आमचे नाना उर्फ बालगंधर्व

स्वागत फुलांनी

जयंत विठ्ठल कुळकर्णी 

भाग ३

संध्याकाळी सात वाजता उत्तरार्ध सुरु झाला होता. रंगमंचावरील भारतीय बैठकीवर स्थानापन्न झाले होते; महापौर नानासाहेब गोरे, सन्मानीय उदघाटक भारताचे गृहमंत्री यशवंतराव चव्हाण, महापालिका आयुक्त श्री. भुजंगराव कुलकर्णी आणि उदघाटन सोहळ्याचे संयोजक पु. ल. देशपांडे. यानंतर समारंभाची संपूर्ण माहिती देणारं आणि ज्या भाषणाची सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते ते पुलंचं संस्मरणीय व अत्यंत मनोरंजक असं भाषण झालं होतं. ते भाषण ऐकून ५१ वर्षाचा काळ उलटून गेला तरी त्यातील एक वाक्य मात्र मनात आजही रुंजी घालतंय… पु. ल. म्हणाले होते, ‘या रंगमंदिराबाहेर एक स्त्री असूनही पुरुषांना लाजवेल असा पराक्रम गाजविणारी झांशीच्या राणीचा पुतळा आहे. आणि ज्याच्या रंगभूमीवरील स्त्रीभूमिकांनी व दैवी संगीतगायनाने असंख्य रसिकांना आनंद दिला त्या पुरुषाचं स्मारक हे रंगमंदिर आहे.’ यानंतर यशवंतराव चव्हाणांचं छोटसं भाषण झालं होतं. त्यात ते म्हणाले, ‘नट, नाटककार व प्रेक्षक हा त्रिकोण अपूर्ण वाटायचा. आता या रंगमंदिरामुळे चौकोन पूर्ण झाला आहे. ‘समारंभाला अध्यक्ष म्हणून आचार्य अत्रे उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे त्यांचा ‘मराठा’ वृत्तपत्रामधील अग्रलेख हा अध्यक्षीय भाषण म्हणून नानासाहेब गोरे यांनी वाचून दाखविला होता.

दुसऱ्या दिवशी पुलंनी ‘गंधर्व गीतांजली’ हा अभिनव कार्यक्रम सादर केला होता. त्यात हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा, प्रभा अत्रे, नलिनीबाई वाबळे, मालती पांडे, जयमाला शिलेदार, पद्मा जोगळेकर (तळवलकर), ज्योस्त्ना भोळे, वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, सुधीर फडके व लावणीच्या क्षेत्रात प्रतिगंधर्व म्हणून ओळखल्या जाणा‍ऱ्या सुप्रसिद्ध लावणी गायिका कौसल्याबाई कोपरगावकर अशा १२ दिग्गज कलाकारांनी २४ पदं गाऊन रसिक श्रोत्यांना गंधर्वयुगात नेलं होतं. जयंतराव, अजूनही माझ्या नजरेसमोरून पद्माने गायलेलं ‘खरा तो प्रेमा’, हिराबाईंचं ‘पुष्पपराग सुगंधित’, आयुष्यात प्रथमच ऐकलेली लावणी ‘नेसली पितांबर जरी बाई गं’ जिच्यावर नानांचं ‘वद जाऊ कुणाला’ हे पद बसवलंय ती लावणी गातांना वृद्ध कौसल्याबाई दम घेण्यासाठी प्रत्येक वेळी ‘बाई गं’ म्हणल्यावर एक टाळी वाजवून थांबत असत, पं. भीमसेन जोशी यांनी ‘मम् आत्मा गमला’ व ‘मम् मनी कृष्णसखा रमला’ ही दोन पदं गायली होती. सारं सारं तरळून जातंय..! (यातील ब-याचशा गोष्टी आजही माझ्या स्मरणात ताज्या असल्या तरी तपशिलात त्रुटी राहू नयेत म्हणून संदर्भासाठी श्री. बाळ चितळे यांच्या ‘रंगमंदिर’ या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या बालगंधर्व जन्मशताब्दी या विशेषांकातील लेखाचा वापर केला आहे.)

१९५२-५३ सालापर्यंत पं. भीमसेन जोशी बहुतकरून महाराष्ट्राबाहेर असल्याने त्यांनी नानांचं एकही नाटक पाहिलं नव्हतं. अथवा नाट्यगीतंही फारशी ऐकली नव्हती. त्यामुळे वरील दोन पदं त्या समारंभात म्हणायची ठरल्यानंतर पंडितजींनी साहजिकच पुलंना विचारलं की पदं बसवायची झाल्यास कुणाची मदत घ्यावी अथवा मिळेल असं तुम्हाला वाटतं..? त्यावर पुलंनी त्वरित माझ्या आईचं नांव सुचवलं होतं. त्यामुळे आईसह त्या गाण्यांच्या तालमी पंडिजींच्या घरी होत असत. तसेच, पु. ल. पेटीवर असत. त्या खोलीत फक्त पंडितजी, पु. ल., माझी आई व मी असे चौघंच असायचो. मी आईसोबत जात असल्याने हा भाग्याचा दुर्मिळ क्षण मला अनुभवायला मिळाला होता. अशाच एका खाजगी बैठकीत पुलंच्या आग्रहास्तव पुलंनी आईला ‘जोहार मायबाप’ हा नानांचा अभंग ऐकवायला सांगितला होता. तो अभंग ऐकतांना नानांच्या आठवणीने पुलंच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. तेव्हा, ‘नलिनीताई, कार्यक्रमाच्या अखेरीस हा अभंग म्हणाल कां..?’ अशी पुलंनी आईला विनंती केली होती. त्याप्रमाणे आईने हा अभंग रंगमंदिरात गायला देखील होता. परंतु, विंगेत उभं राहून भावनावेग आवरण्यासाठी होत असलेली आईची धडपड मला बघवत नव्हती. त्याआधी आईने मोठ्या कार्यक्रमातून ती गायली होती. तेव्हा एवढ्या मोठ्या जन समुदायापुढे ही घाबरणार तर नाही, या भावनेने व काळजीने दरवेळी नाना तिच्या पाठीमागे बसलेले असत. प्रत्यक्ष नानाच पाठीशी असल्याने घाबरायचं कशाला..? असं म्हणून धैर्याने आई बिनधास्त गात असे.. मात्र दुर्दैवाने या प्रसंगी सोबतीला नाना नव्हते. परंतु, होते ते नाना नसल्याचं अतीव दुःख..! असो.

१) संगीतकार वसंत देसाई, लता मंगेशकर, बाळ गंधर्व, बेगम अख्तर व अंजनीबाई मालपेकर. वसंत देसाई यांच्या वेब साईटवरून… २) बालगंधर्व व पं. राम मराठे. तात्या अभ्यंकर यांच्या संग्रहातून… ३) स्त्रीच्या भूमिकेत रानडे व बालगंधर्व. सीताकांत लाड यांच्या स्मृति-संगीत या पुस्तकातून… ३) बाळ चिटणीस, बालगंधर्व, गदिमा, श्री. व सौ. सीताकांत लाड, दत्ता वावळेकर, मामा वावळेकर व कृष्णराव सपते… दत्ता वावळेकर यांच्या संग्रहातून…

श्री. बाळ चितळे यांच्या ‘रंगमंदिर’ या लेखातील आणखी एक उल्लेखनीय बातमी वाचनात आली, ती येथे सांगावीशी वाटते. अशी होती की नानांची काही दुर्मिळ छायाचित्रं मिळविण्यासाठी चितळे हे मुबईला अंजनीबाई मालपेकर यांना भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा गप्पांच्या ओघात नानांच्या सौंदर्याबद्दल व गानमाधुर्याबद्दल सहज बोलणं झालं होतं. त्यावेळी ‘मोर जसा पिसारा घेऊन जन्माला येतो तसे बालगंधर्व गाणं घेऊन जन्माला आले होते’ असं अंजनीबाई सहजपणे म्हणून गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी चितळे पुण्याला गदिमांना भेटायला गेले होते. कारण होतं, गोपाळराव देउसकरांनी काढलेल्या नानांच्या पुरुष व स्त्रीवेषातील दोन तैलचित्राखाली चार-चार ओळींच्या दोन काव्यपंक्ती गदिमांकडून लिहून घ्यायच्या होत्या. त्यावेळी अंजनाबाई यांनी ‘मोराच्या पिसाची’ दिलेली उपमा चितळे यांनी गदिमांना सांगितली. त्यांनी लगेच कागद व पेन घेतलं आणि पंधरा मिनिटांत जे समोर आलं ते नानांवर रचलेलं अप्रतिम असे हे काव्य… “जशा जन्मती तेज घेऊन तारा, जसा मोर घेऊन येतो पिसारा, तसा येई कंठात घेऊन गाणे, असा बालगंधर्व आता न होणे..! रतीचे जया रूप लावण्य लाभे, कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे, सुधेसारखा साद, स्वर्गीय गाणे, असा बालगंधर्व आता न होणे..!”

गंधर्व गेल्यानंतर जेव्हा प्रभादेवीला रवींद्र नाट्यमंदिरामध्ये श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम झाला होता तेव्हा अनेक दिग्गज गायक व इतर मंडळी निमंत्रित होती. त्यावेळी ज्योत्स्नाताईंच्या आईने, नलिनीताईंनी आपल्या गंधर्वगायकीने सर्वांवर छाप मारली होती. त्याचं कौतुक व पावती स्वतः गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकरांनी नलिनीताईंना दिली होती. हेही विशेष होतं. खुद्द त्यांचे वडील बालगंधर्व आत्मविश्वासाने म्हणत, मला शिकवायला वेळ नाही परंतु, माझं गाणं शिकायचं असेल तर माझ्या मुलीकडे गाणं शिकावं. त्याचप्रमाणे, ज्योत्स्नाताईंनाही गाण्याचं उत्तम अंग आहे. मराठीतील थोर वाचस्पती, संगीतसमीक्षक, संस्कृतचे अभ्यासक व अध्यापक तसंच संगीत विषयाचे जाणकार अशी ख्याती असलेले अरविंद मंगरूळकर (सुलभा तेरणीकर यांचे काका) यांनी एका आठवणीत सांगितलं होतं, “बालगंधर्वांच्या साठीतल्या कन्येने, बैठकीकडे जाण्याआधी, खुर्चीवर हार घालून ठेवलेल्या पित्याच्या फोटोला नमस्कार केला. मग ती बैठकीवर येऊन बसली. बाजूच्या खोलीतून तंबोरा लावण्याचा सूर येत होता तिकडे तिने मान वाळवून पहिलं. ती लकब इतकी बालगंधर्वांसारखी होती की ज्यांनी बालगंधर्व पहिले होते त्यांना त्याच क्षणी बालगंधर्व आठवले. झालेल्या या भासाने आम्हला गोड धक्का दिला. आता आपण बालगंधरावांचंच गाणं ऐकणार आहोत या भावनेने आमचे कान ऐकू लागले. रंगभूमीवर उभे राहिल्यावर बालगंधर्व जे वातावरण निर्माण करीत ते इतकं विलोभनीय असे की, ज्यांनी तो जमाना पाहिला ते ते विसरणार नाहीत. ज्यांनी तो पहिला नाही त्याला कधीही त्याची कल्पना येणार नाही..!”

१) महाराष्ट्र टाईम्स, बालगंधर्व विशेषांक, १९८८: गंधर्व फॅशन: नटसम्राट बालगंधर्वांच्या नवनवीन डिझाईन्स असलेल्या जॉर्जेटच्या तलम साड्या शामराव धैर्यवान उर्फ शामराव शेठ यांच्या गिरगांवमधील जर्मानिया डाईंग अँड प्रिंटिंग वर्क्समध्ये छापल्या जात असत. काळ होता १९२५चा… प्रथमा पाटील यांच्या ‘The Dress and Ornaments of the Pathare Prabhu’ या लेखातून… २-३-४-५) त्या फॅशनने नटलेले बालगंधर्व. नाट्यशोध संस्थान यांच्या संग्रहातून…
१९१३ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत माळ्याच्या धर्मशाळेत ‘गंधर्व नाटक मंडळी’ ची स्थापना झाली. १९०६ ते १९३३ हा बालगंधर्वांचा आणि संगीत नाटकाचा सुवर्णकाळ ठरला होता..! या वैभवी गंधर्वयुगात नारायणरावांनी सुभद्रा, शंकुतला, भामिनी, शारदा अशी भव्यदिव्य पात्रं तर ‘एकच प्याला’ मधील जीर्ण साडीमधील सिंधू पाहून रसिक थक्क झाले होते. त्या काळात बालगंधर्व म्हणजे एक ‘स्टाइल आयकॉन’ बनले होते. या ‘गंधर्व फॅशन’च्या वेळी त्यांच्या भरजरी साड्या, नक्षीदार दागिने याची स्त्रियांना भुरळ पडली होती. अगदी साबण, सौंदर्य प्रसाधनं यावर देखील बालगंधर्वाचं चित्र असायचं. थोडक्यात, बालगंधर्वांचे नाटक पाहणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभव होता. त्याला कारणही होतं. ते म्हणजे, रंगमंचावर प्रकाश आणि रंगांची इतकी विलक्षण व खर्चिक उधळण असे की रसिक मायबापांचे डोळे दिपून जात असत. म्हणतात, ज्या काळात सोनं १० रुपये तोळा या भावात मिळत होते त्या काळात गंधर्वांनी ७५ हजार रुपयांचे रंगमंच उभारून केवळ रसिक मायबापांसाठी आनंदाने संगीत नाटकं पेश केली होती. शिवाय वैशिष्ट्य असं, नाटकाला येणाऱ्या रसिकवर उंची अत्तरांचा फवारा, रंगमंचावर सुंदर मखमली पडदे, मुलायम गालिचे, सिंहासन, प्रकाशाचा लखलखाट, प्रत्येक पात्राची वस्त्रं मखमली कापडाची, सोन्याच्या मुलामा दिलेले दागिने, मुकुट, मंत्रमुग्ध होऊन जावं असा आवाज, तबला आणि सारंगीची अप्रतिम साथ असे. बालगंधर्वांचं वर्णन करताना एकदा ज्योस्त्ना भोळे म्हणाल्या होत्या की“बालगंधर्व दिसायला सुंदरच नव्हते तर, त्यांचं गोरंपण इतकं मोहक व तेजस्वी होतं की, एखादं पांढरं शुभ्र रेशमी तलम वस्त्र त्यांच्या कांतीपुढे फिकं पडेल…”

१) ‘एकच प्याला’ या नाटकातील एका उत्तेजक प्रसंगात सिंधूच्या भूमिकेत बालगंधर्व: किर्लोस्कर नाटक मंडळीने १२ मार्च १९११ ला मुंबईत रिपन थिएटरमध्ये केलेलं ‘संगीत मानापमान’ हे बालगंधर्व यांचं पाहिलं नाटक होतं व इ.स. १९५५ रोजी त्यांनी ‘एकच प्याला’ या नाटकात साकार केलेली ‘सिंधू’ ही त्यांची शेवटची भूमिका ठरली होती. महाराष्ट्र टाईम्स संग्रहातून… २) एका खाजगी मैफिलीत बालगंधर्व… ३) एका मैफिलीत गातांना बालगंधर्व व संगीतकार वसंत देसाई. तबल्यावर वसंतराव आचरेकर. वसंतराव आचरेकर यांच्या संग्रहातून…

१) बालगंधर्व व गोहरबाई कर्नाटकी… २) १९१३ मधील ‘शाकुंतल’ नाटकात शकुंतलाच्या भूमिकेत बालगंधर्व व दुष्यन्तच्या भूमिकेत गोविंदराव टेंबे. सीताकांत लाड यांच्या स्मृति-संगीत या पुस्तकातून… ३) एका मैफिलीत बालगंधर्व व संगीतकार वसंत देसाई. वसंतराव आचरेकर यांच्या संग्रहातून… ४) नटसम्राट बालगंधर्व. माझे काका कै. आप्पा यांच्या संग्रहातून… खाली: १-२-३) सांगली येथील नागठाणे या गांवातील जन्मस्थानी असलेला बालगंधर्व यांच्या भव्य वाडा… ४) बालगंधर्व यांच्या अखेरच्या काळातील निवासस्थान: मुंबईतील माहिमच्या पश्चिमेला वीर सावरकर मार्गावर कापड बाजाराच्या नजिक ‘अग्रवाल भवन’ हा एकमजली बंगला जेथे बालगंधर्व व गोहरबाई रहात होते…
***
कधीही व्यावसायिक दृष्टी न ठेवणारे, आपल्या कलेशी एकनिष्ठ असणाऱ्या व संगीत नाट्यक्षेत्रात एकतर्फी साम्राज्य करणाऱ्या बालगंधर्वानी निरनिराळ्या भूमिका साकारून संगीत नाटक आणि नाट्यसंगीत हे कलाप्रकार मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये लोकप्रिय केले होते. नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी आणि वसंत शांताराम देसाई प्रभृतींनी लिहिलेली अनेक संगीत नाटकं बालगंधर्वांनी केली होती. तसेच, मोहक अभिनय व सुमधुर गायन करणाऱ्या बालगंधर्वांनी एकूण २७ नाटकातून स्त्रियांच्या व पुरुषांच्या मिळून ३६ भूमिका करणाऱ्या नानांना आपल्या वाढत्या वयानुसार स्त्री भूमिका शोभत नाहीत याची जाणीव होती. त्यामुळे त्यांची जागा घेणाऱ्या दुसऱ्या स्त्रीच्या शोधात ते होते. इतरांचा शोध घेतांना त्यांनी माणिक वर्मा यांना विचारलं होतं. मात्र त्यांनी नकार दिला होता. त्याच सुमारास गोहरबाई कर्नाटकी त्यांच्या जीवनात आल्या. तत्पूर्वी गोहरबाई कर्नाटकी यांनी नानांच्या कांही नाटकातून स्त्री भूमिका केल्या होत्या. पुढे नोंदणी पद्धतीने त्यांचा विवाह झाला होता. त्यामुळे धर्म बदलण्याचा प्रश्न नव्हता. नंतर ते गोहरबाईंबरोबर माहीमला राहायला गेले होते. दरम्यान नानांची तब्येत बिघडत चालली होती. दुर्दैवाने कमरेखालील पायामधील शक्ती नाहीशी झाली होती. तरीही अशा परिस्थितीत एकटे पडलेल्या नानांनी माहिमचं घर न सोडण्याचा निर्णय घेतला होता. दुर्दैवाने आयुष्याच्या अखेरीस बालगंधर्व कोमात गेले होते. त्यावेळी दादरच्या हिंदू कॉलनीत फडके नर्सिंग होम मध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. डॉ. फडके नर्सिंग होममधून गंधर्वांना त्या परिस्थितीत डॉ. राजाभाऊ वाबळे व गंधर्वांचे पुतणे श्री. वसंतराव राजहंस यांनी पुण्याला नेलं होतं. तो दिवस होता १ मे, १९६७. डॉक्टरांचे स्नेही डॉ. माईणकर यांच्या प्रशस्त बंगल्यात गंधर्वांना ठेवण्यात आलं होतं. त्या दीड महिन्याच्या काळात माईणकरांच्या बंगल्यात त्याही परिस्थितीत गंधर्वांना पाहाण्यासाठी ठराविक वेळी त्यांचे असंख्य चाहते व भक्त मंडळींची प्रचंड रांग लागत असे. कोमात असतांनाच नानांना खोलवर बिस्तर स्रोत झाले होते. त्यामुळे सर्व कपडे सतत धुवायला व बदलायला लागत असत. पुण्यातील त्या मुक्कामात व अत्यंत बिकट परिस्थितीत ज्योत्स्नाताई व त्यांच्या आई-वडिलांनी नानांची चोवीस तास सेवा केली होती. कुणाचा विश्वास बसणार नाही, आपल्या गायकीने कदाचित त्यांना आराम मिळेल व गंधर्व कोमामधून जागे होतील या भावनेने खुद्द गानहिरा हिराबाई बडोदेकर दर दिवशी नानांच्या खोलीबाहेर बसून श्रद्धेने भजनं गात असत. परंतु, विधिलिखित तसं नव्हतं. ते कोमातून बाहेर आले नाहीत. गंधर्व गेले तो दिवस होता १५ जुलै, इ.स. १९६७… गोहरबाईंना देवाज्ञा झाल्यानंतरही नानांनी आपल्या माणसात परत यावं म्हणून डॉ. वाबळ्यांनी खुप प्रयत्न केले होते. नानांची बडदास्त नीट ठेवता येईल या उद्देशाने एक बंगलाही भाड्याने घेण्याचं निश्चित केलं होतं. परंतु, मी आहे तेथेच ठीक आहे असं म्हणून नानांनी पुण्यास येण्यास नकार दिला होता…
१) बालगंधर्व व गोहरबाई… २) १९४४ साली गिरगांवला झालेल्या नाट्यशताब्दी महोत्सवाच्यावेळी संगीत नाटकांवरील चर्चा करतांना मा. कृष्णराव व बालगंधर्व…
सीताकांत लाड यांच्या स्मृति-संगीत या पुस्तकातून… ३) उतारवयातल्या गलीतगात्र झालेल्या बालगंधर्वांची एक खाजगी मैफल… तात्या अभ्यंकर यांच्या संग्रहातून…

    नानांच्या अखंड आठवणी सांगतांना साहजिकच ज्योत्स्नाताई भावनावश होत असत. शेवटी त्या म्हणाल्या, “जयंतराव, आमच्या घरी गं.ना.मं. (गंधर्व नाटक मंडळी) लिहिलेल्या अनेक वस्तु आहेत. ओतप्रेत प्रेमाने-मायेने भरलेली नानांची कितीतरी पत्रं  आहेत. तसेच, इतर सामानांसकट दुर्मिळ फोटोही आहेत. माणूस म्हणून सर्वात श्रेष्ठ असलेले नाना ही तर आमची मर्म बंधातील ठेवच आहे. नानांचं दर्शन जितकं प्रसन्न होतं तितकंच त्यांचं अंतःकरणही निर्मल होतं. यश, कीर्ती, वैभव व लोकप्रियता या सर्वच बाबतीत शिखरावर आरूढ असतानाही ते कमालीचे विनम्र होते. खरं सांगू, स्वतःविषयी नानांची भूमिका सदैव तुकारामाच्या या पुढील अभंगाप्रमाणे होती..”
तारू लागले बंदरी । चंद्रभागेचिये तिरी ॥१॥
लुटा लुटा संतजन । अमुप हे रासी धन ॥२॥
जाला हरिनामाचा तारा । सीड लागले फरारा ॥३॥
तुका जवळी हमाल । भार चालवी विठ्ठल ॥४॥.

ज्योत्स्नाताईंकडे नानांच्या आठवणींचा प्रचंड साठा आहे. तसेच, त्यांची स्मरणशक्तीही वाखाणण्यासारखी आहे. हे कौतुकास्पद होय. तेव्हा त्यांनी नानांच्या वैयक्तिक व दुर्मिळ आठवणी फोटोंसह लिहून प्रकाशित कराव्यात अशी मी त्यांना नम्र विनंती केली आहे. येथे अजिबातच मला वेळ मिळणार नाही पण लवकरच पुण्याला गेल्यावर शांतपणे वेळ मिळेल असं त्या म्हणाल्या. असो. वैयक्तिक आठवणींमुळे अनेक समज-गैरसमज दूर होतील. तसेच, बालगंधर्वांची माहित नसलेली उद्बोधक माहिती आम्हा रसिकांना वाचायला मिळेल ही अपेक्षा. अशी माझी खात्री आहे. त्यांनाही ते पटलं असून त्यांनी ते मान्य केलं आहे. त्यांच्या कार्याला मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो…

नटसम्राट बालगंधर्व: १) बालगंधर्व यांचे पोस्टाचे तिकीट… २) द्राक्षसवाच्या जाहिरातीमधील गंधर्व… माझे काका कै. आप्पा यांच्या संग्रहातून… ३-४) गंधर्व यांची तैलचित्रें… ५) श्रद्धा आडारकर यांनी रेखाटलेलं सुंदर तैलचित्र…  

बालगंधर्वांचा जन्म २६ जून, १८८८ मध्ये झाला होता. बालगंधर्व ही पदवी त्यांना लोकमान्य टिळकांनी १८९८ साली म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षी दिली होती. १९०५ साली वयाच्या सतराव्या वर्षी गुरुद्वादशीच्या मुहूर्तावर त्यांनी नाटकमंडळीत प्रवेश केला होता. तेव्हापासून आपली गंधर्व नाटकमंडळी १९३४ साली विसर्जित करीपर्यंत सतत एकोणतीस वर्ष त्यांनी रंगभूमीवर एकछत्री राज्य केलं होतं; पण कधी स्वतःचा बकवा नाही, आपली शेखी मिरवली नाही. संपत्ती-कीर्ती-कर्ज-आपत्ती सर्वच त्यांच्याकडे चालत आलं होतं. अशा या नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व, या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. रंगभूमीवरून निवृत्ती स्वीकारण्यापूर्वी बालगंधर्वांनी ‘शाकुंतल’मध्ये शकुंतला, ‘सौभद’मध्ये सुभदा, ‘मृच्छकटिक’मध्ये वसंतसेना, ‘मानापमान’मध्ये भामिनी, ‘संशयकल्लोळ’मध्ये रेवती, ‘शारदा’मध्ये शारदा, ‘मूकनायक’मध्ये सरोजिनी, ‘स्वयंवर’ मध्ये रुक्मिणी ही स्त्री पात्रं रंगवली. एकच प्याला या नाटकात साकार केलेली सिंधू ही त्यांची शेवटची भूमिका होती. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचं विलक्षण प्रभुत्व होतं. सर्वांचं दैवत असलेल्या वंदनीय नानांना ऊर्फ नटश्रेष्ठ बालगंधर्व यांना माझे शतशः प्रणाम..!

– ©️ जयंत विठ्ठल कुळकर्णी.
न्यू यॉर्क, अमेरिका
jvkny1@gmail.com

बालगंधर्व यांना मिळालेले पुरस्कार:
– बालगंधर्वांचा संगीत इ.स. १९५५ साली अखिल भारतीय संगीत नाटक अकादमीने राष्ट्रपती पदक देऊन सन्मान केला.
– भारत सरकारने बालगंधर्वाना इ.स. १९६४ साली पद्मभूषण ह्या पुरस्काराने गौरविले.

टीप: आपल्या दैनंदिन व्यापातून वेळ काढून व माझ्यावर विश्वास ठेऊन प्रसिद्धीविन्मुख ज्योत्स्नाताईंनी हा लेख लिहिण्यास माझ्यासाठी आनंदाने अनेक तास-महिने खर्ची केले. त्यांच्या निगर्वी स्वभावाने व दिलेल्या सहकार्याने मी हा बालगंधर्वांवर प्रदीर्घ लेख लिहू शकलो. त्यामुळे ज्योत्स्नाताईंचा मी अत्यंत आभारी व ऋणी आहे. धन्यवाद.

[ लेखमाला समाप्त ] 

स्वागत फुलांनी : प्रकाशचित्र – आभाकोल्हटकर  [८]
प्रेषक डॉ. प्रियंवदा कोल्हटकर  
priyakar40@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@@@@
विचारशलाका 
मिलिंद कर्डिले
– ©️ मिलिंद कर्डिले 
milindkardile@yahoo.com
@@@@@@@@@@@@@@@@@@
चित्रोळी
 
४४ ]
 
माधव मनोहर जोशी
 
– ©️ माधव मनोहर जोशी 
madvac1979@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@@@@
आजची कविता

प्रज्ञा नरेंद्र करंदीकर
 
 
*सौंदर्याचा  चकवा*

लता वृक्ष वेली सा-या
नटल्या  घालून आभूषणे
निसर्गनिर्मित हे दागिने
मोहक रत्नजडीत देखणे

स्वर्गातील भासती जणू
आल्या अप्सरा धरणीवर
गर्भरेशमी वस्त्र हिरवे
घाली त्यांच्या सौंदर्यात भर

कुंतल मोकळे तलम
रेशमी झुलती वा-यावर
पदन्यास करत धरती
ठेका झाडे तालावर

झुबे डुलते कानातले
थिरकती पायीची पैंजणे
करी गारुड  मनामनावर
यांच्या या रुपाचे चांदणे

पांथस्थाला घाली भूल
हा सौंदर्याचा चकवा
डोळ्यांचे फेडतो  पारणे
शृंगार  नित्य नवा


– ©️ प्रज्ञा करंदीकर
बंगळुरु
pradnyakarandikar85@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
शुक्र नभीचा दिसावा ! 

विज्ञानकथा
 
अर्चित गोखले
१९८० सालाची गोष्ट. कर्नाटक राज्यातील रायचूर ह्या गावात खूप मोठी वेधशाळा बांधली जाणार होती. खगोलशास्त्राचा अभ्यास करणं आणि खगोलशास्त्रासंबंधी महत्वाचे शोध घेणं हा ह्या वेधशाळेचा मुख्य उद्देश होता. ह्या वेधशाळेच्या संचालकपदी तरुण खगोलअभ्यासकाची निवड व्हावी अशी राज्याच्या अधिकाऱ्यांची इच्छा होती. ह्या पदासाठी कोणाची करावी असा प्रश्न राज्याच्या अधिकाऱ्यांसमोर उद्भवलेला होता. ही निवड करण्याची जबाबदारी राज्याच्या अधिकाऱ्यांनी त्या काळातील ज्येष्ठ खगोल वैज्ञानिक श्री.अगस्ती ह्यांच्यावर सोपवली.

वेधशाळेच्या संचालकपदी आपली निवड व्हावी ह्यासाठी देशभरातून बऱ्याच तरुण खगोलअभ्यासकांनी अर्ज पाठवले. श्री. अगस्ती प्रत्येक अर्ज नेटाने बघत होते, देशभरातील विविध विद्यापीठांमधून उच्च शिक्षण नुकतंच घेतलेल्या तरुण खगोलअभ्यासकांनी अर्ज केला असल्याने नेमकी कोणाची निवड करावी ह्याचं उत्तर त्यांना सापडत नव्हतं. शिक्षण, प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि असे इतर निकष विचारात घेतले तर सगळे खगोलअभ्यासक अगदी तोलामोलाचे सिद्ध होत होते.

अशा परिस्थितीत सर्व खगोलअभ्यासकांपैकी जो खगोलअभ्यासक शिकलेल्या खगोलीय संकल्पनांचा प्रत्यक्ष वापर करू शकेल त्याची निवड करण्याचं निश्चित झालं. परंतु त्यातील कोणाला खगोलीय संकल्पनांचा वापर अचूक करता येत आहे, हे पडताळण्यासाठी काय करावं असा विचार श्री. अगस्ती करत होते. एखाद्या खगोलीय संकल्पनेची व्याख्या मांडायला सांगितली तर प्रत्येक व्यक्ती त्याचं अचूक उत्तर देईल, हे त्यांनी ओळखलं होतं. एखाद्या ग्रहाचा सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्याचा वेग किती असं विचारलं तरी शिकलेल्या संकल्पना गणिताच्या सूत्रांमध्ये  मांडून सगळ्यांची उत्तरं सारखीच आणि अचूक येतील ही देखील त्यांना खात्री होती. आकाशात एखादी दीर्घिका ओळखायला सांगितली तरी देखील सगळे तरुण खगोलअभ्यासक अचूक ओळखू शकत होते. मग काय असं काय बरं करावं ज्यांनी सगळे तरुण खगोलअभ्यासक विचार करायला प्रवृत्त होतील असा त्यांचा विचार चालू होता. खूप विचार केल्यावर त्यांना एक युक्ती सुचली!

श्री. अगस्ती ह्यांनी अर्ज केलेल्या सगळ्या तरुण खगोलअभ्यासकांना त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतलं. राज्याचे अधिकारीसुद्धा तिथे उपस्थित होते. प्रत्येक खगोलअभ्यासक विद्यापीठात शिकत असताना अभ्यास केलेल्या प्रत्येक पुस्तकाचं प्रत्येक पान कंठस्थ करून आला होता. प्रश्न विचारला की लगेच आपण पहिलं उत्तर देऊ शकलो पाहिजे, ह्या हेतूने सगळ्यांनी अभ्यास केला होता. सगळेच ताकदीचे आणि तरुण खगोलअभ्यासक असल्याने प्रत्येकाची स्मरणशक्ती तितकीच तीव्र होती. त्यामुळे तयारी करताना वाचलेल्या संकल्पना विचारल्या तर अगदी एका क्षणाचा सुद्धा विलंब न करता सगळे उत्तर देऊ शकत होते आणि किंबहुना तशीच तयारी करून आले होते. अर्थात सगळे तरुण खगोलअभ्यासक अशीच तयारी करून येतील हे अनुभवी आणि ज्येष्ठ खगोल वैज्ञानिक श्री.अगस्ती ह्यांनी आधीच ओळखलं होतं. त्यामुळे कुठलाही प्रश्न न विचारता त्यांनी सगळ्यांना तिथे बसवलं आणि त्यांना, आपल्या मनातली एक इच्छा व्यक्त करायची आहे, असं सांगितलं. सगळ्या तरुणांचे श्री. अगस्ती आदर्श असल्याने त्यांची इच्छा काय आणि ती आपण कशी पूर्ण करू शकतो, ह्यासाठी सगळ्यांचे चेहरे उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहताना दिसत होते.

ते म्हणाले, “मला बरोबर आपल्या डोक्यावरील बिंदूवर किंवा त्याच्या जवळपास असलेल्या आकाशातील बिंदूवर शुक्र ग्रह बघायचा आहे. तेसुद्धा रायचूरमधूनच आणि नुसत्या डोळ्यांनी कुठल्याही दुर्बिणीशिवाय. “. ही इच्छा ऐकताच सगळे तरुण खगोलअभ्यासक चिंतित दिसू लागले. कार्यालयात येताना उत्साहाने भरलेले सगळ्या तरुणांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव दिसू लागले. प्रत्येक व्यक्ती आपलं उत्तर पहिलं असेल ह्या तयारीने आला असल्याने हे ऐकून सगळ्या खगोलअभ्यासकांमध्ये शांतता पसरली होती. श्री. अगस्ती ह्यांना ह्या सगळ्याची पूर्ण कल्पना असल्याने त्यांनी ती शांतता भंग करत सगळ्यांकडे बघत ते म्हणाले, “मला आजच शुक्र बघायचा नाही आहे, मी तुम्हाला एक दोन महिन्यांची मुदत देतो. आपण पुन्हा फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी भेटू.” इतकं बोलून त्यांनी सगळ्या तरुण खगोलअभ्यासकांना शुभेच्छा दिल्या. सगळे तरुण खगोलअभ्यासक शुभेच्छा घेऊन, अगस्ती सरांना भेटून त्यांच्या प्रश्नावर विचार करत कार्यालयाच्या बाहेर पडले.

सगळे बाहेर पडल्यावर राज्याचे अधिकारी अगस्ती सरांना म्हणाले, “हे इतके शांत का झाले? अगदी सोपा प्रश्न विचारला तुम्ही, प्रत्येक जण आकाशाचे नकाशे ओळखायला शिकला असेल, एखादा ग्रह कधी, कुठे, किती वाजता दिसेल हे देखील त्यांना माहित असेल. ते सहज तुम्हाला अंगणात घेऊन जातील आणि शुक्र डोक्यावर आला की दाखवतील.” त्यावर श्री.अगस्ती हसले आणि म्हणाले, “शुक्र ग्रह हा सूर्याच्या जवळचा ग्रह असल्याने, तो कायम सूर्याबरोबर उगवतो आणि सूर्याबरोबरच मावळतो. पृथ्वी आणि शुक्र त्यांच्या कक्षेत भ्रमण करत असताना कधी कधी बरोबर अशा ठिकाणी येतात जिथे सूर्य – पृथ्वी आणि शुक्र हा कोन सर्वाधिक असतो. त्याला शुक्राचं परम इनांतर म्हणतात. पण अशा स्थितीत असताना देखील शुक्र सूर्यापासून ४५ ते ४७ अंश अंतरावरच असतो, त्या पेक्षा लांब तो जाऊच शकत नाही. म्हणजेच शुक्र ग्रह सूर्याच्या पूर्वेला असेल तर सूर्य मावळताना तो ४५ अंश पश्चिम क्षितीजाच्या वरती दिसेल आणि ह्याच्या  बरोबर उलट शुक्र सूर्याच्या पश्चिमेला असेल तर तो सूर्योदयापूर्वी ४५ अंश पूर्व क्षितिजावर दिसेल. शुक्र जेव्हा डोक्यावर येईल तेव्हा त्याच्या जवळ सूर्य असल्याने आपल्याला तो बघणं शक्य होणार नाही. परिणामी तो कधीच डोक्यावर दिसू शकणार नाही.” हे ऐकून अधिकारी अचंबित झाले आणि म्हणाले, “म्हणून ती मुलं चिंतेत दिसली, मग तुम्ही असा प्रश्न विचारला कशासाठी?” त्यावर श्री. अगस्ती म्हणाले, “ह्या प्रश्नाचं एक उत्तर आहे आणि तेच जो शोधेल, त्याची संचालकपदी आपण निवड करायची.”

इकडे सगळे तरुण खगोलअभ्यासक ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी वेगवेगळी पुस्तकं वाचत होते, इतर कुठून ह्याची माहिती मिळते का शोधत होते, प्रत्येकाची खूप धावपळ सुरु होती. त्यातील एक अभ्यासक राजन्य दुसऱ्या दिवशी सकाळी वृत्तपत्र वाचत होता. त्यात बातमी होती, “१६ फेब्रुवारी, १९८० रोजी रायचूर येथून खग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे”. ही बातमी वाचताच राजन्यला अत्यानंद झाला. त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलं. त्याला हसताना पाहून त्याच्या घरचे म्हणाले, “अरे, तू हसतोस काय, तुला अगस्ती सरांच्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे ना? अभ्यास कर”. त्यावर तो काही न बोलता ताबडतोब घराबाहेर पडला. तो अगस्ती सरांच्या कार्यालयाकडे निघाला होता. रस्त्याने अगदी हसत खेळत आनंदाने गाणं म्हणत चालत होता.

त्याच्या एका खगोलअभ्यासक मित्राने त्याला पाहिलं. राजन्य इतका आनंदी कसा ह्याचं आश्चर्य वाटून तो मित्र त्याच्याशी बोलायला गेला, “काय रे राजन्य, तू इतका आनंदी आहेस, तुला सरांचं उत्तर मिळालं का?” राजन्य शांतपणे त्याच्या मित्राला म्हणाला, “तू आपल्या गावातून दिसणाऱ्या सूर्यग्रहणाची बातमी वाचलीस का?” त्यावर मित्र लगेच म्हणाला, “हो वाचली ना! मी त्याची निरीक्षणं घेण्यासाठी तयारी करत आहे, आपण खगोलअभ्यासकांनी ग्रहणाची अचूक निरीक्षणं घेऊन लोकांना ग्रहण पाहण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. तब्बल सव्वा दोन मिनिटांची ती खग्रास अवस्था आहे. चंद्र – पृथ्वी अंतर त्या दिवशी कमी असल्याने खग्रास ग्रहण पाहता येणार आहे, “. असं अगदी अभ्यासपूर्ण आणि भरभरून तो ग्रहणाबद्दल बोलत होता.

हे सगळं ऐकून राजन्य काही बोलणार इतक्यात मित्र म्हणाला, “परंतु आता सरांच्या प्रश्नामुळे अभ्यासात वेळ घालवावा लागेल आणि कदाचित ग्रहण बघता येणार नाही”. असं म्हणून तो पुस्तकात मान घालून, काहीतरी वाचत निघून गेला. राजन्यला हसावं का रडावं कळेना. परंतु काही विचार न करता त्याने सरांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. राजन्य कार्यालयात आला आणि सरांना भेटून म्हणाला, “सर, मी तुमची इच्छा पूर्ण करीन, तुम्हाला रायचूर गावातून डोक्यावर शुक्र दाखवीन.” हे ऐकून श्री. अगस्ती म्हणाले, “चल मग, आज संध्याकाळी मैदानात जाऊ”. त्यावर राजन्य म्हणाला, “सर अजून तुम्ही दिलेली मुदत संपली नाहीये, आजच्या ऐवजी १६ फेब्रुवारी रोजी गावाच्या मैदानात या दुपारी. मी नक्की तुम्हाला डोक्यावर शुक्र दाखवतो, ” एवढं बोलून राजन्य घरी निघाला.

सरांना मनापासून आनंद झाला होता. कारण त्यांना अपेक्षित असलेलं उत्तर राजन्यकडून मिळालं होतं. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी मैदानात गर्दी जमली. प्रत्येक जण एक विलक्षण अनुभव घेण्यासाठी तिथे उत्साहाने आला होता. सगळ्या खगोलअभ्यासकांनी प्रत्येकाला एक काळा चष्मा दिला. सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी बघितलं तर आपली दृष्टी कायमची बाधित होऊ शकते, म्हणून ते केवळ ग्रहणासाठी निर्मित विशेष चष्म्यामधूनच पहावं असं प्रत्येकाला त्यांच्याकडून सांगण्यात आलं.

हळू हळू ग्रहण लागायला सुरुवात झाली. सूर्यबिंबासमोर चंद्रबिंब येऊ लागलं. सूर्यबिंबाचा पाव भाग झाकला गेला. हळू हळू अर्ध सूर्यबिंब झाकलं गेलं. चंद्राची सावली जशी सरकत होती तसं काही काळात पाऊण सूर्यबिंब झाकलं गेलं. जमलेले सगळे अगदी कुतूहलाने पाहत होते आणि एकीकडे तज्ञांकडून सूर्यग्रहणाची भूमिती आणि इतर माहिती समजून घेत होते. आता खग्रास अवस्थेला काहीच मिनिटं शिल्लक होती. सूर्याची अगदी कडेची बाजू प्रकाशित दिसत होती, बाकी संपूर्ण सूर्य झाकला गेला होता. आजूबाजूचं तापमान कमी झाल्याचं प्रकर्षाने जाणवत होतं. पक्षी किलबिल करत होते. पटापट आपल्या घरट्यात जात होते.

अखेर तो क्षण आला आणि ग्रहणाची खग्रास अवस्था सुरु झाली. संपूर्ण सूर्यबिंब झाकलं गेलं. संपूर्ण आकाशात अंधार झाला आणि भर दिवसा इतर ग्रह – तारे दिसू लागले. ब्रह्महृदय, रोहिणी, काक्षी आणि राजन्य असे ठळक तारे दिसू लागले. सूर्याचं प्रभामंडळ किंवा कोरोना म्हणजेच सूर्याच्या वातावरणातील सगळ्यात बाहेरचं आवरण जे इतर प्रसंगी सूर्याच्याच तेजामुळे आपल्याला दिसू शकत नाही ते दिसत होतं. शास्त्रज्ञ प्रभामंडळाचा अभ्यास खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी करू शकतात कारण सूर्यबिंब झाकलं गेल्याने त्याचं तेज कमी होतं आणि बाहेरचं आवरण म्हणजेच कोरोना आपल्याला खग्रास स्थितीत पाहता येतो. जमलेल्या सगळ्यांना प्रभामंडळ पाहून खूप आश्चर्य वाटलं. बरोबर त्याच क्षणी राजन्य अगस्ती सरांकडे गेला आणि त्याने हात वर करून आपलं बोट आकाशातील डोक्यावरच्या बिंदूवर रोखलं. सगळ्यांनी कुतूहलाने आकाशात त्या ठिकाणी पाहिलं आणि सारे एकदम अचंबित झाले. तेजस्वी आणि प्रखर असा शुक्र ग्रह प्रत्यक्ष त्यांना डोक्यावर दिसत होता!

काय बघू आणि काय नको अक्षरशः प्रत्येकाची अशी अवस्था झाली होती. परंतु हा सगळा केवळ आणि केवळ सव्वा दोन मिनिटांचा खेळ. ते आश्चर्य लोकांना पचेपर्यंत आकाशात पुन्हा उजेड झाला, ग्रहणाची खग्रास अवस्था संपली. ग्रह – तारे, प्रभामंडळ सगळं सूर्याच्या तेजात लुप्त झालं. तापमान वाढू लागलं. हळू हळू पुन्हा संपूर्ण सूर्यबिंब चंद्रबिंबाच्या मागून बाहेर आलं आणि ग्रहण सुटलं. जमलेल्या सगळ्यांनी निसर्गाचा हा अद्भुत आणि रोमांचक अविष्कार दाखवल्याबद्दल आणि त्याची माहिती दिल्याबद्दल खगोलतज्ञांचे मनापासून आभार मानले आणि सगळे आपापल्या घरी निघाले.

श्री. अगस्ती सर, राज्याचे अधिकारी आणि सगळे तरुण खगोलअभ्यासक सरांच्या कार्यालयात गेले. राज्याच्या अधिकाऱ्याला सरांचे शब्द आठवले, “शुक्र जेव्हा डोक्यावर येईल तेव्हा त्याच्या जवळ सूर्य असल्याने आपल्याला तो बघणं शक्य होणार नाही. परिणामी तो कधीच डोक्यावर दिसू शकणार नाही.” ह्याचं एकमेव उत्तर म्हणजे जेव्हा खग्रास सूर्यग्रहण होईल केवळ आणि केवळ तेव्हाच शुक्र आपल्याला आकाशात इतक्या उंचीवर दिसू शकेल कारण सूर्य त्याच्या जवळ असला तरी त्याचा प्रकाश चंद्रबिंबाकडून अडवला जाईल, भर दिवसा अंधार पडेल आणि शुक्र आपल्याला दिसेल.

सगळ्या खगोलअभ्यासकांना ही संकल्पना माहित होती. परंतु विवेकाचा वापर करून राजन्यने माहित असलेल्या संकल्पनेचा प्रत्यक्षात वापर करून दाखवला आणि अगस्ती सरांकडून राजन्यची वेधशाळा संचालकपदी नियुक्ती झाली. राज्याच्या अधिकाऱ्यांनी राजन्यचं नाव संचालक म्हणून जाहीर केलं. सगळ्या खगोलअभ्यासकांनी त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या. आणि सगळ्यांनी एकत्र काम करून त्या गावात खगोलशास्त्राचा भरपूर प्रसार केला!

टीप: अशाच प्रकारे ८ एप्रिल २०२४, रोजी झालेल्या सूर्यग्रहणाच्या खग्रास अवस्थेवेळी शुक्र ग्रहाचं आकाशात ५५ – ६० अंशावर दर्शन झालं.

– ©️ अर्चित गोखले 

II०४-०४-२०२४ II सौर चैत्र १५, १९४६
architgokhale28@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@@@@
गीता प्रवचने
हेमंत मोने

पान २

 

पान ३

[ पूर्वप्रसिद्धी – बालविकास मंदिर मासिक – जुन २०२९ ]
– ©️ हेमंत मोने 
hvmone@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@@@@
बालचित्रकारांचे दालन
 
– सानिका वर्तक 
प्रेषक सौ. स्वाती वर्तक
           swati.k.vartak@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@@@  
 
हत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@

18 thoughts on “आमचे नाना उर्फ बालगंधर्व

  1. जयंत विठ्ठल कुलकर्णी यांचा बालगंधर्वांच्या आठवणींना उजाळा देणारा लेख अप्रतिम. ही लेखमाला समाप्त झाली याची चुटपूट लागून राहील.

    अर्चित गोखले यांची कथा मस्त. खगोलशास्त्र इतक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचे त्यांचे कसब वाखाणण्याजोगे.

    • धन्यवाद!🙏 मला खगोलशास्त्रातील संकल्पना समजून सोप्या पद्धतीने सांगण्याची शिकवण हेमंत मोने सरांकडून मिळाली! 🙏

  2. अर्चित गोखले यांची कथा उत्कंठा वाढवणारी आहे. मी अशाच प्रकारचे कोडे पूर्वी कधीतरी वाचल्याचे आठवते. माझा प्रश्न आहे की, खग्रास सूर्यग्रहणाशिवायच्या अन्य दिवशी, जेव्हा शुक्र बरोबर डोक्यावर असेल आणि सूर्य बऱ्यापैकी दूर असेल, तेव्हा जर जमिनीत खूप खोल असलेल्या एखाद्या विहीरीतून आकाशाकडे पाहिले तर शुक्र दिसेल का? असे केले की, सूर्य चित्रातून बाहेर जाईल आणि फक्त शुक्र दिसेल, असे मला वाटते. अर्चित गोखले किंवा खगोलशास्त्रातील अन्य जाणकार व्यक्तींनी यावर आफले मत जरूर कळवावे.

  3. ग्रहणाव्यतिरिक्त इतर दिवशी सूर्याच्या प्रखर उजेडामुळे शुक्र उपस्थित असूनही दिसू शकत नाही. म्हणूनच चांदण्या रात्री दिसतात. दिवसा त्या काही गायब झालेल्या नसतात. ग्रहणाच्यावेळी मात्र सूर्याची प्रखरता बऱ्यापैकी लयाला गेली असते. विहिरीत उभं राहून सूर्य फ्रेमबाहेर काढता येईल, पण उजेडाचं काय करणार ?मला काय वाटतं हे मांडण्याचा प्रयत्न केलाय. अर्चित जास्त अधिकाराने स्पष्ट करतीलच . 

  4. खूप खोलवर विहिरीत जाणं आणि सूर्याला फ्रेम मधून बाहेर काढणं ह्या स्थितीची तुलना आपण दुर्बिणी बरोबर करू शकतो. दुर्बीण देखील आकाशाचा अगदी लहान भाग आपल्याला दाखवते. त्याच्या बाहेरचा भाग दुर्बिणीच्या फ्रेम मधून बाहेर जातो.

    पहाटे दुर्बिणीतून एखादा ग्रह बघत असू तर असा अनुभव येतो की सूर्योदयापूर्वी आपण बघत असलेला ग्रह आता सूर्यप्रकाशामुळे किंवा त्या आधीच्या संधिप्रकाशामुळे नुसत्या डोळ्यांना दिसत नसून दुर्बिणीतून मात्र अजून तो दिसतो आहे. तेव्हा सूर्याचा प्रकाश तसा कमी असल्याने हे शक्य होतं. परंतु दुपारी दुर्बिणीतून देखील ग्रह पाहणं शक्य नसतं. कारण सूर्यप्रकाश फार तेजस्वी असतो. म्हणजेच थोडक्यात ग्रह आणि सूर्य एकमेकांपासून लांब हवे. आणि पूर्ण कथेचं सार तेच आहे की शुक्राच्या बाबतीत हे अंतर फार जास्त असू शकत नाही. सूर्य – शुक्र कायम एकमेकांच्या तसे जवळच राहणार.

    विहिरीतून पाहताना केवळ डोक्यावरचा बिंदू दिसू शकतो (Zenith). त्यामुळे शुक्राची क्रांती आपल्या अक्षांशाच्या बरोबर असायला हवी. ती नसेल तर शुक्र देखील फ्रेम बाहेर जाईल. अशा अनेक कारणांमुळे विहिरीतून शुक्र पाहणं शक्य नाही असच समोर येतं. त्यासाठी ग्रहणातील खग्रास अवस्थेचीच गरज भासेल.

  5. श्री. जयंत कुलकर्णी यांचा लेख सुंदर. याचे पहिले दोन भाग कधी प्रसिद्ध झाले आहेत? माझाकडून ते वाचायचे राहून गेले आहेत. मला हे तीनही भाग माझ्या इमेल वर मिळू शकतील का? माझ्या काही इतर संगीत प्रेमी मित्रानाही ते पाठवायची इच्छा आहे. माझा मेल id dpdeodhar@gmail.com धन्यवाद

    • दीपकजी,

      आपल्याला  आवडलेली कै. बालगंधर्वांवरील जयंत विठ्ठल कुलकर्णी यांची तीन भागातील लेखमालिका ‘मैत्री’अनुदिनीच्या ४, १० आणि १६ एप्रिल २०२४ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. धन्यवाद. 

      संपादक    

  6. कुळकर्णिजी भाग्यवान, त्यांना बालगंधर्वांची ही गाथा त्यांच्या नातीच्या तोंडून ऐकायला मिळाली व सोबत दुर्मिळ छायाचित्रे ही मिळाली. व मैत्री कुटुंबीय भाग्यवान जयंतजींनी तो खजिना आपल्यासाठी रिता केला. शेवटी त्यांचे झालेले हाल वाचून, अतीव दु:ख झालं. धन्यवाद जयंतजी.

    मोनेजींच्या शिष्योत्तमानं लिहिलेली खगोलीय कथा व मोनेजींची विनोबांनी केलेली गीता प्रवचने(साने गुरुजी लिखित) ची सुरुवात दोन्ही उत्तम. धन्यवाद अर्चितजी व मोनेजी.

    या नितांतसुंदर अंकासाठी धन्यवाद नाबरजी.

  7. सौ  स्वाती वर्तक लिहितात :-

     श्री जयंतजींचे ” नाना” वाचून खरोखर त्यांच्या भाग्याचा हेवा करावा असेच वाटते ..जेव्हा ते म्हणतात…” १९५२-५३ सालापर्यंत पं. भीमसेन जोशी बहुतकरून महाराष्ट्राबाहेर असल्याने त्यांनी नानांचं एकही नाटक पाहिलं नव्हतं. अथवा नाट्यगीतंही फारशी ऐकली नव्हती. त्यामुळे वरील दोन पदं त्या समारंभात म्हणायची ठरल्यानंतर पंडितजींनी साहजिकच पुलंना विचारलं की पदं बसवायची झाल्यास कुणाची मदत घ्यावी अथवा मिळेल असं तुम्हाला वाटतं..? त्यावर पुलंनी त्वरित माझ्या आईचं नांव सुचवलं होतं. त्यामुळे आईसह त्या गाण्यांच्या तालमी पंडिजींच्या घरी होत असत. तसेच, पु. ल. पेटीवर असत. त्या खोलीत फक्त पंडितजी, पु. ल., माझी आई व मी असे चौघंच असायचो. मी आईसोबत जात असल्याने..”..वाह!

    त्यांची स्मरणशक्ती ही तल्लख आहे ..सलाम ..! ते लिहितात,

    ” पु. ल. म्हणाले होते, ‘या रंगमंदिराबाहेर एक स्त्री असूनही पुरुषांना लाजवेल असा पराक्रम गाजविणारी झांशीच्या राणीचा पुतळा आहे. आणि ज्याच्या रंगभूमीवरील स्त्रीभूमिकांनी व दैवी संगीतगायनाने असंख्य रसिकांना आनंद दिला त्या पुरुषाचं स्मारक हे रंगमंदिर आहे.’”

    पु .ल .यांचे हे वाक्य लेखाला उजळवून देतात..नानांचा विनय सांगताना ज्योत्स्नाताईंची भावविवशता व प्रेम..या अभंगातून सहजी लक्षात येते.
    तारू लागले बंदरी । चंद्रभागेचिये तिरी ॥१॥
    लुटा लुटा संतजन । अमुप हे रासी धन ॥२॥
    जाला हरिनामाचा तारा । सीड लागले फरारा ॥३॥
    तुका जवळी हमाल । भार चालवी विठ्ठल ॥४॥.

    खूप छान होती लेखमाला जयंतजी…संपल्याची रुखरुख वाटते.

    श्री कर्डिलेजींची विचार शलाका, जोशीजींची चित्रोळी आणि प्रज्ञाची कविता सारे वाचनीय ..धन्यवाद.

    अर्चित गोखले यांनी विज्ञान कथा लिहून खूप सुखद नवलाईने भारून टाकले. मला तर श्री जयंत नारळीकर यांच्याच कथा आठवू लागल्या ..छान.. किती सोप्या शब्दात कथा खगोलशास्त्रज्ञ व शास्त्र यांच्या अनुषंगाने फुलविली आहे ..आवडली ..अभिनंदन..

    सहज…१६ फेब्रुवारी १९८० चे ग्रहण मला चांगलेच आठवते

    मोनेजींनी गीता प्रवचनावर २०१९ मध्ये लिहिलेला लेख आजही तेवढाच छान. याचे श्रेय विनोबाजींचे का सरांचे असे वाटते ..धन्यवाद.

  8. जयंत कुलकर्णी यांचा लेख वाचून त्यांना मिळालेल्या संधीचे किती कौतुक करावे तेच समजत नाही .त्या शिवाय त्यांनी हे सगळे  आठवून आठवून लिहिले आहे त्याचं विशेष कौतुक . मी महाराष्ट्र टाइम्सचा बाल  गंधर्व विशेषांक संग्रहात ठेवला आहे .त्यात अनेकांनी लिहिले आहे . शिवाय अनेक गोष्टींचा इतिहासही  समाविष्ठ केलेला आहे.त्यांनी लिहिलंय पु. ल. पेटीवर असत. त्या खोलीत फक्त पंडितजी, पु. ल., माझी आई व मी असे चौघंच असायचो. मी आईसोबत जात असल्याने हा भाग्याचा दुर्मिळ क्षण मला अनुभवायला मिळाला होता. हि गोष्ट कोणालाच माहित नाही . त्यामुळे  जयंत कुलकर्णी यांचा लेख मटाच्या विशेषांकात  प्रसिद्ध करायला हवा होता . तर बाहेर उडाली असती .एकूणच जयंतरावांना लिहिणे सुंदर जमते . सदर लेख लिहून आम्हाला आनंद दिला आहे. यात शंका नाही . 

     विचार शलाका चित्रोळी  आणि करंदीकरांनी कविता आवडली 

    खग्रास स्थितीत सूर्यबिंब झाकलं गेल्याने त्याचं तेज कमी झालं  सगळ्यांनी कुतूहलाने आकाशात त्या ठिकाणी पाहिलं आणि सारे एकदम अचंबित झाले. तेजस्वी आणि प्रखर असा शुक्र ग्रह प्रत्यक्ष त्यांना डोक्यावर दिसत होता! ला जबाब गोष्ट आहे अर्चितजी . 

    श्री हेमंत मोने यांचे लेख वाचायला मिळणार आहेत . आजपासून सरुवात छान झाली आहे सानिकाचे चित्र आवडले 

    या वेळचा अंक फार सुरेख आहे नाबरजी खूप आभार. 

          

  9. नमस्कार,
    माझ्या लेखमालेला रसिक वाचकांनी दिलेला प्रतिसाद ही नानांना उत्फुर्तपणे मिळालेली दाद होती. मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. तसेच, संपादक मंगेश नाबर यांचाही ऋणी आहे. शेवटी, गदिमांनी लिहिल्याप्रमाणे… “जशा जन्मती तेज घेऊन तारा, जसा मोर घेऊन येतो पिसारा, तसा येई कंठात घेऊन गाणे, असा बालगंधर्व आता न होणे..! रतीचे जया रूप लावण्य लाभे, कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे, सुधेसारखा साद, स्वर्गीय गाणे, असा बालगंधर्व आता न होणे..!” धन्यवाद.
    आपला,
    जयंत विठ्ठल कुळकर्णी.

  10. आभा कोल्हटकरची स्वागत फुले सुंदर आहेत. ही फुले ‘अस्टर’ची आठवण देतात..

    ‘आमचे नाना उर्फ बालगंधर्व’चा तिसरा भाग कर्तृत्त्ववान लोकांच्या अद्भुत कहाण्यांनी भरलेला आहे. भारतीय संगीताला समृध्द करणारा हा अज्ञात इतिहास वाचकासमोर ठेवण्यासाठी जयंत कुळकर्णींना खूप धन्यवाद!

    चित्रोळीतील चित्र पहातच राहावे इतके मोहक आहे. त्याचे वर्णन माधव जोशींच्या चित्रोळीत हुबेहूब उतरले आहे.

    प्रकाशचित्रातील फुलांना उद्देशून प्रज्ञा करंदीकर यांनी ‘सौंदर्याचा चकवा’ छान काव्यबद्ध केला आहे.

    अर्चित गोखले यांनी ‘शुक्र नभीचा दिसावा’ लेखात वर्णन केलेले १९८०चे सूर्यग्रहण मुंबईतून खंडग्रास दिसले होते. आम्ही हे सूर्यग्रहण बाल्कनीत एक परात ठेवून, त्यात गढूळ पाणी घालून, त्यातून पहिले होते. त्या सुमारास TIFRमधून बरेच गट ज्या ठिकाणाहून ते खग्रास स्वरूपात दिसणार होते, अशा ठिकाणी आधीपासून नियोजन करून, प्रयोग साहित्य घेऊन गेले होते. अर्चित गोखले यांनी, या घटनेचा उपयोग वेधशाळेच्या संचालकपदी योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी कसा केला गेला, त्याचे वर्णन सुंदरपणे केले आहे. हे वाचून लहानपणी वाचलेल्या राजाच्या गोष्टी आठवल्या. राजा चार राजपुत्रांतून आपल्या सिंहासनाला अर्वाधिक योग्य वारसदार निवडण्यासाठी, त्याना विशिष्ट मुदतीत कठीण समस्या सोडवण्यासाठी देत असे.     

    हेमंत मोने यांची ‘गीता प्रवचने’ वाचनीय आहेत.

    सानिका वर्तकचे हे सुंदर कल्पनाचित्र आधी पाहिल्याचे आठवते.

    सुंदर अंकासाठी सहयोग देणाऱ्या सर्वाना धन्यवाद!  

  11. नमस्कार स्वातीताई व पेठेसाहेब and other readers as well,
    आपण नेहमी तत्परतेने व उलट-टपाली माझ्या लेखांना जो प्रतिसाद देतां त्याबद्दल मी आपला आभारी आहे. Photo-Journalismचा उत्कृष्ट वारसा मी प्रथम माझ्या तीर्थरूप वडिलांकडून घेतला. आणि नंतर आमचे स्नेही व नामवंत छायाचित्रकार कै. गौतम राजाध्यक्ष यांच्याकडून तो बहराला. शेवटी, जपलेल्या व जोपासलेल्या दुर्मिळ खजिन्याला जर लेखणीने शब्दरूप दिले नाही अथवा प्रकाशात आणले नाही तर, त्याला अर्थ नाही. आपल्यासारख्या कर्तव्यदक्ष व चोखंदळ रसिक वाचकांमुळेच ते अधिक प्रभावी ठरते. थोडक्यात, या उतार वयात शेवटच्या टप्प्यात जाणाऱ्या व हळु-हळू-धग-धग करणाऱ्या आमच्या ‘जीवन रेल’ला खऱ्या अर्थाने मिळणारं ते बोनसवजा इंधन आहे. यात शंका नाही. असो. संपर्कासह असाच कृपलोभ असूं द्या. ठेवावा… धन्यवाद.
    आपला आभारी व नम्र,
    जयंत.

    PS: Special thanx to Mangesh Nabarsaheb for his trust on me and publishing my articles as it is. More later on…

यावर आपले मत नोंदवा