रामायणातील गोष्टी

स्वागत फुलांनी  

प्रस्तावना 

रामायण आपल्याला लहानपणापासून परिचित आहे; मोठ्यांच्या तोंडून व गोष्टींच्या पुस्तकांतून. आणि आपल्याला ते ढोबळमानाने माहीत आहे. पण मुळात ते कथाप्रसंग वाल्मिकींनी कसे सांगितले आहेत व किती तपशीलवार आहेत ह्याकडे आपण कधी फार लक्ष दिले नव्हते. मूळ रामायणातील काही कथाप्रसंग वाचकांसमोर ठेवण्याचा हा यत्न आहे. रामायणाची अनेक भाषांत अनेक रूपे उपलब्ध आहेत. संस्कृतमध्ये लिखित रामायण हे मूळ रामायण आहे असे मानले जाते. त्या संस्कृत ग्रंथातून काही कथा जशा आहेत तशा प्रस्तुत करण्याचा यत्न आहे.

रामाच्या जन्माची कहाणी व रामायणातील काही मुख्य पात्रांचे या मर्त्य जगातून प्रस्थान याबद्दल रामायणात जे लिहिले आहे ते वाचकांपुढे क्रमशः ठेवत आहे.

रामजन्म व इतर दशरथपुत्रांचा जन्म :  कथाप्रसंग १

भारतवर्षात अनेक राज्ये होती त्यापैकी अयोध्या देशामध्ये इक्ष्वाकू वंशातील दशरथ हा राजा होता.  धर्मानुचारी दशरथाला अपत्य नव्हते.  त्यामुळे त्याने विचार केला की पुत्रप्राप्तिकरिता अश्वमेध यज्ञ करावा. लगेच त्याने मंत्रिमंड्ळाला बोलावून आपला विचार सांगितला आणि  म्हटले की मला हा यज्ञ शास्त्रोक्त पद्धतीने करावयाचा आहे. म्हणून प्रधानमंत्री सुमंत्र याला आदेश दिला की त्याकरिता राजपुरोहित वसिष्ठ आणि इतर सर्व मान्यवर ऋषींना बोलवा. त्यांच्याशी सल्लामसलत करावी म्हणतो. सुमंत्राने कश्यप, जाबालि, वामदेव, सुयज्ञ आणि वसिष्ठ याखेरीज अनेक वेदपारंगत ब्राह्मणांना बोलावले. त्यांना राजाने आपला विचार सांगितला व म्हटले की हा यज्ञ कसा करावा आणि माझे ईप्सित त्यातून कसे साध्य होईल हे मला सांगावे. सर्वांनी हा बेत चांगला असल्याचे सांगितले आणि सल्ला दिला की ‘शरयू नदीच्या काठी मंडप बनवा, यज्ञशाला उभारा; तेथे यज्ञकार्य करू. त्याची सामग्री गोळा करायला सुरुवात करा आणि आता घोड्याला सर्व राज्यांमध्ये सोडा. आपले ईप्सित  अवश्य साध्य होईल.’

दशरथाने सर्व मंत्र्यांना त्यानुसार आज्ञा दिल्या. उपाध्याय आणि रक्षक यांबरोबर घोडा सोडण्याची आज्ञा दिली आणि राजा सर्वांचा निरोप घेऊन आपल्या राण्यांकडे येऊन म्हणाला की अश्वमेध यज्ञाकरिता तुम्हाला पण यज्ञदीक्षा घ्यायची आहे.  संतानप्राप्तिकरिता हा यज्ञ आहे.

यानंतर सुमंत्राने एकांतात राजाची गाठ घेतली व म्हटले, “ महाराज, आपल्या संतानाच्या बाबतीत मी एक कथा ऐकली आहे. सनत्‌कुमारांनी ही भाकित कथा पूर्वी ऋषींना सांगितली होती. सनत्‌कुमारांनी तेव्हा हे सांगितले होते की –

“ कश्यपपुत्र विभंडक या ऋषींना  ऋष्यशृंग नावाचा पुत्र होईल. तो कायम पित्याबरोबर वनात राहील. जनसंपर्क नसल्यामुळे त्याला स्त्री-पुरुष ओळखता येणार नाहीत. तो दोन्ही प्रकारच्या ब्रह्मचर्याचा पालन करणारा होईल; पहिले गुरुकुलातील नैष्ठिक ब्रह्मचर्य जे प्रमुख ब्रह्मचर्य आहे ते पाळेल आणि नंतर दुसरे  ब्रह्मचर्य म्हणजे संतानप्राप्तिकरिता ठराविक काळातच स्त्री समागम करण्याचा  नियम पाळण्याचे ब्रह्मचर्य अनुसरेल. पित्याबरोबर अनेक वर्षे वनात राहिल्यावर मग हे असे घडेल –

‘अंग देशाचा राजा रोमपाद याच्या अत्याचारांमुळे त्याच्या देशात अवर्षण घडेल. तो ऋषींना बोलावून विचारेल की प्रायश्चित्ताकरिता काय करावे लागेल ते सांगा. ते  ऋषी त्याला सल्ला देतील की  विभंडक ऋषींचा पुत्र ऋष्यशृंग यांस इथे बोलावून घावे आणि आपली कन्या शांता हिचा विवाह त्यांच्याबरोबर लावावा.  जितेंद्रिय अशा ऋष्यशृंग ऋषींना बोलावण्याकरिता रोमदेव राजाने आपले पुरोहित व मंत्री यांना त्यांच्याकडे पाठवू पाहिले. पण ते सर्व म्हणाले की आम्हाला ऋषींच्या शापाची भीती वाटते म्हणून आम्ही स्वतः न जाता काही उपायाने त्यांना इथे बोलवू.  हे ऋषी इथे आल्यावर वृष्टी होईल आणि आपल्या कन्येचा विवाह पण होईल.”

इतके बोलून सुमंत्र दशरथ राजाला म्हणाला “ त्याप्रमाणे घडले. रोमपादाने ऋष्यशृंग ऋषींना बोलावून आपल्या कन्येचा विवाह त्यांच्याशी लावून दिला. हे ऋष्यशृंग ऋषी आपल्याला पुत्रप्राप्ति करवून देतील”. यावर दशरथाने विचारले “रोमदेवाने ऋष्यशृंग ऋषींना कसे बोलावून घेतले ?”

सुमंत्राने मग पुढील हकीकत सांगितली –
 “ रोमदेव राजाने आपल्या मंत्र्यांना विचारले  ‘ आपण लोक कोणत्या उपायाने त्या ऋषींना इथे बोलावून घ्याल ?’  तेव्हा ते  रोमदेव राजाला म्हणाले ‘ या ऋषींनी आजपर्यंत स्वाध्याय आणि तपश्चर्या एव्हढेच केले आहे. त्यामुळे त्यांना स्त्रीसुख आणि विषयसुख ह्या गोष्टी परिचित नाहीत. म्हणून आम्ही  शहरातून सुंदर वेश्यांना त्या ऋषींकडे पाठवू आणि त्या ऋष्यशृंग ऋषींना लुभावून इथे आणतील. ‘

रोमदेव राजाने त्याप्रमाणे करण्याची अनुमति त्यांना दिली.
त्यानुसार वेश्या ऋषींच्या निवासस्थानाच्या आसपास जाऊन त्यांच्या दृष्टीस पडण्याचा प्रयत्न करायला लागल्या. दैवयोगाने एक दिवस ऋष्यशृंग ऋषींच्या दृष्टीस त्या पडल्या. त्या वेश्यांनी लगेच त्यांच्याशी संवाद साधला- ‘ हे ऋषी, आपण कुणाचे सुपुत्र आहात? आणि या वनात एकटे का राह्ता ?’

ऋष्यशृंग ऋषी मोहित झाले आणि त्यांनी म्हटले ‘ माझे वडील विभंडक ऋषी आहेत. आम्ही जवळच राहतो. आपण तेथे चलावे व आदरातिथ्य स्वीकारावे.‘

त्याप्रमाणे त्या वारांगना त्यांच्या निवासस्थानी गेल्या व ऋषींनी कंदमुळे, फळे देऊन त्यांचे आतिथ्य केले. पण त्यांचे पिता विभंडक यांच्या भीतीने त्या वारांगनांनी काहीतरी सबब सांगून तिथून काढता पाय घेतला. जायच्या आधी आपल्याबरोबर आणलेले लाडू इत्यादी त्यांना देऊन आल्या. ऋष्यशृंग ऋषींनी कधी मिठाई पाहिली नव्हती त्यामुळे त्यांनी लाडू म्हणजे फळेच आहेत असे समजून ते लाडू खाल्ले. पण त्या सुंदर गणिका निघून गेल्यामुळे ते थोडे उदास झाले आणि दुसर्‌या दिवशी स्वतःच त्यांच्याकडे पोहोचले. त्या गणिकांनी त्यांचे आदरातिथ्य करून त्यांना आपल्याबरोबर चलण्याची विनंती केली आणि मग ऋष्यशृंग ऋषी त्यांच्या बरोबर नगरात पोहोचले. ते तिथे पोहोचताच इंद्राने नगरात वर्षा केली. रोमपादाने ऋषींचा सत्कार वगैरे करून वर मागितला की आपले पिता माझ्यावर रोष न करू देत. त्यानंतर त्यांना आपल्या निवासस्थानी घेऊन जाऊन त्यांचा विवाह आपल्या कन्येशी लावून दिला. आणि मग ऋष्यशृंग ऋषी रोमपादाची कन्या शांता हिजबरोबर राजधानीत सुखाने राहू लागले.”

सुमंत्राने पुढे म्हटले ‘ महाराज, सनत्‌कुमार आपल्या बाबतीत काय म्हणाले तेही आपण ऐकावे ‘. सनत्‌कुमार पुढे म्हणाले “ इक्ष्वाकु वंशात दशरथ नावाचा धर्मात्मा राजा होईल तो रोमपादाकडे जाऊन विनंती करेल की मला संतान नाही म्हणून संतानप्राप्तिकरिता मला जो यज्ञ करायचा आहे त्याकरिता ऋष्यशृंग ऋषींना माझ्याबरोबर यज्ञ करण्याकरिता पाठवावे. रोमपाद राजा ऋष्यशृंग ऋषींना सपत्नीक व सपुत्रक असे दशरथाबरोबर पाठवतील. राजा दशरथ ऋष्यशृंग ऋषींना यज्ञ करण्याची विनंती करेल व त्यांना यज्ञाचा ऋत्विज बनवेल. त्या यज्ञाचे फळ म्हणून दशरथाला ४ पराक्रमी पुत्र होतील.”

ही भाकितकथा सांगून सुमंत्र राजाला म्हणतो- ‘ महाराज, सनत्‌कुमारांचे हे बोल फार पूर्वीचे म्हणजे सत्ययुगातले आहेत. आता आपण त्याप्रमाणे रोमपादाकडे जाऊन ऋष्यशृंग ऋषींना घेऊन यावे ’.

 दशरथ राजा लगेच राजपुरोहित वसिष्ठ यांच्या कडून अनुज्ञा घेऊन लवाजम्यासह रोमपादाकडे गेला. रोमपादाने दशरथाचा आदरसत्कार केला. ऋष्यशृंग ऋषींना सांगितले की हा राजा माझा मित्र आहे. ७-८ दिवस राहिल्यावर, दशरथाने मुद्द्याचे बोलणे काढले. ‘यज्ञाचे एक मोठे काम आले आहे; त्याकरिता ऋष्यशृंग ऋषींना माझ्याबरोबर पाठवावे.’ राजा रोमपादाने तात्काळ अनुमति देऊन ऋष्यशृंग ऋषींना विनंती केली की त्यांनी यज्ञकार्याकरिता दशरथाबरोबर जावे. राजा दशरथाने ताबडतोब काही दूत पुढे पाठवले आणि सर्व अयोध्यानगरी स्वच्छ करून सजवायला सांगितली. अशा या सजलेल्या नगरीत राजाने ऋष्यशृंग ऋषींबरोबर प्रवेश केला व त्यांचा सत्कार केला. काही दिवस गेल्यावर राजाने ऋष्यशृंग ऋषींना पुत्रप्राप्तिकरिता यज्ञकार्य करण्याची विनंती केली. त्यावर ऋष्यशृंग ऋषींनी घोडा सोडवून आणायला सांगितले व शरयूच्या काठी यज्ञाची तयारी करायला सांगितले. राजा दशरथाने वसिष्ठ ऋषींना मुख्य कुलगुरू म्हणून यज्ञाची व्यवस्था पार पाडण्याची विनंती केली. लगेचच तयारीला सुरुवात केली गेली. वसिष्ठ ऋषींनी आज्ञा दिली –‘ विद्वान ब्राह्मण, स्थापत्यकलाजाणकार, कुशल कारागीर यांना बोलवा. सहस्रावधी विटा गोळा करून येणार्‌या राजांच्या राहण्यासाठी आरामदायक घरे बनवा. त्याचप्रमाणे येणार्‌या ब्राह्मणांकरिता निरनिराळ्या ठिकाणी सुखसोयींनी व धान्यादिंनी भरलेली घरे बनवा.  नगरवासी व गावांतून येणार्‌यांकरिता मोठ्मोठी घरे बनवा. त्यात भोजनाची व्यवस्था करा. जे कारागीर यज्ञाकरिता काम करीत आहेत त्यांना वेतन आणि भोजन द्या म्हणजे ते मन लावून काम करतील आणि कोणी सोडून जाणार नाही.’ यानंतर सुमंत्राला बोलावून सांगितले की ‘ देवतुल्य काशी नरेश, तसेच महाराजांचे श्वशुर केकयदेशाधिपति, अंगदेशाचे राजा रोमपाद, यांना स्वतः जाऊन घेऊन या. आणि सिंधू देश, दक्षिणेकडील देश आणि पृथ्वीतलावरील अन्य राजे यांना दूत पाठवून निमंत्रण करा.’ काही दिवसांनी हे सर्व राजे रत्न इत्यादी भेटी घेऊन आले. मग वसिष्ठ दशरथाला म्हणाले ‘ हे राजन्‌, सर्वजण आले आहेत. आता एकदा यज्ञस्थळी यज्ञशालेला भेट द्या व व्यवस्था पहा.’ एका शुभ दिवशी राजा दशरथाने यज्ञस्थळाला भेट दिली, यज्ञदीक्षा घेतली आणि सर्व ब्राह्मणांनी ऋष्यशृंग ऋषींना आपला मुख्य गुरू म्हणजे ऋत्विज नेमून यज्ञ कार्य सुरू केले. या दरम्यान एक वर्ष पूर्ण झाले आणि यज्ञाचा घोडा परत आला. कल्पसूत्रांमध्ये लिहिलेल्या विधिंप्रमाणे सर्व ब्राह्मण यज्ञकार्य करीत होते.  सोमयज्ञाच्या आधी करण्याचा प्रवर्ग्य ( सोमयज्ञाच्या आधीचा विधी- गरम भांड्यात दूध ओतून करण्याचा ) , नंतर उपसद ( सोमरस काढायच्या आधी करायच्या ज्योतिष्टोमातील विधी )  आणि प्रतिदिन दोन वेळा सवन ( यज्ञस्नान) इत्यादी विधिवत केले गेले. या यज्ञकार्यात जो येईल व जितक्या वेळा येईल त्याला यथेच्छ भोजन दिले. कोणीही असंतुष्ट राहू नये ही काळजी घेतली गेली. दोन सवनांच्या मधील वेळात ब्राह्मण लोक आपापसात शास्त्रार्थचर्चा करीत होते. यज्ञकार्याकरिता २१ मुठी उंचीचे २१ लाकडी खांब उभारले होते. त्यांवर सोन्याचे आवरण चढवले होते. वस्त्रालंकार व चंदन यांनी सुशोभित केले होते. त्या खांबांना ३०० पशु व अश्वमेध घोडा बांधले होते. ज्या देवाचा जो पशु नियुक्त आहे ते पशु, सर्प, पक्षी असे सगळे यज्ञस्थळी आणले गेले. स्वतः राणी कौसल्येने त्या अश्वमेध घोड्याची पूजा केली व तलवारीने त्याचे ३ तुकडे केले. मग रात्रभर त्या अश्वाची राखण तिने केली. तिच्याबरोबर राजाच्या शूद्र स्त्रिया व वैश्य स्त्रियांनाही, अध्वर्यु आणि उद्गाता या पुरोहितांनी तिथे ठेवले. मग दुस-या दिवशी यज्ञपुरोहितांनी त्या घोड्याच्या चरबीची आहुती दिली. त्या चरबीच्या आहुतीचा वास दशरथाने वारंवार घेतला आणि आपली पापे नष्ट केली. घोड्याचे १६ तुकडे करून विधिवत्‌ हवन केले. अश्वमेधाकरिता कल्पसूत्र आणि ब्राह्मणे यात सांगितल्याप्रमाणे अग्निष्टोम, अतिरात्रि व उक्थ असे तीन होमविधी केले. त्याआधी ज्योतिष्टोम, आयुष्टोम, अतिरात्रि, अभिजित्‌, विश्वजित्‌, आप्तोर्याम हे महायज्ञ केले. यज्ञाची सांगता केल्यावर ब्राह्मणांना भूमिदान केले आणि सुवर्ण, गायी इत्यादी दिले. त्यानंतर महाराज दशरथ ऋष्यशृंग ऋषींना म्हणाले ‘ आता माझ्या कुलवृद्धीकरिता आपण काही करा.’  त्यावर ध्यान करून ऋष्यशृंग ऋषी म्हणाले ‘ तुला चार पुत्र होतील. त्याकरिता मी अथर्ववेदात सांगितलेला पुत्रेष्टी यज्ञ करेन.’ आणि त्यांनी तो यज्ञ सुरू केला.

 यज्ञ सुरू झाल्याबरोबर देवदेवता, गंधर्व हे  आपला हविर्भाग घेण्याकरिता जमा झाले. त्यांनी सर्वांनी मिळून ब्रह्मदेवास विनंती केली – ‘’ हे भगवान, रावण नावाचा राक्षस आम्हाला फार त्रास देत आहे. तो त्रैलोक्याला सतावत आहे. तो स्त्रियांना पकडून घेऊन जातो, देव, गंधर्व, मुनि , इंद्र सर्वांना त्रास देतो. आम्ही त्याला काही करू शकत नाही कारण आपण त्याला वरदान दिले आहे की कोणी देव , यक्ष, गंधर्व, राक्षस  तुला कधी मारू शकणार नाहीत. तेव्हा आपणच उपाय सांगा “. ब्रह्मदेव म्हणाले “ मी विचार केला आहे. देव, गंधर्व, यक्ष, राक्षस यांच्याकडून तो अवध्य आहे. पण वर मागतांना मनुष्यांना क्षुद्र लेखून त्याने मनुष्यांकडून अवध्य होण्याचा वर नाही मागितला. तेव्हा त्याचा वध मनुष्यानेच करावा लागेल. “ त्याच वेळी भगवान विष्णु तेथे आले आणि ब्रह्मदेवाजवळ बसले. तेव्हा सर्व देवतांनी त्यांची स्तुती करून त्यांना रावणाचा वर व त्याच्याकडून होणारी पीडा हे सर्व सांगितले  व शेवटी विनंती केली की भगवान , रावणाच्या वधाकरिता आपण मनुष्यलोकात अवतीर्ण व्हा.  महाराज दशरथाच्या तिन्ही राण्यांच्या पोटी पुत्रभावाने जन्म घ्या व रावणाला युद्धात पराभूत करा. विष्णु म्हणाले – ‘आपणा लोकांचे कल्याण असो. मी दशरथाच्या घरी जन्म घेऊन रावणाचा वध करेन ; आणि मर्त्य लोकांत ११००० वर्षे राहून पृथ्वीचे पालन करेन..’

याच वेळी दशरथाने यज्ञ सुरू केला. त्यावेळी अग्निकुंडातून एक सूर्यासमान तेजस्वी, सिंहासारखी चाल असलेला, लाल रंगाचे तोंड असलेला , नगार्‌यासारखा आवाज करणारा पुरुष हातात सोन्याची थाळी व त्यावर चांदीचे झाकण असे घेऊन अवतीर्ण झाला व म्हणाला ‘ मला प्रजापतिने पाठवले आहे. तुझ्या यज्ञामुळे तुला हा पदार्थ पाठवला आहे. ही देवतांनी दिलेली खीर आहे. हे पायस तू तुझ्या राण्यांना तुझ्या इच्छेनुरूप प्राशन करण्यास दे. तुला संतति प्राप्त होईल.’  दशरथाने त्यास प्रदक्षिणा करून नमस्कार केल्याबरोबर तो पुरुष अंतर्धान पावला.

मग दशरथाने कौसल्येला खिरीतील अर्धा वाटा दिला. त्यानंतर सुमित्रेला उरलेल्यातील अर्धा वाटा म्हणजे एक चतुर्थांश वाटा दिला , मग कैकेयीकडे जाऊन उरलेल्यातील अर्धा वाटा म्हणजे एक अष्टमांश वाटा दिला. मग काही विचार करून पुन्हा सुमित्रेकडे गेला व उरलेला एक अष्टमांश वाटा तिला दिला. आपापलया वाट्याची खीर खाऊन तिन्ही राण्यांना लवकरच गर्भधारणा झाली.

 इकडे ब्रह्मदेवाने यक्ष, किन्नर, सिद्ध, नाग यांना सांगितले की आपण सर्व भगवान विष्णुंच्या मदतीकरिता वानरांना उत्पन्न करा. हे वानर मायेने रूप बदलणारे, महापराक्रमी, बलवान असे हवेत. त्यानुसार हजारो वानर उत्पन्न केले गेले. त्यात सूर्याने  सुग्रीव, इंद्राने वाली, अग्निने नील, विश्वकर्माने नल तर कुबेराने गंधमादन या वानरांना उत्पन्न केले. वायुने हनुमान नावाचा सर्वात बुद्धिमान, वज्रसमान देह असलेला व गरुडाप्रमाणे वेग असलेला वानर उत्पन्न केला.

अश्वमेध यज्ञानंतर सुमारे ६ ऋतुंनंतर म्हणजे १२ महिन्यांनी दशरथाच्या राण्यांनी पुत्रांना जन्म दिला. कौसल्या व कैकेयी यांनी प्रत्येकी एक पुत्राला तर सुमित्रेने दोन पुत्रांना जन्म दिला. त्यांच्या जन्मानंतर अयोध्येत उत्सव साजरा झाला. अत्यधिक दान दिले गेले. आकाशातून पुष्पवृष्टी झाली. गंधर्वांनी गायन केले. अयोध्येच्या गल्लीगल्लीत वेश्या, नट, नट्या व सामान्य जन गाणे नाचणे करीत होते. १२ दिवसांनी बारसे केले गेले व कौसल्येच्या पुत्राचे नाव रामचंद्र, कैकेयीच्या पुत्राचे नाव भरत व सुमित्रेच्या पुत्रांची नावे लक्ष्मण व शत्रुघ्न अशी ठेवली गेली. नामकरण विधी वसिष्ठ ऋषींनी संपन्न केला.
(वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग ८ ते १८ मधून.)

टीप :- अशी ही रामजन्मकथा. हा इतिहास नसून कथा असली तरी त्या काळातील चित्रण यातून मिळते. हा काळ नक्की कोणता हे सांगणे कठीण आहे. कथेच्या प्रसंगाचा काळ आणि कथा लिहिण्याचा काळ हे दोन्ही वेगळे असू शकतात. या दीर्घ रामायणातील इतक्याश्या कथेतून काय काय दिसते ? –

१.ऋष्यषृंग ऋषींची कथा नवीनच कळली. त्या कथेला वगळून रामजन्माची कथा थोडक्यात  सांगितली जाते.

२.यज्ञसंस्थेवर प्रचंड विश्वास दिसून येतो. यज्ञयागाचे फार महत्त्व दिसते. राजाच्या घरचा यज्ञ म्हणजे सार्वजनिक भोजन व वारेमाप खर्च. एव्हढ्या सुवर्णमुद्रा आणि रौप्य मुद्रा देण्याकरिता सोने गाळण्याची क्रिया अवगत होती तर. इतके सोने, रुपे कुठून व कसे आले हा एक प्रश्न आहे. यज्ञ म्हणजे कडक विधी पण आणि उत्सव पण !

३. यज्ञात पशुबळी, अश्वबळी  देणे आवश्यक होते. अश्वमेध यज्ञाचे वर्णन फार चांगले वाटत नाही. घोड्याचे तीन तुकडे करून राणीने त्याची राखण करणे, चरबी जाळणे, त्याचा वास घेणे व पाप नष्ट करणे ( हे जरा पचनी पडायला कठीण आहे !). मला वाटते काही काही ब्राह्मण लोक यज्ञाची आतुरतेने वाट पहात असावे का ; कारण त्यात मांसाहार करायला परवानगी होती ? मनुस्मृतीत ( ५.३१) मध्ये सांगितले आहे ‘ यज्ञाकरिता मांसाचे भक्षण हा देवाकरिताचा विधी सांगितला आहे आणि (५.२७ मध्ये ) लिहिले आहे की ब्राह्मण हे  मंत्रसंस्कार व प्रोक्षण झालेलेच मांस फक्त खाऊ शकतात किंवा प्राण संकटात असतील तर मांस खाऊ शकतात, एरवी नाही.  आणि  सर्वतोपरी उपदेश (५.४९ मध्ये ) मात्र हा आहे की मांसभक्षण सदा वर्ज्य करावे; त्याचे पुण्य अश्वमेध यज्ञापेक्षा जास्त आहे.

४.एका अश्वमेध यज्ञात किती उपयज्ञ ! कल्पसूत्रे आणि वेदांतील ब्राह्मणे यांच्यातील  विधींचे फार तपशीलवार वर्णन आहे. यज्ञ केल्यास हवे ते मिळते या विश्वासामुळे यज्ञसंस्था खूप बोकाळली. तसेच विधिवत यज्ञ करण्याच्या महत्त्वामुळे त्याचे ज्ञान असलेले ब्राह्मण फार श्रेष्ठ मानले जाऊ लागले. या अतिशयोक्तिपूर्ण महत्त्वामुळे बहुतेक,  प्रतिक्रिया म्हणून, वेद व यज्ञ न मानणारे असे जैन धर्म, बौद्ध धर्म आदि उत्पन्न झाले असावेत.                                                      

चार्वाक या वेदांना न मानणा-या नास्तिकाने तर म्हटले –  ‘अग्निहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठनम्‌ । बुद्धिपौरुषहीनानां जीविकेति बृहस्पतिः ॥‘                   

म्हणजे- अग्निहोत्र, तीन वेद, तीन दंडधारण आणि भस्म लावणे हे करून पौरोहित्य आदि कर्मे करणे ही बुद्धिहीन आणि पौरुषहीन लोकांची उपजीविका झाली.  

५.कौसल्येबरोबर राजाची शूद्र स्त्री व वैश्य स्त्री यांनाही मारलेल्या घोड्याबरोबर ठेवले होते असा उल्लेख आहे. दशरथ राजाची शूद्र स्त्री व वैश्य स्त्री याचा अर्थ नीट कळला नाही. कदाचित ठेवलेल्या स्त्रिया का ? कारण क्षत्रियांना व राजाला कनिष्ठ वर्णाशी संबंधाची  अनुमती होती.

६.भारतात तेव्हा अनेक स्वतंत्र राज्ये वा महाजनपदे होती. आणि धर्मानुसार राज्य करण्याला फार महत्त्व होते. राज्यविस्तार करणे प्रचलित नव्हते. राजाराजांमध्ये मैत्री होती. एकमेकांच्या राज्यावर डोळा नव्हता असे वाटते. शांतता होती.

७.त्या काळात वेश्या राजरोसपणे समाजाचा भाग होत्या असे दिसते. ‘Prostitution is the oldest profession in the world’ असे कुणीसे म्हटलेले आहे ते सार्थ आहे !

८.राजाच्या यज्ञाचे काम म्हणून कुशल कारागीरांना सक्तीने वा मोफत कामाला लावले नव्हते. सवेतन व सभोजन ठेवले होते. कामगारांनी काम सोडून मधूनच निघून जाणे ही समस्या तेव्हाही होती का काय ? वसिष्ठ ऋषींनी ती शंका बोलून दाखवली आहे.

९.यज्ञवेदीतून एक पुरुष ( अग्निदेव) प्रकट झाला. तो सूर्यासारखा तेजस्वी असून त्याची चाल सिंहासारखी होती असे वल्मिकींनी लिहिले आहे !  तो पुरुष फक्त प्रकट झाला होता; उभा होता. त्याची चाल कशी काय कळली ? एखाद्या गोष्टीची स्तुती करतांना भान हरपून स्तुती करणे व हवे ते गुण आपल्याकडून चिकटवणे हा स्वभाव तेव्हापासून प्रचलित आहे. यातूनच अंधभक्ती जन्माला येते. ( वा अंधभक्तीतून अवास्तविक स्तुती जन्माला येते ! )

१०. कथा छान रंगवलेली आहे. माहीत असून सुद्धा वाचनीय वाटते.

 – ©️ विलास सातपुते

vilas.satpute54@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

स्वागत फुलांनी – Strawberry

– ©️ सविता कांबळे

savitak211@gmail.com

 ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

विचारशलाका 

(६२) 

 

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आणखी एक (अज्ञात ) केशवसुत

– पृष्ठ ७० –

– प्रेषक माधव मनोहर जोशी 

madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

श्रीमद्भगवत्गीता

१५ व्या अध्यायाचा भावानुवाद

श्लोक १६ –
द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च ।*
*क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते ॥ १५- १६ ll*

*अर्थ* —
ह्या विश्वात नाशवान आणि अविनाशी असे दोन प्रकारचे पुरुष आहेत. त्यामध्ये सर्व
भूतमात्रांची शरीरे हा नाशवान आणि जीवात्मा हा अविनाशी म्हटला जातो. ॥ १५-१६ ll

*मराठी पद्यरूपी भावानुवाद –*
क्षर व अक्षर l पुरुष जमात l
असती विश्वात l फक्त दोन ll
क्षर नाशिवंत l अक्षर अमर l
ऐसे त्यांचे फेर  l जाण तू हे ll
सर्व भूतमात्र l असतात क्षर l
आत्मा हा अक्षर l अविनाशी ll

*श्लोक १७*–
*उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः ।*
*यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः ॥ १५-१७ ॥*

*अर्थ* —
परंतु या दोन्हींपेक्षा उत्तम पुरुष तर वेगळाच आहे, जो तिन्ही लोकांत प्रवेश
करून सर्वांचे धारण-पोषण करतो. याप्रमाणेच तो अविनाशी परमेश्वर आणि
परमात्मा असा म्हटला जातो. ॥ १५-१७ ॥

*मराठी पद्य रूपी भावानुवाद –*
असे सर्वोत्तम l अक्षर पुरुष l
तोचि परमेश l जाण सदा ll
करितो पोषण l आणिक पालन l
त्रैलोक्यी फिरुन l सकलांचे ll

*श्लोक १८*–
*यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः ।*
*अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः ॥ १५-१८ ॥*

*अर्थ* —
कारण मी नाशवान पुरुषा पासून तर पूर्णपणे पलीकडचा आहे आणि अविनाशी
जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे. म्हणून लोकांत आणि वेदांतही पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. ॥ १५-१८ ॥

*मराठी पद्य रूपी भावानुवाद –*
मला जाण पार्था l घे मज पाहून  l
दूर क्षराहून l असतो मी l
अक्षराहून ही l मी असे उत्तम l
मी पुरुषोत्तम l वेद म्हणे ll

*श्लोक १९* –
*यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम्‌ ।*
*स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत ॥ १५-१९ll*

*अर्थ* —
हे भारता (अर्थात भरतवंशी अर्जुना), जो ज्ञानी पुरुष मला अशा प्रकारे तत्त्वतः
पुरुषोत्तम म्हणून जाणतो, तो सर्वज्ञ पुरुष सर्व रीतीने नेहमी मला वासुदेव परमेश्वरालाच भजतो. ॥ १५-१९ ॥

*मराठी पद्य रूपी भावानुवाद –*
जाणे जो मजला l परमेश रूपी l
असे त्याची मती l अती ज्ञानी ll
आराधिती मज l ऐसे ते पुरुष l
मी तो परमेश  l जाण पार्था ll

*श्लोक २०*–
*इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मयानघ ।*
*एतद्‌बुद्ध्वा बुद्धिमान्स्यात्कृतकृत्यश्च भारत ॥ १५-२० ॥*

*अर्थ* —
हे निष्पाप भारता (अर्थात भरतवंशी अर्जुना), असे हे अतिरहस्यमय गुप्त शास्त्र
मी तुला सांगितले आहे, याचे तत्त्वतः ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो.

*मराठी पद्य रूपी भावानुवाद –*
निष्पाप अर्जुना l तुजला कथिले l
शास्त्र सांगितले l अती गुह्य ll
मिळता ह्याचे हे l संपूर्णसे ज्ञान l
होशी ज्ञानवान l कृतार्थ ही ll

इति पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः
पुरुषोत्तम योग नामक गीतेचा  हा १५ वा अध्याय इथेच  समाप्त

****************************
 – ©️ माधव मनोहर जोशी.
madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आजची कविता

*सांगताही येत नाही*

काय सांगू लाडके तुज, भेटताही येत नाही
अंतरीचे प्रेम तुजला, सांगताही येत नाही

सुरेख ओठ हे तुझे मज, मोह मजला पाडती
ओठ ओठां भेटतील कां? सांगताही येत नाही

द्रौपदीची लाज राखण्या, कृष्णा आला धाऊनी
आज तिजला सावराया, कृष्ण कोणी येत नाही

पुत्र पुत्री आपुले हे, गोड आज वागती
धाडतील वृद्धाश्रमी, ते सांगता ही येत नाही

प्रेमभावे वागण्याची, सवय आपणा पाहिजे
कोण कामा येईल केंव्हा, सांगताही येत नाही

जे कराया वाटते, ते शीघ्र केले पाहिजे
मृत्यू हा भेटेल केंव्हा, सांगताही येत नाही
******************

– ©️ अनिल निगुडकर

भोपाळ

anilnigudkar2017@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

ध्रुवीय प्रकाश किंवा ऑरोरा बोरेलिस

(वैज्ञानिक भाषेत उत्तर गोलार्धात यास ऑरोरा बोरेलिस  आणि दक्षिण गोलार्धात ऑरोरा ऑस्ट्रॅलिस  म्हणतात.

जेव्हा सूर्यावर उद्रेक होतो आणि सूर्य लहान लहान कण प्लाझ्मा अवकाशात फेकतो (याला सूर्यवारा म्हणतात). तेव्हा हा ध्रुवीय प्रकाश दिसतो. हे कण पृथ्वीपर्यंत येतात, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे ते पृथ्वीच्या ध्रुवांकडे वळवले जातात आणि तिथे पृथ्वीवरील वायुमंडलातील वायूंशी धडकतात. या धडकांमुळे ते वायू चमकू लागतात. हे जणू हवेतून येणारे एखादे जादुई तेज असते. बहुतेक वेळा हिरवे, पण कधी निळे, जांभळे किंवा लालही दिसू शकते.

 

पृथ्वीवर येणारे इलेक्ट्रॉन्स पृथ्वीच्या वायुमंडलातील ऑक्सिजन व नायट्रोजन अणूंवर आदळून त्यांना उद्दीप्त करतात. त्यातून प्रकाश उत्सर्जित होतो. बहुतेक वेळा ऑक्सिजन अणूंमुळे हिरवा किंवा लाल प्रकाश, तर नायट्रोजन अणूंमुळे निळा व जांभळा प्रकाश दिसतो. दर ११ वर्षांनी सूर्यावर मोठे उद्रेक होतात.

हा प्रकाश उत्तर गोलार्धात जास्तकरून अलास्का, कॅनडा, फिनलंड, आइसलँड ग्रीनलंड आणि नॉर्वे येथे निश्चितपणे दिसतो. गेल्या एकदोन वर्षांत मधून मधून जर्मनीतही दिसत आहे. या वर्षी सूर्यावर बरीच वादळे होत असल्याने गेले दोन दिवस, १९ आणि २० जानेवारी, संपूर्ण जर्मनीत हा उत्तरप्रकाश दिसला होता. Radio  किंवा TV वर वादळाबद्दल सांगितले जाते, तरीही प्रकाश केव्हा दिसेल हे आधी सांगता येत नाही. केव्हा रात्री १० वाजता तर केव्हा मध्यरात्री, केव्हा १ वाजता तर केव्हा दोन, अडीचच्या सुमारास सुद्धा दिसतो. एक तर रात्रभर जागे राहावयास हवे, नाही तर योगायोग असावा लागतो.

सौरमालेतील इतर ग्रहांवरही हे आविष्कार आढळतात. त्यासाठी त्या ग्रहाकडे स्वतःचे चुंबकीय क्षेत्र आणि वायुमंडल असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, मंगळावर MAVEN या यानाद्वारे ध्रुवीय प्रकाश निरीक्षित करण्यात आला.

सूर्यवाऱ्याला सूर्यापासून पृथ्वीपर्यंत पोहोचायला दोन ते चार दिवस लागतात, त्यामुळे या कालावधीत ध्रुवीय प्रकाश अपेक्षित असतो. थंडीत दिवस कमी व रात्र जास्त लांब असल्याने थंडीतच उत्तरप्रकाश पाहण्याची संधी असते. अर्थातच थंडीत संध्याकाळी जास्तकरून बाहेर कोणी बसत नाहीत, घरांतच गप्पागोष्टी चालतात. त्यामुळे योगायोग असेल तरच हा प्रकाश पहावयास मिळतो.

कालच्या रात्री माझे शेजारी जागे होते. त्यांनी काढलेले काही फोटो त्यांच्या संमतीने इथे पाठवत आहे.

 

मी १९७४ साली ग्रीनलंडला भेट दिली होती. तिथे मला ध्रुवीय प्रकाश पहावयास मिळाले. पण त्यावेळी माझ्याकडे अगदी साधा कॅमेरा होता त्यामुळे मला फोटो घेता आले नाहीत.

– ©️ नलिनी भट  
nalini_nbs@gmx.de
Ritterhude, Germany

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

खडकातील पाऊलखुणा !

[ भूगोलाचा इतिहास : ४४ ] 

मानवाचा सर्वात जुना लिखित इतिहास इजिप्त मधला, इ. स. पूर्व ३४००, म्हणजे सुमारे साडेपाच हजार वर्षांपूर्वीचा आहे. गुहेतील प्राचीन चित्रे, अश्मयुगीन हत्यारे इ. च्या रुपात त्यापूर्वीच्याही काळातील धागेदोरे दिसतात. पण जेंव्हा माणूसही निर्माण झाला नव्हता, त्या काळच्या इतिहासाचा आणि भूगोलाचाही वेध कसा घ्यावा हा मोठा प्रश्न होता. त्या प्रयत्नात संशोधक खडकांकडे वळले आणि कोट्यवधी वर्षांचा पृथ्वीचा इतिहास उलगडू लागला. मानवी इतिहासाची विभागणी अश्मयुग, ताम्रयुग, प्राचीन, मध्ययुगीन इ. कालखंडात करण्यात आलेली आहे. तशीच पृथ्वीचा इतिहासाचीही विशिष्ट अशा कालखंडानुसार मांडणी करण्यात आली. त्याला  भूशास्त्रीय कालश्रेणी ( Geological Timescale) म्हणतात.

डॅनिश संशोधक धर्मगुरू निल्स स्टीनसेन उर्फ निकोलस स्टेनो यांनी १८६९ मध्ये एक सिद्धांत मांडला. ‘खडकांचा कोणताही थर हा त्याच्या वरच्या थरापेक्षा जुना व त्याच्या खालच्या थरापेक्षा नवा असतो’. अतिशय साध्या शब्दातला हा बिनतोड सिद्धांत एका शास्त्राचा पायाच ठरला व त्यामुळे स्टेनो हे भूशास्त्रीय कालखंडांचे जनक ठरले. १७७२ मध्ये जे. बी. रोम डी इलसेल यांनी हेच तत्व खडकांचे वय ठरवण्यासाठी लागू केले. पृथ्वीच्या इतिहास शोधाची पूर्ण इमारत आजही याच पायावर उभी आहे. नंतर प्रत्यक्षात खडकांचा अभ्यास सुरू झाला, तेंव्हा हे दिसले की खडकांचे थर हे पुस्तकाच्या पानांप्रमाणे केवळ आडवे, एकावर एक व समांतर रचलेले नसतात. तर ते झिजलेले, वाकलेले, मोडतोड झालेले व रूपांतर झालेले असतात. खडकांचे रूप व गुणधर्म यावर तेथील पर्यावरणाचाही परिणाम झालेला असतो. म्हणजे खडकांचे रूप पाहून प्राचीन काळी बदलत गेलेल्या वातावरणाचाही अंदाज बांधता येतो. तात्पर्य कोणत्याही खडकांच्या थरात पृथ्वीचा तेथील भूतकाळ प्रतिबिंबित झालेला असतो. म्हणजे खडकांचा एकेक थर हे पृथ्वीच्या भूतकाळाचे एकेक पान आहे. फक्त त्यावरील लिपी समजली की वसुंधरेच्या इतिहासाचा ग्रंथ वाचता येणे शक्य आहे. तो इतिहास ज्या कालबद्ध पायऱ्यांत सांगितला जातो, त्यालाच भूशास्त्रीय कालश्रेणी म्हणतात.
१७८७ भूशास्त्रज्ञ अब्राहम वेर्नर यांनी 1787 मध्ये प्रथमच खडकांच्या थरांचे वर्गीकरण करून त्यांचे प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक व चतुर्थक ( Primary, Secondary, Tertiary and Quaternary) असे चार प्रकार पाडले. हे प्रकार जमिनीच्या तळाकडून वर म्हणजे भूतकाळाकडून वर्तमानाकडे अशा क्रमाने मानले आहेत. यापैकी खोलवरील प्राचीन अशा प्राथमिक व द्वितीयक कालखंडाचे पुढे अनेक उपविभाग शोधून काढण्यात आले. वेर्नर यांच्या मते हे सर्व थर प्राचीन काळातील एका प्रचंड महापुरात निर्माण झाले. हे मत नेपच्यूनी सिद्धांत ( Neptunian theory) म्हणून ओळखले जाते.

पुढे १८८५ मध्ये स्कॉटिश भूशास्त्रज्ञ व आधुनिक भूशास्त्राचे जनक, जेम्स हटन यांनी रॉयल सोसायटी पुढे तीन क्रांतिकारक निबंध वाचले. त्यातून  या विषयाला मोठीच कलाटणी मिळाली. हटन यांच्या मते पृथ्वीचा अंतर्भाग उष्ण असून तोच नव्या खडकांच्या निर्मितीस कारणीभूत आहे. पाणी आणि वारा यांच्यामुळे जमिनीची झीज होते व तिचे थर सागरतळाशी साचतात. भूगर्भातील उष्णतेमुळे या थरांचे खडकात रूपांतर होते व उष्णतेमुळेच ते भूपृष्ठावर येतात. हे मत प्लुटोनिस्ट सिद्धांत म्हणून ओळखले जाते.

औद्योगिक क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणावर कोळशाच्या खाणी खोदल्या जाऊ लागल्या. या क्रियेत खोलवरील खडकात अनेक ज्ञात अज्ञात जीवाश्म सापडू लागले. १८२० ते १८५० या काळात खडकांचे थर व जीवाश्म यांचा जो प्रचंड अभ्यास झाला, त्यातून धरतीच्या इतिहास शोधात क्रांतीच झाली. दोन खडकांच्या प्रकारात जर एकाच प्रकारचे जीवाश्म आढळत असतील तर ते एकाच काळात निर्माण झाले असणार हे उघड आहे.  त्यावरून हे जीवाश्म म्हणजे पृथ्वीच्या इतिहासग्रंथाची लिपीच ठरत होते. जिवाश्मावरून खडक प्रकार ठरवण्याची पद्धत विलियम स्मिथ, जॉर्ज कुव्हीअर वगैरेंनी सुरू केली. मग जिवाश्मांवरून पृथ्वीच्या इतिहासाचे कालखंड ठरवण्यात आले व त्यांना नावे देण्यात येऊ लागली. उदा. ज्यूरासिक, कार्बोनिफेरस इ.

खडक प्रकारांची नावे बहुधा ते खडक वा जीवाश्म प्रथम जिथे सापडले त्या स्थानावरून किंवा खडकांच्या स्वरूपावरून देण्यात आली. उदा. डायनोसारचे जीवाश्म प्रथमत: युरोपातील ज्यूरा आल्प्स या पर्वतात सापडले. त्यामुळे १४ ते २० कोटी वर्षांपूर्वीच्या या खडकांना व त्या कालखंडाला ‘ज्यूरासिक’ म्हणतात. तर ज्या खडकांवर तीन रेषा दिसत त्यांना ट्रायासिक आणि ज्यात कोळसा होता थरांना कार्बोनिफेरस असे नाव देण्यात आले.

या अभ्यासातून मांडण्यात आलेल्या पृथ्वीच्या इतिहासाची म्हणजेच भूशास्त्रीय कालश्रेणीची रूपरेषा पुढील प्रमाणे सांगता येईल. ४७० कोटी वर्षाच्या पृथ्वीच्या भूतकाळाची विभागणी पाच प्रमुख कालखंडांमध्ये करण्यात आली असून त्यांना ‘कल्प’ (Era) म्हणतात. त्यांची नावे कालक्रमनुसार आर्किओझोईक, प्रोटेरोझोईक, मेसोझोईक, पेलिओझोईक व सिनोझोईक अशी आहेत. या कल्पांची विभागणी पुढे महायुग( Periods) व युग (Epoch) या उपविभागात करण्यात आली आहे. महायुगांची नावे टर्शरी, ज्यूरासिक, ट्रायासिक, कार्बोनिफेरस इ. आहेत, तर युगांची नावे होलोसीन,प्लिस्टोसीन, प्लिओसीन इ. आहेत. आपण राहतो ते होलोसीन किंवा आधुनिक युग 11000 वर्षांपूर्वी सुरू झाले. ते पाच लक्ष वर्षांपूर्वी सुरू झालेल्या क्वाटर्नरी महायुगाचा भाग असून ते महायुग 65 लक्ष वर्षांपूर्वी सुरू झालेल्या सिनोझोईक कल्पात मोडते.
या कालश्रेणीतून मांडलेला पृथ्वीचा पूर्वेतिहास लक्षात येण्यासाठी एक प्रसिद्ध उदाहरण घेऊ. कल्पना करा की परवा मध्यरात्री बारा वाजता पृथ्वी निर्माण झाली व त्या घटनेस काल मध्यरात्री एक दिवस म्हणजे २४ तास पूर्ण झाले. अर्थात हे २४ तास म्हणजे ४७० कोटी वर्षे ! या २४ तासात तिच्या इतिहासातील मुख्य घटनांचा कालक्रम पुढीलप्रमाणे असेल.

७ नोव्हेंबर मध्यरात्री बाराला जन्म. नंतर पहाटे दोन वाजेपर्यंत वातावरण, जलावरण, महासागर तयार झाले. तोपर्यंत पृथ्वीपासून चंद्र वेगळा झाला आणि  उल्कावर्षाव व ज्वालामुखीचे उद्रेक थांबले. ८ नोव्हेंबरच्या पहाटे चार पूर्वी पहिला सजीव निर्माण झाला. पहाटे सहा पूर्वी प्रकाश संश्लेषक जीव अन्ननिर्मिती करू लागले. मात्र केंद्रक असणारे एकपेशीय सजीव निर्माण होईपर्यंत दुपारचा एक वाजला. त्यातून बहुपेशीय सजीव विकसित होण्यास सायंकाळचे 5 वाजले. सायंकाळी आठ वाजता जलचर प्राण्यांची निर्मिती झाली. तर रात्री साडेनऊच्या सुमारास वनस्पती जमिनीवर वाढू लागल्या आणि १० वाजता भूचर जमिनीवर विहार करू लागले. रात्री १०. ४० ते ११.४० या वेळेत पृथ्वीवर डायनोसार व मोठमोठे नेचे यांचे साम्राज्य होते. उरलेल्या वीस मिनिटात सस्तन प्राणी, पक्षी विकसित झाले. आणि मध्यरात्री बाराला काही क्षण बाकी असतांना मानवाचा जन्म झाला.

म्हणजे पृथ्वी आणि जीवसृष्टीच्या आयुष्याच्या तुलनेत मानवाचे वय 24 तासास एक मिनिटही नाही. ! पण त्याच एक मिनिटात त्याने या पूर्ण इतिहासाला गवसणी घातली. पृथ्वीचा जन्म, विश्वाचा विस्तार , एवढेच नव्हे तर विश्वाच्या जन्मापर्यंतच्या रहस्याला स्पर्श केला.

असे म्हणतात की काळपुरुषाच्या काठीचा आवाज येत नाही. ते खरे असेल नसेल. पण त्याच्या पावलांचे ठसे मात्र खडकावरील पाऊलखुणांच्या रुपात नक्की शिल्लक उरतात. आणि त्याच भाषेत धरतीच्या इतिहासाचा ग्रंथ लिहिला जातो. मात्र ती साक्षरता  ज्यांच्याकडे आहे, त्यांनाच तो वाचता येतो. आजच्या वेगवान जगात आपल्या आई वडीलांचाही इतिहास जाणण्यास व संगण्यास अनेकांकडे वेळ नाही. त्या पार्श्वभूमीवर भूमातेच्या इतिहास शोधासाठी ज्यांनी वाहून घेतले आहे, ते संशोधक अधिकच महान वाटू लागतात.

 

एल. के. कुलकर्णी
lkkulkarni.nanded@gmail.com
सोबतचे चित्र : पृथ्वीचा इतिहास – २४ तास

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

बाजीराव- मस्तानी आणि पेशवे घराण्याचा इतिहास

भाग ६/७

थोरला अलिबहाद्दर

हा थोरल्या समशेरबहाद्दरचा मुलगा. याचा जन्म लष्करी छावणीत १७५८ साली झाला. मेहेरबाईंना, नानासाहेब पेशव्याने, “समशेरबहाद्दरची सरदारी अलिबहद्दरला देतो” असे आश्वासन देऊनही, त्या पुण्याला परतल्या नाहीत. (असे वाचण्यात आले की, नानासाहेबांची पत्नी “गोपिकाबाई” ही कायम यांची हेटाळणी “ठेवलेल्या बाईची मुले”–लेकावळा, अशी करत असे. त्यामुळे त्या कदाचित पुन्हा पुण्यात आल्या नसाव्यात). पुढे नानासाहेब वारल्यावर त्या कायमच्या पुण्याला आल्या. नानासाहेबांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे, नानासाहेबांच्या लहान भावाने म्हणजे, माधवरावांनी सगळी व्यवस्था पूर्ववत केली. यामुळेच अलिबहाद्दरची पहिली सुमारे साडेतीन वर्ष त्याच्या परिवारात पुण्यात गेली. थोरल्या माधवरावांनी त्याचे पालनपोषण योग्य इतमामाने केले. त्याच्या शिक्षणासाठी शिक्षकही नेमला होता. हे सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणेच पराक्रमी होते.
अलिबहाद्दर आपल्या विधवा आईसह पुण्याला शनिवारवाड्यात मस्तानीमहालात राहत होते. ते ८ सप्टेंबर १७८७ ला ते बुंदेलखंडात जायला निघाले. अलिबहद्दरने उत्तरेकडे एकूण पाउण कोटीचा मुलुख काबीज केला. नाना फडणीसांच्या परवानगीने पेशव्यांच्या अधिकृत सनदेनुसार त्यांनी बुंदेलखंडात “सागर जिल्ह्याच्या” ईशान्येला “बांदा” संस्थान स्थापन करून तिथेच कायमचे वास्तव्य केले.
नारायणराव पेशव्यांची १७७३ साली हत्या झाल्यानंतर रघुनाथरावांनी गारद्यांना करारात  ठरल्याप्रमाणे पाच लाख रुपये आणि तीन किल्ले किंवा किल्ल्यांच्या बदल्यात तीन लाख रुपये दिले नाहीत,  तेव्हा,  गारद्यांनी त्यांना अशी धमकी दिली की, आम्ही “थोरल्या बाजीरावांचे नातू थोरले अलिबहाद्दर यांना पेशवेपदावर बसवू.”
अलिबहाद्दरने नाना फडणीसांकडून स्वतःचे नावे “बांदा नवाब” म्हणून पेशव्यांची सनद मिळवली. त्यांनी पेशव्यांशी करार करून “ते स्वतः जो प्रदेश जिंकतील तो, पेशव्यांच्या साम्राज्याचा एक भाग राहील आणि मानला जाईल” असे निश्चितपणे ठरवून घेतले होते. त्यांनी १२-१३ वर्ष बांदा संस्थानाचा उपभोग घेतला. पण त्यांचा बहुतेक सगळा काळ हा लढायातच गेला.
पुढे २३ ऑगस्ट १८०२ रोजी “कलिंजरच्या” युद्धात अचानक आजारी पडून छावणीतच, अलिबहाद्दरचा मृत्यू झाला. ते मोठे कृष्णभक्त होते. त्यांच्या मृत्यूनंतर यांचा शोकसमारंभ शनिवारवाड्यात, चिमणाजी रघुनाथ पेशवे,  यांच्याकडून, ०१ ऑक्टोबर सन १८०२ रोजी झाला. यांच्या पहिल्या पत्नी “बादशहा बेगम” लहान वयातच वारल्या. दुसऱ्या पत्नी “दुलजबेगम” या होत.
दिल्लीमध्ये मोगलाई काळापासूनच  “कुतूबसाहेब” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शाही कब्रस्तानात अलिबहाद्दरची कबर आहे. “गुलाम कादिरविरुद्धच्या” युद्धात विशेष शौर्य दाखवल्याबद्दल “शहाआलम बादशाहाने” “विशेष मान” म्हणून अलिबहाद्दरच्या परिवारातील मृत सदस्यांचा दफनविधी या शाही कब्रस्तानात करायची परवानगी दिली होती.

दुसरे समशेरबहाद्दर अलीबहाद्दर
थोरला अलिबहाद्दर यांचा हा पहिला मुलगा. यांचा जन्म १७८५ मध्ये झाला. यांना  “दादासाहेब” असे म्हणत. यांचे सगळे शिक्षण पुण्यातच झाले. सामान्यतः पाबळ आणि पुण्यात राहत होते. यांचे वडील अलिबहाद्दर वारले त्यावेळी हे पुण्यात होते. ही बातमी समजल्यावर “अमृतराव पेशव्यांची” परवानगी घेऊन, फौज जमवून दुसरे समशेरबहाद्दर, बुंदेलखंडात गेले. थोरल्या अलिबहाद्दरांचे पश्चात, हिम्मतबहाद्दर आणि गनीबहाद्दर (हे समशेरबहाद्दरचे काही काळ दिवाण होते.) सगळी सत्ता बळकावून बसले होते. समशेरबहाद्दरने त्यांचा पराभव केला. बुंदेलखंडात त्यांनी पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करून १८०३ झाली किलींजरवर स्वारी केली. तो हस्तगत करून, समशेरबहाद्दराने “बांदा नवाब” म्हणून वस्त्रे धारण केली. पुढे या हिम्मतबहाद्दरने, समशेरबहाद्दरची साथ सोडली आणि इंग्रजांची साथ धरली. बुंदेलखंडाचा हा प्रदेश इंग्रजांना आपल्या ताब्यात हवा होता, समशेरबहाद्दराने हिम्मतबहाद्दर आणि इंग्रज या दोघांच्या, संयुक्त फौजांना नेटाने तोंड दिले. पण सरतेशेवटी बांद्यापासून नऊ मैलावर “बेटवा नदीजवळ” झालेला युद्धात १३ ऑक्टोबर १८०३ रोजी समशेरबहाद्दरांचा सपशेल पराभव झाला.
इंग्रजांशी  शत्रुत्व चालेना तेव्हा त्यांना मिळते घेणे भाग पडले. आणि १८ जानेवारी १८०४ रोजी इंग्रज आणि दुसरे समशेरबहाद्दर यांच्यात तह झाला. त्यामुळे बांद्याची जहागिरी आणि इतर मालमत्ता सुरक्षित राहिली. दुसरे समशेरबहाद्दर इंग्रज सैन्यात नोकरदार अधिकारी बनले. इंग्रजांनी त्यांना चार लाख रु. तैनात मंजूर केली. त्यानंतर त्यांचे आयुष्य शांतपणे गेले.
यापूर्वीच दुसऱ्या बाजीरावांनी,  दुसरे समशेरबहाद्दर आपली अवज्ञा करतात हा राग मनात धरून, ०५ ऑक्टोबर १८०३ रोजी इंग्रजांशी झालेल्या करारान्वये, बुंदेलखंडातील थोरल्या अलिबहद्दरच्या ताब्यातील ३६,१६००० रु.,वसुलीचा प्रदेश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्य खर्चासाठी इंग्रजांच्या हवाली केला. थोरले अलिबहाद्दर पुण्याला शनिवारवाड्यात मस्तानीमहालात राहात होते; तो  देखील १८१२ साली जमीनदोस्त केला. त्यात दुसरे समशेरबहाद्दरची आई व पत्नी राहत होती. त्यांना वाड्याबाहेर काढून, दुसऱ्या जागी ठेवले. “वाडा खणून, माती मलबा वगैरे झाडून बाहेर टाकले आणि त्या जागेवर झाडे लावली.”अशी नोंद आहे.
दुसरे समशेरबहाद्दर यांचा बांदा येथेच ३१ ऑगस्ट १८२३ रोजी मृत्यू झाला.

झुल्फिकारअली अलीबहाद्दर
थोरले अलीबहाद्दरचा यांचा हा दुसरा मुलगा. अलीबहाद्दर सन १८०२ ला वारले त्यावेळी, हे त्यांच्या परिवारात बुंदेलखंडात होते. त्यांचा जन्म सन १८०० चा. अलीबहाद्दरची तिसरी पत्नी बक्षीबेगमचे हे पुत्र. त्यांचे सावत्र भाऊ दुसरे समशेरबहाद्दर १८२३ साली वारल्यावर यांना चार लाख रु. पेन्शन मिळायला लागले. ते बांद्याचे नवाब झाले. यांनी बांदा संस्थानाच्या आणि बांदा शहराच्या वैभवात खूप भर घातली. अनेक वास्तू, बागबगीचे, धर्मशाळा, तलाव, मशीद यांची त्यांनी बांदा शहरात निर्मिती केली. अनेक कवी आणि विद्वानांना त्यांनी आश्रय दिला.
१८४२  साली उत्तर हिंदुस्तान दंगे झाले. त्यावेळी योगायोगाने झुल्फिकारअली व दुसरे बाजीराव पेशवे इतर काही कामानिमित्त गव्हर्नर जनरलला भेटायला अलाहाबादला गेले होते. त्यांचे काम झाल्यानंतर उत्तरेकडील दंग्याशी या दोघांचा संबंध असल्याच्या संशयावरून दोघांनाही अलाहाबाद परवानगीशिवाय सोडण्याची मनाई केली होती. झुल्फिकारअली १८४९ साली वारले.
प्रख्यात शायर मिर्झा गालिब,  मस्तानीचे वंशज – बांद्याचे नवाब, आणि १८५७ या तीन गोष्टींचा परस्परांमध्ये एक घनिष्ठ संबंध आहे. गालिब यांचा जन्म  २७ डिसेंबर १७९७ चा असून, मृत्यू १५ फेब्रुवारी १८६९ रोजी झाला. १९ व्या शतकातले प्रख्यात शायर मिर्झा गालिब यांचे बांदा नबाब शाखेतील वंशजांशी जवळचे नाते होते. ज्येष्ठ इतिहास संशोधक सेतूमाधवराव पगडी यांच्या सांगण्याप्रमाणे मिर्झा गालिब यांच्या एक मामी व झुल्फीकारबहाद्दर यांची पत्नी नवाबबेगम या दोघी बहिणी होत्या.
मिर्झा गालिब यांचे एक काका, एका लढाईत,  इंग्रजांच्या बाजूने लढत असताना मारले गेले. त्यांच्या या निष्ठेबद्दल त्यांचे वारस म्हणून, त्यांचे पुतणे मिर्झा गालिब आणि मिर्झाचे भाऊ अशा दोघांना इंग्रजांकडून तहहयात पेन्शन मिळत असे. ते पेन्शन स्वीकारण्यासाठी गालिबना दिल्लीहून कलकत्त्याला जावे लागत असे. कारण  पेन्शनची रक्कम कलकत्ता ट्रेझरीमधून दिली जात असे. बांदा नवाबांशी असलेल्या नातेसंबंधांमुळे गालिब अनेक वेळा दिल्लीहून कलकत्ता येथे जाताना वाटेत बांदा कोठीत त्यांचा मुक्काम असे.

दुसरा अलिबहद्दर
झुल्फिकारअली वारल्यानंतर दुसरा अलिबहद्दर हे बांद्याचे नबाब झाले. ते २२ वर्षाचे होते. बांदा १८९९ सालपर्यंत बुंदेलखंडाच्या ब्रिटिश अधिकार क्षेत्रातील जिल्ह्यात राहिले. अलिबहद्दरच्या  कारकिर्दीतच १८५७ चा उठाव झाला. अलिबहद्दर बरेच उशिरा बंडात सामील झाले. ऑगस्ट १८५७ ते ऑक्टोबर १८५७ मध्ये बांदा शहरात बंडवाल्यांचे किमान १२००० सैन्य जमा झाले होते. अलिबहद्दरने, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे वगैरे पुढाऱ्यांशी संपर्क स्थापन केला. आपल्या विश्वासू माणसामार्फत  बांद्याची हकीकत कळवून लष्करी मदतीची विनंती केली. राणी लक्ष्मीबाईने  यांना “राखीबंध भैय्या” मानले होते. या प्रदेशात बांद्यापासून २२ मैलावरचा किलींजरचा किल्ला  तेवढाच इंग्रजांच्या ताब्यात होता. अलीबहाद्दरच्या सैन्याने किलींजरच्या किल्ल्याला वेढा घातला. इतक्यात इंग्रजांची फौज बांद्यावर चालून येत असल्याची बातमी मिळाल्यामुळे, त्यांना किलींजरचा किल्ल्याचा नाद सोडून बांद्याला परत यावे लागले. २० एप्रिल १८५८ ला इंग्रज सैन्याने बांद्यात प्रवेश केला. आणि अलिबहद्दरचा १० महिन्याचा बांद्याचा  शासनकाल संपला. या धामधुमीत उत्कृष्ट शृंगारलेला राजवाडा, संपत्तीची लूट झाली. काल्पी आता बंडखोरांचे मुख्य केंद्र बनले. अलिबहद्दर काल्पीला पोहचले. १६ ऑक्टोबरला “सिंधवाच्या” लढाईत अलीबहाद्दरचा पराभव झाला.
पूर्वी इंग्रजांशी सहानभूतीने वागल्याने इंग्रज आपल्याला माफ करतील असे त्यांना वाटले. पण अलीबहाद्दरला कैद करण्यासाठी सरकारने इनाम जाहीर केल्याचे त्यांना समजले. आतापर्यंत सहा महिन्याच्या अयशस्वी धावपळीत अलीबहाद्दर थकले होते. म्हणून त्यांनी एका इंग्रज अधिकाऱ्याने सुचविल्याप्रमाणे, मध्य भारताच्या गव्हर्नर जनरलला, खलिता पाठवला.आणि “आपण केवळ असहाय्य परिस्थितीमुळे बंडखोरांना सामील झालो….” असे कळवून शरण जायचे ठरवले. आणि संधी मिळताच तात्या  टोपे आणि रावसाहेब पेशव्यांना डोंगरपुरजवळच सोडून अलीबहाद्दर इंग्रजांना जाऊन मिळाले.
इंग्रजांकडून माफी मिळाल्यावर अलीबहाद्दरना एका सैन्य पथकाच्या पहार्‍याखाली — नोकरवर्ग, आश्रित, संपत्ती, परिवारातील सदस्य, सामान, वगैरेसह इंदौरजवळ महू छावणीत रवाना केले. सगळी धनसंपत्ती सरकारकडे जमा होऊन त्यांच्या खर्चासाठी १००० रुपये दिले गेले. अलिबहाद्दरने आपल्या परिवारासह यापुढचे आयुष्य कसे घालवायचे याबद्दल इंग्रजांनी त्यांना अटी सांगितल्या. त्यांनी पुढचे सगळे आयुष्य जवळजवळ स्थानबध्द स्थितीत इंदौरलाच घालवले. आयुष्याच्या अखेरीला इंग्रजांनी त्यांना हवे असल्यास बनारसच्या राजाकडे जायची परवानगी दिली. त्याप्रमाणे दुसरे अलिबहाद्दर वाराणसीला गेले असताना तेथेच अचानक १४ ऑगस्ट १८७३ साली ते वारले.
अलिबहद्दरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वंशजांना दरसाल १३००० रु. पॉलिटिकल पेन्शन मिळू लागले.

दुसऱ्या अलिबहद्दरना तीन मुले होती. ते “बांदेवाले नबाब” म्हणून प्रसिद्ध आहेत.

(क्रमश:)
© अ‍ॅड. क्रांती आठवले-पाटणकर
डोंबिवली.
9969087559
०३.०५.२०२५
(सदर लेखमाला माझ्या नावासह अग्रेषित करायला हरकत नाही.)

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

संस्कृत श्लोक व सुभाषिते

क्रमांक ५

सुभाषितांचे महत्त्व 

संस्कृत साहित्यात सुभाषितांना खूप महत्त्व दिले जाते. सु-भाषित म्हणजे चांगले वचन. ज्या वचनापासून ज्ञान मिळते, व्ववहारज्ञान मिळते, जे सन्मार्ग दाखवते, ते सुभाषित. सुभाषिताने कुठे कसे वागावे, ह्याबद्दल मार्गदर्शन मिळते. ही सुभाषित येतात कुठून? आज व्हॅाटसॲपवर आपल्याला कितीतरी विषयांवर कुणा थोर माणसाने लिहिलेले विचार वाचायला मिळतात. काही विचार एखाद्याने आपल्या पुस्तकात लिहिलेले असतात तर काही एखाद्या थोर व्यक्तीने एखाद्या प्रसंगी म्हटलेले असतात. आपण त्याला “अवतरणें” म्हणतो. इंग्रजीमध्ये काही कवी, उदाहरणार्थ वर्ड्स्वर्थ, ह्यांच्या कवितेतील ओळी उद्धृत केल्या जातात, म्हणजे शब्दश: अवतरण चिन्हांत दिल्या जातात. नाटककार, उदाहरणार्थ, शेक्सपियर, ह्यांच्या नाटकांतील पात्रांचे उद्गार दिले जातात. “टू बी ॲार नॅाट टू बी” हे असंच सुप्रसिद्ध वाक्य. त्याचा शब्दश: अर्थ आहे, “असावं की नसावं”. राजपुत्र हॅम्लेट महाभारतातल्या अर्जुनाप्रमाणे संभ्रमात पडलेला आहे. बापाचा खून करणारा काका प्रार्थना करायला गुडघ्यांवर बसलेला आहे. तलवारीच्या एका घावानिशी त्याचे शिर धडापासून अलग करणे सहज शक्य आहे. पण प्रार्थना करत असतांना त्याला मारला तर त्याला सद्गती मिळेल आणि न मारावा तर सूड घेण्याची अशी संधी पुन्हां मिळेल न मिळेल! जेव्हा, जेव्हा, एखाद्याची अशी द्विधा मनःस्थिती होते, तेव्हा तो हे शब्द वापरतो. वेगवेगळी सुभाषिते नेमकं असंच काम करत असतात. एखाद्या परिस्थितीत एखाद सुभाषित आपल्याला आठवतं आणि ह्या प्रसंगी काय करावं ते सांगतं.

श्री विंझे ह्यांनी सुभाषितांचाच कोश केल्यामुळे सुभाषितांचे महत्व सांगणारे श्लोक त्यांत असणे साहजिक आहे. एका प्रकरणांत काव्य, शब्द, शब्दरचना, शब्दांचा सरळ अर्थ आणि गूढ अथवा गुप्त अर्थ, वाचा, उच्चार, इ. विषयांवर असणारी एकोणनव्वद सुभाषिते आहेत. संस्कृत भाषेच्या काळामध्ये कवी श्लील किंवा अश्लील याचा फार विचार करत नसत. शब्दांच्या गुप्त अर्थाबद्दलच्या श्लोकांमध्ये आंध्रमधील स्त्री, महाराष्ट्रांतील स्त्री आणि गुजरातमधील स्त्री आपले स्तन कसे झांकते, ह्याची उपमा दिली आहे. सुभाषितरचनेबद्दल असलेल्या श्लोकांत असा उल्लेख आहे तर प्रणय, प्रेम, शृंगार, इ. संबंधी विषयांत तर असे खुले उल्लेख बरेच येणारच परंतु संस्कृत भाषेंत ते गैर मानले गेलेले नाहीत. अर्थात प्रत्येक काळांतील कवीही कांही मर्यादा पाळत असतीलच. आज आपण सुभाषितांची महती सांगणारे दोन प्रसिध्द श्लोक पहाणार आहोत. ज्यांनी शाळेंत असतांना संस्कृत विषय घेतला होता, त्यांना हे श्लोक निश्चितच परिचित असतील.

त्यांतला पहिला श्लोक असा आहे,
               द्राक्षा म्लानमुखी जाता शर्करा चाष्मतां गता ।
               सुभाषितरसस्याग्रे सुधा भीता दीवं गता ॥

श्री. विंझे ह्यांनी केलेला पद्यमय अनुवाद :-
               कोणी सुभाषितरसापुढे टीके न;
               द्राक्षे तयास बनली बघुनीच म्लान।
               झाली शीलाच थिजुनी जणुं शर्करा ती
               स्वर्गी पळे अमृत, थोर धरून भीती ॥

सुभाषितांत पहिल्या ओळीत च+अश्मतां= चाष्मतां हा संधी आहे तर दुसऱ्या ओळीत सुभाषितरसस्य+अग्रे  हा संधी आहे. 

ह्या श्लोकाचा सोपा अर्थ असा आहे..
सुभाषितरसापुढे द्राक्षे म्लानमुखी (जांभळी, काळी, निळी) झाली, साखर थिजून तिचा दगड झाला. (खडीसाखर झाली) आणि अमृत (सुधा)  भिऊन पळाले, ते थेट स्वर्गात गेले.

आपल्याहून रसाळ, गोड अशी सुभाषिते ऐकून द्राक्षांचा चेहरा उतरला, ती म्लान झाली म्हणजे फिकी पडली असा खरा अर्थ आहे. द्राक्षे गोड असतात. सुभाषितांची गोडी आपल्याहून जास्त आहे, हे पाहून द्राक्षांना वाईट वाटले. पुढे म्हटले आहे की साखरेचाच दगड झाला. तिलाही कमीपणा आला. ती थिजली आणि दगड बनली. खडीसाखर घट्ट असते. तेव्हा कवीने म्हटले आहे की सुभाषितांच्या गोडीपुढे आपली गोडी कांहीच नाही, असे वाटून साखरही आश्चर्यचकित झाली व तिचा दगड झाला. सर्वांवर कळस म्हणजे अमृत जे गोड असून पिणाऱ्याला अमर करतं, असं म्हटलं जातं, तें चक्क पळून गेलं आणि घाबरून स्वर्गांत निघून गेलं. द्राक्षे, साखर आणि अमृत ह्या तीन गोड वस्तुंशी सुभाषितांच्या रसाच्या गोडीची तुलना करून त्याला श्रेष्ठ ठरवले आहे. ज्यांच्याशी तुलना करायची आहे, त्यांनाच कमीपणा दिला आहे. ह्या प्रकाराला “व्यतिरेक” अलंकार वापरला आहे, असे म्हणतां येईल. सुभाषितरस हे कांही खाद्य किंवा पेय नव्हे. त्याची गोडी जिभेने चाखतां येत नाही पण जिभेचा वापर करूनच आपण सुभाषित म्हणतो. इथे सुभाषिताची गोडी ठसवली आहे.

आता सुभाषिताबद्दल दुसरा श्लोक पाहूया. तो असा आहे:-
                 केयूरा न विभूषयन्ति पुरूषं, हारा न चंद्रोज्ज्वला ।
                 न स्नानं, न विलेपनं, न कुसुमं, नालंकृता मूर्धजा:।
                 वाण्येका समलंकरोति पुरूषं या संस्कृता धार्यते ।
                 क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम् ॥

श्री विंझे ह्यांनी केलेला काव्यमय अनुवाद:-
                 शोभा देति न हार शुभ्र तसे, केयूरही मानवा,।
                 न स्नाने, न विलेपने, न कुसुमे शृंगारिले केस वा ।
                 वाणी संस्कृतियुक्त एकच नरा शोभा खरी देतसे।
                 वाणी हीच अपूर्व भूषण सदा, नाशा दुजे जातसे ॥

सुलभ अर्थ – केयूरादी अलंकार, शुभ्र हार, स्नान, उटी, फुले किंवा केशरचना ह्यापैकी एकानेही माणसाला शोभा येत नाही. संस्कारयुक्त वाणी, ही एकच माणसाचा खरा अलंकार. इतर सर्व अलंकार क्षय होतात पण भूषणांतले भूषण वाणी ही सदैव टिकून रहाते.

ह्या श्लोकांत चांगल्या बोलण्याचे महत्व सांगितले आहे. इथे वाणी हा एका दागिन्यासारखी किंवा मनुष्याची शोभा वाढवणारी वस्तु मानली आहे. केयूर म्हणजे बाजूबंद. दंडावर बांधतात तो अलंकार. बाजूबंद वा इतर दागिने, पांढरा शुभ्र हार, उत्तम साबण वापरून केलेलं स्नान, अंगावर लावलेला लेप अथवा उटी, फुले किंवा केशभूषा, ह्यापैकी एकानेही माणसाला खरी शोभा येत नाही. खरी शोभा फक्त चांगली संस्कारयुक्त भाषा वापरल्यानेंच येते. तसंच सौंदर्यात भर घालणाऱ्या इतर सर्व गोष्टी झिजतात, नाश पावतात. वाणी मात्र झिजत नाही, कमी होत नाही. तेव्हां वाणी हाच श्रेष्ठ दागिना आहे. इथे अर्थातच अतिवृध्द, आजारी माणसांचा विचार केलेला नाही. सामान्यतः निरोगी माणसाला काय शोभून दिसेल, ते सांगितले आहे. आधुनिक काळांत शरीराला शोभा आणण्यासाठी किंवा शरीराची शोभा वाढविण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत. कुणाही मध्यमवर्गीय घराच्या प्रसाधनगृहात गेलात तर डझनानी बाटल्या किंवा डब्ब्या दिसतील. हातासाठी एक, पायासाठी एक चेहऱ्यासाठी एक आणि डोक्यासाठी एक, असे शांपू, साबण, वगैरे वस्तू जाहिरातीत दिसतात. स्नानसाठी वेगळ्या, प्रत्येक प्रकारच्या वेशाबरोबर वापरण्याच्या विवधरंगी ओष्ठ-शलाका मिळतात. आता ब्युटी पार्लर अथवा सौंदर्यवर्धक केंद्र (सौंदर्य प्रसाधन केंद्र) फक्त स्त्रीयांसाठीच नाहीत तर पुरूषांसाठीही आहेत. केस गेले, टक्कल पडले तर लावायला केसांचा उत्तम टोप मिळतो. ह्या बाबतींत पूर्वीची डोकं टोपीने, हॅटने, झांकण्याची पध्दतच बरी होती कां? कांही असो कितीही नट्टापट्टा केला तरी मधुर आणि सुसंस्कृत वाणीने बोलणारा/बोलणारी गड जिंकून जाते.

ज्यांना सभेत बोलायचं असतं, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचं असतं, ज्यांना आपलं म्हणणं पटवून द्यायचं असतं (वकिल), त्यांना तर उत्तम भाषा ही अत्यंत आवश्यक आहे. आवाजातील चढउतार सहज झाले पाहिजेत. मनीचे भाव शब्दांतून श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचवायचे असतील तर वाणीने मोहिनी घालता आली पाहिजे. अर्थात तुमचा त्या विषयाचा अभ्यास, तुमची कळकळ, तुमची निष्ठा असलीच पाहिजे. हे सर्व असून जेव्हा तुम्ही सुभाषित वा तत्सम शब्द बोलण्यांत वापरतां, तेव्हा त्याची लज्जत निश्चितच वाढते. उत्तम किर्तन ऐका. तुमचा देवावर विश्वास नसला तरी तुम्ही किर्तनाने उल्हसित नक्कीच व्हाल. ही आहे वाणीची करामत, जी वरील श्लोकांत अभिप्रेत आहे. आपण चित्रवाणीवर भाषणे ऐकतो. ‘आज ह्या ठीकाणी’ हे शब्द खूपदा वापरलेले दिसतील. त्याला कारण वक्ता विचार करायला मधे वेळ घेत असतो. राजकारणी व्यक्तींचा एक अधिक वा उणा शब्द त्यांना गोत्यांत आणू शकतो कारण विरोधक टपलेले असतात तर कांही अमर्यादा-पुरूषोत्तम कांहीतरी खमंग बोलण्याच्या नादात आपला ताल आणि तोल सोडून बरळतात.

हा श्लोक भर्तृहरीच्या नीतीशतकातील आहे. हा कवी भर्तृहरी नेमका कोण?  कुठला? ह्याबद्दल अनेक प्रवाद आहेत. भर्तृहरीने नीतीशतका बरोबरच शृंगारशतक आणि वैराग्यशतक अशा दोन रचनाही केलेल्या आहेत. आधी नीतीशतक मग प्रणयासक्त जीवन म्हणून शृंगारशतक आणि शेवटी वैराग्यशतक अशा प्रत्येकी शंभर श्लोकांच्या तीन रचना त्याने केल्या आहेत. इतर अनेक संस्कृत कवींप्रमाणे भर्तृहरीबद्दलही ‘फार कमी माहिती व आख्यायिका जास्ती’ अशी स्थिती आहे. तो साधारण सहाव्या शतकात होता असावा असा अंदाज आहे. तो उज्जैनचा राजा होता व नंतर त्याने राज्य विक्रमादित्य ह्या आपल्या लहान भावाकडे सोपवले व संन्यास घेतला, असे म्हटले जाते. सातव्या शतकांत भारतात आलेला चीनी प्रवासी ह्यूएनत्संग (Hieun Tsang)  ह्यांच्या कांही उल्लेखावरून भर्तृहरी बौध्दधर्मीय होता, असे कांहींचे मत आहे तर त्याच्या ह्या तीन काव्यांतील कांही रचनांवरून तो अद्वैतवादी होता, असा कांहींचा तर्क आहे.

बालादपि सुभाषितम् ग्राह्यम्, हे आपले ब्रीद असावे. अर्थ सोपा आहे. सुभाषित लहान मुलाकडूनही शिकून घ्यावं. हा चरण मनुस्मृतीमधील श्लोकांतला आहे. मनुस्मृती जाळण्याच्या काळांत मी त्यांतलं हे वचन घ्यायला सांगतोय.  त्याच श्लोकांत म्हटलंय, “शत्रुकडूनही सदाचार घ्यावा आणि सोनं जरी घाणीत पडलं असेल, तरी घ्यावं.” थोडक्यांत चांगल्या गोष्टी कुठूनही घ्याव्या, (आणि वाईट वा चुकीच्या गोष्टी मनुस्मृतीतूनही स्वीकारू नयेत), ह्या न्यायाने आता त्याज्य असणाऱ्या मनुस्मृतीमधून हे चांगलं वाक्य स्वीकारायला हरकत नसावी.

– ©️ अरविंद खानोलकर

arvindkhanolkar@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

उत्तरे जाणा व ज्ञानात भर घाला

प्रश्नसमूह ७ : शास्त्रीय गायकी 

३१. ‘हिंदुस्तानी रागदारी’ गायकीत मुख्य घराणी कोणती ? –

३२. या घराण्यांचे प्रसिद्ध गायक कोणते ?

३३. रागांचे किती वर्ग केले आहेत व त्यांना काय म्हणतात ? 

 ३४. प्रसिद्ध रागदारी गाणार्‌या स्त्री गायिका कोण कोण आहेत वा होऊन गेल्या आहेत ? 

 ३५. शास्त्रीय संगीतावर आधारित गीतांचे कोणकोणते  प्रकार प्रचलित आहेत ?        

– ©️ विलास सातपुते 

vilas.satput54@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

विहंग मित्र

क्रमांक  ७ : Tickell’s Bue Flycatcher.( टिकल्सचा माशिमार )

खूपच आकर्षक निळ्या रंगाचा माशिमार.
वरच्या बाजूस निळा,तर खाली नारिंगी व पांढरा.नारिंगी भाग छाती आणि गळ्याकडे असतो. नेहमी प्रमाणे नर हा जास्ती गडद रंगाचा असतो. तर मादी ही फिकट रंगाची आणि आकाराने थोडी लहान असते.
विरळ रानात, साधारण जलस्त्रोतांच्या जवळ आढळतो . मंजुळ  आवाज असतो.
प्रकाशचित्रकारांचा  आवडता  पक्षी आहे.


– ©️देवदत्त पाटणकर.

8378980966 

castingalu@gmail.com

^^^^^^^^^ ^^^^^^^^^ ^^^^^^^^ 

 

With Best Regards,
Deodatta Patankar,
8378980966.

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

मला आवडलेले पुस्तक : मास्तरांची सावली

मध्यंतरी एक पुस्तक वाचनात आले आणि मन सुन्न झाले.माणूस कसा जगतो? .कोणती जिजीविषा त्याला थोपवून धरते ? जगण्याची धडपड करीत असताना इतके आसूड ओढणारे ,कटू सत्य दाखवणारे शब्द कसे काव्यबद्ध करतो ? आणि वाटते , सतत त्यांच्यावर सावली धरणारी कृष्णाबाई किती धीराची असेल.

नारायण सुर्वे हे दीन, दुबळे, गरिबांचे कैवारी, त्यांचे  श्रेष्ठ मराठी कवी….त्यांना कविश्रेष्ठ करण्यात कृष्णाबाईंचा सिंहाचा वाटा.

खरे तर त्यांना आपण काय म्हणावे..त्यांची जात, धर्म कोणालाच माहीत नाही, गंगाराम सुर्वे यांना ते कचरा कुंडीजवळ सापडले . त्यांनीच त्यांचा सांभाळ केला म्हणून नाव लिहिले नारायण गंगाराम सुर्वे.

सुर्वे यांचे बालपण अतिशय हलाखीत गेले हॉटेलमध्ये पोऱ्या, कापड गिरणीत बिगारी, प्राथमिक शाळेत शिपाई अशी पडतील ती कामे केली.

एका छोटेखानी कार्यक्रमात मी त्यांना भेटले होते. त्यांच्या जवळच बसले होते, थोडे बोलणे झाले..विचारले, तुम्ही इतके परखड पणे कसे लिहिता? ते अतिशय शांत, नम्र, मूक…मी म्हटले, तुमच्या कविता पाठ्य पुस्तकात आहेत. दहावीला शिकवतो आम्ही. ते मंद हसले म्हणाले…मी काही कल्पना वगैरे करीत नाही ..जे दिसते ते लिहितो..अनुभव येतात तसेच शब्द झरतात.

हा इतका शांत माणूस गिरणी कामगारांसाठी चळवळ उभारतो. मार्क्सवादी म्हणून तत्वे बाळगतो हे समजून घ्यायला मला जड जात होते…कृष्णाबाई सांगतात “लालबागच्या चाळीत ते सर्वांना चळवळीचे महत्व सांगायचे,सभेत जायचे, सभेचा वृतांत सांगायचे …

किती सोसले असेल त्यांनी.. पण त्यांच्या पाठीशी ढाल बनून उभ्या होत्या कृष्णाबाई..

मास्तरांची सावली..म्हणजे कृष्णाबाईंचे आत्मकथन. ते शब्दबद्ध केलंय, डॉ नेहा सावंत यांनी..कृष्णाबाईंचे माहेरचे आडनाव तळेकर ..आई वडील लवकर गेले, ते गिरणी कामगार होते. आजी जवळ त्या मोठ्या झाल्यात तेथेच जवळ नारायण गंगाराम राहत. त्यांनीच त्याची प्रतिभा ओळखली ,त्यांचे वेगळेपण हेरले आणि स्वतः च पुढाकार घेऊन कोर्टात लग्न करण्यास तयार केले, लग्नानंतर दोघेही नोकरी नसलेले, अक्षरशः रस्त्यावर दिवस काढले.पण ते हाल,उपासमार,  ते दुःख सारे नारायण यांच्या प्रेमापोटी सहन केले.

पण त्यांनी हार मानली नाही अशा परिस्थितीत मिळेल ती कामे केली , मुलांना वाढवले. नवऱ्याला सातवी ची परीक्षा द्यायला लावली..त्या लिहितात
 “ रवी सहावीला असताना मास्तर अनेकदा त्याला घरी कविता शिकवायचे. त्यांचं वाचन अफाट असल्यामुळे आणि कवितेची विशेष आवड असल्यामुळे ते कविता, इतिहास छान शिकवायचे. माझ्या मनात यायचं, मास्तर फक्त तिसरीच शिकलेत तरीही ते सहावीच्या मुलाला इतकं छान शिकवतात. मग ते स्वत:च मास्तर का होत नाहीत? म्हणून एक दिवस मी त्यांना विचारलं, ” मास्तर, शिक्षणाची किती डिग्री असते हो?”

”अगं, खूप असते. शिकावं तितकं थोडंच आहे किशा!”

”मग तुम्ही का शिकत नाही मास्तर? आता आपला रवीसुध्दा सातवीला गेला. दोघं मिळून एकत्र परीक्षा द्या ना! तुमचं वाचन, लेखन भरपूर आहे. तुम्हाला काही कठीण जाणार नाही. ”

मास्तर जरा लाजतच होते, कारण वर्गात सगळी लहान लहान मुले आणि मास्तर म्हणजे चार मुलांचे बाप. मी त्यांना म्हटलं, ” मास्तर, लाज ठेवायची खिशात आणि बसायचं वर्गात. आपल्याला काहीतरी घडवायचंय ना! मग लाजून कसं चालेल?” मास्तरांनी मनावर घेतलं. नेटाने अभ्यास सुरू केला आणि दोघेही बापलेक सातवी पास झाले.”

 पि.टी सी चा कोर्स करायला लावला ..त्यामुळे त्यांना एका शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली, त्याच इमारतीत खाली  कृष्णाबाई शिपायाची नोकरी करीत .तेथेच मुलं विद्यार्थी म्हणून असे पूर्ण कुटुंबच एका जागी … त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी खर्चाचा ताळमेळ कसा बसवला हे च कळत नाही त्या हयातभर ..वटवृक्षाच्या सावलीप्रमाणे राहिल्या.

त्या सुमारास त्यांच्या कविता  अनेक ठिकाणी छापून येत, पण पुस्तक काढण्यासाठी पैसे नव्हते.शिरीष पै देखील पुस्तक काढावे म्हणत . पैशाशिवाय कोणीही पुस्तक काढायला तयार नव्हते. शेवटी कृष्णाबाईंनी स्वतःचे मंगळसूत्र विकून सहाशे रुपये आणले ..त्या म्हणतात ..मंगळसूत्र आणि कुंकू यापेक्षा मनातील भावना आणि श्रद्धा मोठ्या वाटतात मला…हे केवढे मोठे तत्वज्ञान….मास्तरांना मोठे करण्याची धडपड आपल्याला दिसून येते..अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत ..त्यांच्याच भाषेतील म्हणी देखील आपल्याला भेटतात ..म्हणून काही जण या पुस्तकाला ..साहित्य मूल्य ..नाही असे ही म्हणतात .
पण आपल्याला त्यातून एक त्याग,समर्पण आणि ध्यास याची शिकवण मिळते एवढे मात्र खरे..

त्या पैश्यातून नारायण सुर्वे यांचा “ऐसा गा मी ब्रह्म”  हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आणि त्याला महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळाला. वर्षभर कृष्णाबाईंनी मंगळसूत्र घातले नाही… नंतर सुर्वे  यांनी नवीन मंगळसूत्र केलं. हळूहळू नारायण सुर्वे यांची प्रसिद्धी वाढू लागली. मोठ मोठ्या लोकांचा सहवास मिळू लागला. त्यांच्या “माझे विद्यापीठ” या कवितासंग्रहाला तर अकरा पुरस्कार मिळाले. कृष्णाबाई त्यांच्या कोणत्याच कार्यक्रमाला जायच्या नाहीत. त्यांना वाटे आपण त्या लोकात शोभत नाही. नारायण सुर्वेंचे कार्य विविध पातळीवर वाढत गेले.

पण आपल्या किशावर ( ते कृष्णाबाईंना याच नावाने हाक मारीत ) ते किती अवलंबून होते हे त्यांच्या बोलण्यावरून कळते त्यांनीच एकदा मुलांना सांगितलं आहे की, “किशाबाई आहे तोवर खरं. ती घरात नसेल, आजारी असेल की, या देवळातली घंटाच बंद पडल्यासारखी वाटते.”

कृष्णाबाईंची त्यांच्यावरील भक्ती कशी  होती ते या परिच्छेदावरून कळेल:-

“आता मी एकच प्रार्थना करते की, ‘बाबा, मी हलती, डुलती आहे तोवर सुर्व्यांचं काय व्हायचं ते नीट सन्मानानं झालेलं मला पाहू दे.’ मुली मला म्हणतात, “आई तू असं का बोलतेस? लोक काय म्हणतील? बायका असं बोलत नाहीत.”

पण मी बोलते ते खरं आहे. बायकांचं काय, कुठेही कसंही होतं. म्हातारपणी पुरुषांचं कठीण होतं. मला रस्त्यावर पडायची वेळ आली तरी हरकत नाही. माझी गरिबी मी कधीच विसरले नाही. मी तशीच आहे आणि मला हेही माहीत आहे, उद्या हात पसरायची वेळ आली तर नुसत्या सुर्व्यांच्या नावाने माझी ओंजळ भरेल. उभ्या महाराष्ट्रानं त्यांना प्रेम दिलं, आपलं केलं, तसं ते मलाही करतील. पण माझ्या माणसाचं मात्र सगळं नीट शेवटपर्यंत सन्मानानं झाल्याशिवाय माझ्या जिवाला चैन नाही पडायचं. माझा जीव त्यांच्यात अडकेल.

असे हे साधंसुधं आत्मकथन पण प्रेरणादायी ..लहानसे आहे एका बैठकीत पण संपू शकते तरीही वाचनीय नक्कीच भावनेपेक्षा कर्तव्याला, व्यवहाराला महत्त्व कसे द्यावे*

हेच जणू  कृष्णाबाई या पुस्तकातून आपल्याला सुचवितात असे वाटते

–  सौ. स्वाती वर्तक
खार (प)
मुंबई ४०० ०५२

मास्तरांची सावली – कृष्णाबाईं नारायण सुर्वे.
प्रथमावृत्ती – १५ ऑगस्ट २००९
व्दितीयावृत्ती – १६ जानेवारी २०१०
प्रकाशक – डिंपल पब्लिकेशन
मूल्य – १९० रुपये
पृष्ठ संख्या – १८३.
++++++++++++

टीप….खालील माहिती अधिकची..पुस्तकातून नव्हे.

 १९९५ मध्ये नारायण सुर्वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले . अनेक सन्मान नारायण सुर्वे यांना मिळाले.  भारत सरकारचा पद्मश्री हा ही पुरस्कार त्यांना मिळाला.  
नारायण सुर्वे यांचे वाचन चौफेर होते .

दारिद्र्य, समाजाकडून आधी झालेली हेटाळणी. विपन्न अवस्था हे सर्व त्यांच्या सखोल अनुभवाच्या शब्दांना कारणीभूत ठरते ..असे दिसते
१…ऐसा गा मी ब्रह्‌म (१९६२) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह.
२…माझे विद्यापीठ (१९६६),
३….जाहीरनामा (१९७५)
४…नव्या माणसाचे आगमन (१९९५) हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले.
५…सनद (१९८२) आणि
६… निवडक नारायण सुर्वे (१९९४) ह्या त्यांच्या निवडक कवितांचे संपादित संग्रह.
७….उर्दू साहित्यिक ⇨ कृष्ण चंदर ह्यांच्या उर्दू कथांचा सुर्वे ह्यांनी केलेला अनुवाद तीन गुंड आणि सात कथा (१९६६) ह्या नावाने प्रसिद्घ झाला.
८….दादर पुलाकडील मुले (१९७५) ही त्यांची अनुवादित कादंबरी.
९….त्यांच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद ऑन द पेव्ह्‌मेंट्‌स ऑफ लाइफ (१९७३) ह्या शीर्षकाने प्रसिद्घ झाला आहे.

पुस्तकाचे मुखपृष्ठ 
पुस्तकाचे मलपृष्ठ 

–  सौ.स्वाती वर्तक
खार (प )
मुंबई ४०० ०५२

swati.k.vartak@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

चित्रकारांचे दालन

– ©️ मिलिंद महाबळ 

milind.mahabal65@gmail.com

@@@

 

@@@

चित्रकार ….. डॉ सौ.सरिता शेवगावकर

प्रेषक सौ. स्वाती वर्तक 

swati.k.vartak@gmail.com 

@@@@@@@@@@@@@

महत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. 

@@@@@@@@@@@

महत्त्वाची सूचना :- मैत्री अनुदिनी हे मुख्यत: मराठी साहित्याला वाहिलेलं आणि नवं-जुनं साहित्य प्रकाशित करणारं एक नियतकालिक आहे. ते आम्ही वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देत असतो. एखादा जुना लेख वा कविता वगैरे साहित्य पुनर्प्रकाशित करायचं असल्यास आम्ही सदर लेखकाची परवानगी घेण्याचा प्रयत्नही करत असतो. काही वेळा संपर्क होऊ शकत नाही. मात्र अशा प्रकारे पुनर्प्रकाशित केलेल्या साहित्यावर आम्ही न चुकता लेखकाचं नांव व ज्या पुस्तकातून वा मासिकातून ते घेतलं त्याचा नामनिर्देश करत असतो. कृपया आमची अडचण समजून सहकार्य करावं ही विनंती.

@@@@@@@@@@@@@@