माझी जन्मठेप

दीपावली २०१८ विशेष 
 
पुस्तकाची कुळकथा *
 
[७] 
 
वि. दा. सावरकर

पुस्तकाचे मुखपृष्ठ

‘मैत्री’च्या या लेखमालेत आजपर्यंत आपण ज्या पुस्तकाच्या कुळकथा वाचल्यात, त्यातील कै. मामा वरेरकरांच्या ‘कुंजविहारी’ नाटकाच्या प्रकाशाची कुळकथा आपल्याला आठवत असेल. वरेरकरमामांना  सामाजिक हितशत्रूंशी कसा झगडा द्यावा लागला तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘माझी जन्मठेप’ तत्कालीन दंडसत्तेचे बळी ठरले. स्वातंत्र्यपूर्व काळातच नव्हे, तर आज आणि पुढेही हजारो वाचकांना स्फूर्तिप्रद ठरणा-या या अपूर्व ग्रंथाची ‘कुळकथा’ आज ‘संग्रहालय’ मासिकाच्या सप्टेंबर १९७८ च्या अंकातून साभार पुनःप्रसिद्ध करत आहोत. – सं.

     ” आमचा अंदमानचा वृत्तांत नि तेथे बंदिवास कंठीत असतांना भोगाव्या लागलेल्या यातना यांची कहाणी   ऐकण्यासाठी महाराष्ट्रातच नव्हे, परंतु उभ्या हिंदुस्थानांत आमच्या सहस्रावधी देशबांधवांनी सहानुभूतीपूर्ण औत्सुक्य आजपर्यंत अनेक समयी व्यक्त केलेले आहे. त्यांतही सुहृदांस आपण भोगलेली उत्कट दुःखे सांगतांना समवेदनांच्या अश्रूंनी स्निग्ध होणारा तो मधुर आनंद मिळवण्यासाठी आमचे हृदय आमच्या सुटकेपासून साहजिकच कासावीस होत आहे …

     परंतु तरीही काही केल्या अंदमानची कथा ओठांवर येत असतांहि लेखणीवाटे बाहेर येईना. अंधकारात वाढणा-या कोण्या काटेरी फुलवेलीप्रमाणे त्या सा-या दिवसांची स्मृति उजेड दिसतांच सुकून जाऊं पाही, दिपून जाई. कधी वाटे, सांगण्यासाठी का हे सगळे भोगले ? तर मग तो सगळा अभिनयच म्हणावयाचा. कधी वाटे, आपणास भोगाव्या लागल्या त्या यातना भोगीत असतांनाच जे त्या यातनांस बळी पडले त्यांना घरी परत येऊन प्रियजनांस ती दुःखे सांगण्याचे समाधानही मिळाले नाही ते सहतापी आज आपणाबरोबर नाहीत. ज्यांच्यासह तपाचा उत्ताप सहन केला त्यांस सोडून ह्या पारण्याच्या पंक्तीतील ही मिष्टान्ने एकट्यानेच कशी खावी? ही त्यांच्याशी प्रतारणा तर होणार नाही ना ? आणि आपणासारख्या कित्येक मनुष्यांवर आजपर्यंत हे खडतर संकटांशी सामना करण्याचे प्रसंग कोसळले आहेत नि अजून असले किंवा याहून भयानक प्रसंग कोसळावयाचे आहेत. ह्या जीवनकलहाच्या नगा-यांच्या घाईत आम्ही काय ही टिमकी वाजवीत बसावे ?

     परंतु दुःखाच्या गळ्यात किंकाळीचा ढोल हा निसर्गानेच बांधिलेला असावा की तो वाजवून त्याने आपली शक्य ती करमणूक करून घ्यावी. ससाण्याने झेप घालताच विवश होऊन त्याचे चोचीतच पडलेला पक्षी सहाय्याची लेश आशा नसता जो स्वाभाविक चीत्कार करतो. त्या चीत्कारापासून तो नेपोलियनचे प्रेत सेंट हेलिनामधून पॅरिसला ज्या दिवशी परत आणले त्या दिवशी राष्ट्रचे राष्ट्र आपले ध्वज नमवून आपल्या सहस्र वाद्यांतून सहस्र शोक नि विरहगीते गात जो दुःखाचा हंबरडा फोडते झाले, त्या हंबरड्यापर्यंत जितका प्राणिमात्राचा आक्रोश आहे, तितका तो आपापल्या दुःखांची प्रसिद्धी करण्यात चूर झालेला असतो. आक्रोश हा दुःखाचा स्वर आहे, तेव्हा या अनंत आकाशात जे अनेक चीत्कार उसासे टाकून आपल्या दुःखांचा भार कमी करीत हिंडत आहेत त्यांत माझ्या दुःखाने प्रसिद्धीचा उसासा का टाकू नये ? या अनंत अवकाशात माझ्याही आक्रोशाला अवकाश आहे असे वाटून प्रवृत्ती, केव्हा केव्हा दुःख एकदाचे ओकून टाकण्यास अगदी अधीर होई. पण तीच परिस्थिती तिचा पाय हिसडून तिला मागे खेची. कारण आमच्या सध्याच्या परिस्थितीत आमच्या अंदमानच्या अनुभवांत सांगण्यासारखे आहे तेच विशेषेंकरून सांगता येणार नाही. आजच्या परिस्थितीत सांगता येईल ते अगदी वरवरचे, उथळ वा सापेक्षतः क्षुल्लकसे वाटत असल्यामुळे सांगण्यास उत्साह येत नाही आणि जे सांगण्यासारखे आहे ते परिस्थिती सांगू देत नाही.

     अशा स्थितीत काहीतरी सांगून त्या कथानकाचे चित्र रंगहीन नि सत्त्वहीन करून टाकण्यापेक्षा, प्रस्तुत काही सांगूच नये. कधी तसा दिवस उगवेल की ज्या दिवशी सर्व गूढ आकांक्षा व्यक्त होऊ शकतील. सर्व मनोभावना मोकळेपणाने बोलू शकतील, त्या दिवशी सांगायचे ते यथाप्रमाणं होईल. तसा दिवस या आयुष्यात न उगवला तर नाही सांगणार, ते वृत्त जगाने ऐकले नाही म्हणून त्याचे महत्त्व उणावत नाही वा त्याची तीव्रता बोथट होत नाही. किंवा ह्या जगताच्या प्रचंड राहाटीत ते सर्व अश्रूत राहिले म्हणून काही मोठा खंड पडणार आहे असेही नाही, असे वाटे.

     …. जे काय अर्धेमुर्धे वा अल्पस्वल्प सध्याच्या परिस्थितीत सांगता येण्यासारखे आहे ते तरी आपण सांगितलेच पाहिजे… एतदर्थ परिस्थितीत जो काय सांगता येईल तो आमचा अंदमानमधील वृत्तांत सांगून टाकण्याचा आम्ही निश्चय केला आहे.

… या आठवणीत सर्व वृत्त जरी सांगता आले नाही, तरी सांगितले जाईल ते अक्षरशः नि भावार्थही यथातथ्य सांगितले जाईल, ह्या विषयी शक्य ती दक्षता राखण्याचा यत्न केला जाईल.”

– वि. दा. सावरकर
रत्नागिरी, शालिवाहन संवत्
१८४७ / सन १९२५

~~~~ ~~~~ ~~~~~

     परकीय ब्रिटिश साम्राज्यतेविरुद्ध बंड पुकारल्याच्या आरोपावरून श्री. विनायक दामोदर सावरकर यांना दोन जन्मठेपेची शिक्षा ब्रिटिशांच्या राज्यातील न्यायालयाने २४ डिसेंबर १९१० रोजी दिली आणि पन्नास वर्षे किंवा दोन जन्म काळेपाण्याची शिक्षा भोगण्यासाठी अंदमानला त्यांची रवानगी करण्यात आली. त्याच जन्मठेपेचे कठोर सत्य असलेले भयानक स्वानुभव सांगणारा हा ग्रंथ वीर सावरकरांनी त्या बंदिवासातून १९२४  मध्ये सुटल्यावर रत्नागिरी येथे स्थानबद्ध असताना लिहावयास घेतला. प्रथम १९२५-२६ मध्ये पुणे येथील ‘केसरी’त त्याचा पूर्वार्ध नि १९२७ मध्ये मुंबईतील ‘श्रद्धानंद’ साप्ताहिकात त्याचा उत्तरार्ध क्रमशः प्रसिद्ध झाला. ‘केसरी’मध्ये ह्या ‘जन्मठेप’ ग्रंथाइतकी, दुसरी कोणतीही वाचक जिची अत्यंत आतुरतेने वाट पहात असत, अशी माला दीर्घकाळ चालली नाही. आणि तरीही ‘केसरीला हे पुस्तक पूर्णपणे छापता आले नाही. २० जानेवारी १९२७ पासून ह्या ग्रंथाचा उत्तरार्ध ‘श्रद्धानंद’मध्ये प्रसिद्ध होऊ लागला आणि मे किंवा जून १९२७ मध्ये तो पुस्तकरूपाने प्रकाशित झाला.

     पुढे थोड्याच दिवसात ह्या पुस्तकाचा गुजराथी अनुवाद अहमदाबादच्या प्रस्थान कार्यालयाने प्रसिद्ध केला.

     १७ एप्रिल १९३४ रोजी सरकारने हा ग्रंथ आक्षेपार्ह ठरवून त्याचेवर बंदी घातली. १९३७ सालापासून अनेक वर्षे या ग्रंथावरील बंदी उठवावी म्हणून साहित्य संमेलने तसेच अन्य संस्थांनी आणि व्यक्तींनी सरकारकडे मागणी केली पण ती फलद्रुप होऊ शकली नाही.

     १९४५ साली काँग्रेस मंत्रिमंडळ अधिकारारुढ झाल्यावर या ग्रंथावरील बंदी उठविण्याची मागणी एकसारखी करण्यात आली. एकही जणांनी तर ही पुस्तके छापून उघडपणे विकण्याचीही घोषणा केली. तेव्हा शेवटी २२ मे १९४६ ला, या पुस्तकावरील बंदी उठविण्यात आली. अर्थात मधल्या काळात बंदी होती तरीही गुप्तपणे ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक घराघरातून वाचले जात होतेच. १९४७ साली परचुरे पुराणिक मंडळीने या पुस्तकाची स]दुसरी आवृत्ती प्रकाशित केली.

     परंतु एवढ्यात ३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची हत्त्या झाली आणि त्यात एक आरोपी म्हणून बॅ. सावरकरांना गोविले गेले. तेव्हा सावरकरांच्या पुस्तकांवर नवे संकट आले. त्यामुळे पुढे काही वर्षांनी १९५२-५३ मध्ये ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक मुंबईच्या पदपथावर सव्वा सव्वा रुपयांस मिळू लागले. वीर सावरकर विनोदाने म्हणाले, “ठीक झाले ! आता अनेकजण स्वस्त पुस्तक घेऊन वाचू लागतील. ” आणि खरोखर तसेच झाले. आठ रुपयांचे इतके उत्तम पुस्तक सव्वा रुपयात मिळू लागताच सर्वसाधारण वाचकही ते विकत घेऊ लागला. पुस्तकाला सारखी मागणी येऊ लागली आणि पुन्हा ते पूर्ण किंमतीला विकले जाऊ लागले !

     त्यानंतर १९६३ मध्ये समग्र सावरकर वाङ्मयात हा ग्रंथ छापला गेला आणि १९६८ मध्ये या ग्रंथाची नवी आवृत्ती ग. पां. परचुरे प्रकाशन मंदिराने प्रसिद्ध केली. सात हजार वाचकांनी ह्या ग्रंथाचे प्रसिद्धीपूर्व मूल्य देऊन ह्या ग्रंथाविषयीचा आदर व्यक्त केला.

     आज ही आवृत्तीही बाजारात उपलब्ध नाही.

     हा ग्रंथ केवळ बंदिवासातील कष्टांचे हृदयद्रावक वर्णन करणारा नाही, तर भयंकर आपत्तीतही माघार न घेता किंवा शरण न जात झुंजत राहण्याची स्फूर्ती देणारा आहे. हिंदुस्थान स्वतंत्र करण्यासाठी सशस्त्र क्रांतिकारकांनी  किती कष्ट सहन केले त्याचे या ग्रंथांतील वृत्त वाचून ज्याचे हृदय हेलावणार नाही असा वाचक विरळाच.

@@@

[ ‘माझी जन्मठेप‘ या पुस्तकाच्या ग. पां. परचुरे प्रकाशन मंदिराने १९६८ साली प्रकाशित केलेल्या आवृत्तीच्या प्रास्ताविकातून संक्षेपतः आणि ‘संग्रहालय‘च्या सप्टेंबर १९७८ च्या अंकावरून साभार उद्धृत]

*पुस्तकाची कुळकथा‘ या मालिकेत प्रसिद्ध झालेले लेख :-
२३ सप्टेंबर २०१५ :- (१) मामा वरेरकर यांचे नाटक ‘कुंजविहारी’ – मामा वरेरकर
२९ ऑक्टोबर २०१५ :- (२) ‘भगीरथाच्या पुत्रां’ची जन्मकथा – गो नी दांडेकर
१० नोव्हेंबर २०१५ :- (३) स्वातंत्र्यशाहीर कुंजविहारींच्या ‘आहुती’ची कथा – ज शा देशपांडे
०९ डिसेंबर २०१५ :- (४) ‘त्या’ ग्रंथराजाची जन्मकथा – पु रा बेहेरे
०३ जानेवारी २०१६ :- () सूर्यास्त : आचार्य अत्रे – ह वि मोटे
२३ सप्टेंबर २०१६ :- () “सात लाखातील एक”  या कादंबरीची कहाणी  – मामा वरेरकर
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

 प्रिय वाचक, 

आज या अंकाबरोबर  ‘मैत्री’ अनुदिनीच्या भरगच्च दीपावली २०१८ विशेषांकाचा समारोप होत आहे. त्याचा घेतलेला आढावा. :-
(०१) केदार आणि नारायण :- कै. चंद्रकांत वर्तक [३१ ऑक्टोबर ]
(०२) आणि त्याचा (गणितातील) खेळ संपला :- पुष्पा शंकर अभ्यंकर [०२ नोव्हें. ]
(०३) अगा जे जाहलेचि नाही :- मुकुंद नवरे यांची कथाचतुष्टयी [०३, ०९, १६, २३ नोव्हें. ]
(०४) माझी लेखिका मैत्रीण :- डॉ. प्रियंवदा कोल्हटकर [०५ नोव्हें.]
(०५) ऐसपैस (३३): तो कोण होता ? – हर्षद सरपोतदार [०६ नोव्हें.]
(०६) प्रतिभेचा शाप :- अनु. सौ. स्वाती वर्तक [०७ नोव्हें.]
(०७) गवारीची भाजी :- सतीश इंगळे [०८ नोव्हें.]
(०८) सत्ता आणि स्त्रिया :- हर्षद सरपोतदार [१० नोव्हें.]
(०९) इंद्रायणी काठी काही क्षण :-  ‘पालवी’ या मालिकेत कै. लक्ष्मण लोंढे [१२ नोव्हें.]
(१०) नियती :- सौ. स्वाती वर्तक [१४ नोव्हें.]
(११) नेमाडे : एक सोक्षमोक्ष :- हर्षद सरपोतदार  [१८ नोव्हें.]
(१२) अंगण, पेंटर जोशी :- ‘सहज सांगावंसं वाटलं’ या मालिकेत प्रकाश पेठे [१९ व २७ नोव्हें.], चुटपुट – प्रकाश पेठे [ ९ नोव्हें.]
(१३) भिकारी :- अनु. मुकुंद कर्णिक [२१ नोव्हें.]
(१४) फिज्जेरल्ड आणि ‘रुबाईयात’ :- कै. प्रा. माधव मनोहर [२५ नोव्हें.], रुबाईयात – अनु. मुकुंद कर्णिक [ ६१ ते ६५ – १० नोव्हें, ६६ ते ७३ – २५ नोव्हें ]
(१५) माझी जन्मठेप – ‘पुस्तकाची कुळकथा’ या मालिकेत कै. वि दा सावरकर [ २९ नोव्हें.] 
(१६) मैफल कवितांची :- झोपा – अमितेय, देव – शरदचंद्र करकरे [४ नोव्हें. ], कवितात्रयी :- मुकुंद कर्णिक [ ७, १४ व १९ नोव्हें. ], शुभकामनाएँ – अनु. सौ. स्वाती वर्तक [१२ नोव्हें. ] तसेच सौ. स्वाती वर्तक यांच्या कविता : सार्थक दिवाळी [३ नोव्हे.], स्पर्श [८ नोव्हें.], कै. सचित वाघ यांची विडंबन गीते [ ४ व २३ नोव्हें.], आजची कविता (१५) : केशव साठये, आजची कविता (१४, १६ व १७) : अमितेय
(१७) अंगण :- मेघा कुलकर्णी [१६ नोव्हें.]
(१८) अशा गोष्टी अशा गंमती :- कै. शं. ना. नवरे  [०२, ०५, १०, १८ व २१ नोव्हें.]
(१९) ऑलिम्पिकची नवलकथा, पाखरे भिरभिरती अंबरी  :- कै. भानू शिरधनकर यांच्या २ पुस्तकातील काही भाग [०६, ०८, १२, १८, २३ व २७ नोव्हें.]
(२०) थोडी मेंदूची मशागत, वाढवा तुमचा शब्दसंग्रह : घोडा :- प्रेषक सलील कुलकर्णी  [०३, ०७ नोव्हें.]
(२१) कारण की :- अज्ञात व राम भट [१९ व २१ नोव्हें.]
(२२) याशिवाय  ‘राग- अनुराग’ (१५, १६) : केशव साठये, ‘संस्कारकथा’ (१२) : सौ. मीरा राईलकर, संस्कृत आणि तंबाखू : प्रा. मनोहर रा. राईलकर, सात रुपयांची गोष्ट : अनामिक, शंभरीच्या उंबरठ्यावर.   

तर कसा वाटला ‘मैत्री’चा यंदाचा दिवाळी अंक? मनमोकळा अभिप्राय नोंदवा. लेखकांनी इतरांच्या लेखांवरही आपली प्रतिक्रिया निःसंकोच द्यावी. आमचं मागणं लई नाही !

या अंकासाठी ज्यांनी दर्जेदार ललित आणि वैचारिक साहित्य आस्थेने पुरविले त्या सर्व लेखक, कवी – कवयित्री, चित्रकार यांचे मनःपूर्वक आभार. आलेले सारे साहित्य कालमर्यादेमुळे या महिन्यात प्रकाशित करू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व. ते यथावकाश प्रसिद्ध होईल.
आपले,
– ‘मैत्री’चे संपादक मंडळ.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आजची कविता 

अमितेय 
 
१७. 
आलबेल 
रोज सूर्य उगवत आहे
ठरल्यावेळी मावळत आहे
यात खंड पडत नाही
वेगळं काही घडत नाही
सर्व सुरळीत चालू आहे

सगळं काही आलबेल आहे !

काही लोक सुखी आहेत
काही दुःख भोगत आहेत
काही मजा मारत आहेत
काही त्याग करत आहेत
दंगेधोपे चालू नव्हते
असे दिवस आले नव्हते
यात विशेष काय आहे ?

सगळं काही आलबेल आहे !

पिढ्यांत दरी पडत आहे
मागची बरी ठरत आहे
जुने दिवस, जुन्या व्यक्ती
चांगले म्हणा, का ही सक्ती ?
पुढल्या पिढीत अर्थ नाही
हेही फारसं खरं नाही
हाही वाद जुनाच आहे

सगळं काही आलबेल आहे

मनू किंवा गौतम बुद्ध
महमद किंवा येशू ख्रिस्त
नेमनियम ठरवून गेले
काही बदल सांगून गेले
एवढा आटापिटा करून शेवटी
माणूस बदलू शकले नाहीत
तोही होता तसाच आहे

सगळं काही आलबेल आहे

जिथे रावण उगवत आहेत
तिथे राम जन्मत आहेत
जे जे हिटलर पेटत आहेत
त्यांना चर्चिल भेटत आहेत
चांगल्यालाही मरण नाही
काळजीचं कारण नाही
कालचक्राचा खेळ आहे

सगळं काही आलबेल आहे

अमितेय
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

 

नोंदवही 

शंभरीच्या उंबरठ्यावर 

Dr.B.D. Tilak

डॉ. बाळ दत्तात्रेय टिळक, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मराठी रसायनशास्त्रज्ञ
जन्म : २६ सप्टेंबर १९१८, कारंजा, वर्धा, मृत्यू : २५ मे १९९९
@

Aleksandr Solzhenitsyn

अलिकसांद्र सोल्झेनित्सिन, नोबेल विजेते रशियन साहित्यिक
जन्म : ११ डिसेंबर १९१८, कॉस्कोव्होडस्क, रशिया, मृत्यू : ३ ऑगस्ट २००८
@

Helmut Schmidt

हेल्मुट श्मिट, चॅन्सलर, जर्मनी
जन्म : २३ डिसेंबर १९१८, हँबर्ग, जर्मनी, मृत्यू : १० नोव्हेंबर २०१५
@

B.K.S. Iyengar

  

बी. के. एस. अय्यंगार, आंतरराष्ट्रीय योगाचार्य
जन्म : १४ डिसेंबर १९१८, बेलूप, कोलार, कर्नाटक, मृत्यू : २० ऑगस्ट २०१४, पुणे
@

Kurt Waldheim

कर्ट वाल्डहाइम, ऑस्ट्रेलियाचे राष्ट्राध्यक्ष
जन्म : २१ डिसेंबर १९१८, सांक्त, आंद्राबार्डेन, मृत्यू : १४ जून २००७
@@@
( ‘शब्द दर्वळ‘ वार्षिक २०१७ वरून साभार )
छायाचित्रे : विकिपिडियावरून साभार
प्रेषक : अनामिक 

      

 

पेंटर जोशी

दीपावली २०१८ विशेष 
 
सहज सांगावंसं वाटलं (४)
प्रकाश पेठे 

लेखकाचे मनोगत 

पेंटर जोशी हे माझे मामा. आजोळी गेलं की मीसुध्दा बॅनर रंगवीत असे. मला चेहरे काढायला मिळत नसत. तरीही बॅनरच्या जन्मापासून गुरूवारी रात्री बॅनर टॉकीजवर चढेपर्यंत सगळी कामं माहित होती. मामाचं आणि माझं गुळपीठ होतं. मी मुंबर्इचा असल्यानं त्याला माझं कौतुक असे.

वरील लेख छापला गेला तेव्हा त्याच्या पेपरवाल्यानं त्याला फोननं कळवलं “ पेंटरसाहेब, रविवार पुरवणीत तुमच्यावर अर्धपान लेख आहे. मस्त आहे. दोन अंक पाठवले आहेत.” पेपरवालासुध्दा पुरवणी चाळत असे याचं कौतुक वाटलं. मामानं लेख वाचला आणि तो खूष झाला. त्याचा फोन आला, “तुझ्यामुळे मला महाराष्ट्रभर प्रसिध्दी मिळाली. मी लगेच भेटायला येतोच.”

तीन दिवसानी मामा मामी आमच्या घरी दाखल झाले. घरात आनंदी आनंद झाला. मामी खूप बडबडया. दोनतीन दिवस मजेत गेले.  त्यानंतर दोन नियतकालिकांत त्याची मुलाखत प्रसिध्द झाली. दोन ठिकाणाहून सत्काराचं आमंत्रण आलं.  सगळ्या नातेवार्इकांनी लेख वाचला आणि मामाचं कौतुक केलं.त्याच्या जीवनशैलीचा माझ्यावर प्रभाव आहे.

@@@

    अमरावतीमध्ये एक खास व्यक्ती आहे. ती म्हणजे ‘लिबर्टी आर्ट सर्व्हिस’चे कलावंत-संचालक शंकर त्र्यंबक जोशी अथवा पेंटर जोशी.

     चित्रपट वितरकांच्या विश्वात लिबर्टी आर्ट सर्व्हिस स्टुडिओ या नावाने प्रख्यात असलेल्या संस्थेने जवळ जवळ सदतीस वर्षे अनेक हिंदी व मराठी चित्रपटांचे कलात्मक बॅनर बनवण्याचे काम केले.

     वितरकाने चित्रपट विकत घेतला की त्याला भरपूर प्रसिद्धी देऊन तो जास्तीत जास्त कसा चालेल याची त्याला चिंता असते. यात मुख्यत्वे चित्रपटगृहावर मोठमोठे बॅनर लावणे हे मुख्य काम असते. बॅनर बनवणे हे काम कलात्मक पद्धतीने, लोकांच्या डोळ्यात भरेल असे करावे लागते. तो व्यवसाय पेंटर जोशी यांनी आयुष्यभर करून संपूर्ण सी. पी. सी. आय. सर्किटमध्ये पहिल्या क्रमांकाचे स्थान टिकवून ठेवले होते.

यशाचे सातत्य 

     चित्रपटसृष्टीत टिकून राहण्यास ‘यशाचे सातत्य’ या परवलीच्या शब्दांची गरज असते. ज्याच्या नावाचा बोलबाला थांबला, तो माणूस कितीही मोठा असला तरी या विश्वातून ताबडतोब बाहेर फेकला जातो. मग तो नट असो की संगीतकार. त्या दृष्टीने चित्रपटसृष्टी हा अत्यंत निर्दय व्यवसाय आहे. पेंटर जोशांनी बॅनर बनवावेत  गावोगावच्या लोकांना ते सतत आवडत राहावेत व त्यामुळेच वितरकांना त्यांच्याकडेच धाव घ्यावी लागावी, असे तपे चालले.

     लिबर्टी आर्ट सर्व्हिस ही संस्था सी. पी. सी. आय. सर्किटसाठी ( सेंट्रल प्रॉव्हिन्स – सेंट्रल इंडिया – सेंट्रल सर्किट सिने असोसिएशन ) ज्यांचे मुख्य कार्यालय आहे भुसावळ येथे. यामध्ये अमरावती, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, खांडवा, ब-हाणपूर, नागपूर, रायपूर, भिलई, दुर्ग, जबलपूर हा भाग येतो. तर दुसरा भाग म्हणजे इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर, उज्जैन वगैरे विस्तार आणि तिसरा भाग म्हणजे राजस्थानातील जयपूर, अजमेर, बिकानेर वगैरे भाग.

     चित्रपटाची जाहिरात करण्यासाठी निर्मात्याकडून वितरकाला अडीच तीन लाख रुपये मिळतात. त्यात बॅनर बनवणे, पोस्टर्स चिकटवणे, लहान मोठ्या गावातून लाऊडस्पीकरने जाहिरात करणे हे करावे लागते. त्यासाठी प्रत्येक सर्किटला उत्तम आर्टिस्ट शोधावा लागतो. काही निर्माते जाहिरातींवर प्रचंड पैसा खर्च करतात  व अपेक्षित लाखो प्रेक्षकांना भारून टाकतात. प्रांतोप्रांती चित्रपटाच्या चांगलेपणाबद्दल वातावरण तयार करतात. ‘मोगले आझम’ चित्रपटाच्या वेळी गावोगावी प्रचंड बॅनर्स लावून के. असिफ यांनी किती परिणामकारक वातावरण तयार केले होते ते आजही लोकांना आठवत असेल. मुंबईचे ऑपेरा हाऊस चित्रपटगृह त्याच्या बॅनर्सच्या मांडणीमुळेच समग्र मुंबईकरांना माहीत झाले आहे. दक्षिणेत तर काही काळ चित्रपट निर्मात्यांमध्ये बॅनर स्पर्धाच लागली होती.

     पूर्वी हिंदी चित्रपट विकत घेण्यासाठी चार-पाच लाख रुपये मोजावे लागत. यात त्याला सहा प्रिंट्स मिळत आता त्याची किंमत चाळीस पन्नास लाखांवर पोचली आहे.

नोकरी नाही !

     पेंटर जोशी यांनी आपल्या कला शिक्षणाचे धडे थेट अमरावतीहून मुंबईला येऊन दादर येथील प्लाझा सिनेमाजवळील ‘समर्थ आर्ट स्टुडिओ’मध्ये घेतले व लगेच आपल्या गावी जाऊन स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. त्यावेळी त्यांचे वय अठरा एकोणीस वर्षांचे होते. सुरुवातीच्या काळात त्यांना खूप त्रास झाला. ते लहान असतानाच त्यांचे वडील निवर्तले होते. घरची जबाबदारीही येऊन पडली होती. तरीही त्यांनी कोणाची नोकरी करायची नाही, हा पण निवृत्त होईपर्यंत तडीस नेला. जो तो माणूस नोकरीच्याच मागे लागतो, ठिकाणी पेंटर जोशी यांची जिद्द पाहून कौतुक वाटते.

     त्यांच्यात उपजत कलागुण होते. कोणत्याही कलाविद्यालयात शिक्षण न घेता लहानपणीच त्यांनी चित्रकला आत्मसात केली होती.

पेंटर जोशींनी केलेल्या पोस्टर्सचे नमुने (१)

हजार चित्रपटांची कामे 

     लिबर्टी आर्ट सर्व्हिस ही संस्था १३ सप्टेंबर १९४९ रोजी स्थापन झाली व ३१ मार्च १९८८ रोजी बंद करण्यात आली. या सदतीस वर्षांच्या काळात त्यांनी हिंदी व मराठी चित्रपट मिळून एक हजार चिवत्रपटांची कामे केली.  एका चित्रपटाचे साधारणपणे पंचवीस ते तीस बॅनर्स बनवावे लागत. म्हणजे त्यांनी सदतीस वर्षात पंचवीस तीस हजार बॅनर्स बनवले. साधारणपणे एका बॅनरचा आकार वीस फूट लांब व दहा फूट रुंद असतो. लिबर्टीमध्ये एका वेळी चार फिगर आर्टिस्ट, दोन स्केचर्स, दोन लेटर आर्टिस्ट, एक कार्पेंटर मिस्त्री आणि फ्रेम्स ने-आण करणे, फ्रेम्सना कापड ठोकणे,  व्हाईट ऑइल करणे, पॅलेट्स ब्रश साफ करणे यासाठी सहा माणसे असे मिळून सोळा सतरा माणसे स्टुडिओत काम करत.  स्वतः पेंटर जोशी काम करीत. स्टुडिओत काम करणा-या माणसांची हजेरी, पगार करणे, हिशोब ठेवणे, कॅनव्हास कापून शिवून घेणे इत्यादी व्यवस्थापनातली किचकट कटकटीची कामे त्यांच्या पत्नी सुशीलाबाई करत असल्यामुळे पेंटर जोशींना स्वतःचा वेळ कलात्मक कामासाठी उपयोगात आणता येत असे.

      चित्रकार असूनही ते दाढी किंवा लांब केस ठेवत नाहीत. त्यांना पाहून कोणी त्यांना चित्रकाराच्या गटात घालणार नाही. तरीही काळ्या फ्रेमच्या चष्म्यातून बदामी रंगाच्या डोळ्यांनी तुमच्याकडे पाहिले की कळते की  हा माणूस वेगळा आहे.  चांगल्या गोष्टींकडे पाहताना ते मान किंचित मागे करतात, कपाळाला एक बारीकशी आठी पाडतात व चांगले वाईटपणाचा अभिप्राय देतात. आज त्यांची साठी उलटली आहे तरी डोळ्यांमधली कलावंती झाक जरासुद्धा कमी झालेली नाही.

     राजा परांजपे यांच्यासारखे निर्माते-दिग्दर्शक असतानाच्या काळी किंवा नंतरही मराठी चित्रपटांची त्यांनी असंख्य कामे केली. दादा कोंडके यांच्या सर्वच सिल्व्हर ज्युबिली’ चित्रपटांची कामे त्यांनी केली. दादांच्या चित्रपटांच्या श्रेयनामावलीत लिबर्टी आर्ट सर्व्हिस अमरावतीचे नाव अवश्य असे.

बॅनरचा प्रभाव 

     बॅनर्सवर नट -नट्यांचे खूप मोठ्या आकारांचे चेहरे रंगवावे लागतात. खूप लांबूनही ते ओळखू यावे लागतात. तसेच चित्रपटातील भूमिकेप्रमाणे त्यांचे रंगरूप हावभाव रंगवावे लागतात. त्याशिवाय बँनरची रचना, मांडणी, आकर्षकपणा याकडेही लक्ष द्यावे लागते. कारण प्रत्येक बटबटीत — मग ते साप्ताहिक, मासिक केली पुस्तकाचे मुखपृष्ठ असो की सिगारेटची जाहिरात असो –  ती अशी बनवावी लागते की पाहणा-यास ती वस्तू घेण्याचा मोह व्हावा किंवा त्याचे प्रथमदर्शनी मत अनुकूल व्हावे.

पेंटर जोशींनी केलेल्या पोस्टर्सचे नमुने (२)

     म्हणून दोनशे चौरस फूट जागेत अमुक चित्रपट पहावासा वाटावा असा बॅनर बनवणे हीसुद्धा एक कला आहे. सुशिक्षित माणूस चार इंची एक कॉलमी जाहिरात वाचून चित्रपट पाहावा की नाही हे ठरवू शकतो. पण बहुसंख्य समाजावर बॅनर ही गोष्ट जास्त प्रभाव पाडते. या सामान्य लोकांना चित्रपट आवडला तर तो सर्वत्र तोंडी जाहिरात करती  चित्रपट पाहता पाहता सिल्व्हर ज्युबिली करतो. कोणताही चित्रपट पंचवीस आठवडे चालणे हे निखळ यशाचे गमक मानले जाते. सर्वांनाच आनंद होतो आणि चित्रपटाशी संबंधित प्रत्येकाला काही ना काही फायदा होतोच. यशासारखे दुसरे यश नाही असे जे म्हणतात, ते लिबर्टीच्या नशिबी आले. त्यामुळे तिचे नाव गाजले.

     निर्मात्याकडून वितरकाकडे चित्रपटाची स्टिल्स येणे आणि चित्रपटाची रिळे आल्यावर ठरलेल्या तारखेला चित्रपट प्रदर्शित करणे यात नेहमीच फार कमी वेळ असतो, त्यामुळे रात्रंदिवस बसूनही गुणवत्ता कायम ठेवून वेळेवर काम द्यावे लागते. अशा कारणांनी लिबर्टी स्टुडिओत रात्रपाळी ही नित्याचीच बाब असे. या व्यवसायातल्या बहुसंख्य लोकांना कामाच्या पद्धतीमुळे कसले ना कसले व्यसन हे असतेच पण जोशी हे निर्व्यसनी आहेत. त्यामुळेच त्यांची प्रकृती आजही चांगली आहे.

 

पेंटर जोशींनी केलेल्या पोस्टर्सचे नमुने (3)

‘धवल’ यश 

     पेंटर जोशींच्या शब्दात सांगायचे तर ‘संपूर्ण सी. पी. सी. आय. सर्किटमध्ये लिबर्टी आर्ट सर्व्हिस हे कलाविद्यालय होते. कोठून कोठून होतकरू नवशिकी मुले येथे शिकून गेली आणि आज ते कलाकार बनून स्वतःचा चरितार्थ चालवीत आहेत.

     इतक्या दीर्घकाळच्या व्यवसायात त्यांना पुष्कळ बरे वाईट अनुभव आलेच कारण निखळ यश हळूहळू येते व चिरकाल टिकते. चित्रपट जरी रंगीत निघत असले तरी तो धंदा कृष्णधवलच असतो हे सर्वांना माहीत आहे. पेंटर जोशी हे या क्षेत्रात असे एकमेव कलावंत आहेत की ज्यांनी आयुष्यभर फक्त धवल व्यवसाय केला पण त्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. म्हणूनच त्यांचा संसार सुखाचा झाला असे त्यांना वाटते. संसाराच्या सर्व जबाबदा-यांतून मोकळे झाल्यावर केव्हातरी थांबायलाच हवे मी म्हणून त्यांनी आनंदाने कुंचला खाली ठेवला आहे.

– प्रकाश पेठे 
( छायाचित्रे व लेख : ‘महाराष्ट्र टाइम्स‘ १६ एप्रिल १९८९  च्या अंकावरून साभार  )
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आजची कविता 

केशव साठये 

(१५)

 धड पडतही नाही

धड थांबतही नाही

माझे निर्णय घेण्याचे शहाणपण

ओलिस ठेवून मख्ख बसलाय तो !

तुझ्या अधांतरी वागण्याचं

स्पष्ट प्रतिबिंब

मला दिसतंय

या हलक्याशा सरीच्या थेंबात

केशव साठये 

keshavsathaye@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

ऑलिम्पिकची नवलकथा 
कै. भानू शिरधनकर 

[५]

चालू शतकाच्या सुरवातीस ऑलिम्पिकच्या वा-याने सगळे जग झपाटले गेले होते. विशेषतः स्वातंत्र्य, शांतता, समता आणि प्रतिष्ठा ही मानवी मूल्ये, ऑलिम्पिक चळवळीचा गाभाच बनून गेली.

‘ऑलिम्पिया व ऑलिम्पिक्स ही नव्या मानवी संस्कृतीची प्रतीकेच होत,’ असे बॅरन द क्युबर्टीन यांनी लिहून ठेवले आहे. सेंट सीयर येथील लष्करी विद्यापीठात विद्याध्ययन करीत असताना राजकीय तत्त्वज्ञान, समाजशास्त्र आणि शिक्षणशास्त्र या विषयांकडे त्यांचे मन ओढले गेले. विशेषतः ब्रिटिश व अमेरिकन लोक खेळात घेत असलेला भाग व आनंद याकडे त्यांचे लक्ष वळले. ऑलिम्पिया येथील उत्खननातून बाहेर आलेल्या जागतिक क्रीडा स्पर्धांबद्दलची माहिती व अवशेष यांचा अभ्यास केल्यावर त्यांच्या मनाने घेतले की अशा जागतिक स्पर्धांद्वारा जागतिक ऐक्य व शांतता यांचा पुरस्कार व प्राप्तीही करता येईल. त्या प्राचीन ग्रीक क्रीडा स्पर्धांचे पुनरुज्जीवन करण्याचा त्यांच्या मनाने ध्यास घेतला.

फ्रेंच सैनिकांनी ऑलिम्पिया येथील उत्खननानंतर झ्यूस देवतेचे मंदिर त्या प्राचीन पद्धतीनेच पुन्हा बांधले. सतत सहा वर्षे उत्खनन करून जर्मन संशोधकांनी तेथील प्राचीन क्रीडांगणाचा शोध घेतला. त्या उत्खननात सापडलेल्या अवशेषांचा ताबा ग्रीसने घेतला आणि ते सर्व अवशेष त्यांनी आपल्या पुराणवस्तू खात्यात समाविष्ट केले. त्या सगळ्या शोधांमुळे युरोपातील तरुणवर्ग थरारला. तशा त-हेच्या जागतिक क्रीडास्पर्धा पुन्हा सुरू व्हाव्यात अशी मागणी व हाकाटी त्यांनी सुरू केली.

१८९२ साली पॅरिसच्या अॅाथलेटिक्स स्पोर्ट्स युनियनपुढे क्यूबर्टीन यांनी या खेळांबद्दलचा आपला आराखडा ( प्लॅन ) प्रथमच सादर केला. इतर देशांतील क्रीडा संस्थांचे या कामी पाठबळ व साहाय्य मिळवावे अशी त्यांनी युनियनला विनंती केली. त्यांच्या सततच्या प्रयत्नांना व चिकाटीला यश येऊन अमेरीका, ब्रिटन व फ्रान्स या देशांचे क्रीडा प्रतिनिधी एकत्र आले. त्यांनी हौशी खेळाडूंच्या क्रीडा स्पर्धांचे सामने भरवण्याचे व प्राचीन जागतिक क्रीडा स्पर्धांचे पुनरुज्जीवन करायचे असे ठराव मान्य केले. युरोपातील अनेक देशांनी त्यांचा तो ठराव उचलून धरला आणि लागेल ते साहाय्य देण्याचे कबूल केले. लागलीच चार वर्षांनी १८९६ साली आधुनिक काळातील पहिली ऑलिम्पिक क्रीडास्पर्धा भरवण्याचे आणि तीही प्राचीन ऑलिम्पिकच्या क्रीडांगणाच्या आसमंतात, अथेन्स येथेच भरवण्याचे त्यांनी नक्की केले. या क्रीडास्पर्धा दर चार वर्षांनी भरवाव्या आणि त्या जगातील निरनिराळ्या देशांतील प्रमुख शहरी भरवाव्यात नि त्यावर नियंत्रण ठेवणारी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी निवडण्यात यावी असेही त्यांच्या बैठकीत ठरले. १८५९ व १८७० साली क्रीडास्पर्धा भरवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता, त्या डी. व्हीकेलास नावाच्या गृहस्थाची या कमिटीचे पहिले अध्यक्ष म्हणून निवड झाली. झप्पास आणि क्यूबर्टिन यांचे ऑलिम्पिक पुनरुज्जीवनाचे स्वप्न एकदाचे साकार झाले.

आधुनिक जागतिक क्रीडा स्पर्धांची प्रस्थापना करण्याच्या कामी क्यूबर्टिन ह्या फ्रेंच गृहस्थाचे प्रयत्न बहुतांशी कारण झाले हे आता आपण पाहिलेच. या क्रीडा स्पर्धांमध्ये विशेष रंग व चैतन्य आणण्याच्या कामी आणखी एका फ्रेंच गृहस्थाची देणगी कारण झाली. हे म्हणजे मायकेल ब्रियल. त्यांनी जलद चालायच्या शर्यतीत सर्वप्रथम येणा-या खेळाडूला एक ट्रॉफी देण्याचे जाहीर केले. ही ट्रॉफी सर्व बक्षिसांपेक्षा अधिक मौल्यवान होती. मात्र ही शर्यत प्राचीन युगातील फीडिपीडस या योद्ध्याच्या विक्रमाच्या धर्तीवर आधारलेली होती.

 

Statue of Pheidippides

  

फिडीपीडस याच्या विक्रमाची हकीगत अशी :-

इ. स. पूर्व ४९० च्या सुमारास पर्शियाचा राजा देरियस, याने सेनानी हिप्पीयस याच्या अधिपत्याखाली मोठी फौज देऊन ग्रीसवर स्वारी केली. अथेन्स व इरिट्रिया पादाक्रांत करून तेथील प्रजाजनांना गुलाम करून आणावे अशी त्याने या सेनानीला आज्ञा दिली होती. इरिट्रियाला दीर्घ वेढा घालून हिप्पीयसने ते काबीज केले आणि अथेन्सपासून सव्वीस मैलांवर असलेल्या मेराथॉन नावाच्या मैदानात तळ ठोकला. या परचक्राविरुद्ध स्पार्टाची मदत मिळवावी या हेतूने अथेनियन लोकांनी ऑलिम्पिक क्रीडापटू फिडीपीडस याला आपला राजदूत म्हणून स्पार्टाला पाठवले. फिडीपीडस याने धावत पळत, वाटेत आलेल्या नद्या पोहत, वाटेतील डोंगर चढत, द-या उतरून पार करीत, कित्येक दिवस प्रवास केला आणि अथेन्सला साहाय्य करण्याच्या कामी स्पार्टन लोकांचे मन वळवले. लागलीच तो मागे वळला व ती खुषीची बातमी अथेनियन लोकांना देण्यासाठी तेवढेच अंतर धावत पळत त्याने पार केले. अथेन्सवर दुस-या बाजूने अचानक हल्ला करावा या उद्देशाने हिप्पीयसने मॅराथॉन येथून आपले बरेचसे सैन्य समुद्राच्या बाजूला वळवले आणि ती संधी साधून ग्रीक सेनानीने पर्वत पार करून मॅराथॉन येथील पर्शियन सैन्यावर हल्ला चढविला आणि झपाट्यासरशी त्यांचे वीस हजार सैन्य कापून काढले. बाकीचे पळाले. हिप्पीयस आणि देरियस यांनी दुःखित मनाने आपले सैन्य मागे नेले.

हा प्रचंड विजय मिळताच अथेनियन सेनानीने फिडीपीडस याला पुन्हा ही विजयाची बातमी सांगण्यासाठी अथेन्स शहराकडे पिटाळले. मॅराथॉनपासून अथेन्सपर्यंतचे सव्वीस मैलांचे अंतर फिडीपीडसने धावत पळत कापले. स्पार्टाहून अगोदरच धावत आल्यामुळे तो थकला होता आणि आता येतो न येतो तोच पुन्हा त्याला अथेन्सकडे विजयाची बातमी घेऊन धावत जावे लागले. अथेन्सच्या प्रवेश द्वारात पोचताच तो विजयोन्मादाने ओरडला, ‘लोकहो ! आनंदोत्सव साजरा करा. आपण लढाई जिंकली. आपण विजयी झालो. ” ते शब्द त्याने उच्चारले आणि तो धाडकन खाली कोसळला. मृत्यूने त्याला कवटाळले होते.

फिडीपीडसच्या त्या अतिमानवी प्रयत्नाची कायम स्मृती राहावी या उद्देशाने मायकेल ब्रियल यांनी जलद पळण्याच्या शर्यतीत सर्वप्रथम येणा-या युवकाला ट्रॉफी देण्याची व्यवस्था केली. आणि त्या शर्यतीलाही मॅराथॉन हेच नाव पडले. ही शर्यत आता ऑलिम्पिकचे एक प्रमुख आकर्षण झालेले आहे. जगातील १०० च्यावर राष्ट्रातील खेळाडू या शर्यतीत भाग घेत असतात. ही शर्यत अनेक देशात लोकप्रिय ठरली आहे. बोस्टन येथे झालेल्या अशा एका अमेरिकन शर्यतीत भाग घेण्यासाठी निघालेल्या, काही कोरियन क्रीडापटूंना तिथे जात यावे म्हणून अमेरिकन सैनिकांनी आपसात वर्गणी जमवली होती यावरून मॅराथॉन शर्यतीची लोकप्रियता कोणाच्याही लक्षात येईल.
  – कै. भानू शिरधनकर
( ‘ऑलिम्पिकची नवलकथा‘ या पुस्तकातून संक्षिप्त साभार )
  [ छायाचित्र : ‘विकिपीडिया’वरून साभार ]

फिज्जेरल्ड आणि ‘रुबाईयात’

दीपावली २०१८ विशेष 
माधव मनोहर   

[पूर्वार्ध]

असे म्हणतात की जगातील सर्वात अधिक लोकप्रिय असा ललितप्रबंध म्हणजे उमर खय्यामच्या रुबायांचा संग्रह. आणि या संग्रहातील रूबाया मुळात जरी उमर खय्यामने रचलेल्या असल्या तरी, ही आश्चर्यकारक अशी विलक्षण लोकप्रियता ज्या रुबायांच्या संग्रहाला प्राप्त झाली आहे, त्या रूबाया मूळच्या नव्हेत, तर एका स्वतःच्या काळात फार करून कोणाला माहीत नसलेल्या अशा एका आयरिश विक्षिप्ताने इंग्रजीत भाषांतरलेल्या. बाकी फिज्जेरल्डने रचलेल्या या रुबायांना भाषांतरलेल्या, असे तरी  कसे म्हणावे ? कारण इंग्रजी रुबायांच्या या तथाकथित भाषांतरांत फिज्जेरल्डचे स्वत्व इतके मिसळले आहे की या इंग्रजी रूबाया फिज्जेरल्डच्याच नावावर आता खपतात. रुबाया म्हटल्या की त्या फिज्जेरल्डच्याच, असा एक सर्वमान्य संकेत पाश्चात्य साहित्येतिहासात आता प्रस्थापित झाला आहे.

मूळ रुबायांचे तज्ज्ञ तर असेही म्हणायला कमी करीत नाहीत की फिज्जेरल्डच्या रूबाया म्हणजे मूळच्या रूबाया नव्हेतच. तर काही तज्ज्ञांचे मत असे की फिज्जेरल्डला मूळ रूबाया ज्या फारशी भाषेत रचल्या गेल्या त्या भाषेचेच यथामूल ज्ञान नव्हते ! आणि आपल्या तथाकथित ( विकृत) रूबायात फिज्जेरल्डने फारसी भाषेचे अज्ञान ठायी ठायी प्रकट केलेले आहे ! पण हा झाला तज्ज्ञांच्या मतामतांचा गलबला. अर्थात लोकांनी या मतामतारांची सतत उपेक्षाच केली आहे आणि एकवेळ ब्रिटिश साम्राज्य मोडीत निघेल, पण शेक्सपिअरचे साहित्यिक वर्चस्व यावच्चंद्रदिवाकरौ अबाधित राहील, असे जरी मोठ्या दिमाखात कोणी आढ्यतेने म्हटले असले आणि ब्रिटिश साम्राज्य मोडीत निघून आता काही दशके लोटली असली तरी, इंग्रजी भाषेतील सर्वाधिक लोकप्रिय प्रबंध आहे तो मात्र फिज्जेरल्डचा –  शेक्सपिअरचा नव्हे. आणि असे म्हटले तर, त्यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही की जगाच्या साहित्यिक नकाशावर हे जे सर्वाधिक लोकप्रिय असे स्थान उमर खय्यामला अभावित प्राप्त झाले ते निःसंशय फिज्जेरल्डच्या भाषांतरित रुबायांच्या परिणामी.

आणि तरीदेखील खरे नवल आहे ते पुढेच आहे.  फिज्जेरल्डच्या रुबाया प्रसिद्ध झाल्या आणि लगेच त्या लोकप्रिय झाल्या, असे घडले तरी काय ? तर असे पण मुळीच नाही. फिज्जेरल्डचा उमर खय्याम रूबाया  संग्रह प्रकाशित झाल्यानंतर पुन्हा तो कित्येक दशके केराच्या टोपलीत धूळ खाताच पडला होता. आणि कोणी फार करून त्याची जन्मकाळात दखल घेतली नव्हती. त्या भाषांतरित रुबायांचा कर्ता ( बिचारा !) फिज्जेरल्ड हयात असताना तर त्याच्या या रुबायांची कोणी दखल घेतली नाहीच ; पण तो निधन पावल्यानंतरही त्याच्या या रुबाया कित्येक वर्षे अलक्षित, उपेक्षितच राहिल्या.

जगात अशी एक साहित्यिक भाषा नाही की ज्या भाषेत फिज्जेरल्डच्या रुबाया अवतरलेल्या नाहीत. फार दूरचे कशाला ? जगाच्या नकाशावर ज्या आपल्या या मराठी भाषेला स्थान नाही, त्या उपेक्षित मराठी भाषेतच फिज्जेरल्डकृत रुबायांचे किती अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत, त्यांची यथाकाल, यथाक्रम, गणती कोणा जिज्ञासूने आता एकदा करायला हवी. माझ्या माहितीप्रमाणे या फिज्जेरल्डकृत रुबायांचा ( कदाचित पण निश्चित नव्हे ) पहिला अनुवाद केला तो सुप्रसिद्ध वैदर्भी कवी जयकृष्ण केशव उपाध्ये यांनी. तदनंतर या रुबायांचे अनुवाद अगणित झाले असावेत.

आता आणखी एक नवल वर्तले ( आपल्या या मराठी भाषेत ) ते पण सांगण्यासारखे आहे. माधव ज्युलियन या फारसी भाषेचा पंडित असलेल्या कवीने मूळ उमर खय्यामच्याच ओरिजिनल रुबायांचा मुळाबरहुकूम तर्जुमा केला आहे.  फिज्जेरल्ड अनुवादित रुबायांची संख्या फक्त एकशे एक आहे तर उमर खय्यामच्या मूळ रुबायांची संख्या किमान दसपटींनी तरी अधिक आहे. त्यात पुन्हा माधव ज्यूलियनसारखा कष्टशील कवी. असा कवी की जो पंडितही आहे.  त्या पांडित्याच्या परिणामी शब्दाशब्दाच्या केवळ अर्थासाठी नव्हे, तर नादासाठी देखील जो सतत दक्ष असतो, त्याच्या या रुबायांचे चीज मुळीच झाले नाही आणि नंतर मग वैतागून माधव ज्यूलियनने फिज्जेरल्डच्या रुबायांचे पुनः एकदा भाषांतर केले ‘द्राक्षकन्या’ या नावाने. तर या ‘द्राक्षकन्ये’ला मात्र प्रतिसाद ब-यापैकी मिळाला. पण मिळाला तो देखील अजाणता. जाणकारीचा नव्हे, तसा तर तो क्वचितच मिळतो. खरे तर माधव ज्यूलियनचा उमर खय्यामच्या अखिल उपलब्ध रुबायांचे यथातथ्य भाषांतर करण्याच्या पहिला यत्न अधिक महत्त्वाकांक्षी होता. पण तथाकथित रसिकांचे लक्ष वेधून घेतले ते मात्र ‘द्राक्षकन्ये’ने. कुसुमाग्रजांसारख्या श्रेष्ठ कवीने उमर खय्यामला उद्देशून जी कविता रचली त्या कवितेत माधव ज्यूलियनचा देखील निर्देश कृतज्ञतापूर्वक केलेला आढळतो तो उगाच नव्हे !

इंग्रजी काव्याच्या इतिहासात फिज्जेरल्डची जी ख्याती आहे, तीदेखील स्वतंत्र रचनाकर्ता म्हणून नव्हे तर उमर खय्यामकृत रुबायांचा भाषांतरकर्ता म्हणून. ( मूळ फारसी रूबाईचा अर्थ चतुष्पदी असाच आहे.) ‘रूबाइयात’ हे फारसी भाषेतील रूबाईचे अनेकवचन आहे. वस्तुतः फिज्जेरल्ड हा स्वतः मोठा एक स्कॉलर पंडित म्हणून त्याच्या हयातीत काहीसा ख्यात होता. त्याची स्वतंत्र मौलिक रचनाही विपुल आढळते. पण अर्थातच सर्वथा उपेक्षित अशा मूळ ग्रीक भाषेतील कित्येक सुप्रसिद्ध नाट्यकृतींचे यथामूल अनुवाद त्याने केले आहेत. आणि त्यातील काही प्रथमच. स्वाभाविकच या नाट्यानुवादांचे महत्त्व स्वतः फिज्जेरल्डच्या लेखी केवळ अनन्यसाधारण विशेष असे होते. पण ते सर्व नाट्यानुवादही कालोदधीत लुप्त झाले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, केवळ चाळा म्हणून फारसी भाषेचे स्वतःचे ज्ञान पारखण्याच्या हेतूने उमर खय्यामच्या निवडक शंभरएक रुबायांचे जे मुक्त अनुवाद त्याने केले — ज्या या मुक्त अनुवादाच्या बाबतीत तो स्वतः अखेरपर्यंत असंतुष्टच होता. — त्या रुबायांच्या अनुवादाने मात्र फिज्जेरल्डला ( अर्थात मरणोत्तर ) उदंड कीर्ती प्राप्त करून दिली. आणि त्या कीर्तीची व्याख्या काय ? तर जगातील सर्वाधिक लोकप्रिय अशा ललित साहित्यकृतीचा कर्ता म्हणून. एका इंग्रज कवीने म्हटले आहे की यश हे असे एक अन्न  आहे की जे मृतच काय ते भक्षण करतात ! ही काव्योक्ती फिज्जेरल्डच्या संबंधात साभिप्राय सार्थ ठरली.

फिज्जेरल्डचा जन्म इ. स. १८०० चा. इ. स. १८५० मध्ये त्याने उमर खय्यामच्या – त्याच्या लेखी – निवडक अशा १०१ रूबायांचा अनुवाद केला. आता यापुढचे नवल ऐका. फिज्जेरल्डने या अनुवादित रूबाया फ्रेजर्स नामक तत्कालीन नामांकित मासिकाकडे प्रकाशनार्थ आणून दिल्या आणि फ्रेजर्सने त्या नापसंत म्हणून फिज्जेरल्डकडे परत पाठवल्या ! शेवटी फिज्जेरल्डने स्वतःच्या खर्चाने स्वतःच त्यांना ग्रंथरूप दिले. बाकी ग्रंथरूप तरी कसले म्हणा ? खरे तर दहावीस पृष्ठांचे एक चोपडे. बरे, ते देखील त्याने स्वतःच्या नावावर प्रकाशित केले नाही. प्रकाशित केले ते निनावी. त्याची मूळ किंमत होती पाच शिलिंग. पण पुस्तकांच्या दुकानातून या चोपड्याचा उठाव होईना, तेव्हा त्याची किंमत एक पेनी ठरवून दुकानदाराने रद्दी म्हणून ते रद्दड किंवा रद्द पुस्तकांच्या खोक्यात भिरकावून दिले. आणि तेथेच ते स्विनबर्न व रोझेटी या सुप्रसिद्ध प्री -राफेलाईट कविद्वयाला एक दिवस सापडले. त्यांनीच प्रथम या चोपड्यावरची धूळ झटकली आणि ते चोपडे घरी नेल्यावर नंतर जे काय घडले, तो इतिहास आहे. पण तोपर्यंत गेल्या शतकाची अखेर दिसू लागा;ली होती आणि चालू शतकाची सुरवात म्हणजे बघा जवळपास अर्धशतकापर्यंत आता जगातील सर्वाधिक लोकप्रिय पुस्तक म्हणून जे गाजत आहे ते रद्दीत शब्दशः धूळ खात पडले होते !

याचा अर्थ असा नव्हे कीजे सर्वच साहित्यपंडित फिज्जेरल्डच्या रूबायांबाबत अज्ञानात होते. प्रस्तुत संबंधात हार्वर्ड विद्यापीठातील एक नामांकित पंडित प्राध्यापक चार्ल्स एलियट नॉर्टन याने नमूद करून ठेवलेली आठवण नमूद करण्यासारखी आहे. फिज्जेरल्डने आपले चोपडे प्रसिद्ध केल्यानंतर तोपर्यंत पंचवीस वर्षे उलटून गेली होती. चोपडे अर्थातच निनावी. पण नॉर्टनला त्याचे काही एक महत्त्व जाणवले. आणि इ. स. १८६९ मध्ये ‘नॉर्थ अमेरिकन रिव्ह्यू’ नावाच्या एका विख्यात मासिकात त्याने या रूबायांवर एक लेख प्रसिद्ध केला. त्या लेखात त्याने — कदाचित प्रथमच — एक विलक्षण विधान केले होते. ते विधान येणेप्रमाणे :- हे भाषांतर नव्हे ; तर कवीच्या प्रातिमीक स्फूर्तीचे हे एक देणे आहे. ‘ म्हणजेच उपर्युक्त विधानाचा अर्थ असा की या रूबायात जसे उमर खय्यामचे दर्शन घडते, तसेच फिज्जेरल्डच्या प्रतिभेचे पण दर्शन घडते. अर्थात त्यावेळी या अनुवादित रुबायांचा कर्ता कोण, याचा नॉर्टनला पत्ता नव्हता. पण एका अमेरिकन मासिकात प्रसिद्ध झालेला हा मूल्यमापनपर टीकालेख देखील सर्वथैव उपेक्षिला गेला, असे दिसते. कारण त्या काळात या रुबायांची अन्यत्र कोठेच वाच्यता झालेली दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

आता या रुबायांच्या संबंधातील ही एक आश्चर्यकारक गोष्ट खरोखरच सांगण्यासारखी आहे. गोष्ट आहे ती नॉर्टनचा उपर्युक्त अभिप्राय प्रसिद्ध झाल्यानंतर चार वर्षांनी प्रो. नॉर्टन इंग्लंडला आला होता त्यावेळची. कार्लाइलबरोबर लंडनच्या रस्त्यातून नॉर्टन सहज हिंडत होता, तेव्हा त्याने कार्लाईलजवळ त्या छोट्या पुस्तकाची म्हणजेच रुबायांची खूप स्तुती केली. तेव्हा कार्लाईलने त्याला विचारले, “रुबाईयात ही काय भानगड आहे ?” – तोपर्यंत लंडनमध्ये राहत असूनसुद्धा कार्लाईलने त्या छोट्या पुस्तकाविषयी कधी काही ऐकले नव्हते. तेव्हा त्याने कुतूहलाने नॉर्टनला विचारले, ” कोण कवी आहे हा ?” तेव्हा नॉर्टन म्हणाला की मलादेखील ते माहित नव्हते येथे आल्यावर जिज्ञासेने तपास केला, तेव्हा लेडी बर्न्स जोन्सने सांगितले की रुबायांचा हा अनुवादक कोणी रेव्हरंड एडवर्ड फिज्जेरल्ड आहे तो नारफॉकमध्ये कोठेतरी राहतो. आणि दिवसाचा सारा वेळ बोटीत घालवतो म्हणे. ” कोण? रेव्हरंड एडवर्ड फिज्जेरल्ड ? तो कसला रेव्हरंड ? तो बेटा रेव्हरंड असेल तर मी सात रेव्हरंड लागून राहिलो आहे. अरे, हा तुझा फिज्जेरल्ड माझा फार जुना दोस्त आहे. तू म्हणतोस तितके चांगले जर हे पुस्तक असेल, तर माझ्या या जुन्या दोस्ताने आजवर माझ्याजवळ त्याची वाच्यता कशी काय केली नाही, हे एक आश्चर्यच आहे. आणि तू तर म्हणतो आहेस की या पुस्तकातल्या रुबाया की काय म्हणतोस त्या फार फार चांगल्या आहेत. म्हणजे नवलच आहे. ” ही कार्लाइलची मासलेवाईक प्रतिक्रिया !

तेव्हा ते बोलणे इतक्यावरच थांबले आणि दुस-याच दिवशी नॉर्टनने मोठ्या आठवणीने त्याला आवडलेल्या त्या छोट्या पुस्तकाची एक प्रत या महाविद्वान प्रतिभाशाली विक्षिप्ताकडे पाठवून दिली. तदनंतर दोनतीन दिवसांनी त्यांची पुन्हा भेट झाली. तेव्हा कार्लाइल काहीसा चिडून म्हणाला, ” तुझं ते छोटं पुस्तक वाचलं. भिकार आहे. माझा जुना दोस्त तास मोठा स्कॉलर आहे. ग्रीक नाटकांच्या अनुवादात त्याने आपला सारा जन्म घालवला. आणि आता या उतारवयात त्याला ही असली अवदसा कोठून सुचली कोण जाणे ! कोण तो कुठला उमर खय्याम ! एक मवाली माणूस ! त्याच्या त्या मूर्ख रुबायांचं भाषांतर करण्यात त्याने आपला बहुमोल वेळ घालवावा, म्हणजे एक आश्चर्यच आहे. श्रमच करायचे तर ते काही कारणी लागतील असे तरी बेट्याने करावेत की नाही ?  व्यर्थ कालापव्यय. त्याचा आणि माझा देखील !”

एखाद्या छोट्या पुस्तकाचे भाग्य कसे असते, ते आता बघा. रूबाया ‘फ्रेझर्स’ मासिकाने नाकारल्या. तेव्हा फिज्जेरल्डने स्वतःच त्या प्रसिद्ध केल्या. पुस्तकाची किंमत ठेवली पाच शिलिंग्ज. तरी पुस्तक खपले नाही, तेव्हा ते पेनी ए बुक रद्दी पुस्तकांच्या ढिगा-यात भिरकावले गेले. त्या ढिगा-यातून रोझेटी- स्विनबर्नने ते उपसून काढले. घरी नेऊन अधाशीपणाने वाचले आणि त्यांना ते भारी आवडले. आपल्या दोस्तांजवळ त्यांनी या छोट्या पुस्तकाची यथेच्छ स्तुती केली. तेव्हा कार्टीश नावाच्या पुस्तकविक्रेत्याने रद्दीत भिरकावलेल्या या पेनी बुकाची किंमत एकाएकी वाढवून ते एक प्रत एक गिनी या चढ्या भावात विकायला सुरुवात केली. पण तेव्हा देखील ही नवप्राप्त लोकप्रियता फार काळ टिकून राहिली नाही. लोकांना पुन्हा एकदा या छोट्या पुस्तकाचा विसर पडला.

@@@

कै. प्रा. माधव मनोहर
( लेख : ‘ललित‘ दिवाळी अंक १९७५ वरून साभार)
[ छायाचित्रे : ‘विकिपीडिया‘वरून साभार ]
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

रुबायात : खुझा नामा

 

मुकुंद कर्णिक 

 

KUZA— NAMA

66 

Listen again. One Evening at the Close

Of Ramazan, ere the better Moon arose,

In that old Potter’s Shop I stood alone

With the clay Population round in Rows.

खुझा-नामा ( मडक्यांची कथा )

 

६६ 

ऐका नीट. रमजानच्या एका रात्री

चंद्र उगवायच्या जरा आधीच

म्हाताऱ्या कुंभाराच्या दुकानात उभा होतो मी.

मडकीही होती उभी ….. रांगा लावून.

67 

And, strange to tell, among the Earthen Lot

Some could articulate, while others not :

And suddenly one more impatient cried —

“ Who is the Potter, pray, and who the Pot?”

६७ 

आणि अचंभ्याची गोष्ट वाटेल तुम्हाला;

मडक्यांमधली कुणी बोलत होती तर कुणी होती निमूट.

आणि एवढ्यात त्यातलं एक उतावळं मडकं ओरडलं,

“अरे पण कुंभार कोण आहे? आणि आपण मडकी कोण?

68 

Then said another — “Surely not in vain

My substance from the common Earth was ta’en,

That He who subtly wrought me into Shape

Should stamp me back to common Earth again.”

६८ 

दुसरं म्हणालं, “अरे ज्यानं जन्म दिला त्यानं

मला आकार देण्यासाठी जमीन खोदून माती घेतली होती

ते काय उगाचच?…..आणि आता ?

तोच परत माझी माती करून टाकणार ! काय हे !

69 

Another said — ” Why, ne’er a peevish Boy,

Would break the Bowl from which he drank in Joy ;

Shall He that made the Vessel in pure Love

And Fancy, in an after Rage destroy ! ”

६९ 

दुसरं म्हणालं, “अरे, एखादं चिडखोर मूल सुध्दा फोडून टाकणार नाही…

ज्या मडक्यातून त्यानं पिऊन घेतला होता आनंद ते.

पण (इथं बघा,) ज्यानं प्रेमानं घडवलं तोच…

रागाच्या भरात विनाश करणार आहे.

70 

None answer’d this ; but after Silence spake

A Vessel of a more ungainly Make :

” They sneer at me for leaning all awry ;

What ! did the Hand then of the Potter shake ? ”

७० 

कुणीच प्रतिवाद केला नाही.

पण जरा वेळाच्या शांततेनंतर एक बेढब मडकं बोललं,

“मी कलंडतो म्हणून सगळे कुचेष्टा करतात, पण माझा काय दोष?

कुंभाराचे हात काय करत होते तेव्हा? थरथरत होते?”

71 

Said one — “Folks of a surly Tapster tell,

And daub his Visage with the Smoke of Hell ;

They talk of some strict Testing of us— Pish !

He’s a Good Fellow, and ’twill all be well.”

७१ 

मग एक सुरई बोलली, “भट्टीतल्या खडूस माणसाबद्दल सांगतात,

की तो आपला चेहरा नरकातल्या धुरानं बिघडवून टाकतो,

आपली कडक परिक्षा घ्यायची म्हणून….. पण जाऊ दे.

भला माणूस आहे! तो जे करेल त्यात आपलं चांगलंच होईल.”

72 

Then said another with a long drawn Sigh,

” My Clay with long oblivion is gone dry :

But, fill me with the old familiar Juice,

Methinks I might recover by- and -by !”

७२ 

आणि मग दुसरं एक उसासा टाकून म्हणालं,

“अरे, कोरडा पडलोय मी विस्मृतीत जाऊन,

जरा ती आपली नेहमीची मदिरा माझ्यात भरा,

मग बघा, कदाचित हळू हळू, पण होईन मी बरा.”

73 

So while the Vessels one by one were speaking,

One spied the little Crescent all were seeking :

And then they jogg’d each other, ” Brother, Brother !

Hark to the Porter’s Shoulder-knot a- creaking ! ”

७३ 

सगळी मडकी अशी एकमेकांशी बोलत असताना

एकाची नजर ईदच्या चंद्रकोरीकडं गेली जिला शोधत होते सगळे.

आणि मग सगळेच एकमेकांचा निरोप घेत म्हणाले, “भाई लोक,

चाहूल ऐका भारवाही हमालाच्या खांद्यावरली (बोचक्याची) गाठ कुरकुरतेय त्याची.”

 

(खुझा-नामा या मडक्यांच्या कथेतील रमादानचा महिना म्हणजे सृष्टीची सुरुवात, मडकी म्हणजे मर्त्य मानव, कुंभार म्हणजे मानवाला जन्माला घालणारा ईश्वर, ईदचा चंद्र म्हणजे मोक्ष, भारवाही हमाल म्हणजे यम आणि त्याच्या खांद्यावरील बोचक्याच्या गाठीची कुरकूर ही मृत्यूची चाहूल असा उमर खय्यामचा कल्पनाविलास असावा.)
@@@
मुकुंद कर्णिक
karnik.mukund@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
 लक्षणीय 

सात रुपयांची गोष्ट 

नोबेल पुरस्कार विजेते प्रा. सी. व्ही. रामन यांनी निवृत्ती घेतल्यावर त्यांच्या असे मनात आले की बंगळूर येथे एक संशोधन संस्था काढावी. म्हणून या अशा संस्थेतील शास्त्रज्ञांच्या तीन पदांसाठी त्यांनी वृत्तपत्रात जाहिरात दिली. अनेक शास्त्रज्ञांनी यासाठी अर्ज दाखल केले; याच्यामागे सर्वांचा एक उद्देश्य असाही होता की जरी आपली निवड झाली नाही तरी या नोबेल पुरस्कार विजेत्याला किमान एकदा भेटण्याची संधी मिळेल. प्राथमिक चाचणीमध्ये पाच शास्त्रज्ञांची निवड होऊन अंतिम चाचणी खुद्द प्रा. रामन एका मुलाखतीद्वारा घेणार होते आणि त्या पाच उमेदवारांमधून तीन शास्त्रज्ञांची निवड करणार होते. त्यानुसार मुलाखती पार पडल्या.

दुस-या दिवशी प्राध्यापक महाशय आपल्या घराच्या प्रांगणात फेरी मारत असताना त्यांना एक तरुण त्यांची वाट पाहत असलेला आढळला. त्याला पाहिल्यावर रामन यांना आठवले की हा कालच्या उमेदवारांपैकी होता पण याची निवड झालेली नाही. मग रामन यांनी त्याला काय अडचण आहे असे विचारले. तो म्हणाला की अडचण काहीच नाही. पण मुलाखत आटोपल्यावर कार्यालयाने त्याच्या खर्चापोटी जे पैसे त्याला चुकते केले त्यात सात रुपये जास्त दिले. हे सात रुपये तो त्यांना परत करायला गेला असता त्यांनी आपला हिशोब पूर्ण झाल्यामुळे आता हे ७ रुपये घेता येत नाहीत असे त्याला सांगितले. तो तरुण रामन यांना म्हणाला की हे सात रुपये त्याचे नसल्यामुळे ते स्वीकारणे योग्य वाटत नाही. रामन यांनी त्याला सांगितले की ठीक आहे; तुला हे सात रुपये परत करायचे आहेत तर मी ते घेतो. ते घेऊन रामन जरासे पुढे गेले आणि परत आले व त्या तरुणाला म्हणाले की उद्या सकाळी साडे दहा वाजता आपल्याला भेट. त्या तरुणाला आनंद झाला कारण त्याला आता रामन यांनी पुन्हा भेटता येत होते.

दुस-या दिवशी तो तरुण जेव्हा रामन यांना भेटला तेव्हा रामन यांनी त्याला सांगितले, “तरुण माणसा, तू पदार्थविज्ञान चाचणीत अयशस्वी झाला होतास परंतु प्रामाणिकपणाच्या चाचणीत यशस्वी झाला आहेस. तेव्हा मी तुझ्यासाठी आणखी एक पद निर्माण केले आहे.”

S. Chandrasekhar

अर्थातच त्या तरुणाला अत्यानंद झाला आणि त्याने त्या संस्थेत काम करून एफ. आर. एस. संपादन केली. आणि कालांतराने त्याला नोबेल पुरस्कार मिळाला. तो तरुण म्हणजे आजचे प्रा. एस. चंद्रशेखर होय. त्यांनी नंतर एक पुस्तक लिहिले की त्या सात रुपयांनी त्याचे सारे आयुष्य कसे बदलून गेले.

प्रामाणिकपणा किंवा सचोटी एक महान शास्त्रज्ञ कसा निर्माण करते हे याचे एक उदाहरण आहे.
डॉ. विजय आजगावकर यांनी पाठवलेल्या एका स्फुटलेखाचा  मुक्त अनुवाद.
अनामिक            

    

अगा जे जाहलेचि नाही …

कथाचतुष्टयी (४)
 
दीपावली २०१८ विशेष 
 
कथा चौथी 
 
निर्मला 

मुकुंद नवरे 

लग्नात मामा का लागतो असं मी विचारलं तर तुम्ही म्हणाल लग्नमंडपात मामा मुलीला घेऊन येतो आणि लग्न लागतं तेव्हा तो अंतरपाट धरायलाही असतो. तेही खरंच आहे  कारण एका बाजूने भटजी आणि दुस-या बाजूने मामा असे दोघेच हे काम ‘ताराबलं’ म्हटले जाईपर्यंत करतात. त्यातही फरक म्हणजे भटजी त्याचवेळी मंगलाष्टकं म्हणत असल्यानं मामाला फक्त अंतरपाट धरण्याचं काम असतं. पण निर्मलाच्या लग्नाची गोष्ट सांगितल्यावर मामा आणखी काय करू शकतो ते तुम्हाला कळेल.

निर्मला माझी भाची आणि मी तिचा मामा. ती माझ्या आक्काची मुलगी. आक्का तिच्या पहिल्या बाळंतपणाला माहेरी आली होती याचा अर्थ मी निर्मलाला जन्मापासून पाहत आलो आहे हे कळेलच. तिचे बोबडे बोल मी जसे ऐकले तसेच तिने बालकमंदिरात म्हटलेली गाणी आणि नाच मला अद्याप आठवतात. आक्कानं तिला मॉंटेसरीत घातलं होतं त्यामुळे तिचा मनोविकास लहानपणापासून चांगला झाला हे मी मनोवैज्ञानिक होण्याआधीपासून म्हणत आलो आहे. मी असं म्हटलं की आक्का म्हणणार,  ‘तुला आपल्या भाचीचं भारीच कौतुक’. तेही कदाचित खरंच असेल कारण मनाचे सर्व व्यापार कुणाला कळले आहेत ? आम्ही मनोवैज्ञानिक पण आडाखे बांधत केस हाताळत असतो आणि यश मिळतं तेव्हा आडाखे बरोबर असण्याची ती पावती असते… तर ते असो.

परत निर्मलाकडे येतो. ती लहानपणापासून चुणचुणीत आहे आणि गोरी नसली तरी तिचं सावळेपणही नजर आकर्षून घेतं हे मीच नाही तर बघणारा कोणीही मान्य करील. अशी ही माझी भाची कोल्हापुरातच वाढली आणि तिनं केव्हा शाळा पार केली हे आम्हाला कळलंही नाही. तिला पाठीवर भाऊ झाला तरी आमची आक्का आणि सदानंदरावांनी तिला मोठी करताना मुलगा मुलगी असा भेदभाव कधी केला नाही. त्यामुळे कॉलेज शिक्षणाचा प्रश्न आला त्यावेळी खुशाल निर्मलाच्या आवडीप्रमाणे तिला वालचंद इंजिनियरिंग कॉलेजात आक्कानं पाठवलं तेही घरापासून दूर. त्यामुळे झालं काय तर ती आणखीनच स्मार्ट झाली. प्रत्येक सेमेस्टरमधे तिला चांगल्या ग्रेड्स मिळत गेल्या. फायनलला असतानाच कॅंपसला मुलाखती झाल्या आणि एका आय् टी कंपनीनं तिची निवड केली. अर्थात याचं मला काहीच आश्चर्य वाटलं नाही. कारण एक तर आमची भाची गुणाचीच आणि दुसरं म्हणजे तिचा विषय इलेक्ट्रॉनिक्स. त्यामुळे डिग्री आणि जॉब ऑफर एकाच वेळी तिच्या हातात आल्या तेव्हा आक्काला एकीकडे आनंद झाला तर मुलगी आता पुण्याला जाणार याचं दु:खही झालं.

पण खरी परीक्षा पुढे होती. या आय् टी कंपन्या मुलांना भारतात बसवून ठेवत नाहीत हे मला कळत होतं तसं ते निर्मलालाही माहित होतं. आणि तसंच झालं. ट्रेनिंगचे सहा महिने आणि पुढचं वर्ष होण्याच्या आतच तिला स्कॉटलंडला जाण्याची ऑर्डर मिळाली तेव्हा आक्काला खरा धक्का बसला. पण त्यातून मी तिची समजूत काढली आणि आक्कानं खंबीर होऊन तिला निरोप दिला. तिला विमानतळावर पोचवायला मुंबईला आम्ही सगळेच गेलो होतो त्यावेळी निर्मला शेवटच्या क्षणी थोडी बावरली पण ते स्वाभाविक म्हटलं पाहिजे कारण ती एका संपूर्ण अनोळखी जगात प्रवेश करायला निघाली होती… तर ते असो.

निर्मला ग्लासगोला गेली आणि तिकडे ब-यापैकी रूळली. आक्काला तिनं वचन दिलं होतं त्यानुसार दर दिवसाआड ती फोनवर ख्याली खुशाली कळवत असे. तिचा फोन येऊन गेला की आक्का मला फोन करून सगळं सांगत असे. पुढे फोन आठवड्यातून एकदा आला तरी आक्काला काही वाटेनासं झालं. निर्मलाची असाइनमेंट दोन वर्षाची होती त्यामुळे मधे एकदा तीन आठवड्याच्या सुट्टीवर ती येऊन गेली तेव्हा मलाही भेटून गेली. तेव्हाच तिच्यात आलेला आत्मविश्वास मला सहज जाणवला.

*****

अशी दोन वर्षे पाहता पाहता निघून गेली आणि निर्मला असाइनमेंट संपवून भारतात परतली ! ती आता पुण्यातच घर घेऊन राहू लागली. आक्काला लेक परत आल्याचा आनंद झाला. ती कधी पुण्याला लेकीकडे जाऊन राहू लागली तर इतर वेळी निर्मला पुण्याहून  कोल्हापूरला जा ये करू लागली. आक्काला आता निर्मलाच्या लग्नाचे वेध लागले होते. ती ग्लासगोला असताना तिकडेच काही जुळवेल अशी धाकधुक मनात होती. पण तसं काही नसल्याचं कळलं तेव्हा आक्काचा जीव भांड्यात पडला. ती उत्साहानं निर्मलासाठी स्थळं शोधू  लागली. तसं तिनं मलाही सांगून ठेवलं. मी निर्मलाचं मत जाणून घेण्यासाठी विचारलं तेव्हा ती भारतात राहिली तर यापुढे तिचं  कामाचं ठिकाण पुणे, मुंबई किंवा तत्सम शहर असणार हे तिनं सांगितलं. त्यानुसार स्थळ निवडताना ते स्थानिक असलं तरी  मुलगा  पुण्यात किंवा मुंबईत काम  करणारा असावा असं मी आक्काला सांगितलं. आमचे सदानंदराव मात्र मुलगा चांगल्या घराण्यातला हवा यावर अडून होते आणि नोकरीपेक्षा व्यवसायात माणूस पुढे जातो या विचाराचे होते. मुलगी आपल्यापासून फार दूर जाऊ नये असं तर दोघांनाही वाटत होतं. शेवटी निर्मला त्यांची मुलगी आहे आणि तीही लहान नाही, त्यामुळे त्यांना योग्य वाटेल तो निर्णय त्यांना घेऊ द्या असं मला बायकोनं सांगितलं आणि ते मला पटलं. मामा आणि मामी असलो तरी त्यांच्या निर्णयात आम्ही प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही.

आणि एक दिवस आक्कानं मला फोनवर ‘या’ स्थळाबद्दल सांगितलं. त्यांनी फोटो आणि कुंडली पाहिल्यावर आता मुलगी पाहण्याची तयारी दाखवली होती. ही मंडळी कोल्हापूरला स्थायिक होती पण मुलगा अभिजित सी ए ची परीक्षा उत्तीर्ण केलेला  पण सध्या पुण्याला त्याच्या मामाच्या फर्ममधे काम करत होता. पुढच्याच शनिवारी आक्कानं मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम घरीच ठेवला होता आणि मला त्यावेळी येण्यासाठी तिनं गळ घातली. त्याप्रमाणे आक्काकडे छोटेखानी कार्यक्रम झाला. मुलगा अभिजित, त्याचे आई-वडील असे तिघेही आले होते. निर्मलाला त्यांनी पाहिली तेव्हाच त्यांना ही पसंत पडणार असा विचार माझ्या मनात आला. मलाही गोरागोमटा अभिजित आणि ती अनुरूप वाटली, आणि इतर बाबींचं कॉंबिनेशनही योग्य वाटलं. सर्वच गोष्टी जुळत होत्या. फक्त एक होकाराचा शब्द हवा होता पण तो कानावर पडायला दोन दिवस लागले. तरीही आक्काला आनंद झाला आणि ती पुढच्या तयारीला लागली.

आक्कानं मोठ्या आनंदानं निर्मलाच्या साखरपुड्याचा कार्यक्रम केला. दोन्ही बाजूची मंडळी उत्साहात होती. सगळे नातलग आणि आप्त मिळून साठ एक माणसं आली होती. निर्मला आणि अभिजित छान सजले होते आणि सगळीकडून त्यांचं कौतुक चाललं होतं. या निमित्तानं नवीन ओळखी झाल्या. माझी पहिल्यांदा ओळख झाली ते नेमके अभिजितचे मामा निघाले. आम्ही दोघेही मामा, त्यामुळे बोलायला विषय चांगला मिळाला.

” सावळी वधू बरी गौर वराला .. जोडा छान शोभतोय ” काही तरी सुरुवात करायची म्हणून मी बोललो.

” सगळं छान आहे हो .. पण हा अभिजित … याला थोडी मनाला मुरड घालायची सवय हवी. म्हणजे मी मामा असून बोलतो कारण आज ना उद्या हे कळणारच ” ते म्हणाले.

मला ते ऐकून काहीसं आश्चर्य वाटलं. मीच त्यांना थोडसं बाजूला घेऊन गेलो. माझ्यातला मनोवैज्ञानिक मला स्वस्थ राहू देईना.

” लग्नानंतर बदलतं हो .. बायकोच्या ताब्यात गेला की माणूस बदलतो. ” मी म्हणालो.

” तसं झालं तर बरंच की हो. पण काय आहे, हा एकुलता एक, त्यामुळे लहानपणापासून आई वडीलच त्याचं ऐकत आलेत, प्रत्येक गोष्ट त्याच्या मनासारखी व्हायलाच पाहिजे .. आता बाहेरच्या जगात असं नेहमीच कसं होणार. पण तुम्ही म्हणता तसं झालं तर आनंदच आहे. ” ते म्हणाले.

आमची ओळख झालीच होती म्हणून मी त्यांचं व्हिजिटिंग कार्ड मागून घेतलं. माझंही कार्ड त्यांना दिलं. त्या मामांशी माझं एवढंच बोलणं झालं पण त्यावरून परिस्थितीचा अंदाज आला. मात्र याबाबत कुणाशी बोलायचं नाही असं मी ठरवून टाकलं.

साखरपुडा झाल्यावर पुढच्या कार्यक्रमाला गती आली. दोन्ही पक्षांनी मिळून लग्नाचा मुहूर्त काढला. लग्नाला सहा महिने होते त्यामुळे तयारीला वाव होता. तयारी तर आजकाल दोन्ही बाजूचे आई वडीलच करत असतात. ज्यांचे लग्न ठरलेले असते ते दोघे तर हिंडायला फिरायला मोकळच असतात. इथे तर काय दोघांचे आई वडील कोल्हापुरात आणि ही दोघे कामानिमित्ताने पुण्याला होती. त्यामुळे त्यांच्या गाठी भेटी होत असणार यात शंका नव्हती. दोघेही कधी आठवड्याच्या शेवटी कोल्हापूरला येऊन सोमवारी परत जात असत. आक्का आणि सदानंदरावांच्या डोक्यात हे लग्न सोडून दुसरा विचारच नव्हता.

*****

असे तीन महिने गेले आणि एक दिवस सकाळी आक्काचा फोन आला. ती रडकुंडीला आली होती कारण निर्मला या लग्नाला नाही म्हणत होती. तिच्यासाठी हा जणू बॉंब गोळा होता.

” आता तूच काही तरी समजूत घाल बाबा तिची. आमचं तर ती काहीच ऐकायला तयार नाही ” आक्का म्हणाली.

” ती आहे कुठे ? ” मी विचारलं.

” आहे पुण्यालाच. काल रात्री फोनवर बोलली. खूप विचार करून नाही म्हणतेय असं म्हणाली. आम्ही दोघांनी गळ घातली, तू इकडे आल्यावर बोलू असं सुचवलं. पण ही काही ऐकायला तयार  नाही. नाही म्हणजे ठाम नाही असंच म्हणत राहिली. आता तूच सांग, सगळं या थराला आल्यावर आता नाही म्हटलं तर सगळीकडे छीथू होणार.. लोक काय म्हणतील .. ” ती म्हणाली.

” जरा धीरानं घे आक्का. काही तरी कारण असणार बघ. आपल्याला माहित नाही. ती इकडे आल्यावर बोलू तिच्याशी. माझी खात्री आहे ती मला सांगेल, सगळं खरं खरं सांगेल ” मी आक्काची समजूत काढत बोललो. ” तिला सध्या फोनही करू नको. आता यानंतर जेव्हा ती कोल्हापूरला येईल तेव्हाच तिच्याशी बोलायचं, आपण होऊन तो विषयही काढायचा नाही, न जाणो मधल्या काळात त्यांच्यात गैरसमज असेल तर आपोआप पॅच अप होईल… “

” तसं झालं तर ठीकच रे बाबा ” आक्का म्हणाली. सबुरी राखण्याचा मार्ग आम्ही निवडला. ते चांगलंच झालं.

माझ्या अपेक्षेप्रमाणे निर्मलानं मलाच बुधवारी फोन केला. मी शनिवार रविवार घरी असणार का अशी तिनं चौकशी केली.

‘ महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे ‘ म्हणाली.  ती शुक्रवारी रात्रीच कोल्हापूरला येणार होती. तिच्याच इच्छेप्रमाणे शनिवारी सकाळी क्लिनिकमधे आमची भेट ठरली. हे तिनं आक्कालाही सांगितलं असणार कारण तिनं फोन करून ‘ नीट सांभाळ रे बाबा, आता तुझ्या हातात सगळं आहे’ असं मला सांगून टाकलं.

शनिवारी मी दहा वाजता क्लिनिकमधे जाऊन स्थानापन्न होणार एवढ्यात ‘ मामा ..’ म्हणत  निर्मला केबिनमधे शिरली. आत आल्या आल्या ती मला येऊन बिलगली. तिच्या डोळ्यात अश्रू होते.

” मामा तूच मला यातून बाहेर काढ, मला हे लग्न नाही करायचं … ” ती म्हणाली.

” शांत हो निर्मला, तुझ्या इच्छेविरूद्ध लग्न होणार नाही … ” मी तिला आश्वासन दिलं. ती समोरच्या खुर्चीत बसली.

माझ्या शब्दांनी तिला दिलासा मिळाला. ती शांत झाली. मी थोडा वेळ जाऊ दिला तेव्हा तिचा आवेग ओसरला.

” आता मला एक एक करत सांग, नक्की काय झालं, तू लग्नाला नाही म्हणतेस की अभिजित नको … ” मी म्हणालो.

” मामा, मला लग्न करायचं आहे रे. पण हा अभिजित मला नको. मी खूप खूप विचार करून या निर्णयाला आले. ” ती म्हणाली.

” पण साखरपुडा झाला तेव्हा तर तू आनंदात होतीस ” मी आठवण करून दिली. ” त्यापूर्वीही तुम्ही एकमेकांशी बोलून मगच निर्णय घेतला होता, बरोबर नं  ? ” मी विचारलं.

” मामा, ते सगळं भूतकाळात गेलं समज. अभिजित नक्की कसा आहे हे मला नंतरच कळत गेलं. आणि मामा, दोन तास एकत्र बसलो, बोललो म्हणून माणूस पूर्ण कळतो का ? ” तिनंच मला विचारलं.

मला होकार देणं शक्य नव्हतं. कारण ती खरं तेच बोलत होती. वर्षानुवर्षे सोबत राहूनही माणूस कळत नाही हे सिद्ध करणारी असंख्य उदाहरणं मी रोज पाहत होतो.

” पण आता तरी तो तुला पूर्ण कळला असं म्हणू शकतेस तू ?”   मी विचारलं.

” नाही रे मामा. पण तो कळला नं तेवढा बस झाला. त्याच्यासोबत नाही राहू शकणार मी ” ती म्हणाली.

” हे पहा, तुझ्यावर कोणी सक्ती करणार नाही. प्रॉमिस. पण मला सांग तुमच्यात एवढं काय बिनसलंय.. तुला तो आताच न आवडण्याचं काय कारण ? ” मी विचारलं.

” मामा, त्याचा इगो … तुला कसं सांगू , त्याला कुणाची पर्वाच नाही रे. सगळं त्याला  त्याच्या मनासारखंच झालेलं हवं असतं… जरासं इकडचं तिकडे झालेलं चालत नाही. आणि या सगळ्याचा त्याला अभिमान वाटतो हे तर त्याहून भयंकर ” ती म्हणाली.

मला अभिजितच्या मामांनी साखरपुड्याच्या दिवशी काढलेले उद्गार आठवले. तसाच अनुभव निर्मलाला आलेला दिसत होता.

” निर्मला, याशिवाय आणखी काही कारण ? ” मी  जिज्ञासेनं विचारलं. माझ्यातला मनोवैज्ञानिक, दुसरं काय !

” आणि तो एक नंबरचा स्वार्थी आहे , जेवायला बसला की सगळं स्वत:ला वाढून घेतो. समोरच्याचा विचार सुद्धा नाही. आणि आवडी निवडी ! तशात त्याला आवडतं तेच घरी झालं पाहिजे हे त्यानं मला सांगून टाकलंय.” ती म्हणाली.

हे थोडं अति आहे हे मला जाणवलं. पण खरंच एवढं कारण असेल की आणखी काही, मी विचारात पडलो.

” या सगळ्यात निर्मला, जे तुला सहन होणारच नाही असं काही आहे का.. ” मी विचारलं.

” मामा, एवढं बस नाही का ? आणखी काय सांगू ?  अरे तो फार पझेसिव्ह आहे . त्यानं मला माझ्या सोशल ग्रुप्सची माहिती खोदून खोदून विचारून घेतली. ‘मला सगळं कळलं पाहिजे’ म्हणाला. माझा मोबाईल फोनही हातातून ओढला. गेल्याच आठवड्यात.. त्यावेळचा त्याचा चेहरा मला वेगळाच वाटला … ” ती म्हणाली.

मला आता या प्रकरणी मुद्देच मुद्देच दिसू लागले. अभिजितच्या स्वभावावर औषध शोधणे हा त्या लोकांचा प्रश्न होता. मी  निर्मलापुरता विचार करण्याचा निर्णय घेतला.

” ओके. निर्मला तू घरी आई बाबांना ही सगळी कारणं आता सांगून टाक. मला बोललीस हेही सांग. माझी खात्री आहे ते तुला सपोर्ट करतील. त्यांचा पाठिंबा असल्यावर आपल्याला पुढे जाता येईल. काय करायचं ते सगळं तू माझ्यावर सोड.” मी म्हणालो.

माझ्या नुसत्या बोलण्यानं निर्मलाच्या चेह-यावर हुरूप आला.

” आता मला सांग, तू अभिजितशी अजून बोलते बिलतेस की नाही… का गट्टी फू ? ” मी विचारलं.

” काय रे मामा … ” ती पहिल्यांदाच हसून म्हणाली, ” अरे बोलणं नसेल तरी आम्ही व्हॉट्सॅपवर आहोतच की. ते चालूच.

असतं. नवरा असणं वेगळं आणि फ्रेंडशिप वेगळी. ” ती म्हणाली.

ते ऐकल्याबरोबर माझ्या डोक्यात एक विचार चमकला. नजर समोरच्या भिंतीवरील कॅलेंडरवर स्थिरावली.

” पुढच्या रविवारी एकत्र जेवण घेऊया ? पुण्यात…” मी म्हणालो, ” मी तिकडे येतो. या आठवड्यात कधी तरी त्याला सांग. त्याच्या आवडीच्या हॉटेलमधेच भेटूया म्हणजे तो नाही म्हणणारच नाही. ” मी म्हणालो.

” हो, चालेल. मी नेहमीच्या हॉटेलमधे टेबल बुक करून ठेवते.” ती म्हणाली.

” आणि एक, चौघांसाठी बुक कर, मी त्याच्या मामांना बोलावणार आहे … ” मी म्हणालो.

” ते कशासाठी …? ” ती हेल काढत म्हणाली.

” ते तुला नंतर कळेल ” मी म्हणालो. माझ्या मनात योजना पक्की झाली होती.

माझ्या अपेक्षेप्रमाणे आक्काचा फोन दुपारीच आला. निर्मलानं तिला सगळं सांगितलं होतं. ते ऐकल्यावर हे लग्न न झालेलं बरं असं तिलाही वाटल होतं. आधी सदानंदरावांनी थोडी खळखळ केली होती, पण यातून बाहेर पडायला ते तयार झाले होते.

” आता तूच बघ रे बाबा. सगळं तुझ्यावर सोपवते … ” ती म्हणाली.

नंतर दोन दिवसांनी निर्मलाचा पुण्याहून फोन आला. माझ्या सांगण्यानुसार तिनं हॉटेलमधे रविवारच्या जेवणासाठी एक टेबल आरक्षित केलं होतं. मी नंतर अभिजितच्या मामांना फोन करून जेवणासाठी आमंत्रण दिलं.

” भेटून खूप दिवस झालेत, एकदा भेटूया ” मी म्हणालो. निर्मला आणि अभिजित पण असतील हे सांगितलं.

त्यांनीही आढेवेढे घेतले नाहीत. त्यांच्या मनमोकळ्या स्वभावाचा पुन्हा एकदा अनुभव आला.

” नक्की भेटू. ” ते म्हणाले.

आणि त्या रविवारी आम्ही हॉटेलमधे जेवणासाठी एकत्र आलो. तरूणाईनं बरीच गर्दी केली होती तरी आम्हाला एका कोप-यात टेबल मिळालं. एका बाजूला निर्मला आणि मी तर दुस-या बाजूला अभिजित आणि त्याचे मामा असे आम्ही समोरासमोर बसलो.

वेटरनं मेन्यू कार्ड्स आणून टेबलावर ठेवली.

” सांग तू काय हवंय ते … ” निर्मलाच्या हातात एक कार्ड देत म्हणालो.

” थांबा मी ऑर्डर करतो … ” तिच्या हातून कार्ड काढून घेत अभिजित म्हणाला. त्यानं हात वर करून वेटरला बोलावलं आणि कार्डवर नजर टाकत काय घ्यायचं ते ठरवलं.

वेटर जवळ आला तेव्हा  कुणाला काही न विचारता त्यानं ऑर्डर दिली. ती घेऊन वेटर निघून गेला.

” इथं काय चांगलं मिळतं मला माहित आहे ” आमच्याकडे बघत अभिजित म्हणाला. मी आणि मामा एकमेकांकडे बघत होतो.

” मामा, सध्या व्यवसाय काय म्हणतो ? ” मी अभिजितच्या मामांना विचारलं.

” चांगला चाललाय. जी एस् टी मुळे व्यापारी वर्गाची रिटर्न्स वगैरे खूप कामं वाढलीत. आमच्या व्यवसायात तसं मरण नाही पण जनसंपर्क ठेवावा लागतो, मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे लागतात, विश्वास संपादन करावा लागतो… ” मामा म्हणाले.

” अभिजित, तू सध्या मामांकडे असतोस. पुढे काही स्वत:चा व्यवसाय करणार की मामांकडेच… ” मी विचारलं.

” मला काय गरज, मामांची प्रॅक्टीस आहेच की. त्यामुळे सध्या तरी मी कुठला विचार करत नाही. ” तो म्हणाला.

” असं कसं, काही अॅंबिशन वगैरे … ” मी म्हणालो.

” आपण इथेच बरे आहोत. ” अभिजित म्हणाला.

” अभिजित, लग्नानंतर निर्मलाची बदली बंगलोरला झाली तर काय करशील ? ” मी विचारलं.

” अशी कशी होईल ? ” त्यानं विचारलं.

” का नाही , ती तर अमेरिकेतही होऊ शकते. ” मी म्हणालो.

ते ऐकून अभिजित गडबडला. त्यानं याबाबत काहीच विचार केला नव्हता हे उघड होतं.

” अभिजित, निर्मलाशी कधी या विषयावर बोलणं नाही झालं ? ” मी विचारलं.

” मी बोलले होते. पण यानं ते मनावर घेतलं नाही. वेळ येईल तेव्हा पाहू म्हणाला … ” निर्मला म्हणाली.

एवढ्यात वेटर आला आणि त्यानं ट्रेमधून आणलेले पदार्थ टेबलावर मांडले. अभिजितचं लक्ष विचलित झालं. त्यानं लगेच दोन वाडगे पुढ्यात ओढले आणि स्वत:च्या प्लेटमधे  पदार्थ वाढून घेतले.

” तुम्ही पण घ्या. ” तो आम्हाला म्हणाला. त्यानं वाडगे पुढे सरकवले.

” थॅंक्स ” मी म्हणालो. मग निर्मलानं इतरांच्या प्लेट्स भरल्या.

” घ्या मामा ” ती आम्हा दोघांना म्हणाली. आम्ही जेऊ लागलो.

” इथला पनीर टिक्का मसाला मला खूप आवडतो ” अभिजित म्हणाला. त्याला जेवण आवडलं होतं.

” अभिजित, आपण तू आणि निर्मलाबद्दल आता बोलूया, तुम्ही एकमेकांना आवडलात का ? ” मी विचारलं.

” ती मला आवडली आहे . ” अभिजित चट्कन म्हणाला.

” आणि निर्मला, तू काय सांगशील ? ” मी विचारलं .

” मामा, मी यावर खूप विचार केलाय आणि आता मी म्हणू शकते की आम्हा दोघांचं ट्यूनिंगच वेगळं आहे.” ती म्हणाली.

” म्हणजे काय ? ” अभिजित तिच्याकडे बघत म्हणाला.

” मी काय बोलतेय ते तुला पूर्ण कळतंय अभिजित. ” निर्मला म्हणाली. ” तू मला कधी आवडला होतास पण आता म्हणशील तर तुझ्याशी लग्न केलं तर ती माझी चूक होईल असं मला वाटतं आणि ती चूक मी करणार नाही.”

” पण मग इतके दिवस… ” अभिजितनं बोलायला सुरूवात केली.

” थांब अभिजित, ” त्याचे मामा म्हणाले ” निर्मला जर असं म्हणत असेल तर आता तो मुद्दा फार ताणण्यात अर्थ नाही.”

” मलाही तसंच वाटतं अभिजित, माझी अनेक वर्षांची प्रॅक्टिस आहे, अनेक असफल विवाह मी पाहिले आहेत. मला वाटतं जेव्हा मन ‘नाही’ म्हणत असतं तेव्हा ओढून ताणून लग्न करण्यात काही अर्थ नसतो. त्यामुळे तुम्ही दोघांनी झालं गेलं विसरून पुढे जाणंच योग्य ठरेल.” मी म्हणालो. अभिजित गप्प राहिला.

आमचं जेवण निम्म्यावर आलं होतं तेव्हाच जेवणाचा बेरंग झाला होता. पण मी तशी तयारी ठेवली होती.

” मामा, ” अभिजितच्या मामांकडे बघत मी म्हणालो, ” आपण भविष्याचा विचार करत हा निर्णय घेतला पाहिजे. मी हिच्या आई-वडिलांना सांगतो, तुम्ही याच्या आई-वडिलांना सांगा. अभिजित आज विचार करतो त्यापेक्षा काही वेगळा विचार त्यांना   करावा लागेल असं मला वाटतं. “

” तुमचं म्हणणं मला पटतंय ” मामा म्हणाले. ” आपल्याला यातून मार्ग काढावा लागेल. “

ते ऐकून माझा जीव भांड्यात पडला.

” पण मामा, आज या मुलांकडून एक शिकूया, आजकालची मुलं मैत्री आणि लग्न यात गल्लत करत नाहीत. आपण मित्र म्हणून नक्कीच संबंध ठेऊ शकतो.” मी म्हणालो.

” आणि आज तर फ्रेंडशिप डे आहे … ”  पर्समधून गुलाबाचं फूल काढून अभिजितला देत निर्मला म्हणाली.

[ कथामालिका समाप्त ]
मुकुंद नवरे
mnaware@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
पाखरे भिरभिरती अंबरी : भानू शिरधनकर 
विस्मृतीत गेलेली पुस्तके 
 
प्रस्तावना 
 
मुकुंद गणेश सहस्त्रबुद्धे 
 
प्रिय वाचक, 

‘ऑलिम्पिकची नवलकथा’ या कै. भानू शिरधनकर यांच्या पुस्तकाची सुरुवातीची काही प्रकरणे ‘मैत्री’च्या आपल्यासमोर सादर केली होती आणि आपण त्याला उत्तम प्रतिसाद दिला. ते पुस्तक आपण विकत घेऊन वाचावे अशी अपेक्षा आहे. आज शिरधनकरांच्या ‘पाखरे भिरभिरती अंबरी’ या आणखी एका रोचक पुस्तकाची प्रस्तावना साभार पुनःप्रसिद्ध करत आहोत. – सं.    

ब-याच वर्षांपूर्वी एकदा आमचे वडीलधारे मित्र ‘वाङ्मयशोभे’चे श्री. नाना केळकर गप्पा मारायला घरी आले होते. त्यांचेबरोबर एक अपरिचित गृहस्थ होते. घरी त्याचवेळी आणखी दोनतीन मित्रही आले होते. सुटीचा दिवस होता आणि सकाळची वेळ होती. चहापाणी झाल्यावर घरातली मंडळीही गप्पांत सामील झाली. केळकरांच्या नवीन प्रकाशनाबद्दल विचारता त्यांनी शिरधनकरांच्या ‘सर्कसचे विश्व’ या नव्याने प्रकाशित होणा-या पुस्तकाबद्दल माहिती सांगितली. विषय असा होता की सा-यांनीच त्यात उत्साहाने भाग घेतला. कुणीतरी सहज म्हटलं की या पुस्तकाच्या लेखकाची भेट झाली पाहिजे. त्यावर नाना केळकरांनी विचारलं, ‘तुम्ही त्यांना बघितलं नाही ?’ लगेच त्यांनी पलीकडच्या खुर्चीत निर्विकार शांतपणे बसलेल्या एका मध्यमवयीन गृहस्थाकडे बोट दाखवलं. आम्ही सर्व अवाक झालो. नानांबरोबर आलेल्या त्या अपरिचित गृहस्थांची आम्ही साधी चौकशीही केली नव्हती. आणि त्यांनीही आपल्या अस्तित्वाची जराही जाणीव होऊ दिली नव्हती. अर्थातच सर्वांनी नंतर त्यांना  चांगलंच घेरलं. त्याना नाना प्रश्न विचारले. आणि आश्चर्य म्हणजे त्यांचा आवडता विषय निघाल्याबरोबर इतका वेळ गप्प बसलेला हा गृहस्थ एकदम इतका बोलका झाला की वेळ किती गेला ते समजलंच नाही. सर्वजण अगदी खूष झाले. श्री. शिरधनकरांशी प्रथम परिचय हा अशा रीतीने झाला. नंतर अधूनमधून भेटी होत राहिल्या. पण त्यांचे आवडीचे विषय सोडले तर बाकीच्या विषयांवर बोलायला ते फारसे उत्सुक नसत.

दुस-या महायुद्धानंतरच्या काळात शिरधनकरांनी सागरी जीवन आणि शिकारकथा, प्राणीकथा इत्यादी विषयांचे लेखक म्हणून मिळवलेली लोकप्रियता अमाप होती. पण तरीही कोणत्याही सार्वजनिक स्वरूपाच्या कार्यक्रमात ते उपस्थित असल्याचं कधी ऐकलं नव्हतं. आमच्यापैकी कुणीही त्यांना ओळखलं नव्हतं ते त्यामुळेच.

काही वर्षांपूर्वी ‘अभिनव प्रकाशन’च्या श्री. वामनराव भटांबरोबर ते घरी येऊ लागले. वामनरावांनी त्यांची सांगितलेली एक आठवण सांगण्यासारखी आहे. शिरधनकरांची नोकरी संपल्यावर कित्येक वर्षे त्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम त्यांना मिळाली नव्हती. आणि अनेक वर्षं त्यांच्याबरोबर वावरलेल्या वामनरावांनाही त्यांनी ते सांगितलं नव्हतं. संकोचापोटी शिरधनकर कोणाशी हा विषय काढीत नसत. पैसे त्यांचे होते आणि त्यांना त्याची गरजही होती. पुढे कोणीतरी त्यांच्या कचेरीत हे प्रकरण नेलं. शिरधनकरांचे प्रेमी तिथेही होते. त्यांनी इतर कामं बाजूला सारून, जुने कागद तपासून त्यांचे पैसे त्यांना देण्याची व्यवस्था केली. अगोदर कळते तर अगोदरही मिळाले असते. पण यांच्या संकोचापुढे कोण काय करणार !

उत्तरोत्तर अधिक परिचय झाल्यावर एक वेगळेच शिरधनकर दिसू, जाणवू लागले. हे शिरधनकर म्हणजे सा-या निसर्गाशी एकरूप झालेला एक अवलिया होता. उंच, शेलाटी अंगकाठी, तरतरीत नाक, तुकतुकीत सावळा वर्ण आणि विलक्षण भावपूर्ण डोळे असलेले शिरधनकर एरवी कितीही अबोल असोत पण निसर्गाबद्दल बोलणं निघालं म्हणजे मग त्यांच्याकडे पाहात राहावं. पशुपक्ष्यांबद्दल बोलताना वा लिहिताना ते अगदी त्यांच्यापैकी एक असल्यासारखं बोलत. जणू ते आपल्या भाऊबंदांबद्दलच बोलताहेत.  असं वाटे, की त्यांना त्यांची भाषाही समजत असली पाहिजे.

एक दिवस असेच अचानक शिरधनकर घरी आले आणि एक हस्तलिखित ठेवून गेले. उघडून पाहतो तो ते प्रस्तुत ग्रंथाचं हस्तलिखित होतं. योगायोग असा की त्याच सुमारास मी बरीच मोठी सुट्टी घेऊन लोणावळ्याला जाऊन राहणार होतो. अर्थातच असा ग्रंथ वाचण्याची अगदी खास सोय झाली. हा ग्रंथ वाचताना त्यांच्या निसर्गाशी असलेल्या तादात्म्याची खात्री पटली. आयुष्यभर निरीक्षण करून पक्ष्यांबद्दल जी माहिती त्यांनी जमवली ती अगदी काळजीपूर्वक, खुलासेवार आणि रंगतदारपणे त्यात मांडली होती. वाचताना प्रथमच ध्यानात आलं की पक्षी कसा बघावा हेच मुळी मला माहित नव्हतं. पण त्यांचं लिखाण वाचायला लागल्याबरोबर अगदी ‘तिला उघड’ म्हटल्यासारखं पक्ष्यांच्या जगांत माझा अलगदपणे प्रवेश झाला.

सकाळ संध्याकाळ फिरायला जाताना मी आपोआपच पक्षी पाहू लागलो. त्यांची नावं समजावून घेऊ लागलो. त्यांचं निरीक्षण करू लागलो. लिखाण इतकं नेमकेपणाने लिहिलं आहे की बरेचसे पक्षी पाहिल्यावर त्यांची नावं लक्षात यायला फारसा वेळ लागला नाही. शंका आली अथवा अधिक माहिती हवी असली तर पुन्हा एकदा लिखाणातला तेवढा भाग काढून वाचायचा, म्हणजे काम भागत असे. पक्ष्यांचा आकार, रंग रूप, आवाज, बसणं – उडणं, उडण्याची पद्धत इत्यादींकडे जाणीवपूर्वक लक्ष जाऊ लागलं. शिरधनकर नुसतेच माहितगार नाहीत. तर ते एक सिद्धहस्त लेखकही आहेत. त्यांच्या लिखाणाचा प्रभावच असा आहे की पक्षीगणांचं सौंदर्यही आपोआप आपल्यापुढे उलगडत जातं.

सुट्टी संपल्यावर लोणावळा सोडून मी परतलो. पण माझं पक्ष्यांबद्दलचं आकर्षण मात्र मला सोडून गेलं नाही. ते उत्तरोत्तर वाढतच गेलं. अजूनही वाढत आहे. आजही सहलींना गेल्यावर – मग ते गावात असो, डोंगरात, रानात वा समुद्रावर असो – मन पक्षी शोधू लागतं. सापडले म्हणजे त्यात रमू लागतं. आगगाडीने जातानाही आता मला ते दिसतात. एवढंच काय पण, माझ्या मध्य मुंबईतल्या घराजवळही ते दिसतात. कावळे आणि कबुतरं तर सोडाच, पण पूर्वी कधीही न दिसलेले पोपट, दयाळ, गवई, कोतवाल, हळद्या यांच्यासारखे नावाजलेले सुंदर पक्षीही मला माझ्या राहत्या परिसरात दिसू लागले आहेत. हे पक्षी पूर्वी कुठे होते ? असं कसं झालं ? मला ते पक्षी पूर्वी का दिसले नाहीत ?

मी काही कुणी पक्षीतज्ज्ञ नाही. पक्षी पाहावेत असंही मला पूर्वी कधी वाटलं नाही. पण शिरधनकरांच्या ‘पाखरे भिरभिरती अंबरी’नं माझ्यात कसा बदल झाला आणि मला एक नवा आनंदाचा विषय कसा प्राप्त झाला हे सांगण्याकरताच हे सर्व लिहिलं. शिरधनकरांचं असामान्य अनुभवविश्व, सौंदर्यदृष्टी आणि निवेदनकौशल्य यांच्यामुळे कोणीही वाचक असाच बदलून जाईल आणि पक्षीप्रेमी बनेल याबद्दल मला थोडीही शंका नाही.

मुकुंद गणेश सहस्त्रबुद्धे
पाखरे भिरभिरती अंबरी : लेखक भानू शिरधनकर
प्रकाशक : वामन विष्णु भट, अभिनव प्रकाशन, ५३, गुरु नानक मार्केट, दादर, मुंबई ४०० ०१४.
प्रथमावृत्ती : डिसेंबर १९७९
किंमत : २० रुपये
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
विडंबन गीत
 

क्र. ४४-४५

कै. सचित वाघ – प्रेषक सुभाष फडके 

आय पी जी सादरीकरण – मंदार मोडक  

 मंगेश पाडगावकरांच्या गीतातील शब्द इतके कोमल आहेत की फुलांच्या पाकळ्यांचा स्पर्श झाल्यासारखे वाटावे. कै. सचित वाघांनी आपल्याला डोळे खाडकन उघडून जमिनीवर आणण्याचे काम मोजक्या शब्दात केले आहे.

‘देव दीनाघरी धावला’ या एका जुन्या नाटकातील – “उठि उठि गोपाळा” ही भूपाळी सर्वतोमुखी आहे. कुमार गंधर्वांच्या विशेष शैलीमुळे ती भूपाळी अजूनही लक्षात राहते. वाघांनी श्रीकृष्णाच्या जागी पत्नीला झोपेतून जागा करणारा पती, ही कल्पना डोळ्यासमोर ठेवून हे विडंबन केले आहे. 

 

भिकारी

दीपावली २०१८ विशेष 
 
इंग्रजी साहित्य परिचय [ २३ ]  

मुकुंद कर्णिक 

“दया करा मालक, गरीब, भुकेल्या माणसावर दया करा. तीन दिवस झाले पोटात काही गेलं नाही मालक, कुठं धर्मशाळेत झोपायला जायचं म्हटलं तरी लागणारा रुपाया माझ्याजवळ नाही. देवाशप्पथ मालक, मी चांगल्या घरचा माणूस आहे हो. पाच वर्षं शाळामास्तर होतो एका खेड्यात. पण माझ्या वाईटावर असलेल्या लोकांनी संगनमत करून मला काढून टाकलं शाळेतनं. खोटी साक्ष दिली माझ्याविरुध्द हो त्यांनी आणि माझी नोकरी गेली बघा. आख्खं वर्ष झालं मी बेकार आहे. मालक, दया करा.”

लाकूडवखारवाल्या साखरपेकरानी घरात प्रवेश करत असताना मागं वळून बघितलं. अंगावरच्या कपड्यांची लक्तरं झालेला, दारुच्या नशेत असल्यासारख्या डोळ्यांचा आणि दाढीच्या वाढलेल्या खुंटांमधून करपलेले गाल दिसत असलेला माणूस फाटकाबाहेर उभा राहून हात पुढं करून बोलत होता. साखरपेकराना त्या भिकाऱ्याला कुठंतरी बघितल्यासारखं वाटलं.

“आता मला नोकरी सांगून आलीय बघा, मालक, साताऱ्यात. पण तिकिटाला पैसे नाहीत माझ्याजवळ,” भिकाऱ्यानं पुन्हा विनवलं, “शरम वाटतेय हो मागायला, पण इलाजच नाही दुसरा, मालक.”

साखरपेकरानी त्याला आपादमस्तक न्याहाळलं. एका पायात वहाण तर दुसऱ्यात फाटका बूट, तुमानीचा एक पाय अर्ध्या चड्डीसारखा फाटलेला तर दुसरा पोटरीपर्यंत येणारा, कळकट दिसणारा माणूस बघून त्याना एकदम आठवलं कुठं बघितलं होतं त्याला आधी ते.

“काय रे, कालच मला भेटला होतास ना, अंबाबाईच्या देवळाजवळ?,” ते म्हणाले. “आणि तेव्हा शाळामास्तर असल्याचं नव्हता बोललास, शाळेतनं काढून टाकलेला विद्यार्थी आहे, असं म्हणाला होतास. होय ना?”

“नाही, नाही मालक. खरं नाही ते,” चपापलेला तो भिकारी सांगायला लागला, “मी खरंच शिक्षक आहे. हवं तर मी तशी कागदपत्रं दाखवतो तुम्हाला पुरावा म्हणून.”

“बस्स बस्स ! खोटारडा आहेस तू. नक्की तूच होतास तो, शाळेतनं काढून टाकलेला मुलगा आहे असं काल मला सांगणारा. बोल, खरंय की नाही?,” साखरपेकर म्हणाले, “छे: ! लाज कशी नाही वाटत तुला लोकाना असं फसवायला? थांब, पोलिसात तक्रारच देतो तुझ्याविरुध्द. गरीब, भुकेलेला असलास म्हणून काय झालं? अशी निर्लज्ज फसवाफसवी?” साखरपेकरांनी एक तुच्छतेचा कटाक्ष टाकला आणि आत जायला वळले.

भिकाऱ्यानं फाटकाच्या खांबावर हात ठेवला आणि एखाद्या घाबरलेल्या सश्यानं बघावं तशी नजर लावत म्हणाला, “नाही मालक, मी खोटं नाही सांगत. माझ्याकडं कागद आहेत हो.”

“कोण विश्वास ठेवील तुझ्यावर? गावकऱ्यांनी कीव करावी म्हणून मास्तर काय, विद्यार्थी काय, काही वाट्टेल ते बनशील. महालबाड, फसवा आहेस. शी !” भिकाऱ्याची लबाडी साखरपेकरांना जिवापाड प्रिय असलेल्या तत्वांच्या विरुध्द होती. दयाळू, गोरगरिबांना मदत करण्यात हात आखडता न घेणाऱ्या, कनवाळू साखरपेकरांच्या कोमल हृदयाला त्या भिकाऱ्याच्या फसवेगिरीमुळं यातना होणं साहजिकच होतं.

भिकाऱ्यानं जरा वेळ आणाशपथा घेत आपण खरं बोलत असल्याचं पटवून द्यायचा प्रयत्न केला आणि अखेर मान खाली घालून म्हणाला, “खरं आहे तुमचं मालक. मी शाळामास्तर नाही नि विद्यार्थीही नाही. खोटं होतं ते. मी एक बेवारशी गायक आहे. आमचा गाणाऱ्यांचा एक कंपू होता. मी गायचो त्यात. पण मग दारूचं व्यसन लागल आणि मग सगळ्यांनी मला बेवडा, बेवडा म्हणत कंपूतून हाकलून लावलं. भीक मागण्यावाचून काही दुसरा मार्गच उरला नाही मला मालक. खरं सांगून कुणी विश्वास ठेवत नव्हतं माझ्यावर. तेव्हा मग खोटं बोलायची सवय लागली. आता खोटं बोलल्याशिवाय राहवतच नाही मला. खरं बोलून उपाशी रहायचं, डोक्यावर छप्पर नाही, झोपायला जागा नाही असं जिणं जगायचं! त्यापेक्षा खोटं बोलून लोकांच्या सहानुभूतीतून जुजबी का होईना, प्राप्ती होते तिच्यावर जगायची सवय लावून घेतली. तुम्ही म्हणता ते खरं आहे मालक, पण काय करू?”

“काय करू म्हणून मलाच विचारतोस?” साखरपेकर जवळजवळ किंचाळलेच, “काम कर. मूर्ख माणसा, काम कर आणि त्यातून कमाई कर.”

“ठाऊक आहे मला ते मालक. काम केल्यावर कमाई होते. पण…. मला काम कुठं मिळणार हो?”

“दीड शहाण्या, म्हातारा झाला नाहीस अजून, चांगला धट्टाकट्टा आहेस, तरुण आहेस. शोधलंस तर काम मिळेलच तुला कुठंतरी. पण नाही! तू आळशी आहेस, दारुड्या आहेस, हातभट्टीच्या घाणेरड्या दारूचा वास मारतोय तुला, आणि तरीही तुला कसली नोकरी हवी असणार ते कळतंय मला. जिथं काम नसेल आणि पगार जास्त मिळेल अशीच नोकरी हवी असणार तुझ्यासारख्या खोटारड्या, लुच्च्या लफंग्याला. दुसरं काय ! मेहनतीचं काम करणं कसं पत्करशील, नाही का?”

कसनुसं हसून भिकारी म्हणाला, “काय बोलताय मालक? मला कामं कुठली मिळायला. उशीर झालाय त्याला. दुकानात काम बघावं तर त्यासाठी व्यापाराची कला लहानपणापासून यायला पाहिजे असते. कुठल्या कारखान्यातही काम मिळणार नाही कारण त्यासाठी लागणारं असं कुठलंही कौशल्य माझ्यात नाही. मग तुम्हीच सांगा मी काय करू?”

“बकवास ! काही ना काहीतरी सबब सांगतोयस. लाकडं तोडू शकशील की.”

“माझी ना नाही पण तुम्हालाही ठाऊक आहेच की मालक, आजकाल सगळे पट्टीचे लाकूडतोडे बेकार बसले आहेत ते.”

“हं ! तुझ्यासारखे कुचकामी लोक असंच बोलणार. माझ्या लाकूड वखारीत लागतील ती लाकडं फोडशील? मी देतो ते काम तुला.”

“हो मालक, मी तयार आहे त्याला.” भिकाऱ्यानं नाईलाजानं उत्तर दिलं.

“ठीक तर मग. चल, दिलं तुला ते काम.” साखरपेकरानी घाईघाईने घरातून त्यांच्या स्वैपाकिणीला हाक मारली, “पार्वतीबाई”. लुगड्याला  हात पुसत वयस्कर पण भक्कम अशा पार्वतीबाई बाहेर आल्या. साखरपेकरानी त्याना सांगितलं, “पार्वतीबाई, याला आपल्या वखारीत घेऊन जा आणि जळणासाठी म्हणून आणलेले लाकडाचे ओंडके फोडून ठेवायचं काम द्या.”

भिकाऱ्यानं खांदे उडवले आणि अनिच्छेनंच पण नाईलाजानं पार्वतीबाईंबरोबर घराच्या मागे असलेल्या वखारीकडं जायला निघाला. भुकेलेला होता आणि पैसे मिळवायचे या उद्देशानं नव्हे, तर मालकाच्या बोलण्याला बळी पडलो याचं वैषम्य वाटलं म्हणून. खरं तर सकाळी सकाळीच प्यालेल्या बेवड्याचा अजून परिणाम होता त्यामुळं काम करायची तसदी घ्यायला त्याचं शरीर तयार नव्हतं. पण नाईलाज होता.

साखरपेकर घरात गेले आणि जेवणाच्या खोलीतून दिसत असलेल्या वखारीकडे त्यांनी नजर टाकली. खिडकीजवळ उभे राहून ते वखारीत काय घडतंय याच्याकडे पाहू लागले. पार्वतीबाई आणि तो भिकारी दोघेजण घराशेजारच्या वाटेने वखारीकडे आले. पार्वतीबाईनी भिकाऱ्याला एकवार आपादमस्तक बघून घेतलं तणतणत वखारीचं दार उघडलं.

तो ना शाळामास्तर ना शाळेतला विद्यार्थी असलेला ‘गायक’ भिकारी एका मोठ्या ओंडक्यावर बसला हाताच्या दोन्ही तळव्यांत गाल धरून. पार्वतीबाईनी वखारीतून आणून एक कुऱ्हाड त्याच्या पायाशी टाकली आणि बहुतेक त्याला शिव्या देत उभी राहिली. साखरपेकराना काय ते ऐकू येत नव्हतं.  “कजाग आहे बाई,” साखरपेकर पुटपुटले.

भिकाऱ्यानं नाखुशीनंच एक ओंडका जवळ ओढला, आपल्या दोन पायात धरला आणि कुऱ्हाड उगारली. ओंडका सटकला आणि आडवा झाला. भिकाऱ्यानं पुन्हा एकदा ओंडका जवळ ओढला आणि त्याच्यावर सावधपणे पण हलकेच कुऱ्हाड मारायचा प्रयत्न केला. कुऱ्हाडीनं एक ढलपा देखील निघाला नाही ओंडक्याचा आणि ओंडका परत आडवा पडला.

एव्हाना साखरपेकराना त्याच्यावर दया यायला लागली. दारू पिऊन आणि कदाचित विड्या फुंकून छाती पार पोकळ झालेल्या, ताकत नसलेल्या, कदाचित आजारीही असलेल्या माणसाला आपण हे मेहनतीचं काम करायला लावल्याबद्दल आता त्यांच त्यांनाच अपराधी  वाटायला लागलं. पण त्यातूनही त्यांच्या मनात आलं, “करू दे हे काम त्याला. त्याच्या भल्यासाठीच तर आपण ते  करायला लावतो आहोत.” खिडकीपासून बाजूला होऊन ते आपल्या कामाच्या खोलीत येऊन बसले.

तासाभरानं पार्वतीबाईनी येऊन भिकाऱ्यानं दिलेली सगळी लाकडं फोडल्याचं सांगितलं.

“अरे वा ! ठीक तर मग हे दोन रुपये द्या त्याला आणि म्हणावं, हे काम पसंत असेल तर दर आठवड्याला येऊन करत जा. पैसे मिळतील म्हणावं.”

तेव्हापासून दर आठवड्याला सोमवारी तो भिकारी वखारीत येऊन लाकडं फोडून द्यायला लागला. ते काम नसेल तर वखार आणि परिसर झाडून काढायचा. साखरपेकर त्याही कामाचे त्याला पैसे द्यायचे. एकदा त्याला आपली एक जुनी विजारही दिली त्यांनी.

असेच दिवस गेले आणि साखरपेकरानी राहतं घर बदललं. वखार आहे त्या जागेतच ठेवली पण राजारामपुरीतल्या पाचव्या गल्लीच्या कोपऱ्यावरून ते तेराव्या गल्लीत मोठ्या घरात रहायला गेले. तेव्हा घरसामान, फर्निचर वगैरे गाडीत भरून द्यायचं काम त्यांनी त्या भिकाऱ्याला संगितलं. तेव्हाही अगदी एकाददुसरी खुर्ची आणून गाडीत ठेवण्यापलीकडं त्यानं काही काम केलं नाही. त्या दिवशी तो सबंध वेळ मरगळलेलाच होता. नुसताच गाडीच्या अवतीभवती येरझाऱ्या घालत जणू काही काम करतो आहोत असं भासवत होता. सगळं सामान नव्या घरात पोचवल्यानंतर साखरपेकरानी त्याला बोलावलं आणि म्हणाले, “ हे घे तुझ्या आजच्या कामासाठीचे पैसे, तीन रुपये.  मी त्या दिवशी तुला कामं करायला लाग म्हणून सांगितलं त्याचा चांगला परिणाम झालेला दिसतोय. दारू पिणंही कमी झालंय तुझं. काय नाव काय म्हणालास तुझं?”

“लक्ष्मण, मालक.”
“ठीक आहे, लक्ष्मण. लिहायला वाचायला शिकलायस का”

“हो, मालक.”

“ठीक आहे, मग तुला मी दुसऱ्या चांगल्या कामाला लावतो. लाकडं फोडायचं मेहनत मजुरीचं काम नसेल ते. शाहूपुरी व्यापारी पेठेत माझे एक मित्र आहेत अडत दुकानदार, मी चिठ्ठी देतो ती घेऊन उद्या तू त्यांच्या दुकानात जा. दुकानात गुळाच्या आवक-जावकेच्या नोंदी करायचं काम देतील तुला. पगारही चांगला देतील. नीट मन लावून काम कर. आणि हो, दारू पिणं अजिबात सोडून दे. ऐकलंस का?”

“हो, मालक. मेहरबानी मालक.”

साखरपेकरानी मित्राच्या नावे चिठ्ठी लिहिली. मनातल्या मनात धन्य वाटलं त्याना. आपण एका गरीब पण चुकार माणसाला चांगल्या मार्गाला लावलं याचं समाधान झालं. त्या समाधानात चिठ्ठी देताना त्यांनी लक्ष्मणच्या खांद्यावर थोपटलंही आणि त्याला निरोप दिला.

लक्ष्मणनं चिठ्ठी घेतली आणि पुन्हा एकदा “तुमची मेहरबानी मालक” म्हणून निघून गेला. त्या दिवसापासून नंतर तो कधी वखारीकडं फिरकला नाही.

दोन वर्षं उलटली.

साखरपेकर त्या दिवशी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीपाशी असलेल्या रांगेत उभे होते तिकिटासाठी. लोकांनी डोक्यावर घेतलेलं नाटक होतं, सुवर्णमहोत्सवी प्रयोग होता त्या दिवशी. तिकिटासाठी दोन खिडक्या उघडलेल्या होत्या. अर्थातच दोन्हीकडे रांगा मोठ्या होत्या. एका खिडकीमधून साखरपेकरानी तिकीट घेतलं, पैसे दिले आणि रांगेतून बाहेर पडले. अचानक दुसऱ्या खिडकीसमोरच्या रांगेकडं त्यांचं लक्ष गेलं. चामड्याचं जाकीट आणि बकरी टोपी घातलेल्या एका माणसानं तिकीट घेतलं आणि तोही मागं फिरला.

“लक्ष्मण ! लक्ष्मणच ना तू?,” साखरपेकरानी त्यांच्या दोन वर्षांपूर्वीच्या लाकूडफोड्याला ओळखलं आणि विचारलं. “कसं चाललंय तुझं ? बरं आहे ना?”

“चांगलं चाललंय. आता मी वकिलाकडं काम करतो. सातपुते वकील. अशीलांचे दस्तऐवज लिहून देतो. महिना शंभर रुपये मिळतात.”

“छान छान ! देवाची कृपा. मला खूप बरं वाटलं हे ऐकून, लक्ष्मण. अरे, तू माझ्या मुलासारखाच आहेस. म्हणून मी तुला सन्मार्गाला लावलं. तेव्हा तुझ्यावर रागावलो मी, आठवतंय? धरणी पोटात घेईल तर बरं असं वाटलं असेल तुला त्या वेळी. पण आज? माझं ऐकलंस तेव्हा म्हणून आजचा हा दिवस दिसतोय तुला. आभार मानायला हवेस तू.”

“आभारी आहे मी तुमचा, मालक,” लक्ष्मण म्हणाला. “त्या दिवशी तुम्ही भेटला नसतात तर आज कदाचित अजूनही मी स्वत:ला शाळामास्तर नाहीतर विद्यार्थी म्हणवत भीक मागत फिरत असतो. तुमच्याकडे आलो म्हणून वाचलो मी.”

“ठीक ठीक. मला आनंद आहे त्यात.” साखरपेकर म्हणाले.

“एक आहे मालक, त्या दिवशी तुम्ही मला जे बोललात, जो उपदेश दिलात तो लाख मोलाचा होता. आभारी आहेच मी तुमचा…. आणि तुमच्या स्वयपाकीण बाई…… पार्वतीबाईचा. देव तिचं भलं करो. फार मोठ्या मनाची बाई. तुमचे उपकार झालेत माझ्यावर, पण मला खरं वाचवलं असेल कुणी तर पार्वतीबाईनी!”

“पार्वतीबाईनी? ते कसं काय?”

“त्याचं असं झालं, तुमच्या वखारीत यायचा न मी, ओंडके फोडायला, तेव्हा माझ्याकड बघून पार्वतीबाई करवादायची, “आरं बेवड्या, मेल्या, कशाला जग्तुयास? मुडदा बशिवला तुजा भाड्या ! त्यो यम बी न्हेत नाई तुला, मुर्दाडा !” आणि कपाळावर हात धरून माझ्याकडं बघत बसायची माझी कीव करत.  म्हणायची, “कसा कमनशिबी हाईस रं पिंडक्या. चांगलं ख्यायाला न्हाई का अंगाव घालायाला न्हाई. दळभद्र्या, पाप्याचं पितर झालाईस. तू काय लाकडं फोडणार? उज्जेड !” आसवं भरायची तिच्या डोळ्यात माझ्याकडं बघत असंच काय काय बोलताना. मग, मालक, ती उठायची आणि स्वत:च लाकडं फोडायची सगळी. आजवर, मालक खरं सांगतो मी, विश्वास ठेवा, इतक्या दिवसात एकसुध्दा ओंडका मी नाही फोडला. सगळे तिनंच फोडले. फोडून झाल्यावर घरातून भाजी भाकरी आणून मला खायला लावायची. आणि वर तुम्ही दिलेले पैसे माझ्या हातावर ठेऊन म्हणायची, “जा आता नीट. याद राख, प्यायचं न्हाई. पिलास तर मला कळंलच पुन्यांदा यीशील तवा. मग ही कुऱ्हाडच घालीन बग तुझ्या टक्कुऱ्यात.” तिची ही आईसारखी माया, खोल मनातून केलेला, काळजीपोटीचा, रांगड्या पण प्रेमाच्या भाषेत केलेला उपदेश ऐकूनच मला उपरती झाली असणार. काय बाई ! काय बाई !! माझ्या आत्म्यालाच हात घातला तिनं ! मग मी मनात ठाम ठरवलं इथून पुढं दारूला हातही लावायचा नाही. आणि…. शेवटच्या दिवशी तुम्ही जायला सांगितलंत ना मालक, तेव्हा आधी मी पार्वतीबाईला भेटलो. पाया पडलो तिच्या. तर माझ्या तोंडावरून हात फिरवून तिनं ‘अला बला’ केली आणि म्हणाली, “जा लेकरा. सम्बाळून ऱ्हा !” कधी विसरणार नाही मी तिला मालक.”

दुसरी घंटा झाली आणि लक्ष्मण निरोप घेऊन नाट्यगृहाच्या प्रवेशदारातून आत गेला. साखरपेकराना भानावर यायला क्षण दोन क्षण जायला लागले. मग तेही आत गेले.

(रंग भरण्यासाठी शेवटच्या संभाषणात मी खूपच स्वातंत्र्य घेतले आहे. मात्र संभाषणाच्या ‘आत्म्याला हात लावला नाही’. तो चेकोव्हला अपेक्षित होता तसाच ठेवला आहे.  अर्थात तरीही म्हणतो, “कॉम्रेड चेकॉव्ह, कृपा करून कुठं असाल तिथून क्षमा करा याबद्दल.”)

(अंतोन चेकॉव्हच्या The Beggar या कथेचे मुक्त मुक्त रूपांतर)

– अनु. मुकुंद कर्णिक 
karnik.mukund@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
कारण की

चारुता सागर : अभिनंदन

चारुता सागर ( २१ नोव्हेंबर १९३० – २९ मे २०११)

राम भट 

१९७१ साली ‘साधना’ दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या श्री. चारुता सागर यांच्या ‘नागीण’ या कथेला त्या सालातली सर्वोत्कृष्ट कथा म्हणून एक हजार रुपयांचे ‘कॅ. गो. गं. लिमये पारितोषिक’ अलीकडे देण्यात आले. त्याबद्दल आम्ही चारुता सागर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. चारुता सागर यांच्यासारख्या मळणगाव या ( जि. सांगली ) खेड्यात वास्तव्य करून राहणा-या लेखकाला हे पारितोषिक मिळावे याचा कुणासही विशेष आनंद होईल.

संथ गतीने का होईना पण गेली १२ -१३ वर्षे ते विविध नियतकालिकातून कथालेखन करीत आहेत. ‘सत्यकथे’त त्यांच्या काही कथा आल्या तेव्हा आपल्या मराठी लेखकांचे चारुता सागर यांच्याकडे प्रथम लक्ष गेले. तथापि त्यांच्याकडे अधिकांचे अधिक लक्ष जाणे आवश्यक आहे, कारण हा लेखक नजिकच्या भविष्यात माथे सैरभैर करणारे असे काहीतरी लिहिणार आहे. त्यांच्या पायांवर भिंगरी आहे आणि वृत्तीत फकिरी आहे. त्यामुळे चार लोकांपेक्षा वेगळे अनुभव त्यांच्या गाठीला आले आहेत. पोटासाठी त्यांनी अनेक व्यवसाय केले आहेत. ते पोलीस होते. लष्करात सैनिक होते. आणि त्याआधी बेवारशी प्रेते पुरून मजुरी मिळवत होते. ( त्याच अनुभवावर त्यांची ‘वर्दी’ ही कथा आहे. )

वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी घर सोडून तीर्थयात्रा करीत भ्रमंती केली. संपूर्ण देश पायाखाली घातला. शरदबाबूंचे संपूर्ण वाङ्मय वाचून पछाडल्याप्रमाणे ते सगळी वंगभूमी पायी भटकले. समरेश बसूंची एक कथा वाचून १९७० साली त्यांना भेटण्यासाठी पुनः बंगालची वारी केली. ‘दर्शन’ कथा लिहिण्यापूर्वी जोगत्यांच्या ताफ्यांतून २०० मैलांवर असलेल्या सौंदतीच्या यल्लमाला पायी गेले. एका पत्रात ते लिहितात, ” वयाच्या सव्वीसाव्या वर्षांपर्यंत धडपडलो. पण सगळे निरर्थक. आता केवळ स्वप्ने पडतात. — कधी धर्मसंस्थापक होऊन गौतमासारखा भटकत राहतो. कधी पंख फुटतात आणि हिमालयाच्या शिखरावरून उडत राहतो … असली ही स्वप्ने सुख देणारी, अस्वस्थ करणारी … आता एक नवा विचार बळावू लागलाय … हे सगळे सोडावे आणि उर्वरित आयुष्य हिमालयात वेचावे … जिथे दिवस तर वेड लावतोच, पण रात्रही वेड लावते. “

चारुता सागर हे टोपण नाव असावे असा समज आहे. पण तो खरा नव्हे. ते त्यांचेच मूळ नाव आहे. चारुता सागर यांनी आजवर तीस बत्तीस कथा लिहिल्या आहेत. अजून त्यांचा संग्रह प्रसिद्ध झालेला नाही. पण कुणा चांगल्या प्रकाशकाने हे मनावर घेतले पाहिजे. एका पत्रात ते म्हणतात, ” आपण कदाचित गेलोच तर कुणालाही अक्षरगंध नसलेल्या माझ्या घरात कथेचीही कात्रणे केरात जाणार. असो. चिरंतन तरी काय आहे म्हणा !”

@@@
– राम भट 
( ‘ललित‘ मार्च १९७५ अंकावरून साभार )
छायाचित्र आंतरजालावरून साभार )
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
अशा गंमती – अशा गोष्टी 

शं. ना. नवरे

(५) माशी आणि तोफ 

उमेदवारीच्या काळात प्रा. स. गं. मालशे प्र. के. अत्र्यांकडे सहज बसले असताना कोणी विद्यार्थी अत्र्यांकडे आले.

“अत्रेसाहेब, आम्ही आपल्याला उदघाटक म्हणून आमंत्रण करायला आलो आहोत.”

अत्र्यांनी तोंडावरून हात फिरवला आणि  विचारले, ” आम्ही कसलं उदघाटन करायचं ?”

“आमच्या हस्तलिखित मासिकाचा पहिला अंक प्रकाशित करणार आहोत, त्यासाठी –“

 अत्र्यांनी एकदम म्हटलं, ” माशी मारायला तोफ कशाला ? माझ्याऐवजी यांना घेऊन जा. तुमचं काम होईल.”

— प्रा. मालशांच्या अध्यक्षीय उमेदवारीला सुरुवात झाली.

– शं. ना. नवरे 

(‘ललित’ जानेवारी १९६७ वरून साभार )

@@@

शंकर नारायण नवरे ऊर्फ ‘शन्ना’ म्हणजे कथा, कादंबऱ्या, नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील एक अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे लेखक. २१ नोव्हेंबर १९२७ हा शन्नांचा जन्मदिन आहे. शन्नांना मनःपूर्वक आदरांजली.    

अंगण

दीपावली २०१८ विशेष 

सहज सांगावंसं वाटलं (३)

 

प्रकाश पेठे 

     आमच्या आजोळच्या गावी आमचं कौतुक व्हायचं. आम्ही मुंबईकर होतो म्हणून आणि आम्हाला मामाच्या घराचं अप्रूप होतं ते त्याचं स्वतःचं घर होतं म्हणून. रंग, गंध आणि स्पर्श ह्या जाणीवा जागृत करणारं मामाचं मोठं पण अगदी साधं घर आम्हाला स्वप्नमहालच वाटायचा. ज्याचं स्वतःचं घर असेल तोच श्रीमंत अशी आमची समजूत होती. कारण आमचं लहानपण भाड्याच्याच घरात गेलं होतं.

     मामाच्या घराच्या बाहेरच्या भिंती विटांच्या पण मधल्या भिंती शेणमातीने लिंपलेल्या कुडाच्या होत्या. सारवलेल्या मातीची जमीन होती.  बांबू पसरून मातीच्या गा-याने भरलेली माडी होती. आणि स्वयंपाकघरात चुनेगच्ची. गच्चीत धुराडं होतं. तेथून स्वयंपाक करीत असलेल्या आजीशी गप्पा मारता यायच्या. घरात मातीच्या चुलीची “रेंज ” होती. सलग तीन चुलींपैकी मधल्या चुलीत सरपण टाकून जाळ केला की तिन्ही चुलींतून एकाच वेळी जाळ येई. एकीवर आंघोळीचं पाणी, दुसरीवर दूध आणि तिसरीवर डाळ शिजत असे.

     पुढं अंगण मागं अंगण. मागल्या अंगणी तुळशी वृंदावन आणि दगडाची चिरेबंदी विहीर. दोन्ही अंगणात कोप-यात झाडं. प्राजक्त, चाफा, तगर, कण्हेर, शेवगा, आवळा असा गोतावळा. पुढच्या अंगणात आई किंवा आजी रोज शेणसडा करीत. तो वाळला की रांगोळी रेखली जाई. रोज सकाळी आई शेणाची पिशवी घेऊन शेण आणायला पिटाळी. गाई म्हशींच्या मागे धावायला लागे. मागीलदारी दूर संडास होते त्यात टोपलीऐवजी पत्र्याचे डबे होते. लहान मुलांना त्या संडासात जायला भीती वाटे. कारण खालून डुकरं डोकवायची . म्हणून अगदी लहान मुलांची नालीवर रांग लागे.

     जेवणघरातच देवघर होतं. इतके देव होते की त्यांना स्नान, गंध. अक्षता, फुलं वाहता वाहता अर्धा तास निघून जायचा. आल्या गेलेल्याना बसायला पाट दिला जायचा. रोज सकाळी बेल घालणारी बाई यायची. ती ओटीवर फतकल मारून बसायची. तिच्या गप्पाच फार. सगळ्या गावच्या उठाठेवी. आम्ही आजोळी जाऊन पोचलो की लगेच दुस-या दिवशी सगळ्या आळीत बातमी पोचवायची.

     संध्याकाळ झाली की चिमण्या, कंदील यांच्या काचा रांगोळीने साफ करायला लागायच्या. तो सगळा जामानिमा घेऊन आम्ही अंगणातच बसायचो. भुत्यांच्या वाती उंच करून त्यात घासलेट भरणं कंदील लावणं अशी कामं करायला फार मजा यायची. घरात वीज नव्हती. त्यामुळे अंधार व्हायच्या आत जेवणं उरकायला लागायची. उशीर झालाच तर आम्हा मुंबईकरांच्या ताटापुढे कौतुकाने चिमणी ठेवली जायची. प्रत्येकाच्या सावल्या भिंतीवर पडायच्या. त्यातून भुताच्या गोष्टी निघाल्या की त्या सावल्यांच्या संगतीत थरारक वाटायच्या.

     माडीवर जायला जेमतेम दोन फुटी बिनकठड्याचा जिना होता. पण कधी कोणी जिन्यावरनं पडलं नाही. माडीवर गाद्या ठेवायला घडवंची होती. उन्हाळ्यात गच्चीमध्ये दहा पंधरा गाद्या  रांगेनं पसरल्या जात. दिवसभर अंगणात हुंदडून गादीवर पाठ टेकली की वरती लख्ख आकाश दिसे. इकडे सप्तर्षी, तिकडे ध्रुवतारा, व्याध, मंगळ  असे ग्रहतारे मोजता मोजता झोप लागायची.

     इकडं मुंबईतल्या उपनगरात आमचं बि-हाड. अतिप्राचीन गाव. गावात वाडेच वाडे. दरेक वाड्यात बरीच बि-हाडं. काही सोबतीसाठी, काही ओळखी नात्याची तर काही तेवढीच मिळकत म्हणून ठेवलेली. सर्व वाड्यांना पुढे मागे अंगण. चहूबाजूंनी कोट. वाड्यांची अंगणं म्हणजे घरांचाच एक भाग. लग्न, मुंजी, डोहाळजेवणं, मंगळागौरी, चैत्रगौर, चांदण्यातल्या जेवणावळी, क्रिकेट, ठिक-या, लगो-या, छप्पापाणी, भोंडला हे सगळं अंगणातच घडायचं. कोणत्याही कार्यासाठी कार्यालय भाड्यानं घ्यावं लागायचं नाही.

     आमचं बालपण या नाही त्या अंगणातच सरलं. चार मित्रांकडे गेलं तरी हाका मारून अंगणातच भेटीगाठी किंवा खेळ. कोणाच्या घरात जाऊन बसायची जरूर पडत नसे.

     आमचे एक काका मुंबईतल्या एका प्रचंड चार मजली चाळीत राहत. त्यांच्याकडे दोन खोल्या होत्या. घरात फरशी, सिलिंग फॅन, मोरीत नळ, चार बँडचा सुबक रेडियो, टेबल खुर्ची, टेबल फॅन, लोखंडी कपाट असा आम्हाला दृढ परिचयाचा नसलेला पण कौतुकपात्र सरंजाम होता. त्यांच्या जीवनाला मुंबईच्या नीटनेटकेपणाचं वलय होतं. त्यांची राहणी साधी असूनही उंची वाटावी अशी होती. तरी पण दोन दिवसात त्यांच्याकडे कोंडल्यासारखं वाटायचं.

     त्याउलट आमचं घर भर वस्तीत असल्यामुळं सर्व जरुरीच्या गोष्टी जवळ होत्या. पाच मिनिटं चाललं की शाळा, पाच-सात मिनिटं चालायच्या अंतरावर चार-पाच पुरातन मंदिरं होती. मंदिरात वेळोवेळी रसाळ कीर्तनं, प्रवचनं व्हायची. जवळच व्यायामशाळा, पंधरा मिनिटं चाललं म्हणजे सुंदर नदीवर पोचता यायचं. काठावर बसा किंवा सकाळी स्वच्छ पाण्यात डुंबायला, पोहायला जा. आमच्या गावाचं समग्र सांस्कृतिक विश्वच पंधरा -वीस मिनिटांच्या अंतरावर होतं. त्यामुळे संपूर्ण जीवन जगायला मिळण्याचं समाधान होतं.

     वडिलांची पिढी खेड्यापाड्यातून आली आणि पोटापाण्यासाठी कुठल्या कुठल्या मोठ्या गावात किंवा मुबईसारख्या महानगरात भाड्याच्या घरात विरघळली. दैनंदिन झकाझकीत आणि आर्थिक ओढाताणीत त्यांची स्वगृहाची स्वप्नं कापरासारखी उडाली. मुंबईत आमच्या एका दूरच्या नातेवाईकाच्या दोन खोल्यात आई-वडील, दोन मुलं, आजी-आजोबा, आणि एक आत्या अशी सात माणसं राहत.

     तरुणपणी मुंबईचा घट्ट परिचय झाला. कारण आम्ही जे. जे. स्कुलमध्ये शिकत होतो. तिथे वाचनालयात पुस्तकं चाळता चाळता हेनरी वॅन द वेल्दे या युरोपियन चित्रकार चिंतकाचं एक वाक्य मनात घुमत राहिलं. त्यानं लिहिलं होतं की माणसंसुद्धा गाई म्हशींसारखी सोशिक असतात. गाई-म्हशींना तुम्ही कोणत्याही प्रकारच्या गोठ्यात ठेवा, त्या कधी तक्रार करतात ?

     पुढे आम्ही शिक्षण झाल्यावर मुंबई सोडली. चार मित्र एका लहानशा खोलीत राहायचो. ना अंगण ना गच्ची. आमचे आईवडील पारतंत्र्याच्या कठीण काळात वाढले. पण आमच्या पिढीला स्वातंत्र्यकाळाचा पाठिंबा होता. शिक्षितांना नवी नवी क्षेत्रं  उपलब्ध्द होत होती. त्याचबरोबर मनात स्वतःच्या विकासाबरोबर देशविकासाची स्वप्नंच फुललेली असायची. एका खोलीत राहणा-या त्या चार जिवांचा जीव स्वतःच्या आणि कार्यक्षेत्राच्या विकासामागे धावत होता. ह्या धावपळीत तारुण्य केव्हाच उलटून गेलं तरी स्वतःचं घर कसं असावं याचा विचार प्रत्यक्षात आणायला कधी निवांतपणाच मिळाला नाही.

     मात्र डोळ्यांसमोर पुढे मागे अंगण, माडी, गच्ची, फुलझाडं यांशिवाय घर म्हणजे घर नव्हे या प्रतिमांनी मनात घर केलेलं दिसलं. त्याच्या सोबतीला हेनरी वॅन द  वेल्देची पुरवणी होतीच. परवा सातासमुद्रापलीकडून बालमित्र घरी आला. त्याच्याभोवती गोळा होऊन आम्ही अपार उत्सुकतेनं विचारलेलं, तुमचं लंडनमधलं घर कसं आहे. तो म्हणाला, ” पुढे मागे मोठं अंगण, मध्ये टुमदार घर आणि वर कौलारू माडी,” आम्हा सर्वांच्याच डोळ्यांत या समाधानाचा सागर ओसंडला …

प्रकाश पेठे 
( चित्र व लेख : ‘महाराष्ट्र टाइम्स’ २५ एप्रिल १९९३ च्या अंकावरून साभार )
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

 

कवितात्रयी  
मुकुंद कर्णिक 

३.

मी असावे, तूं असावे

मी असावे, तू असावे, मंदसा वारा असावा

मल्मली मेघापलिकडे चंद्र थोडासा दिसावा

धुंद रात्रीची खुमारी गारव्याने वाढवावी
रातराणीच्या सुवासाने हवा भारून जावी

कुठुनसा सारंगिचा हळुवार तरळत सूर यावा

रेशमी हे केस माझे मी तुझ्यावर पांघरावे
अर्धमिटल्या पापण्यांना चुंबुनी हलकेच घ्यावे

या खुळ्या प्रीतीस माझ्या कुंज जाईचा हसावा

बांधुनी घ्यावेस मजला तू तुझ्या दोन्ही करांनी
भान आणावे अखेरी गायनाने पाखरांनी
रंग नारंगी उषेचा कळत नकळत जाणवावा

मी असावे, तू असावे, मंदसा वारा असावा

@@@
मुकुंद कर्णिक
karnik.mukund@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

 

कारण की … !
 

‘महाराष्ट्र सारस्वतकार’ वि. ल. भावे  

‘महाराष्ट्र सारस्वतकार’  या पदवीने सर्वश्रुत असलेले जुन्या पिढीतले संशोधक आणि ग्रंथकार विनायक लक्ष्मण भावे ( जन्म : ६ नोव्हेंबर १८७१, पळस्पे या गावी, कुलाबा – निधन १२ सप्टेंबर १९२६, पुणे)

कै. वि. ल. भावे यांच्या जीवनाकडे पाहिले म्हणजे छंदिष्टपणा, वेड; यातूनच बरेचसे कार्य होत असते हे लक्षात येते. विल्सन कॉलेजात शिकत असताना त्यांनी मराठी वाङ्मयाचा ९८ पानी  इतिहास लिहिला आणि तो प्रो. वि. गो. विजापूरकर यांच्या ‘ग्रंथमाला’ मासिकात प्रसिद्ध केला. त्याच निबंधाची मोठी ६७० पानांची आवृत्ती ‘महाराष्ट्र सारस्वत’ १९१९ साली प्रसिद्ध झाली. ते या एका ग्रंथाने विशेष प्रसिद्ध झाले असले तरी आपल्या ‘महाराष्ट्र कवी’ या मासिकातून ( सुमारे २५०० पृष्ठांतून ) नागेश, दासोपंत वगैरे मातबर जुन्या कवींची अप्रकाशित कविता त्यांनी प्रकाशात आणली. मराठी दप्तरे प्रसिद्ध केली. शिवाजीमहाराजांवर मौलिक प्रबंध लिहिले. नेपोलियनचे चरित्र लिहिले. ( त्यांच्या मते शिवाजी आणि नेपोलियन हेच खरे आदर्श वीरपुरुष !) सर्वांनी नादान ठरवलेला शेवटला बाजीराव याच्याबद्दल भाव्यांना खूप आपुलकी होती आणि ती आपुलकी स्पष्ट करणारा लेखही  त्यांनी लिहिला होता. ( आणि वादळ उठवले होते. ) फलज्योतिष्यावरही त्यांनी लेखन केले होते. विविधरंगी पाखरे पाहणे आणि पाळणे हाही त्यांचा एक छंद होता.

ठाणे येथे त्यांची हयात गेली. तेथे वडिलोपार्जित मिठागराचा धंदा करून त्यांनी पैसाही कमावला. पण अधिक वेळ आणि पैसा खर्च केला तो आपले छंद पुरवण्यात !

इ.स. १८८७ मध्ये मॅट्रिकच्या वर्गात असलेल्या विनायकला त्यांच्या वकील असलेल्या वडिलांनी इतिहासाचे पुस्तक विकत आणून दिले नाही. इतिहासाच्या पुस्तकाला महाग झालेल्या या मुलाने वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी, १ जून १८९३ रोजी या ग्रंथालयाची निर्मिती केली. ठाणे  येथील मराठी ग्रंथसंग्रहालय स्थापन करण्यापासून तो ते नावारूपाला आणण्यापर्यंत त्यांचा पुढाकार होता. (पुस्तकांची कपाटे खांद्यावरून वाहण्यापर्यंतही ).

वर्गण्या गोळा करायला येणा-या धंदेवाईक कार्यकर्त्यांना ते हाकलून लावीत. पण किरकोळ रकमेची अपेक्षा धरून महर्षी कर्वे जेव्हा दारी आले तेव्हा त्यांनी कर्व्यांना  पन्नास हजार रुपये देऊन थक्क केले.

पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाच्या ग्रंथालयातले एक पुस्तक त्यांना संदर्भासाठी हवे होते; पण मंडळाच्या कार्यवाहाने कपाटाच्या किल्ल्या नाहीत असे सांगताच त्यांनी दगड आणून कुलूप फोडले आणि हवा असलेला संदर्भग्रंथ बाहेर काढला. असले त्यांचे विक्षिप्त व्यक्तिमत्त्व ! असलीच माणसे मोठमोठी कामे पार पाडतात  व आदर्श निर्माण करतात.

@@@

नारायण हरि आपटे 

जुन्या पिढीतील नामवंत कादंबरीकार नारायण हरि उर्फ नानासाहेब आपटे ( जन्म : ११ जुलै ११८८९, समडोळी, सातारा – निधन १५ नोव्हेंबर १९७१ कोरेगाव, सातारा ) म्हणजे मामा वरेरकरांच्या नंतर जवळजवळ ५५-६० वर्षे सातत्याने ललित लेखन करणारे मराठीतले दुसरे साहित्यिक होत. हे साहित्यिक होण्याची स्वप्ने रंगवीत होते तेव्हा हरिभाऊ आपटे आणि राम गणेश गडकरी वैभवाने तळपत होते.

इंग्रजी चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यावर वयाच्या पंधराव्या वर्षी, १९०४ साली ते घरातून पळून गेले आणि जवळजवळ वर्षभर हिंदुस्थानभर वणवण फिरले. १९०६ मध्ये हरिभाऊ आपट्यांच्या ‘करमणूक’ पत्रात त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. ‘अजिंक्य तारा’ ही त्यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली (१९०९) तेव्हा ते फक्त वीस वर्षांचे होते. ‘सुखाचा मूलमंत्र’ या कादंबरीने एकेकाळी महाराष्ट्राला झपाटून टाकले होते. ‘पहाटेपूर्वीचा काळोख’, ‘एकटी’, न पटणारी गोष्ट’ अशा त्यांच्या कितीतरी कादंब-या त्या काळी खूप गाजल्या आणि त्यांचे नाव घरोघरी गेले. ‘न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर प्रभात कंपनीने ‘कुंकू’ हा चित्रपट काढला. त्यांच्या आणखी अनेक कादंब-यांवर चित्रपट निघाले पण ‘कुंकू’ चित्रपटाला आता ३५ वर्षे झाली असली तरी तो अजूनही पहावासा वाटतो. विशेष म्हणजे त्या चित्रपटाची पटकथा आणि संवाद मोठ्या प्रमाणावर आपट्यांनी स्वतः लिहिले होते. ( त्यांच्या कादंब-यांवर ‘राजा हमीर’, ‘सावकारी पाश’, आणि  ‘गंगावतरण’  हे तीन मूकपटसुद्धा निघाले होते. )

काही काळ ते ‘किर्लोस्कर’ मासिकाचे सहसंपादक होते. परंतु त्या वेळी किंवा त्यानंतर त्यांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी ( भाषणे, मुलाखती, छायाचित्रे वगैरे ) जरासुद्धा प्रयत्न केले नाहीत. त्यापासून ते अलिप्तच राहिले. तो त्यांचा स्वभावविशेष असेल किंवा त्यांनी खेड्यात आयुष्य घालवले हेही कारण असेल. परंतु अलिप्त राहणे हाच त्यांचा स्वभाव असावा. कारण कोरेगावीसुद्धा त्यांचे छोटे घर गावाबाहेरच टोकाला होते. गावाबाहेर राहणारे तेच पहिले कुटुंब ! त्यांना कधी अध्यक्षपदे  मिळाली नाहीत. मानसन्मान झाले नाहीत. त्यांच्या वयाची ८० वर्षे पूर्ण झाली तेव्हा त्यांचे प्रकाशक हिंदुस्थान साहित्याचे श्री. ह. वि. दात्ये यांच्या पुढाकाराने त्यांचा पुण्यात सत्कार झाला. तोच जवळजवळ पहिला आणि शेवटचा ! तरी सुद्धा “माझ्या लायकीपेक्षा मला जास्त प्रसिद्धी व मान सन्मान मिळाला. मी कृतज्ञ आहे !” असे ते म्हणाले. त्यावरून त्यांच्या संतुष्ट मनाची कल्पना येते. ‘तुमच्या कादंब-यांचा नेहमी आनंद पर्यवसायी शेवट का असतो?’ या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले, ‘ माझी पात्रे  ही मी माझी मुलंच समजतो. त्यांना दुःखी असलेलं  बघवत नाही. ‘

‘आपण लेखक का केले’ हे सांगताना त्यांनी म्हटले, ‘ देशाला स्वातंत्र्य हवे याची मला तळमळ होती. त्यासाठी तरुणांची मने आणि मनगटे मजबूत हवीत.  म्हणून त्यांची ध्येयनिष्ठा व शरीर सामर्थ्य वाढण्याला प्रवृत्त करणारे साहित्य मी लिहिले. या त्यांच्या दोन्ही उद्गारांवरून साहित्यनिर्मिती आणि साहित्याकडे पाहण्याची दृष्टी या दोन्हीवरही खूप प्रकाश पडतो.

@@@

कॅप्टन गो. गं. लिमये     

 कॅप्टन गोपाळ गंगाधर लिमये ( जन्म : २५ सप्टेंबर १८९१, निधन : १८ नोव्हेंबर १९७१ ) यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एका विनोदकाराचा आणि कथालेखकाचा अस्त झाला. गेल्याच वर्षी त्यांनी वयाच्या ८० व्य वर्षात पदार्पण केले तेव्हा त्यांचा पुण्यात भव्य सत्कार झाला होता आणि त्या निमित्ताने त्यांच्या उत्कृष्ट निवडक कथांचा संग्रह ( पॉप्युलर प्रकाशन ) प्रसिद्ध झाला होता. मराठी कथेचे एक निष्ठावंत संशोधक राम कोलारकर यांनी हा संग्रह संपादित केला आहे. वेळप्रसंगी काही तरी बोलावे किंवा लिहावे म्हणून नव्हे, तर संशोधनाचा एक निष्कर्ष म्हणून कोलारकरांनी असे म्हटले आहे की कॅ. लिमये हे आधुनिक मराठी कथेचे जनक होते. त्यांच्या मते भावरंजन, इच्छारंजन, बोधवाद, शाब्दिकता यांची लिमयांनी कथेतून हकालपट्टी केली आणि मराठी कथेची भाषा जीवनाच्या जवळ आणली.

१९१६ मध्ये मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून ते डॉक्टर झाले आणि १९१८ ते १९२१ या दरम्यान त्यांनी पूर्व आफ्रिका आणि इराक येथे सैन्यात कॅप्टन म्हणून काम केले. काही काळ ते मुंबई नगरपालिकेत डॉक्टर म्हणून काम करीत होते. चित्रकला, फोटोग्राफी, बेबी सिनेमा, तंतुवाद्य वादन हेही त्यांचे छंद होते.

१९१२ मध्ये त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली हे खरे असले तरी सैन्यातून परत आल्यावर १९२२ ते १९३८ या काळातच त्यांनी खरे लेखन केले. विनोद, कथा, रूपांतरित नाटके वगैरे मिळून त्यांचे सव्वीस ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांनी औषधे व आरोग्य याहीवर दहाबारा पुस्तके लिहिली आहेत.

कॅ. लिमये हे विनोदी लेखक चिं. वि. जोशी यांचे मामा. हे दोघेही मामा-भाचे ‘तलवार’ या नावाने हस्तलिखित मासिक चालवीत. विनोदी लेखनात भाच्याइतके मामांचे नाव झाले नाही हे खरे असले तरी मराठी कथेला वेगळे वळण देण्याचा मान गोपूमामांनी मिळवला. शिवाय विनोदकार म्हणून स्थान मिळवले! ( ट्रॅमची वाट पाहाण्यावर कॅ. लिमये लिहितात – ‘ ट्रॅम येईपर्यंत भाड्यासाठी म्हणून बरोबर आणलेली आणेली खिशात लोळत पडू देण्यापेक्षा व्याजबट्ट्यात गुंतवलेली बरी !’)

आधुनिक मराठी कथेचे जनक म्हणून कॅ. लिमये यांच्या नवे दरवर्षी एका उत्कृष्ट कथेला एक हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. वर्षातील ती उत्कृष्ट कथा आणि त्या कथेच्या जवळपास उभ्या राहणा-या कथा यांचा एक संग्रहही दरवर्षी प्रसिद्ध होणार आहे. कॅ. लिमये यांचे जामात श्री. चिंतामणी लाटकर ( कल्पना मुद्रणालय ) आणि कथा संशोधक श्री. राम कोलारकर यांच्या पुढाकाराने आणि इतर काही साहित्यिक व प्रकाशक यांच्या सहकार्याने ही योजना सुरू झाली आहे.

लेखक – अज्ञात
(‘ललित‘ डिसेंबर १९७१ मधून साभार )

  

     

नेमाडे – एक सोक्षमोक्ष !

दीपावली २०१८ विशेष 
 
हर्षद सरपोतदार 
पार्श्वभूमी 
 
 

     १३ जानेवारी २००२ च्या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या रविवार पुरवणीत ‘नेमाडे आणि त्यांचा वैचारिक गोंधळ’ या शीर्षकाने मी एक लेख लिहिला होता. या लेखाला दुजोरा देणारा, कथाकार पंकज कुरुलकर यांचा लेख पुढल्या शुक्रवारी प्रसिद्ध झाला आणि पत्रेही बरीच आली. याला पार्श्वभूमी होती ती नेमाड्यांनी ‘महाराष्ट्र फाउंडेशन’चा दोन लाखांचा पुरस्कार स्वीकारताना केलेलं भोंगळ नि असंबद्ध भाषण.

     पुढे २०१२ साली फेसबुकच्या एका साहित्यिक ग्रुपवर मी नेमाड्यांविषयी एक विस्तृत लेख लिहिला. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला.

     हा लेख लिहिला तोपर्यंत नेमाड्यांची ‘हिंदू’ कादंबरी प्रसिद्ध झाली नव्हती व त्यांना ज्ञानपीठही मिळालं नव्हतं. ‘हिंदू’ कादंबरीत हिंदू धर्माबरोबरच कुसुमाग्रज, अनंत भालेराव वगैरे मराठी साहित्यविश्वातील अग्रेसर लेखक-कवींवर नेमाड्यांनी जो शेणसडा ओतला त्यामुळे नेमाड्यांचे चाहतेही त्यांच्यावर नाराज झाले.

     पण गंमत अशी, की अनेक साहित्यिकांना हीन पातळीवरून नांवे ठेवणारं ‘टीकास्वयंवर’ हे नेमाड्यांचं पुस्तक ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार मिळवून गेलं, तर ‘हिंदू’ कादंबरीत त्यांनी शेणसडा ओतल्यावर त्यांना ‘ज्ञानपीठ’ मिळालं.

     यामुळे ‘साहित्य अकादमी’ आणि ‘ज्ञानपीठ’ यांच्या निवड समितीच्या पात्रतेविषयी आणि हेतूंविषयी जशी शंका येते, तशीच नेमाड्यांच्या लटपटेपणाविषयीही खात्री पटते. थोर संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे किंवा निर्भीड कन्नड कादंबरीकार डॉ. एस. एल. भैरप्पा यांना ‘ज्ञानपीठ’ मिळत नाही आणि नेमाड्यांना ते मिळून जातं यातच आपल्या एकूण सांस्कृतिक शोकांतिकेचं रहस्य सामावलेलं आहे.

     इथे एक गोष्ट स्पष्ट करतो. काही बाबतीत नेमाड्यांशी मीही सहमत आहे. उदा. फडके-खांडेकर मला स्वतःलाही वाचवत नाहीत. त्यांच्या मर्यादाही मी दाखवू शकेन. मात्र त्यांचा अधिक्षेप मी कधीही करणार नाही. कुठलाच कृतज्ञ मराठी साहित्यिक व टीकाकार हे करणार नाही. पण नेमाडे तो करतात तेव्हा त्यांची पात्रता काय ? निष्ठा काय ? श्रद्धा काय ? हे मुद्दे उपस्थित होतात.

     २०१२ साली प्रसिद्ध झालेला खालील लेख मुख्यतः ‘टीकास्वयंवर’ या पुस्तकाविषयी असला, तरी नेमाडे यांचं व्यक्तित्वही त्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवात नेमाड्यांच्या मुक्ताफळांपासूनच करू.

अ) नेमाडे यांची मुक्ताफळे 

‘टीका स्वयंवर’ या कुप्रसिद्ध पुस्तकात भालचंद्र नेमाडे यांनी कुणाविषयी काय मुक्ताफळे उधळली आहेत ती आधी देतो.

१) कालिदासाचे मेघदूत – दुय्यम कलाकृती (पृष्ठ २५१)
२) टेनिसन, ब्राउनिंग, इलियट, बेकेट – दुय्यम दर्जाचे साहित्यिक (पृ. ११५)
३) शि. म. परांजपे – मराठी नीट न येणारा माणूस (पृ. २४८)
४) पु. शि. रेगे – अपरिपक्व कादंबरीकार (पृ. २२८)
५) खांडेकर, फडके, माडखोलकर, गाडगीळ, भावे, रेगे, खानोलकर, जोगळेकर – लैंगिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने बुभुक्षित (पृ. २५५)
६) इंदिरा संत – क्षीण आशयाच्या कविता लिहिणारी कवयित्री  (पृ. १५२)
७) पद्मा गोळे – शब्दभांडार उबवित राहणारी कवयित्री (पृ. १३३)
८) पुन्हा फडके, खांडेकर, माडखोलकर – क्षुद्र लेखक, कवी (पृ. ८७)
९) आचार्य अत्रे – (कायम ‘प्रल्हाद अत्रे’ असा तुच्छतेने केलेला उल्लेख) (पृ. ४०, १२२, २५६)
१०) श्री. के. क्षीरसागर – मास्तरकी, भुंकणारी शैली, अर्ध्या हळकुंडाने पिवळे, लटपटपंची, अपुरे ज्ञान, घमेंडखोर इ. (पृ. १६, २३, २६,
     २८, २९, ३१)
११) ग. दि. माडगुळकर व सरोजिनी बाबर – निकृष्ट दर्जाचे लेखक (पृ. ३७)
१२) नरहर कुरुंदकर – पोरकट लेखक (पृ. ३९)
१३) दिलीप चित्रे – धन्देबाजी करणारे, काडीचाही व्यासंग नाही, अडाणी, मराठीचा नीट अभ्यास नाही (पृ. ३९)
१४) अरुण कोलटकर – सांस्कृतिक क्षुद्र वृत्ती (पृ. ८३)
१५) बोरकर, बापट, अनिल, पाडगांवकर, आरती प्रभू – रविकिरण मंडळाची हास्यास्पद परंपरा सांभाळणारे कवी (पृ. ९२)
१६) पु. ल. देशपांडे – आधुनिकीकरणाला सुप्त विरोध (पृ. ९८)
१७) विजय तेंडूलकर – आधुनिकीकरणाला ‘सुपर फॅशन’ म्हणून कवटाळणारे  (पृ. ९८)
१८) चोखामेळा, ग्रेस – बावळट साहित्यिक (पृ. १८०)
१९) रेगे, खानोलकर, दळवी – अडाणी लेखक (पृ. २६६)
२०) ‘तुझे आहे तुजपाशी’ – आपली वाङ्मयीन संस्कृती किती खालच्या दर्जाची आहे हे या नाटकावरून लक्षात येते (पृ. ३४१)
२१) एकूण समीक्षक – धंदेवाईक बदमाष. वास्तववादी समीक्षेची आपल्याकडे परंपराच नाही.  (पृ. ३७३, १७६, ३४२)
२२) एकूण साहित्यिक – गिधाडे (पृ. ४२)

अशातऱ्हेने तमाम मराठी साहित्यिक आणि समीक्षकांचा नेमाडे नांवाच्या अतृप्त आत्म्याने अक्षम्य असा अधिक्षेप केला आहे.

ब) नेमाडे यांच्या विचारांमधील निवडक विसंगती 

आता नेमाडे यांचा वैचारिक गोंधळ सिद्ध करणाऱ्या त्यांच्या लेखनातल्या आणि मुलाखतींमधल्या निवडक दहा विसंगती सादर करतो.

१) क्षीरसागर यांना मराठी शब्दाला पुढे कंसात इंग्रजी प्रतिशब्द देण्याची सवय होती. उदा. सिनिक (cynic), ज्ञेयाच्या (object), सर्वसामान्य (standard) इत्यादी.  त्याला अनुलक्षून ‘प्रस्तुत टीकाकार आम्हांस हसवितात’ असं हेटाळणीच्या सुरात नेमाड्यांनी ‘टीकास्वयंवर’ या टुकार ग्रंथात म्ह्टलं आहे. (पृ. २३)

प्रत्यक्षात नेमाडे हेच करतात. कानून (canons), स्वदेशीवाद (nativism), स्वदेशीवादी (nativistic), निर्मित वस्तू (end product), निर्मिणारी (creative), उतरंड (filtration), अधिकार (authority), ग्रंथहक्क (copyright) असले ‘क्षुल्लक इंग्रजी शब्द’ कंसात वारंवार देऊन नेमाडेही आम्हाला खदाखदा हसवतात. (पहा : पृ. २४१, २४२, २४४, २४६, २४७ वगैरे)

२) ‘क्षीरसागर यांची बुद्धी तरुण होती तेव्हा त्यांच्यावर ज्यांचा प्रभाव पडला, तोच पुढे कायम राहिला’ अशी टीका नेमाडे करतात. (पृ. २९) स्वतः नेमाड्यांचंही असंच आहे. बालकवी, चंद्रशेखर, शिरुरकर, तुकाराम, सानेगुरुजी यांचा बालवयात त्यांच्यावर प्रभाव पडला आणि तेच त्यांचे कायमचे आवडते बनून गेले याची कबुली त्यांनी दिली आहे. (पृ. ३३७, ३३९, ३४०, ३४१)

३) ‘फडतूस ब्राह्मण साहित्यिकांचं उगीचच कौतुक होतं. वस्तुतः आज महार-मांगांचीच भाषा खऱ्या अर्थाने सतेज आहे’ (पृ. ३४४) असा निर्वाळा देणारे नेमाडे चांगल्या भाषेची उदाहरणे देताना मात्र गोडसे भटजी, लोकहितवादी, लक्ष्मीबाई टिळक, साने गुरुजी, चिं. वि. जोशी, माडगुळकर, भाऊ पाध्ये इत्यादी बहुतांशी ब्राह्मण लेखकांच्या भाषेचाच दाखला देतात. (पृ. ३४४)

४) ग्रेस यांना ‘बावळट साहित्यिक’ (टी.स्व. पृ. १८०) अशी शिवी हासडणाऱ्या नेमाड्यांनी ‘मला त्यांची कविता कळत नाही’ असं केशव सद्रे यांना दिलेल्या मुलाखतीत कबूल केलं आहे. (पहा : ‘नेमाडे यांचे साहित्य : एक अन्वयार्थ’ प्रा. केशव सद्रे पृ. १५९)

५) ‘जीए यांना ज्ञानपीठ मिळायला हवे’ (टी.स्व. पृ. ३८३) असं म्हणणारे नेमाडे सद्रे यांना दिलेल्या उपरोल्लेखित मुलाखतीत ‘जीएंच्या कथा समजत नाहीत. लहान मुलांसाठी म्हणूनसुद्धा त्या सकस नाहीत. जीए हे गोंधळून गेलेले आहेत. त्यांना काय सांगायचंय, काय नाही, हे कळत नाही.’ असं म्हणून मोकळे होतात. (सद्रे पृ. १५९) शिवाय ‘लघुकथा हा निव्वळ मासिकं चालवणारा क्षुद्र वाङ्मयप्रकार आहे.’ असं सांगायलाही ते कमी करत नाहीत. (टी.स्व. पृ. २५२, ३४१ व सद्रे पृ. १५९)

६) दळवी यांना ‘लैंगिकतेचे व्यापारी’, ‘लैंगिकता तंत्र म्हणून टिकविणारे’ (टी.स्व. पृ. २६५), अडाणी (पृ. २६६), ‘रीतीनिष्ठ लैंगिकतेकडे झुकलेले’  (पृ. २७८) अशा शेलक्या शिव्या घालून झाल्यावर ‘दळवी हे ‘ज्ञानपीठपात्र’ असल्याचं सर्वश्री मुळी, विसपुते आणि पाटील यांना दिलेल्या मुलाखतीत नेमाडे सांगून टाकतात. (पृ. ३८४)

७) ‘फडके-खांडेकर हे स्वतः ला ‘युगप्रवर्तक’ म्हणवणारे लेखक प्रत्यक्षात ‘थिटे’ आहेत. ते टिकणार नाहीत. (टी.स्व. पृ. ३३) उलट नवी नैतिकता आपल्या कादंब-यांमधून मांडणारे मनोहर तल्हार, मनोहर शहाणे, ए.वि.जोशी, किरण नगरकर, अनंत कदम, दीनानाथ मनोहर इत्यादी लेखक ‘थोर’ असल्या’चं नेमाडे सुचवतात. (टी. स्व. पृ. २७८)

प्रत्यक्षात फडके-खांडेकर अजून तरी टिकले आहेत आणि हे तथाकथित ‘थोर’ लेखक आज कुणाला माहीत नाहीत ही परिस्थिती आहे.

८) केशव सद्रे यांना दिलेल्या मुलाखतीत नेमाडे सुचवतात की ‘कविता ही सर्व साहित्य प्रकारात केंद्रीय असते. कारण अबोध मनाच्या भाषेच्या अंतस्तराखालीच कवितेच्या ध्वनीस्तरांचाही उगम होत असतो. त्यामुळे कवितेत माणूस जास्तीत जास्त प्रामाणिक असतो.’ (सद्रे पृ. ६९ व ७०) हेच नेमाडे पुढे म्हणतात, ‘बऱ्याचदा माणूस कवितेत इमोशनल होऊन खोटे बोलू शकतो.’ (सद्रे पृ. १४९)

९) ‘ऐतिहासिक सत्याचे विकृतीकरण करणारी कादंबरी’ म्हणून नेमाडे ‘स्वामी’ या कादंबरीचं उदाहरण देतात. (टी.स्व. २१४) मग ‘१९६० सालानंतर दरवर्षी एकतरी चांगली कादंबरी येऊ लागली आहे’ असं  म्हणून ‘स्वामी’चा उल्लेख करतात. (पृ. २४९) आणि परत २६० व २६१ या पृष्ठांवर ‘कर्तुत्वशून्य पिढीच्या अपेक्षा पूर्ण करणारी कादंबरी’ म्हणून ‘स्वामी’वर उपरोधिक टीका करून जातात.

१०) दिलीप चित्रे आणि अरुण कोलटकर यांना वर लिहिल्याप्रमाणे साहित्यदृष्ट्या क्षुद्र, अडाणी, अव्यासंगी वगैरे कित्येक शिव्या घालून झाल्यावर स्वतःच्या ‘मोजक्या आवडत्या’ कवींमध्ये नेमाडे या दोघांचा समावेश करतात. (टी.स्व. पृ. ३४१)

क) नेमाडे यांच्या आचारांमधील निवडक विसंगती

१) ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि त्याचे तत्कालीन संपादक गोविंद तळवलकर  यांच्यावर नेमाड्यांनी सडकून टीका केली आहे. 

‘निर्बुद्ध, अडाणीपणामुळे येणारी मग्रुरी, प्रसिद्धीच्या सत्तेचा मद, जातीय प्रवृत्ती, सत्यविपर्यास करणारे’ इत्यादी विशेषणं त्यांनी त्यांना लावली आहेत. (टी.स्व. पृ. ३५८, ३५९)

पण हेच नेमाडे एकदा अशोक शहाण्यांबरोबर तळवलकर यांना भेटायला गेले होते आणि इंग्लंडमधल्या आपल्या वास्तव्यावर आधारित लेख ‘मटा’ मध्ये छापा म्हणून त्यांना गळ घालत होते. तळवलकर यांनी ते छापले नाहीत म्हणून नेमाड्यांचा हा राग. (पहा : ‘न छापण्याजोग्या गोष्टी’ सुनील कर्णिक पृ. ११८) म्हणजे चिकित्सेपेक्षाही व्यक्तिगत रागलोभ हीच नेमाड्यांच्या टीकेमागची प्रेरणा असते असं म्हणता येईल.

२) दुकानदार आणि साहित्यिक यांची तुलना करताना नेमाडे म्हणतात, ‘खपाऊ नाटके, कादंबऱ्या, विनोद इ. लिहून ‘बँक बॅलन्स’ वाढवणे या गोष्टींमध्ये एक हुकुमी इच्छाशक्ती असते. (टी.स्व. पृ. ३६)

हेच नेमाडे १६ जानेवारी १९९१ रोजी म्हापसा सांस्कृतिक केंद्रात दिलेल्या मुलाखतीत काय म्हणतात बघा.

‘कोसलाएवढ्या तुमच्या बाकीच्या कादंबऱ्या का गाजल्या नाहीत?’ असा प्रश्न मुलाखतकाराने विचारल्यावर नेमाडे उत्तरतात,

‘त्या कादंबऱ्याही दुसऱ्या तिसऱ्या आवृत्तीत असून वर्षाला प्रत्येकीच्या पाचसहाशे प्रती खपत आहेत.’ (पहा : सद्रे पृ. १४९) म्हणजे वाङ्मयीन गुणवत्तेचा संबंध नेमाडेही अखेर ‘खपा’शीच नेऊन जोडतात.

३) नेमाड्यांच्या कादंबऱ्यांचा हा खपसुद्धा संशयास्पद आहे. ‘कोसला’च्या पहिल्या आवृत्तीच्या न खपलेल्या सर्व प्रती २३ ऑक्टोबर १९७० रोजी स्वतः नेमाड्यांनीच प्रकाशक ‘देशमुख आणि कंपनी’कडून विकत घेतल्या होत्या. त्यावेळी देय रकमेमधून बाजारभावाप्रमाणे ३३ टक्के कमिशन वसूल करायला ते विसरले नाहीत. मग देशमुखांनीही नेमाड्यांना पूर्वी दिलेला अ‍ॅडव्हान्स त्यामधून वळता करून घेतला. (पहा : ‘कुरुंदकरांची निवडक पत्रे’,  सं. जया दडकर, पृ. ११३ व २३०)

४) दुसऱ्यांना वाङ्मयीन धंदेबाजी आणि बाजारूपणाबद्दल उपदेशाचे डोस पाजणारे नेमाडे प्रकाशकाकडून अ‍ॅडव्हान्स घेतात, पुस्तकविक्रीचे कमिशन वसूल करतात, ‘महाराष्ट्र फौंडेशन’च्या पुरस्काराचे दोन लाख रुपये खिशात टाकतात नि अशातऱ्हेने स्वतःचा ‘बँक बॅलन्स’ बेलाशक वाढवतात.

५) कुणाची स्तुती करायची म्हटली की नेमाड्यांचा प्राण कंठाशी येतो. टीका स्वयंवर पृ. ४५ वर ते म्हणतात ‘माणदेशी माणसं’ लिहिणारे लेखक ‘नाईलाजाने भोगाव्या लागणाऱ्या दुःखावर मोठे होऊन पुण्यात किंवा मुंबईत सुरक्षित, सुखकर जीवन जगत असतात.’ यावर प्रश्न विचारावासा वाटतो, की खुद्द नेमाडे इंग्लंडात किंवा गोव्यात कसल्या प्रकारचं जीवन जगत होते ? आणि त्यानंतर महाराष्ट्रात प्राध्यापकाचं ‘चिरेबंद’ जीवन ते सुखात जगले  की दुःखात ?

मुलाखतकार नेमका हाच प्रश्न त्यांना विचारतो, तेव्हा ‘आदिलेखक होण्याचं धैर्य माझ्यात नाही.’ असं म्हणून ते स्वतःची सुटका करून घेतात. (टी.स्व. पृ. ३५७, ३५८)

६) उठसूठ दिल्लीला जाऊन पुरस्कार घेऊन येणाऱ्या लेखकांविषयी संताप व्यक्त करणारे नेमाडे (टी.स्व. पृ. ३३) काही वर्षांनंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी किंवा ‘साहित्य अकादमी सदस्य’ असल्याच्या सबबीवर दिल्लीच्या सतत वाऱ्या करत राहतात.

७) साहित्य पुरस्कारांवर झोड उठवणाऱ्या नेमाड्यांनी ‘टीकास्वयंवर’ ग्रंथाच्या मलपृष्ठावर (साकेत प्रकाशन, आवृत्ती २००१) त्या पुस्तकाला मिळालेल्या चिल्लर पुरस्कारांचीसुद्धा यादी अगदी अभिमानपूर्वक दिली आहे. ‘शासकीय पुरस्कार क्षुद्र, फालतू असतात. ते घेऊ नका’ असं सांगणारे लेखकही नंतर ते निर्लज्जपणे स्वीकारतात. ते बंद केले पाहिजेत’ (टी.स्व. पृ. ८९, ३५७, ३८३) असा कंठशोष करणारे नेमाडे १९९१ चा साहित्य अकादमी पुरस्कार मात्र त्याच ‘निर्लज्जपणे’ स्वीकारताना दिसतात.

८) लेखकांच्या ‘अड्डेबाजी’वर तुटून पडणारे नेमाडे (पहा : ‘लेखकाचा लेखकराव’ हा संपूर्ण लेख) १९९८ मध्ये अकादमी सदस्य झाल्यावर स्वतःही अड्डेबाजीचा धुमाकूळ घालताना दिसतात. १९९८-९९ पासून २००१-०२ पर्यंतचे अकादमी पुरस्कार नेमाड्यांचे निकटवर्ती असणारे सदानंद मोरे, रंगनाथ पठारे, ना.धों.महानोर आणि राजन गवस यांना मिळाले हा योगायोग नव्हे. मोरे यांनी याबद्दल उघडपणेच नेमाड्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला होता. महानोर हे नेमाड्यांचे जवळचे मित्र. पठारे हेही नेमाडेपंथीच. आणि गवस यांनी तर नेमाड्यांवर एक पुस्तक संपादित करून पुरस्कार पदरात पडून घेतला. (पहा : ‘नेमाडे पंथीय दहशतवाद’ ले.पंकज कुरुलकर, म. टा. दि. १८ जानेवारी २००२.) कुरुलकरांच्या मुद्देसूद आरोपांना नेमाडे किंवा वरीलपैकी एकाही लेखकाने उत्तर दिल्याचं किंवा खुलासा केल्याचं माझ्यातरी पाहण्यात नाही.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आताशा ‘लेखकराव’ म्हटलं की झट्कन नेमाड्यांचीच आडव्या अंगाची, वेडगळ चेहऱ्याची मिशाळ मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते.

ड) नेमाडे यांच्या मराठीच्या चुका  

ज्येष्ठ साहित्यिकांना ‘मराठी नीट न येणारा माणूस’, ‘अडाणी’ वगैरे संबोधून त्यांची हेटाळणी करणाऱ्या नेमाड्यांचं स्वतःचं मराठी काय लायकीचं आहे याची ही एक झलक.

१) ग्रंथाच्या नावापासूनच सुरुवात करू. ‘टीकास्वयंवर’ हा शब्द नेमाड्यांनी मुद्दाम ‘सीतास्वयंवरा’सारखा वापरला आहे. एकेका साहित्यिकाला टीकास्वरूपी हार घालत जाण्याचं प्रतिक म्हणून ‘स्वयंवर’ शब्द योजला असावा. पण स्वयंवरात हार केवळ एकालाच घातला जातो, अनेकांना नव्हे. त्यामुळे या शब्दाचा शीर्षकातला वापर पूर्णपणे अशास्त्रीय आहे.

२) पृ. १०२ वर ‘साहित्य आणि रसिक या दोन घटकांचा बांधिलकीशी येणारा संबंध दूरान्वयाचा ठरतो’ असं विधान आहे. इथे ‘दूरचा ठरतो’ हे पुरेसं होतं. ‘दूरान्वयाचा’ हे अनावश्यक. शिवाय ‘दुरान्वये’ हा शब्द नकारात्मक रचनेत वापरण्याचा संकेत आहे. उदा. ‘दूरान्वयेही संबंध येत नाही.’  पण नेमाडे अज्ञानातून तो चुकीच्या ठिकाणी व चुकीच्या प्रकारे वापरतात.

३) पृ. २८५ वर ‘वैफल्य म्हणजे हतबलता नव्हे, भ्रमनिरास म्हणजे निराशावाद नव्हे हे कृतीनेच ही कादंबरी सिद्ध करते’ असं वाक्य आहे. इथे ‘निराशावाद’ या शब्दाची चुकीची योजना केली आहे. त्याऐवजी ‘नैराश्य’ हवं होतं. किंवा नुसतं ‘निराशा’ही चाललं असतं.

४) पृ. ३८४ वर ‘आंतरराष्ट्रीय स्तरावरही नोबेलसारखी बक्षिसं असाहित्यिक कारणांवरूनच दिली जातात’ असं लिहिलंय. इथे ‘असाहित्यिक’ हे चूक आहे. त्या ऐवजी ‘साहित्यबाह्य’ हा शब्द हवा.

५) क्लिष्ट, लांबलचक वाक्यरचना आणि चुकीचं मराठी यांची ही चढाओढ पहा : ‘सत्यदर्शन, जीवनदर्शन, कणखर वगैरे अनुभव आणि सामाजिकता, वास्तवता, इत्यादी अनेक गोष्टी बाजूला ठेवून अस्सल शब्दांचे शिल्प पाहू गेल्यास केकावलि किंवा गोदागौरव ह्यांतील शब्दयोजना इतकी झगमगीत वाटते की त्यापुढे पादाकुलक किंवा अक्षररचना किंवा मुक्तछंद यासारख्या सोप्या पद्यातूनच पण आठदहा ओळींपलीकडे क्वचितच जाणारे व त्यातील दोनेकच ओळींत कवितेचे सार ओतणारे नवे कवी आपले शब्दांचे अज्ञानच दाखवीत असतात असे म्हणावे लागेल.’ (पृ.२३६, २३७)

चुकीच्या मराठीची आणि क्लिष्ट वाक्यरचनेची अशी उदाहरणं पानोपानी आढळतात. एकूण नेमाडे या गृहस्थाच्या जाड कातडीवर आपल्या संतवाङ्मयाचा जराही संस्कार झालेला दिसत नाही हेच खरं.

तात्पर्य 

पुराणांतील ‘जालंधराख्याना’प्रमाणे साहित्यिकांचं नंदनवन तात्पुरतं बळकावून बसणारा हा नेमाडेरुपी ‘शुंभासुर’ आणि त्याला ते प्राप्त करून देणारा ज्ञानपीठरुपी ‘जालंधर दैत्य’ हे दोन्ही धन्य होत.

या दोघांनाही त्यांची जागा दाखवणारा कुणीतरी ‘शिवशंभो’ लवकरच निर्माण व्हावा ही सदिच्छा !

हर्षद सरपोतदार
hsarpotdar1@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
अशा गंमती – अशा गोष्टी 
शं. ना. नवरे

(४) निदान एकदा —

[ स्थळ : एक पुस्तकांचे दुकान, गिरगाव, मुंबई.]

“नमस्कार भावेसाहेब.”
“नमस्कार कविराज.”
“तुमच्याबद्दल आमची तक्रार आहे.”
“आमचीही तुमच्याबद्दल असू शकेल.”
“तुम्ही फार कमी लिहिता.”
“तुम्ही फार जास्त लिहिता.”
 “भावेसाहेब, जास्त नाही. दिवसातून आठ दहा कविता करतो.”
“दिवसातून एकदा स्नान करीत जा. तुमच्याशी बोलत उभं राहणं कठीण जातं.”

(पु. भा. भावे नाकाशी सुगंधित रुमाल धरतात. कविराज रस्ता धरतो.)

– शं. ना. नवरे 
(‘ललित’ जानेवारी १९६७ वरून साभार )
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
ऑलिम्पिकची नवलकथा 
 
कै. भानू शिरधनकर  
(४) 

Baron de Coubertin ( 1 January 1863 – 2 September 1937) 

Evangelos Zappas (23 August 1800 – 19 June 1865)

 

आधुनिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे जनक म्हणून आज जरी आपण बॅरॉन द कुबर्टीन  फ्रेंच व्यायामतज्ञाला सारे श्रेय देत असलो तरी त्यापूर्वीही ही कल्पना जर्मनीमध्ये व्यायाम प्रसारासाठी पहिले आंदोलन करणारा व्यायामतज्ञ जे. सी. गट्स मशस् याने बोलून दाखवली होती. अर्नेस्ट कर्टीस नावाच्या एका जर्मन तज्ज्ञाने १८५२ साली बर्लिनमध्ये या प्राचीन खेळाबाबत एक माहितीपूर्ण भाषण केले. त्याने याबाबत केलेल्या संशोधनाकडे ग्रीसमधील मेजर इव्हांजेलस झप्पास नावाच्या एका धनाढ्य गृहस्थाचे लक्ष वेधले व त्याने मोठ्या प्रयत्नांनी १८५९ साली पॅन हेलेनिक क्रीडास्पर्धा भरवल्या. या क्रीडा स्पर्धांना सुमारे २०,००० प्रेक्षक हजर राहिले होते. बॅरन द कुबर्टीन यांच्या काळापूर्वी झप्पास याच्या खटपटीमुळे ग्रीस देशात १८५९, १८७०, १८७५ व नंतर १८८९ मध्ये अशा चार क्रीडास्पर्धा झाल्या पण आजच्या जागतिक क्रीडास्पर्धांचे वैभव दुर्दैवाने त्या स्पर्धांना प्राप्त झाले नाही. याची कारणे म्हणजे ग्रीस हे त्या वेळी मोठे शक्तिशाली व संपन्न राष्ट्र उरले नव्हते आणि झप्पास याचे प्रयत्नही फार तोकडे पडले. क्यूबर्टीन याच्या प्रमाणे त्याने अनेक देशातील व अनेक र राष्ट्रातील शाळा, विद्यालये, विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे व क्रीडा संस्थांचे सहाय्य मिळवण्याचा प्रयत्न केला नव्हता.

प्राचीन ग्रीसच्या व तेथील वैभवशाली ऑलिम्पिक खेळाच्या इतिहासाने इव्हांजेलस झप्पास हे इतके प्रभावित झाले होते की त्यांना फारसे यश आले नाही तरी त्या क्रीडा सत्रांवर त्यांनी अगणित खर्च केला इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या मृत्यूनंतर आपली सगळी संपत्ती, ग्रीसमध्ये त्या प्राचीन क्रीडा सत्रांचे पुनरुज्जीवन व्हावे या उद्देशाने खर्च केली जावी अशी इच्छा व्यक्त केली होती. ग्रीक सत्तेने झप्पास यांची ती कल्पना उचलून धरली आणि झप्पास यांनी त्या कार्यासाठी दिलेल्या पैशाचा स्वीकार केला. आणि त्यांनी प्रथम खेळांची दोन सत्रे घडवून आणली. पण ही दोन्ही क्रीडासत्रे अयशस्वी झाली. पहिल्या वेळी म्हणजे १८५९ साली तर या सामान्यांच्या वेळी भीषण गोंधळ उडाला होता.

खेळांसाठी क्रीडांगण किंवा स्टेडियम उपलब्ध ;नसल्यामुळे प्लेसलुईस नाक्यावर व अथेन्सच्या रस्त्यातच या क्रीडा स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. त्यामुळे रस्त्यात विलक्षण गर्दी उडाली. राजा, राणी आणि मोठमोठे अधिकारी हजर असूनसुद्धा घुसाघुसी व दंगली झाल्यावाचून राहिल्या नाहीत. खेळाडूंना रिंगणात प्रवेश करता येईना. त्यांना आत येणे शक्य व्हावे म्हणून घोडदळाने रस्ते रोखण्याचे ठरवले. आणि त्यामुळे गर्दी बिथरली. रेटारेटी सुरू झाली. कैक लोक पायदळी तुडवले गेले आणि कित्येक घोड्यांच्या टापांखाली सापडले. मुले पोलिसांच्या साखळ्या तोडून आत घुसली. प्रेक्षकांच्या गर्दीत घुसलेल्या कित्येक खेळाडूंना पोलिसांनी पकडले आणि धावण्याच्या शयर्तीत भाग घेणारा एक खेळाडू जागच्या जागी पडून मरण पावला.

तथापि अयशस्वी रीतीने का होईना पण १८५९ व १८७० च्या या दोन सत्रांनी आधुनिक जागतिक क्रीडा स्पर्धांचा पाया घातला यात संशय नाही. १८५९ नंतर खेळांच्या निरनिराळ्या प्रकारात भर पडत गेली. २०० मीटर्स, ४०० मीटर्स, १५०० मीटर्स अंतर धावण्याच्या शर्यती, कुस्ती, काठीवरून उंच उडी, टग ऑफ वॉर वगैरे खेळांची त्यात वाढ झाली. आणि या पहिल्या स्पर्धांनंतर बरोबर ३७ वर्षांनी आधुनिक वैभवशाली ऑलिम्पिक क्रीडा सत्रांची सुरुवात झाली.

 – कै. भानू शिरधनकर 
( ‘ऑलिम्पिकची नवलकथा‘ या पुस्तकातून संक्षिप्त साभार )

अगा जे जाहलेचि नाही…

कथाचतुष्टयी (३)  
 
दीपावली २०१८ विशेष  
 
मुकुंद नवरे

 

या मालिकेतील यापूर्वीच्या दोन कथा दि. ३ आणि ९ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध झाल्या आहेत. आज तिसरी कथा. 

कथा तिसरी 

उज्वला 

     उज्वलाचा जन्म झाला तेव्हाच तिला डॉक्टर करण्याचं अरविंद अाणि शोभानं ठरवलं होतं.  तीही लहानपणापासून अतिशय हुशार होती. अभ्यास आणि खेळ या दोहोत कायम चमकत होती. उज्वलाच्या पाठीवर चार वर्षांनी केतकी आणि नंतर दोन वर्षांनी वैभवचा जन्म झाला. या तिन्ही मुलांना मोठं करण्यात अरविंद आणि शोभानं कुठलीच कसर ठेवली नाही. मुलं लाडात वाढली पण फाजील लाड असे कुणाचेच झाले नाहीत. आई-बाबा दोघेही नोकरी करत असल्यानं मुलांपुढे त्यांचा आदर्श होता. शिवाय लहानपणापासून तिघांना आजी-आजोबांचा सहवास मिळत होता, तिथेही लाड म्हणजे फक्त खायचे प्यायचे अशीच व्याख्या होती. मोठे काका आणि काकू यांचं प्रेमही मुलांना मिळत होतं.

     अशीच वर्षं भराभर सरकत गेली. उज्वलानं वैद्यकीय-प्रवेश परीक्षेत उत्तम गुण मिळवले आणि तिला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. अरविंद आणि शोभानं पाहिलेलं एक स्वप्न आता खचितच पूर्ण होणार होतं. उज्वलानं मन लावून अभ्यास केला आणि प्रत्येक परीक्षेत ती प्रावीण्य मिळवत गेली.

     केतकीला अभियांत्रिकी शाखेत जायचं होतं. तिलाही प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळाले आणि देणगी न देता सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तिच्या मागे वैभव शाळेत दहाव्या वर्गात होता.

     वैद्यकीय महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला येईपर्यंत अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या जोड्या पडून जातात. हे आता इतकं सर्वमान्य झालं आहे की तसं झालं नाही तरच लोकांना आश्चर्य वाटतं. पण कधी कधी संबंध जुळतातच असंही होत नाही. उज्वलाच्या बाबतीत असंच झालं. शेवटच्या वर्षात असताना तिला विपुलनं चक्क मागणीच घातली. तो तिच्याच वर्गात होता आणि पुढे शल्यचिकित्सा विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण घेणार होता. उज्वलाचा कल गायनेकॉलाजीकडे असल्यानं तिची साथ मिळून आपण पुढे अधिक यशस्वी होऊ असा त्याचा विचार असावा.

     उज्वलानं हा विषय घरी सर्वांसमोर मांडला. कारण तिला घरच्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय काहीच करायचं नव्हतं.

     यावर घरी संमिश्र प्रतिक्रिया उमटली.

     ” बघ गं बाई, संसार तुला करायचाय. ते ठरले हिंदी भाषी लोक.” शोभा म्हणाली.

     ” माझी हरकत नाही. पण पुढे पश्चात्ताप वाटायला नको. ” अरविंद सावधपणे म्हणाला.

     उज्वलानं काकांना विचारलं. एरवी काका पुरोगामी विचारांचे पण आता काय बोलतील इकडे सर्वांचं लक्ष लागलं.

     ” तशी माझी काही हरकत नाही. पण बेटा, तुला तडजोड करून रहावं लागेल. त्या लोकात घरी मोठ्यांसमोर हातभर घूॅंघट घ्यावा लागतो. बघ तू कसं वातावरण आहे त्यांच्याकडे.” ते म्हणाले.

     उज्वला विचारात पडली. शेवटी तिच्या मनानं कौल दिला, नकोच असली काही शक्यता.

     तिनं त्याप्रमाणे विपुलला नकार दिला. त्यानंही तो खिलाडू वृत्तीनं स्वीकारला.

     एक वर्ष पुढे सरकलं आणि उज्वला डॉक्टर झाली. त्या दिवशी अरविंद आणि शोभाचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं. उज्वलाची आता इंटर्नशिप सुरू झाली. तिथे स्टायपेंड मिळू लागला त्यामुळे एक त-हेचं आर्थिक स्वातंत्र्य मिळालं. इकडे केतकी आणि वैभवचं शिक्षण सुरूच होतं. तो आता कनिष्ट महाविद्यालयात होता.

     इंटर्नशिप सुरू असतानाच  उज्वलाचं लग्न ठरवावं असं अरविंदला वाटू लागलं. योगायोग असा की, ती जिथे इंटर्नशिप करत होती त्याच हॉस्पिटलमधे काम करणा-या डॉ. अरूणकडून तिला प्रतिसाद आला. तिच्याहून तो दोन वर्षांनी मोठा होता आणि दोघांची जोडी अनुरूप होती. त्याला प्रत्यक्ष भेटल्यावर अरविंद आणि शोभाला खूप आनंद झाला. घरची मंडळी सुशिक्षित पण त्याच वेळी आपल्या परंपरा पाळणारी होती. एकंदरीत खोट काढण्यासारखं काहीच नव्हतं त्यामुळे सर्वांशी विचारविनिमय करून अरविंदनं अरूणच्या घरी जाऊन रीतसर हा विवाह व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. त्याही मंडळींनी दोन दिवसात होकार  कळवला आणि लगेचच एका शुभमुहूर्तावर साक्षगंधाचा कार्यक्रम पार पडला. अरूण आणि उज्वलाचा विवाह होणार हे नक्की झालं. अरविंद आणि शोभासाठी तो महत्वाचा दिवस होता.

     असं सगळं काही मनासारखं होत असताना एक दिवस नियतीचा जबरदस्त फटका या कुटुंबाला बसला. अरविंद आणि शोभा स्कूटरवरून जात असताना एका वाहनाने त्यांना जोरदार धक्का दिल्याने ते फेकले गेले ! हॉस्पिटलमध्ये त्यांना नेईपर्यंत दोघांनीही प्राण सोडले. त्या क्षणी सगळं होत्याचं नव्हतं झालं. उज्वला, केतकी, वैभव, काका-काकू सगळे त्या हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत ते थांबले नाहीत. सर्वांवर दु:खाचा डोंगर कोसळला. उज्वलाच्या आजी-आजोबांना हॉस्पिटलमध्ये आणण्याची हिंमत कुणाला झाली नाही. काकांनी पुढाकार घेतला, काकूंनी सर्व मुलांना पोटाशी धरलं म्हणून सगळे या प्रसंगातून बाहेर पडू शकले.

त्या रात्री आजी-आजोबांच्या कुशीत शिरून उज्वलानं भरपूर रडून घेतलं आणि घडलेला प्रसंग तिनं पचवला. आता ती आपल्या लहान भावंडांची आक्का झाली होती.

आजी-आजोबांसह तिन्ही भावंडं एकत्र राहू लागली. काका-काकूंचं घर थोडंसंच दूर होतं पण त्यांचाही मोठा आधार होता. उज्वलाला आई-बाबांच्या विम्याचे पैसे मिळाले. त्यांच्या ऑफिसकडून भविष्य निर्वाह वगैरेच्या रक्कमा मिळाल्या. पण सगळं मिळूनही  गेलेली माणसं परत येत नाहीत हे सत्य उज्वलानं पचवलं. केतकी आणि वैभव एकदमच प्रौढ होऊन गेले.

     पण आणखी एक धक्का अजून बसायचा होता. एक दिवस अरूणच्या घरून आता लग्न होऊ शकणार नाही असा निरोप आला ! ते कळल्यावर उज्वला तर सैरभैर झाली. काका लगेच त्या मंडळींना भेटायला गेले. त्यांनी लग्न मोडण्याचं कारण विचारलं. पण त्या लोकांनी काहीही बोलण्याचं नाकारलं. ‘हे सगळं प्रकरण इथेच संपलं समजा’ म्हणत राहिले. शेवटी काका हताश होऊन परत आले. त्यांनी घरी येऊन झालेलं बोलणं आजी-आजोबांना सांगितलं तेव्हा उज्वला संतप्त होऊन गेली. पण आजोबांचं मत पडलं की झालं ते योग्यच झालं, यामुळे वेळीच त्या लोकांची मानसिकता तर कळली. त्यामुळे वाईट वगैरे वाटून घ्यायचं कारण नाही. ते अनुभवाचे बोल उज्वलाला धडा शिकवून गेले. ती सावरली.

* * * * *

      आणि एक दिवस आनंदाचा उगवला. काकांचा फोन आला आणि त्यामागोमाग ते स्वत: काकूसह येऊन हजर झाले. त्यानंतर थोड्याच वेळात विपुल अग्रवाल आणि त्याचे आई-वडील येऊन उज्वलाच्या आजी-आजोबांना भेटले. घरी उज्वला होतीच. मोठ्यांच्या पाया पडून अग्रवालांनी विपुलसाठी सरळ उज्वलाला मागणी घातली.

      ” आम्ही हिला सून म्हणून स्वीकारायला तयार आहोत. ” ते म्हणाले.

     हे ऐकून आजी-आजोबांच्या डोळ्यांना धारा लागल्या. हे असं कधी होईल याची त्यांनी अपेक्षा केली नव्हती. उज्वलाला गहिवरून आलं. काही वेळ सगळीच मंडळी भारावून गेली. मग काकूनं आत जाऊन साखरेचा डबा आणला.

       अग्रवाल मंडळी पण होकार मिळेल या खात्रीनं आली असावीत. त्यांनीही सोबत आणलेल्या मिठाईचा डबा उघडला.

मुकुंद नवरे
mnaware@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आजची कविता 

अमितेय 

१५. 

हे दुष्ट जग ! 

गडे खिडकीमधुन

नको बाहेर डोकावू

कुणी पाहील हळूच

दृष्ट लावून जाईल

नको हवेत मोकळ्या

पहाटेची उभी राहू

थंडी बोचरी बोचेल

अंग अंग शहारेल

फूलपरडी घेऊन

बागेमध्ये नको फिरू

भुंगे लोचट, तुझ्या गं

अंगचटीला येतील

दाराबाहेर दुपारी

उन्हाची तू नको येऊ

धग सूर्याची निष्ठूर

लाल लाल गं होशील

अनवाणी एकट्याने

नको रानोमाळ हिंडू

वाटेमध्ये काटा दुष्ट

पाऊल दुखेल

नदीकिनारी उगीच

नको फार दूर जाऊ

निलाजरा असे वारा

केस विसकटतील

गारा वेचायाला राणी

अंगणात नको जाऊ

शिष्ट पावसाच्या धारा

ओलीचिंब गं होशील

चांदण्यात गच्चीवर

नको आकाशात पाहू

चंद्र चोरटी नजर

तुला लावून धरील

अंधारात दिव्याविना

नको फाटकात दिसू

मत्सरी गं रात

तुला झाकून टाकील

दुष्ट वाईट्ट हे जग

तुला टपले छळाया

बैस माझ्यापाशी, ऐक-

गाणी- गझला- रुबाया…

अमितेय 

*********************************************************

लक्षणीय 
अंगण
मेघा कुलकर्णी   

दीपोत्सवात होणारी कार्तिक मासाची सुरुवात एक वेगळा आनंद निर्माण करते. वारकरी संप्रदायाच्या परंपरेत आषाढ ते कार्तिक या चातुर्मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही वृक्षस्वरूप असली तरी घरीदारी तिचे नित्य प्रभातीपूजन तसेच सायंकाळी तिच्यासमोर लावला जाणारा दीप हे भारतीय संस्कृतीचे आद्य प्रतीक आहे. निर्मळपणाचे द्योतक आहे. आषाढवारीत हीच तुळस, वारकरी शिरी स्थानापन्न झालेली पहावयास मिळते. यांवरूनच वारकरी संप्रदायातले तुळशीचे महत्त्व दिसून येते.

महाराष्ट्रीय संस्कृतीत कार्तिक मासांतला तुळशीविवाह हा सोहळा तीन दिवसांचा साजरा करण्यात येतो. याची सुरुवात कार्तिक द्वादशी या दिवसापासून होते. या आनंदसोहळ्याचे अजून एक विशेष खास महत्त्व हे की या सणानंतर लग्नसराई सुरू होते. साखरपुडा करून ठरलेल्या नात्यांना नवआयुष्य सुरू करण्याची, मंगलकार्याची ओढ निर्माण होते. या सोहळ्यात भगवान श्रीकृष्ण वर स्वरूपात तर तुळशीने वधूरूप धारण केलेले असते. त्यात भर घालत असते, त्रिपुरारी पौर्णिमा. लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून टाकणारी. आश्विन महिन्यातले लक्ष्मीपूजन आणि त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्या संस्कृतीत खासच महत्त्व आहे.

“दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी” सायंप्रार्थनेतील ही उक्ती पूर्वापार आनंद देतेच आहे तसेच, आजच्या धकाधकीच्या जीवनातही मोलाची शिकवण देत आहे. आजही लहान गावांमध्ये अंगणात तुळशीकट्टा असतो. दिवा लावण्यासाठी चारी बाजूंना छोट्या दिवड्या असतात. संपूर्ण कार्तिक मास, घराचे मुख्य द्वार आकाशदिवे, पणत्यांनी प्रकाशित होत असतानाच अंगणातील तुळशीकट्टा रंगवण्याचे, उसाच्या पेरांनी सजवण्याचे  काम चालू होते. घरांतील वातावरण मंगलमय बनते. तुळशीविवाहादिवशी ‘राधा-दामोदर प्रसन्न’ ही अक्षरे लिहिली जातात. विवाहसमयी आवर्जून मंगलाष्टकंही गायली जातात. रेशीमगाठी जुळलेल्या वाग्दत्त वधू-वरांची रूपे या विवाहानिमित्ताने पाहिली जातात. विवाहकार्य संपन्न होताच फटाक्यांची आतषबाजी होते, प्रसाद वाटला जातो. आठ-पंधरा दिवस, महिन्यांनी सासरी जात असलेल्या लेकीकडे पहाताना “कन्या असे दुजांची” हेच माऊलीचे भरले डोळे सांगत असतात.

कवी ना. धों. महानोर यांच्या काव्यपंक्तीतून तुळशीचे आगळे महत्त्व प्रकट होते.

“रुक्मिणी हाटेल जाते तुळसिले खेटून
जरीचा पदर आल्या मंजुळा तुटून
रुक्मिणीले साडीचोळी, सत्यभामेला दोरवा
तुळसाबाईला थंड पाण्याचा गारवा
रुक्मिणीले साडी, सत्यभामेला पातळ
तुळसाबाईला पाणी गंगेचं नितळ”

(संदर्भ: पळसखेडची गाणी, १९८२. पृ.२३.)

@@@
मेघा कुलकर्णी
megha.kolatkar21@gmail.com

नियती

दीपावली २०१८ विशेष 
 

सौ. स्वाती वर्तक  

का देखण्या, उत्तुंग इमारतीच्या लिफ्टसमोर सुषमा वाट बघत उभी होती. बराच वेळ झाला आठव्या माळ्यावर कोणीतरी लिफ्ट अडकवलेली दिसत होती खरे तर संध्याकाळी कॉलेजमधून दमून भागून आलेल्या सुषमाने चिडायला हवे, निदान किंचित कुरकुर ..पण छे ! ते तिच्या स्वभावातच नव्हते. ती निमूट उभी होती.

अचानक तिला आठवले..पाचव्या माळ्यावरील आपली मैत्रीण डॉ सरोज दिसली नाही बरेच दिवसात. आणि तिची ती गोंडस नातवंडेही कंपाऊंडमध्ये खेळताना दिसली नाहीत. त्या मुलांचे गोबरे, गोड चेहरे आठवून तिला खुदकन हसूच आले. त्यातला धाकटा ४ वर्षांचा रियांश, तो तर ती फाटकात शिरताच ..आंटी..ओरडत, हात पुढे करत, पळत यायचा..एकदा तिला बिलगून झाले की आपल्या अक्षयदादाजवळ परत. तो तरी काय ६ वर्षांचाच..तोही …हाय, आंटी ..करून सुषमाला प्रसन्न स्मित देऊन मोकळा व्हायचा. त्या मुलांची आई, सौ नेहा देखील किती गोड हसते. आपण आलो की…” आंटी, सामान पकडू? “ म्हणत अदबीने वागते. तिला आपल्या रूपाचा, सौंदर्याचा अजिबात गर्व नाही. पण गेल्या ३, ४ दिवसात आपल्याला कोणीच भेटले नाही. बाहेर गावी गेले वाटते. उद्या सरोजला भेटून विचारले पाहिजे..” काय गं, तुझी रूपवान सून गावाला गेलीय का ?

या विचारात दंग असतानाच लिफ्ट आली. तिने लगबगीने आत शिरत आपल्या माळ्याचे क्र ४बटन दाबले. घरात येताच नेहमीचे दृश्य बघून ती कामाला लागली. ती जेवढी शांत, तेवढीच नीट नेटकी, कामास तत्पर आणि दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणारी होती. भिंतीवरचे तिचे लाडके बी प्रभाचे चित्र. त्याची फ्रेम वाकडी झालेली तिने सरळ केली. सोफ्याचे घरंगळत जाणारे कव्हर व्यवस्थित लावले. आज यांना आणि मुलाला जाब विचारायचाच की बाहेर जाताना तुम्हाला हे दिसत नाही का ? असे तिने ठरवले पण रोजच्या प्रमाणे, ती नुसती हळू हळू बोलणार आणि ते दोघे हसणार हे ठरलेलेच.

मुंबईची जीवन शैली किती विचित्र. इच्छा असूनही माणसे भेटत नाही. मुंबई नुसती पळत असते. सुषमाचेही जीवन असेच धावपळीत जात होते. ती समाजशास्त्राची प्राध्यापिका. तिचे कॉलेज घरापासून बरेच लांब. महिला स्पेशल पकडण्यासाठी वेळेत स्टेशन गाठणे गरजेचे असे. मनात असूनही सरोजला ती भेटूच शकली नाही. अनेक दिवस असेच गेले.

आणि एक दिवस तशीच लिफ्ट जवळ जाताना तिला नेहा दिसली. किती काळवंडली होती. डोक्यावर स्कार्फ देखील घट्ट बांधलेला, मुले खेळत होती. सुषमाला खूप आनंद झाला. रियांशशी गप्पा मारून ती नेहा जवळ आली ..उत्साहाने बोलू लागली…अगं, कुठे होतीस इतके दिवस ? आणि काय ताप वगैरे आला होता ? बारीक झालीस, स्कार्फही बांधला आहेस, थंडी वाजते का ?

‘हो, हो, आंटी..किती प्रश्न ….फारच काळजी करता तुम्ही सर्वांची …काही नाही..जरा केस गळतात म्हणून जपतेय.’

‘हो का ! अगं, मी तुला एक तेल तयार करून देते, उद्या ये .. खूप छान आहे ..माझ्या आजीने शिकवलंय मला बनवायला .. बघ तुझे केस गळणे ३ दिवसात थांबेल ..’

‘थँक्स आंटी..यू आर सो स्वीट,’ म्हणत नेहा जरा बाजूला वळली.

खरे तर, ही तिची अदब नव्हती पण असेल घाईत म्हणत सुषमा लिफ्टमध्ये शिरली.

त्या दिवसानंतर पुनः मुले, नेहा भेटलेच नाहीत .आज मात्र डॉ. सरोजला भेटायचेच ठरवून कामे भराभर उरकून ती पाचव्या माळ्यावर गेली.

घरात कोणीच नव्हते. फक्त गडी होता. त्याने सांगितले, ‘डॉ बाई तो हस्पताल गई है..’

‘अरे, पण सरोजच्या इस्पितळाची ही वेळ नव्हे.’

‘नहीं, वो तो नेहा बीबी के हस्पताल में गई हैI ‘

‘का, काय झाले ?’

‘पता नहीं. ‘

एवढेच बोलणे झाले. असंख्य विचार मनात गर्दी करू लागले. सुषमाचे डोके गरगरू लागले. एक अनामिक हूरहूर छळू लागली.

काय झाले ..आपल्याला सरोजने तर काही सांगितले नाही. नेहा आजारी आहे का ? तिच्या इस्पितळात म्हणजे काय ?

उद्या सरोजला फैलावरच घेते.. असे काय करते ही ? मला जिवाभावाची सखी म्हणवते आणि….

दुसऱ्याच दिवशी कॉलेज मधून परतताना तिला पाठमोरी सरोज दिसली. थांब, कुठे जातेस ? तिचा हात अक्षरशः ओढतच सुषमा ओरडली….आणि सरोजचा चेहरा दिसताच ती घाबरली. दोन महिन्यांनी आपली लाडकी मैत्रीण भेटतेय, ती अशी..

‘अगं, काय होतेय तुला ?’

हा रस्ता आहे की घर की कंपाऊंड कसलाही विचार न करता सरोज सुषमाच्या गळ्यातच पडली आणि स्फुंदून स्फुंदून रडू लागली. सुषमाची अवस्था दयनीय झाली होती. तिला सांभाळून घरी नेले. पाणी पाजले. पाठीवर मायेने हात फिरवीत म्हणाली, ‘..शांत हो आधी ..शांत…नंतर सांग. ‘

बराच वेळ गेल्यानंतर सरोज सावरली. हळू हळू बोलती झाली. ‘अगं, शुमि…होतीस कुठे ग तू ? कधी सांगू ? कशी सांगू??’ पुनः हुंदका आला तिला ..’तू मागल्या महिन्यात अमेरिकेला फिरायला गेलीस आणि इकडे माझे दुष्ट चक्र सुरू झाले गं ..’

‘काय झाले ?’

‘अगं , कसे……..सांगू गं… आपल्या सुंदर नेहाला ल्यूकेमिया झालाय.’

‘काय ! …..’ घाबरून सुषमाच्या हातातील ग्लास खाली पडून फुटला आणि इतस्ततः काचा विखुरल्या जणू डोक्यात ठण ठण वाजणाऱ्या असंख्य अशुभ विचारांच्या वेदना.

काही काळ दोघीही निस्तब्ध होत्या.

किंचित सावरल्यावर सुषमाच्या मायाळू स्पर्शाने सरोज घडाघडा बोलू लागली.

‘अशी कशी गं ही नियती ? आपण साठीच्यावर गेलो आता, सोसवत नाही गं….नेहा जेमतेम बत्तीसची झालीय आता..तिच्यावर नियतीने असा घाला घालावा?’

‘अगं, तू डॉक्टर आहेस ना ? तूच जर अशी हतबल झालीस तर तुझ्या मुलाने, विशालने, कोणाकडे बघायचे ?’

‘ते खरे आहे , पण डॉक्टर असणेच आता मला खातेय. त्या ज्ञानामुळेच जास्त भीती वाटते.’

‘नको, इतका विचार करुस .. आता विज्ञान फार पुढे गेले आहे. आपण जुने झालोत. काहीतरी औषध नक्की मिळेल तिला. ती बरी होईल.’ सुषमा समजावण्याचा प्रयत्न करीत होती पण तिच्याही आवाजात जोर नव्हता. ती देखील आतून हादरलीच होती.

‘हो. ते ही खरेय.. बॉम्बे हॉस्पिटलचे निष्णात डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत; ते म्हणतात ..she will be ok.. Don’t worry.’

‘हो न ..मग काय ? आणि किती गोड आहे ती ..सज्जन देखील . तिच्यावर नियती अशी रुसणार नाही.’

‘शुमि, अगदी बरोबर बोललीस.. तुला आठवते, माझा विशाल तिच्या प्रेमात पडला तेव्हा आपण दोघींनी काय काय म्हटले त्याला.’

‘हो, आपल्याला वाटत होते, ही रूप गर्विता असेल.’

‘आणि मला तर ती सिंधी होती हेच पटत नव्हते.’

‘पण किती लवकर तिने आपले कयास चुकीचे ठरवून सगळ्यांना आपलेसे केले ..नाही का ?’

‘तेच ना ! बिचारी .. !! कधी कधी मला त्या जगन्नाथाचे निर्णय कळतच नाही.’

खूप वेळ दोघी मैत्रिणी बोलत बसल्या. डॉ सरोजचे मन खूप सावरले होते. सुषमाने बराच दिलासा देत तिच्या स्वभावानुसार हॉस्पिटलच्या वेळा समजून घेतल्या. त्याप्रमाणे स्वतःची ड्युटी लावली सरोजचे ..नाही, नाही, राहू दे ..सर्व धुडकावून. दोघी आपापल्या घरात कामास लागल्या.

सुषमाच्या कॉलेजपासून खरे तर बॉम्बे हॉस्पिटल काही जवळ नव्हते. बरीच कसरत करावी लागणार होती. तसेही रिटायर होऊनही ती कॉलेज प्रिन्सिपॉलच्या विनंतीमुळे अजून क्लासेस घेत होती. कॉलेजची गरज होती. म्हणून आशा होती प्रिन्सिपॉल तिला साथ देतील. पण अजून तिला जगाची ओळख झाली नव्हती बहुधा. या युगात राबणारे कमीच राबवून घेणारेच जास्त. हे ती विसरली होती.

घरात काम करता करता ती ३०, ३५ वर्ष मागे गेली होती. तो इवलासा विशाल. तिच्याकडे चॉकलेट मागणारा, मग शाळेचे गृहपाठ करण्यासाठी मदत मागणारा, शाळेतील प्रकल्प पूर्ण करताना तिची मदत घेणारा. बारावीत खूप चांगले मार्क्स मिळूनही फक्त एका मार्कांमुळे मेडिकलची हुकलेली त्याची संधी, आणि आपण आईसारखे डॉक्टर होऊ शकत नाही म्हणून लहान बाळाप्रमाणे ढसाढसा रडणारा विशाल. एका चलचित्रा प्रमाणे तिच्या डोळ्यांसमोरून झरझर विशालचा जीवनपट फिरू लागला.

त्यानंतर त्याला बाबापुता करून सरोजने त्याला बी फार्म मध्ये टाकणे. तेथे उत्तम यश मिळवून पुढे पी एच डी साठी त्याचे अमेरिकेस प्रयाण.

तेव्हा आपण दोघी किती म्हणायचो..गोरा पान उंच विशालला एखादी अमेरिकन गटवणार तर नाही न ?

पण तो उच्च विद्याविभूषित होऊन परत आला तेव्हा आपल्या मैत्रिणीचा जीव कसा अभिमानाने, आनंदाने उचंबळून येत होता.

सुषमाच्या पतीने हाक मारल्यामुळे तिची विचार शृंखला खंडित झाली. नवऱ्याचे काम संपल्यावर तिला अचानक हुरहूर वाटू लागली. आठवले की विशाल पी एच डी नंतर पुनः अमेरिकेस गेला होता. आणि ..आणि ..ते सर्व आठवून तिचे डोळे पाणावले. स्पंदने वाढलीत. वाह रे ! नियती, अजब तुझा खेळ ! विशाल पुनः पोस्ट पी एच डी करायला गेला होता. यशाची उत्तुंग शिखरे गाठत त्याने पदवी संपादन केली होती आणि त्याचा विषय होता …कर्करोगाच्या पेशी….

देवा ! याचसाठी का तू त्याच्या बायकोला इतक्या लहान वयात हा रोग दिलास ? त्या मुलाची परीक्षा का बघतोयेस ?

सुषमा जरी कला शाखेची असली तरी तिच्या स्वभावामुळे ती अनेक वेळा, वेगवेगळ्या पेशंटची मदत करत असे. त्यांच्यासाठी दवाखान्यात बसत असे. त्यांच्या रोगांबद्दल माहिती वाचत असे. त्यानुसार आपल्याला रुग्णाची. काळजी घेता यावी असा शुद्ध हेतू त्यात असे. म्हणून तिने कर्करोगाबद्दलही बरेच वाचले होते. तिला ठाऊक होते या वयात कँसरचा हॉजकिन्स नावाचा प्रकार पुष्कळ जणांना होतो पण सध्या तरी तो असाध्य मानला जात नाही. तिने स्वतः किती तरी रोगी बरे झालेले बघितले होते. पण प्रिय नेहाचा हॉजकिंस नव्हता..तिचा होता… रक्ताचा कर्करोग ..???.पूर्णपणे बरा होतो न आता नवीन औषधाने ..होईल ना? माझी मेहनत, व्रत वैकल्ये काहीही पणाला लावेन, पण सरोजला दुःखात नाही लोटणार मी ..

सुषमाच्या स्नेहल, वात्सल्यपूर्ण वागण्याने विशाल तिच्याबरोबर मोकळेपणी बोलत होता. मधूनच त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावत. त्या दृढ निश्चयाने माघारी लोटत तो तिला समजावीत राहिला.. ‘नाही मावशी, खरे तर हा रोग साधारणपणे ५५, ५६ च्या वरील लोकांना किंवा १० वर्षांखालील मुलांना जास्त होतो पण माझ्या नेहाला का ..?’

त्यानंतर किती तरी वेळ ते दोघे त्या असाध्य रोगाबद्दल, त्यांचे प्रकार इतर बाबतीत बोलत राहिले.

अरे, पण व्हायचे कारणच काय ?

काय सांगणार ? अजून कुठे सर्व ज्ञात आहे वैज्ञानिकांना….??? मावशी…करून त्याने हंबरडाच फोडला

ती बावरली..पुनः स्वतः च स्फुंदू लागली ..सावरून म्हणाली….

‘अरे, रडायचे नाही ..हा निर्धार कुठे गेला तुझा बाळा ?.’

‘मी ऐकलंय अगदी ऍक्युट नाही पण क्रोनीक ल्यूकेमियासुद्धा बरा झालाय. मी एक लेख वाचला होता.’

‘डॉ के. श्रीवास्तव यांचा..ते म्हणतात …” ..त्या पेशंटने हे सिद्ध केले की चमत्कार देखील होऊ शकतात. त्याला मी सांगितले होते ..तुला क्रॉनिक मायोलाईड ल्यूकेमिया झालाय हे खरे  !.पण देवावर विश्वास ठेवावा. त्याच्या इच्छेशिवाय काही घडत नाही. जर तू औषध नाही घेतलंस तर २ वर्षे ..घेतलंस तर ६ वर्षे नक्की काढशील. पण माझा एक असिस्टंट तेथे उभा होता; तो त्याला म्हणाला ..तू दररोज १० कृष्ण तुळस व १० हिरवी तुळस आणि ५ कडूनिंबाची पाने सकाळी अनशा पोटी खा . औषधे घे पण हेसुद्धा कर ..बघ…माझा फारसा विश्वास नव्हता पण त्यामुळे नुकसान काहीच होणार नव्हते . म्हणून मी देखील दुजोरा दिला. आणि चमत्कार घडला. ५ वर्षांनी तो माझ्या जवळ आला तेव्हा खडखडीत बरा होऊन. मी त्याला १९९० मध्ये तपासले होते. ९५ पासून तो फॅक्टरीत कामावर रुजू झाला. २००४ साली परत भेटला.. सर्दी खोकल्याने बेजार होता. तापही आला न्यूमोनिया झाला आणि त्यातच त्याची प्राणज्योत मालवली पण ..म्हणजे कँसर ने गेला नाही .  पूर्ण १४ वर्षे तो मस्त जगला ….हा माझ्यासाठी चमत्कारच होता.”

‘मावशी, असे घडेल तुला वाटते ? माझी नेहा जगेल ?. तुम्ही लोक किती सुखी अज्ञानात सुख म्हणतात ते हेच का ? मी का घेतला गं. तो विषय..??’ पुनः विशाल भावुक झाला. त्याला आवरायला पाहिजे ठरवून तिने विषय थांबवला व कॉफी घेऊ या म्हणून उठलीच.

विशाल गेल्यावर अचानक तिच्या गळ्यात गाणे कुठून आले तिलाच कळले नाही. पण गहिवरल्या कंठाने ती गुणगुणत होती. “ दैवजातें दुःखे भरता दोष ना कुणाचा …पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा .” खरेच नियतीपुढे देव सुद्धा वाकतो का ? नियती इतकी दुष्ट असते का ? नियतीची इच्छा, प्रारब्ध नक्की काय असते? जर नियती नावाची शक्ती इतकी विलक्षण असेल तर मानवाने प्रयत्न करावे की नाही ? खरेच का सटवाई आपल्या कपाळावर काही लिहून जाते ? ते देवसुद्धा पुसू शकत नाही का ? एका दगडाचा देव होतो, एक दगड कबरीवर ..असे का ? हे सर्व पुनः पुनः मनात येत राहीले आणि सुषमा आत आत पर्यंत दुखावली.

महिनाभर सुषमा अखंडपणे सरोजला सोबत देत होती. नेहाजवळ राहात होती. जमेल ते सर्व करत होती. मध्येच वाटत होते, नेहा बरी होतेय ..मध्येच रोग हुलकावणी देत होता. कधी तिच्या प्लेटलेट्स अगदी कमी झाल्या तर  ..कधी सफेद रक्तपेशी वाढल्यात. सरोज हवालदिल झाली की सुषमा धावत होती. नियती आपला खेळ खेळत होती.

आज हर्षभरित, उत्फुल्ल चेहऱ्याने सरोज घरी आली, उराउरी भेट घेत म्हणाली…’अगं, सुषमा आपली नेहा बरी झाली. खरेच मला देखील माहित नव्हते गं..विज्ञान किती पुढे गेलेय. तू मध्यंतरी पुण्याला गेली होतीस कामाने, तेव्हा नेहाचे संपूर्ण रक्तच बदलण्यात आले. आणि तुला आश्चर्य सांगू…..आधी ती ए पॉझिटिव्ह होती ना ? आता ती ओ पॉझिटिव्ह झाली आहे . म्हणजे तिच्या स्वभावाप्रमाणेच गं… सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारी. तसाच हा रक्त गट…गंमतच नाही का ?’

सुषमा नुसती अवाक होऊन बघत होती. डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते. तिला काहीच कळत नव्हते. हे स्वप्न, भास का सत्य ? देवाचे आभार तरी कोणत्या शब्दात मानावे ? दोघी मैत्रिणींना सुचत नव्हते. नुसत्याच एकमेकींच्या हातात हात धरून शांत बसल्या होत्या.

दररोज सकाळी सुषमा आपल्या बाल्कनीतून बघत होती. खरेच नेहा पूर्वपदावर येत होती. आपल्या मुलांना शाळेत आणणे, पोचवणे, सफाईदारपणे कार चालवत जाणे…किती छान करत होती नेहा. तिचे काळे काळे कुरळे केसही कसे सुंदर वाढले होते. मानेला एक मुरका देत जेव्हा ती केस मागे करत असे… किती गोड दिसत असे. प्रत्येक वेळेस हे दृश्य बघितले की सुषमा आनंदी होई आणि नमन करून देवाचे आभार मानी.

बघता बघता ३ महिने उलटले. आज काही नेहा खाली उतरली नाही मुलांना सोडायला. मुलांचे आजोबाच त्यांना बसमध्ये घेऊन गेलेत. उगाच पाल चुकचुकली.

पहाटे पहाटे दारावरची बेल कोणी वाजवली बघायला सुषमाने दार उघडले . समोर मान खाली घालून वॉचमन उभा होता.

‘क्या हुआ भैय्या ?’

‘मॅडम, वो नेहा बिटिया…..!’

‘क्या हुआ उसे ?’

‘वो गुजर गई ?’

‘क्या ??????’

‘हां.. डॉ मॅडम ने बुलाया है. ‘

सुषमाला दरदरून घाम फुटला होता. पुढचे काहीच न ऐकता ती नवऱ्याला फक्त जागे करून वर पळाली.

वर पाचव्या माळ्यावर करुण दृश्य होते. विशालचा भावनावेग अनावर झाला होता. त्या सौंदर्यवतीचा कृश काळवंडलेला निष्प्राण देह झाकून ठेवलेला बघवत नव्हता. कोणाला भेटू, कोणाला सावरू काहीच कळत नव्हते सुषमाला .. …अश्रू गोठल्यासारखे होऊन,  स्तब्ध झाली होती ती.

तेवढ्यात धाकटा रियांश पळत येऊन तिला चिकटला आणि विचारू लागला..

‘आंटी, सब बडेलोग क्यों रो रहे है ??’

त्याला उराशी कवटाळत अचानक तिचा बांध फुटला आणि ती कळवळून उत्तरली…

‘नियती..राजा..नियती….

डाव साधला रे तिने….’

@@@
– सौ. स्वाती वर्तक
खार ( पश्चिम ), मुंबई
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
कवितात्रयी  
मुकुंद कर्णिक 
२. प्रियतमे
खुलती बटा गालांवरी‚ मउ रेशमाच्या झालरी
गोरा गुलाबी हासरा चेहरा तुझा सखि लाजरा
कचभार जो स्कंधावरी आषाढ घन जणू अंबरी

खुलती बटा गालांवरी

क्षणमात्र उचलशि पापण्या, शर येति हृदया विंधण्या
घायाळ या जीवास दे झुलुपांचि शीतल सावली

खुलती बटा गालांवरी

डरणार ना मरणास मी जर आस माझी हो पुरी
मजसाठी तव नेत्रांतुनी बस एक अश्रु झरे तरी

खुलती बटा गालांवरी

मजला नको जीवन पुन्हा, निष्प्रेम जगणे हा गुन्हा
माझ्या स्मृतीला मात्र दे जागा जराशी अंतरी

खुलती बटा गालांवरी

+++++++

मुकुंद कर्णिक
karnik.mukund@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
राग-अनुराग 
(१६) 
 
 
केशव साठये 

‘ओ .. सजना… बरखा बहार आयी’ हे सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं म्हणजे पावसाला आणि प्रेमाला घट्ट बांधणारा ओलाचिंब अनुभव आहे. प्रेम म्हटलं की असूया, संशय आसपास येरझाऱ्या घालायला लागतात मग ‘संशय का मनी आला’ हे नाट्यगीत प्रेम अधिक घट्ट असल्याचे शिक्कामोर्तब करते.

ओमप्रकाश हा गुणी नट समरसतेनं ‘आयो कहासे घनःश्याम’ त्यातील नोटेशनसह गातो तेव्हा त्या कृष्णसख्याला प्रकट होण्यावाचून गत्यंतर राहत नाही. आणि इकडे ‘अमर प्रेम’मध्ये ‘बडा नटखट झालेला कृष्ण कन्हैया’ आणि यशोदेच्या वात्सल्याचा शिडकावा आपल्याला आवडून जातो ते या अनोख्या स्वरबहारामुळे.

‘मानापमान’ हे नाटक म्हणजे गंधर्व युगातलं सुवर्णपान. त्यातल्या भामिनीच्या भूमिकेतले बाल गंधर्व जेव्हा ‘नाही मी बोलत नाथा’ चे सूर आळवत तेव्हा सारं प्रेक्षागृह म्हणे त्या लटक्या रागाच्या मोहक आविष्कारात डोलू लागे. ‘नाही मी बोलत..’ हे पालुपद ते १०-१० वेळा सादर करत पण प्रत्येक वेळी अबोल्याच्या सड्याचे वेगवगळे विभ्रम रंगमंचावर जिवंत होत असत. ‘अब क्या मिसाल दू मै तुम्हारे शबाब की’ हे ‘आरती’ चित्रपटातलं रफीचं गाणं प्रदीप कुमार या निर्विकार नटाच्या तोंडीसुद्धा खुलून जातं ते या सुभग स्वरांमुळेच. अर्थात मीनाकुमारीची लोभस अदाही या गाण्याचा सन्मान ढळू देत नाही तेही तितकंच खरं. प्रेम ही भावना अनेक रचनांमधून डोकावते पण इथं मात्र प्रेमाची अमर्याद व्याप्ती ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या गाण्यातून व्यक्त होते.

‘नजर लागी राजा तोरे बंगलेपर’ हे कोठीवरचं आयुष्य शृंगारात लपेटून त्यातल्या आतल्या हुंदक्यांचं दर्शन घडवतं. ‘कुछ तो लो कहेंगे’ हे त्रिकालाबाधित सत्य सांगून हा समाजाला तोंड देत जगण्याचा हौसला वाढवतो.

खमाज-मिश्र खमाज रागाच्या कुशीत कभी गम कभी ख़ुशी म्हणत ही गाणी अवतरतात.

 

https://www.youtube.com/watch?v=lpm6BfdJZvg

– केशव साठये
keshavsathaye@gmail.com

इंद्रायणीकाठी काही क्षण

दीपावली २०१८ विशेष 
 
पालवी (२)

कै. लक्ष्मण लोंढे 

     दिल्ली तो बहोत दूर है म्हणता म्हणता ऑफिसच्या कामानिमित्त दिल्लीचं पाच दहा वेळा तरी दर्शन घडलं. पुणं त्या मानानं इथं जवळ आणि जवळ म्हणूनच फारसं जाणं होत नाही. तसं पुण्यालाही दोन-चार वेळा जाणं झालं, नाही असं नाही; पण पुण्याच्या आसपासचा प्रदेश पहायचं मात्र राहून गेलं होतं.

     शेवटी या वेळी जेव्हा थोडा वेळ घेऊनच पुण्याला गेलो तेव्हा एक ठरवून टाकलं. पुण्यातल्या एखाद्या मित्राची भेट झाली नाही तरी चालेल; पण काही झालं तरी आळंदीला जाऊन यायचंच. आळंदी गावात कार शिरली  तेव्हापासूनच मनात विचारचक्र सुरु झालं. महाराष्ट्रातल्या इतर कोणत्याही धुळीनं भरलेल्या गावासारखंच गाव दिसू लागलं तेव्हा आश्चर्याचा धक्का वगैरे मुळीच बसला नाही. कारण याहून जास्त अपेक्षाच केली नव्हती. पण एवढं मात्र जरूर वाटत होतं की रस्त्यावर दिसणाऱ्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर काही अभिमान दिसेल. आम्ही ज्ञानियांच्या राजाच्या गावचे. गाव धुळीचं असलं तरी आमचं हे वैभव एवढं मोठं आहे की त्यासाठी तुम्हाला इथं यावं लागलं.. इतर गावांना आहे का हे भाग्य? असं काहीतरी हे गाव म्हणेल, असं वाटलं होतं; पण तसं काहीच दिसलं नाही.. तेव्हा मात्र मन थोडं खट्टू झालं; पण मीच मग समाधान करून घेतलं की ‘ अहंकाराचा वारा, न लागो माझिया मानसा ‘ ही प्रार्थना तिथं अनेक वेळा म्हटली गेली असेल, त्याचाच हा कदाचित परिणाम असेल.

     गल्ली – बोळातून कार पुढे चालली होती. अखेर जेव्हा फुलं-माळा, अबीर, गुलाल-प्रसाद या वस्तूंच्या विक्रीची पालं दिसली तेव्हा नक्की जाणवलं की समाधी जवळ आली.. ‘ भाऊ या, साहेब या.. प्रसाद घ्या.. ‘ अशी हाकाटी सुरु झाली. चार दोन पोरं जवळ धावली. वाटलं, ज्ञानियांच्या राजाचा पुण्याईचा यांना मिळालेला वारसा हा एवढाच दिसतोय त्याच्या नावावर. संध्याकाळपर्यंत तीस-चाळीस रुपयांचा व्यापार झाला आणि दहा-पाच रुपये कनवटीला लागले, तर त्यांच्या दृष्टीनं ज्ञानोबा पावला-एरव्ही नव्हे. विचार कसासाच वाटला; पण इलाज नव्हता. मनात आला खरा..

     मी फुलं-माळा काही घेतलं नाही. मला ती घ्यायचीच नव्हती.. चपला कारमध्ये काढून ठेवल्या.. बाहेरच्या नळावर पाय धुतले आणि सरळ समाधी मंदिरातच गेलो..

     जाता-जाता एका पोरानं गाठलंच, ‘ऐकून जा साहेब, असे चला,‘ म्हणत त्यानं माहिती सांगायला सुरूवात केली. बोलावलं नव्हतं तरी आला. अर्थातच शेवटी मी रुपया – दोन रुपये देईन या आशेनं .. काहीतरी सनावळ्या सांगत होता. अर्धवट ऐकत होतो आणि नव्हतोही ..

     सरळ जाऊन समाधीपाशीच उभा राहिलो. एकटक पाहत राहिलो.. ‘ आणि त्यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी या ठिकाणी जिवंत समाधी घेतली.‘ पोरानं सांगितलं – आणि पोराची पुढली वाक्यं ऐकूच आली नाहीत.. एकविसाव्या वर्षी जिवंत समाधी एवढेच शब्द मनात घुमत राहिले.. आणि मन एकदम गलबलून गेलं.

     मनात विचार आला, आपलं आजचं वय छत्तीस.. पंधरा वर्षांपूर्वी आपण एकवीस वर्षांचे होतो.. तेव्हा आपण कुठे होतो? कसे होतो? आपण त्यावेळी समाधी घेतली असती, किंवा साधे सरळ रेल्वेखाली सापडलो असतो, तर पंधरा वर्षांनंतर आपली कोणी नुसती आठवण तरी काढली असती? मनानं उत्तर दिलं .. नाही.. बहुधा कोणीही नाही..

     पोराचं सांगून झालं होतं.. तो पुढं चला म्हणत होता; पण समाधीपासून हलवतच नव्हतं. त्याच्या हातावर तिथंच एक रुपया ठेवला आणि त्याला चालतं केलं. आता मी एकटाच समाधीसमोर उभा होतो.. माझ्या विचारचक्रात अडथळा करणारं कोणी नव्हतं.

     एकदम मनासमोर सातशे आठशे वर्षांपूर्वीं घडलेली ती घटना आणण्याचा प्रयत्न करू लागलो. नक्की काय घडलं असेल? आजही आळंदी १००-१२५ उंबऱ्यांहून मोठी वाटली नाही. त्यावेळी तर ती याहूनही छोटी असेल.. ज्ञानदेवांचं घर नक्कीच मातीचं असेल.. गावात पक्की सडक नसेल.. रस्ते धुळीचे असतील.. गावाला म्हणण्यासारखी अर्थव्यवस्थाच नसेल. एखादं वाण्याचं दुकान.. एखादं भटा-भिक्षुकाचं घर.. आणि इतर कुणब्यांच्या झोपड्या असतील.. बारा बलुतेदारांतले अस्पृश्य गावाबाहेर रहात असतील.. गावात पन्नास-साठ — फार तर शंभर गाई-बैल असतील.. घोडे नसतीलच.. असलाच तर एखादा जमीनदारांचा..

    आणि अशा गावात तो दिवस उजाडला असेल.. नेहमीसारखाच.. गावातल्या कुलकर्ण्यांचा कोणी एक मुलगा काही तरी धार्मिक लिहितोय या पलीकडे कुणाला त्याची खास जाण नसेल..

     पण त्या मुलानं समाधी घेण्याचा निर्णय पूर्वीच जाहीर केलेला असेल.. त्यामुळे त्या दिवसाला थोडंसं अधिक महत्व सगळ्याच गावकऱ्यांच्या दृष्टीनं चढलं असेल.. गावकऱ्यांच्या, अगदी वृद्ध गावकऱ्यांच्याही आठवणीत कोणी समाधी घेतलेली, पाहिली असेल की नाही, याची शंकाच असावी.. तेव्हा या मुलाचं तेवढं कौतुक जरूर असेल.. समाधी म्हणजे एक प्रकारची आत्महत्याच, असा त्या काळाशी विसंगत असा विचार कोणाच्याही मनात आला नसेल.

त्या दिवशी सकाळी कोणीही उठून शेतावर गेलं नसेल.. सगळी इंद्रायणीकाठी जमली असतील आणि सगळी म्हणजे तरी किती ? शंभर-दोनशे -पाचशे माणसं.. फार फार तर आजूबाजूच्या चारदोन गावांतली गावांतली आणखी थोडी, बस!

     आणि तो एकवीस वर्षांचा तेजस्वी मुलगा धीरगंभीर मुद्रा धारण करून, गळ्यात झेंडूच्या फुलांच्या माळा घालून, आपल्या मोठ्या भावाला नमस्कार करून आपल्या लिखाणाचं बाड घेऊन समाधीसाठी खणलेल्या त्या खड्ड्यात उतरला असेल.. ध्यानस्थ बसला असेल.. निवृत्तीनाथांनी फावड्यांनं पहिली माती ढकलली असेल .. ती माती त्यांच्या अश्रूंनी ओली चिंब झाली असेल.. मुक्ता नावाच्या कोवळ्या पोरीनं टाहो फोडला असेल.. कदाचित शेवटच्या क्षणी शोक अनावर होऊन ती समाधीच्या जागेकडे धावलीही असेल..  तिला कोणीतरी ओढून दूर नेली असेल.. तिचं सांत्वन केलं असेल.. ती हमसाहमशी रडत राहिली असेल.. पटापट माती ढकलली गेली असेल.. ज्ञानेश्वरांचा जयजयकार झाला असेल.. पांडुरंगाच्या नावाचा जयघोष झाला असेल.. ( ‘ ज्ञानेश्वर महाराज की जय ‘ असं लोकं ओरडले असतील का?) आणि मध्यान्हीला सगळं सोहळा संपून काहीतरी बोलत बोलत गावकरी आपापल्या घरी परतले असतील.

     सत्यात हे एवढंच घडलं असेल का?

     नक्की काय घडलं नसेल ? दुसऱ्या दिवशी पी. टी. आय किंवा यु. एन. आय. नं न्यूज दिली नसेल.. दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात त्या सोहळ्याचे फोटो आले नसतील.. निवृत्तीनाथांची मुलाखत आली नसेल .. यातलं काहीही घडलं नसेल हे नक्की.. आणि तरीही काहीतरी महान घडलंय याची लवकरच उभ्या महाराष्ट्राला जाणीव झाली असेल.. ती कशी झाली असेल याची कल्पनासुद्धा करता येत नाही.

     ‘माझा मऱ्हाटाचि बोलू कौतुके I परि अमृतातेही पैजा जिंके ‘ हे शब्द त्यावेळी किंवा नंतरही व्यक्ती-व्यक्ती, जमीनदार-कूळ, नवरा बायको फार काय कीर्तनकार, प्रवचनकार यांच्या तोंडून बाहेर पडलेल्या शब्दांतून काहीतरी जास्त पुण्याई घेऊन आले होते. ते इतर शब्दांसारखेच हवेत उच्चारले गेलेले असले तरी हवेत विरून जाणारे नव्हते. इतर शब्दांसारखेच मसीच्या शाईनं लिहिले गेलेले असले तरी नष्ट होणार नव्हते.. ह्या शब्दांचं वजन, पुण्याई एवढी होती की शतकांच्या धुळीखालीही ते गाडले जाणार नव्हते.. तो एक हुंकार होता.. शब्दाच्या सुरवातीच्या ओंकारासारखा. ती एक भाषेची, बंडाची ललकारी होती.

     समाधीतून मी बाहेर पडलो आणि पुन्हा त्या पोरानं मला गाठलेच. एक रुपया मिळाल्यावरही उरलेली माहिती सांगायची आपली जबाबदारी आहे, असं वाटण्यात त्याचा प्रामाणिकपणा दिसून येत होता.

     प्रदक्षिणा सुरु केली आणि मग प्रदक्षिणेत त्यानं इतर सगळी माहिती पुरवली. अजवृक्ष ! त्याची ज्ञानेशांच्या गळ्याला लागलेली मुळी .. ज्येष्ठ वद्य अष्टमीला आळंदीहून वारीची पालखी निघते तेव्हा ‘ टाटा ‘ करून हात हलवणारा समाधीवरचा सोन्याचा कळस.. श्री ज्ञानेशांच्या आईनं सव्वा लक्ष प्रदक्षिणा घातलेला हजार वर्षांहून जुना सुवर्ण पिंपळ.. त्यानं बिचाऱ्यानं सारं सारं दाखवलं. मीही पाहिलं, ऐकून घेतलं.

     आता परत फिरायचं होतं. तेवढ्यात पुन्हा समाधीच्या आतल्या भागातून स्वच्छ, सुरेल शब्दांत पाच-पंचवीस स्त्रियांनी सामूहिकपणे पसायदानाच्या ओव्या म्हटल्याचा आवाज ऐकू आला. पसायदान आपण पाठ करायचं असं बरेच दिवस मनाशी घोळत होतो; पण ते अजून जमलं नव्हतं ज्ञानेश्वरांच्या समाधीपाशीच पसायदानाच्या ओव्या ऐकू येऊ लागल्यावर पुन्हा एकदा पाय समाधी मंदिरात वळले.

     त्या स्त्रिया कोणत्यातरी अनाथाश्रमातल्या असाव्यात. रांगेने खाली जमिनीवर बसून त्या स्पष्ट शब्दांत पसायदान म्हणत होत्या. तिथंच टेकलो. आयुष्यभर ज्याच्या वाट्याला उपेक्षा आणि अवहेलना आली त्या मुलानं जीवित कर्तव्य संपताना त्या आयुष्यासंबंधी मनात थोडाही कडवटपणाचा भाव न ठेवता ‘ जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात ‘ अशी प्रार्थना करावी, ही मनाची केवढी उन्नत अवस्था आहे ! आणि त्या ओव्या मला ऐकायला मिळत होत्या अनाथाश्रमातील स्त्रियांच्या तोंडून ! पसायदान म्हणून झाल्यावर त्या स्त्रियांनी हात जोडले आणि माझेही हात आपोआप नकळत जुळले.. मनाचं विरेचन, शुचिर्भवनच झालं होतं ! कारण एरवी अगदी देवळातही मी सहसा मनापासून हात जोडीत नाही.

     परत कारमध्ये येऊन बसलो. कार सुरू झाली तरी मनातले विचार मनात रेंगाळत राहिले. मनात सारख्या दोन विभूती येत होत्या. सोळा वर्षांचा ज्ञानेश्वर आणि त्याच्या नंतर साडे चारशे-पाचही वर्षांनी जन्माला आलेला सोळा वर्षांचा शिवबा.. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरचं वारं पिऊन एवढ्या लहान वयात या दोन पोरांच्या मनात केवढे युगप्रवर्तक विचार उगवले होते ! एकानं संस्कृतीची मिरासदारी मोडून काढली होती तर दुसऱ्यानं जुलमी मुसलमानी राज्याचं कंबरडं मोडलं होतं.

     सोळा वर्षांच्या ज्ञानेश्वराला हे माहीत ही नव्हतं किंवा त्यानं असा विचारही केला नसेल की आपण आज जे लिहीत आहोत त्याचा पुढं हजारो वर्ष अभ्यास होणाराय !

     स्वतः मीही काही किडूक-मिडूक लिहितो आणि लिहितो त्याचा अभिमानही बाळगतो. ज्ञानेश्वरांच्या समाधीपाशी तो गळून पडला. आणि मग मनात विचार आले, आपण लिहतो ते वाङ्मय आपल्या काळातही सगळी माणसं वाचीत नाहीत. आपल्या पाठीमागे तर ते विसरलेच जाईल. हजारो वर्षे टिकेल असं अक्षर वाङ्मय ज्ञानेशांचं.. आपण करतो ती नुसती बोरूबहाद्दरी, हे पटलं. पण हे पटत असतानाच त्या विचारांशी विसंगत असा आणखी एक विचार मनात येत होता की जे काही विचार मनात येत आहेत ते कागदावर उतरवावेत. एखादा बऱ्यापैकी वाचनीय लेख होईल पण स्वतःच्या वाङ्मयाचा टिकाऊपणा (?) लक्षात आल्यावर वाटलं .. छे, लिहूच नये.

     हा विचार मनात येतोय न येतोय तोच जाणवलं. पाठीवर कोणीतरी हात फिरवला. मी तो स्पर्श ताबडतोप ओळखला. तो श्री ज्ञानेशांचाच स्पर्श होता.. ते सांगत होते – अरे, ‘ राजहंसाचे चालणे I भूतळीं जालिया शाहाणे I आणिके काय कोणें I चालावेचि ना ?’

— घरी आलो. कागद पुढे ओढले आणि लिहायला सुरुवात केली ….

———- ००००० ———-
– कै. लक्ष्मण लोंढे 
प्रेषक :  स्वाती लोंढे 
swatilondhe12@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
शुभकामनाएँ 
उर्दू कविता – मराठी अनुवाद 
श्री. असर सत्तार ए. बी. शेख – सौ. स्वाती वर्तक  
चाक दामनों की तुरपाई करने के लिए दिवाली का मौसम कितना सुहाना होता है ।
वक़्त की टहनी पर बैठी हुई एक नन्हीं सी चिड़िया
शबनमी रोशनी की बूंदों को अपनी चोंच में पकड़कर
लम्हों की मुंडेर पर रखे हुए दीये की मिट्टी में
कुछ ऐसे अंदाज़ से उतरती है कि चारों दिशाओं में फैले हुए
नफरतों के अंधियारे दूर बहुत दूर चले जाते हैं
ये उजाले के हाले हमारे इख्तियार में तो हैं
आओ इन्हें समेटकर दीपावली की मुबारक़बाद देने में
कितनी पाकीज़गी होगी ।
@
सहने गुलशन में यह दीया ऐसे जलता है कि
पागल सी हवायें भी इसके मिजाज़ का कुछ बिगाड़ नहीं सकती.
क्योंकि यह ज्योत हथेलियों पर सजधज कर
मोहब्बतों का पैग़ाम लिख देती है
इन सपनों की ताबीरों को बाँटना
हमारे इख्तियार में तो है
आओ इन ख़ुशियों के पलों को हम
माहौल से चुराकर दीपावली की शुभकामनाएँ
तुम्हें दे ही डालते है ।
@
पल पल महकता आँचल
लहराता है वादियों में
इसे कुछ देर हाथों की कोरों से पकड़कर
एक सुई के माथे में
अमन का धागा पुरोकर
इसपर गुलबूटे बनाना ,हमारे बस में तो है
और माज़ी की तल्ख़ियों को भूलाकर
दिलों के चाक दामनों की तुरपाई करते रहिये
उजाले की सरहदें नहीं होती
इसी वज़ह कायनात के जजीरों में इसे बिखेरियें
यह नेक काम करने में इतनी देरी क्यों बरत रहे हों
यह भी तो हमारे इख़्तियार में है ना ?
@
कवी – श्री. असर सत्तार ए. बी. शेख
वान्द्रे (पश्चिम)
मुंबई ४०० ०५०
@@@
शुभेच्छा
———-
वेळेच्या फांदीवर बसलेली ती लहानशी चिमणी
पहाटेच्या दंवाचा प्रकाश आपल्या चोचीत धरून
क्षणांच्या वरवंडीवर ठेवलेल्या पणतीच्या मातीत
अशी काही अलगद टेकते की चारी दिशांना
पसरलेला काळोख दूर खूप दूर निघून जातो
या, साऱ्यांनो, याच क्षणांना टिपू या
आणि दिवाळीच्या शुभेच्छा देऊ या
किती सुंदर असतील त्या शुभेच्छा
किती पावित्र्य असेल त्यांच्यामध्ये
@
उपवनातील शिवारात ती पणती अशी काही तेवते
की वेडी वावटळ देखील तिची ऐट मोडू शकत नाही
कारण ती मंद तेवणारी ज्योत करतली नटून थटून
लिहीत असते सदैव प्रेमाचा संदेश ,
त्या स्वप्नांचे अर्थ, शुभाशुभ फल
सर्वांना वाटणे तरी निदान आपल्या हातात आहेत ना ?
तेवढा तरी आपला आवाका आहे ना ?
या, साऱ्यांनो, हे आनंदाचे क्षण, आसमंतातून
वेचून घेऊ या आणि
देऊन टाकू या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा
@
क्षणोक्षणी दरवळणारा पदर
फडफडतोय दऱ्या खोऱ्यांमध्ये
काही क्षण धरू या त्याला
आपल्या बोटांच्या पेराने
एका सुईच्या नेढ्यात, ओवून शांतीचा दोर
गुंफूया स्नेहाची वीण
ते नक्षीकाम करणे तर आपल्या हातात आहे ना ?
@
भूतकाळातील त्या कटू आठवणी विसरू या
हृदयातील उसवलेल्या नक्षीवर टीप घालू या
प्रकाशाला नसते कोणाची तमा, कोणतीही सीमा
म्हणूनच उजळू दे तो, या भव्य सृष्टिमध्ये
आणि हे शुभ कार्य करण्यासाठी वेळ का दवडता ?
तो तर आमच्या कुवतीच्या बाहेर नाही ना ?
आहे न ते आमच्याच हातात ?
आहे ना ते आमच्या आवाक्यात ?
देऊ या वेळेवर दिवाळीच्या शुभेच्छा
सुंदर, पावन, शिव, पवित्र शुभेच्छा
@@@
– अनुवाद : सौ. स्वाती वर्तक 
swati.k.vartak@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

 

ऑलिम्पिकची नवलकथा 
 
कै. भानू शिरधनकर  
(३)

     प्राचीन काळी ग्रीस देशात या क्रीडास्पर्धा कशा होत असत याबद्दल थोडीफार कल्पना तत्कालीन  लेखक, कवींच्या काव्यातून व आता झालेल्या उत्खननातून आपल्याला येऊ शकते. झ्यूस राजाची पवित्र आंबराई अल्टीस ही लंब चौकोनात्मक होती. तिच्या एका बाजूला डोंगरांची रांग आणि दक्षिणेकडे नद्या होत्या. पूर्वेच्या बाजूला घौड मैदान होते व तेथे घोड्यांचे खेळ व शर्यती होत. खुद्द स्टेडियम संगमरवरी दगडांचा बांधलेला होता. प्रेक्षागृहात ६० हजार प्रेक्षक बसू शकत. खेळांच्या मैदानावर प्रेक्षकांना जाण्यास मज्जाव होता. फक्त खेळाडू, पंच व समीक्षक यांनाच तिथे जात येत असे. झ्यूस देवीच्या मूर्तीसमोर उभे राहून खेळाडूंना व पंचांना शपथ घ्यावी लागे. ‘आम्ही खोटा खेळ करणार नाही, आम्ही खोटा निकाल देणार नाही.’ त्या प्राचीन काळीसुद्धा ग्रीस देशात खेळाडूंच्या शिक्षणाकडे, स्वास्थ्याकडे, खुराकाकडे जे लक्ष देण्यात येत असे ते मोठे उल्लेखनीय असे. अमेरिकेसारख्या सुधारलेल्या राष्ट्रातसुद्धा १९१८ ते १९४२ सालच्या कालखंडापर्यंत खेळाडूंची व त्यांच्या तब्येतीची इतकी काळजी घेण्यात येत नव्हती.

     आता प्राचीन अवशेषांच्या उत्खननातून आपल्याला जी माहिती उपलब्ध होत आहे त्यावरून असे दिसून येते की त्या खेळाडूंचा दैनंदिन कार्यक्रम अगदी सकाळीच सुरू होई आणि तो सायंकाळी फार उशीरापर्यंत चालू राहात असे. सकाळी आंबोळ्या ( आंबवलेल्या पिठाच्या भाक-या ) व द्राक्षांचा रस यांची त्यांना न्याहरी मिळे. मग व्यायामाला व खेळांच्या सरावाला सुरवात होई. तीमध्ये खंड न घेता जेवणाच्या वेळेपर्यंत चालू राही. दुपारी जेवणानंतर पुन्हा खेळांच्या सरावाला सुरवात होई व नंतर भरपूर जेवण मिळे. भाज्या, फळे आणि भरपूर लोणी व चीझ देण्यात येई. पुढेपुढे मासे आणि मटणही देण्यात येऊ लागले. मिलो आणि थिऑजिनस नावाचे त्या वेळचे दोन मोठे कुस्तीगीर व मुष्टियोद्धे होते. ते एका बैठकीत एकेक जण आख्या बोकडाचे मांस फस्त करत असत. यात कदाचित अतिशयोक्ति असेल. पण अतिशयोक्ति तरी कसली ? अलीकडे किंगकाँग सिलीसमारा वगैरे खेळाडूंच्या प्रचंड आहाराबद्दल अशीच माहिती आपण वाचली नव्हती काय ? ते काही असो. पण एवढी माहिती मात्र खास उपलब्ध आहे की ते प्राचीन खेळाडू एका वेळी ६ पौंड मांस सहज खात असत. पण थंडगार पेय व मादक अंमली पेये पिण्यास मात्र सर्व खेळाडूंना मनाई असे.

     त्या प्राचीन काळातसुद्धा विश्वक्रीडा स्पर्धांतून अनेक खेळाडू विक्रम करून जात असत. इ. स. पूर्व सातव्या शतकाच्या मध्यावर चिओनीस नावाच्या एका विक्रमवीराने २३ फूट १ १/२ ( दीड ) इंच लांब उडी मारून विक्रम केला होता. आजच्या प्रमाणातसुद्धा हा विक्रम उल्लेखनीय नाही असे कोण म्हणेल? या नंतरच्या काळातील विक्रमवीरांची नावे इतिहासात नमूद आहेत. अशा विक्रमवीरांना त्या काळी ऑलिव्ह पर्णाच्या माळा व चक्र घालून त्यांचा गौरव करण्यात येई. पण पुढेपुढे किंमती बक्षिसे देऊन गौरव करण्याची प्रथा पडली व त्यामुळेच या पवित्र स्पर्धांमध्ये लाचलुचपत व लबाड्यांना सुरुवात झाली.

     त्या काळी ध्वजज्योती मोठ्या मिरवणुकीने क्रीडांगणावर नेण्याची प्रथा होती. ऑलिम्पिया येथील प्राचीन क्रीडांगणावर अंतर्वक्र असलेल्या काचेच्या नगा-यासारखा दिसणारा मोठा आरसा ठेवण्यात येई. त्यावर सकाळच्या वेळचे सूर्यकिरण पाडण्यात येत. आरशासमोर खेळाडूंपैकी एक स्पार्टन तरुणी गुडघे टेकून बसे. तिच्या हाती लाकडी दांडी बसवलेली कपड्याची वात असे. आरश्यातून परावर्तित होणारी जळजळीत सूर्यकिरणे या वातीवर पाडण्यात येत आणि थोड्याच वेळात ती वात प्रज्वलित होई. ती ठेवू लागताच दुसरी तरुणी आपल्या हातातील काचपात्रात ती तेवती वात धारण करी आणि तेथून अल्फीयस नदीच्या काठी असलेल्या पांढ-या संगमरवरी क्रीडा मंदिराकडे ती ज्योत मिरवणुकीने नेण्यात येई.

     क्रीडा मंदिरात तयारीने उभे असलेले ३७० संदेशवाहक, त्या वातीवर आपली ज्योत पेटवून घेत असत आणि मग संदेशवाहकाचा तो तांडाच्या तांडा अथेन्स शहराकडे चालू लागे. ते दृश्य मोठे अविस्मरणीय असावे.

     ध्वजज्योतीची ती प्राचीन प्रथा १९३६ साली जर्मनीने बर्लिनच्या महोत्सवात पुन्हा पुनरुज्जीवीत केली. तेव्हापासून ही ध्वजज्योत एका क्रीडाक्षेत्रापासून दुस-या क्रीडाक्षेत्राकडे धावून नेली जाते. बर्लिनहून लंडन, लंडनहून हेलासिंकी, तिथून मेलबोर्न व मेलबोर्नहून रोम अशी ती ध्वजज्योत प्रयाण करत असते. प्रचार व चैतन्य या दृष्टीने ध्वजज्योतीचे महत्त्व असामान्य असते. १९३७ सालच्या फैजपूर काँग्रेसच्या वेळी अशी तेवती ध्वजज्योती मुंबईहून फैजपूरपर्यंत स्वातंत्र्यवीरांनी धावून नेली होती. जनमानसावर तिचा प्रभाव केवढा पडतो हे त्या वेळी पाहिलेले अनेक लोक असतील.

     इ. स. ३९४ साली रोमन सम्राट थिओजीसिएल  याने जागतिक क्रीडा स्पर्धा संपुष्टात आणल्यानंतर, काही काळातच उत्तरेकडील काही रानटी हल्लेखोरांनी ऑलिम्पिया क्रीडा क्षेत्रावर हल्ले चढवून त्यांनी त्या क्षेत्राचा नाश करून टाकला. त्यानंतर रोमन लोकांनीही त्या क्रीडांगणाचा व तेथील देवळांचा नाश केला. त्यानंतर त्याच प्रदेशात दोन प्रचंड भूकंप घडून आले. त्यामुळे आफीयस व क्लॉडियस या नद्यांनी आपली पात्रे व प्रवाह बदलले आणि त्या पुराखाली ऑलिम्पियाचे प्राचीन क्रीडांगण, रेती दगडांच्या आच्छादनाखाली गाडले गेले.

     सुमारे १३०० वर्षे लोटली आणि १८२९ साली फ्रेंच सरकारने आणि नंतर १८७५ साली जर्मन सरकारने त्या प्राचीन क्रीडाक्षेत्रांचे उत्खनन सुरू केले. १८८१ साली उत्खननाचा कार्यक्रम पूर्ण झाला आणि त्यातून पुराणवस्तू संशोधकांना आणि इतिहासतज्ज्ञांना प्राचीन ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या वैभवाचे दैदिप्यमान असे दर्शन घडून आले. त्यातूनच पुढे त्या प्राचीन क्रीडाक्षेत्राचे पुनरुज्जीवन घडवून आणण्याची कल्पना ग्रीसमध्ये व इतरत्रही जीव धरू लागली.

– कै. भानू शिरधनकर 
( ‘ऑलिम्पिकची नवलकथा’ या पुस्तकातून संक्षिप्त साभार )

@@@