नानांच्या कवितेतील राधा

यशवंत कर्णिक

 
 
 

‘नाना’ म्हणजे ज्येष्ठ गोमंतकीय कवी मनोहर सावळाराम नाईक, पेडणे, गोवा. कविवर्य बा.भ. बोरकर यांचे निकटवर्ती. त्यांचे चार कवितासंग्रह व दोन समीक्षा  ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. विश्व चरित्र कोशालाही त्यांनी लक्षणीय योगदान केले आहे.  आज त्यांचे वय आहे एकोणनव्वद वर्षे. त्यांची कविता अत्यंत प्रासादिक आहे. त्याची  झलक प्रस्तुत लेखात आहे.  

 
  
        श्रीकृष्णाची प्रिय सखी राधा बहुतेक सर्व भारतीय कवींच्या कलाकृतींची विषय होऊन गेलेली  आहे. श्रीकृष्णाच्या सोळा सहस्र मैत्रिणीमध्ये  राधेला जे महत्व आले आहे ते त्याच्या अष्टनायिकानाही मिळालेले नाही. हजारो वर्षं उलटली तरी आजही धर्मग्रंथांत, काव्यात आणि जयघोषात  कृष्णाच्या आधी राधेचं नाव घेतलं जातं.
          पुराणं असं सांगतात की श्रीकृष्ण जेव्हा मथुरेहून वृंदावनात आला त्यावेळी तो दहा वर्षांचा होता. साहजिकच तो समवयस्क मित्रमंडळींत मिसळला. ते बहुतेक सर्व गोप व गोपी (गुराखी ) होते. राधा ही दहा वर्षे वयाची  चुणचुणीत  गोपी त्याची विशेष मैत्रीण झाली. तारुण्यात पदार्पण केल्यानंतर स्वाभाविकपणे ते एकमेकांचे  प्रेमिक झाले.
          ब्रह्मवैवर्तानुसार राधा ही  वृषभानू व  कलावती ह्या वैश्य दाम्पत्याच्या पोटी  जन्मली होती. भाद्रपद शुध्द  अष्टमी हा  दिवस  राधाष्ट्मी म्हणून साजरा केला जातो. राधेच्या जन्माबद्दल वेगवेगळ्या कथा पद्मपुराण, नारदपुराण, आनंद रामायण वगैरे ग्रंथांत  दिल्या आहेत. काही पुराणांनुसार ती अविवाहित होती तर काहींनुसार विवाहित होती नि तिच्या पतीचे नाव रायांणा वा आयंघोष होते. ब्रह्मवैवर्ताने  तिला रुक्मिणी व सत्यभामा यांच्याप्रमाणे कृष्णाची पत्नीच मानले आहे. ती विष्णुपत्नी लक्ष्मी हिचा अवतार होती असे म्हटले आहे. विष्णूने श्रीकृष्णावतार घेतल्यावर लक्ष्मी राधारूपात त्याच्या मागे आली असे म्हटले आहे. काहींच्या मते राधा अस्तित्वातच नव्हती; ती श्रीकृष्णाची मिथ्यरूपातील प्रेयसी आहे. एवढे खरे की अतिप्राचीन ग्रंथांत राधेचा उल्लेख नाही. सातवाहनांच्या काळात, म्हणजे ख्रिस्तोत्तर पहिल्या वा दुस-या शतकात तिचा पहिल्यांदा उल्लेख झाला. तिच्या नावाला झळाळी प्राप्त झाली ती बाराव्या शतकात संस्कृत कवी हरीशरण जयदेव याने रचलेल्या ‘गीत गोविंद’ ह्या काव्याने. भारतीय मन सौंदर्यपूजक व शृंगारप्रिय असल्यामुळे  राधा रूपमती मानली गेली. जय्देवाने तर तिला प्रणयिनी बनवले. श्रीकृष्णाच्या पत्नी व अष्टनायिका माजघरात राहिल्या नि राधा वृंदावनात श्रीकृष्णासमवेत  उघडउघड रासक्रीडा करू लागली. त्याला मधुराभक्तीचं  स्वरूप आलं. भक्तीसंप्रदायी लोक कृष्णाच्या आधी राधेचा जयघोष करू लागले. रासक्रीडेचं शृंगारिक वर्णन भक्तांना खटकलं नाही. उलट ते भावमय नि भक्तीस्वरूप वाटलं.
          सोळाव्या शतकातील संत एकनाथ महाराजानाही राधेच्या अनुपम सौंदर्यावर नि विभ्रमांवर गौळण लिहावीशी वाटली.
         एकोणीसाव्या नि विसाव्या शतकातील मराठी कवीनाही शृंगारिक काव्यासाठी  राधा – कृष्ण हे जोडपं सोयीस्कर वाटलं यात नवल नाही. त्यात गोमंतकीय कवीही मागे राहिले नाहीत. द.वा. कारे, बा.भ बोरकर, मनोहर नाईक आदि ज्येष्ठ  कवींनी त्यांना आपल्या काही कवितांचे नायक -नायिका केले. त्या कविता काव्यगुणांनी समृद्धच आहेत. बोरकरांची ‘मीलन क्षेत्र ‘ ही कविता (संग्रह ‘चित्रवीणा’) विशेष उल्लेखनीय आहे. तिच्यात  निसर्गाच्या विभ्रमांची प्रतीके म्हणून बोरकरांनी राधा व कृष्ण यांच्या प्रणयाचा वापर केलेला आहे. पण ती बोरकरांची खासियतच होती.
    ” संध्या राधा तांबूस गोरी उन्मद्पद गतिमंद
       यमुना-स्नाना धापत आली जपत मनी गोविंद
       न सहुनी मोहनदाह सोडिता श्वास कंचुकी बंध
       सहज तिच्या चाळ्यातुन सुटले वाळ्याचे रतिगंध
       अंचल उडता कंपित स्तंभित चंचल पवन-कदंब
       धर्मचलाने सचैल भिजला झाला ओलाचिंब
       यमुना वदली नको राधिके उघडी टाकू पाठ
       लोचन पापी सोडवु दे मज कचभाराची गाठ 
       हरीप्रतिबिंबे लहरत होती यमुना उतट तुडुंब
       डुंबत होती धुंद राधिका पिळीत पिवळे लिंब
       वंशवनातुन व्यंकट लोचन तिमिर चोरटा कृष्ण
       उष्ण उसासे टाकीत खिळला बघत तिला सतृष्ण
       निळी होउनी उठली राधा पिळू लागली केश
       मोर होउनी गिळू  लागला जलमौक्तिक हृषीकेश
       पिसापिसातुन फुटू लागले नक्षत्रांचे नेत्र
       या चित्राने रात्र जाहली अक्षय मीलन-क्षेत्र. ” 
         बोरकरांनी स्त्रीसौंदर्याला व स्त्रीपुरुष प्रणयाला केंद्रस्थानी ठेवून अनेक सुंदर कवितांची निर्मिती केली असली तरी राधा व कृष्ण यांच्यावर त्यांनी केलेले काव्य अगदीच थोडे आहे. इतर काही कवींमध्ये भक्तीची नि आध्यात्माची प्रेरणा प्रबळ ; त्याचं प्रतिबिंब त्यांच्या काव्यावर पडे. बोरकरांचा तो पिंड नव्हता.
         राधा व कृष्ण यांच्या प्रणयी जीवनावर मोकळेपणाने लिहिणारे दुसरे गोमंतकीय कवी आहेत मनोहर सावळाराम नाईक, जे आजमितीस ८९  वर्षांचे आहेत तरीही लिहिते आहेत. २००५ साली त्यांचा कवि जयदेवाच्या ‘गीत गोविंद’ ह्या सुप्रसिद्ध नृत्यकाव्याचा रसाळ पद्यमय अनुवाद प्रसिद्ध झाला. त्याला विख्यात विचारवंत कै. राम शेवाळकर यांची प्रस्तावना आहे. मनोहर नाईक हे माझे परम मित्र आहेत. त्यांना मी ‘नाना’ म्हणतो. ते मला ‘भाई’ म्हणतात. ते मला वय,  अनुभवानं आणि साहित्यिक म्हणूनसुद्धा ज्येष्ठ आहेत.
        वास्तविक नानांचा पिंड आध्यात्मिक, जीवनाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी नितळ,  भावपूर्ण , सौंदर्यसक्त  पण  थोडी   पारमार्थिकही.  याचा अर्थ असा नाही की त्यांच्या कविमनाला मानवी व्यथा, दुःख, अन्याय वा जीवनातील विसंगती दिसत नाहीत. एका कवितेत त्यांनी केलेलं भाष्य अर्थपूर्ण आहे.
         ” हा मानव आतून दुष्ट, पाशवी क्रूर
            सभ्यता, बंधुता हा केवळ उपचार
            ही वसुधा भासे स्नेहलतेने  सजली
            अंतरी हिच्या पण लाव्हा अन अंगार ”
         ह्या लेखात मात्र मी त्यांच्या सौंदर्यासक्त मनाची अभिव्यक्तीच फक्त विचारात घेणार आहे नि ती देखील राधा व कृष्ण यांच्या संदर्भांपुरतीच.
         जयदेवांनी ‘गीतगोविंद’ ची रचना ज्या चंद्रकांत जातीत केली आहे त्यातच नानांनी रचलेली ‘विरहिणी’  ही अष्टपदी चपखल जाऊन बसते.
      ” ऋतू कुसुमाकर हा उधाण आले चैत्रा
         तरूलतांत फुलली मधुमासाची जत्रा
         हा मंद वाहतो गंधित मलयसमीर
         राधेच्या गात्री चैत्र मातले सत्रा ”
      राधा व कृष्ण यांचा हा शृंगार चालला असताना राधेचं वय काय असावं असा प्रश्न मनात निर्माण झाला तर त्याचं उत्तरही कवीनं  शेवटल्या ओळीत मोठया खुबीनं  दिलं आहे. राधा त्यावेळी सतरा वर्षांची होती म्हणजे ऐन भरात होती.
       ” मकरंद धुंद लव उन्मिलीत सारंगे
         त्या परी नयन जड प्रणयमदाच्या संगे
         विमनस्क उसासत स्मरसुंदर स्मरणाने
         ताणले चाप जणु लावून बाण अनंगे //
         त्या मदनशरांनी विद्ध जाहली राधा
         तापली तनुलता होऊन मोहन बाधा
         कुच अधिकच उन्नत तंग कंचुकी-बंध
         हा विरहव्यथेचा प्रकार नाही साधा //
         आठवले कालच पूर्णचंद्र उदयाला
         हिंदोळत होता तरुशाखेवर झूला
         त्या हिंदोळ्यावर कृष्ण आणखी राधा
         त्यासवे गळ्यातील शुभ्र फुलांच्या माळा //
         वेढले हरीने राधेला करपाशी
         ओढिले आणखी निकट तिला हृदयाशी
         देखिली मेखला कटिवरुनी  ढळताना
         मी उभीच होत्ये तेथून दूर जराशी // ”
याचा अर्थ असा की हा प्रणय सुरू असताना राधेची सखी तिथंच जवळपास उभी होती. साहजिकच तिच्या मनात ते पाहून लज्जा उत्पन्न झाली.
      ” लाजून जाहले अगदी चूर मनात
         तो चंद्रबिंबही लपले कृष्णघनांत
         मी पुढे आणखी तिथे थांबल्ये नाही
         परतल्ये घरा शोधीत तमातून वाट // ”
सखीच्या मनात रात्रभर विचारांचे तरंगच येत राहिले.
      ” कुणि कसे जपावे स्वतःस वयसाकाळी
         राधा तर कृष्णास्तव धरणीवर आली
         तो अंगसंग नच मीलन जणु प्राणांचे
         ती समर्पणातच अशी अलौकिक झाली //
         मी विचार करत्ये अता कालच्या रात्री
         किती अमृत  स्रवले असेल तिचिया गात्री
         यापुढे सतत ती विरहिणीच राहील
         वाहेल जोवरी जल यमुनेच्या पात्री  //
          नानांची ‘निळी’ ही कविता राधेच्या प्रणयी भावभावनाना भक्तीचा स्पर्श करून देते.
       ” आज पहाटे स्वप्नी आला घनःश्याम श्रीहरी
          अधरांवर मम अधर ठेवले धरून मजला उरी
          बावरल्ये मी झाले जागी  तेव्हापासून अशी
          निळ्या भ्रमाने चित्त भारुनी झाल्ये वेडीपिशी
          मंचक दिसला निळा जाहला निळी जाहली शेज
          निळ्या  सकाळी निथळत होते निळ्या नभाचे तेज
          निळ्या जळाने भरले दिसले निळे होऊनी घडे
          निळावल्या प्राजक्ताखाली  निळ्या फुलांचे सडे
          निळी पाखरे निळी वासरे निळा वायुचा छंद
          निळ्या आसमंतातुन सुटले निळे निळे सौगंध
          व्याकुळले मी गमले मजला मीच जाहले निळी
          निळेनिळे का दिसते सगळे मला जळी अन स्थळी
          धावत आल्ये घरी आरशा पुढे राहिल्ये उभी
          निळ्या दर्पणी मुळी दिसेना माझी मजला छबी 
पण ही  आध्यात्मिक भावना सर्वच काव्यात राहत नाही. ती निखळ  शृंगार अभिव्यक्त करायला मागेपुढे पाहत नाही. उदाहरणार्थ ‘लाजून  चूर’ ह्या कवितेतल्या अखेरच्या  काही ओळी :
            “मातले  रान मातले प्राण खळाळे पायात नीर 
              पहाते जेथे अनंग तेथे उभा हा रोखून तीर
              अशा या वेळी झाल्ये मी खुळी  ऐकून वेणूचे सूर
              जवळ बाई मोहन नाही तरी मी लाजुन चूर”
तशाच ह्या ओळी सुद्धा :
            ” हरिने आव आणला भोळा, फसले बाई
               माझेच साठी बांधला झूला, बसले बाई
               हरिने मला घातला डोळा, हासले बाई
               गळ्यात माझ्या घातला गळा, सोसले बाई
               हरिने केला देहाचा चोळा, बासले बाई
               सगळे झाले गोकुळ गोळा, दिसले बाई
               हरिने दिला आपला शेला, नेसले बाई
               खरेच सारे स्वप्नात मला, भासले बाई ”
      ह्या भावना फक्त श्रीकृष्णाची प्रियसखी राधा हिच्याच मनात येऊ शकतात कारण ती पूर्ण कृष्णमय होऊन गेली होती. तिच्या मनातील भावनाना ती किती विलक्षण सुंदर  शब्दांत वाट करून देते पहा :
     ” आनंदाचा रंग जसा मेघ निळा निळा
        मज त्याचा लळा असे लागला गे माये
        आनंदाच्या मुखा बाई गोरसाचा वास
        मज त्याचा सोस असे लागला गे माये
        आनंदाचा स्वर जसा मुरलीचा नाद
        मज त्याचे वेड असे लागले गे माये
        आनंदाच्या कपोलास अमृताची रुची
        मज त्याची ओढ असे लागली गे  माये
        आनंदाच्या शिरी मोरपीस शोभतसे
        मज त्याचे पिसे असे लागले गे माये
        आनंदच मूर्त नंद-नंदन सुहास
        मज त्याचा ध्यास असे लागला गे माये
        भेटता गोविंद उरी आनंदी आनंद
        तेवढाच छंद आता उरला गे माये ”
        सगळी सृष्टीच कृष्णमय झाल्यामुळे तिच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. नानांनी हे किती सुंदर शब्दांत अभिव्यक्त केले आहे. नाना ज्ञानदेवांचे असीम भक्त आहेत. ज्ञानेश्वरांच्या  वाणीचा प्रभाव त्यांच्या काव्यावर झाला असल्याचे जाणवल्यावाचून राहत नाही.
         नानांच्या काव्यातील राधा ही जशी कृष्णाची प्रणयिनी आहे तशी आराधिकाही आहे. तिचे श्रीकृष्णावरील प्रेम वैषयिक तर खरेच पण ते अशरीरही आहे. ते पारमार्थिक व  अध्यात्मिक पातळीवरही उतरू शकते. नानांनी ते आपल्या अनेक कवितांत निरनिराळ्या स्तरांवर शब्दबद्ध केले आहे. राधा हे देवी लक्ष्मीचे रूप असेल तर त्यांच्या संबंधाना आपोआपच एक उदात्तता प्राप्त होते. पण ती कविकल्पनेतली कुणी कृष्ण-प्रणयिनी गोपी  असेल तरी काही फरक पडत नाही. ते एक लोभस व्यक्तिमत्व आहे यात शंकाच नाही. भक्तीवान्ग्मयात सुद्धा तिला एक महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. तिलाच नाही तर गोकुळातल्या सर्व गोपिकानाही. तुकाराम महाराजांनी  एका अभंगात त्यांचे गुणगान केले आहे :
    ” धन्य ती गोधने कांबळी काष्टीका
       मोहरी पांवा निका ब्रीद वांकी  //
       धन्य ते गोकुळ धन्य ते गोपाळ
       नर नारी सकळ धन्य झाल्या //
       धन्य ते देवकी जसवंती  दोहींचे
       वसुदेवनंदाचे  भाग्य झाले //
       धन्य त्या गोपिका सोळासहस्र बाला
       यादवा  सकळा धन्य झाले
       धन्य म्हणे तुका जन्मा तीचि आली
       हरिरंगी रंगली सर्वभावे // ”
 
                      ***          ***        ***
( राधाकृष्णाचे चित्र : प्रख्यात चित्रकार राजा रविवर्मा यांनी रेखाटलेले  असून विकिपीडियावरून साभार.)
यशवंत कर्णिक 
९०२ ग्लेन ईगल, गं.दे. आंबेकर मार्ग, परळ गाव, 
परळ, मुंबई ४०० ०१२. 
सेल : ९७ ६९ ६५ २९ ११
इंटरनेट :  karnikyeshwant@gmail.com     
 
श्री. नाना नाईक यांचा वरील परिचय वाचून साहजिकच वाचक मित्रांना नानांच्या सध्याच्या काळातील  कविता वाचण्याची इच्छा झाली तर नवल कसले ?  त्यांच्या दोन कविता ‘मैत्री २०१२’ अनुदिनीवर  लवकरच प्रकाशित होतील.
मैत्री२०१२ अनुदिनीचे मुखपृष्ठ सजवले आहे श्री. अशोक यशवंत कर्णिक यांनी.  छत्रपती शिवाजी टर्मिनसचे त्यांनी काढलेल्या पेंटिंगचे हे छायाचित्र आहे. श्री अशोक कर्णिक यांच्याबद्दलची माहिती खालीलप्रमाणे :
जन्म – कोल्हापूर – ११ जुलै, १९६०. 
शिक्षण – गोवा कॉलेज ऑफ आर्ट, पणजी येथून पदवी (१९८०). 
व्यवसायक्षेत्र – मुंबई – सध्या इग्नायटी डिजिटल स्रर्व्हिसिस लिमिटेड जाहिरात कंपनीत एक्झिक्युटिव्ह क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून कार्यरत. 
 २०११ मध्ये पुणे येथे त्यांनी काढलेल्या  सचिन तेंडुलकर यांच्या पेंटिंग्जच्या  प्रदर्शनाचे उदघाटन लता मंगेशकर यांच्या हस्ते झाले होते. सचिन यांना भेट म्हणून दिलेले एक सचिन यांचे  पोर्ट्रेट  त्यांच्या नवीन बंगल्यात लावले आहे. 
 अनेक देशी व परदेशी पारितोषिकांचे मानकरी. कान (Cannes) प्रदर्शनात दर वर्षी हजेरी. 
 पत्नी व दोन मुलांसह वर्सोवा (मुंबई) येथे वास्तव्य.
Advertisements

10 thoughts on “नानांच्या कवितेतील राधा

 1. श्री मनोहर नाईक यांच्या सुंदर, अलंकारिक भाषेतील राधा-गोविंद प्रेमातील उत्कटता भाईनी त्यांच्या अप्रतिम शैलीत आणि अगदी श्री नाईक यांच्या कविता आवर्जून वाचाव्याश्या वाटाव्यात इतक्या सुंदर, परिणामकारक शब्दात सादर केली आहे. श्री नाईक यांच्या कविता लवकरच मैत्री अनुदिनीवर वाचायला मिळण्याचे श्री मंगेशरावांनी दिलेले संकेत स्वागतार्हच आहेत. उत्कंठेने प्रतीक्षा आहे.
  -मुकुंद कर्णिक

 2. प्रतिभावंत कवीच्या काव्यातील माधुरी अलौकिक असते. आणि तिचा योग्य आस्वाद घेण्यास तसेच प्रतिभाशाली रसिकमन हवे.श्री कर्णिक यांच्या प्रस्तुत लेखातून त्याप्रमाणे समसमा संयोग झालेला दिसून येतो. राधा व कृष्ण यांच्यातील क्रीडेवर आपल्या कित्येक कवींनी आपली प्रतिभा पणास लावली आहे. कै. बा.भ. बोरकर आणि इतर कवींच्या काव्याला साजेसे काव्य नाना नाईक यांनी सादर केले आणि त्याचा रोचक परिचय श्री. कर्णिक यांनी करून दिल्याबद्दल आभार मानावेसे वाटतात. नाईक यांच्या अलीकडील कविता आपण आता प्रसिद्ध करणारच आहात. वाट पाहातो.
  वि.प.

 3. राधा व कृष्ण यांच्या चिरंतन प्रेमाला अनेक कवींनी प्रणय आणि त्याबरोबर शृंगार यांची जोड़ दिलेली आहे. श्री. नाना नाईक यांनी मात्र आपल्या कवितेत संयमित शृंगार आणला आहे. नाईक यांना त्या प्रेमात भक्तीही प्रेरित होती. श्री. कर्णिक यांनी नानांच्या या कवितेचा करून दिलेला परिचय त्यांची समग्र कविता वाचकांना वाचायला लावणारा आहे, यात शंका नाही. नाईक यांचा समीक्षा ग्रन्थ कोणता असेल,याची चौकशी केली पाहिजे. आपण या लेखासोबत दिलेले चित्र आवडले.

 4. नाटक असो, चित्रपट असो, वा क्रिकेट, कॆरम, फुटबॊल…. खेळ सावकाश सुरू व्हावा आणि बहरत जावा…ते बहरणे कळूही नये असा यशवंत कर्णिकांचा हा लेख बहरत गेला आहे. कसलेल्या लेखणीचे कौशल्य जाणवते. दुधात साखरेप्रमाणे बोरकरांची कविता, व केशराप्रमाणे रवीवर्मांचे सुंदर चित्र खुमारी वाढविते.
  नानांची कविता नाजुक व सुंदर. मूर्तीमंत कृष्ण मनापुढे उभा करते. राधेचे सौंदर्यही.
  संपादकांच्या आश्वासनामुळे या लेखाला ट्रेलरचे स्वरुप आले आहे. नानांच्या कवितांचा चित्रपट रीलीज होण्याची वाट पहातोय. फक्त अलिकडच्याच नव्हे तर जुन्याही कविता हव्यात…… म्हणजे नानांच्या तारुण्यातल्याही.
  प्रद्युम्नसंतु

 5. Dear Bhai,
  Thanks for your very affectionate words about my poetry. You know that I have not written a single poem during the last sixteen years for the simple reason that I do not want to harness my aflatus which has (it appears) left me. However I would be glad if you bring my old poems to the notice of poetry lovers. Thank you once again.
  Affectionately yours,
  Nana

 6. आपली अनुदिनी प्रथमच वाचनात आली. काव्य-शास्त्र-विनोद यांच्या बहु अंगांनी नटलेली आपला अनुदिनी वाचणे हा एक आनंद लाभला.
  आपण मुखपृष्ठावर दिलेले छायाचित्र नजरेत भरण्यासारखे आहे. श्री. अशोक कर्णिक यांचे ख़ास अभिनन्दन. यापूर्वीचे छायाचित्र कुणी काढले होते ? तोदेखिल धरणाचा एक विहंगम देखावा होता.
  श्री. यशवंत कर्णिक, श्री. अवधूत परळकर, श्री. लक्ष्मण लोंढे, श्री. मंगेश नाबर यांच्या सोबतीने आपल्याला इतरही काही दर्जेदार साहित्य निर्माण करणारे लेखक व कवी लाभले आहेत. श्री. प्रद्युम्न सन्तु, श्री. मुकुंद कर्णिक व श्री. शंभुनाथ गानु यांची काव्ये बहार आणत आहेत. आपली पुढील वाटचाल यशस्वी होवो.
  चिदानंद

  • श्री. चिदानंद,
   आपल्या अभिप्रायाबद्दल आभार. यापूर्वीचे मुखपृष्ठ तुंगभद्रा धरणाचे होते. ते श्री. गणेश नाबर यांनी खेचलेले होते.
   मंगेश नाबर.

 7. आपल्या मैत्री२०१२ अनुदिनीवर श्री. यशवंत कर्णिक यांनी लिहिलेला ज्येष्ठ गोमंतकीय कवी श्री. नाना नाईक यांच्या कवितेतील राधा हा आस्वादात्मक लेख वाचला. श्री. नाईक यांचे इतरही काव्यसंग्रह रसिकांना परिचित आहेत. अलीकडील कालात मात्र मराठी नवकाव्याचे प्रवर्तक कै. बा.सी.मर्ढेकर यांच्या नवकवितेबद्दल प्रतिकूल मत मांडणारे नानांचे लेख ‘अंतर्नाद’ मासिकात प्रसिद्ध झाले. त्या पुढे जाऊन नानांनी आपल्या उतारवयात अनेक दुखणी त्रास देत असुनही लक्ष वेधून घेणारा तब्बल चारशे पानांचा एक समीक्षाग्रन्थ लिहिला. त्यासंबधात लिहिणे मला आवश्यक वाटले, म्हणून हे पत्र. शिवाय एका वाचक भगिनीने तशी पृच्छा केली आहे.
  ‘मृगजलाच्या लाटा’ ( डॉ. विजया राजाध्यक्षान्च्या मर्ढेकर-महात्म्याशी प्रतिवाद ) असे त्याचे नाव आहे. काव्यलोलुप व चिंतनशील व्यक्तित्व असलेल्या नानांना मर्ढेकरांच्या काव्यातील दुर्बोधता अजिबात सहन झाली नाही. किंबहुना, त्यातील बरेच अशुद्ध शब्द, विचित्र वाक्य-रचना, असंबद्ध विचार, छंद-दोष त्यांना कृत्रिम वाटले. मर्ढेकरांच्या कवितेची दूसरी बाजू जणू त्यांना उजेडात आणायची होती. या समीक्षाग्रंथात नानांनी मर्ढेकरांच्या जवळजवळ प्रत्येक कवितेवर निरिक्षण आणि त्यांच्या कवितेवरील विजयाबाईंच्या समर्थनावर टीका केली आहे. मर्ढेकरांना ज्या ज्या प्राध्यापक व कवींनी डोक्यावर घेतले, त्यांना नानांनी परखडपणे प्रश्न केले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे हे पुस्तक प्रकाशित होऊन आज दोन तीन वर्षे झाली असावीत. यावर साहित्य जगतात कोणते विचार मंथन झाले आणि त्या संबंधात खुद्द नानांचे विचार, त्यांना अधिक त्रास न देता, वाचण्याची इच्छा व्यक्त करतो.
  आपला,
  कमलाकर गोटखिंडी

  • श्री. गोटखिंडी,
   आपल्या आभिप्रयाबद्दल आणि माहितीसाठी आभार मानतो. आपण केलेली विनंती सबंधित वाचतील अशी अपेक्षा आहे.
   मंगेश नाबर.

 8. Radha ani krushacha shrungar agadi sanyamit swaroopamadhye kavitet aalela aahe. Chhan padhya rachana ahe. Yashwantravanche manahpoorvak abhar. Tyani ek vegalyach dhataniche kavya vachanyachi sandhi upalabdha karun dili ahe.
  Shambhunath Ganu.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s