पद्मश्री शिल्पकार करमरकर

यांच्यावर लिहिलेली दोन पुस्तके
 
 
सौ. स्वाती वर्तक 
 

शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर ( २ ऑक्टोबर १८९१ – १३ जून १९६७) 

१३ जून १९६७..शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांची पुण्यतिथी

त्यांच्यावर दोन पुस्तके लिहिली आहेत श्री. सुहास बहुळकर यांनी …  त्यांची आजच्या दिनीं थोडक्यात ओळख करून द्यावी असे मनापासून वाटले म्हणून हा लेखप्रपंच.

शिल्पकार करमरकर मुखपृष्ठ : मराठी पुस्तक

 

शिल्पकार करमरकर मुखपृष्ठ व मलपृष्ठ : इंग्रजी पुस्तक

आयुष्याची मौल्यवान माती.. शिल्पकार करमरकर ( मराठी )

Precious clay of life..legendary sculptor.. V.P.Karmarkar ( इंग्रजी )

मी इतकी भारावून गेले आहे की मला काही सुचतच नाही. मी काय लिहावे ?

लेखकाची भाषाही खूप  सहज, सोपी, ओघवती, प्रासादिक आहे की अक्षरश: माझ्या डोळ्यापुढे करमरकरजींचे चित्र उभे राहते. शब्दचित्र निर्माण करण्यामध्ये ते अतिशय वाकबगार आहेत असे जाणवते.

शिल्पकार विनायक पांडुरंग उर्फ नानासाहेब करमरकर यांच्या सूनबाई सुनंदा विश्वास करमरकर यांचेही मी आभार मानायलाच पाहिजे कारण त्यांनी पुनःपुन्हा केलेल्या प्रेमळ आग्रहामुळे श्री. बहुळकर अखेरीस सासवण्यात पोचले. करमरकर शिल्पालय बघता बघता त्या थोर शिल्पकाराचे जीवन अनुभवत राहिले.

शिल्पकार करमरकर यांचा जन्म २ ऑक्टोबर १८९१ सासवणे येथे झाला.

मराठी पुस्तक जरी ३१० पृष्ठांचे असले तरी शिल्पकार, शिल्पे यांचे फोटो, चित्रे याने सजलेले असल्याने वाचक सहज वाचनात गुंग होतो.
इंग्रजी पुस्तक २०८ पृष्ठांचे असून त्याची मांडणी, रचना, पाने अधिक सुबक, सुरेख व देखणी आहेत. इंग्रजी पुस्तकाचे आर्ट वर्क पार्ले येथील चित्रकार श्री अनिश दाते यांनी अतिशय सुंदररित्या केले आहे.

अनुक्रम २४ प्रकरणांचे, त्यात बालपणापासून त्यांच्या मृत्यूनंतर मुलगा व सुनेने साकार करून जपून ठेवलेले… शिल्पालयापर्यंतचे लेख वेधक आहेत.

पहिल्याच प्रकरणात, रस्त्यावरचे गलिच्छ, मरणासन्न कुत्रे उचलून, भयंकर अवस्थेत त्याला घरी आणून न्हाऊ माखू घालणारा हा कोण सह्रदय माणूस असे मनात येते. आपली उत्कंठा वाढत राहते आणि हळुवारपणे लेखक त्या शिल्पकाराच्या जीवनात आपल्याला हिंडवून आणतो.

” पहिले शिवस्मारक ” बद्दल इतक्या प्रभावी शब्दांमध्ये लिहिले आहे की माझ्यासमोर अक्षरशः सगळे ते उभे राहीले. तो अरबी घोडा, त्यांचे ते ब्रॉंझमध्ये एकसंघ ओतण्यासाठी नव्याने फाउंड्रीचा शोध घेणे, त्या पुतळ्याचा आकार आणि वजन लक्षात घेऊन तो धातूचा रस कसा घालतात वगैरे ते सगळे.. तो मोठ्या कास्टिंगचा थरार,  ते शिवस्मारकातील रिलीफ शिल्प, राज्याभिषेक सगळे सगळे. खूप सुंदर वर्णन केलेले आहे अगदी सामान्य कुवतीच्या माणसाला देखील समजेल. एवढा  सखोल अभ्यास करून त्याच्याबद्दल समजावले आहे. दोन-दोनदा वाचत होते आणि अतिशय भावले मला.

अमेरिकेच्या दौऱ्यावर करमरकर गेले ते वाचताना मी विचार करीत होते की खरोखर ते ६०, ६५ वर्षांपूर्वी कसे गेले असतील आणि माझ्या डोळ्यासमोर स्वामी विवेकानंद साकार होत होते. किती कष्टाने ते गेले होते आणि तिथे जाऊन त्यांनी अमेरिका जिंकली; तसेच करमरकर गेले त्यांनी तिथे सगळ्यांना जिंकून घेतले, आपले विचार मांडले. त्यांची शिल्पे लोकांना आवडली. तिथल्या लोकांनी त्यांची स्तुती केली, प्रशंसा केली त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर एकदम करमरकर हे विवेकानंदांसारखेच भासले.

बर्गलमनी जनरल ली व मेक्सन डेविस घोड्यावर बसून पर्वत चढत आहे या सगळ्याचे जे वर्णन लिहीले आहे ते अतिशय उत्तम रित्या चित्रित केले आहे. ते पर्वत शिखर, अब्राहम लिंकनचे डोके प्रचंड आकारात खोदणे सारे डोळ्यांसमोर उभे राहते.

करमरकरांच्या दैनंदिनीतील अभिप्राय वाचताना चांगली माहिती मिळते. करमरकर सांगतात, ” इन्स्टिट्यूटच्या प्रदर्शनात येथील विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून मिळणाऱ्या स्वातंत्र्याच्या दुरुपयोग स्पष्ट दिसत होता. आधुनिक कला निर्मिती करणारे कलावंत बेताल का असतात याचे रहस्य इथे समजते. मुळाक्षरे व व्याकरण समजण्यापूर्वी एखादा ग्रंथ लिहिला तर त्याचे स्वरूप कसे असेल तसेच या कलाकृती बघून वाटले.”

करमरकरांनी लिहिलेले स्वातंत्र्य देवीचे वर्णन .. शिल्पकाराची विशाल दृष्टी व भव्य शिल्प प्रत्यक्षात आणण्याची कृती यांचा श्रेष्ठ संगम येथे झाला आहे. इंजिनीयरचे अद्भुत कार्य आपल्याला थक्क करते. असे अनेक लेख कै .करमरकर यांनी लिहिलेले या पुस्तकात वाचायला मिळतील.

अमेरिका दौऱ्यात करमरकरांनी अनेक भव्य स्मारके अभ्यासली होती तसे काहीतरी भव्य दिव्य करण्याचे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकले नाही, ते वाचताना अतीव दुःख झाले. गांधी स्मारकासाठी त्यांनी केलेली शिल्पे, त्यासाठी केलेला अभ्यास सारेच उत्तम होते .

जे आर. डी टाटांच्या बरोबर झालेला त्यांचा तो संवाद. त्यांनी  स्केचसाठी एक हजार रुपये का द्यायचे वगैरे त्यांनी जे सांगितले आणि उद्योग समूहातील अधिकाऱ्याच्या चढेल वैचारिकतेला धक्का देऊन त्यांना जागे केले  ..मी स्वतःची प्रतिष्ठा जपली ..अशा काही वाक्यांमधून लेखकाने अतिशय उत्तम रीतीने करमरकरांचे चरित्र उभे केले आहे.

श्री. करमरकरांच्या दैनंदिन गोष्टींबद्दल ते  लिहीतात, त्यात अक्षरशः माझ्या वडिलांच्या जीवनाची अनेक साम्य स्थळे आढळली. सगळे आमच्या घरी अगदी असेच होते. त्यामुळे करमरकर हे पुस्तक वाचताना मी अगदी हरवून गेले होते.

खुद्द श्री. करमरकर हे उत्तम लेखक होते हेही या पुस्तकावरून कळते

त्यांनी लिहिलेय की पाश्चात्य कला ही निसर्गनिष्ठ आहे, आधुनिक कला आत्मनिष्ठ आहे तर पौर्वात्य कला भावनानिष्ठ आहे. त्यात त्यांनी तीनही कलांचे निष्ठावान अनुयायी गांधीजींचे चित्र किंवा प्रतिमा कशी करतील याचे सार्थपणे विवेचन केले आहे. करमरकरांचे इतरही सगळे शेवटले लेख अतिशय माहितीपूर्ण आहेत.

शिल्पे (१) सुशीला   

शिल्पे (२) छत्रपती शिवाजी महाराज

शिल्पे (३) कोलकाता येथील शिल्पे

शिल्पे (४) मत्स्यगंधा   

त्यांच्या प्रत्येक शिल्पाविषयी लेखक श्री. सुहास बहुळकर यांनी अतिशय आत्मीयतेने लिहीले आहे मग ते आत्ममग्न आणि अंतर्मुख असलेले गांधी असोत, गोगलगाईवर बसलेली अंध स्त्री असो, वडील पांडुतात्या, मत्स्यकन्या, ज्योती माकडीण व तिचे पिल्लू असो, किंवा सुशीला असो.लहान सहान बारकाव्यांसह त्याचे रसग्रहण केले आहे. खूप वाचनीय आहे.
एकच वानगी दाखल..

‘ग्रेसफुल वरी’चे शिल्प

करमरकरांनी करूण भाव व माया-ममता व्यक्त करणारे एक शिल्प तयार केले. त्याचे नाव होते,  ” ग्रेस फुल वरी. ” या शिल्पात एक स्त्री असहाय्य मुद्रेत उभी असून तिने छातीशी तिच्या लहान बाळाला कवटाळले आहे. खाली तिचा तीन चार वर्षाचा मुलगा तिच्या डाव्या पायाला बिलगला आहे. त्या स्त्रीच्या उभे राहण्यातून, डावीकडे कललेल्या मानेतून व ज्या काळजीने तिने लहानग्याला छातीशी कवटाळले आहे त्यातून तिची असहाय्यता जाणवत असतानाच खालच्या बाजूला असणाऱ्या या मोठ्या भावंडालाही, वय लहान असून जे घडले आहे, ते समजून उमजून तो बाबरला आहे. प्रत्यक्षात काय घडले आहे, ते प्रेक्षकाला कळतच नाही पण या शिल्पातून जाणवते की काही तरी भयंकर घडले आहे किंवा घडणार आहे आणि त्याच्या काळजीने ही स्त्री व तिची दोन मुले जे घडू पाहत आहे त्याकडे असहाय्यतेने बघत आहेत. या शिल्पातला त्या स्त्रीचा असहाय्य चेहरा, डोक्यावरून पदर घेत तिची उभी राहण्याची ढब, साडीच्या चुण्या, पाठीशी सोडलेला रुळणारा पदर, ज्या दोन हातांनी लहान मुलाला कवटाळले आहे, त्या हातातून व्यक्त होणारे वात्सल्य सर्व काही पहात रहावे असेच आहे. पण त्यासोबतच आल्या परिस्थितीला तोंड देण्याचा निर्धार त्यातून जाणवतो. पायाशी बिलगलेल्या मोठ्या मुलाचे कृश शरीर, कमरेला बांधलेला करदोटा व बावरून त्याने आईच्या कुशीत लपवलेले तोंड एका अत्यंत भावपूर्ण अशा निर्मितीचा प्रत्यय देते. १९३४ च्या ” बॉम्बे आर्ट सोसायटी ” च्या प्रदर्शनात हे शिल्प देखील गाजले होते.

लेखकाने किती प्रत्ययकारी वर्णन करून हे शिल्प सामान्य वाचकांसाठी जिवंत केले आहे हे सहज समजते.

प्रत्येक कलेचा निसर्ग हा देव आहे त्याची भक्ती करण्याच्या पद्धतीमध्ये काय तो फरक आहे म्हणूनच वेगवेगळ्या पद्धती अस्तित्वात आहेत या प्रांताच्या मर्यादेचे तीन कोन् आहेत इमिटेशन, रिप्रेझेंटेशन आणि इंटरप्रिटेशन त्या अतिशय सुंदर रीतीने समजावले आहे.

 

शिल्पकार करमरकर सून सुनंदा यांचे शिल्प साकारताना

शिल्पकार करमरकर इतर शिल्पांचे काम करताना

करमरकर यांनी गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर आणि गांधीजी यांना समोर बसवून शिल्प तयार केले आहे.त्यांना अनेक बक्षिसे, बॉम्बे आर्ट सोसायटीची पदके, आर्टिस्ट ऑफ द इअर चा बहुमान, ललित कला अकादमीची फेलोशिप  आणि ते भारत सरकार तर्फे ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित आहेत.

समकालीन इतर शिल्पकार यांचीही माहिती आणि करमरकर यांची पत्रे देखील उल्लेखनीय. अ पासून ज्ञ पर्यंत घेतलेला हा धांडोळा स्तुत्य आहे .

हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे. कलेवर प्रेम असणाऱ्या, चित्रकार व शिल्पकार असणाऱ्यांनी सगळ्यांनी वाचावे असेच हे पुस्तक आहे.

 

मराठी पुस्तक..आयुष्याची मौल्यवान माती. शिल्पकार करमरकर
लेखक श्री. सुहास बहुळकर
किंमत ५५०/-
प्रकाशक..राजहंस प्रकाशन, पुणे.

इंग्रजी पुस्तकPrecious clay of life .  Legendary Sculptor, V.P.Karmarkar
लेखक श्री. सुहास बहुळकर
किंमत- रु. २४०० / –

प्रकाशक – ललित कला अकादमी, दिल्ली. 

प्रकाशचित्रे : सुहास बहुळकरअनिश दाते यांच्या सौजन्याने.

– ©️  सौ.स्वाती वर्तक, खार ( प.),

मुंबई ४०० ०५२.
swati.k.vartak@gmail.com

सौ. स्वाती वर्तक यांनी पाठवलेला फोटो

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आजची कविता 

प्रदीप अधिकारी 
चिरंतन सत्य

वेळ आता जवळ आली, दूर भासणाऱ्या मरणाची,
जमवितो मी लाकडे आताशा, लागणाऱ्या सरणाची !

काय घेऊनी जन्मलो मी, काय मी कमविले वा गमविले,
गिनती त्याची कशी करावी, रांगेत उभ्या त्या शून्यांची

कळले आता मला नव्याने, का मला जे कळतच नव्हते,
प्यास लागली होती जीवाला, मृगजळाच्या त्या पाण्याची

रडवूनी मी अपुल्यांना, हसवित गेलो भलत्याच कुणाला
शेवटी हासलो मीही स्वत:शी, जखम लपवूनी त्या दु:खाची

हे सारे असेच होते, जे भासले खरे, तेच नेमके खोटे होते,
आस अंतरी म्हणुनी लागली, चिरंतन त्या सत्याची…

– ©️ प्रदीप अधिकारी             

9820451442
adhikaripradeep14@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@@@@
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 
 
– अवनी घाणेकर 
इयत्ता आठवी, बालमोहन विद्यामंदिर, मुंबई
प्रेषक मृदुला जोशी 
@@@@@@@@@@@@@@@@@@

ग्रँट रोड, एक कॅलिडोस्कोप : 

 
लेखक मधुसूदन फाटक

पुस्तक परिचय 

 
मोहन कान्हेरे

 

मुखपृष्ठ

दक्षिण मुंबईमधलं ‘ ग्रँट रोड ‘ हे एक अतिशय महत्त्वाचं स्थानक…… ऐतिहासिक महत्त्व असलेलं, सांस्कृतिक दृष्ट्या श्रीमंत असलेलं…..पूर्व – पश्चिम दोन्ही दिशांना दाटी-वाटीने वस्ती, सर्व प्रकारची व्यापारी केंद्रं …. यामुळे हा विभाग कायमच गजबजलेला! पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेन चर्चगेटवरून सुटल्या की तिसरं स्थानक येतं ते ग्रँट रोड…..या स्थानकाचा रोचक इतिहास लहानशा पुस्तिकेच्या द्वारा वाचकांसमोर ठेवला गेला आहे.

नुकतेच निवर्तलेले मधुसूदन फाटक यांनी हे काम खूपच आस्थेने केलं आहे. मधुसूदन फाटक हे फोटो जर्नालिझमकरता ओळखले जात. १९६३ साली त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि गेली ४० वर्ष अनेक मान्यवर वृत्तपत्रांच्या पुरवण्यांमधून त्यांनी  लेखन केलं. वासुदेव बळवंत फडके स्मारक समितीचे ते कार्यवाह होते आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयच्या ताडदेव शाखेचे ते अध्यक्ष होते. अत्यंत डोळसपणे  भोवतालचा वेध घेणारे, प्रासंगिक लेखन करणारे मधुसूदन फाटक….. त्यांनी या छोट्याशा पुस्तिकेमध्ये अनेक विषयांना हात घातला आहे, उदंड तपशील नोंदवला आहे. आपल्या अवतीभवतीचं लोकजीवन, इथली खाद्य संस्कृती, इथली करमणुकीची केंद्रं, इथे घडलेल्या राजकीय घटना या सर्वाचा रंजक आढावा म्हणजेच हे छोटसं पुस्तक.

रेल्वे स्थानकापासून अगदी केवळ दहा मिनिटांवर ज्योती स्टुडिओ होता, हे अनेकांना माहीत नसेल. श्री. अर्देशीर इराणी या जाणकार धनिकाने एका प्रशस्त भूखंडावर हा स्टुडिओ उभा केला. १९३१ मध्ये चित्रपटनिर्मिती सुरू झाली, आणि ‘आलम आरा ‘ हा चित्रपट तिथे जन्माला आला. राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला आचार्य अत्रे यांचा ‘श्यामची आई’ हा चित्रपट याच ठिकाणी तयार झाला…..मंगेशकर कुटुंब, न्यायमूर्ती बावडेकर, पत्रकार चं. वि. बावडेकर, चित्रपट लेखक-दिग्दर्शक दिनकर द. पाटील, अशोक सराफ, संस्कृत भाषेवर प्रभुत्व असलेले हरिभाऊ वेलणकर, सुनील गावस्कर, उत्तरा केळकर, आरती अंकलीकर टिकेकर, पंडित फिरोज दस्तूर, कवीराज राजा बढे…… ( ही यादी खूप मोठी आहे ) हे सगळे ग्रँट रोडचे रहिवासी.

इथे इंग्रजांच्या काळात ‘प्ले हाऊस’ नावाचा विभाग होता. अनेक चित्रपटगृहं त्या ठिकाणी होती, म्हणून प्ले हाऊस. नंतर त्याला पिला हाऊस म्हणू लागले. इम्पिरियल चित्रपटगृहाला खेटून दोन हत्तींच्या प्रतिकृती उभ्या होत्या, आणि आजही केविलवाण्या अवस्थेत त्या पाहायला मिळतात. या ठिकाणी ‘अलबेला’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातलं “भोली सुरत… ” हे गाणं परत परत ऐकायला रसिकांना आवडायचं. मात्र त्याकरता तिकीट परवडत नव्हतं. रात्री नऊचा शो बरोबर नऊ वाजता सुरू होत असे आणि साडे दहाच्या सुमारास हे गीत पडद्यावर येत असे. या चित्रपटगृहाचे सगळे दरवाजे उघडे करून फुटपाथवर उभ्या असलेल्या रसिकांना मोठ्या प्रेमाने गाणं ऐकवलं जात असे.

समुद्रकिनारी चार राजवाडेसुद्धा जुन्या जमान्यात पाहायला मिळत. बडोदे संस्थान अधिपती प्रताप सिंह महाराज यांचा राजवाडा, आनंद भुवन या नावाने १९०५ साली ब्रिज कॅण्डीलगत बांधला गेला. आताचं ऑगस्ट क्रांती मैदान म्हणजेच त्या काळातलं गवालिया टॅंक…..ग्रँड रोड स्टेशनपासून दहा ते बारा मिनिटाच्या अंतरावर. ही तर ऐतिहासिक जागा. त्याचीही आठवण लेखकाने काढली आहे. प्रस्तुत पुस्तकाला कॅलिडोस्कोपची उपमा दिली आहे, आणि ती योग्यच आहे.

पुस्तकात जागोजाग फोटो छापले आहेत आणि त्या त्या ठिकाणच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. पुढच्या पिढीसाठी हे पुस्तक म्हणजे एक उत्तम दस्तावेज आहे.

ग्रँट रोड, एक कॅलिडोस्कोप : लेखक मधुसूदन फाटक 

प्रकाशक : अशोक केशव कोठावळे, 
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस,
गिरगाव, मुंबई.

मूल्य रु. १००/-
पृष्ठसंख्या ७०

– ©️ मोहन कान्हेरे
mohankanhere@yahoo.in
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
अनामिकाची शिफारस

अनामिक

बालसाहित्य कालानुरूप कसे असावे ? या विषयावर आज बरेच काही बोलले जाते परंतु त्यापेक्षा काही भरीव लिहिले गेले तर ते साहजिकच हवे आहे. या विचारात असताना डॉ. उमेश करंबेळकर यांनी लिहिलेली दोन नवीन करकरीत पुस्तके हाती आली. या दोन्ही पुस्तकांची शिफारस करण्यासाठी आज आलो आहे.

डॉ. उमेश करंबेळकर हे ‘मैत्री’च्या वाचकांना प्रामुख्याने पर्यावरणावर अधिकारवाणीने लिहिणारे तज्ज्ञ म्हणून ठाऊक आहेत. त्यांनी कुमार वयाच्या मुलांसाठी काय बरे लिहिले आहे, या कुतूहलाने पहिले पुस्तक उघडले. ते आहे ‘उडणा-यांचा तलाव‘. ही अर्थातच गोष्ट आहे पण गोष्ट आहे ती दुष्काळी भागातल्या गावक-यांची आणि त्यांनी केलेल्या श्रमांतून घडलेल्या चमत्काराची. त्यांनी काय केले श्रम? त्यांनी एकत्र येऊन ठामपणे ठरवले की सर्वानी श्रमदानातून गावाशेजारून वाहणा-या ओढ्याचे पाणी अडवण्यासाठी एक बंधारा बांधायचा. मग पावसाचे पाणी त्या तलावात साठवले जाईल. आणि खरोखरच तो तलाव पाण्याने भरला आणि काय चमत्कार झाला? मुख्य म्हणजे तलाव आणि गावाचा परिसर हिरवागार झाला. तलावाकाठी अनेकानेक पक्षी आले. आणि हळूहळू तो तलाव पक्ष्यांनी गजबजून गेला. ही बातमी सर्वत्र पसरली; शहरातून अनेक पक्षीप्रेमी येऊ लागले. हे सगळे पक्ष्यांमुळे झाले, मग गावाचे भाग्य कसे उजळले …. हा तलाव ‘पक्षी अभयारण्य’ म्हणून कसा जाहीर झाला. हे सविस्तर सचित्र वाचण्यासाठी हे पुस्तक वाचा. हे पुस्तक चित्रांनी सजवले आहे संतोष घोंगडे यांनी आपल्या विलक्षण चित्रांनी.  .

दुसरे पुस्तक आहे ‘परक्या फुलांची गोष्ट.’ ही गोष्ट अशीच  माळरानातल्या फुलांवर आधारलेली आहे. या रानात जसे मोठमोठे वृक्ष होते, तसेच नाना प्रकारचे पशुपक्षी होते आणि असंख्य गवती फुले होती. ऋतूप्रमाणे या फुलांचा रंग बदले. पण एका वर्षी एक परके फूल उगवले.  सुरुवातीला या परक्या फुलाचे स्वागत झाले पण जसजशी त्यांची संख्या वाढू लागली तसतशी गवतफुलांना भीती वाटू लागली की आपले काय होणार ? मग त्यांनी त्या रानातील एका सर्वात ज्येष्ठ अशा वृक्षराजाकडे दाद मागितली आणि या परक्या फुलांना हाकलून देण्याची मागणी केली. त्या आदीवृक्षाने मात्र त्यांना कसे समजावले आणि त्याचे ऐकून पुढे काय झाले यासाठी हे पुस्तक वाचा. याही पुस्तकाला एक आगळावेगळा साज दिला आहे मैत्रेयी नामजोशी यांच्या बहारदार चित्रांनी.

एक विशिष्ट शैलीदार लेखक म्हणून गाजलेल्या डॉ. उमेश करंबेळकर यांच्या या दोन्ही पुस्तकांची माहिती पुढीलप्रमाणे  देताना असे सुचवावेसे वाटते की पालकांनी यंदाच्या वर्षी ही दोन्ही पुस्तके मुलांच्या क्रमिक पुस्तकांबरोबर खरेदी करून त्यांना वाचण्यास द्यावीत. पुस्तकांची निर्मिती उत्तम असून प्रकाशकांनी किंमत माफक ठेवली आहे.

विशेष सूचना : वाचकहो, आपल्या घरातील शाळकरी मुले जर इंग्रजी माध्यमात शिकत असतील तरी ही पुस्तके त्यांना बघू द्या. त्यातील चित्रे किती लोभसवाणी आहेत ! मराठी मजकूर मात्र त्यांना तुम्हीच समजावून सांगावा.

(१) उडणा-यांचा तलाव
किंमत रु. ८०/-


(२) परक्या फुलांची गोष्ट
किंमत रु. १००/-

लेखक डॉ. उमेश करंबेळकर,
रघुकुल निवास, ३२५, मंगळवार पेठ,
सातारा ४१५ ००२.
फोन : ९८२२३९०८१०
ईमेल : umeshkarambelkar@yahoo.co.in

प्रकाशक दिलीप माजगावकर,
राजहंस प्रकाशन प्रा. लि.
१०२५, सदाशिव पेठ,
पुणे ४११ ०३०.
फोन – (०२०) २४४७३४५९.
ईमेल : rajhansprakashan1@gmail.com
वेबसाइट : www.rajhansprakashan.com

अनामिक

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
पिल्लू मोठे झाले

मिलिंद कर्डिले
खरेच, आपल्या घरी जेव्हा एक शिशू जन्माला येतो तेव्हा घर आनंदाने किंवा प्रसन्नतेने भरून जाते. घरातील प्रत्येक व्यक्ती कामाला लागते किंवा ते बाळ सर्वांना कामाला लावते असे म्हणू हवे तर. त्याला दुध पाजणे, त्याचे कपडे बदलणे, न्हाऊ घालणे अशी अनेक कामे पार पाडावी लागतात. त्याचे हसणे, रडणे ते इवले इवले हात पाय हलवणे हे सगळे बघणे म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. जसजसे ते बाळ मोठे होत असते तस तसे त्याच्या वेगवेगळ्या लीला पाहायला मिळतात.

वाढत्या वयानुसार त्याचे आपले विचार तयार व्हायला लागतात. एक वेगळे विश्व तयार होत असते. त्या विश्वात मित्रांचा, शाळेचा समावेश होतो. आधी फक्त आई वडिलांच्या विचारांचा पगडा असतो पण नंतर इतर अनेक जणांचा प्रभाव पडू लागतो. अभ्यासात एखाद्या विषयात जास्त रुची वाटू लागते तर एखादा विषय कंटाळवाणा वाटतो. हे वय मोठे विचित्र असते. यात त्यांचे संगोपन करणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे, त्यांचा एकंदर कल बघून शिक्षणाची दिशा ठरवणे, त्यांचा मित्र परिवार कसा आहे याची चाचपणी करणे इत्यादी अनेक गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. कारण यावर त्यांचे पूर्ण भविष्य अवलंबून असते. कसोटीचा काळ असतो खरे तर. शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरावर अनेक बदल होत असतात. परिस्थितीशी सामना करण्याची कुवत निर्माण होत असते. एका पिल्लाचे रूपांतर होत असते. एक वेगळी ओळख तयार होत असते. पंख पसरून भरारी घेण्याची तयारी होत असते.

एका ठराविक वयानंतर ते आपले विचार मांडू लागतात. आपले निर्णय घेऊ लागतात. खरे तर कधीकधी घरातील शिस्त ही बंधन वाटू लागते. कारण ते वय असते भरारी घ्यायचे. स्वच्छंद वागायचे. मुक्तपणे जगायचे. मग घरात थोडे खटके उडू लागतात ज्याला आपण ” जनरेशन गॅप” असे एक गोंडस नाव दिले आहे. आपले मूल मोठे झाले आहे ही बाब स्वीकारणे आई वडिलांच्या पचनी पडणे कठीण असते. कारण त्यांच्यासाठी ते पिल्लू असते. हे बदल मुलांनी आणि आई वडिलांनी वेळीच स्वीकारले तर पुढील वाद टळतात.

हे पिल्लू पुढे नोकरीला लागते. आर्थिक दृष्ट्या सक्षम होत असते. त्याची ताकद वाढू लागते. जेवढी आर्थिक कुवत वाढते तेवढे ते जास्त स्वतंत्र होते. अर्थकारण हा आपल्या आयुष्याचा फार मोठा भाग आहे. त्याशिवाय जीवन जगणे फार कठीण आहे. वयाच्या २७/२८ वर्षांपासून ते स्वतंत्र निर्णय घेऊ लागते. आपले जीवन कसे असावे, घर कसे असावे, पत्नी किंवा पती कसा असावा, याबद्दल त्याच्या स्वतःच्या अपेक्षा तयार होऊ लागतात. एखाद्या गोष्टीबद्दल आई वडिलांशी ते चर्चा करतील पण त्यांचे ऐकतीलच याची खात्री देता येत नाही. एक स्वतंत्र विचारसरणीचे व्यक्तिमत्त्व आकार घेत असते.

अशा वेळी आई वडिलांनी त्याला योग्य त्या ठिकाणी प्रोत्साहान देणे गरजेचे असते. त्याच्या पंखात किती ताकद भरली आहे हे पहावे लागते. त्याच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज घ्यावा लागतो. आपली मते आपण अकारण लादत नाही ना याचा अदमास घ्यावा लागतो. हेच वय असते जेव्हा मुलांना आपल्याकडून वेगळ्या अपेक्षा असतात. काही तर विचित्र बोलून त्यांचे पंख छाटण्याऐवजी त्यांच्या पंखात बळ कसे येईल ते पाहणे गरजेचे असते.  एक वैचारिक परिपक्वता पालकांनी दाखवणे गरजेचे असते. पण हे तेव्हाच घडते जेव्हा पालक स्वीकारतात की ” पिल्लू मोठे झाले”

– ©️ मिलिंद कर्डिले

milindkardile@yahoo.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
बालचित्रकारांचे दालन
सुट्टीतील कामगिरी 
 
– भार्गवी महाडिक 
@@@@@@@@
– अर्जुन भातखंडे 
 
प्रेषक सौ. स्वाती वर्तक
swati.k.vartak@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@@@ 
 
हत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@

25 thoughts on “पद्मश्री शिल्पकार करमरकर

  1. पद्मश्री करमरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त माझा लेख प्रसिद्ध केल्याबद्दल ..संपादकजींचे आभार
    शून्य ..असलेली कविता भारावते. अधिकारीजी
    अवनी घाणेकर..बालमोहन चे नाव वाढविणार नक्की. पर्यावरणावर छान कविता केली आहे ..अभिनंदन अवनी आणि धन्यवाद मृदुला ताई
    ग्रँटरोडला राहणारे श्री कान्हेरेजी पुस्तक बघूनच आनंदी झाले असतील .हो न?..वाचणार पुस्तक नक्की.. .ग्रँटरोड ची आणखी ओळख होईल.
    डॉ करंबेळकर यांची पुस्तकं मला पाहिजे आहेत . मी त्यांना तसे कळविले ही आहे.
    एकूण आजचा अंक…पुस्तक परिचय ..वर आधारित दिसतो. संपादकजी फार विचारपूर्वक नियोजन करतात असे जाणवते .
    कर्डिलेजी ..आजकालच्या पालकांनी वैचारिक परिपक्वता दाखवण्याची प्रत्येक बाबतीतच गरज आहे..पिल्लू फारच झपाट्याने मोठे होत आहे सध्या ..
    भार्गवी ने पेन्सिलिंच्या साली वापरून केलेला परकर आवडला. सुरेख , चित्रे, मन लावून काढते दिसते
    आजकालच्या मुलांचे बजरंगावर असलेले प्रेम अर्जुन च्या चित्रात कळते .दोघांनाही.. आशीर्वाद व अभिनंदन

  2. स्वाती वर्तक यांचा शिल्पकार पद्मश्री करमरकर यांच्यावरील लेख माहितीपूर्ण आहे. लेखासोबतचे फोटो छानच आहेत. सासवने येथील या शिल्पालयाला मी दोन तीन वेळा भेट दिली आहे. “ग्रेसफुल वरी” हे शिल्प तिथे पाहिल्याचे आठवत नाही. २००३ साली तिथे गेलो होतो तेव्हा संपूर्ण शिल्पालयाचे व्हिडीओ शुटींग केले होते. त्यात करमरकरांच्या सुनबाई सुनंदा यांची दीर्घ मुलाखत देखील आहे. सुनंदाबाईना व्हिडीओ शुटींगची कल्पना आवडली होती. त्याची cd बनवून मी त्यांना भेट देखील दिली होती. ती cd त्यांनी त्यांच्या अमेरिकास्थित मुलाला देखील ती पाठविली होती. चार -पाच वर्षांपूर्वी तिथे गेलो असता सुनंदाबाईंची भेट झाली नाही. कारण त्या आजारी होत्या.
    या १७.४० मिनिटांच्या व्हिडीओची गुगुल ड्राईव्ह लिंक देत आहे.
    https://drive.google.com/file/d/1_H5MIvg9G8pVMvR-yHpF2KOIrPk2fx6b/view?usp=sharing

    मधुकर फाटक यांच्या पुस्तकाचा मोहन कान्हेरे यांनी करून दिलेला परिचय वाचून अनेक स्मृती जाफृत झाल्या, ग्रँट रोड स्टेशनचे नाव सर रॉबर्ट ग्रँट (१७७९-१८३८) यांच्या स्मृती निमित्त ठेवले गेले. ग्रँट रोड ची आणखी एक ओळख म्हणजे स्टेशन समोरील मेरवान हे इराणी हॉटेल. येथील मावा केकची चव अन्य कुठच्याही केकला नाही. सकाळी दहा-अकरा पर्यंतच केक मिळत असे. ब्रून मस्का/बन मस्का आणि पानी कम चहा किंवा डबल ऑमलेट पाव खाल्ले की तृप्त वाटायचे. काही वर्षांपूर्वी हे हॉटेल बंद झाले. अलीकडे अनेक ठिकाणी अंधेरी येथील मेरवानच्या शाखा आहेत. डोंबिवलीतही आहे. येथील मावा केकची चव unique असली तरी “त्या” मेरवानच्या केकची चव निश्चितच नाही. कुणी झोपेतून उठवून चितळेंची बाकरवडी दिली तरी त्याची चव ओळखता येईल, तसेच या केकबाबत होते..
    या भागातील सिनेमागृहांविषयी मी लिहिले आहे. यथावकाश ‘मैत्री’ मधे प्रसिद्ध होईल.
    इतर मजकूर देखील वाचनीय

    • श्री अजीतजी
      खूप खूप धन्यवाद
      मी विडिओ दोन वेळा बघितला
      छान आहे
      तो मी श्री बहुळकरजींना पण पाठविला आहे
      संपादकजी आणि आपली परवानगी आहे न ?

      • अजित पाटणकर यांनी पाठवलेला हा व्हिडीओ पाहून माझ्याही तब्बल ८ वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. आम्ही म्हणजे ‘मैत्री’चे मुंबईतील लेखक-वाचक यांनी २०१५ साली दोन दिवसांची एक सहल आयोजित केली होती. २४-२५ जानेवारी २०१५ रोजी ही १८ मित्रांची सहल अलिबागजवळील एका रम्य स्थानी आयोजित करण्यात आमचे डॉ. दिनेश नारुरकर यांनी पुढाकार घेतला आणि मृदुलाताईंच्या परिचयाच्या श्री. व सौ. साळगावकर यांच्या बंगल्यात आम्ही सारे जण भेटलो, राहिलो आणि खूप गप्पागोष्टी केल्या. या अविस्मरणीय सहलीला आले होते आमचे आदरणीय भाई कर्णिक, डॉ. विठ्ठल आणि सौ. वीणाताई प्रभू, डॉ. विजय आजगावकर, श्रीपाद आगाशे, मंदार मोडक. .

        या सहलीच्या उत्तरार्धात आम्ही सर्व सासवणे येथील शिल्पकार करमरकर यांच्या शिल्पालयाला भेट दिली. त्या वेळेस करमरकरांच्या सुनबाई सुनंदाबाई आम्हाला भेटल्या होत्या. सुनंदाबाईंच्या बाबतीत ही भेट महत्त्वाची ठरली कारण डॉ. आजगावकर यांनी त्यांना तपासले आणि एवढेच नव्हे तर त्यांचा मधुमेह चाचणी रिपोर्ट पाहून काही बहुमोल सूचना दिल्या होत्या.

        अजित पाटणकर यांना धन्यवाद.

        मंगेश नाबर

  3. पद्मश्री शिल्पकार करमरकर यांच्याबद्दल  सौ. स्वाती वर्तक लिहिलेला लेख फारच आवडला. सॊबत चित्रेही उत्तम दिली आहेत . या लेखामुळे स्वातीताईंच्या  शिल्पकले बाबतच्या प्रेमाची प्रचिती येते . मैत्रीचा अंक परिपूर्ण करण्यात अश्या लेखांचे असणे किती महत्वाचे असते ते मंगेशजींच्या कल्पकतेमुळे लक्षात येते . दोघांचे आभार .  
    प्रदीप अधिकारी कवितेद्वारे मांडणारे चिरंतन सत्य खरोखर जाणीव करून देते 
     इयत्ता आठवी, बालमोहन विद्यामंदिर मधील  अवनी घाणेकर हिने  पर्यावरणासंबंधी  चांगले लिहिले आहे                               
    ग्रॅन्ट रोड, एक कॅलिडोस्कोप : लेखक मधुसूदन फाटक यांच्या पुस्तकाचा   मोहन कान्हेरे यांनी करून दिलेला  परिचय फार आवडला . एके काळी ग्रंथालीचे कार्यालय तिथे असल्याने ग्रांटरोडला नेहमी जाणे होत असे . त्यामुळे ग्रांट रोडच्या  समग्र विस्ताराचा परिचय होता . ते पुस्तक मिळाले तर जर वाचीन त्याचबरोबर करमरकर याची पुस्तके वाचविशी वाटतात   
    .
    डॉक्टर उमेशजीं जरी त्यांच्या लेखनामुळे   परिचित असले तरी  उडणा-यांचा तलाव, परक्या फुलांची गोष्ट ही पुस्तके संग्रही असावीत असे वाटते  मिलिंद कर्डिले यांच्या म्हणण्यानुसार पिल्लू मोठे झाले हे काळानुसार आपसूकच कळते ,                             

    भार्गवी महाडिक, अर्जुन भातखंडे याची चित्रे चांगली आहेत 
    ताजा कलम 
    मी अभिप्राय लिहून टाकला आणि पाठवणार तेव्हढ्या आधीच्या लोकांचं  म्हणणं वाचावं म्हणून पाहिले तर श्री अजित पाटणकर यांनी दिलेलं संकेत स्थळ उघडून पाहिलं तर चाट  पडलो प्रदर्शन पाहण्याची तीव्र इच्छा झाली . त्यामुळं पाटणकर यांचे खूप खूप  आभार . आपण व्हिडीओ काढून  ठेवलात त्यामुळे आम्हाला लाभ झाला   

  4. शिल्पकार करमरकर यांच्यावरचा स्वातीजींचा लेख भावला व मला स्मरणरंजनाकडे घेऊन गेला. काही वर्षांपूर्वी अलिबाग-किहीमला गेलो असताना सासवण्याला भेट दिली होती. करमरकरांच्या बंगल्याच्या पुढील अंगणापासूनच शिल्पांना सुरुवात होते. अंगणातच एक मोठी म्हैस (व बाजूलाच गुराखीही) बसलेली दिसली. ही अर्थातच शिल्पे होती हे जवळ आल्यावर लक्षात आलं. त्यानंतर पुढील दालन व जिना यांमध्येही उभी करून ठेवलेली शिल्पे भेटत होती. माडीवरील मोठ्या दालनात ओळीने मांडून ठेवलेली शिल्पेच शिल्पे आणि त्यांतून आविष्कारीत होणारी करमरकर यांची अद्भुत प्रतिभा यांचा अनुभव घेतला. (स्वातीजींनी हे संग्रहालय पाहिलं नसल्यास जरूर पहावं.) खाली डायनिंग टेबलापाशी करमरकरांच्या सूनबाई बसल्या होत्या. त्यांचं बोलणं अगदी ऐकत रहावं असं मिस्कील. “मी लग्न होऊन सासरी आले तेव्हा मला काही कामच नसायचं. घरात नोकरचाकर होते. नव्या साड्या नेसायच्या, नटूनथटून बसायचं, आरशात बघायचं नि छान छान दिसायचं एवढंच माझं काम. पण नंतर याला कंटाळले. मग आधी मॉडेल म्हणून आणि पुढे मदत म्हणून सासऱ्यांबरोबर थोडंफार काम करू लागले. त्यातही चुकाच चुका…” हे सगळं त्या इतक्या ढंगदार व विनोदी भाषेत सांगत होत्या, की आमची अगदी हसून हसून पुरेवाट झाली. आज त्या बिचाऱ्या हयात आहेत की नाही कुणासठाऊक !

    मिलिंद कर्डिले यांनी लिहिलेलं अक्षरशः सत्य आहे. माझ्या मुलीला मी आतापर्यंत ‘पिल्लू’ अशीच हाक मारत असे. पण हे पिल्लू परवा १ जूनपासून अगदी लहान वयातच जुनिअर कॉलेजचं उप-प्राचार्य झाल्याची बातमी कळली नि तिला यापुढे पिल्लू म्हणावं की नाही हा प्रश्न उभा राहिला. पिल्लू मोठं झालं हे अजूनही पचनी पडत नाही. 

    बालचित्रकारांची चित्रे मस्त !                                                           

    • आभार..आपले वैशिष्ट्यपूर्ण मत आवडले . तुमचे म्हणणे अगदी खरे आहे .मी शिल्पालयाला भेट द्यायलाच पाहिजे.पण..!कधी कधी खरोखर नियतीच्यापुढे शरण जावे लागते आताच मागे 29 एप्रिल ला आमच्या कोंकण ट्रिप मध्ये सासवणे होते . आम्ही आवस पर्यंत पोचलो ही आणि काही अपरिहार्य कारणाने ताबडतोब मुंबईला परतावे लागले. अर्थात आज न् उद्या मी नक्की जाणारच ..धन्यवाद

  5. मैत्रीचा आजचा अंक दृष्टीस पडल्यावर वरवर चाळून पाहिला आणि हा अंक म्हणजे पुस्तक परिचयाचा विशेषांक आहे असे वाटले. स्वाती वर्तक यांनी प्रख्यात शिल्पकार करमरकर यांच्यावरील दोन पुस्तकांचा करून दिलेला परिचय, मोहन कान्हेरे यांचा आणि अनामिक यांनी शिफारस करताना डॉ. करंबेळकर यांच्या दोन पुस्तकांवर लिहिलेला लेख असे सारे वाचनात आले. एकूण संपादकांनी योग्य अशी सांगड घालून हा अंक सादर केलेला दिसला. सर्वच लेख उत्तम आहेत याशिवाय आणखी काय लिहू ?

  6. स्वाती ताईंचा शिल्पकार लेख भावला. शिल्प साकार करणे हे खरे तर अतिशय अवघड काम आहे. ती फक्त एक मूर्ती नसते. त्यात शिल्पकाराने आपले कसब पणाला लावले असते. त्यात भाव ओतले असतात.

    ग्रँट रोड सारखे मला वाटते जुन्या मुंबईतील प्रत्येक स्थानाचे एक वेगळे महात्म्य आहे. मुंबईतील इराणी हा सुधा एक लेखाचा विषय होऊ शकतो.

    महादेव आणि हनुमान मनाला भावले.

    @हर्षद जी माझी मुलगी पण आता २९ वर्षांची झाली आहे. अजूनही तोंडातून तिला कधीतरी पिल्लू म्हणून हाक मारली जाते. हा लेख तिला डोळ्यासमोर ठेऊन लिहिला आहे.

    आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

  7. आपण सगळे ‘पुस्तकपंढरीचे वारकरी’ त्यामुळे आज आळंदीहून पंढरपूरला नेहमीच्या वारीने प्रस्थान ठेवलेलं असतानाच आपणही आपल्या वारीला सुरुवात केली आहे. करमरकरांवरची दोन पुस्तकं, डॉ. उमेश करंबेळकर यांची नवीकोरी दोन पुस्तकं आणि मधुसूदन फाटक यांचं ‘ग्रँटरोड’ अशा उत्तमोत्तम पुस्तकांचा परिचय करून घेण्याची सुसंधी आज मिळाली आहे.

    स्वाती वर्तक यांनी शिल्पकार करमरकर यांच्यावरच्या दोन्ही पुस्तकांचा थोडक्यात पण अतिशय साक्षेपाने परिचय करून दिला आहे. यायला हवेत ते सर्व मुद्दे आले आहेत. त्यात स्वातीताईंना करमरकरांच्या विलक्षण, थोर कार्याबद्दल वाटणारा आदर, स्वातीताईंची कलेतली जाणकारी, सुहास बहुळकरांनी अभ्यासपूर्वक चरित्र लिहिल्याबद्दलची कृतज्ञता हे सगळं स्पष्टपणे प्रतिबिंबित झालं आहे. त्यातून एका प्रकारे त्यांचं ऋजू व्यक्तिमत्त्वही दृग्गोचर होतं आहे. कुठल्याही प्रकारची शेरेबाजी नाही हे तर खासच. साधं, सरळ आहे सगळं. स्वातीताईंचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक.

    एक गोष्ट लक्षात आणून देते. मी सगळे फोटोही बारकाईने पाहिले. त्यांत इंग्रजी पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शीर्षक Precious Soil of Life असं छापलं आहे आणि लेखात मात्र Precious Clay of Life असं आहे. हे कसं काय? व्यक्तिशः मला Precious Clay of Life हेच शीर्षक अधिक समर्पक वाटतंय एवढं मात्र नक्की.

    डॉ. उमेश करंबेळकर यांच्या दोन्ही पुस्तकांचा अनामिक लेखकांनी अतिशय आकर्षक परिचय करून दिला आहे. लगेच ही पुस्तकं मागवून घ्यावीत असं वाटलं.

    मधुसूदन फाटक यांचं ‘ग्रँटरोड’वरचं पुस्तक रोचक व माहितीपूर्ण असणार हे निश्चित. तेही वाचायला हवं.

    पुस्तक-परिचयाव्यतिरिक्त दिलेलं अन्य साहित्यही तितकंच भुलवणारं आहे. विशेषतः प्रदीप अधिकारी यांची कविता, मिलिंद कर्डिले यांचं ‘पिल्लू’ आणि बालकलाकारांच्या कविता व चित्रं, सगळंच फार सुरेख आहे.

    या स्पेशल अंकाच्या नियोजनाबद्दल संपादकांना खास धन्यवाद.

    मृदुला जोशी

    • सौ. स्वाती वर्तक लिहितात :-

      मृदुलाताई,

      तुमचा अभिप्राय वाचून मी नेहमीच सुखावते. तुमचे संपादकीय कौशल्य, बारकावे टिपणारी पारखी नजर आणि स्नेहपूर्वक सुधार सुचविणारी वृत्ती फार कौतुकास्पद आहे. तुमचे म्हणणे बरोबर आहे. डिजिटल फोटोमध्ये सॉईलच लिहिले होते मी माझा फोटो पाठवित आहे त्यात क्ले लिहिले आहे. क्षमस्व.

      माझा फोटो खूप स्पष्ट नसल्याने मी डिजिटल पाठविला. चूक झाली.

      मी तो फोटो पाठवित आहे तो येथे दिसणार नाही.

      धन्यवाद

      सौ. स्वाती वर्तक

      * वरील उल्लेखिलेला फोटो लेखाच्या शेवटी देत आहोत. – सं.

      • स्वाती,
        मी उपस्थित केलेल्या शंकेची दखल घेऊन तुम्ही लगेच स्पष्टीकरण दिलंत, एवढंच नव्हे तर नव्या सुधारित मुखपृष्ठाचा फोटोही दिलात यासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
        मृदुला

  8. पुस्तक परिचयाच्या या विशेषांका साठी माननीय नाबरजींचे आभार.
    सर्वजण (स्वाती सोडून) अभिप्राय देताना, कविता मात्र विसरले. चिरंतनसत्य ही अधिकारीजींची व पर्यावरणावर अवनी या बालिकेची कविता वाचनीय आहे. दोघांना धन्यवाद. कर्डिले जी पिल्लू चं मोठं होणं १६ व्या वर्षीच लक्षात यायला हवं २२-२३ म्हणजे उशीरच.

  9. स्वाती वर्तक यांनी मोजक्या शब्दात उत्तम परीक्षण केलंय.
    त्यांच्या वडिलांचा निसुटता उल्लेख आला आहे.
    ग्वाल्हेर मधील ते एक असामान्य व्यक्तिमत्व…..
    कृपया त्यांचा परिचय आम्हांला वाचायला मिळावा……
    चौपाटीवर लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याच्या समोर अलीकडे आंतरराष्ट्रीय अवॉर्ड मिळवलेले शिल्पकार विनय वाघ राहतात शिल्पकारांचीत्यांची तिसरी पिढी आहे शिल्पकलेवर प्रेम करणाऱ्यांनी अवश्य वाघ स्टुडिओला भेट द्यावी अनेक राजकीय नेते आणि पु ल देशपांडे यांच्यासारखे साहित्यिक यांचे विलक्षण सुंदर पुतळे आपल्याला तिथे पाहायला मिळतात

  10. सौ. स्वाती वर्तक यांनी करून दिलेल्या पुस्तक परिचयातून मूर्तिकार करमरकर उमगतात ते त्यांच्या विविध शिल्पांमधून. मला विशेष वाटले ते शिल्प त्यांची सून सुनंदा हिचे, एकदम बोलके. शिवाय ते शिल्प घडवतानाचा काढलेला फोटोही विशेष. बसलेली व्यक्ती आणि घडणारे शिल्प यांतील साधर्म्य विलक्षण. आपण लहानपणी करमरकर हे आडनाव गंमतीने इंग्रजीत म्हणायला सांगत असू पण नंतर हे आडनाव ‘ मरावे परी कीर्तीरूपे उरावे ‘ या अर्थाने सार्थ करणारे मूर्तिकार करमरकर हे नाव चिरकाल टिकून राहील हे या लेखातून आणि सोबतच्या चित्रांमधून कळते. या अंकातील प्रदीप अधिकारी यांची कविता आणि अवनी घाणेकर हिची पर्यावरणावरची कविता आवडली. एकूण अंक अतिशय वाचनीय आहे.

  11. सासवण्यातील ‘करमरकर शिल्पालय’ आम्ही पाहिले आहे. त्यावेळेस त्यांची मुलगी हजर होती, असे आठवतेय. त्यामुळे, स्वातीताईच्या लेखातील प्रकाशचित्रे पाहताना ती शिल्पे पुन्हा एकवार पाहिल्याचा आनंद झाला. स्वातीताईच्या रसभरीत वर्णनावरून पुस्तक खूप वाचनीय असणार यांत संशय नाही.
    प्रदीप अधिकारी यांची चिरंतन सत्य ही कविता सुंदर आशयाची आहे. परंतु, ती पूर्णपणे मराठीत असती तर अधिक भावली असती.

    मधुसूदन फाटक यांचे ‘ग्रँट रोड, एक कॅलिडोस्कोप’ नक्कीच वाचायला हवे असे वाटते. मोहन कान्हेरे यांनी पुस्तकाची करून दिलेली ओळख आमच्या आठवणी जाग्या करणारी आहे. ग्रँट रोडला आमचे एक कार्यालय नाना चौकांत होते. त्यामुळे आमचे तिथे नियमित जाणे होत असे. स्टेशनच्या पूर्वेला असलेल्या मेरवानमध्ये आम्ही कधीतरी ओव्हनफ्रेश पाव-लोणी खात असू. तेथील मावाकेकही घरच्यांसाठी खरेदी करत असू.

    अवनी घाणेकरची जागतिक पर्यावरण दिनानिमित्तची कविता आवडली.

    अनामिकाची बालपुस्तकांची शिफारस योग्य आहे.

    मिलिंद कर्डिले यांनी ‘पिल्लू मोठे झाले’ मधून पालकांना केलेले मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.

    भार्गवी महाडिक आणि अर्जुन भातखंडे यांची चित्रे प्रशंसनीय आहेत.

यावर आपले मत नोंदवा