डब्लिन डायरी

स्वागत फुलांनी

 
प्रकाश पेठे 
 
 
क्रमांक १२

बिस्कीट

सुरुवातीलाच खुलासा केलेला बरा की बिस्कीट म्हणजे पार्लेजी किंवा ब्रिटानिया बिस्कीट नाही. ते अमेरिकेतील आमच्या मुलाच्या घरी असलेल्या छोट्याश्या गोंडस कुत्र्याचे नाव आहे.

बिस्कीट ही आमच्या मुलाच्या घरातील महत्त्वाची व्यक्ती असल्याने त्याची ओळख करून देण्याआधी आमच्या प्राणीप्रिय कुटुंबाबद्दल सांगायला हवे.  .

आमच्या घरात सगळ्यांनाच प्राण्यांची आवड. आम्ही मुंबईच्या उपनगरात एका वाड्यात राहत होतो, त्या वेळची गोष्ट. वाडा खूप मोठा होता.

मला कुत्रा पाळण्याची फार हौस.  मी, एका जन्म होऊन काही काळ झालेल्या छोट्या गोंडस कुत्र्याच्या पिल्लाला घरी घेऊन आलो आणि त्याच्याशीच खेळत बसलो. आई म्हणाली, “त्याला तुला इथे कोणी ठेवू देणार नाहीत.” कोणी काही ऐकून घेतले नाही.

पिल्लू रात्री केकटायला लागल्यावर सगळे माझ्यावर रागावले. मला त्या पिल्लाला रात्री दूर सोडून यावे लागले. वाडा खूप मोठा असूनही त्याला मला ठेवता आले नाही.

लहान वयात मी मुंबईतले गिरगाव पाहिले होते. तिथे चाळी  होत्या.  एका खोलीत चार पाच माणसे रहात. त्यात कुत्रा कुठून ठेवणार?  मला मोठ्ठ्या वाड्यात पिल्लू ठेवू  दिले नाही.

त्या  रात्री मला स्वप्न पडले. दाटीवाटीच्या मुंबईतल्या कुत्र्यांच्या चाळी डोळ्यासमोर आल्या. गायवाडीत माझ्या शेजारी माझा कुत्रा शेपटी जोरात हलवत उभा आहे. सगळे लोक पट्टे बांधलेली कुत्री घेऊन रस्त्यावरून फिरतायत. गिरगाव केळेवाडी संघमंदिरात नाटकाला गेलेल्या प्रेक्षकांचे दोनशे कुत्रे त्या गल्लीत बांधून ठेवलेले आहेत. काही क्षणच ते स्वप्न डोळ्यासमोर दिसले, अजून विसरलो नाही…

त्यानंतर बराच काळ गेला.. आमचे स्वतःचे घर झाले. प्राणी बाळगायला कोणाची आडकाठी नव्हती. घरात मांजरी आणि कुत्र्याच्या पिल्लांचा सुळसुळाट होता; मांजरी जास्त होत्या. मुले शाळा सुटून घरी आली की मांजराशी खेळत. एका मांजरीला गरम पोळी लागत असे. ती शिळी पोळी खात नसे. पत्नी सगळ्या पिल्लांचे लाड पूरवत असे. एकेक मांजरीचे पिल्लू एकेकाच्या गादीत झोपे. बाकीची पिल्ले पायपुसण्यावर मुक्काम करीत.

अनेक दशकांपूर्वीच्या छायाचित्रात पत्नी, मुलगा आणि मोठी मुलगी यांच्या प्रत्येकाकडे दोन दोन पिल्लं मजेत आहेत असे दिसते

स्वतःच्या पिल्लाला  समजावणारी आमच्या घरातील गुबगुबीत मांजर


मांजरीचे दूध पिणारी कुत्रीची पिल्ले

 

पुस्तकांच्या फडताळात बसलेली मनीमाऊ

पुढे मुलीचे लग्न झाले. मुलाचे शिक्षण होऊन तो उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेला. एकेक करता करता घरात येणाऱ्या मांजरीही पळाल्या.

हल्लीच आम्ही अमेरिकेत आलो. आमचे स्वागत करायला मुलाच्या बरोबर कुत्र्याचे एक गोड पिल्लू आमच्याकडे टक टक  पाहत होते.

Biscuit

सगळ्यांनी आमचे स्वागत केले; त्यात एक कुत्र्याचे पिल्लू आमच्याकडे पहात होते. त्याला आम्ही नवे होतो. आम्हालाही तो नवीन होता. नंतर त्याची ओळख करून दिली. ” हा आमचा बिस्कीट.”

आम्ही सोफ्यावर बसलो. तो जवळ येऊन वास घेत होता. त्याला कळले की हे कोणीतरी नवीन आहे; नंतर आम्ही त्याच्या सहवासाला रुळलो. आमच्या नातीचा तो विशेष लाडका आहे आहे. तिच्या खालोखाल त्याची लगट मुलाशी असते.  बिस्किटला घरातली सगळीच माणसे आवडतात. तो माणूसवेडा आहे. सारखे  त्याला माणसातच बसायला आवडते. त्याला एकट्याला घरी सोडून कुठे गेले तर त्याला मुळीच आवडत नाही आणि आणि सगळे घरी आले की तो नाचून थयथयाट करतो आणि पाच सात मिनिटे त्याला कुरवाळल्यावरच  शांत होतो. बाहेरगावी जायचे असेल तर ओळखीच्यांकडे ठेवून जावे लागते.  आता आजीशी त्याची घट्ट मैत्री झाली आहे. तो तिला कधीच विसरणार नाही.

त्याचा आकार लहान आहे. त्याला सहज कडेवर घेता येते. त्याच्या  अंगावर हात फिरवला की तो खुश होतो. घरात दोन मुले आणि एक कुत्रा असल्याने इथे पाच माणसांचे कुटुंब आहे. त्यात आम्हा दोघांची भर पडली. बिस्किटची लहान मुलाप्रमाणे  काळजी घेतात.  त्याला  सकाळ संध्याकाळ वेळच्या वेळी खायला देतात.  एक दीड वर्षाचे मूल लघळपणा करणार नाही इतके ते अंगाला चिकटते.

इतरांच्या कुत्र्यांच्या सवयी मला माहित नाहीत पण सहा महिन्याच्या काळात बिस्किटच्या सवयी आणि लकबी माहिती झाल्या आहेत. त्याला मागच्या अंगणात जायचे असले तर तो एका पायाने दरवाजा वाजवतो. दार उघडून दिला की तो बाहेर जातो. आपण दरवाजा लावून ठेवला असेल तर एका पायाने आणि तोंडाने दार उघडून घरात येतो. त्याला पार्कमध्ये नेत असेल तर त्याला आधीच कळते. तो खुश होतो आणि गळ्यातला पट्टा  सोडल्यावर धावत सुटतो तो थांबत नाही. धावून धावून दमून जातो.

डब्लिनला आल्यावर लक्षात आले की जवळ जवळ दोन घरामागे एक  कुत्रा आहे. बहुतेकांच्या कडे छोटे छोटे कुत्रे आहेत.  मोठे कुत्रे सहसा कोणाकडे नसतात.  इथे घराचे संरक्षण करण्यासाठी यांत्रिक सोय आहे. कोणी अतिक्रमण केले तर मोठा आवाज होतो आणि ती त्याची बातमी पोलीस स्टेशनला कळते. लगेच पोलिसांची गाडी येते. त्यामुळे  कुटुंबाच्या रक्षणासाठी कोणी कुत्रा पाळत नाहीत.  पण हौसेखातर पाळतात. जेव्हा बिस्किटला आणले तेव्हा मुली वयाने लहान होत्या. त्यांची  आवड लहान पिल्लू घेण्याकडे असेल. म्हणून  लहान लहान आकाराच्या  बिस्कीटची निवड झाली असेल.  छोटा कुत्रा लहान मुलासारखा असतो त्याचे लाड केले जातात. बऱ्याच स्त्रिया पिल्लाला कडेवर घेतानाही दिसतात. खूप मोठा कुत्रा असेल तर तसे करता येत नाही.

मी नातीला विचारले, ” याचं बिस्कीट हे नाव कोणी ठेवलं ?” तेव्हा तिन सांगितले की आम्ही डॉग शेल्टरमध्ये लहानसा कुत्रा घ्यायला गेलो होतो. तिथे पुष्कळ पिल्ले पहिली. सगळीच चांगली होती . बिस्कीटही आवडला होता. आधी त्याच नाव नव्हतं. आम्ही तीन नाव नक्की केली.  मोका, स्पार्कल आणि बिस्कीट.

नंतर तीन नावांच्या चिठ्या एका बाउलमध्ये टाकल्या आणि त्यातली एक चिठ्ठी उचलली. त्यातून बिस्कीट हे नाव निघाले. तेव्हापासून त्याचे नाव बिस्कीट झाले. त्याचा रंग पामोरियनसारखा पांढरा शुभ्र  नाही पण ब्रिटानिया बिस्कीटपेक्षा जास्त उजळ रंग आहे म्हणून त्याचे नाव बिस्कीट.  त्याला घरी घेऊन आलो त्याला चार वर्षे झाली, असे नातींने सांगितले.  आता तो साडे चार वर्षाचा असेल.

सकाळ झाली की बिस्कीट वरच्या मजल्यावरून खाली येतो आणि आजीच्या जवळ जाऊन बसतो आणि शेपटी तिच्या अंगावर आपटतो आणि तोंडाने आवाज काढतो. शेपटीने खुणा करतो. त्यानंतर आजी त्याच्या पोटावरून आणि डोक्यावरून हात फिरवते. ती जरा थांबली की  लगेच पुन्हा आवाज काढतो;  त्याचे समाधान होईपर्यंत त्याला गोंजारावे लागते. भरपूर गोंजारले की मगच तो शांत होतो. आजीशी त्याची घट्ट मैत्री झाली आहे.

त्याच्या अनेक सवयी आहेत.  त्याला खिडकीत बसून बाहेर पाहायला आवडते. कोणी  बाहेर दिसले की तो माणूस दिसेनासा होईस्तोवर भुंकत राहतो. त्याला कॉटच्या खाली बसायला आणि झोपायला आवडते. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या माणसाचा किंवा कुत्र्याचा वास येतो.  त्याला घरात बसल्या बसल्या कळते. लगेच तो त्या दिशेने धावत भुंकत सुटतो.

17 May23 Biscuit

भारतात कुत्र्यांचा तोटा नाही. एकेका  कुत्रीला अनेक पिल्ले होतात. त्यातली  होळीपर्यंत जगली तर मोठी होतात, नाही तर नाही. कुत्री रस्त्यावर मिळेल ते खातात. भर उन्हात रस्त्याच्या कडेवरच्या  गवतात गाढ झोलपलेली असतात. रात्री जाणाऱ्या येणाऱ्यांना  त्रास देतात. पुष्कळांना चावतात. आमच्या गावात कुत्रे चावल्यास विनामूल्य लस टोचून देतात. असे पाच वेळा करावे लागते. एकदा मलाच तसे करावे लागले होते. खूप लोक कुत्र्यांना  बिस्किटे खायला घालतात अथवा घरातल्या गोष्टी खायला घालतात.

अमेरिकेत तेरा कोटी कुटुंबे आहेत आणि नऊ कोटी पाळीव प्राणी आहेत.  साडेसहा कोटी लोकांच्या घरी कुत्रे आणि  चार कोटी पासष्ट लोकांकडे  मांजरी पाळलेल्या आहेत. काहींच्याकडे दोन प्राणी आहेत.

अमेरिकेत सर्व्हे केल्यावर कुत्र्यावर प्रेम करण्याची तीन कारणे समोर आली.  त्यातले पहिले कारण महामारीच्या काळात घरात पाळलेला प्राणी हा सगळ्यांचा एकमेव विरंगुळा होता. दुसरे असे की पाळीव प्राण्याचे निष्पाप प्रेम आणि मिळणारी अमर्याद निरपेक्ष जवळीक.

प्राण्याचे स्वतःचे विचारविश्व असते तरीही त्याचा माणसावरचा  विश्वास जबरदस्त असतो. तिसरे असे की माणसाचा  प्राण्यावर  विश्वास असणे हे  माणसाला असलेली निरपेक्ष प्रेमाची  गरज.

पँडेमिकच्या काळानंतर अमेरिकेतील कुटुंबांच्या स्वास्थ्याबाबत  संशोधन करण्यात आले होते. त्यातून असा निष्कर्ष निघाला की ज्यांचेकडे पाळीव प्राणी होते  त्यांनी  जीवनात घडलेले आघात समर्थपणे झेलले होते.

आमच्या मुलाच्या  मित्रांचे कुत्रे ते बिस्किटचे मित्र आहेत.  त्या सगळ्यांना एकमेकांच्या कुत्र्यांची चौकशी करायला आवडते. प्रत्येकाला सारख्या वयाची मुले नसली तरी कुत्रे हा प्रिय विषय असतो. बिस्कीट सगळ्याशी  छान खेळतो भांडत नाही पण दुसऱ्या कुत्र्यांना गोंजारले किंवा कौतुक केले तर त्याला राग येतो.

रात्री त्याला त्याला संडासला घेऊन जाण्यासाठी त्याला “चल, बिस्कीट बाहेर” की लगेच तो दारातून पटकन बाहेर जातो आणि आटपून लगेच परत येतो. तो घरात काही घाण करत नाही. सगळेच कुत्रे असे शहाण्यासारखे  वागत असतील की नाही ते माहित नाही.

माणसाचे आणि प्राण्याचे प्रेम अतूट असते.  त्या प्रेमाला कशाचीच उपमा देता येत नाही. राणा प्रतापचे आणि चेतकचे एकमेकांवरचे प्रेम सर्वानाच माहित आहे. तसेच शिवाजी महाराजांच्या कुत्र्यावरचे प्रेम अतूट होते. रायगडावर शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याशेजारी त्याचा लाडका कुत्रा वाघ्याचा पुतळा बांधला आहे. त्यासाठी इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर यांनीच  देणगी दिली होती.

– ©️ प्रकाश पेठे  
prakashpethe@gmail.com

4th October 2023डब्लिन

 स्वागत फुलांनी [ १२ ] – प्रदीप अधिकारी
@@@@@@@@@@@@@@@@@@
   विचारशलाका
मिलिंद कर्डिले
– ©️ मिलिंद कर्डिले 
milindkardile@yahoo.com
@@@@@@@@@@@@@@@@@@
चित्रोळी 
 
४८ ]
 
माधव मनोहर जोशी
 
– ©️ माधव मनोहर जोशी 
madvac1979@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@@@@
आजची कविता
 
सौ. माधवी देशमुख
 
राजमाता तुम्ही होतात म्हणून ….

कानी हुंदक्यांचा गराडा
तेज असून तीमिर सारा
सावरण्या पदराबाई
कुणी राहिलाच वाली नाही..

नाही सोसावले तूम्हाला
‘गाऱ्हाणे’ मांडले माय भवानीला
जन्म देऊन शिवबाला
वादळासमोर एक दिवा पेटवला..
.

राजमाता तुम्ही होतात म्हणून
माझा शिवबा घडला
ममत्व  पोटात ठेवून
त्याला फोलाद बनवला.
..

स्वराज्याच्या स्वप्नाचं
मूर्त रूप चित्ती धारण्या
बाळकडूत शिवबाला सांगे
हिंदुत्व तारण्या

तिकडे शिवबाची लढाई
रात्री देव आणि सोबतीला समई
व्रतवैकल्य करून बाई
तुम्ही भवानी चरणी वाहिली

अजीवन द्वंद्वात उभी राही
राजमाते समोर एक आई
आई भवानीला जाई शरण
सांगे कर शिवबा संग मावळा राखण

राजमाता तुम्ही होतात म्हणून
जीव मावळा लावला
गौरवला भगवा गौरवला जीवा शिवा
जय भवानी जय शिवाजीचा नारा
आजतागायत अंतरी कोरला

राजमाता तुम्ही होतात म्हणून
रक्षली मराठी धरोहर
अंगात सळसळणारी शिवाई
अक्षय जागते खरोखर.

धन्य तुमचे ममत्व
धन्य धन्य ते कर्तुत्व
हृदयाच्या ठिणग्या लपवून
स्वीकारले ते राज मातृत्व
हृदयाच्या ठिणग्या लपवून
स्वीकारले ते राजमातृत्व……

– ©️ सौ. माधवी देशमुख,
गुरगांव, हरयाणा
 deshmp30@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
लीप वर्षाविषयी जगभरात कुठं काय म्हटलं जातं ?

मूळ लेखक डच वेल 
 
मुक्त अनुवाद : मुकुंद कर्णिक

शाप की प्रेमसंबंध घडवून आणणारं?.. .. .. बऱ्याच देशांत फेब्रुवारी २९ हा दिवस अवलक्षणी गणला जातो. याउलट काही ठिकाणी मात्र तो प्रेमात असलेल्या महिलांसाठी प्रस्तावाची पर्वणी मानला जातो.

चार वर्षांनी एकदा येणाऱ्या ह्या दिवशी काय मिळतं? कमालीचा आनंद की अटळ शाप? नाही नाही, दर चार वर्षांनी होणाऱ्या ‘वर्ल्ड कप’बद्दल बोलत नाही मी. बोलतोय ते दर चौथ्या सम वर्षी येणाऱ्या २९ फेब्रुवारी ह्या दिवसाबद्दल !

लीप वर्षातल्या ह्या दिवशी जन्माला आलेल्या माणसांना – आजमितीला जगभरातल्या जवळ जवळ पाच दशलक्ष माणसांना – ‘लीपलिंग्ज’ किंवा ‘लीपर्स’ म्हटलं जातं. त्याना इतर वर्षांत आपला वाढदिवस कुठल्या दिवशी साजरा करायचा हा मोठा गहन प्रश्न पडतो. पण काही देशांतल्या दिनदर्शिकेत जेव्हा हा दिवस, चालू २०२४ सालातल्यासारखा, ठळकपणे दिसतो तेव्हा त्यांच्यासाठी तो एक खास दिवस ठरतो.

आयर्लंडमध्ये फेब्रुवारी २९ हा ‘अविवाहितांचा दिवस’ किंवा ‘महिलांसाठी खास दिवस’ ( Bachelor’s Day, or Lady’s Privilege ) गणला जातो. तिथल्या प्रथेप्रमाणे ह्या खास दिवशी सेंट ब्रिजिट आणि सेंट पॅट्रीक ह्यांच्या लोककथेतल्यासारखे स्त्रिया पुरुषांकडे प्रेमाचा प्रस्ताव मांडू ( किंवा सोप्या शब्दांत सांगायचं तर त्याना ‘मागणी’ घालू ) शकतात.

असं म्हणतात की पाचव्या शतकातल्या सेंट ब्रिजिट नावाच्या धर्मोपदेशिकेने (nun) आयर्लंडच्या मुख्य धर्मोपदेशक (patron) असलेल्या सेंट पट्रिककडून एक करार करवून घेतला; ज्यायोगे २९ फेब्रुवारीच्या खास दिवशी बायकांना पुरुषांकडे प्रेमाचा प्रस्ताव ठेवायला मान्यता देण्यात आली.

ही प्रथा पुढं सन १२८८ मध्ये स्कॉटिश कायद्यानुसार अधिकृत करण्यात आली. तोपर्यंत तेथे बायकांनी पुरुषांना लग्नाची मागणी घालणे हे बेकायदेशीर मानलं जायचं. ह्या कायद्यानुसार फेब्रुवारी २९ ह्या एका दिवसासाठी अपवाद करण्यात आला. इतकंच नव्हे तर जर त्या पुरुषाने त्या मागणीचा अव्हेर केला तर त्याला दंड भरावा लागण्याची तरतूदही केली गेली.

त्या काळात इंग्लिश कायद्यानुसार फेब्रुवारी २९ हा दिवस ‘कायदेशीर’ दिवसच मानला जात नव्हता. तेव्हा कायद्यातली ही पळवाट ओळखून बायकांनी स्वत: पुढाकार घेऊन त्या दिवशी असे ‘प्रेमाचे प्रस्ताव’ मांडत वचनबद्ध व्हायला सुरुवात केली असंही म्हटलं जातं.

पुढं सन १९०० मध्ये हा ‘उलटी गंगा’ प्रस्ताव ( roles-reversed proposals ) अमेरिकेतही पसरला.

२०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या “लीप ईयर” ह्या सिनेमाला प्रेरणा मिळाली होती ती ह्या प्रथेचीच. त्या रोमॅंटिक कॉमेडीची नायिका अ‍ॅना (कलाकार एमी अ‍ॅडम्स) बोस्टन ते डब्लिन असा प्रवास करून तिचा प्रियकर जेरेमी (कलाकार अ‍ॅडम स्कॉट) ह्याला खास आयरिश बॅचलर्स डे ह्या दिवशी भेटायला येते आणि त्याच दिवशी त्याच्यापुढे “माझा होशील का?” ( will you marry me? ) चा प्रस्ताव ठेवते.

लीप वर्षातल्या फेब्रुवारीच्या अखेरच्या दिवशी बायकांनी स्वत: पुरुषांना मागणी घालायची ही प्रथा डेन्मार्क आणि फिनलंड ह्या देशांतही पाळली जाते.

डेन्मार्कमध्ये एखाद्या पुरुषाने अशी आलेली मागणी नाकारली तर त्यानं त्या स्त्रीला हातमोज्यांचे बारा जोड द्यायचे असतात. म्हणजे ‘तिच्या बोटात आंगठी ( एंगेजमेंट रिंग ) नाही’ ही लज्जास्पद गोष्ट ती लपवू शकेल. फिनलंडमध्ये अशा नाकारणाऱ्या पुरुषानं स्त्रीला तिचा झगा ( स्कर्ट ) बनवण्यासाठी पुरेसं होईल इतकं कापड द्यायचं असतं. पण असं कापड देण्यामागचं प्रयोजन स्पष्ट नाही.

इतर काही देशांमध्ये लीप वर्ष हे वाईट, कमनशीब आणणारं असतं अशी समजूत आहे.

जर्मनीमध्ये शेतकऱ्यांच्या भाषेत एक जुनी म्हण आहे. “स्काल्टझार ग्लीश काल्टझार” (Schaltjahr gleich Kaltjahr), म्हणजे “लीप वर्ष हे थंड वर्ष असतं. ”

जर्मनीत आणखी एक गमतीशीर प्रथा आहे. लीप वर्षासंबंधानेच आहे, पण २९ फेब्रुवारीबद्दल नाही. नेहमीच्या वर्षात मे महिन्याच्या पहिल्या तारखेपूर्वी ऱ्हाईन प्रांतातले विशीच्या आतले तरुण बर्च झाड तोडतात आणि त्याला सुशोभित करून त्यांचं प्रेम असलेल्या तरुणींच्या घरासमोर रोवतात. त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली असते ती. लीप वर्षात हेच केलं जातं पण तेव्हा विशीतली तरुणीच असं तोडलेलं झाड ती ज्याच्यावर अनुरक्त आहे त्या तरुणाच्या दारासमोर रोवते.

पण बहुतेक करून जगात इतरत्र मात्र लीप वर्ष हे कमनशिबीच मानलं जातं.

तैवानमध्ये हे जास्तीचा एक दिवस असलेलं वर्ष वाईट मानतात. बहुतेकांची समजूत असते की लीप वर्षात घरातली वयोवृध्द माणसे मरतात. त्यांचं आयुष्य वाढावं म्हणून लग्न करून सासरी गेलेली मुलगी नूडल्सचे पदार्थ बनवून आपल्या आईवडिलांसाठी माहेरी नेते. नूडल्स हे एक रुचकर आणि पौष्टिक असं अन्न  आहे आणि ते लीप वर्षाचे दुष्परिणाम नाहीसे करते हा तिचा विश्वास असतो.

ग्रीस देशात २९ फेब्रुवारी ह्या दिवशी वाङ्गनिश्चय झालेले विवाह दुर्दैवी ठरतात आणि त्यांचा शेवट घटस्फोटात होतो अशी समजूत असते. तसंच घटस्फोटही त्याच तारखेला  झाला असेल तर पुन्हा दुसरा जोडीदार कधीच मिळणार नाही असंही ग्रीक लोक मानतात.

पण तुमचा लीप वर्षाच्या चांगुलपणावर विश्वास असेल तर टेक्सास आणि न्यू मेक्सिको यांच्यातल्या सरहद्दीवर असलेल्या अँथनी ह्या गावाला जा. तिथं लीप वर्ष समारोह साजरा केला जातो. १९८८ मध्ये मेरी अ‍ॅन ब्राऊन आणि बर्डी लुईस हया दोन “२९ फेब” वाल्या ( म्हणजे त्या तारखेला जन्मलेल्या ) मैत्रिणींनी  नगरपालिकेकडे ह्या समारोहाची कल्पना मांडली. आणि ती स्वीकारली गेली. मेरी ब्राऊनने स्थानिक नगरसेवकांच्या भेटी घेऊन आपल्या कल्पनेचा प्रचार आणि पाठपुरावा केला आणि त्यानंतर अँथनी हे गांव “जागतिक लीप वर्ष राजधानी” म्हणून ओळखलं जाऊ लागलं. जगभरातून “२९ फेब” लोक समारोहात भाग घेण्यासाठी येऊ लागले.

अर्थात हा समारोह फुटबॉलच्या वर्ल्ड कप सारखाच चार वर्षांनी येतो, पण येतो तेव्हा भाग घेणारे सगळेच विजेते असतात. कमनशिबाचा मागमूस नसतो.

*****

मूळ लेखक Deutsche Welle / The Telegraph, Kolkata  / 01.03.2024.
मुक्त अनुवाद : मुकुंद कर्णिक
karnik.mukund@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
बालचित्रकारांचे दालन
 
– शरण्या देशमुख, सातारा  
प्रेषक सौ. स्वाती वर्तक
           swati.k.vartak@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@@@
 
हत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@

8 thoughts on “डब्लिन डायरी

  1. स्वागत फुलांचे   हे छायाचित्र सुरेख आहे  

    मिलिंद कर्डिले यांचे रामवचन ,माधव मनोहर जोशी कान्ह्याची ऐकून मंजुळ वेणू  दोन्ही छान                                  

    सौ. माधवी देशमुख यांची राजमाता तुम्ही होतात म्हणून ही कविता खूप आवडली  

    लीप वर्षाविषयी जगभरात इतकं सगळं  म्हटलं जातं हे मुळीच माहिती नव्हतं त्यामुळे  अनुवाद मुकुंद कर्णिक यांनी दिलेल्या माहितीमुळे आनंद झाला . आम्हाला माहित होते की भूतपूर्व पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा जन्म २९ फेब्रुवारी रोजी झाला होता .त्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती ती आठवते आहे                                  

     शरण्या देशमुख, हिची कल्पना चित्रातून छान मांडली  आहे 

  2. अधिकारीजी ..छान स्वागत …तुमच्याच घरात आहेत का फुले ? धन्यवाद

    पेठेजी ..तुमचं बिस्कीट फारच गोड… त्याच्या नावाची कथा मजेशीरच आहे ..मला आधी वाटले त्याच्या रंगावरून ठेवले असणार

    मिलिंद कर्डिले छान ..वचन

    जोशीजींची वेणू आधी आली होती काय ..उगाच वाटतेय मला? चांगली आहे

    राजमाता कविता ..चांगले भाव व्यक्त केले आहेत ..माधवी ताई

    कर्णीकजींच्या अनुवादाबद्दल काय लिहावे ? तो छानच पण माहिती ही पुष्कळ नवीन. आभार

  3. पेठेजी, कॉलेजच्या दिवसात बघितलेल्या रेबिजच्या रोग्यांमुळे न् माझ्या एलर्जी एक्झिमा मुळे मी कुत्र्यामांजरांपासून दूरच रहाते. मात्र आपला सचित्र लेख आवडला.

    विचारशलाका व चित्रोळी छान.

    माधवीची वीररसी कविता आवडली.

    अधिकारीजींचं जास्वंदीचे फूल व छोट्या शकण्याची रात्रंदिवस नेत्रसुखद.

    कर्णिकजी २९ फेबचं इतकं भलंबुरं प्रथमच कळलं.

  4. श्री प्रकाश पेठे यांची डायरी नेहमीच वाचनीय असते या वेळचा लेख ही उत्तम म

    फोटो मुळे लेख परिपूर्ण झाला आहे .

    वाचत असताना एक विनोद आठवला

    कुत्र्यांची स्पर्धा होती अनेक देशांमधून पाळीव कुत्रे आले होते . स्टेजवर येऊन प्रत्येक कुत्र्याने काहीतरी कसरत करून दाखवली ते पाहून प्रेक्षक हर्षभरीत झाले .

    सगळ्यात शेवट एक कुत्रा आला आणि त्याने फक्त वर खाली अनेकदा शेपटी हलवली .

    कडेला शेपटी अजिबात नेली नाही …..हे कसब विलक्षण होतं .

    कुत्र्याच्या मालकाने स्टेजवर येऊन स्पष्टीकरण दिलं.

    तो म्हणाला आम्ही गिरगावात राहतो….. तिथे शेपटी फक्त वर खाली हलू शकते , कारण आमच्या गिरगावात मोकळी जागाच नाही……

  5. मैत्री परिवारात माधवी देशमुख नव्याने आल्या आहेत .

    यांची कविता मनस्पर्शी आहे .त्यांचं खूप स्वागत …..

    अशाच त्यांनी कविता पाठवाव्यात……

  6. प्रदीप अधिकारी यांच्या प्रकाशचित्रातील पुष्परचना सुंदर वाटली.

    प्रकाश पेठे सरांनी ‘बिस्कीट’ची ओळख छान करून दिली आहे. सोबतची प्रकाशचित्रे वर्णनाची गंमत वाढवतात. “पुस्तकांच्या फडताळात बसलेली मनीमाऊ” हे प्रकाशचित्र विशेष आवडले. आमच्याकडे असलेला पांढराशुभ्र बोका (नांव गुरू) हा देखील असाच पुस्तकाच्या फडताळात बसत असे, ते आठवले.

    मिलिंद कर्डिले यांच्या संग्रहातील विचार शलाका आवडली. माधव जोशींनी निवडलेले चित्र आधी पाहिलेले असले तरी त्यावरील ओळी नवीन आणि छान आहेत.

    ‘ लीप वर्षाविषयी जगभरात कुठं काय म्हटलं जातं ?’ या  मुकुंद कर्णिक यांच्या अनुवादातून वेगळी माहिती मिळाली.

    शरण्या देशमुखचे चित्र शांत भाव निर्माण करते.

  7. प्रकाशजींच्या लेखातील कुत्रीचे पिल्लू मांजरीचे दूध पिते हा एक चमत्कार वाटला .
    माधवी देशमुख यांनी शिवरायांच्या मातेची थोरवी कवितेतून फार छान सादर केली आहे .
    कर्णिकजी मला वाटतं ज्या देशात 14 फेब्रुवारीला व्हॅलण्टाईन डे साजरा केला जातो ते तरुण भाग्यवान आहेत कारण आयर्लन्ड मधील तरुणांना बॅचलर्स डे येण्यासाठी चार वर्षे वाट पहावी लागते .
    शरण्या देशमुख या छोट्या मुलीने एकच चित्र निळा गडद रंग व फिकट निळ्या रंगात रंगवून रात्र व दिवस हा फरक फार छान दाखवला आहे .
    कर्डीले यांची विचार शलाखा व जोशी यांची चित्रोळी आवडली .

यावर आपले मत नोंदवा