ऐसपैस

हर्षद सरपोतदार
३४. 
 

कुणाचा कोण ?

ज्या वस्तूसाठी गिऱ्हाईक धावत येईल,
ती वस्तू दुकानात ठेवायची नाही;
ही पुण्यातल्या मराठमोळ्या दुकानदारांची खासियत.
गिऱ्हाईक येताना दिसल्यावर त्यांची ‘शटर’ पाडायची धडपडच जास्त असते.
माझंच बघा ना !
‘बायकोला एकदातरी बाहेरची भजी किंवा खिचडी वगैरे खायला घालीन’ हा माझा निश्चय.
कारण ‘बाहेर खाणे म्हणजे पाप !’ अशी तिच्या बाळबोध घराण्यातली शिकवण होती.
मला ती मोडून काढायची होती.
त्यासाठी जंग जंग पछाडलं.
पण सदाशिव पेठेतील ‘श्री’, किंवा ‘बेडेकर’
आणि जिमखान्यावरचा ‘खिचडी फेम’ अप्पा हे प्रसिद्ध दुकानदार एकदाही ‘उघडे’ असलेले मला सापडले नाहीत.
कोणत्या वेळेत ते उघडे असतात कोण जाणे.
लोक बाजारात यायची वेळ झाली की बहुधा ते दुकान बंद करत असावेत.

आमची जीवनवाहिनी- जी पुणेरी मिसळ- तिच्या बाबतीतही असाच अनुभव आला.

‘यूपी’ मधले आमचे नातेवाईक मोहनभय्या हे एकदा माझ्याकडे रहायला आले होते.
(‘असाही एक दरोडा’ या यूपीमधील सत्य घटनेवरील माझ्या लेखात ते वाचकांना भेटलेच आहेत !)
इथे बस किंवा लोकलचा प्रवास करण्यापूर्वी आम्ही ‘तिकीट’ काढतो हे पाहून त्यांना अजब वाटलं.
पोलिसांना आम्ही ‘घाबरतो’ हे ऐकून तर ते खो खो हसायलाच लागले.
‘आप हिंदोस्तां मे रेहते हो, या नरक मे रेहते हो जी ?’ असं त्यांनी मला विचारलं.
त्यानंतर त्यांनी मला एक ‘फर्माइश’ केली.
‘वो पेशवा का पर्वतीबर्वती जो भी कुछ है, हमे दिखावो भई !’ ते म्हणाले,
‘और पूना के मिसल के बारे मे भी बहोत सुना है, वो भी खिलाओ-‘
तेव्हा मी त्यांना एक अट घातली.
पुण्यात असेपर्यंत कुठल्याही कारणावरून ‘मारामारी’ करायची नाही ही ती अट.
ती त्यांनी नाइलाजाने मान्य केल्यावरच मी त्यांच्या दोन्ही इच्छा पूर्ण करायचं मान्य केलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी जरा लवकरच (म्हणजे ७ वाजता) उठलो.
चहा घेतला. अंघोळी वगैरे उरकल्या.
मग स्कुटरने पर्वतीला गेलो.
पर्वती पाहून मोहनभैय्या खूष झाले.
‘सरीर कमाने के लिये तो बहोत अच्छा है ये भई !’ ते म्हणाले,
‘ये लोग पुराने जमाने के पेहलवान है क्या ?’  पेशव्यांच्या भिंतीवर लावलेल्या चित्रांकडे बोट दाखवत त्यांनी विचारलं.
‘हां. अब्दाली करके एक पैलवान था. उसको छोडके बाकी सबको इन्होने हराया था !’
उद्विग्न होऊन मी म्हणालो आणि तिथून त्यांना बाहेर काढलं.
पर्वती उतरून खाली आलो.
‘अब मिसल का ब्रेकफास्ट करेंगे !’ असं मी सुचवल्यावर ते खूष झाले.
ते मुळात कुमाऊंनी. त्यामुळे भयंकर तिखट खाणारे.
तेव्हा झणझणीत पण दर्जेदार मिसळ खायला घालायची म्हणून त्यांना तुळशीबागेत ‘श्रीकृष्ण’मध्ये नेलं.
बघतो तर दुकान बंद !
घड्याळात सकाळचे फक्त साडेनऊ वाजलेले.
म्हणून समोरच्या दुकानात चौकशी केली.
तो म्हणाला, ‘दुकान मगाशीच बंद झालं !’
‘क्यों ? क्या हुवा ? मालिक मर गया क्या ?’ मोहनभय्या विचारते झाले.
मी त्यांना कसंबसं गप्प करून चौकशी केली.
तेव्हा समजलं, की अर्ध्या चड्डीतल्या आणि पोट सुटलेल्या त्या केसाळ, उघड्याबंब मालकाने नुकतंच कुलूप लावलं होतं.
एरवी सकाळी नऊच्या आधीच बंद होणारं ते दुकान आज त्याला अर्धा तास उशिरा बंद करावं लागलं होतं,
त्यामुळे तो चिडला होता असं समोरचा दुकानदार म्हणाला.
मोहनभैय्यांना मी हिंदीत याचा ‘सारांश’ ऐकवला तेव्हा ते भडकले.
‘आप लॉग ये कैसे सह सकते है ? तोड देना चाहिए ये दोकान !’ असं ओरडत ते दगड शोधू लागले.
कसंबसं त्यांना शांत करून मी त्यांना स्कुटरकडे ओढत घेऊन गेलो.
आणखी दोनतीन मिसळीची दुकानं पाहिली.
तीही बंद झालेली.
पण कसंही करून त्यांना मिसळ खायला घालणं गरजेचं होतं.
म्हणून दुसऱ्या दिवशी पहाटेचा गजर लावला.
उठलो. चहा घेतला.
प्रातर्विधी पुढे ढकलले.
अंघोळीही लांबणीवर टाकल्या.
आणि घाईघाईत निघालो.
तेव्हा कुठे ‘श्रीकृष्ण’ उघडं सापडलं.
(मालकही नेहमीप्रमाणे उघडेच होते.)
मला न जुमानता मोहनभैय्या मालकाला ‘जाब’ विचारणार होते,

पण मिसळ खाऊन ते तृप्त झाले आणि पुण्याची (व आमच्या घराण्याचीही) अब्रू वाचली.

 

या सगळ्या पार्श्वभूमीवर आमच्या बेकरीवाल्याचा खरं तर सत्कारच करायला हवा.
आमच्या कॉलनीतला हा आद्य बेकरीवाला.
त्याच्या बेकरीत आम्हाला रोजच जावं लागतं.
दूध आणण्यासाठी.
पण बहुतेकदा दुधाबरोबर आम्ही भलतंच काहीतरी घेऊन बाहेर पडतो.
कधी महाळुंगाचं लोणचं,
कधी उंदियो मिक्स,
किंवा कस्टर्ड पावडर,
किंवा कुठली कुठली बिस्किटं, जेली, न्युडल्स,
किंवा असलंच काहीतरी.
घरी आल्यावर लक्षात येतं की हे आपल्याला नको होतं.
पण तरीही आपण स्वतःच ते गळ्यात बांधून घेतलं आहे.
याला कारण बेकरीवाल्या त्या सावंत बंधूंची ती न थांबणारी बडबड.
दोन्ही भावांना वक्तृत्वाची उपजतच देणगी.
सदाशिव पेठेतल्या प्रसिद्ध ‘खाऊवाल्या पाटणकरां’सारखी.
‘उरलेल्या चार रुपयांचं काय देऊ मॅडम ?’ असं पाटणकर हसत हसत विचारत.
मग मॅडमही पैसे घ्यायचे विसरून पाटणकर देतील तो पदार्थ पिशवीत कोंबत बाहेर पडत असत.
हा नेहमीचा अनुभव.
त्याच गल्लीत पूर्वी रहात असलेले हे सावंत बंधू पाटणकरांच्याही पुढे एक पाऊल पोहचले आहेत.
‘नाश्त्याला काय देऊ, वैनी ?
‘घ्या s गरम पट्टी सामोसे आहेत !
‘ग्रीन बेकरीचे की हिंदुस्तानचे पॅटिस देऊ ?
‘नाही तर दोन्ही बांधतो चार चार-
‘आता कुठे करत बसता पोहे नि उप्पीट ?
‘पैसे द्या हो नंतर ! त्याची चिंता करू नका-
‘बरं, काही ब्रेड, बटर, टोस्ट, खारी, बिस्कीट…?’

गिऱ्हाईक बेकरीतून उतरून पळत सुटेपर्यंत त्यांची ही ‘रेकॉर्ड’ चालू असते.

आमच्या स्पष्टवक्त्या फब्या काकिर्डेने एकदा त्यांना जामलं होतं.
‘हे बघा, आम्हाला काय हवं असेल ते आम्ही घेऊ.
‘आम्ही आमचे समर्थ आहोत.
‘तुम्ही सुचवायची गरज नाही !’
असं त्याने त्यांना सुनावलं.
यावर मोठ्या भावाने खूप गरिबीने खुलासा केला,
‘तसं नव्हे हो साहेब !
‘तुम्ही गडबडीत असता.
‘काहीतरी राहून जातं, विसरून जातं-
‘कधी चांगला ‘ताजा’ माल आलेला असतो.
‘आता या अळुवड्याच बघा !
‘इथल्या एक गरजू बाई करून देतात-
‘एकदा नेऊन बघितलं नि सांगितलं आम्हाला-
‘तर आम्हाला बी अंदाज येतोय.
‘नाहीतर आम्ही तरी कशाकशाची चव बघत बसणार हो ?’
असं सलग दहापंधरा मिनिटं बेकरीवाला (मोठा भाऊ) बोलत राहिला.

-आणि शेवटी हातात अळुवड्यांचं पार्सल घेऊनच फब्या दुकानाच्या पायऱ्या उतरला !

तर अशा या बेकरीवाल्यावरून-
म्हणजे त्याच्या कुटुंबावरून-
आमच्या घरात अधून मधून वादविवाद होत असतात.
कारण अगदी क्षुल्लक आहे.
स्वतः बेकरीवाल्या (मोठ्या नि छोट्या) बंधूंव्यतिरिक्त त्यांच्या कुटुंबातल्या अन्य मंडळींचीही बेकरीत वर्दळ सुरु असते.
सगळ्यांचे चेहरे एकाच वळणाचे.
गोल, गुटगुटीत आणि जाड भुवयांचे.
फक्त शरीराचा आकार वयोमानाप्रमाणे वेगवेगळा.
या सगळ्या मंडळींचं बेकरीवाल्याशी असलेलं नातं हा आमच्या चर्चेचा कायमचा विषय.
बेकरीवाल्याचे भाऊ कोण ? पुतणे कोण ? आणि मुलं कोणती ?
शिवाय आईवडील कोण ? काका, मामा कोण ? सासू सासरे कोण ? वगैरे.
याविषयी वेगवेगळे अंदाज कारणपरत्वे व्यक्त होत असतात.
भरीला भर म्हणून त्यांच्या बायकामुलींची चेहरेपट्टीही थेट बेकरीवाल्याच्या बायकोच्याच वळणावर.

त्यामुळे गोंधळ अजूनच वाढला होता.

शेवटी काय तो ‘खुलासा’ करून घ्यावा आणि घरातले वाद थांबावेत म्हणून एकदा रात्री उशिरा बेकरीत शिरलो.
बेकरीवाला (मोठा भाऊ) नोटा मोजण्याच्या गडबडीत होता.
पण त्याचा धाकटा भाऊ मोकळा दिसला म्हणून त्याच्याकडे गेलो.
माझ्या शंका त्याने शांतपणे ऐकून घेतल्या.
मग तेवढ्याच शांतपणे त्याने खुलासा केला.
‘साहेब अगदी सोपं करून सांगतो-‘ तो म्हणाला,
‘जो यांचा मुलगा वाटतो,
‘तो यांचा सर्वात धाकटा भाऊ आहे.
‘आणि ज्यांना सगळे यांचा थोरला भाऊ समजतात,
‘ते यांचे वडील आहेत.
‘ज्याला तुम्ही यांचा पुतण्या समजता,
‘तो यांचा मुलगा आहे बरं का !
‘आणि जी यांची मुलगी वाटते-
‘ती प्रत्यक्षात यांची मेहुणी आहे.
‘जेव्हा हे ‘आत्या’ म्हणून हाक मारतात,
‘तेव्हा ते त्यांच्या आईला बोलवत असतात.
‘आणि ‘भाऊ’ म्हणून हाक देतात;
‘तेव्हा ती त्यांच्या वडिलांना उद्देशून असते.
‘ज्यांना ते ‘बाबा’ म्हणतात,
‘ते खरं म्हणजे आमचे काका आहेत !
‘आणि ज्यांना ते ‘काका’ म्हणतात,
‘तो मी- म्हणजे त्यांचा तीन नंबरचा भाऊ, बरं का-
‘त्याला उद्देशून ते म्हणत असतात.
‘आमच्या वहिनींना ते ‘ताई’ म्हणतात.
‘कारण वहिनी त्यांच्या बहिणींमध्ये सर्वात मोठ्या ना !
‘आणि सासऱ्यांना ते ‘मामा’ म्हणतात-
‘मग सासूबाईंना ‘मामी’ म्हणणं आलंच की-
‘म्हणजे आपल्या पद्धतीप्रमाणे ते आते-मामे भावंडांचं-
‘आलं ना लक्षात ?
‘झालं ना सगळं क्लियर साहेब ?’
मी क्षणभर बधीर झाल्यासारखा झालो.

त्यानंतर ‘होय ! झालं क्लिअर !’ अशा अर्थाची मान हलवत मुकाटपणे तिथून निघालो.

पण माझा चेहरा साफ पडला असावा असं रस्त्यातल्या तुरळक लोकांच्या नजरेवरून वाटलं.

घरी माणसं उत्सुकतेने वाट पहात थांबली होती.

बेकरीवाल्याच्या काकाने- आपलं, भावाने- सांगितलेलं सगळं त्यांना ऐकवलं.
आणि काय सांगू ?
बेकरीवाल्याच्या काकाने चुकीचं सांगितलं होतं,
की मीच काहीतरी गफलत केली कोण जाणे;
पण त्या दिवसापासून घरातला गोंधळ कमालीचा वाढला आहे.
आणि एकदोन दिवसांआड होणारे वादविवाद आता रोजच होत आहेत !
@@@
हर्षद सरपोतदार 
hsarpotdar1@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
 मुखपृष्ठ : नायगारा –  प्रीती सातोस्कर नाईक 
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
लक्षणीय 
त्रिवेणी संगमाच्या तीरावर
 
केशव साठये 
Triveni 3

मित्रवर्य विनय हर्डीकर याचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तो मोजकंच लिहितो पण जे लिहितो ते मनःपूत लिहितो. विषयाला सर्वांगाने भिडून आपल्या व्यासंगाच्या मुशीतून तो ते असे उतरवतो की वाचकांना अगदी नेहेमीच विषय असला तरी तो नव्याने कळतो. ‘अंतर्नाद’ दिवाळी अंकात त्यांनी एक शिवधनुष्य उचलले आहे आणि ते म्हणजे ‘आमचा संगीत (प्रेमाचा ) त्रिकोण’ या लेखाच्या  निमित्ताने कुमार गंधर्व ,भीमसेन जोशी आणि किशोरीताई यांच्या एकूण गान कारकिर्दीची तुलनात्मक मांडणी. दोन माणसांची तुलना करताना भल्याभल्यांची तंतरते इथे तर हे ३ दिग्गज. पण विनयने अत्यंत कुशलतेने ही स्वरचित्रं   साकार करुन शास्त्रीय संगीताच्या अथांग सागरात सूर मारुन त्यांतील  नेमकी रत्नं वेचून वाचकांच्या हाती ठेवली आहेत.

या गायकांची जडणघडण मांडत त्यांच्या शागीर्दीचा प्रवास उलगडत गाण्याचे मर्म या लेखात अतिशय सहज मांडलं आहे. .शिष्य आणि विद्यार्थी हा फरक सांगत या कलेच्या उच्च शिक्षणमूल्यांचा उच्चार  लेखक  करतो यातूनच तो  शास्त्रीय संगीताचं मर्म सहजपणे सांगतो. घराण्याचा सोस आणि परंपरेचं जोखड याची चर्चा करत या तिघांच्याही आधुनिक दृष्टिकोनाचा सन्मान या लेखात होताना दिसतो. हा संपूर्ण लेख गायकांवर आणि  गाण्यावर असला तरी  लेखक आपल्या  बहुआयामी अनुभवाच्या शिदोरीतून तो  जीवनाच्या अनेक अंगांना  स्पर्श करत पुन्हा समेवर  कसा आणतो हे  तो वाचल्यावरच समजेल.

रियाज, आकार युक्त गाणं, सादरीकरण तंत्र, राग मांडणी, बढत अशा अनेक पैलूंची चर्चा अतिशय रसाळपणे आणि संपर्क उदाहरणामुळे अभ्यासपूर्ण आणि प्रवाही झाली आहे. गाणं समजणं, शास्त्र समजणं, गायक समजणं आणि श्रोते समजणं आणि एकूण समाज पर्यावरण समजणं हे पाचही मुद्दे लेखकाच्या कह्यात असले की तो लेखच एक उत्कृष्ट मैफिल होऊन जातो याचं हे एक  सुरमयी उदाहरण आहे.

केशव साठये 
keshavsathaye@gmail.com
प्रिय वाचक, 

यंदा दिवाळीच्या सणाचे आणि फुरसतीचे चीज करणारे एकाहून एक असे दिवाळी अंक बाजारात आले आहेत. दिवाळी संपली तरी या अंकांचे वाचन चालू आहे. या अंकातील काय आवडले काय नावडते याचा ताळेबंद वाचकांनी थोडक्या शब्दात पाठवावा असे आमच्या मनात असते. पण मागील वर्षी केलेल्या आवाहनाला विशेष प्रतिसाद मिळाला नव्हता. म्हणून यंदा तसे विचारले नाही. तरी रसिकाग्रणी केशवराव साठये यांच्याकडून आलेले एक निरीक्षण आपल्या समोर ठेवत आहोत. आपणही मोजक्या शब्दात कळवू शकता. – सं.        

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
इतिहासावर आपली मुद्रा कोरणारे वर्ष
संशोधन 

सर आयझॅक न्यूटन 
( २५ डिसेंबर १६४२ – २० मार्च १७२७)

     प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एखादे वर्ष असे उजाडते की त्याच्या संपूर्ण जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळून जाते. सुखांच्या क्षणांपायी कधी ते वर्ष संस्मरणीय ठरते तर कधी त्याला दुःखाची झालर असते. पण प्रत्येकाच्याच आयुष्यात एकदा तरी नाना रंगांची उधळण करणारे असे इंद्रधनुष्य उमलते आणि त्या माणसाच्या उभ्या आयुष्यालाच एक नवीन अर्थ प्राप्त करून देते , जीवनप्रवासाला एक आगळा अर्थ प्रदान करणारे असे इंद्रधनु व्यक्तीच्या आयुष्याच्या नेमक्या कुठल्या वळणावर येईल, लवकर येईल की उशीरा उगवेल, हे मात्र सगळे गूढच असते.

     असेच एक वर्ष सुमारे साडे तीनशे वर्षांपूर्वी एका, तोवर सर्वसाधारण चारचौघांसारखाच गणल्या जाणा-या एका मनुष्याच्या जीवनात उगवले. आजच्या भौतिकशास्त्राचा पाया रचला गेला तो नेमक्या त्याच घटिताद्वारे. गणितातील नवीन दालने त्यांतूनच उघडली गेली. गुरुत्वाकर्षणाचा शोधसिद्धांत, गतीचे तीन नियम, कॅल्क्युलसचा जन्म, त्याच दालनात त्याच वर्षी घडून आला. त्या असाधारण व्यक्तीचे नाव आता वेगळे उकलून सांगण्याची गरज खरोखरच आहे का… सर आयझॅक न्यूटन ! न्यूटन यांनी लावलेल्या त्या शोधांनी आपल्या सगळ्यांचाच जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन तर बदलालाच पण, आपल्या रोजच्या जगण्याला त्यांमुळे एक वैज्ञानिक बैठक देखील प्राप्त झाली.

     एक असामान्य वैज्ञानिक म्हणून पुढे ज्या न्यूटन यांचे नाव त्रिखंडात गाजले त्या न्यूटन यांना त्यांचे शालेय शिक्षण अर्धवट सोडायला लागले होते आणि तेही केवळ त्यांच्या आईच्या हट्टाखातर, हे तर आज कोणालाही सांगून खरे वाटणार नाही. अविश्वसनीय वाटावे असेच हे सगळे नाही का ? नियतीच्या मनात केव्हा काय येईल याचा नेम कोणी सांगावा ? न्यूटन यांनी त्यांच्या जन्मदात्याप्रमाणेच शेतकरी बनून शेतात राबावे, अशी त्यांच्या मातोश्रीची इच्छा होती, याला काय म्हणावे ?

     १६४२ सालातील डिसेंबर महिन्यात जन्माला आलेल्या न्यूटन यांचे जन्मदाते वडील त्याच्या तीन  महिने अगोदर वारले होते. न्यूटन तीन वर्षांचे झाल्यावर त्यांच्या आईने दुसरा विवाह केला. न्यूटन यांचे त्यांच्या सावत्र वडिलांशी बिलकुल पटले नाही. त्यामुळे ते कायम पुस्तकातच रमत राहिले. मात्र, चारचौघांसारखा दिसत असला तरी हा मुलगा असामान्य बुद्धिमत्तेचे लेणे ल्यालेला आहे ही बाब ज्या शाळेत न्यूटन यांचे नाव दाखल केलेले होते, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी अचूक हेरली. खास न्यूटन यांना वाचण्यासाठी ते निरनिराळी पुस्तके आणून देत. त्यांच्या वाचनाद्वारे न्यूटन यांच्या ठायीची उपजत जिज्ञासा सतत वाढती राहिली. हट्टाला पेटून न्यूटन यांच्या आईने त्यांना शाळेतून काढले तेव्हा याच मुख्याध्यापकांनी आणि न्यूटन यांच्या काकांनी त्यांचे नाव परत शाळेत दाखल केले.

     जगविख्यात अशा केंब्रिज विद्यापीठातील ट्रिनिटी महाविद्यालयात न्यूटन शिकत असताना १६६५ साली लंडनमध्ये प्लेगची जबरदस्त साथ आली. सगळीकडे हाहाकार माजला. जो तो शहर सोडून बाहेर धाव घेऊ लागला. न्यूटन हे देखील मग आपल्या आजोळी वुल्सथोर्प  मनोर, लिंकनशायर [ Woolsthorpe Manor, Lincolnshire ] येथे गेले. तेथे गेल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की पुस्तकांपेक्षा निसर्गातच आपल्याला अधिक चांगले आणि उपयुक्त ज्ञान मिळते. आपल्या आजोळच्या शेतात, बागेत मग ते रमू लागले. रात्रीच्या चांदण्या आणि आकाश त्यांना गूढतेचा अनुभव प्रदान करत असे. सकाळपासून ते शेतात जात आणि एखाद्या झाडाखाली बसून विचारात मग्न होऊन जात. एकदा असेच ते अंगणातील सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले असताना अचानकपणे एक सफरचंद त्यांच्या पुढ्यात पडले आणि गुरुत्वाकर्षणाची संकल्पना त्यांच्या मनात अंकुरली. आपले मित्र विल्यम स्टुकेले  ( William Stukeley ) यांना न्यूटन यांनी ती गोष्ट सांगितली. पुढे स्टुकेले यांनी तीच गोष्ट Memoir of Sir Isaac Newton’s Life या १७५२ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात नमूद केली.

     खरे तर न्यूटन यांचा स्थायीभाव अलिप्त राहण्याचा होता. त्यांना फारसे मित्र नव्हते. त्यांनी कधी लग्नही केले नाही. बालपणीच, दुसरे लग्न केल्यामुळे, आपल्याला आई दुरावली याचा त्यांच्या मनावर विलक्षण ओरखडा उमटलेला होता. पुढील आयुष्यात सावत्र वडिलांशी होणा-या सततच्या वादांमुळे न्यूटन वृत्तीने अंमळ तुसडे बनले. आप[आपल्या सावत्र वडिलांचे घर जाळून टाकायचे, ताशीव आपल्या मनातली सुप्त इच्छा त्यांनी आपल्या दैनंदिनीमध्ये लिहून देखील ठेवलेली होती. या सगळ्यांपायी ते जरासे एकलकोंडे आणि शीघ्रकोपीसुद्धा बनले होते. थोडी देखील टीका त्यांना सहन होत नसे. या अशा सगळ्या गुंत्यामुळे कायम एकटे राहणेच त्यांनी पसंत केले.

    अर्थात जे होते ते चांगल्यासाठीच होते असे जे म्हटले जाते, ते खरेच होय. १६६५ साली प्लेगची साथ आली नसती तर कदाचित सगळे चित्रच वेगळे दिसले असते. त्या वर्षी जे शोध न्यूटन यांना लागले, निसर्गाचे जे गूढ त्यांना उमगले ते कदाचित कधीच घडले नसते. त्याच वर्षात न्यूटन यांनी बायनॉमिअल सिद्धांत ( Binomial Theorem ) आणि कॅल्क्युलसचा देखील शोध लावला. त्याचबरोबर धवल प्रकाशाबाबत ( White light ) त्यांनी जो सिद्धांत मांडला त्याचा पायाही त्याच वर्षात रचला गेला. त्या संदर्भांतील ग्रंथ १७०४ मध्ये Optik या नावाने प्रसिद्ध झाला. त्याचे असे झाले की आकाशीय किरणांचा प्रकाश पांढराच आहे, असा भास न्यूटन यांना एके रात्री आकाशनिरीक्षण करत असताना झाला. मात्र, तेच दृश्य त्यांनी ज्या वेळी भिंगामधून पाहिले तेव्हा बाहेर फेकला जाणारा तो प्रकाश दरवेळी पांढराच नसतो, असे त्यांच्या लक्षात आले. त्याच बाबीचे निरीक्षण करण्याचा मग त्यांना जणू छंदच जडला. वेगवेगळ्या भिंगांमधून निरीक्षण करण्याचा त्यांनी एक प्रकारे धडाकाच लावला. नंतर काही दिवसांनी न्यूटन यांनी एक प्रयोग करून पाहिला. घराच्या भिंतीला त्यांनी एक भोक पाडले. ते भोक असे पाडले की त्यातून सूर्यप्रकाश बरोबर आत यावा. आत येणारी सूर्याची किरणे जिथे पडत तिथे त्यांनी एक त्रिकोणाकार लोलक (prism ) ठेवला. पांढरा रंग फेकणारी सूर्यकिरणे लोलकामधून पलीकडे जाताना मात्र आपला रंग बदलतात हे न्यूटन यांच्या ध्यानात आले. ही सगळी त्या लोलकाची करामत असावी अशी न्यूटन यांची धारणा झाली. म्हणून मग आणखी एक लोलक त्यांनी पहिल्या लोलकाच्या विरुद्ध बाजूस परंतु त्याला समांतर अशा पद्धतीने ठेवला. ही सगळी मांडणी झाल्यावर न्यूटन यांनी पुन्हा नोंदी घेण्यास सुरुवात केली.

     आज इतका काळ उलटून गेल्यानंतर ही गोष्ट खूपच साधी आणि सोपी वाटत असली तरी त्या काळात मात्र ती कमालीची दखलपात्र ठरली. त्याचे कारणही तसे साधेसरळ होते. अवघा २३ वर्षांचा युवक कोणत्याही प्रकारच्या प्रगत अशा वैज्ञानिक उपकरणांच्या मदतीशिवाय एक आगळी बाब जगासमोर मांडू पाहत होता. न्यूटन यांचा तो प्रयोग एका अर्थाने क्रांतिकारक ठरला. अतिसूक्ष्म कणांची एक सलग मालिका म्हणजेच प्रकाश, हे वास्तव न्यूटन यांच्या ध्यानी आले ते या प्रयोगानंतरच. अवकाशीय पोकळीमधून प्रकाश सर्वसाधारणपणे ज्या वेगाने प्रवास करतो त्या पेक्षा अधिक वेगाने तो काचेच्या कोणत्याही माध्यमातून प्रवास करत राहतो.

     प्रकाश म्हणजे अतिसूक्ष्म कणांची मालिका हा शोध न्यूटन यांनी लावण्यापूर्वी त्याच शोधाच्या जवळपास जाणारा एक प्रयोग इटलीतील एक शास्त्रज्ञ ग्रिमाल्डी ( Grimaldi ) यांनी केला होता. प्रकाश हा कणांपासूनच बनलेला आहे, असेच त्यांचे मत प्रयोगांती बनलेले होते. परंतु जननिंदा आणि जनपवादाच्या भीतीपायी आपला हा प्रयोग त्यांनी बराच काळ प्रकाशितच केला नाही. त्याला कारणे दोन. एक तर ग्रिमाल्डी हे एका चर्चमध्ये पाद्री म्हणून कार्यरत होते आणि दुसरे म्हणजे गॅलिलिओ यांनी केलेल्या नानाविध प्रयोगांमुळे त्यांना ज्या पद्धतीने लोकनिंदेला सामोरे जावे लागले ते दिव्य आपल्या वाट्याला येऊ नये अशी ग्रिमाल्डी यांची इच्छा होती. प्रकाशाच्या लहरी निर्माण होत असतात, अशा प्रकारचे प्रतिपादन विख्यात फ्रेंच तत्त्ववेत्ते आणि गणिती रेने डेस्कार्ट्स ( Rene Descartes ) यांनी त्याच्या आधी मांडलेले होते.

     न्यूटन हे विलक्षण चिकित्सक आणि विचक्षण होते. प्रकशलहरींच्या त्या सिद्धांताबाबत ते म्हणूनच कमालीचे साशंक होते. शिवाय त्या चिकित्सेला अस्तर लगडलेले होते. सूक्ष्म अशा राष्ट्रवादी भावनेचे. प्रकशलहरींबाबतचे संशोधन केले होते एका फ्रेंच शास्त्रज्ञाने आणि त्याला दुजोरा देणारा शास्त्रज्ञ होता इटलीचा ! ख्रिश्चन ह्युजेन्स ( Christian Huygens ) नावाच्या एका वैज्ञानिकानेही १६७९ साली प्रकाश लहरींच्या संदर्भात आपला सिद्धांत मांडला होता परंतु तो पूर्णपणे खोदून काढत आपलाच निष्कर्ष कसा बरोबर आहे हे न्यूटन यांनी आपल्या पुस्तकात अतिशय सखोलपणे विशद केले.

     न्यूटन यांच्या भोवतीच्या वलयामुळे म्हणा किंवा विज्ञानजगतावरील त्यांच्या प्रभावामुळे म्हणा, प्रकाश म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अतिसूक्ष्म कण आणि अशा कणांची सलग ,मालिका होय, हा न्यूटन यांचा सिद्धांत त्या काळात अनेकांनी उचलून धरला. परंतु, प्रकाशाच्या लहरीच असतातहे वास्तव थॉमस यंग (Thomas Young ) यांनी डबल स्लिट (Double slit ) च्या तंत्राद्वारे १८०१ साली सिद्ध केले. त्यानंतर बरोबर १०१ वर्षांनी अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी क्वांटम थिअरी ( Quantum Theory ) च्या साहाय्याने थॉमस यांग यांचा सिद्धांत हा न्यूटन मांडत असलेल्या प्रकाश किरणांच्या सिद्धांतापेक्षा वेगळा असल्याचे प्रतिपादन सप्रयॊग मांडले. त्यासाठी त्यांनी फोटोइलेक्ट्रिक इफेक्टच्या विश्लेषणाचा आधार घेतला. मात्र, न्यूटन यांचा सिद्धांत चुकीचा आहे, असे आईन्स्टाईन यांनी चुकूनही म्हटलेले नाही, हे विशेष.

     एकीकडे वैज्ञानिक दृष्टीने प्रयोग करत असतानाच न्यूटन दुसरीकडे गणितातली आपली आवड आणि जिज्ञासादेखील जोपासत होते. त्याच काळात न्यूटन यांना कॅल्क्युलसचाही उलगडा झाला. त्याचे असे झाले की गुरुत्वाकर्षणाच्या विचारातच न्यूटन सतत असत. अशा अवस्थेत असताना जमिनीवरील छोट्या छोट्या उतारांवर न्यूटन यांनी आपले लक्ष केंद्रित केले. त्या उतारांचे मापन ते गणित, भूमिती आणि /अथवा बीजगणिताची फारशी मदत न घेता करू लागले. कॅल्क्युलसच्या विकासाची पायाभरणी त्या सगळ्या प्रक्रियेत कोठे तरी घडून आली असावी, असा या क्षेत्रातील जाणकारांचा होरा आहे. मी,तर, न्यूटन यांनी आपले ते संशोधन कुठल्याच नियतकालिकात प्रसिद्ध केले नाही. त्या नंतर तब्बल आठ वर्षांनीं जर्मन गणिती Gottfried Leibniz  ( इ. स. १६४६ – १७१६) यांनी कॅल्क्युलसचा तोच सिद्धांत प्रकशित केला तेव्हा न्यूटन याना ती बाब फार जिव्हारी लागली. दोघामध्ये वादही झाला. पुढे अनेक वर्षे त्या वादाच्या ठिणग्या पडताच  राहिल्या. अखेर कॅल्क्युलसच्या शोधाचे श्रेय इतिहासकारांनी या उभयतांच्या  ओंजळीत घातले.

     असे हे १६६५ वर्ष ! युगायुगातून अवचितच केव्हा तरी उगवणारे. इतिहासावर आपली मुद्रा कोरणारे. न्यूटनसारख्या एका अवलियाची ओळख उभ्या जगाला करून देणारे … !

@@@
लेखक : नाव दिलेले नाही.
[ ‘अर्थबोधपत्रिका’ जुलै २०१७ वरून साभार ]

17 thoughts on “ऐसपैस

  1. नमस्कार सुप्रभात, आजच्या अंकातील सरपोतदार यांचा वेगळा माहितीपूर्ण लेख दैनंदिन जीवनातील अनुभवाच्या खूप जवळचा आहे. काही ठिकाणी तर दुकानांत येणारे लोक हे मालकाच्या दृष्टीने दुर्लक्ष करणेची बाब असते. .जणू काही वाणसामान देऊन तो समाजावर उपकार करत असतो. म्हणून मग आज काल सुपर मार्केटची व्यवस्था चांगली वाटत आहे. यांवर हे दुकानदार, “आमचेकडून तुम्ही हल्ली सामान घेत नाही असेही विचारतात.” लक्षणीय – त्रिवेणी संगमाच्या तीरावर आवडले. शास्त्रीय माहिती पण वेगळ्या दृष्टीकोनांतून – इतिहासावर आपली मुद्रा कोरणारे वर्ष वाचताना हेही पटले की एखादी संधी/एखादे वर्ष जीवनांत भरपूर आनंद देते.

  2. नेहमी प्रमाणेच हर्षदजींचे ऐसपैस गुदगुल्या करत,हसवत राहिले .त्यांच्या यूपी च्या पाहुण्यावरून सहज आठवले. हरियाणात असताना मी ऐकले होते . दोन मित्र गप्पा करीत होते . एक म्हणाला …अरे यार, मैं अभी बंबई जाके आया . व हाँ ट्रेन में , वो भी लोकल में लोग टिकट खरीदते है और मेरा पैर लग गया एक बंदे को ..तो वो मुझे सॉरी बोला, …सुना.. वो मुझे सॉरी बोला..सॉरी..आणि दोघे खो खो हसू लागलेत

    साठये जींचे परिक्षण वाचून आनंद झाला . आता हा देखील दिवाळी अंक आणावासा वाटत आहे

    न्यूटन चे वाचले .खूप नवी माहिती मिळाली आणि सहज असे ही वाटून गेलं 25 डिसेंबर थोर लोक जन्म घेतात की काय ..हाहा

    • बापरे ! म्हणजे हरियाणाही यूपीसारखाच आहे ? यूपी पाहिल्यावर बिहार काय असेल अशी शंका माझ्या मनात आली होती व भारतीय असल्याबद्दल प्रथमच मी ओशाळलो होतो. असो. २५ डिसेंबर तुमचा जन्मदिवस असावा असा एक तर्क.

  3. हर्षदजींचे ऐसपैस नेहमीप्रमाणेच खुसखुशीत, खुमासदार ! त्यातला हलकाफुलका नर्म विनोद खूष करून जातो.

    न्यूटनच्या ‘सफरचंद’ अपघाताने लागलेल्या गुरुत्वाकर्षण सिध्दांताच्या शोधापलिकडे केलेल्या इतर संशोधनांची, त्याच्या बालपणाची माहिती सहसा नसते ती अज्ञात लेखकाच्या लेखातून मिळाली.

  4. हर्षदजी सरपोतदार यांच्या विनोदशैलीवर कितीदा लिहावे आणि किती वाखाणणी करावी पण आज हे वाचून पुण्यात जाऊन त्या सपना बेकरीच्या मालक मंडळींना बघायची इच्छा झाली.
    आपण दिवाळी अंक समाप्त केला तरी या लेखामुळे ते वातावरण तसेच जिवंत ठेवलेले आहे असे वाटले. केशव साठये यांच्यानंतर किती वाचक यंदा वाचलेल्या दिवाळी अंकांवर लिहितील याची उत्सुकता आहे.
    न्यूटनच्या एकूण कामगिरीचा या लेखात घेतलेला आढावा आम्हा पामरांना समजेल असा आहे. आभार.

  5. एव्हाना मैत्रीतील ऐसपैस हे खुसखुशीत सदर खूप वाचकप्रिय झालंय. पुण्यातील दुकानदारांपेक्षा पणजी-म्हापसा येथील दुकानदार काही वेगळे नाहीत. म्हणूनच मॉल संस्कृति बोकाळलीय. मोहनभैया व फब्या गमतीदार आहेत.
    मजा आली.
    विनय हर्डीकरांच्या, अंतर्नादच्या दिवाळी अंकातील लेखाची थोडक्यात साठ्येजींनी छान समीक्षा लिहिलीय. संपूर्ण अंकच वाचायला हवा.
    अर्थबोधपत्रिकेतील न्यूटनबद्दलचा माहितीपूर्ण लेख, विशेषतः त्यातील इतर संशोधकांच्याही माहितीमुळे आवडला. धन्यवाद नाबरजी

  6. न्यूटन हा महान शास्त्रद्न्य होता हे खरं, पण बायबलच्या जेनेसिस १ मध्ये जगाची उत्पत्ती चार हजार चार वर्षांपूर्वी झाली असा जो अडाणीपणाचा सिद्धांत मांडलेला आहे, त्यावर त्याची (व केपलर याचीही) नितांत श्रद्धा होती. धर्मग्रंथ बुद्धिवंतांनाही कसे पांगळे बनवू शकतात याचं हे एक उदाहरण ! हा सिद्धांत खोटा ठरू नये म्हणून वेदांचा व भारतीय इतिहासाचा काळ पुढे ओढण्यात आला याचे लेखी पुरावे उपलब्ध आहेत.

  7. हर्षद सरपोतदार अगदी सहजपणे सध्या शब्दात नेहमीच्या आयुष्यातले प्रसंग इतक्या खुमासदार शैलीत मांडतात की त्यांना दाद अपरिहार्य असते.

  8. हर्षदरावांचा लेख नेहमीप्रमाणेच हसवून गेला. जुन्या काळातल्या मोठ्या घरांमधले नात्यांचे गोंधळ त्यांनी हसत व हसवत दाखवले आहेत..

यावर आपले मत नोंदवा