हर्षद सरपोतदार

वार : शुक्रवार.
तारीख : १३ जानेवारी २००६.
वेळ : साधारण दुपारी १२.३० ची.
स्थळ : अर्जेंटिनातील ब्युनोस आयर्स परगण्यामधील ‘अकॅसुसो’ (Acassuso) या टुमदार शहरातल्या ‘बँक ऑफ रिओ’ ची दुमजली इमारत.
रिओ बँकेच्या दर्शनी भागातलं काचेचं दार ढकलून सुटाबुटातले पाच पुरुष एकामागोमाग आत शिरले. त्यांच्या हातात मोठ्या बॅगा होत्या. त्यातले दोन जण आतला जिना चढून वरच्या मजल्यावर गेले. बाकीच्या तिघांनी तळमजल्यावर जागा धरल्या. आडोशाला उभं राहून सर्वांनी खिशातून रबरी मुखवटे काढून तोंडावर चढवले आणि एकाच वेळी खिशातून पिस्तुलं काढून ती समोरच्या लोकांवर रोखली. त्यावेळी दोन्ही मजल्यावर मिळून २३ कर्मचारी आणि ग्राहक होते. वरच्या मजल्यावर जे मोजके कर्मचारी होते त्यांना खाली आणण्यात आलं. मग सर्वांना जमिनीवर पालथं झोपण्यास सांगण्यात आलं. त्यामुळे बँकेवर दरोडा पडत असल्याचं लोकांच्या लक्षात आलं. पालथं झोपल्यामुळे दरोडेखोर नेमकं काय करत आहेत हे कुणालाच दिसत नव्हतं.
पोलिसांचं आगमन
एव्हाना दरोडा पडत असल्याची बातमी पोलिसांना समजली होती. त्यामुळे एकामागोमाग एक पोलिसांच्या गाड्या तिथे पोहोचल्या होत्या आणि पोलिसांनी नि कमांडोजनी बँकेच्या इमारतीला वेढा घातला होता. दरोडेखोर अजून आतच असल्याचं पोलिसांना समजलं तेव्हा त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. बँकेची कॅश लुटण्याचा हा नेहमीसारखाच एक प्रयत्न आहे आणि दरोडेखोर आपल्या तावडीतून सुटत नाहीत अशी त्यांची खात्री झाली. तरीही पोलिसांनी दरोडेखोरांच्या कलाने घ्यायचं ठरवलं. कारण १९९९ साली ‘रामेल्लो’ शहरात अशाच एका बँकेवर पडलेल्या दरोड्याची आठवण ते विसरले नव्हते. त्या दरोड्यात बराच विध्वंस आणि गोळीबार झाला होता. काहींचा त्यात बळी गेला होता. त्या प्रकरणात पोलिसांनाही दोषी ठरवण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांना ते होऊ द्यायचं नव्हतं.
बँकेच्या इमारतीला अन्य कुठल्याही बाजूला दुसरं दार नव्हतं. त्यामुळे दर्शनी भागाच्या मुख्य दारासमोरच काही अंतरावर पोलिसांनी मुक्काम ठोकला. शिवाय बँकेला वेढा घालून सुमारे शंभर शस्त्रसज्ज पोलिस उभे होते. पोलिसांचे छुपे निशाणेबाज- ज्यांना स्नायपर म्हणतात- तेही आजूबाजूंच्या रस्त्यांवर आणि इमारतींवर दडून बसले होते. इकडे मीडियावाल्यांनी मिळतील तिथे जागा पकडून त्या घटनेचं चलत् चित्रण करायला सुरुवात केली होती. काही मीडियावाले तर कॅमेरा घेऊन आजूबाजूच्या झाडांवर चढले होते. बघ्यांची गर्दीही वाढत होती.
एक चमत्कारिक घटना
तेवढ्यात एक चमत्कारिक घटना घडली. काचेचं दार ढकलून बँकेचा सुरक्षा रक्षक बाहेर पडलेला पोलिसांना दिसला. त्याच्या उजव्या हातात पिस्तुल होतं. हातात संरक्षक ढाल धरलेले दोन पोलीस पुढे जाऊन त्याला घेऊन आले. अधिकाऱ्यांनी लगेचच त्याला ताब्यात घेऊन प्रश्न विचारायला सुरुवात केली. तेव्हा तो म्हणाला, “ते कितीजण आहेत मला नेमकं समजलं नाही. तीनचार जण तर नक्कीच होते. त्यांच्या अंगात सूटबूट आहेत आणि तोंडावर बुरखे आहेत. एकाच्या हातात मोठी गन आहे. लोकांना त्यांनी फरशीवर झोपवलं आहे. ओलीसांची संख्या वीस-पंचवीस असावी. माझ्यावर पिस्तुल रोखून त्यांनी माझं रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतलं. त्यातल्या गोळ्या काढून माझ्याच खिशात टाकल्या आणि रिव्हॉल्व्हर पुन्हा माझ्या हातात दिलं. माझ्याशी ते अगदी सौजन्याने वागले. करडा सूट घातलेल्या एकाने मला दंडाला धरून काचेच्या दारापर्यंत आणलं आणि बाहेर जायला सांगितलं. त्यापूर्वी मला तो ‘सॉरी’ म्हणाला. या पहा रिव्हॉल्व्हरमधून त्यांनी काढलेल्या गोळ्या !” खिशातून गोळ्या बाहेर काढत सुरक्षा रक्षक म्हणाला. त्याने दिलेल्या माहितीमुळे पोलीस अगदी थक्क झाले. कारण यापूर्वी असं कधी घडल्याचं त्यांना आठवत नव्हतं.
दरोडेखोरांशी संपर्क
बँक मॅनेजरसुद्धा आतच असल्याचं पोलिसांना समजलं तेव्हा त्याच्या मोबाईलवर त्यांनी फोन लावला. काही मिनिटांतच दरोडेखोरांशी संपर्क प्रस्थापित झाला. बोलणाऱ्या दरोडेखोराने स्वतःचं नांव ‘वॉल्टर’ असं सांगितलं. पोलिसांचा बोलणी-अधिकारी (Negotiator) मिग्युएल सिएलो याने त्याला विचारलं, “वॉल्टर, तुम्हाला काय हवंय?”
“सांगतो. पण आधी एक करा. वर मला हेलिकॉप्टर फिरताना दिसतंय !” वॉल्टर म्हणाला, “ताबडतोब ते हलवा. आणि गच्चीवर जे कमांडो उतरलेत त्यांनाही खाली बोलवा. नाहीतर आम्ही ओलीसांना ठार मारायला सुरुवात करू.”
“ओके ओके. मी त्यांना हटवतो. तुम्ही कुणाला मारूबिरू नका.” सिएलो म्हणाला आणि त्याने दोन्ही हाताचे अंगठे खाली करून गच्चीवरील कमांडोज आणि आकाशातील हेलिकॉप्टर यांना खूण केली. त्याबरोबर हेलिकॉप्टर तिथून दूर निघून गेलं आणि गच्चीवरून उड्या मारून कमांडोज खाली आले.
“वॉल्टर, तुमच्या इच्छेप्रमाणे झालं आहे. तुम्हाला काय हवंय ते सांगा.”
“आम्हाला सेफ पॅसेज हवाय.”
“ते कठीण आहे. तुम्हाला आम्ही वेढा घातलाय. तुमचं लाईव्ह चित्रण होत आहे. तुम्ही शरण या म्हणजे थोडक्यात सुटू शकाल. कमीतकमी शिक्षा व्हावी म्हणून मी स्वतः तुमची शिफारस करीन.”
“मी तो निर्णय घेऊ शकत नाही. थोडा वेळ द्या. बाकीच्यांशी बोलून सांगतो.” वॉल्टर म्हणाला.
“ठीक आहे.” असं म्हणून सिएलोने फोन ठेवला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मितहास्य होतं.
आणखी एकाची सुटका
थोडा वेळ गेला आणि काचेचं दार ढकललं गेलं. एक अतिशय घाबरलेला तरुण मुलगा बाहेर डोकावला. त्याची पॅन्ट ओली झाली होती. “हा नर्व्हस झालाय, याला जपून न्या !” मागून करडा सूटवाला दरोडेखोर पोलिसांना उद्देशून ओरडला. दार पुन्हा बंद झालं. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन शांत केलं आणि काय घडलं ते विचारलं.
“मी भयंकर घाबरलो होतो-” तरुण सांगू लागला, “मला लघवीला होत होती. तेव्हा त्यांनी मला टॉयलेटला जाऊ दिलं. पण पुन्हा व्हायला लागली. तेव्हा तो वॉल्टर का कोण आहे त्याने मला धीर दिला आणि ‘तू आता बाहेर जाऊनच कर’ म्हणाला. भीतीने माझे पाय थरथरत होते. पण त्याने मला मदत केली. आधार देत त्याने मला दारापर्यंत आणलं.”
“त्यांनी कुणाला मारहाण वगैरे केली का?”
“छे छे, अजिबातच नाही. ते आमच्याशी अगदी समजुतीने बोलत होते.”
हे सगळं ऐकून अधिकाऱ्यांचा आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता.
“काहीतरी गौडबंगाल आहे ! मला हे फार विचित्र वाटतंय” एक अधिकारी म्हणाला.
तोपर्यंत तिथे सरकारी वकील पोहोचला होता. बोलणी-अधिकारी सिएलोने पुन्हा फोन लावला.
“वॉल्टर, काय ठरलं?”
“समजा आम्ही शरण आलो तर तुम्ही आम्हाला जिवंत ठेवाल याची काय हमी?” वॉल्टरने विचारलं.
“छे छे, ते तू मनातही आणू नकोस. या घटनेचं लाईव्ह चित्रण टीव्हीवर दाखवलं जातंय. तुम्ही निःशस्त्र होऊन बाहेर या, आम्ही तुमच्या केसालाही धक्का लावणार नाही. इथे सरकारी वकील आले आहेत तेही याची हमी देतील. बोल त्यांच्याशी.”
“हॅलो, वॉल्टर, तुम्ही काळजी करू नका.” सरकारी वकील बोलू लागला, “तुमच्या सुरक्षेची जबाबदारी मी घेतो. फक्त आत कुणाला इजा करू नका. आम्ही बचाव पक्षाच्या एका वकिलांनाही बोलावलंय. ते तुमची बाजू कोर्टात मांडतील.”
“विचार करून सांगतो.” एवढं बोलून वॉल्टरने फोन बंद केला.
वाटाघाटी याप्रमाणे चालू राहिल्या. दरम्यान बचाव पक्षाचा एक वकीलही तिथे पोहोचला होता. मात्र वॉल्टरने त्याच्याशी बोलायला नकार दिला. ‘ब्युनोस आयर्समधील सुप्रसिद्ध वकील अमुक अमुक यांना बोलवा. ते आले की आम्ही त्यांच्याशी बोलतो आणि मग शरण येतो’ असं त्याने सांगितलं आणि त्या वकिलाचा नंबर सिएलोला दिला. त्याप्रमाणे पोलिसांनी त्या वकिलाला फोन लावायला प्रयत्न केला. फोन बराच वेळ एंगेज येत होता, पण शेवटी एकदाचा लागला. मग पोलिसांनी त्याला अकॅसुसो शहरात रिओ बँकेपाशी येण्याची विनंती केली. ‘ओके, मी ताबडतोब निघतो, पण मला तासभर तरी लागेल’ असं वकिलाने सांगितलं आणि फोन ठेवला.
नाचगाण्याचा आवाज
बाहेर पोलिसांची आणि मीडियावाल्यांची गडबड चालू असताना मध्येच आतून गाण्याचा आणि टाळ्यांनी दिलेल्या ठेक्याचा आवाज ऐकू आला. पोलिसांनी एकमेकांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं. तेवढ्यात काचेचं दार उघडलं आणि एका म्हाताऱ्या बाईला धरून उभा असलेला करड्या सुटातील तो दरोडेखोर पुन्हा एकदा दिसला. यावेळी त्याने तोंडावरचा मुखवटा वर केला होता. त्यामुळे चष्मा आणि जाड मिश्या असलेला त्याचा चेहरा सर्वांना दिसला. ‘या आजींना घेऊन जा !’ तो ओरडला आणि दार पुन्हा बंद झालं. ढालधारी पोलीस पुढे जाऊन तिला घेऊन आले. पोलिसांनी तिची चौकशी केली तेव्हा ती म्हणाली, “दरोडेखोरांनी सगळ्यांकडचे मोबाईल घेऊन ते एका बाकड्यावर रांगेने लावून ठेवले होते. माझा फोन पुन्हा पुन्हा वाजत होता म्हणून त्या करड्या सुटातल्या माणसाने- वॉल्टरने- तो फोन दाखवून ‘हा कुणाचा?’ म्हणून विचारलं. मी म्हटलं ‘माझा’. तेव्हा तो म्हणाला, ‘सारखा कुणाचा फोन येतोय तुम्हाला?’ तेव्हा ‘माझा आज वाढदिवस असल्यामुळे नातेवाईक फोन करत असतील’ असं मी म्हणाले. मग आधार देऊन त्याने मला उभं केलं आणि म्हणाला ‘घाबरू नका आजीबाई, आपण तुमचा वाढदिवस साजरा करूया.’ मग त्याने मेणबत्ती मिळाली नाही म्हणून एक कँडी पेटवली आणि तो नि त्याचे साथीदार माझ्याभोवती फेर धरून नाचत ‘हॅपी बर्थ डे’ गायला लागले. त्याने सांगितल्यामुळे पडल्या पडल्या जमिनीवर हाताचा ठेका धरून सर्व ओलीसही त्याला साथ करत होते. मी फुंकर घालून कँडी विझवल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या. मग तो म्हणाला, ‘वाढदिवसाची तुम्हाला भेट देतो आजीबाई. जा, तुमच्या नातवंडांमध्ये जाऊन वाढदिवस साजरा करा !’ आणि मग हाताला धरून त्याने मला बाहेर आणून सोडलं. मोठा प्रेमळ माणूस !”
त्या म्हाताऱ्या बाईचं हे वर्णन ऐकून पोलिसांच्या डोक्याला मुंग्या आल्या. ‘हे चाललंय काय?’ असं ते एकमेकांना विचारू लागले. टीव्हीवर त्या बाईचं बोलणं ऐकणाऱ्या जनतेनेही घरातल्या घरात हसून टाळ्या वाजवल्या. करड्या सुटातला वॉल्टर, त्याचा चष्मा आणि जाड मिश्या लोकांच्या मनावर ठसल्या. मग अजून काय काय गंमत बघायला मिळतेय या उत्सुकतेपोटी लोक जेवणखाण विसरून टीव्हीकडे पहात राहिले.
पिझ्झाची मागणी
एव्हाना दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश करून दोन तास होऊन गेले होते. ब्युनोस आयर्समधून निघालेला वकील तासभर होऊन गेला तरी अजून तिथे पोहोचला नव्हता. तेव्हा तो बनावट नंबर असावा अशी पोलिसांना शंका आली. पण वॉल्टरने ती शंका फेटाळून लावली. “ते आल्याशिवाय आम्ही बाहेर येणार नाही.” तो म्हणाला, “अजून अर्धा तास वाट बघू. तोपर्यंत ते आले नाहीत, तर मघाशी येऊन गेला त्या वकिलाला बोलावून ठेवा.”
त्यानंतर पाऊण तास झाला तरी ब्युनोस आयर्सचा वकील आला नाही. दुपारचे ३.३० वाजले होते. पुन्हा एकदा पोलिसांनी फोन लावला. “तुमचे ते वकील काही आले नाहीत. पण बचाव पक्षाचे दुसरे वकील इथे आलेले आहेत. आता शरण या.” सिएलो म्हणाला.
यावर वॉल्टरने पोलिसांना एक विनंती केली. “आम्हा सगळ्यांना भूक लागलीय.” तो म्हणाला, “तुम्ही सर्वांसाठी पिझ्झा आणि सोडा वॉटरच्या बाटल्या मागवू शकाल काय? तीस-पस्तीस तरी लागतील. बिचाऱ्या ओलीसांनाही भूक लागली असेल. आम्ही खाऊन घेतलं की मग तुम्ही सांगाल त्याप्राणे शरण येतो.”
पोलीस भयंकर चडफडले पण त्यांना ‘होय’ म्हणणं भागच होतं. त्यांनी लगेच पिझ्झा आणि सोडावॉटर आणायला व्हॅन पिटाळली.
दरोडेखोर गायब !
पिझ्झा येण्यात अर्धा तास गेला. सिएलो वॉल्टरला फोन लावू लागला पण फोन लागेना. आईमाईवरून शिव्या घालत पोलीस फोन लावत होते पण उपयोग झाला नाही. शेवटी अधिकाऱ्यांनी काही वेळ आपसात चर्चा केली. मग हातात पिझ्झाचे खोके घेऊन दोन पोलीस काचेच्या दारापाशी आले. त्यांच्या मागोमाग रिव्हॉल्व्हर घेऊन अन्य पोलीस आणि कमांडोज दबक्या पावलांनी येत होते. दार ढकलून बघतात, तर समोर कुणीच नाही. मात्र फरशीवर झोपून राहिलेले ओलीस त्यांना दिसले. पोलीस आत आल्याबरोबर काही ओलीस उठून बसले, काही उभे राहिले तर काही अजून झोपूनच राहिले होते. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांना झोपूनच राहायला सांगितलं.
काही पोलीस जिन्याने वर गेले. वरचा हॉलही रिकामा होता. त्यांनी आढ्याकडे नजर टाकली. तिथे काही तोडफोड दिसली नाही. खिडक्यांमधून दरोडेखोर बाहेर पडूच शकत नव्हते कारण खाली पोलिसांचा वेढा होता. पोलिसांची अक्षरशः मती गुंग झाली. साले गेले कुठे? मग लक्षात आलं, की बँकेला तळघर आहे. पोलीस दोन जिने उतरून तळघराकडे धावले. दार आतून बंद होतं ते फोडण्यात आलं. आतलं दृश्य बघून पोलिसांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. सेफ डिपोझिट व्हॉल्ट्स उचकटून काढून बाजूला त्यांचा ढीग रचलेला दिसला. त्यातच एक बॅटरी पॅक आणि गिरमिटासारखं कुलूप फोडणारं हत्यारही पडलं होतं. एकूण ४०० व्हॉल्ट्स होते, त्यापैकी १४७ दरोडेखोरांनी रिकामे केले होते. एवढं करूनही दरोडेखोर गायबच होते. सर्व भिंती शाबूत होत्या. मात्र भिंतीपाशी एक शुभ्र वस्त्र अंथरलेलं दिसलं. त्यावर दरोडेखोर आपली सर्व शस्त्रे ओळीने मांडून ठेवून गेले होते. शस्त्रं पाहून पोलिसांना हसावं की रडावं कळेना. कारण बंदूक आणि पिस्तुलं सर्व खेळण्यातली आणि खोटी होती. वरच्या बाजूला भिंतीवर एक कागद चिकटवला होता. त्या कागदावर दरोडेखोरांनी पोलिसांना उद्देशून काही मजकूर टाईप करून ठेवला होता. हा मजकूर असा,
“In a neighbourhood of rich people,
without weapons or grudges,
Its just money, not love.”
(भावार्थ : “जवळच श्रीमंत लोकांच्या वस्तीत,
शस्त्रं किंवा राग-द्वेष न बाळगता आम्ही असू.
विषय फक्त पैशाचा आहे, प्रेमाचा वगैरे नाही.”)
तो मजकूर पाहून पुन्हा एकदा पोलिसांनी दरोडेखोरांना आईमाईवरून शिव्या घातल्या.
भुयार आणि बोगदा
ज्याअर्थी दरोडेखोर गायब झाले, त्याअर्थी तळघराच्या खालून एखादा बोगदा असावा असा इंटीलिजन्स अधिकाऱ्यांनी कयास केला. व्हॉल्ट्स असलेली पोलादी कपाटं सरकवायला त्यांनी पोलिसांना सांगितलं. जाण्यापूर्वी तीनही मजल्यांवर दरोडेखोरांनी क्लोरीनचा फवारा मारला होता आणि मानवी केसांच्या बटा उधळल्या होत्या. त्यामुळे उद्या ते पकडले गेले तरी डीएनए तपासातून काही निष्पन्न होण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे मुद्देमालासकट त्यांना पकडणं भाग होतं. बोगद्यातून दरोडेखोर कुठेतरी जमिनीवर येतीलच हे ओळखून अधिकाऱ्यांनी वेळ न गमावता पोलिसांच्या गाड्या सर्व बाजूंच्या रस्त्यांवर रवाना केल्या. ‘जी जी संशयास्पद माणसं किंवा वाहनं दिसतील त्यांना थांबवा आणि इकडे घेऊन या !’ असा आदेश शहरात जारी केला गेला.
एव्हाना पोलादी कपाटं सरकवण्यात आली होती. भिंतीला एके ठिकाणी माणूस आरपार जाईल एवढ्या आकाराचं भोक पोलिसांना दिसलं. पोलिसांनी आत जाऊन पाहिलं तर घसरगुंडीसारखं एक तिरपं भुयार केलेलं त्यांना दिसलं. भुयाराची लांबी साधारणपणे १५ मीटर एवढी होती. त्या भुयार-वजा-घसरगुंडीचा वापर करून पोलीस खाली आले तेव्हा एका भल्यामोठ्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या बोगद्याला ते भुयार जोडलेलं दिसलं. त्या बोगद्यात महापालिकेचे अंधुक दिवे होते आणि साधारण ढोपरभर सांडपाणी वहात होतं. त्या पाण्यातून चालत काही पोलीस दोन्ही दिशांना जात राहिले, पण त्यांना दरोडेखोर कुठेही दिसले नाहीत. त्याचवेळी वरच्या बाजूनेही पोलिसांची वाहने बोगद्याच्या दोन्ही टोकांकडे सुसाट वेगाने जात होती. थोड्याच वेळात वाहनं प्रवेशद्वारापाशी पोहोचली पण दरोडेखोर त्यांना आढळले नाहीत. काही पोलीस तिथे खाली उतरून उलटे चालत निघाले तेव्हा त्यांना दुसऱ्या बाजूने येणारे पोलीस भेटले. त्यांना पाहून दरोडेखोरांनी आपल्याला चकवल्याची त्यांची खात्री झाली. ड्रेनेजचं दुसरं टोक नदीपाशी होतं. तिथेही आतून आणि वरून पोलीस पोहोचले. पण तिथे चिटपाखरूही नव्हतं.
लोकांची भावना
इकडे एकेक ओलीस बँकेतून बाहेर येऊ लागले. प्रत्येकाची कसून तपासणी करून मगच त्यांना सोडण्यात येत होतं. ओलिसांनी मीडियाला सांगितलं, की दरोडेखोर त्यांच्याशी सौजन्याने वागत होते. त्यांनी कुणाला दुखापत केली नाही किंवा कुठलाही विध्वंस केला नाही. ते कुठे गायब झाले हे मात्र त्यांना समजलं नव्हतं. कारण जाण्यापूर्वी वॉल्टरने त्यांना डोळे मिटून जमिनीला तोंड लावून झोपायला सांगितलं होतं. पोलीस आत शिरेपर्यंत ते तशाच अवस्थेत पडून राहिले होते. टीव्हीवर लाखो लोकांनी हे वर्णन ऐकलं आणि त्यांच्या मनात दरोडेखोरांविषयी कौतुकाचीच भावना निर्माण झाली. त्यांना ते ‘रॉबिन हुड’प्रमाणे वाटू लागले. वॉल्टर तर त्यांचा आवडताच झाला होता. तसंही अर्जेंटीनातल्या अकार्यक्षम आणि भ्रष्ट बँकांविषयी लोकांचं मत चांगलं नव्हतंच. त्यामुळे बँकेची जिरली याचा उलट त्यांना आनंदच झाला. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये आकडे आले त्यावरून लोकांना समजलं, की दरोडेखोरांनी एकूण २३ लोकांना ओलीस धरलं होतं आणि १४७ व्हॉल्ट्स फोडून त्यांनी अंदाजे २० मिलियन (२ कोटी) डॉलर एवढा ऐवज लंपास केला होता. त्यात कॅश आणि सोनं, चांदी, जवाहीर याचा प्रामुख्याने समावेश होता. पुढे कित्येक दिवस लोटले, पण पोलिसांना दरोडेखोर सापडू शकले नाहीत. ते गेले ते गेलेच !
दरोड्याचा मास्टर माईंड
यशस्वी, कलात्मक आणि परिपूर्ण दरोडा घातल्यानंतर ५ आठवडे लोटले आणि एका किरकोळ चुकीमुळे पोलिसांना दरोडेखोरांचा सुगावा लागला. त्याविषयी सांगण्यापूर्वी दरोड्याचा बेत कुणी आणि कसा आखला हे थोडक्यात सांगतो.
फर्नांडो अराउजो (Fernando Araujo) हा एक मनस्वी कलावंत होता. शिवाय फावल्या वेळेत तो स्थानिक मुलांना मार्शल-आर्ट शिकवत असे. १९९९ साली वर उल्लेखिलेल्या रामेल्लो (Romello) शहरातील बँक दरोड्याच्या बातम्या वाचून तो वैतागला होता. “हे दरोडेखोर किती बिनडोक आहेत !’ त्याच्या मनात विचार घोळत होते, ‘कुठलाही विध्वंस न करता आणि कुणालाही दुखापत न करता कलात्मक दरोडा घालणं अगदी सहज शक्य असताना हे असा मूर्खपणा का करतात?’
पण हा विचार त्यावेळी तिथेच थांबला. पुढे २००३ साली अराउजोचा त्याच्या प्रेयसीशी ब्रेक-अप झाल्यावर काही काळ तो ‘मारिजुआना’ या ड्रगच्या आहारी गेला होता. त्यावेळी पुन्हा त्याच्या मनात कलात्मक दरोड्याचा विचार घोळू लागला आणि त्या दिशेने तयारी करायला त्याने सुरुवात केली. ‘निन्जा टर्टल’ या व्हिडीओ मालिकेमधूनही त्याला प्रेरणा मिळाली होती.
दरोड्याची पूर्वतयारी
एकदा विचार ठरल्यावर अराउजोने शहरातल्या रिओ बँकेवर दरोडा घालण्याचा बेत नक्की केला आणि बँकेपासून अगदी जवळच त्याने एक घर भाड्याने घेतलं. त्यानंतर जेव्हा त्याने बँकेच्या इमारतीचं निरीक्षण केलं तेव्हा बँकेच्या अगदी जवळूनच पण रस्त्याखालून सांडपाणी वाहून नेणारा नगरपालिकेचा प्रशस्त बोगदा नदीच्या दिशेने जात असल्याचं त्याच्या लक्षात आलं. ‘आपण आर्किटेक्चरचे विद्यार्थी आहोत’ असं सांगून महापालिकेच्या संबंधित खात्याकडून बोगद्याची यंत्रणा कशी चालते हे त्याने समजून घेतलं. एव्हाना रिओ बँकेच्या दुसऱ्या शहरातील एका शाखेत खातं उघडून एक सेफ डिपॉझिट व्हॉल्टही त्याने मिळवला होता. बँकेतले कॅमेरे चुकवून या सगळ्याचे फोटो काढून त्याने कच्ची योजना तयार केली. त्यानंतर त्याने काही माणसं विश्वासात घेतली, ती अशी,
१. सॅबेस्टियन बोल्स्टर – अराउजोचा वर्गमित्र, पेशाने इंजिनियर, कुटुंबवत्सल, कायद्याचं पालन करणारा.
२. ‘डॉक’ (टोपणनांव) – एक जुना, निवृत्त बँक दरोडेखोर.
३. अल्बर्टो डी ला तोरे ‘बेटो’ – ‘डॉक’ चा सहकारी.
४. लुई मारिओ सेलेनेस – शैलीदार निवृत्त चोर आणि पैसा पुरवठादार. ‘स्पायडर मॅन’ नांवाने प्रसिद्ध.
५. लुई उर्फ ‘द किड’ – एक तरुण गुंड.
६. ज्युलियन झालोशेवेरा – कुशल ड्रायव्हर आणि मदतनीस.
वरीलपैकी केवळ ‘डॉक’शीच अराउजोची साधारण ओळख होती. बोल्स्टर वगळता बाकीची सर्व मंडळी ‘डॉक’ने आणली. या सर्वांना अराउजोने समजावून सांगितलं, की “आपल्याला कोणताही विध्वंस न करता, हत्या न करता एक कलात्मक दरोडा घालायचा आहे. एरवी दरोडेखोर मध्यरात्री बँकेचं दार वगैरे फोडून (Break-in) आत जातात, आपण दिवसाढवळ्या आत जायचं आहे. पोलिसांच्या साक्षीने दरोडा घालायचा आहे आणि आतून बाहेर (Break-Out) निसटायचं आहे. जो ऐवज मिळेल तो सर्वांनी सारखा वाटून घेऊ. तुम्ही सूचना करू शकता, मात्र अंतिम निर्णय माझा असेल आणि सर्वांनी तो मान्य केला पाहिजे.”
प्रत्येकाने ही गोष्ट कबूल केली.
परिपूर्ण योजना
सर्वात आधी अराउजोने बोल्स्टरला विश्वासात घेतलं आणि बोगद्यामध्ये नेऊन आणलं. बँकेच्या अगदी समोरच रस्त्यावर ड्रेनेजचं एक बंदिस्त मॅनहोल होतं तेही त्याला दाखवलं. मग त्याने विचारलं,
“आपण इथपर्यंत खालच्या बोगद्यातून येऊ आणि साधारण इथून एक तिरपं भुयार वर खणू. त्या भुयाराचं वरचं टोक थेट व्हॉल्ट्सच्या खोलीत उघडेल. हे शक्य आहे का?”
उत्तर देण्याआधी बोल्स्टरने अनेकदा बोगद्यात जाऊन निरीक्षण केलं. मग तो म्हणाला,
“मॅनहोलपासून बँकेच्या त्या खोलीपर्यंतचं अंतर आणि इथून खाली बोगद्याच्या तळापर्यंतचं अंतर या दोन बाजूंची मापं जर मला मिळाली तर त्या मापांचा ‘त्रिकोण’ काढता येईल आणि त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूचं माप मी सहज काढू शकेन.”
या संभाषणानंतर एकदा उशिरा रात्री बँकेपाशी जाऊन अराउजोने एक टेप त्या मॅनहोलच्या भोकातून खाली सोडली. खाली बोल्स्टर उभा होता त्याने मापं घेऊन नोंदी करून घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या एका दिवशी अराउजोने आपल्या बाईकच्या चाकाचा परीघ नीट मोजून टायरवर खूण करून ठेवली आणि बाईक त्या भोकापासून बँकेच्या भिंतीपर्यंत हातात धरून नेली. तिथे पोहोचेपर्यंत टायरवरील खूण किती वेळा फिरली याची आकडेमोड करून तो आकडा त्याने बोल्स्टरला दिला. बँकेच्या भिंतीपासून व्हॉल्ट्सच्या खोलीपर्यंतची मापे त्यांच्याकडे होतीच. त्यामुळे त्या सर्व मापांचा वापर करून भूमितीनिपुण बोल्स्टरने १५ मीटर लांबीचं भुयार खणावं लागेल असा निष्कर्ष काढला. हा निष्कर्ष किती अचूक ठरला हे पुढे सिद्ध झालंच. भुयार खणण्याचं कामही मुख्यतः बोल्स्टर आणि अराउजो यांनी उरकलं. फक्त सेफची भिंत फोडायची तेवढी त्यांनी बाकी ठेवली.
दरोड्यासाठी अराउजोने स्वतःची गाडी वगैरे विकून थोडे पैसे उभे केले होते. लुई सेलेनेसने त्याला एक लाख डॉलर उसने दिल्यावर बरेच प्रश्न सुटले. अराउजोने प्रथम बँकेतल्या व्हॉल्ट्सच्या ब्रॅन्डचे काही व्हॉल्ट्स खरेदी केले आणि त्यावर त्याचे आणि बोल्स्टरचे प्रयोग सुरु झाले. अखेर केवळ सात सेकंदामध्ये प्रत्येक व्हॉल्टचं कुलूप उचकटण्यात बोल्स्टर यशस्वी झाला तेव्हा अराउजोने त्याला मिठीच मारली ! या पूर्वतयारीमुळेच प्रत्यक्ष दरोड्याच्या दिवशी काही अडचणी येऊनसुद्धा बोल्स्टर १४७ व्हॉल्ट्स उचकटण्यात यशस्वी झाला होता. याचबरोबर अराउजोने एक जुनी व्हॅन खरेदी करून त्याचा तळ कधीही काढता व बसवता येईल अशी व्यवस्था करून घेतली होती. दरोडा घातल्यावर ऐवज लुटलेल्या पिशव्या बोगद्यातल्या पाण्यातून वाहून नेण्यासाठी एक हलक्या वजनाची झोडियॅक बोटही बोल्स्टरच्या वर्कशॉपमध्ये तयार करण्यात आली. त्याचप्रमाणे घडीची एक शिडी-कम-जिनाही तयार करण्यात आला.
दरोड्याच्या दिवशी
हवामान खात्याची मदत घेऊन पाऊस नसलेला दिवस दरोड्यासाठी नक्की करण्यात आला. नियोजित दिवशी सकाळी सर्वांनी आपली घड्याळे नीट लावून घेतली होती. निघाल्यानंतर दोन मोटारी चोरून त्या मोटारींनींच (बोल्स्टर आणि ज्युलियन वगळता) सर्वजण बँकेत गेले. आपली चेहरेपट्टी आणि वेशभूषा बदलण्याची त्यांनी काळजी घेतली होती. बँकेच्या पार्किंगमध्ये त्यांनी गाड्या उभ्या केल्या आणि मग ते बँकेत शिरले. बरोबरच्या बॅगांमधून त्यांनी खेळण्यातली शस्त्रं, ऐवज भरण्यासाठी पॉलिथिनच्या रिकाम्या पिशव्या, मास्क, बॅटरी पॅक आणि जॅकहॅमर, क्लोरीन, केसांचे जुडगे अशा आवश्यक त्या सर्व गोष्टी घेतल्या होत्या. बोल्स्टर आधीच बोगद्यात गेला होता. त्याने झोडियॅक बोट लपवून ठेवली आणि भुयारात चढून तो बँकेच्या भिंतीपाशी येऊन उभा राहिला होता. ज्याक्षणी ‘डॉक’ आणि अराउजोने सेफच्या दालनात प्रवेश करून इशारा केला, त्याक्षणी बोल्स्टरने भिंत फोडली आणि तो आत आला. त्याविषयी बोल्स्टर म्हणतो, “किल्लीच्या भोकात गिरमिटाचं टोक घुसवून व्हॉल्टचं लॉक फोडायचं आणि पुढल्या व्हॉल्टकडे वळायचं एवढंच काम मी पुढला दीडएक तास करत राहिलो होतो. बाकीचे दोघे काय करताहेत इकडे माझं लक्ष नव्हतं.”
खालच्या मजल्यावर सेलेनेस, बेटो आणि द किड हे ओलीसांवर शस्त्रं रोखून उभे होते. त्यापैकी सेलेनेस म्हणजे ‘करडा सूटवाला’ म्हणून प्रसिद्ध झालेला ‘वॉल्टर’. आजीबाईंना बाहेर सोडताना त्याने मुद्दामच आपला चेहरा सर्वांना दाखवला होता. अर्थातच त्याचा चष्मा आणि मिशी खोटी होती हे सांगायला नकोच. पोलिसांचा बोलणी-अधिकारी सीएलो याच्याशी तोच वाटाघाटी करत होता. त्याचा उद्देश अराउजोने निघण्याचा इशारा करेपर्यंत वेळ काढत बसणं एवढाच होता. ‘ब्युनोस आयर्समधला वकील’ म्हणून सिएलोला त्याने आपल्याजवळचा एक बोगस नंबर दिला होता आणि सिएलोचा फोन आल्यावर वकील म्हणून तो स्वतःच आवाज बदलून बोलला होता. थोडक्यात, वाटाघाटी हा केवळ देखावा होता.
मॅनहोलमधून थेट व्हॅनमध्ये

अराउजोने इशारा केल्यावर पोलीसांना पिझ्झाची विनंती करून आणि ओलिसांना तोंड जमिनीवर टेकवायला सांगून सर्व निघाले. काढलेला ऐवज त्यापूर्वीच पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरून भिंतीच्या पलीकडे भुयारात सोडण्यात आला होता. पिशव्या घसरगुंडीतून सरळ झोडियॅक बोटीत येऊन पडत होत्या आणि दोन जण त्या रचून ठेवत होते. सर्वजण भिंतीपलीकडे आल्यानंतर भोकातून हात घालून पोलादी कपाट सरकवण्यात आलं. भोक आता बाहेरून दिसणार नव्हतं. सगळे भराभर खाली आले आणि बोटीतून वेगाने काही अंतरावर गेले. तिथे वरच्या बाजूस दोन पुरुष उंचीवर ड्रेनेजच्या मॅनहोलचं झाकण उघडून त्यातून घडीचा जिना खाली सोडला गेला होता. हे मॅनहोल बँकेपासून दहा ब्लॉक (साधारण दोन ते अडीच हजार फूट) अंतरावर थोडं आडबाजूला होतं. अराउजोची व्हॅन हे मॅनहोल मधोमध घेऊन उभी केलेली होती. टायर पंक्चर झाल्याचा देखावा करून ज्युलियन तिथे वाट बघत बसून राहिला होता. व्हॅनचा तळ बाजूला करून आणि मॅनहोलचं झाकण काढून घडीचा जिना त्यानेच खाली सोडला होता. (याचा पूर्वीच त्याच्याकडून सराव करून घेण्यात आला होता.) त्या जिन्याने पिशव्या वरच्या भोकातून थेट व्हॅनमध्ये पोचवण्यात आल्या. मागोमाग माणसंही पोहोचली. त्यापूर्वी झोडियॅक पाण्यात लोटून देण्यात आली होती. ती नदीच्या दिशेने वहात गेली. जिना वर ओढून घेऊन झाकण पुन्हा लावण्यात आलं, व्हॅनचा तळ बसवण्यात आला आणि गाडी निघाली. पाचच मिनिटांत ते मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले. जेव्हा पोलीस बँकेत घुसले, तेव्हा अराउजो आणि त्याचे साथीदार भोजन करत टीव्हीवर बँकेचा देखावा बघत हसत-खिदळत बसले होते. ती रात्र त्यांनी तिथेच काढली. मिळालेल्या ऐवजाचं सर्वांना समान वाटप करण्यात आलं. त्यानंतरच्या एकदोन दिवसात आपापला ऐवज घेऊन प्रत्येकजण तिथून निघून गेला. व्हॅनचीही विल्हेवाट लावण्यात आली.
दरोड्याचा उलगडा
अराउजोने प्रत्येकाला जपून राहण्याविषयी बजावलं होतं. पण अखेर डी ला तोरे ‘बेटो’ याची चूक झालीच. त्याने एक आलिशान गाडी विकत घेऊन मैत्रिणींना फिरवायला आणि त्यांच्याशी लफडी करायला सुरुवात केली. त्यामुळे संतापलेल्या त्याच्या बायकोने- अलिशियाने- सरळ पोलीस चौकीत जाऊन दरोड्याची खबर दिली. पोलिसांनी झटपट हालचाली करून पाच जणांना ताब्यात घेतलं. मात्र ‘डॉक’ आणि लुई उर्फ ‘द किड’ हे दोघे शेवटपर्यंत मिळाले नाहीत. यापैकी अराउजो आणि ज्युलियन यांचा हा पहिलाच गुन्हा होता. खटला चालवण्यात आला आणि सर्वांना १० वर्षांपासून १५ वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षा झाल्या. मात्र प्रत्येकाने जेमतेम वर्ष-दीड वर्ष कैद भोगली आणि मग त्यांची सुटका करण्यात आली. ऐवजातला फारच थोडा भाग वसूल करण्यात पोलीस यशस्वी झाले. बाकीचा ऐवज दरोडेखोरांनी कुठे जिरवला याचा आजपर्यंत पत्ता लागलेला नाही. विचारलं तर ‘बेटो’ म्हणतो, “पोलिसांनी पकडलं तेव्हा मला एवढा मानसिक धक्का बसला, की पैसे कुठे ठेवले तेच आठवत नाहीत!” हाच प्रश्न विचारल्यावर अराउजो एखाद्या काल्पनिक बेटाचं आणि त्यावरील काल्पनिक बँकेचं नांव सांगतो. “तिथल्या सेफ डिपॉझिट व्हॉल्ट्समध्ये माझा ऐवज आहे !” असं म्हणून डोळे मिचकावत तो हसतो.
सर्वांनाच फायदेशीर ठरलेला गुन्हा
शतकातील या सर्वात कलात्मक दरोड्यामधील प्रत्येकजण आज एक ख्यातनाम व्यक्ती बनला आहे. त्यांच्या मुलाखती घेऊन अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. सेलेनेस याचे ट्विटरवर ३०,००० फॉलोअर आहेत.
स्वतः फर्नांडो अराउजोने दोन पुस्तकं लिहिली असून त्यावर चित्रपट आणि शॉर्ट फिल्म्सही बनल्या आहेत. नेटफ्लिक्सच्या ‘रिअल क्राईम’ मालिकेत या दरोड्यावर चित्रपट निघाला असून त्यात अराउजो, सेलेनेस प्रभृतींनी कामं केली आहेत. या सर्व फिल्म्सचा सल्लागार म्हणूनही अराउजोने काम केलं आहे. शिकाऊ पोलिसांना अशा गुन्ह्यांमधील खाचाखोचा कळाव्यात म्हणून पोलीस खात्यातर्फे अराउजोची व्याख्यानेही ठेवली जात असतात.
स्वतः अराउजोच्या म्हणण्याप्रमाणे ‘दरोड्याच्या या गुन्ह्यातून सर्व संबंधितांना फायदाच झाला आहे. ज्यांचा ऐवज चोरीला गेला त्यांना त्याहीपेक्षा जास्त भरपाई मिळाली. इन्शुरन्समुळे बँकेला तोटा झाला नाही. उलट रिओ बँक आणि इन्शुरन्स कंपनी यांचा धंदा दरोड्याच्या प्रसिद्धीमुळे बराच वाढला. संबंधित पोलिसांची प्रमोशन झाली. बोलणी-अधिकारी सीएलो तर डिटेक्टिव्ह बनला. सर्व न्यायमूर्तींनाही चांगलीच प्रसिद्धी मिळाली. एखाद्या कलात्मक सादरीकरणाने आनंद मिळतो तसा या दरोड्यामुळे सर्वांनाच आनंद मिळाला आहे. यापेक्षा आणखी काय हवं ?’
एकूण प्रकरणाकडे नजर टाकल्यास प्रतिभाशाली अराउजो काहीही चुकीचं बोलला नसल्याची आपली खात्री होते.
निदान माझी तरी झाली.
– हर्षद सरपोतदार
संदर्भ स्रोत व फोटो साभार :
1. ‘The Heist of the Century’ (Argentine Movie, 2020).
2. Article by Alex Mitchell, New York Post, 10-08-2022.
3. Article by Josh Dean, www.gq.com, 20-02-2020.
4. Netflix Documentary : ‘Bank Robbers – The Last Great Heist’, 2022.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
स्वागत फुलांनी – White Buttercup
– अनघा फर्नांडिस
प्रेषक डॉ. प्रियंवदा कोल्हटकर,
priyakar40@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
विचारशलाका
(56)
Think like a farmer
Don’t shout at crops.
Don’t blame crops for not growing fast enough.
Don’t uproot crops before they have had a chance to grow.
Choose best plants for the soil.
Irrigate, fertilise, remove weeds.
You can’t control seasons, you can only prepare for them.
Sorce : Internet
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आणखी एक (अज्ञात ) केशवसुत
कै. म. के. दामले
– पृष्ठ ६४ –

– प्रेषक माधव मनोहर जोशी
madvac1979@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
श्रीमद्भगवत्गीता
१२ व्या अध्यायाचा भावानुवाद
माधव मनोहर जोशी
श्लोक ६ आणि ७*–
*ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः ।
अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ॥ १२-६ ॥*
*तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् ।
भवामि नचिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् ॥ १२-७ ॥*
*अर्थ* —
परंतु जे मत्परायण भक्तजन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून मज सगुणरूप परमेश्वराचीच
अनन्य भक्तियोगाने निरंतर चिंतन करीत उपासना करतात ॥ १२-६ ॥
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), त्या माझ्यात चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तत्काळ मृत्युरूप
संसारसागरातून उद्धार करणारा होतो. ॥ १२-७ ॥
*मराठी पद्य रूपी भावानुवाद* —
अर्पिती जे भक्त l त्यांची नित्य कर्मे l
मजसी जे प्रेमे l भक्तिभावे ll
करुनी चिंतन l सगुण रूपात l
मला भजतात l निरंतर ll
जाण तू हे पार्था l ज्यांनी गुंतविले l
चित्त ते आपुले l मज प्रती ll
जन्म मृत्यू फेरे l त्यांचे चुकविले l
त्यांना पार नेले l पैलतीरी ll
*श्लोक ८* –
*मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय ।
निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः ॥ १२-८ ॥*
*अर्थ* –
माझ्यातच मन ठेव. माझ्या ठिकाणीच बुद्धी स्थापन कर. म्हणजे मग तू माझ्यातच राहशील, यात मुळीच संशय नाही. ॥ १२-८ ॥
*मराठी पद्य रूपी भावानुवाद* —
ठेव रे तू पार्था l तुझे रे ते मन l
कर तू स्थापन l मजपाशी ll
बुद्धी तू माझ्यात । ठेव रे खुशाल ।
माझा राहशील । निश्चित तू ।।
*श्लोक ९* —
*अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् ।
अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय ॥ १२-९ ॥*
*अर्थ* —
जर तू माझ्यात मन निश्चल ठेवायला समर्थ नसशील, तर हे धनंजया (अर्थात अर्जुना), अभ्यासरूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर. ॥ १२-९ ॥
*मराठी पद्य रूपी भावानुवाद* —
जर तुज वाटे l तुला न जमते l
ठेवण्या मन ते l माझ्याठायी ll
तर मग ठेव l मम प्राप्ती ध्येय l
अरे धनंजय l योगाभ्यासे ll
*श्लोक १०* —
*अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव ।
मदर्थमपि कर्माणि कुर्वन्सिद्धिमवाप्स्यसि ॥ १२-१० ॥*
*अर्थ* —
जर तू वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील, तर केवळ माझ्याकरता कर्म करायला परायण हो. अशा रीतीने माझ्यासाठी कर्मे केल्यानेही माझ्या प्राप्तीची सिद्धी तू मिळवशील. ॥ १२-१० ॥
*मराठी पद्य रूपी भावानुवाद* —
जर तुज नसे l शक्य हा अभ्यास l
घे तू माझा ध्यास l कर्मासाठी ll
कर्म परायण l व्हावी तव बुद्धी l
मिळे तव सिद्धी l सहजच ll
– ©️ माधव मनोहर जोशी.
madvac1979@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आजची कविता
प्रज्ञा करंदीकर
आपला दिवस आनंदात जावो
तुझेच तुझ्याशी आतल्या आत
किती चाललय युद्ध
बघ!!शांतपणे माझ्याकडे पहात
मंद हासत म्हणाला बुद्ध
केवढा तो चिखल केलास
बघ रुतत चाललीस आत
हात दाखवून अवलक्षण
करुन का घेतेस आपला घात
भोगतेस मग एकटीच
देतेय का कुणी साथ
गुंतत नाही कुणी कुणात
प्रत्येकाची वेगळी वाट
ठेव नित्य स्मित ओठी बघ
जमताय का माझ्यासारखं
कशासाठी दुःख मिरवायच
चारचौघात वेड्यासारखं
ढवळून टाक मन गढूळलेले
होऊ देत निचरा त्याचा
येऊ देत वर निवळशंख
एक निळा आलाप अंतरीचा
केवढे वाहतेस ओझे भार कर
हलका झाळून मन शुद्ध
त्यागलीस वल्कले क्रोधाची की
गवसेल तुला तुझ्यातला बुद्ध
नको करुस काळजी
अधिक उणे होत राहणार
स्विकारवे जसेच्या तसे
क्षण क्षण सुखी होणार
एक पणती लाव स्नेहाची
ज्योतीने ज्योत पेटू देत
तुझ्या कृतीतून जगाला
पुनःश्च एकदा बुद्ध भेटू देत
– ©️ प्रज्ञा करंदीकर
pradnyakarandikar85@gmail.com
वांग्याचे भरीत
[ रेसिपी ]

– ©️ प्रज्ञा करंदीकर
pradnyakarandikar85@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
असाही एक सूर्योदय
अवधूत परळकर
आज सकाळी सूर्य बहुधा पश्चिमेला उगवला असावा,
नाही तर तो वेड्यासारखा समुद्राच्या किनारी घुटमळतांना का दिसतो आहे ? आणि लेकाचा समुद्रात बुडण्याऐवजी वर वर सरकताना का दिसतोय ?
गिरगाव चौपाटीवरून फिरताना माझ्या मनात आलेला प्रश्न इतर कुणाच्याही मनात आला नसेल असं नाही. पण का कोण जाणे कोणी बोलत नाही. सारे निमूट चालताहेत.
रस्त्यात एक पारशी बाई कुत्रा घेऊन चालली होती. कुत्रा मध्येच थांबला. बाई देखील थांबली. कृत्याने विष्ठा विसर्जन केलं. आणि पुढे चालू लागला. तसं दोरी खेचून त्या पारशी बाईने त्याला थांबवलं. बाईने आपल्या पर्समधून दोन पुठ्ठे काढले. कुत्र्याची विष्ठा गोळा करून तिने व्यवस्थित प्लॅस्टिकच्या पिशवीत जमा केली आणि कुत्र्याला हिसका देऊन ती पुढे निघाली.
मी थक्क !
किती विलक्षण दृश्य.
या शहरात असा प्रकार मी कधीच पाहिला नव्हता..
मूढासारखा मी काही काळ जागीच उभा राहिलो.
आसपास पाहिलं, लोक काहीच घडलं नाही, अशा थाटात शांतपणे चालत होते. विशेष म्हणजे सारेच्या सारे फुटपाथवरून चालत होते. एकही जण फुटपाथ सोडून रस्त्याच्या कडेने चालत नव्हता.
मुंबईसारख्या शहरात ही शिस्त आली कधी आणि कुठून काही अंतर गेल्यावर रस्त्यात एकदम जोरदार आवाज झाला. वळून पाहिलं. एका मोटारीने दुसऱ्या मोटारीला धडक दिली होती.
पुढच्या मोटारीची मागची बाजू भाग या धडकेने चेपली होती. दोन्ही ड्रायव्हर गाडीचे दार उघडून खाली उतरले. आता दोघात बाचाबाची होणार असं वाटलं. पण मागच्या गाडीचा ड्रायव्हर जपानी लोक झुकतात तसा दुसऱ्या ड्रायव्हरच्या समोर झुकला; सॉरी म्हणाला. पुढच्या गाडीचा ड्रायव्हरने “नेव्हर माईंड” बोलत त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
“मी चालू ट्रॅफिक मध्ये.अचानक ब्रेक लावायला नको होता,” तो मागच्या माणसाच्या पाठीवर थोपटत म्हणाला.” “माझच चुकलं. मला अचानक ब्रेक लावण जमलं नाही. ” सॉरी सॉरी म्हणत दोघे एकमेकांची क्षमा मागत होते. अपराध मीच केला म्हणत होते.
मी हे अभिनव दृश्य पाहत असता एक तरुणी समोरून गेली. मध्येच तिला रस्त्यात एक कागदाचा बोळा पडलेला दिसला. ती वाकली, तिने तो बोळा उचलला आणि दोन तीन मीटर पुढे असलेल्या कचऱ्याच्या पेटीत शांतपणे टाकला. तिच्या मागून आलेल्या दुसऱ्या इसमाने त्या डब्यात तंबाखूची पिचकारी टाकली. आणखी एकानं चॉकलेटचं आवरण टाकलं.
मनात आलं, नागरिकशास्त्राचे आणखी किती नमुने आज मला पाहायला मिळणार आहेत कोण जाणे.
.
मला पलीकडच्या फुटपाथला जायचं होतं.
गाड्यांचा प्रवाह थांबला की रस्ता क्रॉस करावा असं वाटलं. सिग्नल तीन चार मीटरवर होता. तो पाहून माझ्याच बेशिस्त मनाची लाज वाटली. मुंबई सुधारते आहे आपणही सुधारूया म्हटलं आणि चालत सिग्नलपर्यंत गेलो.
पादचाऱ्यांना ग्रीन सिग्नल मिळाला नव्हता पण गाड्यांचा ओघ पूर्ण बंद झाला होता. रस्ता रिकामा होता. करूया का क्रॉस.
माझ्याबरोबर सहा सात जण रस्ता क्रॉस करण्यासाठी उभे होते; त्या शिस्तप्रिय लोकांचे निश्चल चेहरे पाहून मी बेकायदा क्रॉस करण्याचा मोह आवरला. ग्रीन सिग्नल आल्यावर त्यांच्या सोबत रस्ता क्रॉस केला.
आज मेट्रोनं प्रवास करावा असं वाटलं. तिथलं वातावरण एकदम सोफिस्टिकेटेड. मी डब्यात चढलो. डबा तसा रिकामा होता, पण सीट सगळ्या भरलेल्या होत्या. सीटपाशी उभा असताना जवळच बसलेली महिला उठली. मला बसायला जागा झाली. वाटलं त्या बाईचं स्टेशन आलं असणार. पण नाही ती तशीच उभी राहिली.
स्त्री दाक्षिण्यासारखे हे पुरुष दाक्षिण्य !
काय झालंय समाजाला. एका दिवसात एवढा बदल ? मला ऑड वाटलं. मी उठलो. दुसऱ्या डब्यात जागा शोधू .. तिथं जागा नाहीच मिळाली पण एक गंमत पाहायला मिळाली. बहुतेक प्रवाशांकडे खिशात मोबाईल होता. पण एकही प्रवासी मान खाली घालून मोबाईल पाहत नव्हता. काही पेपर वाचत होते, काहींच्या हातात पुस्तक होतं.
मोबाईल हातात न घेतलेला समाज मेट्रो प्रवासामुळे पाहायला मिळाला. धन्य वाटलं.
मुंबईकर सुसंस्कृत झाले की अख्खा देश सुसंस्कृत झाला आहे. कळेना.
भल्या सकाळी अरबी समुद्रातून उगवलेला सूर्य डोळ्यासमोर आला. एकूण उलथापालथ चालू आहे सगळीकडे.
मला शाळेतले दिवस आठवले.
शाळेत जायला मला नेहमी उशीर व्हायचा. एक दिवस मी चक्क वेळेवर वर्गात हजर राहिलो.
मला वर्गात बघून रेगे सर म्हणाले, “आज अगदी टायमावर हजर. सूर्य पश्चिमेला उगवला की काय ?”
आगाऊपणे उत्तर द्यावं असं वाटलं. ” सर, बाहेर येऊन पहा एकदा. बसेस आणि गाड्या वेळेवर येतात का.” पण तेव्हा शिक्षकांना उलट उत्तर द्यायची पद्धत नव्हती. आज तर चित्र हातातच उलटं पालटं होऊन गेलं आहे.
काय म्हणावं याला ? ही क्रांती की उत्क्रांती ? हे शहर आणि शहरातली माणसं एका दिवसात कशी बदलली आणि एका दिवसात बदलली म्हणजे क्रांतीच. पण क्रांती देखील इतक्या वेगाने, एका दिवसात नाही बदलत. ती बऱ्यापैकी मोठी प्रक्रिया असते म्हणे.
घरी परतेपर्यंत संध्याकाळ झाली.
काय काय पाहायला मिळालं रस्त्यात.
विचारू नका. दर्शन एका आदर्श समाजाचं.
मी सोडून कोणीही या अदभुत प्रकाराची दखल घेतली नाही हे मात्र आश्चर्य.
पूर्वेला मावळतीचे लालसर रंग दिसायला लागले होते. आणि सूर्यबिंबही तांबूस दिसायला लागलं होतं. संध्याकाळसारखी संध्याकाळ. फक्त दिशा बदलली.
कोणी बदलली ?
रस्त्यातून दिवे लावलेली वाहनं चालली होती. पण नेहमीसारखी आवाज करत नाही तर शांतपणे आणि लाईनची शिस्त पाळत.
पलीकडून कोणती तरी धार्मिक मिरवणूक येताना दिसली .. मिरवणुका आवाजी असतात. पण या मिरवणुकीचा आवाज येत नव्हता. जवळ आल्यावर सौम्यसा आवाज येऊ लागला. बासरीचा कोवळा आवाज. दोन बासरीवादक. भक्तीगीत वाजवत होते.
सगळं गोड गोड होतं. प्रश्नच नाही.
पण या उलथापालथीने माझं डोकं आऊट झालं .
आधी लाऊड स्पीकरच्या कर्कश आवाजाने आता या शांततेच्या आवाजाने. पुरता चक्रावून गेलो.
‘ साउंड ऑफ सायलेन्स ‘ हे गाणं आठवलं. ग्लानीच आली. ग्लानीतच हताश शब्द मनात उमटले.
****************
कधी पसरेल या शहरात हा शांततेचा ध्वनी .
स्वप्नंच बघायची का आपण हयातभर? आधुनिक शास्त्र, आधुनिक तंत्र शिकायची ती काय फक्त आपल्यापुरती, साधन संपत्ती मिळवण्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी ?
कधी स्वच्छ होणार आपली गावं आणि शहरं. कधी थांबणार स्त्रियांची आणि प्रामाणिक कष्टकऱ्यांची पिळवणूक आणि देशातील भ्रष्ट वारे आणि वादळे..
काल परवा महिला क्रिकेट संघानं विश्वचषक मिळवून नव्या सूर्योदयाची किरणे पसरवली.
असा सूर्योदय पूर्वेला होऊ द्या किंवा पश्चिमेला, आपल्या सर्वांना तो हवा हवासा आहे. सूर्योदयाच्या दिशांपेक्षा आशा महत्त्वाची.
आशेची ही किरणंच आजचा अंधकार दूर करतील आणि उद्या उजाडेल. घराघरात आयुष्याच्या मशाली पेटतील.
– ©️ अवधूत परळकर.
awdhooot@rediffmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
चक्रीवादळ : २
भूगोलाचा इतिहास : ३९
एल. के. कुलकर्णी
कुणास वाटे रूप देखणे
भय प्रलयाचे कोणा वाटे
निसर्ग वादळ दृश्य अलौकिक
मनास माझ्या अद्भुत वाटे
डॉ. राम राऊत यांच्या ‘तांडव’ या कवितेतील या ओळी आहेत. तसे फोटोत सुंदर दिसले तरी चक्रीवादळ प्रत्यक्षात धडकी भरवणारेच असते. त्याचे हे नावही किती समर्पक आहे ? अमेरिकेत त्याला ‘हरिकेन’ म्हणतात.
कोलंबससोबत गेलेल्या स्पॅनिशांनी हे नाव युरोपात आणले. ‘हराकेन’ ही माया संस्कृतीतील तर ‘हुराकेन’ ही कॅरिबियन परिसरातील अनिष्टांची देवता. त्यावरून ‘हरिकेन’ हा शब्द आला. पूर्व पॅसिफिक महासागरात अशा वादळांना ‘टायफून’ म्हणतात. हे नाव चीनमध्ये बाराव्या शतकापासून वापरले जाते. त्याचा मूळ अर्थ – ‘टिकणारे वारे’. मात्र भारतीय उपखंडात सर्वत्र त्याचा उल्लेख चक्रीवादळ म्हणजे सायक्लोन असा केला जातो.
आजकाल प्रत्येक चक्रीवादळाला त्याचे असे वेगळे नाव दिलेले असते. पृथ्वीवरील एकाच भूप्रदेशात, उदा. बंगालच्या उपसागरात, एकाच वेळी एकापेक्षा अधिक चक्रीवादळे अस्तित्वात असू शकतात. यामुळे गोंधळ टाळण्यासाठी त्यांना नावे दिली जातात. ही नावे जागतिक हवामानशास्त्र संघटना (world Meteorological Organization) किंवा त्या त्या देशातील हवामानविषयक कार्यालयातील समित्यांतर्फे दिली जातात. जागतिक हवामान संघटनेने उष्ण व उपोष्ण कटिबंधीय वादळे, त्यांचे प्रकार व स्थान यानुसार जगाचे भाग – क्षेत्रे – पाडले असून त्या त्या भागातील देशांना हे नाव देण्याची संधी दिली जाते. भारत त्यापैकी उत्तर हिंदी महासागर क्षेत्रात समाविष्ट आहे. या क्षेत्रात भारतासोबत श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, इराण, मालदीव, कतार, सं. अरब अमिरात इ. चा समावेश होतो.
चक्रीवादळांची नावे अनेकदा विचित्र वा गंमतीदार वाटतात. कारण ती वेगवेगळ्या भाषेतील असतात. सामान्यतः चक्रीवादळाची नावे, ते नाव सुचवणारा देश, त्यांची भाषा व संस्कृती यांना प्रतिबिंबित करणारी असतात. उदा. बांगला देशाने सुचवलेली नावे, निसर्ग, बीपर जॉय (म्हणजे आपत्ती), अर्णब अशी बंगाली भाषेतील आहेत. भारताने दिलेली नावे गती, तेज, इ. आहेत, तर २०२४ मध्ये नुकत्याच येऊन गेलेल्या वादळाचे रेमाल (वाळू ) हे अरेबिक नाव ओमानने दिलेले होते. चक्रीवादळांच्या नावांच्या याद्या काही वर्षे आधीच जाहीर केलेल्या असतात. एकदा चक्रीवादळ निर्माण झाले की ते अस्तित्वात असेपर्यंत त्याचे नाव बहुधा कायम राहते. एखादे वादळ फार विध्वंसक ठरल्यास ते नाव वादळांच्या नामयादीतून निवृत्त केले जाते, म्हणजे ते पुढे वापरले जात नाही.
पृथ्वी स्वतःभोवती फिरते. त्यामुळे उत्तर व दक्षिण गोलार्धात चक्रीवादळांची स्वतःभोवती फिरण्याची दिशा भिन्न असते. उत्तर गोलार्धातील चक्रीवादळे प्रतिघड्याळी (Anticlockwise) दिशेने फिरतात. तर दक्षिण गोलार्धात ती घड्याळी ( Clockwise) दिशेने फिरतात.
चक्रीवादळे फक्त उष्ण व उपोष्ण कटिबंधात होतात. स्थूल मानाने पृथ्वीवर कोणत्या क्षेत्रात व कोणत्या काळात ती वादळे निर्माण होतात, हे अचूक रित्या माहिती झाले आहे. उष्ण कटिबंधातील चक्रीवादळांचे वार्षिक सरासरी प्रमाण पुढीलप्रमाणे आहे. वेस्ट इंडिज बेटे – ६, चिनी समुद्र – ३०, पॅसिफिक महासागर ( फिजी बेटे) – २, हिंदी महासागर (मॉरिशस परिसर) – ६. तर भारतीय उपखंड परिसर – १२.
अरबी समुद्रात वर्षाला सरासरी २ दोन तर बंगालच्या उपसागरात वर्षाला सरासरी १० चक्रीवादळे निर्माण होतात. म्हणजे बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रापेक्षा अधिक चक्रीवादळे निर्माण होतात. बंगालच्या उपसागरातील वादळे निर्माण झाल्यानंतर वायव्येकडे प्रवास करीत भारताच्या पूर्व किनाऱ्यावर धडकतात. त्यामुळे बंगाल, उडीसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू यांच्या किनाऱ्यांना वारंवार चक्रीवादळाला तोंड द्यावे लागते. अरबी समुद्रात चक्रीवादळाचे प्रमाण कमी असून ती केरळच्या नैऋत्येस तयार होऊन प्रथम उत्तरेकडे सरकतात. नंतर महाराष्ट्राच्या समोर आल्यावर काही काळ ती वायव्येकडे प्रवास करीत गुजरातच्या नैऋत्येस येतात. येथून ती दिशा बदलून ईशान्येकडे वळून गुजरातच्या किनाऱ्यावर धडकतात. त्यामुळे गुजरातच्या वेरावळ, द्वारका या भागास वारंवार चक्रीवादळास तोंड द्यावे लागते. पश्चिम किनाऱ्यावरील मुंबई व इतर बंदरांना चक्रीवादळाचा तडाखा कमी बसण्याचे कारण त्या वादळांचा असा विशिष्ट प्रवास मार्ग आहे. आणि त्याचे कारण थरचे वाळवंट हे आहे. भारतीय उपखंडातील सर्वात कमी वायूभार क्षेत्र राजस्थान – थरच्या वाळवंटात असते. त्यामुळे अरबी समुद्रातील बहुतेक वादळे राजस्थानकडे जाण्यासाठी ईशान्य दिशेने गुजरातच्या किनाऱ्यावर पोहोचतात.
पण चक्रीवादळांचा स्थूल प्रवासमार्ग माहीत असला तरी ते कुठे व केव्हा निर्माण होईल व किनाऱ्यावर नेमके कुठे धडकेल याचा काहीही अंदाज बांधणे पूर्वी शक्य नसे. भारतात पूर्व किनाऱ्यावर १८६४ मध्ये दोन प्रचंड चक्रीवादळे आली. पहिले ऑक्टोबरमध्ये कलकत्त्याला व दुसरे नोव्हेंबरमध्ये मच्छलीपट्टणला धडकले. त्यांनी प्रचंड विध्वंस घडवून आणला. तेव्हा सरकारने १८६५ मध्ये चक्रीवादळाच्या पूर्वसूचनेसाठी इशारायंत्रणा उभारण्याचे ठरवले. अशी पहिली यंत्रणा कलकत्ता येथे १८६५ मध्ये कार्यान्वितही झाली. गंमत म्हणजे खुद्द हवामान खाते मात्र त्याच्यानंतर, १८७५ मध्ये स्थापना झाले. पश्चिम किनाऱ्यावर कराची, मुंबई इ. ठिकाणी अशी यंत्रणा १८८० मध्ये उभारण्यात आली. १८८६ पर्यंत सर्व भारतीय बंदरावर ही यंत्रणा कार्यरत झाली. सुरुवातीला पूर्व व पश्चिम किनाऱ्यावरील वादळाचे संकेत इशारे वेगवेगळ्या पद्धतीचे होते. त्यामुळे उडणारा गोंधळ टाळण्यासाठी १८९८ पासून सर्व बंदरावरील संकेतइशाऱ्यात एकसूत्रता आणण्यात आली. पुढे यासाठी उपग्रह सेवांसह सर्व अत्याधुनिक तंत्रे वापरण्यात येऊ लागली व त्यातून चक्रीवादळाचे अचूक भाकिते मिळू लागली.
आजकाल समुद्रावर सर्वत्र सागरी जलाचे तापमान व वायूभार यावर उपग्रहांद्वारे लक्ष ठेवण्यात येते व त्या आधारे संभाव्य चक्रीवादळाचा अंदाज सांगितला जातो. एकदा चक्रीवादळ निर्माण झाले की त्याचा विकास, गती, प्रवासाची दिशा व वेग यावरही उपग्रहांद्वारे लक्ष ठेवले जाते. त्यानुसार संबंधित भागाला इशारे दिले जातात व योग्य सावधगिरीचा उपाय योजना करून जीवित व वित्तहानी टाळली जाते. एखाद्या रेल्वेचे वेळापत्रक सांगावे, तसे आजकाल चक्रीवादळाच्या प्रवासाचे वेळापत्रक सांगितले जात आहे. नैसर्गिक आपत्तींना केवळ अटळ संकट न मानता मानवाने या क्षेत्रात साधलेली ही एक श्रेष्ठ सिद्धी होय.
माणूस निसर्गाला गुलाम बनवू शकत नाही हे खरे. पण तो केवळ निसर्गाचा गुलाम म्हणूनही राहू शकत नाही. शास्त्रशुद्ध अभ्यास व त्याला विवेकाची जोड हाच मानवाच्या खऱ्या मुक्तीचा खरा मार्ग आहे. ज्यांनी हा मार्ग दाखवला त्या संशोधकांचे आपल्यावर केवढे ऋण आहे ?
– ©️ एल. के.कुलकर्णी
lkkulkarni.nanded@gmail.com
सोबतचे चित्र : १.चक्रीवादळाचे छायाचित्र
२. चक्रीवादळाची एक नामयादी
[ ५ ऑक्टोबर २०२४ च्या ‘लोकसत्ता‘मध्ये पूर्वप्रसिद्ध ]
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
ला..जून हासणे, अन्…
शिल्पा कुलकर्णी
चांदणे स्वरांचे
लेखांक # २१
नुकताच एप्रिल महिना संपला आणि मे महिना सुरू झाला. यात काही विशेष नाही हो. एक महिना संपून दुसरा चालू झाला इतकच पण ही जी ३० एप्रिल २०२५ तारीख होती ती एका तरल सांगितिक प्रवासाची सुरवात घेऊन आली. आजही श्रावण सुरू होताच बरसणारा पाऊस आणि श्रावणातल्या उन पावसाच्या खेळातली ती निळाई घेऊन येणारं ‘श्रावणात घन निळा ‘आठवतं. संध्याकाळी कातर वेळी मुलं घरात आली नाही की कासाविस करणारं ‘या चिमण्यांनो’ आठवत. किती म्हणून गाणी सांगावी? मराठी अस्मितेचं स्फुल्लिंग चेतवणारं ‘जय जय महाराष्ट्र माझा’ आठवावं की पौर्णिमेच्या चंद्राच्या शीतल प्रकाशात न्हालेलं ‘उगवला चंद्र पुनवेचा आठवावं?’ ही आणि अशी अनेक रसपूर्ण , गोड , मधाळ गाणी देणारे संगीतकार म्हणजे श्रीनिवास खळे ! त्यांच हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने संगीतातल्या अवलियाला वाहिलेली ही साहित्यमय आदरांजली.
आजचं गाणं ना खूप खास आहे.आपल्या काव्य प्रतिभेने मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारे मंगेश पाडगांवकर यांच्या लेखणीतून उतरलेलं हे प्रेमगीत आणि त्याला स्वरसाज चढवलेला तितकाच प्रतिभावंत संगीतकार पण या गाण्यात मात्र गायकाच्या भूमिकेत असलेले, पं.हृदयनाथ मंगेशकर. गाणं सर्वांनी ओळखलच असेल
ते म्हणजे ” ला .. जून हासणे अन्… “
गाण्यातला पहिला शब्द तोडून एकच अक्षर लांबवून जो काही परिणाम खळ्यांनी साधलाय तो मला नाही वाटत जगातल्या कुठल्याही भाषेत कुठल्याही गाण्यात साधला गेला असेल. एरव्ही शब्द तोडणे बरोबर वाटत नाही पण इथे मात्र त्या प्रियकराच्या अवस्थेला पूर्ण न्याय खळ्यांनी दिला आहे.
सुरवातीलाच आपल्याला एका अनामिक ओढीनं खेचून घेणारं संगीत. सतार, कॅार्ड्स, ठेका याचा वापर करून बांधलेला समा आणि मग टींग टींग , टींग टींग ,टींग टींग … टींग अशा वाजणाऱ्या कॅार्डस् मनामनात रूतून बसल्या आहेत. खुणेची कॅार्ड मिळताच येणारा ला आणि किंचित मागून येणारं जून. अहा ! साऱ्या गाण्याची नजाकत इथेच एका शब्दातच आहे असे वाटावे. मी तर किती वेळा मागे करून करून हाच भाग ऐकला आहे.
*लाजून हासणे अन् हासून हे पहाणे*
ला.. जून शब्द असा इतका गोड वाटतो की त्या प्रियकरावर तिची पडलेली मोहिनी, तिच्या लाजण्यामधे हरवून गेलेला तो. तिचं लाजणं तिचं लाजून हसणं हे सारे विभ्रम त्याला अगदी अगदी परिचयाचे असेच.
नव्याने प्रेमात पडलेल्या तरूणाला त्याच्या प्रेयसीची किंवा होऊ घातलेल्या प्रेयसीची प्रत्येक गोष्ट भावते. प्रेमातली लटकी भाषा त्याला बरोबर उमगते. आणि शब्द येतात
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे
यात ओळखून हा शब्द अगदी स्वतःच ग्वाही देत असल्यासारखा येतो तर तुझे वर दिलेला जोर, तिचं लाजणं ,हसणं सारं अधोरेखित करतो. मी असा लांबवला आहे की मला तुझे बहाणे पक्के माहित आहेत अशी माझी खात्रीच आहे, हे जाणवावं. मी ओळखून… या ओळीसाठी वापरलेली व्हेरीएशन्स किती अर्थवाही आहेत? हृदयनाथांच्या आवाजात खूप कमी गाणी आहेत पण जी आहेत ती अत्यंत हृदयस्पर्शी , भावस्पर्शी. त्यांच्या कार्यक्रमाचं भावसरगम हे नाव अगदी समर्पक वाटतं.
कडव्यानंतर येणारं संगीतही त्या प्रेमिकाची भावावस्था उलगडणारं. काहीसं स्वप्नावस्थेत नेणारं.
तुला पाहताना डोळ्याच्या मध्ये पापण्यासुद्धा येऊ नयेत,
त्याचाही भार वाटावा अशी त्याची बिकट अवस्था.
डोळे मिटता क्षणीच तिचा चंद्रासम चेहरा समोर तरळावा.
ही इतकी भावव्याकूळ अवस्था प्रियकराची का व्हावी?
त्याचं उत्तर बडे बडे आसामी सुद्धा नाही देऊ शकत.
त्याची ती व्याकूळ अवस्था वर्णन करताना काय सुंदर तरल शब्द पाडगावकर वापरतात.
*डोळ्यांस पापण्यांचा का सांग भार व्हावा?*
*मिटताच पापण्या अन् का चंद्रही दिसावा?*
*हे प्रश्न जीवघेणे*
*हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे*
*मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे*
डोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा हा अगदी भाबडा प्रश्न गायक विचारतो. ती यात डोळ्यास नंतर किंचित ठहराव पापण्यांचा नंतरही तसाच मग का सांग हा चिरंतन प्रश्न भार व्हावा ची अचूक शब्दफेक! कमालिची सुंदर चाल बांधली आहे. मिटताच पापण्या अन् का नंतरही किंचित ठहराव. का तू मला सतत समोर दिसत्स हा स्वतःलाच विचारलेला प्रश्न , ती असोशी , बेचैनी चालीतून , स्वरांतून हलेकेच प्रसारीत होते. हे प्रश्न जीवघेणे च्या चालीत जी हतबलता आहे. व्याकुळता आहे ती दाखवताना खळे आपसुकच ती ओळ खालच्या स्वरात चालू करतात. व्याकुळता व्यापक करताना जीवघेणे आळवून म्हणावयास लावतात.
तरल कवी , सुक्ष्म भाव टिपणारे संगीतकार आणि ते गाऊन उलगडून दाखवणारे हृदयनाथ. जणू ती प्रियकराची अवस्था नसून आपल्याच हृदयाची आहे असं वाटावं.
जिच्यामुळे ही अवस्था झाली आहे अशा प्रेयसी ला कसं बर कळावं की अशी घायाळ अवस्था व्हायला तीच तर कारणीभूत आहे. ती घनव्याकूळ , घायाळ अवस्था वर्णन करताना पाडगावकर फार सुंदर रूपक वापरतात.
ही अवस्था दाखवण्यासाठीच जणू उंचावणारे सूर कडव्यांमधे येतात आणि हृदयनाथांचे आर्त टीपेचे सूर येतात, त्याला कसे कळावे मधली व्याकूळता, हृदयात लागलेला प्रेमाचा बाण सहन करतानाची सैरभैर अवस्था
हे इतक्या परिणामकारक चालीतून दाखवलय की त्या प्रियकराविषयी सहानुभुतीच वाटायला लागते.
आणि तरीही तो कलिजा खलास करणारा तिरपा कटाक्ष झेलायला तो अगदी ओढीने तयार असतो.
*हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे?*
*हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे*
*तिरपा कटाक्ष भोळा*
*तिरपा कटाक्ष भोळा आम्ही इथे दिवाणे*
*मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे*
हे सर्व बहाणे मला कळतातच आणि अर्थात आवडतातच असे सांगण्यासाठी पुन्हा पुन्हा ती आळवणी येते.
कदाचित दिवस रात्र ही ओढ सहन केल्यावर , तिच्या आठवात जागरण झाल्यावर ती दिसताच कमालिचा टवटवीत तारा उगवल्यासारखं त्याला वाटतं आणि तिच्या आठवांच्या गंधाने पुनित झालेला सुगंधी वारा वाहू लागतो.
तिच्या आठवणींची धुंदी , तिची ओढ, तिच्या आठवणीत धुंद तरंगणारा प्रियकर या कडव्याच्या आधी जे संगीत येत
त्यातून दिसू लागतो.ती धुंदी ते तरंग त्या व्हायोलिनसदृश सुरावटीतून वाऱ्यावर लहरू लागतात. रात्रीस चांदण्यांचे सुचते सुरेल गाणे…काय सुंदर कल्पनाविलास आहे!
*जाता समोरुनी तू उगवे टपोर तारा*
*देशातुनी फुलांच्या आणी सुगंध वारा*
*रात्रीस चांदण्याचे*
*रात्रीस चांदण्याचे सुचते सुरेल गाणे*
*मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे*
*लाजून हासणे अन् हासून हे पहाणे*
*मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे*
निसर्गातील प्रतिके वापरून पाडगावकरांनी त्या प्रियकराची भावावस्था सुरेख टिपली आहे.प्रत्येक कडव्याची चाल वेगळी आहे पण अंतरे असे बसवले आहेत की धृवपद उचलता येते. तरीही ही चाल गाताना गायकाची तारेवरची कसरत आहेच. खळ्यांचे ते वैशिष्ट्यच नव्हे का?
शब्दांना, भावांना अनुरूप चाली देणारा हा संगीतकार इतका मनस्वी की कधी कधी ते ११ चाली करत पण त्यातली चाल चपखल वाटेपर्यंत निवड होत नसे.
इतकी समरसता असेल तर गाणी का नाही आपल्यावर आजही आणि पुढेही मोहिनी घालणार आणि घालत रहाणार?
संपूर्ण गाणे ऐकताना आपण इतके धुंद होतो की त्याच स्वरलहरींवर असच विहरत रहावं असं वाटत.
हृदयनाथांनी हे गाणं इतक तरल मखमली म्हटलय की स्वतःची अधिक गाणी त्यांनी का नाही म्हटली अशी खंत राहून राहून वाटते. भावसरगम मधून ते गातच आले पण चित्रपट वा भावगीत अजून खूप गायला हवे होते असे वाटते पण मनस्वी कलाकारांची जातच वेगळी. ते काय आणि कुठे आपल्या प्रतिभेचा शोध घेत राहतील सांगता येत नाही. आणखी एक विचार मनात चमकून गेला, हे गाणे तलत नी गायले असते तर ? असेच रेशमी झाले असते नाही?
दिग्गज कवीची लेखणी, अत्यंत सुक्ष्मभाव टिपणारा संगीतकार आणि प्रतिभाशाली संगीतकार असून गायकाच्या भुमिकेत शिरणारा गायक असल्यावर असे दुर्मिळ योग येतातच. आपण फक्त त्या पर्वणीमधे मनसोक्त न्हाऊन घ्यायचं आणि स्वर संगीताच्या मोहिनीमध्ये चिंब चिंब व्हायचं. याहून आनंद अवस्था काय असू शकते? सोबत दुवा जोडत आहे आपणही ह्या पर्वणीचा लाभ घ्या.
– ©️ शिल्पा कुलकर्णी
shilpa.y.kulkarni@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
उत्तरे जाणा व ज्ञानात भर घाला
विलास सातपुते
– प्रश्नसमूह 5
16. खाली काही संतांची मूळ नावे-आडनावे दिली आहेत. पहिले नाव गाळले आहे. आपण ते गाळलेले नाव भरायचे आहे तसेच त्या संताला आपण कोणत्या नावाने ओळखतो ते कंसात लिहायचे आहे.
–—- सूर्याजी ठोसर म्हणजे ( )
—– विठ्ठलपंत कुलकर्णी ( )
—— बोल्होबा अंबिले ( )
—— सूर्यनारायण देशपांडे ( )
—– दामाजी रेळेकर ( )
—— काका कुंभार ( )
17. खालील संत कोणत्या शतकात होऊन गेले ? –
संत ज्ञानेश्वर
संत नामदेव
संत एकनाथ
संत रामदास
संत चोखामेळा
संत तुकाराम
18. संत वाङमयात खालील संतांच्या विशेष गद्यपद्य रचना कोणत्या ?
ज्ञानेश्वर
नामदेव
एकनाथ
तुकाराम
रामदास
19. कोणते संत महाराष्ट्राबाहेरसुद्धा आदरणीय मानले जातात.
20. महाराष्ट्रातील स्त्री संत कोण कोण होऊन गेल्या ?
वाचक मित्रांनी वरील प्रश्नांची उत्तरे लेखकाकडे न पाठवता संपादकांच्या ईमेल पत्त्यावर पाठवावी ही विनंती.
उत्तरे पाठवणे शक्य नसल्यास आपली प्रतिक्रिया पाठवू शकता.
– ©️ विलास सातपुते
vilas.satput54@gmail.com
प्रश्नसमूह ५ ची उत्तरे :-
१६. खाली काही संतांची मूळ नावे-आडनावे दिली आहेत. पहिले नाव गाळले आहे. आपण ते गाळलेले नाव भरायचे आहे तसेच त्या संताला आपण कोणत्या नावाने ओळखतो ते कंसात लिहायचे आहे.
नारायण सूर्याजी ठोसर म्हणजे (रामदास)
ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी (ज्ञानेश्वर)
तुकाराम बोल्होबा अंबिले (तुकाराम)
एकनाथ सूर्यनारायण देशपांडे (एकनाथ)
नामदेव दामाजी रेळेकर (नामदेव)
गोरोबा काका कुंभार (गोरा कुंभार)
१७. खालील संत कोणत्या शतकात होऊन गेले ? –
संत ज्ञानेश्वर – १३ वे शतक ( इ.स. १२७५ ते १२९६)
संत नामदेव – १३ वे व १४ वे शतक ( इ.स. १२७० ते १३५०)
संत एकनाथ – १६ वे शतक ( इ.स १५३३ ते १५९९)
संत रामदास – १७ वे शतक (इ.स. १६०८ ते १६८१)
संत चोखामेळा – १३ वे – १४ वे शतक ( इ.स. १२७३ ते १३३८)
संत तुकाराम – १७ वे शतक ( इ.स.१६०८ ते १६५०)
१८. संत वाङमयात खालील संतांच्या विशेष गद्यपद्य रचना कोणत्या ?
ज्ञानेश्वर – ज्ञानेश्वरी ( ९००० ओव्या ) , अमृतानुभव ( ८०० ओव्या), चांगदेवपासष्टी, हरिपाठ, अभंग.
नामदेव – अभंगगाथा ( २५०० अभंग), हिंदीच्या बोलीभाषेत अभंग ( १२५ पदे)
एकनाथ – एकनाथी भागवत ( १८००० ओव्या) , भावार्थ रामायण( ४०,००० ओव्या), रुक्मिणी स्वयंवर, दत्ताची आरती ( त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा)
तुकाराम – अभंग गाथा ( ४५०० अभंग)
रामदास – दासबोध ( ७७५० ओव्या),मनाचे श्लोक ( २०५ श्लोक) , भीमरूपी स्तोत्र, करुणाष्टके, आरत्या ( सुखकर्ता दुखकर्ता इत्यादी)
१९. कोणते संत महाराष्ट्राबाहेरसुद्धा आदरणीय मानले जातात ?
– नामदेव.व नामदेव हे शीख संप्रदायात पूज्य मानले जातात. त्यांना नामदेवबाबा असे संबोधतात. नामदेवांनी पंजाबमध्ये जाऊन कीर्तने केली. शिखांची शबदकीर्तने व महराष्ट्रातील वारकरी कीर्तने यात बरेच साम्य आहे. नामदेवांनी हिंदीच्या व्रज किंवा शौरसेनी भाषेत सुमारे १२६ अभंग रचले आहेत. त्यातील 62 अभंग पवित्र गुरुग्रंथसाहेबात “ नामदेव मुखबानी” या नावाने समाविष्ट केले आहेत. नामदेवांचे मंदिर पण पंजाबमध्ये आहे. राजस्थानात सुद्धा आहे.
२०. महाराष्ट्रातील स्त्री संत कोण कोण होऊन गेल्या ?
१) संत मुक्ताबाई – मुक्ताई विठ्ठल कुलकर्णी. १३ व्या शतकातील.संत ज्ञानेश्वरांच्या कनिष्ठ भगिनी. स्वतः योगी होत्या. ज्ञानेश्वरांना “ ज्ञानेश्वरी” लिहिण्यास प्रवृत्त केले. वयोवृद्ध योगी चांगदेवांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले होते.
२) संत बहिणाबाई – बहिणाबाई आउजी कुलकर्णी. १७ व्या शतकातील. तुकारामांचे शिष्यत्व पत्करलेल्या संत. सातएकशे रचना त्यांनी केल्या. ब्रह्मण असून वाणी जातीच्या तुकारामांचे शिष्यत्व पत्करले म्हणून त्रास सोसावा लागला.
३) संत सोयराबाई – संत चोखोबांच्या पत्नी. स्वतःही संत. साध्या भाअषेत काही अभंग रचले आहेत.
४) संत जनाबाई – विठ्ठल भक्त. १३-१४ व्या शतकातील. नामदेवांना समकालीन. नामदेवांच्या घरी काम करायच्या. तीनशे अभंग रचले.
[ वरील प्रश्नांची उत्तरे पाठवणा-या सर्व वाचक मित्रांचे अभिनंदन आणि आभार ]
– ©️ विलास सातपुते
vilas.satput54@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
विहंग मित्र
देवदत्त पाटणकर
मित्र क्र. ३ ३ : sarus crane ( सारस क्रौंच
उंच राखाडी रंगाचा क्रौंच पक्षी.
पाय मात्र गुलाबी असतात. डोक्यापासून मानेपर्यंत लाल रंगाचा भाग असतो.
उथळ पाणथळ जागांमधून भक्ष्य शोधत असताना दिसतो. पाणी भरलेल्या शेताडीमधून सुद्धा दिसतो.
असं म्हणतात की नर-मादिची जोडी कायम असते.
नराचा मादीला वश करतानाचा नाच अतिशय बघण्यासारखा, वैशिष्ट्यपूर्ण आणि दिमाखदार असतो.
खालील प्रकाशचित्रे नळ सरोवरच्या (अहमदाबादच्या जवळ) परिसरात काढली आहेत.
– ©️देवदत्त पाटणकर
8378980966 .
castingalu@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
मैं तो देखुंगी बम्बई
अॅड. क्रांती आठवले पाटणकर
गेल्या महिन्यात मी श्रीवर्धन-हरिहरेश्वर-दिवेआगर येथे जाऊन आले. २२ नोव्हेंबरला मी या टूरवर एक लेख लिहिला. तो लोकांना खूप आवडला. अनेकांनी मेसेज/फोन करून इतर टूरवर देखील लिहावे असे सांगितले.
गेल्या २५ वर्षात, महाराष्ट्र आणि भारतातील सुमारे १५० ठिकाणी मी पर्यटनासाठी फिरून आले. सगळ्या ठिकाणांवर सविस्तर लिहिणे शक्य नाही. पण काही विशेष माहितीपूर्ण किंवा गंमतीशीर अनुभव लिहिणार आहे. या १५० ठिकाणात डोंबिवलीचे गल्लीबोळ, ठाण्यापासून कर्जत पर्यंतची ठिकाणे देखील आहेत.
काही माणसे माझ्या परिचयाची आहेत ज्यांनी अर्धे जग पाहिले आहे. पण त्यांनी त्यांचे गाव अद्याप नीट पाहिलेले नाही. एका पुणेकर नातेवाईकाने दुबई, युरोप, बाली, श्रीलंका पाहिले आहे. पण पुण्यातील पेशवेकालीन मंदिरे पाहिलेली नाहीत. सासवड, यवत, पुरंदर वगैरे लांबच राहिले. एप्रिल २०२५ मध्ये उद्घाटन झालेले चिंचवडचे क्रांतिवीर चापेकर बंधूंचे स्मारक (क्रांतितीर्थ) आम्ही पाहून आलो. पण चिंचवडमधील एका मैत्रिणीला असे काही स्मारक असल्याचे माहितही नव्हते.
चालायचेच…
पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना…
सुरुवात “*मुंबई दर्शन*” पासून…
माझा जन्म, शालेय शिक्षण सगळंच डोंबिवलीत झाले. आता लग्नानंतर settle ही डोंबिवलीत झाले, त्यामुळे मी अगदी ज्याला “स्थानिक डोंबिवलीकर” म्हणतात तशी आहे.. दहावीनंतर पुढच्या शिक्षणासाठी मी रामनारायण रुईया कॉलेज, माटुंगा आणि पदवी प्राप्त केल्यावर कायद्याच्या अभ्यासासाठी सरकारी विधी महाविद्यालय, चर्चगेट, इथे जात असे. त्यामुळे मला मुंबई शहराचा तसा थोडाफार परिचय होता.
१९८०-१९९० च्या दशकात डोंबिवलीत गरजेपुरती दुकाने होती. त्यामुळे लग्नासाठी किंवा सणासुदीसाठी दागिने/कपडे खरेदी करायला दादरला जाणे होत असे. आम्ही भावंडे आई – वडिलांसोबत जात असू. दादरला खरेदी करायची तिथेच “मामा काणे” यांच्या हॉटेलमध्ये राईसप्लेट खायची आणि मग घरी यायचे. असा आमचा उपक्रम काही वर्ष चालला.
हळूहळू चांगली दुकाने डोंबिवलीत येऊ लागली आणि मग दादरला खरेदीला जायचे बंद झाले.
कॉलेज किंवा खरेदी या व्यतिरिक्त, मी मुंबई पाहिली ती डोंबिवलीत जेव्हा महाराजा टूर्स तर्फे “मुंबई दर्शन” ही एक दिवसीय ट्रीप जायला लागली तेव्हा. मी माझ्या शाळासोबती मैत्रीणीसह १९९२-९३ ला ही टूर केली होती. त्यानंतर वर्षभरातच बहीणी व भाच्यांसह पुन्हा गेले होते. पण एका दिवसात २५-३० ठिकाणे पाहायची म्हणजे धावपळच होते. शिवाय या धावपळीत ते स्थळांची फारशी माहिती देत नाहीत, असं मला वाटलं.
अशा पार्श्वभूमीवर मुळ गिरगावकर असलेल्या माझ्या नवऱ्याचे, म्हणजे अजितचे, डोंबिवलीत घर आहे समजल्यावर एक सुखद आश्चर्याचा धक्का बसला. अजितला मुंबईचा (उपनगरे नव्हेत…फक्त मुंबई शहर- *कुलाबा ते दादर*) प्रचंड अभिमान. असो…
तर मी सांगत होते, “*मैं तो देखुंगी बंम्बई*”…
अजित नेहेमी म्हणायचा की ‘आपण कधीतरी दक्षिण मुंबई चालत पाहू. मी विनामुल्य गाईड आहेच’. पण तो योग येत नव्हता.
तसं एकदा २००८-०९ च्या सुमाराला माझी भाची आणि तिच्या लहान मुलीसह आम्ही डोंबिवलीहून कार घेऊन मुंबई दर्शन करायला गेलेलो होतो. पण आपणच आपली सगळी ठिकाणं बघायची, माहिती द्यायला कोणी नाही, असं हे मुंबई दर्शन थोडं कंटाळवाणेच झालं.
काही वर्षांपूर्वी सहजच नेटवर काहीतरी शोधत असता, एक १९४७ सालच्या “डोली” या चित्रपटातलं एक गाणं सापडलं. ह्या गाण्याचे बोल अतिशय सुंदर आहेत. या गाण्यात ती म्हणते, “दिल्ली की गलियो मे जिया नाही लागे, मैं तो देखुंगी बम्बई…” नायक तिला हरप्रकारे दिल्ली कशी छान आहे हे पटवून देत असतो आणि नायिका मात्र मला मुंबईच बघायची आहे यावर हटून बसलेली असते. त्याच्यातली एक ओळ मला फारच आवडली ती म्हणते, “वहाँ सैगल भी है और सुरैया भी हैं, मैं तो देखुंगी बम्बई…”
(*गाण्याची लिंक लेखाच्या शेवटी दिली आहे*)
झालं ! हे गाणं ऐकलं काय आणि मी अजितच्या मागेच लागले की तुला तुझ्या मुंबईचा फारच अभिमान आहे ना ! मग आता मला तुझी मुंबई फिरव. दिवसाची आणि रात्रीची मुंबई देखील. तू माझा गाईड म्हणून काम करायचं. सर्व दक्षिण मुंबई पाहायची. म्हणजे आपण व्ही. टी. स्टेशनला उतरल्यावर पायी, पायी फिरायचे. अजितला गंमतीने म्हटलं “वहाँ धरम भी है और हेमा भी है, मैं तो देखुंगी बम्बई…” “वहाँ अमिताभ भी है और रेखा भी है, मैं तो देखुंगी बम्बई…”.
अर्थात हे आपलं डोली मधल्या गाण्याला जोडून म्हटले एवढेच. एरव्ही नट-नट्यांना प्रत्यक्ष पाहण्यात मला अजिबातच रस नाहीये.
एकदा म्हणजे २००१ च्या सुमाराला आम्ही गिरगावातील आमच्या घरी राहून, रात्रीचे मरीन ड्राईव्ह पाहिले होते. अकराच्या सुमारास घरातून निघालो. घरापासून चालत दहा मिनिटांवर चौपाटी. चौपाटीवर थोडा वेळ फिरलो. नंतर चौपाटी पासून नरीमन पाँइंट पर्यंत घोडागाडीतून फेरफटका मारला. तो एक विलक्षण अनुभव होता. त्यावेळी सी.आय.डी. चित्रपटामधील “ऐ दिल है मुश्कील जीन यहाँ, ज़रा हटके ज़रा बचके, ये है बम्बई मेरी जान” म्हणणारा जॉनी वॉकर आठवला. त्यानंतर रात्री साडेबारा- एकच्या सुमारास आम्ही चौपाटीवर आईस्क्रीम खाल्लं. थोडा वेळ कट्ट्यावर बसून समुद्र पाहिला आणि घरी परतलो.
त्यानंतर २००९ साली विक्रांत युद्धनौका पाहायला गेलो होतो.( नौदलाच्या सेवेतून निवृत्त झालेली ‘विक्रांत’ dismantle करण्यापूर्वी सामान्य लोकांना बघण्यासाठी उपलब्ध होती. एरव्ही युद्धनौका आपल्या सामान्य लोकांना कशी पाहायला मिळेल?). युद्धनीती किंवा बोटीवरील तांत्रिक बाबी काही मला कळत नाहीत. पण विक्रांत युद्धनौका जेव्हा बघितली तेव्हा त्याची भव्यता पाहून अवाक् व्हायला झाले. हा एक वेगळा संस्मरणीय अनुभव..
तेथून मग कमला नेहरू उद्यान, म्हातारीचा बूट, (येथे मी इयत्ता तिसरीत असताना आमच्या शाळेची ट्रीप गेली होती. त्यानंतर २००९ ला पाहिले.) तिथून गिरगाव चौपाटीचे विहंगम दृश्य, चर्चगेट स्टेशन जवळील सम्राट हॉटेल मधील unlimited थाळी खाल्ली. (इथल्या थाळीत तळलेली गवार उपपदार्थाच्या बाजूला होती. पहिल्यांदाच मी तळलेली गवार खात होते. फारच रुचकर लागत होती. unlimited थाळीत, मी unlimited तळलेली गवार खाल्ली! जेवण राहिलं बाजूलाच….कोणाचं काय आणि माझं काय….त्यानंतर वेगवेगळे पदार्थ घरी करून बघण्याची माझी हौस मला स्वस्थ बसू देईना. मी लगेच अशा प्रकारची गवार बरेचदा घरी केली. खूपच चांगली लागते.)
मात्र गेल्या तीन वर्षात खूप वेळा मुंबईला जाण्याचा योग आला. कधी कामानिमित्त तर कधी फिरण्यासाठी.. त्यामुळे लेख लिहिताना पाहिलेल्या ठिकाणांच्या क्रमाबाबत थोडेफार इकडचे तिकडे, थोडेसे पुढे-मागे होण्याची शक्यता आहे.
*“मैं तो देखुंगी बम्बई”*
२०२० साली आम्ही दक्षिण मुंबई पाहिली होती. त्यावर अजित पाटणकरांनी लिहिलेला लेख मैत्रीमध्ये (मार्च २०२२) प्रसिद्ध झाला होता.
आता त्यानंतरच्या माझ्या मुंबई दर्शनची एक झलक..
*एपिल २०२३*.
गिरगावच्या घरी गेलो होतो. येताना घराच्या मागील रस्त्यावर असलेले फडके गणपती मंदिर… त्यासमोरील प्रकाशचा साबुदाणा वडा, बटाटा पुरी, पियुष, घेतले. (इथल्यासारखे हे पदार्थ जगात कुठेही मिळत नाही.)
भटवाडी, बनामा हॉल लेन (न.र.फाटक, चंद्रकांत काकोडकर यांचे निवासस्थान, आध्यात्मिक ग्रंथांचे प्रकाशक: ढवळे प्रकाशन) एकांकिकांच्या पुस्तक विक्रीसाठी प्रसिद्ध रामकृष्ण बुक डेपो ही ठिकाणे पाहिली.
घरी परतताना… हरकिसनदास हॉस्पिटल, दिलीपकुमार-मधुबालाचा खटला चालला होता ते गिरगाव कोर्ट, ड्रीमलँड थिएटर वगैरे पाहिले. हिंदी सिनेमातील गाण्यांची चार आणे किंमतीची छोटी पुस्तके विकणाऱ्या पाववाला स्ट्रीट मधील बऱ्हाणपूरवालाचे दुकान इथून दोन मिनिटांवर होते. (ऑर्केस्ट्रा करणाऱ्या मंडळीना गाण्याचे बोल यामुळेच सहज मिळत असत) तिथे गेलो नाही…..
* ऑक्टोबर २०२३*
त्यानंतर ऑक्टोबरमध्ये दादर-नायगावच्या “मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात” कामानिमित्त गेलो होतो. तेथून जवळच “प्रीतम” हे सुप्रसिद्ध हॉटेल आहे. त्याच सुमारास त्या हॉटेलचे मालक कुलवंतसिंह जानी यांचे “मुंबई मेरी जान” हे सदर “दैनिक लोकसत्ता” मध्ये येत असे. त्यात प्रीतम हॉटेलात भेटलेल्या दिग्गज मंडळीच्या आठवणी असत. राजकपूर आदी मंडळींचा, त्या काळी, राबता असायचा. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात गेलो असता, प्रीतम हॉटेलात जेवून आलो. बरेच दिवसाची एक इच्छा पूर्ण झाली. उगाचच…
तिथल्या मालकासोबतचे राज कपूरसह अनेकांचे बरेच फोटो तिथे दर्शनी भागातच लावलेले आहेत.
हिंदमाता क्लॉथ मार्केटमधून ड्रेस मटेरीअल्स खरेदी करायची फार दिवसांची इच्छा होती. अनायासे तिथपर्यंत गेलोच होतो तेव्हा ही इच्छा देखील पूर्ण केली.
*२०२४*
जानेवारी महिन्याच्या ११ तारखेला पुन्हा एकदा दादर-नायगावच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात कामानिमित्त जाणे झाले. माझ्या एका लेखमालेसाठी जुन्या काळातल्या वर्तमानपत्रातील एक बातमी/लेख शोधायचा होता. त्याचे फोटो घेतले. जाताना VJTI कॉलेज, हिंदू कॉलनी वगैरे भाग फिरलो. यावेळी सोबत सुप्रसिद्ध लेखक/पत्रकार श्री. रविप्रकाश कुलकर्णी होते. पृथ्वीराज कपूर, के.एन.सिंग, नौशाद अशा जुन्या काळातील दिग्गज सिनेकलाकारांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. (नौशाद १९३० साली मुंबईत आले. नाव मिळेपर्यंत अनेक रात्री दादर टी.टी. येथील ‘ब्रॉडवे सिनेमा’ समोरच्या फुटपाथवर त्यांना झोपावे लागले होते. १९४६ साली त्यांचा रतन सिनेमा हिट झाला. पुढे १९५२ साली याच ब्रॉडवे थिएटरमध्ये त्यांचा ‘बैजू बावरा’ हा चित्रपट ५० आठवडे चालला, तेव्हा तिथे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना आपल्या संघर्षाचे दिवस आठवून अश्रू अनावर झाले होते, “त्या फुटपाथवरून या फुटपाथवर यायला १६ वर्षे लागली”, असे ते म्हणाले होते.)
तेथून दादर पश्चिमेला येऊन काही खरेदी केली आणि घरी परतलो.
दादरला जाऊन आलो आणि दुसऱ्या दिवशीच म्हणजे १२ जानेवारीला अटल सेतूचे उदघाटन झाले. त्याचे कौतुक ऐकले, व्हिडीओ बघितले आणि लगेच १८ जानेवारीला अटल सेतू पाहायला गेलो.. जाताना वडाळ्याचे सुप्रसिद्ध विठ्ठल मंदिर पहिले. हे मंदिर ४०० वर्षांपेक्षा जास्त जुने आहे आणि ते ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखले जाते. जवळच असलेले सी.के.पी. राम मंदिर पाहिले. तेथूनच पुढे शिवडीवरून भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पूल असलेल्या अटलसेतूवरून जाताना खूप मजा आली. शिवडी ते पनवेल.. २० मिनिटांचा, १६ किलोमीटरचा विना अडथळा प्रवास. अथांग पसरलेल्या जलाशयावरून आपण जातोय ही कल्पनाच मोहवून टाकणारी होती. नॉन स्टॉप आणि मस्क्यासारख्या सुरेख अशा रस्त्यावरनं जाणारी गाडी… आजूबाजूला समुद्र बघताना मजा येते.
पनवेलला जेवलो, तेथील डी मार्ट मधून उगाचच किरकोळ खरेदी केली आणि डोंबिवलीला परतलो.
त्याच वर्षी ११ मार्चला underwater/undersea Tunnel चे उद्घाटन झाले. दोनच महिन्यात *२९ मे २०२४*ला या समुद्राखालील बोगद्यातून गेलो.
हाजी अली पाहून झाल्यावर, वरळी ते मरीन ड्राईव्ह १० किलोमीटरचा प्रवास undersea Tunnel मधून केला. अटलसेतूवरून जाताना खूप मजा आली होती.. याउलट समुद्राखालून जाताना मात्र अपेक्षित मजा जाणवली नाही. आपण फक्त आपल्या मनाची समजूत करून घेतो की आपण समुद्राखालून जात आहोत. प्रवासाचा वेळ वाचतो हे मात्र खरे आहे.
समुद्राखालील बोगद्यातून जात असताना मला “हनुमान विजय” सिनेमातील एक सीन आठवला … हा सिनेमा पाहण्यास आम्हाला शाळेतर्फे नेले होते. मी ६ / ७ वर्षांची होते. सिनेमात एका प्रसंगी रावणाचा भाऊ अहिरावण, प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांचे अपहरण करतो आणि देवीला बळी देण्यासाठी त्यांना पाताळलोकात घेऊन जातो. तिथल्या नागकन्या चंद्रसेनाचे रामावर प्रेम असते. रामाशी लग्न लावून देण्याच्या अटीवर ती हनुमानाला राम-लक्ष्मणाची सुटका करण्यास मदत करते. पण राम एकपत्नी असल्याने ते शक्य नसते. तेव्हा प्रभू रामचंद्र तिला वचन देतात की कृष्णावतारात मी तुझ्याशी लग्न करेन आणि तू माझी आवडती राणी सत्यभामा होशील”.
सिनेमातील हा सीन मला खूप आवडला होता. ‘पाताळलोक’ डोक्यात पक्का बसला होता. १५-२० मिनिटांचा हा सीन तपशीलवार माझ्या लक्षात आहे.
बोगद्यात असताना मी पाताळलोक शोधत होते. पण मला काही दिसला नाही !!.
बोगद्यातून बाहेर पडून लिबर्टी सिनेमा, पारसी डेअरी (कुल्फीसाठी प्रसिद्ध) मेट्रो सिनेमावरून क्रॉफर्ड मार्केटला गेलो. आंब्याचा सिझन संपत आला होता. तिथून आंबे घेतले. (माझे वडील १९९२ ला सेवानिवृत्त झाले. तो पर्यंत याच क्रॉफर्ड मार्केटहून घरच्यासाठी कधी भाजीपाला, तर कधी उत्तम प्रतीची फळफळावळ आणत असत), मार्केट समोरच बादशहा कोल्ड्रिंक हाउस … सदानंद हॉटेल (पूर्वीच्या काळातील एकमेव ग्रेड वन उडिपी हॉटेल), बाजूला स्टेशनरीचे होलसेल मार्केट असलेला, अब्दुल रेहमान स्ट्रीट, इलेक्ट्रिक उपकरणांचे मार्केट, लोहार चाळ व आसपासचा परिसर. बाजूला सरदार गृह — लोकमान्य टिळकांचे मुंबईतील उतरण्याचे ठिकाण.. आता अगदी जुनाट झालेली इमारत पण अद्याप ढाचा भक्कम आहे. लाकडी जीने आहेत. एकदम वरच्या मजल्यावर टिळक हॉल आहे. आता सरदारगृहात प्लास्टिकच्या फुलांचे व्यापारी आहेत.
तिथून येताना, चालत चालत जी.टी. हॉस्पिटल, त्यासमोरील पिकेट रोडचा दक्षिणाभिमुख मारुती, लघुवाद न्यायालय, जिथे अनेकदा शुटींग होते तो इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टिट्यूटचा जिना (कोर्टाच्या पायऱ्या म्हणून दोन ठिकाणी शुटींग होते. एक हे आणि दुसरे ठिकाण एशियाटिक सोसायटी.) पाहिले.
तिथून माझगावला गेलो. २०२३ मध्ये अजितने ‘ललित’ मासिकाच्या दिवाळी अंकासाठी, १८८६ सालच्या “वेषधारी पंजाबी” या पहिल्या मराठी रहस्यमय कादंबरीवर परिचयात्मक लेख लिहिला होता. त्या कादंबरीतील बहुतेक घटना दक्षिण मुंबईत घडतात. त्यात माझगावच्या नेस्बीट रोडवरील एका बंगल्याचा उल्लेख आहे. माझगावचे जीएसटी भवन (पूर्वीचे विक्रीकर कार्यालय) हे अजितचे कार्यालय, त्याच रस्त्यावर. तेथून गिरगावात येण्यासाठी तो ज्या बसथांब्यावर, उभा राहात असे, त्या समोरच्या पदपथापलीकडे मोठे आवार असलेला एका पारशी व्यक्तीचा जुन्या पद्धतीचा प्रशस्त आवार असलेला टुमदार बंगला होता. कादंबरीतील नेस्बीट रोडवरील बंगल्याचे वर्णन वाचल्यावर हाच बंगला असावा अशी त्याची खात्री आहे. तो बंगला आम्ही (बाहेरून) पाहिला.
तेथून पुढे जाताना मीनाकुमारीचे दफन केले होते ते अंजीर वाडी जवळचे कब्रस्तान बाहेरूनच पाहिले.
तिथून घरी परतलो.
*११ मे २०२४* (*रात्रीची मुंबई*)…
असं म्हणतात की मुंबई कधीच झोपत नाही. मुंबई ही रात्रंदिवस धावत असते / पळत असते, पण कधी थकत नाही. पण दिवसाची मुंबई आणि रात्रीची मुंबई ही मुंबईची दोन रूपे आहेत. अशी ही रात्रीची मुंबई पहायला आम्ही जेवून खाऊन रात्री दहाच्या सुमारास डोंबिवलीहून कारने निघालो. डोंबिवलीच्या माणकोली ब्रिजवरून आमची गाडी सुसाट निघाली. साधारण दीड तासात आम्ही मुंबईत पोहोचलो. मुद्दाम रात्रीच्या शांत समयी बेलार्ड इस्टेट परिसरात गेले (गडकरी सरांकडे ज्युनिअर असताना भारत पेट्रोलीयम बिल्डींगजवळ असलेल्या, कॉन्ट्रॅक्टर बिल्डींगमधील, सहकार न्यायालयाच्या ५ नंबरच्या कोर्टात मी अनेकदा गेले होते.) तेथून मंत्रालय, एल.आय.सी.ची इमारत, असे फिरत, फिरत मरीन ड्राईव्हवरील अॅम्बेसेडर हॉटेल, “कृष्णमहल” ( आठवते का !!! “वहाँ सुरैया भी हैं”, तिचा एक चाहता बरीच वर्षें सुरैयाच्या घरासमोरील कट्ट्यावर तिला पाहण्यासाठी बसून राहत असे) वरून पुढे नरीमन पॉइंटला पोहोचलो. कट्याच्या टोकाला जाण्याचा रस्ता काही कारणाने बंद होता. अजित खट्टू झाला. एकट्याने निवांत बसायला सर्वोत्तम ठिकाण असे त्याचे मत..
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलो तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते. पण तसे मुळीसुद्धा वाटत नव्हते. समुद्रकिनाऱ्यावर गर्दी होती. खाण्याच्या गाड्या लागल्या होत्या. लोक हिंडत होते आणि खात होते. समुद्रावर रात्रीची काळी छाया पसरली होती. त्यातच आजूबाजूच्या उंच, उंच इमारती, रस्त्यावरील दिव्यांचा झगझगीत प्रकाश त्या काळ्याभोर समुद्राच्या पाण्यावर उठून दिसत होता. Queen’s Neckless हे नाव अगदी सार्थ करणारा. हिऱ्यासारखा चमकणारा तो आजूबाजूच्या दिव्यांचा प्रकाश समुद्रकिनाऱ्यावर खरोखरच रत्नहाराप्रमाणे शोभून दिसत होता. तेथून वाळकेश्वर पर्यंत चक्कर टाकून डोंबिवलीकडे यायला निघालो. रात्रीच्या मुंबईचे एकंदरच कल्चरच निराळे. एकीकडे उंच, उंच इमारतीत रंगणाऱ्या पार्ट्या, दुसरीकडे डोंगरी, नागपाडा सारखी वस्ती, आणि तिसरीकडे गिरगाव परिसरातील मध्यमवर्गीय लोक.. सगळेच आपापल्या परीने आयुष्य जगत असतात. पहाटे ३ च्या सुमारास डोंबिवलीत परतलो.
येताना गोल देऊळ, नळबाजार, भेंडीबाजार, डोंगरी, कर्नाक बंदर, …
अजितचे माहिती देणे चालूच होते..
मुंबईला अनेकदा वेळेला जाऊन आलो होतो पण रात्रीची मुंबई पाहायचीच राहिली होती. रात्रीची (दक्षिण) मुंबई शांत आणि वेगळीच दिसते.
एकंदरच दिवसाची काय आणि रात्रीची मुंबई काय ! मुंबई फक्त वाचण्याचा किंवा लेखनाचा विषय नाहीये. तर तो अनुभवायचा विषय आहे. काही अनुभव हे शब्दांत मांडणे अवघड असते. ज्याला त्याला मुंबईबाबतचा अनुभव वेगळा येईल. कोणाला गर्दी, धावपळ आणि घामेजलेली मुंबई दिसेल, तर कोणाला सगळे जाती, धर्म, पंथ, श्रीमंत, गरीब, भेदभाव विसरून सर्वसमावेशक असलेली मुंबई दिसेल.
गाईड सोबत असला की त्या वास्तूंशी निगडीत आठवणी उलगडून सांगितल्यावर आनंद मिळतो. त्यामुळे मला दिवसाची आणि रात्रीची अशी मुंबईची दोन्ही रुप आवडली.
अजितच्या म्हणण्यानुसार गेटवे ऑफ इंडिया, म्युझियम, जुने विधान भवन व त्या आसपासचा परिसर, पाहायचा आहे.
वाळकेश्वर-बाणगंगा आणि गिरगाव परिसरातील अजून अनेक ठिकाणे पाहायची आहेत. उदा. सी.पी. टँक,खत्री लेन मधील विनय हॉटेलची मिसळ, भुलेश्वर, माधवबाग, पांजरापोळ, पायधुनी, सुरती हॉटेल मधील थाळी, पंजाबी घसीटारामची लस्सी आणि रबडी.
गिरगावात असताना अजितने पाहिलेल्या सिनेमांवर त्याने एक लेख लिहिला आहे. त्यात उल्लेखलेली सिनेमा थिएटर्स व तिथल्या आठवणी, शिवाय काळबादेवी रोड परिसर आणि काळबादेवी मंदिर (हे मंदिर त्या काळातील सामाजिक आणि राष्ट्रीय विचारांचे केंद्र होते, जिथे क्रांतिकारक एकत्र येत असत. चाफेकर बंधू येथे दर्शनासाठी येत.)
आणि बरेच काही..
*बघूया कधी योग येतोय ते*..
(समाप्त)
*©अॅड. क्रांती आठवले पाटणकर*
डोंबिवली.
9969087559
०९.१२.२०२५
(सदर लेखमाला माझ्या नावासह अग्रेषित करायला हरकत नाही.)
*(सदर लेख माझ्या फेसबुक वॉलवरही वाचण्यास उपलब्ध आहे)*
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
चित्रकारांचे दालन
– ©️ रामचंद्र देशमुख
संपर्क : ९९३०२४६९८९
प्रेषक मेघना घाटे
meghanaghate25@gmail.com
– ©️मिलिंद महाबळ
– ©️ युती प्रवीण अघोर
प्रेषक शुभदा प्रवीण अघोर
shubhadaaghor@gmail.com
महत्वाची सूचना – या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@
महत्त्वाची सूचना :- मैत्री अनुदिनी हे मुख्यत: मराठी साहित्याला वाहिलेलं आणि नवं-जुनं साहित्य प्रकाशित करणारं एक नियतकालिक आहे. ते आम्ही वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देत असतो. एखादा जुना लेख वा कविता वगैरे साहित्य पुनर्प्रकाशित करायचं असल्यास आम्ही सदर लेखकाची परवानगी घेण्याचा प्रयत्नही करत असतो. काही वेळा संपर्क होऊ शकत नाही. मात्र अशा प्रकारे पुनर्प्रकाशित केलेल्या साहित्यावर आम्ही न चुकता लेखकाचं नांव व ज्या पुस्तकातून वा मासिकातून ते घेतलं त्याचा नामनिर्देश करत असतो. कृपया आमची अडचण समजून सहकार्य करावं ही विनंती.
@@@@@@@@@@@@@@























































