अगा जे जाहलेचि नाही…

कथाचतुष्टयी (३)  
 
दीपावली २०१८ विशेष  
 
मुकुंद नवरे

 

या मालिकेतील यापूर्वीच्या दोन कथा दि. ३ आणि ९ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध झाल्या आहेत. आज तिसरी कथा. 

कथा तिसरी 

उज्वला 

     उज्वलाचा जन्म झाला तेव्हाच तिला डॉक्टर करण्याचं अरविंद अाणि शोभानं ठरवलं होतं.  तीही लहानपणापासून अतिशय हुशार होती. अभ्यास आणि खेळ या दोहोत कायम चमकत होती. उज्वलाच्या पाठीवर चार वर्षांनी केतकी आणि नंतर दोन वर्षांनी वैभवचा जन्म झाला. या तिन्ही मुलांना मोठं करण्यात अरविंद आणि शोभानं कुठलीच कसर ठेवली नाही. मुलं लाडात वाढली पण फाजील लाड असे कुणाचेच झाले नाहीत. आई-बाबा दोघेही नोकरी करत असल्यानं मुलांपुढे त्यांचा आदर्श होता. शिवाय लहानपणापासून तिघांना आजी-आजोबांचा सहवास मिळत होता, तिथेही लाड म्हणजे फक्त खायचे प्यायचे अशीच व्याख्या होती. मोठे काका आणि काकू यांचं प्रेमही मुलांना मिळत होतं.

     अशीच वर्षं भराभर सरकत गेली. उज्वलानं वैद्यकीय-प्रवेश परीक्षेत उत्तम गुण मिळवले आणि तिला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. अरविंद आणि शोभानं पाहिलेलं एक स्वप्न आता खचितच पूर्ण होणार होतं. उज्वलानं मन लावून अभ्यास केला आणि प्रत्येक परीक्षेत ती प्रावीण्य मिळवत गेली.

     केतकीला अभियांत्रिकी शाखेत जायचं होतं. तिलाही प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळाले आणि देणगी न देता सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तिच्या मागे वैभव शाळेत दहाव्या वर्गात होता.

     वैद्यकीय महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला येईपर्यंत अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या जोड्या पडून जातात. हे आता इतकं सर्वमान्य झालं आहे की तसं झालं नाही तरच लोकांना आश्चर्य वाटतं. पण कधी कधी संबंध जुळतातच असंही होत नाही. उज्वलाच्या बाबतीत असंच झालं. शेवटच्या वर्षात असताना तिला विपुलनं चक्क मागणीच घातली. तो तिच्याच वर्गात होता आणि पुढे शल्यचिकित्सा विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण घेणार होता. उज्वलाचा कल गायनेकॉलाजीकडे असल्यानं तिची साथ मिळून आपण पुढे अधिक यशस्वी होऊ असा त्याचा विचार असावा.

     उज्वलानं हा विषय घरी सर्वांसमोर मांडला. कारण तिला घरच्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय काहीच करायचं नव्हतं.

     यावर घरी संमिश्र प्रतिक्रिया उमटली.

     ” बघ गं बाई, संसार तुला करायचाय. ते ठरले हिंदी भाषी लोक.” शोभा म्हणाली.

     ” माझी हरकत नाही. पण पुढे पश्चात्ताप वाटायला नको. ” अरविंद सावधपणे म्हणाला.

     उज्वलानं काकांना विचारलं. एरवी काका पुरोगामी विचारांचे पण आता काय बोलतील इकडे सर्वांचं लक्ष लागलं.

     ” तशी माझी काही हरकत नाही. पण बेटा, तुला तडजोड करून रहावं लागेल. त्या लोकात घरी मोठ्यांसमोर हातभर घूॅंघट घ्यावा लागतो. बघ तू कसं वातावरण आहे त्यांच्याकडे.” ते म्हणाले.

     उज्वला विचारात पडली. शेवटी तिच्या मनानं कौल दिला, नकोच असली काही शक्यता.

     तिनं त्याप्रमाणे विपुलला नकार दिला. त्यानंही तो खिलाडू वृत्तीनं स्वीकारला.

     एक वर्ष पुढे सरकलं आणि उज्वला डॉक्टर झाली. त्या दिवशी अरविंद आणि शोभाचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं. उज्वलाची आता इंटर्नशिप सुरू झाली. तिथे स्टायपेंड मिळू लागला त्यामुळे एक त-हेचं आर्थिक स्वातंत्र्य मिळालं. इकडे केतकी आणि वैभवचं शिक्षण सुरूच होतं. तो आता कनिष्ट महाविद्यालयात होता.

     इंटर्नशिप सुरू असतानाच  उज्वलाचं लग्न ठरवावं असं अरविंदला वाटू लागलं. योगायोग असा की, ती जिथे इंटर्नशिप करत होती त्याच हॉस्पिटलमधे काम करणा-या डॉ. अरूणकडून तिला प्रतिसाद आला. तिच्याहून तो दोन वर्षांनी मोठा होता आणि दोघांची जोडी अनुरूप होती. त्याला प्रत्यक्ष भेटल्यावर अरविंद आणि शोभाला खूप आनंद झाला. घरची मंडळी सुशिक्षित पण त्याच वेळी आपल्या परंपरा पाळणारी होती. एकंदरीत खोट काढण्यासारखं काहीच नव्हतं त्यामुळे सर्वांशी विचारविनिमय करून अरविंदनं अरूणच्या घरी जाऊन रीतसर हा विवाह व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. त्याही मंडळींनी दोन दिवसात होकार  कळवला आणि लगेचच एका शुभमुहूर्तावर साक्षगंधाचा कार्यक्रम पार पडला. अरूण आणि उज्वलाचा विवाह होणार हे नक्की झालं. अरविंद आणि शोभासाठी तो महत्वाचा दिवस होता.

     असं सगळं काही मनासारखं होत असताना एक दिवस नियतीचा जबरदस्त फटका या कुटुंबाला बसला. अरविंद आणि शोभा स्कूटरवरून जात असताना एका वाहनाने त्यांना जोरदार धक्का दिल्याने ते फेकले गेले ! हॉस्पिटलमध्ये त्यांना नेईपर्यंत दोघांनीही प्राण सोडले. त्या क्षणी सगळं होत्याचं नव्हतं झालं. उज्वला, केतकी, वैभव, काका-काकू सगळे त्या हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत ते थांबले नाहीत. सर्वांवर दु:खाचा डोंगर कोसळला. उज्वलाच्या आजी-आजोबांना हॉस्पिटलमध्ये आणण्याची हिंमत कुणाला झाली नाही. काकांनी पुढाकार घेतला, काकूंनी सर्व मुलांना पोटाशी धरलं म्हणून सगळे या प्रसंगातून बाहेर पडू शकले.

त्या रात्री आजी-आजोबांच्या कुशीत शिरून उज्वलानं भरपूर रडून घेतलं आणि घडलेला प्रसंग तिनं पचवला. आता ती आपल्या लहान भावंडांची आक्का झाली होती.

आजी-आजोबांसह तिन्ही भावंडं एकत्र राहू लागली. काका-काकूंचं घर थोडंसंच दूर होतं पण त्यांचाही मोठा आधार होता. उज्वलाला आई-बाबांच्या विम्याचे पैसे मिळाले. त्यांच्या ऑफिसकडून भविष्य निर्वाह वगैरेच्या रक्कमा मिळाल्या. पण सगळं मिळूनही  गेलेली माणसं परत येत नाहीत हे सत्य उज्वलानं पचवलं. केतकी आणि वैभव एकदमच प्रौढ होऊन गेले.

     पण आणखी एक धक्का अजून बसायचा होता. एक दिवस अरूणच्या घरून आता लग्न होऊ शकणार नाही असा निरोप आला ! ते कळल्यावर उज्वला तर सैरभैर झाली. काका लगेच त्या मंडळींना भेटायला गेले. त्यांनी लग्न मोडण्याचं कारण विचारलं. पण त्या लोकांनी काहीही बोलण्याचं नाकारलं. ‘हे सगळं प्रकरण इथेच संपलं समजा’ म्हणत राहिले. शेवटी काका हताश होऊन परत आले. त्यांनी घरी येऊन झालेलं बोलणं आजी-आजोबांना सांगितलं तेव्हा उज्वला संतप्त होऊन गेली. पण आजोबांचं मत पडलं की झालं ते योग्यच झालं, यामुळे वेळीच त्या लोकांची मानसिकता तर कळली. त्यामुळे वाईट वगैरे वाटून घ्यायचं कारण नाही. ते अनुभवाचे बोल उज्वलाला धडा शिकवून गेले. ती सावरली.

* * * * *

      आणि एक दिवस आनंदाचा उगवला. काकांचा फोन आला आणि त्यामागोमाग ते स्वत: काकूसह येऊन हजर झाले. त्यानंतर थोड्याच वेळात विपुल अग्रवाल आणि त्याचे आई-वडील येऊन उज्वलाच्या आजी-आजोबांना भेटले. घरी उज्वला होतीच. मोठ्यांच्या पाया पडून अग्रवालांनी विपुलसाठी सरळ उज्वलाला मागणी घातली.

      ” आम्ही हिला सून म्हणून स्वीकारायला तयार आहोत. ” ते म्हणाले.

     हे ऐकून आजी-आजोबांच्या डोळ्यांना धारा लागल्या. हे असं कधी होईल याची त्यांनी अपेक्षा केली नव्हती. उज्वलाला गहिवरून आलं. काही वेळ सगळीच मंडळी भारावून गेली. मग काकूनं आत जाऊन साखरेचा डबा आणला.

       अग्रवाल मंडळी पण होकार मिळेल या खात्रीनं आली असावीत. त्यांनीही सोबत आणलेल्या मिठाईचा डबा उघडला.

मुकुंद नवरे
mnaware@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

आजची कविता 

अमितेय 

१५. 

हे दुष्ट जग ! 

गडे खिडकीमधुन

नको बाहेर डोकावू

कुणी पाहील हळूच

दृष्ट लावून जाईल

नको हवेत मोकळ्या

पहाटेची उभी राहू

थंडी बोचरी बोचेल

अंग अंग शहारेल

फूलपरडी घेऊन

बागेमध्ये नको फिरू

भुंगे लोचट, तुझ्या गं

अंगचटीला येतील

दाराबाहेर दुपारी

उन्हाची तू नको येऊ

धग सूर्याची निष्ठूर

लाल लाल गं होशील

अनवाणी एकट्याने

नको रानोमाळ हिंडू

वाटेमध्ये काटा दुष्ट

पाऊल दुखेल

नदीकिनारी उगीच

नको फार दूर जाऊ

निलाजरा असे वारा

केस विसकटतील

गारा वेचायाला राणी

अंगणात नको जाऊ

शिष्ट पावसाच्या धारा

ओलीचिंब गं होशील

चांदण्यात गच्चीवर

नको आकाशात पाहू

चंद्र चोरटी नजर

तुला लावून धरील

अंधारात दिव्याविना

नको फाटकात दिसू

मत्सरी गं रात

तुला झाकून टाकील

दुष्ट वाईट्ट हे जग

तुला टपले छळाया

बैस माझ्यापाशी, ऐक-

गाणी- गझला- रुबाया…

अमितेय 

*********************************************************

लक्षणीय 
अंगण
मेघा कुलकर्णी   

दीपोत्सवात होणारी कार्तिक मासाची सुरुवात एक वेगळा आनंद निर्माण करते. वारकरी संप्रदायाच्या परंपरेत आषाढ ते कार्तिक या चातुर्मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही वृक्षस्वरूप असली तरी घरीदारी तिचे नित्य प्रभातीपूजन तसेच सायंकाळी तिच्यासमोर लावला जाणारा दीप हे भारतीय संस्कृतीचे आद्य प्रतीक आहे. निर्मळपणाचे द्योतक आहे. आषाढवारीत हीच तुळस, वारकरी शिरी स्थानापन्न झालेली पहावयास मिळते. यांवरूनच वारकरी संप्रदायातले तुळशीचे महत्त्व दिसून येते.

महाराष्ट्रीय संस्कृतीत कार्तिक मासांतला तुळशीविवाह हा सोहळा तीन दिवसांचा साजरा करण्यात येतो. याची सुरुवात कार्तिक द्वादशी या दिवसापासून होते. या आनंदसोहळ्याचे अजून एक विशेष खास महत्त्व हे की या सणानंतर लग्नसराई सुरू होते. साखरपुडा करून ठरलेल्या नात्यांना नवआयुष्य सुरू करण्याची, मंगलकार्याची ओढ निर्माण होते. या सोहळ्यात भगवान श्रीकृष्ण वर स्वरूपात तर तुळशीने वधूरूप धारण केलेले असते. त्यात भर घालत असते, त्रिपुरारी पौर्णिमा. लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून टाकणारी. आश्विन महिन्यातले लक्ष्मीपूजन आणि त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्या संस्कृतीत खासच महत्त्व आहे.

“दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी” सायंप्रार्थनेतील ही उक्ती पूर्वापार आनंद देतेच आहे तसेच, आजच्या धकाधकीच्या जीवनातही मोलाची शिकवण देत आहे. आजही लहान गावांमध्ये अंगणात तुळशीकट्टा असतो. दिवा लावण्यासाठी चारी बाजूंना छोट्या दिवड्या असतात. संपूर्ण कार्तिक मास, घराचे मुख्य द्वार आकाशदिवे, पणत्यांनी प्रकाशित होत असतानाच अंगणातील तुळशीकट्टा रंगवण्याचे, उसाच्या पेरांनी सजवण्याचे  काम चालू होते. घरांतील वातावरण मंगलमय बनते. तुळशीविवाहादिवशी ‘राधा-दामोदर प्रसन्न’ ही अक्षरे लिहिली जातात. विवाहसमयी आवर्जून मंगलाष्टकंही गायली जातात. रेशीमगाठी जुळलेल्या वाग्दत्त वधू-वरांची रूपे या विवाहानिमित्ताने पाहिली जातात. विवाहकार्य संपन्न होताच फटाक्यांची आतषबाजी होते, प्रसाद वाटला जातो. आठ-पंधरा दिवस, महिन्यांनी सासरी जात असलेल्या लेकीकडे पहाताना “कन्या असे दुजांची” हेच माऊलीचे भरले डोळे सांगत असतात.

कवी ना. धों. महानोर यांच्या काव्यपंक्तीतून तुळशीचे आगळे महत्त्व प्रकट होते.

“रुक्मिणी हाटेल जाते तुळसिले खेटून
जरीचा पदर आल्या मंजुळा तुटून
रुक्मिणीले साडीचोळी, सत्यभामेला दोरवा
तुळसाबाईला थंड पाण्याचा गारवा
रुक्मिणीले साडी, सत्यभामेला पातळ
तुळसाबाईला पाणी गंगेचं नितळ”

(संदर्भ: पळसखेडची गाणी, १९८२. पृ.२३.)

@@@
मेघा कुलकर्णी
megha.kolatkar21@gmail.com

15 thoughts on “अगा जे जाहलेचि नाही…

  1. श्री मुकुंद नवरे यांची कथा घटना प्रधान आहे .अरविंद आणि शोभा यांना का मारलं . विपुल अग्रवाल अचानक पुन्हा मागणी घालतो तो हि आई वडिलांसह येऊन . त्यामुळे शेवट गोड होतो. आदर्श कुटुंबात असं होण्याची शक्यता दर्शवली आहे त्या बद्दल आक्षेप घेता येत नाही . मुलामुलींच्या संबंधात शरीर संबंध न घडवण्याची काळजी लेखकानं घेतली आहे तो लेखकाचा चांगुलपणा आहे . कारण आजच्या जगात वेगळं होतं . कविता आवडली .आणि अंगण हे स्फुट चांगलं आहे

  2. श्री नवरेजींची उज्ज्वला.. कथा बऱ्याच घटना आणि पुष्कळ मोठा काळ याने छान रंगली आहे .आवडली

    अमितेयजींची कविता आणि तिचे शीर्षक सहज जुन्या काळातील …देखा न करो तुम आईना…. चष्मेबददूर ..या गाण्याची आठवण करून देतात ..उत्तम जमली आहे

    तुळशीचे अनन्य साधारण महत्व सांगणारे लक्षणीय आवडले.

  3. मुकुंद नवरे यांच्या कथामालिका आजच्या गतिमान आणि सततच्या बदलत्या परिस्थितीचे भेदक चित्रण घडवत आहे. यात त्यांनी कोणत्याही स्वरूपाचा अतिरेक टाळलेला दिसतो. विवाह ही नेहमीच सर्व लोकांच्या कुतूहल खेचणारी घटना असते. म्हणूनच की काय आज दूरचित्रवाणीवरील बहुतांशी मालिका या विवाहाच्या घडामोडींवर रचलेल्या असतात आणि स्त्रीपुरुष रस घेऊन दिवसातून चार चार वेळा बघतात. पण नवरे मात्र घटनांवर आधारित कथानक रंगवून सांगतात. आता पुढची कथा म्हणजे अखेरची कोणती याची मला प्रतीक्षा आहे.

  4. नवरेजींच्या आधीच्या कथांमधे लग्न मोडणे होते तर आजच्या कथेत मात्र शेवटी लग्न जुळणे आहे. बरे वाटले.
    अमितेयजी प्रेयसीची फारच काळजी घेताहेत. शेवटची इच्छा छान,काव्यमय. अभिनंदन.
    लक्षणीय मात्र खास काही सांगत नाही. यापेक्षा वृंदेची गोष्ट सांगितली असती तर जास्त आवडलं असतं. असो.

  5. मुकुंदराव,
    कथा चांगली आहे परंतु वाचताना दीर्घ कालावधीतील घटना अगदी फास्ट फॉरवर्ड मध्ये घडवल्या आहेत असा ग्रह होतो. अरुणच्या घरच्यांनी ठरलेला विवाह मोडण्याचा निर्णय का घेतला ते न सांगणं आणि अग्रवालांनी अचानक ‘आम्ही हिला सून म्हणून स्वीकारायला तयार आहोत’ असं सांगणं हे कळायला जरा जड जातंय. स्वीकारायला तयार असणं म्हणजे ‘आधी न स्वीकारण्यासारखं काही होतं त्याच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही मनाचा मोठेपणा दाखवून स्वीकारायची तयारी दाखवत आहोत’ असा काही तरी अर्थ निघतो. उज्वलाच्या बाबतीत तसे काही असेल असे वाटत नाही. मग ही ‘तयारी दाखवणे’ का?

    • अजूनही मुलांकडच्या लोकांनी नकाराची कारणे न सांगणे अशा प्रकारचा उद्दामपणा मुलांच्या नातेवाईकांकडून होतच असतो हा लग्नाच्या बाजारातील व्यावहारिक अनुभव आहे, लेखकाने तो सरळपणे मांडला आहे इतकंच, त्यामुळे आपला आक्षेप लेखकाच्या लिहिण्याच्या प्रेरणेवर नको हे महत्वाचे.

  6. माझ्या कथेवर प्रतिक्रिया देणा-या सर्वांचा मी आभारी आहे. श्री. मुकुंदराव कर्णिक यांनी केलेले निरीक्षण योग्यच आहे. नायिकेला पहिल्या घरून नकार येणे हे शुभ अशुभाच्या ज्या कल्पना असतात त्यामुळे , परंतु हे समजणे वाचकांवर सोडले आहे . तसेच अमराठी कुटुंबाकडून रीतसर मागणी घातली जाते तेव्हा ‘ अपनाना चाहते है ‘ अशा त-हेच्या वाक्याचे भाषांतर म्हणून स्वीकार शब्द वापरला आहे , त्या लोकांचा स्वत:चा मोठेपणा वगैरे नाही एवढेच मी म्हणेन.

  7. कथालेखन, नि त्यापुढे जाऊन कादंबरी लेखन यात बुद्धीची, प्रेरणेची आणि प्रतिभेची कसोटी लागते, कथेचे तंत्र सांभाळताना कथावस्तूस धक्का न लागू देणे यात त्या लेखकाची वा लेखिकेची हातोटी महत्वाची.
    एखादा अभ्यासपूर्ण लेख, माहितीचे वैविध्यपूर्ण संकलन, टीका, समीक्षण यात बुद्धीची चमक तर दिसतेच पण या गोष्टी प्रयत्नसाध्य देखील आहेत, मात्र कथा, कविता, नाटक आणि चित्र या कला केवळ प्रतिभेच्या वरदान ठरतात. त्यातून नाटक, कथा यातला साहित्यिक व्यवहार सांभाळणारा साहित्यिक पुढे कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न करू शकतो, कादंबरीची बैठक नि त्यातून फुलणारा घटनांचा डोलारा सांभाळण्याची ताकद लेखकाला छोट्या छोट्या कथा लिहूनच मिळवता येते, त्यामुळे लेखकाचे कथालेखनाचे प्रयत्न नि त्या प्रयत्नांना साद आणि साथ देणाऱ्या संस्था (ज्यात मैत्री अनुदिनी ही एक) यांचे योगदान महत्त्वाचे नक्कीच.
    त्यामुळे या आधी सुमार दर्जाच्या कथा प्रसिद्ध होऊनही मला त्यावर टीका करावेसे नाही वाटले कारण कथालेखकास मिळायला हवे असे प्रोत्साहन जणू देणारी ती एक चळवळ ठरते.
    मुकुंद नवरे, डॉ कोल्हटकर, मुकुंद कर्णिक, स्वाती वर्तक, श्री व सौ राईलकर, हर्षद सरपोतदार असे मैत्री अनुदिनीतले कथालेखक ही परंपरा समर्थपणे चालवीत आहे यातच खरे समाधान मानावे.
    मराठीतील लेखक लेखनावर उदरनिर्वाह करू शकत नाही, प्रकाशकांच्या भ्रष्टाचाराला एकही अपवाद नाही, लेखक दरिद्री आणि प्रकाशक पैशाने माजलेले पोळ अशी एकंदर स्थिती असताना लेखकास मिळावे ते प्रोत्साहन रुपी मूल्य तरी मिळवू देण्यास आपण लेखकास का बरे वंचित करावे हा माझा आपल्या सर्वांना सवाल आहे, प्रतिसादाच्या अपेक्षेत

  8. असहिष्णू वाचक अशी मैत्री अनुदिनीची ओळख होत चालली की काय अशी शंका येणाऱ्या प्रतिक्रिया मैत्री अनुदिनीच्या एकंदर व्यासपीठास धोकादायक नक्कीच.
    एखादा वेगळा विचार मांडला तरी सगळ्यांनी मराठी भाषा बुडतेय अशा अभिनिवेशात त्यावर तुटून पडायचे हा अनुभव मी घेतलेला आहे.
    गीतेचा भावार्थ संस्कृत मधून बोलीभाषेत आणताना जेव्हढा विरोध काही शतकांपूर्वी झाला तसाच नि त्याच आवेगाने एका शब्द प्रयोगासाठी माझ्यावर लोक तुटून पडले नि त्यात माझे म्हणणे देखील ऐकून घेतले गेले नाही ही वेदना माझ्या मनात अजूनही रुतलेली आहे.
    प्रौढत्वि निज शेषवास जपणे बाणा कवीचा असे, ही उक्ती मैत्री अनुदिनीवरील कवींमध्ये मलातरी जाणवली नाही, जे काही कवी म्हणविणारे आहेत ते साठी बुद्धी नाठी या स्वभाऊक्तीप्रमाणे निबर नि ताठर झालेल्या मनोवृत्तीचे भासतात, न बदलणे हाच स्थायी भाव रुजविणारी ही वृत्ती भाषेस हानिकारक नक्कीच, वेगवेगळे प्रयोग नि शब्दांची मोडतोड भाषा जिवंत ठेवतात, मैत्री अनुदिनीवर मात्र बदलास विरोध हा स्थायीभाव जाणवतो हे नक्की (अपूर्ण विराम)

  9. देवेन्द्र राक्षे यांची प्रतिक्रिया कोणत्या संदर्भात आहे ते काही कळले नाही. मलाही प्रकाशकांचा काही फार चांगला अनुभव आला आहे अशातला भाग नाही, परंतु मी तो मैत्रीवर चर्चा करण्याचा विषय कधीच केला नाही. मैत्री या अनुदिनीचे काही धोरण, नियम असले तर श्री नाबर यांनी तसे स्पष्ट कळवावे. मला तरी राक्षे यांच्या लागोपाठच्या दोन प्रतिक्रिया 16 नोव्हेम्बरच्या अंकातील लेख कविता यांच्याशी संबंधित वाटत नाहीत.

    • माझी प्रतिक्रिया स्पष्ट आहे, स्वाती वर्तक यांच्या कथेवरील प्रतिक्रिया आणि मधुराधिपतेर अखिलं मधुरं या माझ्या लेखाविषयी

      • दोन्ही लेखांवरील वाचकांच्या प्रतिक्रिया ज्या पद्धतीने असहिष्णू वाटल्या त्याविषयी

    • स्पष्ट प्रतिक्रिया देणं याला असहिष्णुता म्हणता येणार नाही. प्रतिक्रिया ही एकतर चांगली म्हणजे स्तुतीपर असते किंवा टीकात्मकही असू शकते. पुन्हा प्रतिक्रिया दिली नाही तर त्यावरही टीकाटिप्पणी होते. माझं असं निरीक्षण आहे की स्वाती वर्तक व प्रियंवदा कोल्हटकर या दोघी वगळता बाकीचे लेखक-वाचक अधूनमधून प्रतिक्रिया देत असतात. त्याबद्दलची माझी भूमिका पूर्वीच मांडून झाली आहे.

  10. मैत्री अनुदिनीची असहिष्णू वाचक म्हणून ओळख ? साप साप म्हणून भुई धोपटण्याचा प्रकार दिसतोय. मला तरी असे काहीही आढळले नाही. बाकी काय लिहू ? आजची तिसरी कथा ही वास्तवात घडून येणारी घटना आहे. तिचे कथेत रूपांतर अत्यंत प्रभावी झाले आहे. अंगण हा स्फुटलेख प्रासंगिक वाटतो.

यावर आपले मत नोंदवा