शोध दिशाकाकचा

स्वागत फुलांनी

डॉ. उमेश करंबेळकर  
दिशाकाकचा उल्लेख प्रथम डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे यांच्या ‘महाराष्ट्र संस्कृती’ या ग्रंथात वाचनात आला. त्यानंतर डॉ. म. के. ढवळीकर यांच्या ‘कोणे एके काळी सिंधु संस्कृती’ या ग्रंथात दिशाकाकसंबंधी अधिक सविस्तर खालील माहिती मिळाली.

सिंधु संस्कृतीच्या काळात, साधारणतः इ.स.पूर्व २५०० पासून समुद्रांतर्गत व्यापारास चालना मिळाली. त्यामुळे समुद्रकिनारी प्रदेशात वसाहती स्थापन झाल्या. अर्थात त्या काळी खलाशांकडे होकायंत्र नसल्यामुळे नौका किनाऱ्यापासून फारशा दूर जात नसत. परंतु वाऱ्यामुळे जहाजं भरकटली आणि जमिनीपासून दूर गेली तर जमीन शोधण्यासाठी व्यापारी आपल्याबरोबर पिंजऱ्यातून कावळे नेत. त्यांना मोकळे सोडल्यावर ते उडत उडत जमिनीच्या दिशेने जात. हे कावळे म्हणजेच दिशाकाक.

मोहेंजोदरो येथे एक वैशिष्ट्यपूर्ण मुद्रा सापडली आहे. त्या मुद्रेवर नौकेचं चित्र आहे आणि नौकेच्या वरच्या बाजूस दोन कावळे म्हणजेच दिशाकाक आहेत. याला पुष्टी देणारा पुरावा एका बौद्ध जातक कथेत आढळतो. ‘बव्हेरू जातक’ या कथेत भारतीय व्यापारी बव्हेरू देशाला जाताना दिशा दाखवण्यासाठी बरोबर कावळे नेत असल्याचं त्यात वर्णन केलं आहे.

हे वाचल्यानंतर दिशाकाक म्हणजे साधा कावळा (House Crow) की वेगळ्या प्रजातीचा कावळा असा प्रश्न मनात निर्माण झाला कारण साधा कावळा समुद्रावरून जमीन शोधून काढू शकेल का याबाबत संदेह होता.

त्यामुळे दिशाकाकचा शोध घेण्याची ईच्छा मनात निर्माण झाली. नंतर त्या दृष्टीने शोध सुरू केला.

प्रथम दिशाकाकचा उल्लेख प्राचीन संस्कृत वाङ्मयात आहे का याचा शोध घेतला, तेव्हा  हंसदेव मुनीच्या ‘मृगपक्षिशास्त्र’ या ग्रंथात वर्णिलेल्या बारा प्रकारच्या कावळ्यांमध्ये दिशाकाकचा समावेश आढळला नाही.
– के. एन्. दवे ( १८८४-१९८३ ) यांच्या ‘बर्ड्स इन संस्कृत लिटरेचर’ या ग्रंथातही दिशाकाकचा उल्लेख नाही. दवे हे तरुण वयात पक्षी अभ्यासक होते व त्यांचा पाली व संस्कृत भाषेचा गाढा अभ्यास होता.
– पुण्याच्या डेक्कन कॉलेजातील स्क्रिप्टोरियममध्ये संस्कृत भाषेतील जवळ-जवळ सतराशे ग्रंथांमधील शब्दांचे संदर्भ मिळतात. तेथेही दिशाकाकसंबंधी एकही संदर्भ आढळला नाही.
यावरून दिशाकाक हा मूळ संस्कृत शब्द नाही हे स्पष्ट झालं.

दिशाकाकचा उल्लेख जातक कथांमध्ये आहे. जातक कथा पाली भाषेत आहेत. म्हणून ज्या बावेरू जातक कथेत दिशाकाकचा उल्लेख आहे ती मूळ पाली भाषेतील कथा शोधली. ह्या कथेची सुरुवात,’ तदा एकच्चे वाणिजा दिसाकाकं गहेत्वा नावाय बावेरू रट्टं अगमंसु ‘| अशी आहे. तेथे दिसाकाक असा शब्द होता. ज्येष्ठ विदुषी दुर्गा भागवतांनी जातक कथांचं मराठी भाषांतर करताना दिसाकाकचं ‘दिशाकाक’ असं रुपांतर केलं. त्यांमुळे दिशाकाक हा संस्कृत शब्द असावा असा ग्रह निर्माण होतो.

दिशाकाक हा कोणत्या प्रजातीचा कावळा होता याचा शोध घेण्यासाठी दोन मार्ग होते.
१ – मोहेंजोदडो येथे आढळलेली दिशाकाकची मुद्रा पाहणं.

२ – बावेरू जातक या कथेतील दिशाकाकच्या वर्णनावरून शोध घेणे.
दिशाकाकची मुद्रा – ही मुद्रा ‘ट्रेडिंग शिप विथ कंपास बर्ड’ या नावाने प्रसिद्ध आहे. जोनाथन मार्क केनॉयर यांच्या ,इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, या ग्रंथात या मुद्रेचं छायाचित्र आहे.

मूळ मुद्रा जेमतेम ३ इंच लांबीची आहे. त्यावर सपाट तळ असलेली नाव, नावेच्या बाजूला दोन दांड्याचं सुकाणू, मध्ये दोन खांब असलेली छोटी झोपडी, खांबाच्या टोकाला पानांची डहाळी आणि नावेच्या काठावर बसलेले दोन पक्षी असं चित्र आहे.

पुरातत्व शास्त्राच्या दृष्टीने या मुद्रेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण अशा प्रकारची ती एकमेव मुद्रा आहे. त्या काळचे व्यापारी समुद्रप्रवास करताना बरोबर दिशाकाक नेत असा जो जातक कथेत उल्लेख आढळतो त्याला पुष्टी देणारा पुरावा म्हणून या मुद्रेकडे पाहिलं जातं.

परंतु तिचा अगदी छोटा आकार आणि पक्ष्याची ओळखण होईल अशा कोणत्याही वैशिष्ट्याचा अभाव यामुळे दिशाकाकची ओळख होण्यासाठी तिचा कोणताही उपयोग झाला नाही.

बावेरू जातक कथेतील दिशाकाकचं वर्णन ज्या बावेरू जातक आलं आहे, ती कथा थोडक्यात अशी, एकदा वाराणसीचे व्यापारी दिशाकाक घेऊन बावेरू राष्ट्राला गेले. त्यावेळी बावेरूमध्ये पक्षी नव्हते. पिंजऱ्यातला काळा, तुकतुकीत त्वचेचा, गळ्यापर्यंत चोच आणि मण्यांसारखे डोळे असलेला तो पक्षी बघून तेथील लोकांना नवल वाटलं. त्यांनी तो पक्षी शंभर कार्षापणाला विकत घेतला. त्या लोकांनी दिशाकाकला सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवलं. त्याला मांस, सागुती,फळं, मध व साखर खायला दिली. पुढल्या खेपेस व्यापाऱ्यांनी आपल्या बरोबर मोर नेला. मोराला बघून बावेरूचे लोक आनंदाने वेडेच झाले. त्यांनी एक हजार कार्षापणास मोर विकत घेतला. तेव्हापासून दिशाकाककडे त्यांचं दुर्लक्ष झालं.

याशिवाय ‘धम्मसिद्ध जातक’ या कथेतही दिशाकाकचा उल्लेख आहे. तो उल्लेख असा, एकदा वाराणसीचे व्यापारी दिशाकाकला घेऊन समुद्र प्रवास करत असताना नाव फुटते. दिशाकाक एका बेटावर पोहोचतो. तेथे लहान सहान पक्ष्यांची असंख्य घरटी होती.दिशाकाक कपटाने घरट्यातील अंडी व पिलं खाऊ लागला.

येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, जातककथा जरी गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मांवर आधारित असल्या तरी त्यांच्याकडे केवळ धार्मिक कथा ह्या दृष्टिकोनातून पाहिलं जात नाही. ह्या कथांमध्ये त्या काळातील सामाजिक परिस्थितीचं, रीती-रिवाजांचं तसेच भौगोलिक परिस्थितीचंही यथार्थ चित्रण केलेलं आढळतं. त्यावरून त्या काळच्या भारतवर्षाच्या इतिहासाचंही ज्ञान होतं. उपलब्ध ५४४ जातक कथांवर बरंच संशोधन झालं आहे. त्यावरून पुढील गोष्टी स्पष्ट होतात.

– बावेरू म्हणजे त्या काळचा डिलमून प्रदेश आणि आजचे बहारिन राष्ट्र हे आज सर्वमान्य झालं आहे. बहारिन हे पश्चिम आशियातील राष्ट्र असून ते तेहतीस बेटांच्या समूहाने बनलं आहे. त्यातील तीन-चारच बेटं मोठी असून त्यांच्यावर वस्ती आहे. मुख्य बेट म्हणजे वाळवंटी प्रदेशच आहे. त्यावर पाच कि.मी.च्या पट्ट्यात काटेरी झुडपं, खजूर, डाळिंब आणि अंजीर एवढ्य़ाच वनस्पती आहेत. बाकीची बेटं निर्मनुष्य असून त्यावर स्थलांतरित पक्ष्यांच्या वसाहती आहेत. येथील समुद्रात अनेकदा वेगवान वारे वाहतात.

यावरून ‘बावेरू राष्ट्रात त्यावेळी पक्षी नव्हते’ असं जे कथेत वर्णन आहे त्याची सत्यता पटते. पक्षी आणि वनस्पती याचं अतूट नातं असतं. रुक्ष वाळवंटी प्रदेशात झाडी नसल्यामुळे पक्षी मुळातच कमी आढळतात. तसेच मोर हा भारतातूनच युरोपात गेला हेही आता सिद्ध झालं आहे. धम्मसिद्ध जातक कथेतील ज्या बेटावर दिशाकाक गेला ते बहारिनच्या छोट्या तीस बेटांपैकी एखादे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

– त्या काळी वाराणसी व्यापाराचं मुख्य केंद्र होतं आणि तेथून पूर्वेकडे ब्रह्मदेश. इंडोनेशिया इ. तर पूर्वेकडे बहारिनपर्यंत व्यापारी जात असत. वाराणसीच्या व्यापारी मार्गांची माहिती मोतीचंद्रांच्या ‘सार्थवाह’ ह्या ग्रंथात मिळते. ह्या ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला असून मो.कृ.पारधी यांनी त्याचा मराठी अनुवाद केला आहे. सार्थ म्हणजे व्यापाऱ्यांचा तांडा म्हणजेच कॅरॅव्हान. तांड्याचा प्रमुख म्हणजे सार्थवाह. त्या काळी वाराणसीहून चार महामार्ग निघाले होते. त्यातील एक पश्चिमेला भरुकच्छला गेला होता.एका जातक कथेत साठ योजनं विस्तार असलेल्या वाळवंटाचा उल्लेख आहे. हे वाळवंट म्हणजे राजस्थान आणि सिंधमधील वाळवंट होय. तसंच भरुकच्छ म्हणजे आजचं भडोच होय.

पूर्वेकडील देशात प्रवासाला जाताना व्यापारी गंगानदीतून नावेने जात. तर पश्चिमेकडील राष्ट्रांना जाताना व्यापारी वाराणसीहून खुश्कीच्या मार्गाने प्रथम भरूकच्छला जात व तेथून समुद्रप्रवास करत. अहमदाबादपासून सुमारे ८० कि.मी. अंतरावर असलेल्या लोथल या गावी जहाज दुरुस्तीसाठी मोठी गोदी होती.

– समुद्रप्रवासाला निघताना व्यापारी दिशाकाक बरोबर घेत. त्यामुळे दिशाकाक हा कच्छ व सिंध या प्रांतातला कावळा असावा असा निष्कर्ष काढता येतो.

– जातककथेतून दिशाकाकची जी माहिती मिळते ती अशी – दिशाकाक हा सर्व भक्षी, छोट्या पक्ष्यांची शिकार करणारा, ताकदवान, धूर्त, बुद्धीमान असा कावळ्याच्या कुलातील पक्षी होता. त्याचा रंग काळा, त्वचा तुकतुकीत, गळ्यापर्यंत चोच आणि डोळे मण्यांसारखे होते. तो सिंध व कच्छ ह्या भागात आढळणारा होता.

यानंतर दिशाकाकचं हे वर्णन मृगपक्षिशास्त्रात वर्णन केलेल्या कावळ्याच्या कुठल्या प्रजातीशी जुळतं ते पाहिलं. मृगपक्षिशास्त्रात कावळ्याचे – ‘काक, करट, बलिपुष्ट, सकृत्प्रज, ध्वांक्ष, आत्मघोष, परभृत, वायस, चिरंजीवी, मौकुली, द्रोणकाक आणि काकोल’ असे बारा प्रकार सांगितले आहेत.

ह्या बारा प्रकारांपैकी ध्वांक्ष (रंग निळा), परभृत ( नीलवर्ण, पंखांचे टोक पांढरे ), चिरंजीवी (कंठ,छाती व पंख पांढरे), मौकुली (लहान आकार, काळ्या पांढऱ्य़ा रंगाचे), बलिपुष्ट (लहान चोच, पोट व पुच्छ लहान), करट (लहान चोच ) ह्या कावळ्य़ांचं  वर्णन दिशाकाकशी जुळत नाही.

बाकीच्या सहा प्रकारांपैकी काक ( काळेकुट्ट, लांब चोच, समुहाने राहणारे, भित्रे ), सकृत्प्रज ( उंच देहाचे, एकदाच अंडी घालणारे ), आत्मघोष ( सरस्वती तीरावर घरटी करणारे, गोड आवाजाचे), वायस ( काळे, प्रेताचे मांस खाणारे, बैलाच्या पाठीवर बसणारे), द्रोणकाक ( देहाने मोठे, मोठी चोच, विशाल पंख, निर्भय, लहान पक्ष्यांचा द्वेष करणारे) आणि काकोल (कोकोल पर्वताजवळ राहणारे) असे आहेत.

ह्या सहा प्रकारच्या कावळ्यांचं दिशाकाकशी काही ना काही बाबतीत साम्य आढळतं. परंतु बारकाईनं पाहिल्यास द्रोणकाकचं दिशाकाकशी जास्त साम्य दिसतं. त्यावरून दिशाकाक म्हणजे मृगपक्षिशास्त्रात वर्णन केलेला द्रोणकाक हे स्पष्ट झालं.

यानंतर पक्ष्यांच्या आधुनिक वर्गीकरणानुसार दिशाकाकचे कावळ्याच्या कोणत्या प्रजातीशी साम्य आढळतं, याचाही शोध घेतला त्यासाठी ग्रिमिट आणि इन्स्किप यांच्या पुस्तकाचा आधार घेतला. ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात भारतीय उपखंडात आढळणाऱ्या प्रत्येक प्रजाती,उप-प्रजातीच्या पक्ष्याचं रंगीत चित्र आणि वर्णन आहेच शिवाय त्यांची व्याप्ती(distribution) दाखवणाऱ्या नकाशांच्या प्लेट्सही आहेत.गंमत म्हणजे कावळ्याच्या कॉर्व्हिडी कुलातील पक्ष्यांची संख्या बारा म्हणजेच मृगपक्षिशास्त्रातील कावळ्यांच्या संख्येएवढीच आहे. अर्थात हा निव्वळ योगायोग आहे.

कॉर्व्हिडी कुलातील ब्लॅक बिल्ड मॅग पी, ह्यूमचा ग्राउंड पेकर, स्पॉटेड नट क्रॅकर, रेड बिल्ड चोफ्स आणि यलो बिल्ड चोफ्स हे पक्षी रंगरुपाने दिशाकाकपेक्षा खूपच भिन्न दिसतात. रुक आणि कॅरिआन क्रो हे हिवाळी स्थलांतरित पक्षी आहेत. युरेशियन जॅक डो हा आकाराने लहान असून त्याचा डोक्याचा आणि मानेचा भाग तसेच बुबुळही करड्या रंगाचे असतं. त्यामुळे ह्यापैकी कोणी दिशाकाक असू शकत नाही हे लक्षात आलं.

उरलेले चार प्रकार म्हणजे हाउस क्रो, लार्ज बिल्ड क्रो (म्हणजेच जंगल क्रो), ब्राऊन नेक्ड रेव्हन आणि कॉमन रेव्हन (COMMON RAVEN). दिशाकाक यापैकी कोणता तरी एक असू शकतो हे ध्यानात आलं.

हाउस क्रो संपूर्ण भारत आणि पाकिस्तानात आढळतो. लार्ज बिल्ड क्रो कच्छ, गुजरात आणि राजस्थान वगळता संपूर्ण भारतात आढळतो पण पाकिस्तानच्या उत्तर भागातच आढळतो. ब्राऊन नेक्ड रेव्हन भारतात आढळत नाही आणि पाकिस्तानच्या पश्चिम भागातच आढळतो. कॉमन रेव्हन हिमालयात उंचावर, कच्छ, राजस्थान व पाकिस्तानच्या सिंध प्रांतातच आढळतो. उर्वरित भारतात आढळत नाही. पुस्तकातील प्लेट क्र.९१ वरून ह्याचा अंदाज येतो.

कॉमन रेव्हन

दिशाकाकची मुद्रा हडप्पा येथे आढळली. त्यामुळे सिंध व कच्छ प्रांतात आढळणारा कावळाच दिशाकाक असू शकतो. त्यामुळे लार्ज बिल्ड क्रो आणि ब्राऊन नेक्ड रेव्हन हे पक्षी बाद केले आणि कॉमन क्रो म्हणजेच हाऊस क्रो व कॉमन रेव्हन हे दोनच पक्षी उरले.

क़ॉमन क्रो सर्वांनाच माहित आहे.पण कॉमन रेव्हन हा पक्षी आपल्या भागात आढळत नसल्यामुळे त्याची माहिती अनेकांना नसते. क़ॉमन रेव्हन हा पक्षी कॉमन क्रो पेक्षा बराच मोठा म्हणजे ६३ सें.मी. एवढा असतो. संपूर्ण उत्तर गोलार्धात तो आढळतो. भौगोलिक प्रदेशानुसार त्याच्या काही उप-प्रजाती आहेत. त्यातील C.C.CORAX  ही उप-प्रजाती पाकिस्तान आणि भारताच्या वायव्य भागात आढळते.

ह्या पक्ष्याचं आयुष्य साधारणतः पंधरा वर्षे एवढं असतं. इतर कावळ्यांप्रमाणेच हा सर्वभक्षी आहे. धान्य,फळं, मांस,छोटे पक्षी,अंडी,किडे,सरडे असं सर्व काही त्याला चालतं.
ह्या पक्ष्य़ाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा मेंदू. पक्षी जगतातील सर्वांत मोठा मेंदू म्हणून त्याची गणना होते. त्यामुळे हा पक्षी अत्यंत बुद्धीमान आहे. अनेक पक्षी ट्रायल ऍंड एरर पद्धतीने समस्यांची उकल करतात परंतु रेव्हन पक्षी डोकं लढवून एका प्रयत्नातच समस्या सोडवतो असं काही प्रयोगातून सिद्ध झालंय.
एकंदरीत दिशाकाकची वैशिष्ट्यं कॉमन क्रोपेक्षा कॉमन रेव्हनमध्ये जास्त आढळतात.त्यामुळे दिशाकाक म्हणजे क़ॉमन रेव्हन हे स्पष्ट होतं.

थोडक्यात दिशाकाक म्हणजे मृगपक्षिशास्त्रात वर्णन केलेला द्रोणकाक आणि आधुनिक वर्गीकरणाननुसार कॉमन रेव्हन असं समीकरण तयार होतं.

इथे एका महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. मृगपक्षिशास्त्रात वर्णिलेल्या कावळ्यांच्या प्रकारांची आधुनिक वर्गीकरणानुसार केलेल्या कावळ्यांच्या प्रकारांशी सांगड घालण्याचा प्रयत्न के. एन. दवे यांनी आणि चितमपल्लींनीही केलाय. परंतु त्यात बरीच मतभिन्नता आढळते. पण द्रोणकाक हा एकच कावळा असा आहे की ज्याच्या बाबतीत ह्या दोन्ही तज्ज्ञांत एकवाक्यता आढळते. ह्या दोघांच्याही मते द्रोणकाक म्हणजे क़ॉमन रेव्हन होय.

थोडक्यात दिशाकाक = द्रोणकाक = कॉमन रेव्हन. मराठीत द्रोणकाक म्हणजे डोमकावळा.

तरीही या समीकरणात एक त्रुटी राहत होती. ती अशी की दिशाकाकचा समुद्रावर जमीन शोधण्यासाठी उपयोग होई. दिशाकाक म्हणजेच कॉमन रेव्हन हे सिद्ध करायचं झाल्यास कॉमन रेव्हनचा असा उपयोग झाल्याचा संदर्भ शोधणं आवश्यक होतं. अखेर असा संदर्भ सापडला, बायबलमधील नोव्हाच्या गोष्टीत.

जलप्रलय होणार म्हणून नोव्हाने आपल्या बोटीवर सर्व पशुपक्ष्यांच्या जोड्या घेतल्या होत्या. जलप्रलयानंतर दहाव्या महिन्यात पर्वतांची टोकं दिसू लागल्यावर चाळीस दिवसांनी रविवारी नोव्हाने प्रथम रेव्हन पक्ष्याला जमीन शोधण्यास पाठवलं. रेव्हन परतला नाही. सात दिवसानंतर नोव्हाने कबुतराला पाठवलं, ते ऑलिव्ह वृक्षाची फांदी घेऊन परतलं. सात दिवसांनंतर पुन्हा कबुतराला धाडलं. ते परत आलं नाही. अशी नोव्हाची गोष्ट आहे.

ऑलिव्ह वृक्षाची फांदी घेतलेलं कबुतर

ही गोष्ट कितपत खरी मानायची हा मुद्दा बाजूला ठेवला तरी समुद्रावर जमीन शोधण्यासाठी सर्व पक्ष्यांमध्ये रेव्हनच योग्य ही समजूत प्राचीन काळी होती, हे त्यातून व्यक्त होतं. तसेच पक्षिशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तरी त्यात बरंच तथ्य दिसतं. ते असं की रेव्हनने जमीन शोधली. त्यावेळी झाडांची टोकं, शेंडे पाण्यावर दिसत होते. रेव्हन सर्वभक्षी असल्यामुळे त्याला कुजकं नासकं, फळं काहीही चालतं. त्यामुळे त्याची जगण्याची सोय झाली म्हणून तो परतला नाही.

कबुतर प्रथम पोहोचलं तेव्हा पाणी आणखी उतरलं होतं. पण जमीन दिसत नव्हती. कबुतर तृणधान्याचे दाणे खातं. त्यावेळी त्याचं पीठ होण्यासाठी जमिनीवरचे खडे खातं. जमीन दिसत नसल्यामुळे कबुतराला तेथे जगणं शक्य नव्हतं. म्हणून ते परत आलं. दुसऱ्या खेपेला  पाणी आणखी हटलं होतं. जमीन दिसू लागली होती. कबुतराच्या दृष्टीने ती जगण्यास योग्य झाली होती त्यामुळे ते परत आलं नाही.

अशा तऱ्हेने दिशाकाकशी साधर्म्य दाखवणारा हा महत्त्वाचा दुवा मिळाला. त्यामुळे दिशाकाक म्हणजे द्रोणकाक म्हणजेच कॉमन रेव्हन हे समीकरण सिद्ध झालं.
याच बरोबर माझा दिशाकाकचा शोधही संपला.

संदर्भ :
महाराष्ट्र संस्कृती – डॉ.पु.ग.सहस्त्रबुद्धे
कोणे एके काळी सिंधु संस्कृती – डॉ.म.के.ढवळीकर
जातक कथा (खंड १ ते ६)- दुर्गा भागवत
मृगपक्षिशास्त्र – हंसदेव मुनी – अनु. मारुती चितमपल्ली, भातखंडेशास्त्री
सार्थवाह – मोतीचंद्र- अनु.- मो.कृ.पारधी
संपूर्ण बायबल – फादर फ्रान्सिस दिब्रिटो
बर्ड्स इन संस्कृत लिटरेचर – के.एन्.दवे
इंडस् व्हॅली सिव्हिलायझेशन – जोनाथन मार्क केनॉयर
BIRDS OF INDIAN SUBCONTINENT – R.GRIMMET,C.INSKIPP,T.INSKIPP

– डॉ.उमेश करंबेळकर, सातारा
umeshkarambelkar@yahoo.co.in

 ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^ 
स्वागत फुलांनी [ १४ ] – प्रदीप अधिकारी
@@@@@@@@@@@@@@@@@@
विचारशलाका
मिलिंद कर्डिले
– ©️ मिलिंद कर्डिले 
milindkardile@yahoo.com
@@@@@@@@@@@@@@@@@@
चित्रोळी
 
[ ५० ]
 
माधव मनोहर जोशी
 
 – ©️ माधव मनोहर जोशी 
madvac1979@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@@@@@
आजची कविता
 
प्रज्ञा नरेंद्र करंदीकर
 
©️ प्रज्ञा करंदीकर,
बंगळुरु
pradnyakarandikar85@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
हॅास्पिटलमधून बाळ गायब

रहस्यकथा क्रमांक ४
अरविंद खानोलकर

गेले चार दिवस मुंबईतील कमलाबेन हॅास्पिटल चुकीच्या कारणासाठी पेपरांत गाजत होतं.
हॅास्पिटलच्या प्रसूती विभागातून तीन दिवसांच बाळ गायब झालं होतं. तिथल्या नर्स, मेट्रन, डॅाक्टर, ह्या त्याबद्दल काहीच सांगू शकत नव्हत्या. हॅास्पिटल मोठ्या उद्योगपतीचं असल्यामुळे प्रथम त्यांनी ही बातमी दाबून टाकण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोपही हॉस्पिटल मॅनेजमेंटवर होत होता.

नीरजा काटकर नावाची एक मध्यमवर्गीय महिला बारा दिवसांपूर्वी तिथे प्रसूत होऊन तिला साडे सात पौंड वजनाचा मुलगा झाला. हॅास्पिटल प्रसूतीपासून पाच दिवसांनी बाळ-बाळंतीणीला घरी जाऊ देण्याची हॅास्पिटलची पद्धत आहे. हॅास्पिटलमध्ये बाळांना वेगळं ठेवलं जाई आणि मधून मधून ठराविक वेळी आईकडे आणून दिलं जाई. परंतू चौथ्या दिवशी सकाळी बाळाला आईकडे आणून दिलं नाही. तिथेच बसलेल्या आजींनी नर्सला विचारले, “अग, बाळाला घेऊन येतेस ना! भूकेलेलं असेल ते!” “आणत्ये आज्जी,” म्हणून गेलेली नर्स बराच वेळ परत आली नाही. आई-आज्जी अस्वस्थ झाल्या. त्यांनी दुसरी नर्स शोधली आणि तिला सांगितलं, ती म्हणाली, “मी तिला पहाते हं!” ती गेली आणि बराच वेळ तीही आली नाही. बऱ्याच वेळाने दोन डॅाक्टर, दोन नर्स, एक वॅार्ड बॅाय असा सर्व ताफाच तिथे आला. बाळाच्या आईच्या पोटात “धस्स” झालं. आजी म्हणाली, “बाळ कुठे आहे?” डॅाक्टर स्टाफला विचारत होते, “इथे नीट पाहिले कां ?”
सिस्टर म्हणाली, “इथेही पाहिलं पण इथे नव्हतंच. रात्री दोन वाजता ते रडत होतं, म्हणून आईजवळ दिलं होतं. साडे तीनला मीच परत नेऊन ठेवलं. आता माझी ड्यूटी संपली म्हणून मी जात होते तर मला परत बोलावलं.” बाळाच्या आजीने कळवळून विचारलं, “मग बाळ आहे कुठे?” आई तर रडायलाच लागली. बाळ सापडलंच नाही. पोलिस मात्र आले. त्यांनी डॉक्टर शहाणे, डॅाक्टर शर्मा, मेट्रन मेरी, तीन नर्सेस शीला, कनिका, सॅंड्रा आणि एक सफाई कामगार बाई ह्यांच्या जबान्या घेतल्या आणि तिथे असलेल्या सीसीटीव्हीच्या फूटेजची कॅापी घेतली.

हॅास्पिटलमधून ही बातमी बाहेर पडायला वेळ लागला नाही. संध्याकाळच्या पेपरमध्येच बातमी आली. “कमलाबेन हॅास्पिटलमधून बाळ गायब”. दुसऱ्या दिवशी बऱ्याच संपादकांनी हॅास्पिटल प्रशासनाला धारेवर धरलं. दोन दिवसांनी उद्योगपतींचं नांवही घेतलं जाऊ लागलं. एवढं मोठं हॅास्पिटल, त्यात अनेक विभाग, अनेक तज्ञ आणि त्यामुळे हॅास्पिटलची ॲाक्युपन्सी १००% हून अधिकच असे. जास्त वाटलं का? सकाळी ॲडमिट होऊन दुपारी जाणाऱ्याचाही एक दिवस धरला जातो तर दुपारी आलेल्यांचे नवा दिवस तिथून सुरू होऊन सकाळी सातला संपतो. असे दोन्ही पेशंटस पूर्ण दिवसाचे रूम चार्जेस देतात. साहजिकच ॲाक्युपन्सी १०० च्या वर जाते. हॅास्पिटलचा पसारा मोठा. उद्योगपतींनी जरी गुंतवणूक केली असली तरी ते काही स्वत: हॅास्पिटल चालवत नव्हते. त्यासाठी त्यांनी बोर्ड नेमलं होतं. बोर्डावर रिटायर्ड बँकर होते, नामांकित डॅाक्टर्स होते. मॅनेजमेंट एक्सपर्ट होते. त्या बोर्डावर  हॅास्पिटल मॅनेजमेंट पहाणारे फक्त दोघे होते. एक सीईओ आणि त्यांचे डेप्युटी. आजवर सर्व सुरळीत चाललं होतं. दर इतर हॅास्पिटल्सहून अधिक होते. १००% हून अधिक ॲाक्युपन्सीमुळे फायदाच फायदा होता. बाळ गायब झाल्याच वृत्त आलं आणि अचानक तीन चार दिवसांत ॲाक्युपन्सी ९१% वर आली व घसरतच होती. बोर्डाची तात्काळ मीटिंग घेण्यात आली. सीईओ तांबे आणि डेप्युटी सीईओ म्हसकर, यांच्या बरोबरच प्रसूती विभागाच्या प्रमुख डॅाक्टर नीना कुरीयननांही हजर रहायला सांगण्यात आलं.

यशवंत रोज वर्तमानपत्रात येणारा मजकूर वाचत होते. चंदूही वाचत होता. चंदूने एकदा ह्या विषयावर मामांकडे बोलणं काढलं होतं. तेव्हा यशवंत म्हणाले होते, “चंदू, एक लक्षांत घे तीन दिवसांच तान्हं बाळ वाढवायचं म्हणजे सोप्पी गोष्ट नाही. तेव्हां यामागे एखादी मुलं पळवणारी मोठी टोळी वगैरे असण्याची शक्यता जवळ जवळ शून्य आहे. हे कुणाचं तरी एकट्याचं काम आहे. हॅास्पिटल स्टाफपैकी कोणी तरी त्या एका चोराला मदत केली असावी, एवढंच मी सध्या म्हणू शकतो.” चंदू म्हणाला, “बरोबर आहे आणि अशी केस आपल्याकडे येण्याची शक्यता कमीच आहे.” ह्यावर यशवंत मामा गूढ हंसले. त्यांना वाटत होतं की हे प्रकरण आपल्याकडे येणार. उद्योगपतींना आपली पत महत्त्वाची असते. हॅास्पिटलच्या निमित्ताने ती एकदा मार्केटमध्ये घसरली तर इतर उद्योगांवरही परिणाम होईल. ते पोलिसांवर फार काळ अवलंबून रहाणार नाहीत. नीरजा काटकरला पांच दिवसांनी बाळाशिवाय घरी जावं लागलं होतं. माध्यमं तिची वा तिच्या पतीची मुलाखत प्रसारित करत होते. पण यशवंतांच्या हेही लक्षांत आलं होतं की माध्यमं हॅास्पिटलच्या मॅनेजमेंटवर फारशी टीकाही करत नव्हती कारण त्या गृपच्या उद्योगांकडून मिळणाऱ्या जाहिराती त्यांना गमवायच्या नव्हत्या. यशवंतांचा, ही केस आपल्याकडे येणार हा कयास अचूक ठरला. त्या उद्योगपतीच्या सेक्रेटरीचा त्यांना फोन आला, “साहेबांनी तुम्हाला आणायला कार पाठवायला सांगितलंय. उद्या सकाळी नऊला पाठवू कां?”

उद्योगपतींचे बीकेसीतील (बांद्रा-कुर्ला कॅाम्प्लेक्समधील) ॲाफीस हे यशवंताच्या घरापासून कारने पंधरा मिनिटांच्या आंतच आलं. नऊ वाजून वीस मिनिटांनी त्यांचं उद्येंगपतींनी उभं राहून स्वागत केलं आणि त्यांना बरोबर घेऊन संभाषणासाठी सोफ्यावर जाऊन बसले. त्यांनी सरळ विषयालाच हात घातला, “आमच्या हॅास्पिटलमधून बाळ गायब होणं, हे आम्ही लांछनास्पद मानतो. मला काही करून तेच मूल मिळायला हवंय आणि हे कसं झालं ते कळायला हवं. म्युनिसिपालिटीच्या हॅास्पिटलमध्ये पूर्वी असा प्रयत्न झाल्याची आणि कधी मुलांची अदलाबदली झाल्याच्या बातम्या येतात पण आमच्याकडे असं होऊच कसं शकतं? आम्ही पगारही जास्त देतो. मला आमचे न्यूरॅालॅाजिस्ट व तुमचे मित्र डॅाक्टर  गोसावी ह्यांनी तुमचं नाव सुचवलं. मी ही ऐकलंय  तुमच्याबद्दल. तुम्हाला मी विनंती करतो की लवकरात लवकर ह्याचा छडा लावा. फी हवी तर आधीच घ्या.” यशवंत म्हणाले, “फीचं काही नाही. हॅास्पिटलच्या सीईओ, डेप्युटी सीईओ ह्यांना माझ्याशी सहकार्य करायच्या सूचना द्या. सर्व नोंदी, हॅास्पिटलची सर्व व्यवस्था पहाण्याची मुभा द्यायला सांगा.” उद्योगपती उभे राहून हस्तांदोलन करत म्हणाले, “ ती सर्व व्यवस्था होईल. सी.सी. टी.व्ही. फुटेजही देऊ.”  यशवंत साडे दहाच्या आत घरी परत आले होते. आल्याबरोबर चंदूला सर्व सांगून ते म्हणाले, “चंदू, म्हणजे त्या गायब बाळाचा शोध आपल्यालाच घ्यायचा आहे.”

“मामा, तुम्हीच म्हणाला होता की तीन दिवसाच्या बाळाला पळवायला तसंच जबरदस्त कारण पाहिजे.” चंदू म्हणाला. “हो, त्या दिशेने विचार करतोय मी पण सध्या हे सीसीटीव्ही कव्हरेज काय आलंय ते तर पाहूया. चंदूने लॅपटॅाप टीव्हीशी जोडला व कव्हरेजमधील भाग टीव्हीवर दिसू लागला. प्रथम प्रसूती विभागात सात जणींची सोय होती आणि वॉर्ड एकच होता. सर्व बेडसवर स्त्रिया दिसत होत्या. तीन चाकं लावलेले पडदे होते. आवश्यक असल्यास एका बेडला दोन किंवा तीन बाजूनी बंद करून प्रायव्हसी निर्माण करत. सिस्टर शीला दोन हातात दोन बाळांना घेऊन येते. एकेकाला आपल्या आईकडे देते. वेळ रात्री दोनची होती. मग काही हालचाल नव्हती.

तीन वाजतां दुसरं बाळ शीलाने आईकडून उचललं व सर्व मुलांना ठेवत तिकडे नेलं. साडेतीनला नीरजाचं मूलही तिने नेलं. त्यानंतर एक दोन वेळा अशीच दुसरी मूल आणली व नेली. ह्यांत संशयास्पद काही नव्हतं. जिथे मुलांना ठेवत ती जागा वेगळ्या कॅमेऱ्याच्या क्षेत्रात होती. तिथून उचलून नेणं आणि आणणं त्या रात्री शीलानेच केलं होतं. त्या सगळ्या वेळा पहिल्या कॅमेऱ्यावरील हालचालींच्या वेळांशी जुळत होत्या. शीलाशिवाय कनिकाही त्यावेळी ड्युटीवर होती. ती फक्त मूल ठेवत होते त्या भागातील एका खुर्चीवर बसून डुलक्या घेत होती. तिने एकदा फक्त सर्वांना नवीन टॅावेल दिले व जुने बालदीत टाकून बालदी वॅार्डबाहेर घेऊन गेली. बाळे होती त्या भागात त्या वेळी कुणीच नव्हतं. यशवंत चंदूला म्हणाले, “एक गोष्ट लक्षात आली कां?” “चंदूने विचारलं, ” कोणती?” “एकूण मुलांची संख्या ह्यात सहाच होत्येय. तिथे ठेवलेली मुलं आणि त्याच वेळी आईकडे दिलेली मुलं सहाच होत आहेत. सात स्त्रिया असून मुलं सहाच कशी? त्या अर्थी, एक मुलं टॉवेल वगैरे गोळा करतात, त्या बालदीतून आधीच पळवण्यांत आलं असावं. नीरजाला पाजायला दिलेलं मुलं तिचं नसावं. झोपेत तिच्या लक्षात आलं नाही. काही बाळं कोणत्याही मातेला लगेच लुचतात.” यशवंत विचार करत म्हणाले, “चंदू, डॅाक्टर, मेट्रन, नर्सेस, इ. सर्वांच्यावर एजन्सीतर्फे पाळत ठेव. शक्य तो तूही जा. दोन दिवसात हालचाली, माहिती सर्व हवीय, म्हणावं.”

चंदूकडे मिळालेल्या रिपोर्टमध्ये विशेष काही माहिती नव्हती. शीलाचं रूटीन होतं. नवरा, मुलं, संसारात बुडाली होती. नोकरी आणि संसार, ती भाजी मार्केट, हॅास्पिटल, घर, हेच करत होती. मेट्रन मेरीचंही रूटीन सेट होतं. संध्याकाळी एका चाळीशीच्या बाईला भेटली, ती तिची मैत्रीण असावी. बराच वेळ दोघी गप्पा मारत होत्या. बाकी घर आणि हॅास्पिटल. कनिकाचा मैत्रिणींचा मोठा गृपच होता. बराच वेळ कोण ना कोण बरोबर असे. सँड्राच्या नवऱ्याला नोकरी नव्हती आणि तो दोघांना कॅनडाला कसं जातां येईल, त्याची चौकशी करत होता. सफाई कामगार बाईच्या घरी माणसं जास्त आणि आवक कमी, अशी परिस्थिती होती. ती उरलेल्या वेळात एका लहान सोसायटीत घरकामं करीत होती. यशवंतानी सर्व रीपोर्टस वाचले आणि ते चंदूला म्हणाले, “चंदू, सँड्राचा नवरा कधीपासून कॅनडाला जायचे प्रयत्न करतोय, ती माहिती काढ. अजून कां गेला नाही, त्याचं कारण कळलं पाहिजे. कनिकाच्या मैत्रिणीतील कोणाकडून कनिकाच्या आर्थिक परिस्थितीची माहिती काढ. मेरीच्या मैत्रिणीची माहिती काढ. जमल्यास तिच्याकडून मेरीची काही माहिती मिळते का पहा. पाळत चालूच राहू दे. दुसऱ्या दिवशीही रीपोर्ट तसेच होते. फक्त सँड्रा नवऱ्याबरोबर कॅनडाच्या एम्बॅसीच्या ॲाफिसमध्ये गेली होती. तिला नाईट शिफ्ट होती. मेरी काही त्या मैत्रिणीला पुन्हा भेटायला गेली नव्हती.

चंदूने मेरीच्या मैत्रिणीची माहिती मिळवली.  दरवाजा वाजवला. मेरीच्या मैत्रीणीच नाव होतं हिरा सावंत. तिच्या आईने दार उघडलं. चंदूने आपण मेरीच्या मैत्रिणीचा मित्र आहोत, असं सांगून प्रवेश मिळवला. आईला विचारलं, “तुम्ही अजून काम करतां की काय?” आई म्हणाली, “नाय रे झिला, मी करायचो. खूप कामा केली. पूर्वी सुईणीक कामाची काय कमी? आतां लोकांना सुईणी नकोत.” चंदू म्हणाला, “आमचो इस्वास आसा आजी. सुईण आणि बाळाला मालिश करायला आम्हाला हवी आहे.” आई म्हणाली, “अरे, मी करत नाय पण माझी हिरा माझ्या परीस भारीच आहे. छान करता सर्व. आता खूप कामात आहे पण मधी कामा मिळत नसत.” चंदूने म्हातारीशी गोड बोलत, तिच्याकडून माहिती मिळवली ती अशी की. पंधरा दिवसांपूर्वी मेरीने तिला एक काम आणून दिलं. त्या कामांत तिचे बाराहून अधिक तास जात होते. कुणा श्रीमंत माणसाकडे काम मिळाल्याने आगाऊ पैसेही मिळाले होते. अजून सहा महिने तरी काम कायम रहाणार होते. कोणाकडे कामाला जायची, कुठे जायची, ते मात्र  आईला सांगता आलं नाही. चंदूने ते दुसऱ्या दिवशी शोधून काढलं. एका सोन्या चांदीचा व्यापार करणाऱ्या आणि सावकारी करणाऱ्या श्रीमंताच्या बायकोला हल्लीच मुलगा झाला होता. तिच्या मुलाचा जन्म घरीच झाला होता. आईला दूध नव्हतं. मुलं अशक्त होतं. त्याला दूध द्यायला एक बाईसुध्दा ठेवली होती.

यशवंतांची खात्रीच झाली की त्या श्रीमंताघरी वाढणारं ते बाळच, कमलाबेनमधून गायब झालेलं बाळ असलं पाहिजे. त्यांनी म्युनिसिपालटीतील त्या श्रीमंताच्या बाळाच्या जन्माची नोंद पाहिली. नेमकी तीच वेळ, तीच तारीख दिली होती, जेव्हा नीरजाचं बाळंतपण झालं होतं. जन्म झाल्याचा दाखला एका सुईणीने दिला होता.
ती सही होती हिरा सावंत हीची. आता हे नक्की झालं की मेट्रन मेरीनेच ते बाळ हॅास्पिटलमधून नेलं व त्या श्रीमंताघरी ठेवलं आणि हिराच्या मदतीने व पैशांच्या जोरावर तो श्रीमंत, ते बाळ आपल्या घरी वाढवत आहे. आता हे सिद्ध करायचं होतं. यशवंतानी त्यासाठी मेरी आणि हिरा यांना संशयावरून पोलिसांनी ताब्यात घ्यायला सांगितलं. त्यांना बोलायला भाग पाडणं पोलिसांना सोपं होतं. पण खरा गुन्हेगार तो मूल स्वीकारणारा, खोटी जन्मनोंद करणारा होता. मेरी आणि हिरा ह्यांच्या विधानांवरून त्याला खोटे कागदपत्र बनवणं, बेकायदेशीररीत्या दुसऱ्याचं मूल स्वीकारणं, इ. आरोपावरून अटक करायची होती पण तो नक्कीच मोठे वकील देऊन लढला असता. दुसरंच मूल घरी ठेऊन, ह्या मुलाला काहीं अपाय करता. मग यशवंतानी खरी परिस्थिती उद्योगपतींना सांगितली. ते म्हणाले, “धुरंधर, तुम्ही माझं फार मोठं काम केलं आहे. मी पहातो.” काय काय बोलणी झाली, कसे प्रश्न सुटले कुणास ठाऊक पण कमलाबेन हॅास्पिटलच्या पायऱ्यांवर ठेवलेलं महिन्याच्या आंतले एक बाळ सुरक्षा रक्षकांना अचानक दिसलं. प्रसूती विभागाच्या डॅाक्टरांनी जन्मखूणेवरून ते बाळ हे हॅास्पिटलमधूनच गायब झालेलं बाळ हे ओळखलं. नीरजानेही आपलं बाळ ओळखलं.  मेट्रन मेरीने लवकरच राजीनामा दिला. हिरा सुटली. उद्योगपतींनी तक्रार मागे घेतली म्हणून पोलिसांनी बाळ गायब झाल्याची फाईल बंद केली. खरा गुन्हेगार सुटला. उद्योगपती म्हणाले, “धुरंधर, काही गोष्टी कर्मावर सोडून द्यायच्या असतात. जेलपेक्षा वाईट दिवस येतील त्याच्या आयुष्यात. तुम्ही पहाच.” इकडे सरकारने एका ॲार्डरने मुंबईत ह्यापुढे जन्मनोंद करण्यासाठी सरकारी, म्युनिसिपल किंवा खाजगी  हॅास्पिटलच्या डॅाक्टरचा दाखला आवश्यक असल्याचे जाहीर केलं.

– ©️ अरविंद खानोलकर
arvindkhanolkar@gmail.com

वि.सू. ह्या गोष्टीतील पात्रे, प्रसंग, इ. सर्व काल्पनिक आहेत. साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
जंगलातला एक थरार 

देवदत्त पाटणकर 

सकाळी ११—११.३०  वाजलेत.

रामदासच्या ताम्हिणीमधल्या लपणात ( bird hide ) बसलोय.
पाण्यावर येणार्‍या पक्षीगणांची सकाळची वर्दळ आता कमी झाली आहे.

सकाळच्या सत्रात रेड व्हिस्कर्ड बुलबुलांची जोडी, यलो ब्रोड बुलबुल, टिकल्सचा ब्लू फ्लायकॅचर, इ. नेहमीचे कलाकार हजेरी लाऊन गेलेत, मध्येच पॅराडाईज फ्लायकॅचरच्या मादीनेही आम्ही पण आहोतचा सांगावा दिलाय!

व्हाईट रम्प्ड शामाचा कॉल येतोय…. वा: पाण्यावर आला तर धमालच !!
पण आता काही वेळ अशीच प्रतिक्षा करावी लागणार बहुतेक.

हळूहळू प्रकाश बदलतोय…. सकाळचा ‘गोल्डन लाईट’ जाऊन ऊन्ह तापलीयत…
सगळीकडे शांतता…मध्येच वाहतुकीचा आवाज….. पेंग यायला लागलीय !

लपणात आत्ताच एक सहपक्षीनिरीक्षक आलेत.. इतका वेळ ते व्हाईट चिक्ड बार्बेटच्या घरट्याची प्रकाशचित्रे काढत होते. सध्या २-३ पिले आहेत. त्यांना भरवण्याचं काम नर मादी अव्याहत करताहेत.
हे घरटं एका प्रचंड वृक्षाच्या साधारण मध्यावर, जमीनीपासून ४०—५०फूटावर आहे…. सुबक कोरलेलं गोल भोक !

बार्बेटची जोडी दर दहा-पंधरा मिनीटानी वेगवेगळे किटक पकडून आणतीय.
लपणापासून हे झाड ५००-६०० फुटावर आहे. या सततच्या फेर्‍या बघायला मजा येतीय.
अचानक पाचोळ्याचा आवाज..
स्पर फाऊल आल्या बहुतेक… पट्कन काहीच दिसत नाहीये.
आवाज मात्र येतोय.

अचानक खडकाआडून त्रिकोणी डोकं दिसायला लागलं….. धामण ! सगळे सावध झाले.
हळूहळू जिभ सतत बाहेर काढत, अंदाज घेत खडकाआडून बाहेर येतीय…. अरे ही संपतच नाहीये…. ५-६ फूट लांबी आहे,सिल्व्हर-ब्राउनीश रंग, काळी दुभंगलेली जीभ…. वा: काय स्पेसिमेन आहे!!
इकडेतिकडे हिंडून परत जंगलाच्या दिशेने जातीय… आता लपणात काळजी, तिकडे घरट्याकडे तर जाणार नाही? पण ते तर खूप लांब, ऊंचावर आहे.अस्वस्थता…
घंटी वाजवल्यावर लहू येतो…. त्याला हि रोज दिसते तेव्हा तो निर्वीकार…. घरटं सुरक्षीत आहे म्हणतो.
धामण आता गवतात, झाडोर्‍यात दिसेनाशी झालीय.

काळजी थोडी कमी होते.
काही वेळ जातो.
अचानक धामण झाडावर, घरट्याकडे चाललीय…. अरे देवा !!

श्वास रोखून सगळे जंगलात वेळोवेळी घडणारा, निसर्गाचा भाग असलेला जीवन मरणाचा खेळ बघतोय… करता काहीच येत नाही, आणि या खेळात हस्तक्षेप बरोबर नाही…. हा जीवनक्रम आहे. जीवो जीवस्य जीवनम्! असं असलं तरी वाईट वाटतंय.

बार्बेट नरमादी जीवाच्या आकांतानी सापावर झेपा टाकतायत पण काही उपयोग नाही.
धामणीनी आतली २—३ पिल्लं एकापाठोपाठ गिळंकृत केली आहेत. आता खाली उतरतेय.
लपणात अस्वस्थ शांतता.

प्रत्येक जण जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणिव होऊन शांत आहे… विचार करतोय.
नरमादींना अजून आशा आहे किंवा सत्य कळत नाहीये, पचवता येत नाहीये…. अजून भक्ष्य पकडून फेर्‍या मारताहेत….
हळूहळू फेर्‍या बंद होतात!!!!

अचानक पाणथळीजवळच्या उन्हाच्या पट्ट्यात चांदी चमकते…. धामण परत आलीय. आमच्या अगदी समोर पाणी पिण्यासाठी!
तृषा भागवून परत जंगलात नाहीशी होते.
असा थरार प्रत्यक्ष बघायला मिळणं हा नशिबाचाच भाग !

परत परत घटनाक्रम आठवत लपणातले सगळे स्वत:च्या पोटपुजेसाठी बाहेर !!!
आयुष्य थांबत नाही …..
इत्यलम्!

लेखन व प्रकाशचित्रे : ©️ देवदत्त पाटणकर
castingalu@gmail.com
8378980966.

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
बालचित्रकारांचे दालन
 
– सानिका वर्तक 
प्रेषक सौ. स्वाती वर्तक
           swati.k.vartak@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@@@
 
हत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@

26 thoughts on “शोध दिशाकाकचा

  1. आजचा अंक फारच आवडला. डॉ. करंबेळकरांची कावळ्याची गोष्ट किंवा त्याची ओळख पटवण्यासाठी केलेला खटाटोप, अभ्यास आणि संशोधन सर्वच कौतुकास्पद! अरविंद खानोलकरांची रहस्यकथा, माधव मनोहर जोशी यांची चित्रोळी, प्रज्ञा करंदीकरांची कविता सर्वच छान आहेत. देवदत्त पाटणकरांचा जंगलातला एक थरार खरोखर थरारक!

  2. आदिआणि अंत निसर्गात सामावलेला असा एक सर्वांग सुंदर अंक आजचा ..धन्यवाद संपादकजी

    योगायोगाने सानिकाचे चित्र ही पक्ष्याचे ..हे देखील मुद्दाम का नाबरजी ? ..छान

    डॉ करंबेळकर यांनी दिशाकाक चा घेतलेला शोध अतिशय प्रशंसनीय आहे ..ते खरे प्रकृतीप्रेमी आहेत .खूप नवीन माहिती मिळाली.नवल वाटते..धन्यवाद

    राम वचन, चित्रोळी ,प्रज्ञा ची कविता सारे वाचनीय

    यशवंत एकदम सुसाट..धाडकन रहस्य शोधून काढणारा यशस्वी हेर ..आवडतो..उगाच फापटपसारा नाही .

    देवदत्तजींचा थरार तर खरेच थरारक आहेच पण जोडीला छायाचित्र उत्तम आहेत ..अभिनंदन

  3. करंबेळकरजींचा लेख खूप काही सांगून जातो. दिशाकाकचा शोध घेण्यासाठी पाली, इंग्रजी व संस्कृत पुस्तकांचा धांडोळा घेऊन अखेर रेव्हन या पक्ष्याची निश्चिती केली गेली. धन्यवाद करंबेळकरजी.

    अधिकरीजी ही रानजाई का? मस्त फोटो. धन्यवाद.

    खानोलकरजींची रहस्यकथा अर्नाळकरांची आठवण करून देते. धन्यवाद.

    देवदत्तजींनी जंगलातील थरार मस्त उभा केलाय.

    विचारशलाका, चित्रोळी व प्रज्ञाची कविता छान.

    सानिकाचा पक्षी उडायची वाट बघत होते. पण बसूनच होता तो.

  4. दिशाकाकची माहिती एकदम नवीनच वाटली… याबाबत काहीच माहिती नव्हती.. डॉ. उमेश करंबेळकरांची शोधमोहीम कौतुकास्पद..

  5. प्रदीप अधिकारींची नाजूक, धवल फुले पाहून मन प्रसन्न झाले.

    डॉ. उमेश करंबेळकर यांनी कष्टपूर्वक घेतलेला ‘दिशाकाकचा शोध’ आणि त्याचे निष्कर्ष सुरस वाटले. माहितीच्या पसाऱ्यातून योग्य ते तुकडे जोडत त्यानी शेवटी मांडलेला निष्कर्ष पटतो.

     विचार शलाका आणि चित्रोळी आवडली.

    अरविंद खानोलकर यांची ‘हॅास्पिटलमधून बाळ गायब’ ही रहस्यकथा अगदीच सरळ वाटली.

    ‘जंगलातला एक थरार’ देवदत्त पाटणकर यांनी चित्रमय भाषेत आणि घटनेचे प्रत्यक्ष दर्शन घडविणारी प्रकाशचित्रे दिल्याने थेट मनापर्यंत पोहोचला.

    सानिका वर्तकचा पक्षी सुंदर आहे.

  6. स्वागत फुल झकास   दिशाकाकचा शोध घेण्यासाठी  डॉ. उमेश करंबेळकरजींनी  घेतलेले श्रम फार मोलाचे आहेत .कोणीतरी अशाही गोष्टींचा शोध घेत असतं याचा आनंद झाला . ते  करंबेळकरजी आहेत याचा आनंद वाटला .   

    मिलिंद कर्डिले यांची  विचार शलाका, माधव मनोहर जोशी यांची चित्रोळी तसेच ओंजळ तुझ्या माझ्या अंतरी  छान   

    हॅास्पिटलमधून बाळ गायब ही  रहस्यकथा  ठीक 
     देवदत्त पाटणकर यांनी वर्णन केलेला   जंगलातला   थरार  फारच थरारक आहे लेखन आणि छायाचित्रण दोन्ही सुंदर .

    आणि  सानिकाचं चित्र फारच छान.

    मंगेशजी आजचा अंक फारच झकास  

  7. निखिल शाळिग्राम लिहितात :- 

    मैत्रीचे अंक नेहमी विविधतेने नटलेले व सजलेले असतात. याचे प्रत्यंतर आजच्या अंकावरून पुन्हा आले. याचा आनंद आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी हे लिहीत आहे. डॉ. उमेशजी करंबेळकर यांनी आजवर ज्या व्यासंगी वृत्तीने मैत्रीत लेखमाला लिहिल्या; त्याच धर्तीवर आजचा शोधलेख लिहिला आहे. त्यांचे असेच लेखन यापुढे यावे. 

    आजच्या अंकातील देवदत्त पाटणकर यांचा मैत्रीतील पहिलाच लेख त्यांच्याविषयीच्या अपेक्षा वाढवणारा आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांची चित्रमय वर्णनशैली आवडली.

    अरविंदजी खानोलकर यांच्या आजच्या रहस्यकथेत रहस्याचा तडा इतक्या लवकर लावला जाईल हे वाटले नव्हते. 

    रामवचन, चित्रोळी आणि कवितांची सदरे उत्तम आहेत. सानिका वर्तकचे चित्र आवडले.       

  8. भानू काळे यांची विनोद शिरसाठ यांनी घेतलेली मुलाखत आवडली .त्याच शब्दांकन रेणुका कल्पना यांनी केलं आहे .त्या एकच व्यक्ती आहेत की दोन व्यक्ती आहेत हे समजलं नाही .
    गोखलेजींचा माहितीपूर्ण लेख आवडला .माझी शंका अशी आहे की पृथ्वी भोवती अनेक देशाचे कृत्रिम उपग्रह निरनिराळ्या वेगाने आपापल्या कक्षेत फिरत असतात .त्यांची टक्कर होऊ शकते का ?कर्डिलेंजिंची विचार शलाका ,व जोशीजींची चित्रोळी आवडली .
    बर्वेजींनी लेखाच्या शेवटी कुत्र्यांच्या हल्ल्यातून भोंदूगिरी सहज उघड केली आहे .फार छान .

  9. कावळा हा अस्पृस्य पक्षी समजला जातो .डॉ .करंबेळकर यांच्या लेखावरून प्राचीन काळी दिशाकाक या स्वरूपात जहाजातून प्रवास करताना तो जमिनीची दिशा दाखवणारा तारणहार ठरत असे .हा त्याचा उपयोग समजला .
    कर्डीले यांची विचारशलाका व जोशी यांची चित्रोली व प्रार्थना आवडली .
    करंदीकर यांची कविता व चित्र आवडले .चित्रावरच कविता असल्या मुळे चित्र पहाण्याचा पूर्ण आनंद मिळाला नाही .
    अरविंदजींची रहस्यकथा आवडली .मागच्या कथेत ब्लॅकमेलरला शिक्षा झाली नाही .या कथेत मेट्रन व हिरा याना शिक्षा झाली नाही .असं गुन्हेगाराला मोकाट सोडून देऊ नका हो .
    पाटणकर यांची प्रकाश चित्रे अप्रतिम .नुसत्या प्रकाश चित्रावरून प्रसंग डोळ्या समोर येतो .
    सानिकाचं चित्र छान .चित्रा वरच चित्रकाराचे वय लिहिले हे फार चांगले .

  10. दिशाकाकावरील लेख अप्रतिम. तो लिहिण्यासाठी डॉ. करंबेळकर यांनी घेतलेले कष्ट व त्यांचा व्यासंग दिसून आला. असे संशोधनपर लेख वाचताना वेगळाच आनंद मिळत असतो. तो आनंद दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद !

    देवदत्त पाटणकर यांचा जंगलातील थरारही थरारक. मात्र हा लेख यापूर्वी कुठेतरी वाचल्यासारखा वाटतो.

  11. धन्यवाद हर्षदजी. आपणां सारख्या जाणकारांकडून पसंतीची दाद मिळाली खूप आनंद झाला.

यावर आपले मत नोंदवा