अच्युतन मुदलियार

कथा 

मुकुंद कर्णिक 

अच्युतन मुदलियारना आता पुण्यात राहणं नकोसं वाटायला लागलं होतं.नाही म्हटलं तरी जवळजवळ चाळीस वर्षं काढली होती त्यांनी तिथं. डिफेन्स अकाउण्ट्सच्या ऑफिसातून रिटायर झाल्यानंतर रास्ता पेठेतल्या घरात राहायला जाऊन देखील त्याना वीस एक वर्षं झाली होती. रिटायरमेंटनंतर कोईमतूरला आपल्या वडिलोपार्जित घरी जाऊन राहायची आपली इच्छा देखील अच्युतननी सोडून दिली होती पत्नीसाठी. देवकीअम्मांना पुणं फार आवडायचं. आणि विशेषत: रास्ता पेठेतलं घर. शेजारपाजार तमिळियन्सचा होता हे कारण होतंच. शिवाय जवळच्या रोस्टरीमधून सतत दरवळत येणारा दळल्या जात असलेल्या प्युअर कॉफीचा वास त्याना खूप आवडायचा.

अच्युतन  त्यांना म्हणायचेसुध्दा, “तुला कितीही महागातला परफ्यूम आणून दिला तरी तो नको असतो. आता कॉफी पावडर कपड्यांवर शिंपडून जात जा बाहेर फिरायला जाताना. तेवढंच बाकी ठेवलंयस, देवकीअम्मा.” देवकीअम्मा हसून म्हणायच्या, “काही तरी काय बोलता हो? हा वास म्हणजे माझा जीव की प्राण आहे. तुम्हाला काय कळतंय? तुम्हाला आवडत असेल ती चिकोरी की काय त्या बिया मिसळलेली पाकिटातली पुचकट कॉफी. मी वास पण घ्यायची नाही तिचा. ही प्युअर, ताजी दळलेली कॉफी म्हणजे, आ हा हा हा ! आणि अत्तराचं म्हणाल तर द्या ती तुमच्या लेकीला. जावईबापूंना आवडतात ते फवारे अंगावर मारून घ्यायला. मग काय? आणि आपली सरोज पण त्यातलीच. नवऱ्याला आवडतं म्हणून स्वत:ला पण  आवडून घेते. प्रेम करून कल्याणम् (लग्न) केलंय ना !”

सरोजा, अच्युतन आणि देवकीअम्मांची एकुलती एक लाडाची कन्या. एस पी कॉलेजमधून बी ए वुइथ हिस्ट्री केलं आणि तिथंच लेक्चरर असलेल्या श्रीनिवास कुलकर्णीबरोबर प्रेमही! आता, तमिळ नवरा मिळाला नस्ता का? रास्ता पेठ तर उतू जाते आहे तमिळियन्सनी. पण नाही ! महाराष्ट्रीयन गाठला तिनं. देवकीअम्मांच्या मते “तिनं कसलं? त्यानंच ओढलं असणार तिला प्रेमाच्या जाळ्यात”. देवकीअम्मानी रडून घर डोक्यावर घेतलं होतं तेव्हा. अच्युतननी आणि शेजारपाजारच्या लोकांनी कशी तरी समजूत घातली. संमती देण्याआधी मात्र अम्मानी खोदून खोदून विचारून घेतलं, “सरोजा, दारू बिरू पीत नाही न ग तो? आणि सिगारेट? मास मच्छी खाणारा असेल तर बिलकुल करू देणार नाही मी हे कल्याणम्. आधीच सांगून ठेवते.”

पण गंमत बघा, लग्नानंतर महिन्याभरातच जावईबापूनी सासूबाईना इतकं आपलंसं केलं की काही विचारू नका. आणि यथावकाश जेव्हा सरोजाला बाळ झालं, मुलगी, तेव्हा अम्मांच्या आनंदाला पारावार उरला नाही. जावयाविषयी मनात असलेलं उरलसुरलं किल्मिष देखील पार नाहीसं झालं. मुलीचं नाव त्याना मुरुगनदेवाच्या अर्धांगिनीचं ठेवायचं होतं, ‘दैवानाई’. पण महाराष्ट्रीय वाटणारं ‘देवयानी’ ठेवायला त्यांनी नाही म्हटलं नाही. पेथी (नात) देवयानी ही देवकीअम्मा आणि ताता (आजोबा) अच्युतन या दोघांचीही कमालीची लाडकी झाली. पण लाडाकोडात वाढत वाढत ती जेव्हा दहा वर्षांची झाली तेव्हा श्रीनिवास कुलकर्णीना मुंबईमध्ये चांगल्या पगाराची नोकरी चालून आली. मोठा पगार आणि राहायला फ्लॅट मिळणार होता त्यामुळं कुलकर्णी कुटुंबानं पुणं सोडून मुंबईला जायचा निर्णय घेतला.

श्रीनिवासनी ती नोकरी स्वीकारली. आधी जाऊन जॉइन झाले आणि मग कंपनीच्या संमतीनं माटुंगा भागात एक फ्लॅट पसंत करून सरोजा आणि देवयानी ह्या दोघीना घेऊन आले. अच्युतन मुदलियार आणि देवकीअम्मा दोघेही गेले होते लेकीचं नवं घर लावून द्यायला. माटुंगा म्हणजेही मिनी तमिळनाडूच म्हणा ना. त्यामुळं लेक तर खूष होतीच, अम्माना देखील आनंद झाला मुलीचा आणि नातीचा तमिळ संस्कृती आणि भाषेशी संपर्क बनून राहील याचा. आठ दिवस राहून दोघं परतले पुण्याला. पण दोघांचं, विशेषत: अम्मांचं, मन लागेना रास्ता पेठेतल्या घरात. जावई, लेक आणि लाडकी नात, सगळेच जवळ नाहीत हे मोठं कारण झालं अच्युतन आणि देवकीअम्मा दोघांना पुणं नकोसं व्हायला.

अच्युतननी मग पुन्हा एकदा देवकीअम्मांकडं विषय काढला कोईमतूरला जाऊन रहायचा. यावेळी त्याना होकार मिळाला. आठवडयाभरासाठी तिकडं जाऊन घराची डागडुजी करून घेऊन ते परत आले आणि आणखी एक आठवडयानंतर दोघेही रवाना झाले पुण्यातलं आपलं बस्तान उठवून.

कुलकर्णी कुटुंब मुंबईत आणि मुदलियार कुटुंब कोईमतूरमध्ये आनंदानं राहायला लागले. होता होता दहा वर्षं उलटली. श्रीनिवास आणि सरोजा दोघांनाही देवयानीनंतर आणखी एक मूल व्हावं अशी इच्छा होती खरी. देवकीअम्मा आणि अच्युतन दोघंही मधून मधून टुमणं लावत असत सरोजाकडं. परंतु परमेश्वराच्या मनात नव्हतं ते. देवयानी ही एकुलती एक मुलगीच राहिली कुलकर्णी कुटुंबात. श्रीनिवास आणि सरोजानेही ईश्वरेच्छा मान्य केली आणि आणि देवयानीला काहीही कमी पडू न देता वाढवण्यात आनंद मानला.

देवयानी समंजस आणि आईवडिलांवर खूप प्रेम करणारी, त्यांच्या मनाविरुध्द काहीही न करणारी  मुलगी होती. मराठी आणि तमिळ दोन्ही संस्कृतींमधून चांगल्या आचारविचारांचा वारसा घेऊन ती वाढली. रामनारायण रुईया कॉलेजमधून मानसशास्त्र विषय घेऊन बी ए झाली. एका कन्सल्टन्सी फर्ममध्ये नोकरीलाही लागली. सरोजाला, आता देवयानीचं लग्न व्हायला पाहिजे असं वाटायला लागलं. देवयानीनं ते मान्य केलं. आपला आयुष्याचा जोडीदार कसा असावा ह्याबद्दल तिच्या काही अपेक्षा असतीलही, तरीही आईच्या सांगण्यावरून मुलगा तमिळ असला तर उत्तम हेही तिनं मान्य केलं. श्रीनिवासला अर्थातच देवयानीसाठी चांगला मराठी वर शोधायचा होता. पण सरोजाचं मन त्यानं ना आजवर कधी मोडलं होतं ना आताही. त्याचं एक म्हणणं मात्र होतं. “सरू, सासूबाईंनी जसा, मी शाकाहारी, निर्व्यसनी – अगदी सिगारेटसुध्दा न ओढणारा असेन याची खातरजमा करून घेऊन मगच मला पास केलं, तसाच मीही तुम्ही जो कुणी तमिळ ‘वरुङगाल मणमगन’ (संभाव्य वर) शोधाल त्यानं शाकाहारी, निर्व्यसनी, सिगारेट, दारू यांना स्पर्शही न करणारा असं असावं हा आग्रह धरेन. त्याची शैक्षणिक पात्रता, अर्थार्जनाची क्षमता हे मुद्देही तपासणं आवश्यक आहे. आणि आपल्या देवूला त्याच्या घरी काहीही त्रास होता कामा नये ही अट तर असणारच असणार माझी.”

नातीच्या ‘कल्याण संबंधम्” विषयी अच्युतनतातांचं म्हणणंही तेच होतं. आपला नातजावई मराठी नसून तमिळ असणार आहे याचाच त्यांना आणि देवकीअम्माला आनंद झाला.

वरसंशोधन सुरू झालं. मिनी तमिळनाडूमध्ये नायडू, अय्यंगार, पिल्लई, अय्यर वगैरे कुटुंबांमध्ये सरोजाच्या, खरं तर श्रीनिवासच्या, कसोटीला उतरणारी तरुण विवाहेच्छु मुलं सापडणं काही कठीण गेलं नाही. वळसम्मा आणि (आता दिवंगत) माधवन मुपनार यांचा एम कॉम झालेला, सद्गुणी मुलगा आधीरायन हा सरोजा, श्रीनिवास आणि मुख्य म्हणजे देवयानी ह्या तिघांनाही पसंत पडला. आधीरायननंही देवयानीला एकदोन वेळा भेटून, बोलून आपणही ह्या कल्याणसंबंधम् साठी अनुकूल असल्याचं दर्शवलं. मुपनार म्हटल्यावर अच्युतनतातांनी जरा जास्त चौकशी केली. डिफेन्स अकाउण्ट्समध्ये ऑडिट सेक्शनमध्ये सर्वपल्ली मुपनार म्हणून एकजण होता ते त्याना आठवलं आणि मग काय, त्या मुपनारशी काही नातं आहे का मुलांचं ते शोधताना समजलं की आधीरायन हा सर्वपल्ली मुपनारच्या दिवंगत भावाचाच मुलगा होता. आता अच्युतनतातांनी वयोमानामुळं कुरकुरत असलेली कंबर कसली आणि सर्वपल्लीचा शोध सुरू केला. फोनाफोनी करत करत ते पोचले केरळ राज्यातल्या त्रिसुर जिल्ह्यात असलेल्या गुरुवायुर मंदिरापाशी. त्यांचा एके काळचा कलिग सर्वपल्ली देखील आता सेवानिवृत्त होऊन त्रिसुरमध्ये स्थायिक झालेला होता. विष्णुभक्त असल्यामुळं त्यानं गुरुवायुर मंदिराचा परिसर निवडला होता आयुष्याची संध्याकाळ व्यतीत करण्यासाठी.

लाडक्या नातीच्या होऊ घातलेल्या कल्याणम् मुळं उत्साहानं पुन्हा तरुण बनलेले अच्युतन मुदलियार मग पोचले गुरुवायुरला.

सर्वपल्ली मुपनारनाही आनंद झाला आपला जुना सहकारी मित्र भेटल्यामुळं. आधीरायनविषयी त्यांनी सारी माहिती दिली. भाऊ माधवनच्या मरणानंतर आधीरायन आणि वळसम्मा दोघांना आधार त्यांनीच दिला होता. आधीरायननं कल्पना दिली होती त्यांना ‘वरुङगाल मणमगई’ (संभाव्य वधू) देवयानीबद्दल आणि अच्युतनताताप्रमाणे त्यांनाही  आनंद झाला होता. सर्वपल्लीनी आग्रह केल्यावरून अच्युतन दोन दिवस राहिले मित्राकडे. गुरुवायुर मंदिरात देव दर्शन घेऊन त्यांनाही समाधान झालं. मंदिर परिसर आवडला त्यांना. आणि सर्वपल्लीनी कल्याणम् समारंभ गुरुवायुर मंदिरात करावा’ असा प्रस्ताव मांडल्यावर, “मला देखील ते आवडेल; परंतु देवयानीच्या आई वडिलांना आणि खुद्द देवयानीला विचारून सांगतो” असं आश्वासन देऊन ते कोईमतूरला परतले.

आल्या आल्या त्यांनी श्रीनिवासला फोन लावला, सगळा वृत्तान्त सांगितला. सरोजाशी आणि देवयानीशीही बोलले. तिला म्हणाले, ‘देवा, येन् अम्पाना पेथी (माझ्या लाडक्या नाती), ऐक. देवकीअम्मा आणि  मी, दोघंही थकलो आहोत. मुंबईचा प्रवास आता आम्हाला झेपणार नाही. शिवाय मुलाच्या काकांचीही इच्छा आहे की कल्याणम् विधी गुरुवायुर मंदिरामध्ये व्हावा. आम्हालाही आवडेल ते. तेव्हा बघ, विचार कर. अम्मा आणि आप्पा, दोघांशीही बोलून मला काय ते कळव. आणि हे बघ, आप्पांना सांग, म्हणाव निश्चयतारत्तं (वाङगनिश्चय) उरकून घ्या लवकर आणि मग तू ये इकडे दोन तीन दिवस रजा घेऊन. आम्हाला बोलायचंय तुझ्याशी.”

त्यानंतर आठवड्याभरात वाङगनिश्चय झाला. लग्नाची तारीख ठरली तीन महिन्यांनंतरची. लग्न गुरुवायुर मंदिरात करायचं हेही ठरलं. श्रीनिवासच्या नातेवाईकांमध्ये खूप जवळचे असे कोणी नव्हते, ऑफिसातील आणि इतर मित्र जे आवर्जून केरळमध्ये येतील ह्या समारंभासाठी असे थोडेच होते. जे खास होते येण्यासारखे त्यांना तिकडे नेण्याची, इतर सामग्री नेण्याची वगैरे सारी व्यवस्था श्रीनिवास करणार होता. हे सगळं अच्युतनना देवयानीनं कळवलं. तिला स्वत:ला आत्ताच तातडीनं कोईमतूरला जाणं मात्र रजेच्या अभावी शक्य नव्हतं तेही कळवलं. ताता जरा हिरमुसले झाले पण देवयानीनं दोन आठवडयानंतर रजा मिळेल तेव्हा येईन असं आश्वासन दिलं त्यामुळं त्यांना बरं वाटलं.

कबूल केल्याप्रमाणं देवयानीनं सांगितल्या वेळेला आठ दिवसांची रजा मिळवली आणि कोईमतूरला गेली. अच्युतन आणि देवकीअम्मा दोघांनाही इतक्या दिवसांनंतर लाडकी नात आली म्हणून कमालीचा आनंद झाला. देवकीअम्मांना आता अधू झालेली नजर, वाढलेलं वय, वाढलेलं वजन आणि वाढलेला आकार यांमुळं शैथिल्य आलं होतं. त्यामुळं अच्युतनताताच घरची, बाहेरची कामं करत. देवयानीला हे बघून खूप वाईट वाटलं. मग आल्या आल्या तिनं तातांच्या विरोधाला न जुमानता सगळा कारभार आपल्या हातात घेतला. म्हणाली, “ताता, आठ दिवसांचा तर प्रश्न आहे. नंतर तुम्हीच बघणार आहात नेहमीप्रमाणं. मग आता माझं ऐकायचं आणि मला सारं करू द्यायचं. बस्स. मी काही ऐकणार नाही तुमचं.”

त्या रात्री देवकीअम्मा आणि अच्युतनताता खूप एक्सायटेड होते. सर्वपल्ली मुपनार यांनी त्यांच्या घराविषयी, घरातल्या माणसांविषयी, चालीरीतींविषयी जे जे काही सांगितलं होतं ते सारं तातांनी देवयानीला सांगितलं. शिवाय आपल्या घरचे तमिळ रीतिरिवाज, सणवार, देवदेवता, त्यांची उपासना, व्रत वैकल्ये, काय बोलू नि किती बोलू असं झालं होतं त्याना. मध्यरात्र उलटून गेली तरी आता झोपायचंय हे ध्यानात न घेता अम्मा, ताता, दोघे – विशेषत: अच्युतनताता – बोलत, उपदेश करत राहिले. शेवटी देवयानीनंच सांगितलं, “आता पुरे झालं ताता. आय  प्रॉमिस, आय शाल डू ऑल आय कॅन टु बी दि मोस्ट आयडियल मरुमगई (सून).” ताता हसले आणि मग तिघेही झोपायला गेले.

सकाळी सकाळीच मुपनारांचा फोन आला अच्युतनना. आधीरायनकडून त्यांना समजलं होतं देवयानी कोईमतूरला गेल्याचं. तेव्हा तिला गुरुवायूरला घेऊन येण्याची गळ घातली त्यांनी. देवयानीला विचारून तातांनी होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी निघून एक दिवसासाठी येत असल्याचं कळवलं.

सकाळी प्रायवेट गाडी करून तिघंही गुरुवायुरला गेले. तीनएक तासांचा प्रवास होता. आरामात झाला. मुपनार कुटुंबात देवयानीचं मोठ्या प्रेमानं स्वागत केलं गेलं. आधीरायनच्या काकीनं तर तिला आपल्या जवळ बसवून घेऊन मायेनं कुरवाळलं. थोडे ताजेतवाने झाल्यावर सगळ्यांनी गुरुवायुरअय्यप्पाचं दर्शन घेतलं. मंदिराचा परिसर पाहून आणि कल्याणम् समारंभांसाठी मंदिरात कायमस्वरूपी असलेली व्यवस्था तसेच निवासाच्या अद्ययावत सोयी पाहून देवयानीला आनंद झाला. आपलं कल्याणम् अशा सुंदर पवित्र ठिकाणी होणार याचं समाधान झालं. संध्याकाळ झाली तसे ताता, अम्मा आणि देवयानी कोईमतूरला परत जायला निघाले. दिवसभराच्या धावपळीनं ताता थोडे थकल्यासारखे झाले होते त्यामुळंच बहुधा ते फारसं न बोलता गाडीत डोळे मिटून बसून होते.

निघताना मुपनारअम्मानी अडाई आणि दही, चटणी भरून डबा दिला होता. त्यामुळं रात्री घरी पोचल्यावर स्वैपाक करायची आवश्यकता नव्हती. कुणालाच जास्त भूक नसल्यामुळं देवयानी  आणि देवकीअम्मानी एकएक अडाई खाल्ली. ताताना  तेही नकोसं  वाटलं. कपभर दूध आणि एक केळं खाऊन ते म्हणाले, “मला जरा थकल्यासारखं वाटतंय त्यामुळं मी झोपतो” आणि  ते व देवकीअम्मा झोपायला गेले. देवयानी देखील तिला दिलेल्या खोलीत जाऊन अंथरुणावर पडली. तिला पडल्या पडल्या झोप लागली. रात्री दीड वाजायच्या सुमाराला देवकी अम्मानी येऊन तिला जागं  केलं. “देवू, ताताना कसं तरीच होतंय. छातीत दुखतंय  आणि पूर्ण डाव्या हाताला मुंग्या आल्यासारखं वाटतंय म्हणतायत.” देवयानी धावलीच तातांच्या खोलीकडं. तातांची  चाललेली तगमग बघून तिनं त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना फोन केला. लक्षणं ऐकल्यावर त्यांनी ताबडतोब ताताना कार्डियाक हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगितलं. ते स्वत: डायरेक्ट तिथं पोचतो म्हणाले. देवयानीनं शेजारी राहत असलेल्या राधाकृष्णनना उठवलं. त्यांनी  त्यांची गाडी काढली आणि अच्युतनताताना हॉस्पिटलमध्ये नेलं. अम्माला घरीच थांबवून देवयानी त्यांच्याबरोबर गेली. हॉस्पिटलमध्ये  डॉक्टरानी तातांचा ईसीजी काढला आणि तो बघून त्यांना सरळ आयसीयू मध्ये शिफ्ट केलं. तिथं आवश्यक ते तातडीचे उपचार करून डॉक्टर बाहेर आले. देवयानीला आपल्या केबिनमध्ये नेऊन म्हणाले, “मिस्, पेशंटची मेडिकल हिस्ट्री तुम्हाला कदाचित माहिती नसेल तर सांगतो. सात  वर्षांपूर्वीची कंजेस्टिव्ह कार्डियाक फेल्यूअर (सीसीएफ) ची ही केस आहे. त्यात आता अ‍ॅक्यूट मायो कार्डियल इन्फारक्शन (एमसीआय) झालं आहे आहे. आर्टरीमध्ये ब्लॉकेजिसही आहेत.  साध्या शब्दांत सांगायचं तर हा तीव्र हार्ट अटक आहे. सीसीएफ नंतर पेशंटचं आयुष्य पाच ते सात वर्षं इतकंच असतं. त्यात आत्ताचा हा अटॅक. त्यामुळं हे अजून किती दिवस काढतील ते मी सांगू शकणार नाही. ही इज नाईंटी इयर्स ओल्ड. त्यामुळं सर्जरी अ‍ॅडव्हायजेबल नाही. आता मी त्याना ट्रॉम्बॉलाइझ करून सीडेटिव्ह दिलेलं आहे त्यामुळं ते गुंगीत आहेत. शुद्धीवर आल्यानंतर तुम्ही त्यांना भेटू शकाल. बोलतीलही ते तुमच्याशी. पण मी खोटी आशा देऊ शकत नाही. अ‍ॅट द मोस्ट फोर टु फाइव्ह डेज. यू नो व्हाट आय मीन.”

देवयानीला धक्काच बसला हे ऐकून. काय करायचं? कसं सांगायचं देवकीअम्माना? आईला बोलवून घ्यावं काय? तिच्या मनात काहूर उठलं. अच्युतनना शुध्दीवर यायला अजून एक तास तरी लागेल असं नर्सनं सांगितल्यावरून देवयानी आणि राधाकृष्णन घरी गेले. तिनं देवकीअम्माना घाबरत घाबरतच कल्पना दिली. पण आश्चर्य म्हणजे त्यांनी ते सारं शांतपणे ऐकलं आणि म्हणाल्या, “देवू, तू अवघडून घेऊ नकोस. कधी ना कधी हे होणार याची मला कल्पना होतीच. तुझ्या तातांनी गेल्या दोन वर्षांपासून मला हे सगळं समजावून सांगत माझ्याकडून मनाची तयारी करून घेतली आहे. मला खंबीर राहायला तयार केलं आहे. त्यामुळं मी कोलमडून पडणार नाही. दु:ख तर वाटणारच. पण मला वाटतं आपण त्याना धीरानं निरोप द्यायला हवा. सरोजाला फोन करून कल्पना दे आणि मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चल. आपण त्यांच्याजवळ थांबून राहू.”दोघी हॉस्पिटलमध्ये गेल्या आणि आय सी यू च्या बाहेर थांबून राहिल्या. थोड्या वेळाने अच्युतनना शुद्ध आल्याचं नर्सनं येऊन सांगितलं तेव्हा देवकीअम्मा आत गेल्या. तातानी हात वर करून त्याना जवळ बोलवलं. हळू आवाजात म्हणाले, “देवकीअम्मा, तू आलीस ते बरं केलंस. आपली नात देवू लहान आहे. घाबरून गेली असेल. हो ना?”
“तुम्ही नका काळजी करू तिची. कणखर मनाची आहे ती. तुम्ही स्वत:ची काळजी घ्या म्हणजे झालं.” देवकीअम्मानी उत्तर दिलं.
“मला बोलायचंय तिच्याशी. तिला आत बोलव.”

“एका वेळी एकालाच आत येऊ देतात. मी बाहेर जाते आणि तिला पाठवते. पण जास्त बोलू नका.” असं म्हणून देवकीअम्मा बाहेर गेल्या. देवयानी आत आली आणि तातांच्या बेडजवळ उभी राहिली. डोळे डबडबले होते पण तरी हसून तिनं तातांचा  हात हातात घेतला.
“माझ्या लाडक्या देवू, अगं पाणी का आहे तुझ्या डोळ्यात? रडू नको. मी ठीक आहे. तुझ्या कल्याणम् च्या आधी बरा होऊन येतो. प्रॉमिस.”
“बघा हं ताता. वचन देताय तुम्ही मला. पाळायलाच हवंय.”
“अगं ! पाळणार म्हणजे पाळणार. कल्याणम्  समारंभच काय मी तुझा आख्खा संसार बघायला पण येणार आहे तुझ्या घरी. आता हास बघू. तुला डॉक्टरनं  काय सांगितलं मला ठाऊक नाही. पण माझं वचन म्हणजे वचन. आता देवकीला घेऊन घरी जा. आयसीयू तनं बाहेर काढतील मला तेव्हा या.”
‘ठीक आहे ताता. मी विचारते डॉक्टरना कधी स्पेशल रूममध्ये ट्रान्सफर करणार आहेत ते. आणि हो, मी आईला फोन केला होता. ती पण येईल उद्यापर्यंत.” देवयानीनं तातांच्या कपाळावर ओठ टेकले आणि बाहेर गेली.

एक दिवसांनंतर अच्युतनला स्पेशल रूममध्ये ट्रान्सफर केलं गेलं. मुंबईहून आलेली सरोजा आणि देवयानी त्याना बघायला गेल्या. मुलीला बघून अच्युतनना गहिवरून आलं. बराच वेळ नुसता तिचा हात हातात धरून तिच्याकडं बघत राहिले. सरोजालाही रडू आवरलं नाही. कढ ओसरल्यानंतर  लेक आणि वडील भरभरून एकमेकांशी बोलले. इतके की अखेर जवळ बसलेली देवयानी म्हणाली, “ताता, तुमची लेक आली तर लगेच नातीला विसरलात ना?”

ताता म्हणाले, “अगं तुला कसं विसरेन? शक्य आहे का ते? तुला वचन दिलंय तुझा संसार बघायला येणार आहे म्हणून. अगदी या जन्मात जमलं नाही तरी पुढच्या जन्मात तर नक्की येणार. तुझ्याच पोटी मुलगा म्हणून जन्म दे असं सांगणार आहे अय्यप्पाला. म्हणजे जन्मल्यापासूनच बघत राहीन तुझा संसार.” आपल्याच बोलण्यावर अच्युतनताता खूष होऊन हसायला लागले. नर्स, सरोजा आणि देवयानी तिघीही  “आता पुरे, पुरे” म्हणेपर्यंत हसता हसता एकदम थांबले. चेहरा कसनुसा झाला. डाव्या डोळ्याची पापणी लवायला लागली, डावा हात लुळा पडला. नर्सनं दोघींना खोलीबाहेर काढून डॉक्टरना बोलावलं. ताताना ट्रान्झियंट इस्केमिक अटॅक आला होता. डॉक्टरांनी ताबडतोब ट्रीटमेंट सुरू केली. बाहेर आल्यावर त्यांनी सांगितलं, “मिस्टर मुदलियार ट्रीटमेंटला लिमिटेड रिस्पॉन्स देत आहेत. कॅरोटिड आर्टरीत आलेल्या ब्लॉकेजमुळं ब्रेन डॅमेज होण्याची शक्यता आहे. परिस्थिती गंभीर आहे. त्यांच्या मिसेस इथं नाहीत का? त्यांना बोलावून घ्या.” देवयानीने राधाकृष्णनना फोन करून सांगितल्यावर ते लगेच देवकीअम्माना घेऊन आले.

सगळेजण तातांच्या बेडजवळ गेले. ताता कष्टाने अडखळत सरोजाला म्हणाले, ‘सरोजा, ही माझी गोड नात आहे ना देवू …. दैवानाई…. देवयानी, तिचं कल्याणम् आहे दोन महिन्यांनंतर. थाटात कर हं. ही देवकी, देवकीअम्मा, माझी वाघीण तुला मदत करेल.  काळजी नको करू. श्रीनिवासना पण सांग तसं.” इतकं बोलून ते गप्प झाले. बराच वेळ मुकाटयानं देवकीअम्माचा हात आपल्या उजव्या हातात धरून राहिले. आणि मग  अचानक अम्माना म्हणाले, “देवकीअम्मा, आता मी मरणार आहे का ग ?”

“काही तरी बोलू नका ताता. शांत डोळे मिटून पडून रहा बघू तुम्ही.” देवयानी म्हणाली.
चार पाच मिनिटं झाली असतील. तातांच्या हातातून अम्मांचा हात अलगद सुटला. परत पकडायचा त्यांनी प्रयत्न केला नाही. त्यांचाच हात लुळा पडला होता.
नर्सनं बोलवून आणलेल्या डॉक्टरनी ताताना तपासलं आणि म्हणाले, “आय अ‍ॅम सॉरी, ही इज नो मोअर.”

*** 
अच्युतन मुदलियारांना जाऊन पाच वर्षे झाली. देवयानी आणि आधीरायन यांचा विवाह होऊनही जवळजवळ तितकीच वर्षं झाली होती. आता तर त्याना एक गोडसा मुलगाही होता, चार वर्षांचा. चुणचुणीत खेळकर, लाघवी रामानुजन. आधिरायननं माटुंग्यातल्या हेड ऑफिसातून बदली मागून घेतली होती तमिळनाडूमधल्या शाखेत. कोईमतूरपासून जवळच होतं त्याचं ऑफिस. त्यामुळं रहायला अच्युतनतातांच्या घरीच होते तिघंही. देवकीअम्मानाही उतार वयात आधार आणि लाघवी रामानुजनमुळं विरंगुळा मिळावा ह्या दृष्टीनं हा निर्णय घेतला होता सर्वांनी मिळून. सरोजालाही बरं वाटलं आपल्या वयोवृध्द आईकडं बघायला आपली मुलगी असणार आहे म्हणून.गेल्या दोन दिवसांपासून रामानुजनला व्हायरल इन्फेक्शन होऊन ताप येत होता. तापात सारखा चढ उतार व्हायचा. ताप कमी असेल तेव्हा रामानुजन हसायचा, तेही कसनुसं. ताप वाढला म्हणजे निस्तेज, निपचित पडून राहायचा. थोड्या वेळापूर्वी ताप १०४ डिग्री पर्यंत गेला होता. तेव्हा देवकीअम्मा बसून होत्या त्याच्या जवळ, कपाळावर कोलन वॉटरच्या पट्ट्या ठेवत. हळू हळू ताप उतरायला लागला. देवयानीनं थर्मामीटर लावलं, ताप १०२ डिग्रीपर्यंत खाली आला होता. रामानुजनला बसतं करून देवयानीनं स्पंजिंग केलं. देवकीअम्माला बिलगून रामानुजन मुकाटयानं बसला होता. देवयानीनं विचारलं, “बरं वाटतंय का बेटा? थोडी पेज पिशील का? आणू?” रामानुजननं  नको अशा अर्थानं डोकं हलवलं आणि तिचा हात धरून आपल्या जवळ खाली बसवलं. दोन तीन मिनिटं तशीच गेली आणि अचानक रामानुजाननं देवकीअम्मा कडं बघितलं आणि म्हणाला, “देवकीअम्मा, आता मी मरणार आहे का ग?”

देवयानीनं हे वाक्य ऐकलं आणि तिचं काळीज लक् कन्  हाललं. ‘चार वर्षांचं मूल, मरण म्हणजे काय हे कळण्याचं वय नाही. आणि हे शब्द?’ डोळ्यात उभं राहिलेलं पाणी निपटत देवकीअम्मा रामानुजनला थोपटत म्हणाली “ना, येन् कोळ्ळु पेरन ( माझ्या लाडक्या नातवा ), असं बोलू नकोस.”
देवयानीच्या डोळ्यासमोर अच्युतनतातांचा हॉस्पिटलमधला अखेरचा दिवस उभा राहिला. आणि ती आवेगानं रामानुजनला मिठी मारून पुटपुटली, “नाही ताता, मी जाऊ नाही देणार तुम्हाला या वेळी. तुम्ही वचन दिलंय मला, माझा आख्खा संसार तुम्ही बघणार आहात म्हणून. आता कुठं  सुरुवात झाली आहे.”

*** *** ***
– ©️ मुकुंद कर्णिक 
karnik.mukund@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आजची कविता
वर्षा पेठे

उभा जन्म होवो वारी

वाट संपावी सत्वरी
वेगे पोचावे मंदिरी
प्रेमे चढावी पायरी
भाव दाटले अंतरी

गोड नामाची माधुरी
सदा असावी अधरी
माय दिसता गाभारी
व्हावे हृदय पंढरी

भेटताना ऊराऊरी
श्वासे भरावी कस्तुरी
देह व्हावा एकतारी
विठू वसावा अंतरी

विसरून दुःखं सारी
जीव सुखावे माहेरी
शुद्ध भावाची शिदोरी
द्यावी निघता माघारी

किती झाल्या खेपा तरी
पुन्हा वाटे यावे दारी
एक मागणे श्रीहरी
ऊभा जन्म होवो वारी

– © वर्षा पेठे
vnpethe@gmail.com

विठ्ठल रखुमाई ( चित्र ) – अ‍ॅड क्रांती आठवले पाटणकर

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
कै. चंद्रचूड वासुदेव : एक कसलेले वादक

मोहन कान्हेरे 

कै. चंद्रचूड घनःश्याम वासुदेव ( २३ सप्टेंबर १९३४ – २९ जून २०००)

शांत, शीतल, मितभाषी कै.चंद्रचूड वासुदेव या थोर संवादिनी वादकाबद्दल लिहिताना मुख्यत्वे पुलंच्या संवादिनीशी संबंधित आठवणी येत आहेत …. आधी त्या सांगतो आणि नंतर मुख्य विषयाकडे वळतो
पुलंनी गोविंदराव पटवर्धन यांच्या सत्कार समारंभात  काढलेले गौरवोद्गार…… ते सर्व भाषणच आज आठवत आहे.संवादिनी वादकांच्या अनेक गमती त्यांनी सांगितल्या आहेत.

एक छोटासा किस्सा सांगावासा वाटतो. पुलंनी लिहिलंय की ते जेव्हा चाळीत राहत होते तेव्हा त्यांच्या शेजारी एक सत्यभामाबाई राहत होत्या. बाईंना पेटीवादनाची खूप हौस होती, पण तेवढी कला त्यांच्या बोटात उतरत नव्हती. सूरपट्टी शोधत शोधत त्या वादन करीत.  त्यांच आवडतं गाणं  ‘ सत्य वदे वचनाला नाथा ‘. दुपारी घरातली कामं करून झाली की त्या त्यांच्या घरातल्या पलंगावर पेटी वादन करायला बसत…… पहिलं गाणं अर्थातच सत्य वदे वचनाला नाथा……

पुलनी लिहिलंय, सत्यभामाबाईंचं वादन म्हणजे आपली करमणूक……
त्या जेव्हा पेटीवर  ‘सत्य ‘ शोधायला लागत तेव्हा त्यांचा गळा नाथापर्यंत पोहोचलेला असे.

गोविंदराव पटवर्धन यांचा भव्य सत्कार रवींद्र नाट्य मंदिरात झाला, तेव्हा मला जायची संधी मिळाली होती. सभागृह खचाखच भरलेलं होतं. मधल्या रिकाम्या जागेत रसिक श्रोते मांडी घालून खाली बसले होते. सत्कार समारंभ छानच झाला. सर्वांचीच भाषणं आटोपशीर आणि रंजक झाली.

मध्यंतरानंतर पुलंना गोविंदरावांच्या बरोबर संवादिनी वादनाच्या जुगलबंदीला बसावं लागणार होतं….. टाळ्यांच्या गजरात दोघेही मंचावर विराजमान झाले. वादनापूर्वी पुलंनी हातात माईक घेतला आणि श्रोत्यांना सांगितलं की अनेकदा मंचावर लोकांच्या पोटात भीतीने गोळा येतो, पण आज गोविंदरावांच्या बरोबर वादन करायचं म्हणजे माझ्या बोटात गोळा आला आहे…

चंद्रचूड वासुदेव यांच्याबद्दल मला माहित असलेलं आज जरा विस्ताराने सांगतो. विस्ताराने अशा करता की त्यांच्याबद्दल एरव्ही फारसं कुठे काही छापून आलं नाही. त्यांच्या कलाजीवनाचा कुठेही विशेषत्वाने गौरव  केला गेला नाही.

अलीकडे मी वाचलेला डॉक्टर अशोक रानडे यांचा चंद्रचूड यांच्यावरील लेख मात्र खूपच वाचनीय आहे. त्यांनी काही मार्मिक नोंदी केल्या आहेत.ते म्हणतात  ‘ नाट्यसंगीताची वळणे घेत घेत वासुदेवला मार्ग सापडला आणि रसिकांना वासुदेव!…….

त्यांचं वैशिष्ट्य असं की लय, शब्द आणि सुरावटींचे बारकावे वादनातून ते व्यक्त करीत. कौशल्य आणि बुद्धी याचा सुंदर मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झाला होता. गायकाला पेटीवादक साथ करतो तेव्हा ते काम अति संयम ठेवून करावं लागतं. स्वतःची विद्वत्ता दाखवून गायकावर कुरघोडी करायची नसते. गायक जेव्हा गातो तेव्हा मधली जागा किंवा आवर्तने पेटी वादक, तबलावादक नजाकतीने भरून काढतात. ही जागा जेव्हा भरायची असते तेव्हा गायकाची शैली समजून घेऊन भरणा करावा लागतो. चंद्रचूड वसुदेव हे काम अतिशय समजून करीत असत.

त्या त्या गायकाला योग्य अशी साथ संगत ते करायचे हे हा त्यांचा विशेष!

चंद्रचूड यांच्याकडे उत्तम स्मरणशक्ती होती. सहा महिन्यांनी किंवा आठ महिन्यांनी तालमीला हजर झाले तरी त्यांना चाल आणि मधल्या जागा व्यवस्थित आठवत असत. त्यांना मनपसंत असलेलं संगीत तर ते वाजवीत असत तथापि अन्य कलाकारांची शैली किंवा अन्य देशातल संगीत सुद्धा ते अभ्यासात असत. गायक जर चांगलं गात असेल तर त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसत असे आणि तो जर असहनीय गात असेल तर वासुदेव यांचा चेहरा अत्यंत गंभीर दिसत असे.

डॉक्टर अशोक रानडे यांनी सांगितले की एकच दुर्गुण या कलाकाराचा होता तो म्हणजे त्याला महत्त्वकांक्षा नव्हती….आपल्या कला साधनेमध्ये ते व्यग्र असायचे.

त्यांच्या सहभागामुळे अनेक कार्यक्रम उभे राहिले आणि गुणवत्ता टिकून राहिली. त्यांनी गीताला चाल देताना त्या गीताची गती डौल नजाकत आणि रुबाब लक्षात घेतला व तशी चाल केली. उत्तम सारंगीवादकाला सारंगीतले सूर ऐकू तर येतातच पण ते दिसायलाही लागतात असं म्हटलं जातं. वासुदेव यांच्या वादनामुळे चांदण स्वरात लपलेला गंध, दरवळायला लागतो अशी अलंकारिक भाषा लक्ष्मण जोशी यांनी वापरली आहे.

चंद्रचूड वासुदेव यांना आपुलकीने सर्वजण भाऊ म्हणत. त्यांच्या वादनाची सर्वत्र खूप तारीफ होत असे. दूरदर्शनवर सुहासिनी मुळगावकर यांनी अनेक कार्यक्रम सादर केले. त्यातल्या संगीताच्या कार्यक्रमांसाठी त्या आवर्जून भाऊंनाच बोलवीत.अजित कडकडे यांच्या २०० मैफिलीना भाऊंनी साथ संगत केली आहे. कार्यक्रमाच्या आधी एक तास ते सभागृहात हजर राहत असत.

मोगुबाई कुर्डीकर, कुमार गंधर्व, बसवराज राजगुरू, वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, ज्योत्स्ना भोळे, प्रभा अत्रे, सुरेश हळदणकर अशा नामवंतांबरोबर भाऊंनी संवादिनीवर अनेक कार्यक्रमातून साथ संगत केली आहे. अनेक गद्य नाटकांना पार्श्वसंगीत दिलं आहे. त्यांच्या अनेक रचनांपैकी  ‘गावत मन हरी गान ‘ ( तोडी अंग ) आणि सोड रे पदरा ( रामकली अंग ) यांचा खास उल्लेख केला जातो.

भाऊंची आठवण म्हणून दर वर्षी गिरगांवातील साहित्य संघामध्ये तीन-साडेतीन तासाचा कार्यक्रम सादर केला जातो. हा कार्यक्रम विनामूल्य असतो. प्रकाश वगळ हे संवादिनी वादक पुढाकार घेतात, आणि खूप कष्ट करतात, तेव्हा तो कार्यक्रम रसिकांना ऐकायला मिळतो.भाऊंचे सुपुत्र निषाद वासुदेव आणि त्यांची स्नुषा ( सून ) शर्वरी यांचा आयोजनात मोठाच सहभाग असतो.

आज भाऊ आपल्यात नसले तरी रसिकांच्या सुगंधी स्मृतीमध्ये ते कायम असणार ..

***
थोर संवादिनी वादक चंद्रचूड वासुदेव यांच्याबद्दलची थोडीशी माहिती उपलब्ध झाली आहे. ती संकलित माहिती थोडक्यात रसिक वाचकांकरता  सादर करतो.चंद्रचूड यांच्या घरामध्येच संगीत होतं. वडील दिलरुबा वाजवत. त्यांच्या आई नाट्यसंगीताच्या चाहत्या होत्या. कलेला प्रोत्साहन देणारं गुणग्राही असं हे कुटुंब.
.
वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी, १९४४ साली संगीत ‘विद्याहरण’ हे नाटक पाहायला लहान वयातले चंद्रचूड गेले होते. गिरगावातल्या साहित्य संघात हा नाट्य प्रयोग झाला. पडदा उघडल्यावर नांदी सादर केली गेली. तेव्हा जे ऑर्गन वादन या छोट्या मुलाने ऐकलं त्याने तो प्रभावित झाला. आणि मग हे वाद्य आपण शिकायचं. आधी पेटीवादन शिकायचं असं त्यांच्या मनात आलं.

सुरुवातीला बाबुराव चौगुले यांच्याकडे प्राथमिक शिक्षण झालं. मधुबाला चावला या गायिकेला पेटी वादनाची साथ संगत त्यांनी केली.
पुढे मग एक फार मोठा गुरु त्यांना लाभला. त्या गुरुचं नाव मधुकर पेडणेकर. सर्वजण त्यांना पी मधुकर म्हणत. अतिशय वेगळ्या ढंगाचं, शैलीदार वादन ते करीत. त्यांच्याबद्दल संगीत क्षेत्रामध्ये खूप आदर होता. त्यांच्या नावाचा दबदबा होता. ते लहरी होते पण प्रेमळ होते,असं चंद्रचूड यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.

‘कुलवधू’ नाटकात साथ संगत करण्याची पहिली संधी चंद्रचूड यांना मिळाली. ‘ बोला अमृत बोला ‘ हे नाट्यगीत ज्योत्स्ना भोळे यांनी गायलं तेव्हा चंद्रचूड यांची ऑर्गन साथ ऐकून त्या प्रभावित झाल्या. नाटक संपल्यानंतर त्यांनी या तरुण वादकाचं खूप कौतुक केलं होतं.

आकाशवाणी आणि दूरदर्शनवर चंद्रचूड वासुदेव यांना बरीच संधी मिळाली ..

सुहासिनी मुळगावकर यांना हाच कलाकार साथ संगतीला हवा असे. गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या गायनालासुद्धा सथ करण्याचं भाग्य त्यांना लाभलं होतं.
काही नाटकातून अभिनय करण्याचीसुद्धा त्यांना संधी मिळाली. ‘सुंदर मी होणार’, ‘तो मी नव्हेच’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘महाराणी पद्मिनी’ अशा नाटकांचा उल्लेख करता येईल. काही नाटकांचे संगीतदिग्दर्शन तबीयतीने त्यांनी केलं. काही नाटकांना पार्श्वसंगीत त्यांनी दिलं.

प्रपंचामध्ये त्यांना कृपालिनीताईंची छान साथ मिळाली. त्यांचे सुपुत्र निषाद हे हौसेने पेटी वादन करतात. मॅनेजमेंट विषयात ते उच्चविद्याविभूषित आहेत आणि एका खाजगी कंपनीमध्ये खूप मोठ्या पदावर काम करीत आहेत.

आपल्या सगळ्यांना कुतूहल असेल, वासुदेव कुटुंबीय कुठे राहतात  ठाकूरद्वार नाक्यापासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर त्यांचं अतिशय नीटनेटकं आणि छान घर आहे. मला त्यांच्या घरी जायची दोन-तीन वेळा संधी मिळालेली आहे. निगर्वी आणि साधी माणसं आहेत……

[ प्रकाशचित्रे : श्री. निषाद चंद्रचूड वासुदेव यांच्या सौजन्याने.]- ©️ मोहन कान्हेरे.

mohankanhere@yahoo.in
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
निसर्गातील उपेक्षित

डॉ. उमेश करंबेळकर 
४.    
गोगलगाय [ भाग १ ] 


श्रावण महिन्यात रानात, शेतात, बागेत हिंडताना उन्हात पांढरी काचेसारखी रेषा चकाकताना दिसते. नीट निरखून पाहिल्यास त्या रेषेच्या टोकाला मातकट रंगाचा बोटभर लांबीचा एक प्राणी दिसतो. त्याच्या शरीरातून जो श्लेष्म पाझरतो तो उन्हात चकाकत असतो. हा प्राणी म्हणजे गोगलगाय.
गोगलगायींचे दोन प्रकार आढळतात. पाठीवर शंख असलेले आणि पाठीवर अत्त्यंत लहान किंवा अजीबात शंख नसलेले. पाठीवर शंख किंवा कवच असलेल्या गोगलगायींना स्नेल म्हणतात तर शंख नसलेल्या गोगलगायींना स्लग असं म्हणतात.गोगलगायी स्नायुपादांच्या मदतीने घसरत पुढे सरकतात. स्नायुपादातून श्लेष्म स्रवत असल्यामुळे घर्षणाचा अडथळा कमी होतो आणि जमिनीवरील टोकदार वस्तूंपासून संरक्षण होतं. गोगलगायींचे पाय दिसत नाहीत आणि तरीही त्या हालचाल करतात. यावरून गोगलगाय आणि पोटात पाय अशी म्हण तयार झाली. जो माणूस वरून दिसायला साधाभोळा पण आतून कपटी कारस्थानी असतो त्याच्या संदर्भात ही म्हण वापरली जाते.

ह्या भागात स्लगसंबंधी माहिती घेऊ.

बिन शंखाची गोगलगाय (slug )

खरं म्हणजे बिनशंखाच्या गोगलगायींना म्हणजे स्लगना स्वतःचं रक्षण करण्यासाठी शंखासारखा अवयव नसतो. त्यांच्या शरीरातील चिकट द्रव त्या त्यांच्या वाटेला जाणाऱ्या मुंगी, मुंगळ्यांसाऱख्या कीटकांच्या अंगावर सोडतात. ह्या द्रवात तो अडकून पडतो. अशा तऱ्हेने ह्या गोगलगायी स्वतःचं रक्षण करतात. अर्थात पक्ष्यांसारख्या मोठ्या शत्रूविरुद्ध त्याचा काही उपयोग होत नाही. असं असलं तरी उत्क्रांतीमध्ये महाकाय डायनोसोर नष्ट झाले पण गोगलगायी पाचशे कोटी वर्षांपासून तग धरून आहेत.

गोगलगायींची हालचाल अत्यंत मंद असते. त्यांचं शरीर मऊ, बुळबुळित असतं. त्यांच्या पाठीवर कोठेही चिमट्याने दाबले तर त्यातून चिकट द्राव बाहेर येतो. तो बिनविषारी असतो परंतु त्यामुळे अनेकांना गोगलगायींची किळस वाटते.

गोगलगायीत नर आणि मादी अशी प्रजोत्पादनाची लिंगं असतात. रानातल्या दगडांखाली, पालापाचोळ्यात त्या अंडी घालतात. ढिगाऱ्यातल्या उबेने अंडी उबतात. पावसाळ्यात वाहून आलेल्या पाला पाचोळ्याच्या ढिगाखाली गोगलगायी मोठ्या संख्येने आढळतात. स्लग गोगलगायींचा रंग मातकट असतो. या गोगलगायी पक्ष्यांची विष्ठा, पालापाचोळा खातात. कबुतराप्रमाणे जेथून आल्या तेथे परत जाण्याचा त्यांचा स्वभाव असतो. ह्याला घरपरतीची भावना किंवा होमिंग इन्स्टिंक्ट असं म्हणतात.

बहुतांश गोगलगायी निरुपद्रवी असतात. फार थोड्या आकाराने मोठ्या असलेल्या गोगलगायी शेतीचं व फळबागांचं नुकसान करतात. आपल्या बागेतील पालापाचोळा खाऊन जगणाऱ्या गोगलगायी पुन्हा मातीत मिसळून जातात आणि जमीन समृद्ध करून आपल्यावर उपकार करतात.

अनेक जण आपल्या बागेतील पालापाचोळा एकत्र करून जाळून टाकतात. हे पर्यावरण विरोधी कृत्य आहे. त्यामुळे हवेचं प्रदूषण तर होतंच शिवाय अनेक पोषकद्रव्यंही नष्ट होतात. त्याच बरोबर हल्ली बागेतील चिखलाने पाय खराब  होऊ नयेत म्हणून तेथे पेव्हर ब्लॉक बसवले जातात.

याचाही गोगलगायींच्या संख्येवर परिणाम होतो. त्यामुळे गोगलगायी शहरातून दिसेनाशा झाल्या आहेत.

वास्तविक आपल्या बागेतील जमीन समृद्ध करणाऱ्या गोगलगायींचं स्वागत करायला हवं.

[ प्रकाशचित्र विकिपीडियावरून साभार ]
– ©️ डॉ. उमेश करंबेळकर
umeshkarambelkar@yahoo.co.in
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
विनोबा विचार पोथी

हेमंत मोने 
क्रमांक ६५ दान हे परिग्रहाचे प्रायश्चित्त आहे म्हणून त्यात अभिमानाला अवकाश नाही.

दान हा शब्द “दा” या धातूपासून बनला आहे. देणे आणि कापणे असे या धातूचे दोन अर्थ होतात. आपल्यातले कापून दुस-याला देणे म्हणजे दान. आपल्याला पेढा हा प्रसाद म्हणून मिळाला; आपण त्यातला अर्धा शेजारच्या माणसाला दिला तर ते दान होईल. दान म्हणजे समविभाजन असा अर्थ शंकराचार्यांनी केला आहे.

विनोबा जमीनधारकांना जमिनीचा सहावा हिस्सा मागत. लोक तसा सहावा हिस्सा देऊनही टाकीत. त्यामुळे आपण धर्मकार्यातून मोकळे झालो असे त्यांना वाटे. आपल्या प्रत्येकाकडून काही ना काहीतरी संग्रह होतो. धनाचा संग्रह करण्याची वृत्ती तर सर्वसामान्यपणे दिसून येते. नाव चालविण्यासाठी पाण्याची गरज आहे परंतु पाणी नावेच्या खाली असायला हवे; याप्रमाणे धनाची, संपत्तीची गरज आहे ती घरात नव्हे, तर समाजात. घरात संपत्ती वाढण्यात धोका आहे. म्हणून ती समाजात वाटली गेली पाहिजे. संत कबीर नावेच्या उदाहरणाने हेच आपल्याला सांगतात. ते म्हणतात, ” पानी बाढो नाव मे, घर मे बाढो दाम, दोनो हाथ उलीचिये, यही सयानो काम.”

विनोबा म्हणतात, विवाहाने तुम्ही बांधले जाता आणि त्यात आपले कल्याण समजता. तसेच “दाना”सारख्या धर्मकार्यात नित्य बांधले जाण्यात कल्याण आहे.

एकदा काही खाल्ले तर त्यामुळे खाण्यातून सुटका होत नाही. ही शरीरासाठी फायद्याची गोष्ट आहे हे आपण जाणतो. म्हणून आपण रोज भोजन करतो. रोज स्नान करणे, भोजन करणे, झोपणे हे नित्यकर्म आहे तसे दानही नित्य कर्म आहे. त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. भोगामुळे जी मलिनता येते ती धुण्यासाठी रोज दानरूपी स्नान अवश्य करायला हवे.

समाजात सतत दानाचा प्रवाह वाहत राहणे हा सामाजिक दृष्टीने दानाचा अर्थ आहे. याचे उत्तम उदाहरण आपले शरीर आहे. हात लाडू उचलतो, तो जिभेवर ठेवतो, चर्वणानंतर जीभ तो पोटात ढकळते. पोट जर स्वार्थी बनले आणि लाडू त्याने स्वत:पाशी ठेवून घेतला तर शस्त्रक्रिया करण्याची पाळी येईल. परंतु पोट त्याला पचवून, रक्त बनवून शरीरात सगळीकडे पाठवून देते. अशा त-हेने शरीराचा प्रत्येक अवयव स्वार्थी नसून देह परायण असतो. प्रत्येक अवयव स्वार्थी बनला तर भोजन संपलेच.

लहानपणापासून आपल्याला आईवडिलांनी वाढवले, आपले शरीरिक, मानसिक पोषण केले. समाजाने शिक्षण दिले, चरितार्थाचे साधन दिले, या सर्वांचे आपल्यावर उपकार आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. “दान” ही त्यांच्या उपकाराची, समाजाचे ऋण अंशत: फेडण्याची संधी आहे. पुण्यकर्म आहे. म्हणून आपण स्वत:ला उपकारकर्ता समजू नये. ते आपले कर्तव्य आहे. कर्तव्यपूर्ती ही अभिमानाची गोष्ट आहे का? त्यामुळे दानात अभिमानाला जागाच नाही.

– ©️ हेमंत मोने.

hvmone@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
मुक्काम पोस्ट गुरुग्राम, हरियाणा
प्रिय वाचक मित्रांनो,दि. १५ मे २०२३ च्या ‘मैत्री’च्या अंकात  ” मुक्काम पोस्ट गुरुग्राम, हरियाणा ”  या शीर्षकांतर्गत माझे अनुभवकथन प्रसिद्ध झाले होते.
त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एकत्रित प्रकाशचित्राचा मी उल्लेख केला होता. काही वाचकांनी ते प्रकाशचित्र पहायची उत्कट इच्छा व्यक्त केली.
आणि मग ‘मैत्री’ परिवारातल्या सौ. स्वाती वर्तक यांनी मला ते प्रकाशचित्र पाठवले. जिज्ञासूंसाठी सोबत ते प्रकाशचित्र सादर करत आहे. धन्यवाद.

मोहन कान्हेरे
mohankanhere@yahoo.in
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
नभ मेघांनी आक्रमिले… !

महाराष्ट्रात यंदा पावसाळा लांबला आहे. २३-२४ जून २०२३ पासून मोसमी वारे दाखल झाले असून लवकरच पाऊस सुरू होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. आभाळ मेघाच्छादित असले तरी वर्षासरी कोसळत नाहीत असे आढळत आहे. मात्र २८ जून रोजी काही तास वर्षाधारा बरसल्या. पावसकराची आतुरतेने प्रतीक्षा करत असलेल्या आमच्या मित्रांकडून आलेली प्रकाशचित्रे :- .
– प्रदीप अधिकारी, तळेगाव दाभाडे
@@@
–  वर्षा पेठे, टेंभरे
@@@@@@@@@@@@@@@@@
 
हत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@

अक्षर साहित्यातील विनोबांचे योगदान

हेमंत मोने

‘महाराष्ट्र धर्म’

अध्ययन आणि अध्यापन हे तर विनोबांच्या जीवनाचे सूत्र. १९२१ साली एप्रिल महिन्यात विनोबा वर्ध्याला गेले आणि विनोबांच्या नेतृत्त्वाखाली तिथे सत्याग्रह आश्रम सुरु झाला. विनोबांचा मुख्य भर प्रार्थना आणि तकली उपासनेवरच होता. प्रार्थना म्हणजे वाङ्मय उपासना आणि तकलीवर सुत कातणे ही कर्ममय उपासना.उपासनेचे कर्म या ऐवजी कर्माची उपासना हा संदेश विनोबा आपल्या दैनंदिन जीवनातून देत होते. आश्रमात विनोबा उपनिषदे, शंकराचार्यांचे गीताभाष्य यावर वर्ग घेत, प्रवचन करीत. परंतु कोणीही त्याची टिपणे काढली नाहीत. लिहिण्यापेक्षा जिरवून आणि पचवून टाकलेले विचार आचरणात आणण्यावर विनोबांचा भर असे. विनोबा म्हणजे ज्ञानाची गंगाच. तिचा लाभ स्थळ आणि काळ या दृष्टीने व्यापक व्हावा असे जमनालाल बजाज, श्रीकृष्णदास जाजू इ. मंडळीना वाटे. या सर्व मंडळींच्या विनंतीचा फायदा झाला. विनोबांनी लेखणी उचलली, त्यातून सुरु झाले ते “ महाराष्ट्र धर्म “ नावाचे मासिक.

वयाच्या २८ व्या वर्षी विनोबा लिहिते झाले आणि पुढे ५० वर्षे त्यांचे विदग्ध वाङ्मय लोकांसमोर येऊ लागले. विनोबांच्या या अक्षर वाङ्मयाला अध्यात्माची बैठक असली तरी ते सामाजिक, राजकीय, आर्थिक या सर्व क्षेत्राना स्पर्श करते. ‘महाराष्ट्र धर्म’ हे प्रथम मासिक होते; विनोबांनी या मासिकात उपनिषदांवर चार दीर्घ लेख लिहिले. विनोबा म्हणतात की उपनिषद हे पुस्तक नसून “ प्रातिभ दर्शन “ आहे. पुढे जून १९२४ पासून महाराष्ट्र धर्म हे साप्ताहिक म्हणून निघू लागले. साधारण तीन वर्षे ते अखण्डितपणे प्रकाशित होत राहिले. त्यामध्ये विनोबांचे २२२ लेख प्रसिद्ध झाले. त्यातील ४० लेखांचे संकलन पुढे” मधुकर “ या नावाने पुस्तकरुपात १९३६ साली प्रसिद्ध झाले. २०१४ पर्यंत या पुस्तकाच्या १८ आवृत्या प्रसिद्ध झाल्या असून ४५ हजार प्रती वितरीत झाल्या आहेत.

विनोबांची विद्वत्ता शब्दप्रभुत्व आणि यथोचित संदर्भ शोधण्याची कला येथेही दिसून येते.आत्मनिवेदन या पहिल्या लेखात विनोबा म्हणतात—भक्ती संप्रदायात आत्मनिवेदन शेवटी येत असले तरी पत्रकाराच्या संप्रदायात ते पहिल्या प्रथम येते कारण भक्ताचे काम आतल्या देवाला जागवण्याचे आणि पत्रकाराला बाहेरच्या देवाला जागवण्याचे असते. परंतु आतला देव जागवल्याशिवाय बाहेरचा देव जागविणे शक्य नाही.

समन्वयवादी दृष्टी आणि साम्यसूत्रे

ओरिसाच्या पदयात्रेत गीतेवरील १०८ साम्यसूत्रांची संस्कृत रचना केली. त्यातील १८ सूत्रांवर कर्नाटकच्या पदयात्रेत पदयात्रीनसमोर साम्यसूत्र विवरण अशी प्रवचनेही दिली. यातील एक सूत्र आहे “शुक जनकयो: एक: पन्थ:” या सूत्राच्या विवेचनातही विनोबांची समन्वयवादी दृष्टी दिसते. शुक संन्यासी तर जनक कर्मयोगी. ही दोन व्यक्तीत्वे घेऊन गीता रहस्यात वाद निर्माण केला आहे. पण अकर्मी कर्म पाहणारा तो संन्यासी आणि कर्मी अकर्म पाहणारा तो कर्मयोगी असा अर्थ गीतेला अभिप्रेत आहे. म्हणून शुक आणि जनकाची एकता आपण लक्षात घेतली पाहिजे असा विनोबांचा समन्वयवादी दृष्टीकोण आहे. जी तत्त्वज्ञाने आत्म्यावर अवलंबून आहेत ती आणि जी परमेश्वराच्या कृपेचे आवाहन करतात ती तत्त्वज्ञाने या दोन्ही प्रकारच्या दर्शनांचा समन्वय  झाला पाहिजे असे विनोबांना वाटत होते. अनेक वर्षांच्या निदिध्यासाचा हा परिणाम होता असेच म्हणावे लागेल. वेदांत आणि बौद्ध यांच्या अंतिम ध्येयात समानता आहे असे विनोबांना वाटत होते.

वाद घालून वाद टाळणे विनोबांना पसंत नाही. गीतेतील स्थितप्रज्ञ   लक्षणातील शेवटचा फलश्रुती सांगणारा जो श्लोक आहे त्याच्यावरील भाष्यात विनोबांनी हा समन्वय कसा साधला आहे ते पहा.

तो श्लोक असा——अर्जुना स्थिती ही  ब्राम्ही पावता न चळे पुन्हा !
टीकुनी अंतकाळीही ब्रह्म निर्वाण मेळवी !
स्थितप्रज्ञाची स्थिती कायम स्वरूपी असते ती प्रयासाने टिकवावी लागत नाही हा याचा सोपा अर्थ.

यावर विनोबांचे भाष्य असे —- बौद्धानी यातला ब्रम्ह शब्द काढून फक्त निर्वाण शब्दच स्वीकारत बौद्धाना निषेधक भाषा आवडली एवढाच याचा अर्थ.मनुष्याने आपलेपणा सोडावा अहंतेचे मडके फोडून टाकावे एवढ्याचा सूचक हा निर्वाण शब्द आहे. या उलट वैदिकांना विधायक भाषा आवडली. वैदिकांना वाटले की मोक्ष अभावरुप म्हणण्यापेक्षा भावरूप म्हणणे योग्य. आम्ही नाहीसे झालो, शून्य झालो म्हणण्यापेक्षा आम्ही व्यापक झालो, अनंत झालो असे म्हणणे बरे असे वैदिकांना वाटले. विनोबा असे सच्चे समन्वयवादी आहेत. विनोबा म्हणतात की भाषेचे स्वरूपच असे असे विलक्षण आहे की ती एका बाजूने अर्थ समजावून देते तर दुस-या बाजूने गैरसमज निर्माण करते. विधायक आणि निषेधक दोन्ही भाषांचे भाव लक्षात घेवून रुचेल ते स्वीकारावे. सर्वंकष आणि मौलिक आकलन नि विवेचन संक्रमित करू शकणारी शब्दसिद्धी असल्यामुळेच विनोबा हे भावणारे भाष्य करू शकले.

अध्यात्मिक संपत्तीचे वारस

भक्ती मार्गाचे ज्ञानेश्वरी, भागवत, तुलसीरामायण, तुकाराम गाथा इ. उच्च कोटीचे ग्रंथ विनोबांनी आयुष्यभर अभ्यासले, हृदयात साठवले, यात विनोबांचे मोठेपण आहेच. पण विनोबांचे ज्ञान दातृत्व एवढे की ते ग्रंथ पचवून हा ज्ञानसंग्रह विनोबांनी त्याचा आशय आणि भाव कायम राखून मुक्त हस्ते वाटून टाकला. वेदांचे अध्ययन सतत पन्नास वर्षे  झाले त्यातून ऋग्वेद सार हा ग्रंथ तयार झाला. यात १३१९ रुचा (मंत्र) आहेत.ऋग्वेदातील मंत्र संख्येचा हा आठवा हिस्सा आहे.

विनोबांनी निवड केलेले मन्त्रांचे रचनाकार कोण असतील ? ते २५० ऋषींचे मंत्र असून त्यात १९ स्त्रियांच्या मंत्रांचाही समावेश आहे.
अष्टादशी हा निवडक उपनिषदांवरील  सारग्राही ग्रंथ. काही मुख्य उपनिषदातील वाक्यांचा ब्रह्मसूत्र भाष्यात शंकराचार्यानी उपयोग केला.अशा अठरा उपनिषदांवरील एकूण सातशे छत्तीस श्लोकांचा अर्थ सांगणारे हे चयन आहे.

एकनाथांच्या भागवताने गीतेच्या दुधात मधाची भर घातली आहे हा विनोबांचा अभिप्राय.त्यातील एकादश स्कंध विशेष प्रसिद्ध. या स्क्न्धातील १५१७ श्लोकांपैकी साररुपात ३०६ श्लोक निवडून “ भागवत धर्मसार “ तयार झाले. ओरिसाच्या पदयात्रेत जगन्नाथदासाच्या उडिया भाषेतील भागवताचेही विनोबा अध्ययन करीत. पद यात्रीनबरोबर संवाद साधला जाई. त्यातील ९३ श्लोकांवर विनोबांनी प्रवचने केली.

संतांची भजने

ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास या संत पंचकाचा अभ्यास तर विनोबांनी शालेय जीवनातच केला. परीक्षेत प्रथम क्रमांक आला तेव्हा पारितोषक म्हणून दासबोध ग्रंथ मागितला.

.” महाराष्ट्र धर्म “ मासिकात सुरवातीपासूनच तुकोबांच्या निवडक अभंगांवर विनोबांचा लेख प्रसिद्ध होत असे. त्यातून पुढे  संतांचा प्रसाद आणि तुकारामांची भजने  ही पुस्तके वाचकांना उपलब्ध झाली.

१९४१ साली जेलच्या वास्तव्यात एकनाथांची भजने हा संग्रह प्रसिध्द झाला.विनोबा म्हणतात की ज्ञानदेवांची भजने आणि त्यांची चिंतनिका यात मी जितका अंश ओतला तितका गीताई सोडल्यास दुस-या कशातही ओतला नसेल. स्व.दामोदरदास मुंदडा विनोबांचे कथन लिहून घेत असत. त्यांनी म्हटले आहे की लिहविता लिहविता विनोबा भावसमाधीत इतके लीन व्हायचे की त्यांना जगाचे काही भानच रहायचे नाही. किती तरी वेळ सारख्या अश्रुधारा वाहत रहायच्या. तुलसीदासांच्या विनयपत्रिकेला उत्तम आत्मसात करून त्यातील निवड विनयानजली नावाने प्रसिद्ध केली.

रामदासांची भजने हे पुस्तक म्हैसूरच्या पदयात्रेत १९५७ साली संपादित झाले.असार सोडून सार घ्यावे हा रामदासांचा उपदेश विनोबांनी आपल्या जीवनातही उतरविला. विनोबांनी दासबोधाच्या सुवर्ण खाणीतून ७७५१ ओव्यानपैकी ५०० ओव्या निवडल्या. या निवडीला विनोबा दासबोधातील बोधबिंदू म्हणतात. मनाचे श्लोक ही सोन्याची तिजोरी आहे.इतकेच नव्हे तर मनाचे श्लोक ही अपौरषेय वाणी आहे.—इति विनोबा.

ज्या प्रांतात आपली यात्रा चालेल त्या प्रांतातील जनतेशी तेथील संतांच्या आध्यात्मिक ग्रंथांच्या माध्यमातून प्रेमपूर्वक संपर्क साधायचा ही विनोबांची सहज प्रेरणा २४ मे पासून पुढे महिनाभर त्यांनी जी पदयात्रा केली त्यात दिसून आली. गुरु नानकाचा जपुजी हा ग्रंथ.आपल्याकडे जसा ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ तसा शिखानचा हरिपाठ म्हणजे जपुजी. त्यांची एकूण साधना निरभउ, निरवैरू या दोन शब्दात सागता येईल.आशयाच्या दृष्टीने ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव आणि कबीराचा बीजक यातील साम्यस्थळेही विनोबा दाखवतात.
शंकरदेव आणि माधवदेव हे आसामचे संत पुरुष. त्यांच्या “ नामघोषा” या पुस्तकातील वचनानचेही नामघोषा सार हे पुस्तक विनोबांचीच देणगी आहे.

महापुरुषांचे ऋण

शंकराचार्य, ज्ञानेश्वर आणि महात्मा गांधी या तिघांचे ऋण माझ्यावर आहे असे विनोबा आदरपूर्वक नमूद करतात. त्या ऋण मुक्तीचा स्थूल उपाय म्हणजे त्यांचा साहित्य प्रसाद सर्वाना वाटणे. शंकराचार्य कोणत्याही साधनेचे ओझे होऊ देत नाहीत. साधना सुटकेसाठी आहे अडकून पडण्यासाठी नाही असे आचा-यांचे मत आहे. शंकराचा-यांच्या १२०० श्लोकांपैकी ४०० श्लोकांचे “ गुरुबोध सार “ १९५७ साली कालडी येथी यात्रेत या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

एकादश व्रते यावर दर मंगळवारी महात्मा गांधी भाष्य करीत. विनोबांनी या व्रतानवर रसाळ अभंग तयार केले ते एकादश व्रते या पुस्तकात आहेत.

या पुस्तकाचे निवेदनही विनोबांनी काव्यातच केले आहे.त्यातील पहिल्या दोन ओळी अशा—-
प्रेरणा परमातम्याची महात्म्याची प्रसन्नता
वाणी संत कृपेची ही विन्याची कृतिशून्यता

गांधीजींच्या आज्ञेनुसार ईशावास्य उपनिषदांच्या १८ श्लोकांवर “ ईशावास्य वृत्ती “ हे पुस्तक लिहिले.या विवेचनात पूर्वाचार-यानचा विचार विनोबांनी पुढे नेला आहे.

समन्वयातून साम्याकडे

परस्पराना नीट समजून घेणे आणि परसस्परांचे गुण ग्रहण करणे याची आवश्यकता विनोबांना पदयात्रेत जाणवली. हृदय जोडण्याचे हे मिशन म्हणजे ज्ञानसंग्रह आणि व्रतसंग्रहानंतरचा विनोबांचा हा प्रेममुलक लोकसंग्रहच होता.विनोबांच्या सारग्राही दृष्टीत समन्वय, संकलन, वर्गीकरण आणि सम्पादन या सर्व कौशल्यांचा अंतर्भाव होतो. कुराणात ६२३७ आयती (वचने) आहेत त्यातील सारभूत अशा १०६५ आयतींचे कुराणसा १९६३ च्या सुमारास प्रसिध्द झाले.कुराणसाराप्रमाणेच ख्रिस्त धर्मसारही संपादित केले.

गौतम बुद्धांच्या धम्मपदाची रचनाही केली.

जैन धर्मीयांनाही त्या धर्माचा सारभूत आणि सर्व समावेशक असा समणसुत्त नावाचा ग्रंथ तयार करण्यास विनोबांची प्रेरणाच कारणीभूत झाली.सर्व धर्म विचारांचा साधारण विभाजक काढला म्हणजे शुद्ध अध्यात्म हाती येईल आणि तेच विज्ञानाला दिशा देईल ही विनोबांची तळमळ होती.राजनीतीकडून लोकनीतिकडे नेण्यासाठी विनोबांचे स्वराज्यशास्त्र हे पुस्तक अवश्य वाचावे.हे पुस्तक म्हणजे लोकनीतीचे व्याकरण आहे.

गीताई आणि गीता प्रवचने

कालक्रमात हे लेखन अगोदर झाले असले तरी हे ग्रंथ विनोबांच्या अक्षर वाड;मयाचे कळस अध्याय आहेत असे म्हटले तरी चालेल. गीताई लेखनास आईकडून प्रेरणा मिळाली. विन्याच गीतेचा भावार्थ पद्यात उतरवू शकेल असा त्या माऊलीला विश्वास होता. विनोबा म्हणतात ज्ञानेश्वरानी गीतेबद्दल गोडी निर्माण केली आणि गीता अभ्यासाची गरज गीता रहस्याच्या वाचनाने जाणवू लागली.

गीतेबाबत आणि विशेषत: गीतेच्या पाचव्या अध्यायाबद्दल नि:शंक झाल्यावरच विनोबांनी पाचव्या अध्यायापासून गीताई लेखनास प्रारंभ केला. ७ ऑक्टोबर १९३० ते ६ फेब्रुवारी १९३१ या काळात वर्ध्याच्या महिला आश्रमात लेखन पूर्ण झाले. गीताई हा मराठी साहित्यातील एक मोठा चमत्कार आहे. गीताईची रचना इतकी सोपी, रसाळ आणि प्रासादिक आहे की ती वाचता वाचता तिच्यातील भावार्थ मनामध्ये आपोआप उमलू लागतो, असे आचार्य अत्रे म्हणतात. गीताईने खपाचा उच्चांक गाठला आहे. जून २०१६ च्या २६९ व्या आवृत्तीपर्यंत ४१ लाख ६८ हजार प्रति निघाल्या आणि अजूनही गीताईच्या आवृत्त्या काढाव्या लागत आहेतच.

गीता प्रवचने

१९३२ सालचा विनोबांचा धुळे तुरुंगवास हा इतरांसाठी अध्यात्मवासच सिद्ध झाला. लक्ष्मणशास्त्री जोशी, जमनालाल बजाज इ. सर्वांच्या विनंतीला मान देऊन २१ जानेवारी १९३२ ते १९ जून १९३२ या काळात प्रत्येक रविवारी विनोबांनी गीतेवर प्रवचने केली. विनोबा म्हणतात की स्वत:च्या भावनेला दृढ करण्यासाठी जप भावनेने मी बोलत होतो. विनोबा बोलत आहेत असे विनोबानाही वाटत नव्हते. आणि ऐकणा-यानाही असे वाटत नव्हते की विनोबा बोलत आहेत. विनोबांची प्रवचने साने गुरुजींनी शब्दबद्ध केली, हे मराठी जनतेवर मोठेच उपकार आहेत. विनोबांच्या गीता प्रवचनांची रुपांतरे सुमारे २३ भाषात झाली आहेत. विनोबांचा आयुष्यभराचा प्रवासच गीतेबरहुकुम झाला त्यामुळे विनोबांच्या गीताप्रवचनातील शब्दांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. गीतेवरची विनोबांची वेलोर प्रवचनेही गीतेचा गाभाच व्यक्त करणारी आहेत.ही प्रवचनेतर गीतेच्या अभ्यासकांनी वाचलीच पाहिजेत.

गीतेच्या अध्यात्मिक अर्थाची प्रतीती या प्रवचनातून अभ्यासकाला येते. ३० वर्षांच्या निदिध्यासाने साकार झालेले महत्त्वाचे पुस्तक म्हणजे स्थितप्रज्ञ दर्शन. ते षडदर्शनाच्या पंक्तीत बसणारे आहे. गीतेच्या दुस-या अध्यायात स्थितप्रज्ञ लक्षणांचे १८ श्लोक आहेत. त्या प्रत्येक श्लोकावर १९४४ साली शिवनिच्या तुरुंगात लहान गटासमोर विनोबांनी प्रवचने दिली.गीता प्रवचने, गीताई, गीताई चिनतनिका, गीताई शब्दकोश आणि साम्यसूत्रे या पंचकात जो अडकला तो गीतेच्या प्रेमांत पडल्याशिवाय रहाणच शक्य नाही. विनोबांचे चतुरस्र लेखन विशीष्ठ काळातील असले तरी त्यातील ताजेपणा आणि विचार वर्तमान काळातही सर्वाना मार्गदर्शक ठरणारे आहेत.

विनोबा म्हणतात की जग माझी इतर सगळी सेवा किंवा कृति विसरून गेले तरीही गीताई आणि गीता यांना कधीही विसरणार नाही. माझ्या या कृती जगाची सेवा करीत राहतील कारण गीताईची रचना करताना किंवा गीतेवर प्रवचने करताना मी केवळ समाधिस्त होतो.

– ©️ हेमंत मोने

hvmone@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आजची कविता

प्रदीप अधिकारी 
काजळ वेळ



काजळली सांजवेळ,
रोज दाराशी का येते
कोण छळते तिजला,
पाणी डोळां का भरते…!

कधी वाटते पोटुशी,
पोटी अंधाराचा गोळा
तिचा थकला चेहरा,
मुखी वेदनेचा बोळा…!

तिचे ढगाआड अस्तित्व,
जणू लाल आलवण
झाकल्या डोक्याखाली,
तिचा देह अजून तरुण…!

तिच्या अरूपाचे झाकोळ
मनी उठती  कल्लोळ
तिचे  रेंगाळणे पळभर
तरी  वाटते अमंगळ…!

अशावेळी  देव्हाऱ्यात
दीपज्योतीने उजळावे
कुण्या चिमुकल्या आवाजाने
घरी शुभंकलोती म्हणावे…!

– ©️ प्रदीप अधिकारी

9820451442
adhikaripradeep14@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
ही सुषमा कोण?

कडबोळे : ९४
 
 

डॉ. अनिल जोशी

वर्ष १९६९.  डॉक्टर करसननभाई पटेल या सरकारी सेवेत काम करणाऱ्या एका  रसायनशास्त्रातील तंत्रज्ञाने फॉस्फेट विरहित धुलाईची पावडर तयार केली व ती साडेतीन रुपये किलोने विकायला सुरुवात केली.  त्यावेळी बाजारात मिळणाऱ्या सर्वोत्तम धुलाईच्या पावडरीचा दर १३ रुपये प्रति किलो असा होता. पिवळ्या रंगाच्या दिसणाऱ्या या पावडरीने कपडे चांगले निघत होते. दरातल्या या प्रचंड तफावतीमुळे लोकांचे लक्ष हळूहळू या पावडरने वेधले आणि तीन वर्षातच करसन अहमदाबाद येथे आपले स्वतःचे दुकान काढले. अपघातात मरण पावलेल्या आपल्या मुलीच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी या पावडरला ‘निरमा‘ असे नाव दिले आणि लवकरच महाराष्ट्र आणि गुजरात काबीज केला. सुरुवातीला हिंदुस्तान लिव्हर सारख्या या क्षेत्रातील ताकदवान  कंपन्यांनी  निरमा कंपनीकडे दुर्लक्ष केले.त्यांचा व आपला ग्राहक वर्ग वेगवेगळ्या आहे त्यामुळे त्यांचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे अशी काहीशी तुच्छतेची भावना ही यामागे होती.  परंतु हळूहळू निरमा कंपनीची लोकप्रियता वाढत गेली आणि तिने या मोठ्या कंपन्यांना तगडी स्पर्धा देण्यास सुरुवात केली. तीन दशकात कंपनीचा वार्षिक कारभार १७ दशलक्ष  रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला.

निरमाचे  सुरुवातीचे ग्राहक हे अल्प उत्पन्न गटातले होते. आपल्या या ग्राहकांची संपत्ती स्थिती हळूहळू सुधारते आहे आणि त्यांचे नवमध्यम वर्गात रूपांतर होते आहे, याची या कंपनीने दखल घेतली आणि मध्यमवर्गीयांसाठी स्नानाचे साबण व धुलाईची पावडर यांची स्वतंत्र उत्पादने बाजारात आणली व बाजारातील आपला तोपर्यंत पंधरा  टक्क्याला पोचलेला वाटा शाबूत ठेवला. यासाठी आवश्यक ते प्रगत तंत्रज्ञान कंपनीने आत्मसात केले व देशभरात सहा ठिकाणी आपले विविध उत्पादने उत्पादित करण्यास सुरुवात केली. चारशेच्या आसपास वितरक व वीस लाख किरकोळ विक्रेत्यांचे जाळे निरमाने देशभरात विणले. भारतातल्या लहानात लहान शहरात किंवा खेड्यात ही पावडर सुलभतेने मिळू लागली. मला आठवते आहे की सुरुवातीच्या काळात या पावडरच्या पिशव्यांमध्ये कुपन्स असायची व ठराविक कालावधीनंतर लॉटरीसारखी सोडत काढली जायची व विजेत्यांना वेगवेगळी बक्षिसे वस्तू रूपाने मिळायची.

काही कालावधीनंतर निरमाने विदेशी बाजारपेठात देखील प्रवेश केला. बांगलादेश, मध्यपूर्व, चीन, रशिया व आशिया खंडातील इतर देशात विक्रीला सुरुवात केली. लवकरच बांगलादेशातील अग्रेसर धुलाईची पावडर म्हणून निरमा प्रसिद्ध झाली. सन १९९९ – २००० पर्यंत या क्षेत्रातील निरमाचा  वाटा ३८% पर्यंत जाऊन पोहोचला आणि या कंपनीने हिंदुस्तान लिव्हरच्या ३१ टक्के  वाट्याला  मागे टाकले. हळूहळू निरमा आपल्याला लागणारा कच्चामाल देखील स्वतःच निर्माण करायला सुरुवात केली त्यासाठी भावनगर व बडोदा येथे स्वतःचे कारखाने सुरू केले. त्यामुळे उत्पादनाच्या किमती कमी ठेवण्यात त्यांना यश येऊ लागले व इतर मोठ्या कंपन्यांच्या स्पर्धेत स्वतःचे स्थान टिकवता आले. हळूहळू शाम्पू, अंघोळीचे साबण, टूथपेस्ट इत्यादी ज्यांना आपण सौंदर्यप्रसाधने म्हणू शकू त्या क्षेत्रात देखील निरमाने  प्रवेश केला. हे करत असताना त्यांनी अजून एक गोष्ट केली. किमती नेहमीप्रमाणे कमी ठेवल्या परंतु वितरकांना दिल्या जाणाऱ्या कमिशनमध्ये भरघोस वाढ केली.

निरमा मार्फत केल्या जाणाऱ्या जाहिराती या देखील कंपनीच्या लोकप्रियतेमध्ये महत्त्वाच्या होत्या. संगीता बिजलानी, रिया सेन व सोनाली बेंद्रे या त्या काळी काहीशा अप्रसिद्ध असणाऱ्या सिनेतारकांचा आपल्या जाहिरातींकरता निरमाने कल्पक वापर करून घेतला. “निरमा, निरमा, वॉशिंग पावडर निरमा”  ही त्यांची जाहिरात धून कानोकानी, मनोमनी पोचली. ” हेमा, रेखा, जया आणि सुषमा ! सबकी पसंद निरमा ” ही त्यांची अशीच एक लोकप्रिय जाहिरात.

https://www.youtube.com/watch?v=FkcZjPRUuXcया जाहिरातीत एकंदरीत चार नावे. त्यातील  हेमा, रेखा, जया या नावांचा उगम समजण्यास सुलभ आहे. हेमामालिनी, जया बच्चन व रेखा या हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या नायिका आणि त्यांची नावे आपल्या सर्वांनाच सुपरीचित आहेत. त्यांच्या नावावरून स्फूर्ती घेऊन ही तीन नावे जाहिरातीत योजली असावी असा तर्क सुरक्षितपणे करता येतो.  परंतु ही “सुषमा” कोण या बाबतीत थोडासा संभ्रम आहे.  सुषमा नावाजवळ जाणाऱ्या हिंदी चित्रपटातील दोन नायिका.  सुश्मिता सेन व ‘आंधी’ फेम सुचित्रा सेन. अजून एक सुषमा आपल्याला माहित असण्याची शक्यता आहे आणि त्या म्हणजे हिंदीतील सुप्रसिद्ध सहनायिका सुषमा सेठ. पण या  तिघी जाहिरातीतील इतर तीन ग्लॅमरस नावात बसतील का? सुचित्रा सेन थोड्या फार जवळ जातात पण तरीही सुचित्रा आणि सुषमा यातील हे साम्य ओढून ताणून म्हणावे असेच आहे. सुश्मिता सेन बरीचशी नंतर आलेली त्यामुळे तिचे नाव तर काल सुसंगतही वाटत नाही. पाहणाऱ्यांच्या व ऐकणाऱ्यांच्या कल्पनाशक्तीला व स्वप्नांना वाव देण्यासाठी तर या नावाचे प्रयोजन नसेल ना?Good Lord Boyet, my beauty, though but mean,
Needs not the painted flourish of your praise:
Beauty is bought by judgement of the eye,
Not utter’d by base sale of chapmen’s tongues: Shakespeare(Love’s Labours Lost, 1588)


– ©️ डॉ अनिल यशवंत जोशी
९४२२६४७२८३
jaysss12@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
खरे पुरोगामी कोण?

सत्तरीची सेल्फी : २ 

चंद्रकांत बर्वे

हल्ली सगळे पक्ष, सगळे नेते, त्यांचे कार्यकर्ते आणि छोटे मोठे व्हॉटसपवर कॉमेंट टाकणारे देखील स्वतःला पुरोगामी म्हणवतात. आता पुरोगामी म्हणजे काय? तर जो विवेकवादी, विज्ञानवादी विचार आणि कृती करतो तो किंवा जो जुन्या गोष्टी जशाच्या तशा न स्वीकारता त्याची चिकित्सा करू शकतो तो. या दृष्टीने छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे क्रांतिकारी नेते पुरोगामी होते हे निर्विवाद पण या महापुरुषांची नावे घेतली की आपण पुरोगामी ठरतो असा समज काही लोकांचा झालेला आहे.

पुरोगामीच्या विरोधी शब्द म्हणजे ‘प्रतिगामी’. आमच्या लहानपणी एसेम जोशींचा समाजवादी पक्ष हा पुरोगामी आणि बलराज मधोक यांचा जनसंघ हा प्रतिगामी पक्ष म्हटला जायचा. यथावकाश समाजवादी नष्ट होत गेले आणि जनसंघाचे रुपांतर होत गेले आणि सध्या सगळेजण स्वतःला पुरोगामी म्हणवतात. प्रतिगामी शिल्लकच नाही राहिले. हां म्हणजे हिंदुत्ववादी आहेत पण त्यांना कोणी प्रतिगामी म्हणत नाही तर स्वतःला खरे हिंदुत्ववादी म्हणण्याची फॅशन आलीये. पुरोगामी हा शब्द सगळ्यांनी स्वीकारलेला आहे पण अर्थ प्रत्यक्षात आणणारे फार थोडे.

पुरोगामी म्हणजे कोण? जो माणसांच्या जातीचा नाही तर त्याच्या गुणांचा विचार करतो, जो स्त्री पुरुष समानता मानतो, जो जुन्या कालबाह्य कल्पना सोडून आधुनिक जीवनपद्धती स्वीकारतो, जो स्वतःचा, आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा साकल्याने विचार करतो तो पुरोगामी. आता आपण किती पुरोगामी आहोत, त्यांची अनेक लक्षणे आहेत पण आता आपण त्यातल्या अगदी थोड्यांचा विचार करूया. (बाकी लक्षणे परत कधीतरी). बघा पटतंय का?

आज वाढती लोकसंख्या हे अनेक समस्यांचे मूळ आहे. शतकापूर्वी ही समस्या जाणवत नव्हती कारण भरपूर न कसलेली जमीन, आरण्ये उपलब्ध होती. शारीरिक कष्टाला महत्व होते कारण आधुनिक उपकरणे नव्हती. जास्त मुले म्हणजे कामाला जास्त हात अशी स्थिती होती. आयुष्यमान कमी होते, वयाची साठीही सेलिब्रेट केली जात असे. रोगराई जास्त जीवघेणी होती, वैद्यकीय ज्ञान कमी होते, शिवाय कुटुंब नियोजनाची साधनेही उपलब्ध नव्हती. त्यामुळे ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भवः’ हा आशीर्वाद सर्वमान्य होता. पण आता चित्र बदललेले आहे. आज सगळ्यांचे आयुष्यमान वाढलेले आहे. वैद्यकीय प्रगतीमुळे कित्येक रोग नष्ट झालेले आहेत. मुलाला ज्या संधी उपलब्ध आहेत त्याच मुलीला देखील आहेत. तरी सुद्धा खूप जण म्हातारपणची काठी हवी असे म्हणत अनेक पोरांना जन्म देतात, वंशाला दिवा हवा म्हणून पहिल्या मुलीनंतर मुलासाठी बायकोचे बाळंतपण चालू ठेवतात. त्यामुळे १) आज ज्यांना दोन पेक्षा अधिक मुले आहेत त्यांनी स्वतःला पुरोगामी अजिबात म्हणू नये.

आजची आणखी एक समस्या म्हणजे जातीयवादी विचारसरणी. निवडणुकांचे विश्लेषण बघा, त्यात वाढती महागाई, गरिबी, बेकारी, गुन्हेगारी, स्त्रियांवरील अन्याय यापेक्षा जाती धर्माचे राजकारण जास्त महत्वाचे ठरते. या समस्येला खरे उत्तर म्हणजे आंतरजातीय विवाह आपल्या संपूर्ण समाजाला जवळ आणू शकतो, एकसंध करू शकतो, पण आज जर विवाहविषयक जाहिराती पाहिल्या तर त्यात मुलाची/मुलीची जात आवर्जून लिहिली जाते आणि अपेक्षाही याच जातीचा पाहिजे अशी असते. तेव्हा २) कोणी स्वतःच्या किंवा आपल्या पाल्याच्या लग्नात जातीची अट ठेवली असेल तर त्यांनी कृपया स्वतःला पुरोगामी म्हणून पुरोगामी या शब्दाची बदनामी करू नये.

आज मेडिकल सायन्स फार पुढे गेलेले आहे. आपण सगळे आधुनिक औषधोपचार घेत असतो पण ते स्वतःसाठी. पण एक खूप मोठे काम समाजातील अंध व अन्य शारीरिक समस्या असणाऱ्यांसाठी करू शकतो ते म्हणजे मरणोत्तर अवयवदान. आपल्याला “मरावे परी नेत्ररूपी उरावे” ही म्हण देखील नवी नाही. आपण मरतो तेव्हा शरीराचे सगळे अवयव निकामी झालेले नसतात. आपले डोळे, किडनी, त्वचा, लिव्हर, फुफ्फुसे, हृदय देखील इतर शारीरिकदृष्ट्या गरजू व्यक्तींना देऊन, अवयव प्रत्यारोपण करून आपण त्यांना जीवदान देऊ शकतो. माणसे आपली जमीन, घर, दागिने कोणाला द्यावेत याची इच्छा सांगतात पण त्याहून अधिक किंमती असे शरीराचे अवयव मात्र कुणा गरजूला न देता ते शरीर जाळून किंवा गाडून टाकले जाते. मरणोत्तर देहदान करणारे कम्युनिस्ट नेते ज्योती बसू, सोमनाथ चॅटर्जी, भाजपचे नानाजी देशमुख, समाजवादी मधु दंडवते असे फार थोडे आहेत. पण अवयवांची गरज असलेल्यांची यादी खूप मोठी. कोणीही व्यक्ती आपली मरणोत्तर नेत्रदान किंवा देहदान करण्याची इच्छा व्यक्त करू शकतो. पण शेवटी ही प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाइकांची असते. ३) ज्यांनी आपल्या आप्तेष्टांचे असे अवयव दान केलेले आहे तेच खरे पुरोगामी बाकी सगळे कुचकामी.

– © चंद्रकांत बर्वे 

9920576455
csbarve51@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

योगाभ्यास : वज्रासन

योगाद्वारे आरोग्य : ४

कै. सदाशिव निंबाळकर


संधिवातावर प्रतिबंधक उपचार

या आसनात पायांची बैठक वज्राप्रमाणे पक्की असते म्हणूनच या आसनास ‘वज्रासन’ म्हणतात. या नावाची दुसरीही उपपत्ती प्रचलित आहे. वज्र म्हणजे जननेंद्रिय. या आसनाच्या अभ्यासाने जननेंद्रियावर व ओटीपोटावर परिणाम होतो. म्हणून यास वज्रासन असे नाव दिले गेले आहे.

आसनापूर्व स्थिती : दोन्ही पाय एकमेकांजवळ ठेवून पाय पसरून बसावे. हात नितंबाच्या दोन्ही बाजूस ठेवावे ( आकृती १ )

आसन साधण्याची कृती: डाव्या हातावर व बाजूवर शरीराचा भार घ्यावा. उजवा पाय गुडघ्यात दुमडावा. ( आकृती २ ) उजव्या हाताने उजव्या पावलाचा तळवा वरच्या बाजूस करून पाऊल मागे न्यावे. उजव्या पार्श्वभागाखाली पाऊल व्यवस्थित ठेवावे. ( आकृती ३ ) शरीराचा भार उजव्या हातावर व बाजूवर आणावा. हाताने डावे पाऊल धरावे. ( आकृती ४) पावलाचा तळवा वरच्या बाजूस करून दोन्ही पायांचे आंगठे एकमेकांना लागतील अशा रीतीने पावलांची रचना करावी. (आकृती ५ व ६) पार्श्वभाग उलट्या पावलावर व्यवस्थित पक्का करावा. कटिरास्थि थोडे पुढील बाजूस झुकवावे. ओटीपोटाचा भाग पुढे घ्यावा. पाठीचा कणा सरळ ( नैसर्गिक रीतीने ) ठेवावा. हाताचे तळवे गुडघ्याजवळ मांडीवर ठेवावे. डोळ्यांच्या पापण्या खाली येऊ द्याव्या. पोट, हातांचे स्नायू ढिले ठेवावे. अशा सुलभ व सुखदायक स्थितीत बसल्यावर श्वास आपोआपच सावकाश, संथ व दीर्घ होतो.

येणा-या व जाणा-या श्वासाची जाणीव व अनुभव टाळ्यास किंवा नाकाच्या मधल्या पडद्याजवळ प्रत्ययास येतो, त्यावर मन ठेवावे. मनाची धारणा करावी. एकाग्रता आपोआप निर्माण झाली तर उत्तमच – पण साधकांनी मुद्दाम प्रयत्न करू नये. त्यापासून फायद्यापेक्षा हानीच होते. चंचल मन इकडे तिकडे गेले तर जाऊ द्यावे. त्याची गती मंद झाल्यावर परत त्यास श्वासाच्या जाणिवेवर आणावे. यालाच ‘प्राणधारणा’ म्हणतात. हीच वज्रासनाची अंतिम स्थिती होय.

श्वास स्थिती : हे ध्यानासन असल्याने श्वासाची गती आपोआपच मंद होते. श्वास दीर्घ चालू लागतो.

आसन सोडण्याची कृती : डोळे उघडावे. तळहात मांड्यांवरून खाली जमिनीवर आणावे व नितंबाच्या बाजूस ठेवावे. डाव्या हातावर भार  घेऊन उजव्या हाताच्या मदतीने उजवा पाय सरळ करावा. उजव्या बाजूवर व हातावर भार घेऊन डाव्या हाताच्या साहाय्याने डावा पाय सरळ करावा व प्रारंभीच्या स्थितीत यावे.

अभ्यास : प्रारंभी प्रत्येकी १० श्वास ते २० श्वासांच्या २-३ आवृत्त्या कराव्या. चांगला अभ्यास झाल्यावर एकच वेळ हे आसन  ३ ते १० मिनिटे करावे.

सूचना : (१) योगाभ्यासयोग्य अशी शारीरिक व मानसिक स्थिती प्राणधारणेसहित वज्रासनामुळे त्वरित प्राप्त होते. म्हणून सुरवातीस हे आसन  करून योगाभ्यास सुरू  करावा.
(२) ज्या लोकांचे घोटे व गुडघे कडक असतील, त्यांनी या आसनाचा सराव हळूहळू करावा. आकृती ३ ची स्थिती, उजवा व डावा  पाय घेऊन थोडा थोडा वेळ ठेवावी. आसन  साधण्याची घाई करू नये. घोट्याखाली टॉवेलची घडी घेऊन काही दिवस सराव करावा म्हणजे त्रास होणार नाही.

लाभ : (१) ओटीपोटातील रक्ताभिसरण सुधारते व जननेंद्रियांचे आरोग्य राखले जाते.
(२) पाठीच्या कण्यातील दोष नष्ट होतात व कणा नैसर्गिक स्थितीत ठेवण्याची आपोआप सवय लागते.
(३) घोट्याचे व गुडघ्याचे सांधे ताणले गेल्यामुळे स्नायुबंध लवचिक बनतात. रक्त पुरवठा होतो. तेथील                ज्ञानतंतू कार्यक्षम बनतात.
(४) संधिवाताच्या काही प्रकारांत प्रतिबंधक उपचार म्हणून या आसनाचा चांगला उपयोग होतो.

कै. सदाशिव निंबाळकर
[चित्रे व लेख ‘महाराष्ट्र टाइम्स‘ ९ मे  १९७६ च्या अंकावरून साभार ]

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

चित्रकारांचे दालन
 

– ©️ सौ. मुग्धा देशपांडे 
mugdhasvd@gmail.com
प्रेषक मुकुंद कर्णिक
karnik.mukund@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@@@  
 
हत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@

डब्लिन डायरी

प्रकाश पेठे 

लेखांक १

नव्या गावी गेलं की एक प्रश्न पडतोच. ते कसं असेल ?  बाकी रेल्वे स्टेशनं आणि विमानतळं  थोड्या फरकाने सारखीच असतात. बडोदा आणि दिल्लीचा विमानतळ माहितीचा होता. सॅन फ्रान्सिस्कोचा कसा असेल? याची कल्पना करत होतो.

बडोद्याला विमानात भरलेलं आमचं सामान सॅनफ्रान्सिस्कोला व्यवस्थित पोचेल की नाही याची चिंता होती.  पण सरकत्या पट्ट्यावर सामान दिसलं, तेव्हा जीव भांड्यात पडला.

पुढचा प्रश्न होता; बाहेर असलेल्या मुलाशी संपर्क कसा साधायचा? जो माणूस विमानात भेटला होता त्याच्याकडे अमेरिकेत चालेल असा फोन होता. त्यावरून मुलाशी संपर्क झाला आणि सुस्कारा सोडला. आता इमिग्रेशनवाले किती वेळ घेतील कोणास ठाऊक अशी शंका होतीच. पोलीस ऑफिसरला पासपोर्ट आणि कॉन्सुलेटनं दिलेलं पाकीट दिलं. तो  एका खोलीत गेला. म्हणाला, बाहेर बसा. त्या  पाकिटात काय होते ते आजतागायत कळलेले नाही. तो थोड्या वेळाने बाहेर आला. अगदी हसून आमचा निरोप घेतला आणि म्हणाला, आता सुखाने कायमचे अमेरिकेत राहा.

थोड्या वेळाने मुलगा आणि सून दिसले.

घरी जाताना गाडी समुद्रावरच्या पुलावरून जात होती, तो  प्रशांत महासागर. इथे त्याचं पाणी अतिशय थंडगार असतं. समुद्रातल्या बेटावर एक तुरुंग आहे. त्यातल्या गुन्हेगारांना  पळून जाता येत नाही कारण त्या पाण्यात कोणी पडला तर जास्त काळ जिवंत रहात  नाही. या पुलावरून जाताना रामेश्वरच्या पाम्बन पुलाची आठवण झाली, बाकी कॅलिफोर्निया डोंगराळ आणि हिरवागार आहे.पुढे जात असता अचानक डाव्या बाजूला फेसबुक असा मोठा फलक पहिला आणि खूप मजा वाटली. फेसबुकचा निर्माता झुकरबर्ग विसाव्या वर्षी हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना त्याने २००४ साली फेसबुकची निर्मिती केली आणि पाहता पाहता तो जगातला महत्वाचा माणूस झाला.गुगल, फेसबुक, फोटोशॉप हे माझ्या तंत्रजीवनाचे आधारस्तंभ आहेत. बरेच वर्षे कॉलेजमध्ये शिकवत होतो. मुलांना कळलं होतं की मी मराठीत लिहितो. मुलं म्हणाली, तुमच्या लेखनाचं भाषांतर करा म्हणजे आम्हाला वाचता येईल. मी म्हटलं, ठीक आहे. म्हणून मी इंग्रजीत शॉर्ट स्टोरीज या नावाने १५१ गोष्टी फेसबुकवर टाकल्या. छायाचित्रंही पाठवत हॊतॊ. माझे सातशे आठशे मित्र विद्यार्थी – विद्यार्थींनी वाचून अभिप्राय देत किंवा लाइकचा पाऊस पाडत.ते सगळं मी माझ्या मित्राच्या सल्ल्यानुसार वर्ड प्रेसवर टाकलं आणि ते कोणालाही उपलब्ध झालं.  ते सगळं पुढील संकेत स्थळावर वाचता येईल.https://prakashpethe.prasand.in/

फेसबुक, गुगल, व्हाट्सअ‍ॅप यांच्या मदतीशिवाय माझं काम करणं कठीण आहे. अश्या सर्व भारदस्त आणि जगाच्या बुद्धिमतेला आधार देणाऱ्या संस्था मी ज्या गावी जाणार होतो, त्या डब्लिनपासून पाऊण तासाच्या अंतरावर आहेत. हे कळल्याने आनंद झाला. व्हॉट्सअ‍ॅपशिवाय देश परदेशातले लोक एकमेकांशी तासन् तास फुकट बोलू शकणार नाहीत सगळ्यांनी व्हॉट्सअ‍ॅपला गृहीत धरलं आहे. कोणाच्या मनात त्याचे आभार मानायचे लक्षात सुद्धा  येत नाही आणि गुगल नसेल तर माणसं निर्जीव होतील.

अमेरिकेची आणि माझी पुस्तकी ओळख साठ वर्षापासून आहे. कारण आमचं वास्तुकलेचं शिक्षण. जगातील महान वास्तुकलाकार फ्रॅंक लॉईड राईट, लुई सुलिव्हन, व्हॅन डर रोहे, या मंडळींचं जीवन कार्य मला तोंडपाठ होतं. त्यामुळे शिकागो, गगनचुंबी इमारती, लिफ्टचा शोध वगैरे गोष्टींचा परिचय होता. राईटचं रुबी हाऊस, जॉन्सन वॅक्स कंपनी, अरिझोनामधील तालीसीनचा स्टुडिओ, न्यूयॉर्कचं म्युझियम या  राईटच्या गोष्टी डोक्यात  बसल्या आहेत. राईटची पुस्तकं डोक्यात घर करून आहेत. ते म्हणाले होते, “अमेरिकेसाठी आज ऑरगॅनिक वास्तुकला मानवी स्वातंत्र्याच्या मूर्त स्वरूपात अर्थ लावेल. कारण नैसर्गिक वास्तुकला मोकळेपणा शोधते. ” त्यांच्या  इमारती त्यांच्या मनातलं बोलतात. त्याला निसर्गात लपलेल्या आणि समरस झालेल्या वास्तू आवडत. त्याचा काँक्रीटच्या  जंगलावर राग होता.आता अमेरिकेत आलोय. बघू पुढे काय काय दिसणार आहे, असं म्हणता म्हणता डब्लिन गावात प्रवेश केला आणि  मुलाचं घर आलं.कॅलिफोर्नियातल्या डब्लिनची वस्ती ७०,००० असून ते सिलिकॉन व्हॅलीमध्ये आहे. अमेरिकेतल्या अनेक शोधांपैकी कदाचित अर्धे शोध सिलिकॉन व्हॅलीतच लागले असतील. जगाच्या दृष्टीनेही कॅलिफोर्निया महत्वाचा प्रदेश आहे.

Dublin town

अमेरिकेतल्या  काही  गावांची नावं अन्य देशातुन आलेल्या नागरिकांनी दिलेली आहेत. १८२०  नंतर जवळ जवळ साठ लाख आयरिश लोक अमेरिकेत आले. त्यातले १८४५ ते ५२ या दुष्काळच्या काळात आले, त्यापैकी २३ लाख ३६ लोक कॅलिफोर्निया राज्यात आहेत. त्यामुळे त्यांनी आर्यलँडमधील डब्लिनचं नाव या गावाला ठेवलं.

मला कोणी विचारलं की नायगारा पाहायचा आहे का हार्वर्ड पाहायचं आहे तर मी हार्वर्ड निवडीन. मंदिर की  वाचनालय? तर वाचनालय !  अँस्टरडॅमला गेलो होतो तेव्हा तिथलं सात मजली आलिशान वाचनालय पाहून चाट पडलो होतो. डब्लिन गावातली पहिली सार्वजनिक वास्तू पहिली ती वाचनालयाची. १९१४ साली सुरु झालेलं वाचनालय १९७० साली आधुनिक बनवण्यात आलं.  त्याचे क्षेत्रफळ ३८००० चौरसफूट – भरपूर पुस्तकं आहेत.  एका वेळेस कितीही  पुस्तकं घरी नेता येतात. परत करताना जर वाचनालय बंद असेल तर भिंतीत ठेवलेल्या कपाटात बाहेरूनच आत सोडता येतात. ती परत घ्यायला  मनुष्य हजर असण्याची गरज नसते.

Dublin Library

डब्लिन गाव फ्री वे ५८० आणि ६८० च्या चौकाच्या आजूबाजूला दीडशे वषापासून अस्तित्वात आहे.

580 and 680 freeway

इथे सगळा वाहन प्रवाह उजव्या बाजूने जातो. गोलाकार रस्त्याने मुख्य प्रवाहात शिरण्यासाठी जे रस्ते आहेत यांना क्लोव्हरलीफ म्हणतात. अमेरिकेतले फ्री वे हे राष्ट्राच्या वाहन व्यवहाराचा कणा आहेत. दोनशे फूट रुंदीच्या मार्गात डावी उजवीकडे चारपाच मार्गिका असतात. या रस्त्यावर कुठे सिग्नल किन्वा क्रॉसिंग नसतं. एकदा का फ्री वेला लागलं की गाडी ताशी  शंभर सव्वाशे किलोमीटर वेगाने पळवत  ठेवावी लागते. मैलोगणती कोणी अडवत नाही आणि  वेग कमी करून चालत नाही. अन्यथा अपघात होण्याची भीती असते.

इथे येऊन आता दोन महिने झालेत. डब्लिनमधल्या  जवळ जवळ सर्वच भारतीय रेस्टॉरंट्समध्ये आस्वाद घेऊन झाला आहे.गावात एक्कावन्न टक्के आशियायी लोकांची  वस्ती आहे. त्यात चिनी, कोरियाचे, तैवानचे, व्हिएतनामचे धरतात.  त्यामुळे कोणत्याही भारतीय  रेस्टॉरंटमध्ये गेलं तर  बाह्य वातावरण अमेरिकन असलं  तरी आपण भारतातच आहोत असं वाटतं.

– ©️ प्रकाश पेठे
6831 Syrah Drive
Dublin, California.
prakashpethe@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आजची कविता

डॉ. उमेश करंबेळकर

तीन ओळी

दुष्काळाच्या पाऊलखुणा
जमिनीवर उमटताना
एकच काळा ढग आकाशात
————————————

डोंगर उतारांवर
विनाशकारी बीज रोपण
आणि फुललेले काँक्रीटचे मळे
————————————–

रुजलेली देशी रोपे
उपटून विस्थापित
परक्या फुलांना मात्र पायघड्या
—————————————

– ©️ डॉ. उमेश करंबेळकर.

umeshkarambelkar@yahoo.co.in
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
शब्द – शब्द – शब्द

डॉ. उमेश करंबेळकर 
१०४. 

अंध गज न्याय

अंध गज न्याय हा अंधहस्तिन्याय म्हणूनही ओळखला जातो.अंध गज न्याय अनेकांना माहित असतो ते, हत्ती आणि सहा आंधळे या गोष्टीवरून. सहा आंधळ्यांना हत्ती कसा असतो ते विचारलं. एकाने हत्तीच्या कानाला स्पर्श केला आणि त्यावरून तो सुपासारखा असतो असं सांगितलं. तर दुसऱ्याने हत्तीच्या पायावरून हत्ती खांबासारखा, तिसऱ्याने सोंडेवरून सापासारखा, चौथ्याने शेपटीवरून दोरीसारखा, पाचव्याने पोटावरून भिंतीसारखा तर सहाव्याने सुळ्यावरून हत्ती कुदळीसारखा असतो असं सांगितलं. हत्तीच्या निरनिराळ्या अवयवांना स्पर्श केल्याने प्रत्येकाच्या अनुमानात फरक आढळला. आपलंच निरीक्षण खरं समजून ते आपापसात भांडत बसले.एखाद्या गोष्टीचं यथार्थ ज्ञान होण्यासाठी तिचा सर्व बाजूंनी विचार करायला हवा. एकाच दृष्टिकोनातून बघितल्यास यथार्थ ज्ञान होत नाही हे सांगणारा हा अंधगज न्याय.अंध गज न्यायावर आधारलेली ‘आंधळे आणि सहा हत्ती’ अशी एक इंग्रजी कविता बऱ्याच वर्षांपूर्वी शालेय क्रमिक पुस्तकात होती. ह्या कवितेसंदर्भातील एक किस्सा आचार्य़ अत्र्यांनी त्यांच्या ‘मी कसा झालो’ ह्या वाङ्मयीन आत्मशोधात सांगितला आहे.

या कवितेवर अत्र्यांनी पुण्याच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षकांसमोर आदर्श पाठ दिला. सर्व शिक्षकांनी त्याची टिपणं  काढली. पुढे एस.टी.सी.च्या पाठाची परीक्षा द्यावयाला एज्युकेशन इन्स्पेक्टर के.जी.जोशी निरनिराळ्या शाळांतून हिंडू लागले. प्रथम ते भावे स्कूलमध्ये गेले. तेथील शिक्षकाने ह्ती आणि सहा आंधळे हा पाठ दिला. त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूलमध्येही शिक्षकाने हाच पाठ दिला. योगायोग असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं. नंतर नूतन मराठी मध्येही हाच प्रकार. नंतर ते अत्र्यांच्या शाळेत आले आणि वर्गावर जाऊ लागले. वर्गात बघतात तो काय, फळ्यावर सहा आंधळे आणि हत्तीचे चित्र !  ते पाहताच त्यांचा रागाचा पारा चढला आणि ते तो पाठ घेणाऱ्या शिक्षकावर ओरडले,

“ No ,no. I don’t want to lesson. Throw those blind men & the elephant out”. तो शिक्षक थरथर कापू लागला. नंतर इन्स्पेक्टर जोशांनी अत्र्यांना सर्व हकीकत सांगितली तेव्हा अत्र्यांची हसून हसून पुरेवाट झाली.
या न्यायात किंवा कवितेत अंध व्यक्ती कशा फसतात ते दाखवलं आहे पण गंमत म्हणजे डोळस व्यक्ती देखील कशा फसतात ते एका जातक कथेत सांगितलं आहे. त्या जातक कथेचं नाव आहे किंसुकोपण जातक.
ती कथा अशी. एकदा वाराणसीत ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करत होता. त्याला चार पुत्र होते. एके दिवशी ते पुत्र आपल्या सारथ्याला म्हणाले, “आम्हाला पळस पाहायचा आहे. पळसाचे झाड दाखव.”  सारथ्याने एका वेळी एकालाच पळस दाखवीन अशी अट घातली. राजपुत्र कबूल झाले. सारथ्याने प्रथम थोरल्या मुलाला पळसाची जेव्हा पानगळ होते तेव्हा पळस दाखवला. दुसऱ्याला पालवी फुटते तेव्हा, तिसऱ्याला पळस फुललेला असताना आणि चवथ्याला फळं धरली असताना पळस दाखवला. त्यानंतर ‘पळस कसा दिसतो’ याची गोष्ट त्या राजपुत्रांत निघाली. तेव्हा,” जसा जळका बुंधा”,”जसं काही वडाचं झाड”, “जसा काही मांसाचा गोळा”, “जसं काही शिरसाचं झाड” असं एकेकाने पळसाचं वर्णन केलं.
ही कथा अंध गज न्यायाचीच असली तरी डोळस व्यक्ती देखील कशा फसू शकतात ते सांगणारी. म्हणून जरा वेगळी.
[ लेखमाला समाप्त
– ©️ डॉ. उमेश करंबेळकर

umeshkarambelkar@yahoo.co.in

@@@

‘शब्दतरंग’ पुस्तकाचे मुखपृष्ठ

शब्दांसोबत केलेली ही मुक्त मुशाफिरी आता पुस्तकरूपात ‘शब्दतरंग या शीर्षकाने प्रसिद्ध झाली आहे.
‘शब्दतरंग’
डॉ. उमेश करंबेळकर

संपादक : डॉ. सदानंद बोरसे
प्रकाशक :  राजहंस प्रकाशन प्रा. लि.,
 १०२५, सदाशिव पेठ, पुणे ४११ ०३०.
फोन : (०२०) २४४७३४५९
 
पृष्ठे १६८
किंमत रु. २००/-
डॉ. उमेश करंबेळकर यांचा पत्ता :
रघुकुल निवास, ३२५, मंगळवार पेठ, सातारा ४१५ ००२.
दूरध्वनी : ९८२२३९०८१०
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
थोर संवादिनी वादकाचं पुण्यस्मरण 

मोहन कान्हेरे 
 
 

कै. चंद्रचूड घनःश्याम वासुदेव 

उच्च कोटीचे संवादिनी वादक आणि संगीतकार पंडित चंद्रचूड घनःश्याम वासुदेव यांचं पुण्यस्मरण, रविवार दिनांक ११ जून २०२३ रोजी साहित्य संघ मंदिरामध्ये केलं गेलं. या निमित्ताने गायन वादनाचे रसीले कार्यक्रम सादर झाले.महाभारताचे गाढे अभ्यासक माननीय दाजी पणशीकर हे प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित होते. चंद्रचूड वासुदेव तथा भाऊ यांच्याबद्दलच्या सुगंधी आठवणी दाजी यांनी सांगितल्या. भाऊंच्या व्यक्तिमत्त्वातले छान पैलू श्रोत्यांना समजले. त्यांच्या अल्पशा मनोगतानंतर गायन वादनाचा रसिला कार्यक्रम सादर झाला.खास रत्नागिरीहून आलेले वरद सोहनी यांनी यमन रागात बडा ख्याल प्रस्तुत केला. याच रागातली दृत चीजही त्यांनी सादर केली. ती देखील श्रवण सुखद होती. राग पुरुष उभा करण्याचं त्यांचं कसब श्रोत्यांना खूप आवडलं.त्यांच्या राग वादनामध्ये खूप बारकावे होते आणि सौंदर्याची दृष्टी होती.त्यांना तबल्यावर ढंगदार साथ संगत, अथर्व आठल्ये यांनी केली. अथर्व यांचा बायावरचा घुमारा अत्यंत लक्षवेधी होता.

कार्यक्रमात पूनम पंडित गात आहेत.

त्यानंतर निलेश भिवंडकर,नितीन ढापरे, पूनम पंडित आणि तनय पिंगळे यांनी गायन रंग जमवला. तनय पिंगळे यांना पंडित नारायण बोडस यांची तालीम मिळालेली आहे. त्यांच्या गायनातून ते स्पष्टच झालं. खूप जमून गायले.

अखेरीस पंडित विनोद भूषण आल्पे यांनी दोन रचना सादर केल्या.  ‘या भवनातील गीत पुराणे’ आणि ‘जो भजे हरी को सदा ‘
दोन्ही रचनांमध्ये त्यांनी तीन महान गायकांची शैली सादर केली. पंडित भीमसेन जोशी, पंडित वसंतराव देशपांडे आणि पंडित कुमार गंधर्व. श्रोत्यांनी त्यांच्या गायनाला खूपच चांगला प्रतिसाद दिला.ऑर्गनवर साथ संगत करण्यासाठी पंडित विश्वनाथ कान्हेरे उपस्थित होते. हा वादक कार्यक्रमांमध्ये नेहेमीच रंग भरतो आणि श्रोत्यांची दाद मिळवतो…त्यांच्या वादनामध्ये अर्थातच कसलेपणा  होता. अनेक बारकावे त्यांनी वादनातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवले.तबलावादनामध्ये साई बँकर यांनी खूप चमकदार कामगिरी केली. त्यांचं वादन कमालीचं आकर्षक होतं. उल्हास दळवी यांनी तालवाद्यांची साथ संगत केली तीही चोख होती…..या कार्यक्रमांमध्ये शर्वरी वासुदेव ( भाऊंची सून ) यांनी रंगतदार सूत्रसंचालन केलं . सर्व कार्यक्रमाचं संयोजन माननीय प्रकाश वगळ यांनी केलं …….  त्यांना विशेष धन्यवाद……
प्रिय वाचक मित्रांनो, कार्यक्रमाचा हा वृत्तांत वाचल्यानंतर या महान कलाकाराची जडणघडण कशी झाली याबद्दलची उत्सुकता आपल्याला वाटणं स्वाभाविक आहे. त्या दृष्टीने त्यांच्या कलाजीवनाचे पैलू उलगडणारा छोटासा लेख देण्याचा माझा मानस आहे.* 
[ प्रकाशचित्रे : श्री. निषाद चंद्रचूड वासुदेव यांच्या सौजन्याने.]
– ©️ मोहन कान्हेरे
mohankanhere@yahoo.in
 * ‘मैत्री’च्या पुढील ( २९ जून २०२३ ) अंकात वाचा. – सं.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
जबाबदार कोण ?
थोडक्यात मार्मिक : ३१

कौस्तुभ ताम्हनकर

 “उन्होने गलती की है / जवाब मिलेगा / हम घुसके मारेंगे,” माननीय पंतप्रधानांचे हे उद्गार होते. त्यांनी  त्यांचे शब्द खरे करून दाखवले. पुलवामा, उरी, बालाकोट येथे जाऊन शत्रूला अस्मान दाखवून भारतीय जवान परतले. “तुम्ही एकाला मारलेत तर आम्ही दहांना  मारू,” जवानांना स्फुर्ती मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी दाखवला. आपली न्यायव्यवस्था देखील म्हणते, १०० अपराधी सुटले तरी चालतील पण एकही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये.या पार्श्वभूमीवर या बातम्या बघा.‘मिरवणुकीत लोक इतके नाचले की कोल्हापुरात पाच ट्रक आणि सात ट्रॉल्या भरून चपलांचा ढीग दुसऱ्या दिवशी जमा झाला ! बेभान होणे, बेहोष होणे म्हणजेच उत्सव साजरे करणे काय ?’
‘गोविंदा उत्सवात एका गोविंदाने प्राण गमावले तर पंधराजण जखमी त्यातील तीन अत्यवस्थ !’
‘गणेश विसर्जनाच्या वेळी राज्यात २० जणांचा मृत्यू पैकी १४ बुडाले ! ध्वनी प्रदूषणाची मर्यादा अमर्यादेपलीकडे.’या मृत्यूंना जबाबदार कोण ? यांना  जखमा कुणामुळे झाल्या ? ज्यांची कर्णपटले फाटली त्यांना शिवणार कोण ?
ज्यांचे जळाले त्यांचे अश्रू कोण पुसणार ? का पुसणार ? स्वत:च त्यांनी धोंडा स्वत:च्या पायावर मारून घेतला आहे ना ?  ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या म्हणी काय नुसत्याच घोकायच्या ?

पूर्वी उत्सवात मुक्या प्राण्यांचा बळी दिला जात असे. ती प्रथा बंद होतीय पण बळी जातच आहेत. हे बळी काय देव आपणहून घेत आहेत. का आपले वागणे बेजबाबदार पणाचे होत चालले आहे. त्या वागण्याची समज देव आपल्याला देत आहेत.
आजकाल सर्व उत्सव हे व्यवसाय झाले आहेत. व्यवसाय म्हटला की  त्यात फक्त फायद्याकडे लक्ष असते. कोण मारो, कुणाचे नुकसान होवो, याचे सोयर सुतक नसते. मूर्ती विसर्जन ही खरे तर दु:खद घटना आहे, ती आपण  नाचून बेभान होऊन आनंदाने साजरी करतो!

कुणीतरी या मृत्यूंची, या अपघातांची जबाबदारी घ्यायला हवी.
“घूस के मारेंगे.  एकाही निरपराध्याला शिक्षा झाली नाही पाहिजे,” ही आपली शिकवण आहे.
चला अपराध्याला हुडकू या.
अपराधी आपल्यातच दडलेले आहेत. अतिरेकी आणि यांच्यात काहीच फरक नाही.

जे लोक अजूनही प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती आणतात, जे अजूनही चांगल्या पाण्यात तिचे विसर्जन करतात, जे निर्माल्याचे वर्गीकरण न करताच त्याचे नदी नाल्यात विसर्जन करतात, जे कर्णपटले  दुखावतील अशा आवाजात बेबंध होऊन नाचतात, हेच खरे अपराधी आहेत. यांना कोण आणि कशी शिक्षा करणार ?

एक पर्याय आपल्या समोर आहे. ज्यांना ह्या सत्य परिस्थितीची जाणीव आहे. कुठे तरी हे थांबवावेसे वाटते त्यांनी ठरवावे. ज्या घरात मातीची मूर्ती आहे, जे लोक मूर्तीचे विसर्जन पाण्यात करतात अशा देवाला आम्ही नमस्कार करायला जाणार नाही. उंच उंच मानवी मनोरे बांधून शेवटच्या स्थरावर लहान मुलांना चढवतात अशा खेळांना बघण्यासाठी आम्ही हजेरी लावणार नाही. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजी मिरवणुकींना पाहण्यासाठी आम्ही जाणार नाही. डोळे दिपवणारी रोषणाई असणाऱ्या मंडपात आम्ही पाऊलच ठेवणार नाही.

असे वागणाऱ्या लोकांची संख्या वाढली तर प्रेक्षकच नाहीत अशी परिस्थिती निर्माण होईल. प्रेक्षकच  नाहीत तर रोषणाईचे  करायचे काय ? मानवी मनोरे कोणासाठी रचायचे ?  मिरवणुका का काढायच्या ? असे विचार आयोजकांच्या मनात येतील. वाईट सिनेमा नाही का आपोआप पडत, तसेच होईल. या सर्व बिभत्सपणाला उपस्थित  राहून आपण उभारी देत असतो म्हणजे काही अंशाने आपणही या मृत्यूंना, या अपघातांना जबाबदार आहोत हे लक्षात ठेवा !

– ©️ कौस्तुभ ताम्हनकर / ९८१९७४५३९३ / kdtamhankar@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
चित्रकारांचे दालन
 
©️ अशोक कर्णिक 
ashok.karnik@gmail.com
 प्रेषक मुकुंद कर्णिक
karnik.mukund@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@@@
 
हत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@

 

  

जून महिन्यातल्या एका रात्रीतलं स्वप्न

“A Midsummer Night’s Dream”
शेक्सपीयरच्या नाटकाचं थोडक्यात कथानक
 
 
अनुवाद : मुकुंद कर्णिक
 
 
भाग ७
अंक चौथा, प्रवेश पहिला
स्थळ: तेच, ओक वन
नव्या प्रियकराच्या प्रेमात आकंठ बुडालेली राणी टिटानिया बॉटमच्या हाताला धरून त्याला पुष्पशय्येकडे नेत असताना  ओबेरॉन पहात  असतो. टिटानिया म्हणते, “चल माझ्या प्रियकरा, आपण त्या शय्येवर बसूया. तिथं मी तुझ्या सुंदर गोबऱ्या गालांना कुरवाळत तुझ्या मऊ रेशमी केसात गुलाबाची फुलं माळेन.”

बॉटम (खिंकाळत): “पीचब्लॉसम, अरे ये, माझं डोकं खाजव बरं. आणि कॉबवेब कुठं आहे?”

कॉबवेब: हा काय मी इथं आहे.”

बॉटम: “हं, तू असं कर, ती त्या फुलावर बसलेली मधमाशी दिसते ना, तिचे पंख छाटून टाक आणि तिची मधाची पिशवी घेऊन ये माझ्या गालांना मसाज करायला. आणि मस्टर्डसीड, तू कॅप्टन कॉबवेबला मदत कर मसाज करायला. मला न्हाव्याकडं जावं लागणार आहे बहुधा, गालांवरली मऊ रेशमी लव फार वाढली आहे आणि ती माझ्या कोवळ्या गालांना टोचते आहे.”

टिटानिया प्रेमानं बॉटमचे गाल कुरवाळते आणि विचारते, “प्रिया, तुला मी काही मधुर संगीत ऐकवू का? आवडेल तुला?”

बॉटम खिंकाळून म्हणतो, “हो, चालेल, झांजांचा आणि सळयांच्या त्रिकोणावर बडव बडव बडवून केलेला कर्ण कर्कश्श आवाज मला फार आवडतो.”

टिटयानिया: “नाही तर तुला खायला काही गोड आणवू का?”

बॉटम: “अरे वा ! बरंच होईल की. छान लुसलुशीत हिरव्या गवताचा चारा आणून भरव मला. आणि हो, वाळलेले हरभरे देखील आवडतात मला बरं का. तेही आणव तोबरा भरायला. पण हे बघ, तुझ्या ह्या पऱ्यांना सांग आवाज करू नका म्हणून. मला झोप आली आहे कमालीची. खाणं येईपर्यंत जरा झोपून घेईन म्हणतो.”

टिटानिया: “झोप माझ्या लाडक्या. मी आहे तुझ्याजवळ, तुला अशी बिलगून. आणि पऱ्यांनो, जा बरं तुम्ही आपापल्या कामांना. आवाज करू नका अगदी.”

बॉटम घोरायला लागतो आणि टिटानियाही त्याला कुशीत घेऊन झोपी जाते.

हे सगळं बघून ओबेरोनची करमणूक होत असते. इतक्यात रॉबिन पक अवतीर्ण होतो. ओबेरॉन त्याला सांगतो, “ये. ये. मित्रा, बघतोयस ना हे काय चाललंय ते? मला कीव येते आहे रे माझ्या राणीची. थोड्या वेळापूर्वी मी तिला भेटलो होतो तेव्हा फुलं गोळा करत होती ह्या गाढवाच्या गळ्यात घालायला हार करण्यासाठी म्हणून. त्याच्या डोक्यावर छान सुवासिक फुलांचा मुकुटदेखील घातला होता तिनं. मी खूप समजावलं तिला असं करू नकोस म्हणून. पण ऐकायला तयार नव्हती. शेवटी मी समजावायचा  नाद सोडून दिला. मग तीच आपण होऊन तयार झाली तिच्याकडच्या त्या इंडियन मुलाला माझ्या ताफ्यात पाठवायला. आणि तिनं एका परीकरवी तसा निरोपही पाठवला त्याला लगेच. तेव्हा आता तिच्यावर आपण पांघरलेली भूल उतरावायला हवी आता. मी असं करतो, तिच्या डोळ्यांवर ह्या पानांचा रस पिळतो म्हणजे ती भूल नाहीशी होईल आणि ती पूर्ववत आपल्यात परत येईल. तू देखील ह्या गाढवाचं डोकं काढून घे. परत अथेनियन माणूस होऊ दे त्याला. म्हणजे तो त्याच्या इतर साथीदारांबरोबर शहरात परत जाईल. आजच्या रात्रीत जे काही घडलं ते केवळ स्वप्नच होतं ह्यापलिकडं त्याला काही आठवणार नाही. पण त्याआधी मला राणीवरची भूल काढून घेऊ दे.”

ओबेरॉन त्याच्या हातातल्या पानांचा रस टिटानियाच्या पापण्यांवर पिळतो आणि प्रेमानं म्हणतो,
“प्रिये, माझ्या लाडक्या राणी टिटानिया, जागी हो आणि आधी माझ्या प्रेमात होतीस तशीच पुन्हा हो. भूल पडण्याआधी जग जसं बघायचीस तसंच बघ. अग, ह्या पानांच्या रसाची करामत मदनाच्या फुलातल्या प्रेमरसापेक्षा जास्त जादूची आहे. जाणवेल तुला.”

टिटानिया बॉटमच्या अंगावरला आपला हात काढते आणि डोळे उघडते. प्रेमभऱ्या नजरेनं तिच्याकडं बघत उभ्या असलेल्या ओबेरॉनकडं बघून छानसं हसते आणि त्याचा हात हातात घेत म्हणते, “ओबेरॉन, अरे काय चमत्कारिक स्वप्न पडलं रे मला. चक्क एका गाढवाच्या प्रेमात पडले होते मी असं दिसलं स्वप्नात.” झोपेत आपले लांब कान हलवत असलेल्या बॉटमकडं बोट दाखवून ओबेरॉन तिला सांगतो, “राणी, तो बघ तुझा प्रियकर!”

टिटानियाच्या अंगावर शहारे येतात. ती ओबेरॉनच्या बाहुपाशात शिरून म्हणते, “ईss, काही तरीच काय? किती ओंगळ दिसतंय हे गाढव.”

“हो ना? बरं, आता शांत हो. तुझ्या पऱ्यांना बोलवून छानसं संगीत वाजवायला सांग. आणि रॉबिन, तू ते गाढवाचं डोकं काढून घे आणि ह्या पाचही जणांवर अगदी गाढ अशी झोप पांघरून टाक.”

टिटानिया पऱ्यांना बोलावते. ते सारे येऊन आपल्या बासऱ्या  आणि इतर वाद्ये वाजवायला लागतात. बॉटम गाढ झोपेत गेल्यामुळं त्याचं खिंकाळल्यासारखं घोरणं थांबतं. पक त्याच्या डोक्यावरून आपला हात फिरवतो आणि लगेच गाढवाचं डोकं जाऊन तिथं बॉटमचं मुळातलं मानवी डोकं दिसायला लागतं. पक त्याला म्हणतो, “बेटया, जागा होशील ना तेव्हा तुझ्या मूळच्या डोळ्यांनी जग पहा.”

ओबेरॉन पऱ्यांना जोरजोरात वाद्ये वाजवायला सांगतो. आणि टिटानियाकडे प्रेमाने हसून बघत म्हणतो, ”टिटानिया, माझा हात धर आणि आपण ह्या संगीताच्या तालावर नाचू या. आज मी खूप खूष आहे. उद्या देखील सरदार थेसियसच्या लग्नात खूप नाचून मस्ती करू. थेसियस आणि हिप्पोलिटाच्याच बरोबरीने ह्या झोपलेल्या प्रेमिकांचीही लग्ने लागतील. मस्त मजा असेल उद्या.”

पक ओबेरॉनला आठवण करून देतो की आता पहाट व्हायला लागणार आहे, आपल्याला निघायला हवं इथून. तेव्हा टिटानियाही म्हणते, “खरं आहे, आपल्याला जायला पाहिजे ओबेरॉन. चल, जाता जाता मला तू सांग की मी ह्या मानवांच्या घोळक्यात कशी आले आणि त्यांच्यातच झोपले कशी ते.”  तिघेही तिथून अदृश्य होतात.

थेसियस, त्याची शिकारी पार्टी येते. त्यांच्या घोड्यांच्या टापांचा किंवा त्यांच्या  बिगुलांचा आवाजदेखील झोपलेल्या चौघांना जागे करू शकत नाही इतके ते गाढ झोपलेले असतात. थेसियसच्या लोकांपैकी कुणालाही ते चौघे दिसत नाहीत. थेसियसच्या बरोबर हिप्पोलिटा आणि हर्मियाचा बाप एजियस हे दोघे देखील असतात.

थेसियस घोड्याचा लगाम खेचतो आणि पाठोपाठ येणाऱ्या स्वारांकडं बघून बोलतो, “तुमच्यापैकी कोणीतरी  एकजण जाऊन इथल्या वनरक्षकाला बोलवून आणा. आपण आता शिकार थांबवत आहोत. पण अजून दिवस उजाडायला वेळ आहे तर तोपर्यंत आपल्या शिकारी कुत्र्यांना पश्चिम कड्याजवळ मोकळं सोडा. राणीसाहेबांना त्यांचं तालासुरातलं भुंकणं ऐकू द्या. जा.”

दोघे स्वार  निघून जातात. थेसियस हिप्पोलिटाकडे हसून बघत म्हणतो, “हिप्पोलिटा, चल आपणही पश्चिम कड्यावर जाऊ या. तिथून आपल्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा खालच्या दरीतून येणारा नादमाधुर प्रतिध्वनी ऐकायला मिळेल.”

“मागे मी हर्क्यूलिस आणि कॅडमस ह्यांच्याबरोबर क्रीट बेटावर गेले होते अस्वलाच्या शिकारीसाठी तेव्हा स्पार्टाची शिकारी कुत्री होती आमच्याबरोबर. काय त्यांचं भुंकणं होतं म्हणून सांगू? चारी बाजूनी त्यांचे प्रतिध्वनी येत होते. आकाश काय, कडेकपारी काय, अगदी सगळीकडून आवाज येत होता फिरून फिरून. अहो असा प्रतिध्वनीचा खेळ म्हणजे अगदी तालासुरातलं संगीतच वाटत होतं. तुम्हाला सांगते, भुंकण्यातलं असं स्वर्गीय संगीत मी कधीच ऐकलं नव्हतं.“ हिप्पोलिटा म्हणते.

“अग, आपली कुत्री देखील स्पार्टाच्या कुत्र्यांच्याच वंशावळीतली आहेत, तोच रंग, तसंच गळ्याखालचं लोंबतं मांस, जमीन झाडत असल्यासारखे कान! थेस्सालीच्या बैलांचे असतात ना तशा कमानीसारख्या वाकडया पायानी पळतात. पळण्यात तशी फारशी वेगवान नाहीत पण चर्चच्या घंटेसारख्या आवाजात अशी भुंकतात ना की ऐकतच राहावं. ऐकशीलच तू आता. चल.” असं म्हणत थेसियस घोडा वळवतो. दोन तीन टापा टाकल्या असतील नसतील इतक्यात थेसियसचं लक्ष गवतावर झोपलेल्या मुलींकडं जातं. घोड्याला थांबवत तो म्हणतो, “अरेच्च्या, ह्या कोण मुली? आणि इथं कशा काय झोपल्यात?”

एजियस त्याच्या घोड्यावरून उतरून जवळ जाऊन बघतो आणि चकित होऊन म्हणतो, “सरकार, अहो ही माझी मुलगी हर्मिया आहे. आणि ही दुसरी नेदारची मुलगी हेलेना. आणि ते बघा तिथं पलिकडंच झोपलेत ते डिमेट्रियस आणि लिसांडर. पण मला कळत नाही हे चौघेही इथं कसे? आणि तेही एकत्र?”

थेसियस: “मीही बुचकळ्यात पडलोय. कदाचित आपण इथं येणार ते समजल्यामुळं आले असतील आपल्याला भेटून शिकारी जथ्थ्यात सामील व्हायला. अरे हो, पण एजियस, आज हर्मियानं तिचा निर्णय सांगायचाय ना?”

एजियस: “होय सरकार.”

थेसियस स्वारांना सांगतो बिगुलांचा आवाज करून त्या चौघांना जागं करायला. चार पाच जण बिगुले वाजवतात. इतका मोठ्ठा आवाज होतो की झोपलेले चौघेही खडबडून जागे होतात. थेसियस आणि इतर लोकांना बघून दचकतात. थेसियस हसून म्हणतो, “शुभ प्रभात, मित्रांनो, अरे व्हॅलेंटाईन्स डे कधीच होऊन गेला. आणि आत्ता तुम्ही प्रेमिकांनी जोड्या जमवल्यात काय?”

चौघेही पटकन गुढ्ग्यांवर बसून नमस्कार करतात. लिसांडर बोलायचं धाडस करतो, “क्षमा असावी सरकार.”

“उठा, उठा.” थेसियस लिसांडर आणि डिमेट्रियस या दोघांकडं पाळी पाळीनं बघत म्हणतो, “अरे कालपर्यंत तुम्ही दोघं एकमेकांचे वैरी होतात ना? मग ही अशी एकमेकांच्या शेजारी झोपण्याइतपत मैत्री कशी झाली तुम्हा दोघांत?

लिसांडर: “सरकार, मी गोंधळून गेलोय, अर्धवट जागा, अर्धा झोपेत असा आहे मी बहुतेक. त्यामुळं कदाचित मला आठवत नसावं नीट. पण मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आठवायचा. हं, आत्ता आठवलं, सरकार, क्षमा करा, मी आणि हर्मिया इथं आलो होतो काल रात्री, अथेन्स सोडून पळून जायच्या उद्देशाने. अथेन्सच्या कायद्यांपासून सुटका करून घ्यायची होती आम्हाला.”

एजियस: “बस्स कर लिसांडर. फार झालं! सरकार, तुम्ही ऐकलंत ना हे? मला न्याय द्या सरकार. हा पळवून नेणार होता माझ्या मुलीला. डिमेट्रियस, ऐक. तुझ्या होणाऱ्या बायकोला, माझ्या मुलीला माझ्या परवानगीशिवाय पळवून नेऊन हा आपल्या दोघांनाही फसवणार होता.”

रागानं लालबुंद झालेल्या एजियसकडं बघायचं डिमेट्रियस टाळतो. हेलेनाकडं चोरटा कटाक्ष टाकून थेसियसला म्हणतो, “सरकार, ह्या दोघांच्या पळून जायच्या कटाविषयी मला हेलेनानं सांगितलं तेव्हा मी चिडून त्याना अडवायसाठी म्हणून ह्या वनात त्यांच्या मागावर आलो. हेलेनाही माझ्या पाठोपाठ आली. आणि सरकार, काय झालं, कसं झालं ते मला समजत नाही, पण कुठल्या तरी दैवी शक्तीनं मला जाणवून दिलं की माझं हर्मिया वर असलेलं प्रेम बर्फासारखं वितळून गेलं आहे. आज मला जाणवतय की हेलेना हीच माझं सर्वस्व आहे, हर्मिया नाही. माझ्या हृदयाची स्पंदनं, माझ्या डोळ्यांतला प्राण, सर्व काही हेलेना आहे. एखाद्या आजारी माणसाला जसं त्याचं आवडीचं अन्न नकोसं होतं तसं झालं होतं माझं हेलेनाच्या बाबतीत. पण आता माझा आजार दूर झाला आहे, डोकं आणि मन ठिकाणांवर आलेलं आहे. मी हेलेनाशिवाय जगू शकणार नाही हे मला कळून चुकलंय सरकार. आयुष्यभर तिच्याशी एकनिष्ठ राहून मी तिच्यावरच प्रेम करत राहीन मरेपर्यंत.”

थेसियस एजियसकडे बघतो. एजियस खांदे उडवून काही न बोलता बाजूला जातो. थेसियसच्या चेहऱ्यावर हसू फुटतं. तो म्हणतो,” बरं का रे प्रेमिकांनो, तुम्ही नशीबवान आहात. त्यामुळंच आपली इथं भेट झाली. तुमची ही चित्तरकथा आम्ही नंतर ऐकू सवडीनं. आणि एजियस, आम्ही या प्रेमिकांच्या संबंधाने काल दिलेला निर्णय बदलतो आहोत. आमच्या विवाहसमारंभातच, त्याच देवळात, ही दोन जोडपी देखील विवाहबद्ध होतील. आणि हो, आता दिवस उजाडतोय. तेव्हा आपण शिकार थांबवून अथेन्सला परत जाऊ. सगळेच. आज मोठी जंगी पार्टी करूया. चल हिप्पोलिटा.”

दोन् जोडप्यांखेरीज बाकी सगळे जण निघून जातात.

डिमेट्रियस: “मी तर चक्रावलो आहे. सारं कसं अंधुक, अस्पष्ट दिसतंय मला.”

हर्मिया (डोळे चोळत): “मला तर सगळ्या गोष्टी दोन दोन दिसतायत.”

हेलेना: मला माझा डिमेट्रियस, माझं मूल्यवान रत्न परत मिळालं? विश्वास बसत नाहीये.”

डिमेट्रियस: आपण जागे आहोत का खरंच? मला वाटतंय आपण अजून झोपेतच आहोत, स्वप्न बघत. स्वप्नात मला सरदार थेसियस दिसत होते आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या बरोबर यायला सांगितलं.”

हेलेना: “हो, त्यांच्या बरोबर राणी हिप्पोलिटा देखील होती.”

लिसांडर: “सरदारांनी आपल्याला देवळात यायला सांगितलं.”

डिमेट्रियस: हो ना? बघा, तुम्हालाही तसंच वाटतंय म्हणजे ते सगळं खरंच असणार. आपण जागे आहोत तर. चला मग, आपण त्यांच्या पाठोपाठ जाऊया. वाटेत आपल्या स्वप्नांबद्दल चर्चा करू.”

चोघेही  जातात.

बॉटम डोळे उघडतो. “माझा संवाद आला की सांगा बरं का रे मला,” तो पुटपुटतो. “मी म्हणायचंय .. ‘नि:पक्षपाती पिरॅमस’.” बॉटम अडखळत उठतो, जांभई देतो आणि इकडेतिकडे बघत हाका मारतो, “पीटर.. पीटर क्विन्स ! फ्लूट !  स्नाऊट ! स्टारवेलिंग ! आहात कुठं सारे?” ते सगळे आधीच गाढवाचं डोकं असलेल्या बॉटमला बघून पळून गेलेले असतात. बॉटमला वाटतं  आपल्याला गाढवाचं डोकं उगवलं आहे असं आपण स्वप्नात बघितलं. “क्काय चमत्कारिक स्वप्न होतं ते. पण तितकंच गमतीचं ! पीटर क्वीन्सला सांगितलं पाहिजे त्या स्वप्नावर एक पोवाडा लिही ‘बॉटमचं स्वप्न’ असा आणि थेसियसच्या लग्नात गा. नाटकाच्या शेवटी गायचं. नको नको, त्यापेक्षा थिस्बे मेल्यानंतर गायलं तर उत्तम होईल.”

[ पडदा ].

***

अंक चौथा, प्रवेश दुसरा
स्थळ: पीटर क्विन्सचे वर्कशॉप

क्विन्स, स्टारव्हेलिंग, फ्ल्यूट बोलत आहेत.
क्विन्स विचारतो, “बॉटमच्या घरी जाऊन आलात का तुम्ही? आलाय  का तो परत?” यावर स्टारवेलिंग उत्तर देतो, “नाही ना. त्यानं कुणाशीही संपर्क नाही केला. ती जी काही भुताटकी होती ओक वनात तिनं बॉटमभाऊचं अपहरण केलेलं असणार हे नक्की.”
फ्ल्यूट  म्हणतो, “बॉटमभाऊ परत आला नाही तर आपल्या नाटकाचा सत्यानाश होईल. आपण प्रयोग करूच शकणार नाही. हो ना?”
क्विन्स: “खरं आहे. आख्ख्या अथेन्समध्ये पिरॅमसची भूमिका बॉटमच्या इतक्या तयारीनं करू शकेल असा कुणी माणूसच नाही.”
फ्ल्यूट मुंडी हलवतो, “अथेन्स मधल्या कुणाहीपेक्षा बॉटमभाऊचा अभिनय उजवाच असतो.”
क्विन्स: “शिवाय त्याच्या हजरजबाबीपणाला तर तोडच नाही.”
फ्ल्यूट: “त्याच्या आवाजामुळंही तो ‘पॅरामूर’च ठरतो.”
क्विन्स: “अरे दीड शहाण्या, पॅरामूर नाही. पॅरॅगॉन!  पॅरॅगॉन म्हणजे सर्वश्रेष्ठ. आणि पॅरामूर म्हणजे व्यभिचारी.”
फ्ल्यूट: “असं का? चुकलंच माझं.”
क्विन्स काही बोलणार असतो इतक्यात स्नग प्रवेश करतो.
स्नग: “दोस्तानो, ऐका. सरदार थेसियस आणि राणी हिप्पोलिटा आत्ताच देवळातून बाहेर आलेत. त्यांच्या लग्नातच आणखी दोन जोडप्यांची देखील लग्ने लावली गेली. आता जर आपण आपलं नाटक सादर करू शकलो असतो ना तर तुफान धमाल झाली असती यार. आपला नावलौकीक तर झाला असताच. शिवाय जो भरभक्कम मेहेनताना मिळाला असता तो वेगळाच. हो ना क्विन्सभाऊ?”
फ्ल्यूट: “ओ बॉटम, बॉटमभाऊ ! तुला कल्पनाच येणार नाही  तुझ्या गायब होण्यानं तुझं किती नुकसान झालंय त्याची. अरे दिवसाला सहा पेन्स अशी पेन्शन जन्मभरासाठी मिळाली असती. हो की नाही दोस्तानो? मी पैजेवर सांगतो पिरॅमसच्या भूमिकेसाठी सरदार थेसियसनी  बॉटमभाऊला सहा पेन्स रोज ह्यापेक्षा कमी कधीच दिले नसते.”
एवढ्यात आवाज येतो, “नटसम्राट लोक, आहात कारे सगळे इथं हजर?” आणि साक्षात निक बॉटम दारात येऊन उभा राहतो.
“बॉटम, ये ये बॉटम,” क्विन्स  धावत जाऊन त्याला मिठी मारतो. “वा वा, आजचा दिवस मोठा भाग्याचा आहे. ह्या क्षणाची आतुरतेनं वाट बघत होतो आम्ही सगळे.”
“दोस्तानो, मला तुम्हाला काही जबरदस्त गोष्टी सांगायच्या आहेत,” आनंदानं नाचणारे सगळे कलाकार शांत झाल्यावर बॉटम म्हणतो. “पण काय ते विचारू नका. विचाराल तर सांगणार नाही कारण मी सच्चा अथेनियन आहे. सांगेन तेव्हा गोष्टी अगदी जशा घडल्या तश्श्या सांगेन.”
क्विन्स: “सांग सांग बॉटम. आम्हाला ऐकायच्या आहेत.”
बॉटम: अंहं ! माझे ओठ बंद आहेत. आत्ता एवढंच सांगतो की सरदार थेसियस यांचं जेवण आटोपलं आहे. तेव्हा आता आपल्या नाटकासाठी सज्ज व्हा. तुमचे पोशाख, बूट, तुमच्या नकली दाढया अशा सगळ्या जामानिम्यासह राजवाड्यावर चला. आपापले संवाद नीट आठवून घ्या. कारण आपलं नाटक पास झालंय. आपण प्रयोग करणार आहोत आपल्या नाटकाचा. त्यासाठी थिस्बेचे कपडे स्वच्छ असले पाहिजेत. आणि सिंहाच काम जो कोणी करणार आहे त्यानं नखं कापायची नाहीत हे लक्षात घ्या. सिंहाच्या पंजासारखी ती  बाहेर निघालेली दिसली पाहिजेत. आणि मुख्य म्हणजे प्रयोगाच्या आधी कुणीही कांदा लसूण खाऊ नका. आपले आवाज गोड असायला हवेत. तरच प्रेक्षक म्हणतील ‘किती गोड विनोदी प्रहसन आहे’. बस्स  आता आणखी काही सांगायचं नाही. चला निघा.”
सगळे जातात.

[ पडदा.]
(क्रमश:)
[ वरील अनुवादाचे यापूर्वीचे सहा भाग, अनु. दि. १७ ऑक्टो. १२ नोव्हें., १५ डिसेंबर २०२२, १३ जानेवारी, २१ फेब्रुवारी आणि ०६ एप्रिल २०२३ रोजी प्रसिद्ध झाले होते. ]

– अनुवाद मुकुंद कर्णिक 
karnikmukund@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आजची कविता

प्रदीप अधिकारी

अगोचर

तळ डोहाचा करीत गहिरा,
काजळ माया जळांत पसरल्या…
ध्यानस्थ बसले झाड  वडाचे,
जमवूनी  भवती  गूढ़ सावल्या…
भग्न शिवालय काठावरती,
गाभाऱ्यांतील मिणमिण पणती…
पाय उलटे जळांत सोडुनी,
अगोचर कुणी ते वाट पाहती… !!!

– ©️ प्रदीप अधिकारी  

9820451442
adhikaripradeep14@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
काय वाचाल ?

अनामिकाची शिफारस

लोभ असावा’ आणि ‘एखाद्याचा मृत्यू‘ हे आणखीन एक विचित्र नावाचे पुस्तक नुकतेच वाचून काढले. या दोन दीर्घकथांचे लेखक आहेत श्री. मनोहर शहाणे व प्रकाशक आहेत मौज प्रकाशन. विषयांची सहजसुंदर हाताळणी व वरचा दर्जा या दोन गुणांचा संगम यात दिसून येतो. त्यामुळेच सलग असे वाचन होऊन कथाविषय मनामध्ये रेंगाळत राहतात.

आणखी एक पुस्तक वाचले. ‘चौफुला‘ – लेखिका आहेत चौघीजणी – श्रीमती सरला कारखानीस, लीला आवटे, मृण्मयी बारपांडे, हेमा मथुरे. प्रकाशक अभिनव प्रकाशन मुंबई.

‘चौफुला’ च्या चार लेखिकांपैकी कोणाचेही नावाभोवती प्रसिद्धीचे वलय नाही ; कदाचित म्हणूनच मी सहज ते वाचावयास घेतले व त्यात रंगून गेलो. एकूण अकरा कथांमधील मला विशेष आवडलेल्या कथा म्हणजे ‘एक रात्र’ ( ले. सरला कारखानीस ), ‘साफल्य’ ( लीला आवटे ), म्हैस ( मृण्मयी बारपांडे ) या आहेत. मनामध्ये दीर्घकाळ रेंगाळत राहतील अशा या कथा आहेत. आपण त्या जरूर वाचाव्यात.

१९२० ते १९७१ एवढ्या प्रदीर्घ कालखंडाचा बस वाहतुकीच्या संबंधात आलेला अनुभव ‘एस. टी. तील दिवस‘ या नावाने न. गो. पंडित यांनी लिहिलेला आहे. ( प्रकाशक शुभदा सारस्वत प्रकाशन पुणे ) प्रवासी वाहतुकीमध्ये १९२० ते १९५० पर्यंत खाजगी वाहतूक कंत्राटदारांचीच चालती होती. पुढे सरकारी पातळीवरून त्याची मक्तेदारी एस. टी. कार्पोरेशनकडे देण्यात आली, याचा माहितीपटच  ( Documentary Film ) जणू यात चितारलेला आहे. आता माहितीपटच असल्याने त्यात एकसूरीपणा फार डोकावतो. मात्र अपरिचित असा विषय असल्यामुळे एवढा प्रचंड व्याप उभा करता करता पडद्यामागे काय काय हालचाली होत असतात त्याचे वाचनीय असे चित्रण यात केले आहे.

असेच दुसरे एक माहितीपटवजा पुस्तक म्हणजे ‘आम्ही पोस्टातील माणसं‘ लेखक सीताराम मेणजोगे डिंपल  प्रकाशन ) . पोस्टाच्या नोकरीत विविध पातळ्यांवर लोकांशी संबंध येत असल्याने ते अनुभव वाचावयास चांगले वाटतात हे मात्र खरे !

आता भेटू असेच पुढील अंकी …

– अनामिक

संग्रहालय सप्टेंबर १९८६ वरून साभार पुनःप्रसिद्ध ]

   ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
हाराष्ट्राला चिरस्मरणीय अशा काही विभूति

भाग ३७

प्रिय वाचक,
‘मैत्री’च्या १४ नोव्हेंबर २०२१ च्या अंकापासून, शतकापूर्वीच्या काही ज्ञात, अज्ञात तसेच विस्मृतीत गेलेल्या विभूतींचा थोडक्यात सचित्र परिचय. मासिक ‘मनोरंजन’च्या दिवाळी अंक १९१० मधून साभार क्रमशः पुनःप्रसिद्ध करण्यात आला. आजचा हा ३७ वा भाग शेवटचा. या लेखमालेचे बहुसंख्य वाचकांनी स्वागत केले आणि त्या त्या विभूतींना वंदन केले. – सं. 

(१११) लिंगप्पा जयप्पा सरदेसाई 
 
[ स. १८६२ – १९०६ ] 
वीरशैवलिंगि ब्राह्मण; जन्म मिरज संस्थानांत शिंगली गांवी १० जानेवारी १८६२; ह्यांना १८७२ सालीं शिरसिंगीचे सरदेसाई श्रीमंत जयप्पा यांच्या ज्येष्ठ पत्नीने दत्तक घेऊन लिंगप्पा हें नांव ठेविलें; यांनी मराठी, संस्कृत व इंग्रजी वाङ्मयाचा अभ्यास खाजगी रीतीनें केला; ह्यांनी आपल्या संस्थानांत फार सुधारणा केल्या; लाखो रुपये खर्च करून विहिरी, तलाव बांधून पाण्याची सोय करून रयत सुखी केली; १९०४ सालीं धारवाड येथील लिंगायत विद्यार्थ्यांच्या बोर्डिंगास सालीना एक हजार उत्पन्नाचे गांव तोडून दिलें; हे पहिल्या प्रतीचे सरदार होते; ह्यांना मुंबई सरकाराने दोनदा आपल्या कायदे कौन्सिलाचे सभासद नेमिलें होतें; वीरशैव महासभेच्या अध्यक्षत्वाचा मान यांना दोनदा देण्यांत आला होता; आपल्या समाजाच्या उत्कर्षासाठी यांनी अनेक प्रकारे परिश्रम केले; स्वज्ञातीत शिक्षणप्रसार करण्याची यांना फारच कळकळ होती; मृत्यूसमयी दत्तकपुत्र घेण्याची यांना सूचना केली असतां ‘एका मुलाचा चरितार्थ चालविण्यापेक्षा ज्ञातीतील हजारो मुलांच्या चरितार्थाचें साधन करून ठेवणें उत्तम’ असें म्हणून अंतकाली  आपलें सर्वस्व ४० हजार रु. उत्पन्नाचें संस्थान यांनी लिंगायत फंडास अर्पण केलें; ह्यांचा स्वभाव अत्यंत विनायशाली व मनमिळाऊ होता ; मृत्यु २३ आगस्ट १९०६. 
 
 
(११२) आनंदीबाई जोशी 
 
 
 
 
[ स. १८६५ – १८८७ ]  
कोकणस्थ ब्राह्मण; जन्म पुणें येथें शके १७८७, चैत्र शुद्ध ९; विवाह तेरावे  वर्षे श्रीयुत गोपाळराव विनायक जोशी यांचेबरोबर झाला; लग्न झाल्यावर शिक्षणास प्रारंभ झाला; इंग्रजी शिकण्यास कोल्हापूर येथें सुरुवात झाली; ता ७ एप्रिल एप्रिल १८८३ रोजी ह्या कलकत्त्याहून अमेरिकेस जाण्यास निघाल्या ; अमेरिकेत डाक्टरीच्या परीक्षा पास होऊन ११ मार्च १८८६ रोजी यांना एम् . डी. ची पदवी मिळाली व न्यू इंग्लंड येथील बायकामुलांच्या दवाखान्यावर यांची नेमणूक झाली ; एम् डी ची पदवी मिळविणारी ही पहिलीच हिंदी स्त्री होय; अमेरिकेतील हवा मानेना म्हणून या स्वदेशीं येण्यास निघाल्या व १८८६ चे नवंबरचे १६ वे तारखेस मुंबईस येऊन पोंचल्या; यांच्या अकालिक मृत्यूमुळें यांनी संपादन श्रेष्ठ ज्ञानाचा आपल्या देशास फायदा घेतां आला नाहीं, हे देशाचें दुर्दैव समजलें पाहिजे; मृत्यु २६ फेब्रुआरी १८८७. 
 
 
(११३) व्हायओलेट क्लार्क   
 
 
[ स.     – १९०९ ]
इंग्रज ख्रिश्चन; मुंबई इलाख्याचे लोकप्रिय गव्हरनर  सर जार्ज क्लार्क यांच्या ह्या कन्या; ह्या आपल्या मातेबरोबर १९०७ सालीं मुंबईस आल्या; हिंदुस्थानावर आणि हिंदू लोकांवर यांचे फार प्रेम असे; हिंदुस्थानांत येण्यापूर्वीच यांनी रामायण, महाभारत, भगवद्गीता, उपनिषदें ह्या हिंदूंच्या पूज्य ग्रंथांचा जर्मन आणि इंग्लिश भाषेंतून श्रद्धापूर्वक अभ्यास केला होता; शासित आणि शास्ते यांच्यांत निरंतर स्नेहसंबंध असावा असें यांच्या वडिलांप्रमाणेच यांचेंहि मत असे व तसे प्रसंग घडवून आणण्यासाठी यांचे मनःपूर्वक प्रयत्न असत; एतद्देशीय लोकांशी या फारच मिळून मिसळून वागत व अनाथ अपंगांना साहाय्य करण्याच्या कामीं तनुमनानें झटत; अस्पर्श वर्गाच्या मुलांच्या शिक्षणास उत्तेजन देण्याच्या कामीं त्यांनी फार आस्थापूर्वक प्रयत्न केले ; त्यांच्या मदतीसाठी स्वतः जलसा करून हजारो रुपये मिळवून दिले; हिंगणे येथील अनाथ बालिकाश्रमासाठी मोठा फंड जमविण्याचें यांनी योजिलें होतें; यांचा तो हेतू यांच्या अकाल निधनामुळें मनातल्या मनातच राहून गेला; सा-या मुंबई इलाख्याचें यांनी आपल्याकडे चित्त वेधून घेतलें होतें; यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ, दयाळू आणि परोपकारी होता; यांच्या अकाल मृत्युमुळें मुंबई इलाख्यातील सारी प्रजा फार हळहळली; आपलें कोणी निकट संबंधी मनुष्य गेलें, असेंच सर्वांना वाटलें; मृत्यु २२ मार्च १९०९.
[ लेखमाला समाप्त ]
– अज्ञात
[ ‘मनोरंजन‘ दिवाळी अंक १९१० वरून साभार पुनःप्रसिद्ध ]
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
घन तमी शुक्र बघ राज्य करी ..
 
  

चांदणे स्वरांचे :  ४

एखादं गाणं आपल्याला केव्हा भावतं? बऱ्याच वेळा आवडत्या गायक-गायिकेचा प्रभाव असतो हे जरी एक कारण झालं तरी काही गाणी अशी असतात की ती अगदी हृदयापर्यंत जाऊन भिडतात. त्या काव्यात मांडलेले विचार अगदी त्या काव्य सरींमध्ये  आपल्याला चिंब चिंब करतात.

गाणं, गायकी, शब्द, संगीत, चाल, लय सगळं सगळं आपल्या आरपार पोहोचतं. असं गाणं कितीही वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा आपण ते ऐकतो, मनोभावे त्याची पारायणं करतो. किंबहूना ते गाणं त्याच्या सगळ्या हरकती, सूर, ताल, लय अगदी आत आत भिनलेलं असतं.

उत्तम आवाज, उत्तम सूर, उत्तम संगीत याला जर उत्तम शब्दांची जोड लाभली तर ती कलाकृती अजरामर होते. हे गाणं आहे १९२० साली लिहिलेलं ! भा.रा तांबे यांनी लिहिलेलं, हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेलं आणि अर्थातच लताबाईंच्या स्वर्गीय आवाजाचा परिसस्पर्श लाभलेलं. माझ्या अत्यंत आवडीचं. घन तमी शुक्र बघ राज्य करी ..

कसं कोणास ठाऊक पण मला हे गाणं अनवधनानं ऐकायला मिळालं. पूर्वी एकमेकांच्या कॅसेट एकमेकाला ऐकायला द्यायची पद्धत होती. अशीच माझ्या एका दर्दी भावाने मला त्याची कॅसेट गाणी ऐकायला दिली आणि या गाण्याचा खजिना हाती लागला.

गाण्याच्या सुरुवातीला स्टीलड्रम, झायलोफोन, ट्रॅंगल वा तत्सम वाद्यांचा एक अनोखा आवाज येतो आणि जणू लुकलूक करणारे तारे, तारांगण असं काहीसं डोळ्यासमोर सहज येऊ लागतं. त्यानंतर गुढगर्भ असे व्हायलिनचे पिसेस वाजतात. जणू अलगद ते आपल्याला अंतराळात नेतात. आणि मग स्वर्गीय सूर उमटतात ..

घन तमी शुक्र बघ राज्य करी ..
खिन्न मना बघ जरा तरी …

घन तमी चा घनगर्द सूर अगदी दाटून आलेला अंधार हुबेहूब दाखवतो. नुसताच काळोख नाही तर मानव निर्मित निराशेचा खोल काळोख .. स्वतःच निर्माण केलेला काळोख मनाला वेढून राहीलेला .. या अशा खिन्न झालेल्या मनाला, आकाशात काळोखातही प्रचंड तेजाने चमचमणाऱ्या शुक्राच्या चांदणीकडे पाहण्यास तांबे सांगतात, नव्हे काळोखावर त्याचेच साम्राज्य चालते असेही दर्शवतात. खिन्न मना म्हणतानाची खिन्न अवस्था आणि बघ जरा .. वरी .. ह्याचा फोर्स ते आकाशाला भिडलेले सूर इतके प्रेरीत करणारे की अगदी अनवधानानं आकाशाकडे पहावं आणि नुसते कानात साठवून ठेवावे.

त्याच फ्लो मध्ये पुढचे कडवे येते ..

ये बाहेरी अंडे फोडुनि
शुद्ध मोकळ्या वातावरणीं
का गुदमरशी आतच कुढुनी
मार भरारी जरा वरी

ये ऽऽऽ बाहेरी ही इतक्या फोर्सने म्हटलंय आणि ते सूर इतके टीपेला जातात की अगदी ते तडकणारं अंड्याचं टरफल आणि बाहेर येणारं ते पिल्लू दिसू लागतं.

आणि मग जणू ती आतली सगळी घुसमट सोडून बाहेर येऊन शुद्ध श्वास घेऊ लागतं हे शब्दातून, सूरातून ठायी ठायी प्रतित होतं. सगळी घुसमट संपून, तडतड संपून बाहेर आल्यावर ते सूर अगदी शांत होतात, शुद्ध मोकळ्या म्हणताना तो हलकेपणा, ते बाहेरच्या जगात वावरणं, सारी आवरणं गळून जाऊन मोकळं होऊन तरंगणं हे सारं अगदी त्या शुद्ध मोकळ्या दोनच शब्दातून समजावं.

का गुदमरशी .. आतच कुढूनी म्हणताना ते आतल्या आत कुढणं, गुदमरणं, उगीच काही कारण नसताना त्या गर्तेत सापडणं जणू त्या स्वरलिपितून दिसून येतं.

मार भरारी जराऽऽऽ … तितकच फोर्सफूल .. आव्हान देणारं. हृदयनाथांनी योजलेली स्वरयेजना अगदी शब्द थेट उलगडून सांगणारी. काव्याशी अर्थाशी प्रामाणिक राहून केलेली..सुरवातीला पोटतिडकीने हे सांगितल्यावर थोडे सूर खाली येतात .. नूर बदलतो. आता जरा समजावणीच्या सूरात लताबाई गाऊ लागतात.

फूल गळे फळ गोड जाहले
बीज नुरे डौलात तरु डुले
तेल जळे बघ ज्योत पाजळे
का मरणी अमरता ही न खरी

खिन्न मनाला समजावताना निसर्गातली चिरपरिचित उदाहराणे देऊन तांबे जणू उत्पत्ती स्थिती लय याचा सिद्धांत समजावतात आणि हृदयनाथांच्या संगीत संयोजनात लताबाई ते कमालीच्या परिणामतेने गातात. इथे फक्त सुरांचा गोडवा उपयोगाचा नाही तर त्यापलिकडे जाऊन तो खोलवर दडलेला गुढ गर्भित अर्थ त्या त्यांच्या स्वरातून हवा तिथे जोर देऊन हवं तिथे हलके म्हणून रसिकांच्या हृदयालाच हात घालतात. फूल जरी गळलं तरी ते फळाच्या रूपात येतयं हा विश्वास ते अलौकीक सूर देतात. डौलात तरू ऐकताना झाड थरारल्याचा भास होतो.

तेल गळलं तरी बघ … अगदी आपलं लक्ष वेधून घेतलं जातं , जीवनाची सत्यता आपल्यावर बरसते.

पहिल्या कडव्यात थेट शुक्राच्या माध्यमातून खिन्नतेचा अंधार दूर करायला सांगणारे तांबे, दुसऱ्या कडव्यात उभारलेल्या मनाला पदोपदीने समजावतात आणि शेवटी चक्क.. सर्व प्राणीमात्रांना ज्याची भीती, चिंता भेडसावत असते त्या मरणालाच हात घालतात. लताबाईंचे सूर ही बदलतात.. किंचित नरमाईने त्या गातात
मरणाची विशालता सुरांतून कळते .. तो ब्रह्मांडाचा पसारा समोर तरळतो. आपल्या क्षृद्रत्वाची भावना रसरसून वर येते आणि त्यातच मरण म्हणजे जणू त्याची करूणा, कृपा .. अगदी
दुनिया जिसे कहते है
मिल जाए तो मिट्टी खो जाए तो सोना ..

याची आठवण यावी. ती अनंत माया ते अनंत प्रेम कसं आपल्याला कवेत घ्यायला आसुसलं आहे … पण आपण मात्र खऱ्या सुखापासून वंचित राहून कपोल कल्पित दुःखात का वृथा ढकलतो याचा पश्चात्ताप , अनुताप व्हावा इतकं इतकं परिणामकारक त्यांनी ते गायलय.

मना वृथा का भीशी मरणा
दार सुखाचे ते हरि करुणा
आई पाही वाट रे मना आ आ आ
पसरोनी बाहु कवळण्या उरीं

पुन्हा साऱ्याची इतिश्री … घनतमी मधून होते.
हृदयनाथांचं प्रत्येक गाणं वेगळं. त्याची हाताळणी त्या त्या श्रीमंत काव्यासारखीच गर्भरेशमी. मोजके सूर पण कठीण येजना .. अशा मिलाफातून आणि लता , आशाच्या सूरानी तेजाळून ते चांदणं आपल्यात झिरपावं . गायचा प्रयत्न केला तरी थिटेपण जाणवावं आणि मग फक्त कानांनी ऐकत ते हृदयात साठवावं अशी अवस्था .. भल्या भल्यांची होते तिथे सामान्य रसिकांची काय कथा ?
असामान्य शब्द, भावगर्भीत, ब्रह्मांडापर्यंत रसिकांना सहज नेणारे आणि संगीताच्या जादूनं ते अंतराळ सुरावटीतून प्रत्यक्षात यावं … इतकं हे गाणं प्रभावशाली. इतक्या वर्षानंतरही त्याची थोरवी टिकवून राहीलेलं!! रसिक मनावर शुक्राप्रमाणेच अधिराज्य करणारं, अजरामर !!!!!

– ©️ शिल्पा कुलकर्णी

shilpa.y.kulkarni@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
बालचित्रकारांचे दालन
सुट्टीतील कामगिरी
–  भार्गवी महाडिक  
प्रेषक सौ. स्वाती वर्तक
swati.k.vartak@gmail.com
@@@@@
– कबीर कर्णिक 
इयत्ता चौथी 
 @@@
– पार्थ कर्णिक
हे ZenTangle शैलीत काढलेले ज्वालामुखीचे चित्र आहे.
प्रेषक मुकुंद कर्णिक
karnik.mukund@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@@@
 
हत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@

मिलेवा मारिच-आइन्स्टाईन

अपयशी संघर्षांची कहाणी

डॉ. विद्या नारायण वाडदेकर

भाग ७

वैवाहिक सहजीवन –

विवाहानंतर आइन्स्टाईन मारिच यांच्यावर खूष होते. ‘त्या घराची काळजी घेतात, स्वयंपाक छान करतात, आणि सदैव आनंदी असतात’, असे ते मित्रांना सांगत. परंतु, कॉफ्लरना मार्च १९०३ मध्ये लिहिलेल्या पत्रात ‘आपला सर्व वेळ घरकामातच जातो’, अशी तक्रार मारिचनी केली आहे. पतीच्या कारकिर्दीला अग्रक्रम, तर पत्नी अग्रक्रमाने गृहिणी आणि त्यानंतर शक्य झाल्यास तिची कारकिर्द, अशी पती-पत्नी यातील पारंपरिक, अलिखित, श्रम विभागणी आइन्स्टाईन-मारिच यांच्यात विवाह झाल्यापासूनच होती.

दर दिवशी आठ तास याप्रमाणे, पेटंट कार्यालयात आठवड्याचे सहा दिवस नोकरी, खाजगी शिकवण्या, आणि स्वतःच्या आवडीचे विज्ञान-संशोधन, यांत आइन्स्टाईन यांचे दिवस भराभर निघून जात. त्यामुळे विवाहानंतर मारिच याना सर्व वेळ घराबाहेर घालविणाऱ्या आइन्स्टाईनची ईर्ष्या वाटे.पतीच्या बहुतांश वेळाचा लाभ घेणाऱ्या पेटंट कार्यालयाचा त्या राग राग करत. याच सुमारास आइन्स्टाईन आपल्या वरिष्ठांच्या नकळत शाळा, विद्यापीठीय नोकरीचा शोध घेऊ लागले. आइन्स्टाईन-मारिच यांच्या संसारातील परस्पर भिन्न भूमिकांमुळे ते विवाहाच्या सुरुवातीपासूनच विरुध्द दिशात खेचले जात होते. संध्याकाळी, रविवारी, इतकेच काय पेटंट कार्यालयातही आइन्स्टाईन पर्यवेक्षकाच्या परवानगीशिवाय, त्यांच्या नकळत, संशोधन करत. एकंदरीत, सदासर्वदा मारिच एकाकीच असत. विवाहाच्या महिन्यातच, जानेवारी १९०३ मध्ये, आइन्स्टाईन यांचा, त्यांच्या कारकिर्दीच्या प्रारंभी प्रकाशित झालेल्या तीन शोधनिबंधांपैकी, दुसरा शोधनिबंध प्रकाशित झाला. त्यांच्या शोधनिबंधाचा विषय होता ‘सांख्यिकीय भौतिकशास्त्राची मूलभूत तत्त्वे’ आणि ‘अणूरेणूंचा गतिज सिद्धांत’. कालांतराने, म्हणजे १९०५ मध्ये, त्यांचे जे काम जगभर गाजले, त्याची पार्श्वभूमी या शोधनिबंधांत दडलेली होती.

बर्नला स्थायिक झाल्यापासून आइन्स्टाईनना मिळालेल्या दोन नव्या दोस्तांनी त्यांच्या उरल्यासुरल्या वेळावरही अतिक्रमण केले. आइन्स्टाईनचे हे दोन खास मित्र, त्यांच्याशी बौद्धिक चर्चा करण्यासाठी नियमितपणे एकत्र जमत. या छोट्या चर्चागटाला ते गंमतीने ‘ऑलिंपिया अ‍ॅकॅडमी’ म्हणत. मारिच तिघांच्या चर्चा कधीमधी, मूकपणे ऐकत असत.

खरे तर मारिचना पदविका प्रमाणपत्र मिळाले नसले तरी झुरिच तंत्रनिकेतन सोडल्याच्या त्यांच्या दाखल्यावर चार वर्षांचा भौतिकशास्त्र अभ्यासक्रम आणि त्यांत मिळवलेल्या विषयवार श्रेणी दाखवलेल्या होत्या. त्यामुळे शिक्षणक्षेत्रातील नाही, तरी बर्न विद्यापीठात ग्रंथपालाची किंवा तत्सम नोकरी त्यांना मिळवता आली असती! किंवा विद्यापीठात इतर कारकिर्दीसाठीचे काही अभ्यासक्रम पूर्ण करता आले असते. यापैकी काहीही न करता मारिच यांनी नवऱ्याला सतत प्रोत्साहन देणारी, आणि घरादाराचे सर्व व्यवहार सांभाळणारी, पूर्णवेळ गृहिणी, एवढीच भूमिका का स्वीकारली? त्याना घरातच राहण्याविषयी झालेली सक्ती, हे एक कारण असू शकेल का? पती म्हणून, आइन्स्टाईन यांच्या यशाचा त्यांना वाटणारा अभिमान रास्त म्हणता येईल. मात्र त्यांचे यश मारिचसारखी निश्चयी, धाडसी, प्रयत्नशील व्यक्ती, आपलेच समजून निष्क्रिय कशी राहू शकते? असे प्रश्न आपल्याला पडतात.

विवाहपश्चात प्रथम प्रसूती –      

या आधी उल्लेखिलेल्या, ‘नोव्हि सॅडला’ केलेल्या प्रवासादरम्यान, मारिचना त्या दुसऱ्यांदा गरोदर असल्याचे समजले. ही बातमी आइन्स्टाईनना कळल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय असेल, याविषयी त्याना शंका होत्या. परंतु, मारिच यांच्या पत्राला सप्टेंबर मध्यावर सकारात्मक प्रतिसाद देताना आइन्स्टाईननी, ‘मी तुझ्यावर खूष आहे. तुला नवी लिझरेल मिळेल.’ असे लिहिले होते.१४ मे १९०४ रोजी मारिचना बर्न येथे मुलगा झाला. मुलाचे नांव हॅन्स अल्बर्ट ( Hans Albert ), असे ठेवले होते. त्याला ‘अल्बर्ट’ अशीच हाक मारत.  मुलाच्या जन्माने मारिच यांचा आनंद गगनात मावत नव्हता. १४ जूनला कॉफ्लरला त्यांनी लिहिले,’ अल्बर्टच्या वडिलांना त्याचे खूप कौतुक आहे आणि ते इमानेइतबारे पित्याची भूमिका निभावत आहेत.’  छोटा अल्बर्ट जसा मोठा झाला, तसे आइन्स्टाईन त्याच्यासाठी खेळणी बनवण्याचा, त्याच्याबरोबर तास न् तास रमण्याचा, आनंद घेऊ लागले. आपले वैवाहिक सहजीवन पुन्हा मार्गावर येईल, अशी सुचिन्हे  मारिचना दिसू लागली. परंतु, लवकरच आइन्स्टाईनच्या ज्या कामांमुळे १९०५ हे वर्ष जादुई ठरले, त्या गहन कामात आइन्स्टाईन आकंठ बुडाले. आइन्स्टाईन यांच्या शिफारशीनुसार पेटंट कार्यालयाने त्यांचा मित्र बेसो, याला नोकरीही दिली. बेसो यांनी रोम विद्यापीठांतून गणित आणि भौतिकशास्त्र, तर झुरिच तंत्रनिकेतनातून यांत्रिक-अभियांत्रिकी अभ्यासले होते. बेसो १९०८ पर्यंत पेटंट कार्यालयात नोकरी करत होते. या कालावधीत आइन्स्टाईन यांचे ते अत्यंत जवळचे, बुद्धिमान असे एकमेव सहकारी होते.१९०५ मध्ये लहानग्या अल्बर्टचा पहिला वाढदिवस जसा जवळ येऊ लागला, तसे आइन्स्टाईन यांचे आज जगभर गाजलेले शोधनिबंध, दर महिन्याला एक, लागोपाठ, ‘अ‍ॅनालेन डर फिजिक (भौतिकशास्त्राचा इतिहास)’ या झुरिच विद्यापीठातून निघणाऱ्या नामांकित शोधपत्रिकेतून, धडाक्यात प्रकाशित होऊ लागले.. या दरम्यान आइन्स्टाईनच्या हातून अनेक कामे पूर्ण झाली. जसे, १८ मार्चचा पुंज परिकल्पनेवरील (quantum hypothesis) शोधनिबंध, ३० एप्रिलला सादर केलेला पीएचडीसाठीचा द्वितीय प्रबंध, ११ मेचा शोधनिबंध, ज्यात त्यानी ब्राऊनियन हालचालीचे (Brownian motion) स्पष्टीकरण अण्वीय गृहीतकाच्या आधारे निर्विवादपणे देता येत असल्याचे दाखवून दिले आहे, जून ३० चा शोधनिबंध, ज्यांत गाजलेला सापेक्षतावादाचा (रिलेटिव्हिटीचा) खास सिद्धांत आहे, २७ जूनचा शोधनिबंध ज्यांत वस्तुमान आणि ऊर्जा यांच्यातील समतुल्यतेची ओळख करून दिली आहे.

त्या सुमाराच्या आइन्स्टाईनच्या प्रकाशित कामात इतर लेखकांनी लिहिलेल्या लेखांचे सारांश तर अगणित आहेत. या सर्व कामांतील, अनेकांना वाटतात तसे, मारिच यांच्या योगदानाचे थेट पुरावे उपलब्ध नाहीत. परंतु, इतक्या वेगाने प्रसिध्द होणाऱ्या शोधनिबंधांचे मुद्रितशोधन, ग्रंथालयातून संदर्भशोधन, अशी व्यवहार्य मदत मारिचनी, आइन्स्टाईनना केली असू शकेल. एकंदरीतच सतत कार्यमग्न असलेले आइन्स्टाईन, मारिच आणि अल्बर्ट यांना कितीसा वेळ देत असतील?

पतीसह आईवडिलांशी प्रथमच भेट –

इतक्या आश्चर्यकारक धडाकेबाज संशोधनांनंतर, ऑगस्ट १९०५ मध्ये पेटंट कार्यालयातून मिळालेल्या दोन आठवड्यांच्या सुट्टीत आइन्स्टाईन अखेर प्रथमच मारिच आणि छोट्या अल्बर्टसह, नोव्हि सॅड येथे सासूसासऱ्यांना भेटायला गेले. मारिच यांच्या संपूर्ण कुटुंबियांना, दोन्हीही अल्बर्ट, पहिल्यांदाच भेटले. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच आइन्स्टाईनना झुरिच विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली.

मारिच, हॅन्स अल्बर्ट आणि आइन्स्टाईन (१९०४-१९०५)

पतीचे जागतिक कार्य आणि प्रसिद्धी –

१९०५ मध्ये प्रकाशित झालेल्या शोधनिबंधाने आइन्स्टाईनचे सहकारी आणि जगभरांतील भौतिकशास्त्रज्ञ, स्विस पेटंट कार्यालयातील या तृतीय श्रेणी कारकुनाची दखल घेऊ लागले.  बर्लिनहून जर्मन भौतिकशास्त्राचे अधिष्ठाता, मॅक्स प्लँक, यांनी आपल्या सहाय्यकाला बर्न येथे पाठवून, या अप्रसिद्ध कारकुनाचा शोध घेतला. यातूनच पुढे प्लँक आणि आइन्स्टाईन यांच्यात घनिष्ट मैत्री प्रस्थापित झाली. परिणामी आइन्स्टाईन, जर्मन भौतिकशास्त्राच्या राजधानीत, म्हणजे बर्लिनला, पोहोचले.

पीएचडीच्या बरोबरीने ‘हॅबिलिटॅसिऑन’ (Habilitation) ही अधिकची व्यावसायिक अर्हता मिळाल्यास माध्यमिक शाळात अध्यापकाची नोकरी किंवा विद्यापीठात प्राध्यापकाची स्थायी नोकरी मिळविणे सोपे होईल, या उद्देशाने आइन्स्टाईननी बर्न विद्यापीठाला १९०५ वर्षांतील आणि त्यापूर्वीचे स्वतःचे प्रकाशित शोधनिबंध सादर करून हॅबिलिटॅसिऑनसाठी अर्ज केला. परंतु, हॅबिलिटॅसिऑनसाठी अलीकडच्या काळात लिहिलेले मौलिक प्रबंध सादर करणे, आवश्यक असल्याचे, बर्न विद्यापीठाने कळवले. आधी राजी नसलेल्या आइन्स्टाईननी शेवटी प्राध्यापक, आल्फ्रेड क्लीनर, यांच्या प्रोत्साहनाने पुंज भौतिकीवरील (quantum physics) प्रबंध सादर केला. झुरिच विद्यापीठांतील भौतिकशास्त्राचे भावी प्राध्यापक, म्हणून क्लीनरना आइन्स्टाईन यांच्यात रस होता. फेब्रुवारी १९०८ मध्ये आइन्स्टाईनना ‘हॅबिलिटॅसिऑन’ प्रमाणपत्र मिळाले. तत्कालीन प्रथेनुसार बर्न विद्यापीठांत ते लागलीच खाजगी प्राध्यापक म्हणून, अर्धवेळ शिकवू लागले. यातून मिळणारे वेतन इतके अपुरे होते की, इच्छा असूनही, त्यांना पेटंट कार्यालयातील नोकरी सोडता आली नव्हती.

संदर्भ:
Allan Esterson and David C. Cassidy, Einstein’s Wife: The Real Story of Mileva Einstein-Marić Cambridge, MA: MIT Press, 2019. Pp. 336.

–  ©️  डॉ. विद्या नारायण वाडदेकर 

wadadekarvidya@rediffmail.com

@@@@@@@@@@@@@@@@@@

नवीन मुखपृष्ठ :  गोवळकोंडा किल्ला  – रुपाली कामत

 
@@@@@@@@@@@@@@@@@@@
आजची कविता

मिलिंद कर्डिले 
 
 

ये जिंदगी एक …

ये जिंदगी एक
अजीब इत्तेफाक हैं
हम सब यहाँ
बिन बुलाये मेहमान हैं!!रिश्ते बनाते हैं
रिश्ते बिगाड़ते हैं
मिलने बिछड़ने का
खेल खेलते हैं !!समंदर के किनारे
गहराई नही होती
चंद पल के रिश्तोंमे
मोहब्बत नही होती!!गहराई पाई जाती है
दूर समंदरमे जानेसे
रिश्तों में मिठास आती है
साथ साथ चलनेसे!!नित्य चलती है सांसे
इसीलिए जीते हैं
बिना अर्थ समझेही
लौटके चले जाते हैं !!

– ©️ मिलिंद कर्डिले
milindkardile@yahoo.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
वृक्षसंपदेतून आरोग्यदायी पर्यावरणाकडे

डॉ. उमेश करंबेळकर  

२३. 

गाजर गवत, जलपर्णी ह्या आक्रमक विदेशी वनस्पतींचा आपल्या देशात काहीशा अजाणतेपणामुळे प्रवेश झाला. अमेरिकन गव्हाबरोबर हे तण देखील येईल आणि त्याचा एवढ्या वेगाने प्रसार होईल याची कल्पना त्यावेळी आली नव्हती.परंतु असे काही अपवाद सोडता बहुतेक क्षुप तसेच वेल वर्गातील विदेशी वनस्पती त्यांची आकर्षक फुले व सौंदर्य यांसाठी आणली गेली. प्रथम ह्या वनस्पती विविध उद्याने, सार्वजनिक बागा, शासकीय विश्रामगृहे व कार्यालये ह्यांच्या आवारात अशा ठिकाणी लावल्या गेल्या. ह्या वनस्पतींमुळे तेथील सौंदर्यात निश्चितच भर पडली. अशा वनस्पतींचा अनेकजण अतिशय सुंदर ह्या अर्थाने ‘एक्झॉटिक’ म्हणून उल्लेख करतात तो चुकीचा आहे.खरे म्हणजे एक्झॉटिकचा अर्थ unusual or interesting because it comes from different country or culture  म्हणजे दुसऱ्या देशातून किंवा संस्कृतीतून आल्यामुळे असाधारण किंवा औत्सुक्य निर्माण करणारी असा आहे.अशा एक्झॉटिक वनस्पती आपल्याही बागेत असाव्या असे वाटून त्यांची घरोघरी लागवड केली गेली. त्यातूनच पुढे ह्या वनस्पतींचा घराबाहेर, गावाबाहेर आणि शेवटी रानावनांत प्रवास झालेला दिसून येतो. झिनिआ ही मूळ मेक्सिकोमधील वनस्पती आज भारतात सर्वत्र आढळते तिचा हा प्रवास असाच झाला. अशीच एक आकर्षक फुलांसाठी प्रसिद्ध असलेली विदेशी आक्रमक वनस्पती म्हणजे कॉसमॉस. दहा-बारा वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यात पुण्याला जाताना नसरापूरपासून कात्रज पर्यंत महामार्गाच्या दुतर्फा पिवळ्या- भगव्या फुलांनी बहरलेली ही वनस्पती लोकांचं लक्ष वेधून घेई. ऑक्टोबर महिन्यापर्यंत ती फुललेली असे नंतर नष्ट होई आणि पुढल्या वर्षी सप्टेंबरमध्ये फुलून येई. गेल्या दोन तीन वर्षांत तिने चांगलेच हातपाय पसरले आहेत आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात तिचा प्रवेश झाला आहे.त्यातून तिचा आक्रमक स्वभाव सिद्ध झाला आहे.तसे पाहिले तर ही वनस्पतीत अनेक गुण आहेत. तिच्या फुलांतील पुष्परस मधमाशा, फुलपाखरं गोळा करतात. तिच्या फुलांचा गालिचा पसरल्यामुळे डोंगर व आजूबाजूचा परिसर सुंदर दिसतो. ही फुले कारळ्यासारखी दिसतात त्यामुळे नवरात्रीच्या दिवसात कारळ्याच्या फुलांना पर्याय म्हणून कॉसमॉसची फुले विकली जातात. असे असले तरी तिच्या आक्रमक स्वभावामुळे आणि सहज होणाऱ्या प्रसासामुळे सह्याद्रीच्या पर्यावरणाच्य़ा दृष्टीने संवेदनशील अशा पठारी भागात ह्या वनस्पतीचा प्रवेश रोखण्यासाठी तिच्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.त्यासाठी ह्या वनस्पतींना पर्यायी अशा देशी वनस्पतींची जाणीवपूर्वक लागवड व संवर्धन करणे हा उपाय योग्य ठरतो.कुंपणासाठी निर्गुडी, अडुळसा, सागरगोटा, कोरांटी, त्रिधारी, निवडुंग अशा वनस्पतींचा उपयोग पूर्वी केला जाई. ती पद्धत पुन्हा रूढ व्हायला हवी.रानात विंचवी, रुई. चित्रक, रिंगणी, डोरली, ढोरदवणा, खरवती, टाकळा, दर्प तुळस, गोरखमुंडी, पिलू, सालवण, कुर्डू, कोळिंजन, रानजिरे, तरवड अशा छोट्या-मोठ्या वनस्पती सहज उगवतात पण त्या तण समजून काढून टाकल्या जातात. ह्यातील बऱ्याच वनस्पती आता आपल्या आसपासच्या भागातून दिसेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे त्यांची लागवड आणि संवर्धन केल्यास विदेशी वनस्पतींचा प्रसार रोखणे शक्य होईल.

त्याचबरोबर येथे आणखी एक विचार मांडावासा वाटतो. ‘औषधी नाही अशी वनस्पती नाही’ ह्या अर्थाच्या श्लोकाचा उल्लेख मागे केला आहे. त्यादृष्टीने ह्या विदेशी वनस्पतींचे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून काही उपयोग होऊ शकतील का ह्याचा विचार करून त्या दृष्टीने संशोधन व्हायला हवे. त्यातून काही चांगले निष्कर्ष हाती आल्यास एखादी आक्रमक विदेशी वनस्पती ही इष्टापत्तीही ठरू शकेल.

क्रमशः ]

– ©️ डॉ. उमेश करंबेळकर 
umeshkarambelkar@yahoo.co.in
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

शिफ्टिंग

[ ११ ] 
प्रीती पेठे इनामदार

नव्याची आस

जुन्यातून  नवीन इमारतीत शिफ्ट झाल्यावर सर्वात मोठ्ठा दिसणारा बदल म्हणजे, भरपूर प्रकाश. नवीन असल्यामुळे रंग उरंगलेला फिक्का नसून पांढरा शुभ्र असतो. प्रत्येक खोलीची एक बाजू ही काचेची मोठी खिडकीच. जुन्या मोझॅइक टाईल्स किंवा करड्या रंगाच्या कोब्याच्या जागी आता गुळगुळीत, उजेड परावर्तित करणाऱ्या व्हिट्रीफाइड टाईल्सने घेतलेली असते. पूर्वी मोठ्याशा न्हाणीघरात घासून, आपटून, कपडे धुण्यापुरता एकच दगड लावलेला असायचा. आता टॉयलेटचे आकारमान लहान झाले असले तरी पूर्ण जमीन व भिंतींना सिरॅमिक वा व्हिट्रीफाईड टाईल्सचा मुलामा असतो. प्लम्बिंग आणि इलेक्ट्रिकल वायरिंग ही कंसील्ड झाल्यामुळे स्वच्छता आणि उजेड, दोन्ही साध्य होतात. धूळ, घाण बसण्याच्या जागा कमी झाल्यामुळे, घरं अधिक  चकचकीत, प्रसन्न वाटतात.वॉर्डरोब्सची पद्धत रुळल्यापासून कपड्यांचा ढिगारा असलाच तरी पटकन कपाटात कोंबता येतो. स्वयंपाकघरातलं सामान ट्रॉलीजमध्ये बंदिस्त राहतं व डोळ्यांवर भांड्यांच्या पसाऱ्याचा ताण पडत नाही. चपलांसाठी शू रॅक, सौंदर्य प्रसाधनांसाठी ड्रेसिंग टेबल, पुस्तकांसाठी बुक केस, उशा चादरींसाठी स्टोरेजवाला सोफा कम बेड. अश्या, सामानाची झाक पाक व व्यवस्थित ठेवण्याच्या छान सोयी चलनात आल्या आहेत.  भरपूर पैसे खर्चून इंटिरियर केलेलं असल्यानं पूर्वीपेक्षा छत बुटकं असलं तरी घरं कशी टुकटुकीत, दिसतात.  करोनानंतर वर्क फ्रॉम होम, पॉडकास्टींग, व लॉगिंग करणाऱ्यांचं प्रमाण वाढल्यानं, प्रत्येकाला एक छोटी का असेना पण स्वतंत्र साउंड प्रूफ खोलीची गरज भासू लागली आहे. तेवढ्याच क्षेत्रफळात घरात जास्त खोल्या पण लहान आकाराच्या, ही नवीन लेआऊट पद्धत अश्यांच्या पत्थ्यावरच पडली आहे.या उंच इमारतींमध्ये लिफ्टनेच दळणवळण सुरु झाल्यामुळे शेजार-पाजारी आणि इतर सदस्यांच्या भेटी गाठी घडण्यासाठी खास प्रयत्न करावे लागतात. नाही तरी हल्ली व्यक्ती सामोरासमोर बसलेल्या असल्या तरी मोबाईलमध्येच डोकं खुपसून असतात. त्यामुळे घरात खेळणारी लहान मुलं अथवा ज्येष्ठ नागरिक असल्याशिवाय, या परिस्थितीचं कुणाला फारसं काही वाटत नाही.  ह्यावर, एकमेकांच्या घरी जाणं हा वाटत असलेला घोळ टाळून, एकत्र बाहेर हॉटेलिंग करणं, ट्रीपला, हायकिंगला जाणं, असे उपाय लोकांनी शोधलेच आहेत.  आता प्रत्येक नवीन इमारतीला खाली वॉचमन, cctv असतो. त्याने महानगरातल्या चोऱ्या काही कमी झाल्यात असं वाटत नाही पण पूर्वी दारावर येणारे सुऱ्यांना धार काढणारे, पापड, खरवस, मध, पणत्या व तत्सम सामान विकणारे, बोहारिणी वगैरेंचे पोटा पाण्याचे वांधे झाले हे मात्र खरं. यालाच इंग्रजीत गेटेड कम्युनिटी म्हणतात.  म्हणजे गेटच्या आत गेलं की तुमचा बाहेरच्या जगाशी तसा संबंध उरत नाही.  आतच क्लब हाऊस, स्विमिंग पूल, लाऊंज, जिम, किड्स प्ले एरिया वगैरे सुविधा असतात, फक्त सदस्यांसाठी. परवानगीशिवाय कुणी आत शिरू शकत नाही. पूर्वी बहुतांश सरकारी निम सरकारी वसाहतीच अशा असायच्या – ONGC, SBI, आर्मी, यासारख्या. आता खाजगीकरणाच्या रेट्याने त्या लोप पावत चालल्या असल्या तरी इतर विकासकांनी मात्र ही संकल्पना उचलून धरली आहे व ती लोकप्रिय होत आहे.काही गेटेड कॉम्युनिटीज इतक्या मोठ्या असतात की एखादं छोटं नगरच जणू.  पाचेकशे बिऱ्हाडांची, २०-२५ मजली, ५-६ इमारतींची सोसायटी. प्रत्येक घराकडून मासिक पाचेक हजार रुपये मेंटेनन्स म्हंटलं, तरी महिन्याला पंचवीसेक लाखाचा गल्ला जमा होतो.  मग त्यात भांडणं, गटबाजी, राजकारण हे ओघानं येतं.  काही ठिकाणी मजल मारामाऱ्यांपर्यंतही जाते.  तरी गुण्यागोविंदानं राहणारे, सोसायटीच्या कामकाजाचं नीट व्यवस्थापन करणारेही काही कमी नाहीत.  एकंदरीत या नवीन इमारतींमुळे, खाजगी भौतिक जीवनमानाचं स्तर उंचावलं तर आहेच, अर्थात त्याची आर्थिक, व सामाजिक किंमत मोजूनच.
 [ पुढील भागात लेखमाला समाप्त  ]

– ©️ प्रीती पेठे इनामदार 
preetipetheinamdar@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
 
– ©️ अॕड. क्रांती आठवले-पाटणकर  [ अ‍ॅक्रिलिक रंग राजस्थानी आर्ट ]
प्रेषक अजित पाटणकर 
asmita1293@yahoo.co.in
@@@@@@@@@@@@@@@@@ 
 
हत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@

जीवितमृतक

अॕड. क्रांती आठवले-पाटणकर 

नमस्कार.

‘पतित एकदा पतित का सदा’ या नाटकाच्या संदर्भात एक लेख पाठविला होता. त्यात ह्या वेळच्या लेखमालेचे सूतोवाच केले होते.. त्यात असे म्हटले होते की:-.

“याशिवाय मन उद्विग्न करणारा एक लेख लिहित आहे.. तो आहे, कायद्यानुसार मृत असलेल्या परंतु प्रत्यक्षात जिवंत असलेल्या माणसांवर… ”

मूळ कथेपूर्वी त्याच प्रकारच्या आणखी दोन कथा पाहूया.. दुसऱ्या भागातील रविन्द्र्नाथांच्या कथेत कायदेशीर पेच नाहीये..पण गाभा तोच आहे.. जिवंत का मृत?

– © अॕड. क्रांती आठवले-पाटणकर,
*डोंबिवली*
*9969087559*

भाग १ / ४

*एका जिवंत व्यक्तीचा आक्रोश*: *मरनेसे पहले मुझे*,*एक बार जिंदा करवा दिजीये*..

काही दिवसांपूर्वी Zee5 वर ‘कागज’ नावाचा चित्रपट पाहिला.चित्रपट पाहून व्यथित झाले. या जगात असेही घडते ? माणसे इतकी पाषाणहृदयी असतात?..

लेखाच्या शेवटच्या भागात आजच्या युगातील  एक दाहक वास्तवाविषयी लिहिले आहे.. ज्याबाबत बरीच लोकं अद्याप अनभिज्ञ आहेत.. मी देखील याबाबत नुसतेच ऐकून होते. पण त्यांच्या वेदनेची तीव्रता आत्ता जाणवली.  अशा घटना पाहिल्यावर मन बधीर होते  .. माणुसकीवरचा विश्वास डळमळीत होतो….

असो.

सर्वसाधारणपणे एखादी गोष्ट सिद्ध होण्यासाठी पुरावा लागतो.. बहुतेक वेळा कागदी पुरावा..

माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कायदा त्याची साथसंगत करतो. पण ते कुणाला जाणवत नाही.. तसेच कागदाचे देखील आहे.. आपल्या जीवनात कागदाला किती महत्त्व आहे हे आपल्या लक्षातच येत नाही..

माणसाची ओळखच कागदामुळे असते…
जन्माला आल्याचा पुरावा – जन्मदाखला,
शिक्षण किती ? – दाखवा प्रमाणपत्र,
नोकरी व्यवसाय – दाखवा कागद,
लग्न-घटस्फोट वगैरे … दाखवा कागद.. ..
तुमच्या अस्तिवाचा पुरावाच आहे कागद…

कुठल्यातरी इंग्रजी चित्रपटात एक सीन पाहिल्याचे आठवते.. नक्की नाव आठवत नाही. त्यात एका ज्युची चौकशी चालू असते.. तो आपली सर्व प्रमाणपत्र दाखवितो.. आणि सांगतो.. माझे नाव अमुक, मी डॉक्टर आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे….

एक जर्मन सैनिक ती सर्व प्रमाणपत्रे कचऱ्याच्या डब्यात टाकतो.. आणि शांतपणे विचारतो.. ‘आता सांग, तू कोण आहेस?’

म्हणजे या कागदांशिवाय आपले अस्तित्व शून्य आहे..

असा विचार मनात कधी आला होता?

वकिली करत असताना मी दिवाणी दावेच चालवत असे..दिवाणी कायद्यात कागद बोलतो. कागदावर लिहिलेल्या एक एक शब्दाचा किस पाडला जातो. त्यामुळे कागदांचे महत्त्व मला चांगलेच माहित आहे.. मी अशिलांना सांगत असे.. तुम्ही काय सांगता त्याला फारसे महत्त्व नाही..कागद दाखवा !!!

ह्यावेळी आपण ज्या तीन कथा पाहाणार आहोत त्या एका समान धाग्याने जोडल्या आहेत.. *अस्तित्वाचा* *पुरावा*..

आज पहिली कथा: भवाल संन्यासी

आठवतंय का? गेल्या जूनमध्ये, फाळणीपूर्व बंगाल मधील एका सत्यघटनेवर लेख पाठविला होता.

त्याचे थोडक्यात स्मरण:

एका प्रतिष्ठीत जमीनदार कुटुंबात १९०९ ते १९४६ या दरम्यान घडलेली सत्यघटना. ढाक्याजवळील  भवाल इस्टेट ही त्या इलाख्यातील सर्वात मोठी जमीनदारी.

१९०९ साली या इस्टेटीच्या तीन वारसांपैकी एक वारस – कुमार रोमेंद्र (मेजोकुमार) – वैद्यकीय उपचारासाठी दार्जीलिंग येथे गेला असता त्याचा आकस्मिक मृत्यू होतो. तिथेच त्याचे अंत्यसंस्कार झाले असेही सांगितले जाते..डॉक्टरने त्याच्या मृत्यूचा दाखला देखील दिलेला असतो.. म्हणजे कायद्यानुसार तो मृत असतो..

परंतु त्यानंतर १२ वर्षांनी म्हणजे १९२१ मध्ये एक नागासाधू ढाक्यात अवतीर्ण होतो आणि तो मेजोकुमार असल्याचे सर्वत्र पसरते. दरम्यानच्या काळात त्याच्या दोन्ही भावांचा मृत्यू झालेला असतो..

मात्र हा नागासाधू मेजोकुमार नाही, त्याचा मृत्यू झाला आहे, असे त्याच्या पत्नीचे ठाम मत असते. परंतु भवाल इस्टेटीतील बहुसंख्य प्रजेला हा मेजोकुमार असल्याचे मान्य असते. इस्टेटीच्या वारसाचा प्रश्न असल्याने प्रकरण न्यायालयात जाते.. १९२१ ते १९४६ या दरम्यान चाललेल्या या प्रकरणात सर्वप्रथम जिल्हाधिकारी चौकशी करतो व  हा साधू, मेजोकुमार नसल्याचा निर्णय देतो. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात जाते. ढाका सत्र न्यायालय, कलकत्ता उच्च न्यायालय ते लंडनचे प्रीव्ही कौन्सिल, या सर्व ठिकाणी नागासाधू हाच मेजोकुमार म्हणजे कुमार रोमेंद्र असल्याचा निर्णय दिला जातो.

अशा प्रकारे मेजोकुमार हा मृत नसून जिंवत असल्याचे कागदोपत्री सिद्ध होते. मेजोकुमारच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून न्यायालयीन निर्णयाचा कागद अंतिम ठरला. कायद्यानुसार तो जिवंत असतो. अर्थात त्याच्या पत्नीला हा निर्णय मान्य नसतो हा भाग वेगळा.

१९४६ साली ज्या दिवशी प्रीव्ही कौन्सिलचा अंतिम निर्णय, भवाल इस्टेटीत पोहोचतो, त्याच दिवशी देवीच्या दर्शनासाठी देवळाच्या पायऱ्या चढत असताना, मेजोकुमारचा हृदयविकारामुळे मृत्यू होतो.

माणसांच्या जगात न्याय नाही मिळाला. पण परमेश्वराच्या दरबारी न्याय मिळाला अशी त्याच्या पत्नीची भावना होते.

मृत्यूदाखल्यानुसार मृत असलेला मेजोकुमार न्यायालयीन निर्णयाद्वारे जिंवत होतो खरा, पण नागा साधू हा खरंच मेजोकुमार होता का नाही, हे अखेरीस एक गूढच राहते.. .

उद्याच्या भागात दुसरी कथा..

– © अॕड. क्रांती आठवले-पाटणकर
*डोंबिवली* ०१.०५.२०२१
*9969087559*

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आजची कविता

मिलिंद कर्डिले
 
 

वाटत होते बोलूनी 

वाटत होते बोलूनी
करावे मन मोकळे
नव्हते कुणी बोलाया
सांगू कुणा कळेना

करुनी घेतले नेत्र बंद
सुचला एक विचार
मारुया गप्पा देवाशी
तरळली मूर्ती दत्ताची

सुरुवात केली बोलाया
तो फक्त ऐकत होता
नाही बोलला एकही शब्द
प्रेमळ नजरेने पहात होता

मी मात्र करीत होतो
मन माझे मोकळे
माझ्या विचारांचे द्वंद्व
मुखातून प्रकटत होते

जसे संपले शब्द
तसा झालो गप्प
त्याने मग विचारले,
झालास का रे मोकळा?

मग दत्त बोलू लागला
हळुवार डोईवरून
हात फिरवला
आणि म्हणाला,

चिंतनात मी ज्याच्या
मुखी ज्याच्या माझे नाम
नाही होणार काही विपरीत
नको करू इतका विचार

करी जो स्मरण माझे
असे मी त्याच्या पाठी
देईन मी दर्शन त्याला
जो मनोभावे साद घाली

!! श्री गुरुदेव दत्त !!

������

– मिलिंद कर्डिले

milindkardile@yahoo.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
II पुंडलिक II

मनातलं आणि बरंच काही : ३ 

स्वाती लोंढे

टेबलावर जेवणाची सर्व तयारी करून सुरेशला हाका मारणार इतक्यात छातीत झालेला तीव्र वेदनेमुळे सुजाता ‘आई गं ..’ म्हणत एकदम खाली कोसळली. तिचं ते विव्हळणं ऐकून सुरेश धावत आत आला.

एक सेकंद काय झालंय आणि काय करायला हवंय हे त्याला  कळलंच नाही.. पण पुढल्याच क्षणी तो ‘ जासु SS जासु ’ म्हणत तिच्याकडे धावला. त्यानं तिला उठवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानं ताबडतोब डॉक्टरला फोन लावला. आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे पुढच्या पंधरा-वीस मिनिटात अ‍ॅंब्युलन्स बोलावून तिला सिटी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिटही केलं. आय. सी. यु. च्या बाहेर बाकावर बसल्यावर त्यानं सुस्कारा टाकला. नशीब, आपण घरी होतो म्हणून हे सगळं पटापट करता आलं, नाही तर .. या विचारानेसुद्धा त्याच्या अंगावर सर्रकन शहारा आला. भीतीनं त्याचा थरकाप उडाला. आता आधी शंतनू आणि दिगंतला  कळवायला हवं म्हणून त्यानं घड्याळात पाहिलं. आणि तो फोन लावणार इतक्यात सिस्टरनं त्याला हाक मारल्या.

तो धावतच आय.सी. यु. मधल्या सुजाताच्या बेडजवळ गेला. सुजाता काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती. त्यानं कान तिच्या तोंडाजवळ नेऊन ऐकण्याचा प्रयत्न केला. ‘ माझ्या दोन्ही पुंडलिकांना कळवळलंत का?’ असं अडखळत अडखळत तिनं बोलायचा प्रयत्न केला आणि मान टाकली.

सुजाताच्या दिवसांसाठी शंतनू एक आठवड्याची रजा घेऊन आला. त्याला एकट्याला बघून सुरेशनं विचारलं, ‘ एकटाच ?’
‘ हो.. दिगंतचं आणि माझं बोलणं झालं .. तो  म्हणाला, आत्ता त्याला नाही जमतंय   .. पुढल्या वेळी तो येईल..’

सुरेश मटकन खाली बसला. पण स्वतःला सावरत तो म्हणाला, ‘ इट’स ओके..’ त्याच्या मनात आलं, विठ्ठलानं त्याच्या पुंडलिकाला बरोबर ओळखलं तरी जासु मात्र तिच्या पुंडलिकांना नाही ओळखू शकली..

———- ००००० ———-
चित्र : अनामिक 

– © स्वाती लोंढे,
प्रभादेवी, मुंबई ४०००२५
२४३०४००७ / ९८६९४४९२०९
swatilondhe12@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
विनोद व महदाख्यायिका
‘विनोद व महदाख्यायिका’ ची  यापूर्वीची पाने, १ ते ६ – ९ फेब्रुवारी,  ७ ते  ९- ७ मार्च,  १० ते १३ – ९ एप्रिल २०२३ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहेत. 
– अज्ञात 
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
पत्रप्रपंच

मोहन कान्हेरे

प्रस्तावना : 
 
सर्वांना सविनय नमस्कार.

किमान दीड दोन वर्षे माझी पत्रं, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये, ‘बहुतांची अंतरे’ या सदरात दर शनिवारी एक याप्रमाणे छापली जात आहेत.
अनेक अनेक जण मला विचारतात की हे नियमित पत्रलेखन तुम्हाला कसं काय जमतं ?…..पत्राचा विषय तुम्ही कसा निवडता ?…. पत्रलेखन करण्याचा सराव तुम्ही कसा केला ?
आता या सगळ्याची उत्तरं देण्याची मला सवय झाली आहे. प्रांजळपणे सांगायचं तर लेखनाची मला कॉलेजमध्ये असल्यापासून सवय आहे. एखाद्या विषयावर लेखन करायचं असेल तर त्या विषयांमध्ये येऊ शकणारे वेगवेगळे मुद्दे आधी मी लिहून ठेवतो. कुठल्या मुद्द्यांना प्राधान्य द्यायचं ते त्याच वेळी ठरून जातं. लेखनासाठी आपल्या सांस्कृतिक महाराष्ट्रामध्ये अनेकानेक विषय उपलब्ध आहेत.
शास्त्रीय संगीत हा तर माझा अत्यंत आवडता विषय आहे. लहानपणापासून ते, मी ऐकत आलो आहे. कार्यक्रमांना मी हजेरी लावत असतो. मी एक हौशी सूत्रसंचालक आहे. सुमारे ३०-३५ वर्षे मी हे काम करीत आलो आहे.
माननीय श्रीधर फडके, उतरा केळकर, भीमराव पांचाळे, अनिल मोहिले, स्वराधीश भरत बळवल्ली अशा दिग्गज कलाकारांच्या कार्यक्रमातून अनेकदा मला सूत्रसंचालनाची संधी मिळालेली आहे. हौसेने ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये वर्षानुवर्षे प्रासंगिक लेखन करणारा मी लेखक आहे. माझ्यासह लेखकांच्या आणि वाचकांच्या सदिच्छा मला मिळत राहू देत….मी चुकीचं लिहिल्यास अवश्य मला सांगितलं जावं.
माननीय मंगेशजींच्यामुळे हे लेखन करायला मी उद्युक्त झालो. माझी निवडक पत्रं ‘मैत्री’मध्ये साभार पुनःप्रसिद्ध करावी, ही कल्पना त्यांचीच….. मलाही ती खूप आवडली. आता त्या पत्रांची चिकित्सा करायला मी ती आपल्यासमोर ठेवत आहे.

विनीत.
मोहन कान्हेरे

mohankanhere@yahoo.in
@@@

१.

माननीय संपादक ‘महाराष्ट्र टाइम्स’ यांस,

‘विविध भारती’वरच्या ‘ संगीत सरिता ‘ कार्यक्रमात, यापूर्वीच प्रसारित झालेल्या कार्यक्रमांचे ध्वनिमुद्रण ऐकवले जात आहे. तेही अत्यंत आनंददायी आहे, प्रबोधन करणारे आहे. संगीतप्रेमींना नवनवीन माहिती त्यातून मिळत आहे. बरोबरीने ऐकवल्या जाणाऱ्या गायनातून पुन:प्रत्ययाचा आनंदही……
दिनांक २० मे २०२३ रोजी या कार्यक्रमात थोर संगीतकार खय्याम यांची मुलाखत ऐकायला मिळाली. अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला….. व्हायोलीन या वाद्याबद्दल त्यांना प्रश्न विचारले गेले, तेव्हा ते म्हणाले की हे जरी पाश्चात्य वाद्य असलं तरी त्याचं मूळ भारतीय वाद्यात आहे. पारंपारिक वाद्य रावणहत्था, ( जे लहान मुलांची खेळणी विकणाऱ्या स्त्रिया वाजवत असत ) त्या वाद्यापासून प्रेरणा घेऊन, त्याच्यात चांगले चांगले बदल करून वायलीनची निर्मिती झाली असावी…..

तबला निर्मिती पखवाज या वाद्यापासून झाली हे तर सर्वश्रुत आहे. फिल्मी कलाकारांच्या मुलाखतीना, अर्धा तास, कधी एक तास वेळ देणारी ‘ देश की सुरीली धडकन ‘ संगीत सरितेकरता मात्र फक्त १५ मिनिटे देते, हे योग्य वाटत नाही.

– मोहन कान्हेरे, मुंबई.

@@@

२.

माननीय संपादक ‘महाराष्ट्र टाइम्स’ यांस,

थोर चित्र महर्षी, शिवभक्त, भालजी पेंढारकर यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून, दिनांक ३ मे २०२३ रोजी, आकाशवाणीच्या एफ एम चॅनेलवर, निवेदिका रश्मी वारंग यांनी उचित शब्दात भालजीना आदरांजली वाहिली. पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक अशा तिन्ही प्रकारचे चित्रपट या महान निर्माता – दिग्दर्शकाने निर्माण केले. पृथ्वीराज कपूर, राज कपूर, राजा परांजपे, शाहू मोडक, दुर्गा खोटे, सुलोचना……अशा अनेक कलाकारांना भालजींच्यामुळे चित्रपटात काम करण्याची  संधी मिळाली. भालजींच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा आढावा अल्पशा वेळेमध्ये घेणं अवघड होतं, तरी देखील निवेदकेने स्तुत्य प्रयत्न केला ….’ आज शिवाजी राजा झाला ‘ हे त्या काळात अत्यंत लोकप्रिय झालेलं गीतही ऐकवलं. खूप धन्यवाद या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनाही.

– मोहन कान्हेरे, मुंबई

@@@

३.

 
माननीय संपादक ‘महाराष्ट्र टाइम्स यांस,

अनोखे स्मरणरंजन

दिनांक १२ मे २०२३ रोजी चौपाटीच्या भारतीय विद्या भवनमधील सभागृहात ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय आगळावेगळा कार्यक्रम सादर केला गेला. गनी मानसूरी या ज्येष्ठ नागरिकाने हा कार्यक्रम सादर केला. हेमा मालिनी यांच्या आधीची ड्रीम गर्ल म्हणजे वैजयंतीमाला बाली….. त्यांच्यावर चित्रित झालेल्या २४ चित्रपट गीतांना मोठ्या पडद्यावर सादर केलं गेलं. वैजयंतीमाला म्हणजे अत्यंत बोलका गोड चेहरा, भावदर्शन करणारे डोळे, उत्कट नृत्याविष्कार करणारी, सशक्त मुद्राभिनयातून नायिकेच्या मनातली तरल स्पंदनं सादर करणारी वैजयंतीमाला …… कधी प्रेमरसात चिंब भिजलेली, कधी विरहव्यथेने उन्मळून पडलेली, कधी क्रोधाग्नीमध्ये जळणारी,  तर कधी कृद्ध रागिणी…. विविध गीतांतून आम्ही पाहिली / ऐकली ……
या कार्यक्रमाकरिता गिरीश शहा यांनी व्हिडीओग्राफी केली होती. गनी आणि गिरीश  यांना भरभरून धन्यवाद.

– मोहन कान्हेरे, मुंबई.

@@@

४. 

@@@
५.

– मोहन कान्हेरे
mohankanhere@yahoo.in

 
@@@@@@@@@@@@@@@@@@
शब्दकोडे
मुकुंद कर्णिक
 
२७. 
 
 
 प्रिय वाचक, 
‘मैत्री’चे आघाडीचे लेखक श्री. मुकुंद कर्णिक यांनी आजवर विविध स्तरावर विपुल लेखन केले आहे, याची उजळणी करण्याची आवश्यकता नाही. त्यांना वाचकांचा उदंड प्रतिसाद सातत्याने मिळाला आहे. तरी त्यांच्या शब्दकोड्यांना हवा तसा प्रतिसाद न लाभल्यामुळे त्यांनी ते रचणे थांबवले होते. आमच्या आग्रहावरून त्यांनी पुनश्च सुरुवात केली आहे. त्यापूर्वी आमच्या नेहमीच्या वाचकांचा याबाबत विचारले असता अनेक वाचकांनी शब्दकोडे ‘मैत्री’त असावे असा कौल दिला आहे. आता वाचकांच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. – सं.     
– © मुकुंद कर्णिक 
karnik.mukund@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
बालचित्रकारांचे दालन
सुट्टीतील कामगिरी 
 
 
 
– भार्गवी महाडिक 
प्रेषक सौ. स्वाती वर्तक
          swati.k.vartak@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@@@  
 
हत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@

पद्मश्री शिल्पकार करमरकर

यांच्यावर लिहिलेली दोन पुस्तके
 
 
सौ. स्वाती वर्तक 
 

शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर ( २ ऑक्टोबर १८९१ – १३ जून १९६७) 

१३ जून १९६७..शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांची पुण्यतिथी

त्यांच्यावर दोन पुस्तके लिहिली आहेत श्री. सुहास बहुळकर यांनी …  त्यांची आजच्या दिनीं थोडक्यात ओळख करून द्यावी असे मनापासून वाटले म्हणून हा लेखप्रपंच.

शिल्पकार करमरकर मुखपृष्ठ : मराठी पुस्तक

 

शिल्पकार करमरकर मुखपृष्ठ व मलपृष्ठ : इंग्रजी पुस्तक

आयुष्याची मौल्यवान माती.. शिल्पकार करमरकर ( मराठी )

Precious clay of life..legendary sculptor.. V.P.Karmarkar ( इंग्रजी )

मी इतकी भारावून गेले आहे की मला काही सुचतच नाही. मी काय लिहावे ?

लेखकाची भाषाही खूप  सहज, सोपी, ओघवती, प्रासादिक आहे की अक्षरश: माझ्या डोळ्यापुढे करमरकरजींचे चित्र उभे राहते. शब्दचित्र निर्माण करण्यामध्ये ते अतिशय वाकबगार आहेत असे जाणवते.

शिल्पकार विनायक पांडुरंग उर्फ नानासाहेब करमरकर यांच्या सूनबाई सुनंदा विश्वास करमरकर यांचेही मी आभार मानायलाच पाहिजे कारण त्यांनी पुनःपुन्हा केलेल्या प्रेमळ आग्रहामुळे श्री. बहुळकर अखेरीस सासवण्यात पोचले. करमरकर शिल्पालय बघता बघता त्या थोर शिल्पकाराचे जीवन अनुभवत राहिले.

शिल्पकार करमरकर यांचा जन्म २ ऑक्टोबर १८९१ सासवणे येथे झाला.

मराठी पुस्तक जरी ३१० पृष्ठांचे असले तरी शिल्पकार, शिल्पे यांचे फोटो, चित्रे याने सजलेले असल्याने वाचक सहज वाचनात गुंग होतो.
इंग्रजी पुस्तक २०८ पृष्ठांचे असून त्याची मांडणी, रचना, पाने अधिक सुबक, सुरेख व देखणी आहेत. इंग्रजी पुस्तकाचे आर्ट वर्क पार्ले येथील चित्रकार श्री अनिश दाते यांनी अतिशय सुंदररित्या केले आहे.

अनुक्रम २४ प्रकरणांचे, त्यात बालपणापासून त्यांच्या मृत्यूनंतर मुलगा व सुनेने साकार करून जपून ठेवलेले… शिल्पालयापर्यंतचे लेख वेधक आहेत.

पहिल्याच प्रकरणात, रस्त्यावरचे गलिच्छ, मरणासन्न कुत्रे उचलून, भयंकर अवस्थेत त्याला घरी आणून न्हाऊ माखू घालणारा हा कोण सह्रदय माणूस असे मनात येते. आपली उत्कंठा वाढत राहते आणि हळुवारपणे लेखक त्या शिल्पकाराच्या जीवनात आपल्याला हिंडवून आणतो.

” पहिले शिवस्मारक ” बद्दल इतक्या प्रभावी शब्दांमध्ये लिहिले आहे की माझ्यासमोर अक्षरशः सगळे ते उभे राहीले. तो अरबी घोडा, त्यांचे ते ब्रॉंझमध्ये एकसंघ ओतण्यासाठी नव्याने फाउंड्रीचा शोध घेणे, त्या पुतळ्याचा आकार आणि वजन लक्षात घेऊन तो धातूचा रस कसा घालतात वगैरे ते सगळे.. तो मोठ्या कास्टिंगचा थरार,  ते शिवस्मारकातील रिलीफ शिल्प, राज्याभिषेक सगळे सगळे. खूप सुंदर वर्णन केलेले आहे अगदी सामान्य कुवतीच्या माणसाला देखील समजेल. एवढा  सखोल अभ्यास करून त्याच्याबद्दल समजावले आहे. दोन-दोनदा वाचत होते आणि अतिशय भावले मला.

अमेरिकेच्या दौऱ्यावर करमरकर गेले ते वाचताना मी विचार करीत होते की खरोखर ते ६०, ६५ वर्षांपूर्वी कसे गेले असतील आणि माझ्या डोळ्यासमोर स्वामी विवेकानंद साकार होत होते. किती कष्टाने ते गेले होते आणि तिथे जाऊन त्यांनी अमेरिका जिंकली; तसेच करमरकर गेले त्यांनी तिथे सगळ्यांना जिंकून घेतले, आपले विचार मांडले. त्यांची शिल्पे लोकांना आवडली. तिथल्या लोकांनी त्यांची स्तुती केली, प्रशंसा केली त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर एकदम करमरकर हे विवेकानंदांसारखेच भासले.

बर्गलमनी जनरल ली व मेक्सन डेविस घोड्यावर बसून पर्वत चढत आहे या सगळ्याचे जे वर्णन लिहीले आहे ते अतिशय उत्तम रित्या चित्रित केले आहे. ते पर्वत शिखर, अब्राहम लिंकनचे डोके प्रचंड आकारात खोदणे सारे डोळ्यांसमोर उभे राहते.

करमरकरांच्या दैनंदिनीतील अभिप्राय वाचताना चांगली माहिती मिळते. करमरकर सांगतात, ” इन्स्टिट्यूटच्या प्रदर्शनात येथील विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून मिळणाऱ्या स्वातंत्र्याच्या दुरुपयोग स्पष्ट दिसत होता. आधुनिक कला निर्मिती करणारे कलावंत बेताल का असतात याचे रहस्य इथे समजते. मुळाक्षरे व व्याकरण समजण्यापूर्वी एखादा ग्रंथ लिहिला तर त्याचे स्वरूप कसे असेल तसेच या कलाकृती बघून वाटले.”

करमरकरांनी लिहिलेले स्वातंत्र्य देवीचे वर्णन .. शिल्पकाराची विशाल दृष्टी व भव्य शिल्प प्रत्यक्षात आणण्याची कृती यांचा श्रेष्ठ संगम येथे झाला आहे. इंजिनीयरचे अद्भुत कार्य आपल्याला थक्क करते. असे अनेक लेख कै .करमरकर यांनी लिहिलेले या पुस्तकात वाचायला मिळतील.

अमेरिका दौऱ्यात करमरकरांनी अनेक भव्य स्मारके अभ्यासली होती तसे काहीतरी भव्य दिव्य करण्याचे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकले नाही, ते वाचताना अतीव दुःख झाले. गांधी स्मारकासाठी त्यांनी केलेली शिल्पे, त्यासाठी केलेला अभ्यास सारेच उत्तम होते .

जे आर. डी टाटांच्या बरोबर झालेला त्यांचा तो संवाद. त्यांनी  स्केचसाठी एक हजार रुपये का द्यायचे वगैरे त्यांनी जे सांगितले आणि उद्योग समूहातील अधिकाऱ्याच्या चढेल वैचारिकतेला धक्का देऊन त्यांना जागे केले  ..मी स्वतःची प्रतिष्ठा जपली ..अशा काही वाक्यांमधून लेखकाने अतिशय उत्तम रीतीने करमरकरांचे चरित्र उभे केले आहे.

श्री. करमरकरांच्या दैनंदिन गोष्टींबद्दल ते  लिहीतात, त्यात अक्षरशः माझ्या वडिलांच्या जीवनाची अनेक साम्य स्थळे आढळली. सगळे आमच्या घरी अगदी असेच होते. त्यामुळे करमरकर हे पुस्तक वाचताना मी अगदी हरवून गेले होते.

खुद्द श्री. करमरकर हे उत्तम लेखक होते हेही या पुस्तकावरून कळते

त्यांनी लिहिलेय की पाश्चात्य कला ही निसर्गनिष्ठ आहे, आधुनिक कला आत्मनिष्ठ आहे तर पौर्वात्य कला भावनानिष्ठ आहे. त्यात त्यांनी तीनही कलांचे निष्ठावान अनुयायी गांधीजींचे चित्र किंवा प्रतिमा कशी करतील याचे सार्थपणे विवेचन केले आहे. करमरकरांचे इतरही सगळे शेवटले लेख अतिशय माहितीपूर्ण आहेत.

शिल्पे (१) सुशीला   

शिल्पे (२) छत्रपती शिवाजी महाराज

शिल्पे (३) कोलकाता येथील शिल्पे

शिल्पे (४) मत्स्यगंधा   

त्यांच्या प्रत्येक शिल्पाविषयी लेखक श्री. सुहास बहुळकर यांनी अतिशय आत्मीयतेने लिहीले आहे मग ते आत्ममग्न आणि अंतर्मुख असलेले गांधी असोत, गोगलगाईवर बसलेली अंध स्त्री असो, वडील पांडुतात्या, मत्स्यकन्या, ज्योती माकडीण व तिचे पिल्लू असो, किंवा सुशीला असो.लहान सहान बारकाव्यांसह त्याचे रसग्रहण केले आहे. खूप वाचनीय आहे.
एकच वानगी दाखल..

‘ग्रेसफुल वरी’चे शिल्प

करमरकरांनी करूण भाव व माया-ममता व्यक्त करणारे एक शिल्प तयार केले. त्याचे नाव होते,  ” ग्रेस फुल वरी. ” या शिल्पात एक स्त्री असहाय्य मुद्रेत उभी असून तिने छातीशी तिच्या लहान बाळाला कवटाळले आहे. खाली तिचा तीन चार वर्षाचा मुलगा तिच्या डाव्या पायाला बिलगला आहे. त्या स्त्रीच्या उभे राहण्यातून, डावीकडे कललेल्या मानेतून व ज्या काळजीने तिने लहानग्याला छातीशी कवटाळले आहे त्यातून तिची असहाय्यता जाणवत असतानाच खालच्या बाजूला असणाऱ्या या मोठ्या भावंडालाही, वय लहान असून जे घडले आहे, ते समजून उमजून तो बाबरला आहे. प्रत्यक्षात काय घडले आहे, ते प्रेक्षकाला कळतच नाही पण या शिल्पातून जाणवते की काही तरी भयंकर घडले आहे किंवा घडणार आहे आणि त्याच्या काळजीने ही स्त्री व तिची दोन मुले जे घडू पाहत आहे त्याकडे असहाय्यतेने बघत आहेत. या शिल्पातला त्या स्त्रीचा असहाय्य चेहरा, डोक्यावरून पदर घेत तिची उभी राहण्याची ढब, साडीच्या चुण्या, पाठीशी सोडलेला रुळणारा पदर, ज्या दोन हातांनी लहान मुलाला कवटाळले आहे, त्या हातातून व्यक्त होणारे वात्सल्य सर्व काही पहात रहावे असेच आहे. पण त्यासोबतच आल्या परिस्थितीला तोंड देण्याचा निर्धार त्यातून जाणवतो. पायाशी बिलगलेल्या मोठ्या मुलाचे कृश शरीर, कमरेला बांधलेला करदोटा व बावरून त्याने आईच्या कुशीत लपवलेले तोंड एका अत्यंत भावपूर्ण अशा निर्मितीचा प्रत्यय देते. १९३४ च्या ” बॉम्बे आर्ट सोसायटी ” च्या प्रदर्शनात हे शिल्प देखील गाजले होते.

लेखकाने किती प्रत्ययकारी वर्णन करून हे शिल्प सामान्य वाचकांसाठी जिवंत केले आहे हे सहज समजते.

प्रत्येक कलेचा निसर्ग हा देव आहे त्याची भक्ती करण्याच्या पद्धतीमध्ये काय तो फरक आहे म्हणूनच वेगवेगळ्या पद्धती अस्तित्वात आहेत या प्रांताच्या मर्यादेचे तीन कोन् आहेत इमिटेशन, रिप्रेझेंटेशन आणि इंटरप्रिटेशन त्या अतिशय सुंदर रीतीने समजावले आहे.

 

शिल्पकार करमरकर सून सुनंदा यांचे शिल्प साकारताना

शिल्पकार करमरकर इतर शिल्पांचे काम करताना

करमरकर यांनी गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर आणि गांधीजी यांना समोर बसवून शिल्प तयार केले आहे.त्यांना अनेक बक्षिसे, बॉम्बे आर्ट सोसायटीची पदके, आर्टिस्ट ऑफ द इअर चा बहुमान, ललित कला अकादमीची फेलोशिप  आणि ते भारत सरकार तर्फे ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित आहेत.

समकालीन इतर शिल्पकार यांचीही माहिती आणि करमरकर यांची पत्रे देखील उल्लेखनीय. अ पासून ज्ञ पर्यंत घेतलेला हा धांडोळा स्तुत्य आहे .

हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे. कलेवर प्रेम असणाऱ्या, चित्रकार व शिल्पकार असणाऱ्यांनी सगळ्यांनी वाचावे असेच हे पुस्तक आहे.

 

मराठी पुस्तक..आयुष्याची मौल्यवान माती. शिल्पकार करमरकर
लेखक श्री. सुहास बहुळकर
किंमत ५५०/-
प्रकाशक..राजहंस प्रकाशन, पुणे.

इंग्रजी पुस्तकPrecious clay of life .  Legendary Sculptor, V.P.Karmarkar
लेखक श्री. सुहास बहुळकर
किंमत- रु. २४०० / –

प्रकाशक – ललित कला अकादमी, दिल्ली. 

प्रकाशचित्रे : सुहास बहुळकरअनिश दाते यांच्या सौजन्याने.

– ©️  सौ.स्वाती वर्तक, खार ( प.),

मुंबई ४०० ०५२.
swati.k.vartak@gmail.com

सौ. स्वाती वर्तक यांनी पाठवलेला फोटो

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आजची कविता 

प्रदीप अधिकारी 
चिरंतन सत्य

वेळ आता जवळ आली, दूर भासणाऱ्या मरणाची,
जमवितो मी लाकडे आताशा, लागणाऱ्या सरणाची !

काय घेऊनी जन्मलो मी, काय मी कमविले वा गमविले,
गिनती त्याची कशी करावी, रांगेत उभ्या त्या शून्यांची

कळले आता मला नव्याने, का मला जे कळतच नव्हते,
प्यास लागली होती जीवाला, मृगजळाच्या त्या पाण्याची

रडवूनी मी अपुल्यांना, हसवित गेलो भलत्याच कुणाला
शेवटी हासलो मीही स्वत:शी, जखम लपवूनी त्या दु:खाची

हे सारे असेच होते, जे भासले खरे, तेच नेमके खोटे होते,
आस अंतरी म्हणुनी लागली, चिरंतन त्या सत्याची…

– ©️ प्रदीप अधिकारी             

9820451442
adhikaripradeep14@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@@@@
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 
 
– अवनी घाणेकर 
इयत्ता आठवी, बालमोहन विद्यामंदिर, मुंबई
प्रेषक मृदुला जोशी 
@@@@@@@@@@@@@@@@@@

ग्रँट रोड, एक कॅलिडोस्कोप : 

 
लेखक मधुसूदन फाटक

पुस्तक परिचय 

 
मोहन कान्हेरे

 

मुखपृष्ठ

दक्षिण मुंबईमधलं ‘ ग्रँट रोड ‘ हे एक अतिशय महत्त्वाचं स्थानक…… ऐतिहासिक महत्त्व असलेलं, सांस्कृतिक दृष्ट्या श्रीमंत असलेलं…..पूर्व – पश्चिम दोन्ही दिशांना दाटी-वाटीने वस्ती, सर्व प्रकारची व्यापारी केंद्रं …. यामुळे हा विभाग कायमच गजबजलेला! पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेन चर्चगेटवरून सुटल्या की तिसरं स्थानक येतं ते ग्रँट रोड…..या स्थानकाचा रोचक इतिहास लहानशा पुस्तिकेच्या द्वारा वाचकांसमोर ठेवला गेला आहे.

नुकतेच निवर्तलेले मधुसूदन फाटक यांनी हे काम खूपच आस्थेने केलं आहे. मधुसूदन फाटक हे फोटो जर्नालिझमकरता ओळखले जात. १९६३ साली त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि गेली ४० वर्ष अनेक मान्यवर वृत्तपत्रांच्या पुरवण्यांमधून त्यांनी  लेखन केलं. वासुदेव बळवंत फडके स्मारक समितीचे ते कार्यवाह होते आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयच्या ताडदेव शाखेचे ते अध्यक्ष होते. अत्यंत डोळसपणे  भोवतालचा वेध घेणारे, प्रासंगिक लेखन करणारे मधुसूदन फाटक….. त्यांनी या छोट्याशा पुस्तिकेमध्ये अनेक विषयांना हात घातला आहे, उदंड तपशील नोंदवला आहे. आपल्या अवतीभवतीचं लोकजीवन, इथली खाद्य संस्कृती, इथली करमणुकीची केंद्रं, इथे घडलेल्या राजकीय घटना या सर्वाचा रंजक आढावा म्हणजेच हे छोटसं पुस्तक.

रेल्वे स्थानकापासून अगदी केवळ दहा मिनिटांवर ज्योती स्टुडिओ होता, हे अनेकांना माहीत नसेल. श्री. अर्देशीर इराणी या जाणकार धनिकाने एका प्रशस्त भूखंडावर हा स्टुडिओ उभा केला. १९३१ मध्ये चित्रपटनिर्मिती सुरू झाली, आणि ‘आलम आरा ‘ हा चित्रपट तिथे जन्माला आला. राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला आचार्य अत्रे यांचा ‘श्यामची आई’ हा चित्रपट याच ठिकाणी तयार झाला…..मंगेशकर कुटुंब, न्यायमूर्ती बावडेकर, पत्रकार चं. वि. बावडेकर, चित्रपट लेखक-दिग्दर्शक दिनकर द. पाटील, अशोक सराफ, संस्कृत भाषेवर प्रभुत्व असलेले हरिभाऊ वेलणकर, सुनील गावस्कर, उत्तरा केळकर, आरती अंकलीकर टिकेकर, पंडित फिरोज दस्तूर, कवीराज राजा बढे…… ( ही यादी खूप मोठी आहे ) हे सगळे ग्रँट रोडचे रहिवासी.

इथे इंग्रजांच्या काळात ‘प्ले हाऊस’ नावाचा विभाग होता. अनेक चित्रपटगृहं त्या ठिकाणी होती, म्हणून प्ले हाऊस. नंतर त्याला पिला हाऊस म्हणू लागले. इम्पिरियल चित्रपटगृहाला खेटून दोन हत्तींच्या प्रतिकृती उभ्या होत्या, आणि आजही केविलवाण्या अवस्थेत त्या पाहायला मिळतात. या ठिकाणी ‘अलबेला’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातलं “भोली सुरत… ” हे गाणं परत परत ऐकायला रसिकांना आवडायचं. मात्र त्याकरता तिकीट परवडत नव्हतं. रात्री नऊचा शो बरोबर नऊ वाजता सुरू होत असे आणि साडे दहाच्या सुमारास हे गीत पडद्यावर येत असे. या चित्रपटगृहाचे सगळे दरवाजे उघडे करून फुटपाथवर उभ्या असलेल्या रसिकांना मोठ्या प्रेमाने गाणं ऐकवलं जात असे.

समुद्रकिनारी चार राजवाडेसुद्धा जुन्या जमान्यात पाहायला मिळत. बडोदे संस्थान अधिपती प्रताप सिंह महाराज यांचा राजवाडा, आनंद भुवन या नावाने १९०५ साली ब्रिज कॅण्डीलगत बांधला गेला. आताचं ऑगस्ट क्रांती मैदान म्हणजेच त्या काळातलं गवालिया टॅंक…..ग्रँड रोड स्टेशनपासून दहा ते बारा मिनिटाच्या अंतरावर. ही तर ऐतिहासिक जागा. त्याचीही आठवण लेखकाने काढली आहे. प्रस्तुत पुस्तकाला कॅलिडोस्कोपची उपमा दिली आहे, आणि ती योग्यच आहे.

पुस्तकात जागोजाग फोटो छापले आहेत आणि त्या त्या ठिकाणच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. पुढच्या पिढीसाठी हे पुस्तक म्हणजे एक उत्तम दस्तावेज आहे.

ग्रँट रोड, एक कॅलिडोस्कोप : लेखक मधुसूदन फाटक 

प्रकाशक : अशोक केशव कोठावळे, 
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस,
गिरगाव, मुंबई.

मूल्य रु. १००/-
पृष्ठसंख्या ७०

– ©️ मोहन कान्हेरे
mohankanhere@yahoo.in
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
अनामिकाची शिफारस

अनामिक

बालसाहित्य कालानुरूप कसे असावे ? या विषयावर आज बरेच काही बोलले जाते परंतु त्यापेक्षा काही भरीव लिहिले गेले तर ते साहजिकच हवे आहे. या विचारात असताना डॉ. उमेश करंबेळकर यांनी लिहिलेली दोन नवीन करकरीत पुस्तके हाती आली. या दोन्ही पुस्तकांची शिफारस करण्यासाठी आज आलो आहे.

डॉ. उमेश करंबेळकर हे ‘मैत्री’च्या वाचकांना प्रामुख्याने पर्यावरणावर अधिकारवाणीने लिहिणारे तज्ज्ञ म्हणून ठाऊक आहेत. त्यांनी कुमार वयाच्या मुलांसाठी काय बरे लिहिले आहे, या कुतूहलाने पहिले पुस्तक उघडले. ते आहे ‘उडणा-यांचा तलाव‘. ही अर्थातच गोष्ट आहे पण गोष्ट आहे ती दुष्काळी भागातल्या गावक-यांची आणि त्यांनी केलेल्या श्रमांतून घडलेल्या चमत्काराची. त्यांनी काय केले श्रम? त्यांनी एकत्र येऊन ठामपणे ठरवले की सर्वानी श्रमदानातून गावाशेजारून वाहणा-या ओढ्याचे पाणी अडवण्यासाठी एक बंधारा बांधायचा. मग पावसाचे पाणी त्या तलावात साठवले जाईल. आणि खरोखरच तो तलाव पाण्याने भरला आणि काय चमत्कार झाला? मुख्य म्हणजे तलाव आणि गावाचा परिसर हिरवागार झाला. तलावाकाठी अनेकानेक पक्षी आले. आणि हळूहळू तो तलाव पक्ष्यांनी गजबजून गेला. ही बातमी सर्वत्र पसरली; शहरातून अनेक पक्षीप्रेमी येऊ लागले. हे सगळे पक्ष्यांमुळे झाले, मग गावाचे भाग्य कसे उजळले …. हा तलाव ‘पक्षी अभयारण्य’ म्हणून कसा जाहीर झाला. हे सविस्तर सचित्र वाचण्यासाठी हे पुस्तक वाचा. हे पुस्तक चित्रांनी सजवले आहे संतोष घोंगडे यांनी आपल्या विलक्षण चित्रांनी.  .

दुसरे पुस्तक आहे ‘परक्या फुलांची गोष्ट.’ ही गोष्ट अशीच  माळरानातल्या फुलांवर आधारलेली आहे. या रानात जसे मोठमोठे वृक्ष होते, तसेच नाना प्रकारचे पशुपक्षी होते आणि असंख्य गवती फुले होती. ऋतूप्रमाणे या फुलांचा रंग बदले. पण एका वर्षी एक परके फूल उगवले.  सुरुवातीला या परक्या फुलाचे स्वागत झाले पण जसजशी त्यांची संख्या वाढू लागली तसतशी गवतफुलांना भीती वाटू लागली की आपले काय होणार ? मग त्यांनी त्या रानातील एका सर्वात ज्येष्ठ अशा वृक्षराजाकडे दाद मागितली आणि या परक्या फुलांना हाकलून देण्याची मागणी केली. त्या आदीवृक्षाने मात्र त्यांना कसे समजावले आणि त्याचे ऐकून पुढे काय झाले यासाठी हे पुस्तक वाचा. याही पुस्तकाला एक आगळावेगळा साज दिला आहे मैत्रेयी नामजोशी यांच्या बहारदार चित्रांनी.

एक विशिष्ट शैलीदार लेखक म्हणून गाजलेल्या डॉ. उमेश करंबेळकर यांच्या या दोन्ही पुस्तकांची माहिती पुढीलप्रमाणे  देताना असे सुचवावेसे वाटते की पालकांनी यंदाच्या वर्षी ही दोन्ही पुस्तके मुलांच्या क्रमिक पुस्तकांबरोबर खरेदी करून त्यांना वाचण्यास द्यावीत. पुस्तकांची निर्मिती उत्तम असून प्रकाशकांनी किंमत माफक ठेवली आहे.

विशेष सूचना : वाचकहो, आपल्या घरातील शाळकरी मुले जर इंग्रजी माध्यमात शिकत असतील तरी ही पुस्तके त्यांना बघू द्या. त्यातील चित्रे किती लोभसवाणी आहेत ! मराठी मजकूर मात्र त्यांना तुम्हीच समजावून सांगावा.

(१) उडणा-यांचा तलाव
किंमत रु. ८०/-


(२) परक्या फुलांची गोष्ट
किंमत रु. १००/-

लेखक डॉ. उमेश करंबेळकर,
रघुकुल निवास, ३२५, मंगळवार पेठ,
सातारा ४१५ ००२.
फोन : ९८२२३९०८१०
ईमेल : umeshkarambelkar@yahoo.co.in

प्रकाशक दिलीप माजगावकर,
राजहंस प्रकाशन प्रा. लि.
१०२५, सदाशिव पेठ,
पुणे ४११ ०३०.
फोन – (०२०) २४४७३४५९.
ईमेल : rajhansprakashan1@gmail.com
वेबसाइट : www.rajhansprakashan.com

अनामिक

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
पिल्लू मोठे झाले

मिलिंद कर्डिले
खरेच, आपल्या घरी जेव्हा एक शिशू जन्माला येतो तेव्हा घर आनंदाने किंवा प्रसन्नतेने भरून जाते. घरातील प्रत्येक व्यक्ती कामाला लागते किंवा ते बाळ सर्वांना कामाला लावते असे म्हणू हवे तर. त्याला दुध पाजणे, त्याचे कपडे बदलणे, न्हाऊ घालणे अशी अनेक कामे पार पाडावी लागतात. त्याचे हसणे, रडणे ते इवले इवले हात पाय हलवणे हे सगळे बघणे म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. जसजसे ते बाळ मोठे होत असते तस तसे त्याच्या वेगवेगळ्या लीला पाहायला मिळतात.

वाढत्या वयानुसार त्याचे आपले विचार तयार व्हायला लागतात. एक वेगळे विश्व तयार होत असते. त्या विश्वात मित्रांचा, शाळेचा समावेश होतो. आधी फक्त आई वडिलांच्या विचारांचा पगडा असतो पण नंतर इतर अनेक जणांचा प्रभाव पडू लागतो. अभ्यासात एखाद्या विषयात जास्त रुची वाटू लागते तर एखादा विषय कंटाळवाणा वाटतो. हे वय मोठे विचित्र असते. यात त्यांचे संगोपन करणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे, त्यांचा एकंदर कल बघून शिक्षणाची दिशा ठरवणे, त्यांचा मित्र परिवार कसा आहे याची चाचपणी करणे इत्यादी अनेक गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. कारण यावर त्यांचे पूर्ण भविष्य अवलंबून असते. कसोटीचा काळ असतो खरे तर. शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरावर अनेक बदल होत असतात. परिस्थितीशी सामना करण्याची कुवत निर्माण होत असते. एका पिल्लाचे रूपांतर होत असते. एक वेगळी ओळख तयार होत असते. पंख पसरून भरारी घेण्याची तयारी होत असते.

एका ठराविक वयानंतर ते आपले विचार मांडू लागतात. आपले निर्णय घेऊ लागतात. खरे तर कधीकधी घरातील शिस्त ही बंधन वाटू लागते. कारण ते वय असते भरारी घ्यायचे. स्वच्छंद वागायचे. मुक्तपणे जगायचे. मग घरात थोडे खटके उडू लागतात ज्याला आपण ” जनरेशन गॅप” असे एक गोंडस नाव दिले आहे. आपले मूल मोठे झाले आहे ही बाब स्वीकारणे आई वडिलांच्या पचनी पडणे कठीण असते. कारण त्यांच्यासाठी ते पिल्लू असते. हे बदल मुलांनी आणि आई वडिलांनी वेळीच स्वीकारले तर पुढील वाद टळतात.

हे पिल्लू पुढे नोकरीला लागते. आर्थिक दृष्ट्या सक्षम होत असते. त्याची ताकद वाढू लागते. जेवढी आर्थिक कुवत वाढते तेवढे ते जास्त स्वतंत्र होते. अर्थकारण हा आपल्या आयुष्याचा फार मोठा भाग आहे. त्याशिवाय जीवन जगणे फार कठीण आहे. वयाच्या २७/२८ वर्षांपासून ते स्वतंत्र निर्णय घेऊ लागते. आपले जीवन कसे असावे, घर कसे असावे, पत्नी किंवा पती कसा असावा, याबद्दल त्याच्या स्वतःच्या अपेक्षा तयार होऊ लागतात. एखाद्या गोष्टीबद्दल आई वडिलांशी ते चर्चा करतील पण त्यांचे ऐकतीलच याची खात्री देता येत नाही. एक स्वतंत्र विचारसरणीचे व्यक्तिमत्त्व आकार घेत असते.

अशा वेळी आई वडिलांनी त्याला योग्य त्या ठिकाणी प्रोत्साहान देणे गरजेचे असते. त्याच्या पंखात किती ताकद भरली आहे हे पहावे लागते. त्याच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज घ्यावा लागतो. आपली मते आपण अकारण लादत नाही ना याचा अदमास घ्यावा लागतो. हेच वय असते जेव्हा मुलांना आपल्याकडून वेगळ्या अपेक्षा असतात. काही तर विचित्र बोलून त्यांचे पंख छाटण्याऐवजी त्यांच्या पंखात बळ कसे येईल ते पाहणे गरजेचे असते.  एक वैचारिक परिपक्वता पालकांनी दाखवणे गरजेचे असते. पण हे तेव्हाच घडते जेव्हा पालक स्वीकारतात की ” पिल्लू मोठे झाले”

– ©️ मिलिंद कर्डिले

milindkardile@yahoo.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
बालचित्रकारांचे दालन
सुट्टीतील कामगिरी 
 
– भार्गवी महाडिक 
@@@@@@@@
– अर्जुन भातखंडे 
 
प्रेषक सौ. स्वाती वर्तक
swati.k.vartak@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@@@ 
 
हत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@

उपचार माणुसकीचा

कथा 
 
 
मोतीराम टोपले
 

” आज काय झालं माहीत आहे? सकाळी वॉर्डबॉय एक अ‍ॅक्सिडंटची केस घेऊन माझ्या केबीनमध्ये आले. त्या पेशंटच्या चेहऱ्याकडे पाहून मी अगदी चक्रावून गेले रे. ”

” का गं? चेहरा खूपच डॅमेज झालेला होता का?”
” छे, रे अजिबात नाही.”
” मग काय ? ”
” तो एका पंचविशीतला काश्मीरचा मुलगा आहे आणि आपल्या लग्नातल्या फोटोत तू जसा दिसतोयस ना अगदी तसाच दिसतोय रे तो. ”

” तुमचं बायकांचं हे नेहमीचंच. तो याच्यासारखा दिसतो, ती तिच्यासारखी दिसते. आपल्याला मूल नसल्याने आपला मुलगा असता तर असाच दिसला असता. असं कदाचित तुझ्या मनाला वाटत असेल. तुला आठवतं, आपण पाहिलेल्या ‘मिशन इंपॉसिबल’ या सिनेमात टॉम क्रूझचा सेम टू सेम डुप्लिकेट सुरुवातीला दाखवला होता, मात्र नंतर चेहऱ्यावरचा रबरी मास्क काढल्यावर तो मेकअप केलेला कुणी दुसराच असल्याचं दाखविलं होतं. आपल्याकडे डॉन सिनेमात अमिताभ बच्चनचा डुप्लिकेट शेवटपर्यंत अस्तित्वात असलेला दाखविला होता, हे असं सिनेमात दाखवतात झालं, पण प्रत्यक्षात असं कधीही नसतं गं. ”

” नाही रे, खरंच तू येऊन बघच त्याला म्हणजे खात्री पटेल तुझी. “
” बरं बाई, मी येऊन जाईन. मग तर झालं! ”
“ आणि माझं म्हणणं खरं ठरलं तर मला काय देशील ?”
“ तू म्हणशील ते !”
” असं कर; तू माझ्या केबीनमध्ये ये. मग आपण वॉर्डमध्ये जाऊ. ”
” ओ. के. येईन मी. बरं निघतो मी. एका पेशंटला अपॉइंटमेंट दिलेली आहे. आता मला निघायला हवं. बाय!”

‘श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ, चॅरिटेबल ट्रस्ट’ दिल्लीतील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल. या नावाजलेल्या हॉस्पिटलची स्थापना वीस वर्षापूर्वी झाली. सुरुवातीलाच राज्यातील विविध शहरातील तज्ञ व नावाजलेल्या डॉक्टरांना इथे नेमणूका देण्यात आल्या. त्यातील सायकियाट्रीस्ट म्हणून डॉ. श्रीनिवास व ऑर्थोपेडीक सर्जन म्हणून डॉ. स्मिताची नेमणूक झाली. नंतर दोघांचा प्रेमविवाह झाला.

नव्या नवलाईचं वर्ष संपून गेलं. तरीही स्मितामध्ये गरोदरपणाची लक्षणं दिसेनात म्हणून दोघांनीही टेस्ट करून घेतल्या. त्यात स्मितामध्ये दोष आढळून आला. त्यानंतर स्मिताने श्रीला दुसरं लग्न करण्याचं अनेकदा सुचवलं. पण दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम होतं की श्री दुसऱ्या लग्नाला कधीच तयार झाला नाही. एकदा स्मितावर तो इतका भडकला व रागाने बोलला की यापुढे आयुष्यात पुन्हा लग्नाचा विषय काढायचा नाही आणि काढलास तर मी इथून निघून जाईन पुन्हा कधीही परत न येण्यासाठी !  हे ऐकल्यावर स्मिता श्रीला मिठी मारुन रडायला लागली. तेव्हा श्रीने तिच्या पाठीवर हात फिरवीत समजावलं, “हे बघ तुझ्या-माझ्या नशिबात मूल नाही. त्याला इलाज नाही. अशी मूल नसलेली कितीतरी जोडपी असतात. त्यातीलच आपण एक. समजा मूल नाही म्हणून दुसरं लग्न केलं तर मूल होणारच याची गॅरेंटी काय ? तसंच प्रेम तुझ्यावर व संसार दुसरीबरोबर हे कसं शक्य आहे ? आणि अशी दोघांचीही फसवणूक करणं मला तरी जमणार नाही. मुळात तुझ्यावरील माझ्या प्रेमाची विभागणीच मला नको आहे. तेव्हा आपल्याकडे येणारा पेशंट हीच आपलं मुलं असं आपण समजू. आपल्याकडून होईल ती त्यांची सेवा आपण करु. आपली मुलं भविष्यात आपली आठवण काढतीलच याची खात्री आजच्या जगात देता येणार नाही, पण आपले पेशंटमात्र या डॉक्टरांच्या इलाजामुळे ‘मी वाचलो किंवा वाचले’ याची आठवण कधी ना कधी काढतील हे नक्की. ”

संध्याकाळी श्रीनिवास डॉ. स्मिताच्या केबीनमध्ये आला. “तू थोडा वेळ बस हं! मी जरा सतरा नंबर वॉर्डमध्ये जाऊन येते. मघा एका पेशंटच्या पायामध्ये प्लेट बसवली; एव्हाना तो शुद्धीवर यायला पाहिजे, जरा त्याला बघून येते, ” असं म्हणत स्मिता वॉर्डकडे जायला निघाली.
स्मिता आल्यावर दोघंही वॉर्ड नंबर सोळाकडे जायला निघाली. वॉर्डमधील कॉट नं. ४ वर झोपलेल्या पेशंटकडे दोघंही पोहोचली. पेशंटने हसत दोघांकडे पाहिलं.

” कसं वाटतंय आता ?” डॉ. स्मिता
” बरं आहे पण अजून थोड्या वेदना होताहेत,” पेशंट. मी पेशंटच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिलो. स्मिता म्हणाली त्याप्रमाणे पेशंटचा चेहरा आमच्या लग्नातील फोटोमधील हुबेहूब माझ्या चेहऱ्यासारखा दिसत होता. माझ्या माहितीप्रमाणे लाखोत एखाद्या मुलाचा चेहरा अगदी आई किंवा वडिलांच्या चेहऱ्यासारखा असू शकतो. फक्त जुळी किंवा तिळी मुलं काही वेळा एकासारखी एक असू शकतात. मग हा मुलगा अगदी माझ्यासारखा कसा दिसू शकतो ? नैसर्गिक चमत्कारच म्हणायचा दुसरं काय !

जुळ्या, तिळ्यावरुन आठवलं. मी हायस्कूलमध्ये असताना आमच्या वर्गात मुस्लीम समाजातील तिळ्या मुली होत्या. झरिना, रुबिना व शबिना अशी त्यांची नावं होती. दिसायला त्या इतक्या सारख्या होत्या की आम्हीच काय शिक्षकवर्गही त्यातली रुबिना कोण ? शबिना कोण ? झरिना कोण ? हे ओळखू शकत नसत. एस. एस. सी. परीक्षेला तिघींचाही एकाच ब्लॉकमध्ये एकामागून एक नंबर आला. सर्वात पुढे होती तिला ऐंशी टक्के गुण, तिच्या मागची होती तिला पन्नास टक्के गुण मिळून दोघीही पास झाल्या. तिसरी मात्र नापास झाली. तिने ऑक्टोबरमध्ये पुन्हा फॉर्म भरला. ती पंच्याऐंशी टक्के मार्क घेऊन पास झाली. नंतर समजलं, ऐंशी टक्के गुण मिळवून पास झालेली मुलगीच पुन्हा ऑक्टोबरच्या परीक्षेत पेपर लिहायला बसली होती. एकदा गंमत म्हणून ही हकीकत मी माझ्या मेडीकल कॉलेजमधील मित्रांना सांगितली, त्यावर एक मित्र म्हणाला,
” त्या तिघींपैकी जिचं पहिल्यांदा लग्न होईल तिच्या नवऱ्याची पंचाईत होणार बिचाऱ्याची ”
” ती कशी काय ? ” आम्ही सर्व
” जेव्हा तो सासरी जाईल तेव्हा समोर असलेली आपली बायको आहे हे तो ओळखणार कसा?” आम्ही सर्व हसलो. फक्त प्रकाश तेवढा हसला नाही. त्याच्या डोक्यात काही दुसराच विचार चालला होता. आम्ही सर्वांनी वळून त्याच्याकडे पाहिलं ” चूक. काहीही पंचाईत होणार नाही. उलट मजाच मजा होईल, ” प्रकाश.
” ती कशी काय ? ” आम्ही सर्व
” साधी गोष्ट आहे. त्याने समोर दिसेल तिला मिठी मारायची. ती ओरडली तर फक्त ‘सॉरी’ म्हणायचं … बस्स” हे ऐकून आम्ही सर्व पोट धरून हसलो होतो हे सर्व आठवलं.

” एक फॉरमॅलिटी म्हणून मी पेशंटला त्याचं नाव वगैरे काही प्रश्न विचारले. त्यावरुन त्याचं नाव ‘बिपीन’ मोटर सायकल स्लिप झाल्याने अपघात झाला. मागच्या सीटवर मित्र होता. त्याला फक्त खरचटलं, त्यानेच हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केलं. घरी कळवलं. मावशी आली, तीच इथे सोबत असते. आता औषधं आणायला गेली आहे. बिपीनने एम.बी.बी.एस.ची परीक्षा दिली आहे, अजून रिझल्ट लागायचा आहे. त्याला कार्डिऑलॉजीस्ट व्हायचं आहे. त्या कॉलेजच्या चौकशीसाठी तो दिल्लीमध्ये आला आहे. ही माहिती मिळाली. मी तिथून निघायचं ठरविलं. स्मिताला सांगण्यासाठी मी वळलो. एवढ्यात एक बाई औषधांचा बॉक्स घेऊन बिपीनच्या कॉटकडे येताना दिसली. तिने औषधांचा बॉक्स बाजूच्या कपाटावर ठेवला. तिला पाहता क्षणी मला ही स्त्री यापूर्वी कुठेतरी भेटली असल्याचे जाणवले. मी स्मिताला सांगून निघालो व विचार करत करत माझ्या केबिनमध्ये खुर्चीवर येऊन बसलो. काही वेळाने मला पंचवीस वर्षापूर्वीची केस व त्यातील घटना आठवत गेल्या.

त्या काळात व्यवसायात नवीन असून देखील दिल्लीसारख्या शहरात माझी प्रॅक्टीस चांगली चालली होती. शनिवारचा दिवस होता तो.
दुपारच्या अपॉईंटमेंट संपल्या होत्या. संध्याकाळी कोणालाही अपॉईंटमेंट दिली नव्हती. क्लिनिक बंद करून चारच्या ट्रेनने मी काश्मीरला जायचं ठरवलं. तीन पंचेचाळीसला मी स्टेशनवर पोहोचलो. ट्रेन लागलेली होती. विंडो सीटवर मी बसलो. बघता बघता प्रवाशांनी डबा भरला. ट्रेन बरोबर वेळेत सुटली. मी इअरफोन कानाला लावून मोबाईलवरील गाणी ऐकण्यात मग्न झालो. पुढच्या स्टेशनवर माझ्या शेजारच्या सीटवरील प्रवासी उतरला. एवढ्यात मागच्या बाजूने आलेली एक स्त्री बाजूच्या सीटकडे उभी राहून काही विचारत असल्याचं मला दिसलं. मी इअरफोन काढून खुणेनेच तिला ‘काय म्हणता?’ असं विचारलं.
“प्लीज मला विंडो सीट देता का?” स्त्री.
काही क्षण मी तिचं निरीक्षण केलं, माझी बॅग उचलून बाजूला सरकलो,
तिला विंडोसीटकडे जायला दिलं, दोघंही सीटवर बसलो.

“थँक्स हं. काय झालं ? दहा वर्षांनी मी दिल्लीला आले. इतक्या वर्षात आजुबाजूला काय बदल झालेत ते पाहण्यासाठी मला विंडो सीट हवी होती”
“ओ.. के .. ” सहसा तरुण स्त्री, अपरिचित तरुण पुरुषाच्या बाजूला आपणहून कधीच बसायला तयार होत नाही मग हा काय प्रकार आहे ? मला समजेना. तिच्या गळ्यातील मंगळसुत्रावरुन ती विवाहित आहे, कानातील चमकणारे प्लॅटिनमचे टॉप, रंग-रूप राहणीमान यावरून ती उच्चभ्रू समाजातील वाटत होती. कदाचित बस, ट्रेनसारख्या सार्वजनिक प्रवासी वाहनातून प्रवास करण्याची तिला सवय नसावी, त्यामुळे बऱ्याच वेळी अशा प्रवासातील पुरुष सहप्रवाशाकडून होणारे स्पर्श वगैरे बाबत ती अनभिज्ञ असावी. असा विचार माझ्या मनात आला.

मी यापूर्वी बऱ्याच वेळा काश्मीरला गेलेलो असल्याने मला खिडकीतून बाहेर बघण्यात मुळीच इंटरेस्ट नव्हता. शिवाय बऱ्याच दिवसांनी मोकळा वेळ मिळाल्याने मला आवडीची जुनी दर्दभरी गाणी ऐकायची होती. त्यामुळे विंडोसीट द्यावी लागल्याने मला अजिबात वाईट वाटलं नाही.
एवढ्यात साठीच्या घरातील एक धोतर नेसलेला गृहस्थ समोरून हसत येताना दिसला. “डॉक्टर, अभिनंदन हो तुमचं,” असं म्हणत त्याने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. नाईलाजाने माझा हात मी त्याच्या हातात दिला, पण अभिनंदन कशाचं हेच मला समजेना. अनुनासिक उच्चारावरुन हा गृहस्थ ब्राह्मण असावा हे मी ओळखलं. मी डॉक्टर असलो तरी कुठल्याही व्यक्तीचा फॅमिली डॉक्टर नव्हतो त्यामुळे या गृहस्थाला मी ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. हा गृहस्थ स्वत:साठी किंवा अन्य कोणासाठी माझ्या क्लिनिकमध्ये कधीतरी आलेला असणार हा विचार माझ्या मनात आला.
“काश्मीरला चालला आहात वाटतं ?” गृहस्थ
“हो” असं मी उत्तर दिलं. आपल्या डोक्यावर दिल्ली ते काश्मीर असं तिकीट तर लावलेलं नाही ना अशी शंका क्षणभर माझ्या मनात आली.
” तुम्ही कसं ओळखलंत?” मी
” अहो, अशा प्रसंगी काश्मीरला जाणार नाही, तर का राजस्थानला जाणार?” असे म्हणत गृहस्थ उगाचच हसला.

“ डॉक्टर, बाकी एक बरं केलं नाही हो तुम्ही ?”
” काय ते?”

‘आम्हाला लाडू चुकवलेत ते ..हॅ हॅ.. हॅ.. बाकी तेही बरोबरच म्हणा कारण तुमच्या सर्व पेशंटची नावं व पत्ता शोधायचा तर भारताचा नकाशा घेऊन बसावं लागलं असतं हो तुम्हाला.. असो.. तुमच्या ट्रिपला आमच्याही शुभेच्छा बरं का!” असे म्हणत गृहस्थ पुढे निघून गेला.
त्या वेळी माझ्या डोक्यात प्रकाश पडला की माझ्या बाजूला बसलेली स्त्री ही माझी पत्नी आहे, लग्नानंतर हनिमूनसाठी आम्ही काश्मीरला चाललो आहेत, असं त्या गृहस्थाला वाटलं असावं. हा विचार माझ्या मनात येताच मला शरमल्यासारखं झालं. मी त्या स्त्रीपासून थोडासा सरकून बसलो. आमचं संभाषण ऐकल्यामुळे तिही समजायचं ते समजली असावी कारण तीही थोडीशी खिडकीच्या बाजूला सरकली.

“आपण डॉक्टर आहात वाटतं!” स्त्री.
“ हो. ”
” जनरल प्रॅक्टिशनर की स्पेशालिस्ट ?
“सायकियाट्रीस्ट”
” काश्मीरला व्हिजीटसाठी की अन्य कामासाठी जाताय ?”
“व्हिजीटसाठी. ”
” एवढ्या लांब व्हिजीटसाठी जाता ? ”
” माझ्याकडे लांबलांबचे पेशंट येतात, मी सहसा लांबच्या व्हिजीटला जात नाही पण झालंय काय माझा एम. बी. बी. एस. चा क्लासमेट काश्मीरमध्ये राहतो, त्याच्या भावाचा प्रॉब्लेम आहे. त्याने बोलावलं, मग नाकारणार कसं ! म्हटलं जाऊ त्या निमित्ताने मित्राची भेट होईल म्हणून चाललोय.”
” बरं झालं बाई, अगदी देवच पावला आणि तुमची भेट झाली म्हणायची. “
” म्हणजे काय ? मी नाही समजलो. ”

” अहो, माझी बहीण श्वेता, माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान, दिसायला खूपच सुंदर म्हणून मागणी घालून दोन वर्षापूर्वी तिचं लग्न झालं. पूर्वी ती फार बोलकी होती. अभ्यासात हुशार. अनेक खेळात प्रवीण. फक्त तिला पाण्याची भिती वाटे. कारण लहानपणी पोहायला शिकताना तिच्या नाकातोंडात पाणी गेलं होतं. तिला लहान मुलांची खूप आवड होती. पण तिला स्वतःला मूल नसल्यामुळे कदाचित तिच्या मनावर परिणाम झाला असावा. ती कोणात मिसळत नाही. कोणाशी बोलत नाही, खाण्याकडे लक्ष नाही. अशी वागते. सासरी दोन वेळा मरता मरता वाचली. बहुधा आत्महत्येचा प्रयत्न असावा. तिच्या सासरच्यांनी अनेक डॉक्टर केले पण फरक काहीही नाही. सध्या तिला माहेरी आणलेलं आहे. प्लीज तुम्ही तिला तपासाल का ? खूप उपकार होतील तुमचे. तुमची फी, जाण्यायेण्याचा खर्च सर्व मी देईन. प्लीज नाही म्हणून नका.”

नेहमीप्रमाणे एक ‘चॅलेंज’ म्हणून मी केस घ्यायचं ठरवलं.
“ ठीक आहे. मी उद्या तुम्हाला भेटतो. तुमचा मोबाईल नंबर द्या. ” तिने आपलं नाव संगीता व मोबाईल नंबर सांगितला. तो नंबर नावासह मी माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह केला व रिंग दिली. तिने माझा नंबर व नाव आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केला.
सात वाजता काश्मीरला पोहोचलो. मित्र न्यायला आला त्याच्याबरोबर त्याच्या घरी पोहोचलो. चहापान झाल्यावर त्याच्या भावाला तपासलं. त्याला काही प्रश्न विचारले. त्यावरुन केस हिस्ट्री तयार केली. माझ्याकडची काही औषधं व प्रिस्क्रीप्शन लिहून मित्राकडे दिली. औषधं कशी द्यायची ते समजावून सांगितलं. जेवल्यावर तासभर काश्मीरमध्ये मित्रासह फेरफटका मारला. बऱ्याच गोष्टी केल्या. झोपण्यापूर्वी संगीताला फोन करून रविवारी सकाळी भेटण्याचं ठिकाण व वेळ फिक्स केली.
रविवारी सकाळी ठरलेल्या ठिकाणी, ठरलेल्या वेळी मी पोहोचलो. संगीता माझी वाट पहात बसली होती. ते ठिकाण अगदी पाकिस्तानच्या बॉर्डरजवळच होतं. संगीता मला म्हणाली की तिचे आईवडील व बहीण इथून पंधरा कि.मी. वर पाकिस्तानात रहातात. तिथे आपल्याला जायचं आहे.
“अहो, पण आपल्याला तिथे कसं जाता येईल ?” मी

” त्याची काळजी करू नका. तुमच्यासारख्या म्हणजे बॉर्डरपासून दूर राहणाऱ्या लोकांना उगाचच वाटतं की बॉर्डर म्हणजे एक रेषा असते ती ओलांडली की लगेच पलिकडचे सैनिक गोळ्या घालतात किंवा पकडून नेतात. पण प्रत्यक्षात तसं काही नसतं. दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये वैर नसते. शिवाय बॉर्डर मैलोनमैल पसरलेली असते. किती ठिकाणी सैनिक असणार ? आणि हो एखाद्या व्यक्तीला पाहून ती व्यक्ती आपल्या देशाची आहे की शत्रू देशाची आहे हे कसं ओळखणार? भारतातील लोक रंगाने काळे व पाकिस्तानातील लोक युरोपियन लोकांसारखे गोरे असं असतं तर ओळखता आलं असतं पण तसं नाहीना. त्यामुळे आपल्याला भिती नाही. शेवटी दोन्ही देशाचे सैनिक ही माणसंच असतात. रोबो नसतात. ते मानवतावादी दृष्टीकोनातून
नागरिकांना इकडून तिकडे जाऊ देतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने काही वेळा बॅगा तपासतात. त्यांनाही माहीत आहेच की आजचा पाकिस्तान हा पूर्वीचा भारताचाच भाग आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये नातेसंबंध आहेत. त्यामुळे लोक येणार जाणार. त्यांना अडविण्याचं पाप आपल्या माथी नको अशी कदाचित त्यांची भावना असेल. तेव्हा तुम्ही काळजी करु नका. दुपारी मीच तुम्हाला इथे आणून सोडणार आहे तेव्हा निर्धास्त रहा ”

आम्ही बोलत बोलत चाललो होतो. थोड्या अंतरावर एक स्कूटर उभी होती. संगीताने स्कूटरला चावी लावली, मी दोलायमान अवस्थेत तिच्या मागच्या सीटवर बसलो काही अंतरावर बॉर्डरवर भारतीय सैनिक उभा होता. तेथे संगीताने स्कूटर उभी केली.
” काय काका? कसे आहात ? पुढच्या वेळी येताना तुमच्यासाठी काय आणू?” संगीता.
” जमलं तर एक प्लेट बिर्याणी घेऊन ये,” सैनिक
“ बरं येते हं!” असं म्हणत संगीताने स्कूटर चालू केली. पुन्हा पुढे काही अंतरावर पाकिस्तानी सैनिक उभा असलेला दिसला. नाही म्हणायला माझ्या हृदयाची धडधड थोडी वाढली. संगीताने स्कूटर थांबवली व ती सैनिकाकडे गेली.

” चाचाजी, यह देखो मैने तुम्हारे लिए मिठाई लायी है” असं म्हणत पर्समधील मिठाईचा बॉक्स तिने सैनिकाच्या हाती दिला.”
“बहुत अच्छा बेटी. लेकिन तुम्हारे साथ यह कौन आया है? ”
यह एक डॉक्टर है और हमारा रिश्तेदार भी है ”
‘अच्छा जाओ खूष रहो।”
संगीताने हाताने त्याचा निरोप घेतला व स्कूटर चालू केली. काही वेळाने एक भल्या मोठ्या हवेलीसमोर स्कूटर उभी केली. आम्ही उतरलो.

” हे आमचं घर म्हणजे माहेर” असं म्हणत संगीताने हवेलीत प्रवेश केला. हॉलमध्ये तिचे वृद्ध आईवडील तिची वाट पहात बसले होते. संगीताने आपल्या आईवडिलांशी माझा परिचय करून दिला. मोलकरणीने चहा आणून दिला. चहापान झाल्यावर संगीता मला आतील एका प्रशस्त खोलीमध्ये घेऊन गेली. तिथे एका भल्या मोठ्या पलंगावर एक स्त्री झोपलेली होती. आम्ही तिथे पोहोचल्यावर झोपलेल्या स्त्रीसोबत असलेल्या बाईला संगीताने जेवण करायला जायला सांगितले. बाई निघून गेली. संगीताने जवळची एक खुर्ची उचलून झोपलेल्या स्त्रीच्याजवळ आणून ठेवली व मला बसायला सांगितलं.

” ही माझी बहीण श्वेता. तुमचा पेशंट,” समोरचा भव्य फोटो दाखवत चार वर्षापूर्वीचा हा आमचा फोटो. त्यात बघा कशी दिसायची आणि आता तिची ही अवस्था झाली आहे. तुम्ही हिला तपासा. बाबांच्या औषधाची वेळ झालेली आहे; मी पट्कन जाऊन येते,” असे म्हणत संगीता निघून गेली.
मी श्वेताकडे पाहिले. आजारपणामुळे ती कृश झाली असली तरी तिचं मूळ सौंदर्य लपून राहत नव्हतं. ती डोळे उघडे ठेवून झोपेतच असल्यासारखी दिसत होती. मी तिथे असल्याची तिला जाणीवच नव्हती. तिला जागवण्यासाठी मी ‘हॅलो’ अशी हाक दिली तेव्हा ती दचकून जागी झाली. तिला मी आपण डॉक्टर असून संगीताने मला इथे आणल्याचं सांगितलं. ती थोडीशी सावरली. मी तिचा बीपी, पल्सरेट चेक केला, डोळे थोडेसे उघडून चेक केले. स्टेथोस्कोप छातीला व पाठीला लावून तपासलं. नंतर तिला काही प्रश्न विचारले. तिने एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तिची नजर फक्त माझ्या दिशेला होती. जेमतेम वीस-बावीस वयातील तिची ही अवस्था बघून मलाही वाईट वाटलं. बाजूच्या टेबलावरील औषधांच्या बाटल्या, गोळ्यांच्या स्ट्रीप मी पाहिल्या. औषधांची नावं वेगळी असली तरी त्यातील कंटेंटवरून आतापर्यंत कोणती औषधं दिलेली आहेत हे मी नोट करून ठेवलं. एवढ्यात संगीता आली. तिने श्वेताला ‘काय हवंय ? नाश्ता केलास का?’ असं विचारलं . श्वेताने तिलाही उत्तर दिलं नाही. नंतर संगीता व मी हॉलमध्ये आलो. तिथे तिला मी श्वेताविषयीचे काही प्रश्न विचारले. त्यावरुन केस हिस्ट्री तयार केली. माझं प्रिस्क्रीप्शन लिहून दिलं. माझ्या बॅगेतील काही औषधं दिली. ती केव्हा व कशी द्यायची हे समजावून सांगितलं. घरात वृद्ध वडील वगळता कोणीही पुरुष नसल्याने तिच्यावरील इलाजाबाबत कोणाशी बोलावं, हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला.

काही वेळाने मोलकरीण जेवण घेऊन आली. संगीताने मला आग्रहाने जेवण वाढलं. जेवण झाल्यावर मी तिला पंधरा दिवसांनी श्वेतामधील बदल फोनवरुन मला कळवायला सांगितलं नंतर पुढची ट्रिटमेंट मी तुला व्हॉटस्अॅपवरुन पाठवीन असं  सांगितलं. संगीताने एन्व्हलपमध्ये दहा हजार रुपये घालून ते मला दिले व ही फी ठेवा तसेच पंधरा दिवसांनी श्वेतामधील सुधारणा तुम्हाला कळवते, गरज भासल्यास तुम्हाला न्यायला मी दिल्लीला येईन असंही ती म्हणाली. त्यावर तुम्ही दिल्लीला येण्याची गरज नाही मी काश्मीरपर्यंत येईन, पुढे मात्र तुमची गरज लागेल’ असं हसत मी तिला सांगितलं त्यावर तीही हसली. मी निघायच्या तयारीने बॅग उचलली. तिच्या आईवडिलांचा निरोप घेतला. एवढ्यात संगीताचा फोन वाजला. तिने फोन घेतला. फोनवरील बोलणं संपल्यावर संगीता विचारात पडलेली दिसली. मला काही समजेना.
“डॉक्टर माफ करा, आपल्याला एवढ्यात निघता येणार नाही. आत्ताच्या फोनवरुन समजलं की बॉर्डरवर थोडीशी चकमक झाली आहे.”

“बरं मग आता काय करायचं ? ” माझ्या छातीत धस्स झालं. “घाबरू नका, आता दोन वाजलेत. दोन तीन तासात सगळं पूर्ववत होईल. इथं अधून मधून हे असंच चालू असतं नंतर आपण निघू. तुमची शेवटची ट्रेन आठ वाजता आहे. ती तुम्हाला नक्की मिळेल. तोपर्यंत तुम्ही आमच्या गेस्टरुममध्ये आराम करा. गेस्टरुमच्या बाजूला स्विमिंग पूल आहे. त्याचाही तुम्ही वापर करु शकता” असे सांगत मला गेस्टरुममध्ये सोडून संगीता निघून गेली.
मी दरवाजा बंद करून घेतला शर्ट काढला. फॅन फुल स्पीडवर लावला व कॉटवर पडून राहिलो. थोड्याच वेळात मला झोप लागली. जाग आल्यावर घड्याळात पाहिले चार वाजले होते. अजून तास दीड तास वेळ होता. इतका वेळ काय करणार? असा मला प्रश्न पडला. मी बाजूचा दरवाजा उघडून पाहिला समोर छानसा स्विमिंग पूल दिसला. कामाच्या रगाड्यात बरेच दिवस पोहायला जायला मिळालं नव्हतं, ‘चला पोहायची हौस पुरी करून घेऊ’ असं मी ठरवलं. पुन्हा रुममध्ये आलो. पँट, बनियन काढून ठेवलं व बॅगेतील टॉवेल घेतला व स्विमींगपूलकडे आलो. रुमचा दरवाजा कदाचित बऱ्याच दिवसात वापरला नसल्यामुळे थोडा आवाज झाला. तेथील एका सोफा कम बेडवर टॉवेल ठेवला. स्विमींगपूलभोवती सहजच एक फेरी मारली व पाण्यात उडी मारली. आजुबाजूला नीरव शांतता असल्याने उडी मारल्याचा मोठा आवाज झालाच.

अर्धा तास मनसोक्त पोहून झाल्यावर मी पूलमधून बाहेर पडायचं ठरवलं. एवढ्यात मागच्या बाजूला पाण्यात काही पडल्याचा मोठा आवाज झाला. मी मागे वळून पाहिलं. पाण्यावर तरंगणारं काही दिसत नव्हतं. मी विरुद्ध दिशेला पोहत पाण्याखाली गेलो. तेथे श्वेता निपचित पडलेली दिसली. मी ताबडतोब तिला उचलून घेतलं व पूलमधून बाहेर पडलो. तिला सोफ्यावर ठेवलं. हिला पोहायला येत नाही असं संगीता म्हणाली होती ते मला आठवलं. मग ही इथे या अवस्थेत कशी? हा आत्महत्येचा प्रयत्न तर नाही ना असा मला प्रश्न पडला. कदाचित मला अशा उघड्या अवस्थेत पाहिल्याने तिच्या भावना अनावर झाल्या असतील. आपल्या नशिबात यातलं काहीच नाही, भविष्यातही आशा नाही असं तिला वाटलं असावं त्यातून आलेल्या नैराश्यामुळे तिने आत्महत्येचा प्रयत्न केला नसेल ना? हे व असे अनेक विचार माझ्या मनात आले. कारण सकाळी जेवणापूर्वी केस हिस्ट्रीसाठी संगीताला विचारलेल्या प्रश्नांच्यावेळी श्वेताच्या नवऱ्याचे दुसऱ्या एका स्त्रीशी संबंध असल्याचं तसंच श्वेता व तिचा नवरा यांच्यामध्ये संवाद नसल्याचं समजलं होतं.

श्वेताचा श्वासोच्छवास बंद झाला होता. म्हणून मी तिला पाठीवर झोपवलं, तिला ताबडतोब कृत्रिम श्वासोच्छवासाची गरज होती. मी डाव्या हाताने तिचं नाक दाबून धरलं. एक दीर्घ श्वास घेऊन माझ्या तोंडातून ती हवा श्वेताच्या तोंडात सोडली नंतर तिच्या छातीवर दोन्ही हाताने दाब दिला असं काहीवेळा केल्यावर श्वेताच्या नाकातोंडातून पाणी बाहेर पडलं व श्वेताचा नैसर्गिक श्वास चालू झाला. आता मला थोडे रिलॅक्स वाटलं.
त्याच अवस्थेत श्वेता डोळे उघडण्याची वाट बघत मी तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत होतो. काही क्षणात श्वेताने डोळे उघडले व माझ्याकडे पाहिले. नंतर आपण कोठे आहोत हे जाणून घेण्यासाठी तिने आजुबाजूला पाहिलं. तिला मानसिक आधार देण्यासाठी मी तिच्या डोक्यावरुन हळूवारपणे हात फिरवत राहिलो. पुन्हा तिचे डोळे बंद झाले. ही अशी का करते ? मला समजेना. काही वेळाने तिने डोळे उघडले. मला तिच्या नजरेत याचना दिसली. मी आश्वासक हसलो. त्या क्षणी श्वेताने मला घट्ट मिठी मारली व ती रडू लागली. काही वेळाने तिचं रडणं थांबलं; नंतर आपला डावा हात माझ्या कमरेभोवती ठेवून डोळे बंद करून ती आपला उजवा हात माझ्या सर्वांगावर फिरवू लागली. मी गोंधळून गेलो. हिला झिडकारुन निघून जावं असा एक विचार माझ्या मनात आला पण या क्षणाला मी हिला झिडकारलं तर ही पुन्हा कोणत्याही क्षणी आत्महत्येचा प्रयत्न करील अन् त्यात ती यशस्वी झाली तर तिच्या मृत्यूस नकळत मी कारणीभूत ठरेन. तिच्या मृत्यूप्रसंगी मी भारतात असल्यामुळे इथले लोक माझ्यावर दोषारोप करू शकणार नाहीत पण हे अपयश आयुष्यभर मला सतावणार शिवाय जाणून बुजून अपयश पदरी घेणं हे एक डॉक्टर म्हणून किंवा माणूस म्हणून केव्हाही योग्य नाही.

त्यावेळी मला मेडिकल कॉलेजच्या आमच्या निरोप समारंभाच्या वेळचे प्राचार्य डॉ. रंगनाथन यांचे शब्द आठवले ते म्हणाले होते, “तुम्ही पेशंटला तपासताना तो गोरा की काळा, पुरुष की स्त्री, गरीब की श्रीमंत, मित्र की शत्रू या कशाचाही विचार न करता तो फक्त माझा पेशंट आहे, मीच त्याला बरा करणार त्यासाठी पूर्ण विचार करून औषध योजना करणार आणि त्याला वाचवणार हीच सदैव तुमची भावना असली पाहिजे आणि तशी ती असली तरच तुम्ही व्यवसायात तसेच जीवनातही निश्चित यशस्वी व्हाल ”

अखेर मी निर्णयाप्रत आलो. श्वेताची मिठी हळूवारपणे सोडवली, डोकं वर करून देवाला नमस्कार केला आणि समोरच्या परिस्थितीला सामोरा गेलो. काही वेळाने श्वेतापासून अलग झालो. श्वेता उठून माझ्या पायाजवळ आली काही क्षण एक टक माझ्याकडे पहात राहिली नंतर तिने माझ्या पायाला हात लावून नमस्कार केला व आपल्या रुमच्या दिशेने निघून गेली.
मी उठून बाथरुममध्ये गेलो. आंघोळ केली व अंग पुसत आपल्या रुममध्ये येऊन ड्रेस घालून तयार झालो. एवढ्यात दरवाजावर नॉकींग केल्याचा आवाज झाला. मी दरवाजा उघडला बाहेर संगीता उभी होती. “बॉर्डरवरील परिस्थिती नॉर्मल झाल्याचा मला आताच फोन आला, ” संगीता.
“ओ. के. आता आपण लगेच निघू म्हणजे काळोख पडण्यापूर्वी तुम्ही मला सोडून घरी येऊ शकाल.” मी.
संगीताने स्कूटरवरुन मला काश्मीरमधील मूळ जागी आणून सोडलं. पुन्हा पुन्हा आभार मानून तिने माझा निरोप घेतला. मीही लगेच रेल्वे स्टेशन गाठलं व तेथून दिल्लीला पोहोचलो.
दुसऱ्या दिवशी माझी प्रवासी बॅग उघडून आतील संपलेल्या औषधांच्या जागी नवीन औषधं भरून ठेवताना मला बॅगेत एक सोन्याची चीप आढळली. ही चीप बॅगेत कुठून व कशी आली? हेच मला समजेना. काश्मीरला मित्राकडून बाहेर पडण्यापूर्वी मी बॅग चेक केली होती. तेव्हा त्यात चीप नव्हती. पाकिस्तानातून बाहेर पडताना बॅग चेक करायची राहून गेली कारण नाही म्हटलं तरी कधी एकदा पाकिस्तानातून भारतात पोहोचतो असं मला झालं होतं. पुन्हा चकमक झाली तर पाकिस्तानात अडकून पडायला नको. त्या गडबडीत बॅग चेक करायची राहिली. संगीताच्या घरीच हा गोंधळ झाला असावा हे मी ओळखलं. खात्री करण्यासाठी संगीताला फोन लावला. फोन लागेना पाकिस्तानात जाणं मला तरी शक्य नव्हतं. पंधरा दिवसांनी तिचा फोन येईल त्यावेळी पाहता येईल, असा विचार करून मी ती चीप कपाटातील लॉकरमध्ये ठेवून दिली.
बेल मारुन मी नर्सला बोलावलं ” वॉर्ड नंबर १६, कॉट नं. ४ वरील पेशंटच्या सोबत त्याची मावशी आहे तिला ‘माझ्या केबीनमध्ये घेऊन ये” असं सांगितलं. थोड्याच वेळात नर्ससोबत पेशंटची मावशी माझ्या केबीनमध्ये आली. मी तिला खुणेनेच बसायला सांगितले. ती बसली. नर्स निघून गेली.

“तुमचं नाव संगीता तर नाही ना ?”

“हो, पण तुम्हाला कसं माहीत ?”
” यापूर्वी आपण भेटलो आहोत. आठवतं?
” सॉरी हं, मला नाही आठवत ”
” कधी ?”
“पंचवीस वर्षापूर्वी. तुम्ही तुमची बहीण श्वेता हिच्या ट्रिटमेंटसाठी मला पाकिस्तानात घेऊन गेला होता.”

‘आपण सायकियाट्रीस्ट डॉ. श्रीनिवास तर नाही ना?”
” हो, बरोबर ओळखलंत’
” तुमच्या दाढीमुळे मी तुम्हाला ओळखू शकले नाही. सॉरी हं. ”

” त्यावेळी तुम्ही पंधरा दिवसांनी तुमच्या बहिणीच्या प्रकृतीबाबत कळविते असं म्हणाला होतात पण कळवलंच नाहीत. मी बऱ्याच वेळा फोन केला पण तुमचा फोनच लागेना.. बरं असो. तुमची बहीण कशी आहे आता ? ”
‘तुमच्या ट्रीटमेंटमुळे ती अगदी नॉर्मल झाली इतकी की ती मानसिक आजाराने त्रस्त होती हे सांगून कोणाला खरंही वाटणार नाही पण दोनच वर्षापूर्वी डेंग्यूच्या आजाराने वारली बिचारी ”
“सो सॉरी.. बरं मी तुमच्या माहेरी आलो होतो त्यावेळी तुमची एक वस्तू चुकून माझ्या बॅगेत आली ती मी जपून ठेवली आहे. बिपीनला डिस्चार्ज मिळाल्यावर इथून जाताना आठवणीने घेऊन जा.
“नको राहू दे, ती सोन्याची चीपच ना ?”
” हो. ”
“ती चीप तुमच्या नकळत मीच तुमच्या बॅगेत ठेवली होती. “
“पण का? कशासाठी ?”
” तुम्ही माझ्या बहिणीला जीवदान दिलंत त्याची किंमत नव्हे पण त्यातून थोडीतरी उतराई होण्यासाठी मी ते केलं. ”
” पण माझ्या नुसत्या एका तपासणीवरुन तुमची बहीण बरी होणार असं तुम्ही कशावरुन ठरविलंत ?”

” तुमची ट्रीटमेंट मी प्रत्यक्ष पाहिली. ट्रीटमेंटचा परिणाम पॉझिटीव्ह येणार की निगेटीव्ह हे श्वेताच्या नशिबावर अवलंबून होतं. तुमच्या ऋणातून अल्पांशाने का होईना उतराई होण्याची हीच वेळ आहे असं मला वाटलं. कारण यानंतर तुम्हाला मी किंवा श्वेताने कधीच भेटायचे नाही हे मी ठरविलेलं होतं. तुम्ही बिपीनला पाहिलं ना? तो तिचाच मुलगा आहे. तो तुम्हाला कसा वाटला ?”
हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. आता बिपीन माझ्यासारखाच का दिसतो याचा मला उलगडा झाला. त्याचबरोबर हिला त्यावेळचं सगळं समजलेलं आहे याचीही मला कल्पना आली. काही वेळ दोघंही नि:शब्द झालो.

 “तुम्ही ते सर्व प्लॅन केलेलं होतं तर…. का केलंत तुम्ही हे सर्व ?
“श्वेता माझी बहीण. गर्भश्रीमंत घराण्यामध्ये मागणी घालून तिचं लग्न झालं. घरात सर्व सुखसोई, नोकरचाकर, प्रेमळ सासुसासरे, नवरा सागर दिसायला सुंदर, एकुलता एक त्यामुळे नणंद नाही, जाऊ नाही. अगदी राजाराणीचा संसार. असं घर मिळाल्यामुळे ती, आमचे आईवडील, मी सर्व खूष होतो.”

अनेक स्वप्नं उराशी बाळगून श्वेताने घरचा उंबरठा ओलांडला. घरच्या एका पाहुणीने रात्री श्वेताला सजवून बेडरुममध्ये आणून सोडलं. काही वेळाने सागरने बेडरुममध्ये प्रवेश केला. पहिल्याने टॉवरबोल्ट लावून दरवाजा बंद केला. मीलनाचा क्षण जवळ आल्याचं पाहून श्वेताच्या हृदयाची धडधड वाढली. सागर पलंगाजवळ आला व म्हणाला, ‘हे बघ, माझं एका मुलीवर प्रेम आहे. तिच्याशिवाय मी जगू शकत नाही. केवळ आई-बाबांच्या समाधानासाठी मी हे लग्न केलं आहे. तू हे कोणालाही सांगू नकोस व माझ्याकडून कसल्याही अपेक्षा ठेवू नकोस.’ असे म्हणत तो पलंगावर पांघरुण घेऊन झोपी गेला हे ऐकून बिचारीच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. सारी रात्र तिने जागून काढली.
सागरच्या वागण्यात कधीतरी सुधारणा होईल या आशेवर ती जगत राहिली, तिने खूप सहन केलं. मला किंवा आईला तिने वर्षभर कशाचीही कल्पना दिली नाही. तिला हळुहळू समजलं की सागरचं एका कमी जातीच्या मुलीशी प्रेमप्रकरण चालू होतं. हे जेव्हा त्याच्या वडिलांच्या कानावर आलं तेव्हा वडिलांनी त्याला तंबी दिली की जर तू त्या मुलीशी लग्न केलंस तर तुला इस्टेटीतील कपर्दिकही मिळणार नाही तेव्हा काही दिवस सागर शिस्तीत वागला. वडिलांना श्वेताचं स्थळ समजलं. त्यांनी मागणी घालून हौसेने लग्न लावून दिलं.

लग्नानंतरही सागरचे त्या मुलीशी संबंध चालूच असल्याचं श्वेताला समजल्याने ती खंगत गेली. दोन वेळा तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला पण वाचली. तिची परिस्थिती पाहून सासऱ्यांनी सागरला खडसावलं, ‘तुझं तुझ्या बायकोकडे अजिबात लक्ष नाही. तिच्या हौसमौजेचा तू कधीही विचार करत नाहीत. तिला कधी फिरायला नेत नाहीस. तिची काय अवस्था झाली आहे तुला दिसत नाही का ? तिला हवा पालट म्हणून तिच्या माहेरी घेऊन जा. तूही चार दिवस तिथे रहा. नंतर महिनाभर तिला तिथे राहूदे’ असं फर्मानच त्यांनी काढलं. निमूटपणे सागर श्वेताला घेऊन आला. चार दिवस राहिला व पाचव्या दिवशी निघून गेला.

नवऱ्याने अवहेलना केली म्हणून पत्नीने जीवन संपवावं हे कितपत योग्य आहे? माझ्या बहिणीचा कोणताही दोष नसताना तिचा बळी जाता नये यासाठी आपणच काहीतरी केलं पाहिजे असं मी ठरवलं. मानसशास्त्राची पदवीधर असल्याने जेव्हा अनेक डॉक्टरांच्या ट्रीटमेंटचा श्वेतावर परिणाम होईना तेव्हा मी ओळखलं हिचा आजार केवळ औषधाने बरा होणारा नाही. ऐन तारुण्यात वैवाहिक सुख न मिळाल्याने तिची उपासमार झाली आहे त्यामुळे ती मनोरुग्ण झाली आहे. एखाद्या सहृदयी डॉक्टराने हिची दयनीय अवस्था ओळखून योग्य ट्रीटमेंट दिली तर ही बरी होऊ शकेल. या निर्णयाप्रत मी आले.

चार दिवसांनी सागर परत गेला. पाचव्या दिवशी योगायोगाने तुमची माझी रेल्वेत भेट झाली. खरं तर त्या दिवशी मी माझ्या एक मैत्रिणीच्या लग्नासाठी दिल्लीला आले होते. माझी दुसरी एक मैत्रीण नीता दिल्लीतच राहते. मी नीताला फोन करून पहिल्याने तुझ्या घरी येते नंतर आपण लग्नाला जाऊ व लग्नानंतर मी लगेच परत निघणार असं कळवलं होतं.  त्या दिवशी पहाटे लवकर उठून सकाळी नऊ वाजता मी दिल्लीत पोहोचले. नीताच्या नवऱ्याचा मेडीकल स्टोअर आहे. चहापान झाल्यावर मी त्यांना इथे नामांकित असे मानसोपचार तज्ञ कोण आहेत असं विचारलं. त्यांच्याकडून तुमचं नाव समजलं तेव्हा मी तुम्हाला भेटायचं ठरविलं. ते म्हणाले, ‘डॉक्टर फार बिझी असतात, अकरा वाजेपर्यंत बहुधा क्लिनिकमध्ये असतात, नंतर व्हिजीटला जातात. लग्न दुपारी दोन वाजता असल्याने मी नीताच्या जावेच्या मुलीला सोबत घेऊन निघाले. तुमच्या क्लिनिकमध्ये पोहोचले. तिथे रिसेप्शनिस्टकडून तुम्ही व्हिजीटला गेल्याचं समजलं. मी नर्व्हस झाले. तिथे तुमचा मुख्यमंत्र्यासोबतचा भव्य फोटो पाहिला. त्याचमुळे संध्याकाळी मी काश्मीरला परत जाताना तुम्हाला ट्रेनमध्ये ओळखलं व तुमच्या शेजारी येऊन बसले. थोड्या वेळाने धोतरवाल्या गृहस्थाच्या संवादावरुन तुम्ही तेच डॉक्टर असल्याची खात्री पटली. त्याच क्षणी कसं कोण जाणे? पण मला वाटलं हीच व्यक्ती माझा प्रयोग यशस्वी करु शकेल.

आपण पाकिस्तानात गेलो, तुम्ही श्वेताला तपासलं. मी तुम्हाला गेस्टरुममध्ये सोडलं. श्वेता व मी जेवण घेतलं नंतर दोघंही श्वेताच्या रुममध्ये आलो. श्वेता झोपली. मी तिच्या बाजूला मॅगझीन वाचत बसले. नेहमीप्रमाणे चार वाजता श्वेता उठली व टॉवेल घेऊन बाथरुममध्ये गेली. यावेळेला रोजच ती आंघोळ करायला जायची. मी उठून माडीवरील खोलीत जाऊन बसले. तिथल्या स्विमींग पूलच्या दिशेच्या खिडकीची काच थोडीशी सरकवून माझ्या प्रयोगाच्या निरीक्षणाला सुरुवात केली. काही वेळाने तुमच्या रुमचा स्विमींगपूलच्या बाजूला उघडणारा दरवाजा उघडल्याचा आवाज झाला. तुम्ही बाहेर येऊन चहुबाजूला पाहिलंत. पुन्हा रुममध्ये गेलात पुन्हा पुलकडे येताना तुमच्या अंगावर फक्त अंडरवेअर व हातात टॉवेल होता. टॉवेल तिथल्या सोफ्यावर ठेवून तुम्ही पुलभोवती फेरी मारली व पाण्यात सूर मारुन पोहायला सुरुवात केली. काही वेळाने श्वेता धावत तुमच्या दिशेने जाताना दिसली. मला आशेचे किरण दिसू लागले. एवढ्यात श्वेता पाण्यात पडली, मी घाबरले. क्षणभर माझा प्रयोग फसल्यासारखे मला वाटले. तुम्ही श्वेताला उचलून पाण्यातून बाहेर आलात… तिला सोफ्यावर ठेवलं.. तिला शुद्धीवर आणलंत.. श्वेताने तुम्हाला मिठी मारली.. काही वेळाने आकाशाच्या दिशेने पहात तुम्ही देवाला नमस्कार केलात.. त्याच वेळी माडीवर मीही देवाला नमस्कार करून देवा माझा प्रयोग यशस्वी होऊ दे, अशी प्रार्थना केली. पुढचं सर्व तुम्हाला माहीत आहेच.
तुमच्यात व श्वेतामध्ये काही भावनिक बंध निर्माण होऊ नयेत म्हणून मी मोबाईलमधील सीमकार्ड बदललं, तुमची पुन्हा भेटच होऊ नये यासाठीच मी तुम्हाला माहेरी पाकिस्तानात घेऊन गेले होते. कारण पेशंटची चौकशी करण्यासाठी तुम्ही पाकिस्तानात नक्कीच येणार नाहीत याची मला खात्री होती.
तुम्ही पाकिस्तानात यायला नकार दिलात तर मी श्वेताला काश्मीरमधील माझ्या घरी आणून तुमची ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं होतं. पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून पाकिस्तानात आलात त्यामुळे तो प्रश्न मिटला. तुमच्या ट्रीटमेंटमुळे श्वेतामध्ये सुधारणा होत गेली ती गरोदर राहिली. बिपीनचा जन्म झाला. सासरची, माहेरची माणसं खूष झाली. श्वेता मुलात रमली. दैव कसं असतं बघा! तिकडे सागरच्या प्रेयसीला तेव्हा व नंतर कधीच मूल झालं नाही. सागर काहीच बोलला नाही. तो जर काही बोलला असता तर वडिलांनी त्याला घराबाहेर काढायला कमी केलं नसतं.

बिपीनच्या जन्माचं रहस्य आपल्याशिवाय कोणालाच माहीत नाही अशा भ्रमात श्वेता होती. माहेरी आल्यावर ती मला नेहमी म्हणायची, ‘ज्या डॉक्टरांच्या उपचाराने मी बरी झाले त्यांना मला भेटायचं आहे पण प्रत्येक वेळी मी वेळ मारुन न्यायची. बिपीनच्या दहाव्या वाढदिवसावेळी पुन्हा तिने खूपच अजीजी केली. तेव्हा ‘डॉक्टरना भेटावंसं किंवा नुसतं पहावसं का वाटतं ? ते मला माहीत आहे, कारण त्यांनी तुला दिलेली ट्रीटमेंट मी माडीवरच्या खिडकीतून स्वत: पाहिली आहे आणि तशी ती परिस्थिती मीच घडवून आणली होती तो माझाच प्रयोग होता,’ असं  सांगितलं.
तू नेहमी झोपून उठल्यावर आंघोळीस जातेस हे मला ठाऊक होतं. साधारण त्याचवेळेस डॉक्टर पोहायला येतील हा माझा अंदाज होता आणि तो खरा ठरला. तेव्हा तिने मला मिठी मारली व त्यावेळच्या आपल्या मनस्थितीचं वर्णन केलं. ‘मी बाथरुममध्ये आंघोळ करीत होते. एवढ्यात स्विमींगपूलच्या बाजूला दरवाजा करकरत उघडल्यासारखा आवाज झाला. म्हणून मी खिडकीची काच थोडीशी सरकवून पाहिलं तेव्हा मला स्विमींगपूलभोवती फिरणारा तरुण दिसला त्याच्या अंगावर फक्त घट्ट अंडरवेअर होती. इतक्या कमी कपड्यातील तरुण, बलदंड – पिळदार, सुंदर पुरुष देह मी कधीच पाहिला नव्हता नंतर त्याने पाण्यात सूर मारुन पोहायला सुरुवात केली. बराच वेळ मी ते दृश्य पहातच राहिले हे सत्य की स्वप्न हेच मला समजेना. मी बाथरुममधून केव्हा बाहेर पडले, मागचा दरवाजा उघडून त्या पुरुषाच्या दिशेने धावत सुटले. माझं मलाच समजेना. वाटेत स्विमींग पूलचा पाण्याने भरलेला भाग आहे या कशाचंच मला भान नव्हतं. त्यामुळे मी पाण्यात पडले व बेशुद्ध झाले.. . शुद्धीवर आल्यावर मी त्या तरुणाला पाहिलं, एक शेवटचा प्रयत्न म्हणून मी त्याला मिठी मारली. तरुणाच्या जादुई स्पर्शामुळे मी माझी राहिले नव्हते. ते स्वप्नवत सुखद क्षण कायमचं स्मरणात ठेवण्यासाठी मी डोळे मिटून घेतले. शेवटी देहाची मागणी देहाने ओळखली व त्या तरुणाने म्हणजेच डॉक्टरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ते सुखद क्षण आजही मला जगण्याची प्रेरणा देतात. तुझे उपकार मी आयुष्यात कधीच विसरणार नाही” असं म्हणून तिने मला मिठी मारुन रडायला सुरुवात केली. मी तिची पाठ थोपटून समजूत काढली. शेवटच्या आजारपणातसुद्धा ती तुमची आठवण काढत होती. न रहावून मलासुद्धा तुम्हा दोघांची भेट घडवून द्यावी असं वाटलं पण नंतर विचार केला,

यातून काय साधलं जाणार ? मधल्या काळात तुमचं लग्नही झालेलं असणार त्यामुळे या भेटीमुळे तुमच्या संसारात वादंग निर्माण व्हायला नको म्हणून मी तुमची भेट टाळली. आज अचानक तुमची भेट झाली आणि ओघाओघात मी सर्व सांगून गेले अन्यथा हे रहस्य कोणालाही कधीच कळलं नसतं.
तुमच्यासारख्या सहृदय माणसाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शत्रुदेशामध्ये येऊन योग्य ते उपचार केले, त्यामुळेच ती इतकी वर्षे जगली. तुम्ही येऊन गेलात त्याच्या दुसऱ्या दिवशी मोलकरणीला श्वेताच्या गादीखाली एक कागद व काही सुट्या गोळ्या मिळाल्या. तिने त्या माझ्याकडे आणून दिल्या. त्या आठही झोपेच्या गोळ्या होत्या. म्हणजेच रोज रात्री तिला दिलेल्या झोपेच्या गोळ्या आम्हाला घेतल्यासारखं दाखवून तिने लपवून ठेवलेल्या होत्या. त्या चिठ्ठीवर लिहिलेलं होतं,  ‘मी श्वेता, माझ्या आजारपणाला कंटाळून स्वेच्छेने माझे जीवन संपवीत आहे. माझ्या मृत्यूस माझ्या माहेरच्या, सासरच्या किंवा अन्य कोणासही जबाबदार धरण्यात येऊ नये.’ खाली श्वेताची सही होती. म्हणजेच श्वेता आत्महत्येच्या तयारीत होती पण तुमच्या उपचारामुळे तिच्या जीवनात आशा निर्माण झाली त्यामुळे तिने आत्महत्या केली नसावी. सुसाईड नोटसुद्धा ती विसरली असावी. मीही तिला त्याबाबत काही विचारलं नाही. गोळ्या फेकून दिल्या व सुसाईड नोट फाडून टाकली. तुमच्यामुळे श्वेता इतकी वर्षे जगली. त्यामुळे आमच्यावर तुमचे अनंत उपकार आहेत. श्वेताचं जिवंत मरणं मला पहावेना म्हणून मी हे सारं केलं. यात माझं काय चुकलं ? किती चुकलं ? हे मला माहीत नाही. प्लीज मला माफ करा,” असे म्हणत संगीता रडू लागली.

सगळे ऐकून मीसुद्धा चक्रावून गेलो. आता हिला काय म्हणावं ? हेच मला समजेना. मी डोक्यावर हात घेऊन बसलो. काही क्षण असेच शांततेत गेले. एवढ्यात दरवाज्यावर नॉकींग केल्याचा आवाज आला. आम्ही दरवाजाकडे पाहिले. डॉ. स्मिताने केबीनमध्ये प्रवेश केला. “सॉरी हं. मी गाडीची चावी न्यायला आले होते. तुमचं बोलणं चालू होतं. सगळं बोलणं मी बाहेरुन ऐकलं. माझा नाईलाज होता, कारण तुमच्या बोलण्याचा विषय माझ्या नवऱ्याच्या आमच्या लग्नापूर्वीच्या आयुष्यातील होता त्यामुळे तो जाणून घेणं मला भाग पडलं. मी अचानक आल्यामुळे तुमचा गोंधळ उडालेला दिसतो, हिने जर सगळं ऐकलं असेल तर ही आता कशी रिअ‍ॅक्ट होते ? हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल हो ना ? मग ऐका. संगीता, तू जे केलं ते केवळ बहिणीच्या

प्रेमापोटी. ती कसंही करून जगली पाहिजे या एकाच उद्देशाने तू ते केलंस त्यात तुझा वैयक्तिक असा कोणताही स्वार्थ नव्हता. त्यामुळे तुझी चूक माफ करण्यायोग्य आहे. श्री, तू एक डॉक्टर आहेस, श्वेताच्या केस हिस्ट्रीवरुन श्वेता जगली पाहिजे तर हाच एकमेव शेवटचा उपचार आहे हे तू निश्चित केलंस व उपचार दिलास. त्याला योग्य प्रतिसाद म्हणून श्वेताच्या वागण्यात लक्षणीय बदल होत गेले, पुढे ती गरोदर राहिली. बिपीनचा जन्म झाला. मागचं दुःख श्वेता पूर्णपणे विसरली व पुढे वीस-बावीस वर्षे जगली म्हणजे तुझा उपचार योग्य होता हे सिद्ध झालं. केवळ पेशंटचा जीव वाचावा यासाठी तू सर्वस्व पणाला लावलंस. आपली कृती ही म्हटलं तर एक प्रकारचा गुन्हा आहे. शत्रुदेशामध्ये या गुन्ह्याला मृत्यूदंडाची शिक्षाही होऊ शकते याची देखील तू पर्वा केली नाहीस. खरंच तू ग्रेट आहेस, आय एम प्राऊड ऑफ यू” काही वेळ शांतता.
“ स्मिता, ही गोष्ट मी तुझ्यापासून इतकी वर्षे लवपून ठेवली असं तुला नाही वाटलं? तसंच माझा तिरस्कार करावा असंही नाही वाटलं तुला ?”
” मुळीच नाही. तू म्हणतोस ते बरोबर आहे. दुसऱ्या एखाद्या स्त्रीला तसंच वाटलं असतं. पण मला नाही वाटलं तसं, कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू जे केलंस तो वैद्यक शास्त्रातील उपचार नसेल पण ‘माणूसकीचा उपचार’ मात्र नक्कीच आहे. तुझी कृती हे एक प्रकारचं दान होतं असं मी समजते. दान हे फक्त दयेपोटी किंवा गरजेपोटी केलं जातं यामध्ये कोणताही स्वार्थ नसतो. कोणतीही अपेक्षा नसते. आपण केलेलं दान आपण विसरुनही जातो. कोणाला त्याबद्दल सांगतही नाही कारण केलेलं दान दुसऱ्याला सांगणं यामध्ये प्रसिद्धी मिळविणे हा स्वार्थ असतो व त्यामुळे दानाचं महत्त्वच रहात नाही. मला खात्री आहे हे तू मला नाही सांगितलंस तसंच इतर कुणालाही सांगितलं नसशील.”
” हो खरंच मी ते विसरुनच गेलो होतो.”

तुला मी म्हटलं नव्हतं तो माझाच मुलगा आहे असं कोणालाही वाटेल. पटलं ना तुला ? खरोखरच आपल्याला वारसच मिळालाय असंच वाटतंय मला, तसंच मी न मागता मला हवं ते बक्षीस तुझ्याकडून मिळालंय असंच मी समजते. असा विचार स्मिताच्या मनात आला.

” संगीता, बिपीनला कार्डिओलॉजिस्ट व्हायचंय ना ? इथे दिल्लीत त्याची राहण्याची व शिक्षणाची जबाबदारी आमची. चालेल का तुम्हाला ?” स्मिता.
ऐकताच संगीताने स्मिताला मिठीच मारली. बिपीन पुढील शिक्षणासाठी आमच्या घरी येण्यापूर्वी आमच्या लग्नातील फोटोंचा अल्बम त्याच्या नजरेआड करणं गरजेचं आहे. हो नाहीतर, मला व श्रीला जो प्रश्न पडला तोच प्रश्न बिपीनला देखील पडायचा! हा विचार स्मिताच्या मनात आला.
@@@
– ©️ मोतीराम टोपले 
8237584745
9422045950
topleprasad@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आजची कविता 

प्रदीप अधिकारी

उतरते ऊन

कंटाळवाणी आळशी दुपार
आस्तेच कुस बदलते,
वळचणीला अवघडून
बसलेली सावली, खाली
तापलेल्या फरशीवर उतरते…!

वामकुक्षी आटोपून,
देऊळही आळस झटकते,
गाभाऱ्यात पेंगुळलेली समई
घंटानादाने पटकन् डोळे उघडते…!

देवळाच्या दारात,
बसलेली फुलवाली
मरगळलेल्या फुलांवर
पुन्हा एकदा पाणी मारते…!

काठी टेकीत टेकीत,
देवळातून फेरी मारणाऱ्या
आजोबांचा हात धरून
ऊनही मग पायरी पायरीने
खाली उतरते….!

[ सौजन्य गुगल ]

– ©️ प्रदीप अधिकारी

9820451442
adhikaripradeep14@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
निसर्ग ‘एक वादळ’

दीपक पारखी

चिपळूण गुहागर रस्त्यावर एक प्रवेशद्वारी कमान असलेलं गाव. कधी तरी डांबरीकरण केलेला पण आता पुरेसा लक्ष न दिलेला रस्ता. राममंदिराकडं जाणारा रस्ता, उजवीकडे सोडून वळलं की एक बैठं घर. सारवलेल्या अंगणात एक म्हातारा वाटणारा पण काय-वाचा-मने  तरुण असलेला, सतत घायकुतीला आलेला घाऱ्या डोळ्यांचा तो उघडं आकाश पाहतोय. गेल्या पंधरा वर्षात कष्टांनी फुलवलेली बाग नजरेनं स्पर्श करत कुरवाळतो. आंब्याची कलमं, फणस, अंतराळाशी स्पर्धा करणारे माड आणि पोफळी.

अंगणात फार वेळ उभं राहवत नाही. आपल्या बैठ्या घरात परत येतो. चालूच असलेला टीव्ही आणि आरामखुर्ची जवळ करतो. बातम्या चालू. परत खिडकीतून बाहेर डोकावतो. अननस, पपई आणि फुललेली कोरांटी. मुलगा कद नेसून पूजेच्या तयारीत. सून त्याच्या ओंजळीत हळुवार फुलं  सोडते. आमटीला फोडणी टाकत आतून बायकोचा आवाज येतो,’ अहो,अंघोळ करून घेताय ना ?’

अंघोळीचा एरवी त्याला खूप कंटाळा. परंतु आज मनाची अस्वस्थता लपविण्यासाठी स्वतःच्याच शरीराची ओळख करून घेत तो अंघोळ झाल्यावर टॉवेल लावून बाहेर येतो. करडे केस विंचरायचे तसेच ठेऊन पुन्हा एकदा टीव्हीपुढं बसतो. थोड्या वेळानं मुलाला जोरात पुकारतो, ‘ ब्रेकिंग न्यूज बघ..निसर्ग आपल्यापर्यंत यायला दोन तास उरलेत.’

मुलगा प्रतिसाद देत नाही. छोटी नात धावत येऊन मांडीवर बसायचा प्रयत्न करतीय. तो तिला झिडकारत नाही पण नेहमीच्या उत्साहानं मांडी रुंदही करत नाही. ही आपली वंशावळ. पुन्हा बाहेर पाहतो आणि पुटपुटतो ही माझी अपत्यं. झावळ्या कसनुसं हसून त्याच्या भावनांना मान देतात.

दुपारचे दोन वाजलेत. अजुनी त्याला जेवावंसं वाटत नाही. सकाळी मऊ भात जेवला होता की नाही आठवत नाही. सोसाट्याचं वारं सुटतय, पालापाचोळा उडतोय, धुळीचे अर्धवट लोट  नजर धूसर करतायत. उघडी खिडकी त्याला सांगतीय असं काहीच होत नाहीय. वारं अजुनी पडलेलंच . त्याच्या मनातील वादळ चक्राकार फिरत असतं .

अंगणात  खेळणारी नात तो हातानी ओढून घरात आणतो. घरातील सगळे घरातच आहेत याची खात्री पटवतो. आत येतो. लाईट चालू आहेत का बघतो. मनाशी विषादानं हसतो. टीव्ही चालू असताना दिवे लागतायत का हे बघणारे त्याचे डोळे तेजाला विसरून म्लान होतायत.

पडलेलं वारं उभारी घेत मनाशी पाहिलेलं चित्र प्रत्यक्षात जाणवायला लागतं. इकडं टीव्हीचा मोठा केलेला आवाज आणि वेगवान वाऱ्याचा घोंघावा. अर्ध्या तासात मुसळधार सरी बरसू लागतात. तो नातीला घट्ट मिठी मारतो. खरं म्हणजे समोर वावरणाऱ्या बायकोला भयाकूल अवस्थेत मिठीत घ्यायची त्याला इच्छा असते. पण सून,मुलगा..आणि हो बायकोही. संकोच एके संकोच. एरवी वयानुसार कमी झालेली श्रवणेंद्रिय तरारून बाहेरचा वेध घेतात. कुठेतरी विजेचा कडकडाट, झाडाची एखादी फांदी तटतटण्याचा भेसूर आवाज.टीव्ही, आरामखुर्ची, खिडकीची फट आणि नातीचं निरागस वावरणं.

दोन अडीच तास त्याला गोठवून टाकणाऱ्या अवस्थेतून थांबलेलं वारं आणि रोडावलेली पावसाची झड. वळचणीतून ठिबकणारं पाणी पुन्हा किंचित लठ्ठ होताना दिसतं. बाहेर खूप अंधारच. तो छत्री घेतो..अंधाराला वाट दाखविण्यासाठी बॅटरी घेतो. विलक्षण ओढ लागल्यासारखा दार किलकिलं करतो. आकाशाचा विसर पाडत  नारळी पोफळीकडं धावतो. सगळी बाग पडेल चेहऱ्यानं उभी. त्यांचं असं उभं राहणं देखील त्याच्यात त्राण आणतं. कलमं उभी, नारळीपोफळी उभी, फणस किंचित दुखावल्यासारखा, जांभूळ धाय मोकलून रडण्याच्या बेताला  आलेला. पानांचा खच. आपल्या बागेच्या सीमा धुंडाळून तो शांत होतो. आपण खूपच वाईट चित्र पाहत होतो. हुश्श करत तो अधिक बारकाईनं बागेकडे पाहतो. काही झाडं  पिळवटलेली तर काही झाडांनी आपली कच्चीबच्ची अपत्य जमिनीवर सांडलेली.

आता तो स्वतःच्या भानातून बाहेर येतो. या गावामध्ये आपण प्रस्थ आहोत याचा सूक्ष्म अभिमान बाळगत तो गावाच्या कमानीपर्यंत जायचं ठरवतो. रस्ताभर झाड उन्मळून पडलेली. तो तिथं पोचायच्या आतच त्याचा मुलगा आणि त्याचे क्रिकेटमेट  रस्ते साफ करताना दिसतात.

रात्र  झालीय. निसर्ग वादळाने आपलं फार नुकसान नाही केलं म्हणत राममंदिराच्या दिशेनं कृतज्ञतेने नमस्कार करतो. मनात, ओठात, रंध्रारंध्रात कल्याण करी रामराया गुंजायला लागतं. घरात येऊन तो पुन्हा टीव्हीपुढं बसतो. ब्रेकिंग न्यूज चालू. गुहागर, आंजर्ले, केळशी, दिवेआगर, मुरुड, अलिबाग.. कोरोना वाहिन्या दुसऱ्या आणि दुखऱ्या तोंडानी वादळाची माहिती देतायत. त्याचं  वाईट वाटणं गावाच्या कमानीतून बाहेर पडून विश्वव्यापी होतं .
दोन दिवस झालेत आपण केवळ टीव्हीवरच्या बातम्याच ऐकायच्या ? नुसतं खंतावणं हा त्याचा स्वभाव नाही. किनारपट्टीला राहणारे त्याचे सगळे भाऊबंद कसे असतील.. तो फोन करत  बसतो. क्वचित एखाद्या ठिकाणाहून प्रतिसाद येतो. परंतु तो इतका क्षीण असतो की त्याला तो ऐकू येत नाही आणि ऐकवत देखील नाही.

काही तरी सुचून तो पुण्याला फोन लावतो. ‘हॅलो,विनायकराव  …’ फोन संपतो. तो जोरात बायकोच्या नावानं हाक मारत सुटतो. या हाका नेहमीच्या नाहीत हे भान तिला येतं. हातातला पिळा तसाच ठेऊन ती येते. खूप तासांनी त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं. ‘ अग, विनायकरावांनी एक लाख रुपये द्यायचं कबूल केलंय. मी फक्त शब्द टाकला आणि तो पूर्ण व्हायच्या आतच … ‘ त्याला पुढचं बोलवत नाही.

गेली दहा वर्षे आपला नवरा मंदिर जीर्णोद्धारासाठी पैसे गोळा करतोय पण आता त्यांनी विनायकराव  यांच्यासारख्या व्यावसायिकाकडं शब्द टाकलाय तो कशासाठी हे तिला विचारायची गरज पडली नाही. विजेचं येणंजाणं आणि त्याचं  आतबाहेर करणं यातून नवऱ्याच्या मनात काय दाटून येताय हे तिला पस्तीस वर्षांच्या सहवासात पाठ झालं होतं .

आवंढा गिळत दुसरा फोन फिरवतो. ‘ हॅलो,प्रकाश, मी जे सांगतोय ते ऐक. दहा किलो कणिक, दोन किलो तांदूळ, एक किलो गोडं तेल, एक किलो डाळीचं पीठ, काड्यापेटी आणि मेणबत्ती बॉक्स अशी किट्स तयार करायचीत. त्याची संख्या मी नंतर सांगीन.’

थोड्या वेळानं त्याचा फोन वाजतो. .. मी वेळणेश्वरहून बोलतोय. वीज नाही त्यामुळं पंप चालू नाहीत. त्यामुळं विहिरीतल्या पाण्याचा उपसा करता येत नाही. डिझेलवर चालणार पंप बघा. आणि पिण्याचं पाणी देखील. विहिरीतलं पाणी पालापाचोळा आणि धुळीनं काळं  पडलंय. इतर मदतीइतकीच पिण्याच्या पाण्याची खूप गरज आहे आणि तीही आंजर्ले, केळशी आणि हर्णेला.’

या फोनमुळं घाऱ्या डोळ्यांना कामाची गरज, तातडी, क्षेत्र आणि प्राधान्यक्रम ठरवणं सोपं जातं. चिपळूण, शिराळं, रामपूर फोन खणखणतायत ..’ हॅलो, मी बोलतोय. आपल्याला .. ‘

दोन मोटारी तयार होतात. एकात दोनशे किट्स आणि पाचशे लिटर पिण्याचं पाणी आणि दुसऱ्यात तो, त्याची बायको. दोन्ही मोटारचालक कधी काळी अर्धी चड्डी, काळी  टोपी आणि तळहात आणि खांदा याना जोडणाऱ्या दंडाची पकड अजुनी न विसरलेले.

दोन्ही मोटारी आंजर्ल्याला पोचल्या. मी आयुष्यात कधीच रडलो नाही हे अभिमानानं सांगणारे घारे डोळे ओले होतात. सोबतची बायको आणि कार्यकर्ते यांना ते कळू द्यायचं नाहीं म्हणून उगाचच बोलण्याची असोशी सुरु होते.
नतमस्तक झालेले वीज आणि  टेलिफोन खांब, उन्मळून पडलेली माड, पोफळी आणि चक्राकार फिरून जमीनदोस्त झालेली कलमं, पत्रे उडालेली घरं, क्वचित निखळलेले भिंतीचे चिरे आणि आपणच लावलेली, वाढवलेली झाडं आपल्याच घरावर पडून झालेली मोडतोड.

लोक  जथ्यानी उभे. शरीरभर कारुण्य. तो येतो सगळं सामान उतरवतो आणि अचानक पाचसहा विशीतली पोरं  त्याला गराडा घालतात. एक खुर्ची मागवतात आणि म्हणतात, ‘ काका, तुम्ही बसा इथं . अजिबात उठायचं नाही. हे गाव आणि इथली माणसं  आम्ही चांगली ओळखतो. खरा गरजूच तुमच्यापाशी येईल हे आम्ही बघू. ‘

शंभर किट्स आणि मिळेल त्या भांड्यात ओतून घेतलेलं पिण्याचं पाणी यांचं वाटप लोकांचा कालवा चालू असताना होत होतं. समोरून एक मोटार येते. रडवेल्या चेहऱ्यानं गावाची माहेरवाशीण आणि जावई उतरतात. त्यांनी लोकांना द्यायला बरोबर काहीच आणलेलं नसतं. जावई डिकी उघडून दोन मोठ्या करवती बाहेर काढतात. त्याला फार कौतुक वाटतं. आता या करवती चालतील .. दोनचार दिवसात रस्ते मोकळे होतील, घरांची छपरं मोकळी होतील. आपण खाण्यापिण्याचे जिन्नस आणले पण असं काही कुणी सुचवलं नाही. एक बारीक कळ येतच राहते.

उरलेलं सामान घेऊन मोटारी हर्णेकडं निघतात. हीच परिस्थिती आणि हेच वाटप. आणलेली किट्स संपून जातात. मोटारी तोंड फिरवून गुहागरच्या दिशेनं जातात. रेंज मिळताच तो फोन करतो. ‘ विनायकराव, तुम्ही केलेल्या मदतीचं वाटप करून आलोय. याचं श्रेय गावकरी मला देत होते पण मी वारंवार तुमचा उल्लेख करत होतो. आणि हेही सांगत होतो की माझी भूमिका हमालाची म्हणजे भारवाही आहे मी. आपण केलेली मदत अमूल्य आहे पण थोडी तोकडी पडतीय . याकरीता … ‘ त्याचं वाक्य अर्धवट तोडत विनायकराव आश्वस्त करतात. ‘ मी आहे ना ! ‘

रात्री खूप उशिरा तो आणि त्याची बायको घरी येत असतात. बायकोला मनापासून वाटत असतं कि सुनेला सांगावं हे आले की त्यांना ओवाळ. पण तिची हिम्मत होत नाही. तिला पक्की खात्री असते या हमालाला ते आवडलं नसतं .
चार दिवसांनी ते घारे डोळे मला फोनवर सांगतात, ‘ आमचं कोकण निसर्गानं फुलवलं आणि निसर्गानंच उध्वस्त करायचा प्रयत्न केलाय. पण कोकणी माणूस हरणार नाही. पुन्हा उभा राहील. तो काय पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ किंवा मराठवाड्यातला आत्महत्या करणारा शेतकरी आहे. सांग बरं मला !!

मी फोनवर डोलावलेली मान त्याला दिसलीय असं मला खरंच वाटलं.

– ©️  दीपक पारखी 
dgparkhi@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
कोन्नी नावाची एक पिढी

प्रकाश पेठे

‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या रविवार आवृत्तीत  “कोन्नी  नावाची एक पिढी” हा लेख कोन्नी वांग नावाच्या तरुण चिनी पत्रकार स्त्रीने, कोन्नी चुंग या ७६ वर्षाच्या ज्येष्ठ टीव्ही पत्रकार आणि अँकर यांना केंद्रस्थानी ठेवून लिहिला आहे. या चुंग बाई अमेरिकेत प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांना टीव्हीवर पाहून अनेक चिनी स्त्रियांनी लेखिकेसह अनेक मुलींचं नाव “कोन्नी”ठेवलं आहे.

कोन्नी वांग आपल्या लेखात सांगतात, ” मी कॅलिफोर्नियाच्या बर्कले विद्यापीठामध्ये शिकत होते. माझा कॉलेजचा पहिलाच दिवस होता. मी कँटीनमध्ये सॅन्डविच घेण्यासाठी रांगेत उभी होते. इतक्यात माझ्या नावाचा पुकारा झाला. मी अजून काही सांगितलं नसताना माझं नाव का घेतलं ? मी मान वळवून पाहिलं तर एका मुलीने “ओ” दिली. आणि  मी चमकले. याचा अर्थ माझ्या नावाची आणखी एक मुलगी या कॉलेजात आहे. नंतर मी माझ्या खोलीत आले आणि कोन्नी असं नाव टाईप करून कॉलेजच्या फेसबुक अकाउंटमध्ये पाहिलं तर त्यात कोन्नी  झाँग, कोन्नी चेंग, कोन्नी वांग अशी कोन्नी नावाची मोठी यादीच पुढे आली. कॉलेजमध्ये माझ्या नावाची एक पिढी होती.

माझं नाव आजोबांनी ठेवलं होतं. माझी आई क्विंग ली पुस्तक प्रकाशनात काम करत होती. पण अमेरिकेत आल्यावर इंग्रजीवर प्रभुत्व असल्याशिवाय त्या व्यवसायात टिकणं अवघड होतं. तिच्या मैत्रिणींनी आईला सांगितलं की रेस्टारंटमध्ये काम करून पहा. तेही  तिनं  केलं. पण तिथे तिला  कंटाळा आला.

माझी आई टीव्हीवर कोन्नी चुंग हिला बोलताना पाहायची. ती मोठमोठ्या लोकांच्या मुलाखती ठसक्यात घ्यायची. तिचा मेकअप, केसांची ठेवण, बोलका चेहरा, चांगली छाप पाडत असे. त्या  कोन्नी चुंगच्या टीव्हीवरील अस्तित्वामुळे सत्तर ते नव्वदच्या  दशकात अमेरिकेत जन्माला आलेल्या चिनी मुलींची नावं कोन्नी ठेवली गेली होती. सर्व आशियायी मातांना आपली मुलं मोठी व्हावीत. पत्रकार व्हावीत, त्यांनी नाव काढावं असं वाटे.

जिच्यावर सर्व चिनी स्त्रिया फिदा होत्या त्या टीव्हीवरच्या निवेदिकेचं नाव कोन्नी चुंग होतं. तिचा जन्म १९४६ साली वाशिंग्टनमध्ये झाला होता. तिचं नाव ठेवण्याआधी वडिलांनी मोठया मुलीला चीनमध्ये फोन करून विचारलं, ” नुकत्याच जन्म झालेल्या  तुमच्या धाकट्या बहिणीचं नाव काय ठेवावं ?” बहिणींनी विचार करून सांगितलं, “कोन्नी” ठेवा.

कोन्नीचं शिक्षण झाल्यावर तिनं ठरवलं की टीव्हीत  काम करावं.  नशिबाने तिला काम मिळालं.  ” पण तिथे  मी एकटीच मुलगी होते.आजूबाजूला सगळा पुरुषांचा गराडा असे. मला कल्पना नव्हती की किती आशियायी लोकांचं माझ्याकडे लक्ष आहे. ”

पण तिच्याकडे सगळ्या  स्थलांतरितांचं लक्ष होतं. एक कुटुंब चीनहून १९८९ साली अमेरिकेतल्या ओहायो राज्यामध्ये आलं. त्यातल्या स्त्रीला आपल्या मुलीला टीव्हीत दिसणाऱ्या कोन्नी चुंगसारखं बनवायचं  होतं. तिनं मुलीचं नाव  “कोन्नी” ठेवलं; आणखी एक कुटुंब दक्षिण कोरियातून अरिझोनमध्ये स्थायिक झालं त्यांनी स्वतःच्या मुलीचं नाव कोन्नी चुंग जोई ठेवलं. कँटॉनीझ भाषा बोलणारे तसेच व्हिएतनामी, तैवानी स्थलांतरितांना कोन्नी हे मुलीचं नाव आवडत होतं.

ती पुढे सांगते, आमच्या वांग कुटुंबाचा पहिला मुक्काम नेब्रास्कात होता. त्यावेळी उच्च शिक्षण घेण्यासाठी मुलांना चीनने कुठेही जाण्यास मंजुरी दिली होती. त्यामुळे माझे वडील अमेरिकेत शिकायला आले होते. ते कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना चीनमध्ये तियानमेन चौकात विद्यार्थ्यांची आंदोलनं चालू होती.  माझे वडील चीनमधील विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी कॉलेजमध्ये आंदोलन करत होते. कोणीतरी ही बातमी माझ्या आजोबांना कळवली. चीन सरकारनं माझ्या आजोबांना तंबी दिली आणि सगळ्यांवर पाळत ठेवण्यात येत होती. त्यामुळे माझ्या वडिलांच्या ग्रीन कार्ड मिळवण्याची घाई केली होती.

पुढे १९६५ मध्ये इमिग्रेशनच्या कायद्यात बदल झाल्याने पुष्कळ आशियायी तरुण अमेरिकेकडे आकर्षित झाले होते.

कोन्नी वांग त्यांच्या आईच्या जीवनावर  पुस्तक लिहीत असता त्यांनी पूर्वपरिचय नसून कोन्नी चुंग यांना मेल पाठवला. त्याचं त्यांना ताबडतोब उत्तर आलं. नंतर  टेलिफोनवर बोलताना चुंग म्हणाल्या, “मला माझ्याच नावाच्या कोणाशी तरी बोलताना बरं वाटतंय.” तेव्हा  वांग त्यांना म्हणाल्या, “मी एकटी नाही खूप कोन्नी आहेत.” हे  ऐकून त्या चाट पडल्या. मी म्हणाले, “तुमच्यामुळे इतक्या कोन्नी झाल्यात.”

कोन्नी चुंग, कोन्नी वांग यांना म्हणाल्या की जेव्हा मी शाळेत होते तेव्हा वर्गातली मुलं माझ्या नावावरून टिंगल करायची. टर उडवायची. मला मेल्यासारखं होत असे..लग्न झाल्यावर मी मनाशी ठरवलं की आपण नवऱ्याचं नाव लावायचं आणि आपल्या नावाचा त्याग करायचा. पण काळ पुढे सरकला. मी माझ्या आई वडिलांचा विचार करत हॊते. त्यांनी माझं नाव कोन्नी म्हणजे तडफदार किंवा दृढता ठेवलं. मी सर्वार्थाने दुसऱ्या देशात होते. उद्या  माझ्या मुलांना भिन्न संस्कृतीत वाढताना त्यांच्या अमेरिकन स्वप्नांचं  काय होईल ? त्यामुळे मी माझं नाव कायम ठेवलं.

आत्ता मी जो काही विचार करते आहे, ते चीनच्या संस्कृतीचे सांस्कृतिक विचार आहेत. मी  ठरवलं  की मी ज्या विश्वात वावरणार आहे ते जग क्रूर आहे. मला माझं शील आणि संस्कृती सांभाळायची आहे.

कोन्नी चुंग

कोन्नी वांग यांनी  ‘न्यूयार्क टाइम्स’साठी लेख पूर्ण केला तेव्हा ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने खुद्द कोन्नी चुंग आणि  कोन्नी नावाच्या दहा मुलींना स्टुडिओमध्ये बोलावले; तसेच छायाचित्रणासाठी कोन्नी आमाराकी ( ४६ वर्षे ) यांना बोलावलं होतं. आमाराकी म्हणाल्या, “माझ्या आईला वाटायचं, आपलीही  मुलगी जर्नालिझम करणारी व्हावी, म्हणून माझं नाव कोन्नी ठेवलं.”

चुंग म्हणाल्या, “आज अमेरिका माझ्या जन्माच्या वेळी होती त्यापेक्षा खूप वेगळी आहे. मला नवल वाटतं की  एक टीव्हीची निवेदिका इतक्या मुलींना पंख लावून त्यांना स्वतःच विश्व बदलण्याची शक्ती देते. माझाच विश्वास बसत नाहीये.”

–  ©️ प्रकाश पेठे
6832 Syrah Drive,
Dublin, California,
USA.
prakashpethe@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
बोधकथा

देवेंद्र रमेश राक्षे 

या बोधकथेतील संदर्भ एका हिन्दी पाठाच्या वाचनातून आलेला आहे.

बाणभट्ट हा संस्कृत साहित्यिक. त्याने ‘कादंबरी’ नावाचा एक संस्कृत ग्रंथ लिहिला.

हा ग्रंथ अर्धवट लिहून झाला होता नि त्याला त्याची अखेर दिसू लागली.
हा ग्रंथ आपल्या हातून पूर्ण होईल अशी खात्री वाटेना.
अशा वेळी त्याने आपल्या दोन्ही मुलांना जवळ बोलावले.

दोन्ही मुले आपल्या पित्याप्रमाणेच विद्वान, व्युत्पन्न असे.
बाणभट्ट आपल्या मुलांचे कर्तुत्व जाणून होता व दोघेही आपले कार्य आपल्या माघारी पुढे नेण्यास सक्षम आहेत याची त्याला खात्री होती.
पण ‘कादंबरी’ या आपल्या संस्कृत ग्रंथास कोण पुढे नेतो हे पाहणे जरूरी होते.

दोन्ही मुले आपल्या पित्याच्या आज्ञेत होती.
त्यांना आपल्या पित्याबद्दल अपार आदर व प्रेम होते आणि सर्वात महत्वाचे एकमेकांबद्दल देखील असाच भ्रातृभाव अपार आदराने व प्रेमाने संपन्न असा होता.

त्यामुळे ग्रंथलेखनाची जबाबदारी कुणाकडेही सोपवली तरी मनभेद होणार नव्हते.
तरी देखील बाणभट्ट एक परीक्षा घेऊ पहात होता.

दोन्ही मुले त्याच्या निकट होती, समोर अंगणात एक झाड पडलेले होते, वाळून त्याचे आता केवळ सरपण झालेले.

त्या झाडाचे एका वाक्यात वर्णन करण्याची सूचना बाणभट्टाने आपल्या दोन्ही मुलांना केली.

एका मुलाने केलेले वर्णन असे होते –
शुष्कं काष्ठं तिष्त्यग्रे |

दुसऱ्याने वर्णन केले –
नीरस तरुवर विलसती पुरत: |

दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच की वाळलेले झाड जमिनीवर पडले आहे.

बाणभट्टाने निर्णय घेतला नि तो दोन्ही मुलांनी आनंदाने व आदराने मान्य केला.

कुणी बरे त्या ग्रंथाचे लेखन पूर्ण केले ?

@@@
निरूपण

तुलसीदासांचे प्रत्यक्ष बोल पुढीलप्रमाणे –
कागा कासो लेत है |
कोयल कागो देत |
तुलसी मिठे वचन सें |
जग अपनो करी लेत ||

त्याच वेळी सुभाषितकारांचे बोल देखील आठवतात.
काक: कृष्ण: |
पिक: अपि कृष्ण: |
को भेद: काकपिकयो: |
वसंत काले सम्प्राप्ते |
काक: काक: |
पिक: पिक: ||

या दोन्ही सुभाषितांमध्ये एकच समान गोष्ट ठासून सांगितली आहे ती म्हणजे मधुर वाणी !

लेखणी वाचकाला खिळवून ठेवते जर ती नीरस नसेल तर.
लेखनाची सुरवात, मध्य नि संपन्न होणे हे रसपूर्ण असेल तर आणि तरच वाचक प्रथम वाक्यापासून शेवटचे वाक्य वाचले तरी त्या लिखानाच्या विचारात मग्न होत जातो.
प्रज्ञा आणि प्रतिभा  यातला हा मूलभूत फरक.
प्रज्ञावान विद्वान प्रतिभासंपन्न असेलच असे नाही, पण प्रतिभासंपन्न प्रज्ञावान लेखक वाचकाला आपल्या लेखनात जखडून ठेवतो.

हेच नेमके बाणभट्ट जाणून होता.
‘शुष्कं काष्ठं तिष्ठत्यग्रे |’ हे सत्य वचन पण तेच सत्य जेव्हा
‘नीरस तरुवर विलसती पुरत: |’ या शब्दात व्यक्त केले जाते तेव्हा ते सत्य मानणे देखील राजस ठरते.

त्यामुळे त्याने तत्क्षणी निर्णय घेतला नि ज्या पुत्राने ‘नीरस तरुवर विलसती पुरत: |’ या शब्दात अंगणात पडलेल्या त्या वाळलेल्या झाडाचे वर्णन केले त्याच्याच कडे ‘कादंबरी’ या ग्रंथाचे लेखन पूर्ण करण्याची जबाबदारी दिली.

 – ©️ देवेंद्र रमेश राक्षे 
rakshedevendra@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
बालचित्रकारांचे दालन
सुट्टीतील कामगिरी 
 
 
– भार्गवी महाडिक 
@@@@@@@
– अवनी वैद्य
@@@@@@
– मणिकर्णिका करकरे  
 
प्रेषक सौ. स्वाती वर्तक
          swati.k.vartak@gmail.com
@@@@@@@@@@@@@
हत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@@@

 

योग संकल्पना, उद्‌गम, प्रक्रिया, विकास

लेखमालिका : जिज्ञासूंसाठी योगाचा परिचय
 
 

विलास सातपुते

  

योगावरील लेखांच्या या मालिकेत खालील विषयांवर लेख सादर करणार आहे :-

१. योगाची संकल्पना, योगाचा उगम, योगाचा उद्देश, योगाचा विकास, योगाची प्रक्रिया, योगाचे प्रकार.

२. पतंजलियोगसूत्रांत वर्णन केल्याप्रमाणे अष्टांग योग – एक विहंगावलोकन

३. ज्ञानयोग – विहंगावलोकन; साध्य,  साधना, साधक, यावर चर्चा

४. भक्तियोग – विहंगावलोकन;  साध्य, साधना, साधक, यावर चर्चा

५. कर्मयोग – विहंगावलोकन; साध्य, साधना, साधक, यावर चर्चा

६. ध्यानयोग – विहंगावलोकन; साध्य, साधना, साधक, यावर चर्चा

७. हठयोग – विहंगावलोकन; मूळ, साध्य , प्रक्रिया यावर चर्चा

८. अमनस्क योग – रूपरेखा

९. भगवान बुद्धांच्या विचारांतून उद्गम झालेली योगपद्धति – परिचय

लेखांक १

योगाची संकल्पना, योगाचा उद्देश, योगाचा विकास आणि योगाची प्रक्रिया

योग हा गहन विषय आहे. मी तो सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करेन. तसे पाहिले तर मी देखील या विषयाचा विद्यार्थी आहे. आणि मी जितका जास्त अभ्यास करत आहे, तितके माझे अज्ञान वाढत आहे. म्हणजे अजून किती जाणून घ्यायचे आहे, त्याची मर्यादा दिवसेंदिवस वाढत आहे.

भारतात योग हा प्राचीन काळापासून प्रचलित आहे. योगाची विविध नावे ऐकिवात आहेत. जसे – राजयोग, क्रियायोग, हठयोग, अमनस्क योग, ध्यान योग, कर्मयोग, भक्क्तियोग, ज्ञानयोग, लययोग इत्यादि. योग हा शब्द ऐकल्यावर पहिली गोष्ट डोळ्यासमोर येते, ती म्हणजे महर्षी पतंजली यांचा योगसूत्रांचा ग्रंथ “पातंजलयोगसूत्राणि” आणि त्यात वर्णन केलेले अष्टांग योगाचे वर्णन. परंतु योगाचा उल्लेख किंवा वर्णन इतर अनेक ग्रंथांतही आढळते; जसे की – योगवासिष्ठ, भागवतपुराण, स्कंदपुराण, महाभारताचे शांतिपर्व, सुमारे २० उत्तरकालीन उपनिषदे जी दहाव्या शतकाच्या आसपासची असावीत. हठयोगप्रदीपिका हा ग्रंथ पंधराव्या शतकातला आहे, आणि सर्वात प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे भगवद्गीता.

महर्षी पतंजलीचा ‘पातंजलयोगसूत्राणि’ हा ग्रंथ सुमारे इ.स. पूर्व ३०० च्या आसपास रचला गेला.

आजच्या लेखात योगाच्या पार्श्वभूमिसंबंधी काही माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करूया. योगाची संकल्पना, योगाचा उद्देश, योगाचा विकास आणि योगाची प्रक्रिया इत्यादि.
आणि पुढे या मालिकेत योगाचे विविध प्रकार सारांश रूपात  समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

योगाची संकल्पना
योग म्हणजे काय?

योग म्हणजे योगासन, प्राणायाम नव्हे. ते योगमार्गाचे किंवा योगक्रियेचे भाग आहेत. शारीरिक आरोग्य हा योगाचा उद्देश नाही. योग ही मनावर ताबा मिळवण्याची आणि मन शांत करण्याची  क्रिया आहे.

१. योगाची व्याख्या
अ) सर्वात जुनी उपलब्ध असलेली व्याख्या कठोपनिषदात आहे. कठोपनिषदातील योगाची व्याख्या अशी आहे:
यदा पंचावतिष्ठन्ते ज्ञानानि मनसा सह ।
बुद्धिश्च न विचेष्टति तां आहु: परमाम्‌ गतिम् ॥  २.३..१० ॥

तां योगमिति मन्यन्ते स्थिराम् इंद्रियाधारणाम् ।
मराठी अर्थ – जेव्हा पाचही ज्ञानेंद्रिये आणि मन हे स्थिरता प्राप्त करतात आणि बुद्धी काही परिश्रम करत नाही, तेव्हा त्याला अंतिम ध्येयाचा मार्ग/साधन म्हणतात. (येथे अंतिम ध्येय आत्मसाक्षात्कार आणि मोक्ष हे आहे.) ती (मनाची) स्थिर अवस्था, ज्यामध्ये इंद्रियांचे नियंत्रण असते, त्याला योग म्हटले जाते.

ब) महर्षी पतंजलींच्या योगसूत्रांमध्ये योगाची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे.
योगश्चित्तवृत्तिनिरोधः ॥१.२॥
मराठी अर्थ – योग म्हणजे मनाच्या क्रिया थांबवणे – चित्तवृत्तींचा निरोध करणे.
क) कूर्मपुराणात योगाची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे.
एतद व: परम सांख्यम् भाषितम् ज्ञानमुत्तमम्। सर्ववेदांतसारं हि योगस्तत्रैकचित्तता ॥२.४०॥
मराठी अर्थ – हे सांख्यिकीचे सर्वोच्च ज्ञान मी तुम्हाला सांगितले आहे. हे सर्व वेदांताचे सार आहे आणि त्यात योग म्हणजे मनाची एकाग्रता.

ड) सांख्यदर्शनाचे जाणकार आणि योगी स्वामी हरिहरानंद आरण्य यांनी आपल्या
‘पातंजलयोगदर्शन’ या योगसूत्रांच्या भाष्य पुस्तकात एक सरळ साधी व्याख्या दिली आहे –
“ जेव्हा आपण एकतान वृत्तीने मनामध्ये एकच ज्ञान किंवा प्रत्यय ठेवतो आणी इतर ज्ञानांचा निरोध करतो तेव्हा त्याला योग म्हणतात. हे आत्मदर्शनाचे साधन आहे.”

या सर्व स्पष्टीकरणांवरून आपण असे म्हणू शकतो की – “योग ही मनाची एक स्थिर, एकविचारक किंवा विचारहीन अवस्था आहे, ज्यामध्ये इंद्रिये आणि मन शांत केलेली असतात.

२. योगाची संकल्पना कशी उदयास आली? योगाची गरज कधी आणि कशी निर्माण झाली?
योग प्रथम कोणी सांगितला याबद्दल याज्ञवल्क्यस्मृतिमध्ये एक संदर्भरूप वाक्य आहे.
हिरण्यगर्भो योगस्य वक्ता नान्यः पुरातनः ।
मराठी अर्थ – हिरण्यगर्भ ही योग सांगणारी पहिली व्यक्ती, त्याच्यापेक्षा पुरातन कोणी नाही.
पण या हिरण्यगर्भाविषयी अजून काही माहिती कुठे नाही किंवा त्याचे योगवक्तव्य कुठल्याही रूपात उपलब्ध नाही. त्यामुळे आपले प्रश्न अनुत्तरित राहतात.

म्हणून मग या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी जर आपण वेदांतील संहिता हा सर्वात जुना भाग पाहिला, तर त्यात योग या संकल्पनेचा उल्लेख नाही. योगाचा उल्लेख दोन पूर्वोत्तर उपनिषदांमध्ये आढळतो. कठोपनिषद आणि श्वेताश्वतर उपनिषद. पूर्व-पूर्व उपनिषदे म्हणजे सर्वात प्राचीन उपनिषदे – छांदोग्य उपनिषद्‌, बृहदारण्यक उपनिषद, ईशा आणि तैत्तिरिय उपनिषद ही आहेत. त्यानंतर मुंडक, मांडुक्य, कठोपनिषद, श्वेताश्वतर इत्यादि पूर्वोत्तर उपनिषदे.  छांदोग्य उपनिषदांमध्ये ध्यानाचा एकदाच उल्लेख आहे, पण योगाचा उल्लेख नाही. उपनिषदे हा वेदांचा शेवटचा भाग आहे. त्याला वेदांत म्हणतात.

यावरून आपण असा अंदाज लावू शकतो की योग ही संकल्पना वेदांच्या निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात आली. वेदांचे ४ भाग आहेत. संहिता, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद.

संहिता या भागात जे मंत्र आहेत ते देवतांचे स्तवन आहे. देवतांना प्रसन्न करण्यासाठी. ब्राह्मणे या भागात त्या मंत्रांना यज्ञकर्मात कसे प्रयोजित करायचे ते आहे. यज्ञकर्मातून  आपल्या सांसारिक इच्छा पूर्ण व्हाव्या हाही यज्ञकर्माचा एक हेतू होता. संहिता भागाला ‘ उपासना कांड’ म्हणू शकतो; ब्राह्मणे या भागाला ‘कर्मकांड’ म्हणू शकतो. हे दोन भाग प्रवृत्तिधर्माचे स्त्रोत आहेत, ज्यामध्ये उपासना आणि कर्म निर्देशित आहेत. प्रवृत्तिधर्म म्हणजे काहीतरी मिळवण्याच्या इच्छेने केलेले धार्मिक आचरण. जसे की पूजा, उपासना, व्रत, यज्ञ इ.

आरण्यक आणि उपनिषद यात मुख्यतः तत्त्वज्ञान असल्याने त्यांना ‘ज्ञानकांड’ म्हणू शकतो. हे दोन भाग निवृत्तिधर्माचे स्रोत आहेत. निवृत्तिधर्म म्हणजे सांसारिक कर्म आणि इच्छा यातून निवृत्तीसाठी केलेले धार्मिक आचरण. जसे की मोक्षप्राप्तीसाठी शास्त्राचा अभ्यास, चिंतन, अलिप्तता, त्याग इ.

कामना पूर्ण करण्यासाठी उपासना आणि कर्म करूनही नेहमी फळ मिळत नाही किंवा नवीन नवीन कामना निर्माण होणे थांबत नाही, हे जेव्हा लक्षात आले; तेव्हा मानवाची पावले चिंतन, तत्त्वज्ञान याकडे वळली असावीत. त्यातून आरण्यक आणि उपनिषद हे निर्माण झाले असावेत. आरण्यकांमध्ये तत्त्वचिंतनाची सुरुवात आहे, तर उपनिषदांत अत्युच्च सीमेला पोहोचलेले दिसते.
त्यामुळे योग ही संकल्पना वेदांच्या उत्तरार्धात उदयास आली असावी, असा निष्कर्ष काढू शकतो.
याचे प्रमाण  श्वेताश्वतर उपनिषदातील खालील पहिल्या श्लोकात मिळते.

श्वेताश्वतर उपनिषदातील पहिला श्लोक आहे –
ब्रह्मवादिनो वदन्ति ।
किम्‌ कारणम् ब्रह्म कुतः स्म जाता जीवाम केन क्व च संप्रतिष्ठाः।
अधिष्ठाता: केन सुखतरेषु वर्तामहे ब्रह्मविदो व्यवस्थाम्‌  ॥ १.१.॥

मराठी अर्थ – ब्रह्म म्हणजे काय? आपण कुठून जन्मास आलो? आपण कशाने जीवित राहतो? आपण कुठे स्थित असतो? (जन्मापूर्वी आणि मृत्यूनंतर).  हे ब्रह्मविद्‌ विद्वानों, कोणाच्या अधीनतेखाली एका व्यवस्थेनुसार आपण सुखदुःख भोगत आहोत?

अशा मूलभूत प्रश्नांवर विद्वान विचार करू लागले आणि त्यांची उत्तरे तर्क आणि अनुमानाने सहज सापडली नाहीत, तेव्हा त्यांनी ध्यानाचा आश्रय घेतला. तिसऱ्या श्लोकाची ही ओळ सांगते की –

ते ध्यानयोगानुगता अपश्यन्‌ देवात्मशक्तिं स्वगुणैर्निगूढाम्‌ ॥ १.३ ॥
मराठी अर्थ – जेव्हा ते ध्यानयोगात गेले, तेव्हा त्यांना स्वतःच्या त्रिगुणांनी झाकलेल्या दैवी शक्तीचे – आत्मशक्तीचे दर्शन झाले.

योगाची उत्पत्ती आणि आवश्यकता याबद्दल श्वेताश्वतर उपनिषदातील वरील श्लोकांवरून असे अनुमान लावता येते की, तत्त्वज्ञान आणि मूलभूत प्रश्नांवर चिंतन करण्यासाठी सर्वप्रथम ध्यानाचा, म्हणजेच योगपद्धतीचा उपयोग केला गेला;  कारण योगातील  चित्तैकाग्रतेमधली  शक्ती चिंतनासाठी पोषक होती. एकाग्र मनाची विचारमंथन क्षमता बाह्य विषयांमध्ये विखुरलेल्या मनापेक्षा जास्त असते. हे आपण सर्वांनी कधी ना कधीतरी अनुभवले असेलच. म्हणूनच कदाचित हा वाक्प्रचार देखील वापरला जातो की “जरा ध्यान देऊन अभ्यास करा, तर तुम्हाला नीट समजेल”, “जर तुम्ही ध्यान देऊन केले तर कोणतीही चूक होणार नाही” इत्यादी. ध्यानात मग्न असलेल्या मनाची क्षमता अधिक असते, हे या सर्वांवरून स्पष्ट होते.

आता इथे दुसरी शंका येणं साहजिक आहे की, या तत्वज्ञानाची गरज काय?
एक कारण आहे – माणसाची एखादी गोष्ट जाणून घेण्याची नैसर्गिक प्रवृत्ती – कुतूहल, जिज्ञासा.  विशेषत: प्रत्येक माणसाला कमी-अधिक प्रमाणात मूलभूत प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची उत्सुकता, जिज्ञासा असते.
दुसरे कारण – जीवनातून दु:ख कायमचे काढून टाकण्याचे मार्ग शोधणे.
तत्वज्ञानातून दु:ख कसे दूर होईल?  उत्तर आहे :- तत्वज्ञानाच्या अभ्यासाने दु:खांपासून मुक्ती मिळवण्याच्या उपायांचेही ज्ञान मिळते.

भगवान गौतम बुद्ध याने जीवनातील दु:ख पाहिले होते – वार्धक्य, मृत्यू, रोग, अपयश इ. हे पाहून तो दु:खापासून मुक्त होण्याच्या मार्गाच्या शोधात निघाला. ते उपाय जाणून घेण्यासाठी त्याला तत्वचिंतनाचा आश्रय घ्यावा लागला. विश्वात किती मूलभूत घटक आहेत, मन काय आहे, शरीर काय आहे, त्यांचा सुख-दु:खाशी काय संबंध आहे, दु:ख दूर होऊ शकते की नाही इत्यादी. आणि मग त्याला ज्ञान स्फुरले आणि त्याने दुःखाबद्दल चार मूलभूत तत्त्वे मांडली. दुःख, दुःखसमुदय, दुःखनिरोध, दुःखनिरोधगामिनि प्रतिपद्‌. यांचे स्पष्टीकरण असे आहे :-

१. दुःख – जीवनात दुःख आहे ते जाणा. ते दूर केले पाहिजे.
२. दुःखसमुदय – दु:खाला मूळ आहे, कारण आहे. ते अकारण किंवा random नाही. ते कारण तृष्णा आहे.
३. दुःखनिरोध – दुःखापासून मुक्तता आहे. त्या दुःखमुक्त अवस्थेला निर्वाण म्हणतात. तेच तुमचे ध्येय आहे.
४. दु:खापासून मुक्त होण्याचा मार्ग आहे.  तो चोखाळला पाहीजे. हा मर्ग म्हणून बुद्धाने अष्टांग मार्ग सांगितला आहे. हा पतंजलिंच्या अष्टांग मार्गापेक्षा थोडा वेगळा आहे.
ही विश्लेषणाची पद्धत आयुर्वेदाच्या म्हणजे वैद्यकीय शास्त्रातील पद्धतीप्रमाणेच आहे.
१. रोग काय आहे, रोगाची लक्षणे काय? ते जाणा. तो रोग दूर करणे हे शक्य आहे.
२. रोगाचे निदान करणे म्हणजे रोगाचे कारण जाणून घेणे.
३. रोग बरा होऊ शकतो आणि रोग बरा झाल्यानंतर रोगमुक्त अवस्था कशी असेल हे समजून घ्या. रोगमुक्त अवस्था हे ध्येय आहे.
४. आणि शेवटी, रोग बरे करण्याचे उपाय आहेत, ते जाणून घ्या आणि त्यांची अंमलबजावणी करा.

पतंजलि योगसूत्रांत असेच विश्लेषण आहे. हेय, हेयहेतू, हान, हानोपाय.
१. हेय – जे सोडायचे आहे ते.  ज्यातून सुटका हवी आहे ते; येणारे दुःख.
२. हेयहेतू- जे सोडायचे आहे त्याच्या अस्तित्त्वामागील कारण; चित्त आणि पुरुष यांच्या भेदाविषयीचे अज्ञान किंवा अविद्या.
३. हान – सुटका झाल्यानंतरची स्थिती. अज्ञान/ अविद्या दूर करणे आणि कैवल्य मिळवणे.
४. हानोपाय – सुटका करून घेण्याचा उपाय; विवेकख्याति म्हणजे चित्त आणि पुरुष यांतील भेद्ज्ञान होणे.

सर्वांची  विश्लेषणात्मक विचारपद्धति एकच आहे.
आणि असे चिंतन करून बुद्धाने दुखाची कारणे शोधून दुखमुक्तीचा मार्ग शोधला. या चिंतनाकरिता त्याने जी एकाग्रता साधली, ती एक योगच होता.
आपले काही प्राचीन ग्रंथ दु:ख दूर करण्याविषयी काय सांगतात ते पहा.
अत्र आहारार्थं कर्म कुर्यात् अनिंद्यम् । कुर्यात् आहारं प्राणसंधारणार्थम् ।।
प्राणाः संधार्याः तत्वजिज्ञासनार्थम् । तत्वं जिज्ञास्यम् येन भूयो न दुःखम् ॥

योगवासिष्ठमध्ये ऋषी वसिष्ठ यांनी श्रीरामांना दिलेली शिकवण आहे ही.
याचा मराठी अर्थ: आहारासाठी असे कार्य करा जे निंदनीय नाही.
आहार घ्यावयाचा असतो, शरीरात प्राण टिकवण्यासाठी.
प्राण धारण करायचे, तत्वज्ञान जाणून घेण्यासाठी.
तत्वज्ञान जाणायचे, पुन्हा कधीही दुःख होऊ नये म्हणून.

सांख्यदर्शन हा सनातन आस्तिक तत्त्वज्ञानाच्या सहा ग्रंथांपैकी एक तत्वज्ञानग्रंथ आहे, योगदर्शन हे त्यावर आधारलेले  प्रॅप्क्टिकल आहे. सांख्यदर्शनात दु:ख दूर करणे, हा ज्ञानाचा मुख्य उद्देश सांगितला आहे. त्यातील पहिली कारिका खालीलप्रमाणे आहे.-
दुःखत्रयाभिघाताज्जिज्ञासा तदपघातके हेतौ । दृष्टे सापार्था चेत्‌ नैकांतात्यंततो अभावात्‌ ॥१॥
मराठी अर्थ: तीन प्रकारची दु:खं कोसळतात. ती दूर करण्याच्या उपायांबद्दल जिज्ञासा आहे.  त्या जिज्ञासेला अर्थशून्य म्हणता येणार नाही, कारण दृष्ट जगतातील साध्या उपायांनी दु:खापासून मुक्ती मिळण्याची शाश्वती नसते किंवा दु:खाची पुनरावृत्ती न होण्याची खात्री नसते.
म्हणजे दु:खापासून मुक्ती मिळवण्यासाठी असे उपाय शोधण्याचा प्रयास आहे की, त्या उपायांची अंमलबजावणी केल्यावर दु:ख पूर्णपणे नष्ट होईल आणि परत परत येणार नाही. यालाच दुःखाची “आत्यंतिक निवृत्ति“ असे  म्हणतात.

या शब्दांवरून हे सिद्ध होते की अध्यात्मिक चिंतनाचा उद्देश दु:खापासून मुक्ती आहे आणि त्यातूनच दुःखापासून मुक्ती मिळते. दु:खापासून मुक्ती म्हणजे मोक्ष. मोक्षाच्या अवस्थेत या जन्मी दु:खापासून मुक्ती मिळते आणि येणाऱ्या जन्मांतून सुटका झाल्याने त्यातील दु:खापासूनही मुक्ती मिळते, म्हणजे दु:खापासून कायमची मुक्ती मिळते.
अशा प्रकारे योग संकल्पनेचा उगम उपनिषद्‌काळात झाला. सखोल तत्वचिंतनासाठी झाला.  तत्त्वचिंतन मोक्षासाठी केले गेले. अशा प्रकारे योगाद्वारे मोक्षाचा मार्ग सापडला.

३. योगाची प्रक्रिया कशी आहे आणि योगाचा विकास कसा झाला?  
जेव्हा विद्वानांच्या मनावर हे ज्ञान बिंबले की, चिंतन आणि त्यातून आत्मसाक्षात्कार हे  करण्यासाठी ध्यान आवश्यक आहे, ध्यानासाठी मनाची एकाग्रता आवश्यक आहे आणि मनाच्या एकाग्रतेतून योग सिद्ध होतो, मनाच्या एकाग्रतेसाठी  इंद्रियांवर नियंत्रण हवे, आणि मन शांत हवे; तेव्हा योगाभ्यास करण्यासाठी विविध पद्धती शोधल्या गेल्या. त्या सर्व पद्धती खालील दोन उपायांवर किंवा क्रियांवर आधारित होत्या :
१. मनाच्या एकाग्रतेतील अडथळे दूर करणे :
मन स्वभावाने चंचल आणि गतिशील आहे. इंद्रिये नैसर्गिकरित्या बाह्यविषयाभिमुख असतात आणि ती मनाला चंचल अवस्थेत ठेवतात. इंद्रिये बाह्य विषय मनापर्यंत आणतात. त्या विषयांच्या संपर्कांतून मिळणार्‍या सुखांशी मन आसक्त होते, जोडले जाते ( सुखाचा हव्यास निर्माण होतो ) आणि मग सुख मिळविण्यासाठी ते क्रियाशील होते. अशा प्रकारे मन सदैव विचलित राहते, म्हणजेच बाह्य विषयात विखुरलेले राहते.

हे अडथळे दूर करणे ही मन एकाग्र करण्याच्या योगिक प्रक्रियेतील पहिली पायरी आहे. बाह्य विषयांशी संपर्क कमी करण्यासाठी एकांत उपयुक्त होता. मनाची क्रियाशीलता कमी करण्यासाठी सुखासक्तीवर विजय मिळवणे आवश्यक होते. त्यासाठी मनाची शुद्धी- चित्तशुद्धी आवश्यक होती. त्याच्यासाठी इच्छांवर नियंत्रण, शुद्ध आचरण, काहीतरी फळ मिळवण्यासाठी कर्म करण्याच्या वृत्तीवर संयम, इंद्रियसुखाऐवजी मोक्षाबद्दल उत्सुकता आणि मोक्षाची इच्छा म्हणजेच मुमुक्षुत्व या सर्व गुणांची गरज भासू लागली. या दिशेने योगविद्येचा विकास होत गेला. हा  झाला योगप्रक्रियेच्या बाह्यांगाचा विकास. बाह्यांग म्हणायचे कारण वरील सर्व एकाग्रतेच्या अप्रत्यक्ष पद्धती आहेत.

२. दुसरा उपाय म्हणजे मनाच्या एकाग्रतेची थेट-डायरेक्ट पद्धत. बाह्य आकर्षण कमी केल्यानंतर मनाला कोणत्याही एका विषयाशी जोडणे हा थेट किंवा प्रत्यक्ष मार्ग आहे. ते विषय अनेक असू शकतात आणि कालांतराने त्यांच्यांत सुधारणा झाल्या, काही नवीन भर पण घातली गेली.

एकाग्रतेचे उपाय वा विषय कोणते होते?
* ईश्वराच्या किंवा देवतेच्या प्रतिमेवर एकाग्रता, ईश्वराचे ध्यान, चिंतन
* मंत्र जप किंवा अखंड नामस्मरण.
* ओम्‌चा जप.
ओम्‌च्या जपाचा उल्लेख उपनिषदांमध्ये वारंवार येतो. ओम्‌चा जप करताना  बाहेरचे आवाज कमी ऐकू येणे, ओम्‌च्या लयीत मन स्थिर होणे, या बाबी एकाग्रतेला पूरक आहेत; यासोबतच काही शक्तीची भावना होणे हे देखील पूरक आहे.

मुंडक उपनिषद्‌ खालीलप्रमाणे सल्ला देते –
प्रणवो धनुः शरो ह्यात्मा ब्रह्म तल्लक्ष्यमुच्यते ।
अप्रमत्तेन वेद्धव्यं शरवत्तन्मयो भवेत् ॥ २.१.४ ॥

मराठी अर्थ :- ॐ हे धनुष्य आहे, प्रत्यागात्मा हा शर म्हणजेच बाण आहे. ब्रह्म हे त्याचे ध्येय आहे. काळजीपूर्वक वेध घ्या. बाण जसा लक्ष्याशी एकरूप होतो तसे ब्रह्माशी एकरूप व्हा.
महर्षि पतंजलि योगसूत्रांत ओम्‌विषयी सांगतात की योग साधणयासाठी ओम्‌चा जप करा; तो ईश्वराचा वाचक आहे.

आधीच्या उपनिषदांमध्ये आणखी एक उपाय सांगितला आहे. तो म्हणजे श्वासगतिनिरोध. ह्यातूनच प्राणायामाचा उगम आणि विकास झाला. श्वास ही एक स्वयंचलित क्रिया आहे. मनाचे त्यावर नियंत्रण नाही. मनाच्या क्रियांमुळे, इच्छांमुळे एकाग्रतेच्या क्रियेत विघ्ने येतात. ती विघ्ने श्वासावर मन केंद्रित केल्याने दूर होतात. दोघांमध्ये अंतर्गत संबंधही आहे. मनाची गती श्वासाच्या गतीशी संबंधित आहे. श्वास मंद झाला की मनाचा वेग कमी होतो. अशा प्रकारे दोन्ही कारणांमुळे प्राणायाम मन एकाग्र होण्यास मदत करतो.

यानंतर मनाच्या एकाग्रतेची मर्यादा वाढली; ध्यान प्रगाढ होऊन त्याचे रूपांतर समाधीत झाले आणि त्यात विशेष प्रज्ञाजागृतीचा अनुभव आला. त्या विशेष प्रज्ञेमुळे ( प्रज्ञा = complex ज्ञान स्पष्टपणे चट्कन होण्याची उच्च बुद्धी ) तत्त्वचिंतनाचे फळ जे ज्ञान, ते सहजपणे लाभू लागले आणि योगाचे ध्येय म्हणजे “श्रेष्ठ ज्ञान आणि त्यातून मोक्ष” हे प्राप्त झाले.

हा झाला योग प्रक्रियेच्या अंतरंगाचा विकास. याला अंतरंग म्हणतात, कारण हे सर्व उपाय थेट मनावर आहेत.

यानंतर भगवद्गीता हा ‘ब्रह्मविद्या आणि योग’ ह्यावर व्यापक चर्चा करणारा आणि सर्वांचे सार देणार पहिला ग्रंथ आहे. यामध्ये ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग असे योगाचे चार वेगवेगळे मार्ग सांगितले आहेत. योग जास्तीत जास्त आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे या दृष्टिकोनातून पाहिल्यास गीतेच्या योग पद्धतीच्या या विभागणीमुळे तो उद्देश सफल झाला आहे. हे प्रथमच घडले. यात सत्त्वगुणप्रधान, चिंतनशील आणि वैराग्यपालक अशा व्यक्त्तींकरिता तसेच संन्याशांकरिता ज्ञानयोग-ध्यानयोग, चिंतनशीलतेकडे कल नसणार्‌या परंतु श्रद्धावन्त आणि भावुक अशा व्यक्तींकरिता भक्तियोग आणि रजोगुणप्रधान आणि गृहस्थधर्मी अशा व्यक्तींकरिता कर्मयोग प्रतिपाद केला आहे.

दरम्यान, महर्षी पतंजलिंनी, ‘ध्यानाद्वारे योगसाधना करण्याची प्रक्रिया आणि त्याचे मूलभूत ज्ञा’ देणाऱ्या सूत्रांची रचना केली. सूत्रे म्हणजे संक्षिप्त वाक्ये, जी लक्षात ठेवायला सोपी असतात. योगाशी संबंधित जवळजवळ सर्व ज्ञान – चित, क्लेश, समाधी, कर्म, वासना, प्रज्ञा, विवेकज्ञान, चित्तनिरोध – त्या सूत्रांत एकत्रित आहे. इतका तांत्रिक आणि शास्त्रशुद्ध रित्या  तपशील इतर कोणत्याही तत्कालीन पुस्तकात नाही. नंतरच्या हठयोगप्रदीपिका या हठयोगाबद्दलच्या श्री. स्वात्माराम यांच्या पंधराव्या शतकातील ग्रंथात असा तपशील आहे.

जसजसा काळ गेला तसतशा सर्व पद्धती प्रगत होत गेल्या आणि नवीन पद्धतीही शोधल्या गेल्या. षटचक्र आणि कुंडलिनी जागृती यांचा योगाशी असलेला संबंध कळला. प्रगत प्राणायाम, मुद्रा, बंध इत्यादी विविध प्रकारांचा शोध दहाव्या शतकात लागला. हठयोगामध्ये प्राणायाम, मुद्रा, बंध यांना प्राधान्य आहे. प्राणायाम पतंजलींनीसुद्धा सूत्रांमध्ये सांगितला आहे. नंतर त्याचे तंत्र हळू हळू विस्तारित होत गेले; त्याचा स्वास्थ्याशी असलेला संबंध पण नंतरच्या काळात लक्षात घेतला गेला आणि स्वास्थ्याशी संबंधित असे प्राणायामाचे अजून प्रकार नंतर शोधले गेले. हठयोगाबरोबरच अमनस्क योग, लययोग, महावतार बाबाजींचा क्रिया योग इत्यादी इतर योग देखील प्रचलित झाले.

अशाप्रकारे, विविध प्रकारच्या व्यक्तिंच्या विविध क्षमतेला अनुकूल अशा विविध योगमार्गांचा शोध लावला गेला आणि योगविद्येचा विकास होत गेला.

या मालिकेच्या पुढील भागात आपण योग आणि त्याच्या विविध प्रकारांबद्दल चर्चा करू.

– ©️ विलास सातपुते 
vilas.satpute54@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आजची कविता

मिलिंद कर्डिले 

उम्मीद

हर शख्स है
यहाँ परेशान
पर उम्मीदों पे
जीता है इंसान!

जब फटे आसमान
आती है नदी उफान पर !
बहा देती है गाँव खेत
पर नहीं बहाती उम्मीदों को !!

जब पडे सुखा
आस लगा के बैठते हैं!
आयेगी कब बारिश
उम्मीद लगा के बैठते है !!

माॅं बाप, भाई बहन
पती पत्नी कच्चे बच्चे!
सारे रिश्ते ज़िंदगी
बंधे है उम्मीदोंकी धागोंसे!!

जिंदगी के चंद आखरी पल
कैसे गुजरेंगे पता नहीं!
पर एक खुशहाल मौत की
उम्मीद लेके जीते है!!

ये उम्मीदही है
जो जीने का मकसद है!
उम्मीद के बिना
जिंदगी अधूरी है!!

शुक्रगुजार हूॅं उस रब का
जिसने हमें उम्मीद दी!
इसी उम्मीद के सहारे
तो हमने जिंदगी बिताई!!

– ©️ मिलिंद कर्डिले

milindkardile@yahoo.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने

आर्किटेक्ट चंद्रशेखर बुरांडे
 
 

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक

दिनांक ६ जून २०२३ रोजी राज्यभिषेक दिनास ३४९ वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे १ जून ते २ जून २०२३ पर्यन्त विविध कार्यक्रमासह “राज्याभिषेक दिन” साजरा केला जाणार आहे. यादवकालीन स्थापत्यशिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या शिवनेरी किल्ल्यात महाराजांचा जन्म झाला. सन १६४४ मध्ये त्यांनी तोरणा व रोहिडा किल्ला जिंकला. रोहिडा किल्ल्यावरील रोहिडेश्वर मंदिरात महाराजांनी आपल्या मोजक्या साथीदारांसह हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. हिंदवी स्वराज्याचे बीज ज्या शिवनेरी किल्ल्यात रोवले गेले त्या ‘हिंदवी स्वराज्य’ संकल्पनेस बळकटी देण्यासाठी सन १६४५ मध्ये महाराजांनी मुरूमदेव किल्ला ताब्यात घेतला. किल्ल्याची डागडुजी करून त्याचे नाव ‘राजगड’ ठेवले व राजगडावर मुक्काम हलवला. तत्कालीन परिस्थितीत किल्ल्यांचे महत्त्व ओळखून महाराजांनी सन १६५६ मध्ये रायरी किल्ला जिंकला. रायरी किल्ल्याला अधिकृत राजधानी घोषित करण्यागोदर राजगड हीच अघोषित राजधानी होती. या संघर्षमय जीवनात महाराजांनी अनेक किल्ले स्वराज्यात जोडले. महाराजांनी रायरी किल्ल्याची दुहेरी संरक्षक तटबंदी बांधून किल्ला अधिक बळकट केला. गडांचा राजा अशी ख्याती लाभलेल्या गडकिल्ल्यास राजधानीचे स्वरूप देऊन महाराजांनी त्याचे नाव ‘रायगड’ ठेवले. दिनांक ६ जून १६७४ रोजी गडावर राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वत:ला रयतेचा राजा घोषित केले. ह्या दिनाच्या निमित्ताने पुरातन किल्ला स्थापत्य इतिहास व जतन-संवर्धनाबाबत थोडक्यात जाणून घेऊया.

आजवर अनेक इतिहासकारांनी स्थापत्य इतिहासास बगल देऊन केवळ तर्क-वितर्कातून सामान्य इतिहास वाचकांसमोर मांडला आहे. परंतु स्थापत्य अवलोकनातून उकल करून समाधानकारक उत्तर मांडल्याचे उदाहरण आढळत नाही; ही वस्तुस्थिती आहे. म्हणून रायगडावर बांधलेल्या शिवपूर्वकालीन इमारतींच्या निर्मितीचा अचूक कालखंड, जागेची उपयुक्तता व त्यांचे नामकरण इत्यादीबाबतीत संभ्रम आढळतात. लेखकाच्या मते, मध्ययुगीन कालखंडात, किल्ला बांधणीत यादवकालीन स्थापत्यप्रभाव दिसून येतो तर कोकण प्रांतातील प्राचीन किल्ला बांधणीत दक्षिण भारतात स्वतंत्र हिंदू राष्ट्र स्थापित केलेल्या विजयनगरच्या राजा कृष्णदेव राय साम्राज्याचा प्रभाव आढळतो. रायगडावरील द्वादशकोनी अलंकृत स्तंभावरील बाल्कनी, अर्धगोलाकार घुमटाखालील भागात कोरलेली शिल्पे तसेच खिडक्यांवरील कोरीव आकृतिबंधातील नक्षीकामावरून त्याचा प्रत्यय येतो. महाराजांनी रायरी किल्ल्याचे नाव बदलून ‘रायगड’ असे ठेवले. ह्या नावात ‘राय’ असा उल्लेख आढळतो. ह्यावरून स्तंभासारखे अप्रतिम कलाकुसरीने नटलेले शिल्प विजयनगर साम्राज्यात बांधले असावे यास पुष्टी मिळते. सतराव्या शतकापर्यंत महाराष्ट्रातील जनता निरनिराळ्या परकीय राजवतींचा जुलूम सहन करत जगत होती. त्यांना ‘स्वतंत्र असणे’ म्हणजे काय असते ह्याचे ज्ञान नव्हते. रयतेच्या मनात सहजी न उमगणार्‍या ‘स्वतंत्र असणे’ व स्वराज्य या कल्पनेस वास्तविकतेत बदलण्याचे बळ छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले. रायगडावरील राज्याभिषेक घटना म्हणजे महाराजांनी रोहिडेश्वर मंदिरात घेतलेल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेची संकल्प सिद्धी होय. ही घटना म्हणजे महाराष्ट्रातील रयतेस गुलामी मानसिकतेतून मुक्ततेचा संदेश देणारी होती. स्वराज्य व स्वतंत्र असणे म्हणजे नेमके काय असते हे रयतेने प्रथमच अनुभवले.

स्वराज्य स्थापनेनंतर अवघ्या सहा वर्षांनी महाराजांचे रायगडावर निधन झाले. शिवछत्रपती ते मराठ्यांच्या अस्तापर्यंत किल्ला हेच सत्तेचे केंद्र राहिले होते. सन १८२० मध्ये मराठ्यांचा पराभव झाला व रायगड ब्रिटीशांच्या ताब्यात गेला. छ. शिवाजी महाराजांबद्दल असलेली नितांत श्रद्धा केव्हाही उफाळून येऊ शकते याचा अंदाज व धास्ती ब्रिटीशांच्या मनात होती. भारतावर सत्ता राबवण्यासाठी इंग्रजांनी किल्ल्यांची गरज संपुष्टात आणून शहर उभारणीवर लक्ष केंद्रीत केले. इतर परकीय राज्यकर्त्याप्रमाणे चाणाक्ष इंग्रजांनी किल्ल्यांना हानी पोहोचवली नाही परंतु किल्ल्यांपर्यन्त जाण्याचे सर्व मार्ग बंद केले. भारतास स्वातंत्र्य मिळेपर्यंतची सलग १२५ वर्ष व स्वातंत्र्यानंतरची ७५ वर्षे असे एकूण दोन शतके किल्ल्यांची पडझड होत राहिली. नैसर्गिक कारणांमुळे होणारी पडझड रोखणे शक्य नसल्यामुळे बहुतांश किल्ल्याची तटबंदी प्रमाणाबाहेर ढासळली आहे तर अनेक किल्ल्यातील इमारती आज अवशेष रूपात उरल्या आहेत.

मध्ययुगीन कालखंडाअगोदर व त्यानंतरच्या मिश्र राजवटींचा उदय व ऱ्हास जवळून पाहिलेल्या किल्ल्यांचा प्रवास सर्वप्रथम लष्करी छावणी ते सत्ता केंद्र यापर्यंत येऊन थांबला. वर्तमान स्थितीत किल्ले हे पर्यटन केंद्र म्हणून उरले आहेत. सामान्य पर्यटक जेव्हा किल्ल्यास भेट देतात तेव्हा त्यांना त्याच्या भव्यतेची प्रचिती येते. सामान्यजन रहात असलेल्या निजी इमारती व राज्यसंरक्षणासाठी बांधलेल्या किल्लासदृश्य बांधकामरचनेत खूप फरक असतो. त्यामुळे पर्यटकांच्या मनात किल्ला रचनेतील तंत्र जाणून घेण्याची उत्सुकता बळावते. महाराष्ट्रात जवळपास ३५० किल्ले असल्याची नोंद आढळते. त्यातील अनेक किल्ले जमीनदोस्त होऊन त्यांचे अस्तित्वही मिटले आहे त्यापैकी काही किल्ले अवशेषरूपात तग धरून आहेत तर काही मोजके किल्ले कमी-अधिक प्रमाणात अस्तित्व टिकवून आहेत.

प्राचीन कालखंडात टेहळणी केंद्राचे कार्य केलेल्या गढीवजा इमारतींनी मध्ययुगीन कालखंडात लढावू किल्ल्याचे कार्य केले. हे सर्व शिवछत्रपतींनी घडवून आणले. आधुनिक काळाच्या सुरूवातीस ब्रिटीशांनी त्या किल्ल्यांचा उपयोग कारागृहासारखा केला. त्यानंतर दिवसेगणिक किल्ल्यांची दुर्गती होत राहिली. ह्या किल्ल्यांची दुर्गती रोखली नाही तर आणखी काही वर्षानंतर हे किल्ले नजरेआड होतील ही वस्तुस्थिती आहे. वर्तमान रायगडावरील चौथर्‍यांच्या अवशेषातून कळून येते. संवर्धन म्हणजे भविष्यात होणारी पडझड रोखणे व पडझड झालेला भाग ज्या मूळ स्थितीत होता त्याच स्थितीत पूर्ववत करणे असा अर्थ अभिप्रेत आहे.

महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांपासून ते राज्यसरकारच्या अधिपत्याखाली असलेले भारतीय पुरातत्व विभाग हे आपापल्या परीने जमेल तसे कार्य करतात. ह्या महत्त्वपूर्ण कार्यात एकसंधता नाही. संवर्धन ही एक शास्त्रोक्त प्रक्रिया आहे. ह्या प्रक्रियेत भविष्यात होणारी दुरवस्था रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करणे ही पहिली प्राथमिकता असते. गतकालीन इमारतींचे जतन करावे की नाही ह्या संदर्भात प्रसिद्ध कला समीक्षक, लेखक तसेच थोर तत्वज्ञानी जॉन रस्कीन ह्यांनी सन १८४९ मध्ये केलेले विधान खूपच समर्पक तसेच बोलके आहे.

“. . . Old buildings are not ours. They belong, partly to those who built them, and partly to the generations of mankind who are to follow us. The dead still have their right in them:
That which they labored for . . . we have no right to obliterate . What we ourselves have built, we are at liberty to throw down. But what other men gave their strength, and wealth, and life to accomplish, their right over it does not pass away with their death . . .”

by John Ruskin 1849, “The Seven Lamps of Architecture” chapter 6
त्या विधानाचा मराठी भाषेतील भावानुवाद असा :-
ते म्हणतात,
“ज्या इमारती आम्ही बांधल्या त्या नष्ट करण्याचा आम्हास पूर्ण स्वातंत्र्य आहे. परंतु ज्या इमारती आम्ही बांधल्याच नाहीत त्या नष्ट करण्याचा अधिकार आम्हाला नाही. खरं तर त्या आमच्या नव्हेत, जर असल्याच तर त्यांच्या, ज्यांनी स्वकष्टाने त्या उभारल्या व त्यांच्या अनेक पिढ्यांनी त्या जतन केल्या. आज त्यांचे पूर्वज जिवंत नसले तरी त्यांचा हक्क अबाधित आहे.”

आपल्या पूर्वजांनी बांधलेले घर असो की पुरातन इमारती त्याचे संवर्धन होणे किती महत्वाचे आहे हे वरील विधानातून कळून येते. म्हणून, गतकालीन किल्ल्यांचा नष्ट झालेला भाग आज ज्या स्थितीत असेल तसाच्या तसा पुढील काळातही सुरक्षित राहील हे पाहणे महत्त्वाचे ठरते. परंतु अशा प्रकारे केलेले कार्य क्वचितच आढळते. आणि पुरातन वास्तूचे संवर्धन म्हणजे संपूर्ण नूतनीकरण नव्हे. नूतनीकरण आणि पुन:स्थापना ह्यात खूप अंतर आहे. नैसर्गिक आपतीमुळे किल्ला बांधणीतील निखळलेले चिरे एकत्रित करून तो भाग जसा होता तसा उभा करणे म्हणजे प्रत्यर्पण. त्यामध्ये कुठेही आधुनिकतेचा लवलेशही दिसता कामा नये. नैसर्गिक कारणामुळे पडझड झालेल्या उर्वरित किल्ल्याच्या संवर्धन प्रक्रियेत पुरातन इमारतीची टिकून राहण्याची क्षमता वाढेल अशा प्रकारचे स्थापत्यतंत्र वापरणे आवश्यक असते. किल्ले, आपल्या पूर्वजांकडून वारसा हक्काने मिळालेला अमूल्य ठेवा आहे. ते आज ज्या स्थितीत आहेत त्याच स्थितीत त्यांचे संवर्धन करून संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे असे लेखकास वाटते.

तसेच, किल्ला परिसरात आधुनिक रूपातील बागबगीचे, सिमेंट अथवा कृत्रिम साधने वापरुन बनवलेले प्राणी अथवा लेजर शो यासारखे कार्यक्रम आयोजित कारणे अयोग्य आहे. त्यामुळे पुरातन जागेतील मूळ चेतना नष्ट होऊन त्या वास्तुमधील रोमांच व आकर्षण कमी होते. अशा कार्यक्रमाऐवजी पुरातन वातावरणाशी  साधर्म्य दर्शवणार्‍या गत दैनंदिन जीवनातील वस्तूंचे तसेच शस्त्राचे प्रदर्शन मांडायला हवे. तसेच गत इतिहासाची काटेकोर माहिती देणारे अभ्यासक व इतिहासकारांची भेट घडवून संवाद घडवून आणणे, ग्रंथवाचन इत्यादींच्या माध्यमातून ३६५ दिवस किल्लातील परिसर कार्यरत राहील अशा योजना आखणे अधिक संयुक्तिक वाटते. ह्या बाबतीत यूरोपियन देशांनी केलेले कार्य वाखाणण्यासारखे आहे. कालांतराने युरोपातील अनेक पुरातन वास्तु लहान मोठ्या शहराच्या मध्यावर आहेत. त्यांनी त्या वास्तूंना शहराचा अविभाज्य घटक मानून त्यांचे रीतसर जतन केले आहे. आजही त्या वास्तु त्या त्या शहराचे सौंदर्य अधोरेखित करतात. हे विशेष. नेमक्या त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील किल्ला वास्तूंचे जतन-संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे. अशा प्रकारची निर्मिती व बदलातून नवीन पिढ्यांना गतकाळ कसा होता हे कळून येईल.

अति प्राचीन कालखंडातील रामायण-महाभारतातील कथित प्रासाद व राजमहालांचे स्वरूप नेमके कसे होते ह्याचे पुरावे आपणास ज्ञात नाहीत. आणखी काही काळानंतर किल्ले देखील नजरेआड होतील. एकीकडे वर्तमान युगात मध्ययुगीन कालखंडातील सामान्य इतिहास, रुमाल व ऐतिहासिक दस्तावेजात बंदिस्त आहे तर दुसरीकदडे त्याच बंदिस्त इतिहासाचे साक्षीदार असलेले स्थापत्यदाखले आपल्या नजरेदेखत जमीनदोस्त होत आहेत. एकदा का ऐतिहासिक दस्तावेजातील पानांना बोलते करणारे स्थापत्यदाखले नजरेआड गेले तर त्या बंदिस्त दस्तावेजातील शब्दांना काहीच अर्थ उरणार नाही.

महाराष्ट्रातील सर्व गडांमध्ये अनोखे निसर्गसौंदर्य लाभलेल्या रायगडावर घेऊन जाणारी रोमांचकारी पायवाट  व रोपवे मार्ग, ओबडधोबड पृष्ठभाग त्यावरील इमारती, ह्याचे आकर्षण सर्वांना आहे. तसेच महाराजांच्या अमर स्मृतींना उजाळा मिळावा, त्यांच्याविषयी असलेला आदर द्विगुणित व्हावा म्हणून रायगडावर तसेच महाराष्ट्रभर प्रतिवर्षी ६ जून हा ‘राज्यभिषेक दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात वारसा हक्काने चालत आलेल्या किल्ल्यांचे महत्त्व जपले जावे किल्ले संरक्षिले रहावेत हा त्यामागचा उदात्त हेतू. त्याचबरोबर किल्ल्यांची दुर्गती रोखण्याचे प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्या भग्न अवशेषरूपातच आपण समाधान शोधत आहोत, ही खर्‍या अर्थाने सामाजिक शोकांतिका आहे. आज इतक्या वर्षांनी देखील शिवछत्रपतींच्या बद्दल असलेला आदर कमी झाला नाही परंतु किल्यांचे संवर्धन जसे व्हायला हवे तसे होत नाही. दर वर्षी दोनपाच दिवसाच्या कार्यक्रमावर लाखो रुपये खर्च होतात. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतरच्या काळात गडावरील नि:शब्दता सतत बोचत राहते. त्याच त्या कार्यक्रमातून आपण नेमके काय साधतो हे आठवले की मन अस्वस्थ होते. ह्यात वेचक बदल अपेक्षित आहे. हा बदल लवकरात लवकर घडून यावा हीच अपेक्षा! उभं आयुष्य हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी खर्ची घातलेल्या ह्या महान योध्यास  मन:पूर्वक अभिवादन व राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

चित्र : विकिपेडियावरून साभार.
– ©️ आर्किटेक्ट चंद्रशेखर बुरांडे 
98192 25101
fifthwall123@gmailcom
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
वीज मापक (Electricity Meter)

 
तंत्रजिज्ञासा [ १९ ]
 
 

दीपक देवधर

 दरमहा एक कागद घरी / दुकानात / कारखान्यात किंवा आस्थापनेत येतो आणि त्या कागदावरील आकडे बघून कुटुंबप्रमुखाचे किंवा ज्याने पैसे द्यायचे आहेत अशा जबाबदार व्यक्तीचे डोके (आणि काही वेळा डोळे) फिरते. मग त्या कागदावरील आकडे कसे चुकीचे आहेत त्याविषयी काथ्याकूट चालू होतो, पुढील महिन्यात ते आकडे कमी कसे करता येतील यावर विचार होतो..आणि काही वेळा त्याप्रमाणे कार्यवाहीसुध्दा होते पण बऱ्याच वेळा, त्या कागदावर लिहिलेले पैसे भरल्यावर पुढील महिन्यापर्यंत काहीच होत नाही. वरील वर्णनातील हा कागद म्हणजे दरमहा येणारे विजेचे देयक(बिल)! वीज पुरवठा करणारी कंपनी, त्यांनी आपल्या घरात बसवलेल्या मापकावरील आकड्यानुसार आपण किती वीज वापरली ते बघते आणि ठरवलेल्या दराप्रमाणे किती पैसे द्यायचे ते कळवते.

हा वीज मापक म्हणजे घरात / आस्थापनेत किंवा जिथे कुठे विजेचा वापर केला जातो तिथे, किती विद्युत उर्जा वापरली ते मोजणारे आणि सांगणारे यंत्र. हे यंत्र जिथे वीज वापरली जाते तिथेच बसवलेले असते आणि या मापकाचे एकक असते किलोवॅट अवर (kilo watt hour–Kwh). म्हणजे १००० वॅट विद्युतभार जर १ तास वापरला, तर या मापकात एका एककाची नोंद होते.

१८८० मध्ये विजेचा व्यापारी तत्त्वावर वापर सुरू झाला आणि किती वीज वापरली गेली याचे मोजमाप करणे गरजेचे झाले. एडिसनने विद्युत यांत्रिकी तत्वावर चालणारा मापक शोधला पण त्यावर पुढे काम न करता विद्युत रासायनिक पद्धतीने मापन करणारे तंत्र शोधले आणि विकसित केले..दिष्ट(DC) स्वरूपात पुरवली जाणारी वीज एका विद्युत घटातून दिली जात असताना, त्या घटातील पत्र्याचे विशिष्ट काळाच्या अंतराने वजन करून, त्यातील फरकावर आधारित वीज वापर ठरवून त्याप्रमाणे देयके तयार करण्याची पद्धत सुरू झाली. पुढे प्रत्यावर्ती (AC) विद्युत धारेचा पुरवठा होऊ लागल्यावर ही वेळखाऊ, कष्टाची आणि अचूक नसलेली मापन पद्धती बंद झाली आणि त्याऐवजी विद्युत यांत्रिकी तंत्रावरील मापन पद्धती विकसित होउन रूढ झाली. १८८९ मध्ये ऑटो ब्लाथी नावाच्या हंगेरीच्या तंत्रज्ञाने ‘प्रवर्तन(इंडक्शन)’ तत्वावर चालणारा ‘किलो वॅट अवर’ मापक तयार केला आणि हंगेरीतील गान्झ कारखान्यात त्याचे व्यापारी तत्वावर उत्पादनही त्याच वर्षी सुरू झाले. पुढे १८९४ मध्ये ऑलिव्हर शालेन्बर्गरने त्याच प्रवर्तन तत्वावर चालणारा पण आतील चकतीच्या फेऱ्या आणि चकती फिरण्याचा वेग, याचे वापरलेल्या ऊर्जेशी अचूक  प्रमाण असणारा मापक तयार केला आणि आजही त्याच तत्वावर वीज मापक चालतात.

मायकेल फॅरेडेने चुंबकीय क्षेत्रात हालचाल करणाऱ्या विद्युत वाहकामध्ये विद्युत धारा तयार होते या तत्त्वाचा म्हणजेच प्रवर्तनाचा शोध लावला. या तत्त्वावर चालणारा मापक चित्र क्र. १ मध्ये दाखवला आहे. तो कसा चालतो ते पाहू.

विद्युत यांत्रिक मापकामधील यंत्रणा

१. विभवांतर वेटोळे ( Voltage coil )- बारीक तारेचे अनेक वेढे असलेले वेटोळे प्लास्टिकच्या डबीत ठेवलेले असते आणि विद्युत भाराला समांतर (parallel) जोडणी केलेली असते.
२. विद्युत धारा वेटोळे ( Current coil )- जाड तारेचे तीन वेढे, विद्युत भाराशी एकसर ( series) जोडणी केलेली असते.
३. स्टेटर- चुंबकीय क्षेत्राचे केंद्रीकरण आणि निर्बंधित ( confines ) करतो.
४.अ‍ॅल्युमिनियमची फिरणारी चकती (अ‍ॅल्युमिनियम चुंबकविरोधी धातू असल्यामुळे त्याच धातूची चकती वापरतात.)
५. चकती थांबवणारी चुंबके
६. गोल आकाराचा गिअर असलेली दांडी.
७. आकडे दाखवणारा दर्शक

विभवांतर आणि विद्युत धारा यांचे सतत मापन करून वापरलेली विद्युत उर्जा मोजण्याचे काम वीज मापक करतो.

चित्रात दाखवलेली चकती दोन तार वेटोळ्यामध्ये तयार होणाऱ्या विरोधी बलांमुळे दोन फेजच्या प्रवर्तन मोटरसारखे काम करते. विभवांतर वेटोळे विभवान्तराच्या प्रमाणात चुंबकीय प्रवाह( flux) प्रवाह तयार करते तर विद्युत धारा वेटोळे विद्युत धारेच्या प्रमाणात चुंबकीय प्रवाह तयार करते. वेटोळे प्रवर्तनशील असल्याने विभवांतर वेटोळ्याचे चुंबकीय क्षेत्र दुसऱ्यापेक्षा ९० अंशाने उशीरा कार्यरत होते, त्यामुळे चकतीवर एडी तरंग ( Eddy Currents) तयार होतात.

एडी तरंग विद्युत वाहकामध्ये त्याच्या भोवतीच्या  चुंबकीय क्षेत्रातील बदलांमुळे तयार होणारे वर्तुळाकार विद्युत तरंग असतात. वाहकाच्या चुंबकीय क्षेत्राला काटकोनात असलेल्या  प्रतलावर तयार होणारे हे तरंग बंद वर्तुळाच्या स्वरूपात वहातात. चित्र क्र. २ मध्ये दाखवल्याप्रमाणे चुम्बकाने तयार केलेल्या (हिरव्या रंगातील ) चुंबकीय क्षेत्राने वाहकाच्या प्रतलावर लाल रंगात दाखवलेले एडी तरंग तयार झालेले आहेत. निळ्या रंगात दाखवलेली चुंबकाच्या दोन कडांना तयार होणारी परस्पर विरोधी चुम्बकीय बले सव्य-अपसव्य दिशा असलेले एडी प्रवाह तयार करतात.

या एडी प्रवाहांमुळे चकतीवर त्या क्षणाला असलेले विभवांतर, विद्युत धारा आणि फेजमधील कोन यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात असलेले  बल कार्यरत होते. स्टेटरमधील कायमस्वरूपी चुंबक चकतीच्या फिरण्याच्या गतीच्या प्रमाणात विरोधी बल चकतीवर प्रभावित करते. या दोन विरोधी बलांमध्ये संतुलन साधण्याच्या प्रयत्नात चकती फिरू लागते आणि तिची गती त्यावेळी वापरत असलेल्या विद्युत उर्जेच्या प्रमाणात असते. चकतीला जोडलेल्या दान्डीवरील गिअरमुळे चकतीच्या गतीला अनुसरून आकडे दाखवणाऱ्या दर्शकाची चक्रे फिरू लागतात आणि आपल्याला किती उर्जा वापरली ते कळते.

चित्र क्र. ३ मध्ये मापकाचे बाह्य रूप दिसते. सध्या आपण वापरत असलेल्या मापकामधे हेच आकडे इलेक्ट्रॉनिक तंत्रामुळे डिजिटल स्वरूपात दिसतात. घरातील किवा आस्थापनेतील कुठले उपकरण किती ऊर्जा ‘खाते’ हे तपासून योग्य कृती केल्यास विद्युत उर्जेच्या वापरावर नियंत्रण आणणे शक्य आहे.

–  ©️ दीपक देवधर
dpdeodhar@gmail.com
( लेख व चित्रे : दै. ‘लोकसत्ता‘मधील ‘तंत्रजिज्ञासा’ सदर तसेच याच नावाच्या लाटकर प्रकाशनाने २०१७ मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकावरून साभार पुनःप्रसिद्ध )
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
भापो

 
थोडक्यात मार्मिक : ३०

कौस्तुभ ताम्हनकर

माणसं दुरावत चालल्याचा एक ताजा अनुभव. प्रभूकाका सकाळी वारले. साहिलला त्याच्या बाबानी गाडी काढायला लावली. बाबा वय वर्षे सत्तरीच्या पुढे. कोणी वारले की मदतीला धावून जायचे हे ठरलेले. त्याप्रमाणे त्यांनी साहिलला उठवले. जरा कुरकुरतच साहिल तयार झाला. डोंबिवलीहून पुण्याला पोहचायचे म्हणजे तीन तासांची  निश्चिंती.

खोपोलीला आल्यावर साहिलने सुहानीला फोन केला.

” आम्ही निघालो… ”
” अरे बापरे… कशाला येताय एवढी दगदग करुन ? ” सुहानी.
“म्हणजे? सासरे वारलेत ना ?” साहिलने सुहानीला आश्चर्याने विचारले.
“अरे हो. पण ते अजून दवाखान्यातच आहेत. बॉडी शवागारात ठेवली आहे. विजय युएसवरुन परस्पर दवाखान्यातच येईल. तिकडूनच त्यांना नेणार. हे कधी होईल ते माहीत नाही, ” सुहानी.

सांत्वन करायला प्रभूकाकांच्या मागे कोणीच नव्हते. बायको वर्षभरापूर्वीच देवाघरी गेली होती. मुले सुना कर्तव्य पार पाडत होती.

” मग काय म्हणतेस, परत जाऊ,” साहिल.
” तेच योग्य होईल. तुझ्या भावना पोहोचल्या.”

साहिलने गाडी वळवली.
साहिलचे बाबा गाडीत बसून दोघांचा संवाद ऐकत होते त्यांनी रुमालाने डोळे पुसले; एक दीर्घ सुस्कारा सोडला.

साहिल आणि सुहानी भाऊ बहीण, हा प्रसंग घडून पंचवीस वर्षे झाली. सध्या ती दोघे दोन ध्रुवावर असल्यासारखी दोन अती लांबच्या देशात राहतात. त्यांची  भेट आजकाल भापो ( भावना पोहोचल्या ) या शब्दांनीच होत असते.

काय बरोबर? काय चूक? उत्तर हुडकणे कठीण आहे. साहिलच्या बाबांच्या भावना साहिलला कशा समजणार? त्याने सत्तरी पार केली तरी बदलणाऱ्या काळाच्या वेगापुढे त्याला वडिलांच्या भावना समजणारच नाहीत.

मरणाचे दु:ख होण्यासाठी मरणाला अवेळ साधावी लागते. त्याच वेळी बांध फुटतात. कडकडून मारलेल्या मिठीत दु:ख विरघळते.
वेळेत सर्व काही झाले तर मरणाचा सोहळा होतो. हे नव्या पिढीला माहित आहे किंवा परिस्थितीने त्यांना व्यवहारी बनवले आहे.

कविवर्य कै. मंगेश पाडगावकर म्हणतात, ‘ भावनांचा तू भुकेला रे मुरारी. ‘
मुरारीला जर का भावना पोहोचतात तर साहिल आणि सुहानीच्या पोहोचलेल्या भावना दुय्यम का ?
कारण त्यात भोळाभाव नाही आहे तो फक्त सोयीस्कर व्यवहार !
कटू असला तरी तोच खरा असतो . आणि तो मान्य करण्यावाचून आपल्याला पर्याय नसतो.

–  ©️ कौस्तुभ ताम्हनकर

९८१९७४५३९३
kdtamhankar@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
चित्रकारांचे दालन
–  ©️ सायना फर्नांडिस 
प्रेषक डॉ. प्रियंवदा कोल्हटकर  
priyakar40@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@@@
 
हत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@

धक्का

कथा 
 
प्रा. (कै.) मनोहर रा. राईलकर

        संध्याकाळचा सहा-साडेसहाचा सुमार असावा. आमच्या क्लबचे नेहमीचे सभासद आज जवळ जवळ दिसतच नव्हते. साहजिकच आहे. पावसानं आज अगदी कहर केला होता. दुपारभर हवा चांगली स्वच्छ होती. पण संध्याकाळी आभाळ एकाएकी भरून आलं आणि जो पाऊस कोसळायला सुरुवात झाली तो मुळी थांबतच नव्हता. असा पाऊस पूर्वी इथं कधी पडला नव्हता, असं लोक म्हणत होते. क्लबचे आम्ही पाचसहा जणच सभासद काय ते जमलो होते. आणि रमी खेळत होतो. पण, खरं तर त्या पावसानं कुणालाच उत्साह वाटत नव्हता. शेटे तर पावसाला एकसारखे शिव्या घालीत होते. आमचा क्लब तळमजल्यावरच होता. पण पावसाचा जोरच इतका की खिडकीतूनसुद्धा इतकं सुसाट पाणी येत होतं, की विचारू नका.

000

क्लबचं मुख्य दार उघडून एक धिप्पाड गृहस्थ डोकावले. “आत येऊ का जरा?” त्यांनी विचारलं. त्यांचा पावसाळी कोट पाण्यानं निथळत होता. हॅटवरचं साचलेलं पाणी ते दारातूनच बाहेरच्या बाजूला झटकीत होते. चांगले सहा फूट उंच होते. शेटे त्यांना म्हणाले. “वा! वा! या, की. येऊ का म्हणजे काय? या ना. बसा.”

पण, आपला ओव्हरकोट न काढताच त्यांनी विचारलं, “वाकडेसाहेब ह्याच क्लबात येतात ना? त्यांना जरा भेटायचं होतं. येतील ना अजून? वाट पहातो मी बाहेर उभं राहून वाटलं तर.”

“ पण, बाहेर कशाला थांबता. आतच येऊन बसा नं. हो. येतात. अगदी नियमितपणं येतात. सहसा चुकवत नाहीत. पण आज काही आले नाहीत खरे. अहो कोण येणार असल्या पावसात आपलं घर सोडून?” शेट्यांनी म्हटलं. “आमच्यासारखी खरी आवड असल्याशिवाय नाही जमायचं.”

“नाही हो त्यांच्या मुलाला पकडलंय ना पुन्हा? त्या गडबडीत असतील,” गोरे म्हणाले.
“मीही त्याचकरता आलो होतो. घरी भेटले नाहीत. त्यांच्या पत्नी म्हणाल्या क्लबात असतील. असो. येतो मी,” असं म्हणून गृहस्थ वळला.

“अहो कॉफी तरी घेऊन जा,” मी म्हणालो. कारण कॉफी आलीच होती तेवढ्यात.
“थँक्स,” पाहुणा म्हणाला अन् कोट बाहेरच्या दारावर लावून खुर्चीवर बसला.

“आपला परिचय?” काण्यांनी विचारलं.
“मी मराठे. रेफरमेटरीचा डायरेक्टर आहे. वाकडे माझे मित्र.”
“तरीच,” शेटे उद्गारले. “त्यांच्या मुलाला ठेवायचं असेल?”
“होय. तसा त्यांचा विचार आहे. पण, ते आता इथं नाहीत. मी उद्या त्यांना त्यांच्या घरीच भेटेन.”
“का हो मराठे? तुम्हाला काय वाटतं सुधारेल का हा वाकड्यांचा मुलगा? की आपलं…”
“हॅ!” काण्यांनी मध्येच तोंड घातलं, “अहो रिमांड होम काय मुलं सुधारण्याकरता असतात? आणि असली गुंड मुलं तर कधीच सुधारायची नाहीत. काय मराठेसाहेब?”
“कदाचित्,” मराठे मोघमच उत्तरले. तेवढ्यात पोऱ्यानं कॉफी ओतून सगळ्यांना कपबशा दिल्या.

“अहो ही चटावलेली पोरं. लहानपणापासून मवालीगिरी करायची सवय लागलेली. अशी तशी सुटते थोडीच?”  मी म्हटलं.

तेवढ्यात वीजच गेली. दोनतीन मिनिटं स्तब्धतेत गेली. गोऱ्यांनी आपला लायटर पेटवून उजेड पाडला. पण, शेट्यांनी तितक्यात पोऱ्याला सांगून वाण्याकडून मेणबत्त्या आणवल्यासुद्धा. मेणबत्त्यांच्या उजेडात पुन्हा एकेकदा सगळे कॉफी घेऊ लागलो.
“मराठेसाहेब, बसा. कुठं जाता इतक्या अंधाराचे? आता काही तासभर दिवे येत नाहीत. हा पाऊस बघा टिपऱ्या बडवल्यासारखा पडतो आहे,” मी आग्रह केला. मग मराठेही थोड्या नाखुशीनंच पण, थांबले.
“मी सांगतो, ही मुलं,” शेट्यांनी पुन्हा सूत्र पकडलं, “कध्धी म्हणून सुधारणार नाहीत.” त्यांनी कप जोरात बशीत आदळला.

“शेटेसाहेब,” काण्यांनी चिमटा काढला, “अहो त्या पोरांचा राग कपबशीवर का काढता का? का हो जोशीसाहेब,” काणे म्हणाले, कारण ते इतका वेळ गप्प गप्पच होते. “तुमचं काय मत?”
आमचे जोशी कॉलेजात प्राध्यापक होते. पण स्वभावानं म्हणजे प्रतिसानेगुरुजीच. मुलं म्हणजे फुलं, इत्यादी. त्यांचं चालायचं. आता तर त्यांना संधीच चालून आली. “तुम्हाला काय कळणार मुलांच्या भावना?” नाकात तपकीर कोंबीत ते म्हणाले.
बापरे जोशींनी तपकिरीचा बार भरला की आता पंधरा मिनिटांची निश्चिंती. भाषण, नि ते अगदी सानेगुरुजी छापाचं. ते म्हणायचे, “असल्या प्रत्येक रिमांड होमवर सानेगुरुजीच पाहिजेत. मुलांना कसं जोपासावं, कसं वाढवावं…”
“टिंगल पुरे हो गोरे,” काणे म्हणाले. “काही झालं तरी आपली माहिती ऐकीवच. अगदी आपल्या जोशींचीसुद्धा. एवीतेवी हे मराठे आलेच आहेत. का हो मराठेसाहेब? आम्हाला ऐकवा की काही किस्से. नाही तरी तासभर काही पत्तेही खेळता यायचे नाहीतच. अन् पाऊसही थांबायची लक्षणं नाहीत. का हो मंडळी. तुमचं मत काय?”
“आमचं अनुमोदन आहे,” गोरे उत्तरले. मग, मी पोऱ्याला काही खायला अन् कॉफी आणायला सांगितलं. आणि सगळे सरसावून बसलो. मराठ्यांनी अगदी शांतपणं आपले गमबूट काढले. खिशातून पाईप काढून तो ते साफही करू लागले. पाईप साफ करता करता ते बोलू लागले. पाईप साफ करून झाल्यावर त्यांनी खिशातून पिशवी काढली नि पाइपात तंबाखू भरला.

“तुम्ही म्हणता ते खरं आहे शेटेसाहेब. गुन्ह्याची सवय लागलेली मोठी माणसं एक वेळ सुधारतील. पण, बारा ते सोळासतरा वर्षांची मुलं कमालीची हट्टी. मोठ्या माणसांना शारीरिक, मानसिक शिक्षेची तरी भीती वाटते. पण, ह्या आडवयातली मुलं कमालीची हट्टी असतात. त्यांना मारा ठोका, गोड बोला. कसंही वागवा. त्यांच्या वागण्यात काहीही फरक पडायचा नाही.
“खरं सांगायचं तर प्रत्येक मुलगा नि मुलगी भूमितीतल्याप्रमाणं स्वतंत्र रायडर असतं. आणि जसं प्रत्येक रायडर सोडवण्याची पद्धत वेगळी त्याप्रमाणं प्रत्येक मुलगा मुलगी सुधारण्याची पद्धतही वेगळी. आणि काही रायडर जसे आपल्याला कधीच सुटत नाहीत तशी काही मुलं कधीच सुधारत नाहीत. निदान असं वरवर वाटतं. किंवा काही रायडर कसे सोडवायचे ते आपल्याला माहीत नसतं, असं म्हणा हवं तर.”
“वा मराठेसाहेब. रेफरमेटरीमध्ये बसून भूमितीतली उदाहरणं सोडवता वाटतं?”

मराठ्यांनी फक्त स्मित केलं. “आणि रायडर सोडवायला लागणारं कौशल्य प्रत्येकाकडे नसतं. तसं मुलं सुधारण्याचं कौशल्यही सर्वांजवळ नसतं. त्याला खरोखरीच सानेगुरुजींचं हृदय हवं.”
“बघा शेटेसाहेब,” इति जोशी. “तुमची कामं नव्हेत ही. तुम्ही फक्त खऱ्याचं खोटं नि खोट्याचं खरं करावंत. आणि पक्षकारांचे खिसे कापावेत.”
यावर शेटे काही खरमरीत उत्तर देण्याच्या आविर्भावात आले. पण, त्या दोघांच्या वादात कुणालाच रस नव्हता. मराठे काय म्हणताहेत ते सर्वांनाच ऐकायचं होतं. म्हणून मीच झटक्यात म्हटलं, “तुमचा काय अनुभव आहे मराठेसाहेब? अगदी हाताबाहेर गेलेला मुलगा सुधारण्याचा?”

“मला अजून तितकासा अनुभव नाही. पण मला एक उदाहरण माहीताय. आता ते ऐका नि मग तुम्हीच ठरवा की वाह्यात मुलगा सुधारतो की नाही आणि कशानं सुधारतो ते.” विझलेला पाईप पुन्हा पेटवीत मराठे उद्गारले. आम्ही सगळे त्यांची पाईप पेटवण्याची क्रिया एकाग्रतेनं पहात होतो. हातावर ठोकून त्यांनी तो स्वच्छ केला नि पुन्हा त्यात तंबाखू भरली.  आणि पेटवला. आमची उत्कंठा मुद्दामच ते ताणीत होते की काय कुणास ठाऊक?
“पूर्वी इथं एक रेक्टर होते. अन् बरं का जोशीसाहेब, योगायोगानं त्यांचं नावही सानेच होतं. अतिशय प्रेमळ. रेफरमेटरीमधली मुलं म्हणजे त्यांना आपलीच मुलं वाटत.”
“शेटेसाहेब,” पुन्हा जोशी.
“अहो ऐका तरी त्यांचं पुरतं. कशी त्या साने रेक्टरांची कशी जिरली त्याची हकीकत सांगताहेत. काय मराठेसाहेब, असंच ना?”
पण मराठे नुसतेच हसले. पाईपचा एक दमदार झुरका घेऊन त्यांनी पुढं सुरुवात केली. त्यांनी डोळे मिटले. आणि बहुधा वाक्याची जुळवाजुळव करीत असावेत.

000

“त्यांच्या वेळी मानसशास्त्राचं फॅड इतकं पुढं गेलेलं नव्हतं. जर फॅड शब्द जोशीसाहेबांना चालत असेल तर,” मराठे मिस्किलपणं म्हणाले.
मराठे कथा सांगतात:
अहो तीसबत्तीस वर्षांपूर्वीचा काळ तो. स्वातंत्र्यापूर्वीचा. पण साने मात्र मानसशास्त्राच्या साह्यानंच मुलं सुधारायचा अगदी प्रामाणिक प्रयत्न करायचे. नि इतर सगळे अधिकारी त्यांची त्यावरून टिंगल करायचे. पण, सान्यांचं स्थानच खूप मोठं होतं. त्यामुळं त्यांचं त्यांना ऐकावं लागे.

तशी फार मुलं नव्हती. काही तरी बारातेराच असतील. मुलींचा भाग वेगळा असायचा. तिथं सानेबाई देखरेख करायच्या. त्यांना सगळे आक्का म्हणात. प्रेमळपणात आक्का अन् साने ह्यांच्यात जणु चुरस असे.
नाना प्रकारच्या अपराधांकरता पकडलेली मुलं असायची. कुणी चोरी, कुणी दरोडेखोरी, कुणी मारामारी. पण आजवर खुनासाठी पकडलेलं कुणी आलेलं नव्हतं तिथं. नि तेवढंच कमी नसावं म्हणून की काय, एक दिवस एका तेराचौदा वर्षांच्या मुलाला दोऱ्या बांधून आणलं होतं. त्याला सान्यांपुढं उभं करताच त्यांनी हुकूम सोडला, “त्याच्या दोऱ्या सोडा.”

“साहेब, इन्स्पेक्टर घाबरत म्हणाला, ‘पण, त्यानं खून केलाय साहेब एका माणसाचा.”
“तुम्ही कृपा करून गप्प बसा. मला सर्व केस माहीत आहे. प्रथम त्याच्या दोऱ्या सोडा.” इन्स्पेक्टरानं हवालदाराला खूण केली. आणि आता काय होतं ते पाहू लागले.
‘तुझं नाव काय बाळ?’
“वना, तो गुर्मीत म्हणाला. तुमच्यासमोरच्या कागदात काय लिहिलंय ते वाचा की.”
“बाळ इकडे ये,” सान्यांचा शांतपणा पाहून इन्स्पेक्टर चमकला. बहुधा नवाच असावा. बाकीच्यांना चांगलीच माहिती होती.
“हे पहा जेलरसाहेब,” वनानंच सान्यांना दम भरला, “तुमचं ते प्रेम बीम पाघळू नका. ते बाकीच्या पोरांकरता ठेवा. मी मस्त मार खाईन. त्याशिवाय पोटच भरत नाही. पहिलं बाबा मारी. मग पोलीस मारीत. आता तुम्ही मारा. मला मस्त सवय आहे मार खायची. त्याशिवाय पोटच भरत नाही माझं, म्हटलं ना.”

साने जरा चपापले. इन्स्पेक्टरनं हवालदाराला डोळा घातला. सान्यांनी वनाचा सगळा इतिहास वाचायचं ठरवलं. त्यांनी वॉर्डरला सांगितलं, याला आंघोळ जेवण उरकू द्या. आणि विश्रांती घेऊ द्या. संध्याकाळी बघू. त्यांना हे प्रकरण नवीन होतं. सामान्यतः आतापर्यंतची बहुतेक मुलं बाळ ह्या एकाच शब्दानं त्यांना वश व्हायची. काही कमी, काही जास्त वेळात. पण व्हायची. मात्र, हे प्रकरण निराळंच दिसत होतं. म्हणून काही निराळा विचार करायला हवा असं त्यांनी ठरवलं.
इन्स्पेक्टरला वाकुल्या दाखवीत वना वॉर्डरबरोबर गेला.

000

खानदेशातल्या एका खेड्यातला हा मुलगा. बापाची प्रचंड शेती होती. तो नि त्याचे मोठे तीन मुलगे शेतातून सोनं पिकवीत. आणि खरंच सोनं म्हणजे तागडीनं मोजावं असं. कापसाच्या एकेका बाजाराला पन्नास हजार सहज मिळत. सगळ्यांनाच पैसा मिळवायचा नाद लागला. अन् वनाकडे दुर्लक्ष झालं. परिणामी तो वाया गेला. भ्यायचा काय तो आईला. पण तीही त्याच्या वयाच्या अकराव्या वर्षी म्हणजे लवकरच, मरून गेली. त्यामुळं त्याच्यावर कुणाचा दाबच राहिला नाही. मग त्याच्या खोड्या सुरू झाल्या. नाही तरी वाहत्या पाण्याला योग्य वाट करून दिली नाही की ते भलतीकडेच वाहू लागतं, अन् पसरायला लागतं. तीच अवस्था वनाची झाली. कुणाची गुरं पळव, बकरा कापून टाक, मुलींना त्रास दे, झोपड्या पेटव. एक ना दोन. बापाकडे तक्रारी येताच तो कसलाही विचार न करता किंवा काय घडलंय याची कसली चौकशीही न करता त्याला यथेच्छ झोडपून काढी. एकदा तर त्यानं इतका झोडपला, की, वना दोन दिवस बेशुद्ध होता. प्रकृतीनं जबरदस्त. पण शुद्धीवर आल्यावर त्याच्या मनाचा पीळ आणखी घट्ट झाला. आणि खोड्यांचं प्रमाण आणखी वाढलं.

एक दिवस वनानं जत्रेमध्ये काही मुलींची छेड काढली. त्यांच्याबरोबर त्यांचे भाईबंद होतेच. त्यांनी वनाला चांगला चोपला. अन् विहिरीच्या पाण्यात चांगला पंधरावीस वेळा बुचकळून काढला. अन् शेवटी तो बेशुद्ध झाल्यावर त्याला तिथंच टाकून तो मेला असेल अशा भीतीनं पळून गेले. जत्रेला येणाऱ्या कुणाचं तरी लक्ष गेलं म्हणून तो वाचला. तीनचार दिवसांनंतर चांगला बरा झाल्यावर तो घरी आला. सगळेजण झोपल्यावर रात्रीचा कुऱ्हाड घेऊन लपत छपत आपल्याला बुडवण्याच्या कामात पुढाकार घेणाऱ्याच्या घरी गेला. बिचारा उन्हाळ्याचे दिवस म्हणून बाहेरच खाटेवर झोपला होता. वना त्याच्या छातीवर बसला. आणि म्हणाला बोल कोण वाचवतो तुला आता ते. त्यानं मरणाच्या आकांतानं ओरडा केला. तेव्हा त्याची बायकामुलं पटापटा बाहेर आली. ते बघताच वनानं त्याच्या गळ्यावरनं कुऱ्हाड फिरवली. आणि पळाला. बायकोनं हंबरडा फोडला. तशी माणसं धावत आली.
त्याला पकडण्याकरता सगळे लोक कुऱ्हाडी बंदुका घेऊन निघाले. सहा दिवसांनी तो पोलिसांना सापडला. आणि अल्पवयीन म्हणून ज्युवेनाईल कोर्टातून त्याला नुकतंच इथं रेफरमेटरीत आणलं होतं.
संध्याकाळी चार वाजता तो उठल्याचं कळल्यावर साने त्याच्या खोलीत आले, ‘काय बाळ कसं काय वाटतंय?’
“हे पहा सानेसाहेब, तुमचं ते बाळ बाळ बस्स करा. पुन्हा म्हणालात ना तर हे स्टूल घालीन डोक्यात.”
साने म्हणाले, “इतकंच ना? मग आत्ताच का घालीत नाहीस?” वना जरा चपापला. त्यानं स्टूल खाली ठेवलं. सान्यांना जरासा आशेचा किरण दिसला. पण ते म्हणाले, “नाही म्हणत मी तुला बाळ. मी आपला वना नावानंच हाक मारीन. मग तर झालं?”
नंतर त्यांनी चौकशी केली, तुला काय आवडतं, काय काय येतं घरी कोण कोण माणसं? पण त्यानं एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. तो घुम्यासारखा बसूनच राहिला.
इतर मुलांना एकदोन महिन्यांनी कुणी ना कुणी भेटायला येत असे. प्रत्येक मुलाच्या वाढदिवसाला त्याला खास घरी बोलवायचं आणि त्याच्या आवडीचा पदार्थ करायचा, अशी आक्कांची पद्धत होती. पण, वना काही बोलायलाच तयार नसे. त्यामुळं त्याची आवड कशी समजणार? पण, तो खानदेशचा म्हणून वाढदिवसाला त्यांनी डाळबाट्या केल्या.

वना जरा खूष झालेला दिसला. आक्कांना आणि सान्यांना जरा बरं वाटलं. आणि आशाही वाटू लागली. पण वना आपला गप्पच होता. सान्यांना वाटलं आता थोडा प्रयत्न करायला हरकत नाही. म्हणून ते म्हणाले, “वना अरे आज आक्कांनी डाळबाट्या का केल्या आहेत ते माहिती आहे का?” त्यानं का उत्तर दिलं नाही तेव्हा ते म्हणाले, “अरे, आज तुझा वाढदिवस ना म्हणून.” त्यासरशी तो खवळला. त्यानं ताट उडवून दिलं आणि तो बाहेर गेला. सान्यांना काही कळेना जसजसं प्रेमानं जिंकायला जावं तसतसा चेव येऊन तो अधिकच खवळे.
सान्यांचे सहायक पवार एकदा म्हणाले, “सानेसाहेब, वना इतर मुलांना फार त्रास देतो. त्याला काही तरी शिक्षा करायला हवी. निदान कोंडून तरी ठेवलं पाहिजे.”
साने म्हणाले, “पवार, मला जे कधीच मान्य व्हायचं ते नाही ते तुम्ही पुन्हा पुन्हा का सांगता? बस्स. ह्या विषयावर पुन्हा मला तुम्ही सांगू नये हे उत्तम?”
पवार बिचारे खालच्या मानेनं निघून गेले.
जवळ जवळ दीड वर्षं गेलं. पण वना सुधारण्याचं चिन्हच नव्हतं. उलट त्याचा स्वभाव अधिकाधिक उग्र होऊ लागला. साने दिवसेंदिवस अस्वस्थ होऊ लागले. त्यांना स्वतःचा हा पराभव डाचत होता. पवार आणि इतर लोक ह्यांचं म्हणणं खरं असावं असं त्यांना वाटू लागलं, पण तरीही काही झालं तरी त्या मार्गानं आपण जायचं नाही म्हणजे नाही, असा त्यांनी निश्चय केला.
000
पण नियती वेगळीच होती. एक दिवस कशावरून तरी वनाचं नि एका मुलाचं भांडण झालं. वना त्या मुलाच्या छातीवर बसला. त्याचे कान धरून तो त्याचं डोकं जमिनीवर आपटू लागला. पोरगा प्रथम प्रथम ओरडत होता. नंतर बेशुद्ध झाला. बाकीच्या मुलांनी आरडाओरडा करून वॉर्डरला बोलावून आणलं. दोघातिघांनी मिळून वनाला बाजूला केलं. सान्यांना कळताच ते धावत आले. बेशुद्ध मुलाला त्यांनी हॉस्पिटलात पाठवलं. आणि ते वनाकडे वळले. पवारांना त्यांनी छडी आणायला सांगितलं. पवारांनी ती आनंदानं आणली. सान्यांनी डोळे मिटून वनाला चोपण्यास सुरुवात केली. सान्यांचा हा अवतार सर्वांनाच नवीन होता. ते सगळे भयभीत झाले. पण मनातून सगळ्यांना बरंही वाटत होतं.
वना हूँ की चूँ करीत नव्हता. तितक्यात आक्का बाहेरून आल्या तेव्हा त्यांना कळलं. त्यांनी वनाला बाजूला केलं. त्यात त्यांनाही एक छडी बसलीच. तेव्हा साने थांबले. “ह्याला कोंडून घाला,” इतकंच बोलून ते मटकन खुर्चीत बसले. त्यांची सारी शक्तीच संपून गेली होती. त्यांच्याकडे बघवत नव्हतं. शेवटी आक्कांनी आणि पवारांनी मिळून त्यांना त्यांच्या खोलीत नेऊन निजवलं.

000

दुसऱ्या दिवशी आक्का सान्यांना उठवायला गेल्या तेव्हा त्यांना त्याचं शरीर गार लागलं. त्या किंचाळल्या त्यांनी नोकराला बोलावलं. अन् डॉक्टरांना बोलावणं पाठवलं. सगळीकडे धावाधाव सुरू झाली. कुणाला काही सुचेना. डॉक्टर आले. ते म्हणाले, ह्यांनी झोपेच्या गोळ्या जास्त प्रमाणात घेतल्या आहेत. पण आता काही उपयोग नाही.

आक्का रडत रडत म्हणाल्या, “अहो ते रात्री जवळ जवळ बेशुद्धावस्थेतच झोपले होते.” तितक्यात त्यांचं लक्ष दिव्याकडे गेलं. दिवा अजून जळतच होता. तो बंद करायला त्या गेल्या तेव्हा त्यांना टेबलावरची तीन पाकिटं दिसली. एकात मृत्युपत्र आणि आक्कांना पत्र, मी स्वखुशीनं आत्महत्या करीत आहे, त्याकरता कुणालाही दोषी धरू नये. दुसरं पत्र वरिष्ठांना. सर्व हकीकत कळवून आपण त्यागपत्र देत असल्याचं. तिसरं पत्र वनाला.
वनाला पत्र लिहिल्याचं कळताच सर्वत्र हलक्या आवाजात कुजबूज सुरू झाली. काय झालं असेल? कुणाला कळेना वनाला पत्र कसं काय नि त्यात काय असेल? बरं त्यावर खाजगी असं लिहिलेलं असल्यामुळं कुणाला फोडताही येईना. तरी पवार म्हणाले, “आपण फोडून पाहुया आत काय लिहिलंय ते.” तेव्हा आक्का रागावल्या, “पवारसाहेब ते तुमचे वरिष्ठ होते. त्यांच्या इच्छेचा अनादर करू नका.” तेव्हा, पवार थांबले. त्यांनी ते पत्र शिपायाबरोबर वनाकडे पाठवलं.
शिपायानं पत्र खिडकीतून वनाकडे टाकलं आणि तो म्हणाला, सानेसायबांनी जीव दिला.
वना ताडकन उठून बसला. त्यानं पत्र फोडलं आणि तो ते वाचू लागला.
बाळ वना, अनेक आशीर्वाद,

मी तुला बाळ म्हटलेलं आवडत नसे. पण आता हे शेवटचंच. उद्या मी ह्या जगात नसेन. मला अहंकार होता की मी तुला प्रेमानं जिंकेन. पण मी हरलो. मी तुझ्यावर भयानक अत्याचार केला. मला आता सद्गती मिळणार नाही. पोटच्या पोराप्रमाणं तुझ्यावर माया केली आणि वैऱ्याच्या मुलाप्रमाणं तुझ्यावर हात टाकला. मला क्षमा कर करशील ना? तुझा जेलरसाहेब.
पत्र वाचताच वनानं हंबरडा फोडला. “सानेसाहेब, सानेसाहेब. मी सानेसाहेबांचा खून केला. मला फाशी द्या, मला फाशी द्या. मला सानेसाहेबांना पाह्यचंय, मला त्यांना भेटायचंय,” तो सारखा ओरडत होता. शेवटी शिपायानं त्याला दम भरला, आक्कांना त्रास होतोय.
वनानं मग गयावया केली, “आक्कांना निरोप सांगा की मला सानेसाहेबांना बघायचंय.”
शिपाई म्हणाला, “कशाला? सानेसाहेबांना मारून तुझे डोळे निवले नाहीत वाटतं? आता आक्कांना मारायचा विचार दिसतोय.”
“नाही हो. तुम्ही आक्कांना एवढं सांगाच. एवढी भीक घाला मला.” शिपायानं आक्कांना निरोप दिला. त्यावर त्या म्हणाल्या, “पवारसाहेब घेऊन या त्याला.”
“पण आक्का…”
“पण नाही नि बीण नाही,” आक्का ओरडल्या. “मी सांगत्ये ना? ताबडतोब त्याला घेऊन या.”
पवार मुकाटयानं गेले अन त्याला मानगुटीला धरून घेऊन आले.

वनानं सानेसाहेबांच्या पायावर झेप घेतली. अन त्यांचे पाय धरून तो धाय मोकलून तो रडू लागला. आक्का त्याच्या पाठीवरून हात फिरवू लागल्या. अर्ध्या तासानं सान्यांचा देह नेला तेव्हाही त्याचं रडं थांबलं नाही. जणु गेल्या सोळा वर्षांचं रडं तो आत्ता रडून घेत होता.
सान्यांच्या जागी पवारांचीच नेमणूक झाली. आणि आक्का जागा सोडून गेल्या. पण वना त्या दिवसापासून साफ बदलला. वाघाची अगदी शेळी झाली. सगळ्यांना चमत्कार वाटू लागला. सान्यांना जिवंतपणी जे साधलं नाही ते त्यांच्या मृत्यूनं साधलं होतं, असं म्हणायला हवं.
मग वनानं अभ्यास करायचं ठरवलं. पवारांनीही शिफारस केली. दोन वर्षांतच तो एसेस्सी. झाला. मग पवारांनी त्याला कॉलेजातही घातला. अठराव्या वर्षानंतर त्याला रेफरमेटरीत ठेवता येत नव्हतं. वनात होत असलेले बदल पवार वेळोवेळी आक्कांना कळवीतच होते. म्हणून मग आक्कांनी त्याला आपल्याकडे नेलं. हळुहळू शिकत शिकत वना एमेस्सी झाला. त्याला एका कॉलेजात प्राध्यापकाची नोकरीही मिळाली.

000

कथा संपल्याचं कुणाला कळलंच नाही. बोलणं थांबवून मराठ्यांनी गमबूट चढवायला सुरुवात केली. पाऊसही थांबला होता. आम्ही सगळे चकित होऊन पहात होतो. गमबूट चढवून झाल्यावर त्यांनी रेनकोट चढवला. त्याची कॉलर सारखी करता करता ते म्हणाले, “आणि त्यांनी ती नोकरी सोडली…”
“का? का? का पण?” आम्ही सगळेच ओरडलो.
मराठ्यांचे बूट घालून झाले होते. पण, आमच्या प्रश्नावर उत्तर न देता ते दारापर्यंत गेले. डाव्या हातानं डोक्यावरची हॅट सारखी करून त्यांनी उजव्या हातानं शर्टाच्या खिशातलं कार्ड बाहेर काढलं नि विमानासारखं आमच्याकडे भिरकावलं नि बाहेर पडून दार ओढून घेतलं. आम्ही सर्व स्तंभित झालो होतो. पण, त्यांची गाडी चालू झाल्याचा आवाज ऐकला आणि आम्ही सगळे भानावर आलो. गोऱ्यांनी कार्ड उचललं आणि त्यावरचं नाव मोठ्यानं वाचलं,
“वना बाळा मराठे, एमेस्सी (गणित).”

00000

( पूर्वप्रसिद्धी : ‘वाङ्मयशोभा’ सप्टेंबर १९७३ )
प्रा. (कै.) मनोहर रा. राईलकर
railkar.m@gmail.com
9822067619
[ वरील कथा प्रा. ( कै.) मनोहर रा. राईलकर यांच्या पत्नी श्रीमती मीरा म. राईलकर, तसेच त्यांचे पुत्र डॉ. आनंद व डॉ. मुकुंद राईलकर यांच्या अनुमतीने ( दि. २५ जानेवारी २०२३ च्या ईमेलद्वारे ) ‘मैत्री’मध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहे.  ]
 
@@@@@@@@@@@@@@@@@
 
नवीन मुखपृष्ठ : गोकाकचा धबधबा – सचिन उपाध्ये
 
@@@@@@@@@@@@@@@@@
द्वंद्व
 
 
कडबोळे : ९२
 
डॉ. अनिल जोशी
प्रत्येकाला  पचवावं लागतं एक  द्वंद्व
ममता आणि काम
जीवनदान आणि वंशसातत्य
वर्तमानात डोकावणारा इतिहास
आणि
भविष्यात पाय पसरणारं वर्तमान….
काही प्रबुद्ध वेळेवर पळून जातात  बोहल्यावरून
काही नंतर  पळतात
आपल्याला यातलं काहीच जमत नाही
आपण बापुडे, जातो या  द्वंद्वाला सामोरे.
या  द्वंद्वाचे  संभाव्य परिणाम दोन
अंतहीन कुत्तरओढ किंवा मुक्ती.
दोनच पर्यायात निवड करण्याचं कारण काय?
अंकरेषेवरचा शून्य मिळवणं इतकं सोपं ना राव !!

–  ©️ डॉ अनिल यशवंत जोशी

९४२२६४७२८३
jaysss12@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
कहाणी घटस्फोटाची..

 
मुक्त अनुवाद अजित पाटणकर

ही गोष्ट मी लिहिलेली नाही. आंतरजालावर तीन / चार वर्षांपासून अधूनमधून ही गोष्ट डोकावत असते. लेखक कोण आहे ते माहित नाही. मूळ हिंदीत असलेली ही गोष्ट खरी आहे का काल्पनिक आहे, ते देखील माहित नाही.. गोष्ट छान लिहिली आहे एवढे मात्र निश्चित. तपशिलात आवश्यक ते बदल करून हा मुक्त अनुवाद ‘मैत्री’च्या वाचकांसाठी…  

राधिका आणि नवीन यांचा घटस्फोट न्यायालयाने मंजूर केला. त्या आदेशाची प्रत घेऊन दोघेही कोर्टाबाहेर पडले. दोघांचेही काही नातेवाईक त्यांच्यासोबत होते. त्यांच्या  चेहऱ्यावर विजय आणि सुटकेची भावना स्पष्ट दिसत होती. चार वर्षांच्या अटीतटीच्या दीर्घ लढाईनंतर अखेर आज निर्णय लागला होता. आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे, घटस्फोटाच्या अटीशर्तींसाठी वकिलांनी केलेला शब्दच्छल, हे सारे संपले होते. दोघेही कायदेशीररित्या लग्नाच्या बंधनातून मुक्त होऊन विभक्त झाले होते.. एका प्रकारच्या मुक्तीची अनुभूती होत होती.

त्यांच्या लग्नाला दहा वर्षे झाली होती त्यापैकी चार वर्षे घटस्फोटाच्या कार्यवाहीत गेली.

राधिकाच्या हाती स्त्रीधन आणि इतर काही वस्तूंची यादी होती. घटस्फोटापूर्वी ते ज्या घरात राहात होते तेथून ह्या वस्तू आणायच्या होत्या. शिवाय कोर्टाच्या निर्णयानुसार नवीनने राधिकाला दहा लाख रुपये एक रकमी पोटगीदाखल द्यायचे होते.
नवीन आणि राधिका त्यांच्या घरी पोहोचले. राधिकाला तिच्या हातातील यादीनुसार दागिने व इतर वस्तू गोळा करायच्या होत्या.चार वर्षानंतर ती सासरच्या घरी आली होती. मात्र ही शेवटची वेळ होती. त्यानंतर पुन्हा या घराशी संबंध उरणार नव्हता.

राधिका, तिची आई आणि नवीन वगळता सोबतचे बाकी नातेवाईक आपापल्या घरी गेले होते. नवीन या घरात गेली चार वर्षे एकटाच राहात होता.. त्याचे आई, वडील, भाऊ  हे सर्व आजही गावीच राहत होते. राधिका आणि नवीनचा एकुलता एक  मुलगा आता सात वर्षांचा झाला होता. कोर्टाच्या निर्णयानुसार त्याचा ताबा राधिकाकडे देण्यात आला होता. नवीन महिन्यातून एकदा त्याला भेटू शकत होता.

घरात प्रवेश करताच राधिकाच्या आठवणी ताज्या झाल्या. किती कष्टाने तिने हे घर सजविले होते. एक एक वीट लावत जसे घर आकाराला येते तसे तिने हे घर सजविले होते. एक एक गोष्ट विचारपूर्वक जमविली होती.त्यामुळे तिचा जीव गुंतला होता त्यात. लहानपणापासून उराशी बाळगलेल्या स्वप्नाची परिपूर्ती झाली होती.

कोर्टातून परतल्यावर नवीनला शारीरिक व मानसिक थकवा वाटू लागला. तो सोफ्यावर आडवा झाला आणि राधिकाला म्हणाला, “तुला जे हवे ते घेऊन जा. मी तुला अडवणार नाही. मग ते तुझ्या यादीत असो वा नसो.” सर्व सामान एका खोलीत ठेवले होते.

राधिका देखील दमलेली होती. मनावरील ताण हलका झाला होता. तिने नवीनकडे पाहिले. चार वर्षात किती बदल झालाय त्याच्यात.. पांढरे केस डोकावू लागले होते. फार वाळला होता. चेहऱ्यावरील तेज नाहीसे झाले होते.

त्यांचा प्रेमविवाह होता आणि राधिकाच्या घरच्यांनी त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न करून दिले होते. पण त्यांच्या या प्रेमाला कुणाची तरी नजर लागली. नवीनला दारूचे व्यसन लागते. एकदा त्याने दारूचे नशेत राधिकावर हात उचलला होता. रागाने राधिका माहेरी निघून गेली होती.

त्यानंतर चूक कुणाची यावरून राधिकाची आई आणि नवीनचे आई वडील यांच्यात जुंपली.. एकमेकांची उणीदुणी काढताना, वाद वाढत वाढत प्रकरण घटस्फोटापर्यंत आले. ना राधिका घरी परतली ना नवीन तिला आणायला गेला.

गीतकार राजेद्र कृष्ण यांच्या शब्दात सांगायचे तर…

हम से आया न गया, तुम से बुलाया ना गया
फ़ासला प्यार में, दोनों से मिटाया ना गया

राधिका गतकाळाच्या आठवणीत गुंगली असताना तिच्या आईचा आवाज आला, “तुझं सामान कुठे दिसत नाहीये. या दारुड्यानं विकून तर नाही टाकलं ?”

“आई, तू गप्प बस,” राधिका खेकसली. नवीनला दारुड्या म्हटलेले तिला आवडले नव्हते.

त्या खोलीतील सामान यादीप्रमाणे तपासून घेतले. घरातील इतर खोल्यांमधील वस्तू देखील एकत्र करून ठेवल्या.

राधिकाने फक्त आपल्या वस्तू घेतल्या. मग तिने सासरच्या मंडळींनी दिलेल्या दागिन्यांची पिशवी नवीनच्या हातात दिली. ती पिशवी राधिकाला परत करत नवीन म्हणाला, “ तुझ्याकडेच असुदे, मला त्याची गरज नाहीये. ”

दहा-पंधरा लाखाचे दागिने होते ते.

“का बरं?, तिकडे कोर्टात तर तुमचा वकील या दागिन्यांसाठी भांडत होता.”

“ तुम्ही देखील मला जगातील वाईट माणूस, आणि दारुड्या सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होतात. तेव्हा राधिका, आता कोर्ट हा विषय संपला आहे. तिकडे काय घडलं यावर चर्चा नको.”

यावर राधिकाच्या आईने नाक मुरडले.

“मला नको आहेत ते दागिने आणि हो, ते दहा लाख रुपये पण नकोत.”

आश्चर्यचकित होऊन नवीनने विचारले, “पण का?”

“कारण काही नाही, असंच,” राधिकाने तोंड फिरविले.

“तू तर नोकरीही करत नाहीस. उर्वरित आयुष्य कसं काढणार आहेस? घेऊन जा ते सारे. तुला उपयोगी पडतील. ”

एवढं बोलून नवीन दुसऱ्या खोलीत निघून गेला. बहुधा डोळ्यातील अश्रू लपवायचे असावेत.

इकडे राधिकाची आई सामान नेण्यासाठी टेम्पो कुठपर्यंत आलाय याची चौकशी करत होती..

ही संधी साधून राधिका नवीनच्या पाठोपाठ त्याच्या खोलीत गेली.

नवीन रडत होता. आपल्या अनावर भावनांना बांध घालायचा आटोकाट प्रयत्न करत होता. राधिकाने या पूर्वी नवीनला इतका भावनाविवश होऊन रडताना पाहिलं नव्हतं. ते पाहून तिला क्षणभर बरं वाटलं.

पण तिने मनाला आवर घातला.

तिने तिरकसपणे विचारले, “ माझी एवढी काळजी होती तर घटस्फोट का दिलास?”

“मी नाही, तू अर्ज केलास घटस्फोटासाठी. ”

“तू पण सही केलीस ना?” “माझ्यावर हात उगारलास त्याबद्दल माफी का नाही मागितलीस?”

“तुझ्या घरच्यांनी तशी संधीच दिली नाही. जेव्हा जेव्हा फोन केला तो तेव्हा त्यांनी बंद केला.”

“घरी का नाही आलास?”

“हिम्मत नाही झाली. ”

तेवढ्यात राधिकाची आई तिथे आली. राधिकाचा हात धरून तिला ओढत बाहेर नेले. ” आता कशाला त्याच्याशी बोलत बसत्येस? सगळी नाती संपली आहेत ना आता.”

मायलेकी बाहेर सोफ्यावर बसून टेम्पोची वाट पाहू लागल्या.

राधिका मनातून अस्वस्थ होती. तिचे विचार बधीर होत चालले होते. ज्या सोफ्यावर ती बसली होती तो सोफा घेण्यासाठी ती पैसे साठवत होती. हवा तसा सोफा मिळण्यासाठी तिने सारे शहर पालथे घातले होते.

मग तिची नजर एका रिकाम्या कुंडीकडे गेली. याच कुंडीत तिने हौसेने तुळस लावली होती. अगदी प्रेमाने त्या तुळशीची देखभाल करत होती. आता तिथे काहीच नव्हते. तुळससुद्धा घर सोडून गेली होती.

तिची अस्वस्थता वाढत गेली. ती अचानक उठली आणि नवीनकडे गेली. तिच्या आईच्या हाकांकडे तिने दुर्लक्ष केलं.नवीन बेडरूममध्ये पलंगावर डोके खुपसून पडला होता. त्याची ती अवस्था बघून तिला दया आली. पण तिला माहित होते की सारे  आता संपले आहे. आता भावूक होऊन चालणार नाही.

तिने खोलीभर नजर फिरविली. सगळे सामान अस्ताव्यस्त पडले होते. सर्व कोपऱ्यात जळमटे झाली होती. कोळ्याने जाळी विणली होती.

खरे तर त्याला ह्या साऱ्या गोष्टींचा तिरस्कार होता. म्हणून तो घराची साफसफाई स्वत: करायचा.

तिची नजर भिंतीवर लटकवलेल्या फ्रेमकडे गेली. त्यातील फोटोत ती नवीनच्या गळ्यात हात टाकून हसत होती. किती सुगंधी दिवस होते ते…

राधिका या विचारात गढलेली असताना तिची आई तिथे आली. तिने राधिकाचा हात धरून तिला बाहेर ओढत नेले.

बाहेर टेम्पो उभा होता. यादीप्रमाणे गोळा केलेले सामान टेम्पोत भरले जात होते. राधिका सुन्न होऊन बसली होती. गाडीचा आवाज ऐकून नवीन बाहेर आला.

अचानक नवीन आपले कान पकडून राधिकासमोर गुढघ्यावर बसला.

म्हणाला,” नको ना जाऊ, मला क्षमा करशील?”

कदाचित हेच शब्द ऐकण्यासाठी राधिकाचे कान आतुर झाले होते. नवीनचे शब्द ऐकताच तिच्या संयमाचा बांध फुटला. तिने कोर्टाचा आदेश पर्समधून काढला आणि फाडून टाकला.

यावर आई काही बोलण्याच्या आधीच तिने नवीनला जवळ घेतले. आणि दोघे रडू लागले.

दूर उभ्या असलेल्या आईच्या लक्षात सारे आले. हृदयाच्या हाकेपुढे कोर्टाचा आदेश फक्त एक कागद आहे. काश, त्यांना यापूर्वीच भेटून द्यायला हवे होते.

🙏 जर क्षमा मागून नातं टिकणार असेल तर अहंकार बाजूला ठेवून क्षमा मागितली पाहिजे.

– मुक्त अनुवाद अजित पाटणकर
asmita1293@yahoo.co.in
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
‘ माझ्या आयुष्यात आली जानकीदेवी ‘
 
 
मोहन कान्हेरे  
 

मी लहान असताना छंद म्हणून तबला वाजवत असे. आमच्या घरातच हे वाद्य होतं, कारण माझे वडील हौशी तबलावादक होते.

मी त्यांना जेव्हा म्हटलं, “मला तबला शिकवा.” तेव्हा ते म्हणाले, “घरच्या घरी शिकवणी होत नाही. तुला मी पंढरीनाथ नागेशकरांकडे घेऊन जाईन.  त्यांच्याकडे तू तबला शिकलाच पाहिजे असं मला वाटतं…..”

मला खूप आनंद झाला आणि नंतरच्या सोमवारी चुनाम लेन, डॉ. भडकमकर मार्ग या ठिकाणी तबलावादन विद्यालयात माझा प्रवेश झाला.
जो गृहपाठ मला आमचे गुरुजी देत असत तो मी अगदी मनापासून करीत असे. तथापि नंतर माझे व्याप वाढले. ऑफिसमधलं काम वाढलं आणि तबल्याला वेळ देणं अवघड झालं. माझ तबलावादन फारसं पुढे गेलं नाही.

एकदा आमच्या घरी,अनेक महिलांना घरी जाऊन गायन शिकवणाऱ्या गोदावरी अक्का आल्या. माझ्या वडिलांना म्हणाल्या, “तुमचा मुलगा आठवड्यातून दोन दिवस तबला साथ करायला जानकी देवीकडे जाईल का? त्या आता बऱ्यापैकी गायला लागल्या आहेत. तबला साथ करण्याचे बऱ्यापैकी पैसेही त्या देतील.”

मला नोकरी व्यतिरिक्त थोडे फार पैसे असे मिळणार असतील तर ते हवंच होतं.
साथ सांगत करण्याचं काम मी स्वीकारलं.

शनिवारी दुपारी ऑफिस सुटल्यानंतर मी जानकी देवींकडे जात असे.
मरीन ड्राईव्हला पोद्दार मेंशन नावाची एक चार मजली इमारत आहे. तिथे तळमजल्यावर त्या राहत असत. मी त्यांच्याकडे गेलो तो पहिला दिवस मला आजही स्पष्ट आठवत आहे. अतिशय श्रीमंत घर होतं. माझं स्वागतही चांगलं केलं गेलं. पहिल्या दिवशी केवळ दोनच भजनं त्या गायल्या. त्यांचा आवाज बसला होता….  मी नियमितपणे दर शनिवार रविवारी त्यांच्या घरी जाऊ लागलो.

@@@

मी खुश होतो कारण मला बऱ्यापैकी पैसे मिळत होते.
त्यांना माझं वागणं बोलणं खूप आवडत असे.आमच्यात  चांगली जवळीक निर्माण झाली.

“आप तो मुझे बेटा लगते हो.आपको पता नही, मै मेरे पती की मैं तिसरी पत्नी हूँ……अगर वो जिंदा होते तो आज उनकी उमर अस्सी सालकी होती……मुझे संतान का सुख नही मिला…..रखेल जैसी…..I” इतकं बोलून त्या रडू लागल्या.. आता काय करावं मला कळेना…

मी त्यांना म्हटलं, “तुम्ही गाण्यामध्ये स्वतःला रमवलं आहे.मी तुमच्याकडे येऊन तबला संगत करतो, तीही तुम्हाला आवडली आहे.आता कडवट आठवणी तुम्ही विसरून जा..”

एका पावसाळी दिवशी नेहेमीप्रमाणे शनिवारी मी त्यांच्या घरी गेलो.
“आज प्रॅक्टिस नको. हा पाऊस मला बेचैन करतो,उदास करतो,”असं त्या म्हणाल्या.

मी त्याना म्हटलं, “मला देखील आज तबला वाजवायची इच्छा  नाही. मी घरी जाऊ का?”
त्या म्हणाल्या, “रात्री आठनंतर मी एकटीच या घरामध्ये असते…… मला सवय आहे…… पण आज मी उदास आहे. मला खूप रडावसं वाटतय…….आज माझी घुसमट होईल. तुम्ही मीराबेनला फोन करा. तिला इकडे यायला सांगा. मी गाडी पाठवते.बोलवा तिला. तुम्ही दोघं आज माझ्याच घरी रहा…..मला तुमची सोबत हवी आहे……”

@@@

 
मी घरी फोन केला. मीराला म्हटलं, “सानूला घेऊन तू ये. …जानकीदेवी  गाडी पाठवणार आहेत……”

मीरा म्हणाली, “सानू तर पूनम मावशीकडे गेली आहे. दुपारी तिला पूनम घेऊन गेली.मी एकटीच येणार.”

जानकीदेवींनी माझ्याकडून फोन घेतला. मीराशी त्या बोलल्या.
त्यांनी तिला प्रेमाने, आग्रहाने   ‘ये ‘ म्हटलं.

मी जानकी देवीकडे जायला लागून वर्ष झालं होतं. मीराला त्यांचं घर बघायची खूप उत्सुकता होती.
ठरल्याप्रमाणे ड्रायव्हर  गाडी घेऊन गेला. मीरा  गाडीतून जानकीदेवींच्याकडे आली.
पाऊस खूप वाढला होता आणि दोन तीन तास तरी तो पडणार अशी लक्षणे दिसत होती.

जानकी देवी जास्तच घाबरल्या होत्या त्यामुळे मीराला दारात बघताच त्या हर्षभरीत झाल्या.  
त्यांनी तिचा हात हातात घेतला आणि तिला घरात आणलं.

म्हणाल्या,  “जैसे मै सोच रही थी वैसे ही आप  है……मुझे बहुत खुशी है की आप हमारे घर आई I
हम विश्राम करेंगे I  कल सवेरे नाश्ता करके आप दोनो जा सकते हैI”

सकाळी आठ वाजता त्यांचा महाराज येणार होता पण पावसामुळे तो खरोखर येऊ शकेल का असं माझ्या मनात आलं. 

उद्याचं उद्या…..असं मनात म्हणून, मी आणि मीरा जानकीदेवींशी गप्पागोष्टी करू लागलो…..

त्या सुन्या सुन्या घरामध्ये आम्ही दोघं सोबतीला…….त्यामुळे जानकीदेवीना अतोनात आनंद झाला होता.
तो त्यांच्या वागण्या बोलण्यात दिसत होता.
त्यांनी फोनवरच सत्कार हॉटेलमधून जेवण मागवलं आणि निवांतपणे आम्ही जेवलो.

 बाजूला एक बेडरूम होती. चांगलीच प्रशस्त आणि मोठी.
आम्हाला दोघांना तिथे झोपायला सांगून त्या म्हणाल्या, “मी बाहेरच्याच बाजूला सोफ्यावर झोपेन.”

मला रात्री अकरानंतर झोपायची सवय त्यामुळे मी त्याना म्हटलं, “मी टीव्हीवर काहीतरी पहात बसेन…..११ नंतर झोपेन.”
त्या म्हणाल्या, “बहुत अच्छे…… मै भी टीव्ही देखुंगी……I”

पाऊस खूप वाढला. विजा चमकत होत्या. प्रचंड गडगडाट होत होता…..जानकी देवींच्या काय मनात आलं कोणाला माहिती…..

त्यांनी त्यांच्या खोलीत जाऊन भल्या मोठ्या कपाटातून एक अतिशय किमती साडी बाहेर काढली. मीराला दिली.  त्या म्हणाल्या,  “ही साडी तुला खूप छान खुलेल.अजूनही तुला मी काही देणार आहे.”

असं म्हणून त्या पुन्हा आत गेल्या. एक  दागिन्यांची लाल पेटी घेऊन त्या बाहेर आल्या. मीरा समोर त्यांनी ती धरली आणि म्हणाल्या, “ये भी तुम्हे देना चाहती हु I”

हे सगळं फारच अनपेक्षित होत होतं. मी विचारलं,  “यात काय आहे?”

त्या म्हणाल्या, “सोने का बना लक्ष्मी हार I”

मीरा अगदीच संकोचून गेली ती काहीच घेई ना…….
तेव्हा साडी त्यांनी तिच्या हातात कोंबली आणि लक्ष्मी हारसुद्धा त्यावर त्या ठेवायला गेल्या…….
तेव्हा मीरा म्हणाली, आपने साडी दी मुझे……बहुत अच्छी है. किंमती है.I
अब और कुछ मत देना मुझे संकोच लगता है I ”
तेव्हा त्या म्हणाल्या, “अब इस बडे घर मे  अकेली रहती हु I यहाँ की हर चीज पर मेरा अधिकार है……I .
तुम मुझे बहुत ही अच्छी लगी…….शायद हम पहले कभी मिले है. हो सकता है पिछले जनम में…….” त्यांचे डोळे पाणावले.
त्यांची ही अवस्था बघितल्यावर मीराने ती लक्ष्मी हाराची पेटी स्वीकारली. त्यांना वाकून नमस्कार केला…….. मग अतिशय कृतकृत्य झाल्यासारख्या त्या सोफ्यावर बसल्या.
मीही जागेवरून उठलो आणि त्यांना वाकून नमस्कार केला.
सकाळी त्यांचा महाराज अगदी वेळेवर आला.  तो पावसात चिंब भिजला होता. मी त्याला सोफ्याच्या बाजूला असलेला नॅपकिन दिला.
मी चहा करण्याच्या विचारात होतो. त्याला मी म्हटलं,  “पहले चाय पीना…….मैं बनाऊंगाI ”
त्यावर तो अतिशय लाजला आणि म्हणाला, “अंकलजी ये तो मेरा काम है.मै करुंगा I
तब तक आप बडी मा को जगा देना I “……….
त्याची बडी मा सोफ्यावर निवांत झोपली होती.
तिला उठवू का नको, अशा संभ्रमात मी होतो. पण उठवणं तर आवश्यकच होतं.
मी जानकी देवींना हाक मारली पण काहीच प्रतिसाद आला नाही.
पुन्हा मोठ्याने हाका मारल्या. त्या शांत पडलेल्या होत्या.
मी त्यांच्या मानेला हात लावला…. माझ्या मनात अभद्र शंका आली……
मी महाराजना म्हटलं, “शायद……शायद……”..
तो पटकन पुढे झाला. त्याने त्यांच्या मानेला हात लावला……तो समजून चुकला की जानकी देवी या जगात नाही आम्ही लगेचच शेजारच्या त्रिवेदींच्या घराची बेल दाबली ते स्वतः आणि त्यांचे दोन्ही मुलगे लगेचच आले.
ते म्हणाले, “यांचा एक दूरचा भाऊ रिगल सिनेमाच्या मागे राहतो.त्याचा फोन नंबर माझ्याकडे आहे.मी त्याला बोलावतो.तुम्ही टेन्शन घेऊ नका…….”.

@@@

नंतर मला ते म्हणाले, “आप बेन का प्यारा बेटा………आपकी वो बहुत तारीफ   करती थी…… आपको सच्चा इंसान कहती थी…….I ”
मी रडायला लागलो…….बाल्कनीत जाऊन मी मनसोक्त रडून घेतलं. माझ सांत्वन करायला मीरा आणि त्रिवेदी तिथे आले.त्यांचा मुलगा नितीन.   तोही तिथे आला.
आता प्रश्न असा होता की नंतरचं कसं, काय करणार?
मी त्रिवेदी ना म्हटलं,   ” तुम्ही तर त्यांचे शेजारी,तुम्ही ठरवाल तसं करू.”
त्यावर ते मला म्हणाले,  “तुम्ही मिराबेनला घेऊन आता घरी जा.
डॉक्टरला आणायचं  काम मी करेल. तो माझा माणूस……..सर्टिफिकेट लगेच देईल.  त्यांचा भाऊ आला की आम्ही ठरवू……. मी तुम्हाला फोन करेल.तुम्ही डायरेक्ट  चंदनवाडीमध्ये या……. बेन च्या अंतिम संस्कार तर तुम्हीच करायचा आहे……”.
मी हो म्हटलं.
पाऊस जरा कमी झाला होता.
त्रिवेदींना मी म्हटलं, “एक प्रॉब्लेम है I कल रात को जानकी देवीने मेरी पत्नी को एक साडी दी है और एक गहना भी………अब अगर यहा हम छोडेंगे तो मालूम नही किस के हाथ लगेगा……….और अगर,ले जाऊ तो..I “……. माझी पंचाईत त्यांना लगेचच कळली.
ते म्हणाले,  “मोहन भाई,एक काम करते है.I “त्यांनी बायकोला घरातून एक  बॅग आणायला सांगितली.
त्या तत्परतेने  घेऊन आल्या. त्रिवेदीनी स्वतःच्या हाताने त्या दोन्ही वस्तू बॅगेत टाकल्या. चेन लावली, आणि मीराच्या हातात दिल्या……….ते म्हणाले, “आप दोनों पर पूरा भरोसा है……… ये आपको देना ये मेरी जिम्मेदारी है.
आप दोनो जा सकते है. नितीन आपको टॅक्सी मे बिठायेगा.I ”
मै फोन करुंगा तब आप चंदनवाडी आना…… अंतिम संस्कार आप  करेंगे….I “..मीराला अश्रू अनावर झाले. तिने जानकीदेवींना  मनोभावे नमस्कार केला जसा तिने तिच्या सासूला केला असता……..मी देखील खूप भावुक झालो होतो.
मी त्यांना नमस्कार करून  मनात म्हटलं , “आपका आशीर्वाद हमेशा के लिए मेरे साथ रहने देना…..I “..त्रिवेदींनी मला जवळ घेतलं…….
नितीनला सांगितलं, “मोहनजी को टॅक्सी मे बीठा देना I ”
आम्ही तिघे खाली उतरलो. एक टॅक्सी तिथे उभी होती. आम्हाला त्याने टॅक्सीत बसवलं
आणि त्याला काय वाटलं कुणास ठाऊक तोही ड्रायव्हरच्या शेजारी बसला.  माझ्या ग्रँड रोडच्या घरी त्याने आम्हाला आणून सोडलं. मी त्याला म्हटलं, ” घरी चल, चहा घे……”.
तो म्हणाला, “सावकाशीने घरी येईन मी,बाबाला घेऊन.
आता मात्र मला गेलं पाहिजे……तिकडे माझी  गरज आहे……..”
असं म्हणून तीच टॅक्सी त्याने आपल्या घराकडे वळवली……..आम्ही दोघं त्या पाठमोऱ्या टॅक्सी कडेने बराच वेळ बघत राहिलो……..
पुन्हा मला दुःखातिरेक  झाला. मी रडू लागलो……….

– ©️ मोहन कान्हेरे.
mohankanhere@yahoo.in
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
काय वाचाल ?

 अनामिकाची शिफारस

यावेळेस श्री. ना. पेंडसे यांची आणखीन एक कादंबरी ‘आकांत ‘ वाचावयास घेतली व पुन्हा एकदा झपाटून गेल्यासारखे वाटू लागले. प्रथितयश लेखकांचे लिखाण वाचतांना त्यांचे विषय-मांडणीचे कौशल्य, प्रभावी भाषा व वाचकाला कथानकाचे बरोबरीने खेचून नेट राहण्याची शक्ती यांचा जबर पगडा पडत राहतो आणि वेगवान कथानकाने का लेखकाच्या नावाने आपणांस एवढे गुंगवून सोडले त्याचा क्षणभर पत्ता लागत नाही.

बँकेमध्ये कारकुनीपासून सुरुवात करून मॅनेजरपदी पोचलेल्या कथानायकाला त्याचा एक मित्र मरण पावल्यामुळे व त्यानंतर येणारे विविध अनुभव, त्यामुळे निर्माण झालेली मानसिक वादळे व त्या सर्वांकडे त्याच्या पत्नीने एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहिल्याने त्या उभयतांमध्ये निर्माण झालेले तणाव यांचे विलक्षण जिवंत व प्रत्ययकारी असे चित्रण शिरुभाऊंच्या समर्थ लेखणीतून झाले आहे.

‘ माउली ‘ हे आनंद यादव यांचे पुस्तक वाचताना पण काहीसा असाच अनुभव येतो. मांजर हे कधी एखाद्या कथा कादंबरीची मध्यवर्ती कल्पना होऊ शकेल असे वाटले नव्हते. पण ते या कादंबरीमध्ये प्रत्यक्ष साकार झालेले आहे. समस्त मार्जार कुलाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन यादवांनी आपणांपुढे मांडलेला आहे.

प्राणिमात्रांमध्ये प्रामुख्याने आढळणारी ‘ मातृसत्ताक ‘ पद्धती मांजरांमध्ये विशेषत्वाने जाणवते. पिल्लांचा सांभाळ, भक्ष्य कसे पकडावे त्याचे शिक्षण, स्वसंरक्षणाचे शिक्षण आदि अनेक, वाचनीय तपशील आपल्याला आश्चर्याने थक्क करून सोडतात आणि ‘बुद्धीचा वापर’ हा मानवाखेरीज प्राणिमात्रांमध्ये पण कसा कसोशीने होत असतो ते आपल्याला समजते.

आवर्जून शिफारस करावे इतके वाचनीय असे हे पुस्तक आहे.

प्रभाकर पेंढारकरांचे ‘आणि चिनार लाल झाला ‘  हे पुस्तक मी वाचायला घेतले. कारण त्यांचे अगोदरचे एक पुस्तक ‘ रारंग ढांग ‘ हे मला फार फार आवडले होते म्हणून.

१९७१ च्या बांगलादेश  – स्वातंत्र्य युद्धाचा काल, सीमेवरील भारतीय सैन्याकडून होत असलेला कडवा प्रतिकार ( पाकिस्तानी हल्ल्याला ) व अशाच प्रतिकाराला तोंड देत देत नशिबाने बचावलेला एक पाकिस्तानी पायलट काश्मीरमधील बडगाम येथे पॅराशूटच्या साह्याने उतरतो व स्थानिक मुसलमानांच्या साहाय्याने पोलिसांच्या तावडीत न सापडता, प्रतिशोधाचे ( सुडाचे ) व सुटकेचे विचार करीत बसतो. शेवटी तो पोलिसी  गोळीबारात मरण पावतो. इतकेच छोटेसे कथानक आहे. पण काश्मीरचे सौंदर्य, पाकिस्तानी पायलटच्या मनात उद्भवणारे  विविध विचार-विकार, भारतीय पायलट्सची जागरूकता व साध्य GNAT विमानांच्या सहाय्याने पाकिस्तानी सेबरजेटचा मोठ्या कौशल्याने केलेला पाडाव अशा शौर्यगाथेची वर्णने असलेले हे पुस्तक एकदा हाती घेतले की पूर्ण केल्यावाचून सोडवत नाही.

अनामिक
[ ‘संग्रहालय‘ ऑगस्ट १९८६ वरून साभार ]

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
चित्रकारांचे दालन
– ©️ सौ. मुग्धा देशपांडे 
mugdhasvd@gmail.com
प्रेषक मुकुंद कर्णिक
karnik.mukund@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@@@
 
हत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@