असे हे वाचक ! : दुर्गाबाई भागवत

दुर्गाबाई भागवत (१० फेब्रुवारी १९१० - ७ मे २००२)

दुर्गाबाई भागवत
(१० फेब्रुवारी १९१० – ७ मे २००२)

 
 
वेचलेले सुवर्णकण 
भानू शिरधनकर 

भानू शिरधनकर यांनी अनेक लेखकांच्या मुलाखती त्यांच्या वाचनाच्या आवडीविषयी घेतल्या. आपल्याला वाचनाची आवड कशी निर्माण झाली, ती पुढे कशी वाढली किंवा टिकवली याबाबत त्यांनी एक प्रश्नमाला तयार केली होती. आणि त्यातून या मुलाखती जन्माला आल्या. या मुलाखती ‘ललित’ या वाचकांच्या लोकप्रिय मासिकातून प्रसिद्ध झाल्या होत्या. यापूर्वी कॉमरेड डांगे यांची अशीच पुनःप्रसिद्ध केलेली मुलाखत आपण ‘मैत्री’तून वाचली असेल. आता विदुषी दुर्गाबाई भागवत यांची मुलाखत आज दुर्गाबाईंच्या स्मृतीदिनी ‘ललित’ मासिकातून साभार उद्धृत करत आहोत.  

“जेवणखाण आटोपून, स्वस्थपणे आणि आरामात वाचन करीत बसणं, मला फार पसंत वाटतं “, असे दुर्गाबाई मागे एकदा सहज बोलतांना म्हणाल्याचे मला आठवले.

वाचनाच्या त्यांच्या आवडीनिवडीबद्दल त्यांना विचारावे म्हणून नुकताच मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांच्या वरील बोलण्याचा मला अनुभवच आला. जेवणखाण आटोपून दुर्गाबाई एक लठ्ठसे पुस्तक हातात घेऊन आरामशीरपणे वाचीत बसल्या होत्या. त्यांच्या आसपास एकदोन लठ्ठ लठ्ठ पुस्तके पडली होती.

त्या पुस्तकांवर ग्रंथालयाचे शिक्के नाहीत हे पाहून, मी त्याना म्हटले, ” आपल्याला पुस्तकं खरेदी करण्याचा बराच षौक असावा असं दिसतं. “

“छंदच आहे तो मला. ” दुर्गाबाई म्हणाल्या, ” नवं पाहण्यात आलं की ते विकत घेतल्याशिवाय सहसा चैन पडत नाही मला. पुस्तकखाती नाहीतरी महिन्याला ५०-६० रुपयांचा माझा खर्च असतोच. कपड्यालत्त्यांसाठी किंवा इतर चैनीसाठी माझा काही विशेष खर्च होत नाही. साड्या वर्षाला फक्त मी  दोन घेते. पण पुस्तकं मात्र शें -पाऊणशे घेते. अर्थातच हवी असलेली सगळीच पुस्तकं विकत घेणं काही शक्य नसतं. तरीपण काही पुस्तकं खरेदी करणं भागच असतं. मला वाचनाची आणि लेखनाची आवड उत्पन्न झाली, त्यावेळेपासूनच मी पुस्तकं विकत घेऊ लागले. आतापर्यंत पुस्तकांसाठी मी पंधरा सोळा हजार रुपये तरी खर्च केले असतील आणि मौज अशी की पुस्तकांचा हा संभार वाढत असल्यामुळे ती ठेवण्यासाठी मला कपाटं विकत घ्यावी लागत आहेत. “

” वाचनाची आवड निर्माण झाल्यापासून आपण पुस्तकं विकत घेऊ लागलो,  असं  आपण मघां म्हणालात पण आपल्याला वाचनाची आवड कधी आणि कशी लागली ? ” मी विचारले.

लहानपणी अक्षरओळख झाल्यापासूनच माझ्या वाचनाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. घरातील सर्वच वातावरण वाचणा-यांचं होतं. आजी जबरदस्त वाचणारी ! लहानपणची मला आठवण आहे, आजी आजोबांना नेहमी म्हणत असे, “मला दागिने नकोत. कपडेलत्ते, वस्त्राभरणे नकोत. मला वाचायला पुस्तकं आणून द्या. ‘ आणि आजोबा तिची ती हौस पुरवीत असत. आजीचं शिक्षण पाचवी – सहावीपर्यंत झालेलं होतं. पण इंग्रजी तिने स्वतःच्या वाचनामुळे वाढवलं. शॉ, शेक्सपियर आणि वेल्सही तिने वाचला होता. आजीने वाचलेलं शेवटचं पुस्तक ‘ कॅप्टन ब्लड ‘ हे होय. ते मला अजूनही आठवतं. “

” आमच्या आत्याबाईही चांगल्या वाचणा-या होत्या. आणि वडलांना तर वाचनाचा विलक्षण नाद. ते रोज रात्री बारा वाजेपर्यंत जागून वाचीत आणि सकाळी चार वाजता उठून पुन्हा वाचीत बसत. बाजारात नवं पुस्तक आल्याचं कळलं की वडलांनी ते विकत आणलंच म्हणून समजा. “

” घरात असं वाचनप्रिय वातावरण असल्यामुळे मी खूपच वाचलं. मात्र लहानपणी वाचनाबाबत आम्हा मुलांना एक नियम कडकपणे पाळावा लागे आणि तो म्हणजे आजीने वाचल्याशिवाय घरातील मुलांनी कुठलंही पुस्तक वाचता नये ! “

” त्या सुरुवातीच्या काळात आपण केलेल्या वाचनाबद्दलची आणि आपल्याला मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दलची काही माहिती सांगाल का ? ” मी विचारले.

” लहानपणचे वाचन, आजोबा, आजी, वडील वगैरेंच्या मार्गदर्शनाखाली झालं हे मी मघा सांगितलंच. आजोबांमुळेच डार्विनचं सगळं वाङ्ग्मय मी वाचलं. माझ्या वयाच्या नवव्या वर्षी वडलांनी ‘बुंदेलखंड प्रकरण’ हे पुस्तक आणून दिल्याचं आठवतं. वयाच्या बाराव्या वर्षी, त्यांनी मला आपट्यांच्या सामाजिक कादंब-या वाचायला दिल्या. भारतीय उपकथा हे पुस्तक मी त्याचवेळी वाचलं आणि ते आवडल्यामुळे पुन्हा पुन्हा अनेकदा वाचलं. मोरोपंत, वामनपंडित, तुकाराम यांचं पाठांतर यावेळी मी करीत असे.

इंग्रजी वाचनाची सुरुवात ब्राईट स्टोरी रीडर्सने झाली. मिसिज हेनरीवूड यांची पुस्तकं प्रथम वाचल्याचं मला आठवतं. रेनॉल्डच्या कादंब-या, अरेबियन नाईट्स ही पुस्तकं मी लौकरच वाचली. चार्ल्स डिकन्स व स्कॉट यांच्या कादंब-या मला आत्याबाईनी वाचायला लावल्या.

धार्मिक पुस्तकंही वाचनाच्या झपाट्यात त्यावेळी माझ्या तडाख्यातून सुटली नाहीत. आजगावकरांची  रसाळ कविचरित्र मी आवडीने वाचली. पांगारकरांची पुस्तकं मात्र आजोबांनी मला वाचू दिली नाहीत. कारण पांगारकरांबद्दल त्यांचं मत चांगलं नव्हतं.

त्या सुरुवातीच्या काळात अशी त-हेत-हेची पुस्तकं माझ्या हाती पडली आणि कावळा जसा विधिनिषेध न मानता हाती पडेल ते  खातो, त्याच सर्वभक्षीपणाने त्यावेळचं  माझं  सगळं झालं.  आश्चर्य वाटेल, पण त्या काळात मी वैद्यकशास्त्राचीही पुस्तकं वाचली होती आणि त्या पुस्तकातील लैंगिक विभागही वाचून काढले होते. राऊतांच्या घरात जिथे राहात होतो, तिथे एक पोटमाळा होता. त्या माळ्यावर आम्ही भावंडं व काका मिळून आमचं हे सामुदायिक वाचन करीत असू.

मॅट्रिक होईपर्यंत काही ग्रंथकारांची पुस्तकं मी अशी वाचून काढली होती. मॅट्रिकनंतर माझ्या ख-या, गंभीर, डोळस व अभ्यासपूर्ण वाचनाला सुरुवात झाली. आणि माझ्या वाचनाच्या बाबतीत अशीच अनेक स्थित्यंतरं पुढेसुद्धा घडून आली. मॅट्रिक झाल्यावर मी विवेकानंदांची पुस्तकं इंग्रजीमध्ये वाचली. या सुमारास भारताच्या राजकारणांत झपाट्याने बदल होत होता.  याचा परिणाम मनावर झाला व आपल्या देशाचा इतिहास माहित हवा असं वाटून माझं मन इतिहासाकडे वळलं. चरित्रग्रंथही मी त्याच अनुषंगाने अनेक वाचले. सावरकरांची पुस्तकं , जोसेफ मॅझिनी, मॅक्स्विनी व गॅरिबाल्डी यांची चरित्रं इंग्रजीत मिळाली ती सर्व वाचली. लहानपणी ‘खेळगडी’ मासिकातून नेपोलियनच्या गोष्टी येत. त्या मी नियमितपणे वाचीत असे. त्या मला खूप आवडायच्या. आता मोठेपणी जेव्हा मी नेपोलियनचं चरित्र वाचलं तेव्हा तर मी भारावून गेले.

भारतीय इतिहासाप्रमाणेच इंग्लंडचा इतिहाससुद्धा मी सूक्ष्मपणे वाचून अभ्यासला. ट्युडर काळापासूनचा त्या देशाचा इतिहास मला मोठा अभ्यसनीय वाटतो. मानवांच्या सुष्ट-दुष्ट क्रिया व त्यांच्याशी निगडित असलेल्या त्यांच्या मनोभावना — थोडक्यात म्हणजे मानवतेचा ज्यांना अभ्यास करायचा असेल त्यांनी इंग्लंडच्या इतिहासाचं वाचन करावं, असं मला वाटतं.

पहिल्या लढाईच्या वेळेपर्यंत माझं इतिहासाचं वाचन खूपच झालं. पण मग इथेच इतिहासाचं वाचन सुटलं आणि मी मार्क्स वाचला. भारतीय राजकारणाचा परिणामही मनावर होऊन मी गांधीजींचं व इतर राष्ट्रीय पुढा-यांचं वाङ्ग्मय वाचून काढलं. यापैकी लाला लजपतराय यांचं ‘माझ्या हद्दपारीचे दिवस’ ( डेज ऑफ माय डिपोर्टेशन ) हे पुस्तक मला अतिशय आवडलं. त्याचा माझ्या मनावर खूपच परिणाम झाला.

कॉलेजात असतांना संस्कृत वाङ्ग्मयाचं वाचन मी बरंच केलं. मी जे संस्कृत ग्रंथकार वाचले त्यापैकी कालिदास मला विशेष आवडला नाही. बाण, भट्टनारायण आणि भास विशेष आवडले. शूद्रक कवीचं ‘वेणीसंहार’ आणि भासाचं ‘मृच्छकटिक’ ही नाटकं तर माझ्या फारच आवडीची आहेत.

‘ब्रह्मसूत्रभाष्य’ हे मला बी. ए. लाच होतं. त्याच काळात शांडिल्य आणि नारद यांची भक्तिसूत्रं आणि आरण्यकं वाचली. आरण्यकं मला अजूनही रुचिर आणि सुंदर वाटतात. नारद आणि शांडिल्य यांची भक्तिसूत्रं अजूनही फार आवडतात. बी. ए. झाल्यानंतरचं माझं सर्व वाचन अभ्यासासाठीच झालं. बुद्धवाङ्ग्मयाचं परिशीलन व वाचन मी अभ्यासासाठीच केलं. “

मी विचारलं, “कथा, कादंबरी, नाटक यांपैकी आपल्याला कुठला वाङ्ग्मयप्रकार फार आवडतो ? “

” सगळेच वाङ्ग्मयप्रकार मी आवडीने वाचले आहेत. लघुकथा मला अजूनही वाचायला आवडतात. पूर्वी कादंब-यांचा मला मनस्वी ओढा होता. नाटकंही मी वाचत असे. आता वाचनाचं व अभ्यासाचं क्षेत्र विस्तृत झाल्यामुळे कथाकादंब-यांची ओढ कमी झाली — “

” आणि काव्य ? ” मी विचारले.

” कविता, वा ! ” दुर्गाबाई हसल्या. त्या म्हणाल्या, ” मॅट्रिक होईपर्यंत मीच कविता करत होते मुळी. पण मग ते सोडून दिलं आणि कविता फक्त वाचू लागले. कॉलेजात असतांना कविता खूप वाचली. कविता वाचायची व तिचा रसास्वाद व आनंद उपभोगायचा तर त्याला फार वेळ लागतो. कॉलेजात असतांना मी किट्स, बायरन, शेले वगैरेंचं  काव्य वाचलं. पण आता काव्य वाचणं पूर्णतः बंद केलं आहे. शेक्सपियरची सुनितं कधीमधी वाचते तेवढीच. “

 ऋतुचक्र - १९५६

ऋतुचक्र – १९५६

भावमुद्रा - १९६०

भावमुद्रा – १९६०

'ललित' मासिकाचा 'दुर्गा भागवत विशेषांक' (ऑगस्ट २००२) - मुखपृष्ठ

‘ललित’ मासिकाचा ‘दुर्गा भागवत विशेषांक’ (ऑगस्ट २००२) – मुखपृष्ठ

दुर्गाबाईंची पुस्तके : (१) ऋतुचक्र – १९५६  (२) भावमुद्रा – १९६० 
‘ललित’  मासिकाचा ‘दुर्गा भागवत विशेषांक’ (ऑगस्ट २००२) – मुखपृष्ठ 
” आपल्याला विशेष आवडणारे ग्रंथकार कोण ? ” मी विचारले.

” मिल हा माझा आवडता ग्रंथकार आहे. मिलचा माझ्या जीवनावर व लेखनावर खूपच परिणाम झाला आहे. त्याची भाषा आणि त्याच्या लिखाणातील प्रामाणिकपणा यांचा माझ्या मनावर फार [परिणाम झाला. हेनरी डेव्हिड थोरो हा पण माझा आवडता ग्रंथकार ! थोरोच्या प्रभावामुळेच मी शॉच्या आहारी विशेष जाऊ शकले नाही.

सुप्रसिद्ध चिनी तत्वज्ञ कॉन्फ़्युशस हाही माझा अत्यंत आवडता लेखक होय. जीवनाकडे पाहण्याच्या त्याच्या आशावादी दृष्टीकोणाचा माझ्या मनावर फारच परिणाम झाला आहे. कॉन्फ़्युशसचं एक सुभाषित तर माझ्या मनोपटलावर कायम ठसून राहिलेलं आहे. ते म्हणजे – जो मनुष्य हसू शकत नाही व विनोद करू शकत नाही, तो कधीच तत्वज्ञ होऊ शकणार नाही. “

” आपल्या वाचनाच्या व्यासंगाबद्दल आपण खूपच सांगितलं, आता आपल्या वाचनाच्या पद्धतीबद्दल काही माहिती सांगाल का ? “

” वाचन हे दोन कारणांसाठी प्रायः केलं जातं. केवळ करमणूक म्हणून केलेलं वाचन हा एक प्रकार. पण करमणूक आणि ज्ञान ही द्विधा होऊ शकत नाहीत. करमणुकीसाठी केलेलं वाचन हे सुद्धा आपल्या ज्ञानात भरच घालीत असतं. आणि तसं म्हटलं तर वाचन ही ज्ञानाची पाणपोईच आहे.

वाचनाचा दुसरा प्रकार म्हणजे लेखनासाठी किंवा काही विशिष्ट उद्देश्याने केलेलं वाचन हा होय. याला अभ्यास म्हणायला हरकत नाही. अशा वाचनाची, प्रत्येकाची काही विशिष्ट पद्धत असू शकते.

जेवणखाण आटोपून स्वस्थपणे वाचन करीत बसणं मला फार प्रिय आहे. यामुळे वाचन फार होतं असं मला वाटतं. पुस्तक प्रथम झपाट्याने वाचून काढायची माझी रीत आहे. पण कुठल्याही नव्या ग्रंथाकाराचं पहिलं पुस्तक वाचून काढायला मला थोडा वेळ लागतो. त्याची पुढची पुस्तकं वाचायला वेळ थोडा कमी लागतो. एकाच ग्रंथकाराची मिळतील तेवढी पुस्तकं वाचण्यावर माझा भर असतो. ती वाचून काढल्यावर मग त्या ग्रंथकारावर इतरांनी काय लिहिलं आहे ते मी वाचून काढते. यामुळे त्या ग्रंथकाराचा आपल्याला पूर्णपणे [परिचय घडून येतो.

एकच पुस्तक पुन्हा पुन्हा वाचण्याकडे माझ्या मनाचा ओढा असतो. अशी कित्येक पुस्तकं आहेत की ती पुन्हा वाचावीत असं माझ्या मनात आहे. माझा अनुभव असा आहे की एकच पुस्तक पुन्हा वाचलं तर त्यातून नवी अनुभूती मिळत असते.

दिवसातून तीन तासांपेक्षा अधिक वेळ मात्र मी वाचन करीत नाही. तीन तासांत भरपूर वाचन करता येतं. असा माझा अनुभव आहे. विषय विशेष गूढ असला तर एखादं करमणूक करणारं पुस्तक मी नेहमी जवळ ठेवते. गंभीर वाचनाचा कंटाळा आला की मनाला तजेला येण्यासाठी मी हलकंसं पुस्तक हातात घेते.

पुस्तकं ही निव्वळ शोभेसाठी नसून वापरण्यासाठी असतात हे खरं असलं तरी त्यांवर आडव्या उभ्या रेघोट्या मारून किंवा प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह रेखाटून ती खराब करून टाकणं काही मला पसंत नाही. मी म्हणूनच पुस्तकांवर बहुधा खुणा करीत नाही. त्याऐवजी मला आवडलेला मजकूर मी टिपूनच घेते. ताबडतोब टिपून घेण्याइतका अवसर नसला तर त्या पानात कागदाचे कपटे आठवणीसाठी घालून ठेवते. विशेषतः रेल्वेच्या प्रवासात जेव्हा जेव्हा मी वाचीत असते तेव्हा तेव्हा या पद्धतीचा मला चांगलाच उपयोग होतो.

एरवी मला हव्या असलेल्या मजकुराची मी टिपणं घेते व ही टिपणं विषयवारीने कार्डपद्धतीने लावून ठेवते. टिपणांची माझी एक कायम लठ्ठ वही पण असते. या वहीत मी केलेल्या वाचनाच्या टिपण्णी उतरलेल्या असतात. डॉक्टर केतकर यांच्या पुस्तकातील उता-यांची माझी वही अशीच केवढी तरी मोठी होती. “

‘माझ्या वाचनाचा माझ्या जीवनावर काय परिणाम झाला ?’ असा प्रश्न आपण विचारला आहे. माझ्या वाचनाचा माझ्या जीवनावर तसा उल्लेखनीय असा काही परिणाम झाला आहे, असं मला वाटत नाही. वाचन ही माणसाला आत्मोन्नतीकडे नेणारी शिडी आहे, असं माझं मत आहे. पण माणसाचं व्यक्तिमत्व  त्याने केलेल्या वाचनामुळे बदलत नाही. वाचनामुळे माणसांची कलुषित झालेली मतं बदलू शकतात. किंवा त्यांची मतंही कलुषित होऊ शकतात. पण माणसाचं सगळं व्यक्तिमत्वच त्याने केलेल्या वाचनामुळे बदलेल असं वाटत नाही.

माझ्याच बाबतीत सांगायचं तर वाचनामुळे मला हवा असलेला एकांत मिळू शकतो आणि माणसाला याची फार जरुरी असते. ज्ञान ताजं, अद्यावत ठेवण्यासाठीच मी सतत वाचन करीत असते. वाचन ही मोठी बंदिशाळा असून माणूस तिच्या भिंती स्वतःच आपल्याभोवती उभारीत असतो. माझ्याप्रमाणे इतरेजनही वाचनाच्या या बंदिशाळेत अडकून पडावेत, असं मला नेहमी वाटतं. आणि यामुळेच मी आपणहून माझी पुस्तकं दुस-यांना वाचायला देत असते. वाचायला नेलेली पुस्तकं लोक परत देत नाहीत हे ठाऊक असूनसुद्धा पुस्तकं  वाचायला देण्याचं धाडस मी करीत असते. ज्ञानाची पाणपोई चालू ठेवण्याचं हे सूक्त मी वडलांकडून शिकले.

मला आठवते, वडलांचे वेळी, आपट्यांच्या पुस्तकांचा सेट आम्हाला दरवर्षी नवा घ्यावा लागे, तरीही नव्या सेटातील पुस्तकं पुन्हा नव्या वाचकांना आम्ही आग्रहाने देतच असू. “

( ललित – जून १९६६ च्या अंकावरून साभार )
 छायाचित्रे : गुगलवरून साभार
*************************************************************************************************
आजच्या कविता 
 ताण -बळी
————————–
जीव घेतोय ‘खाकी’ चा
असह्य झालेला ताण
साहेब म्हणतो रजा नाही
आरोपी धरून आण
—————————–
सतत भावना दाबून दाबून
सुटते अखेर गोळी
सवयीनुसार लिहिल्या जातात
पंचनाम्याच्या ओळी
——————————
बायकामुलांच्या डोळ्यांमधलं
पाणीसुद्धा आटतं
मरणसुद्धा ड्युटीवरच
अवचित त्याला गाठतं !
————————–
जगायचे तर गेले राहून
जणू लागला वाघच मागे
धावा धावा धावा रे
पैसा झाला सबकुछ येथे
प्राण पणा ला लावा रे

वर्ष,महिने,तासही विसरा
सेकंदाला आले मोल
किती पळावे पळणाराने
अखेर दुनिया आहे गोल

जणू अफूची गोळी स्पर्धा
धावत सुटती सारे खाऊन
कधीतरी मग जाणीव होते
जगायचे तर गेले राहून

एकदाच हा प्रवास घडतो
पुन्हा मिळेना हि संधी
मारून मुटकून जगण्या पेक्षा
जगू नये मग का स्वच्छंदी

पैसा हा तर साधन केवळ
साध्य नसे ते जगण्याचे
बाळगतो पण सदोष आम्ही
कोन त्याकडे बघण्याचे

सुंदर दुनिया , सुंदर सृष्टी
आणखी सुंदर करेन मी
खारीचा तो माझा वाटा
उचलूनच मग मरेन मी
************************

 फास्ट फूड हटाव – तब्येत बचाव 
******************************
टाळू फास्ट फूड । रोगांचे आगार ।
पुरेशी माघार । घेऊ आता ॥
तातडीचे अन्न । आतडीचे रोग ।
विकतचे भोग । कशासाठी ॥
सांगतो मुरारी । बरी भाजी पोळी ।
फळ फळावळी । लाभदायी ॥
क्षणोक्षणी कोणी । खाई तळलेले ।
काय कळलेले । सांगा त्यास ॥
जागीच बसोनी । खाती काही फार ।
कमी पडे दार । घराचेही ॥
उगाच खायाचे । ज्यास नाही श्रम ।
दूर करू भ्रम । आजरोजी ॥
हालचाल हेच । जिवंत लक्षण ।
त्याचेच शिक्षण । गरजेचे ॥
विसरून गेला । चालणे जो पायी ।
त्यास ठायी ठायी ।’ दम’ बाजी ॥
व्यायामाचा राजा । घ्यावी छान चाल।
हीच मोठी ढाल । रोगांपुढे ॥
लोकांचे आरोग्य । हेच देशा धन ।
बलशाली मन । लढवय्ये ॥
***********************
मुरारीभाऊ देशपांडे
murarisangamneri@gmail.com
*******************************
Advertisements

7 thoughts on “असे हे वाचक ! : दुर्गाबाई भागवत

 1. दुर्गाबाई भागवतांच्या वाचनविषयक मननीय विचारांबद्दलचा शिरधनकरांचा लेख चांगला आहे. एक मात्र थोडेसे खटकले. दुर्गाबाई पाश्चात्य लेखकांबद्दल बोलल्या त्यापेक्षा अगदीच कमी मराठी लेखकाबद्दल बोलल्या. त्यांच्या समकालीन कितीतरी मराठी साहित्यिकांना तर त्यांनी अनुल्लेखाच्या कपाटात ठेवले आहे असे वाटले.
  मुकुंद कर्णिक

  • मुकुंदराव,
   अभिप्रायाबद्दल आभार. या संबंधात दुर्गाबाईंच्या इतर आत्मपर लेखनात शोधावे लागेल.
   मंगेश नाबर

 2. दुर्गाबाईंच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आपण भानू शिरधनकर यांचा दिलेला लेख माहितीपूर्ण आणि दिशादर्शक आहे.

  धन्यवाद!

  आनंद पत्की

 3. दुर्गा भागवत यांच्याविषयी एक आदरयुक्त भीती आहे. या मुलाखतीने ती अधिकच वाढली. केवढ्या सहज-सोप्या पद्धतीने त्या खूप काही सांगतात. भानू शिरधनकर यांच्यासारख्या प्रसिद्ध लेखकाने एवढ्या बाळबोध पद्धतीने प्रश्न विचारावेत, याचे आश्चर्य वाटले. पण नंतर लक्षात आले की, या साध्या (काहीही वैचारिक गिरकी घेतल्याचा आव न आणता विचारलेल्या) प्रश्नांमुळेच मुलाखत छान झाली आहे. `करमणुकीसाठी कथा-कादंबऱ्या-ललिल वाचणे म्हणजे काही वाचन नव्हे,` असं काहीसं मत एका विद्वानाने पुस्तकात नोंदवून ठेवले आहे. त्यामुळे माझं मन मला खात होतं. करमणुकीसाठी केलेलं वाचनही काही दुय्यम नाही, असं सांगून दुर्गाबाईंनी जणू मलाच धीर दिला आहे! `कविता वाचायची व तिचा रसास्वाद व आनंद उपभोगायचा तर त्याला फार वेळ लागतो,` हे त्यांचं म्हणणंही अगदी खरं आहे. जाता जाता एक योगायोग – गेल्याच आठवड्यात भानू शिरधनकर यांनी अनुवादित केलेली एक रहस्य कादंबरी आणली आणि त्यानंतर लगेच त्यांनी घेतलेली ही सोपी मुलाखत वाचायला मिळाली.

  • कै. भानू शिरधनकर यांची अनुवादित रहस्य कादंबरी ? मला ती कशी वाचायला मिळाली नाही याचे आश्चर्य वाटते. कारण ज्यांच्या पुस्तकांमुळे माझी कै. वा. वि. उर्फ वामनराव भट यांची ओळख आणि नंतर दृढ मैत्री झाली त्यांची बहुतेक सर्व पुस्तके मी वाविंकडून विकत घेतली होती. कृपया या पुस्तकाचे नाव कळवावे ही विनंती.
   आणखी एक. या भानुरावांनी अनेकांच्या त्यांच्या वाचनाच्या संदर्भात अतिशय रोचक मुलाखती घेतल्या आणि त्या ललित मासिकात प्रसिद्ध झाल्या. त्यांचे पुस्तक निघाले की नाही हे मला कळले नाही.
   मंगेश नाबर

 4. `जगायचे तर गेले राहून`मध्ये मांडलेली व्यथा रास्तच आहे. कितीही मिळविला तरी कमी पडतो, असंच पैशाबाबत म्हणावं लागतं. पण नाइलाजाने अनेकांना या नको असलेल्या शर्यतीमध्ये (रॅट रेस) धावावंच लागतं.

 5. दुर्गाबाई भागवत यांच्या वाचनासंबंधी मुलाखत साध्या सरळ शब्दात असली तरी दुर्गाबाई यांनी प्रश्नांची उत्तरेही तशीच दिली आहेत. काहीही लपवलेले नाही. आपल्या विद्वत्तेचा आव आणलेला नाही आणि तेच त्यांचे वैशिष्ट्य होते.
  मुरारीभाऊ यांच्या कविता अर्थगर्भ आहेत. एवढे म्हटले तरी पुरे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s