गुरुजन

अमेरिका अमेरिका – ९ 
 
सतीश इंगळे 
 
श्री. सतीश इंगळे यांच्या “अमेरिका अमेरिका” या लेखमालेचे यापूर्वीचे लेख खालील तारखांना प्रसिद्ध झाले आहेत. :-

१९ जुलै २०१७ : (१) कितना अकेला हूँ मै,  १९ ऑगस्ट २०१७ : (२) मुक्काम पोस्ट अथेन्स, १९ सप्टेंबर २०१७ :(३)गंगेत घोडं न्हायलं, १९ ऑक्टोबर २०१७ : (४) नवलाईचे दिवस, २० नोव्हेंबर २०१७ : (५) मोरू , ०३ डिसेंबर २०१७ : (६) थेंबे थेंबे, १९ जानेवारी २०१८ : (७) तोंडओळख आणि १२ एप्रिल २०१८ :  (८)  सहप्रवासी 

‘प्रत्येक प्राणी एक यंत्र आहे आणि यंत्र हा सिस्टमचा केंद्रबिंदू आहे!’ शिक्षणाच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्याच तासाला हे सॉक्रेटिसच्या ‘मानव मर्त्य आहे’ किंवा एखाद्या जहाल कामगार पुढाऱ्याच्या तोंडात शोभणाऱ्या ‘रक्तपिपासू भांडवलदार कामगारांना काय यंत्र समजतात?’सारख्या या वाक्याने आम्ही चक्रावूनच गेलो. पण बोलणारे डॉ. गँबल हे विद्यापीठातले ख्यातनाम प्राध्यापक होते. दोन पी. एच्. डी., बऱ्याच सरकारी कमिट्यांवर व कंपन्यांचे मदतगार म्हणून नेमणूक व तितकेच शास्त्रीय लेख अशी त्यांची कर्तबगारी होती. त्यांच्या नावाचा  विद्यापीठात दबदबा होता. त्यांचा विषय होता ‘सिस्टम इंजिनिअरिंग व मॉडेलिंग’. आता त्यात प्राणी कुठून आले हे आम्हाला समजेना. आम्हाला फक्त लोखंडी यंत्रं माहीत होती. यंत्राची ही सजीव व्याख्या नवीनच होती. आम्ही सगळे जण भांबावलेल्या चेहऱ्याने ऐकत होतो.
डॉ. गॅम्बलची गाडी चालूच होती. मग त्यांनी यंत्राची व्याख्या दिली. यंत्राला एक ठराविक काम असते, त्याला इंधन लागते व ते चालवणारी किंवा त्याला आज्ञा देणारी गोष्ट लागते वगैरे सांगून पुन्हा ते प्राण्यांकडे वळले. प्राण्यांत हृदय हे इंधन पुरवते आणि मेंदू हा कामाच्या सूचना देतो वगैरे ऐकल्यावर आपण नक्की योग्य तासाला आलो आहोत का अशी शंका यायला लागली. तिथून ते मुंगीपासून हत्तीपर्यंत प्राण्यांकडे वळले. त्यांनी हे प्राणी काय व कसे करू शकतात याची साग्रसंगीत टिपण्णी दिली व निरनिराळे प्राणी त्यांच्या क्षमतेप्रामाणे निरनिराळी कामे कशी करतात तरी त्याना लागणाऱ्या तीन गोष्टी कशा समान असतात हे समजावले. या वेळेपर्यंत आपण नक्कीच चुकीच्या ठिकाणी आलो आहोत किंवा चुकीचा विषय निवडला आहे, नाही तर डॉ. गॅंबल चुकीच्या विषयावर बोलत आहेत याची खात्रीच वाटायला लागली. आम्ही सगळेजण इंजिनिअर होतो. आम्ही इंडस्ट्रियल व सिस्टम्स इंजिनिअरिंगचे विद्यार्थी होतो. आम्हाला लेथ, ड्रिलिंग मशीन अशा यंत्रांची ओळख होती. विषयाच्या वर्णनावरून आपण इंडस्ट्रीशी संबंधित शिकणार आहोत अशीच आमची समजूत होती. त्यात प्राण्यांचा कुठेच उल्लेख नव्हता. प्राण्यांशी आमचा संबंध प्राणिसंग्रहालय सोडून बऱ्याच वर्षांपूर्वीच तुटला होता. आता हे काय लचांड अवतरले म्हणून थोडे धास्तावूनही गेलो.
त्यांचे प्रथमदर्शनी व्यक्तिमत्वही जरा उग्रच होते. तसे ते बुटकेच होते पण त्यांची रुदी त्यांच्या उंचीएवढीच होती. दणदणीत आवाज व खणखणीत काहीसे ओरडल्यासारखे बोलणे आणि जाड फ्रेमचा व तितक्याच जाड काचेचा चष्मा अन् त्या मागचे गर्द हिरवे / निळे डोळे यामुळे त्यांची जरा भीतीच वाटली.
पण मग शक्ती, काम, काम करणारी अवजारे, काम चालवणारी वस्तू (आता माणसे वस्तू झाली होती), कामाची पध्दत, नियम, कामाचे ध्येय, वातावरण वगैरेंनी ‘सिस्टम’ तयार होते असे त्यानी समजावल्यावर जीव भांड्यात पडला. नंतर त्यांनी रोजचा प्रवास हीही कशी एक ‘सिस्टम’ आहे आणि त्यासाठी आपण साधे का होईना पण गणित कसे वापरतो याची आठवण करून दिली; निरनिराळी रोजच्या जीवनातली ‘सिस्टम ची’उदाहरणे दिली.आपले काम सोपे करण्यासाठी किंवा कार्यशक्ती वाढवण्यासाठी आपण कळत न कळत गणितावर आधारित किती मॉडेल वापरतो हे दाखवले, आणि कशी गंमत केली म्हणून मिश्किलपणे डोळे मिचकावत दणदणीत हसले. पहिल्याच दिवशी मी त्यांचा भक्त झालो.
हा विषय चांगलाच मनोरंजक व विचार करायला लावणारा होता. विशेषत: सिस्टमची व्याख्या व्यक्तीच्या दृष्टिक्षेपावर अवलंबून असली तरी त्यामागची तत्वे एकच असतात हे त्यांनी घरगुती उदाहरणे देत समजावले.एखाद्या मोठ्या कंपनीत, कंपनीचा सूत्रधार तसेच काम बघणारा, हिशोब ठेवणारा, सामान आणणारा, नवीन काय वस्तू आपल्याला परवडतील याचा विचार करणारा वगैरे कामांना स्वतंत्र व्यक्ती असते. यात कंपनी ही एक भव्य सिस्टम असते. उलट सर्वसामान्य घरात गृहिणी या सर्व कामांची जबाबदारी घेते.घर हा तिच्या सिस्टमचा व्याप असतो. व्याप निराळा असला तरी दोन्ही ठिकाणी विचार तोच करावा लागतो हे उदाहरण अगदी मनाला भिडले.
त्यांच्या या उदाहरणाने मला चटकन माझी आई आणि तिच्याचसारख्या बायकांची चटकन् आठवण झाली आणि त्यांची कीवही आली. पण या उदाहरणाच्या समर्पकतेची गंमतही वाटली. कारण वुइमेन्स लिबरेशन ही चळवळ त्या वेळी जोरात चालू होती. बाहेरच्या नोकरीत बायकांवरचे भेदभाव जावेत म्हणून कायदे बदलत होते. पण सामान्य गृहिणींच्या कामाचाही आदर व्हायला हवा अशीही चळवळीची मागणी होती. कारण ती सर्व जबाबदाऱ्या सांभाळतेच पण वर घरकामही करते. (अमेरिकेत यंत्राने बरीच कामे तेंव्हाही होत होती पण घरकामाला नोकर मात्र मिळत नाहीत.) तेंव्हा तिच्या कामाची किंमत काय हा वादाचा विषय झाला होता.
एकदा तात्त्विक चर्चा संपून मॉडेलिंग शिकायला लागल्यावर मात्र आमची तिरपीट उडाली.कारण मुख्य विषय पूर्णपणे गणितावर अवलंबून होता. तीन वर्षाच्या नोकरीच्या काळात विसरून गेलेल्या मॅट्रिक्स, कॅल्क्युलस वगैरे गणिताच्या प्रकारांची भरभर उजळणी करावी लागणार होती.
नशिबाने तेवढ्या एकाच भागात या महारथींशी झगडावे लागणार होते. सुदैवाने सिस्टम इंजिनीअरिंग मॉडेलिंगशिवाय आमच्या शिक्षणक्रमात ऑपरेशन्स रिसर्च,वागणूकीचे मानसशास्त्र (बिहेवियरल सायन्स) व कंप्यूटर सायन्स असे आणखी तीन भाग होते. प्रत्येक भागातले कमीत कमी दोन विषय घेण्याची सक्ती होती. बाकीच्या तीन भागात अंकगणित व बीजगणितच लागणार होते.
कंप्यूटर सायन्समध्ये एकदा कंप्यूटरची दशांश (खरे म्हणजे अष्टांश किंवा सोळांश) पध्दत शिकल्यावर गणिताचा संबंध नव्हता. कारण बाकीचे सर्व शिक्षण प्रोग्रामिंग व सिम्युलेशन प्रोग्राम वापरण्याचे होते.
हा विषय डॉ. वी नांवाचे चिनी प्राध्यापक शिकवायचे. सुरूवातीला त्यांच्या इंग्रजीच्या उच्चारातून शब्द शोधणे हाच मोठा अभ्यास होता. ‘र’चा ‘ल’ करणे किंवा अक्षरे खाणे हे अगदी सहज घडायचे. पण या अडचणीची त्यांनाही कल्पना होती. म्हणून महत्त्वाच्या माहितीच्या नोट्स घेण्यासाठी ते तीन तीनदा ‘लाइट इट डाऊन’ अशी आठवणही करायचे. आपण बऱ्याच वर्षांनंतर परत एकदा शाळेत आल्यासारखे वाटायचे. मला गेल्या गेल्याच कंप्यूटरची गोडी लागली. शिवाय माझ्या पदवीच्या निबंधाचे कामही कंप्यूटरवरच करायचे होती. त्यामुळे मी त्यांचे बरेच विषय घेतले.
त्यातला एक विषय होता रांगांचे मानसशास्त्र. एका तयार कंप्यूटर प्रोग्रामचा वापर करायचा होता. खेळच म्हणाना! रांगेत उभे असणाऱ्या माणसांची संख्या, प्रत्येकाच्या कामाला लागणारा सरासरी वेळ,रांगेतल्या लोकांची सहनशक्ती (कारण कांही माणसे कंटाळून निघून जातात) यावरून बॅंकेत किती खिडक्या उघडायच्या किंवा डिपार्टमेंट स्टोअरमध्ये किती कॅश रजिस्टर चालू करायची हे सांगणारा खेळ. त्यात आणखी बदल म्हणजे कामगारांचा पगार, कंटाळून निघून गेलेल्या माणसांमुळे बुडलेला धंदा यावरून सर्वांत फायदेशीर उत्तर शोधणे.
दुसरा खेळ होता रेस्टॉरंटचा. यात खुबी होती माणसांना कुठे बसवायचे व अन्न द्यायला किती वेळ लावायचा. याचे उत्तर जरा आश्चर्यकारकच आले. निष्कर्ष होता की गर्दीच्या वेळी भरभर काम करावे पण गर्दी नसताना जेवढे लांबवता येईल तेवढे लांबवावे. शिवाय गर्दी नसेल तेंव्हा लोकांना खिडकीजवळच्या जागा द्याव्यात म्हणजे बाहेरच्या माणसांना गर्दीचा भास व्हायला हवा.
डॉ. वीं हे स्वभावाने फारच प्रेमळ होते. सर्वांनाच, पण विशेषत:परदेशी विद्यार्थ्यांना त्यांचा आधार वाटायचा. त्यांना डोंगर चढायची आवड होती. बरेचदा ते मुलांना त्यांच्याबरोबर डोंगर चढायला किंवा जेवायला घरीही बोलवायचे. त्यांची अन् माझी चांगलीच मैत्री झाली. त्यांनी विद्यापीठ सोडेपर्यंत आमचा पत्रव्यवहारही होता.
‘कामात येणाऱ्या समस्यांचा अभ्यास करण्याची पध्दत व उत्तर शोधण्यासाठी उपयोगी अशा निरनिराळ्या पध्दतींचा अभ्यास’ अशी ऑपरेशन्स रिसर्चची ओळख डॉ. शेकनी  केली. डॉ. गॅंबलसारखे तेही सुरूवातीला घरगुती (फक्त पैसे संबंधित) उदाहरणे देत व ती धंद्याच्या अडचणींना जोडत त्यामुळे विषय कळायचाही चटकन अन् मनोरंजकही व्हायचा.
मला गंमत वाटली ती म्हणजे त्यातल्या मूलभूत गृहिताची. अवघड किंवा किचकट अभ्यास करून मिळालेले सर्वोत्तम उत्तर, त्यासाठी घालवलेला वेळ, केलेले कष्ट व खर्च यांचा विचार केल्यावर उत्तम ठरत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीला एकच उत्तम उत्तर मिळूच शकत नाही. किंबहुना असे उत्तर शोधणे हा वेळाचा व शक्तीचा अपव्यय आहे कारण माहिती नसलेल्या किंवा आपल्या शक्तीबाहेरच्याही बऱ्याच गोष्टी असतात. तेंव्हा सोपी तंत्रे वापरून चटकन मिळणाऱी बऱ्यापैकी फायदेशीर उत्तरे बहुधा सर्वोत्तम उत्तराच्या जवळपासच असतात. बऱ्यापैकी उत्तरांतल्या फायद्याचा,धोक्यांचा किंवा तोट्याचा कसा अभ्यास करावा व कोणता धोका किंवा कितपत तोटा आपण सहन करू शकतो हे ठरवून आपले निर्णय कसे घ्यावे त्याची निरनिराळी तंत्रे हा आमचा अभ्यास. मला तर एकदम गीतेच्या बाराव्या अध्यायातल्या एका श्लोकाचीच आठवण झाली.
या विषयात गणित फारसे अवघड नव्हते. लीनिअर प्रोग्रामिंग म्हणजे तर बीजगणितच होते. उलट इतर कांही विषयांना सुरूवातीला साधे अंकगणितच लागत होते. खरेखुरे धंद्यातले प्रश्न योडवायला मात्र इतक्या गोष्टींचा विचार करायला लागायचा की कंप्यूटर मॉडेल केल्याशिवाय गत्यंतरच नसायचे.
समस्यांचा अभ्यास कसा करावा हे शिकवणारा ऑपरेशन्स रिसर्च हा माझा अगदी आवडता भाग झाला. त्यात मी घेता येतील तेवढे क्लास घेतले. त्यामुळे माझ्या संशोधनाला मी त्यातलाच विषय निवडला. डॉ. शेक व डॉ. ओव्हरबी असे दोन प्राध्यापक आम्हाला ऑपरेशन्स रिसर्च शिकवायचे. दोघेही उत्तम शिक्षक होते पण दोघांची व्यक्तिमत्व व शिकवण्याची पध्दत पूर्णपणे भिन्न.
डॉ. शेक जरासे पुटपुटल्यासारखे तोंडातल्या तोंडात बोलायचे. बोलताना त्यांना डोळे मिचकावायची संवय होती. त्यांचा चेहरा कायम हसरा असायचा. त्यामुळे ते आपली चेष्टा करीत आहेत असेच वाटायचे. ते विद्यापीठाच्या बऱ्याच कमिट्यांवर होते व खाजगी उद्योगांचे सल्लागारही होते. त्यामुळे त्यांची उदाहरणेही त्या अनुभवातून यायची. स्वत: घरे बांधणे हा त्याच छंद होता. त्यांनी स्वत:चे रहाते घर पूर्णपणे स्वत: बांधले होते. फावल्या वेळात ते स्वत:च्या घरात सुधारणा करीत व मुलांसाठी घर बांधीत होते. त्यांच्या गाडीतही कायम काहीतरी बांधकामाच्या वस्तू असत. त्यांचे मदतगार म्हणून काम केल्याने आमच्यासारख्या बऱ्याच गरजू विद्यार्थ्यांना जरा जादा उत्पन्नही मिळत होते. पण कॉलजमध्ये इतके प्रतिष्ठित वागणारे आपले प्राध्यापक जुनाट फाटके कपडे घालून लाकडे कापत आहेत, तोडताहेत किंवा खिळे मारताहेत हे दृष्य मोठे गंमतीचे होते. या सगळ्या उद्योगांमुळे ते कायम गडबडीतच असायचे. त्यांना भेटायला त्यांच्या भेटायच्या वेळात नाहीतर आधी ठरवून भेटावे लागायचे. पण मग मात्र शंका निरसन होईपर्यंत वेळ द्यायला पूर्ण तयार.
डॉ. ओव्हरबींचे व्यक्तिमत्व मात्र पूर्ण भिन्न होते. तांबडे केस, भरघोस मिशा आणि मध्यम उंची. दिसायला एखद्या नटासारखे देखणे. मोकळा स्वभाव आणि तेवढेच मोकळे हसणे आणि कायम हसतमुख चेहरा. प्रत्येक विद्यार्थ्याची ते आपुलकीने चौकशी करायचे, भरपूर वेळ द्यायचे. त्यांच्या विद्यार्थ्यांमधल्या लोकप्रियतेचे हेही एक कारण होते. कोणतीही अडचण आली की सगळे जण त्यांच्याकडेच धाव घ्यायचे. ते गायचे उत्तम व गिटारही छान वाजवायचे. बऱ्याच वेळा डिपार्टमेंटचे क्लास संपल्यावर शांत वेळी ते स्वत:ची मैफलच भरवून टाकायचे त्यामुळे त्यांना भेटणेही सोपे असायचे.
त्यांना राजकारणात प्रचंड रस होता. ते उदार मतवादी होते. अथेन्समधल्या डेमोक्रॅटिक पक्षात ते जबाबदारीच्या पदावर होते. गरीबांबद्दल त्याना प्रचंड कणव होती. अर्थात् आम्ही परदेशी विद्यार्थी तर ठणठण गोपाळच होतो. तेव्हा आमचे ते लाडके झाले यात आश्चर्य नव्हते. शिकवताना त्यांची सर्व उदाहरणेही सरकारी धोरणे व बजेट यांची असायची. परिणामत: आम्हा परदेशी मुलांना आमच्या विषयाबरोबर अमेरिकेच्या राजकारणाची, सरकारची व धोरणांमागच्या विचारसरणीची ओळखही झाली.
डॉ. फ्रीडमन वागणुकीच्या मानसशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचे मी दोनच क्लास घेतले. त्यांत काय शिकलो ते विसरलो पण दोन्ही विषय मात्र लक्ष्यात राहिले. एक होता न्यूरल सायन्स. म्हणजे मेंदू आज्ञा कशा देतो व त्या योग्य ठिकाणी कशा पोचतात याचा. आपले मज्जातंतू या शरीरातल्या इलेक्ट्रिक वायर आहेत हे कळल्यावर बसलेला शॉक अजूनही आठवतो. दुसरा विषय होता लोकांसाठी सर्व्हे कसे बनवतात याचा. त्यात सर्व्हेचा निकाल तो बनवणाऱ्याच्या दृष्टिकोनावर,प्रश्नांच्या  वाक्य रचनेवर व त्यांच्या क्रमवारीवर किती अवलंबून असतो हे त्यांनी वर्गातच एकाच विषयावर दोन सर्व्हे घेऊन दाखविले. त्यानंतर माझा वर्तमानपत्रात प्रसिध्द होणाऱ्या सर्व्हेवरचा विश्वासच उडाला.
डॉ. फ्रीडमनच्या क्लासना मुलांची गर्दी मात्र चिक्कार असायची. मुख्य कारण म्हणजे त्यांचा परीक्षांवरचा अविश्वास. वर्गातल्या चर्चेतला भाग व शेवटी एक मुलाखत यावर ग्रेड ठरणार. आमचा प्रत्येक क्वार्टर अकरा आठवड्यांचा असायचा. सहाव्या व अकराव्या आठवड्यात मोठी परीक्षा व तिसऱ्या व नवव्या आठवड्यात चाचणी परीक्षा. शिवाय गृहपाठ निराळा. डॉ. गॅंबल व डॉ. ओव्हरबी या बाबतीत नियमीत असायचे. डॉ. वी त्याऐवजी कंप्यूटर प्रॉजेक्ट द्यायचे. डॉ. शेकचा भर घरी करायच्या परीक्षेवर किंवा कंप्यूटर मॉडेलवर असायचा. परीक्षेसाठी ते दहा पेपर काढायचे व प्रत्येक मुलाला निराळा पेपर द्यायचे. वर्गातल्या सर्व परीक्षांना आपल्या नोट्स व पुस्तकाचा वापर करायला परवानगी होती. हे ऐकल्यावर आम्हा भारतीय विद्यार्थ्यांना तर सुरूवातीला स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला. परीक्षेत कॉपी करायला परवानगी हे आमच्या कल्पनेच्या बाहेरचेच होते. पण अर्थातच या परीक्षा अवघड असत. घरी करायची परीक्षा किंवा प्रॉजेक्ट्समुळे तर ‘घी देखा लेकिन बडगा नही देखा’ अशीच स्थिती व्हायची. अश्या वेळी एकमेकांची मदतही घेता यायची. कारण कसेही करून तुम्हाला विषय कळणे महत्वाचे हेच ध्येय होते. तेंव्हा डॉ. फ्रीडमनचा परीक्षाविरहित, वर्गातल्या चर्चेवर ग्रेड देणारा क्लास लोकप्रिय झाला नसता तरच नवल!
डॉ. फ्रीडमन व डॉ. गॅंबल एकमेकांचे शेजारी व चांगले मित्रही होते. पण दोघेही लठ्ठ एवढेच त्यांच्यात साम्य. डॉ. फ्रीडमन जवळ जवळ सव्वा सहा फूट उंच होते तर डॉ. जेमतेम सव्वापांच.. दोघे एकत्र चालायला लागले की लंबू आणि टिंबू वाटत. डॉ. गॅंबल अगदी संथ व स्पष्ट बोलायचे तर डॉ. फ्रीडमन तोंडातल्या तोंडात पण वाघ मागे लागल्यासारखे. डॉ. गॅंबलचा चेहरा जरा गंभीरच असायचा तर डॉ. फ्रीडमचा कायम हसरा. डॉ. गॅंबल कायम आपल्या कामात व्यग्न असायचे तर डॉ. फ्रीडमनला वीकएंडला क्लबमध्ये नाचाण्यात नाहीतर त्यांच्या शेतावर काम करण्यात समाधान.
असे हे आमचे गुरूजन. प्रत्येकजण निराळा होता पण त्यांच्यात एक गोष्ट समान होती ती म्हणजे विद्यार्थ्यांना विषय कळावा ही तळमळ व त्यासाठी लागेल तेवढा वेळ द्यायची तयारी. वर्गात आपला आब राखणारे पण बाहेर एखाद्या ज्येष्ठ मित्रासारखे. वर्गात मुले कॉफी पीत किंवा लंच खात बसलेले त्यांना चालायचे पण ते सर्व वर्गाची शिस्त पाळून. मदत करायला किंवा शंकानिरसन करायला केव्हाही तयार. त्यांच्या प्रेमाने आणि मार्गदर्शनाने आमचे शिक्षणाचे दिवस कसे सरले हे कळलेच नाही पण आठवणी मात्र कायम राहिल्या.
सतीश इंगळे
satishingale@hotmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
प्राचीन भारतातील विज्ञान प्रवर्तक  
संकलक डॉ.  श्री. र. लेले 
३. पहिले विश्वामित्र 
अथर्वणाच्या शोधामुळे अग्नि निर्माण करता येऊ लागला तरी ती क्रिया कष्टाची होती. या क्रियेमध्ये सुधारणा व यांत्रिकीकरण हे विश्वामित्र ( पहिले ) यांचे कार्य आहे. त्यांचे पुढील संशोधन नमूद आहे :-
(१) घर्षणाच्या ठिकाणी वाळलेल्या दर्भाचे तुकडे ( दर्भ पिंजूलम् ) ठेवल्यास विस्तव जलद पेटतो. ( सामवेद १. ७९)
(२) घुसळण्याचे लाकूड जर दोरी लावून फिरवले तर घर्षण फार जलद होते. ( ऋग्वेद ३. २९. १ )
फिरत्या दांड्याला गति देण्यासाठी दोरीचा उपयोग करता येतो. विश्वामित्राच्या या यांत्रिक शोधाचा उपयोग आज आपण हजारो वर्षे ताक घुसळणे व सुताराचे  गिरमिट चालवणे या कामी त्यामध्ये कोणताही बदल न करता करीत आहोत.
वरील शोधामुळे आजच्या काड्याच्या पेटीप्रमाणे पाहिजे त्या ठिकाणी व त्या वेळी अग्नि  निर्माण करण्याचे तंत्र प्रस्थापित झाले.
(१) = (प्रजननंम् ) अग्नीजनन  साधनभूतं दर्भपिंजूलं (कृतं ) संपादितंश्री  I  ( सायण )
(२) = ( अभिमंथनम् ) अरण्या : उपरिनिधेयं मंथान साधन- भूतं दण्ड रज्वादिकम् I
– संकलक  डॉ. श्री. र. लेले  
मराठी विज्ञान परिषद पत्रिका या मासिकावरून साभार (जून १९६८ )
@@@

6 thoughts on “गुरुजन

  1. आज मैत्रीमध्ये श्री. सतीश इंगळे यांच्या अमेरिकेतील त्यांच्या वास्तव्यावरील पुढील लेख प्रसिद्ध झालेला वाचला आणि आनंदाची बाब अशी की त्यांनी आता त्यांच्या वेळच्या गुरुजनांची एक मधुर आठवण दिलेली मिळाली. श्री इंगळे यांच्या उच्च शिक्षणाच्या क्षेत्राबाबत मी अनभिज्ञ आहे तरीही त्यांची सुबोध शैली आणि वाचकाला समजावून सांगण्याची हातोटी यामुळे मी या लेखाचा आनंद घेऊ शकलो. त्याची पावती देण्यासाठी हे विपत्र.

  2. आजच्या अंकातील सतीश इंगळे यांचा लेख आणि शीर्षक पाहून आश्चर्य वाटले नाही. त्यांनी आजपर्यंत जो आढावा घेतला होता त्यात अद्याप शिक्षक किंवा मार्गदर्शक आले नव्हते ते आता आले. या शिक्षकांचा सतीशजींना आलेला अनुभव अर्थातच अमेरिकेच्या परंपरेला साजेसा होता. तेथील जीवनाचे सार त्यांच्या राहणीत, संस्कृतीत दिसून आले मग शिक्षक कसा अपवाद असेल ?
    या अंकातील पानपूरक म्हणून आपण दिलेली प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांची मालिका रोचक आहे.

  3. प्राचीन भारतातील विज्ञान प्रवर्तक या अंतर्गत ‘पहिले विश्वामित्र’ या लेखाविषयीची माझी प्रतिक्रिया :
    १. आर्यांना अग्नीचा शोध इराणच्या उत्तरेस आणि कश्यप समुद्राच्या डाव्या बाजूला असलेल्या अझरबैजान या देशात लागला. ‘अथर’ म्हणजे ‘अग्नी’ व बीज म्हणजे मूळ. अथर बीज याचं अझर बैजान हे पर्शियन शब्दरूप आहे.
    २. आर्य भारतात इ स पूर्व ७८०० च्या सुमारास आले. आर्यांच्या भारतातील पहिल्या राजापासून अंदाजे ३०-३२ पिढ्या गेल्यावर कान्यकुब्ज देशाचा राजा विश्वरथ उर्फ विश्वामित्र ऋषी याचा काळ येतो. म्हणजे एकंदरीत साताठशे वर्षे तरी गेली असतील. तोपर्यंत आर्यांना अग्नी उत्तम प्रकारे अवगत झालेला होता. विश्वामित्रांनी तो त्यांना शिकवायची गरज नव्हती.
    ३. सामवेदात १ – ७९ अशी ऋचाच नाही. ती संकलकाला कुठून मिळाली ?
    ४. ऋग्वेद ३-२९-१ या ऋचेतून विश्वामित्र पूर्वापार काय चालत आलं आहे हे सांगत आहेत.
    ‘भराग्निम मंथानपूर्वथा !’ असं ते या ऋचेत म्हणत आहेत. ग्रिफीथच्या शब्दात याचा अर्थ
    ‘We will rub Agni in ancient fashion forth’ असा होतो. म्हणजे विश्वामित्राने यातून नवीन
    असा काहीच शोध लावलेला नाही.
    ५. ‘पहिले विश्वामित्र’ म्हणजे काय ? माझ्या समजुतीप्रमाणे व वाचनाप्रमाणे विश्वामित्र एकच झाले
    होते. दुसरे विश्वामित्र इथे कुणाच्या ऐकिवात असतील तर त्यांनी संदर्भ द्यावा.
    या सगळ्या पार्श्वभूमीवर संकलक ओढून ताणून विश्वामित्राला उल्लेखित शोधांचं श्रेय देत आहेत अशी भावना होते.

  4. ‘ प्राचीन भारतातील विज्ञान प्रवर्तक ‘ या मालिकेतील विश्वामित्रांवरील लेखावरची हर्षद सरपोतदार यांची प्रतिक्रिया वाचली आणि एका प्रकारे समाधान वाटलं. आपले वाचक कुठलाही मजकूर अंधविश्वासाने जसाच्या तसा स्वीकारत नाहीत याचंच जणू प्रत्यंतर आलं. हे असंच व्हायला हवं, नाही का? विचार मंथन – विषयाची घुसळण व्हायलाच हवी, कानेकोपरे तपासले जायला हवेत. मैत्रीचं व्यासपीठ अशा मंथनाचं स्वागतच करील. हर्षद यांचं त्यांनी केलेल्या सखोल अभ्यासाबद्दल अभिनंदन.

  5. Mrs. Swati Vartak wrote :-

    अंक छान आहे.

    श्री इंगळेजींचा लेख वाचून सहज मनात आले. पूर्वीचे शिक्षक खरेच किती तन्मयतेने शिकवित असत. विद्यार्थ्यांनी पुढे यावे, शंका विचाराव्यात, आपण त्याचे निरसन करावे ही तळमळ दिसून येई; मग आता पाट्या टाकल्या सारखे का शिकवितात ? अर्थात त्यांची ही काही बाजू आहेच पण त्या लंगड्या सबबी असू शकतात.
    पहिले विश्वामित्र …माहिती नवी ..धन्यवाद.

यावर आपले मत नोंदवा