कन्फ्यूशियसचा विचार 

[ ]
 
मुकुंद नवरे 
 

 पूर्वार्ध 

( कन्फ्यूशियसची अनेक बोधवचने आहेत. १. तुमच्या आवडीचे कार्य करत रहाल तर तुम्हाला एक दिवसही काम करावे लागणार नाही. २. जोवर तुम्ही थांबत नाही तोवर तुम्ही किती हळू चालता यास महत्व नाही. ३. जीवन साधेसरळ अाहे आपणच ते क्लिष्ट करतो. ४. अज्ञानाची सीमा माहीत असणे हेच ज्ञान होय. अशी ही बोधवचने अनेकांना माहीत असतात. पण कन्फ्यूशियसची संपूर्ण विचारसरणी काय होती आणि तिचा प्रसार कसा व कुठवर झाला याची माहिती सर्वांना असतेच असे नाही. काही वर्षांपूर्वी ‘ताओ’ या विचारसरणीवरील काही पुस्तके माझ्या वाचनात आली आणि तिचा उद्गाता लाव त्सू आणि कन्फ्यूशियस हे दोघेही चीनमधे समकालीन होते आणि त्यांची भेटही झाली होती हे कळले. त्यामुळे कन्फ्यूशियसबद्दलही मला जिज्ञासा वाटू लागली. शोध घेतल्यावर ‘ कन्फ्यूशियॅनिझम् , ए शॉर्ट एडिशन ‘ हे पुस्तक हाती लागले. त्याचा परिचय आणि त्यावर आधारित हा लेख आहे. )

 

कन्फ्यूशियसचे १९२२ मधील पोर्टेट -चित्रकार इ. टी. सी. वॉर्नर 

कन्फ्यूशियस पंथ

कन्फ्यूशियसच्या विचारसरणीचा आवाका पाहिला तर गेल्या अडीच हजार वर्षात तिच्यात विविध ठिकाणच्या पूर्वापारच्या धार्मिक समजुती आणि प्रथांतील बारकावे, तात्विक भूमिकेतून जगाचा घेतलेला शोध, नैतिकता, शिक्षण पद्धती, कौटुंबिक व सामुदायिक विधी, शासकीय सेवेत वाहून घेणे व सौंदर्याची जाणीव, इतिहासाबद्दलचे तत्वज्ञान, आर्थिक सुधारणांची चर्चा, कवी आणि चित्रकारांची वैचारिक प्रगल्भता आणि इतरही ब-याच गोष्टींचा विचार झाला असल्याचे दिसून येते. उदाहरण द्यायचे झाले तर इतर कोणत्याही मानवी संस्कृतीचा नसेल एवढा विस्तृत असा जो पूर्व आशियाचा सुरूवातीपासून आजवरचा इतिहास आपल्याला पहायला मिळतो त्याचे श्रेय  कन्फ्यूशियसच्या विचारसरणीला द्यावे लागेल. इतकेच नाही तर एखाद्या रोग्याला लिहून दिलेले औषध असो वा जलशक्तीवर आधारित महाकाय प्रकल्प असो; बोनसायचा लहानसा वृक्ष असो वा सुंदरसे  आखीव रेखीव उद्यान असो, तेथे आपल्याला कन्फ्यूशियसच्या विचारसरणीचे दर्शन घडत असते. ‘ कन्फ्यूशियॅनिझम् , ए शॉर्ट एडिशन ‘ या पुस्तकात जॉन एच्. आणि एव्हेलिन नागाइ बरथ्रॉंग या लेखकद्वयांनी आपले हे मत नोंदवले आहे.

ते म्हणतात की, चीन, कोरिया, जपान आणि व्हिएटनाममधे कन्फ्यूशियसच्या  विचारसरणीतून जागतिक दृष्टिकोन चालत आलेला दिसतो आणि तेथील लोकांच्या जीवनपद्धतीला लाभलेले सांस्कृतिक कोंदण त्यातील सूक्ष्म बारकाव्यांसह आजही दृष्टीस पडते. कन्फ्यूशियसपंथीयांनी कला, नैतिकता, धर्म, कुटुंबजीवन, विज्ञान, तत्वज्ञान, शासन आणि अर्थशास्त्र अशा मानवी जीवनाच्या सर्वच अंगांना स्पर्शिले आहे. इतके की, संपूर्ण जीवन – त्याच्यातील चारित्र्य, विचार व आचार आणि सभोवतालचा निसर्ग यांवर विविध बाजूंनी सर्वसमावेशक असा विचार केल्याचे दिसते. यातून आपली जिज्ञासा जागी होते आणि ज्यास कन्फ्यूशियसपंथीय दाव/ ताओ/ मार्ग या नावाने स्वीकारतात ती जीवनपद्धती गेल्या अनेक शतकांत कशी विस्तारत गेली असेल याचा आपण शोध घेऊ लागतो. या पुस्तकात याचा मागोवा घेण्यात आला आहे.

कन्फ्यूशियसची विचारसरणी हे चिनी संस्कृतीचे चिन्ह अशी ओळख पाश्चिमात्य देशात असली तरी त्यास एक आंतरराष्ट्रीय धर्म म्हणता येईल अशी ती तत्वप्रणाली आहे. चीनमधूनच तिचा प्रसार कोरिया, जपान आणि व्हिएटनाममधे झाला. कोरियाच्या बाबतीत तर देश स्थापन झाला तेव्हापासूनच कन्फ्यूशियसपंथाने तेथे मुळे धरली आणि दीर्घकाळ राज्य करणा-या चोझन घराण्याने (१३९६ – १९१०) कन्फ्यूशियस विचारसरणी हीच कोरियाची तात्विक परंपरा राहील असे चौदाव्या शतकाच्या शेवटी जाहीर केले. कोरियात प्रसार झाल्यानंतर कन्फ्यूशियसपंथ जपानमधे गेला. सुरूवातीला तेथील बौद्ध मठांमधे उच्चभ्रू जनांसाठी योग्य शिक्षण म्हणून त्या विचारसरणीचा अंतर्भाव करण्यात आला. खरे तर चीनमधील तांग घराण्याच्या काळापासूनच (६१८ – ९०७) चिनी संस्कृतीची वैशिष्ट्ये – त्यातील बौद्ध धर्माच्या सूत्रांसह – जपानच्या नजरेत भरली होती. पुढे जपानमधे टोकुगावा घराण्याचा (१६०० – १८६८) जसा उदय झाला तसा शोगन-कन्फ्यूशियस या नवीन पंथाचा अधिकाधिक प्रभाव जपानी संस्कृतीवर पडत गेला. शोगनपंथीयांनी कन्फ्यूशियसने सांगितलेल्या राज्यकारभाराच्या सूत्रांचा पुरस्कार केला आणि जपानमधील बुद्धिवंतांनी चीन आणि कोरियातील लोकांप्रमाणेच या सूत्रांचा स्वीकार केला. त्याचप्रमाणे व्हिएटनाममधील राजे आणि विद्वान मंडळी प्रभावित झाली आणि त्यांनी चिनी संस्कृतीबरोबरच कन्फ्यूशियसचे ग्रंथ आणून त्यांतील तत्वे स्वीकारली.
हे समजून घेणे महत्वाचे आहे की, कन्फ्यूशियसची विचारप्रणाली म्हणजे एक जिता जागता धर्मच नव्हे तर संस्कृती निर्माण करण्याचा मार्ग आहे. त्यात धर्मामागे तत्वज्ञान, कर्मकांडामागे सिद्धांत, इतिहासामागे अभ्यास, काव्यात कौशल्य, सुलेखनात कला व रंगकाम आणि अराजकीय आदर्शवादाचा समावेश आहे.

कन्फ्यूशियस पंथ आणि ताओ/ बौद्ध विचार

जगातील इतर तत्वज्ञाने आणि धार्मिक भूमिकांच्या तुलनेत आपल्या पंथात जगाच्या ठोस आणि ख-या दिसणा-या स्वरूपाचा विचार केला जातो असा प्रतिवाद कन्फ्यूशियसपंथीयांकडून केला जातो. याचा अर्थ दिसणारे वस्तुमान जग आणि घडणा-या घटना या ख-या असून आपली मानसिकता व मानवी इच्छा यापासून त्या भिन्न आहेत असे ते म्हणतात. याबाबतीत दाव/ ताओपंथीयांनी मानलेली पोकळी आणि बौद्ध धर्मीयांनी प्रतिपादलेल्या शून्यत्वाच्या विरूद्ध कन्फ्यूशियसपंथीय आपली जगाबद्दलची कल्पना मांडतात हे विशेष होय. कन्फ्यूशियसपंथीय इतर लोकांच्या समजुती दाबून टाकण्याचा प्रयत्न करत नाहीत पण त्याचवेळी अशा समजुतींबद्दल त्यांच्या पंथात जे सांगितले आहे त्यातील अधिक खरेपणाबद्दल ते सामान्यजनांना शिक्षित करतात. ते म्हणतात, आपण सारे या ऐहिक जगाचे स्वामी आहोत आणि पृच्छा करतात की याहून आपले दुसरे जग आहे तरी कोणते ? ताओवाद्यांनी आपल्याला कितीही अजब रसायने सांगितली आणि बौद्धांनी ध्यानातून मिळणारी वरदाने दाखवली तरी दोन गोष्टी निश्चित आहेत की, आपल्याला आपल्या मुलांना वाढवायचे आहे आणि आपल्या वृद्धांवर उत्तरक्रिया करायच्या आहेत. हे मान्य केले की मधे उरते ती फक्त कला असून ती साध्य केलेलीच बरी. कन्फ्यूशियसपंथीयांच्या या विचारांना ताओवादी आणि बौद्ध नाकारू शकले नाहीत. तसेच कन्फ्यूशियसपंथीयांनी आपली वर्तणूक नेहमीच चांगली ठेवल्याने फार तर त्यांच्या विचारांची टिंगल होईल किंवा ते गळ्यातील ताईताप्रमाणे ते मिरवले जातील अशा दोनच शक्यता उरल्या. झुनांग्झी (इ.स. पूर्व चौथे शतक) या ताओ गुरूने तर कन्फ्यूशियसचा खुबीने उपयोग करून त्याला ताओवादीच ठरवले. कन्फ्यूशियसपंथीयांनी मात्र स्वत:मधे आणि सभोवतालच्या जगामधे सुधारणा केल्या तर इतर दोघांना दोन्ही बाबतीत अपयश आले. शेवटी कन्फ्यूशियस म्हणतो त्याप्रमाणे जग हे एक भांडार असून त्याचा सांभाळ कुणाला तरी करावाच लागेल !

संक्षिप्त इतिहास

हा पंथ बहरात येण्याचा काळ कन्फ्यूशियस ( Kongzi/ Master Kong) पासून सुरू झाला (इ.स. पूर्व ५५१ – ४७९). त्यालाही आपण या परंपरेचे संस्थापक आहोत याची कल्पना नसावी असे वाटते. इतर आध्यात्मिक पंथांचे जनक ( जसे की, मोझेस, येशू, मोहम्मद, बुद्ध ) हे अगोदरचेच सत्य पुनश्च सांगत होते तशीच कन्फ्यूशियसची भावना होती. त्याच्या दृष्टीने आधी होऊन गेलेल्या साधुसंतांनी (sages & worthies) सांगितलेले शहाणपण तो शिकवत होता. झाऊ (Zhow) घराण्याचे संस्थापक किंग वेन, किंग वू आणि त्यांच्या सरदारांचे ऐतिहासिक आदर्श समोर ठेऊन तो खरी संस्कृती कशी असली पाहिजे ते सांगत होता. झाऊ घराण्याची ही शिकवण निर्दोष अशा राजाज्ञांवर आधारलेली होती आणि त्याहून महत्वाचे म्हणजे या राजाज्ञांना या राजेलोकांच्या आधी होऊन गेलेल्या साधुसंतांच्या शिकवणीचे अधिष्ठान होते. तसेच झाऊ घराण्यातील राजांची  नैतिकता आणि चारित्र्य हे सद्गुणांची कास धरणा-या कुणालाही प्रभावित करणारे होते. यामुळे कन्फ्यूशियसचे सांगणे प्रामाणिकपणाचे होते की, तो या पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीचा केवळ प्रसारक असून वर्तमानकाळातील चुकीच्या दिसणा-या गोष्टींचा प्रचारक नाही आणि विक्रेता तर नाहीच नाही. त्याचे ध्येय समाजसुधारणेचे होते. त्याने अंगिकारलेल्या महान तत्वांमधे माणुसकीच्या गुणास (virtue of ren) अपार महत्व दिलेले दिसते. हा माणुसकीचा गुणही पूर्वापारचा खानदानी गुण असून कन्फ्यूशियसने त्याला पुनर्जीवन दिले आणि त्याचा व्यापक अर्थ सांगितला. आधीच्या गुरूजनांनी ‘रेन’ म्हणजे ‘सरदारमंडळींनी त्यांच्यावर जे लोक अवलंबून आहेत त्यांची घ्यावयाची  काळजी’ असा सीमित अर्थ सांगितला होता. या गुणास सर्व गुणात श्रेष्ठ ठरवून कन्फ्यूशियसने मूलभूत फरक केला की, हा गुण कोणालाही विकसित करता येतो, तो फक्त सरदारमंडळींचा मक्ता नव्हे. माणुसकी ही जन्म सरदारघराण्यात झाला म्हणून परंपरागत अशी असत नाही तर ती माणूस म्हणून जगण्यासाठी अंगी बाणवता येते. कन्फ्यूशियसने ही माणुसकी सर्व जनांसाठी आणि झाऊ सरदारांच्या पुत्रांसाठी व्यवहारात आणण्याची गोष्ट मानली. त्याच्या शिष्यमंडळीत सरदारपुत्र होते तसेच सामान्य मुलातील त्याचा आवडता शिष्य यान हुई होता. आलेल्या सर्वांना तो शिकवण देत असे. कोणी विचारले तर तो ‘ आपण साधु किंवा संत नाही ‘ असे सांगत असे आणि ‘आपल्याला कोणी जिवंत साधु वा संत भेटलेला नाही ‘ असेही सांगत असे. त्यामुळे कन्फ्यूशियसने स्वत:चे असे जगाला काय दिले असे विचारले तर ‘ त्याने स्वत: बनवलेली उच्च गुणांची सूची ‘ हेच उत्तर मिळते. तसेच त्याने शिकण्यावर खूप भर दिला असून तो म्हणतो की, त्याचे शिकण्यावर जेवढे प्रेम आहे तेवढे प्रेम असलेली व्यक्ती त्याला आढळलेली नाही. आपल्याला खूप काही माहीत आहे असे त्याने मानले नाही की स्वत:ला चांगला विद्यार्थी म्हटले नाही ; पण प्रामाणिकपणे सद्गुणांच्या वाटेवर जाणे आपल्याला आवडते असे तो म्हणत असे. ‘ तुम्ही सकाळी दाव/ताओ ऐकाल तर त्याच दिवशी संध्याकाळी तुम्ही समाधानाने मृत्यू पावाल ‘ असे त्याने म्हटले आहे. याचा अर्थ असा की साधुसंतांनी सांगितलेला ताओ मार्ग कवटाळाल आणि आत्मसात कराल तर तुम्हाला जीवनाकडून आणखी अपेक्षा ती काय असेल ?

कन्फ्यूशियसच्या परंपरेतील दुसरा मोठा गुरू (Master) म्हणून मेन्सियस (Mencius/ Mengzi) चे नाव घेतले जाते. आज दिसणा-या चीनचे जे एकत्रीकरण झालेले दिसते ते घडून येण्यासाठी  झालेली युद्धे त्वेषाने लढली जात होती आणि त्यात मोठी राज्ये लहानांचा पराभव करत होती. त्या अशांत काळात राज्य कसे करावे हे जाणून घेण्यासाठी राजेलोक तत्वज्ञानी मंडळींचा सल्ला घेत असत. अशा काळात मेन्सियसने कन्फ्यूशियसच्या विचारांची पाठराखण करत इतर विचारांपासून राजांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या विरूद्ध जाणारी मंडळी देखील होती. एका बाजूस फक्त सत्ता आणि सत्ता मिळवण्यासाठी वाट्टेल ते करण्याचा आग्रह होता. त्यांचे मत होते की, गुणसंपदांचा आग्रह धरणे हा कालापव्यय असून लोकांना फक्त सुख हवे असते आणि वेदना कळतात एवढाच शासनाने विचार करावा आणि मोबदला किंवा शिक्षा देणारे कायद करावेत. दुस-या बाजूस ताओ विचारसरणीचे समर्थक होते ज्यांच्यामते समस्यांवर काहीच न करणे हा उपाय असून सत्तास्पर्धेतून बाहेर होणेच चांगले…. या दोन विचारसरणींच्या मधे यांग झू हा एक तत्ववेत्ता होता ज्याने राजकारणास नाकारून स्वत:स टिकवावे असाही सल्ला दिला तर मोझी या तत्वज्ञाने सामाजिक सुधारणा करण्यास सांगून सामाजिक शांतीसाठी उपयोगी असा दृष्टिकोन ठेवण्यास सांगितले. मेन्सियसने या सर्वांचे विचार चूक असल्याचे सांगितले. सत्ताधीशांना सल्ला देणे हे त्याच्या उपजीविकेचे साधन होते. त्याच्या मते कन्फ्यूशियसची सुरूवातीची शिकवण संतुलित होती आणि तिलाच त्याने विस्तृत व अद्ययावत रूप दिले. उदा. मेन्सियसने दाखवून दिले की, मनुष्य स्वभावाचे नीट पृथ:क्करण करून, त्याची मशागत करून देशाचा राज्यकारभार चालवण्यात सुधारणा करता येऊ शकते. त्याने ठामपपणे सांगितले की, सर्व लोकांमधे सद्गुणांची बीजे असतातच आणि ती अंकुरण्यासाठी मन आणि हृदयाची (mind-heart) मशागत करावी लागेल आणि यातून प्रशासकही सुटू शकणार नाही. प्रशासकाने स्वत:मधे कन्फ्यूशियसने सांगितलेली तत्वे रूजवली तर तो स्वत:चा आदर्श लोकांपुढे ठेवून सुसंस्कृत व नैतिक राज्य-रचना निर्मितीचे साधन ठरू शकेल. याच दृष्टिकोनातून पुढे कित्येक शतके चीनमधे प्रशासकीय अधिका-यांच्या स्पर्धा-परीक्षेत कन्फ्यूशियसची विचारसरणी हा अभ्यासाचा विषय राहिल्याचे दिसून येते.

स्वत:ला पूर्णत्वाकडे नेणे

कन्फ्यूशियसवाद म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी पाश्चिमात्य देशात ही परंपरा आणि तिचे उद्दिष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न होतो. परंतु कन्फ्यूशिसच्या जगतात या परंपरेची कार्यपद्धति आणि उद्दिष्टप्राप्तीला तेवढेच महत्व आहे. जसे की, एखादा पाश्चिमात्य विद्वान एखाद्या गोष्टीचे स्वरूप काय आहे हे विचारील तर चिनी विद्वान तेवढ्यावरच न थांबता ती गोष्ट प्राप्त किंवा आत्मसात करण्यासाठी काय करावे हे विचारील आणि ही गोष्ट दुस-या एखाद्या समान कार्याशी निगडीत आहे काय हेही विचारील. हा पूर्व आणि पश्चिमेतील देशात विचारपद्धतींमधील फरक लक्षणीय आहे.

कन्फ्यूशियसच्या मते आपला तळहात जितका आपल्याला परिचित असतो तितकाच परिचय ताओ/दावचा झाला पाहिजे.
तो म्हणतो की, ‘ ताओ/ मार्ग रूंद करण्याचे काम व्यक्तीचे असून ताओ/ मार्ग कुणा व्यक्तीला रूंद करणार नाही.’ पुढे कन्फ्यूशियस म्हणतो की आपल्या वागणुकीसाठी प्रत्येक व्यक्ती जबाबदार असून त्याचा विसर पडता कामा नये. ही मते विचारात घेता कन्फ्यूशियसला समजून घेण्याचा एक मार्ग दिसतो तो म्हणजे ध्येय म्हणून सतत त्याच्या तत्वांचा विचार करणे आणि यातून स्वत:लाच पूर्णत्वाकडे नेणे. ‘ बोले तैसा चाले ‘ या उक्तीनुसार कन्फ्यूशियसने स्वत:च्याच जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांबाबत जे वर्णन केले आहे त्यावरून ही मार्गक्रमणा कशी अवघड असते ते कळते. तो म्हणतो :

पंधराव्या वर्षापासून, माझे ‘मन-हृदय’ (mind-heart) शिकण्याच्या स्थितीत आले.
तिसाव्या वर्षापासून, मी भूमिका (stance) घेऊ लागलो.
चाळिसाव्या वर्षापासून, मी संशयग्रस्त राहिलो नाही.
पन्नासाव्या वर्षापासून, मला तियान (tian) मागील नैसर्गिक प्रवृती कळली.
( tian/ tianming म्हणजे चीनच्या राजाला राज्य करण्यासाठी स्वर्गातून मिळालेली आज्ञा अशी धारणा आहे.)
साठाव्या वर्षापासून, माझे कान सूर जुळवून घेऊ लागले.
सत्तराव्या वर्षापासून, माझ्या ‘मन-हृदया’ला मर्यादा न ओलांडता चांगुलपणाचे ren) स्वातंत्र्य मला देता येऊ लागले.

जगाचे चिंतन हे मूळ रूपक

कन्फ्यूशियसची मूळ विचारसरणी वरीलप्रमाणे आहे तर तुलनेने अलिकडच्या  काळात माऊ झोंगसान (Mou Zongsan, १९०५-९५) यांनी तिचा अर्थ नव्याने सांगितला असून त्यांच्या मते कन्फ्यूशियसची नैतिक धारणा ही आपल्या जाणीवांबाबत सतत चिंतन करण्यावर आधारलेली आहे. कन्फ्यूशियसची शिकवण आणि इतर तत्वज्ञानांशी तुलना करताना ते म्हणतात की, ग्रीक तत्वज्ञान हे मूलत: आपल्या नैसर्गिक अस्तित्वाचे (nature of being) चे विश्लेषण आणि त्याबाबत वाटणारे आश्चर्य (awe) यावरील रूपक (metaphor) आहे. त्याचप्रमाणे क्रिस्ती, यहुदी, इस्लाम आणि हिंदु धर्मीयांचे रूपक दैवी अस्तित्वाबद्दल (divine reality) आश्चर्य आणि त्याच्या अध्यात्मिक अनुभवावर आधारित आहे. हे दैवी अस्तित्व आणि त्यावरील निष्ठा (piety) विशिष्ट अनुभवातून येते. मात्र कन्फ्यूशियसचे मूळ रूपक हे जगाबद्दलच्या चिंतनावर आधारलेले आहे. शोध घेतला तर पाश्चिमात्य जगातील क्वेकर विचारसरणीत जगाबद्दलचे चिंतन आढळते पण कन्फ्यूशियसपंथीयांना त्यांच्या गुरूची शिकवण आहे की, त्यांच्या चिंतनात एकच समान धागा आहे जो व्यक्ती, कुटुंब, समूह, समाज, राष्ट्र, जग आणि त्याच्याही पलिकडे जाऊन जे पूर्वी होते, आहे आणि राहील त्या ताओच्या प्रचीतीमधून जातो. कन्फ्यूशियसच्या विचारसरणीतील या आणि अशा इतर धारणांसंबंधी माहिती उत्तरार्धात.

‘ कन्फ्यूशियॅनिझम, ए शॉर्ट एडिशन ‘
जॉन एच्. आणि एव्हेलिन नागाई बरथ्रॉंग,
वनवर्ल्ड , ऑक्सफर्ड,
२००४

मुकुंद नवरे
mnaware@gmail.com

रेखाचित्र : विकिपेडियावरून साभार

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

थोडं हसूया  
(४)
 
स्वरूची आयुर्भोजन 
 

प्रकाश पेठे 

आयुष्यात अपत्यजन्म आणि त्याचं लग्न हे दोनच आनंद साजरे करायचे प्रसंग असतात. माझा मित्र शिरीषच्या लेकीचं लग्न होतं. आम्ही पहाटे मुंबईला पोचलो. जिन्यात अर्ध्यावर पोचलो तर लोहाराच्या भात्यासारखा आवाज येत होता. “अहो, हा कसला आवाज येतोय,” ती म्हणाली. दार उघडंच होतं. शिरीष आणि शैलावहिनी मांडी  ठोकून भक भक असा भुभुकार करत होते.

“अरे, शिर्ष्या, आज तुझ्या लेकीचं लग्न आणि हे सुचतं कसं तुम्हाला ?”
“अरे, कपालभाती आणि भस्रिका करतोय, पाच मिनिटं लागतील, ” पायाचे चवडे पकडून मांड्या जोरात हलवत शैलावहिनी म्हणाल्या, ” अहो, वहिनी, जरा चहा टाकाना मी आलेच, ” ती किचनमध्ये गेली.

शिरीषने सांगितलं, अरे, सुनीताचा प्रेमविवाह आहे. सुधन्वा म्हणजे आमचा जावई आयटीवाला  आहे. सहा महिने इकडे आणि सहा महिने सिंगापूरला असतो. तो परवाच आला. आम्ही घ्यायला गेलो होतो. मुलाकडचे लोक आणि सुनीता हॉटेलवर आहेत. “

“आपण नऊ वाजता हॉलवर जाऊ. ते सगळे परस्पर येतील. दहाला गुरुजी येतील. अकराचा  मुहूर्त आहे. आणि साडेबाराला जेवण. लग्नाचं काँट्रॅक्ट दिलंय. आपल्याला काही काम नाही. भटजीपासून अंतरपाटापर्यंत सगळं ते करणार. आपण फक्त अक्षतांच्या पुरचुंड्या फेकायच्या,” शिरीषनं सांगितलं.
“मग त्या गोळा करून पुन्हा वापरतील आणि अंतरपाट तरी कशाला हवा वहिनी ?” बायको म्हणाली.

“नाही तर काय. इतके पैसे खर्चायचे ते फक्त शास्त्रोक्त शिक्कामोर्तब करण्यासाठी. लव्हमॅरेज करून या पोरांनी हौशीतली हवा काढून घेतली आहे. माझी विहीणसुद्धा नाराज आहे. कशात मजा उरली नाही. नुसतं आमंत्रितांना जेवायला घालायचं.”

“बोहोल्याकडे बघा. दोघं खिदळताहेत हातात हार घेऊन, ” ती मला म्हणाली.
“अंतरपाट धरणारे दोघेही बुटके मुद्दाम शोधून आणलेत की काय कोणास ठाऊक.”
“पत्रिकेत सुरुचि आयुर्भोजन छापलंय तो काय प्रकार आहे ?” मी शिरीषला विचारलं.
“अरे, ते पाहशीलच बुफेमध्ये, ” लग्नाचं नाटक संपलं आणि आम्ही शेजारच्या हॉलमध्ये जेवायला गेलो.
बायकोनं रसगुल्ला तोंडात टाकताच ती कळवळली. ” अगं, काय झालं ?” मी विचारलं.

“अहो, रसगुल्ला गोडच नाही. नुसता दुधाच्या चोथ्याचा गोल गोळा आहे.”

“मी कानीकपाळी ओरडत असतो की मराठी माणसाची वाचनापासून फारकत झालीय. तुला वाचायला काय झालं? पहा तिथे लिहिलंय डायबिटीस विभाग. तू नेमकी तिथं गेलीस.”

“गर्दी दिसली म्हणून तर मी इथे आले. मला वाटलं काही तरी नवी रेसिपी असेल,”
“गर्दी दिसली की डोकवायची तुझी सवय काही जायची नाही.”
“हेच ते शिरीष भावजींचं “सुरुचि आयुर्भोजन” दिसतंय.” “तुम्हाला नाही असा मेनू सुचला,” ती तणतणली.

“समोरच्या बाजूला बी.पी. ब्लॉकेज कोलेस्ट्रॉल हायपर टेन्शनवाल्यांसाठी वेगळं काउंटर आहे. तिकडे जाऊ नकोस. सगळे उकडलेले आणि वाफवलेले पदार्थ आहेत. “

“अय्या, दोन्ही ठिकाणी गर्दी दिसतेय. पतंजली की कोण ते शिरीष भावजी आणि शैला वहिनींच्या खांद्यावर बसलेले दिसताहेत वेताळासारखे.”
“महर्षी पतंजली ऋषी म्हणतात त्यांना. आजच्यासारखं नुसतं सुरेश रमेश नाही. बेअक्कल.”
“हे काय, शिरीष भावजी, तुम्ही डायबिटीस विभागात ? मग शैला वहिनी कुठे आहे ? “
“ती तिकडे विहीणबाईबरोबर हायपर टेन्शन विभागात.”
“अय्यम, त्या दोघीना कसलं टेन्शन ?”
“त्यांना आता यापुढे काहीच उद्योग उरला नाही. त्याचंच टेन्शन.”
“पण चायनीज आणि चाट कुठे आहेत ?”
“ते काय सगळे या अंडर थर्टी तिकडेच आहेत. हवं ते हादडा विभागात. “
” इतकं सगळं केलंस पण आमच्या आवडीचं कुठेय ?”

“आहे की जा त्या कोप-यात !”

दोन चार लोक दिसले. आम्ही तिकडे गेलो.
प्रकाश पेठे

prakashpethe@gmail.com

[ ‘लोकसत्ता हास्यरंग‘ २३ नोव्हेंबर २००८ च्या अंकावरून साभार ]
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^ 

साहित्यिकांच्या कथा – दंतकथा

 

प्रभाकर पाध्ये

 

रॉय किणीकर [१]

रॉय किणीकर यांना ओळखणा-यांना ते काय आहेत हे माहीत आहेच, आणि त्यांना जे ओळखत नाहीत त्यांना सांगून त्यांची कल्पना येणारच नाही.

एकदा किणीकर बोरीबंदर स्टेशनच्या प्लॅटफॉर्मकडे निघाले असताना त्यांना एक मित्र भेटला. ‘काय किती दिवसांनी भेटलास लेका,’ या थाटात किणीकरांनी त्याची दखल घेतली आणि त्याच्याशी चुस्त ( आणि सुस्त ) गप्पा मारीत ते उभे राहिले. काही वेळ गप्पा मारल्यानंतर ते मित्राला म्हणाले, ” तू जरा इथं थांबतील का ? या गाडीनं पुण्याला जाणा-या एका दोस्ताला जरा निरोप देऊन येतो. ” मित्र ‘हो’ म्हणाला.

किणीकर प्लॅटफॉमवर गेले. मित्र इकडे वाट पाहात उभा राहिला. गाडी निघून गेली तरी किणीकरांचा पत्ताच नव्हता. कसा असणार ? किणीकर त्याचा गाडीने पुण्याचे अंतर कापीत होते !

प्रभाकर पाध्ये
[ ‘ललित‘ दिवाळी अंक १९७६ वरून साभार ]
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
निमित्त 
केशव साठये 
८२. 
आबासाहेब मुजुमदार


पुण्यातील गणेशोत्सव हा यांच्या वाड्यात ताल सुरांच्या साक्षीने रंगत असे आणि अनेक रसिक तृप्त होत. १९४८ साली पंडित भीमसेन जोशी यांचे गाणे या वाड्यावर होते. गायकाच्या बैठकीची व्यवस्था सुरु होती, यजमान म्हणाले, भिमाण्णा, आज योग चांगला आहे, याच गादीवर बसून अब्दुल करीम खान साहेब गायले आहेत, हीच बैठक सवाई गंधर्व यांच्या गायकीने सजली आहे आणि आता तिसरी पिढी तुमची. हे ऐकून पंडितजी एकदम उठले. लवून नमस्कार केला आणि मग गायला बसले.

खऱ्या रसिकाची व्याख्या करताना यांचे नाव घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. गुणग्राहकता या त्यांच्या वृत्तीमुळे अनेक दिग्गज कलाकार त्यांच्या वाडयात सादरीकरणाची संधी म्हणजे आपला सन्मान समजत.

दत्तो वामन पोतदार, न. चिं. केळकर, बॅ. जयकर, पु. ल. देशपांडे अशा अनेक नामवंतांना या वाड्याने रिझवले आहे. पुण्यात शुभ कार्याची सुरवात कसबा गणपतीला अक्षत देऊन व्हायची तशी गाण्याच्या कार्यक्रमाच्या आमंत्रणाची वर्दी सर्वात पहिल्यांदा या वाड्याच्या दिंडी दरवाज्यातून आत येई आणि मग बाकीचे.

‘सुरांचा राजवाडा’’ हे नामकरण पु.ल.यांनी या वाड्याचे केले आहे. आणि का नाही करणार ?  भास्करबुवा बखले ते शोभा गुर्टूपर्यंत पाच हजार गुणी गायक –गायिकांच्या सुरांनी हा वाडा निनादला. मयूरवीणा, बिन, जलतरंग, सूरसिंगार, स्वरमंडळ, काचतरंग, रुद्रवीणा..अशी ४० दुर्मीळ वाद्ये या रसिकांच्या संग्रही होती. विशेष म्हणजे ते ही सर्व वाद्ये वाजवतही असत. गाण्याला वाहिलेले २५०० ग्रंथ, एक हजार हस्तलिखिते, ५०० संदर्भग्रंथ असे क्वचितच कुणाच्या खाजगी संग्रहात पाहायला मिळतात. काही वर्षांपूर्वी ३५ हजार दुर्मीळ बंदिशींचे डिजिटलायझेशन करुन यांच्या वारसांनी संगीत प्रेमींसाठी एक रत्नांची खाणच खुली केली आहे.
२५० वर्षांचा देदीप्यमान इतिहास लाभलेला वाडा म्हणजे पुण्यातील कसबा पेठ इथला मुजुमदार वाडा, आणि त्याचे रसिकाग्रणी मालक सरदार आबासाहेब मुजुमदार.- स्मृतिदिन (मृत्यू १६ सप्टेंबर १९७३ ) प्रणाम !
@@@
८३. 
अवंतिकाबाई गोखले


रस्त्यांना असलेली मोठ्या व्यक्तींची नावे हा आजकाल केवळ उपचाराचा विषय झाला आहे. कारण त्या व्यक्तीच्या नावाने तो रस्ता फार कमी ओळखला जातो. नाहीतर फर्गसन रोडऐवजी आपल्याला नामदार गोखले रस्ता हे ऐकायला नसते का मिळाले ? यांच्याही नावाचा रस्ता आहे, मुंबईत ऑपेरा हाऊसजवळ. ऑटोमोबाईल मार्केट हीच त्याची ओळख आहे. पण हा रस्ता कुण्याच्या नावाने आहे हे विचारले तर फारच क्षीण प्रतिसाद येतो. यांचा जीवनप्रवास अतिशय रोचक आहे.

इंदूरमध्ये जन्म, लग्न अगदी बालपणी, शिक्षणही यथातथाच. पण इंजिनिअर नवऱ्याच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी परिचारिका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर नवरा परदेशी गेला असता सासऱ्याकडून इंग्रजीही चांगल्या शिकल्या. त्याचा त्यांना अचानक फायदाही झाला आणि इचलकरंजीच्या राणीसाहेबांबरोबर इंग्रजी जाणणारी बाई म्हणून चक्क परदेश प्रवासाची संधी त्यांना मिळाली. ही त्यांच्या आयुष्याला मिळालेली कलाटणी होती. अनेक स्वयंसेवी संस्था आणि त्याचे कामकाज त्यांना पाहायला मिळाले, इस्पितळांना भेटी दिल्या. गोपाळकृष्ण गोखले, सरोजिनी नायडू यांनाही त्यांना तिथे भेटता आले आणि त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. स्वातंत्र्य संग्रामाची आस मनात निर्माण झाली. अशा वेळी महात्मा गांधीजी यांच्या कार्याकडे त्या साहजिकच आकर्षित झाल्या.

त्या दरम्यान एक जाहीर सभेत त्या नाशिकमध्ये बोलत होत्या, तेव्हा लोकमान्य टिळकांनी त्यांना ऐकले आणि महाराष्ट्राच्या सरोजिनी नायडू तयार झाल्या आहेत, असे सहज उदगार त्यांच्या मुखातून बाहेर पडले. गांधीजींच्या सर्व महत्त्वाच्या आंदोलनात महिला आघाडी सांभाळणाऱ्या झाल्या. गांधीजींच्या प्रत्येक वाढदिवसाला स्वतः सूतकताई करुन धोतरजोडी त्या पाठवत असत. चंपारण्य आंदोलनात महाराष्ट्रातील दोन प्रमुख महिला सहभागी होत्या. त्यात आनंदी वैशंपायन यांच्याबरोबर याही होत्या. इथंच या महात्म्याची ओळख मराठी वाचकांना करुन देण्याचा त्यांनी चंग बांधला आणि गांधीजी यांचे चरित्र मराठीत आले. गांधीजींच्या पहिल्या भारतीय शिष्या असे त्यांचे वर्णन होऊ लागले.

मुंबई महानगर पालिकेच्या एक कर्तव्यदक्ष सभासद म्हणून त्यांचा नाव लौकिक होता .१९२३ ते १९३१ असा ८ वर्षांचा कालखंड त्यांच्या मुंबई महानगर पालिकेतील स्वीकृत सदस्य म्हणून केलेल्या कामामुळे गाजला. आज स्वच्छ भारत अभियान देशभर मोठ्या प्रमाणात सुरु आहे पण १९२० च्या दशकात चौपाटीवर कचरा करू नये, अनारोग्यकारक पदार्थांची विक्री बंद व्हावी असे क्रांतिकारी ठराव त्या सभागृहात मांडत. स्थायी समिती सदस्य हे पद भल्याभल्यांना भूरळ पाडते. पण या बाई औरच निघाल्या. बैठकीला हजर राहण्याचा भत्ता त्यांनी नाकारला. निवडून आलेल्या सदस्यांनी बैठकीला उपस्थित राहणे गृहीतच आहे, असे म्हणत ३० रुपये हा दैनिक भत्ता नको म्हणाल्या. तांत्रिकदृष्ट्या हे शक्य नाही हे समजल्यावर ते पैसे त्या दान करु लागल्या .गिरणी कामगारांच्या मुलांसाठी ‘पाळणाघर’सारखा उपक्रम त्यांनी सुरु केला. हा देशातील पाळणाघराचा पहिला प्रयोग मानला जातो. महानगरपालिकेच्या इस्पितळात महिलांच्या आरोग्याच्या तपासणीची विशेष सोय करणाऱ्या, त्यांच्यासाठी एक स्वतंत्र दिवस नेमून देणाऱ्या अवंतिकाबाई गोखले यांची जयंती (जन्म १७ सप्टेंबर १८८२) प्रणाम !

केशव साठये 

keshavsathaye@gmail.com

Advertisements

बोधामृत

डॉ. अनिल जोशी 

अस्मादिकांचा जन्मच पंढरपूरचा ! अर्थात कोणताही विषय अध्यात्मिक पातळीवर नेणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क व तो  आम्ही वापरतोच. आज एका काहीशा अस्पर्शित विषयाकडे अज्ञ जनांचे लक्ष वेधावे अशा विचाराने लेखणी हाती धरली आहे. तेव्हा आता “ मिटा डोळे व वाचा नीट “ ( वाचणे= बचावणे  असाही अर्थ होतो नाहीतर पुन्हा माफी मागा म्हणून कुणीतरी हटून बसायचे )

जनकल्याणार्थ अहर्निश काम करणाऱ्या अनेक संस्था व खाती या देशात आहेत. यातील बरेच लोक अहर्निश शब्दाचा सोईस्कर अर्थ लावून दिवसाची रात्र करतात ( कार्यालयात दिवसाची रात्र कशी करायची ते सुज्ञास सांगणे न लगे.) सध्या क्रिकेट व इतर काही खेळांचे  सामने चालू असल्याने काही वेळा रात्रीचा दिवस देखील करावा लागतोय पण नोकरी म्हणले की त्रास हा आलाच. यातील काहींची स्वत:ची अशी बोधचिन्हे व बोधवाक्ये आहेत. आपल्याला कोठल्या दिशेला आपापले खाते न्यायचे आहे, त्याचा संकेत यातून व्हावा असा एक बुरसटलेला विचार यामागे आहे. या बोधवाक्यांमधून ठासून भरलेले चिंतन आजतागायत फारसे लोकांपर्यंत आले नाही किंवा चुकीचे आले.

आपण सर्वजण एक अति तप्त उन्हाळा व पाऊस नसताना आलेला पूर नुकताच अनुभवून त्यातून भाजून बाहेर पडत आहोत. जागतिक तापमानवाढ, त्यातून होणारे वातावरणातील बदल व त्याचे चराचरावर होत असलेले परिणाम याविषयी आपण बरेच काही वाचले व वाचत आहोत. ( या ठिकाणी “ वाचणे “ म्हणजे काय ते सांगत नाही, आमचा वाचकांवर तेवढा विश्वास आहे !) पर्यावरणरक्षण व जमल्यास संवर्धन हे जगाचा जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्यच आहे. विकसनशील देशातील नागरिक म्हणून तर हे कर्तव्य काकणभर जास्तच आहे  हे एव्हाना आपल्याला समजले आहे. गेली अनेक वर्षे आपल्याबरोबर असणारी दोन खाती अत्यंत पर्यावरणस्नेही पद्धतीने काम करताहेत पण दुर्दैवाने त्यांच्या या योगदानाकडे आपले अक्षम्य दुर्लक्ष होते आहे. पहिले खाते म्हणजे भारत संचार निगम उर्फ BSNL ! चराचरातील पंचमहाभूतांच्या हालचालींशी इतके तादात्म्य पावलेले दुसरे कोणतेही खाते नाही. जरा वारा सुटला, पावसाच्या सरी आल्या, विजांचा गडगडाट झाला की वसुंधरेला होणारा त्रास यांच्या कोमल हृदयाला सोसेनासा होतो व ते आपल्या कोषात जाऊन बसतात व आपले काम बंद करतात. एकदा तर रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना जोराची शिंक आल्यावरही आमचे आंतरजाल त्या धक्याने बंद पडले होते. त्यामुळे अख्खा एक दिवस त्यांना ( म्हणजे पुतीन यांना ) आमच्या सल्ल्याखेरीज काढावा लागला व त्या काळातच असाद हाताबाहेर गेला. (असाद हे BSNL च्या कर्मचाऱ्याचे नाव नसून ते सीरियाचे अध्यक्ष आहेत. ) आता काही लोक याला अकार्यक्षमता  वगैरे म्हणतात (आता मी असाद किंवा पुतीन यांच्याविषयी बोलत नसून आपल्या लाडक्या BSNL कडे वळलो आहे. समोर सगळ्या जगाचे प्रश्न असले की संदर्भ समजणे  अवघड असते.) एखाद्या माणसाच्या दृष्टीने ब्रह्मांडाचा आकार केवढा तर त्या माणसाच्या डोक्याएवढा ! BSNL चे आंग्लभाषेतील बोधवाक्य Connecting India Faster… Faster than your Thoughts असे आहे . त्या प्रचंड गतीमुळेच  हे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचायला अडचण होते. आता ‘5 G’ आल्यावर काय होणार याची काळजीच आहे. ही अकार्यक्षमता वगैरे मुळीच नाही. आंतरजालाच्या अति वापराने पोरेटोरे बिघडत आहेत, कुटुंबातील, समाजातील संवाद लोपतो आहे. यातून आपल्याला बाहेर काढण्याचा BSNL मनापासून प्रयत्न करते आहे, त्याला विरोध हा आपला दुतोंडीपणा नाही काय ? आपण सर्वांनी मृदगंध अनुभवावा, पावसात खेळावे, विजांचा गडगडाट पहावा यासाठी हा सर्व अट्टाहास आहे. मात्र त्यांचे Connecting India Faster… Faster than your Thoughts  हे ब्रीदवाक्य मात्र बदलावे. एक तर ते आंग्ल भाषेतील आहे व त्यामुळे वर नमूद गोंधळ उडतो तो  वेगळाच ! त्यामुळे त्यांचे हे बोधवाक्य बदलून “पादऱ्याला पावट्याचे निमित्त “ हे नवीन बोधवाक्य आम्ही सुचवीत आहोत. येथे पादरा व पावटा ही केवळ प्रतीके आहेत.  प्रतिकांची भाषा न समजता आम्हावर अश्लीलतेचा आरोप होऊ शकतो पण लोकशिक्षक म्हणून काम करताना मुगुटाला काटे राहणारच की !

वीज वितरण मंडळ हे असेच एक पर्यावरणस्नेही खाते. सोसाट्याचा वारा, वादळी पाऊस यातील सौदर्य तुम्ही घरात वातानुकुलीत खोलीत किंवा पंख्याखाली बसून कसे अनुभवणार ? पंखे, वातानुकूलन यंत्रणा  बंद पडली  की आपोआप मोकळ्या हवेत यायची बुद्धी होते. पूर्वी पाऊस आल्यावर वीज जायची. हल्ली काही वेळा आधीच वीज जाते व  नंतर पाऊस येतो. MSEB ला पावसाचा अंदाज कसा येतो ( व आम्हाला का व कसा येत नाही ) यावर MSEB व हवामान खाते यांचा विचारविनिमय चालू आहे. वीजगळतीचे शास्त्र हा देखील त्यांचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. वीज वहनाचे शास्त्र सर्वसामान्य लोकांनाही समजावे व एका “आकड्यात “ किती ताकद असू शकते याची शास्त्रीय जाणीव लोकांना व्हावी यासाठीही  त्यांचे विशेष प्रयत्न चालू आहेत. अनेक सार्वजनिक कार्यक्रम मोफत वीजेवर चालू देऊन संस्कृती संवर्धनासाठी हे खाते यथाशक्ती हातभार लावत आहे. “ दिव्याखाली अंधार “ हे बोधवाक्य त्यांच्यासाठी अत्यंत योग्य आहे. अंधार कळल्याखेरीज प्रकाशाची किंमत कशी कळणार ?

श्रीमद्भगवद्गीता व त्यातील स्थितप्रज्ञ लक्षणे समजायला तशी अवघड. ही लक्षणे समजून घ्यायची असतील तर कामकाजाच्या वेळेत SBI च्या कोणत्याही शाखेत जा. नशिबाने आत प्रवेश मिळाला तर काही काळ तेथे साधकासारखे बसा. चित्त एकाग्र करून तेथे कार्यरत सर्व कर्मयोग्यांचे निरीक्षण करा. भोवतालच्या नागमोडी रांगा, त्यातले ज्येष्ठ नागरिक, बंद पडलेली मशिनरी यांनी जराही विचलित न होता ते ज्या निर्विकारपणे आपापल्या संगणकाकडे बघत राहतात, त्याला तोड नाही. अर्जुनाबरोबर कृपाचार्यांच्या शिकवणीत हे सारेजण होते की काय माहित नाही ? त्यांच्या संगणकावर पोपटाचा डोळा असतो म्हणे !! एरवी बँकेबाहेर भेटले की व विशेषतः त्यांचे काही काम असले की तोंड भरून हसणारी व्यक्ती SBI मध्ये जाऊन आपल्या कामाच्या जागी बसली की जणू तिचा कायाकल्प होतो. सर्व ओळखी, नाती गळून पडतात, समोर फक्त दिसतो तो संगणकाचा पडदा. फार अवघड व कष्टसाध्य साधना आहे ही ! कुंभमेळ्यात एका पायावर उभे राहणारे साधू तुम्हाला आठवतात, त्यांच्यापुढे रांगा लावलावून त्यांना नमस्कार करता. मग असंख्य ग्राहकांना एका पायावरच काय, प्रसंगी डोक्यावर उभे करणाऱ्या या महानुभावांचा दुस्वास कशासाठी ? पुढचा आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण सर्वजण SBI च्या शाखांमधून साजरा करूयात. त्यांचे सध्याचे बोधवाक्य “The Banker to every Indian “ असे फार साधे आहे, ते बदलून “ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती नसो द्यावे वित्तभान “ असे सुचवावेसे वाटते.

वरील सर्व मनसबदारांनंतर क्रमांक लागतो तो आमच्या नगर परिषदेचा. आमच्या नगरपालिकेचे बोधवाक्य आहे, “ झाडू संतांचे मार्ग, करू पंढरीचा स्वर्ग ! “ संत व स्वर्ग हे यातील कळीचे शब्द ! आपण संतत्वाला पोचलो आहोत का याचे सर्वांनी प्रामाणिक आत्मचिंतन करावे. असे आत्मचिंतन झाले आहे का या प्रश्नाला बहुतेकांचे उत्तर नकारार्थी असणार. काही बिघडत नाही. नवविधा भक्तीची कास धरा, नुसते नगरपालिकेकडे तक्रार करत हा दुर्लभ मनुष्यजन्म वाया घालवू नका.

एकदा संतत्व प्राप्त झाले की बाह्यजग मिथ्या हे आपोआपच उमगते आणि मन आत्मानंदी विहरू लागते. स्वर्ग म्हणतात तो  यालाच… मग कसली घाण, कसला कचरा, कसले पाणी आणि कसले रस्ते … ही सर्व मायाच ! तुम्ही संत नसल्याने तुमचे रस्ते नगरपालिकेने का झाडावेत ? यात कायदा पूर्ण नगरपालिकेच्या बाजूने जाणार कारण त्यांची कार्यकक्षा त्यांनी संतांपूर्तीच आखून घेतली आहे.

आता थोडेसे शासनाच्या आरोग्य विभागाकडे बघुयात ..अपुरी अंदाजपत्रकीय तरतूद, वेगवेगळ्या पँथिंचा सावळा गोंधळ, कर्मचाऱ्यांचे औदासिन्य, मागणी पुरवठ्यातील तफावत,  या पलीकडे जाऊन सर्वांसाठी आरोग्य अशी गर्जना करायची असेल तर एकच मंत्र “ प्रभुके भरोसे हाको गाडी ….”

पोलीस खाते हाही असाच एक आभास आहे. जेथे आपणच आपले पोलीस आहोत ती आदर्श व्यवस्था ! नाही माझे एकट्याचे असे मत नाही. साहेबांचे एके काळचे पंतप्रधान बेन्जामिन  डीझरेली यांनी म्हणले आहे, “When men are pure,laws are useless! When men are corrupt laws are broken !! “ यातल्या आदर्शाकडे आपल्या समाजाला न्यायचा पोलिसांचा पुरेपूर प्रयत्न असतो. “सद॒रक्षणाय खलनिग्रहणाय” यासोबत “जे खळांची व्यंकटी सांडो” असे पूरक बोधवाक्य घेऊन आपले पोलीस चालतात. डॉल्बी ऐकायला येत नाही किंवा उलट्या बाजूने येणारी वाहने, तिबल सीट दिसत नाहीत असे मुळीच नाही. त्यांच्यातील  व्यंकटी सांडून त्यांचा आंतरात्मा जागा होण्याची वाट पाहायला नको का ? सारखी घाई काय कामाची ?

एकंदरीत काय, तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी ….. हेच खरे !!

– डॉ. अनिल यशवंत जोशी

९४२२६४७२८३ .
jaysss12@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
नवीन मुखपृष्ठ : ट्रिंगलवाडी पदभ्रमण [] – विजय गोडे
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

फोलकथा 

(ज्या वाचून कुणावरही कसलाही परिणाम होण्याची शक्यता नाही अशा कथा.)   
 
हर्षद सरपोतदार 
७. 
तीन मूर्तिकार 

एका गावात तीन मूर्तिकार रहात असत.
पहिला मूर्तिकार ‘खुजे’ हा मागणीप्रमाणे पुरवठा करणारा होता.
तो गणपतीच्या दिवसांत गणपतीच्या मूर्ती करून विकत असे.
दुर्गापूजेच्या दिवसांत व्याघ्रारुढ दुर्गा विकत असे.
शिवजयंतीला शिवाजीमहाराजांचे अर्धपुतळे बनवत असे.
त्यामुळे त्याच्या दुकानात बारा महिने गर्दी असायची.
त्यातून त्याला खूप पैसा मिळायचा.

दुसरा मूर्तिकार ‘थिटे’ याने जरा वेगळी वाट चोखाळली होती.
एका बंदिस्त आवारात त्याने शेकडो पुतळे उभारले होते.
त्याची शिल्पे ऐतिहासिक आणि पौराणिक काळातील घटनांवर बेतलेली असत.
ती पहायला तिकीट असे.
तिकीट काढायला लोकांच्या रांगा लागत.
परिणामी थिटे याला खूप पैसा आणि प्रसिद्धी मिळाली.

तिसरा मूर्तिकार ‘बडे’ हा मात्र तसा धीमा होता.
खुजे आणि थिटे यांच्यासारखा तो बहुप्रसव नव्हता.
त्यामुळे तो केवळ एकच शिल्प निर्माण करू शकला.
पण त्यासाठी त्याचं अवघं आयुष्य खर्ची पडलं होतं.
जवळच्या एका डोंगरात त्याने हे शिल्प कोरलं होतं.
हे शिल्प अतिशय भव्य होतं आणि सूर्य आकाशात असताना त्याच्या किरणांमुळे त्या शिल्पाचे वेगवेगळॆ भाग उजळून निघतील अशाप्रकारची रचना केलेली होती.
हे शिल्प करण्यात आयुष्य गेल्यामुळे बडे याला पैसाही मिळाला नाही आणि प्रसिद्धीही मिळाली नाही.

कालांतराने हे तीनही मूर्तिकार मरून स्वर्गात गेले.
काही काळाने आपल्या कलेची खाली कुणाला आठवण राहिली  आहे का असा प्रश्न त्यांच्या मनात आला.
म्हणून देवदूताजवळ त्यांनी चौकशी केली.

देवदूताने माहिती काढल्यावर समजलं की तिघांच्या तीन तऱ्हा झाल्या आहेत.

‘खुजे’ या मूर्तिकाराची कुणालाच आठवण राहिलेली नाही.
अशा नांवाचा कुणी होऊन गेला हेच नव्या पिढ्यांना माहीत नाही.

‘थिटे’ मूर्तिकार काही लोकांना आठवत आहे.
पण नव्या पिढ्यांना त्याच्या कलाकृतींमध्ये स्वारस्य नाही.
शिवाय इतिहासात नवीन शोध लागल्यामुळे त्याने बेतलेले प्रसंगही कालबाह्य झाले आहेत.
त्याच्या त्या बंदिस्त आवाराची पडझड झाली आहे.
आणि त्याने बनवलेले पुतळे भग्न होऊन वेडेवाकडे पडले आहेत.

तिसरा मूर्तिकार ‘बडे’ याचं नांव मात्र सर्वत्र दुमदुमत आहे.
तरुण पिढ्या त्याच्या शिल्पामधून प्रेरणा घेऊन लहानमोठी शिल्पं बनवत आहेत.
आणि ‘बडे’ याच्या घराचं राष्ट्रीय स्मारकात रूपांतर झालं आहे.
@
हर्षद सरपोतदार 
hsarpotdar1@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

निमित्त 

केशव साठये 
 
८१. 
डाॅ. वीणा सहस्रबुद्धे

डॉ. वीणा सहस्र्बुद्धे ( १४ सप्टेंबर १९४८ – २९ जून २०१६)

मुंबई आय. आय. टी. असो नाही तर कोपनहेगनची कार्यशाळा असो की स्टॉकहोमचे शिबीर असो; तेवढ्याच निष्ठेने गाण्याचं मर्म त्या उलगडून दाखवत असत. यांचा तराना ऐकला आणि चित्तवृत्ती प्रफुल्लीत झाल्या नाहीत असे कधीच होत नाही. मी फक्त क्लासिकलच गाणार, असला हट्ट न करता प्रयोगशील वृत्तीने त्या गाण्यात अनेक नव्या गोष्टी आणत राहिल्या.याबद्दल कानसेन यांचे ऋणी राहतील.

१९८६ साली त्यांचा गाण्याचा पहिला अल्बम आला आणि नंतर तसे चाळीस आले आणि त्यांनी रसिकांच्या मनात कायमचेच घर केले. जात्याच सुरेल आवाज, त्यात विष्णू दिगंबर यांचे पट्ट शिष्य असलेल्या. आपल्या वडिलांकडून तालीम घेत ही ‘वीणा’ झंकारु लागली. खयाल गायकीवर उत्कृष्ट हुकुमत असलेल्या ग्वाल्हेर घराण्याची परंपरा लाभलेली ही गानतपस्विनी हाडाची शिक्षिकाही होती. वडील शंकरराव बोडस हे विष्णू दिगंबर यांच्या आज्ञेवरुन संगीत प्रसारासाठी कानपूरला होते. तिथेच यांचा जन्म झाला. गाणे शिकवण्याचे बाळकडूही घेत घेत त्यांनी आपला सांगीतिक प्रवास सुरु केला.

बालचित्रवाणीला असताना मित्रवर्य डॉ. कशाळकर यांच्या बरोबर एस. एन. डी. टी. कॉलेजमध्ये गेलो होतो. संगीत विभागात एक शिक्षिका अतिशय मन लावून मुलीना तिथे शिकवत होत्या. सोपी भाषा आणि लगेच प्रात्यक्षिक दाखवण्याची तयारी हे पाहून मुलींनाही ते छान आत्मसात होत असणारअसे मला जाणवले. ते मला त्यांचे झालेले प्रत्यक्ष असे पहिले दर्शन. एक प्रथितयश गायिका एवढे छान शिकवू ही शकते हे पाहून खूप बरे वाटले.

‘कृष्णसंध्या’, ‘ऋतुसंगीत’ हे त्यांचे कार्यक्रम म्हणजे शास्त्र, कला, संस्कृती, मनोरंजन यांचा टवटवीत असा गुच्छ होता. त्यांचा यमन, बिलासखानी तोडी माझे वडील समरस होऊन ऐकायचे. आवाजात एक प्रातःकालीन मार्दव, स्वरांचा जबरदस्त लगाव आणि श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याची कशिश त्यांच्या स्वरातून व्यक्त होते. प्रसन्नता हा त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि गानकलेला कायम बिलगलेली असायची त्या ज्येष्ठ गायिका डॉ वीणा सहस्रबुद्धे यांची जयंती – जन्म १४ सप्टेंबर १९४८ ,प्रणाम !

केशव साठये 
keshavsathaye@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
  संस्कृत शिकायचंय ना ? 

प्रा. मनोहर रा. राईलकर 

पाठ १७

टीप :- इथंही तेच सांगता येईल. खादथ, पश्यथ, गायथ आणि पठथ ह्या क्रियापदांचे कर्ते नेहमी “तुम्ही”  हाच असणार. आणि पठसि चा कर्ता तू.

अभ्यास / गृहपाठ  : संस्कृतात रूपांतर करा :-

(१) आम्ही अनरसा (अपूपं) खातो. (२) आम्ही चित्रपटगीते (चित्रपटगीतानि) गातो. (३) उद्यानात काय असतं? (४) पुष्कळ (बहवः) झाडे असतात. (५) संध्याकाळी आम्ही स्तोत्रे (स्तोत्राणि) गातो.

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

‘खर्वस’ आणि ‘अगर अगर’ 

बालकुमारांचे पान

 

आनंद माधव

माझ्या लहानपणी आमच्या घरात दुभते जनावर नाही, असे कधी झाले नाही. आजकाल विशेषतः शहरातल्या राहणीमध्ये घरात गाय किंवा म्हैस पाळणे जवळ जवळ अशक्य झाले आहे. या बदललेल्या परिस्थितीचे नवीन पिढीवर अनेक परिणाम झाले आहेत. पण या संबंधातल्या एका साध्या गोष्टीची मला परवा अगदी सहजगत्या जाणीव झाली.आमच्या घरातल्या मुलांना ‘खर्वस’  चविष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ जवळ जवळ अपरिचित राहिलेला आहे हे कळल्यानंतर मला बराच वेळ चुटपुट लागून राहिली. लहानपणी आम्हाला २/४ महिने खर्वस खायला मिळाला नाही की चुकल्या चुकल्यासारखे वाटे. त्याचीही आठवण झाली. २०/२५ वर्षांपूर्वीचे घरोघर येऊन दूध घालणारे गवळीही आपल्या गि-हाईकांना खुषीने ‘चीक’ देत असत. त्यामुळे ‘खर्वसा’चा  परिचय व्हायला खरे म्हणजे घरी दूधदुभते पाहिजेच अशी परिस्थिती नव्हती. दुधाच्या क्षेत्रात ‘बाटली युग’ सुरू झाल्यापासून ही ‘गवळी’ संस्थाही हळूहळू कालबाह्य ठरत आहे. ( किंवा ठरलेली आहे. )खरवस आणि चीक म्हणजे काय हे आता मला सांगायलाच हवे !गाय  किंवा म्हैस व्यायल्यानंतर पहिले ३/४ दिवस जे दूध देते ते नेहमीच्या दुधापेक्षा रंग, दाटपणा, चव आणि रासायनिक घटना या सर्व दृष्टींनी वेगळे असते. नेहमीच्या दुधापेक्षा ते दाट, आंबट, गिळगिळीत, पिवळटसर आणि पचायला कठीण असते. यालाच ‘चीक’ म्हणतात. चिकामध्ये थोड्याफार प्रमाणात साधे दूध, साखर किंवा गूळ, नारळाचा खव, वेलदोड्याची पूड इत्यादी मालमसाला घालून हे मिश्रण उकडले की त्याचा एक लिबलिबित गठ्ठा जमून येतो. याच्या वड्या पडता येतात. चवीला हा पदार्थ फारच चांगला लागतो. वर्णन वाचण्यापेक्षा तो प्रत्यक्ष खाणेच चांगले !

सध्या दुधात ४-५ % प्रोटीने ( केसीन ) असतात, तर चिकामध्ये प्रोटिनांचे प्रमाण १५ ते १७ % वाढलेले असते. ही वाढ मुख्यतः अल्बुमिन वर्गातल्या प्रोटिनांची असते. व्यायल्यानंतर अल्बुमिनांचे हे प्रमाण कमी होत होत ८/१० दिवसांनंतर अगदी नाममात्र ( ०.१ ते ०.२ % ) राहते. चिकापासून खर्वस बनतो तो या अल्बुमिनांमुळे ही प्रोटीने पाण्यात विरघळणारी असतात. चीक तापवताना ही प्रोटीने स्वतःच्या वजनाच्या कित्येक पट पाणी  ( अर्थात दुधातले ) शोषून फुगतात आणि खर्वस ही कलिल गुणधर्माची ( कोलॉइडल ) मिठाई तयार होते.

चिकाच्या दुर्मिळतेमुळे गृहिणींना घरोघर ‘खर्वस’ करणे जमत नसले तरी हुशार हलवायांनी या परिस्थितीतून मार्ग काढला आहे. पुण्यासारख्या ठिकाणी १२ महिने रोज खर्वस मिळणारी काही दुकाने आहेत. आपल्याला सहज प्रश्न पडेल की यांना रोज कोणता गवळी ‘चीक’ पुरवतो ? चिकापासून खर्वस का बनतो हे ज्यांना कळले आहे त्यांच्या हेही लक्षात आले असणार की दुधाचे ‘कलिल’ बनवू शकणारा दुसरा एखादा पदार्थ दुधात घातला तरी खर्वस बनेल. अंड्याच्या ( कोंबडीच्या ) बलकामध्ये अल्बुमिन प्रोटीने असतात. कपभर दुधात एक अंडे ढवळून ते मिश्रण उकडले तरी ‘खर्वस’ बनतो, पण या खर्वसाला घट्टमूट्टपणा येत नाही त्यामुळे वडी नीट पडत नाही ; दुधाचे ‘पुडिंग’ बनते पण खर्वस बनत नाही.

‘अगर अगर’ या नावाने ओळखला जाणारा पदार्थ दुधापासून ‘खर्वस’ बनविण्यासाठी सर्रास वापरला जातो. गेलिडियम आणि गार्सिलेरिया या कुलातल्या लव्हाळ्यांपासून ‘अगर’ वेगळे काढले  जाते. कुणी त्याला ‘चायना ग्रास’ तर कुणी ‘इसिन ग्रास’ म्हणून ओळखतात.

‘अगर’ गरम पाण्यात विरघळते आणि स्वतःच्या वजनाच्या कितीतरी पट पाणी शोषल्याने, फुगते व गार होताना त्याचा घट्ट, बांधीव पण लिबलिबीत गठ्ठा (जेल ) होतो. पाण्यात अगरचे प्रमाण ०.५ % एवढे जरी असले तरी त्याचा चांगला बांधीव जेल जमून येतो. या गुणधर्मामुळे ‘अगर’ जगभरच्या वेगवेगळ्या मिठायांतून आणि खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. रंगाला आणि खळीला घट्टपणा आणण्यासाठी वस्त्रउद्योगात, पायसकारक ( इमल्सिफाईंग एजंट ) म्हणून सौंदर्य प्रसाधनात आणि फोटोफिल्म्सवरील प्रकाशसंवेदनशील लुकणात आणि विविध प्रकारच्या आसंगीच्या ( अ‍ॅढेजिव्हज ) निर्मितीत ‘अगर’चा  उपयोग होतो. सूक्ष्मजीवशास्त्रीय अभ्यासांत सूक्ष्म जीवाची वाढ करण्याचे माध्यम म्हणून ‘अगर’चा सार्वत्रिक वापर केला जातो.

रॉबर्ट कॉक या ख्यातनाम जीवशास्त्रज्ञाबरोबर काम करणा-या फ्राऊ हेस या स्त्रीने प्रथम ‘अगर’चा सूक्ष्म जीवांच्या वाढीसाठी वापर केला. तेव्हापासून सूक्ष्म जीवांच्या अभ्यासास मोठी मदत झाली आहे. ‘अगर’च्या अंगी काहीही पौष्टिक गुणधर्म नाहीत. उलट हा पदार्थ मानवी शरीरातल्या पचनयंत्रणेला दाद न देता जसाच्या तसा बाहेर पडतो. आंतड्यामध्ये जाऊन फुगणारा व आतड्याबाहेर पडताना ती साफ करणारा एक निर्धोक पदार्थ म्हणून ‘अगर’चा सारक ( लॅक्सेटिव्ह ) औषधांमध्ये उपयोग केला जातो.

‘अगर’चे सध्याचे जागतिक उत्पादन ५ हजार टनांचे घरात आहे. जपानमध्ये ‘अगर’ तयार करण्याचा छोटा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. भारतामध्ये त्याची निर्मिती नुकतीच सुरू झाली आहे. भावनगरच्या सेंट्रल मरीन केमिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने बसविलेल्या पद्धतीनुसार अहमदाबादच्या सेल्युलोज प्रॉडक्ट्स या कंपनीने १९७० साली प्रथमच ८ लक्ष रुपये किंमतीचे सुमारे १२ हजार किलो ‘अगर’ बनविले आहे.

अगरच्या निर्मितीसाठी योग्य असलेली रेड अल्गी या नावाने ओळखली जाणारी लव्हाळी लखदीव, मालदीव बेटांच्या आसपास आणि ओरिसामधल्या ‘चिलका’सरोवरात आढळतात.

अगरच्या अंगचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म त्याच्या रेणुरचनेमुळे आहेत. गुणधर्मावरून किंवा वास्तवीय स्वरूपानुसार त्याचे जिलेटीन आणि अल्बुमिन युक्त प्रोटीन पदार्थांशी साम्य असले तरी ‘अगर’  प्रोटीन पदार्थ नव्हे. हा आहे गॅलेक्टान गटातला महाशार्करेय  ( पॉलीसॅकराईड ) पदार्थ. जलविच्छेदनानंतर अगरपासून गॅलेक्टोस ही शर्करा मिळते. ५३ गॅलेक्टोस रेणूंमध्ये एका स्थानी बायसल्फेट HSO4  घटक या रेणूमध्ये स्थिरावलेला आहे. हा झाला अगरच्या महारेणूतला एक दुवा असे निदान १४० दुवे एकत्र गुंफून अगरचा महारेणू बनलेला आहे.

अशा या अगरचा ‘खर्वस’ बनविण्यासाठी प्रथम उपयोग  करणा-या अज्ञात संशोधकाचे आम्ही ‘खर्वस’खाऊ सर्व लोक सदैव ऋणी आहोत.

आनंद माधव

 ( ‘सृष्टिज्ञान’ सप्टेंबर १९७१ वरून साभार )
छायाचित्र विकिपेडियावरून साभार
@@@
चित्रकारांच्या दालनात 
 
– चित्रकार ईशान पीयूष करकरे, डेट्रॉईट, अमेरिका – वय .१० वर्षे
– प्रेषक सौ. स्वाती वर्तक   

 

नव्या नोकरीत चंचूप्रवेश

अमेरिका अमेरिका [१८]
 
सतीश इंगळे 
 
प्रिय वाचक, 
 
सतीश इंगळे यांच्या प्रस्तुत आत्मचरित्रपर लेखमालेचा १८ वा भाग प्रदीर्घ कालखंडानंतर आज प्रसिद्ध होत आहे. मध्यंतरी काही अपरिहार्य कारणाने या लेखनात खंड पडला होता. आता पुनश्च हरि ओम् I   
 
या लेखमालेचे या पूर्वीचे १७ भाग खालील तारखांना प्रसिद्ध झाले होते;  उशीराने येणा-या वाचकांसाठी ही माहिती देत आहोत :-   
 
[१] कितना अकेला हूँ मै :- १९ जुलै २०१७, [२] मुक्काम पोस्ट अथेन्स :- १९ ऑगस्ट २०१७, 
[३] गंगेत घोडं न्हायलं :- १९ सप्टेंबर २०१७,  [४] नवलाईचे दिवस :- १९  ऑक्टोबर २०१७,
[५] मोरू :- २० नोव्हेंबर २०१७, [६] थेंबे थेंबे :- ३ डिसेंबर २०१७, [७] तोंडओळख :- १९ जानेवारी २०१८,
[८] सहप्रवासी :- १२ एप्रिल २०१८, [९] गुरुजन :- १७ मे २०१८, 
[१०] एका महत्त्वाच्या टप्प्याची सांगता :- १७ जुलै २०१८,[११] ‘ गुड बाय’ अथेन्स :- १४ ऑगस्ट २०१८, 
[१२] धंदा हा अमेरिकेचा धंदा आहे :- १२ सप्टेंबर २०१८, [१३] एक शहर, दोन चित्रे :- ११ ऑक्टोबर २०१८, [१४] गवारीची भाजी :- ८ नोव्हेंबर २०१८, [१५]  नोकरीच्या शोधातली नोकरी :- ५ डिसेंबर २०१८, 
[१६] मिळाली रे मिळाली..नोकरी! :- ९ जानेवारी २०१९,
[१७] ‘आपल्याला थोडी कॉफी आवडेल का ?’ :- १८ फेब्रुवारी २०१९  
 
भाग १८
 

१३ मार्च १९७२, नेहमीसारखाच एक कंटाळवाणा सोमवार. पण माझ्या आयुष्यात तो अविस्मरणीय दिवसच होता. आज मी खऱ्याखुऱ्या नोकरीवर रुजू होत होतो. नातेवाइकांचा विरह, आई, वडील व भावाचे कष्ट, अथेन्समधल्या सुरूवातीच्या अडचणी, सर्व काही एखाद्या चित्रपटासारख्या डोळ्यांसमोरून जात होते. खरे म्हणजे अगदी ‘सुखभरे दिन आयोरे भैय्या’ किंवा ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ असे मला वाटायला पाहिजे होते. पण ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ हेच माझ्याबाबतीत जास्त खरे होते. नोकरीचे पत्र मिळाल्यावरचा शुक्रवारचा आनंद हळूहळू मावळला होता. त्याची जागा ‘आपल्याला काम झेपेल का?’ या काळजीने घेतली होती. ही माझी अमेरिकेतली ‘इंजिनिअर’ म्हणून पहिलीच नोकरी होती. तेंव्हा ‘कामाच्या अपेक्षा काय असतील?, काम आपल्याला जमेल का?, लोक आपल्याला सामावून घेतील का?’ इत्यादी शंकांनीही मनात धुडगूस घातला होता. शिवाय कर्जाचा डोंगर डोळ्यांसमोर दिसतच होता. तेव्हा मॅनेजरची वाट बघत असताना ‘आता चांगले काम करायचे, मॅनेजरला खूश करून भरभर कर्ज संपवायचे व लगेच भारतात सगळ्यांना भेटायला जायचे,’ अशी दिवास्वप्ने रंगवीत बसलो.

 

सेक्रेटरीने कॉफी विचारतानाच आपले नाव लिंडा असल्याचे सांगितले. पण कॉफी विचारण्याचा शिष्ठाचार उरकल्यावर माझ्याशी काय बोलायचे असा प्रश्न तिलाही पडला असावा आणि वेळ घालवायला तिच्याशी उगाच् कसे बोलायचे, अशी मलाही भीड वाटली. म्हणून मग माझे पार्सल तिने जवळच्याच एका खोलीत टाकले. खोलीत चार पाच टेबले होती पण कोणीच आले नव्हते म्हणून अंधारच होता. मीही दिवा लावायचे धाडस न करता, होता त्या उजेडात एक कंप्यूटर प्रोग्रामिंगचे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न किंवा खरे म्हणजे सोंग करीत बसलो.

साधारण नऊनंतर माणसे रमत गमत यायला सुरूवात झाली. माणसांची येण्याची वेळ व कपडे यांनी जरा धक्काच दिला. आठ ते पांच किंवा नऊ ते सहा अशी कामाची वेळ आहे, असे माझी मुलाखत घेताना माझा भावी मॅनेजर जेरी कनाप म्हणाला होता. पण नऊच काय पण दहा वाजताही निम्याहून अधिक ऑफिस रिकमेच होते. आणि आलेली, विशेषत: तरूण माणसेही अश्या आविर्भावात व पेहेरावात आली की प्रश्न पडावा की ‘हे ऑफिसात कामाला आले आहेत की बागेत फिरायला?’  ब्ल्यू जीन व टी शर्ट असा त्यांचा गणवेश असावा. निदान अंगभर कपडे होते हेच नशीब. त्यामानाने वयस्कर लोक अगदी सूट बूट नाही तरी व्यवस्थित कपड्यात होते.

येणारा प्रत्येक जण आल्या आल्या लिंडा व इतर हजर असलेल्यांना ‘गुडमॉर्निंग’ करायचा व नंतर एकमेकांचा वीक एंड कसा गेला याची चौकशी करायचा. शुक्रवारी मी आलो तेंव्हा या खोलीतल्या कोणाशीच माझी भेट झालेली नव्हती. तेंव्हा मी नवीन इंजिनिअर आहे की मुलाखतीला आलेला नोकरार्थी होतकरू आहे हे त्यांना काहीच माहीत नव्हते. परिणामत: माझ्याकडे कुतूहलमिश्रित दुर्लक्ष करून जो तो आपापल्या कामाला लागला.

साधारण साडेदहा वाजता जेरी उगवला. शुक्रवारी जेरी ब्ल्यू जीन व एका निटशर्टवर होता.पण शुक्रवारी बऱ्याच ऑफिसात ‘ड्रेस डाऊन डे’ असतो हे मी ऐकले होते. तेव्हा मला आश्चर्य वाटले नव्हते. उलट साहेबही कसा सगळ्यांसारखा वागतोय असेच वाटले होते. पण आज मी त्याच्याकडून सुटा बुटातल्या साहेबाची अपेक्षा करीत होतो. उलट जेरीचा अवतार अगदी दुसऱ्याच टोकाचा होता. डोळ्यावर काळा चष्मा, हातात सोन्याचे घड्याळ, अंगावर एक भडक रंगाचे जॅकेट आणि जवळ जवळ सर्व बटणे उघडी असलेला विरोधी रंगाचा तितकाच भडक शर्ट असा त्याचा पेहेराव (किंवा अवतार) होता. एखाद्या कंपनीतला साहेब म्हणण्यापेक्षा एखाद्या हिंदी सिनेमातला खलनायक म्हणूनच ज्यास्त शोभला असता.

पण तो इतका देखणा व हसतमूख होता की हे कपडेही त्याला शोभून दिसत होते. आल्या आल्या तो लिंडाशी बोलला. मी आलो आहे असे तिने सांगितल्याबरोबर जवळ जवळ धावतच माझ्याकडे आला व नासाच्या मीटिंगमुळे त्याला उशीर झाला असेही स्पष्टीकरण दिले. शिवाय मी येणार आहे हे कुणालाही सांगायला विसरला म्हणून मला असे ताटकळत बसावे लागले याबद्दल चक्क माफी मागितली. आणि शेवटी तिथल्या प्रथेप्रमाणे कॉफी पाहिजे का म्हणूनही चौकशी केली.

मला चटकन माझे भारतातल्या नोकरीचे दिवस आठवले. आमचा साहेब हा एक निवृत्त कर्नल होता. आरडाओरडा हीच त्याची बोलण्याची पध्दत होती. आम्ही सगळे सैन्यात आहोत अशा प्रमाणेच तो वागवायचा. राग आला तर उठा बशा, पुश अप किंवा फॅक्टरीला फेऱ्या मारायला लावायचा नाही हेच आमचे नशीब! त्यामुळे साहेब म्हणजे ज्याच्यापासून तोंड लपवायचे तो माणूस अशी आमची समजूत होती. समोर आल्यावर कपाळावर आठी असेल की नाही यावर आम्ही पैजा लावायचो व ज्या महाभागाच्या नशिबात आठ्या नसलेल्या साहेबाचे दर्शन होण्याचा कपिला षष्ठीचा योग आला त्याच्याकडून चहा व वड्याची पार्टी उकळायचो. उलट इथे माझा साहेब हसऱ्या चेहऱ्याने येऊन वर उशीर झाल्याबद्दल माफी मागत होता आणि कॉफीचा आग्रह करीत होता. निदान सुरूवात तरी चांगली झाली होती.

जेरीने मग मला आमचा कंत्राट मॅनेजर, रॉन लॉंगकडे नेले व ओळख करून दिली. रॉनला माझ्याबद्दल बहुतेक माहिती होतीच तेव्हा नावांची देवाण घेवाण करण्यापलीकडे फारसे काहीच नव्हते. रॉनही अगदी मिश्किल होता. प्रथम त्याने माझ्या कपड्यांचीच चेष्टा केली. (अमेरिकेतल्या ऑफिसच्या गणवेशाच्या माझ्या कल्पनेनुसार मी माझा नवा शर्ट, एकुलता एक टाय व कोट अशा अवतारात आलो होतो.) सरकारी नोकरांना भेटायचे असेल तर अंगभर कपडे व इतर वेळी अंग झाकण्या इतपत कपडे अशी आमची अपेक्षा आहे असा त्याने खुलासा केला. त्याच्या या बोलण्यावर मी तर उडालोच. माझ्या अमेरिकेबद्दलच्या आणखी एका (गैर)समजावरचा पडदा त्याने फाडला होता. वर त्याने ‘आम्ही ऑफिसच्या वेळांपेक्षा तुम्ही तुमचे काम वेळेवर संपवण्याला महत्व देतो.. तेंव्हा कामावर नीट लक्ष दे’ असेही बजावले. त्यामुळे बऱ्याच लोकांच्या पेहेरावाचे व वेळेचे गूढही उलगडले. पण हिंवाळ्यातल्या जराशा बऱ्या दिवसतात हे कपडे मग उन्हाळ्यात अंग झाकण्याची व्याख्य काय असेल हा प्रश्न मनात डोकावलाच.

रॉन चांगलाच गप्पिष्ट होता आणि मला धक्के लावायचा त्याने विडाच उचलला असावा.  मी अजून जरा बुजलेला व घाबरलेला आहे हे त्याने माझ्या हावभावांवरूनच ओळखले. माझे शिक्षण व प्रोग्रामिंगचा अनुभव यामुळे मला काहीही अवघड जाणार नाही असा धीर तर दिलाच पण वर मी त्यांच्याकडे काम करायला तयार झालो हे त्यांचे किती चांगले नशीब आहे असेही सांगितले. मला तर धक्काच बसला. नोकरी देणाऱ्या साहेबाकडून किंवा कंपनीकडून तुम्हाला नोकरीवर ठेवृन आम्ही तुमच्यावर किती उपकार करतोय या वागणुकीची मला संवय होती. इतकी चांगली वागणूक तर मला अनपेक्षितच होती. वर तुझ्या ओळखीने आम्ही कोणाला कामावर घेतले तर आम्ही तुला २०० डॉलर बोनस देऊ हे सांगितल्यावर तर माझी विकेटच उडाली. रॉनच्या या बोलण्यावर निदान काही वेळापरती तरी ‘आपल्याला जमेल का’ ही माझी काळजी बरीच कमी झाली. कपड्यांचे बंधन नाही व वेळेचेही बंधन नाही. आता तर ही अगदी नवसाची नोकरी वाटायला लागली. कधी एकदा कामाल सुरूवात करतो आहे’ असा हुरूपही आला. अर्थात् या सवलतींच्या घीमागचा बडगा अजून दिसायचा होता.

नंतर जेरी मला आमचे व्हाइस प्रेसिडेंट एड सिमन्सकडे घेऊन गेला. माझ्या कल्पनेप्रमाणे सूट घातलेला तो पहिला माणूस भेटला. पन्नाशीचा एड दिसायला उंच, सडपातळ पण अगदी पोरगेलासाच होता आणि बोलायचाही सारखा घाईत असल्यासारखा भरभर. कामाच्या बाबतीतही तो तसाच असावा. कारण ओळखीचे शिष्टाचार संपल्याबरोबर त्याने मला त्याच्या एलन नावाच्या सेक्रेटरीच्या ताब्यात दिले व सर्व नोकरीचे शिष्टाचार आजच्या आज पुरे करायला सांगितले.

संवयीप्रमाणे एलननेही लगेच कॉफीची विचारणा केली व मी ती नाकारल्याबरोबर तिने मला कंपनीची माहिती द्यायला सुरूवात केली. ‘कन्सल्टंट अँड डिझाइनर्स इन्कॉर्पोरेटेड’ असे भारदस्त नांव असले तरी कंपनीचे हे एकमेव ऑफिस होते आणि त्यांच्याकडे नासाचे कंत्राट हे एकमेव कंत्राट होते. शिवाय अमेरिकेतल्या ग्रेहाउंड या जंगी बस कंपनीची ही उपकंपनी आहे असे लेटर हेडवर लिहीलेले असले तरी प्रत्यक्षात त्यांचे नावापुरतेच नाते होते. थोडक्यात ’नांव सोनुबाई’ अशीच काहीशी कंपनीची स्थिती होती. अर्थात आपल्याला नोकरी मिळाली आहे या माझ्या आनंदापुढे या सगळ्या माहितीचे मला सोयर सुतक नव्हते हा भाग निराळा.

मग एलनने माझ्याकडून बरेच फॉर्मही भरून घेतले. कामाचे फॉर्म केंव्हा व कसे भरायचे याची माहिती सांगितली. पगार दर दोन आठवड्यांनी नंतरच्या शुक्रवारी मिळणार वगैरे महत्वाचे मुद्दे दिले आणि नासाचा फॉर्म पुढे केला. या फॉर्ममुळे मला नासाचा पास आणि कंप्यूटर वापरण्याची परवानगी मिळणार होती.

तो फॉर्म मी भरायला सुरूवात केली. नांव, शिक्षण, कंपनीचे नांव अशी जुजबी माहिती झाल्यावर व्हिसाचा प्रश्न होता. तो वाचला आणि माझ्या छातीत धडडधडायला लागले. कारण मी अजून विद्यार्थी व्हिसावरच होतो. इतक्या आनंदात चाललेल्या वेळाला दृष्ट लागते की काय असे वाटायला लागले.

मी धावत एलनकडे गेलो. ती फोनवर होती पण मला प्रत्येक क्षण अवघड जात होता. तिला माझी स्थिती समजली असावी. आपण नंतर बोलू असे म्हणत तिने फोन ठेवला व माझ्याकडे प्रश्नात्मक दृष्टी वळवली. मी तिला माझ्या व्हिसाबद्दल सांगितले. लगेच तिने एडला बोलावून घेतले. अर्थात एडने नासाशी शुक्रवारीच संपर्क साधलेला होता आणि मी नासाचा कंत्राटदार म्हणून नोकरी करू शकतो हा निर्णयही सांगितला. उलट त्याने माझा फॉर्म भरून झाल्याबरोबर नासाच्या योग्य त्या अधिकाऱ्यांच्या सह्या घेण्यासाठी एलनला पिटाळले आणि माझा जीव भांड्यात पडला.

जेरीने मग हजर असलेल्या मंडळींशी माझी ओळख करून दिली. या वेळपर्यंत बहुसंख्य मंडळी हजर झाली होती. आता मी दुर्लक्ष्य करण्याच्या प्राण्याऐवजी कुतूहलाचा सहकारी झालो होतो. त्यामुळे बहुतेकांना माझे शिक्षण, अनुभव वगैरेत रस होता. तिथे बरेच अनुभवी इंजिनिअर होते. बहुसंख्य गोरे अमेरिकनच. ते सगळे सारखेच दिसतात किंवा सर्व नावे सारखीच वाटतात असे म्हणण्याइतका मी नवशिका उरलो नव्हतो पण पहिल्याच दिवशी ही सर्व नावे व बरोबरीचे चेहरे लक्ष्यात रहाणे अवघडच होते. तात्पर्य काय तर त्यातल्या तिघांचीच नावे त्या दिवशी लक्ष्यात राहिली, तेही कारण ते गोरे अमेरिकन नव्हते म्हणून!. एक म्हणजे बिल अर्ली नांवाचा आफ्रिकन अमेरिकन, दुसरा होता होजे गोन्झालिस नावाचा दक्षिण अमेरिकन अन् तिसरे उमामहेश्वर राव म्हणून भारतीय.  बिल लक्ष्यात राहिला कारण तो एकटाच सूट व टाय घालून आला होता. अनुभवी सहकाऱ्यानी जुजबी बोलणेच केले. पण रावानी मात्र आपुलकीने बरीच चौकशी केली.

समवयस्क सहकाऱ्यांचा अनुभव मात्र ‘व्यक्ति तितक्या प्रकृति’ हे पटवणारा होता. रावांशिवाय दोन भारतीय होते. कमल भाटिया म्हणून एक मुलगा अन् रोमा मलकानी म्हणून एक मुलगी. बहुधा ती जरा घाईतच असावी. कारण माझ्याशी जुजबी बोलून ती लगेच बाहेरच पडली. खरे म्हणजे ती नुकतीच ऑफिसला आली होती. आणि लगेच बाहेर पडली याचे मला जरा आश्चर्यच वाटले. पण मग रॉनचे बोलणेही आठवले.

कमल भाटिया हा तर वल्लीच होता. बुटका, जरासा लठ्ठ आणि माझ्याच वयाचा पण अकाली केस पांढरे झालेला. हातात सदैव सिगरेट आणि तोंड कायम चालू. त्याला जेरीशी व सगळ्या अनुभवी लोकांशीही प्रचंड आत्मविश्वासाने बोलताना पाहिले आणि मला न्यूनगंड म्हणजे काय हे कळले. आपण होऊन माझ्याशी बोलायला आला. पण माझ्या पार्श्वभूमीपेक्षा माझ्या सोशल लाइफमध्येच त्याला जास्त रस होता. ‘मी नुकताच वॉशिंग्टन भागात आलो आहे व भारतातून येताना लग्नही ठरवून आलो आहे. त्यामुळे मला सोशल लाइफ नाही व त्यात रसही नाही’  हे कळल्यावर त्याची जरा निराशाच झाली.

शेवटी जेरीने, मला, मी बसणार होतो त्या खोलीकडे नेले. इथे तीन टेबले होती.  त्यातले दोघे हजर होतेच. त्यातल्या ब्ल्यू जीन व टी शर्टमधल्या पूर्ण टक्कल असलेल्या मध्यमवयीन माणसाचे नाव होते चार्ली पामर व दुसरा रिचर्ड (हा स्किप या टोपणनावाने ओळखला जायचा) वेलेब्नी हा अमेरिकन. भुरे केस, काहीसा लठ्ठ किंचित पोक काढून चालणारा. एड सिमन्स व बिल अर्लीनंतरनंतर सूट घातलेली ही अपवादात्मक व्यक्ती. मला तर कोणी तरी साहेबच वाटला. ज्याअर्थी आपल्याला याच्या खोलीत ठेवले आहे त्याअर्थी आपण त्याच्यासाठी काम करणार असाच माझा ग्रह झाला. पण तो आमचा सिस्टम अ‍ॅडमिनिस्ट्रेटर आहे व चार्ली त्याचा सुपरवायजर आहे हे ऐकून जरा आश्चर्यच वाटले.  पुस्तकाच्या कव्हरवरून पुस्तकाची ओळख पटत नाही याचा प्रत्यय आला.

जेरीने ओळख करून दिली तेव्हा स्किप ‘वेलकम’ पलिकडे काही बोलला नव्हता. पण जेरी गेल्याबरोबर चमत्कार झाल्यासारखा त्याला आवाज फुटला. त्याने माझी इत्यंभूत चौकशी केली. मलाही त्याने दाखवलेल्या आस्थेने दिलासा वाटला. पण मग जेव्हा माझे लग्न ठरले आहे हे त्याला कळले तेंव्हा त्याने भारतातल्या लग्नपध्दतीबद्दल प्रश्न विचारायला सुरूवात केली. आता मात्र मी गोंधळून गेलो. एक तर याचा कामाशी सुतराम संबंध नव्हता आणि दुसरे म्हणजे फारशी ओळख नसताना कुणी हे प्रशन विचारणे, वैय्यक्तिक स्वातंत्र्याला जपणाऱ्या या देशात काहीसे विचित्रच वाटत होते. नंतर त्यानेच खुलासा केला. त्याला त्याच्या आईने व आज्जीने वाढवलेले होते. अगदी नोकरी लागेपर्यंत तो त्यांच्याबरोबरच रहायचा. म्हणून तो बायकांच्या बाबतीत फार बुजरा झाला होता. सुरूवातीच्या काळात त्याची आई किंवा आज्जीच चर्चमधल्या नाही तर ओळखीच्या मुलीशी त्याची डेट ठरवायच्या. त्यामुळे स्वतंत्रपणे डेटिंग करायची त्याला संवयच नव्हती. परिणाम म्हणजे आता पस्तिशी ओलांडली तरीही त्याचे लग्न होत नव्हते आणि म्हणूनच भारतातल्या वडिलधाऱ्यांनी ठरवायच्या लग्नपध्दतीबद्दल त्याला कुतूहल होते.

जणूं काही मला त्याच्या प्रश्नांच्या भडिमारातून सोडवायला, जेरी मग जेफ केस्लर नांवाच्या इंजिनिअरला घेऊन आला. चश्म्यातून मिश्किल हसणारा, अकाली टक्कल पडलेला जेफ मला बघता क्षणीच आवडला. तोही नुकताच कामाला लागला होता पण त्याचे वागणे व बोलणे इतके सहज व आत्मविश्वासाचे होते की त्याच्याशी बोलल्यावर माझाही आत्मविश्वास वाढला.

‘तुला कांही मदत लागली तर कधीही मला सांग’ असे म्हणून जेफ बाहेर पडणार तेवढ्यात एलन आणखी एका मुलीला घेऊन आली. ‘हाय सतीश, मी पॅनली’ या शब्दात एलनला बोलायची संधी न देताच तिने बोलायला सुरूवात केली. वेळेचे नियम शिथिल असले तरी ही इतक्या उशीरा का आली असा प्रश्न माझ्या मनाला शिवण्याआधीच तिने स्पष्टिकरण द्यायला सुरूवात केली. जेफ व एलनला तिची संवय असावी. आपल्याला आता बोलायची संधी मिळणार नाही हे त्याना माहीत असावे.

पॅनली बोलताना थांबली या संधीचा फायदा घेऊन सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या सह्या असलेला फॉर्म एलनने माझ्या हातात दिला. तो फॉर्म लगेचच नासाच्या सिक्युरिटी ऑफिसला देऊन नासाचा पास लवकरात लवकर – म्हणजे त्याच दिवशी- मिळवणे आवश्यक होते. नासाचे ऑफिस तर चार पाच मैल दूर होते. तिथे जायला बस होती पण आधीच या वेळेपर्यंत तीन वाजून गेले होते व पाचच्या आत तिथे पोचणे गरजेचे होते. मी काय करावे याचा विचार करीत होतो तेवढ्यात पॅनली म्हणाली ‘चल, मीच तुला सोडते. काम झाल्यावर मला त्या बाजूला जायचेच होते तर ते काम मी आत्ताच उरकते.’

आता ऑफिसला परत यायचे नव्हते म्हणून माझे चंबूगबाळे उचलून आम्ही पॅनलीच्या गाडीकडे निघालो. पण गाडीत बसणे इतके सोपे नव्हते. कारण तिच्या गाडीत एवढा पसारा होता की ती गाडीतच रहाते की काय असे वाटावे. मला बसण्यासाठी जागा करतानाही, पुढच्या सीटवरचे सामान मागे टाकत, मागचे सामान डिकीत टाकत अव्याहतपणे तिची कॉमेंट्री चालूच होती. मी, आपल्याला उशीर झाला तर नासाचे ऑफिस बंद होणार या काळजीत होतो पण गाडी आवरण्याचे तिचे काम अगदी शांतपणे चालू होते.

.पण गाडीतही पॅनलीचे चाळे चालूच होते. गाडीतल्या आरशात लिला स्वत:चा चेहरा दिसला व त्याला रंगरंगोटी करणे आवश्यक आहे असा साक्षात्कार तिला झाला. तेव्हा बोलण्याबरोबर हाही कार्यक्रम सुरू झाला. कधी कधी दोन्ही हात कामात होते म्हणून ती पायाने स्टिअरिंग व्हील धरते आहे हे बघून माझी तर बोबडीच वळली. त्यातच वेगाचे नियम आपल्याला लागू पडत नाहीत अशीच तिची समजूत असावी. मला तर नोकरीचा पहिला दिवस आयुष्याचा शेवटचा दिवस ठरतो की काय अशी भीति वाटायला लागली.

पण तिने मला वेळेवर नासाला सोडले. एलनने सर्व कागदपत्र व्यवस्थित तयार केले होते. त्यामुळे फारसा वेळ लागला नाही पण प्रत्यक्ष बिल्ला मिळेपर्यंत धडधड होतीच. मला धीर द्यायला पॅनली माझे काम होईपर्यंत तिथे थांबली. नंतरही मला माझ्या बस थांब्यापर्यंत सोडून आपल्या कामाला गेली. मला मात्र उगाचच एखादे वादळ येऊन गेल्यासारखे वाटत होते. लांब जाणाऱ्या तिच्या गाडीकडे मी चक्रावून पहात होतो. नोकरीच्या नव्या जगात मी चंचूप्रवेश केला होता. दिवसभर भेटलेले चेहरे डोळ्यांसमोरून एखाद्या चित्रपटासारखे जात होते पण कानात मात्र पॅनलीची बडबड घुमत होती.

@@@

(क्रमशः )
सतीश इंगळे 
satishingale@hotmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आजची कविता

टाटा बाप्पा

दहा दिवस तुझ्याशी
केल्या मनसोक्त गप्पा
आज आला निरोपाचा
भलता हळवा टप्पा

तु आलास की घराचं
मंदिर होतं देवा
आई बाबा अन् आजी आजोबाही
मनोभावे करतात सेवा

बालगोपाळांचा होऊन जातोस
तू जिवलग दोस्त
दहा दिवस आनंदात
रंगून जातात मस्त

आरती आणि मंत्रोच्चाराची
होते पवित्र शिंपण
तुझ्या माझ्या नात्याची
घट्ट होते गुंफण

नसतोस केवळ पाटावर
ह्रदयात असतोस बसलेला
श्रद्धा आणि भक्तिभाव
मनात खोल वसलेला

आज निरोपाच्या रस्त्यावर
घालताना फुलांचा सडा
असतात सर्वांच्या ओलावलेल्या
डोळ्यांच्या रे कडा

मुलं विचारतात आई बाबांना
बाप्पा  राहू शकत  नाही ?
निरुत्तर होतात बाबा
आई पाहू शकत नाही

दाटलेल्या कंठानेच
विसर्जन विधी घडतात
रिकामा पाट आणताना
पावलं  जड पडतात

पुढच्या वर्षी येणार म्हणून
तुला करतो टाटा
बाप्पा मोरया रे म्हणत
फुटतात आनंदाच्या लाटा

रेंगाळते जिभेवर बारा महिने
मोदकांची चव न्यारी
जगणेही होते चवदार
वाढते त्यातली खुमारी

हृदयात तसा कायमच
असतोस होऊन मंगलमूर्ती
आशीर्वादाने तुझ्याच
सत्कर्माची स्फूर्ती !

तूच आमच्या घरचा राजा
तूच नवसाला पावणारा
वर्षभर आतुरतेने वाट
पहायला लावणारा !
@@@

मुरारीभाऊ देशपांडे, संगमनेर 
9822082497
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
शब्द – शब्द – शब्द 
 
डॉ. उमेश करंबेळकर 

( २५ )
दण्डापूप न्याय

संस्कृतमधील बऱ्याच न्यायांचे वैशिष्ट्य हे की ज्या गोष्टीवरून अथवा उदाहरणावरून न्याय तयार व्हायचा ती गोष्ट त्या काळच्या सर्व सामान्यांच्या जीवनात नेहमी घडणारी अशी असायची. त्यामुळे तो न्याय चटकन रूढ होई. पण त्यामुळे आजच्या काळात कित्येकदा त्यांचा संदर्भ लक्षात येत नाही आणि त्याचा अर्थही कळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दण्डापूप न्यायाचंच बघा ना. दंड म्हणजे काठी किंवा लाठी. अपूप म्हणजे अनारसा. ‘उंदराने काठी नेली म्हणजे अनारसेही नेले’ असा ह्या दंण्डापूप न्यायाचा अर्थ आहे. अमूक एखादी गोष्ट घडली की काही गोष्टी ओघानेच येतात हे सांगणारा हा दंण्डापूप न्याय.

तसं पाहिलं तर काठी आणि अनारसा ह्या दोन्ही गोष्टी आपल्या माहित असतात. तरी देखील ह्या उदाहरणाचा संदर्भ ध्यानात येत नाही. ‘काठीचा आणि अनारशांचा काय संबंध ? मुळात काठीला अनारसे बांधले कशाला?’ इथून त्याची सुरूवात होते.

हा संदर्भ लक्षात येण्यासाठी पूर्वीच्या काळी काठीला किती महत्त्व होते हे माहित करून घेऊ या. पूर्वीच्या काळी माणसे पायी एकट्याने प्रवास करत. अशा वेळी कुत्र्यासारखे श्वापद अंगावर धावून आल्यास किंवा चोरांनी अडवल्यास संरक्षणाचे साधन म्हणून लाठीचा उपयोग होई. कारण ही लाठी भरीव वेळूची असे. लहानपणी मुलांना लाठीचे हात करायला शिकवत. असा लाठी चालवण्यात पारंगत माणूस दहाजणं अंगावर चालून आली तरी त्यांना भारी पडे. रात्री प्रवास करण्याचा प्रसंग आला तर चालताना मधून मधून काठी जमिनीवर आपटत चालत. (त्यामुळे जमिनीत कंपने निर्माण होतात. सरपटणाऱ्या प्राण्यांना ती ऐकू जातात आणि ती मार्गातून दूर होतात हे तर अनुभवसिद्ध आहे ). अशा तऱ्हेने लाठी हे प्रवाशाचे संरक्षणाचे साधन असे.

याशिवाय प्रवासात लागणारे कपडे, खाद्यपदार्थ किंवा शिधा गाठोड्यात बांधून ते गाठोडे काठीच्या टोकाला बांधत आणि काठी खांद्यावर तोलून प्रवासाला निघत. रणधीर कपूरचा ‘रामपूर का लक्ष्मण’ हा चित्रपट ज्यांनी बघितला असेल त्यांच्या  ध्यानात ही गोष्ट येईल. तिच्या जाहिरातीतही रणधीर कपूरच्या खांद्यावर अशी गाठोडं बांधलेली काठी होती. आजही माऊलीच्या पालखीबरोबर काही वारकरी अशी काठी घेऊन वारी करताना दिसतात. एवढंच कशाला काठी नि घोंगडं घेतलं की गडी जत्रंला जायला तय्यार होतो. थोडक्यात आज प्रवासाला निघताना सूटकेस जितकी महत्त्वाची तेवढीच किंबहुना त्याहून जास्त महत्त्वाची गोष्ट पूर्वीच्या काळी काठी होती.

दण्डीचे महत्त्व कळलं. आता ‘अनारसेच का ‘? ते बघू. तांदळाच्या पीठात गूळ मिसळून ते मळले की अनरशाचे पीठ तयार होते. अनारशांच्या एका बाजूला खसखस लावून ते तळतात. असे हे अनारसे खूप पौष्टिक असतात. स्निग्ध व पिष्टमय पदार्थांमुळे प्रवासात खर्च झालेली ऊर्जा चटकन भरून येते. खसखस म्हणजे अफूचे बी. अहिफेन म्हणजेच अफूला आयुर्वेदात दिव्य औषधी म्हटले आहे. वेदनाशामक (analgesic) आणि निद्राकर (sedative) म्हणून तिचा उपयोग होतो. म्हणूनच असे पौष्टिक,रुचकर आणि दीर्घकाळ टिकणारे अनारसे प्रवासात बरोबर घेतले जात. रात्री मुक्कामाला पोहोचल्यावर पोटभर अनारसे खाऊन जमिनीवर आडवं पडलं की गाढ झोप लागे. पण त्यामुळे व्हायचं काय रात्री उंदरांनी काठी पळवून नेली तरी जाग येत नसे. सकाळी उठून पाहतात तर काठी गायब आणि हो त्याच्याबरोबर अनारसेही गायब. आता आला ना लक्षात दण्डापूप न्याय !

दण्डापूप न्यायाचं आजच्या काळातील उदाहरण द्यायचं झालं तर असं देता येईल, ‘लोकलमधे चोराने पाकीट मारले’ म्हणजे पाकीटाबरोबर पाकिटातील पैसे, क्रेडिट कार्ड, लोकलचा पासही गेला हे ओघानंच आलं.

डॉ. उमेश करंबेळकर

umeshkarambelkar@yahoo.co.in
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

निमित्त 

केशव साठये 
 
८०. 
मल्लिकार्जून मन्सूर

कर्नाटक ही गानहिऱ्यांची खाण आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरु नये.’माझे विचार आणि माझी कृती ही गाण्यापासून कधी मुक्त राहूच शकता नाही,’ अशा विचारांचा हा गायक  ख्याल गायकीत नितांत रमणारा, नाटकी आणि  मेळ्यातून रसिकांना ठाऊक झालेला हा कलावंत.

निळकंठबुवांकडून गाणे शिकलेला, मंजीखां आणि बुर्जीखा यांच्याकडून घरंदाज  गायकीचे धडे गिरवलेला गानसेवक.

धारवाडच्या त्यांच्या छोट्या बंगलीत प्रातःसमयी झाडांची फुले तोडताना, मग देवपूजा करताना या ज्येष्ठ गायकाला गुणगुणताना, प्रार्थना अर्पण करताना ज्यांनी पाहिले ऐकले असेल ते भाग्यवानच म्हटले पाहिजेत. कानात प्राण आणून गाणे ऐकण्याची कशीश हजारो श्रोत्यांच्या मनात निर्माण करणारा हा स्वरपुजारी एकटाच गाताना काय दैवी सुरांची पखरण करत असेल कल्पनाही करता येत नाही.

बहादुरी तोडीतली’ हे महादेव’ या बंदिशीने धारवाडला किती वेळा स्वरगंधात भिजवले असेल. ‘हे नरहरा नारायणा’ ही बिभासमधली रचना ही त्यांची परमेश्वराला वाहिलेली उत्कृष्ट स्वरपुष्पांजली होती. स्वरावर हुकूमत, तालावर पक्की बैठक. गळ्यातून चराचर सृष्टीत प्रवेश करताना अतिशय देखणी आणि श्रवणीय होऊन यायची. गळा गोड आहे म्हणून स्वरांशी कधीही त्यांनी प्रतारणा केली नाही. त्यांना सतत बरोबर घेऊनच गाता झाला.

गौड मल्हार, अडाणा, तोंडी आणि यमनी बिलावलमधल्या ३ मिनिटांच्या त्यांच्या रेकॉर्ड्स ऐकणारा प्रत्येक रसिक त्यांचा भक्त बनला.

इतक्या कमी वेळात रागाची  संपूर्ण आरास दाखवणारा हा गायक मग अनेक मैफलीत बाजी मारुन जाऊ लागला .

मल्लिकार्जून मन्सूर हे नाव धारण करणारा हा श्रेष्ठ गायक.
ग्वाल्हेर आणि जयपूर घराण्याला ललालभूत  ठरलेला – त्यांच्या २७ व्या पुण्यतिथीनिमित्त (मृत्यू १२ सप्टेंबर १९९२) .सादर प्रणाम.

केशव साठये 
keshavsathaye@gmail.com

    

हरवलेलं मन 

नवीन धारावाहिक कादंबरी 
 
प्रा. मनोहर रा. राईलकर   
 
पाच  
 
प्रिय वाचक, 

या धारावाहिक कादंबरीचे मागील चार भाग अनुक्रमे  ९, १७, २१ ऑगस्ट आणि ४ सप्टेंबर २०१९ या तारखांना प्रसिद्ध झाले आहेत. आज पुढील पाचवा भाग वाचा. – सं.    

तिच्या आवाजात जबरदस्त हुकमत होती. मला बोलायला किंवा विचार करून हो-नाही सांगायला तिनं वावच ठेवला नाही. लहानपणापासून नोकरचाकरांना हुकूम सोडायची सवय असणार. पण, म्हणून सगळं जगच आपलं नोकर आहे, असं कसं समजतात हे लोक?

मी तिरप्या नजरेनं त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या दृष्टीत आर्जव दिसलं.
‘मला अपयश नका देऊ साहेब,’ असं तर त्याची दृष्टी सुचवीत नसेल ना?
मी उठलो. आत जाऊन कपडे करून आलो.
‘चलायचं?’ मी विचारलं.
‘होय, साहेब,’ असं म्हणून तो बाहेर पटला नि त्याच्या मागं मी. काकांच्याकडे दृष्टी टाकली तर त्यांच्या दृष्टीत वात्रटपणा असावा असं वाटून गेलं.

त्याच्या पाठीकडे पुन्हा दृष्टी गेली अन् लक्षात आलं की माझ्याहून त्याचेच कपडे उंची होते. मला कसंसंच झालं.
बाहेर आलो. त्यानं दार उघडून धरलं. मी आत चढलो. आणि तोही आपल्या जागेवर बसला. एवढ्या मोठ्या गाडीत निजताही आलं असतं. पण मी आपला अंग चोरून एका कोपऱ्यात बसलो. चालकाच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू असावं, असं मला उगीच वाटून गेलं. आपल्या ह्या आलिशान गाडीतून ह्या असल्या फडतूस माणलाला घेऊन जायचं आपल्या नशिबी आलंय? काही कळायला वाव नव्हता.
गाडी सिंहगड रस्त्याला लागली आणि त्यानं गाडीचा वेग वाढवला. इतका वेळ असली मोठी गाडी गर्दीतून चालवताना तो वैतागला होता. अलीकडे सिंहगड रस्त्यावर हळू हळू वस्ती वाढायला लागली होती. पण एकूण रस्ता खूपच मोकळा होता. चांगला नव्हता हे खरंय. पण गर्दी नव्हती.

विठ्ठलवाडी सोडल्यावर गाडी एका डाव्या रस्त्याला लागली. रस्ता कसला बोळ म्हणा. त्याच्या टोकाशी असलेल्या फाटकापाशी गाडी थांबली. गाडी पाहताच रखवालदार पुढं आला. आणि धावतच पुढं येऊन त्यानं फाटक उघडलं.
आमच्या ड्रायवरनं त्याला काही तरी खूण केली. त्यानं मान डोलवली. सुमारे दीडदोनशे फूट गेल्यावर एका प्रशस्त बंगल्याचं पोर्च लागलं. तिथं गाडी थांबली.

ड्रायवर उतरून माझ्या बाजूला आला. त्यानं दार उघडल्यावर उतरलो नि बाहेर पडलो.
बाहेर पडलो खरा. पण पुढं काय करायचं ते कुणा लेकाला माहीत होतं?
संगमरवरी पायऱ्या नि पुढं संगमरवरीच चौक. त्यावर आपल्या फाटक्या तुटक्या चपला न्यायचा धीर होईना. बंगल्याचा दर्शनी भागच इतका वैभवसंपन्न होता. तर आतलं वैभव किती असेल? चौकाच्या तिन्ही बाजूंच्या भिंतींना फिक्कट पिवळा तैलरंग होता. मधल्या भिंतीला एक भलं मोठं दार. सात साडेसात फूट तरी उंच असावं. इतकं भलं मोठं दार पाहूनच माझी छाती दडपली. हे मधलं दार नि बाजूच्या भिंतींनाही अशीच सहा साडेसहा फुटांची दारं. मधल्या दाराच्या बाजूंना दोन तैलचित्रं दिसली. बहुधा माधवरावांच्या आईवडिलांची असावीत.

‘चला साहेब,’ ड्रायवर म्हणाला. माझ्या निरीक्षणाची त्याला गंमत वाटली असावी. आणि मला अंमळ निरीक्षणाकरता वेळ द्यावा असाही विचार त्यानं केला असावा.
आपल्या मालकांशी तुलना करता हा प्राणी म्हणजे ‘किस झाड की पत्ती’ असंही त्याच्या मनात आलं असेल का?
आता चपला कुठं काढाव्यात असा विचार करू लागलो.
ड्रायवरच्या ते लक्षात आलं असावं. तो म्हणाला, ‘राहू द्यात साहेब. इथं चालतात,’ हे म्हणत असतानासुद्धा त्याच्या डोळ्यांत एक मिश्किल चमक दिसल्याचा मला भास झाला.

तेवढ्यात आतून एक पट्टेवाला आला त्याला आमच्या ड्रायवरनं म्हटलं, ‘अरे गोविंदा, हे बघ हे ब्रह्मेसाहेब आलेत, ह्यांना बाईसाहेबांकडे घेऊन जा.’

माझी छाती धडधडू लागली. ही कोण मोहिनी आहे, तिची भेट झाल्यावर आपली काय अवस्था होईल?
एकदा वाटलं की नावाप्रमाणंच मोहक असेल. एकदा वाटलं नाव आणि रूप ह्यांचा काही मेळ असेल का? ‘नावाविषयी आजीबाई,’ हे, चिं. वि. जोशींचं स्फुट प्रकरण आठवलं नि हसू आलं.
‘या साहेब,’ पट्टेवाला म्हणाला. त्याच्या मागून मी त्या प्रशस्त दारातून प्रवेशलो. मागच्या बाजूला दहासाडेदहा फूट रुंदीचा व्हरांडा, डाव्या बाजूला प्रशस्त लाकडी जिना. डाव्या उजव्या बाजूंना इमारती. व्हरांड्याच्या पायऱ्या उतरून आम्ही हिरवळीवर उतरलो. हिरवळीमधूनच एक पायवाट जात होती. पायवाटेवर फरशा आणि आजूबाजूंस फुलझाडं नि वेली. ‘वाः!’ माझं मन एकदम प्रसन्न झालं.
‘इकडून या साहेब,’ पट्टेवाल्यानं माझ्या समाधीचा भंग केला.

‘बाईसाहेब आपली वाटच पाहताहेत. आपल्याला उशीर झाल्यामुळं काळजीत आहेत.’
‘च्यायला!’ मी चक्रावलो. माझी काळजी करायचं ह्या बाईला कारणच काय? आपण ह्या लफड्यात निष्कारणच गुंतत चाललोय, असं मला वाटायला लागलं. काही भूलभुलैया तर नाही ना? इथूनच वळून परत जावं का? माझा काही निश्चय होई ना. आता परतणं तर अशक्यच दिसत होतं. दोर कापलेले होते!
‘या साहेब इकडून,’ पट्टेवाल्याचं पालुपद चालूच होतं. आणि त्याच्या मागून मी धडधडत्या हृदयानं ओढला जात होतो. भारल्यासारखा.

सगळ्यांचं लक्ष माझ्याकडेच असावं, असा सारखा भास होत होता. खरं तर जमलेले सगळे आपापल्या विचारात मग्न होते. त्यांचा पोशाखही तसा साधासुधाच होता, सर्वांचा. क्वचित काही लोकांचा जरासा उंची असेलही.

प्रत्येकाच्या हातात पेले होते. मधून मधून ते त्याचा एकेक घोट घेत होते. आणि मधून मधून टेबलावरच्या पदार्थांचा आस्वादही घेत होते. कसलं पेय असेल? बीयर?, व्हिस्की? की आणखी काही? मला तरी आणखी नावं कुठं माहीत होती?
पण आपापसांत गप्पा मारण्याइतकी त्यांची ओळख असावी. आणि मोहिनीबाईंचीही असावी. बावरल्यासारखा इकडे तिकडे पहात पट्टेवाल्याच्या मागून मी फरपटत होतो.

‘नमस्कार वसंतराव,’ मंजुळ आवाजात हाक ऐकू आली.
अन् आवाजाच्या दिशेनं चमकून मी पाहिलं.
‘मी मोहिनी बोर्ले,’ हाकेमागोमाग परिचय आला.

‘तुम्ही आलात. फार आनंद झाला.’
मी अवाक झालो.

अप्रतिम सुंदर अशी एक प्रौढ स्त्री माझ्या समोर नमस्काराकरता हात जोडून उभी होती.
गोरा रंग, धारदार नाक, भव्य कपाळ, प्रसन्न हसरे डोळे, कपडे उंची पण भपकेबाज नव्हते.
मेकपचा पूर्ण अभाव. मंगळसूत्राखेरीज गळ्यात, हातात दागिने नव्हते. पण खानदानी श्रीमंतीचा आब मुद्रेवर अन् बोलण्याचालण्यातून ओसंडत होता.
मोहिनी ह्या नावाबद्दल केलेल्या माझ्या कल्पना कापरासारख्या उडून गेल्या. मुद्रा अतिशय सात्त्विक अन् सोज्वळ, धीरोदात्त वृत्तीची स्त्री समोर उभी होती.
वयाचा अंदाज करणं कठिण होतं. पण चाळिशीच्या आतबाहेर असावं. मात्र त्या प्रसन्न व्यक्तिमत्वाला कळेल न कळेल, अशी एक काळजीची किनार असावी, असं मला स्पष्ट जाणवलं.
माधवरावांची जी माहिती मला झाली होती, त्या माहितीमुळंही मला वाटलं असेल. पण डोळ्यांखालती पुसटशी काळी वर्तुळंही जमा झालेली दिसत होती.

काळ्या कुरळ्या केसांत काही रुपेरी ताराही चमकत होत्या. आणि सुंदर नि हसऱ्या चेहऱ्यावर सुरकुत्याही दिसू लागल्या होत्या.
त्यांच्या नमस्काराला प्रतिसाद न देता मी नुसताच त्यांच्याकडे पाहात राहिलो होतो.

‘माझी चिठ्ठी पाहून नवल वाटलं असेल ना?’ त्यांनी हसत हसत म्हटलं.

‘पण त्यात नवल वाटण्यासारखं काही नाही. काल रात्रीच माधवरावांनी मला मुंबईहून फोन केला नि तुमच्या भेटीबद्दल, तुमच्या बोलण्याबद्दल सगळं सांगितलं. नि आजच्या पार्टीला तुम्हाला बोलवावं, असंही सुचवलं. पण मला काही खात्री नव्हती की तुम्ही याल अशी! खरं की नाही?’ असं म्हणून त्या पुन्हा हसल्या.
आपल्या मनातल्या विचारांचा ह्या बाईंना कसा सुगावा लागला असेल कुणास ठाऊक? मोठ्या वस्ताद दिसतात.
एकजण तबक घेऊन हिंडत होता. बाईंनी त्याला थांबवलं. त्या तबकातला एक पेला उचलू लागल्या.

‘काय आहे?’  मी भीत भीत विचारलं.
‘भिण्याचं कारण नाही. सरबतच आहे. आमच्याकडे मद्य कधीच नसतं. कंपनीच्या पाटर्यांतही हे कधी मद्य ठेवू देत नाहीत. त्यांना कमालीचा तिटकारा आहे मद्याचा. घ्या,’ असं म्हणून त्यांनी एक पेला माझ्या हाती दिला.

‘आणि अगदी मोकळेपणानं काय हवं ते घ्या. मुळीच संकोच करू नका. संपतकाका तुमच्याशी सगळ्यांची ओळख करून देतील. संपतकाका,’ त्यांनी हाक मारली.
एक काळा आणि उंच माणूस पुढं आला. त्याचे डोळे भेदक तपकिरी होते. कपडे पांढरे शुभ्र. अचकन आणि अंगरखा. प्रकृतीनं चांगलाच दांडगा. वय मात्र बरंच असावं. हातावर नि चेहऱ्यावर सुरकुत्यांची दाटी होती. सत्तरी तरी उलटली असणार. तरीपण शरीराच्या हालचाली वयाला न शोभण्याइतक्या मोठ्याच चपळ अन सफाईदार होत्या.

‘काय बाईसाहेब?’ तो नम्रतेनं म्हणाला.
मग मोहिनीबाईंनी माझी ओळख त्याला करून दिली. पण, त्याची ओळख मला करून दिली नाही.
त्याअर्थी तो एक नोकर असावा, हे उघड होतं.

पण मला मात्र संपतकाका हे नाव आणि नोकर असला तरी खूप जुना असावा किंवा कदाचित कारभारी असावा एवढंच समजलं.

संपतकाकांनी मला सर्वत्र हिंडवलं आणि एकेकाची ओळख करून दिली. कुणी छायाचित्रकार, कुणी संपादक इ. माझी ओळख मात्र त्यांनी ‘हे वसंत ब्रह्मे,’ इतकीच करून दिली.

नवल असं की हे सारे वृत्तपत्रीय जगतातले असूनही माझी आणखी चौकशी करावी, असं त्यांतल्या एकालाही वाटलं नाही! एका परीनं तेही बरंच झालं. कारण मी तरी अंतिम निर्णय कुठं सांगितला होता. ह्या विचारासरशी माझं मलाच हसू आलं होतं. जणू काही माधवराव आणि आणखी दहापाच उद्योगपती माझ्या समोर अर्ज घेऊन उभे आहेत आणि म्हणताहेत, ‘अहो, आमचं, तेवढं पी.ए. चं काम बघा की.’ आणि मग मीच मुलाखती घेऊन ठरवणार कोणाकडे काम करायचं ते! त्या कल्पनेनं मला खुदकन हसू आलं.

मी आपल्या स्वतःच्या विचारांत गर्क होतो हे खरं आहे. पण माझ्यातही कुणाला रस नव्हता.
औपचारिक ओळख झाल्यावर जिवणी एकदा रुंदावून झाली की आपलं काम झालं, असं समजून जो तो आपापल्या गप्पांत दंग व्हायचा.
त्या साऱ्या घोळक्यात मला विसंवादी वाटायला लागलं. सार्वजनिक बागांप्रमाणं तिथंही सिमेंटच बाकही ठेवलेले होते.

त्यामुळं मग एका हातात सामोसा आणि एका हातात सरबताचा पेला घेऊन मी एका बाकावर बसून त्यांचा आस्वाद घेऊ लागलो. आणि त्या अपरिचित जगाचं तिऱ्हाइताप्रमाणं निरीक्षण करू लागलो.

माझ्या मूर्खपणाची मला लाज वाटायला लागली. मोहिनीबाईंबद्दल मी वेड्यासारख्या काय एकेक कल्पना करून घेतल्या होत्या? मला फारच अपराधी वाटायला लागलं.
त्या माधवरावांच्या गृहस्वामिनी होत, ते तर आता स्पष्टच होतं. पण मग त्यांनी पत्रकार मंडळींना अशी पार्टी का दिली असेल?
पत्रकार परिषद असती तर समजण्यासारख होतं. पण मग तिथं माधवरावांचीही उपस्थिती आवश्यक नव्हती का?
हे घरगुती पाटर्यांचं प्रकरण आपल्या इथं कुठं असतं? आणि मद्य नसूनही इतके पत्रकार आले होते, हेही एक नवलच म्हणायला हवं!
माधवरावांना असल्या पार्ट्या आवडत असतील का? आवडत नसल्या तरी बाईंपुढं त्यांचं काही चालत नसेल का? बाई इतक्या हट्टी असतील?
आपलं तेच खरं करणाऱ्या? माधवरावांना त्याचाही मनस्ताप असेल का? पार्टी देण्यावरून दोघांचे खटके उडत असतील का? पुन्हा एकदा प्रश्न नि प्रश्न! हो.
पण, माधवरावांना आवडत नाही म्हणून मोहिनीबाईही पार्ट्यांत मद्य ठेवीत नाहीत. म्हणजे त्यांच्या मताचा आदर करतात, असं नाही का?

माणसामाणसांचे स्वभाव आणि संबंध किती गुंतागुंतीचे असतात?

साधारणतः तास दीड तास पार्टी चालली. आणि मग एकेक जण निघू लागला. बाईंचा निरोप घेण्यासाठी गर्दी होऊ लागली. जराशी गर्दी कमी झाली की त्यांना सांगून आपणही निघावं, असा विचार केला आणि अर्धवट उठलेला मी पुन्हा खाली बसलो. बाईंच्या ते लक्षात आलं असावं. गर्दी सोडून त्या माझ्यापाशी आल्या.
‘येतो मी,’ असं मी म्हणणार त्याआधी त्याच म्हणाल्या, ‘जरा थांबा ना. थोडं काम आहे तुमच्याशी. गर्दी संपली की बोलू हं,’ इतकं म्हणून माझ्या प्रतिसादाची वाटही न पाहता त्या निघून गेल्या.
त्यांचा हा नेहमीचाच खाक्या असावा. आपल्याला स्वतःला जे काय म्हणायचं. ते म्हणून टाकायचं आणि समोरच्याचं म्हणणं ऐकण्यापूर्वी संभाषणच बंद करून टाकायचं! दुसऱ्याला बोलायची संधीच द्यायची नाही.

मग त्याला संभाषण तरी कसं म्हणावं? आणि का म्हणावं?

पुन्हा वाट पाहणं आलं. जवळजवळ दहा मिनिटं मी बसून असेन. माधवराव नि बाईंच्यात नेहमी खटके उडत असतील का? माझं विचारचक्र सुरू झालं. कोणकोणत्या कारणांवरून उडत असतील?
पण मग माधवरावांनी हे शुक्लकाष्ठ माझ्या मागं कशाला लावलं? त्यामुळं, नि आता बाईंनी पार्टीला बोलावल्यानं त्या दोघांबद्दलच्या विचारांनी माझ्या मनात गर्दी केली.
‘ब्रह्मेसाहेब!’ संपतकाकांची हाक ऐकून मी दचकलो. अन् खडबडून उभा राहिलो.
‘अं?’
‘बाईसाहेबांनी वर बोलावलंय.’
‘पण…’

घड्याळ पाहून मी बोलू लागताच त्यांनी मला थांबवलं.
‘उशीर होईल, असं तुमच्या घरी कळवलंय.’

पण मी तसाच उभा राहिलेला पाहून ते म्हणाले, ‘जाऊ या ना वर?’ त्यांच्या स्वरांतलं आर्जव मला जाणवलं.
हिरवळीमधल्या पायवाटेनं आम्ही जिन्याकडे आलो. आणि वरच्या मजल्यावर गेलो.
डाव्या बाजूला एक प्रशस्त सभागार होतं. त्याच्या आतल्या भिंतीला लागून एकदीड फूट उंचीचा लांबरुंद मंच होता.

त्यावर गाद्या आणि लोड न् त्यांना परीटघडीच्या शुभ्र चादरी-अभ्रे घातलेले दिसले. गाण्याच्या कार्यक्रमाला चांगलाय, माझ्या मनात आलं.

‘इथं पुष्कळदा गाण्याचे कार्यक्रम होतात,’ संपतकाका म्हणाले तेव्हा मी दचकलो. त्यांनी फक्त स्मित केलं.
‘साहेब पार्ट्यांना येतात ना?’
‘कधी कधी येतात.’
सभागार सोडून आम्ही पुढं गेलो.


‘या, वसंतराव,’ संपतकाकांच्या मागून मी खोलीत शिरताच बाईंनी माझं स्वागत केलं. आणि कोचाकडे बोट करून म्हटलं, ‘बसा. तुम्ही आता आमच्या कुटुंबातले आहात.’
‘आपण उगीच माझा एवढा सन्मान करताहात. तुम्ही कुठं नि आम्ही कुठं?’
‘तसं नव्हे वसंतराव,’ एवढं बोलून त्या एकदम गंभीर का झाल्या ते मला कळेना.
क्षणभर त्या मूक झाल्या. कुठंतरी काहीतरी सलत असणार. दोघांच्या संबंधात काहीतरी बिघाड झाला असावा, असं मला वाटलं.

‘माधवराव,’ त्यांनी पुन्हा बोलणं सुरू केलं. ‘आपली अडचण कुणाजवळही बोलत नाहीत. पण तुमच्याजवळ ते बोलले. तुमची आपल्याला मदत होईल असा विश्वासही त्यांना वाटला. इतकंच कशाला? तुम्ही त्यांच्या बरोबर सातत्यानं असावं, अशी तरतूदही ते करू पाहताहेत. हे सारं काय उगीच? तुमच्याबद्दल त्यांना काहीतरी जिव्हाळा वाटत असल्याशिवायच? आपल्या हरवलेल्या काळाबद्दल ते कुणाशीही बोलत नाहीत. डॉक्टरकडे जायलासुद्धा ते कधी तयार नसतात. लहान मुलांना डॉक्टरची भीती वाटणं आपण समजू शकतो. तुमचा विश्वास नाही बसायचा, पण ह्या वयातसुद्धा त्यांना लहान मुलांसारखीच डॉक्टरची भीती वाटते. एरवी त्यांची कर्तबगारी आकाशाएवढी आहे. पण दुसरीकडे पाहावं तो लहान मुलापेक्षाही मूल आहेत. तुमच्यावर मात्र त्यांचा कमालीचा विश्वास बसलाय.’

‘त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा मी कसोशीनं प्रयत्न करीन,’ मी म्हटलं.
त्या मंद हसल्या. त्यांनी माझ्याकडे नजर टाकली. पण काही बोलल्या नाहीत.
‘काही गोष्टी बोलायच्या नसतात. मनोमन समजून घ्यायच्या असतात,’ असं तर त्या सुचवीत नसतील?
‘त्यांना माणसाची पारख चांगली आहे. ऊठसूठ कुणावरही विश्वास टाकीत नाहीत ते.’ त्यांच्या बोलण्यात माधवरावांबद्दलचा अभिमान डोकावून गेला. मला नवल वाटलं.
बाईंच्या शेऱ्यामुळं मला आनंद झाला असला तरी दुसरीकडे माधवरावांना नकार देणं अधिक अवघड होऊ लागलं. पण, बोलायला हे हवंच होतं. जेवढ्या लवकर तेवढं चांगलं.

मी शब्द जुळवू लागलो.
‘एक बोलू का? परवानगी असेल तर?’
‘बोला की. परवानगी कशाला मागायची?’
‘असं कसं? काही झालं तरी आपण आणि सर हे मालक आणि मी एक नोकर, आपला नि सरांचाही.’
‘नोकर?’ असं म्हणून त्या हसू लागल्या. त्यांच्या हसण्याचा मला काही उलगडा होई ना.

मी गोंधळून त्यांच्या तोंडाकडे पहात राहिलो. त्यांच्या ते लक्षात आलं. अन् त्या हसायच्या थांबल्या.

‘क्षमा करा हं,’ त्या शरमून म्हणाल्या. ‘तुमची चेष्टा करण्याचा उद्देश नव्हता. पण माधवरावांचं वागणं तुम्हाला माहीत नाही.
घरातल्या किंवा कंपनीतल्या माणसालासुद्धा ते नोकरासारखं वागवीत नाहीत. तर निजी सचिवाला नोकर कसं मानतील? तेव्हा तुम्ही असलं काही एक मनात आणू नका. बोला, काय अडचण आहे?’
मग मी त्यांना काकांचा आश्रम, तिथली व्यवस्था, मुलं वगैरे माहिती सांगितली. त्यांनीही बरेच प्रश्न विचारले. त्या प्रश्नांवरून आमच्या कामाची त्यांना आधीच माहिती असावी, असं लक्षात आलं.
‘पण, तुमची अडचण काय आहे?’
मुख्य प्रश्न कसा विचारायचा ही बाकबूक होतीच. शेवटी मी धीर केलाच. ‘काकांना माझी इतकी मदत होत असते की त्यांचं काम मी सोडलं तर त्यांचे हातपायच मोडल्यासारखं होईल. त्यांनी माझ्या अगदी लहानपणापासून स्वतःच्या मुलासारखं  वाढवलंय…’
बाईंचे डोळे भरून आलेले पाहिले नि मी गप्प झालो. दातांनी ओठ दाबून रडं थांबवण्याची त्यांनी खूप धडपड केली. सरतेशेवटी त्या उठल्या.

हातानंच मला बसायची खूण करून मागच्या दारानं त्या आत गेल्या. एकाएकी त्यांना काय झालं, मला कळेना. त्या येईतो मलाही हलता येई ना. अवघडल्यासारखा मी बसून राहिलो.

दहा मिनिटांनी त्या परत आल्या. त्यांच्या नाकाचा शेंडा लाल झाला होता. माझ्या कुठल्या शब्दानं त्यांना त्रास झाला, ते काही मला कळे ना.
पुन्हा पुन्हा मी आठवून पाहिलं. कुठल्या तरी शब्दानं त्यांच्या जुन्या जखमेवरची खपली निघाली असावी, इतकंच अनुमान करणं शक्य होतं.
कारण विचारणं तर शक्यच नव्हतं. पण आपल्या कोणत्याही शब्दानं नक्कीच त्रास झाला नाही, ह्याबद्दल माझी खात्री होती.
येऊन बसल्यावरही त्या काही क्षण गप्प गप्पच होत्या. त्यांचा आवेग कमी होईतो आपणही गप्प बसावं, असं मी ठरवलं.

जरा वेळानं ‘बोला,’ अशी हातानंच त्यांनी मला खूण केली.

‘काकांची अडचण व्हावी, हे मला कधीच पटणार नाही. आणि माझ्या सोडून जाण्यानं ती होणार ह्यात शंकाच नाही. ह्या त्रांगड्यातून काही सन्मान्य मार्ग निघत असेल, तर सरांचं काम करण्याची माझी इच्छा आहे. नाही तर…’ मी वाक्य अर्धंच सोडलं.
बाईही विचारांत पडल्या. आपण इतकं स्पष्ट बोलण्यात काही चूक केली की काय, असं मला वाटू लागलं. दोघा बोर्ले पतिपत्नींनी मला अतिशय आपुलकीनं वागवलं होतं, हे खरं आहे. पण, मी तरी काय करणार? मी दुग्ध्यात पडलो. काकांचं काम न सोडावं, तर बोर्ले पतिपत्नी नाराज होतात. आणि त्यांची मर्जी संभाळायची तर काकांची चांगलीच अडचण होणार. मी अस्वस्थ झालो.

‘आपला अपमान करायचा नव्हता मला,’ मी धीर करून बोलू लागलो. ‘माझ्यासारख्या अतिसामान्य माणसाला तुम्ही दोघांनी अत्यल्प ओळखीवरसुद्धा इतक्या सन्मानानं वागवलंत, इतक्या उच्च पदावर नेऊन ठेवलंत…’

मोहिनीबाईंनी हात वर करून माझं बोलणं थांबवलं, ‘तुमची अडचण खरी आहे. आणि काकांचं काम सोडायचं नाही, असं म्हणण्यानं तुम्ही काकांविषयीचं प्रेम आणि आदरच व्यक्त करताहात. तुमची ही कर्तव्यनिष्ठा पाहून तर माझा तुमच्याबद्दलचा विश्वास दुणावला. तुम्ही माझा किंवा यांचा मुळीच अपमान केला नाहीये. उलट मोहाला बळी न पडता तुम्ही स्पष्टपणं सांगितलंत, तेच बरोबर आहे. पण तरीही यांतनं मार्ग निघेल. तुलनेनं काकांचं काम कुणीही करण्यासारखं आहे. कारण ते व्यावहारिक पातळीवरचं आहे. आम्हीसुद्धा त्यांना विश्वासपात्र माणसं पुरवू. त्यांचं वेतनही आम्ही देऊ. पण ह्यांनी आजवर कुणाजवळही आपलं मन मोकळं केलं नाही, ते तुमच्या जवळ केलंय. तुमच्याशिवाय त्यांना आजवर कुणीही भेटलं नाही, हा काय योग असेल तो असो. ही काही साधी बाब नाही.’

‘पण, काकांना विश्वास वाटेल, असा माणूस मिळणंही तेवढंच अवघड आहे. मी असं करतो. आधी काकांशी बोलतो. ते काय म्हणतात, ते पाहतो. चालेल?’
‘ठीक आहे.’
माधवरावांबद्दल प्रश्न विचारायचं मनात होतं. पण अगदी पहिल्याच भेटीत एवढं कसं विचारावं, असं वाटून गप्प राहिलो.

‘विचारा वसंतराव,’ त्या म्हणाल्या. अन् मी दचकलो. माझ्या मनातलं त्यांनी कसं ओळखलं असेल? माझ्या चेहऱ्यावर दिसलं काय?
‘तुम्हाला काही विचारावं, असं माझ्या मनात आहे, हे तुम्ही कसं ओळखलंत?’ राहवेना म्हणून मी विचारलं.
बांगड्या किणकिणल्यासारख्या त्या हसल्या. त्यांचं ते हसणंही मोठं प्रसन्न होतं. समोरच्या व्यक्तीच्या मनात एकदम आपुलकी निर्माण करणारं.

‘सरळ आहे. तुम्ही बोलत तर नव्हतात. पण, तुमचे ओठ हलत होते. असं केव्हा होतं? एक म्हणजे मनुष्य संतापलेला असतो, पण अगतिक असल्यानं बोलू शकत नाही. त्यावेळी तो पुटपुटतो.

पण तुम्ही रागावलेले नव्हतात. दुसरं कारण काय? काही तरी बोलायचं मनात असतं. पण बोलावं की नाही, असा संभ्रम पडतो. अशा विचारात असतो तेव्हाही ओठ हलतात,’ असं म्हणून त्या पुन्हा हसल्या.
छान! आपला मानसशास्त्राचा अभ्यास पुस्तकीच की! एकूण काय? पुस्तकी अभ्यासालासुद्धा अनुभवाची जोड हवीच.
‘हं?’ त्यांनी मला बोलायला पुन्हा सुचवलं.

‘तसं विशेष नाही. माझ्या मनात शंका आली होती. काल सरांना मी विचारलं नाही. आणि आज तर सगळाच खुलासा झाला. त्यामुळं विचारायचं कारणच राहिलं नाही.’
‘कसली शंका?’
‘चांगली नाहीये. अतिमद्यपानामुळं असं होतं. पण काल गाडीत तर सरांनी एकदाही मद्य घेतलं नाही. आणि आज तुम्ही सर्वच उलगडा केलात. रागावला नाहीत ना?’
त्या पुन्हा हसल्या. त्या हसण्यातून त्यांच्या मनातला माधवरावांबद्दलचा आदरच उघड होत होता. ‘छेः!’
मी घड्याळ पाहिलं. नऊ वाजायला आले होते. ‘निघतो मी आता.’

‘संपतकाका!’
‘गाडी तयार आहे, बाई,’ आवाज आला.
हे संपतकाका मोठे चलाख आहेत, माझ्या मनात आलं.
‘गाडी कशाला बाई? मी जाईन रिक्षानं.’ पण तेवढ्यातच पुढं आलेल्या संपतकाकांना बाईंनी खूण केली.
‘चला साहेब,’ ते मला म्हणाले.

आणि मी मुकाट्यानं त्यांच्या मागून निघालो. बाईंना हात करण्याकरता मागं वळून पाहिलं. त्या माझ्याकडेच पहात होत्या. त्यांची नजर प्रेमळ वाटली. डोळे पाणावलेले दिसले.

माधवरावांच्या काळजीनं असणार. मी हात वर केला. त्यांनीही हात हलवला.
संपतकाकांच्या पाठोपाठ मी जिना उतरलो. पण मनात बाईंचाच विचार होता. आपल्या मनात असेल तसंच आपल्याला दिसतं, तसंच ऐकू येतं. समोरच्याच्या बोलण्यातूनही आपण आपल्याला अनुकूल असेच अर्थ काढतो. तसं करणं बरोबर आहे की नाही, वस्तुस्थिती काय आहे, हेही आपण पाहात नाही. माणसामाणसांत अशामुळंच गैरसमज होतात, असंही मी वाचलं होतं.
काही असो. बाईंनी डोळे पुसलेले मला दिसलेच. माधवरावांच्या काळजीनं त्यांचं अवघं जीवन व्यापलं असेल. आपली स्मृती परत येत नाही म्हणून ते अस्वस्थ आणि त्यांच्या काळजीमुळं बाई अस्वस्थ. आपल्याबद्दल दोघांनाही विश्वास वाटला, हे आपलं भाग्यच. काकांची जर चांगली सोय झाली, तर आपण कसोशीनं प्रयत्न करायचा, असं मी ठरवून टाकलं.

आपल्यावर दोघांचा नुसता विश्वासच आहे असं नसून दोघांचा आपल्यावर लोभही जडलाय, हे जाणवून मला आतल्या आत भरून येत होतं. पण आपलं बोलणं चालू असता मध्येच त्यांना वाईट कसलं वाटलं असेल? आपल्या मृत अपत्याचं स्मरण की अपत्यहीनतेचं दुःख? आपल्या नेमक्या कोणत्या शब्दामुळं त्यांना रडू फुटलं? मी सगळ्या संवादाची मनातल्या मनात उजळणी केली. पण माझ्या तोंडून काही अनुचित शब्द गेला असल्याचं मुळीच वाटत नाही. पण, त्या छोट्याशा प्रसंगामुळं मला उदास वाटत राहिलं. एवढ्या उदार मनाच्या पतिपत्नींच्या वाट्याला कसलं दुःख असेल? केवळ माधवरावांच्या प्रश्नामुळं?

‘साहेबांना काही मूलबाळ?’ मी गाडीच्या चालकाला विचारलं.
‘आमचे साहेब आणि बाई फार प्रेमळ आहेत. पण देव तरी कसा निष्ठुर पहा. अठरा विश्वे दारिद्रय असलेल्या घरात खंडीभर पोरं देतो. पण असल्या देवमाणसांना मुलाकरता खंतायला लावतो. खरंच देवमाणसं आहेत, ही दोघं.’
‘लग्न होऊन बरीच वर्षं झाली असतील नाही?’
‘नाही. आठ वर्षंच.’
चालकाच्या शब्दांतील सहानुभूती प्रांजळ होती.
‘हं!’ मी निःश्वास टाकला.

‘निरनिराळ्या संस्थांना इतकी मदत करतात,’ चालक सांगत होता.
आमच्या संस्थेची त्यांना माहिती असेल का? असली पाहिजे. मगाचच्या त्यांच्या बोलण्यावरून तसं वाटतंय खरं.
‘आमच्या संस्थेलापण?’
‘होय, साहेब.’
‘असं?’ नवल आहे. मला आजवर कसं कळलं नाही? अर्थात हिशेबात मी आजवर कधी लक्ष घातलं नव्हतं. त्यामुळं मला कळून आलं नसणार. आता काकांना विचारलं पाहिजे. ‘तुम्ही आमच्या इथं कधी आला होता?’
‘किती तरी वेळा. बाईसाहेबांना घेऊन खूपदा आलोय.’
‘बाईंनासुद्धा? कोणत्या संस्थांना मदत करतात? लहान मुलांच्याच की…’
‘लहान मुलांच्याच मुख्यतः तुमच्यासारख्या. म्हणजे ज्यांचे आईवडील सापडत नाहीत. किंवा जी मुलं हरवली आहेत, अशी मुलं तुमच्याकडे असतात ना?’

माझं मन पुन्हा बोर्ले दांपत्याकडे ओढ घेऊ लागलं. एवढ्या दयाळू अन् सहृदय नवराबायकोला आपल्यामुळं आनंद मिळणार असेल तर आपण त्यांचं काम पत्करायला हवं, असं मी ठरवलं. आपल्यामुळं त्यांना काही लाभ झाला तर फारच चांगलं. एरवी निदान काम केल्याचं तरी समाधान मिळेल.
आता फक्त काकांच्या कामाचा प्रश्न राहिला. काका रागावणार नाहीत, हे खरं आहे. पण आपल्या सोडून जाण्यानं त्यांना नक्कीच दुःख होणार. पण काकांच्या अडचणी निवारण्यापेक्षा हे कुटुंब सुखी झालं तर आमच्यासारख्या आणखी दहा संस्थांना जो आधार मिळेल तो अधिक मोलाचा ठरेल.
पण उलट, आपण माधवरावांना मदत केली नाही, तरी आजच्याप्रमाणं बाई संस्थांना मदत करीत राहणारच. त्या काय थांबणार आहेत? पण काकांना कोण आहे?
उलट सुलट विचारांमुळं माझ्या मनाचा निश्चय होई ना. एकीकडे काकांबद्दलची माया, कृतज्ञता तर दुसरीकडे बोर्ले पतिपत्नींबद्दलची कणव. यांत माझ्या मनाची ओढाताण सुरू झाली.
सलाम करून चालक निघून गेला. आणि काकांना जाग येणार नाही, अशा बेतानं मी हलकेच आपल्या खोलीत शिरलो. अर्थात नंतर तरी त्यांना कळणारच. पण सुदैवानं त्यांनी मला हाक मारली नाही. मलाही धीर झाला नाही. म्हटलं, उद्या पाहू.
अंथरुणावर पडलो खरा. पण झोप कुठली? कालपासून हे काय चाललंय? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न. कसलाच निर्णय होत नव्हता. उलट, डोकं फिरवणाऱ्या प्रश्नांची सतत भरच पडत होती.
(क्रमशः )
00000

–  प्रा. मनोहर रा. राईलकर 
railkar.m@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आजची कविता
 
मधुकर सोनवणे 
 

अनंतातुनी आलो आपण

अनंतातुनी आलो आपण, अनंताकडे झेप पुन्हा |
चार दिवस ते इथे राहणे, श्रवणी सांगतसे कान्हा || १.

या कान्हाची संगत न्यारी, अंतरी घुमवितसे मुरली |
सुरेल सूर ते पडता कानी, देह भावना ती विरली || २.
विसरुनि अंतरीचा मुरलीधर, मन विहंग जंव स्वैर उडे |
माया मोहवी इंद्रधनुच्या, सप्त रंगी मग जीव जडे || ३.
त्या रंगांनी रंगवू जीवन, कल्पनेत मन ते रंगे |
आभाळाच्या क्षितिजावरले, रंगही मिसळू त्यासंगे || ४.
सागर तिरीच्या वाळूत खोपे, आणिक किल्ले किती केले |
कृष्णविवरी त्या आकांक्षेच्या, शंख शिंपले किती भरले || ५.
मौल्यवान हे जीवन दिधले, रस घेण्याला तो इथला |
स्वप्ने जमवित पुरते जीवन, वेळ नसे रस घेण्याला || ६.
घरी खेळतो बाळकृष्ण तो, दुडुदुडु त्याची न पाहियली |
लोकल नऊ सत्राची न चुकाया, घाई पाचवीस पुजली || ७.
परिवाराच्या संगे जाऊनि, सृष्टी वैभवी नच रमला |
छोटा पडदा खिळवुनी ठेवी, नीरस करुनी सुट्टीला || ८.
झुळझुळत्या जललहरी मधुनी नाद येती ॐकाराचे |
वाहत वारा मुरलीधराचे, सूर घुमवी ते मुरलीचे || ९.
कधि न उघडली, ज्ञानेश्वरी वा नाथी भागवत आवडीने |
तुकयाची ती परखड वाणी, मुकविली ती तर पेपरने || १०.
रसाळ वाणी ज्ञानेशाची, मराठीत अमृत वर्षे |
नाथ भागवत निर्गुणात ने, शब्दामधुनी तुज हर्षे || ११.
असेच जीवन नको घालवू, मूल्य ओळखी तू आपुले |
अनंत नि तू महान असता, बद्ध काय मायाजाले || १२.
जोवरी करिती काम इंद्रिये, स्वहित परहिता त्वरा करी |
संतांनी बहुमोल कलश ते, भरुनी अमृत दिले करी || १३ .

स्वरूपी अनुभवी अनंत वैभव, ब्रह्मांडाचा तू स्वामी |
सांगे अनंत चतुर्दशी ही, मन गुंतवी आत्मारामी || १४.

मधुकर सोनवणे (अण्णा )
अनंत चतुर्दशी २०१९ [ १२/०९/२०१९]
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

शब्दकोडे क्रमांक ८ :  उत्तर

 

या शब्दकोड्याचे उत्तर वाचक सर्वश्री डॉ. उमेश करंबेळकर, सुभाष फडके आणि मुकुंद नवरे यांनी पाठवले होते. या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

शब्दकोडे क्रमांक ९

आडवे पर्याय

१] ही ओळ कुणी लिहिलेल्या अभंगाची आहे आठवले का? (२,२,३)
६] नथीतून मारला तरी मर्मभेद करायला चुकणार नाही (२)
७] पसाभर लाह्या आणि दुध दिल्यावर हा तृप्त होईलच याची काय शाश्वती? (२)
८] कृपण असला, चिक्कू असला तरी तो माझा मामा असं संस्कृतमध्ये म्हणतात (३)
१०] याच्यात कटुता नाही पण ११आडव्याला जोडीला घेऊन हा एक साम्यवादी तत्वज्ञ होईल (२)
११] १० आडव्याला परिक्षेत नाही मिळाले तरी चालेल पण अंगावर येऊ नये म्हणजे झालं (२)
१३] दीप्तीला यश मिळालं यात आश्चर्य करण्यासारखं काय आहे? (३)
१६] कर्मकार, मलिक यांच्या कर्तृत्वामुळे सगळ्यांचे डोळे दिपले (२)
१८] बघाहो, बाजीची दाढी वाढली तर भोळ्या भाबड्या बाया नादी लागून जाल तिथे येतील (२)
१९] हा बेल्ट बांधून घेणं येरागबाळ्याचं काम नाही (७)

उभे पर्याय

१] नि:संदिग्ध बोललं की शंकेला जागा रहात नाही (३)
२] घायकुतेपणा करून सोडाल तर तुमचं काही खरं नाही. त्यापेक्षा सबुरी बरी (२)
३] मोबाईलवर पैसे घालवण्यापेक्षा स्थावर मालमत्ता जमवणे बरे नाही का? (३)
४] कसाबसा गाडीत चढताना खिसा कापला गेला तर आख्ख्या प्रवासभर चुटपूट लागून राहते (२)
५] हे काळजीपूर्वकच करायचे असते, कसे बसे फासून चालत नाही (३)
८] पहिल्या देव बापाला नाही, पण प्रल्हादाच्या बापाला तर देवानं मारलं न? (३)
९]कोणाचा तरी माल कोणी दुसराच हडप करतो म्हणजे जरा अतीच झालं न? (३)
१२] गझलेतून काढून याला रद्दीत टाकलं तर मोठा गहजबच होईल (३)
१४] शिवाजीमहाराजांच्या सैन्याने लुटलेला सुरतेतला इंग्रजांचा डेपो म्हणजे लाकूडफाटयाचा साठा नव्हता (३)
१५] आडदांड माणूस हा जनावरासारखाच असतो, हो की नाही? (३)
१७] घूसखोराला आपले जवान असा हात दाखवतील की त्याच्या तोंडचं पाणीच पळून जाईल (२)
१८] सर्वात लहान मुलगा बापाच्या जवळचा असतो म्हणतात. सूर्य आणि या ग्रहाचं तसंच आहे. सर्वात लहान, सर्वांपेक्षा जवळचा (२)

विशेष सूचना : वाचकांनी आपली उत्तरे संपादकांकडे पाठवण्याची आवश्यकता नाही.  पुढील अंकात वरील कोड्याचे उत्तर प्रसिध्द झाल्यानंतर त्याच्याशी ताडून पहावीत.

मुकुंद कर्णिक
karnik.mukund@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

अशा गोष्टी – अशा गंमती
शं. ना. नवरे 
१३. 
महानगर 

पुण्याच्या एका प्राध्यापक-,;लेखकाला दुस-या लेखकाच्या कोणत्याही कथेचे अगर पुस्तकाचे नाव आपल्या लक्षात नसल्याचे दाखवण्याची चमत्कारिक खोड होती.रमेश मंत्रींच्या नव्या कादंबरीबद्दल – ‘महानगर’बद्दल – पुण्याच्या लेखकांत अनेकवार चर्चा झाली होती. प्रस्तुत प्राध्यापक-लेखकही त्या चर्चेत होते.

रमेश मंत्री एकदा पुण्यास गेले असताना त्यांची ह्या प्राध्यापकलेखकाशी गाठ पडली.

नेहमीच्या सवयीप्रमाणे त्या प्राध्यापकांनी विचारले, ” मंत्री, तुमची काहीतरी एक नवीन कादंबरी की नाटक प्रसिद्ध झालं आहे ना ?”

“हो, कादंबरी प्रसिद्ध झालीय. “

“काय बरं तिचं नाव …. मी वाचलीय ती …. महासागर की …. ”

“— अहमदनगर !”

त्यांची सवय ठाऊक असलेले रमेश मंत्री शांतपणे म्हणाले.

कै. शं. ना. नवरे
[ ‘ललित‘ जुलै १९६७ च्या अंकावरून साभार ]

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
निमित्त 
केशव साठये 
 
७९. 
राजेपणाचा सन्मान ठेवणारा राजा – मालोजीराजे नाईक निंबाळकर
 


फलटणसारख्या छोट्या गावात माझे संपूर्ण शालेय शिक्षण झाले. दोन वर्षे कॉलेजही तेथेच केले. आपल्याला शहरी सुविधा मिळाल्या नाहीत, शिक्षणात आणखी नवे पैलू जोडता आले नाहीत अशी खंत तेव्हा वाटत असे पण एक मोठा दिलासा होता तो म्हणजे आमचे मुधोजी हायस्कूल. उत्तम शिक्षक, समृद्ध शैक्षणिक वातावरण यामुळे खूप काही शिकता आले. फलटणसारखे छोटे गाव सांस्कृतिकदृष्टया पुण्यासारख्या शहरापासून फार वेगळे वाटले नाही, याचे श्रेय या दृष्ट्या समाजाभिमुख राजांकडे जाते. १५ ऑक्टोबर १९१७ रोजी त्यांना राज्याभिषेक झाला, तेव्हापासून हे राजे केवळ फलटणसाठीच नव्हे तर महाराष्ट्रातील गरजू आणि वंचितांसाठी उभे राहिले. राज्य कारभार हाती घेताच आपल्या दरबारात त्यांनी तीन घोषणा केल्या. स्त्रियांचे समान हक्क, हरिजनांना दरबारात प्रवेश आणि कुलाचार म्हणून देवीला मांस आणि मद्य यांच्या नैवेद्याला बंदी.

वयाच्या अवघ्या २१ च्या वर्षी ही समाजाभिमुख प्रगल्भता दाखवणारा राजा १०० वर्षांपूर्वीच या गावाला मिळाला हे या गावाचे भाग्यच म्हटले पाहिजे. यांनी आपल्या कारकिर्दीत काय नाही केले. कायम दुष्काळी प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फलटण परिसरात पाऊसाच्या पाण्यावर अवलंबून राहणे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखे होते. या संकटातून कायमची सुटका करण्यासाठी त्यांनी  भाटघर धरणातून नीरा उजवा कालवा हा प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलास दिला. आता फलटणच्या माळरानावर उस डौलात डोलू लागला. साखरवाडी हा इथला पहिला खाजगी साखर कारखाना यांच्याच प्रेरणेतून उभा राहिला. फलटणचा श्रीराम सहकारी साखर कारखाना हे यांच्याच दूरदृष्टीचे फलित आहे. शेती शाळा ही अभिनव कल्पना यांच्याच कारकिर्दीत फुलली, बहरली आणि फलटण परिसरातील शेतकऱ्याची मुले आधुनिक शेतीचे धडे शाळेत गिरवू लागली. सहकार हा शब्द खऱ्या अर्थाने समाजापर्यंत पोहोचवला तो याच राजांनी.

१९२६ साली लक्षुमी सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक स्थापन करुन संस्थानातील अर्थव्यवस्थेला एक विधायक वळण दिलं. मुधोजी हायस्कूलमध्ये गिरीश यांच्यासारखे विद्वान शिक्षक त्यांनी आणले. देशातील संस्थाने विलीन करण्याचा फतवा निघाला तेव्हा सर्वात पहिल्यांदा त्यांनी आपले संस्थान विलीन केले आणि तिजोरीतील ६६ लाख रुपये सरकारकडे जमा केले. आण्णा  कर्वे यांच्या कार्याला सढळ हाताने मदत केली. रयत शिक्षण संस्थेला आपली साताऱ्याची जमीन दान देऊन कर्मवीरांच्या शिक्षण प्रसाराला हातभार लावला. वृत्तपत्राचे महत्व ओळखून ‘विशाल संह्याद्री’ या दैनिकाची स्थापना करण्यात पुढाकार घेतला.

कोयना धरण, पश्चिम महाराष्ट्राचे एक वरदान ते यांच्याच मंत्रिपदाच्या कारकिर्दीत उभे राहिले. १९५२ ते १९५७ या काळात राजांकडे सार्वजनिक बांधकाम खाते होते. त्यावेळी बांधकाम खात्याकडेच पाटबंधारे विभाग होता. या काळात लक्षणीय काम करुन त्यांनी आपला समाजाकडे बघण्याचा उदार दृष्टीकोन तेवत ठेवला. आर्थिक तरतूद काटेकोरपणे  पाळत कोट्यवधी रुपयांच्या योजना वेळेत पूर्ण करण्याचे त्यांचे कौशल्य वाखाणण्यासारखेच होते. कामाच्या दर्जाकडेही त्यांचे काटेकोरपणे लक्ष असायचे. कोयना धरण योजना, हेळवाक, ता. पाटणचा जलविद्युत प्रकल्प, मंत्रालयाची प्रशस्त इमारत ही कामगिरी त्यांच्या नावावर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा प्रतापगडावर उभारावा हा शासनाचा निर्णय तडीस नेण्यात यांचा मोलाचा सहभाग होता. प्रताप गडावर हा पुतळा उभा राहिला त्याच्या  उदघाटनाला तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांना आमंत्रित करुन या लोकोत्तर कामगिरी केलेल्या राजांचे दर्शन घडवले आणि त्यांची महती काय आहे याची जाणीवही करुन दिली. सेवासदन असो नाहीतर शिवाजी मिलिटरी स्कूल यांचा मदतीचा हात सदैव पुढे असे. महाराष्ट्र साहित्य परिषद काय किंवा भांडारकर संस्था काय यांच्या देणग्या तिथे बिनबोभाट पोहोचत.

राजा रयतेकडे किती विशाल अंतःकरणाने पाहू शकतो, याचे अतिशय बोलके उदाहरण म्हणजे श्रीमंत मालोजी राजे नाईक निंबाळकर  त्यांची १२३ वी जयंती ( जन्म ११ सप्टेंबर १८९६ ) प्रणाम !

केशव साठये 
keshavsathaye@gmail.com

वंदनीय व्यक्तिमत्त्व

सौ. स्वाती वर्तक 

 

भाग ३

कै. विनायक सीताराम सरवटे  

 
या तीन भागांच्या लेखमालेचे यापूर्वीचे दोन भाग अनुक्रमे दि. १५ ऑगस्ट  व २ सप्टेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध झाले होते. आज तिसरा आणि अंतिम भाग. – सं. 

कणखर व्यक्तिमत्व असलेले विनायकराव आपल्या घरातही शिस्तप्रिय होते.
त्या काळात सर्वांनाच विदित असेल की घरात एक दोन नव्हे बरीच माणसे असत.
तात्यांच्या घरात हे सारे मिळून २७, २८ जण तरी राहत असत. त्यांच्या पत्नी सौ. सरस्वती आई या जगत जननीसारख्या होत्या. त्यांचे पुतणे, पुतण्या, जाऊ, दीर ही जणू सर्व त्यांचीच अपत्ये होती.मी दूरभाषवरून जमेल त्यांच्या नातेवाईकांशी बोलण्याचा प्रयत्न केला.त्यांची धाकटी मुलगी सुश्री कालिंदी या तारुण्यातच विनोबाजींसह पवनार येथे राहावयास गेल्या. १० वर्षे त्यांच्याबरोबर पदयात्रेत भूदान चळवळीत हिरीरीने कार्य केले. आता नव्वदीच्या जवळ आहेत. अजूनही त्या तेथेच असतात. आध्यात्मिक कार्ये, आणि विनोबाजींचे “मैत्री“ हे मासिक चालवितात.
त्यांच्याशी वार्तालाप करताना भरून आले. कोणत्याही मुलीला असेल तसा नितांत आदर त्यांना आपल्या तात्यांबद्दल तर आहेच. पण ऐन तारुण्यात आपल्याला विनोबाजींसह जाण्यास परवानगी देणारे वडील त्या काळी दुर्मीळ. त्यांच्या मते एकमेवाद्वितीय असे त्यांचे वडील. उपनिषदांमधील हात, डोळे बांधलेल्या माणसास भेटणाऱ्या बुद्धिमान साक्षात्कारी मार्गदर्शकाचे जे वर्णन आहे ते जणू तात्या. असे त्या अत्यंत अभिमानाने सांगतात. खरी आत्मोन्नती पाहिजे असल्यास गांधी किंवा विनोबाजींशिवाय कोठेही तुला मिळणार नाही हे अत्यंत तळमळीने सांगणारे म्हणजे तात्या.!
तात्यांचे चित्त अनासक्त होते. अगदी झोकात चाललेली वकिली स्वातंत्र्यासाठी क्षणात सोडणारे आणि बाल निकेतन संस्था नीट सुरू झाल्यावर, नावारूपाला आल्यावर तेथून निवृत्ती घेणे, तिचे सर्व व्यवहार मुलाच्या अधीन करणे हे कसलाही मोह नसल्याचेच लक्षण आहे.
सतत राबता असणारे घर, क्षणाक्षणाला आपले लहान सहान प्रश्न घेऊन येणारे लोक त्यांच्या वृद्धापकाळी येईनासे झाले तरी ना खंत ना विषाद.

ते पूर्णपणे नास्तिक नसले तरी त्यांचा कर्मकांडावर विश्वास नव्हता. भक्तीकडे ओढा फारसा नव्हता पण काही पुस्तकांनी कसे संस्कार केले, कसे विचार, वृत्ती बद्दलण्याकडे कल होऊ लागला, हे तात्या सांगतात. त्यात प्रामुख्याने जेनेटिक्सवर ग्रंथ लिहिताना त्यांनी वाचलेली पुस्तके. फ्राईडचे सायको अनालिसिसवरचे सर्व ग्रंथ, स्पेन्सरचे ग्रंथ, विलियम जेम्सचे व्हरायटी ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्स, दासबोध, गीतारहस्य,.ज्ञानेश्वरी यांचा ते आवर्जून उल्लेख करतात.
यामुळे मृत्यूपूर्वी तात्यांचे वर्तन व विचार अण्णा (मोठा मुलगा ) आपणास विशद करतात.त्यांची नात अत्यंत लहान लहान आठवणी सांगते पण त्यातूनही तात्यांचे शिस्तप्रिय व स्त्री पुरुषास समान वागणूक देण्याचे विचार दिसतात. ती सांगते, फार पूर्वी स्त्रिया नवऱ्याच्या उष्ट्या ताटात जेवत असत ते तर तात्यांना मान्य नव्हतेच पण शिवाय स्त्रियांनीच इतकी भांडी का घासावी हेही त्यांना पटत नसे. त्यांनी सर्व बदलले. प्रत्येकाने आपापली ताट वाटी घासावी आणि घरातील स्त्रियांचे काम हलके करावे हा त्यांचा दंडक असे. पूर्वी चुलीवर स्वयंपाक शिजत असे त्यासाठी एवढ्या मोठ्या घरात १००, १०० किलोच्या वर लाकडे आणि गोवऱ्या येत. ते सर्व एकत्रितपणे ठरलेल्या खोलीत रचून ठेवणे सगळ्यांचे काम, प्रत्येकाने हातभार लावलाच पाहिजे.असा नियम. त्यात स्त्री-पुरुष भेद नाही.
आपली आंघोळ झाली की दुसऱ्यासाठी बंबात पाणी भरून ठेवणे, स्वार्थाला जागा नव्हती. इतरांचा प्रथम विचार हीच फक्त शिकवण दिली. जेवताना कसे बसावे, खावे, अन्नाला यज्ञ का समजावे, तसेच संध्याकाळी लवकर येऊन परवचा कसा म्हणावा, का म्हणावा या सर्व बाबतीत त्यांची कडक शिस्त असे .

इंदूरमध्ये तात्यांच्या नावे…तात्या सरवटे नगर, तात्या सरवटे मार्ग असे नगर पालिका निगमने नावे देऊन सत्कार केला आहे.
“सरवटे बस स्टँड“ही इंदूरमध्ये आहे. श्री सीताराम जाजू यांनी ते नाव देऊन तेथे तात्यांचा अर्धपुतळाही उभारला आहे.

शेवटी त्यांच्याबद्दल लिहिताना, ज्येष्ठ पुत्र म्हणतात, ज्या वेळेस तात्यांना कळले की आता या शरीराने नवीन काही वाचन, अध्ययन वा सृजनात्मक कार्य करणे अशक्य आहे तेव्हा त्यांनी स्वतःच निर्णय घेतला. पंचांग पाहिले. सर्व नातेवाईकांना बोलावून घेतले आणि आपला निर्धार सांगितला. “ हा माझा निश्चय आहे. कोणीही आडकाठी घेऊ नये. आता माझ्या देहास कोठलेही अतिरिक्त औषध पाणी करू नये. मी प्रायोपवेशन करणार आहे. “ सर्वांना त्यांचे हे स्पष्ट मत वज्राघाताप्रमाणेच होते पण त्यांची ठाम मते याचा प्रत्येकास अनुभव होता. सगळेच भेटावयास आलेत. १५ जानेवारी १९७२ रोजी त्यांनी प्रयोपवेशनास प्रारंभ केला. सर्वांना उत्तम उपदेश केला. सार्थक जीवनाचे सार काय हे समजावून सांगितले आणि “ माझ्या मृत्यूनंतर कोणतेही मंत्रादि क्रियाकर्म करू नये “ अशी इच्छा व्यक्त केली.अगदी शांतपणे तो देशप्रेमाचा, समाजकार्याचा, साहित्यसेवेचा अखंड तेवत असलेला नंदादीप मंद होत गेला .आणि २६ जानेवारी १९७२ रोजी ज्योत मालवली.

कितीही नाही म्हटले तरी इंदूरचे तात्यांचे भक्त, प्रेमी, चाहते यांचा नुसता महापूर उसळला. महायात्रा निघाली. शेवटी गीतेचा श्लोक, वैदिक ऋचा, कुराणातील आयत व बौद्ध धर्माचा एक श्लोक अशी सर्वधर्मीय प्रार्थना झाली. आणि एक महासूर्य अस्तंगत झाला.
महानिर्वाण झाले.
[ लेखमाला समाप्त ]

@@@
सौ स्वाती वर्तक
खार (प), मुंबई ४०० ०५२.
swati.k.vartak@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आजची कविता 

“आयुष्यात स्थिरता येणे …”

ही एक भोळी समजूत आहे

असे वाटले होते की शिक्षणातील अंतिम प्रमाणपत्र भिंतीवर झळकावल्यानंतर ती आली ……
गंभीरपणे म्हणताय की काय?

कदाचित लग्न झाल्या नंतर? ….
ठामपणे मुळीच नाही!

मग ध्यानी आले की एखादी चांगली नोकरी मिळवून विजयाची पताका घरावर फडफडावी …
अशक्यपणाची दुसरी एक व्याख्या?

खात्रीलायक वाटले की अपत्ये वयात येऊन घरट्यातून उडून गेली …
ठामपणे नक्कीच नाही, उलट तिसऱ्याचीच एखादी सून म्हणून घरात घुसते,
पाहुणे म्हणून तिच्या माहेरचे प्रेमी, वारंवार आणण्यासाठी !!!!!!!!!!!!!!
ती डिंकाने ठामपणे चिकटवण्यासाठी?

थोडक्यात, ‘आयुष्यात स्थिरता येणे’ ही एक भ्रामक विसंगती असते …
प्रत्यक्षात ती ‘झगडणे’ अशी आहे,

तिचा शोध घेण्यासाठी साधू-संतांनी सांगितलेली कितीतरी वचने वाचून आनंद मिळवण्यासाठी,
लक्षात राहण्यासाठी …
विसरणे, तत्वज्ञ बनणे, असफलता अधोरेखित करणे, बंडखोर म्हणून आणि अखेर चरफडत जगण्यासाठी?

अंती इतरांच्या दृष्टीस पडतात त्या आपल्या रक्षांचे क्षणिक ‘बंधन’ ….
ते देखील असे नाजूक की राखीचा दोरा तुटून त्यांचे कणन् कण
फुटेल त्या वाटेने आणि दिशेने अनंतात विलीन करण्यासाठी …

शोध घेत असतो तथाकथित ‘आपलाच आत्मा’ कुणीही न बघितलेला कपोलकल्पित असा …
दरदरून घामाघूम झालेला, स्वप्नांतून दचकून जागा होतो तेव्हां …मीच

हेमंत वि कुळकर्णी

lsr_kulkarni@msn.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

फोलकथा

(ज्या वाचून कुणावरही कसलाही परिणाम होण्याची शक्यता नाही अशा कथा.) 
६. 
एका काडेपेटीचं दुःख 
एका गावात एक उकिरडा होता.
त्यावर एक रिकामी काडेपेटी पडली होती.
तेवढ्यात दुसरी एक काडेपेटी तिथे येऊन पडली.
त्यांचा संवाद सुरु झाला.
पहिली काडेपेटी म्हणाली,
“मी समाधानी आहे.
माझं जीवन कारणी लागलं.
माझ्या पोटातल्या सगळ्या काड्या देवापुढची समई लावण्यासाठी वापरण्यात आल्या.”
दुसरी काडेपेटी निःश्वास सोडून म्हणाली,
“मी मात्र दुःखी आहे.
माझं आयुष्य फुकट गेलं.
माझ्या पोटातल्या सगळ्या काड्या विड्या ओढण्यासाठी वापरल्या गेल्या.
एवढंच काय, पण एक काडी एका स्त्रीला पेटवून देण्यासाठीही वापरण्यात आली.
आणि एक मोडकी काडी शिल्लक असतानाच मला इथे फेकून देण्यात आलं.”
एवढं बोलून ती हुंदके देऊ लागली.
तेव्हा पहिल्या काडेपेटीने तिचं सांत्वन केलं.
ती म्हणाली,
“बाई गं, धीर सोडू नकोस. नशिबात असेल तर ही मोडकी काडीही तुला सुखी करू शकेल.”
तिचं म्हणणं खरं ठरलं.
दुसऱ्या दिवशी कचरा उचलायला सफाई कामगार आले.
त्यांच्यापैकी एकाने ती काडेपेटी उचलून घेतली.
त्यात मोडकी का होईना, पण एक काडी आहे हे बघून खिशात टाकली.
त्या रात्री त्या सफाई कामगाराच्या काळोख्या झोपडीतला दिवा त्या मोडक्या काडीने लावला गेला.
आणि काडेपेटी कचऱ्यात फेकण्यात आली.
पण त्या काडेपेटीला त्याची खंत वाटली नाही.
ती आता सुखी झाली होती.
तिचं जीवन सफल झालं होतं.
@@@
हर्षद सरपोतदार
hsarpotdar1@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

संस्कृत शिकायचंय ना ? 

प्रा. मनोहर रा. राईलकर 
 
पाठ १६ 
टीप :‑ ३२. पिबसि म्हटल्यावर कर्ता तू हाच ठरतो. मात्र कर्ता पुंलिंगी की स्त्रीलिंगी हे कळू शकत नाही. कारण, मराठीप्रमाणं संस्कृतात क्रियापदाला लिंग नसतं. 
          ३३. पिबामि असं  म्हटल्यावर मी हाच वाक्याचा कर्ता आहे, हे ठरतं. त्यामुळं कर्त्याचा उल्लेख केला नाही तरी चालतं. 
          ३४ ते ४०. ह्या वाक्यांतील क्रियापदामुळं कर्ता आम्ही हाच ठरतो.

जिगर मुरादाबादी

मुकुंद कर्णिक 

जिगर मुरादाबादी

उर्दू गझल लोकप्रिय करण्यामध्ये अहम् भूमिका करणाऱ्या जिगर मुरादाबादीना उर्दू क्लासिक गझलेचे अखेरचे शायर मानले जाते.

जिगर मुरादाबादी यांचं खरं नाव अली सिकंदर असं होतं. ते शायर मौलाना अली ‘नजर’ यांचे पुत्र. ६ एप्रिल १८९० रोजी त्यांचा मुरादाबाद मध्ये जन्म झाला. प्राथमिक शिक्षण मिळालं पण थोड्या घरच्या अडचणी आणि त्यांपेक्षा जास्त बेपर्वाई यांपायी पुढचं शिक्षण काही झालं नाही. आणि तसंही शायरी करायची तर पुस्तकी ज्ञान काही कामाचं नाही असाच समज परिवारात होता. पण हौस म्हणून अली सिकंदर यांनी घरच्या घरीच अभ्यास करून फारसी भाषा अवगत करून घेतली.

अली सिकंदर ते जिगर मुरादाबादी हा प्रवास सहजासहजी घडला नाही. शायरीचा वारसा वडिलांकडून मिळाला पण अली सिकंदर लहान असतानाच वडील वारल्यानंतर त्याना उपजीविकेसाठी प्राप्तीचे मार्ग मर्यादित होते. ठीक शिक्षणाच्या अभावी इंग्रजी भाषेचा परिचय नगण्य होता. त्यामुळे नोकरी मिळालीच तर अगदीच सामान्य आणि बेभरवशाची असायची. मग कधी ते रेल्वे स्टेशनावर चष्मे विकायचे तर कधी आणखी काही आणि अशा प्रकारे आयुष्य कंठायचे. चेहरा कुरूपात जमा होईल असा होता आणि रहाणीदेखील अवलियासारखी. परंतु त्यांच्या शायरी पेश करण्यातला ढंग असा होता की कुरूपपणाकडे आपसूकच डोळेझाक केली जायची. पुढे तरुणपाणी त्यांनी आपलं नाव बदललं आणि ते स्वत:ला जिगर असं म्हणून घ्यायला लागले. त्यांचं जन्मस्थानाचं मुरादाबाद हे नावही त्यांनी आपल्या जिगर या नावाला जोडलं आणि मग अली सिकंदर हे जिगर मुरादाबादी बनले.

जिगर मुरादाबादींच्या शायरीच्या आणि ती सादर करण्याच्या अनोख्या ढंगामुळं त्यांचा एक ‘कल्ट’ बनला होता. तरुण शायरांमध्ये एक प्रकारच्या अहमहमिकेने त्यांच्या त्या ढंगाची, त्यांच्या अस्ताव्यस्त केसांचीदेखील, नक्कल केली जायची. जिगर मुरादाबादीना मद्य अतिशय प्रिय होतं, इतकं की मुशायऱ्यामध्ये ते जायचे तेच मद्यधुंद होऊन. आयोजक त्याना स्टेजवर चढण्यासाठी आधार द्यायचे. पण शायरी सादर करताना जाणवायचंही नाही की हा शायर आज मद्यधुंद आहे. मुशायरा संपेपर्यंत मग फक्त जिगर मुरादाबादीचीच ही महफिल आहे असं वातावरण तयार व्हायचं.

त्यांच्या या मद्यप्रेमाच्या अतिरेकामुळं नातेवाईकांची गैरमर्जी झाली आणि त्या पायीं त्यांनी मुरादाबाद सोडलं आणि लखनौजवळच्या गोंडा या गावी येऊन स्थायिक झाले.

ते प्यायचे, पण एरवी मात्र त्यांचं वर्तन शिष्टता आणि ऋजुतेचं उदाहरणच असं असायचं. लोकाना मदत करायचे आणि विसरून जायचे. त्यांचं ठाम मत असायचं की ज्याला मदत केली आहे त्याच्या समोर जायचं नाही, आपण समोर गेलो तर त्या व्यक्तीला संकोचायला होईल.

एकीकडे जिगर मुरादाबादी चित्रपटांसाठी गीतें लिहायला नाखूष असायचे परंतु पुढे मजरूह सुलतानपुरी याना आग्रह करून त्यांनी फिल्मी गाणे लिहिण्यासाठी तयार केलं. ‘दागे-जिगर’ हा जिगर मुरादाबादींचा पहिला काव्यसंग्रह सन १९२१ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर सन १९२३ मध्ये ‘शोला-ए-तूर’ हा दुसरा संग्रह अलीगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीने प्रसिध्द केला. सन १९५८ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘आतिषे-गुल’ या संग्रहाला साहित्य अकादमीकडून उर्दू भाषेतील सर्वश्रेष्ठ निर्मिती असे गौरवले गेले.

आयुष्याच्या अखेरच्या काळात ते आपले वडील आणि आजोबा याना मुरादाबादेत जिथं दफन करण्यात आलं होतं तिथंच आपल्यालाही मृत्यूनंतर दफन केलं जावं अशी इच्छा वारंवार व्यक्त करत होते. परंतु अद्यापपावेतो नाराज असलेल्या नातेवाइकांनी ती मानली नाही. गोंडा येथेच ९ सप्टेंबर १९६० रोजी जिगर मुरादाबादी पैगंबरवासी झाले.

आजच्या त्यांच्या स्मृतीदिनी मी त्यांच्या एका गझलेचा अनुवाद सादर करून त्याना श्रद्धांजली देत आहे.

हम को मिटा सके ये ज़माने में दम नहीं
हम से ज़माना ख़ुद है ज़माने से हम नहींआम्हाला संपवणं? हं: ! या समाजाकडे तितकी ताकद नाही. अरे, आमच्यामुळे तर समाजाचं अस्तित्व  आहे, समाजामुळे आमचं नाही.

बे-फ़ाएदा अलम नहीं बे-कार ग़म नहीं
तौफ़ीक़ दे ख़ुदा तो ये नेमत भी कम नहींकसलाही क्लेश निष्फळ, निरुपयोगी नसतो, तसंच दु:खंही. देवाच्या कृपेनं सामर्थ्य मिळालं तर क्लेश आणि दु:ख या देणग्यादेखील मोठ्याच ठरतील.

मेरी ज़बाँ पे शिकवा-ए-अहल-ए-सितम नहीं
मुझ को जगा दिया यही एहसान कम नहीं

माझी वाणी  हुकुमशहाच्या जुलुमाविरुध्द तक्रार करणार नाही. मला जागं केलं हा काही कमी उपकार नाही त्यांचा.

या रब हुजूम-ए-दर्द को दे और वुसअ’तें
दामन तो क्या अभी मिरी आँखें भी नम नहीं

हे परमेश्वरा, तू माझ्या दु:खांची तीव्रता आणखी वाढव. अरे माझा पदर भिजणं सोड, माझे डोळेही अजून पाणावलेले नाहीत.

शिकवा तो एक छेड़ है लेकिन हक़ीक़तन
तेरा सितम भी तेरी इनायत से कम नहीं

माझी तक्रार ही खरं तर फक्त एक खट्याळपणा आहे, कारण तू करत असलेला जुलूम देखील मी तुझी कृपाच समजतो.  

अब इश्क़ उस मक़ाम पे है जुस्तुजू-नवर्द
साया नहीं जहाँ कोई नक़्श-ए-क़दम नहीं

हा  प्रेमाचा शोध  एका अशा टप्प्यावर येऊन पोचला आहे जिथं ना कसला आधार, कसली सावली आहे ना कुणाच्या पाउलखुणा.

मिलता है क्यूँ मज़ा सितम-ए-रोज़गार में
तेरा करम भी ख़ुद जो शरीक-ए-सितम नहीं

रोजच्या जीवनातल्या दु:खातही मजा असते एक प्रकारची, कारण त्या दु:खाना तुझी कृपा साथ देत नसते.

मर्ग-ए-‘जिगर’ पे क्यूँ तिरी आँखें हैं अश्क-रेज़
इक सानेहा सही मगर इतना अहम नहीं

‘जिगर’ मरण्यामुळं तुझे डोळे अश्रूंनी थबथबून का यावेत? ती दु:खद घटना असेल पण तरी इतकी काही महत्वाची असणार नाही.

मुकुंद कर्णिक 
karnik.mukund@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आजची कविता

 

 

 
जिगरबाज हो आम्ही 
शतक कराया पडली केवळ
एकच धाव कमी
म्हणुनी होतो निराश कधी का
जिगरबाज हो आम्हीआज तोकडे असेल थोडे
पडलेले पाऊल
अभिनंदन चंद्राने केले
हीच यशाची चाहूलस्वागतास मी भारत देशा
पसरीन माझे बाहू
नव्या दमाने पुन्हा एकदा
यान पाठवा पाहू

टाळून उणीवा झेप घेऊनी
यावे माझ्या घरी
पुष्पवृष्टी मी करीन तेथे
खूप तिरंग्या वरी

हिंदुस्थानी जिद्दीचा तर
मीही एक चहाता
चला करा बिनधास्त तयारी
कसली वाट पहाता

अंतराळही दुमदुमवू या रे
करू निनाद जयघोष
शास्त्रज्ञांनो तुमच्यामध्ये
भरपूर जिद्द नि जोश

नका मानू हे अपयश बिलकुल
कारण ना धक्क्याचे
मानकरी तुम्ही आजमितीला
नव्याण्णव टक्क्यांचे !
================================
 मुरारीभाऊ  देशपांडे,

संगमनेर ९८२२०८२४९७
murarisangamneri@gmail.com
[ चित्र : रघुपती शृंगेरी ( WhatsApp वरून  साभार ]

================================

अशा गोष्टी – अशा गंमती
शं. ना. नवरे   
१२. 

हातचा एक 

‘श्री दीपलक्ष्मी’ मासिकाचे संपादक श्री. ग. का. रायकर यांना एका वाचकाचे पत्र आले :-‘आपले मासिक आणि प्र. के. अत्र्यांचा ‘मराठा’ मी नियमितपणे वाचतो. संपादकांची छायाचित्रे देण्याची आपली दोघांची पद्धत मला वैशिष्ट्यपूर्ण वाटते. परवा मी आणि माझ्या बहिणीने मोजणी केली तेव्हा असे आढळून आले आहे की छायाचित्रांच्याबाबतीत आपण अत्र्यांपेक्षा फक्त एकच छायाचित्र अधिक आहात. आपल्या मासिकात काहीतरी कारणाने अत्र्यांचे एखादे छायाचित्र प्रसिद्ध करून हा एकाचा फरक काढाल काय, इत्यादी …

उत्तरादाखल, श्री दीपलक्ष्मीच्या पुढील अंकाकडे लक्ष ठेवण्यासाठी रायकरांनी त्या वाचकाला विनंती केली.

वाचकाला कबुल केल्याप्रमाणे रायकरांनी पुढल्या अंकात अत्र्यांचे एक छायाचित्र छापून टाकले.

— छायाचित्रांत अत्रे होते आणि त्यांच्याबरोबर रायकरही होते !

कै. शं. ना. नवरे
[ ‘ललित’ जुलै १९६७ च्या अंकावरून साभार ]

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
लक्षणीय 
केशव साठये 

‘वाचणारी माणसे’ या शिल्प प्रदर्शनाविषयी

 

 

चंद्रमोहन कुलकर्णी हे पुण्यातील कलासाहित्य विश्वाला विशेष ठाऊक आहेत ते इलस्ट्रेटर म्हणून. कॉलेजच्या दिवसांपासून अनेक मासिकांची मुखपृष्ठे याच्या शैलीदार रेखाटनाने सजलेली मी पाहिली आहेत. कथासंग्रह, कादंबऱ्या, बालसाहित्य यांची किती कव्हर्स चंद्रमोहनने केली असतील याची गणतीच नाही. पण एवढ्या मोठ्या संख्यने कामे करुनही आपला ठसा त्या त्या साहित्याचा अविभाज्य भाग बनेल एवढी तन्मयता त्याने कायमच दाखवली. आता विविध कला प्रकारात तो काम करत असला तरी त्याच्यातल्या मूळ इलस्ट्रेटरला तोही विसरला नाही आणि आपणही.

आणि हाच इलस्ट्रेटर आता वेगळ्या रूपात ‘आर्ट टुडे’च्या दालनात अवतारला आहे. कव्हर्स करताना मूळ साहित्य चित्रकारांनी कसे वाचले आहे ते पृष्ठभागावरील चित्र पाहून चाणाक्ष वाचकांच्या नक्की लक्षात येते. या माणसांनी या आपल्या लाडक्या पेशासाठी एक कामाचा भाग म्हणून खूप काही वाचलं असणार, मनःपूत वाचलं असणार आणि हे वाचन पॅशन बनून त्याच्या मानगुटीवर कायमचे बसले असणार हे ‘वाचणारी माणसे ‘ हे शिल्प कला प्रदर्शन पाहताना अंदाज आला. ( हा अंदाज बरोबर की चूक ते त्यांनी सांगावे ). ही शिल्पे त्यांनी फायबर कोटिंगमधून साकार केली आहेत तर मिनिएचर्सही मुख्यतः मार्बल वापरुन घडवली आहेत.

वरच्या मजल्यावर सुरळी अचूक फेकणारा पेपरवाला पोरगा तर मला या वाचनसंस्कृतीतला अग्रदूत वाटून गेला. आपण किती कौशल्याने पेपर टाकतो आहे, हा अभिमान त्याने कधीच खाकोटीला मारलाय. आपल्या वाचकांना त्यांचा आवडता पेपर कसा वेळेत मिळेल हीच काळजी त्याला आहे. वृत्तपत्र व्यवसायाच्या साखळीतील अगदी शेवटची कडी असलेला हा गल्लोगल्ली पहाटे उत्साहाने संचार करणारा पोऱ्या — याला प्रदर्शनाच्या अग्रभागी मान देऊन चंद्रमोहनने समस्त वाचकांच्या वतीने त्याला सलाम केला आहे, ते अतिशय हृदयस्पर्शी आहे.

यात आणखीही अनेक प्रकारची वाचणारी माणसं आहेत आणि या प्रत्येकाचे सुखनिधान ‘वाचन’ हेच आहे. कुणी बस स्टॉपवर वाचतंय, कुणी निवांत आरामखुर्चीत बसून, कुणी छान लवंडून तर कुणी आपल्या कम्फर्ट पोझमध्ये. सामूहिक वाचन करणारे एक कुटुंबही या मांदियाळीत आहे. प्रत्येकाची अत्त्युच्च आनंदाची संकल्पना वेगवेगळी आणि त्यामुळे वाचण्याची अवस्था ही भिन्न, पण यातून जाणारा मार्ग मात्र मोक्षाकडेच घेऊन जाणार याची खात्री ही तल्लीनता पाहताना होते.

वाचन ही प्रक्रिया आणि त्यातून मिळणारे समाधान ,सुख हे केवळ आपल्या मनाला आणि बुद्धीलाच रिझवत नसते तर ते आपल्या संपूर्ण शरीरभर पसरते,शरीरही तो आनंद शोषून घेण्यासाठी आतूर असते . आपला आवडता लेखक आवडता विषय आणि भरपूर पानांचा ऐवज एवढा जाम निमा असला की समाधी या शब्दाबद्दल आपल्याला कुतूहल वाटेनासे होते कारण आपण ती अवस्था अनुभवत असतो . यातील पसरलेलं पुस्तक ,वाचताना हाताचे आणि मानेचे ही हा वाचक डोळे करतो की काय हे दिसणारे आसुसलेपण या शिल्पातून डोकावते . सुबकपणा देण्याचे टाळून शिल्पांचा नैसर्गिक बाज टिकवून अवतरलेली ही माणसे आपल्या गोतावळ्यात एक होऊन जातात.

८ सप्टेंबर २०१९ पर्यंत पुण्यातील भांडारकर रोडवरच्या ‘आर्ट टुडे’च्या कलादालनात या ‘वाचणाऱ्या माणसां’ना आपल्याला भेटता येईल.
 – केशव साठये 
keshavsathaye@gmail.com

स्वल्पविराम  

पालवी [ ९ ]
 

कै. लक्ष्मण लोंढे 

काही दिवसांपूर्वी शिवाजी मंदिराला नाटकाला गेलो होतो. मध्यंतरात चहा प्यायला चहाच्या स्टॉलवर गेलो,  तर एकदम पाठीवर जोरदार थाप पडली. हातातला कप हिंदकळला. गरम चहा हातावर आणि शर्टावर सांडला.
‘च्यायला कोण हा .. ‘ म्हणत मागे वळलो तर तिथं विसू उभा ! ताबडतोब त्याला माफ केलं. त्याचं चुकलं नव्हतं. ‘पडले वळण इंद्रिया सकळां‘ अशी त्याची अवस्था होती. किंबहुना तो मला असा चहा पिताना पाठमोरा दिसला असता तर मीही तेच केलं असतं. त्याच्या अंगावर चहा सांडेल याची तमा न बाळगता.

विसू मला तब्बल पंचवीस वर्षांनी भेटत होता. पंचवीस वर्षं म्हणजे पाव शतक ! विसू म्हणजे खरं विशा .. माझा शाळेतला दोस्त ! आणि शाळा सोडल्याला आज पाव शतक उलटलंय. चहाचा कप बाजूला ठेवला आणि त्याला कडकडून मिठी मारली. कुठे असतोस, काय करतोस वगैरे चौकशा झाल्या. तेवढ्यात नाटकाची तिसरी बेल झाली. ‘पहायचंय ना नाटक ? की कटू या असेच ?’ त्याला विचारलं. वास्तविक नाटक चांगलं होतं. पहायची इच्छा होती; पण विशाशी गप्पा मारायची इच्छाही फार तीव्र होती. गेल्या पंचवीस वर्षांत आम्ही एकमेकांना एकदाही भेटलेलो नव्हतो. ‘दोन ओंडक्यांची होते प्रवाहात भेट ! एक लाट फोडी दोघां पुन्हा नाही भेट !‘ अशी अवस्था झालेली होती. तोही ‘नाटक पाहू,‘ असं म्हणाला आणि ‘नाटक संपल्यावर जाऊ नको रे! ‘ असं एकमेकांना बजावत आम्ही नाट्यगृहात वळलो.

नाटक संपलं आणि नाटकानंतर आम्ही पुन्हा भेटलो. विसूनं इराण्याच्या हॉटेलात जाऊन गप्पा मारीत बसण्याचा प्रस्ताव मांडला, पण मी ती खोडून काढला. ‘मी जवळच रहातो. गप्पा मारीत घरीच बसू, चल. शिवाय घरी आलास की माझ्या कुटुंबाशी तुझी ओळख करून देता येईंल.मी सुचवलं आणि ताबडतोब ते त्याला पटलं.

‘वास्तविक शाळा संपल्यावर काही दिवस शिक्षणा – नोकरीनिमित्त मीही बाहेरगावी रहात असलो तरी गेली दहा वर्षं मी चक्क मुंबईत राहतोय. तुझ्या लिखाणातून किंवा मासिका-बिसिकांत तुझ्या प्रसिद्ध होणाऱ्या गोष्टींच्या खाली छापलेल्या तुझ्या पत्त्यावरुन तूही मुंबईत राहतोस हे माहित होतंच. तुला भेटायचंही मनात होतंच; पण बघ, हा असा योग आला.’ विसू  म्हणाला. मग आम्ही दोघांनी चालता चालता मुंबईच्या जीवनाला शिव्या दिल्या. ह्या महानगरीत काही किलोमीटर्सच्या अंतरावर कशाला, काही फुटांच्या अंतरावर राहणारी माणसंसुद्धा इच्छा असून एकमेकांना वर्षानुवर्ष भेटू शकत नाहीत.विसूला घेऊन मी घरी आलो. बायकोशी-मुलांशी ओळख करून दिली. आणि त्याला माझं घर दाखवायला सुरुवात केली. हॉल दाखवला. किचन दाखवलं. बेडरूम्स दाखवल्या. ह्या सगळ्या खोल्यांतील फर्निचरला, भिंतींच्या रंगाला, घराला लावलेल्या पडद्यांना विसूनं मनापासून दाद दिली. घरातल्या एकूण टापटिपीचं कौतुक केलं. किचनमध्ये बायको आमच्यासाठी चहापाण्याचं करीत होती. तिला ऐकू जाईल इतपत मोठ्यानं म्हटलं, ‘छे छे ! घरातल्या ह्या सगळ्या गोष्टींसाठी माझं कसलं कौतुक करतोस? घरात जी टापटीप सौन्दर्य दिसतंय ना, त्याचं श्रेय तुझ्या वहिनीचं आहे बाबा.. कुठे टापटीप बिघडलेली दिसत असली, गचाळपणा दिसत असला, अव्यवस्थितपणा वाटत असला तर त्याचं श्रेय माझ्यात आणि मुलांमध्ये विभागून जातं. अर्थात माझा वाट सिंहाचा, मुलांचा कमी ’..

विसूला घेऊन मी माझ्या अभ्यासिकेत गेलो, मुंबईच्या छोट्याशा घरात माझ्यासाठी स्वतंत्र अभ्यासिका आहे, अशातला भाग नाही. खरं तर ही खोली म्हणजे माझी अभ्यासिका कम मुलांची अभ्यासाची खोली कम अडगळीचं सामान ठेवण्याची खोली कम पाहुणे आले तर त्यांच्यासाठी बेडरूम कम कपडे वाळत घालायची खोली कम इतर बरंच काही आहे. पण मी आपला त्या खोलीला माझी अभ्यासिका म्हणतो. मला बरं वाटतं. खोलीलाही रुबाबदार व्यक्तिमत्व आल्यासारखं वाटतं आणि मुख्य म्हणजे तिला अभ्यासिका म्हणावं, असं तिच्यात काहीतरी आहे.

वास्तविक त्याच खोलीत छोटीशी तीन चाकी, मोठ्याची दोन चाकी अशा दोन सायकली, एक जुना पलंग, त्याच्यावरच्या सगळ्या गाद्या, वरच्या माळ्यावर पापडाचे डबे, त्याच्या जोडीला जुन्या बॅगा, कोपऱ्यात मुलांच्या बॅटा, चपला ठेवायची रॅक, आणि गॅस गेला तर अडचणीच्या वेळी उपयोगी पडणारा स्टोव्ह आणि रॉकेलचा डबा इतकं सगळं सामान ठेवलेलं आहे. पण तरीही त्यातच एका कोपऱ्यात माझं एक छोटेखानी टेबल आणि त्याच्यापाशी एक जुनी घडीची खुर्चीही आहे.

शिवाय मुख्य म्हणजे तिथं भिंतीवर एक मोठं जवळजवळ अर्ध्याहून अधिक भिंत व्यापून राहील एवढं माझं पुस्तकाचं कपाट आहे.

त्या कपाटात हारीनं पुस्तकं लावून ठेवली आहेत. इंग्रजी, मराठी, कायद्याची, विज्ञानविषयक शिवाय कादंबऱ्या, नाटकं, काव्यसंग्रह इत्यादी सगळं काही.. हे कपाट माझ्या खोलीत छान शोभून दिसतं. मी बारीक सारीक लेखन करणारा लेखक असल्यामुळे व त्या निमित्तानं मला अधून मधून माणसं भेटायला येत असल्यामुळे मी त्या खोलीत माझ्या लेखक या भूमिकेला साजेसं असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे बऱ्याचशा माणसांचा त्या कपाटाकडे पाहिलं की माझ्याविषयी चांगला गैरसमज होतो. मी नुसता लेखक नसून माझ्या लिखाणामागे माझं प्रचंड वाचन आणि विविध विषयांचा माझा दांडगा व्यासंग उभा आहे, असा पाहणाऱ्यांचा समज होतो. तो त्याच्या नजरेत ओघळतो. तो मला दिसतो आणि मी सुखावतो.

विसूवरही कपाटाचा योग्य तो अपेक्षित परिणाम झालाच ! विविध विषयांवरची पुस्तकं, त्याची शीर्षकं वगैरे पाहून तो भारावून गेला. त्यानं चार-दोन पुस्तकं कपाटातून काढली. त्यांच्यावरून हात फिरवला आणि त्याच्या नजरेत समाधान भरून आलं. मी स्वतः माझ्या नजरेनं त्याच्या चेहऱ्यावरचे बदल टिपत होतोच. कपाटातल्या निरनिराळ्या पुस्तकांवर नजर फिरवता फिरवता विसूची नजर एका प्रसिद्ध पुस्तकावर गेली. ते पुस्तक बाहेर  काढीत विसू मला म्हणाला, ‘लक्ष्मण, बरेच दिवस हे पुस्तक मी किती शोधत होतो बघ.. मिळतच नव्हतं रे ! आणि आत्ता मिळालं बघ.. तुझ्याकडे एवढी पुस्तकं बघितल्यावर मला वाटलंच होतं तुझ्याकडे ते असेल असं.. मी हे पुस्तक घेऊ का ?’ मी थोडासा कडवट चेहरा करीत म्हटलं, ‘माझं वाचून व्हायचंय रे ! माझं झालं की देतो तुला लगेच..’

मग आणखी पुस्तकांवर नजर फिरवता फिरवता विसूनं दुसरं एक पुस्तक शोधून काढलं. आणि मला पुन्हा तेच विचारलं आणि मी त्याला पहिलंच उत्तर दिलं. अखेर विसू चिडला आणि म्हणाला, ‘काय रे साल्या, देत का नाहीस पुस्तकं ? मी परत करणार नाही असं वाटतंय का तुला ? मी सांगितलं ना, आता मी मुंबईत रहातो. शिवाय आपण आता वरचेवर भेटूच ना..तेव्हा करेन ना तुझी पुस्तकं परत.. ‘ अखेर विसू नाराज होऊ नये म्हणून मी त्याला एक पुस्तक दिलं.

–पण ईश्वरसाक्ष खरं सांगतो, खोटं सांगत नाही, त्या कपाटातली बरीचशी पुस्तकं मी न वाचलेली आहेत. ती सगळी पुस्तकं मला वाचायची आहेत. म्हणूनच मी ती विकत घेतली आहेत. ( ‘ग्रंथाली’ चळवळीतल्या त्या माझ्या मित्रांनी कृपया नोंद घ्यावी..) मी पुस्तकं विकत घेतो. विकत घेतलेली सगळी पुस्तकं ताबडतोब वाचली जातातच असं नाही. अर्थात ती कपाट सजवायला घेतलेली असतात असं नव्हे. तर वाचायची असतात म्हणूनच घेतलेली असतात. वाचायचा संकल्प सोडलेला असतो; पण संकल्प आणि सिद्धी यात कधी कधी कित्येक दिवसांचं, कदाचित वर्षांचंही अंतर पडतं .. काही हरकत?

एकूण काय माझ्याकडे न वाचलेली अशी अनेक पुस्तकं आहेत आणि पुस्तकाचंच कशाला.. मी न केलेल्या पण मला करायच्या आहेत अशा अनेक गोष्टी आहेत. साधं प्रवासाचंच घ्या. नोकरीच्या निमित्तानं म्हणा, इतर काही कारणानं म्हणा, माझा बऱ्यापैकी प्रवास झालाय; पण अजून कन्याकुमारीचं विवेकानंदांचं स्मारक बघायचं राहिलंय की ! हिमालयात हरिद्वार, हृषीकेश बघून व्हायचंय की ! ताजमहाल घाईघाईत दिवसा पाहून झाला.. पण पौर्णिमेच्या पिठूर चांदण्यात ते टवटवीत सौन्दर्यपुष्प पहायचंय की ! गंगेच्या काठावर तिथल्या कोलाहलाकडे संपूर्ण दुर्लक्ष करून तासन्तास बसून हजारो वर्षांच्या गंगेच्या प्रवाहाबरोबर वाहत आलेल्या भारताच्या इतिहासावर विचार करीत बसायचं राहिलंय की ! आणि प्रवासाच्या साधनाचं म्हणाल, तर सायकल, बैलगाडी, घोडा, जीप, मोटार आगबोट, रेल्वे, तिचे सर्व प्रकारचे वर्ग आणि प्रकार, चांगली तीन चार प्रकारची विमानं, यात बसून झालं असलं तरी शक्य झालं तर आणि संधी मिळेल तेव्हा उंट, हत्ती, यांच्यावरून आणि  हेलिकॉप्टर, पाणबुडी आणि खासगी छोटं चार सीटर विमान यांच्यातून प्रवास करायचाय की ! ट्यूब रेल्वेत कुठे बसून झालंय ? रोप रेल्वेत कुठे बसून झालंय ? आणि हिंदुस्थानाबाहेरचं तर आख्ख जग बघून व्हायचंय. त्यात कितीतरी गोष्टी आहेत की ज्या सारख्या मला खुणावतायत, हाका मारतायत.

न वाचलेली पुस्तकं आणि न केलेल्या प्रवासासारखा आणखी कितीतरी न केलेल्या गोष्टी आयुष्यात आहेत. आता त्यातल्या काही गोष्टींच्या बाबतीत तर वयामुळे किंवा शारीरिक अडचणीमुळे मी रद्दबातलही झालेलो आहे. साधी सव्वीस जानेवारीच्या दिल्लीच्या परेडची गोष्ट घ्या. सैन्यात जायची खास आवड नसली तरी एन. सी. सी.चा एक कॅडेट म्हणून राष्ट्रीय स्तरावर आपली निवड होऊन इतर नावाजलेल्या रेजिमेंट्सच्या सैनिकांच्या पाठोपाठ मोठ्या रुबाबात मार्चिंग करीत राष्ट्रपतींच्या सलामी मंचापाशी आल्यावर खाड्कन मान वळवून आपल्या पाठीमागच्या शंभर एक कॅडेट्सना सलामीचा आदेश देत रुबाबानं राष्ट्रध्वजाला सलाम करायची काय मला इच्छा नव्हती? नक्कीच होती!

लिखाणाचे तर किती संकल्प मनातल्या मनात मी सोडले आहेत!

पूर्ण झालेल्या गोष्टींपेक्षा अपूर्ण राहिलेल्या गोष्टीच पुढे जगायची ओढ लावतात. आत्मचरित्र वगैरे लिहिण्याची वेळ म्हातारपणाची.. माणूस जेव्हा आपल्या गतजीवनाच्या चित्रांचा अल्बम पुनः-पुन्हा पाहू लागतो तेव्हा तो म्हातारा झाला असं समजावं .. बाप रे! केवढं मी जगलो, किती किती पाहिलं, काय काय केलं, अशी भावना मनात येऊन त्याविषयी समाधान वाटू लागलं की, माणूस संपला असं समजायला हरकत नाही. आता त्याच्याच्यानं पुढं काही व्हायचं नाही हे निश्चित. पण जोपर्यंत माणूस, ‘ वूड्स आर लव्हली, डार्क अँड डीप — बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप ‘ असं रॉबर्ट फ्रॉस्टच्या शब्दांत पंडित नेहरूंबरोबर म्हणू लागतो, तेव्हा तो जिवंत आहे, संपलेला नाही असं समजावं. ही प्रॉमिसेस काही दुसऱ्याला दिलेली असायला हवीत असं नाही. आपण सोडलेले संकल्पही असू शकतात. आपण स्वतःला दिलेली प्रोमिसिस असतात जी आपल्याला खुणावत असली की आपला पुढला प्रवास सुरु होतो.

माझं सगळं करून झालं. आता मी सुखसमाधानानं मरायला मोकळा आहे असं म्हणावंसं वाटणं हे दुर्दैवाचं लक्षण आहे. जगज्जेत्या शिकंदराच्या बाबतीत असं सांगतात की सारं जग जिंकून झाल्यावर आणखी काही जिंकायला उरलं नाही म्हणून तो रडला. शिकंदराला मानलं आपण.. खरा जिंदादिल माणूस होता तो! सगळं जग जिंकून झाल्यावर त्याच्या अश्वमेधाचा वारू परत आल्यावर यज्ञ घालून ‘कृतार्थ मी‘ असं विचार करीत मांडलिक राजांच्या सलाम्या घेत शिकंदर सुखानं सिंहासनावर बसून राहिला, असं वाचनात आलं असतं तर शिकंदर मनातून पार उतरला असता.

अर्थात जीवनात घडलेल्या गोष्टींसंबंधी समाधान असणं हे विकृत मनाचं लक्षण आहे, असं मी मानत नाही. पण न घडलेल्या गोष्टींसंबंधी त्या घडवून आणण्यासाठी धडपड करायची इच्छा मनात असणं हे जिवंत मनाचं लक्षण आहे. असं मला नेहमी वाटतं.

हा ‘झोका‘ लिहायला सुरुवात केली तेव्हा वाटलं, न वाचलेल्या पुस्तकांसारखा हा एक न लिहिलेला ‘झोका‘ ठरतो की काय? पण नाही, झाला पूर्ण .. पण मला माहित आहे, हा पूर्णविराम नाही, स्वल्पविराम आहे.. आणखी ‘झोके‘ लिहायचे आहेतच की .. कितीतरी न लिहलेले ‘झोके‘ मला हाक मारतायत. माझ्या मनात गर्दी करून आहेत.. मी येतो कागदावर आधी म्हणून आतून धक्के देतायत. मी न वाचलेल्या पुस्तकांसारखे मला खुणावतायत.. साद घालतायत.

———- ००००० ———-

कै. लक्ष्मण लोंढे 
प्रेषक : स्वाती लोंढे 
swatilondhe12@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
कन्फ्यूशियसचा विचार 

[ १ ]

 

मुकुंद नवरे 

एक बोधकथा : मूल आणि विहीर 

 

Mencius or Mengzi

चीनमधील कन्फ्यूशियसच्या परंपरेतील मेन्सियस (Mencius / Mengzi) या गुरूला कन्फ्यूशियसनंतर दुसरे महत्वाचे स्थान दिले जाते. मेन्सियसचा काळ इ. स. पूर्व चौथ्या शतकातील आहे. त्याने केलेल्या लेखनात विहिरीत पडण्याच्या बेतात असलेल्या मुलाची कथा असून मानवी मनाचा चांगुलपणा सांगण्यासाठी मेन्सियसने या कथेतील प्रसंगाचा आधार घेतला आहे. मेन्सियसचे म्हणणे असे की, कुठलाही माणूस, जो विहिरीत पडण्याच्या बेतात असलेल्या मुलाला पाहील, तो त्या मुलास जिवाच्या धोक्यापासून वाचवल्याशिवाय  राहणार नाही. मेन्सियसने वर्णिल्यापासून ही कथा कन्फ्यूशियसच्या विचारसरणीच्या संदर्भात गेली अनेक शतके सांगितली जात आहे. हा सहज घडू शकणारा प्रसंग मेन्सियसने विषद केल्यानुसार प्रत्येकावर मूलत: तोच परिणाम करील आणि होय, प्रत्येकजण त्या विहिरीच्या काठावरील मुलाला वाचवील असे सहज म्हणता येते.

मेन्सियस  मात्र या कथेच्या माध्यमातून त्याने माणसांबाबत केलेले सखोल निरीक्षण सांगत असून त्यानुसार कुठलाही पुरूष किंवा स्त्री माणसाच्या नैसर्गिक स्वभावातील चांगुलपणामुळेच त्या मुलाला वाचवण्याची कृती करील. मेन्सियस पुढे म्हणतो की, हा माणसाचा चांगुलपणा हा त्याने बाहेरून शिकलेला भाग नसून तो माणसाच्या नैसर्गिक स्वभावात शुद्ध स्वरूपात आहे. त्याच्या मते सर्व मनुष्यमात्रातील मन दुस-याला होणारे दु:ख पाहू शकत नाही, म्हणूनच सर्व मानवी मने इतर मनांशी कळवळा दाखवतात. आता जर कुणी एकाएकी विहिरीच्या काठावरील मुलाला आत पडण्याच्या स्थितीत पाहील तर त्याच्या मनात त्याठिकाणी असलेला जिवाचा धोका, त्या मुलाची होऊ शकणारी हानी, त्याबाबत दया, करूणा हे भाव भरून येतील. त्यानुसार आता ती व्यक्ती जी कृती करेल ती त्या मुलाच्या पालकांचे उपकार मिळवण्यासाठी नसेल, शेजा-यांची आणि मित्रांची प्रशंसा मिळवण्यासाठी नसेल किंवा ती कृती न केल्यास आपली प्रतिष्ठा संभाव्यत: लयाला जाईल अशा काही विचारातूनही नसेल.

मेन्सियस म्हणतो की दया (pity) आणि करूणा (compassion) यांचा स्पर्श ज्याच्या मनात नसेल तेथे माणुसकी नाही ; ज्याच्याकडे लाज (shame) आणि तिटकारा (aversion) वाटणारे मन नसेल तेथे माणुसकी नाही ; ज्याच्याकडे सभ्यता (modesty) आणि अनुशीलन (compliance) मानणारे मन नसेल तेथे माणुसकी नाही आणि ज्याच्याकडे बरोबर काय (right) आणि चूक (wrong) काय हे कळणारे मन नसेल तेथे माणुसकी नाही. जेव्हा मनात दया आणि करूणा यांचा उदय होतो तीच आपण माणूस असण्याची (humanness) सुरूवात असते… जेव्हा मनात लाज आणि तिटकारा उद्भवतात तीच आपली बरोबर असण्याची (rightness) सुरूवात असते… जेव्हा मनात सभ्यता आणि अनुशीलन यांचा उगम होतो तीच नैतिकतेची (propriety) सुरूवात असते आणि जेव्हा मनाला बरोबर काय आणि चूक काय हे कळते तीच शहाणपणाची (wisdom) सुरूवात असते. सर्व मनुष्यमात्रात हातपाय असावेत त्याचप्रमाणे या चार बाबी आरंभापासून असतात.

संदर्भ: ‘ सोर्सेस ऑफ चायनीज ट्रॅडिशन ‘ [ खंड २ ]
विल्यम डी बेरी आणि आयरी ब्लूम ,
कोलंबिया युनि. प्रेस, १९९९
रेखाचित्र : विकिपेडियावरून साभार

मुकुंद नवरे
mnaware@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
निमित्त
केशव साठये 
 
७७. 
 
अनंत हरी गद्रे उर्फ समतानंद

जाहिरातींचे कॉपी रायटिंग हा आपण गेल्या काही दशकातला आधुनिक लेखन प्रकार मानतो पण त्याला मराठीत वैभव प्राप्त करुन देण्याचे श्रेय यांनाच द्याल हवे. अनेक नाटक सिनेमांच्या जाहिरातींचा मजकूर लिहिण्यासाठी निर्माते त्यांच्याकडे गळ घालत. थोडक्यात पण लक्ष वेधून घेणारे लेखन हा त्यांचा हातखंडा होता.

अच्युत बळवंत कोल्हटकर यांच्या ‘संदेश’ या वृत्तपत्रातील एक खंदे वार्ताहर अशी त्यांची ख्याती होती. वाचकांना खिळवून ठेवणारी त्यांची बातमीदारी हा त्या काळातील पत्रकारितेतील चर्चेचा विषय झाला होता.

राम गणेश गडकरी आणि श्री. म. माटे यांच्याशी त्यांचा स्नेह होता. हे थोडे या दोघांहून वयाने लहान पण प्रगल्भता मात्र विलक्षण. एका उण्यापुऱ्या आयुष्यात माणूस काय काय करु शकतो याचा त्यांनी आपल्याला धडाच घलून दिला आहे.

अध्यात्माची ओढ त्यांना थेट हिमालयात घेऊन गेली. पण अशा भ्रमंतीत त्यांचे आयुष्य जावे हे नियतीला मंजूर नव्हते. कारण या माणसाच्या हातून अनेक लोकोत्तर कामे घडायची होती. मराठी रंगभूमी ते दलितोद्धार आणि जाहिरातीचे लेखन ते स्वातंत्र्य चळवळीत सहभाग असे कॅलिडोस्कोपी आयुष्य ते जगले. एक ते दीड तासाचे नाटक ही त्यांची आपल्या नाट्यसृष्टीला मिळालेली अनमोल भेट आहे.

सहभोजन हा भारतीय समाजतला एका अविभाज्य भाग आणि सत्यनारायण हा मराठी मुलखातील एक लोकप्रिय धार्मिक विधी. या दोन्हीचा उपयोग करुन त्यांनी ‘झुणकाभाकर सहभोजना’चा उपक्रम सुरु केला. याला आचार्य अत्रे, स्वातंत्रवीर सावरकर, सेनापती बापट, शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी अशा अनेक नामवंतांनी पाठिंबा दिला. दलित व्यक्तीला पंक्तीचा मान देणारे हे व्यक्तिमत्व. जातीभेदाचे कुंपण तोडणारी त्यांची ही जीवनशैली अनन्यसाधारण अशीच होती.  टिळकांच्या स्वातंत्र्य चळवळीत लेखणीसह स्वतःला  झोकून देणारे, साप्ताहिकांमधून  समाजातल्या दुष्ट चालीरीतींवर आसूड ओढणारे अनंत हरी गद्रे उर्फ समतानंद  – त्यांच्या  स्मृतिदिनानिमित्त  (जन्म १६ ऑक्टोबर १८९० – मृत्यू ३ सप्टेंबर १९६७) प्रणाम !

@@@
७८.
कविता महाजन 

झाली त्याला आता १५-१६ वर्ष. मित्रवर्य अवधूत परळकर माझ्याकडे राहायला आला होता. तो आला की एक असतं, काहीतरी नवीन घेऊन येतो तो, एखाद्या आडवाटेवरच्या फिल्मची सीडी, नाहीतर हिंदू, इंडियन एक्स्प्रेस यांमध्ये कोपऱ्यात आलेल्या एखाद्या लेखाचे कात्रण खूप काँटेम्पररी असतं ते. त्यावेळी तो दहा, पंधरा कविता घेऊन आला होता, उत्सुकतेनं पहिली वाचली आणि मग वाचतच गेलो. कविता होत्या ‘बाई’ या व्यक्तीबद्दलच्या. तिचं भावविश्व्, तिच्या सुखाच्या कल्पना , तिचं बाई असणं, तिच्या बाई असण्याचा गैरफायदा घेणारा नरपशू, उदात्त नात्यांनाही नख लावणारी विकृत माणसं. बाईभोवती फेर धरून नाचणारे दुःख ऐलमा पैलमा इतकं सहज टिपून त्या कवयित्रीनं पुढयात टाकलं होतं.

दुस-या दिवशी ऑफिसला गेल्यावर आमच्या तात्कालिक संचालक डॉ सुनंदा इनामदार यांच्या केबिनमध्ये जाऊन समोर उभा राहिलो.

‘काय रे, केशव, काय नवीन ?’

आमचा उत्तम संवाद होता. रसिक, साहित्याची आवड असणाऱ्या त्या असल्यामुळं नवीन काही चांगलं वाचलं की मी जाऊन शेअर करायचो, त्या कविताही मी त्यांना वाचून दाखवल्या. साध्या सरळ भाषेतून त्यातलं तप्त वास्तव इतकं अंगावर आलं की काही वेळ आम्ही सून्न होऊन बसलो होतो.

तिच्या ‘बाई’वरच्या कविता या तक्रारी नव्हत्या, ना टिपिकल पुरुषी जगाबद्दल कडवटपणा. तिच्यातील कवीपणाच्या ऊर्जेतच स्त्रीच्या भावविश्वाचे धागे खोलवर रुजलेले होते, ते अक्षरशः तिनं अनेकवेळा उखडून दाखवलेत, त्या शब्दातून ते ठसठसणं असं बाहेर पडतं की ती एक दुःखाची लिपी होऊन जाते.

पुढं मग तिची भेटही झाली, छान मैत्री झाली. तिने लिहिलेल्या कादंबरीवर पत्रव्यवहारही झाला. ‘ब्र ‘या कादंबरीवर व्यक्तिरेखेच्या वागण्याबद्दल मी काही आक्षेप नोंदवले होते, त्याला उत्तर देताना तिने लिहिले होते, मी खरं म्हणजे वाचकांना काय वाटतं याचं उत्तर देण्याच्या फंदात पडत नाही पण तू मित्र आहेस म्हणून लिहिते एक मित्र म्हणून, लेखिका म्हणून नाही. आणि मग तिनं माझ्या आक्षेपांबद्दल तिचे म्हणणे मांडले होते. पुढे तिची ‘भिन्न’ आली ती गाजली, कुहू सारखी मल्टी मीडिया कादंबरी हा एक नवा जॉनर तिने मराठी साहित्य विश्वात आणला.

मनस्वी,पारदर्शी, बंडखोर अशी ही नामवंत लेखिका, कादंबरीकार. पण कविता हाच तिच्या साहित्याचा नैसर्गिक हुंकार होता असं मला वाटतं.

‘पडदा’ या कवितेत ती म्हणते,
नाटक संपलंय
पडदा टाक
मी खुणावलं
तर त्या जख्ख हातांना
खेचता येत नव्हता
पडद्याचा दोर
मग भूमिका टाकून
मी गेले
त्याला हात द्यायला,

आज कविता असती तर ५२ वर्षे पूर्ण केली असती तिने. (जन्म ५ सप्टेंबर १९६७ – निधन २७ सप्टेंबर २०१८). ५२ पानांच्या डावापेक्षाही तुटपुंजे आयुष्य लाभूनही तिने अनेक रसिकांच्या साहित्य प्रेमींच्या आयुष्यात आपल्या प्रतिभाशाली लेखणीने एक समृद्ध वाचनानुभव दिला, सामाजिक प्रश्नांना कादंबरीच्या अंगाने भिडून ते मुख्य प्रवाहात आणले.
श्रद्धांजली !

केशव साठये
keshavsathaye@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
शब्द – शब्द – शब्द
 
डॉ. उमेश करंबेळकर 

( २४ )


घट्टकुटी प्रभात न्याय

संस्कृतमध्ये जे अनेक मजेशीर न्याय आहेत त्यातलाच एक म्हणजे घट्टकुटी प्रभात न्याय. हे नाव ऐकून ‘ह्यात मजेशीर ते काय ?’ असा प्रश्न काहींना पडेल. तर काहींना पुलंच्या जलशृंखला योग, कनिष्ठ भगिनी योग अशा काही नवीन ग्रहयोगांतलाच हा एखादा प्रकार असावा, असं वाटेल. तसं काही नाही. घट्ट कुटी प्रभात न्याय हा फार जुना, संस्कृत साहित्यातील न्याय आहे.

घट्ट म्हणजे जकात. कुटी म्हणजे झोपडी. घट्टकुटी म्हणजे जकात नाका. प्रभात म्हणजे पहाट हे आपल्याला माहीतच आहे.

सध्या अनेक शहरांतील जकात रद्द झाली आहे. पण काही वर्षांपूर्वी सर्व नगरांत आणि शहरांत प्रवेश करताना मालावर जकात द्यावी लागे. त्यावेळी ‘ इतक्या लाखांची जकात चुकवलेला मालट्रक पकडला.’ अशा तऱ्हेच्या बातम्या वर्तमानपत्रांत वाचायला मिळत. जकात चुकविण्याची व्यापाऱ्यांची प्रवृत्ती त्यातून दिसून येई. पण गंमत म्हणजे ही प्रवृत्ती आजकालचीच नाही तर फार पुरातन आहे. कारण जकातीची परंपराही तितकीच जुनी आहे.

जकात चुकविण्यासाठी आत्ताचे व्यापारी जशा अनेक युक्त्या योजतात तसेच पूर्वीचे व्यापारीही करत. पूर्वी व्यापारी आपला माल बैलगाड्यातून वाहून नेत. जकात नाका टाळण्यासाठी हे व्यापारी सहसा रात्री प्रवास करत, ते देखील आडमार्गाने. पण कित्येकदा गंमत काय व्हायची की, आडमार्गाचा रस्ता चुकायचा.मग रात्रभर अंधारात भरपूर हिंडल्यावर पहाटेच्या प्रकाशात गाडी हमरस्त्याला लागायची आणि नेमका जकात नाकाच समोर दृष्टीस पडायचा. हाच तो घट्टकुटी प्रभात न्याय. मूळ उद्देश फसणे, असफल होणे हा ह्या न्यायाचा अर्थ.

आत्ताच्या महामार्गांवरील टोलनाके म्हणजे एक प्रकारचे जकात नाकेच. येथील टोल देखील जबरदस्त. पेट्रोलपेक्षा टोलचेच पैसे जास्त अशी परिस्थिती. त्यामुळे हे टोलनाके  टाळण्यासाठी अनेक वाहन चालक  आडमार्गाने वाहने नेतात आणि नेमके टोलनाक्याच्या अलिकडेच महामार्गाला लागतात. अशा वेळी हा घट्टकुटी प्रभात न्याय आठवतो आणि त्यातील गंमतही कळते.

डॉ.उमेश करंबेळकर

umeshkarambelkar@yahoo.co.in
@@@
संस्कृत शिकायचंय ना ?
 पाठ १५ 
 प्रा. मनोहर रा. राईलकर
टीप:  वाक्य २९. किम् आणि अस्ति ह्यांचा संधि होऊन किमस्ति होईल.

हरवलेलं मन

नवीन धारावाहिक कादंबरी 
 
प्रा. मनोहर रा. राईलकर   
 
भाग चार 

तो कोण?

या नवीन धारावाहिक कादंबरीचे सुरुवातीचे ३ भाग अनु.  दि. ९, १७ आणि २१ ऑगस्ट २०१९ रोजी प्रसिद्ध झाले होते. आज चौथा भाग. -सं.     

माझ्या आयुष्यात एक नवीन दालन उघडत होतं. एक नवीन प्रकरण सुरू होत होतं. सगळंच नवीन, सगळंच अनपेक्षित. नोकरी अनपेक्षित, तिचं स्वरूपही अनपेक्षित. एवढ्या मोठ्या उद्योगपतीचा केवळ परिचयच नव्हे, तर अखंड सहवास… कायम त्यांच्या बरोबर राहून गाडीतून हिंडायचं… आईवडिलांचा पत्ता नसलेल्या, अनाथ म्हणून बेवारशी वाढलेल्या मुलाच्या आयुष्यात ही क्रांतीच होती. जन्मभर मान मोडून अभ्यास करणाऱ्या, सदैव प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण होणाऱ्या मुलांनासुद्धा आयुष्यात सामान्य जीवन कंठावं लागतं. तिथं माझं भाग्य केवढं! पुरुषस्य भाग्यं देवो न जानाति कुतो मनुष्यः। कुठं बोर्ले उद्योगांचे मालक-चालक, अगदी सर्वेसर्वा माधवराव आणि कुठं दोनतीन महिन्यांचा टाकून दिलेला मी एक फालतू मनुष्य!… आज गाडीत आमची अचानक भेट होते काय, ते आपला प्रश्न मला सांगतात काय, अन् मी केवळ हौस किंवा छंद म्हणून मानसशास्त्र वाचतोय इतकं कळून खूश होऊन मला आपल्या निजी सचिवाचं पद बहाल करतात काय! अतर्क्य, निखालस अविश्वसनीय.

‘हँ!’ मला वाटलं मी स्वतःशीच बोललो. पण बहुधा माझ्या तोंडून उद्गार बाहेर पडला असावा. कारण समोरच्या व्यक्तीनं ‘काय विचित्र प्राणी आहे,’ अशा नजरेनं माझ्याकडे पाहलं. पण, मला तर इथं आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.

खरं म्हणजे प्रवासभर माझ्या मनात माधवरावांशिवाय दुसरा कुठला विषयच येत नव्हता. आपल्या कामाकरता जायचं तर पहिल्या वर्गानंच असा काकांचा आग्रह, मला पटत नसे. पण आता असं वाटतंय की त्यामुळंच माधवरावांचा नि माझा परिचय झाला. नव्हे त्यांचा निजीसचिव होण्याची सुवर्णसंधी लाभली. माधवरावांचं काम मात्र आपल्याला जमलं पाहिजे. नुसतं कारण सापडून पुरायचं नाही. त्यांच्या अज्ञात, अंधाऱ्या पट्ट्याचाही शोध लागला पाहिजे. पण अजून त्यांनी आपल्याला सगळी कथा कुठं सांगितली आहे? इतक्या अपुऱ्या आधारावर कोणी झालं तरी काय शोध लावणार? शक्यही नव्हतं नि बरोबरही नव्हतं. उगीच हवेत इमले बांधण्यात काय अर्थ? जाऊ द्या. पण असा मान झटकून मनातून जाणारा विषय थोडाच आहे? राहून राहून सगळ्या प्रसंगांची उजळणी मनात होत राहिली. ती टाळणं अशक्य असल्याचं जाणवलं. त्यामुळं पुस्तक काढून वाचण्याचा विचार मी रहित केला.

आपल्याला नोकरी मिळाल्याचं कळल्यावर काकांना काय वाटेल? खरं तर काकांनासुद्धा आपल्यासारख्या एका सहाय्यकाची जरुरी आहेच. त्यांचा आता हातच मोडल्यासारखं होईल. त्यामुळंच त्यांना कसं सांगायचं हा माझ्यापुढं यक्षप्रश्नच होता. गाडी जसजशी घाट चढून पुण्याजवळ येऊ लागली, तसतसा माधवरावांचा विषय मागं पडून काकांबद्दल मला चिंता वाटू लागली. खरंच, काकांशी चर्चा केल्याशिवाय इतका मोठा निर्णय आपण केलाच कसा? माझं मलाच नवल वाटलं. आजवर लहानसहान गोष्टीतसुद्धा काकांना विचारल्याशिवाय मी निर्णय करीत नसे. ते मला म्हणायचे, ‘आता तुझा तूच निर्णय करायला शीक. तुझी स्वतःची निर्णयशक्ती वाढली पाहिजे. चुकलं तर चुकलं. पण निर्णयशक्तीचा विकासच न झाल्यामुळं मोठेपणी निर्णय चुकून फटका बसेल तो सहन होणार नाही, इतका प्रचंड असू शकेल. म्हणून तू आतापासूनच निर्णय करू लाग.’

तरीही माधवरावांना अंतिम होकार देण्यापूर्वी ‘काकांना विचारून सांगतो,’ असं तरी म्हणायला हवं होतं. माधवरावांच्या व्यक्तित्वापुढं आपण वाहवत गेलो? अन् एवढासुद्धा विवेक राहिला नाही आपल्याला?

हळू हळू चिंतेची जागा लाजेनं घेतली. काही सुचेना. काकांना तोंड कसं दाखवायचं, ह्याच विचारानं माझी अस्वस्थता वाढली. तेच तेच विचार माझा मेंदू कुरतडू लागले. त्या नादात मी शिवाजीनगरला उतरलो केव्हा, रिक्षा करून आश्रमात आलो केव्हा, तेही मला कळलंच नाही.

माझ्या सुदैवानं काका घरी नव्हते. अन् रात्री उशीरा यायचे होते. मी सुटकेचा निःश्वास टाकला. अक्षरशः आजचं मरण उद्यावर! जेवण करून मी अंथरुणावर पडलो. गाडीत झोप नीट न लागल्यामुळं आज लवकर झोपावं, असं ठरवलं होतं. मोठ्या माणसांना झोपेची आराधना का करावी लागते? डोक्यात विचारांचं काहूर असेल तर झोप कुठली? लहान मुलं पटकन का झोपतात? त्यांच्या डोक्यात असली विचारांची कसलीच गुंतागुंत नसते. माझ्या मनातल्या गुंतागुंतीमुळं झोप काही नीट लागली नाही.

सकाळी उठून पाहिलं तर काका आलेलेच नव्हते. सगळं आवरून वृत्तपत्रं वाचली. आणि नऊ वाजता कचेरीत आलो. काकांची पत्रं पाहून उत्तरं तयार करू लागलो.

माधवरावांच्या प्रश्नाची कायदेशीर जबाबदारी काही माझ्यावर नव्हती. हा काही नेहमीसारखा करार नव्हता. त्यांच्या व्याधीचा विचार करणं ही काही नोकरीतली अट नव्हती. म्हणजे त्या कामात यश मिळण्या न मिळण्यावर काही अवलंबून नव्हतं. हा विचार मनात डोकावला नि माझी मलाच लाज वाटायला लागली. हाही एक प्रकारचा पळपुटेपणाच नव्हे का? काका सांगतात त्याप्रमाणं कायदेशीर जबाबदारीपेक्षा नैतिक बाबींना जास्त महत्त्व द्यायला नको का आपण?
पण, आपल्याला ह्या बाबतीत करता तरी काय येईल? आपण काही तज्ज्ञ नाही. मनोविज्ञानाचा तर मुळीच गंध नाही. पुस्तकं वाचू शकतो. काही प्रकरणांचा अभ्यास करता येईल. बस्स!

माझ्या मनात आलं माधवराव भोळे आहेत की सज्जन? माझ्यासारख्या अननुभवी नवख्या इसमाला एकदम निजी सचिव बनवणं म्हणजे चेष्टा आहे काय? पण भोळे तर कसं म्हणावं? एवढया पाच पाच कारखान्यांचा व्याप संभाळणारा माणूस भोळा कसा काय असू शकेल? त्यांना माणसाची परीक्षा असणारच. आपल्या सचोटीबद्दल काही तरी विश्वास वाटल्यामुळंच त्यांनी असा निर्णय केला असणार. बस्स! ठरलं. आपण आपल्याकडून त्यांना जितकी मदत करता येईल तितकी करायचीच. त्यात यश येणं न येणं दैवाच्या हाती. पण एक प्रश्न उरतोच. निजी सचिवाचं काम तरी काय असतं? काकांचं काम करतो तसंच असणार बहुधा. पुन्हा काका! त्यांना हे सारं कसं सांगायचं? ते रागावणार नाहीत हे नक्की! पण तो त्यांचा मोठेपणा. आपलं चुकलंच. माधवरावांना एकदम होकार नकोच होता द्यायला.

पण आपण होकार तरी कुठं दिलाय अजून? गाडीतून उतरताना त्यांनीच म्हटलं नाही का आपल्याला? माझ्या म्हणण्याचा विचार करा असं? आपण काय फटक्यात त्यांना नकार कळवू शकतो. बस्स! त्यांना कळवून टाकायचं, हे काही आपल्याला जमण्यासारखं नाही, असं. काकांना असं अर्धवट सोडून पळून जणार नाही मी.

000

‘साहेब!’

दारात एक माणूस उभा होता. ‘आत येऊ?’ नखशिखांत पांढराशुभ्र पोशाख, स्टार्च लावून कडक इस्त्री केलेला. चकचकीत पॉलिश केलेली बटनं, आपलं प्रतिबिंब पाहून घ्यावं असे चकचकीत बूट, अन् खाकेत धरलली टोपी. कोण असावा काही लक्षात येत नव्हतं. इतक्या उंची नि अद्यावत पोशाखातला माणूस आपल्याला साहेब म्हणून संबोधतोय, त्याअर्थी फार मोठ्या दर्जाचा माणूस नसावा. शिवाय कपड्यांचा रुबाब चेहऱ्यावर दिसत नव्हता. स्वरांतली अदब आणि चेहऱ्यावरची नम्रता तो कुणी नोकरचाकर असावा असं सुचवीत होती.

‘या ना. या.’ नोकर असला तरी एकेरी हाक मारायला माझी जीभ धजेना. सभ्यपणानं मी त्याला बसायलाही सुचवलं. ‘बसा,’ मी खुर्चीकडे बोट केलं.
पण खुर्चीत न बसता अन् काहीही न बोलता त्यानं मला सलाम केला आणि एक पाकीट पुढं केलं. उत्कृष्ट कागद आणि नव्यानंच प्रचारात आलेली स्क्रीनप्रिंट छपाई. मी पाठवणाराचं नाव वाचलं. मोहिनी बोर्ले. खाली पत्ता होता. माझ्या नावामागं ‘मा.’ ही उपाधी पाहून मला हसू आलं.

पण, ह्या मोहिनीच्या नावामागं कु. किंवा सौ, काहीच नव्हतं. ‘अरेच्चा! कोण ही मोहिनी? माधवरावांची पत्नी? की मुलगी? आणि माझ्याशी हिचं काय काम? हिनं आपल्याला पत्र का लिहावं? काय असेल पत्रात? कालच तर आपली माधवरावांशी ओळख झाली. एवढ्याशा ओळखीवर हिनं आपल्याला पत्र लिहावं? बरं स्वतः माधवराव मुंबईत.’ माझं डोकं भंजाळलं.

मी पुन्हा पाकिटावरचं नाव वाचलं. नावावरनं कल्पना करू लागलो. आतल्या आत गुदगुल्या होऊ लागल्या. पाकीट न उघडताच मी मान वर करून कडक इस्त्रीवाल्याकडे पाहिलं. त्यानं फक्त कमरेत वाकून स्मित केलं. टेबलावरची कात्री घेतली. म्हटलं हा काही सांगणार नाही. कात्री घेतली खरी. पण इतकं सुंदर अन् महागडं पाकीट कापायचंही जिवावर आलं. पण कापल्याशिवाय ह्या भानगडीचा उलगडा व्हायचा कसा? पाकीट उजेडाकडे धरून मोकळी जागा पाहिली. पाकीट कापून पत्र काढलं.

सादर नमस्कार 

आज संध्याकाळी ६ ते ७ आमच्या घरी योजलेल्या चहाफराळाच्या कार्यक्रमाला आमच्याकडे येण्याची कृपा करावी.
आ.
मोहिनी बोर्ले.

मला काही उलगडा होईना. ही जी कोण मोहिनी आहे, ती माधवरावांपैकीच असावी, हे उघड होतं. पण पत्ता तर वेगळा होता. माधवरावांनी दिलेला पत्ता कँपातला होता. आणि हा सिंहगड रस्त्यावरचा होता. कोण असेल ही? घरच्या चहाच्या कार्यक्रमाला मला बोलवायचं कारण काय? कशी असेल? वय? मला उगीचच हुरहूर वाटायला लागली. मी हरवून गेलो. जरा वेळानं त्या कडक इस्त्रीवाल्यानंच मला जाग आणली.

‘साहेब!’
‘ठीक आहे.’
‘काही उत्तर, साहेब?’
‘काही नाही.’

पु्हा एकदा सलाम करून तो निघून गेला. पण माझं डोकं फिरवून गेला. आधी माधवराव, मग काका. आणि आता ही मोहिनी. आज काही आपलं डोकं ठिकाणावर रहात नाही. ही बोर्ले मंडळी अगदी गळेपडूच दिसताहेत. अक्षरशः काही तासांच्या ओळखीवर आपल्याला निजी सचिव बनवणारे माधवराव काय, की कसलीच ओळख देख नसताना आपल्याला बिनधास्त चहाला बोलावणारी ही मोहिनी काय? छेः! ह्या मोहिनीच्या मोहात पडण्यात अर्थ नाही. बड्या मंडळींच्या भानगडीत धोकाच. अहो, श्रीमंतांच्या लहरी. आज मोठ्या उत्साहानं निजी सचिव बनवतील. अन् उद्या एखादे वेळी अर्धचंद्रही देतील. ह्या मोहिनीच्या लफड्यात तर मुळीच सापडून चालायचं नाही.

म्हणून ते पाकीट आणि पत्र केराच्या टोपलीत टाकू लागलो. पण इतकं सुंदर पत्र आणि पाकीट, अरेच्चा! ह्याला सुवासही आहे, आणि हे केराच्या टोपलीत? अरसिक खरंच आपण.

आपल्याला सुवासिक पत्र पाठवणारी ही मोहिनी कोण असेल? कशी असेल? यापूर्वी कधीही आपला परिचय झाला नसताना हिनं आपल्याला हे निमंत्रण का दिलं असेल? काय आहे, ह्या बोर्ले मंडळींच्या मनात? आपल्याला कोंडीत पकडून काही वेडेवाकडे प्रकार तर करायला लावणार नाहीत?

पाकीट टेबलाच्या खणात टाकलं आणि निश्चय केला, आपण ह्या कार्यक्रमाला जायचं नाऽहीऽ. आणि माधवरावांनाही  सांगायचं की तुमच्या कामात मी तुम्हाला लागेल ती मदत करीन. पण हे निजी सचिवाचं काम नको मला. एक करता एक व्हायचं. आणि काकांच्या इथल्या कामांचा प्रश्न होताच.

‘आपल्याला ह्या मोहिनीसाठी गटवण्याचा बेत तर नसेल? शंकाच नको. बाप रे! नकोच ती भानगड. नाव मोहिनी आणि असायची काळीबेंद्री!’

ह्या निश्चयामुळं मला एकदम सुटल्यासारखं झालं. काकांना दुखवण्यापेक्षा माधवरावांना नाही म्हणणं सोपं. बोर्ले मंडळी काही सरळ दिसत नाहीत.

किती तरी वेळ असल्या उलट सुलट विचारांची गर्दी माझ्या मनात दाटली. आतून काकूंची हाक आली आणि मी तंद्रीतून बाहेर आलो. घड्याळाकडे दृष्टी टाकली.

अरे बापरे साडेअकरा? मी पटकन आत गेलो. मुलं जेवत होती. काहींचं झालं होतं. मी हात धुवून पानावर बसलो. ‘नमस्कार दादा,’ मुलं म्हणाली. मीही हसून नमस्कार केला.

एरवी जेवताना मी मुलांशी गप्पा मारीत असे. तीसुद्धा शाळेतल्या गमतीजमती मला सांगत असत. पण त्या दिवशी माझं लक्ष नव्हतं. जेवणाकडेही लक्ष नव्हतं. च्, कुठल्या मुहूर्तावर माधवरावांची गाठ पडली, असं झालं.

जेवण झाल्यावर सायकल घेऊन मी डेक्कनवर गेलो. मीना लॉजवर सायकल लावली अन् बस थांब्यावर आलो. आणि माझं मलाच हसू आलं. मधला विचार विसरून स्वयंसंमोहित झाल्यासारखा मी विद्यापीठाकडे निघालो. खरं तर माधवरावांच्या भानगडीतच पडू नये आपण, असं वाटू लागलं होतं. मग विद्यापीठात जायचं कारणच काय मला? लक्षात आल्यावर मी परतायचा विचार करू लागलो. पण तेवढ्यात बस लागली. आणि रांगेबरोबर प्रतिक्षिप्त क्रियेनुसार मी बसमध्ये चढलोसुद्धा. समजा नोकरी नाही पत्करली. तरी त्यांचं हे काम करायला काय हरकत? एवढ्या मोठ्या माणसाचं काम करू शकलो, तर पुढंमागं नक्कीच उपयोग होईल.

विद्यापीठाच्या ग्रंथालयात तीनेक तास बसून पुष्कळ पुस्तकं चाळली. माहिती तर खूपच जमा झाली. देजा वू, जामे वू असली प्रकरणंसुद्धा पुष्कळ मिळाली. फ्रॉयट (Freud), युंग (Jung) ह्यांच्या पुस्तकांचाही फडशा पाडला. पण माधवरावांसारखं प्रकरण कुठं मिळे ना. त्यांचं प्रकरण फ्युगऽ प्रकारात मोडण्यासारखं असेल का? खरं तर त्यांनी नामवंत आणि अनुभवी मनोवैज्ञानिकांकडेच जायला हवं. मी काय त्यांना मदत करणार? विद्यापीठातली पुस्तकं वाचून का कुठं असली प्रकरणं सोडवता येतात?

‘डोक्याला मार लागला का?’ असं विचारलं तेव्हा फक्त ‘आठवत नाही,’ इतकंच ते म्हणाले. पण डोक्याला कुठं व्रण आहे का, ते डॉक्टरकडून तपासून घ्यायला हवं.
बसून बसून अंग आंबून गेलं. पुस्तकं सरकवली वह्या खाकोटीला मारल्या आणि बाहेर पडलो.

माधवरावांचा प्रश्न सोडवणं ही आपल्या अखत्यारीतली बाब नाही, एवढा ‘विश्वास’ ह्या तीन तासांच्या अभ्यासानं मला दिला! पण, मग त्यांनाही ह्याची कल्पना असेल तर त्यांनी आपल्याला नोकरीला तरी का ठेवावं? काल ते म्हणाले, ‘माझंही एक काम आहे,’ म्हणजे एक गोष्ट नक्की की स्वतःचं काही तरी काम आहे, म्हणूनच ते आपल्याला इतकी मोठी सन्मानाची नोकरी देऊ करताहेत. नाहीतर एखाद्या नवशिक्याला असली नोकरी कोण देईल?

पण, त्यांनाच का दोष द्यायचा? आपणसुद्धा ते आपल्याला नोकरी देताहेत म्हणूनच ना त्यांना मदत करण्याच्या बाता करतो आहोत? तसंच काही नाही हं. काकांच्या कामात व्यत्यय येऊ नये म्हणून आपण ही नोकरी नाकारायचीही ठरवलं होतंच की! आणि तरीही त्यांचं काम करायची आपली तयारी आहेच. पण, त्याच वेळी ‘त्यांचा आपल्याला पुढं मागं उपयोग होईल,’ असंही आपल्या मनात येऊन गेलंच. त्याचं काय?

ही सदसद्विवेकबुद्धी मोठी फाजील असते. माणसाला कधी सात्त्विक समाधान लाभू देत नाही. खरं तर ‘मी किती सरळ आहे,’ हे मी स्वतःलाच बिनतोड युक्तिवाद करून पटवलं होतं. पण, हिची खोड जायची नाही. नको तिथं अचूक टपकते. पचकतेच म्हणा ना? आणि तिला टाळताही येत नाही. हिच्याशी वाद म्हणजे पराभवाची हमीच!

साडेपाच वाजले घरी यायला. सायकल लावता लावता काकांचा आवाज आला आणि पोटात धस्स झालं. आता खरी परीक्षा आहे. पण परीक्षा कसली? ‘तुमचं काम मला स्वीकारता यायचं नाही,’ असं माधवरावांना कळवायचं आपलं ठरलंच आहे. तरीही मनातल्या मनात, अगदी आतल्याच्या आतल्या कप्प्यात कुठं तरी ‘माधवरावांचा निजी सचिव होण्यात गंमत आहे असं वाटतंच आहे ना?’ पुन्हा सदसद्विवेकबुद्धी! वैताग!

‘तुझा फोन आला होता रे,’ मी आत शिरल्या शिरल्या काकांनी सांगितलं.
‘कुणाचा?’
‘मोहिनी बोर्ले. पार्टीला यायचं लक्षात आहे ना? असं विचारलंय’
‘हं!’ इतकाच उद्गार काढून मी खुर्चीत बसलो.
‘का रे? जायचा विचार नाही वाटतं?’

‘कसली पार्टी काका? ह्या बाईची का मुलीची अन् माझी ओळखदेखील नाहीये. आणि ही मला पार्टीला बोलावतेय. काका, हे सारे बड्यांचे खेळ आहेत. मी काही जाणार नाहीये.’
बाहेरचे कपडे उतरवून लुंगी लावून मी जेवणघरात आलो. तेवढ्यात काकांची हाक ऐकू आली. ‘अरे वसंता, तुझ्याकडे कुणीतरी आलंय पहा.’
कोण असेल? असं वाटून मी बाहेर आलो. नि एकदम दचकलो. तो! सकाळचा कडक इस्त्रीवाला, चकचकीत बटनंवाला!

‘चला, साहेब. बाईसाहेबांनी गाडी पाठवलीय तुम्हाला न्यायला.’
‘गाडी?’
‘होय, साहेब. फार लांब आहे घर’
‘अहो, मी बसनं आलो असतो.’
‘साहेब बस नाहीत फारशा. दिवसांतून दोनच आहेत. तुम्ही कपडे करून चला लवकर. बाईसाहेब वाट पाहताहेत. वाट्टेल ते करून तुम्हाला घेऊन यायला सांगितलंय त्यांनी.’
‘वाट्टेल ते करून?’
‘होय साहेब.’
‘छे, हो. मी कसला येतो? इथं किती कामं पडली आहेत,’ त्याला टाळायचं कसं हा प्रश्न होता.

तोही खमक्या. काही न बोलता गप्प उभा राहिला. जायचं नाव काढीना. आणि तो निघून जाईतो मलाही काही करता येई ना. दोघेही मख्खपणं आपापल्या ठिकाणी गच्च!
खुर्चीत बसलो. नि टेबलावरचा काचेचा गोळा हातानं फिरवू लागलो. ‘एवढी का ही बाई आपल्या पाठीस लागलीय?’ काकांनी तो गोळा माझ्या हातून काढून घेतला. ‘नसेल यायचं एखाद्याच्या मनात तर सोडून द्यावं नि गप्प बसावं.’ मधेच मी त्याच्याकडे पाहिलं. तर तो तोंड भरून हसला.

फोन वाजला. काकांनी घेतला नि मला म्हणाले, ‘तुझाच आहे.’
‘मी वसंत ब्रह्मे.’
‘मी मोहिनी बोर्ले.’ फोनमधून आवाज आला अन् मी कमालीचा दचकलो. कडक इस्त्रीवाल्याकडे पाहिलं. तो पुन्हा हसला. ‘आमचा ड्रायवर आलाय ना तिथं?’
‘अं? हो, हो आलाय ना.’
‘मग लवकर निघा अन् त्याच्या बरोबरच या. मी वाट पाहत्ये,’ असं म्हणून बाईंनी फोन बंद केलासुद्धा!

(क्रमशः )
प्रा. मनोहर रा. राईलकर 
railkar.m@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
फोलकथा 
 
हर्षद सरपोतदार   
५. 
सारे जहाँ से अच्छा ! 
एका गावात एक नाला होता.
गावातली सगळी घाण त्यातून वहात असे.
त्यामुळे त्याचं पाणी काळं, जांभळं दिसायचं.
भयंकर दुर्गंधी यायची.
पण तिथे राहणाऱ्या डुकरांना त्या नाल्याचा फार अभिमान होता.
अशी सुंदर जागा जगात कुठेही नाही असं त्यांना वाटायचं.
पूर्वीच्या पिढीतल्या एका डुकराने त्या नाल्यावर एक कविता रचली होती.
‘सारे जहाँ से अच्छा, ये नाला है हमारा’ अशी ती कविता होती.
ही कविता ती डुकरं मोठ्या अभिमानाने गात असत.
पुढल्या पिढीतील लहान डुकरांनाही ती शिकवत असत.
आणि त्या नाल्यात मनसोक्त बागडत असत.
त्यांचं जीवन असं मजेत चालू होतं.
पण एके दिवशी एक तरुण डुक्कर वाट चुकून दुसऱ्या गावाला पोहोचलं.
तिथून फिरत फिरत काही दिवसांनी ते पुन्हा आपल्या नाल्यापाशी परत आलं.
सर्व डुकरांनी त्याचं मोठ्या प्रेमाने स्वागत केलं.
पण आल्याआल्याच ते तरुण डुक्कर ओरडलं –
“कोण होता तो भोसडीचा कवी ? ‘सारे जहाँ से अच्छा’ लिहिणारा ?”
“अरे असं काय म्हणतोस ? फार प्रतिभाशाली कवी होता तो !” एका ज्येष्ठ डुकराने त्याला जामलं.
“कसला प्रतिभाशाली !
त्याने कधी जग पाहिलं होतं ? तुम्ही तरी पाहिलं आहे ?
मी अनेक नद्या बघितल्या, नाले बघितले,
पण आपल्या नाल्याएवढं घाणेरडं जगात दुसरं काहीही नाही.
खरं तर ‘सारे जहाँसे अच्छा’ ऐवजी ‘सारे जहाँ से गंदा’ असंच आपण म्हटलं पाहिजे. नाहीतर हा नाला साफ तरी केला पाहिजे.”
पण कुणीच त्या तरुण डुकराचं ऐकून घेतलं नाही.
उलट त्याच्यावर नालाद्रोहाचा खटला भरण्यात आला.
आणि ‘सारे जहाँ से अच्छा’ हे गाणं गात ती डुकरं त्या नाल्यात मजेत डुंबत राहिली.
हर्षद सरपोतदार
hsarpotdar1@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

 

संस्कृतप्रेमींकरता नवीन नवीन पदार्थ
 
प्रा. मनोहर रा. राईलकर    
पदार्थ ४६


मागचे दोन पदार्थ, म्हणजे मी केलेले श्लोक एका अर्थानं वात्रटिका होत्या. आता आणखी एक स्वरचित श्लोक मी सांगणार आहेच. तत्पूर्वी, हा श्लोक पाहा,

घृष्टं घृष्टं पुनरपि पुनश्चन्दनं चारुगन्धं
छिन्नं छिन्नं पुनरपि पुनः स्वादु चैवेक्षुकाण्डम्।
दग्धं दग्धं पुनरपि पुनः काञ्चनं कान्तवर्णं
न प्राणान्ते प्रकृतिविकृतिर्जायते चोत्तमानाम्।।

हेही अर्थांतरन्यासाचं उदाहरण होय. शेवटच्या ओळीत काही अनुभजन्य नियम सांगितला आहे. कोणता? महान लोकांचा. प्राण गेला तरी आपली सत्प्रवृत्ती ते सोडीत नाहीत. त्यासाठी पहिल्या तीन चरणांत एकेक उदाहरण दिलं आहे.

(१) चंदनाचा गुणधर्म काय? ते कितीही घासला (घृष्टं) (म्हणजे उगाळला), पुन्हा पुन्हा घासला, तरी त्याचा सुगंध तसाच असतो.
(२) उसाचं कांडं. त्याचे कितीही तुकडे करा. आणखी आणखी करा. त्याची गोडी कमी होत नाही.
(३) सोनं भट्टीत पुन्हा पुन्हा तापवा. ते अधिकच उजळतं. कारण,
(४) कितीही छळ झाला तरी सज्जन आपली नैसर्गिक प्रवृती कधी सोडीत नाहीत.

ह्यातला शेवटचा चरण तसाच ठेवून मी एकनाथ महाराजांचं वर्णन केलं आहे.
ते कधी रागावत नसत. म्हणूनच त्यांना शांतिब्रह्म म्हणत. पण त्यांना राग आणण्याचं काम त्यांचा हेवा करणाऱ्या काही ब्राह्मणांनी एका यवनाला सांगितलं. ही कथा तुम्हाला माहीतच असेल. तीच पुढच्या श्लोकात वर्णिली आहे.

शान्तिब्रह्मा भवतु कुपितश्चिन्तयन्कोप्यविन्धः
स्नानस्यान्ते पुनरपि पुनः ष्ठ्यूतवान्तस्य काये।
नेतुम्भूतोSणुमपि सफलं क्रुद्धतां नैकनाथं
न प्राणान्ते प्रकृतिविकृतिर्जायते चोत्तमानाम्।

कथाच सर्वांना परिचित असल्यानं अर्थ वेगळा सांगायची आवश्यकता नाही, असं समजतो. ष्ठीव् म्हणजे थुंकणे, ष्ठ्यूतवान् म्हणजे थुंकता झाला.

प्रा. मनोहर रा. राईलकर 
railcar.m@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
लक्षणीय 
केशव साठये 
 

मिस्टर अँड मिसेस अय्यर

 


मिस्टर आणि मिसेस अय्यर हा सिनेमा माझा ऑल टाइम फेव्हरेट आहे.

हा सिनेमा तुम्हाला बांधून ठेवतो, कोणतेही मोठे रहस्य,संघर्ष नसूनही तो तुम्हाला जागेवरून हलू देत नाही. शिवाय दृश्यही वेगवान नाहीत. आपल्या ऐटीत निवांत कॅमेरा शतपावली घालतो. अगदी हळुवारपणे कथेला बिलगतो.

हिंदू मुस्लिम दंग्याची पार्श्वभूमी या सिनेमाला आहे. यात कोंकणा सेन(मीनाक्षी ) यांनी हिंदू पारंपारिक तमिळ गृहिणी आणि आणि राहुल बोस(राजा चौधरी) यांनी मुस्लिम युवक वन्यजीव छायाचित्रकार ही भूमिका साकारली आहे.

हिंदूची घरे जाळली म्हणून सुडाने पेटलेला एक गट ही मंडळी प्रवास करतात त्या, बसमध्ये घुसतात. आणि त्यावेळी एरवी मुस्लिम म्हणून त्याचे पाणी नाकारणारी मीनाक्षी त्या म्होरक्याला आपण दोघे मिस्टर आणि मिसेस अय्यर आहे असे सांगते. आणि इथेच आपला सहप्रवासी हा आपला सोबती असतो यावर शिक्का मोर्तब होते. बरोबरच्या माणसाबद्दल एक आपुलकीची सौहार्दाची भावना मनात निर्माण झाल्यानंतर त्याची जात धर्म हे मुद्दे फिझुल वाटू लागतात. एकमेकांना कळत-नकळत मदत केली जाते.

केवळ काही तासाचे सहप्रवासी परस्परांबद्दल आपुलकी आणि माणुसकीचे मनोहारी दर्शन दाखवू शकतात हा या सिनेमाचा मुख्य पैलू आहे.

दोन धर्मातील, जातीतील विद्वेषाला एक सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न हा सिनेमा करतो.
या चित्रपटाचे सब टेक्स्ट पण महत्वाचे आहे.

दंगलग्रस्त परिस्थितीमुळे यांना एका विश्रामगृहावर एकत्र राहावे लागते.

तिथे एक मोठी हत्या पाहिल्यानंतर ती राजाला आपल्या शयनगृहात राहण्याची विनंती करते. इथेही सहअनुभूती हाच संदर्भ आहे, यात कोठेही स्त्री पुरुष म्हणून त्यांच्यात शारीर आकर्षण निर्माण झाले असे कोणतेही संकेत दिग्दर्शक देत नाही. पण तरीही एका भीषण परिस्थितीत एकमेकाना धीर देत, कधी हात हातात घेऊन ,कधी डोक्यावर थोपटून एकत्र घालवलेल्या कडू गोड क्षणांच्या आठवणी मनात साठवत ते आपापल्या वाटेने निघून जातात. सहवास आणि स्पर्श यांचे आपल्या जीवनातील अमुल्य स्थान अधोरेखित करत हा मिस्टर आणि मिसेस अय्यर सिनेमा मग आपल्याला माणूस म्हणूनच माणसाकडे पाहण्याची आपली प्रेरणा सशक्त करत पुन्हा पुन्हा आठवत राहतो.

केशव साठये 
keshavsathaye@gmail.com

वंदनीय व्यक्तिमत्त्व

सौ. स्वाती वर्तक 

भाग २
 

कै. विनायक सीताराम सरवटे

एकदा वकिली सोडल्यावर तात्यांना जणू त्यांच्या ध्येयाने झपाटले. लोकमानस जागृत करण्याचा व समाजातील तरुणांचा संग्रह करण्याचा त्यांचा शुद्ध हेतू होता. त्यासाठी अनेक चळवळी केल्या. चळवळींचे रूप बदलले पण तळाशी सर्वदा एकच उद्देश्य..तरुणांना एकत्र आणून त्यांच्यात स्वाभिमान वाढविणे.

त्यासाठी त्यांनी सहकारी मंडळ, ज्ञान प्रसारक मंडळ, अहिल्योत्सव, मल्हारराव बाजीराव उत्सव, दत्त समाज, गणेशोत्सव, प्रजा परिषद, महाराष्ट्र ब्राह्मण सभा अशा अनेक संस्था स्थापन केल्या, कैक उपक्रम राबविले.

संमेलनं भरवून, भाषणे देऊन ते लोकांना सांगत की संमेलनं हे राजद्रोहाचे कृत्य नाही. राज्याची व लोकांची सर्व दिशांनी उन्नती व्हावी, त्यांना आपल्या मतांचा व विचारांचा प्रसार करण्यास स्वातंत्र्य मिळावे, स्वाभिमान, राज्याविषयी अभिमान व प्रेम वाढावे  एवढाच माझा हेतू आहे.

स्वदेशाभिमान वाढविण्यास निःशुल्क वाचनालय चालविणे, लाठीकाठीचे वर्ग, स्वयंसेवकांसाठी शिस्त लावण्यात समर्थ रामदासांचा दासबोध आणि स्काऊट मॅन्युअल वाचण्यास सांगणे, नुक्ता बिल करणे, हुंडा बंद करण्यासाठी ऍक्ट करणे, ब्राह्मणांनी उद्योगधंदे काढावे, त्यासाठी निधी गोळा करावा असे असंख्य उपक्रम त्यांनी राबविले.

त्यांच्या चातुर्याने त्यांनी किती वेळा आपल्या सभा यशस्वीपणे सुरू ठेवल्या आणि विरोधकांचे डाव उधळून लावले, याचे मजेशीर किस्से आपल्याला ऐकायला, वाचायला मिळतात. इंदूरला गोखले यांचा सन्मान करीत असताना मौलवी अब्दुल गनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह तेथे आले पण तात्यांनी त्या सर्वांना हिकमतीने तेथून काढले. मराठी मजकुरासाठी “मल्हारी मार्तंड विजय“  या पेपरात किमान १६ पृष्ठे मिळावी यासाठी शक्कल लढविली;  त्यामुळे सरवटे हे नाव सर्वतोमुखी झाले होते.१९३० – ३१ च्या सुमारास विदेशी कापडाची होळी, स्वदेशीचा पुरस्कार, दुकानासमोर ३ ते ४ तास उभे राहणे, धरणे देणे या कामात ते अग्रेसर होते.

इंदूरला डॉ हेडगेवार यांचे काका आजारी असल्याने ते आले होते .तेव्हा त्यांची तात्यांशी ओळख वाढली. दोघांचे ध्येय मिळते जुळते. त्यामुळे सूर जुळले आणि डॉ हेडगेवारांनी इंदूरलाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करण्यासाठी एक शाखा उघडावी असा मनोदय व्यक्त केला, त्यावेळी तात्यांनी स्पष्टपणे सांगितले की संघाची देवता हनुमान आहे त्यांच्यासमोर कार्यकर्त्याला प्रामाणिकपणा, व निष्ठाशपथ घ्यावी लागते ती मला अडचण वाटते. कारण मला असा हिंदू निर्माण करावयाचा आहे जो तेजस्वी व निर्भय असेल जे काही करेल  ते भारतासाठी. देशासाठी झटावे, त्यासाठी जगावे आणि फक्त त्याचसाठी मरावे असा आशय असणारा हिंदू. हेडगेवार स्वतः देशप्रेमीच होते त्यांना हा विचार पटला व संघाला देवता ठेवू नये हा विचार नक्की झाला. तात्या संघचालक झाले. तात्यांनी हे वेळोवेळी स्पष्ट केले होते की मी काँग्रेसमध्ये आहे, स्वातंत्र्यप्राप्ती हे मुख्य ध्येय आहे पण तरीही पुढे काही वाद झालेत. संघातील श्री करंदीकर यांचे म्हणणे….मुसलमान हे आमचे शत्रू आहेत, त्यांना हांकलून  लावले पाहिजे व इतर अंतर्वर्ती मंडळात होणाऱ्या काही गोष्टींमुळे तात्यांचे वैचारिक मतभेद होऊ लागले आणि त्यांनी रा स्व संघ सोडण्याचा निर्णय घेतला. बऱ्याच वर्षांनंतर तात्यांनाही असे वाटले की त्यांनी काही गोष्टी सुस्पष्ट केल्या असत्या, करंदीकर यांना विचारले असते की हे संघाचे ध्येय आहे का? तर बहुधा चित्र वेगळे झाले असते .

तात्यांची साहित्य सेवा बघावी तर आनंद होतो. त्यांनी भरपूर लिखाण केले. काही पुस्तके गाजलीत. जसे ..आई बापास चार शब्द, सामाजिक वाद (नेहरू पुरस्कार प्राप्त ) बोल्शेविज्म (हिंदी ) लोकमान्य तिलक चरित्र (हिंदी ), मराठी साहित्य समालोचन . खंड १ ते ४ यावेळेस त्यांच्या पुण्या मुंबईकडील असंख्य कवी लेखकांशी ओळखी झाल्या. या ग्रंथात समग्र मराठी साहित्याचे मार्मिक रसग्रहण वाचावयास मिळते. एक बृहदग्रंथ म्हणून त्याची विचारणा करण्यात येते.

१९३८ साली मुंबईत बॅ. जयकर स्वागताध्यक्ष आणि बॅ. सावरकर अध्यक्ष असताना तात्या मुंबईला आले .अखिल भारत हिंदी संपादक संमेलनही इंदूरला भरवले
१९४४ साली पुण्याप्रमाणेच इंदूरलाही राष्ट्र सेवा दलाची उभारणी ही तात्यांनी केली.
१९४६ मध्ये काँग्रेसच्या आदेशानुसार महाराजा होळकरांना ब्रिटिश साम्राज्याशी संबंध विच्छेद करण्याचे अलटीमेटम समक्ष देण्यासाठी त्यांनी विशाल मोर्चा काढला. त्याचे नेतृत्व करून थेट माणिकबाग पॅलेसवर धडकले.

तात्यांची शैक्षणिक सेवा अजूनही इंदूर येथे नावाजली जाते.
त्यांच्या लेकीने  पूर्व प्राथमिक शाळा सुरू केली. बाल निकेतन संघ नावाने ती अजूनही कार्यरत आहे.


त्या काळात म्हणजे 1945 च्या सुमारास त्यांची मोठी कन्या शांताताई यांनी कराचीस जाऊन मोंन्टेसरीचा कोर्स केला होता. तेथे तात्या गेले. तेथे डॉ मोंन्टेसरीची व्याख्याने इटालियन भाषेत होत. त्यांचा पुतण्या ती इंग्रजीत भाषांतरीत करीत असे.
तेथून परतल्यावर तात्यांच्या बाल निकेतनने श्रीमती ताराबाई मोडक यांच्या नूतन बाल शिक्षण संघाच्या विद्यमाने बाल शिक्षा परिषद भरविली ज्याचे उद्घाटक हिंदुस्तान सरकारचे तत्कालीन शिक्षणमंत्री श्री राजगोपालाचारी होते आणि अध्यक्षा अहमदाबादच्या सौ सरलादेवी साराभाई. इतरही थोर बाल शिक्षातज्ञ असल्याने बालशिक्षणाचा खूप प्रचार झाला.

बाल निकेतनची विधिवत स्थापना १९४७ साली झाली आणि त्यासाठी कोनशिला बसविण्यास डॉ. राजेंद्रप्रसाद आले होते. तात्या त्यावेळी असेंम्बलीचे सभासद आणि डॉ राजेंद्रप्रसाद अध्यक्ष असल्याने दोघांचे परस्पर चांगले संबंध होते.१९४७ च्या वेळेस दीड वर्षे त्यांनी शिक्षणमंत्री पदावर कार्य केले. इंदूर विश्वविद्यालयाच्या स्थापनेसाठी ऍक्ट व प्रयत्न केला.१९४८ मध्ये तात्या पार्लमेंटचे सदस्य झाले. १९५० मध्ये घटना अस्तित्वात आली. घटनेचा आराखडा बांधण्यात, तो लिहिण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यामुळे डॉ आंबेडकर यांच्याशी चर्चा होत असे. ज्येष्ठ सभासद म्हणून घटनेच्या अधिकृत प्रतीवर तात्यांची सही घेऊन त्यांना गौरविण्यात आले. पं नेहरू आणि सरदार पटेल यांनी आनंद व्यक्त केला.

श्री राजाजी नेहमी आपल्या चीफ व्हीप श्री सिन्हा यांना सांगत की मी कोणत्याही कमिटीत असलो तरी माझ्यासह सदैव श्री सरवटे यांना ठेवत जा. यावरून आपल्याला तात्यांच्या गुणांची साक्ष मिळते. हे नक्की.

तात्यांचे अनेक सन्मान झाले. मोठमोठ्या रकमेची बक्षिसे किंवा देणग्या मिळाल्या पण त्या त्यांनी सामाजिक कार्यात किंवा बाल निकेतनच्या विकासासाठी वाटून टाकल्या.. वयाची पंचाहत्तरी झाली तेव्हा त्यांचा ( ४ वर्ष पूर्ण झाल्यावर ) १९६३ मध्ये अमृत महोत्सव करण्यात आला. भारताचे उपराष्ट्रपती डॉ झाकिर हुसेन हे त्या कार्यक्रमात हजर होते. त्या काळी त्यांना रोख २१,००० रुपये आणि मानपत्र देण्यात आले.

१९६६ च्या २६ जानेवारीला राष्ट्रपतींनी तात्यांना “ पद्मभूषण “ ही उपाधी दिल्याचे प्रसिद्ध झाले. तो सोहळा २२ एप्रिल १९६६ रोजी राष्ट्रपती भवनात थाटामाटात साजरा झाला.

त्यानंतर इंदूरमध्ये त्यांचा जागोजागी अनेक संस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. त्यात विशेष म्हणजे मध्य प्रदेशचे शिक्षणमंत्री नरसिंगराव यांनी गौरव केला आणि त्यावेळेस तात्यांच्या बाल निकेतनचा विकास करीन अनुदान मिळवून देईन या आश्वासनांचा .तात्या कोणा कोणाच्या सान्निध्यात आलेत ,त्यांनी कसे इतर श्रेष्ठ व्यक्तिंसह कार्य केले. याची यादी करण्यात काही अर्थ नाही कारण ती “  वाढता वाढता वाढे “ सारखी वाढत जाणार. काही मोजकी नावे घ्यायची झालीत तर…महात्मा गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल, चक्रवर्ती राजगोपालाचार्य, श्री,लाल बहादुर शास्त्री, डॉ राजेंद्रप्रसाद, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. भीमराव आंबेडकर, डॉ. चिं. द्वा. देशमुख, मौलाना अबुल कलाम, सौ.विजयालक्ष्मी  पंडित, श्री गाडगीळ, विनोबाजी, श्री धोंडो केशव कर्वे, डॉ सी वि रमण आणि अनेक.

 

असे हे थोर विभूति, ज्यांच्या सामाजिक कार्याचा, राजकारणाचा  इतका प्रचंड आवाका होता . की ते सर्व २-३ भागात सांगणे म्हणजे घागरीत रत्नाकर भरणे आहे.[ पुढच्या आणि शेवटच्या भागात बघू या त्यांचा मूळ स्वभाव, घरातील शिस्त  व नातेवाईकांचे संबंध ]

[ भाग २ संपूर्ण]

– सौ.स्वाती वर्तक
खार (प), मुंबई ४०० ०५२

swati.k.vartak@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आजची कविता 

काय मी मागू?
 

येतोस तू गणेशा, चैतन्य घेऊनी संगे |
स्थापना जिथेही होई, मांगल्यची तेथे रंगे || १.

ज्ञानेशे नमिले तुजला, ॐ काररूपे साकार |
तंव कृपा ज्यावरी होई, त्या भवसागर हो पार || २.

रात्र नि दिवस हे नित्य, कुरतडती जीवन काल |
उंदीर चरणीचा सांगे, ओळख या क्षणीचे मोल || ३.

हा भवतीचा आभास, जणु इंद्रधनू आभाळी |
मम मूर्तीसम बुडणार, नच गुंतू मायाजाली || ४.

जागृती नि स्वप्न सुषुप्ती, यांच्याही पैल तू असशी |
तुर्येची आठवण होण्या, तू चतुर्थीसची येशी || ५.

तुज म्हणती मंगलमूर्ती, हृदयात नित्य तू वसशी |
भद्र ते नित्य कल्याण, त्या मासी पद भूमीसी || ६.

दुष्टास वक्र तंव शुण्ड, सज्जना सरळ ती नित्य |
अंकुश नि पाश करात, सुचवितीच सर्व अनित्य || ७.

विद्येचा स्वामी तूची, मांगल्य वसो नित हृदयी |
कैवल्य मार्ग तो दावी, मी कोण ज्ञान हे देई || ८.

जीवनी बुद्धी दे ऐशी, निर्विघ्न मार्ग तो व्हावा |
वास्तूत तू जिथे वसशी, कणकण आनंदे न्हावा || ९.

ज्यावरी दृष्टी तंव जाई, मांगल्य तये चिंतावे |
हितकरचि कर्मे व्हावी, दोष ते मनीचे जावे || १०.

गूळ नि खोबरे खाता, गोडी नि स्नेह वाढावा |
दुर्वांकुर विनया शिकवो, मोदके मोद तो व्हावा || ११.

प्रत्येक कृतीतुनि आमुच्या, वर्धिष्णु व्हावे प्रेम |
हृदयात वसे तू देवा, वाणीत वसू दे हेम || १२.

तू विश्वंभर साक्षात, जगताचा मूलाधार |
वाणीचा उद्गाता तू, तुज अंत नसे नि पार || १३.

शब्दांनी तुजला कैसे, श्री मूर्ती तुजसी स्तवावे |
वाणीच्या पैल असे तू, आदरा कसे व्यक्तावे || १४.

म्हणुनी मी राहुनि मौन, ॐ कारा स्मरूनी नमितो |
सावधान राहु दे नित्य, काळोख कधी ना मनी तो || १५.

तू आत्मरूपचि असता, तुजलाचि काय मी मागू |
करविता नि कर्ता तूची, गाऱ्हाणे कैसे सांगू || १६.

हितकर ते काय आम्हासी, अंतरी बसोनी सांगे |
निष्काम करुनिया कर्मे, पूजनी तुझ्या मी रंगे || १७.

उत्थापन तुझिये करता, साकार रूप ते जाई |
देवा तू हृदयी नित्य, विस्मरणा नच ते होई || १८.
संकटी पाव तू देवा, निर्वाणी आठव करवी |
जे दिधले जीवन मजला, माधुर्ये कणकण भरवी || १९.

लेकरे तुझीची आम्ही, वर्तनी दिव्यता यावी |
परतुनी तुजकडे येता, ना मनात खंत रहावी || २०.

एकवीस अर्पीतो चरणी, ये कवीस साह्य कराया |
हे तुझे अर्पितो तुजला, भावासी व्यक्त कराया || २१.

– मधुकर सोनवणे (अण्णा)

               msonavane@hotmail.com
श्री मंगल चतुर्थी २०१९.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
नवीन मुखपृष्ठ : ट्रिंगलवाडी पदभ्रमण [] – विजय गोडे 
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
लक्षणीय 
मेघा कुलकर्णी 
 

‘जिथं सारं काही भरपूर, ते आपलं कोल्हापूर’

या एका वाक्यातच शहराच्या संस्कृतीचे दर्शन घडते. पण या पावसाळ्यात मात्र पूरातले कोल्हापूर पहाणेची वेळ आली. नुकताच येऊन गेलेला महापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला त्याचा बसलेला तडाखा, लिहिताना शब्दसामर्थ्यही अपुरे पडावे आणि भावना व्यक्तही न करता याव्यात अशी परिस्थिती निर्माण झाली. महिनाभर क्षणाचीही उसंत न घेता मुसळधार पाऊस कोसळत होता. नद्या, धरणे यांनी पहाता पहाता धोक्याची पातळी गाठली. ६ आणि ७ ऑगष्ट २०१९ पासून तर नदीकाठच्या अनेक वसाहती, गल्ल्या यांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला. कोल्हापूर शहराला बेटाचे रूप प्राप्त झाले. या सगळ्यात प्रथमच पुणे-बंगलोर महामार्गावरही पाणी काही फूटांवरून वाहू लागले. लहान गावांचा संपर्क तुटला. महामार्गच बंद झाल्याने कोल्हापूरला बाहेरून मदतकार्य मिळण्याची शक्यताच उरली नाही. त्यामुळेच पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे काम कोल्हापूरातील अनेक संघटनांनी व त्यांच्या कार्यकर्त्यानी त्वरीत सुरू केले. परिस्थितीचे भान ठेवून कोल्हापूरकरच आपल्या माणसांसाठी उभा राहिला. मदतकार्याला वेग आला.

शहरांतील काही भागातील वीज व्यवस्था कोलमडली पण वीज कर्मचारी आणि नागरिक यांच्यात कधीच नाराजीचे सूर उमटले नाहीत. विजेचे खांबच निम्म्याच्या वर पाण्यात, तरीही विद्युतप्रवाह लवकरात लवकर कसा सुरू होईल याचे प्रयत्न सुरू होते. तसेच शहरातल्या प्रतिष्ठित व्यक्तींनीही या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन पूरग्रस्तांसाठी अन्न, पाणी, निवारा यांची तातडीने व्यवस्था केली. दूध संकलन, भाजीपाला यांची वितरण व्यवस्था डळमळीत झाली. जसे पूराचे पाणी वाढत राहिले तसतसे शहराला पाणीपुरवठा करणारे पंपिंग स्टेशनही पुराच्या पाण्यांत अडकले. कधी नव्हे तो शहरात पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला. सर्व व्यवहार बंद होऊन सगळे शहर सामसूम झाले, पाऊसच फक्त काय तो अजूनही चालू होता. आता पेट्रोल, डिझेलची कमतरताही भासू लागली. कोसळत्या पावसात नेहमी रस्त्यावर धावणारी रिक्षा सहजासहजी मिळेना. अगदी कुठेतरी एखादी दिसली तरी प्रवाशांना आनंद होत होता. बाकी शहरांत पाणीबाणी.

स्वत:चे व्यावसायिक नुकसान होऊनही प्रत्येक जण दुसऱ्याला धीर देण्याचा प्रयत्न करत होता. जमेल तसे सहकार्य करत होता. आत्मियता, माणुसकी तर इथल्या मातीच्या कणाकणात भरलेली आहे. याच गोष्टींचा अशा नैसर्गिक आपत्तीत प्रचंड प्रमाणात उपयोग झाला. राजघराणे प्रजेसोबत ठामपणे उभे राहिले, आजही राजर्षी शाहूमहाराज यांच्या विचारांचा सन्मान इथे कृतीतून आणि आचरणातून होतो. सामाजिक ऐक्य साधत १२ ऑगष्ट २०१९ ला आलेला बकरी ईद हा सण साजरा केला गेला नाही. अशातच अर्ध्या वाटेवर अडकलेले प्रवासी बसस्थानकावरच थांबून राहिलेले पहायला मिळाले. महामार्गावरील ट्रकड्रायव्हर यांना सहाय्य केले गेले, या आपुलकीचे त्यांनाही समाधान लाभले. त्यांच्या मतानुसार अनेक ठिकाणी अशा नैसर्गिक आपत्तीत प्रचंड उपासमार होते. पण कोल्हापूरात समस्यांनी मर्यादा ओलांडूनही हसतमुखाने भोजन वितरण व्यवस्था झाली.

निसर्गाच्या महारौद्रापुढे अनेकांना डोळ्यादेखत संसार टाकून मदत मिळेल तिथे जाऊन राहावे लागले. शहरातील मठांमध्ये, मंदिरात, मशीदीत लोकांना आसरा मिळाला. उध्वस्त, उद्वीग्न अवस्थेतील पूरग्रस्तांना भेटताना मन भरून आले, भावना डोळ्यात दाटल्या. मनकल्लोळ काही केल्या शांत होईना. काल-परवापर्यंत सुखी कौटुंबिक जीवन जगणारी ही माणसे विस्कळीत झाली. सांत्वन करणार तरी कसे? चांगल्या परिस्थितीत रहाणारे हे लोक मिळेल ती मदत घेऊ लागले. या अडचणीच्या प्रसंगी काही ठिकाणी तर पटकन हातही पुढे करत नव्हते. अशा वेळी खूप मोठा दिलासा दिला तो एन.डी.आर.एफ. ( National Disaster Response Force) आणि व्हाईट आर्मीच्या जवानांनी. त्यांचा आविर्भाव पहाता पुढील शब्द क्षणांत आठवले. “कंधो से मिलते है कंधे, कदमों से कदम मिलते है|” म्हणत परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत त्यांचे कार्य सुरूच राहिले. कोल्हापूरकर त्यांचे सदैव ऋणी असतील.

कोल्हापूरातील अनेक छोटे-मोठे व्यवसाय या महापूरामुळे अक्षरशः कोलमडून गेले. सांगली शहरातही पूरपरिस्थिती अत्यंत गंभीर होती. यंत्रनगरी इचलकरंजीतही पूराचेच साम्राज्य पसरले होते. अनेक व्यावसायिकांची यंत्रसामग्री आणि संसारही पाण्याखाली गेले. सर्व समस्येचा विचार करताच हे सगळे नव्याने उभे करणे या लोकांसाठी खूप कठीण काम आहे हेच लक्षात येते. लहान लहान घरांची पडझड खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे. रस्ते खचले आहेत. हळूहळू पूरपरिस्थिती ओसरत होती तेव्हा परत एक-दोन दिवस पावसाचा जोर परत वाढला होता त्यामुळे थोडी भयावह परिस्थिती निर्माण झाली. अनेक सामाजिक संस्थांचे आजही मदतकार्य आघाडीवर चालू आहे. महामार्ग मोकळा झाला, तशी बाहेरून मदत मिळू लागली. पण संकटाच्या याही दिवसात इथला माणूस खचला नाही. परिस्थिती सुधारते आहे हे लक्षात येताच लोक आपापल्या घरी परतू लागले आहेत. घरातले सामान जिथल्या तिथे टाकून जावे लागले, आज त्याच ठिकाणी गाळ, चिखल यांचे थर साचले आहेत. तरीही घरांची, परिसराची स्वच्छतामोहिम सुरू आहे.

ऑगष्ट २०१९ या महिन्यांत अशा अनाहूतपणे आलेल्या नैसर्गिक आपत्तीला कोल्हापूरकरांनी एकमेकांना केलेले सहकार्य अविस्मरणीय आहे. आज मदतीचा ओघ सर्व ठिकाणांहून त्या लोकांकडून सुरू आहे ज्यांना कोल्हापूरबद्दल अत्यंत जिव्हाळा आहे. मदतकार्य खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचावी ही तळमळ इथल्या संघटना आणि कार्यकर्त्यांची आहे. शिवाजी विद्यापीठाने केलेल्या जलक्रांतीचा उपयोग या अडचणीच्या काळात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवत एक वेगळाच आदर्श निर्माण केला. जनतेला असलेला राजघराण्याचा पाठिंबा यातून माणुसकीचे नातेच दिसून आले. अनेकांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेले हे शहर समृद्धीचे, संपन्नतेचे प्रतिक आहे. या आलेल्या आपत्तीतून सावरत भविष्याकडे मार्गक्रमण करणे जरी आव्हानात्मक असले तरी माझे कर्तव्यतत्पर कोल्हापूरकर नव्या जोमाने उभे राहतील असा विश्वास आहे.

@
( छायाचित्रे : “आम्ही कोल्हापुरी” या सोशल ग्रुपकडून साभार )
– मेघा कुलकर्णी
megha.kolatkar21@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आपल्या शरीरातला  कोणता अवयव सर्वात महत्वाचा बरे ?बालकुमारांचे पान 

परमेश्वराने जेव्हा मानवाची निर्मिती केली, तेव्हा त्याने त्याच्या शरीराचे सारे अवयव काळजीपूर्वक बनवले – माणसाचे डोके, डोळे, कान, नाक, तोंड, घसा, पाय, हात, हृदय, पोट, जीभ आणि इतर सारे काही. त्यानंतर देवाने सर्व अवयवांना त्यांनी कोणकोणते काम करायचे ते सांगितले.

पायांनी जमिनीवर घट्ट उभे राहायचे, हातांचे काम, त्यांनी स्पर्श करणे व काही धरणे, नाकाचे काम श्वास घेणे, डोळ्यांचे, सर्वत्र पाहाणे, तोंडाचे काम जे तोंडात पडेल ते  खाणे, चघळणे, आणि घशाने ते गिळणे, हृदयाचे काम, रक्त शरीराच्या इतर सर्व भागांना पोचवणे, जिभेचे काम चव घेणे व बोलणे. आणि सारे अन्न जे शरीरात येते त्याची सर्वतोपरी काळजी घेणे हे काम पोटावर आले आणि सर्व अवयवांचा राजा म्हणून पोटाला निवडण्यात आले.

शरीराचे सर्व अवयव आपापले काम चोख करू लागले आणि त्याबाबतीत ते समाधानी होते. परंतु काही काळानंतर त्यांच्यात एकमेकांविषयी तक्रारी सुरू झाल्या.

घसा पहिला आला. तो म्हणाला, ” हातांनो, तुम्ही सारे अन्न माझ्यात जे घालता, ते एक सेकंदही तेथे राहात नाही. पोट सारे गिळून टाकते आणि स्वतःसाठी ठेवते. मला असं वाटतं, की आपल्याला असा राजा पाहिजे, की जो सर्वांशी सारखा व्यवहार करेल. “

दातांनी याला मान्यता दिली. ” आम्ही अन्न चावतो, पोट ते सारे घेते. असा स्वार्थी राजा आम्हाला नकोय.”
” अहो, पण निदान तुम्ही अन्नाला स्पर्श तरी करता, ” डोळे म्हणाले. ” आम्हाला ते सारे पाहण्यापलीकडे काय काम असते ?”

पायांनी आपले म्हणणे मांडले. ” तुम्ही किमान पक्षी अन्न पाहात असता. आम्ही काय करतो ? सारखे चालत असतो. त्या अन्नाला कधीच स्पर्श करत नाही. त्याची साधी कसली चव आहे, याची कधी माहिती तरी आम्हाला आहे काय ?”

या वादात सारे अवयव एका मुद्द्यावर आले, की त्यांना कोणीतरी नवीन राजा पाहिजे, की जो सर्वांना सारखे वागवील. त्यानी सर्वान्न्नी देवाकडे जाण्याचा निर्णय घेतला.
” देवा, आम्हाला नवा राजा हवाय.  पोट राजा हा अधाशी आहे. तो केवळ आपली स्वतःचीच काळजी घेतो. आमचा मुळी विचारच करत नाही.”

हे ऐकून देव बुचकळ्यात पडला. त्याने थोडा वेळ विचार केला. शेवटी त्याला एक तोडगा सुचला. ” बाळांनो, तुम्ही असं करा, सर्वांनी मिळून एक सभा भरावा आणि त्यात ठरवा, की तुम्हाला कोण राजा पाहिजे  तो. परंतु त्या सभेच्यापूर्वी आणि सभेनंतर  दोन दिवसपर्यंत मी परत येईपर्यंत तुम्ही काहीही खायचं नाही बरं.  मग मला तुम्ही सांगायचं, की तुम्हाला कोण नवा राजा पाहिजे तो. “

सा-या अवयवांनी विचार केला, की हा तोडगा चांगला आहे. ” आम्ही पोट राजाला दाखवून देऊ, की त्याचं आमच्याशिवाय चालायचं नाही. आम्ही त्याच्या पर्यंत अन्न पोचूच देणार नाही. मग त्याला समजेल, की राजा होणे म्हणजे गंमत नाहीये.”

त्यांनी कोण नवीन राजा झाला पाहिजे, यावर चर्चा करायला सुरुवात केली. त्याची चर्चा चालू राहिली, वाद काही केल्या संपेना. निर्णय होईना. सकाळ पासून जी चर्चा सुरू झाली, ती रात्र व्हायला आली, तरी संपत नव्हती.

दुस-या दिवशीची सकाळ उजाडली. देव लवकरच येणार होता आणि कोण नवा राजा वावा, यावर एकमत होत नव्हते. निर्णय होत नव्हता. आणि सा-या अवयवांना भूक लागली होती.

” डाव्या डोळ्या, तू हो राजा, ” सुकलेल्या तोंडातून कसेबसे शब्द आले.
डावा डोळा म्हणाला, ” पण आज सकाळी मला नीटसं दिसत नाहीये. राजा अशा दुबळ्या डोळ्यांचा नसावा. डाव्या पाया, तू का होत नाहीस, आमचा राजा ?”
डावा पाय म्हणाला, ” मला इतकी भूक लागली आहे, की मला नीट उभं राहता येत नाहीये. मी कसा होणार तुमचा राजा ?”
शरीराचे सारे अवयव भुकेने इतके हैराण झाले होते की त्यांना आता राजा होणे हे कल्पनाच नकोशी झाली होती.
तोंड म्हणाले, ” मला वाटतं, की पोटाला तूर्त राजा राहू द्यावं.”
प्रत्येकाला हा विचार पसंत पडला.

तेवढ्यात देव अवतरला. ” बाळांनो, झाला की नाही तुमचा निर्णय कोण नवा राजा झाला पाहिजे तो ?”
सर्व अवयवांनी मग देवाला सांगितले, ” आम्हाला नवा राजा नकोय. शरीराला मिळालेल्या अन्नाचे पोट समसमान वाटे करते आणि प्रत्येक अवयवाला आपापलं काम करण्या पुरतं अन्न पुरवतं, की नाही, हे आता आम्ही जातीने पाहू.”

मग देवाने हातांना पोटासाठी एक सत्व बनवायला सांगितले. ते सत्व तयार झाले. हातांनी ते सत्व तोंडाला भरवले. ते घशातून शरीरात खाली खाली पोटात गेले आणि पोटाने ते सत्व इतर अवयवांना सारखे वाटले.
हळू हळू डोळ्यांना सुस्पष्ट दिसू लागले. पाय हळू हळू नीट उभे राहू लागले. तोंडाला नेहमीची चव आली. त्यातून आवाज येऊ लागला. सर्व अवयवांना आता पूर्ववत वाटू लागले आणि ते आपापली कामे करण्यास सज्ज झाले. आता त्यांची तक्रार उरली नाही.

तथापि एका अवयवाला मात्र हे पसंत पडले नव्हते. पोटाने राजा व्हावे, याला या अवयवाची ना नव्हती. त्याला आपल्याला योग्य असा मान, महत्व इतर सर्व अवयवांनी दिला पाहिजे, असे वाटत होते. त्याने थोडे वाट पाहाण्याचे ठरवले. एक ना एक दिवस असा येईल, की त्याला आपले महत्व सिद्ध करण्याची वेळ मिळेल.

आणि तो दिवस आला. देशाची राजकन्या माकी गंभीररित्या आजारी पडली. राजा आणि राणी यांचे ते एकुलते अपत्य होते. राज्याचा जणू ती वारस होती.

राजकन्या एका अशा दुर्धर आजाराने अंथरुणाला खिळली होती, की त्या दुखण्यावर कसलाही उपाय मिळत नव्हता. राजवैद्यांनी तिच्या शरीराची कसून पाहाणी केली. आपली सारी पुस्तके चाळली. एकमेकात त्यांचे खूप बोलणे झाले.

अखेरीस त्यांना असे कळून चुकले की राजकन्येचा जीव वाचवण्याचा फक्त एक उपाय आहे.
मुख्य राजवैद्य राजाकडे आला आणि म्हणाला, “महाराज, या जगात एकच असा उपाय आहे की ज्यामुळे आपल्या राजकन्येचा प्राण वाचू शकेल. परंतु ती गोष्ट मिळणे अतिशय कठीण आहे. ”
” कोणती अशी गोष्ट आहे की ती मिळणे अशक्य वाटतं तुम्हाला ?” राणीने प्रश्न केला.
” ते आहे, सिंहीणीचं दूध. ”
” काय  सिंहीणीचं दूध ? ” राजा म्हणाला. ” ते तर अशक्यप्राय आहे. ”
” तेच तर म्हणतो आम्ही, ” सारे वैद्य म्हणाले.

” पण राजकन्या माकी आमची एकुलती एक आहे. ” राणी म्हणाली. ” तिचं काही बरं वाईट झालं, तर आमच्या नंतर या राज्याच्या जनतेचा वाली कोण राहील ? आपल्या शत्रूंना मग आयतं राज्य हाती मिळेल.”
काय करावे ? राजाने हुकूम दिला. ” जो कोणी सिंहीणीचं दूध आणून राजकन्येला देईल, त्याला मी माझं अर्धं राज्य देईन.”

सबंध राज्यात दवंडी पिटली गेली. प्रत्येकाला वाटले की  आपल्याला अर्धे राज्य मिळाले तर किती बरे होईल. परंतु सिंहीणीचे  दूध आणण्याची कुणाचीच हिम्मत होत नव्हती. सर्व नागरिकांना याची खंत वाटत होती की आता राज्यकन्येचा मृत्यू चुकवता येत नाही.

तथापि, दूर दुर्गम अशा डोंगराळ प्रदेशात क्वामे नावाचा एक धाडशी तरुण होता. त्याच्या कानावर ही दवंडी आली. त्याने  काहीही करून हे काम करायचेच असा मनाशी निर्धार केला. त्याच्या मनात आले, की आपण कदाचित या कामात जर यशस्वी झालो, तर अर्धे राज्य मिळेल आणि राज्यकन्येचा जीव वाचेल.

क्वामेने आपल्या प्रदेशात सिंह वसती असलेल्या गुहांचा शोध घेतला. शोधता शोधता त्याला आढळून आले की एका गुहेत एका सिंहिणीने नुकतेच एका पिलाला जन्म दिला आहे. परंतु तिचे दूध तो कसे काय मिळवणार होता ? जर तो त्या गुहेच्या आसपास नुसता फिरकला असता, तरी सिंहिणीला भीती वाटून तिने त्याच्यावर हल्ला केला असता आणि त्याला ठार केले असते.

क्वामेच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याने एक बकरा मारला आणि त्याच्या मासाचे काही तुकडे त्या गुहेच्या जवळपास विखरून ठेवले. थोड्या वेळात तेथे ती सिंहीण आली आणि तिने ते खाल्ले. दुस-या दिवशी क्वामे पुनः तिथे गेला आणि त्याने आणखी काही मांस गुहेच्या थोडे जवळ ठेवले. अशा प्रकारे दररोज क्वामे गुहेच्या जवळ जवळ जाऊन मांसाचे तुकडे ठेवू लागला. आणि ती सिंहीण ते खाऊ  लागली.

असे होता होता एक दिवस क्वामे तिच्या इतका जवळ पोचला की ती क्वामेच्या हातातून ते मांस त्याच्यावर काहीही हल्ला न करता खाऊ लागली.
हळू हळू तो सिंहिणीशी हळुवार शब्दात काही बोलू लागला. तिच्या जवळ जाऊन तिला हलके थोपटण्यापर्यंत त्याची मजल गेली.

एक दिवस तिची मर्जी पाहून क्वामेने तिचे दूध काढले आणि ते घेऊन तो तत्काळ राजवाड्यात जाण्यासाठी निघाला.
राजकन्येच्या शरीराचे सर्व अवयव ते दूध पाहून आनंदित झाले. कारण आता राज्यकन्येचा जीव वाचवण्याच्या अत्यंत महत्वाच्या कामात प्रत्येक अवयवाला आपापली कामगिरी पार पाडायची होती.

” सिंहीण कशी शोधून काढायची, हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे,” डोळे म्हणाले.
” पण, त्या सिंहिणीचा गुरागुराट ऐकता ऐकता, केव्हा तिचं दूध काढायचं, ते मलाच कळलं होतं, ” कान म्हणाले.
” तिचं ते दूध घेऊन कोण आलं होतं आणि जर का त्या सिंहिणीने अचानक हल्ला केला असता, तर ते दूध इथवर आमच्याशिवाय कोण घेऊन आलं असतं ?” पाय अभिमानाने म्हणाले.

” पण ते दूध सिंहिणीकडून काढायचं महाकठीण काम आणि ते आणल्यावर राज्यकन्येला देऊन तिचा प्राण वाचवण्याची कामगिरी आमच्याशिवाय कोण करत आहे ? ” हात पुढे येऊन म्हणाले.
प्रत्येक अवयव आपण किती महत्वाचे काम करत आहोत, हे सांगत होता. फक्त जीभ गप्प होती. ” जरा थांबा,” जीभ स्वतःशीच बोलली. ” आता दाखवीनच तुम्हाला, कोणता अवयव अधिक महत्वाचा आहे तो.”

इकडे क्वामे राजवाड्यात पोचला आणि तडक तो राजा व राणी यांच्याकडे गेला. आता जिभेचे काम करण्याची पाळी होती.
” महाराज, महाराणी, तुम्हाला जी गोष्ट हवी होती, ती मी आणली आहे.त्यामुळे राज्यकन्येचे प्राण वाचू शकतील.— कुत्र्याचं दूध ! ” क्वामे बोलून गेला.

” काय ? ” राजा ओरडला. ” अरे, तुझी हिम्मत कशी झाली आमच्याकडे येण्याची ?  पहारेक-यांनो, पकडा या माणसाला आणि ताबडतोब फासावर द्या त्याला ! “

जीभ सा-या अवयवांकडे वळून म्हणाली, ” पाहिलंत, माझ्या एका शब्दाने काय होते ते ? तुम्ही केलेल्या सा-या कामावर बोळा फिरवला जातोय. अगदी जीवन मरणाचा प्रश्न आहे. आता कबूल करा की मी सर्वात महत्वाची आहे आणि तुम्हाला मीच वाचवू शकेन.”
शरीराचे सारे अवयव ताबडतोब तयार झाले. त्यांनी मान्य केले की अवयवांमध्ये जीभ हीच सर्वात महत्वाची आहे.

मग जीभ पुढे आली. ती म्हणाली, ” महाराज, क्षमा करा. आपली सेवा करण्याच्या कामात आणि राज्यकन्येचा प्राण वाचवण्याच्या कामाची जबाबदारी मी शिरावर घेतली असल्यामुळे माझ्या तोंडून चुकून भलतेच शब्द बाहेर पडले. हे दूध खरोखर सिंहिणीचे आहे हो. तुमच्या राज्यवैद्यांना हवं तर याची परीक्षा करू द्या. मगच ते राज्यकन्येला द्या. आणि तिचे प्राण वाचले नाहीत, तर बेलाशक मला फासावर द्या.”

ताबडतोब क्वामेने आणलेल्या दुधाची तपासणी करण्यात आली. त्याची खातरजमा झाल्यावर ते दूध राज्यकन्येला देण्यात आले. दुधाचा परिणाम दिसून आला. राज्यकन्या उठून बसली. आणि लवकरच खडखडीत बरी झाली.

राज्यकन्या माकी आणि क्वामे यांनी एकमेकाला पाहता क्षणीच ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. क्वामेला अर्धे राज्य मिळाले आणि राज्यकन्येशी त्याचा विवाह झाला, हे काय सांगायला हवे ?

थोडक्यात, जिभेने महत्वाचे काम चोख बजावले होते. ती शरीराचा सर्वात महत्वाचा अवयव म्हणून सर्वांनी मान्य केले होते. कारण तिच्यात चांगली आणि वाईट शक्ती आहे, हे सर्वांना कळून चुकले होते.

पुढे कालांतराने जेव्हा राज्य कन्या माकी व क्वामे राज्याच्या सिंहासनावर राजा व राणी म्हणून बसले, तेव्हा त्यांनी आपापल्या जिभेचा चांगल्यासाठी उपयोग केला.

आता आपला राजा कोणी व्हावे ज्यासाठी ईश्वराकडे  गेले होते, ते शरीराचे अवयव ? त्यांची समस्या सुटली होती. परमेश्वरही आता निर्धास्तपणे आपल्या विश्वनिर्मितीच्या कार्यात गुंतून गेला. पुढे काय झाले, हे तुम्ही मला सांगायला हवे काय ? भेटलात तर न विसरता सांगा हं !

@@@
(What is the Most important part of the body ? by Julius Lester या कथेचा स्वैर भावानुवाद )
मुक्त अनुवाद  : अनामिक 

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

चित्रकारांच्या दालनात 
 
चित्रकार ईशान पीयूष करकरे, डेट्रॉईट, अमेरिका – वय .१० वर्षे
– प्रेषक : सौ. स्वाती वर्तक   

पतंजली योग सूत्रे

परिचयात्मक लेखमाला 

 
सुभाष फडके 

 

लेख पाचवा

 

Bodhisattva seated in meditation 2nd century CE

आतापर्यंतच्या चार लेखात योग या शब्दाची चित्तवृत्तीनिरोध अशी व्याख्या, वृत्तींचे पाच प्रकार आणि वृत्तींचा निरोध करण्यासाठी सांगितलेले अभ्यास आणि वैराग्य हे परस्परपूरक उपाय यांच्याविषयी जाणून घेतले. योग हे एक दर्शन आहे आणि त्याचे उद्दिष्ट अंतिम सत्याचा शोध घेणे असे आहे. हा शोध घेत असताना अंतिम सत्याच्या दर्शनासाठी आवश्यक अशी शारीरिक आणि मानसिक स्थिती संपादन करणे केवळ महत्त्वाचेच नाही तर अनिवार्य आहे. अभ्यासाद्वारे वृत्तींवर, विचारांवर नियंत्रण प्राप्त झाले की, साधकाला स्थैर्य प्राप्त होते. ज्या ध्येय वस्तूचा (संकल्पनेचा) अनुभव घ्यायचा आहे, तिच्याशी साधक एकरूप होऊन जातो. असे एकरूप होणे ही समाधी अवस्थाच आहे. या लेखात सूत्र १७ ते २२ मध्ये समाधीविषयी चर्चा आहे.

मागच्या लेखात अभ्यास आणि वैराग्य या दोन उपायांनी चित्तात उठणाऱ्या वृत्तींचा निरोध करण्याविषयी चर्चा केली होती. वृत्तींचा निरोध करणे म्हणजेच त्यांना पूर्णपणे थांबवणे. या अवस्थेला पोहोचण्यापूर्वी त्यांना नियंत्रित करणे, एकाग्र करणे आवश्यक असते, हेही आपण पाहिले होते. एकाग्रता ही जरी मनाची अवस्था असली, तरी ती प्राप्त करण्यासाठी शरीर निरोगी, स्वास्थ्यपूर्ण असणे तितकेच महत्त्वाचे आहे. शरीर केवळ निरोगी असणे पुरेसे नाही, तर ते स्थिर आणि तणावमुक्त असणेही अगत्याचे आहे. शरीर आणि मन एकमेकांचे जुळे असतात. शरीर शांत असले, तर मन शांत होण्यास मदत होते आणि मन शांत असले तर शरीर स्वस्थ, स्थिर राहू शकते. अस्वस्थ शरीर आणि अशांत मन म्हणजे आपल्या ऊर्जेचा केवळ अपव्ययच. त्या वाया जाणाऱ्या ऊर्जेचा एकाग्रतेने उपयोग केला, तर पुष्कळ रचनात्मक कार्ये घडू शकतील. असो. पुढील लेखात जेव्हा आसन हा विषय येईल, तेव्हा यावर सविस्तर चर्चा करू.

वाचक मित्रांनो, जसे जसे या लेखमालेमध्ये आपण पुढे वाटचाल करीत आहोत, तसतसा हा विषय अधिकाधिक अवघड होत चालला आहे. समाधी या विषयावर परिणामकारकपणे लिहिणे, बोलणे हे प्रत्यक्ष अनुभवाशिवाय शक्यच नाही. केवळ पुस्तके वाचून फार फार तर त्या विषयाची वरवरची माहिती मिळू शकेल. मी पहिल्या लेखातच स्पष्ट केले होते की, मी केवळ योगसूत्रांचा अभ्यास करत आहे. प्रत्यक्ष योगाभ्यास ही माझ्यासाठी खूपच पुढची गोष्ट आहे. त्यामुळे योगसूत्रांचा परिचय करून देताना जेव्हा अशी परिस्थिती येईल की अनुभवाशिवाय लिहिणे फोल आहे, तेव्हा मी ते नम्रपणे टाळेन.

आता महर्षी पतंजली सांगत आहेत की, या एकाग्रतेच्या अभ्यासात वितर्क, विचार, आनंद आणि अस्मिता, असे चार टप्पे आहेत. हे चार टप्पे स्थूल, सूक्ष्म, सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम असे आहेत. त्यासंबंधीचे सूत्र असे आहे.

वितर्कविचारानन्दास्मितारूपानुगमात् संप्रज्ञातः ।। १७ ।।
संप्रज्ञात शब्दाचा अर्थ चांगल्या प्रकारे जाणणे असा आहे. कोणत्याही विषयाला तन्मयतेने जाणणे याला संप्रज्ञात योग म्हणतात. वितर्क, विचार, आनंद आणि अस्मिता या चारांचे अनुसरण करून याची प्राप्ती होते.
हा झाला या सूत्राचा ढोबळ शब्दार्थ. जरा खोलात जाऊन संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात या दोन शब्दांचा अर्थ एकत्रपणे समजून घेणे अधिक सोयीचे होईल. संप्रज्ञात हे एक प्रकारचे ध्यान (किंवा समाधी) असते. यात ज्याचे ध्यान केले जाते ते (ध्येय वस्तू), ध्यान करणारा (ध्याता) आणि प्रत्यक्ष ध्यान हे एकमेकांपासून वेगवेगळे असतात, तरीपण मन त्या ध्येय वस्तूच्या चिंतनात समाधानी असते. त्या उलट असंप्रज्ञात ध्यानात (किंवा समाधीत) ध्याता, ध्येय आणि ध्यान यांच्यामधील फरक पूर्णपणे विसर्जित झालेला असतो.
संप्रज्ञात ध्यानाच्या वर सांगितलेल्या वितर्क, विचार, आनंद आणि अस्मिता या चार टप्प्यांना समाधी असेच म्हटले आहे.

 

वितर्क आणि विचार
 

प्रथम वितर्क म्हणजे काय ते पाहू. वितर्क म्हणजे विशेष स्वरूपाचा, विश्लेषणात्मक तर्क. प्रत्येक बाबतीत कारण काय आहे आणि परिणाम काय आहेत, हे वेगळे पाडत स्थूलाकडून सूक्ष्माकडे केलेली वाटचाल म्हणजे सवितर्क समाधी.
विचार म्हणजे एखाद्या गोष्टीची सर्वांगीण चौकशी करणे, त्यावर चिंतन करणे, आणि विवेकबुद्धीचा उपयोग करून, घेण्यासारखे काय आणि सोडण्यासारखे काय ते जाणून घेणे. विचार तर्कापेक्षा सूक्ष्म असतो.
स्वामी माधवानंद त्यांच्या ‘पातंजल योगसूत्र विचार’ या पुस्तकात वितर्क आणि विचार या ‘एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत’, असे सांगतात. आता यांच्या साहाय्याने मन एकाग्र कसे होईल ते पाहू. दोन्ही बाबतीतील एकाग्रता एखाद्या संकल्पनेवर अवलंबून असते. सुरुवातीला त्यात मध्येच काहीतरी वेगळेच विचार डोकावू शकतात. थंडी, ऊष्णता, काही त्रासदायक आवाज किंवा अन्य कारणांमुळे तर्काची/विचाराची मालिका खंडित होऊ शकते. भूतकाळातील किंवा सध्याच्या अडचणींची चिंता, कर्तव्याची सतत होणारी जाणीव, उगाचच अपघाताची भीती किंवा दूर असलेल्या मुलांची, नातेवाईकांची काळजी अशा विविध गोष्टींनी मन विचलित होते. परंतु चिकाटीने अभ्यास करणारा साधक हळू हळू वितर्क आणि विचार यांच्यावर आधारित असलेली एकाग्रता प्राप्त करू शकतो.

याच्या आधीच्या लेखात गाण्याच्या एका ओळीने जप करायला बसलेल्या साधकाचे चित्त कसे विचलित होते, ते सांगितले होते. त्यामुळे चित्ताला विचलित करणाऱ्या गोष्टी कशा दूर ठेवता येतील, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार त्याची सहनशक्ती, विचलित होण्याची कारणे वेगवेगळी असणार. त्यामुळे प्रत्येकाने आपल्याला पुढील एक दीड तास कोणचाही व्यत्यय येणार नाही, असे आयोजन करून मग ध्यानाला बसावे हे श्रेयस्कर. मग त्यात कोणाला रात्रीची वेळ सोयीची वाटेल तर कोणाला पहाटेची. कोणाला मांडी घालून बसणे जमेल तर कोणाला खुर्चीवर बसणे सोयीचे वाटेल. कोणाला उदबत्ती लावल्याने प्रसन्न वाटेल तर कोणाला त्या धुराचा, वासाचा त्रास होईल. परंतु सामान्यतः मोठे आवाज, घट्ट कपडे, अतिशय थंडी, अतिशय उकाडा, कोणतीही शारीरिक व्याधी हे एकाग्रतेच्या बाबतीत अडथळे असतात. बाह्य वातावरणाइतकेच आतले म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांनी बनलेल्या अंतःकरणातील वातावरणही महत्त्वाचे असते.
श्री. कृष्णाजी केशव कोल्हटकर यांच्या ‘पातञ्जल योग दर्शन’ या ग्रंथात त्यांनी या बाबतीत पुढील विचार मांडला आहे.

साधना करीत असताना साधकाचे चित्त एकदम वृत्तीविरहित होईल असे अपेक्षित नसते. ते आधी एकाग्र करावे लागते. सुरुवातीला ज्ञानेन्द्रियांच्या द्वारे बाह्य विषयांचा संपर्क होतो, जो अनिवार्य आहे. बाह्य विषयांमध्ये जितकी अधिक विविधता, चंचलता असेल, तितके ते चित्त एकाग्र करण्याच्या दृष्टीने बाधक होईल. त्यामुळे साधनाकाळाच्या आरंभी आजूबाजूचे वातावरण, चित्त एकाग्र करण्यासाठी पोषक असणे श्रेयस्कर. गीतेच्या सहाव्या अध्यायातील श्लोक क्रमांक ११ शुचौ देशे प्रतिष्ठाप्य… पासून ते श्लोक क्रमांक १७  युक्ताहारविहारस्य… मध्ये सांगितल्यानुसार किंवा प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडीनिवडीनुसार परंतु साधनेसाठी पोषक असे आसन, शारीरिक स्थिती, मनाची एकाग्रता, आहार, विहार, झोप, साधनेसाठीचा नियमित वेळ या बाबींची काळजी घेणे हितावह असते.

त्यांच्या मते सगुण परमेश्वराच्या नवविधा भक्तीद्वारा (श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वन्दन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन) जी एकाग्रता अथवा तन्मयता साधली जाते, तीच योगशास्त्रातील ‘सवितर्क समाधी’ होय. या समाधीत जरी चित्त बाह्य गोष्टींच्या म्हणजे वर सांगितलेल्या नऊ प्रकारच्या भक्तीतील नामस्मरण, पूजा, मूर्ती, जपमाळ अशा विविध गोष्टींत  मग्न असले, तरी त्याशिवाय बाकी कोणत्याच वृत्ती त्याला स्पर्शही करीत नाहीत. त्यामुळे त्याला एक प्रकारची एकाग्रता प्राप्त होते, ज्याचा परिणाम चित्तशुद्धी असाच होतो. याद्वारे चित्ताचा निरोध होण्याच्या अंतिम ध्येयाच्या अधिकाधिक जवळ जाता येते. त्यामुळे सवितर्क समाधीला निरोधाच्या अभ्यासाचा प्रारंभ समजले जाते.

या सवितर्क समाधीचा अभ्यास दीर्घकाल केल्यावर त्यात परिपक्वता येते. आरंभी साधकाच्या न कळत त्याचे चित्त भरकटून इतर विषयांचे चिंतन करू लागते पण थोड्या वेळाने ते साधकाच्या लक्षात आले की, तो चित्ताला प्रयत्नपूर्वक पुनः स्वस्थळी आणतो. असे बरेच दिवस झाल्यानंतर मन बाह्य वस्तूंकडे कमीकमी धावू लागते आणि यदाकदाचित ते धावले, तरी पूर्वीपेक्षा लवकर स्वस्थळी परत येते. हा अभ्यास पक्व होत असल्याचे लक्षण म्हणजे पूर्वी ज्या निमित्तांनी चित्त बाह्य विषयांचे चिंतन करीत होते, ती निमित्ते आता घडली तरी त्यामुळे चित्तात पूर्वी प्रमाणे विक्षेप होत नाही. त्याहून पुढची पायरी म्हणजे पूर्वी विशिष्ट वेळ, जागा अथवा बैठक असल्यावरच मनाची एकाग्रता होऊ शकत होती, ती आता केव्हाही, कोठेही आणि इतर उपांगांच्या अनुपस्थितीत होऊ लागते.

उपास्य देवतेची मूर्ती पुढे असण्याची जी आवश्यकता पूर्वी होती, ती आता संपते आणि उपास्य देवतेचा नुसता विचार जरी मनात आणला की चित्त एकाग्र होऊ लागते. असे होणे ही सवितर्कातून सविचारात जाण्याची खूण आहे. सविचार समाधीच्या अवस्थेत साधक त्याच्या नेहमीच्या नियमित वेळी साधना करतच असतो, परंतु अन्य वेळी नित्य व्यवसाय करत असतानासुद्धा मधून मधून जे रिकामे क्षण सापडतील त्यात त्याचे मन उपास्य देवता किंवा जे काही ध्येय असेल त्याच्याशी एकाकार होते. अशा रीतीने साधक जाता, येता, देता, घेता, उठता, बसता, काम करताना भाव्य वस्तूचे चिंतन करायला लागतो.

सवितर्क/सविचार समाधीचा रोजच्या जीवनातील अनुभव

वाचकहो, ही अवस्था केवळ संतांना किंवा योगाचा अभ्यास करणाऱ्या साधकांनाच प्राप्त होते असे नाही. अगदी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांनाही असा अनुभव कधी ना कधी मिळालेला असतो. असे समजा की एखाद्या माणसाला नोकरी बदलायची आहे आणि एका मोठ्या कंपनीतून त्याला इंटरव्ह्यूसाठी बोलावणे आले आहे. अशा वेळी तो माणूस त्याचे जेवणखाण, उठणे बसणे वगैरे सर्व व्यवहार नेहमीसारखे करत असतो, परंतु मनाच्या एका कप्प्यात सतत त्या इंटरव्ह्यूचे विचार चालू असतात.

अजून एक उदाहरण द्यायचे झाले, तर एका तरुण मुलीचे एका सुयोग्य वराशी लग्न ठरलेले आहे. लग्नाची तारीख एक महिन्यानंतरची आहे. जरी दोघेही आपापल्या घरी, कामाच्या ठिकाणी त्यांचे सामान्य व्यवहार नेहमीप्रमाणे करत असले, तरी दोघांच्याही मनात लग्नाविषयीचे अखंड चिंतन चालू असते. थोडक्यात काय तर ज्या गोष्टीचे आपल्याला महत्त्व वाटते, ती मिळेपर्यंत तिचा ध्यास घेतला जातो. जर एखादा संशोधक किंवा कलाकार त्याच्या साध्य विषयाशी असाच एकरूप झाला असला, तर तोसुद्धा सविचार समाधीत आहे असे म्हणता येईल.

वितर्क आणि विचार यांच्या साहाय्याने साधकामध्ये एक परिपक्वता येते आणि एक पूर्णतेचा भाव जागृत होतो. नियमित वेळची साधना आणि दिवसभरातल्या रिकाम्या क्षणीचे अनुसंधान यांच्यामुळे चित्ताची शुद्धी होत होत ते पूर्णपणे सात्त्विक होते. पूर्वी ज्या गोष्टींनी मन इकडे तिकडे धावत होते आणि त्यामुळे बरीच ऊर्जा वायफळ खर्च होत असे, ती आता होत नाही. शरीरसुद्धा पूर्णपणे मनाच्या ताब्यात आल्याने तेही अधिक कार्यक्षम होते. ही पूर्वी वाया जाणारी ऊर्जा आता शरीरातच जतन होऊ लागते. या सर्वाचा परिणाम म्हणून साधकाला एका अभूतपूर्व आनंदाचा अनुभव येतो.

वरील अनुभवाचे वर्णन गीतेच्या सहाव्या अध्यायातील श्लोक २१ आणि २२ मध्ये अतिशय समर्पकपणे केले आहे.

सुखम् आत्यन्तिकं यत्तद् बुद्धिग्राह्यम् अतिन्द्रियम् ।
वेत्ति यत्र न च एवायं स्थितश्चलति तत्त्वतः ।। २१ ।।
यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः ।
यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ।। २२ ।।

अर्थः – इंद्रियांच्या पलीकडचा, केवळ शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीनेच ग्रहण करता येईल असा, आत्यंतिक आनंद या अवस्थेत अनुभवाला येतो. या अवस्थेतील योगी परमात्म्याच्या स्वरूपापासून मुळीच विचलित होत नाही.
हा लाभ झाल्यावर त्याहून अधिक दुसरा कोणताही लाभ तो मानीत नाही आणि या स्थितीत असलेला योगी फार मोठ्या दुःखानेही विचलित होत नाही.
असा आनंद चित्तामध्ये उमटणे ही सविचार समाधीतून सानंद समाधीत गेल्याची खूण आहे. या समाधीत होणारा आनंद हा मन आणि इंद्रियांच्या पलीकडचा असतो. सवितर्क समाधीमध्ये मन ध्येय वस्तूच्या स्थूल रूपावर एकाग्र होत असे. सविचार समाधीमध्ये मन ध्येय वस्तूच्या मात्र विचाराने एकाग्र होऊ लागते, ही पहिल्यापेक्षा सूक्ष्म समाधी आहे. सानंद समाधी सूक्ष्मतर आहे. ती कशी हे समजण्यासाठी आनंद म्हणजे काय याची चर्चा करणे आवश्यक आहे.

आनंद म्हणजे काय?
 

ढोबळमानाने आनंदाचे तीन प्रकार करता येतील. समजा एखाद्याला तहान लागली आहे. कुठे पाणी मिळत नाही आहे. तेव्हा साहजिकच तो दुःखात असेल. त्याला पाणी मिळाले आणि ते पिऊन त्याची तहान भागली की त्याला आनंद होईल. हा आनंदाचा प्रकार सर्वात स्थूल आहे. यात भूक, थंडी, वारा, उकाडा वगैरे गोष्टींमुळे होणारे दुःख दूर झाल्याने सुख होते. कोणत्याही इंद्रियाची भोग्य वस्तू त्याला मिळाली की, जी अनुकूलत्वाची भावना होते त्यामुळे वाटणारे शारीरिक सुख किंवा आनंद इतकीच त्याची व्याख्या करता येईल. या भोग्य वस्तू नसल्या की दुःख आणि असल्या की सुख.

सु आणि दुः हे परस्परविरोधी अर्थ दाखवणारे दोन उपसर्ग आहेत. सु म्हणजे चांगले, दुः म्हणजे वाईट आणि ख म्हणजे इन्द्रिय. इन्द्रियाचा अनुकूल विषयाशी संयोग घडला की होते ते सुख आणि प्रतिकूल विषयाशी संयोग घडला की होते ते दुःख. हे सुख दुःख नैसर्गिक आहे आणि यात माणसाच्या मूलभूत गरजा समाविष्ट आहेत. या पूर्ण केल्याने होणारा आनंद क्षणिक असतो आणि त्याचे मूळ तमोगुणात असते.
याच्यापुढे जो आनंद आहे तो मनाला होणारा आनंद आहे. अमुक गोष्ट अमुक रीतीने व्हावी अशी इच्छा असते. ती तशी झाली (म्हणजे इच्छा पूर्ण झाली) तर आनंद, नाही झाली तर दुःख. यात पोषण, प्रजनन आणि संरक्षण या नैसर्गिक सहज भावनांना तितकेसे महत्त्व नसते. मी ठरवल्याप्रमाणे एकादशीच्या दिवशी काहीही न खाता, पाणीसुद्धा न पिता राहू शकलो, की मला आनंद होतो. मी भर पुरात नदीमध्ये उडी टाकली, तर मला मोठे शौर्य गाजवले असे वाटते. अशी अनेक उदाहरणे देता येतील, परंतु यातील मुख्य मुद्दा अहंभाव पोसला जाणे हा असतो. अहंभावाला धक्का लागला तर दुःख आणि त्याचे पोषण झाले तर आनंद. हा आनंद कामनापूर्तीमुळे होत असल्याने, मनाशी जोडलेला असल्याने त्याचे मूळ रजोगुणात आहे. त्यामुळे त्याचे अंतिम फल ‘रजसस्तु फलं दुःखं’ या अध्यात्मशास्त्रातील त्रिकालाबाधित सिद्धान्तानुसार मिळते.

तिसऱ्या प्रकारचा आनंद हा शुद्ध आनंद असतो. तो कशावरही अवलंबून नसतो. चित्तामध्ये कोणतीही वासना नसते आणि सत्त्वगुण नांदत असतो. त्यामुळे त्या आनंदातून दुःख होत नाही आणि तो क्षणिकही नसतो. पहिल्या प्रकारामध्ये शरीर हे काही स्थूल वस्तू मागत होते आणि ती त्याला मिळाली की, आनंद मिळत होता. दुसऱ्या प्रकारामध्ये मन हे काही सूक्ष्म वस्तू मागत होते आणि ती त्याला मिळाली की, आनंद मिळत होता. याचाच अर्थ असा की तो आनंद कशावर तरी अवलंबून होता. सानंद समाधीमध्ये आनंदाच्या ऊर्मी चित्तात आपोआपच उमटत असतात.
आनंद जर स्थूल किंवा सूक्ष्म वस्तूंचा धर्म असता, तर त्या नसल्या की आनंदही नाहीसा झाला असता. पण सानंद समाधीत होणारा आनंद आपल्याला दाखवून देतो की, ती चित्ताची एक सहज वृत्ती आहे. पहिल्या दोन प्रकारात स्थूल वस्तू आणि कामनापूर्ती यांच्या बाबतीत जी तन्मयता चित्तात निर्माण होते त्यामुळे आनंद होतो. परंतु ती वस्तू आणि कामना या चित्तापासून भिन्न असतात. सानंद समाधीत चित्तामध्ये असणाऱ्या आनंदवृत्तीशीच चित्ताची तन्मयता होत असल्याने, त्याला बाह्य कारण आवश्यक नसते. जर अन्नामुळे आनंद होत असता, तर निर्जळी एकादशी करताना आनंद झाला नसता. कामनापूर्तीने आनंद होत असता, तर एखाद्या सुखद घटनेच्या मात्र आठवणीने आनंद झाला नसता.

संगीत क्षेत्रातील उदाहरण
 

या संबंधात मला संगीत क्षेत्रातील एक उदाहरण द्यावेसे वाटते. अहमदाबाद येथे राहताना माझ्या पत्नीला सतार शिकवण्यासाठी गुलाम रसूल खान नावाचे एक उस्ताद आमच्या घरी येत असत. त्यांच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकलेली गोष्ट आहे. बरीच वर्षे सतार शिकल्यानंतर त्यांच्या गुरूने त्यांना सांगितले, “आता तुझा हात तयार आहे. मी शिकवलेल्या सर्व रागांचे स्वर, आरोह, अवरोह वगैरे तुला चांगले वाजवता येतात. परंतु तुझ्या वाजवण्यात ‘जान’ नाहीये.”
मग खानसाहेबांनी गुरूला विचारले, “मग आता मी  काय करू?”
ते म्हणाले, “तू आता एक ‘चिल्ला’ कर.”

चिल्ला करण्यासाठी तो कलाकार त्याच्या कलेत बऱ्यापैकी पारंगत असावा लागतो. अगदी नवशिक्यासाठी चिल्ला कामाचा नाही. ही एक प्रकारची तपश्चर्याच आहे. चिल्ला करणारी व्यक्ती स्वतःला चाळीस दिवस एका खोलीत कोंडून घेते. त्या खोलीतच एक ॲटॅच्ड बाथरूम असते. झोपणे, जेवणखाण वगैरे सर्व त्याच खोलीत. बाहेरच्या जगाशी कोणताही संबंध नसतो. कोणाला भेटायचे नाही, वर्तमानपत्र, रेडिओ, मोबाईल काहीही नाही. या व्यक्तीने चोवीस तासापैकी शक्य तितका वेळ संगीत साधनेत घालवायचा असतो. सकाळी सकाळच्या, दुपारी दुपारच्या तर रात्री रात्रीच्या रागांचा रियाझ करावा किंवा चोवीस तास एकाच रागाचा रियाझ करावा. बाकी दुसरे काहीही करायचे नाही. चाळीस दिवसांनंतर त्याला आणि इतरांना त्या कलाकाराच्या संगीतात एक विलक्षण बदल घडलेला दिसतो. जणुं काही त्याला संगीताचा आत्मा सापडतो किंवा संगीत त्याच्या रक्तात भिनते.

या चिल्ला नावाच्या तपश्चर्येत कलाकार फक्त संगीताचा विचार करतो, तेच कर्म करतो, तेच जगतो. शारीरिक व्यवहार आवश्यकतेनुसार चालू असतात, परंतु संपूर्ण लक्ष संगीतावर केन्द्रित असते. त्यामुळे तो संगीताशी तादात्म्य पावतो. त्याच्यातले संगीत आतून सहजपणे येते, त्यासाठी त्याला काहीही कष्ट पडत नाहीत. आणि त्या संगीतात दैवी जादू, एक विलक्षण ताकद असते. माझ्या माहितीनुसार बऱ्याच कलाकारांनी त्यांच्या संगीत कारकिर्दीत चिल्ला केलेला आहे.
खानसाहेबांनीही चिल्ला केला. केवळ हाताने सतार वाजवायची एवढेच नाही, तर मनात सतत तोच विचार, उठता बसता एकच ध्यास! त्यांनी स्वतः सांगितले की, “चिल्ला केल्यानंतर तुझ्या सतारवादनात खरोखर ‘जान’ आली आहे”, असे प्रमाणपत्र त्यांच्या गुरूंनी त्यांना दिले होते. त्यानंतर त्यांच्या कलेमुळे त्यांना तर आनंद मिळालाच, परंतु ऐकणाऱ्यालाही तो आनंद अनुभवता आला. माझ्यासारख्या सुरांशी फारसे घेणे-देणे नसलेल्या माणसालाही त्यांनी वाजवलेले ऐकताना खरोखर विलक्षण आनंद व्हायचा.

योगमार्गातसुद्धा अशी कठोर साधना करणाऱ्यांची उदाहरणे आहेत. त्यानंतर त्यांना जो विलक्षण अनुभव मिळतो, त्याची तुलना कोणत्याही ऐहिक सुखाशी करता येणार नाही. सवितर्क/सविचार समाधीचा भरपूर अभ्यास करून सानंद समाधीपर्यंत पोहोचल्यावर साधकामध्ये एक मोठा बदल घडून येतो. बाहेर धावणारी त्याची इंद्रिये आणि मन अंतर्मुख होतात. नियमित साधना काळाव्यतिरिक्त दिवसातील रिकाम्या वेळातच नव्हे, तर झोपेतही त्याचे ध्येय गोष्टीशी अनुसंधान चालू असते. अशा साधकाला अंतर्निष्ठ मुमुक्षू असे म्हणतात. तो प्रारब्धानुसार व्यवहारात वावरत असतो, परंतु त्याचा वृत्तीप्रवाह ध्येय गोष्टीला धरूनच असतो. तो स्वतःमध्येच मग्न राहू लागतो.
चिल्ला केलेल्या सतारियाची स्थितीसुद्धा अशीच असते. तो रोजचे व्यवहार करत असला तरी संगीत त्याच्या रोमारोमात भिनलेले असते. संगीत साधना आणि अध्यात्मिक प्रगती यांचे परस्पर नाते असावे, असे मला वाटते. असो.
सवितर्क आणि सविचार समाधीत चित्त एकाग्र करताना बाह्य संवेदना आणि त्यातून उमटणारे ताजे आणि स्मृतीजन्य विचार/विक्षेप दूर करायची सवय अंगी बाणलेली असते. आनंद ही सुद्धा चित्ताचीच एक वृत्ती आहे. तिलाही दूर केले पाहिजे असा प्रयत्न आता साधकाने करावयाचा असतो. त्याला ते थोड्या अंतरप्रयत्नाने साध्यही होते आणि मग तो सास्मित समाधीच्या मार्गात प्रवेश करतो.

चित्ताची अंतर्मुखता आणि बहिर्मुखता या दोन्हींचा संधिप्रदेश म्हणजे अस्मिता भाव. तिथून साधक निर्बीज समाधीकडे झेपावू शकतो अथवा मन, इंद्रिये शरीर यांच्या इच्छा पूर्ण करण्याकडे परत जाऊ शकतो.
इथे सुरुवातीला ‘मी आनंदात आहे’ हा भाव असतो. हळू हळू ‘मी आनंदात आहे’ च्या जागी ‘मी आहे’ एवढीच जाणीव राहते. त्यावेळी वितर्क, विचार आणि आनंद या कोणत्याच वृत्ती चित्तामध्ये नसतात. स्वतःनेच स्वतःविषयी केलेल्या विचाराने साधक ‘पुरुषा’च्या अगदी जवळ पोहोचतो. या अवस्थेला “अस्मिता रूप संप्रज्ञात समाधी” असे म्हणतात. अस्मितेमध्ये अहंकार नसतो, केवळ स्वत्वाचे भान असते.

सारांश
 

वर समजावून सांगितलेल्या सवितर्क, सविचार, आनंद आणि अस्मिता या संप्रज्ञात अथवा सबीज समाधीच्या चार श्रेणी आहेत. सबीज समाधी म्हणजे ज्या समाधीसाठी काही वस्तू, विचार, असा काही आधार, बीज आवश्यक असते. या समाधीमध्ये द्रष्टा आणि दृश्य यांच्यात तफावत कायम असते. वितर्कापेक्षा विचार सूक्ष्म आहे, वितर्क आणि विचारापेक्षा आनंद सूक्ष्म आहे आणि अस्मिता तिघांच्याही पलीकडची आहे. खालच्या टप्प्यावरून वरच्या टप्प्यावर जाण्याची योग्यता साधकामध्ये आली आहे की नाही, ते ओळखण्याच्या काही खुणा सांगितल्या आहेत. या आंतरिक प्रवासात कोण किती पुढे जातो, ते बाहेरून सहज कळत नाही एवढे मात्र खरे.

– सुभाष फडके 
subhashsphadke@yahoo.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आजची कविता  

असंच एक झाड असतं बकुळीचं   

सडा पायतळी अंथरीत
मंद गंध सहज पसरत
दुरीहून साद आपल्याला घालत
आपल्यापाशी या या हाकारत

ओंजळीत स्वतःला घ्याया लावत
अपुल्या गंधाने नाकाशी जवळीक साधत
मनही त्या मृदू स्पर्शानं गंधानं मोहरत
आपल्याशी गंधीय जवळीक साधत

नाजूक फुल सुकून जात
सुकलं तरी अपला गंध विखरत
जाता जातही गंध देत देत
मनही प्रसन्न करत निरोप घेत

डॉ. विजय आजगावकर 
drvsa1931@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

लक्षणीय 

दृष्टीआडची सृष्टी 

डॉ अनिल यशवंत जोशी  

 

अंधशाळेतील मुलांची वैद्यकीय तपासणी करणे हा मला नेहमीच अंतर्मुख करणारा एक अनुभव आहे. चार ते पाच मुलंमुली एका रांगेत, मागच्या मुलाचा हात पुढच्याच्या खांद्यावर ठेवलेला आणि सर्वात पुढे अंधशाळेचा एखादा डोळस सेवक अशा क्रमाने एकमेकांना सांभाळत हे सर्वजण दवाखान्यात येतात. एरवी वेगवेगळ्या संस्थेत काम करणारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे बऱ्याचवेळा निरस, काय ताप आहे हा ? असे भाव सतत आपल्या चेहऱ्यावर बाळगून असतात. अंधशाळेचे शिपाई मात्र याला अपवाद आहेत. बरोबर आणलेली मुळे अपंग आहेत, आपल्यावर अवलंबून आहेत याची यथार्थ जाणीव त्यांना असते. आपल्या घरच्या मुलाप्रमाणे हे सर्वजण या मुलामुलींची काळजी घेतात. संस्थाचालकांनी नोकर भरती करताना कांही विशिष्ठ निकष लावून मगच हे सेवक घेतले असायची शक्यता मला सुरवातीला वाटायची. नंतर नंतर असे वाटू  लागले की या मुलांची दृष्टीहीनता या सर्वांच्या माणुसकीला हाक तर देत नसेल ना ? कारणमीमांसा काहीही असो…. ती माणुसकीची रांग पहिली की अजून काही वर्षे तरी जगबुडी येणार नाही असा विश्वास दुणावतो. बरोबर आणलेल्या सर्व मुलांना हे सेवक त्यांच्या पहिल्या नावाने हाक मारतात आणि तेही अत्यंत मार्दवाने !

या सर्व मुलांना दवाखान्यात आल्यानंतर कसल्याही विशेष वागणुकीची अजिबात अपेक्षा नसते. इतर सर्व रुग्णांसारखेच ते  रांगेनी आत येतात. इतरांसारखेच इंजेक्शनला घाबरतात. वैद्यकीय तपासणीत डॉक्टर-रुग्ण संवादाला अनन्यसाधारण महत्व आहे. कमीत कमी प्रश्नात रोग्याबद्दलची व त्याच्या सध्याच्या आजारपणाची जास्तीत जास्त माहिती जो गोळा करू शकताे तो डॉक्टर  श्रेष्ठ ! या तपासणी दरम्यान “ लघवी पिवळी होतेय का ? “ हा प्रश्न बऱ्याचवेळा विचारावा लागतो व अनेकदा हा प्रश्न प्रतिक्षिप्तपणे तोंडातून जातो. अंधशाळेतल्या मुलांना हा प्रश्न विचारला गेला की ती काहीशी कावरीबावरी व्हायची व एकदम गप्प बसायची. त्या मागची त्यांची मानसिकता व अगतिकता जाणून हा प्रश्न विचारून आपण त्यांच्यावर किती अन्याय करत आहोत त्याची अस्वस्थ जाणीव मला एके दिवशी  झाली आणि त्यादिवसापासून मी हा प्रश्न त्या मुलांसमोर विचारला जाणार नाही याची विशेष दक्षता घेऊ लागलो व याबाबतची माहिती ही बरोबरच्या सेवकांकडून मिळवू लागलो.

         वेगवेगळ्या व्याधी किंवा आजार होणे हा मानवी आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे. परंतु या व्याधी किंवा आजार स्वीकारण्याची पद्धत वेगवेगळ्या लोकांत वेगवेगळी असते. बऱ्याचदा किरकोळ आजाराने, व्याधीने त्रस्त असलेले लोक त्याचा मोठा बाऊ करतात. आपले नातेवाईक व डॉक्टर यांना अक्षरशः सळो की पळो करून सोडतात. त्याचबरोबर दुर्धर आजारांना नेटाने व धीराने सामोरे जाणारे रुग्णही भेटतात. या सर्व अंधजनांबाबत मात्र मला एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने जाणवते. यातला कोणीही आपल्या अंधत्वाचे भांडवल करून वागताना किंवा बोलताना दिसत नाही. निसर्गाने केलेला एक घोर अन्याय या सर्वच लोकांनी हलाहलासारखा पचविल्याचे जाणवते. या लोकांकडून आपण थोडेसे जरी शिकलो तरी जीणे किती सुसह्य होईल.

अशाच एका तपासणीच्या दिवशी ४-५ मुलांचा मेळा दवाखान्यात आला. एकेक करीत मी सर्वांची तपासणी संपवत आणली. त्यांच्यातला १०-१२ वर्षांचा एक चुणचुणीत मुलगा तपासणीसाठी पुढे आला. उजव्या डोळ्याच्या भोवताली सूज येऊन काळेनिळे झाले होते. ”काय रे ? पडलास की काय ? “ माझा प्रश्न. “ छे हो डॉक्टर, पडतोय कसला, खेळताना टक्कर झाली, “ त्याचे उत्तर. “ अशी कशी टक्कर झाली बाबा ? “ त्याला बरे वाटावे म्हणून मी केलेला एक निरर्थक प्रश्न. “ काय करायचे डॉक्टर ! आमच्यातले काही खेळताना इकडे तिकडे पाहातच नाहीत …. नुसते आंधळ्यासारखे वागतात बघा, ” हसत- हसत त्याने उत्तर दिले. अर्जुनाला विश्वरूप दर्शन झाल्यावर त्याची काय अवस्था झाली असेल त्याची पुसटशी कल्पना मला आली . आजही हे उत्तर आठवले की माझ्या अंगावर काटे उभे राहतात !!
@
– डॉ अनिल यशवंत जोशी 

jaysss12@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
अशा गोष्टी – अशा गंमती 
सुरेश भार्गव मुळे 
११. 
विच्छा माझी पुरी करा !


एक मुलाखतकार वसंत सबनीसांची मुलाखत घेत होता. साहित्य संमेलन उधळून लावू शकणा-या मुलाखतकारांच्या लाइनीतला तो एक मुलाखतकार होता. त्यानं जाम वैताग दिला.
शेवटी त्यानं विषय ‘विच्छा माझी पुरी करा’वर नेला.
मग सहज म्हणून तो म्हणाला,
“आता इच्छेवरच विषय आला म्हणून विचारतो. तुमची बालपणाची एखादी इच्छा पूर्ण झालीय का ?”
“हो. झालीय की !” वसंत सबनीस म्हणाले.
“नवल आहे ! बहुतेकजण ह्या प्रश्नाला नकारार्थी उत्तरं देतात !” मुलाखतकार म्हणाला.
“त्याचं काय आहे. लहानपणी मी मस्ती केली की माझी आई माझे केस धरून खेचत असे. त्यावेळी मला वाटायचं की माझ्या डोक्यावरचे केसच नाहीसे झाले तर किती बरं होईल. तर माझी ही इच्छा बरं का, आत्ता पूर्ण झालीय !” वसंत सबनीस म्हणाले.

@
[‘ललित‘ दिवाळी अंक १९८१ वरून साभार ]
सुरेश भार्गव मुळे.
@@@