जून महिन्यातल्या एका रात्रीतलं स्वप्न

“A Midsummer Night’s Dream”
शेक्सपीयरच्या नाटकाचं थोडक्यात कथानक
 
 
अनुवाद : मुकुंद कर्णिक
 
 
भाग ७
अंक चौथा, प्रवेश पहिला
स्थळ: तेच, ओक वन
नव्या प्रियकराच्या प्रेमात आकंठ बुडालेली राणी टिटानिया बॉटमच्या हाताला धरून त्याला पुष्पशय्येकडे नेत असताना  ओबेरॉन पहात  असतो. टिटानिया म्हणते, “चल माझ्या प्रियकरा, आपण त्या शय्येवर बसूया. तिथं मी तुझ्या सुंदर गोबऱ्या गालांना कुरवाळत तुझ्या मऊ रेशमी केसात गुलाबाची फुलं माळेन.”

बॉटम (खिंकाळत): “पीचब्लॉसम, अरे ये, माझं डोकं खाजव बरं. आणि कॉबवेब कुठं आहे?”

कॉबवेब: हा काय मी इथं आहे.”

बॉटम: “हं, तू असं कर, ती त्या फुलावर बसलेली मधमाशी दिसते ना, तिचे पंख छाटून टाक आणि तिची मधाची पिशवी घेऊन ये माझ्या गालांना मसाज करायला. आणि मस्टर्डसीड, तू कॅप्टन कॉबवेबला मदत कर मसाज करायला. मला न्हाव्याकडं जावं लागणार आहे बहुधा, गालांवरली मऊ रेशमी लव फार वाढली आहे आणि ती माझ्या कोवळ्या गालांना टोचते आहे.”

टिटानिया प्रेमानं बॉटमचे गाल कुरवाळते आणि विचारते, “प्रिया, तुला मी काही मधुर संगीत ऐकवू का? आवडेल तुला?”

बॉटम खिंकाळून म्हणतो, “हो, चालेल, झांजांचा आणि सळयांच्या त्रिकोणावर बडव बडव बडवून केलेला कर्ण कर्कश्श आवाज मला फार आवडतो.”

टिटयानिया: “नाही तर तुला खायला काही गोड आणवू का?”

बॉटम: “अरे वा ! बरंच होईल की. छान लुसलुशीत हिरव्या गवताचा चारा आणून भरव मला. आणि हो, वाळलेले हरभरे देखील आवडतात मला बरं का. तेही आणव तोबरा भरायला. पण हे बघ, तुझ्या ह्या पऱ्यांना सांग आवाज करू नका म्हणून. मला झोप आली आहे कमालीची. खाणं येईपर्यंत जरा झोपून घेईन म्हणतो.”

टिटानिया: “झोप माझ्या लाडक्या. मी आहे तुझ्याजवळ, तुला अशी बिलगून. आणि पऱ्यांनो, जा बरं तुम्ही आपापल्या कामांना. आवाज करू नका अगदी.”

बॉटम घोरायला लागतो आणि टिटानियाही त्याला कुशीत घेऊन झोपी जाते.

हे सगळं बघून ओबेरोनची करमणूक होत असते. इतक्यात रॉबिन पक अवतीर्ण होतो. ओबेरॉन त्याला सांगतो, “ये. ये. मित्रा, बघतोयस ना हे काय चाललंय ते? मला कीव येते आहे रे माझ्या राणीची. थोड्या वेळापूर्वी मी तिला भेटलो होतो तेव्हा फुलं गोळा करत होती ह्या गाढवाच्या गळ्यात घालायला हार करण्यासाठी म्हणून. त्याच्या डोक्यावर छान सुवासिक फुलांचा मुकुटदेखील घातला होता तिनं. मी खूप समजावलं तिला असं करू नकोस म्हणून. पण ऐकायला तयार नव्हती. शेवटी मी समजावायचा  नाद सोडून दिला. मग तीच आपण होऊन तयार झाली तिच्याकडच्या त्या इंडियन मुलाला माझ्या ताफ्यात पाठवायला. आणि तिनं एका परीकरवी तसा निरोपही पाठवला त्याला लगेच. तेव्हा आता तिच्यावर आपण पांघरलेली भूल उतरावायला हवी आता. मी असं करतो, तिच्या डोळ्यांवर ह्या पानांचा रस पिळतो म्हणजे ती भूल नाहीशी होईल आणि ती पूर्ववत आपल्यात परत येईल. तू देखील ह्या गाढवाचं डोकं काढून घे. परत अथेनियन माणूस होऊ दे त्याला. म्हणजे तो त्याच्या इतर साथीदारांबरोबर शहरात परत जाईल. आजच्या रात्रीत जे काही घडलं ते केवळ स्वप्नच होतं ह्यापलिकडं त्याला काही आठवणार नाही. पण त्याआधी मला राणीवरची भूल काढून घेऊ दे.”

ओबेरॉन त्याच्या हातातल्या पानांचा रस टिटानियाच्या पापण्यांवर पिळतो आणि प्रेमानं म्हणतो,
“प्रिये, माझ्या लाडक्या राणी टिटानिया, जागी हो आणि आधी माझ्या प्रेमात होतीस तशीच पुन्हा हो. भूल पडण्याआधी जग जसं बघायचीस तसंच बघ. अग, ह्या पानांच्या रसाची करामत मदनाच्या फुलातल्या प्रेमरसापेक्षा जास्त जादूची आहे. जाणवेल तुला.”

टिटानिया बॉटमच्या अंगावरला आपला हात काढते आणि डोळे उघडते. प्रेमभऱ्या नजरेनं तिच्याकडं बघत उभ्या असलेल्या ओबेरॉनकडं बघून छानसं हसते आणि त्याचा हात हातात घेत म्हणते, “ओबेरॉन, अरे काय चमत्कारिक स्वप्न पडलं रे मला. चक्क एका गाढवाच्या प्रेमात पडले होते मी असं दिसलं स्वप्नात.” झोपेत आपले लांब कान हलवत असलेल्या बॉटमकडं बोट दाखवून ओबेरॉन तिला सांगतो, “राणी, तो बघ तुझा प्रियकर!”

टिटानियाच्या अंगावर शहारे येतात. ती ओबेरॉनच्या बाहुपाशात शिरून म्हणते, “ईss, काही तरीच काय? किती ओंगळ दिसतंय हे गाढव.”

“हो ना? बरं, आता शांत हो. तुझ्या पऱ्यांना बोलवून छानसं संगीत वाजवायला सांग. आणि रॉबिन, तू ते गाढवाचं डोकं काढून घे आणि ह्या पाचही जणांवर अगदी गाढ अशी झोप पांघरून टाक.”

टिटानिया पऱ्यांना बोलावते. ते सारे येऊन आपल्या बासऱ्या  आणि इतर वाद्ये वाजवायला लागतात. बॉटम गाढ झोपेत गेल्यामुळं त्याचं खिंकाळल्यासारखं घोरणं थांबतं. पक त्याच्या डोक्यावरून आपला हात फिरवतो आणि लगेच गाढवाचं डोकं जाऊन तिथं बॉटमचं मुळातलं मानवी डोकं दिसायला लागतं. पक त्याला म्हणतो, “बेटया, जागा होशील ना तेव्हा तुझ्या मूळच्या डोळ्यांनी जग पहा.”

ओबेरॉन पऱ्यांना जोरजोरात वाद्ये वाजवायला सांगतो. आणि टिटानियाकडे प्रेमाने हसून बघत म्हणतो, ”टिटानिया, माझा हात धर आणि आपण ह्या संगीताच्या तालावर नाचू या. आज मी खूप खूष आहे. उद्या देखील सरदार थेसियसच्या लग्नात खूप नाचून मस्ती करू. थेसियस आणि हिप्पोलिटाच्याच बरोबरीने ह्या झोपलेल्या प्रेमिकांचीही लग्ने लागतील. मस्त मजा असेल उद्या.”

पक ओबेरॉनला आठवण करून देतो की आता पहाट व्हायला लागणार आहे, आपल्याला निघायला हवं इथून. तेव्हा टिटानियाही म्हणते, “खरं आहे, आपल्याला जायला पाहिजे ओबेरॉन. चल, जाता जाता मला तू सांग की मी ह्या मानवांच्या घोळक्यात कशी आले आणि त्यांच्यातच झोपले कशी ते.”  तिघेही तिथून अदृश्य होतात.

थेसियस, त्याची शिकारी पार्टी येते. त्यांच्या घोड्यांच्या टापांचा किंवा त्यांच्या  बिगुलांचा आवाजदेखील झोपलेल्या चौघांना जागे करू शकत नाही इतके ते गाढ झोपलेले असतात. थेसियसच्या लोकांपैकी कुणालाही ते चौघे दिसत नाहीत. थेसियसच्या बरोबर हिप्पोलिटा आणि हर्मियाचा बाप एजियस हे दोघे देखील असतात.

थेसियस घोड्याचा लगाम खेचतो आणि पाठोपाठ येणाऱ्या स्वारांकडं बघून बोलतो, “तुमच्यापैकी कोणीतरी  एकजण जाऊन इथल्या वनरक्षकाला बोलवून आणा. आपण आता शिकार थांबवत आहोत. पण अजून दिवस उजाडायला वेळ आहे तर तोपर्यंत आपल्या शिकारी कुत्र्यांना पश्चिम कड्याजवळ मोकळं सोडा. राणीसाहेबांना त्यांचं तालासुरातलं भुंकणं ऐकू द्या. जा.”

दोघे स्वार  निघून जातात. थेसियस हिप्पोलिटाकडे हसून बघत म्हणतो, “हिप्पोलिटा, चल आपणही पश्चिम कड्यावर जाऊ या. तिथून आपल्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा खालच्या दरीतून येणारा नादमाधुर प्रतिध्वनी ऐकायला मिळेल.”

“मागे मी हर्क्यूलिस आणि कॅडमस ह्यांच्याबरोबर क्रीट बेटावर गेले होते अस्वलाच्या शिकारीसाठी तेव्हा स्पार्टाची शिकारी कुत्री होती आमच्याबरोबर. काय त्यांचं भुंकणं होतं म्हणून सांगू? चारी बाजूनी त्यांचे प्रतिध्वनी येत होते. आकाश काय, कडेकपारी काय, अगदी सगळीकडून आवाज येत होता फिरून फिरून. अहो असा प्रतिध्वनीचा खेळ म्हणजे अगदी तालासुरातलं संगीतच वाटत होतं. तुम्हाला सांगते, भुंकण्यातलं असं स्वर्गीय संगीत मी कधीच ऐकलं नव्हतं.“ हिप्पोलिटा म्हणते.

“अग, आपली कुत्री देखील स्पार्टाच्या कुत्र्यांच्याच वंशावळीतली आहेत, तोच रंग, तसंच गळ्याखालचं लोंबतं मांस, जमीन झाडत असल्यासारखे कान! थेस्सालीच्या बैलांचे असतात ना तशा कमानीसारख्या वाकडया पायानी पळतात. पळण्यात तशी फारशी वेगवान नाहीत पण चर्चच्या घंटेसारख्या आवाजात अशी भुंकतात ना की ऐकतच राहावं. ऐकशीलच तू आता. चल.” असं म्हणत थेसियस घोडा वळवतो. दोन तीन टापा टाकल्या असतील नसतील इतक्यात थेसियसचं लक्ष गवतावर झोपलेल्या मुलींकडं जातं. घोड्याला थांबवत तो म्हणतो, “अरेच्च्या, ह्या कोण मुली? आणि इथं कशा काय झोपल्यात?”

एजियस त्याच्या घोड्यावरून उतरून जवळ जाऊन बघतो आणि चकित होऊन म्हणतो, “सरकार, अहो ही माझी मुलगी हर्मिया आहे. आणि ही दुसरी नेदारची मुलगी हेलेना. आणि ते बघा तिथं पलिकडंच झोपलेत ते डिमेट्रियस आणि लिसांडर. पण मला कळत नाही हे चौघेही इथं कसे? आणि तेही एकत्र?”

थेसियस: “मीही बुचकळ्यात पडलोय. कदाचित आपण इथं येणार ते समजल्यामुळं आले असतील आपल्याला भेटून शिकारी जथ्थ्यात सामील व्हायला. अरे हो, पण एजियस, आज हर्मियानं तिचा निर्णय सांगायचाय ना?”

एजियस: “होय सरकार.”

थेसियस स्वारांना सांगतो बिगुलांचा आवाज करून त्या चौघांना जागं करायला. चार पाच जण बिगुले वाजवतात. इतका मोठ्ठा आवाज होतो की झोपलेले चौघेही खडबडून जागे होतात. थेसियस आणि इतर लोकांना बघून दचकतात. थेसियस हसून म्हणतो, “शुभ प्रभात, मित्रांनो, अरे व्हॅलेंटाईन्स डे कधीच होऊन गेला. आणि आत्ता तुम्ही प्रेमिकांनी जोड्या जमवल्यात काय?”

चौघेही पटकन गुढ्ग्यांवर बसून नमस्कार करतात. लिसांडर बोलायचं धाडस करतो, “क्षमा असावी सरकार.”

“उठा, उठा.” थेसियस लिसांडर आणि डिमेट्रियस या दोघांकडं पाळी पाळीनं बघत म्हणतो, “अरे कालपर्यंत तुम्ही दोघं एकमेकांचे वैरी होतात ना? मग ही अशी एकमेकांच्या शेजारी झोपण्याइतपत मैत्री कशी झाली तुम्हा दोघांत?

लिसांडर: “सरकार, मी गोंधळून गेलोय, अर्धवट जागा, अर्धा झोपेत असा आहे मी बहुतेक. त्यामुळं कदाचित मला आठवत नसावं नीट. पण मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आठवायचा. हं, आत्ता आठवलं, सरकार, क्षमा करा, मी आणि हर्मिया इथं आलो होतो काल रात्री, अथेन्स सोडून पळून जायच्या उद्देशाने. अथेन्सच्या कायद्यांपासून सुटका करून घ्यायची होती आम्हाला.”

एजियस: “बस्स कर लिसांडर. फार झालं! सरकार, तुम्ही ऐकलंत ना हे? मला न्याय द्या सरकार. हा पळवून नेणार होता माझ्या मुलीला. डिमेट्रियस, ऐक. तुझ्या होणाऱ्या बायकोला, माझ्या मुलीला माझ्या परवानगीशिवाय पळवून नेऊन हा आपल्या दोघांनाही फसवणार होता.”

रागानं लालबुंद झालेल्या एजियसकडं बघायचं डिमेट्रियस टाळतो. हेलेनाकडं चोरटा कटाक्ष टाकून थेसियसला म्हणतो, “सरकार, ह्या दोघांच्या पळून जायच्या कटाविषयी मला हेलेनानं सांगितलं तेव्हा मी चिडून त्याना अडवायसाठी म्हणून ह्या वनात त्यांच्या मागावर आलो. हेलेनाही माझ्या पाठोपाठ आली. आणि सरकार, काय झालं, कसं झालं ते मला समजत नाही, पण कुठल्या तरी दैवी शक्तीनं मला जाणवून दिलं की माझं हर्मिया वर असलेलं प्रेम बर्फासारखं वितळून गेलं आहे. आज मला जाणवतय की हेलेना हीच माझं सर्वस्व आहे, हर्मिया नाही. माझ्या हृदयाची स्पंदनं, माझ्या डोळ्यांतला प्राण, सर्व काही हेलेना आहे. एखाद्या आजारी माणसाला जसं त्याचं आवडीचं अन्न नकोसं होतं तसं झालं होतं माझं हेलेनाच्या बाबतीत. पण आता माझा आजार दूर झाला आहे, डोकं आणि मन ठिकाणांवर आलेलं आहे. मी हेलेनाशिवाय जगू शकणार नाही हे मला कळून चुकलंय सरकार. आयुष्यभर तिच्याशी एकनिष्ठ राहून मी तिच्यावरच प्रेम करत राहीन मरेपर्यंत.”

थेसियस एजियसकडे बघतो. एजियस खांदे उडवून काही न बोलता बाजूला जातो. थेसियसच्या चेहऱ्यावर हसू फुटतं. तो म्हणतो,” बरं का रे प्रेमिकांनो, तुम्ही नशीबवान आहात. त्यामुळंच आपली इथं भेट झाली. तुमची ही चित्तरकथा आम्ही नंतर ऐकू सवडीनं. आणि एजियस, आम्ही या प्रेमिकांच्या संबंधाने काल दिलेला निर्णय बदलतो आहोत. आमच्या विवाहसमारंभातच, त्याच देवळात, ही दोन जोडपी देखील विवाहबद्ध होतील. आणि हो, आता दिवस उजाडतोय. तेव्हा आपण शिकार थांबवून अथेन्सला परत जाऊ. सगळेच. आज मोठी जंगी पार्टी करूया. चल हिप्पोलिटा.”

दोन् जोडप्यांखेरीज बाकी सगळे जण निघून जातात.

डिमेट्रियस: “मी तर चक्रावलो आहे. सारं कसं अंधुक, अस्पष्ट दिसतंय मला.”

हर्मिया (डोळे चोळत): “मला तर सगळ्या गोष्टी दोन दोन दिसतायत.”

हेलेना: मला माझा डिमेट्रियस, माझं मूल्यवान रत्न परत मिळालं? विश्वास बसत नाहीये.”

डिमेट्रियस: आपण जागे आहोत का खरंच? मला वाटतंय आपण अजून झोपेतच आहोत, स्वप्न बघत. स्वप्नात मला सरदार थेसियस दिसत होते आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या बरोबर यायला सांगितलं.”

हेलेना: “हो, त्यांच्या बरोबर राणी हिप्पोलिटा देखील होती.”

लिसांडर: “सरदारांनी आपल्याला देवळात यायला सांगितलं.”

डिमेट्रियस: हो ना? बघा, तुम्हालाही तसंच वाटतंय म्हणजे ते सगळं खरंच असणार. आपण जागे आहोत तर. चला मग, आपण त्यांच्या पाठोपाठ जाऊया. वाटेत आपल्या स्वप्नांबद्दल चर्चा करू.”

चोघेही  जातात.

बॉटम डोळे उघडतो. “माझा संवाद आला की सांगा बरं का रे मला,” तो पुटपुटतो. “मी म्हणायचंय .. ‘नि:पक्षपाती पिरॅमस’.” बॉटम अडखळत उठतो, जांभई देतो आणि इकडेतिकडे बघत हाका मारतो, “पीटर.. पीटर क्विन्स ! फ्लूट !  स्नाऊट ! स्टारवेलिंग ! आहात कुठं सारे?” ते सगळे आधीच गाढवाचं डोकं असलेल्या बॉटमला बघून पळून गेलेले असतात. बॉटमला वाटतं  आपल्याला गाढवाचं डोकं उगवलं आहे असं आपण स्वप्नात बघितलं. “क्काय चमत्कारिक स्वप्न होतं ते. पण तितकंच गमतीचं ! पीटर क्वीन्सला सांगितलं पाहिजे त्या स्वप्नावर एक पोवाडा लिही ‘बॉटमचं स्वप्न’ असा आणि थेसियसच्या लग्नात गा. नाटकाच्या शेवटी गायचं. नको नको, त्यापेक्षा थिस्बे मेल्यानंतर गायलं तर उत्तम होईल.”

[ पडदा ].

***

अंक चौथा, प्रवेश दुसरा
स्थळ: पीटर क्विन्सचे वर्कशॉप

क्विन्स, स्टारव्हेलिंग, फ्ल्यूट बोलत आहेत.
क्विन्स विचारतो, “बॉटमच्या घरी जाऊन आलात का तुम्ही? आलाय  का तो परत?” यावर स्टारवेलिंग उत्तर देतो, “नाही ना. त्यानं कुणाशीही संपर्क नाही केला. ती जी काही भुताटकी होती ओक वनात तिनं बॉटमभाऊचं अपहरण केलेलं असणार हे नक्की.”
फ्ल्यूट  म्हणतो, “बॉटमभाऊ परत आला नाही तर आपल्या नाटकाचा सत्यानाश होईल. आपण प्रयोग करूच शकणार नाही. हो ना?”
क्विन्स: “खरं आहे. आख्ख्या अथेन्समध्ये पिरॅमसची भूमिका बॉटमच्या इतक्या तयारीनं करू शकेल असा कुणी माणूसच नाही.”
फ्ल्यूट मुंडी हलवतो, “अथेन्स मधल्या कुणाहीपेक्षा बॉटमभाऊचा अभिनय उजवाच असतो.”
क्विन्स: “शिवाय त्याच्या हजरजबाबीपणाला तर तोडच नाही.”
फ्ल्यूट: “त्याच्या आवाजामुळंही तो ‘पॅरामूर’च ठरतो.”
क्विन्स: “अरे दीड शहाण्या, पॅरामूर नाही. पॅरॅगॉन!  पॅरॅगॉन म्हणजे सर्वश्रेष्ठ. आणि पॅरामूर म्हणजे व्यभिचारी.”
फ्ल्यूट: “असं का? चुकलंच माझं.”
क्विन्स काही बोलणार असतो इतक्यात स्नग प्रवेश करतो.
स्नग: “दोस्तानो, ऐका. सरदार थेसियस आणि राणी हिप्पोलिटा आत्ताच देवळातून बाहेर आलेत. त्यांच्या लग्नातच आणखी दोन जोडप्यांची देखील लग्ने लावली गेली. आता जर आपण आपलं नाटक सादर करू शकलो असतो ना तर तुफान धमाल झाली असती यार. आपला नावलौकीक तर झाला असताच. शिवाय जो भरभक्कम मेहेनताना मिळाला असता तो वेगळाच. हो ना क्विन्सभाऊ?”
फ्ल्यूट: “ओ बॉटम, बॉटमभाऊ ! तुला कल्पनाच येणार नाही  तुझ्या गायब होण्यानं तुझं किती नुकसान झालंय त्याची. अरे दिवसाला सहा पेन्स अशी पेन्शन जन्मभरासाठी मिळाली असती. हो की नाही दोस्तानो? मी पैजेवर सांगतो पिरॅमसच्या भूमिकेसाठी सरदार थेसियसनी  बॉटमभाऊला सहा पेन्स रोज ह्यापेक्षा कमी कधीच दिले नसते.”
एवढ्यात आवाज येतो, “नटसम्राट लोक, आहात कारे सगळे इथं हजर?” आणि साक्षात निक बॉटम दारात येऊन उभा राहतो.
“बॉटम, ये ये बॉटम,” क्विन्स  धावत जाऊन त्याला मिठी मारतो. “वा वा, आजचा दिवस मोठा भाग्याचा आहे. ह्या क्षणाची आतुरतेनं वाट बघत होतो आम्ही सगळे.”
“दोस्तानो, मला तुम्हाला काही जबरदस्त गोष्टी सांगायच्या आहेत,” आनंदानं नाचणारे सगळे कलाकार शांत झाल्यावर बॉटम म्हणतो. “पण काय ते विचारू नका. विचाराल तर सांगणार नाही कारण मी सच्चा अथेनियन आहे. सांगेन तेव्हा गोष्टी अगदी जशा घडल्या तश्श्या सांगेन.”
क्विन्स: “सांग सांग बॉटम. आम्हाला ऐकायच्या आहेत.”
बॉटम: अंहं ! माझे ओठ बंद आहेत. आत्ता एवढंच सांगतो की सरदार थेसियस यांचं जेवण आटोपलं आहे. तेव्हा आता आपल्या नाटकासाठी सज्ज व्हा. तुमचे पोशाख, बूट, तुमच्या नकली दाढया अशा सगळ्या जामानिम्यासह राजवाड्यावर चला. आपापले संवाद नीट आठवून घ्या. कारण आपलं नाटक पास झालंय. आपण प्रयोग करणार आहोत आपल्या नाटकाचा. त्यासाठी थिस्बेचे कपडे स्वच्छ असले पाहिजेत. आणि सिंहाच काम जो कोणी करणार आहे त्यानं नखं कापायची नाहीत हे लक्षात घ्या. सिंहाच्या पंजासारखी ती  बाहेर निघालेली दिसली पाहिजेत. आणि मुख्य म्हणजे प्रयोगाच्या आधी कुणीही कांदा लसूण खाऊ नका. आपले आवाज गोड असायला हवेत. तरच प्रेक्षक म्हणतील ‘किती गोड विनोदी प्रहसन आहे’. बस्स  आता आणखी काही सांगायचं नाही. चला निघा.”
सगळे जातात.

[ पडदा.]
(क्रमश:)
[ वरील अनुवादाचे यापूर्वीचे सहा भाग, अनु. दि. १७ ऑक्टो. १२ नोव्हें., १५ डिसेंबर २०२२, १३ जानेवारी, २१ फेब्रुवारी आणि ०६ एप्रिल २०२३ रोजी प्रसिद्ध झाले होते. ]

– अनुवाद मुकुंद कर्णिक 
karnikmukund@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आजची कविता

प्रदीप अधिकारी

अगोचर

तळ डोहाचा करीत गहिरा,
काजळ माया जळांत पसरल्या…
ध्यानस्थ बसले झाड  वडाचे,
जमवूनी  भवती  गूढ़ सावल्या…
भग्न शिवालय काठावरती,
गाभाऱ्यांतील मिणमिण पणती…
पाय उलटे जळांत सोडुनी,
अगोचर कुणी ते वाट पाहती… !!!

– ©️ प्रदीप अधिकारी  

9820451442
adhikaripradeep14@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
काय वाचाल ?

अनामिकाची शिफारस

लोभ असावा’ आणि ‘एखाद्याचा मृत्यू‘ हे आणखीन एक विचित्र नावाचे पुस्तक नुकतेच वाचून काढले. या दोन दीर्घकथांचे लेखक आहेत श्री. मनोहर शहाणे व प्रकाशक आहेत मौज प्रकाशन. विषयांची सहजसुंदर हाताळणी व वरचा दर्जा या दोन गुणांचा संगम यात दिसून येतो. त्यामुळेच सलग असे वाचन होऊन कथाविषय मनामध्ये रेंगाळत राहतात.

आणखी एक पुस्तक वाचले. ‘चौफुला‘ – लेखिका आहेत चौघीजणी – श्रीमती सरला कारखानीस, लीला आवटे, मृण्मयी बारपांडे, हेमा मथुरे. प्रकाशक अभिनव प्रकाशन मुंबई.

‘चौफुला’ च्या चार लेखिकांपैकी कोणाचेही नावाभोवती प्रसिद्धीचे वलय नाही ; कदाचित म्हणूनच मी सहज ते वाचावयास घेतले व त्यात रंगून गेलो. एकूण अकरा कथांमधील मला विशेष आवडलेल्या कथा म्हणजे ‘एक रात्र’ ( ले. सरला कारखानीस ), ‘साफल्य’ ( लीला आवटे ), म्हैस ( मृण्मयी बारपांडे ) या आहेत. मनामध्ये दीर्घकाळ रेंगाळत राहतील अशा या कथा आहेत. आपण त्या जरूर वाचाव्यात.

१९२० ते १९७१ एवढ्या प्रदीर्घ कालखंडाचा बस वाहतुकीच्या संबंधात आलेला अनुभव ‘एस. टी. तील दिवस‘ या नावाने न. गो. पंडित यांनी लिहिलेला आहे. ( प्रकाशक शुभदा सारस्वत प्रकाशन पुणे ) प्रवासी वाहतुकीमध्ये १९२० ते १९५० पर्यंत खाजगी वाहतूक कंत्राटदारांचीच चालती होती. पुढे सरकारी पातळीवरून त्याची मक्तेदारी एस. टी. कार्पोरेशनकडे देण्यात आली, याचा माहितीपटच  ( Documentary Film ) जणू यात चितारलेला आहे. आता माहितीपटच असल्याने त्यात एकसूरीपणा फार डोकावतो. मात्र अपरिचित असा विषय असल्यामुळे एवढा प्रचंड व्याप उभा करता करता पडद्यामागे काय काय हालचाली होत असतात त्याचे वाचनीय असे चित्रण यात केले आहे.

असेच दुसरे एक माहितीपटवजा पुस्तक म्हणजे ‘आम्ही पोस्टातील माणसं‘ लेखक सीताराम मेणजोगे डिंपल  प्रकाशन ) . पोस्टाच्या नोकरीत विविध पातळ्यांवर लोकांशी संबंध येत असल्याने ते अनुभव वाचावयास चांगले वाटतात हे मात्र खरे !

आता भेटू असेच पुढील अंकी …

– अनामिक

संग्रहालय सप्टेंबर १९८६ वरून साभार पुनःप्रसिद्ध ]

   ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
हाराष्ट्राला चिरस्मरणीय अशा काही विभूति

भाग ३७

प्रिय वाचक,
‘मैत्री’च्या १४ नोव्हेंबर २०२१ च्या अंकापासून, शतकापूर्वीच्या काही ज्ञात, अज्ञात तसेच विस्मृतीत गेलेल्या विभूतींचा थोडक्यात सचित्र परिचय. मासिक ‘मनोरंजन’च्या दिवाळी अंक १९१० मधून साभार क्रमशः पुनःप्रसिद्ध करण्यात आला. आजचा हा ३७ वा भाग शेवटचा. या लेखमालेचे बहुसंख्य वाचकांनी स्वागत केले आणि त्या त्या विभूतींना वंदन केले. – सं. 

(१११) लिंगप्पा जयप्पा सरदेसाई 
 
[ स. १८६२ – १९०६ ] 
वीरशैवलिंगि ब्राह्मण; जन्म मिरज संस्थानांत शिंगली गांवी १० जानेवारी १८६२; ह्यांना १८७२ सालीं शिरसिंगीचे सरदेसाई श्रीमंत जयप्पा यांच्या ज्येष्ठ पत्नीने दत्तक घेऊन लिंगप्पा हें नांव ठेविलें; यांनी मराठी, संस्कृत व इंग्रजी वाङ्मयाचा अभ्यास खाजगी रीतीनें केला; ह्यांनी आपल्या संस्थानांत फार सुधारणा केल्या; लाखो रुपये खर्च करून विहिरी, तलाव बांधून पाण्याची सोय करून रयत सुखी केली; १९०४ सालीं धारवाड येथील लिंगायत विद्यार्थ्यांच्या बोर्डिंगास सालीना एक हजार उत्पन्नाचे गांव तोडून दिलें; हे पहिल्या प्रतीचे सरदार होते; ह्यांना मुंबई सरकाराने दोनदा आपल्या कायदे कौन्सिलाचे सभासद नेमिलें होतें; वीरशैव महासभेच्या अध्यक्षत्वाचा मान यांना दोनदा देण्यांत आला होता; आपल्या समाजाच्या उत्कर्षासाठी यांनी अनेक प्रकारे परिश्रम केले; स्वज्ञातीत शिक्षणप्रसार करण्याची यांना फारच कळकळ होती; मृत्यूसमयी दत्तकपुत्र घेण्याची यांना सूचना केली असतां ‘एका मुलाचा चरितार्थ चालविण्यापेक्षा ज्ञातीतील हजारो मुलांच्या चरितार्थाचें साधन करून ठेवणें उत्तम’ असें म्हणून अंतकाली  आपलें सर्वस्व ४० हजार रु. उत्पन्नाचें संस्थान यांनी लिंगायत फंडास अर्पण केलें; ह्यांचा स्वभाव अत्यंत विनायशाली व मनमिळाऊ होता ; मृत्यु २३ आगस्ट १९०६. 
 
 
(११२) आनंदीबाई जोशी 
 
 
 
 
[ स. १८६५ – १८८७ ]  
कोकणस्थ ब्राह्मण; जन्म पुणें येथें शके १७८७, चैत्र शुद्ध ९; विवाह तेरावे  वर्षे श्रीयुत गोपाळराव विनायक जोशी यांचेबरोबर झाला; लग्न झाल्यावर शिक्षणास प्रारंभ झाला; इंग्रजी शिकण्यास कोल्हापूर येथें सुरुवात झाली; ता ७ एप्रिल एप्रिल १८८३ रोजी ह्या कलकत्त्याहून अमेरिकेस जाण्यास निघाल्या ; अमेरिकेत डाक्टरीच्या परीक्षा पास होऊन ११ मार्च १८८६ रोजी यांना एम् . डी. ची पदवी मिळाली व न्यू इंग्लंड येथील बायकामुलांच्या दवाखान्यावर यांची नेमणूक झाली ; एम् डी ची पदवी मिळविणारी ही पहिलीच हिंदी स्त्री होय; अमेरिकेतील हवा मानेना म्हणून या स्वदेशीं येण्यास निघाल्या व १८८६ चे नवंबरचे १६ वे तारखेस मुंबईस येऊन पोंचल्या; यांच्या अकालिक मृत्यूमुळें यांनी संपादन श्रेष्ठ ज्ञानाचा आपल्या देशास फायदा घेतां आला नाहीं, हे देशाचें दुर्दैव समजलें पाहिजे; मृत्यु २६ फेब्रुआरी १८८७. 
 
 
(११३) व्हायओलेट क्लार्क   
 
 
[ स.     – १९०९ ]
इंग्रज ख्रिश्चन; मुंबई इलाख्याचे लोकप्रिय गव्हरनर  सर जार्ज क्लार्क यांच्या ह्या कन्या; ह्या आपल्या मातेबरोबर १९०७ सालीं मुंबईस आल्या; हिंदुस्थानावर आणि हिंदू लोकांवर यांचे फार प्रेम असे; हिंदुस्थानांत येण्यापूर्वीच यांनी रामायण, महाभारत, भगवद्गीता, उपनिषदें ह्या हिंदूंच्या पूज्य ग्रंथांचा जर्मन आणि इंग्लिश भाषेंतून श्रद्धापूर्वक अभ्यास केला होता; शासित आणि शास्ते यांच्यांत निरंतर स्नेहसंबंध असावा असें यांच्या वडिलांप्रमाणेच यांचेंहि मत असे व तसे प्रसंग घडवून आणण्यासाठी यांचे मनःपूर्वक प्रयत्न असत; एतद्देशीय लोकांशी या फारच मिळून मिसळून वागत व अनाथ अपंगांना साहाय्य करण्याच्या कामीं तनुमनानें झटत; अस्पर्श वर्गाच्या मुलांच्या शिक्षणास उत्तेजन देण्याच्या कामीं त्यांनी फार आस्थापूर्वक प्रयत्न केले ; त्यांच्या मदतीसाठी स्वतः जलसा करून हजारो रुपये मिळवून दिले; हिंगणे येथील अनाथ बालिकाश्रमासाठी मोठा फंड जमविण्याचें यांनी योजिलें होतें; यांचा तो हेतू यांच्या अकाल निधनामुळें मनातल्या मनातच राहून गेला; सा-या मुंबई इलाख्याचें यांनी आपल्याकडे चित्त वेधून घेतलें होतें; यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ, दयाळू आणि परोपकारी होता; यांच्या अकाल मृत्युमुळें मुंबई इलाख्यातील सारी प्रजा फार हळहळली; आपलें कोणी निकट संबंधी मनुष्य गेलें, असेंच सर्वांना वाटलें; मृत्यु २२ मार्च १९०९.
[ लेखमाला समाप्त ]
– अज्ञात
[ ‘मनोरंजन‘ दिवाळी अंक १९१० वरून साभार पुनःप्रसिद्ध ]
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
घन तमी शुक्र बघ राज्य करी ..
 
  

चांदणे स्वरांचे :  ४

एखादं गाणं आपल्याला केव्हा भावतं? बऱ्याच वेळा आवडत्या गायक-गायिकेचा प्रभाव असतो हे जरी एक कारण झालं तरी काही गाणी अशी असतात की ती अगदी हृदयापर्यंत जाऊन भिडतात. त्या काव्यात मांडलेले विचार अगदी त्या काव्य सरींमध्ये  आपल्याला चिंब चिंब करतात.

गाणं, गायकी, शब्द, संगीत, चाल, लय सगळं सगळं आपल्या आरपार पोहोचतं. असं गाणं कितीही वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा आपण ते ऐकतो, मनोभावे त्याची पारायणं करतो. किंबहूना ते गाणं त्याच्या सगळ्या हरकती, सूर, ताल, लय अगदी आत आत भिनलेलं असतं.

उत्तम आवाज, उत्तम सूर, उत्तम संगीत याला जर उत्तम शब्दांची जोड लाभली तर ती कलाकृती अजरामर होते. हे गाणं आहे १९२० साली लिहिलेलं ! भा.रा तांबे यांनी लिहिलेलं, हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेलं आणि अर्थातच लताबाईंच्या स्वर्गीय आवाजाचा परिसस्पर्श लाभलेलं. माझ्या अत्यंत आवडीचं. घन तमी शुक्र बघ राज्य करी ..

कसं कोणास ठाऊक पण मला हे गाणं अनवधनानं ऐकायला मिळालं. पूर्वी एकमेकांच्या कॅसेट एकमेकाला ऐकायला द्यायची पद्धत होती. अशीच माझ्या एका दर्दी भावाने मला त्याची कॅसेट गाणी ऐकायला दिली आणि या गाण्याचा खजिना हाती लागला.

गाण्याच्या सुरुवातीला स्टीलड्रम, झायलोफोन, ट्रॅंगल वा तत्सम वाद्यांचा एक अनोखा आवाज येतो आणि जणू लुकलूक करणारे तारे, तारांगण असं काहीसं डोळ्यासमोर सहज येऊ लागतं. त्यानंतर गुढगर्भ असे व्हायलिनचे पिसेस वाजतात. जणू अलगद ते आपल्याला अंतराळात नेतात. आणि मग स्वर्गीय सूर उमटतात ..

घन तमी शुक्र बघ राज्य करी ..
खिन्न मना बघ जरा तरी …

घन तमी चा घनगर्द सूर अगदी दाटून आलेला अंधार हुबेहूब दाखवतो. नुसताच काळोख नाही तर मानव निर्मित निराशेचा खोल काळोख .. स्वतःच निर्माण केलेला काळोख मनाला वेढून राहीलेला .. या अशा खिन्न झालेल्या मनाला, आकाशात काळोखातही प्रचंड तेजाने चमचमणाऱ्या शुक्राच्या चांदणीकडे पाहण्यास तांबे सांगतात, नव्हे काळोखावर त्याचेच साम्राज्य चालते असेही दर्शवतात. खिन्न मना म्हणतानाची खिन्न अवस्था आणि बघ जरा .. वरी .. ह्याचा फोर्स ते आकाशाला भिडलेले सूर इतके प्रेरीत करणारे की अगदी अनवधानानं आकाशाकडे पहावं आणि नुसते कानात साठवून ठेवावे.

त्याच फ्लो मध्ये पुढचे कडवे येते ..

ये बाहेरी अंडे फोडुनि
शुद्ध मोकळ्या वातावरणीं
का गुदमरशी आतच कुढुनी
मार भरारी जरा वरी

ये ऽऽऽ बाहेरी ही इतक्या फोर्सने म्हटलंय आणि ते सूर इतके टीपेला जातात की अगदी ते तडकणारं अंड्याचं टरफल आणि बाहेर येणारं ते पिल्लू दिसू लागतं.

आणि मग जणू ती आतली सगळी घुसमट सोडून बाहेर येऊन शुद्ध श्वास घेऊ लागतं हे शब्दातून, सूरातून ठायी ठायी प्रतित होतं. सगळी घुसमट संपून, तडतड संपून बाहेर आल्यावर ते सूर अगदी शांत होतात, शुद्ध मोकळ्या म्हणताना तो हलकेपणा, ते बाहेरच्या जगात वावरणं, सारी आवरणं गळून जाऊन मोकळं होऊन तरंगणं हे सारं अगदी त्या शुद्ध मोकळ्या दोनच शब्दातून समजावं.

का गुदमरशी .. आतच कुढूनी म्हणताना ते आतल्या आत कुढणं, गुदमरणं, उगीच काही कारण नसताना त्या गर्तेत सापडणं जणू त्या स्वरलिपितून दिसून येतं.

मार भरारी जराऽऽऽ … तितकच फोर्सफूल .. आव्हान देणारं. हृदयनाथांनी योजलेली स्वरयेजना अगदी शब्द थेट उलगडून सांगणारी. काव्याशी अर्थाशी प्रामाणिक राहून केलेली..सुरवातीला पोटतिडकीने हे सांगितल्यावर थोडे सूर खाली येतात .. नूर बदलतो. आता जरा समजावणीच्या सूरात लताबाई गाऊ लागतात.

फूल गळे फळ गोड जाहले
बीज नुरे डौलात तरु डुले
तेल जळे बघ ज्योत पाजळे
का मरणी अमरता ही न खरी

खिन्न मनाला समजावताना निसर्गातली चिरपरिचित उदाहराणे देऊन तांबे जणू उत्पत्ती स्थिती लय याचा सिद्धांत समजावतात आणि हृदयनाथांच्या संगीत संयोजनात लताबाई ते कमालीच्या परिणामतेने गातात. इथे फक्त सुरांचा गोडवा उपयोगाचा नाही तर त्यापलिकडे जाऊन तो खोलवर दडलेला गुढ गर्भित अर्थ त्या त्यांच्या स्वरातून हवा तिथे जोर देऊन हवं तिथे हलके म्हणून रसिकांच्या हृदयालाच हात घालतात. फूल जरी गळलं तरी ते फळाच्या रूपात येतयं हा विश्वास ते अलौकीक सूर देतात. डौलात तरू ऐकताना झाड थरारल्याचा भास होतो.

तेल गळलं तरी बघ … अगदी आपलं लक्ष वेधून घेतलं जातं , जीवनाची सत्यता आपल्यावर बरसते.

पहिल्या कडव्यात थेट शुक्राच्या माध्यमातून खिन्नतेचा अंधार दूर करायला सांगणारे तांबे, दुसऱ्या कडव्यात उभारलेल्या मनाला पदोपदीने समजावतात आणि शेवटी चक्क.. सर्व प्राणीमात्रांना ज्याची भीती, चिंता भेडसावत असते त्या मरणालाच हात घालतात. लताबाईंचे सूर ही बदलतात.. किंचित नरमाईने त्या गातात
मरणाची विशालता सुरांतून कळते .. तो ब्रह्मांडाचा पसारा समोर तरळतो. आपल्या क्षृद्रत्वाची भावना रसरसून वर येते आणि त्यातच मरण म्हणजे जणू त्याची करूणा, कृपा .. अगदी
दुनिया जिसे कहते है
मिल जाए तो मिट्टी खो जाए तो सोना ..

याची आठवण यावी. ती अनंत माया ते अनंत प्रेम कसं आपल्याला कवेत घ्यायला आसुसलं आहे … पण आपण मात्र खऱ्या सुखापासून वंचित राहून कपोल कल्पित दुःखात का वृथा ढकलतो याचा पश्चात्ताप , अनुताप व्हावा इतकं इतकं परिणामकारक त्यांनी ते गायलय.

मना वृथा का भीशी मरणा
दार सुखाचे ते हरि करुणा
आई पाही वाट रे मना आ आ आ
पसरोनी बाहु कवळण्या उरीं

पुन्हा साऱ्याची इतिश्री … घनतमी मधून होते.
हृदयनाथांचं प्रत्येक गाणं वेगळं. त्याची हाताळणी त्या त्या श्रीमंत काव्यासारखीच गर्भरेशमी. मोजके सूर पण कठीण येजना .. अशा मिलाफातून आणि लता , आशाच्या सूरानी तेजाळून ते चांदणं आपल्यात झिरपावं . गायचा प्रयत्न केला तरी थिटेपण जाणवावं आणि मग फक्त कानांनी ऐकत ते हृदयात साठवावं अशी अवस्था .. भल्या भल्यांची होते तिथे सामान्य रसिकांची काय कथा ?
असामान्य शब्द, भावगर्भीत, ब्रह्मांडापर्यंत रसिकांना सहज नेणारे आणि संगीताच्या जादूनं ते अंतराळ सुरावटीतून प्रत्यक्षात यावं … इतकं हे गाणं प्रभावशाली. इतक्या वर्षानंतरही त्याची थोरवी टिकवून राहीलेलं!! रसिक मनावर शुक्राप्रमाणेच अधिराज्य करणारं, अजरामर !!!!!

– ©️ शिल्पा कुलकर्णी

shilpa.y.kulkarni@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
बालचित्रकारांचे दालन
सुट्टीतील कामगिरी
–  भार्गवी महाडिक  
प्रेषक सौ. स्वाती वर्तक
swati.k.vartak@gmail.com
@@@@@
– कबीर कर्णिक 
इयत्ता चौथी 
 @@@
– पार्थ कर्णिक
हे ZenTangle शैलीत काढलेले ज्वालामुखीचे चित्र आहे.
प्रेषक मुकुंद कर्णिक
karnik.mukund@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@@@
 
हत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@

10 thoughts on “जून महिन्यातल्या एका रात्रीतलं स्वप्न

  1. जून महिन्यातल्या एका रात्रीतलं  स्वप्न  याच्या कथानकाचा उलगडा व्हायला मला थोडा वेळ लागला पण अनुवाद सरस  असल्याने कळायला सोपे गेले .  मुकुंद कर्णिक छान लिहितात .
     
     प्रदीप अधिकारी, यांची अगोचर ही कविता आवडली . बालकवींच्या : औदुंबर : कवितेची आठवण झाली 

    अनामिकाची शिफारस  अनामिकाची शिफारस  नेहमीच चांगली असते ,
    महाराष्ट्राला चिरस्मरणीय अशा काही विभूति  मधील   अज्ञात,व्हायओलेट क्लार्क यांच्या बद्दलची माहिती वाचून मन भरून आलं .भारतात येऊन इथलं  साहित्य आत्मसात करणं . म्हणजे फारच झालं . क्लार्क बाईंना सलाम . आम्ही(मी) कुठे जात नाही आणि काही करत नाही . नुसते शब्दांचे बुडबुडे सोडतो.
       
    घन तमी शुक्र बघ राज्य करी .https://www.youtube.com/watch?v=N0p43HW_LBA – दुनिया जिसे कहते है https://www.youtube.com/watch?v=CE1PhifmwH8  
    सौ.  शिल्पा कुलकर्णी यांनी  संवादासाठी छान गीतं  निवडली आहेत  हृदयनाथ . र्मगेशकर यांचं संगीत मला आवडतं  जगजीत सिंग चित्रा  सिंग यांचे गाणे ऐकून पन्नास वर्षे होऊन गेली . आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद . लेखन खूप छान आहे
                                    
    भार्गवी महाडिकचं  पाहिलं चित्र आवडलं  तसेच पार्थ कर्णिक याचे चित्र फारच आवडलेलं . ही कोणत्या प्रकारची चित्रकला आहे ? 

  2. ‘जून महिन्यातल्या एका रात्रीतलं स्वप्न’ हा मुकुंद कर्णिक यांनी केलेला अनुवाद वाचायला छान वाटते. विशेषतःगाढव रूपातील बॉटमच्या चक्रम संवादांचे अनुवाद अधिक छान जमले आहेत.

    प्रदीप अधिकारींची ‘अगोचर’ ही कविता आवडली. ही वाचत असताना बालकवींच्या ‘औदुंबर’ कवितेतील “झाकळुनी जळ गोड काळिमा पसरे लाटांवर, पाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर” या ओळी सहज ओठांवर आल्या.
    अनामिकानी शिफारस केलेले कथासंग्रह आणि अनुभवाधारित पुस्तके नक्कीच वाचनीय असतील.

    मला अपरिचित असलेले ‘लिंगप्पा जयप्पा सरदेसाई’ हे किती जनताभिमुख होते, ते त्यांच्या आयुष्यभर केलेल्या कामांतून आणि अंततः त्यांनी केलेल्या सर्वस्वदानातून ध्यानात येते. ‘आनंदीबाई जोशी’ त्यांच्यावरील चरित्र, कादंबरी, सिनेमा यांमुळे त्या विस्मरणात जाणे कठीण! पण हा मजकूर १९१०मधला असल्याने योग्यच आहे.
    लेखमालेतील व्हायोलेट क्लार्क हे विलक्षण व्यक्तिमत्त्व आहे. जन्माने इंग्रज असूनही, ख्रिश्चन असूनही, हिंदुस्थानी लोकांच्या पूज्य ग्रंथांचा अभ्यास त्यांनी केला. यातून त्यांची इथल्या जनतेविषयीची आस्था प्रकट होते. मनात आले, इथल्या जनतेचे नेतेपद मिरविणाऱ्या किती जणांनी हे पूज्य ग्रंथ अभ्यासलेले असतील?

    ‘घन तमी शुक्र बघ राज्य करी ..’या माझ्या आवडत्या गाण्याचे शिल्पा कुलकर्णी यांनी केलेले रसभरीत रसग्रहण आवडले. गाण्यातील सौंदर्याचे बारकावे नव्याने कळले.

    भार्गवी, कबीर आणि पार्थ यांच्या चित्रांतून त्यांचे चित्र काढण्याचे कौशल्य आणि रंगसंगतीची जाण डोकावतेय.

  3. श्री कर्णिक यांचे अनुवादित चक्रम संवाद ..खूप छान ..मध्ये खूप दिवस गेल्यामुळे पुनः आठवावे लागते.
    श्री अधिकारी जींची कविता आवडली
    आनंदीबाई जोशींवर माझ्या मैत्रिणीने डॉक्युमेंटरी केली आहे ती आठवली…क्लार्क बद्दल राईलकर सरांनी लिहिले होते का?..वाचल्यासारखे वाटते कोठे तरी
    घन तमी वर छान लिहिले असल्याने ते गाणे ऐकले आनंद झाला ..जोडीने शिल्पाताईंचे रसग्रहण वाचल्याने मज्जा वाटली.
    पार्थ चे झेन टेंगल शैलीतील चित्र अप्रतिम..त्याचे मनःपूर्वक अभिनंदन

  4. अधिकारी जी, त्या कुणा अगोचराचा फोटो दिला नाहीत. कविता छान आहे.
    अनामिकांनी वर्णिलेली पुस्तकं रोचक वाटताहेत. बघू या वाचून.
    विभूतिंपैकी क्लार्क बाई कमाल वाटल्या. पार्थ, झेन टेंगल पैकी टेंगल शब्दाचा अर्थ कळला नाही, सांगतोस जरा.
    एकूणच अंक छान आहे. धन्यवाद नाबरजी.

  5. ज्या दर्जाचं काव्य त्याच दर्जाचं, तितक्याच तोला मोलाचं संगीत……आणि विलक्षण आकर्षक असा वाद्यमेळ!
    घनतमी शुक्र बघ राज्य करी हे गीत यापूर्वी अनेकदा ऐकले.आता जेव्हा कधी ऐकेन तेव्हा शिल्पा कुलकर्णी यांच्या रसग्रहणाची नक्कीच आठवण होईल.
    हृदयनाथ यांचा रंग काही वेगळाच आहे शैली अफलातून आहे. त्यांच्या चाली सुरुवातीला लक्षवेधक वाटत नाहीत. जसजसं श्रवण करावं तसतसं त्या चालीतलं सामर्थ्य नक्कीच जाणवतं.
    अनिल मोहिले हा अनुभव सांगताना म्हणाले होते की चाल मनात झिरपावी लागते आणि एकदा तसं झालं की आपण त्या गाण्याचे होऊन जातो.
    शिल्पा ताईंना खूप खूप धन्यवाद

    • एक सांगायचं राहिलं
      घनतमी हे गाणं ऐकताना केशवसुतांच्या सतारीचे बोल या कवितेची आठवण होते.
      काळोखाची रजनी होती
      हृदयी भरल्या होत्या खंती
      अंधारातच दडले सारे
      लक्ष लक्ष वरचे
      विमनस्कपणे स्वपदे उचलित
      रस्त्या तून मी होतो हिंडत
      एका खिडकीतून सूर तदा
      वदले दीडदा दीडदा दीडदा.

  6. स्वाती लोंढे लिहितात :-

    नमस्कार

    मुखपृष्ठ उत्कृष्ट.. गोवळकोंड्यात जाऊन आल्याचा भास..
    शिल्पा कुलकर्णींचं ‘ घन तमी शुक्र बघ राज्य करी ‘ रसग्रहणात्मक विवेचन खूप भावलं’.

    स्वाती लोंढे

यावर आपले मत नोंदवा