सावध व्हा…

 

स्वागत फुलांनी

माझं नाव सुवर्णा जोशी (खरं तर हे माझं खरं नाव नव्हे पण लाजिरवाण्या गोष्टी सांगायच्या झाल्या की. )

 मी मूळची कोकणातली . रत्नागिरी जिल्ह्यात माझं गाव.
या गावाचं नावही सांगायची माझी इच्छा नाही….. कारण गावातल्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीने मला सहानुभूती दाखवायला नकोय; मला फोन करायला नको; पत्र पाठवायला नको आणि भेटायला तर मुळीच नको.

 माझं शालेय शिक्षण गावातल्याच बाळबोध शारदा विद्या मंदिर शाळेत झालं .
 घरून आणि शाळेमध्ये खूप चांगले संस्कार मिळाले .
जुन्यातलं ते चांगलं घ्यायचं आणि नव्यातलं ही चांगलं घेऊन आपण जगण्याची कला साध्य करायची असं माझं राहणं…..
माझ्या मैत्रिणी देखील अतिशय सरळ मनाच्या आणि भावनाप्रधान! मीही स्वतःला तसंच समजते .

अशी मी कॉलेजचं शिक्षण घ्यायला मुंबईला माझ्या काकाच्या घरी गेले . सिडनहॅम या नावाजलेल्या कॉलेजमधली मी नावाजलेली विद्यार्थिनी झाले……
मन लावून अभ्यास केला आणि कॉमर्सची पदवीधर झाले.
 पुढचं शिक्षण घेत असतानाच एका कर्तबगार चांगल्या तरुणाची, निशिकांत जोशीची बायको झाले. हे सर्व अगदी लवकर लवकर जमून आलं; आजही मला त्या योगायोगाचं आश्चर्य वाटत आहे.
निशिकांत म्हणजे नेमस्त स्वभावाचा आणि सरळ मार्गी तरुण !  
त्याचीही स्वप्नं होती आणि ती माफक होती.  त्या दृष्टीने त्याने वाटचाल केली आणि त्याच्याशी, वयाच्या बाविसाव्या वर्षी माझं लग्न झालं.

आमचं लग्न झाल्यानंतर एक वर्षातच निशीची  ट्रान्सफर झाली, ती देखील अति दूर. हरियाणामध्ये गुरुग्राम येथे आम्हाला यावं लागलं.  दिल्लीच्या विमानतळापासून सव्वा तासांवर आमचं गुरुग्राम. तिथे सेक्टर ५६ मध्ये माझं वास्तव्य सुरू झालं.

 सुरुवातीला तो पेइंग गेस्ट म्हणून राहिला आणि मग, भाड्याचं घर घेऊन त्याने मला बोलवून घेतलं.
या गुरुग्राममधल्या जीवनाशी जुळवून घेताना माझी बरीच कसरत झाली पण सुदैवाने इथे  चांगल्या मैत्रिणी मिळाल्या .
सुमित्रा तर पुण्यातली . आमची दूरदूरची नातलग .
ती माझी खास मैत्रीण झाली .

*************

कालांतराने गोड, गोऱ्या, गोमट्या मुलीची, कांचनची मी आई झाले. मग तर खूप व्यस्त झाले…..

 बघता बघता हे शहर माझं झालं आणि मी या शहराची झाले. या शहराचाच एक भाग झाले…..

 आता माझी दुर्दैवी कहाणी तुम्हाला सांगायची आहे. यामध्ये तुम्हाला सावध करण्याचा सुद्धा माझा प्रयत्न आहे.

 ***************

गेले दोन दिवस माझं डोकं भणभणत आहे….. मला जीव नकोसा झाला आहे…

त्या दिवशी ऑफिस च्या कामानिमित्त निशी मेरठला गेलेला होता.
……घरात मी एकटीच!

….खूप रडले…..  स्वतःच्या थोबाडीत मारून घेतलं…..जेवलेही नाही. नुसतंच दूध पिऊन दिवस ढकलले…… माझ्या निशीला काही कळवायची हिम्मतच होत नव्हती.  
रमेश, हा माझा चुलत भाऊ, मुंबईत रहाणारा….. खरं तर माझा तो मित्रही आणि आधारसुद्धा….

त्याला फोन करून कळवले आहे. तो शनिवारी इथे येणार आहे ……
 माझ्या आयुष्यात जसा खड्डा पडलाय तसा तो तुमच्या आयुष्यात पडू नये म्हणून हे आता लिहायला घेतलंय…..

 आमचा सेक्टर मला खूप आवडतो.
घरापासून सर्व सर्व जवळ आहे आणि रात्रीसुद्धा इथे जाग असते.
इथे मोजकी मराठी कुटुंबं आहेत. बाकी सर्व परप्रांतीय….. त्यामुळे संबंध बेताचेच राहिले आहेत.

 सहा महिन्यांपूर्वीच मला इथे एक बऱ्यापैकी नोकरी मिळाली, त्यामुळे कोणाच्यात मिळून मिसळून राहण्याची, मैत्री करण्याची, एकत्र ट्रीपला जाण्याची कधी संधी लाभली नाही.

आम्ही दोघं नोकरीच्या निमित्ताने सेक्टर ५ मध्ये जातो.
आमची घरातून निघायची वेळ एक असते मात्र परत येताना कधीकधी रात्रीचे नऊसुद्धा वाजतात……

माझी सुकन्या…… कांचन!
तिच्या चेहऱ्यात विलक्षण गोडवा …….कोणालाही तिच्याशी बोलावंसं वाटेल……
साडेपाच फूट उंच…… तरतरीत…… दोन वर्षे कथ्थक शिकलेली…….
दीनानाथ दलालांच्या चित्रातली सुंदरीसुद्धा कांचनइतकी सुंदर नाही …..संस्कृत नाटकातील शकुंतलाच ती…..

 गोरीपान. अतिशय बोलके घारे घारे डोळे…..लाघवी स्वभाव.
 गोड गोड बोलणारी आणि समोरच्याला पटकन आपलंसं करणारी…..
माझ्या बहिणीचा हा गुण तिने घेतला आहे. सर्वांनाच ती हवीहवीशी……
कॉलेजमध्ये तिचं हे पहिलंच वर्ष……

पण तिचं कॉलेजमधलं आयुष्य कसं चाललंय, तिला अभ्यास आवडला का, तिच्या मैत्रिणी कोण आहेत……मला फारसं माहीत नाही….. एकदाच  सेक्टर ६८ मध्ये जात होतो तेव्हा गाडीतून तिने मला तिचं मॉडन कॉलेज दाखवलं त्या दिवशी रविवार होता मी गाडी थांबवली आणि तिला म्हटलं मला तुझं कॉलेज बघायचंय आपण वॉचमनला विचारून आत जाऊन येऊ; ती हो म्हणाली कॉलेजच्या प्रवेशद्वाराशी आम्ही गेलो तेव्हा वॉचमन तिच्याकडे बघत राहिला आणि म्हणाला, ये क्या अन्वर साहेब नाही आहेत कोण अनवर असं विचारायला हवं होतं पण दुसराच काही विषय निघाला आणि ते राहून गेलं विचारायची.
 आम्हा तिघांची साप्ताहिक भेट फक्त रविवारी!  तीसुद्धा निसुटती, बरीचशी औपचारिक……

  सकाळी ब्रेकफास्ट झाला की पळायची  बाजूच्या टॉवरमध्ये, सुजाताच्या घरी…..
एकदा तिकडे गेली की कधी परतेल सांगणं कठीण!…… मग आमच्या गाठीभेटी नाहीत, मोकळं बोलणं नाही ……आम्हा तिघांना एकत्र गप्पा मारताना कधी कुणी पाहिलं नसेल.
 मला आणि निशीला, फावला वेळ नाही.
 इथलं आयुष्य मुंबईच्या वरताण धावपळीचं …..

 त्या शुक्रवारी मी ऑफिसमधून नेहमीप्रमाणे आले.
  टेबलवर  पर्स ठेवली….. खूप तहान लागली होती तरीदेखील मी किचनमध्ये गेले नाही…..कारण तिथेच एक मोठा लिफाफा ठेवला होता. उत्सुकतेने मी तो उघडला. आत  पत्र होतं, माझ्या लाडक्या कांचनचं……

 ****************

”  मी आता तुझी कोणीच नाही…… तुझ्याशी, बाबांशी, सर्व नातलगांशी मी संबंध तोडत आहे……मला त्याचं जराही दुःख नाही…..
तुम्ही सर्व काफीर……खुजे…….
आणि म्हणूनच बिनधास्त सर्व काही मोकळेपणे लिहीत आहे.
हे पत्र जेव्हा तुझ्या हातात असेल तेव्हा मी ३२,००० फुटांवर विमानात बसलेली असेन…..
माझ्या शेजारी माझा रब, माझा आका, अनवर, मला कुशीत घेऊन बसलेला असेल. आम्ही दोघं त्या वेळेस एका वेगळ्याच दुनियेत जाण्याची स्वप्नं रंगवत असू……
माझा अन्वर ……मस्त उंची, उत्तम देहयष्टी, सावळा, भेदक नजर !
त्याने रोखून पाहिलं की समोरच्या मुलीच्या ……..

मला तो ‘खुशबू’ म्हणतो……
किती रोमँटिक आहे बघ तरी!  खूप खूप प्रेम करतो माझ्यावर. त्याच्या वॉलेटमध्ये माझा फोटो आहे आणि त्याच्या खाली त्याने माझी सही घेतली आहे .
माझी खूप आठवण आली की माझा फोटो तो पहात बसतो. ( खुद्द त्यानेच मला हे सांगितलं आहे)
 मी भेटले की दर वेळेला नवी शायरी ऐकवतो, छान छान गिफ्ट देतो मला ….. आमची नवी ओळख झाली तेव्हा पहिल्या भेटीत त्याने मला गोल्डन  वॉच दिलं .
 त्याच्याकडे लखनवी अदब आहे. त्याच्या आवाजात जादू आहे …..मस्त गातो आणि तेही फक्त माझ्याच साठी……
त्याच्यासारखा तगडा मर्द माझ्या आयुष्यात आला आणि मी पूर्ण बदलले गं  ….. माझ्या जागी असतीस, तुझंही असंच झालं असतं……
मागचं एक वर्ष आम्ही एक दुसऱ्याचे झालो आहोत.

हे सगळं कसं घडलं ते तुला सांगते.

शबनम बारमध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो. एखाद्या रोमँटिक सिनेमात शोभेल अशी आमची जवळीक झाली……

 आता विस्तारानेच सांगते.
शबनममध्ये मी वेफर्स खात असताना मला जोरदार ठसका लागला. अन्वरला मी ओळखतही नव्हते……धावत जाऊन त्याने पाणी आणलं……माझा ठसका थांबेपर्यंत माझ्यासमोर बसला. माझी अवस्था बघून त्याचे डोळे पाणावले……

 रंजना मला नंतर म्हणाली की हे नाटक असणार….. एखाद्या अनोळखी मुलीला ठसका लागला तर डोळ्यात पाणी यायची काय गरज?  
तिला काय माहित कवी मनाचा माणूस कसा असतो ते……
मी तिथून निघताना त्याने रुबाबदारपणे खिशातून स्वतःचं कार्ड काढलं. त्याच्यावर  उर्दूत  लिहिलं होतं,    

‘ शायर अन्वर ‘
  फक्त फोन नंबर, शेजारी एक जलती  हुई शमा…..

 मला ते वाचता आलं नाही. मी त्याला विचारल्यावर तो खूप हसायला लागला. त्याचं हसणं जगावेगळं आहे.लहान मुलासारखं निरागस आहे.  मला तो हसताना खूप आवडत होता. माझ्या डोळ्यात खोलवर बघत त्याने विचारलं ,
 ” फिर कब मिलोगी? मुझे आपकी नशिली आँखो पर शायरी लिखनी है “
 माझ्या नजरेला नजर भिडवून त्याने माझा हात हातात घेतला आणि…….
  एवढी धिटाई?   मला तर त्याचं कौतुकच वाटलं…..

नाही तर आमचे तरुण! मुलींच्या समोर लाजत बुजत बोलतात…. नजरेला नजर द्यायलासुद्धा घाबरतात….. सिली……

हळूहळू आमच्या भेटी वाढत गेल्या. त्याचे मित्र माझ्यावरून त्याला चिडवायला लागले. माझ्या मैत्रिणी मला म्हणत होत्या तू फार पुढे जाऊ नकोस……..
 त्या मला मागे का खेचत होत्या? बहुतेक त्या माझ्यावर जळत होत्या…….

आता तुला शेवटचं सांगते कारण तुझ्या मनात ते आलं असणार……..
तो तुम्हा मध्यमवर्गी काकवांचा आवडता प्रश्न आहे, की मुलगा करतो काय?

तू त्यांना सांग तो फार मोठा शायर आहे.
लवकरच त्याचं पुस्तक येणार आहे. ते आलं की बॉलीवूडमधल्या लोकांची लाईन लागेल. ….. त्याने सिनेमा करता लिहावं अशी त्याला गळ घातली जाईल.
 मग तर काय, पैसा आणि प्रसिद्धी…….पैसे मोजायला वेळ मिळणार  नाही असं तो मला सांगत होता……..

 पैशांवरून आठवण झाली……
 तुला ते सुरुवातीलाच सांगायला हवं होतं ……

घरातून जेव्हा मी निघाले तेव्हा अन्वरच्या आग्रहावरून आपल्या दोघींचे दागिने आणि लॉकरमधली सगळी कॅश मी त्याच्या बॅगेत ठेवली आहे…..
 तुम्हा दोघांची बँकेची पासबुकं आणि त्याच्या आग्रहाखातर तुमचे पासपोर्टही घेतले आहेत…..
 तो म्हणाला, इमर्जन्सी में ये सब हमारे पास चाहिये…. ”  

 देवघरातला पितळी बाळकृष्ण बरोबर घ्यायला त्याने मला होकार दिला….. त्याचं मन किती मोठं,  हे यावरून सिद्ध झालं ……
 आणि हो चांदीचं तांब्या भांडंसुद्धा आम्ही घेतलं आहे.

अन्वर म्हणाला, ” आपके पेरेंट दोनो पैसे वाले हैI उन्हे खूब सारी तनखा मिलती होगी. जब मौका मिलेगा तब मै किसी के साथ उनके पैसे और गहने लौटा दूंगा I  उनको जिंदगी मे कभी भी मै मिलूंगा नही I  तुम मिली और क्या चाहिये मुझे?”
तो मला म्हणाला ,      
” मेरे मा बाप दिल्ली में रहते है I  और उनको मिलने के लिए, तुम्हे छोड कर  पंद्रह दिनो के बाद अकेले वहां जाना है I  “
 हे सर्व वाचताना तू रडायला लागशील……. पण माझ्यावर तुझा विश्वास आहे हे मला माहित आहे…… मला खात्री आहे.
 रडू नको खुळ्यागत…..

 मी माझ्या प्रगतीसाठी जात आहे. एक नवं आयुष्य मी सुरू करत आहे.
मला खुशबू हे छान नाव मिळणार आहे आणि मला प्रार्थना करायला नवा रब मिळणार आहे…… हाऊ रोमँटिक……
मला आता अजान म्हणता येते  आपले सगळे देव मला परके वाटतात …..तूसुद्धा…..
 बाबा  भडकतील याची मला खात्री आहे. त्यांना सावरायचं काम तुझं आहे….. त्यांना म्हणावं,
 ” पोलिसात जाऊ नका. तसं काही केलंत तर त्याचे मित्र, ‘ सर तन से जुदा ‘ करतील “
कधी आठवण तुझी आलीच तर येईन भेटायला….. खुशबू अन्वर या नव्या नावाने…….

खुशबू अन्वर.

– ©️ मोहन कान्हेरे,     

गुरुग्राम
mohankanhere@yahoo.in

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

स्वागत फुलांनी – रान अबोली

– सविता कांबळे

savitak211@gmail.com

 ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

विचारशलाका 

(६१) 

– प्रेषक शुभदा अघोर

shubhadaaghor@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आणखी एक (अज्ञात ) केशवसुत

– पृष्ठ ६९ –

– प्रेषक माधव मनोहर जोशी 

madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

श्रीमद्भगवत्गीता

१५ व्या अध्यायाचा भावानुवाद

श्लोक ११ —
*यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितम्‌ ।*
*यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः ॥ १५-११ ॥*

*अर्थ* —
योगीजनही आपल्या हृदयात असलेल्या या आत्म्याला प्रयत्‍नानेच तत्त्वतः जाणतात;
परंतु ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केले नाही असे अज्ञानी लोक प्रयत्‍न करूनही या
आत्मस्वरूपाला जाणत नाहीत. ॥ १५-११ ॥

*मराठी पद्य रूपी भावानुवाद* —
जाणती योगी ही l हृदयस्थ आत्मा l
करिता प्रयत्ना l मनोभावे ll
असे ज्याचे चित्त l बहुत अशुद्ध l
असा तो निर्बुद्ध l काय जाणे ll

*श्लोक १२
*यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम्‌ ।*
*यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्‌ ॥ १५-१२ ॥*

*अर्थ,* –
सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते, जे तेज चंद्रात आहे आणि
जे तेज अग्नीत आहे, ते माझेच तेज आहे, असे तू जाण. ॥ १५-१२ ॥

*मराठी पद्य रूपी भावानुवाद –*
रवी,चंद्र,अग्नी l बहु तापलेले l
कैसे तेज आले l त्यांचेकडे ll
हे तू जाण पार्था l माझेच हे तेज l
उजळी जगास l सारीकडे ll

*श्लोक १३*–
*गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा ।*
*पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः ॥ १५-१३ ॥*

*अर्थ* —
आणि मीच पृथ्वीत शिरून आपल्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो आणि
रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींचे पोषण करतो. ॥ १५-१३ ॥

*मराठी पद्य रूपी भावानुवाद –*
धरेच्या पोटात l शिरून तो मीच l
धारितो सर्वांस l मम तेजे ll
बनूनी मी चंद्र l माझिया रसाने l
पोषितो प्रेमाने l वनस्पती ll

*श्लोक १४
*अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।*
 *प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्‌ ॥ १५-१४ll*

*अर्थ* —
मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा, प्राण व अपान यांनी संयुक्त वैश्वानर
अग्निरूप होऊन चार प्रकारचे अन्न पचवितो. ॥ १५-१४ ॥

*मराठी पद्य रूपी भावानुवाद –*
बनुनी मी अग्नी l सर्वांच्याच तनी  l
वसती करुनी l मी असतो ll
प्राण व अपान l बघ वायुसंग  l
अन्न चतुरंग  l पचवितो ll

*श्लोक १५*–
*सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।*
*वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्‌ ॥ १५-१५ ॥*

*अर्थ* —
मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे. माझ्यापासूनच
स्मृती, ज्ञान आणि अपोहन ही होतात. सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे.
तसेच वेदांतांचा कर्ता आणि वेदांना जाणणारासुद्धा मीच आहे. ॥ १५-१५ ॥

*मराठी पद्य रूपी भावानुवाद –*
मी वसे हृदयी l सकलांच्या खोल l
माझे हे बोल l ध्यानी ठेव ll
होतसे निर्माण l ज्ञान अन् स्मृती l
तसेच विस्मृती l माझ्यामुळे ll
जाणीतो मी वेद l ज्ञानाचा उगम l
वेदात परम l मीच आहे ll

****************************
 – ©️ माधव मनोहर जोशी.
madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

प्रदीप वर्तक..एक मनस्वी कलाकार

२५ ऑगस्ट १९५० रोजी सौ. लीलाताई आणि श्री अनंतराव वर्तक यांना पुत्ररत्न  प्राप्त झाले. नाव ठेवले प्रदीप…तेव्हा ठाऊक नव्हते हा असेच नावाप्रमाणे तेजोमय असणार.

तसे त्या घरात गाणारे असे कोणी नव्हते पण संगीताप्रती प्रेम , जिव्हाळा आजीपासून सर्वांनाच  होता..  याला उपजत देणगी असावी ..बालपणापासून संगीताची आवड..आजकाल जसे लिट्ल चॅम्प्स गाजतात तसे तो मंचावर गात होता, गाजत होता..त्याची धाकटी बहीण उषा वर्तक तीही सोबत असे. ( हिने तर नंतर मोठेपणीही अनेक कार्यक्रम प्रस्तुत करून अगदी लता मंगेशकर यांना देखील कौतुक करण्यास बाध्य पाडले होते )

पण प्रदीपच्या आवाजाला दृष्ट लागली बहुदा.  अठराव्या वर्षी काहीतरी त्रास झाला आणि आवाज अतिशय घोगरा व जड झाला..गाण्याची आवड तशीच होती, संगीताचे सूर  त्यांना साद देत. तदनंतर त्यांनी आपला मोर्चा “संगीतकार “ या क्षेत्राकडे वळविला. त्यात त्यांनी नावाप्रमाणेच दैदिप्यमान यश मिळविले. त्या काळात त्यांची गाणी आकाशवाणी व दूरदर्शनवर ऐकवली जात. त्यांच्या गाण्यांचा दर्जा बघून त्यांना “आकाशवाणी संगीतकार ग्रेड 1” हा मान मिळाला. त्यांच्या सोबत अरेंजर म्हणून विलास जोगळेकर काम करीत असत दोघांची जोडी छान जमली होती.

त्यांचे स्नेही अशोक पत्की यांनीही संगीत नियोजन केले. दूरदर्शनवरील ‘आरोही’ आणि ‘शब्दांच्या पलीकडले’मध्ये त्यांची गाणी गाजली..हेमंत कुमार आणि श्यामा चित्तार यांचे ” दर्यावरी “ या गाण्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली होती

श्रीनिवास खळे, यशवंत देव, शंकर वैद्य, शांताराम नांदगावकर, पद्मिनी बिनीवाले अशी अनेक नावे घेत येतील. यांच्या सोबत कार्य करायला मिळाले म्हणून ते प्रसन्न होते.
 त्यांचे त्या काळचे गायक, गायिका… हेमंत कुमार, महेंद्र कपूर, मन्ना डे,अरुण दाते, अरुण इंगळे, शरद जांभेकर, जयवंत कुलकर्णी, अजित कडकडे, उषा वर्तक, अनुराधा पौडवाल, पद्मजा फेणाणी, दिलराज कौर, सुषमा श्रेष्ठ, प्रमिला दातार. इतर असत

पण काही वर्षे मध्यंतरी घर, संसार, मुलाचे शिक्षण, परदेश गमन या व्यापात संगीताशी तडजोड करावी लागली ..इच्छा असूनही इतर व्यापामुळे सूर दूर सारावे लागले. आणि निवृत्तीनंतर पुनः चैतन्य सळसळू लागले; त्यात भक्कम साथ दिली त्यांची सहधर्मचारिणी चित्रा वर्तक यांनी..ती त्यांची सावली बनून राहिली.

नव्या उमेदीने, नवे गायक, गायिका, नवी ऊर्जा ..
पुनः अनेक गाणी केली; यावेळेस त्यांचे नवीन कलाकार होते …सुदेश भोसले, मंदार आपटे, वैशाली भैसने माडे, साधना सरगम,  अर्चना गोरे, स्वाती आपटे आणि इतर
कवी…भालचंद्र फडणवीस, श्रेयसी वझे, श्रीनिवास आठल्ये यांच्या शब्दांना त्यांनी योग्य तो न्याय दिला..
या सत्रात त्यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील गीत लाखो लोकांची पसंती मिळविणारे ठरले ..मंदार आपटे आणि वैशाली माडे यांच्या सुमधुर तयार आवाजात ते अतिशय कर्णमधुर झाले आहे.

त्यांचा स्वभाव मिस्किल होता, हास्य खळाळते होते, आपल्या मतांवर ठाम असत. समोरची गायिका किती प्रतिष्ठित आहे याचा विशेष मुलाहिजा न बाळगता स्वतः चे पाहिजे असलेले सूर मिळाले नाहीत तर स्पष्ट बोलत ..कधी कधी याची इतरांना खंत वाटे..अनेक समस्या त्यांनी हसत  झेलल्या. भरपूर शारीरिक व्याधी असूनही एकटेच काठी घेऊन  लांब लांब कामानिमित्त फिरत असत.. ही जिद्द वाखाणण्यासारखी होती ,प्रेरणास्पद होती .

त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. सह्याद्री वाहिनीवर त्यांची मुलाखत रंगली.. स्वच्छद कॅलिडोस्कोप भाग ३५ मधील मुलाखत बरेच काही सांगून जाते .तसेच अर्चना गोरे यांची डॉक्युमेंटरी ही बोलकी आहे,  मा.हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडून कौतुक व आशिष शेलार यांच्यातर्फे सत्कार झाला. आणि बरेच काही.
रसिक वाचकांनी इच्छा असल्यास बघावी.
खाली दुवा देत आहे .

दिनांक ११जानेवारी 2026 रोजी संगीत क्षेत्रातील हा मनस्वी तारा निखळला .त्यांचा स्वभाव विशेष माझ्या कानात गुणगुणतो की ते आताही यक्ष,गंधर्व,अप्सरा यांच्या सोबत मस्त महफिल रंगवत असतील .
ओम शांती.

– ©️  सौ स्वाती वर्तक

खार ,मुंबई ५२
swati.k.vartak@gmail.com

https://youtu.be/O-8Npf6IkhY?si=4BuUBsY88LHAsQoq
https://youtu.be/bsw1eZTWR9k?si=yYKn7c3DKjDo8cIt
https://youtu.be/1OkYG6k6ukU?si=YlnJiFFFiHu7Lpze

@@@@@@

आजची कविता 

राधेची तक्रार

राधा आणिक कृष्ण, अचानक भेटले स्वर्गात l
गोकुळानंतर तयांची कधी घडली नव्हती भेट ll१ll
अवचित बघुनी राधेला, कृष्ण गडबडला मनी l
राधा होती शांतचित्त, स्मितहास्य तिच्या वदनी ll२ll
“कसे आहात द्वारकाधीश? ” राधा पुसे कृष्णाला l
‘ द्वारकाधीश ‘ संबोधन ऐकोनी, कृष्ण मनी बावरला ll३ll
म्हणे कृष्ण, “हे राधे, मी आहे कान्हा तुझा लाडका l
‘द्वारकाधीश’ म्हणोनी मजला करू नको ग परका ll४ll
गोकुळ सोडून द्वारकेत मी, पुरता बुडलो व्यापात l
राधे, तव आठव येता अश्रू दाटत होते नयनात ll५ll
राधा सांगे, ” कृष्णा,मज तुझी कधीच आठवण आली नाही
आठव कैसा येईल, तुज जर कधी विसरलेच मी नाही ll६ll
तुजला मी जपून ठेवले होते या माझ्या नयनांमध्ये दोन्ही l
रडले नाही कधीही, अश्रूंसह तू वाहून जाशील म्हणूनी ll७ll
गोकुळास या सोडूनी, तू पोचलास थेट द्वारकेस l
प्रेम विसरुनी आमुचे, कधी न आलास भेटण्यास ll८ll
स्वकर्तृत्वाने तुज कीर्ती मिळाली,ह्या साऱ्या जगती l
द्वारकेस जाऊनी तू कान्हा बदललास रे किती ll९ll
दहा बोटे तुझी जादुई फिरत होती त्या बासरीवरी l
मधुर स्वरांवर लुब्ध होऊनी डोलत होती गोकुळनगरी ll१०ll
गोकुळ सोडून जाता, या बासरीस पुरता तू विसरलास l
द्वारकेस जाऊनी एका बोटावर सुदर्शन चक्र घेतलेस ll११ll
गोकुळात गोवर्धन उचलूनी कित्येक जीव तारलेस l
द्वारकेस जाता सुदर्शन चक्राने दुष्ट जीव घेतलेस ll१२ll
कुरुक्षेत्री पार्थास गीता सांगूनी, केलास रे तू उपदेश l
आशय तिचा महान,आजही मार्ग दावी सकलांस ll१३ll
पराक्रमी द्वारकाधीश म्हणूनी, तू पूज्य असशी जगती जरी l
कान्ह्या, तुझे बालरुप ठसले सकलांच्या मनमंदिरी ll१४ll
प्रत्येक मंदिरी पहा तू कान्ह्या, जाऊनिया ह्या पृथ्वीवरी l
कृष्णा, तुजसवे दिसेल राधा सर्वत्र तुझिया बरोबरी ll१५ll

– ©️  सौ. विनया माधव जोशी

प्रेषक माधव मनोहर जोशी 

madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

भुतं खरीच असतात का ?

आपण राहतो त्या जगात मानव प्राण्यांबरोबर इतरही अनेक पशु, पक्षी, जलचर, कृमी कीटक हे सारेच सुखेनैव जगत असतात. “जीवो जीवस्य जीवनं “असे जरी वचन असले तरीही ज्याप्रमाणे मानवाला ह्या पृथ्वीतलावर वास्तव्य करण्याची परवानगी आहे तितकीच परवानगी इतरही सर्व पशु,पक्ष्यांना नक्कीच आहे. ह्यामध्ये मी भूतांचाही समावेश नक्कीच करीन ! आता ह्या ठिकाणी “भुते“ हा एक वादाचा प्रश्न आहे. भुते नक्की अस्तित्वात आहेत का ह्याबद्दल कोणीच ठामपणे सांगू शकत नाही.

 पुरातन काळापासून मानवाने ज्या बऱ्याच गोष्टींचा शोध लावला, ज्या बऱ्याच शास्त्रांचा (आणि शस्त्रांचाही ) शोध लावला, त्यात ज्योतिषशास्त्र ह्या शास्त्राचा अंतर्भाव आहे. ज्योतिषशास्त्रावर कितपत विश्वास ठेवायचा हा सुद्धा एक चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. परंतु ह्या ज्योतिषशास्त्रानुसार, जन्मलेल्या जवळपास प्रत्येक सनातनी व्यक्तीची जन्मकुंडली बनवली जातेच जाते, अगदी मानवाने विज्ञानात कितीही प्रगती केली,आणि माणूस चंद्रावर तर पाय ठेऊन आलाच आहे परंतु आता मंगळाच्या भोवतीही घिरट्या घालू लागलेला आहे, तरीही अजून जन्मकुंडल्या बनतच आहेत, मंगळाची पीडा आहे का हेही पाहिले जात आहे ! ह्या ज्योतिषशास्त्रानुसार मानवात बरेच गण असतात, उदाहरणार्थ मनुष्य गण, देव गण, राक्षस गण ! त्यातील काहीकाही गणातील लोकांनाच फक्त भुते दिसू शकतात, इतर गणातल्या लोकांना दिसू शकत नाहीत असे मी मागे कुठेतरी वाचलेले होते. परंतु नक्की कोणत्या योनीतील लोकांना भुतं  दिसतात हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही, पण काही लोकांचा असा विश्वास आहे की मनुष्य गण ह्या  योनीतील लोकांना भुतं  दिसू शकतात, तर देव गण किंवा राक्षस गण यांसारख्या इतर योनीतील लोकांना ती दिसत नाहीत. अर्थात हे असे सारे मानले जाते. याशिवाय, कमकुवत मनाच्या लोकांना भूत दिसण्याची शक्यता अधिक असते, असेही मानले जाते.

 माझ्या पत्रिकेत माझा देवगण लिहिलेला असल्याने मला मात्र भुते आत्तापर्यंत कधीच दिसली नाहीयेत. लहान असल्यापासून मला भुतांच्या गोष्टी ऐकायला फार आवडत असत. बहुदा जी गोष्ट आपण पाहू शकत नाही परंतु ती अस्तित्वात असल्याचे इतरजण सांगतात, अशा गोष्टींबद्दल माणसाला बहुधा जात्याच आकर्षण असते, आणि मीही त्याला अपवाद नव्हतो. शाळा कॉलेजात असताना भुतांच्या गोष्टी मित्रांना सांगण्यात आणि त्यांच्याकडून ऐकण्यात फार गंमत वाटत असे. मला अजून आठवते की शिवाजी पार्कमधील स्काऊट हॉलच्या समोर मुंबईच्या महापौरांचा बंगला आहे (एकेकाळी तो ग्वाल्हेरच्या महाराजांचा एक महाल होता ), आता त्याचे बाळासाहेब ठाकरे स्मारकात रूपांतर करणे सुरु आहे. त्या बंगल्याला लागून एक चिंचोळी वाट थेट समुद्राच्या पुळणीवर जात असे. तिला आमच्या लहानपणी भूतगल्ली असे म्हणत असत. ( जेव्हा शेजारी सावरकर स्मारक बांधण्यात आले तेव्हा ती वाट बंद करण्यात आली.) तर ,आमच्या लहानपणी आम्हाला अगदी दिवसाढवळ्या सुद्धा त्या भूतगल्लीतून समुद्रावर जायला प्रचंड भीती वाटे. एकदा काही मित्रांबरोबर जिद्दीने पैज लावलेली होती आणि आम्ही २ मित्र एकमेकांचा हात  घट्ट धरून जोरात रामरक्षा म्हणत ती गल्ली पार केलेली होती, आणि पैजेचे चक्क ५ रुपये जिंकलेले होते. तेव्हा मला जाणीव झाली की आपल्याला भुते दिसणे शक्य नाही. तर ते असो.

 पुढे इंजिनीरिंग झाल्यावर मला पहिलाच जॉब हा वरळी येथील क्रॉम्प्टन ग्रीव्हज लिमिटेड ह्या मोठ्या कंपनीत मिळाला. खूप मोठी कंपनी असल्याने मी साहजिकच खुशीत होतो. इथे नोकरीत असताना मला २, ३ वेळा भुतांचे प्रताप मात्र पाहायला मिळाले ! मला प्रत्यक्ष भूत दिसले नाही, परंतु एक भूत करत असलेल्या अचाट कृत्यांचा मी प्रत्यक्षदर्शी मात्र नक्कीच होतो ! त्याचे झाले असे,—-

वरळी येथील आमच्या कंपनीची जी लोकेशन होती तो संपूर्ण भाग सोनापूर एरिया म्हणून अजूनही ओळखला जातो. आमचे जे मेन गेट होते, त्याच्या बरोबर समोर हिंदू स्मशानभूमी होती, आमच्या डाव्या बाजूला मुस्लिम धर्मियांची दफनभूमी तर त्याच्या समोर ख्रिस्ती लोकांची दफनभूमी होती. म्हणजे अजूनही त्या सर्व तेथे आहेतच. त्यामुळे बरेचदा समोरील हिंदू स्मशानभूमीत जेव्हा प्रेताचे दहन सुरु असायचे  तेव्हा तो एक विशिष्ट वास आमच्या कंपनीत दरवळत असे. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी जेव्हा आमच्या कंपनीने तिथे जागा विकत घेतली होती, त्यावेळेसही ती जागा मुस्लिम धर्मियांच्या दफनभूमीतील काही भागच विकत घेऊन तेथे फॅक्टरी उभारलेली होती. आमच्याकडे असलेले जुने सिनियर्स आम्हाला सांगत असत की बरेचदा एखाद्या नवीन मशीनच्या  फौंडेशन साठी खोदताना जमिनीखाली काही सांगाडे मिळालेले  होते म्हणून !

माझी नेमणूक ही क्वालिटी कंट्रोल खात्यात झालेली होती. नवीन असताना साहजिकच मला तीनही पाळ्यात काम करावे लागलेले होते. आमच्याकडे तिसरी पाळी ही रात्री १२ वाजता सुरु होऊन सकाळी साडेसात वाजता ती संपत असे. माझे खाते बरेचसे आमच्या मेनगेट जवळ होते. रात्रीच्या वेळेस तिसऱ्या पाळीत स्टाफचा असा मी एकटाच असायचो आणि अशा वेळेस मी आमच्या खात्यात न बसता मशीन शॉपमध्ये जाऊन बसत असे. कारण मशीन शॉप हा मेन  गेट पासून बराच लांबवर होता. तिसऱ्या पाळीचा पहिला चहा हा साधारणपणे पहाटे दीड ते पावणे दोनच्या सुमारास मिळत असे. आमच्या कडे बहुतेक सर्व आयात केलेली मशिनरी होती. त्या मशिन्स सेट करण्यासाठी अनुभवी कामगार होते. त्यांना सेटर्स असे म्हणत असत. कोणताही नवीन जॉब एखाद्या मशीनवर घ्यायचा म्हटल्यावर हे जे सेटर्स असत ते त्या जॉबचे ड्रॉईंग वाचून त्यानुसार मशीन सेट करत असत . (त्याकाळात कॉम्पुटर द्वारे चालवली जाणारी मशिन्स, सीएनसी , नव्हती ). एकदा मशिन्स सेट झाले की  मग हे जे सेटर्स असत ते ते मशीन ऑपरेटरच्या हातात देत असत. हे जे ऑपरेटर्स असत ते त्याकाळी बहुदा अर्धशिक्षित उत्तर प्रदेशचे भय्ये असत. कामात ते वाघ असत, परंतु त्यांना मशीनचे फारसे ज्ञान नसे. सेटर्सने सेट केलेलं मशीन हिरवे बटन दाबून सुरु करायचे आणि जॉब झाला की लाल बटन दाबून ते बंद करायचे इतपतच ज्ञान त्यांना असायचे. आमच्याकडे एक भले मोठे अवजड असे व्हर्टिकल बोअरिंग मशीन होते. त्याची उंचीच साधारणपणे ८ ते ९ फूट असावी आणि त्याचा व्यास सहज ५ ते ६ फूट असावा. असे हे मशीन चालवण्यासाठी बलदंड शरीराच्या कामगाराची गरज भासत असे.

अजूनही ती रात्र आठवली की माझ्या अंगावर शहारे येतात. त्या रात्री ह्या अवजड मशीनवर हिरालाल नावाचा एक धष्टपुष्ट भय्या काम करत होता. तो सहज सहा फुटाहून उंच आणि साधारणपणे शंभर किलो वजनाचा तगडा ऑपरेटर होता. मी दीड वाजून गेला असल्याने पहिल्या चहाची वाट पाहत होतो. सर्व कामगारांना चहा वाटून झाल्यावर मलाही चहा मिळाला. मी शॉपफ्लोरवरील एका टेबलाला खेटून उभा राहून चहाचा आस्वाद घेत होतो. सर्व साधारणपणे ज्या लोकांना धूम्रपानाची सवय असते अशा लोकांना चहा प्यायल्यावर हमखास धूम्रपानाची तल्लफ येते. आमच्या कंपनीत शॉपफ्लोरवर धुम्रपानास बंदी असल्याने असे लोक चहा पिऊन होताच बाजूला असलेल्या टॉयलेट्स मध्ये किंवा त्याच्या बाजूला बसून विडी, सिगारेट्स ओढत असत. ह्या गोष्टी जरी मॅनेजमेंटला मान्य नसल्या तरी आम्ही अशा गोष्टींकडे निदान तिसऱ्या पाळीत तरी कानाडोळा करत असू. त्या रात्री मी चहा पित असताना आमच्याकडचा  एक हेल्पर घाबराघुबरा होत माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, “साब, जल्दी चलो , हिरालाल मर रहा है !” मला क्षणभर काही सुचेना, मी पटकन माझ्या ग्लासातील उरलेला चहा तसाच टाकला आणि त्या हेल्परच्या मागे धावत गेलो. तो मला कामगारांच्या टॉयलेटकडे घेऊन गेला. तेथील दृश्य जे मी पाहिले त्याने मी जागच्याजागी अक्षरश: थिजलो. मी पाहिलं तेव्हा सहा फूट उंचीचा शंभर किलो वजनाचा हिरालाल आपणहून जमिनीपासून सुमारे तीनेक फूट उंच उचलला जाऊन जमिनीवर आपटला जात होता. हे कसे होतेय ते काहीच कळत नव्हते. नदीच्या काठी पूर्वी बायका जशा आपली लुगडी धुताना लुगड्याचा पिळा हाताने उचलून डोक्याच्या मागून फिरवून मग जमिनीवरील दगडावर आपटत असत, अगदी नेमक्या त्याच ऍक्शन प्रमाणे हिरालाल उचलला जाऊन जमिनीवर आपटला जात होता. बरे त्याला कोणीही असे उचलत नव्हते, हे सारे आपॊआपच होत होते. एवढ्या बलदंड हिरालालला असे उचलून खाली जमिनीवर आपटण्याची शक्ती कोणातच नव्हती, परंतु जे होत होते ते माझ्या डोळ्यासमोर होत होते. बिचारा हिरालाल “माफ करो सर, माफ करो” असे काहीतरी बरळत होता ! माझ्या डोळ्यासमोर असे तो तीनदा उचलला जाऊन आपटला गेलेला मी पाहिलं. त्यानंतर सारे शांत झाले. हिरालाल जमिनीवर निपचित बेशुद्ध पडला. मी त्याच्या जवळ जाऊन पाहिले तर त्याचा श्वासोच्छवास सुरु होता. मी पटकन चार पाच कामगारांना सांगून त्याला उचलले आणि मेन गेटपर्यंत आणले, नशिबाने त्या अपरात्री समोरच एक टॅक्सी मिळाली त्यात हिरालालला घालून त्याच्या बरोबर २ कामगार पाठवले आणि कोपऱ्यावरील ESIS हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केले. इकडे शॉपफ्लोरवर येऊन मी सर्वांना परत कामे सुरु करण्यास सांगितले. त्याच वेळेस एक वयस्कर कामगार माझ्याकडे येऊन मला म्हणाला, “साहेब, हे भुताचे काम आहे बरं का ! तुम्हाला ठावे नाही पण आम्ही असे प्रकार लय टायमाला बघतो.” मी त्याच्या बोलण्याकडे फारसे लक्ष दिले नाही, पण मी मनातल्या मनात नक्कीच टरकलो होतो, हे निश्चित !

ह्या घटनेनंतर हिरालालचे पुढे काय झाले हे जाणून घायची मला उत्सुकता होती. परंतु मला सांगण्यात आले की  ८ दिवस हॉस्पिटलात उपचार घेतल्यावर  हिरालाल त्याच्या गावी यूपीला निघून गेला आहे म्हणून !

अगदी अश्याच प्रकारची घटना त्यानंतर साधारणपणे दीड महिन्यानंतर मला पाहायला मिळाली. माझी परत तिसरी पाळी सुरु झाली होती. तसाच साधारणपणे पहाटे दीड च्या सुमारास मी चहाचा आस्वाद घेत असताना मागच्या प्रमाणेच एक हेल्पर धावत आला आणि मला म्हणाला , “सर, चलो, झुमरू मरनेही वाला है !” मी तसाच चहा टाकून धावत मागच्याच स्पॉटला गेलो. आमच्याकडे झुमरू नावाचा एक अत्यंत किडकिडीत हेल्पर होता. तो टॉयलेटच्या बाहेर जमिनीवर आडवा पडून आपोआप जमिनीपासून सुमारे ३ ते ४ इंच वर उचलला जाऊन खाली आपटला जात होता. तोही “मुझे बचाव, मैं अब बिडी नाही पिऊंगा !” असे काही तरी बरळत होता, तोही ३,४ वेळा उचलला जाऊन मग बेशुद्ध पडला. मग त्यालाही ESIS हॉस्पिटलात रात्री भरती  केले.

असे लागोपाठ  दोन विचित्र प्रकार बघितल्यावर मी विचार करायला लागलो, की नेमके ह्या दोघांना नक्की काय झालेले असावे ते ! काही कळत नव्हते, जुने कामगार तर मला सांगत होते की हे भुताचे प्रतापच आहेत म्हणून ! माझ्या डोळ्यासमोर मी हे प्रताप पाहिलेले होते, पण मला भूत काही दिसले नव्हते. मग हे नक्की काय असेल ह्याच विचारात मी बरेच  दिवस असताना मला माझे उत्तर अचानक मिळाले, ते असे.

सुमारे २ महिन्यानंतर तिसऱ्या पाळीतून मी परत जनरल शिफ्टमध्ये कामात असताना एके दिवशी जेव्हा दुसरी पाळी साडेतीन वाजता दुपारी सुरु झाली, तेव्हा आमच्या खात्याच्या दारातून हिरालाल आत आला. हा आता पूर्वीचा हिरालाल राहिलेला नव्हता, त्याचे वजन बरेच कमी झालेले होते. त्याच्या चेहऱ्यावर थकल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. तो सरळ माझ्यापाशी आला आणि त्याने माझे चक्क पाय धरले. मला म्हणला, “ साब, ऊस रात आपने मुझे अस्पताल भेजा उसके लिये मैं बच गया, नाही तो मैं वोही  दिन मरनेवालाही था.” मी पटकन त्याला उठवत म्हटलं, ”अरे भाई, अब बताओ की ऊस दिन क्या हुआ था”. तो म्हणाला, “साबजी, अपने कंपनीमे एक मायकेल नामका जनरल मॅनेजर अंग्रेजोंके जमानेमे था, वोह बहुतही नेक आदमी था और अनुशासन प्रिय था. काम के दौरान कोईभी कारीगर अगर टाइम पास करते नजर आता था तो वो साब गरम होते थे, और ऐसे कारीगरको चार्जशीट देते थे. ऊस रात चाय पिनेके बाद मुझे बिडी पिनेकी आदत है, तो मैं टॉयलेटके बाहर बिडी पी रहा था, अचानक दाये बाजूसे सफेद घोडेपर बैठके मायकेल साब आये .” मी मध्ये टोकत त्याला म्हटलं, “अरे मायकल कैसे आयेगा ? और वोभी घोडपे बैठके ?” त्यावर हिरालाल म्हणाला, “अरे साब, मायकेल तो कबका मर चुका है, उसके लिये ये अपनी फॅक्टरी सबकुछ थी , कंपनीके अंदर काम करते वक्त वो यहा मरा था, अब उसका भूत हो गया है, वो रातको राऊंड लगाता है, ऊस रात मुझे बिडी पिते हुए देखकर वो घोडेसे नीचे उतरा, मुझे माँ बहेनपर दो चार गालिया  दी और उठा उठा के मुझे पटकने लगा ! और मै तो बेहोष हो गया, आगेका मुझे मालूम नही !” त्याचे हे सांगणे ऐकून मी नखशिखांत हादरलो. अशाच प्रकारचे स्पष्टीकरण त्यानंतर काहीच दिवसांनी मला झुमरू ह्यानेही दिले !

मंडळी, ह्या सर्वाला काय म्हणावे ! मला प्रत्यक्ष भूत कधी दिसले नाही परंतु भुताचे असे विचित्र प्रकार मात्र नक्कीच पाहायला  मिळालेले आहेत. आणखीही काही प्रकार सांगण्यासारखे आहेत, पण ते पुन्हा केव्हा तरी !

*****      
– ©️ माधव मनोहर जोशी.

madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

वसुंधरेच्या कायापालटाची कहाणी

भूगोलाचा इतिहास : ४३  

यस्यां समुद्र उत सिंधुरापो यस्यांमन्नं कृष्टय: संबभूवु :
यस्यांमिदं जिन्वति प्राणदेजत् सा नो भूमि: पूर्वपेये दधातु ।।

जिच्यावर नद्या, समुद्र सरोवरे इ. असून धनधान्य व पिके पिकवणारी माणसे जिथे निर्माण होतात आणि जिथे जे प्राणमय आणि गतिशील आहे, ते जीवन व्यतीत करते, ती भूमी आम्हाला पहिल्या दुग्धपानाचा आनंद देवो.
– भूमीसुक्त ( अथर्ववेद)

या भूमीसुक्तात पृथ्वीची सुंदर भौगोलिक वर्णने केली आहेत. पण वरील ऋचेत वर्णन केलेली वसुंधरा जन्मतः खडक वायूचा एक ओसाड ढीग मात्र होती. तिच्या रुपांतरणाचा इतिहास जेवढा रंजक तेवढाच नाट्यमय आहे.

सुमारे ४५० ते ४६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीचा जन्म झाला. नवजात पृथ्वी म्हणजे खडक, धूळ व वायु यांचा एक प्रचंड समुच्चय होता. त्यावेळची स्थिती कल्पनातीत भयंकर होती. तिच्या गुरुत्वाकर्षण कक्षेतील खडकांचे असंख्य तुकडे उल्केच्या रुपात तिच्यावर येऊन कोसळत होते. त्याच काळात  खडकातील किरणोत्सारी द्रव्ये आणि प्रचंड दाब यामुळे तिच्या अंतरंगातील उष्णता प्रचंड वाढून खडक वितळू लागले. खडकांना पडलेले तडे व भेगातून लाव्हारस बाहेर पडून ज्वालामुखीचे उद्रेक होऊ लागले. तो लाव्हारस साचून भूपृष्ठावर ज्वालामुखी पर्वतांची निर्मिती होऊ लागली. उल्कावर्षाव, भयानक उष्णता व ज्वालामुखींचे अव्याहत उद्रेक ही अशी भयंकर स्थिती सुमारे पन्नास कोटी वर्षे राहिली. हा उल्कावर्षाव व ज्वालामुखी उद्रेकाचे पर्व थोडे शांत होईपर्यंत चंद्र पृथ्वीपासून वेगळा झाला होता.

दरम्यान वितळणाऱ्या खडकातील निकेल, लोहासारखी जड मूलद्रव्ये तळाशी जाऊन आणि अल्युमिनियम, सिलकेट्स सारखी हलकी मूलद्रव्ये वर येऊन भूकवच तयार झाले. भेगा व तडे यामुळे भूकवचाचे तुकडे पडले. याच तुकड्यांचे अपवहन होऊन कालांतराने खंडांना आजचे स्वरूप प्राप्त झाले. त्याक्रियेत भूखंडांचे तुकडे – प्लेट्स – एकमेकांवर आदळून घडीचे पर्वत म्हणजे वलीपर्वत, तर जिथे भूकवच खचले तिथे खचदऱ्या व गटपर्वत निर्माण होऊ लागले.

बाल्यावस्थेत पृथ्वीभोवती वातावरण असे नव्हते. खडकांच्या ढिगाऱ्यासोबत धूळ व वायूंचे दाट आवरण होते. त्यात हायड्रोजन, हेलियम, मिथेन व अमोनिया असावा. अव्याहत ज्वालामुखी उद्रेकातून अनेक वायु पृष्ठभागावर आले आणि ते वातावरणाचा भाग बनले. त्या वातावरणात मुख्यतः हायड्रोजन सल्फाईड,

अमोनिया आणि सध्याच्या २०० पट कार्बन डाय ऑक्साईड असावा. हायड्रोजन सल्फाईड व अमोनिया हे हळूहळू क्षाररुपात जमिनीत व समुद्रात पोहोचले. पृथ्वीच्या वातावरणात मुळात मुक्त स्वरूपातील ऑक्सिजन नव्हता. कारण जो काही ऑक्सिजन होता, त्याचा हायड्रोजनशी संयोग होऊन पाणी तयार झाले होते. पुढे वनस्पती निर्माण झाल्यावर त्यांच्या अन्ननिर्मिती (प्रकाश संश्लेषण) क्रियेत ऑक्सिजन मुक्त होऊ लागला. त्यामुळे हवेत ऑक्सिजनचे प्रमाण वाढत २०% पर्यंत झाले. त्याचवेळी वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड वायु प्रकाश संश्लेषण क्रियेत शोषला जाऊन त्याचे प्रमाण 0.03% पर्यंत खाली आले.

वातावरणाचा मुख्य घटक असलेला नायट्रोजन वायु कमी क्रियाशील तर हेलियम हा एक निष्क्रिय वायु आहे. त्यामुळे हे दोन्ही वायु मुक्त वायुरुपात हवेत शिल्लक राहिले.

पृथ्वीवरचे जलावरण सुमारे 380 कोटी वर्षांपूर्वी तयार झाले. त्यापूर्वीही पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण आजच्या एवढेच होते. पण सुरवातीचा काही काळ अतिउष्ण तापमानामुळे हे सर्व पाणी वातावरणात वाफेच्या रुपात होते. नंतर पृथ्वी जसजशी थंड होऊ लागली, तसतशी हवेतील वाफ मुसळधार पावसाच्या रुपात जमिनीवर कोसळू लागली. हा ‘पहिला पावसाळा’ हजारो वर्षे अविरत चालू होता. त्या काळात हवेतील बहुतेक सर्व वाफ पाणी होऊन भूपृष्ठावर पोहोचली. पावसाच्या रुपातील हे पाणी भूकवचातील खोलगट भागात साचण्याची क्रिया हजारो वर्षे होत गेली आणि त्यातून महासागर व समुद्र निर्माण झाले. जमिनीत पोहोचलेले पाणी भूजलाचा रुपातही साठत गेले. तसेच पर्वतावरून नद्या वाहू लागल्या. त्यांच्यातून वाहून येणारा गाळ साचून मैदाने तयार होऊ लागली. दुसरीकडे पर्जन्य व नद्यांच्या पाण्यात जमिनीवरील क्षार विरघळून हजारो वर्षे  सागरात वाहून गेले व सागरजल क्षारयुक्त झाले. अशा प्रकारे जलावरण निर्माण झाले.

अशा प्रकारे पृथ्वीवर सुरवातीच्या 50 कोटी वर्षात वातावरण व त्यानंतर सुमारे 80 कोटी वर्षापर्यंत जलावरण, म्हणजे महासागर व समुद्र तयार झाले. आता तिच्यावरील एका अभूतपूर्व नाट्यप्रवेशाची तयारी पूर्ण होत आली होती. तो प्रवेश होता सजीवांच्या आगमनाचा. भूमी, वातावरण व जलावरण हे नेपथ्य तयार होते. हजारो वर्षे अव्याहत तुफान पाऊस, विजांचे थैमान व सागरलाटांचे अखंड नर्तन चालू होते. उच्च ऊर्जा असणारे अतिनील किरण सरळ भूपृष्ठापर्यंत येत होते. त्या ऊर्जेच्या साहाय्याने समुद्र व हवेतील संयुगांची आंतरक्रिया व्हायची फक्त बाकी होती. या अनुकूल स्थितीतही पहिल्या सजीव जन्माची संभाव्यता युगानुयुगे सागरलाटांवर हिंदकळत होती. कधी संयुगे अगदी जवळ येऊन निसटून जात होती. कधी ती जवळ येत होती, तर नेमका त्या क्षणी अतिनील किरणांचा स्पर्श मिळत नव्हता. असा हा शक्याशक्यतेचा हा खेळ लाखो वर्षे चालला. अचानक कधीतरी एका क्षणी सर्व जुळून आले. आणि समुद्रात पहिली सजीव संयुगे निर्माण झाली. ओसाड निर्जीव धरेवर जीवचैतन्याचा आविष्कार झाला. तेव्हा पृथ्वीचा जन्म होऊन सुमारे १०० कोटी वर्षे होत आली होती. पुढे प्रकाश संश्लेषण करणारे सजीव तयार होऊन पृथ्वीचे वातावरण बदलू लागले. यानंतर त्यांच्यातून एकपेशीय सजीव व पुढे बहुपेशीय सजीव तयार झाले. त्यांच्यातून कोट्यवधी वर्षाच्या लक्षावधी प्रकारच्या सपुष्प अपुष्प इ. वनस्पती तसेच जलचर, उभयचर, डायनोसार वगैरे सरपटणारे प्राणी, पक्षी व सस्तन अशी प्राणिसृष्टी क्रमाने उत्क्रांत होत गेली. या विकास क्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर मानव उत्क्रांत झाला. ही घटना फार अलीकडची म्हणजे फक्त काही लाख वर्षांपूर्वीची. अशा प्रकारे एकेकाळची निर्जीव, रुक्ष, भयंकर व ओसाड पृथ्वी जीवसृष्टीने बहरून गेली.

अमेरिकेच्या फ्रॅंक ड्रेक यांनी १९६१ मध्ये एक प्रसिद्ध समीकरण मांडले. विश्वात जीवसृष्टी किती ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे, हे या समीकरणातून मांडले आहे. प्रत्येक घटक अनुकूल असण्याची शक्यता किमान मानली, तरी आपल्या आकाशगंगेतच जीवसृष्टी असणारे हजारो ग्रह असू शकतील, असे हे समीकरण सांगते. असंख्य विज्ञान कथा व सिनेमातूनही परग्रहावरील सजीव कल्पिले आहेत. पण प्रत्यक्षात मात्र आजच्या क्षणापर्यंत तरी या संपूर्ण विश्वात पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे, ज्यावर सजीव आहेत आणि त्यांच्यामुळे तिला भूमाता होण्याचे भाग्य लाभले आहे.

पण हे मातृत्व लाभण्यासाठी ज्वालामुखीचे थैमान, उल्कापात, विजांचा कडकडाट, खडक वितळविणारी  प्रचंड उष्णता असे कितीतरी भोग तिला भोगावे लागले. तात्पर्य, माता – मग ती कोणतीही असो, पण आधी तिला कितीएक दिव्ये करावी लागतात, वेदना सहन कराव्या लागतात, तेंव्हा कुठे मिळते विश्वातले सर्वोच्च पद – मातृत्व. मात्र तिच्या त्या भोगांची जाणीव कोण आणि किती ठेवेल याबाबतही तिला निरपेक्षच राहावे लागते – मग ती भूमाता असो, की घराघरातली आई असो.

– ©️ एल. के. कुलकर्णी

lkkulkarni.nanded@gmail.com
सोबतचे चित्र : नवजात पृथ्वी – संकल्पचित्र. (इंटरनेट वरून साभार)

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

बाजीराव- मस्तानी आणि पेशवे घराण्याचा इतिहास

भाग ५/७

बाजीरावाचा मृत्यू झाला तेव्हा, मस्तानी पुण्यात कैदेत होती. ही बातमी पुण्यात पोचल्यानंतर काही काळातच मस्तानीचा मृत्यू झाला. पण तिच्या मृत्यूबाबत स्पष्ट नोंदी मिळत नाहीत.

पाबळ हे मस्तानीला निर्वाहखर्चासाठी दिलेल्या तीन गावांपैकी एक गाव. येथे गावाच्या वेशीलगत थोरल्या बाजीरावांचा प्रशस्त वाडा होता. हे आवार “मस्तानीची गढी” या नावाने ओळखले जाई. १९७५ सालापर्यंत ते पुष्कळसे शाबूत होते. पुढे इथे काहीही सुस्थितीत राहिले नाही.

आज देखील जर दोनशें वर्षीच्या अवधीत जुन्या-नव्या विचार-आचारांचा लढा तीव्र स्वरूपात विद्यमान असलेला आपण पाहतों, तर नवीन विचारांची सुरुवातही ज्या काळात नव्हती, त्यांत चिमाजी, राधाबाईसारख्यांच्या मनात प्रागतिक विचार आले नाहींत याबद्दल त्यांस दोष देण्यात हशील नाही. त्यांच्यावर दोष येतो तो इतकाच की, मनुष्यस्वभावाची योग्य पारख त्यांना झाली नाही आणि मस्तानीस टाकून देण्याचा भलताच आग्रह त्यांनी बाजीरावास केला. “व्यवहार म्हणजे तडजोड” हा न्याय कोणत्याही काळांत जाणत्या माणसांनी सांभाळला पाहिजे. बाजीरावानें मस्तानीसह दूर राहवें, घरात राहून इतराच्या मनोभावना दुखावू नयेत अशी व्यवस्था घडवून आणणं शक्य होते.

पण एवढा पराक्रमी बाजीराव, ज्याने पुण्यास वाडा बांधून राजधानी सजविली, त्यालाच “वाड्यातून निघून जा” असे कोण ? कसे सांगणार ! बाकी बाजीराव स्वतः होऊनच बाहेर राहून लोकापवाद टाळीत होते. मस्तानीस घेऊन ते शानिवारवाड्यातच बाजूस राहू लागले. त्याच्याकडे इतरांचा प्रवेश बहुतेक बंद पडला. चिमाजीअप्पा मात्र आगाऊ वर्दी देऊन त्याच्या भेटीस जात असत, असा प्रकार काही काळ चालला.

बाजीराव मस्तानीला सोडून देण्यास कबूल नाही तर तिला आपणच जबरदस्तीने दूर करावी, शक्य तर तिला जगातूनच नाहीशी करावी असा विचार काही मंडळीच्या मनात अल्पकाळ चालला. तिला व बाजीरावालाही या गोष्टी कळल्या. दोघाचेही जीव कासावीस झाले असल्यास नवल नाही. त्यामुळे शाहूमहाराजांचा आदेश “ज्याची वस्तू त्यास द्यावी आणि त्यांचे समाधान करावे” हा किती दूरविचाराचा व योग्य होता हे लक्षात येते ! मस्तानीच्या जिवास अपाय झाला नाही याचे श्रेय शाहू महाराजांस दिले पाहिजे.

दरम्यान बाजीरावाचे व मस्तानीचें दळणवळण अंतस्थपणे चालू राहून एकमेकाचे नोकर जात येत होते. उभय पक्षांचे हेर व पहारे आपापल्या कामावर असून काय खटपटी आत चालल्या आहेत याची माहिती दोघासही होती. एका अर्थानें दोघेही भयभीत झालेली होती. खरें म्हटले तर आश्चर्य वाटते तें हे कीं, क्षणमात्रांत आपल्या तेजानें प्रत्यक्ष बादशहाच्या छातीत धडकी भरविणारा आणि निजामासारख्यास आपल्या पायांशी नमविणारा हा हजारो अश्वसैनिकांचा अद्वितीय सेनानी स्वकीयांपुढे केवळ गोगलगाय बनून निःस्तब्ध राहिला, शे-पन्नास स्वारांनिशी एकदम वाड्यावर हल्ला करून मस्तानीला धाडसानें सोडवून नेण्यास धजला नाही, हा प्रकार आपण पाहतों. पण त्याच्या चरित्राच्या दृष्टीनें हेंही त्याचे शहाणपणच म्हणावे लागलें, बंधु, पुत्र, मातुश्रींना, त्याने दुखविले नाही आणि स्वतःच निमूटपणें यातना सहन केल्या, यामुळें त्याच्या चरित्रास उठाव मिळतो.

बाजीराव यांच्या मृत्यूचे वर्तमान ऐकताच मस्तानीचा प्राण गेला. नुसत्या धक्क्याने असा प्रकार कदाचित होऊ शकतो. पण, बाजीरावांच्या जिवंतपणी जर उघडपणे आपले असे भलतेच हाल होऊ शकले, तर त्याच्या पश्चात आपल्याला कोण त्राता राहिला? असा विचार मनात येऊन तिने जाणूनबुजून  अपघाती प्रयोग करून घेतला असणे संभवनीय आहे. मात्र याबद्दल निश्चित माहिती नाही. काही ठिकाणी असे म्हटले आहे की मस्तानीचा मृत्यू हा शनिवारवाड्यातच झाला. तेथून तिला तिच्या गावी पाबळ येथे आणले  गेले. कित्येकांच्या मते बाजीराव मृत्यूशय्येवर असताना ती पुण्याहून निघून रावेरखेडी येथे जात असताना पाबळ येथे त्यांच्या मृत्यूची बातमी तिला कळली आणि तिथे तिने लगेच प्राण सोडला. पाबळ येथे मस्तानीची कबर गावाजवळच आहे. पाबळ, केंदूर, आणि लोणी ही गावे हिला इनाम दिली होती. बुंदेलखंडात बाजीरावांना मिळालेली जहागीर सन १७८८ पासून “बांदा संस्थान” या नावाने मस्तानीच्या वंशजांकडे  होती . मस्तानीच्या सर्व वंशजांना “पेशव्यांचे वंशज” असल्याचा फार अभिमान आजही वाटतो.

मस्तानीने बाजीरावाला आपले अवघे जीवन समर्पित केले होते.
“कौन दुनियामे आया है किसके लिये!
अर्श-ए-आजमपे होते है ये फैसले,
जब खुदाकी इनायत इधर हो गई,
तू मेरा,  मै तेरी  हमसफर बन गई,
तू मेरा ताज है, तेरी इज्जत हूँ मै…”
(शायरा – शबिना अदिब)

अशीच भावना मस्तानीची असावी.

मस्तानीच्या मृत्यूनंतर पेशव्यांच्या मुख्य खासा देवघरात “मस्तानीचा टाक” ठेवण्याबद्दलची चिमाजीअप्पांनी सूचना केली होती. त्या टाकाबद्दल इतिहास संशोधक (कै.) कृ.वा. पुरंदरे यांचे संशोधन आहे. या संशोधनामुळे मस्तानीचा बाजीराव कोणत्या ना कोणत्या पद्धतीने विवाह झाला असावा असे म्हणता येईल. अन्यथा देवघरातील देवांमध्ये “टाक” ठेवण्याची पात्रता मान्य झाली नसती. तथापि या विवाहबद्दल स्पष्ट माहिती मिळत नाही.(पूर्वीच्या काळी स्त्री सती गेल्यानंतर तिचा “टाक” करून तो घरातील देवात ठेवत. पेशवेकुलात अशाप्रकारचे  सौ. अन्नपूर्णाबाई व सौ. रमाबाईंचे टाक देवांत ठेवले होते. टाक– धातूच्या पत्र्यावरील देवतेचा ठसा.)
थोरले बाजीराव आणि मस्तानी यांच्या संदर्भात प्रियकर हिंदू आणि प्रेयसी मुसलमान किंवा अर्धमुसलमान (तेही कोणीही धर्मांतर न करता) असलेले संपूर्ण भारताच्या इतिहासात हेच एकमेव उदाहरण असावे हे मात्र मान्य करायलाच हवे.

आता पहिले बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांचे वंशजाविषयी माहिती घेऊ
“पेशवे घराण्याचा इतिहास” या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीत, आपल्या निवेदनात, लेखक प्रमोद ओक म्हणतात…. “अधिकारलालसा, सत्तास्पर्धा, वारसाहक्काची अतिरिक्त जाणीव, हयामुळे आपसात भाऊबंदकी सुरू होऊन बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी पाया रचलेले पेशवा घराणे आतून बाहेरून पोखरले गेले. या पार्श्वभूमीवर मस्तानीच्या वंशजांची निष्ठा पाहण्यासारखी आहे. थोरल्या माधवरांच्या पश्चात काही वर्ष राज्यात माजलेली निर्नायकी बेबंदशाही असो, पानिपत संग्राम असो, किंवा १८५७ चा उठाव असो, कटू प्रसंग असो अथवा कसोटीचा प्रसंग असो, मस्तानीच्या वंशजांचा स्वराज्याप्रती अतूट सेवाभाव आणि निष्ठा अविचल, अभंग राहिली. मस्तानीच्या वंशजाने कोणत्याही कटू प्रसंगी, विद्रोहाचा, उठावाचा विचारही मनात आणला नाही, या सत्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही”.

थोरले समशेरबहाद्दर (कृष्णसिंह)
पहिले बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांचा एकमेव पुत्र  २८ जानेवारी १७३४ रोजी जन्मला. ऐतिहासिक कागदपत्रात त्याचे नाव समशेरबहाद्दर उर्फ कृष्णसिंह असा उल्लेख आढळतो.. हा आपल्या माता-पित्याप्रमाणे देखणा होता. वयाच्या सहाव्या वर्षीच मातृ-पितृ विहीन झाल्यावर नानासाहेबांनी, म्हणजे पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या मोठ्या मुलाने, त्यांना प्रेमाने, आपुलकीने, आणि योग्य इतमामाने  सांभाळले. समशेरबहाद्दरच्या पालनपोषणात त्यांनी कोणतीही कसूर ठेवली नाही. परिवारातल्या इतर मुलांप्रमाणे ते देखील शनिवारवाड्यात लहानाचे मोठे झाले. आणि त्यांना सगळे शिक्षण देण्यात आले. ते मराठी भाषा, देवनागरी आणि मोडी लिपीत सुंदर लिहीत असत.

समशेरबहाद्दर यांच्यावर पहिल्या चिमाजीआप्पांचा मुलगा सदाशिवराव म्हणजे भाऊसाहेब यांचा खूप प्रभाव होता. सदाशिवरावभाऊंच्या हाताखाली राहून हे कारभारी आणि दरबारी कामकाजात हुशार बनले. तसेच लष्करी कामातही ते तरबेज होते. वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी त्यांनी रघुनाथरावांबरोबर म्हणजे आपल्या सावत्र भावाबरोबर उत्तर भारताच्या मोहिमेत सहभाग घेतला होता. नानासाहेबांनी समशेरबहाद्दरना लहानपणीच सरदारी दिली होती. समाजरितीनुसार बाजीराव- मस्तानीचा मुलगा हिंदू असायला हवा होता. पण काही अगम्य कारणास्तव त्याला मुसलमान मानले गेले. या अर्थाने मुस्लिम असूनही समशेरबहाद्दर पत्रावर “पांडुरंग” असे लिहीत. पेशव्यांबद्दल यांना अतिशय निष्ठा आणि आदर होता. पेशव्यांच्या अनेक मोहिमात जातीने हजर राहून  यांनी मराठी साम्राज्याची बहुमोल सेवा केली. तडफ आणि शौर्य याबद्दल यांचा लौकिक होता.

सन १७५८ च्या मध्याच्या सुमाराला समशेरबहाद्दरने  एक मोठी कामगिरी बजावली. या काळात “बुंदेलखंडात छत्रसालांचे नातू हिंदूपत” हे राज्य करत होते. त्यांना नानासाहेबांनी “राजा” म्हणून मान्यता दिली होती. त्याबद्दलच्या अंतिम कराराच्या अटी ठरवण्याची बोलणी करण्यासाठी समशेरबहाद्दरना  बुंदेलखंडात पाठवले. हिंदूपद हे छत्रसालांचे नातू तसेच,  समशेरबहाद्दर हे  बाजीराव – मस्तानी यांचे पुत्र म्हणजेच छत्रसालांचे नातूच.. यामुळेच उभयतामध्ये बंधुभावाने आणि मोकळेपणाने बोलणे होऊन राजा हिंदूपत आणि पेशवे यांच्यात करार झाला आणि या करारांवर पेशव्यांतर्फे प्रतिनिधी आणि साक्षीदार म्हणून समशेरबहाद्दर आणि गोविंदपंत बुंदेले यांनी सही केली.

याच प्रकारचे काम त्यांना पुन्हा एकदा करावे लागले ते अशासाठी की, “बुंदेलखंडात जयपूरला छत्रसालांचे दुसरे एक नातू “जगतपुत्र पहाडसिंग” आणि “पहाडसिंगचे दोन पुतणे” यांच्यात, गादीसाठी वाद निर्माण झाला. या परिस्थितीचा आढावा घेऊन न्याय निर्णय करण्यासाठी नानासाहेबांच्या आदेशावरून समशेरबहाद्दरना बुंदेलखंडात जावे लागले. त्यांनी सगळी परिस्थिती पाहून “पहाडसिंगाचे” बाजूने कौल दिला. धोरणीपणा, मुच्छद्दीगिरी, सेनानायकत्व, दक्ष कारभार, असे समशेरबहाद्दरचे गुण यासारख्या अनेक प्रसंगातून दिसून येतात. १७५९ साली समशेरबहाद्दरना “साहेब नौबतीचा” मान मिळाला.
एक शाहीर पोवाड्यात समशेरबहाद्दरचे शौर्य वर्णन करताना म्हणतो..
“समशेरबहाद्दर रणशूर रणगाढा,
रणी वाजे चौघडा,
हटकुन गिलचे हाणितो धडाधडा,
ढाल तलवार जमदाढा,
ज्याने रणी अडवला तीस लाख घोडा,
सन्मुख दावी मुखडा,
रावबाजीचा पुत्र जसा हिरा,
येती जखमांच्या लहरा”

१७६१ च्या पानिपतच्या युद्धात त्यांनी पराक्रम दाखवला. या युद्धात समशेरबहाद्दर जबर जखमी झाले आणि त्या अवस्थेत ते भरतपूरला गेले. घायाळ झालेल्या समशेरबहाद्दरना जवळच कुंभेरीला आणण्यात आले. औषधोपचाराचे खूप प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही. सरदार सूरजमलने त्याची चांगली निगा राखली. “भाऊ, भाऊ” असा शोक करून ते लवकरच मरण पावले. यांचा पहिला विवाह १७४९ ला “लालकुंवरबाई” त्यांच्याशी झाला. चार वर्षातच या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर त्याच वर्षी म्हणजे १७५३ लाच यांचा विवाह “मेहेरबाई” यांच्याशी झाला. या पतीबरोबर पानिपतच्या मोहिमेवर गेल्या होत्या. परंतु युद्धाचा बेरंग दिसू लागल्यावर समशेरबहाद्दरने यांना झाशीला पाठवून दिले आणि तिथून त्या पुण्याला परत गेल्या. पानिपतच्या पराभवानंतर नानासाहेबांनीच मेहरबाईला तिच्या मुलासह म्हणजे, “थोरल्या अलिबहद्दरसह” तिच्या वडिलांकडे पाठवले. या स्वतः मराठी जीवनाशी, संस्कृतीशी, एकरूप झालेल्या होत्या. एकादशी, चतुर्थी, यासारखे उपावास, त्यांच्या मनात रुजले होते.

(क्रमश:)
©अ‍ॅड. क्रांती आठवले-पाटणकर
डोंबिवली.
9969087559
०२.०५.२०२५
(सदर लेखमाला माझ्या नावासह अग्रेषित करायला हरकत नाही.)

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

संस्कृत श्लोक व सुभाषिते

क्रमांक ४

श्री गणेशाय नम:                      

कालच गणेशचतुर्थी होती. गणपतीची पूजा सर्व महाराष्ट्रात घरोघरी तसेंच सार्वजनिक गणेशोत्सवात होते. काही आरत्या, काही श्लोक म्हटले जातात. काही सार्वजनिक गणेशोत्सवांत जास्तींत जास्त मोठा आवाज करून श्री गणेशाच्या सुपासारख्या कानांची परीक्षा घेत असतात तर घरोघरी भक्तीभावाने गणेशाची पूजा होत असते. कोणत्याही देवाची पूजा असली, कोणतेही होम हवन असले तर प्रथम गणेशाचे वंदन, पूजन केल्याशिवाय ती पूजा होत नाही. गणपतीची पूजा प्रथम का करायची ह्या बद्दल पुराणात तीन कथा आहेत परंतु त्यांतील पहिली सर्वांना ठाऊक असलेली कथाच सर्वमान्य आहे व इतर कथा त्याच कथेवर आधारित आहेत. पार्वतीमातेने निर्माण केलेला बाल गणपती रक्षक म्हणून तिथे प्रवेश करू पाहणाऱ्या शिवालाच अडवतो. तेव्हां क्रोधित  होऊन शंकर बालकाबरोबर युध्द करतो आणि त्या बाल गणपतीचा शिरच्छेद करतो. पार्वती जेव्हा हे पहाते, तेव्हा ती दु:ख आणि क्रोध ह्यामुळे विश्वप्रलय करायला सिध्द होते. तेव्हा शिव आणि विष्णु तिची विनवणी करतात आणि त्या बालकाला जिवीत करण्याचे आश्वासन देतात. ते उत्तर दिशेला जातात, तिथे त्यांना सर्वप्रथम एक हत्ती नजरेस पडतो. ते त्याचेच शिर कापून आणतात आणि त्या बालकाच्या धडावर लावून त्याला जिवंत करतात. बरोबरच त्याला वर देतात की त्याला सर्वत्र अग्रपूजेचा मान मिळेल आणि तो चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती मानला जाईल.

गणपतीबद्दलची दुसरी कथाही थोड्या फार फरकाने सर्वत्र प्रचलित आहे. अग्रपूजेचा मान कोणाला असावा ह्याबद्दल जेव्हा वाद निर्माण झाला, तेव्हां भगवान शंकरांनी सांगितले की जो पृथ्वी प्रदक्षिणा करून सर्वांत आधी परत येईल, त्याला अग्रपूजेचा मान मिळेल. सर्व देव आपापल्या वहानांवर बसून पृथ्वी प्रदक्षिणेला निघाले. गणपती मात्र तिथेच थांबला. त्याने विचार केला पृथ्वी हे केवळ शिवाचं प्रतिबिंब आहे व शिवापासून ती वेगळी नाही. त्याच्यातच सामावलेली आहे. त्याने शिवाभोवती एक प्रदक्षिणा केली व तो स्वस्थ बसला. सर्व देव परतल्यावर शिवाने जाहिर केले की अग्रपूजेचा मान सर्वज्ञ आणि बुध्दीमान गणेशाला दिला जात आहे. देव म्हणाले, “तो तर इथून हललाही  नाही.” गणपतीने सांगितले की आपण भगवान शिवाभोवती प्रदक्षिणा घातली कारण पृथ्वी त्यांच्यातच सामावलेली आहे. भगवान विष्णु आणि भगवान शिवांनी त्याचा हा युक्तिवाद मान्य केला व गणपतीस अग्रपूजेचा मान देण्यांत यावा, असे जाहिर केले. ह्या कथा तार्किक कसोटीवर घासत न बसतां, त्यांचा भावार्थ लक्षांत घेऊन समजून घेतल्या पाहिजेत.

आता आपण श्री विंझे ह्यांच्या कोशांतील गणेशाबद्दलचे दोन परिचित श्लोक समजून घेऊया. पहिला श्लोक असा आहे….

 मूळ संस्कृत श्लोक 
          ओम गणानां त्वां गणपतिं हवामहे
          कवीं कवीनामुपमश्रवस्तमम् ।
          ज्येष्ठराजं ब्रम्हणा ब्रम्हणस्पत
          आन: शृण्वन्नूतिर्भि: सीदसादनम् ॥

          विंझे ह्यांनी केलेला काव्यमय मराठी अनुवाद

          हे नायका गणांच्या ! श्रेष्ठ कवे सर्व दूर तव किर्ति
          वृध्दश्रेष्ठ गणपते मंत्रांची रक्षिका तुझी शक्ति ।
          आम्ही निमंत्रितो तुज, स्वीकृत आमंत्रणास त्या करूनी
          ये आमुच्या गृही, वस, रक्षकसंभार सर्व घेवोनी ॥

 सुलभ अर्थ
         गणांचा नायक, श्रेष्ठ कवि (ज्ञाता), सर्वत्र किर्ती  पसरलेला, सर्व मंत्रांचा रक्षक, अशा हे गणपते, आम्ही तुला बोलावित आहो. हे आमचे आमंत्रण ऐकून आमचे संरक्षण करण्याच्या सर्व साधनांसह, तू आमच्या निवास स्थानी येऊन रहा.

हा वैदिक वाङ्मयातून घेतलेला श्लोक आहे. ह्यात गणपतीला आवाहन केलेले आहे. आधी त्याची स्तुती केली आहे. तो गणांचा नायक. गण हे पूर्वीचे लढाऊ पथक. अशा लढाऊ पथकांचा नायक, कविंमध्येही श्रेष्ठ कवि, ब्रम्हज्ञात्यामध्ये ज्येष्ठ ब्रम्हज्ञाता, तुझ्याकडे रक्षक मंत्र आहेत, तुझी किर्ती दूरवर पसरलेली आहे, अशा गणेशा तुला आम्ही आवाहन करतो. हे आवाहन पहिल्याच चरणात केले आहे. हवामहे म्हणजे आवाहन करत आहोत. नंतर त्याचे इतर गुण आणि सामर्थ्य सांगितले आहे. गणेशाला वंदन करून सुरू केलेले कार्य पूर्ण होतं, सिध्दीस जाते, तो विघ्नहर्ता असल्याने त्यात विघ्ने येत नाहीत, हा विश्वास त्यामागे आहे. तिसऱ्या व चौथ्या चरणात निमंत्रण करतोय, त्याचा स्वीकार कर आणि सर्वशक्तिंनीशी आमच्या घरी येऊन रहा, अशी विनंती केली आहे. तुझा वास घरात असला म्हणजे आमची कर्तव्ये आम्ही पार पाडू शकू, ही भावना आहे. गणेश पूजनांत बरेच वेळा प्रथमच हा श्लोक म्हटला जातो. त्यामुळे अर्थ माहित नसला तरी हा श्लोक सर्वांना परिचयाचा वाटेल.

विंझे यांनी वरील श्लोकाच्या अनुवादासाठी आर्या वृत्त वापरले आहे. आर्या वृत्त वापरण्यासाठी कवि मोरोपंत फार प्रसिध्द आहेत. त्यांची केकावली ही संपूर्ण रचना १००० कडवी आर्या वृत्तात आहेत. ते समयसूचक आणि शीघ्र कवि होते. त्यांचे एकदा सरदार घोरपडे यांच्या वाड्यावर पुराण सांगायला गेले होते. श्रोते रंगले होते. सरदार घोरपडे ह्यांच्या मनांत विचार आला, “ह्या एवढ्या पंडिताला बिदागी तरी किती द्यायला हवी.” ते आपल्या दिवाणास त्यासंबंधी कुजबुजू लागले. मोरोपंतांच्या लक्षांत येतांच ते म्हणाले,
                     भोजासम कविताप्रिय, कर्णासम दानशूर घोरपडे ।
                     ऐसे असता माझ्या बिदागिचा का तुम्हास घोर पडे ॥
ही आर्या ऐकताच सरदार घोरपडे यांनी दाद देऊन आपल्या गळ्यातली भारी किंमतीची माळ काढली आणि मोरोपंतांच्या गळ्यात घातली.

आता गणपतीशी संबंधित आणखी एक श्लोक पाहूया. हा श्लोकही विंझे ह्यांनी  वैदिक वाङ्मयांतून घेतलेला आहे.

मूळ संस्कृत श्लोक

        भद्रं कर्णेभि: शृणुसाम देवा:
        भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ।
        स्थिरैरंगैस्तुष्टवॅांसस्तनूभि:
        व्यशेमहि देवहितं यदायु: ॥

विंझे यांचा काव्यमय मराठी अनुवाद

हे यज्ञप्रिय देव, नित्य अमुच्या कानी पडो मंगल
नेत्रांनाही दिसे सदैव अवघे जे जे असे निर्मल
हे आम्ही स्तवितो स्थिरेंद्रिय अशी एकाग्रता साधूनी
जावो अमुचे जीवित प्रभू! तुझ्या संपूर्ण आराधनी ॥
सुलभ अर्थ :- हे यज्ञप्रिय देवा, आमच्या कानी नेहमी मंगलच पडो. आमच्या नेत्रांना नेहमी मंगलच दिसो. आम्ही सर्व अवयवांची एकाग्रता साधून, तुझे स्तवन करून एवढेच मागतो की आमचे जीवन तुझ्या सेवेंतच व्यतीत होवो.

वैदिक काळी यज्ञ हे देवाला आवाहन करण्याचे प्रमुख साधन होते. यज्ञ केल्याने पंचमहाभूते, देवता, संतुष्ट होतात व संकल्प करावा ते देतात, असा समज होता. आजही पूजेचा तो एक उद्देश असतो. मात्र तो एकमेव उद्देश असतो, असे आता म्हणतां येणार नाही. म्हणून देवाला यज्ञप्रिय देवा, असे संबोधले आहे. देवाकडे मागणी केली आहे ती देखील काय तर आमचे जीवन तुझ्या सेवेत व्यतीत होवो.
आम्ही चित्त, बुध्दी, शरीर सर्वाची एकाग्रता साधून तुझ्याकडे हे मागतो आहे. त्या आधी म्हटले आहे की आम्हाला सदैव मंगल दिसो व मंगलच ऐकायला येवो. प्रसन्न वातावरणांत एकाग्रता साधणं शक्य होईल, ही भावना त्यामागे आहे.

आपल्या संताच्या वाणींतही हा विचार प्रकर्षाने दिसतो. संतशिरोमणी तुकाराम म्हणतात, “माझे चित्त तुझे पायी।राही ऐसे करी कांही। धरोनियां बाहीं। भव हा तारी दातारा॥” नामदेव म्हणतात, “तैसा मजलागी होऊनी कृपाळ। करी गा सांभाळ अनाथाचा॥” संत आपले चित्त, संसार, व्यवहार सर्वच विठ्ठलावर सोंपवून मोकळे होतात. ते विठोबाला आर्त आवाहन करतात, “आम्हाला तुझ्या चरणाशिवाय कांही नको” जिवंत असेतोवर पोट भरणे माणसाला भाग असते पण तो जगण्याचा एकमेव हेतू नाही. म्हणून अशा प्रार्थना मानवी मनांत येतात. परमेश्वर मानणारा परमेश्वराकडे मागतो आणि  परमेश्वर न मानणाराही मनांत आशावादी राहूनच प्रयत्न करतो. आज गणेश चतुर्थी घरोघरी गणेशाकडे लोक कार्यसिध्दी आणि विघ्नहरण मागणार आहेत. आपण सामूहिक प्रार्थना करूया, “देवा गजानना, तुझी भक्ती करणाऱ्या ह्या महाराष्ट्र राज्यांत सुख, शांती, समृध्दी नांदो.”

– ©️ अरविंद खानोलकर

arvindkhanolkar@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आपणच लिहिलेली शोकांतिका

साद प्रतिसाद : ४४

या शतकाचे पाव शतक संपत आले. स्वातंत्र्य मिळून तर पंचाहत्तर वर्षे झालीत. आपला सशक्त लोकशाही असलेला देश. आतापर्यंत विविध राज्यात, केंद्रात आलेल्या वेगवेगळ्या सरकारचे क्लेम खरे मानले तर आपल्या देशाने सर्वच क्षेत्रात फक्त विकासच केला!. या लोकशाही देशात आपण निवडून दिलेले लोक प्रतिनिधी हे फक्त लोकसेवाच करतात. ते एकनिष्ठ आहेत आपल्या पक्षाशी, पक्षाच्या विचार धारेशी. त्यांच्या या विचारधारा सारख्या बदलतात. प्रत्येकाला काहीतरी नवे हवे असते सारखे. जुन्याचा पटकन कंटाळा येतो. लोकसेवक असल्याने प्रत्येकाला स्वतःचाही विकास तितकाच महत्त्वाचा वाटतो. किंबहुना स्वतःचाच विकास जास्त महत्वाचा असतो राजकारणात. मग त्यासाठी काहीही करायची तयारी. कोणत्याही स्तराला जायची तयारी. निवडणुका आल्या की होणारे तमाशे, उडणारी धुळवड, चिखलफेक आपण बघतोच. हे आक्का, भाई, दादा, बाहुबली काहीही करू शकतात. मारामाऱ्या, खून, खोक्याची देवघेव.. अगदी काहीही..कसलेही खास उत्पन्न, कामधाम नसताना हे लोकसेवक लखपती, करोडपती कसे होतात याचा कुणीच शोध घेत नाही; आपल्या सुधारलेल्या लोकशाही, विकसनशील देशात! हे नवलच आहे!!

आपण शिक्षण क्षेत्रात सुधारणेचे दावे करतो. गेली पाच वर्षे सारखे एन इ पी म्हणजे नव्या शैक्षणिक धोरणाचे ढोल पिटले जाताहेत. अगदी जागतिक विद्यापीठाशी स्पर्धा सुरू असल्यासारखी वातावरण निर्मिती केली जातेय. पण अजूनही अनेक शाळेत शिक्षक नाहीत. स्वच्छता गृहाची नीट सोय नाही. प्रयोगशाळा, संगणक, इंटरनेटसारख्या सुविधा नाहीत. महाविद्यालयात तर विद्यार्थीच येत नाहीत वर्गात. तरी निकाल छान छान लागतात. संशोधक विद्यार्थी कॉपी पेस्ट करून प्रबंध लिहितात. त्यावर मान्यतेसाठी सही करायला प्राध्यापक लाखो रुपये घेत असल्याच्या बातम्या येतात. खाजगी कॉलेजेसची तपासणी, प्राध्यापकाच्या नेमणुका, त्यासाठी होणारी लाखोची देवघेव हे सगळे आता उघडे गुपित झाले आहे. काही अपवाद वगळता कुलगुरू नेमणुकीत होणारा राजकीय हस्तक्षेप, मग अशा कुलगुरूपैकी काहींनी केलेला पैशाचा अपहार, त्याचे मीडियातील व्हिडिओ क्लिप याचीही आपल्याला सवय झालीय. अशा भ्रष्टाचारात अडकलेल्या कुणाची चौकशी झाली, त्यांना शिक्षा झाली, त्याची पेन्शन थांबवली असे ऐकिवात नाही. ही भ्रष्टाचारी माणसे समाजात उजळ माथ्याने वावरताना दिसतात..लोकांना द्यान पाजळायला मोकळे फिरतात! आपल्याकडे आय आय टी सारख्या उच्च शिक्षण संस्थात सरकारच्या, जनतेच्या पैशाने शिक्षण घेऊन आपलेच होतकरू तरुण, हुशार विद्यार्थी जगाचे कल्याण करायला परदेशात जातात. अन् आपल्या आई वडिलांना इकडे एकटे सोडून तिकडचे च होऊन बसतात. यालाच देशसेवा म्हणतात. कारण ते म्हणे इकडे डॉलर्स पाठवतात. ज्यामुळे देशाचा विदेश निधी वाढतो. देश थोडा बहुत आर्थिक दृष्ट्या संपन्न होतो. आपण कोणत्याही गोष्टीकडे कोणती दृष्टिकोनातून बघतो त्यावर फायदे तोटे, चांगले वाईट, योग्य अयोग्य ठरत असते.

आपले शालेय शिक्षण तर इतके छान छान झालेय की विचारूच नका. कॉन्व्हेन्ट, इंटरनॅशनल, ग्लोबल अशी नावे असलेल्या, विस्तीर्ण वातानुकूलित कॅम्पस असलेल्या शाळांतील पहिली दुसरीची फी लाखो रुपये असते. म्हणजे इंजिनिअरिंग शिक्षणापेक्षाही महाग! पण इथेही लांब लाइन असते ऍडमिशनसाठी. कुणीही काहीही प्रश्न न विचारता इथे मुलाना प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असतात. मुळातच व्यस्त पालकांना आजकाल फालतू चौकशा करायला वेळ नसतो. प्रत्येकापुढे कसल्या ना कसल्या डेड लाइन्स असतात. मोठमोठे टार्गेट्स असतात. त्यासाठी ते अग्निशमन दलासारखे फायर फायटिंग करीत असतात.

आता या देशात पूर्वीची कुटुंबव्यवस्था, नातीगोती, त्यातला लळा जिव्हाळा हे सगळे शोधून बघावे लागते. कामापुरता मामा अशी परिस्थिती आहे. लग्न संस्थेला तडे जात आहेत. छोट्या मोठ्या कारणाने होणाऱ्या घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. मुले मुली लिव्ह इन रिलेशन शीपमध्ये राहायला लागली आहेत. तेही पालकांच्या संमतीने! आहेत स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही अशी एकूण परिस्थिती आहे. तरीही आम्हाला आमच्या संस्कृतीचा, सांस्कृतिक वारसा जपण्याचा, मूल्ये जोपासण्याचा सार्थ अभिमान आहे. याला गणितात paradox म्हणजे विरोधाभास म्हणतात.

पर्यावरण, निसर्गाची जपणूक, प्रदूषण यासारख्या विषयाचे गांभीर्य तर आमच्या ध्यानी मनी देखील नाही. हे सगळे परीक्षेत पर्यावरण विषय शिकणे, आवश्यक तितके पास होण्यापुरते मार्क मिळवणे इथपर्यंतच मर्यादित आहे. माणसाने निसर्गाचे वस्त्रहरण केल्यामुळे वाढलेले तापमान, प्रदूषण, बदललेले ऋतुमान, त्यामुळे वाढलेली रोगराई याची आम्हाला अजूनही गंध वार्ता ही नाही. त्यावर गांभीर्याने विचार करावा, हे सगळे थांबविण्यासाठी गांभीर्याने पावले उचलावीत, याकडे प्राथमिक गरज म्हणून बघावे असे आम्हाला, आम्ही निवडून दिलेल्या सरकारला कोणालाच वाटत नाही. आम्ही आपापल्या घरात, आपल्या कुटुंबात, आपल्या कामात फार बिझी आहोत. ही काही नैसर्गिक, काही मानवनिर्मित भयानक संकटे आपल्या दाराशी येऊन ठाकली आहेत याचे आम्हा कुणालाच भान नाही.

जो माणूस कोणे एके काळी एकमेकाच्या हातात हात घालून सहकार्याने, विवेक बुद्धीने इथपर्यंत कसा बसा पोहोचला तोच माणूस आज एक दुसऱ्याच्या उरावर बसतो आहे. तिसऱ्या महायुद्धाचा शंखनाद वाजवतो आहे, ही खरी आपली शोकांतिका आहे.आपणच लिहिलेली!

–  ©️ प्रा. विजय पांढरीपांडे

७६५९०८४५५५

vijaympande@yahoo.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

महाजनो येन गतः स पन्थाः  

जगाच्या पाठीवर अमेरिका नावाचे प्रकरण : लेखांक ५

कला, साहित्य, संस्कृती यांच्या अविष्कारात रममाण झालेल्या कलाकारांचे समाजातील स्थान कवि केशवसूत यांनी मोजक्या शब्दात वर्णिले आहे.
आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके ।
देवाचे, दिधले असे जग तये आम्हांस खेळावया ॥

आम्हाला दुर्लक्ष्य कराल तर –
आम्हाला वगळा – गतप्रभ झणी होतील तारांगणे ।
आम्हाला वगळा – विकेल कवडीमोलावरी हे जिणे ! ॥
 असेही केशवसूत बजावतात.

ही कलाकार मंडळी म्हणजे सामान्य लोक नव्हेत तर त्यांना “अभिजन” म्हणून गणले जाण्यात बहुमान वाटतो.

अभिजन (किंवा शिष्टजन) म्हणजे समाजातील असे विशिष्ट लोक जे जन्मजात किंवा स्वकष्टाने मिळवलेल्या गुणवत्तेमुळे, ज्ञानामुळे, प्रतिष्ठेमुळे किंवा इतर कारणांमुळे एक विशेष दर्जा आणि महत्त्व प्राप्त करतात.
या अभिजनातले जे श्रीमंत होतात आणि समाजावर प्रभाव टाकू पाहतात तेव्हा त्यांची गणना “महाजनात” होते.

धर्मस्य तत्वं निहितं गुहायाम्। महाजनो येन गतः स पन्थाः।

धर्माची म्हणजे एकंदर महाज्ञानाची कवाडे एखाद्या गुहेत दडलेली आढळतात तेव्हा महाजन चालतील ती वाट वहिवाट (पंथ) म्हणून स्वीकारावी असा या संस्कृत वचनाचा अर्थ होतो.
तर आम्ही कुणीतरी विशेष आहोत हे समजणारे अभिजन तथा महाजन जेव्हा अडचणीत येतात तेव्हा लोकानुनयाच्या युक्त्या वापरत ही मंडळी त्यांच्या एकंदर राहणीमानाचे प्रदर्शन समाजासमोर मांडतात. समाजमन रोजचे दैनंदिन व्याप विसरत या अभिजन, महाजन मंडळींच्या उत्सवात स्वत:चे मनोरंजन करून घेते. हजारो कोटी खर्च करून केलेले विवाहसोहळे, राणीची अंत्ययात्रा, राजकुमाराचा घटस्फोट, राजाच्या भेटीआधी विशिष्ट राजशिष्टाचाराचे पाहुण्यांना घडणारे सक्तीचे प्रशिक्षण इत्यादी गोष्टींतील तपशील वृत्तपत्राचे रकाने भरतात, तसेच वृत्तवाहिन्यांद्वारे प्रेक्षकांच्या काना-डोळ्यावर आदळतात तेव्हा त्या मनोरंजना देखील बाजार मांडला जातो व त्यातून मोठी आर्थिक कमाई देखील साधली जाते. उत्सवी नग्न राजा आणि मनोरंजनात मग्न प्रजा, अशी सारी व्यवस्था अव्यवस्थेला झाकण्यात यंत्रणा दंग होतात.

या अभिजन – महाजन वर्गाची एक राखीव अशी अंतस्थ: व्यवस्था असते, अशीच एक व्यवस्था जगभर “फ्री मेसन” म्हणून ओळखली जाते. या व्यवस्थेतील महाजन म्हणजे “मेसनरी” आणि ते गुप्तपणे भेटतात तेव्हा त्या जागेस “लॉज” असे संबोधले जाते. मेसनरी मंडळी एकमेकांना “फेलो ब्रदर” असे संबोधतात.        

“फ्री मेसन” सारख्या अनाधिकृत परंतु गूढगम्य संस्थांना “ईल्यूमनाटी” असे संबोधले जाते. या संस्था आपल्या अस्तित्वाची पुरेपूर काळजी घेऊन देखील आपले अस्तित्व गूढ राखण्यात प्राधान्य देतात. अशी मंडळी जेव्हा त्यांच्या ठरलेल्या “लॉज” मध्ये भेटतात त्या बैठकीची गुप्तता अतोनात राखली जाते. बैठकीबद्दल कोणताही लेखी पुरावा देखील ठेवला जात नाही. जणू “असे काही घडलेच नाही”, “अशी काही संस्थाच नसते”, “असे काही लोकच नाहीत” असा देखावा देखील केला जात नाही. “तेरी भी चूप – मेरी भी चूप” असा सगळा मामला असतो.
ही मंडळी स्वत:ला “देवाने खास म्हणून घडवलेले” असे समजतात. त्यांची प्रत्येक भूमिका, कर्तव्य हे केवळ आदर्श असेच असते असाच त्यांचा दावा असतो. समाजात जे काही चांगले घडते ते त्यांच्या सामाजिक कार्यामुळेच अशी त्यांची ठाम समजूत असते. त्यासाठी ते मोठ्या प्रमाणात देणग्या देत अशी सामाजिक कामे घडवून आणतात.

भारतात प्रत्येक शहरात मेसनरी असतात, ते आपली ओळख “मेसनरी” म्हणून उघड करत नाहीत किंवा कोणत्याही प्रकारच्या ओळखपत्रात त्याचा उल्लेख करत नाहीत.
ही “फ्री मेसन” टोळी (सोसायटी) सर्वप्रथम जर्मनीत काही शतकांपूर्वी प्रत्यक्षात अस्तित्वात आल्याचे सांगितले जाते. प्रत्येक देशात त्यांच्या खाणाखुणा आढळतात. त्यांची एकंदर ३२ प्रकारची चिन्हे असतात. अगदी डॉलरच्या काही नोटांवर देखील यातली काही चिन्हं आढळतात.
अगदी नवी दिल्लीतल्या “ल्यूटेन्स” या रायसिना टेकडीच्या परिसरात अनेक पुराण्या इमारती आणि त्यांचे वरवरचे आकार या फ्री मेसन सोसायटी वापरत असलेली चिन्हं दर्शवितात. कनॉट प्लेस परिसरात देखील फ्री मेसन सोसायटीच्या चिन्हांचे प्राबल्य आढळते.

भारतातील मेसनरी होऊन गेलेल्या काही महत्त्वाच्या व्यक्तिंमध्ये पंडित जवहारलाल नेहरू, डॉ० राजेंद्रप्रसाद यांची नावे होती असे सांगितले जाते. यावरून या फ्री मेसन टोळ्यांचे प्राबल्य जाणवू शकते.
मेसनरी म्हणून गणना होताना एक प्रकारचा शपथविधी त्या मेसनरीच्या विशिष्ट “लॉज” (उदा० लॉज क्रमांक १३८ ई०) मध्ये घडवून आणला जातो, त्याचेही आणि असे इतर अनेक कर्मकांडं मेसनरी पाळतात.

एकंदरीत काय तर आम्ही सामान्य नाहीत तर इतरांपेक्षा वेगळे आहोत, कुणीतरी खास आहोत याची जाणिव मनात घट्ट रोवून टाकायची आणि या जाणिवेशी अत्यंत प्रामाणिक रहायचे. मेसनरी व्यक्तिचा मेसनरी असण्याचा हुद्दा जर त्याच्या कोणत्याही 

अपत्याने पुढे रुजू ठेवला नाहीत तर ती व्यक्ति आपल्या वारसांना मेसनरी टोळीबद्दल काहीच सांगत नाही. एक प्रकारची गूढगम्य अशी गुप्तता पाळणे हा त्या शपथविधीतला एक नियम असतो.
अगदी फ्री मेसनच नव्हे तर अशा सदृश्य अनेक यंत्रणा गुप्ततेत आपले काम करतात. “सुमडी में दमडी और दमडी सें कोंबडी” ही म्हण साजरी करणारी अशी या टोळीची एकंदर धाटणी असते.

“ल्यूटेन्स दिल्ली” म्हणून एक केवळ विशिष्ट परिसर आपल्या डोळ्यासमोर तर येतोच परंतु त्याचबरोबर सत्तेच्या भोवती लाळघोटेपणा करत आपले महत्त्व अबाधित ठेवत सत्तेची फळे चाखण्याचे यशस्वी प्रयत्न या अशा टोळ्या करतात. मध्य दिल्लीतील प्रशस्त बंगले, त्याच्या भोवतालची काही एकरातली बाग अशी मोक्याची जागा पटकावून ही मंडळी बसलेली दिसतात.

समाजसेवेच्या नावाखाली सत्ता उपभोगणे ते ही कायद्याच्या चौकटीत हे मुख्य सूत्र असते. यातून बाहेर पडते यांचे खरे रूप. ते रूपच मुळात असते खोटे. “मोठे तितुके खोटे” आणि “थोर तितुके चोर” ही जाणिव या टोळीतील कुणाही सदस्याच्या जवळ गेले की कळून चुकते.

यातून फोफावतात अनेक अपारदर्शी सत्ताबाह्य परंतु सत्तेवर प्रभाव टाकणारी सत्ताकेंद्रं. एक आभासी वातावरण या टोळ्यांच्या आसमंतात घुमू लागते. याचा प्रभाव मोठमोठ्या कार्पोरेट उद्योगात देखील पडतो. कार्पोरेट कल्चर नावाचे आभासी प्रभावकेंद्र देखील असेच. कुणी काम करतो का? ते कसे करतो? किती तत्परतेने करतो? वगैरे गोष्टी नगण्य ठरतात. “मी काम करतो की नाही ते महत्त्वाचे नाही”, तर माझ्या वरिष्ठाला “मी काम करतो आहे हे पटले की झाले”. हे या कार्पोरेट यंत्रणेचे सत्तासूत्र ठरते.

ही अशीच पार्श्वभूमी “सी०आय०ए०” या अमेरिकन कारस्थानी संस्थेला जन्म घालणारी ठरली त्याची कहाणी या लेखमालेच्या पुढील अंकात.                  

(क्रमश:…)
पूर्वप्रसिद्धी – दै. पुण्यनगरी (सर्व आवृत्त्या) दि. ३ ऑक्टोबर २०२५

– @ देवेंद्र रमेश राक्षे
rakshevendra@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

पाणी एकाच वेळी गोठते आणि उकळते!

‘त्रिस्थली बिंदू’ (Triple Point)

मित्रांनो आणि मैत्रिणींनो ,
पाणी हा आपली सृष्टी, पृथ्वीवर जीवन निर्माण करून ते समृद्ध करणारा प्राथमिक घटक आहे. आपण पाहतो हे पाणी द्रवरूपात तर सर्वत्र उपलब्ध असतेच पण आपण चहा करताना त्याची वाफ होताना पाहतो, तर घरात फ्रीजमध्ये तसेच  उत्तर गोलार्धात अनेक ठिकाणी नैसर्गिक अवस्थेतही पाहतो.
पण तुम्हाला माहिती आहे का? पाणी एकाच वेळी गोठू (बर्फ होऊ) आणि उकळू (वाफ होऊ) शकतं! हे कसं शक्य आहे? हा चमत्कार ‘त्रिस्थली बिंदू’ (Triple Point) या भौतिक शास्त्रातील संकल्पनेमुळे समजून घेता येतो.
चला तर मग, याबद्दल मजेदार गोष्टी जाणून घेऊया.

त्रिस्थली बिंदू म्हणजे काय?
जेव्हा पाण्याचं तापमान आणि दाब (Pressure) अगदी एक विशिष्ट ठराविक प्रमाणात असतो, तेव्हा पाणी एकाच वेळी तीन अवस्थांमध्ये राहातं,
१. घन अवस्था (Solid) – म्हणजे बर्फ
२. द्रव अवस्था (Liquid) – म्हणजे पाणी
३. वायू अवस्था (Gas) – म्हणजे वाफ
याला ‘त्रिस्थली बिंदू’ किंवा इंग्रजीत Triple Point असं म्हणतात.

त्रिस्थली बिंदू कधी तयार होतो?
पाण्याचा त्रिस्थली बिंदू साधारण 0.01°C तापमान आणि 611 पास्कल (Pa) इतक्या कमी दाबावर तयार होतो.
म्हणजेच जर आपण प्रयोगशाळेत पाण्याला असं खास वातावरण तयार करून दिलं, तर ते पाणी बर्फ, पाणी आणि वाफ या तीनही रूपांमध्ये एकाच वेळी दिसू शकतं. अगदी जादूसारखं वाटतं, नाही का?

हे का घडतं?
तुम्हाला माहिती आहे का, आपल्या पृथ्वीवर वेगवेगळ्या तापमान आणि दाबामुळे पाण्याची अवस्था बदलते, म्हणजे सामान्य वातावरणीय दाब असेल तेव्हा,
• तापमान खूप कमी झाले  की पाण्याचं बर्फ होतं. (हिमालय किंवा आल्प्स पर्वतावरील बर्फ)
• तापमान १०० अंशापुढे वाढत गेलं की पाण्याची वाफ होऊ लागते. (चहा करताना उकळणारे पाणी)
• सामान्य स्थितीत  ते पाणी राहतं.
पण जर आपण तापमान आणि दाब वर दिल्यानुसार अगदी अचूक  ठेवले, तर पाणी एकाच वेळी तिन्ही अवस्थांमध्ये राहातं.
त्रिस्थली बिंदू हे भौतिकशास्त्रातील तापमान, दाब आणि पदार्थांच्या अवस्थांशी (Phase of Matter) निगडीत अत्यंत महत्त्वाचे तत्त्व आहे. यामागे प्रामुख्याने थर्मोडायनॅमिक्स (Thermodynamics) आणि फेज इक्विलिब्रियम (Phase Equilibrium) ही भौतिकशास्त्रातील दोन मुख्य तत्त्वे कार्यरत असतात.

१. थर्मोडायनॅमिक्सचा पहिला नियम (First Law of Thermodynamics)
थर्मोडायनॅमिक्स म्हणजे ऊर्जा आणि तिच्या रूपांतरणाचा अभ्यास. थर्मोडायनामिक्सचा पहिला नियम सामान्यतः ऊर्जेच्या संवर्धनाचा नियम म्हणून ओळखला जातो. ज्यामध्ये असे म्हटले जाते की, कोणत्याही विलग प्रणालीत किंवा एखाद्या बंद प्रणालीमध्ये (Closed System) उष्णता, दाब आणि तापमान नियंत्रित केले असता, ऊर्जा एक रूपातून दुसऱ्या रूपात जाते.  म्हणजेच एकूण ऊर्जा स्थिर असते, ऊर्जा एका रूपातून दुसर्‍या स्वरूपात बदलली जाऊ शकते, परंतु ती निर्माण किंवा नष्ट केली जाऊ शकत नाही

त्रिस्थली बिंदू’ (Triple Point) १

या तत्त्वानुसार इथे दाखवलेल्या चित्रात खाण्यातून मिळालेल्या रासायनिक उर्जेचे रूपांतर आपल्याला खेळण्यासाठी आवश्यक कायनेटिक उर्जेत होते तर सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाश उर्जेचे रूपांतर पानामध्ये साठवलेल्या रासायनिक उर्जेत होते.
पाण्याला उष्णता दिल्यास ते द्रव रूपात राहते, उष्णता वाढवली तर वाफ होते आणि उष्णता कमी केली तर बर्फ होतो.
पण जर आपण तापमान आणि दाब अचूक प्रमाणात ठेवले, तर पाणी कोणतेच एक रूप कायम ठेवू शकत नाही आणि तिन्ही रूपांमध्ये सतत रूपांतर होत राहते.

२. फेज इक्विलिब्रियम (Phase Equilibrium) – समतापीय संतुलन तत्त्व

भौतिकशास्त्रात फेज इक्विलिब्रियम (Phase Equilibrium) म्हणजे दोन किंवा अधिक अवस्थांमध्ये पदार्थाचा संतुलन राखणारा बिंदू.
• साध्या शब्दात सांगायचं झालं तर, एखाद्या पदार्थाची दोन किंवा अधिक अवस्था (घन, द्रव, वायू) एकाच वेळी टिकून राहण्याची स्थिती म्हणजे फेज इक्विलिब्रियम.
त्रिस्थली बिंदूचे तत्त्व:
• जेव्हा आपण तापमान 0.01°C आणि दाब 611 Pa (Pascal) ठेवतो, तेव्हा पाण्याच्या तिन्ही अवस्था (बर्फ, पाणी आणि वाफ) यांमध्ये ऊर्जेचा मुक्त प्रवाह (Free Energy Flow) सुरू होतो.
• पाणी एकाच वेळी बर्फात रूपांतरित होत असतं, वाफेत रूपांतरित होत असतं आणि द्रवात राहण्याचा प्रयत्न करतं.
पण असं का होतं?
 याचे उत्तर गिब्स मुक्त ऊर्जा तत्त्व (Gibbs Free Energy Principle) देते.

३. गिब्स मुक्त ऊर्जा तत्त्व (Gibbs Free Energy Principle)
भौतिकशास्त्रज्ञ जोसिया विलार्ड गिब्ज यांनी मांडलेलं गिब्स मुक्त ऊर्जा तत्त्व त्रिस्थली बिंदू समजण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.
गिब्स मुक्त ऊर्जा सूत्र:
G=H−TS
इथे:
• G = गिब्स मुक्त ऊर्जा (Gibbs Free Energy)
• H = एन्थाल्पी (Enthalpy) – म्हणजे एकूण उष्णता
• T = तापमान (Temperature)
• S = एंट्रॉपी (Entropy) – म्हणजे एन्ट्रॉपी, उपयुक्त काम करण्यासाठी उपलब्ध नसलेल्या प्रति युनिट तापमानाच्या प्रणालीच्या थर्मल उर्जेचे मापन.

या सूत्राचा अर्थ:
• पदार्थ नेहमी त्याच्या ऊर्जेचा स्तर कमी करण्यासाठी (Minimum Energy State) बदल करत असतो.
• जर आपण दाब आणि तापमान अगदी विशिष्ट ठिकाणी नियंत्रित केलं (0.01°C आणि 611 Pa), तर पाणी कोणत्याही एका स्थितीत राहात नाही.
• गिब्स मुक्त ऊर्जा सतत बदलत राहते, परिणामी बर्फ, पाणी आणि वाफ, तिन्ही एकत्र दिसतात.
विशेष बाब:
गिब्स ऊर्जा कमी करण्यासाठी पाणी सतत रूप बदलत राहतं. म्हणूनच तिथे स्थिर संतुलन (Stable Equilibrium) निर्माण होत नाही. परिणामी, बर्फ वितळतं, पाण्याची वाफ होते आणि वाफ थंड होऊन पाणी किंवा बर्फ होतं, सतत चक्र सुरू राहतं.

४. ट्रिपल पॉईंट डायग्राम (Triple Point Diagram)

विज्ञानामध्ये हे स्पष्ट करण्यासाठी P-T Phase Diagram (Pressure-Temperature Phase Diagram) वापरला जातं.
या तक्त्यामध्ये:
• एका बाजूला दाब (Pressure) आणि दुसऱ्या बाजूला तापमान (Temperature) असतो.
• काही ठिकाणी एकच अवस्था दिसते (उदा. पाणी, बर्फ, वाफ).
• पण जेव्हा आपण ठराविक तापमान 0.01°C आणि दाब 611 Pa ठेवतो, तेव्हा तीनही अवस्था एकाच वेळी टिकून राहतात. यालाच Triple Point म्हणतात.

५. घन, द्रव आणि वायू — तिन्ही एकत्र का टिकतात?
हे समजण्यासाठी थर्मोडायनॅमिक स्थिरता (Thermodynamic Stability) पाहावी लागेल.
• पाण्याच्या बर्फ या  घन रूपात ऊर्जा कमी असते.
• पाण्याच्या  द्रव रूपात ऊर्जा थोडी जास्त असते.
• पाण्याच्या वाफेच्या  वायू रूपात ऊर्जा सर्वात जास्त असते.
जेव्हा आपण तापमान आणि दाब त्रिस्थळी बिंदू च्या पातळीवर अचूक ठेवतो, तेव्हा पाण्याच्या तीनही रूपांना समान ऊर्जा मिळते म्हणून पाणी ठराविक बिंदूवर तीनही अवस्थांमध्ये सतत बदलत राहातं. यालाच Thermodynamic Equilibrium म्हणतात.

६.  फक्त 0.01°C आणि 611 Pa वरच हे का शक्य असतं?
कारण 0.01°C आणि 611 Pa (0.00611 bar) वर गिब्स मुक्त ऊर्जा सर्वात कमी असते. पदार्थ त्याच्या सर्वात स्थिर स्थितीकडे झुकतो (Minimum Energy State).परिणामी, पाणी बर्फ, वाफ आणि द्रव यांमध्ये सतत बदलत राहातं आणि तिन्ही रूपं एकाच वेळी दिसतात.

संक्षेपात: त्रिस्थली बिंदू कसा होतो?

 

घटक कारण परिणाम
थर्मोडायनॅमिक्स ऊर्जा सतत बदलते पाणी तिन्ही स्थितीत रूपांतरित होतं.
फेज इक्विलिब्रियम संतुलन टिकवणारा बिंदू तीनही अवस्था एकत्र राहतात.
गिब्स मुक्त ऊर्जा ऊर्जा कमी करण्यासाठी सतत बदल पाणी बर्फ, द्रव आणि वाफ — तिन्ही असतात.

त्रिस्थली बिंदूचा प्रयोग
हे तुम्ही घरी करू शकत नाही, पण वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये हे शक्य आहे. प्रयोगशाळेत एक खास बंद बाटली (Vacuum Chamber) घेऊन त्यामधील हवा काढून टाकली जाते आणि तापमान अगदी अचूक ठेवलं जातं.
तिथे पाणी उकळतंही आणि गोठतंही, एकाच वेळी!

त्रिस्थली बिंदू कशासाठी उपयोगी आहे?
१. उष्णता मोजण्यासाठी (Temperature Measurement) – त्रिस्थली बिंदू वापरून तापमान अगदी अचूक मोजलं जातं.
२. वैज्ञानिक प्रयोगांमध्ये – द्रव्यांच्या अवस्था समजण्यासाठी त्रिस्थली बिंदू महत्त्वाचा ठरतो.
३. अंतराळ संशोधनातही – काही ग्रहांवर दाब वेगळा असतो, त्यामुळे अशा स्थितीचा अभ्यास करायला त्रिस्थली बिंदू मदत करतो.
जर तुम्ही प्रयोगशाळेत नेमकं 0.01°C आणि 611 Pa असलेलं वातावरण तयार केलं, तर तुम्हांला तुमच्या डोळ्यांनी हे बघता येईल, पाणी एकाच वेळी बर्फ, द्रव आणि वाफ म्हणून दिसेल!

काय, विज्ञान किती भन्नाट आहे ना? 

  • © दीपक देवधर 

dpdeodhar@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

रंग माझा वेगळा…!!

निळ्या आणि पांढर्‍या रंंगाचे मिश्रण असलेली अतिशय सुरेख दिसणारी  दुर्मिळ असलेली गोकर्णीची वेल एका बंगल्याच्या कंपाऊंड वाॅलवर बहरलेली पाहिली अन् मन वेडावले.

पावसाळा संपत आला होता आणि चार दिवसांची सुट्टी घेऊन थोरला दिल्लीहून अचानक येऊन थडकला होता आणि त्याच्या हट्टापायी अगदी अनपेक्षितपणे आम्ही कारने दापोलीला निघालो होतो…महाडवरून आत शिरुन एका सुंदरशा रस्त्याने भरवेगात जात असताना डाव्या हाताला असलेला तो बंगला क्षणार्धांत मागे पडला पण निळ्यापांढर्‍या ठिपकेदार फुलांनी तुफान फुललेली ती गोकर्णीची वेल कायमची मनात ठसली.

‘परत जाताना आपण ह्याच रस्त्याने जाऊ या’ असे ठरवले होते पण आयत्या वेळी GPS ने दाखवलेल्या मार्गाने माणगावरुन पुण्याला गेलो आणि मी मनात ठरवलेला “त्या” बंगल्याच्या मालकाकडून त्या गोकर्णीची एखादी शेंग मिळवण्याचा बेत फिस्कटून गेला….मुलाकडे नाराजी व्यक्त केली तर तो म्हणाला, “बाबा, ह्या वयात असली खूळं डोक्यात घेऊन बसू नका..लॅप टाॅपवर गुगल करा..नाही तर Amazon वरुन मागवा…घरबसल्या मिळेल !”

तो विषय मग तसाच राहिला…नंतर कधीतरी, मी गुगलवर, Amazon वर शोधण्याचे दोन तीन वेळा केविलवाणे प्रयत्न केले पण काही जमले नाही…!

गेल्या महिन्यात आमच्याच सोसायटीमध्ये  तळमजल्यावर  राहणार्‍या एका बागप्रेमी सदस्याशी सहज गप्पा मारताना ह्या गोकर्णीचा विषय निघाला, तर तो अचानक म्हणाला, “अहो काका, माझ्याकडे आहेत एक दोन सुकलेल्या शेंगा तुम्ही म्हणता त्या गोकर्णीच्या..हव्यात का तुम्हाला?? मालवणहून येताना आणल्यात….

हे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा….ह्या म्हणीसारखी सिच्युएशन झाली की…मी उत्साहाने त्याच्याकडून ती सुकलेली पांढरट रंगाची अर्धवट उमललेली शेंग मोठ्या आनंदाने घेऊन घरी आलो. शेंगेत फक्त दोन बिया होत्या…सगळे सोपस्कार पार पाडून त्या बिया कुंडीत लावल्या…दोन आठवड्यापूर्वी एक वेल उगवलेली दिसली…! भरपूर खत माती असल्याने बघता बघता तरारली आणि आज सकाळी लक्षात आले  ते त्या वेलीवर फुललेले पहिले वहिले गोकर्णीचे सुंदर नाजुक, निर्मळ पांढरे फुल..!!

सकाळी सकाळीच अपेक्षाभंगाचा धक्का बसला, मन थोडसे खट्टू झाले …मला हवी असलेली “ती” “ही” नव्हतीच..!!

–  © प्रदीप अधिकारी

adhikaripradeep14@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

उत्तरे जाणा व ज्ञानात भर घाला

प्रश्नसमूह ६ : प्लॅस्टिक

२६. सगळ्यात प्रथम अस्तित्वात आलेले  प्लॅस्टिक कोणते ? कधी ?                         

२७. सध्या  रोजच्या सामान्य वापरात कोणकोणती प्लॅस्टिक्स आहेत आणि ती कोणकोणत्या वापरात आहेत ?

२८. प्लॅस्टिकमध्ये कोणते विशेष उपयोगी गुणधर्म आहेत ?

२९. आजकाल जे नॉन-स्टिक नावाने जे तवे, कढया येतात त्यावर कसला थर दिलेला असतो ? 

३०. प्लॅस्टिकचे तोटे काय ?  

वाचक मित्रांनी वरील प्रश्नांची उत्तरे लेखकाकडे न पाठवता संपादकांच्या ईमेल पत्त्यावर पाठवावी ही विनंती.   

उत्तरे पाठवणे शक्य नसल्यास आपली प्रतिक्रिया पाठवू शकता.  

– ©️ विलास सातपुते 

vilas.satput54@gmail.com

@@@

प्रश्नसमूह ६ ची उत्तरे

 

बॅकेलाईटच्या वस्तू, इन्सुलेटर 
बॅकेलाईटचा शोभेच्या गोष्टीत वापर 

२६.  ‘बॅकेलाईट’ हे पहिले प्लॅस्टिक १९१० पासून वापरात आले. लिओ बेकलॅन्ड या मूळ बेल्जियन रसायनशास्त्रज्ञाने ते अमेरिकेमध्ये शोधले. त्याचा वापर घरातील स्विचबोर्ड, वाहनातील पार्ट, इन्‌सुलेटर्स इत्यादीमध्ये होतो.

पेट प्लॅस्टिकचा वापर 
३ LDPE व HDPE यांचा वापर
HDPE चे पाईप 
टेफ्लॉनच्या वस्तू 

२७.  अ) – पॉलिथीन – याचे पूर्ण नाव ‘ लो डेन्‌सिटी पॉलिइथिलीन ( LDPE)’ असे आहे. पातळ कापडाच्या स्वरूपात असते व पिशव्या, पडदे, खाद्य व औषधे यांची पॅकिंग यात वापरले जाते.
       आ) पेट( PET) – याचे पूर्ण नाव ‘पॉलिइथिलीन टेरेप्थॅलेट” आहे. अगदी पारदर्शक पण असते. मुख्यत्वे बाटल्या बनवण्याच्या कामी येते.
       इ) एचडीपीई(( HDPE)  – याचे पूर्ण नाव “ हाय डेन्‌सिटी पॉलिइथिलीन’ हे आहे. हे एलडीपीई पेक्षा जास्ती मजबूत व जाड असते. जाड बाटल्या, जाड कॅन्‌स्‌, छतावर उभारल्या जाणार्‌या पाण्याच्या टांक्या व कारखान्यात अ‍ॅसिड इत्यादी                         साठवण्याकरिताच्या टाक्या, पाईप इत्यादीमध्ये वापरले जाते.
       ई) पीपी( PP)  – याचे नाव “ पॉलिप्रॉपिलीन” असे आहे. हे एचडीपीई पेक्षा जास्ती मजबूत व टिकाऊ असते. विशेषकरून जरा जास्त तापमानापर्यंत ( 100 डिग्री सें.) वापरले जाऊ शकते. याचा ही वापर छतावर उभारल्या जाणार्‌या पाण्याच्या                 टांक्या व कारखान्यात अ‍ॅसिड इत्यादी साठवण्याकरिताच्या टाक्या, पाईप इत्यादीमध्ये केला जातो.
      उ) पीव्हीसी( PVC)  – याचे नाव ‘ पॉली व्हिनाईल क्लोराईड” असे आहे. याचा ही वापर शेतीमध्ये पाण्याचे पाईप, जमीनीवर अंथरायचे गालिचे वा फरशा यात होतो. चपलांचे तळ पण बनतात. आजकाल याचा वापर कमी होऊ लागला आहे.
      ऊ) पॉलिस्टायरीन – याचा वापर सोफासेटच्या गाद्या, वाहनांतील सीट्‌स्‌ यांत होतो. तसेच अंड्यांचे ट्रे, डबे वगैरेमध्ये पण होतो.
      ओ) याखेरीज पॉलिकार्बोनेट, अ‍ॅक्रिलिक ही पारदर्शक प्लॅस्टिक पण वापरली जातात.   

२८.   प्लॅस्टिकवर धातूंप्रमाणे गंज लागत नाही, अ‍ॅसिड सुद्धा साठवू शकते. वजनाला हलके असते. नजीकच्या वस्तूंशी घर्षण कमी करते. धातूंच्या उलट असते म्हणजे वीज व उष्णता वाहण्यास विरोध करते.

२९.   त्या तवे, कढया इत्यादीवर ‘टेफ्लॉन’ या एका वेगळ्या पॉलिमर द्रव्याचा थर दिलेला असतो. हे द्रव्य गुळगुळीतपणा, कठीणपणा, आणि उच्च तपमान सहन करण्याकरिता प्रसिद्ध आहे. त्यावर वातावरण, अ‍ॅसिड याचा काही परिणाम होत नाही. ते शुद्ध राहते.

३०.  प्लॅस्टिकचे नैसर्गिक दृष्ट्या विघटन होऊन निसर्गातील मूल घटकांत रूपांतर होत नाही. त्यामुळे ते तसेच पृथ्वी वा जलाशय यांमध्ये साठून राहते, जागा व्यापते. म्हणजे प्रदूषण करते. प्राणि व मासे यांच्या पोटात जाते आणि त्यांना नुकसान करते. या सर्वातून सुटकेसाठी त्याला पुन्हा प्लॅस्टिक बनवण्याच्या प्रक्रियेत वापरणे पण अजून तितकेसे शक्य झाले नाही. त्यामुळे लक्षावधी टन प्लॅस्टिक समुद्रात जात आहे.

 [ वरील प्रश्नांची उत्तरे प्रकाश पेठे यांनी पाठवली आहेत.  इतर सर्व वाचक मित्रांचे अभिनंदन आणि आभार ] 

 – ©️ विलास सातपुते 

vilas.satput54@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

विहंग मित्र

क्रमांक  ६ : Asian Emerald  dove  ( पाचू कवडा )

पाचू च्या रंगाचे पंख, लाल चोच,राखाडी कपाळ,असा हा अतिशय देखणा पक्षी रानात जमिनीवर,झाडांवर दिसतो,
फक्त नराला चंदेरी पॅच असतो. समुद्रसपाटी पासून डोंगराळ भागापर्यंत सर्वत्र आढळतो.
हा पक्षी रानात बघणे अतिशय आल्हाददायक असते.

– ©️देवदत्त पाटणकर.

8378980966 

castingalu@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

With Best Regards,
Deodatta Patankar,
8378980966.

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

चित्रकारांचे दालन

 

 – ©️ रामचंद्र देशमुख

संपर्क : ९९३०२४६९८९

  प्रेषक मेघना घाटे 

meghanaghate25@gmail.com

@@@

– ©️ मिलिंद महाबळ 

milind.mahabal65@gmail.com

@@@

 –  ©️ युती प्रवीण अघोर  

प्रेषक शुभदा प्रवीण अघोर     

shubhadaaghor@gmail.com

@@@@@@@@@@@@@@@@@

महत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. 

@@@@@@@@@@@

महत्त्वाची सूचना :- मैत्री अनुदिनी हे मुख्यत: मराठी साहित्याला वाहिलेलं आणि नवं-जुनं साहित्य प्रकाशित करणारं एक नियतकालिक आहे. ते आम्ही वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देत असतो. एखादा जुना लेख वा कविता वगैरे साहित्य पुनर्प्रकाशित करायचं असल्यास आम्ही सदर लेखकाची परवानगी घेण्याचा प्रयत्नही करत असतो. काही वेळा संपर्क होऊ शकत नाही. मात्र अशा प्रकारे पुनर्प्रकाशित केलेल्या साहित्यावर आम्ही न चुकता लेखकाचं नांव व ज्या पुस्तकातून वा मासिकातून ते घेतलं त्याचा नामनिर्देश करत असतो. कृपया आमची अडचण समजून सहकार्य करावं ही विनंती.

@@@@@@@@@@@@@@

प्रेम आणि मरण

गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी)

 

स्वागत फुलांनी
गोविंदाग्रज –  राम गणेश गडकरी [ २६ मे १८८५ – २३ जानेवारी १९१९ ]

जगावाचुनी लाभतीस तर जग मी केले असते,
तुझ्यावाचुनी जग परि आता हो असत्याचे नसते…

डोळ्यांपुरते जग नच असते रुप जगाला पुरते,
प्रेमळ हृदया परि निर्दय जग दगडाखाली पुरते…

होईल होईल वाटत होते तेच अखेरीस झाले,
नाव घेतल्यावाचुन आता मनात झुरणे आले…

गोविंदाग्रज

कविता समजणे ही आत्मसाक्षात्कारी बाब आहे. पण या कवितेबाबत थोडे आजूबाजूचे वाचल्यावर “त्या”ची व्याकुळता आणि ‘नाव घेतल्यावाचून झुरण्याच्या’ दु:खाची तीव्रता मला अधिक जाणवली. “प्रियतमा” या पुस्तकात तारा भवाळकर लिहितात:-
“गोविंदाग्रजांच्या कवितेतले प्रेम हे पूर्णपणे भौतिक वास्तवाला वाट पुसतच जाणारे आहे. ‘प्लेटॉनिक लव्ह’ची, शरीरातीत उदात्त प्रेमाची गाणी कवीने गायली नाहीत. प्रेयसी तिच्या सर्व भौतिक अस्तित्वासहच हवी, तरच प्रीती सुफल संपूर्ण होते. इथे कोरा आदर्शवाद कुठेच नाही”….

…“गोविंदाग्रजांच्या कवितेतला ‘तो’ सातत्याने ‘ती’ चा शोध घेतो आहे, ‘ती’ च्यासाठी व्याकुळ होतो आहे, ‘ती’ च्या एखाद्या कटाक्षाने मोहरून जातो आहे, प्रेमाच्या एका उत्कट क्षणासाठी अनंत मरणे ओढवून घेण्यासाठी आतुर होतो आहे, एका चुंबनासाठी पुन्हा पुन्हा मरणभेटीचा सोहळा आनंदाने भोगण्या- साठी एका पायावर तयार होतो आहे, प्रीतिभावनेचा ‘गोफ’ उलगडताना त्याच्या आतड्याला पीळ पडतो आहे. दगडासारख्या निष्प्रेम चिरंजीवनाचा तो धिक्कार करतो आहे. एका प्रेमाशिवाय त्याला विश्व शून्य वाटते आहे आणि प्रीतीच्या एका उत्कट क्षणाच्या भोगासाठी अनंत वेळा मृत्यूला मिठी मारण्यासाठी तो आसुसलेला आहे. प्रीतीसाठी आसुसलेला इतका उत्कट नायक मराठी कवितेला, मराठी मनाला, मराठी वातावरणाला अगदी नवा होता.”….

… “गोविंदाग्रजांच्या समग्र प्रेमकवितेत ‘त्या’ची व्याकुळता, क्वचित् आनंदोर्मी यांचे दर्शन होते. टोकाची निराशा आणि उत्कट प्रीतीचे स्वप्नही दिसते. मात्र आपल्या प्रियेविषयी अनादराचे शिव्याशापाचे उद्गार कुठेही दिसत नाहीत. उत्कट प्रीती निर्माण करणाऱ्या ‘देवा’ला आणि ‘देवा’ला जाळण्याची भाषा आहे. ‘नटव्या थाटापाठी’ तू गेलीस, इतके तिला म्हणून तो थांबतो. कारण तिच्यावरचं त्याचे प्रेम उत्कट आहे. त्या निराशेपोटी तो प्रीतीच्या निर्मात्यावर संतापतो, प्रीतिदेवतेला मात्र शापित नाही. उलट- जगावाचुनी लाभतीस तरि जग मी केले असते । तुझ्यावाचुनी जग हे आता असून झाले नसते ।। इतके म्हणून ‘ नाव घेतल्यावाचुन आता मनात झुरणे आले, ह्या वास्तवाला नाइलाजाने सामोरा जातो.”

(प्रियतमा: तारा भवाळकर)

पण काही वेळा चमत्कार घडतो… गोविंदाग्रजांची “प्रेम आणि मरण” ही दीर्घ कविता वाचता वाचता मला साक्षात्कार झाला आणि शेवट वाचून मी सुन्न झालो.

हे सारे आठवायचे कारण की हल्लीच एके ठिकाणी (म्हणजे WhatsApp वर) कुसुमाग्रज यांची “मौन” कविता वाचली.

ती कविता अशी:
मौन – कुसुमाग्रज

शिणलेल्या झाडापाशी
कोकिळा आली
म्हणाली, गाणं गाऊ का ?
झाड बोललं नाही
कोकिळा उडून गेली.

शिणलेल्या झाडापाशी
सुगरण आली
म्हणाली, घरटं बांधु का ?
झाड बोललं नाही
सुग्रण निघून गेली.

शिणलेल्या झाडापाशी
चंद्रकोर आली
म्हणाली, जाळीत लपु का ?
झाड बोललं नाही
चंद्रकोर मार्गस्थ झाली.

शिणलेल्या झाडापाशी
बिजली आली
म्हणाली, मिठीत येऊ का ?
झाडाचं मौन सुटलं
अंगाअंगातुन
होकारांच तुफान उठलं.
(मुक्तायन)

पण कुसुमाग्रजांची कविता वाचताना तीव्रतेने आठवली ती राम गणेश गडकरी, “गोविंदाग्रज” यांची “प्रेम आणि मरण” ही कविता.
“प्रेम आणि मरण” हे एक उत्कट काव्य आहे.  Love Demands Sacrifice असे म्हटले जाते. रोमिओ ज्युलीएट असो वा सस्सी-पन्नू सर्व अमर प्रेमकथा अपूर्ण राहिल्या म्हणूनच प्रसिद्धीस पावल्या. “…. and they lived happily ever after” अशा प्रकारची प्रेमकथा आठवते का बघा.
गडकऱ्यांच्या काव्यप्रतिभेविषयी काही लिहिण्याची माझी पात्रता नाही.
कवितेतील आशयाविषयी संशोधक आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक तारा भवाळकर यांनी लिहिले आहे:
“प्रेम आणि मरण’ याच एका कवितेत नव्हे, तर सर्वत्र उत्कट प्रीतीच्या क्षणी मरणाला मिठी मारण्याची तीव्र ओढ आहे आणि उत्कट प्रीतीचा क्षण आलिंगन चुंबनांशिवाय सार्थ होत नाही. ‘प्रेम आणि मरण’ हे एक कल्पनारम्य कथाकाव्य! टीकाकारांच्या टीकेचा विषय झालेले. गोविंदाग्रजांची समग्र प्रेमकल्पना या कवितेत एकवटलेली आहे. कवितेच्या शीर्षस्थानी होनाजीबाळाच्या कवितेच्या दोन ओळी दिलेल्या आहेत : जगीं सांगतात प्रीत पतंगाची खरी । झड घालून देतो प्राण दीपकाचे वरी ।।

गोविंदाग्रजांची प्रेमकल्पना:

इथे ‘तो’ पतंग आणि ‘ती’ दीपज्योत ! ‘तो’ तिच्यासाठी वेडापिसा हो, तो ‘ती’ च्याभोवती जीवघेण्या ओढीने पिंगा घालतो आणि अखेर प्राणार्पण करतो. होनाजीच्या या ओळीतली प्रेमभावना अगदी मूळ कल्पनेसह फारसी काव्यातली ! शमा और परवाना ! परवाना -‘तो’ पतंग, शमा ‘तो’ दीपज्योत. या जोडीत ‘ ती ‘ स्थिर ! तिला शोधणारा, वेडावणारा आणि अखेर प्राणार्पण करणाराही ‘ तो ‘च ! होनाजीच्या या पंक्तीमधली कल्पना मुस्लिम अमलातल्या कवींकडून मराठीं कवितेत आली, हे उघड आहे. त्या कवितेत नेहमी प्रियकर तरल, हळवा, उत्कट, ‘ती’च्यासाठी आसुसलेला आणि ‘ती’च्या प्राप्तीसाठी संकटांचे पहाड फोडणारा असतो. तिच्या एका प्रेमकटाक्षासाठी व्याकुळ होणारा आणि त्याची प्राप्ती होताच अहोधन्य ! ‘ मानणारा!

प्रियकराचे हे रूप मराठी कवितेला अनोखे आहे. होनाजीच्या या लावणीनेही पुढे मराठी वळण घेतले आहे आणि ती नायिकाच ‘ तुझ्या प्रीतीचे दुःख मला दावु नको रे ।’ म्हणून त्याची आळवणी करीत आहे. गोविंदाग्रजांचा वृक्ष मात्र एक क्षणभरच मेघात लखलखून नाचणाऱ्या विजेसाठी वेडापिसा होतो. तिच्या प्राप्तीसाठी उग्र तपश्चर्या करताना हठ- योग्यालाही लाजवील असे कायाक्लेश तो भोगतो ( पहाड फोडणाऱ्या फरहाद प्रमाणे ). स्पर्शासह मरण आणणारी ‘जिवाची राणी’ ही खरी तर शुद्ध राक्षसी !’ तिच्यासाठीचे वेड हे आत्मघातकी आहे, हे इतरांनी त्याला सांगण्याची गरज नाहीच. त्याला ते माहीतच आहे. त्यामुळे ‘क्षण एक पुरे पेमाचा वर्षाव घडो मरणांचा। मग पुढे’ असे तो बिनदिक्कत सांगतो.

कारण त्याच्या दृष्टीने ‘निष्प्रेम चिरंजीवन’ हे दगडाचे ! त्याचा तो धिक्कार करतो. ‘तीच्या प्राप्तीपुढे त्याला स्वर्गलोकही तुच्छ आहे. तिच्यासह नरकातही जायला जणु तो तयार आहे. परंतु तिच्याशिवायचा स्वर्गही त्याला शून्य वाटतो. एखाद्या उत्कट पतिव्रतेसारखी (सिंधूसारखी ) त्याची ही निष्ठा आहे. आणि अखेरीस ती ‘प्रीतीची जळती ज्योत’ त्याच्याकडे जीवघेण्या ओढीने धावत येते. तिच्या एका उत्कट स्पर्शाने जीवनाचे सार्थक होऊन तो उन्मळून पडतो. त्याच्या अंगावरच्या कळ्या दीर्घकाळानंतर खुलण्याने त्या सार्थकतेचे. तेज उजळून निघते ! हे सगळेच लटके वाटावे, केवळ कल्पनेचा स्वैरविलास वाटावा, असे आहे.
प्रीतीच्या असफलतेची दाहकता ‘ती’च्या परंतु या ना त्या परीने गोविंदाग्रजांच्या कवितेतला ‘तो प्राप्तीसाठी सातत्याने सर्वस्व पणाला लावून बसलेला, तिच्यासाठी वेडापिसा झालेला दिसतो. याची संगती कशी लावणार ? केवळ कल्पनाचमत्कृती म्हणून सोडून देणार का? गोविंदाग्रजांच्या नायकाला प्रीतीचा लाभ सहजपणे फार कमी वेळा होतो.
(प्रियतमा: तारा भवाळकर)

प्रेम आणि मरण ही कविता बऱ्यापैकी मोठी असल्याने थोडक्यात सार मांडतो..
मोकळ्या मैदानावर राज्य गाजवणारा एक उत्तुंग वृक्ष आहे. पानांनी डवरलेला आहे. त्याच्या छायेत गवत, वेली वाढत असतात. छोटीसी जीवसृष्टी बहरत असते. एका पावसाळ्यात आकाशात विद्युल्लता चमकते, वृक्षाच्या हृदयात प्रीतीच्या लहरी थरथरतात आणि त्या महाकाय वृक्षाचे भान हरपते..
त्या चंचल बालेच्या ध्यासामुळे झालेली ती प्रीतीची जखम त्याचं जीवनच शोषून घेते. मुसळधार वृष्टीमुळे देखील त्याच्यावर टवटवी येईना. वसंताच्या आगमनामुळे तो मोहरेना.

गडकरी म्हणतात:
त्या क्षणी। त्याचिया मनीं। तरंगति झणीं।
गोड तरि जहरी। प्रीतीच्या नवथर लहरी॥ न कळता॥

तो ठसा मनावर ठसला।
तो घाव जिव्हारीं बसला॥ प्रीतिचा॥
वेड पुरें लावी त्याला।
गगनातिल चंचल बाला। त्यावरी॥

जातिधर्म त्याचा सुटला।
संबंध जगशीं तुटला॥ त्यापुढें।
आशाहि। कोणती कांही। रहिली नाही।
सारखा जाळी। ध्यास त्यास तीन्ही काळी॥ एक तो॥

त्यानंतर अनेक पावसाळे आले  तरी त्या वृक्षाला टवटवी आली नाही, कळ्या कधी उमलल्या नाहीत, वेगवान वाऱ्याने देखील त्याचे पान हलले नाही.. सगळे त्या वृक्षाची चेष्टा करू लागले, देवादिक हसू लागले. पण इष्काचा जहरी प्याला प्राशन केलेल्या वृक्षाला कशाचंच सोयरसुतक नव्हतं. तो एखाद्या तपस्वी प्रमाणे ताठ आणि निश्चल उभा होता.

ह्रदयाला फसवुनि हंसणें।
जीवाला न कळत जगणें॥ वरिवरी॥

त्याला मान्य नव्हते.

दीर्घकाळ चाललेली त्या वृक्षाची तपश्चर्या पाहून इंद्राचे आसन डळमळू लागले.. आणि देव म्हणाले “वरं ब्रूहि”
वृक्ष आनंदाने म्हणाला ..

तो वदे। “देवि सर्व-दे,। हेंच एक दे-।
भेटवी मजला। जीविंच्या जिवाची बाला॥ एकदा॥”

देवी म्हणाली, हा वेडेपणा आहे.. सौदमिनीला तू कसा भेटणार? हे सर्वनाशाला आमंत्रण आहे.
त्यावर तो वृक्ष म्हणतो:
‘निष्प्रेम चिरंजीवन ते
जगि दगडालाही मिळते । धिक् तया।।
क्षण एक पुरे प्रेमाचा।
वर्षाव पडो मरणांचा। मग पुढें॥”
निग्रहें। वदुनि शब्द हे। अधिक आग्रहें!
जीव आवरुनी। ध्यानस्थ बैसला फिरुनी॥ वृक्ष तो॥

यानंतर शेवटची काही कडवी..जीवाला चटका लावणारी..

तो निग्रह पाहुनि त्याचा॥
निरुपाय सर्व देवांचा॥ जाहला॥
मग त्याला भेटायाला।
गगनांतिल चंचल बाला॥ धाडिली॥

धांवली उताविळ होत।
प्रीतीची जळती ज्योत॥ त्याकडे॥
कडकडे। त्यावरी पडे। स्पर्श जों घडे।
वृक्ष उन्मळला। दुभंगून खालीं पडला॥ त्या क्षणीं॥

दुभंगून खालीं पडला।
परि पडतां पडतां हंसला॥ एकदा॥
हर्षाच्या येउन लहरी।
फडफडुनी पानें सारीं॥ हांसलीं॥

त्या कळ्या सर्वही फुलल्या॥
खुलल्या त्या कायम खुलल्या॥ अजुनिही॥
तो योग। खरा हटयोग। प्रीतिचा रोग।
लागला ज्याला। लाभतें मरणही त्याला॥ हें असें॥

विद्युल्लतेला गाढ आलिंगन देऊन वृक्ष तृप्त मनानं उन्मळून कोसळला आणि या क्षणी अंतर्बाह्य उमलला.
मरणानं त्या वृक्षाचं जीवन सफल झालं.

– ©️ अजित पाटणकर

9967834851
डोंबिवली.

asmita1293@yahoo.co.in
(पूर्ण कविता इंटरनेटवर उपलब्ध आहे)

[ चित्र विकिपिडियावरून साभार ]

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

स्वागत फुलांनी – strawberry

– सविता कांबळे

savitak211@gmail.com

 ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

विचारशलाका 

(६०) 

  

– प्रेषक शुभदा अघोर

shubhadaaghor@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आणखी एक (अज्ञात ) केशवसुत

– पृष्ठ ६८ –


– प्रेषक माधव मनोहर जोशी 

madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

श्रीमद्भगवत्गीता

१५ व्या अध्यायाचा भावानुवाद

श्लोक ६
*न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः ।*
*यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ १५-६ ॥*
*अर्थ*—
ज्या परमपदाला पोचल्यावर माणसे फिरून या संसारात येत नाहीत, त्या स्वयंप्रकाशी परमपदाला
ना सूर्य प्रकाशित करू शकतो, ना चंद्र, ना अग्नी; तेच माझे परमधाम आहे. ॥ १५-६ ॥

*मराठी पद्य रुपी भावानुवाद –*
ज्या परमपदी l पोचता, न येती l
फिरून संसारी l कोणी जीव l
ते स्वयंप्रकाशी I त्याला न उजळे l
अग्नीची ती लोळे l रवी,चंद्र ll
असे ते पद l ते परमधाम l
माझाही  मुक्काम l तेथे असे ll

*श्लोक ७
*ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः ।*
*मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ॥ १५-७ ॥*

*अर्थ*—
ह्या देहात असणारा हा सनातन जीवात्मा माझाच अंश आहे आणि तोच प्रकृतीत स्थित
मनाला आणि पाचही इंद्रियांना आकर्षित करतो. ॥ १५-७ ॥

*मराठी पद्यरुपी भावानुवाद –*
ह्या देही वसतो l सनातन आत्मा l
तो एक जीवात्मा l अंश माझा ll
प्रकृतीत स्थित l असा माझा अंश l
पंच  इंद्रियांस l आकर्षितो ll

*श्लोक ८–*
*शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः ।*
*गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात्‌ ॥ १५-८ ll*
*अर्थ* –
वारा वासाच्या वस्तूतून वास घेऊन स्वतःबरोबर नेतो, तसाच देहादिकांचा स्वामी जीवात्माही
ज्या शरीराचा त्याग करतो, त्या शरीरातून मनसहित इंद्रिये बरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो. ॥ १५-८ ॥

*मराठी पद्य रुपी भावानुवाद –*
वारा वाहताना l निजसंगे नेतो l
वस्तूचा वास तो l दूरदूर ll
तद्वत जीवात्मा l त्यागता शरीरे l
मन व इंद्रिये l दूर नेतो ll
मिळता फिरून l त्याला नव देह l
मनेंद्रियासह l प्रवेशतो ll

*श्लोक ९*–
*श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च ।*
*अधिष्ठायं मनश्चायं विषयानुपसेवते ॥ १५-९ ॥*

*अर्थ* —
हा जीवात्मा कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मन यांच्या आश्रयानेच विषयांचा उपभोग घेतो. ॥ १५-९ ॥

*मराठी पद्यरुपी भावानुवाद –*
असा हा जीवात्मा l नेत्र,कर्ण,त्वचा l
नाक,मन,जिव्हा l वापरतो ll
ह्यांच्या वापराने l जीवात्मा तो मग l
विषयोपभोग l घेत असे ll

*श्लोक १०
*उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितम्‌ ।*
*विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः ॥ १५-१०ll*

*अर्थ* –
शरीर सोडून जात असता किंवा शरीरात राहात असता किंवा विषयांचा भोग घेत असता
किंवा तीन गुणांनी युक्त असताही (त्या आत्मस्वरूपाला) अज्ञानी लोक ओळखत नाहीत.
केवळ ज्ञानरूपी दृष्टी असलेले विवेकी ज्ञानीच तत्त्वतः ओळखतात. ॥ १५-१० ॥

*मराठी पद्यरुपी भावानुवाद–*
अशा जिवात्म्यास l ना जाणे अज्ञानी l
वसताना तनी  l वा सोडिता ll
विषयोपभोगी l असताना मग्न l
असुनी त्रिगुण l ओळखे ना  ll
ज्याला ज्ञान दृष्टी l आणि जो विवेकी l
तोच तो ओळखी l आत्मरुपा ll

****************************
 – ©️ माधव मनोहर जोशी
madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आजची कविता 

मकर संक्रांत
———–

शुभेच्छा

उत्तरेकडे कलतोय हळूहळू भास्कर
हिवाळ्याची शीतलता होतेय किंचित कमी
दिवस गरम करताना हसतोय दिनकर
शेतात डुलणारं, लगडलेलं धान्य देतंय हमी

आनंदला कृषिवल पाहुनी तिळाचं पीक
आभार मानी देवाचे, कृतज्ञतेचे भाव
गुळाचा गोडवा त्यात घालून मानवा शीक
हृदयीची ऊब, ठेव मनीं मधुर स्वभाव

मृण्मयीचं काळं रूप, सूर्याची प्रखरता
क्षमेची शीतलता, पण तापणारे ऊन
राबणारे हात, त्यात फुलणारी धवलता
साऱ्याचे स्वागत सृष्टी करते हसून

आभाळात झुंबड, उडे पतंगाची
जणू रंगबिरंगी खग करीती विहार
स्वप्नांची झेप दिगंतरी जाय मानवाची
निळ्या निळ्या निळाईत शोभती हार

मकर संक्रांत देती संदेश प्रेमाचा
दान द्यावे, पसरावी स्नेहाची हिरवळ
जसा प्रकाश होई पुढे तमोहराचा
मनोमनीं उमलू दे, तेजाचा परिमळ

– ©️ सौ.स्वाती वर्तक

खार ( पश्चिम )

मुंबई ४०० ०५२ 

swati.k.vartak@gmail.com

@@@@

पानांतूनी  हिरव्या झरला

सूर्य पिवळा पिवळा
वसंताच्या आगमनाचा
हा नेत्रदिपक सोहळा

पर्णिकांच्या पानांवर
करतो ऋतू स्वाक्षरी
घोस झुलते  सुवर्णाचे
लटकते फांदीस अंगूरी

रुप देखणे बहाव्याचे
नसे  गंधाची  बाधा
दरवळे अंतरी कृष्ण
फुले भासती राधा

ओघळल्या फुलांची मोहवी
अंगणी सोनसळी नक्षी
लक्षवेधती बहारदार
वृक्षावरचे हे पिवळे पक्षी

– ©️  प्रज्ञा करंदीकर,

बंगळुरु
pradnyakarandikar85@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

‘नोबेल’ समिती बनली अमेरिकेची बटीक !


पुढला पुरस्कार राहुल गांधीना ?

ज्याप्रमाणे संयुक्त राष्ट्रसंघ उर्फ ‘युनो’ ही संस्था गेली कित्येक वर्षं अमेरिकेच्या ओंजळीने पाणी पीत राहिली आहे, त्याचप्रमाणे नोबेल शांतता पुरस्कार समिती ही संस्था सुद्धा अमेरिकेची हक्काची ‘बटीक’ बनली आहे हे व्हेनेझुएलाच्या ताज्या घडामोडीवरून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. हे आजच होत आहे असं नव्हे. या प्रक्रियेला सुरुवात होऊन ५०-६० वर्षं सहज लोटली आहेत हे एकदोन ठळक उदाहरणांवरून दाखवता येऊ शकेल.

नोबेलची ‘विनोदी’ उदाहरणे
१९७३ साली व्हिएतनाम युद्ध संपुष्टात आणण्यासाठी जो ‘पॅरिस शांतता करार’ झाला होता, त्याबद्दल व्हिएतनामी मुत्सद्दी ली दु थो (Le Duc’ Tho) आणि कुविख्यात अमेरिकन युद्धखोर हेन्री किसिंजर यांना नोबेल शांतता पुरस्कार विभागून जाहीर करण्यात आला होता. यापैकी ली दु थो यांनी शांतता करार प्रत्यक्षात न आल्याबद्दल पुरस्कार नाकारून स्वतःचा प्रामाणिकपणा सिद्ध केला पण किसिंजर याने मात्र निर्लज्जपणे तो स्वीकारला होता.

१९९४ साली मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून विमान अपहरणाचा जनक म्हणून गाजलेला कुप्रसिद्ध पॅलेस्टिनी अतिरेकी यासर अराफत याला शांततेचा पुरस्कार देऊन नोबेल समितीने मोठाच विनोद घडवून आणला होता.

सगळ्यात कहर म्हणजे २००९ साली बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष बनले आणि त्यांनी कोणतंही कर्तृत्व सिद्ध न करताच नोबेल समितीने त्यांना शांतता पुरस्कार देऊन टाकला होता.

इतिहासातली अशी अनेक विनोदी उदाहरणे देता येऊ शकतील. पण आपण फक्त नजीकच्या वर्तमानकाळाबद्दल बोलू. जो जो अमेरिकेचा प्रतिस्पर्धी किंवा शत्रू असतो, त्याला कधीही हा पुरस्कार मिळालेला तुम्हाला आढळणार नाही. उदा. कोविडच्या काळात भारताने कित्येक लहानमोठ्या देशांना मोफत लस पुरवली आणि लाखो जीव वाचवले होते. पण मोदींना हा पुरस्कार मिळाला नाही. उलट अमेरिकेच्या शत्रूंचे जे जे कट्टर विरोधक असतात, त्यांना आवर्जून हा पुरस्कार दिला जातो. गेल्या पाच वर्षांत कुणाकुणाला पुरस्कार मिळाले हे पाहिलं की ही बाब स्पष्ट होईल.

गेल्या पाच वर्षांतले निवडक शांतता पुरस्कार
२०२१ साली दिमित्री मुराटॉव यांना हा पुरस्कार मिळाला. हे रशियन पत्रकार असून सातत्याने राष्ट्राध्यक्ष पुतीन अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कशी गळचेपी करत असतात ते टाहो फोडून सांगत असतात. रशियन सरकारनेही त्यांना आता ‘परदेशी हस्तक’ ठरवून टाकलं आहे ही गोष्ट वेगळी.

२०२२ मध्ये ‘मेमोरियल’ नांवाच्या रशियन संस्थेला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. ही संस्थासुद्धा रशियातलीच असून पुतीन सरकारविरोधात मानवी हक्कांसाठी लढत असते. या संस्थेबरोबरच ‘सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज’ या युक्रेनियन संस्थेलाही हा पुरस्कार विभागून देण्यात आलाय. युक्रेनच्या लोकांची रशिया  कशी गळचेपी करत आहे हे ही संस्था उजेडात आणत असते असं म्हणतात.  

२०२३ चा पुरस्कार नर्गिस मोहम्मद या इराणी महिलेला इराण सरकारविरोधात मानवी हक्क, स्त्री हक्क इत्यादीसाठी लढा उभारण्याबद्दल देण्यात आला होता. आज इराणमध्ये काय चालू आहे हे पाहिलं की यामागची कारणमीमांसा लक्षात येते.

२०२५ सालचा पुरस्कार मारिया मचाडो हिला देण्यात आला. ही बाई व्हेनेझुएलामधील विरोधी पक्षनेती असून गेली अनेक वर्षं त्या देशाचा अध्यक्ष निकोलस मादुरो याच्याशी झगडत राहिली आहे. अलीकडेच या मादुरोची उचलबांगडी करून अमेरिकेने त्याला कैद करून ठेवलं आहे हे पाहिलं की या घटनाक्रमामागील सूत्र लक्षात येतं.

पुढला संभाव्य पुरस्कार
तात्पर्य, नोबेल शांतता पुरस्कार समिती ही अमेरिकेची- किंवा नेमक्या शब्दांत सांगायचं तर अमेरिकेच्या ‘डीप स्टेट’ ची- बटीक बनली असून त्यांच्या इशाऱ्यावर पुरस्कार जाहीर करत असते हे उघड सत्य आहे. त्यामागे अमेरिकेचे हितसंबंध सांभाळणारा कुठलातरी राजकीय हेतू असतोच.

उद्या मोदींच्या “दडपशाहीला आणि हुकूमशाही राजवटीला धैर्याने तोंड देत संघर्ष चालू ठेवल्याबद्दल कणखर विरोधी पक्षनेता आणि भारतीय जनतेचा तारणहार” राहुल गांधी यांना हा पुरस्कार जाहीर झाला तर कुणी आश्चर्य वाटून घेऊ नये. बहुधा पुढल्याच वर्षी त्याना हा पुरस्कार जाहीर होईल अशी शक्यता निदान मला तरी वाटते.

– ©️ हर्षद सरपोतदार

  ०७-०१-२०२६

hsarpotdar1@gmail.com
(फेसबुक पोस्ट)

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

रुळावलेला

२४ तास रेल्वेशी बांधील असलेल्या अभियंत्याचे आत्मकथन 
लेख क्र. ३  

ट्रेनिंगमध्ये असे खूप ( Men/Machinary चे ) अनुभव आले. त्या विविध तांत्रिक पद्धतीचा दैनंदिन जीवनात सुधा खूपच उपयोग झाला.त्याचे एक वेगळेच पुस्तक होईल.असो.

Classroom आणि Field चे सर्व ट्रेनिंग झाल्यावर आमची  Seniority साठी नाममात्र परिक्षा झाली.माझ्या दुर्देवाने त्या वेळी महाराष्ट्रात (मुंबई,नागपूर,भुसावळ आणि सोलापुर)या ठिकाणी माझ्या पदाची रिक्त जागाच नव्हती. त्यामुळे  मला जबलपूर मंडल मधील NKJ ( New Katni  Junction Microwave) या ठिकाणी रुजू व्हावे लागले.

आता मी शिकाऊ उमेदवार नव्हतो; एक जबाबदार कर्मचारी झालो होतो. गमतीची गोष्ट म्हणजे तेथील माझे वरिष्ठ एका वर्षातच निवृत्त होणार होते आणि मीच त्यांच्या जागी येणार असे वातावरण झाले होते.सगळा कर्मचारी ५०-५५ वयाच्या पुढील होता .त्यात मी पडलो सगळ्यात लहान २६ वर्षांचा. २६ वर्षाच्या  तरुणाला ५०-५५ वयोगटातील स्टाफ कडून कामे करून घेणे म्हणजे मोठे आव्हानच होते आणि परत त्यांचा Incharge. त्यामुळे मला अतिनम्र होउनच त्यांच्या कडून कामे करून घ्यावी लागायची.वेळप्रसंगी त्यांची सगळी शिफ्ट Duty सुद्धा मीच करू लागलो. रोजच्या जेवणाकरता मी तेथीलच एक शुद्ध शाकाहारी जैन भोजनालयात जात होतो. इतर तंत्रज्ञांचीसुद्धा शिफ्ट Duty केल्यामुळे ते माझ्यासाठी बऱ्याच  वेळा घरचा डबा आणायचे त्यामुळे माझ्या भोजनालयात दांड्या  व्हायच्या. “हफ्ते में एक खाडा चलेगा, महिनेके चार खाडे का पैसे हम वापस देंगे, ज्यादा हो  गया तो पैसे नाही मिलेंगा” असा भोजनालयाच्या मालकाचा एक ठरलेला डायलॉग असायचा.( मला हा खानावळ मालक पु.ल दिग्दर्शित “गुळाचा गणपती” मधील दुकान मालक अण्णा मोरगावकर च वाटायचा). माझे जेवणाचे भरपूर खाडे व्हायचे. बर्याच वेळा माझे तंत्रज्ञ  कर्मचारी जेवण आणायचे त्यामुळे मला त्यांना नकारही देता येत नव्हता खरे म्हणजे वेगळ्या चवीचे जेवणही मिळायचे. कुठल्याच कामाला नाही म्हटल्यामुळे  त्या ठिकाणी २/३ महिन्यातच  मी पारंगत झालो. आणि Staff सुधा म्हणू लागले, “अपना नया लडका incharge खोचडा ( क्रुकेड  ) नही,अच्छा है”.

इकडील महाराष्ट्र मंडळामध्ये, बर्वे, आपटे, देशपांडे, आगाशे आणि कुलकर्णी  यांनी माझी  सूचक चौकशी सुरु केली. मी सोलापूरचा पत्ता देऊन मोकळा व्हायचा आणि सगळी क्षेपणास्त्रे तिकडे वळवयाचो. त्याला  आमच्या मातोश्री उत्तरे द्यायच्या.

काही दिवसांनी आमच्या Depot ची वार्षिक तांत्रिक तपासणी होणार होती. मुंबईहून  मध्य रेल्वेचे आमच्या विभागाचे प्रमुख येणार होते. मी बरेच रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक तपशील, तांत्रिक माहिती, योग्य ती Manuals, Chart करून ठेवले होतेच. उत्तम देखभाल केल्यामुळे उपकरणे सुद्धा उत्तम स्थितीत चालत होती. वेळच्या वेळी कामे केल्यामुळे मला व माझ्या Staff ला  इतका ताण आला नाही. तांत्रिक तपासणी ( Technical Inspection and Technical Audit ) झाली. उत्तम शेरा मिळाला आणि आमच्य Unit ला त्याकाळी(१९९२) २०००/ रुपये कॅश अवार्ड मिळाले. मला खूप बरे वाटले.

सोलापूरची आठवण यायची. माझ्या  मुंबईतील त्याच वरिष्ठ अधिका-यांनी माझ्याकडून बदलीसाठी अर्ज लिहून घेतला आणि कर्नाटकातील वाडी ( सोलापूरहून १४८ कि.मि) या ठिकाणी  समन्वय  निरीक्षकाची  ( Zonal Cordination Inspector) जागा आहे सांगितले. वाडी या ठिकाणी मध्ये रेल्वेची हद्द संपते, सोलापूर मंडल संपते आणि Secunderabad मंडल सुरु होते. आणि नवीन झोन म्हणजे दक्षिण मध्य रेल्वे सुरु होते  .मला आनंद झाला. मी लगेच  अर्ज दिला. २०/२५ दिवसांनी माझ्या  बदलीची order मुंबईहून निघाली.आनंदाने आणि दु:खाने  मी NKJ वरून जबलपूर आणि जबलपूरहून इटारसी आणि इटारसी हून कर्नाटक Express ने सोलापूर  निघायची तयारी केली.आमच्या Unit मधील लोकांना खूप खूप वाईट वाटले. कारण अडीअडचणीला तेथील शिफ्ट Duty आणि इतर तांत्रिक/अतांत्रिक कामे  आता त्यांनाच करावी लागणार होती. कारण त्यांचा पसारा आवरायला मी  नसणार होतो. स्टेशनवर सोडायला सगळा Staff आला . एवढी गर्दी पाहून स्टेशन मास्तर लगेच व्यवंस्थित यूनिफोर्म घालून मला  येऊन विचारू लागला, “सरजी, कोई बडा साब आय क्या ? सब ठीक तो है ? कुछ गडबड तो नही?” मी त्याला हसून म्हणालो, “सब ठीक है, मेरा ट्रान्स्फर मेरे गाव के नजदीक हो गया”, त्याने आनंदाने मिठी मारली, कारण तोही भूसावळहूनच  त्याच्या घरी( Hometown)  आला होता.

तेवढ्यात घाईघाईने जैन भोजनालयाचा मालक, ३ छोटीशी खोकी घेउन आला आणि मला म्हणाला, “आप ये जबलपूर मै खाईये, और ये इटारसी या सफर मै खाहिये”. माझ्या जेवणाची काळजी करणारा आईनंतर ही पहिलीच व्यक्ती होती. मला गहिवरून आले.  त्याला मी “पाय लागो” पद्धतीने  वाकून नमस्कार केला ,त्यानेही “खुश रहो हमेशा बेटा” असा आशीर्वाद दिला. त्याने माझ्यासाठी जेवण आणि मिठाई आणली होती. सगळ्यांशी जुळवून  घेतल्याचा मिळून मिसळून वागण्याचा मला फायदा झाला होता.माझ्यामुळे त्याला तिथे  फायदाच होत होता. छोट्या स्टेशन आणि गावामध्येच  खरी माया, ओलावा असतो. प्रेम, माया आणि दुष्मनी सुध्या  अगदी ठासून भरलेली असते.( NKJ हे स्टेशन साधरणपणे आपल्याकडील कुर्डूवाडी प्रमाणे होते.)  Corporate Culture Office  मधील कुटुंबात कोरडेपणा असतो. ट्रेन आली. स्टेशनवरील गर्दी पाहून  TC पण चक्रावला . साध्या  Passenger ट्रेनला एवढी गर्दी. मी गाडीत बसलो. TC ला  गर्दीचे कारण सांगितले  आणि जबलपुर (म प्र) हून  मी सोलापूरला निघालो. पुढच्या लेखात पाहूया, माझे सोलापूर आणि रेल्वे.

——————————————————————————————–इनोद
शिक्षक : राजू, सांग बरे, इंग्लंडमध्ये दळणवळणाची साधने पुष्कळ  का आहेत?( खरे उत्तर असते, औद्योगिक क्रांतीमुळे )
राजू: “ गुरुजी, इंग्लंडमध्ये ना  (अं,अं डोके खाजवत)  दळणवळणाची साधने पुष्कळ  आहेत, कारण तेथे वळणावर  वळणावर दळणा दळणाच्या गिरण्या आहेत ”. (राजू गिरणी मालकाचा मुलगा असतो.)
———————————————————————————————

एक सांस्कृतिक  एकांकिका आहे. कृपया ऐका गेल्या वेळी आपण उदैपूर कि ट्रेन ऐकली त्याचेच व्यासपीठावरील सादरीकरण आहे
https://youtu.be/t4P16DG87pw?si=YbX6ylwJ1nhFZz1H

– ©️ हेमंत कुलकर्णी 

ssehemant@gmail.com 

CVI (S&T)/ CSMTVigilance Branch C.R Mumbai

Mob:9004417957Rly:01054738 

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

धरतीची जन्मकथा

भूगोलाचा इतिहास : ४२

कल्पनेला स्वप्न पडले
चेतनेला जाग आली
काळाच्या काळजात
झंकार उमटला
जेव्हा पृथ्वीचा जन्म झाला.
– आलोक

पृथ्वीच्या जन्मासंबंधी प्राचीन काळापासून जगभर  विविध कथा कल्पना प्रचलित होत्या. उदा. भारतीय पुराणात पृथु नावाच्या राजाने तिला मुलगी म्हणून स्वीकारले म्हणून तिला ‘पृथ्वी’ म्हणतात. एका कथेनुसार दुर्गादेवीने मधु आणि कैटभ या राक्षसांचा संहार केल्यानंतर त्यांच्या मेदापासून पृथ्वी निर्माण झाली म्हणून तिला ‘मेदिनी’ म्हणतात. अजून एका कथेनुसार विष्णूंच्या नाभीपासून उत्पन्न झालेल्या कमळावरील ब्रह्मदेवाने त्या कमळाची विभागणी तीन भागात केली. स्वर्ग, आकाश आणि पृथ्वी. ग्रीक पुराणकथेत सृष्टीच्या आरंभी फक्त अंधार होता. त्यात निक्स नावाच्या पक्षाच्या एक सोनेरी अंड्यातून प्रेमदेवता इरॉस बाहेर पडली. अंड्याच्या वरच्या भागाचे आकाश बनले व खालच्या भागाची पृथ्वी बनली. बायबलनुसार देवाने ७ दिवसात विश्व निर्माण केले. तेव्हा पहिल्या दिवशी स्वर्ग व पृथ्वीची निर्मिती केली. आयर्लंडमध्ये जेम्स अशर या नावाचे ख्रिश्चन आर्चबिशप होऊन गेले. त्यांनी तर पृथ्वीची निर्मिती चार हजार वर्षापूर्वी झाली, असे ओल्ड टेस्टामेंटचा आधारे १६५० मध्ये एका पुस्तकात  जाहीरच केले. पण पृथ्वीवरील सर्वात प्राचीन खडकाचे वय ४३० कोटी वर्षे आहे. म्हणजे पृथ्वी त्याच्याही आधी निर्माण झाली असावी, हे उघड आहे. या विषयासंबंधी असा वास्तव व शास्त्रीय विचार अठराव्या शतकापासून सुरू झाला.

१७५४ मध्ये काम्प्ट द बफन या शास्त्रज्ञाने मांडलेला टक्कर सिद्धांत ( Collision theory) हा या दिशेने केलेला पहिला प्रयत्न होता. त्यांच्या मते पूर्वी सूर्य एक अतिविशाल वायुरूप गोल होता. त्यावेळी त्याची टक्कर एका विशाल तार्‍याशी झाली. या टकरीत दोघांच्या पृष्ठभागावरील द्रव्याचे लहान-मोठे थेंब अंतराळात उडाले व थंड होऊन त्यांचे ग्रह बनले. त्यापैकीच एक आपली पृथ्वी. यानंतर इमॅन्युएल कांट या जर्मन तत्वज्ञाने १७५५ मध्ये सूर्यमालेच्या निर्मितीसंबंधी काही कल्पना मांडल्या. कान्ट यांच्याच कल्पनेचा विकास करून लाप्लास या प्रसिद्ध फ्रेंच गणितज्ञाने १७९६ मध्ये एक सिद्धांत मांडला. तो ‘अभ्रिका गृहीतक'(Nebular hypothesis) म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानुसार पूर्वी सूर्य हा अतिप्रचंड, तप्त विशाल वायूमेघ किंवा अभ्रिकेच्या (Nebula) रूपात होता. तो वेगाने फिरत थंड होताना त्याची स्वतःभोवती फिरण्याची गती वाढत गेली. वाढत्या परिवलन गतीमुळे केंद्रत्यागी बल वाढत गेले. त्यामुळे या अभ्रिकेतील द्रव्य दूर फेकले गेले. त्या द्रव्याचे तुकडे पडून व ते थंड होऊन पृथ्वी व  ग्रह निर्माण झाले.

पुढे अमेरिकेच्या थॉमस चेंबरलेन व फॉरेस्ट मोल्टन यांनी १९०५ मध्ये ग्रहकणिका सिद्धांत (Planetismal theory) नावाचा सिद्धांत मांडला. त्यानुसार एक वेगाने जाणारा तारा सूर्याच्या जवळून पण त्याच्यावर न आदळता गेला. त्या तार्‍याच्या गुरुत्वाकर्षणामुळे सुर्यावरील वायूच्या धाग्यासारख्या शाखा ओढल्या गेल्या. त्या धाग्यामधील वायू थंड होऊन धनरूप ‘ग्रहकणिका’ तयार झाल्या. अशा अनेक ग्रहकणिकांच्या एकत्रिकरणातून ग्रह तयार झाले व सूर्याभोवती फिरू लागले. त्यापैकीच एक पृथ्वी होय. पुढे १९१९ मध्ये सर जेम्स जीन्स व जेफ्रिज या दोन इंग्रज शास्त्रज्ञांनी ‘भरती सिद्धांत'(Tidal theory) नावाचा एक सिद्धांत मांडला. त्यात असे मानले आहे की दुसऱ्या एका ताऱ्यामुळे सूर्यावरील द्रव्याला भरती येऊन त्याचा काही भाग सूर्यापासून वेगळा झाला. या वायुरूप धाग्यातील वायू थंड होऊन त्याचे प्रथम द्रवरूप गोळे बनले व ते थंड होऊन ग्रह बनले. या सिद्धांतानुसार सूर्यापासून बाहेर पडणाऱ्या धाग्याचा आकार सिगारसारखा मध्यभागी फुगीर व दोन्ही बाजूस निमुळता होता. त्याचे क्रमाने लहान तुकडे झाले व ग्रह बनले. याचमुळे सूर्यमालेतील ग्रहांचे आकारही बुधापासून गुरुपर्यंत मोठे व पुढे क्रमाने लहान होत गेले आहेत.

याशिवाय पृथ्वीच्या उत्पत्तीसंबंधी इतरही अनेक सिद्धांत मांडले गेले. उदाहरणार्थ रसेल यांचा जोडतारा सिद्धांत (Binary star theory)रॉस व गन यांचा विखंडन सिद्धांत (Fission therory), ए.सी. बॅनर्जी यांचा सिफाईड सिद्धांत ( Cefied theory), फ्रेड होईल व आर. ए. लिटिलटन यांचा नवतारा सिद्धांत ( Nova theory), डॉक्टर आल्फवेन यांचा विद्युतचुंबकीय सिद्धांत  ( Electromagnetic theory) इ. 1940 ते 50 या दशकात संघनन सिद्धांत ( Condensation theories) या नावाने पृथ्वीच्या उत्पतीसंबंधी काही स्पष्टीकरणे मांडली गेली. ती बऱ्याच प्रमाणात स्वीकारली गेली.

वरील सर्व सिद्धांत वेगवेगळ्या पद्धतीने सूर्यमाला व पृथ्वीच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण देतात. प्रत्येक सिद्धांतात काही महत्त्वाचे मुद्दे असले तरी प्रत्येकात काही उणीवाही आहेत. पण हे सर्व विचारमंथन आणि भूशास्त्रीय पुरावे, यामधून काही मुद्द्याबाबत शास्त्रज्ञांमध्ये एकवाक्यता निर्माण झाली. ते मुद्दे असे. पृथ्वीची उत्पत्ती सूर्यमाला व इतर ग्रहांसोबत एका अभ्रिकेसारख्या वायुमेघापासून (nebula) झाली. उत्पत्तीनंतर केव्हाही पृथ्वी द्रवरूप नव्हती. ती मुळात अतिशीत होती पण किरणोत्सर्ग प्रक्रिया व हरितगृह परिणामामुळे तिचे तापमान वाढत गेले.

एकूण पृथ्वीच्या उत्पतीसंबंधीचे सध्या मान्य असे स्थूल चित्र पुढीप्रमाणे आहे. पृथ्वीची उत्पत्ती एकाच ताऱ्याच्या उद्रेकातून झाली. त्या तार्‍याचा स्फोट झाला व त्याचे बरेच द्रव्य अंतराळात विखुरले गेले. मागे राहिलेल्या द्रव्याचे रूपांतर एका अभ्रिकेत झाले. ही अभ्रिका स्वतःभोवती फिरत असताना आकुंचन पावू लागली व तिच्या केंद्रीय भागाचे रूपांतर सूर्यात झाले. त्याच्याभोवती विविध अंतरावरून धूळ व वायू यांचे समुच्चय फिरत होते. त्यांचे संघनन  होऊन पृथ्वी व इतर ग्रह तयार झाले.

पृथ्वीच्या जन्माची घटना सुमारे ४५० ते ४६० कोटी वर्षांपूर्वी घडली हे आता जवळपास मान्य झाले आहे. वायूने घेरलेला एक जलविरहित व खडकाळ समुच्चय हे पृथ्वीचे सुरवातीचे रूप होते. खडकामधील किरणोत्सारी पदार्थ व अंतर्भागातील वाढता दाब यामुळे उष्णता वाढू लागली व तिचे अंतरंग वितळू लागले. अशा प्रकारे द्रवरूप गाभा व भोवताली खडकांचे शिलावरण तयार झाले. उत्पत्तीनंतर पहिल्या १०० कोटी वर्षात पृथ्वीवर जलावरण व वातावरण तयार झाले. शिलावरण प्लेट्सच्या हालचाली व भूखंड अपवहन होऊन खंड तयार होऊ लागले.

एकीकडे हे सर्व होत असताना 250 कोटी वर्षांपूर्वी केव्हातरी पहिले सजीव आणि नंतर त्यातून प्राणी व वनस्पती निर्माण झाले. त्यांच्यात उत्क्रांती होत, लाखो प्रकारांनी बहरलेली जीवसृष्टी भूतलावर नांदू लागली. एकेकाळचा खडकांचा एक विशाल समुच्चय. उष्ण वितळणारे अंतरंग, उल्कांचा मारा, ज्वालामुखींचे उद्रेक आणि तप्त लाव्हारसाचे पाट, अशा भयंकर अवस्थेत ही धरणी लाखो वर्षे होती. पण पुढे  जीवसृष्टीच्या विकासामुळे ती विश्वातील एकमेव जीवधारी ग्रह व चैतन्यमयी भूमाता बनली.

अशी आहे लाखो सजीवांना आणि आपल्या मानव जातीला जन्म देणाऱ्या आपल्या भूमातेच्या जन्माची कहाणी.

– ©️ एल. के. कुलकर्णी

lkkulkarni. nanded@gmail.com
सोबतचे चित्र : पृथ्वी व सुर्यमालेची निर्मिती – संघनन सिद्धांत ( इंटरनेटवरून साभार )

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

बाजीराव- मस्तानी आणि पेशवे घराण्याचा इतिहास

भाग ४/७

आता आपण बाजीराव- मस्तानी आणि त्यांच्या वंशजांची माहिती घेऊया…..

कहाणी बाजीराव मस्तानीची
एक गोष्ट खरी आहे की अजूनही पहिले बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्याबद्दलची लोकांच्या मनातली उत्सुकता काही कमी होत नाहीये. अजूनही लोक तिचे समाधीस्थळ, तिचा मस्तानी महाल, शनिवारवाडा, इ. गोष्टी पहायला जातात. पहिले बाजीराव पेशवे यांचा मृत्यू होऊन यंदा २८५ वर्ष झाली. तरीही त्या दोघांवर २०२४ साली चित्रपट काढावासा वाटतो हे विशेष आहे.

“मी मस्तानी हिंदुस्तानी, बुंदेली पेहराव,
झिरझिरवाणी निळी ओढणी, वाळ्याचा शिडकाव
तुम्ही माझे बाजीराव…

बाजीराव मस्तानी ही एक अजरामर प्रीतीकथा असल्यासारखे आजपर्यंत सर्वांनी या प्रकरणाकडे पाहिले. यावर हे वरील गीत ग. दि. माडगूळकरांनी “वैजयंता” या जुन्या मराठी चित्रपटात लिहिले होते.
पण अद्यापही बऱ्याच जणांना बाजीराव – मस्तानीच्या पुढच्या पिढ्यांचे काय झाले?  ते काय करतात ? ते कुठे असतात?  याबद्दल काहीच माहिती नाही. त्यांच्याविषयी जाणून घेण्याआधी बाजीराव- मस्तानी यांच्याविषयी थोडेसे:-

बाजीराव-मस्तानी भेट कुठे झाली
बाजीराव आणि मस्तानी यांची भेट कुठे झाली हे निश्चितपणे सांगता येणार नाही. मस्तानीबाबतच्या अनेक आख्यायिका सापडतात. इतकेच नव्हे तर मस्तानीच्या नाजूक सौंदर्याचीही अतिशयोक्ती केलेली आढळते.

“बुंदेलखंडाचा महाराजा” “छत्रसाल बुंदेला” हा छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानत असे. त्यांच्याप्रमाणे वागून त्याने मुघलांचा वेळोवेळी पराभव करून आपले राज्य स्वतंत्र ठेवले होते. पण अचानक मुहम्मदशाह बंगशने डिसेंबर सन १७२८ मध्ये जैतपुरजवळ वृद्ध छत्रसालचा पराभव केला. मराठा आणि राजपूत यांच्यात वेळप्रसंगी एकमेकांना मदत करण्याचा पूर्वी करार झाला होता. त्या करारानुसार छत्रसालाने बाजीरावाकडे लष्करी मदत मागितली. १७२९ साली बंगशविरुद्धच्या मोहिमेत बाजीरावाच्या देदीप्यमान यशामुळे खुश होऊन, छत्रसालने मस्तानीला बाजीरावाला अर्पण केली. मस्तानी ही छत्रसालाची एका इराणी वंशाच्या उपस्त्रीपासून झालेली मुलगी असे म्हणतात.  

असेही सांगतात की “बंगशचा” पराभव केल्यानंतर “छत्रसाल” आणि “बाजीराव” यांची छत्रसालाच्या दरबारात भेट झाली. त्यावेळी बाजीरावांचे मर्दानी देखणे रूप पाहून मस्तानी त्यांच्यावर मोहित झाली.
मस्तानीच्या कुलाबाबत अनेक प्रवाद असले तरी ती महाराजा छत्रसाल यांची अनौरस कन्या होती हे बहुजनमान्य आहे. महाराजा छत्रसाल हे प्रणामी  पंथाचे असल्याने त्यांच्या राज्यात विशिष्ट धर्माची सक्ती नव्हती.
मस्तानी मुसलमान बीजाची एवढ्यावरूनच ती मुसलमान गणली गेली. पण खरं तर हिंदू राजाची मुलगी असल्याने पैतृक समाजव्यवस्थेनुसार मस्तानी हिंदूच होती. आणि बाजीराव तर हिंदूच होता.. त्यामुळे कुठच्याही अंगाने मस्तानी आणि बाजीराव – मस्तानी यांची मुले देखील हिंदूच ठरतात.

मस्तानी बाजीरावांकडे आली तेव्हा १४/१५ वर्षाची असेल. पुढे ती पुण्यात ब्राह्मणी घरात, ब्राह्मण पतीजवळ एकनिष्ठने राहिली. तिने ब्राह्मणांचे भाषा, पेहराव, आदी व्यवहार स्वीकारले. ती संस्कृतीने हिंदू बनली होती.
मस्तानी ही अश्वरोहणात विशेष कुशल होती. बाजीरावांप्रमाणे तलवार- भाला घेऊन ती त्यांच्याबरोबर भरधाव घोडदौड करी, त्या तीव्र वेगात उभयतांच्या रिकिबी यत्किंचितही मागेपुढे होत नसत. अनेक मोहिमेत ती बाजीरावांसोबत होती.

मस्तानीची आई इस्लामधर्मिय होती हे नक्की. तथापि तिची जन्मकथा अगदी ठामपणे सांगता येत नाही पण, तिची जन्मदाती आई ही बहुदा इराणी वंशाची असावी असे म्हणतात. “मस्तानी” या शब्दातील मूळ फारशी शब्द “मस्तान” असून ते विशेषण आहे. त्याचा अर्थ गुंग,धुंद, मस्त, आकर्षक असा आहे. त्याचे स्त्रीलिंगी रूप “मस्तानी” म्हणजे “धुंदी आणणारी” असा आहे. यावरून छत्रसालाचे अनौरस मुलगी मस्तानी हिचे “मस्तानी” नाव तिच्या बालपणापासूनच्या मोहक रूपामुळे पडले असणे शक्य आहे. तिचे मूळ नाव कदाचित वेगळे असू शकेल. मस्तानीचे  जन्मसाल आणि जन्मस्थान उपलब्ध नाही पण, १७२९ साली ती नुकतीच तारुण्यात पदार्पण करत होती यावरून ती त्यावेळी, १५/१६ वर्षाची असावी. म्हणजे तिचा जन्म १७१४ च्या आसपासचा असावा. बाजीराव १७०० साली जन्मले.

मस्तानी” या शब्दाभोवती काहीतरी गुढवलय असल्याची  भावना लोकांच्या मनात आहे. “एक अजरामर प्रीतीगाथा” अशाप्रकारे मस्तानी आणि थोरले बाजीराव ह्यांच्यातील संबंधांची मांडणी करण्याचे खरतर काहीच कारण नाही.
त्याकाळी अवांछनीय कागदपत्रे गैर माणसांच्या हाती लागून त्याचा दुरुपयोग होऊ नये, तसेच राजकारणाच्या उलाढालीत स्त्रीवर्गाला त्रास होऊ नये म्हणून तशी कागदपत्रे लगेच नष्ट केली जात असत. मस्तानीचा उल्लेख असलेली कागदपत्रे अशाच प्रकारे नष्ट केली असावीत. उत्तर पेशवाईत खुद्द दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी १८१२ साली व्यक्तिगत वैराखातर शनिवारवाड्यातील मस्तानी महाल व पाबळचा वाडा उध्वस्त केले होते. त्यावेळी अनेक कागदपत्रे, दप्तरे नष्ट झाली होती. शिवाय शनिवारवाड्यात १७९१ पहिल्यांदा आग लागली तद्नंतर, आणखी ७ आगींचे उल्लेख मिळतात. आगी आणखी पसरू नयेत यासाठी काही बांधकामे पाडावी लागली. २१ फेब्रुवारी सन १८२८ ला सर्वात मोठ्या आगीत नगारखाना, नानासाहेबांचा जुना आरसेमहाल, यासह काही किरकोळ इमारती वगळता, बहुतेक सगळे बांधकाम हे भस्मसात झाले.

मस्तानीविषयी अधिक तपशील मिळत नाहीत, त्यामागे हीच कारणे असावीत.
मस्तानीचा प्रत्यक्ष उल्लेख असलेल्या अस्सल (त्रोटक) नोंदी सुमारे २० आहेत. त्यात सविस्तर तपशील नाही. दोन-तीन वाक्यांच्या नोंदीच  जास्ती आहेत.  इतकेच नव्हे तर मस्तानीचे समकालीन असे चित्रही उपलब्ध नाही. त्यामुळेच मस्तानीचा विचार करताना ही सगळी वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे.

मस्तानी – बाजीराव विवाह हा अद्यापही न उलगडलेला कूटप्रश्न आहे. पण त्यावेळेच्या “खांडा विवाह” पद्धतीनुसार त्यांचा विवाह झाल्याचे मानले जाते.
मस्तानीबद्दल दोन उल्लेख आढळतात — पेशव्यांकडे “गणपती उत्सव” व “कृष्णाष्टमीच्या उत्सव” या दोन प्रसंगी मस्तानी नृत्य – गायन पेश करत असे. तो पूजाविधीचा एक भाग आणि प्रकार होता. मधुराभक्तीचा तो प्रकार होय. राजनर्तकीने किंवा नायकिणीने एखाद्या राजदरबारात नृत्य पेश करावे तसा हा हलक्या  प्रतीचा नृत्याविष्कार नव्हे.

बाजीरावाची प्रथम पत्नी काशीबाई आणि मस्तानी यांच्यात वितुष्ट नव्हते. बाजीरावाची आई राधाबाई किंवा चिमाजीअप्पा यांनी मस्तानीचा व्यक्तिगत राग किंवा द्वेष केला असे इतिहासात कुठेच दिसत नाही. त्यांना कठोर व्हावे लागले ते राज्यहितासाठी. शनिवारवाड्यात बाजीराव पेशव्यांनी स्वतंत्र महाल बांधून मस्तानीची राहण्याची स्वतंत्र सोय केली  यामुळे लोकमत विशेष प्रक्षुब्ध झाले. राज्यकर्ते घराणे असल्यामुळे मस्तानीमुळे पेशवे परिवारात उठलेला वाद, कौटुंबिक पातळीवर मर्यादित न राहून, या प्रकरणाला सार्वजनिक स्वरूप आले.

पण तरीही या लोकापवादाला खतपाणी मिळताय, या प्रकरणाला वेळेवर आवर घालायला पाहिजे, अशी राधाबाई आणि चिमाजीअप्पा यांची भूमिका होती. समशेरबहाद्दरबद्दल बाजीरावांना सुरुवातीपासूनच फार आपुलकी वाटत असे. हे अपत्यप्रेमच राज्याचा घात करील आणि भविष्यकाळात समशेरबहाद्दर राज्याचा वाटा मानू लागला तर, स्वराज्याचे अस्तित्व धोक्यात येईल हीच या    माता – पुत्रांना खरी भीती वाटत होती. याशिवाय परकीय शत्रू या परिस्थितीचा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यहितासाठी ही संभाव्य संकटपरंपरा टाळणे आणि म्हणूनच मस्तानी आणि बाजीराव यांचा एकमेकांशी असलेला संपर्क तोडणे आवश्यक होते. या जाणीवेतून राधाबाई आणि चिमाजीअप्पा यांनी कठोरपणा पत्करला असावा.

उपलब्ध कागदपत्रावरून पेशवे परिवारात मस्तानीच्या संदर्भात वादंगाला नोव्हेंबर सन १७३७ पासून उग्र स्वरूप आले असे दिसते.
बाजीराव मोहिमेवर असताना मस्तानीला कसे वागवावे हा प्रश्न निर्माण होऊ लागला आणि स्वतःच्या जबाबदारीवर काहीच निर्णय घ्यायचा इतरांना अधिकार पोहोचत नव्हता. शेवटी पुण्याच्या कारभाऱ्यांनी शाहू महाराजांना सविस्तर हकीकत कळवून योग्य तो आदेश देण्याची विनंती केली. त्याप्रमाणे शाहू महाराजांनी कळवले की, “ज्याची वस्तू त्यास द्यावी आणि त्यांचे समाधान करावे. त्यांना पश्चात होईल तेव्हा ते टाकून देतील.” त्यामुळे पुण्यात मस्तानीला साध्या कैदेत टाकण्याचा विचार सुरू झाला. सरतेशेवटी नानासाहेबांनी बाजीराव पुण्यात नसताना, चिमाजीअप्पांच्या सल्ल्यावरून मस्तानीला युक्तीने २६ जानेवारी सन १७४० रोजी कैद केले. आणि त्यासंबंधीचे पत्र चिमाजीअप्पांना पाठवले. या कैदेत मस्तानी सुमारे तीन महिने असावी.

पेशवा परिवारात या घडामोडी होत असताना, निजामाच्या परिवारातदेखील काही घडामोडींनी वेग घेतला होता, निजाम दिल्लीपती मोहम्मदशाहाला भेटायला गेलेला असताना, त्याच्या सहा मुलांपैकी एकाने म्हणजे, नासिरजंगने  बंड पुकारले होते. आणि स्वतःला दख्खनचा सर्वाधिकारी म्हणून घोषित केले होते. या घडामोडींचा लाभ उठवण्यासाठी काहीशा उद्विग्न परिस्थितीतच थोरले बाजीराव ०१ नोव्हेंबर १७३९ रोजी नासिरजंगविरुद्ध, जंगी मोहिमेवर रवाना झाले. या मोहिमेत नासिरजंगचा पराभव झाला व २७ फेब्रुवारीला तह झाला. त्यानंतरच्या पुढच्याच आठवड्यात ०३ मार्चला बाजीराव आणि नासिरजंग यांची “वरखेडे” मुक्कामी सदिच्छा भेट झाली. त्यावेळी चिमाजीअप्पा देखील हजर होते. या काळात चिमाजीअप्पांची बाजीरावांशी  मस्तानीच्या संदर्भात खूप सविस्तर बोलणी झाली. यासंदर्भात चिमाजीअप्पांनी पुण्याला  २९ मार्च १७४० ला एक पत्र पाठवले आणि त्यात त्यांनी असे लिहिले होते की “त्यांचे प्राक्तनी असेल ते सुखरूप होऊ. आपण निमित्त घ्यावे असे नाही. पुण्याला गेल्यावर तिची रवानगी त्याचकडे करावी. त्यांचे प्राक्तनी असेल ते होईल ते ऐसा विचार केला आहे….” या मजकुरावरून बाजीरावांची  आणि चिमाजीअप्पांचीही मनस्थिती चांगली स्पष्ट होते. त्यानंतर चिमाजीअप्पा पुण्याला आले. आणि बाजीराव “खरगोण” प्रांताच्या जहागिरीची व्यवस्था लावण्यासाठी तिकडे रवाना झाले.

या काळात झालेली दगदग, आधीपासून झालेला मनस्ताप, यामुळे मोहीम संपत आलेली असताना, बाजीरावांची प्रकृती बिघडू लागली. एकूण प्रकृतीचा विचार करून त्यांनी पिलाजी जाधव आणि इतर सरदारांना मोहिमेच्या पुढच्या टप्प्यावर रवाना केले. आणि ते स्वतः खरगोण, हंडीया या प्रदेशांची व्यवस्था पाहायला गेले. बाजीरावानी मुहूर्त पाहून २३ मार्चला खरगोण प्रांतात प्रवेश केला. ०५  एप्रिलपासून त्यांचा मुक्काम “रावेरखेडी” येथे होता. इकडे चिमाजीअप्पा वरखेडयाहून निघाल्यापासून १० एप्रिलला पुण्याजवळ लोहगावला पोहोचले. रावेरखेडी मुक्कामी २० एप्रिलपासून बाजीरावांची तब्येत जास्तच बिघडू लागली. आणि त्यांच्या प्रकृतीला उतार पडेना. तेव्हा ही हाकिकत पुण्याला सविस्तर कळवली गेली. बातमी समजताच नुकताच मुंज झालेला मुलगा जनार्दन यांच्यासह काशीबाई रावेरखेडीच्या दिशेने रवाना झाल्या. बाजीरावांच्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून रावेरखेडी येथे २३ एप्रिलपासून धर्मादाय आणि अन्य धार्मिक कृत्ये  होऊ लागली. औषधोपचारही चालू होते. पण गुण येत नव्हता. याच दिवशी जनार्दन आणि काशीबाई पोहोचले. बाजीरावांची प्रकृती अधिकच ढासळत गेली. २६ एप्रिलला ते बेशुद्ध झाले. आणि अखेरीस त्याच अवस्थेत २८ एप्रिलला पहाटे बाजीरावांची जीवनयात्रा संपली.

( यंदाच्या २८ एप्रिल रोजी बाजीराव पेशवे यांची पुण्यतिथीचा कार्यक्रम नेहेमीप्रमाणे रावेरखेडी येथे आयोजित करण्यात आला. त्याची काही छायाचित्रे खाली दिली आहेत. फोटो सौजन्य: बाजीराव पेशवे (प्रथम) प्रतिष्ठान, खरगोण, मध्यप्रदेश.
नारायण केशव बेहेरे यांचे “पहिले बाजीराव पेशवे” या नावाचे  पुस्तक मे १९३० प्रसिद्ध झाले. हे पुस्तक त्यांना का लिहावेसे वाटले याबाबत बेहेरे लिहितात, “थोरल्या बाजीराव पेशव्यांची पुण्यतिथी समारंभाने साजरी करण्याचा उपक्रम इंदुरातून झाला. ही गोष्ट पेशवे व होळकर या घराण्याचा जो पूर्वापार प्रेमाचा व घरोब्याचा संबंध आहे त्याला अनुसरूनच आहे. नर्मदा नदीच्या काठी, रावेरखेडी येथे हा उत्सव प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो. या उत्सवामुळे बाजीरावचे विस्तृत चरित्र लिहिण्याची कल्पना मनात उद्भवली.” याचा अर्थ सन १९३० च्या आधीपासूनच रावेरखेडी येथे पहिले बाजीराव पेशवे यांची पुण्यतिथी साजरी करण्याचा उपक्रम चालू होता असे लक्षात येते.)

(क्रमश:)

© अ‍ॅड. क्रांती आठवले-पाटणकर
डोंबिवली.
9969087559
०१.०५.२०२५
(सदर लेखमाला माझ्या नावासह अग्रेषित करायला हरकत नाही.)

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

संस्कृत श्लोक व सुभाषिते

क्रमांक ३ : कृष्णस्तुती

आपण तीन प्रार्थना पाहिल्या. अजूनही बऱ्याच प्रार्थना आहेत. वंदे मातरम् ही प्रार्थनाच आहे आणि  विंझेंच्या ह्या संग्रहात ती आहे. आज आपण देवाची स्तुती करणारे दोन श्लोक पाहू. पहिला श्लोक आहे तो फारच प्रसिध्द आहे. विशेषत: दक्षिणी राज्यांत तो जास्त म्हटला  जातो. तो कृष्णाची स्तुती करणारा आहे. तो जप करायलाही म्हटला जातो. काही जण रोजच्या पूजेतही म्हणतात. तो असा—-

करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तम् ।
वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दम् मनसा स्मरामि॥

विंझे ह्यांनी केलेला त्याचा काव्यमय अनुवाद

करकमलीं पदकमलां मुखकमलीं चुंबिण्यास जो धरितो ।
निद्रित वट पत्रावर, मुकुंद, तो बाल मी मनीं स्मरतो ॥

सुलभ अर्थ – वडाच्या पानावर निजून, हातांनी पाय आपल्या तोंडात घालणाऱ्या बालमुकुंदाचे मी मनाने स्मरण करतो.

नुकतीच कृष्णजन्माष्टमी आणि दहीकाला, दहीहंडी उत्सव होऊन गेलेत. श्रीकृष्णाची महती सांगणारे, वेगळेपण सांगणारे अनेक मजकूर तुम्ही व्हॅाटसॲप किंवा इतरत्र वाचलेच असतील. श्रीकृष्णाची बालपणापासून ते मरणापर्यंतची अनेक रूपे तुम्ही ह्यापूर्वीही वाचली असतील, ऐकली असतील. त्या सर्वांतलं मनमोहक रूप आहे ते बालमुकुंदाचं! अजून बाळ रांगत नाही आहे. उपडी तरी होतेय का? बहुतेक नसावे ! पण पराक्रम तेव्हाही थोरच. कंसाने त्याला मारायला पाठवलेल्या पूतना राक्षसिणीलाच त्याने यमसदनी पाठवले होते. पण बालक निरागस आहे. वडाच्या पानावर बाळ उताणे झोपलेयं आणि आपलाच पाय हातांनी धरून पायाचा अंगठा चोखतेय. अरविंद म्हणजे कमळ. संस्कृतमध्ये कमळाची उपमा हात, पाय, डोळे, वदन,  सर्वांनाच दिली जाते. कविने श्लोक रचतांना त्याचा मोठा कौशल्याने उपयोग करून घेतलाय आणि श्लोकात नादमाधुर्य निर्माण केलेय. कर, पद, मुख ह्या शब्दांना जोडताना रूपक अलंकार वापरला आहे. कर हे कमलासमान ही उपमा होते पण करकमल म्हणजे कर हेच कमल म्हटले की तो रूपक अलंकार होतो. तीनही शब्द रूपक अलंकार वापरून ‘अरविंद’ ह्या एकाच शब्दाला जोडलेत. नंतर विनिवेशमध्ये दोन व असल्याने पहिल्या चरणांत सर्व शब्दांमध्ये व आलेला आहे. दुसऱ्या चरणांत कृष्णाच्या अनेक नावापैकी मुकुंद हे नाव पहिल्या चरणांतील शब्दांशी साधर्म्य असणार निवडले आहे.

मराठी काव्यमय अनुवादासाठी “आर्या” हे वृत्त श्री विंझे ह्यांनी वापरले आहे. आर्या वृत्तात पहिल्या व तिसऱ्या चरणांत १२ मात्रा व दुसऱ्यांत १८ तर चौथ्यांत पंधरा मात्रा असाव्यात, असा नियम आहे. पूर्वीच्या पंडित कवींनी आर्या वृत्ताचा खूप उपयोग केला आहे. बरेच किर्तनकार आर्या वृत्तांतील पदांचा किर्तनात सढळ वापर करतात व ठसक्यात म्हणतात. मात्रा म्हणजे काय, असा प्रश्नही मनात येऊ शकतो. तर कवितेच्या चरणातील शब्दांच्या अक्षरांची गणना. काव्यामध्ये, “मात्रा” म्हणजे अक्षरांचा उच्चार करण्यासाठी लागणारा वेळ किंवा कालावधी. लघु (ऱ्हस्व) अक्षरासाठी एक मात्रा आणि गुरु (दीर्घ) अक्षरासाठी दोन मात्रा मोजल्या जातात. मात्रा मोजून काव्याची लय आणि वृत्त (छंद) ठरवला जातो.

श्लोकाबद्दल लिहितांना जरी मी निवड केली, शब्दयोजना केली, असे म्हणत असलो तरी काव्यरचना ही बरेचदां उत्स्फूर्त असते. मुद्दाम केली जात नाही. विद्वान आणि बहुश्रुत व्यक्तीला जे स्फुरते, त्यांत असे शब्द आपोआप येणारच. हा श्लोक मार्कंडेय ऋषींच्या बाल-मुकुंद अष्टकम् मध्ये आहे. मार्कंडेय ऋषि हे प्रदीर्घ काल जीवित रहाणारी पुराणकालीन व्यक्ती म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांच्या पित्याने पुत्रप्राप्तीसाठी शिवाची आराधना केली. शंकराने प्रसन्न होऊन त्याला एक पुत्र होईल असा आशीर्वाद दिला. परंतु त्याला ‘अल्पवयीन सद्गुणी व धार्मिक पुत्र’ किंवा ‘मूर्ख व नीच वर्तन करणारा दीर्घायुषी पुत्र’ ह्यांतील एकाची निवड करण्यास सांगितले. पित्याने धार्मिक आणि सद्गुणी पुत्राची निवड केली. त्यानुसार मार्कंडेय केवळ सोळा वर्षे आयुष्य घेऊन जन्मले. समज आल्यापासून त्यांनी शिवाची तपस्या केली. सोळा वर्षे पूर्ण होतांच शिवपूजनांत मग्न असणाऱ्या मार्कंडेयाला न्यायला यमदूत आले पण ते त्याचे प्राण हरण करायला धजावले नाहीत कारण मार्कंडेय शिवलिंगाची पूजा करत होता. तेव्हां स्वत: यमाने मृत्यूचा पाश त्याच्या गळ्याभोवती आवळला आणि यम त्याला नेण्यासाठी ओढू लागला. मार्कंडेय शिवलिंग धरून बसलेला असल्याने तो पाश शिवलिंगाभोवतीही बसला. यमाने तो ओढतांच शिव स्वत: प्रगट झाले व त्यांनी यमाचाच वध केला. तेव्हां सर्व देवांनी शिवाकडे यमाला पुनर्जीवीत करण्याची प्रार्थना केली. शिवाने मार्कंडेयाला हजारो वर्षांचे अखंड तारुण्य आणि आयुष्य बहाल करण्याच्या अटीवर यमाला जिवंत केले. त्या मार्कंडेयांनी केलेली एक रचना बाल मुकुंद अष्टकम्. विंझे ह्यांच्या संग्रहात मात्र मार्कंडेयांचा संदर्भ नाही. त्यांनी सुभाषितावलींतून घेतल्याचा उल्लेख आहे.

दुसरा श्लोक आहे पंढरपूरच्या विठोबाचा. विठोबा म्हणजे कृष्णच. पुंडलिकासाठी कटीवर हात ठेवून अठ्ठावीस युगे विटेवर उभे राहिलेले परब्रम्ह. वारकरी ह्यांचे नाम घेत मेलो न मैल चालत येतात. पंढरपूरला मोठी रांग लागते ह्याचं दर्शन घ्यायला. “कानडा हो विठ्ठल कर्नाटकु, तेणे मज लावियेला वेधु’ हे आपण नेहमी ऐकतो. पुंडलिकाची गोष्ट पूर्वी महाराष्ट्रात घराघरांतून सांगितली जायची. आजही आईबापांची मनोभावे सेवा करणाऱ्या मुलाला पुंडलिक म्हटलं जातं. पुंडलिक आईवडिलांचे पाय चेपत असतांना पांडुरंग त्याला भेटण्यासाठी प्रगट झाला. पुंडलिक म्हणाला, “जरा थांब. अंमळ ह्यांचे पाय चेपून देतो आणि आलोच.” पुंडलिकाने दिलेल्या वीटेवर देव उभा राहिला आणि मग कायम तिथेच उभा राहिला. भीमा नदीच्या तीरावर मंदीर बांधलं गेलं. लाखो भाविक त्याचे दर्शन घ्यायला तिथे येतात. नियमित येणारे वेगळेच. एकदा तरी त्या हरीचे दर्शन घ्यावे, ही इच्छा अनेकांची असते पण हा श्लोक पहा,

                         मा यान्त पान्था: पथि भीमरथ्या: ।
                         दिगंबर: कोsपि तमालनील: ॥
                         विन्यहस्तेsपि नितम्ब बिम्बे ।
                         धूर्त: समाकर्षति चित्तवित्तम् ॥
(भो) पान्था:, पथि भीमरथ्या: मा यान्त । (तत्र) कोsपि धूर्त: तमालनील: दिगम्बर: नितम्ब बिम्बे विन्यहस्त: अपि (तव) चित्तवित्तम् समाकर्षति ।

विंझे ह्यांनी केलेला काव्यमय अनुवाद

                      भीमेकडे जाऊ नकोस पांथ
                      तो नग्न तेथे कुणी शामकांत।
                      कटीसही ठेवुन हस्त, धूर्त
                      चोरी झणीं रे तव चित्तवित्त ॥

सुलभ अर्थ:- प्रवाशांनो भीमा नदीच्या तीरावर जाऊ नका. तिथे एक नग्न सांवळ्या रंगाचा उभा आहे. तो आपले हात कटीवर ठेवून (तुमच्याकडे हात न आणताही) तुमचे चित्तरूपी वित्त हरण करतो.

वरवर निंदा पण खरी स्तुती करणे ह्याला ‘व्याजस्तुती’ अलंकार म्हणतात. ह्या श्लोकांत वरवर विठोबाला नावे ठेवली आहेत. प्रवाशांना त्याच्यापासून सावध रहाण्याचा इशारा दिला आहे. सावध कुणापासून रहायचं आहे तर भीमेच्या तीरावर उभ्या असणाऱ्या त्या धूर्त सांवळ्या विठोबापासून. कारण काय तर तो तुमचं चित्तरूपी धन क्षणांत हरण करतो. तेंही कसं तर त्याचे हातही न हलवतां. नुसतं दर्शन देऊनच तुमचं चित्त कायमच आकर्षित करून घेतो. कविने जरी विठ्ठलाला नग्न म्हटले असले तरी मूर्ती नग्न कधीच नसते. पीतांबर नेसवला जातो.

महाराष्ट्रांतील विठ्ठल भक्तांची, संताची चरित्रे पाहिली तर ही गोष्ट तुम्हाला पटल्याशिवाय रहाणार नाही. वारकरी हरिपाठ म्हणतात, त्याची सुरूवात संत तुकारामांच्या ह्या अभंगाने होते, “सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवोनियां। तर  ज्ञानेश्वर म्हणतात, “देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें  मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा।पुंण्याची गणना कोण करी” ज्ञानदेव आणि त्याची भावंडे, संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई, संत सखू, संत सावता माळी,  संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, संत एकनाथ अशी किती नांवे घ्यावीत, ज्यांना त्या पंढरीरायाने भक्तीचं वेड लावलं. वेद, उपनिषदांमध्ये, गीतेमध्ये जरी आत्मप्राप्तीचे भिन्न भिन्न मार्ग सांगितले असले तरी ह्या कलियुगी “नामसंकिर्तन साधन पै सोपे। जळतील पापे जन्मांतरीची ॥ (संत तुकाराम) हाच एक सोपा मार्ग आहे. मात्र नाम घेतांना तुम्ही त्याच्याशी एकरूप व्हायला पाहिजे. संत कबीर म्हणतात, “माला तो कर में फिरे, जीभी फिरे मुख माँहि। मनवा तो चहुँ दिसि फिरे, यह तो सुमिरन नाहिं।।” म्हणजे माळेतले मणी हात फिरवत आहेत, जीभ तोंडात फिरत आहे आणि मन चारी दिशांना फिरत आहे, हे नाम स्मरण नव्हे. तेव्हां नामावर पूर्ण लक्ष केंद्रित व्हायला हवे.

नाम घेण्याविषयी नारदांची एक कथा थोडक्यांत सांगतो. नारद एकदा भगवंताला म्हणाले, “देवा, तू अमुक अमुक भक्ताला किती सहज प्रसन्न झालास. मी तर तुझे नांव सतत घेत असतो.” भगवंत नारदाच्या हाती तेलाने भरलेली वाटी देतात आणि एक प्रदक्षिणा करून यायला सांगतात. ते असंही सांगतात की तेलाचा एक थेंबही सांडू देऊ नकोस, नाहीतर अनर्थ होईल. नारद वाटीवर पूर्ण लक्ष केंद्रित करून एक प्रदक्षिणा करून परत येतात पण प्रदक्षिणा करताना लक्ष तेलावर असल्याने ‘नारायणा’ला विसरतात. ते परत आल्यावर भगवंत विचारतात, “छान पण प्रदक्षिणा पूर्ण करतांना माझे स्मरण नाही केलेस! पृथ्वीवरील संत आपले काम करतां करतां माझं नाव घेतात.” नारदांचा गर्व उतरतो.

ह्या श्लोकांच्या अनुषंगाने जरी पुराणांतील कथा व धर्म ह्यांचा उल्लेख येत असला तरी हे लिखाण करताना धार्मिक हेतू मनात ठेवून केलेले नाही. धार्मिक दृष्टीकोनांतून ह्या विवेचनात त्रुटी असू शकतील.

– ©️ अरविंद खानोलकर

arvindkhanolkar@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

खरी समस्या, खोटे समाधान

खूप दिवसानंतर मित्राची भेट झाली. नेहमीप्रमाणे गप्पा रंगल्या. आमच्या भेटीत तोच जास्त बोलतो. मी शांतपणे ऐकण्याचे काम करतो. त्याचे म्हणणे, विद्यार्थी असताना मी तू शिकवलेले ऐकले. आता तू माझे ऐक. त्याचा अनुभव दांडगा, समृद्ध असल्याने त्या ऐकण्यात मौज असते. आधी थोडे मित्राबद्दल सांगणे गरजेचे. मग ते काय बोलला, ते सांगतो.

आम्ही बरोबरच इंजिनियरिंगची पदवी घेतली. मी पुढे आय आय टी त शिक्षण, संशोधन, अध्यापन केले. त्याने पदवीनंतर जमशेटपूर येथे टाटा स्टीलमध्ये करिअर सुरू केले. अल्पावधीत मोठ्या जबाबदारीच्या पदांवर बढती घेत, मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आपले करिअर संपन्न केले. शार्प फोटोजेनिक मेमरी, प्रॅक्टिकल, वैचारिक निर्णय क्षमता, उत्तम नेतृत्व कौशल्य या अंगभूत गुणाच्या बळावर अगदी तरुण वयात वरच्या जबाबदारीच्या पदावर तो सरसर चढत गेला. या निमित्ताने, कंपनीच्या खरेदीसाठी, प्लांट उभारणीसाठी त्याच्या भरपूर परदेश वाऱ्या देखील झाल्या. त्यामुळे अनेक मोठमोठी अधिकारी मंडळी संपर्कात आली. त्याच्या अनुभवाला जरतारी किनार लाभत गेली.

मित्राची ओळख झाली. आता त्याने सांगितलेला किस्सा..

एकदा तो जर्मनीत गेलेला. भारतात नवा अत्याधुनिक स्टील प्लांट उभारायचा होता. त्या संदर्भात बोलणी करण्यासाठी त्याच्या बॉसने त्याला एकट्याला पाठवले फायनल बोलणी करायला. याच्या लक्षात आले की ती मंडळी सर्व माहिती नीट देत नाहीत. स्पष्ट काही बोलत नाहीत. खोलात जाऊन विचारलेल्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे देताहेत. पण त्याने त्यांचा पिच्छा सोडला नाही. करोडो रुपयाचे डील होते. ती मंडळी अत्याधुनिक यंत्रणा देण्याऐवजी सेकंड ग्रेड जुनी यंत्रणा गळी मारण्याचा प्रयत्न करीत होती. बरेच तापलेले वातावरण. पण याने पाऊल मागे घेतले नाही. त्यांनी तिकडून याच्या बॉसलाही फोन केला. तक्रारीच्या सुरात. पण बॉसला याची लायकी माहिती होती. त्यानेही सर्वाधिकार त्याचेच असल्याचे ठणकावून सांगितले! तेव्हा ती मंडळी नरमली. याच्या हुशारीची, कार्यक्षमतेची त्यांची खात्री पटली. ते अत्याधुनिक ए ग्रेडची यंत्र द्यायला तयार झाले. या संदर्भात याचे तिकडे वजन वाढले. त्यांच्या बॉसने याला पंधरा दिवस पाहुणा म्हणून ठेवून घेतले. आपले सगळे स्टेट ऑफ द आर्ट कारखाने, प्लांट दाखवले.

अशाच एका भेटीत त्यांच्या ७० वर्षाच्या टॉप मोस्ट बॉसबरोबर ओव्हर द ड्रिंक घडलेला हा त्याने सांगितलेला किस्सा:..

हे जर्मनीतील उच्च पदस्थ महाशय बिझनेस डीलच्या संदर्भात अनेकदा भारतात आले होते. वेगवेगळ्या शहरात राहिले होते. वाटाघाटीच्या संदर्भात त्यांचा सरकारी यंत्रणेशी, लाल फितीच्या कारभाराशी चांगला संबंध आला होता. इकडच्या श्रीमंत कुटुंबाशी त्यांचा जवळून संबंध आला होता. म्हणूनच त्यांनी दोन तीन पेग घेतल्यावर का होईना नोंदविलेले निरीक्षण तेवढेच महत्त्वाचे होते.

ते म्हणाले, ”तुमच्याकडे सगळ्या दोऱ्या सरकारच्या हातात असतात. देश स्वतंत्र झाला. पण तुम्हाला सगळे स्वातंत्र्य नाही. तुमच्या बिझीनेसमनचे लगाम सरकारी अधिकाऱ्याच्या, मंत्र्याच्या हातात असतात. दिल्या घेतल्याशिवाय काही होत नाही. हा असा हाय लेवल भ्रष्टाचार सगळीकडेच असतो. पण एक गोष्ट मला जाणवली विशेष. तुमच्याकडची श्रीमंत, सुसंस्कृत, शिकलेली मोठी माणसे देखील भिकाऱ्यासारखी वागतात. लाचार झालेली दिसतात; पैशासाठी. हाव तरी किती असावी याला मर्यादाच नाही. म्हणजे कितीही मिळाले यांना तरी समाधान नाहीच. दिल मांगे मोअर अशी त्यांची अवस्था! मला वाटते; त्या मानाने तुमच्याकडील गरीब हे जास्त समाधानी असतील. जे आहे त्याच्यात..त्यांना त्यांच्या मर्यादा कळतात. आपली झेप कळते. पण ही उच्चभ्रू श्रीमंत मंडळी नको तितकी हावरट दिसतात. कितीही मिळाले तरी समाधान नाहीच. पाश्चात्य देशात मटेरियलिस्टिक भाव, वृत्ती आहे.पण इतकी टोकाची नाही.”

एवढे बोलून मित्र म्हणाला, ” तुला लक्षात येतेय का? केवढे मोठे कटू सांगून गेला तो युरोपियन म्हातारा जिनियस! आपण इतके विश्लेषण करीत बसतो..कुठे कुणाचे काय चुकते याचे! पण म्हणतात ना, काखेत कळसा अन् गावाला वळसा! तशी स्थिती असते आपली.उत्तरे आपल्या जवळ असतात. सोपी असतात. पण जखम एकीकडे अन् उपचार दुसरीकडे अशी आपली ट्रीटमेंट असते समस्येकडे बघण्याची. म्हणून आपल्याकडचे प्रश्न सुटत नाहीत. मुळात आपल्याला प्रश्न सोडवायचेच नसतात. ते तसेच चिघळत ठेवण्यात राजकारणी मंडळी, सरकारातले निर्णय घेणारे पुढारी, यांना रस असतो. कारण समस्या सुटल्या की सरकारला, नेत्यांना कामच उरणार नाही. तिथे प्रत्येकाला आपण किती व्यस्त आहोत हे दाखवण्याचा अट्टहास असतो!”

मित्राचे म्हणणे पटले. कधी कधी नकळत, अनवधानाने फार मोठे सत्य अचानक आपल्या हाती लागते. माझे तसेच झाले. आपली खरी समस्या वेगळी असते. आपण खोट्या समाधानावर जगत बसतो.

–  ©️ प्रा. विजय पांढरीपांडे

७६५९०८४५५५

vijaympande@yahoo.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

एच्०-१ बी० व्हिसा – वड्याचे तेल वांग्यावर

जगाच्या पाठीवर अमेरिका नावाचे प्रकरण : लेखांक ४

अमेरिकेत राहून काम करून अमेरिकन डॉलर या चलनात पैसे कमवायचे असल्यास परदेशी नागरिकांना एच्०-१ बी० व्हिसाधारक होऊनच अर्थार्जन करावे लागते.

ट्रॅम्प सरकारने भारतावर राग काढताना एच्०-१ बी० व्हिसावर जास्तीत जास्त भारतीय काम करतात हे पाहून एच्०-१ बी० व्हिसाच्या अटी आणखी जाचक केल्या.
एका अर्थाने वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचाच हा प्रकार होता.

एच्०-१ बी० व्हिसाबद्दलच्या धोरणातील बदल आणि त्यातील काही तथ्यं
१. एच्०-१ बी० व्हिसासाठी जगभरातून दरवर्षी  लाखों परदेशी नागरिक पहिल्यांदा अर्ज करतात त्यातल्या साधारणपणे पंचाहत्तर हजार परदेशी नागरिकांची सोडत (लॉटरी) पद्धतीने निवड होते. या पहिलटकर इच्छुकांना आता १ लाख डॉलर म्हणजे सध्याच्या डॉलरच्या भावानुसार सुमारे ८८ लाख रूपये या व्हिसाच्या पोटी फी म्हणून भरावे लागतील.
२. ज्यांच्याकडे एच्०-१ बी० व्हिसा उपलब्ध आहे आणि ते अमेरिकेत आधीच कार्यरत आहेत त्यांना काही समस्या नाहीत, तसेच ज्यांच्या एच्०-१ बी० व्हिसाची मुदत आता संपत आहे त्यांना देखील मुदत वाढ करून घेताना ही वाढीव रक्कम भरायची गरज नाही.  
३. अमेरिकेत शिकत असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांकडे एफ्-१ हा व्हिसा असतो त्या विद्यार्थ्याला जर अमेरिकेत नोकरी मिळाली तर त्याला नोकरी देणारी कंपनी त्यास एच्०-१ बी० व्हिसासाठी मदत करू शकते, अशा विद्यार्थ्याला देखील वाढीव रक्कम मोजावी लागणार नाही.
४. अमेरिकेत एच्०-१ बी० व्हिसावर कार्यरत असलेल्या परदेशी नागरिकाने जर त्याची सध्याची नोकरी सोडली आणि तिथेच अमेरिकेत दुसऱ्या कंपनीत तो नोकरीस लागला असता, त्याची नविन कंपनी त्याचा एच्०-१ बी० व्हिसा आपल्या कंपनीअंतर्गत नोंदून घेते, त्यावेळेस देखील कोणतीही वाढीव रक्कम भरावी लागणार नाही.
५. एच्०-१ बी० व्हिसाधारक परदेशी नागरिक काही कारणाकरिता आपल्या मायदेशी परतला असेल आणि कंपनीच्या कामाकरिता त्याला पुन्हा अमेरिकेत परतावे लागले तर त्यास त्याच्या पारपत्रावर (पासपोर्टवर) तो अमेरिकेत प्रवेश करतानाचा शिक्का मारताना देखील त्यास कोणतीही वाढीव रक्कम भरावी लागणार नाही.
६. एच्०-१ बी० व्हिसाधारक परदेशी नागरिक जेव्हा एच्०-१ बी० व्हिसाची मुदत संपवून आपल्या मायदेशी परततो, आणि एक वर्षाहून अधिक काळ जर मायदेशी घालवतो. त्यावेळी त्याला जर अमेरिकन कंपनीने कामाकरिता पुन्हा बोलावले तर त्यास एच्०-१ बी० व्हिसासाठी नव्याने अर्ज करावा लागेल. या नव्या अर्जासाठी मात्र वाढीव रक्कम म्हणजे सुमारे ८८ लाख रूपये मोजावेच लागतील.

थोडक्यात काय तर परदेशातून अमेरिकेच्या एच्०-१ बी० व्हिसासाठी केलेला नविन अर्ज हा वाढीव रक्कम १ लाख अमेरिकन डॉलर म्हणजे सुमारे ८८ लाख रूपये मोजूनच करावा लागेल.
अमेरिकेतल्या अमेरिकेत मात्र एच्०-१ बी० व्हिसाच्या नव्या अर्जासाठी मात्र कोणतीही वाढीव रक्कम भरावी लागणार नाही.
म्हणजे मोठ्या प्रमाणात परिणाम होतील ही भीती दाखवली जाती ती खरोखर किती प्रमाणात हे मी सहज सोप्या गणिताने वर मांडून दाखवले आहे.

त्याउपर ट्रॅम्प सरकारने काढलेल्या या फर्माणामुळे चर्चिल्या जाणाऱ्या कवित्वावर थोडे भाष्य पुढीलप्रमाणे –
H1b व्हिसा च्या निमित्ताने “अमेरिकेत कशाला जायचे? ब्रेनड्रेन वर उपाय? ट्रम्पतात्याचे भारतावर उपकार” अशा आशयाच्या चर्चा भारतात झडत आहेत.

जे काय बदल होतील त्यातून काय मार्ग काढले जातील वगैरे पुढच्या गोष्टी.
तरी देखील मूलभूत वस्तुस्थिती काय आहे?
परदेशात मिळणारे प्रोत्साहन आणि सर्व तऱ्हेचे पाठबळ देशात मिळत नाही कारण इथे सर्व काही केवळ राजकारणी लोकांच्या हाती आहे.

आमच्या देशातील विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, उद्योग, दळणवळण, कायदा, सुरक्षा, आरोग्यसेवा एव्हढेच काय तर मनोरंजन, आनंदी राहणं, सुखासमध्यानाने जीवन व्यतित करणं हे देखील राजकारणी लोकांच्या मर्जीवर आणि त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या सोयीनुसार सुखकर किंवा दु:खकर होते.

पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांचे परदेशी स्नेही विचारत की भारतात नागाचे खेळ खेळणारे गारुडी, वाघ, साधू अशीच करमणुकीची साधने कशी? त्यावर पंडितजी त्यांना सांगत की “बहुधा त्यांची गरीबी, त्यांचे दु:ख विसारण्याचा तो एक प्रयत्न असेल.”
डॉ० जयंत नारळीकर हे शास्त्रज्ञ भारतात येण्यापूर्वी त्यांनी प्रत्यक्ष भारताच्या तत्कालीन पंतप्रधानांना अटी (टर्म्स अँड़ कंडिशन्स) घातल्या होत्या, तेव्हा ते कुठे भारतात आले. त्याशिवाय त्यांना काय सुविधा इथे मिळाल्या असत्या का? याचा देखील विचार करावा.

परदेशातील संधी सोडून भारतात येण्याच्या माझ्या स्वतःच्या निर्णयाचा मला आजही पश्चाताप आहे.
मी व्यवसायाने सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करतो, त्याव्यतिरीक्त मी आज कचरा विघटन क्षेत्रात गेली १० वर्ष संशोधनाच्या कामात वैज्ञानिकांच्या पाठीशी राहून तन, मन, धनाने अग्रेसर असतो, परंतु इथल्या भ्रष्ट यंत्रणेला माझी गरज नाही आणि माझ्या सोबत असलेल्या वैज्ञानिकांची देखील. आपले भारतीय वैज्ञानिक, बुद्धिवंत जितके बाहेर जातील आणि चमकतील त्यातून बाहेरचे जग सुधारणार आहे, फुलणार आहे, फळणार आहे, भारताचे प्राक्तन केवळ आणि केवळ पुढारी मंडळींच्या मेहेरबानीवर अवलंबून आहे केवळ आणि केवळ.

देशभक्ती मनात आहे आणि रक्तात देखील. परंतु राजकारणी पुढारी लोकांच्यापुढे आमचे रक्त पातळ राहते केवळ, कितीही उसळले तरी त्याचा त्रास आमचा रक्तदाब वाढण्यात होतो.
देशाचे भले करण्याची आमची लायकी नाही, ती लायकी आणि त्यासाठीची सक्षमता केवळ राजकारणी पुढाऱ्यांचीच केवळ.

या अशा उफराट्या अनुभवांनी संपन्न होत निराशेत आयुष्य घालवायचे, आपल्या बुद्धीमत्तेला इथे गंजत सडू द्यायचे की अमेरिका, युरोपसारख्या पाश्चात्य प्रदेशात जिथे ज्ञानाला किंमत आणि श्रमाला प्रतिष्ठा तिथे जाऊन काही पराक्रम आयुष्यात घडवायचे आणि एकंदर आपल्या आयुष्याला देखील घडवायचे हे प्राध्यान्य प्रत्येकाचे प्रत्येकाने ठरवावे असे.

परदेशी पाश्चात्य वातावरणात कामाची समसमान संधी आणि प्रगतीच्या खुल्या वाटा जर आम्हाला आमच्या मायदेशात सहजी प्राप्त झाल्या तर इथला तरुण वर्ग बाहेर जाणार नाही. स्थलांतर केव्हा घडते जेव्हा मायदेशातल्या संधी संपतात. “चल उड जा रे पंछी, अब ये गाव हूंआ बेगाणा” ही भावना असह्य होते तेव्हा पोटापाण्याच्या शोधात आणि त्याहून आहे हे जीवनमान उंचवण्याच्या प्रयत्नात माणसं स्थलांतर करतात.
“मायदेशी माणसं” हा कथासंग्रह असो की “बनगरवाडी” कादंबरी, लेखक वर्णन करतो ते वाक्य किती भेसूर याची जाणिव होते, ते वाक्य म्हणजे – “माणसं जगायला बाहेर पडली”.      

(क्रमश:…)

पूर्वप्रसिद्धी – दै. पुण्यनगरी (सर्व आवृत्त्या) दि. २६ सप्टेंबर २०२५
– @ देवेंद्र रमेश राक्षे
rakshevendra@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

Eiswette* ब्रेमेनमधील एक प्रसिद्ध समारंभ

चार लोक एकत्र आले म्हणजे गप्पा तर होतातच पण कधी कधी एखाद्या गोष्टीची चर्चा करताना लोक पैजाही मारतात. ८ नोव्हेंबर १८२८ ची गोष्ट, ब्रेमेनमध्ये व्यापारी लोक गप्पागोष्टी करत होते. बेमेनमधून वाहणारी वेसर नदी, म्हणजे ब्रेमेनची जणू रक्तवाहिनीच. ब्रेमेनच्याच नव्हे तर जर्मनीच्या आयात-निर्यातीचे काम वेसर नदीतून व नंतर ब्रेमेन बंदरातून होत असे. त्या काळी थंडी खूप असल्याने व नदीचे पाणी स्वच्छ असल्याने, थंडीत ते गोठत असे.  जमलेल्या व्यापा-यांनी पैज मारली. ६ जानेवारी १८२९ या दिवशी वेसर नदी वाहती असेल की गोठेल. काही जण म्हणाले, वेसर वाहती असेल तर काहींचे मत पडले, वेसर गोठेल. जे पैज हरतील त्यांनी सर्वांसाठी “Kohl und Pinkel” चे जेवण द्यावयाचे असे ठरले. – “Kohl und Pinkel” हा   ब्रेमेनचा व उत्तर जर्मनीतला एक खास पदार्थ आहे आणि तो थंडीत बनवला जातो.  

तेव्हापासून ब्रेमेनमध्ये ही Eiswette ची परंपरा चालू झाली. १९२८ मध्ये Eiswette चा १०० वर्षांचा महोत्सव झाला. त्या वर्षी त्या कार्यक्रमात थोडा बदल केला गेला. ६ जानेवारीला १२ वाजता एका शिंप्यातर्फे नदीची चाचणी घेण्याचे ठरले. शिंप्याचे वजन बरोबर ९९ पौंड असावे लागते. शिंप्याच्या हातात एक तापलेली इस्त्री असते; त्या इस्त्रीच्या मदतीने नदी गोठली आहे की वाहती आहे, याची चाचणी घेतली जाते. शिंप्याबरोबर बायबलमध्ये उल्लेखिलेले three wise men, एक नोटार व एक डॉक्टर आणि काही माननीय व्यक्तींना बोलावलेले असते. 

नोटार व डॉक्टर वेळेवर येतात. 
तसेच Three wise men, सुद्धा वेळेवर येतात.
शिंपी मात्र अगदी शेवटच्या क्षणी धावत पळत येतो.

आल्यावर प्रथम त्याचा नोटारांशी उशिरा आल्याबद्दल वादविवाद होतो. नदीकिना-यावर शिंप्याचे वजन केले जाते. ते जर बरोबर ९९ पौंड नसेल, आणि ते नसतेच, तर शिंप्याला त्याचे कारण सांगावे लागते. शिंप्याची इस्त्री तापलेली आहे कीं नाही याची परीक्षा घेताना “बोट भाजल्यामुळे” डॉक्टर थोडासा आरडाओरडा करतो. शिंप्याला हातात इस्त्री घेऊन नदीच्या काठावरील Punkendeich या ठिकाणाहून जर पाय ओले न होता वेसरच्या दुस-या किना-याला जाता आले तर तो वेसर गोठल्याचा पुरावा समजावयाचा.

पूर्वीच्या काळी ब्रेमेन बंदरातून आयात-निर्यातीचा व्यापार करणा-यासाठी न गोठता सतत वाहणारी वेसर नदी फार महत्वाची होती. जर नदी गोठलीच तर बर्फ फोडून मार्ग काढत जाणारे जहाज नदीचे पाणी वाहते करीत असे. हल्ली मात्र या नदीच्या पाण्याचा बर्फ झाल्याचे काही आढळलेले नाही. कारण वळणावळणाने जाणारी नदी आता सरळ केल्याने आणि त्या नदीच्या काठावर जे कारखाने उभे राहिले आहेत त्यातून वेसर नदीत वाहून येणाऱ्या विविध रसायानांमुळे पाणी क्वचितच गोठते. तेव्हा शिंप्याला एका बोटींत बसून दुस-या किना-याला जावे लागते.

DGzRS ची बोट त्यासाठी तयारच असते.  

( DGzRS = समुद्रात अडचणीत सापडलेल्या बोटी व माणसे यांच्या बचावासाठीची जर्मन संस्था, जिची मुख्य कचेरी ब्रेमेनमध्ये आहे. कशी अस्तित्वात आली त्याचीही गोष्ट वाचण्यासारखी आहे. DGzRS बद्दलची माहिती पुढच्या लेखात)

सुरुवातीला फक्त व्यापा-यानी सुरु केलेल्या या प्रथेस आता राजकारणातील व इतर प्रतिष्ठित लोकांनाही बोलावले जाऊ लागले. अर्थातच नदीची परीक्षा घेण्यापूर्वी शिंपी मागील वर्षातील राजकीय तसेच सामाजिक घटनावर एक व्याख्यान देतो, मनोरंजक आणि टोमणेदार. व्याख्यानांतील टोमणे आणि इतर गमतींवर दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत बातमी वाचावयास मिळते.

फक्त ब्रेमेनमध्ये होणारा हा हास्यजनक आणि मजेदार कार्यक्रम पाहण्यासाठी ब्रेमेनमधील तसेच आजूबाजूचे, केव्हा केव्हा परदेशातूनही लोक येतात. सगळे जण दाटी दाटी करून नदीकाठावर उभे असतात.

Eiswette कार्यक्रम झाल्यानंतर जानेवारीच्या तिसऱ्या शनिवारी “Kohl und Pinkel” भोजनाचा एक मोठा कार्यक्रम होतो.

बऱ्याच मोठ्या आणि प्रतिष्ठित लोकांना या जेवणासाठी बोलावण्यात येते. भोजनासाठी प्रतिष्ठित नुसते येतात; एवढेच नव्हे तर येताना मोठ्या देणग्या घेऊन येतात. जमलेली सर्व रक्कम DGzRS ला त्याच्या कामासाठी दिली जाते. नदीवर किंवा उत्तर समुद्रात (northsea) काही दुर्घटना घडली तर  DGzRS त्यांच्या मदतीला जाते. त्यासाठी या पैशाचा उपयोग होतो.

दर वर्षी पाहुण्यांची संख्या व देणगीची रक्कम वाढत आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे. गेल्या वर्षी (२०२५) आलेल्या पाहुण्यांनी वरील संस्थेला ६०७.७६४, युरोची देणगी दिली. सुरुवातीला फक्त पुरुषांसाठी होणाऱ्या कार्यक्रमात आता स्त्रियांचाही समावेश झाला आहे.

ब्रेमेनमधील हा समारंभ इतरांनाही इतका आवडू लागला आहे की १९७६ पासून इतर लहान मोठ्या गावांत असा समारंभ होतो. तेथे त्या गावातली छोटी नदी, ओढा किंवा तळे गोठले आहे कि नाही याची परीक्षा घेतली  जाते.

कार्यक्रमाचे तपशील व फोटो मी www.bremen-sehenswert.de/eiswette.htm यावरून घेतले आहेत
wikipedia वरही याबद्दल माहिती आहे पण मराठीत काही नसावी असे वाटते.

– ©️नलिनी भट-स्पेरलिंग

nalini_nbs@gmx.de
Ritterhude / Germany

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

गेले ते दिन…!!

कोणे एके काळी म्हणजे कोविडपूर्व काळात परिस्थिती अशी नव्हती….पहाटे सारा परिसर शांत असायचा आणि चक्क पाखरांच्या संमिश्र किलबिलाटाने जाग यायची..!

शिवाजी पार्क परिसरातल्या बहुतेक सार्‍या तीन मजली इमारती म्हणजे १९४० च्या आगेमागे त्या वेळच्या नामांकित उच्चभ्रू लोकांनी बांधलेल्या, दुमजली बंगल्यांच्या मालकांच्या पुढच्या पिढीतल्या कर्त्या लेकरांनी, ७० च्या दशकात चढवलेले तिसरे मजले होते…

त्यांच्या वाड-वडिलांनी बंगल्याच्या आवारात त्या काळी लावलेली आंबा, फणस, नारळ, जांभुळ, बकुळ सारखी कौटुंबिक आवडीची झाडे ताडमाड उंच वाढली होती, परसात मावेनाशी झालेली, चार पाच मजली उंचीची झालेली होती…

ह्या  सगळ्यांमुळे सार्‍या परिसरात भर दुपारीसुध्दा एक सुखद सावली असायची…त्याच बरोबर वातावरणात हवासा गारवा असायचा….झाडा झाडांवर पक्ष्यांची वर्दळ असायची, विणीच्या हंगामातली घरटी असायची..कोकिळ, बुलबुल, मैना, पोपट, शिंपी, सुतार, तांबट, चुकचुके अगदी झालेच तर उंच वृक्षांवर  वटवाघळे, घुबडे असायची आणि ठेंगण्या ठुसक्या प्राजक्ताच्या झाडांवर मावळतीला चिमण्यांचा कल्ला असायचा.

गजबजलेल्या दादरमध्ये असूनही शिवाजी पार्कची स्वत:ची अशी शान होती…आदब होती..सभ्य अशी शांतता होती..!

मध्यंतरी आपल्या संपादक महाशयांच्या आग्रहावरुन मी काढलेल्या विविध पाखरांच्या फोटोंची एक सिरियल खास ‘मैत्री’साठी केली होती. ३६ वेगवेळ्या पक्ष्यांपैकी सुमारे २५ पक्ष्यांचे फोटो तर मी इथेच माझ्या खिडकीतून काढलेले होते. पाचव्या मजल्यावर घर असल्याने आणि समोरच जांभळाचे उंचच उंच झाड असल्याने हे सारे सहज शक्य झालेले होते …

कोविडची भयप्रद लाट ओसरुन गेली आणि पुर्नविकासाची त्सुनामी आली….समोरचे ते झाड आणि झमारत बळी पडली. इतर जुन्या इमारतीभोवती निळ्या रंगाचे उंच उंच पत्रे लागू लागले आणि इमारती भुईसपाट होऊ लागल्या, मोठमोठे वृक्ष धारातीर्थी पडू लागले…सगळीकडे JCB ची घरघर, धडधड आणि प्रचंड धुरळा…!

सुंदर पाखरांच्या किलबिलाटांऐवजी कावळ्यांच्या कर्कश्य आवाजाने, ग्रानाईट कटिंगच्या चीर्रर्रर्र..आवाजाने आणि सिमेंटच्या राखाडी धुळीने आसमंत भरुन जाऊ लागला….माणसे नव्या, मोठ्या घरांची स्वप्ने पाहूं लागू लागली  आणि गरीब बिचारी विस्थापित पाखरे मुकाटपणे  आपली घरटी सोडून कुण्या परगांवी निघून गेली…

गेली सहा सात वर्षे हेच चालु आहे…हळुहळु अंगवळणी पडू लागलेय….विकासासाठी खरोखरच किती विनाश आवश्यक असतो? असले वैचारिक प्रश्न  विचारणारे कोणी राहिलेही नाही..

अशा सध्याच्या वातावरणात आज सकाळी अचानक सुखद धक्का बसला. लवकरच रिडेव्हलमेंटखाली जाणार्‍या समोरच्या इमारतीतल्या रेन ट्रीवर सोनेरी पिवळ्या धम्मक हळदुल्याची फडफड दिसली. जवळजवळ सहा वर्षांनी अगदी अनपेक्षितपणे हा पक्षी इथे दिसला आणि कॅमेरा आणण्यासाठी तारांबळ उडाली….!

जमेल तसे फोटो काढत गेलो….पण ती पूर्वीची गंमत त्यात नव्हती…! कशासाठी आणि कोणासाठी इथे थांबायचे? या विचाराने, तो देखिल मिनिटभरातच इथून उडून गेला..!!

  

 हळद्या/ हळदुल्या / Golden Oriole 

–  © प्रदीप अधिकारी

adhikaripradeep14@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

उत्तरे जाणा व ज्ञानात भर घाला

प्रश्नसमूह ६ : प्लॅस्टिक

२६. सगळ्यात प्रथम अस्तित्वात आलेले  प्लॅस्टिक कोणते ? कधी ? –                        

२७. सध्या  रोजच्या सामान्य वापरात कोणकोणती प्लॅस्टिक्स आहेत आणि ती कोणकोणत्या वापरात आहेत ?

२८. प्लॅस्टिकमध्ये कोणते विशेष उपयोगी गुणधर्म आहेत ?

२९. आजकाल जे नॉन-स्टिक नावाने जे तवे, कढया येतात त्यावर कसला थर दिलेला असतो ? –

३०. प्लॅस्टिकचे तोटे काय ? –  

वाचक मित्रांनी वरील प्रश्नांची उत्तरे लेखकाकडे न पाठवता संपादकांच्या ईमेल पत्त्यावर पाठवावी ही विनंती.   

उत्तरे पाठवणे शक्य नसल्यास आपली प्रतिक्रिया पाठवू शकता.  

– ©️ विलास सातपुते 

vilas.satput54@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

विहंग मित्र

मित्र क्र. ५  – Black naped monarch ( निलमणी )


गडद निळा (azure blue ) रंग शरीरावर, डोक्यावर व हनुवटी खाली काळा पॅच असा अतिशय आकर्षक असा पक्षी. पंख तपकिरी / राखाडी असतात. चोचीवर काळी छोटी पिसं  असतात. भारतात बहुतेक सर्व भागा आढळतो.
उडतानाच हवेमधले कीटक मटकावतो.
उडताना कर्कश आवाज करतो.  

– ©️देवदत्त पाटणकर.

8378980966 

castingalu@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

चित्रकारांचे दालन

  

– ©️ रामचंद्र देशमुख

संपर्क : ९९३०२४६९८९

  प्रेषक मेघना घाटे 

meghanaghate25@gmail.com

@@@

– ©️ मिलिंद महाबळ 

milind.mahabal65@gmail.com

@@@

 – ©️ युती प्रवीण अघोर  

प्रेषक शुभदा प्रवीण अघोर     

shubhadaaghor@gmail.com

@@@@@@@@@@@@@@@@@

महत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. 

@@@@@@@@@@@

महत्त्वाची सूचना :- मैत्री अनुदिनी हे मुख्यत: मराठी साहित्याला वाहिलेलं आणि नवं-जुनं साहित्य प्रकाशित करणारं एक नियतकालिक आहे. ते आम्ही वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देत असतो. एखादा जुना लेख वा कविता वगैरे साहित्य पुनर्प्रकाशित करायचं असल्यास आम्ही सदर लेखकाची परवानगी घेण्याचा प्रयत्नही करत असतो. काही वेळा संपर्क होऊ शकत नाही. मात्र अशा प्रकारे पुनर्प्रकाशित केलेल्या साहित्यावर आम्ही न चुकता लेखकाचं नांव व ज्या पुस्तकातून वा मासिकातून ते घेतलं त्याचा नामनिर्देश करत असतो. कृपया आमची अडचण समजून सहकार्य करावं ही विनंती.

@@@@@@@@@@@@@@

ऋत्विक घटक 

: वास्तवाचे विद्रूप सौंदर्य उलगडणारा दिग्दर्शक

 

स्वागत फुलांनी


चित्रपट सृष्टीतील दिग्गज : १

ऋत्विक घटक

भारतीय चित्रपट सृष्टीतील ऋत्विक घटक हे असे नाव आहे, जे फक्त दिग्दर्शनाच्या कौशल्यासाठी नव्हे, तर मानवी अस्तित्वातील वेदनेच्या कलात्मक अभिव्यक्तीसाठी आदराने उच्चारले जाते. सत्यजित राय, मृणाल सेन या दिग्दर्शकांबरोबर त्यांनी भारतीय चित्रपटाला विचारशील आणि सामाजिक वास्तवाशी जोडणारी नवी दिशा दिली. घटक हे केवळ दिग्दर्शक नव्हते, ते लेखक, नाटककार, कवी आणि तत्त्वचिंतक होते. त्यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे एका विचारवंत कलाकाराचा वेदनांनी आणि बंडखोरीने भरलेला प्रवास. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांना थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

प्रारंभ आणि पार्श्वभूमी
ऋत्विक घटक यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२५ रोजी ढाका येथे झाला आहे. बंगालच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेत ते वाढले, पण १९४७ च्या भारत-विभाजनाने त्यांच्या मनावर खोल जखम कोरली. फाळणीमुळे लाखो लोकांसारखेच त्यांनीही विस्थापन अनुभवले. स्वतःची ओळख, माती, आणि बालपण हरपण्याची वेदना. ही जखम त्यांच्या प्रत्येक चित्रपटाच्या कणाकणात जाणवते.

तरुणपणी १९४८ मध्ये ते भारतीय जननाट्य संघ (IPTA) मध्ये सामील आणि पूर्णवेळ सक्रीय झाले. त्या काळात IPTA हे कला आणि सामाजिक बदल यांचा संगम बनलेले व्यासपीठ होते. घटक यांनी नाटक, लेखन आणि अभिनयाद्वारे सामाजिक विषमता, वर्गसंघर्ष आणि अन्याय यांविरुद्ध आवाज उठवला. इथूनच त्यांच्या कलात्मक जाणिवेला राजकीय आणि सामाजिक धार प्राप्त झाली. त्यातीलच अनेक दिग्गज..शंभू मित्र, सलील चौधरी, उत्पल दत्त पुढे त्यांच्याबरोबर चित्रपटातही काम करत राहिले.

कलात्मक प्रवासाची सुरुवात



१९५०च्या दशकात त्यांनी चित्रपट माध्यमाचा अंगीकार केला. बंगालमधील दुष्काळ, फाळणीचे खोल घाव आणि शहरातील बेरोजगारी यांसारख्या वास्तवांनी त्यांच्या सर्जनशीलतेला आकार दिला. त्यांनी चित्रपटाला केवळ मनोरंजनाचे साधन मानले नाही, तर ते सामाजिक जागृतीचे आणि आत्मशोधाचे एक माध्यम आहे, असे ठामपणे सांगितले.

ऋत्विक घटक

त्यांच्या चित्रपटांतील प्रमुख संकल्पना

ऋत्विक घटक यांच्या चित्रपटांचे केंद्र म्हणजे ‘विस्थापन’, फक्त भौगोलिक नव्हे, तर भावनिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विस्थापन.

सुवर्णरेखा मधील एक दृश्य

• ओळख गमावण्याची भीती त्यांच्या प्रत्येक पात्राच्या चेहऱ्यावर कोरलेली दिसते.
• सामाजिक विषमता आणि वर्गसंघर्ष हे त्यांचे सततचे विषय होते.
• स्त्रीचे दुःख आणि तिचा अंतर्गत बळ, हे त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने दाखवले. ‘मेघे ढाका तारा’तील नीता, ‘सुवर्णरेखा’तील सीता ही त्यांच्या दृष्टीकोनाची प्रतीके आहेत.
• संगीत आणि नाटक हे त्यांनी केवळ सजावटी घटक म्हणून नाही, तर कथनाच्या भावनिक रचनेत घट्ट गुंफले.

दृश्य आणि संपादनशैली
घटक यांच्या दृश्यभाषेत एक तीव्रता होती, ती शांत आणि सुबक चित्रणापेक्षा अधिक अस्वस्थ करणारी होती. त्यांनी कॅमेऱ्याला भावनांचा साथीदार बनवलं. लो-अँगल्स, क्लोजअप्स, ओव्हरहेड शॉट्स आणि प्रकाशछायांचा तीव्र वापर करून त्यांनी पात्रांच्या अंतःसंघर्षाला आकार दिला. त्यांच्या फ्रेम्स अनेकदा नाट्यमय, जवळजवळ चित्रासारख्या भासतात. दृश्यातून शोक, वेदना आणि आशाहीनतेची भावना प्रकट केली. कॉन्ट्रास्ट, छाया प्रकाश याचा प्रभावी वापर.


‘मेघे ढाका तारा’ मधील एक दृश्य

संपादनशैलीत त्यांनी आशयानुरूप प्रयोग केले. पारंपरिक कथनशैली न वापरता, जंप-कट्स, साऊंड ओव्हरलॅप्स, मोंटाज आणि अचानक येणाऱ्या भावनिक संक्रमणांनी प्रेक्षकांना धक्का दिला. त्यांच्या संपादनातून प्रेक्षकांना भावनिक धक्का देऊन विचार करायला लावले जात असे. त्यांच्या चित्रपटांचा प्रवाह कधी विस्कळीत वाटतो, पण तोच विस्कळीतपणा त्यांच्या जगलेल्या वास्तवाशी प्रामाणिक आहे.

त्यांचे महत्त्वाचे चित्रपट

नागरिक (१९५२, प्रदर्शित १९७७)
भारतीय समांतर सिनेमाचा पाया मानला जाणारा हा चित्रपट कोलकात्याच्या उपनगरी जीवनातील दारिद्र्य आणि बेरोजगारीवर आधारित आहे. ‘रमण’ हा सुशिक्षित पण नोकरीविना युवक त्या काळातील निराश तरुणाईचे प्रतीक बनतो. शहराच्या गल्लीबोळांतील वास्तव आणि पात्रांच्या डोळ्यातील असहायता घटक क्लोजअप्सद्वारे यांनी अत्यंत वास्तववादी पद्धतीने उलगडली. हा चित्रपट तयार झाल्यावर प्रदर्शित झाला असता तर सत्यजित राय यांच्या ‘पथेर पांचाली (१९५५)’ च्या आधीचा पहिला वास्तववादी, प्रायोगिक चित्रपट ठरला असता.

अजान्त्रिक (१९५८)

बिमल आणि जगद्दल

मानव आणि यंत्रातील भावनिक,जणू आई-मुलाचे नाते दाखवणारा अद्भुत प्रयोग. ‘बिमल’ नावाचा एकाकी चालक आपल्या जुन्या शेवर्लेट कार ‘जगद्दल’शी बोलतो, तिची काळजी घेतो. ती कार त्याच्यासाठी जणू जिवंत व्यक्ती आहे, ती भावना व्यक्त करते. वॉल्ट डिस्नेच्या Herbie सारख्या पात्रांपूर्वीच घटक यांनी वस्तूंना भावना दिल्या होत्या.

बाडी ठेके पलिये (१९५९)

चित्रपटाचे एक पोस्टर

बाल चित्रपटाचा पहिला यशस्वी प्रयत्न. लहान मुलाच्या नजरेतून मोठ्या शहराचं, कोलकात्याचं जग दाखवणारा चित्रपट. यात बालकाच्या निरागसतेचा आणि समाजाच्या क्रूरतेचा संघर्ष आहे. विद्रोही आणि काहीसा उचापत्या कांचन वडलांच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी कलकत्याला पळून येतो ..आणि मुले पळवणाऱ्या माणसांपासून ते गुंड, शहरातली मवाली मुले, चोर, तसेच मिनी सारखी सहृदय मैत्रीण असे अनेक अनुभव घेऊन गावी परत येतो.
घटक यांनी यात अनेक तांत्रिक प्रयोग केले.. विविध तांत्रिक करामती वापरून लहान मुलाला दिसलेले मोठे शहर यात दाखवले आहे .. त्यात आवाजाचा वेग वाढवणे, कार स्थिर असताना चाके फिरण्याचा परिणाम साधण्यासाठी वापरलेली ३०० MM ची विशिष्ट लेन्स, त्याच वेळी १८ मिमी लेन्सने इतर वस्तूंचे विरूपण टिपणे. त्यातून पोचणारी मुख्य भावना – ‘एई शहरटा एकटा युद्धखेत्र,
मानबिक जत्न आर सहानुभूति एकेबारे नेइ। चोले जाओ… एई जाएगाटा थेके चोले जाओ.’(हे शहर जणू एखाद्या रणांगणासारखं आहे, इथे माणुसकी, काळजी, आणि संवेदना यांचा मागमूसही नाही.
जा… निघून जा या ठिकाणाहून.)

मेघे ढाका तारा (१९६०)

चित्रपटातील एक बोलकी प्रतिमा.

फाळणीच्या जखमा झेलणाऱ्या कुटुंबाची कथा. नीताचे पात्र भारतीय स्त्रीच्या त्यागमूर्ती प्रतिमेला प्रश्न विचारते. संगीत, प्रतिध्वनी आणि ओव्हरटोनचा वापर करून घटक यांनी तिच्या आंतरिक वेदनेचा आवाज दिला. “आमी बाँचबो (मला जगायचंय, मी जगणार आहे) ” हा आक्रोश भारतीय चित्रपटातील स्त्रीच्या हक्काचा घोष बनतो. हा त्यांचा सर्वार्थाने परिपूर्ण यशस्वी चित्रपट. अत्यंत बंदिस्त कथा, प्रातिनिधिक मानवी व्यक्तिरेखा, कथा आणि कालानुरूप नेपथ्य, विविध प्रयोग केलेले पार्श्वसंगीत ..यात वापरलेले विविध नैसर्गिक आवाज (उदाहरणार्थ..भात शिजताना होणारा रटरटण्याचा आवाज त्यांनी नीताच्या आईच्या मनातले कल्लोळ आणि योजना शिजणे दाखवण्यासाठी वापरला तर चाबकाच्या फटक्यांच्या आवाजाने नीताचा झालेला विश्वासघात वेगळ्याच उंचीवर पोचवला.), कथेचा वेग कायम ठेऊन आशय फुलवणारे संपादन अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला हा चित्रपट भारतीय आणि जागतिक सिनेमातही एक ‘मैलाचा दगड’ मानला जातो.

कोमल गांधार (१९६१)


तुटलेपण, वियोग, फसवणूक हे सगळे फाळणीचे परिणाम दाखवण्यासाठी शकुंतलेच्या व्यक्तिरेखेचा नाटकात वापर केला आहे. त्या काळातील राजकीय अस्वस्थता, नाटकाच्या गटांमधील ताण आणि व्यक्तिगत आयुष्यातील द्वंद्व अशा तीन पातळ्यांवर चित्रपट फिरत राहातो. एक सुसूत्र गोष्ट नसूनही या तीनही  गोष्टींचा एकमेकात विणलेला पट. शकुंतलेच्या नाटकाचा रूपक म्हणून वापर करून त्यांनी समाज आणि व्यक्ती यांच्यातील संघर्ष दाखवला.

सुवर्णरेखा (१९६२)

फाळणीच्या जखमांचे आणखी एक गहिरे चित्रण. यातील सीता ही ‘भारतीय’ मातृप्रतिमा असली, सहन करणारी असली तरी ती स्वतःचे निर्णय घेते. स्वाभिमानी स्त्री ..अडचणीत भावाकडे न जाता स्वत: गाणी म्हणून जगण्याचा पर्याय स्वीकारणारी ही स्त्री स्वाभिमानाचा आणि समाजातील बंधनांविरुद्धच्या संघर्षाची प्रतीक आहे.

तिताश एकटी नदीर नाम (१९७३)



अद्वैत मल्ला बर्मन यांच्या आत्मचरित्रात्मक कादंबरीवर आधारित. तिताश नदी.. हळूहळू कोरडी पडत चाललेल्या नदीवरील शहरी भांडवलदार लोकांचे आक्रमण वाढत जाते, जशी नदीकाठच्या लोकांची संस्कृती आणि जगण्याची परंपरा हरवते. घटक यांनी इथे मानवी विस्थापनाला भौगोलिक प्रतिमेत रूप दिलं. आटलेल्या पात्रातील शेतांमधून बागडणाऱ्या लहान मुलावर चित्रपट थांबतो. 

जुक्ती ताक्को आर गप्पो  (१९७४) (तर्क, चर्चा आणि कथा)



घटक यांचा शेवटचा आणि सर्वार्थाने वैयक्तिक चित्रपट. स्वतः त्यांनी नायकाची भूमिका साकारली. ‘नीलकंठ’, एक दारूडा पण विचारवंत. समाजाची तत्त्वज्ञान, बौद्धिक विचारांची गोंधळलेली अवस्था या नायकात दिसत राहाते.. तो समाज, राजकारण, कला या विषयांवर नक्षलवादी युवक, संगीतज्ञ आणि ब्राह्मण यांच्याशी संवाद साधतो. ही संवादमालिका म्हणजे सामाजिक विचारांचा जणू कोलाज. या संवादांतून स्वतःचं मानसिक, सामाजिक आणि राजकीय आत्मपरीक्षण करत राहातो. त्यातून त्यांच्या विचारविश्वाची अस्वस्थता आणि आत्मपरीक्षण प्रकट होते. ब्रेख्टियन शैलीचा वापर करून त्यांनी प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडलं.

विचारधारा आणि तत्त्वज्ञान
ऋत्विक घटक यांच्यासाठी सिनेमा म्हणजे सामाजिक जबाबदारी. त्यांना वाटत होतं की, सिनेमा लोकांच्या वेदना, संघर्ष आणि स्वप्नांशी जोडला पाहिजे. त्यांचा सिनेमा म्हणजे एक भावनिक संवाद, जिथे प्रेक्षक केवळ पाहात नाही, तर जाणून घेतो, विचार करतो.
त्यांच्या कलाकृतींमध्ये वेदना हीच प्रेरणा होती. त्यांना ‘कला म्हणजे संघर्षातून उगवलेले सौंदर्य’ असे वाटत असे. त्यांनी सांगितलेले ‘I cannot make films unless I suffer’ हे वाक्य त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा सारांश ठरते.



शेवट आणि वारसा
१९७६ मध्ये केवळ ५०व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आयुष्यभर आर्थिक आणि मानसिक संघर्ष झेलत असतानाही त्यांनी भारतीय सिनेमाला एक नवा मार्ग दिला. व्यावसायिक यश त्यांना फारसं लाभलं नाही, पण पुढील पिढ्यांनी त्यांना ‘कल्ट’ दर्जा दिला. मणी कौल, अदूर गोपालकृष्णन, सईद मिर्झा, कुमार सहानी यांसारखे अनेक दिग्दर्शक त्यांना आपला प्रेरणास्त्रोत मानतात.
त्यांचे चित्रपट म्हणजे जीवनाच्या वास्तवाचे आरसे, जिथे सौंदर्य आणि वेदना एकत्र नांदतात. ते कलाकार म्हणून सतत तुटले, पण त्यांच्याच तुटलेपणातून भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दिशा मिळाली.
ऋत्विक घटक हे सिनेमा आणि वास्तव यांच्या सीमारेषा मिटवणारे दिग्दर्शक होते. त्यांनी माणसाच्या अंतःकरणातील तुटलेपण, फाळणीच्या जखमा आणि जीवनावरील न संपणारी आस या सगळ्यांना दृश्यभाषेत रूप दिलं. त्यांचा सिनेमा केवळ बघायचा नसतो.. तो अनुभवायचा, ऐकायचा आणि जगायचा असतो.

त्यांच्या एका वाक्यात त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं सार आहे.
“सिनेमाला लोकांच्या जीवनाशी, संघर्षाशी आणि स्वप्नांशी जोडले पाहिजे.”
याच विचाराने ऋत्विक घटक भारतीय चित्रपट इतिहासात सदैव जिवंत राहतील.

******

-©️ दीपक देवधर 

dpdeodhar@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

स्वागत फुलांनी – गुलाबी तिळवण 

– सविता कांबळे

savitak211@gmail.com

 ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

विचारशलाका 

(५९) 

– प्रेषक शुभदा अघोर

shubhadaaghor@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आणखी एक (अज्ञात ) केशवसुत

– पृष्ठ ६७ –

– प्रेषक माधव मनोहर जोशी 

madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

श्रीमद्भगवत्गीता

१५ व्या अध्यायाचा भावानुवाद

श्लोक १ –
श्रीभगवानुवाच
ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्‌ ।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्‌ ॥ १५-१ ॥

अर्थ —
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आदिपुरुष परमेश्वररूपी मूळ असलेल्या, ब्रह्मदेवरूप मुख्य फांदी असलेल्या,
ज्या संसाररूप अश्वत्थवृक्षाला अविनाशी म्हणतात, तसेच वेद ही ज्याची पाने म्हटली आहेत, त्या संसाररूप
वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्त्वतः जाणतो, तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे. ॥ १५-१ ॥

*मराठी पद्यरूपी भावानुवाद*—

भगवान उवाच —
ज्याच्या फांद्या खाली l मुळे उंचावर l
अश्वत्थ वृक्षावर l पाने वेद ll
अश्वत्थ वृक्षाला l अशा जो जाणतो l
जाणावा तोच तो l वेद वेत्ता ll

श्लोक २
*अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः ।*
*अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके*॥ १५-२ ॥

*अर्थ –*
त्या संसारवृक्षाच्या तिन्ही गुणरूपी पाण्याने वाढलेल्या, तसेच विषयभोगरूप अंकुरांच्या, देव, मनुष्य
आणि पशुपक्ष्यादी योनिरूप फांद्या खाली व वर सर्वत्र पसरल्या आहेत. तसेच मनुष्ययोनीत कर्मांनुसार
बांधणारी अहंता, ममता आणि वासना रूपी मुळेही खाली व वर सर्व लोकांत व्यापून राहिली आहेत. ॥ १५-२ ॥

*मराठी पद्यरुपी भावानुवाद –*

अशा ह्या वृक्षाच्या l शाखा त्या त्रिगुणी l
वर आणि खाली l पसरल्या ll
वैषयिक रूपी l असे ते अंकुर l
नारायण नर  l पशू गण ll
अशा ह्या त्रिवर्णी l फांद्या अश्वत्थाच्या l
बहु पसरल्या l वर खाली ll
माणसाची कर्मे l ममता वासना l
व्यापती जनांना l चहूकडे ll

श्लोक ३
*न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा ।*
*अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा*॥ १५-३ ॥

*अर्थ–*
ह्या संसारवृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे, तसे येथे विचारकाळी आढळत नाही. कारण याचा आदी नाही,
अंत नाही. तसेच त्याची उत्तम प्रकारे स्थिरताही नाही. म्हणून या अहंता, ममता आणि वासना रूपी अतिशय
घट्ट मुळे असलेल्या संसाररूपी अश्वत्थवृक्षाला बळकट वैराग्यरूप शस्त्राने कापून टाक ॥ १५-३ ॥

*मराठी पद्यरुपी भावानुवाद –*

हा संसार वृक्ष l त्याचे हे स्वरूप l
असतं फसवं  l जाण आता ll
नसे आदी ह्याला l नसे अंत ह्याला l
नसे स्थैर्य ह्याला l जाण हेही ll
घट्ट ह्या वृक्षाच्या।अहंता ममता l
वासनाधीनता l काप आता  ll
अशा ह्या वृक्षास l तुला कापण्यास l
वैराग्याची आस l धर पार्था ll

श्लोक ४ 
*ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन्गता न निवर्तन्ति भूयः ।*
*तमेव चाद्यम पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी ॥ १५-४ ॥*

अर्थ–*  त्यानंतर त्या परमपदरूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे. जेथे गेलेले पुरुष
संसारात परत येत नाहीत आणि ज्या परमेश्वरापासून या प्राचीन संसारवृक्षाची प्रवृत्तिपरंपरा विस्तार
पावली आहे, त्या आदिपुरुष नारायणाला मी शरण आहे, अशा दृढ निश्चयाने त्या परमेश्वराचे मनन
आणि निदिध्यासन केले पाहिजे.

*मराठी पद्यरुपी भावानुवाद–*

जया भेटल्याने l परते ना पुरुष ।
शोध ऐसा ईश l संसारात ।।
भेट तू त्या ईशा l प्राचीन वृक्षाची l
वृत्ती व  प्रवृत्ती l विस्तारली ll
शरण जा आता l त्या आदिपुरूषा l
नारायण ईशा l निश्चयाने ll
कर रे तू पार्था l ईशाचे मनन l
व निदिध्यासन l सदोदित ll

श्लोक ५
निर्माणमोहा जितसङ्गदोषा, अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः l
 द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसञ्ज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत्‌ ॥ १५-५ ॥

*अर्थ–*
ज्यांचे मान व मोह नष्ट झाले, ज्यांनी आसक्तिरूप दोष जिंकला, ज्यांची परमात्म्याच्या
स्वरूपात नित्य स्थिती असते आणि ज्यांच्या कामना पूर्णपणे नाहीशा झाल्या आहेत,
ते सुख-दुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोचतात.

*मराठी पद्यरुपी भावानुवाद –*

मान आणि मोह l नष्ट झाले ज्याचे l
दोष आसक्तीचे l जिंकीयले ll
परमात्मा रुपी l राहाती जे स्पष्ट l
ज्यांच्या इच्छा नष्ट l पूर्ण झाल्या ll
असा तो ज्ञानी l जो झालासे मुक्त l
नाही सुख दुःख l त्यास वाटे ll
असा तो पुरुष l परम स्वरुपी l
अविनाशी पदी l पोचतो रे ll


 – ©️ माधव मनोहर जोशी.

madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आजची कविता 

 

– ©️ सौ. स्वाती वर्तक  

swati.k.vartak@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

        गोड मराठी

मन धावतंय  तुझ्याचं मागं
डोलतय तुझ्याच साठी
जावं तिथं कुठं तिथं
नाव येई तुझंच व्हटी

सध्या रत्नागिरीच्या राधिकेनं  वरील गाण्याने सगळ्यांना येड लावलंय.
नाकात नथ घालून  हसत हसत म्हटलेल्या  या गोड गीताच्या  चार ओळींनी धमाल उडवून दिली आहे.
ती रत्नागिरीची असून लंडनच्या पॉप स्कुल मध्ये शिकली आहे . ती मराठीत गायली म्हणून कौतुक .

एक परीक्षक म्हणतो ‘ काय गोड आहेत या ओळी , मला मराठी शिकावंच  लागेल . आणि तो थोडं गाऊनही दाखवतो.  ती सांगते     यहा   “येडा” का मतलब “प्यारा पागल”
हे सगळं आय पॉपस्टार अमेझॉन तर्फे चालू आहे . यात नवीनतेवर भर दिलेला आहे . भोजपुरी हरियाणवी , मराठी असे गायक भारतातल्या अनेक प्रांतातील गायक त्यात भाग घेत आहेत .
ते काहीही असो    

 माझा एक लेख छापून घेण्यासाठी एका दुकानात गेलो होतो. तिथे गर्दी नसल्याने , एका मुलीने संगणकावर माझा मराठी लेख पाहिला. 

तिने गुजरातीत मला  विचारले, “तुम्ही मराठी लिहिता ?” 

मी ‘हो’ म्हणालो . 

त्याच वेळी शेजारी उभी असलेली तिची मैत्रीण  मराठी पुस्तकात डोकावून अक्षरं जुळवून वाचत हॊती.    
मी उत्सुकतेनं त्या मुलीला विचारलं, “काय गं तू मराठी वाचते आहेस?”
ती म्हणाली,  “आम्ही दोघी मराठी शिकतो आहोत” . मला रहावले नाही म्हणून पुन्हा विचारलं, “तुम्ही काय  करता ? ”  
“फॅकल्टी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये ‘एम ए’ करतो आहोत .”
“मराठी का शिकता आहात ?”
“मराठी भाषेत नाटकं फार सुंदर असतात.”  
“तुमचे नाट्य शास्त्राचे प्रमुख दाभाडे सर माझे मित्र आहेत . ते हल्लीच  निवृत्त झाले आहेत.
तुम्ही शिरवाडकर , कानिटकर ,  तेंडुलकर ,  जयवंत दळवी यांची नाटके वाचा. त्यांचे नाट्यलेखन जगप्रसिद्ध झालेलं आहे.”
“तुम्हाला हे सगळं कसं  माहिती ?”
“माझं  मराठी भाषेवर प्रेम आहे!”
“तुम्ही काय करता ?”
“मी आर्किटेक्ट आहे . मी कॉलेजमध्ये शिकवतो .
माझी थोडक्यात ओळख सांगायची झाली तर तुम्ही सयाजीबागेतलं फुलांचं घड्याळ पाहिलं असेल !”
“हो तर ते आम्ही लहान असल्यापॊसून पाहत आलो आहोत”
“ते मी बनवलं आहे” .  
“बापरे, कमालच झाली .तुम्हाला भेटून  खूप  आनंद झाला” . “मला पण” .
“तुमची नावं काय आहेत ?”
“मी कावेरी त्रिवेदी आणि ही नंदीनी  आचार्य” .
“मला माझ्या  मराठी भाषेचा अभिमान वाटतो. ती भाषा  तुम्ही शिकता आहेत ते ऐकून फारच मजा आली “
वास्तविक मुंबईच्या भाजी बाजारात सुद्धा ऐकायला न मिळणारी भाषा नाटकात आणि गोड गाण्यामुळे कोणाला शिकावीशी वाटावी याचा आनंद होतो . 

– ©️ प्रकाश पेठे 

prakashpethe@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

सारेच सज्जन

“ रेणू, पुरे कर आता काम,अकरा वाजलेत ग,किती दमशील ? जा आता झोपायला !” आईनी प्रेमळपणे स्निग्ध नजरेने जणू मला ओवाळत म्हटले.

“ झालेच,एवढी गवार निवडून ठेवते. सकाळी खूप घाई होते. ना ! उद्या सकाळी दिनेश भावजींना डबा पाहिजे सातलाच.”

“ तू त्याचे फार लाड करू नकोस बरं वहिनी,वहिनी करून तुला राबवून घेतो तो. “ त्या हसत म्हणाल्या. त्यातही माझे कौतुक होतेच.

मी बराच वेळ गवार निवडत बसले. शरीर थकले होते. डोळ्यावर झोप होती पण मला आमच्या खोलीत जायला नकोच वाटत होते.कालच्या रात्रीचे जगदीशचं बोलणे आठवले अन डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

“ रेणू, मी आता आवडत नाहीना तुला ? किती दिवस दूर राहशील अशी ? रेणू मला तू पाहिजेस …. अं ? तू सोडून तर जाणार नाहीस ना मला ? मी तुला दोष देणार नाही… तू या पांगळ्या माणसाशी संसार कर असे कसे म्हणू ?आईसुद्धा दोष देणार नाही तुला. पण मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही रेणू !” हे बोलताना त्यांचेही डोळे वाहू लागले होते. मग त्यांच्या छातीवर डोके ठेवून रडत मी त्यांची समजूत घातली होती. … पण आज ..आज पुन्हा तोच प्रसंग उद्भवणार नाही ना ?”

मी खोलीत गेले तर जगदीश झोपले होते. मला वाटले, खरंच ते झोपलेत की नाटक करताहेत..

माझ्या आयुष्याचंच नाटक झालय खरं तर ! आमच्या लग्नाला अजून दोन वर्ष झाली नाहीत, पण वैवाहिक सुखाचं एक वर्ष गेलं असेल जेमतेम आणि जगदीशना हा असा अपघात झाला.

माझा आणि त्यांचा विवाह ठरवून झालेला पण हे इतके उमदे दिसत होते की त्यांच्यावर जीव ओवाळून टाकला मी. स्वभावही समजूतदार,हळवा. आमची दोघांची सरकारी नोकरी,सामान्य कुटुंब,पण जगदीशची आई आणि धाकटा दीर दिनेश,दोघेही प्रेमळ..सुस्वभावी !

पण हे सुख दैवाला पाहवल नाही जणू ! त्या दिवशी जगदीश लोकलने  डोंबिवलीहून दादरला निघाले होते. तो त्यांचा रोजचा प्रवास होता.  मी दिलेला डबा घेऊन, माझा प्रेमळ निरोप घेऊन ते निघाले. आणि मी माझ्या ऑफिसमध्ये पोहचल्यावर मोबाईल आला, ‘ तुमच्या मिस्टरांना – जगदीश साळुंखे यांना रेल्वे अपघात झाला आहे. हॉस्पिटलमध्ये नेले आहे.’

त्याच दिवशी डॉक्टरांनी निर्णय घेतला आणि त्यांचे दोन्ही पाय कापावे लागले. .. जगदीश वाचले. माझं कुंकू बळकट पण .. यापुढे मी आयुष्य कसं जगायचं.. कृत्रिम पायाचा एक वर्षानंतर विचार करावा लागेल म्हणतात. पण जगदीश सहा महिन्यातच सावरले आहेत आणि काल तर कसं सांगू ? याला शृंगार म्हणता येईल का ?

कालची रात्र संपून आता सोळा तास उलटलेत. सासूबाईंनी माझ्या काळजीपोटी म्हटलं,” रेणू, दिवसभर दमली आहेस तू. नोकरीसाठी जाण्यायेण्याचीं दगदग,कार्यालयात सतत भरणा करणाऱ्यांचा राबता आणि त्यामुळं कॅशियर म्हणून येणाऱ्या चलनी  नोटांचा एक न दिसणारा दरारा,घरी आल्यावर जगदीशची बायको या नात्यानं करायची शुश्रूषा,घरातील स्वयंपाकपाणी आणि आवराआवर. रेणू,पोरी तू घरात आलीस ती सून म्हणून,परवापरवापर्यंत मी तुझ्याकडं सून म्हणूनच पाहत होते. दिनेशचं हवं नको देखील तू वहिनी या नात्यानं बघत राहिलीस. पण जगदीशचं असं झालं आणि सगळी नातीच बदलून गेलीत. दिनेशची तू  बहीण झालीस आणि माझी मुलगी. खूप दमलीस. रात्रीचे अकरा वाजलेत. तुला तुझ्या आरामाची काही पडली नाही.. तुला पडलाय एक ध्यास .. सकाळचा दिनेशच्या डबा.नको स्वतःची आबाळ करून घेऊस. जगदीशचं औषधपाण्याचं बघ आणि झोप बाई.”

सासूबाईंचं एक म्हणणं खरं होतं की मला भावजींच्या सकाळच्या डब्याचा आणि नाश्त्याचा ध्यास लागून राहिला आहे आणि त्यामुळं अकरा वाजून गेले तरी मी झोपायला जात नाही. पण सासूबाईंना काय सांगू की मी झोपायला जायचीच टाळाटाळ करतीय.त्या माझ्या आई झाल्यात पण मला सून म्हणून  झोपायला जायचंय.यातला तणाव मी त्यांच्यापर्यंत कसा पोचवू ?

जगदीशना फुलांची फार आवड. लग्नापूर्वी आमचं काही महिन्यांचं प्रणयराधन चालायचं. कधी नदीचा काठ, कधी टेकडी नाहीतर कधी धोबीघाट सुद्धा. रोज संध्याकाळी जागा बदलायच्या पण एक गोष्ट मात्र कधीच बदलली नाही. त्यांच्या बोटाना येणारा पुष्पगंध आणि  शर्टाच्या खिशातून डोकावणारा पानाच्या पुरचुंडीतला शुभ्र गजरा. तो गंध,ती कुजबुज,ते उष्ण श्वास आणि भविष्यातील नियोजनांची यादी. माझा स्वर धपापायचा तर त्यांचा उत्तेजित व्हायचा.
लग्नाच्या आदल्या रात्री सीमांतपूजनाच्यावेळी त्यांची आवड म्हणून  मी खूप सारे गजरे माळले होते. ते पाहून ते खूष होतील असं वाटलं होतं पण.. हॉलच्या एका कोपऱ्यात त्यांनी मला गाठलं आणि म्हणाले रेणू तू खूप छान दिसतीयस ,तुझा साजशृंगार तुला शोभून दिसतोय. तरीही एक काम कर. डोईवरचे गजऱ्यांचे परिधान उतरवून ठेव. मी अवाक झाले. फुलांवर इतकी माया करणारे जगदीश अशी मागणी कशी करू शकतात ?

मी नाराज होत एकेक गजरा उतरवला आणि लग्नमंचावर गेले. माझ्या मैत्रिणी,नातेवाईक अगदी आईदेखील माझं हे रूप पाहून अचंबित झाल्या. डोळ्यातील आसवं लपवत मी तो सोहळा पार पडला तो एक खंत उराशी बाळगून. जगदीश असं का वागले असतील ?मी स्वतःला प्रश्न विचारत थकून गेले. सीमांतपूजन पार पडलं आणि त्यांनी मला पुन्हा गाठलं. मी पुन्हा एकदा सैरभैर झाले. माझ्या भुंडया डोक्यावर टप्पल मारत ते म्हणाले,रेणू s माझ्या या विचित्र मागणीनं दुखावलीस ना ! एकांतात करायचा  साजशृंगार असा सार्वजनिक मला नकोय. उद्याही अंतरपाटाआड तू उभी असशील तेव्हा गजरे नकोयत. आपल्या पहिल्या रात्रीसाठी ते रूप राखून ठेव. त्यावेळी मी तुला ‘ शकुंतला ‘  करेन ..माझ्या हातानं . तुझ्या हातात,पायात,गळ्यात आणि केसांच्या खोप्यात गजरेच गजरे असतील. तुझ्या या रुपाला केवळ मी साक्षी असेन.

लग्न होऊन मी घरी आले. सूनमुख दाखवण्याचा कार्यक्रम असो नाहीतर हळदीकुंकू. मी गजरा माळला नाही. रात्री दहाच्या सुमाराला पाण्याचा तांब्या घेऊन मी खोलीत गेले की जगदीश हाती गजरा घेऊन तयार असायचे. गजरा माळल्याविना ना त्यांनी मला जवळ घेतलं ना ओठांची महिरप मोडली. सकाळी खोलीचं दार सार्वजनिक करण्याआधी तो उरलेला निम्माशिम्मा गजरा मी काढून टाकलाय का नाही यावर त्यांचं बारीक लक्ष असायचं.
त्यांना अपघात झाला त्या दिवसापासून मी मंगळसूत्र चाचपून बघायचे. सवयीनं गजरा ठीक करण्यासाठी डोक्याकडं तोच हात जायचा. हात थकून रिकामाच खाली यायचा. त्यांच्या आसपास कुठेही फूल असणार नाही याची मी काळजी घेत असताना काल माझी चूक झाली. त्यांची फुलांची आवड लक्षात घेऊन दिनेशभावजींनी त्यांच्या उशाशी पिवळा धम्मक चाफा ठेवला. मला हे माहित नसताना मी खोलीत गेले. त्यांच्या औषधाच्या गोळ्या त्यांच्या हातावर ठेवल्या, तेव्हा त्यांचा आवाज घोगरा झाला,चेहरा उत्तेजित झाला. त्यांनी मला घट्ट जवळ ओढलं आणि तो चाफा माझ्या वेणीत खोवला. माझ्यावर चुंबनांचा मारा करत त्यांची पकड अधिकाधिक गहिरी झाली. माझ्या ओणव्या शरीरावर त्यांचा भार पडला. मी विस्फारित नजरेनं त्यांच्याकडं पाहिलं. मांडीखालचे पाय नसलेलं शरीर निष्फळ झुंजत राहीलं . मग आसवांचा पूर लोटला.

मी खरं सांगते,रात्र झाली की मला त्या खोलीत जायची भीती वाटतीय. नकोत मला ते असहाय अश्रू. त्यांना झोप लागायची वाट पाहायची आणि पृथक शय्येवर अंग टाकून द्यायचं.

सासूबाई काळजीपोटी मला झोपायला जायचा आग्रह करतायत. अजून ते जागे आहेत. मी भावजींच्या डब्याच्या तयारीची कारणं सांगत वेळ घालवतीय. गवार निवडून झालीय तरीही त्यांच्या घोरण्याचा आवाज ऐकू येत नाही. आता मी कुठल्या कामाचा बहाणा करू ?सासूबाईंना कसं सांगू ?

माझी जगदीशांच्या खोलीत जायची टाळाटाळ सासूबाईंच्या लक्षात आली होती की नाही हे कळायला मार्ग नव्हता. पण रात्री मी हॉलमध्ये,किचनमध्ये आणि बाल्कनीमध्ये उगाचच कामं निर्माण करतीय आणि सतत त्यांच्या खोलीतील त्यांच्या घोरण्याच्या आवाजाचा वेध घेतीय हे त्या पाहत होत्या. माझ्या जोडीला त्याही आपल्या थोरल्याच्या खोलीत अधूनमधून डोकावत होत्या. आढ्याकडं पाहणाऱ्या जगदीशशी काहीतरी बोलून त्या तोच वेध घेत होत्या असं मला वाटायला लागलं. माझी उगाच निर्माण केलेली कामंदेखील संपली. त्याचवेळी सासुबाई हातात तेलाची वाटी घेऊन जगदीशच्या खोलीत गेल्या. त्यांच्या डोक्यावर तेल घालत त्या हलकेच मालिश करत राहिल्या. जुन्या कवितांची आवर्तनं त्यांच्या मुखातून कानावर पडत होती. थोड्यावेळाने सासूबाईंचा आवाज थांबला. रिकामी वाटी हातात घेऊन त्या बाहेर आल्या. जणू त्यांचं बाहेर पडणं हे रेणू तू आता आत जा म्हणून सांगणं होतं.

सकाळची माझी आणि जगदीशांची आन्हिकं आटपली. मी दिनेशभावजींच्या डब्याची तयारी करत असताना त्या म्हणाल्या,” रेणू s बाळ बरेच दिवस म्हणत होते की तुला सूचवावं तुझी ड्रॉईंगची वही खूप दिवसात उघडली नाहीस. मी तुझ्या पेन्सिलीना टोकं करून ठेवलीत. आज तुझ्या ऑफिसलाही सुट्टी आहे. एखादं छानसं चित्र काढून दाखवशील मला ?”

त्यांच्या विचारण्यात भाबडेपणा नक्कीच नव्हता. त्यांना काहीतरी उत्तर द्यायला हवं म्हणून मी म्हटलं,” आई तुम्ही म्हणताय ते खरं आहे. मला हाती पेन्सिल घेऊन खूप दिवस झालेत. पण होतं  असं की चित्रपट गीतं  लिहिणाऱ्या कवीला  आता कशावर गाणं लिहावं हे नीट कळत नाही.तेव्हा संगीतकाराने एखादी धून वाजवून दाखवावी की त्याला मीटर समजतो आणि दिलेल्या सिच्युएशनवर त्याची लेखणी झरझर काम करायला लागते. तसं तुम्ही मला एखादा विषय दिलात तर बरं होईल.”

माझी ही गरज अतिशय निरागसपणे घेत त्या म्हणाल्या , “ एव्हढाच ना,देते विषय. माझ्या तरुण वयात आम्ही विहिरीवर जायचो. कधी धुणी धुवायला.कधी भांडी घासायला ,नाहीतर साठवणीचे पाणी भरायला. तो पाणवठा हा विषय कसा वाटतो तुला ?”

दुपारची जेवणं झाली आणि मी बुद्धयाच जगदीशच्या खोलीत कागद पेन्सिल घेऊन बसले. तासाभरात हाती एक चित्र घेऊन सासूबाईंकडं येत म्हणाले,”आई किती दिवसांनी आज मूड लागला. हे घ्या चित्र पाणवठ्याचं.”

चित्र बघता बघता त्यांचे डोळे पाणावले. माझ्या पाठीवरून हात फिरवत म्हणाल्या,” रेणू तुझं हे चित्र उत्कृष्ठ आहे की नाही हे मला सांगता यायचं नाही ,पण एक गोष्ट चटकन लक्षात आलीय. सांगू ?”

त्यांच्या लक्षात नेमकं काय आलय याचा अंदाज मी घेत असताना त्या म्हणाल्या,” यातल्या इतर सासुरवाशिणी विहिरीकडे,रहाटाकडं नाहीतर धुण्याच्या पिळ्याकडं पाहतायत. पण तू केंद्रित केलेली हा बाई धुणं धुताधुता पलीकडच्या झाडाकडे पाहतीय. कारण त्या झाडाखाली तिचं लेकरू तिनं झोपवून ठेवलय .”

इतकं बोलून त्या बाल्कनीत निघून गेल्या. पाठमोऱ्या त्या गदगदताना मला जाणवत होत्या. माझ्यातील विनापत्य सासुरवाशीण त्यांचं सांत्वन कशी करू शकणार होती ?
संध्याकाळी जगदीश मोबाईल बघण्यात गढून गेले होते. मी चोरपावलानं  आत गेले. ते काहीतरी यु ट्यूबवर पाहत होते. माझी चाहूल लागताच त्यांनी चटकन मोबाईल बंद केला. त्यांची ही कृती मला विचित्र वाटली. जगदीश एखादी पॉर्न फिल्म बघत होते की काय या शंकेनं मी व्याकुळ झाले.मला हातानी बसतं करत ते म्हणाले,” रेणू एक सिनेमा पाहत होतो. ‘ एक चादर मैलीसी ‘ नायक आणि नायिका यांचा संसार सुखाचा चाललेला असतो. आणि अचानक नायक मरतो. त्याला एक धाकटा अविवाहित भाऊ असतो. त्यांच्या समाजातील प्रथेनुसार तिची सासू आणि वडीलधारे तिच्या मागे लागतात की तू धाकट्या दिराशी लग्न कर. ते लग्न होतं पण ती मात्र नव्या नवऱ्याकडं दीर म्हणून पाहत रहाते. दीरदेखील तिच्याकडं वहिनीच्याच नजरेनं पाहतो. या दोघांची उलघाल सिनेमा भर चालू राहते. “

मी तिथून उठले, बाल्कनीत आले आणि पदराचा बोळा तोंडात कोंबला. क्षणभर वाटलं जगदीश चालत चालत बाल्कनीत येतील आणि म्हणतील,”रेणू,मी काही तुला सुचवत नव्हतो गं ..नको इतकी कासावीस होऊस.”
आज मी एका लेडी डॉक्टरची वेळ घेतलीय. मला काही होतय म्हणून नाही तर मोकळेपणानं तद्न्य व्यक्तीशी बोलता यावं म्हणून मुद्दामच अनोळखी डॉक्टर गाठली.डॉक्टर बाईंसमोर मी बसले . डोळ्यातून पाण्याचा थेंबही काढायचा नाही असं ठरवून बसले. डॉक्टरांना सध्याची जगदीशची अवस्था सांगितली. आणखी वर्षभर तरी कृत्रिम पाय बसवता येणार नाही ही वस्तुस्थिती सांगितली. मला अजून काही विचारायचं होतं पण शब्द फुटत नव्हते. त्या मुक्या शब्दांना डॉक्टरांनीच वाचा फोडली.

“ मिसेस रेणू, तुमच्या मनात काय विचार थैमान घालतायत याची मला पूर्ण कल्पना आहे. तुमच्या लग्नाला जेमतेम दीड वर्ष झालंय. अद्याप तुम्हाला मुलबाळ नाही किंवा प्रेग्नन्सी नाही. प्रेग्नन्सी यायची शक्यता बायॉलॉजिकली निश्चित आहे पण फिजिकल लेव्हलला ते शक्य होत नाही. दोन्ही पाय नसल्यानं तुमच्या पतींना  संभोग करायची इच्छा असूनही जोर देता न आल्यानं तो ऍक्ट करणं जमत नाही. तुमचा प्रश्न असा असू शकतो की,त्यांनी कृत्रिम पाय लावले तर ते चालू शकतील पण त्या ऍक्टसाठी जोर लावायला हे पाय उपयोगी ठरतील का ?

माझं स्पष्ट उत्तर सांगते तस होण्याची शक्यता अगदी निकालात काढण्याजोगी नाही पण कृत्रिम पाय बसवल्यावर ते अजमावून बघताना जर यश आलं नाही तर तुम्हा दोघांची काय अवस्था होईल ?तुम्ही मानसिकदृष्ट्या खंबीर राहून ती क्रिया पार पाडली तर एक चान्स घ्यायला काहीच हरकत नाही.”

मी डॉक्टरांकडून परत आले ते नवी आशा घेऊन. आता मला एखाद वर्ष जोगिणीसारखं राहायचं आहे. कृत्रिम पाय बसवले की त्या पायांसह जगदीशना  संबंधासाठी प्रवृत्त करायचं आहे. त्यानंतर मी आणि जगदीश मनोसक्त रडू ते यश मिळालं म्हणून किंवा अपयश पदरी पडलं म्हणून. कृत्रिम पाय …एक चालत येणारी आशा. माझ्यासाठी.. जगदीशसाठी.. सासूबाईंसाठी.

काल जगदीशना यशस्वीपणे कृत्रिम पाय बसवले.अडखळत का होईना ते घरात चालायला लागले. व्हीलचेअर जीनी दीड वर्ष साथ दिली, ती त्यांनी आपल्या हातानं  थोपटत बाजूला केली. घर आनंदानं न्हाऊन निघालं. दिवसभर कुणीकुणी येऊन जात होतं . अभिनंदन आणि बुके यांनी घर भरून गेलं.

रात्र आली. मी डोक्यात गजरा घातला. नवंकोरं बेडशीट गाद्यांवर अंथरलं  हातामध्ये दुधाचा ग्लास घेऊन त्यांच्या घोरण्याचा आवाज ऐकू यायच्या आत आत आले.

सारीकडे सामसूम झालेली. मी बाल्कनीत रडत बसलीय.कृत्रिम पायानं चालत जगदीश आले. माझे डोळे पुसत म्हणाले,”रेणू,मी स्वतःला अपराधी समजत नाही. नियती अपराधी आहे.”

कृत्रिम पायांना जोर सापडत नव्हता आणि मानसिक  ताणामुळे जगदीशांची गात्रही शिथिल पडत होती. आता आम्ही तीनचार अपयशी प्रयत्नांना सोडून दिलं होतं .
डॉक्टरबाईंच्याकडं आम्ही दोघही गेलो.काय होतय  ते त्यांना सांगितलं. त्या म्हणाल्या,” मिसेस रेणू यांच्या पायात त्या क्रियेसाठी आवश्यक जोर सापडत नाही ही  गोष्ट ऑब्व्हियस आहे. तणावामुळं त्यांची शारीरिक तयारी न झाल्यानं संभोग क्रिया होऊ शकत नाही. कदाचित काळ हेच त्यावर औषध असू शकेल. पण मी तुम्हाला एक सुचवू का ? जगदीश हे बायोलॉजिकली बाप बनण्यास सक्षम आहेत. ते बाप आणि तुम्ही आई बनण्यास सक्षम आहात.पण ते शक्य होत नाहीय. आपण टेस्ट ट्यूब बेबीचा पर्याय का ट्राय करत नाही ? “
एक नवा पर्याय आणि एक नवी आशा घेऊन आम्ही घरी आलो.

मी बाल्कनीत चित्र रेखाटत बसले होते. आपली चाहूल लागणार नाही अशा बेतानं सासूबाई माझ्या मागं येऊन उभ्या राहिल्या.मला मनाजोगतं चित्र रेखाटता येत नव्हतं. त्याचा एक ताण मनावर वागवत मी खुर्चीला टेकले आणि मागं वळून पाहिलं. सासूबाई ते अर्धवट सोडलेलं चित्र एकाग्रतेनं न्याहाळत होत्या.

सासूबाईंना जे मला सांगायचं होतं ते सांगण्यासाठी त्या अवचित सामोऱ्या आल्या. त्यांना दुसऱ्या खुर्चीवर बसतं करत मी म्हटलं,”आई,मला तुम्हाला काही सांगायचंय. कदाचित जगदीशनी हे तुम्हाला सांगून झालंही असेल. मला माहित नाही. चार दिवसांपूर्वी मी आणि जगदीश एका लेडी डॉक्टरकडं जाऊन आलो. आम्हा दोघांची अडचण आणि गरज आम्ही डॉक्टरांशी डिस्कस केली. डॉक्टरबाईंनी एक उपाय सुचवलंय. तो अमलात येण्यापूर्वी तुमच्याशी बोलायचं होतं.

सासूबाईंच्या डोळ्यात डोळे घालून डॉक्टरांशी केलेली चर्चा त्यांना इत्यंभूत सांगितली. सासूबाईंच्या होकाराची नकाराची वाट पाहत असताना त्यांनी मला जवळ घेतलं. त्या स्पर्शात स्वच्छ होकार होता.

मी आणि जगदीश पाळीचे दिवस पाहून लॅबोरेटरीमध्ये गेलो. जगदीश आणि  मी दोघांनी आपापली जननक्षमता सिद्ध करणारी आयुधं प्रदान केली. तिथून उठून आम्ही डॉक्टरांकडं आलो. त्या म्हणाल्या,”मिस्टर जगदीश तुम्ही योग्य निर्णय घेतलाय आणि अमलात देखील आणलाय. आता पुढचं काम आमचं आहे. लॅबमध्ये आम्ही तुम्हा दोघांच्या बीजांचा संकर घडवून आणू. त्यातून तीनचार भ्रूण तयार करू. त्या भ्रूणांची वाढ करू आणि त्यानंतर त्यातला सर्वात सक्षम भ्रूण आम्ही रेणूच्या गर्भाशयात स्थापित करू. वरचेवर सोनोग्राफी आणि इतर तपासण्या करून त्या भ्रूणाचं रूपांतर निरामय अर्भकात परावर्तित होतय ना याची काळजी घेऊ. सगळं व्यवस्थित पार पडल्यावर नऊ महिन्यांनी तुम्ही बाळाचा पहिला स्वर ऐकाल . लेट अस होप फॉर बेटर. मी तुमच्या संपर्कात राहीन. योग्यवेळी मिसेस रेणू तुम्हाला बोलावलं जाईल.”

एका दीर्घ तणावातून स्वतःला सावरत आम्ही घरी आलो. सासूबाईंच्या गळ्यात पडून मी रडण्याच्या अगोदरच त्यांचा खांदा जगदीशनी जवळ केला.

आमचं बाळ पालथं पडायला लागलं होतं . माझी स्केचेसची वही विविध चित्रांनी भरून गेली होती. जगदीश करावकेवर किशोरकुमारची गाणी म्हणण्यात स्वतःला रमवत होते.

घराला किती काळाने घरपण आलं होतं . आज दिनेशभावजींनी मला त्यांच्या ऑफिसमधून फोन करून विचारलं, ”वहिनी तू जरा संध्याकाळी वेळ काढू शकशील ? नाही..  वेळ काढंच .हॉटेल नीलकमलला ये. मला तुझ्याशी बोलायचंय. दादाला मात्र हे सांगू नकोस.”

मी हॉटेल नीलकमलमधे प्रवेश केला. दिनेशभावजी टेबलावर ताल धरून माझी वाट पाहत बसले होते. मी आलीय हे कळताच उठून उभे राहिले. मी खुर्चीवर बसताच आलो म्हणून कॉरिडॉर ओलांडून बाहेर गेले.

पाच मिनिटात भावजी आले तेव्हा त्यांच्याबरोबर एक मुलगी होती. छोट्या चणीची, जीन्स ल्यायलेली, हलकासा मेकअप केलेली आणि उत्सुक नजरेची.
तिला पाहताच मी उठून उभी राहिले. भावजींनी तिच्या खांद्याला स्पर्श करत म्हटलं,” स्वाती s मीट माय  लव्हली वहिनी रेणू. आणि वहिनी…”

मी भावजींना थांबवत म्हटलं,” हेच ना ..ही स्वाती. माझी आणि तिची ओळख अमुक ठिकाणी झाली. ती तमुक ठिकाणी राहते आणि एका ऑफिसमध्ये जॉब करते. “

स्वाती म्हणाली,”वहिनी तुम्ही थोड्याश्या चुकलात. मी एका ऑफिसमध्ये जॉब करत नाही ..माझं स्वतःच ऑफिस आहे. मी पर्यटनव्यवसायात काही वर्ष धडपडतीय. “

दोन दिवसांनी मी भावजींना म्हटलं,”हे स्वाती प्रकरण आईना ठाऊक आहे ? बहुतेक नसावं. आणि त्याचा उच्चार मला करता येत नाही ..प्लिज वहिनी तू सांगशील आईला ?असच म्हणायचं आहे ना तुम्हाला ?”

स्वातीचं घरी येणं जाणं वाढलं. जगदीशनी आपले कृत्रिम पाय नैसर्गिक वाटावेत इतके आपलेसे केले. आमच्या बाळाचे दोन वाढदिवस साजरे झाले. मला एक छोटं प्रमोशन मिळालं. सासूबाईंचे केस अधूनमधून चंदेरी दिसायला लागले. आम्ही वन बीएचके फ्लॅटमधून टू बीएचके फ्लॅटमध्ये स्थलांतर केलं.

एक दिवस स्वातीचा मला ऑफिसमध्ये फोन आला. “ वहिनी,मी स्वाती बोलते. तुम्ही संध्याकाळी हॉटेल नीलकमलमध्ये येऊ शकाल का ?”
“ का नाही. तू बोलावतीयस म्हटल्यावर चंद्रावरदेखील येईन. “
“ ऐका  ना.. मी तुम्हाला भेटायला बोलावतीय हे दिनेशला माहिती नाही. आणि माहिती व्हायला देखील नकोय. मला तुमच्या एकटीशी बोलायचंय..
“ बरं बाई मी एकटी येते. पंचांगं ,कॅलेंडरं पालथी घालून झाली ? ठरलेली तारीख सांगायचीय तुम्हा दोघांच्या लग्नाची ?”
“ नाही हो त्याला अजुनी अवकाश आहे. पण तुम्ही या तर खरं . आल्यावर बोलू. “

नीलकमलच्या फक्त दोन जणांच्या टेबलावर आम्ही बसलो. स्वाती शब्दांची जुळणी करतीय हे पाहून मी धास्तावले. या दोघात काही .. मी साशंक. माझा मोकळेपणाचं गेला आणि मी अवघडून बसले.

स्वातीनं बोलायला सुरुवात केली, ”वहिनी मी जे तुम्हाला विचारू इच्छिते ते मी खरं तर दिनेशला देखील विचारू शकते. पण माझं बोलणं झाल्यावर तुम्हालाच समजेल की हे मी दिनेशला कधीच विचारू शकणार नाही.

मी तुमच्याकडं अनेकदा आलीय. तुमच्या बाळाला खेळवलंय . तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तुमचं बाळ आणि दिनेश या दोघांच्या लकबी,नजर यात विलक्षण साम्य जाणवतंय. माझी आई सतत एक शंका बोलून दाखवतीय म्हणून मला हे विचारणं गरजेचं वाटतंय. वहिनी मला एक शंका फेडून घ्यायचीय. माझा तुमच्या प्रामाणिकपणावर पूर्ण विश्वास आहे. द्याल ना माझ्या शंकेचं निरसन करून ?”

 – ©️ दीपक पारखी 

dgparkhi@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

केव्हा, का करायची क्षमा?
 
साद प्रतिसाद : ४२

ज्याच्या हातून चुका झाल्या नाहीत अशी व्यक्ती, समूह, समाज सापडणे कठीण. काही चुका क्षम्य असतात. काहीच्या बाबतीत या गुन्ह्याला माफी नाही असे आपण ठासून सांगतो. क्षमेने सुधारणेला वाव मिळतो अशी एक समजूत. तर क्षमेचा काही उपयोग नाही, निबर कातडीचे लोक बदलत नाहीत, अट्टल गुन्हेगार, अतिरेकी, कधीच सुधारत नाहीत असाही एक टोकाचा विचार प्रवाह. अशा वेळी संभ्रम निर्माण होतो. कुणाला माफ करायचे? कोणत्या परिस्थितीत, कोणत्या अटी शर्तीवर माफ करायचे?
 
या विषयावर लिहिण्याचे निमित्त अर्थातच काश्मीरमधील ताजी भीषण, निंदनीय, हिंसाचाराची घटना. या बाबतीत दोन मतप्रवाह स्पष्ट दिसून येतात. एक म्हणजे धडा शिकवलाच पाहिजे. बदला घेतलाच पाहिजे. त्यासाठी शेजारच्या देशाशी युद्ध छेडावे लागले तरी हरकत नाही.  दुसरा प्रवाह असा की यात लोकल काश्मिरी जनतेची काय चूक? त्यांच्या पर्यटन व्यवसायावर, पर्यायाने पोटावर लाथ का मारायची? सुधारत असलेली तेथील परिस्थिती का बिघडवायची? युद्धाने दोन्ही पक्षी नुकसान होते. धडा शिकवायचा तर त्यांच्या बरोबर आपलेही निरपराध सैनिक मारले जाणार. आपले आर्थिक नुकसान होणार! शस्त्रसंहार होणार. खरेच याची गरज आहे का?  त्याने दुरगामी चांगले स्थिर परिणाम दिसून येतील का?  या प्रश्नाची निश्चित उत्तरे देता येत नाहीत. या विषयातील तद्न्य या बाबीचा मागचा पुढचा विचार करतीलच. पण yudhh हा यावर उपाय ठरू शकत नाही एवढे मात्र निश्चित.
 
रशिया युक्रेन म्हणा, इस्रायल, हमास, गाझा प्रकरण म्हणा, म्यानमार, बांगलादेशातील परिस्थिती म्हणा, दोन कोरियातील, दोन येमेन मधील मतभेद म्हणा..युद्धाने कोणाचेही कोणतेही प्रश्न सुटले नाहीत. उलट वाढले आहेत.फायद्याऐवजी प्रचंड मनुष्यहानी, क्रूर हिंसा, आर्थिक नुकसान झाले आहे दोन्ही बाजूंनी! प्रश्न संघर्षाने सुटत नाहीत हे ऐतिहासिक सत्य आहे. वेळ प्रसंगी युद्धाला पर्याय नसतो हेही खरे आहे. पण युद्ध हा शेवटचा पर्याय असावा. धडे शिकवण्याचे इतरही पर्याय असू शकतात. त्याचाही विचार व्हावा. आजकाल सरकारच्या आधी सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मिडियाच सर्व काही ठरवायला लागली आहे. जन जागृतीऐवजी माथे भडकावण्याचे काम सुरू आहे. हेही थांबले पाहिजे. टोकाचे विचार नेहमीच घातक ठरतात. हे विसरता कामा नये. मिडियाने देखील जबाबदारीने वागणे गरजेचे आहे अशा वेळी. सत्य काय जसे दाखवाल तसे दिसते. विवेक जागरूक ठेवून निर्णय घेणे जास्त महत्वाचे. कोणत्याही प्रश्नाच्या सर्व बाजू नीट तपासणे, अन् वास्तव काय आहे त्याचा नीट शोध घेणे हा समंजसपणा जास्त गरजेचा अशा वेळी..
 
दूर कशाला, कुटुंबातील नाते संबंधात देखील वितुष्ट आले की अशीच परिस्थिती निर्माण होते. नवरा बायको, बापलेक, भाऊ भाऊ, बहिणी, काका मामा..कुठलेही नाते घ्या. साध्या साध्या कारणाने ठिणगी पडते. वाद होतात.ते विकोपाला जातात. मारामारी, हिंसाचार, कोर्ट कचेरी..प्रकार वाढतच जाते. इथेही मनात युद्धाची खुमखुमी दिसून येते. मेरे मुर्गिकी एकही टांग अशी हटवादी वृत्ती असते. माघार घ्यायची कुणाचीच तयारी नसते. अहंकार सापाच्या फण्यासारखा डोके वर काढतो. जे प्रश्न चर्चेने, विचार विमर्शाने, दोन्ही पक्षी एकेक पाऊल मागे घेतल्याने, क्षमा केल्याने, झाले गेले विसरून पुढे जाण्याचा संकल्प सोडल्याने, सहज सुटू शकतात त्यासाठी आरडा ओरडा, भांडणे, कोर्ट कचेरी, मारामाऱ्या हा पर्याय शोधला जातो. त्याचे परिणाम एका व्यक्तीला नव्हे, एका पिढीला नव्हे, पुढच्या अनेक पिढ्यांना भोगावे लागतात. घरातली शांती, सामंजस्य, लळा जिव्हाळा यावर कुठाराघात होतो. झालेल्या जखमा सहजासहजी भरून निघणाऱ्या नसतात. इथेही माफी हा पर्याय असू शकतो. झाले गेले विसरून पुढे पाऊल उचलण्यात मनाचा मोठेपणा असतो. क्षमा करण्यात दिलदारपणा असतो. त्याला पळवाट, भित्रेपणा समजू नये. क्षमा केल्याने कुणी लहान होत नाही. तसेही मानवी नाते संबंध म्हणा, समाजातील भावबंध म्हणा, की राष्ट्रीय मैत्रीचे बंध म्हणा..हे सारे गुंतागुंतीचे असतात. असे केल्याने असे होईल, तसे केले तर तसे होईल असे आडाखे बांधणे चुकीचे देखील ठरू शकते. पण अशी रिस्क घ्यावीच लागते आयुष्यात..कारण हे सरळ रेषेत जाणारे प्रमेय नसते. ते नॉन लिनियर मॅथ्स असते. सोडवायला कठीण.पचवायला त्याहून कठीण! यालाच जीवन ऐसे नाव आहे!

–  ©️ प्रा. विजय पांढरीपांडे
७६५९०८४५५५

vijaympande@yahoo.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

कुडाळची ‘माधुर्य’ थाळी

गेल्या १३ तारखेला सकाळी (१३ डिसेंबर २०२५) आम्ही चार जण पुण्याहून वेंगुर्ल्याला निघालो होतो. कऱ्हाड-कोकरूड- मलकापूर मार्गे निसर्गरम्य अणुस्कुरा घाट उतरून मुंबई-गोवा महामार्गाने कणकवलीच्या दिशेने निघालो. वाटेत शुद्ध शाकाहारी जेवण घेण्यासाठी कुठे खानावळ वगैरे आहे का हे गुगलवर शोधलं तेव्हा कुडाळ गावात ‘माधुर्य भोजनालय’ म्हणून ठिकाण असल्याचं आढळलं. तोच रस्ता पुढे वेंगुर्ल्याकडे जात होता म्हणून कुडाळ आल्यावर गाडी तिकडे वळवली. ‘जीपीएस’ च्या मदतीने कुडाळेश्वर मंदिरापाशी असणारं ‘माधुर्य भोजनालय’ सहज सापडलं.

दुमजली घराच्या फाटकातून आत सावलीत गाडी लावायला पुरेशी जागा. पलीकडे प्रशस्त हवेशीर दालन. त्यात टेबल खुर्च्या. प्रवेश करण्यापूर्वी स्टॅन्डवर चपलाबूट काढून ठेवायचे. डावीकडे बाहेरच्या बाजूस हातपाय धुवून फ्रेश होण्यासाठी मुबलक जागा. एव्हाना भूक चांगलीच प्रज्वलित झाली होती. फिरत्या पंख्याखाली बसून चार थाळ्या मागवल्या. पिवळं वरण-कम् आमटी, नवलकोलाची ओलं खोबरं घालून केलेली हिरवी भाजी, चवळीची सुरबुरीतशी उसळ, गरमागरम पोळ्या, कोबीची पचडी, ताकाची वाटी, लोणचं, उडदाचा पापड आणि भात असा साधाच मराठमोळा बेत. पण जेवून तृप्त झालो. थाळी मर्यादित होती, मात्र वाढपी बायका पुन्हा पुन्हा वाढत होत्या. किंमत फक्त १२० रुपये. सर्वत्र स्वच्छता, टापटीप असल्यामुळे वातावरण प्रसन्न होतं.

मालकीणबाई देखरेख करता करता गप्पा मारत होत्या. त्यांतून समजलं, की त्यांचा मुलगा शशांक जडये याने हॉटेल व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण करून मोठ्या शहरात काही वर्षं नोकरी केली. अनुभव घेतला. मग गावी परत येऊन ८ वर्षांपूर्वी ही खानावळ सुरू केली. तोंडी प्रचारामुळे आणि सोशल मीडियाच्या कृपेने प्रवाशांना आता ती माहीत झाली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरून वाट वाकडी करून लोक मुद्दाम जेवायला येत असतात. मीही त्या बाजूला जाणाऱ्या वाचकांना सुचवेन की एकदा तरी या थाळीचा आस्वाद जरूर घ्या.


– ©️ हर्षद सरपोतदार
  (फेसबुक पोस्ट, २५-१२-२०२५)

hsarpotdar1@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

बाजीराव- मस्तानी आणि पेशवे घराण्याचा इतिहास

विश्वासराव पेशवे
विश्वासराव यांच्या जन्म २२ जुलै सन १७४२ रोजी झाला. पेशवा घराण्यात थोरल्या बाजीराव पेशवानंतर, यांच्याइतका राजबिंडा, देखणा आणि मर्दानी पुरुष झाला नाही. “पानिपत बखर”मध्ये रघुनाथ यादव” लिहीतात, “पुरुषात देखणा विश्वासराव आणि बायकात देखणी मस्तानी बाईसाहेब”. उद्याचा पेशवा म्हणूनच त्याचे संगोपन, प्रशिक्षण, विशेष लक्षपूर्वक होत होते. दुर्दैवाने पानिपतच्या युद्धात लढताना विश्वासरावांचा मृत्यू झाला.

माधवराव पेशवे
नानासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांचे दुसरे चिरंजीव माधवराव हे २० जुलै १७६१ रोजी पेशवापदावर आले. त्यावेळी ते फक्त १६ वर्षाचे होते. मराठी साम्राज्याची जबाबदारी अतिशय कसोटीच्या वेळी अंगावर पडूनदेखील माधवराव डगमगले नाहीत. १७६३ सालच्या निजामाविरुद्धच्या “राक्षसभुवनच्या युद्धातून” त्यांचे शौर्य, कठोर शिस्तप्रियता, सेनानायकत्व, इ. गुण प्रकट झाले. माधवरावांचा आणि मराठेशाहीचा दरारा सर्वत्र वाढला. हैदरअलीखानसारखा कट्टर शत्रूही त्यांना वचकून असे. माधवरावांनी पानिपतची हानी लवकरच भरून काढली. निजामाला राक्षसभुवनच्या लढाईत पेशव्यांची इतकी जरब बसली की, “खर्ड्याच्या लढाईपर्यंत” म्हणजे सन १७९५ पर्यंत तब्बल २२ वर्षे त्याने तोंड वर काढले नाही. त्यांच्या कारकीर्दीत मराठी फौजेनी उत्तरेकडे जाट, रोहिले यांचा जबरदस्त पराभव केला. त्यामुळे पानिपतचा वचपा निघाला. माधवरावांनी राज्याचे जवळपास सगळेच कर्ज प्रसंगी  स्वधनातूनही फेडले.
पानिपतनंतर थोरल्या नानासाहेबांचे धाकटे बंधू “रघुनाथराव” हेच पेशवे घराण्यात जेष्ठ पुरुष उरले होते. पण त्यांनी माधवरावांशी सहकार्य करण्याऐवजी दावा मांडला. माधवरावांनी कधी सबुरीने  तर कधी कठोरपणे वागून या अंतर्गत दुहीला समर्थपणे तोंड दिले. पण, घरच्या आणि बाहेरच्या शत्रूंशी  आणि स्वतःच्या वाट्याला आलेल्या आतड्याच्या क्षयासारख्या रोगाशी झगडत हा कर्तबगार पेशवा पुण्याजवळ थेऊरला,  चिंतामणी मंदिराच्या ओवरीत, वयाच्या २८ व्या वर्षी १८ नोव्हेंबर सन १७७२ रोजी मृत्यू पावला. त्याच्या पत्नी रमाबाई या माधवरांवाच्या बरोबर सती गेल्या.

नारायणराव पेशवे
माधवरावांना अपत्य नसल्यामुळे, त्यांचे कनिष्ठ बंधू नारायणराव १३ डिसेंबर सन १७७२ रोजी पेशवा झाले. यांच्या कारकीर्दीत विशेष काही घडामोडी झाल्या नाहीत. गारद्यांकडून नारायणरावांचा शनिवारवाड्यात खून झाल्यामुळे, त्यांची कारकीर्द, ३० ऑगस्ट १७७३ रोजी, अवघ्या ८ महिन्यांतच संपली.

सवाई माधवराव पेशवे
नारायणरावांचा खुन झाला त्यावेळी गरोदर असलेल्या नारायणराव यांच्या पत्नी गंगाबाईंना, सुरक्षिततेसाठी बारभाई मंडळींनी पुण्याहून, पुरंदर किल्ल्यावर नेले. बारभाईंनी पुरंदर किल्ल्यावरून, गंगाबाईंचे नावे पेशवाईची द्वाही फिरवली. पुरंदरला १८ एप्रिल १७७४ ला सवाई माधवांचा जन्म झाल्यामुळे, बारभाई पक्षाची सरशी झाली.
बारभाईनी सवाई माधवरावांना, त्यांच्या जन्मानंतर केवळ ४० व्या दिवशी म्हणजे, २८ मे १७७४ रोजी पेशवाईची वस्त्रे देवविली. त्यांची आई गंगाबाई १७७७ रोजी वारल्या. त्यांच्या कारकिर्दीत नाना फडणवीस (किंवा नाना फडणीस, १७४२ – १८००) राज्याचा कारभार पाहत होते. सवाई माधवरावांच्या कारकिर्दीत पेशव्यांचे जुने वैभव पुन्हा दिसू लागले होते. २७ ऑक्टोबर १७९५ रोजी अपघाताने शनिवारवाड्यात स्वतःच्या महालाच्या सज्जातून २५ ऑक्टोबरला खाली पडून वयाच्या २१ व्या वर्षी सवाई माधवरावांचा मृत्यू झाला. त्यांच्या दुसऱ्या पत्नी यशोदाबाई या १४ जानेवारी १८११ ला दुसऱ्या बाजीरावाच्या कैदेत असताना रायगड किल्ल्यावर वारल्या.
सवाई माधवराव वारल्यानंतर थोरल्या नानासाहेबांचा वंश संपला.

रघुनाथराव/राघोबादादा
थोरल्या बाजीराव पेशव्यांचा दुसरा मुलगा रघुनाथराव पेशवे हे साताऱ्यालाच राहत होते. कारण सांगता येणार नाही, पण ते सदाशिवराव (भाऊसाहेब) पेशवे आणि मस्तानीपुत्र समशेरबहाद्दर यांचा  लहानपणापासून द्वेष करीत. रघुनाथराव आपली घोडीसुद्धा सदाशिवरावभाऊंच्या घोड्याजवळ बांधू देत नसत.
नारायणरावांच्या खुनानंतर प्रजेच्या, सरदारांच्या, विरोधाला न जुमानता रघुनाथरावांनी स्वतःसाठी पेशवाईची वस्त्रे साताऱ्याहून आणवली. काही काळ ते पेशवेपदावर राहिले. यामुळे अनेक सरदारांनी एकत्र येऊन रघुनाथरावांच्या बंडखोरी विरुद्ध “बारभाई कारस्थान” रचले. नाना फडणवीस, सखारामबापू बोकील, मोरोबादादा फडणीस, त्रंबकरावमामा पेठे, रामशास्त्री प्रभुणे, हरिपंत फडके वगैरे मुत्सद्दी त्यात सामील होते. १७७३ साली बारभाई मंडळी आणि रघुनाथराव यांच्यात यादवी सुरू झाली. रघुनाथरावांच्या चंचल वृत्तीमुळे ह्याच काळापासून पेशवाईत इंग्रजांचा हस्तक्षेप फार मोठ्या प्रमाणात होऊ लागला.
रघुनाथरावांचे पेशवाई विरुद्धचे उद्योग चालूच होते. सरते शेवटी नाना फडणवीसांनी हरप्रकारे सरदारांची एकजूट करून इंग्रज – रघुनाथराव युतीला तोंड देण्याचा संकल्प केला. यामुळे इंग्रजांनी मराठ्यांशी “सालबाईचा तह” केला. परिणामतः रघुनाथरावांना, नाना फडणवीसांच्या स्वाधीन होऊन कोपरगावला कैदेत राहावे लागले. तिथेच ११ डिसेंबर १७८३ रोजी रघुनाथराव निधन पावले. त्यांच्या दुसऱ्या पत्नी आनंदीबाई या होत. नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या संदर्भात तथाकथित “ध” चा “मा” प्रकरणात यांची दुष्कीर्ती झाली आहे. या आनंदवल्ली येथे १७ मार्च सन १७९४ रोजी वारल्या.

दत्तकपुत्र अमृतराव रघुनाथ
रघुनाथरावांचे पहिले दोन मुलगे हे बालपणी वारले. तिसऱ्या खेपेला मुलगी झाली. त्यामुळे वंश चालवण्यासाठी त्यांनी १९ एप्रिल १७६८ ला, अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर, “भुस्कुटे (गाडगीळ)” घराण्यातला एक मुलगा दत्तक घेतला. हेच अमृतराव पेशवे होत.
पण त्यांनतर रघुनाथरावांना “दुसरे बाजीराव” आणि “चिमणाजी” अशी दोन औरस मुले झाली..

चिमणाजी रघुनाथ
“चिमणाजी रघुनाथ” हा रघुनाथरावांचा औरस मुलगा. यांना गं.भा.यशोदाबाईच्या मांडीवर दत्तक देऊन राज्य चालविण्याची योजना नाना फडणवीसांनी आखली. (या यशोदाबाई म्हणजे सवाई माधवराव पेशव्यांची दुसरी बायको.) खरं तर १७८४ साली जन्मलेला चिमणाजी तेव्हा १२ वर्षांचा होता आणि दुसरा बाजीराव चिमणाजीपेक्षा ९ वर्षांनी मोठा होता. तरीही १६ मे १७९६ रोजी दत्तक विधान होऊन २६ मे रोजी चिमणाजीला पेशवाईची वस्त्रेही मिळाली, जी सहा महिनेच टिकली. ह्या सर्वथा राजकीय हितसंबंध नजरेसमोर ठेवून झालेल्या दत्तक विधानामुळे, एखाद्या सासुरवाशिणीने आपल्याच चुलत, चूलत  सासर्‍याला मांडीवर दत्तक घ्यायचा विचित्र प्रकार घडला. इकडे दुसऱ्या बाजीरावाच्या खटपटी  सुरूच होत्या. एकूण रागरंग बघून “महाडचे कारस्थान” करून नाना फडणवीसांनीच दुसऱ्या बाजीरावांना ४ डिसेंबर १७९६ ला पेशवापदावर स्थानापन्न केले व चिमणाजीचे दत्तकविधान रद्द करून त्याला पदच्युत केले.

दुसरे बाजीराव
दुसरे बाजीराव पेशवे यांचा जन्म ०७  जानेवारी १७७५ रोजी “धार” (मध्यप्रदेश) येथे झाला. “महाडचा तह” या प्रसिद्ध राजकारणामुळे “नाना फडणवीसांच्या” कृपेने ते २१ व्या वर्षी पेशवेपदावर आले. परंतु छत्रपतींनी यांना पेशवेपदाची वस्त्रे दिल्याचा पुरावा / दाखला कुठेही उपलब्ध नाही. एक संदर्भ असा आहे की, “आबाजी तथा बाजीकृष्ण शेलूरकरमार्फत यांनी स्वतःच साताऱ्याहून वस्त्र आणून पेशवाईची वहिवाट चालू केली होती.” (संदर्भ— “पेशवे”, लेखक– “श्रीराम साठे”)
यामुळे पेशवाई १८१८ साली अधिकृतपणे संपली असं म्हणायला हरकत नाही

दुसरे बाजीराव,  चिमणाजी , आणि अमृतराव हे तिघेही बंधू एकदा उत्तर भारतात गेल्यानंतर, पुन्हा कधीही दक्षिणेत किंवा महाराष्ट्रात परत आले नाहीत कारण, त्यांच्यावर इंग्रजांनी बंधने घातली होती.
१६ नोव्हेंबर १८१७ रोजी रात्री, येरवड्याच्या चकमकीच्या दरम्यान, दुसरे बाजीराव पेशवे, पुण्याहून कायमचे परागंदा झाले. अखेरीस ०३ जून १८१८ रोजी दुसरे बाजीराव पेशवे “अशीरगडजवळ, ढोलकोट” येथे इंग्रज सेनापती “जॉन माल्कम” यांच्यासमोर शरणागती पत्करुन इंग्रजांकडून सालीना आठ लाख रु. तनखा  घेऊन “कानपूरजवळ बिठूर ऊर्फ ब्रम्हावर्त” तेथे निवृत्त जीवन जगू लागले. त्यांनी हा उत्तरकाल दानधर्म, तीर्थयात्रा, धार्मिक कर्मकांडे, करण्यात घालवला. २८ जानेवारी १८५१ रोजी तिथेच त्यांचे निधन झाले.

दुसऱ्या बाजीराव पेशव्याचे दत्तक पुत्र
दुसऱ्या बाजीराव पेशव्याने बिठूर येथे महाराष्ट्रातील “वेणगावच्या भट” घराण्यातील, “गोविंद ऊर्फ नानासाहेब, सदाशिव ऊर्फ दादासाहेब, आणि गंगाधर ऊर्फ बाळासाहेब” हे तीन मुलगे दत्तक घेतले. आपल्या मृत्यूपत्रान्वये १८३९ साली ज्येष्ठ दत्तक पुत्र नानासाहेब (धोंडोपंत) यांना वारस नेमले. इंग्रजांनी हे मृत्युपत्र मान्य केले नाही. पुढे धोंडोपंत नानासाहेब १८५७ मधील पुढारी म्हणून गाजले.
दुसऱ्या बाजीरावांचे तीनही दत्तक मुलगे १८५७ च्या उठावात सामील झाल्यामुळे तिघांच्याही आयुष्याची अखेर हालअपेष्टात झाली. कोणाचाही वंश पुढे चालला नाही. नानासाहेब आपल्या परिवारासह आश्रयार्थ नेपाळमध्ये गेले. नेपाळ सरकारने नानासाहेबांना आश्रय नाकारला पण इतर परिवाराला नेपाळात राहायची परवानगी दिली.

पेशवेपदावरून पदच्युत झाल्यावर चिमणाजीने शांततेत जीवन व्यतीत केले. चिमणाजी हे फेब्रुवारी सन १८११ पासून वाराणसीत निवृत्त जीवन जगत होते. त्यांना इंग्रजांकडून सालीना दोन लाख रु. तनखा  मिळत असे. त्यांना मुलगा झाला पण, तो जगला नाही. त्यामुळे त्यांचा वंश पुढे चालला नाही. चिमणाजी ३० मे १८३२ रोजी वाराणसी येथे वयाच्या ४८ व्या वर्षी वारले. त्यांची “मुलगी गं.भा. द्वारकाबाई” यांचे नातू “लक्ष्मणराव चिमणाजी थत्ते” यांना ते दीड वर्षाचे असताना, दुसऱ्या बाजीरावाच्या दहाव्या बाई पत्नी “सईबाई” यांनी १८८१ साली नेपाळमध्ये बोलावून दत्तक घेतले होते. पण ते आपले आडनाव “थत्तेच” लावत असत.
रघुनाथ रावांचे दत्तक पुत्र अमृतरावांनी १८०३ साली इंग्रजांशी करार केला आणि ते राजकारणातून अलिप्त झाले होते. १८०५ सालापासून ते वाराणसीला आपल्या परिवारासह निवृत्त जीवन जगत होते. त्यांना इंग्रजांकडून सालीना आठ लाख रु. तनखा मिळत असे. त्यांनी त्यांचे उत्तरआयुष्य धार्मिक वृत्तीने घालवले. ते वाराणसीतच ०६  सप्टेंबर १८२४ रोजी वारले.

अमृतरावांना, विनायकराव हा एकच मुलगा होता. ते वाराणसी आणि चित्रकूट येथे राहत.  विनायकरावांना मुलगा होऊनही जगला नाही म्हणून, त्यांनी नारायणराव यांना दत्तक घेतले.  विनायकरावांचे आणि नारायणरावांचे पटेनासे झाल्यावर, त्यांचे दत्तक विधान रद्द करून, माधवरावांना दत्तक घेतले. विनायकराव ६ जुलै १८५३ रोजी वारले. त्यांनी आपल्या मृत्युपत्रान्वये  माधवरावांना वारस नेमले. १८५७ च्या उठावाच्या वेळी माधवराव फक्त ०९ वर्षाच्या असल्यामुळे, काही कडक बंधने घालण्यापलीकडे इंग्रजांनी त्यांना त्रास दिला नाही. माधवराव आणि त्यांच्या वंशजांचे वास्तव्य “बासबरेली” येथे असे. सन १९२६ पासून ही मंडळी ब्रिटिश सरकारची परवानगी मिळाल्यावर “पुण्यात” स्थायिक झाली. पेशवे घराण्याची ही शाखा आज पुण्यात वास्तव्यास आहे.  

ही झाली पेशव्यांची एकंदर समग्र शाखा.
पुढील भागापासून आपण बाजीराव-मस्तानी यांच्या वंशजांची माहिती घेऊया

(क्रमश:)
– © अ‍ॅड. क्रांती आठवले-पाटणकर
डोंबिवली.
9969087559
३०.०४.२०२५  
(सदर लेखमाला माझ्या नावासह अग्रेषित करायला हरकत नाही.)

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

संस्कृत श्लोक व सुभाषिते

लेखांक २ 

दोन प्रार्थना

.
पहिल्या लेखात आपण एक वेदांतील ऋचा पाहिली. तीही एक प्रार्थनाच होती. आता गणपती जवळ आलेत, तेव्हा ती म्हटली जाईल. गणपतीची आरती झाली की मंत्रपुष्पांजली म्हटली जाते. संपूर्ण मंत्रपुष्पांजली किंवा त्या आधी येणारी मराठी प्रार्थना, म्हणजे “घालीन लोटांगण, वंदिन चरण,” ह्या प्रार्थनांतील सगळे श्लोक वा कडवी ही एकत्र कुठून घेतली नाहीत तर वेगवेगळ्या कृतींतून घेऊन ती एकत्र केली आहेत. आपण मागल्या लेखात गायत्री मंत्र म्हणून जो श्लोक पाहिला, तो ऋग्वेदातला आहे, हे आपल्याला कळलं पण आता गायत्री मंत्राची सुरूवात “ॐ भु: भुर्व: स्व:” ह्या यजुर्वेदातील शब्दांनी होते. ह्या जड विश्वाची उत्पत्ती ध्वनीतून झाली, असं भारतीय तत्वज्ञान मानतं. (अत्याधुनिक विज्ञानही “बिग बॅंग” ने युनिव्हर्सची सुरूवात झाली असं  मानतं .) तो पहिला ध्वनी ॐ होता. ओंकार होता. संत ज्ञानेश्वर पहिल्याच ओवीत म्हणतात “ॐ नमोजी आद्या। वेद प्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूप॥” सर्वाची सुरूवात असणारा, वेदांत उल्लेखिलेला, स्वत:च्या जाणिवेने स्वत:ला जाणणारा,  ॐ हाच आत्मरूप आहे. म्हणून बऱ्याच प्रार्थनांची सुरूवात ॐ ने होते. त्यानंतरचा शब्द आहे, भु: म्हणजे पृथ्वी, भुर्व: म्हणजे अंतरिक्ष आणि स्व: म्हणजे स्वर्ग. थोडक्यांत सांगायचे तर “तिन्ही लोकींचा” अथवा त्रैलोक्यांचा स्वामी असलेला देव. हे विशेषण त्या प्रार्थनेंत सुरूवातीला जोडलं आहे.

.
आज दोन प्रार्थना पहाणार आहोत, त्या थोड्या वेगळ्या आहेत. प्रार्थना म्हणजे काय? सामर्थ्यवान देवाकडे अथवा व्यक्तीकडे नम्र शब्दात केलेली याचना अथवा विनंती. साधारणपणे मानव आपापल्या धर्मानुसार मानलेल्या देवाकडे प्रार्थना करतो. प्रार्थनेत कधी देवाची स्तुती असते, कधी त्याला शरण जाणं असते, कधी देवाचे आभार मानलेले असतात, कधी अपराधांची कबुली असते तर कधी आपल्या गरजा अथवा इच्छा देवाला सांगितल्या जातात. प्रार्थना करताना हात जोडणं, गुडघ्यांवर बसणं वा अन्य शारीरिक क्रिया ह्या संवयीचा भाग असतात. अंतिम समयी आय.सी.यु. त असलेला रूग्ण प्रार्थना करण्याइतका भानावर असला तर तो त्याही स्थितींत मनांत प्रार्थना करतो. आज ज्या दोन प्रार्थना आपण पहात आहोत, त्या अतिशय उदात्त प्रार्थना आहेत. त्यातही देवाकडे मागणं आहे पण ते स्वत:ला, स्वत:च्या आप्तांना अगदी स्वत:च्या देशाला कांही मिळावं म्हणून केलेल्या नाहीत. त्या प्राणिमात्रांसाठी केलेल्या आहेत. ह्यामुळेच त्या वेगळ्या आहेत.

.
त्यांतील एकाचा बरेचजण, आपल्या दैनंदिन प्रार्थनेत समावेश करतात. काही जण देवदर्शनाला गेल्यावर करतात. खरं तर ह्या प्रार्थनेचा धर्माशी संबंध नाही. ती विशाल अर्थाची प्रार्थना आहे. ती अशी आहे:-
                          सर्वेsत्र सुखिन: सन्तु।  सर्वे सन्तु निरामया:।
                          सर्वे भद्राणि पश्यन्तु । न कश्चित् दु:खमाप्नुयात ॥

                           विंझे ह्यांनी केलेला काव्यमय मराठी अनुवाद
                           सुख सर्वां मिळो येथे। निरोगीच असोत ते ।
                           दिसो कल्याण सर्वांना।दु:ख न घडो कुणा॥
विंझेनी दिलेला सरळ अर्थ – येथे (ह्या जगी) सर्व सुखी असोत, सर्व रोगमुक्त असोत, सर्वांना कल्याण दिसो, कुणालाही दु:ख न होवो.

.
आहे ना उदात्त प्रार्थना. परमेश्वराकडे सर्वांसाठीच सुख, आरोग्य, मांगल्य मागितले आहे. हे मागणे उदात्त आहे ह्यांत शंकाच नाही पण प्रत्यक्षात परमेश्वराला तरी ही प्रार्थना अंमलात आणणं शक्य आहे का? मला हा श्लोक वाचताना नेहमी ज्ञानदेवांच्या पसायदानाची आठवण होते. त्यांनी आठशे वर्षांपूर्वी मागणी केली,
“देवा, ‘जे खळांची व्यंकटी सांडो, तयां सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परें पडो, मैत्र जीवांचे॥” खलांचा, दुष्टांचा दुष्टपणा कमी होऊन, त्यांना चांगली कामं करण्याची आवड निर्माण होवो आणि सर्वांना परस्परांबद्दल प्रेम वाटून सर्वांची मैत्री वाढो, ही इच्छा आजही पूर्ण झालेली नाही. अशी मागणी करणं ही भोंदूगिरी नव्हे. ती सर्व प्राणिमात्रांबद्दलची खरी कळकळ आहे. मागणी करणारा मनापासून प्रामाणिकपणे मागतोय पण परमेश्वर देऊ शकत नाही. एकच गोष्ट दोघांना हवी असेल आणि ती एकालाच मिळू शकते, असं असलं की दु:ख आलंच पाठोपाठ. खरं तर इच्छांच्या पाठोपाठ दु:ख फिरत असतं. सुख, समाधान हे “कांही मिळण्यावर” अवलंबून असलं की दु:ख येण्याची शक्यता जास्त असते आणि ज्याच्या अंतरंगी सुख निर्माण झालं, तो सुखासाठी कांही मिळण्याची वाट पहात नाही. तो सुखीच असतो, मग त्याच्याकडे सदरा असो की नसो.

.
“सर्व निरोगी असावेत”. परमेश्वर म्हणेल, “ त्यासाठी मला जन्म-मरण संकल्पनाच बदलावी लागेल.” प्राणिमात्रांचे देह नश्वर आहेत. जीव आहे तोंवर आहे. शरीराला व्याधीचं आणि मरणाचं भय रहाणारच. मग सर्वांसाठी निरामय जीवन कसं मागतात, ही थोर मंडळी. त्यांनाही माहित आहे की हे असाध्य आहे पण असा ध्यास घेतला तर जास्तीत जास्त प्राणिमात्रांना आरोग्य लाभावं म्हणून माणसं झटतील. आपण पाहतोच की काही डॅाक्टर, नर्सेस वा वैद्यकीय सेवा करणारे इतर कर्मचारी किती मेहनत करत असतात. ममतेने रुग्णांची काळजी घेतात. हा श्लोक लिहिण्यामागची किंवा पसायदानामागची भावना हीच आहे की चांगुलपणा वाढीला लागला की दु:ख ओसरेल, आजारात त्रास कमी वाटेल, व्यवहाराहून सेवेला महत्व मिळेल, असं झालं की आरोग्य सुधारेल आणि न चुकवतां येणारे आजार सुसह्य होतील.

.
आपल्या देशांतील लोकशाही राज्यव्यवस्थेत “विरोध” आवश्यक आहे. कदाचित तो अंकुश आहे. हत्तीच्या मानाने अत्यंत किरकोळ असणारा माहूत अंकुशाच्या जोरावर हत्तीवर काबू ठेवतो पण जर अंकुशाचा वापर माहूत स्वैरपणे करू लागला तर हत्ती माहूताला पाडून पायाखाली चिरडायला कमी करणार नाही. वरच्या श्लोकात म्हटलं आहे, सर्वांना “भद्र” दिसो. कल्याण दिसो. मंगलमय दिसो. ह्यातही हेच अभिप्रेत आहे की उगीचच नकारात्मक वातावरण पाहू नका, निर्माण करू नका, तेच तुमच्या आणि इतरांच्या दु:खाच कारण होईल. “सर्वांना सुख मिळावं ”, ही भावना सर्वांनी मनात जोपासली तर त्याचा अर्थ असा नव्हे की सर्व माणसांच्या सर्व इच्छा पुऱ्या होतील. अर्थशास्त्राची सुरूवातच “गरजा असंख्य आहेत आणि साधने कमी आहेत व ती कशी कुठल्या  गरजेसाठी वापरायची” हे ठरविणारं शास्त्र. एका बाजूला ही परिस्थिती तर दुसऱ्या बाजूला अल्पसंतुष्ट राहून हातपाय हलवले नाहीत, पुरेसे प्रयत्न केले नाहीत, तर सुख कसं मिळेल? शेवटी एवढंच म्हणायचं की  “हवं त्यासाठी पुरेसे प्रयत्न करायचे पण जे मिळालं त्यातच आनंद मानायचा”,  हेच सुखाचं साधन.

.
दुसरा श्लोक जरा जास्तच उदात्त आहे. तो असा आहे,

                          नत्वहं कामये राज्यम् न स्वर्गम्, न पुनर्भवम् ।
                          कामये दु:खतप्तानां प्राणीनां आर्तीनाशनम् ॥

                           विंझे ह्यांनी केलेला काव्यमय अनुवाद
                            न स्वर्ग, न पुनर्जन्म, नको साम्राज्यही मला
                           दु:खितांचे दु:ख जावे, हाचि हो ध्यास लागला ॥
सोपा अर्थ – मला राज्य नको, स्वर्ग नको, (अधिक चांगला) पुनर्जन्मही नको. दु:खपीडीतांचे दु:ख नष्ट होवो, एवढेच मी इच्छितो.

.
हा श्लोक सुखाचा विचार करतच नाही, त्याला फक्त दु:ख पहावत नाही. दु:खितांचं दु:ख परमेश्वराने दूर करावं, हीच त्याची मागणी आहे. मला जर कोणी विचारलं की भारताच्या इतिहासात कोण बरं असं म्हणालं असेल तर मी प्रभू गौतम बुध्दांचं नाव घेईन. त्यांना हेच वाटलं, हे नक्कीच आणि तशी परिस्थिती निर्माण करणं हेही मानवाच्या हाती आहे, हे जाणून एका नव्या धर्माचा पाया रचला. परंतु हा श्लोक त्यांचा नाही. हा श्लोक म्हणणारा आहे राजा रंतीदेव. पुराणातला एक राजा. इक्ष्वाकु कुळात जन्मलेला राजा रंतीदेव औदार्याच्या बाबतींत कर्णाला मागे सारेल, असा राजा होता. त्याची प्रजा सुखात होती. कुणाला कांही अडचण आली की तो राजाकडे जाई. राजा हवी ती मदत करत असे. हवं तेवढं धन देत असे. इतर राज्यातूनही कोणी येऊन कांही मागितलं तरी राजा देत असे. मग एक काळ आला. सतत दुष्काळ पडला. धान्य नाही, जनावरांना चारा नाही. लोक रोज राजाकडे येऊ लागले. राजाने आपल्या कोठारांची दारं उघडी टाकली. सर्व जडजवाहीर, धन वाटून टाकलं. लोक कुठे कुठे लांब जाऊन अन्न आणत. राजाने महाल विकला, सर्व कपडे देऊन टाकले. राजा रंतीदेव एका वृक्षाखाली राहू लागला. लोकांना द्यायला तर आतां काही नव्हतंच पण खायलाही नव्हतं. तो आणि राणी. दोघेही उपाशी झोपत. देवाचं नाव घेत. असे ४८ दिवस गेले.

मग एक दिवस कोणीतरी त्याला पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट आणून दिलं. ते आनंदीत झाले. एवढ्यात एक भुकेलेला ब्राम्हण तिथे आला आणि म्हणाला, “मला खूप भूक लागली आहे. मी बरेच दिवस जेवलो नाही.” राजाने ते ताट त्याला दिलं. थोड्याच वेळाने एकाने आंब्याचा रस आणून दिला पण त्याच वेळी एक काही दिवस उपाशी राहिलेला कोणी आला व राजाने त्याची भूक भागवली. मग राजाला एका गवळ्याने ताक आणून दिलं. राणी ओठाला भांड लावणार, एवढ्यात एका तहानलेल्या माणसाने त्यांच्याकडे याचना केली. राजाने ते भांडभर ताक त्याला देऊन टाकलं. मग राजाला कोणीतरी गार पाण्याचा अर्धा भरलेला प्याला दिला. राजाचा गळा तहानेने व्याकुळ झालेला होता. तो पाणी पिणार एवढ्यांत एका अत्यंत गरीब माणसाने म्हटलं, “मला घोटभर पाणी मिळेल कां?” राजाने पाण्याचा पेला त्याला दिला. राजा आणि राणी अन्नपाण्याविना ४८ दिवस राहून मूर्छित झाले. मग त्यांचं आराध्यदैवत विष्णु प्रगट झाले. भक्त परीक्षेत खरा ठरला. राजाला विष्णुने सावध करून म्हटलं, “राजा रंतीदेव, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय हवं ते माग.” राजा रंतीदेवाने तेव्हा हा श्लोक म्हटला, “ देवा, मला राज्य नको, स्वर्ग नको, पुनर्जन्म नको, तू फक्त दु:खितांचे दु:ख निवारण कर.” विष्णुकृपेने दुष्काळ संपला. राजाचे राज्य पुन्हा भरभराटीला आले. अशी ती गोष्ट. ह्या वचनाने राजा अमर झाला.

९.
पुराणातली वानगी पुराणात. आजही उच्च शिक्षण घेऊन नोकरीऐवजी समाजाची, गरीबांची सेवा करणारे आहेत. तेव्हा रंतीदेवाचा विचार मनात ठेवून स्वत:च्या सुखाचा विचार न करता गरीब, परावलंबी, लोकांचं दु:ख निवारण करणारे लोक आहेत. जोपर्यंत हा विचार जिवंत आहे, तोपर्यंत माणसांतली माणूसकी टिकून आहे. आज अनेक संस्था गरीब, अनाथ, पशुपक्षी, इतकंच नव्हे तर पर्यावरण जपावं म्हणून काम करत आहेत. त्यांना मदतही मिळत आहे. ती पैशाची मदत ते रंतीदेवाचा आदर्श समोर ठेवून वापरतील, एवढीच अपेक्षा आपण करू शकतो.

– ©️ अरविंद खानोलकर

arvindkhanolkar@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

रूपे कार्डचा घेतला धसका

ब्रिटिशांनी भारतीय उपखंडात तोडा, फोडा आणि झोडा हीच नीती वापरून आपले साम्राज्य वाढवले. पूर्वेकडील ब्रह्मदेशादी भाग आणि पश्चिमेकडे अफगाणिस्तान, उत्तरेकडे तिबेट, नेपाळ, भूतान तर दक्षिणेकडे श्रीलंकेसारखे बेट भारतापासून अलगदपणे बाजूला काढले. आपल्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळणार नाही अशी एकेकाळी गर्वोक्ती करणारा ब्रिटन आज तोडला जात आहे, फोडला जात आहे आणि झोडला देखील जात आहे. अब्जावधी संपत्ती लुटून नेणारा ब्रिटन आज कंगाल अवस्थेकडे झुकतो आहे. भारतीय खासदार श्री० शशी थरूर यांनी ब्रिटनच्या संसदेत ब्रिटिश सरकार आणि ब्रिटिश खासदारांपुढे हे सारे सुनावले आहे. त्याच ब्रिटिश संसदेने भारतीय वंशाच्या निर्वाचित पंतप्रधानास (श्री० ऋषी सुनक यांना) ब्लडी इंडियन या तुच्छतापूर्वक अनुल्लेखाने पदच्युत केले त्याच श्री० ऋषी सुनक यांना तुम्ही पुन्हा या हो, तुमचे सरकार आम्हाला वाचवेल हो, अशी गळ आता ब्रिटिश नागरिक घालत आहेत.

ब्रिटिशांनी ज्या अमेरिकेची वेळोवेळी पाठराखण केली, कधीही दुजाभाव साधला नाही, ती अमेरिका देखील आज आर्थिक विवंचनेत “मोठे घर नि पोकळ वासा” असे होऊन बसली आहे. प्रचंड मोठी अर्थव्यवस्था, प्रचंड मोठे लष्करी सामर्थ्य, प्रचंड मोठा भूभाग, प्रचंड मोठे आधुनिक तंत्रज्ञान, प्रचंड मोठी कृषीसंपदा आणि प्रचंड मोठे आर्थिक कर्जदेखील यांनी संपन्न असा देश ज्याला मोठं करण्यात पृथ्वीवरचा प्रत्येक मनुष्य आणि इतर प्राणी आपले तन, मन, धन ओततात. अमेरिकेचे चलन “अमेरिकी डॉलर” मोठा करण्यात अवघे जग आपला दिनक्रम व्यतित करतात.

अमेरिकेला काय गरज आहे जगावर अवलंबून राहण्याची, अमेरिकाच जगाला चालवते असा विचार वाचक म्हणून तुमच्या मनात न आला तरच नवल. परंतु खरोखर तशीच परिस्थिती आहे. जगातले सर्व व्यवहार आत्ताआत्तापर्यंत फक्त अमेरिकन डॉलर मध्येच चालायचे. अमेरिकन डॉलर हे जगातले महागडे असे तिसरे चलन. सर्वात महागडे चलन म्हणजे ब्रिटिश पाउंड तर त्याहून थोडे कमी मूल्य असलेले दुसरे महागडे चलन म्हणजे युरोपियन देशांच्या समूहाचे “युरो” हे चलन. तरी देखील अमेरिकी डॉलरचा प्रभाव जगातील सर्व देशांवर पडत असे आणि आजही मोठ्या प्रमाणावर तो प्रभाव टिकून आहे.

माळशिरस मधल्या किंवा गडचिरोलीतल्या अरण्यातील एका गावातील मजूर देखील अमेरिकी डॉलरला भक्कम करण्याचे काम करतो. जेव्हा बँकेच्या ए०टी०एम्० मशीनमधून नोटा काढल्या जातात ते प्लास्टिक स्वरूपात असणाऱ्या ए०टी०एम्० कार्ड वापरून. ते ए०टी०एम्० कार्ड हे रूपे कार्डपेक्षा अन्य कोणतेही असल्यास म्हणजे “व्हिसा” अथवा “मास्टर कार्ड” अशा प्रकारचे असल्यास त्या पैशे काढण्याच्या व्यवहारातील नगण्य अशी रक्कम बँकेला “व्हिसा” अथवा “मास्टर कार्ड” या अमेरिकन कार्ड कंपन्यांना द्यावी लागते. “अमेक्स” तथा “अमेरिकन एक्सप्रेस” नावाचे प्लास्टिकचे ए०टी०एम्० कार्ड मिळते त्याच्या नावावरूनच कळते की ती अमेरिकन कंपनी किंवा अमेरिकन बँक आहे म्हणून. हाच व्यवहार जेव्हा हे प्लास्टिक कार्ड खरेदी-विक्री करण्यासाठी म्हणजे कोणतीही वस्तू (रोख रक्कम न देता) विकत घेताना केला जातो, त्यावेळी देखील या अमेरिकन कंपन्या म्हणजेच अमेरिका पैसे कमावते. याचाच परिमाण म्हणजे अमेरिकन डॉलर प्रत्येक व्यवहारानुरुप भक्कम होत जातो.

नोटाबंदीनंतर भारत सरकारने “यु०पी०आय०” नावाची मोबाईल वरून आर्थिक व्यवहार करण्याची सोय स्थापित केली. सामन्यातील अतिसामान्य ती सोय वापरू शकेल ही शक्यता निर्माण झाली. मोबाईलची क्रांती जवळजवळ ९० टक्के भारतीय नागरिकांपर्यंत तोवर पोहोचली होती, त्यात या सुविधेने “चार चाँद” लावले असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही यावर दुमत नसावे. आणखी चार वर्षांनी आली “कोरोना”ची महामारी. कोरोना काळात अनेकांनी हाताळलेल्या कागदी नोटांना हात देखील लावायला नको या धास्तीने “यु०पी०आय०”चा वापर मोठ्या प्रमाणात फोफावला. त्यामुळे कार्ड वापरणे किंवा ए०टी०एम्० केंद्रावर जाऊन पैसे काढण्याचे प्रमाण नगण्य झाले.

तरी देखील ए०टी०एम्० कार्डची गरज कमी होत नव्हती म्हणून भारत सरकारने आपल्या वित्तीय सेवेद्वारे भारतात जन्माला घातलेले, भारताचे स्वतःचे असे “रूपे” हे प्लास्टिक कार्ड आणि त्याला चालवणारी सशक्त अशी “रूपे” ही यंत्रणा कार्यान्वित केली. त्या यंत्रणेद्वारे होणाऱ्या सर्व व्यवहारांपोटी बँकेला द्यावी लागणारी रक्कम भारतातच राहिली. अमेरिकन डॉलरकडे ती वळवली जाण्याचे मार्ग खुंटले.

यामुळे असे काय होणार? अमेरिकेच्या बलदंड श्रीमंत अर्थव्यवस्थेला थोडाच धक्का लागणार असे जाणकार अभ्यासू व्यक्तिला वाटू शकते. परंतु धक्का बसला बरं. आणि असे तसे नाही तर चांगलेच धक्के बसू लागले. अमेरिकी प्लास्टिक ए०टी०एम्० कार्ड कंपन्यांचा व्यवसाय कमी झाल्यामुळे त्या कंपन्यांचे धुरीण आपले अस्तित्व टिकवण्यासाठी भारतात धडपडू लागले. त्यांनी बँकांच्या व्यवस्थापनाला सक्रिय केले आणि होता होईतो “रूपे” कार्ड भारतीय बँकांनी आपल्या ग्राहकांना देऊ नये किंवा ग्राहकांना त्यापासून परावृत्त करावे यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यामुळे बँकेत आपले खाते नव्याने काढणाऱ्या किंवा जुन्या खातेदारांना ए०टी०एम्० कार्ड देताना बँका “रूपे” कार्ड देणे टाळू लागल्या. आजही फार थोड्या बँका आपल्या ग्राहकांना “रूपे कार्ड” देतात, परंतु त्याचे प्रमाण नगण्य म्हणावे असेच असेल याची शंका आल्याशिवाय रहात नाही. वाचकांनी देशसेवा म्हणून तरी याचा आपल्या बँकेकडे पाठपुरावा करावा असे हा लेखक या लेखाच्या निमित्त आपल्या वाचकांना विनंती करतो.

आपण जेव्हा कोणत्याही दुकानात वस्तू विकत घ्यायला जातो आणि ती वस्तू विकत घेतल्यानंतर आपले ए०टी०एम्० कार्ड वापरतो, तेव्हा ते कार्ड वापरून दुकानदार आपल्याकडून त्या वास्तूचे पैसे घेतो. त्यावेळी दुकानदाराला आपल्या ए०टी०एम्० कार्डचा वापर करण्यासाठी एक यंत्र हातात घ्यावे लागते. त्या यंत्राला “मर्चंट पॉस डिव्हाईस मशीन” असे म्हटले जाते. ते यंत्र त्या दुकानदाराला देणारी एक यंत्रणा प्रत्येक बँकेकडे उपलब्ध असते. असे यंत्र तयार करण्याऱ्या कंपन्या बँकेच्या पाठिशी असतात. या यंत्रांची सेवा देणाऱ्या कंपन्या त्या सेवेच्या बदल्यात बँकेला आणि बँकेद्वारे त्या दुकानदाराला सेवेचे मूल्य आकारतात. दुकानदार त्या विक्रीच्या व्यवहाराच्या बदल्यात बँकेद्वारे त्या यंत्र पुरवणाऱ्या कंपनीला पैसे देतो. समजा १०० रुपयांची वस्तू ए०टी०एम्० कार्डद्वारे खरेदी केल्यास यंत्र आणि यंत्राची यंत्रणा पुरवणारी कंपनी सुमारे पन्नास पैसे ते १ रुपया ७५ पैसे त्या व्यवहारापोटी दुकानदाराकडून वसूल करतात. “अमेक्स” तथा “अमेरिकन एक्स्प्रेस”चे ए०टी०एम्० कार्ड वापरल्यास तर प्रत्येक शंभर रुपयांवर साडे तीन रुपयांपासून तर साडे चार रुपयांपर्यंत भलीमोठी रक्कम वसूल केली जाते.

या यंत्र तयार करणाऱ्या कंपनांनी “रूपे” या ए०टी०एम्० कार्डवर मात्र बहिष्कार घातलेला आढळतो. “रूपे” ए०टी०एम्० कार्ड या व्यापारी यंत्रांवर चालतच नाहीत. यावर मात्र कोणत्याही वृत्तपत्रात, वाहिनीवर चर्चा झालेली आढळत नाही. कोणताही पत्रकार यावर काही व्यक्त होत नाही हे माझे निरीक्षण तुमचेही होऊ शकते.
(क्रमश:…)

[ पूर्वप्रसिद्धी – दै. पुण्यनगरी (सर्व आवृत्त्या) दि. १९ सप्टेंबर २०२५ ]
@देवेंद्र रमेश राक्षे
rakshevendra@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

शब्दकोडे

क्रमांक ४५ : उत्तर 

वाचकांसाठी विनंती : ज्या वाचकांनी आपली उत्तरे पाठवली त्यांची नावे :- डॉ. प्रियंवदा कोल्हटकर, सौ. स्वाती वर्तक, विलास सातपुते.

                               ज्यांची उत्तरे उशीरा आली आहेत, त्यांची नावे  अभिप्रायाच्या चौकटीत देण्यात येतील.  सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार.   

– © मुकुंद कर्णिक 

karnik.mukund@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

मोतीबिंदू

बहिर्भिंग वा बाह्यभिंग म्हणजे कॉर्निया.
अंतर्भिंग म्हणजे लेन्स .
मोतीबिंदू म्हणजे कॅटरॅक्ट.

डोळ्यांच्या रचनेचं चित्र हल्ली शालेय पुस्तकांमध्ये असतं बघा. यातील लेंस वा अंतर्भिंग म्हणजे पारदर्शक काच (अर्थात् काच नाही बरं) आपण बघतो म्हणजे बाह्यभिंग व अंतर्भिंग यांनी मिळून पडद्यावर पाठवलेलं चित्र.  गंमत म्हणजे हे उलट असतं, ते मेंदूत सरळ होतं. एका शास्त्रज्ञानं एक असा चष्मा बनवला ज्यानं ते चित्र डोळ्याच्या पडद्यावर सरळ पडू लागलं. काही दिवस ज्याला सर्व भवताल उलट दिसू लागलं, खाली डोकं वर पाय. नंतर काही दिवसांनी जग सरळ दिसू लागलं पण आपण स्वतः खाली डोकं वर पाय असं चालत आहो असंवाटलं. तर ही मेंदूची गंमत अंतर्भिंग (म्हणजे लेंस) जेव्हा अपारदर्शक होतं तेव्हा त्याला मोतीबिंदू म्हणतात.

हा प्रकार साधारण वयाच्या ६० च्या सुमारास सुरू होतो. जवळजवळ प्रत्येकाला, अगदी कुत्रा मांजरांनाही होतोच. (नेत्रराशल्यतज्ज्ञांची रोजी रोटी) तो २ प्रकारचा असतो, कच्चा व पक्व. पूर्वी म्हणजे १९६० च्या सुमारास मोतीबिंदू पक्व झाल्यावरच काढत होते. परंतु हली दृष्टी मंद व्हायला लागली की मोतीबिंदू कच्चा असतानाच काढून टाकतात.
हे बहिर्भिंग मात्र नयानुसार अपारदर्शक होत नाही. इतकं की मृत्यूनंतर नेत्रदान जेव्हा करतात तेव्हा त्यातील बहिर्भिंगच दुसऱ्याला बसवण्याची शल्यक्रिया करतात.

अंतर्भिंगाचे दोन भाग असतात एक बाह्यकवच म्हणजे Capsule व दुसरा भाग म्हणजे केंद्रबिंदू (nucleus). पूर्वी (फार पूर्वी) सुश्रुताच्या काळी मोतीबिंदूच्या शल्यक्रिया होत असत तेव्हाची अवजारंही सापडलीत. जुन्या ग्रंथामधे एका नेत्रशल्यचिकित्सकानं (बहुधा सुश्रुतानंच) लिहून ठेवलंय की तज्ज्ञानो, हातात एक तुरीचा दाणा ठेवा. जर तुम्हाला मोतीबिंदू काढता आला नाही तर तो दाखवा मोतीबिंदू काढला म्हणून. हा हा..
निदान :- वयोमानाप्रमाणे दृष्टी कमी कमी होत जाते ती बहुतेक त्याच मोतीबिंदूमुळे. तो जेव्हा कच्चा असतो तेव्हा टॉर्च एका बाजूनं उजेड टाकते तेव्हा त्या अपारदर्शकत्वामुळे त्यावर आयरिसची छाया पउने व मोतीबिंदूचं निदान होतं, हा कैप्सुलर वा न्युक्लीयर असतो. पूर्वी जेव्हा मोतीबिंदू पूर्ण पक्व होईपर्यंत वाट बघायला लागे तेव्हा पूर्ण मोतीबिंदूच काढत.

प्रकार: १) Congenital म्हणजे जन्मतःच होतो. आईला मधुमेह असल्यास मूल असं जन्मतं. लेकरू बघून आईच्या मधुमेहाचं निदान नेत्रशल्यचिकित्सक करतो ते असं.
२) वयोमानानुसार – वयाच्या चाळिशीत लेंस म्हणजे अंतर्भिगाचं एक महत्वाचे काम, (नजीकच्या दृष्टी साठी आपला नंबर वाढवणे जे सिलियरी स्नायू च्या मदतीनं करत असतो) करणं त्याला जमत नाही. म्हणूनच आपणा सर्वांनाच चाळिशी लावावी लागते. मग मोतीबिंदूची सुरुवात होते व चषम्याच्या नंबरमधे फेर बदल होऊ लागतात. तरी लवकरच त्याचा इलाज करावा लागतो.
३) Traumatic डोळ्यास इजा झाल्यासही मोतीबिंदू होऊ शकतो.
४) डोळ्याच्या इतर रोगांमुळे किंवा शरीराच्या किंवा
५)शरीराच्या क्षयासारख्या रोगांमुळे मोतीबिंदू होऊ शकतो,
इलाज :- मोतीबिंदू काढून त्या जागी कृत्रिम भिंग बसवणं हा एकमेव इलाज आहे. या साठी मुख्य मानक आहे दृष्टी वर होणारा परिणाम. साधारणपणे ज्या डोळ्याची 6/18 झाली किंवा किंचित आधीही हा इलाज सुचविला जातो व तुम्हाला शल्यक्रिया सांगितली जाते.

हल्ली हा इलाज खूप सोपा झाला आहे. त्याचं नाव फेको इमल्सीफिकेशन एका सुई साख्या अवजारानं Ultrasound किंवा लेझरनं हे केलं जातं (emulsification). एका दुधा सारखं द्रवात त्याचं परिवर्तन करून काढून टाकण्यात येतं.पूर्वी डोळा बधिर करण्यासाठी इंजेक्शन लावत असत. त्याची ही आता गरज नाही. डोळ्यात औषधी थेंब घालून हे काम केलं जातं. पूर्वी जखम करत असत limbus (म्हणजे जिथं बाह्यभिंग व स्क्लेरा मिळतात ती जागा). आता फक्त सुईसारख्या त्या अवजारानं ऑपरेशन केलं जातं.
कृत्रिम भिंग – आता तुमचा चष्म्याचा नंबर तपासून त्यानुसार भिंगाचा जवळचा व दूरचा नंबर ठरविला जातो न् त्यानुसार भिंग बसवलं जातं. म्हणजे तुम्हाला चष्मा लावायचीच गरज नाही. हा एक मोठाच फायदा होतो.
चला तर घाबरू नका, प्रौढांनो, मोतीबिंदूच्या ऑपरेशन साठी तयार व्हा. एकच वांधा आहे. आर्थिक. त्याबद्दल बोलूया नको.

  • © डॉ. प्रियंवदा कोल्हटकर

priyakar40@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

चित्रकारांचे दालन

  

– ©️ रामचंद्र देशमुख

संपर्क : ९९३०२४६९८९

  प्रेषक मेघना घाटे 

meghanaghate25@gmail.com

@@@

-©️  मिलिंद महाबळ 

milind.mahabal65@gmail.com 

@@@

 – ©️ युती प्रवीण अघोर  

प्रेषक शुभदा प्रवीण अघोर     

shubhadaaghor@gmail.com

@@@@@@@@@@@@@@@@@

महत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. 

@@@@@@@@@@@

महत्त्वाची सूचना :- मैत्री अनुदिनी हे मुख्यत: मराठी साहित्याला वाहिलेलं आणि नवं-जुनं साहित्य प्रकाशित करणारं एक नियतकालिक आहे. ते आम्ही वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देत असतो. एखादा जुना लेख वा कविता वगैरे साहित्य पुनर्प्रकाशित करायचं असल्यास आम्ही सदर लेखकाची परवानगी घेण्याचा प्रयत्नही करत असतो. काही वेळा संपर्क होऊ शकत नाही. मात्र अशा प्रकारे पुनर्प्रकाशित केलेल्या साहित्यावर आम्ही न चुकता लेखकाचं नांव व ज्या पुस्तकातून वा मासिकातून ते घेतलं त्याचा नामनिर्देश करत असतो. कृपया आमची अडचण समजून सहकार्य करावं ही विनंती.

@@@@@@@@@@@@@@

नकारातून जनकल्याण : एक सत्यकथा

स्वागत फुलांनी 
फ्रान्सिस केल्सी

 ही कहाणी आहे एका निर्भय आणि ठाम डॉक्टर महिलेची. तिच्या ठाम नकाराने तिने अनेक बालकांचे, एका पिढीच्या बालकांचे विचित्र आजारापासून रक्षण केले.

गोष्ट आहे १९६० च्या आसपासची. ग्रुएंथल या जर्मन औषध उत्पादक कंपनीने १९५७ मध्ये बाजारात एक नवीन औषध आणले होते; त्या औषधाचे नाव होते ‘थॅलिडोमाईड’. त्या औषधात काही शारीरिक क्रिया शांत वा मंद करण्याचे गुण होते. त्यामुळे गर्भवती स्त्रियांच्या उलट्या थांबवण्याकरिता त्याचा चांगला उपयोग होत होता. सर्व युरोप, जपान, ऑस्ट्रेलिया इ. देशांत ते औषध वापरले जात होते.  १९६० मध्ये  एका अमेरिकन उत्पादकाने – रिचर्ड्सन मेरेल या कंपनीने –  ते अमेरिकेत आणण्यास उत्सुकता दाखवली. त्यांनी परवानगी मिळवण्याकरिता त्यांचा अर्ज व माहितीपर कागदपत्रे अमेरिकेच्या खाद्यौषधी विभागाला सादर केली.  त्यांना सहज मंजुरी मिळण्याची अपेक्षा होती.

हा अर्ज नवीन वैद्यकीय अधिकारी, डॉ. फ्रान्सिस ओल्डहॅम केल्सी यांच्या  टेबलावर येऊन थडकला. फ्रान्सिस या ४६ वर्षाच्या औषधशास्त्रातील पी. एच्‌. डी पदवीधारक होत्या व शिवाय एम्‌. डी. पण  अशा भारदस्त पदव्यांच्या होत्या. त्यांची नियुक्ती नवीनच झालेली होती. त्या नवख्या होत्या. औषधी कंपनीला लगेच मंजुरी मिळेल अशी अपेक्षा होती, पण फ्रान्सिस केल्सी यांनी तसे केले नाही. “  अजून परवानगी नाही” हा त्यांचा निर्णय होता.  त्यांना कागदपत्रांत दिलेल्या माहितीत काही माहिती अपुरी वाटली. थॅलिडोमाईडच्या अणूच्या त्रिमिती रचनेत दिशादर्शकतेच्या आधारावर अणूची दोन रूपे होती. त्याचा कागदपत्रात उल्लेख नव्हता.  शिवाय दिलेल्या माहितीत त्यांना शास्त्रशुद्धता आढळली नाही. याबरोबरच डॉ. फ्रांसिसच्या नजरेला हे आले की  कागदपत्रात माहिती देणार्‌या कंपनीच्या अधिकार्‌यांनी पूर्वी काही लेख प्रकाशित केले होते व  ते संशयास्पद आढळले होते. या सर्व कारणांमुळे त्यांनी लगेच परवानगी न देता परीक्षणाकरिता अधिक माहिती मागितली.

त्या काळातील अमेरिकेत नियम असा होता की खाद्यौषधी विभागाने ६० दिवसात नवीन औषधांना परवानगी द्यायची किंवा नाकारायची. काहीच न केल्यास अर्ज मंजूर झाला असे मानण्यात यायचे. पण विभागाने मंजुरी न देता कंपनीकडून  मधेच काही माहिती मागितल्यास पुन्हा ६० दिवस मंजुरी लांबवू शकायचे. फ्रान्‌सिस केल्सी यांचे माहितीने समाधान झाले नाही. त्यांनी लोकांवर केलेल्या चाचण्यांची निरीक्षणे मागवली. यांच्या नवीन माहितीच्या मागण्यांमुळे  परवानगी लांबत चालली होती.  त्या सारख्या नवीन डेटा मागत होत्या. इकडे रिचर्ड्सन मेरेल या कंपनीने परवानगी लगेचच मिळेल म्हणून लाखो गोळ्या बनवून गोदामात तयार ठेवल्या होत्या. त्या पडून राहिल्या मुळे त्यांचा अधीरेपणा वाढत होता. या गोळ्या त्यांनी ख्रिसमसपर्यंत देशभरात लाँच करून नशीब कमावण्याची योजना आखली होती. त्याऐवजी, एक डॉक्टर – एक अज्ञात नवोदित – त्यांना अडवत होता.

डिसेंबर १९६० उजाडला. या महिन्यात लेस्ली फ्लॉरेन्स या स्कॉटिश डॉक्टरने ब्रिटिश मेडिकल जर्नल मध्ये एक पत्र प्रकाशित केले. त्यात त्याने थॅलिडोमाईडमुळे काही मज्जातंतूंवर दुष्परिणामांची शक्यता असल्याचा संशय व्यक्त केला. हे पाहून फ्रान्‌सिस केल्सी यांनी त्या लक्षणांच्या आधारावर अजून माहिती मागितली. ‘परवानगी नाही’ हा निर्णय कायम ठेवला. पुन्हा ६० दिवस परवानगी लांबली. त्या पत्रावरून तिला तिच्या शिकागो विद्यापीठातील आधीच्या कामातील  पण आठवण झाली. त्यात गर्भातील बालकांमध्ये काही दुष्परिणाम कसे होतात याची प्रक्रिया आठवली. लगेच तिने कंपनीकडे विचारणा केली. – गर्भावर काही दुष्परिणाम होत नाहीत हे समजण्याकरिता  प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांची माहिती सादर करा. कंपनीने अर्धवट माहिती सादर केली; त्यातून फ्रांसिस केलीने नवीन प्रश्न काढले व उत्तरे मागितली. पुन्हा “परवानगी नाही” ही स्थिती !

आता मात्र कंपनीचा धीर सुटला ; १९६१ चालू होऊन काही महिने झाले तरी परवानगी दूरच होती. त्यांनी तिला सारखे फोन करून वा कार्यालयात वारंवार येऊन तिच्यावर मानसिक दबाव आणायला सुरुवात केली. पण फ्रांसिस केल्सी या ठाम राहिल्या. दर ६० दिवसांनी निर्णय- “ परवानगी नाही”. कंपनीचे लोक तिच्या वरिष्ठ अधिका-यांना भेटले. पण त्यांनी फ्रांसिस केल्सीच्या कामात ढवळाढवळ करण्यास नकार दिला. फ्रांसिस केल्सी यांच्या दर ६० दिवसांनी नवीन माहितीच्या मागण्या चालूच राहिल्या. कारण दिली जाणारी माहिती समाधानकारक नव्हतीच. त्यात थोडी टोलवाटोलवी पण होती. फ्रांसिस केल्सी यांचे हे म्हणणे होते की औषध बाजारात टाकायच्या आधी त्याच्या सर्व परिणामांची चौकशी झाली पाहिजे व ती माहिती अर्जात असली पाहिजे.  अखेर नोव्हेंबर १९६१ उजाडला. त्याच वेळी युरोपमधील संशोधकांना तेथील जन्मजात दोष असलेल्या बालकांवर संशोधन करतांना त्यांच्या आयांनी गरोदरपणात थॅलिडोमाईड घेण्याशी या दोषांचा काही संबंध असल्याचा पुरावा मिळाला. त्यांना हेही लक्षात आले की थॅलिडोमाईड हे औषध आई अणि गर्भ यांच्या रक्ताला वेगळे ठेवणा-या पडद्याला म्हणजे placental barrier ला क्रॉस करते व गर्भाच्या रक्तात प्रवेश करते. या दरम्यान अमेरिकेत फुकट वाटलेल्या गोळ्या घेऊन १७ जन्मजात दोष असलेले अर्भके जन्मली. एकच हलकल्लोळ उडाला.

ही एक वैद्यकीय आपत्ती होती. डझनभर देशांमधील दहा हजारांहून अधिक मुलांना याचा त्रास झाला. जन्मानंतर लगेचच अनेकांचा मृत्यू झाला. अनेकांना आयुष्यभर अपंगत्व आले. हजारो गर्भधारणेची मुदत संपण्यापूर्वीच संपली.
थॅलिडोमाइडने ते केले होते.
नोव्हेंबर १९६१ मध्ये जर्मनीने फार्मसींमधून औषध काढून घेतले. ब्रिटननेही त्याचे अनुकरण केले. इतर राष्ट्रांनी नुकसान थांबवण्यासाठी धाव घेतली.
शेवटी मार्च १९६२ मध्ये रिचर्ड्सन मेरेल कंपनीने परवानगीचा अर्ज मागे घेतला.

अमेरिका वाचली ! म्हणजे अमेरिकेतील अनेक बालके जन्मजात दोषांपासून वाचली. जर फ्रांसिस केल्सी यांनी १९६० जुलै मध्येच एक साधा पुनरावृत्ती-अर्ज म्हणून परवानगी दिली असती तर काय झाले असते ! त्यांनी त्यांची चिकित्सक वृत्ती दाखवली नसती तर काय झाले असते ? त्यांनी दबावाखाली झुकून परवानगी दिली असती तर काय झाले असते ! त्यांनी चिकाटी सोडली असती, ठामपणा सोडला असता तर काय झाले असते ! आपत्ती आणि अनापत्ती यातील फरक म्हणजे एका महिलेने परवानगीला नकार देऊन योग्य पुराव्याचा आग्रह धरला.

१९६२ जुलैमध्ये वॉशिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्राने फ्रांसिस केल्सी यांचा ही आमची हीरॉइन म्हणून मुख्य पृष्ठावर त्यांचा सन्माननीय उल्लेख केला. हिने अमेरिकन मुलांना वाचवले असे म्हटले. फ्रांसिस केल्सी यांनी मात्र हे म्हटले की या सन्मानास माझे दोन्ही मदतनीस व माझे वरिष्ठ अधिकारीही तितकेच पात्र आहेत.

७ ऑगस्ट १९६२ रोजी, राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी फ्रान्सिस केल्सीला व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले आणि तिला  नागरीक सेवेसाठी विशेष राष्ट्रपती पुरस्कार प्रदान केला – हा नागरीक सेवेकरिता मिळू शकणारा सर्वोच्च सन्मान होता. तो मिळवणाऱ्या त्या फक्त दुसऱ्या महिला होत्या. कॅमेरे चमकले. राष्ट्रपतींनी तिच्या निर्णयाचे आणि दबावापुढे झुकण्यास नकार देण्याचे कौतुक केले.
पण तिचा प्रभाव तिथेच संपला नाही.
केल्सीच्या प्रतिकारामुळे व्यापक सुधारणांना चालना मिळाली.
अमेरिकन सरकारने ऑक्टोबर १९६२ मध्ये लगेच कायद्याची सुधारित आवृत्ती एकमताने मंजूर केली. त्यात फ्रांसिस केल्सी यांनी केलेया मागण्यांच्या आधारावर खालील गोष्टी औषधी कंपन्यांना सक्तीच्या केल्या :- औषध बाजारात उतरवायच्या आधी १) त्याची रोग हटवण्याची परिणामकारकता ( effectiveness )  पुराव्याने दर्शवली पाहिजे. २) औषधांचे अवांछित परिणाम (adverse effects and side effects) अभ्यासून ते सांगितले पाहिजेत. ३) लोकांवर नवीन औषधांचे प्रयोग ( clinical trials) करण्या आधी त्यांना पूर्ण माहिती देऊन त्यांची संमती घेतली पाहिजे.

आजही अमेरिकेत औषधे पुरवणार्‌यांना हे सगळे करावे लागते.
फ्रान्‌सिस केल्सी यांनी ह्या सुधारणा अंमलात आणण्यासाठी नंतर बरेच कार्य केले. खाद्यौषधी विभागात त्या नोकरी करीत राहिल्या  तेही वयाच्या ९० व्या वर्षापर्यंत ! ९१ व्या वर्षी त्या सेवानिवृत्त झाल्या.
केल्सी यांच्यामुळे  जगभरातील औषध सुरक्षेला आकार मिळाला. त्यांनी जे उघड केले त्यामुळे जगभरातील राष्ट्रांनी त्यांचे मानके सुधारली. २०१० मध्ये, एफडीएने सार्वजनिक आरोग्य संरक्षणातील उत्कृष्टता आणि धाडसासाठी डॉ. फ्रान्सिस ओ. केल्सी पुरस्कार तयार केला.
सन २०१५ मध्ये वयाच्या १०१ व्या वर्षी म्हणजे सेवानिवृत्तीनंतर फ्रांसिस केल्सी यांनी १० वर्षांनी देह ठेवला.

फ्रान्सिस ओल्डहॅम केल्सीने कधीही जीवनरक्षक औषध शोधले नाही. तिने कधीही प्रयोगशाळेचे नेतृत्व केले नाही किंवा यशस्वी उपचार विकसित केले नाहीत. तिने जे केले ते खूपच सोपे पण धाडसी होते. तिने तडजोड करण्यास नकार दिला. तिने खऱ्या विज्ञानाची मागणी केली.. “सुरक्षित” म्हणजे खरोखर सुरक्षित असावे असा आग्रह धरून तिने जनतेचे रक्षण केले. तिने औषध आणि औषध नियमनाच्या अपेक्षा कायमच्या बदलल्या. तिचा वारसा  प्रत्येक क्लिनिकल चाचणीत, खऱ्या पुराव्यांनी समर्थित प्रत्येक औषधाच्या लेबलमध्ये जिवंत आहे. कधीकधी विज्ञानातील सर्वात शक्तिशाली कृती म्हणजे शोध नसतो. कधीकधी नाही म्हणण्याचे धाडस असते—शांतपणे, ठामपणे आणि अगदी योग्य क्षणी. फ्रान्सिस केल्सीने ते केले. आणि तिने तसे केल्यामुळे, हजारो अमेरिकन मुले जन्मदोषातून वाचली.  तिच्या शांत नकाराने एक पिढी वाचवली.

फ्रान्सिस केल्सी निवृत्तीनंतर  

– ©️ विलास सातपुते

vilas.satpute54@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

नवीन मुखपृष्ठ

 Golden Bridge (hands of God,)  Ba Na Hills – ईशान कुलकर्णी

[ बा ना हिल्स हे व्हिएतनाममधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक. ]

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

स्वागत फुलांनी – सदाफुली 

सविता कांबळे

 ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

विचारशलाका 

(५८) 

– प्रेषक शुभदा अघोर 

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^ 

आणखी एक (अज्ञात ) केशवसुत

 – पृष्ठ ६६ –

प्रेषक माधव मनोहर जोशी 

madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

श्रीमद्भगवत्गीता

१२ व्या अध्यायाचा भावानुवाद

*श्लोक १६*–
*अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः ।
सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १२-१६ ॥*

*अर्थ* —
ज्याला कशाची अपेक्षा नाही, जो अंतर्बाह्य शुद्ध, चतुर, तटस्थ आणि दुःखमुक्त आहे,
असा कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे. ॥ १२-१६ ॥

*मराठी पद्य रूपी भावानुवाद* —
असे अंतर्बाह्य l निरपेक्ष शुद्ध l
चतुर तटस्थ l दुःखमुक्त ll
असा माझा भक्त l जया नसे फार l
अभिमान थोर l कर्तृत्वाचा ll
असा तोच भक्त l मज असे प्रिय l
जाण धनंजय l निरंतर ll

*श्लोक १७*–
*यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति ।
शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ॥ १२-१७ ॥*

*अर्थ*–
जो कधी हर्षयुक्त होत नाही, द्वेष करीत नाही, शोक करीत नाही, इच्छा करीत नाही,
तसेच जो शुभ व अशुभ सर्व कर्मांचा त्याग करणारा आहे, तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे. ॥ १२-१७ ॥

*मराठी पद्य रूपी भावानुवाद* —

जो न करी शोक l जो न करी द्वेष l
जो न करी हर्ष l ऐसा भक्त ll
जो न दावी इच्छा l तोडीतसे पाशा l
शुभाशुभ अशा l कर्मांचाही ll
असा भक्तियुक्त l उत्तमसा नर l
प्रिय मज फार l जाण तू हे ll

*श्लोक १८ व १९*–
*समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः ।
शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥ १२-१८ ॥*
*तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित्‌ ।
अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥ १२-१९ ॥*

*अर्थ* *श्लोक १८ व १९ चा*—

जो शत्रू-मित्र आणि मान-अपमान यांविषयी समभाव बाळगतो, तसेच थंडी-ऊन, सुख-दुःख
इत्यादी द्वंद्वांत ज्याची वृत्ती सारखीच राहते, ज्याला आसक्ती नसते ॥ १२-१८ ॥
ज्याला निंदा-स्तुती सारखीच वाटते, जो ईशस्वरूपाचे मनन करणारा असतो,
जो जे काही मिळेल त्यानेच शरीरनिर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो, निवासस्थानाविषयी
ज्याला ममता किंवा आसक्ती नसते, तो स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो. ॥ १२-१९ ॥

*मराठी पद्य रूपी भावानुवाद* —
जया असे प्रेम l बहुत सर्वत्र l
शत्रू अन् मित्र l सर्वांसाठी ll
जो न बाळगतो l मान अपमान l
सर्वांना समान l वागवी जो ll
सुख अन् दुःख l थंडी अन् ऊन l
सर्वत्र समान l ज्याची वृत्ती ll
ऐसा माझा भक्त l जया न आसक्ती l
निंदा अन् स्तुती l एक ज्याला ll
जो करी मनन l ईश स्वरूपाचे l
समाधान साचे l त्याचे मनी ll
घरादारा साठी l जया न आसक्ती l
असे स्थिर बुद्धी l निरंतर ll
पाशी जो न फसे l ऐसा माझा भक्त l
प्रिय मज फक्त l जाण पार्था ll

*श्लोक २०*–
*ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते ।
श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ॥ १२-२० ॥*

*अर्थ* —
परंतु जे श्रद्धाळू पुरुष मत्परायण होऊन या वर सांगितलेल्या धर्ममय अमृताचे
निष्काम प्रेमभावनेने सेवन करतात, ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत. ॥ १२-२० ॥

*मराठी पद्य रूपी भावानुवाद* —

मज मध्ये लीन l भक्त जे श्रद्धाळू l
परम दयाळू l मज प्रिय ll
ऐसे माझे भक्त l निष्काम प्रेमाचे l  
धर्म अमृताचे l घोट घेती ll
ऐसे सारे भक्त l मज फार प्रिय l
जाण धनंजय l निरंतर ll

बारावा अध्याय समाप्त ] 

– ©️ माधव मनोहर जोशी.

madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आजची कविता 

हॅवेललँडमधील रिबेकमधले वॉन रिबेक
थिओडोर फॉन्टेन यांची एक सुंदर कविता

मी एका Theodor Fontane यांच्या कवितेचा अनुवाद ‘मैत्री’साठी पाठवत आहे.
ही कविता Heinrich Theodor Fontane (* 30. Dezember 1819 in Neuruppin; † 20. September 1898 in Berlin) यांनी लिहिली
Theodor Fontane एक जर्मन भाषेचे प्रसिध्द लेखक होते. आणि त्यांची ही कविता तर फारच प्रसिध्द आहे.
विकिपेडिया वर त्यांच्याबद्दल खूप माहिती आहे. म्हणून मी ती इथे देत नाही.

हॅवेललँडमधील रिबेकमधले वॉन रिबेक
त्यांचा बागेत नाशपतीचे एक झाड होते,

Birne Pears

सोनेरी शरद ऋतूचा हंगाम आला
आणि झाडावर पिकलेले नाशपती चमकू लागले,
जेव्हा चर्च टॉवरवरून मध्यान्हीचे ठोके वाजत,
तेव्हा वॉन रिबेक आपले खिसे नाशपतीने भरत,

जर त्यावेळी एखादा मुलगा चालत जाताना दिसला,
तर वॉन रिबेक त्याला हाक मारत आणि विचारत,
मुला, तुला नाशपती हवा आहे?”

आणि जर एक मुलगी चालत आली तर ते तिला म्हणत:
“छोटूकली, इकडे ये, मी तुला एक नाशपती देतो.”

अनेक वर्षे हे असेच चालले वॉन रिबेक आता खूप म्हातारे झाले.
त्यांना त्यांचा अंत जाणवला.

शरद ऋतूचा काळ होता, पुन्हा नाशपतीचा सुवास सगलीकडे दरवळू लागला.
वॉन रिबेक म्हणाले: “मी आता शेवटच्या यात्रेला निघत आहे.
माझ्या थडग्यात एक नाशपती ठेवा.”

आणि तीन दिवसांनतर वॉन रिबेकचा अंत झाला.
अंतयात्रेला सर्व शेतकरी आणि बागायतदार आले होते.
ते गात होते “येशू माझा आत्मविश्वास”,
मुलांना फार वाईट वाटले, त्यांचे हृदय जड झाले.
वॉन रिबेक आता गेले. आत आम्हाला नाशपती कोण देणार?”
मुलामुलींना खूप रडू येत होते, पण
ते म्हाताऱ्या वॉन रिबेकला नीट ओळखत नव्हते.
स्वतःच्या मुलांवर अविश्वास असलेल्या वॉन रिबेकला
मुलगा नाशपतीच्या झाडाला कडक बांदोबस्तात ठेवील हे माहीत होते.
सगळ्याचा विचार करूनच,
त्याने कबरीत एक नाशपती ठेवायला सांगितले होते.

तिसऱ्या वर्षी नाशपतीला अंकुर फुटले.
आणि त्याचे छोटे रोप थडग्यातून बाहेर आले.
वर्षे पालटली,

एक नाशपतीचे झाड थडग्यावर आपल्या फांद्या पसरून उभे राहिले.
दर वर्षी सोनेरी शरद ऋतूतील हंगामांत,
त्याची नाशपती फळे चमकतात आणि सुगंध दरवळतो.
आणि जेव्हा एक मुलगा चर्चयार्ड ओलांडून येतो,
तेव्हा ते झाड कुजबुजते: “मुला, तुला नाशपती हवांय?”
आणि जेव्हा एखादी मुलगी येते, तेव्हा झाड कुजबुजते:
“छोटूकली, इकडे ये, मी तुला एक नाशपती देतो.”

अशा रीतीने हॅवेललँडमधील रिबेकचे वॉन रिबेक
अजूनही मुलामुलींना नाशपती वाटत आहेत.

– अनुवाद : नलिनी भट-स्पेरलिंग

nalini_nbs@gmx.de

@@@

आयुष्य पुरेसे नाही

आयुष्य ही परीक्षा सुटणार प्रश्न नाही
उत्तरे शोधताना हे आयुष्य पुरेसे नाही

आलो इथे कशाला उद्दिष्ट काय आहे
सत्य जीवनाचे हे कोणास माहिती नाही

सुख लाटांच्या भरतीने चिंब जाहले अंग
दुःखाच्या मानसिकतेचे रडगाणे संपत नाही

चेहरा बघण्या आधी स्वच्छ कराव्या काचा
आरसा कधी भिंतीचा खोटे बोलत नाही

रेशमी बंध नात्याचे विस्कटले तुटले धागे
जोडायचे कसे ते पुन्हा या कोड्याचे उत्तर नाही!

– ©️ प्रा. विजय पांढरीपांडे

vijaympande@yahoo.com

@@@

 

– ©️ सौ. स्वाती वर्तक

swati.k.vartak@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

यंदाही पाटी कोरीच!

साद प्रतिसाद : ४१ 

गेल्या आठवड्यात एकेक करून नोबेल पुरस्कार जाहीर झाले. १४० कोटीचा आपला देश. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. टागोर, रामन आधीचे. त्यानंतर ज्या मोजक्याचा नंबर लागला त्याचे कार्य कर्तृत्व देशाबाहेरचे. ते परदेशी स्थायिक झालेले. एकमेव अपवाद सत्यार्थी यांचा. पण त्यांना नोबेल मिळाले तेव्हा त्यांचे कार्य कर्तृत्व आपल्याच देशात अनेकाना माहिती नव्हते. हेही आपले दुर्दैव.किंवा वैचारिक दारिद्र्य म्हणा जवळ तर..या पार्श्वभूमीवर नोबेलची कोरी पाटी घेऊन आम्ही विश्व गुरू व्हायला निघालो आहोत. नेदरलँड अतिशय लहान देश. एकूण लोकसंख्या मुंबईपेक्षा कमी असेल. तिथे असलेल्या सात आठ नामांकित विद्यापीठातील नोबेल पुरस्कार प्राप्त जग विख्यात प्राध्यापकाची संख्या दोन अंकी आहे. जपानचेही तेच. दुसऱ्या महायुद्धात अणू बाँबने उध्वस्त झालेला लहान देश आपल्या मानाने. पण तेही नोबेलच्या बाबतीत आपल्या पुढे.

सायन्सची बहुतेक पारितोषिके विद्यापीठात काम करणाऱ्या संशोधक प्राध्यापकांना मिळतात. हे संशोधन सरकार पुरस्कृत, किंवा इंडस्ट्रीचे अनुदान लाभलेले असते. यातून अनेक जणांचे पी एच डी पदवीचे संशोधन देखील होते. ते डायरेक्ट समाजाशी जोडलेले असते. सामाजिक दृष्ट्या महत्वाचे, उद्योगाला पूरक असे असते. आपल्याकडे विद्यापीठातील संशोधन ( यात आय आय टी सारख्या संस्थाही आल्या) हे केवळ पदवी मिळविण्यासाठी कसे तरी उरकलेले चटावरचे श्राद्ध असते! एकूणच मूलभूत संशोधन ( basic fundaamental research) आपल्याकडे फारसे होत नाही. ( प्रत्येक विधानाला सन्माननीय अपवाद असतात हे इथे संपूर्ण लेखात गृहीत धरायचे!

डी आर डी ओ, सी एस आय आर, इस्रो, अशा कितीतरी संशोधन संस्था, प्रयोगशाळा आपल्याकडे अनेक दशकापासून आहेत. त्यातील हजारो सो कोल्ड शास्त्रज्ञ लाखो रुपये पगार घेऊन नेमके काय संशोधन करतात, देशाच्या उद्योग क्षेत्रात, सामाजिक उन्नतीसाठी नेमके काय योगदान देतात याचाच शोध घेतला पाहिजे. जगभर ख्याती प्राप्त असे कोणते समाजोपयोगी संशोधन त्यांनी केले याचाही शोध घेतला पाहिजे. हस्तिदंती मनोऱ्यात राहणारे, नावालाच शास्त्रज्ञ असलेले हे सगळे पांढरे हत्ती आहेत देशाला भार झालेले! हे आपल्या सर्वांना दुखावणारे कटू सत्य आहे.

याचे मूळ कारण आपल्याकडे सरकारी नोकऱ्यामध्ये कडक शिस्तीचे अकॅडमीक ऑडिट होत नाही. आम्ही दरवर्षी करोडो रुपयाचा केंद्राकडून निधी देतो. सक्षम प्रयोगशाळा तुमच्याकडे आहेत. मग याचा तुम्ही काय उपयोग करता. गेल्या पाच वर्षात तुम्ही देशाच्या बौद्धिक क्षमतेत नेमके काय योगदान दिले हा जाब कुणीच कुणाला विचारत नाही. ही वस्तुस्थिती आहे. दरवर्षी लिहिले जाणारे गोपनीय अहवाल, सी आर, हा केवळ उपचार असतो. त्याची नीट तपासणी होत नाही. मुळात या राष्ट्रीय प्रयोग शाळा, संशोधन संस्था, आय आय टी ज, यांना दिलेली उद्दिष्टे, टारगेट, नेमकी काय आहेत, त्यांच्याकडून नेमक्या अपेक्षा काय आहेत हेच वेल डीफाइन नसते. त्यामुळे प्रत्येकाला मोकळे रान मिळाले असते. करोडोचे अनुदान घ्या. लाखोचा पगार घ्या. मजा करा. कुणीही कुणाला बांधील नाही. उत्तरदायी नाही.

सी एस आय आर, डी एस टी, डी आर डी ओ अशा संस्थानी आता तरी जागे व्हायला हवे. मुळात आपली कार्य पद्धती मुळात बदलायला हवी. निवड प्रक्रिया बदलायला हवी. आय आय टी, तसेच इतर केंद्रीय, राज्य स्तरीय विद्यापीठातील पी एच डी साठीचे संशोधन हे विशिष्ट उद्देश पूर्ती साठीच हवे. त्यातून उद्योग क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काही उत्तम योगदान व्हायलाच हवे. एरवी पदव्याना, संशोधनाला मान्यता देऊच नये. दिलेले अनुदान कसे किती उपयोगात आणले याचे कडक ऑडिट दरवर्षी, हवे तर दर सहा महिन्यांनी व्हायला हवे. तेही त्रयस्थ पार्टीकडून. पारदर्शी पद्धतीने.

आज भारतात वर उल्लेखिलेल्या संस्थांना हजारो करोडो रुपयाचे अनुदान सरकार कडून मिळालेले असते. पण त्याचा योग्य विनियोग होतोय की नाही याची कडक तपासणी करणारी, मुख्य म्हणजे जाब विचारणारी, शिक्षा करणारी पद्धतशीर यंत्रणाच आपल्याकडे नाही. त्यामुळे प्रत्येकाला मोकळे रान मिळाले आहे. कुणीच कुणाला जबाबदार नाही. उत्तरदायी नाही.

कुणी म्हणेल आपण मिसाईल क्षेत्रात, अवकाश संशोधन ( स्पेस, सेटलाईट) या क्षेत्रात तर खूप प्रगती केली आहे. चंद्रावर आपण स्वारी केली.हे मान्य. पण या संबंधीचे संशोधन, तंत्रद्न्यान हे ऑलरेडी उपलब्ध असलेले असे आहे. त्यात मूलभूत संशोधन फार कमी. सगळे डिझाइन डेव्हलपमेंट या स्वरूपाचे असे ते काम आहे. किंबहुना इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन, रडार यासाठी जे मेझरिग इन्स्ट्रुमेंट लागतात, जी चीप टेक्नॉलॉजी लागते ती बहुतांशी आयात केलेली असते. म्हणजे उद्या अमेरिका, रशिया, तैवान, सिंगापूर, जपान, इस्राएल सारख्या देशांनी या आयातीला लगाम लावला तर आपले काम ठप्प होईल ही वस्तुस्थिती आजची. उद्या काही चांगले घडले, सरकारने कडक पावले उचलून स्वावलंबी आत्मनिर्भर धोरण अवलंबिले तर परिस्थिती बदलू शकते. तशा गप्पा चालू आहेत. गप्पा शब्द वापरण्याचे कारण असे की कथनी अन् करणी यात जमीन असमानचे अंतर असते प्रत्यक्षात!

आपल्याकडे तरुणाई आहे. प्रतिभा आहे. पण इच्छाशक्ती नाही. कडक शिस्तीचे धोरण नाही. दूरदर्शी विचारसरणी नाही. आपले राजकीय अजेंडे वेगळे. त्यातच आपली अर्धी अधिक कार्य शक्ती खर्च होते. आपला युवा वर्ग अजूनही जातीपातीचे, सवलतीचे राजकारण यातच अडकला आहे. किंबहुना त्याला बाहुबली पुढाऱ्यांनी त्यात अडकवले असे म्हणू या. ज्यांना आपण सत्तेत निवडून देतो त्यांना धोरण नाही, दिशा नाही, भविष्याची जाण नाही. त्यांना सल्ला देणारे अधिकारी सुशिक्षित असले, विद्यापीठाचे कुलगुरू, संशोधन संस्थांचे निदेशक हे कागदोपत्री विद्वान असले तरी बहुतेक जण सरकारचे गुलाम आहेत. सरकारी नोकर आहेत. त्यांना स्वतःचा आवाज नाही. मुख्य म्हणजे अनेकांच्या ठिकाणी नेतृत्व गुणाचा अभाव दिसतो. खंबीरपणे निर्णय घेणे, नवे उपक्रम राबविणे, प्रशासनात शिस्तीची अंमलबजावणी करणे, प्रोत्साहन देणे, सगळ्यांना बरोबर घेऊन, विश्वासात घेऊन नेतृत्वाची धुरा सांभाळणे..अशा आवश्यक बाबीचा अभाव दिसून येतो. आपली टर्म कशी तरी पार पाडायची, कशी तरी वेळ ढकलून न्यायची अशी टाइम पास वृत्तीच जास्त प्रमाणात दिसते. त्यामुळे काही सन्माननीय अपवाद वगळता डोळ्यात भरेल अशी प्रगती क्वचितच दिसते काही मोजक्या संस्थात.

आता तर बऱ्याच बाबतीत खाजगीकरण झाले आहे. त्यामुळे स्वातंत्र्य आहे हवे ते, हवे तसे करण्याचे. पण इथेही राष्ट्राच्या भल्याचा विचार करण्यापेक्षा व्यापारी दृष्टिकोनच दिसून येतो. त्यामुळे जागतिक पातळीवर नोंद घेतली जाईल असे मूलभूत संशोधन फार कमी खाजगी संस्थातून झालेले दिसते. अर्थात काही अपवाद वगळता!

नोबेल पुरस्कार देण्यातही निःपक्ष धोरण नसते, ज्यांना मिळाले त्यांच्यापेक्षा अधिक योग्य व्यक्ती ना का नाही, असे प्रश्न विचारले जातात. शंका व्यक्त केल्या जातात. तरी ज्यांना ज्यांना हा पुरस्कार मिळाला त्यांचे त्या त्या क्षेत्रातील कार्य निर्विवाद उत्तम असते.

भविष्यात तरी या स्पर्धेत लढत देण्यास सशक्त पावले उचलली जातील अशी आशा करू या..

– ©️ प्रा. विजय पांढरीपांडे 
७६५९०८४५५५

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

बाजीराव- मस्तानी आणि पेशवे घराण्याचा इतिहास

भाग २/७

पहिले/थोरले बाजीराव पेशवे

बाळाजींचा मुलगा बाजीराव बल्लाळ याचा जन्म १८ ऑगस्ट सन १७०० रोजी झाला. बाळाजी विश्वनाथ यांनी “बाजी” नावाचे जेवढे पराक्रमी पुरुष होऊन गेले त्यांची एक स्वतंत्र बखर लिहून ठेवली होती. ती ते वाचत होते आणि त्याचवेळी त्यांना पुत्रजन्माची वार्ता समजली. म्हणून मुलाचे नाव बाजीराव ठेवले अशी एक आख्यायिकावजा माहिती मिळते.

बाजीराव वयाच्या बाराव्या वर्षीच वडिलांबरोबर मोहिमेवर जाऊ लागले आणि त्यामुळे त्यांना आणि त्यांचे धाकटे बंधू “चिमाजीअप्पा” यांना राजनीति, युद्धनीती, राज्यव्यवस्था, वगैरेचे उत्तम शिक्षण हे प्रत्यक्ष अनुभवातूनच मिळाले. सन १७१३ साली पांडवगडाच्या चकमकीच्या वेळी यांना पहिला युद्धाचा अनुभव मिळाला. त्यावेळी ते वडिलांबरोबरच होते. वडिलांच्या हयातीतच काही काळ हे पेशव्यांचे “मुतालिक” पण होते. वडील बाळाजी हे दिल्लीच्या मोहिमेवर निघण्यापूर्वी,  ६ ऑक्टोबर सन १७१८ रोजी साताऱ्याला भरलेल्या खास दरबारात समारंभपूर्वक बाजीरावांना “सरदारी” व चिमाजीआप्पांना “मुतालिकी” मिळाली. दिल्ली मोहीमेत ते वडिलांबरोबर गेलेले होते.

बाळाजी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर त्यांची हुशारी आणि धडाडी पाहून, दरबारातील काही सरदाराचा विरोध पत्करूनही, “सबका सुनना दिलका करना”, न्यायाने छत्रपती शाहू महाराजांनी बाजीरावांना पेशवेपद दिले. १७ एप्रिल सन १७२० रोजी त्यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली.

छत्रपती शाहू महाराजांनी बाजीरावांना, पुणे गाव हे वंशपरंपरागत इनाम दिले. राजकारणासाठी आवश्यक वाटल्यामुळे आणि पुणे गाव भौगोलिकदृष्ट्या सोयीचे  आणि मध्यवर्ती असल्यामुळे, सासवडचा मुक्काम सोडून, थोरले बाजीराव सहपरिवार पुण्याला राहू लागले.

त्यानंतर १७३० साली पुण्यात शनिवारवाड्याचा पायाभरणी आणि वास्तुशांती समारंभ पार पडला. या दिवशी शनिवार असल्यामुळे या वास्तूचे नाव “शनिवारवाडा” असे पडले असे म्हणतात. थोरल्या बाजीरावाने बांधलेला हा वाडा दुमजली आणि तीन चौकी होता. पेशवाईच्या अखेरपर्यंत वाड्यात त्या, त्या वेळच्या गरजानुसार दुरुस्ती, फेरबदल आणि नवी बांधकामे नियमित चालू असत.

पहिले बाजीराव पेशवे यांना “एक अजिंक्य योद्धा आणि उपेक्षित पेशवा” असे म्हणता येईल. त्यांच्या पराक्रमाच्या कथा अनेक पुस्तकातून वर्णन केल्या आहेत. केवळ २० वर्षांच्या पेशवेपदाच्या काळात बाजीरावांनी जवळपास तीनचतुर्थांश भारतावर मराठा राज्य स्थापन केले. त्यांनी ४१ लढाया केल्या व एकही लढाई हरले नाहीत. ते अपराजित सेनानी होते. त्यांची सर्वात गाजलेली लढाई ही “पालखेडची”.. Strategic and tactical mobility साठी पालखेडची लढाई, मास्टरपीस मानली जाते. “अ कन्साइज हिस्टरी ऑफ वॉरफेअर” या पुस्तकात फिल्ड मार्शल बर्नार्ड माँटगोमेरी यांनी लिहिले आहे

“The Palkhed Campaign of 1727–28 in which Bajirao- 1 out-generalled  Nizam-ul-Mulk, is a masterpiece of strategic mobility.”
बाजीरावांची भूमिका केवळ पंतप्रधानाची नसून सेनापतीची होती. त्यांनी सर्व सरदारात मराठा साम्राज्याची आकांक्षा निर्माण करून चारही दिशेला राज्यविस्तार केला. आपल्या दराऱ्याने शत्रूला निस्तेज केले. पालखेडची लढाईची, डभईची लढाई, 

भोपाळची लढाई, बुंदेलखंड-वसईच्या मोहिमा, हे बाजीरावाच्या यशाचे एकापेक्षा एक उज्वल टप्पे आहेत.
 लष्करी ताकदीने आपला हक्क पैदा करणे ही त्यांची पद्धत आणि प्रत्यक्ष भेटी, वाटाघाटींनी राजकारण खेळवणे, ही शाहू महाराजांची पद्धत, या दोन्हींचा एकत्रित परिणाम म्हणजे मराठा साम्राज्याचा विस्तार होय.

बाजीराव केवळ सेनानी नव्हते तर एक संवेदनशील व्यक्ती होते. मस्तानी संदर्भातील त्यांच्या जीवाची घालमेल पुढे येईलच. त्याचसोबत ते व्यवहारी होते. एका प्रसंगात या वृत्ती दृगोच्चर होतात…

“थोरल्या बाजीरावांनी राजकारण आणि लष्करी मोहिमांच्या संदर्भात १७३६ सालच्या पहिल्या तिमाहित राजपुतान्याला भेट दिली होती. त्यादरम्यान उदयपूर आणि जयपूर या संस्थांनांना विशेष भेटी दिल्या होत्या. त्या काळात “राणा जगतसिंग” उदयपूरचे अधिपती होते तर, “सवाई जयसिंग” जयपूरचे (जयनगर) अधिपती होते. या मोहिमेत त्यांच्यासोबत काशीबाई पेशवे होत्या. याबद्दलची एक आठवण अशी की, उदयपूरचे  राणा जगतसिंग यांच्या भेटीसाठी थोरले बाजीराव “उदयपूरच्या” दरबारात गेले होते त्यावेळी, दरबारात मध्यभागी सुवर्णमंडित दोन सिंहासने ठेवण्यात येऊन एक राणाने आणि दुसरे पेशव्याने सुशोभित करावे अशी योजना आखण्यात आली होती. पेशव्यांना सामोरे जाऊन राणाने  त्यांचे स्वागत केले. आणि आसन स्वीकारण्याची विनंती केली. परंतु पेशव्यांनी आसन न स्वीकारता ते सिंहासनाच्या पायथ्याशी बसले होते.

याउलट “सवाई जयसिंग” यांच्या भेटीसाठी थोरले बाजीराव “जयपूर” दरबारात आले असताना, सवाई जयसिंगच्या मांडीला मांडी लावून ते बसले होते व बाजीरावाने थेट बरोबरीच्या नात्याने बोलणे आणि वाटाघाटी केल्या, याचे  सवाई जयसिंगना वैषम्य वाटले. त्यांनी आपली नाराजी बाजीरावांना बोलून दाखवताच बाजीरावांनी तडफदारपणे उत्तर दिले, “ज्या महाराणा प्रतापसिंहांनी दिल्लीच्या मोगलांचे वर्चस्व कधीही मान्य केले नाही, स्वदेशाच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर लढा दिला, त्यांच्या सिंहासनाच्या पायापाशीच आम्ही बसावे; आदराने आम्ही नमावे अशीच त्यांची थोरवी आहे. याउलट ज्या घराण्याने आपल्या निष्ठा मोगलांच्या पायावर अर्पण केल्या; त्यांच्या पायापाशी आम्ही बसणे तर सोडाच; आम्ही त्यांना बरोबरीच्या नात्याने वागवतो हेच खूप झाले.”

अशा या बाजीराव पेशवे यांचा मृत्यू मध्यप्रदेशातील “रावेरखेडी” येथे, नर्मदा तीरावर, २८ एप्रिल १७४० मध्ये वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी झाला. तेथे त्यांचे स्मृतीस्थळ बांधले आहे. त्यांचा स्मृतिदिन अजूनही “रावेरखेडी” येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्या दिवशी सकाळपासून विविध कार्यक्रम साजरे होतात. भाजी – भाकरी – मिरचीचा ठेचा असा प्रसाद सर्वांना दिला जातो. या कामी पेशव्यांचे मस्तानीकडील वंशज अतिशय श्रद्धेने भाग घेतात.

थोरले चिमाजीअप्पा

बाजीरावांचे धाकटे बंधू, थोरले चिमाजीअप्पा हे बाजीरावाबरोबर कायम सावलीसारखे असत. चिमाजीअप्पा शूर, धाडसी, आणि मुत्सद्दी होते. बाजीरावांच्या यशात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. चिमाजीअप्पांचे नाव इतिहासात विशेष गाजले ते त्यांच्या अधिपत्याखाली यशस्वी झालेल्या पोर्तुगीजांविरुद्धच्या वसई मोहिमेमुळे. बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर चिमाजीअप्पा लगेचच १७ डिसेंबर १७४० रोजी पुण्यात वारले.

सदाशिवराव (भाऊसाहेब) पेशवे

हे चिमाजीअप्पांचे चिरंजीव. सदाशिवराव (भाऊसाहेब) पेशवे १७६१ च्या पानिपतच्या मोहिमेचे  सरसेनापती होते. चिमाजीअप्पा हे जसे थोरल्या बाजीरावांचे दिवाण होते तीच भूमिका, भाऊसाहेबांनी थोरल्या नानासाहेबांच्या कारकिर्दीत बजावली. हे कसलेले सेनापती होते. लष्करी मोहिमांच्या बाबतीत भाऊसाहेबांवर बरीच मदार असे. पानिपत हीच एक त्यांची मोठी मोहीम नव्हे. १४ जानेवारी १७६१ रोजी  पानिपतच्या युद्धात भाऊसाहेब मारले गेले हे सत्य त्यांच्या पत्नीने म्हणजे “पार्वतीबाईने” कधीच स्वीकारले नाही आणि स्वतःच्या मृत्यूपर्यंत तिने आपली सौभाग्यचिन्ह उतरवली नाहीत. पुढे या भाऊसाहेबांचे काही तोतये निर्माण झाले.

भाऊसाहेबांना मुले झाली होती पण, ती जगली नाहीत. त्यामुळे भाऊसाहेबांनंतर चिमाजीअप्पांचा वंश संपला. पुढे फक्त थोरल्या बाजीरावांचा वंश विस्तारला.
थोरले बाजीराव पेशवे आणि काशीबाई यांना एकंदर पाच मुलगे झाले. यापैकी “नानासाहेब” आणि “रघुनाथराव” यांचा अपवाद वगळता ईतर तिघेही लहान वयात वारले.

थोरले नानासाहेब पेशवे

शाहू महाराजांनी परत एकदा दरबाराचा विरोध पत्करून २५ जून १७४० रोजी थोरल्या नानासाहेबांना पेशवेपदावर नेमले. यांच्या कारभारात कधीही चुका काढता न याव्यात इतका नानासाहेबांचा कारभार चोख  होता.
१७  डिसेंबर १७४९ रोजी शाहू महाराजांचे सातारा येथे निधन झाले. शाहू महाराजांना पुत्र नव्हता. त्यामुळे गादीला पुढचा वारस कोण ? आणि त्याचबरोबर यापुढे पेशवेपद कोणाकडे जाणार ? आणि ते कसे जाणार ? कारण पेशवेपद ही वारसाने मिळणारी गोष्ट नव्हती. पहिल्या तिनही  पेशव्यांनी ते कर्तृत्वाने आणि स्वकष्टाने मिळवले होते.  पण हे दोन्ही प्रश्न शाहू महाराजांनी आपल्या मृत्यूपूर्वी  सोडवले होते. त्यांनी मृत्युपत्र लिहिले होते. त्यात असे म्हटले होते की, “ताराराणीचा नातू, म्हणजे दुसरा राजाराम, हा साताऱ्याचा राजा होईल आणि पेशवेपद वंशपरंपरेने नानासाहेबांच्या वंशजांकडे राहील.” शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर, नानासाहेबांनी, पानगाव येथे, दर्याबाई निंबाळकर, यांच्याकडे गुप्तपणे राहणाऱ्या दुसऱ्या राजारामला सातारला आणले आणि १७४९ मध्ये गादीवर बसवले.

नानासाहेबांची कारकीर्द ही पेशवाईतील वैभवशाली काळ होय. यावेळी मराठीशाही हिंदुस्थानातील सर्वात प्रबळ सत्ता बनली. दरम्यान १७६० साली उत्तरेत पानिपतची मोहीम उद्भवली आणि १७६१ च्या प्रारंभी झालेल्या सर्वंकष युद्धात मराठी फौजेला पराभव पत्करावा लागला. उत्तरेकडील रयतेवर मराठ्यांचा अंमल कमजोर झाला.

पानिपतचा पराभव, बंधूशोक, पुत्रशोक, यामुळे धीर खचून नानासाहेब पुण्यात पर्वतीवर, २३ जून १७६१ रोजी मृत्यू पावले.
या थोरल्या नानासाहेबांना एकंदर पाच मुलगे होते. यापैकी दोन अल्पवयीन ठरले. विश्वासराव हे चांगले शूर आणि कर्तबगार होते पण, ते पानिपतच्या युद्धात कामी आल्यामुळे पेशवाईच्या इतिहासाला वेगळीच कलाटणी मिळाली.

(क्रमश:)

– © अ‍ॅड. क्रांती आठवले-पाटणकर
डोंबिवली.
9969087559
२९.०४.२०२५
(सदर लेखमाला माझ्या नावासह अग्रेषित करायला हरकत नाही.)

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

संस्कृत श्लोक व सुभाषिते

लेख क्र. १  : गायत्री मंत्र

भारतातील बऱ्याच राज्यांतील भाषेची जननी किंवा मूळ स्रोत संस्कृत ही भाषा आहे. संस्कृत भाषा बऱ्याच जणांना अवघड वाटते. त्यांचे मुख्य कारण म्हणजे संस्कृत भाषेचे व्याकरण. संस्कृत बोली भाषा म्हणून जवळजवळ नाहीच पण असे म्हणतात की कर्नाटकात अजून एक गाव आहे, जिथे सर्वजण संस्कृतच बोलतात. लडाखसारख्या भागातील भाषेवर बौध्द ग्रंथ ज्या भाषांमध्ये लिहिले गेले, त्या भाषांचा प्रभाव आहे. आता हायस्कूलमधून हळहळू संस्कृत हद्दपार होत आहे. संस्कृत भाषेची काळजी करणे, हा माझ्या लेखांचा विषय नसेल पण संस्कृतमध्ये जे विचारधन आहे, ते मात्र आपल्याला मार्गदर्शन करणारे आहे. आपण त्यातीलच काहींवर मोकळा विचार करणार आहोत.

आजही लग्नकार्यांमध्ये गुरूजी संस्कृत श्लोक म्हणत असतात. सत्यनारायण पूजेलाही संस्कृत श्लोक पुटपुटतात. आता घरोघरी गणपती येईल. आज ही गणपतीची पूजा गुरूजींकडून घेतली जाते. अशा वेळी गुरूजी रामरक्षा म्हणतात की पूजेचे इतर काही श्लोक म्हणतात की भगवद्गीतेचे श्लोक म्हणतात, ह्याकडे क्वचितच लक्ष जाते. लक्ष दिले तरी ते एखाद्यालाच कळू शकते. आपण त्यांना मंत्र म्हणतो.

असेच काही श्लोक, त्यांचा अर्थ, त्यांचे मूळ आणि त्यांचा जमेल तितका व्यापक विचार करायचा प्रयत्न आपण करूया. श्री लक्ष्मण गोविंद विंझे यांनी १९६३ आणि १९६४ मध्ये संस्कृत-मराठी-सुभाषितसंग्रह दोन खंडात प्रकाशित केला. एकूण २१०० सुभाषिते त्यांनी ह्या ग्रंथात घेतली आहेत. त्या २१०० सुभाषितांचे मराठीत काव्यमय रूपांतर केले आहे आणि सुलभ मराठी भाषांतरही दिले आहे. किती प्रचंड काम आहे. ही सुभाषिते वेगवेगळ्या काव्यामधून, नाटकांमधून, ग्रंथामधून घेतली आहेत. काय, कुठून घेतले ह्याची सूची म्हणजे यादी अथवा ‘लिस्ट’ शेवटी दिली आहे. सर्व सुभाषिते विषयवार विभाग करून दिली आहेत. अनेक सुभाषिते प्रचलित आहेत पण ती कुठल्याही ग्रंथातून वा काव्यातून घेतलेली नाहीत तर ती संस्कृत बोलीभाषेत प्रचलित होती. आपण जशा म्हणी वापरतो, तशी ही सुभाषिते बोलताना वापरली जात. अशी सुभाषितेही ह्यात समाविष्ट आहेत.

आज आपण सूर्याची प्रार्थना करणाऱ्या श्लोकापासून सुरूवात करणार आहोत. मानवाला असलेले ब्रम्हांडाबद्दलचे ज्ञान पहाता सूर्य हा अनंत गॅलॅक्सीमधल्या एका गॅलॅक्सीतला अगणित ताऱ्यांतला एक तारा आहे पण पृथ्वीवरच्या मानवासाठी सूर्य सर्व कांही आहे. म्हणून आपले पूर्वज प्रथम सूर्याची स्तुती करतात. तर श्री गणेशाची आरती म्हटल्यानंतर आपण मंत्रपुष्पांजली म्हणून शेवटी म्हणतो,

संस्कृत श्लोक

 ॐ तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य
 धीमही धियो यो न: प्रचोदयात ॥

श्री. विंझे ह्यांनी केलेले भाषांतर

हे सूर्यदेव! तव सुंदर तेज थोर
सर्वत्र विश्वभर जे पसरे अपार
तद् द्यान मी करूनि याचितसे तयास
 तें प्रेरणाप्रद असो आमुच्या मनास ॥  

सुलभ अर्थ -सूर्याचे जे श्रेष्ठ तेज, त्याचे आम्ही द्यान करतो.
                  आमच्या बुध्दीला ते प्रेरणा देत राहो.

सू्र्य हा आपली प्रार्थना ऐकू शकतो का? सामान्य तर्काप्रमाणे सूर्य काही तुमची प्रार्थना ऐकू शकणार नाही. त्याला मानवासारखे अवयव कुठे आहेत? पुराणकथांमध्ये सूर्य, त्याचा रथ, त्याचा सारथी, असे खूप काही असेल पण प्रत्यक्षात तो प्रचंड एनर्जीने भरलेला एक तारा आहे. पृथ्वीची उत्पत्ती त्याच्यापासून झाली असावी आणि ती त्याच्या भोवती अखंड फिरते आहे. पृथ्वीवरचे जीवन त्याच्यापासून मिळणाऱ्या उष्णतेवर अवलंबून आहे. माणसाने कितीही संशोधन केले तरी ह्या मूलभूत गोष्टींत तो बदल करू शकणार नाही. आपले जीवन सर्वस्वी सूर्यावर अवलंबून आहे. वनस्पती सूर्यावर अवलंबून आहेत. शेती सूर्यावर अवलंबून आहे. सूर्याच्या शक्तीबद्दल, मानवी जीवनावरील प्रभावाबद्दल बोलावे तितके  थोडे आहे. ते आपल्याला सर्वांना माहित आहे. आणि म्हणूनच सूर्याकडे ही प्रार्थना.

हे, सूर्यदेवा, तुझ्या सुंदर तेजाने तू आमचे संपूर्ण विश्व व्यापले आहेस. म्हणून आता तुझी आम्ही प्रार्थना करतो, थोरवी गातो, तू आमच्यावर कृपा कर. आमच्या बुध्दीला चालना, प्रेरणा, देत रहा. माणसाचा आळस, त्याची झोंप रात्रीपुरती. सकाळ झाली सूर्य उगवला की सूर्याला मूठभर पाण्याचे अर्घ्य वाहून म्हणायचे की आम्हाला प्रेरणा दे आणि कामाला लागायचं. सूर्य आपले भ्रमण करत रहाणार. दुपारी डोक्यावर तळपणार. संध्याकाळी मावळणार. सूर्याचे उगवणे आणि मावळणे रोजचेच असले तरी त्यात किती विविधता पहायला मिळते. सूर्याच्या आगमनापूर्वी आणि सूर्यास्त होत असतांना व थोडा वेळ नंतर आकाशात जे रंग पसरतात ते पाहून माणसाचे डोळे धन्य होतात.  चित्रकारांना ते कायम पेपरावर उतरवण्याचा मोह होणारच. कवींना वर्णन करावेसे वाटणारच. पुन्हां प्रत्येक ठिकाणी सूर्योदय वेगळा भासतो. पृथ्वीवर काही ठिकाणी तो सहा महिने दिसतो आणि सहा महिने दिसत नाही, हे अजबच वाटते. तिथे रहाणारेच त्यातली मजा सांगू शकतील.

मला इथे एक वेगळीच आठवण होतेय. पोलिओ ह्या भयंकर आजारावर प्रतिबंधक लसीचे संशोधन करणारा जोनास साल्क. पोलिओने जगभर भिती निर्माण केली होती. अपंग, व्यंग निर्माण झालेली मुले बघून कोणाला बरे वाटेल? जोनास साल्कने तपश्चर्या करून त्यावर लस शोधून काढली. आता तर फक्त काही थेंब नियमित वेळी दिले की ह्या रोगाची भीती रहात नाही. जोनासने लसीचे संशोधन केले आणि ती तयार करण्याचा फॅार्म्युला जाहिर केला. त्याच्या संशोधनाची कुणकुण लागतांच ते त्याने पेटंट घ्यावे आणि आपल्याला द्यावे म्हणून औषधी कंपन्यांचे प्रतिनिधी कोरे चेक घेऊन धावले पण जोनासने लस तयार करण्याचा फॅार्म्युला जाहिर केला व ते फुकट देण्यात यावे, असे सांगितले. अब्जाधीश होण्याची संधी गमावली. वृत्तपत्र प्रतिनिधींनी विचारले, “तुम्ही पेटंट कां नाही घेतले ?” जोनास हंसला आणि म्हणाला, “दररोज इतकी उर्जा जगाला पुरविणारा सूर्य पेटंट घेतो का? नाही ना, मग ज्ञानाचे तसेच आहे. एकदा ते ज्ञान मिळाले  की ते सर्वांच्या हक्काचं होते.” त्याचा फायदा सर्वांना व्हावा, हा उदात्त विचार सूर्याच्या प्रेरणेनेच त्यांच्या मनात आला असावा.

आधी सांगितल्याप्रमाणे हा मंत्र गणपती पूजन, सत्यनारायणपूजन आदी अनेक पूजांतून म्हटला जातो. मुंज, विवाह, इ. संस्कार प्रसंगी म्हटला जातो. तसा तर तो दिवसातून दोनदा म्हणजे सकाळी सूर्य उगवतांना आणि संध्याकाळी मावळताना दोन्ही वेळा म्हणायचा आहे.
ज्यांचा ध्यानावर विश्वास आहे, ते ध्यान लावताना ह्या मंत्राचा जप करतात. तर्क म्हणेल “काही उपयोग नाही.” नसेलही तसा फायदा होत. परंतु कृतज्ञता किती महत्वाची आहे. मानवाला आवश्यक असे सर्व काही पुरवणाऱ्या सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अत्यंत आदर्श आहे. माता-पिता, आचार्य, बंध, समाज,  इ.सर्वांप्रती कृतज्ञता बाळगायला हवीच.

वैज्ञानिक म्हणतील त्यात इतका हेलियम आहे आणि इतका हैड्रोजन आहे. इतर घटक अत्यल्प आहेत. तिथे सतत अणुस्फोट होत असतात. सूर्याचा व्यास पृथ्वीच्या १०९ पट मोठा आहे, वगैरे वगैरे. तेही सूर्याचे महत्त्व मानतीलच. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सूर्याच्या दिशेने रॅाकेटस सोडण्यात येतात. सुरक्षित अंतरावरून फेऱ्या मारणारे यान सोडण्यात येते. आता आम्हाला प्रेरणा दे, अशी नुसती प्रार्थना करून प्रेरणा मिळते का मानवाच्या जिज्ञासेतून प्रेरणा मिळते, हा कदाचित वादाचा मुद्दा होईल. एवढे खरे की भावना कार्यशक्ती जागवतील, प्रेरणा मिळेल पण काहीतरी केल्याशिवाय ती फलस्वरूप होणार नाही.

ह्या श्लोकालाच गायत्री मंत्र म्हणतात. तो ऋग्वेदांतील एका ऋचेत येतो. हा विश्वामित्रांनी सांगितलेला मंत्र आहे. तो चोवीस अक्षरी असून प्रत्येक अक्षर एका देवतेच  स्मरण करून देते, असाही आशय आहे. त्या अशा :-

देवता- १. अग्नि, २. वायु, ३. सूर्य, ४. आकाश, ५. यम, ६. वरुण, ७. बृहस्पति, ८. पर्जन्य, ९. इंद्र, १०. गंधर्व, ११. पूषा, १२. मित्र, १३. त्वष्टा, १४. वसु, १५. मरुद्रण, १६. सोम, १७. अंगिरा, १८. विश्वेदेव, १९. अश्विनीकुमार, २०. प्रजापति, २१. संपूर्ण देवता, २२.रुद्र, २३. ब्रह्मा आणि २४. श्रीविष्णु [४]

आपण फक्त विंझे ह्यांनी सांगितलेला अर्थ ध्यानांत ठेवून रोज सूर्यापासून नि:स्वार्थ सेवा करण्याची प्रेरणा घेतली तरी पुरेसे आहे.

– ©️ अरविंद खानोलकर

arvindkhanolkar@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

अमेरिकेवर अराजकाची चाहूल

जगाच्या पाठीवर अमेरिकेचे गूढ : लेखांक २  ( उत्तरार्ध ) 

ज्या उत्साहाने न्यूयॉर्क शहरातील रॅडिसन स्केअरवरील “हाऊडी मोदी” या कार्यक्रमाला हजारो भारतीयांनी ओसंडून प्रतिसाद दिला, ते सारे भारतीय आज ट्रम्प सरकारच्या वर्तनावर मूग गिळून आहेत.

तरी देखील आज शांतपणे सर्व सोसणारी अमेरिकी जनता एका पातळीपर्यंत सहनशील राहील परंतु या संयमाचा कडेलोट केव्हा होईल याची खात्री खुद्द ट्रम्प प्रशासनाला राहिलेली दिसत नाही. नागरिकांचा असंतोष केव्हा उसळून सत्तापालटासाठी पेटून उठेल याची खात्री पटल्यामुळेच कदाचित अमेरिकेत लष्कराला जागृत रहायला प्रशासन आत्तापासून भाग पाडत आहे.

तालिबानी टोळ्यांच्या हाती सत्ता जाताना अफगाणी जनता हतबल झाली होती. नजीकच्या भविष्यातील बिकट वाट सोडून वहिवाटीच्या विरुद्ध पद्धतीने देशाबाहेर पडताना अगदी अमेरिकी विमानाला लटकून लोक पळू लागले हे दृश्य भयप्रद होतेच.

बांगलादेशात मात्र नागरिकांनी प्रचंड गदारोळात जणू शस्त्र हातात प्राप्त झाल्याप्रमाणे सत्ता उलथवून टाकली. दोन देशातली दोन टोकांवरील ही वेगवेगळी परिस्थिती.

श्रीलंकेत ऑरगॅनिक शेतीमुळे कृषीउत्पन्न घटले आणि त्यामुळे आर्थिक अरिष्ट कोसळले असा जावईशोध लावून केलेला प्रचार गदारोळ माजण्यास उपयोगी ठरला. प्रत्यक्षात हा देश पर्यटन आणि सेवाउद्योगात कार्यरत. कृषीउत्पन्नाचा अर्थव्यवस्थेत फार मोठा वाटा नाही परंतु प्रचार माजवण्यात किटकनाशक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी देखील हात धुवून घेतले. याविषयीचा सविस्तर लेख मी दैनिक पुण्यनगरीमध्ये या आधी लिहिला होता.

म्यानमार (ब्रह्मदेश), नेपाळ, भूतान देश देखील अस्वस्थ कसे राहतील या अमेरिकी हितसंबध हा योगायोग नक्कीच नसतो. इंडोनेशिया, मलेशिया इथे देखील अशांतता कशी पसरवता येईल यासाठी “फोडा आणि झोडा” हे ब्रिटिश हत्यार आता अमेरिकन डीप स्टेट खेळू पहात आहे.

चीनमधल्या अभेद्य भिंतीआडची अदृश्य सृष्टी मात्र अमेरिकन डीपस्टेटला भेदता येत नाही अजूनतरी.  
तर एकंदर भारतीय उपखंडात आणि आसपासच्या आसमंतात अनागोंदी कशी माजवता येईल यावर सर्वतोपरी कारस्थानं अमेरिकेतील सी०आय०ए०, डीपस्टेट खेळत असतात.

डोनाल्ड ट्रम्प यांची वैयक्तिक चिडचिड, जग आपले ऐकत नाही यामुळे वारंवार झडणारा त्रागा, यात जगाची करमणूक होत आहे आणि उर्वरित जग ट्रम्प प्रशासनाची सध्याच्या काळातील काळी छाया आपल्यावर पडू नये यासाठी पर्याय शोधण्यात व्यस्त आहे. भारताचे पंतप्रधान श्री० नरेंद्र मोदी यांचे जपान, चीन आदी देशांचे परदेश दौरे, त्यातून जपानी पंतप्रधान, रशिया-चीनचे अध्यक्ष अनुक्रमे पुतीन आणि शी जीनपिंग यांच्या भेटीगाठी याचेच द्योतक म्हणावे.

भारतीय उपखंडातील देशांना त्रास देण्याच्या नादात अमेरिकेतील ग्राहक नागरिक महागाईने भरडले जातील याची फिकीर करण्याची तसदी अमेरिकन सरकार तूर्तास घेऊ इच्छित नाही. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नोबेल पारितोषिक मिळवण्याच्या हट्टाग्रही अशा वैयक्तिक प्राधान्यापुढे अवघी अमेरिकन सरकारी यंत्रणा फणा काढून फूसफूसत आहे. हा विषारी फणा आता अमेरिकेलाच विळखा घालू पहात आहे.

अमेरिकन अध्यक्ष्याची निवड, अमेरिकन ध्येयधोरणे यांवर अमेरिकेच्या सी०आय०ए० चे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नियंत्रण असते. लोकशाही मार्गाने अध्यक्ष निवडून येतो म्हणा किंवा आणला जातो म्हणा, यात सी०आय०ए०चा प्रत्यक्ष परंतु अप्रत्यक्षरितीने सहभाग असतो. किंबहुना जगातील अनेक देशांचे राष्टप्रमुख तथा कारभारी निवडण्याच्या प्रक्रियेत सी०आय०ए० आपल्या मर्जीचा माणूस कसा सत्ताकेंद्री राहील याची पूर्तता करण्यात तत्पर असते.

म्हणजे अमेरिकन अध्यक्ष्याची ध्येयधोरणे तशी कटपुतळीचा खेळ असतोच.
तरी देखील काही विशिष्ट अध्यक्ष त्यांची मनमानी वाटावी असे उद्योग करत जगावर प्रभाव टाकण्याच्या उद्योगात अडकलेले दिसतात. जॉर्ज बुश (बाप लेक) हे दोघेही अध्यक्षपदी असताना अण्वस्त्रे बाळगण्याचा केवळ संशय इराकमधील सत्ता उलथवून टाकण्याची कृती, व्हिएतनाममधील अंतर्गत यादवीमध्ये आपले सैन्य घुसवून प्रत्यक्ष कारवाईत केवळ मिसरूड फुटलेली तरुण बाळे तत्कालीन अमेरिकन अध्यक्षाच्या मनमानी कारभारामुळे जीव गमावून बसली.

मला इथे टाटा उद्योगसमूहाच्या नेतृत्वाची एक गंमत आठवते.
टाटा उद्योगसमूहात गेले सव्वाशे वर्ष दादाभाई नौरोजी पासून तर रतन टाटा यांच्यापर्यंत मोजकेच अध्यक्ष होऊन गेले. त्यातल्या प्रत्येक अध्यक्षाने स्वतःचे असे एकेक स्वप्न पहिले. त्यातुन जमशेदपुरचा पोलाद कारखाना, चहा-कॉफीचे मळे, ताज हॉटेल, प्रवासी विमानसेवा (आत्ताची एअर इंडिया), नॅनो कार इत्यादी महत्वकांक्षी प्रकल्प साकारली गेली. स्वप्न न पाहणारा आणि त्यामुळे ते प्रत्यक्षात आणण्याची शक्यता नसलेला एकमेव अध्यक्ष म्हणजे सायरस मिस्त्री, साहजिक टाटा उद्योगसमूहातील धरिणांनी अशा अध्यक्षाकडे नाक मुरडून राहणे साहजिक ठरले. टाटांचे हे उदाहरण प्रगतीशील विधायक अर्थात सकारात्मक असे.

अमेरिकन अध्यक्षाचा मनमानी हट्ट मात्र अमेरिकेला प्रत्येकवेळी अशक्त करत गेला. त्यातून इराकमधली मोहीम कोणतेही विघातक अण्वस्त्र शोधू शकली नाही आणि व्हिएतनाम मधल्या यादवी युद्धात अमेरिकेतील एक आख्खी युवा पिढी देशाने गमावल्याची हलहळ अमेरिकेत आजही अनुभवास येते.

गतकाळातील अध्यक्षांच्या हट्टाचे परिणाम जगाने अनुभवले. व्हिएतनाम, अफगाणीस्थान, इराक ही ती ठळक उदाहरणे, परंतु या सर्व प्रकारात अमेरिकन नागरिक थेटपणे भरकटले वा चिरडले गेले नाही.

डोनाल्ड ट्रम्प आज अमेरिकेत जो मनमानी अट्टाहास करत आहेत त्याचा प्रत्यक्ष परिणाम मात्र नागरिकांच्या रोजच्या दिनचर्येवर पडणार आहे. आणि तसा तो अमेरिकी खाद्यउद्योग आणि अमेरिकन शेतीउद्योगावर नक्कीच पडणार आहे.
दीर्घकालीन धोरणामुळे हळूहळू महागाई वाढताना उत्पनाचे स्रोत वाढते असतील तर काळानुसार येऊ घातलेल्या महागाईला सहन करणे सोपे जाते, परंतु अल्पकाळात परिणाम करू पाहणारी वाढती महागाई नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडू शकते.
पाठीचा कणा मोडत असताना पंधरवाड्याचे आर्थिक गणित जमवता जमवता सामान्य नागरिक त्रस्त होण्यात कितीसा वेळ जाणार.

आपल्या नागरिकांकडे लक्ष देण्यापेक्षा बाहेरील देशांना कसा धडा शिकवू आणि तरी देखील शांततेचे नोबेल पारितोषिक मिळवण्यात धन्यता मानणारा अध्यक्ष म्हणून लाभला हे पाहताना अमेरिकन नागरिक चलबिचल होत सरकारविरोधी होतील ते सांगता येणार नाही. हे जाणून ट्रम्प सरकारने आपल्या लष्करी, निमलष्करी दलाला देशांतर्गत भागात तैनात करणे सुरु केले आहे.
अमेरिकेतील नागरिक आपली व्यथा आपल्या रागात कधी व्यक्त करतात हे नजीकचा भविष्यकाळच जणू सांगू पाहतो आहे.
ट्रम्प या व्यक्तिचे एकंदर व्यक्तिमत्व आणि वागणे पाहता अमेरिकेत अणिबाणी लादून लष्करी प्रशासन येऊ शकते. परिस्थिती हाताबाहेर जाताना देशावर ट्रम्प सरकार अधिकाधिक गोत्यात येऊन गाळात गेलेले पाहताना डीप स्टेट काय भूमिकेत असेल हे जाणण्यात जग उत्सुक असेल की स्वतःला सावरण्याच्या प्रयत्नात धास्तावलेले असेल हे आज तरी कसे कळावे.  

(क्रमश:)

पूर्वप्रसिद्धी – दै. पुण्यनगरी (सर्व आवृत्त्या) दि. ८ सप्टेंबर २०२५

– @ देवेंद्र रमेश राक्षे
rakshevendra@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

शब्दकोडे

क्रमांक ४५

 

वाचकांसाठी विनंती : आपली पूर्ण, अपूर्ण कशीही असतील ती उत्तरे मला माझ्या खाली दिलेल्या विपत्र पत्त्यावर पाठवावी. कृपया अभिप्रायाच्या चौकटीत देऊ नये.

– © मुकुंद कर्णिक 

karnik.mukund@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

जेव्हा पृथ्वीला ताप येतो !

भूगोलाचा इतिहास : ४१ 

असे काही खरेच होऊ शकेल याची चाहूल सर्वात आधी थोर भूगोल संशोधक अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट यांना लागली. १८३१ मध्ये त्यांनी असे सुचवले की जंगलतोड आणि वाफेच्या यंत्रांचा वाढता वापर याचा अनिष्ट परिणाम पृथ्वीच्या वातावरणावर होऊ शकेल. त्यापूर्वी  जोसेफ फोरिअर, युनिस न्यूटन फूट यांनी हरितगृह परिणामाचे सूचन केले होते. तर जॉन टिंडॉल यांनी काही वायूंचे प्रमाण वाढल्यास वातावरणाचे तापमानही वाढेल हे सुचवले होते. हे ग्लोबल वॉर्मिंगचे अप्रत्यक्ष सूतोवाचच होते. स्वीडनचे स्वँट अर्हेनियस यांनी हवेतील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण सध्याच्या पेक्षा अर्धे झाले तर वातावरणाचे तापमान खूप कमी होईल व त्याचे प्रमाण सध्याच्या दुप्पट झाल्यास  तापमान ५ ते ६ अंशाने वाढेल असे १८९६ मध्ये सिद्ध केले. हे तर सरळ भूतापवृद्धीचे – ग्लोबल वॉर्मिंगचेच – भाकीत होते. हा सर्व इतिहास यापूर्वीच्या लेखात आलेला आहे. एका अर्थाने हरितगृह परिणामाचा शोध हा भुतापवृद्धीच्या शोधाचा पूर्वार्ध होता.

या प्रक्रियेला ग्लोबल वॉर्मिंग किंवा भुतापवृद्धी हे नाव अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील शास्त्रज्ञ वॅलेस ब्रोकर यांनी १९७५ मध्ये सुचवले. म्हणजे या प्रक्रियेची कल्पना येऊनही तिला नाव मिळण्यास ७९ वर्षे जावी लागली. कारण बऱ्याच शास्त्रज्ञांना असे वाटे, की हरितगृह परिणाम हा स्थिर अवस्थेला पोहोचला असून त्यात आता बदल होणार नाही. काही जण असे मानत की हवेतील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण एका मर्यादेपलीकडे वाढले की जास्तीचा वायू समुद्रात विरघळून जाईल. कार्बन डाय ऑक्साईडचे हवेतील प्रमाण अत्यल्प – ०.०३ टक्के – आहे. पृथ्वीच्या निर्मितीनंतर सुरवातीला हे प्रमाण जास्त होते. पुढे वनस्पती निर्माण झाल्या व त्या प्रकाश संश्लेषणासाठी हवेतील कार्बन डाय ऑक्साईडचे शोषण करू लागल्या. त्यामुळे त्याचे हवेतील प्रमाण कमी होऊन ०.०३ टक्के झाले. ते असे स्थिरच राहील असे अनेक तज्ज्ञांचे मत होते.

पण १९३८ मध्ये गाय स्टिव्हर्ट कॅलेंडर या एका अप्रसिद्ध इंग्रज इंजिनिअरने या स्थिर कल्पनेला मोठा हादरा दिला. त्यांनी एकोणिसाव्या शतकापासूनच्या तापमानाचे आकडे व हवेतील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण याचा अभ्यास केला. त्या आधारे त्यांनी निष्कर्ष काढला की वातावरणाचे तापमान वाढत आहे आणि त्याचे कारण हवेतील कार्बन डाय ऑक्साईडचे वाढते प्रमाण हे आहे. कॅलेंडर यांनी अतिशय कष्टाने व जिद्दीने संकलित केलेली आकडेवारी व निष्कर्ष अचूक असल्याचेच पुढे आढळून आले. म्हणजे वातावरणाचे तापमान वाढत आहे, हे कॅलेंडर यांनी कारणासह सिद्ध केले. हा शोध एवढा निर्विवाद ठरला की, ही तापमानवाढीची क्रिया ‘कॅलेंडर परिणाम’ म्हणून ओळखली जाऊ लागली.

१९५० च्या दशकात गिल्बर्ट प्लास यांनीही निष्कर्ष काढला की कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढल्यास वातावरणाचे तापमान वाढेल. त्याच सुमारास एडवर्ड सुएस यांना कार्बन डाय ऑक्साईडची पातळी वाढत असल्याचे पुरावे मिळाले तर रॉजर रेविल यांनी हे दाखवून दिले की आता महासागरात कार्बन डाय ऑक्साईडचे शोषण होणार नाही. तात्पर्य पन्नास वर्षांपूर्वी स्वँट अर्हेनियस यांनी सांगितलेले भाकीत खरे ठरून ग्लोबल वॉर्मिंग नावाचे अरिष्ट मानवाच्या डोक्यावर घोंगवू लागलेले होते. त्याची  अधिकृत घोषणा बाकी होती एवढेच.

चार्ल्स किलिंग हे एक अमेरिकन शास्त्रज्ञ होते. कॅलिफोर्नियातील कॅलटेक या संस्थेत त्यांनी वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड वायु मोजणारे उपकरण तयार केले होते. पुढे त्यांच्या पुढाकाराने हवाई बेटावरील मौना लोआ वेधशाळेत कार्बन डाय ऑक्साईडच्या प्रमाणावर लक्ष ठेवण्याचे व नोंदी ठेवण्याचे काम सुरू झाले. 1958 ते 2005 अशी तब्बल 47 वर्षे त्यांनी हे काम केले. एवढा प्रदीर्घ काळ अशा नोंदी ठेवण्याचा हा विक्रमच होता. पण त्यातूनच वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडची पातळी वाढत असल्याचे निर्विवादपणे सिद्ध झाले. या नोंदींचा आधारे त्यांनी प्रसिद्ध केलेला आलेख Keeling curve ‘किलिंगची वक्ररेषा’ नावानेच प्रसिद्ध झाला. अमेरिकेच्या जेम्स हॅन्सन यांच्या 1988 मधील एका अभ्यासाने आजवर वाटणारी भीती खरी ठरल्याचे दिसले. गेल्या शंभर वर्षात पृथ्वीच्या वातावरणाचे सरासरी तापमान 0.5 ते 0.7 अंशाने वाढल्याचे त्यानी निर्विवादपणे दाखवून दिले. एकूण पृथ्वीला खरेच ज्वर चढत असून ग्लोबल वॉर्मिंग हे केवळ काल्पनिक संकट नव्हे तर वास्तव व मोठी आपत्ती असल्याचे सिद्ध झाले.

या भुतापवृद्धीचे परिणाम महासागर, वातावरण व सजीव या सर्वांवर होत आहेत. वाढत्या तापमानामुळे उत्तर व दक्षिण ध्रुवावरील बर्फ मोठ्या प्रमाणावर वितळत आहे. त्यामुळे तेथील हिमटोप्यांची ( Ice caps) जाडी कमी होऊन महासागराची पातळी प्रत्यक्षात वाढत असल्याचे आढळून आले. यामुळे येत्या काही दशकात अनेक बेटे, बंदरे व सागर किनारे   हळूहळू पाण्याखाली जाण्याची भीती आहे. अधिक तापमानामुळे गेल्या काही दशकात वणव्यांचे प्रमाण वाढले आहे. तापमान बदलामुळे अनेक सागरी व इतर सजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दुसरीकडे  हवामानात मोठे बदल होत आहेत. उष्णतेच्या व थंडीच्या लाटा अधिक तीव्र झाल्या आहेत. एल निनोची तीव्रता, पर्जन्याचे वेळापत्रक, वितरण व प्रमाण यात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे एकीकडे अतिवृष्टी तर दुसरीकडे अवर्षण यांचे प्रमाण एकदम वाढले. याशिवाय अजून कोणते अप्रत्यक्ष दुष्परिणाम उद्भवतील हेही अनिश्चित आहे. उदा. हवेचे तापमान वाढले की तिची बाष्पधारणक्षमता वाढते. वाफ ही देखील हरितगृह वायु आहे. त्यामुळे तिचे प्रमाण वाढले की तापमान अजून वाढते. त्यामुळे पुन्हा बाष्पधारणक्षमता वाढते. असे तापमान वाढीचे अजून एक दुष्टचक्र सुरू होते.

तात्पर्य भुतापवृद्धी ही तात्विक गणितापेक्षा कित्येक पट व्यापक व वेगवान ठरू शकते. त्यामुळे आजकाल ग्लोबल वॉर्मिंग ऐवजी ‘क्लायमेंट चेंज’ किंवा ‘हवामान बदल’ असा व्यापक शब्द रूढ होत आहे.
या संभाव्य अरिष्टाबद्दल शास्त्रज्ञ सावध करीत होतेच. 1988 वातावरणीय बदलासंबंधी एका आंतरराष्ट्रीय पॅनल  – IPCC – ची स्थापना करण्यात आली. त्यावर विविध शाखांचे तज्ञ असून ते जगातील सर्व सरकारांना योग्य त्या शिफारशी करतात. सुरवातीला ग्लोबल वॉर्मिंगबद्दल संशोधकातही पूर्ण सहमती नव्हती. ती पुढे होत गेली. २०१९ च्या एका अहवालानुसार तर ९९ टक्के तज्ञ या बाबतीत सहमत आहेत. इतकेच नव्हे तर भुतापवृद्धीच्या दुष्परिणामांपासून लोकांना वाचवण्यासाठी तातडीने कृती करण्याची गरज शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. याबाबतच्या अनेक तज्ञ परिषदातून देशांना व जागतिक नेत्यांना हरितगृह वायूंचे उत्सर्जन तातडीने कमी करण्याबाबत वारंवार आवाहनही करण्यात येते. तसे एकूणच जग या बाबतीत खडबडून जागे झाल्याचे दिसते. या संदर्भात वेळोवेळी सर्व स्तरावर परिषदा, मेळावे, आंतरराष्ट्रीय शिखर परिषदा इ. चे आयोजन करण्यात येते. त्यातून आढावे घेऊन आवाहने वगैरे करण्यात येतात. पण दुर्दैवाने याबाबत जेवढा गाजावाजा केला जातो तेवढी प्रत्यक्ष कृती करण्यात आलेली नाही. हरितगृह वायूंचे उत्सर्जन व त्यावर नियंत्रण यात प्रचंड प्रमाणावर जागतिक अर्थकारण गुंतलेले आहे. त्यामुळे अशा परिषदांमध्येही आंतरराष्ट्रीय राजकारण व सत्ताकारण, प्रादेशिक गटबाजी, विकसित व अविकसित देशांची रस्सीखेच, औद्योगिक महासत्तांचे हितसंबंध यांच्या छाया पडत आहेत. हे सर्व असूनही याच प्रकारच्या ओझोन छिद्र आपत्तीबाबत मानवाने यशस्वी व योग्य उपाय योजना केली आहे. ग्लोबल वॉर्मिंग हेही तसेच  सर्व राजकीय व आर्थिक हितसंबंधांच्या पलीकडचे, गंभीर व तातडीचे संकट आहे. त्याबाबतही मानवजात ओझोन छिद्र समस्येबाबत दर्शवलेब तसेच शहाणपण (wisdom) दर्शवेल अशी आशा करू या.

 

– ©️ एल. के. कुलकर्णी

lkkulkarni.nanded@gmail. com

( १९ ऑक्टोबर २०२४ लोकसत्ता मध्ये पूर्वप्रसिद्ध ) 

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

विहंग मित्र

मित्र क्र. ४ paradise  flycatcher ( स्वर्गीय नर्तक )

अतिशय देखणा flycatcher(माशीमार ). पूर्ण वाढ झालेल्या नराची लांब रिबिनीसारखी शेपटी असते. नर माशिमार दोन रंगात  आढळतात. एक दालचीनी च्या रंगाचा आणि एक पांढरा स्वच्छ.
दोन्ही रंगांच्या नरांचे डोके मात्र झगझगीत काळे निळे असते. डोक्यावर तूरा असतो. आणि डोळ्याभवती निळे वर्तुळ असते.
मादी मात्र दालचीनीच्याच रंगाची असून शेपूट खूपच लहान असते.
नर हवेतून शेपूट सांभाळत सुळक्या मारत उडताना पाहणे फारच आनंददायक असते.
खालील प्रकाशचित्रे कर्नाळा पक्षी अभयारण्यात काढली आहेत.

 

– ©️देवदत्त पाटणकर.

8378980966 .
castingalu@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

चित्रकारांचे दालन

  

– ©️ रामचंद्र देशमुख

संपर्क : ९९३०२४६९८९

  प्रेषक मेघना घाटे 

meghanaghate25@gmail.com

@@@

– ©️ मिलिंद महाबळ 

milind.mahabal65@gmail.com 

@@@

 – ©️ युती प्रवीण अघोर  

प्रेषक शुभदा प्रवीण अघोर     

shubhadaaghor@gmail.com

@@@@@@@@@@@@@@@@@

महत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. 

@@@@@@@@@@@

महत्त्वाची सूचना :- मैत्री अनुदिनी हे मुख्यत: मराठी साहित्याला वाहिलेलं आणि नवं-जुनं साहित्य प्रकाशित करणारं एक नियतकालिक आहे. ते आम्ही वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देत असतो. एखादा जुना लेख वा कविता वगैरे साहित्य पुनर्प्रकाशित करायचं असल्यास आम्ही सदर लेखकाची परवानगी घेण्याचा प्रयत्नही करत असतो. काही वेळा संपर्क होऊ शकत नाही. मात्र अशा प्रकारे पुनर्प्रकाशित केलेल्या साहित्यावर आम्ही न चुकता लेखकाचं नांव व ज्या पुस्तकातून वा मासिकातून ते घेतलं त्याचा नामनिर्देश करत असतो. कृपया आमची अडचण समजून सहकार्य करावं ही विनंती.

@@@@@@@@@@@@@@

रियूनियन

स्वागत फुलांनी   

             “अरे यार, आपण सारेच जण आता वृद्धत्वाकडे झुकत चाललो आहोत, छे, मला तर बुवा ह्या सर्वांची भीतीच वाटते आहे. मला म्हातारपण नको आहे, तुला ह्याबद्दल काय वाटतं,अव्या?” प्रमोद आपला  शाळासोबती असलेल्या अविनाशला विचारत होता. तसे पाहिले तर ह्या दोघांनी आता साठी कधीच ओलांडलेली होती. प्रमोदला उत्तर देताना अविनाश म्हणाला, “अरे प्रम्या, ते काय आपल्या हातात असते का रे ? रोजच्या रोज आपण म्हातारेच होत असतो, खरं की नाही ? कालच्यापेक्षा आज आपण एक दिवसानी मोठे झालेलो असतो. म्हणजेच आपण जन्माला आलो होतो तेव्हा सटवाईने आपल्या नशिबात आपल्यासाठी जितके आयुष्य लिहिलेले असते, त्याच्या अंताकडे आपण जात असतो. रोजच्या रोज आपले आयुष्य एकेक दिवसांनी कमीकमी होत असते. हा तर सृष्टीचा नियमच आहे . मृत्यू कोणाला टळलाय का रे ? गीतेत भगवंतांनीच सांगून ठेवले आहे की जातस्य हि ध्रुवो मृत्यू:, नाही का ? तेव्हा ह्या अशा गोष्टींची चिंता करणे तू सोडून दे ! आला दिवस आपला म्हणायचा आणि रोज रात्री झोपताना देवाला सांगायचे की आजचा माझा दिवस सुखरूप पार पाडलास त्याबद्दल धन्यवाद !”

      “अरे अविनाश, माझे म्हणणे काय आहे ते समजून घे  !” प्रमोद म्हणाला.
       “सांग की  दिल खोलके ! मी ऐकायलाच बसलोय, सांग बघू.”

       “अरे अविनाश, तुझे एक ठीक आहे. तू मला सांगितलेले तत्वज्ञान चूक आहे असे मी अजिबात म्हणत नाहीये. पण ते तू रोज तुझ्या विद्यार्थ्यांना सांगत आलास, तसेच मलाही सांगितलेस. तू काय बुवा, आयुष्यात प्रोफेसरगिरी केलीस. मस्त आरामाचा जॉब होता तुझा. सतत कॉलेजात आजूबाजूला तरुणाईच्या संगतीत तू वावरलास, अगदी निवृत्त होईपर्यंत. पण माझे तसे नव्हते ना ! मला मात्र आयुष्यभर दुसऱ्याची चाकरी करावी लागली. मी एवढा मोठा इंजिनिअर होऊन सुद्धा मला फक्त मॅट्रिक पास झालेल्या बॉसची हुजरेगिरी करावी लागली. तर ते असो. तुझ्या जागी तू बरोबर आहेस, आणि मला जी भीती वाटते आहे ती माझ्या मते जगातल्या बहुतेक प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्या आयुष्याची संध्याकाळ सुरु झाल्यावर वाटत असेल असे माझे मत आहे. चल,छोड यार, बरेच दिवसांनी भेटलायस , कोपऱ्यावरच्या इराण्याकडे बसून फक्कड चहा मारूया, आणि जुन्या दिवसांच्या आठवणी जागवूया. ओके ?”  

     प्रमोदच्या ह्या म्हणण्याला अविनाश ना म्हणणे शक्यच नव्हते. दोघेही जण लगेचच कोपऱ्यावर असलेल्या कॅफे कॅडेल नावाच्या इराण्याकडे गेले. आत मध्ये गेल्या गेल्या दोघांनी एका कोपऱ्यातील जागा पकडली. त्यांना तिथे बसलेले पाहून गल्ल्यावरील इराण्याने त्यांच्या डोक्यावरचा पंखा सुरु केला, आणि तो वेटरवर ओरडत म्हणाला, “अरे बबलू, १३ नंबर टेबल साफ करले .” त्याप्रमाणे बबलू फडके मारून गेल्यावर हे दोघे निवांत झाले.

      प्रमोद आणि अविनाश हे दोघेही जण मुंबईतील दादरच्या बालमोहन विद्यामंदिर ह्या शाळेचे माजी विद्यार्थी. शाळेत असल्यापासूनच दोघांची दोस्ती होती. दोघेही एकाच बाकावर बसत असत. दोघेही हुशार पण तितकेच उपद्व्यापी होते. वर्गात बहुदा दोघांचा पहिल्या पाचात नंबर असायचा. अभ्यासाबरोबर इतरही गोष्टीत दोघेही खूप रस घेत असत. दर शनिवारी सकाळच्या शाळेत शेवटचा तास हा नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमाचा असायचा.अशा वेळी प्रमोद हमखास गाणी म्हणत असे तर अविनाश विविध जोक्स सांगून सर्वांची करमणूक करत असे. प्रमोद जेव्हा गाणी म्हणे तेव्हा त्याला तबल्याची साथ म्हणजेच वर्गातील बाकावर ठेका धरण्यात वर्गातील उदय कायम तयार असायचा. अभ्यासाच्या वेळेत अभ्यास आणि खेळाच्या वेळेत खेळ आणि इतर भंकस असे त्या वर्गातील सर्व मुलं आणि मुली करत असत. त्यांच्या वर्गात एकूण ५८ विद्यार्थी होते. सर्व वर्गाचा खरा हिरो म्हणता येईल असा एक विद्यार्थी होता, त्याचे नाव होते राजीव पाटकर. तो अभ्यासात हुशार होता, खूप छान कविता करत असे, तसेच शाळेच्या गॅदरिंगमध्ये नाटकातून सुरेख  काम करत असे.राजीव हा सर्व शिक्षकांचा तसेच विद्यार्थ्यांचा आवडता विद्यार्थी होता.

         चहा पिता पिता प्रमोद अविनाशला म्हणाला, “अरे अव्या, आपल्याला मॅट्रिक पास होऊन चक्क ५० वर्षे झालीयेत रे , खरंच वाटत नाहीये. आपण एक काम करूया का ?”
            “कोणतं काम ? “
           “अरे, आजकाल बरेच लोक व्हॉट्सऍप वर ग्रुप बनवतात. आपणही असा ग्रुप बनवूया का ?”
          “कल्पना मस्त आहे, पण सगळ्यांचे फोन नंबर कुठे माहित आहेत आपल्याला ?”
         “ अरे माझ्या संपर्कात ६,७ मुलं आणि ४,५ मुली आहेत.त्यांचे नंबर मी मिळवतो, आणि त्यांना विचारून आणखी काहीजणांचे नंबर मिळवता येतील.” प्रमोद उत्साहात म्हणाला.
          “बरं , व्हॉट नेक्स्ट ?” इति अविनाश.
         “अरे आपण परत एकदा संपर्कात येऊया. मग आपण जमल्यास एखादे रियूनियन करूया.”

       “ एकदम भन्नाट आयडिया आहे यार, चल, शुभस्य शीघ्रम् . मी लगेच मिळतील तेवढ्यांचे फोन नंबर मिळवतो, तू ही तसे कर. आपण उदयलाही सांगूया, तसेच आपल्या वर्गातली कुंदा होती ना , ती आमच्या शेजारच्या कॉलनीत राहते, अधून मधून मला भेटते. तिच्यावर मी मुलींचे नंबर मिळवायची जबाबदारी टाकतो, ओके ?” अविनाश आता एकदम उत्साहात आला होता.

          “कोण कुंदा रे ? ती कुरळ्या केसांची डोळ्यात काजळ घालणारी ? “
         “होय रे, तीच. कुंदा प्रधान. आता ती कुंदा चिटणीस झाली आहे.”
        “ओके ओके , तिलाही आपण ग्रुप ऍडमिन करूया.” प्रमोद उत्साहाने म्हणाला.

      त्यानंतर पुढील एक दीड महिन्यात हाहा म्हणता मुलं आणि मुली मिळून एकूण ३३ जणांचे नंबर मिळाले आणि त्या सर्वांचा एक व्हॉट्सऍप ग्रुप तयार झाला. प्रमोद, अविनाश, आणि कुंदा असे तिघेजण त्याचे ऍडमिन होते. सर्वांना ह्या ग्रुपची आयडिया जाम आवडली होती. ग्रुपवर जमल्यावर सर्वांचा पहिला प्रश्न एकच होता, आणि तो म्हणजे “राजीव कुठाय ? त्याच्याशी संपर्क झाला का नाही ?” राजीव हा त्यांच्या वेळचा वर्गाचा हिरो असूनही आत्ता मात्र त्याच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता. कोणालाच त्याचा ठावाठिकाणा माहित नव्हता.

       ग्रुप फॉर्म झाल्यावर पहिल्याच आठवड्यात प्रमोदने ग्रुपवर लिहिलं की आपण आपल्या वर्गाचे एखादे रियूनियन करूया. त्याच्या ह्या सूचनेला प्रत्येकाने हर्षभरित प्रतिसाद दिला. सारेच जण ५० वर्षानंतर एकमेकांना भेटायला आता उत्सुक झाले होते. ह्यात विद्यार्थिनी सुद्धा सहभागी होत्याच. ह्या संपर्कात आलेल्या ३३ जणात निम्म्याहून अधिक जण मुंबईच्या बाहेरीलच होते. त्यामुळे सर्वांच्या सोयीनुसार एक दिवस नक्की केला गेला, आणि बालमोहन शाळेच्या जवळच असलेल्या एका हॉल मध्ये भेटायचे नक्की झाले. सर्वांना एकच हुरहूर लागलेली होती व ती म्हणजे राजीवशी संपर्क झालेला नसल्याने त्याला भेटता येणार नव्हते. त्यामुळे सारेच जण  नाराज होते. पण बाकीचे तर भेटणार असल्याने सर्वजण खुशीत होते. गंमत म्हणजे सर्व ३३ जण ह्या  रियूनियन साठी येणार होते..

         हॉलवर जमून काय काय करायचे, जेवणाचे कंत्राट कोणाला द्यायचे, त्यात शाकाहारी किती आणि मांसाहारी किती, अशा गोष्टींचा उहापोह सारेच करत होते. ह्या रियूनियन साठी साहजिकच प्रमोद, अविनाश आणि कुंदाने पुढाकार घेतला होता.

        अखेरीस रियूनियनचा दिवस उजाडला. सकाळी साडे नऊ वाजता हॉलवर सारे जण एकेक करून जमले. सर्वात आधी प्रमोद आणि अविनाश पोचले , त्यांच्या पाठोपाठ पाचच मिनिटात कुंदा सुद्धा पोचली. प्रमोद हा कुंदाला ५० वर्षानंतर भेटत असल्याने त्याने तिला ओळखलेच नाही. आणि तिनेही प्रमोदला ओळखलं नाही. पण अविनाशने ओळख करून दिल्यावर मात्र दोघांना फारच मजा वाटली. कुंदा म्हणाली, “तुला ओळखणे शक्य नव्हते रे ! किती बदललायस तू ? त्यावेळेस तुझ्या डोक्यावर केसांचे जंगल होते, आणि आता मात्र तू टकलू झालायस ! “  

         “अगं , काय करणार ? ही आमची वडिलोपार्जित देणगी आहे ना !”  प्रमोद हसतहसत म्हणाला. थोड्याच वेळात एकेक करून सर्व विद्यार्थी गोळा झाले. एकमेकांच्या गळाभेटी घेणे सुरु झाले. आल्याआल्या प्रत्येकाच्या तोंडून हेच येत होते की आपण भेटतोय परंतु राजीव कसा काय ट्रेसेबल  झाला नाही ? त्याच्याशिवाय ह्या आपल्या रियूनियनला मजाच नाहीये. परंतु ह्या गोष्टीवर काहीही इलाज नव्हता.

       बहुतेक सर्वच एकमेकांना ५० वर्षानंतर भेटत असल्याने, आणि जवळपास प्रत्येकात खूप बदल झालेले असल्याने एकमेकांना ओळखणे कठीण झाले होते. म्हणून अविनाश पुढे येऊन म्हणाला, “मला वाटते की आपण आता एकेक करून आपापली ओळख करून द्यावी. मॅट्रिकनंतर आपण पुढे काय केले, कुठे जॉब केला, बायकोचे किंवा नवऱ्याचे नाव काय, मुलं काय करतात अशा गोष्टी सांगाव्यात. मी माझ्यापासून सुरुवात करतो.“ असे म्हणून अविनाशने मॅट्रिकनंतरच्या  त्याच्या आयुष्याचा आढावा घेतला. त्यापाठोपाठ एकेक करून सर्वजण आपापल्या आयुष्याबद्दल सांगू लागले. प्रत्येकाचं सांगून झाल्यावर इतर सर्वजण टाळ्या वाजवीत असत. सर्वांचे सांगून झाल्यावर प्रमोद उठून उभा राहिला आणि म्हणाला , “चला, आता आपण शाळेत शनिवार साजरा करायचो तसा साजरा करूया, म्हणजे आता गाणी, जोक्स, इत्यादी सुरु करूया.”

       प्रमोद असे म्हणतोय तोच हॉलच्या दारातून खणखणीत आवाज आला. दारातून एक जण आत आला, आणि पुढे येऊन म्हणाला, “मित्रांनो,  मला कसे विसरलात ? माझी स्वतःची ओळख करून द्यायची राहिलीये की ! मी कोण ते ओळखा बघू ?”

       सारे जण त्याच्याकडे निरखून पाहू लागले. वास्तविक ग्रुप वर असलेले सर्व ३३ जण तेथे हजर होते. त्यामुळे हा चौतिसावा कोण ह्याचे कोडे सर्वांना पडले. एक लता सोडली तर कोणीही त्याला ओळखले नाही. लताने मात्र आरोळी ठोकत म्हटलं “मित्रांनो, आपण ज्याला मिस करत होतो तोच हा, आपला राजीव !”

       असे म्हणताच हॉल मध्ये आनंदाचा एकच हलकल्लोळ उडाला. हळूहळू प्रत्येकाला राजीवची ओळख पटत गेली ! सारेच जण त्याला मिठी मारायला पुढे धावले. पण त्याने कोणालाही मिठी मारू दिली नाही. हे पाहून प्रमोद पुढे येत म्हणला, “अरे यार राजीव, तू आहेस तरी कुठे? तुझा नंबर आणि थांगपत्ता मिळवण्यासाठी आम्ही जंग जंग पछाडलं, पण कोणालाच तुझा पत्ता माहित नव्हता. तू राहतोस कुठे ? तुझा नंबर दे बघू आधी !”

        “अरे यार, मी माझा नंबर देईनच, डोन्ट वरी , मी खूप म्हणजे खूप दूर राहतो. मी जिथे राहतो तिथे दुर्दैवाने फोनला रेंजच कधी मिळत नाही. पण ते ठीक आहे. मला त्याची पर्वा  नाही. आता मी स्वतःबद्दल थोडक्यात सांगतो.” असे म्हणून त्याने स्वतःची थोडीफार माहिती सांगितली. सारेच जण राजीवला भेटून इतके खुशीत आलेले होते की तो जे काही सांगत होता त्यात बऱ्याच विसंगती असल्याचेही कोणाच्या ध्यानात आलेले नव्हते. परंतु इतरही काही जणांच्या सांगण्यातही अशा विसंगती होत्या. सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

          राजीव आल्याने आता रियुनियन अधिकच रंगायला लागले. राजीव एकामागून एक विनोद सांगत होता, मधूनच एखादे झकास गाणे गात होता. ह्या मुलांच्या वेळेस शाळेत एक तुळपुळे नावाचे शिक्षक त्यांना मॅट्रिकच्या वर्गात इंग्लिश शिकवायला होते. हे तुळपुळे सर अतिशय उत्तम गात असत. कुंदनलाल सैगल ह्याची गाणी तुळपुळे सर अतिशय रंगवून गात असत. सरांच्या ह्या गाण्यामुळे जवळपास सर्व वर्गाला सैगलची गाणी आवडू लागली. राजीवनेही हळूच तुळपुळे सरांची आठवण काढत सैगलची २,३ गाणी गाऊन सर्वांना ५० वर्षांपूर्वीच्या काळात नेले.  तो गात असताना प्रमोद त्याच्या गाण्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असल्याचे पाहून राजीव पटकन म्हणाला, “अरे प्रम्या, प्लिज, असे रेकॉर्डिंग करू नकोस, मला आवडत नाही. तसेच मला माझे फोटो काढलेलेही आवडत नाही. तेव्हा, नो फोटो प्लिज !” त्याच्या ह्या बोलण्याचे साऱ्यांनाच आश्चर्य वाटले. पण, असतात एकेकाच्या काहीतरी तऱ्हा असे म्हणून कोणीही ह्या गोष्टीला फारसे महत्व दिले नाही. असे असले तरीही बरेच  जण अधून मधून मोबाईलवर फोटो काढतच होते. ते पाहून अविनाश म्हणाला, “मित्रांनो, आपण सर्वजण जे काही फोटो काढतोय, ते सर्व फोटो मला पाठवा, सावकाश, काही घाई नाहीये, घरी गेल्यावर पाठवा, मी ते सर्व नीट एडिट करून त्याची एक सीडी बनवणार आहे आणि त्याची एकेक कॉपी मी प्रत्येकाला भेट देणार आहे.” अविनाशच्या ह्या प्रस्तावाला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला !

      त्यानंतर सर्वजण एक ग्रुप फोटो काढण्यासाठी एकत्र जमले. तेव्हा राजीव काही त्यांच्यात सामील झाला नाही. तो एका खिडकीतून दूरवर बघत उभा होता. सर्वांनी त्याला हाक मारल्यावर तो म्हणाला की त्याने आधीच सांगितलंय की त्याला फोटो आवडत नाहीत म्हणून ! हे ऐकल्यावर सर्वांनी खूपच आग्रह केल्यामुळे राजीव ग्रुपमध्ये आला आणि अगदी शेवटच्या लाईनमध्ये उभा राहिला.

       त्यानंतर सुग्रास भोजनाचा स्वाद घेत असताना सर्वांच्या गप्पा परत रंगात आल्या. त्यावेळेस मात्र राजीवने म्हटलं की तो जेवायला थांबू शकत नाहीये, कारण त्याला दुसऱ्या एका अतिशय महत्वाच्या मीटिंगला जायचे आहे म्हणून ! सर्वांना ह्या गोष्टीचे आश्चर्य वाटले. तरीही त्याला जाऊ देण्यात आले. तो निघताना काही मित्र त्याला गळामिठी मारायला सरसावले तर राजीवने कोणालाही जवळ येऊ दिले नाही. अशा गोष्टी त्याला आवडत नसल्याचे तो म्हणाला आणि मग कोणीही त्याला फोर्स केला नाही. भोजन करताना शाळेतील वेगवेगेळ्या  शिक्षकांच्या आठवणी निघत गेल्या, आणि सारे वातावरण नॉस्टॅल्जीक झाले. भोजनोत्तर कार्यक्रम संपायच्या आधी परत एकदा पुनर्भेटीचे वादे करण्यात आले, वर्षातून एकदा तरी आता कायम भेटण्याचे ठरले.

      कार्यक्रमाची सांगता झाल्यावर सारेजण आपापल्या घरी गेले. कुंदाला पोचायला बराच उशीर झाला,आणि ती खूप दमल्यामुळे लवकर झोपून गेली.

      दुसरे दिवशी कुंदा सकाळीच बाजारहाट करायला बाहेर पडली. तेवढ्यात समोरून तिच्याच वयाची एक स्त्री येताना तिने पाहिली. का कोण जाणे, कुंदाला वाटले की बहुदा आपण ह्या स्त्रीला ओळखतो. ती स्त्री जवळ आल्यावर कुंदाने तिला ओळखले आणि जवळजवळ ओरडून ती म्हणाली, “अगं , तू माधुरी न ? किती वर्षांनी भेटतीयेस गं ! कुठे होतीस इतकी वर्षे ? कुठे राहतेस तू ?”
          “अगं हो हो हो, एकदम किती प्रश्न विचारलेस मला तू ? तू कुंदाच न ?” माधुरीने विचारलं.
        “हो गं , आपण शाळेत एकाच बॅचला होतो, मी ड तुकडीमध्ये होते तर तू क मध्ये होतीस न ?”
        “बरोबर, अगं , आपण मॅट्रिक होऊन ५० वर्षे झालीयेत, आज इतक्या वर्षांनी भेटतीयेस तू. अगं , मी लग्नानंतर थेट अमेरिकेत नवऱ्याबरोबर गेले , आणि आता तिथेच असते. म्हणून आपला काहीच संपर्क होऊ शकला नाही. ४ दिवसांपूर्वी मी आणि माझे मिस्टर आम्ही एक महिन्यासाठी भारतात आलो आहोत.बाय द वे, तू कशी आहेस ? कुठे असतेस ? काय करतेस ?”

        माधुरीच्या प्रश्नांना उत्तरे देऊन झाल्यावर कुंदा म्हणाली, “ अगं माधुरी, आमच्या तुकडीच्या विद्यार्थ्यांनी कालच एक रियुनियन केले. एकदम झकास झाले आमचे रियुनियन ! प्रमोद आणि अविनाश ह्यांच्या डोक्यातून ही कल्पना निघाली आणि त्यामुळे आम्ही सारेजण भेटलो. जणू काही एखाद्या टाइम मशीनमध्ये बसून आम्ही सारेचजण काळाच्या मागे ५० वर्षे गेलो, आणि मॅट्रिकच्या वेळेस आपण जसे होतो तसेच आम्ही सारेजण वागलो.”

       “वाह, छानच गं ! मला तर आता ह्याबद्दल जेलस वाटतंय , आमच्याही तुकडीचे असे रियुनियन झाले तर कित्ती मजा येईल.” माधुरी पटकन म्हणाली.  
        “ आणि तुला एक गंमत सांगू ?  तुला आमच्या तुकडीतील तो राजीव आठवतोय का ?”
       “हो , तो राजीव पाटकर ना ? चांगलाच आठवतोय तो मला.” इति माधुरी.
         “अगं, त्या राजीवचा ट्रेस आम्हाला लागलेला नव्हता, पण कसा कोण जाणे, कार्यक्रम सुरु झाल्यावर थोड्याश्या उशिराने का होईना, पण राजीव आला आणि त्याने अक्षरश: धमाल उडवून दिलीन गं ! शाळेत जसा तो उत्साही असायचा तसाच तो अजूनही आहे, खूप छान वाटलं त्याला भेटून !” कुंदा म्हणाली.

         कुंदाचे हे शब्द ऐकून माधुरी  दचकून म्हणाली, “अगं काय सांगतेस काय तू ? राजीव आला होता ?”
         “हो गं हो, पण त्यात तुला एवढे दचकायला काय झालं ?”
          “अगं कुंदा , हे कसे शक्य आहे ?” माधुरीनं विचारलं .    
          “का शक्य नाहीये ? तो म्हणला की तो खूप दूरवर राहतो, तो जिथे राहतो तिथे नेट किंवा फोनची कनेक्टिव्हिटी अजिबात नसते, त्यामुळेच तो आमच्या ग्रुपवर नाहीये, तसेच तो म्हणाला की तो त्याचा फोन नंबर सर्वांना देईन म्हणून, पण अगं बाई, गडबडीत त्याचा फोन नंबरच न देता तो निघून गेला गं !”

            “कुंदा, अगं तुला आता मी हे  कसं सांगू हेच मला कळत नाहीये. राजीव तिथे येणे हे अगदी त्रिवार अशक्य आहे  ! तो कसा तिथे येईल ?”
             “ ???, म्हणजे, तुला म्हणायचे आहे तरी काय ? “
            “ अगं , तो तिथे येण्यासाठी ह्या जगात  जिवंत तरी असायला हवा ना ?”
          “ओह , म्हणजे काय ? काल आम्ही २,३ तास त्याच्या बरोबर होतो की  गं !” कुंदा आता मात्र हबकली होती. तिला काहीच सुधरत नव्हते.
           ह्यावर माधुरी म्हणाली, “तू तुझ्या मोबाईलवर त्याचा फोटो काढलायंस का ?असल्यास मला दाखवशील का तू आत्ता  ?”

          “यस ,यस , एक मिनिट होल्ड ऑन कर, मी आत्ता दाखवते.” असे म्हणून कुंदा तिच्या फोनवरील तिने काढलेले फोटो पाहू लागली. तिने बरेच फोटो काढले होते,राजीवचे सुद्धा काढले होते. पण एकाही फोटोत राजीव दिसत नव्हता. काही ३,४ मुलांच्या एकत्र काढलेल्या फोटोत जिथे राजीव उभा होता, त्या भागात राजीवचा फोटो न येता तिथे फक्त काळा रंग दिसत होता. हे पाहून कुंदा प्रचंड घाबरली आणि माधुरीला म्हणाली, “काहीतरी गडबड झालेली दिसतीये, नेमके राजीवचेच फोटो आलेले नाहीयेत, त्याच्या जागी नुसताच काळा रंग दिसतोय!”
          ह्यावर माधुरी म्हणाली, “अगं , हेच तर मी म्हणतेय, राजीव हा अमेरिकेत आमच्याच शहरात राहत होता, आमचे त्याच्याशी आणि त्याच्या बायकोशी खूपच चांगले घरगुती संबंध होते.  अगं पण , तो सुमारे २० वर्षांपूर्वीच एका कार ऍक्सीडेन्टमध्ये निधन पावला.”

      माधुरीचे हे बोलणे ऐकून कुंदाच्या हातातील फोन गळूनच पडला. ती हतबुद्ध होऊन खाली बसली.माधुरी पुढे सांगू लागली, “ मला अजून आठवतंय , सुमारे २० वर्षांपूर्वी तो , त्याची बायको आणि त्याचा  मुलगा असे सर्वजण भारतात येण्यासाठी घरून स्वतःच्या गाडीने निघाले. निघताना त्याने आम्हाला मोबाईलवरून कॉल केला होता. विमानतळावर पोचायच्या आधीच हायवेवर त्याच्या गाडीचा भीषण असिडेन्ट झाला आणि त्यात गाडीतील सर्वजण मृत्युमुखी पडले. पोलिसांनी तपास केल्यावर त्याच्या मोबाईलमध्ये शेवटचा कॉल त्याने आम्हाला केलेला असल्याने पोलिसांनी ही वाईट बातमी आम्हाला कळवली. तर माझा सांगायचा मुद्दा असा की  जो राजीव २० वर्षांपूर्वी अपघातात मृत्युमुखी पडला होता तो काल तुमच्या कार्यक्रमाला म्हणे हजर राहिला, म्हणजे ह्याचा अर्थ काय तो तुझ्या लक्षात आलाच असेल. अशा अतर्क्य घटना घडतात कधी कधी, त्यावर  कितपत विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.”

         माधुरीचे हे बोलणे ऐकल्यावर कुंदाची मोठी विचित्र अवस्था झाली. तिने लगोलग प्रमोद आणि अविनाश ह्यांना फोन करून हे सारे सांगितले.  पाठोपाठ पुढील तासाभरात तिला तिच्या वर्गातील अनेक मित्र आणि मैत्रिणींचे फोन आले, आणि प्रत्येक जण हेच विचारत होता, की तुझ्या मोबाईलमध्ये राजीवचे फोटो आलेत का ? कोणाच्याही मोबाईलमध्ये राजीवचे फोटो आलेले नव्हते. मग एकेकाला उलगडत गेले की  राजीव न जेवताच निघून गेला होता, त्याने कोणालाही आपल्या जवळ येऊ दिले नव्हते, कोणालाही त्याने गळामिठी मारली नव्हती की स्वतःला मारूही दिलेली नव्हती.

                  कुंदाने जेव्हा प्रत्येकाला हे वास्तव सांगितले तेव्हा मात्र सारेचजण नखशिखांत हादरले. आपला एक आवडता मित्र आपल्याला सोडून गेल्याचे दुःख साऱ्यांनाच झाले होते, आपण आज  राजीवला नाही तर तर त्याच्या भुताला भेटलो हे वास्तव पचवणे साऱ्यांनाच कठीण गेले !

   ***********************

– ©️ माधव मनोहर जोशी.

madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

स्वागत फुलांनी – गोरखचिंच 

– सविता कांबळे

savitak211@gmail.com

 ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

विचारशलाका 

(57) 

Destiny is a good thing to accept when  it’s  going your way. When it isn’t, don’t call it destiny; call it injustice, treachery, or simple bad luck. 

– Joseph Heller 

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आणखी एक (अज्ञात ) केशवसुत

– पृष्ठ ६५ –

– प्रेषक माधव मनोहर जोशी 

madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

श्रीमद्भगवत्गीता

१२ व्या अध्यायाचा भावानुवाद

श्लोक ११*–
*अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः ।*
*सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्‌ ॥ १२-११ ॥*

*अर्थ* —
जर माझ्या प्राप्तिरूप योगाचा आश्रय करून वर सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असशील,
तर मन बुद्धी इत्यादींवर विजय मिळविणारा होऊन सर्व कर्मांच्या फळांचा त्याग कर. ॥ १२-११ ॥

*मराठी पद्य रूपी भावानुवाद* —
प्राप्ती रूपी योग l आश्रय घेऊनी l
अशक्य होऊनी l जर हे असे ll
तर तू मिळव l ताबा मनावर l
आणि  त्याग कर । कर्म फळे ll

*श्लोक १२* –
*श्रेयो हि ज्ञानमभ्यासाञ्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते ।*
*ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम्‌ ॥ १२-१२ ॥*

*अर्थ*–
मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे
ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्मांच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे.
कारण त्यागाने ताबडतोब परम शांती मिळते.

*मराठी पद्य रूपी भावानुवाद* —
मर्म न जाणता l केलेला अभ्यास l
तयाहूनी श्रेष्ठ l ज्ञान असे ll
ज्ञानाहूनी श्रेष्ठ l माझे नित्य ध्यान l
हे तू सदा जाण l अंतरंगी ll
ध्यानाहून श्रेष्ठ l कर्म फळ त्याग l
मिळे सुख भोग l मन:शांती ll

*श्लोक १३, १४* —
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च ।
निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ॥ १२-१३ ॥
सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १२-१४ ॥*

*अर्थ* —
जो कोणत्याही भूताचा द्वेष न करणारा, स्वार्थरहित, सर्वांवर प्रेम करणारा व अकारण दया करणारा,
माझेपणा व मीपणा नसलेला, दुःखात व सुखात समभाव असलेला आणि क्षमावान म्हणजे अपराध
करणाऱ्यालाही (त्याच्या पश्चातापानंतर) अभय देणारा असतो; तसेच जो योगी नेहमी संतुष्ट असतो,
ज्याने शरीर, मन व इंद्रिये ताब्यात ठेवलेली असतात, ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा असते, तो मन व
बुद्धी मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला प्रिय आहे. ॥ १२-१३, १२-१४ ॥

*मराठी पद्य रूपी भावानुवाद* —

द्वेष ना कोणाचा l करितो जगती l
असतो निस्वार्थी l ऐसा भक्त ll
सर्वांवर प्रेम l करितो सतत l
दयाळू बहुत l असतो जो ll
फुका मोठेपण l नसे जया फार l
सुखदुःखे स्थिर l जो राहतो ll
जेव्हा अपराधी l करे पश्चात्ताप l
दया आपोआप l जो दाखवी ll
योगी जो संतुष्ट l ठेवतो जो फार l
तनमनावर l  अंकुश ही ll
ठेवी मजवर l श्रद्धा जो अपार l
अर्पे मजवर l तन मन ll
ऐसा माझा भक्त l मज असे प्रिय l
जाण धनंजय l गुपित हे ll

*श्लोक १५*—
*यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः ।
हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥ १२-१५ ॥*

*अर्थ* —
ज्याच्यापासून कोणत्याही जीवाला उद्वेग होत नाही तसेच ज्याला कोणत्याही जीवाचा
उद्वेग होत नाही, जो हर्ष, मत्सर, भीती आणि उद्वेग  इत्यादींपासून मुक्त असतो,
तो भक्त मला प्रिय आहे. ॥ १२-१५ ॥

*मराठी पद्य रूपी भावानुवाद* —
अपार उद्विग्न l जो कोणा न करे l
ज्याला नच करे l कोणी त्रस्त ll
जो असे मुक्त l मत्सर,आवेग l
भय व  उद्वेग l जया नसे ll
ऐसा माझा भक्त l मज असे प्रिय l
जाण धनंजय l निरंतर ll

– ©️ माधव मनोहर जोशी.
madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आजची कविता 

  

– ©️ प्रज्ञा करंदीकर

pradnyakarandikar85@gmail.com

@@@

by Riya Gadre 

प्रेषक सौ. स्वाती वर्तक 

swati.k.vartak@gmail. com

@@@

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^ 

     शहाणपणाची टंचाई..बुद्धिजीवी अल्पसंख्यांक

नव्या वर्षाचे कॅलेंडर बदलताना काहीतरी नवा विचार, नवा दृष्टिकोन ठेवतोच आपण आपल्यापुढे..गेल्या काही दशकात सगळ्याच जगात बदललेले वातावरण, येऊन गेलेला करोनाचा दणका, युद्धाचे सावट, तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल, कृत्रिम बुद्धिमत्तेने येऊ घातलेली वादळी वाटचाल, प्रगती की अधोगती या संभ्रमात अडकलेले जग अशा विचित्र परिस्थितीतून जातो आहोत आपण. अशा वेळी खोल गांभीर्याने विचार केला तर आपल्या लक्षात येईल, जगात शहाण्या, बुद्धिजीवी लोकांची संख्या कमी होत चाललीय. सर्व साधारण( मिडिआकर ), फारसा मागचा पुढचा विचार न करणारा सामान्य वर्ग, अप्रामाणिक भ्रष्टाचारी असंस्कृत अशिक्षित अविचारी बहुजन वर्ग सूज आल्यासारखा प्रमाणाबाहेर फुगला आहे. सत्तेत बघा बहुसंख्य कोण आहेत. लोकशाहीची, संविधानाची धुरा, जबाबदारी ज्यांच्या हातात आहे, ते किती विचारी, शहाणे, बुद्धिजीवी आहेत? त्या वर्गात विवेक, निष्ठा, प्रामाणिकपणा, सेवाभाव, कृतार्थभाव या गुणांचा चक्क दुष्काळ दिसून येतो. बरे यांना त्या खुर्चीवर बसविणारे, अधिकार बहाल करणारे सामान्य नागरिक देखील मतदान करताना आपली बुद्धी गहाण ठेवूनच तो अधिकार बजावतो! म्हणूनच सच्चे, प्रामाणिक, शिकलेले, निष्ठावंत नेते निवडणुकीत आपटतात. अन् अशिक्षित, गुंड, बाहुबली गुन्हेगार प्रवृत्तीचे पुढारी मात्र प्रचंड बहुमताने निवडून येतात. हे गणिती सूत्र कसे सोडवायचे?

रशिया अमेरिका चीन सारखी प्रगत राष्ट्रे असोत की युरोपियन, अरबी मुस्लिम समूह असो, सगळीकडे आज अनागोंदी माजली आहे. कुठे युद्धाचा वणवा धुमसतो आहे, त्यात निष्पाप गरीब बालकांचे, सामान्य स्त्री पुरुषांचे बळी जाताहेत, कुठे आर्थिक संकटाचे गंभीर सावट आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेने येऊ घातलेल्या अनिश्चित बदलांची भीती आहे, उद्योग धंद्यातील अनिश्चितता, परिणाम स्वरूप युवा पिढीत निर्माण झालेला संभ्रम. .असे सगळे वादळी पावसाचे ढग दाटून आले आहेत यत्र तत्र सर्वत्र! अशा वेळी खरे तर सुजाण शहाण्या बुद्धिजीवी विचारी वर्गाची जास्त गरज आहे जगात..पण दिसते ते नेमके उलटे..माथेफिरू निर्णय घेणारे, जगाला धमकावणारे नेते राष्ट्राध्यक्ष आहेत..मिसाईल बॉम्बने निष्पाप बाया माणसांचे प्राण घेणारे  राष्ट्र प्रमुख तेलाच्या बॅरलच्या किल्ल्या फिरवत जगाला आपल्या तालावर नाचवताहेत. आपणही मागे नाही कुठल्याच बाबतीत. देश एक असला तरी काही राज्यांची भाषा वेगळी, विचारधारा वेगळी, धोरणे वेगळी..धर्म जात या तडा गेलेल्या पोकळ भिंती.. कधी कशा ढासळतील, शाश्वती नाही. आपले वृथाभिमान, आपल्या नाटकी निष्ठा, भ्रष्टाचारी शासन व्यवस्था, एकमेकांवर चिखलफेक करणारा दुभंगलेला समाज..अशी सगळी अनागोंदी आहे. तरी फायलीत, अहवालात, बॅनर्सवर मात्र प्रगतीचा बोलबाला आहे. गरीबांना कोट्यवधीची मदत केल्याने तिजोरीत खडखडाट असला तरी प्रत्यक्षात अनेकाना मागासलेले बिरूद लावण्यात धन्यता वाटते आहे. त्यामुळे देश खरेच मागासलेला बहुवर्ग आहे की प्रगत सुशिक्षित सुसंस्कृत समाज आहे हे कळायला मार्ग नाही.

आजच्या जगात सुशिक्षित शहाण्या लोकांना कुणी विचारत नाही. शिक्षण क्षेत्रातले उदाहरण घ्या. पेपर पब्लिश करणारे संशोधक प्राध्यापक हवेत या हट्टापायी उत्तम शिकविणारे, विषयाची जाण असणारे प्राध्यापक मागे फेकल्या जाताहेत.. मानांकनाच्या गुणदान पद्धतीचा नाटकी अतिरेक झाल्याने गुणवत्ता वाढण्याऐवजी देखणे आकड्यांची आरास करून सजलेले खोटे प्रगती अहवाल मार्केटिंग करून तयार होताहेत. एखादा प्रामाणिक मेहनती कुलगुरू आला तर त्याला या न त्या कारणाने धारेवर धरून नामोहरम करण्याची स्पर्धा लागली असते कॅम्पस मध्ये. त्यात खत पाणी घालायला टी वी चे पडदे, वृत्तपत्राचे कॉलम आहेतच तिखट मीठ मसाले घालायला! कुणी चांगले उपक्रम राबवले तर तेव्हढ्या पुरते त्याचे कौतुक होतेही..पण त्याने खुर्ची खाली केल्यावर येणाऱ्याचे पाहिले काम जुने पुसून नवा, आपल्या मनमानी पद्धतीचा अध्याय लिहिण्यात धन्यता मानण्याचे असते. इथे कुणालाच उत्तम शिक्षण, दर्जेदार संशोधन, कौशल्य व्यक्तिमत्व विकास, कडक शिस्त वगैरे नको आहे. दुधात पाणी घालणारे गवळी हवे आहेत. त्यांचाच बोलबाला आहे अवतीभवती. खाजगीकरणाच्या नावाखाली झालेल्या व्यापारीकरणाने आधीचे साखरसम्राट शिक्षणसम्राट झाले. विद्यापीठाच्या नावाखाली वातानुकूलित महाल, राजवाडे बांधले गेले. पदवी दान करून शिक्षण विकण्याचा धंदा निर्माण झाला. बुद्धिजीवी शहाणे मागे कोपऱ्यात कचऱ्यात फेकले गेले. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले वाजंत्री लावून वरातीत मिरवायला लागले. संख्या वाढ झाली सगळ्या क्षेत्रात. गुणवत्तेचे मात्र चक्क वाटोळे झाले. नवे क्रांतिकारी शैक्षणिक धोरण येऊन तीन चार वर्षे झालीत तरी निवडक शहाणे पुढ्यातील हजारो वेड्यासमोर फक्त भाषणे देताहेत. चर्चा सत्र गाजवताहेत. हा आकलन न होणारा विरोधाभास आहे. शिक्षणाचे मार्ग, संधी, विषय, सगळेच भूमिती श्रेणीने वाढले. पण तरीही माणसे अशिक्षित, असंस्कृत असल्यासारखी, वेड्यासारखी, अविवेकी का वागतात हे न सुटणारे कोडे आहे.

कोणे एके काळी इथे ऋषी मुनी, शास्त्रद्न्य, विचारवंत, तत्वज्ञ यांचा बोलबाला होता. कवी, लेखक, शायर, नाटककार, प्रतिभावंत यांना समाजात भाव होता, मान होता. अध्यात्म, वेद पुराण, धार्मिक ग्रंथ ही घरघरची श्रीमंती होती. हे सगळे वाचले जायचे. त्यावर गहन चर्चा, वाद विवाद व्हायचे. जुने विचार खोडून नवे मांडले जायचे. चांगले स्वीकारले जायचे. ही वैचारिक संस्कृती, स्वीकृती आता लयाला गेली की काय अशी परिस्थिती आहे. विचार समृद्ध करणारी, मनाला श्रीमंत करणारी, बुद्धीला चालना देणारी देवघेव बंद झालेली दिसते. प्रत्येकाच्या वैचारिक वर्तुळाची त्रिज्या कमालीची संकुचित झाली आहे. स्वार्थ बोकाळला आहे. स्वतःची उंची वाढवण्यासाठी दुसऱ्याला लाथाडायचे, खाली पाडायचे, नामशेष करायचे ही संहारक प्रवृत्ती वाढली आहे.

संगीत, चित्रपट, नाटक, साहित्य, कला. अशा सर्वच क्षेत्रात देखील मरगळ आल्यासारखी दिसते. प्रत्येक क्षेत्रात बाजारू स्वरूप आले आहे. प्रदर्शन वाढले आहे. साधना, भक्ती, तपश्चर्या हे शब्दच नष्ट झालेले दिसतात नव्या पिढीच्या शब्द कोषातून. सगळ्यांना सगळे झटपट इन्स्टंट हवे आहे. वाट बघण्याची तयारी नाही. कष्ट करण्याची इच्छाच नाही. यश स्वातंत्र्य आपला जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखे वागणे. कुणी शहाण्याने चार उपदेशाचे शब्द सांगण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला वेड्यात काढणे ही बकाल वृत्ती बळावली आहे समाजात..

ही प्रगती नाही, अधोगती आहे हे कसे कळत नाही आजच्या समाजाला? जो समाज एकमेकाच्या सहकार्याने, हातात हात घालून इथपर्यंत प्रगत झाला, तांत्रिक क्षेत्रात, उद्योग क्षेत्रात गगन भरारी घेता झाला तोच समाज आज हातात शस्त्रे घेऊन एकमेकाच्या जीवावर उठलाय. एकमेकांना पाण्यात पाहतो आहे. ग्रंथ, वेद पुराण, रामायण महाभारत, परंपरा, सांस्कृतिक विचारधारा..यांनी कोणे एके काळी श्रीमंत झालेला समाजवर्ग आज वैचारिक दारिद्र्याच्या चिखलात गटांगळ्या खाताना दिसतो आहे, माणूसच माणसाचा शत्रू झाल्यासारखा वागतो आहे.. वेड्यांच्या बाजारात गर्दी वाढली आहे. शहाण्याचे बेट निर्जन अवस्थेकडे चालले आहे. बुद्धिवंतांचे हसे होताना दिसते. सरकारात प्रामाणिक अधिकारी नकोसे झालेले दिसतात. पैसे, खिरापती वाटणारे लोक प्रतिनिधी हवेहवेसे वाटतात. ते बाहुबली, गुन्हेगार का असेनात, तरी प्रचंड बहुमताने निवडून येतात. पैसे देऊन पास करणाऱ्या, पदवीदान करणाऱ्या शिक्षणसंस्था गर्दी खेचताहेत. उत्तम शिकविणारे, दर्जेदार संशोधन करणारे कडक शिस्तीचे प्राध्यापक कुणालाच नकोसे झाले आहेत..

भिंतीवरचे वर्षाचे कॅलेंडर बदलताना, नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर यावर्षीच नव्हे, प्रत्येक वर्षीच हीच मागील अंकावरून पुढे चालू ..अशी कथा..हे कथानक कधी बदलेल, बदलेल की नाही, याची वाट बघणे तेव्हढे आपल्या हातात आहे. अन् या बदलासाठी कुणी पुढे आले तर हवेच आहे..

– ©️  प्राविजय पांढरीपांडे

७६५९०८४५५५

vijaympande@yahoo.com 

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

भाग १/७

साधारण २०१८ मी साली इंदौरला गेले होते. तेव्हा अकल्पित असा एक छान योग जुळून आला. बाजीराव-मस्तानीचे थेट वंशज (दहावी पिढी) शाहीनजी व अवैसबहाद्दूरजी यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. त्यांनी आमचे खूप छान स्वागत केले. आम्ही त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या. तोपर्यंत बाजीराव-मस्तानीच्या वंशजांविषयी काहीच माहिती नव्हती. तेव्हा याविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली.

त्यानंतर मी अनेकांना याबाबत माहिती विचारली. पण कुणालाच काहीच माहिती नव्हते. काही जणांनी प्रामाणिकपणे सांगितले की आम्हाला हा प्रश्न कधी पडलाच नाही.

कुणीतरी प्रमोद ओक यांचे ”पेशवे घराण्याचा इतिहास” भाग १ व भाग २ ही पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला. लगेच ती पुस्तके विकत घेऊन मी वाचली. पेशवाईवर लिहिलेल्या अनेक पुस्तकात संदर्भग्रंथ म्हणून या पुस्तकाचा उल्लेख अनेकदा केलेला आढळतो. हा लेख लिहिताना या पुस्तकाचाच मुख्य आधार घेतला आहे. तसेच गो.स.सरदेसाई कृत १९४२ सालचे “मराठी रियासत – पुण्यश्लोक शाहू-पेशवा बाजीराव १७२०-१७४०” व नारायण केशव बेहेरे यांचे १९३० सालचे  “पहिले बाजीराव पेशवे” या पुस्तकांचा आधार देखील या लेखासाठी घेतला आहे.

२०१८ सालीच प्रमोद ओक यांनाही त्यांच्या पुण्याच्या घरी जाऊन मी भेटले होते. त्यावेळी त्यांच्याकडून या पेशव्यांबाबत अधिक माहिती मिळाली.

तेव्हापासून पेशवे घराण्याचा इतिहास, बाजीराव- मस्तानी आणि त्यांचे वंशज, यावर लिहावे असे मनात होते. पण काही कारणाने ते राहून गेले होते. या लेखासाठी २०२५ चा मुहूर्त होता असे म्हणायचे !!

नुकतीच २८ एप्रिल २०२५ रोजी  पहिले बाजीराव पेशवे यांची २८५ वी पुण्यतिथी होती.
बाजीराव-मस्तानी यांचे वंशज कोण आहेत? ते काय करतात? याचे उत्तर फार कमी लोकांना माहित असेल. अनेकांना हा प्रश्न देखील पडला नसेल.

पहिले बाजीराव पेशवा यांच्या पराक्रमापेक्षा त्यांच्या मस्तानीसोबतच्या कालखंडाची चर्चा अधिक झाली. असे असूनही दुर्दैवाने बाजीराव-मस्तानी यांच्या वंशजांची आणि त्यांच्या पराक्रमाची फारच त्रोटक रीतीने मांडणी झाली आहे.
बाजीराव व मस्तानी यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव ठेवले, समशेरबहाद्दर ऊर्फ कृष्णसिंह. याला पेशवे घराण्यात व राजकारणात मानाचे स्थान लाभले. १७६१ साली पानिपतावर तो प्राण पणाला लावून लढला व धारातीर्थी पडला. तेव्हा पेशवे कुटुंबाला त्याचे अतीव दुःख झाले. १७८८ साली बाजीराव-मस्तानीच्या वंशजांना मध्य प्रदेशातील बांदा प्रदेशाची जहागिरी देण्यात आली. त्यानंतर चौथी पिढी म्हणजे बांद्याचा नवाब दुसरा अलीबहाद्दर, हे १८५७ च्या संग्रामात झांशीची राणी व नानासाहेब पेशवा यांच्या बाजूने लढले. या संग्रामात पराभूत झाल्याने  बांदा संस्थान खालसा झाले. तेथील नवाबास पेन्शन देऊन इंदूरला आणून बसविण्यात आले.

प्रसिद्ध उर्दू शायर मिर्झा गालिब हा मस्तानीच्या वंशजाच्या नात्यातील होता. ही माहिती किती जणांना आहे?

या पार्श्वभूमीवर पेशवे घराण्याचा इतिहास, विशेषतः बाजीराव-मस्तानी व त्यांच्या आजपर्यंतच्या वंशजांविषयीची माहिती देणे, हा आजच्या लेखाचा मुख्य उद्देश आहे.

पेशव्यांची कारकीर्द : श्रीवर्धनकर (भट) देशमुख घराण्यातील पेशवे :-
बाळाजी विश्वनाथ (इ.स.१७१३-१७२०)
पहिले बाजीराव (इ.स.१७२०-१७४०)
बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब (इ.स.१७४०-१७६१)
माधवराव बल्लाळ ऊर्फ थोरले माधवराव  (इ.स.१७६१-१७७२)
नारायणराव (इ.स.१७७२-१७७४)
रघुनाथराव (अल्पकाळ)
सवाई माधवराव (इ.स.१७७४-१७९५)
दुसरे बाजीराव (इ.स.१७९६-१८१८)

छत्रपती शाहूमहाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना १७१३ साली पेशवेपद दिल्यापासून १८१८ साली पेशवाईचा अस्त होईपर्यंतचा इतिहास, हा पराक्रम, कौटुंबिक कलह,  कारस्थाने यामुळे गाजला.
मराठेशाहीत पेशवेपदी नियुक्त झालेल्या पराक्रमी बाळाजी विश्वनाथ भट व त्यांच्या वंशजांबाबत “प्रभाकर शाहीरानें” एक पोवाडा रचला होता.. त्याची सुरुवात करताना ते म्हणतात..
“श्रीमंत ईश्वरी अंश धन्य तो वंश परमपुरुषार्थी ।
बरोबरी तयांची कोण करिल पहातार्थी “॥

भट घराण्याकडे पेशवेपद कधी आणि कसे आले?.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून  “पेशवा” या अधिकारपदावर निरनिराळ्या व्यक्तींच्या नेमणूक झालेल्या आहेत.

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर काळात छत्रपती शाहू महाराजांचे आसन आणि राज्य स्थिर करण्यात “बाळाजी विश्वनाथ भट” यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. महाराजांचे पूर्वीचे पेशवे “बहिरोपंत पिंगळे” १७१३ साली एका मोहिमेत कान्होजी आंग्रे यांचेकडून कैद झाले. त्यामुळे पेशवापद विशेष कर्तबगार व्यक्तीकडे असावे, असे छत्रपती शाहू महाराजांना वाटू लागले. विचारविनिमय करताना त्यांना बाळाजींचे नाव सुचले. अशाप्रकारे छत्रपतींचे पेशवापद भट घराण्याकडे १७१३ आले.

पेशवेपदावर आल्यावर बाळाजी विश्वनाथ यांनी दिल्लीच्या बादशहाकडून चौथाई सरदेशमुखीच्या सनदा आणल्या होत्या. त्याचबरोबर महाराणी येसूबाईंची सुटकाही केली होती. त्यामुळे पराक्रमी अशा बाळाजी विश्वनाथ यांच्यावर शाहू महाराजांचा प्रचंड विश्वास होता. छत्रपती शाहू राजांच्या चरणी बाळाजी विश्वनाथ यांची प्रचंड निष्ठा होती. शेवटपर्यंत ते शाहू महाराजांच्या आज्ञेत राहिले.
बाळाजींच्या पत्नीचे नाव राधाबाई होते. त्यांना बाजीराव,  चिमाजीअप्पा, हे दोन मुलगे आणि भिउबाई, अनुबाई अशा दोन मुली झाल्या. ०२ एप्रिल १७२० रोजी बाळाजींचा सासवड येथे मृत्यू झाला.

प्राचीन रोमन लेखक शास्त्रज्ञ प्लिनीने एक किस्सा दिला आहे. ई. स. पूर्व ३० मध्ये रोमन सम्राट टायबेरियसची प्रकृती बिघडली. राजवैद्यांनी त्याला आहारात रोज काकड्या खाण्याचा सल्ला दिला. पण इटलीत वर्षभर काकड्या कशा मिळणार ? मग सम्राटासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली.  काकडीचे वेल वाढवण्यासाठी व काकड्या साठवण्यासाठी विशेष घर उभारण्यात आले. ते घर तेल किंवा मेण लावलेल्या कापडाने आच्छादलेले होते. आजकालच्या अत्याधुनिक  वातानुकूलित ग्रीन हाऊसचा तो प्राथमिक अवतार होता.

शेतात अनेक ठिकाणी उभारलेले शेडनेट, पॉलीहाऊस तुम्ही पाहिले असतील. युरोपात असे काचेचे ग्रीन हाऊस पूर्वीपासून प्रचलित आहेत. प्रचंड थंडी व हिमवृष्टीमुळे तिथे शेती करणे जवळपास अशक्य ठरते. त्यामुळे मोठ मोठी काचघरे उभारून त्यात फुले, फळे भाजीपाला पिकवला जातो. काचेची भिंत ही बाहेरील हिमवृष्टीपासून रक्षण करतानाच ग्रीनहाऊस मधील ऊब कायम राखते. यावरूनच हरितगृह परिणाम – ग्रीन हाऊस इफेक्ट – हा शब्द घेण्यात आला. आणि पाहता पाहता तो विज्ञानातच नव्हे तर व्यवहारातही रुळला. पण या ग्रीन हाऊसचा अवघ्या पृथ्वीशी आणि आपल्याशी काय संबंध असा प्रश्न अनेकांना पडतो.

वातावरणातील काही घटकामुळे एखाद्या ग्रहाच्या वातावरणाच्या खालच्या थराचे तापमान वाढणे म्हणजे हरितगृह परिणाम होय. सध्या भाषेत, आपली पृथ्वी नैसर्गिकरित्या उबदार राखली जाण्याची क्रिया म्हणजे हरितगृह परिणाम. ही संकल्पना टप्प्याटप्प्याने विकसित होत गेली.

हवा ही उष्णतेची दुर्वाहक आहे. त्यामुळे ऊन कितीही कडक असले, तरी त्याच्यामुळे हवा तापणे अपेक्षित नाही. त्यामुळे पृथ्वीचे वातावरण हे अवकाश पोकळीप्रमाणे अतिशीत व त्याचे तापमान शून्य अंशापेक्षाही खूप कमी असायला हवे. पण पृथ्वीच्या वातावरणाचे सरासरी तापमान १५ अंश सेल्सियस आहे. हे कसे काय ? बरोबर दोनशे वर्षांपूर्वी हा प्रश्न फ्रेंच गणिती व संशोधक जोसेफ फोरिअर यांना पडला. पृथ्वीचे सूर्यापासून असलेले अंतर व सूर्याची उष्णता विचारात घेता पृथ्वी फारच थंडगार असावयास हवी, हे त्यांनी १८२४ मध्ये गणिताने दाखवून दिले. पण ती तशी नसण्याचे  कारण मात्र त्यावेळी त्यांना सांगता आले नाही. तरीही असे होण्यात वातावरण कारणीभूत असावे हे त्यांनी अचूक सुचवले. म्हणजे हरितगृह परिणाम हा शब्द फोरिअर यांनी वापरला नसला तरी तसे काहीतरी घडत असावे याची शक्यता त्यांनी व्यक्त केली होती.

तीनच वर्षात, १८२७ व १९३८ मध्ये फ्रेंच शास्त्रज्ञ क्लॉड पौलिएट यांनी फोरिअर यांचे म्हणणे गणिताने पडताळून पाहिले व त्यासंबंधीचे पुरावेच पुढे आणले. हवेतील वाफ व कार्बन डाय ऑक्साईड मुळे पृथ्वी उबदार राहते व यामुळे तिच्यावर जीवसृष्टी टिकून राहते, असेही त्यांनी सुचवले.

युनिस न्यूटन फूट या बहुआयामी प्रतिभेच्या पहिल्या अमेरिकन महिला शास्त्रज्ञ होत्या. त्यांनी अनेक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. १८५६ मध्ये त्यांनी प्रयोगाने सिद्ध केले की हवेत वाफ असेल तर सुर्यामुळे पृथ्वीचे तापमान जास्त वाढते. असे होण्यात कार्बन डाय ऑक्साईड वायू अधिक प्रभावी असून त्यांच्यामुळे पृथ्वी अधिकच उष्ण होईल हा निष्कर्षही त्यांनी काढला.

या बाबतीत फार महत्वाचे योगदान दिले आयरिश शास्त्रज्ञ जॉन टिंडॉल यांनी. रेशो स्पेक्टरोफोटोमीटर हे  उपकरण वापरून विविध वायूंकडून होणाऱ्या इन्फ्रारेड लहरींचे (म्हणजे उष्णतेचे) ग्रहण व उत्सर्जन याचे त्यांनी प्रथमच मापन केले. त्यातून त्यांनी १८५९ मध्ये सिद्ध केले, की हवेत ऑक्सिजन व नायट्रोजनचे प्रमाण सुमारे ९९ टक्के असले तरी, हे दोन्ही वायु हे उष्णता ग्रहण व शोषण करीत नाहीत. मात्र हवेत अल्प प्रमाणात असणारी बाष्प, कार्बन डाय ऑक्साईड व हायड्रोकार्बन्स यांच्यामुळे हवेचे तापमान वाढते. स्वीडनचे स्वँट अर्हेनियस यांनी किचकट प्रयोग व मोजमापे करून या सर्व प्रकाराचा पूर्ण अभ्यास केला. हवेतील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण दुप्पट झाले, तर त्याचे पृथ्वीच्या तापमानावर काय परिणाम होतील याचे गणितीय भाकितच त्यांनी 1896 मध्ये जाहीर केले. ७२ वर्षांपूर्वी फोरिअर यांनी मांडलेले गृहीतक ही केवळ कल्पना नसून वास्तव आहे, हे एव्हाना सर्वांना लक्षात आले होते. या विशिष्ट प्रक्रियेला नाव मात्र अजून कुणी दिले नव्हते. १९०३ मध्ये हेही काम निल्स गुस्ताव एखोलम यांनी केले. या प्रकाराला त्यांनी हरितगृह परिणाम (greem house effect) हे नाव दिले. आजही ते रूढ आहे. वरील इतिहासाच्या पार्श्वभूमीवर आता ही संकल्पना सहज उलगडू शकते.

पृथ्वीला सूर्यापासून मिळणारी ऊर्जा मुख्यतः प्रकाशाच्या रूपात मिळते. त्या उर्जेपैकी ३० टक्के ऊर्जा प्रकाश किंवा उष्णतेच्या रुपात अवकाशात परावर्तित होते. उरलेली ऊर्जा वातावरण किंवा भूपृष्ठाकडून शोषली जाते. पृथ्वीभोवतीचे वातावरण हे उष्णतेसाठी दुर्वाहक असल्याने सूर्यप्रकाशातील ऊर्जा वातावरणात प्रत्यक्षपणे शोषली जात नाही. यामुळे ती वातावरणास ओलांडून सरळ, आरपार भूपृष्ठापर्यंत येते. भूपृष्ठाने ही ऊर्जा शोषण केल्यामुळे भूपृष्ठाचे तापमान वाढते. भूपृष्ठाकडे येणाऱ्या सौर ऊर्जेपैकी ४०% ऊर्जा ही लघुलहरींच्या रूपात असून त्यांच्यातील ऊर्जा अधिक असल्यामुळे भूपृष्ठ तापते. तप्त भूपृष्ठाकडून जी ऊर्जा प्रक्षेपित होते ती दीर्घलहरीच्या म्हणजे उष्णतेच्या रूपात असते. वातावरणातील बहुतेक वायू हे दीर्घलहरिंसाठी पारदर्शक आहेत. पण कार्बन डाय ऑक्साईड हा वायू या दीर्घलहरीतील (विशेषतः १२०० ते १८०० नॅनोमीटर तरंगलांबीच्या लहरीतील) ऊर्जा शोषण करतो. कार्बन डाय ऑक्साईडकडून या प्रारण ऊर्जेचे शोषण झाल्यावर त्याच्यातील रेणू अधिक गतिमान होतात. त्यातून या रेणूंच्या संभाव्य टकरांची संख्या वाढते व त्याचा परिणाम वातावरणाचे तापमान वाढण्यात होतो. अशा प्रकारे मूलतः उष्णतेचे दुर्वाहक असणाऱ्या वातावरणाचे तापमान वाढते.

वरील विवेचन साध्या भाषेत पुढीलप्रमाणे सांगता येईल. सूर्यप्रकाशातील लघुलहरीमुळे प्रथम भूपृष्ठ तापते. तप्त भूपृष्ठाची ऊर्जा दीर्घलहरींच्या म्हणजे उष्णतेच्या रूपात प्रक्षेपित होते. वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड वायू ही ऊर्जा शोषण करतो व त्यामुळे वातावरणाचे तापमान वाढते. वातावरणात कार्बन डाय ऑक्साईड वायू नसता, तर ही ऊर्जा वातावरणाच्या बाहेर प्रक्षेपित होऊन वातावरण थंड राहिले असते. तात्पर्य, हवेतील कार्बन डाय ऑक्साइडच्या अस्तित्वामुळे वातावरण हे पृथ्वीभोवती एखाद्या ब्लॅंकेट प्रमाणे तिला उबदार ठेवण्याचे कार्य करते. या क्रियेस ‘हरितगृह परिणाम’ म्हणतात. कार्बन डाय-ऑक्साइड शिवाय इतर काही वायूमुळेही हरितगृह परिणाम घडून येतो. उदाहरणार्थ बाष्प, ओझोन, मिथेन वायू, सल्फर डाय ऑक्साईड, ढगातील जलबिंदू, धूळ यांचाही हरितगृह परिणामात वाटा असतो. त्यांना हरितगृह वायु म्हणतात. थंडगार पृथ्वीवर जीवसृष्टीचे फुलणे, बहरणे व उत्क्रांती यात हरितगृह परिणामाचा मोठा वाटा आहे. यामुळे हा परिणाम सजीवांसाठी वरदान ठरला आहे.

पण औद्योगिक क्रांतीनंतर कोळशाचे मोठ्या प्रमाणावर ज्वलन होऊ लागले. यामुळे हवेतील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढले. त्यामुळे पृथ्वी केवळ उबदार न राहता तिचे सरासरी तापमान वाढूही शकते, हे लक्षात आले. या क्रियेस ‘ग्लोबल वॉर्मिंग’ किंवा ‘भूताप वृद्धी’ म्हणतात. या घटनेचे पृथ्वीच्या पर्यावरणावर मोठे दुष्परिणाम संभवतात. अशा प्रकारे एक वरदान हाच शाप ठरण्याची वेळ मानवाच्या कृतीमुळे आली आहे.

— ©️ एल. के.कुलकर्णी

भस्मासुराची गोष्ट आज आठवते आहे. भस्मासुर या राक्षसाला जगावर राज्य करायचे होते. त्याने भगवान महादेवाची आराधना केली. प्रचंड खडतर अशा तपश्चर्येनंतर देवाधीदेव भगवान शंकर प्रसन्न झाले.
भस्मासुराला भोळ्या शंकराने वरदान दिले की कुणी त्याचा वध करू शकणार नाही आणि त्याचा तळहात ज्याच्या डोक्यावर येईल तो तात्काळ भस्मसात होईल. या वरामुळे तो उन्मत्त झाला. साक्षात स्वर्गावर स्वारी करून देवांचा राजा देवेंद्रच्या सिंहासनावर त्याची वक्रदृष्टी पडली.
अवघे जग त्याच्या तळहाताच्या स्पर्शापासून दूर पळू लागले. त्याची दहशत माजली.
अशा वेळी साक्षात विष्णू भगवंत पुढे झाले आणि त्यांनी मोहिनी या अप्सरेचे रूप प्राप्त केले. या मोहिनीची मोहिनी भस्मासुरावर पडली. ही सर्वांगसुदर अप्सरा आपली कशी होईल याचा तो विचार करू लागला. मोहिनीने त्याला नृत्य करत तिच्याशी स्पर्धेत जिंकण्याची अट घातली. मोहिनी जसे नृत्य करेल अगदी हुबेहूब तसेच नृत्य हावभाव आणि पदन्यासासह भस्मासुराने करायचे तरच मोहिनीशी तो विवाह करू शकतो.
ही स्पर्धा सुरु झाली, भस्मासुर मोहिनीच्या सोबत ती करेल ते अगदी हुबेहूब तसेच नृत्य करू लागला आणि ऐन मोक्याच्या क्षणी मोहिनीने तिच्या डोक्यावर आपला तळहात ठेवला. तत्क्षणी भस्मासुराने देखील तिचे अनुकरण केले मात्र त्याचे भस्मात रूपांतर झाले आणि जगावरील संकट टळले.

डोनाल्ड ट्रम्प रूपाने एक भस्मासुर अमेरिकेत उगवला आहे.  

या भस्मासुराला यावर घालणे युरोप, रशिया आदी महासत्तांना अवघड जाऊ लागले आहे. या भस्मासुराच्या या अशा उन्मत्त अवस्थेत या भस्मासुराची वक्रदृष्टी भारत देशावर पडली. भारताला नमवू पाहणारा हा भस्मासुर उन्मनी अवस्थेत गर्जना करू लागला.
भारताकडून आलेल्या मालावर प्रचंड आयातकर लादू पाहताना भारताने मात्र अमेरिकेला चकवा देण्याचे प्रयत्न सुरु केले.
 या प्रयत्नांचा परिणाम आता अमेरिकेअंतर्गत यादवी सुरु होण्यात झाला तर त्यात आश्चर्य बाळगू नये.
अमेरिकाप्रेरित आणि अमेरिकापोषित डीप स्टेटने नकळतपणे पाकिस्तानातील इम्रानखान सरकार खिळखिळे केले, तिथली लष्करशाही आपल्या मांडलिकत्व छायेत कटपुतळीची बाहुली बनवली.
पाकिस्तान अमेरिकेच्या कह्यात पुरता आल्यानंतर या डीपस्टेटने आपला मोहरा बांग्लादेशाकडे वळवला. तिथे मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण करून सत्ताबदल घडवून आणला. सुरळीत चाललेली आर्थिकघडी विस्कटून टाकली गेली. प्रचंड अनागोंदी माजून लोकशाही मार्गाने झालेल्या निवडणुकीत जिंकून आलेल्या पंतप्रधानाला देखील देशाबाहेर पळून जाऊन  परदेशी आश्रितासारखे राहण्यास भाग पाडण्यात आले.

भारतात देखील अशा प्रकारे अनागोंदी माजवता येईल याचा डीपस्टेटला भरवसा वाटू लागला. भारतातील विरोधी पक्षांच्या हातात डीप स्टेटने निखारे ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र हे करत असताना एकाच वेळी अनेक डगरींवर पाय रोवण्याच्या प्रयत्नांत हे कुटील कारस्थान आपल्याच चक्रव्यूहात फसत जाताना दिसते आहे.
 भारतावर कशा रीतीने निर्बंध घातले म्हणजे भारत वठणीवर येऊ शकतो याबाबत पुरता गोंधळलेला ट्रम्प यद्वा तद्वा भविष्यताना दिसतो आहे.

आधीच मर्कट
त्यातून मद्य प्याला
हे कमी काय म्हणूनि
भूत त्यात संचारले
परिणामस्वरूप “यद्वातद्वा भविष्यति”
(वाट्टेल तसे वागणे, वाट्टेल ते बरळणे, उड्या मारणे, वळवळणे)
असे सारे सुरु की हो जाहले

भान भरकटलेला अशी अवस्था ट्रम्पने स्व:हस्ते करवून घेतली. ट्रम्पच्या हातून सुकाणू निसटून सरकारची नौका डुबण्याच्या मार्गावर आलेली स्पष्ट दिसते आहे.
 अमेरिकेतील नागरिक स्वस्थ बसणारे नक्कीच नाहीत. त्यावर देखील ट्रम्प सरकार लक्ष ठेवून आहे. सरकारी पाश केव्हाही आवळले जातील अशा अनागोंदीची चाहूल एव्हाना अमेरिकी अवकाशात लागू पहात आहे. वाढत्या आयातकराचे ओझे जलदगतीने अमेरिकेतील सामान्य ग्राहकांच्या डोक्यावर येऊन बसायला आता काहिसाच अवधी बाकी आहे. महागाईचा कडेलोट आणि उत्पन्नाच्या स्रोताचे आटणारे प्रमाण यांचा कडेलोट व्हायला फारसा उशीर होणार नाही. यातून वाढेल तो केवळ असंतोष, त्यापरीस काही नाही. जसजशी असंतोषाची काजळी अवकाश भरून काढेल, ती दडपण्यासाठी सरकारी दडपशाहीतुनअणिबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण व्हायला कितीसा वेळ लागणार.

ट्रम्पचे एकंदरीत वागणे, सहिष्णू उतावळेपणा, सर्व रिपूंनी (मद, मोह, अहंकार, मत्सर, क्रोध आणि वासना या विकारांनी) भ्रष्ट अशा वृत्ती त्याच्यात ठासून भरलेल्या दिसतात. याच वृत्तीतून लष्कराची मदत घेऊन फोफावणारी एकाधिकारी हुकूमशाही अमेरिकेत येऊ घातली आहे. ट्रम्पला समजून घेत समजावून सांगणारे कुणीच उरलेले  नाही. त्यामुळे त्याच्या स्वभावाच्या विक्षिप्त लहरींकडे केवळ पहात राहणे यापलिकडे तिथले नागरिक दुसरे काय करू शकतात.

अमेरिकी नागरिकांच्या वर्तनाविषयी भाकीत करताना गेल्या सव्वाशे वर्षातील अमेरिकी शासनव्यवस्था अभ्यासणे म्हणूनच जरुरीचे ठरते.
सी०आय०ए० नावाची एक पातळयंत्री व्यवस्था संस्थारूपात अनेक दशके जगभरात धुडगूस घालताना दिसते. या संस्थेचे हस्तक जगभरात जगाच्या कानाकोपऱ्यात अगदी आपल्या आसपास आढळून येतात. शांत, सुस्वभावी कुणाच्या अध्यात न मध्यात असलेला आपला एखादा शेजारी पुढे जाता सी०आय०ए०चा एजन्ट म्हणून काम करतो असे कानावर आले असे विरळा परंतु अशक्य नक्कीच नसते.

“आय ड्रीम ऑफ जेनी” म्हणजे अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्यातील राक्षससेवक एका सुंदरीच्या स्वरूपात तुमच्या आयुष्यात येते आणि तुमच्या दैनंदिन कामांमध्ये जादूचा पिसारा फुलवते. १९६५ च्या दरम्यान अमेरिकी टीव्हीवरील ही विनोदी (सुखांत) मालिका. कल्पनेतील अथवा चित्रफितीतील ही सुंदरसेविका तंत्रज्ञानाच्या मदतीने अस्तित्वात येऊ घातली.  

अमेझॉनने पुरवलेली अलेक्सा नावाची ती सुंदरी अदृश्यपणे तुमच्या घरात तुमच्या आज्ञा पाळण्यासाठी अवतरली.
या अलेक्साला तुम्ही कोणत्याही विषयावरील माहितीची विचारणा करू शकता, परंतु अमेरिकी राजकारणाविषयी अगदी ट्रम्पविषयी काही राजकिय विचारायला जाल तर ती गप्प बसणे पसंत करते.

अमेरिकी जनमाणसावर सी०आय०ए० नावाच्या यंत्रणेचा वचक असा अदृश्यपणे वावरत असतो. “नाइंटिन एटीफोर” या कादंबरीत जॉर्ज ऑरवेलने वर्णन केलेल्या “बिग ब्रदर इज वॉचिंग” या अदृश्य दडपणाचा संचार एका ठरविक पातळीपर्यंत नक्कीच जाणवतो.

ब्रिटनमध्ये काम करताना राजकीय व्यवस्थेविरुद्ध भाष्य  करायचे नाही असे बंधन तिथल्या खाजगी क्षेत्रातील कर्मचारी वर्गावर नेहमी असते याचा अनुभव मी घेतला आहे. लोकशाही  जन्म घालणाऱ्या देशातील ही दडपशाही. त्यापुढे अमेरिकेचे काय घेऊन बसलात.

ज्या उत्साहाने न्यूयॉर्क शहरातील रॅडिसन स्केअरवरील “हाऊडी मोदी” या कार्यक्रमाला हजारो भारतीयांनी ओसंडून प्रतिसाद दिला, ते सारे भारतीय देखील आज ट्रम्प सरकारच्या वर्तनावर मूग गिळून मात्र आह

[ पूर्वार्ध

[ पूर्वप्रसिद्धी – दै. पुण्यनगरी (सर्व आवृत्त्या) दि. २९ ऑगस्ट २०२५)] 

फक्त माया

बालकविता 

आई, दूर कुठं तरी
अशी जागा आहे का ?
जेथे राहू शकतो फक्त
तू , मी, अन् बाबा

मिळत असतील तेथे
फक्त लाडू अन् चिवडा
कोणी नसेल रागवायला
समजला का धडा ?

तेथे असेल फक्त
आईबाबांची माया
नको तुझा मोबाईल
सदा कानीं लावाया

संगणकही नको
बाबांचं काम करायला
वेळ मिळेल त्यांना
मला जवळ घ्यायला

खरंच सांग नं एकदा
अशी जागा आहे का ?
खेळू शकाल माझ्याशी
देऊन उंच उंच झोका

शाळेतून आल्यावर
तू घरी नसतेस
व्हिडिओवर मला फक्त
खोटी खोटी दिसतेस

शोधू या नं आई
अशी सुंदर जागा
बाबा वृक्षाची सावली
माऊलीचा गारवा

मी अगदी शांत शांत निस्तब्ध बसलेले..बाहेरची झाडे निश्चल वाटत होती .मन भरभरून येत होते..मूकपणे पारदर्शक काचेतून बघत बसले होते  संथपणे घरंगळणारे पाण्याचे थेंब …श्वास कोंडल्यासारखा झाला होता ..मनात  मळभ दाटून आले होते..नेत्र नीर झाले ..
अस्वस्थता, तळमळ, तगमग हळुहळू वृद्धिंगत होत चालली…खरे तर मुलगा सुखरूप होता..घरी त्याच दिवशी बसलेल्या  बाप्पानेच बहुधा त्याला वाचवले होते… पण …तो अपघात काही डोळ्यांसमोरून जात नव्हता . आजच इतका मोठा अपघात का व्हावा माझ्या मुलाचा.?.याचे काहूर माजले होते .
गणपतीचे दिवस होते..वेळेवर येणारा मुलगा अजून आला नव्हता..खूप खूप वाट बघितल्यावर लंगडत एका हातात मोठी बाईक सांभाळत कसाबसा चालत येत होता.. काहीही न सांगता, काहीही तक्रार न करता त्याने सर्व कामे आटोपली …नंतर कळले आज लवकर जायचे घरी म्हणून तो ऑफिसमधून लवकर निघाला होता.. सांताक्रुझ येथे अचानक डाव्या बाजूने रिक्षा आली अन् सरळ त्याच्या बाईक समोरून  उजव्या बाजूला वळली..तो धाडदिशी आदळला….बाईक उडाली, डिवायडर पार करून दुसऱ्या बाजूस आदळली …मुलाचे हेल्मेट एकीकडे, तो दुसरीकडे, खांद्यावरची बॅग तिसरीकडे …इतस्ततः विखुरले होते ..समोरून बी ई एस टी ची बस घणघणत येत होती …कचकचून कर्रर्रर्र ब्रेक दाबल्याचा आवाज आला ..आणि एकच कल्लोळ..लोक धावत आले ..मुलाला विचारले..तो व्यवस्थित होता ..शुद्धीत होता, उभा राहिला ..लोकांच्या प्रेमळ आग्रहाचे आभार मानत बाईक हातात घेऊन चालत घरी आला..हसत म्हणाला, .”मला नाही लागले पण बिचाऱ्या बाईकला लागले गं आई..!”
मी मात्र सुन्न..माझी मैत्रीण म्हणाली..”का, हो मॅडम।..आपण तर सदैव हसत असता मग आज काय झाले ? का, फक्त लोका सांगे  ब्रह्मज्ञान ..हाहा”

“नाही गं..! एक स्त्री स्वतः चे दुःख आनंदाने पचवू शकते पण मुलांचे नाही सहन करता येत इतक्या सहजी ..”

“हो, पण तूच म्हणतेस ना ..दुसऱ्याच्या दुःखाकडे बघितले की आपले लहान होते.”
“हो गं, परवाच मी अरुणिमाची कथा वाचली काय अफलातून !!”
“कोणती गं…?”

ती फक्त २३ वर्षांची होती..त्या दिवशी तिची मुलाखत होती दिल्लीला ..अप्रतिम खेळायची व्हॉलीबॉल ..
लखनौ येथून ती पद्मावती एक्सप्रेसमध्ये साध्या डब्यात चढली. रात्री काही दरोडेखोर चाकू सुऱ्या घेऊन डब्यामध्ये शिरले ते सगळ्यांना धमकावू लागले  लोकांकडून जे मिळेल ते लुटू लागले अरुणिमाच्या गळ्यात सोन्याची साखळी होती दरोडेखोर तिच्याजवळ आले  तिची साखळी ओढू लागले  तिने आरडाओरडा केला ….विरोध केला..एका मुलीने  विरोध केला याचाच त्यांना जास्त राग आला. त्यांना वाटले एक मुलगी आपल्याला विरोध करते.. त्यांनी तिला भरधाव रेल्वे गाडीतून फेकून दिले.

तिच्या चेहऱ्यावर किती तरी जखमा झाल्या होत्या आणि तुला काय सांगू की जिथे ती पडली होती त्याला लागूनच एक दुसरा रेल्वे मार्ग होता आणि दुसऱ्या ट्रॅकवर तिचा पाय होता.
 बापरे,  काय सांगतेस?
 हो आणि तिने  उठायचा प्रयत्न केला पण कशी उठणार ?
तिचा पाय हलतच नव्हता समोरून एक ट्रेन आली.. तिला दिसत होती पण ती हलू शकत नव्हती.. काय झाले असेल तिला?
 ती गाडी तिच्या पायांवरून गेली. रात्रभर गाड्या येत होत्या जात होत्या तिच्यावरून निघून जात होत्या आणि तुला माहितीये का ? काय सांगू,  रुळाखाली जे उंदीर वगैरे असतात ना ते उंदीर तिचे पाय कुरतडत  होते आणि ट्रेनमधून जे मलमूत्र पडते ते सुद्धा तिच्यावर पडत होते
शी!!! काय सांगते?
 काही वेळानंतर तिची शुद्ध हरपली .सकाळी कुणाला तरी ती अशा भयंकर दयनीय अवस्थेत  पडलेली दिसली. तिला एका प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले
 आणि काय गं !!  तिथे भूल देण्याची व्यवस्था नव्हती त्यामुळे तशाच अवस्थेत तिचा पाय कापला गेला नंतर तिला दिल्लीच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आणि बघ ना आपला मीडिया कसा आहे?
 त्या मीडियामध्ये तिच्याजवळ तिकीट नव्हते म्हणून तिने उडी मारली असे सांगत होते .अशा वेळेस त्या मुलीची अवस्था काय झाली असेल पण तरीही  अरुणिमाने आपले मनोधैर्य गमावले नाही अरुणिमाला खोटा पाय लावावा लागला आणि तिने कृत्रिम पायावर सुद्धा आपले सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर चढण्याचे नक्की केले .
काय सांगतेस?
 हो,  ती आपल्या भावाबरोबर बिहारमध्ये बचेन्द्री पाल यांना भेटायला गेली . तुला माहितीये का ती ?
हो त्या भारतीय स्त्री माऊंट एव्हरेस्ट वीर आहेत त्यांना आश्चर्य वाटले हा कृत्रिम पाय घेऊन ही मुलगी माउंट एव्हरेस्टवर चढणार ? त्यांनी आधी नाही म्हटले पण अरुणिमाची जिद्द बघून त्यांना नमते घ्यावेच लागले.

काय जिद्द आहे?
याला म्हणतात मनोधैर्य .
नंतर ती कशी चढली, तिला भारत सरकारने कसे सन्मानित केले ही देखील चित्तथरारकच कथा
अगं ..कथा काय ? किती भयंकर सत्य
बरे झाले तू आलीस आणि अरुणिमाचे दुःख आपल्यापेक्षा किती किती विदारक ..जाणवून नतमस्तक झाले मी
म्हणतात ना  ..मारुतीरायाने डोंगर उचलला तेव्हाच.. जेव्हा त्याने स्वतः ला मोठे केले
संकटाला लहान समजा व स्वतः ची हिम्मत वाढवा हेच खरे

– सौ. स्वाती वर्तक

मुंबई ४०० ०५२

swati.k.vartak@gmail.com

–  आभा कोल्हटकर [ वय १२ वर्षे ]

  प्रेषक डॉ. प्रियंवदा कोल्हटकर

@@@

Sanika Vartak on computer

सानिका वर्तक 

@@@

– स्वरा वर्तक १

@@@

 

– अद्वैत देऊळगावकर 

@@@

महत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. 

@@@@@@@@@@@

महत्त्वाची सूचना :- मैत्री अनुदिनी हे मुख्यत: मराठी साहित्याला वाहिलेलं आणि नवं-जुनं साहित्य प्रकाशित करणारं एक नियतकालिक आहे. ते आम्ही वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देत असतो. एखादा जुना लेख वा कविता वगैरे साहित्य पुनर्प्रकाशित करायचं असल्यास आम्ही सदर लेखकाची परवानगी घेण्याचा प्रयत्नही करत असतो. काही वेळा संपर्क होऊ शकत नाही. मात्र अशा प्रकारे पुनर्प्रकाशित केलेल्या साहित्यावर आम्ही न चुकता लेखकाचं नांव व ज्या पुस्तकातून वा मासिकातून ते घेतलं त्याचा नामनिर्देश करत असतो. कृपया आमची अडचण समजून सहकार्य करावं ही विनंती.