बडोदे साहित्य संमेलनाध्यक्षांच्या भाषणांचा गोषवारा

प्रकाश पेठे 
बडोदेकरांनी आयोजित केलेल्या मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्ष्यांच्या भाषणांच्या आढाव्याची ही रोचक लेखमाला एकूण ५  भागांमध्ये अनुक्रमे २५ एप्रिल, १० मे, १६ मे, २८ मे आणि आज याप्रमाणे  प्रसिद्ध झाली. या लेखमालेला ‘मैत्री’च्या वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. तसेच, ‘मैत्री’त सातत्याने लेखन करणा-या आणि प्रसिद्ध होणा-या इतर साहित्यावर आस्वादक अभिप्राय देणा-या डॉ. प्रियंवदा कोल्हटकर यांचा या संबंधातील लेख आज प्रसिद्ध होत आहे, ही बाब नमूद करण्यासारखी आहे. – सं.  
भाग ५

बा. भ. बोरकर

४१. अधिवेशन एकेचाळिसावे ३,४,५,६, फेब्रुअरी १९७८    अध्यक्ष-  श्री. राजाभाऊ लेले. संमेलनाध्यक्ष –  बा. भ. बोरकर ( ३० नोव्हेंबर १९१० — ८ जुलै १९८४). विषय-  भाषेचे मुख्य कार्य. — बडोद्यातच पु.ल.देशपांडे आणि सुनीता देशपांडे यांनी सरीवर सरी हा बा.भ. बोरकरांच्या कविता वाचनाचा कार्यक्रम ऐकला होता. ते म्हणाले, “साहित्योपासना ही सुद्धा मोक्ष साधनाच आहे. साहित्यिक हा निरंकुश असला पाहिजे. आपल्याला जे कल्याणकारी वाटते त्याचा पुरस्कार करताना कोणाच्याही राग लोभाची चिंता बाळगू नये.” यांचे भाषण आटोपशीर आणि अर्थपूर्ण होते. शेवट त्यानी कवितेने केला. “आम्ही नाही पांचातले : नाही पंचवीसातले : या सर्वही वळखुनिया आम्ही आंतले हो  : आम्ही नाही लक्षांतले: नाही पक्षांतले: सर्वी असुनी असू अलक्ष्यांतले हो: आम्ही नहीं मंत्रातले: नाही तंत्रातले: सर्वी असुनी नसू मायेच्या यंत्रांतले… “
@

प्रा. विजया राज्याध्यक्ष

४२. अधिवेशन बेचाळिसावे १९,२०,२१,२२,२३ जानेवारी १९७९ अध्यक्ष- भालचंद्र देवता. संमेलनाध्यक्ष – प्रा. विजया राज्याध्यक्ष ( जन्म ५ ऑगस्ट १९३३ ). विषय-   बांधिलकी आणि मराठी कविता —-वाङमयाबाबत उपस्थित केले जाणारे दोन प्रश्न सर्व परिचित आहेत. पहिला प्रश्न : ते का लिहिले जाते? आणि दूसरा ते कोणासाठी लिहिले जाते?  या दुस-या प्रश्नाचा विचार करायचा आहे. पहिली भूमिका, ‘कले साठी कला ‘ या स्वरूपात मांडली गेली आहे. तिचे समर्थक आणि विरोधक तितकेच आग्रही आहेत.’ बांधिलकी ही विवाद्य संकल्पना नसते, कलावाद्यानाही तिचा विरोध नसतो. लेखकाचे साम्यवादी अथवा समाजवादी असणे हा नव्हे. त्यामुळे लेखकाचे बराकीकरण होते. ते होता कामा नये.
@

प्रा. नरहर कुरुंदकर

४३. अधिवेशन त्रेचाळिसावे २२,२३,२४,२५ डिसेंबर १९७९  अध्यक्ष- श्री. दत्तात्रय पारख. संमेलनाध्यक्ष –  प्रा. नरहर कुरुंदकर. ( १५ जुलै १९३२ — १० फेब्रुवारी १९८२) विषय- रसव्यवस्था काही विचार—-नरहर कुरुंदकर म्हणजे प्रचंड प्रतिभा आणि अचाट स्मरणशक्ति लाभलेला आणि तारतम्य बाळगून लिहिणारा आणि खिळवून ठेवेल असे भाषण करणारी विलक्षण व्यक्ति. म.टा.ने २२ फेब्रुवारी १९७६ रोजी खांडेकर गौरव पुरवणी प्रसिद्ध केली होती. ती पुरवणी संग्रही आहे. कुरुंदकरांनी खांडेकरांच्या ‘ययाति’संबंधी प्रदीर्घ लेख लिहिला होता. इतका साक्षेपी विवेचक सापडत नाही. बडोद्यात  कुरुंदकर यांचे भाषण ऐकायला मिळाले होते. बडोद्यात ते म्हणाले, “रसव्यवस्थेविषयी मला बोलावेसे वाटते. आस्वाद घ्यायचा तर नाटक, कादंबरी, कथा, साहित्य पुराणपूर्वीचे वाङ्मय या सगळ्याचा आस्वाद घ्यायला हवा. एक रसिक या नात्याने सातशे वर्षातल्या सर्व वाङ्मय प्रकारांना भावनात्मक प्रतिसादाच्या विषय करू शकू इतकी व्यापकता आपल्या रसिकतेत असली पाहिजे.”
@
४४. अधिवेशन चव्वेचाळिसावे ३०,३१ जानेवारी व १,२ फेब्रुवारी १९८१ अध्यक्ष- श्री. प्रभाकर देवास्कर. संमेलनाध्यक्ष – प्रा. सरोजिनी वैद्य.( १५ जून १९३३ – ३ ऑगस्ट २००७) विषय – आजचे मराठी साहित्य आणि रसिकांचे समाधान असमाधान—  त्यांचे भाषण लहानसे असले तरी अनेक गोष्टींचा आढावा घेणारे आहे, गेल्या १००-१२५ वर्षातील ललित साहित्य हे आत्मपर साहित्य आहे. या साहित्याच्या आस्वादात आपण काही वेळा समाधान तर काही वेळा असमाधान अनुभवले आहे. काही लेखक एकच पुस्तक लिहून थांबतात; उदाहरनार्थ रामनगरी, स्नेहांकिता, सांगते ऐका, माणूस जेव्हा जागा होतो. जे सांगायचे ते एका पुस्तकात सांगून झाले की मग ते लिखाणाकडे वळत नाहीत. असे का व्हावे. स्वत:मध्ये खोल जाणे किंवा बदलत्या व्यापक वास्तवात शिरणे हे कलावंताच्या विकासाचे मार्ग असतात. दोन्ही जिवंत कुतुहलासह लेखकाने तुडवीत जायचे असते. शेवटी त्या म्हणाल्या, “लेखन, लेखक, समीक्षक वाचक असे घटक विचारात घेता एका शोधाशी येउन थांबते आहे. आपल्या अनेक कारणांमुळे आपल्या साहित्यनिष्ठेत आपण उणे आहोत  हाच तो निष्कर्ष आहे. (प्रा.सौ.सरोजिनी वैद्य आणि प्रा.शंकर वैद्य हा साहित्य क्षेत्रातला लक्ष्मी नारायणाचा जोड़ा होता. त्या दोघांना पाहिलं होतं. ) 
@

शिवाजी सावंत

४५. अधिवेशन पंचेचाळिसावे २०,२१,२२ मार्च १९८२.  अध्यक्ष- श्री. कि. या. मासारे. संमेलनाध्यक्ष – श्री. शिवाजी सावंत.( ३१ ऑगस्ट १९४० — १८ सप्टेंबर २००२) विषय- शब्द : एक मनाची ऊर्जा आणि समूहमनाचे कार्य.
“मी आपल्या समोर साहित्य विषयक मूलभूत विचार म्हणजे शब्द – आजचे युग उर्जेचे युग म्हणून मान्यता पावलेले आहे. मनाची उर्जा ही शब्द असते. तुकाराम ज्ञानेश्वर ,कालिदास शेकडो वर्षानंतर वाचले जातात. त्यांचे उर्जारूप लाभलेले साहित्य कधी शिळे होत नाही. मनाच्या उर्जेचं कार्य शब्दांना करावं लागतं. आपल्या भाषेचा गौरव आपणच जपायला हवा आहे . “
@

प्रा. शंकर वैद्य.

४६. अधिवेशन सेहेचाळीसावे ७,८,९,१०, जानेवारी १९८५ अध्यक्ष- श्री. चंद्रकांत गवारीकर. संमेलनाध्यक्ष – प्रा. शंकर वैद्य.( १५ जून १९२८ — २३ सप्टेंबर २०१४) विषय – सामाजिक कविता काही विचार—  आज सामाजिक कविता या विषयासंबंधी मी बोलणार आहे. मराठीत सामाजिक कवितेचा विचार केला तर केशवसूत आठवतात. तरीही सामाजिक कविता नामदेवांच्या काळापासून लिहिली गेली आहे. सर्व मर्यादातून  बाहर पडून, ‘ब्राह्मण नाही हिन्दुही नाही न मी एक पंथाचा’  असे केशवसूत लिहून गेले. नंतरही सामजिक दु:ख, आर्थिक विषमता, यन्त्रयुग, सत्तापिपासा, मानवाचा स्वार्थीपणा यातून होणा-या  दु:खालाही कवितेत स्थान मिळाले आहे. मर्ढेकर यांची कविता ही रुढार्थाने सामाजिक वाटत नाही. ती चालू युगाच्या संस्कृतीतले दु:ख व्यक्त करणारी कविता वाटते. आधुनिक कवींत नारायण सुर्वे याना विसरून चालत नाही. ते समूहाला आवाहन करतात समतेचा घोष करतात. दारिद्र्य आणि त्या पार्श्वभूमीवर मनुष्य, सामजिक स्तर आणि त्यातला माणूस हा धागा पकडून सुर्व्यांच्या कवितेचा संसार उभा राहिलेला दिसतो. एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली की कविता श्रेष्ठ की कनिष्ठ हे वेगळ्याच गुणांवर ठरणार आहे.
@

व. पु. काळे

 

४७. अधिवेशन सत्तेचाळिसावे ५,६, ७, ऑक्टोबर १९८५ अध्यक्ष- श्री. नीलकंठ वाघमारे . संमेलनाध्यक्ष – श्री. व. पु. काळे.( २५ मार्च १९३२ — २६ जून २००१) विषय- अपूर्णाहुती..अनंत व्यथांच्या असंख्य कथांची—-व पु काळे गेले तेव्हा ‘महाराष्ट्र टाइम्स’ने.२८ जून २००१ रोजी  त्यांच्यावर अग्रलेख लिहिला होता. (फार थोड्यांच्या नशिबी हे मरणोत्तर येत. अर्थात तेव्हा ते तो वाचायला हजर नसतो ) व. पु. काळे हे रूढ़ अर्थाने क्रांतिकारक लेखक नव्हेत. ते कधी वादग्रस्त देखील नव्हते. मोठमोठे पुरस्कार त्यांच्या वाट्याला आले नाहीत. साहित्य संमेलनांचे फडही त्यांनी गाजवले नाहीत. त्यांच्या लिखाणाला विद्वत्तेची झालर नव्हती आणि समाज सुधारणेची डूबही नव्हती. थोडक्यात वि.स. खांडेकर, कुसुमाग्रज, पु.ल.देशपांडे अशांसारखे ते महान साहित्यिक नव्हते तरीही त्यांच्या मृत्यूच्या बातमीने महाराष्ट्रातील शहरी मध्यमवर्गीय हळहळला. एक रसरशीत गुलमोहोर उन्मळून पडला, असे अनेकाना वाटले. त्यांच्या अनेक कथांनी मराठी मनाचा ठाव घेतला. घराघरात रोज घडणा-या घटनांमधून कथेची बांधणी करण्याची व.पूं.ची हातोटी विलक्षण होती.   त्यामुळे त्यांच्या कथांतून भेटणारी पात्रे परिचयाची व त्यामुळे आपलीशी वाटतात. महापालिकेतील २७ वर्षाची माझी नोकरी हा माझ्या कल्पनांचा मूळ स्त्रोत आहे असे ते मानायचे. लोकसत्ताने म्हटले की “ पुन्हा प्रपंच सांगणारा सामान्य जनांचा ‘पार्टनर’ गेला. व.पुं.चे निरिक्षण अतिशय सूक्ष्म होते. त्यांनी १९६२ मध्ये कथाकथनाचा पहिला जाहीर कार्यक्रम केला. नंतर अख्खा महाराष्ट्र पालथा घातला.  आर्कीटेक्चर , इन्टेरिअर डेकोरेटर, चित्रकार, छायाचित्रकार, संगीत या त्यांच्या अंगी असलेल्या कलेचे प्रतिबिंब त्यांच्या कथाकथनात व साहित्यात रसिकांना जाणवत राहिले. वाचक आणि श्रोते हेच आपले समीक्षक आणि त्यानी आपल्याला भरपूर न्याय दिला असे व.पु.नी नेहमी नमूद केले. लिखित वाङ्मय जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत नसेल, सुजाण समजला  जाणारा समाज जर त्यापासून लांब रहात असेल तर चांगले साहित्य वेगळ्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचविलेच पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते. आपण सर्जनशील लेखक आहोत याचे भान त्यानी कधी सोडले नाही. त्यांच्या घरात त्यांच्या खुर्चीवर ‘लेखक’ असे ठळकपणे लिहिलेले असे. त्या खुर्चीवर कोणी बसलेले त्यांना चालत नसे. महानगरपालिकेच्या नोकरीत त्यांनी अनेक हॉस्पिटलांची रचना केली आणि विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृह ही त्यांची उत्तम कृती होती. अनेक संमेलनाध्यक्ष यांची भाषणे रटाळ होती पण  व.पुं.चे भाषण रसाळ  होते. बडोद्यातील त्यांचे भाषण मुळातून वाचावे असे आहे. ते सगळे इथे देणे ठीक नाही. मध्यम वर्गाची सुखदुःखे समजणारा आणि ती शब्दबद्ध करणारा, उमदे व्यक्तिमत्व असणारा लेखक गेला याचे दुःख आहे. गांधीनगर गृहातील त्यांचा कथाकथनाचा कार्यक्रमही कायम लक्षात राहील.
@

मंगेश पाडगावकर

४८. अधिवेशन अठ्ठेचाळिसावे १७,१८,१९ जानेवारी १९८७ अध्यक्ष- श्री. वि अ महाजन.  संमेलनाध्यक्ष – मंगेश पाडगावकर (पद्मभूषण) ( १० मार्च १९२९ — ३० डिसेंबर २०१५). विषय- कवितेचा अनुभव एक शोध —काही वर्षापूर्वी  “विश्वामित्री पुलाजवळच्या  ‘अभिव्यक्ति’ मधे पाडगावकर येणार आहेत. जसे असाल तसे निघून या” असा डॉक्टर नेने यांचा फोन आला. आम्ही दोघे लगबगीने जाऊन वेळेत पोचलो. महाराजा रणजीतसिंह यांच्यासह जेमतेम दहाबारा  माणसे असतील. पाडगावकर यांच्या गप्पा भन्नाट होत्या. आम्ही  भरून पावलो. कान पवित्र झाले. तो दिवस विसरता येणार नाही. नंतर तिथली प्रसिद्ध  भजी खायला मिळाली. “पाडगावकर फार मिष्किल. अरे मी कवि असलो तरी माणूसच आहे ना. मलाही तुमच्यासारखे प्रश्न असतात. मीही रोज चार वृत्तपत्रे वाचतो. देशात काय चालतं ते मलाही माहीत असते. दीड तास कसा गेला ते कळले नाही .एकदा त्यांना केळवे माहीम  येथे भेटले होतो आणि एकदा विंदा, वसंत बापट आणि पाडगावकर यांचे काव्यगायन ऐकण्याची संधी मिळाली होती. पाडगावकर यांच्यासंबधी लिहावं तितकं थोडंच आहे. जशा शांता शेळके यांना दुस-यांच्या कविता पाठ होत्या तश्या पाडगावकरांनाही होत्या. बडोद्याच्या अधिवेशनात ते म्हणाले, “ कविता भाषेतून व्यक्त होते.  हीच भाषा आपण व्यवहारिक उपयोगासाठी वापरीत असतो. पण आपण कविता जेव्हा अनुभवतो तेव्हा एक वेगळे नाते भाषेशी जोडतो. रसिक या नात्याने कवितेचा अनुभव घेणे हे जसे भाषेवाचून शक्य नाही तसेच कवीची ही अनुभव न्याहाळण्याची प्रक्रिया भाषेशिवाय अस्तित्वात येऊ शकत नाही. एखाद्या वस्तूचा आकार आपण हाताने चाचपून पहावा त्याचप्रमाणे कवी आपल्या अनुभवाचा कलात्मक आकार कवी भाषेने चाचपून पाहत असतो. कवी आपल्या अनुभवाची आतंरिक रचना न्याहाळीत असतानाच कवितेची भाषा आकार घेत असते. कवितेचा अनुभव हा एक शोध असतो. रसिकाने कोणत्याही घोषणा फलकाखाली उभे राहाणे सतत टाळले पाहिजे. नक्षत्रांचे देणे हा कार्यक्रम सगळेच पाहतात. ‘लोकरंग’च्या ३ जानेवारी २०१६ अंकात  भाऊ मराठे यांनी फार सुरेख लेख लिहिला आहे “ तसेच ८ मार्च २००९ च्या लोकमुद्रेत ते ८० वर्षे पूर्ण करत असल्याने वि.शं.चौघुले यांनी त्यांच्याशी बातचीत केली तो लेख पाडगावकरांचे वेगळे रूप दाखवतो. ते म्हणाले, “ न्यू टेस्टामेंट” च्या इंग्रजी भाषेने मला भारून टाकले. त्या शब्दकळेचं भावलं म्हणून बायबलचे भाषांतर करावे असे मला वाटले.  ‘नव्या करारा’त असे अनेक दृष्टांत किंवा कथा आहेत की ज्यातून व्यापक आणि शाश्वत स्वरूपाचा आशय व्यक्त होतो. माणसे सतत कशाच्या तरी मागे लागलेली असतात. सत्ता, संपत्ती, सुख, मोक्ष, शांति, ईश्वर अशी शोधाची अगणित रुपे हव्यास सूचित करतात. या उलट लहान मुलं निर्मळ निरागस असतात.” त्यांची कविता म्हणजे मोग-याची टपोरी फूलें. आशयघनता सातत्याने टिकवलेला हा श्रेष्ठ कवी ”. पाडगावकर यांच्यासंबधी सर्वाना इतकी माहिती आहे की उगीच शब्द वाढवणे योग्य वाटत नाही.
@

प्रा. मं.वि राजाध्यक्ष

४९.  अधिवेशन एकोणपन्नासावे २४,२५,२६, डिसेंबर १९८८ अध्यक्ष- श्री. श्रीराम खांडेकर. संमेलनाध्यक्ष – प्रा. मं.वि राजाध्यक्ष ( ७ जून १९१३ – १९ एप्रिल २०१०) विषय- सर्वांगींण विकासासाठी भाषिक सत्तेचे विकेंद्रीकरण. भाषणात त्यानी एक चांगला मुद्दा मांडला.—- तुम्ही मराठी असून महाराष्ट्रापासून दूर आहात त्यामुळे तिथल्या गोंधळापासून दूर आहात. (हे काही प्रमाणात बरोबर आहे.) बेळगाव कोल्हापूर येथील मराठी वेगळे आहे तसे बडोदे येथील आहे. पण त्याला प्रमाण भाषेत मान्यता देत नाहीत. तसे होऊ नये. साहित्यात जाती व्यवस्था आहे. उच्चनीच भावना आहे. ती नियतकालिकांतही आहे आणि वाचकातही आहे. साहित्याच्या क्षेत्रात अश्या फसव्या निसरड्या जागा पदोपदी भेटतात. पण वाचनावर मर्यादा असू नये. ‘All lectures are too long’ म्हणून मी जास्त बोलत नाही. जे बोललो त्याला उपदेश समजू नका. “ तुका म्हणे रोग वैद्याचे अंगी – नाही करी जगी उपकार – याची मला जाणीव आहे. आपणही ती ठेवावी, ही विनंती.
@

 

माधव गडकरी

 

५०. अधिवेशन पन्नासावे २३,२४,२५ डिसेंबर १९८९ अध्यक्ष- श्री. गणेश अग्निहोत्री. संमेलनाध्यक्ष – श्री. माधव गडकरी.( २५ सप्टेंबर १९२८ – १ जून २००६)  विषय-  अस्सल शंभर नंबरी सोन्याच्या शोधात मराठी साहित्यसरस्वती—पत्रकाराने लिहिलेल्या साहित्याला फारसे महत्व न देण्याची प्रवृत्ति साहित्यविश्वात आहे. (विद्याधर गोखले यानी म्हटले होते की पत्रकारही साहित्यिक असतो) ५० वर्षाच्या वाटचालीत मी मनापासून साहित्य सेवा केली. यापूर्वी मी बडोदे येथे तीनदा आलो आहे. प्रो. माणिकराव यांना भेटायला माझे वडील मला घेऊन आले होते. नंतर वसंत शांताराम देसाई येथे आले होते तेव्हा.– रामभाऊ जोशी यांचे ‘ सुन्दर मी होणार’ हे नाटक मी बडोदे येथे पाहिले होते. नंतर गडकरी दर्शन हा कार्यक्रम मी पु.ल. देशपांडे यांच्या बरोबर इथे पहिला होता. गडकरी यांच्या मृत्यूनंतर इथे झालेला ‘एकच प्याला’चा ऐतिहासिक प्रयोग महाराजांसमोर झाला होता. या प्रयोगाला ९०८ रुपये आणि १४ आणे उत्पन्न झाले होते. तो ऐतिहासिक क्षण होता. सयाजीरावांची आठवण पदोपदी होते. श्री. माधव गडकरी यांना बडोद्याविषयी फार प्रेम होते असे त्यांच्या भाषणातून जाणवते. ते भाषण बडोदेकरांना खूप आवडले असेल.
@

 

प्रा. वसंत शंकर कानेटकर

५१. अधिवेशन एकावन्नावे २५,२६,२७,जानेवारी १९९१ अध्यक्ष- श्री. अशोक अभ्यंकर.   संमेलनाध्यक्ष –  प्रा. वसंत कानेटकर. ( २० मार्च १९२० – ३१ जानेवारी २०००)  विषय- साहित्याविषयी थोड़े प्रकट चिंतन — सुमारे पंचवीस वर्षानंतर याच अध्यक्षपदावरून मी आपल्यापुढे भाषण करण्यासाठी उभा आहे. साहजिकच आयुष्याच्या उत्तर काळातील साहित्यविषयक माझे नवे चिंतन तुमच्या समोर ठेवतो. तो काळ म्हणजे नवकाव्य आणि नवकथांचा होता. त्यावर तेवढीच टीका पण झाली. युध्दोत्तर काळात समाज जीवनात जी अवनती घडली आणि भ्रष्टाचार माजला त्याची प्रतिक्रिया साहित्यात अवतरली. पण नव्या साहित्य प्रयोगात जी अवनती झाली तिला लोकांचा विरोध होता. कोणत्याही काळातले साहित्य नवे असले तरी ते जुन्याच्या खांद्यावर उभे असते. साहित्यात दर दशकदोन दशकांनी एकेक नवे युग अवतरत असते. तेव्हा नव्या जुन्याचा संघर्ष अटळ असतो. त्यांनी भाषेच्या संदर्भात बरेच विवेचन केले. इंग्रजी भाषा मराठीपेक्षा प्रगल्भ आहे, कारण ते लोक मराठी लोकांपेक्षा प्रगल्भ झालेले आहेत. ही प्रगल्भता म्हणजे स्वतःचे नवे विचार स्वतःच्या हिमतीवर समर्थपणे मांडता येण्याची ताकद. भाषा तयार करता येत नाही. माणसासारखी ती जन्माला येते. तिलाही जन्म, बाल्य, तारुण्य, जरा आणि मृत्यू या अवस्था असतात. कारण भाषा हे सजीव तत्त्व आहे. असे म्हणून त्यानी भाषण संपवले.
@

श्रीमती शांता शेळके

५२. अधिवेशन बावन्नावे २९,३०,३१ मे १९९३  अध्यक्ष- सौ उषा वाघमारे. संमेलनाध्यक्ष- श्रीमती शांता शेळके. ( १२ ऑक्टोबर १९२२ – ६ जून २००२)   विषय- आजची मराठी कविता स्वरूप आणि समस्या – – फक्त पंचवीस वर्षापूर्वी शांताबाई शेळके बदोद्याला संमेलनाध्यक्ष होत्या. त्यामुळे त्यांच्या निवेदनाचा आस्वाद बडोदेकरांनी घेतला होता. मध्ययुगीन कवी, अर्वाचीन कवी आणि आंतरराष्ट्रीय प्रवाहाच्या कवी या सगळ्याचे मिश्रण करून जे रसायन तयार होइल ते म्हणजे शांताबाई शेळके. बडोद्याला संमेलनाध्यक्ष झाल्यानंतर अखिल भारतीय समेलांनाच्याही संमेलनाध्यक्ष झाल्या. त्यांचे मराठी भाषेवर असामान्य प्रभुत्व होते.  इतरांच्या कविताही तोंडपाठ होत्या. शांताबाईचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यांचा जीवनातलं औत्सुक्य जन्मभर टिकून होतं. चांगुलपणा ठासून भरला होता. अत्रे यांच्या नवयुगात पाच वर्षे उपसंपादक म्हणून काम केल्यामुळे त्यांच्या लिहिण्यात सोपेपणा आला. संपादक मंडळी  दुर्बोध लिहीत नाहीत. त्या ‘म.टा.’मध्ये “जाणता अजाणता” हे सदर लिहित. एकदा त्यांनी मांजरींवर लेख लिहिला होता. त्यांचे निरिक्षण छायाचित्रासारखे स्पष्ट होते. आमच्या घरीही मुले लहान असता सतत पाचसहा मांजरी घरात असत. आम्ही त्यांच्या सगळ्या हरकती निरखत असू. त्यांची अनेक छायाचित्रे संग्रही आहेत. जे सहसा पहायला मिळत नाही ते आमची भाटी आणि तिच्या सतत मागावर असलेला बोका यांचे उत्कट आणि आवेगपूर्ण प्रेम पहायला मिळालं होतं. शांताबाईंचं निसर्ग आणि मानवी जीवन या सगळ्यावर निरपेक्ष प्रेम होतं म्हणून त्या उत्तम कवियत्री होऊ शकल्या. त्या अखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्षा झाल्या तेव्हा म.टा आणि लोकसत्ता यांनी २८ जानेवारी १९९६ रोजी पुरवणी काढली होती. त्यात त्या म्हणाल्या होत्या, “नियोजन आणि भवितव्याचा विचार हे माझ्या स्वभावात नाही. एक प्रकारचा “जिवटपणा” मात्र आहे; उत्कटतेचा हव्यास माझ्या स्वभावात आहे”. लोकरंग पुरवणीत प्रभा गणोरकर यांचा आणि वि शं.चौघुले याचे लेख चांगले आहेत . बडोद्यात त्या म्हणाल्या,  “ कविता हा माझ्या सर्वाधिक आवडीचा, कुतुहलाचा व चिंतनाचा विषय आहे. ग ल.ठोकल यानी बदोद्यात संपादित केलेलं ‘सुगी’ हे संकलन उत्तम ग्रामीण कविता देऊन गेले. त्यात ना. घ. देशपांडे यांच्या पाच कविता आहेत. दुसरे म्हणजे मराठी कवितेला अध्यात्म नवे नाही. ” आपुले मरण पाहिले म्या डोळा’ हे आध्यात्मिक अनुभुतीचे उदाहरण आहे. त्यानी एक फार छान सांगितले, ‘ प्रेमेविन रुसू नये असे रामदास म्हणाले. मराठी कवितेवर प्रेम असल्यामुळे तिच्या संदर्भात जे अपूर्णेपण, असमाधान जाणवते ते आपल्या समोर बोलूंन दाखवल्याशिवाय मला राहवेना म्हणून इतक सगळं बोलले. त्या पुढे म्हणाल्या, ” मर्ढेकर सांगून गेले आहेत . :धैर्य दे अन नम्रता दे : पहाण्या जे जे पहाणे : वाकू दे बुद्धीस माझ्या : तप्त पोलादाप्रमाणे : ही शिकवण जशी कवींसाठी  आहे तशी आपल्या सारख्या रसिकांसाठीही आहे. “
@

श्रीमती विजया मेहता

५३. अधिवेशन त्रेपन्नावे १९,२०,फेब्रुअरी १९९४ अध्यक्ष- श्री. वसंत नांदेडकर. संमेलनाध्यक्ष – श्रीमती विजया मेहता. ( जन्म ४ नोव्हेंबर १९३४ ) विषय- नाट्यानुभव म्हणजे काय? बडोदे येथे जन्माला आलेल्या  तीन जणांनी मैदान मारले. त्या तीन व्यक्ति म्हणजे श्रीनिवास खळे, दिलीप पुरषोत्तम चित्रे आणि विजया जयवंत उर्फ़ विजया मेहता. भारदस्त बाई, झाजरमान व्यक्तित्व. कमालीचा आत्मविश्वास. आविष्काराची बेजोड़ पद्धत .पाहताक्षणी छाप पाडणारी अशी स्त्री पूर्वी कधी पाहिली नव्हती. त्यानी लहान भाषण केले. त्या म्हणाल्या, मी एकच सूत्र घेणार आहे. नाट्यानुभव म्हणजे काय ? यात काही माझ्या अनुभवातून काही ज्याना मी गुरुस्थानी मानते ते ‘पीटर ब्रुक’ यांचेही विचार आहेत. नाटककार नाटक लिहितो, दिग्दर्शक ते समजुन घेतो, नटांकडून तो प्रयोग तयार करतो आणि तो पहायला प्रेक्षक येतो. आणि तिथूनच नाट्यानुभवाला सुरुवात होते. पण हल्ली मुंबईला सीरियल नावाचा रोग लागला आहे. नट म्हणतात, आम्ही पोटासाठी करतो. तेंडुलकर, डॉक्टर लागू, दत्ता भट, माधव वागळे हे दिवसभर काम करून संध्याकाळी नाटक करायचे. त्यांच्यात नाटकाची जाळी विणण्याची कुवत होती. ज्या रसिक प्रेक्षकावर आणि त्यांच्या नाट्य अनुभावर माझा विश्वास आहे, त्या विश्वासाने देवमासा पकडण्यासाठी जाळे विणले जाऊ शकेल.” हे भाषण मुळातून वाचावे. झकास झाले होते.
@

प्रा. दिलीप चित्रे

५४. अधिवेशन चोपन्नावे २४,२५,२६ नोवेम्बर १९९५  अध्यक्ष- श्री. रविकांत जोशी. संमेलनाध्यक्ष  प्रा. दिलीप चित्रे. ( १७ सप्टेंबर १९३८ – १० डिसेंबर २००९) विषय- रंजक साहित्य विरुद्ध प्रगल्भ साहित्य—एका  बडोदेकरानंतर दुसरे बडोदेकर दिलीप चित्रे आले .”मला माझ्या जन्मग्रामी बोलावून आपण माझा सन्मान करत आहात त्याबद्दल आभार मानून मी भाषण सुरु करतो. बडोदे येथे माझा जन्म झाला इतकेच नाहीं तर बारा वर्षे माझ्यावर या गावाचे संस्कार झालेत. त्यातूनच माझा विकास झाला. सुमारे तीनशे वर्षापूर्वी आपले कोकणातील वतन सोडून पणजोबा गायकवाड सरकारच्या सेवेत रुजू झाले. तेव्हा कोकण आणि बडोदे यांची मिश्र संस्कृती जोपासणा-या मराठी भाषकांचा मी प्रतिनिधी आहे. माझा अभिमान जमिनीला जोडलेला नाही किंवा मालकी हक्कानी पोसलेला नाही. श्रीमंत सयाजीराव यांनी अनेक गुणी माणसांना येथे बोलावून संस्कृतिक वातावरण जिवंत ठेवले. सर्व विद्याशाखांना प्राधान्य दिले. जातीयता, धर्मांधता, सोवळेपणा, कर्मठपणा  यांची लागण होऊ न देण्याची खबरदारी घेतली. बडोदे येथील परिषदेसारख्या संस्था महाराष्ट्रात दुर्मिळ आहेत. साहित्यिकात बडोद्याचे आमंत्रण हा सन्मान समजला जातो. आपल्या परंपरेतून कोणती नवनिर्मिती करून आपण नव्या शतकात प्रवेशणार आहोत याचा विचार आपणही करावा.” यांच्या भाषणात सतत जिव्हाळा दिसतो.
@

 

भालचंद्र नेमाडे

 

५५.  अधिवेशन पंचावन्नावे २७,२८,२९ डिसेंबर १९९६ अध्यक्ष- श्री. रविकान्त जोशी. संमेलनाध्यक्ष – भालचंद्र नेमाडे.( जन्म २७ मे १९३८.) ————- मला बोलावून माझा सन्मान केलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. बडोदे हे भाषा संवर्धंनाचे मोठे केंद्र राहिले आहे. नवसाहित्याचे पर्व तर अभिरुची मसिकातून विकसित झाले. एकभाषिक राज्ये निर्माण झाल्यावर भाषिक उन्मादाचे वातावरण बरेच काळ टिकले. ते सुदैवाने कमी होत चालले आहे. कारण सगळ्याच भाषा दुय्यम होत चालल्याचे सर्वांच्या लक्षात आले. अशा अवस्थेत माझा आपल्याशी संवाद व्हावा हे माझे भाग्य समजतो. बडोदे, ग्वाल्हेर, देवास, इन्दूर, काशी, हैदराबाद, तंजावर, कारवार, धारवाड़ अशा अनेक विकेन्द्रित स्वरूपात मराठी आपल्या परीने विकसित होत आली आहे. माझे गुरु ना.गो.कालेलकर हे बडोद्याच्या उच्च संस्कृतीचे गुणगान गात असत. माणसांचा सगळ्यात मोठा वारसा त्याची भाषा असतो. उद्याच्या जागतिकीकरणात मातृभाषेशिवाय परक्या भाषेत अत्याधुनिक होऊ पाहण्याइतके हास्यास्पद दुसरे काही नसणार. आधुनिकता कुठे तरी पाश्चात्य देशात तयार होते, तिला आपल्याला दत्तक घेता येते असा भ्रम पसरलेला आहे.” नेमाडे फक्त भाषेविषयी बोलले. कुणाच्या उखाळया काढल्या नाहीत हे फार आवडले.
@

प्रा. राम शेवाळकर

५६.  अधिवेशन छपन्नावे २१,२२,२३,मार्च १९९८ अध्यक्ष- श्री. अनिल कानिटकर संमेलनाध्यक्ष- प्रा. राम शेवाळकर ( २ मार्च १९३१ — ३ मे २००९) त्यांना बारा तेरा मनाचे पुरस्कार मिळाले होते. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (पणजी, १९९४); शिवाय जागतिक मराठी संमेलन, जागतिक कीर्तन संमेलन, भंडारा येथे १९७८ मध्ये झालेले विदर्भ साहित्य संमेलन, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संमेलन, पहिले आदिवासी साहित्य संमेलन, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन, गुजरात  होता –त्यांचा बडोदे येथील विषय होता – साहित्यिकांची स्वप्ने व त्यांचे माध्यम—- ते मात्र स्वत: घेतलेल्या विषयावर बोलले.“जुन्या हैदराबाद संस्थानातील मराठी केवळ टिकून राहिली नाही तर आपले शील सांभाळून जिवंत राहिली; बृहनमहाराष्ट्रातील मराठी लोकानी हंगामी संकटानी विचलित होण्याची गरज नाही. पण मराठी भाषेवरील संकट आपल्या उदासीनतेमुळे  उद्भवले आहे. आत्महीनतेच्या भावनेतुन उद्भवले आहे. स्वभाषेचा न्यूनगंड झटकून टाकून उभे झाले पाहिजे. ललित लेखनालासुद्धा वैचारिक अधिष्ठानाची गरज असते. त्याशिवाय जीवनाचा अर्थ लावता येत नाही. त्यांचे अगदी लहान भाषण असून नेटके होते. त्यानी सार्वजनिक टीका केली. कोणा व्यक्तीवर  नव्हती केली. असं बोलणं सगळ्याना आवडतं.
@

प्रा. द. मा. मिरासदार

५७. अधिवेशन सत्तावन्नावे १९,२०,२१, फेब्रुअरी १९९९ अध्यक्ष-  श्री. अनिल कानिटकर.  संमेलनाध्यक्ष – प्रा. द. मा. मिरासदार .( जन्म १४ एप्रिल १९२७ ) —- व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार या तिघांनी  कथाकथन करून उभा महाराष्ट् हंसवला होता. द. मा. मिरासदार हातवारे करीत बोलू लागले की अद्भुत कार्यक्रम पहायला आणि ऐकायला मिळे. मी त्यांचा कार्यक्रम ऐकला आणि पहिला होता ते अजून आठवते. त्यांचा बडोदे येथील विषय होता – मराठी साहित्यातील विनोद एक परिशीलन.  ते त्यांचे भाषण ऐकले होते. सध्या त्यांनी नव्वदी पार केली आहे. बडोद्यात आले तेव्हा बहात्तर वर्षाचे होते. ते उत्स्फूर्त बोलले असते तर मजा आली असती. पण साधारणपणे दीडदोन महिने आधी अध्यक्ष होणार हे कळलेले असते. त्यामुळे अध्यक्ष निबंध लिहायला बसत असतील. ज्या माणसाने हजारो कार्यक्रम केले होते त्याने निबंध कशाला लिहायला हवा. पण तसं होत नसावे. त्यांची– माझ्या बापाची पेंड-  अशी काही पुस्तके वाचली होती. ती वाचता वाचता पोट धरून धरून हसलो होतो. असा विनोदी लेखक त्या काळी तरी पहिला नव्हता. त्यांना ते सुचतं कसं असं वाटायचं.  त्यांचं अफलातून व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभ रहातं. चि.वि. जोशी यांच्यानंतर इतकं सुन्दर आणि लहानमोठेही वाचू शकतील असं लिहिणारे एकटे द.मा.च. त्यानी शंभरी पार करावी हीच इच्छा.
@

 

विश्वास पाटील

.
५८. अधिवेशन अठ्ठावन्नावे ११,१२,१३, फेब्रुअरी २००० अध्यक्ष- श्री. दिलीप खोपकर. संमेलनाध्यक्ष – श्री. विश्वास पाटील. (जन्म- २८ नोव्हेंबर १९५९)  यांच्या चंद्रमुखी, पांगिरा आणि महानायक या कादंबर्‍यांची भाषांतरे झाली आहेत. पण ते ओळखले जातात पानिपतकार म्हणून. लेखक असलेले सनदी आधिकारी बरेच आहेत. त्यापैकी विश्वास पाटील. त्यांचा बडोदे येथील विषय होता –  मराठी भाषेचे महत्व व्याप्ति आणि विकास. त्यानी त्यांच गाव कसं होत ते सांगितलं. माझ्या जन्मभूमीनं मला भरभरभरुन दिलेलं दान कधीही आटणार नाही. लहानपणी सगळे गड पाहिले. अशिक्षित कष्टकरी माणसे पहिली. जी माझ्या कादंब-यात आली आहेत. जगातील श्रेष्ठ कादंब-या वाचल्या. गावाकडच्या लावण्या ऐकल्या. आज अठ्ठावन देशात मराठी वाहिनी दाखवली जाते आहे. मराठी भाषेच्या व्यावसायिक महत्व सर्वाना कळू लागले आहे हीसुद्धा जमेची बाजू आहे.
@
आभार.
     श्री. दिलीप खोपकर यांनी सयाजीनगरीतील साहित्यविचार या दोन पुस्तकांतील आजवरच्या अध्यक्षीय भाषणांची थोडक्यात ओळख फेसबुक व व्हॉट्स अ‍ॅपवर करून देण्याचं काम सोपवलं.  आजचं वर्तमानपत्र ही उद्याची रद्दी असते. पण निवडक कात्रणं हा ठेवा असतो. सुदैवाने माझ्यापाशी तो होता त्यामुळे इतिहासाचं वर्तमानात रुपांतर झालं. हे काय कमी आहे– ते ते लेख पुन्हा वाचले.. ५८ संमेलनाध्यक्षांच्या  भाषणांची  थोडक्यात ओळख करून देता देता मर्यादित प्रमाणात मल्लीनाथी करायला मिळाली.
     कितीही मोठा साहित्यिक असला तरी त्यालाही राग लोभ असतो. तो राग त्याच्या भाषणातून काढतो. साहित्यिक वर्तुळात एकमेकाना कमी लेखणं चालत आलेले आहे. अत्रे-भावे वाद, अत्रे-फडके वाद, हे मागच्या पिढीला माहीत आहेत. वि.द.घाटे आणि चिं.वि.जोशी यांना बोलावण्यास उशीर केला म्हणून त्यांना राग आला होता. शिवाजी सावंत तर अध्यक्षीय प्रचाराच्या दगदगीमुळे वारले. त्याच बरोबर काहीजण त्या  भानगडीत पडले नाहीत. आम्हीही फडके खांडेकर यांच्या कादंब-या वाचल्या. फडक्यांच्या लिखाणात तोच तोचपणा येतो आहे असं वाटल्यावर दुस-या लेखकाचं पुस्तक उचललं जाई. फडके हे खांडेकरांना आपल्या पेक्षा कमी प्रतीचे समजत. आज सत्तरी ओलांडलेल्या गुजराती लोकांना खांडेकर माहित आहेत, फडके नाहीत. पण  ते पद्मविभूषण होते.
     आंतरजालाच्या जोडणीच्या अडचणी येऊनसुद्धा काम वेळेत संपवू शकलो याचा आनंद आहे. सर्व वाचकांना नमस्कार व आभार.
(लेखमाला समाप्त )
– प्रकाश पेठे 
prakashpethe@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आठवणी साहित्यिकांच्या १९५० ते ६५ च्या…  
मुक्काम ग्वाल्हेर 
डॉ. प्रियंवदा कोल्हटकर  
श्री. प्रकाश पेठे यांची बडोदे येथे झालेल्या ५७ मराठी साहित्य संमेलनाध्यक्षांच्या भाषणांचा गोषवारा असलेली लेखमाला आज समाप्त होत आहे. डॉ. प्रियंवदा ( पूर्वाश्रमीच्या करकरे ) कोल्हटकर  यांनी  ग्वाल्हेर येथे प्रारंभीचे वास्तव्य केले आहे. या लेखमालेमुळे त्यांच्या काही आठवणी जाग्या झाल्या. ‘मैत्री’च्या वाचकांना त्या आवडतील अशा विश्वास आहे. – सं.   
@
प्रकाशजींच्या लेखमालेतील कित्येक व्यक्ती या काळात ग्वाल्हेरला येऊन गेल्या. त्यातील काही आमच्या घरी राहून गेल्या. काही इतरत्र वास्तव्याला होत्या.
ग्वाल्हेरला मराठी शारदोपासक मंडळ व शरद व्याख्यानमाला या दोन संस्थांना तिथे मराठी टिकवून ठेवण्याचं श्रेय जातं. वर्षातून एकदा यांचे उत्सव होत असत. शिवाय याच काळात एक बृहन्महाराष्ट्र साहित्य संमेलन झालं. त्यातल्या काही गोष्टी आजही आठवतात.
*
श्री. के. क्षीरसागर. 
 
ते आमच्याकडे वास्तव्याला होते. पहिल्या दिवशी जेवताना आई पोळी वाढायला आली तर ते म्हणाले, “एक नितकोर वाढा.”आई चक्रावून गेली. मी म्हटलं,”अगं, म्हणजे एक अष्टमांश हवीय त्यांना. (शाळेत अपूर्णांक शिकत होते ना तेव्हा. )” आई आणखीच बावरली. शेवटी त्यांना अर्धी पोळी वाढून पुढे गेली. मात्र तेव्हापासून मी व अरुण (पाठचा भाऊ) जे जरा समजूतदार वयातले होतो, “श्रीकेक्षी” पोळी आईकडे मागत असू व खूप हसत असू.
*
प्र. के. अत्रे.
 
शरद व्याख्यान मालेनं त्यांना आमंत्रित केलं होतं. ते उतरले होते जिवाजीराव शिंदे महाराजांकडे. तेथील सपान आतिथ्यामुळे त्यांना बराच उशीर झाला जनकगंज शाळेत पोचायला. पटांगण गच्चं भरलं होतंच पण वरच्या मजल्यावरील वर्गांमध्येही श्रोते उत्सुकतेनं अत्र्यांची वाट पहात होते. व्याख्यानं बरोब्बर ८ ते ९ रात्री होत असत. साधारण ८-२० ला ते आले व माझे वडील (रामचंद्र करकरे) परिचय करून द्यायला उठले. त्या ५ मिनिटात वडिलांनी उशिराबद्दलची गोष्ट प्रामुख्यानं नोंदवली. अत्रे आपल्या व्याख्यानाच्या सुरवातीस म्हणाले, “मला उशीर झाल्याबद्दल संस्थेचे सचिव करकरले तरी. . . . ” हा त्यांनी पिकवलेला पहिला हशा.
*
कुसुमावती देशपांडे व कवी अनिल.  
 
या दोघांनी बृहन्महाराष्ट्र मराठी कवी संमेलनाला हजेरी लावली होती. यांची प्रेमकथा मला काका (निशिकांत करकरे)नं सांगितली होती. त्या दोघांची प्रेमगीतं (कोणती ते आता आठवत नाही ) मला फार आवडली होती. कारण तेव्हा मी नुकतीच प्रेमात पडले होते ना.
*
मालतीबाई बेडेकर(विभावरी शिरूरकर) 
 
त्यांचं शरद व्याख्यानमालेत भाषण झालं तेव्हा त्या नुकत्याच रशियाला जाऊन आल्या होत्या. त्याबद्दलच त्या बोलल्या. मला अजून त्यातली एक गोष्ट आठवते. त्या म्हणाल्या, “आमचा दौरा आटोपून विमानतळावर परतीसाठी पोचलो. एक युवक मजजवळ आला व म्हणाला, ‘आम्ही फार सुखात आहो अशी समजूत घेऊन तुम्ही परतत असाल तर ते फार चुकीचं होईल. नाही आम्ही सुखी.’ व धावतच निघून गेला.” स्टॅलिनचा काळ होता तो.
*
प्रा. ना. सी. फडके. 
 
हे आमच्याकडे आले होते तेव्हा मी लहान होते. मात्र मी व वडील त्यांच्याकडे पुण्याला गेलो होतो पुण्याला तेव्हाची एक गोष्ट छान आठवते. त्यांच्या नेहमीच्या लेखन टेबलापलीकडे आम्ही दोघे बसलो. ते स्वतःच्या अर्धवर्तुळाकार खुर्चीवर (जिला पूर्ण पाठ नव्हती) बसले. फडके व वडील साहित्यचर्चेत रंगले. मी मात्र इकडेतिकडे बघत होते. फडके मध्येच मागे रेलत व त्यांचे डोके भिंतीला लागे. तिथे भिंतीवर मोठा, काळा, तेलकट डाग पडला होता. मला मोठा प्रश्न पडला होता. इतक्या मोठ्या कलाकाराला (साहित्यिक का होईना!) सौंदर्यदृष्टी नसावी, आपल्या भंवतालाबद्दल?
इतक्या वर्षात त्यांच्या “दौलत” वा “प्रतिभासाधन”मधलं काहीच आठवत नाही. मात्र त्यांच्या घरातील भिंतीवरचा तो काळा डाग मुळीच पुसटही झालेला नाही.
*
ग. दि. माडगूळकर. 
 
ग. दि. मा., वसंत बापट, व राजा मंगळवेढेकर आमच्याकडे राहिले होते तेव्हा मी एम्. बी. बी. एस. च्या परीक्षेत मग्न होते, त्यामुळे मला यांचा सहवास फार कमी लाभला. मात्र स्वाती(वर्तक) नं सांगितलेली एक आठवण मजेशीर आहे. ग. दि. मा. माझ्या वडिलांना म्हणाले, “करकरे, मला तीन मुलगे व चार मुली आहेत. आपण देवाणघेवाण करू शकतो. (आम्ही भावंडं चार मुलगे व तीन मुली आहों) मात्र लक्षात घ्या, मुली रूपानं माझ्यावर गेल्या आहेत हं.” गदिमांना खरंच चार मुली आहेत का ते मस्करी करत होते. कोण जाणे.
*
गो. नी. दांडेकर. 
 
गोनीदांची पुस्तकं मला फार आवडली होती कारण त्यांच्या लिखाणात शरत्चन्द्रांचीच हातोटी असे. त्यांनी आपलं “शितू” शरत्चन्द्रांना अर्पण केलंय. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षीय भाषणाला मी आवर्जून गेले होते. त्या भाषणातील एक गोष्ट आठवते.
ते म्हणाले होते, “लेखकाला एक वेगळीच अनुभूती असते. दुपारी लेखक आरामखुर्चीत व्हरांड्यात बसलाय. अंगणातल्या बाभळीच्या झाडाचा पाला, एक बकरी, मान उंचावून, पुढचे दोन पाय खोडावर टेकवून खातेय. ती लवलवती फांदी लेखकाला वेगळ्याच जगात घेऊन जाते. त्याला गाईच्या सडाला लुचणारं वासरू तिथे दिसायला लागतं. अन मग त्याला आईचा पान्हा पिणारं लेकरू दिसायला लागतं व मग एक कथा जन्म घेते.” इतक्या वर्षात गोनीदांबद्दलची ही आठवण पक्की राहिलीय माझ्या मनात.
                      ________________________________________________
डॉ. प्रियंवदा कोल्हटकर 
priyakar40@gmail.com 

20 thoughts on “बडोदे साहित्य संमेलनाध्यक्षांच्या भाषणांचा गोषवारा

  1. प्रियंवदाजींनी लिहिलेल्या साहित्यिकांच्या आठवणी एकदम मस्त. या साहित्यिकांना प्रत्यक्ष पहायला नि अनुभवायला मिळालं हे त्यांचं भाग्यच.

  2. Mrs. Swati Vartak wrote :-

    श्री पेठेजींचा गोषवारा आज संपला का खरेच ?
    आवडत होते माहिती घ्यायला. आज विशेष भावले मला ते म्हणजे व.पु. , पाडगावकर आणि शांता शेळके.
    धन्यवाद.
    डॉ. कोल्हटकर यांच्या आठवणीत आणखी भर घालायला आज आई हवी होती असे उगाच वाटून गेलं.

  3. श्रीमान प्रकाश पेठे हे देहाने खरोखर बडोद्यात असले तरी त्यांचे मन महाराष्ट्रात आहे अशी जाणीव करून देणारी ही लेखमाला आज संपली. पेठेजींनी आपले बडोद्यात पर्यायाने गुजरातेत कसे वास्तव्य झाले, त्यांनी आपले मराठीपण कसे टिकवले, किती मराठी आणि अन्यभाषिक साहित्यिकांशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध येत गेला यावर एक आत्मचरित्रात्मक लेखमाला लिहावी अशी नम्र विनंती आहे.

    त्यांची काही पुस्तके मुंबईच्या ग्रंथाली या प्रकाशकांनी प्रसिद्ध केली आहेत असे त्यांच्याच एका लेखावरून कळले होते. ही पुस्तके मुंबईत कुठे मिळतील ? ग्रंथालीकडे काय ?

    माझ्या माहितीप्रमाणे पेठेजी लोकसत्ता, मटा आणि अन्यत्र लिहीत आहेत. त्यांच्या प्रकाशित झालेल्या समग्र लिखाणाविषयी मला उत्सुकता आहे म्हणून हे लिहीत आहे. कृपया उत्तर लिहावे अशी पुन्हा विनंती करतो.

    • श्री. प्रकाश पेठे यांची पुस्तके अशी

      १. स्वप्नगॄह : २००२ : [ज्ञानयज्ञात प्रसिध्द] पाने ८३ किंमत रु. ४५ /-

      २. धमधोकार :२०११ : पॄष्ठे ११९ किंमत रु. १२०/-

      ३. वडोदरा : [ज्ञानयज्ञ] पाने ८८ किंमत रु. ८०/-

      ४. आनंदाकार :२०११ : पाने ८८ किंमत रु. १००/-

      ५. नगरमंथन : २०१३ : पाने १८६ किंमत रु. २००/-

      ६. बखर वास्तुकलेची : २०१८ : पाने १९५ किंमत रु. ३००/-

      सहावे पुस्तक “बखर वास्तुकलेची’ हे बडोद्यातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ रोजी अध्यक्षांच्या हस्ते प्रसिध्द झाले. पाने १९५.
      त्यात श्री. प्रकाश पेठे यांनी काढलेली अनेक छायाचित्रे आहेत. आकार ८” x ८” . किंमत ३०० रूपये .

      ७ वे पुस्तक होऊ शकते. ज्याचे नांव आहे “गोष्टी गुजरातच्या”

      वरील सर्व पुस्तकांना सवलत मिळते व पुस्तके ग्रंथालीच्या मुंबईच्या कार्यालयात मिळतात.

      ग्रंथालीचा पत्ता बदलला आहे.पण मूळ कार्यालयापासून जवळच माटुंगा रोडला आहे.

  4. डॉ. प्रियंवदा कोल्हटकरांच्या लैखाने माझ्या साहित्यिकांच्या आठवणीना उजाळा मिळाला आहे. त्यांंचा धाकटा भाऊ असल्याने. लेख उत्तमच लिहीला आहे.👍👏

  5. श्री.निखिलजींची सूचना कळली. आजवर माझी सहा पुस्तके ग्रंथालीव्दारा प्रकाशित झालीत. त्याचे सर्व श्रेय श्री. दिनकर गांगल यांना जातं ते सव्यसाची संपादक आहेत. गोष्टी गुजरातच्या हे आणखी एक पुस्तक लिहिले आहे. त्यात बरीच माहिती उपलब्ध्द होर्इल. मी श्री. मंगेश नाबर यांना त्याची कल्पना दिली आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे ते वाचनीय होर्इल अशी अपेक्षा आहे. ते मी नाबरांकडे पाठवणार आहे. सर्वांच्या अभिप्रायाबद्दल आभार.

  6. साहित्य संमेलनांना मी कधीच हजर राहिलेलो नाही. एक तर तेथे गर्दी आणि काही मुद्दे विवाद्य करून संमेलन गाजवण्याची खटपट चाललेली असते. काहीही असो, बडोद्यात मात्र तसे झालेले नाही किंवा परिस्थिती हाताबाहेर गेली नाही याचा लेखाजोखा मांडणारी प्रकाशभाई ( ते गुज्जू झाले आहेत म्हणून भाई म्हणतो ) पेठे यांची लेखमाला मी रस घेऊन वाचली आणि आज रविवारच्या निवांत वेळामध्ये खूप मजा आला. प्रकाशभाईंनी असेच लिहावे अशी आग्रहाची विनंती आहे. मैत्रीचे संपादक त्यांच्यामागे लागून हे लिखाण आमच्यापर्यंत आणतील अशी आशा आहे.
    पेठेजींच्या लेखमालेवरून सुचलेला – ग्वाल्हेर येथील करकरे कुटुंबाने मराठी साहित्यिकांचा ( न कुरकुरता ) कसा पाहुणचार केला हे आठवणींच्या स्वरूपात सांगणारा डॉ. कोल्हटकर यांचा लेख सुटसुटीत असल्याने आवडला. मला आठवतं की त्यांच्याकडे गदिमा आले असताना त्यांच्यासह घेतलेले एक छायाचित्र मैत्रीच्या पानांवर आम्ही पहिले होते. खूप खूप आभार.

  7. पूर्वीचा काळ आणि त्यातील घटना आठवताना स्मरणरंजन कसे होते त्याचा अनुभव प्रकाशभाई पेठे यांची ही प्रदीर्घ लेखमाला वाचताना आला. साहित्यिक कितीही मोठा प्रतिभावंत असला तरी आपल्या व्यक्तिगत अनुभवाचे प्रदर्शन संमेलनाच्या व्यासपीठावरून करायला तो कचरत नाही हे पटले. त्याचप्रमाणे साहित्यिकांना जवळून पाहण्याचे भाग्य ज्यांना लाभले त्या डॉ. कोल्हटकर यांच्या आठवणी या लेखमालेच्या समारोपाबरोबर छापल्यात त्याचे कौतुक वाटले. आज मैत्रीचे पान साहित्य संमेलनमय झाले असे म्हटले तर अतिशयोक्ती नसावी.

  8. डाॅ.प्रियंवदा कोल्हटकर यांची टिपणं आवडली. लिहिलेल्या आठवणी फारच सुंदर आहेत. ही सगळी माणसं त्यांच्या गावी आणि घरी आली होती हे तर फारच छान. तसा अनुभव आम्ही कधीच घेतला नाही. नशिबवान आहात.

  9. पेठेजी आपली लेखमाला मला मनापासून आवडत होती. ग्वाल्हेरच्या अशा व्याख्यानांचा संग्रह माझ्या माहितीत तरी कुणी केला नाही याची खंत वाटते. आपल्याला माझा छोटेखानी लेख आवडला याचा आनंद आहे. धन्यवाद.

  10. एक नव्हे दोन नव्हे चक्क अठ्ठावन्न मराठी साहित्य संमेलने महाराष्ट्रापासून दूर अशा गुजराथेतील बडोदे या शहरात झाली. त्यांच्या अध्यक्षपदासाठी साहित्यिकांना तसेच प्रज्ञावंत अशा कलाकारांना आमंत्रणे दिली गेली. अशा या दैवदुर्लभ सोहळ्यांचा आढावा घेण्याचे परिश्रम श्रीमान प्रकाशभाई पेठे यांनी घेतले. ही लेखमाला टप्प्याटप्प्याने मैत्रीत प्रसिद्ध झाली आणि तिच्या समाप्तीच्या वेळी महाराष्ट्रापासून दूरवरच्या ग्वाल्हेर नगरीतील प्रथितयश साहित्यिकांचे अनुभव डॉ. प्रियंवदाताई कोल्हटकर यांनी सादर केले. हा योगायोग सहज घडून आला असे मी म्हणणे धार्ष्ट्याचे होईल. तेव्हा मैत्रीच्या संयोजकांचे याबाबतीत आभार मानलेच पाहिजेत.

  11. श्री. प्रकाश पेठे यांच्या आजवर प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांची माहिती आज देणे उचित आहे. मैत्रीच्या वाचकांनी ही पुस्तके ग्रंथाली संस्थेच्या कार्यालयातून खरेदी करून वाचावीत आणि पेठेजींनी केलेल्या परिश्रमपूर्वक कार्याची परतफेड करावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.

  12. “मैत्री” चा प्रत्येक अंक वाचवायचं असतो! त्याला हा अंकही अपवाद नाही आहे. सर्वच लेख आवडले. डाॅ. प्रियंवदा कोल्हटकरांच्या आठवणी मोठ्या मजेशीर आहेत. मनोहर राईलकरांचे लेख मला आवडतात.
    धन्यवाद.

  13. प्रिय मंगेश,

    प्रकाश पेठे यांच्या या अभिनव आढाव्यांच्या मालिकेचा शेवटचा भाग वाचताना एक वैयक्तिक आठवण मनात जागी झाली. १९९५ साली कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या अध्यक्षतेखाली जे संमेलन साजरे झाले त्याला मी उपस्थित होते. दिलीप चित्रे यांच्याबरोबर मुंबईहून कवी अरुण कोलटकर, वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर आणि इतर काही मंडळी बडोद्याला चालली होती त्यांत मी सामील झाले. बडोद्यात आमची व्यवस्था तेथील विद्यापीठाच्या अतिथिगृहात केली होती आणि आमचे तेथील यजमान प्रा. गणेश देवी हे सज्जन होते. तीन दिवस साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची चंगळ होती, पण अर्थातच कविसंमेलन सर्वांत बहारदार होते. विशेषतः अरुण कोलटकर यांनी मंत्रमुग्ध केले. हे संमेलन माझ्या कायम लक्षात राहील.

    मृदुला

  14. प्रकाशभाई पेठे यांची ही पाच भागांची लेखमाला मैत्रीमध्ये मोठ्या दिमाखात प्रसिद्ध झाली – हा दिमाख त्या त्या संमेलनाच्या अध्यक्ष्यांचे छायाचित्र त्यांच्या भाषणाबरोबर देण्याचे औचित्य दाखवले हे विशेष. आजच्या पिढीतल्या वाचकांना या जुन्या काळचे साहित्यिक कसे होते हे दिसले. ही छायाचित्रेही लेखकांच्या त्या काळातली होती हा आणखी एक आनंदाचा भाग. संपादकांचे अभिनंदन.

यावर आपले मत नोंदवा