मध्य प्रदेश सफरनामा

प्रकाश पेठे 
लेखांक २ 

दतिया महाल (बुंदेलखंड)

रस्त्यावरून दिसणारा सात मजली दातिया महाल

 

दतिया पॅलेस पाहायचा हे ठरवूनच निघालो होतो. कारण वास्तुकलेच्या इतिहासात याला महत्वाचे स्थान आहे. जे जे इंग्रज वास्तुरचनाकार भारतात रचना करण्यासाठी आले, त्यांनी स्वतः काम करण्याआधी भारतातील प्रख्यात वास्तू पहिल्या. मुंबईचे मोठे पोस्ट ऑफिस  ( GPO ) बांधणारा जॉन बेग विजापूरला जाऊन गोल घुमट पाहून आला आणि  फिदा झाला होता. म्हणून त्याने जीपीओच्या इमारतीवर घुमट बनवला आहे आणि इमारतसुद्धा विजापूर शैलीत बांधली आहे. जॉर्ज विटेट यांनी  मुंबईचा गेटवे ऑफ इंडिया गुजराती शैलीत बांधला आहे. एडविन ल्युटेन्सने राष्ट्रपती भवन बांधण्या आधी तो भोपाळ, ग्वाल्हेर, दतिया, ओरछा वगैरे गावांना भेट देऊन आला होता. त्याने सांचीच्या स्तूपांचेही निरीक्षण केले होते. दतियाचा महाल पाहिल्यावर तो म्हणाला, ” हा  वास्तू रचनेतील भारतामधील सर्वोकृष्ट नमुना आहे; इतकंच नाही तर त्याने साऊथ आणि नॉर्थ ब्लॉक सचिवालयात दतियातील काही गोष्टींचा उपयोग केला होता, असे म्हणतात. मी जेव्हा साऊथ आणि नॉर्थ ब्लॉक या दोन्ही इमारती आतून पहिल्या होत्या; तेव्हा मी दतिया  पाहिलेले नव्हते. आता तर त्या इमारतींच्या आसपासही फिरकू देत नाहीत.

दोन कक्षांना जोडणारा छोटा सेतू

दोन कक्षांना जोडणाऱ्या सेतूवर गुलाबी ग्रॅनाईटच्या खांबाची अप्रतिम योजना

दतिया म्हणजे बुंदेलखंडातील महत्वाचे स्थळ.  महाभारत काळात दतियाचे नाव दैत्यावक्र होते. हा राजा दुष्ट होता,  याने कृष्णाशी वैर धरले होते. श्रीकृष्णाचा  वध करण्यास थेट उत्तरेकडून द्वारकेला गेला,  पण कृष्णाने त्याला मारले.

पितांबरी देवीच्या मंदिराचे प्रवेशद्वार

दतियाच्या बाबतीत दुसरी महत्वाची बाब म्हणजे हे पितांबरी देवीचे महत्त्वाचे शक्तीपीठ आहे. ही देवी शत्रूला नष्ट करते, अशी भक्तांची मान्यता आहे. त्यामुळे तिथे सतत भक्त येत असतात. ती भारताच्या उत्तर भागात  ब्रह्मास्त्ररुपीणी या नावानेही ओळखली जाते. हिचे मुख्य मंदिर गुवाहाटीला कामाख्या मंदिरापाशी, नेपाळमध्ये पाटण येथे, हिमाचल प्रदेशांत, दतिया आणि  शाजापूर येथे आहे असे कळले. पुराणकाळात एकदा पृथ्वीवर प्रलय होणार होता तेव्हा या देवीने बगळ्याचे रूप घेऊन जगाला वाचवले होते म्हणून तिचे नाव बगलामुखी आहे. दतियात श्रीकृष्णाची अनेक मंदिरे असल्याने त्याला लघु वृंदावनही  म्हणतात.

दतिया पॅलेस बांधणाऱ्या राजा वीरसिंग देव  या रजपूत राजाने  १६०५ ते १६२६ या  एकवीस वर्षांच्या काळात  बुंदेलखंड या विशाल प्रदेशावर राज्य केले. अतिशय सुंदर “बेटवा” या  नदीकाठच्या ओरछा इथे त्याची  राजधानी होती.  तो आणि बादशहा जहांगीर यांची मैत्री होती. त्या दोघांचा राज्यकाळ अगदी  एकच होता.  सर थॉमस रो याला सुरतेत व्यापार करण्यासाठी जहांगीरने परवानगी दिली. थॉमस रो आणि जहांगिराची मैत्री झाली. इंग्रज साहेबानं तीन वर्षे दिल्लीत मुक्काम ठोकला. शिखांचा पाचवा गुरु अर्जुन देव याला जहांगीरने मारले आणि  राजा वीरसिंग देवास सुपारी देऊन अकबराचा म्हणजे स्वतःच्या वडिलांच्या मर्जीतल्या अबुल फझल याचा काटा काढला.  कारण त्याला असे वाटत होते की अबुल फझल त्याच्या बादशाह  होण्यात अडथळा आणेल. त्यामुळे वीरसिंग आणि जहांगिराची मैत्री झाली. त्याला त्याने महाराजा असे संबोधित केले. त्याच्या हिंदुत्वाला कुठे अडथळा आणला नाही. या काळात वीरसिंग देवानं बुंदेलखंडात अनेक वास्तूंची निर्मिती केली. अनेक देवळेही बांधली.

याच राजा वीर सिंह देवने जहांगीराच्या स्वागतासाठी चारशे एक वर्षांपूर्वी  म्हणजे १६२० साली पस्तीस लाख रुपये खर्चून दतिया गावी एक सात मजली महाल बांधला. जहांगीरासाठी सात मजली महाल बनवायचा ही कल्पना फक्त राजे लोकच करू शकतात.

महालाच्या शेवटच्या मजल्यावरच्या सज्जामधून दिसणारा विशाल तलाव

वीरसिंग देव याने त्याच्या वास्तू निर्मात्याला हा महाल का बांधायचा आहे याची कल्पना दिली असेल. त्या कल्पक  कलावंताला कळून चुकले की जहांगीर आणि  त्याच्या वीस राण्या ज्यात नूर जहाँ ( या नावाचा अर्थ आहे, विश्वाचा प्रकाश ) ही असणार  .  इतर राण्यांची  मुले, दास्या आणि सोबतची इतर सेवक मंडळी असा प्रचंड मोठा काफला हत्ती, घोडे, पालख्या यांसह येणार. इतक्या सगळ्या स्त्रियांचे, सौंदर्य प्रसाधन करणारे, कपडे धुणारे, हकीम, असे काय न् काय.या सगळ्या  लवाजम्याला लागणाऱ्या अनेक सोयीचे भान महालाची रचना करणाऱ्याला होत असे स्पष्ट दिसते.

आलेल्या पाव्हण्याना अंघोळीचे आणि  पिण्याचे पाणी उपलब्ध असेल अश्या तीन तलावांच्या सान्निध्यात उंच टेकाडावर महाल उभा करण्याचे ठरवले. त्यामुळे या इमारतीत अनेक  खोल्या आहेत. आणि मोठे मोठे चौक आहेत. किमती वस्तू जडजवाहीर दागदागिने सुरक्षित ठेवण्यासाठी दोन तळघरे आणि तळमजला आहे. आत शिरण्यासाठी एक दरवाजा आहे. तिथे शिरल्यावर लगेच समोर घर दिसत नाही उजव्या बाजूला दगडी जिना आहे त्यावरून वरच्या मजल्यावर जात येते. अशी गुंतागुंतीची रचना असल्याने तो महाल बांधायला नऊ वर्षे लागली. त्यात लाल रंगाचा ग्रॅनाईट आणि विटा यांचाच फक्त वापर केला आहे. आणि सगळ्याला गिलावा केला होता. आज चारशे एक वर्षे झाली पण तो जसा होता तसाच आहे.

मी ही इमारत पाहून चाट पडलो. दोनशे फूट लांब व तितकेच रुंद म्हणजे एक एकर होतात. त्यावर  निव्वळ एकच घर बांधायचे म्हणजे जबरदस्त अंदाज हवा  आणि  प्रतिभा हवी. या सात मजली इमारतीची रचना सकृतदर्शनी सोपी सरळ वाटली तरी बांधायला किचकट होती. त्या कलावंताला  त्याला त्रिवार सलाम. याचा स्वस्तिक आकाराचा चौरस पाया आहे. चार कोपऱ्यात चार अंगणाची सोय असल्याने भर उन्हाळ्यात इमारतीच्या आत गरम होत नाही.

पण काही कारणामुळे जहांगीर  येऊ शकला नाही.  तोच न आल्याने  स्वतः वीरसिंहसुद्धा कधी येऊन राहिला नाही की त्याचे वंशज राहायला आले नाहीत. कधी आपणही  कधी कधी असा अनुभव घेतो.

दिल्ली ते दतिया या मध्ये ४६० किलोमीटर अंतर आहे. राज्यकारभाराच्या व्यस्तपणामुळे त्याला जमले नसेल. त्यामुळे चारशे वर्षे तो महाल तसाच पडून आहे. पुरातत्वच खात्याने या महालाकडे थोडे जास्त लक्ष द्यायला हवे आहे. तो पाहण्यासाठी तिकीट ठेवावे म्हणजे फालतू माणसे आत फिरत असतात ते बंद होईल.

ग्वाल्हेर ते दतिया रेल्वेने अंतर ७५ किलोमीटर असून तिथे पोचायला तास सव्वा तास लागतो. त्या स्टेशनवर क्लोक रूमची  सोय नसल्याने आम्ही दोन्ही पेट्या उचलून एका रिक्षेत टाकल्या. संध्याकाळच्या आत झाशीला पोचायचे होते.  दतिया महालात जाऊन परत येऊ या बोलीवर रिक्षा नक्की केली. रिक्षेतून  जाताना आपण एका ऐतिहासिक महालाला भेट द्यायला जातो आहोत, असे चिंचोळ्या  रस्त्यावरून जाताना जाणवत नाही.  दोन्ही बाजूला एक मजली घरे आहेत.  ऐतिहासिक  इमारतीसमोर असते तशी मोकळी जागा नव्हती. इतर घराच्या गजबजाटात तो महाल उभा होता.

दतियाचा महाल म्हणजे ताजमहाल किंवा खजुराहो नसल्याने तिथे कोणी नव्हते. गाईड नक्की केला; तो म्हणाला, “तीन ऑस्ट्रेलिअन प्रवासी येताहेत.  ते येईपर्यंत थांबा. “.  आम्ही दोघे थांबलो. दतिया महालाला तर आलो होतो.  पण पेट्या कोणाच्या भरवश्यावर  ठेवायच्या हा प्रश्न होता. गाईड म्हणाला या पायरीवर ठेवा, कोणी हात लावणार नाही. मनात आले, चारशे वर्षात ज्या घरात कोणी राहायला आले नाही त्या वास्तूतल्या आमच्या पेट्या कोणी नेणार नाही. स्थानिक रहिवासी असले उद्योग करत नाहीत आणि त्या निर्मनुष्य महालावर चोरी करायला कोणी येण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे आम्ही बिनधास्त होतो.

त्या तीन स्त्रिया ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या होत्या. त्यात सत्तर वर्षाच्या दोन स्त्रिया आणि एकीची मुलगी जी मेलबर्नच्या कॉलेजात इंजिनिअरिंग शिकत होती.  अशा तिघीच भारतभर प्रवास करत करत येथे आल्या होत्या. त्यातली मुलगी म्हणाली, ” माझी आई  फार धाडसी आहे. तिने अर्ध जग पाहिलं आहे. एक महिना झाला या  वेळी आम्ही भारतात फिरत आहोत. ”

दतिया महाल सोडताना ऐतिहासिक  माहोल डोळ्यासमोर उभा राहिला.  नूरजहाँ आणि तिच्या सख्यांचा भरजरी कपड्यांसह, लहान मुलामुलींचा किलबिलाट, दास, दासी, सेवक यांचे आजूबाजूला फिरणे दतियाच्या महालात दिसले.

जहांगीरबाबत   सविस्तर माहिती खालील संकेत स्थळावर मिळेल
https://learn.culturalindia.net/jahangir.html
दूरदर्शनने दतिया संबंधी  माहितीपट  बनवला आहे
Forts Of India – Datia Fort, Madhya Pradesh – Ep#16

 https://www.youtube.com/watch?v=wxTZIDvMXqM

– ©️ प्रकाश पेठे 

prakashpethe@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आजची कविता 
मिलिंद कर्डिले
 

विधात्याचा खेळ !

रोज उजाड़े रोज अंधारे

कालचक्र नित्य फिरे

एक दिन असे सम

एक दिन असे विषम

कधी होई पाप मुजोर

कधी होई पुण्य शिरजोर

कधी असे उत्तरायण

कधी असे दक्षिणायन

कधी ओठांवर हसू

कधी डोळ्यात आसू

कधी  ऐकावी स्तुती

कधी  सोसावी निंदा

सर्व असे  नश्वर

नसे काही  शाश्वत

देवावरील फुलसुद्धा

होत असे निर्माल्य

विधात्याचा खेळ चाले

नित्य सदा निरंतर

जन्म मृत्यूचा फेरा

मुक्ती न मिळे जीवा

जाणून घे हे सत्य

करुनी सर्व समर्पण

– ©️ मिलिंद कर्डिले

milindkardile@yahoo.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
विनोबा विचार पोथी
हेमंत मोने

क्र. ३७

अज्ञानातून ज्ञान निर्माण होत नाही. ज्ञान हे ज्ञानगम्य आहे. म्हणजे अगाऊ ज्ञान असेल तर पुढे ज्ञान मिळावयाचे.

दोन्ही विचारांचा अर्थ एकच आहे. अज्ञानातून ज्ञान निर्माण होत नाही हे नकारात्मक (negative) विधान आहे. तर ज्ञान हे ज्ञानगम्य आहे हे सकारात्मक विधान आहे.

एखादया गोष्टीतून काही तरी निर्माण होते असा आपला व्यवहारिक अनुभव आहे. उदाहरणार्थ कोळसा जाळला की राख होते म्हणजे राख ही कोळशातून निर्माण झाली. एका अर्थाने राख हे उप-उत्पादन  ( by product.) आहे. ज्ञानातून ज्ञान निर्माण होण्याची प्रक्रिया ही कोळशाच्या ज्वलनातून राख उत्पन्न होते तशी प्रक्रिया नव्हे. ज्ञानातून ज्ञान निर्माण होणे ही एक शृंखला आहे. किंबहुना ती पायरी पायरीने उन्नत मार्गाकडे जाण्याची गोष्ट आहे.

रूढ अर्थाने कोणत्याही शाखेचा अभ्यास किंवा औपचारिक शिक्षणातील अभ्यासक्रम म्हणजेच ज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याची प्रक्रिया. विज्ञानात याचा प्रत्यय येतो. न्यूटन या शास्त्रज्ञाने झाडावरून फळ पडतांना पहिले. या निरीक्षणातून त्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला.

गुरुत्वाकर्षणाचे  हे बल केवळ फळ पडण्याच्या क्रियेपुरते सीमित नसून साऱ्या विश्वातच हे बल काम करते असे त्याने सिद्ध केले. अर्थात याला फार मोठ्या बुद्धिमत्तेची जरुरी आहे. त्रिकोणाच्या दोन कोनांची बेरीज माहित असल्यास तिस-या  कोनाचे माप विद्यार्थी सांगू शकतो कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज १८० अंश असते हे त्याला माहित असते. याबाबत अज्ञानी असलेल्या व्यक्तीस हे शोधता येणार नाही.

अध्यात्मिक बाबतीतही हे तत्व लागू आहे. आत्मज्ञान होण्यासाठी शरीर म्हणजे मी नव्हे या अज्ञानातून अगोदर बाहेर पडावे लागेल. ज्या ज्या गोष्टीचे ज्ञान आपणास होते ते सर्व अनात्म आहे. हे समजावून घ्यावे लागेल. आत्मज्ञान हा शब्द आपण आपल्या आकलनाच्या सोयीसाठी वापरतो. खर म्हणजे आत्मज्ञान होत नसते आत्म्याचा साक्षात्कार होत असतो.

– ©️ हेमंत मोने

hvmone@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
रंग, रूप आणि आवाज

तिसरा डोळा : २२
 

प्रदीप अधिकारी

कुठलाही पक्षी, प्राणी ( मनुष्यप्राणीदेखील ) प्रथमच बघितला की त्याच्या बाह्यरूपावरून त्याचा आवाज कसा असेल, ह्याची आपल्या मनात एक अपेक्षा असते; बहुधा आपला अपेक्षाभंग होत नाही. कारण निसर्गानेच प्रत्येक प्राण्याच्या अंगाला, रंगाला, आकाराला शोभेल असा आवाज त्या त्या प्राण्याला बहाल केलेला असतो…..त्यामुळे कावळा कर्कश्य आवाजातच ओरडणार आणि एखादा सुंदर रंगीत पक्षी दिसला की तो नक्की गोड आवाजात शीळ घालणार, असाच आपला समज असतो.

इथल्या तळ्याला “तळे’ म्हणणे म्हणजे जरा अतिशयोक्ती होईल पण स्थानिक पाण-पक्षांसाठी आणि बगळ्यांसाठी हे “चलता है” टाईप तळे आहे. उतारावरून अगदी वीस पंचवीस फूट खाली उतरल्याशिवाय पाण्यापर्यंत पोहोचता येत नाही पण शिल्लक असलेल्या पाण्यात दुरून काळी पांढरी बदके, उंचाडे बगळे बसलेले दिसतात.

सकाळी गेलो तर काहीतरी फोटो घेण्याजोगे मिळेल ह्या आशेने तिथे पोहोचलो  तर अगदी समोरच नजरेच्या टप्प्यात हा रंगीत पक्षी दिसला. पाण्याच्या काठाशीच उभा होता. ऊन्हात त्याचे सुंदर रंग उठावदार दिसत होते. पलीकडे, पाण्यात काळ्या बदकांच्या दोन तीन ओळी पोहत होत्या. आधी ह्या रंगील्याचा फोटो काढावा आणि मग काळ्या  बदकांकडे वळावे असा विचार करून दबकत दबकत ह्याचे दोन फोटो काढले. तोपर्यंत चांगला गप्प उभा असलेला हा, कॅमेरा खाली करताच त्याच्या रंगीत उठावदार रुपाला न शोभणाऱ्या प्रचंड कर्कश्य आवाजात आक्रमकपणे माझ्या डोक्यावर उडत उडत तो जे काही थैमान घातल सुटला की मला अक्षरश: जागच्या जागी खिळून उभे राहावे लागले. त्याच्या कर्णकर्कश्य आवाजामुळे पुढच्या दोन तीन मिनिटांतच तळ्यात होती नव्हती तेवढी सगळी बदके, बगळे आणि इतर पक्षी एकापाठोपाठ  एक भर्राsभर् उडून गेले, मी मात्र  बावळटासारखा हे सगळे बघत उभा राहिलो. त्या रंगीत पक्षाचे…टिटवीचे ( का टिटव्याचे) हे प्रताप बघून शेवटी हात हलवीत परत आलो.

समस्त पक्षी-गणांना भावी संकटाच्या केवळ कल्पनेने वेळीच सावधगिरीचे इशारे देण्याची पक्षी – प्राण्याची ही वृत्ती आणि त्यासाठी त्यांच्या रंग-रुपाला न शोभणारा आवाज आपल्याला जरी अनैसर्गिक वाटला, तरी पक्षीजगतातल्या त्यांचा अस्तित्वाचा उद्देश लक्षात घेता त्या भेसूर आवाजातला  नैसर्गिक गोडवा आपल्याला मान्य करावाच लागेल ….!!


– ©️ प्रदीप अधिकारी  
adhikaripradeep14@gmail.com

9820451442

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आठवणीतील संस्कृत सुभाषिते
 
 [ ८६ ]
 
– ©️ सुभाष भांडारकर
subhashbhandarkar@gmail.com
[ ‘आठवणीतील संस्कृत सुभाषिते’ भाग १ मधून साभार पुनःप्रसिद्ध ]  
@@@@@@@@@@@@@@@
महत्वाची सूचना –  या अंकात प्रसिद्ध होणा-या कथा, कविता, लेख, आदी साहित्याचे हक्क त्या त्या लेखकाच्या स्वाधीन असून सदर साहित्य प्रस्तुत लेखकाच्या वा संपादकांच्या लेखी परवानगीविना व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक वा अन्य कुठल्याही माध्यमातून पूर्णत: अगर अंशत: प्रसिद्ध केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
@@@@@@@@@@@

7 thoughts on “मध्य प्रदेश सफरनामा

  1. प्रकाश पेठे यांनी बुंदेलखंडातील दतिया महालाची इतकी सुंदर ओळख करून दिली की माझं कुतूहल चाळवलं आणि प्रकाशजींनी लेखाच्या शेवटी दिलेली लिंक उघडून मी लगेच दूरदर्शनने तयार केलेली ‘दतिया फोर्ट्स’ ही चित्रफीत पाहिली. अतिशय सुंदर अनुभव मिळाला. प्रकाशजींच्यामुळे दतिया महालांचं आणि वास्तुशिल्पांचं मनोहर दर्शन झालं जे एरवी घडलं नसतं. खूप खूप आभार प्रकाशजी!

    दतिया महालांवरचा हा लेख वाचताना तसंच ही चित्रफीत पाहताना मात्र सतत एक खिन्नता जाणवत होती. एका परीने ती अपरिहार्य आहे. चित्रफितीच्या निवेदनात आणि त्यांत आपली मतं व्यक्त करणाऱ्या विद्वानांच्या वक्तव्यांतून ती खिन्नता उमटत होती. कुठलीही गोष्ट जी जन्माला येते किंवा निर्माण केली जाते ती कधी ना कधी लयाला जाणारच हे जरी मान्य असं गृहीततत्त्व असलं तरी आपण हा आपला समृद्ध कलात्मक वारसा सांभाळण्यात खूप कमी पडतो आहोत हे नाकारता येत नाही. असो.

    प्रदीप अधिकारी यांची उपस्थिती जाणवली ती त्यांच्या सुरेख वर्णनामुळे आणि त्याबरोबरच्या तितक्याच सुरेख पक्ष्याच्या प्रकाशचित्रामुळे. सुंदर दिसणारा पक्षी कर्कश आवाजात ओरडू शकतो आणि त्याच आवाजातून इतर पक्ष्यांना, प्राण्यांना धोक्याची सूचना देऊ शकतो ही निसर्गाची अजब किमया लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद प्रदीपजी!

    एकूण अंक वाचनीय आहे.

    मृदुला जोशी

  2. प्रदीप अधिकारी यांचं रंग रूप आणि आवाज यावरचे सचित्र टिपण आवडलं. लहानशी गोष्ट सुंदर रीतीने मांडण्याची त्यांची कला मनोहर आहे . पक्षाचे छायाचित्रही सुरेख आहे . 
    आठवणीतील संस्कृत सुभाषित यातील कुंतीचा उल्लेख आवडला. ही  गोष्ट माहित नव्हती ती या सुभाषितांमुळे  कळली. 

  3. आजचा अंक देखणा आणि वाचनीय झाला आहे तो प्रकाशभाई पेठे ह्यांच्या दतिया महाल ह्या सुरेख लेखामुळे आणि त्यांतल्या सुंदर सुंदर फोटोंमुळे. मुखपृष्ठावरचा फोटो देखिल अप्रतिम….!!
    प्रदीप अधिकारी

  4. एका वास्तुशास्त्रज्ञाकडून, दतियाचा महालसारख्या प्रसिद्ध वास्तूची माहिती मिळाली. मणिकांचन योगच म्हणायचा. इतिहासही कळला. अभिनंदन पेठेजी. आजची कविता ठीक. ज्ञान ज्ञानातूनच मिळते. ही सकारात्मक गोष्ट कळली. धन्यवाद मोनेजी. रेड वॅटल्ड लॅपविंग या पक्ष्याचा आवाज कर्कश असतो. पण कावळ्यासारख्याच दिसणाऱ्या कोकिळेचा आवाज गोड असतो कि. सुंदर रूप असल्याचा आवाज ही गोडच असेल असं नाही प्रदीपजी. फोटो मोठा सुंदर आलाय मात्र. संस्कृत सुभाषित ठाऊक होतं (डॉक्टर असल्यामुळे?)धन्यवाद नाबरजी.      

  5. प्रकाशजींचा दतिया महालावरील लेख अतिशय माहितीपूर्ण व वाचनीय आहे. फोटोही सुंदर आहेत. हा राजवाडा वीरसिंग देव या राजपूत राजाने बांधला असला, तरी तो मुसलमानी शैलीत बांधला आहे, की हिंदू शैलीत हे प्रकाशजींनी नमूद केलेलं नाही. कृपया खुलासा करावा. आपल्याकडे डाव्या इतिहासकारांनी (उदा. रोमिला थापर) असा एक गैरसमज पसरवला आहे, की भारतात जे जे काही वस्तू-शिल्पाचं व कलाकौशल्याचं काम झालेलं आहे, ते एकतर बौद्धांनी केलं आहे किंवा मुसलमानांनी. हिंदूंनी काहीच केलेलं नाही. हे कितपत खरं आहे हेही प्रकाशजींनी सांगावं. 

  6. शैलीच्या शंकेबद्दल आभार. दतिया ते खजुराहो अंतर २०० किलोमीटर तर दिल्ली साडेचारशे किलोमीटर .खजुराहो  पूर्णपणे हिंदू शैलीत आहे.  कलावंत लोकांच्याही भौगोलिक सीमा असतात .   

    दतिया महालाला स्थानिक लोक गोविंद मंदिर  म्हणतात. याचा प्लॅन स्वस्तिक आकाराचा आहे आणि पूर्णपणे हिंदू शैलीतला आहे . यात राजस्थानी  ब्रॅकेट्स , हिंदू मंदिरासारखे घुमट  व छत्र्या आहेत.  काही बाबतीत इस्लामी शैलीच्या छटा आहेत. बिरसिंग देवाने ओरछा येथे बरेच काम केले आहे. ओरछा पूर्णपणे हिंदू शैलीत आहे. 

    संपादक महाशयांनी आपला अभिप्राय वाचायला सांगितला म्हणून मागे वळून पहिलं
      

यावर आपले मत नोंदवा