कन्फेशन

दीर्घकथा 
 
 
मोतीराम टोपले 
 
 
भाग १

आठ पंचेचाळीसची कोकण कन्या सुटायला पाचच मिनिटे बाकी होती. मी शेवटच्या डब्यात प्रवेश केला. आज गाडीला फारशी गर्दी नव्हती. डब्यात चार पाच प्रवासी आरामात बसले होते. मोकळ्या सीटखाली सामानाच्या दोन्ही पिशव्या सरकवून मी विंडो सीटवर बसलो. बसल्या बसल्या मी सहप्रवाशांवर नजर टाकली. समोरच्या बाकावर साधारण पस्तीस वर्षे वयाचा एक रूबाबदार तरुण बसला होता. त्याच्या एकंदरीत पेहरावावरून व त्याच्याकडील लेदरबॅगवरून तो कुठच्यातरी कंपनीचा एजंट असावा हे सहज ओळखता येत होते. त्याच्या दुसऱ्या बाजुला एक विवाहित जोडपे बसलेले होते. त्यातील स्त्रीच्या हातातील हिरव्या बांगड्या व त्यांच्या एकूण हालचालीवरून त्यांचे अलीकडेच लग्न झालेले असावे हे मी सहज ओळखले. ठीक आठ पंचेचाळीसला ट्रेन सुरू झाली हळुहळू गाडीने वेग घ्यायला सुरुवात केली. मी खिडकीतून बाहेर पाहिले. गावचा परिसर जसजसा मागे जाऊ लागला तस तसे गेल्या दोन महिन्यातील प्रसंग डोळ्यासमोर येऊ लागले.

बारावी सायन्सची परीक्षा मी अठ्याऐंशी टक्के गुण मिळवून पास झालो. CPM ग्रुप असल्याने इंजिनिअरिंगला जायची माझी इच्छा होती. आमच्या शेजाऱ्यांनी माझ्या यशाबद्दल खूप कौतुक केले. पाहुण्यांचे देखील अभिनंदनाचे फोन आले. लवकरच अ‍ॅडमिशन सुरू होणार म्हणून माझी त्यासाठी तयारी चालू होती आणि अचानक एके दिवशी माझ्या वडिलांना हार्टअटॅकचा झटका आला. त्यातच वडिलांचे निधन झाले. सगळ्या आनंदावर दु:खाची छाया पडली. माझे इंजिनिअरिंगचे स्वप्न धुळीस मिळाले. बाराव्या दिवशी पाहुणे आले. त्यांनी आमचे सांत्वन केले.

काही जण म्हणत होते. “प्रशांत तू पुढे शिक, शिक्षण अर्धवट सोडू नकोस. आम्ही जमेल तशी तुला मदत करू.” वगैरे
मी ओळखले हे काही खरे नाही, त्यांच्या भावना मी समजू शकतो पण त्यांनाही ते कसे शक्य होणार ? त्यांना स्वतःचा संसार आहेच ना; शिवाय इंजिनिअरिंगसाठी खर्चही फार येतो. घरात आई व लहान भाऊ यांची जबाबदारी आपल्यावर आहे. त्याचं काय करणार ? हा प्रश्न होताच. तेव्हा आपल्या नशिबी एवढेच शिक्षण आहे. आता आपणच काही तरी काम धंदा केल्याशिवाय तरणोपाय नाही याची मी खूणगाठ बांधली. आपण धंदा कसला करणार? त्यासाठी भांडवल कुठून आणणार ? गावात कामे  कुठे आहेत ? आपण कसले काम करावे? याचा विचार करता मला आठवले की माझ्या एका मित्राच्या वडीलांचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे हे आठवले. त्यांच्याकडे क्लिनर म्हणून मला काम मिळते का बघावे, असे मी ठरवले व मी मित्राच्या घरी जाऊन त्याच्या बाबांना भेटलो. त्यांचे पाच डंपर होते. त्यांनी मला एका डंपरवर क्लिनर म्हणून काम दिले. आलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी मी शोधलेल्या उपायांचे त्यांनी कौतुकही केले.

डम्परचा क्लिनर म्हणून माझी नोकरी सुरू झाली. महिना तीन हजार रूपये पगार त्या खेरीज काही वेळा जेवण चहा पाणी बाहेरच मिळत असल्याने घरखर्च भागवून महिना शंभर रूपये मी सेव्हींग करत होतो. वर्षभरात मी ट्रक, डंपर चालवायला शिकलो. अधून मधून मालकांची कार चालवायला मिळायची. चांगली प्रॅक्टिस झाल्यावर मी ड्रायव्हिंग लायसन्स काढले. ट्रक चालवण्यापेक्षा कार चालवणे कमी श्रमाचे असल्याने मी प्रवाशी कार चालविण्यासाठी आवश्यक बॅच देखील काढला. जेणे करून भविष्यात मला टॅक्सी ड्रायव्हर म्हणून देखील काम करता येईल. लायसेन्स व बॅचसाठी मला दरमहा बचत केलेल्या रकमेचा उपयोग झाला.

एके दिवशी मालकांनी मला बोलावून घेतले. मी त्यांच्या घरी गेलो. त्यांनी मला बसायला सांगितले व ते म्हणाले, “प्रशांत, त्यावेळी तुझ्याकडे कोणत्याही कामाचा अनुभव नसल्याने तू माझ्याकडची क्लिनरची नोकरी स्वीकारलीस व ती इमाने इतबारे तू पार पाडलीस. हे ठीक आहे. पण तुझ्यासारख्या हुषार व शिकलेल्या मुलाने ती अशीच पुढे चालू ठेवावी असं मला तरी वाटत नाही. याबाबतीत तू काय ठरवलं आहेस ? ”

” तुमचं म्हणणं मला पटतं पण सध्यातरी मी काही ठरवलेलं नाही. ‘

“माझ्या मते तू मुंबईला जा. तुझ्यासारख्या हुशार मुलाला तिथे चांगली नोकरी सहज मिळेल. फक्त रहाण्याची सोय असली म्हणजे झालं. ”

” तसे दूरचे मामा आहेत मुंबईला आहेत, पण मी गेल्यावर मला लगेच नोकरी मिळेल असं नाही ना. मग नोकरी मिळेपर्यंतच्या काळात त्या मामांना मी देणार काय? आणि इथला घरखर्च कसा भागवणार, हा प्रश्न आहेच ना ?” “त्याची काळजी तू करू नकोस. तुला गेल्या गेल्या टॅक्सी ड्रायव्हरची नोकरी देण्याची जबाबदारी माझी. पुढे तुझं नशीबच तुला मार्ग दाखवील. ”
“बरं आहे काका. मी विचार करतो. आईचा विचार घेतो आणि तुम्हाला सांगतो.” असं सांगून मी त्यांचा निरोप घेतला.

महिनाभरात मी विचार करून मुंबईच्या मामांशी पत्रव्यवहार करून मुंबईला जाण्याचे निश्चित केले. मी कामासाठी मुंबईला जायचे निश्चित झाले तेव्हा माझ्या मित्राने आठवण म्हणून मला नवीन वर्षाची चॉकलेटी रंगाची सुंदर डायरी भेट दिली व सांगितले  की मुंबईला गेल्यावर दररोज डायरी लिहायची सवय ठेव. मित्राच्या वडिलांनी बोनस म्हणून मला एका महिन्याचा पगार दिला व एक चिठ्ठी दिली. मी डायरीच्या पहिल्या पानावर ती चिठ्ठी स्टेपल करून ठेवली.

काकांनी मला सांगितले, ” या चिठ्ठीवर पत्ता आहे. त्या पत्यावर तू जा. तेथे आप्पासाहेब नावाचा माझा मित्र आहे. तो तुला लगेच टॅक्सी ड्रायव्हरची नोकरी देईल. याची मला खात्री आहे. तुझं काम झालं की लगेच मला कळव. ”

आज २६ डिसेंबर, नशीब अजमावण्यासाठी आपण मुंबईला चाललो आहोत. सोबत आवश्यक सामान त्यात अंथरूण पांघरूण, टॉवेल, घरातील व बाहेर जाताना घालायचे कपडे, मित्राने दिलेली डायरी त्यात काकांनी दिलेली चिठ्ठी काही मुंबईतील मित्राचे पत्ते, बॅटरी अशा सामानाच्या दोन लेदर बॅग घेतल्या. उद्या काय काय करायचे याचा विचार माझ्या मनात चालला होता. एवढ्यात कुठल्याशा स्टेशनवर ट्रेन थांबली. समोरचा एजंट व त्यांच्या मागोमाग ते जोडपं खाली उतरले. माझ्याकडे जेवणाचा डबा असल्याने मी जेवण करून घ्यायचे ठरवले. जवळच्या बेसीनकड़े जाऊन हात धुतले व सीटवर बसून जेवून घेतले. एवढ्यात तो एजंट एक सायंदैनिक व एक पॅकेट घेऊन आला. काही वेळाने ते जोडपे आईस्क्रिम खात गाडीत येऊन बसले. ट्रेन पुन्हा चालू झाली. जोडप्याच्या गोष्टी रंगात आल्या होत्या. एजंटाने ते सायंदैनिक उघडून त्यावर चौफेर नजर टाकली. नंतर खिशातून एक कागद काढून तो पेपरवर जुळवून पाहू लागला. बघता बघता त्याच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसू लागला. नंतर त्याने आपली बॅग उघडली त्यातून स्टॅपलर काढून त्याने तो कागद दैनिकावर ठेऊन स्टेपल मारली नंतर थोड्या वेळापूर्वी आणलेले पॅकेट खोलले. पॅकेटमध्ये चॉकलेटी रंगाची नवी कोरी डायरी होती. जी हुबेहुब माझ्याकडे असलेल्या डायरीसारखी होती. त्या डायरीत ते दैनिक ठेवून त्याने डायरी बॅगेत ठेवली. थोड्याच वेळात तो एजंट बसल्या बसल्या झोपी गेला.

माझ्या डोक्यात विचारचक्र चालू असल्याने मला झोप येतच नव्हती. किंवा आली तर मध्येच जाग यायची, बाजूच्या सीटवरील जोडप्यातील स्त्री नवऱ्याच्या मांडीवर डोके ठेवून झोपली होती. प्रवास चालू होता. आता हवेत थोडासा गारठा जाणवू लागला. एजंटने खिडकीची काच लावून बंद केली. मला गारठा बरा वाटत होता म्हणून मी खिडकी उघडीच ठेवली व झोप घेण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळाने जाग आली हातातील घड्याळात पहाटेचे चार वाजल्याचे दिसले. पुन्हा झोप येण्याची चिन्हे दिसेनात. खिडकीबाहेर गडद अंधार, गाडीच्या इंजिनाचा आवाज, गाडीचे बसणारे हादरे, यामुळे मला कंटाळा यायला लागला. आपण उगाचच ट्रेनने निघालो. बसमधून प्रवास करताना बसच्या हेडलाईटमुळे रस्ता, झाडे, वाटेतील गाव, गावातील स्ट्रिटलाईटमुळे दिसणाऱ्या इमारती, मागून पुढे पुढून मागे जाणारी वाहने दिसतात. गाडी नादुरूस्त झाली तर लगेच मदत मिळते. प्रवासात जिवंतपणा जाणवतो. रेल्वेमार्ग गावाबाहेरूनच असल्याने खूप एकटेपणा जाणवतो. अजून किमान दोन तास आपल्याला याच स्थितीत घालवायचे आहेत. असा विचार करत मी बसलो होतो. लयबध्द आवाजात गाडी काळोख चिरत जात होती.

इतक्यात कानठळ्या बसणारा आवाज झाला ट्रेनमधील लाईट बंद झाली. आपण कोठेतरी फेकले जातो आहोत असे मला जाणवले. मी खिडकीच्या गजाला घट्ट पकडून होतो. मिट्ट काळोख प्रवाशांच्या किंकाळ्या यांनी आसमंत भरून गेला. मला काही क्षण काय झाले काही समजेना. डाव्या हाताच्या बोटातून वेदना सुरू झाल्या होत्या. आता मला जाणवले, रेल्वेला अपघात झालाय माझ्या पायाखालच्या बॅगमध्ये बाहेरच्या पॉकेटमध्ये बॅटरी ठेवल्याचे मला आठवले. अंधारातच पायाखालची बॅग काढून तिच्या बाहेरच्या पॉकेटमधली बॅटरी मी काढली. बॅटरीचा प्रकाश समोर पडल्याबरोबर मी चक्रावून गेलो. समोरच्या सीटवरील एजंट खिडकीची फ्रेम छातीत घुसून गतप्राण झाला होता. सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. त्याच्या बाजूच्या सीटवरील तरूण दोन सीटच्या मधील भागात दूरवर पडला होता. त्याच्या डोक्याला मार लागलेला दिसत होता. त्याची बायको दोन सीटच्या मधल्या भागात पडलेली दिसत होती. दोघेही बेशुद्ध होती. मी माझ्या सीटकडे आलो बॅग खोलली. जेवणाच्या डब्यात कांदा शिल्लक होता तो घेतला पहिल्याने त्या तरूणाच्या नाकाजवळ कांदा पकडला व नंतर तोंडावर पाणी मारले तेव्हा तो शुध्दीवर आला.

” तुम्ही कोण ? मी कुठे आहे ?” असे तो विचारू लागला.

मी त्याला रेल्वेच्या अपघाताची कल्पना दिली. तेव्हा त्याला बायकोची आठवण झाली. मी त्याच्या बायकोला त्याच्या बाजूला आणून बसविले.

” तुम्ही हिची काळजी घ्या. मी इतर डब्यात काय परिस्थिती आहे ते पाहून येतो. ”
असे त्याला सांगून मी ट्रेनमधून खाली उतरून इंजीनच्या दिशेने चालत राहिलो. रेल्वे इंजीनसमोर प्रचंड आकाराचा खडक पडल्यामुळे सुरूवातीचे बरेच डबे रेल्वे ट्रॅकवरून घसरून पडले होते. जिकडे तिकडे रक्ताचा सडा पडलेला होता. प्रवासी वेदनेने विव्हळत होते. या सगळ्याना मदत करणे आपल्या आवाक्याबाहेरचे आहे हे माझ्या लक्षात आले. मी मागे परतलो. वाटेत मला एक रूळापर्यंत आलेली वाट दिसली. मी आमच्या डब्याकडे आलो. माझ्या दोनही बॅगा घेतल्या एक बॅग पाठीवर दुसरी डाव्या हातात व उजव्या हातात बॅटरी घेऊन मी मघा पाहिलेल्या वाटेकडे आलो. आज जरी वाटेवर झुडपे दिसली तरी ही वाट मला जवळचा रस्ता दाखवेल अशी माझी खात्री होती. कारण रेल्वेच्या ट्रॅकचे काम चालू असताना मुख्य रस्त्यापासून ट्रॅकपर्यंत अशा वाटा रेल्वेचे रूळ वाहून नेण्यासाठी करतात हे मला माहीत होते. बॅटरीच्या प्रकाशात काटे झुडपे यातून वाट काढत सुमारे एक किमी चालल्यावर मला डांबरी रस्ता दिसला. समोरच्या माईलस्टोनवर पनवेल १५ किमी व दिशादर्शक बाण दिसला.

रस्त्यावरून बाणाच्या दिशेने मी चालायला सुरूवात केली. अजून सर्वत्र काळोख जाणवत होता. समोरून दोन वाहने निघून गेली. काही वेळाने मागच्या बाजूने दूरवरून एक वाहन येत असल्याचे दिसले. त्याच्या हेडलाईटमधील अंतरावरून ती कार आहे हे मी ओळखले व गाडी थांबवण्यासाठी हात दाखविला. कार न थांबता निघून गेली. काही वेळाने अशी दोन तीन वाहने निघून गेल्यावर माझ्या लक्षात आले की माझ्या या अवतारामुळे कोणी थांबत नाही. म्हणून मी दोन्ही बॅगा रस्त्यावर ठेवून झाडाची एक फांदी आणून बॅगावर ठेवली व तेथेच उभा राहिलो. थोड्या वेळाने एक ट्रक थांबला. मी ड्रायव्हरच्या केबीनकडे जाऊन त्याला रेल्वे अपघाताची माहिती दिली व मला पोलिसस्टेशनपर्यंत पोहचविण्याची विनंती केली.

” ठीक आहे. मी तुला पोलिस स्टेशनपर्यंत नेतो पण मी तुझ्याबरोबर तिथे येणार नाही. कारण ट्रकमध्ये मासे भरलेले आहेत. ते वेळेत पोहोचले पाहिजेत. चल..” असे म्हणताच मी फांदी रस्त्याच्या बाजूला फेकून दिली व दोन्ही बॅगा घेऊन क्लिनरसाईडने ट्रक मध्ये बसलो. वीस एक मिनीटात ट्रक पोलिसस्टेशन समोर पोहोचली. मी ड्रायव्हरचे आभार मानून पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो.

पोलीस स्टेशनच्या बाहेरील खुर्चीवर एक कॉन्स्टेबल बसलेल्या स्थितीतच डुलक्या काढीत होता. त्याला हात लावताच कोण आहे ? कोण आहे ? असे ओरडत तो उभा राहिला. त्याच्या आवाजाने आतील इन्स्पेक्टर बाहेर आला. त्यांना पहाताच मी अपघाताची बातमी त्यांना सांगितली. ताबडतोब फोन फिरवून इन्स्पेक्टरने मदत मागवली. दहा मिनिटात दोन पोलीस व्हॅन हजर झाल्या. माझे सामान तिथेच ठेवून मी त्या दोन वाहनांबरोबर घटनास्थळी दाखल झालो. पोलिस व्हॅनमधील जनरेटरच्या सहाय्याने फ्लड लाईट चालू करून मदतकार्य चालू झाले. अपघाताचे दृष्य पाहून अपघाताची भयानकता लक्षात यायला इन्स्पेक्टना वेळ लागला नाही. त्यांनी मोबाईलवरून अपघाताच्या ठिकाणाची माहिती देऊन अ‍ॅम्बुलन्स मागवल्या. डोंगरात खोदकाम करून रेल्वेमार्ग बनवण्यात आला होता. डोंगरातून आलेला एक प्रचंड आकाराचा खडक रेल्वेमार्गावर पडलेला होता. त्यावर इंजिन आपटल्याने अपघात घडून आला होता. रेल्वेच्या पहिल्या डब्यावर दुसरा डबा अशा क्रमाने डबे आदळले होते. मी शेवटच्या डब्यामध्ये असल्याने आमच्या डब्याच्या आघाताची तीव्रता सर्वात कमी होती. इंजिन ड्रायव्हर इंजिनमध्ये मरून पडला होता. त्याचा एक तुटलेला पाय काही अंतरावर पडलेला होता. आघात इतका प्रचंड होता की पहिल्या दोन डब्यातील एकही व्यक्ती जिवंत नव्हती. मागच्या डब्यात मृताची संख्या कमी पण हात पाय मोडलेल्या, बेशुध्द माणसाची संख्या बरीच होती. आमच्या डब्यातील जोडप्यातील स्त्री अजून बेशुध्द होती. तरूणाचा पाय बहुधा मोडला होता. तो खुपच सुजलेला दिसत होता. अपघातग्रस्तावर प्राथमिक उपचार करण्यात आले. तोपर्यंत उजाडायला सुरूवात झाली. घटनास्थळी फोटोग्राफर, वार्ताहर येऊन पोहोचले. अ‍ॅम्बुलन्स हॉस्पीटलच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. मला पोलीस व्हॅनमधून स्टेशनवर आणले गेले. तेथे मला चहा नाश्ता देण्यात आला. इन्स्पेक्टरनी माझे आभार मानले व आपल्या गाडीने मला पनवेल स्टेशनवर सोडले.

@@@
दुपारी अकरा वाजता मी गोरेगांवला मामांच्या खोलीवर पोहोचलो. रविवार असल्याने मामा घरीच होते. मी स्वच्छ आंघोळ केली. मामीने जेवायला वाढले. मी खूपच दमलो होतो.
“यायला उशीर का झाला ? ”
“मी खूप दमलोय, जरा झोपतो व उठल्यावर सांगतो.” असे सांगून मी कॉटवर जाऊन झोपलो.

सकाळी सहा वाजता मामा उठून दुध व पेपर घेऊन आले. मामानी पेपर उघडला. बातमी वाचली व पेपर मामीकडे दिला मामीने बातमी वाचली. पेपरमध्ये रेल्वे अपघाताची बातमी, अपघाताचे फोटो, सोबत इन्सेंटमध्ये माझा फोटो व बातमीत माझ्या साहसाचे वर्णन होते. जाग आल्यावर मी उठून घड्याळ्यात पाहिले सकाळचे नऊ वाजले होते. मी झटकन उठलो. याचा अर्थ मी काल दुपारी झोपलो. तो आज आता दुसऱ्या दिवशी उठतोय हे माझ्या ध्यानात आलं. बाजूच्या खोलीत मामामामी बसले होते.

” मामी, मला रात्री का नाही उठवलं ? ”
“अरे, आम्ही उठवण्याचा प्रयत्न केला रे. पण तू उठायलाच तयार नाहीस. ही म्हणाली त्याला झोपूदे. तो उठला की वाढते मी त्याला जेवायला. पण रात्री तू उठलाच नाहीस..”
“सॉरी हं, काय झालं…..”
‘काय झालं ते राहू दे. नंतर बघू.. तू जा बरं तोंड धुऊन ये. तुझ्यासाठी मामीने शिरा केलाय तो गरमा गरम खाऊ… जा बरं…. ”
‘नाही. काल काय झालं ते तुम्हाला सांगायचं होत…. ”
‘आम्हाला सगळं माहीत आहे. तू नंतर सांग. तू तोंड धुऊन ये आधी. काल दुपारपासून तू काहीच खाल्लेलं नाहीस.”

आता आश्चर्य करण्याची पाळी माझी होती. मामाना काय समजलं आहे? तेच मला समजेना.

मी तोंड धुवून टेबलापाशी येताच मामानी आजचा न्युजपेपर माझ्यासमोर ठेवला. पेपरमध्ये अपघाताची बातमी दाखविली माझा इंस्पेक्टरसोबतचा फोटो छापून आला होता. मामानी पाठ थोपटून माझे अभिनंदन केले. तेवढ्यात मामांचे दोन शेजारी आले त्यांनीही माझे अभिनंदन केले. मी आल्यामुळे मामांना आनंद झाला होता. कारण त्यांना मूलबाळ नव्हते. मामा दोन वर्षानी रिटायर्ड होणार होते. या वयात पूर्वीसारखी काम त्याच्याकडून होत नसल्याने माझी त्यांना मदत होणार होती. दोन वर्षानंतर गावी जाईपर्यंत मी सोबतीला राहिलो तर त्यांना हवाच होतो. थोड्या वेळाने मामा कामावर जाण्यासाठी निघून गेले.
अकरा वाजता मी तयार होऊन मामीला सांगून खोलीबाहेर पडलो. सोबत ड्रायव्हींग लायसन्स, बॅच व मित्रांच्या बाबांनी दिलेली चिठ्ठीही घेतली. ११.२७ च्या लोकल ट्रेनने मी १२.१० वाजता चर्चगेटला पोहोचलो एक वाजता मी ‘कृष्णा मेन्शन’ मधील बिल्डिंग मधील ‘शिरसाट ब्रदर्स टुरिस्ट टॅक्सी सप्लायर’ या ऑफिसमध्ये पोहोचलो.

@@@

थोड्याशा जागेत ऑफिसची आकर्षक केबीन होती. केबीनमधील ऑफिस टेबलावर ३ टेलिफोन होते. खुर्चीत सुमारे पंचावन्न वर्षे वयाचे रूबाबदार गृहस्थ लॅपटॉपवर काम करत होते.
” सर आत येऊ का?”
“या, बसा, काय काम होतं ?’
” आप्पासाहेबाना भेटायच होतं. ”
“मीच आप्पासाहेब, बोला. ”
“मी प्रशांत पारकर सावंतवाडीहून आलोय. वसंतराव देसाई यांनी तुम्हाला चिठ्ठी दिली आहे” असे म्हणत मी चिठ्ठी त्यांच्याकडे दिली.
“काय म्हणताहेत वसंतराव ? बऱ्याच वर्षानी आमची आठवण झालेली दिसते” असे म्हणत आपासाहेबांनी चिठ्ठी वाचली.
“हे बघा प्रशांत, वसंतरावांनी तुमच्याबद्दल सर्व काही लिहिलयं, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स जरा बघु” मी लायसेन्स व बॅच आपासाहेबाना दाखवला.
” तुम्ही मुंबईत टॅक्सी चालवू शकाल का ?” लायसेन्स व बॅचचे निरिक्षण करीत आपासाहेबांनी विचारले.
” हो वसंतरावांबरोबर बऱ्याच वेळा मी मुंबई शहरात व उपनगरात गाडी घेऊन येत असे.”
“हे बघ आमच्याकडे दोन प्रकारच्या टॅक्सी आहेत. एक मुंबई शहरात व उपनगरात चालतात आणि दुसऱ्या टुरिस्ट टॅक्सी लांब पल्याच्या प्रवासासाठी दिल्या जातात. तुला कुठे जायला आवडेल?”
” मी कुठेही जायला तयार आहे. ”
” ठीक आहे. हे बघ आमच्या सर्व टॅक्सी नव्याच आहेत. दोन वर्षे वापरलेल्या टॅक्सी आम्ही विकून टाकतो व नव्या टॅक्सी घेतो. तेव्हा टॅक्सीची योग्य ती काळजी घेतली पाहिजे आणि हो, कस्टमरची कोणतीही तक्रार येता कामा नये. हे लक्षात ठेव. ”
“हो, मी योग्य ती काळजी घेईन. ‘
” तुला इंग्लिश, हिंदी बोलता येतं का ?
“हो, मी बारावी सायन्स पास, पूर्ण इंग्लिश मिडीयममधून केलं आहे. ”
” छान, तुला महिना सहा हजार रूपये पगार. टुरिस्ट टॅक्सी असेल तर दररोजचा तीनशे रू. भत्ता. उद्या सकाळी आठ वाजल्यापासून तुझी ड्युटी सुरू. ठीक आहे. ”

एवढ्या झटपट मला नोकरी मिळाली हे ऐकताच मला एकदम भरून आलं.

“थँक्यू सर, मी उद्या वेळेवर येतो.” असे म्हणताना नकळत माझे हात जोडले गेले.
अहं सर नव्हे आप्पा,” आपासाहेब हसत म्हणाले.
“येतो मी” असे म्हणत मी आप्पासाहेबांचा निरोप घेतला. वाटेत मामा मामीसाठी पेढे घेतले. खोलीवर पोहोचेपर्यंत तीन वाजले. मामी जेवणासाठी वाट पहात होती. मला नोकरी मिळाल्याचे समजताच तिलाही आनंद झाला. हात पाय धुवून मी जेवण केले. उद्यापासून कामावर जायचे असल्यामुळे गावाकडून आणलेले माझे सामान कपाटात ठेवण्यासाठी मी बॅगची चेन खोलली व आतील सर्व सामान बाहेर काढले. तेव्हा सामानात मला एकाच चॉकलेटी रंगाच्या दोन डायऱ्या दिसल्या मित्राने मला एक डायरी दिली होती. मग दुसरी डायरी कुठून आली ? मला काही समजेना. मी पहिली डायरी उघडली त्यातील पाने परतली. त्यावर मी लिहिलेले मित्रांचे पत्ते होते. ती बाजूला ठेऊन मी दुसरी डायरी उघडली. पानावर कुठेही काही लिहिलेले नव्हते. मध्येच एक दैनिकांचे पान होते व त्यावर लॉटरीचे तिकीट स्टेपल केलेले होते. तेव्हा मी ओळखले की ही त्या एजंटची डायरी आहे. आता मला आठवले. अ‍ॅक्सिडंटनंतर रेल्वे डब्यातून बाहेर पडताना माझी बॅग उघडी होती व बॅगच्या बाजूला डायरी पडलेली होती. माझी डायरी बॅगेतून बाहेर पडली असे समजून ती डायरी बॅगेत ठेवून मी बॅग घेऊन बाहेर पडलो होतो.
लॉटरी तिकीटावरील नंबर मी दैनिकावरील लॉटरी रिझल्टमधील नंबराबरोबर जुळवून पाहिला. त्या तिकीटाला एक लाख रूपयाचे बक्षीस लागले होते. अरे बापरे! आता काय करायचे ? त्या एजंटचा चेहरा, त्याच्या छातीत घुसलेली काच, सारे चित्र डोळ्यासमोर आले. मी झटपट उठून त्या दिवशीचे वृत्तपत्र उघडले. मृतामध्ये एजंटचा फोटो नव्हता. या तिकीटाचे काय करायचे हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला.

एक मन म्हणू लागले की हे बघ तू हे तिकीट चोरले नाहीस तुझ्या नशीबाने हे घबाड हाती लागलेले आहे. तेव्हा ते तुझेच आहे. आता विचार करू नकोस. दुसरे मन म्हणू लागले की तुझ्या आईवडिलांनी गरीबीतसुध्दा कोणाची पै देखील घेतली नाही आणि तू दुसऱ्याची एवढी मोठी रक्कम हडप करणार हे बरोबर नाही.
मी काय करू तो एजंट मरून गेलाय. त्याच नांव पत्ता मला काहीच माहीत नाही. कुठे शोधू त्याला ? माझे डोकेच चालेना. बरे ही गोष्ट कोणाला सांगण्यासारखीही नव्हती. कारण काहीनी मला मुर्खात काढले असते तर काहीनी “हा लाख रूपये म्हणून सांगतोय कदाचित बक्षीसाचे पाच लाखसुध्दा याने हडप केले नसतील कशावरून,  अशी शंका घेतली असती. शेवटी खूप विचार करून मी ठरविले की ही रक्कम आपणच घ्यायची. पण आपण वापरायची नाही. पाहू पुढे काय करता येईल ते. अधिक विचार करण्यात अर्थ नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी आठ पंचेचाळीसला मी ऑफिसमध्ये पोहोचलो. आप्पांनी टॅक्सीची चावी माझ्याकडे दिली. “गाडी सांताक्रुझ एअरपोर्टवरच्या टॅक्सी स्टँडला लावायची. मीटरप्रमाणे भाडे घ्यायचे. एखाद्या प्रवाशाला टुरिस्ट टॅक्सी पाहिजे असल्यास ऑफिसला फोन करायचा. संध्याकाळी सात ते आठपर्यंत ऑफिसकडे यायचं. रात्रपाळीच्या ड्रायव्हरकडे गाडी द्यायची. ” वगैरे सूचना दिल्या.

नवी कोरी पद्मिनी प्रिमियर टॅक्सी बघून मला आनंद झाला. वसंतरावांची अँबेसेडर कार फार जूनी होती. गाडीचे इंजीन चांगले होते पण कुशन वगैरेकडे त्यांचे फारसे लक्ष नसे. ते पक्के व्यावसाईक फालतू खर्च करायचा नाही. पण इंजीनची देखभाल मात्र वेळच्यावेळी झालीच पाहिजे. कोणी गाडी डबडा आहे असे म्हटले तरी चालेल. पण गाडी कधी रस्त्यावर दुरूस्तीसाठी उभी राहता कामा नये. याकडे त्यांचा कटाक्ष असे. शिवाय अशा गाडीला चोरीला जायची भिती नाही. हाही त्यांचा उद्देश होता. मी एअर पोर्टवर गेलो. त्या दिवशी चांगली प्राप्ती झाली. संध्याकाळी साडेसात वाजता मी ऑफिसमध्ये पोहोचलो. मीटर रिडींगप्रमाणे जमलेली कॅश ऑफिसमध्ये जमा केली.

आठवडा भरात मी व्यवसायात बराच रूळलो. सोमवारी मला ऑफ होता. त्या दिवशी सकाळी १० वाजता ट्रेझरी ऑफिसला गेलो. लॉटरी तिकीट सादर करून तिकीटाच्या रकमेसाठी आवश्यक अर्ज दिला. साधारण तासाभराने इन्कमटॅक्सची रक्कम वजा होऊन पासष्ट हजार रूपयाचा स्टेट बँकेचा माझ्या नावाचा चेक माझ्या हातात पडला. चेक मिळाल्याची पोहोच पावती माझ्याकडून घेण्यात आली. वार्षिक उत्पन्नाचा दाखला सादर केल्यास इन्कमटॅक्सच्या स्वरूपात कापून घेतलेली रक्कम परत मिळू शकेल असेही सांगण्यात आले. माझ सारस्वत को-ऑपरेटीव्ह बँकेमध्ये खाते आप्पासाहेबानी काढून दिलेले होते. त्या बँकेत चेक जमा करून ती रक्कम त्याच बँकेत मी एक वर्षाच्या मुदत ठेवीमध्ये ठेऊन दिली.

महिना पूर्ण झाल्यावर पगाराचे सहा हजार रूपये माझ्या खात्यावर जमा झाले. सोमवारी ते सहा हजार रूपये सारस्वत बँकेतून काढून मी खोलीवर आलो. मामा मामी नको म्हणत असताना मी मामीसाठी साडी मामासाठी शर्ट पीस व रोख रूपये दोन हजार मामीकडे दिले. दोन दिवसानी एका पार्टीला घेऊन चार दिवसासाठी गोव्याला जायचे आहे, असे आप्पा म्हणाले होते. गोव्याला जाताना सावंतवाडीत घरी पैसे देता येतील हा विचार करून दोन हजार रूपये बाजुला काढून उरलेले पैसे मी स्वतः साठी ठेवून दिले.

दोन दिवसानी सकाळी आठ वाजता मी आप्पानी दिलेल्या पत्यावर हॉटेलवर पोहोचलो. रिसेप्शनिस्टला रूम नं. ५०२ मधील पार्टीला टुरिस्ट टॅक्सी आल्याचे कळवायला सांगितले. पार्टीने आपण अर्ध्या तासात खाली येतो असा माझ्यासाठी निरोप दिला. मी टॅक्सीत जाऊन बसलो. वीस एक मिनीटात बेअरा दोन सुटकेस घेऊन टॅक्सीकडे आला. त्यांच्या पाठोपाठ एक जोडपे आले. मी डिकी उघडताच बेअराने दोन्ही बॅग आत ठेवल्या. डिकी लॉक करेपर्यंत ते जोडपे मागच्या सिटवर बसले. मी त्यांना घेऊन निघालो. त्यातील पुरूष सुमारे पस्तीस वयाचा व स्त्री पंचवीशीतली वाटत होती. तो सहा फूट उंच व ती साडे पाच फूट उंच असावी. ती दोघं इंग्लंडहून भारतदर्शनासाठी विमानाने मुंबईत आली होती. वाटेत आमचा परिचय झाला. त्याचे नाव पिटर व तिचे नाव ल्युसी होते. विमानातून उतरल्यावर सरळ हॉटेलकडे आल्यामुळे त्यांनी मुंबईचे साजरे रूप पाहिले होते. आता प्रवासात जेव्हा त्यांनी मुंबईची झोपडपट्टी पाहिली. तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले.

या गलिच्छ वातावरणात ही माणसे इथे रहातात कशी? असा त्यांना प्रश्न पडला. पिटर थोडा खादाड होता. वाटेत सारखा काही ना काही खात होता. मलासुध्दा खाणे देत होता. मला मध्ये मध्ये खायची सवय नसल्याने मी ते खाणे टाळले. ल्युसी फक्त अधून मधून मिनरल वॉटर पीत होती. ती आर्टिस्ट होती. तिच्याकडे एक भारी कॅमेरा होता. सुरूवातीला फारसे पहाण्यासारखे बाहेर काहीच नसल्याने ती पुस्तक वाचत बसली. पीटरला संगीताची आवड असल्याने तो कानाला हेडफोन लावून गाणि ऐकत होता, हे त्याच्या हालचालीवरून समजत होते. वाटेत कोल्ड्रिंकसाठी, नाश्त्यासाठी गाडी थांबली, बरेच वेळा निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी ल्युसी गाडी मध्येच थांबवायची. गाडीतून बाहेर येऊन निसर्गाचे फोटो काढायची. तिला पहाण्यासाठी जवळ पासची मुले गाडीकडे यायची. त्या खेडवळ मुलासोबत उभी राहून ती माझ्याकडून फोटो काढून घ्यायची. मुलांना चॉकलेट वाटायची. असे अनेक क्षण कॅमेराबध्द करत ती चालली होती. पिटर मात्र आपल्याच धुंदीत गाणी ऐकण्यात मग्न होता. तो फक्त खाणे पिणे यासाठीच गाडीतून खाली उतरे. दुपारी दोन वाजता गाडी चिपळूणला पोहोचली. तेथे एका हॉटेलमध्ये तिघांनीही जेवण घेतले व गाडी निघाली. त्या दोघांना जेवण जास्त झाल्याने नंतरच्या प्रवासात ती दोघे झोपलेली होती. पाचच्या दरम्यान गाडी राजापूरात पोहोचली. तेथे त्यांना गंगा उगम पावते तो परिसर मी दाखवला. गंगा अचानक येते आणि ही कुंड आपोआप पाण्याने भरतात. दोन तीन महिने यात पाणी असते व एके दिवशी अचानक कुंड रिकामी होतात. याला गंगा गेली असे म्हणतात. अशी ही गंगा कधी वर्षानंतर कधी दोन किंवा तीन वर्षानंतर कधीही उगम पावते. ती कधी येणार हे कोणालाच माहीत नसते. मात्र ती आल्याचे समजताच देशभरातून भाविक गंगास्नानासाठी येतात. ही माहिती त्याना दिली. त्याना आश्चर्य वाटले. तेथील एका गोमुखातून पाणी सतत वहात असते आणि ते बरेच गरम असते त्याला ‘उन्हाळा’ असे म्हणतात हे सांगितले. त्यांनी गोमुखातून वहाणाऱ्या पाण्याखाली हात पसरून पाणी खरेच गरम असल्याचा अनुभवही घेतला. राजापूरहून आम्ही निघालो. साडे आठ वाजता गाडी सावंतवाडीत पोहोचली. तेथील मोती तलाव व सभोवारचा परिसर पाहून दोघेही खुष झाली. हॉटेल ‘पॉम्पस’ मध्ये त्यांची जेवण्याची व्यवस्था केली. जेवणानंतर त्याना शतपावली करायची होती म्हणून तलावाभोवती फेरी मारण्याचे त्यांनी ठरवले. त्यांची परवानगी घेऊन तेवढ्या वेळात मी घरी जाऊन आई – भाऊ यांना भेटून आलो. त्यांच्यासाठी ठेवलेले पैसे दिले.

मी अचानक आल्याचे पाहून त्याना आनंद झाला अर्ध्या तासात मी हॉटेल ‘पॉम्पस’ कडे पोहोचलो. गाडी गोव्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. साडेदहा वाजता गाडी पणजी येथील टुरिस्ट हॉटेलकडे पोहोचली. मी रिसेप्शनिस्टला आम्ही आल्याची वर्दी दिली. बुकींग पूर्वीच केलेले असल्याने कोणतीही अडचण आली नाही. बेअरा दोन्ही बॅग घेऊन पुढे, त्यामागून पीटर व ल्युसी हॉटेलमध्ये प्रवेश करते झाले मी टॅक्सीकडे आलो. टॅक्सी पार्किंगला लावली. बाजूला मुंबईहून आलेली एक टॅक्सी होती. त्याच्या ड्रायव्हरच्या बरोबर थोडा वेळ गप्पा केल्या व टॅक्सीत येऊन झोपलो.

दुसऱ्या दिवशी आम्ही गोवा येथील प्राचीन ओल्ड गोवा चर्च पहायला गेलो. तेथील सेंट झेव्हिअरची जतन करून ठेवलेली बॉडी पाहिली. दर चौदा वर्षांनी ती बॉडी दर्शनासाठी बाहेर काढली जाते हे त्याना सांगितले. पूर्वी ही बॉडी सेंट झेव्हीअरच्या मूळ गावी नेण्याचा प्रयत्न झाला होता. पण तो शक्य झाला नाही. हे समजताच त्यांना आश्चर्य वाटले. तेथून मंगेशी देवस्थान पहायला गेलो. तेथील देवळात मूर्तीला लावलेले कधी उजवीकडचे पान तर कधी डावीकडचे पान आपोआप पडताना पाहून हा काय प्रकार आहे असे त्यांनी मला विचारले. मी लहान असताना आमच्या कुलदैवतेच्या मंदिरात प्रसाद लावणे हा प्रकार पाहिला होता. त्यावरून त्यांना सांगितले की मूर्तीच्या डाव्या व उजव्या बाजूला ठरावीक अंतरावर पानाच्या तुकड्याला पाणी लावून चिकटवतात. पानाच्या तुकड्याचा क्रम महत्वाचा असतो. पान चिकटवून झाल्यावर भाविकाने सांगितलेला प्रश्न भटजी देवीसमोर उच्चारतो व प्रसाद देण्याचे देवीला आवाहन करतो. प्रश्नकर्ता देवीसमोर हात जोडून देवीची प्रार्थना करतो. काही वेळाने एखादा पानाचा तुकडा खाली पडतो. उजव्या बाजुचा पानाचा तुकडा खाली पडल्यास भाविकाने विचारलेल्या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर मिळाले असे समजायचे. डाव्या बाजुचे पान पडल्यास प्रश्नाचे नकारार्थी उत्तर मिळाले असे समजायचे. कोणत्या क्रमांकाचे पान पडले आहे. ते पाहून भटजी पुन्हा त्या जागी दुसरे पान लावून नकारार्थी उत्तर असल्यास ते होकारार्थी होण्यासाठी उपाय कोणता आहे हे भटजी देवीकडे विचारणा करतो. पुन्हा पडलेल्या पानाच्या क्रमावरून काय करायला पाहिजे ते भाविकाला भटजी सांगतो. काही प्रश्न गहन असल्यास तास दोन तासपर्यंत मूर्तीला लावलेला पानाचा एकही तुकडा खाली पडत नाही. ही मला ठाऊक असलेली माहिती त्यांना दिली.

तिसऱ्या दिवशी कलंगुट, मिरामार, बागा, अंजुना हे बिचेस पाहीले गोव्यात एकूण अकरा फोर्ट आहेत. त्यापैकी आग्वाद फोर्ट पाहिला.
चौथ्या दिवशी सकाळी बेळगांव, कोल्हापूर मार्गे मुंबईला जायला निघालो. या रस्त्याने वाहतूक कमी होती. त्यामुळे आम्ही वेगाने निघालो होतो. गाडीच्या उजव्या बाजुला रस्त्याला समांतर जाणारी एक नदी दिसत होती. ल्युसीने मला हात लावून गाडी थांबवायला सांगितली. मी गाडी थांबवली नंतर ल्यूसीच्या सांगण्यानुसार गाडी सुमारे एक किलोमीटर मागे आणली. गाडी थांबली तेथे नदीच्या पत्नीकडे एक मोठे झाड होते. पानझड झाल्यामुळे झाडावर एकही पान दिसत नव्हते. ते झाड व त्या सभोवतालचा परिसर याचे निसर्ग चित्र ल्युसीला काढायचे आहे असे ती म्हणाली.
मी सहज तिला विचारले. “आजबाजुला इतकी हिरवीगार झाडे असताना तुला हेच झाड का आवडलं ?”
,ती म्हणाली, “मला या झाडामध्ये अनेक माणसांचे, प्राण्यांचे चेहरे दिसताहेत.”
मी म्हटलं, “मला कसे दिसत नाहीत ?”
ती म्हणाली, “चित्र पाहिल्यावर तुलाही दिसतील. चल व मला डिकीतील माझा ड्रॉईंग बोर्ड, फोल्डिंग स्टँड वगैरे साहित्य काढून दे.” मी तिचे साहित्य तिला पाहिजे त्याठिकाणी नेण्यास मदत केली. पीटर गाडीचा दरवाजा उघडा टाकून गाडीतच गाणी ऐकत बसला.
आता किमान तासभर तरी हिला पेंटींगसाठी हमखास लागणार. एवढ्या वेळेत नदीत आंघोळ करून पोहता येईल असा विचार करून मी गाडीकडे आलो. माझ्या बॅगमधील टॉवेल अंडरवेअर प्लास्टीक पिशवीत गुंडाळलेला साबण घेऊन बाहेर पडलो. काही अंतर चालल्यावर नदीत मला एक डोह दिसला. त्यात सुमारे पुरूषभर निळसर पाणी होते. एका झाडाखाली मी टॉवेल व अंगावरचे कपडे उतरवून ठेवले. फक्त अंडरवेअरवर मी चालत डोहाकडे आलो. सोबत साबण घेतला होता. पंधरा वीस मिनीटे पोहून झाल्यावर जवळच्या एका मोठ्या दगडावर मी चढलो. दगडाचा बराचसा पृष्ठभाग सपाट व पाण्याच्या पृष्ठभागापासून फुटभर उंच होता. दगडावर उभा राहून मी सर्वांगाला साबण लावला फक्त तोंडाला साबण लावायचा बाकी होता. इतक्यात मागच्या बाजुला पाण्यात सळसळ ऐकू आली. क्षणभर पाण्यात मगर तर नसेल ना ! अशी मला शंका आली आणि मी घाबरलो. मागे वळून पाहिलं आणि अवाक् झालो.

ल्युसी पोहत याच दगडाकडे येत होती. तिच्या अंगात फक्त निकर व ब्रेसिअर होती. ती खालच्या दगडावर उभी राहिली. तिने हात पुढे केला मी तिचा हात पकडला. इतक्या कमी कपड्यातील स्त्रीदेह मी फक्त सिनेमात पाहिला होता. प्रत्यक्ष पहाण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याने मी अवाक झालो होतो. मी उभा होतो त्या दगडावर तिने पाय ठेवला व वर येऊन दुसरा पाय दगडावर ठेवला तो नेमका साबणावर पडला आणि तिचा तोल गेला. ती दगडावर आपटणार म्हणून मी एका हाताने तिच्या कमरेला पकडलं. तिने घाबरून मला मिठी मारली. माझ्या अंगच्या साबणामुळे ती खाली घसरू लागली. मी तिला आणखी जवळ ओढली. त्यामुळे तिचे तोंड माझ्या तोंडासमोर आले. तिचा श्वास माझ्या श्वासात मिसळू लागला. ती खाली सरकल्यामुळे तिचे स्तन ब्रेसिअरमधून बाहेर पडून माझ्या उघड्या छातीवर दबले गेले. माझ्या शरीरातून एक उष्ण लहर निघत असल्याचे मला जाणवले. मी स्वतःला सावरले. ती खूपच घाबरली होती. मी उजव्या हाताने तिच्या पाठीवर हळुवारपणे थोपटल्यासारखे करताच ती सावरली. तिने मिठी सोडली. मी तिच्या हाताला पकडून दगडावरून खाली उतरविले नंतर दोघही पोहत पलीकडे गेलो. तेथून कपडे ठेवलेल्या झाडाखाली गेलो. मी टॉवेलने अंग पुसत कपडे चढवले. ल्युसीने माझा टॉवेल मागितला व ब्रेसीयर काढून माझ्यासमोर अंग पुसले. मी पहातच राहिलो. निकर काढून टॉवेल गुंडाळून ती पेंटींगच्या सामानाच्या दिशेने निघाली. भारतीय संस्कृती व घरचे संस्कार यामुळे मी या दोन्ही प्रसंगातून बचावलो. माझ्या जागी दुसरा कोणी असता तर, हा विचार माझ्या मनात आला, कारण या निर्जनस्थळी ती कितीही ओरडली असती तरी कोणीही येणार नव्हते. अगदी पिटरसुध्दा आला नसता, कारण तो बऱ्याच अंतरावर कानात हेडफोन लावून बसलेला होता.

चालताना वाटेत मी तिला ” तू तिथे कशी पोहोचलीस?” असे विचारले.
ती म्हणाली ” मी ड्रॉईंग पेपर बोर्डवर लावला आणि माझ्या लक्षात आलं, एक महत्वाचा ब्रश दुसऱ्या बॅगेत राहिला. तो नेण्यासाठी मी गाडीकडे आले. तेथे तू नव्हतास. दूरवर झाडाखाली तुझे कपडे दिसत होते म्हणून मी तेथे आले. तेथील निळसर स्वच्छ पाणी बघून मलाही पोहण्याची इच्छा झाली. तिथेच बाजूला कपडे काढून मी पोहायला सुरूवात केली. समोर दगडावर तुला उभा असलेला पाहून मी तिथे आले होते. ”

आम्ही पेंटींगच्या सामानाकडे पोहोचलो. आता मुड नसल्याने तिने सगळं सामान गोळा केले. व सामान घेऊन आम्ही गाडीकडे पोहोचलो. तिथून पुढचा प्रवास सुरू झाला. रात्री दहा वाजता आम्ही मुंबईतील हॉटेलवर पोहोचलो. दोघांनी ट्रिप छान झाल्याबद्दल माझे आभार मानले. त्यांचा निरोप घेऊन मी आल्याचे आप्पाना फोनवरून कळवले. त्यांनी टॅक्सी घेऊन घरी जा व सकाळी गाडी घेऊन ऑफिसला ये असे सांगितले.

०००
( क्रमशः )
– ©️ मोतीराम टोपले 
topleprasad@gmail.com
स्वागत फुलांनी : प्रकाशचित्र – आभा कोल्हटकर  [७]
प्रेषक डॉ. प्रियंवदा कोल्हटकर  
priyakar40@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@@@@
विचारशलाका 
मिलिंद कर्डिले 
– ©️ मिलिंद कर्डिले 
milindkardile@yahoo.com
@@@@@@@@@@@@@@@@@@
चित्रोळी 
 
४३ ]
 
माधव मनोहर जोशी
  
 
– ©️ माधव मनोहर जोशी 
madvac1979@gmail.com
@@@@@@@@@@@@@@@@@@@

आजची कविता 

– ©️ प्रज्ञा करंदीकर,
बंगळुरु
pradnyakarandikar85@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

23 thoughts on “कन्फेशन

  1. टोपलेजींची कथा उत्कंठावर्धक आहे. पुढील भागाची वाट पहात आहे. ल्युसी पुन्हा कथा नायकाच्या आयुष्यात येते काय? बँकेत ठेवलेल्या पैशाचं काय? कन्फेशन कसलं? असे बरेच प्रश्न पडले आहेत. पुढील भागात उत्तरं मिळतील काय, टोपलेजी?

    कर्डिलेजींनी मनाचे (आधुनिक) श्लोक सुरू केलेले दिसतात. धन्यवाद.

    चित्रोळी व आजची कविता आवडल्या. धन्यवाद जोशी जी व प्रज्ञा.

    ६७ साली लंडनमधे आ वासून रंगीत टी व्ही बघितल्याचं आठवलं. त्यामागचं जटिल विज्ञान आज कळलं. धन्यवाद देवधरजी.

    आभाचा फुलाचा फोटो व स्वराचं चित्र दोन्ही ही छान. दोघींची सौंदर्य दृष्टी छान.

    धन्यवाद नाबरजी.

  2. जयंत विठ्ठल कुळकर्णी यांनी बालगंधर्व यांचा चालता काळ व्यवस्थित रेखाटला आहे, परंतु त्यांचा अखेरचा काळ इथे कुठेही आला नाही.
    त्यांची अन्त्ययात्रा केवळ उपचार म्हणून पाच सहा लोकांनी पार पाडली. एका यवनी गायिकेच्या सहवासाची शिक्षा म्हणून त्यांना मिळालेली वागणूक देखील अभ्यासाचा विषय हवा.
    बालगंधर्व हा मुळातूनच मनाला हळवा करणारा नि त्या अनुषंगाने मनाला हलवून टाकणारा विषय नाही का?

  3. लिहिते लेखक हे साक्षेपी वाचक असताना देखील मैत्री अनुदिनीवरील प्रतिक्रिया अपुऱ्या व तोकड्या भासतात. त्यामुळे मैत्री अनुदिनीवर व्यक्त होण्याचा देखील संकोच होतो.

    पोटतिडिकेने काही लिहावे ही संपादकांची भूमिका अशा परिस्थितीत दुबळी ठरते हे पाहताना क्लेश होतात.

    त्यामुळे लेखांवरील प्रतिक्रिया देखील साक्षेपी असाव्यात ही अपेक्षा अनुचित नाही ना?

  4. प्रकाश पेठे लिहितात :-

    मोतीराम टोपले यांच्या दीर्घकथेच्या पहिल्याच भागात इतक्या घटना घडतात की आता पुढे काय होणार याची उत्सुकता आहे. पुढच्या भागाची वाट पाहतो आहे.  

     मिलिंद कर्डिले यांची विचार शलाका, माधव मनोहर जोशी यांची चित्रोळी आवडली. 

     प्रज्ञा नरेंद्र करंदीकर यांची कविता आणि  मटार इडलीचे कृती आवडली. एकदा करून बघून खाल्ल्या की  मगच अभिप्राय देता येईल. 

    आमचे दोन टीव्ही या ना त्या कारणाने बंद पडायचे. ते दुरुस्त  करणारा आमचा मित्र असल्याने तो आमच्यासमोरच त्याला उघडायचा  त्यामुळे सगळे सुट्टे  भाग पाहायला मिळायचे. तो विषय नवा असल्याने निरीक्षण चालायचे. तेव्हा बऱ्याच गोष्टी कळल्या होत्या पण श्री  दीपक देवधर यांचा लेख वाचल्याने छान माहिती मिळाली.  

    मोहन कान्हेरे हे  त्यांच्या पत्रप्रपंचामुळे महाराष्ट्रात सर्वांना माहीत झाले असतील. हल्लीच त्यांचे एक पत्र मी महाराष्ट्र टाइम्सच्या अंकात  वाचले होते. 
    स्वराचे चित्र छान आहे. तिला सांगावे.

     
    प्रकाश पेठे 

  5. मोतीराम टोपले यांची ‘ कन्फेशन ‘ या कथेचा पूर्वार्ध वाचला. कबुली देऊन अपराधी भावना कमी करण्याच्या दोन गोष्टी असाव्यात. १)लॉटरी २) नदीच्या डोहातील घटना. त्याचप्रमाणे दोन सारख्या दिसणाऱ्या डायऱ्या आणि इतका मोठा अपघात घडून आलेल्या भाच्याला मामा-मामींनी काही न विचारणे ( अपघात त्यांना माहित नाही ) आणि भाच्यानं त्या दिवशी इतक्या मोठ्या घटनेविषयी सांगणं टाळणं. या साऱ्या बाबी उत्तरार्धात काय उत्तरं घेऊन येतात याबद्दल औत्सुक्य आहे. 

  6. डॉ. प्रियंवदा कोल्हटकर यांनी विचारले म्हणून —

    साक्षेपी शब्दाचा अर्थ –

    कार्यात मग्न
    अभ्यासोनी प्रकटणारा
    शोध अभ्यास यांत सारखा गढलेला
    ज्ञानार्थी तन्मय
    निश्चयानें चिकाटीनें मागें लागलेला, लक्ष घालणारा
    आग्रही
    एका साध्या शब्दासाठी प्राणाची पर्वा न करणारा
    दीर्घोद्योगी
    विद्यार्थीनां कुतो सुखं – सुखार्थीनां कुतो विद्या – याची जाणिव असणारा
    नीर-क्षीर विवेक आचरणात आणणारा असा
    विद्यार्थी
    एवं

  7. ‘ साक्षेपी ‘  या शब्दाचा शब्दकोषीय अर्थ काहीही असू देत. परंतु साक्षेपी वाचक असा वाक्यात उपयोग होतो तेव्हा साक्षेपीचे रंग बदलतात. 

    १) अयोग्य मजकुराला आक्षेप नोंदवणारा 

    २) वाक्यातील शब्दांचा अर्थ आशयाशी संलग्न करणारा 

    ३) मजकुराचा अन्वयार्थ आपल्या अनुभवांशी ताडून बघणारा 

    ४)विशिष्ठ वाक्य रचना अशी न ठेवता अशी ठेवली असती तर आशयाशी अधिक थेट आणि धीटपणे भिडली असती का ? असा विचार व्यक्त करू शकणारा 

    ५) सामाजिक भान काळानुसार बदलल्याने त्या त्या लिखाणात व्यक्त झालेली मते – मतांतरे आजच्या काळात कशी पाहावीत अशी मीमांसा करणारा 

    वगैरे वगैरे … 

  8. साक्षेपीचा राक्षे यांनी दिलेला अर्थ पटत नाही. त्यापेक्षा कान्हेरेजी व पारखी जी यांनी दिलेले अर्थ पटण्यासारखे आहेत.

    • दोघेही फक्त वाङमय या एकाच फुटपट्टीने विचार करतात.

      माझे विचार त्यापलीकडे जात माणूस आणि त्याचे व्यक्तिमत्त्व यांच्या तत्वावर लक्ष केंद्रीत करते.

  9. प्रदीप अधिकारींचे मुखपृष्ठ नयनरम्य आहे.

    मोतीराम टोपले यांची ‘कन्फेशन’ ही कथा वाचनीय आणि उत्कंठावर्धक आहे. स्वतःचे प्रवास-अनुभव त्यानी या कथेत खुबीने गुंफले आहेत.

    मिलिंद कर्डिल यांची अबोध मनाची वैशिष्ट्ये संगणारी ‘विचार शलाका’, माधव मनोहर जोशी यांची चित्रोळी,  प्रज्ञा नरेंद्र करंदीकर यांची ‘सुप्रभात’ आवडली.

    दूरदर्शनची निर्मिती कशी होत गेली ते दीपक देवधर यांच्या तपशीलवार, माहितीपूर्ण आणि सचित्र ‘तंत्रजिज्ञासा’मधून कळले.

    ‘प्रज्ञा करंदीकर’ यांनी दिलेल्या ‘मटार इडली’च्या सोप्या पाककृतीसाठी धन्यवाद!

    स्वरा वर्तकचे चित्र आवडले.

  10. सौ. स्वाती वर्तक लिहितात :-

    श्री. टोपलेजींची कथा जरी दीर्घ असली तरी ती तशी न जाणवता दुसऱ्या भागाचे औत्सुक्य टिकून राहते यातच श्री टोपलेजींचे केवढे श्रेय सामावलेय. त्यांची ओघवती भाषा, त्यांच्या गाडीने जसा वेग धरला तसेच त्यांची कथा ही वेगवान वाटते. अनेक घटनांनी भरलेली, उत्सुकता ताणून धरणारी आहे. नायक रुपयांचे काय करणार? त्याला एजंट भेटणार का? का ते समाजोपयोगी देणार. ल्युसी पुढे येते का ? तिचा पार्टनर वेगळेच काही करणारा आहे का ? असे अनेक प्रश्न छळतात. आणि यापैकी कुठल्या चुकीसाठी प्रशांतला कन्फेशन करावे लागते ? का ते कन्फेशन ही वेगळ्याच अर्थाने कथेत येणार आहे?..हे सर्व समर्थपणे लेखकाने हाताळले आहे ..छान. 

    कर्डिलेजींचे.. मन.. काय काय म्हणते ते ही आता बघू या.

    प्रज्ञाची सुप्रभात सुंदर कोवळी उजाडलीय. आवडली. 

    माधवजींची चित्रोळी चांगली आहे.

    प्रज्ञा च्या इडल्या करून बघाव्यात की आधी तिच्या हातच्या चाखून बघाव्यात ..हा गहन प्रश्न पडलाय मला ..! हाहा !

    कान्हेरेजींचा पत्र प्रपंच नेहमीच सांगीतिक. 

    श्री देवधरजींना मला एक अगदी लहानसा प्रश्न विचारायचा आहे ..टीव्ही बंद करताना नुसताच रिमोटने दिवसा बंद केला आणि रात्री पूर्ण तर चालेल की त्याचे मागील बटन देखील प्रत्येक वेळी बंद करायला पाहिजे ..त्याने विजेचा, टीव्हीचा काही फायदा, तोटा ?

    आभाचे फुलांनी स्वागत सुंदर..धन्यवाद.  

  11. फक्त रिमोटने टी.व्ही. बंद केला तरी हरकत नाही . पण रात्री आपले लक्ष असताना विद्युत प्रवाहात होणाऱ्या फ्लक्चूएशनपासून टी.व्हीचे रक्षण होण्यासाठी तसेच किरकोळ वीज बचतीसाठी मुख्य सप्लाय बंद करणे चांगले.

  12. राक्षेजी ,कान्हेरेंजी व पारखिजी यांनी दिलेले साक्षेपी या एका शब्दाचे अनेक अर्थ वाचून वाटते की म्हणूनच मराठी भाषा इतर भाषिकांना शिकायला कठीण वाटत असावी .

यावर आपले मत नोंदवा