माझी जन्मठेप

दीपावली २०१८ विशेष 
 
पुस्तकाची कुळकथा *
 
[७] 
 
वि. दा. सावरकर

पुस्तकाचे मुखपृष्ठ

‘मैत्री’च्या या लेखमालेत आजपर्यंत आपण ज्या पुस्तकाच्या कुळकथा वाचल्यात, त्यातील कै. मामा वरेरकरांच्या ‘कुंजविहारी’ नाटकाच्या प्रकाशाची कुळकथा आपल्याला आठवत असेल. वरेरकरमामांना  सामाजिक हितशत्रूंशी कसा झगडा द्यावा लागला तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘माझी जन्मठेप’ तत्कालीन दंडसत्तेचे बळी ठरले. स्वातंत्र्यपूर्व काळातच नव्हे, तर आज आणि पुढेही हजारो वाचकांना स्फूर्तिप्रद ठरणा-या या अपूर्व ग्रंथाची ‘कुळकथा’ आज ‘संग्रहालय’ मासिकाच्या सप्टेंबर १९७८ च्या अंकातून साभार पुनःप्रसिद्ध करत आहोत. – सं.

     ” आमचा अंदमानचा वृत्तांत नि तेथे बंदिवास कंठीत असतांना भोगाव्या लागलेल्या यातना यांची कहाणी   ऐकण्यासाठी महाराष्ट्रातच नव्हे, परंतु उभ्या हिंदुस्थानांत आमच्या सहस्रावधी देशबांधवांनी सहानुभूतीपूर्ण औत्सुक्य आजपर्यंत अनेक समयी व्यक्त केलेले आहे. त्यांतही सुहृदांस आपण भोगलेली उत्कट दुःखे सांगतांना समवेदनांच्या अश्रूंनी स्निग्ध होणारा तो मधुर आनंद मिळवण्यासाठी आमचे हृदय आमच्या सुटकेपासून साहजिकच कासावीस होत आहे …

     परंतु तरीही काही केल्या अंदमानची कथा ओठांवर येत असतांहि लेखणीवाटे बाहेर येईना. अंधकारात वाढणा-या कोण्या काटेरी फुलवेलीप्रमाणे त्या सा-या दिवसांची स्मृति उजेड दिसतांच सुकून जाऊं पाही, दिपून जाई. कधी वाटे, सांगण्यासाठी का हे सगळे भोगले ? तर मग तो सगळा अभिनयच म्हणावयाचा. कधी वाटे, आपणास भोगाव्या लागल्या त्या यातना भोगीत असतांनाच जे त्या यातनांस बळी पडले त्यांना घरी परत येऊन प्रियजनांस ती दुःखे सांगण्याचे समाधानही मिळाले नाही ते सहतापी आज आपणाबरोबर नाहीत. ज्यांच्यासह तपाचा उत्ताप सहन केला त्यांस सोडून ह्या पारण्याच्या पंक्तीतील ही मिष्टान्ने एकट्यानेच कशी खावी? ही त्यांच्याशी प्रतारणा तर होणार नाही ना ? आणि आपणासारख्या कित्येक मनुष्यांवर आजपर्यंत हे खडतर संकटांशी सामना करण्याचे प्रसंग कोसळले आहेत नि अजून असले किंवा याहून भयानक प्रसंग कोसळावयाचे आहेत. ह्या जीवनकलहाच्या नगा-यांच्या घाईत आम्ही काय ही टिमकी वाजवीत बसावे ?

     परंतु दुःखाच्या गळ्यात किंकाळीचा ढोल हा निसर्गानेच बांधिलेला असावा की तो वाजवून त्याने आपली शक्य ती करमणूक करून घ्यावी. ससाण्याने झेप घालताच विवश होऊन त्याचे चोचीतच पडलेला पक्षी सहाय्याची लेश आशा नसता जो स्वाभाविक चीत्कार करतो. त्या चीत्कारापासून तो नेपोलियनचे प्रेत सेंट हेलिनामधून पॅरिसला ज्या दिवशी परत आणले त्या दिवशी राष्ट्रचे राष्ट्र आपले ध्वज नमवून आपल्या सहस्र वाद्यांतून सहस्र शोक नि विरहगीते गात जो दुःखाचा हंबरडा फोडते झाले, त्या हंबरड्यापर्यंत जितका प्राणिमात्राचा आक्रोश आहे, तितका तो आपापल्या दुःखांची प्रसिद्धी करण्यात चूर झालेला असतो. आक्रोश हा दुःखाचा स्वर आहे, तेव्हा या अनंत आकाशात जे अनेक चीत्कार उसासे टाकून आपल्या दुःखांचा भार कमी करीत हिंडत आहेत त्यांत माझ्या दुःखाने प्रसिद्धीचा उसासा का टाकू नये ? या अनंत अवकाशात माझ्याही आक्रोशाला अवकाश आहे असे वाटून प्रवृत्ती, केव्हा केव्हा दुःख एकदाचे ओकून टाकण्यास अगदी अधीर होई. पण तीच परिस्थिती तिचा पाय हिसडून तिला मागे खेची. कारण आमच्या सध्याच्या परिस्थितीत आमच्या अंदमानच्या अनुभवांत सांगण्यासारखे आहे तेच विशेषेंकरून सांगता येणार नाही. आजच्या परिस्थितीत सांगता येईल ते अगदी वरवरचे, उथळ वा सापेक्षतः क्षुल्लकसे वाटत असल्यामुळे सांगण्यास उत्साह येत नाही आणि जे सांगण्यासारखे आहे ते परिस्थिती सांगू देत नाही.

     अशा स्थितीत काहीतरी सांगून त्या कथानकाचे चित्र रंगहीन नि सत्त्वहीन करून टाकण्यापेक्षा, प्रस्तुत काही सांगूच नये. कधी तसा दिवस उगवेल की ज्या दिवशी सर्व गूढ आकांक्षा व्यक्त होऊ शकतील. सर्व मनोभावना मोकळेपणाने बोलू शकतील, त्या दिवशी सांगायचे ते यथाप्रमाणं होईल. तसा दिवस या आयुष्यात न उगवला तर नाही सांगणार, ते वृत्त जगाने ऐकले नाही म्हणून त्याचे महत्त्व उणावत नाही वा त्याची तीव्रता बोथट होत नाही. किंवा ह्या जगताच्या प्रचंड राहाटीत ते सर्व अश्रूत राहिले म्हणून काही मोठा खंड पडणार आहे असेही नाही, असे वाटे.

     …. जे काय अर्धेमुर्धे वा अल्पस्वल्प सध्याच्या परिस्थितीत सांगता येण्यासारखे आहे ते तरी आपण सांगितलेच पाहिजे… एतदर्थ परिस्थितीत जो काय सांगता येईल तो आमचा अंदमानमधील वृत्तांत सांगून टाकण्याचा आम्ही निश्चय केला आहे.

… या आठवणीत सर्व वृत्त जरी सांगता आले नाही, तरी सांगितले जाईल ते अक्षरशः नि भावार्थही यथातथ्य सांगितले जाईल, ह्या विषयी शक्य ती दक्षता राखण्याचा यत्न केला जाईल.”

– वि. दा. सावरकर
रत्नागिरी, शालिवाहन संवत्
१८४७ / सन १९२५

~~~~ ~~~~ ~~~~~

     परकीय ब्रिटिश साम्राज्यतेविरुद्ध बंड पुकारल्याच्या आरोपावरून श्री. विनायक दामोदर सावरकर यांना दोन जन्मठेपेची शिक्षा ब्रिटिशांच्या राज्यातील न्यायालयाने २४ डिसेंबर १९१० रोजी दिली आणि पन्नास वर्षे किंवा दोन जन्म काळेपाण्याची शिक्षा भोगण्यासाठी अंदमानला त्यांची रवानगी करण्यात आली. त्याच जन्मठेपेचे कठोर सत्य असलेले भयानक स्वानुभव सांगणारा हा ग्रंथ वीर सावरकरांनी त्या बंदिवासातून १९२४  मध्ये सुटल्यावर रत्नागिरी येथे स्थानबद्ध असताना लिहावयास घेतला. प्रथम १९२५-२६ मध्ये पुणे येथील ‘केसरी’त त्याचा पूर्वार्ध नि १९२७ मध्ये मुंबईतील ‘श्रद्धानंद’ साप्ताहिकात त्याचा उत्तरार्ध क्रमशः प्रसिद्ध झाला. ‘केसरी’मध्ये ह्या ‘जन्मठेप’ ग्रंथाइतकी, दुसरी कोणतीही वाचक जिची अत्यंत आतुरतेने वाट पहात असत, अशी माला दीर्घकाळ चालली नाही. आणि तरीही ‘केसरीला हे पुस्तक पूर्णपणे छापता आले नाही. २० जानेवारी १९२७ पासून ह्या ग्रंथाचा उत्तरार्ध ‘श्रद्धानंद’मध्ये प्रसिद्ध होऊ लागला आणि मे किंवा जून १९२७ मध्ये तो पुस्तकरूपाने प्रकाशित झाला.

     पुढे थोड्याच दिवसात ह्या पुस्तकाचा गुजराथी अनुवाद अहमदाबादच्या प्रस्थान कार्यालयाने प्रसिद्ध केला.

     १७ एप्रिल १९३४ रोजी सरकारने हा ग्रंथ आक्षेपार्ह ठरवून त्याचेवर बंदी घातली. १९३७ सालापासून अनेक वर्षे या ग्रंथावरील बंदी उठवावी म्हणून साहित्य संमेलने तसेच अन्य संस्थांनी आणि व्यक्तींनी सरकारकडे मागणी केली पण ती फलद्रुप होऊ शकली नाही.

     १९४५ साली काँग्रेस मंत्रिमंडळ अधिकारारुढ झाल्यावर या ग्रंथावरील बंदी उठविण्याची मागणी एकसारखी करण्यात आली. एकही जणांनी तर ही पुस्तके छापून उघडपणे विकण्याचीही घोषणा केली. तेव्हा शेवटी २२ मे १९४६ ला, या पुस्तकावरील बंदी उठविण्यात आली. अर्थात मधल्या काळात बंदी होती तरीही गुप्तपणे ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक घराघरातून वाचले जात होतेच. १९४७ साली परचुरे पुराणिक मंडळीने या पुस्तकाची स]दुसरी आवृत्ती प्रकाशित केली.

     परंतु एवढ्यात ३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची हत्त्या झाली आणि त्यात एक आरोपी म्हणून बॅ. सावरकरांना गोविले गेले. तेव्हा सावरकरांच्या पुस्तकांवर नवे संकट आले. त्यामुळे पुढे काही वर्षांनी १९५२-५३ मध्ये ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक मुंबईच्या पदपथावर सव्वा सव्वा रुपयांस मिळू लागले. वीर सावरकर विनोदाने म्हणाले, “ठीक झाले ! आता अनेकजण स्वस्त पुस्तक घेऊन वाचू लागतील. ” आणि खरोखर तसेच झाले. आठ रुपयांचे इतके उत्तम पुस्तक सव्वा रुपयात मिळू लागताच सर्वसाधारण वाचकही ते विकत घेऊ लागला. पुस्तकाला सारखी मागणी येऊ लागली आणि पुन्हा ते पूर्ण किंमतीला विकले जाऊ लागले !

     त्यानंतर १९६३ मध्ये समग्र सावरकर वाङ्मयात हा ग्रंथ छापला गेला आणि १९६८ मध्ये या ग्रंथाची नवी आवृत्ती ग. पां. परचुरे प्रकाशन मंदिराने प्रसिद्ध केली. सात हजार वाचकांनी ह्या ग्रंथाचे प्रसिद्धीपूर्व मूल्य देऊन ह्या ग्रंथाविषयीचा आदर व्यक्त केला.

     आज ही आवृत्तीही बाजारात उपलब्ध नाही.

     हा ग्रंथ केवळ बंदिवासातील कष्टांचे हृदयद्रावक वर्णन करणारा नाही, तर भयंकर आपत्तीतही माघार न घेता किंवा शरण न जात झुंजत राहण्याची स्फूर्ती देणारा आहे. हिंदुस्थान स्वतंत्र करण्यासाठी सशस्त्र क्रांतिकारकांनी  किती कष्ट सहन केले त्याचे या ग्रंथांतील वृत्त वाचून ज्याचे हृदय हेलावणार नाही असा वाचक विरळाच.

@@@

[ ‘माझी जन्मठेप‘ या पुस्तकाच्या ग. पां. परचुरे प्रकाशन मंदिराने १९६८ साली प्रकाशित केलेल्या आवृत्तीच्या प्रास्ताविकातून संक्षेपतः आणि ‘संग्रहालय‘च्या सप्टेंबर १९७८ च्या अंकावरून साभार उद्धृत]

*पुस्तकाची कुळकथा‘ या मालिकेत प्रसिद्ध झालेले लेख :-
२३ सप्टेंबर २०१५ :- (१) मामा वरेरकर यांचे नाटक ‘कुंजविहारी’ – मामा वरेरकर
२९ ऑक्टोबर २०१५ :- (२) ‘भगीरथाच्या पुत्रां’ची जन्मकथा – गो नी दांडेकर
१० नोव्हेंबर २०१५ :- (३) स्वातंत्र्यशाहीर कुंजविहारींच्या ‘आहुती’ची कथा – ज शा देशपांडे
०९ डिसेंबर २०१५ :- (४) ‘त्या’ ग्रंथराजाची जन्मकथा – पु रा बेहेरे
०३ जानेवारी २०१६ :- () सूर्यास्त : आचार्य अत्रे – ह वि मोटे
२३ सप्टेंबर २०१६ :- () “सात लाखातील एक”  या कादंबरीची कहाणी  – मामा वरेरकर
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

 प्रिय वाचक, 

आज या अंकाबरोबर  ‘मैत्री’ अनुदिनीच्या भरगच्च दीपावली २०१८ विशेषांकाचा समारोप होत आहे. त्याचा घेतलेला आढावा. :-
(०१) केदार आणि नारायण :- कै. चंद्रकांत वर्तक [३१ ऑक्टोबर ]
(०२) आणि त्याचा (गणितातील) खेळ संपला :- पुष्पा शंकर अभ्यंकर [०२ नोव्हें. ]
(०३) अगा जे जाहलेचि नाही :- मुकुंद नवरे यांची कथाचतुष्टयी [०३, ०९, १६, २३ नोव्हें. ]
(०४) माझी लेखिका मैत्रीण :- डॉ. प्रियंवदा कोल्हटकर [०५ नोव्हें.]
(०५) ऐसपैस (३३): तो कोण होता ? – हर्षद सरपोतदार [०६ नोव्हें.]
(०६) प्रतिभेचा शाप :- अनु. सौ. स्वाती वर्तक [०७ नोव्हें.]
(०७) गवारीची भाजी :- सतीश इंगळे [०८ नोव्हें.]
(०८) सत्ता आणि स्त्रिया :- हर्षद सरपोतदार [१० नोव्हें.]
(०९) इंद्रायणी काठी काही क्षण :-  ‘पालवी’ या मालिकेत कै. लक्ष्मण लोंढे [१२ नोव्हें.]
(१०) नियती :- सौ. स्वाती वर्तक [१४ नोव्हें.]
(११) नेमाडे : एक सोक्षमोक्ष :- हर्षद सरपोतदार  [१८ नोव्हें.]
(१२) अंगण, पेंटर जोशी :- ‘सहज सांगावंसं वाटलं’ या मालिकेत प्रकाश पेठे [१९ व २७ नोव्हें.], चुटपुट – प्रकाश पेठे [ ९ नोव्हें.]
(१३) भिकारी :- अनु. मुकुंद कर्णिक [२१ नोव्हें.]
(१४) फिज्जेरल्ड आणि ‘रुबाईयात’ :- कै. प्रा. माधव मनोहर [२५ नोव्हें.], रुबाईयात – अनु. मुकुंद कर्णिक [ ६१ ते ६५ – १० नोव्हें, ६६ ते ७३ – २५ नोव्हें ]
(१५) माझी जन्मठेप – ‘पुस्तकाची कुळकथा’ या मालिकेत कै. वि दा सावरकर [ २९ नोव्हें.] 
(१६) मैफल कवितांची :- झोपा – अमितेय, देव – शरदचंद्र करकरे [४ नोव्हें. ], कवितात्रयी :- मुकुंद कर्णिक [ ७, १४ व १९ नोव्हें. ], शुभकामनाएँ – अनु. सौ. स्वाती वर्तक [१२ नोव्हें. ] तसेच सौ. स्वाती वर्तक यांच्या कविता : सार्थक दिवाळी [३ नोव्हे.], स्पर्श [८ नोव्हें.], कै. सचित वाघ यांची विडंबन गीते [ ४ व २३ नोव्हें.], आजची कविता (१५) : केशव साठये, आजची कविता (१४, १६ व १७) : अमितेय
(१७) अंगण :- मेघा कुलकर्णी [१६ नोव्हें.]
(१८) अशा गोष्टी अशा गंमती :- कै. शं. ना. नवरे  [०२, ०५, १०, १८ व २१ नोव्हें.]
(१९) ऑलिम्पिकची नवलकथा, पाखरे भिरभिरती अंबरी  :- कै. भानू शिरधनकर यांच्या २ पुस्तकातील काही भाग [०६, ०८, १२, १८, २३ व २७ नोव्हें.]
(२०) थोडी मेंदूची मशागत, वाढवा तुमचा शब्दसंग्रह : घोडा :- प्रेषक सलील कुलकर्णी  [०३, ०७ नोव्हें.]
(२१) कारण की :- अज्ञात व राम भट [१९ व २१ नोव्हें.]
(२२) याशिवाय  ‘राग- अनुराग’ (१५, १६) : केशव साठये, ‘संस्कारकथा’ (१२) : सौ. मीरा राईलकर, संस्कृत आणि तंबाखू : प्रा. मनोहर रा. राईलकर, सात रुपयांची गोष्ट : अनामिक, शंभरीच्या उंबरठ्यावर.   

तर कसा वाटला ‘मैत्री’चा यंदाचा दिवाळी अंक? मनमोकळा अभिप्राय नोंदवा. लेखकांनी इतरांच्या लेखांवरही आपली प्रतिक्रिया निःसंकोच द्यावी. आमचं मागणं लई नाही !

या अंकासाठी ज्यांनी दर्जेदार ललित आणि वैचारिक साहित्य आस्थेने पुरविले त्या सर्व लेखक, कवी – कवयित्री, चित्रकार यांचे मनःपूर्वक आभार. आलेले सारे साहित्य कालमर्यादेमुळे या महिन्यात प्रकाशित करू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व. ते यथावकाश प्रसिद्ध होईल.
आपले,
– ‘मैत्री’चे संपादक मंडळ.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आजची कविता 

अमितेय 
 
१७. 
आलबेल 
रोज सूर्य उगवत आहे
ठरल्यावेळी मावळत आहे
यात खंड पडत नाही
वेगळं काही घडत नाही
सर्व सुरळीत चालू आहे

सगळं काही आलबेल आहे !

काही लोक सुखी आहेत
काही दुःख भोगत आहेत
काही मजा मारत आहेत
काही त्याग करत आहेत
दंगेधोपे चालू नव्हते
असे दिवस आले नव्हते
यात विशेष काय आहे ?

सगळं काही आलबेल आहे !

पिढ्यांत दरी पडत आहे
मागची बरी ठरत आहे
जुने दिवस, जुन्या व्यक्ती
चांगले म्हणा, का ही सक्ती ?
पुढल्या पिढीत अर्थ नाही
हेही फारसं खरं नाही
हाही वाद जुनाच आहे

सगळं काही आलबेल आहे

मनू किंवा गौतम बुद्ध
महमद किंवा येशू ख्रिस्त
नेमनियम ठरवून गेले
काही बदल सांगून गेले
एवढा आटापिटा करून शेवटी
माणूस बदलू शकले नाहीत
तोही होता तसाच आहे

सगळं काही आलबेल आहे

जिथे रावण उगवत आहेत
तिथे राम जन्मत आहेत
जे जे हिटलर पेटत आहेत
त्यांना चर्चिल भेटत आहेत
चांगल्यालाही मरण नाही
काळजीचं कारण नाही
कालचक्राचा खेळ आहे

सगळं काही आलबेल आहे

अमितेय
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

 

नोंदवही 

शंभरीच्या उंबरठ्यावर 

Dr.B.D. Tilak

डॉ. बाळ दत्तात्रेय टिळक, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मराठी रसायनशास्त्रज्ञ
जन्म : २६ सप्टेंबर १९१८, कारंजा, वर्धा, मृत्यू : २५ मे १९९९
@

Aleksandr Solzhenitsyn

अलिकसांद्र सोल्झेनित्सिन, नोबेल विजेते रशियन साहित्यिक
जन्म : ११ डिसेंबर १९१८, कॉस्कोव्होडस्क, रशिया, मृत्यू : ३ ऑगस्ट २००८
@

Helmut Schmidt

हेल्मुट श्मिट, चॅन्सलर, जर्मनी
जन्म : २३ डिसेंबर १९१८, हँबर्ग, जर्मनी, मृत्यू : १० नोव्हेंबर २०१५
@

B.K.S. Iyengar

  

बी. के. एस. अय्यंगार, आंतरराष्ट्रीय योगाचार्य
जन्म : १४ डिसेंबर १९१८, बेलूप, कोलार, कर्नाटक, मृत्यू : २० ऑगस्ट २०१४, पुणे
@

Kurt Waldheim

कर्ट वाल्डहाइम, ऑस्ट्रेलियाचे राष्ट्राध्यक्ष
जन्म : २१ डिसेंबर १९१८, सांक्त, आंद्राबार्डेन, मृत्यू : १४ जून २००७
@@@
( ‘शब्द दर्वळ‘ वार्षिक २०१७ वरून साभार )
छायाचित्रे : विकिपिडियावरून साभार
प्रेषक : अनामिक 

      

 

15 thoughts on “माझी जन्मठेप

  1. “माझी जन्मठेप” या पुस्तकाविषयीची अतिरिक्त माहिती पुस्तकाच्या कूळकथेत वाचली. ती सावरकरांच्या एकंदर संघर्षमय जीवनाला साजेशीच आहे. अमितेय यांची कविता “सगळं काही आलबेल आहे” जगाकडे पाहण्याचा एक नवा आणि तटस्थ दृष्टीकोण दाखवते. जगात एवढी उलथापालथ होत असतानाही स्थितप्रज्ञासारखे किंवा साक्षीभावाने राहायचे? का आपल्या दृष्टीने जे चुकीचे किंवा वाईट आहे ते थांबवण्यासाठी आपल्या कक्षेत येणारे (आणि कधी कधी कक्षेबाहेर जाऊनही) प्रयत्न करायचे? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जरी इतिहासातील इतक्या संतमहात्म्यांच्या बोधामृताने सर्व समाज सन्मार्गाला लागला नाही, तरी त्यांनी मात्र त्यांचे कर्तव्य म्हणूनच किंवा ईश्वरी आदेशाचे पालन म्हणून, आपले प्रयास श्रद्धेने, प्रामाणिकपणे चालूच ठेवले, हे लक्षात घ्यायला हवे. कवीला कदाचित काही वेगळे सांगायचे असावे. ते कदाचित बरोबरही असेल, परंतु वैयक्तिक पातळीवर मी “काही तरी धडपड करत रहावी” अशा मताचा आहे.
    एकंदर दिवाळी अंक वाचून समाधान वाटले. प्रत्येक वेळी प्रतिक्रिया दिली नाही तर काय बिघडते? वर्डप्रेसवर लाईक किंवा तशीच काही सोय असती तर बरे झाले असते असे वाटते. “प्रसिद्ध झालेला मजकूर मी वाचला आहे”, हे संपादकांपर्यंत किंवा लेखकापर्यंत पोहोचवण्याचा काही सोपा मार्ग असला पाहिजे. त्यांनीही “जितके लोक वाचतात त्याच्या दहा टक्के प्रतिक्रिया देतात”, हा ढोबळ हिशोब मनात ठेवावा व प्रतिक्रिया नसल्या म्हणजे कोणी वाचतच नाही असा टोकाचा समज करून घेऊ नये ही विनंती.

    • वर्डप्रेसवर “लाइक” ही सोय आहे हे अनेकांना माहीत नसते. आपण जिथे अभिप्राय नोंदवता त्याच्या थोडे वर डाव्या बाजूला SHARE THIS : असे लिहिलेले आढळेल. त्याच्या खाली Press this, Twitter, Facebook असे आहे त्याच्या खाली *Like हे आहे. आजच एका नवीन वाचकाने लाइक केलेले असून त्याचे छायाचित्र आले आहे. यानंतर या सोयीचा उपयोग करावा. -सं.

  2. या दिवाळीत संपादकांनी ३० ते ४० लहानमोठे लेख व कविता सादर केल्या आहेत. त्यासाठी त्यांना किती कष्ट करावे लागले असतील याची मी कल्पना करू शकतो. खरोखरच अभिनंदनीय काम आहे.
    अमितेय यांची कविता दिलासादायक वाटली. आपल्या क्षुद्र आयुष्यात उठसूठ प्रत्येक गोष्टीचा बाऊ करण्याची आपल्याला सवय लागलेली असते व त्यातच आपलं सामर्थ्य संपून जात असतं. तेव्हा असल्या गोष्टींकडे लक्ष न देता तुम्ही तुमचं कर्तव्य करत रहा असं कवीला सुचवायचं असावं.

  3. आजतागायतचा दिवाळी अंक किती विविध प्रकारच्या साहित्यानी भरगच्च होता, हे संपादकांनी घेतलेल्या आढाव्यातून दृग्गोचर होते. आम्ही आपले रोज वाचत जात होतो परंतु किती भरपूर वाचले ते आज लक्षात आले. धन्यवाद मंगेशराव. या अंकासाठी तुम्ही घेतलेले अपार कष्ट हर्षदजी म्हणतात त्याप्रमाणे अभिनंदन करण्यासारखे आहेच. जुनेपाने लेख शोधून काढून पुन्हा एकट्याने टंकित करायचे हे काम येरागबाळ्याचे नोहे. आपण तुम्ही शिवधनुष्य उचलले आणि न मोडता पेललेही आहे ! त्रिवार कुर्निसात !

  4. माझी जन्मठेप या पुस्तकाबद्दल खूप नवी माहिती मिळाली. धन्यवाद
    आजची कविता प्रत्येक परिस्थितीत ऑल वेल आहे ,आपण तसे समजून घ्यावे असे सांगणारी वाटते, छान आहे.
    नोंद वहीत नवीन नावे कळलीत आभार
    दिवाळी अंकासाठी संपादक जींनी जे कष्ट घेतले आहेत त्याला तोड नाही. जवळ जवळ महिनाभर सातत्याने कार्यरत राहणे सोपे नाही . अंक छान होते धन्यवाद

  5. माझी जन्मठेप या पुस्तकाचा इतिहास सावरकरांच्या व इतरांच्या भाषेत मांडलेला जुन्या अंकांमधून शोधून, स्वतः टंकून नाबरजींनी प्रसिद्ध केल्याबद्दल त्यांचे आभार.
    या वर्षीचाही दिवाळी अंक किती समृद्ध होता ते संपूर्ण यादी बघितल्यावर लक्षात आले. सुंदर ललनांच्या चित्रांच्या गुळगुळीत मुखपृष्ठांच्या सह कितीतरी अंक या महिन्यात प्रसिद्ध झाले. फार गाजला तो झी मराठीचा दिवाळी अंक. ते अजून वाचले नाहीत. परंतु आपला मैत्रीचा अंक पहिला व दर्जेदार आहे यात शंका नाही.
    आलबेल कविता वाचून रॉबर्ट ब्राउनिंग यांच्या all is well in the world या कवितेची आठवण झाली. अमितेयजी गॉड इज इन द हेवन म्हणत नाहीत हाच काय तो फरक. छान कविता आहे.
    नोंदवही ठीक. जन्म-मृत्यूचीही त्यात नोंद केलेली आहे हे बरे झाले.
    नाबरजींचे पुन्हा आभार.

    • अमितेय यांनी कळवले आहे :-

      प्रियंवदाताईंनी रॉबर्ट ब्राउनिंग याचे काव्य दिले आहे ते All is right in the world असे आहे. All is well असे नाही. ते पिप्पा पासेस या पद्य नाटिकेतील असून वेगळ्या संदर्भात आहे हे शोधल्यावर समजले. त्यांच्यामुळे कळल्याबद्दल त्यांचे आभार.

  6. आज मैत्रीचा दिवाळी अंक समाप्त झाला. या सबंध महिन्यात या अंकाच्या निमित्ताने जो वाचनानंद मिळाला तो अवर्णनीय आहे. किती लेखकांचे साहित्य वेचून संपादक मंडळाने आमच्या समोर आणले ! एकेका लेखकांचे एक नव्हे दोन नव्हे तीन लेख / कविता असे मिळवणे ही साधी बाब नाही. बरे, हे सारे साहित्य उत्तम आणि दर्जेदार आहे. मैत्री हा प्लॅटफॉर्म असाच बहरता ठेवण्यात संपादक मंडळ आणि हे सर्व लेखक- चित्रकार यांना श्रेय दिलेच पाहिजे.

  7. माझी जन्मठेप हे वीर सावरकरांचे आत्मचरित्र कसे प्रकाशात आले आणि त्यावर त्या त्या काळातल्या सरकारांनी काय अकारण अन्याय केला याची शहारून जावे अशी कहाणी वाचली. मनःपूर्वक धन्यवाद.
    आजची कविता आणि शंभरीच्या मानक-यांची नावे हेही आवडले.
    मैत्रीच्या दिवाळी अंकाचा दर्जा निःसंशय वरच्या पातळीचा आहे पण त्यातील लेखांना किती प्रतिसाद मिळाला ? अजूनही लेखक मंडळी आपल्या लेखाभोवती घोटाळत आहेत. आज मी त्यांची नावे जी लिहीत आहे ती कृपया गाळू नये. प्रा. राईलकर सर, श्रीमती स्वाती लोंढे, डॉ. शरद जोगळेकर ही प्रमुख नावे जे क्वचित अभिप्राय देतात. राईलकर सरांची, त्यांना दिसत नाही ही, तक्रार मला पटत नाही. असे असेल तर ते लांबलचक लेख कसे टंकतात ? शिवाय त्यांना त्यांच्या लेखांवर आलेले अभिप्राय कसे दिसतात ? डॉ जोगळेकर यांनी मुंबईवरील कविता आणि वैज्ञानिक लेख जेव्हा लिहिले तेव्हा ते ज्या उत्साहाने प्रतिक्रिया लिहीत होते ते आता कुठे गायब झाले ? तरी या लेखकांना पुनःपुन्हा आवाहन करूनही ते आपल्याच लेखांच्या वर्तुळात राहू इच्छितात त्यांचा मी निषेध करत आहे.

  8. आज मैत्रीच्या दिवाळी अंकाविषयी निरनिराळ्या वाचकांचे निरनिराळ्या दृष्टिकोनांतून लिहिलेले अभिप्राय वाचायला मिळाले आणि एक समाधान लाभलं. प्रत्येकाची भाषा वेगळी असली तरी मुद्दा एकच होता आणि तो म्हणजे आपल्या संपादकांचं कौतुक. ते वाचून त्यांनी घेतलेल्या अपार कष्टांचं चीज झालं असंच त्यांना वाटलं असणार. मी स्वतः अशीच एक संपादक असल्यामुळे एका दिवाळी अंकाच्या निर्मितीमागे केवढी प्रचंड मेहनत असते याची मला पूर्ण कल्पना आहे. त्या अंदाजाने आपल्या संपादकांचं आणि त्यांना मार्गदर्शन तसंच मदत करणाऱ्या संपादकमंडळाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. हा दिवाळी अंक खरोखर ‘ उत्कृष्ट ‘ निघाला आहे. याचे लेखक-कवी-चित्रकार-अनुवादक आणि इतर सर्व संबंधित मित्र यांचं मनःपूर्वक अभिनंदन!

    मृदुला जोशी

  9. मैत्री अनुदिनीच्या २०१८ च्या दिवाळी अंकाचा समारोप करताना संपादकांनी या संपूर्ण अंकाच्या साहित्याचा जो आढावा थोडक्यात सादर केला त्यावरून काही विचार मनात आले ते संक्षेपाने व्यक्त करत आहे.

    (१) या अंकात काही लेखकांनी कथालेखन, अनुवाद, वैचारिक लेखन, ललितलेखन, समीक्षा आणि कविता या प्रांतात आपले कौशल्य सिद्ध केले :- सौ. स्वाती वर्तक, मुकुंद कर्णिक, प्रकाश पेठे आणि हर्षद सरपोतदार
    (२) मुकुंद नवरे यांनी ज्या चार कथा लिहिल्या त्यांचे मूळ आजच्या बदलत्या समाजजीवनात आहे आणि त्यावरून त्यांनी कथा रचल्या याचे कौतुक वाटले.
    (३) डॉ. प्रियंवदा कोल्हटकर यांनी करून दिलेल्या पुस्तक परिचयातून एका मनस्वी पण मागे पडलेल्या सुशिक्षित स्त्रीचे चरित्र त्यांनी उलगडले.
    (४) मुकुंद कर्णिक हे ज्या रुबाईयातचा अनुवाद सादर करत आहेत त्यांचे मूळ कै माधव मनोहरांच्या एका संशोधनपर लेखातून स्पष्ट झाले याचे श्रेय संपादकांच्या शोधक वृत्तीला दिले पाहिजे. याचा अर्थ ते आलेले साहित्य नुसते प्रकाशित करत नसून त्याचा मागोवा घेतात आणि तो आमच्यापर्यंत पोचवता. असेच कै. भानू शिरधनकर यांचे विस्मृतीत गेलेले साहित्य आपण पुनःप्रसिद्ध करून त्यांच्या स्मृतीला जणू उजाळा दिलात.
    (५) श्रीराम अभ्यंकर यांच्यावरील लेख मात्र निव्वळ कौटुंबिक स्वरूपाचा होता असे खेदाने म्हणावेसे वाटते. या कुटुंबातील व्यक्ती जर अभ्यंकरांवर हे लेख लिहून जर प्रसिद्ध करतात तर ते मैत्रीतील इतर साहित्यावर का अभिप्राय देत नाहीत किंवा त्यापलीकडे काही लिहीत नाहीत याचे आश्चर्य वाटले. म्हणजे हे लोक केवळ आपल्या लेखनापुरते मैत्री अनुदिनीकडे वळतात की काय ? प्रा. राईलकर, डॉ. शरद जोगळेकर, स्वाती लोंढे आणि काही प्रमाणात केशव साठये, शरद करकरे इत्यादी लेखककवी मंडळी याच वृत्त्तीतील आहेत मग यांचे साहित्य का प्रसिद्ध करावे असा प्रश्न मला संपादक मंडळाला विचारावासा वाटतो. आपण अनेक वाचकांना या अनुदिनीचे निवेदन पाठवता मग हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या प्रतिक्रिया का येतात ? जे वाचक – लेखक अभिप्राय देत नाहीत तसेच काही ना काही अडचणींचा पाढा वाचतात त्यांना हे निवेदन पाठवू नये असे मी म्हटले तर त्यात काय हरकत आहे ?
    (६) शेवटी एक त्रुटी जाणवली. आपण यापूर्वी आईमुलांचे पान या सदरांत बालसाहित्य सादर केले होते. ते हल्ली का येत नाही ? त्याचा एक अंश म्हणून काही या दिवाळी अंकात यायला हवे होते.

    काहीही असो, यंदाच्या दिवाळी अंकाने आमच्या फुरसतीच्या वेळात मोलाची भर टाकली. तेवढा वेळ मी तरी दूरचित्रवाणीच्या भाकड व भोंगळ प्रक्षेपणापासून दूर राहण्यात यश मिळवले.

    • दिवाळी अंकाच्या आढाव्यानिमित्ताने आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
      लेखक मंडळींच्या न येणा-या प्रतिक्रियांवर आपण सातत्याने लिहिता की त्यामुळे काही परिणाम होईल आणि लेखकांच्या प्रतिक्रिया येतील या समजुतीत आम्ही नसलो तरी थोडी थोडी सुधारणा होते आहे. ‘मैत्री’ हे लेखक-वाचक यांचे संयुक्त व्यासपीठ आहे – ते केवळ लेखकांचे लेखन प्रसिद्ध करणारे कोणतेही व्यावसायिक माध्यम नाही, हे किती वेळा सांगावे ?
      सं.

      • मैत्रीच्या दिवाळी अंकाची एकेक आकर्षणे नमूद करताना ज्या अनामिक चित्रकाराने अंकासाठी जे मुखपृष्ठ रेखाटले त्याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्याचे विस्मरण झालेले दिसले म्हणून हे विपत्र. इतर सर्व वाचकांनी या अंकाचा आस्वाद घेऊन आपापले मत सादर केले त्याच्याशी आणि संपादकांच्या एकूण कर्तबगारीविषयी मी सहमत आहे. यापुढे असेच अंक प्रसिद्ध व्हावेत ही सदिच्छा.

  10. नमस्कार या मैत्री दिवाळी अंकाने मला अनेक लेखकांची / कवींची ओळख करून दिली त्याबद्दल शतशः धन्यवाद.
    एक वाचक म्हणून आपण इथे प्रतिक्रिया देऊ शकतो ही पध्दत मनापासून आवडली. आजही पुस्तकाची कुळकथा सावरकरांविषयी वेगळीच माहिती देऊन गेली. आलबेल ही अमितेय यांची कविता आजूबाजूस आज जे समाजांत पाहतो आहोत त्याची सकारात्मक बाजू कवींनी दाखवली आहे. नोंदवही ही संकल्पना आवडली , माहिती उत्कृष्ट.

  11. ‘मैत्री’ अनुदिनीच्या दिवाळी अंकाचा आवाका किती मोठा होता ते या शेवटच्या भागात पाहिले आणि किती विविध विषयांना हात घालत अंक साकारला गेला याचे कौतुक वाटले. साधारणत: दिवाळी अंकाची जाहिरात पाहून किंवा अनुक्रमणिका वाचून दिवाळी अंक वाचायला घेतला जातो. पण संपादक मंगेशराव यांनी जाहिरात केली नाही की अनुक्रमणिकाही सुरूवातीला दिली नाही आणि आता सर्व वाचन पूर्ण झाल्यावर आपल्याला काय मिळाले ते वाचकाला कळत आहे. केवळ या एका निकषावरही मंगेशराव इतर सर्वांपेक्षा वेगळे उठून दिसतात. अंकावर वेळोवेळी प्रतिक्रिया आल्याच आहेत आणि समग्र विचार करता संपादक मंडळाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे यात शंका नाही.

यावर आपले मत नोंदवा