मृत्युंजयाच्या सावलीत

वाडवडिलांची पुस्तके [ ९ ]

मुकुंद नवरे


( पूर्वार्ध )

 

‘ मृत्युंजयाच्या सावलीत ‘ हे सौ. शांताबाई माडखोलकर यांच्या अकाली संपलेल्या जीवनपटावरील पुस्तक त्यांची कन्या सौ. मीनाक्षी फडणीस यांनी संपादित केलेले आहे. १८ ऑगस्ट १९५० रोजी शांताबाईंचे निधन होऊन दोन तपे उलटल्यावर फेब्रुवारी १९७४ मध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले; त्यासही आता सेहेचाळीस वर्षे उलटून गेली आहेत. विजय प्रकाशन, नागपूर यांनी प्रकाशित केलेले हे पुस्तक आता दुर्मीळ असून माझी आई सुधा नवरे हिने स्वत:ची स्वाक्षरी करून १ /४/ ७४ ही तारीख घातलेली प्रत आता माझ्याकडे आहे. या एकाच पुस्तकातून वाचकाला शांताबाई माडखोलकर यांचा संपूर्ण परिचय घडतो आणि तो परिचय त्यांची कन्या मीनाक्षी आणि ‘तरूण भारत’कार ग. त्र्यं. उपाख्य भाऊराव माडखोलकर हे त्यांचे पती करून देतात. एवढेच नव्हे तर शांताबाईंना झालेला जीवघेणा आजार आणि त्या कालखंडातून जाताना घरातील सर्वच व्यक्तींच्या जीवाची झालेली तगमग आणि त्याबाबत इतर सुहृदांनी सांगितलेल्या आठवणी वाचून मन हेलावून गेल्याखेरीज राहत नाही.

या पुस्तकात भाऊरावांनी  ‘वचनपूर्ति’ म्हणून लिहिलेले प्रास्ताविक आणि ‘ कल्याणी ‘ या शीर्षकाचा तब्बल ६७ पृष्ठांचा लेख असून स्वत: मीनाक्षीने संपादिका म्हणून लिहिलेले ‘निवेदन’ आणि ‘ महाकालाचा कौल ‘ हा २७ पृष्ठांचा लेख आहे. अभिवादन म्हणून सून सौ. उमा माडखोलकर, पुत्र चंद्रशेखर आणि घरातील जणू सदस्य असलेले सुनील सुभेदार यांची मनोगते आहेत. तसेच माडखोलकरांच्या घरात कधी अंतेवासी विद्यार्थी म्हणून राहून गेलेले माधवराव पारधी (( निवृत्त उपसंचालक, केंद्रीय वार्ता विभाग, दिल्ली ) यांचा ३७ पृष्ठांचा प्रदीर्घ लेख आहे. उर्वरित १२७ पृष्ठांमधे ‘ अशा होत्या शांताबाई ‘ या भागात १३ सुहृदांनी शांताबाईंबद्दल आठवणी सांगितल्या आहेत तर ‘ आप्त-मैत्रिणींच्या दृष्टीतून ‘ या भागात २१ स्त्रियांनी शांताबाईंबद्दल वाटणाऱ्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.

एखाद्या व्यक्तीचे निव्वळ चरित्र सादर केले तर ते कधी एकांगी ठरते; अतिशयोक्तीला कारण होते तर कधी त्यात कमालीचे उदात्तीकरण होते आणि तसे घडू नये म्हणून आपण सुहृदांच्या आठवणींवर भर दिला असल्याचे संपादिका निवेदनात नमूद करते. तसेच  सर्व पृष्ठावर ‘ माझी आई ‘ हे नाव असणे आणि वेष्टनावर ‘ मृत्युंजयाच्या सावलीत ‘ हे नाव असणे, यातील आश्चर्य दूर करताना भाऊरावांनी  पुस्तकाची टायटल पेजे पाहिल्यावर दर्शनी पृष्ठासाठी दुसरे नाव दिल्याचा खुलासा निवेदनात केला आहे. त्यानुसार दर्शनी पृष्ठाला समर्पक असे वेष्टन प्रकाश कावळे यांनी चितारले असल्याचे दिसते.

‘ वचनपूर्ति ‘ या प्रास्ताविकात भाऊराव १९४३ च्या फेब्रुवारीत घडलेल्या प्रसंगाचे वर्णन करतात. त्यावेळी अस्थिक्षयाच्या दुखण्यातून शांताबाई थोड्या सावरल्या होत्या आणि त्यांना नागपूर जवळ चिचभुवन येथील स्वत:च्या शेतबंगल्यावर नेऊन ठेवले होते. त्यावेळी रात्री दोघे चांदण्यात फिरताना शांताबाई मरण आणि मरणोत्तर गती यावर बोलत असे आणि यावर ते नेहमी आक्षेप घेत असत. पण एकदा शांताबाईंनी त्यांना पटवून दिले की ‘ भाऊरावांची आई, थोरली आई, दोन सावत्र बहिणी, आजी, आणि दोन आत्या या सगळ्या ऐन तारूण्यात गेल्या होत्या आणि तोच प्रसंग आपल्यावर येईल असे शांताबाईंना वाटत होते. म्हणून आपल्या दोघांची जीवनकहाणी तुम्ही लिहायची, आपलं सगळं आयुष्य, विचारांची आणि वागण्याची पद्धत, आपला संसार हे सारं इतरांपेक्षा अगदी निराळं आहे म्हणून अशी कथा लिहायला मी वाचले नाही तर, कथा तुम्ही लिहायची ‘ अशी गळच त्यांनी भाऊरावांना  घातली आणि तसे वचन त्यांच्याकडून घेतले. आता तीस वर्षांपूर्वी शांताबाईंनी दिलेले हे वचन पूर्ण करण्याचा सुयोग जानेवारी १९७४ मध्ये आल्याबद्दल ते समाधान व्यक्त करतात आणि ते वचन पुरे केल्यामुळे, वार्धक्य आणि व्याधी यांनी गेल्या तीन वर्षात जर्जर केलेल्या या निकामी शरीराच्या पाशातून भगवंताने आता ताबडतोब मुक्त करावे अशी अनन्यभावाने प्रार्थना करतात.

‘ महाकालाचा कौल ‘ या लेखात मातोश्रींसाठी  ‘बाई’ हे संबोधन तीन पिढ्यांपासून माडखोलकर घराण्यात असल्याचा उल्लेख आहे. त्यानुसार शांताबाईंना सगळे जण फक्त ‘ बाई ‘ म्हणूनही संबोधत असत. बाईंचे वडील विश्वनाथ महादेव ऊर्फ दादा नवाथे हे मूळचे  साताऱ्याजवळच्या महागावचे. ते नऊ वर्षाचे असताना वडील वारल्याने आपले आजोबा बाक्रे यांच्याकडे आर्वीला आले आणि पुढील शिक्षण त्यांनी नागपूरला मामांकडे राहून पूर्ण केले. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केल्यावर कलकत्त्याहून नागपूरला आलेल्या डीएजीपीटी कार्यालयात त्यांनी नोकरी धरली. वयाच्या बाविसाव्या वर्षी त्यांचा विवाह वासुदेव रामचंद्र घाटे यांची चौथी मुलगी गिरिजा हिच्याशी झाल्यावर त्यांनी स्वतंत्र बिऱ्हाड थाटले. त्यांना जी अपत्ये झाली त्यात शांताबाईचा क्रम सहावा होता. तिच्या आधीची पाच आणि नंतरचे एक अशी सहा अपत्ये आली आणि गेली. त्यामुळे बाई ही आई वडिलांची एकुलती एक मुलगी ठरली.

वेळी ६ फेब्रुवारी १९१० रोजी तिचा जन्म झाल्यावर विधिपूर्वक बारसे न होता तिचे ‘मीरा’ हे नाव ठेवण्यात आले. त्याचवेळी तिचा शांतपणा पाहून तिचे नाव शांता ठेवावे अशी सूचना बॅ. गोविंदराव देशमुख यांनी केली होती. ( पुढे लग्नाच्या त्याच नावाचा योग आला आणि नेमके शांता हेच नाव भाऊसाहेबांनी ठेवले.) बाईला लहानपणापासून कुठले ना कुठले आजार होतच असत. तिचे शिक्षण नागपुरातील हिंदु मुलींच्या शाळेत झाले. तिला बाळदम्याचा विकार होता तरीही त्याची चिंता न बाळगता दादांनी तिला तेराव्या वर्षी  पोहणे, घोड्यावर बसणे आणि बंदूक चालवण्याचेशिक्षण दिले. तिच्यात व्यवस्थितपणा होता आणि राहणी साधी पण काटेकोर होती. डोळ्यांप्रमाणेच केसांचेही अनुपम सौंदर्य तिला लाभले होते आणि केसांच्या चक्रावर घालण्यासाठी निरनिराळ्या फुलांच्या वेण्या करण्याची तिला हौस  होती असे मीनाक्षीने म्हटले आहे.

दादा नवाथे हे मुळात सनातनी पण अतिरेक न करणारे होते आणि त्यांची हिंदुत्वनिष्ठा व्यापक होती. आखाड्यात जात असल्याने ते ब्राह्मण मराठा भेद मानत नसत. ते दांडपट्टा आणि बंदूक चालवत असून त्यांना शिकारीचा शौक होता. नागपुरातील डॉ. मुंजे, तात्यासाहेब गुजर, दाजीशास्त्री चांदेकर, डॉ. ल. वा. परांजपे, डॉ. हेडगेवार, डॉ. ना. भा. खरे, अप्रबुद्ध, दादासाहेब परांडे अशा अनेक मंडळीशी त्यांचे संबंध असून या मंडळींची घरी सतत वर्दळ असे. ते प्रांतिक वर्णाश्रम स्वराज्य संस्था आणि रायफल असोसिएशनचे संस्थापक होते आणि रा. स्व. संघाचे कामही ते करत असत. या सर्व मंडळींची घरी वर्दळ असे आणि इतर नातेवाईकांना घरी आणून कौटुंबिक पसारा दादांनी वाढवला होता. त्यामुळे सर्वांची  सरबराई करण्यात शांताबाईची आई गिरिजा यांचा वेळ जात असे. यांनाच सर्व जण मोठी ताई म्हणत असत. ती फक्त गृहिणी नसून निरीक्षण, वाचन, बहुश्रुतता, तौलनिक विचार, प्रखर बुद्धिमत्ता  हे तिचे गुण होते. शिवाय चिचभुवनची शेतीही तीच बघत असे. तिने हे सर्व सांभाळल्यामुळे दादांना सामाजिक कामात लक्ष घालता आले. शिवाय दादा नवाथे उत्कृष्ट ज्योतिषी होते. म्हणूनच भाऊसाहेबांसारख्या अकिंचन आणि अनिकेत तरूणाला त्यांनी आपली एकुलती एक मुलगी दिली त्याला डॉ. हेडगेवारांची मध्यस्थी हे कारण आहेच पण त्याशिवाय त्यांची पत्रिका पाहून आणि त्यातील उच्च ग्रह लक्षात घेऊनच हा निर्णय  घेतला असे मत मीनाक्षीने आपल्या लेखात नोंदवले आहे.

‘ कल्याणी ‘ या लेखात शांताबाईंचे वर्णन भाऊरावांनी कल्याणी या एका शब्दात केले आहे. १९२४ च्या ऑगस्टमध्ये पुस्तकांनी भरलेली फक्त एक ट्रंक घेऊन ते नागपूरला आले त्या वेळी न अंथरूणपांघरूण, न ओळखदेख, न जातगोत अशा अवस्थेत होते आणि ‘ महाराष्ट्र ‘ चे संपादक दादासाहेब ओगले यांनी दिलेल्या एका खोलीत ते राहिले. तशा त्या अनिकेत, एकाकी, भयाण आणि वैराण जीवनात स्वास्थ्य, सौभाग्य आणि समृद्धी घेऊन शांताबाई माहेरच्या मोठ्या थोरल्या प्रेमळ कुटुंबासह जीवनात आली. सौभाग्य हे फक्त स्त्रीच्या जीवनातच असते असे नाही तर पुरूषाच्या जीवनातही असते म्हणून मागंल्य आणि साफल्य आणणारे सौभाग्य शांताबाईने आणून आपले जीवन कृतार्थ केले, असे ते म्हणतात. आपण आयुष्यात आदर्श गृहिणी दोनच पाहिल्या, एक शांताबाई आणि दुसऱ्या परम स्नेही उमाकांत भेंडे यांच्या पत्नी स्नेहलताबाई आणि संसारातले सर्व ऋतू पाहत अनुभवांच्या भट्टीतून दोघांना जावे लागले तेव्हा या दोघींनी कडवटपणाचा उद्गारही काढला नाही असे ते नमूद करतात.

२९ मे १९२५ रोजी विवाह झाला तेव्हा भाऊरावांचे वय २५ वर्षे आणि शांताबाईचे १५ वर्षांचे होते. आपले परम स्नेही प्रो. विठ्ठलराव कुळकर्णी यांचा विवाह सौ. गंगू हिच्याशी झाला त्यावेळी तिची मावसबहीण असलेली शांताबाई पहिल्यांदा दिसली आणि ती आकर्षक वाटली असे ते नमूद करतात. त्यावेळी कर्जबाजारी आणि संसाराची जबाबदारी घेण्यास असमर्थ आणि अनुत्सुक असल्याने ते दादा नवाथे यांचे घरजावई झाले आणि त्यांच्या कृपाछत्राखाली १९३४ पर्यंत राहिले.

लग्नानंतर पहिला प्रवास मुंबई आणि पुण्याकडे कसा झाला त्याचे विस्तृत वर्णन भाऊरावांनी केले आहे. प्रथम मुंबईला ते दादर येथे कुळकर्णी बंधूंकडे,- म्हणजे शांताबाईची मावसबहीण सौ. गंगू हिच्याकडे – उतरले. ते बंधू सुशिक्षित आणि साहित्यप्रेमी असले तरी त्यांची राहणी एकंदरीत जुन्या वळणाची, कोकणी आणि कर्मठ होती, किंबहुना भाऊरावांचा मुंबईतील त्यावेळचा सगळाच मित्रपरिवार याच कोटीतला होता. पण दादरहून ते पुण्याला गेले तेव्हा नारायण पेठेतील व. भ., र. भ. आणि द्वा. भ. या तिघा कर्णिक बंधूंकडे उतरले तेव्हा ब्राह्मणेतर कुटुंबात राहण्याचा पहिला अनुभव शांताबाईला मिळाला. वसंतरावांची पत्नी सौ. विमलाबाई ही शांताबाईची जिवाभावाची मैत्रीण झाली. याच मुक्कामात रविकिरण मंडळाची सभा एका ज्येष्ठ सदस्याच्या घरी झाली तेव्हा त्यांच्या पत्नीने शांताबाईंना सांगितले की ‘ आपण माडखोलकरांच्या लाडक्या असलात तरी पतीची आवड जन्मभर टिकवायची असेल तर बायकोने त्याच्या बरोबर येण्याची पात्रता संपादन केली पाहिजे,.’ हा मार्मिक उपदेश शांताबाईच्या नुकत्याच उमलू लागलेल्या मनात खोलवर जाऊन बसला असे भाऊराव नमूद करतात.

या मुक्कामात तात्यासाहेब केळकर यांच्याकडे जेवायला गेले असताना शांताबाईंचे स्वागत खणानारळाची ओटी भरून केले गेले आणि तात्यासाहेबांनी, ‘ कसे काय आवडले आमचे पुणे तुम्हाला ? ‘ एवढेच त्यांना विचारले. पण या तुलनेत  जबरदस्त धक्का त्या दिवशी बसला जेव्हा भाऊरावांचे गुरू कोल्हटकर त्यांची चौकशी करायला कर्णिकांच्या घरी आले. त्यांनी शांताबाईंना पाहून काढलेले  …’ तुमची निवड फार छान आहे …. डोळे हरणाच्या टपोऱ्या डोळ्यांसारखे आहेत …. मोठी ग्रेसफुल पत्नी मिळाली तुम्हाला …यांचा केशकलापही छान आहे … गजाननराव, तुम्ही माधव ज्युलियन आणि यशवंत यांच्याप्रमाणे स्त्रीरूपाचे दर्दी आहात… ‘ इ. उद्गार शांताबाईंना आवडले नाहीत. त्यांच्या या दौऱ्यात शांताबाईला आपल्या या कलंदर नवऱ्याचे जे दर्शन झाले त्यामुळे त्याच्या साहित्यजीवनात साथ देण्यासाठी अवश्य असलेले सर्व गुण संपादन करण्याचा तिने निर्धार केला. तरीही नंतरच्या काळात गुरू कोल्हटकरांच्या अनेकवार भेटी झाल्या तेव्हा त्यांच्या आकर्षक, रंगेल पण सूक्ष्मदर्शी चिकित्सक व्यक्तिमत्वाचे आकलन होऊन त्यांच्याविषयीचा तिचा आदर वाढतच गेला असे भाऊराव म्हणतात. नंतर वारंवार कोल्हटकर नागपूरला घरी आले त्यावेळी त्यांच्या आवडीचे पदार्थ विचारून मनपसंत मेजवान्या तिने आयोजित केल्या आणि त्यानंतर गप्पा मारताना त्यांनी तिला आपल्या नाटकातील पदे पेटीवर वाजवून दाखवली आणि ती कशी सुचली हेही सांगितल्याचे भाऊराव नमूद करतात.

सुरूवातीला दादा नवाथे  नागपुरातील नव्या शुक्रवारीच्या हमरस्त्यावर गणेशभवन या दुमजली घरात राहत असत. १९३४ साली स्वत:चा शांतानिवास हा बंगला आणि पुढे चिचभुवन येथे शेती घऊन त्यावरील शेतबंगला भाऊरावांच्या मदतीने त्यांनी बांधला. आधी गणेशभवनमध्ये राहत असताना  मागील बाजूला दादा नवाथे वर्णाश्रम संस्थेचे ‘ धर्मवीर ‘ हे साप्ताहिक चालवत असत. त्यात धार्मिक लेख येत असत तर भाऊराव काम करत असलेल्या ‘ महाराष्ट्र ‘ मध्ये त्यांचे निधर्मी लेख येत असत. त्यामुळे सासरा आणि जावई यांच्यात वर्तमानपत्रातून सामना होत असे. यातून पुढे नागपुरात जबरदस्त वादळ उठले तरीही आपले मुलुखावेगळे कुटुंब कोसळले नाही याचे कारण शांताबाईचा विलक्षण सोशिक निग्रही स्वभाव असे भाऊराव म्हणतात. त्यांच्या घरात सर्व जाती-जमातीचे लोक येत असत. या लोकांत खांडेकर, माटे, मानकर, कोसारे, जाईबाई चौधरी असे कार्यकर्ते असत तशाच सुशीलाबाई कोठीवान, शांताबाई अत्रे, शांताबाई गाडेकर, हिराबाई भोंसुले, छबूताई हिंगे, कु. अनसूया जोशी अशा प्रतिष्ठित घरातील मैत्रिणीही असत. या प्रकारे दादा आणि मोठी ताई ही दोघे एकीकडे कर्मठ तर दुसरीकडे सर्व तऱ्हेच्या लोकांची येजा असल्याने एकाच घरात दोन संस्कृती नांदत होत्या.

१९२६ ते १९३६ या दहा वर्षात शांताबाई मोठ्या चिकाटीने पदवीधर झाली आणि भाऊराव आणि तिच्यामधील बौद्धिक  व सांस्कृतिक अंतर पुष्कळच कमी होऊन गेले. त्यांच्या संसारात १९३० मध्ये चंद्रशेखर आणि १९३४ मध्ये मीनाक्षीचा जन्म झाला. त्यापूर्वी १९३३ मध्ये तिने हिंदु मुलींच्या शाळेत आणि नंतर महिला विद्यापीठाच्या कॉलेजात अध्यापनाचे काम सुरू केले. लोकांची शाळा, सुळे महिला विद्यालय आणि रात्रीच्या वेळी श्रमजीवी वर्गासाठी चालणाऱ्या शाळेत तिने काम केले.सार्वजनिक कार्यात भाग म्हणून १९३३ पासूनच मध्यप्रांत महिला परिषदेसाठी शांताबाई काम करू लागली आणि अ. भा. महिला परिषदेच्या कार्यकारिणीवर ती शेवटपर्यंत होती. शाळा आणि महिला संस्थांच्या संमेलनात अध्यक्ष म्हणून तिला बोलावणी येत असत. तिने हिंदी व बंगाली भाषांचा व्यासंग करून परीक्षाही दिल्या. तसेच नाटकातून भूमिकाही केल्या. नागपुरातील सरस्वती मंदिराची चिटणीस असताना तिने साहित्यिकांची भाषणे आणि कवींची काव्यगायने आयोजित केली.

या कल्याणीने आपले जीवन सफल केले पण त्यापेक्षा तिच्या २५ वर्षांच्या साहचर्याचा परिणाम आपल्या लेखनायुष्यावर झाला, असे भाऊराव म्हणतात. तिच्यासोबत १९२५ ते १९४२ पर्यंतचे दिवस सुखात गेले. १९३७ पासून प्रादेशिक साहित्य संमेलनांच्या अध्यक्षपदाच्या निमित्ताने त्यांचा सहप्रवास बृहनमहाराष्ट्रात सुरू झाला आणि इंदूर, उजैन, देवास, बडोदे इ. ठिकाणी प्रवास आणि तेथे नवे स्नेहबंध घडल्याने जीवनाला रूचिरता आणि व्यापकता आली असे ते नमूद करतात.
( वेगवेगळ्या निमित्ताने १९३५  ते १९४७ पर्यंत विदर्भ आणि भारतात शांताबाईने जेवढा प्रवास केला तेवढा भाऊरावांनी पण केला नसेल असे मीनाक्षीने म्हटले आहे.)

शांताबाईनी जबलपूरच्या विख्यात कवयित्री सुभद्राकुमारी चौहान यांच्या ‘ बिखरे मोती ‘ या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला आणि तो प्रकाशितही झाला. पण साहित्य निर्मितीत आपण कमी पडतो, अशी खंत तिला होती म्हणून भाऊरावांनी  तिला एका बड्या घराण्यातील आख्यायिकांच्या आधारे एक झकास कादंबरी लिहिण्यास सुचवले आणि तिने तीन प्रकरणे लिहून त्यांना दाखवली. यावेळी जो प्रसंग घडला तो भाऊरावांनी अतिशय प्रांजळपणे सांगितला आहे. ते म्हणतात की ती प्रकरणे अगदीच मामुली होती म्हणून ते तिला उपहासाने त्या गचाळ सुरूवातीबद्दल बोलले. ” मला वाटत नाही, तुला कधी ललित लेखन जमेलसे. तू की नाही वांझ आहेस !”  हे त्यांचे उद्गार ऐकताक्षणी ती एकदम उसळून कडाडली, ” खबरदार, तो शब्द तुम्ही परत या घरात उच्चाराल तर ! मी तुम्हाला दोन मुले दिली आहेत, मला वांझ म्हणताना काही तरी वाटायला हवे होते तुमच्या जीवाला. स्त्रीला वांझ म्हणणे यासारखी भयंकर शिवी आणि शाप नाही दुसरा. खबरदार परत असे अभद्र बोलाल तर .”
हे शब्द ऐकून आपण वेगळ्या अर्थाने बोललो असे म्हणत बरीच सारवासारव केली पण शेवटी शांताबाई म्हणाली की ” अहो, वाईट शब्द केव्हाही आणि कुठेही वापरला तरी वाईटच. तो वापरण्याची बुद्धी  न होणे हीच खरी सभ्यतेची कसोटी.”
पुढे तीन वर्षांनी भाऊरावांनी ‘ चंदनवाडी’ ही कादंबरी लिहिली ती शांताबाईंच्या लिखाणातील पहिल्या प्रकरणाचा उपयोग करून  लिहिली आणि त्या दोघांची मानसकन्या म्हणून शांताबाईंकडून प्रस्तावनाही लिहून घेतली असे ते नमूद करतात.

शांताबाई ही मानवतावादी होती आणि म. गांधी यांच्यावर तिची अनन्यभक्ती होती असे भाऊरावांनी म्हटले आहे. यामुळेच ती १९३९ च्या फेब्रुवारीत चार दिवस आणि पुढे १९४५ च्या फेब्रुवारीत पंधरा दिवस सेवाग्रामच्या आश्रमात जाऊन राहिली होती. या दोन्ही वेळच्या अनुभवांवर लिहिलेले तिचे लेख ‘तरूण भारत’ मध्ये प्रसिद्ध झाले होते. १९४२ च्या उत्पाती आंदोलनात शांताबाईंनी तेलंखेडीतील एका बंगल्यातून सुरूंग घेऊन तो कन्हानपर्यंत पोचवण्याचे काम केले, अशी नोंद हिंदुस्तानी लाल सेनेच्या रजत महोत्सवी अहवालात केली असल्याचे मीनाक्षीने लिहिले आहे. याच काळात अरूणा असफअली भूमिगत असताना चिचभुवनच्या शेतबंगल्यावर येऊन राहिल्या होत्या अशी नोंद आहे. यावरून शांताबाईंचा राजकीय कल वेगळा होता हे दिसते.

पुढे १९४२ च्या ऑगस्टपासून १९४४ च्या ऑक्टोबरपर्यंत शांताबाई पाठीच्या कण्याच्या अस्थिक्षयाने आजारी झाली. १९४५ च्या मे महिन्यात औरंगाबादच्या मराठवाडा साहित्य संमेलनाला ती भाऊरावांसोबत उपस्थित राहिली. आणि १९४६ च्या मे महिन्यात बेळगाव येथे जे ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन झाले त्यासाठी तर भाऊरावांसोबत शांताबाई, चंद्रशेखर आणि मीनाक्षी असे संपूर्ण कुटुंबच उपस्थित राहिले. याच साहित्य संमेलनात भाऊरावांनी मराठी भाषकांचे वेगळे राज्य असावे अशी भूमिका मांडली आणि तसा ठरावही संमत झाला. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या प्रचारार्थ मडगाव ते सांगली दौरा निघाला त्यात भाऊरावांसोबत शांताबाई सहभागी होती अशी नोंद भाऊराव करतात. यावरून महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेत भाऊरावांच्या सोबत शांताबाईंचा सहभाग दिसतो.

१९४८ हे वर्ष भाऊराव आणि शांताबाई यांच्या कुटुंबासाठी दुर्दैवी ठरले इतकेच नव्हे तर त्यांच्या सहजीवनाचा शेवटचा अंक तेथून सुरू झाला असे म्हणता येते. सुरूवातच अशी झाली की म. गांधी यांची हत्त्या झाल्यावर फेब्रुवारीमधे नागपुरात जी दंगल उसळली त्यात त्यांचे घर आगीत जळून खाक झाले. तसेच चिचभुवन येथील शेतीचा आणि शेतबंगल्याचा विध्वंस तर दादा नवाथे आणि मोठी ताई यांच्या डोळ्यांदेखत झाला. गुंड जेव्हा पेटलेले चुडे घेऊन आले त्यावेळी मोठी ताई एका हातात बंदूक आणि ओच्यात देव भरून दादांचा हात धरून चिचभुवन स्टेशनवर घेऊन गेली आणि ते दोधे आपत्तीतून वाचले असे वर्णन मीनाक्षीने आपल्या लेखात केले आहे. या प्रसंगालाही नवाथे -माडखोलकर कुटुंब धैर्याने सामोरे गेले आणि त्यांनी नव्या संसाराची उभारणी केली. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी नागपूरच्या धंतोली भागात स्थलांतर करून आपल्या बंगल्यास ‘ प्रसाद ‘ नाव दिले.

यानंतर लगेच नाताळात शांताबाई ग्वाल्हेर येथील अ.भा. महिला परिषदेच्या अधिवेशनाला गेल्या. त्याचवेळी दिल्ली, हरिद्वार, हृषीकेश ही स्थळेही त्यांनी पाहिली. या दौऱ्यात त्यांचा मुक्काम दिल्लीला मेजर गाडेकर यांच्याकडे असताना आपल्या उरोभागावर गुंजेएवढी आलेली गाठ त्यांनी सहज सौ. शांताबाई गाडेकर यांना दाखवली, नंतर मेजर गाडेकर यांनी बारकाईने ती तपासली आणि मुबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये अधिक तपासणी करण्याचा आग्रह केला आणि तेथून शांताबाईच्या आयुष्याच्या अंतिम यातनामय यात्रेला प्रारंभ झाला, असे भाऊराव म्हणतात.

१९४९ च्या जानेवारीत ही कॅन्सरची शंका आली आणि त्या दारूण आपत्तीमुळे सगळी मनोराज्ये पार उध्वस्त झाली. यानंतर डॉ. ना. भा. खरे यांच्या सल्ल्यानुसार पहिली शस्त्रक्रिया डागा हॉस्पिटलमध्ये डॉ. मिस राज यांनी केली आणि त्या अवशेषांवर टाटा हॉस्पिटलकडून जो रिपोर्ट आणवला तो पाहून तर भाऊरावांच्या मनोराज्यांची पार राखरांगोळी झाली. १९४९ च्या मे महिन्यात हवापालट म्हणून बाईंना त्यांनी पचमढीला नेले परंतु जखम वाहू लागल्याने त्यांना परत यावे लागले. नंतरच्या उपचारासाठी मात्र त्यांना अनेक महिन्यांसाठी मुंबईला नेण्यात आले. १९५० च्या मार्चमध्ये त्यांच्या उरोभागावर उठलेल्या नवीन गाठीवर डीप एक्स रेचा उपचार केल्यावर तो सगळा भाग काळा ठिक्कर पडला. या धगीने अंगाची आग होत असूनही त्या यातना त्यांनी मुकाट्याने सहन केल्या. परंतु या उपचारांना जोड म्हणून हॉर्मोन्सची इंजेक्शने द्यावीत अशी योजना डॉ. जसावाला यांनी सुचवली असता चेहऱ्याला विरूपता आणणारे ते  इंजेक्शन घेण्यास शांताबाईंनी साफ नकार दिला.

टाटा हॉस्पिटलमध्ये असताना त्याही दिवसात नाट्यसमीक्षक राजा कारळे यांच्यावर सकाळ संध्याकाळ ताज्या फुलांची वेणी आणण्याचे काम त्यांनी सोपवले होते. जूनमध्ये आपले सोवळे बाजूला ठेवून मोठी ताई नागपूरहून मुलीजवळ राहण्यासाठी आल्या तेव्हा अंबाड्यावर दोन सुंदर वेण्या घालून मैत्रिणीशी गप्पा मारत बिछान्यावर बसलेल्या या मुलीचे मरण दीड महिन्यांवर आले आहे असे त्यांना खात्रीने वाटले नसेल, असे भाऊराव म्हणतात. परंतु जुलैच्या पहिल्या आठवड्यात डॉ. जसावाला यांनी भाऊरावांना आपल्या चेंबरमध्ये बोलावून शांताबाईचे आयुष्य आणखी फार तर पाच सहा आठवडे असल्याचे सांगितले. तसेच तिच्या इच्छेनुसार तिला नागपूरला न्यावे अशी सूचनाही केली. पण मुंबईतील काही मित्रांनी दिलेल्या सल्ल्यानुसार लॅमिंग्टन रोडवरील एका होमिओपॅथिक रूग्णालयात उपचार करण्याचे ठरले.  परंतु त्याने त्रास आणखी वाढल्याने शेवटी ३१ जुलै रोजी सकाळी दादा नवाथे आणि मोठी ताईसोबत शांताबाई मेलने नागपूरला परत आल्या.

घरी आल्यावर त्यांची व्यवस्था देवघराच्या खोलीत करण्यात आली होती. भाऊराव तिला भेटले तेव्हा खोलीत धूप,उदबत्त्या आणि फुलांचा संमिश्र वास दरवळत होता. त्यांना पाहून ती म्हणाली, ” शेवटी मी घरी आले एकदाची ! आता सुखाने मरण येईल मला तुम्हा सगळ्यांच्या सान्निध्यात ! ” ते ऐकून आपल्या डोळ्यांना धारा लागल्या पण घरात तीन म्हाताऱ्या व्यक्ती आणि दोन मुले आहेत याची जाणीव शांताबाईने करून दिली, असे भाऊराव म्हणतात. यानंतरच्या दिवसात रोज सकाळी ९ च्या आत आंघोळ, वेणीफणी करून घेऊन ताज्या फुलांची वेणी ती माळत असे. ‘ जी कोणी माणसे भेटायला येतील त्यांना मला भेटू देत ‘ अशी सूचना तिने केली होती. आपल्याला जणू काही झालेलेच नाही अशा प्रकारे ती भाऊरावांशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करत असे.’ आपण गेल्यावर भाऊरावांनी दुसरे लग्न करावे अशी सूचनाही तिने केली पण त्यास नकार देऊन तिने तो विचार मनातून काढून टाकावा ‘ हे आपले आणि शांताबाईचे बहुधा शेवटचेच बोलणे असे भाऊरावांनी म्हटले आहे.

त्यांना भेटायला येणाऱ्यांची रीघ लागली. अनसूयाबाई काळे तर दिवसातून तीनदा भेटायला येत असत. आलेल्या सर्वांशी त्या मजेत गप्पा मारत असत. १५ ऑगस्ट रोजी त्यांनी दादांना घरावर राष्ट्रध्वज लावून त्यावर माळ चढवण्यास सांगितले. नंतर रेडियोवरले नेहरूंचे भाषण ऐकले. दादांनी त्याच दिवशी मृत्युंजयाचा जप करण्यासाठी ब्राह्मण बसवले आणि मुलीला  तीर्थ दिले. पण तिची अस्वस्थता वाढतच गेली.

शेवटी १८ ऑगस्ट हा श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस आला. त्यादिवशी जाग आल्यावर नागपंचमी म्हणून मुलांसाठी नेहमीप्रमाणे दिंडे वगैरे करण्याची सूचना शांताबाईंनी केली आणि श्रावणमास बहरून आला असल्याने बागेतील फुलांच्या छान वेण्या करण्यास ताईंना सांगितले. त्याप्रमाणे झाले तरी अस्वस्थता वाढल्याने शेजारच्या डॉ. शिवदे यांना बोलावण्यात आले. त्यांनी आपल्या परीने जास्तीत जास्त प्रभावी औषध दिले. ते घेत असताना ‘ आता माझ्याजवळून कोणी हलू नका ‘ असे शांताबाई म्हणाली आणि बरोबर १२ वाजून ३५ मिनिटांनी तिची प्राणज्योत मालवली. डॉ. शिवदे यांनी बाहेर हॉलमध्ये येऊन ‘ मीराबाई आपल्याला सोडून गेल्या ‘ असे सांगितले. हे कळल्यावर भाऊराव तडक देवघरात गेले तेव्हा मागोमाग भेटायला आलेले नाना जोगही होते. धाकट्या बहिणीप्रमाणे शांताबाईवर माया करणाऱ्या जोगांचे डोळे भरून आले. पण त्यांनी मन आवरले. तिच्याजवळ गेल्यावर त्यांनी  ” प्राण गेल्यावरही काय तेज आहे हिच्या डोळ्यांचे !” असे उद्गार काढले. भाऊरावांना घेऊन तेच बाहेर हॉलमध्ये आले आणि भाऊरावांचे हात त्यांनी घट्ट धरले पण ” भाऊराव .. ” या एका शब्दापुढे त्यांना बोलता आले नाही.

सौ शांताबाई माडखोलकर

त्या दिवशी शांताबाईंच्या उशीखाली सापडलेली एक छोटी वही भाऊरावांना देण्यात आली. तिच्या मधल्याच पानावर त्यांना शांताबाईच्या हस्ताक्षरातील ओळी दिसल्या.
” चौविस वर्षांपूर्वी दैवे लाभ मला झाला
सुखदु:खांचा विविध गोड गोफ आम्ही दोघांनी विणिला
आयुष्यांतिल दुरित प्रसंगी अतुल धैर्य दिधले
संकटसमयी विघ्नहर्त्या गजाननाने जीवन बहरविले ”
या ओळी वाचून डोळ्यांना धारा लागल्या, असे भाऊराव म्हणतात आणि तेथेच हा लेख संपतो. हा लेख वाचून शांताबाईंना अवघे ४० वर्षांचे आयुष्य लाभले या दैवगतीबद्दल वाचकाला विषाद वाटल्याखेरीज राहत नाही.
@

[ या लेखाचा उत्तरार्ध  २३ ऑगस्ट २०२० च्या  अंकात प्रसिद्ध होईल.
त्यात वाचा : सुहृद आणि आप्त-मैत्रिणींच्या दृष्टीतून शांताबाई. ]

– ©️ मुकुंद नवरे 
mnaware@gmail.com
@@@@@@@@@@@@@
आवाहन

प्रिय मित्रहो,
सप्रेम नमस्कार.
गेल्या कित्येक वर्षांत आली नसेल किंवा अनुभवलेली नसेल अशी बिकट वेळ या २०२० वर्षात आली आहे, यात शंकाच नाही. मार्च महिन्यात चाहूल लागलेल्या कोरोना या साथीने अल्पावधीत, देशात नव्हे तर सबंध जगभरात थैमान माजले आहे.
आणि त्यामुळे ठिकठिकाणची सरकारे आणि महापालिका प्रशासन यांनी नागरिकांच्या एकूण म्हणजे घरगुती व सार्वजनिक संचारावर, प्रवासावर जे निर्बंध घातले आहेत, तसेच त्यात अनेक गोंधळ निर्माण झाले आहेत. त्यांचा मोठा परिणाम आपण जे सण उत्साहाने साजरे करतो त्यांवर झाला आहे. आगामी गणेशोत्सव व नवरात्रौत्सव यांसारख्या घरगुती व सार्वजनिक उत्सवांना अनिश्चिततेचा फटका बसला आहे. यातून मनात आले की यापूर्वी या उत्सवांचे वातावरण कसे होते आणि त्यांची मजा आपण कसे मुक्तपणे लुटत होतो हे आमच्या लेखक-वाचक- चित्रकार- प्रकाशचित्रकार मित्रांनी सहज आठवून ( जास्तीत जास्त ५०० शब्द ) शब्दबद्ध करावे तसेच आठवणीतली प्रकाशचित्रे बाहेर काढावी आणि आमच्याकडे हे साहित्य ( युनिकोड माध्यमात टंकून )  पाठवावे, हे आवाहन करत आहोत. पीडीएफ माध्यमातून पाठवू नये.  निवडक शब्दचित्रांना किंवा प्रकाशचित्रांना ‘मैत्री’मधून प्रसिद्धी देण्यात येईल.
संपादक, ‘मैत्री’ अनुदिनी
mangeshnabar@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@
वर्षाधारा 
– ©️ वर्षा पेठे 
vnpethe@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@
रावळगाव

आठवणींच्या वेलीवर [ ३ ]  
 

प्रदीप अधिकारी 

दिमाखदार जांभळ्या रंगाच्या वेष्टनांतल्या कॅडबरीज चॉकलेटचा जमाना सुरु झाला आणि बच्चे कंपनी हळुहळू “रावळगाव टॉफी” विसरून गेली. वाण्याच्या दुकानातसुद्धा एक आण्याला दोन मिळणाऱ्या ‘रावळगाव’ची सद्दी आमच्या लहानपणाबरोबरच संपली.

लफ्फेदार इंग्रजी अक्षरांत सही केल्यासारखं पांढऱ्या अक्षरात पारदर्शक चिवट कागदाच्या आयाताकृती चौकोनी  तुकड्यावर छापलेलं ‘रावळगाव’ हे नाव आणि कागदात गुंडाळलेली, लांबट आकाराची खमंग चवीची, बराच वेळ तोंडात रेंगाळणारी टॉफी म्हणजे घरी येणाऱ्या पाहुण्यांकडून लहानग्यांना मिळणारी आवडती भेट. काही काही पाहुणे तर आल्या आल्याच खिशात हात घालून चार टॉफीज आम्हा पोरांच्या हाती ठेवायचे आणि आमची अगदी चंगळ उडायची. टॉफी तोंडात टाकली की तोंडात चळ्ळकन् पाणी सुटे …. टॉफीचा तो मधुर खमंग रस चघळत एकमेकांशी बोलताना बऱ्याचदा बोल बोबडे होत असत..! वयाने थोडी मोठी असलेली भावंडे अथवा मित्र मंडळी टॉफी तोंडात टाकून त्या छोट्याशा पारदर्शक चिवट कागदाच्या तुकड्याची झिगझॅग घडी घालत आणि त्या घडीला एक गाठ मारुन तिची बाहुलीच्या आकाराची “चिंगी” बनवीत असत. त्यांचं  ते कसब बघत असताना बऱ्याच छोट्या मुलांच्या तोंडातून टॉफीयुक्त चॉकलेटी रंगाची लाळ गळायची….ही बच्चे कंपनी मग आपल्या मनगटांनी ती पुसून टाकयची…काही वेळाने तोंडातली टॉफी संपून जायची आणि त्यांच्या गालांवर सुकलेल्या चॉकलेटी रंगाचे फराटे दिसायचे.

१९२३ साली शेठ वालचंद हिराचंद ह्या दूरदृष्टीच्या धाडसी उद्योगपतीने नाशिकजवळच्या रावळगाव ह्या आडगावी दीड हजार एकर पडीक जमीन विकत घेतली आणि सलग दहा वर्ष अथक परिश्रम करून ती ऊसाच्या लागवडीखाली आणली. १९३३ साली ‘रावळगाव शुगर फार्म’ नांवाची एक कंपनी स्थापून भारतातल्या एका संपूर्ण आणि स्वयंपूर्ण साखर कारखान्याची यशस्वी मुहूर्तमेढ रचली. १९४० सालापासून  “रावळगाव” ह्या नावाखाली रावळगाव टॉफीचं उत्पादन सुरु झालं – चव, दर्जा आणि त्या काळी असलेली सर्व सामन्यानांना परवडणारी वाजवी किंमत ह्या बाबींचं सातत्य अतिशय काटेकोरपणे  पाळलं गेल्याने लवकरच “रावळगाव” टॉफी हे उत्पादन शहरांपासून ते अगदी दूर दूर महाराष्ट्रांतल्या खेड्यापाड्यापर्यंत लहान थोरात प्रचंड लोकप्रिय झालं.

त्याच काळांत ह्याच शेठ वालचंद हिराचंद ह्यांनी पुण्याजवळ वालचंदनगर नामक प्रचंड औद्योगिक समूह उभा केला. त्यांच्या एका कंपनीत माझ्या बाबांचे लालचंद शहा नावाचे मित्र नोकरीस होते. ते कामानिमित्त मुंबईत आले की गिरगावात आमच्याकडे मुक्कामाला उतरायचे. आम्हां भावंडांचे ते अतिशय लाडके पाहुणे होते कारण ते अगदी न चुकता रावळगाव टॉफीचा एक अख्खा डब्बा घेऊन यायचे. रावळगावच्या त्या आयताकृती पत्र्याच्या लांबट चौकोनी डब्ब्यावर रघुवीर मुळगावकरांनी काढलेली गोड गोड मुलींची सुंदर चित्र असायची.

शहाकाका मुंबईतला मुक्काम आटोपून पुण्याला त्यांच्या घरी जाऊन जुने होईपर्यंत त्या डब्यांतल्या टॉफीज आम्हाला पुरायच्या. डब्बा रिकामा झाला की आई त्यांत विविध आकाराच्या सुया, रंगीत दोऱ्यांची  रिळं, कात्री असंच कांहीबांही ठेवण्यासाठी उपयोग करायची. आईकडे असे बरेच डबे होते. कशात पूजेचं सामान तर कशात वेगवेगळ्या रंगांच्या कांचेच्या बांगड्या ती ठेवत असे. माझ्या बाबांकडे पण एक खूप जुना असा डब्बा होता त्यांत त्यांचं दाढीचं सामान भरलेलं असायचं..! कधीतरी मग एखादा जास्तीचा रिकामा डब्बा आम्हा मुलांच्या  वाट्याला यायचा, रंगीत खडू, पेन्सिली, रंगीत गोट्या, बसची, ट्रामची रेल्वेची तिकिटं ह्यासारखा किंमती ऐवज जपून ठेवण्यासाठी आम्ही त्या डब्ब्याचा उपयोग करीत असू. अख्ख्या कुटुंबाला पुरून उरणारा इतका बहु-उपयोगी पत्र्याचा डब्बा अजूनपर्यंत मी  तरी पाहिलेला नाही.

रावळगाव टॉफीजचे अस्तित्व आता नाममात्र उरलं आहे. कुठल्याही दुकानात ती ह्ल्ली दिसत नाही. कॅडबरीज चॉकलेटसनी तिच्यावर कधीच मात केली आहे.  असं असलं तरीही  शाळेत जाताना आईचा डोळा चुकवून, शहा काकांनी आणलेल्या डब्यातली, मुठभर “रावळगाव” हाफ पँटच्या खिशात कोंबलेली अजूनही लक्षात आहेत, ती आणखी एका वेगळ्याच कारणासाठी…

त्यातल्या दोन-तीन टॉफीज वर्गातल्या आवडत्या मैत्रिणीला अगदी उदारपणे दिल्यावर, खुदकन् हसताना तिच्या गालावर पडणाऱ्या खोल खळीमुळे  ती डब्ब्यावरच्या  मुळगांवकरांच्या चित्रसुंदरी इतकीच गोड वाटायची…..!!

कधीच ‘रावळगाव’ न खाल्लेल्यांना त्या मागे दडलेली, ही असली “ गोड-गुपितं ” कशी कळणार?

–  ©️ प्रदीप अधिकारी
9820451442
adhikaripradeep14@gmail.com

प्रकाशचित्रे : गुगलवरून साभार
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
वस्त्रहरण 
कडबोळे [३५]
 

डॉ. अनिल जोशी

आंतरजालीय  माहितीचा विस्फोट झाल्यानंतर आलेली पहिली  साथ  म्हणून आपण या कोरोनाच्या  साथीकडे बघू शकतो. त्यामुळे कोरोना आणि माहिती अशा दोन  साथींना आपल्याला एकत्रित तोंड द्यावे लागते आहे. अशा प्रसंगी अधिकृत व  विश्वासार्ह माहिती देणाऱ्या  स्त्रोतांचे एक वेगळेच महत्व आहे. वैद्यकीय व्यावसायिकांच्या दृष्टीने खात्रीची माहिती  मिळणे उपचारासाठी  फारच महत्त्वाचे असते. कोरोना हा विषाणू पूर्णपणे नवीन असल्याने त्याचे वेगवेगळे पैलू जगात ठिकठिकाणी तपासून पाहिले जात आहेत. त्यासाठी वेगवेगळे संशोधन विविध ठिकाणी चालू आहे. त्याचे  निष्कर्ष  वेगवेगळ्या वैद्यकीय नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत आहेत. याबाबतीत जी वैद्यकीय नियतकालिके जागतिक स्तरावरची अशी मानली जातात त्यात “The Lancet “, The New England journal Of Medicine (NEJM)  व The Journal Of American Medical Association (JAMA) ही तीन अग्रणी नियतकालिके आहेत.
कोरोनावर  रामबाण उपाय मिळत नाही,  हे साथ सुरू झाल्यावर  स्पष्ट झाले. संसर्गाची तीव्रता कमी करता येते का व त्यासाठी काही औषधे देता येतील का याची चाचपणी सुरू झाली. HCQ किंवा HydroxyChloroquine हे मलेरियावर वापरले जाणारे औषध घेतल्यास प्रतिकारशक्ती वाढून कोरोनाच्या  संसर्गाची शक्यता व तीव्रता कमी होते, असेच तज्ञांच्या  लक्षात आले आणि रोगप्रतिबंध व  रुग्णउपचारात  आघाडीवर असणारे वैद्यकीय व इतर कर्मचारी यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून  हे औषध दिले जावे अशा आशयाच्या सूचना काही देशांमध्ये दिल्या गेल्या. कोरोनाच्या उपचारातही या औषधाचा  प्रायोगिक वापर इतर औषधांसोबत सुरू झाला. कोणतेही औषध हे शेवटी रासायनिक द्रव्य असते. त्यामुळे त्याचे काही अनिष्ट परिणामही असतात. तसे ते  या  औषधाचे पण आहेत. परंतु योग्य ती सर्व काळजी घेऊन औषध घेतले जावे असे इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च या भारतातल्या अग्रणी संस्थेने सुचविले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील आपण हे औषध  घेत असल्याचे अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. असे जरी असले तरी या औषधाच्या बाजूने व विरोधात अधूनमधून उलटसुलट बातम्या येत राहिल्या त्यामुळे स्वाभाविकपणे संभ्रमाचे वातावरण कायम राहिले. अशा वातावरणात The Lancet ने  एक लेख प्रसिद्ध केला.”Hydroxychloroquine or chloroquine with or without a macrolide for treatment of COVID-19: a multinational registry analysis”.असा  या लेखनाचा मथळा होता. HCQ  च्या वापरामुळे  हृदयगतीत अनियमितता  निर्माण होण्याची शक्यता असल्याने या औषधाचा वापर धोकादायक ठरू शकतो, असा या लेखाचा निष्कर्ष होता. हा लेख खूप मोठ्या अभ्यासाअंती प्रसिद्ध केल्याचा दावा हा लेख  लिहिणाऱ्या संशोधकांनी केला होता. सहा खंडातल्या ६७१  रुग्णालयातील ९६०३२  रुग्णांची  २० डिसेंबर २०१९ ते  १४ एप्रिल २०२० या कालावधीतील कोरोना उपचारांची माहिती  मिळवून व त्याचे विश्लेषण करून या लेखातील अभ्यासातील निष्कर्ष काढले गेले होते असा या लेखकांचा दावा होता.
या लेखापुर्वी  “द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन” मध्ये असाच एक लेख प्रसिद्ध झाला. रक्तदाबासाठी दिली जाणारी काही औषधे, ज्यांना ACE Inhibitors व  ARB Blockers  म्हणून ओळखले जाते; ही औषधे कोरोना  साथीच्या वेळी  देणे सुरक्षित आहे, असा या अभ्यासाचा अंतिम निष्कर्ष होता व तो या लेखाद्वारे जाहीर केला गेला होता.कोरोना विषाणू मानवीय पेशीवर हल्ला करताना ACE Receptors वापरतात असा काही संशोधकांचा दावा  आहे.  त्यामुळे ही औषधे  वापरणे सुरक्षित आहे की नाही हा ही  एक गंभीर  चर्चेचा विषय होता. या दोन्ही लेखांमुळे अर्थातच  वैद्यक क्षेत्रात खळबळ उडाली.
HCQ  च्या वापराबाबत अनेक देशांमध्ये संशोधन चालू होते. जागतिक आरोग्य संघटना देखील याबाबत वेगळे संशोधन करत होती. लेख आल्यानंतर अनेक  ठिकाणची संशोधने  थांबविण्यात आली. त्याला एक महत्त्वाचे कारण होते. ही दोन्ही नियतकालिके Peer Reviewed आहेत. याचा साधा सोपा अर्थ सांगायचा झाल्यास या नियतकालिकांमध्ये  कोणताही लेख प्रसिद्ध होण्यापूर्वी  या लेखातील प्रतिपाद्य विषयाचे एक तज्ञमंडळ त्या लेखात नमूद माहितीचा आढावा घेते  व लेखातील माहिती योग्य असल्याची खात्री करते. अशी खात्री झाल्याखेरीज  कोणतेही लिखाण प्रसिद्ध केले जात नाही. NEJM चे  स्थापना वर्ष इ. स. १८१२ ची  आहे तर Lancet १८२३ सालचे आहे. अर्थात गेली सुमारे २०० वर्षे ही नियतकालिके आपला आब राखून आहेत. यात आलेल्या एखाद्या लेखाने जागतिक आरोग्य संघटनेने आपले एखादे महत्त्वाचे संशोधन  अर्धवट सोडून द्यावे एवढे या  नियतकालिकात छापून आलेल्या शब्दांना वजन आहे. वैद्यकीय नियतकालिकांचे वजन हे नुसतेच स्थापनेच्या वर्षावर अवलंबून नसते. या नियतकालिकांचा प्रभाव मोजण्यासाठी  एक मापदंड आहे.  त्याला Impact Factor असे संबोधन आहे. आपण त्याला “प्रभाव निर्देशांक”  म्हणूयात. हा प्रभाव निर्देशांक सर्वसाधारणपणे दोन वर्षांचा काढतात. म्हणजे आज  २०२० मध्ये आपण बोलत असताना  २०१८ – २०१९  या कालावधीतील त्या नियतकालिकाची कामगिरी लक्षात घेऊन  हे गणित मांडता येते. गेल्या दोन वर्षात इतर मान्यताप्राप्त नियतकालिकांमध्ये (Indexed Journals ) संदर्भ म्हणून घेतल्या गेलेल्या एखाद्या नियतकालिकातील लेखसंख्या भागिले या दोन वर्षात या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एकूण लेखांची संख्या म्हणजे त्या नियतकालिकाचा प्रभाव निर्देशांक असतो. २०१८  साली The Lancet चा  प्रभाव निर्देशांक ५९.१०२ इतका होता  तर NEJM चा ७०.६७० ! जितका हा निर्देशांक मोठा तितका त्या  नियतकालिकाचा दबदबा ही मोठा.
आता या दोन लेखांचे पुढे काय झाले ते थोडेसे विस्ताराने पाहू या. २२ मे २०२० रोजी “Hydroxychloroquine or chloroquine with or without a macrolide for treatment of COVID-19: a multinational registry analysis” या मथळ्या अंतर्गत हा लेख The Lancet मध्ये प्रसिद्ध झाला. याचे एकंदरीत चार लेखक आहेत. प्रो  मनदीप मेहरा, सपन  देसाई, अमित पटेल व प्रो फ्रांझ रूजचीत्झ्का अशी ही चार  मंडळी आहेत. २६  मे रोजी काही ऑस्ट्रेलियन संशोधकांनी या लेखातील आकडेवारीबाबत शंका व्यक्त केल्या. संपादकांनी त्याची चौकशी करून या आकडेवारीत काही दुरुस्ती केली. २८ तारखेला विविध देशातील १८० ख्यातनाम संशोधकांनी The Lancet  च्या संपादकांना  खुले पत्र लिहून या लेखातील निष्कर्षाविषयी आपले गंभीर आक्षेप नोंदवले. त्यानंतर पुन्हा एकदा संपादक मंडळाने या अभ्यासाची  फेरतपासणी करून लेखकांना त्यांनी गोळा केलेल्या आकडेवारीविषयी अधिक तपशील मागितला. चारपैकी तीन लेखकांनी असा तपशील देण्यास नकार देऊन हा लेख आम्ही माघारी घेत आहोत अशा आशयाचे पत्र दिले. त्यानंतर ४ जून २०२० रोजी The Lancet  ने एक  अधिकृत घोषणा करून हा लेख मागे घेतला. ही घोषणा खालीलप्रमाणे :-
After publication of our Lancet Article, several concerns were raised with respect to the veracity of the data and analyses conducted by Surgisphere Corporation and its founder and our co-author, Sapan Desai, in our publication. We launched an independent third-party peer review of Surgisphere with the consent of Sapan Desai to evaluate the origination of the database elements, to confirm the completeness of the database, and to replicate the analyses presented in the paper.
Our independent peer reviewers informed us that Surgisphere would not transfer the full dataset, client contracts, and the full ISO audit report to their servers for analysis as such transfer would violate client agreements and confidentiality requirements. As such, our reviewers were not able to conduct an independent and private peer review and therefore notified us of their withdrawal from the peer-review process.
We always aspire to perform our research in accordance with the highest ethical and professional guidelines. We can never forget the responsibility we have as researchers to scrupulously ensure that we rely on data sources that adhere to our high standards. Based on this development, we can no longer vouch for the veracity of the primary data sources. Due to this unfortunate development, the authors request that the paper be retracted.
We all entered this collaboration to contribute in good faith and at a time of great need during the COVID-19 pandemic. We deeply apologise to you, the editors, and the journal readership for any embarrassment or inconvenience that this may have caused.
घोषणा  सविस्तरपणे मुद्दामून दिली आहे. यामध्ये Surgisphere Corporation या कंपनीचा स्पष्टपणे उल्लेख आहे. या लेखाला जे तीन भारतीय वंशाचे  लेखक आहेत, ते या कंपनीशी  संबंधित आहेत. वैद्यकीय संशोधनात लागणारी आकडेवारी ही कंपनी गोळा करून प्रसंगी तिचे पृथक्करण करून  संशोधकांना  उपलब्ध करून देण्याचे काम करते.
आता थोडेसे NEJM  मधील लेखाविषयी. लेखाचे नाव “Cardiovascular Disease, Drug Therapy, and Mortality in Covid-19.” लेखक संख्या एकूण पाच. पैकी मेहरा, देसाई व पटेल हे त्रिकुट तेच ! लेखाच्या प्रसिद्धीची तारीख एक मे २०२०. हा  लेख देखील NEJM ने ४ जून २०२० रोजी मागे घेतला. कारण होते, Because all the authors were not granted access to the raw data and the raw data could not be made available to a third-party auditor, we are unable to validate the primary data sources underlying our article, “Cardiovascular Disease, Drug Therapy, and Mortality in Covid-19.”1 We therefore request that the article be retracted. We apologize to the editors and to readers of the Journal for the difficulties that this has caused.
हे लेखकांनीच संपादकांना लिहिलेले पत्र. आता आकडेवारीची खातरजमा या लेखकांनी लेख प्रसिद्ध  करण्यापूर्वीच का केली नाही असा प्रश्न स्वाभाविकपणे येतो. त्याला सध्या तरी काही उत्तर नाही. या दोन्ही नियतकालिकांनी यापूर्वी काही वेळा पूर्वप्रकाशित लेख मागे घेतले आहेत, त्यात काही चुकीचे संदर्भ आले असल्यास त्याची  दुरुस्ती प्रसिद्ध  केलेली आहे.  मग याला वस्त्रहरण म्हणण्याचे कारण काय? तुम्ही २०० वर्षे  एखादे नियतकालिक चालवत आहात. त्यामुळे लेख प्रसिद्ध करण्यापूर्वी त्यातली आकडेवारी बरोबर असल्याची खातरजमा करणे ही तुमची प्राथमिक जबाबदारी आहे.The Lancet ने  हा लेख प्रसिद्ध करताना बरीच घाई व गडबड केली व  लेख मिळाल्यापासून फक्त चार आठवड्यात  प्रसिद्ध झाला.लेखाचा विषय होता एक औषध, HCQ  नावाचे. हे औषध सहज उपलब्ध आहे, ते स्वस्त आहे व भारतासारख्या विकसनशील देशात  हे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. हे औषध परिणामकारक आहे असे ठरल्यास कोरोनाबाबत  बाजारात येऊ घातलेली इतर औषधे आपले वेगळेपण हरपून  बसतील काय, अशी साधार भीती आहे. अशाप्रकारे येऊ घातलेल्या नवीन औषधांचे अवमूल्यन होऊ नये म्हणून  जाणीवपूर्वक  लेख प्रसिद्धीचा  हा कट आहे की काय अशी भीती काही जाणकारांनी याबाबत व्यक्त केली आहे. या सगळ्या प्रकारात  ज्या Surgisphere  या  कंपनीने ही  आकडेवारी मिळवून त्यावर प्रक्रिया केली तिची व तिच्या मालकांची नक्की काय भूमिका होती याबाबत खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोरोना कधी संपणार  या प्रश्न सारखाच हा   प्रश्न आहे, उत्तराच्या प्रतीक्षेतला !
जाता जाता अजून एक गोष्ट सांगतो, १६ मे २०२०  च्या आपल्या संपादकीयात The Lancet  ने अमेरिकन नागरिकांना  आगामी जानेवारीमधील अध्यक्षीय निवडणुकीत ज्याला सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे महत्व कळते अशा उमेदवाराला मत द्या असे  जाहीर आवाहन केलेले आहे. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना याबाबत अजिबात गांभीर्य नाही असा  या लेखाचाच एकंदरीत सूर  आहे व डोनाल्ड ट्रम्प हे सर्व जगाला मी HCQ घेतो हे उच्चरवाने सांगत असतात.यात काही परस्पर संबंध आहे का? माहित नाही!! आपल्या शेकडो वर्षांच्या विश्वासार्हतेला या नियतकालिकांनी असे पणाला का बरे लावले असावे ?
“Torture the data, and it will confess to anything.” – Ronald Coase(British Economist and author)

– ©️ डॉ अनिल जोशी
९४२२६४७२८३
jaysss12@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

 

डॉ. अरविंद लोणकर

[ २ ]

त्वचा – एक संदेशवाहक यंत्रणा
आजकाल लहान मोठ्या शहरात सर्वत्र टेलिफोन, अत्याधुनिक मोबाईल किंवा सेल फोन असतात. कुठे आग लागली की जवळचा माणूस झटकन फोन उचलून आगीच्या बंबाला किंवा अग्निशमन दलाला वर्दी देतो. कुठे पाण्याचा नळ फुटला असे आढळले की त्याची खबर नगरपालिकेच्या पाणी विभागाला जाते. घरफोडी नाहीतर चोरी झाली की पोलिसचौकीला गडबडीने निरोप पोहोचविता येतो. काही वेळेला चोर हाती लागला की पोलीस यायच्या आधीच आजूबाजूचे लोक चोराला ठोकून काढतात. किंवा बंब यायच्या आधीच भराभरा पाणी ओतून आग विझवायला लागतात. याखेरीज किती त-हेचे संदेश टेलिफोन / मोबाईलवरून येतजात असतील याची कल्पनाच करणे बरे.

ही दोनचार उदाहरणे निवडली आहेत. त्याच्यावर परत एकदा नजर टाकूया. कोणत्याही ठिकाणी अपाय होत असला की ताबडतोब त्याची खबर केंद्राला पुरविली जाते. नंतर केंद्रावरून पोलीस, कामगार, आगीचे बंब यांसारख्या गोष्टी धावत येतात ; जास्त होणारे नुकसान टळते. लगेच दुरुस्तीच्या कामाला लागता येते. पण हे संदेश तातडीने गेले नाहीत तर ? चोर घर धुवून नेतील, आगीने घराचा कोळसाही शिल्लक राहणार नाही, तेव्हा जनतेच्या संरक्षणासाठी हे संदेश झटकन पोहोचणे किती महत्त्वाचे  आहे हे वेगळे सांगायला हवे काय ?

मज्जातंतूंचे कार्य
आपल्या त्वचेत नेमकी हीच गोष्ट होत असते. बाहेरील जगात येणारे अनेक त-हेचे संदेश अन् संवेदना मेंदूकडे पोहोचविणे जरुरीचे असते. या कामी लागणा-या पेशी अन् मज्जातंतू त्वचेत टेलिफोनप्रमाणे सगळीकडे पसरलेल्या असतात. काही ठिकाणी त्या कमी असतात, तर काही ठिकाणी भरपूर. पेशीपासून निघालेले संदेश मज्जातंतूंकडून थेट मेंदूकडे संवेदना पोहोचवायचे काम करतात, तर मेंदूकडून येणारे हुकूम दुस-या तंतूंकडून येतात. त्वचेतील कामाच्या ग्रंथींना काम तयार करायचा निरोप येतो. केसाच्या बुडाशी अगदी छोटे स्नायू असतात. त्यांना हुकूम आल्यावर ते आकुंचन पावतात व केस उभे राहतात. याला आपण म्हणतो की अंगावर काटा आला. दोन मांजरे भांडायला लागली की त्यांच्या अंगावरची सारी लव ताठ उभी राहते. कारण मांजर व इतर प्राण्यात केसांच्या मुळाचे स्नायू जास्त प्रमाणात तयार असतात.



संवेदना जरी अनेक मार्गाने आल्या तरी त्वचेच्या हिशेबात त्या तीनच प्रकारच्या असतात. स्पर्श, तपमान आणि वेदना. झुळझुळीत रेशम आणि खडबडीत फणस, बंदा रुपया आणि किल्ली यांच्या आकारातला स्पर्शाला जाणवणारा फरक या सा-या स्पर्शाच्या संवेदना. काही सुखाच्या, काही दुःखाच्या. पण जगातल्या निरनिराळ्या वस्तूंमधला भेद कळायला स्पर्शज्ञान अतिशय आवश्यक असते गुदगुल्या, कंद आणि वेदना या त्वचेच्या मते स्पर्शाच्याच संवेदना त्यांच्यात फरक फक्त तीव्रतेचा.

आगगाडीत बसल्यावर क्षणोक्षणी खडखडाट चालू असतो. कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी, अशा तालावर आपण बघता बघता झोपी जातो. पण घरी शांत झोपलो असताना मांजराने जेवण घरातले भांडे पाडले की आपण ताडकन जागे होतो. तसेच काहीसे या स्पर्शाच्या संवेदनेत आहे. सतत संदेश येत असले की मेंदू म्हणतो चालू द्या, ठीक आहे पण त्यात काही बदल झाला की मात्र त्याची लगेच दखल घेतली जाते. आपण अंगावर कपडे घातलेले असतात. त्याचा जरी स्पर्श सतत होत असला तरी आपण कपड्याची जाणीव विसरून गेलेलो असतो. त्याच्या जोडीला काही नवीन स्पर्श झाला तरच तो महत्त्वाचा. कुत्रा माणसाला चावला तर ती काही बातमी होत नाही पण माणूस कुत्र्याला चावला तर मात्र छापून येते, तशातली गत.

स्पर्शाची जाणीव सगळीकडे सारखी होत नाही. हाताची बोटे, नाक, ओठ या ठिकाणी ती सर्वात जास्त होते. त्या मानाने तळपाय, पाठपोट या ठिकाणी ती कमी होते.

थंड स्पर्शाने सारे अंग शहारते



थंड आणि गरम या संवेदना या नेमक्या कशा होतात हे आजही मोठे गूढ आहे. पूर्वी शास्त्रज्ञांना वाटायचे की या कामी मज्जातंतूंच्या टोकाशी असलेल्या खास पेशी उपयोगी पडतात. पण तसे असेलसे वाटत नाही. काही ठिकाणाहून थंड आणि काही ठिकाणाहून गरम अशा या संवेदना होतात. पाठपोट आणि कोपरापासूनतातडीचा फोन जातो, तशासारखी वेदना ही संकटाची सूचना आहे   मनगटापर्यंतच्या भागात थंड -गरम यांची जाणीव सर्वात जास्त होते. आपले लक्ष नसताना सहज गंमत म्हणून चेह-यावर थंडगार पाणी टाकले तर फारशी थंडी वाजत नाही. पण तेच पाणी कुणी मानेवर पाठीवरून ओतले की मात्र सारे अंग शहारते. याच्या उलट डोके, चेहरा आणि हात. या ठिकाणी थंडी कमी जाणवते. बर्फ पडत असताना डोक्यावर त्याचा जाड थर बसला स्त्री तो नुसता झटकून टाकता येतो. चेहरा तर उघडच असतो. तो काही बुरखा घेऊन झाकून टाकता येत नाही. पण अंगात मात्र चांगले गरम कपडे घातले नाहीत तर थंडीत माणूस पार गारठून जातो.

त्वचेच्या काही भागाप्रमाणे जीभ, तोंड या ठिकाणीही थंड अन् गरम याचा फारसा विधी-निषेध नसतो. कपातल्या चहाचा थेंब हातावर पडला तर हात पोळतो , परंतु तोच गरम चहा माणूस मजेत पीत असतो. तसेच आईस्क्रीम थंडगार असले तरी आपण मिटक्या मारीत खातो. पण त्याचा कप हातात धरला तर हात काकडतो. शरीराच्या इतर भागात संवेदना असतात पण फार मर्यादित. उदाहरणार्थ पोट रिकामे होणे, मूत्राशय भरल्यावर लघवीला जाण्याची जाणीव होणे, डोके दुखणे वगैरे. शरीरातले बहुतेक अवयव बधीर असतात. पण त्यांच्यावरील वेष्टन मात्र फार संवेदनक्षम असते. शरीराच्या त्वचेप्रमाणेच आत कोठेही वेदना झाली की काही तरी बिघाड झाल्याची धोक्याची सूचना झाली म्हणून समजावे. स्पर्शाच्या संवेदनेची जाणीव जशी थोड्या वेळाने बोथट होते, त्याचप्रमाणे थंडगार या संवेदनेची जाणीव थोड्या वेळाने कमी कमी होत जाते. कडाक्याच्या उन्हातून आपण वातानुकूलित खोलीत गेलो तर पहिल्यांदा चांगलीच थंडी जाणवते. पण थोड्या वेळातच थंडीची बोच कमी होऊन आराम वाटू लागतो.

त्वचेतील मज्जातंतू
(१). मज्जातंतू, (२) घर्मग्रंथी कार्यान्वित करणारा मज्जातंतू, (३) मज्जातंतू, (४) व (६) घर्मग्रंथी, (५) सूक्ष्म स्नायू, (७) संवेदना वाहून नेणारे मज्जातंतू, (८) केसांच्या बुडाशी असणारा स्नायू



वेदनेची जाणीव ही सर्वात महत्त्वाची संवेदना समजायला हवी. शहरात कोठेही घातपात होत असला की पोलिस चौकीवर तातडीचा फोन जातो, तशासारखी वेदना ही संकटाची सूचना आहे. समजा, आपण चुकून तापलेल्या तव्याला हात लावला किंवा चाकूने आपले बोट कापून घेतले, किंवा विजेचा धक्का लागला की वेगाने त्याची खबर मेंदूला पोचवली जाते. लागोलाग मेंदूकडून हुकूम येऊन बोट त्या जागेपासून दूर काढले जाते. ही सूचना जर वेळेवर गेली नाही तर बोट तसेच तव्यावर भाजत राहील. चाकूवर कापत राहील नाही तर विजेचा प्रवाह वाहात राहील. अन् साहजिकच जास्त गंभीर इजा होईल.अशा रीतीने वेदनेची जाणीव आपल्याला मुळीच सुखाची वाटत नसली तरी शरीराचे रक्षण करायला ती फार उपयोगी आहे. चव समजण्यासाठी जिभेवर खास पेशी असतात. त्या एका त-हेने संवेदनाच पोचवीत असतात असे म्हणायला हरकत नाही.

त्वचा जर गारठून गेली असली तर वेदनेची जाणीव होते. मुले ऐन थंडीत सहलीला गेली असताना खरचटून घेतात , पण त्या वेळी फारसे दुखत नाही कारण थंडीने सारे अंग कसे गारगार पडलेले असते. इथिक क्लोराइड या द्रव्याचा फवारा मारून क्षणभर त्वचा गोठवून टाकली तर त्यातून इंजेक्शनची सुई खुपसली तर फारसे दुखत नाही. त्याच्या उलट त्वचा गरम झाली असेल तर त्या जागी कोठलीही वेदना जास्तच जाणवते. तसेच त्वचेचा एखादा भाग दुखावला असल्यास अगर सुजला असल्यास त्याच्या आसपासच्या भागावरही वेदना जास्त जाणवते. आपण म्हणतो की जखमेच्या आजूबाजूचा भाग हळवा झाला आहे.

वेदनेची जाणीव

 

वेदनेचा अभाव

वेदनेची जाणीव  फार महत्त्वाची आहे, असे म्हटले त्याचे आणखी एक उदाहरण देतो. दुर्दैवाने आपल्या देशांत महारोगाचा प्रसार फार मोठ्या प्रमाणावर आहे. या रोगाचे जंतू पहिल्यांदा त्वचा अन् मज्जातंतूंवर हल्ला करतात. विजेच्या तारा खराब झाल्यावर त्यातून प्रवाह बरोबर जात नाही, त्याचप्रमाणे या बिघडलेल्या मज्जातंतूंमधून संवेदना नीट जात येत नाहीत. मग त्वचेच्या काही भागाला बधीरपणा येतो. कापूस लागलेला समजत नाही. गरम-गार यांतला फरक कळत नाही. चपलेतला खिळा वर आलेला असला तरी पायाला खुपत नाही.

निरोगी माणसाचा हात गरम वस्तूला लागला की तो हात झटकन मागे घेतला जातो आणि पुढे होणारे नुकसान टळते.  पण महारोगाच्या सुरुवातीस ही संवेदना होत नसल्याने हात तसाच तापलेल्या वस्तूवर राहतो. चपलेतला खिळा तळपाय पोखरत राहतो. आणि त्यामुळे हातापायात वरचेवर जखमा होतात. फोड येतात. मनुष्य विचार करतो, “अरेच्या, माझ्या हाताला कधी भाजलं बुवा ?” मुलाला अगर माणसाला जर असा बधीरपणा जाणवला तर त्याने वेळ न घालवता डॉक्टरांकडून त्वचेची तपासणी करून घ्यावी. महारोग लवकर हुडकून त्यावर योग्य औषधपाणी केले तर तो संपूर्णपणे बारा होऊ शकतो.

पुष्कळदा निसर्गातही गफलत होते. पोटात खोलवर कुठे त्याची जाणीव झाली तरी आजार निर्माण झालेला असतो आणि त्याची जाणीव मज्जातंतुंतून मेंदूकडे पोचवली जाते. पण मेंदूत त्याचा अर्थ भलताच लावला जातो. आणि त्याच मज्जातंतूंच्या हुकमतीखालची दुसरीच कुठलीतरी त्वचा दुखत राहते. रोग पोटात अन् दुखणं त्वचेवर !

आपण टेलिफोनचा नंबर फिरवतो. पण केंद्रातील गुंतागुंतीच्या यंत्रात काही तरी बिघाड झालेला असला तर भलतीकडे फोन जातो. मग आपण म्हणतो, “सॉरी, रॉंग नंबर !’ तसा हा निसर्गातला ‘रॉंग नंबर’ म्हणायचा !

डॉ. अरविंद लोणकर

[ चित्रे व लेख : ‘सृष्टिज्ञान’ मे १९७० वरून साभार ]

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^ 
जाता जाता

खंडेराव केळकर 
 
[३] 

ऐतिहासिक नाटकात इंग्रजी

पुण्याला एका नामवंत नाट्यसंस्थेचा ‘आग्र्याहून सुटका’ या विष्णुपंत औंधकर लिखित नाटकाचा नाट्यप्रयोग चालला होता. प्रयोग जरी हौशी नाट्यसंस्थेचा होता, तरी तसा ब-यापैकी चालला होता. अपेक्षित वाक्यांना आणि प्रसंगांना टाळ्यांचा प्रतिसाद मिळत होता.

या प्रयोगात स्त्रियांच्या भूमिका पुरुष करीत होते. सगळेच स्त्रीपार्टी सुस्वरूप नसल्यामुळे या स्त्रिया आहेत असे प्रेक्षक समाधानपूर्वक मानून घेत होते.

ओंकार नावाचा एक ब्राह्मण आपली मुलगी वागीश्वरी हिला उमरखान नावाच्या खलनायकाकडे गहाण ठेवतो आणि त्यामुळे शिवाजी महाराजांची सुटका होते ; परन्तु महाराजांना हे कळल्यावर ते नाराज होतात आणि वागीश्वरीच्या सुटकेचा निश्चय करतात.

इकडे उमरखान वागीश्वरीवर जबरदस्ती करून तिच्याशी निका लावत आहे, असा प्रवेश रंगात आला होता. वागीश्वरी उमरखानला आपल्या सामर्थ्यानिशी प्रतिकार करीत होती. अखेर कंबरेजवळ खोवलेला खंजीर काढून ती उमरखानाच्या अंगावर जाण्याचा प्रसंग आला. वागीश्वरीने खंजिराला हात घातला; परंतु नको इतका घट्ट रुतून बसलेला खंजीर काही केल्या निघेना. दोघेही हूँ ss हूँ ! हूँ ss हूँ ! करीत एकमेकांच्या अंगावर जात होते. खंजीर काही निघेना. अखेर वागीश्वरीने ‘शट अप ! उमरखान शट अप ! ‘ असे निर्वाणीच्या शब्दांत उमरखानाला बजावले.

भूतकाळातले प्रेक्षकांचे समूहमानस वर्तमानकाळात आले. वागीश्वरीला सोडविण्यासाठी तलवार सज्ज करून बसलेला शिवाजी हताश होऊन कपाळावर हात मारून मटकन खाली बसला. प्रचंड हास्यकल्लोळ झाला, परंतु काही दिवसांनी इंग्रजी राज्य येणार, हे वागीश्वरीने सुचविल्याबद्दल प्रेक्षकांनी तिला शाबासकी दिली.

खंडेराव केळकर  
( ‘सकाळ‘ दिवाळी अंक २२ ऑक्टोबर १९९५ वरून साभार )

@@@@@@@@@@
महत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@

15 thoughts on “मृत्युंजयाच्या सावलीत

  1. प्रदीप अधिकारी यांचा रावळगांववरील लेख खरोखरच नॉस्टलजिक करणारा आहे. आम्ही रत्नागिरीत असताना रावळगांवएवढं लोकप्रिय आणि खमंग चॉकलेट दुसरं नव्हतं. आजच्या क्याडबरीलाही त्याची सर नाही. पण कुठलीही चांगली गोष्ट टिकत नाही हेच खरं. बाकी प्रदीपजींच्या आणि माझ्या आठवणींमध्ये कमालीचं साम्य आढळलं. आम्हाला कुणीतरी खाऊ म्हणून दिलेल्या रावळगांवच्या नंतर रिकाम्या झालेल्या डब्यांमध्ये माझी आईही शिवणकामाचं साहित्य ठेवत असे तर बाबा दाढीचं सामान ठेवत असत. सीमा-रमेश देव आमच्या घरी आले होते (सीमा ही आईची वर्गमैत्रीण होती) तेव्हा त्यांनी आणलेला रावळगांवचा डबा मात्र त्रिकोनी होता. त्यात आई रेशमाच्या लडी ठेवत असे. गेले ते रावळगांवी दिवस. मुकुंदजी नवरे यांचा शांताबाई माडखोलकरांवरचा लेख आवडला. ‘एका निर्वासिताची कहाणी’ हे माडखोलकरांचं पुस्तक माझ्याकडे आहे व त्यात शांताबाईंवर बराच मजकूर आहे. पण या लेखातून अधिक माहिती समजली.

    • हर्षदजी, नमस्कार ,
      तुमची प्रतिक्रिया वाचून खरंच आनंद झाला आणि गंमतही वाटली. कधी कधी रावळगाव सारखी एखादी छोटीशी गोष्ट देखील आपल्या न कळत आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक संस्कृतीचा कसा भाग बनत जाते त्याच हे उत्तम उदाहरण ठरू शकेल.
      आपण लिहिलेल्या सविस्तर अभिप्रायाबद्दल धन्यवाद .
      प्रदीप

  2. मुकुंद नवरे यांना अनेक सलाम.. संग्रही   ठेवावा असा लेख आहे  ‘तरूण भारत’कार ग. त्र्यं. माडखोलकर   हे परिचित तर  सौ. शांताबाई माडखोलकर यांच्याबद्दल काहीच माहिती  नसल्याने  संपूर्ण लेख वाचत जावा असा आहे. 

    प्रदीप अधिकारी रावळगाव संबंधी इतकी सुंदर माहिती सांगतात की कमाल वाटते. प्रदीपजी ही मैत्रीला मिळालेली सुंदर भेट आहे. मंगेशजी तुमचे छान छान लेख छापताहेत त्याबद्दल आभार. 
    मला वाटते की गेल्या चार महिन्यात करोना  संबंधी आम्हाला इतकी माहिती झाली आहे की इतर कोणत्याही रोगासंबंधी नसेल. इतकं असून  डॉ. अनिल जोशी यांनी चार गोष्टी नव्याने नीट मांडून सांगितल्या आहेत.. वर्षाधारा ही वर्ष पेठे यांची भेट  छान आहे 
    डॉ. अरविंद लोणकर यांचे त्वचाख्यान चांगली माहिती देते 

    • प्रकाशभाई, नमस्कार
      आपल्या कौतुकभरल्या अभिप्रायाबद्दल मी काय लिहू….? पुढेमागे लिखाणात कांही चूकभूल झाली तर कान उपटण्यांत मागेपुढे करू नका. असाच लोभ असावा.
      प्रदीप

  3. श्री मुकुंद नवरे यांच्या समर्थ लेखनातून एक उमदे जीवन परिचित झाले. शेवटच्या ओळी फारच छान

    सुखदु:खांचा विविध गोड गोफ आम्ही दोघांनी विणिला
    आयुष्यांतिल दुरित प्रसंगी अतुल धैर्य दिधले
    संकटसमयी विघ्नहर्त्या गजाननाने जीवन बहरविले ”

    प्रदीप अधिकारी यांची रावळगावची टॉफी चविष्ट आणि उद्बोधक आहे.

    डॉ. अनिल जोशी यांचे कडबोळे नाविन्यपूर्ण माहितीने उद्बोधक झाले आहे.

    डॉ. अरविंद लोणकर यांचं त्वचा विषयावरील लेख माहितीपूर्ण आहे.

    खंडेराव केळकर यांनी दिलेला प्रसंग डोळ्यासमोर उभा राहून हंसू आल्या शिवाय रहात नाही
    मैत्री अधिक रसाळ झाली.
    संबंधितांचे धन्यवाद
    अण्णा
    17/08/2020

    • मधुकरजी नमस्कार ….आपल्याला रावळगाव टॉफी आवडली हे वाचून आनंद झाला.
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      प्रदीप

  4. नवरेजींनी मीरा ऊर्फ शांताबाई माडखोलकर यांचा परिचय इतका सविस्तर करून दिलाय की दुर्मिळ पुस्तक शोधायचा आटापिटा करायला नको. त्या ग्वाल्हेर ला येऊन गेल्याचं मात्र मला आठवत नाही याची खंत वाटते. या सुंदर पुस्तकाचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद नवरेजी.
    वर्षा ताईंनी आयुष्याला पुस्तक मानून सुंदर कविता केलीय. धन्यवाद.
    डॉ. अनिल जोशी यांनी दिली लँसेट या मेडिकल जर्नलनं केलेल्या लबाडीचा चांगला परिचय करून दिलाय. पण त्यामुळे मेडिकल सारख्या उदात्त प्रोफेशनला आलेलं बाजारू रूप पाहून वाईट वाटलं. अभ्यासपूर्ण लेख आहे जोशी जी. धन्यवाद.
    लोणकर जी त्वचाख्यानला त्त्वचा ख्यान कां म्हणतात कळलं नाही. लेख माहितीपूर्ण आहे. धन्यवाद.
    अधिकारीजींनीलेखाचा शेवट मोठा रावळ गावी गोड केला आहे. मजा वाटली.
    ऐतिहासिक नाटकातील शट अप वाचून खळखळून हसू आलं.
    अंक बहारदार. धन्यवाद नाबर जी.

  5. लेखावर प्रतिक्रिया देणारे श्री. हर्षदजी, श्री. प्रकाश पेठे, श्री. सोनवणे आणि डॉ. प्रियंवदाताईंचे मी आभार मानतो. उत्तरार्धात प्रियंवदाताईंना अधिक संदर्भ मिळून खुलासा होईल एवढेच सांगतो.

  6. ग. त्र्यं. माडखोलकर यासारख्या अनेक महनीय साहित्यिकांना आपण विसरलो आहोत. नवीन पिढीला तर हे माहीतच  नाहीत. तरी मुकुंदराव नवरे यांनी सविस्तरपणे लिहिलेल्या या पुस्तकाच्या परिचयात शांताबाई या पडद्यामागील असलेल्या माडखोलकरांच्या पत्नीविषयी महत्त्वाची माहिती मिळाली. असे हे कुणीतरी केलेच पाहिजे. अन्यथा वाडवडिलांची पुस्तके एक तर रद्दीत जातील किंवा ग्रंथालयाच्या कपाटात पडून राहतील. मुकुंदरावांकडे असा हा खजिना आहे तो त्यांनी याहून अधिक मोकळेपणाने वाचकांसमोर खुला करावा. ही माझीच काय इतर वाचकांचीही मागणी असली पाहिजे. 

    रावळगाव या टॉफीविषयी प्रदीपजी यांचा लेख आमच्या आठवणी जाग्या करणारा आहे. आजही त्या टॉफीची चव जिभेवर रेंगाळतेय.  अधिकारी यांनी ती मैत्रीच्या अंकातून मांडली याचे कौतुक केले तितके कमीच. 

    त्वचाख्यान  ही लेखमाला आमच्या अनेक शंकांचे निरसन करणारी आहे. हे असे जुने लिखाण पुनः प्रसिद्ध केल्याबद्दल संपादक मंडळाचे आभार.               

    • कमलाकरजी, नमस्कार ……..हल्ली रावळगाव कुठेही मिळत नाही ….पण मी सतत त्याच्या शोधांत असतो …जिभेवर रेंगाळणारी ती चव.. आठवणीने पण तोंडांत पाणी आणते…जर कधी रावळगाव मिळालेच तर तुमची आठवण काढून तुमच्या वाटणीचे रावळगाव पण मीच तोंडांत टाकीन
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद
      प्रदीप

  7. मुकुंद नवरे, प्रदीप अधिकारी आणि डॉ. अनिल जोशी यांचे लेख, वर्षा पेठे यांची कविता  आणि डॉ अरविंद लोणकर व खंडेराव केळकर यांचे पुनःप्रसिद्ध केलेले लेख हे सारे साहित्य म्हणजे एक मेजवानीचे भरलेले सुग्रास ताट आहे. या भोजनाचा आस्वाद घेऊन तृप्त झालो. ढेकर देताना या  सर्व लेखककवींचे आभार मानतो.      

  8. प्रदीपजींचा लेख वाचून सहज आठवण झाली. त्या काळात इंडियन एअर लाईन्स आणि एअर इंडियाच्या प्रवाश्यांना विमानात प्रवेश केल्यानंतर उड्डाण करण्यापूर्वी तोंडात ठेवून चोखण्यासाठी रावळगावच्या टॉफीच दिल्या जात असत. कधी एकदा हवाईसुंदरी हातात टॉफीचा ट्रे घेऊन येते आणि कधी एकदा ती अमृततुल्य टॉफी तोंडात टाकतो असं होत असे. विमान उड्डाण करताना तयार होणाऱ्या हवेच्या प्रचंड दाबामुळे कानांना दडे बसू नयेत म्हणून घशात या टॉफीचा रस घोळवत ठेवायचा असे, पण या वैज्ञानिक सत्याकडे दुर्लक्ष करून आम्ही फक्त रावळगावचा आनंद आकंठ लुटत असू.

    • मृदुला ताई नमस्कार …..त्याकाळी विमानांत सुद्धा रावळगाव मिळत असत हे वाचून खरेंच नवल वाटले. रावळगाव खाण्यासाठी त्याकाळातली उच्चभ्रू सुद्धा आतुर असत हे वाचून तर गंमतच वाटली.
      आम्ही चाळीत रहाणारे मध्यमवर्गीय. त्यामुळे रावळगाव विमानांत सुद्धा पोहोंचले असेल हे त्या वयांत स्वप्नांत देखील आले नव्हते. असो….पुढे दिवस बदलले ..नोकरींत वरिष्ठ पदांवर काम करायला मिळाले…कामानिमित्त कंपनी देशभरच्या ऑफिसेस मध्ये विमानांनी पाठवू लागली …..तो पर्यंत वयाची चाळीशी उलटून गेली होती आणि विमानांतल्या रावळगावची जागा दुसऱ्या कुठल्या तरी गोळ्या चॉकलेटांनी घेतली होती…..त्यामुळे विमानांत ऐटीत बसून रावळगाव चघळत बसायच्या आनंदास आणि अनुभवास मुकलो हे खरे.असो…!!
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      प्रदीप.

यावर आपले मत नोंदवा