विचित्र कोडी

सौ. मालती दांडेकर  

दूर अंतरावर दिवे लुकलुकू लागले, तेव्हा आनंदरावांना बराच धीर आला. वेळ ही अशी अमावास्येच्या रात्रीची; पाहाल तिथं काळोखाचंच राज्य. बरोबर बायकामंडळी अन् रानात वाट चुकलेली ! मग माणसाला घाबरल्यासारखं व्हावं यात आश्चर्य थोडंच म्हणायचं ?

आज आनंदराव रानातल्या रानजाई देवीला नवस फेडायला बैलगाडी करून आले होते. बरोबर नवविवाहित मुलगी व जावईही होते. मुंज झालेला मुलगा होता, आणि पत्नीही होती. घरात कार्य झालं की या देवीला जायचा त्यांचा कुलाचार होता. संध्याकाळपर्यंत देवदर्शन, नैवेद्य वगैरे झाले व ते परत जाण्यास निघाले. पण रानात सगळ्या वाटा सारख्याच दिसतात. चहूकडे तशीच झाडं आणि तशाच वेलींच्या जाळ्या, त्यामुळे बैलगाडी चुकून भलत्याच रस्त्याने जाऊ लागली तरी गाडीवानाच्या, गड्याच्या, कुणाच्याच ध्यानात आलं नाही. फार काय आनंदरावांना समजलं नाही ते चटकन.

हळूहळू रात्र चढू लागली. रानात विचित्र आवाज वातावरणाच्या भीषणतेस मदतच करीत असतात. दूर कुठं वाघरू गुरगुरल्याचा आवाज येई; तर पालापाचोळ्यावरून एखादं जिवाणू सरसरत गेल्याची चाहूल लागे. केव्हा डाव्या हाताला कोल्हेकुई उठे, तर रातकिड्यांची किर्रकिर्र फारच कर्कश भासे. बारा वाजले, सगळ्यांच्या डोळ्यांवर झोप तरंगू लागली. आनंदराव म्हणाले, “अरे, हरबा, आपण एव्हाना वेशीपर्यंत पोचायला हवं होतं. केव्हाची गाडी चालते आहे. वाट तर चुकलो नाही ना ?”

“मलाबी त्योच अंदेशा येतुया मालक …. त्ये बगा दिवं दिसत्यात, पर त्ये आपल्या गावचं न्हाईती. बुरुजावाणी उंचावर पाच दिवं आपल्या गावात कोनबी न्हाई लावीत. ”

हरबाचे शब्द ऐकताच आनंदराव चमकले एकदम. बुरुज ? अन् पाच दिवे ? ते तर रानातल्या कुटनगरीला आले होते वाट चुकून !

आनंदीबाई म्हणाल्या, “बरं झालं बाई. गाव कुठलं का असेना ! रात्री रानात सापडण्यापेक्षा बरं. गावात जाऊ, कुणाच्या तरी घरी उतरू, शेकोटी पेटवू अन् उनहून दूध घेऊ. मग अंग टाकता येईल जरा. ”

आनंदराव म्हणाले, “अगं, तसं साधं गाव नव्हे हे. रानटी जमातीचं गाव आहे. इथं भारी विचित्र लोक आहेत. त्यांच्या तडाख्यातून सुटलो तर वाचलो म्हणायचं. छे छे छे ! भलतीकडं या हरबानं आणली गाडी बाबा. ”

जावई अरविंद विचारू लागले, “पण विचित्र म्हणजे काय ?”

आनंदराव सांगू ;लागले, ” विचित्र म्हणजे लहरी.  तेथला तरुण राजा अत्यंत बुद्धिमान आहे व त्याचं प्रधानमंडळही अतिशय तीक्ष्णबुद्धीचं. खूष झाले तर सारे सारं काही हसत देतील. नाही तर कोणते हाल नशिबी येतील कुणास ठाऊक ? अगदी बेतानं वागायला हवं, फार जपून बोलायला पाहिजे. ”

सगळेच काहीसे धास्तावून पाहू लागले. तेवढ्यात तुतारीचा उंच आवाज झाला व दहा – बारा काळ्या वर्णाचे, पण लढाऊ पोशाखाचे लोक धावत येऊन त्यांनी गाडीला वेढा दिला. त्यांच्या डोक्यांवर मोरपिसे खोचलेली होती. वाघाच्या कातड्यांची जाकिटं त्यांनी घातली होती व प्रत्येकाच्या हाती भाला व धनुष्यबाण होते. आनंदराव नम्रपणे त्यांना म्हणाले,
” बाबांनो, आम्ही गरीब वाटसरू, वाट चुकून इकडे आलो. आम्हाला रात्रभर राहायला जागा मिळेल तर, देव तुमचं भलं करील, ” दुभाष्या जवळच होता. तो त्या बोलण्याचा अर्थ सांगू लागला. तेव्हा त्यांच्या अधिका-याने विचार करून म्हटलं,

“आमचे राजे ठरवतील त्याबद्दल. आम्ही आता तिकडेच घेऊन जातो आहोत तुम्हाला. पण हे आहे बुद्धिमंतांचं राज्य. अन् इथं बुद्धिमान माणसांचंच नीट स्वागत होतं, एवढंच सांगतो. तुमची परीक्षा नागराजे घेतील. परीक्षेत उतरलात, तर केवळ आश्रयच नव्हे, तर भोजन वगैरे सारं मिळेल ! नाही तर कोणती शिक्षा मिळेल ते आम्ही सांगू शकत नाही. ”

परत मंडळींच्या मनावर भीतीची लाट हेलकावू लागली. हे राजे कसली परीक्षा घेणार आणखी ? आणखी सर्वांचीच घेणार की काय ?

कन्या मीना म्हणाली, “मी कुठे परीक्षेत नापास नाही झाले बाबा. हीही परीक्षा कठीण असली तरी त्यात मी पास होईनच नक्की. ”

आनंदीबाई म्हणाल्या, “तुमचं ठीक आहे गं. पण मी कुठलीच परीक्षा अजून दिली नाही. माझीच पंचाईत व्हायची. ”

त्यांना सर्वाना राजवाड्यात नेण्यात आलं. राजवाडा म्हणजे मोठी मोठी चित्रं काढलेला एक लाकडी दिवाणखाना होता. राजा तिथंच उच्चासनावर बसला होता. गळ्यांत सिंहाच्या दातांची माळ होती. डोक्याच्या केसांवर एक चकचकीत पट्टी बांधलेली होती. त्याचं वस्त्र पानाफुलांनी विणलेलं होतं. हातात दगडाचंच एक छानदार शस्त्र होतं. रूप काळंसावळंच पण नजर अशी भेदक व तिखट की, केवळ त्या नजरेवरूनच त्याच्या बुद्धीची ग्वाही मिळावी ! त्यांच्याच जमातीतल्याला सर्वात बुद्धिमान माणसाची राजा म्हणून निवड होत असे. हे आनंदरावांनी ऐकलं होतंच.

दुभाष्या दोन्ही बाजूंची भाषणं समजावून द्यायला हजर होता. त्याच्या मार्फत नागराजाला सर्व हकीगत सांगण्यात आली. तेव्हा तो हसून म्हणाला, “बसा मंडळी. इथं बुद्धिमंतांचाच आदर होतो. म्हणून मी तुम्हा सर्वांच्या बुद्धीची पारख करीन व नंतर नागराजाच्या या राजधानीत तुम्हाला आसरा मिळेल ! प्रत्येकाला मी प्रश्न विचारीन. विचारू ना ?”

“जरूर विचारावा, सरकार !” आनंदराव म्हणाले.

राजा प्रथम आनंदीबाईंकडे वळून म्हणाला, “मातोश्री, पहिल्यांदा तुमची बुद्धी पाहातो मी. सांगा पाहू ! राणीला देखील पाहावीशी वाटली तरी अगदी क्वचित दिसते, पण तुमच्यासारख्यांना मात्र रोज वाटेल तितक्यांदा ती गोष्ट  सहज पाहायला मिळते. अशी कोठली आहे गोष्ट?”

आनंदीबाईंनी पाच मिनिटं विचार केला. मग त्या हसून म्हणाल्या, ” राजे, आपल्याएवढ्याच योग्यतेची स्त्री, हे ह्याचं उत्तर ! महाराणीला आपल्याएवढ्याच थोर भाग्याची, आपल्यासारख्याच वैभवाची, रुपसंपदेची बरोबरी करणारी महाराणी क्वचितच दिसायची ! पण आमच्यासारख्या साध्या गृहिणींना मात्र स्वतःइतक्याच योग्यतेच्या व आर्थिक स्थितीत बरोबरीच्या असलेल्या गृहिणी रोज वाटेल तेवढ्या दिसतात. खरं ना ?”

नागराजा खूष होऊन म्हणाला, “बरोबर, मातोश्री, तुम्ही परीक्षेत उतरलात. अरे, छोट्या मुला, तू सांग आता. मी तुला विचारतो त्याचं उत्तर. ”

“जमिनीतून निघालं, मग विस्तवातून भाजून काढलं तरी मेलं नाही, उलट जीभ नाही तरी वाटेल तेवढ्या गोष्टी बोलू लागलं, असं काय आहे ?”

सगळ्यांच्या नजरा छोट्या अविनाशकडे वळल्या. नुकतीच मुंज झालेली, तेव्हा त्याचं वय होतं अवघं दहाच वर्षांचं. शाळेत पहिला नंबर होता खरा – पण ते पेपर वेगळे आणि ही तोंडी परीक्षा निराळी. पण अविनाशही तल्लख बुद्धीचा होता. खुदाकन् हसून तो म्हणाला, “ओळखलं राजे ! ते म्हणजे लोखंडाचं निब. टाकाला बसवतात ते लोखंड जमिनीतून काढून भट्टीत तापवून त्याचं निब बनवतात आणि मग ते गोष्टी लिहून सांगू शकतं ! बरोबर आहे ना ?”

“अगदी बरोबर ! काय चुणचुणीत पोरगा आहे हा ! बरं ए ताई, तू आता सांग, एका प्रश्नाचं उत्तर —

सजीव आहे पण चालत नाही, बोलत नाही. जमिनीवर ठेवलं तर उभं राहत नाही. बारा माणसांना त्याला दोर बांधूनही धरून ठेवता येणार नाही. पण माझ्या हातांत मी ते पकडून ठेवू शकतो. असं काय ?”

मीना क्षणभर गांगरली. पण थोडा विचार करून म्हणाली, “महाराज, ती वस्तू म्हणजे कोंबडीचं अंडं हीच असली पाहिजे. ”

नागराज खुषीने म्हणाला,
“छान ! बरोबर ओळखलंस हां पोरी ! ठीक ठीक. तुम्ही सगळेच चतुर दिसता. हा तरुण मुलगा तुमचा मुलगा काय ?”

“मुलगा नव्हे जावई. ”

“वा ! आमच्यात जावयांच्या वेडेपणाच्या गोष्टी खूपच आहेत. तेव्हा तुमचाही जावई वेडा आहे की काय, याचा शोध घेतलाच पाहिजे. जावईबुवा, सांगा, हं मी कूट प्रश्न विचारतो एक, त्याचं उत्तर —
तो रानात होता. मला त्यानं गाठलं. पण मी त्याला पाहू शकलो नाही. मग त्याला पहावं म्हणून मी खाली बसलो, तरी जवळ असून तो मला दिसला नाही; सापडला नाही !”
अन् तो सापडला नाही म्हणूनच मी त्याला माझ्याबरोबर घरी आणलं पण येतानाही तो मला दिसत नव्हता. तरी सारखा छळीतच होता ! असा तो कोण सांगा बरं ?”

अरविंदाची तरतरीत चर्या जराशी चिंताग्रस्त झाली. मीना पतीकडे पाहून कुचेष्टेने हसू लागली. तिकडे पहात अरविंदराव हसले आणि क्षणभराने म्हणाले, “राजे, हा तुमचा रानातला शत्रू मला सापडला बरं का ! तो तर बाभळीचा काटा ! तो रानात आपल्या पायात घुसला, मोडला, पण पाहता येईना म्हणून आपण खाली बसलात; पण तो पुरा आत गेला होता, म्हणून दिसू शकला नाही, सापडेनासा झाला ! म्हणून तो तुमच्या पायाबरोबर घरात आणलात तुम्ही, अन् रस्त्यानंही तो सारखा टोचून तुम्हाला छळीत  होताच, अन् तरीही दिसत नव्हता ! खरं की नाही ? तर असा हा बाभळीचा काटाच !”

अरविंदकडे हास्यमुखानं पाहत नागराज म्हणाला, “वा ! जावई देखील चतुर मिळाला आहे तुम्हाला. भाग्यवान आहात तुम्ही. आता फक्त तुम्हालाच प्रश्न विचारायचा राहिला. तेवढा विचारतो. आणि त्याचं उत्तर दिलंत की तुम्हा सर्वांच्याच बुद्धीची योग्य पारख मी केली असं होईल. ”

नागराजानं खूण करताच दहा जड थैल्या नोकरांनी आणून ठेवल्या. तिकडे बोट दाखवून तो म्हणाला, “सद्गृहस्था, या दहा थैल्या सगळ्या मोहरांनी भरलेल्या आहेत. त्यांपैकी नऊ थैल्यांत ख-या सोन्याच्या  मोहरा आणि एका थैलीत खोट्या मोहरा आहेत. नुसत्या दृष्टीनं पाहून मुळीच ओळखता येणार नाहीत, इतक्या बेमालूम बनवलेल्या आहेत. फक्त एक माशाचा. दर मोहरेमागे वजनात फरक आहे. या प्रत्येक थैलीत संख्येनं सारख्याच मोहरा भरलेल्या आहेत. समजलं ना ?”

आनंदरावांनी मान हलवली. म्हणाले, “ठीक. आता माझ्याकडं कोणतं बुद्धीचं काम ?” आनंदरावांचा प्रश्न ऐकून नागराजानं एक तराजू व तोळ्याची आणि माशाची वजनं समोर आणविली. मग तो म्हणाला, ” तुम्ही प्रत्येक थैलीतून कितीही मोहरा काढा; पण फक्त एकदाच त्या सा-यांचं वजन करा अन् कोठल्या थैलीत खोट्या मोहरा आहेत ते सांगा. बघू तुमची करामत. ”

“एकदाच वजन केलं पाहिजे ?”

“हो, तिथंच तर खरं बुद्धीचं चातुर्य. नाहीतर दरेक थैलीतल्या मोहरा वेगळ्या वजन करून वेडादेखील कमी वजनाच्या मोहरांची थैली ओळखील. नाही का ?”

पलीकडे एक वालुकायंत्र होतं. तिकडं बोट दाखवीत नागराज म्हणाला, ” वाटलं तर विचाराला वेळ घ्या घडीभर. ”

आनंदराव स्तब्धपणे विचार करू लागले. सा-यांच्याच नजरा त्यांच्यावर गुंतल्या. त्या नजरेत काळजीच्याही छटा होत्याच. आनंदरावांनी पाच मिनिटं विचार केला आणि [प्रत्येक थैली उघडली. पहिलीतून एक दुसरीतून दोन, तिसरीतून तीन अशा क्रमाने ते दहाव्या थैलीपर्यंत मोहरा काढीत होते. मग त्या त्यांनी मोजल्या. त्या भरल्या पंचावन्न ! ( १+२+३+४+५+६+७+८+९+१० = ५५)

नंतर शांतपणे व काहीशा हास्यमुखानं त्यांनी तराजू व वजनं घेतली. त्या मोहरांचं वजन केलं आणि हसून म्हटलं,

“नागराज, तुम्ही तर मला सर्वात अवघड कोडं घातलंत ; पण माझ्या बुद्धीनुसार मी ते सोडवलं आहेसं वाटतं. तुमची चौथी थैली खोट्या मोहरांची आहे. खरं ना ?”

“वा ! अगदी खरं ! कसं सोडवलंत तुम्ही हे कोडं ? तेवढं आमच्या या सर्व मंडळींना कळू द्या. आपणच उलगडा करा म्हणजे बरं. ”

“ऐका तर. या एकूण ५५ मोहरा होत्या. त्यांचं वजन ५५ तोळेच भरायला हवं होतं. खरं ना ? पण ते भरलं चौपन्न तोळे आणि आठ मासे म्हणजे ४ मासे कमी आले. मी दरेक थैलीतून एक-दोन याच अनुक्रमाने मोहरा काढल्या होत्या. तेव्हा एक मासा कमी असता तर पहिल्या थैलीत खोट्या मोहरा, दोन मासे कमी भरते तर दुस-या थैलीतल्या मोहरा खोट्या वजनाच्या ठरल्या असत्या. येथे ४ मासे कमी. तेव्हा चौथी थैली त्या दृष्टीने कमी वजनाची अर्थात खोट्या मोहरांची ठरली. बरोबर आहे का रीत माझी ?”

“अगदी बरोबर ! आनंदराव, तुम्ही माझ्याएवढेच बुद्धीमंत आहात ! परत भरू नका त्या मोहरा . बाहेर काढलेल्या ५५ मोहरा या सा-या तुमच्या बुद्धीचा आदर म्हणून तुम्हाला मी भेट देत आहे ! तुम्ही सर्वच चतुर मंडळी भेटलात ! आनंद वाटला. आजची रात्र मोठी चांगली गेली. अच्छा ! ” राजा उदगारला. किती तरी खूष झाला होता तो या चतुर मंडळींवर. बुद्धीची खरी किंमत चतुर माणसालाच कळायची ! त्यानं या प्रवासी मंडळींना अंथरूण -पांघरूण तर दिलंच, पण रात्रभर झोपायला ऊबदार खोली दिली आणि गरम दूधभाकरीचा पाहुणचारही केला.

सकाळी फळांनी भरलेल्या दोन करंड्या बरोबर देऊन, नागराजाने त्यांना रानाबाहेर सुखरूप पोहोचते केलं ; पण निरोप देताना तो आनंदरावांना म्हणाला, “मित्रा, तुही काही अवघड कूट प्रश्न मला विचारायला येत जा/ म्हणजे माझ्याही बुद्धीला धार चढेल मधूनमधून ! केव्हाही या, माझ्या कुटनगरीत तुमचं नेहमी स्वागतच होईल. बरं का !”

बालमित्रांनो, तुम्हाला जावंसं वाटतं का तिथं ? मग कोडी सोडवायची सवय करा पाहू आधी चांगली.

@@@

सौ. मालती दांडेकर  ( १३ एप्रिल १९११ – १४ जानेवारी १९८६ )

–  सौ. मालती दांडेकर
[कथा व चित्र  “हसायला काय झालं ?” कथासंग्रहातून साभार ]
छायाचित्र : ‘विकिपेडिया’वरून साभार
कथेतील चित्र : चित्रकार  वसंत सहस्रबुद्धे 
@@@@@@@@@@@@@@@@@
आजची कविता 
मधुकर सोनवणे 
आता थंडेची स्वागत

कोठे लोपला जल्लोष, धामधूम वाद्यवृंद |
भव्य आरास मंडप, वातावरणी आनंद ||

बाप्पा यायचे म्हणून, उत्साह नि लगबग |
सारीकडे ते चैतन्य, धावाधाव भागंभाग ||

आणायाचे मोरयाला, घराघरात चैतन्य |
सारे मदती धावती, वृद्धा येतसे तारुण्य ||

सडे अंगणी शिंपती, घर घर सजलेले  |
तुळशीच्या वृंदावना, रांगोळ्यांनी वेढियले ||

बाप्पा कधींना एकटा, सारे थव्याने जमती |
कुणी घंटानाद करी, कुणी टाळ वाजविती ||

लोपती ते जाती धर्म, सारे एकची ते होती |
स्नेहभाव सारीकडे, येता गणेशाची मूर्ती ||

सार्‍या ओठी तो गजर, बाप्पा मोरया मोरया |
रस्त्या रंगवी गुलाल. बाप्पा उत्साहे आणाया ||

आणी वाजत गाजत, येई मिरवीत स्वारी |
कुणी गाडीत, रथात, कुणी छान पाटावरी ||

सारे लोपणार आता, लोपे उत्साह पूर्वीचा |
नाकावरती फडकी, नियम तो अंतराचा ||

बाप्पा विघ्नहर्ता तूचि, विघ्न लोपुनिया यावे |
जाणतोसी तू सर्वज्ञा, तुला सारे कांही ठावे ||

आता थंडेची स्वागत, नाही मिरवणुकाही |
नाही कार्यक्रम आणि, कोठे नाही देखावेही ||

तूच संकोचिली ऊंची, आणि सारी ती भव्यता |
तूच होशील हताश , सारे गेले कोठे आता ? ||
सॅनिटायझर आधी, मग धूप उदबत्ती |
कुणा शिवायचे नाही, थंडावेल रे आरती ||

करोंनाच्या राक्षसाचा, होई जोवरी ना नाश |
जरि अंतरी उत्साह, सारे सारेची हताश ||

आरतीत प्रार्थितोचि तुवा संकटी पावावे |
फिरव ती सोंड आता, सर्वा आरोग्य ते द्यावे ||

– ©️ अण्णा
annasonavane02@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@@
‘मैत्री’च्या बालवाचकांसाठी खास स्पर्धा
प्रकाशचित्रावरून शब्दचित्र रेखाटन  
प्रिय वाचक मित्रहो,
सस्नेह नमस्कार

‘मैत्री’ अनुदिनीमध्ये आता महिन्यातून २ किंवा ३ वेळा ‘बालकुमारांचे पान’ प्रसिद्ध होत आहे. या सदराच्या माध्यमातून काही नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार संपादक मंडळाने केला आहे. ‘मैत्री’ अनुदिनी आणि ‘एरा फुड्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने बालवाचकांसाठी एक खास स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

या स्पर्धेसाठी दोन प्रकाशचित्रे ( photo )आजच्या ‘मैत्री’च्या अंकात ( या निवेदनाच्या शेवटी ) प्रसिद्ध केली आहेत. ती म्हणजे कोणत्याही एका सहलीचे ठिकाण अथवा पर्यटनस्थळ आहे. मुलांनी त्यावर कल्पना करावी की आपण या सहलीला गेलो आहोत आणि नंतर ही सहल कशी केली याचे शब्दचित्र त्यांनी रेखाटून ‘मैत्री’चे संपादक श्री. मंगेश नाबर यांच्या  ई-पत्त्यावर पाठवावे.  मुलांना हे शब्दचित्र रेखाटण्यास एक महिन्याचा अवधी दिला जात आहे. शब्दचित्र पाठवण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०२० आहे.

या स्पर्धेसाठी पुढील नियम असतील. :-
(१) आठ ते तेरा वर्षांच्या जगभरातील कुठल्याही मुलामुलींसाठी ही स्पर्धा खुली असेल.
(२) स्पर्धकाने लिहिलेले शब्दचित्र हे मराठीत असले पाहिजे. शब्दचित्र ३०० शब्दांच्या आत असावे. एका स्पर्धकाला एकच शब्दचित्र पाठवता येईल.
(३) हे शब्दचित्र स्पर्धकाच्या हस्ताक्षरात असले तरी चालेल किंवा त्याने तोंडी वर्णन केल्यावर आईवडील किंवा आजोबा आजी यांनी युनिकोडमध्ये टंकून – वर्ड डॉक्युमेंटमध्ये ते शब्दचित्र पाठवलेले असावे.
(४) स्पर्धक आपल्या हस्ताक्षरातील शब्दचित्रे jpg या माध्यमातून पाठवू शकतात. मात्र पी डी एफ शब्दचित्रे स्वीकारण्यात येणार नाहीत.
(५) सर्व शब्दचित्रे ‘मैत्री’च्या संपादकांकडे ईमेलने mangeshnabar@gmail.com  या ई-पत्त्यावर पाठवण्यात यावी. त्यांवर स्पर्धकाचा निवासाचा संपूर्ण पोस्टाचा पत्ता, ईमेल आयडी (असल्यास) किंवा प्रेषक पालकांचा ईमेल आयडी, दूरध्वनी / मोबाईल क्रमांक ही माहिती आणि स्पर्धकाच्या वयाबाबत प्रेषकांकडून स्पष्ट शब्दात खुलासा केला गेला पाहिजे. शब्दचित्राबरोबर ही माहिती नसल्यास ते स्वीकारले जाणार नाही.

या स्पर्धेसाठी ‘मैत्री’ परिवारातील ज्येष्ठ सदस्य श्रीमती मृदुला प्रभुराम जोशी या माननीय परीक्षक असतील. त्यांनी निवडलेल्या पहिल्या तीन क्रमांकांची शब्दचित्रे ‘मैत्री’तून सन्मानपूर्वक प्रसिद्ध करण्यात येतील. परीक्षकांचा निर्णय अखेरचा आणि या स्पर्धेत भाग घेणा-या सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल. त्यासंबंधात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

वरील स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून ‘एरा फुड्स’चे देवेंद्र रमेश राक्षे यांनी जबाबदारी घेतली आहे. यशस्वी स्पर्धकाला ‘एरा फुड्स’तर्फे विशेष भेटवस्तूच्या रूपाने पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल. बक्षीसरूपाने देण्यात येणा-या भेटवस्तू या ‘एरा फुड्स’तर्फे श्री. देवेंद्र रमेश राक्षे पाठवतील व त्याबाबत सर्व जबाबदारी त्यांची असेल. स्पर्धेच्या भेटवस्तूंबाबत अथवा इतर कोणत्याही तक्रारीबाबत ‘मैत्री’ अनुदिनीचे संपादक मंडळ जबाबदार असणार नाही याची देखील नोंद घ्यावी.

‘मैत्री’च्या चोखंदळ वाचकांनी तसेच अन्य रसिक मित्रांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग घ्यावा हे ‘मैत्री’ अनुदिनीच्या वतीने अगत्याचे आवाहन.

धन्यवाद.

आपला,

मंगेश नाबर
(संपादक, ‘मैत्री’)

१. आयफेल टॉवर, पॅरिस, फ्रान्स

 

 

२. नायगारा धबधबा, ऑन्टॅरिओ, कॅनडा

@@@@@@@@@@@@@@@@
बालवात्रटिका 

अमितेय 
१.
बाबांची फजिती 
 

एक होती मुंगी
तिला दिसली लुंगी
लुंगीत जाऊन बसली
कडकडून डसली

बाबा उठले ओरडत
होते लुंगी झटकत
घरभर नाचले
नाचून नाचून दमले

अखेर आईचे ऐकले
एका जागी थांबले
मुंगी पडली टपकन्
आई हसली खुद्कन्

– ©️ अमितेय 

@@@@@@@@@@@@@@@@@@@
चंदूची बाग 

 

कै. ना. ग. गोरे

चंदू हुषार होता, चपळ होता, आनंदी होता ; पण भारी वांड होता. त्याचे वडील महापालिकेच्या कोठल्यातरी एका खात्यात कारकून होते. त्यांना महापालिकेने स्वतःच्या नोकरवर्गासाठी बांधलेल्या वसाहतीत दोन खोल्यांचे घर मिळालेले होते. ती वसाहत शहराच्या कडेला होती. शेजारी ओढा होता. दुसरीकडे सुखवस्तू लोकांचे बरेच बंगले होते. त्याच्या पुढे गेले की बंगल्यांकडे जाणारा राजमार्ग लागे आणि तेथून पार — दृष्टी पोचेस्तोवर शेतजमीन होती. त्या शेताडीत पोचले म्हणजे इतका वारा अंगावरून जायचा की आंघोळ केल्यासारखे वाटे. शेताच्या बांधांना केकताडाच्या रांगा असत. त्यांत एखादेवेळी मधाचे पोळे सापडे. पिवळी गोंडेदार फुले असलेल्या बाभळी असत. त्यांच्या वासाने ऊर भरून घ्यावा असे वाटे. मध्येच एखाद्या जांभळीच्या झाडावर शेपटी उडवीत चक्रर चक्रर आवाज करणारी इटकुलीशी खार असे. तिला पकडून तिची शेपटी कापून आणण्याकरिता चंदू तासन् तास झाडो-यात लपून बसे.

वसाहतीमधल्या एखाद्या बि-हाडाच्या माळ्यावर मांजरी व्याली असली तर तिची पिल्ले अलगद काढून खाली आणणे म्हणजे चंदूच्या हातचा मळ होता ! गच्चीवर पतंग अडकला तर नळावरून चढून चंदू तो पटकन काढून आणी. ओढ्यापलीकडच्या बंगलेवाल्यांच्या वसाहतीमध्ये कोणाकडे पपये पिकू लागले आहेत, कोणाच्या पेरूंना पाड लागला आहे, याची बित्तंबातमी चंदूला असे. त्यामुळे चंदू आपल्या सवंगड्यांत फार लोकप्रिय होता. शेजा-या -पाजा-यांच्या बायकांनाही चंदू आवडायचा, कारण गौरीगणपती असोत, मंगळागौरी असोत, त्यांना लागणारी सगळी पत्री फुले चंदू आणून द्यायचा. चंदूला स्वतःला देखील फुलांची आवड होती. पावसाळ्यात सगळ्या बंगल्यांतून नाना जातींची आणि रंगांची फुले फुललेली असत. ती पाहून, हुंगून चंदू भारावून जाई. चंदूच्या वसाहतीमध्ये फुलझाडे नव्हती. लावली तर ती कोणी टिकू देत नसे. पण एक भला मोठा डेरेदार गुलमोहोर होता. तो वर्षातून एकदा हिरव्याजर्द नाजूक पानांनी गरगरून जाई आणि एखाद्या कोंबड्याच्या डोक्यावरील तू-यासारख्या तांबड्यालाल फुलांनी बहरून जाई. त्याची ती दोन्ही रूपे चंदूला फार आवडत.

श्रावण-भाद्रपद आले की चंदूची झोप उडून जात असे. हे दोन महिने म्हणजे फुलांच्या उधळणीचे, पखरणीचे महिने. या दोन महिन्यात सृष्टी हिरवी साडी नसते. हिरवे चुडे लेते. जाई जुईच्या गज-यांचा  शृंगार करते. हातांत कमळे धरते. केसांत केवडा खोवते. चंदू त्या काळात तांबडे फुटता फुटता उठायचा, कोप-यावरच्या दूध केंद्रावर बाटल्या वाजू लागल्या की मांजरासारखी मुटकुळी करून पडलेला चंदू झटकन अंथरुणावरून उठे. भसाभस दोन चुळा खळखळून टाकी आणि जाळीला अडकवलेली दोन हात लांबीची आकडी आणि भली थोरली पिशवी घेऊन ओढ्यापलीकडच्या वसाहतीत दाखल होई. कुठे एखाद्दुस-या बंगल्यात कुत्रे असत. पण त्यांची चंदूला भीती वाटत नसे. ते सगळे त्याचे दोस्त बनले होते ! कोणाचे नाव टायगर आहे, कोणाचे शेर्पा, कोणाचे मोती ते चंदूला पाठ होते. ज्या बंगल्यावर पहारेकरी असत, ते मात्र चंदू टाळीत असे. पण कुत्रे असोत, की पहारेकरी असोत, कुंपणाच्या बाहेर पडलेल्या फुलांची राखण कोणीच करीत नसे. जो कोणी तेथे पहिला पोचेल, तो त्या फुलांचा मालक ! चंदूला रातराणी पसंत पडे. तिचे झुबकेच्या झुबके परगावकरांच्या कंपौंडवरून बाहेर लोंबत असायचे. रातराणीच्या खालोखाल नंबर जाईजुईचा. पहाटेच्या अंधारात त्यांची पांढरी शुभ्र फुले दिसत मात्र चटकन; पण ती भारी लाजरी. सहसा कुंपणाची हद्द ओलांडायची नाहीत. त्यांना बाहेर खेचून आणायला आकडीचा प्रयोग करावा लागे. पण दान करावे तर प्राजक्ताने. “परडी परडी फुले ! तुझ्यान् वेचवेनात माझ्यान् वेचवेनात — ” असा एक उखाणा चंदूची बहीण त्याला घाली. त्याचे उत्तर होते, ‘ पण चंदूला वाटे की प्राजक्त. हेसुद्धा त्याचे उत्तर असायला काय हरकत असावी ? रोज पहाटे आपल्या धरतीमातेची अशी पूजा करणारे सुपुत्र दोनच. एक प्राजक्त आणि दुसरा बकुळ. तिसरी आहे ती मुलगी, सुरंगी.

चंदूला तांब्यांच्याकडचा प्राजक्त फार आवडे. प्राजक्तसुद्धा सगळे सारखे नसतात. तांब्यांच्याकडच्या प्राजक्ताची फुले टपोरी, स्वच्छ, पांढरी असत. स्वस्तिकासारख्या त्यांच्या पाकळ्या छानदार मुडपलेल्या असत. त्यांचा देठ लांबसर, पोवळ्याच्या रंगाचा असे. पाकळ्या स्पर्शाला मऊ, पण दिसायला टकटकीत दिसत. त्या प्राजक्ताच्या कळ्यांची अब्दागिरी चंदूने मंगळागौरीच्या वेळी कितीतरी पोरींना करून दिली असेल. चंदू फक्त रातराणीचे झेल किंवा प्राजक्ताची फुलेच आणीत होता असे नाही. तो आपल्या आकडीने जास्वंदीची बचक्याएवढाली लाललाल फुले, नाजूक, पिवळी सोनचाफ्याची फुलेही ओढीत असे. सामसूम बागेच्या भिंतीवरून आत उतरायला आणि गुलाब, ग्लाडीओला, निशिगंधावर डल्ला मारायला तो कमी करत नसे. कधी माळ्याच्या शिव्या खाव्या लागत, तर कधी कानशिलाखाली कोणाची चार बोटेही उमटत. या वेळी तसाच प्रकार घडला म्हणा किंवा घडायचे थोडक्यात बचावले म्हणा. घडले असे :

त्या दिवशी रविवार होता. हवेत गारठा होता. वेळ पहाटेची जरी नाही, तरी सकाळची होती. धुके पातळसर पसरलेले होते. गवतावरचे दव पावले भिजवीत होते. चंदूने पाटलांच्या गंधमादन बंगल्यातल्या फुलांनी लादलेल्या निशिगंधाच्या छड्यांचा वाफा आदल्या दिवशी सायंकाळीच हेरून ठेवला होता.एवढ्या सकाळी पाटलांच्या बागेत कुत्रेसुद्धा भेटणार नाही आहे चंदूचा कयास,म्हणून एका झेपेत चंदूने भिंत ओलांडली आणि तो अलगद पलीकडच्या हिरवळीवर उतरून सरळ निशिगंधाच्या वाफ्यात शिरला. झपाझप हातातल्या ब्लेडने त्याने दहावीस निशिगंधाच्या छड्या कापल्या आणि परतण्याच्या तो बेतात होता. इतक्यात सद-याचे मागचे शेपूट कुणी तरी जोराने खेचते आहे, असे त्याला भासले. झटक्यात तो मागे वळला आणि चंदूची वाचाच बसली ! तो महाभयंकर कुत्रा पुढच्या क्षणी आपले नरडे फोडणार, असे त्याला वाटले. पण तेवढ्यात त्याचे मनगट कोणीतरी पकडले आणि कोणाचा तरी करडा आवाज आला, “जॅकी, सोड त्याला. ”

“घाबरू नको. जॅकी काही करणार नाही तुला. बंगल्यात चल, ” पुन्हा तोच आवाज. पण कुत्र्याच्या तावडीतून आपण सुटलो याचेच चंदूला हायसे वाटले. त्याचे मनगट पकडणारा माणूस म्हणजे स्वतः रावसाहेब पाटीलच होते. पण ते काही आपल्याला चावणार नाहीत याची चंदूला खात्री होती.

बंगल्यात पाऊल टाकल्यावर रावसाहेब म्हणाले, “बैस तिथे त्या खुर्चीवर. कोण तू ?काय नाव तुझं ? शाळेत जातोस कीर नुसत्या उनाडक्या करतोस ?”

एका पाठोपाठ गोळ्या सुटाव्या तसे प्रश्न. पण पाटलांचा आवाज बराच मऊ झाला होता. चंदूला जरा धीर आला. पण रावसाहेबांनी दोन कानशिलात भडकवण्याऐवजी प्रश्न विचारले, त्यामुळे आपल्याला रडू येणार की काय, असे चंदूला वाटले. पांगून गेलेला धीर पुन्हा गोळा करून चंदू म्हणाला, “महापालिकेच्या वसाहतीत राहतो मी. शाळेत जातो. पाचवीत आहे, ” बळ करून चंदू कळवळून बोलला. “मला जाऊ द्या. परत असं करणार नाही. मारुतीची शपथ. ”

रावसाहेब आता मनमोकळेपणी हसले. त्यांनी विचारले, “एवढी भाराभर फुलं कशाला नेट होतास आज ? आणि भिंतीवरून आत येऊन ? गणपती तर केव्हाच  संपले. ”

“माझी बहीण आजारी आहे. तिच्यासाठी. ”

“तिच्या अंथरुणाभोवती काय मखर बांधायचा विचार होता की काय ?”

“मी कुठल्यातरी हॉस्पिटलात रोग्याच्या जवळ तशी फुलं ठेवलेली पाहिली होती. मला वाटलं, ताईसाठी तसं करावं म्हणजे ती लवकर बरी होईल. ” चंदू भाबडेपणाने बोलून गेला.

“काय होतंय तुझ्या बहिणीला ?”

“ताप येतोय. आठ दिवस झाले. ”

“एवढी तिला आणि तुला फुलांची आवड, तर घरी फुलझाडं का लावीत नाही ?”

“आमच्याकडं  कुठाय जागा ?”

“त्याचं बघता येईल. पण तू आता जा. परत भिंतीवरून यायचं नाही. समजलं ?”

चंदूने रावसाहेबांना नमस्कार केल्यासारखे केले आणि झपाझप पावले उचलीत तो घराकडे निघाला. त्याचे कानशील थाड थाड उडत होते. शरमेने तो मेल्याहून मेला झाला होता. त्याची सगळीकडून फजिती झाली होती. फुले तर मिळाली नाहीतच पण माळ्याला हुलकावण्या नाहीत, मार नाही, शिव्या नाहीत. छे छे असा फज्जा कधी उडाला नव्हता. चंदूला वाटले, रावसाहेबांनी पार जिरवली आपली.

पण सायंकाळी आणखी काही घडायचे होते. चंदूची आई व्हरांड्यात काही तरी निवडीत बसली होती. त्याचे वडील कचेरीतुन आल्यावर चहा पिऊन खुर्चीत जरा टेकले होते. ताई अजूनही तापातच होती. आणि चंदू खोक्याच्या कपाटांत काही  तरी धुंडाळीत होता. एवढ्यात चंदूची चौकशी करीत कोणी तरी आले. त्याच्या हातात निशिगंधाच्या तीन चार छड्या आणि डोक्यावर दोन कुंड्या होत्या. त्याला पाहून चंदूची आई म्हणाली, “चंदू इथेच राहतो. काय काम आहे त्याच्याकडे ?”

“ताई, पाटील रावसाहेबांनी ह्ये पाठवलंय चंदूसाठी. ते घेऊन आलो. ” तेवढे बोलणे होते आहे तेवढ्यात पाठोपाठ रावसाहेब स्वतः दाखल झाले. त्यांना पाहून चंदूचे धाबेच दणाणले. त्याचे वडीलही, “या रावसाहेब, “म्हणत व्हरांड्यात आले. पण ते देखील गांगरले होते. रावसाहेबांनी सरळ आत येत विचारले,

” चंदू, काय म्हणतेय तुझी ताई ? तिला फुलं हवीत ना ? पाणी घालून एखादा गंज नाही तर तांब्या ये घेऊन. शिवराम, ते निशिगंध दे इकडे. आणि त्या कुंड्या ठेव व्हरांड्यात उन्हाच्या बाजूला. ”

रावसाहेब सकाळी जसे प्रश्न ताडताड करीत होते, तसेच आताही बोलत होते. चंदूच्या आईने पाणी भरून गंज आणला तो घेऊन रावसाहेबांनी त्यांत निशिगंधाचे गुच्छ उभे केले. मग ती फुलदाणी चंदूच्या हाती देत ते म्हणाले,

“ठेव ती ताईच्या जवळ स्टुलावर. तिने डोळे उघडले की तिला निशिगंधाचे गुच्छ दिसायला हवेत ना ? आणि त्या कुंड्यात लावायला हे निशिगंधाचे कांदे. ते कसे लावायचे ते शिवराम दाखवेल तुला. तीन दिवसांनी पाणी देत जा. आणि फुलं आली की सांगायला ये मला. अरे हो, आणि ही दोन कलमं बोगनवेलीची. मेरी पामर जातीची आहेत. एकाच वेलावर पांढरी आणि तांबडी दोन रंगांची फुलं येतील. व्हरांड्याच्या खांबापाशी थोडा खड्डा घे नि त्यात लाव हे दोन फाटे. त्याला खतपाण्याची गरज नाही. अधून मधून पाणी देत जा की झालं. काटे असतात तेव्हा शेळीबिळी खाईल अशी भीती नाही. बघतो आता रोपं कशी वाढवतोस ते. आपल्या हातांनी वाढवलेल्या रोपांची फुलं पाहण्यात मजा. दुस-याची ओरबाडण्यात मजा कसली ?”

हे सगळे एवढे झपाट्याने झाले की रावसाहेब पाटील आपल्या वडलांना “बराय येतो, ” म्हणून चालू लागले. तरी चंदूला त्याचा पत्ता नव्हता. इतका तो या अनपेक्षित प्रकाराने गडबडून गेला होता. किती तरी वेळ ताईच्या उशाशी ठेवलेल्या त्या ऐटदार निशिगंधाकडे पाहात बसला होता.

त्या रात्री चंदूला स्वप्न पडले, ते कुंड्यातून सरळ काढलेल्या, फुलांनी डवरलेल्या निशिगंधाच्या छड्यांचे आणि तांबड्या पांढ-या झुबक्यांनी व्हरांड्यात लावलेल्या बोगनवेलीचे !

कै. ना. ग. गोरे
[ गोष्ट आणि चित्रे : ‘किशोर‘ जानेवारी १९७३ वरून साभार ]
छायाचित्र : ‘विकिपेडिया‘वरून साभार
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

अज्ञात
११.
अखंड गती

सूर्य, चंद्र व इतर ग्रह -तारे हे अखंडपणे फिरत आहेत. या अखंड गतीचा एक अतिशय मजेदार प्रयोग आपल्याला करता येईल. त्यासाठी आपल्याला बरणीचे एक मोठे गोल बूच, बाटल्यांची चार छोटी बुचे. दोन सारख्या लांबीच्या खराट्याच्या काड्या आणि कापराच्या चार वड्या एवढी सामुग्री लागेल. या वस्तू तुम्हाला अगदी सहज मिळण्यासारख्या आहेत.

प्रथम मोठे बूच ( फार मोठे असेल तर ) अर्धे कापा व आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्याला भोके पाडून त्याच्या मध्यातून खराट्याच्या काड्या आरपार काढा. बुचाच्या मध्यावर या काड्यांचा बरोबर काटकोन होईल, अशा रीतीने या काड्या बुचामधून काढल्या पाहिजेत. नंतर काड्यांच्या चार टोकांना चार छोटी बुचे खोचा. या बुचांना एका बाजूस अगोदर चाकूने किंवा ब्लेडने चिरा पाडून घ्याव्यात आणि त्यांत कापराच्या वड्या खोचून घालाव्यात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे कापराच्या वड्या बुचांच्या  एका बाजूस येतील, अशा रीतीने खोचल्या पाहिजेत. त्या समोरासमोर येता कामा नयेत.

आपले चक्र आता तयार झाले. आता एका टबात थंड पाणी भरा आणि हे चक्र त्यावर अलगद सोडा. आता काय गंमत होते पहा ! पाण्यात सोडल्याबरोबर आपले चक्र आपोआप गोलगोल फिरू लागेल. ते थांबणारच नाही. एक-दोन दिवस ते असे आपोआप फिरत राहील. ते फिरण्याचे थांबले तर कापूर संपला असे समजावे.

आपण जे चक्र तयार केलेत ते पूर्णपणे समतोल होण्याची खबरदारी घेण्यावर या प्रयोगाचे यश अवलंबून राहील, हे लक्षात ठेवा. बाहेरची बुचे सारख्या आकाराची असली पाहिजेत. त्याचप्रमाणे कापराच्या वड्याही सारख्या आकाराच्या व विजांच्या असणे आवश्यक आहे.

@@@

१२.
ध्वनी लहरींचा प्रयोग

आवाजाच्या लहरी एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जातात आणि म्हणून आपल्याला आवाज ऐकू येतो, ही गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे. रेडिओच्या मिडीयम (मध्यम ) , शॉर्ट ( आखूड ) आणि लॉंग (लांब ) अशा तीन ध्वनिलहरी असतात, हे तर तुम्हाला माहीत आहे. ध्वनीच्या लहरी असतात व एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी त्या प्रवास करतात, हे तुम्ही सिद्ध करू शकाल. त्यासाठी पुढे दिलेला मनोरंजक प्रयोग करा.

तुमच्या खोलीत मधोमध एक दोरी बांधा. धुणी वाळत घालायला दोरी बांधतात, तशी ही दोरी बांधावी. या दोरीवर एक रेशमाचा हातरुमाल पिनांनी अडकवून बांधा. या हातरुमालापेक्षा रेशमाचा अधिक मोठा असा एखादा कपडा घरात असेल तर तो आपला प्रयोग जास्त चांगला होईल. हा फडका दोरीवर टांगल्यानंतर तुम्ही या फडक्याच्या मधोमध पण त्यापासून एक इंच अंतर ठेवून उभे राहा. तुमचा कान फडक्याच्या बाजूस आला पाहिजे. नंतर तुमच्या एखाद्या मित्रास तळहातावर एक फुलपात्र घेऊन फडक्याच्या  दुस-या बाजूस उभे राहायला सांगा. मित्रास फुलपात्राच्या कडेवर एक अगदी बारीकशी टिचकी मारायला सांगा. फुलपात्राची ही किणकिण तुम्हाला अगदी स्पष्टपणे ऐकू येईल.

नंतर रेशमाचा फडका पाण्यात भिजवून पूर्वीप्रमाणे दोरीवर टांगता ठेवा आणि मित्रास पूर्वीप्रमाणेच फुलपात्रावर बारीकशी टिचकी मारायला सांगा. आता तुम्हाला फुलपात्राची किणकिण अगदी अस्पष्टपणे ऐकू येईल किंवा ऐकूसुद्धा येणार नाही.

आवाजात असा फरक का पडतो? याचे कारण असे की रेशमाचा फडका सुका होता तेव्हा टिचकी मारलेले फुलपात्र आणि तुमचा कान यांमध्ये फक्त हवाच होती. या वेळी ध्वनीच्या लहरींना कोणताच अडथळा न झाल्याने त्या तुमच्या कानापर्यंत सरळ येऊन पोचल्या. फडका पाण्याने भिजवल्यानंतर फुलपात्र आणि तुमचा कान यांमध्ये हवा, पाणी आणि हवा असे आले. ध्वनीच्या लहरी पाण्यापर्यंत पोचल्यावर त्या मागे परावर्तित झाल्या आणि विरून गेल्या. त्यामुळे तुम्हाला अस्पष्ट असा आवाज ऐकू आला. आहे आवाजसुद्धा फडक्याच्या दोन्ही कडांच्या पलीकडून आलेल्या हवेतील लहरींमुळेच तुम्हाला ऐकू येऊ शकला.

@@@

१३.
तुमचा आवाज कसा दिसतो ?

आवाज कसा दिसतो ? तुम्ही म्हणाल नक्कीच काही तरी चूक झाली आहे. आवाज दिसणे असे म्हणणे चूक तर खरीच. तरीसुद्धा एक सोपा प्रयोग करून आवाज आकृतीच्या रूपाने दाखवता येतो.

या प्रयोगासाठी एक मोठा टिनचा गोल डबा हवा. घरात असा एखादा निरुपयोगी डबा नक्कीच असेल. या डब्याच्या एका बाजूस मध्यभागी एक गोल भोक पाडा. डब्याचे झाकण काढून टाकून त्यावर शक्यतर खळीने एक ऑइल पेपर घट्ट ताणून बसवा. वाण्याचे किंवा इतर सामान अशा कागदांत बांधून येते. तसेच आई लोणच्याच्या किंवा मुरांब्याच्या बरण्यांची तोंडे घट्ट झाकून घेण्यासाठी असा कागद आणीतही  असेल. डब्यास पाडलेल्या भोकात रबराची किंवा प्लॅस्टिकची सुमारे एक दीड फूट नळी बसवा आणि नळीच्या बाहेरच्या टोकास काचेचे किंवा प्लास्टिकचे नरसाळे घट्ट बसवा. डब्याच्या तोंडावर लावलेल्या कागदावर थोडी सुकी रेती पसरा.


आपला ” ध्वनि मुद्रक ” तयार झाला. आता नळीला लावलेले नरसाळे तोंडाशी धरून एक चांगल्यापैकी स्वर काढा. तुम्ही आवाज करत असता, तेव्हा डब्यावरची रेती उडेल आणि तिची एक विशिष्ट आकृती तयार होईल. ही आकृती म्हणजे तुमच्या आवाजाचे चित्र होय. तुमचा स्वर ओसरत जाऊन शेवट गाठतो, तेव्हा तुमच्या आवाजाची ‘आकृती’ मोडून बिघडण्याची शक्यता असते. म्हणून आवाज मोठा असतानाच तोंड दूर घ्यावे.

दुस-या माणसाने आपले ‘ध्वनिमुद्रण’ करण्यापूर्वी डब्यावरची रेती पुन्हा नीट करावी. दोन चार वेळा नळीमधून आवाज काढल्यानंतर किती रेती ठेवावी, हे तुमच्या सहज लक्षात येईल. अय प्रयोगावरून तुम्हाला असे दिसून येईल की कोणाही दोन माणसांच्या आवाजाची ‘आकृती’ सारखी नाही. प्रत्येक माणसाच्या बोटाचे ठसे जसे वेगळे तशीच त्याच्या आवाजाची ‘आकृती’ पण वेगळी. आहे की नाही गंमत ?

– लेखक अज्ञात
[ लेख व चित्रे : ‘किशोर‘ जून १९७२ वरून साभार ]

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^ 
चित्रकारांचे दालन 
किया नंदन कामत, वय वर्षे १०. पुणे
प्रेषक ©️  सौ. रूपाली कामत 

किया नंदन कामत, वय वर्षे १०. पुणे

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
मधुबनी कला
– ©️  सौ. रुपाली कामत  
  rupali.kamat@gmail.com  
@@@@@@@@@@@@@@@
महत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@@@@@

6 thoughts on “विचित्र कोडी

  1. आजचा अंक बालगोपालांनी नक्की वाचावा इतका सुंदर झाला आहे
    कोडी घालणाऱ्या सुविद्य मालती बाई ते सुट्टीतील उद्योग पर्यंत सारेच छान छान
    अण्णांची कविता वाचून म्हणावेसे वाटते
    आमच्याच मनांतील विचार, धन्य झालो वाचुनि
    नक्कीच हरतील दुःख बाप्पा ,असो विश्वास मनीं
    अण्णा..कविता आवडली
    अमितेय (कोण आता कळलेय .हं. ) जींची बालांना पाठ करावीशी वाटणारी आहे कविता.
    कै. गोरे यांच्या चंदूची बाग फुलू दे .असे रावसाहेब सर्वांना मिळोत.
    कियाचे रंग ज्ञान उत्तम आहे खूप शुभेच्छा. सौ.रुपाली ताईंची मधुबनी
    कला प्रशंसनीय.

  2. सौ. (कै.) मालती दांडेकर यांची वेगळ्याच प्रकारची गोष्ट आहे आवडली .
    कै. ना. ग. गोरे चंदूची बाग ही जुनी गोष्ट आजही नवी वाटते 
    श्री अज्ञात यांचे सुट्टीतील उद्योग छान आहेत 
    चित्रकारांच्या  दालनातील  : किया कामत, प्रेषक सौ. रुपाली कामत, मधुबनी कला – सौ. रुपाली कामत  यांच्यामुळे बाल अंक छान सजला आहे  

  3. अंक वाचला. छान आहे. मालतीबाईंची बालपणी वाचलेली हिरा आणि गारगोटी कादंबरी अजून आठवते. इतका तेव्हाच्या आमच्या पिढीवर प्रभाव होता त्यांचा. त्यांनी कोडी उत्तरांसकट दिली आहेत गोष्टीत. मजा वाटली.
    सोनवणेजींची कविता सद्यस्थितीचं छान वर्णन करते.
    मुंगी कवितेत अमितेयजींचा वात्रटिका चांगलाच लक्षात राहील.
    चंदू च्या गोष्टीत तेव्हा माणूस किती भरभरून निसर्गावर प्रेम करत होता हे दिसून येतं. ना. ग. गोरे यांनी मुलांसाठीही लेखन केलं होतं हे ठाऊक नव्हतं. धन्यवाद नाबर जी.
    अज्ञात यांचे हे प्रयोग करून बघण्यासारखे आहेत.
    मुलीचं व आईचं (का आजीचं?) चित्र एकाच अंकात बघण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा योग जुळवून आणणा-या संपादकांचे आभार. दोन्ही चित्रं आवडली.

  4. मुलांचा हा अंक फारच छान आहे. मालती दांडेकरांची कथा आणि न ग गोरे यांचा चंदू अप्रतिम.

  5. मुलांना कोडी घालत, त्या कोड्यांची उत्तरे देत जाणारे कथानक हे मालतीबाई दांडेकरांच्या कथेचे वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. तसेच या अंकातील ना. ग. गोरे यांची कथा मुलांना एक महत्वाचा संदेश देऊन जाते तो हा की, लपून छपून किंवा चोरी करून मिळवलेल्या आनंदापेक्षा स्वत: एखाद्या गोष्टीची निर्मिती करण्यात जो आनंद आहे तो तुम्हाला जागेपणी आणि स्वप्नातही अनुभवता येईल. या अंकातील विज्ञानाचे प्रयोग देखील मुलांना आवडतील असेच आहेत. अंकातील दोन्ही चित्रे छान रेखाटलेली आहेत.

यावर आपले मत नोंदवा