डोह : निसर्गशास्त्राचा दस्तावेज

डॉ. उमेश करंबेळकर 
 

श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ‘डोह’ या पुस्तकाची प्रथम आवृत्ती पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे १९६५ साली प्रकाशित झाली.

श्रीनिवास कुलकर्णींचे बालपण सांगली जिल्ह्यातील कृष्णाकाठच्या औदुंबर या गावी गेले. बालपणीचे हे औदुंबर गाव, त्या गावचा परिसर, तेथील माणसे,निसर्ग एवढंच नव्हे तर तिथली प्राणी-सृष्टी या सर्वांचे अत्यंत प्रभावी चित्रण ‘डोह’मधील लेखांत दिसून येते.

‘डोह’मधल्या एकूण अकरा लेखांपैकी ‘सुसरींचे दिवस’ आणि ‘हा चौघडा झणाणे’ हे दोन लेख ‘मौज’मध्ये प्रसिद्ध झाले तर उर्वरित सर्व लेख ‘सत्यकथे’त प्रसिद्ध झाले. या सर्व लेखांचा प्रसिद्धी कालखंड १९६१ ते १९६५ असा आहे.
‘डोह’मधील या सर्व अकरा लेखांत औदुबरच्या परिसरातील निसर्ग आणि त्याची विविध रूपे तसेच तेथील समाजजीवनाचा भाग बनलेल्या प्राण्यांचे अनोखे विश्व हे श्रीनिवास कुलकर्णींनी अत्यंत सूक्ष्म आणि तरल नजरेनं टिपलं आहे.
‘डोह’मधील ‘आम्ही वानरांच्या फौजा’, ’जुन्या जन्मीची माणसे’, ‘रात दिवाभीताची’ आणि ‘सुसरींचे दिवस’ हे चार लेख अनुक्रमे वानर, वटवाघूळ, घुबड आणि सुसर या प्राण्यांवरील आहेत. हे चारही लेख संपूर्ण पुस्तकात त्यांच्या वेगळेपणामुळे उठून दिसतात. खरं म्हणजे ह्या चारही लेखांनी ‘डोह’वर आपला ठसा उमटवलाय असं म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.

निसर्गातील सुसर,घुबड किंवा वटवाघूळ हे तसे उपेक्षित जीव. या उपेक्षितांवर अशा प्रकारचे लेखन या पूर्वी मराठीत कुणीही केले नव्हते. या प्राण्यांविषयीच्या जनमानसातील समजुती, अंधश्रद्धा यांबरोबरच त्यांचा विणीचा काळ, त्यांच्या खाद्यसवयी, वर्तणूक या विषयीची अनेक सूक्ष्म निरीक्षणे हे या लेखांचे वैशिष्ट्य आहे.’डोह’च्या एकूण एकशे बासष्ट पानांपैकी पंचाहत्तर पाने ,म्हणजे जवळ-जवळ निम्मा भाग, या चार लेखांनी व्यापला आहे. ही गोष्टच या चार लेखांचे वेगळेपण आणि ‘डोह’मधील त्यांचे महत्त्व अधोरेखित करते.
श्रीनिवास कुलकर्णींच्या लेखनातील तरल भावविश्व, काव्यात्मता, अनुभवातील कोवळा ताजेपणा आणि अकृत्रिम लेखनशैली या गोष्टी त्या वेळी वाचकांना आणि समीक्षकांनाही खूप भावल्या. घुब़ड. वानर सुसर यांसारखे प्राणी ललित लेखनाचा विषय होऊ शकतात याचे समीक्षकांना अप्रूप वाटले आणि त्यांनी या वेगळेपणाची दखलही घेतली.

हे सर्व खरे असले तरी या पलीकडे जाऊन या प्राण्यांविषयी जी निरीक्षणे नोंदली आहेत त्यांचा खरे-खोटेपणा तपासावा, शास्त्रीय निकषांवर ती टिकतात का याचा शोध घ्यावा असा प्रयत्न त्यांनी केला नाही.किंबहुना त्याची आवश्यकताही त्यांना वाटली नाही हे येथे नमूद करावेसे वाटते. ‘सुसरींचे दिवस’ किंवा ‘जुन्या जन्मीची माणसे’ हे लेख म्हणजे ललित लेखनाइतकेच निसर्ग-शास्त्राचेही लेखन आहे ही गोष्ट त्यांनी ध्यानात घेतली नाही. केवळ ललित लेखन म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले.

माझ्या मते या पैलूकडे दुर्लक्ष होण्याचे एक कारण असे असू शकते की त्या काळात ग्रामीण भागाचा आजच्यासारखा  विकास झाला नव्हता आणि मुंबई वगळता पुण्यासह सर्व शहरांच्या परिसरातील निसर्ग बऱ्यापैकी टिकून होता. शहरातील लोकांची नाळ आपल्या मूळ गावांशी जुळलेली होती. त्यामुऴे ‘डोह’मधील निसर्ग त्यांच्या दृष्टीने अगदीच अनोखा नव्हता. कुठे ना कुठे तो त्यांना भेटत होता. साहजिकच वाचक आणि समीक्षकांनी श्रीनिवास कुलकर्णींच्या लेखनातील इतर पैलूंकडेच अधिक लक्ष दिले आणि त्यांतील निसर्ग-शास्त्र उपेक्षित राहिले.

आज पन्नास वर्षांनंतर मात्र हे चित्र बदललेले दिसते. लोकसंख्येचा विस्फोट, शेतजमिनी गिळून सुजत चाललेली शहरे, या नागरीकरणाच्या रेट्यामुळे दिवसेंदिवस आक्रसणारे वनक्षेत्र,यांत्रिकीकरण आणि महामार्गांचे विस्तारलेले जाळे अशा अनेक कारणांमुळे आजची पिढी निसर्गाला पारखी होत चालली आहे.

आपल्यापाशी जे नसते त्याचीच जास्त ओढ लागते, हा साधा नियम आहे. त्यामुळे आजच्या पिढीत निसर्गाविषयी आकर्षण वाढलेले दिसते. त्याचाच परिणाम म्हणून निसर्ग आणि पर्यावरण या विषयांवर विपुल प्रमाणात साहित्य गेल्या काही वर्षांत प्रसिद्ध  झाल्याचे तसेच ह्या विषयावरील पुस्तकांच्या विक्रीतही मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसून येते.

‘डोह’ बाबतीतही असेच घडले. १९६५ ते २००४ या चाळीस वर्षांच्या काळात ‘डोह’च्या अवघ्या चार आवृत्त्या संपल्या परंतु २००४ ते २०१४ या काळात चक्क पाच आवृत्त्या निघाल्या.ही गोष्टच नवीन पिढीची बदललेली आवड आणि तिला निसर्गाविषयी वाटणारी ओढ स्पष्ट करते. आजच्या तरुण पिढीला, ‘डोह’मधील लेखांतून सुसर,वटवाघूळ, वानर यांची जी अनोखी माहिती मिळते तीच अधिक आकर्षित करते हेही त्यातून दिसून येते.
दहा वर्षांपूर्वी मी ‘डोह’ पहिल्यांदा वाचले, तेव्हा माझ्या बाबतीतही असेच घडले.तसे पाहिले तर ‘डोह’ माझ्या वाचनात जरा उशीराच आले.पण आपल्या आयुष्यात जशा काही व्यक्ती उशिरा येतात आणि सर्वांत जवळच्या होतात तसेच पुस्तकांच्या बाबतीतही होत असावे. ‘डोह’ उशिरा वाचनात आले पण ते थेट खोल मनात शिरले आणि माझ्या अत्यंत आवडत्या पुस्तकांमधील एक झाले.
‘डोह’मधील या चार लेखांनी मनाची जबरदस्त पकड घेतली. ‘सुसरींचे दिवस’ वाचून तर मी अक्षरशः भारावून गेलो.त्याच वेळी ह्या लेखांचे निसर्गशास्त्रदृष्ट्या असलेले महत्त्व मला प्रथम जाणवले.

जागतिक पातळीवर निसर्गशास्त्राचे लेखन ललित अंगाने मांडण्याचे श्रेय सर्वप्रथम स्वीडनचा सर्वश्रेष्ठ निसर्ग-शास्त्रज्ञ कार्ल लिनीअस याच्याकडे जाते. त्याने अठराव्या शतकात वनस्पती,पशु-पक्षी,कीटक यांविषयी ललित शैलीत शास्त्रीय लेखन केले. त्यानंतर युरोपमध्ये अनेकांनी त्याचे अनुकरण केले. मराठीतही आता हा प्रकार रूढ झाला आहे.

मराठीत व्यंकटेश माडगुळकरांनी प्रथम हा प्रकार हाताळला आणि मारुती चितमपल्लींनी तो रुजवला असे मानले जाते. परंतु माडगूळकर आणि चितमपल्लींच्याही खूप काळ आधी श्रीनिवास कुलकर्णींनी अशा प्रकारचे लेखन ‘डोह’मधील या चार लेखांत  फार मोठ्या ताकदीने केले ही गोष्ट ‘डोह’ वाचल्यानंतर लक्षात येते.

या गोष्टीची नोंद तीस वर्षांपूर्वीच ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांनी घेतली आहे. तरूण भारत (पुणे) जून १९८५ च्या अंकात त्यांनी असे म्हटले आहे की, ‘मराठी साहित्यात प्राणीविश्वाचे वेगळे चित्रण करण्याची वेगळी वाट ऐतिहासिकदृष्ट्या प्रथम लक्षात येईल अशा रितीने श्रीनिवास कुलकर्णी यांनी १९६० च्या आसपास रूढ केली. त्यांच्या ‘डोह’ (१९६५) या ललित गद्याच्या पुस्तकात त्यांनी ‘औदुंबरच्या’ परिसरातील डोहाभोवतीचे वानर, वटवाघळे, डोहातील सुसरी यांचे प्रभावी आणि विस्तृत चित्रण केले आहे. मराठी रसिक वर्ग त्यांच्या या लेखनाने त्या वेळी थरारून गेला होता. त्यांनी रूढ केलेल्या वाटेवरून नंतरचे मराठी साहित्यिक गेलेले आहेत’.

तसे पाहिले तर श्रीनिवास कुलकर्णी हे माडगूळकर अथवा चितमपल्लींसारखे निसर्ग अभ्यासक किंवा शास्त्रज्ञ नाहीत. त्यामुऴे रुढ अर्थाने ह्या लेखनास निसर्गशास्त्राचे लेखन म्हणता येणार नाही.
खरे तर या प्राण्यांविषयीची माहिती लेखकाला दादा, थोरली आई, आबू ,नाना शिंगटे इत्यादींकडून मिळाली. याच्या जोडीला लेखकाचे स्वतःचेही निरीक्षण होते.म्हणूनच लेखांतील निरीक्षणे शास्त्रीय असल्याचा दावा लेखकाने कधी केला नाही किंवा त्यांची सत्यासत्यता तपासून पाहण्याचा प्रयत्नही केला नाही.

अर्थात ही गोष्ट श्रीनिवास कुलकर्णींना तेव्हा शक्यही नव्हती.याचे साधे कारण असे की त्या काळात म्हणजे ५०-५५ साली या विषयावरच्या ग्रंथांची मराठीतच नव्हे तर इंग्रजीतही वानवा होती. (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने प्रकाशित केलेल्या इंडियन अँनिमल्स या एस्.एच्.प्रेटर लिखित ग्रंथाची पहिली आवृत्ती १९४८ साली प्रकाशित झाली.)
तसेच अशा तऱ्हेची पुस्तके मिळण्याचे एकमेव ठिकाण अर्थातच मुंबई. त्यामुळे औदुंबरसारख्या मुंबईपासून तीन-चारशे कि.मी.अंतरावरील आडगावात त्यांची गंधवार्तादेखील पोहोचण्याची सुतराम शक्यता नव्हती.

थोडक्यात सांगायचे झाले तर निसर्गशास्त्राची माहिती लेखकापर्यंत पोहोचण्याची कोणतीही प्रसार-माध्यमे त्या काळात लेखकाकडे उपलब्ध नव्हती.याचाच अर्थ ह्या चारही लेखांतील निरीक्षणांचे श्रेय श्रीनिवास कुलकर्णींचे स्वतःचेच आहे.
ही वस्तुस्थिती डोळ्यांसमोर ठेवून जेव्हा या लेखांचा मी निसर्गशास्त्राच्या दृष्टीकोनातून अभ्यास केला तेव्हा जरा चकित झालो.कारण यातील अनेक निरीक्षणे शास्त्रीयदृष्ट्या अचूक होती. अर्थात काही निरीक्षणे आणि त्यातून काढलेली अनुमाने चुकीची होती हे येथे नमूद करायला हवे.पण ही गोष्ट साहजिक होती शिवाय त्यांचे प्रमाणही अल्प होते.

या चार लेखांत वर्णन केलेल्या आणि शास्त्रीय निकषांवर टिकणाऱ्या निरीक्षणांचा परामर्श घेण्याचा प्रयत्न मी या लेखात केला आहे.

याची सुरुवात ‘आम्ही वानरांच्या फौजा’ या लेखापासून करू.
श्रीनिवास कुलकर्णींचा सत्यकथेत (ऑक्टोबर १९६१) प्रसिद्ध झालेला हा पहिला लेख. ‘डोह’मध्येही या लेखाचा क्रमांक पहिलाच आहे.
या लेखात श्रीनिवास कुलकर्णींनी औदुंबरमधील वानरांची मजेशीर निरीक्षणे टिपली आहेत. परंतु त्याचबरोबर ‘वानरांच्या टोळीतील टोळीप्रमुख नराकडून टोळीतील नर-पोरांची होणारी हत्या’ आणि ‘टोळीचा प्रमुख बनण्यासाठी नर वानरांमध्ये  होणारे युद्ध ‘ ही दोन अत्यंत महत्त्वाची निरीक्षणे त्यांनी नोंदवली आहेत. ‘वानरांच्या टोळीत सत्तांतर होते’ ही माहिती त्यातून मिळते. ही दोन्ही निरीक्षणे वस्तुस्थितीला धरून आहेत.

खरे म्हणजे व्यंकटेश माडगूळकरांच्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ‘सत्तांतर‘ या कादंबरीचे बीजच या लेखात आहे. स्वतः माडगूळकरांनीही सत्तांतरच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत याचा स्पष्ट उल्लेख केला आहे.त्यात त्यांनी म्हटलेय, ’वानरांविषयी कुतूहल वाटावे असा लेख मी प्रथम श्रीनिवास कुलकर्णी यांच्या ‘डोह’ (१९६५) या ललित गद्य संग्रहात वाचला.’

याच प्रस्तावनेत माडगूळकरांनी, भारतातील वानरांवर म्हणजेच हनुमान लंगूरवर कोणी कोणी संशोधन केले याची सविस्तर माहिती दिली आहे.
भारतातील वानरांचा पद्धतशीर अभ्यास प्रथम चार्ल्स मॅकन (१९३३) आणि फिलिस जे (१९५८) यांनी केला. त्यानंतर१९५८ ते १९७५ पर्यंत वानरांवर एकूण अकरा महत्वपूर्ण अशी संशोधने झाली. त्यात ‘प्रायमेट्स ऑफ एशिया’,’ द लंगूर्स ऑफ अबू’ अशा महत्त्वाच्या ग्रंथांचा समावेश होता. हे सर्व लिखाण श्रीनिवास कुलकर्णींच्या वाचनात येण्याची अजीबात शक्यता नव्हती हे या पूर्वीच स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे ही दोन अत्यंत महत्वाची निरीक्षणे मराठीत सर्व प्रथम लिखित स्वरुपात नोंदण्याचा मान  ‘आम्ही वानरांच्या फौजा’ या लेखाच्य निमित्ताने श्रीनिवास कुलकर्णींकडेच जातो.

वानरांवरील या लेखानंतर वटवाघळांविषयीचा ‘जुन्या जन्मीची माणसे’ हा लेख जानेवारी १९६३ मध्ये सत्यकथेच्या अंकात प्रसिद्ध झाला.
या छोटेखानी लेखात वटवाघळांची अनेक सुंदर निरीक्षणे नोंदलेली आहेत. वटवाघळे कशी वितात, पाणी कशी पितात, फळे कशी खातात, त्यांचे उडणं, त्यांच्या हालचाली यांची मनोरंजक माहिती त्यातून मिळते.
या लेखात ज्या वाघळांचे तपशिलांत वर्णन आलेय ती वाघळे ‘फ्लाइंग फॉक्स’ या प्रकारची आहेत, ही गोष्ट सहज ध्यानात येते.
या वाघळांबरोबरच घरात चुकून शिरणाऱ्या पाकोळीचेही वर्णन या लेखात आहे. लेखक पाकोळ्यांना ‘वाघळांची पिले’ असे समजायचा. परंतु’ पाकोळीच्याच आकाराएवढी पण वटवाघळाचीच वेगळी जात’ असे थोरल्या आईचं मत होतं. थोरल्या आईचं हे निरीक्षण अचूक होते.

ही पाकोळी म्हणजे ‘इंडिअन पिपीस्ट्रील’ या नावाची वटवाघळाची एक प्रजाती आहे.त्यांचा आकार ४६ मि.मी. म्हणजे १.८ इंच एवढा असतो. ही वाघळे जुन्या घरांच्या छपराखाली वळचणीला किंवा आढ्याला वस्ती करतात. माशा, चिलटे, डास यांसारखे कीटक हे त्यांचे खाद्य. अंधार पडू लागला की ती वस्तीतून बाहेर येतात आणि उडू लागतात. विशेष म्हणजे ‘कीटकांचा पाठलाग करताना ती कधीकधी चुकून घरातही शिरतात’ असे निरीक्षण प्रेटरच्या ग्रंथात या वाघळांसदर्भात नोंदवलेय.
‘फ्लाईंग फॉक्स’ आणि ‘इंडिअन पिपीस्ट्रील’ या दोन वाघळांव्यतिरिक्त आणखी दोन प्रकारच्या वाघळांचा उल्लेख या लेखांत आहे. हे दोन्ही उल्लेख त्रोटक स्वरुपात आहेत. परंतु निरीक्षण अचूक असेल तर छोट्या निरीक्षणातूनही योग्य अनुमान काढता येऊ शकते असे मला वाटते.

या वाघळांसंबधीचे लेखातील ते दोन उल्लेख असे आहेत :
‘वाघळे अगदी जवळून पाहता आली ती देवाच्या आवारातून वरती आलेल्या उंबरावर लटकणारी. दोन वाघळे नेहमी तिथे जोडीने असत.’
‘एक वाघळ दिवटीच्या मळीतल्या फणसावर राही. आमच्या गावातील त्या एकुलत्या फणसाला ओळखणारे वाघळ इतरांहून वेगळे असले पाहिजे.’
हे ते दोन उल्लेख.
‘नेहमी जोडीने राहणारी’ आणि ‘फणसावर एकट्यानं राहणारे’ ही निरीक्षणे ती वटवाघळे कोणत्या प्रजातीची असावीत हे ओळखण्यास मदत करतात. प्रेटरच्या ग्रंथातील माहितीवरून ती ओळखण्याचा मी प्रयत्न केला.

प्रेटरच्या ‘इंडिअन ऍनिमल्स’ या ग्रंथात भारतात आढळणाऱ्या वाघळांच्या एकूण अकरा प्रजातींची माहिती दिली आहे. या दोन वाघळांची ओळख पटवताना प्रथम मी  अकरांमधील ‘फ्लाईंग फॉक्स’ आणि ‘इंडिअन पिपीस्ट्रील’ ही दोन वाघळे वगळली. तसेच ‘सेरोटीन’ हे वाघळ हिमालय आणि आसाम या भागांतच आढळते. त्यामुळे त्याचाही विचार केला नाही.
तसेच ‘फल्व्हस फ्रूट बॅ’ट, ‘बिअर्डेड शिथ-टेल्ड बॅट’, ‘इंडिअन फाल्स व्हॅम्पायर’ आणि’ कॉमन यलो बॅट’ ही चार वाघळे फार मोठ्या संख्येने वस्ती करतात (ROOSTING).  त्यावरून लेखांतील ही दोन वटवाघळे यापैकी नाहीत हे स्पष्ट होते.
‘टिकल्स बॅट’ संबंधी फारशी माहिती उपलब्ध नाही इतकं ते दुर्मीळ आहे.

राहिलेल्या तीन वाघळांपैकी ‘शॉर्ट नोज्ड फ्रूट बॅट’ हे वाघूळ एकट्याने किंवा छोट्या समूहाने राहते तर ‘ग्रेट इस्टर्न हॉर्स शू बॅट’ आणि ‘पेंटेड बॅट’ ही वाघळे एकट्याने किंवा जोडीने राहतात. यातील ‘पेंटेड बॅट’ हे जेमतेम दीड इंच लांबीचे आणि वाळलेल्या पानांत बेमालूमपणे दडून बसणारे असते. ‘ते सहजासहजी दृष्टीस पडत नाही’ असे प्रेटर म्हणतो. त्यामुळे लेखांतील या दोन वाघळांपैकी ते असू शकत नाही.

लेखातील ही दोन्ही वाघळे वेगळ्या जातीची आहेत असे लेखकाचे निरीक्षण आहे. त्यामुळे साहजिकच उंबरावर नेहमी जोडीने आढळणारे वाघूळ हे ‘ग्रेट इस्टर्न हॉर्स शू बॅट’ या प्रजातीचे तर त्याहून वेगळे ,गावातल्या एकुलत्या फणसावर एकट्याने राहणारे वाघूळ हे  ‘शॉर्ट नोज्ड फ्रूट बॅट’ या प्रजातीचे असावे असा निकर्ष मी या दोन निरीक्षणांवरून काढला.

श्रीनिवास कुलकर्णींचे ‘वाघळे कौलारु घरांच्या आढ्यावर फिरणाऱ्या उंदरांना रात्री घेऊन जात आणि पावसाळ्यात उमलून आलेल्या पिवळ्या बेडकांवरतीही ताव मारत.’ हे आणखी एक महत्वाचे निरीक्षण आहे. ही वाघळे ‘फ्लाईंग फॉक्स’ प्रकारची असू शकत नाहीत कारण ती फक्त फळेच खातात.तसेच  ‘इंडिअन फाल्स व्हॅम्पायर’ वगळता बाकी सर्व वाघळे किडे किंवा फळे खातात. ‘इंडिअन फाल्स व्हॅम्पायर’ ही वाघळे मात्र छोटे सस्तन प्राणी ,सरडे,बेडूक एवढेच नव्हे तर मासेही पकडतात असे प्रेटरचे निरीक्षण आहे. त्यामुऴे ही वाघळे , ‘इंडिअन फाल्स व्हॅम्पायर’ प्रजातींची असावीत असे अनुमान या निरीक्षणावरून काढता येते.

वाघळे पाणी कशी पितात त्याचेही वर्णन लेखकानं केले आहे. हे निरीक्षण लेखकाचे स्वतःचे आहे. विशेष म्हणजे या लेखानंतर जवळ-जवळ सत्तावीस वर्षांनी  मारूती चितमपल्लींनी लिहिलेल्या ‘ पवित्र पंखांची वाघुळं ‘या लेखात केलेले वर्णनही असेच आहे. याच लेखात चितमपल्लींनी , ‘वाघळांविषयी इतकं नाजूक,हळुवार लिहिताना मला कुठं आढळून आलं नाही ‘ असं श्रीनिवास कुलकर्णींच्या लेखाविषयी लिहिले आहे.
वटवाघळांसंबंधीची बरीचशी माहिती गावातल्या नाना शिंगटेने लेखकाला दिली. नाना शिंगटेने वाघळांचा चांगलाच अभ्यास केला होता.वाघळे कशी वितात याचेही फार छान वर्णन त्याने केलेय.
‘वाघळीला एका वेळी एकच पिलू होते. तिची पिलू बाहेर यायची जागा ती लोंबकळत असताना वरच्या बाजूला असते. पिलू बाहेर यायच्या वेळी वाघळी आपल्या पायांनी ते काढून घेऊन छातीशी झेलते.’
असे नानाचे निरीक्षण होते.हे निरीक्षण ‘फ्लाईंग फॉक्स’ प्रजातीच्या संदर्भात होते.

प्रेटरच्या ग्रंथात फ्लाईंग फॉक्स वाघळांमधील विण्याच्या क्रियेचे वर्णन नाही पण इंडिअन पिपीस्ट्रील वाघळे कशी वितात त्याचे वर्णन आहे आणि ते नाना शिंगटेच्या वर्णनाशी तंतोतंत जुळते.
नाना शिंगटे वाघळांचा जाणकार होता. नानाच्या मते फळांची जाणकारी वाघळांइतकी कुणालाच नसते.तसेच ‘ वाघळं विमानागत जातात आणि आंब्याच्या दिवसांत गावातली वाघळं रात्रीत रत्नागिरीला जाऊन परत येतात’  हा नानाचा शोध होता.
नानाने हा शोध कसा लावला ते समजत नाही. खरे म्हणजे औदुंबर कोकणापासून बरेच दूर पूर्वेला आहे. साताऱ्यातील वाघळे रात्री चिपळुणात जातात असे कुणी सांगितले तर त्याचे विशेष वाटत नाही. फार पूर्वीपासून सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेल्या परळीच्या बाजारात चिपळूणकडची माणसे तांदूळ विकायला येत त्यावरून तसा अंदाज येतो. परंतु रत्नागिरी आणि औदुंबर यांमध्ये असा काही संबंध दिसून येत नाही. त्यामुळे नानाचा हा शोध म्हणजे चक्क थाप असावी असे मला वाटले.
परंतु एकदा खात्री करून घ्यावी म्हणून सहजच महाराष्ट्राचा मोठा नकाशा उघडला. एक फूटपट्टी घेऊन रत्नागिरी आणि औदुंबर ही दोन्ही ठिकाणे जोडून पाहिली आणि मी चक्क उडालो. ही दोन्ही ठिकाणे आडव्या सरळ रेषेत आहेत. स्पष्टच सांगायचे झाले तर दोन्ही गावे जवळ-जवळ एकाच अक्षांशावर आहेत.म्हणजे औदुंबरचे वटवाघूळ पश्चिम दिशेला सरळ रेषेत उडत गेले तर ते थेट रत्नागिरीला पोहोचेल.

नानाचा हा शोध खरा ठरला. आयुष्यात ज्याने कधी रत्नागिरी बघितली होती की नाही याची शंका यावी अशा नानाने साठ-एक वर्षांपूर्वी, आजच्यासारख्या गुगल मॅपसारख्या सुविधा उपलब्ध नसताना, हा अद्भूत शोध कसा लावला याचे नवल वाटते.

 या नंतरचा तिसरा ‘रात दिवाभीताची ‘ हा लेख १९६४ मध्ये सत्यकथेत प्रसिद्ध झाला. तसे पाहिले तर ‘घुबडांसंबंधीच्या अंधश्रद्धा’ आणि ‘दिवसा कावळ्यांकडून घुबडांवर होणारे हल्ले’ या दोन गोष्टी वगळता घुबडांची शास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाची माहिती या लेखात नाही.असे असले तरी घुबडांवरील अशा तऱ्हेचे मराठीतील पहिले लेखन हे या लेखाचे वैशिष्ट्य मानले पाहिजे.

‘सुसरींचे दिवस’ हा लेख १९६४ साली ‘मौज’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला. चाळीसहून अधिक पानांचा हा लेख, ‘डोह’चा मास्टरपीसच आहे.
औदुंबर गावातून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या डोहातील सुसरी आणि गावकरी यांच्यातील सहजीवनाचे अप्रतिम चित्रण या लेखात पाहायला मिळते.
या लेखातील, सुसरींविषयीची माहिती शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासण्यापूर्वी सुसरींची शास्त्रीय माहिती पाहू.

भारतात तीन प्रकारच्या सुसरी आढळतात. मार्श क्रोकोडाईल,सॉल्ट व़ॉटर क्रोकोडाईल आणि घडियाल. यातील . मार्श क्रोकोडाईल आणि घडियाल ह्या गोड्या पाण्यातील सुसरी आहेत.
शास्त्रीय वर्गीकरणानुसार ह्या तीनही सुसरी ‘क्रोकोडिलिनी’ या उपकुलात मोडतात. त्यांच्या खालच्या जबड्यातील चौथा सुळा दात वरच्या जबड्याला असलेल्या खळगीसारख्या भागातून वर आलेला दिसतो. सुसरीचे तोंड मिटले असले तरी तो जबड्याबाहेर डोकावताना दिसतो.
मार्श क्रोकोडाईल आणि घडियाल यांमधील मुख्य फरक असा की, घडियालच्या नाकाचा टोकाचा भाग (चुंबळ) गोलाकार घड्यासारखा दिसतो. त्यावरूनच तिला घडियाल हे नाव पडलं.मार्श क्रोकोडाईलपेक्षा ती लांबीला अधिक असून तिची लांबी १६ ते १८ फूट एवढी असते. ती फक्त मासे व पक्षी खाते.घडियाल विशेषकरून उत्तर भारतातील नद्यांत आढळतात तर मार्श क्रोकोडाईल आपल्याकडे आढळतात.

मार्च-एप्रिल महिन्यांत सुसर नदीकाठच्या प्रदेशात अंडी घालण्यासाठी योग्य जागेच्या शोधात रात्री हिंडते. त्या वेळी मातीत तिच्या सरपटल्याच्या खुणा दिसतात.(यालाच सरपट पडणे असे गावकरी म्हणत)
पावसाळ्यात नदीचे पाणी पोहोचणार नाही अशा बेताने तेवढ्या उंचीवर जमिनीत खळगा करून त्यात सुसर अंडी घालते. साधारणतः ६०ते ७० अंडी एकाच वेळी घातली जातात. अंडी घातल्यावर सुसर शेपटीने माती पसरवून खड्डा बुजवून टाकते.
सुसर स्वतः अंडी उबवत नाही. खड्ड्यातील उबेमुळे अंडी उबतात. सुसरीच्या अंड्यातील गर्भामध्ये सेक्स क्रोमोसोम नसतो. गर्भाचे लिंग खड्ड्यातील तापमानावरून ठरते. ३० अंश सेल्सिअस तापमान असेल तर गर्भ मादी असण्याची शक्यता असते. ३१अंश से. असेल तर नर किंवा मादी आणि ३२-३३ अंश से. तापमान असेल तर गर्भ नर असण्याची शक्यता जास्त असते. तापमानाचा गर्भाच्या वाढीवर आणि सर्व्हायवल रेटवरही परिणाम होतो.कमी तापमानात गर्भाची वाढ अपूर्ण होते. पिले अशक्त निपजतात. साधारणतः ८० दिवसांत अंडी उबतात. अंड्यातून बाहेर यायच्या वेळी पिले आतून आवाज काढतात. त्याला चिर्प (chirp)असं म्हणतात. तो ऐकून सुसर खड्ड्यापाशी येते आणि खड्डा मोकळा करते. पिलांना जबड्यात घेऊन नदीत नेते.
पिलांच्या तोंडाच्या टोकावरती एक छोटा दात असतो. त्याला एग टूथ म्हणतात. त्याच्या मदतीने पिले अंड्याचे टरफल फोडून बाहेर येतात. पिलांच्या डोळ्यांवरती एक सरकपडदा असतो. त्याला निक्टिटेटिंग मेंब्रेन म्हणतात. हा मोठेपणीही कायम राहतो.
सुसर हा शीत रक्ताचा प्राणी आहे.तिचा चयापचयाचा वेग मंद असतो. त्यामुळे ती अनेक दिवस न खाता राहू शकते. सुसर मांसाच्या लचक्यांचे चर्वण न करता तसेच गिळते.अन्नाचे पचन होण्यासाठी ती छोटे-मोठे दगड गिळते. त्यांना गॅस्ट्रोलिथ असे म्हणतात. सुसरीला स्वेदग्रंथी नसतात. म्हणून ती बराच वेळ तोंड उघडे ठेवून शरीराचे तापमान कमी करते.

सुसरीविषयीची ही शास्त्रीय माहिती लेखातील निरीक्षणांशी ताडून पाहिल्यास त्यात आश्चर्यजनक साम्य आढळते. अर्थात काही गैरसमज आणि चुकीची अनुमानेही दिसतात.
प्रथम एक गोष्ट स्पष्ट होते की, सुसर आणि मगर यांमध्ये लेखकाचा थोडा घोळ झालाय.
दादांनी सुसर आणि मगरीतला,’ मगर सुसरीहून मोठी क्रूर, खोल पाण्यात राहणारी. मगरीची चुंबळ सुसरीच्या डोक्याहून खूप वाटोळी आणि जबडा-नाक या भागाचा सुळका त्यातून पुढे आलेला ‘ असा सूक्ष्म फरक लेखकाला सागितलाय. हे वर्णन घडियालला लागू पडते.पण दोघींचाही चौथा सुळा दात जबडा मिटला तरी बाहेर दिसतो.
काही जण अ‍ॅलिगेटरसाठी मगर हा शब्द वापरतात. अ‍ॅलिगेटर आणि क्रोकोडाईल यातील मुख्य फरक असा की अ‍ॅलिगेटरचा चौथा सुळा दात जबडा मिटल्यानंतर क्रोकोडाईलसारखा बाहेर दिसत नाही. मात्र अ‍ॅलिगेटर भारतात आढळत नाहीत, दक्षिण अमेरिकेत आढळतात. त्यामुळे आपल्याकडे सुसर आणि मगर हे शब्द समान अर्थीच वापरल्याचे दिसून येते.
लेखातील सुसरीची सरपट, तिचे चिंचेजवळील घळीत अंडी घालणे, पिलांचा जनन सोहळा हे सर्व वर्णन अफलातून असेच आहे आणि ते सर्व मुळातूनच वाचायला हवे. त्यातील काही गैरसमज पाहू.

लेखातील ‘ इतकी साठ-सत्तर अंडी घालून ती तयार होईपर्यंतचा काळ सुसर रात्री तिथे येत असली पाहिजे’ तसेच ‘ खालच्या अंड्यातले पिलू वरच्या अंगाला ढोसलून तोंड वर काढी. ते वयाने वरच्यापेक्षा मोठे असे.सुसरीने ते आधी घातलेले असे.’ ही अनुमाने मात्र चुकीची आहेत.
सुसर अंडी घालण्यासाठी सुयोग्य जागा सापडेपर्यंतच गावात येत असे. एकदा योग्य जागा सापडली की तिथे खड्डा करून सर्वच्या सर्व अंडी एकाच वेळी घालत असे.
तसेच खड्ड्याच्या तळातील भागाचे तापमान वरच्या भागापेक्षा थोडे अधिक असल्यामुळे खालच्या अंड्यांतील पिलांची वाढ चांगली झालेली असे. तसेच वरच्या थरातील काही थोडी अंडी कच्ची असत याचे कारण तापमानाचा अंड्यातील गर्भाच्या वाढीवर परिणाम होतो हे आहे.
‘पिलांच्या चुंबळीच्या लहान-मोठेपणावरून, पाठीमागल्या काट्यांच्या उंचीवरून, धारेवरून त्यातील नर मादी ओळखता येत,‘ हे निरीक्षण मात्र निश्चितच दखल घेण्याजोगं आहे.
‘सुसरीला वरती चाललेल्या प्रकारची कशी जाणीव व्हायची’ याचे कोडे लेखकाला पडे. त्याचे उत्तर, पिले अंड्यातून बाहेर यायच्या वेळी जो आवाज काढत, हे आहे. हा आवाज वरती लोकांना हवेत ऐकू येत नसे पण त्याची स्पंदने जमिनीतून सुसरीला जाणवत. दूरवरून येणाऱ्या आगगाडीचा आवाज प्लॅटफॉर्मवर ऐकू येत नाही पण रूळाला कान लावला की चाकांचा खडखडाट ऐकू येतो तसे.
पिलांच्या नाकाडावरील एग टूथ, त्यांच्या डोळ्यांतील सरकपडदा ही दोन्ही निरीक्षणे अचूक आहेत. पक्ष्यांच्या पिलांना एग टूथ असतो आणि काही पक्ष्यांमध्ये सरकपडदाही असतो परंतु सुसरीबाबतची ही दोन्ही निरीक्षणे मराठीत तरी याच लेखात प्रथम नोंदलेली आहेत.

गावातील नाना शिंगटे जसा वाघळांचा जाणकार होता तसा आबू हा सुसरींचा माहितगार होता. सुसरींची विष्ठा चुनकळीसारखी असते हे त्याचे निरीक्षण. सुसर दगड धोंडे खाऊन खाल्लेले मांसाचे लचके पचवी; ही माहिती आबूने कशी मिळवली याचेही नवल वाटते. माडगूळकरांनाही याचे आश्चर्य वाटले होते.
‘पाण्यातल्या देवळाच्या गरुडावर संध्याकाळच्या वेळी एक सुसर जबडा उघडून पडे आणि पिवळ्या चोचीचे मातकट रंगाचे दोन पक्षी तिच्या जबड्यात उतरून दाढेत झालेले किडे,अळ्या खात. ‘ हे लेखकाचे निरीक्षण मात्र विवादास्पद आहे. हिरोडोटसने हे निरीक्षण नोंदवलेय. पण काहींच्या मते पक्षी आणि सुसर यांच्यातील हे सहजीवन प्रत्यक्षातील नसून कपोलकल्पित आहे. तर काहींच्या मते असे सहजीवन असते आणि हे पक्षी प्लव्हर जातीचे असतात.

पक्षी आणि सुसर यांच्यातील सहजीवनाबाबतचा हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवू. पण पन्नास-साठ वर्षांपूर्वी सुसर आणि मानव यांच्यात मात्र सहजीवन अस्तित्वात होते हे हा लेख वाचून कळतं.
सुसरींकडून क्वचित माणसांवर हल्ले होत, कुत्री, जनावरं पाण्यात ओढून नेली जात हे जरी खरे असले तरी डोहातील सर्व सुसरी माराव्यात असा विचार कधी गावकऱ्यांच्या मनात आला नाही. अंड्यातून बाहेर पडलेल्या सर्वच पिलांना मारून टाकले जात नसे. सुसरीचा वंश टिकावा म्हणून त्यातील चांगली वाढ झालेली काही पिले नदीत सोडली जात. नदीची परिसंस्था टिकून राहण्यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे याची जाणीव गावकऱ्यांना होती.

या उलट आज-काल नदीत सुसर दिसली तर प्रसारमाध्यमांच्या दृष्टीने ती ‘ब्रेकिंग न्यूज’ होते आणि ‘सुसरीला पकडून दूर सोडून द्यावे’ अशी लोकांकडून मागणी होते. या पार्श्वभूमीवर ‘सुसरींचे दिवस’ या लेखातील सुसर आणि मानव यांच्यातील सहजीवनाचा हा दस्तावेज पर्यावरण जागृतीच्या कार्यात मार्गदर्शक ठरणारा आहे.
शेवटी या लेखातील एका गंमतीचा या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो.
‘क्रोकोडाईल’ हा शब्द मूळ ग्रीक ‘क्रोकोडिलॉस’ या शब्दावरून आला. त्याचा अर्थ लिझार्ड. ग्रीक भाषेत ‘हो क्रोकोडिलॉस ताउ पोटेमॉ’ अशी संज्ञा आहे. त्याचा अर्थ’ लिझार्ड ऑफ रिव्हर’ असा आहे.
जुन्या घराच्या काळ्या कडीपाटावरून फिरणाऱ्या पालीवर हात उगारला की दादा लेखकाला सांगत, ‘पाली आपल्यावर रागावल्या की, नदीत राहायला जातात आणि त्यांच्या सुसरी होतात. ‘

अशा तऱ्हेने ‘डोह’मधील ह्या चारही लेखांचा निसर्गशास्त्राच्या अंगाने शोध घेतल्यानंतर काही गोष्टी स्पष्ट होतात. त्या अशा,
‘डोह’मधील हे चारही लेख निसर्गशास्त्राचे महत्वाचे दस्तावेज आहेत. केवळ ललित लेख म्हणून त्यांचा विचार करणे हे त्यांच्यावर अन्यायकारक ठरेल.
निसर्गशास्त्राचे लेखन मराठीत सर्व प्रथम ललित शैलीतून मांडण्याचा मान निःसंशय श्रीनिवास कुलकर्णींकडे जातो. अशा प्रकारच्या साहित्याचा मराठीतील पहिला आविष्कार म्हणून ‘डोह’ची मराठी साहित्याच्या इतिहासात नोंद होते.
दुर्बीण किंवा छायाचित्रणाच्या कोणत्याही साधनांशिवाय, या विषयावरील ग्रंथ तसेच इंटरनेट सारख्या सुविधा नसताना पन्नास वर्षांपूर्वी श्रीनिवास कुलकर्णींनी ही सूक्ष्म निरीक्षणे करून ती शब्दबद्ध केली हया गोष्टीचे खरोखर नवल वाटते.(त्याच वेळी श्रीनिवास कुलकर्णींनी ही वाट चोखाळून पुढे वाटचाल केली असती तर मराठी निसर्गशास्त्र साहित्याच्या दृष्टीने ती गोष्ट मोलाची आणि भाग्याची ठरली असती हा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. असो.)

‘डोह’ने आणखी एक गोष्ट केली. पन्नास वर्षांपूर्वी निसर्गातील विविध पशु-पक्षी आणि मानव यांच्यात अस्तित्वात असलेल्या उत्कृष्ट सहजीवनाची नोंद ‘डोह’ने केली.
आधुनिक जीवनशैलीमुळे केवळ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातीलही पर्यावरण गेल्या पन्नास वर्षांत धोक्यात आले. शहरांतील सिमेंट कॉंक्रीटच्या जंगलात राहणं, पाकोळी, गव्हाणी घुबड यांना अवघड झाले. हे पशु-पक्षी शहरांतून दिसेनासे झाले. रस्तारुंदीकरण करताना तसेच जुने वाडे पाडून त्या जागी मोठ मोठ्या अपार्टमेंट्स उभ्या राहताना  शहरातील जुने-पुराणे वड, पिंपळ, चिंच यांसारखे महाकाय वृक्ष तोडले गेले आणि त्यांच्या जागी गुलमोहर, नीलमोहर यांसारखे विदेशी वृक्ष लावले गेले. वानरांना त्यांचा काहीच उपयोग नसल्यामुळे वानरेही दिसेनाशी झाली.
ग्रामीण भागातही असेच विदारक चित्र निर्माण झालं. नद्यांत सोडलेलं सांडपाणी, साखर कारखान्यांची मळी, घातक रसायनं यांमुळे जीवनदायी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नद्यांचं गटारगंगेत रुपांतर झालं. नदीकाठच्या वीटभट्ट्या, बेसुमार वाळू-उपसा यांमुळे नद्यांची परिसंस्था उद्ध्वस्त झाली आणि सुसरी बेघर झाल्या.
‘डोह’च्या प्रकाशनानंतर आज पन्नास वर्षांनी निसर्ग आणि मानव यांच्यातील साहचर्य संपल्याचं हे चित्र आपल्याला दिसतं.
परंतु याचवेळी एक आशादायक गोष्टही दिसून येते.ती ही की या गोष्टीची भयानकता आता थोड्या प्रमाणात लोकांना जाणवू लागली आहे.
‘जगा आणि जगू द्या’ या पर्यावरणाच्या संदेशाचं पालन करणं पशु-पक्ष्यांपेक्षा माणसाच्याच जास्त हिताचं आहे ही गोष्ट हळूहळू सर्वांच्या लक्षात येत चालली आहे.
‘निसर्ग आणि मानव’ यांच्यात पुन्हा सुसंवाद प्रस्थापित व्हायला हवा असा विचार पुढे येत आहे.
अर्थात यासाठी गावात दिवसा ‘वानरांच्या फौजा’ फिरत असल्या पाहिजेत तर ‘रात्र दिवाभीतांची’ असली पाहिजे आणि ‘सुसरींचे दिवस’ कसे असतात ते सांगणारी ‘जुन्या जन्मीची माणसं’ही असायला हवी.
‘हे सर्व एकेकाळी कसे अस्तित्वात होते’ हे सांगत ‘डोह’ची वाटचाल दिमाखात चालू आहे आणि पुढेही चालूच राहील.
@@@
– ©️  डॉ.उमेश करंबेळकर, सातारा.
‘ओळख पक्षिशास्त्राची’ आणि   सजीवांचा नामदाता –  कार्ल लिनिअस या पुस्तकांचे लेखक. निसर्ग अभ्यासक.
महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे, शाखा शाहूपुरी यांच्या ‘वाङमय चर्चा मंडळा’त वाचलेला निबंध (२० फेब्रु.२०१४) साभार.
(‘मौज प्रकाशना’तर्फे प्रकाशित झालेल्या ‘डोहः एक आकलन’ ह्या पुस्तकात ह्या लेखाचा समावेश करण्यात आला आहे.)
umeshkarambelkar@yahoo.co.in
प्रचित्रे आंतरजालावरून साभार.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
            नवीन मुखपृष्ठ – प्रचित्रकार ©️ प्रदीप अधिकारी       
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
आजची कविता

वर्षा पेठे 
सारून मेघांचे
रवी आवरण
सौंदर्य सखीचे
बघतो चोरून

कनक फुलांची
करी उधळण
सावळ्या संध्येचे
होता आगमन

–  ©️  वर्षा
vnpethe@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
‘ललित’ स्वागत 
श्रीनिवास विनायक कुलकर्णी

श्रीनिवास विनायक कुलकर्णी 

सांगली जिल्ह्यातल्या औदुंबर या कृष्णाकांठच्या खेड्यात माझा जन्म झाला. गावाला दोन मैलांचा डोह आहे आणि चहूबाजूंनी व्यापून राहिलेला गार हिरवा रंग.

अक्षर घटवावे, चित्रे काढावीत, वाचन करावे, सर्व समजून घेत असावे आणि स्वतःच्या मर्यादाही ओळखाव्यात, हे शिक्षण घरातच मिळाले. निर्माण होणा-या प्रत्येक उत्सुकतेला समाधान देणारे उत्तर मिळे. आणि एकूण एक उत्तरे लक्षात राहत. पुढचा प्रश्न त्या उत्तराच्या पुढचा. दिसणा-या आणि न दिसता जाणवणा-या गोष्टीच्या तळापर्यंत जाण्याचा छंद संपला नाही.

कविता वाचायला आणि मोठ्यांदा म्हणायलाही आवडे. छान वाटणा-या कोणत्याही घटनेचा कवितेशी काहीतरी संबंध आहे, असे वाटे. कवितेतले जग डोळ्यांपुढे उभे राहायला, खरेखुरे वाटायला यास वेळेपासूनच प्रारंभ झाला.  या ख-याखु-याचा शोध घेत असताना लिहायला लागलो. पहिले पहिले लेखन वडिलांनी सुधारलेले असे. कधी ते इतके सुधारले जाई की त्यांत माझे काहीच उरत नसे. आता सर्व माझेच असते.

त्या वेळी खूप मोठे वाटणारे मंडळाचे वाचनालय, समजले – नाही समजले तरी सगळे वाचून संपवले. वाचलेले, ऐकलेले, स्वप्नातले, लेखन करताना एकाच प्रभावी पातळीवर येऊ शकते, हा अनुभव अजून उरला आहे.

माझी पहिली कविता मराठी चौथीत असताना, पां, ना. मिसाळ यांनी ‘बालसन्मित्र’मध्ये पहिल्यांदा छापली. आणि पहिली गोष्ट का. रा. पालवणकरांनी ‘खेळगडी’च्या शेवटच्या बाललेखांकात. नंतर कविताच लिहिल्या. प्रसिद्धीची चटक असलेल्या काळाचा एक तुकडाही पुढे आला.  आता अनेक वैय्यर्थांच्या जाणिवा होत आहेत.

मराठीतल्या बहुतेक लहानमोठ्या नियतकालिकांतून कविता छापून आल्या. त्या निमित्ताने खूप नियतकालिकांशी संबंध आले. अलीकडे पहिल्या वेगाने कविता लिहिता येत नाही, याचे वाईटही वाटत नाही. चांगल्या कवितेच्या भेटीसाठी वाटचाल झाली. एकाकी आणि स्वयंभू अनुभव उत्कटपणे येतो. तो शब्दांत घेताना कुठे कमी न पडण्याची किमया कधीतरी अचानकपणे सुरू होईल असे आतून वाटत असते. कवितेवर नितांत निष्ठा आहे. चांगली कविता वाचायला मिळाली की अतिशय आनंद होतो.

कविता लिहीत असताना १९६० मध्ये चुकून एक लेखन केले. गो. नी. दांडेकरांनी ते ‘सत्यकथे’कडे नेऊन दिले आणि ‘सत्यकथे’ने आवडल्यामुळे छापले. श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आले. त्यांनी माझ्या लेखनाविषयी फार केले. आपल्याला लिहिता येत नाही असे वाटून खिन्न व्हावे तो भागवतांचे स्निग्ध, चैतन्यदायक पत्र यावे ! त्यांच्यामुळेच ‘डोह’ मधली लेखने लिहून पुरी झाली.

एरव्ही, लेखन करणे हे एक संकटच वाटते. म्हणून अधिक लिहून होत नाही. एखादे लेखन करावयाचे म्हटले की ते वर्षानुवर्षसुद्धा मनात तळ देऊन राहते. त्यातला लिहून होईल तेवढा भाग मनातून उडून जातो. उरलेला जणू सुटकेसाठी वाट पाहत असतो. लिहावयाचा भाग, अंधुक जाणीव असलेला एखादा अज्ञात प्रदेश उल्लंघण्यासाठी पुढे उभा असावा तसा असतो. कधी तो अंगावर कोसळेल वाटते. कधी धीर येतो. खेड्यामधल्या अंधारातून जातांना हळुहळू दिसायला लागावे तसे लिहिताना होते. तो पुढे पसरलेला असतो. त्याला अनेक वाटा असतात. काही वाटा कवितांकडे जातात. काही, दुस-यायच कुठल्यातरी लेखनाचे धुमारे फुटत असलेल्या दिशांना. काही वाटांच्या शेवटांना अद्भुत धुके असते.

ज्यांच्या स्नेहामुळे समृद्ध व्हावे असे खूपच मित्र मिळाले.

मला जिथून हुरूप येतो त्याचे हे उगम आहेत.

लिहिण्यासारखे आणखी कितीतरी आहे ….

–   श्रीनिवास विनायक कुलकर्णी

 [ ‘ललित‘ एप्रिल १९६६ च्या अंकावरून साभार ]
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
कोरोना नंतरचे माध्यम जग

डॉ. केशव साठये 

मागील महिन्यात गुगल कंपनीने पुढील ५-७ वर्षात भारतात ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार, ही केलेली घोषणा आणि जिओने ५ जी तंत्रज्ञान सुरु करण्याचे केलेलं सुतोवाच,  हा निश्चितच एक योगायोग नाही. जागतिक पातळीवर काम करणारे व्यावसायिक जेव्हा असा काही निर्णय घेतात तेव्हा त्यामागे पुढच्या १० वर्षांचे समाजचित्र त्यांच्या डोळ्यासमोर असते. या दोन्ही घटनांचा थेट परिणाम माहिती तंत्रज्ञान आणि प्रसारमाध्यम जगावर होणार हे निश्चित. क्लाऊड टेक्नोलॉजीचा वापर, इंटरनेटचा वाढता वेग ही याची वैशिष्ट्ये ठरतील. शिक्षण, प्रबोधन, करमणूक यांचा एक नवा अवतार यातून समोर येण्याची दाट शक्यता आहे. कोरोना नंतरच्या काळात माध्यमांचा चेहेरामोहरा कसा असेल याचा नेमका अंदाज बांधून मनुष्यबळ, सर्जनशीलता आणि व्यवहार यांची सांगड कशी घालायची हा यक्ष प्रश्न येत्या काळात  माध्यम जगाला सोडवावा लागणार आहे.

यातील सर्वात महत्वाची गोष्ट प्राधान्याने विचारात घ्यावी लागेल ती म्हणजे गेल्या काही काळात प्रेक्षक वाचक यांच्या बदललेल्या सवयी. हीच सवय आता माध्यम आणि विपणन क्षेत्राला  एक कलाटणी देणारी गोष्ट ठरु शकते. कोरोना काळ संपल्यानंतर या बदललेल्या सवयीला पुन्हा ताळ्यावर कसे आणायचे याला प्राधान्य द्यावे लागेल. प्रेक्षक / वाचक संशोधन हा विपणनाचा मोठा प्रकल्प हाती घ्यावा लागेल.

गेले ४,५ महिने सुरु असलेल्या या साथीच्या थैमानाने माध्यम व्यवसायाचे कंबरडे मोडले आहेच आणि हा आणीबाणीचा काळ आणखी किती महिने चालणार याचे उत्तर सध्या तरी आपल्यापैकी कोणाकडेही नाही. पण बदललेल्या परिस्थितीची दखल घेऊन माध्यम विश्वाला पुढील वाटचाल करावी लागणार आहे हे निश्चित. यात जमेची बाब म्हणजे याचा मोठा परिणाम झाला आहे तो कावळ्याच्या छत्र्यासारख्या उगवलेल्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम क्षेत्राला.केवळ भांडवल आहे म्हणून व्यवसायात उतरलेल्याना आपल्या कौशल्य शून्य कारभाराचे मोठे फटके बसायला सुरवात झाली आहे. ते आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. प्रेक्षकांसाठी आणि वाचकांसाठी हा मोठा लाभ आहे. कारण जलपर्णी  काढल्याशिवाय नितळ पाणी दिसत नाही ते आता दिसू लागेल.जी माध्यमे आपल्या कार्यसंस्कृतीवर आणि उच्च व्यावसायिक मूल्यांवर मार्गक्रमण करत आहेत त्यांच्या समोरही आव्हानं नाहीत असे नाही. मुख्य आव्हान आहे ते म्हणजे जाहिरातींचे. टीव्ही माध्यमात ३० टक्के जाहिरातींचा ओघ कमी झाला असून गेल्या वर्षीपेक्षा ३६ टक्क्यांची घट सध्याच्या कालावधीत नोंदली गेली आहे. नियमित जाहिरात करणाऱ्या ३५% कंपन्यांची अनुपस्थिती हा मोठ्या काळजीचा विषय आहे.लॉक डाऊनमुळे टीव्ही माध्यमाकडे नागरिकांचा ओढ वाढताना दिसला  २५ ते ४० टक्के प्रेक्षकांमध्ये वाढ झालेली दिसली पण जाहिरातदार  मात्र फारसा प्रतिसाद देत नाहीत असे चित्र दिसले. म्हणजे टीआरपी हा मुद्दा कोरोनाने निष्प्रभ केल्याचे  दिसते.माध्यमातल्या अशा अनेक अंधश्रद्धा या निमित्ताने हळूहळू संपुष्टात येताहेत हे एक बरे आहे.

सर्वसाधारणपणे सर्व माध्यमांमध्ये ५० ते ६० % जाहिरातीचे उत्पन्न कमी झाले आहे. या माध्यमांना आता नव्या युक्त्या प्रयुक्त्या करुन तोटा होणार नाही अशी व्यूव्हरचना करावी लागत आहे. त्याचा परिणाम दर्जा व आशय संपन्नतेवर पडणार नाही ही कसरतही करावी लागत आहे. आपला वाचक / प्रेक्षक टिकवणे हा यातला  कळीचा मुद्दा असेल. कारण आर्थिक संकटामुळे हा वाचक ग्राहकांच्या  भूमिकेत गेला आहे. त्यामुळे प्राप्त परिस्थितीतून आलेला चोखंदळपणा आणि शेलकी निवड हा यात महत्वाचा निकष ठरु शकतो.

गर्दीचे ठिकाण,सिनेमा नाट्यगृहे येथे जाण्यास प्रेक्षकांची मानसिकता होण्यास बराच कालावधी लागू शकतो. प्रेक्षकांचा ग्राहकांचा वर्षानुवर्षे केलेला अभ्यास आता माध्यम संशोधन संस्थाना पुन्हा करावा लागणार आहे. भीती, शंका, सुरक्षेला प्राधान्य, मानसिक ताणताणाव नियोजन अशा अनेक बाबींवर काम करुन बदलत्या माध्यम पर्यावरणाचे प्रारुप तयार करावे लागेल. नेटफ्लिक्स,अमेझॉन प्राईम,हॉट स्टार यासारख्या संकेत स्थळांना सध्या मोठी मागणी दिसते. पण त्यासाठी आवश्यक तो आशय पुरवठा, निर्मिती याच्यावरील बंधनांचे काय करणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. विशेषतः चित्रपट, मालिका क्षेत्रात अंतराचे, कलाकार संख्येचे अनेक प्रतिबंध असल्यामुळे होणारी निर्मिती कितपत प्रभावी असेल याबद्दलही साशंकता वाटते. नुकतीच वयोगटाची मर्यादा सरकारने उठवली असली तरी एकूणच तणावग्रस्त स्थितीत चित्रीकरण करणे हे किती जिकीरीचे आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

न्यू नॉर्मलचा हा टप्पा स्विकारताना डिजिटल माध्यम उद्योग आता वेगाने आपल्या भावविश्वात, दैनंदिन व्यवहारात प्रवेश  करतो आहे. त्याच्याबरोबरच्या सहजीवनाला आता आपल्याला जुळवून घ्यावे लागणार आहे. हे मान्य करुनही करमणूक क्षेत्रातील नाटक, चित्रपटगृहातील सिनेमे, सांस्कृतिक कार्यक्रम ऑफ लाइन माध्यम व्यवहार आजही जनमानसात आपले वैशिष्ट्य टिकवून आहेत. ते अधिक लोकाभिमुख कसे करता येतील त्यामधील त्रुटी कमी करुन त्याचे आकर्षण कसे टिकवून ठेवता येईल यावर माध्यमकर्मी मंडळीना काम करावे लागेल.

यावरचा प्रभावी उपाय मला असा दिसतो की प्रसार माध्यमांना पुढील काळात जाहिरातींच्या कुबड्या कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. पे वॉलसारखे प्रयोग पाश्चात्य देशात सुरु आहेत, वर्गणीदार हाच उत्पनांचा महत्वाचा स्रोत असला पाहिजे, जाहिराती नाही हे या मागचे धोरण आहे. हेच धोरण वृत्तवाहिन्या, मनोरंजन वाहिन्या यांच्या बाबतीतही वापरता येईल. दर्जेदार आशय हाच माध्यम विश्वाचा कणा असायला हवा ही भावना आता सार्वत्रिक होण्याची गरज आहे. फुकट मिळणारे किंवा अल्प किमतीत मिळणारे बहुतेक सत्वहीन असते याचा अनुभव आपल्याला सर्वच क्षेत्रात येतो;  माध्यम क्षेत्रही त्याला अपवाद नाही. मोफत हवे ही मानसिकता बदलून मुठ सैल करण्याची तयारी आता सर्वानीच करायला हवी.

२००२ ते २०१३ हा कालावधी या क्षेत्रासाठी जागतिक मंदीचा ठरला; यापुढील काळ हा अधिक अक्राळ विक्राळ स्वरूपात समोर उभा ठाकणार आहे. माध्यमकर्मींच्या नोकऱ्यांमधील सुरक्षितता हा मुद्दाही कोरोना नंतरच्या काळातही महत्वाचा ठरणार आहे. राष्ट्रीय पातळीवर एक हजारहून अधिक अर्ध वेळ / पूर्ण वेळ पत्रकारांचा रोजगार गेल्या १२-१५ महिन्यात गेला आहे. काहींच्या नोकऱ्या वाचल्या पण पगारात १० ते ३०% कपात करण्यात आली आहे. द वॉल्ट डिस्ने कंपनीसारख्या मातब्बर संस्थेनेही स्वेच्छा वेतन कपातीचा प्रस्ताव कर्मचाऱ्यांपुढे ठेवला आहे. जगभरात थोड्या फार फरकाने हीच परिस्थिती आहे. या खडतर वाटेवरुन मार्ग काढत माध्यम विश्वाला पुढे जायचे आहे.

मनुष्यबळाच्या बाबतीत निर्माण झालेल्या या खडतर परिस्थितीला माध्यम क्षेत्रांनी निवडलेल्या उमेदवारांची शैक्षणिक अर्हता आणि कौशल्याची वानवाही यला काही अंशी जबाबदार आहे. अर्धशिक्षित पत्रकार, केवळ  तांत्रिक सामुग्री हाताळणारे पण वृत्त मूल्यांची जाण नसणाऱ्या मंडळीनी अनेक वृत्तवाहिन्या गजबजलेल्या आहेत; त्यांना आत पायबंद घालण्याची वेळ आली आहे. नव माध्यम पत्रकारिता, माध्यम व्यवसाय हा केंद्र बिंदू ठेऊन तयार केलेल्या अभ्यासक्रमांना आणि  प्रात्यक्षिकांवर भर देणाऱ्या शिक्षणाला पर्याय नाही हे वास्तवही या महामारीच्या संकटाने समोर आणले आहे. कूशल मनुष्यबळ हा आता परवलीचा शब्द होणार आहे. अर्धशिक्षित, कमी पगारात काम करणारे तंत्रज्ञ फारसे कामाचे नाहीत ही जाणीव आता पक्की होणार आहे; हा या संकटाने दिलेला आशीर्वादच म्हणावा लागेल.

सध्या निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती ही माध्यम क्षेत्रातील व्यवस्थापन, माध्यमकार्मी, ग्राहक आणि जाहिरातदार या सर्वांचीच कसोटी पाहणारी असली तरी ती कायम राहणार नाही आणि कालांतराने त्यात अनुकूल बदल होत जाणार, या वास्तवाचे भान सर्वानीच ठेवायला हवे. विशेषतः आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक माध्यम संस्थांनी समोर दिसणाऱ्या तात्कालिक विदारक चित्राकडे वस्तुनिष्ठतेने पाहण्याची गरज आहे. कपात, अमुलाग्र धोरण बदल, मनुष्य बळाकडे नकारात्मकतेने पाहणे हा त्यावरचा उपाय नाही. कार्यक्षम आणि सृजनशील मनुष्यबळ ही माध्यम जगाची सर्वात मोठी संपत्ती असते. तिला प्रशिक्षित करणे, कामाचा अनुभव देणे यात केलेली गुंतवणूक माध्यमसंस्थानी विचारात घेतली पाहिजे आणि कोरोना नंतरचे माध्यम जग अधिक संवादी,सकारात्मक,स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण असेल याची ग्वाही दिली पाहिजे.

– ©️  डॉ केशव साठये
Keshavsathaye@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
माय मराठी
सचिन उपाध्ये 
 
– ३ –
काही दिवसांपूर्वीच मराठीतली एक गंमत लिहिली होती. वस्तू एकच; पण उपयोगानुसार नांव बदलतं- हंडी, मडकं, माठ इत्यादी.
आज बघूया – शब्द एकच; पण त्याचं लिंग बदललं की अर्थही बदलतो अन् पदार्थ देखील…

१) कात – तो कात आणि ती कात. तो कात पानांत घालतात व ओठ लाल होतात आणि ती कात म्हणजे सापाची कात.
२) खोड – ती खोड आणि ते खोड. जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही आणि झाडाचे किंवा चंदनाचे खोड.
३) शेव – हा जरा आडवळणाचा शब्द पहा. ती शेव म्हणजे शेव-बटाटा पुरी वगैरेशी संबंधित आणि तो शेव म्हणजे टोक. उपरण्याचा शेव बुडवला व मास्तरांनी कोटाला लागलेला डाग पुसला.

असे अनेक शब्द सापडतील मायबोलीत.
आता एखाद्या शब्दाचा वापर करून काय साधता येतं पहा-
‘अप्सरा’ नावाऐवजी ‘बायको’ नावाची पेन्सिल असती तर जास्त समर्पक नाव ठरलं असतं ना ! कारण ?
कायम टोकाची भूमिका ! आहे की नाही गंमत माय मराठीत?

– ©️ सचिनदा

 sachinupadhye26@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
दसरा

आठवणीतले सण [ ५ ]
 
सौ. स्वाती वर्तक  

“ विभाताई, विभाताई,….रामलीला होणार ..रामलीला होणार …”  .जिन्यावरून धडपडत वर येत, पळत, धापा टाकत माझा धाकटा भाऊ हे सांगायला आतुर झाला होता, आनंद त्याच्या तोंडावरून ओसंडून वाहत होता.
आणि खरेच होते ते ….! आमची बाल मने प्रसन्न होत. अशी दसऱ्याची वर्दी आमच्या घरात १० दिवस आधी लागत असे.

आमच्या भल्या मोठ्या घरासमोर एक विस्तीर्ण मैदान होते. तेथे क्रिकेटचे वेड फारसे नव्हते पण हॉकी मात्र सर्व मुले खेळत असत. ऑलिम्पिकमध्ये गोल करून विश्वचषक आणून देणारा हॉकीपटू याच मैदानात घडलेला, तेथे सभा होत, अटलजी येत, आणि …आणि आमचे बालविश्व व्यापून टाकणारे, आनंदाचा अमोल ठेवा वाटणारे ..रामलीला ..चे खेळही होत. दसरा जवळ आला की ट्रक भरून तेथे लोखंडी कांब, लाकडी तक्ते, फळ्या, कनातीचे रंगीबेरंगी कापड, झालरी, खुर्च्या, लहान मोठे बांबू , ध्वनिक्षेपक यंत्रणेच्या योजनेसाठी लागणारे चित्रविचित्र रीळ, वायर, भोंगे असे भरपूर सामान उतरविले जाई. ते बघताच किंवा त्यांचे आवाज येताच लहानग्यांना प्रेमाचे भरते येई. कोणी मैदानात ते जवळून बघायला पळे तर कोणी घरच्या भावंडांना निरोप द्यायला धावे.

दोन दिवसातच रामलीला सुरू होत असे. गंमत अशी की आमच्या घरातूनसुद्धा ती दिसत असे. पण अति उत्साही मुले संध्याकाळपासूनच स्पष्ट दिसावे, अगदी जवळून बघता यावे यासाठी मैदानात जात. पुढे बसण्याचा नंबर लावत. आज तेथे कोणती कथा दाखवली,  ती नाट्यरूपात दुसऱ्या दिवशी आमच्या घरी थोडी मोठी भावंडे करीत असत. तेथले युद्ध देखील संगीतमय असे. ते नोटेशन आणि त्या तालावर नाचत तलवारी फिरवणे अजूनही आम्हा सर्वांना पाठ आहे. १० दिवस नुसती धमाल असे. आमचा सर्वात मोठा भाऊ थोडी दादागिरी करे. नेहमी राम होण्याचा मान मलाच मिळाला पाहिजे, हा त्याचा खाक्या ..तर दुसरा मोठा भाऊ शरद पडेल ती कामे करी. आज लक्ष्मण, तर उद्या मारुती, कधी रावण. बहीण वनिता एकच स्त्री पात्र, त्यामुळे राजमाता कौसल्याही तीच, सीतामाताही तीच, त्राटीकाही तीच तर मंदोदरीही तीच. आम्ही खालची भावंडे त्यांच्या दृष्टीने अगदीच बाल..त्यामुळे वरकड कामे करण्यासाठी आणि प्रेक्षक म्हणून आम्हाला बहुमान मिळे. दादाताईचे मित्रही येत… आते, मामे भावंडे कधी वेगळी वाटलीच नाहीत.  आमची गच्ची खूप मोठी. तेथे दिवस दिवस पसारा, गोंधळ घातला तरी मोठयांना खालच्या माळ्यावर काही कळत नसे. त्या बापड्या स्वतःच्या कामात इतक्या व्यस्त असत की मनातून त्याही सुखावत असतील, मुलांची भुणभुण नको. एकदा तर शरदला मारुती केले होते. मित्रांनी त्याला छान सजवले, लांब लांब चिंध्या आणून मोठी शेपूट केली आणि दिली खोचून त्याच्या विजारीत. अगदी खऱ्यासारखे करायचे हं… म्हणत कोठून तरी चिंधी पेटवून आणली आणि त्याच्या शेपटीला आग लावली. म्हणे आज लंकादहन होणार आहे. सुदैव आमचे की नेमकी त्याच वेळेस आई आली, मुलांचे काय चालू आहे बघायला ( भाग्य, तिला अशी लक्ष ठेवण्याची सवय होती. ) तो उपद्व्याप बघून तिचे धाबे दणाणले. पण तिच्या प्रसंगावधनाने मोठीच दुर्घटना टळली.

रामलीला सुरू होण्याआधी हरिहरन वगैरे गायकांची  भजने ध्वनिक्षेपकावर  ऐकायला मिळत. पुनः पुनः ऐकून ती पाठ होत आणि मग घरातील मोठ्या झोपाळ्यावर किमान ९, १० जण बसून त्या गाण्यांची उजळणी करत असू. दसऱ्याच्या दोन दिवसांपूर्वीच मैदानात एक आणखी आकर्षण मुलांना दिसे. तेथे मोठमोठे तीन पुतळे उभारण्यात येत. रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांचे. त्यात खूप फटाके ठासून भरत. असे दहा दिवस कधी संपत हे कळतही नसे .आणि मग दादाच्या मराठी पुस्तकातील धडा ऐकू येई….हसत हसत वाचन होई…”मोरू ऊठ. दसरा उजाडला . मोरूचा बाप मोरूला म्हणाला. …”

मग दसऱ्याच्या तयारीची मज्जा अवर्णनीय. त्या काळी सॅटीन या कापडाचे अप्रूप. माझी आई त्या कापडाचे आम्हा मुलींना परकर पोलकी शिवत असे .त्यावर फुले लावीत असे. नवा कोरा वास असलेले कपडे सणावारीे परिधान करण्याचा आनंदआजच्या डझनांनी कपडे टाकणाऱ्या मुलांना नाही कळणार.

तोरण, फुले, सजावट, ८, १० किलो तरी श्रीखंड आणि वर चिक्कार लाडू. आधी सांगितल्याप्रमाणे आमचे घर इतके मोठे होते की मोठा भाऊ जेव्हा प्रथम नोकरीनिमित्त मुंबईला आला आणि भाड्याने राहत होता तेव्हा त्याच्या शेजाऱ्याने तोंडाचा आ असा काही वासला की बंदच होईना कारण भाऊ त्याला एवढेच म्हणाला होता “ या घराएवढे आमच्या घरात बाथरूम आहे हो, मला आठवण येतेय. ” . त्यामुळे दसऱ्याला असंख्य लोक त्या मैदानातील आतिषबाजी, दारूकाम, फटाके, मिरवणूक बघायला येत. दारासमोरून मिरवणूक जाई त्यात राम आणि रावणाचे युद्ध चालू असे. ते मैदानापर्यंत जाई आणि तेथे स्टेजवर थोडा वेळ युद्ध  चाले. एकदा रावण खाली पडला की मैदानात उभारलेले पुतळे पेटवण्यात येत. त्यातही ठरलेले. आधी मेघनाद मग कुंभकर्ण आणि शेवटी .. राम स्वतः येत.  आपले धनुष्य बाण उचलत आणि रावणावर नेम धरीत. तो पुतळा पेटून धडधडू लागे  .. रावणदहन… त्यातील दारुशोभा काम संपूच नये असे वाटे. एकदा का तो कोसळला की जीवाच्या आकांताने सर्व ओरडत… प्रभू श्री राम की जय … काही स्त्रिया भक्तिभावाने हात जोडीत.

हे सर्व बघण्यासाठी घरी येणाऱ्यांची गणती नसे. ओळखीचे, अनोळखी.  कोणीही. कोणालाही मज्जाव नसे. श्रीमंत, गरीब, ड्रायव्हरचे, मोलकरणीचे नातेवाईक, शेजाऱ्यांच्या गणगोतातील, लहान, थोर किती किती लोक असायचे. आणि आई आमची.. प्रत्येकाने प्रसाद घेतला का नाही हे आवर्जून बघायची. एकदा मला आठवते, तिने चारशे लाडू केले होते. का तर म्हणे अगं, मागल्या वर्षी थोडे कमी पडले होते नं .. धन्य त्या माऊलीची. पूर्वीच्या स्त्रियांचा कामातील आवाका नि उरक बघून मी थक्क होते. आज लॉकडाऊनमुळे, ”किती काम पडतं गं,“ म्हणणाऱ्या बघितल्या की आपोआप माझे कर या स्त्रियांसाठी जुळतात.

आमचे वडील, भाऊ आणि पुरुष मंडळी शिलंगणाला जात. नवी सडक नाव असलेल्या रस्त्यावर शमीचे झाड होते, तेथे जाऊन पाने घ्यायची येताना मोठे शिवलिंग असलेले शिवमंदिर लागे. तेथे जाऊन पाने वाहायची  आणि भक्तिभावाने पूजा करायची व घरी परतायचे. आम्ही बहिणी, आई, इतर स्त्रिया दूध पाणी घेऊन त्यांच्या येण्याची वाट बघत असू. कारचा हॉर्न ऐकू आला की लगबगीने वरील पायरीवर तयार. त्या काळीसुद्धा जरी राज्ये विलीन झाली होती तरी श्री श्री जिवाजीराव शिंदे हे सोने लुटत. त्यांच्या परिचितांमध्ये वडिलांचे नाव वर असे त्यामुळे घरापासून लांब असलेले एक देऊळ ज्याला.. मांढरे की माता.. म्हणून ओळखतात तेथे वडील, भाऊ जात असत .. शमीची पाने सोन्याचा वर्ख लावलेली श्रीमंत राजे वाटत. ती घेऊन सर्व घरी येत. वडिलांना मुलगा, मुलगी हा भेद पसंत नव्हता. एकदा त्यांनी वनिताताईला पण विचारले, तुला चलायचे आहे का ? ती आनंदाने गेली आणि राजांनी तिला देखील सोन्याची पाने दिलीत. अजूनही ज्योतिरादित्य शिंदे दसऱ्याला तेथे जातात असे कळते.

सर्वांचे पाय दुधाने धुवून पुसून झालेत की कधी कधी गाण्याचा कार्यक्रम असे. नंतर हसत खेळत जेवणे काय मोठाल्या पंगती झडत. आणि दहा दिवस चाललेली धमाल संपुष्टात येत असे.पुनः पुढच्या वर्षीची वाट बघत .

– ©️ सौ. स्वाती वर्तक

खार (प), मुंबई  ४०० ०५२
swati.k.vartak@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
चित्रकारांचे दालन
–   ©️ आदित्य मिलिंद महाबळ, सांगली
7972976669,
आर्किटेक्ट व इंटेरियर डिझाईनर
@@@@@@@@@@@@@@@@@
महत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@@@@@@@@

श्री ज्ञानेश्वरी चिंतन

अध्याय पांचवा [ १ ]

 
मधुकर सोनवणे 

लेखांक सतरा  

चौथ्या अध्यायात भगवंत अर्जुनाला संशय रहित होऊन शुद्ध ज्ञानाची प्राप्ती कर, असे सांगतात, आधीच्या उपदेशात स्पष्ट आदेश देतात

“ आता पार्था निःशंकु होई | या संग्रामा चित्त देई | एथ हे वाचूनी कांही | बोलो नये || [३/१९१] क्षात्र धर्माला उचित असे युद्धकर्म अनुसर, ते म्हणतात, उचित ज्ञानाविषयी संशय हाच मनात असलेल्या संशयाने विश्वास असलेल्या मार्गापासून च्युत करतो. “ जै अज्ञानाचे गडद [काळोख] पडे | तै हा बहुवस मनी वाढे | म्हणौनि सर्वथा मार्गू मोडे | विश्वासाचा ||[ ४/२०४]
अर्जुनाच्या मनात, जीवनात संन्यास आणि कर्म यांच्या श्रेष्ठतेविषयी आणि कल्याण साधण्यासाठी नेमके काय आचरणीय आहे या विषयी संभ्रम निर्माण होतो. तो म्हणतो,

मागां सकळ कर्माचा संन्यासु । तुम्हींचि निरोपिला होता बहुवसु [सर्वप्रकारे]। तरी कर्मयोगीं केवीं अतिरसु [महत्व]। पोखीतसां [वाढविता] पुढती ॥ २ ॥

हे काय देवा?, मागे तुम्ही कर्म संन्यास हाच श्रेष्ठ सांगितला होता आणि तरी मला कर्मयोगात कां गुंतविता? युद्धापासून परावृत्त होणे, हाच तर खरा संन्यास असतांना, पापकर्म अशा हानी होणार्‍या त्या युद्धकर्मात गुंतवून पापाचा धनी कां करविता?

तरी याचिलागीं तुमतें । म्यां राऊळासी [देवांना] विनविले होते । जे हा परमार्थु ध्वनितें [गूढ शब्दात]। न बोलावा ॥ ५ ॥ परी मागील असो देवा । आतां प्रस्तुतीं उकलु देखावा । सांगे दोहींमाजि बरवा । मार्गु कवण ॥ ६ ॥ जो परिणामींचा निर्वाळा [शुद्ध]। अचुंबितु [अचूक] ये फळा । आणि अनुष्ठिता प्रांजळा [प्रांजलपणाने] । सावियाचि [सुलभतेने] ॥ ७ ॥

यासाठीच मी आपणास विनंती केली होती की, परमार्थ गूढ शब्दात सांगू नये. कारण भगवंतांचे वचन हाच मानवी जनांचा जीवनाधार असतो {“मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या: पार्थ सर्वथा”- ३/२३] भगवंत स्वतः आनंद स्वरूप असल्याने त्याच्या वचनांचे अनुसरण जीवनात आनंद देते. आणि त्यासाठीच तर जीवनाची सारी धडपड आहे.
अर्जुनाच्या प्रश्नाचा आशय भगवंतांनी जाणला. अर्जुनाचा संशय आणि निश्चित श्रेयस्कर असे जाणून घेण्याची उत्कंठा यांनी भगवंतांना आनंद वाटला.

आणि ते त्याला सांगू लागले,
तो म्हणे गा कुंतीसुता । हे संन्यासयोगु विचारितां । मोक्षकर तत्वता । दोनीहि होती ॥ १५ ॥

अर्जुना, संन्यास आणि कर्मयोग दोन्हीही कैवल्याप्रत नेतात हे खरे आहे. पण तुला संन्यास याचा अर्थ नीट उमगलेला नाही. संन्यास म्हणजे बाह्य विधिने साध्य करवून घेणारा विधी नाही. ती निर्लेप अंतःकरण ठेऊन आसक्ती विरहित अशी आचार-प्रणाली आहे.
आणि मी माझें ऐसी आठवण । विसरले जयाचे अंतःकरण । पार्था तो संन्यासी जाण । निरंतर ॥ २० ॥

देह, मन, बुद्धी याद्वारा केले जाणारे प्रत्येक कर्म करतांना ज्याच्या अंतःकरणात ‘ मी-माझे ’ अशी भावना पुसटशीही रहात नाही.तो खरा संन्यास आणि ते आचरणारा हाच खरा ‘संन्यासी.’ या जीवनात कांहीच माझे नाही. जे लाभते ते माझ्या व्यक्तिगत वापरासाठी नसून माझ्या क्षमतेनुसार ते गरजवंताला योग्य वेळी निष्काम भावनेने व अलिप्त राहून देण्यासाठी आहे असा भाव हवा. हाच खरा संन्यास.
आचार्य सुद्धा त्यांच्या भाष्यांत हेच सागतात. “ ब्रहमाणि नितरां आसः संन्यास: “ नित्य ब्रह्मस्वरुपात असणे हाच संन्यास.
कर्माच्या संगतीला विरक्ती असली आणि हे मी भगवंतासाठी करीत आहे. यालाच ब्रह्मवृत्ती म्हटले आहे. हेच ज्ञानदेवांनी मागच्या अध्यायात संगितले होते. “ म्हणौनि ब्रह्म तेचि कर्म “[ अध्याय ४/१२१]

आतां गृहादिक आघवें । तें कांहीं नलगे त्यजावें । जें घेतें जाहलें स्वभावें । निःसंगु म्हणऊनि ॥ २२ ॥

संन्यास हा जर बाहयोपचार नाही, तर त्यासाठी घरदार कशाला सोडून द्यायचे? जीवनात ‘निःसंग’ राहणे हेच जर मुख्य उद्दिष्ट आहे. तर त्यासाठी एकांतात जाण्याची गरजच काय?
निष्क्रियता म्हणजे संन्यास असा अर्थ घेणाराला महाभारत फटकारते,
यदि संन्येसत: सिद्धिम् राजा कश्चिदवाप्नुयात् | पर्वतश्च दृमाश्चैव क्षिप्रम् सिद्धिमवाप्नुय:  || १२/१०/२४.
हे राजा, जर निष्क्रियता हाच संन्यास असेल, तर पर्वत आणि वृक्ष यांनाही सिद्धि तत्काळ मिळाली असती.
सिद्धार्थ गौतम जेंव्हा ‘बुद्ध’ होऊन शून्याचा उलगडा झाल्यावर राजनगरीत परतला.  त्याची पत्नी यशोधरा त्याला म्हणाली ‘तुम्ही सत्य शोधायला गेला होतात, तर असे गुपचुप कुणाला न सांगता, अपरात्री आम्हाला सोडून जाण्याची काय आवश्यकता होती? तुम्ही म्हणता तसे सत्य जर सर्वत्र आहे, तर ते इथेच गवसले नसते का?
संसारात राहून शोधले तर तेहि खरे सत्य, जीवनातील या अस्तित्वाचा उपयोग करीत लाभेल. निराकाराची शांतता अनुभवणे ही कोठेही एकांत लाभाची खरी कसोटी आहे. इथे काय आणि हिमालयात काय आंतरिक शांती सारखीच आहे.

म्हणोनि कल्पना जैं सांडे । तैंचि गा संन्यासु घडे । या कारणे दोनी सांगडे[सारखे] । संन्यासयोगु ॥ २५ ॥

मनातल्या इच्छा, संकल्प सारे सोडून जे स्वभावत: वाट्याला आले त्या कर्मात रुचि घेऊन पूर्ण निष्ठेने ते आचरणे हाच संन्यास योग आहे.

आणि सांख्यीं जें पाविजे । तेंचि योगीं गमिजे । म्हणोनि ऐक्यता दोहींते सहजें । इयापरी ॥ २९ ॥
जे ज्ञानयोगाने प्राप्त होते, तेच निष्काम कर्मयोगाने साध्य होते.

तयासीचि जगीं पाहलें[उजाडले] । आपणपें [आत्मतत्व] तेणेंचि देखिलें । जया सांख्ययोग जाणवले । भेदेंविण ॥ ३१ ॥
या जगातील व्यक्ति जरी भिन्न असल्या आणि त्यांची कर्मे जरी भिन्न असली, तरी आपण सारे एकाचा सूत्राने बांधलो आहोत. आपण करीत असलेले कर्म हे सामुदायिक कर्माचा एक भाग आहे. बॅंडच्या पथकात अनेक विविध वाद्ये वाजविणारे कलाकार असतात, पण ते सारे सुरात आपला सूर सुयोग्य रित्या मिसळून सुरेल निर्मिती करीत असतात. जगाच्या प्रभावी कारभारासाठी प्रत्येकाने आपली भूमिका चांगल्या  प्रकारे पार पाडली पाहिजे, भीती आणि असुरक्षितता स्वतःवर विश्वास नसल्यामुळे उद्भवली आहे. आत्म्यास आणि आत्मशक्तीस न समजल्यामुळे आपण स्वतःवरचा विश्वास गमावून बसतो.

येरा योगस्थिति जया सांडे [जो आचरण करीत नाही]। तो वायांचि गा हव्यासीं पडे । परि प्राप्ति कहीं न घडे । संन्यासाची ॥ ३३ ॥

एर्‍हवी जे वैराग्यवृत्तीने कर्म मार्गाचे आचरण करीत नाहीत. ते ज्ञानप्राप्तीचा व्यर्थ हव्यास करतात. परंतु त्यांना ना कर्म, ना संन्यास अशी अवस्था होते.

नाथ आपल्या भागवतात अध्याय २६ मध्ये म्हणतात, ‘जेथ वैराग्य वाढे संपूर्ण । तेथ जनार्दनाची कृपा पूर्ण । वैराग्य तेथ ब्रह्मज्ञान । सहजें जाण ठसावे ॥४॥
आतां कर्ता कर्म करावें । हें खुंटलें तया स्वभावें । आणि करी जऱ्ही आघवें । तऱ्ही अकर्ता तो ॥ ३७ ॥

असा कर्मयोगी साक्षी भावाने जे घडेल त्याला पूर्ण क्षमतेने पण अलिप्ततेने सहाय्यक होतो. तो कोणतेही कर्म करीत नाही. कशाचाही तो कर्ता नसतो. त्याचा देह व इंद्रिये यांना तो आज्ञा देत नाही. त्याचा देह जे करतो त्याला केवळ साक्षी असल्याने तो अकर्ता असतो.
त्याला देहाची शुद्ध नसते. स्वामी रामकृष्ण परमहंस हे देहातीत होऊन आचरण करीत. अशा योग्याला आपल्या देहाच्या अस्तित्वाची जाणीव नसते. असे असतांना कर्तृत्व म्हणून वेगळे काय उरणार?
अशी कर्मे नि:संग राहून केली गेलीत तर कर्तेपणाची भावना आणि कर्मफळाची अपेक्षा दोन्हीही उरत नाहीत. याच भावनेने विनोबांनी उदात्त  कार्ये केलीत. त्यांनी तेरा वर्षे पदयात्रा करून भूदानयज्ञाचे आंदोलन केले. भूदान, ग्रामदान, संपत्तिदान या चढत्या क्रमाने या दानयज्ञातून त्यांनी अखिल भारताला ‘ईशावास्य वृत्ती’चे कार्यप्रवण असे प्रयोग दिले.
तसेच विनोबांचे एक अपूर्व कार्य म्हणजे चंबळच्या डाकूंचे हृदयपरिवर्तन आणि त्यांचे आत्मसमर्पण. या शापित पुत्रांना विनोबांनी जीवन जगण्याची एक नवी दृष्टी दिली, ‘आनो भद्रा क्रतवो यन्तु विश्वत:’च्या प्रार्थनेप्रमाणे, त्यांनी प्रत्यक्ष चरितार्थ केले.

जे पार्था तया देहीं । मी ऐसा आठऊ नाहीं । तरी कर्तृत्व कैचें काई । उरे सांगे ॥ ३८ ॥

कर्मयोगी वाट्याला आलेली सारे कर्मे उत्तम क्षमतेने आणि निष्ठेने करीत असतो. पण तो देहातीत असतो.
त्यामुळे तो आपण कांही कर्तृत्व केले असे मानीत नाही. मी कर्ता आहे ह्या भावनेला तिलांजली देणे ह्यास श्रेयस उपासनेत कर्मयोग म्हटले आहे. एखादी गोष्ट मी केली किंवा माझ्यामुळे झाली असा विचार केल्यास,अहंकार वाढीस लागतो

एऱ्हवीं आणिकांचिये परी । तोही एक शरीरी । अशेषाही [सर्वच]व्यापारीं । वर्ततु दिसे ॥ ४० ॥
आहारातें स्वीकारी । त्यजावें तें परिहरि [सोडून द्यावे]। निद्रेचिया अवसरीं । निदिजे सुखें || ४३ ॥

इतरांचे सारखा तो सुद्धा अन्य देहधारी व्यक्तींचे सारखेच देहाने सारे आवश्यक व्यापार करीत असतो. भोजन करणे, नको त्या गोष्टीचा त्याग करणे, झोपेच्या वेळी झोप हे सारे इतरांचे सारखेच असते.
मात्र हे सारे व्यापार करीत असतांना, त्याच्या प्रतिक्रिया त्यावर होत नाही. कुणी संतापले किंवा स्तुती केली तर दोन्ही गोष्टी देहाबाबत आहेत, माझा त्याशी संबंध नाही हे जाणून त्याने व्यथित वा आनंदी होत नाही. अशी नि:संग वृत्ती हेच त्याच्या पूर्ण मुक्त अवस्थेची खूण असते.

एकनाथ महाराज भागवतात २६ व्या अध्यायात सांगतात, “तेवीं प्रारब्धशेषवृत्तीं । ज्ञाते निजदेहीं वर्तती । वर्ततांही देहस्थिती । देहअहंकृती असेना ॥३४॥ जेवीं कां छाया आपुली । कोणीं गांजिली ना पूजिली । परी कळवळ्याची न ये भुली । तेवीं देहींची चाली सज्ञाना ॥३५॥

आतां अधिष्ठानसंगती । अशेषाही इंद्रियवृत्ती । आपुलालिया अर्थीं । वर्तत आहाती ॥ ४८ ॥

आता आत्मा हेच अधिष्ठान असल्याने सर्व इंद्रियांच्या वृत्ती विषयांचे सेवन त्यांचे धर्मानुसार सहजी करीत राहतात. त्यांच्या कार्यांपासून तो कर्मयोगी अलग असतो.
त्याच्या बाह्य दर्शनात तो सामान्य वाटतो. पण त्याचे अंतरी केवळ परब्रहमाशी समरसता झालेली असते. जे अवती भवती आहे त्या सार्‍यात त्याला लहान बालकासारखे समत्व असते. त्यांत स्वामित्व भाव नसतो आणि तो काय करतो, याशी तो पूर्ण अलिप्त असतो.
संन्यासी आनंद उपभोगायला शिकतो, आणि सांसारिक माणूस फक्त कसे मिळवायचे ते शिकतो. हा मूलभूत फरक आहे. सांसारिक माणूस केवळ सांसारिक पदार्थ अधिक ताब्यात कसे घेता येतील असा विचार करतो – त्याला कधीही आनंद मिळत नाही कारण हांवेला सीमा नसते. संन्यासी त्याच्याजवळ जे काही आहे त्याचा आनंद घेतो, आणि त्यातील आनंद निर्व्याजपणे तो अनुभवित असतो. कोणतीही गोष्ट मिळावी यासाठी त्याला ताबा घेण्याची गरज नसते. हाती आलेल्या गोष्टी इतराच्या सुखासाठी वापरणे त्याला सुखद असते.
तो कर्में करी सकळें । परी कर्मबंधा नाकळे [ लिप्त होत नाही ]। जैसें न सिपें जळीं जळें । पद्मपत्र ॥ ५० ॥

वाट्याला आलेली सर्व कर्मे स्वधर्म पालन म्हणून करीत असताही तो महात्मा आपल्याच मस्तीत असतो. त्याला कोणत्याही कर्माविषयी वा फलप्राप्ती विषयी थोडीही आसक्ती नसते. तो जीवन्मुक्त अवस्थेत असतो. अशा अवस्थेला ‘ ब्रह्मविद्वर’ असे म्हणतात. योगवाशिष्ट्यात उत्पत्ति प्रकरणात [३/६/१८] मध्ये दिलेल्या आत्मसाक्षात्काराच्या सात भूमिकेपैकी पाचवी ‘असंसक्ति’ ही अवस्था म्हटली आहे.
असा सत्पुरुष फार विरळा असतो. तो जनमानसात असतो. त्यांच्या सारखे सामान्य वर्तन करतो. मात्र त्याचे चित्त कदापि विचलित होत नाही. अगदी कमळाच्या पानाप्रमाणे.
संत गोरा कुंभार हे विठ्ठलाचे (पांडुरंग) परम भक्त होते. ते बाह्य व्यवहार करतांना त्याचे चित्त केवळ पांडुरंगाशी समरस झालेले असे. एके दिवशी देहभान हरपून अभंग म्हणत माती तुडवीत होते. त्यांची बायको-संती मुलगा मकरेंद्राला ठेवून पाणी आणण्याकरिता जातांना पतीला म्हणाली, “धनी, बाळावर जरा लक्ष ठेवा. घरात आता कोणी नाही.”
तिचे सांगणे गोरोबांच्या कानांत शिरले, पण गोरोबा देहभान हरपून  विठ्ठलाशी समरस झाले होते. ते चिखल तुडवित असता बाळ, रांगत रांगत पित्याकडे धावत आले. बापाचा पाय धरून उभा राहण्याचा प्रयत्न करू लागले. तोल जाऊन चिखलात पडते. त्या चिखलात त्यांचा एकलुता एक मुलगा पायाखाली आला. त्यालाही तुडवू लागले. बाळ गतप्राण झाले.
पाणी घेऊन आलेल्या संतीने बाळाच्या शरीराचे रक्त व मांस पाहून आक्रोश सुरु केला. आक्रोश कानावर येताच गोरोबा भानावर आले आणि संती रागारागाने गोरोबाला बोलू लागली. त्याचे नामदेव आपल्या अभंगात यथोचित शब्दात वर्णन करतात.’जळो हे भजन तुझे आता’ गोरा कुंभाराच्या पत्नीने श्री विठ्ठलाची करुणा भाकली.”पंढरीनाथा, माझे एकुलते एक बाळ पतीच्या पायाखाली तुडविले गेले; मी मुलावाचून कशी जगू? ”पंढरीनाथाने तिची विनवणी ऐकली. आणि चिखलातून रांगत रांगत ते बाळ तिच्या जवळ आले.

योगिये तोही करिती । परि कर्में तेणें न बंधिजती । जे सांडिली आहे संगती । अंहभावाची ॥ ५६ ॥
कर्माचे कर्तेपणाचा अहंभाव गेल्याने कोणतेही कर्म त्याला बाधत नाही.
एथ इंद्रियांचा पांगु [ दैन्य ]। जया फिटला आहे चांगु [ पूर्णतया ]। तयासीचि आथी लागु[अधिकार] । परिसावया ॥ ६५ ॥

अशा पूर्णमुक्त नि:संग व्यक्तींच्या या वैशिष्ट्यांचे आकलन होण्यासाठी ज्यांच्या इंद्रियांची हांव पुरती मिटली असेल तेच अधिकारी आहेत. एक प्रख्यात सूफी संत उमर बगदादमध्‍ये राहत होते. एक बैरागी त्‍यांच्‍याकडे भेटण्‍यासाठी आला. तेव्‍हा त्‍याला दिसले की, संत उमर हे एक फकीर म्‍हणवतात, पण त्‍यांचे बसायचे आसन हे सोन्‍याचे आहे. खोलीला सगळीकडे जरीचे पडदे लावलेले आहेत आणि रेशमी दो-यांची सजावट होती. चहुकडे सुगंधी अत्तराचा वास दरवळत होता.
तो म्हणाला, मी आपली फकीरी ख्‍याती ऐकून आपल्‍या दर्शनासाठी आलो होतो पण येथे आल्‍यावर माझी निराशा झाली. येथे तर वैभवाचा सागर पसरलेला दिसून येतो आहे.” संत उमर हसले आणि म्‍हणाले,”हे मात्र खरे आहे, हे सर्व सोडून मी तुझ्याबरोबर यावयास तयार आहे.”  बैरागी तयार होताच, उमर यांनी सर्व सोडून नेसत्‍या कपड्यांनिशी ते त्याबरोबर निघाले. काही अंतर जाताच बैरागी एके ठिकाणी थांबला व उमर यांना म्‍हणाला,” तुम्‍ही इथेच थांबा, मी माझा भिक्षेचा कटोरा तुमच्‍या घरी विसरलो आहे. तेवढा परत जाऊन घेऊन येतो.” उमर मोठमोठ्याने हसू लागले आणि म्‍हणाले,” अरे मित्रा, तुझ्या सांगण्‍यावरून मी माझे सर्व ऐश्‍वर्य सोडून या रानावनात हिंडायला तयार झालो, मात्र तुझी त्‍या कटो-याची आसक्ती मात्र सुटली नाही.
अशी असते ही पूर्ण वैराग्याची सबाह्य खूण.

खरा संन्यास आचरणे म्हणजे नेमके काय असते हे आपण पाहिले. आता अशा महापुरुषाच्या चिन्हांविषयी पुढील लेखांकात भगवंतांनी केलेले विवेचन आपण पाहू.
हरी ॐ ||

– ©️ अण्णा
annasonavane02@gmail.com
@@@@@@@@@@@@@
  आजची कविता 
लीलावती भागवत
[ ‘किशोर‘ नोव्हेंबर १९७३ च्या अंकावरून साभार ]
@@@@@@@@@@@@@
अमर शेख 

ललित ‘स्वागत’

अमर शेख ( २० ऑक्टोबर १९१६ – २९ ऑगस्ट १९६९)

बाप नाचगाण्याचे शौकीन, तर आई कवियत्री. (म्हणून तर गायक-कवि म्हणून जन्माला आलो नाही ना ?) जन्म बार्शीचा. आमची मंगळवार पेठ नव्हे, गल्लीसुद्धा अठरापगड जातींची. अन् घरासमोर चक्क कसाईखाना. पश्चिमेचं घर खाटकाचं (म्हणून तर अमर शेख लिहीत नाही ना ? “या कत्तलखान्याविरुद्ध गाणी गातो. ” – एक शंका ) पूर्वबाजूचं घर दारूवाल्याचं ( ही दारू कोरडी व शोभेची ) म्हणून तर अमर शेखच्या गाण्यांत आगडोंब दारू भरलेली नसते ना ?

खरं म्हणजे यमक जुळवायचा छंद लागला तो शिमग्यातूनच. आमच्या वेळेचा शिमगा ! ( हो, तोही आजकालच्या पोरांना नीट जमत नाही. सगळं काम बुळबुळीत. ) आमच्या शिमगाकाव्याची बैठकसुद्धा वेगळी, राष्ट्रीय. शिव्यासुद्धा राष्ट्रीयत्वाच्या धुळीने माखलेल्या असायच्या महाराजा. उदा. अलिकडं आग्टी, पलीकडं आग्टी, मध्ये ठेवला पेरू आणि …… न बोंब ठोकणा-याचा उद्धार राष्ट्रीय पुढा-याकडेच पाठवून करायचा. पण हे वर्षातून एकदाच.  चळवळ वाढत होती. काम वाढत होते. वाचन, अभ्यास वाढत होता. गाणी वाढत होती.

बार्शीचेच प्रसिद्ध नारायणराव भट यांनी गळा पाहिला. ग्वाल्हेरच्या पंडित घराण्याचा सारेगम … धडा दिला. साडेतीन वर्षं. एक पै न घेतां. तंबो-यांत गळा मावेना. शब्द घावेना. पोवाडा, लावणी, गीत, अभंगाकडे ( अर्थबोधी साहित्यस्वराकडे ) पळालो. किस्सा माझे मित्र वसंत कानेटकर यांनी मागे ‘अभिरुची’त गौतम नावाची गोष्ट लिहून झकास रंगवला. उरला आता गीत, पोवाडा आणि लावणी. कोट्यवधी नाही, पण हजारो, लाखोंच्या संख्येनं आस्वाद घेणं महाराष्ट्रात नित्याचं झालं आहे. माझा काव्यानंद ? वेगळाच मिळतो मला. कार्यक्रमाच्या दुस-या दिवशी, सकाळी “चा”च्या वक्तालागावातली साक्षर मंडळी जमतात. काव्यशास्त्रविनोद चालतो. मध्यमवर्गीयाच्या  (ब-याच बैठकी मीही गाजवल्या तरी पण त्या ) पुचाट, मिळमिळीत बैठकीपेक्षा ही मजा आगळी. नव्हे जिवंत – जिता आनंद मिळतो तिथं.

काव्य -कला, राजकारण आणि तत्त्वज्ञान हे विषय आवडीचे. गप्पा मारणारे तसे दर्दिले असतील तर मग रात्र आपलीच. मुंबईपासून गौहत्तीपर्यंत. प्रवास तर पाचवीलाच पुजलेला. “तुमच्या पत्नीची ओळख करून द्या,” म्हटल्याबरोबर हात वर करून निरोप देत उभ्या असलेल्या स्त्रीचं चित्र काढून मी त्याच्या हाती देऊ शकेन. ( चार हजार वर्षं गेली ही आमची छळणूक चाललीय. ‘ हे आमच्या पत्नीचं आवडतं वाक्य. ) सारा देश पाहिला. निम्मा बिहार, उत्तर प्रदेश, कलकत्ता तर जणू माझाच. “झंगझारो झंगझारो झंकारे – बाजलो भेरी ” म्हणून सूर लावला की … अन् आंध्रमध्ये “आंध्रुडालेवरा  – आंध्रुडा  बिराना लेवरा “, आसाममध्ये “बिश्शविजयी नौजवान ” या गीतांची सुरावट फेकताच तिथला समाज, माझ्या सुराला सूर लावतो आणि म्हणतो आता तुमचं मराठी म्हणाना. पाटण्यात तर हिंदी कवींच्या बैठकीत माझ्याबरोबर मी कुसुमाग्रज, विंदा करंदीकरही ऐकवले. परदेशभ्रमणाची पण पावती मिळाली तब्बल दोन महिने, दोनदा. फिनलंड, रशिया, झेकोस्लोवाकिया. संपन्नतेकडे झेपावणारे परदेश पाहून झाल्यानंतर मन दोन्ही वेळा निराश, उदास झालं. वाटलं आपल्या देशांत असं कधीच होणार नाही. संपवावं. थांबावं इथंच. पण थांबता येत नाही. ( आताशी तर कुठं पन्नाशीत गेलोय्. शंभराच्या निम्मेच. म्हणजे मध्यावरच शिखरावर … अभी तो मैं जवान हूँ !

१९३६ पर्यंत मनावर साधारणतः ( भगतसिंगच्या कृतीमुळं ) अर्धी दहशतवादाची व अर्धवट गांधीवादाची छाप.  त्यामुळं सानेगुरुजींच्याकडे वळलो. वेष गबाळ ध्यानी. पण शेवटी परिणति कम्युनिझमच्या प्रवाहांत. अन् मग सर्वच बदल झाला. साहेबासाठी “न्यायअन्यायाची बातच न्हाई न् सायब आमाला एकच न्हाई ” सारखी कवनं. कपडे – हाफ शर्ट, हाफ पँट. डोळे, केस ताठ. आतबाहेर पेटलेला. आग्यावेताळ. त्यांत पुन्हा एका विदुषी लेखिकेने प्रेमभंगाचा जबरदस्त तडाखा दिला. ( साला फाटक्या  माणसाचं प्रेम असंच अंगलटी  येतं  नाही ? एकूण काव्यात रंग भरायला हा मामला बरा. ) एवढ्यात कु. मनोरमा जयकर ( सध्याच्या ज्योती अमर शेख धावून आल्या. त्यांनी सध्याचा धोतरसदरा दिला. साता-यातील सुपने या गावी कर्यक्रमांत कु-हाड मिळाली. केस ताठ होतेच. सौ. शिरीष पै एकदा म्हणाल्या, आधी केस दिसतात मग अमर शेख. हा अवतार पुष्कळदा नडला. शिरूभाऊ पेंडशां ( श्री. ना. पेंडसे ) बरोबर दिलखुलास भांडणं हा शिरस्ता. मुंबईत नव्याने आलेल्या त्यांच्या बहिणीने गहजब, आरडाओरड, दार बंद करून एक कु-हाडीवाला भयंकर माणूस म्हणून चक्क हाकून लावलं. दादरच्या प्रसिद्ध कार्यकर्त्या सौ. आई कोठारे, मला मुलाप्रमाणे जपतात. पण याही घरी फटीतून कुणीतरी पाहिलं नि गहजब केला. पोलीस बोलावण्यापर्यंत पाळी. पण कळल्यानंतर मात्र ….

या सर्वांसकट माझ्यातला हा माणूसच माझ्या चाहत्यांना आवडतो. पत्नीला सूर आवडतो. लोकांना ‘तो मी’ आवडत नाही. त्यांना बदल नको असतो माझ्यात, माझ्या मनांत, सुरांत, काव्य, विचार, कृति, लिपीत. मीसुद्धा बदलत नाही. त्या सर्वांसाठी मी ‘कलश’, ‘धरतीमाता’ कवितासंग्रह लिहिले. नाटक, गीतसंग्रह, लावण्या, अभंग, पोवाडे लिहिले, लिहीत आहे. निष्ठेने, जिद्दीने लिहिले गेले ते सर्वांच्या मालकीचे झाले. माझी मालकी त्यावर असू शकत नाही. असंच लिहीत राहणार. संपणार नाही. लावलेला सूरही संपणार नाही. तोच ध्यास, तोच प्रवास.

कै. अमर शेख
[ ‘स्वागत’ या ‘ललित’ मासिकातील सदरातून उदयोन्मुख लेखकांचे मनोगत ( ऑगस्ट १९६६ ) साभार ]

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
सण / उत्सवातील ढोलबाजी, मुंबईतील खड्डे, पर्यावरण -हास  
 
एका संवेदनशील मुंबईकराचे मनोगत 
चंद्रशेखर बुरांडे 
भारतीय ऋतु सौरमासावर म्हणजे सूर्य संक्रांतीवर अवलंबून असतात. निसर्गाशी साधर्म्य राखत सुरू होणार्‍या सहा ऋतूंतील पहिला ऋतु ग्रीष्म ( वैशाख+ज्येष्ठ ), वर्षा ( आशाढ+श्रावण ), शरद ( भाद्रपद+अश्विन ), हेमंत ( कार्तिक+मार्गशीर्षं ), शिशिर ( पौष+माघ ) तर वसंत ( फाल्गुन+चैत्र ) हा सहावा ऋतु. वर्षप्रतिपदा हा आपला वर्षारंभ. जगाच्या पाठीवर भारत असा देश आहे की जेथे प्रत्येक दोन महिन्याच्या अंतराने बदलत्या ऋतुतील निसर्गछटा व सौंदर्याचा आनंद घेता येतो. भारतातील प्रत्येक प्रांतातील नैसर्गिक भिन्नतेमुळे कोणत्या ना कोणत्या प्रांतात सण, व्रते व उत्सव साजरे होत असतात. ऋतूनुसार सण साजरा करण्याच्या जीवनपद्धतीमुळे आपल्याकडे एक वेगळा भावात्मक दृष्टिकोन दिसून येतो. तसेच नैसर्गिक रचनेतील भिन्नतेमुळे प्रांतागणिक भाषा, भूषा व भोजन देखील भिन्न आहे. महाराष्ट्रात आषाढातील नागपंचमीपासून पहिल्या सणाची सुरुवात होते॰ त्यानंतर श्रावण-भाद्रपद महिण्यातील नारळी पौर्णिमेस वरुणदेवतेची पुजा करून कोळीबांधव समुद्रप्रवेश करतात. याच दिवशी भाऊ-बहीण नातेसंबंध दृढ करणारा रक्षाबंधन साजरा होतो। विजिगीषू वृत्तींनिदर्शक विजयादशमी, नरकासुरावर विजय मिळविण्याच्या स्मरणार्थ नरकचतुर्दशी, दानाचे व परस्परस्नेहाचे निदर्शक संक्रमण ही यादी संपता संपत नाही असे कितीतरी सण! म्हणून आपला देश सण/उत्सव व समारंभप्रिय आहे. या उपक्रमामागे राष्ट्रीय, सामाजिक, आर्थिक व निसर्गाशी नाते जोडणारे असे अनेक संदर्भ आहेत. मानवाच्या निजी जीवनात, ईश्वरभक्ति व श्रद्धा ऊर्जा देण्याचे कार्य करतात. मध्ययुगीन काळात निराश झालेल्या जनतेस आपल्या संतांनी भक्तीयोगातून ईश्वर सान्निध्याचा मार्ग दाखवून त्यांच्या जीवनातील आनंद द्विगुणित करण्याचे महान कार्य केले म्हणून हिंदू समाज टिकून राहिला. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य प्राप्तीच्या ध्येयातून नेमका हाच धागा पकडून लोकशिक्षण व समाजजागृती व्हावी म्हणून ईश्वरभक्ति व करमूणुकीची सांगड घालून सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला.
 
 
 
आपल्याकडे घरगुती व सार्वजनिक सण / उत्सवाचे स्वागत ढोल, ताशा, झांज यासारख्या ऊर्जा निर्माण करणार्‍या वाद्य वाद्यातून करण्याची परंपरा आहे. सण व उत्सवातून मिळणार्‍या समर्पणचा आनंद भावनातून व्यक्त होत असतो. त्यासाठी रंग, ताल व नाद उत्साहवर्धक ठरतात. म्हणून ढोल वाजलेच पाहिजेत! पण आवाजाची तीव्रता मानवी श्रवणशक्तीस सुरक्षित मानलेल्या तीव्रतेपेक्षा अधिक असू नये – कोर्टाने ठरवून दिलेला “लक्ष्मण रेषेचे” पालन व्हायला हवे. ही वाद्ये सर्व भारतभर लोकप्रिय आहेत. ढोल, ह्या सणातील मुख्य वाद्य होय. वाद्यवादनातून चारितार्थ चालवणार्‍या एका ढोलवादकाचे मनोगत खूपच रंजक आहे. तो म्हणतो, कृष्ण जन्माष्टमीनंतर येणारे तीन सण / उत्सव आमच्यासाठी खूप महत्वाचे असतात. हया सणात मिळणार्‍या बिदागीवर आमच्या दिवाळसणाची हौस-मौज अवलंबून असते! कृष्ण जन्माष्टमीच्या दुसर्‍या दिवशी साजरा होणारा सार्वजनिक उत्सव म्हणजे गोपाळकाला. ह्या दिवशी हमखास पाऊस पडतो. ही नैसर्गिक घटना अभूतपूर्व मानली जाते. ह्या दिवसात पडणार्‍या जलधारांना “श्रावणसरी” असे संबोधले जाते. श्रावणसरी अंगावर झेलत ढोल-ताशांच्या तालावर नाचणारे “गोविंदा”, हया उत्सवाचे खरे मानकरी! उर्वरीत उत्सवप्रेमी इमारतीच्या बाल्कनीतून गोविंदाच्या अंगावर पाणी व पाणी भरलेले रंगीबेरंगी फुगे फेकून त्यांचे स्वागत करतात. शहरातील मोकळ्या जागेत कर्कश आवाजातील डी. जे.च्या तालावर ऊंच मानवी थर उभे करून दहीहंडी फोडतानाचे दृश्य पाहण्यात एक वेगळीच मजा असते! यानंतर, सलग अकरा दिवस चालणारा सण / उत्सव, गणेश चतुर्थी. या उत्सवामुळे संपूर्ण शहरास उत्सवाचे स्वरूप प्राप्त होते. ईश्वरभक्ति व श्रद्धेतून अनेक मार्गाने चैतन्यमय वातावरण निर्माण करणारा सार्वजनिक उत्सव! ढोल-ताशांच्या गजरात गुलाल व पुष्प उधळत घराघरात व सार्वजनिक मंडळात विघ्नहर्ता गणेशाचे आगमन होते. बाप्पाचे आगमन व निरोपाचे विसर्जन दृश्य पाहण्यास अपार गर्दी लोटते. अशा सार्वजनिक मिरवणुकीत हौशी युवक/युवतीनी ढोल वाजवण्याची परंपरा नव्याने सुरू झाल्यामुळे आम्हाला मिळणार्‍या बिदागीवर परिणाम झाला आहे. बाप्पावर अपार श्रद्धा बाळगणारे असंख्य उत्साही भक्तगण हे या उत्सवाचे खरे आधारस्तंभ! सर्व धंद्यातील उद्योगपती व राजकीय नेते हे या उत्सवाचे बडे आश्रयदाते! सलग नऊ दिवस चालणारा तिसरा सण, नवरात्रोत्सव. संगीतमय दांडीया खेळाचे आकर्षण असलेल्या ह्या उत्सवात ताल व ठेका असलेल्या गाण्याच्या तालावर स्वत:ला नाचवून घेणारे हौशी गर्भश्रीमंत तरुणाई हेच आमचे धनी! ह्या दिलदार गर्भश्रीमंत तरुण वर्गाकडून भरगोस बक्षिसी मिळवून देणारा हा उत्सव आम्हालाही प्रिय आहे. या वर्षी प्रथमच कोरोना महामारीचे सावट असल्यामुळे पारंपारिक उत्सव कशा प्रकारे साजरा होतो हे पाहावे लागेल॰ आजवर धूमधडक्याने सण साजरे होत आले आहेत, पण वर्तमानात त्या मागचा दृष्टीकोन पुढच्या पिढीत संक्रमित होताना दिसत नाही ही खंतही त्याने व्यक्त केली! जी गत सणाची तीच मुंबई शहरप्रतिमेची (City image)!

वेगवान जीवनपद्धती, मिश्र जीवनशैली व विविध धर्मातील सण/उत्सवाचे भव्य स्वरूप पाहावयास मिळणे ही मुंबई महानगराची खासियत! ब्रिटिशकालीन मुंबईची बहुभाषिक सामाजिक जडणघडण देखील याच भिन्नतेला प्रोत्साहन देणारी होती, ती आजतागायत कायम आहे. तेव्हापासून, देशातील प्रत्येक प्रांताचे प्रतिनिधित्व मुंबईत दिसून येते म्हणून मुंबईस भारताचे छोटेखानी प्रतीक मानले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत स्थायिक झालेले अन्य धर्मिय व परप्रांतीय नागरिक देखील आपापले सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. मुंबईस लाभलेल्या अनेक वैशिष्ट्यापैकी हे एक वैशिष्ट्य आहे. या संदर्भात, मुंबई शहर प्रतिमेकडे तीनशेसाठ अंश कोनातून पाहणार्‍या माझ्या एका संवेदनशील मित्राच्या नजरेतील दृष्यानुभव खूप बोलके आहेत! निसर्गनियमानुसार पडणार्‍या पावसाळी दृश्याबाबत तो म्हणतो; मुंबईतील बहुसंख्य घरांची कौलारू छपरे व इमारतींच्या भिंती व गच्ची निळ्या रंगातील प्लास्टिकने मढवलेल्या दिसतात. यापैकी काही इमारती चक्क काळ्या-निळ्या रंगातील प्लॅस्टिक वेष्टनात गुंडाळलेल्या खोक्यागत दिसतात! तसेच, काही इमारतींवर वर्षोनीवर्षं फडफडत राहणारे फाटक्या-तुटक्या प्लॅस्टिकमधील दृश्य मन विषण्ण करणारे आहे. पावसाचा जोर जसजसा कमी-कमी होत जातो तसतसे इमारतींच्या गच्ची, प्लास्टिकमुक्त होण्यास अधीर असतात. कारण, त्यांनाही हिरवाईने नटलेल्या शहाराचं नैसर्गिक रूप न्याहाळायच असतं! रस्ते, शहर पायाभूत सुविधेतील सर्वात महत्वाचे अंग. या रस्त्याबाबत तो म्हणतो, आकाशात काळवंडलेल्या निळ्या रंगाचा दबदबा तर जमिनीवर खड्ड्याचे साम्राज्य! दक्षिण मुंबईतील काही मोजके “लाडावलेले” रस्ते वगळता उर्वरित मुंबई उपनगरातील बहुतांश रस्ते खड्ड्यांनी भरलेले असतात! निसर्गनियमानुसार येणारा पाऊस ही नैसर्गिक प्रक्रिया आहे परंतु रस्त्यावर खड्डे पडणे हा भ्रष्ट मानवी विकार आहे! हताश मुंबईकर मात्र जिवावर बेतणार्‍या खड्ड्यातून मार्ग काढत तर कधी खड्ड्यांमुळे होणार्‍या पाठदुखीस कंटाळून वाटचाल करत असतो॰ भर पावसात भ्रष्ट कंत्राटदार व विकारवश भागीदारांची खड्डे बुजवण्यासाठी चालवलेली धडपड पाहून मनस्ताप होतो! मानवी जीवाशी खेळणारे कंत्राटदार व भागीदाराना तात्पुरती मलमपट्टी करून बाहेर पडायचे असते. कारण त्यांना खड्ड्यांची तक्रार नोंदवणार्‍या दक्ष नागरिकांच्या नजरेतून सुटायचे असते! तो म्हणतो; असं असूनही दिवस-रात्र मेहनत करणारा सर्वसामान्य व मध्यमवर्गीय त्रस्त मुंबईकरास सण/उत्सव ही पर्वणी असते. आपल्या दैनंदिन जीवनातील विवंचना विसरून व खड्डयांकडे डोळेझाक करून नुकत्याच “डांबरटलेल्या” रस्त्यावर धुंद होवून नाचण्यास तो अधीर असतो. कारण, त्यालाही बाहेर काढायची असते मनात दाटलेली घुसमट!

 

गेली अनेक वर्षे ब्रिटिशकालीन कला-सौंदर्यपूर्ण शहराचा भाग बनून राहिलेल्या माझ्या आणखी एका कला-संवेदनशील मित्राच्या मतानुसार, वास्तुकलेची विशेष जाण असलेले तत्कालीन ब्रिटिश वास्तुविशारद व शिस्तप्रिय प्रशासकीय अधिकारांच्या अंमलबजावणीखाली जडणघडण झालेली स्वातंत्र्यपूर्व मुंबई व वर्तमान अति उच्चशिक्षित प्रशासकीय अधिकारी वर्ग व अल्पशिक्षित व राजकीयदृष्ट्या अपरिपक्व मंडळींच्या अधिकाराखाली स्वातंत्र्यानंतर पसरलेल्या अस्ताव्यस्त मुंबईकडे पाहिल्यास त्यातील विसंगती दिसून येते! तत्कालीन दक्षिण मुंबईतील काही परिसर आजही लंडन शहरसारखे वाटतात ह्यातच सर्व काही येते! वर्तमान उपनगरातील वाढती लोकसंख्या, अतिक्रमणे व बेकायदेशीर बांधकामाकडे दुर्लक्ष्य केल्यामुळे वर्तमान नागरी व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळते. मुंबईतील ओसंडून वाहणारी गर्दी, ध्वनी प्रदूषण व विकासकार्यामुळे बेसुमार वृक्षतोड केल्याने मोठ्या प्रमाणात पर्यावरण -हास झाला आहे. तसेच उल्लेखित प्रदूषणात “दृश्य प्रदूषणही” (Visual pollution) तितकेच घातक असते ह्याचा विचार देखील अनेकांच्या मनात येत नाही! त्याच त्या कामाची पुनरावृत्ती व एकाच वेळी अनेक अनेक विकासकामे हाती घेतल्यामुळे मुंबईतील पायाभूत सुविधा, आरोग्य व शहरसौंदर्य धोक्यात आले आहे. हे पाहून हीच का ती माझी मुंबई? असा प्रश्न मनात येतो! दैनंदिन नागरी जीवन विस्कळीत करून खर्चिक व आभासी विकास मॉडेलकडे जनतेस आकर्षित करण्याची राजकीय इच्छाशक्ती वाढत चालली आहे! थोडक्यात, नागरी विकासाची जाण नसणारे अनेक लोक अल्पकाळ टिकून राहणार्‍या शहर जडणघडणीत गुंतले आहेत हीच ह्या शहराची खरी शोकांतिका आहे! तो म्हणतो, कोविड-१९ या आजाराने सर्व जगास एका विचित्र चक्रव्यूहात अडकवले आहे. ह्या अभूतपूर्व आजारामुळे जगभरातील सर्व व्यवहार ठप्प झाले. भारत देशही त्यास अपवाद ठरला नाही. सर्व बाजूने कोंडीत सापडलेल्या मुंबईकरांच्या जीवनात, अचानक उद्भवलेल्या आपत्तीमुळे भर पडली आहे. ज्या ( वसंत:फाल्गुन+चैत्र ) महिन्यात आपला नववर्षारंभ सुरू होतो त्याच मार्च महिन्यात आपल्या देशातही कोविड-१९ चा शिरकाव झाला होता. परंपरेने  चालत आलेले सण / उत्सव, धार्मिक स्थळे इतकेच नव्हे तर दैनंदिन कार्य बंद करून सर्वांना घरातच थांबण्यास ह्या आजाराने भाग पाडले. त्यामुळे, यावर्षी ढोल वाजणार नाहीत, म्हणून बिदागी नाही! तेव्हा, कोविड-१९ च्या माध्यमातून निसर्गाने मानवास दिलेला धोक्याचा इशारा आहे॰ या आजारामुळे होणारया ब-या वाईट परिणामास आपणच जबाबदार असणार आहोत ह्याची जाणीव ठेवून योग्य काळजी घेत आपापले ध्येय गाठण्यासाठी पुढील वाटचाल करत राहणे हेच योग्य ठरेल!

महाराष्ट्र ही संत व विचारवंतांची भूमी आहे. संतांच्या मते; “सण धर्माचे संरक्षक, भावनांचे संवर्धक आणि समाजाच्या जागरूकतेचे लक्षण असतात”. समर्थ रामदास स्वामींनी धर्म व समाजजागृती संबंधात मार्गदर्शनपर अनेक पदये रचली आहेत. त्यापैकी एका पद्यात ते म्हणतात,

अति कोपता कार्य जाते लयाला,
अति नम्रता प्राप्त होते भयाला |
अति काम ते कोणतेही नसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे |
उपरोल्लेखित स्वामी समर्थ रामदासांनी लिहिलेल्या पद्यातील गर्भितार्थ मुंबईसह देशभरातील महानगरात चालू असलेल्या सर्वांगीण वर्तमान घडामोडीस तंतोतंत लागू पडतात हे आणखी विस्ताराने सांगण्याची गरज का आहे? स्वामी समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे, “प्रमाणामध्ये सर्व काही असावे”, हेच खरे! विकास म्हणजे आपल्या राहणीमानात सुधारणा. पर्यावरण समतोल राखून शहराचा भौतिक व मानवी जीवनविकास एका विशिष्ट मर्यादेतच व्हायला हवा! गणपती विघ्नहर्ता आहे। कोरोना काळातील गणपती विसर्जनाबरोबर भ्रष्ट मानवी विकृतीचेही विसर्जन झाले तर किती बरे होईल असाही एक विचार मनात येतो! केवळ दोषदिग्दर्शन म्हणून नव्हे तर पुरातन मुंबईची ओळख जपली जावी म्हणून हा प्रपंच!

– ©️ आर्किटेक्ट चंद्रशेखर बुरांडे

fifthwall123@gmail.com
प्रचित्रे : प्रातिनिधिक प्रचित्रे – ‘गुगल‘वरून साभार
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
संस्कृत शिकायचंय ना ?
प्रा. मनोहर रा. राईलकर 

पाठ ५३

ब्रू धातु गण २ आणि आत्मनेपदी आहे. त्याची वर्तमानकाळी परस्मैपदी रूपं ब्रवीमि ब्रूवः ब्रूमः, ब्रवीषि ब्रूथः ब्रूथ, ब्रवीति ब्रूतः ब्रुवन्ति अशी असतात. त्याचं कवधावि ब्रुवत् होईल.
संस्कृतातून मराठी आलेला  “त्याला मी ब्र काढू दिला नाही,” हा वाक्प्रयोग प्रसिद्ध आहे. त्याचं मूळ इथं आहे. तो म्हणतो, ब्रवीमि म्हणजे मी बोलतो. पहिलं अक्षर ब्र आहे. तेही मी त्याला उच्चारू दिलं नाही, म्हणजे ब्रवीमि मधली ब्र हे अक्षरसुद्धा उच्चारू दिलं नाही. अशी ह्या वाक्प्रयोगामागील कथा आहे.

आता पुन्हा मूळ विषय. म्हणजे आत्मनेपद विचारात घेतलं तर तृतीय पुरुषी बहुवचन ब्रुवते आहे. त्याचं कवधावि अते काढून आन लावलं की ब्रुवाण (ण का झालं?) होईल. म्हणजे बोलणारा. एक श्लोकार्ध सांगतो. काही कर्तृत्वहीन मनुष्यांच्या घरी एक वडिलांनी खणलेली विहीर असते. पण तिचं पाणी मचूळ, खारट असतं. पण ही माणसं आळशी. तो आमच्या वडिलांची विहीर आहे, असं म्हणत नवीन विहीर न खणता ते खारट पाणीच पीत राहतात. तातस्य कूपोSयमिति ब्रुवाणाः क्षारं जलं कापुरुषाः पिबन्ति। म्हणजे कर्तृत्वहीन माणसं खोट्या अभिमानामुळं त्रास सहन करीत राहतात. पण त्याचबरोबर “आमच्या वडिलांनी खणलेली विहीर आहे,”असं म्हणतही (ब्रुवाणाः) खोटा अभिमानही बाळगीत राहतात.

 
*****
– ©️  प्रा. मनोहर रा. राईलकर 
railkar.m@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
पोदार कॉलेजचा गणपती

आठवणीतले सण [ ५ ] 

अनुपमा जोशी 

 

आमच्या घरी गणपती येत नसे. तरीही गणेशोत्सवाचे दिवस फार मजेचे वाटायचे – कारण आम्ही अनेक नातेवाईक आणि ओळखीच्या माणसांकडे गणपतीच्या दर्शनाला जायचो. विशेषतः ज्यांच्याकडे दीड दिवसाचा गणपती असायचा, त्यांच्याकडे तर पहिल्याच दिवशी संध्याकाळी जावं लागायचं, आणि ती एक ‘सहकुटुंब गणपती दर्शन फेरी’ ही आमची प्रथाच पडून गेली.

बाबा पोदार कॉलेजचे प्रिन्सिपल होते तेव्हा आम्ही कॉलेजच्या इमारतीतच वरच्या मजल्यावर राहत होतो. त्या काळात – १९७५ ते १९८० या वर्षांत – पोदार कॉलेजचा दीड दिवसाचा गणपती हाही आमच्या कौटुंबिक विश्वात महत्त्वाचा बनला. पोदार कॉलेजमध्ये अनेक वर्षांपासून ही प्रथा होती. प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी मिळून ती सुरू केली होती. विद्यार्थीही दरवर्षी सामील व्हायचे. कॉलेजचे एक कर्मचारीच पूजा सांगायचे. लहानशी मूर्ती कॉलेजच्या भव्य हॉलच्या स्टेजवर प्रस्थापित केली जायची. आदल्या रात्री उत्साही मुलं-मुली मखर बनवायचे. मी तेव्हा शाळकरी वयाची होते. त्या तरुण मुलामुलींची लगबग, गप्पागोष्टी, चिडवाचिडवी पाहणं म्हणजे मजाच असायची.

सकाळी नऊ-साडेनऊच्या सुमारास लहानशा सुबक मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व्हायची. २०-२५ कर्मचारी आणि विद्यार्थी त्यावेळेस हजर असायचे. पूजा सांगणारे गंभीरपणे आरती हातात घेऊन उभे असायचे. मुलं उत्साहाने टाळ्या वाजवत वेगवेगळ्या आरत्या म्हणायची. तिथेच पहिल्यांदा मी ‘येईओ विठ्ठले’ ही आरती ऐकली – आणि तारस्वरात ‘निढळावरी कर ssssss ’ ही ओळ खेचून गायची गंमत अनुभवली. बाबा आरती म्हणायला हजर असले, तर मुलांची अशी गंमत जरा कमी प्रमाणात दिसायची!

त्या वयात ‘गणपतीची पूजा = प्रसाद’ हेही एक महत्त्वाचं समीकरण होतं! कॉलेजच्या पूजेनंतर जवळच्या दुग्धालयातले पेढे मिळायचे, त्यामुळे नियमाने मी प्रत्येक पूजेला हजेरी लावायची.

पहिल्या दिवशी संध्याकाळच्या पूजेनंतर शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम असायचा. त्याची सुरुवात कदाचित संगीत जाणणारे कर्मचारी किंवा विद्यार्थी यांच्या पुढाकाराने झाली होती. पण बाबांनी त्या कार्यक्रमाची सूत्रं हाती घेतली आणि त्याला वेगळंच वलय मिळालं. त्या काळी नावाजलेले गायक – पंडित जसराज, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेकी, मालिनी राजूरकर, प्रभाकर कारेकर – अशा माणसांनी तिथे हजेरी लावली होती. हरिप्रसाद चौरसियांची बासरी आणि अब्दुल हलीम जाफर खान यांची सतारही गणरायापुढे सादर झाली होती. विद्यार्थी आणि त्यांचे पालक असायचेच, पण बाबा त्यांच्या ओळखीच्या रसिकांना निमंत्रण करायचे आणि लोक मोठ्या संख्येने आवर्जून यायचे – त्यांच्या स्वतःच्या घरी गणपती असला, तरीही. हा कार्यक्रम विनामूल्य असायचा, आणि हॉल तळमजल्यावर असल्यामुळे अक्षरशः ‘open to public’ असायचा. त्या काही वर्षांत ‘पोदार कॉलेजच्या गणपतीला यावर्षी कोणाचा कार्यक्रम?’ अशी दादर-माटुंगा भागात चर्चा असायची!

त्या गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत बाबा आणि आम्ही मुलं – मी आणि धाकटा भाऊ – दरवर्षी सामील व्हायचो. चारचाकी हातगाडीवर मूर्ती ठेवून चारी बाजूंनी कॉलेजचे २०-२५ विद्यार्थी ती ढकलत चालायचे. कुणी मध्येमध्ये गुलाल उधळायचे, कुणी ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर करायचे. एका वर्षी वाजंत्रीसुद्धा होती, आणि बाबांची नजर चुकवून काही मुलं फिल्मी नाचही करत होती. मध्येच पाऊस आला, तर थोडी शांतता व्हायची, आणि पाऊस थांबला की लगेच दुप्पट उत्साहाने पुन्हा ‘मोरया’च्या आरोळ्या. या मिरवणुकीसाठी छत्री किंवा रेनकोट न घेता जायची मुभा होती, त्यामुळे भिजायला मज्जा यायची.

टिळक ब्रिजवर ट्रॅफिक असायचा, पण दीड दिवसाच्या गणपतींच्या घरगुती मिरवणुका खूप असायच्या. दादर चौपाटीवर पोचून लहानशी पूजा व्हायची आणि मुलं ती मूर्ती घेऊन शिळवायला स्वतःच पाण्यात घेऊन जायची. बाबांचं लक्ष सतत त्यांच्या दिशेलाच असायचं, आणि ती मुलं सुखरूप परत येईपर्यंत ते काही बोलत नसत. विसर्जन झाल्यावर माझा सगळ्यात आवडता कार्यक्रम व्हायचा – बाबा सर्वांना चौपाटीजवळच्या हॉटेलमध्ये वडा-इडली खाऊ घालायचे. मग रिकामा पाट ठेवलेली चारचाकी गाडी ढकलत परत येताना मात्र फार कंटाळा यायचा.

बाबांनी कॉलेज सोडलं त्यानंतर हा गणपती आमच्या आयुष्यातून गेलाच. गणेशोत्सवात गायनाचे कार्यक्रम नंतरही चालू राहिले म्हणे, पण बाबांचा उत्साही आणि दर्दी सहभाग नसल्याने त्याचीही रया गेली असं ऐकिवात आहे. दीड दिवसाच्या गणपतीला ‘सहकुटुंब गणपती दर्शन फेरी’चा शिरस्ता बाबा असेपर्यंत कायम होता. पण विसर्जनाची मिरवणूक त्यानंतर मी तरी कधी अनुभवली नाही. माटुंग्याच्या मेन रोडवर अनंत चतुर्दशीला मोठ्या सार्वजनिक गणपतींच्या मिरवणुका बघायला जायचो. पण हळूहळू मिरवणुकांमधला निखळ उत्साह आणि घरगुतीपणा कमी होऊन बँजोचा गोंगाट आणि ‘टपोरीपणा’ वाढू लागला, तसं तेही बंदच झालं.

– ©️ अनुपमा जोशी 

anupamaa.joshi@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
चित्रकारांचे दालन 
 
कलर पेन्सिलमध्ये केलेले पेंटिंग
– ©️ मिलिंद महाबळ, सांगली 
milind.mahabal.65@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
वर्ष २०१४ मधील गणेश मूर्ती 
–  ©️ आदीश गोरे, मुंबई 
  atgarch@yahoo.com
 @@@@@@@@@@
महत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@ 

पतंजली योग सूत्रे साधन पाद

परिचयात्मक लेखमाला

 
सुभाष फडके 

लेख पंधरावा

मागच्या लेखात आपण अष्टांगयोगाच्या पहिल्या पायरीवरील पाच प्रकारच्या यमांविषयी जाणून घेतले. आता दुसऱ्या पायरीवरील पाच प्रकारच्या नियमांची माहिती घेऊया.

शौचसंतोषतपस्वाध्यायेश्वरप्रणिधानानि नियमाः ।। २.३२ ।।
मराठी अर्थः – शरीर आणि मनाची शुद्धता, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वराला संपूर्णपणे शरण जाणे हे पाच नियम आहेत. आता यातील एकेकाविषयी सखोल विचार करू.

शौच – शारीरिक स्वच्छता आणि मनाचे पावित्र्य म्हणजे शौच. शारीरिक स्वच्छतेचा आरोग्याशी असलेला संबंध वेगळ्याने सांगायची जरूर नाही. ध्यान करताना किंवा अन्यकाळीसुद्धा जर शरीर स्वच्छ नसेल, तर मन एकाग्र होणार नाही. शारीरिक स्वच्छतेइतकेच मनाचे पावित्र्यही महत्त्वाचे आहे. मन स्वच्छ करायचे म्हणजे त्यातील मलीनता दूर करायची. मनातील अज्ञान, आळस, जडत्व या सगळ्या तमोगुणातून येणाऱ्या मूढ वृत्ती आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, असूया, ईर्षा वगैरे रजोगुणातून उद्भवणाऱ्या घोर वृत्ती आहेत. या मूढ आणि घोर वृत्तींना नष्ट करायचे आहे आणि त्यांच्या जागी आनंद, ज्ञान, एकाग्रता, साधेपणा, पावित्र्य अशा सत्त्व गुणाच्या शांत वृत्तींना स्थापित करायचे आहे. असे केल्याने चित्त शुद्ध होते तसेच एकाग्रता वाढते.

संतोष – जी स्थिती असेल त्यात मनाचे समाधान राखणे म्हणजे संतोष. आपल्याला वाट्याला जे काय आले असेल, त्याचा अधिकाधिक कार्यक्षमतेने उपयोग करणे, यालाच संतोषवृत्ती म्हणतात. या नियमाच्या साहाय्याने इच्छा मर्यादित करून वैराग्य वृत्ती अंगी बाणवली, म्हणजे चित्त प्रसन्न राहण्यात मदत होते. साधनेव्यतिरिक्तच्या काळात कसे वागायचे याविषयी समाधी पादाच्या ३३ व्या सूत्रात (मैत्रीवरील आठवा लेख) सांगितले होते.

मैत्रीकरुणामुदितोपेक्षाणां सुखदुःखपुण्यापुण्यविषयाणांभावनातश्चित्तप्रसादनम् ॥१-३३॥

सुख, दुःख, पुण्य आणि अपुण्य (पाप) या चार विषयांच्या बाबतीत अनुक्रमे मैत्री, करुणा, हर्ष आणि उपेक्षा या चार भावना ठेवल्याने चित्त प्रसन्न राहते. चांगल्या आणि सुखी माणसाच्या बाबतीत मैत्री, दुःखी माणसाविषयी करुणा, पुण्यवान लोकांसाठी प्रसन्नता आणि पापी लोकांसाठी उदासीनता ठेवल्याने चित्ताचे राग-द्वेष, ईर्षा, घृणा वगैरे नाश पावतात आणि चित्त शुद्ध आणि शांत होते.
संतोष हा नियमसुद्धा  मैत्री, करुणा वगैरे सारखाच चित्त प्रसन्न ठेवण्याचा उपाय आहे. याच्या पालनामुळे आपल्याला कधी काही कमी पडणार नाही असा दृढ विश्वास मनात असतो. कोणत्याही परिस्थितीत माझ्या आवश्यकतेनुसार मला जे योग्य आहे ते नक्की मिळेल, अशी मनोमन खात्रीही असते. मी कर्ता आहे असा अहंभाव राहत नाही आणि त्यामुळे वृत्ती शांत होतात आणि आपोआपच साधनेत एकाग्रता लाभते.
क्रिया योगाची व्याख्या करताना तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान या नियमांची सूत्र २.१, लेख १० मध्ये सविस्तर चर्चा केली होती. तरीही प्रस्तुत लेखात त्याचा थोडक्यात आढावा घेऊ.

तपः या शब्दाचा अर्थ तापणे असा होतो. संदर्भाने त्याचा अर्थ कडक – शरीराला दुःख देतील अशा –  गोष्टींचे पालन करणे, कडक व्रतात राहणे असा घेता येतो. आत्मसंयमाचे , स्वतःहून स्वतःला शिस्त लावण्याचे व्रत, म्हणजेच काया, वाचा आणि मन यांच्यावर नियंत्रण ठेवणे, असा अर्थ योगसाधनेच्या दृष्टीने करता येईल. त्याने साधना करण्याच्या वेळापुरते मन काबूत राहील, एकाग्रताही साधेल. तप हे एकाग्रता, तितिक्षा (सहनशक्ति), मन:स्थैर्य ह्यांच्या वृद्धी करिता केले जाते.

स्वाध्याय हा शब्द स्व (स्वतः) आणि अध्याय (शिकणे, अभ्यास करणे) या दोन शब्दांपासून आला आहे. त्यावरून स्वाध्याय म्हणजे स्वतःबद्दल जाणून घेणे असा अर्थ करता येतो. आत्मतत्त्व, मोक्ष, सत्य यांच्याविषयी ज्ञानी लोकांनी पूर्वी स्वानुभवातून जे काही लिहून ठेवले आहे, (उदा. वेद आणि अन्य पवित्र ग्रंथ) त्याचे वाचन आणि अध्ययन असाही स्वाध्याय या शब्दाचा अर्थ होतो. चित्तातील वृत्तींचे निरीक्षण करणे, बाहेरून येणाऱ्या प्रत्येक संवेदनेला काय प्रतिसाद दिला जातो त्याच्याकडे साक्षीभावाने पाहणे हा स्वतःबद्दल जाणून घेण्याचा मार्ग आहे. अशा आत्मपरीक्षणाने चित्तवृत्ती अधिकाधिक शांत आणि स्थिर होत जातात. यामुळे अंतिम ध्येयाकडे सुलभपणे वाटचाल करता येते.

ईश्वरप्रणिधान या शब्दाचा अर्थ स्वतःला ईश्वराप्रति समर्पित करणे, त्याची भक्ती करणे असा आहे. ध्यान करताना ईश्वरवाचक प्रणवाचा (ॐ कार) जप करणे आणि ध्यानाव्यतिरिक्त वेळी आपली शारीरिक, मानसिक, बौद्धिक, ऐहिक, पारमार्थिक सगळी कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने करणे म्हणजे ईश्वरप्रणिधान. स्वतःच्या इच्छेनुसार कर्मे केली म्हणजे त्याबद्दल अहंभाव येतो आणि आपण त्या सर्व कर्मांचे कर्ता किंवा भोक्ता होतो. तीच कर्मे ईश्वराला अर्पण केली की कर्तेपणा, भोक्तेपणा नाहीसा होतो, आणि त्यासंबंधीच्या चित्तवृत्ती आपोआप थांबतात.

या पाच प्रकारच्या नियमांचे आणि आधी वर्णन केलेल्या यमांचे पालन एकत्रितपणे, निष्ठेने आणि सदासर्वदा करायचे आहे. यमांमध्ये काय करू नये ते, तर नियमांमध्ये काय करावे ते सांगितले आहे. सर्व यमांच्या मुळाशी एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे आत्मनियंत्रण. यमांचे पालन म्हणजे मनावर आणि इन्द्रियांवर विवेकाच्या लगामाद्वारे आवर घालणे. नियमांमध्ये सांगितलेल्या गोष्टी केल्याने साधकाच्या वैयक्तिक जीवनाला वेगळे वळण लागेल.

यमांचा संबंध समष्टी म्हणजे समाजाशी असतो, तर नियमांचा संबंध व्यष्टी म्हणजे व्यक्तीशी असतो. नियम न पाळण्यामुळे जे काही अनिष्ट फळ भोगावे लागत असेल, ते मुख्यत्वे ज्या त्या व्यक्तीला भोगावे  लागते. परंतु यम न पाळल्याने संपूर्ण समाजावर त्याचा प्रभाव पडतो. उदा. जर कोणी समाधानी नसेल तर त्याचा इतरांपेक्षा त्याला स्वतःलाच जास्त उपद्रव होणार आहे, परंतु जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवण्याचा त्रास सगळ्यांनाच होणार आहे. एखाद्याने स्वाध्याय नाही केला, तर त्याला एकट्याला ज्ञानापासून वंचित राहावे लागेल, परंतु अहिंसेचे पालन न केल्याने समाजात वैमनस्य निर्माण होईल, युद्धापर्यंत मजल जाईल आणि प्रचंड हानी होईल. यम न पाळल्यास समाजाला किंवा दुसर्‍यांना त्रास होतो. दुसर्‍यांना त्रास देणे म्हणजे एक प्रकारे हिंसाच झाली. म्हणून असे म्हणता येईल की सर्व यमांच्या मुळाशी कोणता यम असेल तर “अहिंसा”. महात्मा गांधीजींचे “ अहिंसा” तत्त्व किती मूलभूत होते हेही यावरून लक्षात येईल.
यम नियमांचे पालन आयुष्यभर चालूच ठेवायचे आहे, त्यांचा आपल्या जीवनशैलीत समावेश करून घ्यायचा आहे. तसे केल्याने योगमार्गावर उत्तोत्तर प्रगती तर होतेच, त्याशिवाय व्यावहारिक जीवनही आनंदमय होते. जर समाजातील सर्वच लोक यांचे पालन करतील, तर निश्चितच त्या समाजात शांती, सुसंवाद आणि समृद्धी नांदेल आणि साधनेसाठी पोषक वातावरण तयार होईल.
परंतु हे पालन करताना काय अडचणी येतात आणि त्यांच्यावर मात कशी करायची त्याचा उपाय पुढील सूत्रात दिला आहे.

वितर्कबाधने प्रतिपक्षभावनम् ।। २.३३ ।।

जेव्हा वितर्क म्हणजे यम आणि नियमांपेक्षा विरुद्ध असे भाव, यम नियमांचे पालन करण्यात अडचणी आणत असतील, तेव्हा वितर्काच्या उलट (प्रतिपक्ष) विचारांचे वारंवार चिंतन केले पाहिजे. इथे वितर्क शब्दाचा अर्थ विरोधी युक्तीवाद असा घ्यायचा.

साधकाने योगमार्गावर चालायला आता कुठे सुरुवात केलेली आहे. यम नियमांचे पालन करण्याचा तो मनापासून प्रयत्नही करतो आहे, परंतु अजून मनात पूर्ण विरक्ती आलेली नाही. नित्य काय आणि अनित्य काय, आत्म काय आणि अनात्म काय हे माहिती असले, तरी मनात अजून रुजलेले नाही. शाब्दिक, बौद्धिक स्तरावर जरी हे सर्व समजले असले, तरी विचारांत, आचरणात अजून ते आलेले नाही.

तेव्हा काय होते? अंतर्बाह्य शुचिता पाळण्याचा कंटाळा येतो. कुणाचे वैभव पाहिल्यावर आपल्याकडे ते नसल्याचे असमाधान मनात उत्पन्न होते. जे आपल्यावर अन्याय करतात असे आपल्याला वाटत असते, त्यांना फाड फाड बोलावेसे वाटते, किंवा त्यांना कशी अद्दल घडवायची याचे मनोरथ केले जातात. एखादी सुंदर स्त्री दिसली की पुनः पुनः तिच्याकडे वळून पाहावेसे वाटते. काही चमचमीत पदार्थ दृष्टीस पडला, की जिभेवरचा ताबा सुटतो आणि गरज नसतानाही त्याच्यावर ताव मारला जातो. चांगल्या ग्रंथांचे वाचन करायचा कंटाळा येतो. थोडक्यात म्हणजे यम आणि नियम पाळण्याच्या विरुद्ध सगळं काही करावेसे वाटते.
परंतु मनात असे विचार येणे साहजिक आहे. त्यांना दडपून टाकण्याचा किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा फारसा उपयोग होत नसतो. ते पुनःपुनः उफाळून वर येतात, कारण आपले मन आपल्या सर्व विचारांचे आणि वागण्याचे समर्थन करण्यात पटाईत असते. आता या अवखळ मनाला पटवायचे आहे, की हे विचार हानीकारक आहेत, त्यामुळे योगमार्गावरील प्रगती खुंटेल. त्यांच्या जागी चांगले, अनुकूल विचार मनात आणण्यासाठी नेमके काय करायचे, ते पुढील सूत्रात सविस्तर सांगतले आहे.

वितर्का हिंसादयाः कृतकारितानुमोदिता लोभक्रोधमोहपूर्वका
मृदुमध्याभिमात्रा दुःखाज्ञानानन्तफला इति प्रतिपक्षभावनम् ।। २.३४ ।।

यम-नियमांच्या विरुद्ध असणारे हिंसा किंवा अन्य प्रकारचे भाव म्हणजे वितर्क. प्रत्यक्ष केलेले (कृत), दुसऱ्याकरवी करवून घेतलेले (कारित) आणि संमती दिलेले (अनुमोदिताः) असे वितर्काचे तीन प्रकार असतात. या वितर्कांच्या मुळाशी लोभ, क्रोध आणि मोह हे मनोविकार असतात. हे कारणरूपी मनोविकार आणि त्यांच्यापासून निर्माण होणारे वितर्कसुद्धा कमी, मध्यम आणि तीव्र अशा तीन मात्रेमध्ये असतात. प्रतिपक्ष भावना म्हणजे अंतर्मुख होऊन ‘या वितर्कांचा परिणाम दुःख, अज्ञान आणि जन्ममरणाच्या फेऱ्यामधील अनंत फळांचा भोग असा असतो,’ असा विचार करणे हेच होय.

पक्ष आणि प्रतिपक्ष हे दोन शब्द आपल्या परिचयाचे आहेत. आपल्यामध्ये लोभ, क्रोध आणि मोह हे मनाचे विकार कमी जास्त प्रमाणात सदैव उपस्थित असतात. ते आपल्याला सत्य, अहिंसा, स्वच्छता, संतोष यांच्या विरुद्ध वागण्यास, बोलण्यास प्रवृत्त करतात. म्हणजे विकारांच्या ताब्यात असलेले मन हा एक पक्ष झाला. त्याचा प्रतिपक्ष म्हणजे आपली सारासारविवेकबुद्धी. तिच्यामध्ये या विकारांवर विजय मिळवण्याची शक्ती आहे. हे आंतरिक युद्ध आहे. यात आत्मावलोकन करून योग्य अयोग्याचा निर्णय घ्यायचा आहे. शरीर आणि त्यातील इन्द्रिये क्षणिक सुखासाठी नीती अनीती बाजूला ठेवण्यास प्रवृत्त करत असली, तरी त्याचा प्रतिवाद करून विवेकबुद्धी त्यांना गप्प करू शकते. या सूत्रावर स्वामी विवेकानंदांनी फार सुंदर भाष्य केले आहे. ते असे,

“जर मी स्वतः खोटे बोललो किंवा दुसऱ्याला खोटे बोलायला सांगितले किंवा कोणाच्या खोट्या बोलण्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मान्यता दिली, तर या तीनही गोष्टी तितक्याच चुकीच्या आहेत. या तीन्ही प्रकारे सत्याच्या पालनात बाधा येते. सौम्य खोटे बोलणेसुद्धा धडधडीत खोटे बोलण्याइतकेच गंभीर असते. त्याचा सौम्यपणा किंवा तीव्रपणा जरी त्याच्या परिणामांवरून ठरत असला, तरी मुळात खोटे बोलणे वाईटच असते. मनात येणारा लबाडी किंवा द्वेष किंवा लालसा अशा भावनांनी भरलेला प्रत्येक विचार, अगदी कोणालाही सांगितलेला नसला, कितीही गुप्त ठेवलेला असला, तरीही एक ना एक दिवशी कोणत्या तरी दुःखाच्या रूपाने परत येतो. जर आपल्यामधून द्वेष आणि मत्सर यांनी भरलेली आंदोलने प्रक्षेपित होत असली, तर ती कधी ना कधी चक्रवाढ व्याजाने आपल्याकडेच परत येतात. एकदा तुम्ही त्या आंदोलनाला चालना दिली, की कोणतीही शक्ती ते आंदोलन थांबवू शकत नाही. त्याचा फटका तुम्हाला सहन करावाच लागतो. वरील सर्व विचार लक्षात ठेवून त्यांच्यावर मनन केल्याने आपण यम नियमांच्या विरुद्ध म्हणजे वितर्काने वागण्याचे थांबवू शकतो.”

श्री. कोल्हटकरांनी या सूत्रावर अकरा पानांचे विवेचन केले आहे. त्याचा थोडक्यात गोषवारा आणि मधे मधे माझ्या काही टिप्पण्या पुढे देत आहे.

वितर्कांच्या मुळाशी लोभ, क्रोध आणि मोह आहेत. कोणत्यातरी क्षणिक लाभाच्या इच्छेने किंवा रागाच्या भरात किंवा बुद्धीच्या अपरिपक्वतेमुळे यमनियमांचे पालन केले जात नाही, कारण त्यातील दूरगामी/शाश्वत लाभ लक्षात येत नाहीत. या लोभ, क्रोध आणि मोह यांच्या कमी, मध्यम आणि तीव्र असण्यानुसार यमनियमांचे उल्लंघन करण्याची विरोधी भावना कमी, मध्यम आणि तीव्र असते. परंतु त्या सर्वाचा परिणाम दुःख, अज्ञान आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातील अनंत फळे हाच असतो. त्यामुळे योगमार्गावर चालणाऱ्याने यमनियमांचे पालन कसोशीने केलेच पाहिजे.

यमनियमांचे उल्लंघन करण्यातील तीन स्तर पाहू या. स्वतः हिंसा करणे (कृत) हे अत्यंत गंभीर आहे. स्वतःच्या ऐवजी दुसऱ्याकरवी हिंसा करवून घेणे (कारित) हेदेखील स्वतः यम मोडण्याइतकेच गंभीर आहे. स्वतः हिंसा केली नाही किंवा दुसऱ्याकरवीही करून घेतली नाही, तरीही अनुमोदित हा तिसरा प्रकारसुद्धा योगाभ्यासाच्या दृष्टीने अयोग्यच आहे. अनुमोदन हे कधी प्रत्यक्ष बोलून किंवा कधी आपल्या वागण्यातून अप्रत्यक्षपणे दिले जाते. जे अहिंसेच्या उल्लंघनासाठी सांगितले, तेच अन्य यमांसाठी लागू आहे.

हे समजण्यासाठी काही उदाहरणे पाहू या. मांसाहार करणे ही अप्रत्यक्षपणे केलेली हिंसाच आहे. त्यावर कोणी म्हणेल आम्ही स्वतः तर मासे किंवा कोंबडी मारत नाही. परंतु मांसाहार केल्याने त्या गोष्टीची मागणी वाढते आणि अप्रत्यक्षपणे त्याला अनुमोदन दिले जाते. जोडे, वहाणा, बायकांच्या पर्सेस किंवा युरोप-अमेरिकेत वापरले जाणारे मिंक कोट वगैरे वस्तू प्राण्यांच्या चामडीपासून बनवलेल्या असतात. यात त्या वस्तू वापरणारे स्वतः कोणत्याही प्राण्याची हत्या करत नसले, तरी त्या वस्तूचे ग्राहक या नात्याने त्यांचे त्या हत्येला अनुमोदन आहे असाच अर्थ होतो. यावर प्रतिवाद म्हणून कोणी म्हणेल, की भाकड जनावरांची किंवा नैसर्गिक रीत्या मरण पावलेल्या जनावरांची चामडी वापरण्यात काही दोष नाही. हे जरी मान्य केले, तरी आपण वापरलेल्या जोड्यांत जे चामडे वापरले गेले आहे, ते कशा प्रकारे मेलेल्या जनावराचे आहे, याची खात्री करणे शक्य नाही.
मागच्या लेखात सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह यांचा व्यापक अर्थ आपण पाहिला होता. त्या अर्थानुसार आपण जबाबदारीपूर्वक जीवन व्यतीत करत आहोत, अशी भावना मनात असली की योग साधना करताना एक प्रकारचा निश्चिंतपणा जाणवेल, जो एकाग्रतेसाठी आवश्यक आहे.

मागच्या लेखात आपण यमांच्या पालनामुळे प्राप्त होणाऱ्या सिद्धींविषयी (सूत्र २.३५ ते २.३९) जाणून घेतले होते. त्याचप्रमाणे नियमांच्या पालनाने पुढील सिद्धी प्राप्त होतात.

शौचात् स्वाङ्गजुगुप्सा परैरसंसर्गः ।। २.४० ।।
सत्त्वशुद्धिसौमनस्यैकाग्र्येन्द्रियजयात्मदर्शनयोग्यत्वानि च ।। २.४१ ।।
संतोषादनुत्तमः सुखलाभः ।। २.४२ ।।
कायेन्द्रियसिद्धिरशुद्धिक्षयात्तपसः ।। २.४३ ।।
स्वाध्यायादिष्टदेवतासंप्रयोगः ।। २.४४ ।।
समाधिसिद्धिरीश्वरप्रणिधानात् ।। २.४५ ।।

अर्थ – शारीरिक आणि मानसिक शुद्धीच्या पालनाने स्वतःच्या शरीराविषयी वैराग्य आणि दुसऱ्याबरोबरच्या संपर्काविषयी अनिच्छा निर्माण होते. जेव्हा शरीर आणि मन अंतर्बाह्य शुद्ध होते, तेव्हा साधक केवळ शारीरिक सुखाविषयीच नव्हे, तर शरीराच्या गरजांविषयीही उदासीन होतो. हे शरीर नश्वर आहे असे कळल्याने त्याची शरीराविषयीची आसक्ती जरी नाहीशी झाली, तरीही त्याला शरीराविषयी घृणा किंवा तिरस्कार नसतो. परंतु त्यात वास करणाऱ्या आत्म्याचे ते घर आहे अशी भावना त्याच्या मनात निर्माण होते. त्याला कोणत्याही कारणासाठी दुसऱ्या कोणाशीही संपर्क नकोसा असतो आणि तो स्वतःच्यात रममाण असतो. जेव्हा शरीर आणि मनाची शुद्धी झालेली असते, तेव्हा त्याच्या बरोबरच अंतःकरणाची शुद्धी, मनाची प्रसन्नता, चित्ताची एकाग्रता, इन्द्रियांवर काबू आणि आत्मसाक्षात्काराची योग्यता या पाच गोष्टीही येतात. ज्याच्यापेक्षा दुसरे कोणतेही सुख उच्च नाही, अशा संतोषाचा त्याला लाभ होतो.

तपाच्या प्रभावाने मनातला मळ नष्ट होतो आणि शरीरातील ज्ञानेन्द्रिये आणि कर्मेन्द्रिये यांच्यावर काबू मिळतो. स्वाध्याय केल्याने इष्टदेवतांचा साक्षात्कार होतो आणि ईश्वरी तत्त्वाचा परिचय होतो. ईश्वरप्रणिधानाद्वारे समाधीचा स्थिर अनुभव मिळतो.
यम आणि नियम हा योगाभ्यासाचा पाया आहे. तो जितका मजबूत, तितका पुढचा प्रवास चांगला होतो. पुढील पायऱ्या म्हणजे आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार यांच्याविषयी पुढील लेखांत.

– ©️  सुभाष फडके 
subhashsphadke@yahoo.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
वर्षाधारा 
वर्षा पेठे
vnpethe@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
मुंबईच्या स्वातंत्र्य चळवळीच्या पाऊलखुणा
कामगार, संप आणि बंड

मूळ लेखिका: स्मृती कोप्पीकर
मुक्त अनुवाद :  प्रदीप अधिकारी  

 
भाग २ रा
 

मुंबईच्या कामकरी वर्गातले नागरिक, गोदी कामगार, कापड गिरणी कामगार, मजूर, व्यापारी आणि छोटे उद्योगधंदेवाले यांच्या संघटित ताकदीने या मुंबईला आकार आला होता. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सहभाग स्वाभाविक होता.  कित्येक दशकांनंतर त्यांच्या या चळवळीतल्या सहभागाच्या सुरस कथा हा कामगार वस्तीतला एक चर्चेचा विषय होता.

कामगारांचे संप, कामगार वर्ग व राष्ट्रीय राजकारण यांमधील निकटचे संबंध हे या चळवळीच्या सुरुवातीच्या काळातील प्रमुख पैलू होते आणि पुढे विसाव्या शतकाच्या प्रारंभी ते सर्वसाधारण झाले, अशी अभ्यासकांची नोंद आहे. गिरणी कामगारांनी  १८९२-९३ मधील प्रथम पुकारलेला संप हा पगार आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या सोयी – सवलती यांवर केंद्रित होता. परंतु १९१९, १९२०, १९२४-२५ आणि १९२८ मध्ये झालेल्या सर्वच उद्योग क्षेत्रातील सार्वत्रिक संपांना स्वातंत्र्य चळवळींचा समन्वय लाभला होता. १९०८ सालातील आठवडाभराच्या संपाने तर स्वातंत्र्य चळवळीतील कामगारांचा सहभाग अधोरेखित केला होता.

१९०८ च्या जून महिन्यांत जेव्हा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्यांना राजद्रोहाच्या आरोपावरून अटक झाली होती तेव्हा हजारो गिरणी कामगारांची अस्वस्थता वाढली होती. एक महिन्यानंतर  जेव्हा टिळकांना सहा वर्षाची शिक्षा ठोठावण्यांत आली तेव्हा मुंबई बंद पडली. सगळ्या बाजारपेठा २२ जुलैला बंद झाल्या आणि आठवडाभर बंद राहिल्या. प्रसिद्ध इतिहासकार बिपिनचंद्र यांनी “भारताचा स्वातंत्र्य संघर्ष” (India’s Struggle for Independence)  मध्ये लिहिले आहे की सर्व कापड गिरण्यातील आणि रेल्वे वर्कशॉपमधील कामगारांनी सहा दिवस संप पुकारला. सैन्याला पाचारण करण्यात आले. १६ कामगारांनी रस्त्यांवर आपले प्राण  गमावले तर जवळ जवळ ५० कामगार गंभीर रित्या जखमी झाले. कापडाची मुख्य बाजारपेठ मुळजी जेठा मार्केटमधील शेकडो कामगार देखील संपात सहभागी झाले होते.

१९१९ च्या एप्रिल महिन्याच्या सुरवातीस रॉलेट अॅक्टच्या विरोधात जेव्हा वातावरण तापू लागले होते, तेव्हा सुमारे ८० टक्के कापड बाजार, मासळी बाजार, भाजी बाजार बंद झाले होते. छोटे व्यापारी, कारकून, प्यून,टॅक्सीवाले, व्हिक्टोरियावाले, फेरीवाले, न्हावी, धोबी इत्यादी लोक एक दोन दिवस कामावरच आले नाहीत. महात्मा गांधीना  ‘मुंबईतला हरताळ पूर्णपणे यशस्वी’ असे जाहीर करता यावे म्हणून हे केले गेले असे वर्तमानपत्रातल्या बातम्यातून समजते.

१९२०-३० च्या दशकांत कामकरी वर्गाचा मोठा भाग चळवळीत सामील झालेला होता. काहीनी तर आपले जीव गमावले  होते. बाबू गेनूने निषेध व्यक्त करताना हौतात्म्य पत्करले होते. काळबादेवी येथे आयात केलेल्या कापडाने भरलेल्या ट्रकखाली त्याने स्वत:ला झोकून दिले, ट्रकखाली चिरडून त्याचा मृत्यू झाला. मुंबईच्या अर्थव्यवस्थेचे गोदी हे एक अविभाज्य  अंग होते तर गोदी कामगार हे इथल्या राजकारणाचे. १९२०-३०  च्या दरम्यान   म्हातारपाखाडी यासारख्या माझगाव डॉक्सच्या आजूबाजूच्या भागात राष्ट्रीय प्रश्नावर अनेक सभा व्हायच्या. द बॉम्बे डॉक वर्कर्स युनियनने ब्रिटिश कापडाची  ने-आण करणाऱ्या जहाजांवर बहिष्कार टाकला होता आणि निषेध म्हणून कापडाचे अनेक गठ्ठे  समुद्रात फेकून दिले होते.

युनियनच्या कारभारात वरचष्मा कोणाचा ह्यावरून काँग्रेस आणि कम्युनिस्ट ह्यात अंतर्गत वाद होते तरीही ट्रेड युनियन्सचा कामगारांवर जसा जबर पगडा होता तसाच तो स्वातंत्र्य चळवळीतही होता.काही युनियन्सचा गांधीजी आणि स्वातंत्र्य चळवळ ह्यांना  पाठिंबा होता तर काही थोड्या युनियन चळवळीत सामील होत होत्या परंतु त्या महात्माजींच्या संपर्कात जात नव्हत्या कारण त्यांचा असा समज होता की त्यांच्या मागण्या महात्माजींनी ज्या तऱ्हेने लावून धरायला हव्या होत्या तश्या त्या धरल्या नव्हत्या. परंतु दाट वस्तीतल्या डोंगरी, माझगाव, मांडवी, गिरणगाव, धोबीतलाव, कुंभारवाडा आणि मिश्र लोकवस्ती असलेल्या खेतवाडी, गिरगाव, ठाकुरद्वार अशा ठिकाणी वातावरण निर्विवादपणे ब्रिटीशांच्या विरुद्ध झाले होते.

शहरांतले हे  भाग  स्वातंत्र्याच्या घोषणा, गाणी आणि ब्रिटीशांच्या विरुद्ध उठावाच्या छोट्या छोट्या कारवाया ह्यांनी नेहमी गजबजलेले असत. कॉटन ब्रोकर्स असोसिएशन, बॉम्बे श्रॉफ असोसिएशन, बॉम्बे नेटिव्ह पिस गुड्स असोसिएशन, यांसारख्या संघटना गांधीजींना उघड उघड पाठींबा द्यायच्या तर चांगला जम बसलेले उद्योगपती आणि भांडवलदार सावधपणे गांधीजींच्या फंड उभारण्याच्या आवाहनास प्रतिसाद देत असत अशी “गांधी इन बॉम्बे” या श्रीमती उषा ठक्कर आणि संध्या मेहता ह्यांच्या पुस्तकात नोंद आहे.

बॉम्बे ट्रेड्स डिस्प्युट बिल ज्याद्वारे संप करण्यावर बंदी येणार होती, त्याच्या निषेधार्थ सुमारे २,२०,००० लोक ७ नोव्हेंबर १९३८ साली रस्त्यांवर उतरले. त्याच वेळी कामगार कॉंग्रेसच्यासुद्धा विरोधात गेले. आठ वर्षानंतर रॉयल इंडियन नेव्हीमधले तरुण खलाशी  बंदराजवळच्या रस्त्यावर उतरले होते.

१८ फेब्रुवारी १९४६ रोजी बॉम्बे डॉकयार्ड येथील सिग्नल (संदेश वहन) चे  प्रशिक्षण देणा-या एच.एम.आय.एस. तलवार ह्या जहाजावर असणाऱ्या खलाशांनी वर्णद्वेष, जहाजांवरील कदान्न, कामाच्या ठिकाणी असलेल्या सुविधांची गैरसोय ह्याविरुद्ध बंड पुकारले होते. त्यांनी आपल्या जहाजांची निशाणे उतरवून ठेवली आणि त्या जागी काँग्रेस, मुस्लीम लीग आणि कम्युनिस्ट पार्टीचे झेंडे फडकवले आणि दुसऱ्या जहाजांना इशारे केले. तिथल्या खलाशांनी किनाऱ्याच्या रोखाने बंदुका रोखल्या. आरमाराच्या तळावरील एकूण ७० जहाजांवर हे लोण पसरले. असे म्हणतात की ह्या घटनेतून की काय ब्रिटिशांना आपला गाशा गुंडाळण्याची घाई झाली. पुढे ह्या खलाशांवर कोर्ट मार्शल होऊन त्यांना नौदलातून काढून टाकण्यात आले. त्यातल्या काहींची “स्वातंत्र्य सैनिक” म्हणून नोंद होण्यास १९७३ साल उजाडले.
( पुढे चालू…)

@
मूळ लेखिका: स्मृती कोप्पीकर
मुक्त अनुवाद :  प्रदीप अधिकारी  
[ लेख व प्रचित्र :- पूर्वप्रसिद्धी ‘हिंदुस्तान टाइम्स‘ दि. १२ जुलै २०१७ ]
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
त्वचाख्यान 

डॉ. अरविंद लोणकर

[ भाग ३ ]

त्वचा एक अद्भुत पांघरुण
आमच्या लहानपणी ठिकठिकाणी जाहिराती असत. कोठल्या तरी चहाच्या कंपनीने त्या केलेल्या असत. मोठी गमतीदार विधाने असायची. चहा प्यायल्याने मेंदू तरतरीत होतो. ताप हटतो. मलेरिया बरा होतो. चहा हृदयास अपायकारक नाही. उन्हाळ्यात थंड व हिवाळ्यात गरम. असे चहाचे अद्भुत गुण त्यात वर्णन केलेले असत. ही सारीच विधाने कदाचित खरी नसतीलही. शिवाय अलीकडे जाहिरातीच्या तंत्रांत खूप सुधारणा झाली असल्याने या पाट्या कोठे दिसेनाशा झाल्या आहेत.

पण त्वचेबद्दल मात्र अशीच काहीतरी विधाने केली तर तरी आजही बिनचूक होतील यांत काही शंका नाही. बघा बरे ही जाहिरात कशी सजते ती !

आमच्या कंपनीचा खास शोध – अद्भुत पांघरूण !
हिवाळ्यात शरीर गरम ठेवते तर उन्हाळ्यात गार ठेवते.
धुण्यास सोपे. धोब्याकडे पाठवावयाची गरज नाही.
पाण्यात भिजवल्यास आटत नाही.
संपूर्णपणे जलाभेद्य.
सूर्याच्या उन्हापासून संरक्षक.
रंग पक्का. विटल्यास पैसे परत !

अशासारख्या अनेक सुरस अन् चमत्कारिक गोष्टी त्यात लिहिता येतील. अरेच्चा ! पण ही जाहिरात करायचं कारणच काय ? कारण हे पांघरूण फक्त निसर्गातच मिळते, बाजारात कोणी बनवीत नाही.


त्वचेचा छेद
त्वचेचा वरचा भाग आर्ट पेपराइतका जाड असतो.
त्वचेचा खालचा भाग वरच्या भागाच्या ( म्हणजे  आर्टपेपरच्या ) ३० पट जाड असतो.  

एखाद्या घरात बरीच लहान मुले असतात. रात्री गप्पागोष्टी करत करत त्यांना कधी झोप लागते ते समजतही नाही. मग त्या सा-यांवर पांघरूण घालायचे काम आईला करायला लागते. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात अनेक अवयव असतात. सांधे आहेत, जठर आहे, हृदय आहे, मेंदू आहे; याला सा-यांवर एकच एक पांघरूण घालायचे काम त्वचा करते. किल्ल्याला जसा  तट तशी शरीराला त्वचा. शत्रूच्या हल्ल्यापासून तट जसा आतल्या शिबंदीचे रक्षण करतो, त्याचप्रमाणे बाहेरील असंख्य प्रकारच्या अपायकारक गोष्टींपासून त्वचा शरीराचे रक्षण करत असते. अवयवांना अलगद जपून ठेवते.या अपायकारक गोष्टी किती त-हेच्या असतात त्याला काही गणतीच नाही. लहानमोठे आघात असोत, धक्काबुक्की असो, थंडीवारा, ऊनपाऊस, किडामुंगी अगर डोळ्यांनी न दिसणारे जीवजंतू असोत; या सा-यांना प्रवेश बंद करून ठेवलेला असतो त्वचेने. असे हे पांघरूण चिवट आणि मजबूत मोठे लवचिक असते. नाहीतर शरीराची मोकळेपणाने हालचाल होऊ शकणार नाही. खेळण्यातला शिपाई किल्ली दिल्यावर जशी हालचाल करतो तशी आपली हालचाल झाली असती.

साप, बेडूक अशांसारख्या प्राण्यांना थंडी वा-याची काही  फिकीर नसते. बाहेर थंडी पडली की त्यांचे अवयव गार पडतात आणि ऊन झाले की तापून निघतात. पण माणसाला मात्र आतील अवयवांच्या तपमानात थोडाही फरक पडून चालत नाही. या एकाच गुणामुळे शरीरातली ऊब बाहेर जात नाही की बाहेरील आत येत नाही.

                                  सर्वांगावरचे त्वचेचे संरक्षक पांघरूण

शरीराची क्रिया अगदी थोड्या तपमानाच्या  मर्यादेतच होते. बाहेर कडाक्याची थंडी पडली किंवा उन्हाने अंगाची लाही होत असली तरीही आतील तपमान बदलून चालत नाही. चांदी, तांबे यांसारख्या धातुंतून उष्णता सहजपणे आरपार जाते. कारण ते चांगलेच उष्णवाहक असतात. उलट आपली त्वचा उष्णतावाहक नसते त्यामुळे तिच्यातून उष्णता चटकन आराधर जाऊ शकत नाही. शिवाय त्वचेखाली सगळीकडे पसरलेला चरबीचा थर तिला जास्तच उष्णतारोधक बनवतो.

घाम-त्वचेची शीतक यंत्रणा
काही कारणाने ताप आला, उन्हाळ्यात बाहेरचे तपमान खूप वाढले, खूप व्यायाम केला, तर शरीर गार करणे जरुरीचे असते. यावेळी त्वचेत सगळीकडे असणा-या असंख्य रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि त्यांच्यामधून खूप रक्त खेळवले जाते. तुम्ही उन्हातान्हातून धावत आलात की तुमचे गाल टोमॅटोसारखे लालबुंद होतात ते याच कारणाने. असे हे रक्त शरीराच्या पृष्ठभागावर आले की शरीर निवण्यास मदत होते. साहजिकच शरीरातील जास्त झालेली उष्णता बाहेर टाकली जाते. याच वेळी त्वचेत असलेल्या असंख्य घामाच्या ग्रंथी कामाला लागतात आणि बघताबघता सारे अंग घामाने ओलेचिंब करून टाकतात. मग या घामाचे वाफेत रूपांतर करायला लागणारी उष्णता शरीरातून वापरली जाते.जाणीव शरीर थंड होते; उन्हाळ्यात पाणी गार करण्यासाठी आपण माठात पाणी भरून ठेवतो ना, अगदी तशीच क्रिया येथे होते. ही जास्त झालेली उष्णता बाहेर गेली आणि तपमान योग्य झाले की सा-या रक्तवाहिन्या पूर्वीच्या आकारात येतात. घाम येणे बंद होते. आणि शरीर जास्त  निवणे बंद होते. म्हणूनच आपल्याला उन्हाळ्यात जास्त घाम येतो आणि हिवाळ्यात कमी येतो.

त्वचेचा रंग
त्वचेत सर्वत्र ‘मेलॅनिन’ नावाचे एक रंगद्रव्य असते. गो-या माणसांत ते कमी असते. तर काळ्या माणसांत त्याची अगदी रेलचेल असते. काळा रंग आपल्याला आवडत नाही हे खरे, पण सूर्याच्या उन्हापासून संरक्षण करायला तो फार उपयोगी पडतो. सूर्यग्रहण पाहण्यासाठी तुम्ही मुले काय युक्ती करता ? किंवा तुम्हाला तुमचे विज्ञानाचे शिक्षक तसे करायला सांगतात ? एक पांढरी काच घेऊन त्यावर दिव्याची काजळी धरता, मग ती काच काळी होते आणि मग त्यातून सूर्याकडे आरामात तुम्ही बघू शकता. कारण त्या काळ्या काचेतून सूर्याची प्रखर किरणे आरपार जाऊन डोळ्यांच्या नाजुक भागाला इजा करत नाहीत.  नेमकी अशीच गोष्ट काळ्या कातडीत होत असते. युरोप – अमेरिकेतला गोरा माणूस आपल्याकडच्या उन्हाळ्यात फिरला तर त्याचे अंग भाजून गाजरासारखे लाल होते. पण आपण लोक मात्र खुशाल त्याच उन्हात भटकत असतो, ते केवळ आपल्या काळ्या रंगामुळेच शक्य होते. इतकेच काय पण, हे गोरे लोक फार वर्षे जास्त ऊन वा-यात हिंडले तर त्यांना त्वचेचा कॅन्सर होतो. तो आपल्याला सहसा होत नाही. देव करतो ते ब-याकरताच करतो असे समजून काळ्या रंगाला जरा बेतानेच शिव्या द्या बरे का !

संरक्षक त्वचा
बाहेरील जगात अगणित जीवजंतू आपल्या शरीरात घुसण्यासाठी सतत टपलेले असतात. डास, ढेकूण, मुंगी हे आपल्या ओळखीचेच पाहुणे आहेत. यांखेरीज डोळ्यांनी न दिसणारे कितीतरी जातींचे सूक्ष्म जंतू पदोपदी असतात. या सा-यांना बाहेरच थोपवून धरायचे काम त्वचेकडे असतात. किडामुंगी अर्थातच त्वचेतून आत जाऊ शकत नाही. पण ती चावली तर तिचे विष जागच्या जागी गोठवून इतर शरीरावर त्याचा परिणाम होणार नाही असा प्रयत्न त्वचा करते. जंतूंना तर त्वचा फारच गुंगवते, एक तर त्वचेचा तट अभंग असेपर्यंत त्यांना आत वाट मिळत नाही. त्यातून जंतू त्वचेवरच तळ ठोकून बसले तर त्वचा कोरडी राहून त्यांना उपासमार करून मारते. त्यांनीही जंतू बधले नाहीत तर घाम व त्वचेतून बाहेर पडणारे स्निग्ध पदार्थ यांच्या अद्भुत क्रियेने जंतू मरून जातात. एक मात्र लक्षात ठेवायला हवे की जंतूंशी लढत देण्याची ताकद ही फक्त स्वच्छ व निरोगी त्वचेतच असते. यासाठी दररोज स्नान करणे जरुरीचे असते. नाहीतर त्वचेचे संरक्षण कमी पडते, जंतूंची  सरशी होते आणि खरूज, गजकर्ण, फोड असे अनेक त्वचारोग होतात.

कमळाची पाने जन्मभर पाण्यात वाढतात, पाण्यावर तरंगतात आणि पाणी नसले तर मरून जातात. पण कमळाच्या पानावर पाण्याचा थेंब टाकला तर त्याची नुसती मोत्यासारखी गोळी होऊन राहते. तो थेंब पानातून आरपार जात नाही. तसेच काहीसे त्वचेचे आहे. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे त्वचेला पाणी जीव की प्राण आहे. पण म्हणून त्वचेवर टाकलेले पाणी आत जाईल म्हणता ! छे नाव नको. जी गोष्ट पाण्याची तीच इतर असंख्य पदार्थांची. डॉक्टर मंडळींनी आटोकाट प्रयत्न केले तरी वरून चोपडलेली औषधे आरपार जाणे जवळ जवळ अशक्य आहे.

त्वचा किल्ल्याच्या तटासारखी आहे असे मघाशी म्हटले ते आणखीही एका अर्थाने खरे आहे. तट म्हणजे नुसती भिंत असून चालत नाही. त्यावर टेहेळणी करणारे पहारेकरी रात्रंदिवस ठेवायला लागतात. हो ! नाहीतर शत्रू अगदी दरवाजाबाहेर येऊन ठेपला तरी आत पत्ता लागायचा नाही. त्याचप्रमाणे बाहेर येणारे नाना त-हेचे संदेश पकडून मेंदूकडे रवाना करायचे काम त्वचा करते. या कामी लागणा-या पेशी टेहळणी करणा-या पहारेक-यांप्रमाणे त्वचेत सगळीकडे पसरलेल्या आहेत. अंगावर साधी माशी बसल्याची जाणीव असो, चपलेचा खिळा बोचत असल्याचे दुःख असो, की उन्हाने रस्ता  तापला असल्याची खबर असो ; त्वचेकडून मेंदूला संदेश गेलाच म्हणून समजा. मग त्या संदेशाची योग्य ती दखल घेऊन उपाययोजना करायचे काम मेंदूकडे. या दोघांचे सहकार्य असते म्हणून ठीक. नाहीतर शरीराचा निकाल लागायला वेळ लागणार नाही.

मग आता सांगा पाहू ? सुरुवातीला तयार केलेल्या जाहिरातीत थोडी तरी अतिशयोक्ती केली का ? हे असे अद्भुत पांघरूण  निसर्गाबाहेर कोठे मिळेल का ?

डॉ. अरविंद लोणकर
त्वचारोग विशेषज्ञ, पुणे
[ चित्रे व लेख  ‘सृष्टिज्ञान‘ जून १९७० च्या अंकावरून साभार ]

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
गोंधळात गोंधळ 
कडबोळे [ ३६ ]
The POTUS is on the move !! ६ ]
डॉ. अनिल जोशी

The whole aim of practical politics is to keep the populace alarmed (and hence clamorous to be led to safety) by menacing it with an endless series of hobgoblins, all of them imaginary. – H. L. Mencken .

अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. डेमोक्रॅट व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे उमेदवार निश्चित झाले आहेत..रिपब्लिकन पक्षातर्फे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  व माइक पेंन्स विरुद्ध डेमॉक्रॅटिक पक्षातर्फे जो बाईडन व कमला हॅरीस अशी लढत होणार आहे. करोना साथीची हाताळणी हा या निवडणुकीतील कळीचा मुद्दा होऊ पाहतो आहे. किंबहुना तो तसा व्हावा असे डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रयत्न आहेत. जनमत चाचणीमध्ये  ट्रम्प  महोदय सध्या  काहीसे  पिछाडीवर  आहेत. करोना  साथीमुळे अध्यक्षीय निवडणूक पुढे ढकलावी अशा आशयाचे एक ट्वीट त्यांनी मध्यंतरी केले होते. परंतु दुसऱ्या महायुद्धातसुद्धा अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली नव्हती हा इतिहास आहे. त्यामुळे निवडणूक ठरलेल्या वेळी होणार अशीच  चिन्हे आहेत. अमेरिकेत एक केंद्र सरकार व पन्नास राज्य सरकारे मिळून काम करतात. या सर्व पन्नास राज्यांच्या राज्यघटना वेगवेगळ्या  आहेत. या सगळ्यांना एकत्र घेऊन ही निवडणूक पार पाडणे हे एक मोठे आव्हानच असते. कोरोना पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष मतदान घेताना विषाणू प्रसार  होण्याची भीती व्यक्त होत आहे व त्यात बरेच तथ्यही आहे. “पत्र द्वारे मतदान“ (Postal Balot ) हा याला  एक पर्याय म्हणून पुढे येतो आहे. पत्राद्वारे अध्यक्षीय पदासाठी मतदान नोंदणी करण्याचे नियम वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे आहेत. या सर्व  वेगवेगळ्या नियमांमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक एकतर्फी झाली तर फारसा प्रश्न येणार नाही परंतु मागील वेळे प्रमाणे ही निवडणूक जर चुरशीची झाली तर मग प्रत्येक राज्यातील मतदान चे महत्व खूप असणार आहे. आणि मग मग पत्राद्वारे आलेल्या मतांची मोजणी झाल्याखेरीज निकालाची घोषणा करता येणार नाही. या गोंधळाच्या परिस्थितीचा फायदा घेऊन विपरीत निकाल लागल्यास पराभुत उमेदवार कोर्टबाजी करू शकतो. तुम्ही म्हणाल पत्राद्वारे मत टाकणे यात एवढी गुंतागुंत असण्याचे काय कारण आहे. त्याचा थोडक्यात खुलासा करण्यासाठी हा खास लेख आहे.
१ अमेरिकेतील सर्व राज्यांमध्ये (५०)  पत्र द्वारे मतदान करण्यास अधिकृत मान्यता आहे.अर्थात सर्व राज्यात प्रत्यक्ष मतदान घरात जाऊन मत देण्याचा पर्याय हा नेहमीप्रमाणे उपलब्ध असणार आहेच.
२ एकंदरीत आठ राज्ये व वाशिंग्टन डीसी  हा विशेष जिल्हा आपल्या सर्व पात्र उमेदवारांना निवडणुकीच्या पुरेसे आधी पत्राद्वारे मतपत्रिका पाठवणार आहेत. ही मतपत्रिका भरून उलट टपाली पाठवायची आहे.
२ चौतीस (३४)  राज्यांमध्ये इच्छुक मतदार करोना साथीचे कारण सांगून  किंवा कोणतेही कारण न सांगता देखील पत्राद्वारे  मतदान करू शकतात.
३ आठ राज्यांमध्ये प्रत्येक नोंदणीकृत मतदाराला पत्राद्वारे मतदान करण्यासाठीचा अर्ज  पाठविला जाईल. रितसर अर्ज केल्यानंतर, परवानगी घेऊन पत्राद्वारे मत देता येईल.
४ अठ्ठावीस  राज्यांमध्ये ज्यांना पत्र द्वारे मतदान करावयाचे आहे अशा मतदारांना त्यासाठी जो  विहित  अर्ज करायचा आहे तो स्वत: मिळवावा लागेल.
५ आठ राज्यांमध्ये पत्राद्वारे मतदानाच्या परवानगीसाठी कोरोनाव्हायरस खेरीज  अन्य सबळ कारण  द्यावे लागेल.
ज्यांना  करोना प्रादुर्भावामुळे गर्दीत जाऊन समक्ष मतदान करण्याची भीती वाटते असे मतदार यावेळी मतदान प्रक्रिये  पासून  दूर राहतील असे  सुरुवातीला वाटत होते. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरू नये म्हणून काही  राज्यांनी पत्राद्वारे मतदान करण्याचा पर्याय काहीना काही प्रमाणात सोपा  व्हावा असे  प्रयत्न केले आहेत. सध्या मतदानाचा टक्का घसरला  तर त्याचा फायदा रिपब्लिकन यांना जास्त होईल अशी चिन्हे आहेत. त्यामुळे रिपब्लिकन सत्ता असलेली राज्ये  पत्रद्वारे मतदान करण्याचा पर्याय क्लिष्ट  व दुरापास्त कसा होईल ते पहात आहेत तर डेमोक्रॅटिक राज्ये आपल्या प्रभाव क्षेत्रातील मतदाराला हा पर्याय सहजसाध्य व्हावा म्हणून प्रयत्न करत आहेत . पत्राद्वारे मतदान यशस्वी होण्यात  अमेरिकेच्या पोस्ट खात्याचा मोठा वाटा असणार आहे यात शंका नाही.सर्व  जगभर आंतरजालाचा वापर  वाढल्यामुळे पोस्ट खाती  अडचणीत येत आहेत . अमेरिकेतले पोस्ट खातेही  याला अपवाद नाही.  अध्यक्षीय निवडणुकीतील  पत्रद्वारे मतदानाचे मोठे आव्हान पेलण्यासाठी  पोस्ट खात्याने केंद्र सरकारकडे अधिक निधीची मागणी केली आहे. पत्रद्वारे मतदान यशस्वी झाल्यास  मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढेल असा अंदाज आहे.  या वाढीव मतातील मोठा वाटा विरोधी पक्षाला जाईल अशी अध्यक्ष ट्रम्प यांना भीती वाटते आहे.त्यामुळे  पोस्ट खात्याच्या वाढीव निधीची मागणी मान्य होऊ नये यासाठी ते प्रयत्नशील आहेत. पत्राद्वारे मतदान करताना मोठ्या प्रमाणावर अफरातफर होण्याची शक्यता आहे अशी एक नैतिक(?) हरकत घेत ते पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहेत.या सगळ्या मंथनातून काय निघते ते काळच सांगू शकेल.
या सर्व गोंधळाला अजून एक पदर आहे. तुम्ही  पत्र द्वारे मतदान केले. हे तुमचे पत्र निवडणुकीच्या तारखेपर्यंत पोचले नाही तर ते वैध की अवैध ?  त्याची मोजणी करायची का नाही ?  यासाठीचे प्रत्येक राज्याचे नियम वेगवेगळे आहेत. क्लिंटन विरुद्ध ट्रम्प या मागच्या निवडणुकीवेळी विजय अत्यंत निसटता असल्याने या मुद्द्यावर वेगवेगळ्या पातळीवर बरीच चर्चा झाली होती.
परमेश्वर अमेरिकन निवडणूक आयोगाचे भले करो!
I can’t believe they’re considering an all mail election…
…females worked so hard to get voting rights

– ©️ डॉ अनिल यशवंत जोशी
९४२२६४७२८३
jaysss12@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^ 
मिठाचा मोदक

आठवणीतले सण [ ३ ]
 
प्रदीप अधिकारी 

गणपती असायचा दिड दिवसाचाच पण त्यावेळी मी माझ्या आजोळी. हे अगदी ठरलेलं. सुंदर निसर्गसंपन्न गाव. टुमदार घर, परसदारी विहीर, दाट नारळी पोफळीची वाडी आणि त्याच्या पलीकडे ढेंगभर अंतरावर समुद्र. आजी, आजोबा, मामा, माम्या आणि भरपूर मामे भावंडं. ह्या सगळ्यांच्यात मी आनंदाने सहज सामावून जायचो.

पण ह्या वेळचा गणपती वेगळाच होता……गेल्या ३ -४ वर्षांत आम्ही भावंडं थोडी मोठी म्हणजे १२-१३  वर्षांची झालो होतो त्यामुळे धड लहानही नाही आणि धड मोठीही नाही अशा आड वयांत होतो. आजोबा गेल्यानंतरचा हा पहिलाच गणपती त्यामुळे सहाजिकच नेहमीची मस्ती, धुडगूस नव्हता. अस्वस्थ वातावरणातच सगळं चाललं होत. माम्या आपापली कामं मिटल्या तोंडाने उरकत होत्या. एरवी कामात प्रचंड गढलेली आजी आज मात्र शांतपणे एका कोपऱ्यात बसून होती.

……आजोबा गेले आणि आजी पार बदलली. आधीच ती कंबरेतून वाकलेली होती आता तर तीच पार धनुकलं झालं होतं.  आजोबांच्या आजारपणाने पार थकून गेली होती, केसांचा कापूस झाला होता. मधल्या काळात आयुष्यभर मशेरी लावून खराब झालेले दांत पडून गेले होते. बोळक्या तोंडात एकच दात शिल्लक राहिला होता. तिच्या कपाळावरची ती लालभडक चिरी, टपोऱ्या पिवळट मोत्यांची कानांतली कुडी, गळ्यांतली सोन्याची बोरमाळ आणि ठसठशीत मंगळसूत्र सगळं, सगळं तिने उतरवून ठेवलं  होतं. पटकन् ओळखता येऊ नये इतकी ती वेगळी दिसत होती……

आजीला सर्वच  नातवंडांचा  प्रचंड लळा. धाकटया नातवंडांना ती स्वत: न्हाऊ – माखू, जेवू – खाऊ घालायची. त्यावेळी गावात वीज नव्हती. रात्री भयाण काळोख असायचा. हातात फक्त दिवटी घेऊन रात्री अपरात्री विहिरीवर पाणी आणायला जायची हिम्मत फक्त आजीत होती. मुंजा, हडळ, जखीण, चकवा, मानकाप्या अशी वेगवेगळ्या जातीच्या भुतांशी आजीची चांगलीच  जवळीक होती. रात्री तिच्याजवळ झोपून भुतांच्या गोष्टी ऐकून ऐकून आम्हांला देखील ही  भुतं आणि त्यांचे प्रताप माहित झाले होते.

तिच्या भुतांच्या गोष्टी ऐकता ऐकता एखाद्या नातवंडाची चड्डी ओली झाली नाही असं कधी व्हायचं  नाही. आजी मग गोष्टी सांगणं बंद करून समस्त नातवंडांना परसात नेऊन सू सू करायला लावायची; “मी आहे इथे, जा, जरा अजून पुढे जा त्या माडापाशी,” थोड्याशा मोठ्या नातवंडासाठी ही सूचना असे. जीव मुठीत धरून माडापाशी सू सू करताना मागे वळून पाहिलं तर किर्रर् अंधारात हातात दिवटी  घेतलेली, कमरेत वाकलेली आजीच  भुतासारखी दिसायची पण त्यावेळी तिचाच आधार वाटे.

आजीला स्वत:शीच पुटपुटत काम करायची सवय होती. ती काय पुटपुटायची ते कोणालाच कळत नसे. आम्ही कधी कधी तिला चिडवायचो “आजी, तू कोणाशी एवढी बोलत असतेस?”  “हो, बोलत असते मी त्या पिंपळावरच्या मुंज्याशी” तीच हे ठरलेलं  उत्तर असायचं. आतासुद्धा, कोपऱ्यात जरी ती एकटीच बसलेली होती, तरी स्वत:शीच काहीतरी पुटपुट चालूच होती.
आजी आजोबांची दुसरी बायको…. आजोबांची पहिली बायको चौथ्या बाळंतपणात गेली. सतरा अठरा  वर्षांची आजी माप ओलांडून घरात शिरली तीच मुळी चार मुलांची आई बनून. आजीला त्यानंतर स्वत:ची चार मुलं झाली पण सारी जन्मल्यापासून चार आठ दिवसांतच गेली ….!!

आजीचं एक व्रत होतं. हरतालिकेचा निर्जळी कडकडीत उपवास आजी गणपतीच्या नैवेद्याचा मोदक खाऊन सोडायची पण त्यातही एक गंमत होती. पुरुषांची जेवणं आटोपली की दोन्ही  माम्या मोदक पात्रात पांच मोठाले मोदक उकडत ठेवत.  त्या पांच मोदकांपैकी  एका मोदकात फक्त खडे मीठ भरलेलं असायच. आजीला अर्थातच माहित नसायचं की कुठल्या मोदकात मीठ आहे. व्रत असं होत की मिठाचा मोदक लागेपर्यंत आजीला मोदक खावे लागायचे. मिठाचा मोदक आला की  खाणं बंद. कधी दुसरा तर कधी तिसरा मोदक मिठाचा निघे. मग उरलेले मोदक आम्ही नातवंडं फस्त करीत असू  पण जवळ जवळ दोन दिवस कडकडीत उपवास आणि अपार कष्ट केलेल्या आजीचा पांचवा मोदकच मिठाचा निघावा म्हणून सर्वच  नातवंडं  बाप्पाचा अक्षरशः धांवा करत असू.

आजीच्या पानाभोवती सारी जण कोंडाळं करून “आजी, तो नको हा खा, हा खा” असा कल्ला करायची. मिठाचा मोदक निघाला की आजी हात जोडून डोळे मिटून ‘देवा, विनायका, माझ्या पोरांबाळाच्या आयुष्यांत मिठाचा खडा टाकू नको रे  बाप्पा !’ असे म्हणून पुढ्यातलं ताट दूर  करायची. अगदी लहानपणी ही  सगळी गंमत वाटे पण आता आम्ही थोडे मोठे  झालो होतो त्यामुळे हा सगळा प्रकार म्हणजे वाटते तितकी काही गंमत नाही एवढं कळण्याइतकी समज आली होती…..

…….माम्यांच्या बोलण्यातून कळले होते की  ह्यावेळी आजीच्या व्रताचं उद्यापन आहे. म्हणजे ह्याच्यापुढे आजी हे व्रत करणार नव्हती. नेहमीप्रमाणे आम्ही नातवंडं आजीभोवती गोळा झालो होतो. ह्यावेळी दोन्ही मामा देखील आमच्या कोंडाळ्यात सामील झाले होते. आजीच्या पुढ्यात नेहमीच ताट होतं, त्यांत  केळीचं पान होतं, पानावर वाफाळळेले पांच मोदक होते. मोठी मामी आजीच्या बाजूला तुपाची छोटीशी तपेली घेऊन बसली होती. “ आई, फोडा मोदक, मी तूप वाढते”….मामी म्हणाली. “नको ग बाई, नको घालूस तूप आतां”…अस म्हणून आजीने क्षणभर सर्व मोदकांवर नजर टाकली …“आजी, तो नको, तो नको, हा घे !” आमचा कल्ला सुरु झाला …“बाप्पा, पांचवा मोदक… पांचवा मोदक…..” त्या गोंधळातसुद्धा कुणीतरी बाप्पाचा धावा करत होत …आजीने इथे तिथे न बघता एक मोदक फोडला …….आतले जाड्या मिठाचे खडे बाहेर डोकावले…क्षणभर सगळं सुन्न झालं …पहिलाच मोदक मिठाचा निघाला होता.

आजीने नेहमीप्रमाणे वर बघत डोळे मिटून हात जोडले आणि “देवा, विनायका …….’ म्हटलं. मोठा मामा माझ्या खांद्यावर हात ठेवून माझ्यामागे उभा होता त्याच्याकडे पहात भरल्या डोळ्याने आजी म्हणाली, “ आप्पा, झालं रे बाबा, व्रताचं उद्यापन झालं हो! ”  असं म्हणून ती हसली, ……..अतिशय विचित्र हसली…मला तिच्या बोळक्या तोंडातला तो एकमेव दांत अगदी थेट मिठाच्या खड्यासारखा दिसला…

दिड दिवसाचा गणपती गेला, आम्ही मुंबईला घरी परतलो.
पुढच्या वर्षीच्या गणपतीला आजी नव्हती ……!!!

– ©️ प्रदीप अधिकारी
98204 51442
adhikaripradeep14@gmail.com
प्रचित्र : ‘गुगल‘वरून साभार
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
चित्रकारांचे दालन 
– ©️ मिलिंद महाबळ, सांगली 
milind.mahabal.65@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^  
– सायना फर्नांडिस, पणजी
 
– प्रेषक ©️ डॉ. प्रियंवदा कोल्हटकर 
priyakar40@gmail.com
 @@@@@@@@@@
महत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@ 

इतिहासाशी जडले नाते

सचिन उपाध्ये 
 

                  बाबासाहेब पुरंदरे

शालेय जीवनात इतिहास हा काही माझा आवडता विषय नव्हता. चौथीच्या पुस्तकातील शिवाजी महाराजांचा इतिहास अतिशय आवडायचा; पण नंतरचा इतिहास रटाळ, कंटाळवाणाच वाटत गेला. आपल्या मनावर अनेक गोष्टी संस्कार करत असतात याची जाणीव मला त्या वयात नव्हती. शिक्षक, आईवडील, मित्र, इतर नातेवाईक आणि आपण काय ऐकतो, काय वाचतो ते सगळं मनावर कळत नकळत संस्कार करत राहतं. डोंबिवलीच्या आमच्या स.वा.जोशी विद्यालयाच्या पटांगणात बाबासाहेब पुरंदऱ्यांची अनेक व्याख्यानं झाली. माझ्या सुदैवाने मला त्या काळातली पुष्कळ व्याख्यानं ऐकायला मिळाली. माझ्या पाच वर्षाच्या माध्यमिक शालेय काळात मी दोन-तीनदा तरी बाबासाहेबांना अगदी समोरच्या रांगेत बसून ऐकलं आहे. आठ दिवस फक्त राज्याभिषेक, तीन दिवस फक्त पन्हाळ्याहून सुटका असे शिवचरित्रातले अनेक पैलू पोटभर ऐकायला मिळाले. रात्री अगदी नवाच्या ठोक्याला ते व्याख्यानाला सुरूवात करत आणि मला वाटतं, साडे दहा किंवा अकरा जी काही ठरलेली वेळ असे त्यावेळेस पूर्णविराम. मात्र पुढे काय ही उत्सुकता घेऊनच घरी जावं लागे. एका अशा टप्प्यावर येऊन व्याख्यान थांबलेलं, असे. बाबासाहेब अक्षरशः भारलेले असत आणि सगळ्या श्रोत्यांसकट मीही तशाच स्थितीचा अनुभव करीत असे.

त्या काळी कॉलर माईक नव्हता त्यामुळे एक माईक समोर, आणि एक असा वरून टांगता ठेवलेला असं पाण्याचं तांब्या-भांडं, फळा, आणि खुर्ची असूनही ते फारसे बसत नसत. श्रोत्यांना भारतीय बैठक असे. वाणीचा गंगौघ सुरु झाला की क्वचितच मध्ये थांबलं तर, नाही तर अखंड सुरूच. एके दिवशी असं घडलं. बाबासाहेबांनी व्याख्यान सुरू केलं आणि मधेच ते थांबले. नेहमीच्या रसाळ वाणीऐवजी कडाडले. श्रोत्यांपैकी एक माणूस पुढल्या एका रांगेतच बसून, बिडी-काडी ओढत होता. बाबासाहेबांनी निक्षून त्या माणसास सांगितलं, ” तुम्ही इथे माझ्यासमोर धूम्रपान करू नका. शिवचरित्र सांगणं माझ्यासाठी देवळातल्या पूजेप्रमाणे  आहे. मी हे सहन करणार नाही. ताबडतोब तुम्ही हे नाही थांबवले, तर मी इथून निघून जाईन. ” अर्थातच तो माणूस शरमेने खजील झाला आणि त्याने धूम्रपान बंद केलं. दुसऱ्या क्षणाला बाबासाहेबांनी व्याख्यान असं काही सुरु केलं, जणू काही घडलंच नाही. मी हे सगळं अचंबित होऊन पाहत होतो, ऐकत होतो. अशी घटना माझ्या पाहण्यात नंतर कधीही सुदैवाने घडली नाही.

इतिहास सांगणाऱ्यांच्या जीवनाचा इतिहासही मोठा खडतर असू शकतो हे बाबासाहेबांच्या जीवनातून बघायला मिळतं. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक आठवणी ऐकण्याचाही योग आला. त्यांच्या लहानपणी त्यांचे वडील त्यांना गोष्टी सांगत. आसपासच्या किल्ल्यांवर घेऊन जात, अनेक तीर्थक्षेत्रे दाखवली, त्याचे संस्कार त्यांच्या मनावर फार सखोल झाले, असे ते सांगतात. पुढे कुळकायदा लागू झाला आणि त्यांचं मिळणारं उत्पन्न अगदी तुटपुंजं झालं. अशा परिस्थितीत बाबासाहेब पुण्यातील भाजी घेत आणि रात्रीच्या पॅसेंजर गाडीने मुंबईत येत. सकाळी मुंबईत येऊन ती रस्त्यावर उभे राहून विकायचाही अनुभव मिळवला. पण रोजरोज ही दगदग झेपेनाशी झाल्यावर तो नाद सोडला. मग इतर लेखकांची पुस्तकं घरोघरी जाऊन विकण्याचाही प्रयत्न काही काळ केला. असं करता करता एकीकडे लेखन सुरू होतंच. त्यातून शिवचरित्र लिहायला घेतलं. लेखनाचा काही विशेष असा अनुभव नसताना केवळ एका अलौकिक ध्येयापोटी त्यांनी हे शिवधनुष्य पेलायचे ठरवलं. त्याकरिता घरातील दागिने गहाण ठेवून पैसे जमवायचा प्रयत्न केला. तोही अयशस्वी झाला. मग एका मित्राच्या आजीने त्यांना पुष्कळ मोठ्या स्वरूपात मदत केली. म्हणजे त्या काळी साधारण पंचवीस ते सत्तावीस हजार खर्च येणार होता असं गृहीत धरलं तर जवळ जवळ पंधरा-सतरा हजार रुपये त्या आजीबाईने दिले. बाबासाहेबांनी त्यांना दोनेक वर्षात परत करायला जमेल असं सांगितलं होतं. पण  सहा महिन्यांत त्यांनी परत केले. ती आजीबाई मोठी हुशार होती. तिने पैसे देताना एक अट घातली होती. ज्याप्रमाणे बँकेत व्याज मिळेल त्यानुसार दे असं सांगितलं होतं. आणि ते ठीकही होते कारण ती एकटीच राहत असे आणि तिची जन्मभराची पुंजी तिने ह्यांना दिली होती. आणि एकदाचं पुस्तक छापून झालं  “राजा शिवछत्रपती”

बाबासाहेब गमतीने सांगतात- पुस्तक छापल्यावर खरी परीक्षा सुरू झाली. पुस्तक घेणार कोण? मग त्यासाठी वणवण सुरू झाली. एकदा ते मुंबईहून पुण्याला रेलवेने जात असताना, योगायोगाने समोरच्या बाकावर साक्षात् प्र. के. अत्रे बसले होते. त्यांचं   स्वतःचं वृत्तपत्र  ‘मराठा’ वाचत होते. अत्र्यांचं लक्ष वाचनात होतं आणि समोर बसलेल्या बाबासाहबांची धडपड, जेवढं दिसतंय तेवढं वाचता येईल का अशी होती. काय भाग्य असतं पहा- त्याच दिवशीच्या मराठाच्या अंकात अत्र्यांनी बाबासाहेबांच्या “राजा शिवछत्रपती” पुस्तकाविषयी लेख लिहिला होता. त्यातील एक वाक्य बाबासाहेब आजही आवर्जून सांगतात- शिवचरित्र महाराष्ट्ररसात लिहिलंय’. अत्र्यांच्या लेखानंतर जी काही प्रसिद्धी मिळाली ती कल्पनातीत होती. काही महिन्यांतच पहिल्या आवृत्तीच्या प्रती हातोहात संपल्या.

जशी कथा लेखनाची तशीच व्याख्यानाची. मुळात बाबासाहेब लेखक आहेत की वक्ते आहेत की एक उत्तम अभिनेता आहेत की अजून काही असा प्रश्न मला नेहमी पडतो. उत्तम लेखक आणि उत्तम वक्ता यांचा संयोग एकाच व्यक्तिमत्त्वात बघायला मिळणं अवघड असतं. मला वाटतं  आपण सगळे महाराष्ट्रीय या बाबतीत भाग्यवान आहोत, बाबासाहेबांच्या रूपाने आपल्याला तो संगम आज साठ -सत्तर वर्ष अंनुभवायला मिळतो आहे. एक वक्ता म्हणून त्यांच्या वाणीचा विचार केला तर, सचित्र वर्णन आणि एकाच वेळेस सान-थोरांपर्यंत सगळ्यांना गुंगवून ठेवणारी वक्तृत्वशैली  नुसतीच भाग्याने नाही तर मेहनतीने लाभते. व्याख्यानांच्या रूपाने बाबासाहेबांना पुढे आणण्यात पुलंचा मोठा सहभाग होता असं ते स्वतः अतिशय नम्रतेने मान्य करतात. तसं पाहता त्यांचं पाहिलं प्रकट व्याख्यान वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षी झालं. तिथून पुढे वाणीचा ओघ जो सुरू झाला तो आजपर्यंत कायम आहे. काही वर्षांपूर्वी बाबासाहेब एका मुलाखतीत म्हणाले होते – माझी दहा हजाराहून अधिक व्याख्यानं झाली असावीत अर्थात् त्यांनी कधीही त्याचा हिशेब ठेवला नाही तो भाग निराळा. माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनाला एक प्रश्न कायम पडतो तो म्हणजे – कंटाळा नाही आला तोच तोच विषय घेऊन तेच तेच शिवचरित्र सांगायचा ? शिवचरित्र कितीही प्रेरक, रसाळ असो; पण वक्ता या भूमिकेतून विचार केला तर, मला हा प्रश्न नेहमी भेडसावतो. पण बाबासाहेब याचंही उत्तर देतात, ‘मला नवनवीन संदर्भ सापडत जातात, माझ्या ज्ञानाला उजाळा मिळत असतो, त्यानुसार प्रगत अभ्यास लोकांसमोर मांडायला मला आवडतं. जराही कंटाळा येत नाही’. हे ऐकून मला भास होतो, जणू ते एखाद्या तपस्व्याप्रमाणे आहेत आणि आपलं इप्सित ध्येय प्राप्त केल्याशिवाय थांबणार नाहीत.

वपुंचं एक वाक्य आहे- असण्यापेक्षा सुचणं महत्त्वाचं. बाबासाहेबांना ‘जाणता राजा’ हे नाट्य कसं सुचलं ?असा प्रश्न पडतो. म्हणजे याची संकल्पना युरोपातील कुठल्यातरी प्रयोगातून सुचली असा माझा कयास आहे. पण ती सजग दृष्टी असणं महत्त्वाचं. सुचल्यानंतर ते प्रत्यक्षात आणणं म्हणजे हिमालय उभा करण्यासारखं आहे. ज्यांनी ‘जाणता राजा’ पाहिलं आहे त्यांना मी काय म्हणतोय ते बरोब्बर कळेल. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वात नाट्य, अभिनय लहानपणापासूनच आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्याला आधारही सांगतो. ‘राजा शिवछत्रपती’ पुस्तकात श्री दीनानाथ दलालांची चित्रं आहेत. मला वाटतं साधारण शंभरेक चित्रं असावीत. यातलं प्रत्येक चित्र त्या प्रकरणाचं  किंवा प्रसंगाचं यथोचित दर्शन घडवतं. उदाहरणार्थ – स्वराज्य निर्मितीच्या सुरुवातीच्या प्रयत्नात शिवरायांसमोर एक पेचप्रसंग उभा राहिला होता. एकीकडे स्वराज्य वाचवायचे प्रयत्न करावे तर शहाजीराजांच्या जिवाला धोका होता. दोनपैकी एकच हाती राहू शकेल. तिथे चित्राखाली ओळ आहे -‘बोल स्वराज्य हवे की सौभाग्य?’ आता त्यांच्या अजून एका गुणविशेषाचं वर्णन केल्यावाचून राहवत नाही- त्यांची काव्यप्रतिभा. प्रत्येक चित्राखाली उत्तमोत्तम ओळी आहेत. त्यातली कुठली सुंदर आणि कुठली अधिक सुंदर याची निवड करणं कठीण आहे. म्हणजे कृष्णाचं  बासरी घेतलेलं रूप सुंदर की सुदामा भेटीतलं  की अजून कुठल्या प्रसंगातलं सुंदर असं विचारण्यासारखं आहे.

नाट्य त्यांच्या अंगभूत गुणांपैकी एक आहे याची साक्ष त्यांच्या एका अनुभवातून पटते. ‘”राजा शिवछत्रपती’ पुस्तकातील सगळी चित्रं दीनानाथ दलाल जेव्हा काढत असत तेव्हा अर्थातच प्रसंगाचं यथोचित वर्णन ते दलालांना सांगत. त्यासोबत अभिनयानेही ते दाखवत. म्हणजे अगदी एखाद्या स्त्रीची रेखाटनं असतील  तर खांद्यावरचा पदर कसा असावा, दृष्टी कुठे असू शकते असे बारीक सारीक तपशील ते समोर ठेवत. आश्चर्यमुद्रा, भयमुद्रा असं सगळं चेहऱ्यावर साकार करून दाखवणं सोपं नाही. नेमका तोच गुण त्यांच्या व्याख्यानात उपयोगी पडताना दिसतं. या सगळ्या गुणांच्या मालिकेत, अतिशय प्रखर स्मरणशक्ती मुकुटमणी ठरावी अशीच आहे. एकदा ठाण्यात ‘उमा नीलकंठ व्यायामशाळेच्या प्रांगणात बाबासाहेब बोलत होते. अफझलखानवधाच्या वेळी शिवाजी महाराजांच्या सोबत कोण होते? दहा अंगरक्षकांची नावं सांगितली. मग अफझलखानाच्या सोबत असलेल्या दहापैकी सहांची नावं इतिहासाला माहीत आहेत, तीही सांगितली. मार्गशीर्ष षष्ठी शके अमुक तमुक, इंग्रजी तारीख अमकी असे कितीतरी संदर्भ पटापट देत जातात.

बाबासाहेबांचं भाषेवरचं प्रभुत्वही अफाट आहे. एकदा बोलताना ते म्हणाले, “आपण शिवाजी महाराजांच्या चरित्राचा पाहिजे तसा उपयोग नाही केला.’ म्हणजे काय? तर त्यांचं चरित्र आपण अत्तरासारखं वापरतो. त्याचा वास थोड्या वेळासाठी घ्यायचा नंतर विसरून जायचं. पण ते चरित्र रक्तात भिनलं पाहिजे ही त्यांची कळकळ दिसून येते. मला वाटतं  त्यांनी आपल्या जीवनात ते आचरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. सर्वसाधारणपणे आपण समजतो १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला. पण हा भ्रम आहे. दादरा – नगर – हवेली त्यावेळी भारतात सामील झाले नव्हतं. त्या भागाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांत बाबासाहेबही होते. तिथली पिपरिया नदी ओलांडून गेले आणि पोर्तुगीजांविरुद्ध जी चकमक झाली त्यात ते अग्रणी होते.ऑगस्ट १९५४ मध्ये हा भाग भारतात आला. गोवा तर त्यानंतर भारतात आला. १९ डिसेंबर १९६१ रोजी. एखादा माणूस जेव्हा काही गोष्टी उराशी बाळगून जगतो तेव्हा त्याला बारीक सारीक तपशील लक्षात ठेवायला वेगळी मेहनत लागत नाही. त्यामुळेच कदाचित बाबासाहेबांना शिवचरित्रातल्याच नव्हे तर इतरही अनेक घटनांच्या तारखा सहज लक्षात राहतात. आणि त्यामागे अभिनिवेशही नसतो फक्त अचूकतेची ओढ असते असं वाटतं. बोले तैसा चाले…

मला वाटत नाही बाबासाहेब कधी वादाच्या भोवऱ्यात पडले असतील. नेहमी गोड वाणीने सर्वांचा उल्लेख करतात. राजकारण्यांचा उल्लेखही राजे असा करतात. तरीही काहींनी त्यांच्या बाबतीत तर धुरळा उडवायचा प्रयत्न केला तर ते म्हणतात, ‘अहो या वयातही मला शिवचरित्र समाजात पोहोचविण्यासाठी खूप काही करायचंय. त्यामुळे कोण काय बोलतं ते पाहायला वेळ नाही. शिवाजी महाराजांनी फक्त ५० वर्षांच्या आयुष्यात इतकं करून ठेवलंय की आपल्याला त्याहीपेक्षा जास्त वर्ष आयुष्य लाभूनही अभ्यास करायला ते कमीच पडावं”. किती छान विचार आहेत नाही? आता ते ‘शिवसृष्टीच्या’ कामात गुंतले आहेत. एखाद्या विषयात स्वतःला कसं झोकून द्यायचं ते त्यांच्याकडे पाहून सहज शिकता येईल. अभ्यासाचा विषय सर्वांगांनी कसा आत्मसात करायचा याबद्दलचं एक उदाहरण देतो. शिवचरित्रातल्या त्या त्या दिवशी ते त्या त्या जागी जाऊन आले आहेत. म्हणजे १२ जुलैला शिवाजी महाराज पन्हाळ्याहून सुटले. रात्री निसटले आणि दुसऱ्या दिवशी विशाळगडावर पोहोचले. ते अनुभवण्यासाठी बाबासाहेबांनीही त्याच तारखांना तसाच दिवसा रात्री प्रवास करून पाहिला आहे.. इतकाच नाही, राजगड ते आग्रा पायी प्रवास करून पाहिला आहे. कमाल आहे. इतका पायी फिरणारा निर्व्यसनी माणूस दीर्घायुषी नाही झाला तरच नवल आहे.

मी लेखाच्या सुरुवातीला म्हटलं, त्याप्रमाणे माझ्या मनावर नकळत शिवचरित्राचे आणि बाबासाहेबांचे संस्कार होत गेले. सगळ्यात पहिल्यांदा ‘राजा शिवछत्रपती’ मी चवथीत असताना वाचायला घेतलं. किती कळलं हा मुद्दा नाही किंवा माझं त्यात माहात्म्य नाही. महत्त्व आहे त्यांच्या पुस्तकाचं. ते  पुस्तक बालकथा नसूनही माझ्या त्या वयाला आकर्षित करू शकत होतं. या सगळ्याचा परिपाक म्हणून की काय; पण मीही मोठा झाल्यावर किल्ले भटकू लागलो. मला जमेल तसा आणि माहीत आहे  तेवढा इतिहास किंवा किल्ल्यांबद्दलची माहिती लोकांना सांगू लागलो. आपण सगळेच अर्जुन असतो आणि आपल्याला एक नाही तर अनेक द्रोणाचार्य आयुष्याच्या वाटेवर कृपाप्रसाद देऊन जात असतात. आवश्यकता असते ती आपण कृतज्ञ होऊन त्यांचं स्मरण करण्याची आणि इतरांना तसंच काहीतरी निःस्वार्थपणे देण्याची. नुकत्याच होऊन गेलेल्या त्यांच्या वाढदिनानिमित्त त्यांना दीर्घायु चिंतून माझी लेखणी इथेच थांबवतो.

डावीकडून दुसरे श्री. सचिन उपाध्ये

– ©️ सचिन उपाध्ये 
sachinupadhye26@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आजची कविता
श्रीकृष्ण पोवळे  

ज्वालागिरी

शृंग आकाशी उडे, संतप्त हो ज्वालागिरी
धूम अन् पाषाण दे फेकून आवेगे वरी
विद्ध झाल्या वाघिणीच्या सारखे आक्रंदन
ऐकुनी होती दिशा या स्तब्ध, थांबे स्पंदन

धूम दाटे भोवताली, नाहिसा हो भास्कर
वाफ वाटे दे झुगारोनी नभाचे छप्पर
लागला पोटी सळाळू उष्ण लाव्हा दुर्दम
भावनांचे की उमाळे अंतरी निःसंयम

पाहुनी हे तेथ आले चार कोणी शहाणे
बोलले ज्वालागिरीला देऊ या आश्वासने
बोलले की शृंग लिंपू, बर्फ ठेवू या शिरी
धीट कोणी बोलला की गाडुनी टाकु गिरी

अप्रबुद्धांनो ! स्वतःचा जीव सांभाळा पळा !
चालते व्हा येथुनी अग्नीत किंवा या जळा !

जन्मदिन : २६ ऑगस्ट १९२१

[ ‘संग्रहालय’ ऑगस्ट १९८२ वरून साभार ]
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
अँटोनी लवायजर 
अर्वाचीन रसायनशास्त्राचा पिता 
ज्ञान विज्ञान
वि. अ. जोशी

अँटोनी लवायजर ( २६ ऑगस्ट १७४३ – ८ मे १७९४)



आपल्या शास्त्रशिक्षणात रसायन हा एक विषय असतो. त्यांत मूलद्रव्यांचे गुणधर्म व त्यांच्या रासायनिक संयोग इत्यादींची माहिती असते.  या शास्त्राची सुरुवात मात्र विचित्र पद्धतीने झाली. १७ व्या शतकात अनेक जण खाजगी रीतीने प्रयोग करीत. थोड्या श्रमात श्रीमंत व्हावे, भरपूर पैसे मिळवावे असे प्रत्येकास वाटत असते. श्रीमंती ज्यावर अवलंबून आहे, असे सोने मिळविण्याचा प्रयत्न निरनिराळ्या मार्गांनी केला जाई. त्यातच इतर लोखंड, तांबे अशा स्वस्त धातूंवर काही संस्कार करून सोने मिळविण्याचा प्रयत्न या शतकात अनेकजण करीत असत. तसेच चिर-तारुण्य मिळविण्याकरताही प्रयत्न होत असत. अमरत्व येण्याकरता, मृत्यूवर विजय मिळविण्याकरिता काही औषधे तयार करावी अशीही खटपट होई. आपल्याकडेही लोखंडाचे सोने बनविणारा परीस एक आकर्षक वस्तू होता. अमरत्व आणि कायमचे तारुण्य याकरिता निरनिराळ्या झाडांचा पाला किंवा त्यांचा उकळलेला रस इत्यादींचा उपयोग केला जाई. पा-यासारख्या काही धातूंचेही याबाबतीत फार महत्त्व होते.  या सर्वांना थोडक्यात ‘किमया’ म्हणत. अर्वाचीन रसायनशास्त्राचा या क्रियेतूनच उदय झाला असे म्हणता येईल.

१८ व्या शतकात मात्र यूरोपांत काही स्पष्ट दृष्टिकोन डोळ्यासमोर  ठेवून संशोधनाला सुरुवात झाली. पाणी, जमीन, अग्नी, धातुमूलद्रव्ये यांबद्दल अनेक चुकीच्या कल्पना केल्या गेल्या. त्यापुढील शास्त्रज्ञांनी आणखी शोध लावून कल्पनांमध्ये बदल सुचविले. या सर्व शास्त्रज्ञांचे आपल्यावर मोठे ऋण आहे.

या सर्व शस्त्रज्ञांत लवायजर  ( Lavoisier ) याची कामगिरी फार मूलभूत महत्त्वाची आहे. त्याने लावलेले शोध मूलगामी असल्याने त्याला ‘अर्वाचीन रसायनशास्त्राचा पिता’ असे म्हणतात. फ्रान्समध्ये याचा २६ ऑगस्ट १७४३ रोजी जन्म झाला. जोसेफ प्रिस्टले आणि शील या शास्त्रज्ञांनी प्राणवायूचा शोध लावला असला तरी या वायूची पूर्ण माहिती जगाला लवायजरनेच प्रथम दिली. त्याने प्राणवायू तयार करून त्याचे गुणधर्म सांगितले. याशिवाय १२ दिवस पारा तापवून त्यापासून पा-याचे भस्म (HgO) मिळविले आणि त्याकरिता हवेतील १/५ भाग खर्च होतो हे दाखविले. उरलेल्या भागात मेणबत्ती विझते हेही पाहिले. प्राणवायूशी संयोग होणे म्हणजे ज्वलन ही कल्पना निश्चित करून त्याने पदार्थाचे ज्वलनास ‘जलद क्रिया’ म्हटले. प्राण्याचे श्वसन, धातूंचे गंजणे या क्रियाही ज्वलनाच्याच असल्याचे स्पष्ट करून लवायजरने त्याला ‘मंद क्रिया’ म्हटले. या संशोधनाने पूर्वीच्या ‘फ्लॉजीस्टॉन’ या सिद्धांताला मूठमाती मिळाली. या वायूला ‘ऑक्सिजन’ हे नावही लवायजरनेच दिले. गंधक, फॉस्फरस इत्यादी पदार्थांचा प्राणवायूशी संयोग होऊन ते पाण्यात टाकल्यास त्यापासून अम्ल तयार होतात. म्हणून ‘अम्लजनक’ या अर्थी ‘ऑक्सिजन’ हे नाव त्याने या वायूला दिले. अर्थात काही धातूंच्या भस्मापासून अल्कली ही तयार होत असल्याने हे नाव तितके सार्थ नाही.



लवायजरने रसायनशास्त्राला दिलेली दुसरी महत्त्वाची देणगी म्हणजे तराजू. निरनिराळ्या पदार्थांची योग्य वजने त्याने मिळवली आणि त्यांवरून पदार्थांच्या ‘अविनाशित्वाचा नियम’ सांगितला. १८ व्या शतकाच्या शेवटी वस्तू कोणती याबरोबरच ती किती आहे या माहितीची गरज निर्माण झाली. विशिष्ट टेकू व दोन बाजूंस दोन तागड्या असलेला तराजू आणि अविनाशित्वाचा नियम यांमुळे वस्तू किती आहे हे सांगता येऊ लागले. या नियमासंबंधी लवायजर लिहितो, ” कोणत्याही क्रियेत नवीन काही निर्माण होत नाही. क्रियेपूर्वी व नंतर पदार्थांचे एकूण वजन समानच असते. ” या शोधाचे महत्त्व आजही टिकून आहे.

मूलद्रव्याची आधुनिक कल्पना त्याने पूर्ण केली. यापूर्वी पाणी, हवा, अग्नि आणि जमीन ही चार मूलद्रव्ये मानीत. किमयाशास्त्रात गंधक, पारा व मीठ ही तीन मूलद्रव्ये मानीत असत. लवायजरने मूलद्रव्यांचे चार गट केले.
(१) न दिसणारे – उष्णता, प्रकाश आणि ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन हे वायू
(२) प्राणवायूशी संयोग झाल्याने ज्यापासून अम्ल मिळते असे पदार्थ – उदा. कार्बन, गंधक, फॉस्फरस.
(३) प्राणवायूशी संयोग पावून ऑक्साइड तयार करणारे धातू – उदा. चांदी, तांबे, लोखंड, सोने इत्यादी.
(४) खनिज द्रव्ये – उदा. चुनखडी, वाळू, अल्युमिना इत्यादी.

यांपैकी १ ते ४  पैकी  काही मूलद्रव्ये नाहीत. परंतु सध्या ज्ञात असलेल्या १०३ मूलद्रव्यांतील २३ मूलद्रव्ये त्याने सांगितली. इ. स. १७८७ मध्ये लवायजरने डी मोरव्हा आणि बॅर्थालेट या शास्त्रज्ञांच्या मदतीने एक प्रबंध प्रसिद्ध करून पदार्थांना नावे देण्याची रासायनिक पद्धत निश्चित केली. तोपर्यंत किमयाशास्त्रातील चमत्कारिक व अनिश्चित नावे चालू होती. वेगवेगळ्या वायूंनाही त्यांनी निश्चित नावे दिली. १७९७ साली लवायजरने प्रसिद्ध केलेल्या प्रबंधाला ‘रासायनिक तत्त्वांवरील पहिला महान प्रबंध’ म्हणतात.

याशिवायही त्याने अनेक लहानलहान प्रयोग केले. हेलमॉन्ट या शास्त्रज्ञाने १७ व्या शतकांत सर्व वस्तू पाण्यापासूनच मिळतात असे विधान केले होते. परंतु सतत १२ दिवस पाणी तापवून ‘पाण्यापासून माती व इतर पदार्थ तयार होतात’ हे विधान चुकीचे असल्याचे लवायजरने दाखवून दिले. ऑक्सिजन व हैड्रोजन एकत्र करून त्याने पाणी मिळवले. हिरा जाळून त्यापासून कार्बन डाय ऑक्साइड मिळवून त्याने हिरा हा मूलतः कार्बनच असल्याचे सिद्ध केले. त्याने स्वतःची समृद्ध प्रयोगशाळा स्थापन करून त्यांत अनेक प्रयोग केले.

या महान शास्त्रज्ञाचा शेवट मात्र अत्यंत दुःखद रीतीने झाला. एक प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून त्याने राजाच्या काळात बंदुकीची दारू करण्यात भाग घेतला होता. तसेच खाजगी रीतीने कर जमा करणा-या एका सरदाराकडे तो नोकरीला होता. त्यामुळे इ. स. १७९२ साली फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाल्यावर जहाल क्रांतीवाद्यांना तो शत्रू वाटू लागला. त्याला पकडून जनतेच्या न्यायासनासमोर खेचण्यात आले. लवायजरला देहांताची शिक्षा देताना न्यायालयाचा उपाध्यक्ष जीन बाप्टिस्ट कॉफिनहॉल याने ‘नवीन लोकशाहीला शास्त्रज्ञांची गरज नाही,’ असे उदगार काढले ! नोव्हेंबर १७९२ मध्ये अटक होऊन नंतर त्याच्यावर खटला भरण्यात आला आणि इतर २७ जणांबरोबर लवायजरला ८ मे १७९२ रोजी गिलोटिनखाली देण्यात आले. एका क्षणात त्याचे शीर धडावेगळे झाले. यासंबंधी बोलताना गणितज्ञ लॅन्ग्रेज म्हणतो, “त्याचे डोके धडावेगळे होण्यास फक्त एक क्षण लागला परंतु असा विद्वान परत मिळण्यास कदाचित शतकानुशतके लागतील. ”

वि. अ. जोशी

[ ‘सृष्टिज्ञान‘ फेब्रुवारी १९६९ वरून साभार ]

[ चित्रे  ‘सृष्टिज्ञान’वरून साभार ]
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
शब्द – शब्द – शब्द

डॉ. उमेश करंबेळकर 

६४.
लुंगं गेलं, ताट राहिलं

द.मा.मिरासदारांच्या ‘सोळा आण्याचे वतनदार’ ह्या कथेत “लुंगं गेलं, ताट राहिलं,” अशी म्हण वाचनात आली. कथेत गावचा पाटील, डोक्यात राख घातलेल्या गावच्या इनामदाराची समजूत काढताना ती वापरतो.
या म्हणीचा नेमका अर्थ लक्षात आला नाही पण ग्रामीण भाषेशी निगडित असणार एवढं जाणवलं. ग्रामीण भाषेत अशा म्हणी हरघडी वापरल्या जातात. खास करून वयोवृद्ध गावकऱ्यांच्या पारावरल्या गप्पांत तर हमखास ऐकायला मिळतात.

वा. गो. आपट्यांच्या ‘मराठी भाषेचे संप्रदाय आणि म्हणी’ ह्या कोशात ही म्हण आढळली  नाही. मराठी शब्दकोशात लुंगा याचा बाजरी,ज्वारीचे छोटे कणीस तर ताट याचा जोंधळा, बाजरी, बोरू इ. चे कांड असे अर्थ आढळले. ‘ताट’चा अर्थ माहित होता

कारण, ” रानात जोंधळ्याच्या ताटानं जखम झाली” असं सांगणारे अनेक पेशंट सोनगावच्या दवाखान्यात येतात.
जोंधळ्याची कापणी झाल्यावर ह्या ताटांचे बुडखे वाळून कडक होतात. वावरात हिंडताना लक्ष नसेल तर ह्या बुडख्यांना अडखळून माणूस हमखास पडतो आणि मोठी जखम होते. पायात शूज असले तरी कित्येकदा ते फाटतात आणि त्यातून हे बुडखे आत शिरतात.

ताट हा तसा निरुपयोगी घटक. कणसं महत्त्वाची. त्यामुळे कणसं चोरीला गेली आणि ताटं मागे राहिली तर त्याला काय अर्थ ? समृध्दी, भरभराटीचे दिवस गेले आणि त्याच्या खुणा मागे राहिल्या असा ह्या म्हणीचा अर्थ.
पूर्वीच्या काळी गावात इनामदाराला मान होता. इनामदार म्हणजे गावचं वैभव. गावाला इनामदार नसेल तर गावाला काय शोभा येणार. इतर लोक म्हणजे बिनमहत्त्वाची ताटं. या अर्थाने गावचा पाटील इनामदाराची समजूत काढताना, गावच्या दृष्टीनं

इनामदाराचं महत्त्व ठसवताना ,” तुम्ही नसला तर लुंगं गेलं ताट राहिलं असं होईल,” असं म्हणतो.
पूर्वी ग्रामीण भाषेत ही म्हण वापरात असली तरी वा. गो. आपट्यांच्या ‘मराठी संप्रदाय आणि म्हणी’ या कोशात मात्र ती आढळत नाही. पण ‘काप गेले भोके राहिली’ ही तशाच अर्थाची पण नागरी भाषेतील म्हण आढळते. काप हा महिलांचा कानात घातला.

जाणारा एक दागिना. काप गेले म्हणजे समृध्दी गेली आणि कानाची भोके राहिली म्हणजे गत वैभवाच्या खुणा मागे राहिल्या असा ह्या म्हणीचा अर्थ.

ग्रामीण भागातील अशा असंख्य म्हणींनी मराठी भाषा समृद्ध केली आहे. काळाच्या ओघात त्या विस्मृतीत जाण्यापूर्वी त्यांचे जतन आणि वापर करणं आवश्यक आहे.

– ©️ डॉ. उमेश करंबेळकर

umeshkarambelkar@yahoo.co.in

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

संस्कृतप्रेमींकरता नवीन नवीन पदार्थ
प्रा. मनोहर रा. राईलकर    
पदार्थ ८१
नलिकागतमपि कुटिलं न भवति सरलं शुनः पुच्छम्।
तद्वत् खलजनहृदयं बोधितमपि नैव याति माधुर्यम्।।
कुत्र्याचं शेपूट कितीही काळ नळीत घालून ठेवलं तरी ते कधी सरळ होईल का? तद्वतच कितीही उपदेश केला तर दुष्ट माणसाच्या हृदयात माधुर्य जागृत होईल काय, असं कवि आपल्याला विचारीत आहे.
– ©️ प्रा. मनोहर रा. राईलकर 
railkar.m@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
सणवार आणि ‘देव’घर…

आठवणीतील सण [२]

माधवी सटवे  

माझं माहेरचं आडनाव ‘देव’…आणि म्हणून हे शीर्षक बरं का!!…
तर देवांच्या खूप जुन्या पिढ्यांबद्दल नाही सांगत बसत..पण माझे पणजोबा आणि चुलत पणजोबा त्यांचे आई वडील व इतर असं एकत्र कुटुंब त्यावेळेस पुण्यात सहा बुधवारात राहायचे. देवांचा वाडा होता..ह्याच नावाने ओळखला जायचा..त्या काळानुसार एखाद्याच्या आजोळची, कुणा एखाद्या लेकीच्या सासरचीही काही लहान थोर मंडळी काही ना काही कारणास्तव एकत्र कुटुंबासारखीच वाढली..त्यामुळे सगळीच एकमेकांशी सख्खी असल्यासारखीच त्यांच्यात आत्मीयता होती…मी लहान असताना कोणी विचारले तर सांगता यायचं नाही आणि कोणी सांगितलं तरी फारसं डोक्यात शिरायचं नाही नातं… सगळे फक्त आत्या काका दादा ताई!!..
माझे आजोबा आणि त्यांची भावंडे नोकरी व्यवसायानिमित्त…थोडी विखुरली…आजोबा आणि त्यांचे सख्खे ३ भाऊ मुंबईत..शिवाय चुलत भाऊ बहिणीही.व पुढे आजोबांकडे देवांचा परंपरागत चालत आलेला अश्विन पक्षातील नवरात्रोत्सव आला शिवाय माझ्या बाबांनी त्यांच्या लहानपणी हौसेने बसवलेला गणपतीही कायम राहिला! (पुण्याच्या मोठ्या घरी परंपरागत गणपती उत्सव राहिला.) मुंबईतील नातेवाईकांच्यासाठी आता पुणे-सहा बुधवारचा पत्ता जाऊन आजोबांच्या परळच्या मोठ्या प्रशस्त घराचा पत्ता आला…सगळे मोठे सणवार इथे पुण्याच्याच पेशवाई इतमामाने साजरे होत !!

आज सकाळी मोगऱ्याच्या दरवळानी ह्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या !!..
दसरा गणपती नवरात्र सगळं सगळं आठवलं…
आजोबांचं रेशमी सोवळं, आजीचं सोवळ्यातल्या स्वयंपाकाचं लुगडं… दादारहून फुलमार्केटमधून आणलेली फुलंच फुलं…सणाच्या दिवशीची घरातल्या बायकांची पहाटेपासूनची लगबग…आई तर अशा वेळेस mr india चं घड्याळ घालत असे की काय अशी मला शंका येते करण ती कामात आकंठ बुडालेली असे एखाद्या जागेवर आत्ता तर होती गेली कुठे असं व्हायचं मला…त्यावेळी तिथे पाणी टंचाई फार होती..त्यामुळे पाणी भरायचं काम काही सुटायचं नाही…इतका पै पाव्हणा असतानाही कुणाच्या चेहऱ्यावर पाण्यामुळे आठी उमटली नाही की नाराजीचा सूर लागला नाही!..
माझे आजोबा खास शौकीन होते !!…
सणाच्या दिवशी श्रीखंड त्यांच्याच हातचं असे..
तो एक साग्रसंगीत सोहोळाच असे…आजोबा शुचिर्भूत होऊन पूजाअर्चा आटोपून भल्या मोठ्या पातेल्याला स्वच्छ धुतलेला पंचा बांधीत..आधीच बांधून ठेवलेला घट्ट चक्का घेऊन थोडा थोडा पंचावर घालून फेटत असत…बराच वेळ हे काम तल्लीन होऊन करत बसत…मग त्यात साखर जायफळ वेलची केशर पडून त्याचं वस्त्रगाळ मऊ सूत divine अशा श्रीखंडात रूपांतर झालं… की भारी खुश होत स्वतः वरच…मग गुणगुणत ते पुढच्या कामाला लागत…
त्यांच्या खोलीत त्यांचं एक मोठ्ठं study table होतं.. त्यावर त्यादिवशी पुस्तकं, वह्या, पत्रं, लिखाण साहित्य बाजूला सारून जागा केलेली असे.
त्यांचा एक खास पानाचा लाकडी नक्षीदार डबा असे.आदल्या दिवशीच त्यांनी बाजारातून विड्याची कोवळी पानं आणि इतर लागणारं साहित्य आणलेलं असे. ही सगळी पानं धुऊन पुसून त्या प्रत्येक पानाला उलट करून त्याच्या शिरा(पान कितीही कोवळं असलं तरी) सुरीने हलक्या हाताने काढत… निगुतीने पुनः त्याच तल्लीनतेने पानांवर विड्याचं साहित्य भरत आणि अतिशय नाजूक हातानी विडा बंद करून एक नाजूकशी लवंग त्याला टोचत. विड्यात चुना आणि सुपारीचे मोठे तुकडे कधीच नसत..स्वतः त्यांच्या अडकीत्यानी कातरलेली पत्री सुपारी थोडीशी, गुलकंद आणि इतर काही असं. मी पान कधीच खाल्लं नाही पण ते विडा करताना पाहणं एक अनुभूती होती! (बरं हे सगळं हौसेने फक्त सणावाराला एरवी सुपारीचे खांड ही खायचे नाहीत घरात कोणी. )

हे काम चालू असताना सगळ्या खोल्यातून गप्पांचे हसण्याचे आवाज येत असत…मी आजीच्या गर्भरेशमी साडीचा शरारा घालून त्याच्या घेराचे फलकारे उडवीत घरभर फिरून प्रत्येक खोलीतली ऊर्जा मनात साठवत असे..
जेवणाच्या वेळीही खास पंक्ती झडत!! उदबत्तीचा सुवास, रांगोळ्या…आग्रहही होई, हास्याचे मजलेही चढत…इतके की शेजारच्या बिल्डिंगमधले आमचे खास शेजारी त्यांच्या खिडकीतून आवाज देत!!…”सातवा मजला चढला बरं का!”
जेवणानंतर भल्या मोठ्या सतरंज्या हंथरून सगळ्या खोल्या सुस्तावत.. कोणी पडून गप्पांचा फड रंगवत ,कोणी छोटीशी वामकुक्षी काढत!!…एव्हाना दुपारचे ३.३०-४ होत आणि बेल वाजे…संध्याकाळच्या पाहुण्यांची सुरवात झालेली असे..पुन्हा बायकांच्या खोल्यात लगबग सुरू होई साड्या बदला फ्रेश व्हा नव्याने सजा-दाग-दागिने फारसे नसतच पण उत्साह आनंदच त्याची जागा घ्यायचे !!..घरातल्या मोठ्या बायका कशा कधी तयार होत कोण जाणे त्या तर संध्याकाळीही ओट्याशी चहापान आणि पाहुण्यांच्या सरबराईत गुंग असत!!आम्ही लहान मुलं मात्र छान तयार होऊन मिरवायला सज्ज होत असू!!..
असं देवांचं घर कायम पाहुण्यांनी भरलेलं, गप्पांनी,हसण्याने दुमदुमलेलंच आठवतं!!

आठवणींचा दरवळ आज मोगऱ्याप्रमाणेच मनात दरवळला ,’देव’घर आठवलं आणि जुन्या आठवणी share केल्या तुमच्याशी!!

– ©️ माधवी सटवे   

madhavisatwe@gmail.com
98920 26669
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
चित्रकारांचे दालन
–  ©️ आदित्य मिलिंद महाबळ, सांगली
7972976669,
आर्किटेक्ट व इंटेरियर डिझाईनर
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
– ईशान पियुष करकरे, डेट्रॉईट, अमेरिका
सौ. स्वाती वर्तक यांच्या बंधूंकडे गणपती बसवलेत तर …ईशान करकरे या बालचित्रकाराने अशी कल्पना केली …उंदीरमामा सारथी आहेत ..ते बाप्पाला आणताहेत
प्रेषक ©️ सौ. स्वाती वर्तक  
 swati.k.vartak@gmail.com
@@@@@@@@@@@@
महत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@@ 

मृत्युंजयाच्या सावलीत

वाडवडिलांची पुस्तके [ ९ ]

मुकुंद नवरे 

( उत्तरार्ध )

 

                                         भाऊसाहेब माडखोलकर आणि शांताबाई माडखोलकर

” आपली आई शांताबाई  हिचे वैशिष्ट्य आणि सामर्थ्य जर एका शब्दात वर्णन करायचे झाले तर ते ‘ मनोनिग्रह ‘ या शब्दाने मी करीन ” असे या पुस्तकाच्या संपादिका मीनाक्षी फडणीस म्हणतात. भाऊराव माडखोलकर शांताबाईंचे वर्णन नेहमी माझ्या साहित्याची पहिली वाचक आणि टीकाकार म्हणून करत असत. परंतु उत्तम कादंबरीकाराचे गुण भाऊरावांमध्ये आहेत हे लग्नानंतर प्रथम तिनेच हेरले आणि भाऊराव विलक्षण मनस्वी असल्याने त्या मनस्वितेला अंकुश लावून मोठ्या खुबीने तिने त्यांना एका मर्यादेपलिकडे जाऊ दिले नाही. लग्न होईपर्यंत भाऊरावांची ख्याती महाराष्ट्रात फक्त टीकाकार म्हणूनच होती, पुस्तकांच्या बंदिस्त जगात स्वत:ला कोंडून घेणाऱ्या या बैठ्या टीकाकाराला तिने स्वत:च्या थोरल्या कुटुंबात आणले आणि नंतर समाजाच्या व्यापक संसारात आणून त्यास कादंबरीकार केले. त्यांना तिने कथानके पुरवली आणि त्यांच्या अस्मितेला धक्का न पोचवता त्यांच्या साहित्याला इष्ट वळण दिले. पतीच्या साहित्यजीवनात अशा प्रकारची कामगिरी त्या काळात दुसऱ्या कोणत्याही विदुषीने केली असेल असे वाटत नाही असे मत मीनाक्षीने नोंदवले आहे.

भाऊराव आणि बाई
पुस्तकातील हा तिसरा लेख माधव कृ. पारधी यांचा आहे. पारधी हे सावनेरचे. १९४१ च्या एप्रिलमध्ये कॉलेज सुरू होईपर्यंत दोन महिने कुठे तरी काम मिळवण्याची गरज होती आणि सावनेरला शिकवण्याही मिळणे अवघड होते. तेव्हा आधीची थोडी ओळख काढून आपल्याला काही मिळेल काय एवढेच विचारण्यासाठी ते भाऊरावांकडे गेले आणि त्यांनी स्वत:च चिटणीस म्हणून पारधींना ठेवून घेतले. पगार ठरला नव्हता, पण लॉजमधील जेवणाचा खर्च भाऊराव देणार होते आणि राहण्याची सोय हरिजन वस्तीतील आंबेडकर वाचनालयात पारधींनी स्वत:च केली होती.

भाऊरावांची कामेही फुटकळ म्हणजे व्हिक्टर ह्यूगोच्या कादंबरीची ” मी येईपर्यंत इतकी पाने वाचून ठेव ” असली असत. पारधींनी  ‘नवे संसार’ कादंबरीची मुद्रणप्रतही तयार करून दिली. त्याच वेळी भाऊरावांकडील दोन तपांचा पत्रव्यवहार आणि मराठी आणि इंग्रजीतील नामांकित पुस्तकांच्या संग्रहाने त्यांना आकर्षित केले. या विषयांवर भाऊरावांशी चर्चा होई तरी बाईंच्या मनाचे कपाट त्यांना बंदच वाटत होते.

आणि एक दिवस भाऊरावांनी पारधींना घरी राहायला बोलावले. त्यांच्या या अनपेक्षित देणगीवजा मागणीने ते गोंधळून गेले, आपल्यातील अनियमितपणा, टापटीप आणि शिष्टाचारांचा अभाव याची त्यांना जाणीव झाली. तेव्हा भाऊराव म्हणाले, ” तुला आमच्या घरात परकं वाटण्याचं कारण नाही, घरात कोणीही तुला परका मानत नाहीत, आणि तू पाहतोसच, आमचं घर ही एक धर्मशाळा आहे.” पारधींनी कां कूं करून पाहिले, पण उपयोग झाला नाही आणि त्यांनी त्या धर्मशाळेत आपली पथारी पसरली.
भाऊरावांचे वरील विधान बाईंच्या तोंडीही बसले होते, असे पारधी म्हणतात. कारण भाऊरावांच्या सर्वच वृत्ती समाजोन्मुख असल्याने त्यांच्या घराची धर्मशाळा सहज झाली असती. पण या घराचा घरपणा जाऊ न देता, कुटुंबाहून मोठे जीवन जगण्याची, संसाराच्या बाहेरचे जग संसारात सामावून घेण्याचा वृत्ती बाईंच्या ठायी होती. चंद्रशेखरसारखा स्वतंत्र वृत्तीचा मुलगा, भाऊरावांसारखा एककल्ली व्यवहारविन्मुख नवरा आणि दादांसारखा सनातनी पिता अशा तीन पिढ्या, त्यांच्या तीन राहण्या आणि तीन तऱ्हेचे स्वभाव बाईंनी सांभाळले होते.

त्यावेळी दोनच महिने भाऊरावांकडे राहून नंतर पारधी कॉलेजच्या वसतिगृहावर रहायला गेले पण त्यांचा जीव त्या घरात अडकला. दिवाळीच्या सुट्टीत ते तिथे गेले आणि एकदा तर आजारी पडल्यावर तेथेच गेले तेव्हा बाईंनी औषध, चिराईताचा काढा आणि आमसुलाचे सार नियमित वेळी दिले. पुढे १९४३ मध्ये पारधी मुंबईला स्थायिक झाले तरी दर वर्षी नागपूरची वारी करू लागले. असेच एकदा ते गेले असता बाईंनी त्यांच्या काव्यगायनाचा कार्यक्रम ‘हिंदु मुलींच्या शाळे’त ठेवला, तेव्हा मुलींना परिचय करून त्या म्हणाल्या, ” पारधींची ओळख मी करून देणे म्हणजे माझ्याच मुलाची मी स्तुती करण्यासारखं आहे, पण मुलगा कर्तबगार निघाला, म्हणजे आईला अभिमान वाटतो आणि त्याचे कौतुक ती लोकांना सांगते…”  ही सुरूवात ऐकून बाई आपल्याला मुलगा मानतात आणि आपल्याला त्याची दादही नाही हे पारधींना कळले. असाच हृदयस्पर्शी प्रसंग भाऊरावांच्या बाबतीत आला. १९४३ च्या फेब्रुवारीत भाऊरावांना उस्मानिया विद्यापीठाच्या वार्षिकोत्सवाचे निमंत्रण आले आणि त्यांनी पारधींना सोबत घेऊन आधी पुणे आणि नंतर बसने शिखरसिंघणापूर, पंढरपूर मार्गे हैद्राबादचा प्रवास केला. शिखरसिंघणापूरला दर्शन घेऊन आणि मुक्काम करून ते निघणार तेव्हा मंदिराच्या उपाध्यायांनी यात्रेकरूंच्या नोंदवहीत नावगाव लिहिण्याची विनंती केली. भाऊरावांनी स्वत:ची नोंद करून ती वही पारधींना दिली तेव्हा ते काहीसे गोंधळले. पण ते काही लिहीत नाहीत हे पाहिल्यावर भाऊरावांनी  तीत ” माधव गजानन माडखोलकर ” असे नाव चटकन लिहिले आणि ते पाहून आपण विस्मित झालो असे पारधी म्हणतात. एकदा अंतेवासी म्हणून स्वीकारल्यावर त्या व्यक्तीशी पुत्रवत कसे वागावे याबाबत भाऊराव आणि बाई यांच्या विचारात किती एकवाक्यता होती हे यावरून दिसते.

त्यांच्या घरात रोज हास्यविनोद चालत. त्या घरात संघर्षाविना स्वातंत्र्य होते, निर्बंधाविना सुसूत्रता होती, ममतेविना स्नेहभाव होता आणि विरक्तीविना समता होती, असे पारधी म्हणतात. भाऊरावांचे सामर्थ्य लेखणीतून आणि सार्वजनिक कार्यातून व्यक्त होत असे पण बाईंच्या सामर्थ्याला अभिव्यक्तीची धडपड नव्हती, तर ते आपोआप प्रकट होत असे. त्या कुटंबाशी आलेल्या आणि पुढे वर्षानुवर्षे टिकलेल्या संबंधांवरून पारधींनी ही स्वभाववैशिष्ट्ये नोंदवली आहेत. १९४८ साली त्यांच्या घराचा विध्वंस झाला तेव्हा तिसऱ्या दिवशी पारधी नागपूरला आले. ते म्हणतात की, त्या प्रसंगाने भाऊराव खचले नव्हते, खवळले नव्हते तसेच वीस वर्षे जमवलेली जिंदगी बेचिराख होऊनही बाईंचा आत्मा तटस्थ आणि खंबीर होता. इतकेच नव्हे तर त्यांच्या वृत्तीत विलक्षण सहनशीलता आणि प्रसन्नता आली आणि पुढे ती कॅन्सरच्या आजारातही कसाला लागली. त्या मुंबईला उपचाराला जेव्हा येत गेल्या तेव्हा पारधींना सोबत घेऊन त्या समुद्रकिनारी गेल्या. या आजारातही त्या शेवटपर्यंत प्रसन्न राहिल्या. घरात पुरेसा उजेड असतो पण तो प्रकाश आहे हे आपल्याला जाणवत नाही तसे बाईंचे अस्तित्व संसारात अव्यक्तपणे भरलेले होते असे पारधी म्हणतात. ( जुलै, १९५१ )

अशा होत्या शांताबाई
पुस्तकातील या भागात तेरा लहान मोठे लेख आहेत. वसंत कर्णिक (मुंबई) लिहितात की कर्णिकांच्या कुटुंबात शांताबाई अशा समरस झाल्या की आम्ही त्यांना कुटुंबातील एक म्हणून पाहत होतो. कर्णिकांचे वडील कडक शिस्तीचे असूनही शांताबाईंमुळे त्यांच्या शिस्तीला मुरड पडली. १९२८ मध्ये वसंतरावांचे लग्न झाल्यावर त्यांची पत्नी विमला आणि शांताबाईंचा दाट स्नेह जुळला तो इतका की, त्यांच्या तास न् तास गुजगोष्टी चालत असत. वास्तविक कर्णिकांसारख्या मांसाहारी कुटुंबात शांताबाई येऊन राहतात याचेच अनेकांना आश्चर्य वाटत असे पण हे जातिविषयक विचार शांताबाईंच्या मनाला कधी शिवलेही नाहीत. वसंतराव नागपूरला गेल्यावर भाऊरावांकडे उतरत असत आणि एकदा ते विमलाबाईंसह नागपूरला गेले असता शांताबाईंनी माहेरला आलेल्या बहिणीप्रमाणे तिचे स्वागत केले असे ते म्हणतात. टाटा हॉस्पिटलमधील शस्त्रक्रियेनंतर शांताबाईंनी  दोन तीन आठवडे राहण्यासाठी कर्णिकांचे घर पसंत केले आणि त्यांनीही आपल्या परीने नीट व्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न केला. तेथून विमलाबाई त्यांना घेऊन हॉस्पिटलला जात असत. पुढे सर्व उपाय थकल्यावर शांताबाई नागपूरला परत गेल्या तेव्हा दु:खी अंत:करणाने आपण त्यांचा स्टेशनवर निरोप घेतला पण पुढे काय होणार याची दोघांना कल्पना आली होती तरीही शांताबाई धीराने वागल्या, असे कर्णिक म्हणतात.

र.भ. कर्णिक (पुणे) लिहितात की ‘आनंदी गेह’ हे त्यांचे घर म्हणजे शांताबाईंचे पश्चिम महाराष्ट्रातील माहेरघर होते आणि ती आत्मीयता शेवटपर्यंत राहिली. शांताबाई त्यांच्या घरी असल्यावर पाटपाणी- वाढणी वगैरे काम पण करत असत. त्यांच्याकडे चपात्या होत असल्याने एकदा शांताबाईंनी स्वयंपाकघर ताब्यात घेऊन सर्वांना फुलके करून वाढल्याची आठवण त्यांनी लिहिली आहे. शांताबाई आजारी असत त्याच प्रकारे र.भ. यांना क्षयाने पछाडले तेव्हा ‘ आपण झोन तिकिटे काढून स्वर्गाचा प्रवास बरोबर करायचा ‘ असा करारही त्या दोघांत झाला होता अशी मजेदार आठवण ते सांगतात. १९४९ च्या जूनमध्ये शांताबाईंचे कॅन्सरचे ऑपरेशन झाल्यावर ते भेटले तेव्हा बाईंनीच त्यांना त्या कराराची आठवण करून दिली. ‘ तुम्ही तो करार पाळणार ना ‘ असे त्यांनी विचारल्यावर शांताबाई ” बेलाशक ” म्हणाल्या अशी नोंद ते करतात. (७-९-१९५० )

द्वा.भ. कर्णिक (पणजी) लिहितात की शांताबाईंना भाऊरावांच्या तुलनेत दुय्यम स्थान प्राप्त झाले. तरीही माडखोलकरांची सावली म्हणून वावरताना त्या छायेचा फायदा त्यांनी इतरेजनांना देता येईल तेवढा द्यावा एवढीच महत्वाकांक्षा ठेवली. त्यांनी सुखाचे सोहळे पाहिले, निंदेची झळ सोसली, दुर्दैवाचा पुरेपूर अनुभव घेतला तरीही त्या निर्विकार राहिल्या आणि स्वत:चे स्वतंत्र असे जीवन त्यांनी आखले. भाऊरावांबद्दलचा भक्तिभाव हृदयात तेवत असताना आणि त्यांच्याबद्दलच्या चिंतेने हृदय जळत असतानाही शांताबाईंच्या मनाचा समतोल कधी ढळला नाही. ( मौज, ३०-८-१९५०)

वि.अ. गिजरे (इंदूर) लिहितात की शांताबाई या माडखोलकर-नवाथे कुटुंबातील दोन विश्वांना सांधणारा सोनेरी दुवा होत्या.
या संदर्भात त्यांनी १९२६ मधील खान-मालिनी या विवाहामुळे सबंध महाराष्ट्रात उठलेल्या वादळाचे उदाहरण दिले आहे. दादा नवाथे हे हिंदुत्वाचे कट्टर अभिमानी असल्याने या विवाहाची त्यांना भयंकर चीड आली होती तर भाऊरावांनी या विवाहाचे समर्थन करणारा लेख रूईकर यांच्या ‘स्वतंत्र भारत’ या साप्ताहिकात लिहिला होता! यामुळे नागपुरात भडका उडाल्यासारखा झाला आणि राजाराम वाचनालयात झालेल्या सभेत एका प्रसिद्ध वक्त्याने भाऊरावांना लिंचिंग (Lynching) करण्यात यावे असे उद्गार काढले. अशा त्या प्रसंगी एकीकडे आई वडील आणि दुसरीकडे पती यांना सांभाळण्यात शांताबाईंनी अप्रतिम चातुर्य दाखवले याचा गिजरे गौरवाने उल्लेख करतात. (११-१२-७३)

ग.र. दीक्षित (मुंबई) लिहितात की ते स्वातंत्र्यपूर्व काळात नागपूरला पोलीस अधिकारी म्हणून सी.आय.डी.च्या विशेष शाखेत काम करत असताना त्यांचा भाऊराव आणि शांताबाईंशी परिचय होऊन मैत्री वाढतच गेली. पुढे १९४३ च्या सुरूवातीला चिमूर-आष्टी येथे पोलीस अधिकाऱ्याच्या हत्त्येचे निमित्त होऊन स्थानिक रहिवाश्यांवर अनन्वित अत्याचार झाले आणि त्याबाबत प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी अनसूयाबाई काळे, रमाबाई तांबे, सुशीलाबाई कोठीवान वगैरे महिला मंडळ गेले. त्यांची  हकीकत लोकांना कळावी यासाठी ‘हिंदु मुलींच्या शाळे’त त्यांनी एका सभेचे आयोजन केले. पण तेव्हा अशा सभांना बंदी असल्याने ‘ ती होऊ देऊ नका, लाठीचार्ज करा, गोळीबाराचा उपयोग करावा लागल्यास सोबत मॅजिस्ट्रेट घेऊन जा ‘ असा हुकूम दीक्षितांना मिळाला. पण सदर महिलांचे समाजातील स्थान पाहता अशी घटना घडणे जास्त प्रक्षोभक झाले असते. म्हणून दीक्षित शांताबाईंकडे गेले तेव्हा त्यांनी सल्ला दिला की त्या महिलांची पूर्वघोषित सभा रद्द करून दुसरी सभा त्याच आठवड्यात हळदीकुंकवाचे निमित्त जाहीर करून भरवावी आणि पूर्वीचाच उद्देश सफल करण्यात अडचण नसावी. आणि तसेच होऊन ती सभाही झाली आणि अनुचित प्रकारही घडला नाही. शांताबाईंच्या या प्रसंगावधानाचा उल्लेख करताना दीक्षित म्हणतात की, या शहाणपणास धारिष्ट्याची जोड असल्याने अरूणा असफअली, त्यांच्या मदतीने, पोलिसांच्या हातांवर तुरी देत नागपुरातून निसटून गेल्या ! (९-१०-७३)

प्रो. वि.ह. कुळकर्णी (मुंबई) लिहितात की त्यांचे आणि भाऊरावांचे नाते मावस साडू असल्याने ते मित्र झाले असावेत असे अनेक स्नेही मंडळींना वाटते. परंतु तसे नसून ते दोघे विद्यार्थीदशेत सहाव्या सातव्या वर्गात ठाकुरद्वार-गिरगाव परिसरातील आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत शिकत होते तेव्हापासून स्नेही होते. पुढे ते बी.ए. झाल्यावर त्यांचे लग्न नागपूर मुक्कामी झाले तेव्हा निकटचे स्नेही म्हणून भाऊराव उपस्थित राहिले. त्यावेळी आपल्या होणाऱ्या पत्नीची (गंगूची) पाठराखीण म्हणून तिची ही मावसबहीण मीरा (शांताबाई) लग्नमंडपात वावरत होती. त्यावेळी तिच्या डोळ्यांवर भाऊराव भाळले आणि त्यांनी आपल्याला ” ही मुलगी कोण? ” हा प्रश्न केला आणि त्यातूनच यथाकाल शांताबाईंचा भाऊरावांशी विवाह झाला आणि ते दोघे मित्र एकमेकांचे साडू झाले. ते म्हणतात की, शांताबाईंचा वर्ण श्यामल पण अंगकांती मृदु आणि नितळ असल्याने विविध भावना त्यांच्या चेहऱ्यावर तात्काळ प्रतिबिंबित होत असत. भाऊराव नागपूरहून शांताबाईंसोबत मुंबईला येत तेव्हा दोघे त्यांच्याकडे उतरत असत. त्यावेळी घरी अनेक साहित्यिक मंडळी भेटायला येत असत पण पुरूषांच्या स्वैर संभाषणात बाई फारसा भाग घेत नसत. त्या स्वभावत: सौम्य, अंतर्मुख व अबोल होत्या. पण त्यांचे स्वत:चे बोलणे मोजके व मार्मिक असे. भाऊराव त्यांना ‘शांताबाई’ किंवा ‘बाईसाहेब’ म्हणूनच संबोधत असत. शांताबाई सावकाश पण डौलदार चालत आणि त्यांच्याकडे चोखंदळ सौंदर्यदृष्टी होती. अनेक संकटे, दु:खे बाईंनी पचवली पण सर्वात दुर्धर प्रसंग म्हणजे त्यांना झालेला कॅन्सर होय. त्या आठवणीने  मन अस्वस्थ होते, पण त्या असहाय परिस्थितीतही त्यांनी माडखोलकरांच्या ‘अनघा’ कादंबरीची प्रुफे तपासली आणि शेवटी त्या नागपूरला गेल्या तेव्हा बोरीबंदर येथे त्यांचे दर्शन घेताना त्यांच्या डोळ्यांत जीवनातील सारे दु:ख एकवटलेले दिसले अशी नोंद ते करतात. (१८-१२-७३)

यशवंत शास्त्री (नागपूर) लिहितात की शांताबाई मराठी साहित्यात जर कोणत्या एका कारणासाठी संस्मरणीय ठरतील तर ते म्हणजे त्यांनी भाऊरावांच्या जीवनावर आणि साहित्यावर केलेल्या विलक्षण परिणामामुळे. याची सुरूवात अशी झाली की खांडेकरांची ‘हृदयाची हाक’ ही कादंबरी वाचल्यावर ‘ खांडेकर जर टीकाकार असून कादंबरी लिहू शकतात तर ती तुम्हाला का लिहिता येऊ नये ? ‘ असा प्रश्न बाईंनी भाऊरावांना केला. पुढे या एकसारख्या टोचणीमुळे भाऊराव कादंबरी लिहू लागले आणि अडीच वर्षांनी ‘मुक्तात्मा’ कादंबरी लिहून झाली तेव्हा ते कादंबरीकार होणार याबद्दल शांताबाईंची खात्री झाली. नंतर भाऊरावांनी ज्या कादंबऱ्या लिहिल्या त्यातील सांसारिक संघर्षाचे प्रसंगही भाऊरावांनी शांताबाईंच्या जीवनातूनच घेतले आहेत हे ‘भंगलेले देऊळ ‘ पासून ‘अनघा’ पर्यंतच्या अनेक कादंबऱ्यांत दिसते. ‘नवे संसार’ , ‘प्रमद्वरा’, आणि ‘अनघा’ या कादंबऱ्यांच्या नायिका ही शांताबाईंची प्रतिबिंबे आहेत हे माडखोलकरांच्या मित्रमंडळीत सर्वश्रुत आहे असे शास्त्री म्हणतात. शांताबाईंच्या शेवटच्या आजारात साने गुरूजी टाटा हॉस्पिटलमधे त्यांना भेटायला जात असत अशी नोंद या लेखात आहे. ( लोकमान्य, २७-८-५०)

वि.स. ऊर्फ भाऊसाहेब खांडेकर लिहितात की १९२७ च्या पुण्याच्या मुक्कामात त्यांनी वसंतराव कर्णिकांच्या घरी गजाननराव माडखोलकर आणि शांताबाईंना प्रत्यक्ष पाहिले तेव्हा यशवंत, गिरीश वगैरेंच्या काव्यगायनाचा कार्यक्रम होता. त्यावेळी शांताबाई अबोल वाटल्या तरी त्यांची रसिकताही प्रतीत झाली. पुढे १९३१/३२ साली ते श्री.कृ. कोल्हटकरांना भेटण्यासाठी खामगाव आणि नागपूरला गेले तेव्हा माडखोलकरांकडे राहणे झाले. त्यावेळी शांताबाईंची आतिथ्यशीलता, मोजके पण मार्मिक बोलणे, अनेक विषयातील गती, स्पष्ट मत सांगण्याची प्रवृत्ती इ. स्वभावविशेष त्यांच्या मनावर ठसले. पुढे १९४६ साली बेळगावच्या साहित्य संमेलनानंतर संपूर्ण माडखोलकर कुटुंब कोल्हापूरला त्यांच्या घरी दोन तीन दिवस राहिले तेव्हा त्या मनमोकळ्या वाटल्या तरी पुढे ज्या व्याधीने त्यांचा अकाली अंत झाला त्याची पूर्वचिन्हे त्यांना जाणवत असावीत असे ते म्हणतात. प्रकृतीच्या या प्रतिकूलतेमुळेच त्यांच्या अनेक आकांक्षा कोळपून गेल्या असाव्यात, काही फुले आपला सुगंध पूर्णपणे प्रगट करण्याच्या आधीच सुकून जातात, तसे शांताबाईंच्या बाबतीत घडले. (२४-८-७३ )
याच प्रकारे मधुकर रामकृष्ण वैद्य, चित्तरंजन द.पंडित, मो.ज्ञा. शहाणे, प्रो. स.मा. गर्गे आणि मा.ल. बडकस या मंडळींनी आपल्या हृद्य आठवणी सांगितल्या आहेत पण विस्तारभयास्तव त्यांचा परामर्ष येथे घेणे शक्य नाही.

आप्त-मैत्रिणींच्या दृष्टीतून-‘
पुस्तकातील या भागात २१ जणींचे प्रत्येकी दोन तीन पृष्ठांचे लेख असून अनेक ठिकाणी त्यांच्या भावना उचंबळून आलेल्या दिसतात. वत्सलाबाई घाटे (नागपूर) लिहितात की, त्या आणि मीराताई (शांताबाई) वर्गभगिनी म्हणून हिंदु मुलींच्या शाळेत सातवीपर्यंत बरोबर होत्या. पुढे मीराताईंचे मामा देवीदास घाटे यांच्याशी लग्न झाल्यावर वत्सलाबाई त्यांच्या  मामी झाल्या. हे घाटे कुटुंब नवाथे यांच्या घरीच राहत होते. मीराताई आणि भाऊरावांचा विवाह झाल्यावर त्यांनी वेगळे बिऱ्हाड केले तरी दोन्ही कुटुंबे समोरासमोर राहत होती. पुढील काळात मीराताईंचे क्षेत्र खूपच वाढले तरीही त्यांनी दोन बिकट प्रसंगातून वत्सलाबाई आणि कुटुंबाला बाहेर काढले. एक म्हणजे घाटे कुटुंबात विलक्षण कौटुंबिक विवंचना निर्माण झाली आणि घरात तीन मुली आणि एक वर्षाचा मुलगा असताना वत्सलाबाईंना काम शोधणे भाग झाले तेव्हा प्राथमिक शिक्षिकेचा आवश्यक तो अभ्यासक्रम करण्यास मीराताईंनी सहाय्य केले आणि त्यामुळे १९३९ साली वत्सलाबाईंना हिंदु मुलींच्या शाळेत मासिक तीस रूपये पगाराची नोकरी मिळाली आणि केवळ या भरवशावरच वत्सलाबाई कौटुंबिक आपत्प्रसंगातून बाहेर पडू शकल्या यासाठी  मीराताईंचे उपकार त्यांच्यासाठी अविस्मरणीय होत.
दुसरी मदत म्हणजे वत्सलाबाईंची मोठी मुलगी सुधा अठरा वर्षांची झाली तेव्हा वरसंशोधन करणेही कठीण होते पण तिचे लग्न मीराताईंनी त्यांचे साताऱ्याचे आतेभाऊ लक्ष्मणराव  नवरे यांच्याशी स्वत: पुढाकार घेऊन लावून दिले आणि लग्नानंतरच्या फक्त एका जेवणाच्या खर्चात ते लग्न पार पडले. वत्सलाबाईंचे ते दिवस पालटले आणि सुधाच्या कुटुंबाचाही उत्कर्ष झाला पण हे पहायला मीराताई नाहीत याचा विषाद त्या नोंदवतात.( १०-११-७३)

सुधा नवरे (माझी आई!) लिहिते की १९२६ मध्ये जन्म झाला तेव्हा घाटे-नवाथे-माडखोलकर या समोरासमोर राहणाऱ्या तीन कुटुंबात पहिलं लहान मूल तीच होती त्यामुळे सगळे तिला ‘बेटी’ म्हणू लागले. तेव्हा चंद्रशेखर आणि मीनाक्षीचा जन्मही झाला नव्हता. शांताबाई आणि भाऊरावांनी तिला आपलं पहिलं अपत्य मानलं आणि तिच्यावर अतिशय प्रेम केलं. १९४२ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केल्यावर ती रेशनिग ऑफिसमध्ये नोकरी करण्यासाठी ४० मिनिटे चालत जात असे याचं त्या दोघांना दु:ख झालं. १९४५ मध्ये तिचे लग्न शांताबाईने जुळवून दिल्यावर एका अर्थाने त्यांच्या लाडावलेल्या पोरीला त्यांनी स्वत:च्याच पदरात घेतलं.
१९४५ च्या मराठवाडा साहित्य संमेलनाला भाऊराव अध्यक्ष होते त्यावेळी शांताबाईसोबत ‘बेटी’ही गेली होती. लग्नानंतरचे सगळे कौतुकाचे सोहळे आईने केले तसेच शांताबाईंनी केले. त्या एकमेकीच्या आते-मामेबहिणी असल्या तरी शांताबाई आणि तिच्यात मायलेकीचे नाते कसे होते हे सांगताना तिने एक प्रसंग सांगितला आहे. शांताबाईंवर कॅन्सरची मोठी शस्त्रक्रिया झाल्यावर त्यांची नागपूरला गाठभेट झाली तेव्हा त्या दोघी माडीवरील हॉलमध्ये बसल्या असताना बाई म्हणाली, ” बेटी, तुला पहायचं आहे का माझं ऑपरेशन कसं झालं ते ? ” तो प्रश्न ऐकून आपल्याला काय बघायला मिळणार या कल्पनेने ‘बेटी’ भयभीत झाली. बाईनं तिला आपली डावी बाजू उघडी करून दाखवली आणि तो भाजून काळा पडलेला भाग आणि त्यावरील टाके पाहून ती हादरली… जिने आपल्यावर एवढं प्रेम केलं तिचं दु:ख कमी करण्यासाठी आपण काही करू शकत नाही याची असहाय्यता जाणवली अशी नोंद तिने केली आहे.

इंदिराबाई कुळकर्णी (मुंबई) यांनी मीनाक्षीला लिहिलेले पत्रच या पुस्तकात आहे. आपल्या या मावसबहिणीला त्या मीरा म्हणत असत. मीराचे माहेर नवाथे आणि इंदिराबाईंचे माहेर सातवळेकर ही दोन्ही कुटुंबे नागपुरातील चिटणवीसपुऱ्यात जवळच राहत असत. खेळासाठी त्यांच्या गाठीभेटी होत तसेच त्या हिंदु मुलींच्या शाळेत त्या दोघी एक वर्ष पुढे मागे होत्या. आधी इंदिराबाईंचे लग्न फाल्गुनात प्रो.वि.ह. कुळकर्णींशी झाले तर मागोमाग ज्येष्ठात मीरा-माडखोलकर विवाह झाला. मीराचे सर्वांशी वागणे प्रेमळपणाचे होते तसेच भाऊरावही आपल्याला माहेरच्या गंगू या नावाने हाक मारतात त्यात प्रेमळपणा वाटतो असे इंदिराबाई म्हणतात. दर वर्षी मे महिन्यात माडखोलकर कुटुंब मुंबईला त्यांच्याकडे येत असे तेव्हा जणू साहित्य संमेलनच भरत असे याची आठवण त्यांनी नोंदवली आहे. भाऊसाहेब खांडेकरांच्या उषाताई भर संसारातून गेल्या तसेच मीराला काळाने ओढून नेले, अशी गुणी माणसे उचलून ईश्वर नेतो तेव्हा त्याच्यावरचा विश्वास उडतो अशी तक्रार इंदिराबाई करतात. भाऊरावांच्या ‘अनघा’ कादंबरीची त्या आठवण सांगतात की, ही कादंबरी मीरावरच असून त्यात अनघेचा मृत्यू दाखवला आहे. याबाबत अनसूयाबाई काळे भाऊरावांना म्हणाल्या, ” भाऊराव, तुम्ही अनघेचा मृत्यू ‘अनघे’च्या समोर दाखवायला नको होता.” हे ऐकून मीरा म्हणाली, ” अहो जे होणार आहे ते त्यांनी माझ्यासमोर लिहिले, त्यात काय झाले ?” एवढी तिच्या मनाची जबरदस्त तयारी होती. मीराचे शेवटचा आजार आणि त्यात अकाली आलेले मरण यांच्या आठवणीने मन व्याकुळ होते असे इंदिराबाई म्हणतात. (१६ जून ७३)

इंदिराबाई माईणकर (मुंबई) या इंदिराबाई कुळकर्णी यांच्या लहान बहिणीने भावना व्यक्त करताना शांताबाई लहानपणी कशा खेळकर होत्या ते सांगितले आहे. त्याच वेळी आपल्या शेवटच्या भेटीत शांताबाईंनी दोन्ही हात जोडले तेव्हा बांगड्या कोपरांपर्यंत घसरल्याचे सांगून त्यांच्या अशक्त अवस्थेचे तरीही प्रसन्न मनाचे एका शब्दात वर्णन केले आहे.

वरील आप्तांनंतर शांताबाईंच्या १७ मैत्रिणींनी लिहिलेल्या आठवणी या पुस्तकात आहेत. हिराबाई भोंसुले, सुशीलाबाई मराठे, विमलाबाई ठाकूर, सुभगाबाई काशीकर, सुगंधा शेंडे, सुशीलाबाई शास्त्री, प्रभावती पटवर्धन, विद्यावती थेरगावकर, मंगलाबाई बखले, स्नेहलता भेंडे आणि शांताबाई कशाळकर यांनी आठवणी सांगताना शांताबाईंशी ओळख कशी झाली, पुढे स्नेह कसा वाढला याचे वर्णन केले आहे. अनसूया वाडेगावकर आणि प्रमिलाबाई दाणी यांनी शांताबाईंना घेऊन बसवलेल्या नाटकांबद्दल लिहिले आहे. इंदिराबाई पाटणकर (जळगाव) यांनी आठवणी लिहिताना शांताबाईंनी आपल्याजवळ ” मला मरणाची मला विशेष भीती वाटत नाही, मुले लहान आहेत पण माझ्यावाचून त्यांचे अडेल असे वाटत नाही; पण माडखोलकर यांनी लहानपणापासून अनेक मृत्यू पाहिले असूनही ते अगदी एकटे पडतील एवढेच दु:ख ” असे उद्गार काढल्याचे म्हटले आहे.

शांताबाई गाडेकर (दिल्ली) यांनी शांताबाईंची व आपली ओळख १९३३ पासूनची असल्याचे सांगताना त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये नोंदवली आहेत. त्या म्हणतात की, शांताबाईंनी नवे वळण राखताना जुन्याचा कधी अनादर केला नाही, हाती घेतलेले काम नेटाने करण्याचा त्यांचा स्वभाव होता आणि गबाळेपणा, वेंधळेपणा म्हणजे साधेपणा नव्हे असे त्यांचे ठाम मत होते. १९४९ मधे गाडेकर कुटुंब दिल्लीला असताना शांताबाईंचा मुक्काम त्यांच्याकडे झाला आणि तेथूनच त्यांचे जीवघेणे दुखणे सुरू झाले आणि त्यानंतर शांताबाईंनी अनेक पत्रांतून आपले मन त्यांच्याकडे मोकळे केले. ९ मार्च १९५० ला वाढदिवसाचे निमित्त साधून शांताबाईंनी पाठवले ते शेवटचे पत्र त्यांना मिळाले. पुढे १९५० च्या एप्रिलमधे शांताबाई मुंबईला दवाखान्यात होत्या तेव्हाही आजाराच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या शांताबाईंना त्या रोज भेटायला जात असत असे त्यांनी म्हटले आहे..( ८-१०-५०)

सौ. ताई पाळंदे (पुणे) लिहितात की त्यांची आणि शांताबाईंची ओळख ग्वाल्हेर प्रादेशिक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने १९४७ च्या नोव्हेंबर महिन्यात झाली. माडखोलकरांनी त्या संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारले होते आणि श्री. पाळंदे हे संमेलन आयोजित करणाऱ्या शारदोपासक मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांचे घर प्रशस्त असल्याने पाहुण्यांची सोय त्यांच्या घरी करण्यात आली आणि भाऊरावांसोबत शांताबाई त्यांच्या घरी उपस्थित झाल्या. त्या पहिल्या भेटीतच शांताबाईंच्या लोभस डोळ्यांनी ताईंना आकर्षित केले. परत जाताना  शांताबाईंनी प्रसन्न मुद्रेने ताईंचा हात हातात घेऊन ” ताई, तुम्ही माझी खरीच ताई व्हाल का ?” असा प्रश्न केला आणि ताईंनी चटकन् आनंदाने होकार दिला. यातून त्यांचे भगिनीप्रेम सुरू झाले आणि पत्रद्वारे टिकले. पुढे दोनच वर्षांत शांताबाईंचे दुखणे उद्भवले तेव्हा पाळंदे कुटुंब मुंबईत होते. १९५० च्या जानेवारीत शांताबाई कॅन्सरच्या आॅपरेशननंतर कर्णिक यांच्या घरी असताना पाळंदे पती-पत्नी त्यांना भेटले तेव्हा ‘ मला तुमच्याकडे यायचं आहे ‘ अशी इच्छा शांताबाईंनी व्यक्त केली. मग टॅक्सीने जाऊन त्यांनी फ्लॅट पाहिल्यावर शांताबाईंना तो खूप आवडला. ‘ मला इथं रहायला आवडेल ‘ असे शांताबाई बोलून गेल्यावर  ‘ तुमच्या ताईच्या घरी तुम्ही केव्हाही येऊ शकता ‘ असे ताई म्हणाल्या. त्याप्रमाणे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात दुखणे उलटलेल्या स्थितीत शांताबाई परतल्या, तेव्हा अडीच तीन महिने त्या ताईंच्या ‘उषाकिरण’ मधील फ्लटमधे राहिल्या. त्यांची अवघड व अपायकारक समजली जाणारी शुश्रुषाही ताईंनी केली. अनेक जण भेटायला येत असल्याने वेळ बरा जात असे तरीही शांताबाईंच्या वेदना वाढत गेल्या. खिडकीतून त्यांना समुद्रकिनारा दिसत असे आणि कधी नशिबाला दोष देताना त्यांना अश्रू अनावर होत असत. अशा अनेक आठवणी मनात येऊन हृदयातच विरून जातात असे ताई म्हणतात(१९-७-७३). हे वाचून ऋणानुबंध कसे असतात आणि कसे जुळतात हे वाचकाला सहज कळते.

डॉ. इंदुमती शेवडे (नागपूर) लिहितात की त्यांनी १९३८ साली शांताबाईंना सिवनी येथे भरलेल्या मध्य प्रदेश महिला परिषदेच्या अधिवेशनात पाहिले आणि त्यांचे भाषणही ऐकले. ‘भंगलेले देऊळ’ या नावाजलेल्या कादंबरीच्या लेखकाची पत्नी असूनही त्या निगर्वी वाटल्या. पुढे १९४८ साली नागपुरातील धंतोली भागात शेवडे आणि माडखोलकरांची घरे जवळ असल्याने स्नेह वाढला. भाऊरावांनी तर इंदुमती यांना धाकटी बहीणच मानले त्यामुळे भेटीगाठी होत असत. एके दिवशी संध्याकाळी त्या भाऊरावांकडे गेल्या असताना हस्तसामुद्रिकाचा कार्यक्रम झाला आणि त्यांनी दोघांचेही हात पाहिले. तेव्हा भाऊरावांची बुद्धीरेषा बळकट दिसली पण शांताबाईंच्या हातावरील आयुष्यरेषा आणि भाग्यरेषा मोडलेल्या दिसत होत्या. त्यांच्या मनाला चरका बसला. कारण शांताबाई अल्पायुषी दिसत होत्या ! त्यांनी दोन्ही हात पाहून खात्री केली पण संकेताप्रमाणे त्यावर त्या बोलल्या नाहीत.
पण थोड्याच दिवसात शांताबाई आजारी पडल्या, त्यांचे कर्करोगाचे ऑपरेशन झाले आणि खेळीमेळीचे, स्नेहपूर्णतेचे चार  दिवस संपले.
मुंबईहून आल्यावर पुन्हा एकदा हस्तसामुद्रिकाचा कार्यक्रम  झाला आणि भाऊरावांनीच शांताबाईचा हात पहायला सांगितले. त्यावेळी इंदुमती यांच्याकडे निरनिराळ्या रोगांच्या सूचक चिन्हांची चर्चा करणारे चीरोचे नवीन पुस्तकही आले होते आणि त्याप्रमाणे त्यांना माहिती ताडून पहायची होती. याही वेळी त्यांना हातावरील मंगळाच्या उंचवट्यावर जाळी पडताना दिसत होती. ‘म्हणजे हा घातक रोग ठाण मांडून बसला होता, शांताबाई पुन्हा उठून उभ्या राहणार नव्हत्या.’ हे पाहून पुढे काय झाले ते आपल्याला आठवत नाही… कदाचित चेहराच सारं काही सांगून गेला असेल असे त्यांना वाटते. त्यानंतर शांताबाई निवर्तल्या तेव्हा इंदुमती नागपुरात नव्हत्या. पण शांताबाईंना अधिक आयुष्य लाभले असते तर भाऊरावांचे जीवन कदाचित आणखीही विकसित झाले असते आणि शांताबाईंमुळे नागपूरच्या समाज-जीवनाला, स्त्रीकार्याला कदाचित वेगळी दिशा मिळाली असती असे त्या म्हणतात. (१०-७-७३)

                                  मीनाक्षी फडणीस यांचे प्रकाशचित्र असलेले पुस्तकाचे मलपृष्ठ



सुहृदांच्या अशा सर्व आठवणी वाचल्यानंतर शांताबाई आणि भाऊराव यांचे सहजीवन लोकोत्तर होते याबाबत शंका उरत नाही आणि ती जीवनकहाणी लिहिण्यासाठी शांताबाईंनी भाऊरावांकडून घेतलेले वचन किती सार्थ होते हेही कळून येते. बाईंना अवघे चाळीस वर्षांचे आयुष्य लाभले आणि त्यांच्या आठवणी सांगणाऱ्या या पुस्तकातील सर्व लेखकांची एकत्रित संख्याही चाळीसच भरते. आपल्या आईचा असा जीवनपट चाळीस जणांच्या लिखाणातून संपादित करण्याचे काम मीनाक्षी फडणीस करून गेल्या ( निधन, १०ऑगस्ट २००६ ) हे मला अभूतपूर्व वाटते, कदाचित अशा प्रकारचे हे एकमेव पुस्तक असावे.

– ©️  मुकुंद नवरे 

mnaware@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आजची कविता 

मुरारीभाऊ देशपांडे 
ये गणराया आनंदाने
कर वर्षाव सुखाचा
त्रासून गेली जनता देवा
घालव मास्क मुखाचा

जगणे होवो पुन्हा पूर्ववत
बाकी काय मागणे
नकोच त्या रोगाच्या भीतीने
रात्र रात्र जागणे

जीव वाचु दे झाडून सारे
चेहरे होवो हसरे
झाले तितके खूपच झाले
मनः शांती दे बस रे!

संकटातून तूच सांग रे
सहीसलामत वाट
पुढल्या वर्षी ढोल नि ताशे
पुन्हा तोच मग थाट!
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
– ©️  मुरारीभाऊ देशपांडे,
संगमनेर
9850415744

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

फोलकथा

( ज्या वाचून कुणावर कसलाही परिणाम होण्याची शक्यता नाही अशा कथा…  )

हर्षद सरपोतदार
४९.
लेखक-वाचक संबंध

जगातल्या कुठल्याही पुरुष लेखकाला एखाद्या स्त्री वाचकाचा फोन आला की त्याच्या मनात प्रथम तीन प्रश्न उभे राहतात.
एक, ती ‘वाचिका’ दिसायला कशी असेल ?
दोन, तरुण असेल की म्हातारी असेल ?
तीन, विवाहित असेल की घटस्फोटित वगैरे असेल ?
मीही याला अपवाद नव्हतो.
रेश्मा जुन्नरकर नामक स्त्रीचा फोन आला आणि माझा कथासंग्रह आवडल्याचं तिने सांगितलं तेव्हा हे तीन प्रश्न मलाही पडले.
पण हल्ली फेसबुकसारख्या संकेतस्थळांवर आपली उत्सुकता शमवून घेता येते.
मीही तशी ती शमवून घेतली.
ती साधारण पस्तिशीची होती.
विवाहित होती.
आणि दिसायला बरी होती.

मला अभिमान वाटला.
कारण सत्यघटनांवर आधारित असलेला माझा कथासंग्रह या सुस्वरूप स्त्रीला फारच आवडला होता.
नुसता आवडलाच नव्हता, तर त्यामुळे ती भारावून गेली होती.
(असं तीच म्हणाली होती.)
“प्रत्येक कथेवर मला तुमच्याशी तपशीलवार बोलायचंय.
वेळ मिळेल का ?
माझ्या घरी तुम्ही जेवायला येऊ शकाल का ?” असं तिने विचारलं होतं.
मी ‘हो’ म्हटलं होतं आणि शुक्रवारी सकाळची वेळ ठरवली होती.

ठरल्याप्रमाणे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता तिच्या घरी गेलो.
दार तिनेच उघडलं.
तिचा नवराही होता, पण तो ऑफिसात जायच्या गडबडीत होता.
माझ्यासह कॉफी पिण्यासाठी तो मुद्दाम थांबला होता.
“चांगल्या आहेत तुमच्या कथा.” कॉफी पिताना तो औपचारिकपणे म्हणाला.
पण साहित्यात त्याला एकंदरीत रस असावा असं काही मला वाटलं नाही.
“तुम्हाला फिल्टर कॉफी आवडते म्हणून मुद्दाम केली !” रेश्मा कौतुकाने म्हणाली.
वास्तविक मला कॉफी आवडत नाही. चहा आवडतो.
पण कुठल्याशा प्रथम पुरुषी एकवचनी कथेत मी सतत फिल्टर कॉफी पीत असल्याचं वर्णन आहे.
त्यामुळे रेश्माचा तसा गैरसमज झाला असावा.

कॉफी पिऊन झाल्यावर तिच्या नवऱ्याने माझा निरोप घेतला.
मग मी आणि रेश्मा हॉलमध्येच कथांवर चर्चा करत बसलो.
तिच्या हातात माझं पुस्तक होतं.
ते उघडून ती बोलत होती आणि प्रत्येक कथेचं रसग्रहण करत होती.
अधूनमधून प्रश्न विचारत होती.
‘ही घटना खरोखरच घडली आहे का ? तुम्ही ते लेखिकेचं पात्र कुणावरून घेतलंय ?’ अशांसारखे ते प्रश्न होते.
मी जमेल तशी उत्तरं देत होतो.
बोलत होती मात्र छान. त्यामुळे दिसतही छान होती.
मध्येच म्हणाली, “कथा वाचून माझ्या मनात तुमची वेगळी प्रतिमा निर्माण झाली होती !”
“म्हणजे कशी ?” मी विचारलं.
“तुम्ही बरेच गंभीर असाल, प्रौढ असाल, तुमचे केस पिकलेले असतील आणि तुम्हाला दाढी असेल असं वाटलं होतं.”
“असं का वाटलं तुम्हाला ?”
“तुमच्या या कथेत तुम्ही तुमचं जे वर्णन केलंय त्यावरून.”
मी मनातल्या मनात कपाळावर हात मारला.
पण उघडपणे म्हटलं, “रेश्माजी, ही कथा प्रथम पुरुषी एकवचनी शैलीत लिहिली आहे हे खरं आहे. पण ती कथा माझ्याबाबत घडलेली नाही !”
“ते आलं आता लक्षात.” ती म्हणाली.
पण तिच्या लक्षात फारसं आलं नसावं.
कारण दुसऱ्या एका कथेवर बोलताना मध्येच ती म्हणाली,
“सॉरी, एक विचारलं तर तुम्हाला राग नाही ना येणार ?”
“नाही. विचारा की !”
“या कथेत तुमची पत्नी तिच्या बॉसबरोबर कायमची राहायला जाते असं तुम्ही दाखवलंय. ही  तुमची स्वतःचीच तर ट्रॅजिडी नाही ना ?”
मी तातडीने ती माझ्या बाबतीत घडलेली घटना नसल्याचा खुलासा केला.
संशयाला जागा राहू नये म्हणून मोबाईलच्या गॅलरीतला बायको आणि मुलीचा फोटोही दाखवला.
“छान आहे तुमची फॅमिली.” ती म्हणाली.

अशा प्रकारच्या गप्पांमध्ये दोन-अडीच तास गेल्यावर आम्ही जेवायला बसलो.
किचन-कम-डायनिंग हॉल प्रशस्त होता आणि डायनिंग टेबलही सुंदर होतं.
पण पानात मशरूम सूप, पास्ता आणि पनीरचे पदार्थ पाहून मी वैतागलो.
कारण हे माझे नावडते पदार्थ असून त्यांना मी बोटसुद्धा लावत नाही.
तिला तसं स्पष्टपणे सांगितलं.
“अगंबाई ! खरंच का ?” डोळे विस्फारत तिने विचारलं.
“शंभर टक्के खरं !” मी ठासून म्हणालो.
“अहो पण तुमच्या त्या ‘अग्निमाया’ कथेत तुम्ही हे पदार्थ मला फार आवडतात असं लिहिलंय ना ? म्हणून तर मुद्दाम केले !”
“हं !” विषण्णपणे मी म्हणालो.
माझा संयम आता सुटला होता.
“तुमच्याकडे नायलॉनची दोरी आहे का ?” मी विचारलं.
“दोरी ? आहे की ! कशाला हो ?” ती म्हणाली.
“नाही, त्याच कथेत शेवटी मी पंख्याला टांगून घेऊन गळफास लावून घेतो हेही आहे, म्हणून !” मी उत्तरलो.
***

©️ हर्षद सरपोतदार 
hsarpotdar1@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
विनोबा विचार पोथी

हेमंत मोने
विचार क्र. [ ११ ] 

सुक्रातचे ( SOCRETES)  वचन आहे की पाप हे अज्ञान आहे. गीता म्हणते की अज्ञान हेही पापच आहे.

पाप हे अज्ञान आहे तर अज्ञान हे पाप आहे. शब्दांची जागा बदलल्यावर वाक्याचा आशयही बदलला. १९ सप्टेंबर १९५३ ची गोष्ट. विनोबा देवघर येथील वैद्यनाथ धामच्या महादेवाच्या दर्शनाला अनुयायांसह गेले होते. जेथे हरिजनांना प्रवेश नाही तेथे विनोबा दर्शनाला जात नाहीत. पण देवस्थानच्या पूजा-यांनी हरिजनासह, महिलांसह दर्शनाला येण्याची विनोबांना संमती दिली होती. प्रत्यक्षात घडले उलटच. पुजा-यांनी आपले वचन पाळले नाही. त्यांनी विनोबांवर  आणि त्यांच्या अनुयायांवर हल्ला केला. या माराने विनोबांचा डावा कान कायमचा अधु झाला. एका भगिनीचा गळा  दाबण्याचाही प्रयत्न झाला. पुजा-यांच्या (पंडे ) हातून पाप घडले. विनोबांसारख्या संत पुरुषाचा, त्यांच्या अनुयायांचा घोर विश्वासघात झाला. विनोबांची या घटनेवरची प्रतिक्रिया सामान्य माणसाला अपेक्षित नव्हती. विनोबा म्हणाले, हा भेदासुराचा अंतकालीन आक्रोश ठरेल. असा मला विश्वास आहे. या देवस्थानच्या पुजा-यांच्या या कृतीचा शासनाने आणि जनतेने तीव्र निषेध केला. या अधमांना शिक्षा झाली पाहिजे हीच एकमेव भावना होती. पण विनोबा म्हणाले की त्यांनी (पन्ड्यांनी ) अज्ञानाने तसे केले. त्यांना शिक्षा होऊ नये. दुस-याच्या पापाकडे अज्ञान म्हणून पहावे हेच विनोबांनी यातून आपणास शिकविले.

स्वत:च्या अज्ञानाकडे पाप म्हणून पहावे असे गीता सांगते. राग, द्वेष, लोभ, मोह, मद, मत्सर हे सर्व शत्रू आपल्याला नको त्या गोष्टी करायला लावतात. नीतिधर्माच्याविरुद्ध अनिच्छेने  वागायला शिकवतात. हे सर्व अज्ञान आहे. याला आसुरी संपत्ती असे गीतेने म्ह्टले आहे. सत्ता, संपत्ती आणि संस्कृती यांची हाव, यांचा आग्रह, यातून आसुरी संपत्तीचे प्रकटीकरण होते. मनुष्य स्वधर्म विसरतो. परधर्माचा अनादर करतो  अधर्माला जवळ करतो. गीता म्हणते, हीन मूढ दुराचारी माझा आश्रय सोडिती.| मायेने भ्रांत होऊनी आसुरी  भाव जोडिती.| त्यामुळे आत्मज्ञानापासूनच नव्हे तर मनुष्यत्वाच्या पासूनही आपण दूर जातो. नम्रता, दंभशून्यत्व इ. गुणांना जवळ करून ते आचरणात मुरवून आपल्यातील अज्ञानाचे पाप आपण धुवून काढूया हा गीतेचा संदेश आहे.

– ©️ हेमंत मोने.

hvmone@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
माय मराठी
सचिन उपाध्ये 
-२- 
 
*हिंद मराठी *

म्हणजे काय? हिंदीमिश्रीत मराठी. गेल्या काही दशकांत पोटापाण्याच्या सोयीसाठी वेगवेगळ्या प्रांतातून लोक शहराकडे वळू लागले अन् सामायिक (common) भाषा म्हणून हिंदीचा वापर वाढला. त्याचा विपरीत परिणाम मराठीवर होऊ लागला. कसा ते समजून घेऊया. अर्थात् हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हे (ऑ ! हा काय मास्तरांचा नवीन शोध?). ती फक्त राज्यभाषा, जशी कानडी, गुजराती, मराठी इत्यादी. याबाबत नंतर कधीतरी बोलू.

१. त्याने मला समोरून विचारले,” तू माझ्याशी लग्न करशील का?” मराठीत *समोरून, पाठून, पुढून *असं काही विचारणं नसतं. खरी वाक्यरचना हवी :- त्याने मला *स्वत:*: विचारले,” तू माझ्याशी लग्न करशील का?” किंवा प्रत्यक्ष विचारले…

२.गाडीतून उतरताना (रेल्वे) गाडीचं *पायदान* व फलाटामधील अंतरावर लक्ष द्या. ‘पायदान’ म्हणजे काय? मराठीत पायदान या नावाचा शब्दच नाही. योग्य वाक्य :- गाडीमधून उतरताना गाडीचा / *डब्याचा उंबरठा* व फलाटामधील अंतरावर लक्ष द्या.

३ व्यस्त म्हणजे ‘उलट’ आणि व्यग्र म्हणजे गडबडीत / धांदलीत / busy हा अर्थ ह्यापूर्वीच पाहिला आहे.

प्रत्येक भाषेचा एक लहेजा असतो, एक ढब असते. मराठीत पुल्लिंग, स्त्रीलिंग व नपुंसकलिंग अशा शब्दाच्या ३ जाती असतात; पण हिंदीत मात्र पुल्लिंग व स्त्रीलिंग. नपुंसकलिंगच नाही.

मराठीत ‘मजा’ आली तर हिंदीत ‘मजा’ आया.

मराठीत ‘ऋतू’ आला किंवा गेला, वसंत ऋतू आला, शिशिर ऋतू गेला वगैरे तर हिंदीत ऋतु आयी किंवा ऋतु बहार आयी. ऋतूमधील ‘तू /तु’ कडे लक्ष जाईलच.

मराठीत ‘आवाज’ पुल्लिंगी तर हिंदीत ‘मेरी आवाज सुनोऽऽऽ’

मराठीतला ‘डोळा’ पुल्लिंगी तर हिंदीत ‘आँख’ लाल हो गयी म्हणजे स्त्रीलिंगी आँख. पण मराठीत ते नयन म्हणजे नपुसकलिंगी तर नयन, वचन हे सगळे हिंदीत पुल्लिंगी.

मराठीतलं नपुसकलिंगी ‘नाक’ (ते नाक) हिंदीत स्त्रीलिंगी होतं. म्हणजे नाक कट गयी.

अशा कथा अशा व्यथा भाषेच्या.

– ©️ सचिनदा
sachinupadhye26@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^ 
संस्कृत शिकायचंय ना ?
प्रा. मनोहर रा. राईलकर 

पाठ ५२ (धातुसाधित २)

पाठ ५१ ची उत्तरे, (१) प्रतिभा वाचत असताना माधुरी बोलते. मालायां पठत्यां माधुरी वदति। (२) मीना खेळत असताना सूर्य अस्तास जातो. मीनायां क्रीडत्यां रविः अस्तं गच्छति। (३) वडील (तात) घरी असताना धूम्रपान करू नको.

ताते गृहे भवति धूम्रपानं मा कुरु।
पथ्ये सति गदार्तस्य किमौषधनिषेवणम्।
पथ्येsसति गदार्तस्य किमौषधनिषेवणम्।।
(पदार्थ ३ पाहा.) ह्या श्लोकार्धातील दोन ठिकाणच्या सति सप्तमीचा उलगडा करा.
तू नजरेने हो म्हटले पण वाचेने वदणार कधी ह्या गीतातील एक ओळ.
तू नसताना तुझी आठवण मना जाळिते पदोपदी, अशी आहे.

हिचा संस्कृत अनुवाद मी
त्वयि अभवत्या तव स्मृतिर् मम दहति मानसं पदे पदे। असं केलं होतं. आता ह्यातील सति सप्तमी उलगडून दाखवा.

एक घटना घडत असताना/नसताना दुसरी घडत आहे, असे दोन्ही प्रकार सांगण्याकरता संस्कृत भाषेत हा सति सप्तमीचा प्रयोग केला जातो. त्याकरता आतापर्यंत आपण परस्मैपदी धातूंचा विचार केला. आता आत्मनेपदी धातूंकरता व्याकरणकार काय सांगतात, ते पाहू.

तृतीय पुरुषी बहुवचनी क्रियापदाच्या शेवटी अन्ते, किंवा अते असा प्रत्यय असतो. तो काढायचा. (पण अ तसाच ठेवायचा. म्हणजे न्ते किंवा ते इतकाच भाग वगळायचा). इथपर्यंत परस्मैपदी धातूसारखंच आहे. मात्र, त्यानंतर १, ४, ६ आणि १० ह्या चार गणांतील धातु असेल तर प्रत्यय मान लावायचा आणि इतर गणांतील असेल तर आन प्रत्यय लावायचा. आज मान प्रत्ययाचाच विचार करू.

मराठीतही आलेले भासमान, विद्यमान हे शब्द बहुतेकांना माहीत असतील. भास् १ आ असल्याने तिथं मान प्रत्यय लागला आहे. वृत् (१ आ) ह्या धातूपासून झालेला वर्तमानही माहीत असेल, असं वाटतं. युध् (४ आ) पासून घडलेला युध्यमानही प्रसिद्धच आहे. कारण युध्यमान राष्ट्रे असे शब्द आपण वृत्तपत्रांतून आलेले पाहिले असतील. गण ४ असल्यानं विकरण य आहे. अंग युध्य.
यज् (१ उ) हा धातु उभयपदी असल्यामुळं त्याचं परस्मैपदी रूप यजत् असं तर होतंच. पण आत्मनेपदी रूप सर्वांच्याच परिचयाचं यजमान (म्हणजे यज्ञ करणारा) असंही होतं. वृध् म्हणजे वाढणे. वृद्ध म्हणजे वाढलेला, हा तर आपल्याला माहीतच आहे. पण त्याचं कर्तरि वकाधावि रूप वर्धमान वाढणारा असं होतं. किती तरी संस्कृत शब्द मराठीत जसेच्या तसेच आले आहेत, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. त्यामुळं कितीतरी संस्कृत आपल्याला, केवळ मराठी शिकल्यामुळं येतंच असतं.

सूचना: प्रत्येक गणाच्या धातूला विकरण म्हणून एक अक्षर लागतं. ते लागल्यानंतर होणारं त्याचं रूप म्हणजे त्या धातूचं अंग होय. हे आपण पूर्वी (पाठ ७) पाहिलं आहे. नंतर अंगालाच काही प्रत्यय लागून त्याची क्रियापदे होतात. गण १ आणि ६ ह्याचं विकरण अ. गण ४ चं विकरण य. (म्हणूनच आपण युध् चं अंग युध्य केलं. नंतर युध्ये युध्यावहे… युध्यन्ते अशी क्रियापदांची रूपं केली. आणि मग युध्यमान असं कवधावि केलं. म्हणजे लढणारा. १० व्या गणाचं विकरण अय.

पुढील धातूंची आत्मनेपदी कर्तरि वर्तमानकालवाचक धातुसाधित रूपं सांगा. (१) अंक् (१ आ). (२) अट्ट् (१ आ. जाणे, मारणे) (३) अय् (१ आ. जाणे) (अनु + अय् अन्वय्) जाणणे. परा (पला) + अय् पळून जाणे (पलायन माहितीच आहे). यः पलायते स जीवति। चा अर्थ सांगा. (४) अर्थ् (१० आ) याचना करणे, इच्छिणे. (विद्यां अर्थयते स विद्यार्थी। (५) आस् (१ आ) बसणे (आसन माहितीच आहे.) (६) कास् (१ आ) खोकणे. तुमच्याकडे संस्कृत कोश असेल तर त्यातून १, ४, ६ आणि १० ह्या गणांतील आत्मने- किंवा उभय-पदी धातू शोधा आणि त्यांची साधिते बनवा.

@
– ©️ प्रा. मनोहर रा. राईलकर
railkar.m@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^ 
आमचा बॉम्बे ग्लास वर्क्स चाळीतला गणपती उत्सव

आठवणीतले सण [ १ ] 
 
संगीता जोग 
 

मखर

 

कालपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आमच्या सर्व वाचक, लेखक, चित्रकार, छायाचित्रकार आणि हितचिंतकांना मनःपूर्वक शुभेच्छा ! यंदाचा हा सण  कोरोनाच्या विचित्र व संभ्रमाच्या वातावरणात साजरा होतोय. आमच्या आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादातून मिळालेल्या आठवणींचा पहिला लेख आज प्रसिद्ध करत आहोत. पुढे जसा प्रतिसाद मिळत जाईल तसे अशा (‘न विसरलेल्या’ ) आठवणी उलगडत जाऊ. आपल्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा आहे, हे सांगायला हवे काय ? – सं. 

या बिल्डिंगमध्ये आमचं एकत्र कुटुंब होतं. दोन दीर – जाऊ वेगळे राहायचे. पण गणपती उत्सवासाठी आम्ही सर्व एकत्र यायचो. दोघी नणंदा सहकुटुंब सहपरिवार आमच्याकडे मुक्कामालाच असायच्या. आठ दिवस फक्त धमाल असायची.

मखर बनविण्याची तयारी दोन दिवस आधी सुरू व्हायची. मखर आणि भिंतीवरील आरास हे काम माझं असायचं. रात्री जाग्रण करून ते साहित्य बनवायचं. मुलंही सहभागी व्हायची. सर्वांच्या विचाराने मग मखर तयार व्हायचं आणि बाप्पाचं आगमन होईपर्यंत आमचं सजावटीचं काम चालूच राहायचं.

गणपतीचं बुकिंग कधीच केलं नाही. कबुतरखान्याच्या जवळ खूप दुकानं होती गणपतीची. त्यात मग आमची बालमूर्ती शोधायची आणि ती मिळाली की जो काही आनंद असायचा! कारण दरवर्षी ती ठराविक मूर्तीच मिळायची म्हणून आनंद. हे काम सर्व पुरुषवर्गाचं होतं. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात मग बाप्पाचं आगमन व्हायचं आणि ठरल्या जागी त्याला आसनावर बसवलं जायचं आणि त्या मूर्तीचं कौतुक सुरू व्हायचं.

गणेशचतुर्थीच्या दिवशी साग्रसंगीत पूजा झाली की झांजांच्या आवाजात आरती व्हायची. मग दुपारचा मोदकाचा नैवेद्य, इतर स्वयंपाक तयार करण्याची बायकांची लगबग सुरू व्हायची. दहा-दहा नारळाचे मोदक आम्ही करायचो. पंगतीत चढाओढ लागायची मोदक खाण्याची. बायकांना जेवायला ४ वाजायचे.

आमचा गणपती गौरीबरोबर विसर्जन केला जातो. त्यामुळे पहिल्या दिवशी फक्त आणि फक्त आमचे प्रभुमामा, मृदुलामामी आणि त्यांची मुलं दर्शनाला यायची. मग काय विचारता, गप्पांचा फड असा रंगायचा की विचारूच नका! खूप मजा यायची मामांशी गप्पा मारताना. मग रात्री आरतीला मजल्यावरचे सर्वजण यायचे. २-२ तास आरती चालायची. सगळ्या आरत्या त्या दिवशी अवतरायच्या.

दीड दिवसांच्या बाकीच्यांच्या गणपतीचं विसर्जन झालं की मग मात्र आमच्याकडे गर्दी उसळायची. मुलांचे मित्र, मुलींच्या मैत्रिणी, आमचे सर्वांचे नातेवाईक – सर्वांची हजेरी असायचीच. काही जण तर रात्री आरती करून जेवूनच घरी जायचे.

प्रसादाची आणि  खाण्याची पदार्थांची रेलचेल असायची. खूप मजा यायची.

असं करता करता विसर्जनाचा दिवस यायचा. आदल्या रात्री माझ्या सासूबाई सर्वांना सांगायच्या, “प्रत्येकाने प्रार्थना करा, काही मागायचं असेल तर मागून घ्या. उद्या बाप्पाला काही सांगायचं नाही.”

विसर्जनाला शेजारी मंडळी सामील व्हायची आणि “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या गजरात आम्ही पायी- पायी  समुद्रावर एका तासाने पोचायचो. तिथे परत आरती व्हायची. दादर चौपाटी तेव्हा मोठी होती. खूप गणपती विसर्जनाला यायचे. त्यात उभ्या गौरीही असायच्या. पाहायला मस्त मजा यायची. गणपती त्या समुद्रात जाणाऱ्या मुलाकडे दिला की तो पाण्यात पुढे-पुढे जाईपर्यंत आम्ही पाहत राहायचो. डोळे पाण्याने भरलेले असायचे. जड अंत:करणाने सर्वजण घरी यायचे. पाटावरची माती घरात सर्व ठिकाणी ठेवायची. आणि मग चहा आणि गप्पा सुरू व्हायच्या. चाळीतली मजा काही औरच होती. एकमेकांच्या उपयोगाला यायचे सर्व. घरातलं सामान बिनदिक्कत कोणाच्याही घरात आम्ही ठेवत होतो. काही वाटत नसे कोणालाच. आता ‘गेले ते दिवस’ म्हणत भूतकाळात फिरून डोकावून यायचं. नातवंडांना फक्त आठवणी सांगायच्या आणि आपल्याही मनात आठवणी दाटून आल्यावर भूतकाळात फिरून यायचं आणि त्यातच रमून जायचं.

जागेअभावी सर्व विभक्त झाले. मी ठाण्याला आले. आता गणपती माझ्याकडे असतो. सर्वजण जमतात. पुढची पिढीही तयार झाली आहे. पण शेवटी चाळीतली मजा टॉवरमध्ये नाही, हे खरंय.

संगीता जोग
ठाणे  (पश्चिम), पोखरण रोड क्र. २

मो. ९३२४९८१४११.
* प्रकाशचित्रात संगीता जोग यांनी मखराची स्वतः केलेली सजावट.
{ संगीता जोग या हस्तकलाप्रवीण असून निवृत्तीपर्यंत मुंबई महापालिकेच्या शाळांत हस्तकलाशिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. }
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
चित्रकारांचे दालन 
– ©️ मनीषा नाबर, श्रूस्बरी, मॅसॅच्युसेट्स (अमेरिका )
nabarm@gmail.com
@@@@@@@@@@
महत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@

विचित्र कोडी

सौ. मालती दांडेकर  

दूर अंतरावर दिवे लुकलुकू लागले, तेव्हा आनंदरावांना बराच धीर आला. वेळ ही अशी अमावास्येच्या रात्रीची; पाहाल तिथं काळोखाचंच राज्य. बरोबर बायकामंडळी अन् रानात वाट चुकलेली ! मग माणसाला घाबरल्यासारखं व्हावं यात आश्चर्य थोडंच म्हणायचं ?

आज आनंदराव रानातल्या रानजाई देवीला नवस फेडायला बैलगाडी करून आले होते. बरोबर नवविवाहित मुलगी व जावईही होते. मुंज झालेला मुलगा होता, आणि पत्नीही होती. घरात कार्य झालं की या देवीला जायचा त्यांचा कुलाचार होता. संध्याकाळपर्यंत देवदर्शन, नैवेद्य वगैरे झाले व ते परत जाण्यास निघाले. पण रानात सगळ्या वाटा सारख्याच दिसतात. चहूकडे तशीच झाडं आणि तशाच वेलींच्या जाळ्या, त्यामुळे बैलगाडी चुकून भलत्याच रस्त्याने जाऊ लागली तरी गाडीवानाच्या, गड्याच्या, कुणाच्याच ध्यानात आलं नाही. फार काय आनंदरावांना समजलं नाही ते चटकन.

हळूहळू रात्र चढू लागली. रानात विचित्र आवाज वातावरणाच्या भीषणतेस मदतच करीत असतात. दूर कुठं वाघरू गुरगुरल्याचा आवाज येई; तर पालापाचोळ्यावरून एखादं जिवाणू सरसरत गेल्याची चाहूल लागे. केव्हा डाव्या हाताला कोल्हेकुई उठे, तर रातकिड्यांची किर्रकिर्र फारच कर्कश भासे. बारा वाजले, सगळ्यांच्या डोळ्यांवर झोप तरंगू लागली. आनंदराव म्हणाले, “अरे, हरबा, आपण एव्हाना वेशीपर्यंत पोचायला हवं होतं. केव्हाची गाडी चालते आहे. वाट तर चुकलो नाही ना ?”

“मलाबी त्योच अंदेशा येतुया मालक …. त्ये बगा दिवं दिसत्यात, पर त्ये आपल्या गावचं न्हाईती. बुरुजावाणी उंचावर पाच दिवं आपल्या गावात कोनबी न्हाई लावीत. ”

हरबाचे शब्द ऐकताच आनंदराव चमकले एकदम. बुरुज ? अन् पाच दिवे ? ते तर रानातल्या कुटनगरीला आले होते वाट चुकून !

आनंदीबाई म्हणाल्या, “बरं झालं बाई. गाव कुठलं का असेना ! रात्री रानात सापडण्यापेक्षा बरं. गावात जाऊ, कुणाच्या तरी घरी उतरू, शेकोटी पेटवू अन् उनहून दूध घेऊ. मग अंग टाकता येईल जरा. ”

आनंदराव म्हणाले, “अगं, तसं साधं गाव नव्हे हे. रानटी जमातीचं गाव आहे. इथं भारी विचित्र लोक आहेत. त्यांच्या तडाख्यातून सुटलो तर वाचलो म्हणायचं. छे छे छे ! भलतीकडं या हरबानं आणली गाडी बाबा. ”

जावई अरविंद विचारू लागले, “पण विचित्र म्हणजे काय ?”

आनंदराव सांगू ;लागले, ” विचित्र म्हणजे लहरी.  तेथला तरुण राजा अत्यंत बुद्धिमान आहे व त्याचं प्रधानमंडळही अतिशय तीक्ष्णबुद्धीचं. खूष झाले तर सारे सारं काही हसत देतील. नाही तर कोणते हाल नशिबी येतील कुणास ठाऊक ? अगदी बेतानं वागायला हवं, फार जपून बोलायला पाहिजे. ”

सगळेच काहीसे धास्तावून पाहू लागले. तेवढ्यात तुतारीचा उंच आवाज झाला व दहा – बारा काळ्या वर्णाचे, पण लढाऊ पोशाखाचे लोक धावत येऊन त्यांनी गाडीला वेढा दिला. त्यांच्या डोक्यांवर मोरपिसे खोचलेली होती. वाघाच्या कातड्यांची जाकिटं त्यांनी घातली होती व प्रत्येकाच्या हाती भाला व धनुष्यबाण होते. आनंदराव नम्रपणे त्यांना म्हणाले,
” बाबांनो, आम्ही गरीब वाटसरू, वाट चुकून इकडे आलो. आम्हाला रात्रभर राहायला जागा मिळेल तर, देव तुमचं भलं करील, ” दुभाष्या जवळच होता. तो त्या बोलण्याचा अर्थ सांगू लागला. तेव्हा त्यांच्या अधिका-याने विचार करून म्हटलं,

“आमचे राजे ठरवतील त्याबद्दल. आम्ही आता तिकडेच घेऊन जातो आहोत तुम्हाला. पण हे आहे बुद्धिमंतांचं राज्य. अन् इथं बुद्धिमान माणसांचंच नीट स्वागत होतं, एवढंच सांगतो. तुमची परीक्षा नागराजे घेतील. परीक्षेत उतरलात, तर केवळ आश्रयच नव्हे, तर भोजन वगैरे सारं मिळेल ! नाही तर कोणती शिक्षा मिळेल ते आम्ही सांगू शकत नाही. ”

परत मंडळींच्या मनावर भीतीची लाट हेलकावू लागली. हे राजे कसली परीक्षा घेणार आणखी ? आणखी सर्वांचीच घेणार की काय ?

कन्या मीना म्हणाली, “मी कुठे परीक्षेत नापास नाही झाले बाबा. हीही परीक्षा कठीण असली तरी त्यात मी पास होईनच नक्की. ”

आनंदीबाई म्हणाल्या, “तुमचं ठीक आहे गं. पण मी कुठलीच परीक्षा अजून दिली नाही. माझीच पंचाईत व्हायची. ”

त्यांना सर्वाना राजवाड्यात नेण्यात आलं. राजवाडा म्हणजे मोठी मोठी चित्रं काढलेला एक लाकडी दिवाणखाना होता. राजा तिथंच उच्चासनावर बसला होता. गळ्यांत सिंहाच्या दातांची माळ होती. डोक्याच्या केसांवर एक चकचकीत पट्टी बांधलेली होती. त्याचं वस्त्र पानाफुलांनी विणलेलं होतं. हातात दगडाचंच एक छानदार शस्त्र होतं. रूप काळंसावळंच पण नजर अशी भेदक व तिखट की, केवळ त्या नजरेवरूनच त्याच्या बुद्धीची ग्वाही मिळावी ! त्यांच्याच जमातीतल्याला सर्वात बुद्धिमान माणसाची राजा म्हणून निवड होत असे. हे आनंदरावांनी ऐकलं होतंच.

दुभाष्या दोन्ही बाजूंची भाषणं समजावून द्यायला हजर होता. त्याच्या मार्फत नागराजाला सर्व हकीगत सांगण्यात आली. तेव्हा तो हसून म्हणाला, “बसा मंडळी. इथं बुद्धिमंतांचाच आदर होतो. म्हणून मी तुम्हा सर्वांच्या बुद्धीची पारख करीन व नंतर नागराजाच्या या राजधानीत तुम्हाला आसरा मिळेल ! प्रत्येकाला मी प्रश्न विचारीन. विचारू ना ?”

“जरूर विचारावा, सरकार !” आनंदराव म्हणाले.

राजा प्रथम आनंदीबाईंकडे वळून म्हणाला, “मातोश्री, पहिल्यांदा तुमची बुद्धी पाहातो मी. सांगा पाहू ! राणीला देखील पाहावीशी वाटली तरी अगदी क्वचित दिसते, पण तुमच्यासारख्यांना मात्र रोज वाटेल तितक्यांदा ती गोष्ट  सहज पाहायला मिळते. अशी कोठली आहे गोष्ट?”

आनंदीबाईंनी पाच मिनिटं विचार केला. मग त्या हसून म्हणाल्या, ” राजे, आपल्याएवढ्याच योग्यतेची स्त्री, हे ह्याचं उत्तर ! महाराणीला आपल्याएवढ्याच थोर भाग्याची, आपल्यासारख्याच वैभवाची, रुपसंपदेची बरोबरी करणारी महाराणी क्वचितच दिसायची ! पण आमच्यासारख्या साध्या गृहिणींना मात्र स्वतःइतक्याच योग्यतेच्या व आर्थिक स्थितीत बरोबरीच्या असलेल्या गृहिणी रोज वाटेल तेवढ्या दिसतात. खरं ना ?”

नागराजा खूष होऊन म्हणाला, “बरोबर, मातोश्री, तुम्ही परीक्षेत उतरलात. अरे, छोट्या मुला, तू सांग आता. मी तुला विचारतो त्याचं उत्तर. ”

“जमिनीतून निघालं, मग विस्तवातून भाजून काढलं तरी मेलं नाही, उलट जीभ नाही तरी वाटेल तेवढ्या गोष्टी बोलू लागलं, असं काय आहे ?”

सगळ्यांच्या नजरा छोट्या अविनाशकडे वळल्या. नुकतीच मुंज झालेली, तेव्हा त्याचं वय होतं अवघं दहाच वर्षांचं. शाळेत पहिला नंबर होता खरा – पण ते पेपर वेगळे आणि ही तोंडी परीक्षा निराळी. पण अविनाशही तल्लख बुद्धीचा होता. खुदाकन् हसून तो म्हणाला, “ओळखलं राजे ! ते म्हणजे लोखंडाचं निब. टाकाला बसवतात ते लोखंड जमिनीतून काढून भट्टीत तापवून त्याचं निब बनवतात आणि मग ते गोष्टी लिहून सांगू शकतं ! बरोबर आहे ना ?”

“अगदी बरोबर ! काय चुणचुणीत पोरगा आहे हा ! बरं ए ताई, तू आता सांग, एका प्रश्नाचं उत्तर —

सजीव आहे पण चालत नाही, बोलत नाही. जमिनीवर ठेवलं तर उभं राहत नाही. बारा माणसांना त्याला दोर बांधूनही धरून ठेवता येणार नाही. पण माझ्या हातांत मी ते पकडून ठेवू शकतो. असं काय ?”

मीना क्षणभर गांगरली. पण थोडा विचार करून म्हणाली, “महाराज, ती वस्तू म्हणजे कोंबडीचं अंडं हीच असली पाहिजे. ”

नागराज खुषीने म्हणाला,
“छान ! बरोबर ओळखलंस हां पोरी ! ठीक ठीक. तुम्ही सगळेच चतुर दिसता. हा तरुण मुलगा तुमचा मुलगा काय ?”

“मुलगा नव्हे जावई. ”

“वा ! आमच्यात जावयांच्या वेडेपणाच्या गोष्टी खूपच आहेत. तेव्हा तुमचाही जावई वेडा आहे की काय, याचा शोध घेतलाच पाहिजे. जावईबुवा, सांगा, हं मी कूट प्रश्न विचारतो एक, त्याचं उत्तर —
तो रानात होता. मला त्यानं गाठलं. पण मी त्याला पाहू शकलो नाही. मग त्याला पहावं म्हणून मी खाली बसलो, तरी जवळ असून तो मला दिसला नाही; सापडला नाही !”
अन् तो सापडला नाही म्हणूनच मी त्याला माझ्याबरोबर घरी आणलं पण येतानाही तो मला दिसत नव्हता. तरी सारखा छळीतच होता ! असा तो कोण सांगा बरं ?”

अरविंदाची तरतरीत चर्या जराशी चिंताग्रस्त झाली. मीना पतीकडे पाहून कुचेष्टेने हसू लागली. तिकडे पहात अरविंदराव हसले आणि क्षणभराने म्हणाले, “राजे, हा तुमचा रानातला शत्रू मला सापडला बरं का ! तो तर बाभळीचा काटा ! तो रानात आपल्या पायात घुसला, मोडला, पण पाहता येईना म्हणून आपण खाली बसलात; पण तो पुरा आत गेला होता, म्हणून दिसू शकला नाही, सापडेनासा झाला ! म्हणून तो तुमच्या पायाबरोबर घरात आणलात तुम्ही, अन् रस्त्यानंही तो सारखा टोचून तुम्हाला छळीत  होताच, अन् तरीही दिसत नव्हता ! खरं की नाही ? तर असा हा बाभळीचा काटाच !”

अरविंदकडे हास्यमुखानं पाहत नागराज म्हणाला, “वा ! जावई देखील चतुर मिळाला आहे तुम्हाला. भाग्यवान आहात तुम्ही. आता फक्त तुम्हालाच प्रश्न विचारायचा राहिला. तेवढा विचारतो. आणि त्याचं उत्तर दिलंत की तुम्हा सर्वांच्याच बुद्धीची योग्य पारख मी केली असं होईल. ”

नागराजानं खूण करताच दहा जड थैल्या नोकरांनी आणून ठेवल्या. तिकडे बोट दाखवून तो म्हणाला, “सद्गृहस्था, या दहा थैल्या सगळ्या मोहरांनी भरलेल्या आहेत. त्यांपैकी नऊ थैल्यांत ख-या सोन्याच्या  मोहरा आणि एका थैलीत खोट्या मोहरा आहेत. नुसत्या दृष्टीनं पाहून मुळीच ओळखता येणार नाहीत, इतक्या बेमालूम बनवलेल्या आहेत. फक्त एक माशाचा. दर मोहरेमागे वजनात फरक आहे. या प्रत्येक थैलीत संख्येनं सारख्याच मोहरा भरलेल्या आहेत. समजलं ना ?”

आनंदरावांनी मान हलवली. म्हणाले, “ठीक. आता माझ्याकडं कोणतं बुद्धीचं काम ?” आनंदरावांचा प्रश्न ऐकून नागराजानं एक तराजू व तोळ्याची आणि माशाची वजनं समोर आणविली. मग तो म्हणाला, ” तुम्ही प्रत्येक थैलीतून कितीही मोहरा काढा; पण फक्त एकदाच त्या सा-यांचं वजन करा अन् कोठल्या थैलीत खोट्या मोहरा आहेत ते सांगा. बघू तुमची करामत. ”

“एकदाच वजन केलं पाहिजे ?”

“हो, तिथंच तर खरं बुद्धीचं चातुर्य. नाहीतर दरेक थैलीतल्या मोहरा वेगळ्या वजन करून वेडादेखील कमी वजनाच्या मोहरांची थैली ओळखील. नाही का ?”

पलीकडे एक वालुकायंत्र होतं. तिकडं बोट दाखवीत नागराज म्हणाला, ” वाटलं तर विचाराला वेळ घ्या घडीभर. ”

आनंदराव स्तब्धपणे विचार करू लागले. सा-यांच्याच नजरा त्यांच्यावर गुंतल्या. त्या नजरेत काळजीच्याही छटा होत्याच. आनंदरावांनी पाच मिनिटं विचार केला आणि [प्रत्येक थैली उघडली. पहिलीतून एक दुसरीतून दोन, तिसरीतून तीन अशा क्रमाने ते दहाव्या थैलीपर्यंत मोहरा काढीत होते. मग त्या त्यांनी मोजल्या. त्या भरल्या पंचावन्न ! ( १+२+३+४+५+६+७+८+९+१० = ५५)

नंतर शांतपणे व काहीशा हास्यमुखानं त्यांनी तराजू व वजनं घेतली. त्या मोहरांचं वजन केलं आणि हसून म्हटलं,

“नागराज, तुम्ही तर मला सर्वात अवघड कोडं घातलंत ; पण माझ्या बुद्धीनुसार मी ते सोडवलं आहेसं वाटतं. तुमची चौथी थैली खोट्या मोहरांची आहे. खरं ना ?”

“वा ! अगदी खरं ! कसं सोडवलंत तुम्ही हे कोडं ? तेवढं आमच्या या सर्व मंडळींना कळू द्या. आपणच उलगडा करा म्हणजे बरं. ”

“ऐका तर. या एकूण ५५ मोहरा होत्या. त्यांचं वजन ५५ तोळेच भरायला हवं होतं. खरं ना ? पण ते भरलं चौपन्न तोळे आणि आठ मासे म्हणजे ४ मासे कमी आले. मी दरेक थैलीतून एक-दोन याच अनुक्रमाने मोहरा काढल्या होत्या. तेव्हा एक मासा कमी असता तर पहिल्या थैलीत खोट्या मोहरा, दोन मासे कमी भरते तर दुस-या थैलीतल्या मोहरा खोट्या वजनाच्या ठरल्या असत्या. येथे ४ मासे कमी. तेव्हा चौथी थैली त्या दृष्टीने कमी वजनाची अर्थात खोट्या मोहरांची ठरली. बरोबर आहे का रीत माझी ?”

“अगदी बरोबर ! आनंदराव, तुम्ही माझ्याएवढेच बुद्धीमंत आहात ! परत भरू नका त्या मोहरा . बाहेर काढलेल्या ५५ मोहरा या सा-या तुमच्या बुद्धीचा आदर म्हणून तुम्हाला मी भेट देत आहे ! तुम्ही सर्वच चतुर मंडळी भेटलात ! आनंद वाटला. आजची रात्र मोठी चांगली गेली. अच्छा ! ” राजा उदगारला. किती तरी खूष झाला होता तो या चतुर मंडळींवर. बुद्धीची खरी किंमत चतुर माणसालाच कळायची ! त्यानं या प्रवासी मंडळींना अंथरूण -पांघरूण तर दिलंच, पण रात्रभर झोपायला ऊबदार खोली दिली आणि गरम दूधभाकरीचा पाहुणचारही केला.

सकाळी फळांनी भरलेल्या दोन करंड्या बरोबर देऊन, नागराजाने त्यांना रानाबाहेर सुखरूप पोहोचते केलं ; पण निरोप देताना तो आनंदरावांना म्हणाला, “मित्रा, तुही काही अवघड कूट प्रश्न मला विचारायला येत जा/ म्हणजे माझ्याही बुद्धीला धार चढेल मधूनमधून ! केव्हाही या, माझ्या कुटनगरीत तुमचं नेहमी स्वागतच होईल. बरं का !”

बालमित्रांनो, तुम्हाला जावंसं वाटतं का तिथं ? मग कोडी सोडवायची सवय करा पाहू आधी चांगली.

@@@

सौ. मालती दांडेकर  ( १३ एप्रिल १९११ – १४ जानेवारी १९८६ )

–  सौ. मालती दांडेकर
[कथा व चित्र  “हसायला काय झालं ?” कथासंग्रहातून साभार ]
छायाचित्र : ‘विकिपेडिया’वरून साभार
कथेतील चित्र : चित्रकार  वसंत सहस्रबुद्धे 
@@@@@@@@@@@@@@@@@
आजची कविता 
मधुकर सोनवणे 
आता थंडेची स्वागत

कोठे लोपला जल्लोष, धामधूम वाद्यवृंद |
भव्य आरास मंडप, वातावरणी आनंद ||

बाप्पा यायचे म्हणून, उत्साह नि लगबग |
सारीकडे ते चैतन्य, धावाधाव भागंभाग ||

आणायाचे मोरयाला, घराघरात चैतन्य |
सारे मदती धावती, वृद्धा येतसे तारुण्य ||

सडे अंगणी शिंपती, घर घर सजलेले  |
तुळशीच्या वृंदावना, रांगोळ्यांनी वेढियले ||

बाप्पा कधींना एकटा, सारे थव्याने जमती |
कुणी घंटानाद करी, कुणी टाळ वाजविती ||

लोपती ते जाती धर्म, सारे एकची ते होती |
स्नेहभाव सारीकडे, येता गणेशाची मूर्ती ||

सार्‍या ओठी तो गजर, बाप्पा मोरया मोरया |
रस्त्या रंगवी गुलाल. बाप्पा उत्साहे आणाया ||

आणी वाजत गाजत, येई मिरवीत स्वारी |
कुणी गाडीत, रथात, कुणी छान पाटावरी ||

सारे लोपणार आता, लोपे उत्साह पूर्वीचा |
नाकावरती फडकी, नियम तो अंतराचा ||

बाप्पा विघ्नहर्ता तूचि, विघ्न लोपुनिया यावे |
जाणतोसी तू सर्वज्ञा, तुला सारे कांही ठावे ||

आता थंडेची स्वागत, नाही मिरवणुकाही |
नाही कार्यक्रम आणि, कोठे नाही देखावेही ||

तूच संकोचिली ऊंची, आणि सारी ती भव्यता |
तूच होशील हताश , सारे गेले कोठे आता ? ||
सॅनिटायझर आधी, मग धूप उदबत्ती |
कुणा शिवायचे नाही, थंडावेल रे आरती ||

करोंनाच्या राक्षसाचा, होई जोवरी ना नाश |
जरि अंतरी उत्साह, सारे सारेची हताश ||

आरतीत प्रार्थितोचि तुवा संकटी पावावे |
फिरव ती सोंड आता, सर्वा आरोग्य ते द्यावे ||

– ©️ अण्णा
annasonavane02@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@@
‘मैत्री’च्या बालवाचकांसाठी खास स्पर्धा
प्रकाशचित्रावरून शब्दचित्र रेखाटन  
प्रिय वाचक मित्रहो,
सस्नेह नमस्कार

‘मैत्री’ अनुदिनीमध्ये आता महिन्यातून २ किंवा ३ वेळा ‘बालकुमारांचे पान’ प्रसिद्ध होत आहे. या सदराच्या माध्यमातून काही नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार संपादक मंडळाने केला आहे. ‘मैत्री’ अनुदिनी आणि ‘एरा फुड्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने बालवाचकांसाठी एक खास स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

या स्पर्धेसाठी दोन प्रकाशचित्रे ( photo )आजच्या ‘मैत्री’च्या अंकात ( या निवेदनाच्या शेवटी ) प्रसिद्ध केली आहेत. ती म्हणजे कोणत्याही एका सहलीचे ठिकाण अथवा पर्यटनस्थळ आहे. मुलांनी त्यावर कल्पना करावी की आपण या सहलीला गेलो आहोत आणि नंतर ही सहल कशी केली याचे शब्दचित्र त्यांनी रेखाटून ‘मैत्री’चे संपादक श्री. मंगेश नाबर यांच्या  ई-पत्त्यावर पाठवावे.  मुलांना हे शब्दचित्र रेखाटण्यास एक महिन्याचा अवधी दिला जात आहे. शब्दचित्र पाठवण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०२० आहे.

या स्पर्धेसाठी पुढील नियम असतील. :-
(१) आठ ते तेरा वर्षांच्या जगभरातील कुठल्याही मुलामुलींसाठी ही स्पर्धा खुली असेल.
(२) स्पर्धकाने लिहिलेले शब्दचित्र हे मराठीत असले पाहिजे. शब्दचित्र ३०० शब्दांच्या आत असावे. एका स्पर्धकाला एकच शब्दचित्र पाठवता येईल.
(३) हे शब्दचित्र स्पर्धकाच्या हस्ताक्षरात असले तरी चालेल किंवा त्याने तोंडी वर्णन केल्यावर आईवडील किंवा आजोबा आजी यांनी युनिकोडमध्ये टंकून – वर्ड डॉक्युमेंटमध्ये ते शब्दचित्र पाठवलेले असावे.
(४) स्पर्धक आपल्या हस्ताक्षरातील शब्दचित्रे jpg या माध्यमातून पाठवू शकतात. मात्र पी डी एफ शब्दचित्रे स्वीकारण्यात येणार नाहीत.
(५) सर्व शब्दचित्रे ‘मैत्री’च्या संपादकांकडे ईमेलने mangeshnabar@gmail.com  या ई-पत्त्यावर पाठवण्यात यावी. त्यांवर स्पर्धकाचा निवासाचा संपूर्ण पोस्टाचा पत्ता, ईमेल आयडी (असल्यास) किंवा प्रेषक पालकांचा ईमेल आयडी, दूरध्वनी / मोबाईल क्रमांक ही माहिती आणि स्पर्धकाच्या वयाबाबत प्रेषकांकडून स्पष्ट शब्दात खुलासा केला गेला पाहिजे. शब्दचित्राबरोबर ही माहिती नसल्यास ते स्वीकारले जाणार नाही.

या स्पर्धेसाठी ‘मैत्री’ परिवारातील ज्येष्ठ सदस्य श्रीमती मृदुला प्रभुराम जोशी या माननीय परीक्षक असतील. त्यांनी निवडलेल्या पहिल्या तीन क्रमांकांची शब्दचित्रे ‘मैत्री’तून सन्मानपूर्वक प्रसिद्ध करण्यात येतील. परीक्षकांचा निर्णय अखेरचा आणि या स्पर्धेत भाग घेणा-या सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल. त्यासंबंधात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

वरील स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून ‘एरा फुड्स’चे देवेंद्र रमेश राक्षे यांनी जबाबदारी घेतली आहे. यशस्वी स्पर्धकाला ‘एरा फुड्स’तर्फे विशेष भेटवस्तूच्या रूपाने पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल. बक्षीसरूपाने देण्यात येणा-या भेटवस्तू या ‘एरा फुड्स’तर्फे श्री. देवेंद्र रमेश राक्षे पाठवतील व त्याबाबत सर्व जबाबदारी त्यांची असेल. स्पर्धेच्या भेटवस्तूंबाबत अथवा इतर कोणत्याही तक्रारीबाबत ‘मैत्री’ अनुदिनीचे संपादक मंडळ जबाबदार असणार नाही याची देखील नोंद घ्यावी.

‘मैत्री’च्या चोखंदळ वाचकांनी तसेच अन्य रसिक मित्रांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग घ्यावा हे ‘मैत्री’ अनुदिनीच्या वतीने अगत्याचे आवाहन.

धन्यवाद.

आपला,

मंगेश नाबर
(संपादक, ‘मैत्री’)

१. आयफेल टॉवर, पॅरिस, फ्रान्स

 

 

२. नायगारा धबधबा, ऑन्टॅरिओ, कॅनडा

@@@@@@@@@@@@@@@@
बालवात्रटिका 

अमितेय 
१.
बाबांची फजिती 
 

एक होती मुंगी
तिला दिसली लुंगी
लुंगीत जाऊन बसली
कडकडून डसली

बाबा उठले ओरडत
होते लुंगी झटकत
घरभर नाचले
नाचून नाचून दमले

अखेर आईचे ऐकले
एका जागी थांबले
मुंगी पडली टपकन्
आई हसली खुद्कन्

– ©️ अमितेय 

@@@@@@@@@@@@@@@@@@@
चंदूची बाग 

 

कै. ना. ग. गोरे

चंदू हुषार होता, चपळ होता, आनंदी होता ; पण भारी वांड होता. त्याचे वडील महापालिकेच्या कोठल्यातरी एका खात्यात कारकून होते. त्यांना महापालिकेने स्वतःच्या नोकरवर्गासाठी बांधलेल्या वसाहतीत दोन खोल्यांचे घर मिळालेले होते. ती वसाहत शहराच्या कडेला होती. शेजारी ओढा होता. दुसरीकडे सुखवस्तू लोकांचे बरेच बंगले होते. त्याच्या पुढे गेले की बंगल्यांकडे जाणारा राजमार्ग लागे आणि तेथून पार — दृष्टी पोचेस्तोवर शेतजमीन होती. त्या शेताडीत पोचले म्हणजे इतका वारा अंगावरून जायचा की आंघोळ केल्यासारखे वाटे. शेताच्या बांधांना केकताडाच्या रांगा असत. त्यांत एखादेवेळी मधाचे पोळे सापडे. पिवळी गोंडेदार फुले असलेल्या बाभळी असत. त्यांच्या वासाने ऊर भरून घ्यावा असे वाटे. मध्येच एखाद्या जांभळीच्या झाडावर शेपटी उडवीत चक्रर चक्रर आवाज करणारी इटकुलीशी खार असे. तिला पकडून तिची शेपटी कापून आणण्याकरिता चंदू तासन् तास झाडो-यात लपून बसे.

वसाहतीमधल्या एखाद्या बि-हाडाच्या माळ्यावर मांजरी व्याली असली तर तिची पिल्ले अलगद काढून खाली आणणे म्हणजे चंदूच्या हातचा मळ होता ! गच्चीवर पतंग अडकला तर नळावरून चढून चंदू तो पटकन काढून आणी. ओढ्यापलीकडच्या बंगलेवाल्यांच्या वसाहतीमध्ये कोणाकडे पपये पिकू लागले आहेत, कोणाच्या पेरूंना पाड लागला आहे, याची बित्तंबातमी चंदूला असे. त्यामुळे चंदू आपल्या सवंगड्यांत फार लोकप्रिय होता. शेजा-या -पाजा-यांच्या बायकांनाही चंदू आवडायचा, कारण गौरीगणपती असोत, मंगळागौरी असोत, त्यांना लागणारी सगळी पत्री फुले चंदू आणून द्यायचा. चंदूला स्वतःला देखील फुलांची आवड होती. पावसाळ्यात सगळ्या बंगल्यांतून नाना जातींची आणि रंगांची फुले फुललेली असत. ती पाहून, हुंगून चंदू भारावून जाई. चंदूच्या वसाहतीमध्ये फुलझाडे नव्हती. लावली तर ती कोणी टिकू देत नसे. पण एक भला मोठा डेरेदार गुलमोहोर होता. तो वर्षातून एकदा हिरव्याजर्द नाजूक पानांनी गरगरून जाई आणि एखाद्या कोंबड्याच्या डोक्यावरील तू-यासारख्या तांबड्यालाल फुलांनी बहरून जाई. त्याची ती दोन्ही रूपे चंदूला फार आवडत.

श्रावण-भाद्रपद आले की चंदूची झोप उडून जात असे. हे दोन महिने म्हणजे फुलांच्या उधळणीचे, पखरणीचे महिने. या दोन महिन्यात सृष्टी हिरवी साडी नसते. हिरवे चुडे लेते. जाई जुईच्या गज-यांचा  शृंगार करते. हातांत कमळे धरते. केसांत केवडा खोवते. चंदू त्या काळात तांबडे फुटता फुटता उठायचा, कोप-यावरच्या दूध केंद्रावर बाटल्या वाजू लागल्या की मांजरासारखी मुटकुळी करून पडलेला चंदू झटकन अंथरुणावरून उठे. भसाभस दोन चुळा खळखळून टाकी आणि जाळीला अडकवलेली दोन हात लांबीची आकडी आणि भली थोरली पिशवी घेऊन ओढ्यापलीकडच्या वसाहतीत दाखल होई. कुठे एखाद्दुस-या बंगल्यात कुत्रे असत. पण त्यांची चंदूला भीती वाटत नसे. ते सगळे त्याचे दोस्त बनले होते ! कोणाचे नाव टायगर आहे, कोणाचे शेर्पा, कोणाचे मोती ते चंदूला पाठ होते. ज्या बंगल्यावर पहारेकरी असत, ते मात्र चंदू टाळीत असे. पण कुत्रे असोत, की पहारेकरी असोत, कुंपणाच्या बाहेर पडलेल्या फुलांची राखण कोणीच करीत नसे. जो कोणी तेथे पहिला पोचेल, तो त्या फुलांचा मालक ! चंदूला रातराणी पसंत पडे. तिचे झुबकेच्या झुबके परगावकरांच्या कंपौंडवरून बाहेर लोंबत असायचे. रातराणीच्या खालोखाल नंबर जाईजुईचा. पहाटेच्या अंधारात त्यांची पांढरी शुभ्र फुले दिसत मात्र चटकन; पण ती भारी लाजरी. सहसा कुंपणाची हद्द ओलांडायची नाहीत. त्यांना बाहेर खेचून आणायला आकडीचा प्रयोग करावा लागे. पण दान करावे तर प्राजक्ताने. “परडी परडी फुले ! तुझ्यान् वेचवेनात माझ्यान् वेचवेनात — ” असा एक उखाणा चंदूची बहीण त्याला घाली. त्याचे उत्तर होते, ‘ पण चंदूला वाटे की प्राजक्त. हेसुद्धा त्याचे उत्तर असायला काय हरकत असावी ? रोज पहाटे आपल्या धरतीमातेची अशी पूजा करणारे सुपुत्र दोनच. एक प्राजक्त आणि दुसरा बकुळ. तिसरी आहे ती मुलगी, सुरंगी.

चंदूला तांब्यांच्याकडचा प्राजक्त फार आवडे. प्राजक्तसुद्धा सगळे सारखे नसतात. तांब्यांच्याकडच्या प्राजक्ताची फुले टपोरी, स्वच्छ, पांढरी असत. स्वस्तिकासारख्या त्यांच्या पाकळ्या छानदार मुडपलेल्या असत. त्यांचा देठ लांबसर, पोवळ्याच्या रंगाचा असे. पाकळ्या स्पर्शाला मऊ, पण दिसायला टकटकीत दिसत. त्या प्राजक्ताच्या कळ्यांची अब्दागिरी चंदूने मंगळागौरीच्या वेळी कितीतरी पोरींना करून दिली असेल. चंदू फक्त रातराणीचे झेल किंवा प्राजक्ताची फुलेच आणीत होता असे नाही. तो आपल्या आकडीने जास्वंदीची बचक्याएवढाली लाललाल फुले, नाजूक, पिवळी सोनचाफ्याची फुलेही ओढीत असे. सामसूम बागेच्या भिंतीवरून आत उतरायला आणि गुलाब, ग्लाडीओला, निशिगंधावर डल्ला मारायला तो कमी करत नसे. कधी माळ्याच्या शिव्या खाव्या लागत, तर कधी कानशिलाखाली कोणाची चार बोटेही उमटत. या वेळी तसाच प्रकार घडला म्हणा किंवा घडायचे थोडक्यात बचावले म्हणा. घडले असे :

त्या दिवशी रविवार होता. हवेत गारठा होता. वेळ पहाटेची जरी नाही, तरी सकाळची होती. धुके पातळसर पसरलेले होते. गवतावरचे दव पावले भिजवीत होते. चंदूने पाटलांच्या गंधमादन बंगल्यातल्या फुलांनी लादलेल्या निशिगंधाच्या छड्यांचा वाफा आदल्या दिवशी सायंकाळीच हेरून ठेवला होता.एवढ्या सकाळी पाटलांच्या बागेत कुत्रेसुद्धा भेटणार नाही आहे चंदूचा कयास,म्हणून एका झेपेत चंदूने भिंत ओलांडली आणि तो अलगद पलीकडच्या हिरवळीवर उतरून सरळ निशिगंधाच्या वाफ्यात शिरला. झपाझप हातातल्या ब्लेडने त्याने दहावीस निशिगंधाच्या छड्या कापल्या आणि परतण्याच्या तो बेतात होता. इतक्यात सद-याचे मागचे शेपूट कुणी तरी जोराने खेचते आहे, असे त्याला भासले. झटक्यात तो मागे वळला आणि चंदूची वाचाच बसली ! तो महाभयंकर कुत्रा पुढच्या क्षणी आपले नरडे फोडणार, असे त्याला वाटले. पण तेवढ्यात त्याचे मनगट कोणीतरी पकडले आणि कोणाचा तरी करडा आवाज आला, “जॅकी, सोड त्याला. ”

“घाबरू नको. जॅकी काही करणार नाही तुला. बंगल्यात चल, ” पुन्हा तोच आवाज. पण कुत्र्याच्या तावडीतून आपण सुटलो याचेच चंदूला हायसे वाटले. त्याचे मनगट पकडणारा माणूस म्हणजे स्वतः रावसाहेब पाटीलच होते. पण ते काही आपल्याला चावणार नाहीत याची चंदूला खात्री होती.

बंगल्यात पाऊल टाकल्यावर रावसाहेब म्हणाले, “बैस तिथे त्या खुर्चीवर. कोण तू ?काय नाव तुझं ? शाळेत जातोस कीर नुसत्या उनाडक्या करतोस ?”

एका पाठोपाठ गोळ्या सुटाव्या तसे प्रश्न. पण पाटलांचा आवाज बराच मऊ झाला होता. चंदूला जरा धीर आला. पण रावसाहेबांनी दोन कानशिलात भडकवण्याऐवजी प्रश्न विचारले, त्यामुळे आपल्याला रडू येणार की काय, असे चंदूला वाटले. पांगून गेलेला धीर पुन्हा गोळा करून चंदू म्हणाला, “महापालिकेच्या वसाहतीत राहतो मी. शाळेत जातो. पाचवीत आहे, ” बळ करून चंदू कळवळून बोलला. “मला जाऊ द्या. परत असं करणार नाही. मारुतीची शपथ. ”

रावसाहेब आता मनमोकळेपणी हसले. त्यांनी विचारले, “एवढी भाराभर फुलं कशाला नेट होतास आज ? आणि भिंतीवरून आत येऊन ? गणपती तर केव्हाच  संपले. ”

“माझी बहीण आजारी आहे. तिच्यासाठी. ”

“तिच्या अंथरुणाभोवती काय मखर बांधायचा विचार होता की काय ?”

“मी कुठल्यातरी हॉस्पिटलात रोग्याच्या जवळ तशी फुलं ठेवलेली पाहिली होती. मला वाटलं, ताईसाठी तसं करावं म्हणजे ती लवकर बरी होईल. ” चंदू भाबडेपणाने बोलून गेला.

“काय होतंय तुझ्या बहिणीला ?”

“ताप येतोय. आठ दिवस झाले. ”

“एवढी तिला आणि तुला फुलांची आवड, तर घरी फुलझाडं का लावीत नाही ?”

“आमच्याकडं  कुठाय जागा ?”

“त्याचं बघता येईल. पण तू आता जा. परत भिंतीवरून यायचं नाही. समजलं ?”

चंदूने रावसाहेबांना नमस्कार केल्यासारखे केले आणि झपाझप पावले उचलीत तो घराकडे निघाला. त्याचे कानशील थाड थाड उडत होते. शरमेने तो मेल्याहून मेला झाला होता. त्याची सगळीकडून फजिती झाली होती. फुले तर मिळाली नाहीतच पण माळ्याला हुलकावण्या नाहीत, मार नाही, शिव्या नाहीत. छे छे असा फज्जा कधी उडाला नव्हता. चंदूला वाटले, रावसाहेबांनी पार जिरवली आपली.

पण सायंकाळी आणखी काही घडायचे होते. चंदूची आई व्हरांड्यात काही तरी निवडीत बसली होती. त्याचे वडील कचेरीतुन आल्यावर चहा पिऊन खुर्चीत जरा टेकले होते. ताई अजूनही तापातच होती. आणि चंदू खोक्याच्या कपाटांत काही  तरी धुंडाळीत होता. एवढ्यात चंदूची चौकशी करीत कोणी तरी आले. त्याच्या हातात निशिगंधाच्या तीन चार छड्या आणि डोक्यावर दोन कुंड्या होत्या. त्याला पाहून चंदूची आई म्हणाली, “चंदू इथेच राहतो. काय काम आहे त्याच्याकडे ?”

“ताई, पाटील रावसाहेबांनी ह्ये पाठवलंय चंदूसाठी. ते घेऊन आलो. ” तेवढे बोलणे होते आहे तेवढ्यात पाठोपाठ रावसाहेब स्वतः दाखल झाले. त्यांना पाहून चंदूचे धाबेच दणाणले. त्याचे वडीलही, “या रावसाहेब, “म्हणत व्हरांड्यात आले. पण ते देखील गांगरले होते. रावसाहेबांनी सरळ आत येत विचारले,

” चंदू, काय म्हणतेय तुझी ताई ? तिला फुलं हवीत ना ? पाणी घालून एखादा गंज नाही तर तांब्या ये घेऊन. शिवराम, ते निशिगंध दे इकडे. आणि त्या कुंड्या ठेव व्हरांड्यात उन्हाच्या बाजूला. ”

रावसाहेब सकाळी जसे प्रश्न ताडताड करीत होते, तसेच आताही बोलत होते. चंदूच्या आईने पाणी भरून गंज आणला तो घेऊन रावसाहेबांनी त्यांत निशिगंधाचे गुच्छ उभे केले. मग ती फुलदाणी चंदूच्या हाती देत ते म्हणाले,

“ठेव ती ताईच्या जवळ स्टुलावर. तिने डोळे उघडले की तिला निशिगंधाचे गुच्छ दिसायला हवेत ना ? आणि त्या कुंड्यात लावायला हे निशिगंधाचे कांदे. ते कसे लावायचे ते शिवराम दाखवेल तुला. तीन दिवसांनी पाणी देत जा. आणि फुलं आली की सांगायला ये मला. अरे हो, आणि ही दोन कलमं बोगनवेलीची. मेरी पामर जातीची आहेत. एकाच वेलावर पांढरी आणि तांबडी दोन रंगांची फुलं येतील. व्हरांड्याच्या खांबापाशी थोडा खड्डा घे नि त्यात लाव हे दोन फाटे. त्याला खतपाण्याची गरज नाही. अधून मधून पाणी देत जा की झालं. काटे असतात तेव्हा शेळीबिळी खाईल अशी भीती नाही. बघतो आता रोपं कशी वाढवतोस ते. आपल्या हातांनी वाढवलेल्या रोपांची फुलं पाहण्यात मजा. दुस-याची ओरबाडण्यात मजा कसली ?”

हे सगळे एवढे झपाट्याने झाले की रावसाहेब पाटील आपल्या वडलांना “बराय येतो, ” म्हणून चालू लागले. तरी चंदूला त्याचा पत्ता नव्हता. इतका तो या अनपेक्षित प्रकाराने गडबडून गेला होता. किती तरी वेळ ताईच्या उशाशी ठेवलेल्या त्या ऐटदार निशिगंधाकडे पाहात बसला होता.

त्या रात्री चंदूला स्वप्न पडले, ते कुंड्यातून सरळ काढलेल्या, फुलांनी डवरलेल्या निशिगंधाच्या छड्यांचे आणि तांबड्या पांढ-या झुबक्यांनी व्हरांड्यात लावलेल्या बोगनवेलीचे !

कै. ना. ग. गोरे
[ गोष्ट आणि चित्रे : ‘किशोर‘ जानेवारी १९७३ वरून साभार ]
छायाचित्र : ‘विकिपेडिया‘वरून साभार
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

अज्ञात
११.
अखंड गती

सूर्य, चंद्र व इतर ग्रह -तारे हे अखंडपणे फिरत आहेत. या अखंड गतीचा एक अतिशय मजेदार प्रयोग आपल्याला करता येईल. त्यासाठी आपल्याला बरणीचे एक मोठे गोल बूच, बाटल्यांची चार छोटी बुचे. दोन सारख्या लांबीच्या खराट्याच्या काड्या आणि कापराच्या चार वड्या एवढी सामुग्री लागेल. या वस्तू तुम्हाला अगदी सहज मिळण्यासारख्या आहेत.

प्रथम मोठे बूच ( फार मोठे असेल तर ) अर्धे कापा व आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्याला भोके पाडून त्याच्या मध्यातून खराट्याच्या काड्या आरपार काढा. बुचाच्या मध्यावर या काड्यांचा बरोबर काटकोन होईल, अशा रीतीने या काड्या बुचामधून काढल्या पाहिजेत. नंतर काड्यांच्या चार टोकांना चार छोटी बुचे खोचा. या बुचांना एका बाजूस अगोदर चाकूने किंवा ब्लेडने चिरा पाडून घ्याव्यात आणि त्यांत कापराच्या वड्या खोचून घालाव्यात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे कापराच्या वड्या बुचांच्या  एका बाजूस येतील, अशा रीतीने खोचल्या पाहिजेत. त्या समोरासमोर येता कामा नयेत.

आपले चक्र आता तयार झाले. आता एका टबात थंड पाणी भरा आणि हे चक्र त्यावर अलगद सोडा. आता काय गंमत होते पहा ! पाण्यात सोडल्याबरोबर आपले चक्र आपोआप गोलगोल फिरू लागेल. ते थांबणारच नाही. एक-दोन दिवस ते असे आपोआप फिरत राहील. ते फिरण्याचे थांबले तर कापूर संपला असे समजावे.

आपण जे चक्र तयार केलेत ते पूर्णपणे समतोल होण्याची खबरदारी घेण्यावर या प्रयोगाचे यश अवलंबून राहील, हे लक्षात ठेवा. बाहेरची बुचे सारख्या आकाराची असली पाहिजेत. त्याचप्रमाणे कापराच्या वड्याही सारख्या आकाराच्या व विजांच्या असणे आवश्यक आहे.

@@@

१२.
ध्वनी लहरींचा प्रयोग

आवाजाच्या लहरी एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जातात आणि म्हणून आपल्याला आवाज ऐकू येतो, ही गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे. रेडिओच्या मिडीयम (मध्यम ) , शॉर्ट ( आखूड ) आणि लॉंग (लांब ) अशा तीन ध्वनिलहरी असतात, हे तर तुम्हाला माहीत आहे. ध्वनीच्या लहरी असतात व एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी त्या प्रवास करतात, हे तुम्ही सिद्ध करू शकाल. त्यासाठी पुढे दिलेला मनोरंजक प्रयोग करा.

तुमच्या खोलीत मधोमध एक दोरी बांधा. धुणी वाळत घालायला दोरी बांधतात, तशी ही दोरी बांधावी. या दोरीवर एक रेशमाचा हातरुमाल पिनांनी अडकवून बांधा. या हातरुमालापेक्षा रेशमाचा अधिक मोठा असा एखादा कपडा घरात असेल तर तो आपला प्रयोग जास्त चांगला होईल. हा फडका दोरीवर टांगल्यानंतर तुम्ही या फडक्याच्या मधोमध पण त्यापासून एक इंच अंतर ठेवून उभे राहा. तुमचा कान फडक्याच्या बाजूस आला पाहिजे. नंतर तुमच्या एखाद्या मित्रास तळहातावर एक फुलपात्र घेऊन फडक्याच्या  दुस-या बाजूस उभे राहायला सांगा. मित्रास फुलपात्राच्या कडेवर एक अगदी बारीकशी टिचकी मारायला सांगा. फुलपात्राची ही किणकिण तुम्हाला अगदी स्पष्टपणे ऐकू येईल.

नंतर रेशमाचा फडका पाण्यात भिजवून पूर्वीप्रमाणे दोरीवर टांगता ठेवा आणि मित्रास पूर्वीप्रमाणेच फुलपात्रावर बारीकशी टिचकी मारायला सांगा. आता तुम्हाला फुलपात्राची किणकिण अगदी अस्पष्टपणे ऐकू येईल किंवा ऐकूसुद्धा येणार नाही.

आवाजात असा फरक का पडतो? याचे कारण असे की रेशमाचा फडका सुका होता तेव्हा टिचकी मारलेले फुलपात्र आणि तुमचा कान यांमध्ये फक्त हवाच होती. या वेळी ध्वनीच्या लहरींना कोणताच अडथळा न झाल्याने त्या तुमच्या कानापर्यंत सरळ येऊन पोचल्या. फडका पाण्याने भिजवल्यानंतर फुलपात्र आणि तुमचा कान यांमध्ये हवा, पाणी आणि हवा असे आले. ध्वनीच्या लहरी पाण्यापर्यंत पोचल्यावर त्या मागे परावर्तित झाल्या आणि विरून गेल्या. त्यामुळे तुम्हाला अस्पष्ट असा आवाज ऐकू आला. आहे आवाजसुद्धा फडक्याच्या दोन्ही कडांच्या पलीकडून आलेल्या हवेतील लहरींमुळेच तुम्हाला ऐकू येऊ शकला.

@@@

१३.
तुमचा आवाज कसा दिसतो ?

आवाज कसा दिसतो ? तुम्ही म्हणाल नक्कीच काही तरी चूक झाली आहे. आवाज दिसणे असे म्हणणे चूक तर खरीच. तरीसुद्धा एक सोपा प्रयोग करून आवाज आकृतीच्या रूपाने दाखवता येतो.

या प्रयोगासाठी एक मोठा टिनचा गोल डबा हवा. घरात असा एखादा निरुपयोगी डबा नक्कीच असेल. या डब्याच्या एका बाजूस मध्यभागी एक गोल भोक पाडा. डब्याचे झाकण काढून टाकून त्यावर शक्यतर खळीने एक ऑइल पेपर घट्ट ताणून बसवा. वाण्याचे किंवा इतर सामान अशा कागदांत बांधून येते. तसेच आई लोणच्याच्या किंवा मुरांब्याच्या बरण्यांची तोंडे घट्ट झाकून घेण्यासाठी असा कागद आणीतही  असेल. डब्यास पाडलेल्या भोकात रबराची किंवा प्लॅस्टिकची सुमारे एक दीड फूट नळी बसवा आणि नळीच्या बाहेरच्या टोकास काचेचे किंवा प्लास्टिकचे नरसाळे घट्ट बसवा. डब्याच्या तोंडावर लावलेल्या कागदावर थोडी सुकी रेती पसरा.


आपला ” ध्वनि मुद्रक ” तयार झाला. आता नळीला लावलेले नरसाळे तोंडाशी धरून एक चांगल्यापैकी स्वर काढा. तुम्ही आवाज करत असता, तेव्हा डब्यावरची रेती उडेल आणि तिची एक विशिष्ट आकृती तयार होईल. ही आकृती म्हणजे तुमच्या आवाजाचे चित्र होय. तुमचा स्वर ओसरत जाऊन शेवट गाठतो, तेव्हा तुमच्या आवाजाची ‘आकृती’ मोडून बिघडण्याची शक्यता असते. म्हणून आवाज मोठा असतानाच तोंड दूर घ्यावे.

दुस-या माणसाने आपले ‘ध्वनिमुद्रण’ करण्यापूर्वी डब्यावरची रेती पुन्हा नीट करावी. दोन चार वेळा नळीमधून आवाज काढल्यानंतर किती रेती ठेवावी, हे तुमच्या सहज लक्षात येईल. अय प्रयोगावरून तुम्हाला असे दिसून येईल की कोणाही दोन माणसांच्या आवाजाची ‘आकृती’ सारखी नाही. प्रत्येक माणसाच्या बोटाचे ठसे जसे वेगळे तशीच त्याच्या आवाजाची ‘आकृती’ पण वेगळी. आहे की नाही गंमत ?

– लेखक अज्ञात
[ लेख व चित्रे : ‘किशोर‘ जून १९७२ वरून साभार ]

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^ 
चित्रकारांचे दालन 
किया नंदन कामत, वय वर्षे १०. पुणे
प्रेषक ©️  सौ. रूपाली कामत 

किया नंदन कामत, वय वर्षे १०. पुणे

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
मधुबनी कला
– ©️  सौ. रुपाली कामत  
  rupali.kamat@gmail.com  
@@@@@@@@@@@@@@@
महत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@@@@@

हिंदुत्व 

प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असा वारसा 
 
प्रा. मनोहर रा. राईलकर

 
लेखांक १

( महाजालावर फिरताना (Hindu Wisdom) नावाच्या लेखांकडे माझं लक्ष गेलं आणि मोठ्या कुतूहलानं मी वाचू लागलो. तेव्हा एक भांडारच माझ्यापुढं उघडलं. वाचता वाचता मी स्तिमित होत होतो. ही माहिती अन्य हिंदु बंधुभगिनींनाही मिळावी, म्हणून मी त्यांचा अनुवाद करू लागलो. तो देताना प्रत्येक ठिकाणी मी कंसात मूळ इंग्रजीही पुरवलं आहे. वाचता वाचता तुमचं मन अभिमानानं भरून येईल. आणि हिंदुत्वाची अकारण टवाळी करणारे अडाणी असल्याचं दिसेल.)

आणखी एक अंग: प्राचीन भारतातील विमानविद्या ह्या विषयावरील दुसऱ्या लेखाचा समारोप करताना लिहिलेल्या शेवटच्या परिच्छेदातील काही माहिती पुन्हा पाहू.

एक बाब ओझरती येऊन गेली. ती वाचकांच्या दृष्टीस आलीच असेल असं वाटतं. हिंदूंनी विश्वसंचार केला हे खरं तर आहेच. तसं करताना त्यांनी आपल्या कला, विद्या आणि संस्कृतींचाही प्रसार केला, हेही तुम्ही नोंदलं असेल. युरोपीय देशांनीही विश्वसंचार केला आणि मोंगलांनी केला, अनेकांनी केला. पण तो तरवारीच्या, म्हणजे शस्त्रास्त्रांच्या धाकाखाली केला. तसं करताना त्यांनी लुटालूट केली, महिलांवर अत्याचार केले, नगरं उद्ध्वस्त केली, मंदिरांची आणि वास्तूंची तोडफोड केली, ग्रंथांची जाळपोळ केली किंवा पळवून नेले. दहशतीच्या साह्यानं आपापल्या संप्रदायांचाही प्रसार केला. स्पष्ट शब्दांत त्याला बाटवाबाटवी म्हणतात. ह्याचा पुरावा भारतीयांना देण्याची आवश्यकताच नाही. आजही ते ठळक रूपात जागोजाग आढळतात. मग हिंदूंच्या विश्वसंचाराचं वैशिष्ट्य काय?

हिंदूंच्या विश्वसंचाराचं वैशिष्ट्य: एक, हिंदूंनी वरच्या वेड्यावाकड्या प्रकारांतलं काहीच आणि कधीच केलं नाही, त्यांतली एकही कृति केली नाही. कारण, विश्वसंचारामागील त्याचं ध्येय होतं कृण्वन्तो विश्वम् आर्यम्। सर्व जगाला सुसंस्कृत करणं हाच त्यांचा मुख्य उद्देश. आता याची प्रमाणं, पहिल्याच म्हणजे प्रस्तुत लेखात पाहू, म्हणजे झालं. आणि तेसुद्धा परकीय विद्वानांच्याच शब्दांतून पाहू. हे सगळंच्या सगळं एका लेखात संपेल, असं वाटत नाही. म्हणून पहिल्या लेखात असं म्हटलं. संपलं तर, अर्थातच, पुढच्या लेखांना अस्तित्व राहणार नाही. पण, तसं वाटत नाही.

Arthur Llewellyn Basham 2

१. ऑर्थर लेवलीन बाशाम

(१) ए. एल. बाशाम (Arthur Llewllyn Basham (२४ मे १९१४ – २७ जानेवारी १९८६)) हे अमेरिकन गृहस्थ म्हणजे भारतीय इतिहासावर अधिकारवाणीनं बोलू शकणारे एक विद्वान. रोमिला थापर, व्ही. एस्. पाठक त्यांचेच विद्यार्थी. ते म्हणतात: धर्मयुद्धांबद्दलचे नियम घालून देणाऱ्या प्राचीन स्मृतिकारांपैकी इतका उदात्त नियम मनुविना अन्य कुणीच मांडला नसेल. (No other ancient lawgiver proclaimed such noble ideals of fair play in battle as did Manu.) भारतीय युद्धांचा इतिहास पाहिला तर युद्धाशी प्रत्यक्ष संबंध नसणाऱ्यांना युद्धाचा कधी उपद्रव झाल्याची उदाहरणं दिसत नाहीत. पराभूतांना दास करून आपापल्या देशांत नेऊन त्यांचा शारीरिक छळ केल्याची बीभत्स अमानुष उदाहरणं, जशी असीरियांतील राजे लोकांच्या युद्धात मिळतात, तशी प्राचीन भारतातील युद्धांत एकही उदाहरण नाही. भारतीय संस्कृति-सभ्यतांचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यांतील मानवता (In all her history of warfare, Hindu India has few tales to tell of cities put to the sword or of the massacre of non-combatants. The ghastly sadism of the kings of Assyria, who flayed their captives alive, is completely without parallel in ancient India. To us the most striking feature of ancient Indian civilization is its humanity.)(स्रोत: The Wonder That Was India – By A L Basham p. 8 – 9).

( टीप: जनतेशी कसं वागावं, याबद्दल आपल्या सरदारांना शिवाजीराजांनी दिलेल्या सूचना आपल्याला माहीत आहेत. तशा सूचना देण्याची पाळी तरी त्यांच्यावर का आली असावी, आणि सरदारांकडून तसं वर्तन स्वाभाविकपणंच का झालं नसावं, असं माझ्या मनात आलं. मोंगलांच्या इतक्या वर्षांच्या वागणुकीमुळं जनतेशी असंच वागायचं असतं अशा प्रथा पडल्या असतील, असं उत्तर विचारांती मला मिळालं. तुम्हाला काय वाटतं?)

 हॅरॉल्ड होरेस विल्सन

(२) हॅरॉल्ड होरेस विल्सन (Harold Horace Wilson (1786-1860) भारतीय संस्कृतीचे नाणावलेले अभ्यासक, पौर्वात्य संस्कृतीचे चांगले जाणकार आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठातील संस्कृतचे प्राध्यापक. समग्र विल्सन, विष्णुपुराण यांचे लेखक आणि ब्रिटिश काळातील भारतीय इतिहासाचे सहलेखकसुद्धा म्हणतात, हिंदूच्या युद्धाचे नियमही उदात्त, वीरोचित आणि मानवतापूर्ण असत. निःशस्त्र व्यक्ति, स्त्रिया, वृद्ध आणि जित ह्यांच्याशी क्रूरपणं वागण्याला बंदी घातलेली असे, (The Hindu laws of war are very chivalrous and humane, and prohibit the slaying of the unarmed, of women, of the old, and of the conquered.)

ते पुढं लिहितात, अगदी युद्ध प्रत्यक्ष चालू होतं तरी शेतकरी नित्याप्रमाणं शांतपणं आपापली कामं करीत असायचे, आणि युद्धांचा त्यांना कुणाला कसलाही उपद्रव होत नसे, असं सातव्या शतकात, नालंदा विद्यापीठात आलेल्या आलेल्या ह्युएन त्संग नावाच्या चिनी यात्रेकरूनं नोंदलं आहे. (At the very time when a battle was going on, he says, the neighboring cultivators might be seen quietly pursuing their work, – ” perhaps ploughing, gathering for crops, pruning the trees, or reaping the harvest.” Chinese pilgrim to Nalanda University, Hiuen Tsiang affirms that although the there were enough of rivalries and wars in the 7th century A.D. the country at large was little injured by them.)

(3) येमेन फार जुन्या कथा कशाला? नुकताच घडलेला प्रसंग सर्वांनाच माहीत असेल. सर्वार्थानं अस्थिर जीवन झालेल्या येमेनमध्ये नाना देशांची माणसं अडकली होती. अडकलेल्या भारतीयांना सोडवण्याकरता विजयकुमार सिंह गेलेच होते. पण, त्यांनी केवळ भारतीयांचीच काळजी घेतली असं नव्हे. तर आणखी कित्येक (एकूण ४१) देशांतील नागरिकांचीही सुटका केली. त्यात जन्मापासूनच शत्रुत्वाचा अवलंब करून भारताशी सातत्यानं कृतघ्नतेनं वागणाऱ्या बांगला देशाच्या नागरिकांनाही त्यांनी सोडवून आणलं. अमेरिकेतील काही नागरिकांनाही सुखरूप परत आणलं. केवळ तीन दिवसांच्या एका अर्भकालाही, अर्भक-पेटीतून आणि एका डॉक्टरांना बरोबर ठेवून आणलं. इतर ज्या देशांच्या नागरिकांना सोडवून आणलं त्यातले काही असे: बहारिन, क्यूबा, झेक रिपब्लिक, जिबुटी, फ्रान्स, जर्मनी, हंगेरी, इराक, इंडोनेशिया, आयर्लंड, लेबेनॉन, मलेशिया, मालदीव, नेपाळ, नेदरलँड, फिलिपाइन्स, रोमानिया, स्लोव्हानिया, श्रीलंका, सिंगापूर, स्वीडन, थायलंड आणि तुर्की. आणि विशेष म्हणजे, सोडवून आणलेल्या ४,०७२ भारतीयांपैकी ३,७५५ मुसलमान आहेत. मोदींवर आणि एकूणच सरसकट हिंदुत्ववाद्यांवर मुस्लीम द्वेष्टे असल्याचा आरोप करणाऱ्यांचा मुखभंग झाला आणि त्यांना परस्पर मिळालेलं हे उत्तर आहे. उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम्।

 हू शीह

(४) हू शीह (Hu Shih) नावाच्या, चीनच्या अमेरिकेतील राजदूतांचं म्हणणं आपण त्यांच्या शब्दांतच वाचू यात. ते म्हणतात, हिंदूंनी चीनवर वीस शतकं सांस्कृतिक प्रभाव गाजवला आणि अधिराज्यही केलं. पण, त्याकरता त्यांना सीमेपलीकडून एकही सैनिक पाठवावा लागला नाही. (India dominated and ruled China culturally for twenty centuries, without having required to send a single soldier across her border.)

तेच पुढं म्हणतात, सर्वार्थानं इतक्या संपन्न, इतक्या सुंदर, इतका विलोभनीय दिनक्रम असलेल्या आणि वैश्विक व आध्यात्मिक स्पष्टपणा असलेल्या धर्माचं दर्शन चीनला पूर्वी कधीच झालं नव्हतं. हिरेमाणकांनी मढलेल्या, चमचमणाऱ्या दागिन्यांनी भरलेल्या सदनासमोर, एकाएकी उभं राहिल्यानंतर एखादा दरिद्री याचक जसा गांगरून जाईल, गोंधळून जाईल आणि त्याला जितका पराकाष्ठेचा आनंद होईल तसं चीनला झालं होतं. नंतर त्या संपन्न दात्याकडे त्यानं निर्धास्तपणं मागणी केली आणि मनसोक्त उचल केली. त्यांतील पहिली उचल होती ती भारताच्या धार्मिक जीवनाची. त्याबद्दल चीन भारताचा किती ऋणी आहे, ते सांगून कधीच पूर्ण होणारं नाही. (Never before had China seen a religion so rich in imagery, so beautiful and captivating in ritualism and so bold in cosmological and metaphysical speculations. Like a poor beggar suddenly halting before a magnificent storehouse of precious stones of dazzling brilliancy and splendor, China was overwhelmed, baffled and overjoyed. She begged and borrowed freely from this munificent giver. The first borrowings were chiefly from the religious life of India, in which China’s indebtedness to India can never be fully told. (स्रोत: India and World Civilization – By D. P. Singhal  p. 338)
टीप: पूर्वी केव्हा तरी मी एक कथा वाचली होती. तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठांत विविध देशांतले लक्षावधी विद्यार्थी, शिकण्याकरता येत. तसे काही चिनी विद्यार्थीही आले होते. नंतर परतताना त्यांच्यासह दोन हिंदू शिक्षकही निघाले. त्यांनी आपल्यासह पुष्कळ ग्रंथही नेले होते. समुद्रप्रवासात वादळ झालं, तेव्हा नौकाचालक म्हणाला, भार कमी करण्याकरता आता हे ग्रंथ टाकून द्यायला हवेत. नाही तर जहाज वाचणार नाही. तेव्हा बरोबर गेलेले हिंदु शिक्षक म्हणाले, भारच कमी करायचा असेल तर आम्ही समुद्रात उड्या टाकतो. पण, ग्रंथ टाकू नका.
ही कथा कितपत सत्य आहे, मला माहीत नाही. पण ती सत्य असावी, असा वाटणारा एक प्रसंग मला स्वा. विवेकानंदांच्या चरित्रात आढळला. पहिल्या वेळी (१८८२) जेव्हा स्वामीजी अमेरिकेला गेले, तेव्हा ते पूर्वेकडून गेले होते. वाटेत काही कारणाकरता तीनचार दिवस त्यांचं जहाज हाँगकाँगला थांबलं. तेव्हा, चला शहर पाहून येऊ, असं म्हणून बरोबर एक वाटाड्या घेऊन स्वामीजी निघाले. हिंडता हिंडता, त्यांना एक बुद्ध मंदिर लागलं. आणि स्वामीजी आत जाऊ लागले. तेव्हा वाटाड्यानं त्यांना थोपवलं. तो म्हणाला, “आत जाऊ नका, इथले सेवक आपल्याला मारतील.” पण तो पळून जाऊ नये याकरता त्याचा हात पकडून ते तसेच आता जाऊ लागले. तेव्हा तिथले दोघेजण हाती काठ्या घेऊन त्यांच्या अंगावर आलेच. वाटाड्या पळून जाऊ लागला, तेव्हा स्वामीजी त्याला म्हणाले, “हिंदु योग्याला चिनी भाषेत काय म्हणतात, तेवढं सांग मला, म्हणजे झालं.” वाटाड्यानं शब्द सांगितल्यावर ते स्वतःकडे बोट करून मी हिंदु योगी आहे, असं मारण्याच्या उद्देशानं आलेल्या त्या रक्षकांना स्वामीजी म्हणाले. नवल म्हणजे ते दोघे तत्काल जागीच थांबले, त्यांनी स्वामीजींना वाकून प्रणाम केला आणि आशीर्वादाची मागणी केली. तेव्हा कागदाच्या कपट्यांवर ओम् लिहून स्वामीजींनी त्यांना कागद दिले. ते मस्तकी लावून त्यांनी जपून ठेवले. आणि स्वामीजींना आत चलण्याची विनंती केली. तिथं बंगाली लिपीत लिहिलेले संस्कृत ग्रंथ स्वामीजींना दिसले. (स्वामीजींचं चरित्र पाहून कुणीही ह्या कथेबद्दल निरसन करून घेऊ शकतो.)

लिन उटांग

(५) लिन युटांग (Lin Yutang : १० ऑक्टोबर १८९५ – २६ मार्च १९७६) नावाचे एक चिनी विद्वान आणि The Wisdom of China and India ह्या पुस्तकाचे लेखक लिहितात, “हिंदु स्वाभाविकतःच अध्यात्मवादी असतात. अध्यात्मवादी म्हणजे ईश्वराशी थेट तादात्म्य पावण्याचा प्रयत्न करणं, जिवाशिवाची भेट घडवण्याचा प्रयत्न करणं. संपूर्ण वैदिक तत्त्वज्ञानाची केवळ हीच धडपड असल्याचं दिसतं.” ते पुढं लिहितात, “कॉलेज जीवनात, भारतीयांच्या रामायण आणि महाभारत ह्या महाकाव्यांचं मी जेव्हा प्रथमच वाचन केलं, तेव्हा माझ्या मनात भारताबद्दल प्रेम आणि खऱ्या आदराची भावना उपजली.” (My love and true respect for India was born when I first read the Indian epics, the Ramayana and the Mahabharata in the present translation in my college days.)
ते पुढं लिहितात, ह्या  दोन महान ग्रंथांमुळं प्राचीन हिंदुस्थानच्या वातावरणाकडे, आदर्शांकडे आणि रिवाजांकडे आपण ओढले जातो. हे काम उपनिषदांवर लिहिलेल्या शेकडो ग्रंथांमुळंसुद्धा होणार नाही. त्या ग्रंथांतील हिंदु स्त्री-पुरुष आपल्यापुढं जणु, प्रत्यक्ष अवतरतात. (In these two masterpieces we are brought closer to the atmosphere, ideals and customs of ancient Hindu life than by a hundred volumes of commentary on the Upanishads, and through them Hindu ideals, as well as Hindu men and women, become real to us.)
हिंदूंच्या कल्पनाशक्तीतून प्राचीन वाङ्मयात असले जे महान ग्रंथ निर्माण झाले, त्यांची तुलना केवळ प्राचीन होमरच्या काव्याशीच करता येईल. ह्या ग्रंथांतील व्यक्तींवरून हिंदु सभ्यता किती संपन्न आहे, तेही स्पष्ट होतं. (And the fact that Hindu imagination produced such masterpieces of literature, closely rivaling Homer in antiquity and in beauty and power of portraying human passions, is definite pledge of the worth and richness of the Hindu civilization.)
हिंदूंच्या सर्जनशील कल्पनाशक्तीतून निर्माण झालेलं सीतेचं चरित्र, इतकं उदात्त, आणि पवित्र आहे. की अशा वात्सल्यपूर्ण, भक्तियुक्त आणि त्यागमय स्त्रीचरित्राला साऱ्या जगातल्या वाङ्मयात कुठंही तोड सापडणार नाही. (The creative imagination of the Hindus has conceived no loftier and holier character than Sita; the literature of the world has not produced a higher ideal of womanly love, womanly truth, and womanly devotion.)
धार्मिक विचार आणि काल्पनिक कथावाङ्मय ह्या विषयांत भारत चीनचा गुरु होता. त्रिकोणमिति, वर्गसमीकरणे. व्याकरण, ध्वनिशास्त्र, अरबी भाषेतील कथा, प्राण्यांच्या तोंडून वदवलेल्या पंचतंत्रांतील बोधकथा, बुद्धिबळाचा खेळ, तत्त्वज्ञान अशा नाना विषयांत तो सर्व जगाचाच गुरु होता. बोकॅशिओ, गटे, हर्डर, शोपेनहौअर, इमर्सन आणि इसापसुद्धा ह्या सर्वांनी भारताकडूनच प्रेरणा घेतली. (India was China’s teacher in religion and imaginative literature, and the world’s teacher in trigonometry, quadratic equations, grammar, phonetics, Arabian Nights, animal fables, chess, as well as in philosophy, and that she inspired Boccaccio, Goethe, Herder, Schopenhauer, Emerson, and probably also old Aesop.)
भारतानं कितीतरी संप्रदायांना जन्म दिला. आणि चीननं अगदी नगण्य. भारतानं जन्म दिलेल्यातला थेंबभर संप्रदायसुद्धा चीनच्या डोक्यावरून जाऊन तो त्यातच बुडून जाईल. ज्या देशांकडे आध्यात्मिक वातावरणाची उणीव आहे, त्यांनी जगातल्या दुसऱ्या कोणत्याही देशापेक्षा भारताकडेच वळायला हवं, हा तर अगदी तर्कसंगत निष्कर्ष आहे. (India produced too much religion and China too little.” A trickle of Indian religious spirit overflowed to China and inundated the whole of Eastern Asia. It would seem logical and appropriate that any one suffering from a deficiency of the religious spirit should turn to India rather than to any other country in the world.)
केवळ भारतातच धर्म जिवंत रूपात दिसतो. भारत म्हणजे अद्भुत कथाकादंबऱ्यांचं माहेरघरच होय. एकूण हिंदु मनच असं सर्जनशील असावं. कादंबरी-कथांची निर्मिती हिंदुस्थानात कधीच थांबणार नाही. प्राणिकथा, इसापच्या आणि इतरांच्या कथांचं संपादन करणारा अर्नेस्ट ऱ्हाइस प्रास्ताविकात म्हणतो, “प्राणिकथांना जन्म इसापनं दिलाच नाही. आणि ग्रीसनं तर सुतराम दिला नाही, हे आपल्याला मान्य करायला हवं. कुणी दिला, ते शोधण्याकरता आपल्याला पूर्वेकडे जायला हवं, कथा निर्माण करणाऱ्या हितोपदेशाचं उत्खनन करायला हवं. तेव्हा कुठं ह्या प्राचीन कथांचा उगम आपल्याला गवसेल. अरबी भाषेतील रात्रीच्या कथांचा, अगदी त्यांतील सिंदबादच्या प्रवासी कथांचा उगमसुद्धा हिंदु वाङ्मयांतच आहे. ह्या कथांचं मूळ हिंदूंचं वाङ्मय आहे, हे नाकारता येणार नाही.” त्याचं हे म्हणणं न्याय्यच आहे. (It is apparent that only in India is religion still a living emotion.) India is the home of fables…one must say that the Hindu mind is fabulous. The genius for creating fables seems inexhaustible in Indian literature….Ernest Rhys, in his Introduction to Fable, Aesop and Others justly remarks, “We have to admit that the beast-fable did not begin with him (Aesop), or in Greece at all. We have, in fact, to go East and to look to India and burrow in the ‘tale of tales’ of Hitopadesa to get an idea how old the antiquity of the fable actually is. When one remembers also that many of the stories in the Arabian Nights, including that of the famous Sindbad the Sailor, are of Hindu origin, it is not easy to accept the view that such tales are not of native Indian growth.)
हिंदूंची सर्जनशक्ती फार उच्च पातळीची आहे. आणि खरं तर सर्व जगाचं विनोदी वाङ्मय त्यांनीच संपन्न केलं आहे. त्यात अरबी रात्र-कथांचाही समावेश होतोच. (The Indian culture is highly creative and in fact has enriched the world literature with the droll humor that we associate with the Arabian Nights.) (स्रोत: The Wisdom of China and India – By Lin Yutang p. 3-4, 135 -141 आणि 265-7).
दुर्दैवानं आजच्या चिनी राजकारण्यांना त्याचं विस्मरण झालं असावं. त्यामुळंच त्यांचं अकारण कुरापती काढण्याचं, पाकिस्तानला साह्य देण्याचं कार्य चालू आहे. नुकतीच चीनच्या अध्यक्षांनी शस्त्रास्त्रांचं साह्य दिल्याचं माहीतच आहे.

जॉन ग्रीनलीफ विटियर

(६) जॉन ग्रीनलीफ विटियर ( १७ डिसेंबर १८०७ – ०७ सप्टेंबर १८९२) . John Greenleaf Whittier) अमेरिकेत जन्मलेला एक बुद्धिमान कवी. त्याला इमर्सनकडून प्रेरणा मिळाली. एकदा त्यानं इमर्सनकडून भगवद्गीता वाचायला मागून घेतली. तो म्हणतो, “हे अतिशय विलक्षण पुस्तक आहे. ते वाचल्यामुळं पूर्वेकडील धार्मिक ग्रंथांबद्दल मला अतिशय कुतूहल वाटू लागलं आहे.” (John Greenleaf Whittier (1807-1892) was a talented poet who was influenced by Emerson and from whom he borrowed a copy of the Bhagavad Gita. To Emerson he wrote: “I will e’en keep it until I restore it to thee personally in exchange for George Fox (founder of the Society of Friends, the Quakers). “It is a wonderful book-and has greatly excited my curiosity to know more of the religious literature of the East.” स्रोत: The Oriental Religions and American Thought (Nineteenth-Century Explorations), Carl T. Jackson –  Greenwood Press, London, England, 1981, p. 80.)

मॉरिस विंटरनित्स

(७) मॉरिस विंटरनित्स (Maurice Winternitz : २३ डिसेंबर १८६३- ०९ जानेवारी १९३७)) सुप्रसिद्ध भारतज्ञ.  Indian Literature and World Literature ह्या पुस्तकाचा लेखक. तो सांगतो, युरोपामधील सांख्य तत्त्वज्ञानावरील एक सर्वश्रेष्ठ अधिकारी असलेला गार्ब (Garbe) म्हणतो, “हेराक्लिटोस (Heraklitos), एम्पेडोकल्स (Empedokles), अँक्झॅगोरस (Anxagoras), डेमोक्रिटोस (Demokritos) आणि एपिकुरोस (Epikuros) इत्यादी तत्त्वज्ञांवरही सांख्य तत्त्वज्ञानाचाच परिणाम असावा, असं मला वाटतं. आणि त्यामुळं पायथागोरसवरही हिंदु तत्त्वज्ञानाचा परिणाम झाला आहे, हे सिद्ध झाल्यासारखंही होतं, असं मला वाटतं. तद्वतच ज्ञेयवादी (Gnostic) आणि नवप्लेटोवादी (Neo-Platonic) तत्त्ववेत्यांवरही हिंदु तत्त्वज्ञानातील कल्पनांचाच परिणाम आहे.” (स्रोत: Manu: A Study in Hindu Social Theory – By Kewal Motwani p. 230).
हा ऑस्ट्रेलियन विद्वान प्राच्य विद्यांचा फार मोठा अभ्यासक (Orientalist.) होता. भारताचा वाङ्मयीन इतिहास आम्हाला प्रत्यक्षात मानवजातीचाच इतिहास असल्याप्रमाणं वाटतं. आणि त्या दृष्टीनं पाहता भारतीय वाङ्मय जितकं आमचं आहे, तितकंच ते तुमचंही आहे. महान व्यक्तींचे विचार आणि कल्पना एखाद्या विशिष्ट देशालाच लागू न पडता, सर्व मानवजातीलाच लागू पडतात. (For the history of the literary treasures of ancient India, appears to us only as part and parcel of the history of man. In this sense, Indian literature is as much ours as it is yours. The ideas and thoughts of great men belong to mankind, and not to any one country or nation only. स्रोत: Some Problems of Indian Literature – By Maurice Winternitz).

(८) एम. ए. शेरिंग (१८२६-१८८०.Mathew Atmore Sherring) हा १९व्या शतकातील एक प्रसिद्ध प्रॉटेस्टंट मिशनरी, भारतज्ञ आणि अनेक पुस्तकांचा लेखक. काशी शहराच्या प्राचीनतेचं वर्णन करताना त्यानं इराक आणि मध्य युरोपातील काही नगरांबद्दल उल्लेख करून म्हटलं, “ही शहरं जेव्हा वर येण्याकरता धडपडत होती, तेव्हा काशी त्या महत्पदाला पोचलेलंच होतं.” (When Babylon was struggling with Nineveh for supremacy, when Tyre was planting her colonies, when Athens was growing in strength, before Rome had become known, or Greece had contended with Persia, or Cyprus had added lustre to the Persian monarchy, or Nebuchadnezzar had captured Jerusalem, and the inhabitants of Judaea had been carried into captivity, she (Varanasi) had already risen to greatness, if not to glory.)(स्रोत: Banaras – City of Light – By Diana L. Eck p. 4-5).
(क्रमशः)
प्रा. मनोहर रा. राईलकर   
railkar.m@gmail.com
9822067619
[ छायाचित्रे विकिपीडिया व आंतरजालावरून साभार ]
@@@@@@@@@@@@
आजची कविता 
वर्षा पेठे 
vnpethe@gmail.com
@@@@@@@@@@@@@
बसले आपुल्या माथी…

सचिन उपाध्ये 


पुष्कळ दिवसांपासून एक गोष्ट मनात सारखी पिंगा घालतेय. सगळीकडे सतत सांगितलं जातं की हे माहितीचं युग आहे ( पण ज्ञानाचं आहे का?). हे प्रसार माध्यमांच्या हुकूमतीचं युग आहे, हे स्पर्धेचे युग आहे…
फक्त प्रसार माध्यमाचा विचार करूया किंबहुना त्यातील व्हॉट्स् अ‍ॅपविषयीच विचार करूया. कितीतरी प्रकारची माहिती, गाणी, चित्रफिती, राजकारणविषयक असं रोजच्या रोज रतीब घातल्याप्रमाणे व्हॉट्स् अ‍ॅपधारकांकडे येऊन पडत असतं. आलेला मजकूर आपण काही वेळा व्यवस्थित वाचतो तर कधी वेळेअभावी सोडूनही देतो. नुसती नजर फिरवून बरं वाटलं, तर इतरांनाही अग्रेषित (forward) करतो. पण काय हो, किती वेळा आपण त्यावर नीट विचार करतो? आलेल्या मजकूराची सत्यासत्यता पडताळून पाहतो का? हा विषय कुणासमोर छेडला तर समोरचा माणूस बऱ्याचदा म्हणतो, ‘जाऊ दे ना! ज्याला वाचायचं तो वाचेल, नाही तो सोडून देईल. कशाला एवढा काथ्याकूट करायचा?’ अशी कणाहीन, शरणागत अवस्था बहुतेकांची पाहायला मिळते. पण या धोरणामुळे रतीब कशाकशा प्रकारचा पडतो पहा. मोजकीच उदाहरणं देतो.

१. Today is Charlie Chaplin’s 125th birth anniversary. Here are three apt quotes made by him…असं म्हणून बरंच काही लिहिलेलं असतं. हे सगळं कुठल्याही तारखेला आपल्याकडे येऊन धडकतं आणि मग पुढेही जात राहतं. वास्तविक पाहता चार्लीची जन्मतारीख आहे १६ एप्रिल १८८९. बरं त्याच्या नावावर खपवलेली वाक्यं तरी खरी असतील का? मला नाही वाटत! खलील जिब्रानचं एक वाक्य :- ‘I like walking in the rains because no one can see my tears’.चार्लीच्या नावें खपवलं जातं. हीच परिस्थिती स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी आणि अनेक प्रसिद्ध व्यक्तीच्या उद्गारांबाबत पाहायला मिळते. तपासून पाहायची सवय मी स्वत:ला लावतोय म्हणून म्हणतोय. पुलंच्या भाषेत सांगायचं तर अहमदशहाची शेंडी अब्दालीला लावण्याचा प्रकार घडत असतो. आता इतिहासाचा विषय निघाला म्हणून हे उदाहरण बघा.

२. शिवाजी महाराजांचा मृत्यू हा विषप्रयोगाने झाला…तो सोयराबाईंनी घडवला…ब्राह्मणांनी घडवला वगैरे वगैरे काहीही येतं. आपल्याला जो कोणी पाठवतो त्याला विचारलं तर तो म्हणतो,” काय माहीत? मला कोणीतरी पाठवलं ते मी तुला पाठवलं”. “कुठल्या पुस्तकांत लिहिलंय?” असं विचारलं तर काहीच उत्तर नसतं. म्हणे, असं ऐकलंय. एखादा उत्सुक म्हणतो की “मग खरं काय आहे तू तरी सांग बाबा!” अशा मंडळीना माझं उत्तर असतं की शिवाजी महाराज आयुष्यभर इतके दक्ष होते की निकटची लोकही घातपात करू शकत नव्हते. अहो जो मनुष्य औरंगजेबाच्या कचाट्यात सापडलेला असतानाही स्थिर व सावध होता तो इतका सहज विषप्रयोगाला बळी पडेल? मुलाचा, भावाचा व बापाचाही कर्दनकाळ ठरलेला औरंगजेब, महाराजांवर विषप्रयोग करू शकला नाही तिथे इतरांची काय टाप? ज्येष्ठ अभ्यासकांपैकी एकही जण विषप्रयोगाच्या विधानाला दुजोरा देत नाही.

३. सणासुदीच्या निमित्ताने काहीही माहिती पसरवली जाते. एकदा अशाच एका गटावर (ग्रुपवर) आलं, ‘संभाजी महाराजांना वीरमरण गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी आलं हे खरं आहे. पण त्यांच्या विरोधात असलेल्या ब्राह्मणांनी त्या निमित्ताने गुढीपाडवा साजरा करायला  सुरूवात केली’. आता या हास्यास्पद विधानावर काय करावे, अशा विचारात मी असतानाच माझ्या एका मित्राने ताडकन् लिहिले- गुढीपाडव्याचा उल्लेख ज्ञानेश्वरीत आहे. म्हणजे हा सण कितीतरी आधीपासून चालत आलाय.ती ओवीच देतो मी, म्हणजे त्यावर वादच नको.
अधर्माची अवधि तोडीं| दोषांचें लिहिलें फेडीं| सज्जना करवि गुढी| उभवीं मीं|| (४-५१)

ज्ञानेश्वरीत अशा अजून चार-पाच ओव्या आहेत. (आभार:मित्रवर्य सुधांशु अत्रे).
त्यामुळे ब्राह्मणांनी हा सण सुरू केल्याचा दावाही निकालात निघतो.

४. कपोलकल्पित विधानं पसरवण्याच्या चढाओढीत लोकांनी डॅा.प्रकाश आमट्यांनाही बदनाम करण्याचं सोडलं नाही. त्यांच्या नावावर एक वैद्यकीय शोध (की जावईशोध?) खपवला जातो. लिंबू डीप फ्रीजमध्ये ठेवा. कडक झाले की किसणीवर किसा व खा इत्यादी. कर्करोगावर अत्यंत गुणकारी…डॉ.नी स्वत: या विधानांचा विरोध केल्याचं मी वाचलंय.

ज्ञानासाठी डोळे नि बुद्धीची कवाडं उघडी ठेवा असं कंठशोष करून सांगितलं जातं ; पण हे असलं काहीतरी माथ्यात घुसडवून घ्यायचं? वर उल्लेखिल्याप्रमाणे याला ज्ञान तर सोडाच पण माहिती तरी कशी म्हणायची? जे खरं नाही ते कुठल्या चौकटीत बसवायचं ते ज्याने त्याने ठरवायचं. मला तर वाटतं हे सगळं युद्धाचं युग आहे. यात कुणी वेगवेगळ्या राजकीय पक्षांवर, नेत्यांवर, संस्कृतीवर हल्ले करत असतं. काही वेळा जातीचं, धर्माचं राजकारण साधलं जातं. मध्यंतरी दक्षिण भारतातल्या एका अणु ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात तथाकथित एन.जी.ओ.नी निदर्शनं केली. चौकशीअंती लक्षात आलं, त्या लोकांना देशाबाहेरील संघटना फूस लावत होत्या व आर्थिक मदतही. त्याचप्रकारे  व्हॉट्स् अ‍ॅपवर देखील चुकीची माहिती पसरवण्यात असा कुणाचा छुपा हेतू असेल का? नक्कीच असू शकतो. मराठा समाजाला ब्राह्मणाच्या विरुद्ध उभा करा, विदर्भाला उर्वरीत महाराष्ट्रासमोर उभा करा. शेतकऱ्याला नोकरदार वर्गासमोर, इत्यादी अनेक उदाहरणं यातून डोळ्यांसमोर येत जातात. हे सगळं समाजात दुहीचंच विष पेरतं, हे उघड आहे. हाच प्रकार औषधं, वस्तू, प्रेक्षणीय स्थळं, भाषा, संस्कृती, महान व्यक्तींची कार्ये अशा अनेक बाबींत दिसून येतो.

ईश्वराचं अस्तित्व आहे की नाही? मनुष्याला पुनर्जन्म मिळतो की नाही, यांवर वितंड वाद घालणारा व स्वत:ला पुरोगामी म्हणवणारा वर्ग व्हॉट्स् अ‍ॅपवरच्या जंजाळात अंधश्रद्धा कशी काय बाळगू शकतो? होय! ‘अंधश्रद्धा’ शब्द मी जाणीवपूर्वक व जबाबदारीने वापरतोय. एखाद्या विषयात आपल्याला विशेष माहिती नाही, अभ्यास करण्याची सवड किंवा आवडही नाही, तरीही आपण ते स्वीकारतो. प्रसंगी चुकीची गोष्ट पसरवण्यास हातभार लावतो याला अंधश्रद्धा नाही म्हणायचं, तर काय? दुसरा एक गट असा असतो-आपल्याला काय त्याचं? असा विचार करणारे माझ्या मते हे मुर्दाड मनाचे प्रतीक असतात. एखाद्या गोष्टीवर विचारच करायचा नाही हे जणू व्रतच घेतलेलं आहे. व्हॉट्स् अ‍ॅपवर बरंच काही वाचणारा माणूस म्हणतो की पुस्तक वाचायला वेळ नाही. पडताळून पाहायला वेळ नाही.

एक गमतीशीर उदाहरण देतो.व्हॉट्स् अ‍ॅपवर  ‘स्वानंद’ या नावाने कुणीतरी मराठीतल्या ‘ळ’ अक्षराचा छान वापर करून लिखाण केलं. पण त्यात एक विधान होतं की ‘ळ’ हे अक्षर फक्त मराठीतच आहे. मग मी विचार केला की कानडीत हरदनहळ्ळी डोद्देगोवडा (माजी पंतप्रधान एच.डी देवेगौडा यांचे नाव) त्यात ‘ळ’ येतो. तमिळ, मल्याळम् भाषेच्या नावातच ‘ळ’ येतो. म्हणजे ‘ळ’ अक्षर वापरणारी मराठी ही एकमेव भाषा कशी? हा विचार इतरांना पाठवल्यावर प्रतिक्रिया होत्या,

” हो रे! खरंय” प्रश्न आहे आपल्या जागरूकतेचा (जागृत नव्हे). निदान आपल्या आवडीच्या विषया संबंधित माहितीचा तरी पडताळा प्रत्येकाने करावा.

अखंड सावधान असावे। दुश्चित कदापि नसावे। समर्थ रामदासांच्या या ओवीचं अनुसरण किती करायचं  हा ज्याचा त्याचा विषय आहे. व्हॉट्स् अ‍ॅपवरच्या मजकुरातील भाषेच्या बाबतीत तर भयानक गोंधळ समोर येतो. शुद्धलेखन व व्याकरणाच्या नावाने सगळी बोंबच असते व विनोदनिर्मितीही. त्यावर परत कधीतरी चर्चा करता येईल.
‘नीरक्षीर विवेकेतु’ दृष्टी असावी एवढंच म्हणतो, या स्वल्पविरामानंतर लवकरच पुन्हा भेटू.
***
– ©️ सचिन उपाध्ये
 sachinupadhye26@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
जलकपोत
पक्षीनिरीक्षण 


कै. प्रकाश गोळे

Pheasant-tailed jacana

 

पावसाळ्याचे दिवस होते. पाऊस भुरभुर पडत असला तरी मी तळ्यावर जाण्याचे ठरवले. तळे अजून तुडुंब भरलेले नव्हते. पण तळ्याभोवतीचा माळ हिरवागार झाला होता. बाभूळबन चिमुकल्या पिवळ्या फुलांनी डवरले  होते. बनातून पावशाचा “पेरते व्हा !”, “पेरते व्हा !” असा उच्च स्वर आणि कारुण्य कोकिळेची करुण साद सतत ऐकू येत होती. कोवळ्या लुसलुशीत गवतात घोडे आणि गुरे मजेत चरत होती आणि त्यांच्या खुरांनी बिचकलेले कीटक पकडण्यासाठी पांढरे शुभ्र बगळे त्यांच्या अवतीभवती तुरुतुरु धावत होते.

मी तळ्यावर पोचलो आणि पाऊस उघडला. ढग विरळ झाले. त्यांच्या सोनेरी पाकळ्या उमलल्या आणि त्यातून रेशमी सूर्यकिरण हलकेच वातावरणात उतरले. त्यांनी हिरव्या गवताला झळाळी दिली, डोंगरावरून निळे बोट फिरवले आणि जागोजाग प्रकाशाचे पट्टे रेखले. अशा एका प्रकाशरेखेतच मला ती आकृती दिसली. तिथे तळ्याचा एक हात गवतावर हलकेच विसावला होता. परावर्तित प्रकाशामुळे पाणी विलक्षण चमचमत होते. आणि त्या रुपेरी शलाकेतून हलकी हलकी पावले उचलीत एक डौलदार पक्षी चालत होता.

लांबसर, किंचित वाकडी मान आणि धनुष्याकृती शेपूट यांमुळे कमलपक्ष्याला जशी प्रमाणबद्धता व डौल लाभला आहे, तसा तो इतर पक्ष्यांमध्ये क्वचितच सापडेल. पण हे लावण्या त्याला फक्त उन्हाळ्याच्या अखेरीसच प्राप्त होते. गंमत अशी की विणीच्या हंगामात नर आणि मादी या दोघांनाही कमानदार शेपूट फुटते, मानेवर लंबवर्तुळाकार पिवळा ठिपका उमटतो आणि पाठीवरच्या व पोटावरच्या तपकिरी पिसांना तुकतुकीतपणा येतो. पक्ष्यांच्या इतर जातींमध्ये प्रामुख्याने नर पक्ष्यांनाच सुंदर पिसारा फुटतो. त्याचा उपयोग ते मादीला आकृष्ट करून घेण्यासाठी करतात. पण या कमलपक्ष्याचे सारेच निराळे. नर आणि मादी दोघांनाही सुंदर साज चढतो. मादी अंडी घालते, तर ती उबवणे आणि पिलांची जोपासना करणे ही जबाबदारी नर उचलतो.

लांब, कमानदार शेपटीचे हे सुकाणू कमलपक्ष्याला पाण्यावर तरंगत असलेल्या वनस्पतींवर चालण्यासाठीही उपयोगी पडत असावे. त्याच्या पायाची भली लांबसडक बोटेही त्याला याचसाठी उपयोगी पडतात. कमळाच्या पानांवर अलगद पावले टाकीत, तोल सांभाळून चालणारा पक्षी म्हणून तर त्याला कमलपक्षी ( Pheasant tailed jacana ) हे नाव पडले आहे. त्याचे घरटेही असे तरंगते असते. आणि वा-याबरोबर इकडेतिकडे वाहातही जाते. कमळाच्या पानांवर, जलवनस्पती, गवत यांचा ढिगारा रचून त्यात हे कमलपक्षी चार, गडद तपकिरी  रंगाची अंडी घालतात. चोवीस -पंचवीस दिवसांनी त्यांतून पिले बाहेर पडतात आणि जलवनस्पतींमध्ये निःशंकपणे बागडतात.

छायाचित्रकार – सायना फर्नांडिस, गोवा

कमलपक्षी तसा लाजाळू, भित्रा पक्षी नाही. सर्वसाधारणपणे माणसाची चाहूल लागताच, तो उडून जाऊन पाण्याच्या मध्यभागी जाऊन बसेल हे खरे — असा तो बसला म्हणजे दुरून छोट्या नौकेसारखा डौलदार दिसतो — पण सावकाश, त्याला न दचकवता गेलात तर तो तुम्हाला जवळही येऊ देईल. त्याचे छायाचित्र घेण्यासाठी मी असा दबकत दबकतच गेलो. उंच वाढलेल्या गवताच्या पुंजक्यांमागे मी माझी हालचाल शक्यतो लपवीत होतो. मी पहिले छायाचित्र घेतले, तेव्हा  माझ्याकडे होती. दुसरे छायाचित्र घेण्यासाठी मी आणखी जवळ सरकलो, त्यावेळी तो गवतातला किडा टिपण्यासाठी वळला. कॅमे-याचा आवाज ऐकून मात्र तो दचकला आणि तुरुतुरु धावत पाण्याच्या रोखाने गेला. काठाशी तो किंचित थबकला. एवढ्यात एक म्हैस आमच्या दोघांच्या मध्ये आली. तिच्या दोन पायांमधून तो माझ्याकडे पाहत असतानाच मी आणखी एक छायाचित्र टिपले.

पावसाळा सरत आला की मात्र कमलपक्ष्याचे कमानदार शेपूट गळून पडते. त्याच्या पिसांवरची तकाकी जाते. मानेवरचा पिवळा ठिपकही फिकट होतो. वैभव गेलेले हे बापुडवाणे पक्षी मग लहान लहान टोळकी करून आणि तळ्याकाठच्या, लांब वाढलेल्या गवतामधून, दलदलीतून लपून छपून राहतात.

कै. प्रकाश गोळे
[ प्रकाशचित्रे : विकिपेडियावरून आणि सायना फर्नांडिसकडून साभार ]
[लेख   ‘किशोर‘ ऑक्टोबर १९७३ च्या अंकावरून साभार ]

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
माझे पहिले पुस्तक

कै. श्री. के. क्षीरसागर

श्री. के. क्षीरसागर  

 

माझे पहिले पुस्तक – ‘व्यक्ति आणि वाङ्मय’ – माझ्या वयाच्या पस्तिसाव्या वर्षी प्रसिद्ध झाले. वाङ्मयातील अपत्य लग्नाच्या अपत्याच्याही आधी होण्याच्या काळात ,माझे हे अपत्य थोडे उशीरा झाले असेच म्हणता येईल. नावावरून ते एखाद्या लेखकाच्या  व्यक्तित्वासंबंधीचे व वाङ्मयासंबंधीचे पुस्तक असेल, अशी कल्पना होईल. पण तो होता टीकात्मक निबंधांचा संग्रह.

तसा मी वाङ्मयाकडे थोडा उशीरा आणि अनिच्छेनेच वळलो. वयाचे पंचविसावे वर्ष गाठीपर्यंत माझ्या मनात वाङ्मयाबद्दल फारशी आवड नव्हती. मराठी ललित वाङ्मयाबद्दल तर अनादरच होता. मराठीतील माझे आवडते लेखक अगदी थोडे होते आणि ते चिपळूणकर, टिळक आणि गडकरी हे गद्य लेखक होते. मराठी काव्य आणि कादंबरी यांच्याविषयी अभिमानाने बोलणा-यांना मी काळांत हसत असल्याने,  बाजूकडे वळणे कठीणच होते. वयाच्या पंचविशीनंतर वर्षावर्षाच्या अंतराने एकदोन विनोदी लेख लिहिल्यावर शेजवलकर यांच्या ‘प्रगति’ साप्ताहिकांत मी वयाच्या तिसाव्या वर्षांपासून नियमितपणे लिहू लागलो.

त्या ध्येयवादी साप्ताहिकाच्या समाप्तीनंतर हरिभाऊ मोटे यांच्या ‘प्रतिभे’त अधूनमधून लिहिले. ‘व्यक्ति आणि वाङ्मय’ या माझ्या पहिल्या पुस्तकांत वेगवेगळ्या निमित्तांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या विस्ताराच्या निबंधांचा संग्रह आहे. त्यांत खानोलकरांच्या वाङ्मयकोशाकरिता लिहिलेला लोकहितवादींवरील सुदीर्घ प्रबंध आहे ; सावरकर -पटवर्धन यांच्या ‘भाषाशुद्धी’वरील विस्तृत हल्ला आहे; छोटीमोठी समालोचनेही आहेत.

यावेळेपर्यंत मुंबईच्या संपादकाप्रमाणेच पुण्याच्या एका प्रकाशकाचे लक्षही माझ्या लेखनाकडे गेले होते. ते प्रकाशक म्हणजे सुप्रसिद्ध कथालेखक य. गो. जोशी हे होत. आपल्याप्रमाणेच हा लेखक कोणत्याही ढोंगावर बेमुर्वतखोरपणे लेखणी चालवतो, हे पाहून माझ्याबद्दल आपुलकी वाटल्याचे ‘य. गो. ‘ सांगत. पण आणखीही एक आपुलकीचे कारण होते. मी ( त्यांच्या मते ) प्रामाणिक होतो, तसाच ( त्यांच्याच दृष्टीने !) उपेक्षितही होतो !

‘य. गो. एके दिवशी – १९३७ मध्ये असावे – मजकडे आले. ब-याचशा गप्पा आणि विड्या संपल्यावर , (‘वासूनाका’ शैलीतील !) चारदोन झणझणीत उपपदे हासडून य. गो. म्हणाले, ” x x ला क्षीरसागर,  आपल्याला तुमचं लिखाण फार आवडतं ! आपण तुमच्या लेखांचं पुस्तक काढणार ! xx ला नफा झाला नाही, तरी खर्च तर निघेल !”

हे बोलणे जुलैमध्ये झाले आणि ऑक्टोबरमध्ये भरपूर मुद्रणदोषांसह पुस्तक बाजारात आले. त्यातील एक चूक तर अद्यापही मेंदूतून बाहेर निघत नाही. ‘घराबाहेर’ नाटकावरील लेखांत “ती मुलाच्या प्रेताखातर परत येते,” याऐवजी “ती मुलाच्या प्रेमाखातर परत येते, ” असे छापले होते ! त्या काळात माधव जूलियन पुण्यातील मुक्कामात माझ्याकडेच नित्य येत. पुस्तक पाहताच ते म्हणाले, “पुस्तक चांगले आहे; पण The Printing is Scandalous !”

त्यानंतर तीनचार वर्षांत माझे हे पुस्तक मुंबई विद्यापीठाच्या बी. ए. ऑनर्सच्या मराठीच्या पेपरसाठी लागल्याचे कळले. पण खपाच्या दृष्टीने या सुवार्तेला फारसे महत्त्व नाही, असे मला प्रकाशकांकडून कळले.!

‘प्रगति’ साप्ताहिकात निबंध आणि लघुनिबंध लिहीत असतांनाच, मी एका कादंबरीची काही प्रकरणे प्रसिद्ध केली. त्या कादंबरीचे नाव ‘राक्षसविवाह’ ; आणि तिचेही दत्तक वडील य. गो. जोशीच ! त्यामुळे ;ललित’कडून माझ्या पहिल्या पुस्तकावरील लेखाची मागणी असली, तरी माझ्या पहिल्या ‘जुळ्या’वर लिहिणेच अधिक रास्त होणार आहे ! ‘राक्षसविवाह’ ही ‘कादंबरी’ होणार, ‘चिंतनिका’ होणार, की ‘भावकथा’ होणार याची मलाही नक्की कल्पना नव्हती. तिची सुमारे आठ प्रकरणे प्रसिद्ध झाल्यावर ‘प्रगति’ पत्र सरकारी अवकृपेमुळे बंद पडले. माझी कादंबरीही तेवढ्यावरच थबकली.

‘व्यक्ति आणि वाङ्मय’ प्रसिद्ध झाल्यानंतर दोन वर्षांनी मी पुन्हा लिखाण सुरू केले व त्यांत ‘राक्षसविवाह’ कादंबरी पुरी केली. ललित वाङ्मयाचे पुस्तक व एक सलग पुस्तक या नात्याने ‘राक्षसविवाह’ हे माझे पहिले पुस्तक होय. ‘वाङ्मयीन टीका’ जसा माझ्या विषयांचा एक ओघ, त्याप्रमाणेच स्त्री, प्रेम आणि विवाह हा माझ्या विषयांचा दुसरा ओघ होय. या दुस-या प्रवाहाचे माझे पहिले पुस्तक ‘राक्षसविवाह’ हे होय.
शीलवतीबाई यांची इंग्रजी प्रस्तावना हे या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य होते. पुस्तकावर ‘कडाडून टीका’ होणे, वा ‘खळबळ’ माजणे हे जर त्याचे एक प्रकारचे स्वागत मानले, तर माझ्या या पुस्तकाचे स्वागत कडाक्याने झाले होते. खांडेकरांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून जोराची पण संभावित टीका केली होती ;तर नुकत्याच उगवू लागलेल्या मर्ढेकरांनी कमालीची तुच्छतायुक्त व अहंमन्य टीका केली होती. पण गंमतीची गोष्ट म्हणजे, नववाङ्मयाच्या संप्रदायांत ज्या मर्ढेकरांनी लवकरच ओंगळ उल्लेखांना प्रतिष्ठेचे स्थान दिले, त्यांनीच ‘राक्षसविवाहा’तील काही उल्लेखांना ओंगळ ठरविले होते ! माझ्या कादंबरीत नववधूच्या चेह-यावरील पुटकुळ्यांचा उल्लेख नायक एका विशिष्ट संदर्भात करतो पण मर्ढेकरांनंतरच्या वाङ्मयांत डोक्यातली घामोळी आणि खवंदे खाजविणा-या नायिकांची वर्णने अग्रेसर कथालेखकांनी केली आहेत !

पहिल्या पुस्तकापेक्षा फारच चांगली छपाई  लाभल्याने खुशीच्या मूडमध्ये असलेले माझे दुसरे स्नेही गोपीनाथ तळवलकर पुस्तकाची पहिलीच प्रत पाहताच म्हणाले, “This time the printing is not scandalous. ”

मी म्हणालो, ” But the subject -matter itself (They say !) is scandalous !”

हो ! मोबदल्याबद्दलची अपेक्षाही मला य. गो. यांनी आरंभीच विचारली होती. अस्सल देशस्थी भिडस्तपणाने मी म्हणालो होतो,

“अपेक्षा ? — अपेक्षा कसली ?” — तुम्ही नुकसानीत येऊ नये एवढीच अपेक्षा !”

या दोन्ही पुस्तकांच्या पहिल्या आवृत्तीबद्दल मला प्रत्येकी रोख पन्नास रुपये मिळाले होते !

–  कै. श्री. के. क्षीरसागर  
[ ‘ललित‘ एप्रिल १९६६ वरून साभार ]

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
निमित्त
डॉ. केशव साठये 
१६१. 

आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी

 

‘गॉन विथ द विंड’मधील दृश्य

जातीभेद आणि वंशभेद हा प्रश्न जगातल्या बहुसंख्य देशांना सतावताना दिसतो. आणि आपण असा तो मानत  नाही असा दाखवण्याचा प्रयत्नही होताना दिसतो. कमला हॅरिस यांना अमेरिकेच्या  उपाध्यक्ष पदासाठीची जाहीर झालेली उमेदवारी हे याचेच द्योतक आहे असे वाटते. वंशभेद मिटवलाच पाहिजे पण त्यासाठी जुन्या साहित्यकृतींना, सिनेकृतीना दावणीला बांधण्याची गरज नाही यावर मंथन करणारा लेख. 
काही महिन्यांपूर्वी जॉर्ज फ्लॉइडच्या खूनानंतर अमेरिकेत आणि युरोपमध्ये अनेक निदर्शने झाली. मान आणि गुडघा यांचे असले अभद्र संयुग बघावे लागणे यासारखी वाईट गोष्ट नाही,  मानही अभिमानाने उंच करण्याची गोष्ट किंवा नम्रतेने झुकण्याची. गुढगे  टेकतात ते उदात्ततेसमोर पण इथे मात्र आपल्याला मानेवर टेकलेल्या उन्मत्त गुढग्याचे क्रौर्य पाहावे लागले. मोकळा श्वास घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या देशात श्वास कोंडला जाणे यासारखे वेदनादायी दृश्य नाही. या सगळ्याची चौकशी केली जावी अशी मागणी संयुक्त राष्ट्र परिषदेकडे त्याच्या भावाने केली आहे.

पॅट्रिक हचिन्सन हा  गोऱ्या आंदोलकाला सुरक्षित स्थळी नेताना

या निर्घृण खुनाच्या पार्श्वभूमीवर ‘12 years a slave’ या चित्रपटाचा ऑस्कर विजेता पटकथा लेखक जॉन रिडले यांनी ‘लॉस एंजिलीस टाईम्स’ मध्ये लिहिलेल्या  लेखातून  ‘गॉन विथ द विंड’ हा  चित्रपट एच.बी.ओ.मॅक्स या वाहिनीवरुन आणि लाईव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरुन हटवण्याची सूचना केली आहे. वाहिनीने ती मान्य करत हा सिनेमा सध्या आपल्या संग्रहातून हटवला आहे. संस्कृतीत रुतलेल्याअशा दुष्ट रूढी नेस्तनाबूत होण्याच्या गरजेतून ही मागणी करत असल्याचे त्यांनी लिहिले आणि ते स्वीकारलेही गेले. त्यात काही मथळे दाखवून तो प्रदर्शित केला जाणार आहे असे कळते. अमेरिकेसारख्या सशक्त लोकशाही असलेल्या देशात एखादी वाहिनी एका लेखावरुन जगप्रसिद्ध चित्रपट हटवण्याचा निर्णय घेत असेल तर तो नक्कीच समर्थनीय नाही. शिवाय.स्कार्लेट ओ हरा या नायिकेची अमेरिकन यादवी काळातील ती एक बहुपदरी प्रेमकहाणी आहे. या चित्रपटात कोठेही गुलामगिरीचे समर्थन नाही.

जनमताचा रेटा या नावाखाली, सद्य परिस्थितील तणावाकडे पाहून वा  व्यावसायिक अपरिहार्यतेसाठी कलाकृतींचा बळी दिला जाऊ नये. अमेरिकेतील या सांस्कृतिक कोरोनाची लागण ब्रिटन, युरोपमध्येही होताना दिसते आहे. पोलिसांच्या कारवाईचे उद्दात्तीकरण करणारी ‘कॉप’ ही मालिका थांबवली. ’लिटिल ब्रिटन’ या मालिकेलाही पूर्णविराम देण्यात आला आहे कारण काय दिले, तर त्यात एका कृष्णवर्णीय युवतीची व्यक्तिरेखा वादग्रस्त आहे. ‘टॉम अँड जेरी’ सारखी  निखळ हास्यमालिकाही  यात वर्णभेदाचा पुरस्कार नाही असे  स्पष्टीकरणाचे शेपूट लावून प्रसारित केली जाऊ लागली आहे.

फ्लॉइडच्या खुनानंतर अमेरिकेत जनमत हे इतके तीव्र झाले आहे की चित्रपट, नाटक, कादंबऱ्या या कलाकृतीही अशा अतार्किक भिंगातून तपासल्या जात आहेत. कृष्णवर्णीय म्हणून अमेरिकेत दुय्यम वागणूक  मिळते, विशिष्ट प्रकारच्याच भूमिका मिळतात, हे समज मॉर्गन फ्रीमन, विल स्मिथ, यांनी  खोटे ठरवले आहेत.ओपराहा विन्फ्रे ही सर्वात धनवान टीव्ही अँकर ही कृष्णवर्णीय आहे, आणि तिचे कृष्णवर्णीय असणे याचा तिच्या कार्यक्रमाच्या स्वरूपाशी लोकप्रियतेशी काहीही संबंध नव्हता. त्यामुळे एका अधिकाऱ्याच्या बेछूट वागणुकीमुळे अमेरिकेन सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य होणार नाही. वर्णभेदाचा प्रयत्न, समर्थन हेच त्या कलाकृतीचे उद्दिष्ट आहे, हे सिद्ध झाल्याशिवाय चित्रपटावर बंदी, कलाकृती मागे घेणे असले पर्याय  वापरु नयेत. ‘किलिंग  ए मॉकिंग  बर्ड’सारखे उच्च साहित्यिक मूल्य असलेले पुस्तक त्यात वर्णद्वेषाचे चित्रण आहे म्हणून माळ्यावर टाकणार का?

भीती ही आहे की हे लोण भारतापर्यंत यायला ही वेळ लागणार नाही. आपल्याकडेही अशा अनेक कलाकृती आणि साहित्यातून वर्ण, जात याची चर्चा करणारी कथानके सिनेमाच्या, नाटकांच्या रुपात आली आहेत. सत्यजित रे यांचा ‘सदगती’, बेनेगल यांचा ‘अंकुर’, बिमल रॉय यांचा ‘सुजाता’, मंजुळेंचा ‘सैराट’, ‘फॅन्ड्री’ या चित्रपटात दाखवलेल्या जातीपातीच्या समस्या या काही प्रबोधन व्हावे या हेतूनेच  हाताळल्या आहेत. यात कुणा व्यक्तीला त्याचे समर्थन दिसले तर हे ही चित्रपट आपण नाकारणार आहोत का ?

मुळात समाजाचा आरसा असे मानल्या जाणाऱ्या चित्रपट, नाटक माध्यमातून हे असे तपशील, संदर्भ खुडून काढणे कितपत योग्य आहे आणि शक्य आहे? वास्तव दाखवताना सामाजिक मानसिकता ही दाखवावी लागतेच. यातून चुकीचा संदेश जाईल असं मानत निर्मिती झाली तर ती  कृत्रिम तर होईलच शिवाय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा तो मोठा प्रहार असेल. वर्णवाद, वंशवाद, जातीयवाद याला चित्रपट मागे घेणे यासारखी सोपी उत्तरे आपण शोधणार असू तर ती आत्मवंचना होईल.

अमिताभ बच्चन याची भूमिका असलेल्या आरक्षण या २०११ साली आलेल्या  चित्रपटात एका विशिष्ट समाजाची प्रतिमा आक्षेपार्ह पद्धतीने सादर केली म्हणून त्यातील काही दृश्य  वगळण्यास भाग पाडण्यात आले होते. पण ते सांगण्याचे  काम सेन्सॉर बोर्डाचे असते. झुंडशाहीमुळे असे बदल करता कामा नयेत. १९८७ मध्ये तामीळ भाषेत आलेला ओरे ओरु ग्रामाथीले (एका लहानशा गावात ) या चित्रपटालाही जनक्षोभाला बळी पडावे लागले होते. प्रकरण कोर्टात गेले आणि सिनेमावरील अघोषित बंदी उठली. विशेष म्हणजे या चित्रपटाला समाजिक आशयावरील उत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक (रजत कमळ ) मिळाले.

म्हणजे वरवर जातीयवादी वाटणारा चित्रपट हा समाजाला जातपाती बाहेर बघायाला गुणवत्तेकडे सकारात्मकपणे पाहायला  शिकवतो. असे चित्रपट आपण मागे घेणार आहोत का? चित्रपट, नाटक, कादंबरी या सृजनशील कलाकृती असतात. त्या सादर करताना काही चालीरीती, दुष्ट रूढी, परंपरा यांवर  कलात्मकरित्या प्रकाश टाकल्याशिवाय ते प्रभावीपणे पोहोचवता येत नाही यामुळे वास्तवाचे चित्रण अपरिहार्य असते हे समजून घ्यायला हवे आणि द्यायलाही हवे. सामाजिक समरसता ही प्रयत्न पूर्वक वाढवावी लागते.त्यासाठी समाजही प्रगल्भ व्हावा लागतो. मतपेटीसाठी जातीपातीचे राजकारण करणारे नेते, टीआरपी वाढवण्यासाठी अशा बातम्यांना रंग देऊन फाजील प्रसिद्धी देणारी माध्यमे यांनी विवेक दाखवला तरच  या वर्णजातीच्या साखळ दंडातून आपण हळू हळू बाहेर पडू शकू.

काळा तो दुय्यम, गोरा तो श्रेष्ठ ही आपली मानसिकता शालेय जीवनापासूनच  बदलण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. नकळत वर्णभेद करणारे धडे बदलावे लागतील. उजवा हात सत्कर्मासाठी, डावा हात नाही ही अंधश्रद्धा आहे, हे आपल्याला सातत्याने सांगावे लागेल. मुलगी -मुलगा यामधील भेदाभेद केवळ कायदे करुन संपणार नाहीत. त्यासाठी पराक्रमी, यशस्वी मुलींच्या, महिलांच्या यशोगाथा प्रयत्नपूर्वक कायम समाजासमोर ठेवाव्या लागतील. युनिलिव्हर या कंपनीने आपल्या एका सौंदर्य प्रसाधनाच्या नावातून फेअर हा शब्द वगळण्याचा  घेतलेला निर्णय महत्वाचा आहे. इतरही कंपन्या अशा उल्लेखाचा फेरविचार करण्याच्या मनस्थितीत आहेत.हे रंगभेद मिटवण्याच्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल मानावे  लागेल.

‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ ही घोषणा आता अमेरिकेबरोबर जगभरात  दुमदुमू लागली आहे. लंडनमध्ये या वर्णभेदाबद्दल आंदोलनेही झाली त्याचवेळी उजव्या गटाची निदर्शने झाली.  त्यातील एका उजव्या गटाच्या  जखमी आंदोलकाला पॅट्रिक हचिन्सन यांनी खांद्यावर टाकून सुरक्षित स्थळी हलवले. त्या वेळी  त्यानी काढलेले उद्गार हे महत्वाचे आहेत. तो म्हणाला, ‘तो काळा  की गोरा हे मी पहिले नाही; तो माणूस आहे एवढेच मला दिसत होते.’ माणूस स्वच्छपणे दिसण्याचे अंजन ही काळाची गरज आहे. चित्रपटावर बंदी, पुतळे उध्वस्त करणे, पुस्तकातून धडा वगळणे असले उद्योग म्हणजे आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी असे केल्यासारखे होईल.

– ©️  डॉ केशव साठये
keshavsathaye@gmail.com
@@@@@@@@@@
महत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@

मृत्युंजयाच्या सावलीत

वाडवडिलांची पुस्तके [ ९ ]

मुकुंद नवरे


( पूर्वार्ध )

 

‘ मृत्युंजयाच्या सावलीत ‘ हे सौ. शांताबाई माडखोलकर यांच्या अकाली संपलेल्या जीवनपटावरील पुस्तक त्यांची कन्या सौ. मीनाक्षी फडणीस यांनी संपादित केलेले आहे. १८ ऑगस्ट १९५० रोजी शांताबाईंचे निधन होऊन दोन तपे उलटल्यावर फेब्रुवारी १९७४ मध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले; त्यासही आता सेहेचाळीस वर्षे उलटून गेली आहेत. विजय प्रकाशन, नागपूर यांनी प्रकाशित केलेले हे पुस्तक आता दुर्मीळ असून माझी आई सुधा नवरे हिने स्वत:ची स्वाक्षरी करून १ /४/ ७४ ही तारीख घातलेली प्रत आता माझ्याकडे आहे. या एकाच पुस्तकातून वाचकाला शांताबाई माडखोलकर यांचा संपूर्ण परिचय घडतो आणि तो परिचय त्यांची कन्या मीनाक्षी आणि ‘तरूण भारत’कार ग. त्र्यं. उपाख्य भाऊराव माडखोलकर हे त्यांचे पती करून देतात. एवढेच नव्हे तर शांताबाईंना झालेला जीवघेणा आजार आणि त्या कालखंडातून जाताना घरातील सर्वच व्यक्तींच्या जीवाची झालेली तगमग आणि त्याबाबत इतर सुहृदांनी सांगितलेल्या आठवणी वाचून मन हेलावून गेल्याखेरीज राहत नाही.

या पुस्तकात भाऊरावांनी  ‘वचनपूर्ति’ म्हणून लिहिलेले प्रास्ताविक आणि ‘ कल्याणी ‘ या शीर्षकाचा तब्बल ६७ पृष्ठांचा लेख असून स्वत: मीनाक्षीने संपादिका म्हणून लिहिलेले ‘निवेदन’ आणि ‘ महाकालाचा कौल ‘ हा २७ पृष्ठांचा लेख आहे. अभिवादन म्हणून सून सौ. उमा माडखोलकर, पुत्र चंद्रशेखर आणि घरातील जणू सदस्य असलेले सुनील सुभेदार यांची मनोगते आहेत. तसेच माडखोलकरांच्या घरात कधी अंतेवासी विद्यार्थी म्हणून राहून गेलेले माधवराव पारधी (( निवृत्त उपसंचालक, केंद्रीय वार्ता विभाग, दिल्ली ) यांचा ३७ पृष्ठांचा प्रदीर्घ लेख आहे. उर्वरित १२७ पृष्ठांमधे ‘ अशा होत्या शांताबाई ‘ या भागात १३ सुहृदांनी शांताबाईंबद्दल आठवणी सांगितल्या आहेत तर ‘ आप्त-मैत्रिणींच्या दृष्टीतून ‘ या भागात २१ स्त्रियांनी शांताबाईंबद्दल वाटणाऱ्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.

एखाद्या व्यक्तीचे निव्वळ चरित्र सादर केले तर ते कधी एकांगी ठरते; अतिशयोक्तीला कारण होते तर कधी त्यात कमालीचे उदात्तीकरण होते आणि तसे घडू नये म्हणून आपण सुहृदांच्या आठवणींवर भर दिला असल्याचे संपादिका निवेदनात नमूद करते. तसेच  सर्व पृष्ठावर ‘ माझी आई ‘ हे नाव असणे आणि वेष्टनावर ‘ मृत्युंजयाच्या सावलीत ‘ हे नाव असणे, यातील आश्चर्य दूर करताना भाऊरावांनी  पुस्तकाची टायटल पेजे पाहिल्यावर दर्शनी पृष्ठासाठी दुसरे नाव दिल्याचा खुलासा निवेदनात केला आहे. त्यानुसार दर्शनी पृष्ठाला समर्पक असे वेष्टन प्रकाश कावळे यांनी चितारले असल्याचे दिसते.

‘ वचनपूर्ति ‘ या प्रास्ताविकात भाऊराव १९४३ च्या फेब्रुवारीत घडलेल्या प्रसंगाचे वर्णन करतात. त्यावेळी अस्थिक्षयाच्या दुखण्यातून शांताबाई थोड्या सावरल्या होत्या आणि त्यांना नागपूर जवळ चिचभुवन येथील स्वत:च्या शेतबंगल्यावर नेऊन ठेवले होते. त्यावेळी रात्री दोघे चांदण्यात फिरताना शांताबाई मरण आणि मरणोत्तर गती यावर बोलत असे आणि यावर ते नेहमी आक्षेप घेत असत. पण एकदा शांताबाईंनी त्यांना पटवून दिले की ‘ भाऊरावांची आई, थोरली आई, दोन सावत्र बहिणी, आजी, आणि दोन आत्या या सगळ्या ऐन तारूण्यात गेल्या होत्या आणि तोच प्रसंग आपल्यावर येईल असे शांताबाईंना वाटत होते. म्हणून आपल्या दोघांची जीवनकहाणी तुम्ही लिहायची, आपलं सगळं आयुष्य, विचारांची आणि वागण्याची पद्धत, आपला संसार हे सारं इतरांपेक्षा अगदी निराळं आहे म्हणून अशी कथा लिहायला मी वाचले नाही तर, कथा तुम्ही लिहायची ‘ अशी गळच त्यांनी भाऊरावांना  घातली आणि तसे वचन त्यांच्याकडून घेतले. आता तीस वर्षांपूर्वी शांताबाईंनी दिलेले हे वचन पूर्ण करण्याचा सुयोग जानेवारी १९७४ मध्ये आल्याबद्दल ते समाधान व्यक्त करतात आणि ते वचन पुरे केल्यामुळे, वार्धक्य आणि व्याधी यांनी गेल्या तीन वर्षात जर्जर केलेल्या या निकामी शरीराच्या पाशातून भगवंताने आता ताबडतोब मुक्त करावे अशी अनन्यभावाने प्रार्थना करतात.

‘ महाकालाचा कौल ‘ या लेखात मातोश्रींसाठी  ‘बाई’ हे संबोधन तीन पिढ्यांपासून माडखोलकर घराण्यात असल्याचा उल्लेख आहे. त्यानुसार शांताबाईंना सगळे जण फक्त ‘ बाई ‘ म्हणूनही संबोधत असत. बाईंचे वडील विश्वनाथ महादेव ऊर्फ दादा नवाथे हे मूळचे  साताऱ्याजवळच्या महागावचे. ते नऊ वर्षाचे असताना वडील वारल्याने आपले आजोबा बाक्रे यांच्याकडे आर्वीला आले आणि पुढील शिक्षण त्यांनी नागपूरला मामांकडे राहून पूर्ण केले. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केल्यावर कलकत्त्याहून नागपूरला आलेल्या डीएजीपीटी कार्यालयात त्यांनी नोकरी धरली. वयाच्या बाविसाव्या वर्षी त्यांचा विवाह वासुदेव रामचंद्र घाटे यांची चौथी मुलगी गिरिजा हिच्याशी झाल्यावर त्यांनी स्वतंत्र बिऱ्हाड थाटले. त्यांना जी अपत्ये झाली त्यात शांताबाईचा क्रम सहावा होता. तिच्या आधीची पाच आणि नंतरचे एक अशी सहा अपत्ये आली आणि गेली. त्यामुळे बाई ही आई वडिलांची एकुलती एक मुलगी ठरली.

वेळी ६ फेब्रुवारी १९१० रोजी तिचा जन्म झाल्यावर विधिपूर्वक बारसे न होता तिचे ‘मीरा’ हे नाव ठेवण्यात आले. त्याचवेळी तिचा शांतपणा पाहून तिचे नाव शांता ठेवावे अशी सूचना बॅ. गोविंदराव देशमुख यांनी केली होती. ( पुढे लग्नाच्या त्याच नावाचा योग आला आणि नेमके शांता हेच नाव भाऊसाहेबांनी ठेवले.) बाईला लहानपणापासून कुठले ना कुठले आजार होतच असत. तिचे शिक्षण नागपुरातील हिंदु मुलींच्या शाळेत झाले. तिला बाळदम्याचा विकार होता तरीही त्याची चिंता न बाळगता दादांनी तिला तेराव्या वर्षी  पोहणे, घोड्यावर बसणे आणि बंदूक चालवण्याचेशिक्षण दिले. तिच्यात व्यवस्थितपणा होता आणि राहणी साधी पण काटेकोर होती. डोळ्यांप्रमाणेच केसांचेही अनुपम सौंदर्य तिला लाभले होते आणि केसांच्या चक्रावर घालण्यासाठी निरनिराळ्या फुलांच्या वेण्या करण्याची तिला हौस  होती असे मीनाक्षीने म्हटले आहे.

दादा नवाथे हे मुळात सनातनी पण अतिरेक न करणारे होते आणि त्यांची हिंदुत्वनिष्ठा व्यापक होती. आखाड्यात जात असल्याने ते ब्राह्मण मराठा भेद मानत नसत. ते दांडपट्टा आणि बंदूक चालवत असून त्यांना शिकारीचा शौक होता. नागपुरातील डॉ. मुंजे, तात्यासाहेब गुजर, दाजीशास्त्री चांदेकर, डॉ. ल. वा. परांजपे, डॉ. हेडगेवार, डॉ. ना. भा. खरे, अप्रबुद्ध, दादासाहेब परांडे अशा अनेक मंडळीशी त्यांचे संबंध असून या मंडळींची घरी सतत वर्दळ असे. ते प्रांतिक वर्णाश्रम स्वराज्य संस्था आणि रायफल असोसिएशनचे संस्थापक होते आणि रा. स्व. संघाचे कामही ते करत असत. या सर्व मंडळींची घरी वर्दळ असे आणि इतर नातेवाईकांना घरी आणून कौटुंबिक पसारा दादांनी वाढवला होता. त्यामुळे सर्वांची  सरबराई करण्यात शांताबाईची आई गिरिजा यांचा वेळ जात असे. यांनाच सर्व जण मोठी ताई म्हणत असत. ती फक्त गृहिणी नसून निरीक्षण, वाचन, बहुश्रुतता, तौलनिक विचार, प्रखर बुद्धिमत्ता  हे तिचे गुण होते. शिवाय चिचभुवनची शेतीही तीच बघत असे. तिने हे सर्व सांभाळल्यामुळे दादांना सामाजिक कामात लक्ष घालता आले. शिवाय दादा नवाथे उत्कृष्ट ज्योतिषी होते. म्हणूनच भाऊसाहेबांसारख्या अकिंचन आणि अनिकेत तरूणाला त्यांनी आपली एकुलती एक मुलगी दिली त्याला डॉ. हेडगेवारांची मध्यस्थी हे कारण आहेच पण त्याशिवाय त्यांची पत्रिका पाहून आणि त्यातील उच्च ग्रह लक्षात घेऊनच हा निर्णय  घेतला असे मत मीनाक्षीने आपल्या लेखात नोंदवले आहे.

‘ कल्याणी ‘ या लेखात शांताबाईंचे वर्णन भाऊरावांनी कल्याणी या एका शब्दात केले आहे. १९२४ च्या ऑगस्टमध्ये पुस्तकांनी भरलेली फक्त एक ट्रंक घेऊन ते नागपूरला आले त्या वेळी न अंथरूणपांघरूण, न ओळखदेख, न जातगोत अशा अवस्थेत होते आणि ‘ महाराष्ट्र ‘ चे संपादक दादासाहेब ओगले यांनी दिलेल्या एका खोलीत ते राहिले. तशा त्या अनिकेत, एकाकी, भयाण आणि वैराण जीवनात स्वास्थ्य, सौभाग्य आणि समृद्धी घेऊन शांताबाई माहेरच्या मोठ्या थोरल्या प्रेमळ कुटुंबासह जीवनात आली. सौभाग्य हे फक्त स्त्रीच्या जीवनातच असते असे नाही तर पुरूषाच्या जीवनातही असते म्हणून मागंल्य आणि साफल्य आणणारे सौभाग्य शांताबाईने आणून आपले जीवन कृतार्थ केले, असे ते म्हणतात. आपण आयुष्यात आदर्श गृहिणी दोनच पाहिल्या, एक शांताबाई आणि दुसऱ्या परम स्नेही उमाकांत भेंडे यांच्या पत्नी स्नेहलताबाई आणि संसारातले सर्व ऋतू पाहत अनुभवांच्या भट्टीतून दोघांना जावे लागले तेव्हा या दोघींनी कडवटपणाचा उद्गारही काढला नाही असे ते नमूद करतात.

२९ मे १९२५ रोजी विवाह झाला तेव्हा भाऊरावांचे वय २५ वर्षे आणि शांताबाईचे १५ वर्षांचे होते. आपले परम स्नेही प्रो. विठ्ठलराव कुळकर्णी यांचा विवाह सौ. गंगू हिच्याशी झाला त्यावेळी तिची मावसबहीण असलेली शांताबाई पहिल्यांदा दिसली आणि ती आकर्षक वाटली असे ते नमूद करतात. त्यावेळी कर्जबाजारी आणि संसाराची जबाबदारी घेण्यास असमर्थ आणि अनुत्सुक असल्याने ते दादा नवाथे यांचे घरजावई झाले आणि त्यांच्या कृपाछत्राखाली १९३४ पर्यंत राहिले.

लग्नानंतर पहिला प्रवास मुंबई आणि पुण्याकडे कसा झाला त्याचे विस्तृत वर्णन भाऊरावांनी केले आहे. प्रथम मुंबईला ते दादर येथे कुळकर्णी बंधूंकडे,- म्हणजे शांताबाईची मावसबहीण सौ. गंगू हिच्याकडे – उतरले. ते बंधू सुशिक्षित आणि साहित्यप्रेमी असले तरी त्यांची राहणी एकंदरीत जुन्या वळणाची, कोकणी आणि कर्मठ होती, किंबहुना भाऊरावांचा मुंबईतील त्यावेळचा सगळाच मित्रपरिवार याच कोटीतला होता. पण दादरहून ते पुण्याला गेले तेव्हा नारायण पेठेतील व. भ., र. भ. आणि द्वा. भ. या तिघा कर्णिक बंधूंकडे उतरले तेव्हा ब्राह्मणेतर कुटुंबात राहण्याचा पहिला अनुभव शांताबाईला मिळाला. वसंतरावांची पत्नी सौ. विमलाबाई ही शांताबाईची जिवाभावाची मैत्रीण झाली. याच मुक्कामात रविकिरण मंडळाची सभा एका ज्येष्ठ सदस्याच्या घरी झाली तेव्हा त्यांच्या पत्नीने शांताबाईंना सांगितले की ‘ आपण माडखोलकरांच्या लाडक्या असलात तरी पतीची आवड जन्मभर टिकवायची असेल तर बायकोने त्याच्या बरोबर येण्याची पात्रता संपादन केली पाहिजे,.’ हा मार्मिक उपदेश शांताबाईच्या नुकत्याच उमलू लागलेल्या मनात खोलवर जाऊन बसला असे भाऊराव नमूद करतात.

या मुक्कामात तात्यासाहेब केळकर यांच्याकडे जेवायला गेले असताना शांताबाईंचे स्वागत खणानारळाची ओटी भरून केले गेले आणि तात्यासाहेबांनी, ‘ कसे काय आवडले आमचे पुणे तुम्हाला ? ‘ एवढेच त्यांना विचारले. पण या तुलनेत  जबरदस्त धक्का त्या दिवशी बसला जेव्हा भाऊरावांचे गुरू कोल्हटकर त्यांची चौकशी करायला कर्णिकांच्या घरी आले. त्यांनी शांताबाईंना पाहून काढलेले  …’ तुमची निवड फार छान आहे …. डोळे हरणाच्या टपोऱ्या डोळ्यांसारखे आहेत …. मोठी ग्रेसफुल पत्नी मिळाली तुम्हाला …यांचा केशकलापही छान आहे … गजाननराव, तुम्ही माधव ज्युलियन आणि यशवंत यांच्याप्रमाणे स्त्रीरूपाचे दर्दी आहात… ‘ इ. उद्गार शांताबाईंना आवडले नाहीत. त्यांच्या या दौऱ्यात शांताबाईला आपल्या या कलंदर नवऱ्याचे जे दर्शन झाले त्यामुळे त्याच्या साहित्यजीवनात साथ देण्यासाठी अवश्य असलेले सर्व गुण संपादन करण्याचा तिने निर्धार केला. तरीही नंतरच्या काळात गुरू कोल्हटकरांच्या अनेकवार भेटी झाल्या तेव्हा त्यांच्या आकर्षक, रंगेल पण सूक्ष्मदर्शी चिकित्सक व्यक्तिमत्वाचे आकलन होऊन त्यांच्याविषयीचा तिचा आदर वाढतच गेला असे भाऊराव म्हणतात. नंतर वारंवार कोल्हटकर नागपूरला घरी आले त्यावेळी त्यांच्या आवडीचे पदार्थ विचारून मनपसंत मेजवान्या तिने आयोजित केल्या आणि त्यानंतर गप्पा मारताना त्यांनी तिला आपल्या नाटकातील पदे पेटीवर वाजवून दाखवली आणि ती कशी सुचली हेही सांगितल्याचे भाऊराव नमूद करतात.

सुरूवातीला दादा नवाथे  नागपुरातील नव्या शुक्रवारीच्या हमरस्त्यावर गणेशभवन या दुमजली घरात राहत असत. १९३४ साली स्वत:चा शांतानिवास हा बंगला आणि पुढे चिचभुवन येथे शेती घऊन त्यावरील शेतबंगला भाऊरावांच्या मदतीने त्यांनी बांधला. आधी गणेशभवनमध्ये राहत असताना  मागील बाजूला दादा नवाथे वर्णाश्रम संस्थेचे ‘ धर्मवीर ‘ हे साप्ताहिक चालवत असत. त्यात धार्मिक लेख येत असत तर भाऊराव काम करत असलेल्या ‘ महाराष्ट्र ‘ मध्ये त्यांचे निधर्मी लेख येत असत. त्यामुळे सासरा आणि जावई यांच्यात वर्तमानपत्रातून सामना होत असे. यातून पुढे नागपुरात जबरदस्त वादळ उठले तरीही आपले मुलुखावेगळे कुटुंब कोसळले नाही याचे कारण शांताबाईचा विलक्षण सोशिक निग्रही स्वभाव असे भाऊराव म्हणतात. त्यांच्या घरात सर्व जाती-जमातीचे लोक येत असत. या लोकांत खांडेकर, माटे, मानकर, कोसारे, जाईबाई चौधरी असे कार्यकर्ते असत तशाच सुशीलाबाई कोठीवान, शांताबाई अत्रे, शांताबाई गाडेकर, हिराबाई भोंसुले, छबूताई हिंगे, कु. अनसूया जोशी अशा प्रतिष्ठित घरातील मैत्रिणीही असत. या प्रकारे दादा आणि मोठी ताई ही दोघे एकीकडे कर्मठ तर दुसरीकडे सर्व तऱ्हेच्या लोकांची येजा असल्याने एकाच घरात दोन संस्कृती नांदत होत्या.

१९२६ ते १९३६ या दहा वर्षात शांताबाई मोठ्या चिकाटीने पदवीधर झाली आणि भाऊराव आणि तिच्यामधील बौद्धिक  व सांस्कृतिक अंतर पुष्कळच कमी होऊन गेले. त्यांच्या संसारात १९३० मध्ये चंद्रशेखर आणि १९३४ मध्ये मीनाक्षीचा जन्म झाला. त्यापूर्वी १९३३ मध्ये तिने हिंदु मुलींच्या शाळेत आणि नंतर महिला विद्यापीठाच्या कॉलेजात अध्यापनाचे काम सुरू केले. लोकांची शाळा, सुळे महिला विद्यालय आणि रात्रीच्या वेळी श्रमजीवी वर्गासाठी चालणाऱ्या शाळेत तिने काम केले.सार्वजनिक कार्यात भाग म्हणून १९३३ पासूनच मध्यप्रांत महिला परिषदेसाठी शांताबाई काम करू लागली आणि अ. भा. महिला परिषदेच्या कार्यकारिणीवर ती शेवटपर्यंत होती. शाळा आणि महिला संस्थांच्या संमेलनात अध्यक्ष म्हणून तिला बोलावणी येत असत. तिने हिंदी व बंगाली भाषांचा व्यासंग करून परीक्षाही दिल्या. तसेच नाटकातून भूमिकाही केल्या. नागपुरातील सरस्वती मंदिराची चिटणीस असताना तिने साहित्यिकांची भाषणे आणि कवींची काव्यगायने आयोजित केली.

या कल्याणीने आपले जीवन सफल केले पण त्यापेक्षा तिच्या २५ वर्षांच्या साहचर्याचा परिणाम आपल्या लेखनायुष्यावर झाला, असे भाऊराव म्हणतात. तिच्यासोबत १९२५ ते १९४२ पर्यंतचे दिवस सुखात गेले. १९३७ पासून प्रादेशिक साहित्य संमेलनांच्या अध्यक्षपदाच्या निमित्ताने त्यांचा सहप्रवास बृहनमहाराष्ट्रात सुरू झाला आणि इंदूर, उजैन, देवास, बडोदे इ. ठिकाणी प्रवास आणि तेथे नवे स्नेहबंध घडल्याने जीवनाला रूचिरता आणि व्यापकता आली असे ते नमूद करतात.
( वेगवेगळ्या निमित्ताने १९३५  ते १९४७ पर्यंत विदर्भ आणि भारतात शांताबाईने जेवढा प्रवास केला तेवढा भाऊरावांनी पण केला नसेल असे मीनाक्षीने म्हटले आहे.)

शांताबाईनी जबलपूरच्या विख्यात कवयित्री सुभद्राकुमारी चौहान यांच्या ‘ बिखरे मोती ‘ या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला आणि तो प्रकाशितही झाला. पण साहित्य निर्मितीत आपण कमी पडतो, अशी खंत तिला होती म्हणून भाऊरावांनी  तिला एका बड्या घराण्यातील आख्यायिकांच्या आधारे एक झकास कादंबरी लिहिण्यास सुचवले आणि तिने तीन प्रकरणे लिहून त्यांना दाखवली. यावेळी जो प्रसंग घडला तो भाऊरावांनी अतिशय प्रांजळपणे सांगितला आहे. ते म्हणतात की ती प्रकरणे अगदीच मामुली होती म्हणून ते तिला उपहासाने त्या गचाळ सुरूवातीबद्दल बोलले. ” मला वाटत नाही, तुला कधी ललित लेखन जमेलसे. तू की नाही वांझ आहेस !”  हे त्यांचे उद्गार ऐकताक्षणी ती एकदम उसळून कडाडली, ” खबरदार, तो शब्द तुम्ही परत या घरात उच्चाराल तर ! मी तुम्हाला दोन मुले दिली आहेत, मला वांझ म्हणताना काही तरी वाटायला हवे होते तुमच्या जीवाला. स्त्रीला वांझ म्हणणे यासारखी भयंकर शिवी आणि शाप नाही दुसरा. खबरदार परत असे अभद्र बोलाल तर .”
हे शब्द ऐकून आपण वेगळ्या अर्थाने बोललो असे म्हणत बरीच सारवासारव केली पण शेवटी शांताबाई म्हणाली की ” अहो, वाईट शब्द केव्हाही आणि कुठेही वापरला तरी वाईटच. तो वापरण्याची बुद्धी  न होणे हीच खरी सभ्यतेची कसोटी.”
पुढे तीन वर्षांनी भाऊरावांनी ‘ चंदनवाडी’ ही कादंबरी लिहिली ती शांताबाईंच्या लिखाणातील पहिल्या प्रकरणाचा उपयोग करून  लिहिली आणि त्या दोघांची मानसकन्या म्हणून शांताबाईंकडून प्रस्तावनाही लिहून घेतली असे ते नमूद करतात.

शांताबाई ही मानवतावादी होती आणि म. गांधी यांच्यावर तिची अनन्यभक्ती होती असे भाऊरावांनी म्हटले आहे. यामुळेच ती १९३९ च्या फेब्रुवारीत चार दिवस आणि पुढे १९४५ च्या फेब्रुवारीत पंधरा दिवस सेवाग्रामच्या आश्रमात जाऊन राहिली होती. या दोन्ही वेळच्या अनुभवांवर लिहिलेले तिचे लेख ‘तरूण भारत’ मध्ये प्रसिद्ध झाले होते. १९४२ च्या उत्पाती आंदोलनात शांताबाईंनी तेलंखेडीतील एका बंगल्यातून सुरूंग घेऊन तो कन्हानपर्यंत पोचवण्याचे काम केले, अशी नोंद हिंदुस्तानी लाल सेनेच्या रजत महोत्सवी अहवालात केली असल्याचे मीनाक्षीने लिहिले आहे. याच काळात अरूणा असफअली भूमिगत असताना चिचभुवनच्या शेतबंगल्यावर येऊन राहिल्या होत्या अशी नोंद आहे. यावरून शांताबाईंचा राजकीय कल वेगळा होता हे दिसते.

पुढे १९४२ च्या ऑगस्टपासून १९४४ च्या ऑक्टोबरपर्यंत शांताबाई पाठीच्या कण्याच्या अस्थिक्षयाने आजारी झाली. १९४५ च्या मे महिन्यात औरंगाबादच्या मराठवाडा साहित्य संमेलनाला ती भाऊरावांसोबत उपस्थित राहिली. आणि १९४६ च्या मे महिन्यात बेळगाव येथे जे ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन झाले त्यासाठी तर भाऊरावांसोबत शांताबाई, चंद्रशेखर आणि मीनाक्षी असे संपूर्ण कुटुंबच उपस्थित राहिले. याच साहित्य संमेलनात भाऊरावांनी मराठी भाषकांचे वेगळे राज्य असावे अशी भूमिका मांडली आणि तसा ठरावही संमत झाला. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या प्रचारार्थ मडगाव ते सांगली दौरा निघाला त्यात भाऊरावांसोबत शांताबाई सहभागी होती अशी नोंद भाऊराव करतात. यावरून महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेत भाऊरावांच्या सोबत शांताबाईंचा सहभाग दिसतो.

१९४८ हे वर्ष भाऊराव आणि शांताबाई यांच्या कुटुंबासाठी दुर्दैवी ठरले इतकेच नव्हे तर त्यांच्या सहजीवनाचा शेवटचा अंक तेथून सुरू झाला असे म्हणता येते. सुरूवातच अशी झाली की म. गांधी यांची हत्त्या झाल्यावर फेब्रुवारीमधे नागपुरात जी दंगल उसळली त्यात त्यांचे घर आगीत जळून खाक झाले. तसेच चिचभुवन येथील शेतीचा आणि शेतबंगल्याचा विध्वंस तर दादा नवाथे आणि मोठी ताई यांच्या डोळ्यांदेखत झाला. गुंड जेव्हा पेटलेले चुडे घेऊन आले त्यावेळी मोठी ताई एका हातात बंदूक आणि ओच्यात देव भरून दादांचा हात धरून चिचभुवन स्टेशनवर घेऊन गेली आणि ते दोधे आपत्तीतून वाचले असे वर्णन मीनाक्षीने आपल्या लेखात केले आहे. या प्रसंगालाही नवाथे -माडखोलकर कुटुंब धैर्याने सामोरे गेले आणि त्यांनी नव्या संसाराची उभारणी केली. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी नागपूरच्या धंतोली भागात स्थलांतर करून आपल्या बंगल्यास ‘ प्रसाद ‘ नाव दिले.

यानंतर लगेच नाताळात शांताबाई ग्वाल्हेर येथील अ.भा. महिला परिषदेच्या अधिवेशनाला गेल्या. त्याचवेळी दिल्ली, हरिद्वार, हृषीकेश ही स्थळेही त्यांनी पाहिली. या दौऱ्यात त्यांचा मुक्काम दिल्लीला मेजर गाडेकर यांच्याकडे असताना आपल्या उरोभागावर गुंजेएवढी आलेली गाठ त्यांनी सहज सौ. शांताबाई गाडेकर यांना दाखवली, नंतर मेजर गाडेकर यांनी बारकाईने ती तपासली आणि मुबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये अधिक तपासणी करण्याचा आग्रह केला आणि तेथून शांताबाईच्या आयुष्याच्या अंतिम यातनामय यात्रेला प्रारंभ झाला, असे भाऊराव म्हणतात.

१९४९ च्या जानेवारीत ही कॅन्सरची शंका आली आणि त्या दारूण आपत्तीमुळे सगळी मनोराज्ये पार उध्वस्त झाली. यानंतर डॉ. ना. भा. खरे यांच्या सल्ल्यानुसार पहिली शस्त्रक्रिया डागा हॉस्पिटलमध्ये डॉ. मिस राज यांनी केली आणि त्या अवशेषांवर टाटा हॉस्पिटलकडून जो रिपोर्ट आणवला तो पाहून तर भाऊरावांच्या मनोराज्यांची पार राखरांगोळी झाली. १९४९ च्या मे महिन्यात हवापालट म्हणून बाईंना त्यांनी पचमढीला नेले परंतु जखम वाहू लागल्याने त्यांना परत यावे लागले. नंतरच्या उपचारासाठी मात्र त्यांना अनेक महिन्यांसाठी मुंबईला नेण्यात आले. १९५० च्या मार्चमध्ये त्यांच्या उरोभागावर उठलेल्या नवीन गाठीवर डीप एक्स रेचा उपचार केल्यावर तो सगळा भाग काळा ठिक्कर पडला. या धगीने अंगाची आग होत असूनही त्या यातना त्यांनी मुकाट्याने सहन केल्या. परंतु या उपचारांना जोड म्हणून हॉर्मोन्सची इंजेक्शने द्यावीत अशी योजना डॉ. जसावाला यांनी सुचवली असता चेहऱ्याला विरूपता आणणारे ते  इंजेक्शन घेण्यास शांताबाईंनी साफ नकार दिला.

टाटा हॉस्पिटलमध्ये असताना त्याही दिवसात नाट्यसमीक्षक राजा कारळे यांच्यावर सकाळ संध्याकाळ ताज्या फुलांची वेणी आणण्याचे काम त्यांनी सोपवले होते. जूनमध्ये आपले सोवळे बाजूला ठेवून मोठी ताई नागपूरहून मुलीजवळ राहण्यासाठी आल्या तेव्हा अंबाड्यावर दोन सुंदर वेण्या घालून मैत्रिणीशी गप्पा मारत बिछान्यावर बसलेल्या या मुलीचे मरण दीड महिन्यांवर आले आहे असे त्यांना खात्रीने वाटले नसेल, असे भाऊराव म्हणतात. परंतु जुलैच्या पहिल्या आठवड्यात डॉ. जसावाला यांनी भाऊरावांना आपल्या चेंबरमध्ये बोलावून शांताबाईचे आयुष्य आणखी फार तर पाच सहा आठवडे असल्याचे सांगितले. तसेच तिच्या इच्छेनुसार तिला नागपूरला न्यावे अशी सूचनाही केली. पण मुंबईतील काही मित्रांनी दिलेल्या सल्ल्यानुसार लॅमिंग्टन रोडवरील एका होमिओपॅथिक रूग्णालयात उपचार करण्याचे ठरले.  परंतु त्याने त्रास आणखी वाढल्याने शेवटी ३१ जुलै रोजी सकाळी दादा नवाथे आणि मोठी ताईसोबत शांताबाई मेलने नागपूरला परत आल्या.

घरी आल्यावर त्यांची व्यवस्था देवघराच्या खोलीत करण्यात आली होती. भाऊराव तिला भेटले तेव्हा खोलीत धूप,उदबत्त्या आणि फुलांचा संमिश्र वास दरवळत होता. त्यांना पाहून ती म्हणाली, ” शेवटी मी घरी आले एकदाची ! आता सुखाने मरण येईल मला तुम्हा सगळ्यांच्या सान्निध्यात ! ” ते ऐकून आपल्या डोळ्यांना धारा लागल्या पण घरात तीन म्हाताऱ्या व्यक्ती आणि दोन मुले आहेत याची जाणीव शांताबाईने करून दिली, असे भाऊराव म्हणतात. यानंतरच्या दिवसात रोज सकाळी ९ च्या आत आंघोळ, वेणीफणी करून घेऊन ताज्या फुलांची वेणी ती माळत असे. ‘ जी कोणी माणसे भेटायला येतील त्यांना मला भेटू देत ‘ अशी सूचना तिने केली होती. आपल्याला जणू काही झालेलेच नाही अशा प्रकारे ती भाऊरावांशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करत असे.’ आपण गेल्यावर भाऊरावांनी दुसरे लग्न करावे अशी सूचनाही तिने केली पण त्यास नकार देऊन तिने तो विचार मनातून काढून टाकावा ‘ हे आपले आणि शांताबाईचे बहुधा शेवटचेच बोलणे असे भाऊरावांनी म्हटले आहे.

त्यांना भेटायला येणाऱ्यांची रीघ लागली. अनसूयाबाई काळे तर दिवसातून तीनदा भेटायला येत असत. आलेल्या सर्वांशी त्या मजेत गप्पा मारत असत. १५ ऑगस्ट रोजी त्यांनी दादांना घरावर राष्ट्रध्वज लावून त्यावर माळ चढवण्यास सांगितले. नंतर रेडियोवरले नेहरूंचे भाषण ऐकले. दादांनी त्याच दिवशी मृत्युंजयाचा जप करण्यासाठी ब्राह्मण बसवले आणि मुलीला  तीर्थ दिले. पण तिची अस्वस्थता वाढतच गेली.

शेवटी १८ ऑगस्ट हा श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस आला. त्यादिवशी जाग आल्यावर नागपंचमी म्हणून मुलांसाठी नेहमीप्रमाणे दिंडे वगैरे करण्याची सूचना शांताबाईंनी केली आणि श्रावणमास बहरून आला असल्याने बागेतील फुलांच्या छान वेण्या करण्यास ताईंना सांगितले. त्याप्रमाणे झाले तरी अस्वस्थता वाढल्याने शेजारच्या डॉ. शिवदे यांना बोलावण्यात आले. त्यांनी आपल्या परीने जास्तीत जास्त प्रभावी औषध दिले. ते घेत असताना ‘ आता माझ्याजवळून कोणी हलू नका ‘ असे शांताबाई म्हणाली आणि बरोबर १२ वाजून ३५ मिनिटांनी तिची प्राणज्योत मालवली. डॉ. शिवदे यांनी बाहेर हॉलमध्ये येऊन ‘ मीराबाई आपल्याला सोडून गेल्या ‘ असे सांगितले. हे कळल्यावर भाऊराव तडक देवघरात गेले तेव्हा मागोमाग भेटायला आलेले नाना जोगही होते. धाकट्या बहिणीप्रमाणे शांताबाईवर माया करणाऱ्या जोगांचे डोळे भरून आले. पण त्यांनी मन आवरले. तिच्याजवळ गेल्यावर त्यांनी  ” प्राण गेल्यावरही काय तेज आहे हिच्या डोळ्यांचे !” असे उद्गार काढले. भाऊरावांना घेऊन तेच बाहेर हॉलमध्ये आले आणि भाऊरावांचे हात त्यांनी घट्ट धरले पण ” भाऊराव .. ” या एका शब्दापुढे त्यांना बोलता आले नाही.

सौ शांताबाई माडखोलकर

त्या दिवशी शांताबाईंच्या उशीखाली सापडलेली एक छोटी वही भाऊरावांना देण्यात आली. तिच्या मधल्याच पानावर त्यांना शांताबाईच्या हस्ताक्षरातील ओळी दिसल्या.
” चौविस वर्षांपूर्वी दैवे लाभ मला झाला
सुखदु:खांचा विविध गोड गोफ आम्ही दोघांनी विणिला
आयुष्यांतिल दुरित प्रसंगी अतुल धैर्य दिधले
संकटसमयी विघ्नहर्त्या गजाननाने जीवन बहरविले ”
या ओळी वाचून डोळ्यांना धारा लागल्या, असे भाऊराव म्हणतात आणि तेथेच हा लेख संपतो. हा लेख वाचून शांताबाईंना अवघे ४० वर्षांचे आयुष्य लाभले या दैवगतीबद्दल वाचकाला विषाद वाटल्याखेरीज राहत नाही.
@

[ या लेखाचा उत्तरार्ध  २३ ऑगस्ट २०२० च्या  अंकात प्रसिद्ध होईल.
त्यात वाचा : सुहृद आणि आप्त-मैत्रिणींच्या दृष्टीतून शांताबाई. ]

– ©️ मुकुंद नवरे 
mnaware@gmail.com
@@@@@@@@@@@@@
आवाहन

प्रिय मित्रहो,
सप्रेम नमस्कार.
गेल्या कित्येक वर्षांत आली नसेल किंवा अनुभवलेली नसेल अशी बिकट वेळ या २०२० वर्षात आली आहे, यात शंकाच नाही. मार्च महिन्यात चाहूल लागलेल्या कोरोना या साथीने अल्पावधीत, देशात नव्हे तर सबंध जगभरात थैमान माजले आहे.
आणि त्यामुळे ठिकठिकाणची सरकारे आणि महापालिका प्रशासन यांनी नागरिकांच्या एकूण म्हणजे घरगुती व सार्वजनिक संचारावर, प्रवासावर जे निर्बंध घातले आहेत, तसेच त्यात अनेक गोंधळ निर्माण झाले आहेत. त्यांचा मोठा परिणाम आपण जे सण उत्साहाने साजरे करतो त्यांवर झाला आहे. आगामी गणेशोत्सव व नवरात्रौत्सव यांसारख्या घरगुती व सार्वजनिक उत्सवांना अनिश्चिततेचा फटका बसला आहे. यातून मनात आले की यापूर्वी या उत्सवांचे वातावरण कसे होते आणि त्यांची मजा आपण कसे मुक्तपणे लुटत होतो हे आमच्या लेखक-वाचक- चित्रकार- प्रकाशचित्रकार मित्रांनी सहज आठवून ( जास्तीत जास्त ५०० शब्द ) शब्दबद्ध करावे तसेच आठवणीतली प्रकाशचित्रे बाहेर काढावी आणि आमच्याकडे हे साहित्य ( युनिकोड माध्यमात टंकून )  पाठवावे, हे आवाहन करत आहोत. पीडीएफ माध्यमातून पाठवू नये.  निवडक शब्दचित्रांना किंवा प्रकाशचित्रांना ‘मैत्री’मधून प्रसिद्धी देण्यात येईल.
संपादक, ‘मैत्री’ अनुदिनी
mangeshnabar@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@
वर्षाधारा 
– ©️ वर्षा पेठे 
vnpethe@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@
रावळगाव

आठवणींच्या वेलीवर [ ३ ]  
 

प्रदीप अधिकारी 

दिमाखदार जांभळ्या रंगाच्या वेष्टनांतल्या कॅडबरीज चॉकलेटचा जमाना सुरु झाला आणि बच्चे कंपनी हळुहळू “रावळगाव टॉफी” विसरून गेली. वाण्याच्या दुकानातसुद्धा एक आण्याला दोन मिळणाऱ्या ‘रावळगाव’ची सद्दी आमच्या लहानपणाबरोबरच संपली.

लफ्फेदार इंग्रजी अक्षरांत सही केल्यासारखं पांढऱ्या अक्षरात पारदर्शक चिवट कागदाच्या आयाताकृती चौकोनी  तुकड्यावर छापलेलं ‘रावळगाव’ हे नाव आणि कागदात गुंडाळलेली, लांबट आकाराची खमंग चवीची, बराच वेळ तोंडात रेंगाळणारी टॉफी म्हणजे घरी येणाऱ्या पाहुण्यांकडून लहानग्यांना मिळणारी आवडती भेट. काही काही पाहुणे तर आल्या आल्याच खिशात हात घालून चार टॉफीज आम्हा पोरांच्या हाती ठेवायचे आणि आमची अगदी चंगळ उडायची. टॉफी तोंडात टाकली की तोंडात चळ्ळकन् पाणी सुटे …. टॉफीचा तो मधुर खमंग रस चघळत एकमेकांशी बोलताना बऱ्याचदा बोल बोबडे होत असत..! वयाने थोडी मोठी असलेली भावंडे अथवा मित्र मंडळी टॉफी तोंडात टाकून त्या छोट्याशा पारदर्शक चिवट कागदाच्या तुकड्याची झिगझॅग घडी घालत आणि त्या घडीला एक गाठ मारुन तिची बाहुलीच्या आकाराची “चिंगी” बनवीत असत. त्यांचं  ते कसब बघत असताना बऱ्याच छोट्या मुलांच्या तोंडातून टॉफीयुक्त चॉकलेटी रंगाची लाळ गळायची….ही बच्चे कंपनी मग आपल्या मनगटांनी ती पुसून टाकयची…काही वेळाने तोंडातली टॉफी संपून जायची आणि त्यांच्या गालांवर सुकलेल्या चॉकलेटी रंगाचे फराटे दिसायचे.

१९२३ साली शेठ वालचंद हिराचंद ह्या दूरदृष्टीच्या धाडसी उद्योगपतीने नाशिकजवळच्या रावळगाव ह्या आडगावी दीड हजार एकर पडीक जमीन विकत घेतली आणि सलग दहा वर्ष अथक परिश्रम करून ती ऊसाच्या लागवडीखाली आणली. १९३३ साली ‘रावळगाव शुगर फार्म’ नांवाची एक कंपनी स्थापून भारतातल्या एका संपूर्ण आणि स्वयंपूर्ण साखर कारखान्याची यशस्वी मुहूर्तमेढ रचली. १९४० सालापासून  “रावळगाव” ह्या नावाखाली रावळगाव टॉफीचं उत्पादन सुरु झालं – चव, दर्जा आणि त्या काळी असलेली सर्व सामन्यानांना परवडणारी वाजवी किंमत ह्या बाबींचं सातत्य अतिशय काटेकोरपणे  पाळलं गेल्याने लवकरच “रावळगाव” टॉफी हे उत्पादन शहरांपासून ते अगदी दूर दूर महाराष्ट्रांतल्या खेड्यापाड्यापर्यंत लहान थोरात प्रचंड लोकप्रिय झालं.

त्याच काळांत ह्याच शेठ वालचंद हिराचंद ह्यांनी पुण्याजवळ वालचंदनगर नामक प्रचंड औद्योगिक समूह उभा केला. त्यांच्या एका कंपनीत माझ्या बाबांचे लालचंद शहा नावाचे मित्र नोकरीस होते. ते कामानिमित्त मुंबईत आले की गिरगावात आमच्याकडे मुक्कामाला उतरायचे. आम्हां भावंडांचे ते अतिशय लाडके पाहुणे होते कारण ते अगदी न चुकता रावळगाव टॉफीचा एक अख्खा डब्बा घेऊन यायचे. रावळगावच्या त्या आयताकृती पत्र्याच्या लांबट चौकोनी डब्ब्यावर रघुवीर मुळगावकरांनी काढलेली गोड गोड मुलींची सुंदर चित्र असायची.

शहाकाका मुंबईतला मुक्काम आटोपून पुण्याला त्यांच्या घरी जाऊन जुने होईपर्यंत त्या डब्यांतल्या टॉफीज आम्हाला पुरायच्या. डब्बा रिकामा झाला की आई त्यांत विविध आकाराच्या सुया, रंगीत दोऱ्यांची  रिळं, कात्री असंच कांहीबांही ठेवण्यासाठी उपयोग करायची. आईकडे असे बरेच डबे होते. कशात पूजेचं सामान तर कशात वेगवेगळ्या रंगांच्या कांचेच्या बांगड्या ती ठेवत असे. माझ्या बाबांकडे पण एक खूप जुना असा डब्बा होता त्यांत त्यांचं दाढीचं सामान भरलेलं असायचं..! कधीतरी मग एखादा जास्तीचा रिकामा डब्बा आम्हा मुलांच्या  वाट्याला यायचा, रंगीत खडू, पेन्सिली, रंगीत गोट्या, बसची, ट्रामची रेल्वेची तिकिटं ह्यासारखा किंमती ऐवज जपून ठेवण्यासाठी आम्ही त्या डब्ब्याचा उपयोग करीत असू. अख्ख्या कुटुंबाला पुरून उरणारा इतका बहु-उपयोगी पत्र्याचा डब्बा अजूनपर्यंत मी  तरी पाहिलेला नाही.

रावळगाव टॉफीजचे अस्तित्व आता नाममात्र उरलं आहे. कुठल्याही दुकानात ती ह्ल्ली दिसत नाही. कॅडबरीज चॉकलेटसनी तिच्यावर कधीच मात केली आहे.  असं असलं तरीही  शाळेत जाताना आईचा डोळा चुकवून, शहा काकांनी आणलेल्या डब्यातली, मुठभर “रावळगाव” हाफ पँटच्या खिशात कोंबलेली अजूनही लक्षात आहेत, ती आणखी एका वेगळ्याच कारणासाठी…

त्यातल्या दोन-तीन टॉफीज वर्गातल्या आवडत्या मैत्रिणीला अगदी उदारपणे दिल्यावर, खुदकन् हसताना तिच्या गालावर पडणाऱ्या खोल खळीमुळे  ती डब्ब्यावरच्या  मुळगांवकरांच्या चित्रसुंदरी इतकीच गोड वाटायची…..!!

कधीच ‘रावळगाव’ न खाल्लेल्यांना त्या मागे दडलेली, ही असली “ गोड-गुपितं ” कशी कळणार?

–  ©️ प्रदीप अधिकारी
9820451442
adhikaripradeep14@gmail.com

प्रकाशचित्रे : गुगलवरून साभार
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
वस्त्रहरण 
कडबोळे [३५]
 

डॉ. अनिल जोशी

आंतरजालीय  माहितीचा विस्फोट झाल्यानंतर आलेली पहिली  साथ  म्हणून आपण या कोरोनाच्या  साथीकडे बघू शकतो. त्यामुळे कोरोना आणि माहिती अशा दोन  साथींना आपल्याला एकत्रित तोंड द्यावे लागते आहे. अशा प्रसंगी अधिकृत व  विश्वासार्ह माहिती देणाऱ्या  स्त्रोतांचे एक वेगळेच महत्व आहे. वैद्यकीय व्यावसायिकांच्या दृष्टीने खात्रीची माहिती  मिळणे उपचारासाठी  फारच महत्त्वाचे असते. कोरोना हा विषाणू पूर्णपणे नवीन असल्याने त्याचे वेगवेगळे पैलू जगात ठिकठिकाणी तपासून पाहिले जात आहेत. त्यासाठी वेगवेगळे संशोधन विविध ठिकाणी चालू आहे. त्याचे  निष्कर्ष  वेगवेगळ्या वैद्यकीय नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत आहेत. याबाबतीत जी वैद्यकीय नियतकालिके जागतिक स्तरावरची अशी मानली जातात त्यात “The Lancet “, The New England journal Of Medicine (NEJM)  व The Journal Of American Medical Association (JAMA) ही तीन अग्रणी नियतकालिके आहेत.
कोरोनावर  रामबाण उपाय मिळत नाही,  हे साथ सुरू झाल्यावर  स्पष्ट झाले. संसर्गाची तीव्रता कमी करता येते का व त्यासाठी काही औषधे देता येतील का याची चाचपणी सुरू झाली. HCQ किंवा HydroxyChloroquine हे मलेरियावर वापरले जाणारे औषध घेतल्यास प्रतिकारशक्ती वाढून कोरोनाच्या  संसर्गाची शक्यता व तीव्रता कमी होते, असेच तज्ञांच्या  लक्षात आले आणि रोगप्रतिबंध व  रुग्णउपचारात  आघाडीवर असणारे वैद्यकीय व इतर कर्मचारी यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून  हे औषध दिले जावे अशा आशयाच्या सूचना काही देशांमध्ये दिल्या गेल्या. कोरोनाच्या उपचारातही या औषधाचा  प्रायोगिक वापर इतर औषधांसोबत सुरू झाला. कोणतेही औषध हे शेवटी रासायनिक द्रव्य असते. त्यामुळे त्याचे काही अनिष्ट परिणामही असतात. तसे ते  या  औषधाचे पण आहेत. परंतु योग्य ती सर्व काळजी घेऊन औषध घेतले जावे असे इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च या भारतातल्या अग्रणी संस्थेने सुचविले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील आपण हे औषध  घेत असल्याचे अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. असे जरी असले तरी या औषधाच्या बाजूने व विरोधात अधूनमधून उलटसुलट बातम्या येत राहिल्या त्यामुळे स्वाभाविकपणे संभ्रमाचे वातावरण कायम राहिले. अशा वातावरणात The Lancet ने  एक लेख प्रसिद्ध केला.”Hydroxychloroquine or chloroquine with or without a macrolide for treatment of COVID-19: a multinational registry analysis”.असा  या लेखनाचा मथळा होता. HCQ  च्या वापरामुळे  हृदयगतीत अनियमितता  निर्माण होण्याची शक्यता असल्याने या औषधाचा वापर धोकादायक ठरू शकतो, असा या लेखाचा निष्कर्ष होता. हा लेख खूप मोठ्या अभ्यासाअंती प्रसिद्ध केल्याचा दावा हा लेख  लिहिणाऱ्या संशोधकांनी केला होता. सहा खंडातल्या ६७१  रुग्णालयातील ९६०३२  रुग्णांची  २० डिसेंबर २०१९ ते  १४ एप्रिल २०२० या कालावधीतील कोरोना उपचारांची माहिती  मिळवून व त्याचे विश्लेषण करून या लेखातील अभ्यासातील निष्कर्ष काढले गेले होते असा या लेखकांचा दावा होता.
या लेखापुर्वी  “द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन” मध्ये असाच एक लेख प्रसिद्ध झाला. रक्तदाबासाठी दिली जाणारी काही औषधे, ज्यांना ACE Inhibitors व  ARB Blockers  म्हणून ओळखले जाते; ही औषधे कोरोना  साथीच्या वेळी  देणे सुरक्षित आहे, असा या अभ्यासाचा अंतिम निष्कर्ष होता व तो या लेखाद्वारे जाहीर केला गेला होता.कोरोना विषाणू मानवीय पेशीवर हल्ला करताना ACE Receptors वापरतात असा काही संशोधकांचा दावा  आहे.  त्यामुळे ही औषधे  वापरणे सुरक्षित आहे की नाही हा ही  एक गंभीर  चर्चेचा विषय होता. या दोन्ही लेखांमुळे अर्थातच  वैद्यक क्षेत्रात खळबळ उडाली.
HCQ  च्या वापराबाबत अनेक देशांमध्ये संशोधन चालू होते. जागतिक आरोग्य संघटना देखील याबाबत वेगळे संशोधन करत होती. लेख आल्यानंतर अनेक  ठिकाणची संशोधने  थांबविण्यात आली. त्याला एक महत्त्वाचे कारण होते. ही दोन्ही नियतकालिके Peer Reviewed आहेत. याचा साधा सोपा अर्थ सांगायचा झाल्यास या नियतकालिकांमध्ये  कोणताही लेख प्रसिद्ध होण्यापूर्वी  या लेखातील प्रतिपाद्य विषयाचे एक तज्ञमंडळ त्या लेखात नमूद माहितीचा आढावा घेते  व लेखातील माहिती योग्य असल्याची खात्री करते. अशी खात्री झाल्याखेरीज  कोणतेही लिखाण प्रसिद्ध केले जात नाही. NEJM चे  स्थापना वर्ष इ. स. १८१२ ची  आहे तर Lancet १८२३ सालचे आहे. अर्थात गेली सुमारे २०० वर्षे ही नियतकालिके आपला आब राखून आहेत. यात आलेल्या एखाद्या लेखाने जागतिक आरोग्य संघटनेने आपले एखादे महत्त्वाचे संशोधन  अर्धवट सोडून द्यावे एवढे या  नियतकालिकात छापून आलेल्या शब्दांना वजन आहे. वैद्यकीय नियतकालिकांचे वजन हे नुसतेच स्थापनेच्या वर्षावर अवलंबून नसते. या नियतकालिकांचा प्रभाव मोजण्यासाठी  एक मापदंड आहे.  त्याला Impact Factor असे संबोधन आहे. आपण त्याला “प्रभाव निर्देशांक”  म्हणूयात. हा प्रभाव निर्देशांक सर्वसाधारणपणे दोन वर्षांचा काढतात. म्हणजे आज  २०२० मध्ये आपण बोलत असताना  २०१८ – २०१९  या कालावधीतील त्या नियतकालिकाची कामगिरी लक्षात घेऊन  हे गणित मांडता येते. गेल्या दोन वर्षात इतर मान्यताप्राप्त नियतकालिकांमध्ये (Indexed Journals ) संदर्भ म्हणून घेतल्या गेलेल्या एखाद्या नियतकालिकातील लेखसंख्या भागिले या दोन वर्षात या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एकूण लेखांची संख्या म्हणजे त्या नियतकालिकाचा प्रभाव निर्देशांक असतो. २०१८  साली The Lancet चा  प्रभाव निर्देशांक ५९.१०२ इतका होता  तर NEJM चा ७०.६७० ! जितका हा निर्देशांक मोठा तितका त्या  नियतकालिकाचा दबदबा ही मोठा.
आता या दोन लेखांचे पुढे काय झाले ते थोडेसे विस्ताराने पाहू या. २२ मे २०२० रोजी “Hydroxychloroquine or chloroquine with or without a macrolide for treatment of COVID-19: a multinational registry analysis” या मथळ्या अंतर्गत हा लेख The Lancet मध्ये प्रसिद्ध झाला. याचे एकंदरीत चार लेखक आहेत. प्रो  मनदीप मेहरा, सपन  देसाई, अमित पटेल व प्रो फ्रांझ रूजचीत्झ्का अशी ही चार  मंडळी आहेत. २६  मे रोजी काही ऑस्ट्रेलियन संशोधकांनी या लेखातील आकडेवारीबाबत शंका व्यक्त केल्या. संपादकांनी त्याची चौकशी करून या आकडेवारीत काही दुरुस्ती केली. २८ तारखेला विविध देशातील १८० ख्यातनाम संशोधकांनी The Lancet  च्या संपादकांना  खुले पत्र लिहून या लेखातील निष्कर्षाविषयी आपले गंभीर आक्षेप नोंदवले. त्यानंतर पुन्हा एकदा संपादक मंडळाने या अभ्यासाची  फेरतपासणी करून लेखकांना त्यांनी गोळा केलेल्या आकडेवारीविषयी अधिक तपशील मागितला. चारपैकी तीन लेखकांनी असा तपशील देण्यास नकार देऊन हा लेख आम्ही माघारी घेत आहोत अशा आशयाचे पत्र दिले. त्यानंतर ४ जून २०२० रोजी The Lancet  ने एक  अधिकृत घोषणा करून हा लेख मागे घेतला. ही घोषणा खालीलप्रमाणे :-
After publication of our Lancet Article, several concerns were raised with respect to the veracity of the data and analyses conducted by Surgisphere Corporation and its founder and our co-author, Sapan Desai, in our publication. We launched an independent third-party peer review of Surgisphere with the consent of Sapan Desai to evaluate the origination of the database elements, to confirm the completeness of the database, and to replicate the analyses presented in the paper.
Our independent peer reviewers informed us that Surgisphere would not transfer the full dataset, client contracts, and the full ISO audit report to their servers for analysis as such transfer would violate client agreements and confidentiality requirements. As such, our reviewers were not able to conduct an independent and private peer review and therefore notified us of their withdrawal from the peer-review process.
We always aspire to perform our research in accordance with the highest ethical and professional guidelines. We can never forget the responsibility we have as researchers to scrupulously ensure that we rely on data sources that adhere to our high standards. Based on this development, we can no longer vouch for the veracity of the primary data sources. Due to this unfortunate development, the authors request that the paper be retracted.
We all entered this collaboration to contribute in good faith and at a time of great need during the COVID-19 pandemic. We deeply apologise to you, the editors, and the journal readership for any embarrassment or inconvenience that this may have caused.
घोषणा  सविस्तरपणे मुद्दामून दिली आहे. यामध्ये Surgisphere Corporation या कंपनीचा स्पष्टपणे उल्लेख आहे. या लेखाला जे तीन भारतीय वंशाचे  लेखक आहेत, ते या कंपनीशी  संबंधित आहेत. वैद्यकीय संशोधनात लागणारी आकडेवारी ही कंपनी गोळा करून प्रसंगी तिचे पृथक्करण करून  संशोधकांना  उपलब्ध करून देण्याचे काम करते.
आता थोडेसे NEJM  मधील लेखाविषयी. लेखाचे नाव “Cardiovascular Disease, Drug Therapy, and Mortality in Covid-19.” लेखक संख्या एकूण पाच. पैकी मेहरा, देसाई व पटेल हे त्रिकुट तेच ! लेखाच्या प्रसिद्धीची तारीख एक मे २०२०. हा  लेख देखील NEJM ने ४ जून २०२० रोजी मागे घेतला. कारण होते, Because all the authors were not granted access to the raw data and the raw data could not be made available to a third-party auditor, we are unable to validate the primary data sources underlying our article, “Cardiovascular Disease, Drug Therapy, and Mortality in Covid-19.”1 We therefore request that the article be retracted. We apologize to the editors and to readers of the Journal for the difficulties that this has caused.
हे लेखकांनीच संपादकांना लिहिलेले पत्र. आता आकडेवारीची खातरजमा या लेखकांनी लेख प्रसिद्ध  करण्यापूर्वीच का केली नाही असा प्रश्न स्वाभाविकपणे येतो. त्याला सध्या तरी काही उत्तर नाही. या दोन्ही नियतकालिकांनी यापूर्वी काही वेळा पूर्वप्रकाशित लेख मागे घेतले आहेत, त्यात काही चुकीचे संदर्भ आले असल्यास त्याची  दुरुस्ती प्रसिद्ध  केलेली आहे.  मग याला वस्त्रहरण म्हणण्याचे कारण काय? तुम्ही २०० वर्षे  एखादे नियतकालिक चालवत आहात. त्यामुळे लेख प्रसिद्ध करण्यापूर्वी त्यातली आकडेवारी बरोबर असल्याची खातरजमा करणे ही तुमची प्राथमिक जबाबदारी आहे.The Lancet ने  हा लेख प्रसिद्ध करताना बरीच घाई व गडबड केली व  लेख मिळाल्यापासून फक्त चार आठवड्यात  प्रसिद्ध झाला.लेखाचा विषय होता एक औषध, HCQ  नावाचे. हे औषध सहज उपलब्ध आहे, ते स्वस्त आहे व भारतासारख्या विकसनशील देशात  हे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. हे औषध परिणामकारक आहे असे ठरल्यास कोरोनाबाबत  बाजारात येऊ घातलेली इतर औषधे आपले वेगळेपण हरपून  बसतील काय, अशी साधार भीती आहे. अशाप्रकारे येऊ घातलेल्या नवीन औषधांचे अवमूल्यन होऊ नये म्हणून  जाणीवपूर्वक  लेख प्रसिद्धीचा  हा कट आहे की काय अशी भीती काही जाणकारांनी याबाबत व्यक्त केली आहे. या सगळ्या प्रकारात  ज्या Surgisphere  या  कंपनीने ही  आकडेवारी मिळवून त्यावर प्रक्रिया केली तिची व तिच्या मालकांची नक्की काय भूमिका होती याबाबत खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोरोना कधी संपणार  या प्रश्न सारखाच हा   प्रश्न आहे, उत्तराच्या प्रतीक्षेतला !
जाता जाता अजून एक गोष्ट सांगतो, १६ मे २०२०  च्या आपल्या संपादकीयात The Lancet  ने अमेरिकन नागरिकांना  आगामी जानेवारीमधील अध्यक्षीय निवडणुकीत ज्याला सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे महत्व कळते अशा उमेदवाराला मत द्या असे  जाहीर आवाहन केलेले आहे. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना याबाबत अजिबात गांभीर्य नाही असा  या लेखाचाच एकंदरीत सूर  आहे व डोनाल्ड ट्रम्प हे सर्व जगाला मी HCQ घेतो हे उच्चरवाने सांगत असतात.यात काही परस्पर संबंध आहे का? माहित नाही!! आपल्या शेकडो वर्षांच्या विश्वासार्हतेला या नियतकालिकांनी असे पणाला का बरे लावले असावे ?
“Torture the data, and it will confess to anything.” – Ronald Coase(British Economist and author)

– ©️ डॉ अनिल जोशी
९४२२६४७२८३
jaysss12@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

 

डॉ. अरविंद लोणकर

[ २ ]

त्वचा – एक संदेशवाहक यंत्रणा
आजकाल लहान मोठ्या शहरात सर्वत्र टेलिफोन, अत्याधुनिक मोबाईल किंवा सेल फोन असतात. कुठे आग लागली की जवळचा माणूस झटकन फोन उचलून आगीच्या बंबाला किंवा अग्निशमन दलाला वर्दी देतो. कुठे पाण्याचा नळ फुटला असे आढळले की त्याची खबर नगरपालिकेच्या पाणी विभागाला जाते. घरफोडी नाहीतर चोरी झाली की पोलिसचौकीला गडबडीने निरोप पोहोचविता येतो. काही वेळेला चोर हाती लागला की पोलीस यायच्या आधीच आजूबाजूचे लोक चोराला ठोकून काढतात. किंवा बंब यायच्या आधीच भराभरा पाणी ओतून आग विझवायला लागतात. याखेरीज किती त-हेचे संदेश टेलिफोन / मोबाईलवरून येतजात असतील याची कल्पनाच करणे बरे.

ही दोनचार उदाहरणे निवडली आहेत. त्याच्यावर परत एकदा नजर टाकूया. कोणत्याही ठिकाणी अपाय होत असला की ताबडतोब त्याची खबर केंद्राला पुरविली जाते. नंतर केंद्रावरून पोलीस, कामगार, आगीचे बंब यांसारख्या गोष्टी धावत येतात ; जास्त होणारे नुकसान टळते. लगेच दुरुस्तीच्या कामाला लागता येते. पण हे संदेश तातडीने गेले नाहीत तर ? चोर घर धुवून नेतील, आगीने घराचा कोळसाही शिल्लक राहणार नाही, तेव्हा जनतेच्या संरक्षणासाठी हे संदेश झटकन पोहोचणे किती महत्त्वाचे  आहे हे वेगळे सांगायला हवे काय ?

मज्जातंतूंचे कार्य
आपल्या त्वचेत नेमकी हीच गोष्ट होत असते. बाहेरील जगात येणारे अनेक त-हेचे संदेश अन् संवेदना मेंदूकडे पोहोचविणे जरुरीचे असते. या कामी लागणा-या पेशी अन् मज्जातंतू त्वचेत टेलिफोनप्रमाणे सगळीकडे पसरलेल्या असतात. काही ठिकाणी त्या कमी असतात, तर काही ठिकाणी भरपूर. पेशीपासून निघालेले संदेश मज्जातंतूंकडून थेट मेंदूकडे संवेदना पोहोचवायचे काम करतात, तर मेंदूकडून येणारे हुकूम दुस-या तंतूंकडून येतात. त्वचेतील कामाच्या ग्रंथींना काम तयार करायचा निरोप येतो. केसाच्या बुडाशी अगदी छोटे स्नायू असतात. त्यांना हुकूम आल्यावर ते आकुंचन पावतात व केस उभे राहतात. याला आपण म्हणतो की अंगावर काटा आला. दोन मांजरे भांडायला लागली की त्यांच्या अंगावरची सारी लव ताठ उभी राहते. कारण मांजर व इतर प्राण्यात केसांच्या मुळाचे स्नायू जास्त प्रमाणात तयार असतात.



संवेदना जरी अनेक मार्गाने आल्या तरी त्वचेच्या हिशेबात त्या तीनच प्रकारच्या असतात. स्पर्श, तपमान आणि वेदना. झुळझुळीत रेशम आणि खडबडीत फणस, बंदा रुपया आणि किल्ली यांच्या आकारातला स्पर्शाला जाणवणारा फरक या सा-या स्पर्शाच्या संवेदना. काही सुखाच्या, काही दुःखाच्या. पण जगातल्या निरनिराळ्या वस्तूंमधला भेद कळायला स्पर्शज्ञान अतिशय आवश्यक असते गुदगुल्या, कंद आणि वेदना या त्वचेच्या मते स्पर्शाच्याच संवेदना त्यांच्यात फरक फक्त तीव्रतेचा.

आगगाडीत बसल्यावर क्षणोक्षणी खडखडाट चालू असतो. कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी, अशा तालावर आपण बघता बघता झोपी जातो. पण घरी शांत झोपलो असताना मांजराने जेवण घरातले भांडे पाडले की आपण ताडकन जागे होतो. तसेच काहीसे या स्पर्शाच्या संवेदनेत आहे. सतत संदेश येत असले की मेंदू म्हणतो चालू द्या, ठीक आहे पण त्यात काही बदल झाला की मात्र त्याची लगेच दखल घेतली जाते. आपण अंगावर कपडे घातलेले असतात. त्याचा जरी स्पर्श सतत होत असला तरी आपण कपड्याची जाणीव विसरून गेलेलो असतो. त्याच्या जोडीला काही नवीन स्पर्श झाला तरच तो महत्त्वाचा. कुत्रा माणसाला चावला तर ती काही बातमी होत नाही पण माणूस कुत्र्याला चावला तर मात्र छापून येते, तशातली गत.

स्पर्शाची जाणीव सगळीकडे सारखी होत नाही. हाताची बोटे, नाक, ओठ या ठिकाणी ती सर्वात जास्त होते. त्या मानाने तळपाय, पाठपोट या ठिकाणी ती कमी होते.

थंड स्पर्शाने सारे अंग शहारते



थंड आणि गरम या संवेदना या नेमक्या कशा होतात हे आजही मोठे गूढ आहे. पूर्वी शास्त्रज्ञांना वाटायचे की या कामी मज्जातंतूंच्या टोकाशी असलेल्या खास पेशी उपयोगी पडतात. पण तसे असेलसे वाटत नाही. काही ठिकाणाहून थंड आणि काही ठिकाणाहून गरम अशा या संवेदना होतात. पाठपोट आणि कोपरापासूनतातडीचा फोन जातो, तशासारखी वेदना ही संकटाची सूचना आहे   मनगटापर्यंतच्या भागात थंड -गरम यांची जाणीव सर्वात जास्त होते. आपले लक्ष नसताना सहज गंमत म्हणून चेह-यावर थंडगार पाणी टाकले तर फारशी थंडी वाजत नाही. पण तेच पाणी कुणी मानेवर पाठीवरून ओतले की मात्र सारे अंग शहारते. याच्या उलट डोके, चेहरा आणि हात. या ठिकाणी थंडी कमी जाणवते. बर्फ पडत असताना डोक्यावर त्याचा जाड थर बसला स्त्री तो नुसता झटकून टाकता येतो. चेहरा तर उघडच असतो. तो काही बुरखा घेऊन झाकून टाकता येत नाही. पण अंगात मात्र चांगले गरम कपडे घातले नाहीत तर थंडीत माणूस पार गारठून जातो.

त्वचेच्या काही भागाप्रमाणे जीभ, तोंड या ठिकाणीही थंड अन् गरम याचा फारसा विधी-निषेध नसतो. कपातल्या चहाचा थेंब हातावर पडला तर हात पोळतो , परंतु तोच गरम चहा माणूस मजेत पीत असतो. तसेच आईस्क्रीम थंडगार असले तरी आपण मिटक्या मारीत खातो. पण त्याचा कप हातात धरला तर हात काकडतो. शरीराच्या इतर भागात संवेदना असतात पण फार मर्यादित. उदाहरणार्थ पोट रिकामे होणे, मूत्राशय भरल्यावर लघवीला जाण्याची जाणीव होणे, डोके दुखणे वगैरे. शरीरातले बहुतेक अवयव बधीर असतात. पण त्यांच्यावरील वेष्टन मात्र फार संवेदनक्षम असते. शरीराच्या त्वचेप्रमाणेच आत कोठेही वेदना झाली की काही तरी बिघाड झाल्याची धोक्याची सूचना झाली म्हणून समजावे. स्पर्शाच्या संवेदनेची जाणीव जशी थोड्या वेळाने बोथट होते, त्याचप्रमाणे थंडगार या संवेदनेची जाणीव थोड्या वेळाने कमी कमी होत जाते. कडाक्याच्या उन्हातून आपण वातानुकूलित खोलीत गेलो तर पहिल्यांदा चांगलीच थंडी जाणवते. पण थोड्या वेळातच थंडीची बोच कमी होऊन आराम वाटू लागतो.

त्वचेतील मज्जातंतू
(१). मज्जातंतू, (२) घर्मग्रंथी कार्यान्वित करणारा मज्जातंतू, (३) मज्जातंतू, (४) व (६) घर्मग्रंथी, (५) सूक्ष्म स्नायू, (७) संवेदना वाहून नेणारे मज्जातंतू, (८) केसांच्या बुडाशी असणारा स्नायू



वेदनेची जाणीव ही सर्वात महत्त्वाची संवेदना समजायला हवी. शहरात कोठेही घातपात होत असला की पोलिस चौकीवर तातडीचा फोन जातो, तशासारखी वेदना ही संकटाची सूचना आहे. समजा, आपण चुकून तापलेल्या तव्याला हात लावला किंवा चाकूने आपले बोट कापून घेतले, किंवा विजेचा धक्का लागला की वेगाने त्याची खबर मेंदूला पोचवली जाते. लागोलाग मेंदूकडून हुकूम येऊन बोट त्या जागेपासून दूर काढले जाते. ही सूचना जर वेळेवर गेली नाही तर बोट तसेच तव्यावर भाजत राहील. चाकूवर कापत राहील नाही तर विजेचा प्रवाह वाहात राहील. अन् साहजिकच जास्त गंभीर इजा होईल.अशा रीतीने वेदनेची जाणीव आपल्याला मुळीच सुखाची वाटत नसली तरी शरीराचे रक्षण करायला ती फार उपयोगी आहे. चव समजण्यासाठी जिभेवर खास पेशी असतात. त्या एका त-हेने संवेदनाच पोचवीत असतात असे म्हणायला हरकत नाही.

त्वचा जर गारठून गेली असली तर वेदनेची जाणीव होते. मुले ऐन थंडीत सहलीला गेली असताना खरचटून घेतात , पण त्या वेळी फारसे दुखत नाही कारण थंडीने सारे अंग कसे गारगार पडलेले असते. इथिक क्लोराइड या द्रव्याचा फवारा मारून क्षणभर त्वचा गोठवून टाकली तर त्यातून इंजेक्शनची सुई खुपसली तर फारसे दुखत नाही. त्याच्या उलट त्वचा गरम झाली असेल तर त्या जागी कोठलीही वेदना जास्तच जाणवते. तसेच त्वचेचा एखादा भाग दुखावला असल्यास अगर सुजला असल्यास त्याच्या आसपासच्या भागावरही वेदना जास्त जाणवते. आपण म्हणतो की जखमेच्या आजूबाजूचा भाग हळवा झाला आहे.

वेदनेची जाणीव

 

वेदनेचा अभाव

वेदनेची जाणीव  फार महत्त्वाची आहे, असे म्हटले त्याचे आणखी एक उदाहरण देतो. दुर्दैवाने आपल्या देशांत महारोगाचा प्रसार फार मोठ्या प्रमाणावर आहे. या रोगाचे जंतू पहिल्यांदा त्वचा अन् मज्जातंतूंवर हल्ला करतात. विजेच्या तारा खराब झाल्यावर त्यातून प्रवाह बरोबर जात नाही, त्याचप्रमाणे या बिघडलेल्या मज्जातंतूंमधून संवेदना नीट जात येत नाहीत. मग त्वचेच्या काही भागाला बधीरपणा येतो. कापूस लागलेला समजत नाही. गरम-गार यांतला फरक कळत नाही. चपलेतला खिळा वर आलेला असला तरी पायाला खुपत नाही.

निरोगी माणसाचा हात गरम वस्तूला लागला की तो हात झटकन मागे घेतला जातो आणि पुढे होणारे नुकसान टळते.  पण महारोगाच्या सुरुवातीस ही संवेदना होत नसल्याने हात तसाच तापलेल्या वस्तूवर राहतो. चपलेतला खिळा तळपाय पोखरत राहतो. आणि त्यामुळे हातापायात वरचेवर जखमा होतात. फोड येतात. मनुष्य विचार करतो, “अरेच्या, माझ्या हाताला कधी भाजलं बुवा ?” मुलाला अगर माणसाला जर असा बधीरपणा जाणवला तर त्याने वेळ न घालवता डॉक्टरांकडून त्वचेची तपासणी करून घ्यावी. महारोग लवकर हुडकून त्यावर योग्य औषधपाणी केले तर तो संपूर्णपणे बारा होऊ शकतो.

पुष्कळदा निसर्गातही गफलत होते. पोटात खोलवर कुठे त्याची जाणीव झाली तरी आजार निर्माण झालेला असतो आणि त्याची जाणीव मज्जातंतुंतून मेंदूकडे पोचवली जाते. पण मेंदूत त्याचा अर्थ भलताच लावला जातो. आणि त्याच मज्जातंतूंच्या हुकमतीखालची दुसरीच कुठलीतरी त्वचा दुखत राहते. रोग पोटात अन् दुखणं त्वचेवर !

आपण टेलिफोनचा नंबर फिरवतो. पण केंद्रातील गुंतागुंतीच्या यंत्रात काही तरी बिघाड झालेला असला तर भलतीकडे फोन जातो. मग आपण म्हणतो, “सॉरी, रॉंग नंबर !’ तसा हा निसर्गातला ‘रॉंग नंबर’ म्हणायचा !

डॉ. अरविंद लोणकर

[ चित्रे व लेख : ‘सृष्टिज्ञान’ मे १९७० वरून साभार ]

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^ 
जाता जाता

खंडेराव केळकर 
 
[३] 

ऐतिहासिक नाटकात इंग्रजी

पुण्याला एका नामवंत नाट्यसंस्थेचा ‘आग्र्याहून सुटका’ या विष्णुपंत औंधकर लिखित नाटकाचा नाट्यप्रयोग चालला होता. प्रयोग जरी हौशी नाट्यसंस्थेचा होता, तरी तसा ब-यापैकी चालला होता. अपेक्षित वाक्यांना आणि प्रसंगांना टाळ्यांचा प्रतिसाद मिळत होता.

या प्रयोगात स्त्रियांच्या भूमिका पुरुष करीत होते. सगळेच स्त्रीपार्टी सुस्वरूप नसल्यामुळे या स्त्रिया आहेत असे प्रेक्षक समाधानपूर्वक मानून घेत होते.

ओंकार नावाचा एक ब्राह्मण आपली मुलगी वागीश्वरी हिला उमरखान नावाच्या खलनायकाकडे गहाण ठेवतो आणि त्यामुळे शिवाजी महाराजांची सुटका होते ; परन्तु महाराजांना हे कळल्यावर ते नाराज होतात आणि वागीश्वरीच्या सुटकेचा निश्चय करतात.

इकडे उमरखान वागीश्वरीवर जबरदस्ती करून तिच्याशी निका लावत आहे, असा प्रवेश रंगात आला होता. वागीश्वरी उमरखानला आपल्या सामर्थ्यानिशी प्रतिकार करीत होती. अखेर कंबरेजवळ खोवलेला खंजीर काढून ती उमरखानाच्या अंगावर जाण्याचा प्रसंग आला. वागीश्वरीने खंजिराला हात घातला; परंतु नको इतका घट्ट रुतून बसलेला खंजीर काही केल्या निघेना. दोघेही हूँ ss हूँ ! हूँ ss हूँ ! करीत एकमेकांच्या अंगावर जात होते. खंजीर काही निघेना. अखेर वागीश्वरीने ‘शट अप ! उमरखान शट अप ! ‘ असे निर्वाणीच्या शब्दांत उमरखानाला बजावले.

भूतकाळातले प्रेक्षकांचे समूहमानस वर्तमानकाळात आले. वागीश्वरीला सोडविण्यासाठी तलवार सज्ज करून बसलेला शिवाजी हताश होऊन कपाळावर हात मारून मटकन खाली बसला. प्रचंड हास्यकल्लोळ झाला, परंतु काही दिवसांनी इंग्रजी राज्य येणार, हे वागीश्वरीने सुचविल्याबद्दल प्रेक्षकांनी तिला शाबासकी दिली.

खंडेराव केळकर  
( ‘सकाळ‘ दिवाळी अंक २२ ऑक्टोबर १९९५ वरून साभार )

@@@@@@@@@@
महत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@

मुंबईच्या स्वातंत्र्य चळवळीच्या पाऊलखुणा

कामगार, संप आणि बंड

मूळ लेखिका: स्मृती कोप्पीकर
मुक्त अनुवाद :  प्रदीप अधिकारी

भाग १ 
भारत आपल्या स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापनदिनाचा उत्सव-सोहळा आज साजरा करत आहे. आपल्याकडे अशा सोहळ्यांचे स्वरूप आजकाल  सण किंवा चिंतनशील असे न राहता त्यांचे रूपांतर सहजगत्या अवाढव्य अशा राजकीय आणि पक्षीय देखाव्यात केलेले आढळते.

मुंबई ( तेव्हाचे बॉंबे ) शहर हे ब्रिटीश राजवटीविरुद्ध होणाऱ्या बहुतेक राजकीय चळवळींच्या केंद्रस्थानी असायचे, ह्या शहराची स्वातंत्र्य संग्रामातील भूमिकेची नोंद इतिहासात अगदी कागदोपत्री आहे. त्या चळवळींची शहराच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणाशी जुळलेली नाळ आणि असलेले नाते हे सहजीवनाचे होते. विविध रंगांच्या राजकीय विचारधारातून वाढलेले रथी-महारथी, शहरातील अनेक ठिकाणे जिथे एकोणीसाव्या- विसाव्या शतकांत ह्या दिग्गजांनी  केलेली वातावरण ढवळून टाकणारी भाषणे, सर्वसामान्य नागरिकांनी केलेल्या  चळवळी आणि त्यांच्या कथा  ह्या  दुर्दैवाने आता ह्या  लोकप्रिय शहरातल्या समाजमनातून  लोप पावत चालल्या आहेत.

आज ऑगस्ट क्रांती मैदान किंवा त्याचे महत्त्व काही थोड्या मुंबईकरांना माहित असेल. एवढेच नव्हे तर काँग्रेस हाऊस, सरदार गृह, राजगृह ह्या वास्तू कोठे आहेत किंवा त्या का बरे  आदरणीय  आहेत हेसुद्धा अगदी मूठभर लोकांनाच माहीत असेल.  ह्या आठवड्यात जेव्हा पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन  रोड स्टेशनचे नामांतर प्रभादेवी झाले आणि त्याच बरोबर दोन व्यक्तींचे आणि  एल्फिन्स्टन  मिल नामक कापड गिरणीचे महत्त्व  सार्वजनिक स्मृतीतून जणू पुसून टाकण्यात आले; त्यामुळे  स्थानिकांचा असा समज झाला की ब्रिटिशकालीन प्रभावाच्या खाणाखुणा आता नष्ट होत चालल्या आहेत.

चौपाटी ही आज फक्त मौज मस्ती, रस्त्यावरची खादडी आणि गणपती विसर्जन एवढ्यापुरतीच मर्यादित राहिली आहे; परंतु स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक महत्त्वाच्या राजकीय घटनांची ती एक साक्षीदार होती. कित्येक निषेध सभा आणि लोकांचे मेळावे या चौपाटीच्या वाळूत झालेल्या आहेत. १९१९ च्या एप्रिल मध्ये रॉलेट अ‍ॅक्ट ( काळा कायदा ) च्या निषेधार्थ झालेल्या  प्रचंड सभेचाही त्यात समावेश आहे. महात्मा गांधींनी ह्या घटनेचा उपयोग आपली सत्याग्रहाची संकल्पना लोकप्रिय करायला सुरूवात केली आणि तिचेच रुपांतर पुढे देशव्यापी आंदोलनात झाले.

रॉलेट अ‍ॅक्ट ज्याचा उल्लेख “काळा कायदा” असा केला जायचा त्याने ब्रिटीश सरकारला राक्षसी अधिकार दिले होते, ज्या योगे हे सरकार राजकीय कायदेभंग करणा-यांवर खटले भरू शकत होते, नुसत्या संशयावरून सरकार विरुद्ध केलेल्या कथित विध्वंसक कारवाईच्या नावाखाली कोणालाही अटक करू शकत होते आणि प्रेसवर नियंत्रण ठेवू शकत होते. ह्याच्या निषेधार्थ अनेक वेगवेगळ्या विचारधारेतून पुढे आलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना एकत्र येण्यासाठी एक समान मंच ह्या निमित्ताने उपलब्ध झाला. हॅण्डबीले  छापली गेली, त्यांचे  वाटप झाले. वर्तमानपत्रातून आवाहन करण्यात आले की ६ एप्रिल रोजी चौपाटीवर निषेध नोंदविण्यासाठी एकत्र या. ६ एप्रिल हा दिवस “काळा दिवस” म्हणून संबोधण्यात आला.

“त्या सकाळी सूर्योदयापूर्वीच अक्षरश: हजारो सत्याग्रही चौपाटीवर समुद्रात स्नान करून काळ्या कायद्यामुळे राष्ट्राचा झालेला अपमान आणि दु:ख व्यक्त करण्यासाठी २४ तासांच्या उपोषणास हजर झाले होते. महात्मा गांधी तर सर्वांच्या आधी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह सकाळी साडेसहाला येऊन उपोषणाला बसले होते. लवकरच शेकडो सत्याग्रही त्यांच्या सभोवती बसले,” असा उल्लेख “बॉम्बे क्रॉनिकल” ह्या तत्कालीन प्रतिष्ठित अशा वर्तमानपत्राने आपल्या ७ एप्रिलच्या आवृतीत केला  आहे; ते पुढे म्हणते की जसजसा दिवस पुढे जात राहिला तसतसे  समुद्र किना-यावर माणसांचे  लोंढेच्या लोंढे येऊ लागले. जणू लोकांचा एक महासागर तयार झाला.  सँडहर्स्ट ब्रीजवर अनेक जातीधर्माच्या सुमारे दीड लाख लोकांची झुंबड उडाली .

‘बॉम्बे क्रॉनिकल’च्या अहवालानुसार  समुद्र किनाऱ्यापासून ते माधव बागेपर्यंत एक भलाथोरला जनसमुदाय आपले मानवतेचे सामर्थ्य दर्शवित येत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या घराघरातून बायका मुलांची हीss  गर्दी जमली होती. फ्रेंच ब्रीजजवळ तर जमाव इतका प्रचंड होता की एका सभेतील वक्त्यांची भाषणे  ऐकू येणे अशक्य होऊन दोन वेगळ्या सभा घेतल्या गेल्या. त्याच्या पुढल्या वर्षी चौपाटीच्या वाळूवर असाच प्रचंड जनसमुदाय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्यांच्या अंत्ययात्रेस जमला होता.

स्वदेशीची चळवळ आणि ब्रिटिश उत्पादित मालावर विशेषतः कापडावर बहिष्कार हा विचार जोर धरू लागला होता, सर्व सामान्य माणसांना त्याचे आकर्षण वाटू लागले होते, अनेक ठिकाणी विदेशी कापडाची होळी करण्यात येऊ लागली. १९२१ साली सर्वत्र असहकाराची चळवळ आणि हरताळ ही आंदोलने सर्वत्र पसरली आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या त्या वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आगामी दौऱ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला.

१७ नोव्हेंबरला साधारण २०हजार माणसांचा जमाव एल्फिन्स्टन  मिलच्या आवारांत विदेशी मालाची सर्वांत मोठी  होळी करण्यासाठी जमा झाला होता. शहरांत ठिक- ठिकाणी विदेशी मालाच्या छोट्या छोट्या होळ्या पेटवण्यात आल्या होत्या आणि त्या आठवड्यात मुंबईतल्या  सुनसान रस्त्यांनी प्रिन्स ऑफ वेल्सचे स्वागत केले.

एल्फिन्स्टन  मिल आणि एल्फिन्स्टन रोड स्टेशन ही नावे लॉर्ड जॉन एल्फिन्स्टन  यांच्यावरून दिली  गेली. ते या द्वीपसमूह शहराचे १८५३ पासून ते १८५९-६० पर्यंत गव्हर्नर होते. ईस्ट इंडिया कंपनीकडे असलेली बेटे तेव्हा ब्रिटीश सरकारने ताब्यात घेतली होती. माहीमपासून परळपर्यंतच्या भागात तेव्हा दलदलीचे साम्राज्य होते; ईस्ट इंडिया कंपनीने तेथे भराव घालून जमीन तयार करून बांधकामे केली होती. जॉन एल्फिन्स्टन ह्यांचे काका माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे १८१९ ते १८२७ पर्यंत गव्हर्नर जनरल होते. सुप्रसिद्ध एल्फिन्स्टन कॉलेज हे त्यांच्या नांवाने ओळखले  जाते.

गेल्या दशकांत एल्फिन्स्टन मिल इतिहासात जमा झाली. ह्या आठवड्यांत स्टेशनचे नावही गेले. आता फक्त शिल्लक राहिले आहे ते म्हणजे राजकीय महत्त्व असलेली विदेशी कापडांच्या होळीची मुठभर प्रकाशचित्रे.
(पुढे चालू… )

@
मूळ लेखिका: स्मृती कोप्पीकर
मुक्त अनुवाद :  प्रदीप अधिकारी 
[ लेख :- ‘हिंदुस्तान टाइम्स‘ दि. ५ जुलै २०१७ ]

[ प्रकाशचित्र ‘विकिपेडिया‘वरून साभार ]

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
नवीन मुखपृष्ठ :  तोरणा किल्ल्याची झुंझार माची व राजगड (२) – गणेश नाबर 
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आजची कविता

मधुकर सोनवणे 
 
झाले सारेची अस्पृश्य (!)

आज दिन स्वातंत्र्याचा, देश जाहला आमुचा |
मुक्त आचार विचार, आणि धडा एकोप्याचा ||

काल प्रवाह चालला, वर्षे त्र्याहात्तर झाली |
प्रगतीच्या पथावर, वाट देशाची चालली ||

आले वर्ष वीस-वीस, जीव झाला कासावीस |
जरी असुनी स्वतंत्र, सारे जाहले अस्पृश्य ||

मनी जरी स्नेहभाव, आणि असे आपुलकी |
एकमेकांत अंतर, नाती जणु ती परकी ||

आली भरती दुर्दिना, जाणे संपेल ही कधी |
करोनाच्या पाठोपाठ, स्फोट अतिवर्षा व्याधी ||

सीमेवरचे राक्षस, त्यांची जागी झाली हांव |
कालवरी मित्र भासे, आज करी कावकाव ||

जरि मास श्रावणाचा, आनंदाचा तो अभाव |
देव सारे कोंडलेले, सैतानांची धावाधाव ||

अर्थ जीवनाचा पुरा, आज बदलुनी गेला |
मोल जगण्याला आले, ‘अर्थ’ दुय्यम जाहला ||

जरि एक असे राष्ट्र, व्यक्ति व्यक्ति अलगली |
घाबरती मदतीला, माणुसकी दुर्बळली ||

संपेनाचि काळोखीही, जगी गरीबी वाढली |
महान या दिवसाला, छटा सावळी ती आली ||

नाकावरची फडकी, आता निघणार कधी ?
कधी सगळे ते स्पृश्य आणि भिववेना व्याधी ?||

भव्य होईल मंदीर, राम सीता स्थापियेले |
प्रती सीमेवर लंका, बहु रावण माजले ||
राम येई अयोध्येत, परी रामराज्य कोठे ?
सीता आज भयभीत, दुःख तिच्या मनी दाटे ||

खाण्याचीही कित्येकांना आज वाटते जी भ्रांत |
खरे सुराज्य ते यावे, सार्‍या सार्‍याची जगात ||

दोन गजांचे अंतर, जावो वाढो स्नेहभाव |
तेंव्हा खरा स्वातंत्र्याचा, मनी जागेल तो भाव ||

– ©️ अण्णा
annasonavane02@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
फोलकथा

( ज्या वाचून कुणावर कसलाही परिणाम होण्याची शक्यता नाही अशा कथा…  )

हर्षद सरपोतदार 
४८. 
भिशी

लॉकडाऊनच्या चार महिन्यांत बायकांची भिशी बंद पडली होती.
परिस्थिती पूर्ववत झाल्यावर ती पुन्हा सुरु करायचं ठरलं.
त्यासाठी वकिलीणबाईंच्या बंगल्यावर बायका जमल्या.

व्हॉट्सएपवर ठरल्याप्रमाणे सगळ्याजणी साड्या नेसून, नटूनथटून आल्या होत्या.
नुकतेच घेतलेले आपले नवे दागिने प्रत्येकीने अंगावर घातले होते.
“ही अंगठी. अठरा कॅरेटची आहे.” आपल्या डाव्या हाताची तर्जनी दाखवत कोरोनाची सर्टिफिकिटे देणाऱ्या डॉक्टरची पत्नी बोलली.
“अगं पण ही अंगठी तर डेंग्यूच्या साथीच्या वेळी केली असं मागे म्हणाली होतीस ?” एकीने विचारलं.
“इश्य, ती डेंग्यूच्या वेळची ही गं !” उजव्या हाताचं बोट नाचवत डॉक्टरपत्नी म्हणाली, “आणि ही अंगठी गेल्या आठवड्यात केली.”
“छानच आहे हो !”
मग एकेकीने आपले दागिने दाखवायला सुरुवात केली.
“या बांगड्या आणि हा नेकलेस. सहा तोळे. बावीस कॅरेट.” गेले चार महिने किराणामाल घरपोच पोहोचवण्याचा धंदा करणाऱ्या व्यापाऱ्याची बायको म्हणाली.
“हा चंद्रहार, या बांगड्या आणि या पाटल्या. चोवीस कॅरेट. दहा तोळ्यांचा ऐवज आहे !” खाजगी हॉस्पिटलवाल्या डॉक्टरीणबाई बोलल्या.
“या कुड्या, या अंगठ्या, ही ब्रेसलेट आणि हा नेकलेस. सगळं प्युअर डायमंडचं आहे. !” क्वारंटाईनची सोय उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेलवाल्याची बायको सांगत होती.

तेवढ्यात खाजगी कंपनीत नोकरी करणाऱ्या नोकरदाराची पत्नी तिथे येऊन पोहोचली.
“सॉरी हं. बसने आले म्हणून जरा उशीर झाला.” ती म्हणाली.
“हरकत नाही. पण हे काय ? अशी ओकीबोकी का दिसतेयस ?” वकिलीणबाईंनी विचारलं.
“अगं काय सांगू, गेले चार महिने याचा पगार झाला नाही. घरातच बसून होता. पैसे संपून गेले. एक दागिनेच काय ते उरले होते. याच्या मनात पीएम केअर फंडाला काहीतरी द्यायचं फार होतं. म्हटलं करायचेत काय ठेवून ? म्हणून काढून टाकले सगळे दागिने !”
तिच्या या बोलण्याने बिचाऱ्या त्या बायकांच्या आनंदावर चांगलंच विरजण पडलं.

***

– ©️ हर्षद सरपोतदार 
hsarpotdar1@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
उपेक्षित नायिकांसाठी – एक दृष्टिक्षेप 

मूळ लेखिका दीपा गेहलोत
मुक्त अनु. सोsहम् दुभाषी

लवकरच आपला आणखी एक स्वातंत्र्यदिन उजाडेल, सगळी भाषणे, ध्वजारोहण समारंभ, मोठ्या आवाजातली देशभक्तीपर गीते, गांधी, नेहरू, टिळक, नेताजी, सरदार आणि, कदाचित भगतसिंग याना वाहिलेली स्तुतीसुमने वगैरेंसहित. पण यात मोजकेच उत्कट इतिहासप्रेमी सोडल्यास बहुतेक कुणालाही एकाही महिला स्वातंत्र्यवीरांगनेचे नाव घ्यायचे आठवणार नाही.

हां कदाचित राणी लक्ष्मीबाई आठवेल. तेही केवळ तिच्यावरल्या चित्रपटामुळे, किंवा ‘खूब लडी मर्दानी, वो तो झांशीवाली रानी थी’ या तिच्याभोवती असलेल्या लोककथेमुळे. कस्तुरबा गांधी आठवतील कदाचित, तेही महात्मा गांधींच्या परावर्तित लोकप्रियतेमुळे असेल. त्याही दांडी मोर्चात गांधींबरोबर होत्या, त्यांनीही अनेक महिलांना स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घ्यायला उद्युक्त केलं होतं. आणि हो, खूप मगजमारी केल्यावर काही जणाना आझाद हिंद सेनेच्या कॅप्टन लक्ष्मी, किंवा सरोजिनी नायडू आठवतील.

दुर्दैवाने इतिहास फक्त पुरुषप्रधान दृष्टीकोनातून लिहिला गेलेला असतो. त्यात स्त्रियांचे योगदान हे फक्त एखाद्या तळटीपेप्रमाणे नोंदवलेले असते. पण स्त्रिया देखील पुरुषांच्या बरोबरीने स्वातंत्र्यसंग्रामात उभ्या राहिलेल्या आहेत, पुरूषांइतकाच, किंबहुना त्यापेक्षा जास्त त्याग त्यांनीही केलेला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिन समारंभात जेव्हा आपला तिरंगा फडकावला जाईल तेव्हा त्यांच्यापैकी काही मोजक्या तरी वीरांगनांचे स्मरण आपल्याला व्हायला हवे.

कित्तूर राणी चन्नाम्मा

कित्तूर राणी चन्नाम्मा ही ब्रिटीश राज्याच्या विरोधात उभी राहिलेली राजघराण्यातली पहिली वीरांगना गणली जाते. सन १८२४  साली तिचे राज्य हडप करू पाहणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात कित्तूरच्या नायकघराण्यातल्या या शूर वीर राणीने आपली सेना उभारून अटीतटीचा लढा दिला. दुर्दैवाने त्यात तिला पराजय पत्करावा लागला आणि बंदिवासही. तुरुंगातच ती मरण पावली.

झांशी राणी लक्ष्मीबाईचीच समकालीन बेगम हजरतमहल ही गणिका अवधेचा नबाब वाजीदअलीशहा याची दुसरी बायको होती. ब्रिटिशांनी वाजीदअलीशहाला कलकत्त्यात हद्दपार केल्यानंतर तिने अवधेची सूत्रे आपल्या हातात घेतली आणि उदादेवी नावाच्या एका दलित महिलेला सेनेची अग्रणी बनवून ब्रिटिशांशी युद्ध केले. पण १८५७ चे पहिले स्वातन्त्र्ययुध्द चिरडले गेल्यानंतर ती नेपाळमध्ये जाऊन राहिली आणि तिथेच १८७९ मध्ये निवर्तली.

उषा मेहता

अर्वाचीन काळात उषा मेहता ही अल्पवयीन बालिका गांधींच्या प्रभावाने भारली जाऊन इतर समवयीन मुलामुलींबरोबर स्वातन्त्र्यासाठीच्या चळवळीत सामील झाली आणि चळवळीची प्रचारपत्रके गुपचूप वाटण्याचे काम करू लागली. नंतर  ‘चले जाव’ – ‘छोडो भारत’ चळवळीच्या या नायिकेने आणि तिच्या इतर सहकाऱ्यांनी काँग्रेसची गुप्त नभोवाणी सुरु केली. भूमिगत नभोवाणी केंद्र चालवून गांधी आणि इतर पुढाऱ्यांचे संदेश ती प्रसारित करू लागली. सहकाऱ्यांबरोबर पकडली गेली आणि तिला तुरुंगात टाकण्यात आले. एकाकी कोठडीत ठेवून सहकाऱ्यांना अडचणीत आणता येईल असा जबाब देण्याविषयी तिच्यावर सक्ती करण्यात आली. पण तिने आपल्या सहकाऱ्यांचा विश्वासघात केला नाही. तिचा हा ठामपणा इतर स्वातंत्र्यसैनिकांना कायम स्फूर्तीदायक वाटत राहिला.

उमाबाई कुंदापूर हिला तिच्या सासरच्या नातेवाइकांनी आणि पती संजीव राव यांनी राजकारणात भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. संजीव राव यांच्या मृत्यूनंतर उमादेवीने स्वत: स्वातंत्र्यसंग्रामात उडी घातली. कमालीचे नेतृत्वगुण दाखवून तिने अनेक स्त्रियांना त्या संग्रामात यायला प्रोत्साहित केले. तिने भगिनी मंडळ स्थापले आणि हिंदुस्थानी सेवा दलाच्या महिला शाखेची धुराही संभाळली. मुलींनी शिक्षण घ्यावे म्हणून तिने अथक प्रयत्न केले तसेच स्वातंत्र्यसैनिकाना ब्रिटिशांपासून लपण्यासाठी भूमिगत व्हायला मदतही केली.

मातंगिनी हझरा ही गांधींमुळे इतकी प्रभावित झाली होती की तिच्या खेड्यात तिला ‘गांधी बुढ्ढी’ असे संबोधत असत. दारिद्र्यात जन्मलेल्या या खेडूत कन्येला १८व्या वर्षीच वैधव्य आले. तिथून नंतरचा तिचा जीवन प्रवास लक्षणीय आहे. तिने ब्रिटिशांविरुध्द असंख्य लोकांना चिथावून दिले. तिला अनेक वेळा तुरुंगात डांबण्यात आले. छोडो भारत चळवळीच्या वेळी ती ७३ वर्षांची होती. तेव्हा तिने ब्रिटिशांच्या विरोधात मोर्चाचे नेतृत्व केले आणि तामलिक पोलीस चौकी काबीज करायचा प्रयत्न केला. गोळीबार झाला आणि त्या चकमकीत तिला गोळी लागली. ‘वंदे मातरम्’चा घोष करतच तिने मरण पत्करले.

बंगालमधील पुरोगामी कुटुंबातल्या अरुणा असफअलींचे नाव देखील स्वातंत्र्यचळवळीतील अग्रगण्य नाव होते. मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल त्याना अटक करण्यात आली. तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी स्वत:ला छोडो भारत चळवळीत झोकून दिले. गवालिया टँकजवळच्या सभेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा ध्वज फडकवताना त्यांनी बंदुकीच्या गोळ्याही झेलल्या. काँग्रेसच्या मासिक ‘इन्किलाब’चे संपादनही त्या करीत असत.

अशा कित्येक महिलांचे योगदान आहे आधुनिक भारताच्या जडण घडणीत. भीमाबाई होळकर, झलकरीबाई, भोगेश्वरी फुकनानी, कनकलता बारुआ, राणी गैदेन्लीवू, ए व्ही कुट्टीमालाअम्मा, जानकी अथी नाहप्पन, मूलमती, बेगम रोयेका, कुंतलकुमारी सब्त, कृष्णम्मा जगन्नाथन, प्रीतिलता वड्डेदार, पार्वती गिरी, भिकाजी कामा, मणीबेन पटेल, अक्कम्मा चेरियन, अॅनी बेझंट, कमलादेवी चट्टोपाध्याय आणि कितीतरी अनेक. आंतरजालावर शोध घेतला तर त्यांच्या लोकविलक्षण जीवनाबद्दल थोडक्यात माहिती मिळू शकते.

भारतीय समाज जेव्हा पुराणमतवादी होता, जातीभेदात गुरफटलेला होता, स्त्रियांना शिक्षण देण्याला, त्यांनी घर सोडून बाहेर कार्य करायला ठाम विरोध करत होता अशा वेळी या धाडशी महिलांनी कशाचीही भीती न बाळगता रूढीं  मोडण्यात पुढाकार घेतला. त्यांच्यापैकी काहीं थोड्यांना त्यांच्या आईवडिलांनी, नवऱ्यानी, त्यांच्या सासरच्या नातेवाईकांनी प्रोत्साहन दिले असेल, काही अर्धशिक्षित तर काही अशिक्षित असतील, पण त्यांनी भारतीयांना केवळ स्वातंत्र्यच नव्हे तर सुधारित जीवन देण्यातही हातभार लावलेला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अम्मू स्वामिनाथन, दक्षायनी वेलायुधन, बेगम इजाझ रसूल, दुर्गाबाई देशमुख, हंसा जीवराज मेहता, कमला चौधरी, लीला रॉय, मालती चौधरी, पूर्णिमा बॅनर्जी, राजकुमारी अमृत कौर, रेणुका रे, सरोजिनी नायडू, सुचेता कृपलानी, विजयालक्ष्मी पंडित, अॅनी मस्कारन्हेस या पंधरा महिलांनी भारतीय राज्यघटना तयार करण्यात मदत केली.

सगळ्याच महिलानी काही तलवारी गाजवल्या नाहीत की मोर्चे काढले नाहीत नि स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगवास भोगले नाहीत, पण घरातले  पुरुष या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांना पाठिबा देऊन, घराची आघाडी सांभाळण्यात त्यांचे जे योगदान होते ते दुर्लक्षनीय नक्कीच नाही. त्याना प्रसिद्धी, मानसन्मान मिळाले नाहीत की पुरस्कार, ताम्रपट मिळाले नाहीत पण कर्तव्यातला त्यांचा वाटा त्यांनी उचलला याची नोंद असायला हवी. माझ्या कुटुंबाच्या  वैयक्तिक योगदानाबद्दल लिहायचे तर  माझे स्वातंत्र्यसैनिक आजोबा त्यांच्या आयुष्यात बहुतेक वेळा घराबाहेर असत, तेव्हा मृदुभाषी, प्रेमळ, हळुवार अशा माझ्या आज्जीने घरातल्या लहान मुलांना संभाळणे, वाढवणे, त्यांची शिक्षणे करवणे या सगळ्या गोष्टी एकटीने केल्या. आज्जी-आजोबांच्या संसारात आजोबांच्या अनुपस्थितीमुळे अनेक अडचणी येत गेल्या. कठीण काळात मुलांना बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवावे लागले. अनेकदा अगदी अल्पशा सूचनेने जीवनक्रमात बदल करावे लागले. पण आज्जीने न कुरकुरता ते सगळे सहन केले आणि आजोबांना साथ दिली. त्याना कधीही त्यांच्या अंगीकृत कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्यासारख्या किती तरी कुटुंबाना अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागले असेल पण तेव्हा सगळ्यांनाच आपल्या वैयक्तिक जीवनातल्या सुखापेक्षा स्वातंत्र्यसंग्राम जास्त महत्वाचा होता.

तेव्हा अशा स्त्रियांचं कर्तृत्व – मग त्या स्त्रिया प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या असोत की ज्यांची कुणाला दखलही नसेल अशा असोत – विसरून चालणार नाही. १५ ऑगस्टच्या दिवशी आपण आपला राष्ट्रध्वज फडकवू आणि थोर पुढाऱ्याना मानवंदना देऊ तेव्हा या सगळ्या स्त्रियांच्या त्यागाला आणि धैर्यालादेखील सलाम करायला हवा ही जाणीव असू द्या.

@
मूळ लेख :  दीपा गेहलोत 
मुक्त अनु. सोsहम् दुभाषी
dubhashisohum@gmail.com
( ‘फ्री प्रेस जर्नल, मुंबई दि. १२ ऑगस्ट २०२० यात आलेल्या इंग्रजी लेखाचा मुक्त अनुवाद )
[ प्रकाशचित्रे ‘विकिपेडिया‘वरून साभार ]
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
माय मराठी

सचिन उपाध्ये 

– १ –

प्रत्येक भाषेचा स्वत:चा गोडवा असतो, लकब असते. एखाद्या वस्तुला अनेक शब्द असतात, जसे पाण्याला जीवन, नीर, पय, तोय, अम्बुज, जल इ. एका ठिकाणी ज्ञानेश्वरीतला संदर्भ वाचल्याचे स्मरतंय, पाण्यासाठी माउलींनी २९ शब्द योजले. मला नेहमी अचंबा वाटतो, ज्ञानेश्वरांसमोर बसलेल्या श्रोत्यांनाही ते सगळे शब्द सहजच माहीत होते हे विशेष! साधं उदाहरण घ्या, घरात पाणी प्यायला वापरतो तेव्हा मातीचं भांडं  हा माठ असतो, अंत्यसंस्कारात वापरतो तेव्हा त्याचं मडकं होतं, नवरात्रात घट म्हणून ठेवतो तर दहीहंडीच्या दिवशी ती हंडी होते. मराठीतली गंमत अशी आहे, वस्तू एकच; पण संदर्भानुसार आपण त्याचं लिंगही बदलतो. हे झालं समानार्थी शब्दाविषयी. असंच शब्दार्थाचंही आहे.
‘लागणे’ शब्द पहा कसा वावरतो.

१) भूक, तहान, ठेच, शी-शूसारख्या शारीरिक क्रिया लागतात.
२) नवीन चप्पल-बूटही काही वेळा पायाला लागतात (काहीजणं चप्पल चावते म्हणतात तेच).
३) बुवांचा आवाज शास्त्रीय गायनात असा काही लागतो, बात मत पूछो.
४) कठोर शब्द मात्र जिव्हारी लागतात.
५) विहिरीस पाणी लागतं तेव्हा जिवंत झऱ्याचे ऊमाळे फुटतात
६) प्रवासात एखाद्याला बस किंवा गाडी लागते ते वेगळंच.
७) जेवणानंतर सुपारी लागते का? या प्रश्नास तर दोन अर्थछटा आहेत. सुपारी हवी असते का? आणि घशाला बांध बसतो का ?

असे कितीतरी अर्थ आणि कितीतरी शब्द काढतां येतील.
विनोबा भाव्यांनी एके ठिकाणी म्हटलंय, शब्द कागदावर असतात; पण अर्थ मनांत असतो.
लहानपणी वडिलांनी एक कविता समोर ठेवली आणि अशीच गंमत शिकवली,

शंकरास पूजिले सुमनाने
शंकरास पूजिले सुमनाने
शंकरास पूजिले सुमनाने
शंकरास पूजिले सुमनाने

प्रत्येक वेळेस सुमनाचा वेगळा अर्थ. शंकराची पूजा सु – मनाने अर्थात चांगल्या मनाने, सुमन म्हणजे फुलं आणि सुमन म्हणजे गहू, यांने पूजा केली. तसेच सुमन नावाच्या राक्षसाने त्याची पूजा केल्याचे उल्लेख सापडतात.

आता ही गंमत बघा. प्रसंगानुरूप शब्दही बदलतो आणि अर्थही मात्र पदार्थ तोच.  ताटातलं जेवण आपण जेवत असतो तोपर्यंत ते अन्न असतं. जेवण झाल्यावर जे ताटात उरतं ते उष्टं असतं आणि ताटाबाहेर सांडलं तर ते खरकटं होतं.
अशा मायबोलीची गोडी अनेकांना गेली कित्येक शतके लोभवित आहे. काहीशे’ वर्षांपूर्वीचे हे एक उदाहरण बघा,

जैसी हरळामाजी रत्नकीळा
की रत्नामाजी हिरा निळा
तैसी भाषामाजी चोखळा
भाषा मराठी ।
जैसी पुष्पामाजी पुष्प मोगरी
की परिमळामाजी कस्तुरी
तैसी भाषा माझी साजरी
मराठिया ।।

ज्ञानेश्वरांची रचना वाटते की नाही!
ओळखा कुणाची रचना आहे.
ही रचना आहे १६११-१२ मधील थाॅमस स्टीफन्सची. पोर्तुगालहून आलेल्या या धर्मप्रसारकाने ‘ख्रिस्तपुराण’ नावाचं बायबलवरचं मराठी पुस्तक लिहिलं. त्यालाही ज्ञानेश्वरीतल्या मराठीच्या वैशिष्ट्यांची भुरळ पडली.
मायमराठीतल्या मकरंदाचा असाच आस्वाद जमेल तेव्हा पुन्हा घेऊ.
आज इथेच विरामतो
जय महाराष्ट्र !

– ©️ सचिनदा
sachinupadhye26@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

संस्कृतप्रेमींकरता नवीन नवीन पदार्थ
प्रा. मनोहर रा. राईलकर    
पदार्थ ८०

उदये सविता रक्तो रक्तश्चास्तमये तथा।
सम्पत्तौ च विपत्तौ च महतामेकरूपता।।

दैनंदिन व्यवहारातलं उदाहरण घेऊन महान लोकांचं वर्तन त्यांच्यावर आलेल्या चांगल्यावाईट प्रसंगांवर कसं अवलंबून नसतं, ते कवि ह्या श्लोकात आपल्याला सांगत आहे. उगवताना म्हणजे उदयकाळी किंवा अस्तकाळी सूर्याचा रंग लालच असतो. भरभराट आली म्हणून ते माजत नाहीत, किंवा आता आपली सद्दी संपली म्हणून निराश होऊन स्वस्थही बसत नाहीत.
– ©️ प्रा. मनोहर रा. राईलकर 
railkar.m@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^ 
‘मैत्री’च्या बालवाचकांसाठी खास स्पर्धा
प्रकाशचित्रावरून शब्दचित्र रेखाटन  
प्रिय वाचक मित्रहो,
सस्नेह नमस्कार

‘मैत्री’ अनुदिनीमध्ये आता महिन्यातून २ किंवा ३ वेळा ‘बालकुमारांचे पान’ प्रसिद्ध होत आहे. या सदराच्या माध्यमातून काही नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार संपादक मंडळाने केला आहे. ‘मैत्री’ अनुदिनी आणि ‘एरा फुड्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने बालवाचकांसाठी एक खास स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

या स्पर्धेसाठी दोन प्रकाशचित्रे ( photo )आजच्या ‘मैत्री’च्या अंकात ( या निवेदनाच्या शेवटी ) प्रसिद्ध केली आहेत. ती म्हणजे कोणत्याही एका सहलीचे ठिकाण अथवा पर्यटनस्थळ आहे. मुलांनी त्यावर कल्पना करावी की आपण या सहलीला गेलो आहोत आणि नंतर ही सहल कशी केली याचे शब्दचित्र त्यांनी रेखाटून ‘मैत्री’चे संपादक श्री. मंगेश नाबर यांच्या  ई-पत्त्यावर पाठवावे.  मुलांना हे शब्दचित्र रेखाटण्यास एक महिन्याचा अवधी दिला जात आहे. शब्दचित्र पाठवण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०२० आहे.

या स्पर्धेसाठी पुढील नियम असतील. :-
(१) आठ ते तेरा वर्षांच्या जगभरातील कुठल्याही मुलामुलींसाठी ही स्पर्धा खुली असेल.
(२) स्पर्धकाने लिहिलेले शब्दचित्र हे मराठीत असले पाहिजे. शब्दचित्र ३०० शब्दांच्या आत असावे. एका स्पर्धकाला एकच शब्दचित्र पाठवता येईल.
(३) हे शब्दचित्र स्पर्धकाच्या हस्ताक्षरात असले तरी चालेल किंवा त्याने तोंडी वर्णन केल्यावर आईवडील किंवा आजोबा आजी यांनी युनिकोडमध्ये टंकून – वर्ड डॉक्युमेंटमध्ये ते शब्दचित्र पाठवलेले असावे.
(४) स्पर्धक आपल्या हस्ताक्षरातील शब्दचित्रे jpg या माध्यमातून पाठवू शकतात. मात्र पी डी एफ शब्दचित्रे स्वीकारण्यात येणार नाहीत.
(५) सर्व शब्दचित्रे ‘मैत्री’च्या संपादकांकडे ईमेलने mangeshnabar@gmail.com  या ई-पत्त्यावर पाठवण्यात यावी. त्यांवर स्पर्धकाचा निवासाचा संपूर्ण पोस्टाचा पत्ता, ईमेल आयडी (असल्यास) किंवा प्रेषक पालकांचा ईमेल आयडी, दूरध्वनी / मोबाईल क्रमांक ही माहिती आणि स्पर्धकाच्या वयाबाबत प्रेषकांकडून स्पष्ट शब्दात खुलासा केला गेला पाहिजे. शब्दचित्राबरोबर ही माहिती नसल्यास ते स्वीकारले जाणार नाही.

या स्पर्धेसाठी ‘मैत्री’ परिवारातील ज्येष्ठ सदस्य श्रीमती मृदुला प्रभुराम जोशी या माननीय परीक्षक असतील. त्यांनी निवडलेल्या पहिल्या तीन क्रमांकांची शब्दचित्रे ‘मैत्री’तून सन्मानपूर्वक प्रसिद्ध करण्यात येतील. परीक्षकांचा निर्णय अखेरचा आणि या स्पर्धेत भाग घेणा-या सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल. त्यासंबंधात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

वरील स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून ‘एरा फुड्स’चे देवेंद्र रमेश राक्षे यांनी जबाबदारी घेतली आहे. यशस्वी स्पर्धकाला ‘एरा फुड्स’तर्फे विशेष भेटवस्तूच्या रूपाने पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल. बक्षीसरूपाने देण्यात येणा-या भेटवस्तू या ‘एरा फुड्स’तर्फे श्री. देवेंद्र रमेश राक्षे पाठवतील व त्याबाबत सर्व जबाबदारी त्यांची असेल. स्पर्धेच्या भेटवस्तूंबाबत अथवा इतर कोणत्याही तक्रारीबाबत ‘मैत्री’ अनुदिनीचे संपादक मंडळ जबाबदार असणार नाही याची देखील नोंद घ्यावी.

‘मैत्री’च्या चोखंदळ वाचकांनी तसेच अन्य रसिक मित्रांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग घ्यावा हे ‘मैत्री’ अनुदिनीच्या वतीने अगत्याचे आवाहन.

धन्यवाद.

आपला,

मंगेश नाबर
(संपादक, ‘मैत्री’)

१ आयफेल टॉवर, पॅरिस, फ्रान्स

 

 

२. नायगारा धबधबा, ऑन्टॅरिओ, कॅनडा

@@@@@@@@@@
महत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@

 

मोर  समोर रस्त्यावर

अवधूत परळकर
 
 

विशू ओरडला, ” राजू,  मोर ! ”

“कुठाय “?

” अरे, खाली बघ रस्त्यावर ”

” बाबा , लवकर या, मोर बघा मोर,” राजुने बाबांना हाक मारली. बाबा गॅलरीत आले. पाठोपाठ राजूची आई आली. सरला वहिनीही आली.

मोकाशीच्या फॅमिलीनं ते अभूतपूर्व दृश्य पाहिलं. रस्त्यावर दोन तीन मोर छान बागडत होते…

आणि केवळ मोकाशींच्या फॅमिलीने नाही तर मुंबईतल्या अनेक कुटुंबांनी सोसायटीच्या प्रांगणात आणि रस्त्यावर मोर हिंडतांना पाहिले.

दुस-या दिवशी पेपरातही फोटोसहित बातमी झळकली — निर्मनुष्य रस्त्यावर शहरात मोर फिरताना अनेकांनी पाहिले.

काही म्हणाले,  परवा एक खार  खिडकीतून आमच्या घरात शिरली. इतर काहींनी माकडे गॅलरीत खेळतांना पाहिली. गावाकडच्या रस्त्यावर हरणांचे तांडे रस्त्यावर बागडतांना दिसले. शहराचं हळूहळू अभयारण्यात रूपांतर होते आहे असं विलक्षण द्दश्य दिसू लागलं.

तसं पाहिलं तर मोठं अभूतपूर्व द्दश्य. पण फार आश्चर्यकारक म्हणता येणार नाही.

करोना नावाच्या  भयंकर विषाणूने शहरात थैमान घातल्यानं शहरात सर्वत्र लॉक डाऊन जाहीर झाला  होता. या विषाणूचा प्रसार होऊ नये लोकांनी स्वतःच्या  घरात स्वत:लाच कैद करून घेतलं होतं. तसा शासकीय आदेशच होता.

दुकाने, कारखाने बंद, कचे-या बंद, बस, टॅक्सी, खाजगी गाड्या आणि ट्रेनची वाहतूक  बंद, रस्त्यावर सर्वत्र सामसूम. पुण्या मुंबईसारख्या  शहरातले रस्ते निर्मनुष्य झाल्यावर झाडाझुडपात दडून बसलेल्या प्राण्यांना  मुक्त संचाराला मोकळं रान मिळालं.

एकेकाळी हा सर्व अवकाश त्यांचाच तर होता. माणसांनी त्याच्या भूमीवर आक्रमण केलं. माणसंच नाहीशी झाली पाहून या प्रांण्यांनी आपला भूभाग पुन्हा ताब्यात घेतला.

सर्व वनश्री तोडून मोडून  माणसं जेव्हा इथं घर बांधून राहायला लागली  तेव्हा इथं बागडणारे  पशु पक्षी निर्वासित बनले. माणसं नुसती घरं बनवून स्वस्थ बसली नाहीत. त्यांनी आपल्या सुख सोयीसाठी कारखाने उभारले. वस्त्या दूरवर पसरल्यानं त्यांना प्रवासासाठी वाहनं निर्माण करावी लागली. ही वाहनं आणि कारखाने हवेत दूषित धूर सोडू लागली.

विकासासाठी उद्योग उभे करायला जागा पाहिजे म्हणून माणसांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडही सुरु केली.

पशुपक्षी इथले मूळ रहिवाशी. त्यांच्यावर बेघर होण्याची पाळी आली.  आपल्याच भूमीतून त्यांना परागंदा व्हावं लागलं.

रोग प्रसाराच्या भीतीनं परवा  मनुष्यप्राणी घर नावाच्या पिंज-यात बंदिस्त झाल्यावर या प्राणिजगताला किती हर्ष झाला असेल, धिटाईनं ती रस्त्यावर बागडू लागली. माणसांनी उभारलेल्या घरांच्या गॅलरीत शिरू लागली. पुस्तकातले प्राणी मुलांना रस्त्यावर स्वच्छंद हिंडताना दिसू लागले.

मग राजू ओरडून म्हणाला बाबा, ” मोर बघा मोर !”

एरवी कोणाताही पक्षी माणसाचं ओरडणं कानी पडलं की पळून जातो. राजूच्या ओरडण्यानं मोर पळाला नाही. त्यानं रुबाबात मान उंचावून राजुकडे पाहिलं. इतक्या जवळून माणसाचं पिल्लू तो पहिल्यांदा पाहात असावा.

असो. प्राणीसंग्रहालय दारासमोर आल्यानं शहरवासी सुखावले.

प्राणीजगताबद्दल त्यांच्या मनात एकदम प्रेम दाटून आलं. डिस्कव्हरी चॅनलचे कलाकार असे एक दिवस आपल्या दारात येऊन उभे राहतील असं त्यांना स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं.  लॉकडाऊनमुळे हे भाग्य आपल्या वाट्याला आलंय. त्या  कोरोनामुळे ज्या काही चांगल्या गोष्टी त्यापैकी ही एक.

कोरोनामुळे आपण घरात अडकून पडलोय खरं पण त्यामुळेच आपण आज सर्व कुटुंबासमवेत एकत्र बसून गप्पा मारू शकतो. टीव्हीवरच्या सिरियल बघू शकतो. घरबसल्या सिनेमे बघू शकतो. आणि आता खिडकीतून बाहेर पाहिलं की हे वन्यजीवन.

कोरोनानं लादलेला हा बंदीवास सुसह्य व्हावा म्हणून शहरवासीय सुखवस्तू कुटुंबांनी आणखीही ब-याच क्लुप्ती शोधून काढल्या होत्या..नवे हौशैगौशे कवी … कथालेखक .. नकलाकार .. गायक .. नर्तक बघता बघता मोबाईलवरचे ऑन लाईन सेलिब्रेटि बनून गेले.

हे सर्व कोरोना कृपेनं घडलं.

आणि हे सारे औटघटकेचं चित्र आहे,  याची जाणीव किती जणांना आहे. ठाऊक नाही.  आजवर  किती वाईट आणि धकाधकीचे जीवन जगत होतो आपण, असं सारे एकमेकांना सांगू लागले आहेत.

हा मजकूर वाचत असताना या शहराचे व्यवहार कदाचित पूर्ववत सुरू झाले असतील. रस्त्यावर वाहनं धावू लागली असतील. बाजार, मॉल पुन्हा गजबजून गेले असतील. घरात डांबलेले हौशी कलाकार  बस आणि गाड्या पकडून नोकरीधंद्याला जाऊ लागले असतील. चाकरमाने टांगलेल्या अवस्थेत गच्च भरलेल्या लोकलमधून प्रवास करू लागले असतील.

थोडक्यात सर्वच चित्र बदललेलं असेल. सक्तीनं घरात डांबलं गेल्यामुळे आलेलं उसनं शहाणपण नेहमीचे वारे वाहू  लागले की त्या वा-याबरोबर उडून गेलं असेल. कुटुंबात संवाद राहावा, मुलाबाळांना पालकांचा सहवास मिळावा म्हणून काही आपण पालक नोकरीधंदा सोडून घरी राहिलो नव्हतो असा साक्षात्कार सर्वांना झाला असेल.

एकदा मोटारींची वर्दळ सुरू झाली की मोर आणि खारी रस्त्यावर दिसणार नाहीत. आकाश कारखान्याच्या पुरानं काळवंडलं की  ” किती स्वच्छ आहे आकाश… किती तारे चमकताहेत आकाशात ”  असे उद्गार ऐकू येणार नाहीत हे सर्वांना कळून चुकलं असेल.

पण मुलांचं काय !

या सगळया बदललेल्या द्दश्यानं  गोंधळलेली लहान मुलं विचारत राहतील — “बाबा, मोर कुठे गेले आपल्या कंपांऊंडमधले ? ”

__________________________________________________

– ©️  अवधूत परळकर

awdhooot@gmail.com

छायाचित्र : आंतरजालावरून साभार
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
डॉ. विजय आजगावकर यांना विनम्र श्रद्धांजली  
 

डॉ. विजय आजगावकर दि. १५ सप्टेंबर २०१७ रोजी आपल्या क्लिनिकमध्ये

 

दै. महाराष्ट्र टाइम्स दि. १३ ऑगस्ट २०२०

 

दै. लोकसत्ता दि. १३ ऑगस्ट २०२०

 

प्रिय वाचक मित्रहो,

आपल्या ‘मैत्री’अनुदिनीचे एक ज्येष्ठ सदस्य व खंदे मार्गदर्शक, निष्णात मधुमेहविशेषज्ञ, लेखक, कवी डॉ. विजय आजगावकर यांचे निधन दि. ११ ऑगस्ट २०२० रोजी त्यांच्या मुंबईतील जुहू येथील निवासस्थानी झाले. ‘मैत्री’चा  आधारस्तंभ निखळला. ‘मैत्री’च्या परिवारात अतीव दुःखाचे वातावरण पसरले. आम्ही सारे अत्यंत शोकाकुल असून डॉ. आजगावकर यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. डॉ. आजगावकर यांच्या निधनाने ‘मैत्री’ परिवाराची आणि आमची व्यक्तीशः कधीही भरून येणार नाही अशी अपरिमित हानी  झाली आहे. आमच्या परिवारातील ज्येष्ठ सदस्या श्रीमती मृदुला प्रभुराम जोशी यांनी डॉ. आजगावकर यांना वाहिलेली विनम्र आदरांजली खाली देत आहोत. – सं. :-

आज  सकाळी अचानक डॉ. विजय आजगावकर यांच्या निधनाची अत्यंत दुःखदायक बातमी आली आणि जीव हळहळला. माझ्या मनात जी घालमेल झाली ती लगेच शब्दबद्ध करावी म्हणून हे लिहीत आहे.

” फार चांगला माणूस होता..” अशी आपण गेल्यानंतर  आपली आठवण काढली जावी असं आपल्याला सगळ्यांनाच वाटत असतं. पण हे भाग्य फार थोड्यांच्याच वाट्याला येतं. डॉ. विजय आजगावकर यांच्या निधनाची बातमी ऐकल्याबरोबर माझ्या मनात उमटलेली पहिली प्रतिक्रिया मात्र अगदी हीच होती.. फार चांगला माणूस होता!

माझा आणि त्यांचा संबंध डॉक्टर आणि पेशंट असा कधीच नव्हता तरीसुद्धा ते आपल्या पेशंट्सशी कसे वागत असतील त्याचा अंदाज साध्या संभाषणातूनही करता येत असे. त्यांच्या आवाजातच एक माया, आस्था, जिव्हाळा, प्रेमळपणा जाणवत असे. कुणीही भेटलं किंवा फोन केला तरी आधी प्रकृतीची चौकशी आणि नंतर सर्व काही. निदान माझा तरी अनुभव असाच आहे.

बाकीचं जग त्यांना एक प्रख्यात मधुमेहतज्ज्ञ म्हणून ओळखत असलं तरी मला त्यांच्या वेगळ्याच गुणांचा योगायोगाने परिचय झाला होता. अक्षरशः बोलता बोलता ते समोर बसलेल्या व्यक्तीचं रेखाचित्र किंवा पोर्ट्रेट काढू शकत असत. आणि तेही अगदी हुबेहूब. तशीच दुसरी कला म्हणजे शीघ्रकवित्व. संभाषणात चालू असलेल्या विषयावर लगेच एक कविता तयार व्हायची. अर्थात या कवितांना किंवा त्यांनी काढलेल्या चित्रांना कुठे प्रसिद्धी मिळावी अशी त्यांची मुळीच इच्छा नसे. ते फक्त त्यांचा स्वतःचा छंद किंवा समाधान एवढंच असे.

माझ्यापुरतं बोलायचं तर माझा एक जवळचा आधार गेला असं आत्ता मला अगदी तीव्रतेनं वाटतंय. डॉक्टरसाहेबांना माझी भावपूर्ण आदरांजली.

– मृदुला प्रभुराम जोशी
११ ऑगस्ट २०२०.

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आजची कविता

वर्षा पेठे 
नंदाचा नंद
भक्ता आनंद कंद
श्रीकृष्ण जन्मदेवकी सुत
जन्मे बंदिवासात
बंधनमुक्त

जाहला धन्य
डोईवरी घेता देव
तो वसुदेव

यशोदा मैय्या
पाहूनी त्या कन्हैया
हर्षली मना

हरी दर्शनी
गोप गोपिका दंग
भक्तीचा रंग

– ©️  वर्षा पेठे 

[ गोकुळाष्टमीनिमित्त हायकू रचना प्रकार.]

@@@.

प्रिय सख्या कृष्णा…..
मनात सदैव सुरू असतो…
तुझ्याशी संवाद……………
जसा मला….भावतोय…. जितका कळतोय….जाणवतोय…
तितका व्यक्त करु पाहतेय….

तुझ्या आयुष्यात किती रूपात…..
तुला स्त्रीची शक्ती आणि प्रेम मिळालंय…………

तू जन्माला यायच्या आधीच देवकीने…. बंदिवासात राहून..
पुत्र वियोगाच दुःख भोगलंय…..

तूं सुखरूप जन्माला यावास…. म्हणून तुझ्या बहिणीनं स्वतःचं अस्तित्व संपवलंय…..

यशोदेनं तुझं आईपण…. स्वीकारलंय.. निभावलंय….

राधेनं प्रेयसी बनून…. संपूर्ण समर्पण केलंय………..

गोकुळातल्या गोपिका…वा कुब्जा… वेणू..वृंदा..किंवा यमुना…असंख्य सख्या….. वेड्यासारखं प्रेम केलंय…. सगळ्यांनी तुझ्यावर…

हरण करून आणलेली ती रुक्मिणी असो…..
की तुझी हट्टी सत्यभामा……

तुझ्या सगळ्याच राण्या….. सहस्त्र सोळा भार्या…….

तुझी भगिनी सुभद्रा…….
तुझी प्रिय सखी द्रौपदी…..
कुंती असो की गांधारी……

की तुझं अस्तित्व संपल्यानंतरही…….
तुझी प्रेम दिवानी मीरा……

प्रत्येक स्त्रीमनाशी….. तुझं अतूट नातं……. युगानुयुगे…
त्यांच्यात.. तुझं.. अस्तित्व…
खरं सांगू….मला वाटतं…… त्यामुळेच लाभलंय तुला… देवत्व… पूर्णत्व……

– ©️  वर्षा पेठे 
vnpethe@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

तू नसता तर ?

 

सौ. स्वाती वर्तक  


निकोलस जेम्स वूईचीच म्हणतो, “हात नाहीत, पाय नाहीत मग काळजीच नाही . माझ्या उणिवांकडे का बघता ? माझ्या क्षमता बघा नं… “आज मी तुम्हाला अश्याच एका निकोलसची गोष्ट सांगणार आहे.

तो दिवस मला नीट आठवतो. ६ मार्च २००२, शाळेत बातमी आली . आपल्या रेशमा शिक्षिकेला मुलगा झाला. सर्वानाच खूप आनंद झाला. मीही खुश होते. रेशमा माझी विद्यार्थिनी होती पण आता ती नुकतीच शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. मी उद्गारले…”वा ! कधी ? चला,आपण जाऊ या का बाळाला बघायला ?”
तिची खास मैत्रीण हळूच पुटपुटली…”नका, जाऊ मिस ..तुम्ही ..”
“का ?”

अगदी खाजगीत म्हणाली…”बाळ, सामान्य नाही,” रेशमा रडतेय.
हळूहळू तिचे वर्णन ऐकून माझ्या डोळ्यात पाणी तरारले पण क्षणातच स्वतःला सावरले .
मी मोठी होते. म्हटले तर मी आजी झाले होते.
आमची रेशमा ..म्हणजे चैतन्याचा खळाळता झरा जणू. ! सतत हसत बोलणारी, हसवणारी. इतक्या लहान वयात तिच्यासमोर हे काय वाढून ठेवले होते.
तिला सावरणे, तिला समजून घेणे आपले कर्तव्य नव्हे का ?तिच्या ढोलकावाला इस्पितळात परिस्थिती कठीण होती. डॉक्टर हतबल होते. घरच्यांच्या डोळ्यातील पाणी खळत नव्हते. डॉक्टरांनी सांगितले .”.बाळाच्या आयुष्याबद्दल काही सांगता येणार नाही. त्याला फोकोमेलिया आहे. त्याच्या हातापायांची वाढ कितपत होईल माहीत नाही. प्लेटलेट्स इतके कमी आहेत की जीवन किती असेल हेही सांगता येत नाही .किडनी पण दोन्ही वेगळ्या नाहीत; जास्तीत जास्त ६ महिने जगणार.”
५, ६ दिवसातच त्याचे संपूर्ण अंग निळे पडले. ताबडतोब त्याला वाडिया रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. कसाबसा बरा झाला. जगला.. जे जे इस्पितळात त्याला ९९% अपंग म्हणून घोषित करण्यात आले.

दिवस जात होते . खळाळून हसणारी पण काही काळ मलूल झालेली रेशमा खंबीर झाली. आपण सारे काहीही म्हटले तरी फक्त दया, कणव, सहानुभूती दाखवू शकतो पण आई ?…….तिचे काळीज त्याच्या प्रत्येक दुखल्या खुपल्याला समजून घेते, त्याच्या प्रत्येक भाव भावनांची जपणूक करते. ती आणि तिचे पती श्री इक्बाल दोघे ही बाळाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहीले.

आणि मग सुरू झाला त्यांचा महायज्ञ……त्यात किती समिधा गेल्यात ..गणती नाही.आज या डॉक्टरांचा उंबरठा तर उद्या त्या . असंख्य डॉक्टर, अनेक शल्यक्रिया…

बाळाचे नाव ठेवले …झैन

झैन दिसामाजी वाढत होता. डॉक्टरांच्या कथनास खोडून काढीत होता . इतक्या कमी प्लेटलेट्समध्येही इंजेक्शने, औषधे याला कधी छान प्रतिसाद देत होता; कधी निराश करीत होता.
पण आपल्या या ‘निकोलस’च्या क्षमता वाढत होत्या .त्याला शाळेत जावेसे वाटू लागले . अडीच वर्षाचे पोर पण त्याचा उत्साह, विश्वास वाखाणण्यासारखा होता.

पुनः सुरू झाली आई, वडिलांची पायपीट..आज ही शाळा, उद्या ती..कोणीही त्याला प्रवेश देईना. असे बालक आम्ही कसे घेऊ ? कुठे ठेवू, कोण बघेल ? सगळीकडे नन्नाचा पाढा.
त्या लहान वयात ..एकता ..नावाच्या एका शिक्षिकेने त्याला …ब्लूमिंग स्टार ..मध्ये घेतले .प्री स्कूलमध्ये त्याचे खूप प्रेमाने केले.

परत ज्युनिअर केजीसाठी सुरू झाला शोध. सगळीकडे नाही..शब्द ऐकल्यावर थोडेसे हतोत्साहित होतच असे.
पण एक शेजारीण मनीषा म्हणाली आणि फातिमा नावाच्या शिक्षिकेने त्यांना ..लिटिल फ्लॉवर इंग्लिश हायस्कूलची वाट दाखवली . तेथील मुख्याध्यापिका..जेनेट डिसूझा …हिच्या प्रेमळ स्वभावाचे आणि मदतीचा हात दिल्याचे गोडवे झैन अजूनही गातो.

पण …झैनचा आत्मविश्वास, आईबाबांचे प्रयत्न ..! याचा फार मोठा वाटा होता.

रेशमा भेटत असे. सांगत असे. झैनला फॅन्सी ड्रेसमध्ये भाग घ्यायचाय,… त्याला कथाकथन स्पर्धेत भाग घ्यायचाय. ऐकून मला भरून येत असे. जमेल ती मदत करण्यास मी तत्पर होई. एकदा कथाकथनमध्ये  त्याला “माकडे आणि टोपी वाला “ ..ही कथा अगदी लहान लहान वाक्ये बनवून मी इंग्रजीत लिहून दिली. रेशमाला साभिनय कशी सांगायची हेही सांगितले. दुसऱ्या दिवशी रेशमा सांगत होती ..मिस, झैनने पूर्ण कथा पाठ केलीय पण तो म्हणतो, …”त्या वर्तक आजीला काही कळत नाही का ? माझे हात डोक्यावर जाणार कसे?, मी डोक्यावरची टोपी काढून फेकणार कसा ? “

त्या ५ वर्षाच्या चिमुरड्याचे ते वाक्य ऐकून माझ्या मनात किती कालवाकालव झाली असेल हे सूज्ञास सांगणे न लगे. परत जाणीव झाली ..सहानुभूती आणि समानुभूतीमध्ये खूप अंतर आहे.

झैनची जिद्द, त्याचा उत्साह, शिकण्याची ओढ आणि मुख्यत्वे आत्मविश्वास त्याला यशाच्या जवळ नेत असे.
एक एक सोपान तो विश्वासाने चढत होता
डॉक्टरांचे प्रयत्न, त्यांच्या यशस्वी शल्यक्रियाही त्याला पुष्कळ बरे करत होते. त्याच्यात बरीच सुधारणा दिसत होती.
आणि त्याला साथ देत होती मुख्याध्यापिका, सहशिक्षक आणि त्याचे मित्र.  .

मोठयांची मदत ही विचारपूर्वक आलेली असते. झैनचे आईवडील सांगतील तसे टेबल, खुर्ची आणण्यास, त्यावर बसावयास शाळा परवानगी देत असे. शिक्षिका त्याला समजून घेत पण लहान मुले. त्याला बसमध्ये चढताना, उतरताना ..त्याचे दप्तर स्वतः हातात घेऊन इतक्या प्रेमाने त्याला सांभाळायचे की ते बघून सगळे अवाक् होत. त्याच्या डबा खाण्याच्या मध्यंतरात मुले त्याच्या जवळ पाळीपाळीने बसून राहत की सर्व खेळताहेत ते बघून त्याला वाईट वाटेल ना . डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटमुळे तो शाळेत येऊ शकला नाही तर त्याला नोट्स काढून देत .! कोठून येते इतक्या लहान वयात ही समज ?

हे सर्व लिहिण्याचे कारण ..झैन ..अजूनही मित्रांचा स्नेहभाव विसरत नाही . आवर्जून त्यांचे कौतुक सांगतो त्यांच्या आठवणी सांगतो . त्याला पुष्कळ मित्र आहेत . त्यांना गोष्टी सांगणे ,खेळणे यात त्याचा वेळ चांगला जातो.

म्हणता म्हणता झैन दहावीच्या वर्गात पोचला . इवल्याश्या हातांनी , इवल्याश्या बोटांनी तो पेपर लिहितो . नियमानुसार त्याला अधिकचा वेळ दिला जातो तेवढ्या वेळात तो ते पूर्ण करतो. दहावीत त्याला ७२% गुण मिळाले. जिकडे तिकडे त्याच्या यशाचे गोडवे गायले गेले. त्याचा सत्कार करण्यात आला.

ज्युनियर कॉलेजसाठी देखील जेनेट मॅडमनी त्यांच्या शाळेच्या सेलिन डिसिल्वा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रवेश मिळवून दिला.

                                                            झैन

नुकताच बारावीचा निकाल लागला. तो ७४% गुण मिळवून पास झाला. घरचे सारेच आनंदात आहेत. आता त्याला वेध लागले आहेत. विश्वविद्यालयात जाण्याची. बी कॉम ही पदवी मिळवण्याची. ते सारे त्याला मिळो अशा आपण शुभेच्छा देऊ या.
झैन इक्बाल नाईक…तू  खूप मोठा हो !

त्याच्या यशाबद्दल विचारले तर, झैन सांगतो, “माझ्या आयुष्याला वळण लावण्याचं मोठं कार्य जेनेट मॅडमचंच. त्यांचं ऋण मी आयुष्यात विसरणार नाही.जर पदवीसाठी यांचं कॉलेज असतं तर मी येथेच प्रवेश घेतला असता. ”
आणि म्हणतो ……”आत्मविश्वास…तू नसता तर ..!”
त्याचे आईवडील म्हणतात,…..”झैन, .तू नसता तर, आमचे आयुष्य किती बेचव झाले असते… ”
त्याचे मित्र म्हणतात, ……”झैन, तू नसता तर …आयुष्य असेही सुंदर असू शकते हे आम्हाला कोणी शिकविले असते ?”

@@@

नोंद : वरील प्रकाशचित्र ‘मैत्रीमध्ये प्रसिद्ध करण्यास झैन इक्बाल नाईक आणि त्याची आई रेशमा नाईक यांनी परवानगी दिली आहे, असे सौ. स्वाती वर्तक यांनी कळवले आहे.
– ©️  सौ. स्वाती वर्तक
खार ( प. )
मुंबई ४०० ०५२
swati.k.vartak@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

शब्द – शब्द – शब्द

डॉ. उमेश करंबेळकर 
६३. 
भुंगा 
 
भुंगा हा कीटक वर्गातील प्राणी आहे. संस्कृतमध्ये त्याला भृंग किंवा भ्रमर असं म्हणतात तर इंग्रजीत त्याला Bumblebee हा शब्द आहे.
मधमाशीप्रमाणेच भुंगा फुलांतील मध त्याच्या लांब केसाळ जीभेने चोखून घेतो.परागकण पिल्लांसाठी असतात व मध साठवला जातो. मधमाशांप्रमाणेच भुंग्यांचीही वसाहत असते आणि त्यात राणी असते. भुंग्याचं पोट गोलाकार असतं आणि त्यावर मधमाशांसारखे फारसे पट्टे नसतात, काहींमध्ये तर अजीबात नसतात. भुंगे परागीवहनाचे कार्य करतात. फळशेतीसाठी भुंगे आवश्यक असतात. युरोपमध्ये कीटकनाशक आणि शेतीचे यांत्रिकीकरण यांमुळे भुंग्यांची संख्या कमी झाली आहे.
भुंगा उडताना त्याच्या पंखांची वेगाने म्हणजे एका सेकंदात सुमारे दोनशे वेळा हालचाल होते. त्यामुळे जो ध्वनी निर्माण होतो त्याला गुंजारव असं म्हणतात. ’मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला’ ह्या ‘मानापमान’ नाटकातील पदात त्याचा उल्लेखआहे. मधुर आवाजातील गुणगुण्याला गुंजारव म्हणतात.
खरं म्हणजे भुंगा असा आपल्याजवळ गुंजारव करू लागला की तो दंश करेल का याची भीती वाटते. भुंग्याचा दंश देखील मधमाशीसारखा वेदनादायक असतो. पण मधमाशी चावल्यानंतर तिचा काटा शरीरात रुतून बसतो तसं भुंग्याने केलेल्या दंशामुळे घडत नाही. कारण भुंग्याच्या दंशकाला (Stinger) आकडा (barb) नसतो. महत्त्वाचं म्हणजे भुंगे शांत स्वभावाचे असतात आणि ते उगाच दंश करत नाहीत. असं असलं तरी भुंग्याच्या आवाजाला गुंजारवपेक्षा भुणभुण हाच शब्द चपखल वाटतो. भुणभुण करणारा तो भुंगा अशीच भुंगा ह्या शब्दाची व्युत्पत्ती असावी.
लहान मूल आईकडे सारखा हट्ट करायला लागलं की आई रागावून म्हणते, ” सारखा काय माझ्यामागे भुंगा लावलायंस.”  येथे भुंगा म्हणजे भुणभूण, हट्ट, पीडा असा अर्थ अभिप्रेत असतो.
भुंगा अनेक फुलातील मध शोषतो. पण संस्कृत साहित्याशी ज्यांचा परिचय असेल त्यांना भुंगा आणि कमळ यांचं नातं सांगण्याची गरज नाही. कमळातील मकरंद खाऊन भुंग्याला गुंगी येते. त्यामुळे संध्याकाळी कमळाच्या पाकळ्या मिटल्या की भुंगा कमळात अडकून पडतो.अशी कल्पना संस्कृतमध्ये अनेक काव्यात आढळते. मराठीतील “मिटता कमलदल होई बंदी हा भृंग, परि सोडीना ध्यास, गुंजनात हा दंग घेई छंद मकरंद “ हे नाट्यगीत प्रसिद्धच आहे.
कमळाच्या केसराला ईजा होऊ नये म्हणून भुंगा हळुवारपणे कमळावर बसतो. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या अलौकिक प्रतिभेने त्याचं वर्णन एका ओवीत केलंय, ती ओवी अशी,
का कमळावरी भ्रमर | पाय ठेविती हळुवार | कुचंबैल केसर| इया शंका ||१३.२४७||
त्याचप्रमाणे भ्रमर लाकूड पोखरतो पण नाजूक कमल दल भेदून बाहेर येऊ शकत नाही ह्याचंही वर्णन करणारी देखील एक ओवी आहे. ती अशी,
जैसा भ्रमर भेदी कोडे | भलतैसे काष्ठ कोरडे | परी कळिकेमाझी सांप़डें | कोवळियें ||१.२०||
भ्रमर म्हणजेच भुंग्यावरून काही वनस्पतींना आयुर्वेदात नावे दिलेली आहेत.
जांभळाच्या फुलांचं त्याला आकर्षण वाटतं. म्हणून जांभळाला संस्कृतमध्ये भ्रमरइष्टा असं नाव आहे. तसंच भुंग्याला मोगरी, कदंबाची फुलंही फार आवडतात म्हणून ह्या फुलांना भ्रमरप्रिय असे नाव आहे. माळव्यात भ्रमरच्छली नावाची वनस्पती प्रसिद्ध आहे. भुंगे जवळ आले की ती त्याला मारते म्हणून भ्रमरच्छली. अरि म्हणजे शत्रू. यावरून भ्रमरारि असंही तिचं नाव आहे.
शब्दकोशात ही संस्कृत नावे पाहताना भ्रमर करंडकः असा शब्द दिसला. त्याचा अर्थ भुंग्याची डबी असा दिला होता. करंडक म्हणजे डबी किंवा छोटा करंडा. करंड्यात दागदागिने ठेवतात. मग भुंग्याच्या डबीचा काय उपयोग? त्या करंड्याचा आकार भुंग्यासारखा असतो म्हणून तिला भ्रमर करंडक म्हणतात का ?
अशा शंका मनात उपस्थित होतात. भ्रमर करंडकाचा उपयोग कशासाठी केला जाई हे समजलं तर तुम्ही चकित व्हाल आणि माणूस हा प्राणी किती बेरकी आहे हे तुमच्या लक्षात येईल..
पूर्वीच्या काळी चोर चोरी करण्यासाठी भुंग्याच्या डबीचा वापर करत. भुंग्याच्या डबीत भुंगे ठेवलेले असत. त्या काळी रात्री तेलाचे दिवे लावून लोक झोपी जात. चोरी करण्यासाठी चोर घरात शिरल्यानंतर डबीतील भुंगे घरात सोडत. भुंग्यांसारखे कीटक प्रकाशाकडे आकर्षिले जातात. त्याप्रमाणे हे भुंगे दिव्यांवर झडप घालत. त्यामुळे दिवे विझत आणि चोर निर्धोकपणे चोरी करत. आहे की नाही माणूस डोकेबाज!
– ©️ डॉ. उमेश करंबेळकर

umeshkarambelkar@yahoo.co.in

छायाचित्र : मराठी विश्वकोशावरून साभार [ marathivishwakosh.org ]
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
संस्कृत शिकायचंय ना ?
प्रा. मनोहर रा. राईलकर 
 
पाठ ५१ ( धातुसाधित १ )
पाठ ५० उत्तरे. (१) यदा त्वं तत्र गमिष्यसि तदा अहं त्वां द्रक्ष्यामि। (२) यदा त्वं फलं खादिष्यसि तदा अहमपि फलं खादिष्यामि। (३) इदानीं तत्र कः गमिष्यति? (४) अहं अद्य अन्नं न पक्ष्यामि। (५)  त्वं श्वः शालां गमिष्यसि किम्?
आज आपण धातुसाधितं शिकू. धातुसाधित म्हणजे धातुपासून साधलेले शब्द. (साधित हाही साध् ४, ५ प ह्या धातूपासून साधलेलाच शब्द.) धातूंना काही प्रत्यय लागून नामं, विशेषणं आणि अव्ययं मिळतात. ह्या प्रत्ययांना कृत् प्रत्यय म्हणतात. म्हणून धातुसाधितांना कृदन्त (कृत् आहे अन्ती ज्यांच्या) असंही म्हणतात. त्यांचे पुष्कळ प्रकार आहेत. जवळपास ८०! कर्तरि, कर्मणि, विध्यर्थक, पुन्हा वर्तमानकालवाचक, भूतकालवाचक, भविष्यकालवाचक. त्यामुळं संस्कृतची शब्द घडवण्याची शक्ती खरोखरीच अफाट आहे. आणि हे सर्व शब्द पाठ करावे लागतातच असं नाही. ते घडवण्याची प्रक्रिया समजली की आपण कुणीही तसे घडवू शकतो.
धातुसाधितांचा मुख्य लाभ म्हणजे ती क्रियापदांऐवजी वापरता येतात आणि क्रियापद नसून नाम इ, असल्यानं त्यांना विभक्तिप्रत्ययही लावता येतात. कसं ते आता पाहूच.
पुढं जाण्यापूर्वी खालील श्लोक वाचा. हा श्लोक भर्तृहरीच्या सुभाषितसंग्रहातला आहे. मुख्यतः त्यात भविष्यकाळी क्रियापदं पुष्कळ आहेत. म्हणून घेतला. ती लक्षपूर्वक शोधा.
रात्रिः गमिष्यति भविष्यति सुप्रभातम्   (संधि रात्रिर्गमिष्यति)
भास्वान् उदेष्यति हसिष्यति पङ्कजश्रीः।    (संधि भास्वानुदेष्यति)
इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे
हा हन्त हन्त नलिनीं गज उज्जहार।।
आधी सुभाषितामागची कथा सांगतो. एक भुंगा (द्विरेफ) संध्याकाळच्या वेळी कमळात शिरून मध खात असताना सूर्यास्त होऊन कमळ मिटतं. तो आत अडकतो. तो मनाशी “आता रात्र जाईल (संपेल), मग प्रभात होईल, सूर्य (भास्वान्, भाः तेज असलेला) उगवेल, कमळ हसेल (उमलेल), (आणि आपली सुटका होईल.)” असा विचार करीत असताना, पण अरेरे, तो असा विचार करीत असताना एक हत्ती ते कमळ उपटून नेतो.
एक सार्वत्रिक अनुभव कवीनं वर्णिला आहे. म्हणजे काय? इंग्रजीत एक वचन आहे, There is many a slip between the cup and the lip. म्हणजे समजा, सरबताचा पेला आपल्या हाती आहे. पण तो ओठांपर्यंत नेईपर्यंत किती अडचणी असतील काय सांगणार? हातातोंडाशी आलेला घास गेला, असं मराठीतही म्हणतात.
मात्र, हा श्लोक सांगण्यामागील उद्देश वेगळा आहे. त्याकडे, म्हणजे धातुसाधितांकडे वळूयात. विचार करीत असताना हे न शब्द मी ठळक केले आहेत. म्हणजे, कवीला ती एक क्रिया चालू असताना, असं म्हणायचं आहे. श्लोकात दोन क्रियांचं वर्णन आहे. (इथं क्रिया म्हणजे प्रत्यक्षात कृती अपेक्षित आहे, असं नाही. ती चालूही असेल. दोन क्रिया घडत आहेत. भुंगा विचार करीत असतानाच (पहिली चालू क्रिया) हत्तीनं कमळ उपटलं (दुसरी).
परस्मैपदी धातूच्या वर्तमानकाळाच्या तृतीय पुरुषी बहुवचनी रूपातील अन्ति काढून टाकून तिथं अत् प्रत्यय जोडायचा. अशा विशेषणाला कर्तरि वर्तमानकालवाचक धातुसाधित विशेषण (कर्तरि वकाधावि) म्हणतात. (आत्मनेपदी धातूंचा विचार पुढच्या पाठात करू.) अंती त् असल्यामुळं हे शब्द यच्छत् शब्दाप्रमाणं चालतात. त्याची एकवचनी रूपं अशी: यच्छन्, यच्छन्तम्, यच्छता, यच्छते, यच्छतः, यच्छतः, यच्छति, यच्छन्. ह्यांतील सप्तमीचं रूप यच्छति आहे. हे चालू क्रियेच्या क्रापदाऐवजी घ्यायचं आणि द्विरेफे हेही द्विरेफ ह्या पुंलिंगी शब्दाचं सप्तमीचं रूप आहे.
इंग्रजीतील continuous सारखी ही विशेषणं उपयोगी पडतात. गम्-गच्छन्ति-गच्छत्-देणारा, दृश्-पश्यन्ति-पश्यत्-पाहणारा, दा-यच्छन्ति-यच्छत्-देणारा. मात्र, यांतील तृतीय गणातील काही (दा, धा ह्यांच्या) विशेषणांची रूपं मरुत् च्या रूपांप्रमाणं होतात.
ह्या श्लोकातील विचिन्तयति हे पद पाहा. धातु वि + चिन्त्, त्याचं कृदन्त रूप विचिन्तयत्, त्याची सप्तमी विचिन्तयति होते. आता आपल्याजवळ पुरेशी सामग्री जमली आहे. तेव्हा श्लोकातील चालू असलेली पहिली क्रिया पाहू. त्या क्रियेच्या कर्त्याची द्विरेफे अशी सप्तमी केली आणि विचिन्तयत् हे त्याचं विशेषण असल्यामुळं त्याचीही विचिन्तयति अशी सप्तमीच केली. असं रूप योजलं की ती क्रिया चालू असताना (असा अर्थ होऊन त्याच वेळी) दुसरी क्रिया (हत्तीनं कमळ उपटलं ही) घडली. अशा वेळी पहिल्या क्रियेतील कर्त्याची सप्तमी करावी, हा नियम. म्हणून, त्याच्या विशेषणाचीही सप्तमीच होते. “विचिन्तयति द्विरेफे” ह्या दोन शब्दांचा अर्थ, भुंगा असं चिंतन करीत असताना, असा होतो. ह्या प्रकाराला सति सप्तमी म्हणतात. सति हे (अस् धातूपासून होणाऱ्या) सत् ह्या तकारान्त शब्दाची एकवचनी सप्तमीच आहे. सत् म्हणजे असणारे.
टीप: हेही अस् धातूचं कर्तरि वर्तमानकालवाचक धातुसाधित विशेषणच होय. त्याचं तृतीय पुरुषी बहुवचन सन्ति असल्यानं इथं सत् असं कर्तरि वकाविशेषणच मिळतं.
पुढील शब्द पाठ करा. (अ) (१) धाविष्यामि, धाविष्यसि, धाविष्यति. (२) चलिष्यामि चलिष्यसि, चलिष्यति, (चल् चालणे, कंप होणे, हलणे), (३) भविष्यामि, भविष्यसि, भविष्यति। होणे. (आ) (१) मध्याह्न दुपार. (२) दिवा दिवसा, (३) रात्रौ रात्री, (४) प्रातः सकाळी, (५) सायं संध्याकाळ, (६) यथा जसा, (७) तथा तसा, (८) द्रुतं, सत्वरं, शीघ्रं लवकर.
पुढील वाक्यांचं संस्कृतात रूपांतर करा. (१) प्रतिभा वाचत असताना माधुरी बोलते. (२) मीना खेळत असताना सूर्य अस्तास जातो. (३) वडील (तात) घरी असताना धूम्रपान करू नको.
कर्तरि वर्तमानकालवाचक धातुसाधितं ही विशेषणं असल्यामुळं वाक्यातील कर्त्याप्रमाणं त्याचीही लिंगवचनं बदलावी लागतील. ह्या पाठात जी विशेषणं शिकलो त्यांची स्त्रीलिंगी रूपं करताना ई लावायचा. म्हणजे गच्छत् (जाणारा) ह्याचं स्त्रीलिंगी रूप गच्छती होतं आणि ते नदीप्रमणं चालवायचं. वरील वाक्यांचं संस्कृत रूपांतर करताना हे लक्षात ठेवा. कारण, वाक्यांतील कर्ते स्त्रीलिंगी आहेत.
– ©️ प्रा. मनोहर रा. राईलकर 
railkar.m@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
‘मैत्री’च्या बालवाचकांसाठी खास स्पर्धा
‘प्रकाशचित्रावरून शब्दचित्र रेखाटन’  
प्रिय वाचक मित्रहो,
सस्नेह नमस्कार’मैत्री’ अनुदिनीमध्ये आता महिन्यातून २ किंवा ३ वेळा ‘बालकुमारांचे पान’ प्रसिद्ध होत आहे. या सदराच्या माध्यमातून काही नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार संपादक मंडळाने केला आहे. ‘मैत्री’ अनुदिनी आणि ‘एरा फुड्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने बालवाचकांसाठी एक खास स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

या स्पर्धेसाठी दोन प्रकाशचित्रे ( photo )आजच्या ‘मैत्री’च्या अंकात ( या निवेदनाच्या शेवटी ) प्रसिद्ध केली आहेत. ती म्हणजे कोणत्याही एका सहलीचे ठिकाण अथवा पर्यटनस्थळ आहे. मुलांनी त्यावर कल्पना करावी की आपण या सहलीला गेलो आहोत आणि नंतर ही सहल कशी केली याचे शब्दचित्र त्यांनी रेखाटून ‘मैत्री’चे संपादक श्री. मंगेश नाबर यांच्या  ई-पत्त्यावर पाठवावे.  मुलांना हे शब्दचित्र रेखाटण्यास एक महिन्याचा अवधी दिला जात आहे. शब्दचित्र पाठवण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०२० आहे.

या स्पर्धेसाठी पुढील नियम असतील. :-
(१) आठ ते तेरा वर्षांच्या जगभरातील कुठल्याही मुलामुलींसाठी ही स्पर्धा खुली असेल.
(२) स्पर्धकाने लिहिलेले शब्दचित्र हे मराठीत असले पाहिजे. शब्दचित्र ३०० शब्दांच्या आत असावे. एका स्पर्धकाला एकच शब्दचित्र पाठवता येईल.
(३) हे शब्दचित्र स्पर्धकाच्या हस्ताक्षरात असले तरी चालेल किंवा त्याने तोंडी वर्णन केल्यावर आईवडील किंवा आजोबा आजी यांनी युनिकोडमध्ये टंकून – वर्ड डॉक्युमेंटमध्ये ते शब्दचित्र पाठवलेले असावे.
(४) स्पर्धक आपल्या हस्ताक्षरातील शब्दचित्रे jpg या माध्यमातून पाठवू शकतात. मात्र पी डी एफ शब्दचित्रे स्वीकारण्यात येणार नाहीत.
(५) सर्व शब्दचित्रे ‘मैत्री’च्या संपादकांकडे ईमेलने mangeshnabar@gmail.com  या ई-पत्त्यावर पाठवण्यात यावी. त्यांवर स्पर्धकाचा निवासाचा संपूर्ण पोस्टाचा पत्ता, ईमेल आयडी (असल्यास) किंवा प्रेषक पालकांचा ईमेल आयडी, दूरध्वनी / मोबाईल क्रमांक ही माहिती आणि स्पर्धकाच्या वयाबाबत प्रेषकांकडून स्पष्ट शब्दात खुलासा केला गेला पाहिजे. शब्दचित्राबरोबर ही माहिती नसल्यास ते स्वीकारले जाणार नाही.

या स्पर्धेसाठी ‘मैत्री’ परिवारातील ज्येष्ठ सदस्य श्रीमती मृदुला प्रभुराम जोशी या माननीय परीक्षक असतील. त्यांनी निवडलेल्या पहिल्या तीन क्रमांकांची शब्दचित्रे ‘मैत्री’तून सन्मानपूर्वक प्रसिद्ध करण्यात येतील. परीक्षकांचा निर्णय अखेरचा आणि या स्पर्धेत भाग घेणा-या सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल. त्यासंबंधात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

वरील स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून ‘एरा फुड्स’चे देवेंद्र रमेश राक्षे यांनी जबाबदारी घेतली आहे. यशस्वी स्पर्धकाला ‘एरा फुड्स’तर्फे विशेष भेटवस्तूच्या रूपाने पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल. बक्षीसरूपाने देण्यात येणा-या भेटवस्तू या ‘एरा फुड्स’तर्फे श्री. देवेंद्र रमेश राक्षे पाठवतील व त्याबाबत सर्व जबाबदारी त्यांची असेल. स्पर्धेच्या भेटवस्तूंबाबत अथवा इतर कोणत्याही तक्रारीबाबत ‘मैत्री’ अनुदिनीचे संपादक मंडळ जबाबदार असणार नाही याची देखील नोंद घ्यावी.

‘मैत्री’च्या चोखंदळ वाचकांनी तसेच अन्य रसिक मित्रांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग घ्यावा हे ‘मैत्री’ अनुदिनीच्या वतीने अगत्याचे आवाहन.

धन्यवाद.

आपला,

मंगेश नाबर
(संपादक, ‘मैत्री’)

१. आयफेल टॉवर, पॅरिस, फ्रान्स

 

२. नायगारा धबधबा, ऑन्टॅरिओ, कॅनडा

 

@@@@@@@@@@
महत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@