बदलत्या काळाच्या गोष्टी

स्वागत फुलांनी

रांगोळ्या

रांगोळ्या -प्रज्ञा करंदीकर,

“दीपावली २०२५ विशेष” शुभारंभ ( क्रमांक १ ) 

परवाच्या गोष्टी

ही १९७० सालातील जून-जुलै महिन्यातील गोष्ट आहे.

“ साहेब, तुम्हाला अण्णांनी बोलवलंय “ बबननं मला दारातूनच सांगितलं आणि तो निघून गेला.
बबन हा उरूळी कांचनच्या निसर्गोपचार आश्रमातील एक सेवक होता आणि अण्णा म्हणजे दत्तोबा कांचन यांचा निरोप घेऊन तो आला होता. ते आश्रमाची शेती आणि गोशाळा विभाग बघत असत. त्यांनी मला लगेच यायला सांगितलं होतं.

मी सकाळचं गोशाळेतील काम उरकून खोलीवर आलो होतो आणि आंघोळ करून वर्तमानपत्र वाचत होतो. त्यामुळे दत्तोबांनी का बोलावलं असेल हा विचार मनात आला. मी लगेच तयार होऊन त्यांच्या कार्यालयाकडे गेलो. ते आतमधे उंचशा आसनावर लोडाला टेकून बसले होते.
“ या डॉक्टर “ म्हणत त्यांनी माझं स्वागत केलं. मी त्यांना नमस्कार केला.
“ यांना भेटा, “ दत्तोबा म्हणाले.
त्यांच्या समोर एक तरूण बसला होता. तसा मीही २३ वर्षांचा तरूणच होतो. पण तो ग्रामीण भागातला असला तरी  खाली पांढरा पायजमा आणि वर लांब बाह्यांचा पण परीटघडीचा सदरा घातलेला होता. दिसायला नीटस.
“ हे मोहिते-पाटील…” अण्णांनी नाव सांगितलं. “ अकलूजहून आले आहेत.” ते म्हणाले.

आमदार मोहिते-पाटील हे सहकाराच्या क्षेत्रात तेव्हा गाजलेलं नाव होतं. त्याच घरचा तरूण आलेला दिसत होता.
“ डॉक्टर, यांच्याकडे गाय माजावर आली आहे, तुम्ही यांच्या सोबत जा आणि तिला इनसेमिनेशन करून या.”
दत्तोबा म्हणाले.
“ गाडी आणली आहे..” तो तरूण मला उद्देशून म्हणाला. “ तुम्हाला नंतर परत पण आणून सोडू.”
एवढा खुलासा पुरेसा होता. मी लगेच होकार देऊन पुढच्या तयारीला लागलो.

इनसेमिनेशन म्हणजे आर्टिफिशियल इनसेमिनेशन हे ओघानंच आलं. त्यालाच ए आय म्हटलं जात असे आणि  त्या कृत्रिम वीर्यदानातून देशात संकरीत गाई निर्माण होऊन त्यांचे दूध उत्पादन वाढेल याची खात्री पटली होती. ए आय या शब्दाचा याहून वेगळा अर्थ निदान त्या काळी तरी आपल्याकडे कुणालाही माहीत नव्हता. असो.
पंधरा मिनिटांत मी निघण्यासाठी तयार झालो. फ्रोझन सीमेन म्हणजे गोठवलेल्या वीर्यनलिका आत टांगलेल्या अवस्थेत ठेवल्या जातील असा मध्यम आकाराचा लिक्विड नायट्रोजन भरलेला कंटेनर मी सोबत घेतला. इतर साहित्यही घेऊन मी निघण्यास तयार झालो. साडेनऊच्या सुमाराला ॲम्बॅसिडर गाडीतून आमचा प्रवास अकलूजच्या दिशेने सुरू झाला. जवळपास ९० किलोमीटरचा प्रवास होता आणि आम्हाला बोलण्यासाठी संकरीत गाई, ए आय, हेच विषय होते.

त्यावेळी पशु संवर्धन खात्यामार्फत कृत्रिम वीर्यदानाची केंद्रे सुरू असली तरी शेतकऱ्यांकडून विशेष प्रतिसाद नव्हता. दुसरं म्हणजे त्या कार्यक्रमात प्रक्रिया केलेल्या वीर्यमात्रा या बर्फ वापरून थर्मासमधून पुरवल्या जात असत. आणि या पार्श्वभूमीवर उरूळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमात विदेशातून उपलब्ध झालेल्या वीर्यमात्रा या गोठवलेल्या स्वरूपात असून त्या लिक्विड नायट्रोजन मधे उणे १९६ सेल्सिअस तपमानात ठेवलेल्या होत्या.

हे कसं काय घडून आलं ती गोष्टही उल्लेखनीय आहे. वास्तविक उरुळी कांचनच्या आश्रमात जातिवंत गीर गाईंचा कळप स्थापन करून वीस वर्षे उलटून गेली होती आणि या काळात तेथील काही गाईंना दैनिक दूध उत्पादनात अखिल भारतीय स्पर्धेत पुरस्कार मिळवले होते. शिवाय आश्रमाला “ गोपाळरत्न”  हा सन्मान मिळाला होता. अशा परिस्थितीत त्या आश्रमात कृत्रिम वीर्यदानासाठी फ्रोझन सीमेन आणि तेही विदेशी वळूंचं का उपलब्ध असावं हा प्रश्नच होता. त्याचं उत्तर असं की तेथील गीर गाईंमध्ये दूध उत्पादनाचे गुण वाढले तरी त्यांची पैदास करताना योग्य वळू मिळण्यातील अडचणी आणि त्यामुळे काही प्रमाणात अंतर्गत नातेसंबंधात (इन-ब्रीडिंग) होऊन वेळेवर गर्भधारणा न होणे यासारखे प्रजनन विषयक दोष निर्माण होऊन सरासरी भाकड काळ वाढल्यामुळे गोशाळेचं एकूण अर्थशास्त्र धोक्यात येत होतं. त्याचप्रमाणे कालवडी उशिरा वयात येणे हा दोषही होताच. तेव्हा हे सर्वच दोष दूर करण्यासाठी शेवटी तरणोपाय म्हणून गाईंच्या  विदेशी जातीतील गुण या कळपात आणावेत असा शुद्ध शास्त्रीय विचार करण्यात आला.

हा विचार ज्यांनी केला ते होते मणिभाई देसाई. आश्रम-गोशाळा त्यांनीच स्थापन केली होती. गीर जातीवर त्यांनीच भरपूर मेहनत घेतली होती. त्यांचा विचार अनुभवातून आला होता आणि तो वरवरचा नव्हता. त्याहून महत्वाचं म्हणजे हे प्रयत्न फक्त उरूळीकांचनपर्यंत न थांबता भारतातील लाखो गाईंमधे दूध उत्पादनाचे गुण आणि त्याचवेळी उत्तम प्रजननक्षमतेचे गुण अंतर्भूत व्हावेत यासाठी व्यापक प्रयत्न केले पाहिजेत हा त्यांचा विचारही अभ्यासातून पक्का झाला होता. त्यांनी ‘ भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठान ‘ या नावाची संस्था स्थापन करून होलस्टीन आणि जर्सी या दोन्ही विदेशी जातींच्या वळूंचे फ्रोझन सीमेन देणगी म्हणून विदेशातून मिळवले होते आणि उरूळी कांचनमधून बाहेर सेवा पुरवण्यास सुरुवात झाली होती.

आमचा प्रवास सुरू होता आणि आम्ही चर्चा पण करत होतो.
“ डॉक्टर, सिद्ध वळू म्हणजे काय हो ?” मला त्या युवा मोहिते-पाटलांनी उत्सुकतेने विचारलं.
“ प्रोजेनी टेस्टेड वळूला आपण इकडे सिद्ध वळू नाव दिलं आहे..” मी म्हणालो.

ही पण आणखी एक वेगळी गोष्ट होती. एव्हाना मणिभाई देसाई, त्यांचं भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठान याच बरोबर त्यांनी सिद्ध वळूंचं फ्रोझन सीमेन आणलं आहे ही माहिती सुद्धा दूरवर जाऊन पोचल्याने सिद्ध वळूबद्दल कमालीची उत्सुकता होती. मणिभाईंनी केलेला हा खरोखर एक स्तुत्य विचार होता. याआधी कुणी त्यासंबंधी ऐकलं नव्हतं. मी सुद्धा पशुवैद्यक शास्त्राच्या पदवी परीक्षेत असल्या विषयावर फक्त उत्तरं लिहिली होती. तेव्हा पासून केवळ वर्षभरात आता प्रोजेनी टेस्टेड वळूंच्या फ्रोझन सीमेनच्या मात्रा लिक्विड नायट्रोजनच्या कन्टेनरमधे  घेऊन मी कृत्रिम वीर्यदान करण्यासाठी जात होतो हाच मोठा योग होता.
“ पण तरीही सिद्ध म्हणजे नक्की काय ?” त्यांनी मला विचारलं.
मग मी खुलासेवार उत्तर दिलं की, पूर्वीपासून वळू निवडताना त्याच्या आईनं दूध किती दिलं याचाच विचार करण्याची पद्धत आहे, पण त्याऐवजी वळू पासून ज्या कालवडी जन्माला येतात त्यांच्या दुधाचं मोजमाप करून  जेव्हा वळूची गुणवत्ता ठरवली जाते तेव्हा त्याला “प्रोजेनी टेस्टेड’ वळू म्हणतात.

ही गोष्ट सोप्या भाषेत सांगायची तर मुळात चांगल्या कुळात जन्मलेले वळू तरूण असतात तेव्हाच त्यांच्यापासून तयार केलेल्या वीर्यमात्रा अनेक ठिकाणी उपयोगात आणून प्रत्येकापासून किमान वीस पंचवीस  किंवा शक्य तितक्या अधिक कालवडी जन्माला येतील अशी व्यवस्था केली जाते. त्या चौदा महिन्याच्या होईपर्यंत वयात येतात आणि गाभण राहून दोन वर्षाच्या होताना दूध पण देऊ लागतात. त्या पहिल्या वेतात किती दूध देतात याचं मोजमाप होतं. एका वेतात किती दिवस, दिलेलं एकूण दूध, त्याचा उच्चांक, एकूण  किती किलो लोणी, किती किलो प्रोटीन मिळालं हे कळून येतं. याच प्रकारे दुसऱ्या वेताची आकडेवारी मिळते. मग दूध देण्यातील सातत्य, कालवडींची  शारीरिक ठेवण, बळकट खूर आणि पाय अशी माहिती विचारात घेऊन कोणत्या वळूच्या कालवडी सर्वोत्तम ठरतात त्यावरून त्या वळूची सिद्धता ठरवली जाते. या सिद्धतेसाठी चार पाच वर्षे जातात पण एकदा सिद्ध झाल्यावर त्या वळूचा उपयोग हजारो गाई गाभण करण्यासाठी केला जातो. सांख्यिकीचा योग्य उपयोग करून उत्तमोत्तम गायी जन्माला घातल्याने दुधाच्या धंद्याचं अर्थशास्त्र बदलून जातं, पिढी दरपिढी विकास होत जातो म्हणून सिद्ध वळूचा उपयोग करणं महत्त्वाचं ठरतं अशी माहिती मी  पुरवली.

अशी चर्चा होत आमचा प्रवास संपला आणि आम्ही अकलूजला  त्यांच्या बंगल्यावर जाऊन पोचलो. चहा घेऊन ताजेतवाने झाल्यावर आम्ही लगेच मागील बाजूला असलेल्या गोठ्याकडे गेलो तेव्हा त्यांच्याकडे बरीच जनावरे ठेवलेली दिसली. गडी माणसं होती आणि जनावराला उपचार करताना बंदिस्त करण्यासाठी खोडा पण होता. मग मला माजावर आलेली गाय दाखवण्यात आली. मी तिला खोड्यात घेण्याकरता सांगून आधी  तपासणी केली आणि मग कृत्रिम वीर्यदान करण्याची तयारी केली. सगळं साहित्य माझ्याकडे होतंच. मला फक्त थोड्या कोमट पाण्याची गरज होती ती त्यांनी पूर्ण केली. फारतर दहा मिनिटात मी काम उरकलं आणि मोकळा झालो. आता काम असं उरलं नव्हतं. तरी त्यांनी मला भोजनासाठी आग्रह केला म्हणून मी थांबलो. काही वेळानं भोजन झालं आणि नंतर थोडी विश्रांती पण मला घेता आली. दीड एक तासानंतर मी परत यायला निघालो. मी आलो होतो त्याच ॲम्बॅसिडर गाडीनं त्यांनी माझी परत जाण्याची सोय केली. ‘ तुम्हाला सोडायला येऊ काय ‘ असा प्रश्नही त्यांनी केला पण ते प्रशस्त झालं नसतं आणि तशी आवश्यकता अजिबात नव्हती. मी ९० किलो मीटर प्रवास करून उरूळी कांचनला परतलो. गाईवर एक कृत्रिम वीर्यदान करण्यासाठी एक ॲम्बॅसिडर गाडी त्या दिवशी ३६० किलोमीटर धावली ही गोष्ट माझ्या मनावर कायमची ठसली. पण देशी गाईपासून संकरीत वासरी मिळवण्यासाठी विदेशातून आलेलं फ्रोझन सीमेन वापरण्याचं महत्त्व मोहिते-पाटलांना कळलं होतं ही गोष्ट पण अधोरेखित झाली. तरीही प्रतिष्ठानतर्फे ही सेवा त्यांच्या भागात अद्याप सुरू झाली नव्हती कारण साधने कमी असल्याने अकलूजचा समावेश दुसऱ्या टप्प्यात केला जाणार होता.

मणिभाई देसाई यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठानाशी अनेक मातब्बर मंडळी जोडली गेली होती. त्यात यशवंतराव चव्हाण, अण्णासाहेब पी. शिंदे, वसंतराव नाईक, इ. नेते आणि योगेन्द्र मफतलाल यांच्यासारखे उद्योगपती होते. केंद्रातील कृषिमंत्री सी. सुब्रमण्यम यांची साथ होती. राज्यातील मंत्री पी. के. सावंत, मधुकरराव चौधरी हे पण समविचारी होते. फलस्वरूप मणिभाईंना या उपक्रमासाठी विदेशातून हरतऱ्हेची मदत देणगी रूपाने मिळवता आली. मिल्क मार्केटिंग बोर्ड (इंग्लंड), अमेरिकन ब्रीडर्स असोसिएशन, टास्मानिया ब्रीडर्स असोसिएशन (ऑस्ट्रेलिया), डॅनिडा (डेनमार्क), स्कॉटिश चर्च मिशन या संस्थांनी हजारोंच्या संख्येने गोठवलेल्या वीर्यमात्रा, त्याही सिद्ध वळूंच्या, पुरवल्या. त्यासोबत लागणाऱ्या साहित्याचे संच आणि निदान दहा बारा ठिकाणी केंद्रे स्थापन होतील यासाठी लागणारे लिक्विड नायट्रोजनचे कंटेनर पुरवले. यासाठी लागणारा लिक्विड नायट्रोजन मुंबईतील नोसिल आणि इंडियन ऑक्सिजन या कंपन्यांनी सवलतीच्या दराने पुरवणे मान्य केले. ही केंद्रे चालवण्यासाठी सुरूवातीस लागणारे बारा पशुवैद्यकीय अधिकारी मणिभाईंच्या प्रतिष्ठानाने नेमून प्रशिक्षित केले होते त्यातील एक मी होतो.

अशा रीतीने एक सर्वसमावेशक व्यवस्था निर्माण करण्यात मणिभाई यशस्वी झाले होते. तरीही सदर योजना राबवण्यासाठी काही माध्यमे आवश्यक होती. यातील पहिले माध्यम म्हणजे उरूळी कांचनच्या गोशाळेप्रमाणे असलेल्या इतर गोशाळा होत्या. त्यापैकी आदर्श दुग्धालय मालाड, मुंबई गोसंरक्षक मंडळी कांदिवली, पंचवटी पांजरपोळ नाशिक आणि अहमदनगर पांजरपोळ या संस्थांनी उरूळी कांचनच्या मार्गाने जाण्यासाठी केंद्रस्थापनेची मागणी केली. पण याहून महत्वाची गोष्ट म्हणजे ही योजना हजारो शेतकऱ्यांच्या दारात नेण्यासाठी एखादी आयती व्यवस्था असेल तर ती आदर्श ठरणार होती. त्या दृष्टीने सहकारी साखर कारखान्यांशी बोलणी करण्यात आली. त्यांच्या हजारो सभासदांना संकरित गाई पाळून दुधाचा जोडधंदा करणे शक्य होते. त्यांना दुभती जनावरे पुरवण्याऐवजी त्यांच्याकडील देशी गाईपासून संकरीत वासरी मिळवणे हा मार्ग सोपा होता. दुसरा फायदा असा की, कारखान्याला पुरवलेल्या उसाची रक्कम मिळण्यासाठी काही महिने  वाट पहावी लागली तरी दूध विक्रीतून ठराविक मुदतीत मिळणारा पैसा हाती खेळता राहून आपल्या कार्यक्षेत्रात समांतर अर्थव्यवस्था निर्माण होऊ शकेल हा विचार पटण्यासारखा होता. त्यानुसार दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जाऊन कृत्रिम वीर्यदान सेवा पुरवण्यासाठी  केंद्र स्थापन करण्यास अनेक सहकारी साखर कारखाने तयार झाले. यात प्रवरानगर, श्रीरामपूर, कोपरगाव येथील साखर कारखाने आघाडीवर राहिले आणि तेथे केंद्रे सुरू होऊन शेतकऱ्यांचा प्रतिसाद उत्तरोत्तर वाढतच गेला. अशा रीतीने गोसंकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवण्यास सुरुवात झाली. वर्ष १९७०.

– ©️ मुकुंद नवरे
mnaware@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

स्वागत फुलांनी –  बहावा 

  – सविता कांबळे 

savitak211@gmail.com

 ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

विचारशलाका 

(४८) 

Human use, population and technology have reached that certain stage whwre mother earth no longer accepts our presence with silence.

The XIV Dalai Lama

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

दाम यमक


दाम यमक म्हणजे कवितेमध्ये, कवितेच्या एका चरणाचा शेवट दुसऱ्या चरणाच्या सुरुवातीला येणाऱ्या शब्दांच्या किंवा अक्षरांच्या आवाजाशी जुळणे. यामध्ये एका ओळीतील शेवटचा शब्द पुढच्या ओळीच्या सुरुवातीच्या शब्दाशी ध्वनीमध्ये जुळतो, ज्यामुळे कवितेत एक प्रकारचा सांधा तयार होतो.

उदाहरण:
एका चरणाचा शेवट एका शब्दाने झाला आणि पुढच्या चरणाचा आरंभ त्याच शब्दाने किंवा त्याच ध्वनीच्या दुसऱ्या शब्दाने झाला, तर त्याला दाम यमक म्हणतात.

स्पष्टीकरण:
दाम: याचा अर्थ माळ किंवा दावे (गुंफण) असा होतो, जिथे एका गोष्टीचा शेवट होऊन दुसरी गोष्ट जोडली जाते.
यमक: म्हणजे समान ध्वनी असणे.
त्यामुळे, दाम यमक म्हणजे कवितेतील एका ओळीचा शेवट दुसऱ्या ओळीच्या सुरुवातीला असलेल्या शब्दाशी जोडणाऱ्या समान ध्वनीची पुनरावृत्ती.

ह्या दाम यमकाचा नेमका शोध कुणी लावला ते नक्की कळत नाही. परंतु समर्थ रामदास ह्यांनी त्यांच्या बऱ्याच अभंगात ह्याचा उपयोग केला आहे. उदाहरणार्थ , एक अभंग सोबत पाठवत आहे.

दाम यमक -रामदासांचा अभंग

@@@@@@

दाम यमकातील  माझी काव्यरचना

१)

अंगापूरी डोही गवसली साजिरी श्रीराम *मूर्ती*
*मूर्ती* स नेण्या विरोध केला ग्रामस्थांनी *अती*
*अती* विरोधापायी समर्थांनी ठेविली तेथेच *मूर्ती*
*मूर्ती* नेण्याची ग्रामस्थांना त्यांनी केली *विनंती*

*विनंती* समर्थांची मान्य करण्या,कोणास *झेपेना*
*झेपेना* मूर्ती उचलणे, एकासही ती *उचलेना*
*उचलेना* बघताच ध्यानी आली, तयांना *चूक*
*चूक* सुधारण्या तयांनी घातला समर्था *दंडवत*

*दंडवत* घालून म्हटलं, न्या तुम्ही मूर्ती *चाफळास*
*चाफळास* उत्सवी एक मान द्या, तुम्ही *आम्हास*
*आम्हास* बिनीची काठी उचलण्याचा मिळो *मान* ,
*मान* हा जपण्या दक्ष राहू, जाणा तुम्ही हे *श्रीमान*

*श्रीमान* म्हणजे समर्थांनी तयांपुढे तुकविली *मान*
*मान* हा त्यांना देऊन राखला त्यांचा तो *सन्मान*
*सन्मान* हा अजूनही चालत आहे तो *वर्षानुवर्षे*
*वर्षानुवर्षे* चाफळी काठी उचलती, अंगापूरी हर्षे ll

–  ©️ माधव मनोहर जोशी.
madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आणखी एक (अज्ञात ) केशवसुत

– पृष्ठ ५६ –

– प्रेषक माधव मनोहर जोशी 

madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

संस्कृत सुभाषितांचा मराठी भावानुवाद 

[ ६३ ] 

 संस्कृत सुभाषित–

शरदि न वर्षति गर्जति ,
वर्षति वर्षासु नि:स्वनो मेघ:
नीचो वदती न कुरुते,
न वदति सुजन: करॊत्येव

मराठी भावानुवाद —

मेघ गर्जती शरदामध्ये , पाऊस ना पडतो
वर्षा ऋतूत गर्जनेविना पाऊस कोसळतो
कार्य न करता क्षुद्रजीव नुसताच बडबडतो
न बोलता सज्जन माणूस कार्यमग्न राहतो

– ©️ माधव मनोहर जोशी.

madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

दशावतारातील पहिला अवतार

—— *मत्स्यावतार* ——–

सत्य युगामधे l राजा सत्यव्रत l
त्यालाच म्हणत l राजा मनु ll१ll
मनुने नदीत l करताना स्नान l
मत्स्य एक सान l देखियेला ll२ll
राजाने मत्स्याला l उचलोनी वेगे l
कमंडलू मधे l ठेवियले ll३ll
बघता बघता l मत्स्य झाला मोठा l
कमंडलू छोटा l पडू लागे ll४ll
म्हणून राजाने l मत्स्या उचलले l
आणि सोडियले l जलाशयी ll५ll
तेथेही तो मत्स्य l होऊ लागे मोठा l
जलाशय छोटा l पडू लागे ll६ll
हे सारे पाहून l राजाने मत्स्याला l
सागरी सोडला l प्रेम भावे ll७ll
सागरी असता l मत्स्य वाढू लागे l
अतीवशा वेगे l भराभर ll८ll
मग त्या मत्स्याने l सागरी असता l
सांगितली कथा l सत्यव्रता ll९ll
मत्स्याने कथिले l होईल प्रलय l
सृष्टीचा विलय l होणे आहे ll१०ll
पुढे तो म्हणला l मीच नारायण l
करण्या रक्षण l प्रकटलो ll११ll
राजा हा झालेला l पाहूनी उदास l
विष्णू म्हणे त्यास l धीर धर ll१२ll
ह्या जलप्रलयी l तू हे जाण खास l
होणे सर्वनाश l हे अटळ ll१३ll
महत्त्वाचे काम l राजा तू हे कर l
आता लवकर l लाग कामा ll१४ll
विविधसे जीव l तैसेच बियाणे l
सारे जमविणे l सुरू कर ll१५ll
बांध एक नौका l त्यात ठेव सारे l
नको विसरू रे l हे काहीच ll१६ll
होताच प्रलय l मी तेथे येईन l
तुम्हा वाचवीन l सगळ्यांना ll१७ll
तद्नंतर रोज l मत्स्याचा आकार l
वाढला तो फार l अवाढव्य ll१८ll
अखेरीस झाला l भीषण प्रलय l
विष्णुरुपी मत्स्य l सज्ज झाला ll१९ll
विष्णू अवतार l त्वरित धावला l
तारिले नौकेला l माथ्यावर ll२०ll
प्रलय संपता l नौकेतील नग l
वापरून जग l निर्मियेले ll२१ll
नवीन सृष्टीचा l जन्म झाला मग l
नवीन ते जग l अस्तित्वले ll२२ll
विष्णूचा पहिला l हाच अवतार l
त्याचे उपकार l जगावर ll२३ll
माधव हा म्हणे l धर्मा येता ग्लानी l
विष्णू ह्या भुवनी l अवतरे ll२४ll

 

[ चित्र गुगलवरून साभार ]

[ पूर्वप्रसिद्धी ‘सज्जनगड’ मासिकाचा ऑक्टोबर २०२५ चा अंक ]

– ©️ माधव मनोहर जोशी.
madvac1979@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आजची कविता 

तुझ्या माझ्यात कृष्णा
कुठलं रे अंतर
तुझ्या ओठी मी
माझ्या ओठी तूच निरंतर

दरवळलेला सदैव
मनी भक्तिचाच धूप
वेणूतला भूपस्वर
तुझ्या प्रत्येक प्रेमरुप

साद वेणूची येता कानी
निर्झर  लागती  झरु
धेनूलाही  फुटे पान्हा
दुडक्या चाली धावे वासरु

कातळ ही होतो माती
निळी तेवता ज्योत
अंतरी त्याच्या तुझाच
निळा वाहता स्त्रोत

प्रज्ञा करंदीकर
बंगळुरु
स.१०ः००
दि.२०/५/२०२५

– ©️ प्रज्ञा करंदीकर,
बंगळुरु

pradnyakarandikar85@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

*दशावतार*

आज मुंबई पुण्यात ज्याचा बोलबाला आहे तो दशावतार नावाचा सिनेमा पाहिलात का.? 

हा सिनेमा म्हणजे आधुनिक किचकवध आहे.

पुराणाचा संदर्भ वापरून आजच्या नक्षलवादाचे अप्रत्यक्ष समर्थन करायचा हा प्रयत्न आहे, असं आमचे डावे आणि उजवे देखील मित्र म्हणताहेत.

हा सिनेमा मोदी आणि त्यांचे गडकरी यांसारखे विकासवादी चेले यांच्या कारवायांविरोधात केलेले धीट सिनेमॅटिक स्टेटमेंट आहे असं देखील काहींना वाटतं.

एक सत्य मात्र निर्विवाद आहे.
दशावतार हे निमित्त आहे.
या निर्मितीमधून निर्मात्याला बरंच काही मांडायचे आहे.
हा काही दशावतार या लोककलेचा परिचय करून देणार डॉक्युमेंट्रीवजा प्रयत्न नाही.
इंटरव्हलपर्यंत तो तसा आहेच.

इंटरव्हल नंतर दशावतारी प्रकार गुंडाळला जातो. आणि हा सिनेमा सरकारी अत्याचार, जनहितविरोधी सुधारणा यांच्या विरोधात , काहीसा अस्पष्टपणे आणि तरीही धीटपणे उभा राहतो.
त्यासाठी तो पुराणकथांचे सोंग घेतो आहे हे आपल्याला हळूहळू कळून येते.
स्पष्टपणे सांगायचे तर हा सिनेमा पंतप्रधानांच्या सध्याच्या राजवटीविरोधी आहे. त्या भूमिकेतून
या सिनेमावर शासकीय बंदी देखील येऊ शकते.

तसा. कुणाचा विचार असेल तर, सिनेमाला त्यातून आलेल्या संदेशाला गप्प करायचे दोन मार्ग सरकारकडे आहेत. पारितोषिकांचा वर्षाव करून निर्मात्याला गुदमरून टाकायचं, नाहीतर सिनेमाच्या प्रदर्शनाला बंदी घालायची.
दुसरा पर्याय अव्यवहार्य आहे कारण मराठी प्रेक्षकांनी हा सिनेमा कायच्या काय उचलून धरला आहे. आणि बंदीने तो अधिक गाजेल अशी शक्यता अधिक आहे.
खरं तर —-
या सिनेमात नवीन काय आहे.?
दुष्टांचे विमोचन हा तसा सिनेमावाल्यांचा आवडता पारंपरिक विषय आहे. शोलेचं काल परवाचं उदाहरण आहे. गब्बरसिंगचा सिनेमातला शेवट आठवा.
गब्बरचा तो अंतिम बहुचर्चित सीन बालचित्रपटातला भासावा अशाप्रकारचे खलनायकांचे शेवट दशावतार सिनेमात पाहायला मिळतात.

इथे खलनायक म्हणजे आजची व्यवस्था आहे आणि ती अस्तित्वात आणणारी, अमलात आणणारी नोकरशाही आहे.
सरकार आणि ही व्यवस्था आपणच स्वीकारली आहे आणि बहुमतांनी निवडून दिली आहे हे आता जुने झाले. आता त्यावर देखील शंका घेतल्या जात आहेत.

असो.
कंतारा नावाचा एक दाक्षिणात्य सिनेमा जवळजवळ याच विषयावर होता. दक्षिणात्य भडक शैलीत, सामाजिक अन्याय अत्याचार आणि त्यातून झालेला सामाजिक छळ वगैरे या सिनेमात मांडलं गेलं होतं. दशावतारमध्ये हे नाही असं नाही. खरं तर दशावतार अशा सादरीकरणात कंताराचा बाप शोभावा असा आहे. हिंसेच्या भडक सादरीकरणाला सोकावलेल्या आजच्या मराठी प्रेक्षकांना देखील तो मानवेल की नाही शंका होती. पण तो चांगल्यापैकी मानवलेला दिसतो.

हा सिनेमा आणि हाच विषय सादरीकरणातील बटबटीतपणा टाळून कोणी मांडला असता तर तो बेनेगली आर्ट फिल्म म्हणून गणला गेला असता. थोडीफार पुरस्कारीय प्रतिष्ठा मिळाली असती आणि एका लहान वर्तुळात तो फिरत राहिला असता.

दशावताराला आज मिळणारा प्रतिसाद चकित करून सोडणारा आहे. कथेला पौराणिक डूब देण्याचं चातुर्य दिग्दर्शकाने दाखवल्यामुळे ही हिंसा प्रेक्षकांनी सहज स्वीकारली असावी.

शहरी समाजाला कोंकण, त्याची निसर्गसृष्टी कोंकणी भाषा याचं एक सुप्त आकर्षण आहेच. आधुनिकीकरणाने त्या भूमिचं निसर्गसौंदर्य.आणि तिथली संस्कृती नष्ट होऊ नये असं या समाजाला वाटत असतं.

असो. सिनेमाला मिळालेल्या अफाट लोकप्रियतेमुळे लोकसंगीतासारखा लोकचित्रपट म्हणून एक नवा प्रकार आपल्या संस्कृतीत रुळू पाहतो आहे की काय असं वाटायला लागलं आहे.

Oooooo

 – अवधूत परळकर 
awdhooot@rediffmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

री-युनियन

नमस्कार. मी, मुकुल कर्नाटकी,  बी ई (टेलिकॉम्युनिकेशन) ही माझी पदवी. १९६२ मध्ये पुण्यात घडलेल्या पानशेत धरणफुटीच्या हाहाकारानंतर कॉलेजिस पुनः सुरू झाली तेव्हा मी सीओईपीमध्ये प्रवेश घेतला होता. छोट्या शहरातल्या खासगी सायन्स कॉलेजातून प्री डिग्री आणि प्री प्रोफेशनल ह्या दोन परिक्षा चांगल्या मार्कांनी पास झाल्यानंतर मला प्रतिष्ठित सीओईपीमध्ये, म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे  इथे प्रवेश मिळाला त्यामुळे हरखून गेलो होतो. पण सायन्स कॉलेजातला सहज केलेला अभ्यास आणि इंजिनियरिंग कॉलेजातल्या पहिल्या वर्षातला (एफ इ) पाठीचा कणा मोडेल असा अभ्यास यातल्या फरकाचा अंदाज आला नाही मला आणि चक्क नापास झालो त्या वर्षी. पण नेटाने प्रयत्न करत राहिलो. पुढल्या वर्षापासून न चुकता दर वर्षी पास होत गेलो आणि १९६६मध्ये कॉलेजातून बी ई (टेलिकॉम) ही पदवी मिळवून बाहेर पडलो. तीन वर्षांच्या कोर्स साठी चार वर्षं का असं तुम्ही विचारायच्या आधीच स्पष्ट करतो. मी मघाशी मी सांगितलं ना, पहिल्याच वर्षात एकदा फेल झालो होतो. वाईट? वाटलं होतं ना, माझ्या घरच्यांना आणि मलादेखील ! पण  तेव्हासुद्धा आत्तासारखी “उसमे क्या है? थिस इज नॉट द एंड ऑफ द  वर्ल्ड!” ही गुर्मी होती बरं का आमच्यात. पास झालो दुसऱ्या प्रयत्नात, तेही वुइथ डिस्टिंक्शन! मग पुढची सारी वर्षं चांगल्या मार्कांनी पास होत  गेलो.

 त्यानंतर एम ई वगैरे करण्याच्या फंदात पडलो नाही. यालाही कारण आहे. तेव्हा नुसत्या बी. ई. पदवीधर इंजिनियरलासुध्दा नोकरी मिळणं अवघड नव्हतं आतासारखं. कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट झालो. जर्मन इलेक्ट्रॉनिक्सच्या मुंबईतल्या फॅक्टरीमध्ये जॉबची ऑफर मिळाली. पगार चांगला होता. वर्षभरात जर्मनीला जायची संधीही मिळणार होती. अर्थातच मी ती स्वीकारली. तातडीनं जॉइन झालो.

हे २००६ साल आहे. चाळीस वर्षं हा खूप मोठा काळ आहे आज प्रथमच मी कॉलेजच्या माजी विद्यार्थी संमेलनात सहभागी झालो आहे. सन १९६६-६७ च्या बॅचचं हे री-युनियन. जवळजवळ  पन्नासएक माजी विद्यार्थी सहभागी झाले आहेत. पण मला दोघातिघांशिवाय माझ्या वेळचे, माझ्या टेलिकॉम बॅचचे  जास्त कोणी विद्यार्थी आज इथं आले असल्याचं दिसत नाही. सुभाष पटवर्धन आणि अनिल भालेराव हे माझे  जिगरी दोस्त तेव्हढे आले आहेत. बाकी कुणी नाही. साहजिक आहे. काळाचं इतक्या मोठ्या अवधीतलं भ्रमणचक्र कुणाला कुठं घेऊन गेलं असेल याचा विचार करणं बरोबर होणार नाही. कुणी कार्यबाहुल्यामुळं आले नसतील, कुणी नोकरीधंद्यामुळं परदेशी गेले असतील, कुणी कदाचित परलोकीही गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही हा माझा निगेटिव्ह आउट लुक आहे असं म्हणाल. मान्य आहे मला. पण ती शक्यता मी तरी नाकारू शकणार नाही. ते राहू द्या. सी ओ ई पी मधल्या ६२ ते ६६ या चार वर्षांच्या कालखंडातील माझ्या सगळ्याच आठवणींचा धांडोळा  मी इथं घेत बसणार नाही. पण काही ठळक घटना मात्र सांगायच्या आहेत तुम्हाला.

त्यापैकी काही घटनांचे तुमच्यापैकी काहीजण साक्षीदार आहातच. आठवत असेलच ना? थोडं तरी? काय, सुभाष? आणि अनिल तुला रे? नीलिमा मॅडमला तुम्ही दोघंही विसरू शकणारच नाही. खरंय ना? कॉलेज लायब्ररीयन नीलिमा चौबळ तुमची फ्लेमच होती तेव्हा. अरे, आता कसला संकोच करताय कबूल करायला. त्यातून बाजी मी मारली होती म्हणून चेष्टा करायचात तुम्ही माझी. असूया तर वाटत असणारच तुम्हाला. पण दोस्त होतात तुम्ही माझे. नीलिमानं मला निवडलंय याची खात्री झाल्यावर तुम्ही ॲक्सेप्ट केलं होतं ते खुल्या दिलानं. थँक्स म्हणतो मी आता तेव्हासाठी.

“नाटक्या (हे माझ्या कर्नाटकी या नावाचं मित्रमंडळीतलं ‘लाडकं’ रूप), अरे काय करणार ॲक्सेप्ट न करून? बोटक्लबवर तुम्हा दोघांचं रोइंग बघितल्यावर तर माघार घेणंच पत्करलं मी. हा सुभ्या होता माझ्याबरोबर तेव्हा. विचार त्याला.” अन्या, त्या वर्षीचा मॅगेझिन कमिटीचा सेक्रेटरी अनिल भालेराव  खिदळत म्हणाला.

“जरा गप रे अन्या, खिंकाळू नकोस असा. अरे भरूचा सरांच्या गायडन्समध्ये नीलिमा बोटिंग सफाईनं करायची, त्यामुळंच स्टाफ मेंबर असूनही तिला परवानगी होती. अगदी कनू बोटही सफाईनं वल्हवायची हेही तुला माहित होतंच न?” प्रचंड जाड भिंगाचा चष्मा बहुतेक जन्मल्यापासूनच घालत असलेल्या सुभ्यानं (सुभाष पटवर्धन) अन्याला झापलं. “बोल नाटक्या, तू पुढं बोल.”

“नीलिमा आणि मी, दोघंही प्रेमात होतो तेव्हा. दोघांना चैन पडायचं नाही एकमेकांना भेटल्या बोलल्याशिवाय. माझा तर लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्सचा वेळ सोडून बाकी सारा वेळ लायब्ररीतच जायचा. त्यातला किती वाचण्यात आणि किती ती काय करते ते बघण्यात ते मलाही कळायचं नाही. इतर वेळीही आम्ही मॉडर्न कॅफे, गुडलक, पी सी एच ह्या ‘देवळां’मध्ये बराच वेळ घालवायचो. बऱ्याचदा माझे खिसे खाली असायचे तेव्हा. पण नीलिमा खर्च करायची. आमच्या दोघांच्याही घरच्यांना हे आमचं प्रेमप्रकरण माहीत नव्हतं. मी बी ई क्लियर केल्यानंतवर सांगायचं असं दोघांनीही ठरवलं होतं.  तिचं घर पुण्यातच शिवाजीनगरमध्ये होतं आणि मी बेळगावचा हे तुम्हाला माहीत आहेच.”

“अबे, तुझी डेक्कन क्वीन शिवाजीनगर स्टेशनातच आडकले, कधी पोचणार मुंबईला? पुढचं सांग झटपट.” एव्हर रेस्टलेस अन्या बोललाच.

 “आपला बी ई चा रिझल्ट लागला आणि लगेच कॅम्पस इंटरव्ह्यू सुरू झाले. तुम्ही दोघांनी एम ई करायचं ठरवलंय असं म्हणालात. केलंत की नाही मला माहीत नाही. माझी घरची परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती त्यामुळं पुढचं शिक्षण परवडणार नव्हतं. मी इंटरव्ह्यू दिला आणि जी ई एल् मध्ये सिलेक्ट झालो. ऑफर मिळाली आणि मी ती स्वीकारली. त्याच दिवशी संध्याकाळी नीलिमा आणि मी हे माझं यश सेलिब्रेट करायला कॅम्पमधल्या एक्सेलसीयर थिएटरमध्ये चालू असलेली ‘माय फेअर लेडी’ फिल्म बघायला गेलो. मला आणि नीलिमालाही फिल्म खूप आवडली. त्यानंतर आम्ही कॅम्पमध्येच जेवलो आणि ‘माय फियर लेडी – नीलिमा’ म्हणाली, “मुकुल, चल बंडगार्डन मध्ये थोडा वेळ बसून मग माझ्या घरी जाऊ. माझ्या आईला भेट. आज आपण तिला कल्पना देऊया.” मी तिला म्हटलं, ‘नीली, आज नको. अजून थोडे दिवस जाउ देत. मला जॉबसाठी मुंबईला जायचं आहे. तिथं नीट सेटल होऊ दे. मग एखाद्या वीकएंडला मी येईन तेव्हा भेटतो. तोपर्यंत तुला हवं तर तू कल्पना दे आईला.”

नीलिमा थोडी हिरमुसल्यासारखी झाली पण तिनं मान्य केलं.

दोन तीन दिवसांनी मी सारी आवराआवर करून मुंबईला गेलो. जी ई एल् चं ऑफिस वरळीला होतं पण फॅक्टरी शिवडीला. सुरुवातीचे काही दिवस मला दोन्हीकडे जायला लागायचं. पंधरा दिवसांनंतर मला फॅक्टरी पासून जवळच असलेल्या कंपनीच्या क्वार्टर्स मध्ये बॅचलर म्हणून तीन इंजिनीयर्समध्ये कॉमन अॅकॉमोडेशन मिळालं. काम सुरू झालं. सोनी, सॅन्यो यांना टक्कर देईल असा ट्रान्सिस्टर कम टेपप्लेयर, रेकॉर्डर डेव्हलप करत होती कंपनी. काम इंटरेस्टिंग होतं आणि चॅलेंजिंग देखील. मी हळूहळू कामात बुडून गेलो. नीलिमाशी पत्रव्यवहार सुरू होता. आतासारखे मोबाइल फोन नव्हते तेव्हा. क्वचित एखाद्या वेळी मी कॉलेज लायब्ररीतल्या फोनवर कॉल करायचो. कनेक्शन मिळायची मोठी मेटाकुटी असायची. पण लागलं म्हणजे बोलायचो.  तेव्हढंच संभाषण. नीलिमाला इनसिक्युअर वाटायला लागलं होतं की काय माहीत नाही पण घायकुतीला आल्यासारखी सारखी म्हणायची, “मुकुल, किती दिवस अजून? मी आईला कल्पना दिली आहे. थोडी नाखुषीनंच पण तिनं मान्य केलंय. तिची तब्येत बरी नसते हल्ली त्यामुळं ती सारखी लवकर लग्न करून टाका अशी घाई करायला लागली आहे.” मी मौन बाळगायचो.

“म? करायचंस की लग्न. नोकरी लागली होती. चांगलं कमवायला लागला होतास. काय अडचण होती?” यावेळी अन्यानं नाही, सुभ्यानं शेरा मारला.

 “अडचणी होत्या रे. माझ्यापेक्षा मोठ्या दोन भावांची लग्नं झाली नव्हती. त्यांच्या आधी माझं लग्न करायला घरी नक्कीच विरोध झाला असता. आम्ही पाठोपाठची भावंडं. जेमतेम दीड दोन वर्षांच्या अंतरातली.  आणि मी ग्रॅज्युएट झालो तेव्हा फक्त २२/२३ वर्षांचा होतो. ते  काय लग्नबंधनात अडकायचं वय होतं का? नीलिमा माझ्यापेक्षा एक वर्षांनी मोठी होती. तिचं लग्नाचं वय होत होतं म्हणून तिच्या आईला घाई झाली होती. पण आणखी दोन वर्षं गेली असती तरी काही बिघडलं नसतं. तोपर्यंत माझ्या मोठ्या भावांची लग्नं झाली असती. आणि मीदेखील लग्नासाठी राईप एज चा झालो असतो.”

“नाटक्या, बेटया, प्रेम करताना कुठं गेलं होतं रे हे तुझं शहाणपण? अं?” अन्यानं मला झापलं पण मी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं.

“मी सारी परिस्थिती सांगून कशी तरी तिची समजूत काढत गेलो. वीकएंडसना  मी पुण्याला जायचो आणि आम्ही भेटायचो. ती नाही कधी येऊ शकली मुंबईला. आईची काळजी घ्यायला ती एकटीच होती घरात. त्यामुळं. पुढं हळूहळू काम वाढलं तशा माझ्या पुण्याच्या खेपा कमी कमी होत गेल्या. आणि त्यात एक दिवस मला एक वर्षासाठी जर्मनीला जायला सांगण्यात आलं. त्यानंतरच्या वीकएंडला मी नीलिमाच्या घरी गेलो. तिच्या आईचा हात हातात घेतला आणि सांगितलं, “काळजी करू नका नीलिमाची. मी आहे. जर्मनीहून परत येईन तेव्हा आम्ही लग्न करणार आहोत.” पण त्यांचा चेहरा निर्विकार राहिला. त्यांची आकलन शक्ती संपलेली होती बहुधा.  त्या भेटीनंतर मी डुसेलडॉर्फ साठी रवाना झालो. तीन महिने होईपर्यंत नीलिमाशी मधुमधून संपर्क होत राहिला आणि नंतर अचानक तो पूर्णपणे थांबला. मला काहीच कळेना. खूप चौकशा केल्या. बऱ्याच प्रयत्नांनंतर कॉलेजमधल्या तिच्या सहकाऱ्यांकडून  समजलं  की नीलिमाची आई वारली आणि सारे सोपस्कार झाल्यानंतर अचानक नीलिमानं नोकरीवर यायचं थांबवलं. तिचं घर बंद आहे. ती कुठं गेली याचा पत्ता लागत नाही. मला हा शॉकच  होता. परंतु मध्येच भारतात परत येणं शक्यच नव्हतं. आता बोलायला कससंच वाटतंय, पण हळूहळू नीलिमाची आठवण कमी कमी होत गेली. म्हणतात ना काळ जसजसा पुढं सरकतो तसतसा दु:खं विसरायला लावत असतो. मुदत पूर्ण झाल्यानंतर मी मुंबईला परतलो. पुण्याला नीलिमा रहायची त्या घरी गेलो. पण आता तिथं दुसरंच कुणी रहात होतं. त्याना काहीच कल्पना नव्हती. बेळगावला माझ्या घरी जाऊन सगळ्याना भेटून आलो. दोन्ही भावांची लग्नं ठरली होती. यथावकाश तीही झाली. आता मला पुन्हा नीलिमाची प्रकर्षानं आठवण यायला लागली. ‘कुठं असेल ती? तिला सांगायला हवं की आता आपला मार्ग मोकळा झाला आहे आणि आपण लग्न करू. आणि आईला दिलेला शब्द खरा करू.’ पण ह्या साऱ्या गोष्टी मनातच दाबून ठेवाव्या लागल्या. जे ई एल् फॅक्टरीच्या कॅम्पमध्ये आता मला एकट्याला स्वतंत्र क्वार्टर मिळाली होती. त्यामुळं कामानंतर कोणी आजूबाजूला नसताना मिळणारा मोकळा वेळ खायला उठायचा.

 मी नीलिमाला अखेरचा भेटून डुसेलडॉर्फला गेलो त्याला दोन वर्षं होत आली होती. दोनच दिवस  राहिले होते आणि मला तिची पुन्हा तीव्रतेनं आठवण झाली. मनात आलं ‘आपण गुन्हेगार आहोत. तिचा शोध घेण्यात कमी पडलो आहोत. आपल्यापासून अशी कायमसाठी दूर रहाणं पत्करणाऱ्यातली नव्हती नीलिमा.  ती असणार आहे. कुठंतरी नक्की असणार आहे आणि आपल्याला जशी तिची आठवण येते आहे तशीच तिलादेखील येत असणार आहे. आपण पुन्हा नव्यानं तिचा शोध घ्यायला हवा.’

 मी दुसऱ्या दिवशी फॅक्टरीत तातडीच्या रजेचा अर्ज दिला आणि पुण्याला आलो.”

 सुभाष अधीरतेनं म्हणाला, “नाटक्या, मग? भेटली का ? काय झालं ? गाढवा  लवकर सांग ना. उगाच पिळत बसू नकोस. भेटली का? लग्न केलंत का तुम्ही दोघांनी?” अनिलच्या चेहऱ्यावरही हीच सारी प्रश्नचिन्हं होती.

 “दोस्तानो. थॅंक्स. नीलिमा मला भेटेल का, कशी, केव्हा ह्याबद्दल मी जितका उत्सुक होतो त्यापेक्षा जास्त तुम्ही उत्सुक दिसताय क्लायमॅक्स ऐकायला ! चलता है……… भेटली……..लग्न केलं नाही आम्ही दोघांनी. बस्स?

 ‘मग?’  दोघांनीही एकदमच प्रश्न केला.

“आम्ही लग्न केलं नाही पण एकत्र राहतो आता. तिच्या नव्या घरात.”

 “नाटक्या, लेका, लिव्ह इन रिलेशनशिप? भारीच निघालात की रे.”

“ठीक आहे. तोंडं बंद ठेवता आता? पुढचं सांगू?……….पुण्याला आल्यानंतर थोडं हलकं वाटलं मला. कसा कुणास ठाऊक, पण मनावरचा बोझ थोडा कमी झाल्यासारखं वाटलं.  मनात आलं, आपण कॉलेजच्या बोट क्लबवर जाऊन बसू थोडा वेळ. नीलिमा आणि मी बसत असू तसे. संध्याकाळ झालेली होती. पावसाचे दिवस होते. मुळा नदी तुडुंब भरून वहात होती, वेगात. जशी काही तिला घाई होती पुढं जाऊन मुठा नदीला संगम पुलाखाली भेटायची. लायब्ररी बिल्डिंगच्या शेजारूनंच बोटक्ललबवर जायची वाट होती.  बोटींचे रॅक्स  होते त्या शेडमध्ये जाऊन बसलो नदीच्या प्रवाहाकडं बघत, नीलिमाबरोबरचे दिवस आठवत. हळूहळू अंधार झाला. आता निघूया परत हॉटेलवर जायला म्हणून उठणार इतक्यात कानावर हाक ऐकू आली, ‘मुकुल’. आवाज तोच, मुलायम रेशमासारखा!…….नीलिमाचा. मी अवाक्  होऊन बघत राहिलो. लायब्ररीकडून येत होती नीलिमा. नीलिमाच होती नक्की. चेहऱ्यात थोडा फरक झालेला जाणवत होता. फिकुटला होता. पण आवाज तोच. जवळ आली, थोडं अंतर राखून उभी राहिली. म्हणाली,

“किती उशीर केलास रे यायला. किती वर्षं वाट बघते आहे मी तुझी.”

“पण नीली, होतीस कुठं तू? किती वर्षं मी शोधतोय तुला. तुझ्या घरीही जाऊन आलो पण तू ते घर सोडून गायब झाली होतीस असं कानावर आलं.”

“हो रे. आई गेल्यावर मला तिथं रहावसं वाटेना. तुझंही येण्याचं काही चिन्ह दिसत नव्हतं. मग मी ती जागा सोडली आणि नव्या घरात आले.”

 “लायब्ररीतला जॉब? सोडलास?”

“जॉब सोडला, पण येऊन बसते मी तिथं रोज. आता माझ्या जागी नवीन लायब्ररीयन आला आहे. तो बसतो माझ्या खुर्चीवर. पण मी तिथंच असते. तू बसायचास, माझ्याकडं डोळे लावून, त्या खुर्चीवर डोळे लावून मी असते. आत्ताही तिथूनच आले मी. घरी जायची वेळ झाली म्हणून. चल, घरी जाऊया,  तिथं निवांत बसून बोलू.”

“चल” मी म्हणालो आणि तिच्या मागोमाग निघालो. मंत्रमुग्ध झाल्यासारखा.

 तिच्या मागोमागच नदीच्या पात्रात शिरलो.

 किती वेळानं की दिवसानं, नाही माहीत. वर आलो तेव्हा खूप हलकं वाटत होतं. इकडेतिकडे नजर फिरवली तेव्हा मला शरीर दिसलं, उताणं पाण्यावर तरंगत असलेलं, माझंच, माझ्याशिवाय!”

** ** **

** ** **

** ** **

मी बोलायचा थांबलो.

बसलेल्या धक्क्यातनं पहिल्यांदा सावध झाला तो अन्या.

 “नाटक्या, साल्या, भारी ! लई  भारी विणलंस ! सुसाट सुटलास ! अरे, कॉलेजात असताना आपल्या मॅगेझिनसाठी ही लिहून दिली असतीस माझ्याकडं तर लेका स्टोरीसाठीचं पहिलं बक्षिससुध्दा देववलं असतं तेव्हाच्या आपल्या गॅदरिंगच्या चीफ गेस्टच्या हस्ते. काय प्लॉट आहे! काय प्लॉट आहे! फस्सक्लास!”

सुभाष गंभीर होता. म्हणाला, “अन्या, ह्याच्या ष्टोरीत काहीतरी लोच्या आहे. बॉडी तर पुराच्या पाण्यात वाहून गेली असणार. इतक्या वर्षांनंतर तर तिचा मागमूसही लागणार नाही. मग हा नाटक्या आपल्यासमोर मूर्तीमंत उभा आहे हे कसं काय?”

 उत्तर मीच दिलं. “मी जिच्यात आहे ती ही बॉडी तुम्हाला माहीत असलेल्या मुकुलची नाहीये. मी आणि नीलिमा कधीकधी वर येतो. एके काळच्या आपल्या जगात काय चाललंय ते बघायला म्हणून. कुठं तरी एखादं शरीर मिळतं तेव्हा शिरतो त्याच्यात. आता माझंच घ्या. फरक तर दिसला असेलच तुम्हाला चेहऱ्यात. पण चाळीस वर्षांच्या कालावधीत फरक तर पडणारच. म्हणून तुम्ही अॅक्सेप्ट केलंत मला. त्यासाठीच तर मी सुरुवातीलाच ‘मी मुकुल कर्नाटकी’ अशी ओळख करून दिली होती.

“नाटक्या, पण तू सांगतोयस त्यावर विश्वास बसत नाही माझा. असा दुसऱ्याच्या बॉडीत शिरायचं  हा प्रकार काही खरा वाटत नाही?” शंकासुर अन्या बोलला. उत्तर सुभ्यानंच दिलं मी तोंड उघडायच्या आधी.

“अन्या, लेका ‘पहेली’ सिनेमा बघायला गेलो होतो तेव्हा……शारूखखान दुसऱ्याच्या बॉडीत शिरला ते बघून खच्चून शिट्ट्या मारल्या होत्यास की रे. खान करेल ते पॉसिबल आणि नाटक्या करेल तर ते   इम्पॉसिबल? गप बस जरा. नाटक्यावर विश्वास ठेव. खोटं नाही बोलणार तो.”

 मी गडगडून हसलो आणि म्हणालो, “बरं चला. वेळ झालाय. निघायला पाहिजे मला. नीलिमा वाट बघत असेल. कदाचित येईलसुध्दा बोलवायला.” माझं वाक्य पुरं व्हायच्या आत  हाक ऐकू आली, “मुकुल, झाली ना मित्रांची भेट ? चल आता घरी, फार वेळ झाला.” आणि पाठोपाठ नीलिमा येऊन उभी राहिली.

अन्या आणि सुभ्या आ वासून बघत राहिले. तेवढ्यात नीलिमानं माझा हात धरला आणि आम्ही दोघंही पाण्यात शिरलो, शरीरं पाण्यावर तरंगत ठेवून.

*****              

– @ मुकुंद कर्णिक  

karnik.mukund@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

सं ध्या   शां ता रा म

 

ए मालिक तेरे बंदे हम ‘ हे अजरामर गीत जोपर्यंत कुठेही ऐकलं जाईल, पाहिलं जाईल तोपर्यंत संध्या शांताराम या अभिनेत्रीचं नाव जगभर विसरलं जाणार नाही. १९५७ साली प्रदर्शित झालेल्या शांतारामबापूंच्या ‘ दो आंखे बारह हाथ ‘ या चित्रपटाने अनेक पुरस्कार मिळवले असतील, विक्रम नोंदवले असतील पण त्या चित्रपटातील हे गीत म्हणजे एक परमोच्च बिंदू असून त्या चित्रपटाचा महान संदेश होय. हे भरत व्यास यांचं गीत, वसंत देसाई यांचं संगीत, लता मंगेशकर यांचा आवाज आणि संध्या शांताराम या अभिनेत्रीचा अभिनय या सर्वांचा प्रभाव एवढा जबरदस्त की, हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा हे गीत संपेपर्यंत एकही प्रेक्षक थिएटरच्या बाहेर न पडता डोळ्यातील अश्रूंना वाट करून देत असे यात अतिशयोक्ती नाही. दिग्दर्शक निर्माता म्हणून शांतारामबापूंची ही कलाकृती यासाठी अमर म्हटली पाहिजे.

ज्या काळात मुलांनी जास्त सिनेमे पाहू नयेत हा संकेत घरी पाळला जात असे त्या काळी मी दहा वर्षाचा असताना हा चित्रपट दोनदा पाहिला होता. एकदा वडिलांनीच आम्हा मुलांना तो दाखवला आणि नंतर उन्हाळ्याच्या सुटीत मी मावशीकडे पुण्याला गेलो असताना तिच्या यजमानांनी तोच चित्रपट पाहण्यासाठी मला थिएटरचं तिकिट काढून दिलं होतं. मी दोनदा पाहिलेला तो पहिला चित्रपट, पण दोन्ही वेळा मी तो सारख्याच तन्मयतेने पाहिला. त्यातील ‘ सैया झूठों का बडा सरताज निकला ‘ हे एक गावठी वाद्य वाजवत गात जाणारी संध्या मला भावली, ‘ मै गाऊ तू चुप होजा ‘ हे अंगाई गीत गात मुलांना झोपवणाऱ्या संध्येने माझ्यावर जादू केली आणि ‘ ए मालिक तेरे बंदे हम ‘ हे शेवटचं गीत गातेवेळी तिच्या कपाळावरील फिस्कटलेलं कुंकू, तिच्या डोळ्यातले अश्रू आणि ज्यांची हृदये दगडाची वाटावीत अशा त्या सहा कैद्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून मी स्वत:ही रडलो हे सांगायला काहीही हरकत नाही.

आपण मागोवा घेतला तर १९५१ साली आलेला शांतारामबापूंचा मराठी चित्रपट ‘ अमर भूपाळी ‘ हा देखील ‘ घनश्याम सुंदरा श्रीधरा ‘ या भूपाळीने जेवढा गाजला तेवढाच त्यातील ‘ लटपट लटपट तुझं चालणं गं मोठ्या नखऱ्याचं..’ या लावणीमुळे गाजला होता. त्यातील ही दोन्ही गीते आजही लोकप्रिय असून मराठी चित्रपटांच्या इतिहासात नेहमी नोंदवली जातील अशी आहेत. या गीतांना संगीत वसंत देसाई यांचेच आणि पडद्यावर आपण पाहतो ती अभिनेत्री संध्या हीच असावी हा योगायोग म्हणता येत नाही. कारण शांतारामबापूंनी शोध घेऊन या अभिनेत्रीला  चित्रपटात आणले आणि पुढेही अनेक चित्रपटात प्रमुख भूमिका दिल्या हा इतिहास आहे.

‘ दो आंखे बारह हाथ ‘ शिवाय   ‘ झनक झनक पायल बाजे ‘(१९५५),, ‘ नवरंग ‘ (१९५९), या चित्रपटात संध्याने भूमिका केल्या. यांतील गीते आणि त्यावरील शास्त्रीय नृत्ये गोपीकृष्ण आणि संध्या या जोडीने अजरामर केली. या नृत्यांसाठी संध्याला अपार मेहनत घ्यावी लागली आणि नेहमी यासाठी तयारी असणे हा तिचा गुण असल्याने आपण तिला भूमिका देतो, असं स्वत: शांतारामबापूंनी एकदा म्हटल्याचं माझ्या वाचनात आलं आहे . यातील ‘ झनक झनक पायल बाजे ‘ या चित्रपटातील गीते हसरत जयपुरी यांची तर संगीत वसंत देसाई यांचं होतं आणि त्यातील ‘ नैन सो नैन नाही मिलाओ ‘ हे हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील गीत खूप गाजलं. त्याचप्रमाणे ‘ नवरंग ‘ चित्रपटातील ‘ आधा है चंद्रमा रात आधी ‘ आणि ‘ अरे जा रे हट नटखट ‘ या  महेन्द्र कपूर आणि आशा भोसले यांनी म्हटलेल्या गीतांवरील नृत्याला गोपीकृष्ण आणि संध्या यांनी पुरेपूर न्याय दिला, ती गीते भरत व्यास यांनी लिहिलेली तर संगीत सी. रामचंद्र यांचं होतं. असाच एक शांतारामबापूंचा ‘ स्त्री ‘ हा चित्रपट १९६१ साली प्रदर्शित झाला त्यात संध्याने शकुंतलेच्या भूमिकेत रंग भरला. त्यातील ‘ ओ निर्दयी प्रीतम ‘ हे भरत व्यास यांनी लिहिलेलं आणि सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेलं लता मंगेशकर यांच्या आवाजातलील गीत मला अप्रतिम वाटलं होतं.

१९७१ मधे प्रदर्शित झालेला आणि मराठी जगतात अत्यंत गाजलेला शांतारामबापूंचा  ‘ पिंजरा ‘ हा  चित्रपट संध्या यांच्या अभिनयाने आणि एकाहून एक सुंदर अशा लावणी नृत्यांमुळे इतका गाजलेला आहे की ज्यांनी तो पाहिला त्यांच्या स्मरणातून कधीही जाणार नाही. यातील श्रीराम लागू यांच्या सोबत भूमिका आणि तोडीस तोड अभिनय करताना संध्या शांताराम कुठेही कमी पडत नाहीत. विशेष म्हणजे जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या, राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि उषा मंगेशकर यांनी ठसकेदार आवाजात गायलेल्या एकाहून एक सरस लावण्यांवर नृत्य करून संध्याबाईंनी आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर जी उंची गाठली आहे तिला तोड नाही हे कुणीही मान्य करेल. यांतील ‘ दे रे कान्हा चोळी अन लुगडी ‘ ही एकच लावणी लता मंगेशकर यांच्या आवाजात तर ‘ दिसला ग बाई दिसला ‘, ‘ छबीदार छबी ‘, ‘ मला लागली कुणाची उचकी ‘, नका सोडून जाऊ रंगमहाल ‘ आणि ‘ इश्काची इंगळी डसली ‘ या सर्व लावण्या उषा मंगेशकर यांच्या होत्या. या चित्रपटाने जे काय विक्रम नोंदवले आहेत त्यांत संध्या शांताराम यांचा वाटा मोठा आहे आणि यासाठी त्या लोकांच्या कायम स्मरणात राहतील यात शंका नाही.

अशा या गुणी अभिनेत्रीने वयाच्या ९३ व्या वर्षी ४ ऑक्टोबर २०२५ या दिवशी जगाचा निरोप घेतला. त्यांना श्रद्धांजली वाहताना गदिमा यांच्या शब्दात सांगायचं तर, ज्योतीने तेजाची आरती व्हावी असं यश संध्या यांनी आपल्या स्वत:च्या योगदानातून शांतारामबापूंना मिळवून दिलं असं मी म्हणेन. या जोडीला प्रणाम.

मुकुंद नवरे
mnaware@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

अनुभव 

मी आहे पक्का मुंबईकर. जन्मल्यापासून ७० वर्षे मी मुंबईचा रहिवासी आहे. तथापि गेली काही वर्ष मी  हरियाणामध्ये गुरुग्राम येथे असतो.
माझी धाकटी मुलगी आणि जावई येथे राहतात. मला या शहरात यायला आवडतंही आणि कधी नकोही वाटतं.
आवडायची कारणं आता काही सांगत नाही पण न आवडण्याची कारणं बरीच आहेत …….
त्यापैकी एक या ठिकाणी आवर्जून सांगणार आहे.
कारण विषयच तसा गंभीर आहे.

पाळीव कुत्रा हा भांडणाचा विषय होऊ शकतो, पण भांडण विकोपाला गेल्यानंतर हरियाणात काय होतं ,  ते तुम्हाला मला सांगणं आवश्यक वाटतं. मी त्याचा साक्षीदार आहे ……

शब्दाने शब्द वाढतो, मग शिवीगाळ होते, आईबापाचा उद्धार होतो,  धक्काबुक्की होते आणि अखेरीस पिस्तुलबाजी. .आता जरा तपशिलात जाऊया.

नव्याने वसलेल्या आमच्या कॉलनीच नाव आहे ‘मरीना’ .
 या ठिकाणी ११ उंच इमारती आहेत . सुखवस्तु आणि जरा जास्तच पैसे कमावलेली माणसं इथे राहतात . विचित्र स्वभावाचे अनेक नमुने इथे पाहायला मिळतात.

अनेक घरात पाळलेला कुत्रा आहे . कुत्र्यांच्या बाबतीत सोसायटीने कडक नियम केलेले आहेत आणि ते नोटीस बोर्डवर वाचायला मिळतात तथापि नियम झुगारून या ठिकाणी सर्व काही चालतं…..
बगीचाला खेटून असलेल्या टॉवरमध्ये पहिल्या मजल्यावर आम्ही राहतो. घराच्या बाल्कनीतून संपूर्ण बगीचा पाहायला मिळतो, आणि तो एक विरंगुळा होतो.

 सकाळी आठच्या दरम्यान मी बाल्कनीत उभा होतो आणि एक अति विशाल महिला तिच्या पाळलेल्या कुत्र्याला घेऊन बागेत आली.
तिचा गुबगुबीत तगडा कुत्रा तिला ओढत होता आणि ती त्याच्या मागे धावत होती  .

“नो डियर नो डियर, धिस इज टू मच ! डोन्ट पुल मी लाईक धिस “असं  ती कुत्र्याला सांगत होती .
मला ते दृश्य पहावत नव्हतं .

एका विचित्र क्षणी त्या कुत्र्याचा पट्टा सैल झाला आणि तो मोकळेपणाने धावत सुटला.  तिथेच बगीच्यामध्ये बलदेव सिंग वॉक घेत होते त्यांच्या अंगावर धावला आणि मांडीला जोरात चावला …….

नावाप्रमाणे तगडे असलेले बलदेव, जबरदस्त किंचाळत त्यांच्या तळमजल्यावरील घराकडे धावले. काही क्षणात ते घरातून बाहेर पडले. त्यांच्या हातात गावठी पिस्तूल होतं …..
ते बगीच्यात आले आणि कुत्र्यावर त्यांनी दोन गोळ्या झाडल्या.  अतिशय व्याकूळ आवाज करत तो तगडा कुत्रा तिथे गतप्राण झाला…..

हे विदारक दृश्य कुत्र्याच्या मालकिणीला, रचना तनेजाला पहावलं नाही…. तिरीमिरित धावत सुटली आणि तिने बलदेवना जोरात ढकललं……
पाठीमागे असलेल्या सदाफुलीच्या झुडपावर ते पडले आणि मग त्या गरम डोक्याच्या सरदाराला संताप अनावर झाला……

बाजूला पडलेलं गावठी पिस्तूल त्यांनी हातात घेतलं आणि रचनाच्या दिशेने गोळी झाडली….. तिच्या उजव्या मांडीत गोळी घुसली आणि महाप्रचंड किंचाळत ती गवतावर आडवी झाली ……

एव्हाना सोसायटीतली बरीच माणसं जमा झाली. जो ज्याला जमेल ते सुचेल ते करीत होता.

काही तरुणांनी बलदेवना उचललं आणि रस्ता पार करून समोरच असलेल्या सेवाभाव हॉस्पिटलमध्ये अपघात विभागात नेलं.
समोरच्या टॉवरमध्ये डॉक्टर अवंतिका राहत होत्या.
त्या खाली आल्या आणि त्यांनी तत्काळ काही महिलांच्या मदतीने सेवाभाव हॉस्पिटलमध्येच रचनाला दाखल केलं .

दरम्यान कोणीतरी बादशहापूर पोलीस चौकीला फोन केला आणि तत्परतेने एका जीपमध्ये बसून चार कॉन्स्टेबल घटनास्थळी दाखल झाले……

कुत्र्याचा अंत्यविधी पोलिसांच्या परवानगीने काही उत्साही तरुणांनी दूरवर जाऊन एका शेतात केला.
झाल्या प्रकाराने सर्व सोसायटी हादरली आहे . कुत्रे फिरवणारे एकदमच अबोल झाले आहेत .

आता पोलिसांची क्राईम ब्रँच पुरावे गोळा करत आहे आणि लवकरच हे सगळं प्रकरण कोर्टात जाणार आहे .
कोर्टाने काय निर्णय दिला  हे यथावकाश कळेल……

–   मोहन कान्हेरे
 29 कृष्णा , शास्त्रीहॉल , ग्रांट रोड , मुंबई  400007

mohankanhere@yahoo.in. 

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

   क्रिकेट सामन्यांमधील आधुनिक तंत्रज्ञान : ‘दृष्टीपलीकडील सृष्टी’

आज क्रिकेट सामने पाहताना आपण टीव्हीवर अनेक प्रकारची आकर्षक आकडेवारी पाहतो. गोलंदाजाचा वेग, फलंदाजाच्या फटक्यानंतर चेंडू किती उंच गेला, किती अंतर गेला, बॉल जमिनीवर पडण्याआधी कुठे गेला, कॅच घेताना किती वेगाने चेंडू खाली आला वगैरे. ही आकडेवारी फक्त मनोरंजनासाठी नसते; ती खेळाडूंच्या कामगिरीचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि प्रेक्षकांना अधिक माहितीपूर्ण अनुभव देण्यासाठी वापरली जाते.

त्यामुळे सगळेच प्रेक्षक आज ‘पंच’ बनले आहेत आहेत आणि पंचांना बहुतेकवेळा हवेत ‘खिडकी’ करायचे काम करायला लागते आहे. असो. पण त्याचबरोबर क्रिकेटच काय पण सर्वच खेळातील तांत्रिक बारकावे आज शाळेतल्या मुला-मुलींनाही अवगत झाले आहेत आणि खेळाडूही आपले तंत्र आणि कौशल्य सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा मुबलक वापर करताना दिसत आहेत.

पण हे सगळं कसं ‘मोजलं’ आणि ‘दाखवलं’ जातं? त्याचे तंत्र काय आहे? चला, हे समजून घेऊया.

गोलंदाजाच्या चेंडूचा वेग मोजण्यासाठी – रडार गन

जेव्हा एखादा गोलंदाज चेंडू टाकतो, तेव्हा त्याचा वेग रडार गन (Radar Gun) नावाच्या यंत्राद्वारे मोजला जातो.
हे तंत्रज्ञान पोलिसांकडे वाहनांचा वेग मोजण्यासाठी असलेल्या यंत्रासारखेच असते. गोलंदाज जेव्हा चेंडू फेकतो, तेव्हा रडार गन त्या चेंडूकडे सूक्ष्म रेडिओ तरंग (radio waves) पाठवते. चेंडू त्या तरंगांना परत परावर्तित करतो. चेंडूचा वेग जितका जास्त, तितका परावर्तित तरंगांचा फरक जास्त. या फरकावरून संगणक लगेच चेंडूचा नेमका वेग (उदा. ७५ किमी/तास) मोजतो.

 

सामान्यतः हा आकडा टीव्हीवर गोलंदाजाने टाकलेला चेंडू कॅमेऱ्यात दिसत असतानाच झटपट दिसतो. ही ‘स्पीड गन’ प्रेक्षकांसाठी जितकी रंजक आणि उद्बोधक, तितकीच प्रशिक्षकांसाठीही महत्त्वाची असते कारण त्यावरून गोलंदाजाच्या शारीरिक स्थितीचा अंदाज येतो आणि काय सुधारणा करायला पाहिजे ते समजते.

चेंडूचा मार्ग (Trajectory) दाखवणं – हॉकआय (Hawk-Eye) प्रणाली
हॉक-आय म्हणजे खेळातील ‘डोळ्यांपलीकडचं’ तंत्रज्ञान, जे मानवी नजरेने न दिसणाऱ्या क्षणांना अचूकपणे पकडतं, विश्लेषण करतं आणि खेळ अधिक पारदर्शक, रोमांचक आणि न्याय्य बनवतं.

हॉक-आय तंत्रज्ञान चेंडूचा प्रवास कसा पकडते?
१. अनेक हाय-स्पीड कॅमेरे:



हॉक-आयमध्ये ६ ते १० अतिवेगवान कॅमेरे नियोजनपूर्वक स्टेडियमच्या छताखाली लावलेले असतात. हे कॅमेरे गोलंदाजाचा टप्पा, पिच आणि चेंडू हवेत कसा जातो, हे वेगवेगळ्या कोनांतून टिपतात.

२. त्रिकोणी मोजमाप (Triangulation):

 

प्रत्येक कॅमेरा त्या त्या क्षणी चेंडू कुठे आहे हे ओळखतो. दोन किंवा अधिक कॅमेऱ्यांच्या दृश्यांमधील चेंडूची स्थिती तुलना करून प्रणाली त्याचे अचूक त्रिमितीय (3D) स्थान मोजते.

३. चेंडूचा प्रवास पुन्हा उभारणे (Path reconstruction):

 

हे मोजमाप दर सेकंदाला अनेक वेळा केले जाते. त्यामुळे प्रणालीला चेंडूचा संपूर्ण प्रवास, त्याचा वेग, दिशा, उंची, उडी, आणि स्विंग किंवा स्पिनसारखे बदल अचूकपणे समजतात.

४. पुढील प्रवासाचा अंदाज (Trajectory prediction):

चेंडूच्या प्रत्यक्ष हालचालीवर आधारित भौतिकशास्त्राच्या सूत्रांचा वापर करून सॉफ्टवेअर अंदाज लावते की, पुढे चेंडू कुठे गेला असता, उदाहरणार्थ, फलंदाजाच्या बॅट किंवा पॅडला लागल्यानंतर तो स्टंप्सला लागला असता का.

हॉक-आयमधून मिळणारी गोलंदाज आणि चेंडूविषयक माहिती
गोलंदाजाची क्रिया (Bowler’s action):

चेंडूचा वेग: चेंडू गोलंदाजाच्या हातातून सुटल्याच्या क्षणापासून त्याचा अचूक वेग मोजला जातो.
लाइन आणि लेंग्थ: हॉक-आय पिच मॅप तयार करते, ज्यातून प्रत्येक चेंडू नेमका कुठे पडला हे दिसते. त्यामुळे गोलंदाजाची अचूकता, सातत्य आणि बदल स्पष्ट होतात.

 

स्विंग/टर्न: DeSpin सारख्या दृश्यांद्वारे चेंडू पिच झाल्यानंतर किती वळला हे दाखवले जाते, त्यामुळे वेगवान गोलंदाजाचा स्विंग किंवा फिरकी गोलंदाजाचा टर्न समजतो.

चेंडूविषयक आकडेवारी (Ball details and statistics):
Wagon Wheel (वॅगन व्हील):



 फलंदाजाने कोणत्या दिशांनी किती धावा केल्या हे दाखवण्यासाठी हॉक-आय प्रत्येक फटका झाल्यानंतर चेंडूचा मार्ग नोंदवते.
Beehive (बीहाइव्ह):



प्रत्येक चेंडू फलंदाजाजवळून कोणत्या मार्गाने गेला हे दाखवणारा आलेख . यावरून गोलंदाजाची रणनीती आणि फलंदाजाच्या ताकदी-कमकुवत्या समजतात.
• जैव-यांत्रिक विश्लेषण (Biomechanical analysis): अधिक हाय-स्पीड कॅमेऱ्यांच्या मदतीने गोलंदाजाच्या शरीराच्या हालचालींचे सखोल विश्लेषणही कोचिंगसाठी केले जाते.

फटक्याची उंची आणि अंतर मोजण्यासाठी – बॉल ट्रॅकिंग आणि सेन्सर्स
जेव्हा एखादा फलंदाज जोरदार फटका मारतो, तेव्हा आपण स्क्रीनवर पाहतो, अंतर: ७४ मीटर किंवा उंची: ३२ मीटर. हे कसं मोजतात?



यासाठी दोन गोष्टी वापरल्या जातात:
(अ) उच्चगती कॅमेरे (high-speed cameras)
(ब) संगणक सॉफ्टवेअर

कॅमेरे चेंडूचा प्रवास सेकंदाला शेकडो फ्रेम्समध्ये पकडतात. प्रत्येक फ्रेममधील चेंडूचा स्थानबिंदू (location point) संगणकात नोंदवला जातो. या सर्व बिंदूंवरून सॉफ्टवेअर त्रिमितीय वक्र तयार करते. त्या वक्रावरूनच गणिती पद्धतीने चेंडूने घेतलेली जास्तीत जास्त उंची आणि एकूण प्रवास केलेलं अंतर मोजलं जातं. काही सामन्यांमध्ये चेंडूंत सूक्ष्म सेन्सर चिप्स बसवलेले असतात. हे सेन्सर चेंडूचा वेग, झटका, आणि दिशा मोजतात, ज्यामुळे आकडेवारी अजून अचूक मिळते.

‘स्पायडरकॅम’ आणि ‘ड्रोन कॅमेरा’ – मैदानावरील दृश्ये

आजच्या सामन्यांमध्ये कधी कधी आपल्याला वरून फिरणारा कॅमेरा दिसतो, तो म्हणजे स्पायडरकॅम. हा कॅमेरा मैदानाच्या वर ताणलेल्या केबल्सवर चालतो. त्यामुळे तो मैदानात उडत असल्यासारखा दिसतो आणि आपल्याला विलक्षण थ्री-डायमेंशनल (३D) दृश्य मिळतं. ड्रोन कॅमेरेही आता वापरले जातात, विशेषतः मोठ्या फटक्यांच्या रीप्ले किंवा प्रेक्षक दृश्यांसाठी. हे कॅमेरे प्रसारणाला आकर्षक बनवतात आणि मैदानाचं एक वेगळ्या दृष्टीकोनातून दर्शन देतात.

स्निकोमीटर’ आणि ‘हॉटस्पॉट’ – चेंडूने फलंदाजाला किंवा बॅटला स्पर्श केला का?
कधी कधी चेंडू फलंदाजाच्या बॅटला लागला का नाही हे समजणं अवघड असतं. इथे स्निकोमीटर आणि हॉटस्पॉट मदतीला येतात.



स्निकोमीटर (Snickometer):
यात स्टंपजवळ बसवलेला मायक्रोफोन आणि उच्च संवेदनक्षम ऑडिओ प्रणाली असते. चेंडू बॅटला लागला की लहानसा आवाज निर्माण होतो. तो आवाज संगणकावर ग्राफ स्वरूपात दिसतो. आवाज आला तर चेंडू बॅटला लागलेला समजला जातो.
हॉटस्पॉट (Hotspot):
यात विशेष इन्फ्रारेड कॅमेरे वापरले जातात. चेंडू बॅटला किंवा पॅडला लागला की त्या जागी उष्णतेचा लहानसा ठिपका तयार होतो, जो स्क्रीनवर पांढऱ्या डागासारखा दिसतो.

माहितीचे संयोजन – टीव्हीवरील ग्राफिक्स
सर्व ही माहिती (रडार, हॉकआय, सेन्सर, स्निकोमीटर, इ.) संगणकांद्वारे एकत्र केली जाते. ही आकडेवारी थेट प्रसारण कंपनीकडे पाठवली जाते, जिथे विशेष सॉफ्टवेअर त्याचे ग्राफिक्स तयार करते. जसे की Ball Speed, Distance, Pitch Map, Manhattan Chart, Wagon Wheel इत्यादी. या सगळ्यामुळे सामन्याचा अनुभव केवळ पाहण्यापुरता राहात नाही; तो ज्ञानदायक आणि रोमांचक बनतो.

खेळाडू आणि प्रशिक्षकांसाठी उपयोग
ही आकडेवारी फक्त प्रेक्षकांसाठी नसते. संघाचे प्रशिक्षक आणि विश्लेषक (analysts) या माहितीचा उपयोग खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी करतात. उदाहरणार्थ,
• गोलंदाजाने कोणत्या ओव्हरमध्ये गती कमी केली?
• फलंदाजाने कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक फटके मारले?
• कोणत्या कोनात बॉल जास्त स्विंग होतो?
या अभ्यासावरून पुढील रणनीती ठरते.

थोडक्यात
क्रिकेट हा केवळ बॅट आणि बॉलचा खेळ राहिलेला नाही. तो आता विज्ञान, गणित, आणि तंत्रज्ञानाचं सुंदर मिश्रण झाला आहे.
रडार गन, हॉकआय, स्निकोमीटर, सेन्सर्स आणि कॅमेऱ्यांच्या या जगात प्रत्येक चेंडू, प्रत्येक फटका आणि प्रत्येक निर्णय तंत्रज्ञानाच्या नजरेतून जातो. यामुळे सामना अधिक न्याय्य, प्रेक्षकांसाठी अधिक आकर्षक आणि खेळाडूंसाठी अधिक शिकण्यासारखा बनतो.
खरं तर, आजचा क्रिकेट सामना म्हणजे तंत्रज्ञान आणि कौशल्याचा थरारक संगम आहे.

*****

–  ©️ दीपक देवधर

dpdeodhar@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

राशीस्वभावानुसार उखाणे

भाग १/६

“वेलीची कमान दारावर झुलणार
सनईच्या साक्षीने चौघडा बोलणार
हळद हळूच होणार ओली
अलगद झूलणार बाशिंग कपाळी
सावधान म्हणता अक्षता पडणार
कुंकवावरती नाव उमटणार
अबोलीची वेणी जुईचा गजरा
क्रांती आणि अजितवर सगळ्यांच्या नजरा
अग्नी नारायणाच्या रूपाने देवाची साक्ष
अशा या मंगलसमई तुम्ही सगळे समक्ष.”

माझ्या लग्नाच्या वेळी मी घेतलेला हा उखाणा…

छान वाटतात ना उखाणे ऐकायला !

ह्या लेखमालेचा मुख्य विषय हाच आहे..

टॉनिक प्रत्येकाला लागते. त्याने ताकद येते. प्रत्येकाचे टॉनिक वेगळे असते. शरीरासाठी व्हिटॅमिनच्या गोळ्या वापरता येतात. पण मनालाही टॉनिक लागते त्यासाठी कुठच्याही गोळ्या नसतात.

स्तुती सर्वांनाच आवडते. कौतुक केले की आजारी माणसाला देखील हुरूप येतो. सहा दिवस काम केल्यावर मिळणारी सुट्टी हे टॉनिकच आहे. तसेच करमणूक हे देखील स्वस्थ मनासाठी मोठे टॉनिक आहे. असे टॉनिक ज्याचे त्याने शोधायचे असते. त्यासाठी डॉक्टरच्या प्रिस्क्रीपशनची गरज नसते. पण करमणुकीबाबत एक दोष आहे. कुठचाही विनोद हा अल्पजीवी असतो. एखादा विनोद एकदा ऐकला की त्यातील रंजकता संपते. तो पुन्हा ऐकताना हसू येत नाही.

कधी कधी संसारातील रोजचे व्याप विसरून काल्पनिक गोष्टीत रमणे फार गरजेचे आहे. नाटक-सिनेमाचे जग खोटे आहे हे माहित असूनही ते पाहायला गर्दी होते.  मन आनंदी असेल तर जगणं आनंददायी होतं. “मन चंगा तो सब चंगा”.

म्हणूनच ज्योतिषासारख्या क्लिष्ट विषयाची मनोरंजक पद्धतीने माहिती देण्यासाठी ही लेखमाला लिहिली  आहे. यात दुहेरी हेतू आहे, मनोरंजनामुळे मनाला टॉनिक तर मिळतेच पण सोबत ज्योतिषशास्त्राची तोंडओळख देखील होते.  

मी फेब्रुवारी २०११ साली “राशीस्वभावानुसार उखाणे” हा कार्यक्रम प्रथमच कल्याण येथील “महिला उत्कर्ष मंडळ” या संस्थेत केला. तेव्हा हा कार्यक्रम लोकांना आवडेल का ? अशी मनात एक शंका होती. कारण ज्योतिष हा विषय क्लिष्ट आहे. राशी, नक्षत्र, स्वभाव, तत्त्व, योग, दृष्टी, महादशा वगैरे ऐकताना श्रोत्यांचा गोंधळ उडतो.  पण हा कार्यक्रम ज्योतिष विषयाच्या अभ्यासाचा नसून मनोरंजनात्मक असल्याने, कार्यक्रमाच्या सुरुवातीस मी एक किस्सा सांगून वातावरण हलके फुलके केले होते..

 “एकदा एका गावात गणेशोत्सवाच्या निमित्ताने एका कवीला कार्यक्रमासाठी बोलविले होते. त्याचे कविता वाचन चालू असताना एक आडदांड माणूस हातात काठी घेऊन स्टेजसमोरून फिरत होता.

कवि घाबरला..

काही वेळाने त्याने त्या आडदांड माणसाला भीत भीत विचारले..

“माझं काही चुकतंय का?”

त्यावर तो माणूस म्हणाला,

“तुम्ही आमचे पाहुणे आहात, तुमचं चालू द्या. तुम्हाला ज्यांनी आणले आहे, त्यांना शोधतोय”..

हा किस्सा सांगून,

“आज तसे होणार नाही अशी आशा आहे”, असे सांगत कार्यक्रम सुरु केला.

उपस्थितांना कार्यक्रम खूप आवडला. एक स्त्री, तीही वकिली सारख्या रुक्ष समजल्या जाणाऱ्या व्यवसायातील, आणि त्यातून ज्योतीषशास्त्रावर मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करीत आहे, या गोष्टीचे त्यांना अप्रूप आणि आश्चर्य वाटले. अशा व्याख्यानाची कोणतीही पूर्वपीठिका नसताना देखील हा पहिला कार्यक्रम जिने विश्वासाने सादर करायला मला व्यासपीठ उपलब्ध करून दिले, ती माझी कल्याणची मैत्रीण अॅड.अलका भिडे, तेव्हा या “महिला उत्कर्ष मंडळाची” कायदेविषयक सल्लागार होती.

ज्योतिषशास्त्राची अशा तऱ्हेने ओळख करून देण्याची कल्पना नाविन्यपूर्ण असल्याचे अनेकांनी सांगितले. त्यांनतर मुंबईतील खार, मुलुंड, तसेच डोंबिवली,कल्याण अंबरनाथ, येथेही या कार्यक्रमाला भरपूर प्रतिसाद मिळाला.

मला ज्योतिष या विषयाकडे का वळावेसे वाटले ते फारच इंटरेस्टिंग आहे. मी दहावी पास झाल्यावर माझा मामा आईला म्हणाला की “क्रांती खूप हुशार आहे तर आपण तिची पत्रिका माझ्या ओळखीच्या डोंबिवली येथील ज्योतिषांना दाखवू.” प्रभाकर घैसास नावाच्या ज्योतिषांनी (आता ते हयात नाहीत) माझी पत्रिका बघून ठामपणे सांगितले की ही मुलगी वकीलच होणार, (तेव्हा मला वकील व्हायची मुळीच इच्छा नव्हती.) आणि ही मुलगी साधारण १५/१६ वर्षांनी तिचा मार्ग बदलेल आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकेल. तरीही वकिलीशी असलेला तिचा संबंध कधीही संपणार नाही. आणखीही बऱ्याच गोष्टी त्यांनी माझी पत्रिका पाहून सांगितल्या.

माझी वकील व्हायची अजिबातच इच्छा नसल्याने मला या सगळ्या गोष्टी ऐकताना प्रचंड गंमत वाटली. खरं म्हटलं तर मी थोडी थट्टाच करायची. पण आश्चर्याची गोष्ट आहे की त्यांनी सांगितलेली भाकिते खरी झाली.. खरोखरच मी वकील झाले आणि १५/१६ वर्षातच मी प्रत्यक्ष कोर्टातली प्रॅक्टिस सोडली.

मी वकील होणार हे त्यांचे भाकीत खरे झाल्याने, वकिली व्यवसाय करत असतानाच मनात विचार आला की आपण ज्योतिष शिकूया. हा व्यवसाय म्हणून करायचा विचार कधीच मनात आला नव्हता आणि आजही नाही. पण प्रत्येक गोष्ट मला बुद्धीच्या निकषावर घासून घेतल्याशिवाय चैन पडत नाही. त्यामुळे हे सारे काय आहे हे जाणून घ्यावे असे वाटले. मग त्या दृष्टीने कुठे क्लास आहे याची विचारणा  केली आणि डोंबिवलीतील श्री.श्री. भट यांच्या “ज्योतिष  संशोधन मंडळ” या संस्थेत  २००२ साली  मी ज्योतिष शिकण्यासाठी प्रवेश घेतला.

हे वर्ग फक्त रविवारी दुपारी चार ते सहा असल्यामुळे, माझी कोर्टातील वकिली चालू असताना देखील हा अभ्यासक्रम करणे शक्य झाले.  “ज्योतिष विशारद” झाल्यावर “वास्तुशास्त्र” आणि “हस्तसामुद्रिकशास्त्र” हे अभ्यासक्रम पूर्ण केले. हे सर्व अभ्यासक्रम पारंपारिक ज्योतिषशास्त्राचाच भाग आहेत.

भविष्य सांगण्याची आणखी एक पद्धत आहे ज्याला “कृष्णमुर्ती पद्धती” म्हणतात. १९०८ साली जन्मलेल्या चेन्नई येथील के.एस कृष्णमुर्ती यांनी भारतीय आणि पाश्चात्य जोतिष पद्धतींचा अभ्यास केल्यावर त्यांना वाटले की यात खूप संदिग्धता आहे. मग त्यांनी अनेक वर्षे संशोधन करून २७ नक्षत्रांची २४९ उपनक्षत्रात विभागणी करून त्यावरून भविष्य सांगण्याची पद्धत विकसित केली. याविषयी देखील कुतूहल वाटल्याने मी चेन्नई येथील कृष्णमूर्ती संस्थेचा “ज्योतिष विशारद” हा हिंदीतून correspondence  अभ्यासक्रम पूर्ण केला.

१९९१ साली मी डोंबिवलीतील अॅड. गडकरी सरांकडे वकिल म्हणून काही महिने ज्युनिअर होते. तेव्हा त्यांनी सांगितले होते की “रस्त्यात भेटल्यावर, फोनवर कुणी सल्ला विचारला तर तो द्यायचा नाही.आपल्या ऑफिसच्या वेळेत भेटायला सांगायचे.”

त्यानंतर एकदा कोर्टात अॅड. गडकरी सरांची भेट झाली तेव्हा त्यांना मी सांगितले की “मी ज्योतिष शिकत आहे”. तेव्हा त्यांनी पुन्हा तेच सांगितले. “कुणी कुठेही हात दाखवला किंवा कुंडली दाखविली तर ज्योतिषविषयक सल्ला द्यायचा नाही. आपल्या घरी किंवा ऑफिसमधे यायला सांगायचे.” या गोष्टी वरवर अगदी सहज वाटत असल्या तरी पुढील वाटचालीत फारच मोलाच्या आणि मार्गदर्शक  ठरल्या.

पुढे ज्योतिष शिकत असताना तेथील एकाने “पुण्याच्या गीताधर्म मंडळाच्या” अभ्यासक्रमाची माहिती दिली. तो अभ्यासक्रम पूर्ण केला आणि मग दासबोध, मनोबोध, ज्ञानेश्वरी असे एकातून दुसरे करत बरेच अभ्यासक्रम पूर्ण केले.. त्यानंतर असे ठरवले की आता आपण जे काही शिकलो आहे त्यावर लेखन करूया.

दरम्यान एकदा माझ्या मैत्रिणीसोबत तिच्या महिला मंडळात मी गेले असता, तिथे उखाण्याची खुली स्पर्धा होती. तिथे मी एक स्वरचित उखाणा घेतला. तो उखाणा असा …..

“जीवनाच्या प्रवासात लग्न आहे जंक्शन,
गाडी- माणसं बदलतात, महत्त्वाचे असते स्टेशन,
प्रवास आहे दूरचा ,सोबत आहे घरची ,
अजितची साथ लाभो मला  जन्म-जन्मांतरीची”

या माझ्या उखाण्याला पहिले बक्षीस मिळाले. माझी मैत्रीण म्हणाली “तुझ्या स्वभावाला साजेसा उखाणा घेतलास”.

तेव्हा अचानक मनात विचार आला की प्रत्येक राशीचे वेगवेगळे स्वभाव वैशिष्ट्य असते. तर त्यानुसार त्या राशीची स्त्री किंवा पुरुष कसे उखाणे घेतील यावर लेखन करावं का? आणि या विषयाची निर्मिती झाली.

*आता थोडक्यात ज्योतिष या विषयाबाबत*

सुकर जीवन जगण्यासाठी ज्योतिष हे उत्तर नव्हे तर ज्योतिष फक्त मार्गदर्शन करते.

आजकाल ज्योतिष पाहण्याचे प्रमाण थोडे कमीच झाले आहे कारण बरीच मुले मुली प्रेमविवाहच करतात, तेव्हा पत्रिका बघण्याचा प्रश्नच नाही पण लग्न मात्र मुहूर्त बघूनच करतात ,आहे की नाही गंमत !!!!

ज्योतिष म्हणजे भूत-भविष्याचा आलेख कि दिशादिग्दर्शन ? हे शास्त्र आहे कि थोतांड? जेव्हापासून ज्योतिष अस्तित्वात आले, तेव्हापासून हा वाद चालू आहे. मुळात हा वाद कायम चालूच राहणार आहे . आपल्याला या वादात पडायचे नाही आणि आजचा तो विषयही नाही. मानवाला नेहमीच अज्ञाताचे, अनाकलनीय घटनांचे कुतूहल असते व त्यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न सतत होत असतो. पुनर्जन्म आहे का ? मृत्युनंतर काय होते ? हे मुलभूत प्रश्न असतातच पण, आपल्या भविष्यात काय घडणार आहे ? याबाबत जाणून घेण्याची ओढ जास्त असते. शिवाय काही संकटे येतात तेव्हा त्यांचे निवारण कधी होईल? त्यासाठी काय करावे लागेल? यासाठी देखील ज्योतिषी मंडळीकडे लोकं जातात. थोडक्यात भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न म्हणजे “ज्योतिष”.

एक गोष्ट प्रामुख्याने स्पष्ट करू इच्छिते कि इथे अंधश्रद्धा पसरविण्याचा अजिबात हेतू नाही. केवळ ,माहिती आणि  मनोरंजन एवढाच मर्यादित हेतू आहे.

ज्योतिष सांगण्याचे कुंडली हे काही एकमेव माध्यम नाही, तर अनेक माध्यमे आहेत. जसे –, हस्तसामुद्रिक, (या वरील लेखमाला यापूर्वीच लिहिली आहे. फेसबुक पेजवर वाचण्यास उपलब्ध … दि.२५.०५.२०२५…मात्र हातावरून भविष्य सांगण्याला मर्यादा आहेत.), अंकशास्त्र रमलशास्त्र, कृष्णमूर्तीपद्धती, नाडीशास्त्र, इतकेच काय चेहऱ्यावरून, पाऊलखुणावरून व अंगठ्यावरून भविष्य वर्तवले जाते. मनुष्यप्राण्याला आपल्या आयुष्यात पुढे घडून येणाऱ्या गोष्टी आगाऊ जाण्याची नैसर्गिक इच्छा असते. प्रत्येक मनुष्याच्या मनात वेळोवेळी अनेक प्रश्न उपस्थित होत असतात.  

बहुतेकांना नेहेमी पडणारा एक प्रश्न म्हणजे शनीची साडेसती. ही साडेसात वर्षे फार नकारात्मक पद्धतीने विचारात घेतली जातात. मला हे पटत नाही. या साडेसात वर्षात संकटे येत असतील तर एरव्ही येत नाहीत असं समजायचं का? तसं नसतं ना !.. शिवाय संकटात माणसांची खरी ओळख होते.  शनी हा न्यायी ग्रह आहे असे मानले जाते.

आपल्याकडे चंद्र्राशीला खूप महत्व आहे, तर पाश्चिमात्य देशात रविराशीला जास्त महत्व दिले जाते. म्हणजे जन्माच्या वेळी रवी ज्या असतो त्या राशीला जास्त मह्त्त्व दिले जाते. चंद्र एका राशीत सव्वा दोन दिवस तर रवी एक महिना असतो. चंद्राचा संबंध मानसिक आंदोलनाशी असतो, त्याचा तुमच्या दैनंदिन कार्यक्षमतेवर बराच परिणाम दिसतो.

केवळ चंद्र राशीवरून व्यक्तिमत्व ठरत नाही. तर लग्न रासही विचारात घ्यावी लागते.

लग्न रास ही जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर उदय पावणारी राशी आहे, जे व्यक्तीचे बाह्य व्यक्तिमत्व आणि जीवनातील अनुभव दर्शवते. याउलट, चंद्र राशी ही व्यक्तीच्या जन्मावेळी चंद्राने प्रवेश केलेला राशीचा भाग दर्शवते आणि ती व्यक्तीच्या आंतरिक भावना, मानसिक स्थिती व विचार दर्शवते.

*लग्न रास* (Ascendant Sign):

लग्न रास म्हणजे तुमच्या जन्माच्या वेळी पूर्वेकडील क्षितिजावर उगवणारी राशी. जी कुंडलीच्या प्रथम स्थानात म्हणजे तनुस्थानात असते.

ही रास तुमच्या जीवनातील प्रवेश बिंदू मानले जाते.

ही रास व्यक्तीचे बाह्य व्यक्तिमत्व, वृत्ती, आणि जीवनातील सुरुवातीचे अनुभव दर्शवते.

*उदाहरण*: जर तुमची लग्न रास सिंह असेल, तर तुमची शरीरयष्टी त्यानुसार असते असे मानले जाते.

*चंद्र रास* (Moon Sign):

चंद्र रास म्हणजे तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत होता ती रास.

चंद्र रास व्यक्तीच्या आंतरिक भावना, विचार, मन आणि स्वभाव आदी गोष्टी दर्शविते.

*उदाहरण*: जर तुमची चंद्र रास वृषभ असेल, तर तुमच्या भावनांवर वृषभेचे गुण दिसून येतात.

या दोन्ही राशींचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे, कारण त्या तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडतात.

(क्रमश:)

– © अ‍ॅड. क्रांती आठवले पाटणकर
*डोंबिवली.*
*9969087559*
०४.१०.२०२५
*(सदर लेख माझ्या नावासह अग्रेषित करायला हरकत नाही.)*

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

नोबेल पारितोषिक प्रश्नावली 

१. नोबेल शांतता पारितोषिकाकरिता काही आश्चर्यकारक नामांकने कोणती ?
२. सर्वात जास्ती नोबेल पारितोषिके कोणत्या देशाने मिळवली आहेत ?
३. भारताला आत्तापर्यंत किती नोबेल पारितोषिके मिळाली आहेत ?
४. नोबेल पारितोषिकांच्या इतिहासात दोनदा नोबेल पारितोषिक मिळवणार्‌या तीन व्यक्ती आहेत. आणि एकच महिला शास्त्रज्ञ आहे. कोण आहे ती ?
५. नोबेल पारितोषिकात किती धनराशी दिली जाते ?
६. उमेदवारांनी नोबेल पारितोषिक नाकारली गेल्याची उदाहरणे आहेत काय ?
७. आईनस्टाईनला नोबेल पारितोषिक मिळाले का ?
८. नोबेल पारितोषिके सुरू करणारा आल्फ्रेड नोबेल कोण होता ?
९. नोबेल पारितोषिके किती प्रकारची वा कशा कशात आहेत ?

१०. नोबेल पारितोषिकाकरिता व्यक्तींची निवड कोण करते ?  

उत्तरे 

नोबेल पारितोषिक प्रश्नसमूह :

१. –  आश्चर्यकारक नामांकने :  हिटलर, स्टॅलिन, मुसोलिनी ! ( अमेरिकन प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प पण का ? )

२. – आत्तापर्यंत १२४ वर्षांत अमेरिका या देशाने ४२४ नोबेल पारितोषिके मिळवली आहेत. तर दुस-या क्रमांकावर इंग्लंड्ने १४३ मिळवली आहेत. तिसरा क्रमांक ११५ पारितोषिके मिळवणार्‌या जर्मनीचा आहे.

३. – भारताला म्हणजे भारतीय नागरीकांना ५ पारितोषिके मिळाली आहेत. पण परदेशात काम करणार्‌या भारतवंशीयांना धरून १२

 

मादाम मेरी क्युरी प्रयोगशाळेत
मादाम मेरी क्युरी नोबेल पारितोषिक स्वीकारताना 

.
४. – मादाम मेरी क्युरी ! ह्या पोलंडमध्यी जन्माला आलेल्या महिलेने १९०३ मध्ये भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवले व २०११ मध्ये रसायनशास्त्राचे ! १९०३ मध्ये तिने शोध लावला की “किरणोत्सर्गिता“ अशी काही प्रक्रिया अस्तित्वात आहे. १९११ मध्ये तिने २ किरणोत्सर्गी मूलद्रव्यांचा शोध लावला – पोलोनियम आणि रेडियम. तिच्या मुलीलाही १९३५ मध्ये  कृत्रिम किरणोत्सर्गितेचा उपयोग करून किरणोत्सर्गी असे तत्सम अणू ( आयसोटोप्स) बनवण्याकरिता नोबेल पारितोषिक मिळाले. ज्या किरणोत्सर्गितेचा शोध मेरी क्युरीने लावला त्याच किरणोत्सर्गितेमुळे तिला आप्लास्टिक अ‍ॅनिमिया हा आजार झाला व ती १९३४ मध्ये निधन पावली.

५. – पारितोषिकाची धनराशी दर वर्षी बदलते, महागाईप्रमाणे, व आल्फ्रेड नोबेलने दिलेल्या रकमेच्या गुंतवणुकीवरील व्याजरूपी मिळकतीप्रमाणे. १९०१ च्या दशकात, म्हणजे सुरुवातीला, ही पारितोषिक रक्कम सुमारे १.४५ लाख स्वीडिश क्रोनर होती; यावर्षी २०२५ मध्ये ११० लाख क्रोनर प्रत्येक पारितोषिकामागे दिले जात आहेत. ११० लाख क्रोनर म्हणजे सुमारे १०.४ कोटी रुपये होतात.

६. – आहेत. हिटलरच्या राज्यात त्याने ३ जर्मन शास्त्रज्ञांना हे पारितोषिक घेण्यापासून मनाई केली. १९५८ मध्ये क्म्युनिस्ट रशियाने बोरिस पास्टरनाकला वाङमयाचे पारितोषिक नाकारायला लावले. जीऑं पॉल सार्त्रे ह्या फ्रेंच तत्त्ववेत्त्याने व लेखकाने पण नाकारले, कारण तो कधीच कुठले पारितोषिक स्वीकारत नसे.

७. – आईनस्ताईनला नोबेल पारितोषिक मिळाले पण त्याच्या सर्वात महत्त्वाच्या अशा ‘सापेक्षतावाद’ या सिद्धांताबद्दल नाही. कारण नोबेल समितीच्या मते त्याचा ठोस पुरावा नव्हता. तो एक गृहीतरूपातील मांडलेला सिद्धांत होता. त्याला नोबेल मिळले ते त्याच्या “ प्रकाश आणि विद्युत्‌ यांच्या संबंधावर प्रकाश पाडण्याकरिता. अजून एक रोचक गोष्त ही होती की , १९१९ मध्ये बायकोपासून घटस्फोट घेतांना त्याने तिला हे म्हटले होते की मला जर नोबेल मिळाले तर ती सारी रक्कम मी तुझ्या चरितार्थाकरिता देईन. १९२१मध्ये पारितोषिक  मिळाल्यावर त्याने तसे केले !

नोबेल पारितोषिक पदक 
आल्फ्रेड नोबेल 

८. – आल्फ्रेड नोबेल हा स्वतः एक इंजिनीयर, रसायनशास्त्रज्ञ, आणि धंदेवाईक व्यक्ती होता. त्याचे वडील पण तसेच होते. आल्फ्रेड नोबेल हा सर्वात प्रसिद्ध आहे स्फोटक पदार्थ बनवण्याकरिता. त्याच्या नावावर ३०० च्या वर पेटंट्स होती. त्याने जे अनेक शोध लावले त्यात आपल्याला कळणारा शोध आहे -, नायट्रोग्लिसरीन या स्फोटक द्रव्याला सुरक्षितपणे हाताळून त्यातून डायनामाईट कसा बनवायचा. त्याचे अनेक कारखाने होते. त्याला अनेक भाषा येत होत्या. मृत्युआधी त्याने जे मृत्युपत्र बनवले त्यात त्याने ही ६ पारितोषिकांची कल्पना मांडली व त्याकरिता ३.१ कोटी क्रोनर दिले. आज त्या ट्रस्टने त्याची किमत , गुंतवणुकीच्या माध्यमातून २२०० कोटी क्रोनरपर्यंत नेली आहे.

९. – ६ प्रकारची. १.शरीर्शास्त्र आणि चिकित्साशास्त्र २. भौतिकशास्त्र  ३. रसायनशास्त्र  ४. वाङमय ५. शांतता ६. अर्थशास्त्र 

१०. – अ) वैद्यकशास्त्रातील पारितोषिकाची निवड नॉर्वेमधील कॅरोलिंस्का संस्था / विद्यापीठ यातील “नोबेल असेंब्ली” करते. या संस्थेला जगातील महत्त्वाचे वैद्यकीय विद्यापीठ मानतात.

ब) रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडेमी ऑफ सायन्सेस ही संस्था भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व अर्थशास्त्र यांतील पारितोषिके ठरवते.
क) स्वीडिश अ‍ॅकॅडेमी (साहित्य) ही वाङमयातील पारितोषिक ठरवते.
ड) नॉर्वेजियन नोबेल कमिटी (शांतता) ही शांतता पारितोषिक ठरवते.

–  विलास सातपुते 

vilas.satput54@gmail.com

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

चित्रकारांचे दालन

 

– ©️ रामचंद्र देशमुख

संपर्क : ९९३०२४६९८९

  प्रेषक मेघना घाटे 

meghanaghate25@gmail.com

@@@

– मिलिंद महाबळ 

milind.mahabal65@gmail.com 

@@@

 –  युती प्रवीण अघोर  

प्रेषक शुभदा प्रवीण अघोर     

shubhadaaghor@gmail.com

@@@

वैदेही निगुडकर १

प्रेषक सौ. स्वाती वर्तक  

swati.k.vartak@yaman

@@@@@@@@@@@@@@@@@

महत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. 

@@@@@@@@@@@

महत्त्वाची सूचना :- मैत्री अनुदिनी हे मुख्यत: मराठी साहित्याला वाहिलेलं आणि नवं-जुनं साहित्य प्रकाशित करणारं एक नियतकालिक आहे. ते आम्ही वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देत असतो. एखादा जुना लेख वा कविता वगैरे साहित्य पुनर्प्रकाशित करायचं असल्यास आम्ही सदर लेखकाची परवानगी घेण्याचा प्रयत्नही करत असतो. काही वेळा संपर्क होऊ शकत नाही. मात्र अशा प्रकारे पुनर्प्रकाशित केलेल्या साहित्यावर आम्ही न चुकता लेखकाचं नांव व ज्या पुस्तकातून वा मासिकातून ते घेतलं त्याचा नामनिर्देश करत असतो. कृपया आमची अडचण समजून सहकार्य करावं ही विनंती.

@@@@@@@@@@@@@@