कधी बोलावशील तू आता?

कथा 
 
सौ. स्वाती वर्तक 

” आज जाऊ या का गं, त्यांना बघायला? ” फोनवर अजीजीने विनवित होती माझी सखी. गेले कित्येक दिवस ती माझ्या मागे लागली होती. आम्ही साऱ्याच कनिष्ठ लिपिक. त्या आमच्या सी ई ओ. होत्या. निवृत्त होऊन वर्षे लोटली होती. आम्ही देखील कधीच निवृत्त झालो होतो. कोणी वरिष्ठ तर कोणी मुख्य लिपिक, तर कोणी मॅनेजर पदापर्यंत पोचून.

त्या सी ई ओ असल्या तरी आमच्या ऑफिसमध्ये साऱ्याजणींशी खेळीमेळीने वागत. आम्हा सर्वांना आपलेसे कधी केले तेच कळले नव्हते. त्यांची कडक इस्त्रीची कलकत्ता साडी, त्यांचे ताठ मानेने चालणे, त्यांचे वाचन, अर्थशास्त्राचा व्यासंग आणि त्यांची भेदक दृष्टी. आम्ही सगळे त्या कितीही हसत खेळत वागल्या तरी जरा वचकूनच असू.

मी जरी निवृत्त असले तरीही असंख्य कामात स्वतःला बुडवून टाकलेले. वेळच मिळत नसे. रोज मैत्रिणीला सांगून दिवस पुढे ढकलत होते. त्या खूप आजारी आहेत, आता त्या सतत झोपूनच असतात, आता त्यांना विस्मरण होते; अशा अनेक मैत्रिणीकडून सोडलेले दुःखी निःश्वास कानीं पडत होते. मन अस्वस्थ झाले होते पण तरीही आज, उद्या करीत राहीले

एक दिवस अचानकच फोन खणखणला .नाव बघितले तर त्यांचाच फोन.. आश्चर्याचा धक्काच बसला. का केला असेल त्यांनी मला फोन ? का, हा त्यांच्या घरून कोणी इतरांनी तर नाही केला …धस्स झाले ..काही बातमी देण्यासाठी ? हात उचलून रिसीवर घेईपर्यंत मनाची गती किती जलद असते ..जाणवले. त्या निमिषार्धातच आरती प्रभूंची  कविता ..गेले द्यायचे राहून ….तुझे नक्षत्रांचे देणे….देणे …तरळून गेले. खरेच मी आधी जाऊन भेटायला पाहिजे होते का? त्यांना माझ्याशी काही बोलायचे होते का ? मागेही त्यांनी दोन, तीन वेळा फोन करून विनविले होते..खूप भेटावेसे वाटतेय, येतेस का मोनिका घरी? आपले देणे ?….माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने…शोकांतिकेची ही भावना ठसठसून गेली.

घाबरत फोन उचलला…”.हॅलो, किती क्षीण आवाज होता. मोनिकाच नं ?..तुम्ही येणार होता मला भेटायला ऐकलं ..कधी येताय? वाट बघतेय मी. ..” .थांबत थांबत, दीर्घ श्वास घेत त्यांनी कसेबसे हे वाक्य पूर्ण केले, ” लवकर या हं! ” हु s !! पुनः शांत, शांत….”तो बोलवतच नाही गं.. कधी बोलावेल? सर्व देवांना आठवून झालं. आता कोणाला आळवू? ” …!..तूच करतेस का माझ्यासाठी प्रार्थना? ”

मी दचकलेच. हे शुभांगिनी राजे बोलत आहेत .हो, त्यांचे नावच राजे..एखाद्या  ‘राजे’प्रमाणेच त्या जगल्या. मानिनी.!
हे आम्ही ठेवलेले दुसरे नाव. त्या इतक्या अगतिक कशा झाल्यात? मी निस्तब्ध ..हात थरथरू लागले..वर आढयाकडे बघत …त्यांना तो बोलावत नाही ..एवढ्या का निराश ? वैफल्यग्रस्त ?? इतक्या लवकर ?

भानावर येताच, मी उत्तरले, ” काहीही काय म्हणता मॅडम , माझे कोणते देव उरले आता ?  आणि मी का तशी प्रार्थना करू ? केली तर तुमच्या दीर्घ आयुष्याची, आरोग्याची  नाही का करणार ?”

” हो…तू..तर ..एग्नोस्टिक …नाही का ? पण…काही तर …करा तुम्ही …तो बोलवू दे आता..” त्यांचा तो अडखळत येणारा, असा कधीही न ऐकलेला आवाज आता मला असह्य झाला. मी लगेच म्हटले, ” हो..हो..येतो आम्ही, लवकरच भेटू मॅडम.. ठेवू फोन आता?”

“बरं !”

फोन ठेवला तरी तो अशक्त, रडवा, थकलेला, निराश आवाज त्यांचा होता हा विश्वासच बसत नव्हता. राजे मॅडम ..इतक्या थकल्या? त्यांच्या फक्त येण्यानेच ऑफिसमधील प्रत्येक क्लार्क कामात बुडून जाई. त्यांच्याजवळ येताच ऑफिस फाईल धरून उभा राही, त्यांना बघताच त्यांच्या साडीच्या कडक इस्त्रीला मनातल्या मनात सलाम ठोकी. त्यांचे रुबाबदार चालणे, बोलणे बघून आदराने मान खाली घाली…त्या ?…त्या राजे मॅडम ?

आता तरी जायलाच पाहिजे भेटायला. मोनिकाने फोन उचलला आणि त्या सखीस डायल केला. ती केव्हापासून जाऊया म्हणतच होती. लगेच दिन, वार, वेळ ठरली.

” आलात ,अरे….वा तिघी ही ….आलात… .खूप खूप… बरं वाटलं. “.
त्या जरी हळू आवाजात कण्हत अडखळत बोलत होत्या तरी त्यांना आपल्या येण्याने बरे वाटतेय हे तिघींना जाणवले.

त्यांच्याकडे बघवत नव्हते. तिघींनाही ऑफिसमधली त्यांची छबी पुसून टाकण्याची इच्छा नव्हती.
पायापासून गळ्यापर्यंत घातलेले पांघरूण. पण तरीही त्याच्या आतून एक अतिशय कृश झालेले शरीर जाणवत होते. मान एका बाजूला कलंडली होती. केस विस्कटलेले, ओठातून चिकट द्रवपदार्थ बाहेर येऊन सुकलेला. बोटे वेडीवाकडी झालेली, आणि आवाज न उमटणारा.

तिघीही एकमेकांकडे बघत भावविवश झाल्यात.३, ४ वाक्ये इकडची तिकडची बोलून झाली. तीच तीच गुळगुळीत, झालेली, बोथट, असंवेदनशील, निर्जीव वाक्ये…” काय, मॅडम ..किती बारीक झालाय, काळजी घ्या,  औषधं वेळेवर घेतां नं ?…” वगैरे

” हो..मग!. माझी मुलं, सत्यजित, विश्वजित आठवतात ? दोघेही बाहेर ..”
”  हो हो..चांगलंच आठवतं, मॅडम..लहानपणी ऑफिसमध्ये यायचे…एक इंजिनियर झाला नं ? ”
” यस.. करेक्ट! आणि दुसरा डॉक्टर !”
” एक लंडनला असतो ..एक अमेरिकेत ”
हे सर्व अतिशय हळू, थकलेल्या आवाजात चालू होते.

थांबत, थांबत …मुलांचे कौतुक पुढे सरकत होते. “बघा, किती काळजी घेतो माझी.. एक नर्स,  एक मेड, त्यांच्याशी बोलता यावं म्हणून हा नवीन धर्तीचा फोन ..कारण मला तर हातात धरता येत नाही …हा, बघा कसा उशीजवळ उभा राहतो नुसतं बटन दाबायचं …ते बटनसुद्धा ही नर्स दाबून देते…..आणि बोलायचं.. ! दर आठवड्याला टोपलीभर पैसे पाठवतात.”

त्यांचा चेहरा… इतका विदीर्ण…. मी नर्सला म्हटले, ” जरा पुसतेस का ? ”
ती जणू ओरडलीच ,” अहो, दहा वेळा पुसते..दिवसात. ”
आम्हा तिघींची नेत्रपल्लवी ….आपल्यासमोर जर नर्स अशी वागते ..त्या एकट्या असताना ?..कशी कामे करत असेल ?

” काही नका बोलू तिला .” . राजे मॅडमच्या डोळ्यातून जाणवले.
” ती रागावून निघून गेली तर ? ”
त्यांचे डोळे पाझरत होते..” रुपयांचे मी काय करू? त्यांना तर वेळच नाही भारतात यायला …मी एकटीच जाणार ..मी गेल्यावर तरी येतील का?”

मी ” आता होते भुईवर गेले गेले आकाशात ” …..बहिणाबाईंच्या ओळीत हरवले. आता या मुलांचे कौतुक करीत होत्या आणि आता…? खरेच मन क्षणात इकडे तर क्षणात तिकडे ..असे का होते ? मनाचे काही खरे नाही .

त्यांना खूप बोलायचे होते. पण बोलवत नव्हते ..मला म्हणाल्या, ..” मी गेले की ते कपाट उघड, वर उजवीकडे एक करंडा आहे, तो उदयपूरहून आणला होता, फक्त तुझ्यासाठी..तुझी कलात्मक दृष्टी.. अनोख्या वस्तू संग्रह करण्याची आवड..”
मी स्फुंदू लागले,..”गेल्यावर का ? असं काय ? त्या गेल्यावर मी का येणार? कोण ओळखणार मला ?”
” कागद आणतेस ?” पेन आहे ?..”
” लिही…”

ऐकू येत नव्हते..त्यांच्या तोंडाशी कान लावून प्रयत्न करीत होते ..

तरीही मी एकटी
——————–

तू माझीच निर्मिती
पण गेलास किती दूर
सोडूनि या जीवाला
किती काळजी न् हुरहूर

( मनीषा अगदी मला खेटून उभी राहीली. काय ? हे तिने खुणेनेच विचारले..मी अगदी पुटपुटत उत्तरले…”बहुधा कविता !” )

नाळ कापली तरीही
तू चिकटुनि माझ्या वक्षी
स्तन्य चोखुनि कसा तृप्त
विसावला माझ्याच कुक्षी

(किती क्षीण येतोय आवाज…हृदयाचे कान, पंचप्राण ओतूनही फुस फुस फक्त )

धरलीस वाट शिक्षणाची
परि बोट माझे सोडेना
विव्हळत परतुनि आला
शांतावला उदरावरी सोना

कर्फ्यू लागला एकदा
तू एकटाच शाळेत
मी धास्तावुनी घरीच
तुझीच छबी मनात

( ” ..अगं.. काय लिहीते आहेस, त्या काय बोलताहेत ? ऐकू येतंय का तुला ?” अश्विनी काळजीत.. मी ” हो ” उत्तर देताच म्हणे….का लिहितेस? मला विश्वास होत नाहीये.. या असे शब्द सांगत आहेत ? अगं, याच ना त्या ?…ग्लोबलायझेशनच्या निवडीसाठी तावातावाने बोलणाऱ्या, मुद्देसूद समजावून देणाऱ्या..त्यांचे ते वैचारिक द्वंद्व, ती चर्चा, तो वादविवाद ..यशस्वीपणे दुसऱ्याचे मुद्दे खोदून काढणे ….छे !..मला नाही वाचवत !  )

होते माझ्याही हृदयात
“हिरकणी” चे अदम्य साहस
परि चहूबाजूंनी गराडा
केले तरी अशक्य धाडस

पाहता मला दुरूनि
तू धावत जवळी आला
घेऊन तुला कवेत
माझा जीव निमाला

( अगं.. स्त्री ही शेवटी,आईच…माया, जिव्हाळा हे शब्द काय ती नेहमीसाठी पुसून देऊ शकते ? तिच्या शब्दकोशात अक्षय्य राहणारे …नाही हं…या काळातील आहेत त्या ..मार्जिनल युटिलिटीवर बोलणाऱ्या, यूज व्हॅल्यू कशी वाढते सांगणाऱ्या…राष्ट्राचे आणि बाजारपेठेतील मायक्रोइकॉनॉमिक्स वर आपली ठाम मते मांडणाऱ्या आहेत गं त्या !

मधून मधून अश्विनीची फुसफूस चालूच होती तरीही मी नेटाने त्या काय सांगताहेत हे उतरवून घेत होते )

पंख लाभले तुजला
भरला शिडात वारा
घेतली गगन भरारी
दिला सोडून मोह सारा

( त्यांना ही पंख लाभले होते की…आठवते तुला..सरकारने बाहेरच्या देशातून कर्ज न घेता बॉण्ड्स, फिक्स्ड डिपॉजिट्सतर्फे पैसे मिळवावे..आपल्याच मुलांना तसे करायला लावणे…उद्योगांना भरभराट कशी येते? त्यासाठी लोकांना आकर्षित कसे करायचे हे सर्व ज्या स्त्रीला माहीत आहे, जिने स्वतः गुंतवणूक करून मुलांना मार्गी लावले, आपली कंपनी मोठी केली, त्या बाईने इतके हतोत्साहित व्हावे?)

आता फक्त तुझे मी
चित्र उराशी धरते
धाडू नकोस रुपये
तुझ्याविना हे घरच रिते

( इतकी वर्षे जी रुपये, चलन, शिन, डेरॅम, डॉलर ,टका, युरो यातच राहिली. बोलली, जगली, ती म्हणतेय नको मला रुपये ?)

राजे मॅडम निद्राधीन झाल्या होत्या. थोडा वेळ वाट बघून आम्ही “मेड”ला सांगून निघालो. कवितांचे आणि त्यांचे नाते वेगळेच होते. मनातील मळभ विरले होते. मन मोकळे झाले असणार आणि गाढ झोप लागलीअसेल.

मॅडमच्या कथाही गाजल्या होत्या. त्यावर संवाद, परिसंवाद घडले होते. एक दोन विद्यार्थ्यांनी तर त्यांच्या पुस्तकांवर डॉक्टरेट मिळवली होती पण आता ही डिलीरियममध्ये लिहिलेली कविता ??

” नाही गं.. त्या अशा सतत दुःखी राहत नव्हत्या. ”
” नाही काय ? ”
” आपल्याला इतरांच्या मनातील काय कळतं ? ”
” आता हीच बघ नं कविता ..”
” मला हेच कळत नाही, कोणी एक कविता वाचून किंवा एक कथा वाचून त्या लेखिकेबद्दल कसे काय मत बनवू शकतो ? जजमेंटल होण्यात आपण घाई तर करत नाहीये नं ? ती निराशाजनकच लिहीते, ती फार सेक्सीच लिहीते, ती वामपंथी आहे का उजव्या मताची? तिच्या कथा, कविता फार बायकी असतात …तिला सुखी स्त्रिया कधी दिसल्याच नाहीत का ? तिच्या प्रत्येक कथेतील स्त्री अशी उदास का ?”

अश्विनी अगदी पोटतिडकीने बोलत सुटली

” कारण ते एक ‘ मिथ ‘ आहे ” मधेच गंभीर आवाजात कोणीतरी पुटपुटले. बघितले तर अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली शर्वरी बोलत होती
सगळ्या निवृत्त लिपिक, अधिकारी, मॅनेजर…..त्यात मधूनच ही यौवना कुठून शिरली..चर्चेत भाग घ्यायला ?
” का गं बाई? तुला का असं वाटतं ?…”
” हो, स्त्री आणि सुखी ? हे एक ..मिथ.. च आहे .”
” नाही, सुख ,दुःख हे मानण्यावर असतं …  ”
” ही सर्व पुस्तकी वाक्यं  “…तिच्या येण्याने चर्चेला वेगळेच वळण लागले आणि एका तरुण मुलीचेही असे विचार असू शकतात हे बघून साऱ्याच स्तब्ध झाल्यात. निःशब्द..
मला कळतच नाही , ” डोंगराएव्हढी कर्तव्य अंगावर घेऊन, हे ओझं खांद्यावर पेलवत स्त्री जगतेच कशाला ? ” पोक काढून जन्मभर चालत राहायला?? ”
” उगी उगी..! शर्वरी..इतकी पॅनिक नको होऊस. ” ..मनीषाने ढासळता पूल सावरायचा वृथा प्रयत्न केला.
” अरे, जगू द्या न् प्रत्येकाला आपलं आयुष्य , जसं जगावेसं वाटतं तसं …  ”

मनीषा, अश्विनी आणि मोनिका ही दोन प्रचंड तफावत असलेली चित्रे आ वासून बघत राहिल्या.

एकीकडे शर्वरीचे, दुसरे राजेमॅडमचे आजचे.
तिघींच्या मनात राजेमॅडमचा भूतकाळ सरसरत जात होता .

त्या काळात त्यांनी घरच्यांचा घरी राहण्याचा आग्रह डावलून नोकरी केली ..दोन्ही मुले लहान, त्यांना मोठे करणे, सुसंस्कारित करून उच्च शिक्षण देणे. मानाने जगणे एवढेच त्यांचे ध्येय. ती निकड होती. त्यांची गरज होती. लोक जेवढे ..तेवढी तोंडे..त्यांचे टोमणेही तेवढेच. पण पतीनिधनानंतर दोन्ही मुले वाढवणे ही, जवाबदारी कोणी उचलणार होते का ?
उपकार ” सिनेमाचे गाणे त्यांच्या आवडीचे..नाते, प्यार, वफा सब बातें हैं बातों का क्या ?

प्रसंगी मुलांना ऑफिसमध्ये आणून वाढवले. मुलांनी आईचे कष्ट बघितले आणि त्याचा मान राखला हेही तितकेच खरे!
किती हुशार निघाली. मोठा इंजिनियर तर धाकटा डॉक्टर झाला. आनंदाचे भरते आले होते.

” मी त्यांचे पाय मागे ओढणारी नाही. ”
हे वाक्य घोळवत अतिशय प्रसन्न चित्ताने त्यांनी मुलांना लंडन, अमेरिकेत पाठविले होते .

आणि येथे एकट्याच राहत होत्या.
विचार करकरून मेंदू शिणला..नयनी नीर पुसत आम्ही तिघी घरी परतलो.

कोण बोलतेय ?…हे कोण आलेय ? रात्रभर माझ्या मनाची तगमग संपत नव्हती…घालमेल वाढत होती.

” बस, सत्यजित, तू आलास, तुझीच वाट बघत होते…! आणि विश्वजित का नाही आला रे ?”
“हे बघ आता दहा दिवस येथेच राहा..मी तुझ्या आवडीचे लाडू करून देऊ का ? ये..जवळ ये..!”

सकाळी उठताच राजे मॅडमच्या घरी फोन लावला. नर्सने उचलला.. मी तब्येतीबद्दल विचारताच उत्तरली, “हां, ठीक है..बेटा आया है ना ! गपशप चल रही है..!”

“हो, अरे, वा..! कधी आला? कोण आलाय ? सत्यजित का विश्वजित?

“अरे, क्या बाई..! आपभी ..? आपकी मॅडम……त्याच बरळत आहेत मनातच ..आता रोज हेच चालतं ..”…..!

@@@

– ©️ सौ. स्वाती वर्तक

खार( प. ), मुंबई ४०० ०५२.
swati.k.vartak@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आजची कविता

मिलिंद कर्डिले
हर शख्स है
यहाँ परेशान
पर उम्मीदों पे
जीता है इंसान!

जब फटे आसमान
आती है नदी उफान पर !
बहा देती है गाँव खेत
पर नहीं बहाती उम्मीदों को !!

जब पडे सुखा
आस लगा के बैठते हैं!
आयेगी कब बारिश
उम्मीद लगा के बैठते है !!

माॅं बाप, भाई बहन
पती पत्नी कच्चे बच्चे!
सारे रिश्ते ज़िंदगी
बंधे है उम्मीदोंकी धागोंसे!!

जिंदगी के चंद आखरी पल
कैसे गुजरेंगे पता नहीं!
पर एक खुशहाल मौत की
उम्मीद लेके जीते है!!

ये उम्मीद ही है
जो जीने का मकसद है!
उम्मीद के बिना
जिंदगी अधूरी है!!

शुक्रगुजार हूॅं उस रब का
जिसने हमें उम्मीद दी!
इसी उम्मीद के सहारे
तो हमने जिंदगी बिताई!!

– ©️ मिलिंद कर्डिले

milindkardile@yahoo.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
वृक्षसंपदेतून आरोग्यदायी पर्यावरणाकडे

 

डॉ. उमेश करंबेळकर 
 
१९. 

पारशी जमातीविषयीचा एक किस्सा प्रसिद्ध आहे. काही शतकांपूर्वी पारशांचे पूर्वज पर्शियाहून निर्वासित म्हणून गुजरातमधल्या संजाणला आले. तेथील राजाने त्यांना आश्रय द्यायला नकार दिला. तेव्हा पारशांच्या प्रमुखाने दुधाने भरलेला एक पेला घेतला आणि त्यात चमचाभर साखर घालून ती ढवळली. साखर दुधात पूर्णपणे विरघळली आणि दूधही गोड बनले. ‘साखरेप्रमाणे आम्ही या देशात राहू’ असा संदेश त्याने ह्या कृतीतून दिला. राजाने त्यांना राहण्यास परवानगी दिली. पारशांनी दिलेला शब्द पाळला. ह्या जमातीने टाटा-गोदरेज यांसारखे उद्योगपती, पालखीवाला-नरीमन यांसारखे कायदेतज्ज्ञ, भाभा-सेठना यांसारखे शास्त्रज्ञ, दादाभाई नौरोजी-फिरोजशहा मेहता यांसारखे राजकारणी देशभक्त आपल्याला दिले. कोरोनाची लस विकसित करणारे सायरस पूनावाला देखील पारशीच. अशा तऱ्हेने पारशी जमात इथल्या संस्कृतीत मिसळून गेली आणि तिने आपले समाजजीवन समृद्ध केले.

वृक्षसंपदेतून आरोग्यदायी पर्यावरणाकडे ह्या मालिकेत हे उदाहरण देण्याचा उद्देश आपल्या लक्षात आला असेलच. स्थानिक विरुद्ध परप्रांतीय किंवा परदेशी हा मानवीवाद जसा जगाच्या सर्व भागात चालू आहे तसाच देशी किंवा स्थानिक विरुद्ध विदेशी असा वाद वनस्पतींबाबतही चालू आहे. साहजिकच देशी-विदेशी वनस्पती ह्या संकल्पेनेचा विस्ताराने विचार व्हायला हवा.

देशी वृक्ष किंवा वनस्पती म्हणजे मूळ भारतीय उपखंडातील वनस्पती, ज्या इथल्या मातीत, वातावरणात हवामानात वाढल्या आणि उत्क्रांत झाल्या अशा वनस्पती. येथे देश हा शब्द प्राकृतिक भौगोलिक अर्थाने घ्यायचा, राजकीय अर्थाने नव्हे. भारतातील बऱ्याच मोठ्या भू-प्रदेशात सर्वसाधारणपणे समान परिस्थिती आढळते. त्यामुळे मूळची भारतीय वनस्पती देशाच्या निरनिराळ्या भागातही देशी म्हणून समजायला हरकत नाही.

त्यातही काही वनस्पती काही शतकांपूर्वी आपल्याकडे आल्या आणि इथल्या वातावरणात समरस झाल्या. उदाहरणार्थ हादगा किंवा अगस्ता. हादगा हा मूळ मलेशियापासून उत्तर ऑस्ट्रेलिया ह्या प्रदेशातला. तो नक्की कधी भारतात आला माहीत नाही पण आयुर्वेदाच्या राजनिघण्टु ग्रंथात त्याच्या गुणधर्मांचे वर्णन केले आहे.

याशिवाय ग्रामीण भागातील मंदिरांच्या आवारात हमखास आढळणारा पांढरा चाफा किंवा खुरचाफा तसेच तांबडा चाफा, अनंत किंवा केप जास्मिन हे वृक्ष देखील तशा अर्थाने देशी नव्हेत. तांबडा चाफा मूळचा अमेरिकेतील उष्ण कटिबंधातला तर अनंत मूळचा चीन किंवा जपानचा. मूळचा मध्य आफ्रिकेतला गोरख-चिंचेचा वृक्षही असाच शेकडो वर्षांपूर्वी इथे आला आणि इथला झाला.

अशा काही थोड्या वनस्पती सोडल्या तर गेल्या चार-पाचशे वर्षांत इंग्रजांनी आणि पोर्तुगीजांनी ज्या काही वनस्पती आणल्या त्या विदेशी समजल्या जातात. पोर्तुगीजांनी बटाटा, साबुदाणा, मिरची, अननस, चिकू, हापूस ह्या वनस्पती आणल्या आणि त्य़ांची लागवड केली. पण गंमत म्हणजे हापूस किंवा अल्फान्सो हा मूळचा आपला नाही, हे मान्य करायला आपल्याला जड जाते. मिरची ही आता आपल्या आहाराचा अविभाज्य भाग बनली असली तरी ती पोर्तुगीजांनी चार-पाचशे वर्षांपूर्वी भारतात आणली हे आपल्याला माहित नसते. त्यापूर्वी त्रिकटु म्हणजे सुंठ, मिरी आणि पिंपळी ह्या तीन कटु म्हणजेच तिखट रसाच्या वनस्पतींचा खाद्यपदार्थांत वापर केला जाई.

इंग्रजांनी कुंपणासाठी म्हणून घाणेरी, कोयनेल, शेर, बिट्टी अशा वनस्पती आणल्या आणि लावल्या. महोगनी, सुरू ह्या झाडांची लागवड केली. शंकासूर, गुलमोहर, नीलमोहर, पिचकारी अशी सुंदर फुले येणाऱ्या वनस्पतींचे देखील स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात आगमन झाले. स्वातंत्र्योत्तर काळात सामाजिक वनीकरण विभाग व वन खात्याने झटपट वाढणाऱ्या अनेक विदेशी प्रजाती आणल्या आणि त्यांची मोठ्या प्रमाणात रस्ते व महामार्गांच्या बाजूने लागवड केली. ह्या वनस्पतींना येथील हवामान मानवले आणि त्या नुसत्या वाढल्याच नाहीत तर फोफावल्या.

पण याचबरोबर मानवाचा स्मृतिरंजनात रमण्याचा स्वभावही वनस्पतींच्या देशांतरास कारणीभूत ठरला हे विसरून चालणार नाही.

– ©️ डॉ. उमेश करंबेळकर 
umeshkarambelkar@yahoo.co.in
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आपले पक्षी आपले सोबती

प्रदीप अधिकारी 

 
२५ आणि २६.
कोकिळ ( Cuckoo / Asian Koel )
 

नर कोकीळ

मादी कोकीळ

हा पक्षी मुख्यत्वे झाडावरच राहणारा असून तो दाट पाने असलेल्या झुडपी जंगलात, बागेत, शेतीच्या भागात राहणे पसंत करतो. कीटक, फुलपाखरे, सुरवंट, फळे, मध हे यांचे आवडते खाद्य आहे.

कोकीळ हा पक्षी जरी कोणी बघितलेला नसला तरी त्याबद्दल काहीही  ऐकल नाही, असा माणूस साडपणे कठीण. ‘कुहूsकुहू’ हा स्वर कानी पडला की वसंत ऋतुचे आगमन झाले, असे समजावे. बऱ्याच जणांना माहीत नसते की पंचमातील साद कोकिळेची नसून कोकीळ नर पक्ष्याची आहे. गंमत म्हणजे पंचम स्वरांत गाणारे हे पांखरू बऱ्याच वेळा  प्रयत्न  करूनही कुठे दडून बसलेय तेच समजत नाही.

कावळ्याचा भाऊबंद वाटावा असा हा कोकीळ अतिशय लाजरा बुजरा असतो. आकाराने कावळ्यापेक्षा लहान, मजबूत चोच आणि  गुंजेसारखे लालभडक डोळे. मादी कोकीळ, हा एक वेगळाच पक्षी आहे इतपत वेगळी वाटते. अंगावर फिकट राखी रंगानं खडी काढावी अशी  कोंबडीसारखी पिसे असतात. तिचे डोळे नरासारखेच असतात पण ती गोड गात नाही किंवा ‘कुहूकुहू’ करीत नाही. मादीचा आवाज किक-किक-किक असा चिरका असतो.तिचे ओरडणे म्हणजे कचकचाट असतो.

कोकीळ पक्षी कधीच घरटी बांधत नाहीत घरटे बांधले नाही तरी यथाकाल अंडी देण्याची वेळ येते वीणीच्या हंगामात ते कावळ्याच्या घरट्यात अंडी घालतात. अंडी घातलेले कावळ्याचे घरटे सापडले की नर कोकीळ कावळ्याच्या घरट्यापाशी जातो, कावळा-कावळी नराला हुसकायला जातात तेवढ्या वेळात  दबा धरून बसलेली कोकिळा कावळ्याच्या घरट्याचा ताबा घेते. कावळ्याची अंडी चोचीत उचलून फेकून देते आणि लगबगीने त्या जागी स्वत:ची अंडी घालते आणि उडून जाते. एरवी धूर्त आणि चतुर असलेले कावळे इथे हमखास फसतात आणि कोकिळेची अंडी स्वत:ची म्हणून ती उबविण्याची जबाबदारीही घेतात, पिल्ले झाली  की  त्यांना चारा पाणी देतात, मोठी करतात. यथावकाश पिल्ले मोठी होतात व उडून जातात. हे विचित्र जीवनचक्र निसर्गात अव्याहतपणे चालू आहे.

हिवाळ्याची सुरुवात झाली की  कोकीळ एकदम गडप झाल्यागत वाटतो. कारण त्याचा आवाजच ऐकू येत नाही परंतु कोकिळ आणि कोकिळा आवाज न करता दिवस  वसंत ऋतु येईपर्यंत जिथे असतील तिथेच दिवस काढतात. पक्षी संपूर्ण भारतभर सर्वत्र आढळतो काही प्रजाती मात्र स्थलांतर करतात. जगभरात ह्या पक्ष्याच्या १२० प्रजाती आहेत

२७.
मोर  ( Peackock )

 

२६ जानेवारी १९६३ सालापासून मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. कोंबडी वर्गीय  हा पक्षी १९६३  पूर्वी विनाशाच्या मार्गावर होता. ह्याचे मांस चविष्ट असते, ह्या समजुतीमुळे त्यांची बेछूट शिकार करण्यात आली. शेवटी ही प्रजाती नाहीशी होते की काय असा प्रश्न उपस्थित झाला. मोराचे भारतीय धार्मिक आणि पौराणिक परंपरेतील महत्वाचे स्थान आणि हिंदू धर्मीयांच्या मनात असलेले त्याच्याबद्दलच्या  पवित्र भावना लक्षात घेता त्याचे सर्वांगीण संवर्धन व्हावे ह्या उद्देशाने देशात आढळणाऱ्या सर्व पक्ष्यात सुंदर आणि आकाराने सर्वांत मोठ्या असलेल्या ह्या देखण्या पक्ष्याला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले  आणि मोरांना अभय मिळाले. आज देशात अनेक ठिकाणी मोरांची संवर्धन केंद्रे आहेत.

मोराच्या मादीला लांडोर (Peahen) म्हणतात. तिला मोरासारखा पिसारा नसतो. मोरांचे मुख्य अन्न म्हणजे कीटक, फळे, भाज्या, धान्य; मोर हा शाकाहारी आणि मांसाहारी आहे. मोराला साप खायलाही आवडते. मोर टोमॅटो, गवत, पेरू, केळी, हिरव्या आणि लाल मिरच्या मोठ्या आवेशाने खातो. मोर सरडे आणि अनेक प्रकारचे कीटक खाऊ शकतो. मोर हा एक सर्वभक्षी पक्षी आहे, जो गवत, पाने, हरभरा आणि गव्हापासून कीटक व साप यांना खाऊ शकतो. मोर हा शेतकऱ्यासाठी मित्र पक्षी आहे. हे शेतातील कीडे, कीटक, उंदीर, सरडे आणि साप खातो.

मोर रात्री घनदाट झाडांवर उभे राहून झोपी जातात. मोर घरटी करत नाहीत. लंडोर वर्षाच्या जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान अंडी देतात. जमिनीवर एखाद्या खोबणीत, गवतांच्या गचपणात ती एका वेळी ३ ते ५ अंडी देते. एका मोराचे  २ ते ३ माद्यांबरोबर संबंध असतात त्यामुळे नीट संवर्धन केल्यास वर्षभरांत  १० ते १५ नवे मोर तयार होतात.

ह्या राष्ट्रीय पक्ष्याचा पिसारा, त्याची पिसे, त्याचे वर्षा ऋतुतील नृत्य ह्याची वर्णने आणि  “नाच रे मोरा” सारख्या कविता प्राथमिक शाळेपासून शालेय शिक्षणात असल्याने मोराबद्दल माहिती नसलेला भारतीय विरळाच म्हणावा  लागेल.

– ©️ प्रदीप अधिकारी

९८२०४५१४४२
adhikaripradeep14@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
लक्षणीय
शतकाच्या पाऊलखुणा

संजय केतकर

पंजाबराव देशमुख


पंजाबराव देशमुख यांच्यावरील १९९९ मधील पोस्टाचा स्टॅम्प

विदर्भाच्या इतिहासानं पहिल्या पानावर पंजाबराव देशमुख उर्फ भाऊसाहेबांचं नाव लिहिलं. ‘बोले तैसा चाले’ हे भाऊसाहेबांच्या जीवनाचं मुख्य सूत्र. एक तत्त्वनिष्ठ सेवाव्रती म्हणून मराठी मनानं त्यांचा गौरव केला आहे.

अमरावती जिल्ह्यातल्या पापड या एका छोट्याशा गावांत २७ डिसेंबर १८९८ रोजी पंजाबरावांचा जन्म झाला. अमरावतीच्या हिंदू हायस्कुलमधून ते मॅट्रिक, तर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून इंटरची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९२० साली उच्चशिक्षणासाठी ते इंग्लंडला रवाना झाले. ऑक्सफर्ड विद्यापीठाची डॉक्टरेट ही पदवी त्यांनी मिळवली. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता, ‘वेदवाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास’. पंजाबरावांचं पांडित्य या प्रबंधावरून सिद्ध होतं. बॅरिस्टर होऊन ते भारतात परत आले, ते एका विधायक कार्याची योजना मनात धरूनच.

१९३१ साली भाऊसाहेबांनी श्री शिवाजी संस्थेची स्थापना करून त्याचा विस्तार केला. तो थक्क करणारा आहेच; परंतु भाऊसाहेबांच्या प्रगल्भतेचं ते एक विराट दर्शन आहे. अनेक महाविद्यालयं, शाळा, बालक मंदिरं, प्रशिक्षण विद्यालयं, कृषी महाविद्यालय, छात्रालयं, व्यायामशाळा, अशा जवळपास दीडशे संस्था श्री शिवाजी शिक्षण संस्थेत अंतर्भूत आहेत.

पंजाबराव १९३०साली व-हाडाचे शिक्षण व कृषिमंत्री होते. त्यावेळी त्यांनी कर्जलवाद कायदा पास करून घेतला आणि हजारो शेतक-यांना सावकारी पाशातून मुक्त केलं. त्यांच्या जमिनीसुद्धा त्यांना परत मिळवून दिल्या. १९५२ ते १९६२ या कालावधीत ते केंद्रीय कृषिमंत्री होते. पंजाबरावांनी १९५९ साली दिल्ली येथे ‘जागतिक कृषी प्रदर्शन’ भरवलं. मधुमक्षिका पालन संस्था, कृषियंत्र सामुग्री संघटना, भारतीय कृषक सहकारी अधिकोष अशा कितीतरी संस्थांचे ते संस्थापक व अध्यक्ष होते. कृषी विद्यापीठाची कल्पना पंजाबरावांचीच. अर्थातच विदर्भातील कृषी विद्यापीठाला ;पंजाबरावांचं नाव देण्यात आलं आहे.

पंजाबरावांना १९४६ साली भारतीय घटना परिषदेचं सभासदत्व देण्यात आलं. ही जबाबदारीसुद्धा त्यांनी समर्थपणे सांभाळली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पंजाबरावांच्या कार्याचा विशेष गौरव केला आहे.

भाऊसाहेबांना समाजाची सुधारणा करायची होती. १९२७ साली मोर्शीच्या हिंदू अधिवेशनात चातुर्वर्ण्य, जातिभेद आणि अस्पृश्यता यांचा निषेध करणारा ठराव त्यांनी संमत करून घेतला. अमरावतीचं अंबादेवी मंदिर त्यांच्याच प्रयत्नामुळे सर्वांसाठी खुलं करण्यात आलं. शिक्षण, शेती, सहकार, अस्पृशोद्धार, जातिभेद निर्मूलन या विधायक कार्यांत जीवन समर्पित करणारे पंजाबराव दि. १० एप्रिल १९६५ रोजी स्वर्गवासी झाले

संजय केतकर
[ ‘महाराष्ट्र टाइम्स‘ : शतकाच्या पाऊलखुणा – दि. ३० एप्रिल २००० वरून साभार ]

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
चित्रकारांचे दालन 
– ©️ मनीषा नाबर 
nabarm@yahoo.com
@@@@@@@@@@@@@@@
हत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@

 

स्फोट

धारावाहिक कादंबरी

डॉ. प्रियंवदा कोल्हटकर

 

 उपसंहार

प्रिय वाचक, 
प्रस्तुत धारावाहिक कादंबरीची मागील १४ प्रकरणे अनुक्रमे (१) दि. ०१ ऑगस्ट, (२) १० ऑगस्ट, (३) १८ ऑगस्ट, (४) ०२ सप्टेंबर, (५) १४ सप्टेंबर, (६) २६ सप्टेंबर, (७) ०२ ऑक्टोबर, (८) १४ ऑक्टोबर, (९) २५ ऑक्टोबर, (१०) ०६ नोव्हेबर, (११) १८ नोव्हेंबर, (१२) २७ नोव्हेंबर, (१३) ०३ डिसेंबर, (१४) १५ डिसेंबर २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाली. आज शेवटचे १५ वे प्रकरण वाचा आणि आपली आस्वादक प्रतिक्रिया कळवा. – सं.   
 

प्रकरण १५

अपर्णा

अरविंदनं माझ्या थोबाडीत मारल्यामुळे व पट्कन पाय आपटीत निघून जाण्यामुळे मी हतबुद्ध झाले. अपमानामुळे डोळे भरून आले. व स्वतःवरच राग आला. काय झालं ते सिंधूच्या लक्षात आलं पण आणखी कुणाच्याच ते लक्षात आलं नाही. आम्ही दोघी दाराजवळच्याच टेबलवर बसलो होतो म्हणून. मी दीर्घ उसासा टाकला व परतले. माझ्या पाठीवर एक हात ठेवून व दुसरा धरून तिनंच मला खुर्चीवर बसवलं.

म्हणाली, “नवरा होता ना तो?”
मी होकारार्थी मान हलवली.
सिंधू म्हणाली, “यापूर्वी कधी त्यानं हात उगारला होता?”
मी नकारार्थी मान हलवली. ती म्हणाली, “तरी काय झालं? गेला उडत. मेल चॉव्हिनिस्ट कुठला!”

तिनं माझ्या गाजर हलव्याची प्लेटमधल्या चमच्यात थोडा हलवा भरला व माझ्या मुखाकडे नेला. म्हणाली, “तो बोलला काहीतरी मला नीट ऐकू आलं नाही. काय ते?”
आता कुठे मला माझा आवाज गवसला, “म्हणाला,’निर्लज्ज, बेशरम, पार्टी करतेय आजारी मुलीला घरी एकटं सोडून.’ सिंधू मला आता घरी जावंसं वाटत नाही.”
“आत्ताच काय कधीच जाऊ नकोस. दे सोडून त्याला.”
“पण गुड्डी?”
“सांभाळेल तो. नाही तरी तू म्हणत असतेच तिच्यावर खूप प्रेम आहे त्याचं. तू आज माझ्याकडे चल. रात्री रहा. उद्या बघू पुढचं पुढे.”
“तुझ्याकडे आणखी कोण असतं?”
“कुणीच नाही. मी एकटीच असते. मला एक भाऊ आहे फक्त. तो अमेरिकेत असतो.”
“मग ठीक. ”

त्यावर तिनं तो गाजरहलव्याचा चमचा माझ्या मुखात घातला. तिचा तोच हात धरत मी खुशीनं मान डोलावली. व हलवा संपवला.सिंधूनही जेवण संपवलं. आम्ही दोघी खालच्या मजल्यावर आपापल्या खोलीत गेलो. व कामाला लागलो.
काम संपल्यावर संध्याकाळी सिंधू माझ्या केबिनमध्ये आली व म्हणाली,”निघू या?”

“चला. स्कुटरचं काय करू?”
“असू दे इथंच. उद्या बघू. रात्री सोसायटीत रक्षक असतात.”
मी कागदपत्रं आवरली. पर्स घेतली. व निघालो.

त्या रात्री सिंधूच्या संगतीत मी पूर्णपणे बदलले. जीवन मी जणू काही आजवर खोटंच जगले होते.
दुसरे दिवशी लवकर मी व सिंधू निघून आधी माझ्या(?) घरी गेलो. दाराला कुलूप होतं.

कमलाबाई शेजारच्या घरातून तेव्हाच बाहेर निघाल्या होत्या. मला बघून म्हणाल्या, “अय्या ताई तुम्ही? साहेब बेबीताईंना घेऊन गोव्याला गेले. सोमवारी बेबीताईंची परीक्षा सुरु होतेय तरी रविवारी येतील, फडकेताई म्हणत होत्या पण तुम्ही नाही गेलात? तुम्हाला किल्ली हवीये का? फडक्यांकडे आहे. ”

त्या भोचकभवानीचा मला रागच आला. म्हटलं, “नको. आहे माझ्याकडे. तू जा आपल्या कामाला व रविवारपर्यंत येऊ नकोस.”

मी व सिंधूनं मिळून माझ्या दोन सूटकेस भरल्या. कपड्यांव्यतिरिक्त माझ्या भागाच्या सदनिकेच्या चाव्या, त्याचे सर्व कागद, माझ्या बँक अकाउंटचं पास बुक फिक्स्ड डिपॉझीटच्या पावत्या वगैरे सगळं घेतलं. अरविंदसाठी पत्र लिहून संगणकाशेजारी ठेवलं.

लिहिलं होतं,
गुड्डीचे बाबा,
काल मला कळलं मी तुला सुख देण्यास कां असमर्थ आहे ते. तो राग ( ८ वर्षांचा साठलेला ) तू काल काढलास. आपण वेगळे होऊ या.
माझ्या मालकीच्या सदनिकेचा हिस्सा विकून मी एक छोटी वन बी एच के ची सदनिका घेणार आहे. तोवर मी सिंधूकडे राहीन.
आपण सहमतीनं घटस्फोट घेऊ या. गुड्डीचा समाईक ताबा घेऊ या. तो कोर्ट तुला देऊ शकणार नाही. आपणच ते सहमतीनं करू या.
भेटू या. सिंधूचा पत्ता व फोन नंबर. . . . .
आपण भेटीसाठी वेळ व स्थळ फोनवर ठरवूया.
तू गोव्याहून आईबाबांना आणणार असशील. त्यांची क्षमा मागायला मी तयार आहे. बाबांनी मला संस्कृत शिकवून त्या भाषेच्या अमाप भांडाराची चावीच जणू दिली. आईंनी स्वयंपाकाची खास कोकणस्थी व गोवन  पद्धतीही शिकवली ती मी कधी विसरणार नाही.
गुड्डीला पापा.
अपर्णा.

मी व सिंधू बँकेत आलो, दोन्ही सुटकेस गाडीतच ठेवून. गाडी लॉक करून कामाला लागलो.

अरविंद

अपर्णाच्या थोबाडीत मारून परतलो व अचानक हलकं वाटलं. मिग्रेन (अर्धशिशी) मुळे दिसणारा सिंटिलेटिंग स्कोटोमा (डोळ्यापुढं आलेली विशिष्ट तऱ्हेची अंधारी ) नाहीशी झाली.

गुड्डी बाहेरच उभी होती. गाडी कुलूपबंद होती. ती आत बसू शकली नव्हती. तिला सॉरी म्हणत खिशातून चावी काढली. दोघे आत बसलो. गाडी स्टार्ट केली व आठवलं रोज सकाळी भरपूर नाश्ता करत असे मी तो केला नाही. दुपारच्या फलाहाराची वेळ झालीये.

“वाटेत फळांचं दुकान दिसलं की सांग गुड्डी.”
“बरं. आपण कुठे जातोय बाबा?”
“विनि आँटीकडे. ती इंजेक्शन लावणार नाही. प्रॉमिस. ”
“बाबा फळांचं दुकान. फळांपैकी मला केळी आवडतात. घ्या हं”

मी गाडी थांबवली. फळं घेतली व विनीकडे पोचलो, तिच्या नर्सिंग होमच्या वरच्या मजल्यावरच्या घराची बेल दाबली.
“कोण आहे? दार उघडंच आहे. आत या. ”

विनी जेवत बसली होती. गुड्डीला म्हणाली, “काय गुड्डी शागुती खाणार काय? आवडते ना?”
“हो तुझ्या हातची.”
मी गुड्डीला प्लेट दिली. तिला वाढून, स्वतःचं आटपून हात धुवत विनी म्हणाली, “तुला काय देऊ? केळी आहेत. खाणार?”

गुड्डीचं जेवण व माझा फलाहार आटोपून तोंड पुसून मी म्हटलं, “गुड्डीला ताप होता. क्रोसिन दिलं होतं. उतरलेला वाटतोय. बघ जरा. ”
गुड्डीचं तपमान नॉर्मल होतं. ती म्हणाली, “झोप येतेय. मी झोपू? व ती सोफा कम बेडवर आडवी झाली. पांचच मिनिटात झोपून गेली.

तिच्यावर पांघरूण घालत विनी म्हणाली, “आत बसू या. काहीतरी झालंय. डिस्टर्ब्ड दिसतोस. ”
आतल्या खोलीत मी प्रथमच जात होतो. आत एका डबल बेडशिवाय काहीच नव्हतं. मी बसलो. आज सकाळपासूनची रामकहाणी तिला सांगितली. ऐकून माझ्या जवळ येत पाठीवर हात फिरवू लागली. म्हणाली,  “तुझ्या मिग्रेनमुळे व गुड्डीच्या तापामुळे घडलं सगळं. शांत हो. मिग्रिलची गोळी देऊ का?”
“नको आता गरज वाटत नाही.”

माझ्या डोळ्यात आलेले अश्रू पुसत ती एकदम जवळ आली; मला कवेत घेतलं व म्हणाली, “अरविंद किस मी.”
मीही उत्तेजित झालो, व . . . . आणि. . . .
त्या दुपारी खरं शरीरसुख काय असतं ते मी वयाच्या ३७ व्या वर्षी प्रथमच अनुभवलं. व तिच्या मिठीतच झोपून गेलो.

रात्रीच्या गाडीनं, गोव्याला गेलो. आईबाबांना घेऊन रविवारी परतलो, तर अपर्णाचं पत्र दिसलं. वाचलं. त्यातील मजकूर आई बाबांना सांगितला. आई,  माझ्या बाजूची होती, पण बाबा गप्प राहिले. आई म्हणाली, ” घ्या घटस्फोट. अपर्णा अशी वागेलसं वाटलं नव्हतं बाबा. “भेटलो अपर्णाला व घटस्फोटाचा अर्ज दिला.

अडीच महिन्यांनंतर.

एक दिवशी बाह्यरुग्ण विभागात द्राक्षे भेटला. त्याचे दोन्ही डोळे लाल झाले होते. गुड्डीच्या मागील वाढदिवसाला झालेली मैत्री एव्हाना घट्ट झाली होती. त्याला तपासलं व म्हणालो,”डोळे खाजताहेत का?”
“हो.”
“तुला कसली तरी ऍलर्जी झालीय. चिंता करू नकोस. आज हे थेम्ब दोन्ही डोळ्यात तासा तासानं घाल व उद्या दोन दोन तासानं घाल व डार्क ग्लासेस वापर. परवाला ठीक होशील, पण दाखवायला अवश्य ये.”व त्याला माझ्याजवळची सॅम्पलची बाटली दिली.
शिवाय प्रिस्क्रिप्शन दिलं, ते हातात घेत, मला मदत करणाऱ्या मारीलीनकडे हेतुपूर्वक बघत हळू आवाजात म्हणाला ,”तुला काही सांगायचंय”

मी मारीलीनला म्हटलं, “बाहेर थांब जरा. रिसेप्शनिस्टला सांग पुढील रोगी इतक्यात पाठवू नकोस. ती गेल्यावर द्राक्षे म्हणाला, “दॅट मॅनेजर सिंधू इज पक्का लेस्बियन. म्हणजे वाहिनीसुद्धा समलिंगी आहेत. ”
दीर्घ उसासा सोडत मी उत्तरलो, “आहे कल्पना मला. आम्ही घटस्फोट घेतोय ठाऊक आहे ना?” माझ्या डोक्यात कुठेतरी वाचलेलं वाक्य चमकून गेलं. “लैंगिक शिक्षणाअभावी आपल्या देशात आपण समलिंगी आहोत हे समजण्याआधीच मुली लग्न करून बसतात व वर्षानुवर्षे नवऱ्याचा बलात्कार सहन करत रहातात. ”

द्राक्षे म्हणाला, “योग्य करता आहा. बरं. हे आमंत्रण. रविवारी पार्टीला ये. मीनाचा वाढदिवस गेली दोन वर्षं माझ्या बाबांच्या आजारपणामुळे करता आला नव्हता. या वर्षी दणक्यात करतोय. गुड्डीला घेऊन ये. अरे हो. तोवर माझे डोळे बरे होतील ना?”

आमंत्रणपत्रिका हातात घेत म्हंटलं, “एकदम झकास होतील डोळे तोवर. थँक्स फॉर द इन्व्हिटेशन.”दार उघडून बाहेर जात, द्राक्षेला त्याच्या गाडीजवळ सोडत म्हटलं,”भेटू रविवारी. ”
आत मारीलीनसह येत रिशेप्शनिस्टला म्हटलं, “पुढचा रोगी पाठव.”

पार्टी

रविवारी गुड्डीसह पार्टीला गेलो. धुमधडाक्यात केक कटिंग झालं. गुड्डी मीनासह गायब झाली. जेवणाला वेळ होता, म्हणून म्हटलं कुठे तरी बसू या. एका कोचावर अपर्णा एकटीच बसली होती. तिच्याजवळ गेलो व म्हटलं, “बसू का?”

हसून ती म्हणाली, “बैस की.गुड्डी या पांढऱ्या पोशाखात परीसारखी दिसतेय. नाही?”
मीही हसलो व म्हटलं,”तूच तर दिलायेस हा पोशाख तिला.”
“हो. आठवलं. पैसे फक्त माझे. शिवणकाम व भरतकाम मंगला फडतेचं. गुणी आहे ती पोरगी.”
तेव्हाच एक आफ्रिकन गृहस्थ तिला भेटायला आला. म्हणाला, “मॅडम. इतके दिवस बँकेत येणं झालंच नाही. हे तुमचे मिस्टर?”
“हो, बरं मग तू मराठी गाणं शिकलास का?”
“हो. खूप जुनं गाणं आहे. ‘हा माझा मार्ग एकला’. . . . माझ्या सध्याच्या स्थितीला लागू होतंय. ”
अपर्णा मला म्हणाली, “हे द्राक्षेचे सहकर्मी एक दिवस बँकेत कामानं आले होते. याचं मराठी ऐकलंसच तू. यांच्या गोड आवाजामुळे मी विचारलं होतं, तू गातोस का?व याचं होकारार्थी उत्तर ऐकून मीच म्हटलं याला मराठी गाणं शीक म्हणून.”
मी त्याला म्हटलं, “वाः छान. ”
तो हसला. म्हणाला ,”ऐकवेन कधीतरी. आत्ता निघतो. “माझ्याशी हस्तांदोलन करून गृहस्थ निघून गेला.
मी अपर्णाला विचारलं ” एकटीच आलीस? सिंधू नाही दिसत कुठे?”
“अरे, तिला लग्नाला जायचं होतं एके ठिकाणी.”
“सुखी आहेस ना तिच्याबरोबर?”
“हो. तू कसा आहेस? मी ऐकलंय तू व विनी लग्न करताय!”
“बरोबर ऐकलंस. खरं तर लग्नाची काही गरज नाही. पण विनीला आई व्हायचंय म्हणून. . . . .”

एवढ्यात एक स्मार्ट तरुण अपर्णाजवळ येऊन म्हणाला, “मॅडम ओळखलंत? हे मिस्टर का?”
“दोन्ही प्रश्नांचं उत्तर, हो. मुरुगन तू इथे कसा?”

माझ्याशी हस्तांदोलन करून मुरूगन म्हणाला, “माझ्या बॉस होत्या मॅडम. पण मी केलेल्या लफड्यामुळे त्यांच्या सहवासाला मुकलो. रस्त्यावर आलो होतो. पण मॅडमनं दिलेल्या चांगल्या सर्टिफिकेटमुळे द्राक्षे सरांनी हात दिला. इथे अकाउंटंट म्हणून लागलो. थँक्स मॅडम, निघतो मी.”

तेवढ्यात एक दाक्षिणात्य जोडपं आलं. अपर्णानं ओळख करून दिली. “ही बांग्ला देशी हुस्ना चौधुरी व हा श्रीलंकन सनथ तिलकरत्ने. दोघंही डॉक्टर आहेत.”
जोडप्यापैकी पुरुष म्हणाला,”चुकीची ओळख करून दिलीत मॅडम. आम्ही दोघं भारतीय श्री व सौ. तिलकरत्ने”

आम्ही सगळेच हसलो. अपर्णा म्हणाली, “तुम्ही इथे कसे?”
“बँकेनं दिलेल्या कर्जामुळे आम्ही प्रॅक्टिस सुरू करू शकलो. फॅमिली डॉक्टर हा प्रकार आता उरला नाहीये. पण मी द्राक्षेंच्या वडिलांना ठीक करू शकलो व ही मीनाची डॉक्टर आहे म्हणजे आम्ही द्राक्षेंचे फॅमिली डॉक्टरच की. ”

थोडा वेळ गप्पा मारून ते गेल्यावर अपर्णा मला म्हणाली.”तू कंटाळला असशील ना?”
“नाही. बघतोय एक चांगली बँकर, चांगली माणूस आहेस तू”
दीर्घ उसासा सोडून ती म्हणाली, “पण तुला सुख नाही देऊ शकले.”

तेव्हढ्यात कुठूनशी गुड्डी धावत आली व माझा हात धरून ओढत म्हणाली, “बाबा कम, सी मीनाज न्यू डॉल्स हाऊस. आय टू विल लाईक टू हॅव वन लाईक दॅट.” व अपर्णाकडे पूर्ण दुर्लक्ष करीत तिनं मला ओढून नेलं.

——

[ समाप्त ]
– ©️ डॉ. प्रियंवदा कोल्हटकर, गोवा.                                                                                                priyakar40@gmail.com

@@@@@@@@@@@@@@@@@
आजची कविता 
बालकवी ठोमरे   
[ ‘मनोरंजन’ दिवाळी १९१० वरून साभार ]
 @@@@@@@@@@@@@@@@@
चाणक्य व त्याच्या विरोधातील ब्रिटिश कारस्थान 
अंतरलेला इतिहास : ११
 
 
हर्षद सरपोतदार
 
 

भारतीय परंपरेत चाणक्य व चंद्रगुप्त यांची जोडी अमर झाली आहे. नंद राजांची जुलमी राजवट उलथवून विष्णुगुप्त उर्फ चाणक्य उर्फ कौटिल्य या बुद्धिमान ब्राह्मणाने मौर्य साम्राज्य स्थापन करण्यास चंद्रगुप्त मौर्याला मदत केली असं आपण ऐकत व वाचत आलेलो आहोत.

काही प्राचीन ग्रंथांत या दोघांचे प्रामुख्याने उल्लेख आले आहेत, ते असे;

) ‘बृहतकथा’ या गुणाढ्याच्या पैशाची भाषेतील ग्रंथावरून निर्माण झालेल्या ‘बृहतकथामंजिरी’ व ‘कथासरित्सागर’ अशांसारख्या संस्कृत काश्मिरी ग्रंथांमध्ये चाणक्याचा उल्लेख आला आहे.
) जैन मुनी हेमचंद्र (११ वे शतक) याच्या ‘परिशिष्टपर्वन’ या महाकाव्यात चाणक्याने धनानंदावर केलेल्या स्वारीची हकीगत दिली आहे.
) गुप्तकाळातील नाटककार विशाखदत्त याचं ‘मुद्राराक्षस’ हे संपूर्ण नाटकच चाणक्य, चंद्रगुप्त व अमात्य राक्षस यांच्याशी संबंधित विषयावर बेतलेलं आहे.
) ‘महावंश’ या श्रीलंकेतील बौद्ध ग्रंथातही या दोघांचा उल्लेख आलेला आहे.

वरील ग्रंथांमध्ये चाणक्याचे उल्लेख आले असले तरी ब्रिटिश व मार्क्सवादी इतिहासकार चाणक्य नामक पुरुष होऊन गेला हे मान्य करायला तयार नव्हते. कारण तसं मान्य केलं असतं तर अर्थशास्त्र व राजनीतीवरचे चाणक्याचे ग्रंथ जगात आद्य व अजोड ठरले असते आणि त्यामुळे भारतीय संस्कृती कुठल्याही युरोपीय देशापेक्षा प्राचीन व अव्वल ठरली असती. ते या लोकांना नको होतं. मात्र जसजशी नवीन साधने मिळत गेली, तसतसे हे इतिहासकार निरुत्तर होत गेले. त्याचा घटनाक्रम मनोरंजक असून तो मुद्दाम खाली देतो.

. काही भारतीय पुराणे आणि पुराणकथा यांमध्ये चाणक्य किंवा कौटिल्य या पुरुषाचा उल्लेख अधूनमधून आला होता. पण सर विल्यम जोन्स व होरॅस विल्सन अशा ब्रिटिश विद्वानांनी ही साधनेच ‘अविश्वसनीय’ मानल्यामुळे असा कुणी पुरुष होऊन गेला हेही त्यांनी नाकारलं होतं.
. १९ व्या शतकात ‘चाणक्यनीती’ नामक ग्रंथ उपलब्ध झाला होता, पण खरोखरच ‘चाणक्य’ नांवाचा माणूस व त्याचा ग्रंथ भारतात होऊन गेला काय याविषयी ब्रिटिश संशोधकांनी शंका व्यक्त केली होती.
. ‘पंचतंत्र’ या प्राचीन ग्रंथात सांगितलेली राजनीती व चाणक्याच्या ग्रंथातील चाणक्यनीती यात कमालीचं साम्य आढळलं  होतं. शिवाय पंचतंत्रातील नीती शिकवणारा विष्णुशर्मन’ नामक ब्राह्मण व मौर्यकालीन विष्णुगुप्त म्हणजेच चाणक्य यांच्यात कमालीचं साम्य होतं. पण ब्रिटिश विद्वानांनी हा विष्णुशर्मनही काल्पनिक असावा असा दावा केला व भारतीय इतिहासकारांनी तो मुकाटपणे स्वीकारला.
. गुप्तकालीन नाटककार विशाखदत्त याच्या ‘मुद्राराक्षस’ नाटकात चाणक्य व चंद्रगुप्त यांची संपूर्ण हकीगत आली होती. पण सिल्वियन लेव्ही या ख्रिस्ताभिमानी फ्रेंच संशोधकाने असल्या वाङ्मयाचं ऐतिहासिक मूल्य शून्य असल्याचं ठाम प्रतिपादन केलं व आपल्याकडील आर. के. मुखर्जी वगैरे संशोधकांनी ते ताबडतोब शिरोधार्य मानलं.
. चाणक्याचा दुसरा ग्रंथ ‘अर्थशास्त्र’ हा त्या काळी उपलब्ध नसल्यामुळे असा काही ग्रंथ खरोखरच अस्तित्वात असल्याचंही या संशोधकांनी नाकारलं होतं.

Dr. Rudrapattana Shamshatri

. याच दरम्यान १८९१ साली ‘ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट’ ही संस्था म्हैसूरचे राजे ‘चामराजेंद्र वडियार (दहावे)’ यांच्या आश्रयाखाली सुरु झाली होती. या संस्थेचे ग्रंथपाल म्हणून डॉ. रुद्रपट्टण शामशास्त्री यांनी सूत्रे हातात घेतल्यावर प्रथम त्यांनी ताडपत्रावरील हजारो प्राचीन हस्तलिखितांची सूची बनवायचं काम हाती घेतलं. ते करत असताना १९०५ साली त्यांना ताडपत्रांच्या त्या ढिगात कौटिल्याच्या अर्थशास्त्राचं संस्कृत हस्तलिखित आढळलं. १९०९ मध्ये त्यांनी ते छापून प्रसिद्ध केलं व त्याचं इंग्रजी भाषांतर १९१५ साली प्रकाशित केलं. त्यामुळे ब्रिटिश विद्वानांची पंचाईत झाली. तेव्हा थॉमस बरो (१९०९-१९८६) सारख्या ऑक्सफर्डस्थित संशोधकाने विष्णुगुप्त, चाणक्य व कौटिल्य हे ‘वेगवेगळे’ असावेत अशी थिअरी मांडायचा उपद्व्याप केला व डावे इतिहासकार त्याचीच ‘री’ ओढत राहिले.
. चाणक्य किंवा कौटिल्य नामक पुरुष खरोखरच होऊन गेला असला तरी जातीने तो ब्राह्मण होता व चंद्रगुप्त मौर्याशी त्याचा संबंध होता हे मान्य करायला डावे इतिहासकार तयार नव्हते व आजही नाहीत. महाराष्ट्रातील एक मार्क्सवादी विद्वान डॉ. आ. ह. साळुंखे यांनी ‘आस्तिक शिरोमणी चार्वाक’ या ग्रंथात कौटिल्य हा ‘वैदिक’ असल्याचं नाकारून तो वैदिक-विरोधी ‘चार्वाक’ पंथीय असल्याचा सिद्धांत मांडला.पण ‘अर्थशास्त्र’ ग्रंथातील पहिल्याच श्लोकात कौटिल्याने ‘त्रैलोक्याधिपती विष्णू’ या वैदिक देवाला वंदन करूनच ग्रंथाची सुरुवात केली आहे याकडे त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलं. त्याचप्रमाणे ‘मंजुश्री मूळकल्प’ या नव्याने उजेडात आलेल्या ग्रंथाची दखलही त्यांनी घेतली नाही.
. ‘मंजुश्री मूळकल्प’ हा प्राचीन बौद्ध ग्रंथ १९३४ साली तिबेटमधून अकस्मात प्राप्त झाला होता. (त्याविषयीची सविस्तर हकीगत मी अन्यत्र दिली आहे.) त्यात वैदिकधर्माभिमानी चाणक्य व चंद्रगुप्त यांचे परस्पर संबंध व चाणक्याने नंद राजांची राजवट उलथवण्याविषयीचे स्पष्ट उल्लेख आले आहेत. त्यामुळे चाणक्याच्या अस्तित्वावर व कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्या सर्व विद्वानांची तोंडे बंद झाली.

‘मंजुश्री मूळकल्प’ ग्रंथातील उल्लेख

विष्णुगुप्त चाणक्य हा चंद्रगुप्त मौर्य, त्याचा मुलगा बिंदुसार आणि नंतर अशोक अशा तीन पिढ्यांच्या राजांचा पंतप्रधान होता हे या ग्रंथावरून समजतं. चंद्रगुप्त आणि चाणक्य हे दोघेही बौद्ध नसून सनातनी वैदिक धर्मीय होते. त्यामुळे त्यांचं इथे कौतुक केलेलं नाही. चाणक्याने बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या भिक्षुंवर बरेच निर्बंध घातले होते हे त्याच्या अर्थशास्त्रावरून दिसून येतं. सबब चाणक्याला या ग्रंथात शिव्याच घातल्या आहेत. ‘चाणक्य हा यशस्वी पण संतापी होता. त्याची कारकीर्द तीन पिढ्यांची आणि दीर्घ झाली. (मृत्यूनंतर) तो नरकात गेला.’ असं इथे नमूद केलं आहे. (श्लोक ४५५ ते ४५८) मात्र याच ग्रंथात राजकारणातील कर्तृत्वान ब्राह्मणांची यादी पुढे एके ठिकाणी दिली आहे, त्यामध्ये चाणक्याचा कारभार चोख आणि न्यायी असल्याविषयी त्याची स्तुती केली आहे. (श्लोक ९६६ ते ९७०) चंद्रगुप्ताने २४ वर्षं तर बिंदुसार याने २५ वर्षं राज्य केलं. नंतर अशोक गादीवर आला तेव्हाही काहीकाळ चाणक्यच पंतप्रधान होता. त्यानंतर पंतप्रधान बनलेला राधागुप्त हा बहुधा चाणक्याचा मुलगा किंवा नातू असावा असं या ग्रंथाचे संपादक के. पी. जयस्वाल म्हणतात.(संदर्भ :- ‘An Imperial History of India’ by K.P.Jayaswal, Motilal Banarsidaas, Lahore, 1934.)

वर उल्लेख केलेल्या श्लोक क्रमांक ९६६ ते ९७० मध्ये चाणक्याविषयी खालील माहिती दिली आहे,

“विष्णुगुप्त हा पुष्पपूर येथील ब्राह्मण हा संतापी होता, पण चमत्कार घडवून आणणारा म्हणून पुढे तो विख्यात झाला. (माझ्या मते हे पुष्पपूर म्हणजे रामबंधू भरत याच्या पुत्राने वसवलेली ‘पुष्कलावती’ किंवा ‘पुष्करवती’ ही नगरी असावी. कारण हे गाव सुप्रसिद्ध ‘तक्षशिला’ च्या जवळ असून चाणक्य हा काहीकाळ तक्षशिला विद्यापीठात अध्यापन करत होता. ही दोन्ही ठिकाणं सध्या पाकिस्तानातील पेशावरजवळील ‘खैबर पख्तुनख्वा’ प्रांतात आहेत.)

“विष्णुगुप्ताच्या दारिद्र्यामुळे पूर्वी तो राजांच्या हेटाळणीचा विषय बनला होता व त्यांच्याकडून अवमानित केला गेला होता. पुढे तो ‘क्रोधाधिपती’ व ‘यमान्तक’ म्हणून प्रसिद्धीस आला. दुष्टांचा नाश करणारा, अपायावर उपाय काढणारा व नीतिमत्तेचा आश्रयदाता असा तो होता.पण गरिबीने ग्रासला असल्यामुळे व महाक्रोधी असल्यामुळे प्रत्यक्ष (नंद) राजालाही नेस्तनाबूत करायला त्याने मागेपुढे पाहिलं नाही.”

या ग्रंथातील अशा स्पष्ट उल्लेखांमुळे चाणक्याच्या विरोधातील ब्रिटिश व मार्क्सवादी कारस्थानाला आता कायमची मूठमाती मिळाली आहे.

– ©️ हर्षद सरपोतदार  

hsarpotdar1@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
विनोबा विचार पोथी

हेमंत मोने
 

क्रमांक ५७ 


आत्मचिंतन म्हणजे आत्मशक्तीचे चिंतन. वस्तुतः आत्मा अचिंत्य आहे.

आत्मा अचिंत्य आहे याचा सरळ अर्थ आपण आत्म्याचे चिंतन करू शकत नाही असा होतो, आपण एखाद्या विषयाचे चिंतन करतो तेव्हा आपली इंद्रिये वापरतो. आपण डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, स्पर्शाने जाणतो तेव्हा त्या विषयाचे, वस्तूचे रंग, रूप, गुणधर्म आपण जाणतो. मी गरम गरम भजी खाल्ली. त्यांची चव माझ्या जिभेवर रेंगाळली. काही दिवसानंतर पुन्हा ती मला खावीशी वाटली. हा चिंतनाचा परिणाम. पण गीता म्हणते आत्म्याच्या चिंतनासाठी, त्याला जाणण्यासाठी इन्द्रिये कामाची नाहीत. आत्मसाक्षात्कार हेच मुळात आश्चर्य आहे. असा आत्मसाक्षात्कारी त्याचे वर्णन करूच शकत नाही. दुसरा ते ऐकूही शकत नाही. आत्मा मरत नाही आणि मारीतही नाही असे युद्धप्रसंगाला अनुसरून गीतेत सांगितले आहे. परंतु मुख्य गोष्ट ही की आत्मा विकारापासून अलिप्त आहे. तो निर्विकार आहे. म्हणूनच जेव्हा कोणतेही संकल्प मनात उठत नाहीत, विकार निर्माण होत नाहीत तेव्हाचा क्षण हा सर्वात श्रेष्ठ क्षण आहे. तो क्षण, ती वेळ सत्कारणी लागला, फुकट गेला नाही असे विनोबा म्हणतात. आत्म्यात अनंत शक्ती भरली आहे तिचे चिंतन आपण करू शकतो. इन्द्रिये कार्यरत असतांना अशा चिंतनात अडथळा येतो.

मिल्टन कवीची कहाणी आहे. तो कविता उत्तम लिहीत असे. परंतु राजकारणात फार अडकला होता; त्याचे पुढे डोळे गेले तेव्हा त्याचे राजकारण सुटले. मिल्टनच्या हातुन जगाची खरी सेवा त्याला अंधत्व आल्यानंतर झाली. डोळे गेल्यावरच त्याने ‘प्याराडाईज लास्ट’ लिहिले. बगीच्यात बसून आपल्या मुलीकडून तो कविता लिहून घेत असे. डोळा ही मोठी शक्ती आहे असे आपल्याला वाटते पण कान आणि डोळा कापून अलग ठेवला तर त्यांच्यात शक्ती राहील का? शक्ती आत्म्यात आहे परंतु माणूस मूळ सोडून प्रतिबिंबालाच धरून बसतो. म्हणून आत्मशक्तीचे भान झाले पाहिजे. त्या शक्तीनेच खरे कार्य होते. कर्मयोग सुकर होतो.

वृद्ध माणसांना यातून बोध घेण्यासारखा आहे. दृष्टी कमी झाली, ऐकू कमी येऊ लागले, विस्मरण होऊ लागले म्हणजे माणसे हतबल होतात. निराश होतात. पण खरी शक्ती आत्म्यात आहे हे ज्याने ओळखले, तो सदैव आनंदी राहील. आपल्या दुर्बलतेची चिंता करणार नाही. जीवन दु:खी बनवायचे की सुखी बनवायचे हे शेवटी आत्मशक्तीवरच अवलंबून आहे.

– ©️ हेमंत मोने
hvmone@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
सुटका

थोडक्यात मार्मिक : १६
 
 
कौस्तुभ ताम्हनकर
 

‘एकता  चाळ’  पार मोडकळीला आली होती. पडायच्या आत ती redevolopment ला गेली नाही तर रहिवाश्यांच्या डोक्यावर आकाशाचे छप्पर येणार हे नक्की होते. वीस लोकांची मोट बांधणे हे शिवधनुष्यच होते. ते शेवटी चाळीच्या दगडे-पाटील मालकांनी उचलले आणि बघता बघता अनेक मजल्यांची ‘ एकता को. ऑप. हौसिंग सोसायटी ‘ उभी राहिली.

उत्साही सभासदांचे कार्यकारी मंडळ स्थापन झाले. अध्यक्षपदाची माळ अलगदपणे कार्येकरांच्या गळ्यात पडली. सर्व सदनिकाधारकांना एकता संकुल म्हणजे एक कुटुंब वाटत होते. पहिल्या मजल्यावरील दोन नंबरच्या सदनिकेतील तव्यावरील सुरमईचा वास चौथ्या मजल्यावर पोहोचण्याआधी त्यातील दोन पिसेस तिसऱ्या मजल्यावरील चौथ्या सदनिकेत पोहोचत असत. सर्व जणांच्या वागण्या बोलण्यात एकता खऱ्या अर्थाने ओतप्रोत भरलेली दिसत होती. पहिली तीन वर्षे आनंदात गेली. कार्येकर अध्यक्षपदावरुन नावापुरते उतरले आणि  सचीवपदाची माळ त्यांच्या गळ्यात आपसूक येऊन पडली.

पुढील वर्षांच्या खांदेपालटात कार्यकारी मंडळात नवीन सभासद आले पण कार्येकर कामातून काही सुटले नाहीत. खजिनदार, सचिव, अध्यक्ष तर कधी उपाध्यक्ष तर कधी उपसचिव अशी नुसती अदलाबदल करत कार्येकर सोसायटीचा गाडा चालवतच राहिले.

अशीच पंचवीस वर्षे उलटली. संकुलातील एकता दुभंगली होती. आता संकुलात कुरबुरी सुरु झाल्या होत्या. दोन गट पडले होते. कार्येकरांचे वय वाढले, वयोपरत्वे येणार्‍या व्याधी तनाघरी मुक्कामाला आल्या तरी पण सोसायटीच्या कामातून कार्येकरांची काही सुटका होईना. अनेक वेळा त्यांनी राजीनामा दिला पण मंजूर करायला कोणीतरी हवे ना? सल्ला द्यायला शंभरजण पण पदाधिकारी व्हायला शून्यजण अशी परिस्थिती होती. सोसायटीच्या नावातील सहकारी हा शब्द काढून टाकावा किंवा त्याच्या मागे ‘अ ‘ तरी लावावा अशी कार्येकरांची मनोमन इच्छा होती.

सोसायटी म्हणजे पायातील बेडी जी त्यांनी अति उत्साहात पंचवीस वर्षांपूर्वी स्वतः:च्या गळ्यात घालून घेतली होती. त्या बेडीचा आता सापळा झाला होता. कार्येकर त्यात अडकले होते. या सापळ्यातून सूटायचे कसे ? या विचाराने कार्येकर त्रस्त होते. काट्याने काटा काढावा किंवा जसास तसे या म्हणींचा इथे काही उपयोग नव्हता.

एक दिवस कार्येकरांना पहाटे स्वप्न पडले त्यात ते आरोपीच्या पिंजर्‍यात उभे होते आणि त्यांच्यावर अफरातफरीचे आरोप केले जात होते. त्यांना न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली. कोर्टाच्या बाहेर पडताना मात्र कार्येकर नाचतच बाहेर पडले!

कार्येकर खडबडून जागे झाले. आरोपीचा पिंजरा त्यानी स्वप्नातही कल्पिला नव्हता त्याच पिंजर्‍यात आज पहाटे पहाटे त्यांनी स्वत:ला बघितले होते. त्यांना स्वप्नाचा अर्थ कांही लागे ना. त्यांचा नातू त्याना येऊन बिलगला. त्याने विचारले, ” अजोबा, टेढी उंगली म्हणजे काय हो? ”
;
सोसायटीत ड्रेनेज चोकअप झाले होते. बरेच मोठे काम होते. कार्येकरांनी तीन कोटेशन्स मागवली; त्यातल्या एका बे-भरवशाच्या माणसाला त्याचे दर चढे असताना देखील काम दिले. त्याच्याकडून बरीच रक्कम अगाऊ आपल्या खात्यात वळती करुन घेतली. आणि हे गुपित षटकर्णी व्हायची व्यवस्था केली. या बाणाने निशाणा साधला. संकुलात चर्चेला उधाण आले. प्रथम ती दबक्या आवाजात मग उघडपणे कुजबुजू लागली. विरोधी गटातील सभासदांनी खास AGM ची मागणी केली. कार्येकरांवर आरोपांच्या फैरी झडल्या. आरोपांचे बालंट लागल्यामुळे कार्येकरांचा राजीनामा कार्यकारीणीला मंजूर करावाच लागला. राजीनाम्यासोबत त्यानी त्यांच्या खाती बे-भरवशाच्या माणसा कडून घेतलेल्या  रकमेचा धनादेश जोडलाच होता. कार्यकर सभेतून बाहेर पडले. एक दीर्घ श्वास घेऊन सुटल्याचा आनंद त्यांनी साजरा केला. ‘ टेढी उंगली ‘ आणि त्यांना पडलेल्या स्वप्नाचा अर्थ त्यांना समजला होता.

********
– ©️ कौस्तुभ ताम्हनकर
९८१९७४५३९३
kdtamhankar@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
चित्रकारांचे दालन 
– ©️ मनीषा नाबर 
nabarm@yahoo.com
@@@@@@@@@@@@@@@
हत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@

मिलेवा मारिच-आइन्स्टाईन

अपयशी संघर्षांची कहाणी 

 
डॉ. विद्या नारायण वाडदेकर
 
भाग १

मिलेवा मारिच-आइन्स्टाईन ( जन्म : १९ डिसेंबर १८७५  –  मृत्यू : ४ ऑगस्ट १९४८)


पार्श्वभूमी :-
मिलेवा मारिच-आइन्स्टाईन (Mileva Marić-Einstein) हे नाव वाचताच सुप्रसिद्ध, नोबेल पारितोषिक विजेते, भौतिकशास्त्रज्ञ, अल्बर्ट आइन्स्टाईन, यांची आपसूक आठवण होते. मनात विचार येतो, मिलेवा मारिच-आइन्स्टाईन यांचा सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ, अल्बर्ट आइन्स्टाईन, यांच्याशी काही संबंध असेल का? शोधल्यास याचं उत्तर मिळतं ‘होय’ हेही समजतं की, त्या आइन्स्टाईनच्या पत्नी होत्या, आणि प्रथम पत्नी होत्या.  होय, दुर्दैवाने आइन्स्टाईननी विवाहानंतर काही वर्षांनी त्यांच्याशी घटस्फोट घेतला आणि दुसरा विवाह केला. मिलेवा मारिचना उर्वरित जीवन एक घटस्फोटिता म्हणून जगावे लागले. काय काय घडलं, मारिच यांच्या आयुष्यात?

विद्यार्थीदशेत ज्या मुलीच्या प्रेमात आइन्स्टाईन पडले, तिच्याकडे त्या सुमारास काहीतरी खास बौद्धिक आकर्षण असेल का? पण मग ते एकमेकांपासून दूर का झाले? आइन्स्टाईनच्या जीवनात कुणा अधिक सुंदर किंवा बुद्धिमान स्त्रीचा प्रवेश झाला का? मारिच याना भौतिकशास्त्रज्ञ बनता आले का? असा प्रश्नांच्या उत्तरासाठी मारिच यांच्या जीवनकहाणीत  डोकवायला हवे.

जन्म आणि प्राथमिक शिक्षण :-
मिलेवा मिलोज मारिच (Mileva Miloš Marić) यांचा जन्म १९ डिसेंबर १८७५ रोजी आजच्या सर्बियातील टिटेल (Titel) नगरातील, एका श्रीमंत कुटुंबात झाला. त्या वेळेस तेथे ऑस्ट्रो-हंगेरियन राजवट होती. तिचे वडील मिलोज मारिच (Miloš Marić), १८६२ मध्ये, वयाच्या सोळाव्या वर्षी, नियमानुसार लष्करातील सेवेसाठी टिटेलला आले होते. कालांतराने जर्मन भाषा आणि गणित यांवरील प्रभुत्त्वामुळे जेव्हा त्यांना राज्याच्या प्रशासकीय सेवेत नोकरी मिळाली, तेव्हा त्यानी लष्करातील नोकरीचा राजीनामा दिला. टीटेलला आल्यानंतर पाच वर्षांनी त्यांनी विवाह केला. त्यांच्या पत्नीचे नाव होते, मारिजा रुझिक-मारिच. बाळ मिलेवा जेव्हा चालायला शिकल्या, तेव्हा त्यांच्या डाव्या नितंबातील हाड जन्मतःच विस्थापित असल्याचे लक्षात आले. या समस्येवर त्या काळी उपाय नव्हता. त्यामुळे, मारिच यांच्यात कायमचे अपंगत्व निर्माण झाले होते. चालताना त्या लंगडत. या व्यंगाचे ओझे त्यांना आयुष्यभर वागवावे लागले. असाच शारीरिक दोष त्यांची धाकटी बहीण, झोरका, हिच्यातही होता. त्यामुळे हा दोष अनुवंशिक असावा.

१८७७ मध्ये मारिचच्या वडिलाना रुमातील जिल्हा सत्र न्यायालयात कारकुनाची नोकरी मिळाली. रुमा हे नोव्ही सॅडच्या दक्षिणेला ३० किमी दूर असल्याने कुटुंब रूमाला रहायला आले. १८८२ मध्ये मारिच यांना रुमातील प्राथमिक शाळेत दाखल करण्यात आले. इथे शारीरिक व्यंगावरून इतर मुले त्याना सतत चिडवत. यामुळे मारिच एकलकोंड्या झाल्या. त्या इतरांना शक्यतो टाळू लागल्या. इथे अभ्यासात मात्र त्यानी चांगलीच प्रगती केली. शिक्षकांनी तर तिच्या वडिलांना “या मुलीची विशेष काळजी घ्या. ती म्हणजे एक दुर्मिळ चमत्कार आहे’, असे सांगितले. या शाळेत मारिचनी चार वर्षे शिक्षण घेतले.

माध्यमिक शाळेतील शिक्षण :
त्या काळी स्त्री-शिक्षण म्हणजे अडथळ्यांची शर्यत होती. परंतु, वडिलांनी मारिचच्या क्षमतांना झेपेल इतके शिक्षण त्यांना देण्याचा निर्धार केला होता. यात एक सर्वांत मोठी अडचण अशी होती की त्या काळी स्त्रियांना महाविद्यालयीन (पदवी) शिक्षण घेण्यासाठी सोयच नव्हती. कारण, सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा फक्त मुलग्यांसाठीच चालवलेल्या होत्या. महाविद्यालयीन शिक्षण किंवा व्यावसायिक कारकिर्दीसाठी, एकूण आठ/नऊ वर्षांचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण आवश्यक असे.

मारिचच्या वडिलांची इच्छा मारिचना व्यावसायिक कारकिर्दीसाठी, उच्च शिक्षित करण्याची होती. त्यामुळे त्याना १८८६ मध्ये, नोव्ही सॅड येथील ‘सर्बियन मुलींची उच्च ( प्रगत शिक्षण देणारी, या अर्थी ) शाळे’च्या माध्यमिक विभागांत, पहिल्या वर्षांत, घातले. या शाळेचा अभ्यासक्रम साधारणपणे मुलग्यांच्या जुन्या माध्यमिक शाळेतल्यासारखा होता. इतके शिक्षण बहुधा भविष्यात मातेची, स्वतःच्या मुलग्यांना उच्च शिक्षणाकडे वळविणारीची, भूमिका पार पाडता येण्यास पुरेसे मानले जाई. नोव्ही सॅड येथे मारिचची जेवणाची आणि राहण्याची सोय वडिलांनी, एका विधवेच्या घरांत केली होती. या शाळेत मारिचचे जेमतेम एक शैक्षणिक वर्ष पूर्ण झाले.

१८८७ मध्ये मारिचना रुमा यथील आईवडिलांच्या घरापासून जवळच्याच स्रेमस्का मित्रोविका येथील ‘रॉयल निम्न माध्यमिक शाळेत घातले. कारण, येथील शिक्षण त्यांच्या बुद्धिमत्तेला अधिक आव्हान देणारे होते. येथील तीन वर्षांच्या शिक्षणानंतर त्यांचे माध्यमिक शिक्षण ( आठवी समकक्ष ) पूर्ण झाले.

आता मारिच चौदा वर्षांच्या होत्या. त्या काळातील या वयाच्या ऑस्ट्रो-हंगेरियन मुली एवढ्या शिक्षणानंतर बहुधा घरगुती कामात मदत करणे, शिवण करणे, आणि विवाह होईपर्यंत लग्नाची स्वप्ने रंगवणे; यात विवाहापर्यंतचा काळ व्यतीत करत. परंतु मारिचना उच्च शिक्षण घेण्याच्या दृष्टीने मुलग्यांसाठीच्या उच्च माध्यमिक शाळेत शिकण्याची ओढ होती. तोपर्यंत, ऑटोमान साम्राज्याच्या पाडावानंतर स्वतंत्र झालेल्या सर्बियातील विद्यापीठांत स्त्रियांना प्रवेश दिला जाऊ लागला होता.

१८९० मध्ये, सर्बियातील छोट्या शाबाश (Šabac)  नगरातील, ‘रॉयल सर्बियन जिम्नेसियम’मध्ये त्याना नवव्या इयत्तेत घालण्यात आले. इथे १८९१-९२ या कालावधीत त्यांचे शिक्षण झाले. परंतु १८९२ मध्ये वडिलांची नेमणूक झाग्रेब (क्रोएशियाची राजधानी) येथील उच्च न्यायालयात ‘निम्न न्यायिक अधिकारी’ म्हणून झाली. त्यामुळे कुटुंब रुमाहून झाग्रेबला स्थलांतरित झाले. परिणामी दहावी पूर्ण होण्यापूर्वीच मारिचना शाबाशमधील शाळा सोडावी लागली.

झाग्रेबला स्थिरस्थावर झाल्यावर वडिलांच्या प्रशासकीय सेवेतील उच्च स्थानामुळे, मारिच यांना मुलग्यांसाठीच्या ‘रॉयल अप्पर जिम्नेसिअम (Royal Upper Gymnasium)’ या सार्वजनिक शाळेत खाजगी विद्यार्थिनी म्हणून विनामूल्य प्रवेशासाठी, परवानगी मिळाली. मात्र, प्रत्यक्ष प्रवेश मिळविण्यासाठी त्याना शाळेच्या प्रवेश परीक्षेला बसावे लागले. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १८९२च्या शैक्षणिक वर्षापासून मारिच या शाळेत इयत्ता दहावीत दाखल झाल्या. पुढच्या वर्षापासून त्यांना विद्यावेतनही मिळू लागले. येथील अभ्यासक्रमात अधिक भर अभिजात भाषा आणि त्यातील साहित्य यांवर होता. मारिच यांनी लॅटिन आणि ग्रीक या दोन अनिवार्य भाषांसह जर्मन आणि क्रोएशियन या दोन ऐच्छिक भाषा मिळून चार भाषा अभ्यासासाठी निवडल्या. पहिल्या वर्षी त्यांच्या वर्गांत ४० तर दुसऱ्या वर्षी ६० विद्यार्थी होते. पहिल्या वर्षी त्यांना गणित, भौतिकशास्त्र, इतिहास, भूगोल आणि ग्रीक सोडून इतर भाषा विषयात ‘फार छान’ (अमेरिकन ब)’ श्रेणी मिळाली. तर ग्रीक भाषेत त्यांना ‘उत्कृष्ट (अमेरिकन अ)’ श्रेणी मिळाली. परंतु, १८९३-९४ या वर्षी (अकरावीत) त्यांच्या सर्वः विषयातील श्रेणी खूपच घसरल्या. दोन विषयांतील श्रेणी तर अगदी रसातळाला, ‘समाधानकारक’ला (अमेरिकन ड), पोहोचल्या. आजारपण हे यामागचे एक कारण असू शकेल. याचमुळे कदाचित त्यांना अंतिम परीक्षेला बसणेही पुढे ढकलावे लागले.

दुसरे कारण असे दिसते की, याच वर्षी मारिचनी, ‘भौतिकशास्त्र’ हा विषय घेण्यासाठी, विशेष परवानगी, शिक्षण मंत्रालयाकडे मागितली होती. त्या सुमारास हा विषय घेण्याची मुभा फक्त मुलग्यांनाच होती. वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांमार्फत परवानगी मिळविण्याचा मारिचचा प्रयत्न,  कदाचित विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात बहुधा त्यांच्याप्रती द्वेष जागृत करता झाला. परिणामी त्यांचा मानसिक छळ करण्यात आला. यातूनच कदाचित त्यांची परीक्षा घेणाऱ्या पुरुष शिक्षकांनीही, त्यांना हेतूतः कमी श्रेणी देऊन, त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला असावा. मारिचना अचानक सर्वच विषयांत कमी श्रेणी मिळण्याचे कारण काहीही असेल, परंतु, अशा परिस्थितीतही त्यांनी चिकाटी न सोडता, प्रयत्नपूर्वक चांगले यश मिळवलेच. १४ फेब्रुवारी १८९४पर्यंत खरे तर त्याना भौतिकशास्त्र विषयाच्या वर्गांना उपस्थित राहण्याची, अधिकृत परवानगीही मिळाली नव्हती. परंतु, नंतर त्यांच्या प्रतीचा विरोध मावळताच, मारिच यांच्या श्रेणी अचानकपणे सुधारल्या. सप्टेंबर १८९४ला त्या अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्या. गणित आणि भौतिकशास्त्र विषय वगळता, इतर विषयांतील त्यांच्या श्रेणी ‘छान’ (अमेरिकन क) होत्या. गणितातील त्यांची श्रेणी तर ‘छान’ (क) वरून ‘फार छान (ब) अशी एक स्तर उंचावली, तर भौतिकशास्त्रातील श्रेणी दोन स्तर उंचावली; म्हणजे, समाधानकारक (ड) वरून ‘फार छान’ (ब) झाली.

क्रमशः ]

@@@

संदर्भ:
Allan Esterson and David C. Cassidy, Einstein’s Wife: The Real Story of Mileva Einstein-Marić Cambridge, MA: MIT Press, 2019. Pp. 336.
प्रकाशचित्र:
https://www.independent.co.uk/news/long_reads/mileva-maric-albert-einsten-physics-science-history-women-a8396411.html

– ©️ डॉ. विद्या नारायण वाडदेकर  
wadadekarvidya@rediffmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आजची कविता 

 
प्रदीप अधिकारी

पुरुष

दोन प्रश्न साधे, नवरा म्हणून
तुला विचारतोय, राधे,
दे, मला उत्तर दे..!

वृंदावनात साऱ्या, करुनी कृष्णलीला,
कायमचा तुजला, जो त्यजूनी गेला
अजूनही, तोच कां भासतोय प्रिय तुजला ?

मोहमयी जरी होती, ती निळी सावळी मूर्ती
अनावर होती, ती तुझी धगधगती देहभक्ती
कर्माने नसे, परी धर्माने असतां मी तुझा पती
तुला जडली होती, त्याची मायावी आसक्ती..!

ना कधी मी केला, त्याचा कुठे गवगवा
ना कधी मी केला, त्याचा जरासाही हेवा
ना कधी केली मी, कुठलीही मोहमयी युक्ती
ना कधी केली मी, तुझ्यावर कसलीही सक्ती..!

कधीच केली नाही मी,
तुझ्याशी कधी प्रतारणा
पण तू  कधीच केली नाहीस
माझ्या पौरुषाची विचारणा….
निर्विघ्न समागमातून,
कायमची जखडलीस त्याला
वर चढविलात, आध्यात्मिक मुलामा
तुम्ही तुमच्या जुगुलाला..!

भोगाच्या नाही,
त्यागाच्या प्रेमासाठी
अंगी धमक लागते,
राधे, पत्नी म्हणून,
निर्माल्य स्वीकारायला
हिम्मत लागते…
त्यासाठी दैवी कृष्ण नव्हे,
मर्त्य मानवी अयान असावे लागते

तुला हवा असलेला पूर्ण पुरुष,
नक्की कोणात होता?
दे, राधे, मला उत्तर दे..!

– ©️ प्रदीप अधिकारी
adhikaripradeep14@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
मुद्रित व डिजिटल माध्यमांची रस्सीखेच
बदलत्या प्रवासाची कहाणी
देवेंद्र रमेश राक्षे

भाग ७

  

संगणकीय तंत्रज्ञानामुळे जगभरातील माध्यमं फोफावली, पण तो विस्तार केवळ इंग्रजीपुरताच होता. बाकी भाषांमध्ये मात्र मुद्रणकला केवळ खिळे आणि छापाच्या यंत्रातूनच होत होती. झेरॉक्स कंपनीने आणलेल्या, तसेच साक्लोस्टाईल यंत्राद्वारे सर्व भाषांतील शीघ्र मुद्रण सोपे जाऊ लागले. यावर “आमच्या इथे सर्व भाषांतील मजकूर झेरॉक्स केला जातो” पासून “आम्ही चक्क कॉपी करतो” यासारखे विनोद देखील प्रचलित झाले. पण व्यावसायिक पातळीवरचे गांभीर्य संगणकाद्वारे मुद्रण क्षेत्रात येण्यासाठी अनेक अडथळे होते, त्यातला पहिला अडथळा इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषांतील लिपी विशेषत: चित्रलिपींचा होता.

युरोप, चीन या देशातील महाकाय व्यवसायांना सोयीचे जावे म्हणून त्या त्या भाषेतील चित्रलिपी संगणकात उतरून घेण्यासाठी पाश्चात्य तंत्रज्ञ प्रयत्नशील होते, पण भारतीय बाजारपेठेकडे मात्र त्यांचे लक्ष जाईलच कसे, कारण भारतीय बाजारपेठ त्या काळी कुणाच्याही खिजगणतीत मुळी नव्हतीच. अशा वेळी भारतीय भाषांसाठी आयात असे आयते तंत्रज्ञान लाभण्याची शक्यता तशी कमी लाभदायी देखील.

सर्व भारतीय भाषांना संगणकात रोवण्याचे यशस्वी प्रयत्न पुण्यातील संस्थेने केले ते केवळ त्यापुरतेच मर्यादित न राहता जगविख्यात झाले त्याची ही कहाणी या लेखांकातून.

सी-डॅक या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील सरकारी संस्थेने “दी ग्राफीफ अँड इंटेलिजन्स बेस्ड स्क्रिप्ट टेक्नॉलॉजी” या शब्दप्रयोगातील जी.आय.एस्.टी. ही चार इंग्रजी आद्याक्षरे घेत संगणकाच्या मुख्य यंत्रात खोचायचे असे एक इलेक्ट्रॉनिक कार्ड तयार केले. ज्याद्वारे सर्व भारतीय भाषांतील लिपी संगणकात अवतरण्याची सोय करता आली.

हे जिस्ट कार्ड मी माझ्या संगणकात वापरुन त्यानुसार देवनागरी लिपीत ग्राहकांना वापरता येतील अशा रोजमेळ, खतावणीच्या ( फिनान्शियल अकाऊंटिंग ) व्यवहारांच्या संगणक आज्ञावली ( सॉफ्टवेअर सिस्टिम्स ) तयार केल्या होत्या. साधारणपणे नव्वदीच्या शतकाच्या माध्यान्हानंतरचा वा त्या दरम्यानचा हा काळ होता. त्या काळातील  बँकांत संगणकाचा अवतार नुकताच येऊ घातला होता नि भाषेची वा स्थानिक लिपिंची होणारी गैरसोय जिस्ट कार्डमुळे टळली गेली. या जिस्ट कार्डचा फोटो सोबत जोडला आहे.

Gist card

या जिस्ट कार्डमुळे ग्राहकाचा संगणक भारतीय भाषांमध्ये व्यवहार करण्यास सक्षम ठरत असे. त्या काळी संगणकाचा अविष्कार चित्रांना सोयीचा असा नव्हताच मुळी. त्यामुळे चित्रांचे अविष्कार ( ग्राफीक डिझाईन ) संगणकाद्वारे करणे म्हणजे महामुश्किल असेच काम होते.

त्यापुढे भारतीय भाषांच्या लिपी अवतरणे म्हणजे चित्रलिपीला अधिष्ठान देणे. नेमका हीच अडचण काही अंशी दूर करण्याची सोय सी-डॅक संस्थेच्या जिस्टकार्डच्या अविष्काराने साध्य केली.

हे कार्ड संगणकातील माहिती त्या त्या भाषेगणिक अध्यारुत संकेतांकाद्वारे लिहिते, ती जिस्टकार्डच्या आधारे चित्रलिपीनुसार पाहता येते. याचा व्यत्यास म्हणजे जिस्टकार्ड संगणकातून काढून घेतलेले असेल तर मात्र ही लिपी वाचण्यायोग्य रहात नाही.

सारिणी १

वरील माहितीसारणीतील मुळच्या इंग्रजी अक्षरांना आणि पहिल्या १२८ संकेतांकांना  धक्का न लावता पुढील १२८ संकेतांकांना भारतीय भाषांतील अक्षरांना सी-डॅक च्या जिस्टकार्डने स्थान कसे दिले ते पुढील सारणीवरून कळू शकते.

सारिणी २

सारिणी 3

सारिणी 4



सी-डॅक प्रणित जिस्ट कार्डमुळे भारतीय भाषाविस्ताराची संगणकात मुहूर्तमेढ रोवली गेली. खुद्द जिस्ट-कार्ड हे मात्र फार काही टिकू शकले नाही, त्याची कारणं तितकीच तांत्रिक ठरली. भाषिक तंत्राचा संगणकीय अविष्कार समजून घ्यायचा म्हटलं की माहितीचे अविष्कार समजून घ्यावे लागतात. माहितीची माहिती देखील या लेखमालेत समजून घेऊ यात.

भारतीय भाषांचा संगणकावरील अविष्कार कसा बहरत गेला याचा घोषवारा घेण्याचा प्रयत्न आणि त्याच बरोबर सी-डॅक प्रणीत जिस्ट-कार्डच्या मर्यादा याची माहिती या लेखमालेच्या प्रवासादरम्यान घेऊ यात, पुढील लेखांच्या साखळीतून..

[ क्रमश: ]

– ©️ देवेंद्र रमेश राक्षे               
rakshedevendra@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आवाज  की दुनिया

कडबोळे : ७६

डॉ. अनिल यशवंत जोशी 

‘नाम गुम जायेगा चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज ही पहचान है गर  याद रहे I‘

आपल्या सर्वांच्या मनात रुंजी घालणारी ही रम्य कविकल्पना आता वास्तवात रोगनिदानासाठी वापरली जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तसेही भारताच्या विचारधारेत  वाणीचे एक वेगळे स्थान आहे. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी असे वाणीचे चार प्रकार भारतीय अध्यात्मशास्त्रात सांगितले जातात. रोगनिदानासाठी सध्या डॉक्टर्स जी प्राथमिक तपासणी करतात, त्यात ते चार पाच महत्त्वाच्या गोष्टी पाहतात. नाडी, रक्तदाब, श्वसनाचा दर, डोळे, जीभ, नखे इत्यादी. या यादीत आता एक महत्त्वाची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता कदाचित डॉक्टर तुमचा आवाज / वाणीही तपासतील.

आपण तोंडाला येईल ते बोलतो असे म्हटले जाते. पण विचारांचे वाचेद्वारा संक्रमण होण्याची ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे.  यामध्ये शरीरातील अनेक संस्थांचा एकत्रित सुसंवाद अपेक्षित असतो.  मेंदू,  श्वसनसंस्था,  स्वरयंत्र, जीभ, दात, ओठ असे अनेक अवयव एकत्र येतात आणि मगच शब्द फुटतो.

या आवाज निर्माण करण्याच्या प्रक्रियेत गुंतलेल्या कोणत्याही संस्थेच्या कार्यात कसलाही छोटा मोठा अडथळा आल्यास त्याचा परिणाम शब्दांच्या  उच्चारणावर होणार हे उघड आहे. त्यामुळे या शब्द उच्चारणाचा अभ्यास केला तर कुठल्या संस्थेत दोष निर्माण झाला आहे, त्याचा सुगावा लागू शकतो. हे एक वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान आहे. त्यासाठी पाश्चात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधन चालू आहे.  त्यासाठी २०,००० ते  ३०,००० आवाजाचे नमुने गोळा करण्याचे काम चालू आहे. आवाजाचे नमुने व संबंधित व्यक्तीची आरोग्यविषयक माहिती यांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे व्यक्तीची प्रकृती व तिचा आवाज यांच्यातील अंतर संबंध हळूहळू स्पष्ट होतील. सुरुवातीला हे आवाज बोलणार करण्याचे काम वेगवेगळ्या विद्यापीठांमधून केले जाणार आहे. त्यानंतर जनतेमधून असे नमुने घेतले जातील. व्यापक प्रमाणावर घेतल्या गेलेल्या या नमुन्यांचे विश्लेषण झाल्यानंतर त्याबाबतचा अल्गोरिदम तयार होईल. हा सर्वसाधारणपणे निरोगी व्यक्तीच्या आवाजाचा अल्गोरिदम असेल.  तो वापरून वेगवेगळ्या आजारांचे निदान करण्याचे तंत्र हळू विकसित होईल.

कोरोना साथीच्या काळात दूरस्थ वैद्यक ( Telemedicine) थोड्या फार प्रमाणात विकसित झाले. साथीनंतरही त्याचा काही प्रमाणात वापर होतो आहे. आवाजाचे परीक्षण करण्यासाठी रुग्णाच्या आवाजाचे नमुने डॉक्टरांपर्यंत किंवा यासाठी तयार केल्या गेलेल्या खास संगणक प्रणालीकडे पाठवावे लागतील.  सध्याच्या स्मार्टफोनच्या युगात ही गोष्ट अत्यंत सहज होऊ शकते.सध्या खालील नमूद काही आजारांच्या निदानासाठी या आवाज परीक्षणाचा वापर होऊ शकतो.

.  स्वरयंत्राचे आजार:  यामध्ये स्वरयंत्राचा कर्करोग, शक्तिपात, स्वरयंत्राला आलेली गाठ इत्यादी बाबी कळू शकतील.
.  मेंदूचे आजार: अल्झायमर ,पार्किनसोनीजम, पक्षाघाताचे  काही प्रकार यामध्ये रुग्णाच्या आवाजात होणारे बदल हे रोगनिदानाच्या सहाय्यभूत ठरू शकतील असे असू शकतात.
.  मानसिक आजार:  स्किझोफ्रेनिया,  नैराश्य  इत्यादी.
.  श्वसनसंस्थेचे  आजार:  दमा.
.  लहान मुलांमधील काही आजार: ऑटिझम.

ही तर फक्त सुरुवात आहे.  हृदयविकारात देखील आवाजात काही बदल होतात का, त्याचा अभ्यास चालू आहे.  इतर आजारांच्या बाबतीतही ही शक्यता आजमावून पाहता येईल. एकंदरीत काही कालावधीनंतर तुम्हाला तुमच्या डॉक्टरला तुमचे बोलणे रेकॉर्ड करून पाठवावे लागले तर फारसे आश्चर्य वाटायला नको.

संदर्भ:  मेडस्केप  जर्नल ०८/१२/२०२२  लॉरा टेडेस्को (Laura Tedesco) यांचा लेख.

– ©️ डॉ. अनिल यशवंत जोशी

९४२२६४७२८३
jaysss12@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
मध्यम…मध्यम

प्रकाश पेठे

 

तालासुरात चार जणांसमोर गाणं तेही गाणं आणि गुणगुणणं तेही गाणंच. एक जनातलं आणि एक मनातलं. संगीतकाराच्या मनातलं गाणं जनात ठसण्यासाठी इतरांपेक्षा वेगळं होऊन यावं लागतं. नवं गाणं लोक गुणगुणतात आणि तीच माणसं नव्या नव्या संगीतकारांना गात ठेवतात.

गेल्या काळच्या सर्वज्ञात इतिहासानं दाखवून दिलंय की सर्वाना सतत काहीतरी नवीन हवं असतं. तशी सगळ्यांनाच संगीताची आवड असते. पण बैठकीच्या गाण्याची मराठी माणसाला जास्त आवड आहे असं गायकांना आणि अन्य प्रांतियांना वाटतं. महाराष्ट्राला आधुनिक उत्तर हिंदुस्तानी संगीताची आवड लावण्याचं  संपूर्ण श्रेय संगीत नाटक मंडळींना जातं. या मंडळींचे गायनमास्तर आणि गायक नट अप्रतिम. पं. भास्करबुवा बखले, पं. रामकृष्णबुवा वझे यांसारखे चाली देणारे आणि बालगंधर्व, संगीतसूर्य केशवराव भोसले, दीनानाथ मंगेशकर, सवाई गंधर्व, कृष्णराव गोरे यांसारखे अद्वितीय गायक तसेच साथीला उस्ताद थिरकवॉं यासारखे लयभास्कर असं असताना गावोगावी फिरणा-या मंडळ्यांचं गाणं  सर्व लोक गुणगुणायला लागले नाहीत, तरच नवल.

ठराविक मात्रांचा ठेका धरून त्याच्या आवर्तनात गाणं हवं तसं वळवत, फिरत, नाचवत, सुघड-अवघड तानांनी सजवत त्यात लयकारीची भर घालून सादर करण्याची कला त्यावेळच्या कलावंतांनी विकसित केली, ती लोकप्रियता इतकी वर्षं टिकली की कालपरवापर्यंत ख्याल गायक गायला बसला की सुरवातीचे एक दोन राग बरेच लोक कसेबसे ऐकत. नंतर नाट्यगीताची फर्माइश  होत असे. ओळखीची सुरावट पेटीवाल्यानं  वाजवली की गाणारा ‘आ’ करण्याआधी लोक सरसावून बसत. पहिल्या पावसाची सर अंगावर घेतल्यासारखे सर्वांचे चेहरे आनंदाने फुलून येत. पुष्कळ लोंकांना ख्यालगायकी सहन करायची शक्ती नाट्यसंगीतानंच दिली.

ही सवय कुमार गंधर्वांनी तोडली असं म्हणायला हरकत नसावी. त्यांना फरमाईश हा प्रकार पसंत नव्हता. ते संपूर्ण कार्यक्रम अगोदरच ठरवून येत.

या नाट्यसंगीताचं मूळ उत्तर हिंदुस्तानी आणि कर्नाटकी संगीतात आहे. हिंदुस्थानी संगीतक्षेत्रात मुंबई प्रांत आणि बंगालप्रांती जे मेरुमंथन झालं, ते रेल्वेचं जाळं निर्माण झाल्यावर लगेच अल्लदिया खॉंसाहेबांनी १८९५ मध्ये प्रथम कोल्हापुरात पाऊल  ठेवलं. आजच्या पिढीला जे शास्त्रीय संगीत कळतं, त्याला “भारतीय रेल” जबाबदार आहे. त्यानंतर तर वेगवेगळ्या घराण्याचे गायक वादक मुंबई प्रांती येऊ लागले. मुंबईच्या अतिलोकप्रिय संगीत सिनेसृष्टीने पुष्कळांना संधी मिळवून दिली.

युरोपमधील मॉडर्न मुव्हमेंटचाच काळ भारतीय संगीताचा उज्ज्वल संक्रमण काळ असावा याचं मानसिक समाधान मिळतं. कारण पारंपरिक संगीत आणि लोकसंगीत सोडल्यास सर्वच क्षेत्रात आपलं उसन्या शिदोरीवर चाललं होतं. युरोपातली नवी चळवळ वेगळया संदर्भांत होती, तर भारतीय संगीत स्वातंत्र्याची इच्छा अंकुरल्या काळात होती. ही स्वातंत्र्याची इच्छा देशाच्या स्वातंत्र्यापुरतीच मर्यादित नव्हती, तर वैयक्तिकही होती. कित्येकांना सुखाचा “जी हुजूर” राजाश्रयही नको होता. “लोकाश्रय’ मिळाला सर्वच गुणीजनांना. “स्वदेश हितचिंतक मंडळी” ही नाटक कंपनीचं नावच सर्व काही सांगून जातं. गंधर्व आणि ललितकलादर्श यांचा लोकांवरचा विश्वास गाढ होता.

संगीत नाटकांमुळे नाट्यलेखन, दिग्दर्शन, अभिनय, गायन, वाद्यवादन, चित्रकला, रंगमंचकला, शिल्पकला, नाट्यप्रयोगतंत्र, मराठी भाषा, तालीम मास्तर यासारख्या अनेक अंगांना प्राधान्य मिळालं. आणि प्रत्येकाच्या प्रयोगाला पसंती मिळत गेली.

पं. भातखंडे, पं. पलुस्करांनी भारत पालथा घालून संगीताचं शास्त्र बनवलं. सर्व घराण्यांचा अभ्यास करून हे सगळं करणं, दुर्वा खुडण्याइतकं सोपं नव्हतं. १९०१ मध्ये पलुस्करांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. त्याला लाला लजपतराय, लाला हंसराज, स्वामी श्रद्धानंद यांनी सक्रीय पाठिंबा दिला. यावरून संगीत प्रगतीसाठी कोणत्या गुणवत्तेच्या धुरिणांनी हातभार लावला होता, हे लक्षात येतं. हल्ली गुरुचं नाव घेताना कानाच्या पाळीकडे हात नेण्याची फॅशन आहे. त्यांची नावं घेताना आजही लोकांनी कान पकडावेत अशी परिस्थिती आहे.

गायनाबरोबरच तालांनंही महाराष्ट्र बंगालमध्ये नाद निनादत ठेवला. गंधर्व मंडळीतले थिरकवॉं यांनी तर उस्ताद मुनीरखॉं यांनी प्रचंड शिष्यसंप्रदाय निर्माण केला. ज्या प्रदेशांत पूर्वी एकतारी, चिपळ्या, तुणतुणं, डफ, संबळ, ढोलकी याशिवाय फारसं काही वाजत नव्हतं, तेथे लयतज्ञ निर्माण झाले. लयकारी हा तालवाद्यातला उच्च विषय. तो बुद्धिजीवींना आव्हानात्मक वाटला. त्यामुळेही त्याची प्रतिष्ठा आणि प्रचार वाढला.

सध्या गायन-वादनाची आवड व्यापक “पसरली” आहे. प्रत्येक मोठ्या शहरी संगीत महाविद्यालयं आहेत. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचं कार्यकलाक्षेत्र सर्वत्र पसरलं आहे. संगीत शिकणं  सोयीचं झालं आहे. तरीही ते बरंचसं हौस म्हणून शिकलं जात आहे. यालाही कारण सध्याच्या शिक्षित भारतीयांची मनःस्थिती जबाबदार आहे. पोटासाठी डॉक्टर-इंजिनियर व्हायचं आणि हौशीसाठी संगीत शिकायचं ही परिस्थिती आहे. वास्तविकता आहे.

या विचित्र परिस्थितीमुळे एकूणच संगीत क्षेत्राला थोडी खीळ बसली आहे. तरीही आजवर सारेग  आणि पधनी यांच्यामधल्या “मध्यम”नेच संगीतात अनेक वेळा बहार उडवून दिली आहे, असं तज्ज्ञ मानतात. तशी आज संगीताची जाणकारी ही मध्यम वर्गीयांची मिरासदारी आहे.

हे लोक जोपर्यंत पोटासाठी इंजिनियर होताहेत, तोपर्यंत ते संगीताला सर्वस्व देऊ शकणार नाहीत, ते सर्व गुणगुणणारे आहेत. पण गुणगुणणारेच शेवटी “गाणा-याची ” मागणी उचलून धरतात. आणि त्यांच्यातूनच कोणीतरी केशवराव किंवा नारायणराव जन्माला येतो.

[ ‘महाराष्ट्र टाइम्स‘ ८ फेब्रुवारी २००० वरून साभार ]
– ©️ प्रकाश पेठे

prakashpethe@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
चित्रकारांचे दालन
ध्रुवा वर्तक
– प्रेषक ©️ सौ. स्वाती वर्तक 
         swati.k.vartak@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@
हत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@

जून महिन्यातल्या एका रात्रीतलं स्वप्न

A Midsummer Night’s Dream
शेक्सपीयरच्या नाटकाचं थोडक्यात कथानक
 
 
अनुवाद : मुकुंद कर्णिक
 
भाग ३

अंक दुसरा, प्रवेश पहिला

•       ओबेरॉन : पऱ्यांचा राजा
•       टिटानिया : ओबेरॉनची परी राणी
•       रॉबिन गुडफेलो ‘पक’: एक मिश्किल पुरुष परी – याला जादू येत असते
•       हर्मिया
•       लिसांडर
•       हेलेना
•       डिमेट्रियस

चंद्रोदय झाला आहे. ओकवनात पऱ्या प्रवेश करतात. रॉबिन गुडफेलो ‘पक’ शेजारून घाई घाईनं उडत जाणाऱ्या एका परीला अडवतो.

“हेss, सुंदरी, एवढ्या घाईनं कुठं निघालीस ग?”
“घाईत आहे रे जरा,
जाऊ दे बाबा मला.
टेकड्यांवरून, दऱ्यांवरून, झुडपांवरून नि फुलांवरून,
बागेतून, कुंपणावरून, पाण्यातून नि ज्वालांवरून”
(Over hill, over dale, through bush, through briar:
over park, over fence, through water, through fire)

आमच्या टिटानिया राणीसाठी दंवबिंदू आणायचे आहेत गोळा करून. तुला काय त्याचं? दिसतो तर आहेस खुशालचेंडू. राणी आणि तिच्या सख्या आत्ता एवढ्यात येतील इथं.”

यावर पक  म्हणतो, “अग, पऱ्यांचा राजा ओबेरॉन आत्ता इथं ओक वनात येणार आहे. तेव्हा राणी टिटानिया त्याच्या नजरेला पडणार नाही याची काळजी घे. कारण हल्ली दोघांचं पटत नाही. राणी टिटानियाजवळ एक सुंदर नाजुक दिसणारा मुलगा आहे. कुणा इंडियन राजाकडून तिला तो मिळाला आहे म्हणतात. राजा ओबेरॉनच्या मनात भरला आहे तो. पण  राणी काही केल्या त्या मुलाला सोडायला तयार नाही. म्हणून त्यांची वरचेवर भांडणं होत असतात त्या मुलावरून. ते दोघं समोरासमोरही येत नाहीत हल्ली. मला ठाऊक असतं सगळं.”

‘थांब थांब. आत्ता लक्षात आलं माझ्या. तू रॉबिन गुडफेलो आहेस ना? चलाख, उचापत्या, खोड्या करून इतरांना चकवणारा परी? ऐकलंय मी तुझ्याबद्दल. गवळणींच्या हंड्यातलं दूध त्यांच्या नकळत घुसळून लोणी पळवणारा आणि मग त्या तासन् तास ते दूध घुसळत राहूनही लोणी येत नाही म्हणून हैराण झाल्या की हसत सुटणारा. रात्री वाटसरूना चकव्यात टाकून मजा बघत राहणारा परी! सगळेजण तुला ‘दुष्ट पिशाच्च’ (Hobgoblin), ‘स्वीट पक’ म्हणतात आणि तुझ्या कचाट्यातून सुटले म्हणजे स्वत:ला नशीबवान समजतात. तोच ना तू?”

पक हसून म्हणतो, “ बरोब्बर. मीच तो रॉबिन गुडफेलो ‘पक’. राजे ओबेरॉन यांचा मस्कऱ्या आहे मी. त्यांना हसवत असतो. कधी चणे हादडून गलेलठ्ठ झालेल्या अडेलतट्टू घोड्याला घोडीच्या आवाजात खिंकाळून मी उधळायला लावतो. कधी एखाद्या म्हातारीच्या दारूच्या कपात छोटं सफरचंद बनून लपतो आणि तिनं कप तोंडाला लावला की तिच्या ओठांवर आपटतो. मग ती दचकते आणि दारू तिच्या ओठांवरून ओघळते. तर कधी राजाच्या म्हाताऱ्या आत्त्याजवळ मी तीन पायांचं स्टूल  बनून राहतो आणि ती माझ्यावर बसली की तिच्या ढुंगणाखालून पटकन बाजूला होऊन तिला पाडतो. ती ढुंगण चोळत उठून ‘अरे माझ्या कर्मा’ म्हणत खोकायला लागते तेव्हा सगळे हसतात. म्हणतात इतकी मजा कधीच नव्हती बघायला मिळाली आम्हाला. पण ते राहू दे. तू जा आता. ते बघ राजे ओबेरॉन आले तिकडून, त्यांच्या गोतावळ्यासह.”

“ही काय राणी टिटानियाही आलीच की इकडून. राजा आत्ता ? आला नसता तर बरं झालं असतं.”

पऱ्यांचा राजा ओबेरॉन आणि त्याच्या बरोबर इतर पऱ्यांचा समुदाय तिथं पाहून टिटानिया आणि तिच्या बरोबरच्या पऱ्या जागीच थबकतात.

“छे: कसली मनहूस वेळ आहे ही! तू माझ्यासमोर आलीस या छानश्या चांदण्यात, टिटानिया!” ओबेरॉन म्हणतो.

“चला ग, आपण जाऊया इथून. मला नाही ह्या ओबेरॉनबरोबर बोलायचं,” टिटानिया म्हणते.

“हो, हो, इतकी घाई कशाला करतेस? नवरा आहे ना मी तुझा,” ओबेरॉन म्हणतो.

“हो का ? म्हणजे मी तुझी बायको असणार!” टिटानिया टोमणा मारते. “पण तू इथं कसा काय? हं, आता लक्षात आलं. तुझी ती माषुका महामाया थेसियसबरोबर लग्न करते आहे. म्हणून तू त्यांचा पलंग नीट करून द्यायला आला असावास. होय ना?” असं बोलून टिटानिया कुत्सितपणे हसते.

“बोल बोल, तुला काय हवं ते बोल. आणि हिप्पोलिटाबद्दल तू असं बोलावंस हे साहजिकच आहे म्हणा. कारण तू स्वत:च थेसियसवर मरत होतीस ना? मला ठाऊक आहे ते,” ओबेरॉनही संधी सोडत नाही.

“तू जळतोयस माझ्यावर. म्हणूनच ह्या कपोलकल्पित कथा विणतो आहेस. आजवर जेव्हा जेव्हा आपण दोघं नेहमीच्या परी नृत्त्यासाठी एकत्र आलो आहोत तेव्हा तेव्हा तू तुझ्या आडमुठेपणानं सगळ्या आनंदाचा विचका केला आहेस. निसर्गातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींवर आपल्यातल्या भांडणामुळं पाणी फिरवत आला आहेस.”

“मग हे थांबवणं तुझ्या हातात आहे टिटानिया. साधी गोष्ट आहे. तू तुझ्याजवळचा तो इंडियन मुलगा मला दे शागिर्द म्हणून माझ्या ताफ्यात बाळगायला आणि मिटव हे सगळं,” ओबेरॉन  म्हणतो.

“शक्य नाही ते. त्याची आई माझी सखी होती, विश्वासू सखी. माझी सेवा करायची ती कितीतरी प्रेमानं. ती जेव्हा गरोदर होती तेव्हा आम्ही दोघी नौकाविहार करायचो, ती माझ्याशी खूप खूप गप्पा मारायची. सुंदर, नाजूक होती माझी सखी. पण मानवलोकातली असल्यामुळं तिचा मृत्यू अनिवार्य होता आणि बाळंतपणातच बिचारी मरण पावली. तेव्हापासून मी तिच्या नवजात अर्भकाचा संभाळ केला आहे. अगदी आजतागायत! मी नाही त्याला माझ्यापासून दूर करू शकत. अगदी त्याच्या बदल्यात मला परीलोकाचं साम्राज्य देऊ  केलं गेलं तरीही!” टिटानिया ओबेरॉनची मागणी पार धुडकावून लावते.

“अस्सं? राहिलं! बरं, आता तू ह्या ओक वनात किती वेळ थांबणार आहेस?”

“विवाहसोहळा आटपेपर्यंत. आणि हो, तुला जर आमच्या चांदण्यातल्या परीनृत्त्यात सामील व्हायचं असेल तूही थांबू शकतोस. नसेल तर जायला मोकळा आहेस.”

“तो इंडियन मुलगा मला देत असशील तर थांबतो मी.”

“विसर! तुझं आख्खं साम्राज्य दिलंस तरीही नाही म्हणजे नाही!  चला ग सख्यानो. जाऊयाच आपण. ह्याच्याबरोबर थांबलो तर आमच्यातल्या भांडणाला पारावार उरणार नाही. चला.”
(Not for thy fairy kingdom. Fairies, away!
We shall chide downright, if I longer stay.)
असं म्हणून टिटानिया तिच्या परीवृंदासह तिथून निघून जाते.

“जा जा, गेलीस उडत! पण लक्षात ठेव ह्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही मी,” ओबेरॉन हवेत हात उडवून ओरडतो आणि जवळच उभा राहून हा सगळा तमाशा बघत असलेल्या रॉबिन गुडफेलो ‘पक’ला हाक मारून बोलवतो.

“पक, इकडं ये. तुला आठवतंय का रे? समुद्रकाठी मी एका सुळक्यावर बसलो होतो डॉल्फिनच्या पाठीवर बसून गाणाऱ्या जलपरीचं गाणं ऐकत ते? खरोखर स्वर्गीय होते ते सूर आणि त्यांच्यातली माधुरी. अरे ते ऐकून उफाळणारा समुद्रदेखील शांत झाला होता आणि आकाशातले तारेही खुशीखुशी आपापल्या जागा सोडून इतस्तत: धावत होते बेभान झाल्यासारखे. आठवतंय?”

“हो, हो मला आठवतंय ते, सरकार,” पक होकार भरतो.

“अगदी तेव्हाच मला कामदेव क्यूपीड दिसला होता. चंद्रलोकातून पृथ्वीवर येत असलेला. त्याच्या हातात धनुष्य आणि आणि ताणलेल्या प्रत्त्यंचेत धरलेला बाण होता. त्यानं नेम धरला होता पश्चिमेकडील बेटावर चालत असलेल्या राजकन्येवर. त्यानं बाण सोडला देखील. पण कसा कोण जाणे, नेम चुकला आणि आपल्याच नादात मग्न असलेली राजकन्या निघून गेली. माझं लक्ष होतं तो बाण कुठं पडणार तिकडं. बाण लागला एका रोपट्याला. आणि त्या रोपट्याला आलेलं शुभ्र पांढरं फूल जांभळ्या रंगाचं झालं. का माहीत आहे? बाणानं  त्या रोपट्यात  प्रेमभावना ओतली म्हणून. त्यानंतर कुमारिका कन्यांनी त्या फुलाला ‘आळसावलेलं प्रेम’ असं नाव दिलंय. पक, मित्रा, तू ते फूल आणून दे मला. मोठं जादूचं फूल आहे ते. त्याच्या पाकळीतला रस झोपलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात पिळला तर जागे झाल्यावर ती व्यक्ति डोळे उघडताक्षणी समोर दिसणाऱ्या जीवावर प्रेम करू लागते. जा, तू जाऊन त्वरित ते फूल मला आणून दे.”

“हो सरकार, तुमच्यासाठी जान हाजिर है ! आख्ख्या पृथ्वीला फेरी मारावी लागली तरी घेऊन येईन मी ते फूल, चाळीस मिनिटांत,” असं म्हणून पक पंख पसरून उड्डाण करतो.

ओबेरॉन मनोमन खूष होऊन विचार करतो (स्वगत), “एकदा का पक ते फूल घेऊन आला की मी टिटानिया कुठं असेल तिथं जाणार आणि ती झोपल्यावर त्या फुलाचा रस तिच्या डोळ्यात पिळणार आणि दूर कुठंतरी लपून बसणार. मग जेव्हा ती जागी होईल तेव्हा तिच्या नजरेसमोर पहिल्यांदा येणाऱ्या जीवाच्या प्रेमात ती आकंठ बुडेल मग भलेही तो जीव एखादा सिंह असो की अस्वल, लांडगा, अगदी एखादं वात्रट माकडाचं पोर, किंवा हुप्प्या वानर! ते गारूड कसं उतरवायचं, कोणत्या वनस्पतीच्या पाल्याच्या रसानं ते मला ठाऊक आहे. पण ते उतरवायच्या आधी मी तिच्याकडून तो इंडियन मुलगा मला द्यायचं कबूल करून घेईन.”

(इतक्यात त्याला दोन माणसांच्या बोलण्याची चाहूल लागते. ती काय बोलतात ते गुपचुप ऐकायला म्हणून ओबेरॉन अदृश्य होतो.) त्या दोघांपैकी एक असतो तरुण पुरुष, दुसऱ्या व्यक्तीला टाळून निघून जायच्या घाईत असणारा. दुसरी व्यक्ति असते एक मुलगी. ती त्या पुरुषाला हाका मारत असते, ‘डिमेट्रियस, थांब, थांब.”

तो पुरुष तिरसटपणे ओरडतो, “तू जा इथून, माझं प्रेम नाहीय तुझ्यावर. पिच्छा सोड माझा. कुठं आहेत लिसांडर आणि हर्मिया? इथं ह्या ओक वनात असणार आहेत असं म्हणाली होतीस ना तू? मला दिसू देत ते म्हणजे मी ठार मारून टाकीन लिसांडरला. मग भलेही हर्मियानं मला मारलं तरी चालेल,” असं म्हणून तो – डिमेट्रियस –  तिथंच दोन्ही हातात मस्तक धरून बसतो. ती मुलगी त्याच्या जवळ बसते. तेव्हा तो तिला हातानं दूर ढकलत  किंचाळतो, “हेलेना, इथंच सापडतील ते दोघे असं म्हणाली होतीस ना तू? मग आहेत कुठं ते? वेड लागायची वेळ आली आहे माझ्यावर तरी माझी हर्मिया दिसत नाही मला. तू जा, चालती हो इथून आणि पुन्हा माझ्या मागे येऊ नकोस.”

हेलेना सावरते आणि अनपेक्षितपणे डिमेट्रियसच्या अंगचटी जाऊन त्याचं चुंबन घ्यायचा प्रयत्न करते. तो तिला झिडकारतो आणि म्हणतो, “दूर हो. मी तुला असं करायला कधी उत्तेजन दिलं नव्हतं आणि आताही देणार नाही. आजवर मी नेहमी म्हणत आलो की मला तुझ्याबद्दल प्रेम वाटत नाही आणि पुढे कधी वाटेल हे सुतराम शक्य नाही. तेव्हा तू असं काही करू नकोस. तुला नुसतं बघितलं तरी मला तुझा तिरस्कार वाटतो.” यावर हेलेना म्हणते, ‘आणि तुला बघू शकले  नाही तर मलाच माझा तिरस्कार वाटायला लागतो त्याचं काय?”

“हेलेना, ऐक माझं. हे असं आपली वस्ती सोडून रात्री अपरात्री एखाद्या परपुरुषाबरोबर एकट्यानं जंगलात फिरणं बरं नाही. त्यात भलतंसलतं घडण्याचा धोका आहे आणि तो धोका तू पत्करू नये.”

“मला कसलाही धोका वाटत नाही डिमेट्रियस. तुझ्या चंद्रवदनासारख्या सुंदर चेहऱ्याच्या तेजामुळं मला अपरात्र तर भासतच नाही. आणि तुझ्यासारखा सद्वर्तनी कणखर पुरुष बरोबर असताना मी एकटी असल्याचंही जाणवत नाही. कारण तू म्हणजेच माझं विश्व आहेस.”

“हेलेना, हे बघ, तू  माझं ऐकलं नाहीस् तर मी इथून पळून जाईन तुला एकटीला इथल्या क्रूर जंगली श्वापदांच्या तावडीत सोडून.”

“डिमेट्रियस, जंगली जनावर कितीही क्रूर असलं तरी त्याचं हृदय तुझ्या हृदयाइतकं कठोर असणार नाही. तुला पळून जायचंय? जा. पण मी तुझा पाठलाग करीनच. डाफने आणि अपोलो यांच्या गोष्टीच्या उलट गोष्ट होईल आपली. अपोलो पळणार आणि डाफने पाठलाग करणार ! उडणाऱ्या गरुडमुखी सिंहाचा कबूतर पाठलाग करणार !! मवाळ असणारं हरीण वाघाचा पाठलाग करणार !!! शूरवीर पळतोय आणि भीरू त्याचा पाठलाग करतोय, किती विपरीत आहे ना?”

(The wildest hath not such a heart as you. Run when you will, the story shall be changed: Apollo flies, and Daphne holds the chase; The dove pursues the griffin; the mild hind makes speed to catch the tiger; bootless speed, when cowardice pursues and valour flies.)

“तुझं मूर्खपणाचं बोलणं ऐकत बसायला मला वेळ नाही,” असं म्हणून डिमेट्रियस हेलेनाच्या विरोधाला न जुमानता जायला निघतो. हेलेनाही त्याच्या मागोमाग जाते.

हे सारं संभाषण ऐकल्यावर ओबेरॉनच्या चेहऱ्यावर मिश्किल  हसू फुटतं. मघाशी टिटानियाबरोबर जे करायचं ठरवलं होतं त्याचा प्रयोग ह्या दोघांवर करायचा असा विचार मनात येऊन हे हसू फुटलेलं असतं. हा अथेनियन पुरुष ओक वन सोडून जाण्यापूर्वी ही मुलगीच त्याच्यापासून दूर जात असेल आणि प्रेमविव्हळ होऊन हाच तिच्या मागं लागलेला असेल! स्वत:चीच कल्पना आवडून ओबेरॉन खूष होतो. इतक्यात पक येऊन उभा राहतो. त्यानं आणलेलं फूल तो ओबेरॉनच्या हातात देतो.

“वा वा पक, शाब्बास रे पठ्ठ्या, माझं मोठ्ठंच  काम केलंस तू. अरे, मला माहीत आहे टिटानिया इथं आली म्हणजे नाचून दमल्यावर विसाव्यासाठी कुठं झोप घेत असते ती जागा. आता मी तिथं जाऊन ती झोपल्यावर तिच्या डोळ्यात ह्या फुलाचा रस पिळून तिचं मन वैषयिक भावनांनी भरून टाकीन,” इतकं बोलून ओबेरॉन त्या फुलांची एक पाकळी खुडून पकच्या हातात देतो आणि सांगतो, “ही पाकळी तुझ्याकडं ठेव. आज ह्या ओक वनात एक सुंदर प्रेमविव्हल  तरुणी एका कठोर, अडेलतट्टु तरुणाची मनधरणी करत फिरते आहे. तू असं कर, संधी  साधून त्या तरुणाच्या डोळ्यात ह्या पाकळीचा रस पीळ, पण  काळजी घे की त्यानं डोळे उघडताक्षणी ती तरुणीच त्याला दिसेल. त्या माणसाचे कपडे अथेनियन पध्दतीचे आहेत. त्यावरून तू ओळखू शकशील त्याला. आणि हो, ती तरुणी त्याच्यावर जितकं प्रेम करते त्याच्यापेक्षा किती तरी जास्त प्रेम जागेपणी तो तिच्यावर करेल याची निश्चिती कर. जा आता, आणि उद्या पहाट  होण्यापूर्वी येऊन मला भेट.”

“हो सरकार. काही काळजी करू नका. तुमच्या ह्या आज्ञेचं मी तंतोतंत पालन करीन. “ असं म्हणून पक निघून जातो.

(पडदा)

[ क्रमश:]

वरील अनुवादाचे यामागील दोन भाग, अनु. दि. १७ ऑक्टो. आणि १२ नोव्हें. २०२२ रोजी प्रसिद्ध झाले होते.   

– अनुवाद मुकुंद कर्णिक 
karnikmukund@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आजची कविता

मिलिंद कर्डिले 
 
 

नसे काही शाश्वत 

नसे काही शाश्वत
असे सारे नश्वर
जीवन असे अपुले
एक महा मायाजाल

सुखा माजी दुःख
दोन्ही असे क्षणभंगुर
रागाचा साथी लोभ
सारे मनाचे खेळ

निर्मल मन आज
झाले जरा दुर्मिळ
अहं सुध्दा सोडी साथ
जेंव्हा होसी साधनामस्त

जीवन मृत्यूचा खेळ
चाले हा निरंतर
श्वास आणि उश्वास
न चाले सदकाळ

जे दिसे ते आभासी
न दिसे ते चिरंतन
असा कसा रे ईश्वरा
आहे हा विरोधाभास

– ©️ मिलिंद कर्डिले

milindkardile@yahoo.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

स्फोट

धारावाहिक कादंबरी

डॉ. प्रियंवदा कोल्हटकर

,

प्रकरण १४

खरोखरच त्या एकट्याच ग्लॉकोमा क्लिनिकचं काम उरकू शकल्या असत्या. त्यांच्या लंडनच्या कोर्समुळे व इतक्या वर्षांच्या अनुभवामुळे, एक शल्यकर्म सोडलं तर त्या कुठल्याही नेत्ररोग चिकित्सकापेक्षा कमी नव्हत्या.

अशा या विद्याताई. व एक दिवस अपर्णा यांच्याबद्दल, त्यांच्यासाठी. . . . .

एके रात्री मी अपर्णाजवळ सरकताच मला दूर ढकलीत ती उद्गारली होती, ” जा तुझ्या विद्याताईंच्या कुशीत जाऊन झोप जा ” .

मी ताडदिशी उठून बसलो व म्हणालो होतो, “बेशरम, निदान त्यांच्या रुपेरी केसांचा व वयाचा तरी विचार करायचा होतास.”
“का, तीस वर्षीय तुमच्या कलिगनं, ४० वर्षीय स्कॉटिश मेट्रनशी विवाह केल्याचा किस्सा तूच सांगितला होतास मला. .

—————.

आत्ता विद्याताई मला म्हणाल्या, “बरं तर जा तू घरी. ” व स्वतः वॉर्डच्या दिशेनं निघून गेल्या.
कार चालू करून घराच्या दिशेनं निघालो. गार वाऱ्याची झुळूक आत आली व बरं वाटलं. गुड्डीला कवेत घेतल्यावर वाटतं तसं.

गुड्डी व तिची आईही त्यामुळे आठवली. सकाळी झालेलं भांडण आठवलं. सकाळचंच कां, आधीचीही आठवली. व मग आठवला अधून मधून फुरसतीच्या वेळी,  विचारांती घेतलेला हे लग्न टिकवण्याचा निर्णय.

अपर्णाच्या सकारात्मक गुणांच्या  यादीची मी उजळणी करू लागलो. अपर्णा सुंदर आहे. ( एक उरोज सोडले तर.) भाषा विषयात हुशार आहे. गुजरातीवरील तिच्या प्रभुत्वावर गोवर्धनशेठ तिला लाडानं ‘म्हारी दिकरी म्हारी दिकरी’ म्हणत असतात. व त्यांच्याच सूचनेमुळे माझ्या “ग्लॉकोमा व मद्य”च्या दीव दमणमधील कामासाठी अपर्णाला मदतनीस म्हणून मी घेतली. गोवर्धनशेठनं मग स्वतःच्या या दिकरी (लेकी)साठी गुजरातदर्शनाचा कार्यक्रमच आखला होता. मला एक नवीच अपर्णा बघायला मिळाली होती. (कदाचित तिला मी नवा वाटलो असेन.)

शालेय शिक्षण जिथे झालं त्या सुरतेत बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा सुरती घारी, उंधियु, सुरती पापडी, मोहननी मिठाई खाणं म्हणजे स्वर्गसुखच वाटलं होतं तिला. (अपर्णा जरा खब्बु आहेच.) दमणचं काम पूर्ण झाल्यानंतरची सुरती पर्वणी होती ती.

व मग अहमदाबादेत त्याच वेळी चालू असलेल्या गुजरात नेत्ररोग चिकित्सकांच्या अधिवेशनात माझं ‘अतिसार व मोतीबिंदू’ व्याख्यान होतं. विशेष काही कळलं नसलं तरी नंतरच्या अल्पोपहार वेळी तिला एक नेत्ररोग चिकित्सक गुजरातीत म्हणाले होते, “अपर्णाबेन तुमचे पति जिनियस आहेत. ” व ती फार सुखावली होती. त्या काळात लाभलेलं तिचं सान्निध्य पुन्हा कधीच लाभलं नाही. माझा (व तिचाही) व्याप वाढतच गेला होता.
अपर्णा पाककलेत प्रवीण होती. अगदी स्वतःच्या मम्मीच्या पावलावर पाऊल टाकून तिनं त्यात बक्षिसं पटकावली होती. मात्र या बाबतीत मी केलेलं तिचं शाब्दिक कौतुक तिला पुरत नसे. त्या खाद्यपदार्थांवर ताव मारणं मला जमत नसे. (सतत डोक्यात कॅलरींचा हिशेब असे. )

अपर्णा इतरही गृहकृत्यात व कलांमध्ये प्रवीण आहे. आईची तर ती लाडकी लेक बनलीय. आईच्या स्वभावात गोव्याच्या मानकुराद आंब्याचा अभिजात गोडवा आहे. पण आईशी अपर्णाचं लेकीचं नातं प्रस्थापित झालं ते गुड्डी तीन महिन्यांची झाल्यानंतर.

तेव्हा माझ्याकडे एका म्यानात दोन तलवारी रहात होत्या. एक दिवस सुट्टी असल्यामुळे सकाळी आरामात पेपर वाचीत डायनिंग टेबलाशी बसलो होतो. आई जवळच फुलवाती करत बसली होती. स्वयंपाकघरात अपर्णा व मम्मीची काय गुजगोष्टी चालू होत्या कोण जाणे. मम्मी तरातरा बाहेर येऊन आईला म्हणाल्या, “साठेबाई, (आई, प्राथमिक शाळेत शिक्षिका नाही पण होत्या बरीच वर्षं. ) तुम्हाला मुलींच्या आईची सुखदुःखं काय ठाऊक.?” (अपर्णाला दोन मोठ्या बहिणी आहेत. )

आई सर्दच झाली प्रश्न ऐकून. म्हणाली, “नाही, पण झालीच नव्हती असे नव्हे हो. पहिल्याच खेपेस जुळ्या मुलीच झाल्या होत्या.  यांना फुलांची खूप आवड म्हणून, घराच्या बागेत तेव्हा जाई जुई खूप बहरल्या होत्या म्हणून नावं ठेवली होती त्यांची जाईजुईच. त्या वेली खूप फोफावल्या पण आमच्या जाईजुई मात्र वयाच्या आठव्याच वर्षी दोनच दिवसांच्या तापानं गेल्या की हो. ” आईनं डोळ्यांना पदर लावला. मम्मी गप्प.

या दोघींचं संभाषण मोठं श्रवणीय असे. दोघी बोलत मराठीच. पण आईचं असे कोंकणीसारखं सानुनासिक. तर मम्मीच्या बोलण्याला हिंदीचा लहेजा असे. आई पुढे म्हणाली, “सुखाचं म्हणाल तर मुलींसारखं स्वयंपाकपाणी अरविंदलाही येतं हो. व दुःखाचं म्हणाल तर मुलगी सासरी जाते त्या वयापासून हा आमच्यापासून दूरच आहे की परवा यांच्या मोतीबिंदूचं अचानक ऑपरेशन करावं लागलं तर आम्ही पणजीच्या डॉ. कैसरेकडे गेलो. तो प्रेमानं करतो हो. पण हा दूर परदेशी, तेव्हा. खूप आठवण आली पण काय इलाज? पण आता मला मुलगी नाही याची खंत नाही हो वाटत. अपर्णा माझी मुलगीच आहे”
हे सगळं अपर्णानं ऐकलं व तेव्हापासून तीही प्रयत्नपूर्वक आईची लेक झाली.
बाकी मम्मी व आईची संभाषणं नेहमीच श्रवणीय असायची म्हणा.

पुढे गुड्डी थोडी मोठी झाल्यावर एकदा प्रसंगोपात्त मी मम्मीच्या व अपर्णानं आईच्या बोलण्याची नक्कल केली होती. टाळ्या पिटीत हसत हसत म्हणाली होती गुड्डी, की आता आई तू सिमल्याच्या आजीची व बाबा तू गोव्याच्या आजीची नक्कल कर. ते मात्र आम्हाला मुळीच जमलं नव्हतं.

अपर्णा बाबांचीही लाडकी आहे. तिच्या भाषा विषयातील गतीमुळे बाबांजवळ ती संस्कृत शिकली व त्यांचीही लाडकी बनली.
व मुख्य म्हणजे अपर्णानं मला गुड्डी दिली. गुड्डी हे माझं आजचं एकमेव प्रेमनिधान आहे. हे लग्न टिकवायचं.
राहता राहिला शरीरसुखाचा प्रश्न. तर ते आपल्या नशिबात नाही, असं समजून स्वस्थ बसावं. (कुठल्या ग्रहाचा प्रभाव?) पण. . . . .

कधीकधी मला अफाट शरीरसुखाची स्वप्नं पडतात डोळ्यांपुढे असंख्य मारीलीन तरळू लागतात. व मग मी रात्री,(अपर्णाच्या दृष्टीनं) वेड्यासारखा वागतो. सकाळी चिडचिड करतो. व मारीलीनचा सध्याचा बॉय फ्रेंड  स्त्रीरोग तज्ज्ञ्  अल्फ्रेड डिसूझा दिसला की त्याचा राग राग करतो. इस्पितळाच्या मासिक मिटींग्स मध्ये संततिनियमन व गर्भपातासारख्या माझ्याशी अर्थाअर्थी संबंध नसलेल्या विषयात त्याच्या विरुद्ध जोरजोरात तावातावात भांडतो. वाद काय घालतो वाभाडेच काढतो अगदी.. . . .
स्टॉप.

ट्रॅफिक पोलिसाच्या हातातील ‘थांबा’ मुळे मी कार थांबवली. घरी पोचलो तेव्हा साडेबारा झाले होते.
डोक्यात भणभण होत होतं. घराच्या दाराची किल्ली काढली तेव्हा कसलीशी पांढऱ्या कागदाची पुडी खाली पडली काय होतं कोण जाणे.
डायनिंग टेबलवर मोसंबीची सालं, अर्धं कापलेलं सफरचंद, फ्रिजमधील जलधारा, फळं कापायची सुरी, असं काय काय होतं.

म्हणजे अपर्णा घरी नव्हती व गुड्डी होती. अपर्णा घरी असते तेव्हा काय बिशाद. गुड्डीच्या खोलीत ती डोक्याला स्कार्फ बांधून झोपली होती. मी गुड्डीजवळ बसलो. तिच्या मानेला हात लावला तर चटका बसला.
माझ्या स्पर्शामुळे तिनं डोळे उघडले. ( गुड्डी हरिणाक्षी आहे. का?कशी?मृग नक्षत्रावर जन्मली म्हणून?) तिच्या डोळ्यातील लाली मला चटका देऊन गेली.

“बाबा तुम्ही?” व्हॉट अ सरप्राइज! सात वर्षांची गुड्डी आईसारखीच खब्बू असल्यामुळे आरोग्यानं मस्त १० वर्षांची वाटते व वागतेही तशीच.
” गुड्डी, ताप खूप आहे ना?”

“हो बाबा. हंड्रेड अँड थ्री डिग्रीज फॅरनहाईट. मी थर्मामीटरला हात नाही लावला. तसं केलं तर आई रागावते. मी हाक मारली होती शर्मा आंटीला. पण माझा त्यांनी ताप बघितला व तेव्हढ्यात शर्मा अंकलनी बोलावलं म्हणून लगेच गेल्या त्या.”

एकशे तीन डिग्री फॅ. मी दचकलोच डोळ्यांपुढे कधीही न बघितलेल्या जाईजुई बहिणी आठवल्या (एक फोटो तेवढा होता, आईनं बनवलेल्या अल्बममध्ये.) तो फोटो डोळ्यासमोर तरळला. शिकत असताना बघितलेले बालमृत्यू आठवले.

एकशेतीन! अति तापानं बालमेन्दूवर होणारे गंभीर परिणाम आठवले. मी विगलित झालो. आधी तिला क्रोसीन सिरपचा एक डोस दिला. गुड्डीला घट्ट मिठी मारली. तिचं चुंबन घेतलं व विचारलं. आई केव्हा गेली? कां गेली?

“बाबा, मी म्हटलं होतं तिला आज जाऊ नको ना.”
“तर म्हणाली, वर्षअखेर आहे खूप काम असतं. लतामामीला बोलावलंय. त्या येतील व थांबतील तुझ्याजवळ. तोवर कमलाताई आहेतच घरकाम करीत. पण लतामामी आल्याच नाहीत.”

मी कपाळाला आठ्या चढवल्या. त्या नात्यानं अपर्णाच्या मामी आहेत. पण वयानं फार नाहीत. त्या अतिविशाल महिलेला या कुशीचं त्या कुशीवर वळायला पांच मिनिटं लागतात तर कोथरूड ते पेरूगेट प्रवास करायला. . . . डोक्यात एक कळ सणसणत गेली.

मी ताडदिशी तिला उठवीत म्हटलं, “चल.”
“कुठे?विनिआँटीकडे नाही हं. ती इंजेक्शन लावते.”

विनी फर्नांडिसकडे गुड्डीच्या सगळ्या व्हॅक्सिनसाठी जात असू. ती बालरोग तज्ज्ञ् आहे. अपर्णाच्या मते मला शरीरसुख द्यायला ज्या असंख्य स्त्रिया या घराबाहेर ओळीनं उभ्या आहेत त्यात अविवाहित विनी क्रमांक १ वर आहे.  “ओह, नो ब्लडी हेल! वी आर गोइंग टू युअर मम्माज बँक. आपण तुझ्या आईच्या बँकेत जायचंय बघायला, ती वर्षअखेरच्या कामाचा डोंगर कसा उपसतेय ते. कमॉन.”
डोळे अधिकच मोठे करीत उच्चारली, गुड्डी, “अशी?” शहारली ती व पुढे म्हणाली,”थंडी वाजतेय बाबा.” तिच्या अंगात फक्त एक सुती मॅक्सि होती.

कपाटातून शोधून तिचा एक स्वेटर काढला. (हा स्वेटर मागील महिन्यात मी न्यूयॉर्कहून आणला होता. एका कृत्रिम भिंगं तयार करणाऱ्या कंपनीनं, माझी एक व्याख्यानयात्रा आखली होती. मी अमेरिकेहून येताना एड्स व्हायरस आणलं असणार या भयानं अपर्णानं मला अधिकच अस्पृश्य केलंय.) गुड्डीच्या अंगात घातला.

ती मला मिठी मारत म्हणाली, “माझ्या तापामुळे आलात बाबा? शर्मा आंटी म्हणत होती, तुझ्या बाबांना फोन करूया. मीच नको म्हटलं ते आज ऑपरेशन थेटरमधे असतील. तुम्ही जेवला बाबा? मी तर खूप फळं खाल्ली व दूध प्यायले. तुम्ही जेवलात?”
“जेवतो का मी कधी दुपारी वर्किंग डे ला?(इस्पितळातच मी दुपारी एक केळं व सफरचंद खात असे. )चल आवर तू आपलं.”

गुड्डी पायात मोजेबूट चढवत बडबडली, “मोठी झाले की मी डोळ्यांची डॉक्टरही होणार नाही व वर्षअखेरचं काम करायला बँकेत पण जाणार नाही. घरीच विनीआँटीसारखी मुलंच मुलं तपासत जाईन. आपली पण व दुसऱ्यांची पण.”

कारमध्ये पण तिची बडबड चालू होती. क्रोसिननं ताप उतरत असावा. ग्लानी मुळीच नव्हती.
मी मात्र उत्तप्त झालो होतो.
वर्षअखेर बँकेत खूप काम असतं म्हणे!काम? माय फूट.
ही आई. ही म्हणे गुड्डीची आई! अपर्णाला गुड्डी झाल्यावर मुळीच दूध आलं नव्हतं. (येणार कुठून?) माझी आई अचंबित झाली होती. असं कसं रे?

तिला मुलगा हवा होता. त्या सगळ्या बहिणीच. तिच्या आईची मुलग्याची इच्छा तिच्यातही होती. मी मात्र गुड्डीच्या प्रेमात प्रथमदर्शनीच पडलो होतो. व हळूहळू जसजशी ती मोठी होत होती, तसतशी आमची दोघांची गट्टी वाढत होती. व मग आम्ही दोघे मिळून, अपर्णाची गम्मत करायचो. ती चिडायची, अशी चिडायची. . . . .

मला अचानकच पोटात ढवळून आलं. बँकेच्या आवारात शिरताच अपर्णाच्या टोंगा कलरच्या स्कुटरकडे बोट दाखवीत गुड्डी ओरडली, ” बाबा, आईची स्कुटर.”
अपर्णाला असलेच गडद रंग आवडतात. मला हलके. आकाशी रंगाच्या साडीत बेला अशी सुंदर दिसायची. . . .

ओह गॉश. नो पार्किंग स्पेस. दाराजवळच मी गाडी लावली. खाडदिशी दार उघडलं व त्याच दारातून गुड्डीला खाली ओढलं. जवळच तीन नंबरच्या काऊंटरमागे अपर्णा दाते नाव लेवून जुना लाकडी ठोकळा होता. तिच्या नवीनच मिळालेल्या केबिनमधेही ती नव्हती. बँकेत ग्राहकांची बऱ्यापैकी गर्दी होती. एक दोन काउंटर सोडून कुणीतरी सांगितलं बाईसाहेब कँटिनमध्ये आहेत.
काम होतं ना हिला?वर्षअखेर म्हणे!मी तावातावात कँटिनकडे निघालो.

“बाबाsss”
गुड्डी कशालातरी अडखळली. तिचा हात सोडून देत मी ओरडलो, “यू वेट इंद कार. am coming.”

कँटिनमध्येही बऱ्यापैकी वर्दळ होती पण एका दृष्टीक्षेपात कुणी ओळखीचं दिसलं नाही. पण त्या आवाज व वासांनी माझं माथंच भडकलं. जवळच्याच टेबलाशी अपर्णा एका मैत्रिणीसह बसली होती. समोर सुग्रास अन्नाची ताटं. माझ्या पोटातील वैश्वानर उसळला. माझ्या उजव्या डोळ्यावरची शीर थाडथाड उडू लागली.
अय्या तुम्ही!म्हणत समोर येऊन उभ्या ठाकलेल्या अपर्णाच्या डाव्या गालावर एक चांदणीच्या आकाराचा डाग पसरत गेला. नेमकी तिथेच मी उजव्या हातानं जोरात थप्पड मारली. व ओरडलो निर्लज्ज, बेशरम, पार्टी करतेय, आजारी मुलीला घरी एकटं टाकून. निर्लज्ज.

(क्रमशः )
————-

– ©️ डॉ. प्रियंवदा कोल्हटकर, गोवा.

 priyakar40@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

काय वाचाल ?

‘अनामिका’ची  शिफारस

वाचन हा माझा एक आवडीचा छंद आहे. मराठी भाषेतील नित्य नवी प्रकाशने नजरेखालून घालणे व त्यापैकी काही संपूर्णपणे वाचून काढणे यातच माझा खुपसा फावला वेळ जातो.

नुकतेच एक पुस्तक त्याच्या ओबडधोबड नावामुळे हातात घेऊन चाळून  पाहिले. पुस्तकाचे नाव ‘डोंगराएवढा‘ मूळ लेखक शिवराम कारंत – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते. भाषांतरकर्ती उमा कुलकर्णी. पुस्तकाच्या शेवटच्या ( मलपृष्ठ चार ) पृष्ठावर दिलेल्या माहितीप्रमाणे मूळ कानडी पुस्तक ‘बद्ध जीव’ हे १९३५ साली प्रथम प्रसिद्ध झाले व त्याच्या आजतागायत अकरा आवृत्त्या ( कन्नडमध्ये ) निघाल्या असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर पुस्तक वाचायला सुरुवात केली व्हते सलग दोन दिवसात वाचून संपवले. एवढे या पुस्तकाने मला झपाटून टाकले.

कादंबरीचा विषय तर अगदी साधा — लेखक जंगलामध्ये वाट चुकून एका गृहस्थाच्या घरी रात्र आरामात घालवावी व उजेडातच निघून जावे या विचाराने पोहोचतो. प्रत्यक्षात ४-६ दिवस राहतो आणि त्या वृद्ध दांपत्याच्या प्रेमळ आतिथ्याचा समाचार घेत असतो. बोलता बोलता कळते की या दांपत्याची मुलगी ऐन तारुण्यात दगावली व मुलगा घरातून कित्येक वर्षांपूर्वी शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर पडला तो परत आलाच नाही आणि त्याच्या विरहाने हे वृद्ध जोडपे मनोमन व्याकुळ झालेले आहे. एवढेच मूळ कथानक, त्याला साजेशी उपकथानकाची जोड, निसर्गसौंदर्याची रेलचेल असलेल्या व डोंगर द-यांनी वेढलेल्या सभोवतालच्या प्रदेशाचे तितक्याच समृद्ध भाषेतील वर्णन, यांच्यामुळे कादंबरी अत्यंत वाचनीय झालेली आहे. ‘सशक्त देशीपणा हाच कारंत यांच्या कादंब-यांचा विशेष’  चवथ्या मलपृष्ठावर लिहिलेले आहे ते मनाला पुरेपूर पटते.

वाचनीयता, आपोआप उलगडत जाणारे कथानक व सरस व्यक्तिरेखाटने – शब्दचित्रणे हे विशेष मला या कादंबरीत जाणवले आणि बहुधा त्याचमुळे मी झपाटून गेलो.

याच कादंबरीकाराची आणखी दोन पुस्तके मग मी त्यांच्या या सरस लेखनशैलीमुळे वाचायला घेतली; ती म्हणजे ‘मिटल्यानंतर‘ आणि ‘मुक्कजी‘ ही दोन्ही पुस्तकेसुद्धा तशी खुपजुनी म्हणजे ७-८ वर्षांपूर्वीच प्रकाशित झालेली आहेत व मान्यता पावलेली आहेत. अर्थात ज्ञानपीठ विजेत्या लेखकाच्या पुस्तकांची स्तुती आपण वेगळी अशी करण्याची गरज नाही. तरी पण एवढे सकस, मनाला भिडणारे व आशयसंपन्न असे हे लिखाण जास्तीत जास्त लोकांनी वाचावे व संपन्न अशा मराठी वाङ्मयाचा सर्वत्र प्रसार व्हावा अशा हेतूने हे आपणांपुढे ठेवत आहे.

मात्र अशी निखळ आनंद देणारी पुस्तके भाषांतरित असावीत व मुळातच मराठी भाषेत याहून सरस किंवा निदान या दर्जाची तरी पुस्तके का निघू नयेत या विचाराने मी बेचैन झालो.

माननीय ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, रणजित देसाई अशांसारखे केवळ हाताच्या बोटांवर मोजणारे लेखक व त्यांची पुस्तके सोडली तर अशी झपाटून टाकणारी पुस्तके मराठीमध्ये फार कमी आढळतात.

श्रीमती गौरी देशपांडे यांचे ‘एकेक पान गळावया’, राजेंद्र बनहट्टी यांचे ‘गंगार्पण’ किंवा शरच्चंद्र चिरमुले यांचे ‘एका जन्मातल्या गाठी’ अशी दर्जेदार पुस्तके वाचनालयात निव्वळ पडून राहिलेली असतात, इतर काही सुमार लेखकांची पुस्तके मात्र ब-याच मोठ्या प्रमाणात वाचायला नेली जातात ही घटना वाचकांच्या सपक आवडीची निदर्शक ठरावी हे आपल्या मराठी भाषेचे दुर्दैव !

‘ललित’ मासिकात दरमहा बाजारात आलेल्या पुस्तकांची नावे मी न चुकता वाचतो. पण ती एवढी मोठी यादी बघून त्यांतून चाळण्याजोगी, विकत घेण्याजोगी एक अथवा दोनच पुस्तके निघावीत हे काही चांगले लक्षण नाही. अर्थात हे माझे विधान मजपुरतेच आहे. कारण मराठीविषयी अधिकारवाणीने बोलावे, लिहावे अशी मान्यता मजपाशी नाही. एक सर्वसामान्य वाचक एवढाच माझा अधिकार !

चांगल्या अभिरुचीची जोपासना कुणीतरी करायला हवी म्हणून हा सारा प्रपंच !

– अनामिक
[ ‘संग्रहालय‘ जानेवारी १९८६ वरून साभार ]

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

लक्षणीय

शतकाच्या पाऊलखुणा 

चिंतामणी भिडे

ग. दि. माडगूळकर

गजानन दिगंबर माडगूळकर यांना ‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणत. निकटवर्तीय त्यांना ‘आण्णा’ या नावाने हाक मारत. उभा महाराष्ट्र मात्र त्यांना ‘गदिमा’ या नावाने ओळखतो. ‘गदिमा’ या तीन अक्षरांत एवढी जादू होती, प्रेम-आपुलकी होती, आदर होता की ते उच्चारताच नात्यातल्या कुणा वडिलधारी माणसाला हाक मारल्यासारखं वाटे.

प्रचंड गरिबीतून हा माणूस वर आला. पोटापाण्यासाठी मुंबई-पुण्यासारख्या शहरांत राहिला. पण ग्रामीण जीवनाशी असलेली नाळ त्यांनी कधी तोडली नाही. गावाच्या मातीशी असलेलं इमान कधी विकलं नाही. पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी शब्दांशी बेईमानी केली, अशी खंत त्यांना होती. गीतरामायणासारख्या अद्भुत काव्याने त्यांची ही खंत ब-याच प्रमाणात दूर केली. गीतरामायणाचा मराठी मनावर एवढा प्रभाव होता की लोक आण्णांच्या पाया पडत. दत्तो वामन पोतदारांनी तर त्यांना ‘आधुनिक वाल्मिकी’ अशी पदवी दिली.

आण्णांचं कर्तृत्व गीतरामायणापुरतंच मर्यादित नव्हतं. त्यांनी चित्रपटांसाठी असंख्य गाणी लिहिली, कथा, पटकथा लिहिल्या. बालकविता लिहिल्या. अनेक मासिकांचे आण्णा संपादक होते. अनेक मासिकांमधून आण्णा सातत्याने लेखन करत असत. चित्रपटांतील त्यांच्या गाण्यांवर तर एक पिढी पोसली गेली. राजा परांजपे, सुधीर फडके आणि गदिमा या त्रयीने मराठी चित्रपट रसिकांना अमोल ठेवा दिलेला आहे.

आण्णा अत्यंत रसाळ, सुलभ, काव्यात्म, गेय रचनाकार होते. दुर्बोध, प्रसादहीन, अर्थहीन, क्वचित अर्वाच्य, अगम्य असे नवकवितेचे स्वरूप त्यांना मान्य नव्हते. मात्र मर्ढेकरांबद्दल त्यांना विलक्षण आदर होता.

‘माडगूळकर म्हणजे गीतकार’ या प्रभावाखाली राहून मराठी समीक्षकांनी आपल्या इतर लेखनाची दखल घेतली नाही; किंबहुना आपली उपेक्षाच केली याच शल्य आण्णांच्या मनी होतं. आण्णा पुण्या -मुंबईसारख्या शहरात राहिले. पण त्यांचं मन खेड्यातच होतं. तिथली माती, माणसं यांचा त्यांना कधीच विसर पडला नाही. गावी गेले की ते ग्रामीण बोलीच बोलत. सर्वांची प्रेमानं  विचारपूस करत. गावच्या मातीवर-माणसांवर त्यांनी मनापासून प्रेम केलं. वर्षातून एकदा गावाकडे जाणं ते सहसा चुकवायचे नाहीत. शहरी जीवनातील धावपळीने मरगळलेल्या त्यांच्या मनाला त्यामुळे विलक्षण उभारी येई.

व्यवसायाखातर अक्षरांशी बेईमानी केल्याची खंत आण्णांच्या मनी होती. न पटणा-या तडजोडी केल्याची बोचरी जाणीवही होती. माडगूळच्या बामणाचा  पत्रा या वास्तूची ओढ आण्णांच्या मनी सुदैवच असायची. आपलं अनेक लेखन आण्णांनी येथेच केलं.

आण्णांना अभिनयाचंही अंग होतं. उत्कृष्ट नकलाकार तर ते होतेच. चित्रपटांमध्ये त्यांनी काही भूमिका केल्या होत्या. ‘व-हाडी आणि वाजंत्री’ या विनोदी चित्रपटातील त्यांचा कानडी बाप विशेष गाजला. तशीच शांतारामबापूंच्या ‘राम जोशी’ चित्रपटातील भूमिकाही गाजली.

फळांनी बहरलेलं झाड पाहिलं की आण्णांची आठवण येते. आण्णादेखील एक सदाहरित वृक्षच होते. असंख्य गाणी, कथा, पटकथा, संवाद अशा नानाविध फळांनी सदैव लगडलेला असा वृक्ष. असा हा वृक्ष एके दिवशी कोणाच्या ध्यानीमनी नसताना उन्मळून पडला. १४ डिसेंबर १९७७ रोजी आण्णांची प्राणज्योत मालवली व ते पंचत्वात विलीन झाले.

चिंतामणी भिडे
[ ‘महाराष्ट्र टाइम्स‘ : शतकाच्या पाऊलखुणा – १५ ऑक्टोबर २००० वरून साभार ]

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

चित्रकारांचे दालन 
– ©️ मनीषा नाबर 
nabarm@yahoo.com
@@@@@@@@@@@@@@@
हत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@

केकी मूस “एक अवलिया”

अ‍ॅड. क्रांती आठवले-पाटणकर

भाग ७

 

प्रस्तुत लेखमालेचे यापूर्वीचे सहा भाग अनुक्रमे दि. १४ जुलै, १२ ऑगस्ट, ११ सप्टेंबर, ११ ऑक्टोबर, ९ नोव्हेंबर आणि ६ डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध झाले. आज शेवटचा सातवा भाग वाचा आणि आपल्या आस्वादक प्रतिक्रिया कळवा. – सं. 

वयाच्या साठीनंतर केकींनी “रॉबर्ट हर्बीन” चे “Origami : The Art of a paper folding”, हे पुस्तक वाचून त्यावरून ओरिगामीची कला शिकण्यास सुरुवात केली आणि त्यात त्यांनी सुमारे दोन हजाराच्या आसपास प्रकार बनवले.

ज्या ज्या क्षेत्रात केकींनी पाउल टाकलं, त्या त्या क्षेत्रात त्यांनी प्राविण्य मिळवलं .. मग ते छायाचित्रण असो, संगीत असो, चित्रकला असो, ओरिगामी असो, भाषा शिकणं असो, शिल्पकला, काष्ठशिल्प असो…… आणि ते देखील चाळीसगावसारख्या लहानशा गावात राहून, जिथे त्या काळी अशा गोष्टींसाठी लागणा-या सोयी सुविधांचा अभाव होता…

खरंच केकी हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होतं ..

१९५४ ला केकींची लाडकी “ममा” त्यांना कायमची सोडून गेली. ममा ७ वर्षे अंथरुणाला खिळून होती. ती गेली त्याच्या दोन दिवस आधी कोमामध्ये होती आणि त्यामुळे ती कधी गेली ते कुणाला कळलंच नाही. ममाच्या यातना केकींनी जवळून पाहिल्या. ममा गेली आणि ते या जगात एकटे पडले. ते ओक्साबोक्शी रडले तेव्हा त्यांच्या सोबत, त्यांच्या सगळया कलाकृती देखील मूकपणे अश्रू ढाळत होत्या असं त्यांना वाटलं. म्हणूनच कदाचित त्यांच्या आत्मचरित्राचं नाव “When I Shed My Tears” असं  त्यांनी दिलं असावं. सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे या आत्मचरित्राची साधारण ३००-३५० पानं केकींनी लिहिली आहेत. पण हे आत्मचरित्र अद्याप प्रकाशित झालेलं नाही अशी माहिती मिळाली…. ममा गेल्यावर केकीनी आपली चित्रं स्पर्धेसाठी पाठवणं बंद केलं. तेव्हा केकींचे चाहते असलेले उच्च न्यायालयाचे तेव्हाचे सरन्यायाधीश मा. श्री. धर्माधिकारी यांनी त्यांना याबाबत विचारलं असता केकी म्हणाले, “देखिए, इसी साधनाने आजतक मेरा तो लुटा सारा खजाना, किंतु मंजिल न मिली, मिली तो लाश मिली, अरमानोंकी I ”.

यावरून केकी निराशावादी होते असा निष्कर्ष काढणं चुकीचे आहे.जवळच्या लोकांच्या वर्तनामुळे आलेली ही क्षणिक उद्विग्नता होती. अन्यथा केकी आपल्या कामातून मिळणा-या आनंदात डुंबत होते……

या कलेच्या ध्यासापायी केकींनी बराच, वेळ आणि पैसा, खर्च केला. अर्थात त्यांना स्वप्नपूर्तीचा आनंदही मिळाला.

अशा या अवलिया कलाकाराला आणि सच्च्या प्रेमीला जेव्हा स्वत:चा अंत जवळ आल्याचं जाणवलं, तेव्हा त्यांनी आपले गुरु स्वामी चंद्रकिरण सरस्वती यांच्या सल्यानुसार आपल्या कलादालनाचा ट्रस्ट स्थापन केला आणि त्याला आपल्या आईचं नाव

दिलं. केकींच्या मृत्युपश्चात वर्षभराने सदर ट्रस्ट शासनाकडे नोंदीत झाला. ही बातमी चंद्रकिरण सरस्वती स्वामींना कळविण्यात आली. त्याच दिवशी स्वामींनी आपला देह ठेवला.. त्यांची समाधी जळगाव जिल्ह्यात “कानळदा” येथे आहे.

३१ डिसेंबर १९८९ ला केकी या जगातून निघून गेले. त्याच्या अनमोल कलेचा ठेवा मागे ठेवून ….

केकींनी आपलं एक मृत्यूपत्रही तयार केलं. त्यात त्यांनी अशी इच्छा  व्यक्त केली की आपल्या देहाचं याच वास्तुत दफन करावं आणि समजा यासाठी शासनाची परवानगी मिळाली नाही, तर औरंगाबादला ज्या पारशी विहिरीत आपल्या आईचे अंत्यसंस्कार केले, तेथेच आपलेही अंत्यसंस्कार करावे.

अशी परवानगी तर शासनाकडून मिळाली, परंतु पारशी समाजात मृत शरीर दफन करण्याची पद्धत /  प्रथा नाही. त्यामुळे पारशी धर्मगुरूंनी अंत्यसंस्कारास येण्यास नकार दिला. तेव्हा जवळच्या चर्चमधील एक फादर आणि गावातील एक ब्राह्मण यांनी त्यांचे अंत्यसंस्कार केले आणि त्यावेळी त्यांचे मोजके हितचिंतक हजर होते…. रेम्ब्राँची अखेरही साधारण अशाच प्रकारे झाली असल्याने, केकींचे व त्याचे खरंच ऋणानुबंध असावेत असं वाटतं.

केकी स्वभावाने शांत होते, हट्टी होते, जिद्दी होते, प्रेमळ होते, लहरी होते, संयमी होते, उदार होते, निस्वार्थी होते. ते उत्कृष्ट कलाकार होते, विद्वान होते, चतुरस्त्र होते… आणि  असाधारण प्रेमी होते. याशिवाय ते असामान्य प्रतिभा असलेले आणि स्वत:च्या अटींवर जगणारे होते. थोडक्यात केकी हे “Out Of This World” होते.

सामान्य माणसांच्या जगण्याचे निकष लावून, त्यांच्या जीवनाचं मूल्यमापन करता येणार नाही.

केकी समाजापासून दूर राहात असले तरी त्यांना भेटायला येणा-या ब-याच लोकांशी केकींची तार जुळायची. केकींच्याच शब्दात सांगायचं तर :-

अलग हम सबसे रहते है, मिसाले तार तंबुरा,
जरा छेडे से मिलते है, मिला लो जिसका जी चाहे.

केकी मूस यांचा “माणूस” म्हणून वेध घेण्याचा हा छोटासा प्रयत्न. दस्तुरखुद्द केकी आणि त्यांची असामान्य कला, याबाबतची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी एवढाच या लेखमालेचा मर्यादित उद्देश आहे.

केकी मूस फऊंडेशनतर्फे केकींच्या स्मृतिदिनानिमित्त, दरवर्षी ३१ डिसेंबर या दिवशी, कलामहर्षी केकी मूस कलादालनाच्या आवारात सकाळी ११ च्या सुमारास, एक कार्यक्रम आयोजित केला जातो. या निमित्ताने चित्रांचं एक प्रदर्शन भरवलं जातं.   २०१८ सालच्या अशा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आम्हा उभयतांना मान देण्यात आला.

“रेम्ब्राँज रिट्रीट” ची भक्कम दगडी वास्तू, आता केकींचं स्मारक बनून दिमाखात उभी आहे.. त्याच्या बाजूला केकींची समाधी आहे आणि त्यावर सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी तयार केलेला केकींचा अर्धपुतळा आहे.

……..आणि आता, चाळीसगाव रेल्वेस्टेशनकडे तोंड करून, केकी त्यांची प्रेयसी येण्याची अखंड प्रतीक्षा करत आहेत.

*मरने के बाद भी,मेरी आँखे खुली रहीं*
*आदत जो पड गयी थी, तेरे इंतज़ार की*
(फैझ अहमद फैझ)

( *समाप्त*)

– © अ‍ॅड. क्रांती आठवले-पाटणकर,
*डोंबिवली*.
*9969087559*

*संदर्भ सूची/कृतज्ञता:*
(अनेक  मान्यवरांशी फोनवर बोलणे झाले. त्यांच्या सहकार्याबद्दल मन:पूर्वक आभार.)
*लेख/पुस्तक:*
१)  Keki moos: Life and Still Life (1983)
Publisher: Maharashtra State Board for literature and culture.
२) “अंतर्नाद” मधील श्री. सुधीर जोगळेकर यांचा लेख.
३) “कॅनव्हास”, लेखक: अच्युत गोडबोले, दीपा देशमुख, मनोविकास प्रकाशन
४) फोटो सौजन्य: केकी मूस फौंडेशन
*संकेतस्थळे/व्हिडीओ/ब्लॉग*:
१) व्हॅलेंटाईन डे_प्रेम, प्रेयसी आणि प्रतीक्षा: झी २४ तास.
२) Art Legendary Keki Moos , Documentary by  Multi Media Features
Pvt Ltd.
३) केकी मूस ट्रस्ट,चाळीसगाव
४) A forgotten genius, अलका धुपकर, मुंबई मिरर
५) Facebook Post: अश्विनी मयेकर. द्वारा: श्री. नितीन सेठ, आन्सर कंप्युटर,   डोंबिवली.
६) Facebook Post: प्राची पाठक
७) www.thelallantop.com संदीप सिंह
८) http://digvijaysanjaypatil.blogspot.com/2013/11/my-loving-nest-   chalisgaon.html
९)   mr.wikipedia.org/wiki/माधव_त्रिंबक_पटवर्धन

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आजची कविता 
– प्रो. वासुदेव बळवंत पटवर्धन
 
‘मनोरंजन’ मासिक दिवाळी अंक १९१० वरून साभार ]
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
राखीगढीचा यू टर्न

अंतरलेला इतिहास : १०

 
हर्षद सरपोतदार 
 

डॉ. वसंत शिंदे



डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाचे संशोधक डॉ. वसंत शिंदे यांनी करोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या निमित्ताने एक व्याख्यान एप्रिल २०२० मध्ये युट्यूबवर प्रसारित केलं आहे. ‘Application of DNA Science to reconstruct authentic early Indian History’ हा विषय युट्यूबवर घातला की ते ऐकता-पाहता येतं. तरीही त्याची लिंक खाली देतो,
https://www.youtube.com/watch?v=xjJ3YGmsYG0

या व्याख्यानात राखीगढी येथे झालेल्या संशोधनावर डॉ. शिंदे यांनी अधिक प्रकाश टाकला आहे. त्यावर माझी प्रतिक्रिया खाली देत आहे.:-

१. डॉ. शिंदे यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये सादर केलेल्या राखीगढी संशोधनावर ज्या प्रतिक्रिया आल्या होत्या त्यांची दखल घेतल्याचं त्यांनी या व्याख्यानात स्वतःच सांगितलं आहे. परिणामी त्यावेळी काढलेले काही निष्कर्ष त्यांनी बदलले असल्याचं दिसून येत आहे. ते आता त्यांना ‘निष्कर्ष’ न म्हणता ‘अनुमान’ वा ‘गट फिलिंग’ म्हणत आहेत.

२. ऑगस्ट २०१८ च्या निष्कर्षांमधील अनेक बाबी त्यांनी या व्याख्यानात गाळल्या वा बदलल्या आहेत. उदा. राखीगढीमधील लोक वैदिक आर्य नव्हते, आर्यांपेक्षा दक्षिण भारतीयांशी वा द्रविडांशी त्यांचं साधर्म्य आहे, ते ‘निलगिरी’ मधील ‘इरुला’ जमातीचे असावेत, ते शेतीचं तंत्र पश्चिम आशियातून शिकले होते इत्यादी मुद्दे त्यांनी तेव्हा प्रामुख्याने मांडले होते. (पहा- Economic Times, 13-06-2018 व India Today, 31-08-2018.) पण या व्याख्यानात त्यांनी वेगळेच मुद्दे मांडले आहेत.

३. या देशातील लोकांचे पूर्वज ११००० वर्षांपूर्वी भारतात आले असं या व्याख्यानात डॉ. शिंदे म्हणत आहेत. पण ते म्हणत असताना एकीकडे ते Aryan Invasion Theory नाकारत आहेत हे विसंगत आहे.

४. राखीगढीमधील सांगाड्यांचे डी. एन. ए., त्यांची भांडीकुंडी, घरं हे सर्व हल्लीच्या हरियाणातील लोकांच्या जीवनशैलीशी जुळत आहे, असं आता डॉ. शिंदे म्हणत आहेत. मग ‘इरुला’ लोकांचं काय झालं ? आणि अन्य भारतीय वंशजांचं काय करायचं ? या प्रश्नांची उत्तरे शिंदे यांनी दिलेली नाहीत.

५. वैदिक संस्कृती राखीगढीवाल्या लोकांनीच निर्माण केली, असं आता डॉ. शिंदे सांगत आहेत. पण ऑगस्ट २०१८ मध्ये या लोकांचा वैदिक संस्कृतीशी काहीही संबंध नसल्याचं ते सांगत होते.

६. काश्मीर ते केरळ आणि अफगाणिस्तान ते बंगाल यांमधील लोकांचे ( त्यांचे जाती-धर्म कोणतेही असोत. ) पूर्वज हडप्पीयन लोकच होते कारण ६०% हून अधिक लोकांचे डीएनए जुळत आहेत असं या व्याख्यानात डॉ. शिंदे म्हणत आहेत. म्हणजे आर्य आणि द्रविड असा काही प्रकार नव्हता हे ते एकप्रकारे मान्यच करत आहेत. ऑगस्ट २०१८ मध्ये त्यांनी आर्य आणि द्रविड अशी विभागणी सांगितली होती.

७. शेती करायला सर्वप्रथम भारतातच (९००० वर्षांपूर्वी) सुरुवात झाली असं डॉ. शिंदे या व्याख्यानात म्हणत आहेत. ऑगस्ट २०१८ मध्ये भारतीय लोक इराण्यांकडून शेती करायला शिकले असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.

८. हे सर्व सांगून झाल्यावर ‘हे फारच लहान नमुन्यावरील संशोधन आहे’ हे मान्य करून डॉ. शिंदे यांनी बचावात्मक पवित्रा घेतला आहे. म्हणजे काही काळानंतर ही अनुमाने चुकीचीही निघू शकतील याचं सूतोवाच त्यांनी आताच करून ठेवलं आहे. मग ‘राखीगढीचा संदेश’ या लेखात मी तरी वेगळं काय म्हणत होतो ? डॉ. शिंदे आणि नीरज राय यांनी लहानशा नमुन्यावर अन्य शास्त्रांचा विचार न करता फारच घिसाडघाईने निष्कर्ष काढले आहेत हेच मी त्या लेखात म्हटलं होतं. प्रस्तुतच्या व्याख्यानातून एकप्रकारे माझं म्हणणं तंतोतंत बरोबर असल्याचंच डॉ. शिंदे यांनी कबूल केलं आहे.

– ©️ हर्षद सरपोतदार

hsarpotdar1@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
हृदयातील एक कप्पा

सचिन उपाध्ये

सुहासमावशीच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त लिहायला बसलो आणि स्मृतिचित्रे भराभर फडफडायला लागली. मी माझ्या डोंबिवलीच्या घरात जाऊन पोचलो. जुन्या आठवणीत तेव्हा किती वर्षांचा होतो ते आता आठवत नाही; पण सुनंदाकाकूसोबत आलेली लांब केसांची, मोठ्या डोळ्यांची, साडी नेसलेली तिची मूर्ती डोळ्यासमोर आली. अण्णाकाका आणि काकूबरोबर येणारी किंवा स्वतंत्रपणेसुद्धा येणारी.  त्यानंतरची ठळक आठवण म्हणजे समस्त जोशी परिवाराबरोबर केलेली माथेरान सहल.  तेव्हा माथेरानच्या गाडीत माझ्या बाजूला बसलेली ( किंवा मी तिच्या बाजूला बसलेला ) आणि त्या सहलीत बेल बॉटम पँट घालून घोड्यावर बसलेली तीच ही मावशी.

अजून एक आठवण म्हणजे ती डोंबिवलीला आल्यावर scrabble हा खेळ सगळे मिळून खेळायचो, तेव्हा तिचे English spelling चे skill दिसून येत असे. मनीमावशीला घाबरणारी किंवा तिच्यापासून लांब राहणारी ही मावशी अशीही एक स्मृती मनात आहे.

हिची काही वैशिष्ट्ये लहानपणापासून ऐकत आलो आहे – हिचे मराठी आणि इंग्रजी हस्ताक्षर आणि इंग्रजी भाषा.  म्हणजे अण्णाकाकांच्या भाषेत मांडायचे झाले तर ‘सुहास खरं पाहता इंग्लंडमध्येच जन्माला यायची, चुकून आमच्या पोटी आली.’ ती म्हणे एकदा कुठेतरी सहलीला गेली असता आवश्यक म्हणून इंग्रजीत कडाकडा भांडली होती. हे ऐकल्यामुळे तिच्या ह्या वैशिष्टयांबद्दल तेव्हापासून एक बालसुलभ आकर्षण निर्माण झाले ते कायमचे.  पुढे ती वैशिष्ट्ये वेळोवेळी प्रत्ययासही आली.

B.Sc. Botany ची पदवीधर; पण आता अनेक वर्षं रिझर्व बँकेत नोकरी करणारी, आताची असिस्टंट मॅनेजर श्रीलेखा श्रीनिवास जोशी. मला बऱ्याचदा वाटते, आपल्यापैकी बहुतेकांनी पुढे नक्की काय करायचे आहे, ह्याबद्दल काही ठरवलेले नसते आणि जसे आयुष्य समोर येते तसे आपण ते स्वीकारत जातो. हिच्याबाबतीत तसे झाले आहे काय ही थोडीशी उत्सुकता आहे किंवा हिच्या उमेदीच्या काळात आजच्याइतकी जीवघेणी पळापळ, स्पर्धा नव्हती; म्हणून हिनेही ते जसे येत गेले तसे सगळे  स्वीकारले असेल कदाचित्. माझ्या माहितीप्रमाणे तिने काही काळ ए.के.जोशी शाळेत शिक्षिकेची भूमिका बजावली ते तिला साजेसे ठरले असते, पण नियतीच्या मनात काही वेगळे असावे.

सुहासमावशीचे एका शब्दात वर्णन कर असे कोणी मला सांगितले तर मी सांगेन ‘प्रेमळ.’  दुसरा शब्दच सुचत नाही.  कधी-कधी आध्यात्मिक पातळीवरून विचार केला तर वाटते की ह्याला मोह म्हणायचे की प्रेम?  पूर्वी हा प्रश्न जास्त भेडसावायचा; पण आता नाही.  कदाचित् माझ्या वयामुळे आलेले शहाणपण (?) किंवा अजून काही असेल.  पण आता असे वाटते की असतो एखाद्याचा स्वभाव.  आता असे म्हणावेसे वाटते की हिचे प्रेम पावसासारखे आहे. पाऊस कसा बरसतो ना, तसे हिचे प्रेम! बरसताना पाऊस म्हणत नाही, मी काळ्या मातीवरच बरसेन, काळ्या दगडावर नाही.  तुमचे मन धारणाक्षम असेल तर तिचे प्रेम रूजेल अन् दगड असेल तर तोही भिजेल, झिजेल आणि आकार घेईल. आणि हो! हा इंग्लंडचा बारमाही पाऊस आहे बरे  का! एकदा आपले म्हटले की तो आयुष्यभर बरसणार ह्याची खात्री आहे, अवर्षण नाही!

सतत धावपळ करणारी ही मावशी कुठून एवढा उत्साह आणते कुणास ठाऊक! हिला एक तरी रविवार मोकळा मिळतो की नाही माहीत नाही. कधी ह्या नातेवाईकाकडे तर कधी त्या मैत्रीणीकडे अशी मुंगीप्रमाणे पळापळ करणारी; पण एक न चावणारी देवाची मुंगी असते म्हणतात ना तशी देवाकडून प्रेमाचा विशेष खजिना घेऊन आलेली. कधी घरी आली तर अशा धावपळीत असते की खाली रिक्षा थांबवलेली असते, कुठेतरी जाऊन आलेली असते किंवा कुठेतरी जायचे असते.  कुणीही घरी येऊन गेले आणि आपण त्यावेळी नसलो की आपल्याला एक रुखरुख लागते.  हिच्या भेटीचेही तसेच असते. थोडीशी जास्तच रुखरुख असते, कारण ती काही ना काही छान वाचते, शास्त्रीय संगीत ऐकते त्यामुळे विशेष जिव्हाळा वाटतो.  मुख्य म्हणजे आमचा हक्काचा श्रोता, वाचक आणि बरोबरीच्या नात्याने गप्पा मारणारी आहे ना म्हणून.

प्रत्येकाच्या देण्याला एक सुगंध असतो. तिने दिलेला शर्ट असो, पपई असो की अजून काही. आजही वयाच्या चाळिशीतसुद्धा मला एक अनामिक आकर्षण असते, ह्या मावश्या आल्या की त्यांच्या पिशवीत काय आहे त्याचे.  आपण कुतुबमिनार उभा करून दिला ना कुणाला, तरी ह्यांनी दिलेल्या मातीच्या शोभेच्या भांड्यापुढे तो फिका वाटेल.  काकूकडून सुहासमावशीकडे आलेला हा पुरेपूर वारसा आहे. मला याचा कायमच हेवा वाटतो. कधी भेटवस्तू काय द्यायची हा गोंधळ असेल, तर सुहासमावशीला घेऊन जा असे मी बिनदिक्कतपणे सांगू शकतो.

लहानपणापासून ऐकत वा बघत आलो की एखाद्याने कसे अति भावनाप्रधान असावे (की नसावे?) तर हिच्यासारखे.  म्हणजे मैत्रिणीची बदली झाली किंवा दूरदर्शनवरच्या मालिकेत कुणाचा मृत्यू दाखविला तरी डोळे पाणावणारी. लग्न झाल्यावर सासरी जाताना अति भावुक झाल्यामुळे सबंध जोशी परिवारात प्रसिद्ध झाली.  मला त्याची तेवढी स्पष्ट आठवण नाही; पण सगळे म्हणतात म्हणून मीही म्हणतो. अशी ही भावनाप्रधान मावशी जेव्हा अण्णाकाका गेले तेव्हा खूपच छान समजुतदार, धीरगंभीर मुलाप्रमाणे वागली. त्यानंतर तिला एक पत्र लिहावेसे वाटले होते; पण माझा आळस म्हणा किंवा काही. नंतर लिहिणे झाले नाही, मग कधीतरी ऊर्मी आल्यावर लिहावे तर ते अप्रासंगिक ठरले असते म्हणून नाही लिहिले.

काही माणसांची दाद उत्स्फूर्त आणि छान वाटते.  मोजक्या शब्दात छान आशय आणतात.  ह्याला अल्पाक्षरसामर्थ्य लागते. सुहासमावशीची एक दाद माझ्या लक्षात राहिली ती अशी-दूरदर्शनवरच्या ‘सा रे ग म’ कार्यक्रमातील डॉ.सलील कुलकर्णीच्या प्रतिक्रियांपैकी एक म्हणजे ‘ताजी पोळी आणि शिळी पोळी, मग त्याची फोडणीची पोळी वगैरे वगैरे……’ पाहून ती म्हणाली, “मला ना त्याचे लहान मुलाप्रमाणे गालगुच्चे घ्यावेसे वाटतात.”  हे ऐकून मला खूप मज्जा वाटली.  म्हणजे ते दृश्य मी डोळ्यासमोर उभे करू शकलो. तिने ईमेल वर माझ्या एका लेखाला अशीच मोजक्या शब्दात दाद दिली की मला मनापासून वाटले, “क्या बात है!”

आयुष्यात काही गमती-जमती असतात.  माझी ‘एक मैत्रीण आणि मानलेली बहीण’ तिच्या स्वभावामुळे सुहासमावशीची आठवण करून देते आणि सुहासमावशी गप्पा मारताना मैत्रिणीसारखी भासते.  वयाचे अंतर गळून पडते. एकदा फोनवर गप्पा मारताना मी सहजच उल्लेख केला की अमुक किल्ल्यावर जाऊन आलो आणि सचिन उपाध्ये ट्रॅव्हल्सतर्फे तुला न्यायला आवडेल.  तिने लगेचच प्रतिसाद दिला की, “अरे व्वा! जाऊया की एकदा.”  एकदा सगळ्याच मावश्यांना घेऊन माझ्या प्रिय रायगडावर जायचे आहे.  बघूया कधी योग येतोय ते.  सुधा मूर्तींचे ‘वाईज अदरवाईज’ माझ्या वाचनात तिच्यामुळे आले.  सकस वाचन असलेल्या मावशीचा अभिप्राय भीमसेन जोशींवरील पुस्तकाबाबत असो की ‘Not without my Daughter’ पुस्तकावरचा असो वा इतर कुठल्याही पुस्तकांबाबत. ऐकण्यात मजा वाटते. आपण वाचलेल्या पुस्तकाचा अभिप्राय देण्यात वा माझे नवीन लिखाण दाखविण्यात आतुरताही तितकीच असते.

कल्पकतेचा वारसा तिने कुठून घेतला मला माहीत नाही; पण हल्लीच उमेशमामाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम तिने छान घडवून आणला त्यात तिने मला दिलेले सूत्रसंचालन मलाही सुखावणारे होते. पूर्वी एकदा गो. ल. जोशींच्या (बंडूकाकांच्या) वाढदिवसाच्या वेळी पण बहुतेक तिचाच पुढाकार होता असा माझा कयास आहे.  असे कुटुंबातले किंवा मित्र-मैत्रिणींसंबंधी अनेक कार्यक्रम घडवून आणत असते. मला वाटते उत्तरआयुष्यात ती हा एक छंद म्हणून ही कला जोपासू शकेल.

मुली सासरी गेल्यावर रोजच आईशी फोनवर गप्पा मारतात असे ऐकतो ही परंपरा ह्या मायलेकींपासून सुरू झाली असेल की काय असा खट्याळ प्रश्न (काकूच्या भाषेत चोंबडा) कधी कधी मनी येतो.  पण त्याचे उत्तर मला नाही मिळाले तरी हरकत नाही. काकूवर शस्त्रक्रिया झाली त्या दरम्यान किंवा आगे मागे कधीतरी मावशीने कात टाकली आणि ती काकूचा जणू काही मुलगाच झाली.  त्या धामधुमीत बँकेची परीक्षाही उत्तीर्ण झाली. काळानुसार माणूस बदलत जातो तसे आता ती काकूची मैत्रीण आणि मुलगाही आहे असे जाणवते.

अशी ही सतत गोतावळ्यात वावरणारी मावशी पाहिली की वाटते की हिला एकांत लाभावा. तिची धावपळ पाहून मला एका कवितेच्या ओळी आठवतात की ‘जगेन जगेन म्हणताना जगायचे राहून गेले’ असे तर हिचे होत नाही ना? सतत इतरांसाठीच धावपळ करते आहे, असे कुठेतरी मनात दाटून येते. मग समर्थ रामदासांच्या शब्दांत सांगावेसे वाटते की ‘काही गलबला काही निवळ । ऐसा कंठित जावा काळ ।। जेणेकरीता विश्रांती वेळ । आपणासी फावे ।।’ ह्यानुसार तिने सांसारिक चिंतांतून मनाने दूर जावे म्हणजे तिला स्वत:साठी वेळ मिळेल.  ह्या प्रक्रियेतून तिचे अनेक सुप्त गुण प्रकट होतील आणि आंतरिक स्थैर्य मिळेल असे वाटते. मी करत असलेल्या ध्यानसाधनेचा तिनेही लाभ घ्यावा अशी उर्मी येते. ह्यातून तिचे शारीरिक आणि मानसिक तापत्रय दूर व्हावेत ही इच्छा आहे.

आपण बऱ्याच दिवसांनी खण आवरायला घेतला की एक-एक वस्तू बाहेर काढतो आणि नकळत आपले मन कुठे कुठे पतंगासारखे भरकटत राहते. परिणामी खण आवरायला वेळ लागतो.  माझे असेच काहीसे झाले हे सगळे लिहितां लिहितां.  गमतीने नेहमी मी उल्लेख करतो की हनुमंताप्रमाणे मला हृदय उघडून दाखवायला सांगितले तर परमेश्वराबरोबर सावरकर, टिळक, सुभाषबाबू, शिवाजी महाराज, विवेकानंद इत्यादी मंडळींचेही अस्तित्व हृदयात सापडेल. आज लिहितां लिहितां असे जाणवले. सुहासमावशीचेही तिथेच अस्तित्व आहे.  एका कप्प्यात तीदेखील आहे, आणि हो! तो कप्पा तिच्या प्रेमाने ओलादेखील आहे.

फक्त भाचेच नाही तर समस्त मंडळींतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उत्तरायुष्यात आरोग्यप्रधान दीर्घायु लाभो हीच सदिच्छा!

– ©️ सचिन उपाध्ये

sachinupadhye26@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
‘काटा रुते’

थोडक्यात मार्मिक : १५
 

कौस्तुभ ताम्हनकर

दोन दिवसांपूर्वी बागेत काम करताना डाव्या हाताच्या तर्जनीत गुलाबाचा काटा घुसला त्याला काढायचा प्रयत्न केला पण बेटा घुसत घुसत आतच गेला. मला वाटले माझ्या शरिराने त्याला सामावून घेतले.

‘हे विश्वचि माझे घर’ आणि ‘जो येईल त्याला आपले म्हणायचे’ ही वृत्ती, यामुळे तो काटा आता माझा झाला असे मला वाटले. पण कसचे काय ? कालपासून हे काटे महाराज तर्जनीवर तिळासारखे उगवून स्पष्ट दिसू लागले आहेत. तीळ हे सौंदर्याचे लक्षण ! म्हणून म्हटले “असूं दे त्याला तिथेच.” पण हळूहळू तो काटा त्याचे अस्तित्व दाखवू लागला आहे.

हे म्हणजे अगदी भारतसारखे झाले. पाकिस्तानी, बंगला देशी, ब्रह्मदेशी, लंकनी, पठाणी, नेपाळी, पारशी, इस्त्रायली ही मंडळी भारतात आली. त्यातील नेपाळी, पारशी, इस्रायली लोक बासुंदीतील साखरेप्रमाणे भारतात विरघळून गेले. भारतीय झाले. पण इतर देशी मात्र भारतात तांदळातील खड्याप्रमाणे राहिले आहेत. खडेच ते कसे विरघळणार?  त्यांनी त्यांचे अस्तित्व दाखवायला सुरुवात केली, अगदी माझ्या तर्जनीत घुसलेल्या काट्याप्रमाणे. आता या काट्याला बाहेर काढावेच लागेल. माझ्या शरीराने त्याला सामावून घ्यायचा प्रयत्न केला पण त्या दोघांचे काही जमले नाही.

एकमेकांचे स्वभाव न जुळणारी माणसे एकत्र नंदू शकत नाहीत. ती प्रथम प्रथम एकत्र राहायचा प्रयत्न करतात पण अती झाले म्हणजे विभक्तच होतात. अगदी एकमेकांची तोंडे जन्मात बघायची नाहीत असे म्हणत. वेगळे होतात. त्या दुरावण्यात दोघांचे सुख असते. याला अपवाद रोज सायंकाळी सात ते दहा बघाव्या लागणाऱ्या धारावाही मालिका. या मालिकांमध्ये मात्र ही सतत भांडणारी आणि एकमेकांवर कुरघोड्या करणारी मंडळी एकमेकांपासून दूर न जाता सतत भांडत आणि कुरघोड्या करत एकत्र राहत असतात. याचे खरे कारण असावे  माणसाला भांडणे प्रिय असावीत पण ती करमणूकीपुरतीच.

‘दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ’ या म्हणीप्रमाणे मालिकांतील भांडणांमुळे ‘धारावाही प्रेमिकांना’  मनोरंजनाचा लाभ होतो,  जाहिरातदारांना लोकांना भुलवता येते, वाहिन्यांचा TRP  वाढतो. एक ना अनेक.

हा सर्व मनुष्यस्वभाव ज्ञानदेवांना माहित नव्हता का?  होताच, कारण ते स्वतः ज्ञानदेव होते. ते ‘ हे विश्वचि माझे घर’ असे का म्हणाले असतील? यातील ‘माझे’ हा शब्द  वेगळाच अर्थ तर सांगत नाही?

हे विश्व मला मिळालेले आहे आणि या विश्वाला मला  फुलवायचे, त्याचे नंदनवन करायचे काम माझ्यावर सोपवले आहे. असा खरे तर या बोधवाक्याचा अर्थ ज्ञानदेवांना अभिप्रेत असावा .

आता बाग फुलवायची म्हणजे तिच्यात उगवलेले तण, रानटी झाडे, विषारी वृक्षवल्ली या काढून टाकाव्या लागणार.

म्हणूनच भारतात घुसलेले अतिरेकी आणि माझ्या तर्जनीत घुसलेला काटा वेळीच काढून टाकणे हे भारताचे आणि माझे आद्य कर्तव्य आहे. तसे नाही केले तर अतीव दुःखाला सामोरे जावे लागेल.
म्हणूनच
हे विश्वचि माझे घर
खबरदार जर कराल गडबड
काटयापरीस वेचून ठेचू
आम्ही विश्वाचे राखणदार

******************************
– ©️ कौस्तुभ ताम्हनकर

९८१९७४५३९३
kdtamhankar@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
प्रकाशचित्रकारांचे दालन 
– ©️ आशिष नाईक  
८८९८८ ८५९१५
a22p2n@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@
हत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@

भले बुध्दिचे सागर नाना

कडबोळे : ७५

डॉ. अनिल यशवंत जोशी 

 

नुकताच  मेणवलीचा  नाना फडणवीसांचा वाडा पाहिला. नाना म्हणजे उत्तर पेशवाईतील एक मातब्बर मुत्सद्दी.  त्यांचे पूर्ण नाव बाळाजी जनार्दन भानू ( १२ फेब्रुवारी १७४२ – १३ मार्च १८०० ) कोकणातील वेळास हे त्यांचे मूळ गाव.  त्यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी वेगवेगळी मते आहेत हे खरे आहे. परंतु त्याचा थोडासा वस्तुनिष्ठ आढावा घ्यायचा झाल्यास मराठी विश्वकोशात नानांविषयी जे काही लिहिले गेले आहे, त्यातील काही भाग महत्त्वाचा आहे तो असा……

संकटकाळात मराठ्यांची एकी टिकविणे व इंग्रजांपासून स्वातंत्र्य रक्षण करणे, ही नानाची महत्त्वाची कामगिरी होय. फ्रेंच राज्यक्रांती, इंग्रज-फ्रेंचयुद्धे, अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध इ. घटना नानाला माहीत असणे संभवते. इंग्रजांनाही तो चांगला जाणत होता. ‘इंग्रजांशी तहनामा करणे, तो फार विचार करून करावा लागतो. त्यांचे बोलण्यात व लिहिण्यात एकेक अक्षरात फार पेच असतात’, असे नाना म्हणे. टोपीकरांचा प्रवेश खुष्कीत होऊ देऊ नका, बादशाहीत इंग्रजांचा पाय न शिरावा. बादशाहीत इंग्रज शिरल्यास झाडून खुष्कीत पेच पडेल, असा जरी इशारा नानाने दिला होता, तरी मराठे ते धोरण राखू शकले नाहीत. इंग्रजांविरुद्ध मराठ्यांनी यशस्वी व्हावयाचे तर पाश्चात्त्य राजनीती व सैनिकीपद्धत यांचा अवलंब करणे आवश्यक होते. आपल्या घोडदळापुढे इंग्रज पावप्यादे किती दिवस टिकणार, असे विचारणाऱ्या नानाला पाश्चात्त्य यंत्रचलित व शिस्तबद्ध सैनिकीपद्धतीची खरी ओळख झाली नव्हती. स्वार्थी, तत्त्वशून्य आणि सत्ताभिलाषी मराठामंडळास निःस्वार्थी नेता हवा होता, तसा नाना होऊ शकला नाही. टिपूला पुरते मोडू नये, असे नानाचे धोरण होते पण पुढे ते कायम राहिले नाही.

मराठेशाहीचा कारभार पाहत असतानाच मराठीचा ही पुढची स्वदेशी आणि विदेशी आव्हाने काय होती त्याचे भान नानांना होते असे वरील परिच्छेदावरून स्पष्ट होते.

मराठी विश्वकोशात नानांच्या नावाची नोंद नाना “फडणीस “ अशी आहे. फडणीस की फडणवीस?  का दोन्ही पाठ योग्य? मराठीप्रेमी ज्येष्ठ स्नेही सुषमा जोशी यांना विचारले. त्यांनी केलेली मीमांसा खालीलप्रमाणे:

फड नवीस
नवीस म्हणजे लिहिणारा ( बहुतेक फारशी शब्द )
चिट नवीस
वर्णमालेतील सानुनासिकासारखा बदल झाला असावा.
म्हणजे टठडढ असलेल्या शब्दांचा अनुस्वारयुक्त उच्चार होतो तसा. इथे अनुस्वार नाही पण
फडण वीस ( ड मुळे न ऐवजी ण)
चिटण वीस
काही ठिकाणी लोप झाला आणि णवीस ऐवजी नीस /णीस झाले
संस्कृत उच्चार करताना
शुभङ्करोति म्हणतो तसं
पुढे जे अक्षर आहे त्याच्या अनुनासिक शब्दाप्रमाणे उच्चार होतो तसं न चा ण .

त्यांनीच एक हिंदी संदर्भ देखील उपलब्ध करून दिला तो खालील प्रमाणे :
फ़र्द का अर्थ है रजिस्टर या खाता और नवीस का अर्थ है लेखक। फ़र्द से बिगड़कर बना फड या फड़। मराठी में निस्संदेह फड लिखा (और शायद बोला भी) जाता है क्योंकि उनकी वर्णमाला में ड़ के लिए अलग से कोई वर्ण नहीं है जिसमें ड के नीचे बिंदी हो। लेकिन जहाँ तक हिंदी का मामला है, हिंदी के सम्मानित शब्दकोश में भी हमने फड़नवीस ही देखा।

या वाड्याला भेट देताना जाणवले सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वाड्याच्या संरक्षण जतन व संवर्धनासाठी योजनाबद्ध प्रयत्न होत आहेत आणि या प्रयत्नासाठी फडणवीसांच्या वारसांनी पुढाकार घेतलेला आहे. भेट देणाऱ्या  लोकांसाठी त्यांनीच मार्गदर्शक उपलब्ध करून दिला आहे आणि त्याची सेवा पूर्णपणे मोफत आहे. तिथे काही  स्मृतिचिन्हे ( souvenir ) विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  त्यात शीतकपाटाच्या दारावर लावण्यासाठी एक स्मृतिचिन्ह आहे. त्यावर तुमचे नाव किंवा तुमच्या आवडीचा मजकूर मोडी लिपीत लिहून दिला जातो. नानांचे बहुतांश दप्तर मोडीत आहे.  त्यामुळे मोडी संवर्धनाचा प्रयत्नही तेथे जाणीवपूर्वक केला आहे.  जुन्या काळी खेळले जाणारे काही दुर्मीळ खेळही तेथे ठेवले आहेत. वाड्याच्या दारात असलेली सुमारे दोनशे वर्षे वय असलेली गोरखचिंच देखील पाहण्यासारखी आहे. गोरक्ष चिंचेचे सरासरी आयुर्मान हजार वर्षांचे असते असे सांगितले जाते.  त्यामुळे ही चिंच तशी  तरुणच म्हणावी  लागेल.

‘भले बुद्धिचे सागर नाना
ऐसे नाही होणार।
खूप शर्थीने राज्य राखिले
मनसुबीची तलवार।।’
अनंत फंदी

वाड्यातील अप्रतिम गणेश पट्टी.

– ©️ डॉ अनिल यशवंत जोशी

9422647283
jaysss12@gmail.com
12/11/2022

@@@@@@@@@@@@@@@@@@@

नवीन मुखपृष्ठ :  Vaasa, Finland येथील फॉल सीजन – सीमा गानू, कॅनडा 

@@@@@@@@@@@@@@@@@@@

आजची कविता 

 
प्रदीप अधिकारी 
 
दुपार

नेहमीसारखीच उत्साहाने उठते
थोरली सकाळ…!!

कितीतरी कामं असतात.
पेपर आलाय का ?
दार उघडून बघायचंय.
फ्रीजमधून दुध काढायचंय,
तापवायचंय, चहा करायचाय….!

कप बशांचा आवाज…
नवरोबा उठलाय ….
पेपरबरोबर ठेवायचाय टेबलावर,
त्याच्यासाठीचा कोरा चहा कपभर
स्वत:साठीही घ्यायचाय एक घोटभर.,,
पेपरवर नजर फिरवयाचेय वरवर…
सावकाशीने वाचायचं, हेरून ठेवायचंय …!

मग फेसबुकवर..
कोणा कोणाचे बर्थ डे आज?
सगळ्यांना विश करायचंय…
व्हॉटस अॅपवर आलेली फुलांची बरसात ,
सोबतीला स्वामी- समर्थ, बुवा-बाबांच्या ,
प्रतिमांची खैरात, आभासी असली तरी
दिवसाची होते, शुभ सुरुवात…!

आंघोळ, देवपूजा..
मग सहज एक फेरी,
घामेजलेल्या मार्केटात…
नेहमीचीच फळे, नेहमीचीच भाजी,
त्यातल्या त्यात निवडायची
एखादी, वरवर वाटणारी ताजी….!

कमी तिखट, कमी तेलकट,
दोघांच्या पथ्य पाण्याचा
तोल सांभाळत  जेवण उरकायचं ….!!

बघता, बघता  सकाळची दुपार होते…
स्वैंपाकघर आवरता आवरता
खिडकीचा पडदा ओढल्यावर
दुपार जराशी निवांत होते..!

गाभाऱ्यात भर दुपारी
मंदावलेल्या  ज्योतीसारखी
दमलेली क्लांत दुपार,
अंग मोडून  मग,
जराsशी पहुडते…!!

प्रदीप अधिकारी

adhikaripradeep14@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
स्वयंचलित वाहन (Automobile) कसे चालते ?

 
तंत्रजिज्ञासा : १४

दीपक देवधर

मनुष्याने  निसर्गनियमांचा अभ्यास करून त्यांचा उपयोग करून आपले जीवन अधिक सुखकर कसे होईल याचा सतत प्रयत्न केला आहे. अगदी आदिम चाकाच्या शोधापासून ते अलीकडच्या सौर ऊर्जेपर्यंत. यातीलच  मूलभूत यांत्रिक उपकरणांची आणि संकल्पनांची ओळख आपण गेल्या काही लेखांमधून करून घेतली आहे. सुलभ यंत्रे, गियर आणि इंजिन यांचा मेळ घालून बनली स्वयंचलित वाहने. माणसाने स्वत:ला गती देण्यासाठी आधी इतर प्राण्यांचा वापर सुरू केला. सुरवातीला बैल, घोडा इ. पाळीव प्राण्यांवर बसून त्यांना पळवायला सुरवात केली. नंतर  चाक आणि आसावर एक बैठक घातली आणि ती बैठक या प्राण्यांना ओढायला लावली. ही स्वत: आरामात बसून एका जागेवरून दुसरीकडे जाण्याकरता बनवलेली, प्राथमिक वाहनव्यवस्था होती. जसजशी इतर यंत्रे शोधली गेली तसतशी ही वाहनव्यवस्था अधिकाधिक कार्यक्षम आणि आरामदायी बनत गेली आणि आजतर स्वयंचलित वाहने हा जगातील एक मोठा उद्योग बनला आहे.

पहिली माणसे वाहून नेउ शकणारी, चारचाकी गाडी ( कार ) इ.स १७६८ मध्ये निकोलस-जोसेफ क्युग्नोटने बनवली. ही वाफेवर चालणारी गाडी होती. अंतर्ज्वलन इंजिनावर चालणारी पहिली गाडी इ.स १८०७ मध्ये फ्रांस्वा आयझाक द रिवाजने बनवली. यात इंधन म्हणून हायड्रोजन वापरला जायचा. कार्ल बेंझने इ.स १८८६ मध्ये पेट्रोलवर चालणारी कार बनवली आणि ऑटोमोबाईल उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आता एकविसाव्या  शतकात विद्युत उर्जेवर चालणाऱ्या गाड्या रस्त्यावर येउ लागल्या आहेत. दुचाकी स्वयंचलित वाहनांचा प्रवास थोडा उशीरा सुरू झाला. इ.स १८८४ मध्ये इंग्लंडच्या एडवर्ड बटलरने पेट्रोलवर चालणारे अंतर्ज्वलन इंजिन असलेली पहिली दुचाकी ( खरे तर तिचाकी ) तयार केली. पुढे १८९४ मध्ये हिल्डेब्रांड आणि वुल्फम्युलर यांनी आताच्या दुचाकीच्या आद्य स्वरूपातील गाड्यांचे व्यावसायिक उत्पादन करायला सुरवात केली. दुचाकी असो व चारचाकी, गाडीचे इंधन बदलत गेले आहे, त्यातील सुखसोयी  वाढल्या आहेत, असंख्य बदल झाले आहेत आणि होत आहेत, पण ही गाडी चालण्याची यांत्रिक संकल्पना अजून तरी फार बदललेली नाही. हीच संकल्पना चित्र क्र. १ मध्ये दाखवली आहे.

चित्र क्र. १

चित्रात दाखवल्याप्रमाणे, गाडीच्या चलन यंत्रणेचे ( Driving Mechanism ) तीन मुख्य विभाग असतात. १. इंजिन २. क्लच आणि फ्लायव्हील ३. गियर यंत्रणा. यापैकी इंजिनाची माहिती आपण घेतली आहे. गाडी सुरू करताना आपण आधी इंजिन सुरू करतो.त्या वेळेला इंजिन आणि चाके यांच्यात संपर्क नसतो, त्यामुळेच इंजिन सुरू झाल्याबरोबर गाडी गती घेत नाही. क्लच ही यंत्रणा इंजिन आणि गियर यांच्यातील दुवा असते, जी आपल्याला हवे तेव्हाच इंजिन आणि गियर यांच्यातील संपर्क घडवून आणते. जेव्हा क्लच इंजिनाच्या संपर्कात असतो तेव्हाच इंजिनात तयार झालेले वर्तुळाकार चलन, क्रँकशाफ्टला जोडलेल्या भरीव चक्राद्वारे ( Flywheel ) क्लचकडे हस्तांतरित केले जाते. क्लचमधून येणारा दांडा गियर यंत्रणेला जोडलेला असतो. आपण निवडलेल्या गियर साखळीनुसार गियरचा दांडा फिरू लागतो. गियर यंत्रणेमधून पुढे येणारा दांडा ‘डिफरन्शियल’ व्यवस्थेमधून( चित्र क्र. २ ) गाडीच्या चाकांना जोडलेला असतो. डिफरन्शियलमध्ये असलेले बिव्हेल गियर, गतीची दिशा बदलण्याचे काम करतात आणि त्यांना जोडलेल्या दांड्यांना असलेली चाके फिरवू लागतात. अशा रीतीने इंजिनात तयार झालेली यांत्रिकी उर्जा गाडीला गती देते.

चित्र क्र. २

ही यंत्रणा कशी चालते, ते जरा अधिक तपशीलात पाहू.

वर सांगितल्याप्रमाणे इंजिनानंतर येणारा दुसरा महत्वाचा भाग म्हणजे फ्लाय व्हील आणि क्लच. फ्लाय व्हील इंजिनातील क्रँकशाफ्टला मिळालेली वर्तुळाकार गतिज उर्जा साठवण्याचे काम करते आणि जेव्हा क्लच जोडला जातो तेव्हा सातत्य असलेली गती पुरवते. क्लच, इंजिनाला पुढच्या गियर यंत्रणेपासून हवे तेव्हा अलग करण्याचे काम करतो. हे केल्यामुळे इंजिन चालू असतानासुद्धा गाडीची चाके स्थिर राहतात. हे कसे होते चित्र.क्र. ३ आणि ४ मध्ये दाखवले आहे.

 

चित्र क्र. ३

 

चित्र क्र. ४

  

चित्र क्र. ३ मध्ये दाखवल्याप्रमाणे क्लचची चकती फ्लाय व्हीलवर दाबून धरलेली असते. हा दाब, त्या चकतीवर असलेल्या दुसऱ्या चकतीमार्फत क्लचमधील यंत्रणा देत असते. जेव्हा क्लचची पट्टी मोकळी असते तेव्हा फ्लाय व्हील आणि गियर यंत्रणा जोडलेली असते. जेव्हा क्लच दाबला जातो, तेव्हा चित्र क्र. ४ मध्ये दाखवल्याप्रमाणे क्लच चकती वर दाब देणारी चकती, मागे सरकते आणि क्लच चकती फ्लाय व्हीलपासून मोकळी होते आणि इंजिनाचा गियर यंत्रणेशी संबंध रहात नाही. त्यामुळेच गाडी सुरू करताना अथवा गियर बदलताना क्लच दाबावा लागतो. गाडी जेव्हा न्युट्रल गियरमध्ये असते तेव्हाही क्लच इंजिनाला जोडलेलाच असतो पण गियर यंत्रणेतील दांडा त्यावेळी फिरत नसल्याने चाके फिरत नाहीत.

थोडक्यात सांगायचे म्हणजे स्वयंचलित वाहनामधील क्लच म्हणजे विद्युत परीपथातील बटण किंवा खटका. जेव्हा बटण चालू असते तेव्हाच दिवा लागतो.

गियर यंत्रणेत काय होते ते चित्र क्र. १ आणि २ मध्ये दाखवले आहे. गियर यंत्रणा एका डब्यात बंद केलेली असते कारण गियर फिरताना तसेच बदलताना तयार होणारी उष्णता, विरेचन होण्यासाठी या डब्यात तेल भरलेले असते. चित्रात दाखवल्याप्रमाणे या यंत्रणेत एक मुख्य दांडा (Main Shaft), उप दांडा (lay shaft), कुत्रा (Dog Clutch), गियर आणि निवड यंत्रणा असते. मुख्य दांड्यावरील गियर आणि उप दांड्यावरील गियर सतत एकमेकांना जोडलेले असतात आणि फिरत असतात. मुख्य दांड्यावरील गियर त्या दांड्याच्या थेट संपर्कात नसतात कारण गियर आणि दांडा यामध्ये बेअरिंग असते. त्यामुळे जोपर्यंत गियर निवडला जात नाही तोपर्यंत मुख्य दांडा फिरत नाही आणि चाके स्थिर राहतात. गियर निवड यंत्रणा, कुत्र्यामार्फत मुख्य दांड्यावरील गियर निवडते. कुत्रा मुख्य दांड्यावर बसवलेला असतो आणि तो डावीकडे/ उजवीकडे सरकवता येतो. उप दांडा इंजिनातून येणाऱ्या दांड्याशी जोडलेला असल्याने तो त्याच गतीने फिरत असतो. या वेळी गाडीची चाके स्थिर असल्याने चाकांना (आणि म्हणून मुख्य दांड्याला) सुरवातीला कमी गती पण अधिक टॉर्कची गरज असते, त्यामुळे उप दांड्यावरील गियर कमी दात्यांचा आणि मुख्य दांड्यावरील गियर जास्त दात्यांचा असतो. जेव्हा चालक एक पहिला गियर निवडतो तेव्हा मुख्य दांड्यावरील कुत्रा पहिल्या गियरला जोडला जातो, गियर मुख्य दांड्याला जोडला जातो आणि त्या गियरच्या गतीने मुख्य दांडा आणि नंतर चाके फिरू लागतात. चित्र क्र. ५ मध्ये पहिला गियर निवडला आहे त्यामुळे त्यावेळी असणारी गती हस्तांतरण करणारी  साखळी या चित्रात दिसते.

चित्र क्र. ५

चित्र क्र. ६

चित्र क्र. ६ मध्ये पाचवा गियर निवडल्यानंतर असणारी स्थिती दाखवली आहे. यावेळी मुख्य दांडा जास्तीत जास्त गतीने फिरणे आवश्यक असल्याने दोन्ही दांड्यांवरील गियर जवळपास सारखेच असतात त्यामुळे कमीत कमी टॉर्क आणि जवळपास इंजिनाच्याच गतीने मुख्य दांडा फिरवता येतो. गाडी मागे घ्यावयाची असल्यास चाके उलटी फिरणे आवश्यक असते. त्यासाठी उप दांडा आणि मुख्य दांडा यामध्ये एक गियर टाकून चाकांकडे जाणाऱ्या गतीची दिशा बदलली जाते.

बहुतेक दुचाकी  वाहनामध्ये(आणि काही चार चाकी वाहनांमधेही)  आता, गियर टाकावे लागत नाहीत तर ते वेगाप्रमाणे आपोआप बदलले जातात, असाही पर्याय उपलब्ध आहे. या यंत्रणेला सतत बदलणारे पारेषण(कंटिन्यूअसली व्हेरिएबल ट्रान्समिशन-CVT) म्हणतात. चित्र क्र. ७ मध्ये याचे संकल्पना चित्र दाखवले आहे. या यंत्रणेत दोन दुभागलेल्या (split) पुली एका पट्ट्याने जोडलेल्या असतात. पुलीची आतील बाजू तिरकी असते. एक पुली (फिरवणारी –Drive pully) क्लचमार्फत इंजिनाला जोडलेली असते तर दुसरी (फिरणारी –Driven pully )मागच्या चाकाला जोडलेली असते. जेव्हा इंजिन चालू करून वेगाने फिरायला लागते तेव्हा क्लच, इंजिनाला जोडला जातो आणि त्याला जोडलेली पुली फिरू लागते. वेगाच्या प्रमाणात या पुलीच्या दोन भागातील अंतर कमीजास्त होत जाते (चित्र क्र. ८ ) आणि पट्टा त्या प्रमाणात वरखाली होत जातो. त्यामुळे चाकाला जोडलेल्या फिरणाऱ्या  पुलीवरील पट्ट्याचे स्थानही बदलत जाते आणि आवश्यक  तो वेग आणि टॉर्क इंजिनाकडून चाकाला पारेषित केला जातो. इंजिनाचा वेग बदलण्यासाठी त्यात येणाऱ्या इंधनाचा पुरवठा कमी जास्त करण्याचे काम, अॅक्सिलरेटर नावाची यंत्रणा करत असते. इंजिनाच्या वेगानुसार या यंत्रणेतील क्लच काम करतो. चित्र क्र. ९ दाखवल्याप्रमाणे या क्लचमध्ये त्याच्या आतल्या बाजूची कड तीन/चार  भागात विभागलेली असते आणि त्यावर  पट्ट्या (pads) असतात. जेव्हा इंजिन फिरू लागते तेव्हा वर्तुळाकार चलनामुळे तयार होणाऱ्या अपकेंद्री (Centrifugal) बलामुळे हे आतील कडेचे भाग बाहेरच्या बाजूला सरकतात आणि त्यावरील पॅड बाहेरील चकतीला चिकटतात .ही चकती फिरवणाऱ्या पुलीशी जोडलेली असल्याने, हा संपर्क प्रस्थापित झाल्याबरोबर फिरणाऱ्या पुलीला गती मिळते आणि CVT यंत्रणा सुरू होते.

चित्र क्र. ७

 
 

चित्र क्र. ८

चित्र क्र. ९

 

चारचाकी किंवा दुचाकी  वाहन आता नुसत्या यांत्रिकी व्यवस्थापनावर चालणारे वाहन राहिले नसून अनेक विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सहाय्याने चालणारे यंत्र झाले आहे आणि माणूस त्यात आजही नवनवीन सोयींची भर टाकतच आहे.

–  ©️ दीपक देवधर
dpdeodhar@gmail.com

( लेख व चित्रे : दै. ‘लोकसत्ता‘मधील ‘तंत्रजिज्ञासा’ सदर तसेच याच नावाच्या लाटकर प्रकाशनाने २०१७ मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकावरून साभार पुनःप्रसिद्ध )

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

लक्षणीय

संजय केतकर


आचार्य जावडेकर

महात्मा गांधींच्या विचारांना प्रतिष्ठा व मान्यता मिळवून देण्याची कामगिरी ज्यांनी समर्थपणे बजावली, त्यात आचार्य जावडेकरांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. आपल्या ओजस्वी लेखनामुळे आचार्य महाराष्ट्रातील अग्रगण्य विचारवंतांमध्ये गणले जातात.

शंकर दत्तात्रेय  जावडेकर ( आचार्य ) यांचा जन्म २६ डिसेंबर १८९४ रोजी मलकापूर येथे झाला. त्यांचे वडील विशाळगड संस्थानच्या राजेसाहेबांच्या नोकरीत होते. आचार्य दोन वर्षांचे असतानाच त्यांच्या मातोश्री वारल्या.आचार्यांचे इंग्रजी सहावीपर्यंतचे शिक्षण कोल्हापूरच्या खाजगी हायस्कुलमध्ये आणि मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कुलमध्ये झाले. डेक्कन कॉलेजमधून राजकारण आणि तत्त्वज्ञान हे विषय घेऊन ते बी. ए. झाले. एम. ए. साठी त्यांनी मुंबईच्या विल्सन कॉलेजात नाव दाखल केले; पण महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून, अभ्यासक्रम पूर्ण न करता, ते स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले. त्यांनी राष्ट्रकार्याला वाहून घेण्याची शपथ घेतली.

आगरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, टागोर यांचा आपल्या मनावर फार मोठा परिणाम झाला असल्याचे आचार्यांनी नमूद केले आहे. ‘राज्यनीती शास्त्र परिचय’ हे त्यांचे पहिले पुस्त्रक १९३६ साली प्रसिद्ध झाले. या पुस्तकाचे उदंड स्वागत झाले. तेव्हापासून शंकरराव जावडेकरांना, समाज ‘आचार्य जावडेकर’ या नावाने संबोधू लागला.

इस्लामपूरला गेल्यावर त्यांनी पेढ या गावी हरिजन मुलांसाठी एक वसतिगृह सुरू  केले. त्याचे नाव ‘महात्मा वसतिगृह’ असे ठेवण्यात आले. इस्लामपूरला स्थायिक झाल्यावर आसपासच्या खेड्यात ते काँग्रेसचा प्रचार करत असत. १९३० साली गांधीजींच्या सत्याग्रहात ते सामील झाले. शिरोड्याच्या सत्याग्रहात त्यांना सजा झाली व रत्नागिरीच्या तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले. पुण्याच्या ‘पर्वती’ सत्याग्रहाला आचार्यांचा पूर्ण पाठिंबा होता. ‘अस्पृश्यता निवारण’ या शद्बप्रयोगाऐवजी ‘अस्पृश्यता निर्मूलन’ हा शब्दप्रयोग करावा, असा त्यांचा आग्रह होता. ‘निवारण’ तात्पुरते दूर करणे असते, असे ते म्हणत.

राष्ट्रीय शिक्षणाच्या वैचारिक बाबतीत आचार्यांची उल्लेखनीय कामगिरी म्हणजे त्यांनी तयार केलेला अभ्यासक्रम. टिळक महाराष्ट्र विद्यापीठासाठी त्यांनी तो केला होता. इतिहास, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, राजकारण, समाजशास्त्र या विषयांचा समावेश त्यात करण्यात आला होता.

आचार्यांचे साहित्य हे मराठी साहित्याचा एक अमूल्य ठेवा आहे. १९३८ साली प्रसिद्ध झालेला ‘आधुनिक भारत’ हा त्यांचा ग्रंथ अतिशय गाजला.

स्त्री-पुरुष समानतेच्या विचारसरणीला आचार्यांनी नेहमी पुरस्कृत केले. आपल्या हक्कांबरोबरच दुस-यांच्या हक्कांची जपणूक झाली पाहिजे, असे ते म्हणत. स्त्रियांना शिक्षण मिळालेच पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. १० डिसेंबर १९५५ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

संजय केतकर
[ ‘महाराष्ट्र टाइम्स‘ – शतकाच्या पाऊलखुणा – १४ मे २००० वरून साभार. ]

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

महाराष्ट्राला चिरस्मरणीय अशा काही विभूति

भाग ३१

शतकापूर्वीच्या काही ज्ञात, अज्ञात तसेच विस्मृतीत गेलेल्या विभूतींचा थोडक्यात सचित्र परिचय. मासिक ‘मनोरंजन’च्या दिवाळी अंक १९१० मधून साभार पुनःप्रसिद्ध.

(९३) यशवंत वासुदेव आठल्ये 

[ स. १८५१ – १८९४ ]

क-हाडे ब्राह्मण; जन्म रत्नागिरी येथें ८ जून १८५१; मराठी व इंग्रजी शिक्षण रत्नागिरी येथें होऊन पुढें एल्फिन्स्टन कॉलेजांतून १८७० सालीं हे एम्. ए. झाले; हे भगवानदास स्कॉलर होते; १८७५ त एल्. एल्. बी. होऊन त्याच्यापुढील वर्षीं मुंबई हायकोर्टात यांनी वकिली सुरू केली; मुंबईस असतांना  अनेक सार्वजनिक संस्थांत व चळवळींत यांचे प्रमुखत्वानें अंग होतें; १८७७ साली यांना बडोदें संस्थानांत डिस्ट्रिक्ट जज्ज नेमिलें; १८९२ सालीं नायब दिवाण झाले; बडोदें  संस्थानांत यांनी अनेक उपयुक्त कामें केलीं; कलाभवन, सयाजी ज्ञानमंजुषा, इत्यादी महत्त्वाच्या संस्था यांची स्मारकें होत; हे चांगले लेखक व शोधक होते; स्वभाव मनमिळाऊ, निगर्वी, अत्यंत निस्पृह व निरालस होता; मृत्यु २९ मार्च १८९४.
(९४) विष्णु गोपाळ आपटे 
[ स. १८५१ – १८९९ ]
कोंकणस्थ ब्राह्मण; जन्म १८ सप्टेंबर १८५१; मराठी व इंग्रजी शिक्षण धारवाड व कोल्हापुर; राजाराम हायस्कुलांतून १८७३ सालीं मॅट्रिक झाल्यावर आलफ्रेड स्कॉलरशिप मिळवून मेडिकल कॉलेजांत गेले; १८७८ सालीं हे पहिल्या वर्गांत एल्. एम्. अँड एस्. झाले; याच सुमारास धारवाडास काल-याचा उपद्रव सुरू होता, त्या वेळीं यांनी आपण होऊन तेथील डाक्टरांस चांगली मदत केली; त्यामुळें सरकाराने यांना हावेरी येथें २०० रुपयांवर असिस्टंट सर्जन नेमिलें; तेथें ४ वर्षें नोकरी केल्यानंतर रिजन्सीच्या कारकिर्दीत १८८३ सालीं हे कोल्हापुरास असिस्टंट दरबार सर्जन झाले; अखेरपर्यंत याच हुद्द्यावर होते; धंद्यांत अत्यंत निष्णात असल्यामुळें व शांत, निराभिमानी आणि परोपकारी स्वभावामुळें हे सर्वत्र अत्यंत प्रिय झाले होते; यांनी ग्रामवैद्य, प्रसूतिचिकित्सा व न्यायवैद्यक हीं पुस्तकें लिहिलेलीं आहेत; जन्मतःच यांचा कल परमार्थाकडे होता; त्यांतून कांही कौटुंबिक दुःखामुळें संसारविरक्ति होऊन यांचें लक्ष परमार्थाकडें विशेष लागलें होतें; मृत्यु २९ जुलै १८९९.
(९५) नारायण बापूजी कानिटकर 
[ स. १८५२ – १८९७ ]
कोंकणस्थ ब्राह्मण; जन्म पुणें येथें सन १८५२; मराठी शिक्षण पुण्यास व इंग्रजी शिक्षण मुंबईस एल्फिन्स्टन हाय स्कुल व कॉलेजमध्ये झालें; १८६८ सालीं म्याट्रीकची परीक्षा व १८७६ सालीं वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले; नंतर पुण्यास वकिली करूं लागले; शेवटची ७/८ वर्षें हे चिंचवड संस्थानचे ट्रस्टी होते; हे नामांकित लेखक व नाटककार होते; यांनी सामाजिक व ऐतिहासिक मिळून १२ नाटकें लिहिलीं; त्यांपैकी शिवाजी, सरदार बाजी देशपांडे, बाजीराव मस्तानी, व राजाराम हीं विशेष प्रसिद्ध आहेत; सामाजिक सुधारणेवर यांनी शस्त्र  उचललें होतें; तरुणी शिक्षण नाटिका; शीघ्रसुधारणा दुष्परिणाम, सम्मती  वयाच्या कायद्याचे नाटक वगैरे प्रहसनें लिहून सुधारकांची टर उडविण्याचा यांनी प्रयत्न केला आहे; मृत्यु २५ जुलै १८९७.
क्रमशः ]
– अज्ञात
[ ‘मनोरंजन‘ दिवाळी अंक १९१० वरून साभार पुनःप्रसिद्ध ]
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
प्रकाशचित्रकारांचे दालन
– ©️ आशिष नाईक  
८८९८८ ८५९१५
a22p2n@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@
हत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@

केकी मूस “एक अवलिया”

अ‍ॅड. क्रांती आठवले-पाटणकर

भाग ६

केकी मूस यांनी काढलेल्या  “उमर खय्याम आणि प्रेयसी” या चित्राला एक विशेष अर्थ आहे, असं मला वाटतं.


उमर खय्याम हा ११ व्या शतकातील पर्शियातील खगोलशास्त्रज्ञ, गणिती आणि कवी होता. त्याच्या रुबाया जगप्रसिद्ध आहेत. त्यातील अनेकदा उधृत केली जाणारी ही एक रुबाई (इंग्रजी अनुवाद : फिट्ज़जिराल्ड) :-

A Book of Verses underneath the Bough,
A Jug of Wine, a Loaf of Bread — and Thou
Beside me singing in the Wilderness —
Oh, Wilderness were Paradise enow!

(उमर खैयाम यांच्या या सुप्रसिद्ध रुबाईचा अनुवाद. बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर (हंस: दिवाळी १९४७)

“तेथे वृक्षस्थळी मज पुरे भागही भाकरीचा
दारू पेलाभर रुचिरसा ग्रंथ काव्यामृताचा
आणि संगे प्रणयघन तू निर्जनी स्वैय गाया
त्या स्थानाचा क्षणी मग करू स्वर्ग साचा

ह्याच रुबाईचा माधव ज्युलीयन यांनी केलेला भावानुवाद !

ह्या इथे तरुतळी, एक वही कवितेची
भाकरी एक अन सुरई एक सुरेची
आणखी एक तू गात जवळ घ्या बिजली
ते रान न मग ते नंदनवन ते हेची !

ही रुबाई, केकींच्या “उमर खय्याम आणि प्रेयसी” या चित्रामागची प्रेरणा असावी .
“शेक्सपिअरची पर्णकुटी ”, “3D निसर्गचित्र” ही चित्रं प्रत्यक्ष अनुभव घेण्यासारखी  आहेत. 3D निसर्गचित्रातली खोली (depth) इतकी अप्रतिम आहे की नजर खिळून रहाते.

तिथे आणखी एक चित्र आहे. ते “जहांगीर आणि नूरजहाँ” यांचे आहे अशी माहिती मिळाली.

मला ते ‘सलीम-अनारकलीचे’ वाटते….

“storm”( झंझावात ) हे आणखी एक अप्रतिम चित्र. या चित्रात, वादळ दाखवलं आहे आणि त्या तुफान वादळात हेलकावे खात, पण ताठ उभं असलेलं झाड आहे.

ते पाहून, जीवनात अनेक आघात सोसूनही कलेची साथ न सोडणारे आणि प्रेयसी येईल की नाही, याबाबत शाश्वती नसताना, अनेक वर्षे तिची वाट पाहणारे, केकीच मला त्यात दिसले.

केकीच्या कलादालनात प्रवेश केल्यावर तेथील एक प्रकारच्या गूढ वातावरणाने मी भारली गेले… त्या वास्तूबाहेरच्या जगाचे भान विसरले… एका वेगळ्याच विश्वात प्रवेश केला आहे असं वाटलं … केकींचा अर्धपुतळा मुख्य दालनाच्या मध्यभागी आहे. त्याच्या सभोवती फोटो आणि पेंटिंग्ज मांडली आहेत. ती पाहात असताना, मध्यभागी असलेल्या केकिंची नजर सतत माझ्याकडे आहे, असा भास होत होता. ह्या वास्तूमध्ये मला अद्भुत शांती  जाणवली… आपलेपणा जाणवला.

मला त्यांचं कार्य जाणून घेण्याची इतकी ओढ का वाटत होती, हे त्यांचं कलादालन पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं. मी किंचित चित्रकार आहे. चित्रकलेचं औपचारिक शिक्षण मी घेतलेलं नाही.. केकींनी काढलेलं शंकर आणि पार्वतीचं एक चित्र कलादालनात मांडलेलं आहे. त्याच प्रकारचं, अ‍ॅक्रलिक रंगात रंगवलेलं चित्र मी देखील दोन वर्षांपूर्वी काढलं आहे. (मी काढलेलं चित्र जोडलं आहे)…. हा विलक्षण योगायोग आहे असं मला वाटलं.

फोटोग्राफीतले बारकावे मला कळत नाहीत परंतू ,ते कसं तयार केलं याचं वर्णन एकूण थक्क व्हायला झाले. तसेही “life and still life” या पुस्तकात ते वर्णन मी वाचलेलं आहे. त्यात केकींची सेल्फ पोट्रेट आहेत, ज्यात आचार्य अत्रे यांच्या “कवडीचुंबक” नाटकातील “पंपूशेट” आहे , lawyer at defense आहे , artist at work आहे. बालगंधर्वांनी केकीची कला पाहून म्हटलं  तुम्ही “केकी मूस” नाही , तर “गोल्ड मूस” आहात. (सोन्याला चमक आणण्यासाठी मुशीत घालतात त्या अर्थी वापरलेला शब्द )

आता थोडसं आगळ्या वेगळ्या फोटोंबाबत……

“The witch of Chalisgaon” या फोटोला “बेल्जियम फाईन आर्ट सोसायटीचे” गोल्ड मेडल मिळालं. या फोटोचा उल्लेख याआधी आला आहेच.. याबाबतचा एक किस्सा असा आहे की फोटो पाठविण्याची मुदत संपत आली तरीही मनाजोगे मॉडेल केकीना मिळेना. त्यांनी देवाकडे प्रार्थना केली की एक मॉडेल पाठवून दे. आणि काय आश्चर्य ! दुसऱ्या दिवशी सकाळी केकी त्याच्या घराच्या व्हरांड्यात केस पुसत होते. तेथून जाणारी एक म्हातारी, त्यांचा पायघोळ झगा पाहून त्यांना वैद्य/हकीम समजली आणि औषध मागायला बंगलीत शिरली. केकींना हवं असलेलं मॉडेल त्यांना गवसलं आहे हे त्या म्हातारीला पाहून केकींच्या लक्षात आलं. केकींनी तिच्या ४ आण्याच्या मोळीचे तिला ५ रुपये दिले आणि फोटो काढण्यासाठी तयार केलं. गच्चीवर नेऊन तिचे जवळजवळ ४० फोटोग्राफ घेतले आणि नंतर आपल्या डार्करूममध्ये अखंड २४ तास खपून त्यातील एक फोटो स्पर्धेत पाठविला. त्याला गोल्ड मेडल मिळालं.

अशाच प्रकारे, एक घोडा पाणी पित आहे आणि त्याचबरोबर आपल्या खुराने पाणी उडवीत आहे, असा एक फोटो आहे…

पण म्हणतात ना, घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं  पण त्याला पाणी पाजता येत नाही.. ते त्याचं त्यानंच प्यायचं असतं.  केकींच्या डोक्यात ह्या फोटोबाबतची संकल्पना स्पष्ट होती. घोडा पाणी पित आहे.. त्यामुळे पाण्यात तरंग उमटले आहेत.. त्याचबरोबर, घोडा पाणी पिताना आपल्या एका खुराने पाणी उडवीत आहे….  आता घोडा आपल्या मर्जीने थोडंच पाणी पिणार किंवा उडविणार आहे !! हा फोटो मनासारखा मिळवण्यासाठी त्यांनी चाळीसगावजवळच्या “वालझरी” येथील ओढ्यात तब्बल ४० दिवस प्रयत्न केले. अखेर त्यांच्या दीर्घ प्रतीक्षेला आणि संयमाला यश आलं … आणि एक अप्रतिम असा फोटो निघाला. या त्यांच्या फोटोला Eastman Kodak Company of England यांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं आणि त्या कंपनीने ते खरेदीही केलं . याच कंपनीचं प्रसिद्ध पुस्तक “How to make good pictures” यात या फोटोचा समावेश आहे. (मात्र पुस्तकाच्या कुठच्या एडिशनमध्ये ते प्रसिद्ध झालं याबाबत माहिती मिळू शकली नाही)

हे चित्र खूपच गाजलं .. जळगावचे प्राध्यापक श्री. शरद छापेकर यांनी खूपच छान आणि वेगळी माहिती दिली. १९४२ पासून *बालबोध वाचनमाला* या नावाचं मराठी पुस्तक काढलं जात असे. प्रा. शरद छापेकर यांचे आजोबा ल.नी.छापेकर, हे संपादक मंडळात होते. ते १९४२ ते १९५६ या दरम्यान आनंदीबाई बंकट शाळेत मुख्याध्यापक होते. चित्रशाळा प्रकाशन,पुणे यांनी १९५३च्या सुधारलेल्या नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे मंजूर, इयत्ता सहावीसाठी काढलेल्या पुस्तकात या घोड्याच्या फोटोवर आधारित एक धडा आहे. त्यात हा फोटो छापला आहे आणि फोटोचं वैशिष्ट्य नमूद करून मुलांना, त्यावर आधारित स्वाध्यायही दिला आहे. आणखी एका पुस्तकात केकिंचा “कोंबड्यांची झुंज” हा फोटो आहे, तसेच साधारण १९७७-७८ च्या दरम्यान प्राध्यापक छापेकर यांनी केकींची आकाशवाणीवर मुलाखत घेतली होती, अशीही माहिती त्यांनी दिली.

टेबलटॉप फोटोसाठी जे मॉडेल “तयार” करायचं आहे, ते प्रथम त्यातील बारकाव्यानिशी “दिसलं” पाहिजे. मग त्यासाठी आवश्यक त्या साहित्याची जमवाजमव करायची.त्यानंतर त्याला योग्य अशी प्रकाशयोजना करायची. प्रकाश हा याचा मुख्य नायक असतो. खूप कष्टप्रद काम आहे हे. अशा   त-हेची मांडणी करून त्याचा फोटो काढला जातो. केकींचे काही टेबलटॉप फोटो पाहाताना असं वाटतं की ते फोटो प्रत्यक्ष त्या जागेवर जाऊन काढले आहेत. प्रत्यक्षात ते टेबलावर तयार केलेलं मॉडेल आहे. ही एक प्रकारची fake photography आहे. केकींच्या बाबतीत विशेष म्हणजे ते घराच्या बाहेरच पडत नसत. काही वेळा त्यांच्या काही परिचित व्यक्ती, केकींना हव्या त्या वस्तू आणूनही देत असत. तरी एकंदरीत त्यांच्याकडील तुटपुंज्या सामानातूनच केकींना हे फसवं चित्र उभं करावं लागे..

केकींचं  कौशल्य, त्यांची vision आणि त्यांची मेहनत पाहून अचंबित व्हायला होतं !

त्यांचा एक ‘Winter’ नावाचा एक फोटो आहे. याचा उल्लेख अनेक ठिकाणी केला आहे.  मीठ, वाळू, भुसा, कापूस, वाळलेल्या काड्या आणि त्यावर टाकलेला धुरकट प्रकाश, यातून त्यांनी साकारलेला काश्मीरमधील हिवाळा अप्रतिम….

सुप्रसिद्ध नृत्यांगना/अभिनेत्री पद्मिनी, ग्रामोफोनच्या तबकडीवर आणि मंदिरात नृत्य करत आहे, असे दोन्ही फोटो निव्वळ लाजवाब. यात पद्मिनीचा आणि मंदिराचा कटआउट वापरण्यात आला आहे हे सांगूनही खरं वाटत नाही.

केकीनी निर्जीव वस्तूंची कलाकुसरीने मांडणी करून त्यांना  सजीवता दिली.

एकंदर सगळ्याच कलाकृती सुरेख आहेत आणि त्यामागील केकींची भावना, विचार आणि त्यांनी घेतलेले कष्ट, हे सारं ऐकताना डोळे पाणवतात. मी तर हे सगळं पाहून थक्कही झाले आणि सुन्नही झाले. हा कलाकार उगाच भारतात जन्माला आला असं  वाटलं.

आता केकींच्या काष्ठशिल्पाबाबत….

मला आवडलेली आणखी एक कलाकृती म्हणजे “इटर्नल बाँडेज” हे काष्ठशिल्प. केकींना त्यांच्या बंगलीच्या आवारात एक सुकलेलं बोरीचं झाड दिसलं. त्यात त्यांना दोन माणसे “दिसली”. केकीनी त्या झाडाच्या खोडातून वर आलेल्या फांद्याना, ‘त्या दोघांनी त्यांचे चार हात आभाळाकडे केले आहेत’ या आकारात छाटले. मग त्याच्यात साखळ्या अडकवल्या. म्हणजे ते संसारिक बंधनात अडकलेले आहेत, असं त्यांना सुचवायचं आहे. यातून साकार झाली ती “इटर्नल  बाँडेज” नावाची एक अप्रतिम कलाकृती. स्त्री–पुरुष यांच्या एकरूपतेचं दर्शन यातून केकींनी साकारलं आहे. त्यांची डोकी आणि हात जरी स्वतंत्र असले तरी त्यांचा देह एकच आहे.त्यातून केकींना असे सूचित करायचं आहे की व्यक्तिमत्वं भिन्न असली तरी त्यांचं मन एक आहे. पोटाची खळगी एकच दाखवली असल्याने त्यांचं दु:खही एकच आहे. आणि दोघेही एकरूप होऊन आपापले दोन हात उंचावून परमेश्वराकडे सुखाची प्रार्थना करत आहेत.

इथे केकींची कमालीची सर्जनशीलता दिसते.

(*क्रमश:* )

सर्व प्रकाशचित्रे  © केकी मूस फौंडेशन
(Copyright Disclaimer: under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use. )

–  © अ‍ॅड. क्रांती आठवले-पाटणकर
डोंबिवली.
*9969087559*

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आजची कविता 

वाहरू सोनावणे 

 

स्टेज 

आम्ही स्टेजवर गेलोच नाही

आणि आम्हाला बोलावलंही नाही

बोटाच्या इशा-यांनी –

आमची पायरी आम्हाला दाखवून दिली

आम्ही तिथेच बसलो

आम्हाला शाबासकी मिळाली

आणि ‘ते’ स्टेजवर उभे राहून –

आमचं दुःख आम्हालाच सांगत राहिले

आमचं दुःख आमचंच राहिलं

कधीच त्यांचं झालं नाही …

आमची शंका आम्ही कुजबुजलो

ते कान टवकारून ऐकत राहिले,

नि सुस्कारा सोडला

आणि आमचेच कान धरून

आम्हालाच दम  भरला –

माफी मागा; नाही तर …

– वाहरू सोनावणे 

( ‘गोधड‘ या काव्यसंग्रहातून आणि ‘संग्रहालय‘ जानेवारी १९८८ वरून साभार )

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

जीवन ही एक मारामारी आहे.

माझे न हसणारे वाचक : २
कै. वसंत सबनीस

 

कै. वसंत सबनीस ( ०६ डिसेंबर १९२३ – १५ ऑक्टोबर २००२)

कै. वसंत सबनीस यांची जन्मशताब्दी आजपासून सुरू होत आहे. त्या निमित्ताने त्यांच्याच लेखणीतून वाचक व प्रेक्षक यांच्याविषयी व्यक्त केलेले मनोगत साभार पुनःप्रसिद्ध करत आहोत. – सं.     

माणसाने कायदे तयार करून निरनिराळ्या गुन्ह्यांसाठी जबर शिक्षांची व्यवस्था केली तरी परमेश्वरानंही काही खास गुन्ह्यांना खास शिक्षा योजून ठेवल्या आहेत. जिथं माणसाचा कायदा पंगू ठरतो तिथं परमेश्वरानंच आपला कायदा लावला आहे. त्यांपैकी एक कायदा आणि त्याबद्दलची शिक्षा म्हणजे विनोदी लिहिल्याबद्दल विनोदी लेखकाला मधूनमधून न हसणारा वाचक किंवा प्रेक्षक भेटविणे  ही होय. ही शिक्षा किती भयंकर असते याची कल्पना इतरांना येणार नाही. करुण कथा किंवा कादंबरी अगर  नाटक लिहिणा-या लेखकाला, वाचकाच्या किंवा प्रेक्षकांच्या डोळ्यातून पाणी येतंय की नाही याचा बिनचूक अंदाज येत नसल्यामुळं तो सुखी असतो. (कारण पुष्कळसे वाचक व प्रेक्षक आतल्या आत रडतात म्हणे! ) अजून कादंबरी किंवा नाटकातील दुःखाला वाचकांनी व प्रेक्षकांनी मोठमोठ्यानं हुंदके देऊन किंवा गळा  काढून दाद देण्याची प्रथा सुरू  झालेली नाही. तशी प्रथा असती तर ‘हमखास ३०० हुंदके द्यायला लावणारे नाटक’, ‘पाचशे सव्वीस वेळा गळा  काढून रडायला लावणारी कादंबरी’, ‘सहा वेळा भांडंभर अश्रू आणणारी कलाकृती’ अशा नाटकांच्या जाहिराती झळकल्या असत्या. पण तसं नसल्यामुळं वाचक वा प्रेक्षक कमीजास्त रडले तरी लेखकाला यातना होत नाहीत. पण विनोदाला वाचक वा प्रेक्षक हसला नाही तर लेखकाला रडावंसं  वाटतं. आणि प्रत्येक विनोदी लेखकावर अशी रडण्याची पाळी मधूनमधून येते आणि ती शिक्षा म्हणून भोगावीच लागते. त्याला इलाज नसतो.

मीही थोडंफार  विनोदी लिहीत असल्यामुळं ही शिक्षा माझ्याही वाट्याला आलेली आहे. विशेषतः जीवन ही एक भयंकर मारामारी आहे असं समजून गंभीरपणानं  जगणा-या लोकांना ब्रह्मदेवसुद्धा हसवू शकत नाही, तिथं आमच्यासारख्या पामर विनोदी लेखकाची काय कथा ?

माझे एक वृद्ध नातेवाईक एकदा माझ्याकडे आले होते. त्याच वेळी माझा भाचाही आला होता. तो कॉलेजचा विद्यार्थी होता. त्यानं सहज माझ्या कपाटातील एक पुस्तक काढलं आणि तो वाचत बसला. काही लोकांना दुःखाचे प्रसंग शांतपणे वाचणं जसं  अशक्य असतं तसा  काही लोकांना विनोदही मोठ्यानं न हसता पचवणं अवघड असतं. मग लहानसा जरी विनोद असला तरी ते पोट  धरधरून हसतात. वाचता वाचता उसळतात. माझा भाचा त्यांपैकी होता. तो वाचता वाचता खूप मोठ्यानं हसत होता. मध्येच लोळत होता. लोळता लोळता पुन्हा हसत होता. असा त्याचा कार्यक्रम बराच वेळ चालू होता. वृद्ध नातेवाईक तिथंच शेजारी वर्तमानपत्र वाचीत बसले होते. त्यांनी सात आठ  वेळा भाच्याच्या लोळण्याकडे व हसण्याकडे नजर लावून पाहिलं. शेवटी ते ओरडून त्याला म्हणाले, “मुर्खा ! उगीच काय गाढवासारखा खिदळतोस ?”

“अहो, मी उगीच खिदळत नाही. या पुस्तकातल्या विनोदामुळं हसतोय,” भाचा म्हणाला.

“विनोद झाला म्ह्णून काय एवढ्यानं हसायचं ?”

“हसू आवरत नाही — ”

“मूर्ख आहेस. आण बघू इकडे ते पुस्तक !”

असं म्हणून त्यांनी भाच्याच्या हातातलं पुस्तक घेतलं आणि तो जी पानं वाचून खिदळत होता तीच पानं त्यांनी अत्यंत गंभीरपणे, चेहऱ्यावरील सुरकुती न हलवता वाचली. पुस्तक परत दिलं आणि देताना म्हणाले, ” घे … तो लिहिणारा गाढव आणि तू वाचणाराही त्याचाच भाऊ… काही एक हसण्यासारखं नाही त्यात .. ” असं म्हणून शांतपणानं ते वर्तमानपत्राकडे वळले. ते पुस्तक माझं आहे हे त्यांनी बघितलं नव्हतं. ते त्यांनी पाहिलं असतं तर कदाचित मला निदान त्यांनी गाढवाच्या पंक्तीला बसवलं नसतं. मी हा सर्व प्रकार आतल्या खोलीतून पाहत होतो. हे पुस्तक माझं आहे असं  पुढं जाऊन सांगायचं धाडस काही मला झालं नाही.

दिवाळी अंक खूप लोक वाचतात. अशी ज्या काळात माझी समजूत होती, त्या काळात लोकल गाडीत कुणी दिवाळी अंक वाचताना दिसला की तो कुठली गोष्ट किंवा लेख वाचतो आहे, हे पाहण्याची मला हमखास उबळ यायची. सर्व लेखकाचं असंच होतं की काय हे मला माहीत नाही. पण त्या वेळी मला असं वाटायचं आणि मी गर्दी चुकवण्याचा बहाणा करीत त्या वाचकाजवळ जाऊन पोचायचा आणि त्याच्याजवळच्या खिडकीतून कुतूहलाने बाहेर बघण्याची बतावणी करीत हळूच तो कुठली गोष्ट वा लेख वाचतो ते बघायचा. बहुतेक वेळा निराशाच पदरी यायची.

एक दोन वेळा तर चक्क अशा वाचकाने माझ्या विनोदी लेखाची पानं जाहिरातीच्या पानांसारखी त्यांकडे ढुंकूनही न पाहता, उलटली. मला अनावर इच्छा झाली की ओरडू सांगावं , “अरे, शहाण्या, चांगला विनोद तू डावलतो आहेस !” पण गप्प बसलो. एकदा मात्र ही तपश्चर्या फळाला आली आणि एक वाचक माझा विनोदी लेख वाचत असताना रेडहॅन्डेड सापडला. एक वाचक आपला लेख वाचतो आहे आणि आपण त्याच्या पाठीमागे उभे आहोत ही कल्पनाच रोमांचकारी होती. आपण शिवलेले कापडे घातलेल्या नवरदेवाकडे शिंप्यानं बघावं तसा मी त्या वाचकाकडे पाहत होतो. कारण असा अनामिक वाचक भेटणं ही लेखकांच्या आयुष्यातील एक अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट असते. आणि तोही प्रत्यक्ष वाचत असताना.

मी एकाग्र चित्ताने त्या वाचकाच्या चेहऱ्यावरील भाव निरखत होतो. कुठल्या ठिकाणी कुठला विनोद आहे याची मला पूर्ण कल्पना होती. तो कुठं स्मित करणार, तो कुठं खुदकन हसणार, आणि कुठे अनावर हसणार याचा मला पूर्ण अंदाज होता. म्हणून मी त्या जागा येण्याची वाट पाहत होतो. बराच वेळ झाला तरी तो कुठंही हसेना. मी वाट पाहतोय. तो वाचतोय. त्यानं एक [पान  उलटलं. हसण्याचं नाव सोडा, उलट त्यानं एक मोठी जांभई दिली आणि पुन्हा मान खाली घालून वाचू लागला. निदान शेवटच्या भागात तरी दोनतीन जागा अशा होत्या की तिथं तो हमखास हसला असता. मी पुन्हा वाट बघू लागलो. तो अजिबात हसेना. अशीच दहा पंधरा मिनिटं गेली. मला त्याचा राग यायला लागला.  मी अधिक बारकाईने त्याच्याकडं पाहिलं. तर तो चक्क झोपला होता. मांडीवर मासिक उघडं  पडलं होतं — माझा विनोदी लेख केविलवाणा दिसत होता. आणि माझी अत्यंत करुणाजनक अवस्था झाली होती. तो हसला नसता तरी चाललं असतं. पण त्यानं झोपावं ? … तेव्हापासून कुणी आपला लेख किंवा गोष्ट वाचत असलेला दिसला की मीच उठून दूर जाऊन बसतो !

न हसणा-या वाचकांपैकी एक थोडा वेगळा प्रकार असतो तो लेखकाची जिरवणा-या वाचकांचा. एकदा एका गृहस्थांबरोबर मी एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीकडे गेलो होतो. त्या गृहस्थांचं काही काम होतं तिच्याकडे. मी नको नको म्हणत असताना ते मला घेऊन गेले. “अहो, तशी जुजबी ओळख नसली तरी त्या तुम्हाला ओळखतात तेव्हा तेव्हा तुम्हाला संकोच वाटायचं काही कारण नाही. ” मी जास्त आढेवेढे न घेता गेलो. त्या अभिनेत्रींच्या  घरात गेल्यावर आम्ही दिवाणखान्यात बसलो. बाई आत होत्या. त्या आल्या. त्या गृहस्थांनी चटकन माझी ओळख करून दिली — सुप्रसिद्ध विनोदी लेखक अमुक अमुक. बाई खूप प्रसन्नपणाने हसल्या आणि म्हणाल्या, “ओ हो हो हो ! हेच का ते विनोदी लेखक? यांना कोण ओळखत नाही ? यांच्या कितीतरी कादंब-या मी वाचल्या आहेत. ” मी एकही कादंबरी न लिहिता अनेक कादंब-यांचा जनक आहे याचं  ज्ञान प्रथम मला झालं. इतक्या उत्तम माझी जिरवणारा वाचक मला दुसरा कुठलाही भेटलेला नाही !

वाचकांप्रमाणे विनोदाला न हसणारा प्रेक्षकही अशीच शिक्षा देऊन जातो. न हसणा-या अनेक वाचकांपैकी दुर्दैवदयेनं एखादा कधीतरी भेटतो. पण न हसणारे प्रेक्षक अगदी डोळ्यांपुढे दिसत असतात. त्यांचं न हसणं जास्त जिव्हारी लागतं. एका गावात ‘विच्छा’चा प्रयोग होता. अगदी पुढच्या रांगेत मध्याच्या खुर्चीवर सूटबूट घालून एक गृहस्थ बसला होता. ‘विच्छा’च्या बाबतीत अगदी सुरवातीच्या जागा अशा आहेत की तिथं हमखास हशा येणार, अशी शंभर टक्के खात्री असते. त्या जागा गेल्या तरी तो गृहस्थ हसला नाही. बतावणीतही सगळं थिएटर हसत होतं. आपण त्याला हसू फुटत नव्हतं. आणि प्रयोगाच्या वेळी गंमत  अशी असते की असा एखादा मख्ख प्रेक्षक अगदी पुढं बसलेला असला की हसणा-या प्रेक्षकांकडे लक्ष न जाता नेमकं अशाच माणसाकडे लक्ष जातं. सबंध  प्रयोग संपला, पण त्या गृहस्थाला हसलेलं कुणीही पाहिलं नाही. आपली जिरवायलाच तो आलेला आहे, अशी सर्वांची खात्री पटली. त्याला हसू आलेलं नाही, हीच शिक्षा पुरेशी आहे, असं आम्ही आमचं समाधानही करून घेतलं. प्रयोग संपल्यावर आम्ही आत आवराआवर करीत होतो. तेवढ्यात एक जण मला बोलवायला आला. “तुम्हाला अमुक अमुक गृहस्थ भेटू इच्छितात.” मी रंगपटातून बाहेर आलो. सबंध  प्रयोगभर न हसता बसलेला तोच गृहस्थ मला भेटायला आला होता. कुणीतरी बडा अंमलदार होता तो त्या गावातला. मी नमस्कार केला. तो म्हणाला, “तुमची माझी ओळख नाही. पण हे तुमचं लोकनाट्य अतिशय विनोदी आहे, त्याबद्दल अभिनंदन. “मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. तो गृहस्थ गेल्यावर कुणीतरी म्हणालं की इतर सर्व लोक हसत होते, त्यावरून हे लोकनाट्य विनोदी आहे असं त्यांनी ओळखलं असावं बहुधा !

विनोदाची किंवा इतर प्रेक्षकांच्या हसण्याची पर्वा न करता खुर्चीतल्या खुर्चीत बिनघोरपणे ( त्यांचं घोरणं स्टेजपर्यंत ऐकू येत नाही म्हणून बिनघोरपणे म्हणतो. ) झोपलेले काही प्रेक्षक मी उघड्या डोळ्यांनी बघितले आहेत. तसाच ‘विच्छा’चा प्रयोग संपूर्णपणे पाहिल्यानंतर, ‘कामं चांगली आहेत सगळ्यांची, पण आपल्याला कुठंही हसू आलेलं नाही. थोडा विनोद वाढवायला पाहिजे,’ असं सांगणारा एक का होईना पण प्रेक्षक भेटला आहे, हेही नमूद करणं आवश्यक आहे.

नाटकाच्या बाबतीत विनोदाची हवा काढून घेण्याचं काम केवळ न हसणारे प्रेक्षकच करतात, असं नाही. तर त्यांना हसू न येऊ देण्याचं काम करणारा घटक म्हणजे ध्वनिक्षेपक ! हे यंत्र जेव्हा मौनव्रत धारण करतं, त्यावेळी प्रचंड डोंगराएवढे विनोदसुद्धा भुईसपाट होऊन मातीला मिळतात. म्हणून न बोलणारा मायक्रोफोन आणि न हसणारा वाचक हे दोघेही लेखकाचे जन्मजात वैरी होत !

आणि एकदा माझा मीच वैरी झालो होतो. एका दूरच्या गावात ‘विच्छा’च्या प्रयोगाच्या वेळी माझं बतावणीतील काम संपवून मध्यंतरानंतर प्रेक्षागृहात येऊन बसलो होतो. आता ‘विच्छा’चे इतके प्रयोग झाले आहेत की मला आता त्यातील विनोदाला हसू येत नाही. मी न हसता प्रेक्षागृहात बसतो. त्या दिवशीही मी तसाच बसलो होतो. आणि न हसता रंगमंचाकडे बघत होतो. प्रेक्षागृहातील इतर सर्व प्रेक्षक मात्र मोठमोठ्यानं हसत होते. माझ्या मागच्याच रांगेत एक जोडपं बसलं होतं. त्यांच्या हसण्यावरून आणि मधूनमधून बोलण्यावरून ते नवपरिणित असावं हे स्पष्ट कळत  होतं. मी बराच वेळ तिथं न हसता बसलेला होतो. अर्थात मला कुणी ओळखलं नव्हतं. थोड्या वेळानं  मागच्या रांगेतील तरुण बायको तक्रारवजा स्वरात नव-याला सांगत होती, ” अय्या ! तो पुढच्या रांगेतला तो टक्कलवाला मनुष्य बघितलात का तुम्ही? कसा मख्ख बसला आहे — एकदाही हसला नाही. कमाल आहे, नाही या माणसाची !”

“अगं, तो बहिरा असेल बहुधा, ” नव-यानं खुलासा केला.

“मग मेले तिकीट काढून येतात तरी कशाला इथं धडपडायला ?”

— हे सगळं ऐकू येत असूनसुद्धा मागं वळून पाहण्याचं धैर्य माझ्याजवळ नव्हतं.

वसंत सबनीस
[ ‘ललित‘ दिवाळी १९६९ वरून साभार ]

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
माध्यमांच्या बदलत्या प्रवासाची कहाणी

देवेंद्र रमेश राक्षे
भाग ६
 

आजचा हा लेख या लेखमालिकेतील मागील लेखावरील प्रतिक्रिया नि त्या अनुषंगाने विचारलेल्या काही प्रश्नांचे एकत्रित उत्तर म्हणून साकारला गेला आहे. प्रस्तुत लेखमालेच्या पूर्व आरखड्यात तो नव्हता आणि अशा प्रकारच्या वाचकांच्या प्रतिक्रियेतून ही लेखमाला साकारत आहे याचा देखील विशेष आनंद आहे. – लेखक 

संगणकाचा अविष्कार एका नवीन व्यावसायिकाच्या निर्मितीस निमित्त ठरला. सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर ही नवी व्यावसायिक संधी निर्माण झाली. मी व्यवसायाने सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर. अगदी बेसिक (जी-डब्ल्यू बेसिक, बेसिका), कोबोल (७४ व ८०), सी (टर्बो सी, सी प्लस प्लस, सी प्लस प्लस डॉट नेट, डॉट नेट कोअर), असेंब्ली (८०८८, ८०८६) पासून तर आता अ‍ॅक्टीव्ह जेएस्, नॉन सिक्वेल डीबी सारख्या नव्या जमाण्यातील अशा अनेक प्रोग्रामिंग सांकेतिक भाषेतून संगणकाशी संवाद साधणारे आम्ही प्रोग्रॅमर.
अगडबंब आकारातील महाकाय माहिती विदा (डेटा) यांच्यावर आम्ही प्रक्रिया करतो, त्यातून व्यावसायिक भविष्य, भाकीत मांडत व्यवसायाचे भवितव्य (बिझनेस प्रेडिक्शन्स थ्रू अ‍ॅनॅलिटिक्स) आकडेवारीतून साधतो.
सोप्या भाषेत सांगायचे तर माझ्या व्यवसायात मध्यरात्री १२ वाजता जेव्हा दिनदर्शिकेवरील दिनांक बदलतो ना, अगदी त्याच क्षणी मला पुढील दिवसातील २४ तासांच्या विक्रीचे तासागणिक भाकीत मला आमच्या प्रोग्रॅममुळे आम्ही तयार केलेल्या आज्ञावली ( सॉफ्टवेअर ) द्वारे मिळते.

सोबतचे चित्र याचे प्रमाण ( पुरावा ) आहे.

Hourly Sales

 

 

Predictive Analysis

 

Dashboard

सोबतच्या चित्रात किंबहुना आलेखात ‘क्ष’ अक्षावरील रेषेवर तासांचे प्रमाण दिले आहे तर ‘य’ अक्षावरील रेषेवर विक्रीचे आकडे (रुपये हजार) या प्रमाणात योजलेले आहेत.

यातील लाल रेषा त्या त्या तासांचे विक्रीचे त्या दिवसाचे भाकीत दर्शवितात तर हिरवी रेषा विक्रीपश्चात झालेल्या खरोखरीच्या वास्तव रकमा (आकडे) दर्शवितात. गेली सहा वर्ष हे भाकीत ८९ टक्क्यापासून ९१ टक्क्यापर्यंत खरेखुरे जुळत चालले आहेत.

तर संगणकाधारीत तंत्राचा आम्ही पुरेपूर वापर करतो नि काळाच्या किमान ५ ते १० वर्ष पुढे राहण्याची आमची धडपड असते.

प्रोग्रामिंग प्रक्रियेत विचारांची एक मूलभूत मांडणी केली जाते, त्या प्रक्रियेला ‘लॉजिक’ या वैचारिक मांडणीचा आधार असतो. ‘लॉजिक’ हा शब्दप्रयोग संगणकाच्या अविष्कार होण्याच्या आधीपासून वापरात आलेला आहे. विशेषत: तत्वज्ञानात तसेच वादविवाद स्पर्धेत, वकिली युक्तिवादात विचारांची मांडणी करीत आपली बाजू ज्या विचारांच्या कार्य-कारण भावावर आधारलेली असते ते म्हणजे ‘लॉजिक’. ‘लॉजिक’ या शब्दाचा मराठी अनुवाद म्हणजे ‘तर्काच्या कसोटीवर केलेली विचारांच्या गुंत्याची उकल करणारी मांडणी’.

आज या निमित्ताने आपण एक प्रोग्रॅम लिहिण्याचा उपक्रम करू यात.

इंग्रजी वर्णमालेच्या २६ अक्षरांच्या दोन छापील लिपी म्हणजे मोठी लिपी (कॅपिटल केस) आणि लहान लिपी (लोअर केस). या शिवाय आणखी एक लिपी असते, त्यास “कॅमल केस” (उंट लिपी) असे देखील म्हणतात. जेव्हा नावांच्या नोंदणीची गरज निर्माण होते तेव्हा “उंट लिपी (कॅमल केस)” वापरली जाते. म्हणजे माझे पूर्ण नाव “देवेंद्र रमेश राक्षे”, हे नाव इंग्रजीत लिहायचे झाले तर प्रत्येक शब्दातील पहिले अक्षर हे मोठ्या लिपीत (म्हणजे कॅपिटल केस मध्ये) लिहावे लागते. तो प्रकार संस्थेच्या नावाबद्दल. अद्याक्षरे अथवा अ‍ॅक्रोनिम लिहिताना तर ते फक्त मोठ्या लिपीत (कॅपिटल केस मध्ये) केवळ लिहिले जातात, पण यांचे पूर्ण रूप (लॉन्ग फॉर्म) लिहायचे झाल्यास ते “उंट लिपी (कॅमल केस)” मध्ये लिहिले जाते.

आता एका प्रोग्रॅमरला माहितीच्या स्रोतावर नियमितपणे प्रक्रिया करून या विविध लिपीत विविध अहवालांच्या रूपात (रिपोर्टस्) माहिती प्रसारीत करावी लागते आणि या विविध लिपी त्या त्या कामाच्या स्वरूपानुसार वापरल्या जातात. पण संगणकावर साठवलेल्या मुळ महितीला मात्र धक्का लावता येत नाही, ती माहिती जशीच्या तशीच ठेवून विविध अहवाल निर्माण करावे लागतात आणि तेही सतत.

अशा वेळी मोठ्या लिपीतून छोट्या लिपीत वा उंट लिपीत किंवा उलटसुलटपणे रूपांतरित करावे लागतात. हा प्रोग्रॅम प्रत्येक प्रोग्रॅमरला त्याच्या कार्यकाळात कधीतरी करावाच लागतो.

आपण मोठ्या लिपीतून छोट्या लिपीत नावांना रूपांतरित करण्याचा प्रयत्न करू यात.
या प्रोग्रॅमसाठी आपल्याला आस्की सारणीचा उपयोग करावा लागेल.

आस्की सारणीमध्ये A ते Z ही मोठ्या लिपितली अक्षरे अनुक्रमे ६५ ते ९० या आस्की क्रमांकाने ओळखली जातात. त्याच प्रकारे a ते z ही छोट्या लिपीतील अक्षरे ९७ ते १२२ या आस्की क्रमांकाने ओळखली जातात.

आता आपले काम सोपे होऊ शकते. A या अक्षराला a मध्ये रूपांतरित करायचे झाल्यास A च्या आस्की क्रमांकामध्ये ३२ मिळवायचे की त्यातून ९७ हा आस्की क्रमांक असलेले a हे अक्षर तयार होऊ शकते. हे कसे शक्य झाले, तर A आणि a या दोन अक्षरांच्या आस्की क्रमांकामध्ये ३२ चा फरक आहे.

केवळ हेच गणित लक्षात घेऊन कॅपिटल लिपीतील वाक्य लहान लिपीमध्ये रूपांतरित करण्याचा ‘सी’ तंत्रभाषेतील प्रोग्रॅम पुढीलप्रमाणे लिहिला जाईल.

#include <stdio.h>
#include <conio.h>
int main ()
{
char sentence[30];
int i;
printf (” Enter the string: “);
scanf (” %s”, &sentence); // input a sentence from user
// following action will convert each of the character in the sentence in lower case
for ( i = 0; i <= strlen (sentence); i++)
{
// The ASCII value of A is 65 and Z is 90
if (sentence [i] >= 65 && sentence [i] <= 90)
sentence[i] = sentence[i] + 32; /* add 32 to each character to convert into lower case. */
}
printf (” \n Upper Case to Lower case string is: %s”, sentence);
return 0;
}

मोबाईलवरील नमुना कळफलक

जसे इंग्रजीतील प्रत्येक अक्षरासाठी स्वतंत्र असा आस्की क्रमांक दिलेला आहे त्याच प्रमाणात मराठीतील बहुतेक सर्व मुळ अक्षरास स्वतंत्र असा ईस्की क्रमांक दिलेला आहे. त्यामुळे स्, श्, ष्, न्, ण्, ऋ, ङ, ड्, द, ध, घ, प्, फ्, ट्, त्, ठ्, थ् ही मुळाक्षरे स्वतंत्र ईस्की क्रमांक घेऊन येतात आणि या सर्व मुळाक्षरांना स्वतंत्र कळ (की) कळफळकावर (की-बोर्ड वर) योजली गेली आहे. परंतू श्र, क्ष, ज्ञ अशा जोडाक्षर रूपी मात्र चित्ररूपातून साकारली गेली आहेत आणि त्यांच्या साठी स्वतंत्र अशी कळयोजना नाही तर दोन किंवा त्यापेक्षा जास्त कळ दाबून ही अक्षरे तयार होतात, उदा० क्ष हे अक्षर k s h या तीन कळांना सामावून तयार झाले आहे. त्यामुळे आकारविल्हे (इंडेक्स) साकारताना गोंधळ उडतो. ह, ळ, क्ष, ज्ञ ही मराठी वर्णमालेतील आकारविल्ह्याची सांगता, पण ईस्की क्रमांकाचा वापर केल्यास क्ष आणि ज्ञ ही अक्षरे अनुक्रमे क आणि द च्या नंतर आल्याचे दिसून येते. मुळ इंग्रजी आस्की क्रमांकामध्ये देखील हीच गडबड झाल्याचे दिसून येते. उदा० A नंतर B हे अक्षर येते कारण त्यांचे आस्की क्रमांक अनुक्रमे ६५ व ६६ आहे. खरे तर A नंतर a हे अक्षर हवे, म्हणजे A आणि B मध्ये a हे अक्षर हवे. पण सरधोपटपणे हे साकारले जात नाही, पण यावर पाश्चात्य प्रोग्रॅमर गटाने योग्य तो प्रयत्न साकारून इंग्रजी आकारविल्हे सुधारून घेतले.

दुर्दैवाने भारतीय भाषांना सामावणारी ईस्की सारणी नि तद्नंतर आलेली युनिकोड सारणीस आकारविल्हे (इंडेक्स) सामावून व सुधारून घेण्यासाठी भारतीय प्रोग्रॅमर विशेष प्रयत्न करत नाहीत. किंबहुना भारतीय प्रोग्रॅमर या बाबतीत अज्ञानीच म्हणावेत. भारतीय भाषा या संगणकाधारीत विदाप्रक्रिये (डेटा प्रोसेसिंग) साठी त्यामुळेच कमी पडतात हे इथे नमूद करण्याची मला संधी लाभली आहे. मुळात भारतीय प्रोग्रॅमर समूहातच याची जाणिवजागृती (अवेअरनेस) नसेल तर “आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून यावे?” या न्यायाने मराठी संगणक उद्योजकांत तरी कुठून यावी म्हणा? असो, परम महासंगणक, ईस्की तसेच यूपिआय अशी मोजकी अपवादात्म्क उदाहरणे सोडली तर भारतीय तंत्रज्ञ मंडळी संगणकाच्या मूलभूत ज्ञानापासून तशी वंचितच म्हणावीत. आधार, पासपोर्ट, पॅन कार्ड यंत्रणातील त्रुटी नि या यंत्रणांच्या डोळ्यातील मुसळ देखील न दिसू शकण्याच्या अकार्यक्षमतेविषयी व्यक्त होणे हा वेगळ्या प्रबंधाचा विषय आहे, मात्र विषयांतर होण्याचा धोका पत्करून देखील मला तो इथे वाचकांसमोर मांडावासा वाटतो. आणि याचा व्यत्यास म्हणून देखील अशा या वातावरणात ईस्की, जिस्ट-कार्ड आदी भारतीय संशोधने मला खूप मोलाची वाटतात.

पुढील लेखांच्या साखळीतून माध्यमांचे बदलते विश्व समजून घेऊ या..

[ क्रमश: ]

– ©️ देवेंद्र रमेश राक्षे 
rakshedevendra@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
विनोबा विचार पोथी

हेमंत मोने 

 
क्र. ५६

कर्म करीन तर फळही घेईन हा रजोगुण. फळ टाकीन तर कर्मही सोडीन हा तमोगुण. दोन्ही एकच.

आपल शरीर प्रकृती पासून बनले आहे. आणि सांख्यशास्त्रानुसार प्रकृती त्रिगुणमयी. [ सांख्यशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र statistics नव्हे. ] तिच्यात सत्व, रज, तम हे तीन गुण आहेत. मनुष्य जेव्हा या तीन गुणांना आत्मसात करतो तेव्हा त्याच्यात या गुणांचे मानवीकरण होते. रजोगुण चळवळ्या आहे. त्यात अस्थिरता आहे. तर आळस हे तमोगुणाचे वैशिष्ट्य आहे. माणसाच्या दैनंदिन जीवनातसुद्धा हे गुण आलटून पालटून आपले अस्तित्व दाखवितात. मनुष्य खूप निजून राहिला म्हणजे त्याचे शरीर चळवळ करू लागते आणि खूप धावपळ केली की पुन्हा झोप त्याचा ताबा घेते. म्हणजे तमोगुणातून रजोगुण आणि रजोगुणातून तमोगुण असे चक्र चालू असते. आपण कर्म करतो तेव्हा त्याचे फळ मिळते. कर्मातून कोणत्या ना कोणत्या स्वरुपाची फलप्राप्ती अटळ आहे. ह्या फळाबाबत प्रत्येकाची भूमिका काय आहे ते इथे सांगितले आहे.

तुमच्या घरात समजा काही विद्दुत उपकरणाबाबतची अडचण आली तर तुम्ही इलेक्ट्रिशियनकडे जाता. तुमची अडचण दूर झाल्यावर त्याला योग्य तो मोबदला देण्याची तुमची तयारीही असते पण तो मनुष्य रजोगुणी असेल तर तुमच्या घरी येण्यापूर्वी अमुक अमुक पैसे देणार असाल तर येतो, असे अगोदरच बजावून ठेवतो. कोणतीही तडजोड करायला तो तयार नसतो. म्हणजे या व्यक्तीत रजोगुणाचे प्राबल्य आहे असे समजावे. काही वेळेस एखादा मनुष्य तुम्ही योग्य तो मोबदला देण्यास तयार असून सुद्धा काम करायला उत्सुक नसतो. या आळशीपणाला तमोगुण म्हणतात.

ज्या समाजात किवा कुटुंबात अशा रजोगुणी किंवा तमोगुणी प्रधान व्यक्ती असतील तेथे सुख व शांतीचा अभाव आहे असे समजावे. याचा अर्थ कामाची मजुरी घेऊ नये, आर्थिक मोबदला घेऊ नये असा नाही. पण अवास्तव फळाची अपेक्षा करणे, त्यासाठी अडवणूक करणे, कामास नकार देणे यामुळे संघर्ष होतो. व्यवहार सुरळीत होत नाहीत. म्हणून गीता या गुणांना त्याज्य मानते. कारण गीतेचा भर आत्मज्ञानावर आहे. हे गुण देहाचे आहेत त्यामुळे हे गुण म्हणजे आत्मज्ञानातले अडथळे आहेत. ते बंधनकारक आहेत. अनित्य आणि फसव्या जगात माणसाला गुंतवून ठेवण्याचे काम हे गुण करतात. अगदीच तर-तम करायची वेळ आली तर तमोगुण ही लोखंडाची बेडी आणि रजोगुण चांदीची बेडी असे म्हणता येईल. परिणामी दोन्ही बंधनकारकच.

आत्मे सगळेच असतात पण आत्मवान एखादाच असतो. आत्मज्ञानाकडे नेणारा प्रवास खडतर आहे म्हणून नीतिशास्त्र माणसाने गुणातीत व्हावे असे म्हणत नाही. नीतिशास्त्र तिन्ही गुणांच्या सामंजस्यावर भर देते. व्यक्तीगत आणि सामाजिक जीवनातील संघर्ष टाळण्यासाठी नीतीशास्त्रही सत्त्वगुणाला जास्त महत्व देते. ते म्हणते की सत्त्वगुण आठ आणे घ्या तर रजोगुण पाच आणे आणि तमोगुण तीन आणे घ्या. [ १६ आणे = एक पूर्ण रूपया ] माणसाची बुद्धी सत्त्वगुणप्रधान असल्यामुळे आत्मज्ञानाची शक्यता फक्त माणूस या प्राण्यालाच आहे. म्हणून रजोगुण आणि तमोगुण यांना टाळून सत्त्वगुण वाढवीत न्या. निर्भयता, ऋजुता, अहिंसा, नम्रता, पवित्रता इ. सद्गुण हे सत्त्वगुणाचेच आविष्कार आहेत. गीता या गुणांना दैवी संपत्ती मानते. आणि तू ही संपत्ती घेऊनच जन्माला आला आहेस असे गीतेत १६ व्या अध्यायात म्हटले आहे. तेव्हा सत्वगुण अंगी वाढवत वाढवत अखेर गुणातीत हो असा गीतेचा उपदेश आहे.

सामान्य माणसांसाठी विनोबांनी एक सोपा मार्ग सांगितला आहे. मानवी जीवनाची गाडी सुरळीत चालण्यासाठी रजोगुणाचे इंजिन सत्त्वगुणाच्या रुळांवरून न्यावे म्हणजे धोका नाही.

– ©️ हेमंत मोने

hvmone@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
चित्रकारांचे दालन

My Pencil work

– ©️ आशिष नाईक 
८८९८८ ८५९१५
a22p2n@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@
हत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@

शाळेचा रस्ता

कवितांच्या प्रदेशात : १
डॉ. उमेश करंबेळकर  

दोन वर्षांपूर्वी लॉकडाऊनमुळे रिकामा वेळ भरपूर मिळाला. त्याचा काहीतरी सदुपयोग करून घ्यावा असं वाटलं आणि आठवणीतल्या कविता पाठ करायला घेतल्या. त्या पाठ करताना ‘फडताळातलं आजीचं घड्याळ’ शोधलं, लॉकडाऊन असूनही ‘सानुली मंद झुळूक’ होऊन बाहेर भटकंती केली. आणि त्यातच ‘शाळेचा रस्ता’ही दिसला.

ना.गं.लिमये यांची ‘शाळेचा रस्ता’ ही कविता मला शाळेत अभ्यासक्रमात कधीच नव्हती. पण तरीही जेव्हा पहिल्यांदा मी कविता वाचली तेव्हाच ती आवडली. कवितेची मध्यवर्ती कल्पना कशी साधी आणि सुंदर आहे ते पाहा.

ह्या कवितेत एक मुलगा शाळेत जाताना त्याला रस्त्यातील ज्या अनेक गंमती-जंमती दिसतात त्याचं वर्णन करतो. प्रथम वृक्षवेलींवरील फुलं त्याचं लक्ष वेधून घेतात, पानं टाळ्या वाजवतात, तर अनेक छोटे छोटे पक्षी गाणं गात त्याला खेळायला बोलावतात. रस्त्याच्या कडेला गवतातून उड्या मारणारे टोळ दिसतात तेव्हा त्यांच्या मागे धावून त्यांना पकडावंसं त्याला वाटतं. खेळणीवाल्याची खेळणी त्याला खुणावतात. एके ठिकाणी गारुडी जादूचे प्रयोग करून दाखवत असतो ते पाहत राहावंसं  त्याला वाटतं. रस्त्यात अशा मनाला भुरळ घालणाऱ्या अनेक गंमती दिसत असतानाही, त्यात गुंगून गेलो तर शाळेत जायला उशीर होईल, असं तो सतत स्वतःला बजावत असतो. तसं हे रोजच घडत असतं. म्हणून “शाळेस रोज जाता | मज विघ्ने येती नाना ||” असं तो म्हणतो.

ही कविता वाचली आणि मला माझा शाळेचा रस्ता आठवला. लिमयेंची ही कविता खूप आधीची म्हणजे जवळ जवळ ८०-९० वर्षांपूर्वीची. त्यामुळे त्यांना जाणवलेल्या सगळ्याच गंमती माझ्या शाळेच्या रस्त्यात नव्हत्या पण तरीही थोडं साम्य होतंच.

माझ्य़ा काळातही रस्त्यात खेळणीवाले असायचे; फक्त त्यांची खेळणी आधुनिक असायची. कधी कधी दुकानातल्या ट्रान्झिस्टरवर क्रिकेटची कॉमेंटरी लागलेली असायची आणि लेटेस्ट स्कोअर काय झाला ते ऐकण्याची उत्सुकता लागायची आणि तो ऐकण्यासाठी तेथे थांबायचो. खाऊच्या गाड्या असायच्या. काही मोठी माणसं पतंगाची काटाकाटी खेळत असत; ते बघत थांबावसं वाटे. कधी रोड-रोलरनं डांबरी सडक तयार करण्याचं काम चालू असायचं. या सर्व लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टी म्हणजे शाळेला उशीर होण्याची कारणंच. म्हणजे एका परीने शाळेला जाताना आमच्याही रस्त्यात अशी विघ्नं आड येत होतीच. त्यामुळे कदाचित ही कविता मला भावली असेल.

पण त्याच वेळी “ आत्ताच्या मुलांचा शाळेचा रस्ता कसा असतो? त्यांच्या शाळेच्या रस्त्यात अशाच गंमती असतात का? “ असे विचार मनात आले. खरं म्हणजे पुण्या-मुंबईसारख्या शहरांतील मुलं गेली अनेक वर्षे शाळेच्या बसने किंवा रिक्षाने शाळेत जातात. अनेकांना त्यांचे पालक गाडीतून किंवा स्कूटरवरून शाळेत सोडतात. शाळेत पायी जाणारी मुलं अगदी अपवादाने आढळतात. हीच गोष्ट छोट्या गावांमध्येही अलीकडे दिसू लागली आहे. साताऱ्याजवळच्या सोनगाव, डबेवाडी, शेळकेवाडी अशा गावातीलच नव्हे तर लांबच्या परळी, आसनगाव अशा गावातील मुलांना बालवर्गापासून साताऱ्यातील मराठी किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घातलं जातं. ही मुलेदेखील रिक्षा किंवा शाळेच्या बसमधून शाळेत जातात. मग ह्यांच्या शाळेच्या रस्त्याला मौजमजा येत असते की नाही?

येत असणारच. मी काही स्मरणरंजनात रमणारा नाही. त्यामुळे ‘आमच्या वेळची मजा आता नाही. ते हि नो दिवसाः गतः|’ असं म्हणून सुस्काराही टाकणार नाही. प्रत्येक जण त्या त्या काळात मजा अनुभवतच असतो. फक्त त्याचे अनुभव वेगळे असतात. त्यामुळे आजची मुलंही शाळेच्या रस्त्याची मजा अनुभवतच असणार यात शंका नाही. फक्त ते कुठल्या कवितेतून व्यक्त झालंय का ते मला माहीत नाही. आत्ता तिशी-चाळीशीच्या आसपास असणाऱ्या नव्या पिढीच्या एखाद्या कवीने हा अनुभव व्यक्त केला नसेलच असं मला वाटत नाही. पण माझ्या वाचनात तरी अजून अशी कविता आली नाही. अगदी अशीच नाही तरी तिच्या आशयाच्या जवळपास जाणारी, चालू पिढीचं प्रतिनिधित्व करणारी, शाळेच्या रस्त्यासारखी एखादी कविता आपल्या वाचनात आली असल्यास मला जरूर कळवणे.

 

शाळेचा रस्ता

( चाल – श्रीमंत पतीची राणी )

शाळेस रोज जातांना | मज विघ्नें येती नाना!  ध्रु.

किति पक्षी गाती गाणी
झाडावरि बसुनी ,
‘ये मुला, खेळुं या मिळुनी’
परि उशीर टाळायाला | मी निघे तडक शाळेला ! १

टोळ कसे गवतावरती
आनंदें टुण टुण उडती !
खेळाया बोलावीती
परि उशीर टाळायाला |  मी निघे तडक शाळेला ! २

गारुडी वाजवुनि पुंगी
बोलावी झणि मजलागी !
बहु जमती जन त्या जागी
परि उशीर टाळायाला | मी निघे तडक शाळेला ! ३

बाजूस खेळणीवाला
वाखाणुनि अपुल्या माला
वेधितसे नकळत बाळां
परि उशीर टाळायाला | मी निघे तडक शाळेला ! ४

वाटेतिंल झाडें वेली
हालविती पानें अपुली
बोलाविति मजला जवळी !
परि उशीर टाळायाला | मी निघे तडक शाळेला ! ५

ना. गं. लिमये  

@@@

– ©️ डॉ. उमेश करंबेळकर, सातारा
९८२२३९०८१०
umeshkarambelkar@yahoo.co.in
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
स्फोट

धारावाहिक कादंबरी

  
डॉ. प्रियंवदा कोल्हटकर

प्रकरण १३

मी कॉमन रूममध्ये पोचताच खुर्चीत धाडदिशी अंग टाकून दिलं. हात अभावितपणे डोक्याकडे गेला. उजव्या बाजूची डोळ्यावरची शीर थाड थाड उडत होती. कपाळाचा उजवा भाग दुखत होता. मी शांतपणे डोकं विचारहीन करण्याचा प्रयत्न केला पण उजवा हात डोकं दाबीत होता.

ते बघून आत आलेल्या विद्याताई म्हणाल्या, “तुझं जुनं मिग्रेन (अर्धशिशी ) उपटलेलं दिसतंय. थांब मी तुला भरपूर कॉफी करून देते.”
ही भरपूर कॉफी म्हणजे आम्हां दोघातील एक रहस्य होतं.

या इस्पितळात मी नवखा होतो तेव्हा अशाच एका तणावपूर्ण सेशननंतर मी कॉमनरूममध्ये शिरलो तेव्हा विद्याताई काही तरी लिहीत बसल्या होत्या. मला बघताच डोळ्यांवरील चष्मा व हातातलं पेन त्यांनी टेबलावरच्या कागदांवर ठेवलं तोवर मी आरामखुर्चीवर रेलून डोकं दाबीत होतो.

त्या म्हणाल्या होत्या, “डोकं दुखतंय? थांब तुला एक ऍस्पिरिन देते. तुम्ही डॉक्टर मंडळी म्हणजे असेच वेळेवर कधी स्वतःच्या रोगांचा इलाज करत नाही”
व मग स्वतःच्या भल्या थोरल्या बॅगेतून शोधून काढून एक ऍस्पिरिन व पाणी दिलं होतं.

त्यांची ही बॅग म्हणजे बारा गावच्या भानगडी म्हणून इस्पितळात प्रसिद्ध आहे. व ती त्या कुठेही विसरल्या ( तशा त्या विसरतातच ) तरी त्यांना आणून दिली जाते. हे मला कळलं होतं.
त्यांनी पुन्हा नाकावर चष्मा चढवला होता तो पुन्हा काढत त्या म्हणाल्या होत्या, “फक्त उजवी बाजू दुखतेय, मिग्रेन असणार. तुला कॉफी करून देते.”

मी उदगारलो होतो, “ब्लॅक हं.” त्यावर त्या लगेच म्हणाल्या होत्या, “राहू दे तुझं ते काळ्या कॉफीचं वेड. माझी कॉफी चाख एकदा. मगमध्ये अशी भरपूर नेसकॅफे घ्यायची. त्यात भरपूर साखर व चमचाभर दूध घालून खूप घोटायचं. मग त्यात हळूहळू गरम दूध घालीत मग भरून जाईपर्यंत भरपूर हलवायचं.” असं म्हणत त्यांनी तो फेसाळ पेयानं भरलेला मग माझ्या हाती दिला.

“या पेयाचं नाव आपण ‘भरपूर कॉफी’ ठेवू या का सिस्टर?” मी उद्गारलो होतो.
“एक तर तू मला सिस्टर ऐवजी सगळ्यांसारखं विद्याताई म्हण व दुसरं म्हणजे ती कॉफी संपव आधी. ” असं म्हणून पुन्हा नाकावर चष्मा चढवीत त्या लेखनात गढून गेल्या होत्या.

रिकामा मग खुर्चीखाली ठेवीत मी म्हटलं होतं, “छान वाटलं हं. पण तुम्ही एव्हढं लिहिताय काय?”
त्यांनी चष्मा काढला व माझ्याकडे बघत म्हणाल्या, “आमच्या महिला मंडळात व्याख्यान आहे माझं. हुंडाविरोधी कायदा असला तरीही हुंडा आहेच या विषयावर. येतोस ऐकायला? येच. दोन महिन्यांपूर्वी चं तुझं लग्न फार गाजलं बाबा. व पेरूगेटचा तुझा आलिशान फ्लॅट म्हणजे एक तऱ्हेचा हुंडाच की.”

त्यांनी दिलेल्या ऍस्पिरिनमुळे म्हणा किंवा कॉफीमुळे, वा त्यांच्या प्रेमळ वागणुकीमुळे मी सहज झालो होतो. दिलखुलासपणे हसलो व म्हणालो, “तुमच्या प्रश्नमालिकेची उत्तरं एकेक करून देतो हं. नंबर १. तुमचं व्याख्यान ऐकायला आवडलं असतं पण येता येणार नाही. संध्याकाळी मी व अपर्णा पिक्चर बघायला जाणार आहोत. तुमच्या लिखाणाची एक प्रत द्या, वाचेन अवश्य.

नंबर २. माझं लग्न गाजलं हा माझा दोष नव्हे. तेव्हा मी स्पष्ट कळवलं होतं लग्न रजिस्टर पद्धतीनं करायचं. व माझ्या न्यायशास्त्री बाबांनाही ते पटलं होतं. ते स्वतः वैदिक लग्नं लावतात भरपूर दक्षिणाही घेतात. परंतु मला एकदा ते म्हणाले होते वैदिक वैदिक म्हणतात ती आमची पद्धत खरी वैदिक नाहीच मुळी. ज्या हिंदू धर्मात गांधर्व विवाह मान्य आहे त्यात या सर्व सोहळ्यांचं स्थानच काय मुळी?लग्न गाजलं ते दाते प्रतिष्ठानच्या प्रतिष्ठेमुळे.

नंबर ३. हा फ्लॅट म्हणजे हुंडा नव्हे. माझ्या श्वसुरांनी वडिलोपार्जित मिळकतीत मिळालेला पेरूगेटातील आपला वाडा विकला व नवी बिल्डिंग उभी राहिली तेव्हा हा जोड फ्लॅट राखून ठेवला होता. अपर्णाला पुण्यात नोकरी मिळाली म्हणून. त्याची बरोबर अर्धी किंमत मग माझं लग्न ठरल्यावर बाबांनी दिली होती दाते यांना. बाबांनी थोडी जमीन व आईनं आपलं थोडं सोनं विकून पैसा उभा केला होता. फ्लॅट मी व अपर्णाच्या नावे अर्धा अर्धा रजिस्टर्ड आहे. त्याची रचना अशी आहे की दिसायला एक असला तरी बरोबर दोन भाग करता येतात त्याचे.”

विद्याताई आ वासून बघत होत्या माझ्याकडे. म्हणाल्या होत्या, “बापरे, व्याख्यानच दिलंस की. तुझं एक व्याख्यान ठेवते आमच्या महिला मंडळात. डोकं थांबलं ना रे दुखायचं? हे पूर्ण करून टाकते.” व चष्मा चढवून त्या लेखनात गढून गेल्या.

मात्र त्या दिवसापासून आमची दोस्ती छान जमली. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी त्यांना वैधव्य आलं होतं. मग त्यांनी लग्नामुळे अर्धवट राहिलेला नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला होता. नंतर लंडनच्या मूरफिल्डस इस्पितळात नेत्ररोगचिकित्सा नर्सिंग हा कोर्सही केला होता. या काळात डॉ. वेलणकरांनी त्यांना खूप मदत केली होती.

मग त्यांच्यामुळे गुरुस्थानी असलेले डॉ. वेलणकरही माझे मित्र झाले होते.

एकदा सहजच ते मला म्हणाले होते, “मी खूप खेडोपाडी फिरतो ना अरविंद तिथं मोतीबिंदू खूप लवकर होतो. हे तिथं वरचेवर होणाऱ्या अतिसाराच्या साथीमुळे असावं असं मला वाटतं. तू लंडनमधे एपिडेमियॉलॉजीचा अभ्यास केलाहेस तेव्हा हा प्रकल्प घे हाती. बघ माझा अंदाज खरा कि खोटा ते.”
“अशा प्रकल्पाला धन खूप लागतं वेलणकर.”

“तू अंदाज सांग व खरोखरच मनावर घेत असलास तर मी भारत सरकार व गोवर्धनशेठ दोघांचीही मदत मिळवतो. वाटल्यास लंडनच्या आर. सी. एस. बी. ची मदत मिळते का बघ.” .

मग ३ वर्षं खपून आम्ही तो प्रकल्प पूर्ण केला होता. डॉ. वेलणकरांचा अंदाज बरोबर निघाला होता.
एकदा मी त्यांना म्हटलं, “एका रशियन नेत्ररोगचिकित्सकानं इथाईल अल्कोहल (मद्य)नं ग्लॉकोमा (रक्तदाबासारखा डोळ्याच्या अंतर्दाबात होणाऱ्या वृद्धीमुळे येणारं अंधत्व ) बरा करता येईल असं लिहिलं होतं. वाचलंत वेलणकर? पणजीला एकदा मला डॉ. राजाध्यक्ष भेटले होते. तेही म्हणाले होते हा नेत्रविकार जवळच्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यांपेक्षा कमी प्रमाणात आढळतो तिथे गोव्यात. ”

“हो? राजाध्यक्ष मला नाही बोलला असं काही. मग तू घेतोस का हा प्रकल्प हाती? अरे, मग दीव दमणच्या सीमारेषेवरील गुजरातचे जिल्हेही घेऊ शकशील की तू. वाः वाः उत्तम. छान छान मग तू निष्कर्ष काढशील ‘मद्य प्या ग्लॉकोमा (कांचबिंदू)टाळा. बाकी गोवर्धन शेठ छापणार नाही हं असं काही.”

गोवर्धनशेठना प्रसिद्धीचं खूप वेड. माझ्या ‘अतिसार व मोतीबिंदू ‘ प्रकल्पाला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे ते जाम खुश होते. व माझ्याही नावामागे त्यांच्या गुजराती दैनिकांनी सुप्रसिद्ध विशेषण लावलं. मात्र माझ्या ‘कांचबिंदू व मद्य ‘प्रकल्पाचा निष्कर्ष डॉ. वेलणकर म्हणाले तसा नव्हता निघाला.

महाराष्ट्र नेत्ररोगचिकित्सकांच्या अधिवेशनात तो पेपर वाचताना मी शेवटल्या निष्कर्ष. . . .  या प्रकरणाशी आलो तेव्हा एक तज्ज्ञ् मराठीतच ओरडले होते, “मी सांगतो तुमचा निष्कर्ष, तुम्ही मद्य घ्या अथवा नका घेऊ, माफक प्रमाणात घ्या अथवा अति प्रमाणात, गावठी ठर्रा घ्या अथवा अगदी परदेशी व्हॅट सिक्सटी तुम्हाला ग्लॉकोमा आनुवंशिक असल्यास होणार म्हणजे होणारच. व मी याहून पुढे जाऊन म्हणेन डॉ. साठे की एकदा का ग्लॉकोमा झाला की हे थेम्ब घाला की ते, अशी सर्जरी करून घ्या कि तशी, तुम्हाला अंधत्व येणार म्हणजे येणारच. (आता मात्र चांगल्या औषधांमुळे अंधत्व लवकर येत नाही)

ते तज्ज्ञ मद्यपि म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांच्या या भाषणाच्या पूर्वार्धात हशा पिकला होता मात्र त्यांच्या उत्तरार्धामुळे आम्ही सगळेच एका असहाय भावनेनं विचलित झालो होतो. कारण गेली काही वर्षं ते कांचबिंदूनं ते स्वतः विकारग्रस्त झाले होते, व धीम्या गतीनं, त्यांची वाटचाल चालू होती अंधत्वाकडे.

——————

“अरे झोपलास की काय? ही भरपूर कॉफी घे तुझी.”
मी डोळे उघडले. विद्याताई माझ्या हातात फेसाळ कॉफीचा मग देत म्हणाल्या, “आज तुला झालंय काय अरविंद? घरी सर्व ठीक आहे ना?,”

घरी ? बापरे. मी मग परत त्यांच्या हातात देत म्हटलं, ” गुड्डीला ताप आल्याचं म्हणत होती अपर्णा. व मी तर कालपासून तिला बघितलंच नाही. वाजले किती? मी खिशात हात घालीत म्हटलं, घड्याळ? घड्याळ कुठाय माझं? मी घरीच जातो विद्याताई.”

मग टेबलवर ठेवत त्या खो खो हसत म्हणाल्या, “असा?या ओ टी च्या हिरव्या पजामा सुटात? जा कपडे बदल आधी. व डोकेदुखी काय म्हणतेय तुझी?ती कॉफी तरी प्यायला असतास.”
“जरा कमी आहे.” मी चेंजिंग रूमकडे वळत म्हटलं. कपडे बदलून पँटच्या खिशातलं घड्याळ डाव्या मनगटावर चढवत कॉमन रूममध्ये परतलो. माझी बॅग देत विद्याताई म्हणाल्या, “गुड्डीचा ताप उतरलाही असेल एव्हाना.” व मग माझ्या हातात पांढऱ्या कागदाची पुडी देत म्हणाल्या, “पॅक्समच्या गोळ्या आहेत. ( मनःशांती साठीच्या गोळ्या) घरी गेल्यावर घे व झोपून जा.”

मी ती पुडी बॅगेत टाकली.  घड्याळ बघत म्हटलं ,”बारा वाजलेत. साडेतीनला ग्लॉकोमा क्लिनिक आहे मला.”
“त्याची नको तू काळजी करुस. मी वेलणकरांना फोन करते. दोन्ही मुलं अमेरिकेत स्थाईक झालीत एकटा विधुर माणूस काम तरी काय आहे दुसरं?व ते नाही आलेत तरी मी आहे ना! घरी पोचताच घे गोळ्या तू. . . . .

( क्रमशः )

– ©️ डॉ. प्रियंवदा कोल्हटकर, गोवा.
 priyakar40@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

चंद्रावरील डागाची एक गंमतच आहे…

अजित पाटणकर

चंद्रावरील डागाची एक गंमतच आहे.. कुणाला तो डाग वाटतो तर कुणाला beauty spot.. मला तर आजही तिथे ससाच दिसतो.. म्हणूनच चंद्राला शशधर हे नाव जास्त शोभते, असं आपलं माझं मत आहे..

अशा या चंद्रावरील डागाबाबत रघुनाथ पंडित काय म्हणतात बघा…

कीं अंबरी उफळता खुर लागलाहे।
तो चंद्रमा निज तनुवरी डाग साहे।
जो या यशास्तव कसे धवलत्व नेघे।
शृंगारीला हय भूप तयासी वेंघे।

– रघुनाथ पंडित
(नल दमयंती आख्यान)

घोडयाने आकाशात इतकी उंच भरारी घेतली की त्याची पहिलीच टाप चंद्रावर पडली. (चंद्रावर जो डाग दिसतो ना, तो या टापेचा आहे!) इतक्या सुरेख कामगिरीचा पुरस्कार म्हणून चंद्राने आपली शुभ्रता घोड्यास दिली. अशा शुभ्र, सजवलेल्या घोड्यावर राजा स्वार होत आहे.

म्हणजे घोड्याच्या टापेने पडलेल्या डागाचा चंद्राला अभिमान वाटत आहे.. (जसा श्रीविष्णूंना भृगु ऋषींच्या लत्ताप्रहाराचा..)

आता हे बघा..

*ऐक फेकते सवाल पहिला जवाब याचा देई ग*  या गाण्यात गदिमा म्हणतात..

चंद्रावरती डाग कशाचा काळाकाळा राही ग
छाप सशाचा की हरिणीचा सांग शोधुनी बाई ग

दिवसभर रंगबाजीने अशी थकावट येते ग
चंद्रसख्याच्या छातीवरती रात विसावा घेते ग
(चित्रपट:लाखात अशी देखणी, गीतकार :ग.दि.माडगुळकर)

ज्ञानेश्वर माउली पसायदान मागताना सज्जनांचे वर्णन करताना म्हणतात:-

चंद्रमे जे अलांछन |मार्तंड जे तापहीन |
ते सर्वाही सदा सज्जन |सोयरे होतु |

तर ‘संगम’ चित्रपटातील एका गीतात हसरत जयपुरी लिहितात..

तुझे मैं चाँद कहता था
मगर उसमें भी दाग़ है

तुझे सूरज मैं कहता था
मगर उसमें भी आग है

तुझे इतना ही कहता हूँ
कि मुझको तुमसे प्यार है I

म्हणजे या दोन्ही ठिकाणी चंद्रावरील डाग हे लांछन समजले आहे..

आणि अभिज्ञान शाकुंतलमध्ये कालिदास म्हणतात..
(जेव्हा रानातली शकुंतला पहिल्यांदा दिसली तेव्हा दुष्यंत म्हणतो).

सरसिजमनुविद्धं शैवलेनापि रम्यं
मलिनमपि हिमांशोर्लक्ष्म लक्ष्मीं तनोति।
इयमिधकमनोज्ञा वल्कलेनापि तन्वी
किमिव हि मधुराणां मण्डनं नाकृतीनाम्।।

कमळ शेवाळाने वेढले गेले तरी त्याचे सौंदर्य लपत नाही.चंद्रावरील डाग त्याचे सौदर्य वाढवितो, ही जी सुकुमार कन्या आहे तिने वल्कलं धारण केली आहेत तरी देखील ती किती सुंदर दिसत आहे, सुंदर रूप असेल तर त्याला काय सुशोभित नाही करणार? (कशाने शोभा नाही येणार?)
(जातीच्या सुंदराला काहीही शोभते. )

चंद्रावरील डागाला प्रतिभावंतांनी, संदर्भानुसार वेगवेगळे आयाम दिले आहेत हे बघितल्यावर आपण चकित होतो..

–  ©️ अजित पाटणकर, डोंबिवली
9967834851

asmita1293@yahoo.co.in
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
गंभीर आणि गमतीदार

संग्राहक प्रा. (कै.) आ. ना. पेडणेकर

१.

विश्वकोशाचा मधलाच एक खंड त्याने काढून टेबलावर ठेवला. त्यामागे आत फळीवर ‘ग’ हे अक्षर आढळले. त्याने बाराही खंड काढून टेबलावर ठेवले.

शेल्फच्या आतल्या बाजूस मोठ्या अक्षरात लिहिले होते :-

“पुन्हा सर्व खंड जागेवर ठेवा. ”

मग त्याला ‘ग’ अक्षराचे गुपित कळले.

@@@

२.

हार्लन एलिसन हा विज्ञानकथा ( Science Fiction ) लिहिणारा लेखक. तो एकदा मिडल टेनेसी स्टेट विद्यापीठात पाहुणा व्याख्याता म्हणून आला. त्याचे इंग्रजी साहित्याच्या वर्गापुढे भाषण झाले. नंतर शांतता पसरली. कुणीही त्याला प्रश्न विचारीना.

तेव्हा तो भडकला. “माझ्याकडील ज्ञान मी तुम्हाला देऊ इच्छितो. तुम्ही फक्त प्रश्न विचारा. तिथे ठोकळ्यासारखे बसू नका. ” तरीही कुणी उठले नाही.
तेव्हा तो रागावून म्हणाला, “मी ३२०० किलो मीटर अंतर पार करून इथं आलोय. तुम्ही मला एकही प्रश्न विचारत नाही ? आश्चर्य आहे !”
त्यानंतर मागच्या बाकावरून काहीसा भीत भीत असा प्रश्न विचारला गेला.
“तुम्ही आलात तरी कुठून ?”
जणू दुस-या ग्रहावरून आलेल्या लेखकाला प्रश्न विचारला गेला होता.

@@@

३.

बर्नाड ग्रॅसेट हा प्रकाशक एकदा ज्यां कॉक्टू या लेखकाला म्हणाला, “प्रकाशक लेखकापेक्षा अधिक महत्त्वाचे असतात. ”

तेव्हा कॉक्टू क्षणभर विचार करून म्हणाला, “बरोबर आहे. तुम्ही चित्रपट निर्मात्यांचं अनुकरण करायला हवं. पुस्तकावर भल्यामोठ्या टाइपात छापा :-

ग्रॅसेट निर्मित पुस्तक

आणि नंतर लहान टाइपात लिहा :- ” कॉक्टू लिखित शब्द. ”

@@@

४.

जेकस प्रेव्हेर हा फ्रेंच कवी आणि सुभाषितकार. दर  उन्हाळ्यात तो सेंट पॉल द वेन्ट या खेड्यात येऊन राहायचा.

पहिली दोन वर्षे त्याच्याशी एकही स्थानिक मनुष्य बोलला नाही.

तिस-या वर्षी एके दिवशी तो फिरायला निघाला असताना एका खेडुताने विचारले, “प्रेव्हेर साहेब, ठीक चाललंय ना ?”

कवीने त्याचे आभार मानले. मग त्याला विचारले, “काय हो, हा प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही दोन वर्षं वाट का पहिली ?”

खेडूत म्हणाला, “त्याचं  असं आहे, पहिल्यांदा तुम्ही आलात तेव्हा तुम्ही वेडसर असाल असं वाटलं. काल खात्री पटली. तुम्ही चारचौघांसारखेच नॉर्मल ( साधे ) आहात. ”

“कालच काय घडलं ?”

“काल  आम्ही तुम्हाला झाडापेडांशी बोलताना पाहिलं. ” खेडूत म्हणाला.

@@@

–  प्रा. (कै.) आ. ना. पेडणेकर
[ ‘संग्रहालय‘ ( एप्रिल-मे-जून १९८९ ) मासिकावरून साभार ]

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आनंदाचे चार क्षण

प्रदीप अधिकारी

छोटीशी बाग आहे माझी पांचव्या मजल्यावरच्या पॅरापिटवर.. खरं तर ती फार धोकादायक जागी आहे, चुकून कधी पाय घसरला किंवा तोल गेला तर सरळ वरुन  खाली… साठ फूट  खोल ..!! तरीही गेली  पंचेचाळीस वर्षे मी ही  बाग अगदी आवडीने सांभाळतोय. म्हणण्यापेक्षा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेली आहे ही बाग. अनेक प्रकारची फुलझाडे इथे लावून झाली आहेत. अनेक छोटे मोठे पक्षी अगदी उडत उडत का होईना पण बागेत येऊन जातात, निखळ आनंद मागे ठेवून जातात.

सतत पक्ष्यांची वर्दळ असावी ह्या हेतूने मी अनेक उद्योग करत असतो. मागे एकदा बर्ड फिडर  लावला होता चिमण्यांसाठी. पण  झुंडी यायला लागल्या पोपटांच्या आणि कबुतरांच्या. एका थाळीत पाणी भरून ठेवत असे चिमण्यांच्या आंघोळीसाठी.. त्यात कावळे कसली तरी घाण आणून टाकत, सारे पाणी खराब होत असे. त्यामुळे मूळ उद्देश कधी साध्यच होत नसे.

बागेत गोकर्णीची वेल रूजली होती आणि यथावकाश तुफान फुलली होती….आणि अचानक हे सुंदर रंगीत पांखरू रोज सकाळी बागेत,  इथे तिथे दिसायला लागलं. हाताच्या बंद मुठीत मावेल इवलासा जीव. ‘चुक’ असा आवाज करायचं. त्याच्या अंगावरच्या रंगामुळे इंग्रजीत ह्याला पर्पल् रम्पेड सनबर्ड म्हणतात, असं ज्ञान नेटवरून मिळवले.  पुढे ह्याला मराठीत फुलचुख्या म्हणतात हेही कळले. पण तो पर्यन्त आम्ही त्याला “चुकचुक्या”  नाव ठेवून दिले होते. गोकर्णीच्या फुलातला मध चोखण्या साठी  स्वारी रोज सकाळी हजेरी लावायची.. चुक चुक करत सावधपणे अंदाज घ्यायचा आणि मग कोणीही बघत  नाही ह्याची खात्री पटली की प्रत्येक फुलाच्या देठातून त्याचा मधुप्राशनाचा  कार्यक्रम पार पडायचा.  आमची नुसती चाहूल लागली तरी  भुर्रकन् उडून जायचा.

बागेतल्या झाडांना पाईपाने पाणी घालायची रोज सकाळची वेळ ठरलेली असते.  सवयीने मी  सगळ्या कुंड्यांना पाणी घालून झाले की जास्वंदीच्या झाडावर भरपूर पाणी फवारतो, अगदी झाड निथळत राहील इतके …!! अचानक एक दिवस लक्षात आले की हा लांबून कुठून तरी हे नक्की न्याहाळत असतो. लांबलचक पाईप गुंडाळून ठेवत असतांनाच हा भुर्रकन येतो, जास्वंदीच्या ओल्या पानांवर  चक्क सगळे अंग घुसळतो. फक्त एकदाच ‘चुक’ करतो. अगदी थँक्यू म्हटल्यासारखे, अन् पुढल्याच क्षणी भुर्ररर्…! हातातला पाईप गुंडाळूनही होत नाही तोपर्यन्त ह्याची दिवसभराची आंघोळ झालेली असते. एकदा गेला की मग दिवसभरात चुकून फिरकतही नसे पण ते मधले पाच दहा सेकंद त्याची जास्वंदीच्या पसरट पानावर होणारी आंघोळ पाहाणे विलक्षण आनंददायी दृश्य असायाचे.

दोन एक वर्षांपूर्वीची ही गोष्ट …त्याच सुमारास  अचानक बाहेरगावी जावे लागले  बऱ्याच दिवसांसाठी .. ! परत आलो तोपर्यन्त  गोकर्णीची वेल सुकून गेली होती. चुकचुक्याही कुठेतरी निघून गेला होता.. चुटपुट लागून राहिली होती. रोज सकाळी जास्वंदीला पाणी घालताना त्याची ती लगबगीची आनंददायी आंघोळ आठवायची.. आणि त्या पाठोपाठचा  समधानाचा ‘चुक’ हा चीत्कार ..!!

गेल्या आठवड्यात अचानक बागेतल्या तगरीच्या फांदीवर तो दिसला,,, बघे बघेपर्यंत ‘चुक’ करून उडून गेला..! ठेवणीतल्या बियांच्या साठयामधून  गोकर्णीच्या दोन बिया शोधून काढल्या आणि  एका कुंडीत टाकून दिल्या..  आज लक्षात आलेय त्यातील  एक बी रुजलेय .. कोंब फुटलाय .. गोकर्णीची वेल रुजतेय …आता वाट बघतोय ती वेल  मोठी होऊन फुलण्याची आणि चुकचुक्याच्या आगमनाची.. त्याच्या त्या आनंददायी आंघोळीची..!!


– ©️ प्रदीप अधिकारी
adhikaripradeep14@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

चित्रकारांचे दालन 

– ©️ वैदेही निगुडकर, अमेरिका
प्रेषक  ©️ सौ. स्वाती वर्तक, खार, मुंबई 
 swati.k.vartak@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@
हत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@