सर्वार्थाने विक्रमी : ‘ तो मी नव्हेच ! ‘

दीपावली २०१३ विशेष –   
 
प्रकाश चांदे
 
Prabhakar Panshikar 1
———————————————————————————————— 
 
१९३० च्या दशकात मराठी रंगभूमीला मरगळ आली होती॰ त्यावेळेस आचार्य अत्रे आणि मो॰ ग॰ रांगणेकर या दोन नाटककारांनी आपल्या नाटकांनी रंगभूमीला जीवदान तर दिलेच ; पण आधुनिक तंत्राचा वापर करत मराठी रंगभूमीला प्रगत रस्त्यावर नेले॰ त्यानंतर सुमारे दोन दशकांनी हे दिग्गज नाटककार एकत्र आले, आणि त्यांनी सर्वार्थांनी विक्रमी नाटक ‘तो मी नव्हेच !‘ सादर केले॰ त्या नाटकाच्या निर्मितीला ५१ वर्षे पूर्ण होत असतांना श्री. प्रकाश चान्दे यांनी घेतलेला हा आढावा॰
 
——————————————————————————————————————–

     काय योगायोग आहे ! १९३० च्या दशकात मराठी रंगभूमीला सावरून धरणारे आणि आपल्या एक अंक – एक प्रवेश या आधुनिक तंत्राने आणि सोप्या, सुगम,  प्रवाही भाषेतल्या संवादांनी रंगभूमीची प्रगती करणारे दोन नाटककार जवळ जवळ दोन दशकांनी एकत्र आले, आणि त्यांनी ‘तो मी नव्हेच !‘ हे नाटक सादर केले॰ रांगणेकर हे नाटककार, दिग्दर्शक आणि ‘नाट्य – निकेतन ‘ या नाटक कंपनीचे मालक॰ नाटके धडाधड कोसळत असतांना त्यांनी नाट्यसंगीत आणि अन्य बाबतींत वैशिष्ट्य दाखवणारे ‘ कुलवधू ‘ हे इतिहास घडवणारे नाटक निर्माण केले॰ त्याने जवळ जवळ दोन हजार प्रयोगांचा टप्पा गाठला॰ त्याच काळात आ॰ अत्रे यांची ‘ साष्टांग नमस्कार ‘, ‘ घराबाहेर ‘, ‘ उद्याचा संसार ‘ अशी नाटके समीक्षक आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवत असतांना त्यांच्या कालातीत ठरणार्‍या ‘ लग्नाची बेडी ‘ या नाटकाने त्या काळात हौशी आणि व्यावसायिक अशा ५००० प्रयोगांचा उंबरठा ओलांडला॰ अशा दोन महान रंगकर्मींनी सादर केलेले ‘ तो मी नव्हेच ! ‘ हे नाटक तर मराठी भाषेत अभूतपूर्व नाटक ठरले॰ या नाटकाने वय वाढलेल्या आणि गरजू मुलींच्या लग्नाच्या बाबतीतली परवड अशा काही स्वरूपात सादर केली, की या नाटकानेही ३००० प्रयोग पूर्ण केले॰

१९६०-६१ च्या सुमारास ‘नाट्य – निकेतन‘ची परिस्थिती अडचणीची झाली॰ १९५६ साली रांगणेकरांनीच लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या ‘भटाला दिली ओसरी‘  या नाटकाने चांगली लोकप्रियता मिळवली॰ पण त्यानंतर आलेल्या ‘धाकटी आई‘, ‘भाग्योदय‘, ‘अमृत‘, ‘भूमिकन्या सीता‘, ‘पठ्ठे बापूराव‘, ‘हिरकणी‘  आणि  ‘हे ही दिवस जातील‘ ( या नाटकाच्या प्रत्येक अंकाचा लेखक वेगवेगळा होता॰ ) अशी सर्वच नाटके कमी अधिक प्रमाणात अयशस्वीच झाली आणि ‘नाट्य निकेतन‘ला कर्ज झाले॰ अखेरीस रांगणेकरांनी हे कर्ज फेडण्यासाठी आकाशवाणीवर नोकरी स्वीकारावी आणि त्या वेळेसही जोरात चाललेल्या ‘भटाला दिली ओसरी‘ या नाटकाच्या दोनशेव्या महोत्सवी प्रयोगाला आ॰ अत्रे यांना अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून त्यांच्याकडे एका चांगल्या नाटकाची मागणी करावयाची, असं  रांगणेकर आणि ‘नाट्य निकेतन‘च्या व्यवस्थापनात उत्साहाने भाग घेऊ लागलेल्या तरुण प्रभाकर पणशीकरांनी ठरवले॰ याच नाटकापासून पणशीकर यांची अभिनेता म्हणून दखल घेऊ जाऊ लागली॰ त्याप्रमाणे ‘ भटाला … ‘चा दोनशेवा प्रयोग दादारच्या किंग जॉर्ज शाळेत ( आताच्या ‘राजा शिवाजी विद्यालया‘त ) महोत्सवी प्रयोग म्हणून आ॰ अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली दणक्यात साजरा केला गेला॰ त्या वेळेस पणशीकर, रांगणेकर आणि आ॰ अत्रे यांचे परमभक्त आणि हुकमी प्रकाशक ग॰ पां॰ परचुरे या सर्वांनी आ॰ अत्रे यांना नवीन नाटक लिहावे म्हणून गळ घातली॰ खरं तर अत्र्यांनी त्यांचं ‘कवडी चुंबक‘ हे नाटक लिहून १४ वर्षे झाली होती॰ पण रांगणेकरांनी बसवलेला ‘ भटाला… ‘चा सुविहित प्रयोग बघून आणि या तिघांचा आग्रह पाहून अत्र्यांनी नवं नाटक लिहून ते रांगणेकरांना द्यायचं कबूल केलं.

आ॰ अत्रे यांचा तसा कामाचा झपाटा असे॰ लगेच दुसर्‍या दिवसापासून त्यांनी नव्या नाटकासाठी विषय शोधण्यास सुरवात केली॰ त्यावेळेस एकाच वेळेस अनेक तरुणींशी लग्ने करून त्यांना फसवणार्‍या माधव काझी या तरुणावर कोर्टात खटला चालू होता॰ हा विषय स्वत: रांगणेकरांना आवडला होता आणि त्या विषयावर नाटक लिहावयाचे ठरवून थोडेसे लेखनही केले होते॰ त्यांनी अत्र्यांना तोच विषय सुचवला॰ अत्र्यांना तो विषय आवडला॰ ताबडतोब त्यांनी आपले पुण्याचे वार्ताहर दा॰ सी॰ कोकजे ( याच कोकज्यांनी मराठी वर्तमानपत्रांत व्याख्यानाचा वृत्तान्त देतांना ‘हंशा आणि टाळ्या‘चे कंस देण्यास सुरवात केली होती॰ ) यांना पुण्याच्या ‘सकाळ‘मध्ये या खटल्याचा रोज सविस्तर आणि समग्र वृत्तान्त येत असल्यामुळे ‘सकाळ‘च्या फायली; आणि न्या॰ मू॰ चितळे यांच्या निकालाची पूर्ण प्रत पाठवण्यास सांगितले॰ ही सामग्री आल्यावर त्यांनी अभ्यासाला सुरवात केली॰ त्याच झपाट्याने त्यांनी लेखनासही सुरवात केली॰

स्वत: अत्र्यांच्यांबरोबर खुद्द रांगणेकरही लेखनाच्या प्रगतीबद्दल जागरूक होते॰ कारण या नाटकाचा पहिला प्रयोग त्यावर्षीच्या दसर्‍याच्या दिवशी दिल्लीत करण्याचे ठरले होते; आणि दसर्‍याला जेमतेम दीड दोन महिनेच उरले होते॰ संपूर्ण नाटक कोर्टातच साक्षीदारांच्या साक्षींतून उलगडत जात आहे, असे काहीसे अत्र्यांच्या मनात होते; तर रांगणेकरांना ते चित्रपटाच्या ‘ फ्लॅशबॅक ‘ तंत्राने सादर करण्याची इच्छा होती॰ या बाबतीत अत्रे आणि रांगणेकर यांच्यात बर्‍याच चर्चा आणि वादविवाद घडले; पण अखेरीस रांगणेकर अत्र्यांना स्वत:चे मत पटवून देण्यात यशस्वी झाले, आणि नाटक चित्रपटातील  ‘फ्लॅशबॅक‘ तंत्राने सादर करण्याचे ठरले॰ त्यामुळे जसजसे लेखन होऊ लागले तसतशा तालमी सुरू झाल्या; आणि तिसर्‍या अंकाच्या तालमी तर दिलीला जाताना आगगाडीतच चालल्या होत्या !

नाटक ‘ फ्लॅशबॅक ‘ तंत्राने सादर करण्याचे पटवून देण्यात रांगणेकर यशस्वी झाले खरे; पण प्रत्यक्ष रंगमंचावर ते कसे काय जमेल या बाबत शंकाच होती॰ एक दिवस पणशीकर पाश्चात्य रंगभूमीबद्दलचे एक मासिक वाचत होते॰ त्यात रंगमंचाचे दोन भाग करून एका अर्ध्या भागात एक दृश्य आणि दुसर्‍या अर्ध्या भागात दुसरे दृश्य, असे एक नाटक तिकडच्या रंगभूमीवर केल्याचे त्यांनी वाचले॰ ताबडतोब त्यांच्या मनात हे नाटकदेखील त्या तंत्राने करता येइल असे आले;  आणि त्याबाबतीत पणशीकर रांगणेकरांशी बोलले, आणि बर्‍याच चर्चा आणि काथ्याकूट केल्यावर हे नाटक या तंत्राने सादर करण्याचे ठरले॰

८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजयादशमीच्या सुमुहूर्तावर या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्लीच्या ‘आयफॅक्स‘  नाट्य गृहात झाला॰ या पहिल्या प्रयोगाला दिल्लीत असलेले सारे नामवंत मराठी लोक तर हजर होतेच;  शिवाय, कित्येक अमराठी लोक ज्यांना मराठी रंगभूमीबद्दल माहिती होती, तेही आवर्जून या नाटकाला उपस्थित होते॰ त्यामुळे नाट्यगृह संपूर्ण भरलेले होते॰ या पहिल्या प्रयोगात प्रभाकर पणशीकर ( ५ भूमिका ) , दत्तोपंत आंग्रे, नंदा पातकर, चंद्रचूड वासुदेव,  बिपीन तळपदे, वासुदेवराव दाते, एरन जोसेफ,  पुरुषोत्तम बाळ, कुसुम कुलकर्णी, सरोज नाईक, मंदाकिनी भडभडे, भोलाराम आठवले, श्रीपाद जोशी यांनी भूमिका केल्या॰ यापैकी बरेच जण त्यावेळेस नामवंत अभिनेते / अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होते; तर यापैकी काही जण नंतर नामवंत झाले॰ खरे तर तालमी नीटपणे झालेल्या नसतानाही हा पहिला प्रयोग दृष्ट लागण्यासारखा झाला॰ या प्रयोगाला मराठीतील एक पुरोगामी नाटककार, अत्र्यांचे स्पर्धक आणि राष्ट्रपती नियुक्त खासदार भा॰ वि॰ उर्फ मामा वरेरकर हेदेखील हजर होते॰ त्यांनी मूळ नाटकाचे कौतुक न करता, रांगणेकरांनी नाटक छान बसवले आहे असे खवचट उद्गार काढले॰ अशी संधी अत्रे सोडणे शक्यच नव्हते॰ त्यांनी मामांना सडेतोड उत्तर दिले !

या नाटकाचे नाव अत्र्यांनी प्रथम ‘ मुली त्या मुलीच ! ‘ असे ठरवले होते॰ ज्या माधव काझीवर हा खटला दाखल झाला होता; तो माधव काझी हा अत्यंत हुशार होता॰ त्याने कोर्टात वकील न देता स्वत:चा बचाव स्वत:च केला होता॰ प्रत्येक साक्षीत त्याचा भर तो आरोपी आपण नसण्यावर होता, आणि त्यादृष्टीने तो बचाव करे॰ या सार्‍याला उद्देशून न्या॰ मू॰ चितळे यांनी हा ‘डिफेंस ऑफ डिनायल्स‘ आहे असे निकालपत्रात नमूद केले होते॰ त्यावरुन अत्र्यांनी नाटकाचे नाव बदलून ‘ मी तो नव्हेच ! ‘ असे मुक्रर केले॰ नाटक तुफान चालू लागल्यावर या नाटकाच्या यशातील प्रत्येक गोष्टीवर हक्क सांगणारे अनेक जण पुढे आले॰ या नावाच्या  बाबतीतही असेच झाले॰ ‘मी तो नव्हेच’ चे ‘तो मी नव्हेच‘ असे आपण केल्याचे रांगणेकर सांगू लागले॰ आपल्या यशात असा दुसरा भागीदार अत्रे हे सहन करणे शक्यच नव्हते ! त्यांनी ताबडतोब त्यांच्या पद्धतीप्रमाणे ” संपूर्ण नाटक लिहिणार्‍याला नाटकाचे नाव ठेवता येत नाही का ? “, असा उलटा सवाल करून ते श्रेय रांगणेकरांना देण्यास नकार दिला !

Prabhakar Panshikar 2

या नाटकाचा सर्वात जास्त फायदा कुणाला झाला असेल तर प्रभाकर पणशीकर यांना॰ हे नाटक येईपर्यंत पणशीकर हे रंगभूमीवर धडपडणारे एक अभिनेते होते॰ त्यावेळेस ‘भटाला दिली ओसरी‘ या नाटकात मिळालेल्या भूमिकेमुळे ते नावारूपाला येऊ लागले होते॰ शिवाय ते ‘नाट्य निकेतन‘चे व्यवस्थापक म्हणूनही पुढाकार घेऊन काम करू लागले होते॰ या नाटकात त्यांना पाच अगदी वेगवेगळ्या आणि परस्पर विरोधी ढंगांच्या भूमिका कराव्या लागल्या॰ त्या त्यांनी सफाईदारपणे केल्यामुळे ते अक्षरश: एका रात्रीत लोकप्रिय झाले॰ नंतर रांगणेकर आणि अत्रे यांच्यान्त दुरावा निर्माण झाल्यावर ते अत्रे यांच्याबरोबर राहिले॰  ‘अत्रे थिएटर्स‘तर्फे हे नाटक करायचे ठरल्यावर ते परत नाटकातील भूमिकांच्या वाटपासह दौर्‍याच्या आखणी करण्यापर्यंत सर्व गोष्टी करू लागले॰ दरम्यान ते, मोहन वाघ आणि वासुदेव कोल्हटकर यांच्या भागीदारीत ‘नाट्य संपदा‘ या नाटक निर्मिती करणार्‍या संस्थेचे संस्थापक झाले होते॰ यथावकाश ‘तो मी नव्हेच !‘ हे नाटकही ‘नाट्य संपदा‘कडे आले॰ या नाटकाने यशाची विविध शिखरे पादाक्रांत करावयास सुरवात केल्यावर ते सतत प्रसिद्धीच्या झोतात राहू लागले॰ या नाटकाने ३००० प्रयोगांचा टप्पा पार केला॰ दरम्यान ते ‘नाट्य संपदा‘तर्फे वसंत कानेटकरांसारख्या मातब्बर नाटककारांची नाटके करतच होते॰ त्यांच्या सुदैवाने बहुतेक नाटके व्यावसायिक दृष्ट्या सफल नाटके झाली॰ याच काळात त्यांचे भागीदार वाघ आणि कोल्हटकरांशी बिनसले; आणि ते दोघे वेगळे होऊन त्यांनी स्वत:ची नाटक कंपनी काढली॰ पण पणशीकर आणि ‘नाट्य संपदा‘ ची आघाडीची नाटक कंपनी म्हणून घोडदौड कायम राहिली॰ या सर्वांची परिणीती पणशीकर एक बलदंड निर्माते म्हणून ओळखले जाऊ लागले॰ मराठी नाट्यसृष्टीत अद्याप अबाधित राहिलेला लागोपाठ दोन नाट्य सम्मेलनांचे अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला॰ या सर्वांवर कळस म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी उत्कृष्ट नाट्य कर्मीला पुरस्कार जाहीर झाला॰ तो पहिल्यांदा पुरस्कार तर त्यांनाच मिळाला; शिवाय तो पुरस्कार पणशीकरांच्या नावाने त्यांच्या हयातीतच ओळखला जाऊ लागला ! पणशीकरांचे अन्य सर्व कर्तृत्व मान्य करूनही  हे सर्व ‘तो मी नव्हेच !‘ मुळे घडले असे म्हटले तर ते अमान्य होऊ नये !

या नाटकात लखोबा लोखंडे, दिवाकर दातार, कॅ॰ अशोक परांजपे, दाजीशास्त्री दातार आणि राधेश्याम महाराज अशा पाच परस्परांपासून अतिशय भिन्न असणार्‍या भूमिका पणशीकरांच्या वाट्याला आल्या, त्या त्यांनी कसलेल्या अभिनेत्याप्रमाणे केल्या॰ अत्र्यांसारख्या एका मातब्बर नाटककाराने लिहिलेल्या एका जबरदस्त नाटकात पाच अशा सशक्त भूमिका मराठीतच काय अन्य कुठल्याही भाषेतील रंगभूमीवर दुसर्‍या कुठल्या अभिनेत्याला मिळाल्याचे दिसत नाही॰ त्या दृष्टीने पणशीकर हे नि:संशय भाग्यवान अभिनेते ! पणशीकरांनीही या भूमिकांचे महत्त्व ओळखून कसून मेहनत घेतली आणि या भूमिकांचे सोने केले ! त्यामुळे सुरवातीपासून या भूमिकांत सफाई होती॰ नंतर प्रत्येक प्रयोगागणिक त्या आणखीन विकसित होत गेल्या॰ या प्रत्येक भूमिकेला अगदी वेगवेगळ्या प्रकाराची वेशभूषा आहे॰ परदेशी राहून आलेला दिवाकर दातार ( पाश्चात्य पूर्ण सूट ), त्याचे मोठे बंधु कोकणातील दाजीशास्त्री दातार (धोतर, झब्बा, उपरणे,  फेटा), कॅ॰ अशोक परांजपे ( नेव्हीचा युनिफॉर्म ), लखोबा लोखंडे ( खेडेगावातील कळकट पोषाखातील व्यापारी ), आणि राधेश्याम महाराज ( पारंपरिक महाराज / बुवा ) या सर्व वेशभूषा पणशीकर अक्षरश: पाऊण एक मिनिटात बदलून परत रंगमंचावर हजर होत॰ शिवाय या बदललेल्या भूमिकेचे बेअरिंग आणि त्या भूमिकेसाठी आवश्यक असणारा आवाज, हेल पणशीकर अचूक निर्माण करत॰ अशी भूमिका मिळावी हे जगातील कुठल्याही रंगभूमीवरच्या अभिनेत्याचे स्वप्न असेल॰ ही भूमिका खरे त्यावेळचा मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अत्यंत लोकप्रिय अभिनेता राजा गोसावी याला देण्याची अत्र्यांची इच्छा होती॰ पण नाटकाच्या वाढत्या लोकप्रियतेबरोबर आधीच अत्यंत लोकप्रिय असलेला राजा गोसावी डोक्यात हवा गेलेल्या अभिनेत्यासारखा वागेल आणि आपल्याला डोईजड होईल, अशा भीतीने अत्र्यांचा विरोध मोडीत काढून तोपर्यन्त रंगभूमीवर स्थिरावण्यासाठी चाचपडणार्‍या पणशीकरांना ही भूमिका रांगणेकरांनी देऊ केली॰ मात्र,  तोपर्यन्त रांगणेकरांचे ‘दास मारुती‘ असणारे पणशीकर यांनाही यथावकाश पंख फुटले आणि रांगणेकरांच्यात आणि अत्र्यांच्यांत दुरावा निर्माण झाल्यावर पणशीकर, रांगणेकरांबरोबर न राहता ते अत्र्यांबरोबरच गेले ! काय म्हणावे या कर्माला ?

या नाटकात तशी पात्रे भरपूर आणि कित्येक भूमिका तर अतिशय छोट्या आणि तशा नगण्यच॰ पण रांगणेकरांसारख्या कसलेल्या निर्मात्या – दिग्दर्शकाने प्रत्येक भूमिकेसाठी सुयोग्य पात्रे निवडली; आणि त्यांच्याकडून कसून मेहनत करून घेतली॰ त्यामुळे दत्तोपंत आंग्रे, नंदा पातकर, भोलाराम आठवले, एरन जोसेफ, बिपीन तळपदे, कुसुम कुलकर्णी, मंदाकिनी भडभडे अशी सर्वांचीच कामे नीटस आणि उठावदार झाली॰

हे नाटक रंगभूमीवर आणताना लेखक आणि निर्माता यांच्यात लेखी अगर तोंडी काहीच करार झालेला नव्हता॰ रांगणेकरांना वाटे, अत्र्यांचे डोळे मोठे, ते भली मोठी रक्कम मागतील; तर अत्रे म्हणत, की  ‘नाट्य – निकेतन‘ कशीबशी चाललेली कम्पनी॰ ते काय मला माझ्या मनासारखे देणार, असे पणशीकरांनी लिहून ठेवले आहे॰ तर रांगणेकरांनी त्यांच्या आत्मकथनात, अत्र्यांना यासंबंधी काही करार करू या असे सुचवले, की अत्रे ते म्हणणे धुडकावून लावत॰ खुद्द अत्र्यांनी रांगणेकर यासंबंधी काही बोलले तर त्यांचे म्हणणे लेखी मागत, ते रांगणेकरांनी कधीच दिले नाही, असे नमूद करून ठेवले आहे॰

दिल्लीहून निघताना वाटेत ग्वाल्हेर, इंदूर, धुळे, नासिक असे गावोगावी प्रयोग होत असत॰ प्रत्येक प्रयोग हाऊसफुल्ल जात असे॰ याचा इत्यंभूत वृत्तान्त अत्र्यांना त्यांच्या माणसांकरवी मिळत असे॰ दिवस असे चालले असतांना एक दिवस अत्र्यांनी त्यांच्या ‘ मराठा ‘ दैनिकातून ‘हे प्रयोग बंद करा’, अशी जाहीर नोटीस रांगणेकरांना दिली॰ हा रांगणेकरांवर जबरदस्त आघात होता॰ कुठल्याही प्रकारचा समेट होत नाही असे दिसताच प्रकरण कोर्टात गेले॰ तेथे अत्र्यांनी १९६४ साली एक लाख रुपयांची रॉयल्टी मागितली ! रांगणेकरांच्या डोळ्यांसमोर काजवेच चमकले ! अखेरीस तडजोड झाली॰ त्या नाटकाला दोन वर्षे पूर्ण होत आली होती; आणि १९० च्या वर प्रयोगही झालेले होते॰ त्यामुळे दोन वर्षांत दोनशे प्रयोग ‘नाट्य – निकेतन‘ ने पूर्ण करायचे, अत्र्यांना स्वामीत्त्वापोटी २५,००० रुपये रांगणेकरांनी द्यायचे;, आणि दोन वर्षांनंतर नाटकाचे हक्क कायम स्वरूपी अत्र्यांकडेच राहतील, असा निवाडा कोर्टाने दिला॰ या निवाड्याबरोबरच पणशीकरांनी ‘नाट्य – निकेतन‘ला रामराम ठोकला आणि ते ‘अत्रे थिएटर्स‘मध्ये रुजू झाले॰ त्यामुळे १९४ ते २००  अशा ‘नाट्य – निकेतन‘ च्या ७ प्रयोगात पणशीकरांची भूमिका आत्माराम भेंड्यांनी केली॰ हा सर्व काळ रांगणेकरांना अतिशय कष्टप्रद गेला॰ नंतर २० वर्षांनी याचा सर्व वृत्तान्त रांगणेकरांनी ‘ललित‘च्या एका दिवाळी अंकात ‘दिवस तंतरलेले, दिवस मंतरलेले‘ या लेखात नोंदवला आहे॰

या नाटकाचे २०० प्रयोग झाले होतेच; त्यामुळे हे नाटक आता काही चालणार नाही, असा यच्चयावत सर्व व्यावसायिकांचा होरा होता॰ त्यामुळे हे नाटक ‘अत्रे थिएटर्स‘ ने करू नये असे बोलले जाऊ लागले; पण अत्रे आणि पणशीकरांचा स्वत:वर आणि मराठी प्रेक्षकांवर विश्वास होता॰ ‘अत्रे थिएटर्स‘तर्फे हे नाटक सादर होऊ लागल्यावर प्रभाकर पणशीकरांनी त्यात आणखी काही तांत्रिक सुधारणा करता येतील का, याचा शोध घेतला॰ कारण अर्धा रंगमंच न वापरता ठेवणे त्यांना योग्य वाटत नव्हते॰ त्यांनी विविध प्रकारच्या चाचण्या घेतल्या, प्रयोग केले आणि हे नाटक फिरत्या रंगमंचावर सादर केले तर पूर्ण स्टेज वापरावयास मिळेल,  अशा निष्कर्षाप्रत ते आले॰ मग कोल्हापूरच्या म्हादबा मेस्त्री यांच्याशी संपर्क साधून त्यांना फिरत्या रंगमंचाची संकल्पित रचना समजाऊन पणशीकरांनी स्वत:ला हवा तसा रंगमंच बनवून घेतला॰ यामुळे रंगभूमीच्या तंत्रात प्रचंड क्रांती झाली॰ कोर्टात साक्ष सुरू झाल्यावर रंगमंचावर काही क्षण अंधार होऊन रंग मंच फिरत असे; आणि रंगमंचाचा पाठीमागचा भाग पुढे येत असे॰ तेथे ‘फ्लॅशबॅक‘ तंत्राने पूर्वकथा सादर होत असे॰ यापूर्वी फिरता रंगमंच होता; पण तो एकाच नाट्यगृहात वापरता येत असे॰ पणशीकरांचा फिरता रंगमंच कुठेही नेता येत असे, आणि वापरता येत असे॰

या नाटकाचे एकंदर ३००० च्यावर मराठीत प्रयोग झाले॰ काही प्रयोग गुजराती भाषेतही झाले॰ कन्नड भाषेतही या नाटकाचे प्रयोग झाले॰ या सर्व प्रयोगांत पणशीकरांनीच लखोबा लोखंडेची भूमिका केली आहे॰ हे नाटक तमीळ भाषेतही सादर करण्याचा विचार चालू होता॰ भरपूर पात्रे आणि हजारो प्रयोग, यांमुळे कित्येक अभिनेते, अभिनेत्रींनी या नाटकात काम केले आहे॰ यापैकी कितीतरी नामवंत होते॰ कित्येकजण नंतर नामवंत झाले॰ हे नाटक ज्या कंपनीकडे गेले तेथे ‘दुभती गाय‘ ठरले !

१९६३ साली व्यावसायिक नाटकांचे शासकीय पुरस्कार जाहीर झाले॰ त्यांत कानेटकरांच्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते‘ या नाटकाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार तर ‘तो मी नव्हेच !‘ ला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला॰ या गोष्टीचा अत्र्यांना एव्हढा राग आला की त्यांनी द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला; आणि त्या नाकारलेल्या धनादेशाचे छायाचित्र ‘मराठा‘त, ” हा पाहा, त्या नाकारलेल्या धनादेशाचा फोटो ” या शीर्षकाखाली प्रसिद्ध केला ! खरं तर प्रा॰ कानेटकर आणि त्यांचे वडील कवी गिरीश हे अत्र्यांचे कित्येक वर्षांचे स्नेही ! त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारताना प्रा॰ कानेटकरांनी अत्र्यांच्या या रूसव्यावर खुसखुषीत भाषेत टिप्पण्णी केली !

या नाटकामुळे अत्र्यांची नाटककार म्हणून दुसरी इनिंग्ज सुरू झाली॰ कारण १९४८ साली  ‘ कवडीचुंबक ‘  नाटक लिहिल्यानंतर १४ वर्षांनी अत्र्यांनी नाटक लिहिले॰ मग अत्रे परत बहरात आले आणि त्यांनी  ‘मोरूची मावशी‘, ‘मी मंत्री झालो‘, ‘प्रीतीसंगम‘, ‘बुवा तेथे बाया‘ अशी नाटके लिहिली॰ ( ‘सम्राट सिंह‘  या  ‘किंग लीअर‘ या नाटकावर बेतलेल्या अत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी नाटकाची फक्त काही पानेच लिहून झाली होती॰ अत्रे आजारी पडले आणि निधन पावले;  त्यामुळे ते नाटक अपूर्णच राहिले॰ ) या पैकी  ‘मोरूची मावशी‘ हे नाटक १९८० च्या दशकात नव्याने सादर झाले आणि त्याने दोन हजार प्रयोग केले॰  ‘नाट्य – निकेतन‘लाही ‘कुलवधू‘ आणि ‘भटाला दिली ओसरी‘ यानंतर व्यावसायिक यश ‘तो मी नव्हेच !‘ याच नाटकाने मिळवून दिले॰ या नाटकाने मराठी रंगभूमीला दोन महत्त्वाच्या देणग्या दिल्या॰ एक अभिनेता, व्यवस्थापक आणि मालक प्रभाकर पणशीकर आणि दुसरी, फिरता रंगमंच !

जरी दोनशे प्रयोगांनंतर हे नाटक रांगणेकरांच्या हातून गेले असले तरी, हा विषय काही रांगणेकरांचा पिच्छा सोडेना ! माणूस तुरुंगातून सुटून आल्यावर जर समाजाने आणि त्याच्या नातेवाईकांनी त्याचा खुल्या मनाने स्वीकार केला नाही तर, तो परत पूर्वीचेच गुन्हे करावयास प्रवृत्त होतो; असा विषय घेऊन रांगणेकरांनी ‘पतित एकदा, पतित का सदा ?‘ या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली॰ ते नाटक सपाटून कोसळले ! याही नाटकात आत्माराम भेंडे यांनीच प्रमुख भूमिका केली होती॰ यामुळे अत्रे रांगणेकरांच्या इतके मागे लागले की त्यांनी ‘फजित एकदा, फजित का सदा ?‘ असा लेख लिहून या नाटकाची टर उडवली !

आचार्य अत्रे हे नि:संशय महान नाटककार ! अत्र्यांच्या नाटकांपैकी किमान दोन नाटके त्यांच्या विषयांमुळे कालातीत राहिली; ती म्हणजे ‘लग्नाची बेडी’ आणि ‘तो मी नव्हेच !‘ यांमुळेच वर्षे जात राहिली तरी ही नाटके टवटवीत राहिली ! मराठी रंगभूमीच्या इतिहासात यांची दखल घ्यावीच लागेल.

——————————————————————————————————————–
विशेष नोंद ठेवावी असे : 
१॰ कुठल्याही अभिनेत्याला आव्हान देणारी लखोबा लोखंडे ही पंचरंगी भूमिका ही गिरीश ओक सोडले तर अन्य कुणीही साकार केली नाही॰
२॰ या नाटकात लखोबा लोखंडेच्या मोठ्या भावाच्या तोंडी उर्दू संवाद आहेत॰ ते हिन्दी – मराठी चित्रपट सृष्टीतील प्रथितयश अभिनेते आणि आ॰ अत्र्यांचे मित्र गजानन जागीरदार यांनी भाषांतरीत केले आहेत॰
३॰ याच माधव काजीच्या कथानकावर गणेश कृष्ण बोडस ( गणपतराव बोडस नव्हेत॰ ) यांनी ‘मी तो नव्हेच‘ हे नाटक लिहून स्वत:च्या नाटक कंपनीतर्फे त्याचे गावोगावी कित्येक प्रयोग केले॰
४॰ दिल्लीहून निघालेले सर्व कलाकार प्रयोग करत मुंबईला येत असतांना वाटेत शहापूर येथे बसला अपघात झाला; आणि त्यात नटवर्य दत्तोपंत आंग्रे आणि नंदा पातकर ( सध्याची लोकप्रिय अभिनेत्री इला भाटेचे वडील ) यांचे निधन झाले॰
५॰ या नाटकावर अभिनेते, निर्माता – दिग्दर्शक गुरु दत्त हे हिन्दी चित्रपट निर्माण करणार होते॰ तसे त्यांनी अत्र्यांशी बोलूनही ठेवले होते॰ पण अत्र्यांनी मोहन सैगल नावाच्या निर्मात्याला चित्रपटाचे हक्क विकले॰ ते पाहून गुरुदत्त नाराज झाले॰ या सैगलने नवीन निश्चल नावाच्या सामान्य अभिनेत्याला ( हा खरं तर FTII च्या अभिनयातील अभ्यासक्रमात सुवर्णपदक प्राप्त केलेला अभिनेता॰ ) नायक करून ‘मै वह नही‘ नावाचा टुकार चित्रपट निर्माण केला॰ हे नाटक बघितल्यावर यावर चित्रपट निघाल्यास मी त्यात प्रमुख भूमिका करावयास तयार आहे, असे दिलीपकुमारने जाहीर केले होते॰
६॰ ‘नाट्य – निकेतन‘च्या  ‘हे ही दिवस जातील‘ या नाटकाचे तीन अंक रांगणेकर, ग॰ दि॰ माडगूळकर आणि वसंत सबनीस यांनी लिहिले होते॰
७॰ कोल्हापूरच्या म्हादबा मेस्त्रींनी यशस्वीपणे फिरता रंगमंच बनवल्यावर त्यांच्यावर ‘मराठा‘त अग्रलेख लिहून म्हादबांना ‘यंत्रमहर्षी म्हादबा मेस्त्री‘ अशी पदवी आ॰ अत्र्यांनी प्रदान केली !
८. ‘शिवसेने‘तून फुटून काँग्रेसमध्ये सामील झाल्यावर ‘गद्दार‘ छगन भुजबळ यांचा ‘सामना‘ या दैनिकात ‘लखोबा लोखंडे‘ असा उपहासात्मक उल्लेख कायम होऊ लागला॰ काही वर्षांपूर्वी भुजबळांनी ठाकर्‍यांशी जुळवून घेतल्यावर हा उपहासात्मक उल्लेख ( एकदाचा ! ) थांबला !
९. मामा वरेरकरांनी अत्र्यांना नाटकाचे श्रेय देण्याचे नाकारत ” नाटक रांगणेकरांनी चांगले बसवले आहे, म्हणून परिणामकारक वाटते, ” असे उद्गार काढले॰ ” मग याच रांगणेकरांनी बसवलेले तुमचे  ‘भूमिकन्या सीता‘ का कोसळले ? “, असा सडेतोड प्रतिप्रश्न करून अत्र्यांनी वरेरकरांना तेथेच गप्प बसवले !
१०॰ एका महोत्सवी प्रयोगाच्या समारंभात प्रमुख पाहुणे समाजवादी पुढारी नाथ पै यांनी माधव काजीच्या मनोवृत्तीचे अचूक आणि मार्मिक विश्लेषण केले होते॰
११. या व्यवसायात आर्थिक दृष्ट्या टिकायचे असेल तर नाटक कंपनी ही  प्रा॰ लि॰ कंपनी  करून पूर्ण व्यावसायिकतेने धंदा चालवावा, असा व्यावहारिक सल्ला ‘विको‘ चे कार्यकारी संचालक गजूभाऊ पेंढारकर यांनी पणशीकरांना दिला होता॰
१२. ८ ऑक्टोबर २०१२ रोजी या नाटकाला ५० वर्षे पूर्ण झाली॰ नुसतेच विक्रमी नव्हे तर एक कायम तात्कालिक, सामाजिक संदर्भ असणार्‍या या नाटकाची दखल, ना  निर्माते ‘ नाट्यसंपदा ‘ने घेतली; ना
वर्तमानपत्रांनी, याचा खेद वाटला.
——————————————————————————————————————–
छायाचित्र गुगलवरून साभार
– प्रकाश चान्दे
मोबाईल : 9820847692॰
*************************************************************************************************
 
‘ मैत्री ‘ च्या दीपावली २०१३ विशेषांकाचे पुढील आकर्षण 
 
लो. टिळकांचा मोठेपणा – प्रसाद कोल्हटकर
 
 **********************************************************************************
Advertisements

11 thoughts on “सर्वार्थाने विक्रमी : ‘ तो मी नव्हेच ! ‘

  • from: dr.s.j.

   ” तो मी नव्हेच ” मराठी नाट्य सृष्टीतील एक ‘ मैलाचा दगड ‘.
   नटवर्य प्रभाकर पणशीकरांनी नाट्यप्रेमी मराठी प्रेक्षकाना यातल्या विविध भूमिकांनी भारावून टाकलं. अनेकांनी हे नाटक अनेक वेळा पाहिलं.
   मी मुंबई मराठी साहित्य संघ, केळेवाडी येथे तीन वेळा हजेरी लावली. पहिला योग या नाटकातील एक अत्यंत उत्साही, नाटकवेडे कलावंत पुरुषोत्तम बाळ यांच्यामुळे आला.
   नाटकाच्या जन्मापासून, पडद्द्यामागच्या विविध घटना श्री प्रकाशजी चांदे यांनी छान चित्तवेधक शब्दात रंगवल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
   आणि जुन्या आठवणीना उजाळा दिल्याबद्दल आभार. प्रिय मंगेशजी असे सुंदर योग नेहमी घडवून आणतात; त्यांचेही मनापासून आभार.
   शरद जोगळेकर.

   • ‘तो मी नव्हेच’ या गाजलेल्या मराठी नाटकाच्या समग्र वाटचालीचा आढावा म्हणून श्री प्रकाश चांदे यांनी लिहिलेला एक वाचनीय लेख असे म्हणून त्याचे वर्णन पूर्ण होत नाही. प्रकाश चांदे यांनी यापूर्वी साधना साप्ताहिकात अनेक हिंदी चित्रपटांच्या निर्मितीचा असाच घेतलेला आढावा जेव्हा जेव्हा मी वाचत होतो, तेव्हा त्यांना माझा अभिनंदनाचा इमेल जात असे. या वेळी मैत्रीच्या दिवाळी अंकासाठी मी आवाहन केले होते. ते वाचून त्यांनी हा लेख धाडला. चांदे यांचा आणखी एक असाच रोचक लेख लवकरच आपल्या भेटीस येत आहे.
    मंगेश नाबर

 1. सुंदर लेख. या अजरामर नाटकाच्या संदर्भातल्या घटनांची मनोरंजक माहिती दिल्याबद्दल श्री प्रकाश चांदे यांचे आभार.
  -मुकुंद कर्णिक

 2. श्री प्रकाश चांदे यांनी परिश्रम घेऊन लिहिलेला हा लेख म्हणजे एक उत्तम दस्तावेज आहे.

  विशेषतः क्र. १२ ची नोंद मला महत्वाची वाटते। या नाटकाला गुदस्ता ५० वर्षे झाली याची प्रसार माध्यमातील कुणीही दखल घेतलेली नाही याची खंत वाटते। श्री चांदे हे अभिनंदनास पात्र आहेत।

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s